अंबरेश्वर मंदिर :- ( Ambareshwar Mandir)
मुंबई उपनगरातील अंबरनाथ येथे असलेले अंबरेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि भारतीय शिल्प्कारीतेचा एक उत्तम नमुना आहे. हे मंदिर बघायचा योग आज आला आणि इतके वर्ष ह्या ठिकाणी का आलो नाही हा प्रश्न पडला इतकं अप्रतिम मंदिर आहे. मंदिर परिसर स्वच्छ आणि आवरलेला बघून खरच आनंद वाटला. मंदिराची देखरेख करण्याऱ्या समितीचे मनपासून आभार.
मंदिराचे बांधकाम साधारण शके
९८२ इतके पुरातन आहे. शिलाहार राजा चीत्तारजा ह्याने ह्या अप्रतिम मंदिराचे
बांधकाम केले असून त्याचा मुलगा राजा महामंडलेश्वर माम्बानी ह्याने १०६० रोजी
मंदिराची पुनर्बांधणी केली असे मानले जाते. हेमाडपंथी बांधकाम पद्धतीने मंदिराची
बांधणी केलेली आहे.
काळ्या दगडात बांधलेल्या ह्या मंदिरात अनेक देवी देवतांची
शिल्पे बघायला मिळतात. लक्ष्मीची मूर्ती, शिवलिंग, शंकराची मूर्ती ,पार्वती, नरमुंडधारी महाकाली, शंकर पार्वती विवाह, हंसा वर आरूढ ब्रम्हदेव, वराहरुढ विष्णू ,ऊजव्या सोंडेचा गणपती, त्याच बरोबर विविध नृत्यांचे आविष्कार व काही शृगांरिक कामशिल्पे कोरलेली दिसतात. मंदिराला एकूण तीन
दरवाजे आहेत आणि मंदिरा चा प्रमुख दरवाजा हा पश्चिमेला आहे.
मंदिराच्या दरवाजात
दोन नंदी आहेत त्यातला खाली असलेला नंदी हा मंदिरा इतका प्राचीन आहे तर चौथऱ्यावर
स्थापित नंदी हा अलीकडचा आहे. तो कोणी नवस केल्यावर मंदिराला दान केला असं तिथे
विचारणा केल्यावर कळलं. मंदिराच्या मागच्या बाजूला एक पाण्याच्या वाटी सारखी दगडी
वाटी दिसते तिथून शंकराची पिंड सरळ दिसायची असं समजलं पण सध्या ते दर्शन बंद
करण्यात आलेलं आहे.
मंदिराचे कोरीव काम हे
खरोखरीच अप्रतिम आहे अर्थात दगडाची जी झीज होते ती झालेली आहे. हे मंदिर सुद्धा इंग्रजांच्या काळात कोणा एका
इंग्रजाला सापडलं आणि परत ते वावरत आलं असं समजलं. मंदिराचा गाभारा हा जमिनीपेक्षा
खाली असल्याने छोट्याश्या दरवाजातून १०-१२ पाहिऱ्या उतरून मग शिवलिंगापर्यंत पोचता
येते. दोन नंदी प्रमाणे मंदिरात शिवलिंग
सुद्धा दोन आहेत. त्यातले एक शिवलिंग काळ्या रंगाचे आहे जे स्वयंभू आहे तर दुसरे
शिवलिंग गारगोटीचे आहे. गाभाऱ्यात बरून सूर्यप्रकाश व हवा यायला झरोका आहे. आणि
गाभाऱ्यात काही चिमण्यांनी आपली घरटी सुद्धा मांडली आहेत. मंदिरात असलेले चार खांब
आणि छतावरील कोरलेली झुंबर खरोखर आपलं लक्ष लगेच वेधून घेतात .
मंदिरा शेजारी बांधलेला तलाव आहे आणि त्यात उन्हाळात ही पाणी बघायला मिळतं. ह्या छोट्या तलावात मासे कासवं सोडलीली आहेत. हा तलाव देखील दगडात कोरून काढला असून पायऱ्या तसेच चारी कोपऱ्यात शिल्प कोरलेली आहेत.
मलंग गडाच्या पायथ्याशी उगम पावणारी वालधुनी नदी मंदिराला लागुनच वाहते. पण उन्हाळ्यात मात्र नदीचे पात्र फारच रोडावते आणि त्यात नदीत सोडलेल्या गटारीमुळे असेल अदाचीत पण नदीचे पाणी अतिशय खराब दिसते. नदीच्या मध्ये सुद्धा एक शिवलिंग आणि त्याच्या भोवती एक भगवा झेंडा रोवलेला दिसतो. अंबरेश्वर मंदिरामुळेच ह्या गावाला अंबरनाथ असं नाव पडलं असावं असं वाटत.
इथे पोचण्यासाठी अंबरनाथ पर्यंत लोकलने जाऊन , अंबरनाथ पूर्व बाजूला शेअर रिक्षा उपलब्ध आहेत, साधारण १० रुपये प्रती प्रवासी दराने ह्या रिक्षा आपल्याला मंदिरापर्यंत नेतात. मंदिर साधारण २ कि मी लांब आहे त्यामुळे वेळ असल्यास चालत २५ मिनिटात मंदिरापर्यंत पोचता येते
अम्बरेश्वर मंदिर गुगल नकाश्यावर : -
लोनाड ची लेणी (Lonad Caves) - खंडेश्वरी देवी
| लोनाड ची लेणी (Lonad Caves) |
ही बौद्ध लेणी कल्याणच्या जवळ आहेत. सध्या ह्या लेण्यांच खंडेश्वरी देवी मंदिरात रुपांतर झालेलं आहे. अगदी लहानशी ही लेणी पण अगदी स्वच्छ परिसर आणि बहुदा रोज होणारी पुजाअर्चा त्यामुळे परिसर अगदी प्रसन्न वाटतो. साधारण ५ व्या शतकातली ही लेणी असावी असं इतिहास सांगतो
साधी लेणी आणि शांत वातावरण हे लेण्यांना भेट दिली की लगेचच जाणवतो. संपूर्ण प्रवास उन्हात केल्यावर मंदिराच्या गुहेत नैसर्गिक एयर कंडीशनर मध्ये गेल्यावर फारच सुंदर आणि मस्त वाटलं. बाहेर व-हंडा मग आत प्रर्थानेचा हॉल आणि मग आत गाभारा अशी मांडणी आहे. व-हंडा ला चार खांब होते पण त्यातला एक खांब भग्न झाला आहे आणि त्याचे काही अवशेष आवरून ठेवलेले दिसतात.
डावीकडे एक पाण्याचं टाकं आहे आणि अगदी मे महिन्याच्या रणरणत्या उन्हातही तिथे पाणी दिसतं. पाणी वापरात नसल्याने मासे बेडूक ही आहेत आत पण पाणी दिसायालात तरी शुद्ध दिसतं.
पाण्याच्या टाकी समोर म्हणजे मंदिराच्या उजवीकडे. दगडात कोरलेली शिल्प आहेत त्यांना मारुतीला फसतात तसा शेंदूर फसलेला आहे. आत ही बऱ्याच मूर्त्या आणि शिल्प अशीच शेंदुराने सजवलेली दिसतात. हे शिल्प तसं बघायला गेलं तर उत्तम परिस्थितीत आहे. ह्या शिल्पा बद्दल माहिती उपलब्ध झाली पण दोन वेगळ्या माहित्या पदरात पडल्या म्हणजे
एक अशी की दुसरा खुश्रु याने पुलकेशीच्या दरबाराला दिलेल्या भेटीचे हे दृश्य आहे तर दुसरी माहिती अशी की हा प्रसंग बौद्ध आपल्या वडिलांच्या राज्यात ज्ञानप्राप्ती नंतर येवून पूर्वजन्माची माहिती देतांना चा प्रसंग आहे. शिल्पामध्ये राजा, दरबार, सेवक, कलाकार दिसतात.
प्रर्थाना सभागृहात विशेष असं काही नाही. मूळ गाभाऱ्याच्या बाजूला दोन कोनाडे कोरले आहेत त्यात एका कोनाड्यात गणपती आणि मूषकाची मूर्ती आहे तर दुसरा कोनाडा रिकामा आहे. गाभाऱ्याच्या समोरील यज्ञकुंड आणि लेण्याच्या बाहेरील तुळशी वृंदावन हे नवीन बनवलेले दिसतात.
गाभाऱ्यात ही एका ठिकाणी पाण्याचा प्रवाह आहे आणि एका खड्यात पाणी झिरापातांना दिसतं.
मंदिराच्या गाभाऱ्यात खंडेश्वरी देवी आणि हनुमान अश्या मूर्त्या आहेत.
मंदिराच्या गाभाऱ्यात आम्हाला एक रंगीबेरंगी बेडूक ही दिसला. Hylarana nigrovittata जातीचा हा बेडूक होता. लेण्याबाहेर वेडा रघु, दयाळ वगैरे पक्षी ही दिसले.
देवीमातेचं दर्शन घेवून लोणार गावात
असलेल्या प्राचीन शिवमंदिर बघायला आम्ही निघालो
लोणार लेण्यांना कल्याण पासून जाण्याचा रस्ता खालील नकाश्यात दर्शिवलेला आहे
लोनाड चे प्राचीन शिव मंदिर - Lonad Shiv Temple
लोनाड ची बौद्धकालीन लेणी बघून (खांडेश्वरी देवी मंदिर) बघून पुढच्या मंदिरा केडे मोर्चा वळवला. लेण्यांची टेकडी उतरलो आणि मूळ रस्त्याला लागलो की समोर मोट्ठे पाईप दिसतात. थोडं डावीकडे वळलो की लगेच समोर लोनाड गावात जायचा रस्ता दिसतो. हे लहानसं गाव आहे त्यामुळे रस्तेसुद्धा छोटे छोटे आहेत. साधारण ५-७ मिनिटं बाईक ने गावात गेल्यावर एका प्राचीन दगडी मंदिरा जवळ पोचलो. हेच ते शिलाहार कालीन शिव मंदिर.
हे मंदिर साधारण ११व्य शतकातलं असावं पण मंदिर मात्र पार मोडकळीस आलेलं आहे. मंदिराचा गाभारा आणि आतील शिवलिंग हेच काय ते जरा ठीक परीस्थित आहेत. व्हरांडा, सभामंडप, कळस हे सगळं पडलं आहे, त्याचे अवशेष मंदिरा बाजूला विखुरलेले दिसतात. आम्ही गेलो तेव्हा मंदिराच्या दगडांवर कपडे वाळत घातले होते. एक आजोबा एका मोठ्याश्या आडव्या दगडावर आडवे झाले होते, ते आमच्या केडे "कुठून आली हि ब्याध" अश्या चेहऱ्याने बघून परत कुशी बदलून झोपले. काही लहान मुलं त्या पडीक मंदिराच्या ढासळत चालेल्या एका मोठ्या दगडाखाली आनंदात खेळत होती
आम्ही प्रथम शिवदर्शानासाठी गाभाऱ्यात शिरलो. गाभारा हा साधारण पाच सहा मोठ्या पायऱ्या उतरून मग खाली आहे. शंकराची पिंड आणि त्या समोर नंदी हे गाभाऱ्यातच आहेत. अभिषेकाची व्यवस्था केलेली आहे. त्यामानाने गाभारा स्वच्छ ही होता आणि रोजची पूजा ही होत असावी कारण विड्याच्या पानावर काही नेवेद्य वाहिलेला दिसला. नंदी चा चेहरा पार झिजून गेलेला आहे तर मूळ पिंडी शेजारी एक लहानशी काळी पिंड सुद्धा आहे पण ती मूळ गाभाऱ्या मधील नसावी. गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीवर ऑईल पेंट ने मोठ्ठा ओम काढला आहे. कश्यासाठी ते काही कळलं नाही. तसाच ओम आणि गाभाऱ्याच्या बाहेर ही काढलेला आहे
गाभाऱ्याचे छतावर आतून साधीशी नक्षी आहे पण आता त्यातली फारच कमी नक्षी दिसते कारण दगडाची झीज झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी वाढत चालेल्या भेगा स्वच्छ दिसतात.
मंदिराची पडझड बघून वाईट ही वाटतं. त्वरेने जर काही उपाय योजना केली गेली नाही तर हा इतिहासाचा अमूल्य ठेवा संपूर्ण भुईसपाट होईल.
मंदिराच्या डावीकडे सुद्धा एक शिवलिंग बघायला मिळतं पण ते तिथे नंतर ठेवल्यासारखं वाटतं
मंदिराच्या दगडाची वाढती झीज ह्यामुळे मंदिराभोवातीच्या शिल्पातीला कलाकुसर मनासारखी टिपता येत नाही. अर्थात ह्या मंदिरावरचे नक्षीकाम हे हि तसे साधेसे आहे. मंदिराच्या मागे एका तलाव आहे. आणि बाजूच्या शेतात एक शिलालेख ही सापडला आहे पण ते आम्हाला नंतर कळलं आणि तो बघायचा राहिला. तो शिलालेख प्रदर्शांत हलवायची योजना होती पण गावकऱ्यांच्या श्रद्धेमुळे ती प्रत्यक्षात आणली गेलेली नाही. आजुबाजीला विखरलेले मंदिराचे अवशेष बघून आणि शंकराचरणी परत एकदा नतमस्तक होऊन आम्ही परतीची वाट धरली. नेहमी प्रमाणे मनात तोच प्रश्न की एवढी अवाढव्य आणि अप्रतिम मंदिरं हजारो वर्षा पूर्वी बनवलीच कशी असतील. त्या सर्व अज्ञात कलाकारानाही शतशः प्रणाम
गोंदेश्वर हेमाडपंथी मंदिर - Gondeshwar Temple
नाशिक जवळ सिन्नर ला एक अप्रतिम हेमाडपंथी मंदिर आहे हे एकून होतो आणि म्हणूनच ह्या मे महिन्यात थोडा वेळ काढून ह्या मंदिराकडे मोर्चा वळवला. नाशिक शिर्डी रस्त्यावर असलेल्या सिन्नर गावाच्या थोडं बाहेरच्या बाजूला हे मंदिर आहे. गावातून जायला रस्ता आहे म्हणून गाडी घेउन आत शिरलो पण रविवारी बाजाराचा दिवस असतो आणि हे माहित नसल्याने भरपूर वेळ इकडून तिकडून फिरलो आणि परत हायवे वर आलो कारण रस्त्यांनवर इतकी दुकानं मांडली होती की कार ने मंदिरापर्यंत पोचण शक्यच नव्हत. मग चौकशी आणि गुगल काकांच्या मार्गदर्शना प्रमाणे गावाला वळसा घालून मंदिरा जवळ पोचलो. मंदिरात ७-८ मुलं मंदिरातील शांततेच फायदा घेत अभ्यास करत बसली होती
सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर हे एक शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. मंदिर परिसरात प्रवेश केला की अक्षरशः भारावून जायला होतं. मंदिरा भवती तटबंधी आहे. मंदिर परिसर ही अगदी स्वच्छ होता. मंदिरात शिरताना दगडी दारावरील नक्षीकामच पहिल्यांदा लक्ष वेधून घेत. दारातून प्रवेश केला की दगडी खांब आणि समोर येणाऱ्या उजेडात गोंदेश्वर मंदिरच पाहिलं दर्शन घडतं.
मंदिरा
समोर मोठी मोकळी जागा ही आहे आणि डावीकडे दगडी बांधकाम आहे. बहुदा ह्या
खोल्या पुजाऱ्यासाठी किंवा मंदिराला भेट द्यायला येणाऱ्या भाविकांना
विश्रांतीसाठी बनवल्या असाव्या. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी
राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे
मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते.
यांतील गोंदेश्वराचे शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी
मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. हेमाडपंथी बांधकामाचा उत्तम नमुना म्हणून ह्या मंदिराकडे बोट दाखवता येईल
मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. उंच आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे आणि अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. प्रमुख
मंदिरा भवती असलेली इतर मंदिरं सुद्धा अप्रतिम कोरीवकाम दर्शवतात.
गाभाऱ्यात पुरातन शिवलिंग आहे. आणि गाभाऱ्यातच्या दारावर अतिशय बारीक आणि
सुबक नक्षीकाम केलेलं आहे .
मंदिराच्या बाहेर अनेक देवीदेवतांची शिल्प बघायला मिळतात.
संपूर्ण मंदिराभावती हत्तींची शिल्प कोरलेली आहेत जसे की ह्या हत्तींनी हे मंदिर उभारून पाठीवर तोलालय. मंदिराच्या बाजूला एक मोठा पाण्याचा तलाव ही आहे.
हे मंदिर नक्कीच खास जाऊन भेट देण्यासारखं आहे. रथसप्तमीला सूर्यपूजा थाटामाटात साजरी होते अशी माहिती मिळाली. ह्या मंदिरा जवळच असलेलं अर्येश्वर मंदिर आणि गारगोटी म्युझियम हे देखील नक्की बघा
नाशिकहून येतांना आडवा फाट्यावर डावीकडे वळलं की लगेच आयेश्वर मंदिर लागतं ते लहानसं मंदिर बघून गोंदेश्वर कडे जाण्याचा रस्ता गुगल नकाश्यात दाखवलेला आहे. पण जर रविवारी जाणार असाल तर गावात बाजार भरतो तेव्हा हायवे वरून गावाला वळसा घालून गोंदेश्वर मंदिरात जाल तर उत्तम
आयेश्वर मंदिर - Ayeshwar Temple
सिन्नर ला गोंदेश्वर मंदिर हल्ली बऱ्याच लोकांना माहिती आहे पण नाशिक शिर्डी मार्गावर सरस्वती नदीच्या किनारी आयेश्वराच एक प्राचीन मंदिर आहे ते फारसं कोणाला माहिती नाही आणि त्या मंदिराबद्दल फारशी माहिती सुद्धा उपलब्ध नाही. बरीच शोधाशोध केल्यावर आणि काही जुनी पुस्तक चाळल्यावर काही माहिती मिळाली ती इथे देतो आहे
नाशिक शिर्डी मार्गावर सिन्नर जवळ आडवा फाटा
लागतो नाशिकहून येतांना तिथून डावीकडे वळलं की लगेचच आपण आयेश्वर मंदिराजवळ पोचतो.
तिथे पहिल्यांदा एका लहानसा बगीचा लागतो आणि त्याला लागून जाणाऱ्या डाव्या
बाजूच्या रोडवर वळलो की लगेच आयेश्वर मंदिर दिसतं. ह्या मंदिराला एश्वरेश्वर मंदिर (Aishwaryeshvar Temple) असं ही म्हणतात
हे महाराष्ट्रात बांधलेलं द्राविडी शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेलं एक सुंदर मंदिर आहे पण दुर्वैवाने मंदिराची पडझड दुरुस्ती पलीकडे गेलेली आहे. मंदिर सुदैवाने राष्ट्रीय सुरक्षित स्मारक च्या यादीत मोडतं त्यामुळे मंदिरा भवतीचा परिसर अतिक्रमाणा पासून सुरक्षित आणि मोकळा आहे आणि मंदिर परिसराला रीतसर कंपाउंड ही घातलेलं आहे पण मंदिराबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. असं म्हणतात की चालुक्य (कल्याणी) ज्याला द्राविडी शैली असं ही म्हणतात त्या शैलीतील सर्वात उत्तरेकडील मंदिर हे आयेश्वर मंदिर आहे. कालादृष्ट्या देखील जाणकारांच्या मते हे हेमाडपंती गोंदेश्वर मंदिरापेक्षा ही वरच्या क्रमावार आहे. हे मंदिर सुद्धा साधारण १०-११ व्या शतकातील आहे. पण मंदिर निर्मात्याची माहिती इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवून गेलेली आहे.
चाणक्य शैलीतील मंदिर महाराष्ट्रात ते ही यादव राज्यात कसे ह्याचा एक कयास असा मांडला जातो की त्याकाळी व्यापारी लोक विविध प्रदेशात व्यापार निमित्त फिरत, देश बघत आणि एखाद मंदिर किंवा त्याची कलाकुसर जरा मनात भरली तर हे श्रीमंत व्यापारी त्या कलाकारांना आपल्या भागात घेऊन येत आणि राजाच्या परवानगीने एखादा नवस किंवा आपल्या कडून धर्मिक कार्य घडावे म्हणून मंदिर निर्माण करत. कदाचित राजदरबारातील एखादा मंत्री सुद्धा अश्या प्रकारे मंदिर निर्मिती करत असे.
आयेश्वर मंदिराचे ठळक असे दोनच भाग आहेत गाभारा
आणि मंडप. मंदिराचा चौथरा विस्तीर्ण आहे
आणि त्यावर आणखी एक मंडप बांधण्याचा विचार ही असावा असं दिसतं पण ते काम पूर्ण
झालं नाही. तिथे उभारलेले स्तंभ फक्त दिसतात.

गाभारा साध असून कोपऱ्यात अर्धे खांब
आहेत. गाभाऱ्यात शंकराची पिंड आणि मंडपात नंदी विराजमान आहेत. नंदीच्या गळ्यात माळ
आणि पाठीवर झूल आहे पण दगडाची झालेल्या झिजेमुळे कलाकुसर फारशी दिसून येत नाही. मंदिराचं
शिखर मात्र आज जागेवर नाही , केवळ शिखराचा एक स्तर दिसतो. द्राविडी शैली प्रमाणे
ते अनेक थरांचे शिखर असावे.
मंदिराच्या मंडपाचे खांब मात्र उत्कृष्ठ
कलाकुसरीचा नमुना आहेत. कोरीव नक्षी कामा बरोबरच उत्तम मूर्तिकाम सुद्धा ह्या
खांबांमध्ये दिसून येते. हे खांब सरळ आहेत, इतर मंदिराप्रमाणे वर चौकटी जवळ
निमुळते झालेले नाहीत. ह्या खांबांवरची कलाकुसर बघून थक्क व्हायला होतं.
त्यानंतर गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस सुद्धा सुंदर नक्षीकाम तर उरलेल्या कळसाच्या एका थरावर काही मूर्त्याही दिसतात.
पण ह्या मंदिरच खर वैशिष्ठ आहे तर गाभाऱ्याच्या दरवाज्यावर
कोरलेले मकर तोरण. ह्या अर्धवर्तुळाकार तोरणाची सुरवात दरवाज्याचा खांबांपासून
होते. दोन्ही खांबावर दोन मकर असून दरवाज्यावर गंधर्व कीचक ह्यांचे तोरण आहे आणि मध्यावर
कीर्तिमुख आहे. मकराच्या शेपटीची नक्षी बनवण्यात आलेली आहे. नैसर्गिक झीज सोडली तर
हे तोरण फारच अप्रतिम दिसत असणार
मंदिराच्या आजूबाजूस काही ढसाळलेली दगड ही
दिसतात. गोंदेश्वर आणि आयेश्वर दोन्ही मंदिरामध्ये मुलं अभ्यास करतांना दिसली आणि
खरोखरच ह्या दोन्ही मंदिरा मधलं वातावरण सुद्धा खूपच शांत असतं. हे अप्रतिम मंदिर
बघून मग आम्ही गोंदेश्वर मंदिर बघायला निघालो
आयेश्वर मंदिर - गुगल नकाश्यावर
Reference: ह घी सांकलिया ह्यांचे पुस्तक “महाराष्ट्रातील पुरातत्व”
पाताळेश्वर गुफा मंदिर - Pataleshwar Caves
लेणी बघायची म्हंटलं की कुठेतरी डोंगरावर घाम गाळात जायचं आणि मग तिथलं ते शेकडो वर्ष जुनं कोरीवकाम बघून तृप्त व्हायचं हे नेहमी लेणी बघतांना येणारा अनुभव आहे पण अगदी भर शहरी वस्तीत ही लेणी असू शकतात आणि असं एक लेण पुण्यात अगदी भरवस्तीत आहे. जंगली महाराज रोड वर , जंगली महाराज समाधीच्या शेजारी पाताळेश्वर हे हिंदू गुफा मंदिर आहे आणि ह्या लेण्यात शंकराच पुरातन मंदिर आहे. साधारण ८ व्या शतकात राष्टकुट काळात खोदलेल हे मंदिर आता पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येतं. अर्थात ते पूर्वी शहराच्या बाहेर होतं पण शहराच्या वाढत्या वेशीने ह्या मंदिराला अगदी भरवस्तीत आणून ठेवलाय. सुदैवाने हा परिसर हिरवागार आहे.
ह्या मंदिराचं आणखी एक वेगळेपण म्हणजे हे मंदिर जमीन खोदत खाली बनवलेलं आहे. कदाचित म्हणूनच ह्याला पाताळेश्वर नाव पडलं असावं. ज्वालामुखी ने तयार झालेल्या टणक खडकात वरपासून खाली खोदत जात नंदी मंडप आणि मग आडवं खोदत हे गुफा मंदिर बनवलेलं आहे जस वेरुळचे कैलास लेण ही अश्याच पद्धतीने बनवलं आहे.
जंगली महाराज समाधीला नमस्कार करून डावीकडे पाताळेश्वर मंदिर आहे. काही दगडी पायऱ्या उतरून मंदिरात जावं लागतं पण ह्या पायऱ्या उतरण्या आधीच आपलं लक्ष वेधून घेतो तो मंदिरा समोरील भव्य गोलाकार दगडी नदीमंडप. हा भव्य मंडप १६ खांबांवर उभा आहे.
मंडपात नदीची कोरीव दगडी मूर्ती, ह्या नदीच्या गळ्यात माळा, घंटा वगैरे कोरलेल्या आहे. एकंदरीतच नंदीमंडप म्हणजे खास नदीसाठी मंडप मी पहिल्यांदा बघितला. हा मंडप अतिशय दणकट आहे पण ह्यात फारस सुबक कोरीव वगैरे नाही. तरी ही हा नदीमंडप कायम लक्षात राहावा असाच आहे हे नक्की जाणकारांच्या मते ही अपूर्ण लेणी आहेत त्याच्या मागचं बरोबर कारण ज्ञात नाही पण कदाचित परकीय आक्रमणाचा धोका असावा किंवा आणखी काही
डावीकडे मागच्या बाजूस एक आणखी नंदी ची मूर्ती ठेवलेली आहे पण तिचा तसा काही संदर्भ लागलं नाही. ह्या नंदीच्या रेषेत मंदिराच्या दिशेने गेलो की बाजूला एक ओसरी आहे. दोन खांबावर उभी ही लहानशी ओसरी आणि त्याच्या समोर एक लहानसं पाण्याचं टाक. एक वडाच झाड ओसरीपुढे आहे जिथे वटपोर्णिमेला गर्दी होते
मंदिरात प्रेवेश केला की त्याची भव्यता लक्ष्यात येते. एकूण चोवीस खांबांवर उभ्या ह्या मंदिरात पाताळेश्वरची प्रतिष्ठापना केलेली आहे. मूळ गाभाऱ्या बाजूला दोन आणखी खोल्या आहेत. बाजूला राम लक्ष्मण सीता ह्यांची सुंदर मूर्ती ही आहे. अर्थात ती संगमरवरी मूर्ती ही पुरातन नाही पण सुबक नक्कीच आहे. मंदिराच्या मागच्या उजव्या भागात उंचवटा आणि काही पायऱ्या आहेत. बहुदा ध्यानधरणे साठी एकांत लाभावा म्हणून ही सोय असावी. मंदिराच्या भिंतींवर मोठी शिल्प कोराल्याच्या खुणा आहेत पण ती शिल्प आता ओळखण्या पलीकडे गेलेली आहेत. ही लेणी ब्राम्हणी पद्धतीची मानली जातात त्यामुळे बौद्ध लेण्याप्रमाणे विहार दिसत नाही. हे प्रार्थना मंदिर आहे.
मंदिराच्या प्रेवेश्याच्या उजव्या खांबावर देवनागरी भाषेतील शिलालेख आहे पण तो ही कालानुमानाने झालेल्या दगडाच्या झिजे मुळे वाचता येत नाही, फक्त काही अक्षर समजतात. मंदिराच्या बाहेर, नदी मंडपाच्या उजवीकडे दगडी पायऱ्यांची विहीर देखेल आहे पण सध्या ती विहीर वरती जाळी टाकून बंद केलेली आहे
ह्या मंदिराचा पुसटसा उल्लेख काही पेशवे दप्तरात आढळतो आणि श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी ह्या मंदिराचा जिर्णोधार ही केल्याचं समजत. इंटरनेट वर अधिक माहिती शोधली तर ह्या लेण्यांना काही मान्यवर परदेशी इतिहास तज्ञ आणि मोठ्या चित्रकारांनी खास भेट दिली आहे हे ही समजतं
मंदिरा च्या आजूबाजूला सुंदर बगीचा बनवलेला आहे आणि मंदिरातील स्वच्छता बघून खरच प्रसन्न वाटत. ह्या बगिच्या मध्ये एक पुरातन पिंपळाचा वृक्ष आहे त्याच्या पारंब्यांनी आपले पाय जमिनीत रोवून मूळ खोड कित्येक पटीने मोठं केलं आहे
ही लेणी सकाळी ८:०० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत दर्शनासाठी उघडी असतात. हे राबत मंदिर आहे जिथे आजही पाताळेश्वराची पूजाअर्चा नियमितपणे होते आणि सणासुदीला भाविकांची दर्शनासाठी रांग लागते. संभाजी नगर रेल्वे स्टेशन पासून अगदी चालत जायच्या अंतरावर हे गुफा मंदिर आहे
हुमायूनचा मकबरा - Humayun Tomb - UNESCO Site
हुमायून हा बाबर नंतर चा दुसरा मोगल सम्राट होता ज्याचं मूळ हे अफगाणिस्थान मधलं, १५३१ साली वडिलांकडून मिळालेलं राज्य हुमायून टिकवू शकला नाही. त्याच्या सावत्र भावांनी त्याच्या राज्याचे लचके तोडले आणि पुढे शेर शहा सुरी ने होमायुनचा संपूर्ण पराभव केला आणि त्याला राज्य सोडून मदतीसाठी पळावं लागलं, पुढे १५ वर्षांनी इराणच्या राज्याच्या मदतीने त्याने भारतात गमावलेलं राज्य परत मिळवलं. १९५६ साली त्याच्या मृत्यू नंतर दिल्लीच्या पुराना किल्यात हुमायून राजाला दफन केलं गेलं पण हेमू राजाने दिल्लीवर स्वारी करून किल्ला हस्तगत केला त्यापूर्वी हुमायून राजाच्या पार्थिवाला कबरीतून बाहेर काढून पंजाबला कलानौर ला परत दफन केलं गेलं पुढे हुमायून राजाचा मुलगा अकबर ने राज्य सांभाळल्यावर हुमायून राजाची पहिली पत्नी बेग बेगम ने आपल्या पतीच्या स्मरणार्थ विशाल स्मारक बनवलं तोच हा हुमायून मकबरा. मिरक मिर्झा घियास ह्या स्थापत्य विशारदाच्या अधिपात्यात हा मकबरा बांधला गेला आहे. मग हुमायून राजाच्या पार्थिवाला पंजाब मधून पुन्हा काढून इथे दफन केलं गेलं
हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन पासून साधारण ३ किलोमीटर अंतरावर मथुरा रोड वर हा हुमायूनचा मकबरा आहे. लाल वाळूच्या खडकापासून बांधलेली इतकी मोठी अशी ही पहिलीच वस्तू. हुमायून ची ही कबर भारतीय उपखंडात बांधली गेलेली पहिली भव्य कबर म्हणावी लागेल. ह्या इमारतीत अनेक राजघराण्यातील लोकांच्या कबरी आहेत ज्यामाध्ये बेग बेगम (जीने हे स्मारक उभारलं), हमीद बेगम तसाच हुमायून चा पणतू दारा शिकोह ह्याचं सुद्धा दफन करण्यात आलं. दारा शिकोह हा औरंगजेबाचा सख्खा भाऊ ज्याला शहाजहान ने आपला वारसदार जाहीर केलं होतं पण औरंगजेबाने राज्यप्राप्तीसाठी आपला भाऊ दारा शिकोह ला मारून टाकलं अशी नोंद इतिहासात आहे. मोगलांचा शेवटचा राजा बहाद्दूर शहा जाफर ह्यला इंग्रजांनी इथूनच धरून रंगूनला हद्दपार केलं होतं. ह्या इमारतीचं बांधकाम हुमायून च्या मृत्युनंतर ९ वर्षांनी (सन १५६५) सुरु झालं ते १९७२ पर्यत सुरु होतं. जी आज युनेस्को च्या जागतिक वारसा च्या यादीत सामाविष्ट केलेली आहे. भारतात युनेस्को च्या जागतिक वारस यादीतील साधारण ३२ ठिकाण आहेत त्यातलीच ही एक वस्तू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ह्यांनी २०१० मध्ये या माकाबऱ्याला भेट दिली होती.
हुमायून
चा मकबरा ३० एकर पसरलेल्या चार बाग बगिच्या मध्ये एका प्रचंड अश्या
चौथऱ्यावर उभारला आहे ह्या चौथऱ्याची उंची ७ मिटर एवढी आहे आणि वर जाण्याचा
दगडी जिना एकदम चढा आहे. गुढगा दुखावणारा हा जिना चढून गेलं की समोर मकबरा
दिसतो, सध्या पश्चिमेकडचा मार्ग खुला ठेवल्या ने मकाब-या मध्ये जायला
फिरून जावं लागतं
पण त्यापूर्वी डावीकडे चौथऱ्यावरच अनेक संगमरवरी कबरी उघड्या म्हणजे आकाश्या खाली दिसतात. मकबरा हा दोन माजली असून तो पिवळ्या काळ्या संगमरवरापासून बनवलेला आहे. त्यावरील डोम पर्शियन पद्धतीचा असून मकबरा ४७ मिटर उंच आहे . अतिशय प्रशस्थ अशी ही वस्तू असून नक्षीकाम अप्रतिम आहे.
संगमरवरात
कोरलेल्या जाळ्या तर थक्क करून टाकणाऱ्या आहेत. अष्टकोनी मधल्या खोलीत
हुमायूनची संगमरवरी कबर आहे तर आजूबाजूच्या खोल्यांमध्ये राजघराण्यातील
इतरांच्या कबर घडवलेल्या दिसतात. अर्थात खऱ्या कबरी ह्या तळ घरात असून तिथे
जायला बंदी आहे. सुदैवाने काही साफसफाई च्या कामानिमित्त उघडलेल्या
बेसमेंटला बघता आलं. मूळ कबरी ह्या साध्याश्या आहेत आणि वर स्थापलेल्या
दर्शनाच्या कबरी मात्र उत्तम नक्षीकामासह आहेत. ह्या मकबरा परिसरात साधारण
१०० कबरी आहेत पण सगळ्यांवर नाव न कोरल्याने बऱ्याच कबरी नक्की कोणाच्या हे
समजत नाही
निजामुद्दीन स्टेशन पासून अगदी जवळ आहे तिथून रीक्ष्या बसेस उपलव्ध आहेत. तिकीट : १० रुपये आणि फोटो कॅमेरासाठी वेगळं तिकीट नाही. आत गेल्यावर डाव्याबाजूला लहानसं उपहारगृह ही आहे. कमीत कमी साधारण २ तासाचा वेळ हुमायून मकबरा आणि आजूबाजूची स्मारकं बघायला लागतो. ह्यामध्ये बु हलीमा चा मकबरा, इसा खान चा मकबरा, अफसरावाला मकबरा, नीला घुमबाद वगैरे आहेत. दिल्लीदर्शन सहलीत हुमायून मकबरा हे एक महत्वाचं ठिकाण म्हणून पर्यटकांना दाखवण्यात येतं
हुमायूनचा मकबरा तसेच आजूबाजूची ठिकाणे गुगल नकाश्यावर
घोडबंदरचा किल्ला :
ठाणे शहरापासून जवळच उल्हास नदीच्या काठावर घोडबंदर किल्ला शेकडो वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभा आहे. ऐतिहासिक वस्तू ह्या जतन करण्यापेक्षा त्या दुर्लक्ष करण्याकडे आपला सगळ्यांचा कल असतो हे घोडबंदर किल्ला बघितला की प्रकार्ष्याने जाणवते. पोर्तुगीज, मराठे आणि इंग्रज असा खांदेपालट बघता बघता हा किल्ला एकेकाळी इस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा कार्यालय ही होता. पण आता किल्याची अवस्था फारच दैनीय आहे . मागे काही वर्षापूर्वी ह्या किल्याची डागडुजी करून हा किल्ला एक पर्यटक आकर्षण बनवायचे प्रयत्न केले गेले असं ही ऐकलं पण ते पूर्ण फेल गेलेलं दिसून येत
पोर्तुगीज
ठाण्यात आल्या नंतर त्यांनी ह्या
किल्ल्याची बांधणी सुरु केली ती साधारण १५५० साली, अरबी घोड्यचा व्यापार
ह्या बंदरातून व्हायचा म्हणून हे घोडबंदर आणि ते सुरक्षित राहावे म्हणून हा
घोडबंदर किल्ला
नंतर ह्या किल्ल्यात काहीना काही भर पडत राहीली ती १७३० पर्यंत. ह्या किल्ल्याचे नाव Cacabe de Tanna असं ठेवलं होता त्यांनी.
ह्या किल्ल्यामध्ये पोर्तुगीजांनी एक चर्च बांधलं होतं ती वस्तू आज
ही उभी आहे. जिथे कालांतराने एक हॉटेल मग कार्यालय आणि आता ओसाड खोल्या आहेत. आतील
भिंत आणि जमिनी पूर्णपणे नवीन वाटतात, म्हणजे त्या आहेतच फक्त मूळ बांधकाम आणि
दरवाजा पोर्तुगीज बांधणी दर्शवतो.
ह्या चर्च च्या बाहेर एक मस्त वडाचं झाड आहे आणि त्या झाडावर ८-१० माकड भरदुपारी अगदी शांत झोपली होती. आमचं लक्ष सहज वर गेलं तर ही सतत धिंगाणा घालणारी माकड शांत झोपलेली दिसली. मी खरतर झाडावर झोपलेली माकड पहिल्यांदाच बघत होतो.
हा
किल्ला जिंकण्यासाठी मराठ्यांकडून ही बरेच प्रयत्न
झाले होते. १६७२ साली शिवाजी महाराजाच्या सैन्याला ही अपयश पचवावं लागलं
होतं.
पोर्तुगीजांचे सशक्त आरमार आणि आधुनिक शस्त्रास्त्रे ह्या जोरावर दिव दमण,
वसई ते
गोवा पर्यंत मुलुख मारला होता आणि जनतेवर जबरदस्ती धर्मांतर लादले जाऊ
लागले. ती
तक्रार छत्रपतीकडे गेली आणि मग पोर्तुगीजांना धडा शिकवायची कामगिरी थोरल्या
बाजीरावांनी उचलली आणि त्यांचे धाकले बंधू चिमाजी अप्पा ह्यांच्या
नेतृत्वाखाली मराठी सेना पोर्तुगीजांवर चालून गेली. घोडबंदर किल्ला हा १७३७
साली मराठ्यांच्या ताब्यात
आला. हा किल्ला आणि साष्टी बेट हे दोन्ही १०-१५ दिवसाच्या युद्धानंतर
मराठांच्या
हाती लागलं आणि पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून इथली जनता मुक्त झाली.
पुढे १८१८
ला हा किल्ला इंग्रजांनी जिंकला आणि तेथे इस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा
कार्यालय
वसवले.
किल्यामध्ये हल्ली काही दगडी कमानीचे अवशेष बाकी
आहेत त्याच्या पुढे मोकळी जागा आहे. कमानी जवळ एक बुरुज आहे जिथे जायला लहानश्या
दरवाजातून दगडी पाहिऱ्या आहेत. ह्या बुरुजावरून खाडी आणि बाजूचा हिरवागार निसर्ग
अप्रतिम दिसतो. किल्ल्याच्या एका बाजूला गोडाऊन सारख्या चौकोनी खोल्या आहेत. पण त्याच्यावरचं छप्पर मात्र उडून गेलेल आहे
किल्ल्याच्या मध्ये पाण्याचं मोठे टाकं आहे आणि त्याला पाण्याचा जिवंत प्रवाह आजही ही आहे त्यामुळे पाणी नेहमी असते असं समजलं. किल्ल्यात आणि परिसरात बिबट्याचा वावर आहे आणि तशी बिबट्या संबंधी पाटी सुद्धा चर्चकडे जाण्याच्या रस्त्यावर दिसते
किल्ल्या मध्ये जागोजागी करटूल्याचे वेल लागलेले आहेत. त्याच्या पिवळ्या फुलांनी किल्ला सजलेला दिसला
एकंदरीत हा इतिहासाचा साक्षीदार हल्ली मदतीची हाक मारत जीर्ण होत चाललेल्या अवस्थेत उभा आहे
घोडबंदर किल्ला आणि पोर्तुगीज कालीन चर्च - गुगल नकाश्यावर
कास पठार - kaas plateau - UNESCO Site
कास पठार म्हणजे निसर्ग मित्रांचे नंदनवन, ऑगस्ट , सप्टेंबर महिन्यात फुलणारे फुलांचे गालिचे, विविध रंगाची, आकाराची फुलं म्हणजे फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांचा जणू कुंभमेळा. नजरेचं पारण फिटणे ह्या म्हणीचा आशय खऱ्या अर्थाने समजावून घ्यायचा असेल तर कास पठारावर ह्या काळात एकदा नक्की जावे.
![]() |
| सोनकी - Graham's groundsel |
कास पठार हे UNESCO च्या जागतिक वारसा
स्थळांपैकी एक आहे. UNESCO च्या जागतिक वारसा स्थळाचे दोन प्रकार आहेत १)
सांस्कृतिक वारसा स्थळे २) नैसर्गिक वारसा स्थळे. साल २०१२ ला भारताच्या पश्चिम
घाटाला जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला त्यात ३९ जागांचे संवर्धन
गरजेचे ठरले त्यातली एक महत्वपूर्ण जागा आहे “कास पठार”. ह्या पठारावर ८५०
प्रकारची विविध फुले फुलतात. International Union for Conservation of Nature and Natural Resources ( IUCN ) हि संस्था
जगातील विविध पशु तसेच वनस्पती ह्यांच्या विविध प्रजातींचा अभ्यास करून ज्या
प्रजातींचा ऱ्हास होतो आहे त्याची एक रेड लिस्ट प्रकाशित करते, त्या प्रजातींचे
संवर्धन अत्यंत गरजेचे असते अश्या ह्या रेड लिस्ट मधील साधारण ३९ फुले हि कास
पठारावर अस्तित्त्वात आहेत. ही माहिती देण्याचे कारण की कास पठार बघतांना आपल्याला
किती जबाबदारीने ह्या फुलांचं आनंद घ्यायचा आहे हे समजू शकेल. ह्या वेगाने ऱ्हास
होणाऱ्या प्रजातींना आपल्याकडून नुकसान होणार नाही ह्या जबाबदारीची जाणीव ठेवून
कास पठार फिरायला हवे. Aponogeton satarensis (वायातुरा) नावाची अति दुर्मिळ वनस्पती
कासला आढळते ती बघायला मिळाण नशिबाचा भाग आहे. आमचं नशीब इतकं ही जोरावर नव्हतं पण
ही वनस्पती केवळ साताऱ्यात आढळते म्हणूनच तिच्या नावात हि satarensis असा उल्लेख दिसतो
साताऱ्या पासून साधारण २५ कि मी वर महाराष्ट्राचे valley of flowers, कास पठार आहे. कासला जाणारा रस्ता, घाटात उतरलेले ढग, हिरवागार शालू नेसून आपल्या
स्वागताला जणू तयार निसर्ग आणि फुलांच्या रंगांची उधळण हे बघत आम्ही सकाळी ८:००
पर्यंत कास ला पोचलो. गर्दी टाळायची असेल आणि सुट्टी हातात असेल तर आठवड्याच्या मधल्या
दिवसात कासला जावे कारण शनिवार रविवार तिथे जणू जत्रा भरते. कार पार्किंग इतक्या
दूर करावी लागेल की फुलांपर्यंत
पोचताच दामायला होईल. पण कास खरोखर बघायचं असेल तर भरपूर भटकायची तयारी करून जाणं गरजेच आहे.
![]() |
| कास तलाव - Kas Pond |
कास ला किती वेळ लागेल हे संपूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. कारण फुलांबरोबरच विविध फुलपाखरं, पक्षी सुद्धा बघायला मिळतात. कास ला जायला काही बसेस पण आहेत साताऱ्याहून पण स्वत:चे वहान हा खरच जास्त सोयीस्कर पर्याय आहे जेणे करून तुम्ही कास पठारावर जास्त वेळ देऊ शकता. रात्री उशिरा साताऱ्यात धडकून आणि मुक्काम करून सकाळी कास पठार असा कार्यक्रम आम्ही आखला होता. आणि साताऱ्यात पोचलो तो जो मुसळधार पाऊस सुरु झाला कि उद्याची फुलांच्या दुनियेत जायची स्वप्न हा पाऊस वाहून नेतो की काय अशी काळजी वाटायला लागली पण पहाटे उठलो ते स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निरभ्र निळे आकाश बघत
![]() |
| Panoramic view from kaas Plateau |
साताऱ्यात राहण्यासाठी उत्तम पर्याय
उपलब्ध आहेत, तसेच MTDC मान्यताप्राप्त राहण्याच्या व्यवस्था कास पठारा पासून जवळ
उपलब्ध आहेत. “कास पुष्प यात्री निवास” त्यासाठी संपर्क : श्री विठठल किरदात ,
भ्रमणध्वनी - 8291008666, 9594934666,
8080077606,
9420488392
कास पठार कातळ खडकाचे असून, माती व अन्न द्रव फार कमी प्रमाणात आहे. हे पठार अग्निजन्य खडकापासून बनलेले आहे. पण त्याच बरोबर येथील वातावरण शेकडो रानफुलांना पोषक असं आहे आणि ह्या अग्निजन्य खडकावरही जणू स्वर्ग अवतरतो.
पूर्वी कास पठारावर मुक्त भटकंती शक्य
होती पण पर्यटकांनी भरभरून नुकसान करायला सुरुवात केली. प्लास्टिक पिशव्या, कचरा
वाढू लागला. प्रेयसी चे फोटो फुलात बसून काढणाऱ्या प्रेमवीरांना आपल्या प्रेयसी /
बायको पेक्षा ही रानफुलं नाजूक आहेत हे कदाचित समजलं नाही. मुलांना बगीचात खेळायला
आणल्यासारखे फुलात बागडायला सोडणारे पालक
ही दिसू लागले. फोटोग्राफी करण्याच्या नादात फुलांच्या बहरात कॅमेरा घुसावणारे फोटोग्राफर
दिसू लागले. आणि मग नाईलाजाने सरकारला कास पठारला कंपाउंड घालावं लागलं आता
निर्धारित रस्त्यावरून चालत पठार बघावं लागतं तरी हि ह्या कंपाउंड मधूनही फुलात
शिरणारे वीर ह्या देशात दिसतात. आपण जेव्हा कास ला भेट द्याल तेव्हा ह्या गोष्टीची
नक्की काळजी घ्याल ह्याची खात्री आहे
सध्या कास ला पार्किंग शुल्क आणि प्रवेश
शुल्क आकारले जाते. कधी कधी कॅमेरासाठी सुद्धा शुल्क आकारतात ह्या पैश्यातून पठार
संवर्धनासाठी कामे तसेच जवळच्या गावांत काही कामे केली जातात. सातारा एक उत्तम
पर्यटन स्थळ आहे आणि तुम्ही कास च्या जोडीला जवळची अनेक पर्यटन स्थळे करू शकता.
चार पूर्ण दिवस सातारा परिसराची पिकनिक ठरवू शकता
कास मध्ये मिळालेले काही फुलांचे फोटो इथे टाकतो आहे.
![]() |
| Lambert's Borage - हिरवी निसुर्डी |
![]() |
| Vigna vexillata - हळुंदा, रानघेवडा |
![]() |
| Neanotis lancifolia - तारागुच्छा |
![]() |
| Impatiens oppositifolia - तेरडा |
![]() |
| Curcuma caulina - चवर |
![]() |
| Habenaria foliosa - उग्र हबेअमरी |
![]() |
| Water Willow - करंबल |
![]() |
| Nimphoides Indicum- कुमुदिनी |
![]() |
| Pogostemon deccanensis - जांभळी मंजिरी |
![]() |
| Solanum xanthocarpum - काटे रिंगणी |
![]() |
| Strobilanthes callosus - कारवी |
![]() |
| Konkan Pinda - पंद, पेंद |
![]() |
| दीपकाडी - Dipcadi montanum |
![]() |
| Cyanotis Cristata - नभाळी |
![]() |
| सोनकी - Graham's groundsel |
साताऱ्याहून कास पठारावर जाण्याचा रस्ता गुगल नकाश्यात दाखवला आहे
तांबेकर वाडा - Tambekar Wada
तांबेकर वाड्याबद्दल ऐकून होतो त्यातील प्रसिद्ध भित्ती चित्र बघायची इच्छा ही होतीच आणि म्हणूनच ह्या चौफेर भटकंती च्या ट्रीपमध्ये तांबेकर वाडा आठवणीने प्रोग्राममध्ये ठेवला. गुजराथ टुरिझम च्या साईटवर जरी ह्या वाड्याची नोंद असली तरी तिथे गर्दी नसते हे समजलं होतं पण जेव्हा आम्ही गेलो तेव्हा फक्त आमचाच ग्रुप तिथे होता. तांबेकर वाड्याचा रस्ता दाखवणारा कुठलाही बोर्ड वगैरे नाही तेव्हा विचारात विचारात जावं लागतं आणि कमाल म्हणजे त्या भागात देखील खुपश्या लोकांना वाड्याच्या नक्की जागे बद्दल माहिती नाही. म्हणूनच महितीच्या शेवटी गुगल नकाश्यात तांबेकर वाडा दाखवला आहे. गुगल नकाश्यावर सुद्धा अजून हा वाडा मार्क नाही, ती पण रिक्वेस्ट गुगल मेकरवर टाकली आहे. इथल्या रस्त्याचे नाव मात्र तांबेकर रोड असं आहे.
बाहेरून दर्शनी भाग जरी उत्तम आणि ठीकठाक दिसत असला तरी वाड्याच मागचा भाग ढासळला आहे. नशिबाने पुढचा भाग हा आता अर्केलोजीकॅल विभागाकडे आहे आणि तेथील भित्ती चित्रासाठी प्रसिद्ध माजले व्यवस्थित ठेवलेले आहेत. सयाजी राजांकडे दिवाण म्हणून महत्वाच्या हुद्द्यावर असलेले भाऊ तांबेकर (विठ्ठल खंडेराव तांबेकर ) ह्याच्या रहिवासाचे हे ठिकाण. G +३ असलेली ही हवेली बाहेरून अगदीच साधारण वाटत असली तरी आतून रंगांची उधळण करत समोर येते. हवेलीच्या डावीकडून वरती जाण्यासाठी जिना आहे आणि तिथेच पुरातत्व विभागाने हवेलीची माहिती लावली आहे. त्यानुसार १८४९ ते १८५४ ह्या सहा वर्षात भाऊ तांबेकरांचे हे निवासस्थान होते. वर जाणारे जिने खूपच चढे आहेत आणि गुढगा दुखीवाल्यांची परीक्षा पाहणारे आहेत पण एकदा का तुम्ही पहिल्या मजल्यावर पोचलात की सर्व काही रंगांमध्ये विसरून जाल हे निश्चित. पहिल्या मजल्यावर दर्शनी हॉल नजरेचं पारण फेडतो.
अर्थात पुरातत्व विभागाने ताब्यात घेण्यापूर्वी दुर्लक्षित राहिलेला हा वाडा असल्याने चित्रांना थोडी फार क्षति पोचलेली आहे पण जे शिल्लक आहे ते हि आपल्या कल्पने पलीकडले आहे. ह्या हॉल मध्ये विविध देवी देवता तसेच अनेक ऐतिहासिक प्रसंग चित्रित केलेले आहेत आणि विशेष म्हणजे फक्त भिंती नाही तर दरवाजे खिडक्या ही चित्रांनी सजवलेल्या आहेत. संपूर्ण लाकडी खांब आणि विटांचे बांधकाम केलेला हा वाडा तुम्हाला अचंबित करून सोडतो . हॉल ला लागून डावीकडे अनेक दरवाजे आहेत जे तुम्हाला ग्यालरीत आणि वरच्या मजल्यावर नेतात तर हॉल च्या समोर सुंदर लाकडी जाळी आहे. ह्या जाळीवर देखील रंगांची उधळण आहेच
इतके फोटो आणि रंगसंगती टाकता येतील की विचारू नका. इथे रामायण महाभारतातले अनेक प्रसंग चित्रले आहेत तर मराठा इंग्रज युध्दाचे प्रसंग हि हॉल मध्ये दिसतात. तर काही चित्र जी युरोपीअन शैलीतली आहेत.
दुसऱ्या मजल्यावर ही परत एकदा चढ्या जिन्याशी झटापट करून पोचावे लागते. इथे ही दोन खोल्या आहेत आणि बाहेरची मोठी खोली मध्ये भित्ती चित्र नाही. पण लागून असलेल्या दुसऱ्या खोलीत परत अप्रतिम चित्र आहेत. हे जर वेगळ वाटलं म्हणून अजून चौकशी केली तर मिळालेली माहिती धक्कादायक होती
पूर्वी इथे शाळा भरायची आणि मग मुलं चित्रांशी खेळायची म्हणून भिंती स्वच्छ पांढऱ्या रंगाने रंगवून टाकल्या. ते ऐकून एकदम खिन्न झाल्यासारखं वाटल. अप्रतिम भित्ती चित्र नष्ट झाली आणि त्यावर चढला पंधरा शुभ्र रंग जो आता पिवळा पडला आहे. माहिती तिथे समजलेली आहे पण भिंती नीट पहिल्या तर आजही मागचे रंग नजरेला जाणवतात. आतली खोली मात्र अप्रतिम आहे . विविध धर्माच्या लोकांचे पेहराव. काही युरोपीअन चित्र देव देवता. श्री कृष्णाची रासलीला, त्याचे बालपण तसेच मराठी स्त्री वगैरे चित्रले आहे.
इथे वापरलेले रंग हे सोन्याच्या किमतीचे आहेत अस समजल आणि दारावर नक्षीकामासाठी हस्तिदंताचा उपयोग केला आहे. ही हवेली प्रचंड पैसे खर्चून नटवलेली आहेच पण येथली चित्रकला केवळ अनमोल आहे. हवेली अत्यंत साफ आणि नीट नेटकी ठेवणारे कर्मचारी वर्ग तुम्हाला मदत हि करतात. एकंदरीत हा अमुल्य ठेवा तुम्ही नक्की जाऊन बघावा असाच आहे
येथे साधारण ३०० भित्ती चित्र उरली आहेत. आणि उरलेली हवेली कोसळण्याच्या स्थितीत आहे. ह्या रस्त्यावर बरीच मराठी नावं असलेले वाडे आहेत. एकंदरीत महाराष्ट्रातून आलेले लोक त्याकाळी एकत्रित इथे राहत असावे. हा वाद सकाळी ८:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत उघडा असतो. पण वाड्यात लाईट नाहीत, तेव्हा संध्याकाळी उशिरा जाऊ नका. ह्या हवेलीला प्रवेश फी सुद्धा नाही आहे
अडालज की वाव - Adalaj Stepwell
अहमदाबाद पासून १८ किमी अंतरावर अडालज बावडी / वाव हा पुरातन हिंदू जल नियोजनाचा एक उत्कृष्ठ नमुना आहे. ही विहीर १४९८ साली बांधली गेली आहे आणि आज ही ह्या बांधकामात दिसणारे दगडी नक्षीकाम थक्क करून टाकतं. आपली अनेक प्रेक्षणीय स्थळे जशी लोकांनी रंगवून किंवा आपली नावं कोरून वगैरे खराब केलेली असतात तसे नशिबाने इथे काही झालेले दिसत नाही. गुजराथ प्रदेशात अश्या अनेक वाव आढळतात, ह्या चौफेर भटकंतीच्या ट्रीप मध्ये नवलाख वाव, बाबा हरेर कि वाव आणि अडालज वाव ह्या तीन स्टेपवेल बघता आल्या. पण ह्या तिन्ही विहिरीत अडालज ची विहीर कलेच्या दृष्टीने खूपच उजवी आहे. पाण्याचे व्यवस्थापन आणि जनतेस अथवा राजाघारण्यास पाण्याची उपलब्धता, ह्या कारणांनी ह्या अनेक विहिरी गुजराथ परिसरात बांधलेल्या आढळतात. आणि मग पुढे ह्या विहिरी थोड्या धार्मिक तर थोड्या अलंकारिक बनत गेल्या असाव्या
अडालज कि वाव हि अहमदाबाद पासून जवळ आहे आणि इथे जायला अहमदाबाद पासून वाहतूक व्यवस्था आहे. शेअर रिक्षा पासून ते राज्य सरकारच्या बस वगैरे पर्याय आहेत पण सतत नाहीत. स्वत:चे वहान असल्यास उत्तम. अडालज विहीर, त्रीमंदीर, वैष्णावदेवी मंदिराची प्रतिकृती, इंदोरा नेचर पार्क आणि अक्षरधाम मंदिर असा एक दिवसाचा प्रोग्रॅम बनवता येतो. अक्षरधाम मंदिर शेवट ठेवल्यास रात्रीचा लाईट शो सुद्धा बघून अहमदाबाद मुक्कामी परत येऊ शकता.
अडालज
बावडी / वाव बघायची इच्छा खूप दिवस होती. त्या विहिरी च्या नक्षीकामाबद्दल
ऐकलेलं होतं. तिथे पोचलो तेव्हा एक परदेशी लोकांचा ग्रुप तिथून आवक होऊन
बाहेर पडत होता. त्यातला एक सांगत होता की असलं नक्षीकाम बघायला नशीब
लागतं, बरं झालं आपण भारतात आलो. आणि मला आपल्या पर्यटन विभागाची पंच लाईन
आठवली. “अतुल्य भारत” खरोखर मला ह्या देशात इतकं काही बघायला आणि तुप्त
व्हायला आहे की एक जीवन पुरणार नाही. खरोखरीच हा अतुल्य भारत आहे. इतकं
भावनिक व्हायला कारण आहे हि अडालज बावडी. हिंदू मुस्लिम कलेचा थक्क करणारा
नमुना आहे ही विहीर. जमिनी खाली ५ माजली विहीर आणि ती ही एखाद्या
प्रसादासारखी नटलेली आहे.
ह्या
अप्रतिम विहिरीचा इतिहास ही काही साधासुधा नाही ह्या विहिरीचे बांधकाम
सुरु केलं ते राणा वीर सिंग ह्याने, पण ही विहीर पूर्ण होण्यापूर्वीच राणा
वीर सिंग च्या राज्यावर सुलतानी आफत आली. ह्या राज्याला त्या वेळी नाव होतं
दांडी देश आणि ह्या राणा वीर सिंग च्या राज्यावर हल्ला करणारा सुलतान होता
महम्मद बेगडा, ज्याचं संपूर्ण नाव होतं अबुल नसीर-उद-दिन महम्मद शहा
प्रथम, हा अत्यंत आक्रमक सुलतान होता. अहमदाबाद शहर वासवणाऱ्या अहमद शहा
प्रथम चा हा नातू. सुलतान महम्मद बेगडा ने पुढे अनेक वर्ष गुजराथ प्रदेशावर
राज्य केलं. स्वत:ला सुलतान अल-बर्र आणि सुलतान अल-बह्र अश्या पदव्या धरण
करणाऱ्या ह्या सुलतानने त्याच्या पुढच्या राज्य कालावधीत अनेक अप्रतिम
बांधकामं ही उभारली, त्यातले एक बांधकाम म्हणजे चंपानेर, जे आज UNESCO च्या
संरक्षण यादीत आहे. जामी मस्जिद, सरखेज रोजा आणि अडालज वाहिरी चे उर्वरित
काम ही अनेक बांधकामांपैकी काही बांधकामे ह्या सुलतानाच्या राज्यकालात
झाली.
राणा वीर सिंगशी झालेल्या युद्धात सुलतानाचा विजय झाला आणि राणा वीर सिंग ना युद्धात वीरगती प्राप्त झाली. राणा जी च्या पत्नी राणी रूपबा ह्या अत्यंत रूपवान होत्या आणि ती बातमी सुलतानाला समजल्यावर हा सुलतान राणीकडे लग्नाची मागणी करू लागला. अर्थात ती मागणी ही धमकीपेक्षा कमी नक्कीच नसणार. राणी ने अट घातली की तिच्या पती ने हाती घेतलेली अडालज विहीर जर सुलाताने पूर्ण केली तर ती लग्नाला संमती देईल आणि मग काय, हे अडलेलं काम अत्यंत वेगाने सुरु झालं. विहीर पूर्ण झाल्यावर राणी ने जातीने विहिरीची पाहणी केली, संत सज्जनांना विहिरीच्या पाण्यात स्नान करू देऊन ते पाणी पवित्र केलं आणि मग ह्यात विहिरीत उडी मारून जीव दिला. एक पतिव्रता स्त्री मरणापूर्वी गावकऱ्यांसाठी अमूल्य उपहार देऊन गेली आणि आपल्यासारख्यांना अभिमान देऊन गेली. राणीच्या आत्मदानाचा ह्या विहिरीशी संबध आहे. एका वीर राजपूत राणीच्या बलिदानाची साक्ष देत ही विहीर आज 500 वर्ष उभी आहे.
विहिरीला तीन प्रवेश आहेत जे पहिल्या मजल्यावर एकत्र येतात. हा अष्टकोनी मजला आणि त्यात कोरलेल्या चार ग्यालाऱ्या दगडी नक्षीकामाने अक्षरश: भरून टाकल्या आहेत. संपूर्ण विहीर वाळूजान्य दगडापासून बनलेली आहे. विहिरीचे बांधकाम दक्षिणोत्तर केलेलं आहे. एकूण पाच माजले जमिनी खाली बांधले आहेत आणि खालच्या मजल्यावर पाण्याजवळ तापमान साधारण ५-6 डिग्री से कमी होतं. विहिरीची बांधणी करतांना सूर्य प्रकाश सरळ पाण्यावर पडणार नाही ह्याची काळजी घेतलेली आहे. वरील कथे प्रमाणे विहिरीचे बांधकाम हिंदू आणि मुसलमान दोन्ही राजवटीत झाल्याने त्याचा शिक्का विहिरीतील नक्षीकामांवर सहज दिसतो. विहीर केवळ पावसाचे पाणी साठवत नाही तर जमिनीतील पाण्याच्या साठ्यापर्यंत जाते. विहिरीत धार्मिक चिन्हे सुद्धा कोरली आहेत जेणेकरून विहिरीतील वातावरण पवित्रमय राहावे.
विहिरीला लागून असलेल्या देवीच्या मंदिराचा गाभारा संपूर्ण रंगीत काचेच्या तुकड्यांनी सजवलेला आहे. आणि त्यात काही पौराणिक कथांचे दृश्यं बघायाला मिळतात
विहिरीच्या वरती काही कबरी सारखे बांधकाम बघायला मिळते. असं म्हणतात की महमद सुलतानानी विहिरीचे बांधकाम करणाऱ्या प्रमुख कारागिरांना अशीच अजून एक विहिरी बांधता येऊ शकते का ? असं विचारलं आणि त्यांनी होकार दिला. त्याचं बक्षिस म्हणजे ह्या त्यांच्या कबरी आहेत. पण हि केवळ एकीव कथा आहे.
ह्या अप्रतिम विहिरीला प्रवेश शुल्क नाही. विहीर सकाळी ८:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत बघण्यास उघडी असते असं समजलं. तुमच्या अहमदाबाद प्रवासात जे चूकवी नये असे हे एक पर्यटन स्थळ आहे.
होळकर राजवाडा - Holkar Palace, Indore
इंदौर हे मध्यप्रदेशातील एक महत्वाचे शहर आणि ह्या शहरात मानाने उभ्या असेलेल्या काही इतिहासील वस्तूंपैकी एक महत्वाची वास्तू म्हणजे होळकर वाडा, शिवरायांचा मावळा गगनभरारी घेत निघाला आणि त्याने राज्यविस्तार करता करता भारतात अनेक प्रमुख शहरात आपले बस्तान बसवले, थोरल्या बाजीरावांनी अचूक हेरलेल्या काही वीरांपैकी एक होते हे होळकर. अटकेपार घोडी फेकण्याबरोबर विस्तारत चालेल्या राज्याची घडी मोडू नये म्हणून मोक्याच्या ठिकाणी मराठी सैनिक तैनात केले गेले आणि तिथे त्यांच्या सरदारांचे राजवाडे उभे राहिले. बडोद्याला गायकवाड, ग्वाल्हेरला शिंदे (आत्ताचे सिंधिया) तसेच इंदौर चे हे सरदार होळकर.
मल्हारराव होळकर ह्यांनी स्वराज्यनिर्माण कामात सिंहाचा वाटा उचलला. श्रीमंत बाजीरावांबरोबर अनेक लढाया जिंकल्या. सन १७३८च्य पालखेडच्या प्रसिद्ध लढाईत सुद्धा पेशव्यांबरोबर मल्हारराव होते. सतत मोहिमेवर असलेल्या होळकरांनी कुटुंब एका ठिकाणी स्थिर राहिले तर कुटुंबाची काळजी राहणार नाही आणि लढाया संपूर्ण मानसिक विवंचने शिवाय लढता येतील म्हणून शाहू महाराजांकडे शब्द टाकला. हि जहांगिरी ची मागणी शाहू महाराजांनी मान्य केली आणि श्रीमंत बाजीरावांशी सल्ला मसलत करून मल्हार रावांच्या पत्नी सौ गौतामाबाई होळकर ह्यांना खाजगी जहांगिरी प्रदान केली. सन १७३४ ला बहाल केलेल्या ह्या खाजगी जहांगिरीत मालवा, खान्धेश मधील अनेक गावांबरोबर इंदौर चा ही समावेश होता. आणि मग होळकरांचे कुटुंब इंदौरला स्थिर झाले. पुढील काही वर्ष हि मंडळी खाननदी काठी राहिली आणि साधारण सन १७४७ ला ह्या राजवाड्याचे काम चालू झाले. ह्या राजवाड्याने मराठ्यांचा पानिपतात झालेला प्रभाव ऐकला आणि सन १७६५ ला पानिपत युद्धाचे दु:ख ना पचवता मल्हाररावांनी जगाचा निरोप घेतला आणि मग राजकारण पहिले, अनेक शासक पहिले. मराठ्यामधले आपसी वैर पहिले. होळकरांमधील अंतर्गत गृहयुद्ध ही पहिले.
मल्हाररावांनंतर अहिल्याबाई होळकरांनी राजधानी महेश्वरला जरी हलवली तरी इंदौर ही होळकरांची प्रमुख लष्करी छावणी म्हणून कायम राहिली. त्यानंतर चे शासक यशवंतराव होळकरांच्या काळात मात्तबर मराठे सरदार शिंदे आणि होळकरा यांच्यामधील दुही विकोपाला गेली आणि होळकरांनी उज्जैन वर हल्ला केला आणि बदला म्हणून शिंदेंचे सेनापती सर्जेराव घाटगे ह्यांनी इंदौर वर हल्ला केला. राजवाड्याचे अतोनात नुकसान झाले, मल्हाररावांनी त्यांचा खजिना वाड्यात लपवला आहे असे समजून वाडा खोदून काढला गेला. पुढे इंग्रजांशी पराभव पत्करावा लागल्यावर इंदौर ला पुन्हा होळकरांची राजधानी करण्यात आले. होळकरांचे प्रधानमंत्री तात्या जोग ह्यांनी राजवाडा पुन्हा बांधून काढला, ते बांधकाम सन १८१८ ते १८३३ इतके चालले. राजवाड्यात दगडी आणि लाकडी अश्या दोन्ही प्रकारची बांधकामे आहेत. सन १८३४ ला राजवाड्याला लागलेल्या आगीमुळे एक मजला जळून गेला. पुढे सन १९८४ साली शीखांविरुद्ध दंगलीत हा राजवाडा सामाजाकंटकांकडून पुन्हा जाळला गेला. असे अनेक घाव अंगावर घेत उभा असलेला हा वाडा
विविध
काळात आणि वेगवेगळ्या लोकांकडून राजवाड्याचे काम झाल्यामुळे इथे मोगल,
मराठा, राजपूत आणि फ्रेंच बांधकाम शैलीचे एकत्रीकरण झालेले पाहायला मिळते. ७
माजली उंच वाड्याचे खालचे तीन माजले दगडी बांधकामाचे आहेत तर वरचे मजले
लाकडाच्या बांधकामाचे आहेत. जाळीदार नक्षीकाम आणि लाकडी ग्यालेरी अप्रतिम
दिसते. भक्कम मराठा शैलीच्या दरवाजातून आत गेलं की मधला चौक लागतो आणि समोर
एक मजली दगडी बांधकाम आहे तिथे खाली श्री गजाननाचे मंदिर आणि वरती दरबार
हॉल आहे.

डावीकडील
इमारतीत पहिल्या मजल्यावर होळकरांच्या काळातील वास्तू, शस्त्र , गालिचे,
भांडी तसेच काही ऐतिहासिक कागद पात्रांचे प्रदर्शन मांडले आहे. यशवंत
होळकरांच्या काळात त्यांचे पेशव्यांशी सुद्धा विसंतुष्ट वाढले होते. पुढे
नाना साहेब पेशव्यांना इंग्रजांशी बंड केल्या कारणाने पकडण्यासाठी
होळकरांकडून एक लाख रुपये बक्षिस जाहीर करण्यात आले होते तो १८५८ सालचा
दस्तावेज ही ह्या प्रदर्शनात मांडला आहे. तसेच होळकर वंशाचा इतिहास आणि
राजवाड्याची ऐतिहासिक माहिती सुद्धा लोकांसाठी उपलब्ध आहे. राजवाड्यासमोर
एक लहानसा पण सुंदर बगीचा असून तिथे अहिल्यादेवी होळकरांचा सुंदर पुतळा
आहे.
हा राजवाडा २५० वर्ष्याच्या इंदौर आणि माळवा इतिहासाचा खडा साक्षीदार आहे. आणि नक्की बघावा असा आहे. राजवाड्याच्या प्रवेशासाठी रु १० आणि कॅमेरा साठी रु. २५ अशी फी आकारली जाते.
राजवाडा आवर्जून बघावा असाच आहे रात्री विद्युत रोषणाई केलेला राजवाडा तर फारच खुलून दिसतो. इंदौर रेल्वे स्टेशन राजवाडा जवळ आहे, अगदी चालत गेलात तर अधी कृष्णापुरा छत्री बघून थोडी विश्रांती घेऊन राजवाड्यावर येऊ शकतात. राजवाड्या बाहेर गर्दीचे मार्केट आहे. खाण्यापिण्याच्या गाड्याही ह्या परिसरात भरपूर आहे.
वसई चा किल्ला - Bassein Fort - Vasai Fort
मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावर हा विशाल जलदुर्ग मदतीची हाक मारत उभा आहे. विशाल ह्या साठी की हा किल्ला ११० एकर वर्ग इतक्या क्षेत्रफळावर पसरलेला आहे. पूर्वी ह्या किल्ल्याच्या तीन बाजुंना पाणी / दलदल असायची पण आता समुद्र काही किमी आत सरकला आहे आणि किल्ला समुद्र तीरी वसल्यासारखा दिसतो. किल्ल्याभावती तिवराच जंगल दिसतं. आणि किल्ल्याला लागून उभी राहिलेली बांधकामं. किल्ल्यामध्ये बघण्यासारख्या अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत तसेच दुर्लक्षित राहिल्यामुळे किल्ल्यात दाट जंगलाचा भाग हि आहे. आता ही वेडीवाकडी वाढलेली झाडं, वेली इथल्या अमूल्य ऐतिहासिक वास्तूंना वेढा घालून बसल्या आहेत ज्यामुळे ह्या पुरातन बांधकामाची वेगाने क्षती होत आहे. किल्ल्यात ताडीची झाडं उगवली आणि तो धंदा ही जोरात चालू आहे म्हणूनच म्हटलं की हा अप्रतिम किल्ला मदतीची हाक मारत उभा आहे.
हा
किल्ला जरी पोर्तुगीजांची ओळख सांगणारा असला तरी हा खरा बांधला तो भंडारी
भेंडाले ह्या सरदाराने १४१४ साली. त्यापूर्वी सुद्धा हा प्रदेश प्रसिद्ध
होताच ते म्हणजे एक बंदर म्हणून, अगदी यादव राजांच्या काळात आणि त्या
पूर्वी सुद्धा ह्या प्रदेशाचा उल्लेख आढळतो पण किल्ला बांधला गेला तो
भंडारी भेंडाले ह्यांच्या कार्यकाळात. पुढे गुजराथ सुलतानाने किल्ला
ताब्यात घेतला तो १५३० साली आणि नंतर पोर्तुगीजांनी किल्ला जिंकला तो १५३४
साली असं इतिहास सांगतो. आणि किल्ल्याचा खरा उत्कर्ष घडला तो
पोर्तुगीजांच्या काळात, साधारण दहा वर्ष किल्ल्याचे बांधकाम सुरु होते.
भक्कम तटबंदी, १० बुरुज आणि एका नंतर एक बांधली गेलेली सात चर्च तसेच
न्यायालय, तुरुंग, आश्रम, जहाज बांधणी चे कारखाने, पुरातन स्नान गृहे,
दवाखाने असं बरच काही ह्या किल्ल्यात बनत राहिलं नंतर १७३७ साली मराठ्यांने
हा किल्ला जिंकून त्याचे नामांतर ही केले होते तेव्हा किल्ल्याचे नाव होते
“बाजीपूर” आणि किल्ल्यात बरेच काम ही केली गेली. हा किल्ला जिंकतांना
१२०० मराठे आणि ८०० पोर्तुगीज सैन्य धारातीर्थी पडलं आणि गडावार भगवा
फडकला. तब्बल २०५ वर्षांनी वसई पोर्तुगीजमुक्त आणि जुलूममुक्त झाली पुढे
१७८० साली हा किल्ला ब्रिटीशांच्या हाती गेला आणि हळूहळू किल्ल्याचे महत्व
कमी होत गेलं. १८६० साली ब्रिटिशांनी हा किल्ला चक्क भाडेपट्टी वर एका
सैन्य अधिकाऱ्याला दिला आणि तिथे त्याने उसाची शेती केली. पोर्तुगीज चर्च
चा कारखान्या आणि गोडाऊन सारखा उपयोग केला त्या काळात किल्ल्याची हानी होत
राहिली. स्वातंत्रानंतर हा किल्ला दुर्लक्षितच राहिला. पण ह्या किल्ल्या
अनेक ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे.
ह्या किल्ल्यामार्फत मासे, जातिवंत घोडे, जहाज बांधणी असे अनेक व्यवसाय भरभराटीस आले होते. पोर्तुगीजांच्या भरभराटी बरोबरच भूमिपुत्रांवर होणारे अतोनात अत्याचार आणि जबरदस्तीने चालेली धर्मपरिवर्तन सुद्धा ह्या किल्ल्याला पहावी लागली. १५४८ साली पोर्तुगीज संत फ्रान्सिस्को झेविर ह्या किल्ल्यात उतरला होता आणि त्याकाळात प्रचंड लोकांचे धर्मपरिवर्तन केले गेल्याची नोंद इतिहासात आहे.
किल्ला
संपूर्ण बघायला एक अख्खा दिवस सुद्धा कमी पडतो. किल्ला बघता बघता अनेक
रानफुलं, फुलपाखर आणि पक्षी बघायला मिळतात म्हणजे ऐतिहासिक वास्तू आणि
निसर्ग भ्रमंती दोन्ही चा आनंद घेता येतो. आम्ही किल्ला बघायला सुरुवात
केली ती दर्या दरवाजा कडून, समुद्राकडे उघडणारा हा दरवाजा. भरभक्कम भिंती
आजही शाबूत आहेत आणि गत वैभवाची साक्ष देत खंबीर उभ्या आहेत. किल्ल्याच्या
दरवाजाला लागून एक लहानसे मंदिर ही आहे आणि बाजूला तिवराची जंगलं. जुना
लाकडी दरवाजा मात्र मोडकळीला आला आहे. प्रवेश सरळ ना ठेवता एका दरवाजा नंतर
लगेच दुसरा दरवाजा ९० अंशाच्या कोनात बांधला आहे. इथून आत आलो की
किल्ल्यात नाही तर जंगलात आल्याचा भास होतो इतकी झाडी आहेत. मग लागतात
वाखारीचे अवशेष आणि मग सेंट जोसेफ चर्च,
जोसेफ चर्च हे १५४६ ला बांधलं गेलं, घंटेसाठी बांधलेला मनोरा, तटबंदीला लागून असलेले हे चर्च त्याच्या मागच्या दराने तटबंदी कडे जायला दगडी शिड्या हि आहेत. एक मोठी कमान अजून शाबूत आहे आणि त्यावर आतून पोर्तुगीज पद्धतीची नक्षी आहे आणि समोर उंच मनोरा. त्यावर जायचा जिना ही मोडकळीस आला तरी शाबूत आहे. काही बंद केलेल्या खिडक्या आहेत. हे चर्च नंतर बरेच बदलेले असावे असं वाटतं. चर्च समोर दाट जंगल आणि ताडीची झाडं ही आहेत. बाजूच्या तटबंदी वरून समुद्राचे रूप बघायला मिळतं.
इथून हा रस्ता पुढे बालेकिल्ल्याकडे जातो हा मोठा परिसर आणि पाणी, शस्त्र भांडार आणि अनेक दगडी खोल्या असलेला बालेकिल्ला आहे. ह्याचा दरवाजा पडका आहे आणि इथे हि एका दरवाजा नंतर वळून दुसरा दरवाजा लागतो. विस्तीर्ण परिसर, जाड दगडी भिंती आणि बालेकिल्ल्याला लागून आहे नोस्सा सेन्होरा चर्च हे साधारण १५३५ साली बांधलं म्हणजे बालेकील्ल्यासोबातच ह्याचं काम सुरु झालं असावं. बाहेरील तटबंदी ही १५३६ नंतर बनवली गेली.
बालेकिल्ल्याचा एक बुरुज जरा ठीक रुपात उभा आहे आणि जवळच स्नानगृह, न्यायालय आहे तसाच नागेश्वर मंदिर आहे. पुढे कारागृह, हॉस्पिटल ह्याचे अवशेष
पुढे भव्य पण पडीक डोमिनिक चर्च, जे संत गोन्कॅलो च्या नावाने १५८३ ला बांधण्यात आलं, एकंदरीतच पोर्तुगीजांनी चर्च आश्रम ह्याच्या माध्यमातून धर्मप्रचाराचा जोर वाढवत नेला होता. हे चर्च आणि त्याला लागुनच असलेला आश्रम फारच मोठा आहे अर्थात हे सगळं आता भग्नावस्थेत बघायला मिळतं
ह्या चर्चला लागून डांबरी रस्ता जातो तो ओलांडला की भव्य चिमाजी अप्पा ह्याचे स्मारक. अप्रतिम पुतळा आणि त्यावर विराजमान योद्धा. खरोखर अप्रतिम कलाकृती आहे, अर्थात अलीकडचीच पण अभिमानाने मन भरून यावं अशी
ह्या रस्त्याने वसईकडे चालत निघालो की बाजूला कवायतीचे मैदान आणि पलीकडे अजून खंबीर उभी तटबंदी दिसते आणि हा रस्ता जिथून किल्ल्या बाहेर निघतो त्याच्या डाव्या वाजूला दिसतो एक खुष्कीचा मार्ग. अक्षरश: ह्या दरवाजातून गेलं की गोल फिरत चिचोळ्या वाटेने किल्ल्यात प्रवेश आहे. इथे आता मध्ये एक मारूतीच मंदिर आहे पण ते पूर्वी नसणार. ह्या दरवाज्यातून शत्रू आला तर अगदी हातावर मोजता येतील इतके सैनिक शेकडोच्या सैन्याला अडवून धरू शकतात अशी ह्या मार्गाची ठेवण आहे. हा दरवाजा आतून मात्र नक्षीकामाने नटला आहे किंवा असं म्हणू की इथे थोडे नक्षीकाम शिल्लक आहे.
ह्या दरवाज्याचा वरच्या बाजूला गेलं तर आपण फत्ते बुरुजावर जातो तिथे झेंडावंदनाची सोय आहे, बहुदा ठराविक कार्यक्रमाच्या वेळी इथे सरकारी झेंडावंदन हल्ली होत असावं
फत्ते बुरुजावरून समोर दिसत ते फ्रान्सिकन चर्च , हे सुद्धा प्रशस्त चर्च आहे आणि त्यात पोर्तुगीज राज्यासाठी काम करणाऱ्या वीर योध्याच्या कौतुकासाठी एक खास व्यवस्था आहे. ह्या चर्चच्या दगडी जमिनीवर थडग्याचे दगड नावासहित लावलेले आहेत, त्यावर त्या वीरा च नाव आणि काही पोर्तुगाल चिन्ह त्यांच्या कार्याचं कौतुक म्हणून लावलेले दिसतात. ह्या चर्च ची कमान आणि एकंदरीत बांधणी बघता हे नक्कीच एक अतिभव्य चर्च असणार ह्याची खात्री पटते. चर्च शेजारी आश्रम हि आहे
पुढे अजून काही चर्च काही पडीक घराचे अवशेष, जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष असं अजूनही बरच बघण्यासारखं आहे. दहा बुरुजांचा हा भव्य किल्ला वाचवण आणि जतन करणं अत्यंत महत्वाचं वाटत. काही वर्षपूर्वी इथे अनेक महत्वपूर्ण गोष्टी उत्खालनात सापडल्या त्यात काही विरगळ हि आहेत .
विरगळ
म्हणजे वीर पुरुषाची शिळा ज्यावर युद्धाचे प्रसंग कोरलेले असतात. म्हणजे
लढतांना प्राण अर्पिलेल्या ह्या वीराचे विरगळ हे स्मारकच म्हणा ना. आता हि
विरगळ ची पद्धत यादव आणि शिलाहार कालीन म्हणजे हा प्रदेश हजारो वर्षाचा
इतिहास सांगू शकेल. इथे कदाचित असे अनेक पुरावे माहिती मिळू शकेल. आणि
त्याहून महत्वाचं म्हणजे केवळ वसई किल्ला आणि फक्त पोर्तुगीज हे समीकरण
कदाचित उद्या खोट ठरेल.
चिमाजी अप्पा आणि त्यांच्या सोबत लढणाऱ्या सर्व वीरांचे आणि स्वभूमी परत मिळवण्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या १२०० वीर मराठ्यांचे विचार मानत घोळवत हि भटकंती संपते.
वसई स्टेशन पासून रिक्षा आणि लोकल बस ची उत्तम सुविधा आहे ज्याने तुम्ही किल्ल्याच्या मधोमध पोहचू शकता. स्वत:चे वहान असल्यास किल्ल्यात वाहनाने हि फिरता येतं. किल्ला जमिनीवर असल्याने कुठे उंच चढाई नाही. ह्या किल्ल्याला एकदा भेट देणं नक्कीच गरजेचं आहे.
खाली नकाश्यामध्ये वसई किल्ल्यातली प्रेक्षणीय स्थळे मार्क केली आहेत.
Maharashtra Nature Park - महाराष्ट्रा निसर्ग उद्यान
टाकाऊ
तून टिकाऊ हे वाक्य आपण खुपदा ऐकतो पण अश्या एखाद्या टाकाऊ जमिनीवर
हिरवीगार वनराई निर्माण करून निसर्गाची जणू पूजा मांडल्याचा अनुभव येतो तो
ह्या महाराष्ट निसर्ग उद्यानात. मुंबईच्या अगदी मध्यात असं दाट जंगल, विविध
फुलपाखर आणि अनेक पक्ष्याची घरं असू शकतं हे तिथे प्रत्यक्ष गेल्यावरच
कळतं. इथे साप ही आहेत पण जास्त करून Rat snake, जे माझ्या माहिती प्रमाणे विषारी नसतात आणि असं ही ते माणसाच्या नादी लागत नाहीत
मुंबईत सुट्टीच्या दिवशी मुलांना निसर्गाच्या सानिध्यात न्यायाची इच्छा असेल तर हि एक उत्तम जागा आहे. विविध पक्ष्यांचे वास्तव्व्य असल्याने पक्षीमित्रांची गर्दी तर हे उद्यान खेचतच पण त्याच बरोबर शांत सुंदर आणि निसर्गाने बहरलेलं वातावरण प्रेमी युगुलांना ही आकर्षित करत.
संपूर्ण कचऱ्याच्या ढिगाखाली खितपत पडलेली ही साधारण ३७ एकर जमीन काही विचारवंतांच्या सुपीक विचारांनी आणि मेहनतीने एका सुंदर उद्यानात रुपांतरीत झाली आहे. १९९४ पासून ह्या जमिनीभवती कुंपण करून वृक्ष संवर्धनाच्या कामाला सुरुवात झाली आणि आज इथे दाट जंगल पूर्णत्त्वास आलेलं बघायला मिळतं
मी आणि मजा छोकरा दोघे भर उन्हाळ्यात इथे पोचलो आणि २-३ तास कसे गेले ते समजलं सुद्धा नाही. खरं तर उद्यान सकाळी ८:३० ला उघडतं आणि शनिवारी रविवारी ७:३० ला आणि जेवढं लवकर जमेल तेवढं लवकर इथे जायला हवं. आम्ही उद्यानात प्रवेश केला आणि लगेचच आम्हाला दोन तांबट पक्षांची ची मस्ती , कावळा कोकिळा पकडा पकडी, घारी ची शिकार, जंगली मैना आणि अनेक पानथळ जागेवर दिसणारे पक्षी दिसले. उद्यानाच्या बाजूला वाहणारी मोठी गटार नसून ती मिठी नदी आहे हे मुलाला सांगतांना मलाच लाज वाटत होती. इतकी दुर्गंधी ह्या नदीला येते. इतक्या कलुषित पाण्यात काय मासे वाढणार आणि काय हे पक्षी तिथे खाणार. नदी ची ती दशा बघून नक्कीच वाईट वाटत.
उद्यानात विविध संस्थेचे निसर्ग संबंधित तसेच फोटोग्राफी, चित्रकला शिबिरं हि होतात आणि त्यासाठी उत्तम व्यवस्था इथे आहे. स्वच्छ प्रसाधनगृहे आणि उत्तम पाण्याची व्यवस्था ही नेहमी न आढळणारी काही वैशिष्ठे इथे बघायला मिळतात. अर्थात बाजूला धरावी ची प्रसिद्ध वसाहत आणि मिठी नदीत प्रचंड कचरा त्यमुळे अनेक कावळे घिरट्या मारतांना प्रथम दिसतात पण जरा नजर फिरवली तर बाकी पक्षी सुद्धा नजरेस पडतात. विविध फुलांची झाडं आहेत आणि सर्व ऋतूमध्ये बहरणारी झाडं इथे मोठ्या विचारपूर्वक लावली आहेत. बहावा, रक्त चाफा, कैलाशपती वगैरे झाडांनी आणि दाट सावलीने बनवलेल्या नैसर्गिक ए सी ने आमचा संपूर्ण थकवा काढून टाकला. उद्यानाची देखरेख करायला टीम आहे जे सतत उद्यानात फेरफटके मारत असतात. उद्यानात सुंदर नर्सरी सुद्धा राखलेली आहे. सप्टेंबर ते मार्च हा इथे जायला बेस्ट मोसम असावा अर्थात भर उन्हाळ्यात ही फुलपाखर कमी दिसतील पण १२ महिने इथे जायला हरकत नाही
ह्या उद्यानाची प्रवेश फी रु १० आहे जी खरोखरीच खूप कमी आहे. सायन स्टेशन पासून अगदी चालत तुम्ही ह्या उद्यानात जाऊ शकता. एखाद्या शनिवारी किंवा रविवारी तुमच्या मुलांना घेऊन छोटेखानी पिकनिक नक्की करा
महाराष्ट्रा निसर्ग उद्यान - गुगल नकाशा इथे दाखवला आहे
गणेश घोळ मंदिर - Ganesh Ghol Mandir
शिळफाटा म्हंटल की खिडकाळेश्वाराचं पुरातन मंदिर किंवा अगदी शिळफाट्यावर वसलेलं दत्ताचं मंदिर ही चांगली माहितीतली मंदिर आहेत पण शिळफाट्या समोर दिसणाऱ्या टेकडीवर निसर्ग रम्य अश्या वातावरणात एक गणेशाचं सुंदर मंदिर ही आहे हे नेहमी त्या रस्त्याने जाणार्यांना फारतर माहिती आहे.
पावसाळ्यात हिरवागार होणारा हा परिसर हिवाळ्याच्या मध्यापर्यंत तसाच असतो. रानफुलं, हिरवीगार झाडं आणि ह्या सगळ्याच्या मध्ये वसलेलं टेकडीवरच हे एक लहानसं मंदिर नक्कीच भेट द्यावं असं आहे. पावसाचा जोर चांगला असेल तर जिथून टेकडी चढायला सुरुवात करतो त्याच्या थोडं डावीकडे पाण्याचा एक जोरदार ओहाळ बघायला आणि इच्छा असेल तर डुंबायला मिळतो.
शिळफाट्याला डोंबिवलीकडून आलो की डावा रस्ता पनवेल कडे, उजवा रस्ता मुब्र्याकडे आणि एक रस्ता समोर टेकडीवर जातो जो पुढे महापे मार्गे वाशीकडे जातो ह्या रस्त्यावर टेकडीचा अर्धा चढ गाडीने गेलो की डाव्याबाजूला काही वेळाने टेकडीवर जाणारे जिने दिसतात हेच तुम्हाला गणेश घोळ मंदिराकडे नेतात .
साधारण १४०-१५० स्टेपस आहेत पण दमावणाऱ्या नाहीत. साधारण १०-१५ मिनिटात तुम्ही ह्या मंदिरापर्यंत येऊन पोचतात. मंदिराचा परिसर स्वच्छ आहे आणि मंदिराची देखरेख , पूजा अर्चा करण्यासाठी एक महाराज मंदिरासमोर घर बांधून राहतात. परिसरात फुलझाड लावलेली असल्याने परिसर प्रसन्न वाटतो. एका खूप जुन्या वडाच्या झाडावर एक झोपडी बनवली आहे जिथे शिडीने जावं लागतं. नुकत्याच झालेल्या कुठल्याश्या एका सोहळ्यासाठी होम कुंड , हवन मंडप आणि काही लाकडाच्या झोपड्याही बनवल्या आहेत. बहुदा एखाद्या साधू चा आश्रम असावा
मंदिराकडे नेणारा रस्ता नागमोडा आहे आणि परिसर हिरवागार असल्याने खूप प्रसन्न वाटत. मंदिरात दगडाला शेंदूर फासून एक नैसर्गिक मूर्ती आणि एक गणरायाची नवीन मूर्ती अश्या दोन मुर्त्या आहेत. मंदिर एका मोठ्ठ्या दगडाच्या खोबणीमध्ये वसवलं आहे. ह्या टेकडीवरून आजूबाजूचा परिसर ही मस्त दिसतो. पावसाळ्यात मनमुराद भिजत जायला डोंबिवली जवळचा हा एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे. हिवाळ्यात ही भरपूर पक्षी, रानफुलं आणि हिरवागार निसर्ग आपलं स्वागत करतच जणू इथे उभा असतो.
डोम्बिवली हून कार , दुचाकी किंवा अगदी वाशीकडे जाणाऱ्या बस ने आपण इथे पोहचू शकतो. फत्त कल्याणफाटा ला उतरून १०-१२ मिनिट जास्त चालावं लागतं. इथे यायला भरपूर बसेसची सोय आहे. भरभरून पाउस पडत असल्याने फोटो मोबाईल ने काढले कॅमेरा बाहेर काढायची हिंमत झाली नाही
गुगल नकाश्यामध्ये ह्या मंदिराचं नाव ओंकारेश्वर मंदिर दाखवलं आहे ते बदलायची विनंती गुगल कडे केली आहे

















































































No comments:
Post a Comment