Thursday, October 20, 2022

विदर्भातील लेणी

 बौध्द धर्म, हा जैन धर्म धर्माप्रमाणे वेदप्रामाण्यावर मुळीच विश्वास न ठेवणारा प्रमुख नास्तिक धर्म होय. या धर्माची मुहूर्तमेढ शाक्यकुलोत्पन्न गौतम बुध्दाने सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी वाराणसी जवळ सारनाथ येथे रोवली. त्यानंतर हा धर्म भारतभर व भारताबाहेर पसरला. बुध्द स्वत: मूर्तिपूजा विरोधक होते. ईश्वराच्या अस्तित्वाचा त्याने कधीच पाठपुरावा केला नाही. त्याचे म्हणणे होते की, “ तुम्ही स्वत:चे दीपक स्वत:च व्हा, आणि स्वत:लाच शरण जा.” असा त्याचा उद्घोष असे. त्यामुळे प्रतिमेला व तिच्या पूजेला स्थान नव्हते.
     बुध्दाच्या महापरिनिवार्णानंतर (सुमारे इ.स.पू.४८३) मगधाचा राजा अजातशत्रू याच्यावेळी बौध्दांची प्रथम सभा(संगीती) भरली व बौध्द वाङमयाला दृढ रुप प्राप्त झाले. दुसरी सभा वैशालीस रेवंत भिक्षूच्या अध्यक्षतेखाली घेतली गेली. बौध्दाची तिसरी संगीती मौर्य सम्राट अशोक यांनी भरविली. येथे जुन्या मताचा पुन्हा विजय झाला. चौथी आणि महत्त्वाची बौध्द संगीती कुषाण राजा कनिष्क याचे काळात काश्मिरमधील कुंडलवन येथे झाली. ह्या सभेचा वसुमित्र हा अध्यक्ष होता. त्यावेळी थेरवादाचे पारडे उलटले व स्पष्टपणे बौध्द धर्म दोन भागात विभक्त झाले. थेरवादाला ’हीनयान’ म्हणू लागले तर सुधारणा वादी बौध्दांस ’महायानी’ म्हणू लागले. ह्यानंतर बौध्दांचा तिसरा पंथ निर्माण झाला, त्यास ’वज्रयान’ म्हणू लागले. ह्या पंथातील लोक तंत्र, मंत्र, हठयोगावर विश्वास ठेवणारे होते.
     प्रतीक रुपात बुध्दाचे पूजन करण्याचे विधान बौध्द धर्मात पूर्वीपासूनच होते, पण बुध्दाची मूर्ती घडविण्याची आज्ञा नव्हती. म्हणजेच ह्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात येतो असा की, बौध्द धर्माला सुध्दा हीनयान काळात पूजनाचे महत्त्व पूर्वीपासूनच मान्य होते. परंतु मूर्ती ऎवजी प्रतीक पूजनास महत्त्व होते.
https://www.siddhartha35.blogspot.com
बौध्द प्रतीके
    बौध्द धर्माच्या स्थापनेपासून बुध्दाची मूर्ती प्रत्यक्षात येण्याचे दरम्यान सुमारे सहाशे वर्षाचा काळ गेला. या काळात बौध्दांच्या आराधनेचे मुख्य केंद्र ’बुध्द’ तर होतेच, पण निर्वाण प्राप्त झालेल्या निराकाराला पुन्हा साकार करुन प्रत्यक्ष समोर उभे करण्याची कल्पना बळावली नव्हती. पण त्याच बरोबर निराकाराची शून्यात कल्पना करुन त्याची आराधना करणे शक्य नव्हते. साहजिकच बुध्दाकरिता प्रतीकाचा शोध सुरु झाला.
     बुध्दाचे प्रतिनिधित्व करण्याकरिता समोर येऊ पाहाणारी प्रतीके शक्य तितकी ’ बुध्दाच्या जवळची’ हवी होती. अर्थात प्रत्यक्ष शरीर किंवा शरीराचे पंचभौतिक अवशेष अथवा अवशेषाची स्थापना केलेले स्थान यापेक्षा जवळचे काय असणार? या दृष्टीने ’स्तूप’ हे बुध्दाचे सर्वोत्तम प्रतीक होऊ शकत होते व ते झालेही. पण स्तूपाचा संबंध बुध्दाच्या निर्वाणाशी होता. साहजिक भाविक मनाला तितकासा सुखकर नव्हता. म्हणून बुध्दाच्या जीवनाशी संबंधित असलेल्या वस्तू व विशिष्ट घटनांचे स्मरण देणार्‍या वस्तू बुध्दाची उत्तम प्रतीके बनली. एकदा प्रतीके ठरल्यानंतर मग बुध्दाची उपासना, बुध्दाच्या सामर्थ्याची कल्पना, बुध्द चरित्राचे कलेत अंकन वगैरे गोष्टी सोप्या झाल्या. भरहूत आणि सांचीच्या स्तूपांवर जेथे बुध्द कथांचे चित्रण आहे, ती स्थळे बारकाईने पाहिल्यास हे चटकन लक्षात येईल की, गोष्टीची मांडणी करत असताना जेथे बुध्दाच्या अंकनाची गरज भासत असे, तेथे बुध्दाचे कोणते तरी प्रतीक आणून ठेवत. बुध्द मूर्ती अस्तित्वात येईपर्यंत सर्वत्र हीच पध्दत होती. याकाळात मान्यता पावलेली बुध्द प्रतीके पुढील प्रमाणे होती- (१) पांढरा हत्ती (२) कमळ (३) घोडा (४)बोधीवृक्ष (५) वज्रासन (६) गंधकुटी (७)भिक्षापात्र (८) प्रभामंडल (९) धर्मचक्र (१०) पदचिन्हे ११) त्रिरत्न (१२) स्तूप
https://www.siddhartha35.blogspot.com
अशोकाचा बौध्द धर्मास राजाश्रय
    चंद्रगुप्त मौर्याचा नातू अशोक याने बौध्द धर्माचा स्वीकार करुन त्या धर्माच्या प्रसाराला हरप्रकारे सहाय्य केले. त्याच्या आश्रयाने या धर्मपंथीयाच्या हरतर्‍हेच्या वास्तू उभ्या राहिल्या. या वास्तू चित्रे व मूर्ती यांनी सुशोभित करण्यात आल्या, पण बुध्दास प्रतीक रुपातच दाखविले आहे. पूर्वी पेक्षा निराळाच आशय असणारा एक कलाप्रवाह उत्पन्न झाला. नव्या पंथाच्या गरजा भागविण्यासाठी नवनवे मार्ग चोखाळण्यास प्रारंभ झाला. योगायोगाने काही नवे मार्ग व तंत्रे ठाउक असणारे कलाकार व शिल्पी, अलेक्झांडर याने इराणच्या अकेमिनियन साम्राज्याचा नाश केल्यानंतर अकेमिनियननी बाळगलेल्या कलाकारांची व शिल्पींची वाताहत झाली व त्यातील काही काही गुणी कलाकार व पंडित पूर्वेकडे वळले व त्यांनी मगधचा आश्रय घेतला असावा, असे मौर्यकालीन कलेवरुन दिसून येते.

बुध्द प्रतिमेचे आगमन
     इसवी सनाच्या सुरुवातीपर्यंत तरी प्रतीक पूजेला अधिक महत्त्व होते. परंतु त्यानंतर प्रत्यक्ष मूर्तीचा अभाव तीव्रतेने जाणवू लागला. सुधारणावादी महायानी बौध्दांना आपल्याकडील अभाव दूर करणे इष्ट वाटले. महायानी बुध्दमूर्ती घडविण्याच्या मागे लागले. मूर्ती कशी घडवावी, तिचे रुप, ध्यान कसे असावे या विषयीही त्यांनी खूप विचार केला, त्याविषयी काही नियमही बनवून ते ’साधनमाला’ ग्रंथात नमूद करुन ठेवले.
     अग्निपुराणात बुध्दमूर्तीचे वर्णन असे- गौर वर्ण, पद्मासनात बसलेला, एक वरद मुद्रेत, दुसरा हात अभय मुद्रेत, कान लांब अगदी गालांना टेकणारे आणि मिखावर शांत भाव.
          बुध्द मूर्तीचे दोन प्रकार आढळतात, एक म्हणजे बोधी प्राप्त होण्यापूर्वीचा, बोधिसत्व गौतम आणि दुसरा बुध्द गौतम.
      महायान पंथीयांत बुध्दाची मूर्ती घडविण्याची इच्छाशक्ती बळावली असली , तरी जुन्या विचारधारेला डावलून कोणतेही नवे क्रांतिकारी परिवर्तन करावयाचे असल्यास केवळ धार्मिक आचार्य नैतिक बळावर त्यात बदल करु शकत नव्हते. महासांघिक बौध्दांना सत्तेचा पाठिंबा कुषाण राजा कनिष्क (इ.स. १ ते २ शतक) यांच्या कडून मिळाला. कनिष्काने जेव्हा इतर प्रभावशाली देवतांप्रमाणे आपल्या नाण्यावर प्रथमच बुध्दालाही स्थान देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी बुध्द प्रतीमेचा अभाव तीव्रतर रुपात जाणवला असला पाहिजे. राजाज्ञेचे पाठबळ मिळताच महासांघिक बौध्दांच्या प्रेरणेने कुषाण राजाच्या उत्तर व दक्षिणेतील गांधार व मथुरा कलाशैलीतील पंडित बुध्द प्रतिमा निर्माण करण्यास पुढे सरसावले व दोन्ही कलेत बौध्द प्रतिमा अस्तित्वात आली.
     कनिष्काच्या बहुसंख्य नाण्यांवर ’शावनानो शाओ कनेष्को कोशानो’ हा शक भाषेतील लेख ग्रीक लिपित असतो. या प्रकारच्या नाण्यांवरील भागात बाजूवर बुध्दाची उभी आकृती, त्याचे मागे प्रभावली, बुध्दाचे अंगावरील वस्त्र ग्रीक पध्दतीचे आहे. ग्रीक भाषेत इजऊऊज असे त्याचे नाव लिहिलेले असते. निर्विवाद अशी नाण्यांवरील बुध्दाची ही अति प्राचीन आकृती होय आणि प्रतिकानंतरच्या बुध्द प्रतिमेला पूजन्याचा हा एक प्रथम प्रयास होय.
   बुध्दाची प्रथम मूर्ती ’बोधिसत्व’ या नावाखाली मथुरेच्या कलाकारांनी घडविली असे समजण्याकडे सध्या विद्वानांचा कल आहे. सारनाथ(वाराणसी) येथे भिक्षुपात्र याने बोधिसत्व नाव असलेली विशाल बुध्द प्रतिमा कनिष्काच्या तिसर्‍या राज्य संवत्सरात प्रतिष्ठित केली. सुरुवातीच्या बुध्द प्रतिमांना बोधिसत्व असे संबोधित केल्यामुळे सुधारणावादी बौध्दांनी एकाच दगडाने दोन पक्षी मारले. जुन्या मताप्रमाणे बुध्दाला साकार रुप तर दिले नाहीच, पण भक्ती करण्याकरिता बोधिसत्व या गोड नावाखाली बुध्दाचे साकार प्रतीक लोकांसमोर उभे करुन दिले. बुध्द हे बुध्दत्व प्राप्त करण्यापूर्वी बोधिसत्व होते या न्यायाने.

महाराष्ट्रात बौध्द धर्माचा प्रवेश आणि पुरावशेष
   संपूर्ण महाराष्ट्र बौध्द धर्माशी संबंधित पुरावशेष जसे प्राचीन गुंफा, विहार, मूर्तिशिल्प इत्यादी सर्वत्र कोरलेली दिसतात. प्राचीन गुंफाच्या स्थापत्यावरुन आणि अन्य पुरावशेष साधनांवरुन महाराष्ट्रात बौध्द धर्माचा प्रवेश इ.स. पूर्व २-३ र्‍या शतकाच्या सुमारास झाला असे दिसते. महाराष्ट्रात बौध्द भिक्षुंच्या निवासाकरीता अनेक विहारे कोरली गेली. त्या सोबतच अनेक प्रार्थनास्थळे, म्हणजेच चैत्यगृहे, स्तूप आणि बौध्द प्रतिमा कोरल्या गेल्या असल्याचे पुरावे मिळतात. या संबंधीचे पुरावे विदर्भात पौनी(भंडारा), अडम, मनसर(नागपूर), भद्रावती(चंद्रपूर), वाशीम(वाशीम) आणि पातुर(अकोला) तसेच मराठवाड्यातील अजंठा आणि वेरुळ लेण्या जगप्रसिध्द आहेतच. याशिवाय नाशिक, भाजे, कार्ले, बेडसे, कान्हेरी, आणि अन्य ठिकाणच्या लेण्या प्रसिध्द आहेत. कोकणात खेड, चिपळूण, पाले, दाभोळ, सोपारा, चौल रेड्डी आणि अन्यत्र स्थळी हीनयान व महायान पंथाचे निदर्शक पुरावे दिसतात. याशिवाय पन्हाळेकाजी(रत्नागिरी) येथील काही लेण्यात वज्रयान पंथाची निदर्शक शिल्पे सुध्दा बघावयास मिळतात.
         ह्यात महत्त्वाची बाब उपरोक्त वर्णन केलेल्या शैलगृहांवरुन(गुंफा) असे लक्षात येते की, ह्यातील बहुतांश शैलगृहे ही प्राचीन व्यापारिक मार्गावर कोरली गेली आहेत. त्याअर्थी या शैलगृहांचा वापर व्यापार्‍यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुध्दा महत्त्वपूर्ण असावा.
   महाराष्ट्रात बौध्द धर्माच्या हीनयान, महायान पंथासोबत इ.स. ९-१० च्या शतकाच्या उत्तरार्धात वज्रयान पंथाचा सुध्दा उदय होऊन, येथे तिन्ही पंथांचा प्रसार व प्रचार झाला, असे येथील लेण्यांवरुन व तेथील शिल्पांवरुन दिसते.
https://www.siddhartha35.blogspot.com
सम्राट अशोकाचे महाराष्ट्रावर साम्राज्य
     महाराष्ट्रात मिळालेल्या अशोककालीन शिलालेखांवरुन त्याचे साम्राज्य महाराष्ट्रावर होते असे दिसते. इ.स.पूर्व २४६ च्या सुमारास सम्राट अशोकाने बुध्द धर्माचा स्वीकार करुन त्याचा प्रसार संपूर्ण भारतभर करण्याच्या प्रयत्नास सुरवात केली. त्याने योन नावाच्या(बॅक्ट्रीयन) धर्मरक्षितास अपरांताकरिता(कोकणाकरिता) बौध्द धर्माच्या प्रसाराकरीता पाठविले होते. असा उल्लेख महावंश आणि दीपवंश यात मिळतो. अपरांताची राजधानी सोपारा(सुपार्क) येथे होती. तेथे बौध्द धर्माची बैठक होती. आणि तेथूनच बौध्द सिध्दांताचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रभर केला जात असे. इ.स. पूर्व २-३ र्‍या शतकात बौध्द धर्माची स्थिती अगदी प्रगती पथावर होती, हे महाराष्ट्रभर मिळणार्‍या बौध्द पुरावशेषांवरुन स्पष्ट होते. याच काळात कोकणात इजिप्त व युरोप बरोबर व्यापारिक संबंध वाढले होते आणि त्याच माध्यमातून बौध्द धर्माच्या उन्नतीस व प्रसारास अधिक चालना मिळाली. फाहियान(इ.स. पूर्व ४२०) कोकणाविषयी उल्लेख करतात की, बौध्द धर्माची प्रार्थना स्थळे, भिक्षुंकरिता निवासस्थळे, सह्याद्रीच्या
पर्वत रांगेत कोरली गेली होती. आजही कोकणपट्टीत आणि त्यालगतच्या परिसरात बौध्द धर्माच्या संबंधातील , इ.स. पूर्व दुसर्‍या शतकापासून ते इ.स. आठव्या-नवव्या शतकापर्यंतचे, पुरावशेष मिळतात.

विदर्भात बौध्द अवशेष
     विदर्भात पौनी येथील जगन्नात टेकडीवर इ.स. १९६९-७० साली झालेल्या पुरातत्वीय उत्खननात विटात बांधकाम केलेला स्तूप मिळालेला आहे. स्तुपाचा व्यास ४२ मीटर असून घूमट पेटिका पध्दतीने बांधला आहे. स्तुपाभोवती ९ मीटर रुंदीचा प्रदक्षिणा पथ, भोवती वेदिका आणि चारही बाजूस प्रवेशद्वारे होती. हा स्तूप जगप्रसिध्द सांची येथील स्तुपापेक्षाही आकाराने मोठा असून त्यांच्या तोरणावर शुंगकालीन शिल्पे कोरली आहेत. येथील स्तूप आणि कलवशेषांवरुन प्राचीन कालीन पौनी हे विदर्भातील हीनयान पंथीय बौध्द मताचे मोठे केंद्र होते, असे हमखास सांगता येते.
     याशिवाय अडम आणि मनसर(नागपूर) येथेही स्तुपाचे अवशेष मिळाले आहेत.
   चिनी प्रवासी ह्युएनत्संग यांच्या मतानुसार भांदक म्हणजे भद्रावती येथे एक प्राचीन संघाराम व एक अशोक कालीन स्तूप होता. संघाराम म्हणजे भद्रावती येथील विंध्यासन लेणी होय. त्यात स्तूप कोरले होते. परंतु कालपरत्वे महायान काळात या लेण्याचा विस्तार करुन या हीनयान लेण्याचे परिवर्तन महायान लेण्यात होऊन त्यात भगवान बुध्दाच्या भव्यदिव्य मूर्ती कोरण्यात आल्यात.
       अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात इ.स. पूर्व २-३ र्‍या शतकापासून ते इ.स. च्या २-३ शतकापर्यंतची हीनयान पंथाची निर्देशक प्रतीके आणि इ.स. ४-५ व्या शतकापासून इ.स.८-९ व्या शतकापर्यंतच्या प्रतिमा आणि अन्य बौध्द कलावशेष संपूर्ण महाराष्ट्रात बांद्यापासून चांद्यापर्यंत मिळतात. तसेच इ.स. ९ व्या शतकानंतर वज्रयान या पंथाचे सुध्दा बौध्द पुरावशेष मिळतात.

विजासन लेणी :-  

   चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यातीलच एक महत्वपूर्ण स्थळ. वरोरा मार्गावर २७ किमी अंतरावर हे स्थान आहे. वरदविनायक, देऊळवाडा, विजासन, भद्रमंदिर, भव्य गुंफा मंदिर, भांदक किल्ला, गवराळा ही लक्षवेधी स्थाने येथे आहेत. हिंदू, बौद्ध, जैन या तिन्ही वैभवशाली खुणा भद्रावतीत आढळतात. भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे दर्शन घडवितात.भद्रावती हे ठिकाण वर्धा नदीच्या खोऱ्यात वसले आहे. ते तालुक्याचे शहर आहे. ते चंद्रपूर या जिल्ह्याच्या ठिकाणावरून सव्वीस किलोमीटर अंतरावर येते. त्या ठिकाणाला तेथील अनेक पुरातन वास्तूंमुळे प्रसिद्धी मिळाली. शिवाय, ऑर्डनन्स फॅक्टरी या शस्त्रास्त्रनिर्मितीच्या कारखान्यामुळे वेगळी नवी ओळख निर्माण झाली. या गावाच्या चतु:सीमेला पूर्वेला ताडोबा जंगल, पश्चिमेला देऊरवाडा, उत्तरेला बरांज, वरोरा आणि दक्षिणेकडे लोणारा, चंद्रपूर ही गावे आहेत. भद्रावती हे ठिकाण ‘भांदक’ ह्या नावानेही ओळखले जाते. ते मध्यरेल्वे मार्गावर आहे. रेल्वेस्टेशन ‘भांदक’ या नावाने जास्त परिचयाचे आहे. भद्रावती नागपूर-चंद्रपूर या राज्य महामार्गावर (264) आहे. त्यामुळे दळणवळण दोन्ही मार्गांनी सुलभ आहे.
        भद्रावतीचे प्राचीन नाव 'भद्रक'. या शब्दाचा अपभ्रंश होऊन भांदक असे झाल्याची आख्यायिका आहे. भद्रावती येथे उत्खननादरम्यान सापडल्या गेलेल्या हिंदू, बौद्ध व जैन या काळांतील मूर्ती व मंदिरांचे अवशेष यांवरून तेथील समृद्ध ऐतिहासिक वारसा लक्षात येतो. गावातील नागमंदिर हे फार प्राचीन असून चवथ्या शतकातील असावे. याबाबत विशेष संशोधन होणे आवश्यक असल्याचे इतिहासतज्ज्ञांचे मत आहे.
  भद्रनाग मंदिर:- 
     भांदकचे मूळ नाव भद्रक. ते ज्या मंदिरावरून पडले ते म्हणजे भद्रेश्वराचे मंदिर.रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला आहे. याचे नाव भद्रेश्वर होते. यावरून हे मंदिर महादेवाचे असल्याचे सांगण्यात येते.  कालांतराने, ते मंदिर पडून त्यातील शिवलिंग वगैरे नष्ट झाले. त्या ठिकाणी भद्रनाग मंदिराची वास्तू दिसते. पायऱ्यांची खोल विहीर मंदिराच्या बाजूला आहे. मंदिराला आता भद्रनाग मंदिर असे म्हणतात. त्याची स्थापना कोसल येथील पांडुवंशीय राजा उदयन याने इसवी सन ४८० ते ५०० च्या दरम्यान केली. (जनरल कनिंगहॅम यांचा आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, व्हॉल्यूम 9, पृष्ठ 135).

 

    याच गावापासून केवळ दोन‌ किलोमीटरवर गवराळा आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या वरदविनायक मंदिर येथे आहे.भद्रावतीच्या गणेशाला वरदविनायक असे म्हटले जाते. तो भांदक रेल्वेस्टेशनवरून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर उत्तरेकडे, गवराळा टेकडीवर आहे. म्हणजे भद्रावती शहरापासून दक्षिणेकडे एक किलोमीटर अंतरावर. गवराळा टेकडीवरील वरदविनायक शिल्प उत्तरमुखी असून देवालय उत्तरमुखी आहे. मंदिराची इमारत हेमाडपंथी स्वरूपाची आहे. मंदिराच्या चार-पाच पायऱ्या उतरून खोलगट भागात गेल्यावर सुमारे सहा फूट उंचीची गणेशमूर्ती दिसते. तळघर खोलगट असल्याने मंदिर चालुक्य सम्राट सहावा विक्रमादित्य (इ.स. १०८७ ते ११२६) यांच्या काळात ११०४ मध्ये बांधले गेले असावे.
विजासन लेणी :-   
     विजासन गुंफा अर्थात आवासालय भद्रावतीपासून पश्चिमेस सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे.तेथे बौद्ध लेणी आहेत. त्याला गुहा असेही म्हणतात.  प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ कनिंगहॅम यांनी त्या लेण्यांचा उल्लेख प्रथम केलेला आहे. हि लेणी हीनयान पंथाच्या काळात कोरलेली असुन नंतरच्या काळात महायान पंथीयांनी त्या लेणीत बुद्धांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. या लेण्यामुळे भद्रावती शहराचा इतिहास सातवाहन काळापर्यंत मागे जातो. या विंझासन लेण्याचा विचार केल्याखेरीज महायान पंथीय लेण्याचे विवरण पुर्ण होणार नाही.या परिसरात मौर्य, सातवाहन, पश्चिमी क्षत्रप, मुंदराज वंश, वाकाटक, नळ वंश, विष्णुकूंदी, कलचुरी, चालुक्य, राष्ट्रकुट, मान, यादव यांच्या सत्ता नांदल्या.प्रसिद्ध चिनी यात्रेकरू ह्यूएन त्सांग तेथे इसवी सनाच्या सातव्या शतकात येऊन गेल्याचा उल्लेख आढळतो. 
  या लेण्यात जाण्यासाठी टेकडीवरिल एका अरुंद खिंडीतून जावे लागते. या लेण्याचा तलविन्यास ख्रिश्चन क्रुसासारखा आहे.




 
त्या लेण्यांत तीन दिशांना तीन बोगदे असून पूर्वमुखी बोगदा पासष्ट फूट लांबीचा असावा. तेथे दोन्ही बाजूंस मध्यम स्वरूपाचे कोनाडे आहेत. बौद्ध भिक्षूक त्यात बसून ध्यान करत असावेत (रिपोर्ट ऑफ टूर इन दी सेंट्रल प्राव्हिन्सेस इन 1873, पृ-74, 75).

 
 
 
vijasan 1
मधले भव्य लेणे अंदाजे ६४ फुट बोगद्यासारखे लांब असून या लेण्याच्या दोन्ही बाजूस दोन लेण्या आहेत. पुर्व-पश्चिम मार्गिकेची रुंदी ढोबळमानाने ७.६२ मीटर आहे.

vijasan 7

vijasan 8                    vijasan 9                   vijasan 10

vijasan 12                              vijasan 11

vijasan 13

त्याच्या उत्तरेकडील भागात ( म्हणजे क्रुसाच्या आकाराच्या उत्तरेकडील भागात ) प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात उठावाचे स्तुप कोरले आहेत.या लेण्याचा दर्शनी भागावर असणार्या भिंतीवर जे तीन उठावाचे स्तुप कोरले आहेत, हे या लेण्याचे वैशिष्ट्य मानावे लागेल. या स्तुपांना कोरताना त्यंची सर्व वैशिष्ट्य जसे मेढी, हार्मिका, छत्रावली हे दाखवले आहेत.

vijasan 5

गर्भगृहाच्या उजव्या खांबावर शिलालेख असून त्यात कोण्या रुद्राचे नाव वाचायला मिळते. या शिलालेखातील पहिले आणि सहावे अक्षर अस्पष्ट आहे. मात्र अक्षराच्या धाटणीवरुन या शिलालेखाचा आधीचा काळ गुप्त काळातील म्हणजे ५ व्या शतकातील तर उर्वरीत भाग ७ व्या किंवा ८ व्या शतकातील असावा. हा रुद्र बहुधा यात्रेकरु असून त्याने या लेण्यांना भेट दिली असावी. 











 प्रवेशद्वाराने आत गेल्यावर सपाट छताचे दालन लागते. या दालनाच्या मागे टोकदार कमानीच्या आकाराचे छत असलेले दालन लागते. या दालनाच्या डावीकडे एक आणि उजवीकडे दोन खोल्या आहेत. या खोल्यामध्ये शयनकट्टे आहेत सहाजिकच या खोल्या बौध्द भिक्षुंच्या निवासासाठी वापरल्या जात असणार. इथल्या शयनकट्ट्यावर उशीचा उंचवटाही दिसतो. काही अंतर पुढे गेल्यावर गर्भगृह लागते. गर्भगृहाचे छत सपाट असून आतमध्ये आसनारुढ गौतम बुध्दांची मुर्ती दिसते. 
 vijasan 15
टेकडीच्या माथ्यावर गौतम बुध्दाची मुर्ती उभी केली आहे.
vijasan 14
याशिवाय टेकडीच्या मागच्या बाजुला खडकात कोरलेली बोधीसत्वांची मुर्ती आहे.

  भांदक लेणी :-

  भद्रावती परिसरातच विजासन लेण्याप्रमाणेच भांदक लेणी देखील आहेत.आपण त्यांचीच माहिती घेणार आहोत. ब्रिटीश काळात संशोधक कनिंगहॅमने मध्य प्रांतातील संशोधन अहवालात भांदक येथील लेण्यांचा समावेश केला आहे. कनिंगहॅमला इथे चार लेणी आढळली. त्यापैकी विजासन लेणे वाकाटककालीन आहेत. त्याच बरोबर याठिकाणी काही ब्राम्हण शैलशिल्पे देखील आहेत. दोन शैलशिल्पे राष्ट्रकुट / कलचुरी काळातील असून ती खुद्द गावातच आहेत. इतर काही लेणी भांदकच्या दक्षिणेला दोन कि.मी. असलेल्या गौराळा या ठिकाणी आहेत. गावात असलेली दोन लेणी 'मोठा खुराडा आणि 'लहान खुराडा' या नावाने ओळखली जातात.सध्या हि दोन्ही लेणी रिकामी आहेत.पण मोठा खुराडा या नावाने ओळखली जात असलेल्या लेण्याच्या भिंतीवर शेषशायी विष्णु आणि इतर मुर्ती खोदल्या आहेत. या मुळ मुर्ती सुरवातीच्या काळात जेव्हा लेणी खोदली गेली तेव्हा नसावीत, नंतर राष्ट्रकुट काळात या मुर्ती कोरल्या असाव्यात.   मोठा खुराडा हे लेणे १.०९ मीटर रुंद, १.५७ मीटर खोल आणि २.१२ मीटर उंचीचे अगदीच लहान लेणे आहे. या लेण्याला १.०९ मीटर रुंदीचा खुजा दरवाजा आहे. याच्यापुढे अर्धमंडप असावा. लेण्याच्या अंतर्भागात तिन्ही भिंतीना लागून सलग कट्टा असल्यामुळे जेमतेम दोन किंवा तीनच व्यक्ती उभ्या राहु शकतील एवढी जागा आहे. या कट्त्याला किंवा पीठाला तळाशी खुर किंवा कुंभ आणि वर वर्तुळाकार थर आहे. हे पीठ रामटेक येथे आढळलेल्या बांधीव मंदीराशी खुपच मिळतेजुळते आहे. या पीठावर मुर्ती बसवण्यासाठी एकुण आठ खाचा आहेत. त्यापैकी चार खाचा शैलगृहातील मागील भिंतीत असून बाजुच्या दोन भिंतीलगत पीठामध्ये प्रत्येकी दोन खाचा आहेत. जेव्हा कनिंगहॅमने या ठिकाणाची पहाणी केली तेव्हा याठिकाणी पाच मुर्ती होत्या. त्यात एका शिवलिंगाचाही समावेश होता.आज या सर्व खाचा रिकाम्या आहेत. या शैलगृहाच्या बाह्यांगावर दोन मुर्ती आहेत. यात एक मुर्ती हात वर केलेल्या यक्षाची तर दुसरी मुर्ती केवलनरसिंहाची आहे. या दोन्ही मुर्तींच्या शैलीचा विचार करता या दोन्ही मुर्ती वाकाटककालातील असाव्यात असे अनुमान निघते.
   टेकडीच्या पायथ्यापासून टेकडीच्या माथ्यावरच्या गणेश मंदीराकडे जाताना मध्येच लेणे लागते. या नवीन पायर्या लगत एक पुरुषाची मुर्ती आहे.या मुर्तीची शैलीही वाकाटककालीन वाटते. या मुर्ती तळभागात घट्ट बसवता याव्यात यासाठी खुंटा असतो. मात्र मुर्ती सिंमेटच्या पायात बसवल्याने हा खुंटा दिसत नाही. त्यामुळे या मुर्ती याच लेण्यातील आहेत कि नाही हे सांगता येत नाही. पीठाचे थर आणि देवकोष्टामध्ये असलेल्या यक्ष आणि नरसिंहाच्या मुर्तीवरुन हे लेणे इ.स. पाचव्या शतकात खोदले असावे असा अंदाज करता येतो. 'छोटा किंवा लहान खुराडा' नावाने ओळखले जाणारे लेणे आकाराने अत्यंत लहान असून त्याची लांबी १.६५ मीटर आणि रुंदी ०.९९ मीटर आहे.
   भांदक येथील शैव लेणे :-
  भांदक गावात बदरीनाग मंदीराच्या परिसरात एक लेणे आहे. या लेण्यात प्रवेश केल्यावर १०.६७ मीटर रुंद आणि ५.५३ मीटर लांब प्रांगण लागते. हे प्रांगण पश्चिमाभिमुख असून या प्रांगणातून दोन लेण्यात जाता येते.यातीले एक लेणे प्रांगणाच्या दक्षिण बाजुला असून त्याचा आकार ४.८९ मीटर लांब व ४.७६ मीटर रुंद आहे. या लेण्याच्या मध्यभागी असलेल्या पीठाचा आकार ०.९० चौरस मीटर आहे. यावर एकेकाळी शिवलिंग असावे. प्रांगणाच्या मागील भिंतीत म्हणजे पुर्वेकडे असलेल्या लेण्याचा आकार १०.०६ मीटर रुंद आणि ३.१६ मीटर लांब आहे. या मंडपातून प्रांगणात जाण्यासाठी दोन दारे आहेत. मंडपातील देवकोष्टात लक्ष्मी आहे.मंडपाच्या मागील भिंतीत दोन खोल्या आहेत. डावीकडील खोलीत दशभुजा महिषासुरमर्दीनी आहे. तर उजवीकडील खोलीत चर्तुभुज शिव आहे. या लेण्याच्या भिंतीवर आणखी काही शिल्प आहेत.मात्र ती इतकी झीजली आहेत कि ओळखता येत नाहीत. शिल्पशैलीवरुन हि लेणी दहाव्या शतकातील आहेत असे मानले जाते.मात्र  लेणी अभ्यासक बेगलरच्या मते हि लेणी इ.स. ११-१२ व्या शतकातील आहेत.

जैनमंदिर –  
   हे जैन श्वेतांबर तीर्थ असून श्री केशरीया पार्श्वनाथ यांची प्राणप्रतिष्ठा मंदिरात केली गेली आहे. ते भांदक’ रेल्वेस्थानकावरून दोन किलोमीटर अंतरावर आहे. ती मूर्ती प्राचीन असल्याचे सांगतात. मंदिराचे बांधकाम अतिशय सुंदर आणि आतील शिल्प आकर्षक स्वरूपाचे आहे. प्रेक्षणीय आणि पूजनीय स्थळ म्हणून सर्व धर्माचे लोक तेथे आवर्जून भेट देतात. ती वास्तू आणि तो परिसर आर्किआलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी तीर्थस्थानाचा दर्जा देऊन संरक्षित केले आहेत.   

     बालाजी मंदिर –
     भद्रनाग मंदिराच्या पूर्वेला असून ते पंचायत समिती समोरील रोडने ग्रामोदय संघाच्या समोरील बाजूस येते. मंदिर बाराव्या-तेराव्या शतकातील असावे. बालाजी मंदिरात प्रवेश केल्याबरोबर आकर्षक द्वारपट्टीका समोर दिसते. ती द्वारपट्टीका कलाकुसरीने परिपूर्ण आहे. नैगमेष, गंगा, स्त्रीशिल्प आदी चित्रांकन ठळक स्वरूपात दिसून येते. नैगमेषच्या मूर्ती घडवण्याचा काळ हा चौथ्या शतकाचा म्हणजे वाकाटकाचा समजला जातो. (शिल्पप्रकाश-र.पु. कुळकर्णी पृष्ठ (१४०) मंदिराचे बांधकाम साधे असल्याने त्या मंदिराचा उल्लेख फारसा कोठे झाल्याचे दिसून येत नाही व ते दुर्लक्षित आहे.   






























  भद्रावती किल्ला :-
              येथे असणारा भद्रावती किल्ला केवळ दुर्ग अवशेष अंगावर लेवुन परीपुंर्ण नाही तर अनेक शिल्पांनी देखील संपन्न आहे. भद्रावती शहरात सापडलेल्या अनेक प्राचीन मुर्ती पुरातत्व खात्याने या किल्ल्यात मांडुन ठेवलेल्या आहेत. भद्रावती शहर नागपुर-चंद्रपुर महामार्गावर वसलेले असुन महामार्गापासुन किल्ला साधारण १.५ कि.मी.आत शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. चौकोनी आकाराचा हा किल्ला २.५ एकरवर पसरलेला असुन त्याच्या तटबंदीत चौकोनी आकाराचे लहानमोठे आठ बुरुज आहेत. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी उत्तरेकडील तटबंदीत मुख्य दरवाजा तर दक्षिणेकडील तटबंदीत पुर्वाभिमुख दुसरा लहान दरवाजा आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा दोन चौकोनी बुरुजात लपवलेला असुन हे दोन्ही बुरुज व दरवाजा घडीव दगडात बांधलेला आहे. यात तोफांचा तसेच बंदुकीचा मारा करण्यासाठी झरोके व जंग्या ठेवलेल्या आहेत. या दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करताना दर्शनी भागात दोन बाजुना गोंड राजवटीचे राजचिन्ह असलेली सिंहशिल्प पहायला मिळतात. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस तटबंदीला लागुन उंच चौथऱ्यावर दोन मोठी दालने आहेत. हि दोन्ही दालने नक्षीकामाने व शिल्पांनी सजवलेली असुन सध्या या दोन्ही दालनात किल्ल्यात व शहरात इतरत्र सापडलेल्या अनेक प्राचीन मुर्ती ओळीने मांडुन ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये मस्तक विरहीत कुबेराची मोठी मूर्ती असुन त्यात हंड्यावर बसलेल्या कुबेराच्या हातात मुंगुसाची शेपटी व पायाखाली धनाचे हंडे कोरलेले आहेत, याशिवाय गणेश, शिवपार्वती, महिषासुरमर्दिनी, भगवान महावीर, भगवान बुध्द, भद्रनाथ, विष्णू लक्ष्मी, नरसिंह व वराह अवतारातील विष्णु, नर्तकी, व्याल, सिह ,विरगळ अशा अनेक प्राचीन मुर्ती पहायला मिळतात. या शिवाय उजवीकडील दालनातील भिंतीवर नक्षीदार कोनाडे असुन काही शिल्प कोरलेली आहेत. यात मस्यभेद करणाऱ्या अर्जुनाचे शिल्प पहायला मिळते. दोन्ही दालनाच्या शेजारी बुरुजावर तसेच दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. बुरुजांवर तोफ बसवण्यासाठी तसेच ध्वज रोवण्यासाठी गोलाकार दगडी कट्टा आहे. येथुन किल्ल्याचा आतील संपुर्ण परीसर नजरेस पडतो. किल्ल्याचा आतील भाग म्हणजे एक प्रशस्त पटांगण असुन यात एकुण सात वास्तुंचे चौथरे व एक चुन्याचा घाणा नजरेस पडतो. किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात एक पायऱ्यांची विहीर दिसुन येते. दरवाजाकडील भाग फिरून झाल्यावर या विहिरीजवळ यावे. हि विहीर म्हणजे एक प्रकारचा पाणीमहाल असुन आत उतरण्यासाठी तीन ठिकाणी पायऱ्या आहेत. या पायऱ्या आपल्याला विहिरीत तीन वेगवेगळ्या पातळीवर नेतात. चौकोनी आकाराच्या या विहिरीच्या तीन बाजू घडीव दगडात बांधलेल्या असुन त्यात नक्षीदार कमानी बांधलेल्या आहेत. विहिरीची केवळ एक बाजु विटांनी बांधलेली असुन तळाशी एक भलामोठा दगड बसवलेला आहे. तेथुन किल्ल्याबाहेर जाण्यासाठी भुयार असल्याचे स्थानिक सांगतात. किल्ल्यास पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरीच्या वरील बाजुस मोट बांधलेली असुन खांब रोवण्यासाठी तसेच जास्तीचे पाणी पुन्हा विहिरीत सोडण्यासाठी दोन गजशिल्पे बसवलेली आहेत. विहिरीपासुन जवळच चुन्याचा घाणा पहायला मिळतो. किल्याच्या आत असलेल्या वास्तुचे केवळ चौथरे शिल्लक असल्याने तेथे नेमके काय असावे याच बोध होत नाही. यातील एक चौथरा तटबंदीला लागुन दुसऱ्या दरवाजाजवळ असल्याने तेथे सैनिकांच्या राहण्याची सोय असावी. किल्ल्याचा दुसरा दरवाजा देखील दोन बुरुजात बांधलेला असुन हे दोन्ही बुरुज मुख्य दरवाजाच्या बुरुजापेक्षा लहान आहेत. दरवाजाच्या दर्शनी भागात एक मानवी शीर शिल्प कोरलेले आहे. दरवाजाला अधिक संरक्षण देण्यासाठी समोर आडवी भिंत घालण्यात आली असुन तिच्या टोकाला तटबंदीलगत गोलाकार बुरुज बांधलेला आहे. हे काम बहुदा नंतरच्या काळात करण्यात आले असावे. हा दरवाजा पाहुन मुख्य दरवाजाजवळ आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. याशिवाय किल्ल्याजवळ असलेल्या मंदीरात आपल्याला एक मोठी गणपतीची मुर्ती पहायला मिळते.
सातवाहन काळानंतर १२ व्या शतकात विदर्भावर माना जातीच्या नागवंशीय राजांनी सत्ता स्थापन केली. त्यांनी विदर्भात वैरागड, माणीकगड, सुरजागड या सारख्या किल्ल्यांची बांधणी केली. यातील भांकासिंह नावाच्या नागवंशीय राजाने भद्रावती नगरीची स्थापना केल्याचे मानले जाते. या किल्ल्यांच्या दरवाजावर असलेली नागशिल्पे पहाता या गोष्टीस पृष्टी मिळते. यानंतर १३ व्या शतकात विदर्भात गोंड राजवटीचा उदय झाला व त्यांनी या भागात आपली सत्ता स्थापन केली. गोंड राजांनी या भागावर जवळजवळ ४०० वर्षे राज्य केले त्यामुळे त्यांच्या संस्कृतीची छाप या किल्ल्याच्या बांधकामात दिसुन येते. प्रवेशद्वारावर असलेले हत्तीवर आरूढ झालेल्या सिंहाचे शिल्प हे गोंड राजांचे राजचिन्ह म्हणून ओळखले जाते. गोंड राजांचा सुरुवातीचा काळ वगळता नंतरच्या काळात त्यांनी मुस्लीम राजवटीचे मांडलिकत्व पत्करल्यामुळे त्यांच्यावर युद्धाचे फारसे प्रसंग ओढवले नाहीत. यानंतर १८ व्या शतकाच्या सुरवातीस गोंड वारसाहाक्काच्या अंतर्गत कलहात विदर्भावर नागपूरकर भोसल्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यांनी नगरधन, पवनी, रामटेक, गाविलगड या सारख्या महत्वाच्या किल्ल्यांची पुनर्बांधणी केली पण राज्याच्या अंतर्गत भागात असलेले दुय्यम किल्ले दुर्लक्षिले गेले.










 भटाळा लेणी समुह
आजचा वरोरा म्हणून ओळख असलेल्या तालूक्याचा संपुर्ण भाग प्राचीन भांदक राजधानीत येत होता. बुध्द धम्माचा प्रचार आणि प्रसाराचे महत्मम कार्य भांदक येथून झाले होते. या भागात आढळणाऱ्या लेण्या आजही याची साक्ष देतात.
  चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा तालूक्यातील भटाळा हे गाव.... गावाला डोंगर-रागांनी वेढले आहे. इथे राष्ट्रकुट /कलचुरी काळातील एक बांधीव मंदीर आणि गावाजवळच्या तलावाच्या काठी मोठ्या शिळामध्ये कोरलेली काही शैलगृहे आहेत. येथे एकुण २० लेण्या आहेत. एक लेणी समुह भटाळा गावापासून १ किमी दक्षिणेस असलेल्या ऋषीटाके या तलावाभोवती काही पहाडात आहेत. लेण्यांचा दुसरा समुह हा भवानी मंदीर आणि किल्ला यामध्ये भटाळा गावाच्या दक्षिणेस कोरला आहे. या समुहात एकुण पाच गुफा आहेत. तिसरा लेणी समुह भटाळा गावाच्या पश्चिमेस आणि स्थानिक तलावाच्या दक्षिणेस असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी कोरले आहे. यात दोन लेणी आहेत. येथे काही शिल्प आहेत. शिल्पशैलीवरून आणि लेण्यांच्या वैशिष्ट्यांवरून येथे इ.स. ४-५ व्या शतकापासून ते इ.स. ७-८ व्या शतकापर्यंत लेणी कोरल्या गेल्याचे स्पष्ट होते. हि लेणी जेमतेम १ मीटर उंच, १ मीटर खोल आणि १ मीटर रुंद आहेत. या त्यांच्या आकारावरुनच हि लेणी नवसाच्या पुर्ततेसाठी खोदलेली म्हणजे अर्पित स्वरुपाची आहेत हे स्पष्ट होते. यातील काही लेण्यात शिवलिंग आहे तर काही लेण्यात नरसिंहाची मुर्ती आहे.नरसिंहाच्या मुर्तीच्या शैलीवरुन हि लेणी वाकाटककालीन आहेत हे स्पष्ट होते. पण शिवलिंग असलेल्या लेण्याच्या काळाबाबत  कालनिश्चिती करता येत नाही. 
भटाळा ता. वरोरा जि. चंद्रपुर येथील महादेव मंदिर
चंद्रपूर शहरात असलेल्या अनेक प्राचीन वास्तू गोंड साम्राज्याची साक्ष देत आजही उभ्या आहेत.गोंड राजाचे राज्य प्रस्थापित व्हायच्या हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास जिल्ह्याच्या भूगर्भात दडला आहे. मौर्य, सातवाहन, वाकाटक, गुप्त, परमार, चालुक्‍य, नागवंशीय राजांनी चंद्रपूरच्या भूमीवर राज्य केल्याचे दाखले इतिहासात सापडतात. या राजांनी आपल्या राज्यकाळात अनेक वास्तू आणि मंदिरांची निर्मिती केली होती. कालौघात काही वास्तू नष्ट झाल्या, काही आजही आपला सुवर्ण इतिहासाच्या कथा सांगत उभ्या आहेत. अशीच एक वास्तू म्हणजे "भोंडा महादेव' मंदिर.चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासाच्या अंधारगुहेत अनेक रंजक कथा दडून बसल्या आहेत. अशीच एक कथा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्‍यात येत असलेल्या भटाळा या गावातील प्राचीन मंदिराची. हे मंदिर "भोंडा महादेव' नावाने ओळखले जाते.वरोरा-चिमूर मार्गावर सालोरी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या भटाळा या गावात हे मंदिर आहे. महाराष्ट्रातील आगळे वेगळे रचना असलेले एक मंदिर ! या मंदिराला  कळस, शिखर नसल्याने याला भोंडा महादेव मंदिर म्हणतात.कधीकाळी या प्राचीन मंदिराच्या कळसावर वीज कोसळली होती. पुनर्निर्मिती करताना कळसाविनाच बांधकाम केले. मंदिराच्या डोक्‍यावर कळस आणि अमलक नसल्याने या मंदिराला "भोंडा महादेव' असे नाव पडले. उत्कृष्ट शिल्पकलेची साक्ष देत हजारो वर्षांपासून हे मंदिर उभे आहे. इस ८-९ व्या शतकात राष्ट्रकूट राजांनी सँडस्टोन नी बांधलेले मंदिर.. मंदिरात ५ फूट उंचीचे भव्य शिवलिंग आहे. हे शिवलिंग विदर्भातील सर्वात मोठे शिवलिंग म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या समोर लोकांनी सिमेंट काँक्रीटचे कॉलम बांधून मंदिराच्या मूळ सौन्दर्याला बाधा आणली आहे.
 

 






 माणिकगडाचे राजे परमार यांनी या मंदिराची निर्मिती केली. मंदिराचा कालखंड दहावे शतक आहे. परमार राजे शिवभक्त होते. त्यांनी अनेक शिवमंदिरांची निर्मिती केली. परमार राजाच्या चलनावर शिवपिंडाचे प्रतीक कोरले असायचे. राजुरा तालुक्‍यातील विहीरगाव येथे परमार राजाला सोन्याची नाणी सापडली होती.
भटाळा येथील मंदिरात विदर्भातील सर्वात मोठे शिवलिंग आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पिंडीचा वारीमार्ग सरळ भिंतीत गेला असून, त्यामुळे प्रदक्षिणेला आपसूकच अटकाव होतो. वारीमार्गाच्या या रचनेमुळे हे मंदिर एक परिपूर्ण मंदिर समजले जाते.महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरत असते. मंदिरावर कोरलेली उत्कृष्ट शिल्पकला बघण्यासाठी पर्यटकांचा ओढा असतो.

 पातुर येथील शैव लेणी :-

       महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यातील पातुर तालुका हा निसर्गाच्या कुशीत वसलेला तालुका आहे या ठिकाणी विविध प्रकारची निसर्गरम्य प्रेक्षणीय व ऐतिहासिक स्थळे आहेत. बोर्डी नदीच्या तीरावर बसलेले हे प्राचीन शहर आहे या शहराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे .पातूरला सुवर्णनगरीच म्हणतात ७० च्या दशकात बोर्डी नदीच्या पात्रात सुरत येथील टाकसाळात बनविलेल्या व फारशी भाषेत त्यावर प्रार्थना असलेल्या हजारो मुद्रा सापडल्या होत्या. शहराला लागुनच नानासाहेब महाराजांचे पुरातन मंदिर आहे कि ज्याच्या नावाने आज शहराची ओळख निर्माण झालेली आहे,"नानासाहेब पातुर".
या वास्तुची डागडुजी होणे अत्यंत गरजेचे आहे.पातुरजवळच रेणुका मातेचे स्वयंभू मंदिर उंच अशा डोंगरावर वसलेले आहे.नवरात्राचे नऊ दिवस व दस-याला डोंगराच्या पायथ्याशी गावातील खडकेश्वर येथील अंबादेवीचे जागृत देवस्थानात विराजमान असलेली अंबा माता या देवीच्या भेटीला येते तो क्षण अनुभवतांना महाराष्ट्रातील कानाकोप-यातून आलेल्या भक्तांचे डोळ्यांचे पारणे फिटते.इ.स.सातशेच्या दशकातील ऐतिहासिक कोरीव लेणी , माळराजुरा पक्षी , वन्यप्राणी पर्यटन केंद्र , घाट माथा , तलाव , धोदानी धबधबा , बालाजी मंदिर , तुळजाभवानी मंदिर , सिदाजी बुआ महाराज मंदिर , महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी मंदिर , मुस्लिम धर्माचे नावाजलेले शाहबाबू दर्गा इत्यादी धार्मिक स्थळे शहरात आणी तालुक्यात आहेत. पातुर तालुक्यातून मुंबई ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग आणि अकोला-वाशिम-नांदेड हा राज्य मार्ग हे दोन महत्वाचे मार्ग जातात.


      अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्‍यातील पुरातन लेणी आहेत. आताचे वाशीम कधीकाळी वत्सगुल्मच्या नावाने परिचित होते. वत्सगुल्मचा वाकाटक राजा हरीषेण आणि त्यांचे प्रधानमंत्री वराहदेव या दोघांनी मिळून संपूर्ण राज्यात एकूण सोळा ठिकाणी वास्तुशिल्प कोरले. त्या लेणीतील एक पातूरची लेणी आहे, असा दाखला अकोला गॅझेटर, इंडिया प्रिस्टाईन हिस्ट्री आणि १७३० च्या ब्रिटिश गव्हर्नमेंटचे पुरातत्त्व विशेषज्ञ एडमंड लायन आणि अजिंठा लेणीचा शोध लावणारे रॉबर्ट गिल यांनी दिलेला आहे. त्यांनीच पातूरच्या लेणीचा शोध लावला आहे. ब्राम्ही लिपीतील शिलालेखाचे फोटो त्यांनी घेतले होते त्याचा अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला होता सध्या तो ब्रिटिश लायब्ररी लंडन येथे उपलब्ध आहे .१९०२ साली कुझेन्स हेन्री भारतात आला होता त्याने आपल्या अहवालात पातुरच्या लेण्या बुध्द लेण्या असल्याचे म्हटले आहे .भारताच्या इंडीयन प्रिस्टाईन हिस्ट्री या संकेतस्थळावरही हा अहवाल पाहयाला मिळतो .सन १८८१ मध्ये कुझेन्स हेन्सी ही लेणी पाहण्यासाठी गेले होते. याची नोंद १९०२ च्या नोंदीत मिळते.

    पातुर गावाच्या पश्चिमेस बोर्डी नदीच्या पलिकडे हे द्विदल लेणे आहे. हे लेणे एका टेकडीत कोरले असून त्याच्या समोर प्रांगण आहे. हि दोन्ही लेणी पुर्वाभिमुख असून त्याच्या एकामागोमाग एक असे दोन मंड्प आहेत. त्याच्यामागे गर्भगृह असून गर्भगृहात जाण्यासाठी पायर्या आहेत. हि गर्भगृह मंडपाच्या वरच्या पातळीवर आहेत.
 दक्षिण बाजुच्या लेण्यात जाण्यासाठी प्रथम दोन चौरसाकृती स्तंभ आणि अर्धस्तंभावर उभ्या असलेल्या मंडपात प्रवेश करावा लागतो. हा मंडप नौ फुट खोल आहे. या मंडपानंतर एक पायरी अधिक उंचीवर अंतर्मंडप आहे. हा अंतर्मंडप ३.९६ मीटर खोल असून तोही दोन स्तंभ आणि दोन अर्धस्तंभावर उभा आहे. गर्भगृह चौरसाकृती असून त्याचा आकार ३.३५ चौरस मीटर आहे. त्याच्या मागील भिंतीला लागून एक पीठ आहे. त्यावर बहुधा शिवलिंग असावे. उत्तर बाजुला असलेले गर्भगृह याच आकाराचे पण थोडे अधिक उंचीवर आहे. सध्या तिथे नुसतेच पीठ असले तरी त्यावर पार्वतीची मुर्ती असावी.तपस्येत असलेल्या पार्वतीची हि मुर्ती अद्वितीय आणि खुद्द पातुरमध्ये सापडलेली एकमेव मुर्ती असून सध्या हि मुर्ती नागपुरमधील मध्यवर्ती संग्रहालयात आहे. या मुर्तीचा खुंटा उत्तरेकडील गर्भगृहाच्या खाचेत व्यवस्थित बसतो. या मुर्तीच्या शैलीवरुन हि मुर्ती इ.स. ४५० च्या काळातील असावी असे वाटते. त्याचप्रमाणे येथे असलेल्या अनेक शिलालेखांपैकी लेण्याच्या दक्षिणेला असलेल्या तुलापट्टीच्या बाहेरील बाजुवर असलेल्या ब्राम्ही लिपीतील शिलालेखाची अक्षरे वाकाटककालीन आहेत.
  या लेणीतील स्तंभाची रचना, साधा तलविन्यास, पातुर येथे सापडलेली पार्वतीची मुर्ती आणि वाकाटककालीन अक्षरवळणाचा ब्राम्ही शिलालेख हे सर्व पुरावे लक्षात घेता या लेण्याचा काळ इ.स. ४५० असावा.थोडक्यात सांगायचे तर वस्तगुल्म म्हणजे सध्याचे वाशिम येथून राज्य करणार्‍या वाकाटकांच्या राजधानीजवळ वाकाटक राजा हरिषेण आणि त्याच्या प्रधांनानी अजिंठा लेणे खोदण्याआधी हे लेणे खोदले होते. 





 काहीशी अप्रसिध्द आणि दुर्लक्षित लेणी बघायला जायचे तर पातुर शहराच्या पश्चिम भागात बाळापूर मार्गावर जायचे. मुख्य रस्त्याला गाडी पार्क करून लेणीकडे निघायचे, इथे उंच टेकडीवर मुख्य रस्त्याला लागूनच आता पुरातत्व खात्याने पक्के कुंपण केलेले निदर्शनास येते .पुरातत्व खात्याचा  त्या ठिकाणी वॉचमन नेमला असल्याने लेण्यांची बर्यापैकी काळजी घेतलेली दिसते. समोरच बाजूच्या उंच टेकडीवर रेणूका देवीचे मंदीर आहे . लेणी बघण्यासाठी सरळ वर डोंगरावर निघालो कि पातुर शहराच्या अगदी पश्चिमेकडील हा हा भाग आहे त्यामुळे या टेकडीवरून संपूर्ण पातुर शहर दिसते. 



     लेणीत जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत .सुरक्षेसाठी दोन्ही बाजूने भिंतीचे बांधकाम आहे .वळण घेताच लेणीच दर्शन होते .लेणी कोरलेल्या टेकडीचा दगड हा काळा पाषाण आहे त्यात इतर झीज होणाऱ्या इतर प्रकारच्या दगडांचे थर दिसतात .गारगोटीचा स्तर असलेला पदरही दिसतो .मुख्य लेणी प्रशस्त आहे .भव्य खांबावर उभी असलेली दिसतात 
.खांबाच्या वर कडा तुटलेंल्या अवस्थेतील संस्कृत लेखही दिसतो .मुख्य लेणीत पायऱ्या असून आत मुख्य ठिकाणी मध्यभागी ओटया सारखा भाग आहे .दरवाज्याच्या बाजूला ब्राम्ही लिपीमधील शिलालेख आहे .


मुख्य लेणीच्या बाजूला आणखी दोन छोटया लेण्या आहे .या संपूर्ण लेणीत मूर्त्या सध्या नाहीत  पण त्या पूर्वी असाव्यात असे जाणवते .लेणी ही अपूर्ण असावी त्या ठिकाणचा दगड अयोग्य ठरल्यामुळे किंवा त्या काळच्या  काही अडचणीने काम बंद पडले असावे  .


     प्राचीन वास्तुशी निगडित काही पौरानिक दंतकथाही तशी या बाबतीतही काही दंतकथा सांगितल्या जातात  कालायन नावाचा राक्षस महादेवाची आराधना करुन अमरत्व प्राप्त झाला होता तो सर्वाना त्रास देवू लागला तेव्हा श्रीकृष्णाने कालायनाशी युद्ध पुकारले पण कालायनाशी आपण जिंकू शकत नाही हे पाहता श्रीकृष्ण याच पातुर लेण्यात येवून लपला होता तेव्हा पाराशर ऋषी या लेणीत तपचर्या करत होते .कालायन तेथे आला असता त्याने पाराशरांची तपचर्या भंग केली त्यांनी डोळे उघडताच तो भस्म झाला .या पाराशर ॠषीच्या नावावरून पातुर हे नाव पडले अशी दंतकथा आहे .या लेणीचा संदर्भ महाभारतातील दंतकथेतही येतो पण हा संदर्भ केवळ दंतकथेशीच निगडित आहे.

 हा परिसर चक्रधरस्वामीच्या पद स्पर्श लाभलेला ही भूमी आहे .अनेक ऐतिहासिक वास्तु या परीसरात आहे त्यांचे जतन व संवर्धन व्हावे हीच अपेक्षा.

संदर्भ :

१) उद्ध्वस्त वास्तू समृध्द इतिहास    लेखक :विवेक चांदुरकर
२) प्रत्यक्ष भ्रमंती - विवेक चांदुरकर सर (शिल्पअभ्यासक ,लेखक तथा लोकमत उपसंपादक)
३) डॉ शाम देवकर (इतिहासकार)
४) प्रा पी जी सवडतकर (इतिहास अभ्यासक), किशोर वाघ (अनिस प्रदेशाध्यक्ष), किशोर काकड (स्थानिक शिक्षक ), संजय खांडवे, बुलढाणा 9011971122
 

१६ व्या शतकातील पातुर येथील नानासाहेबांचा वाडा (मंदिर)

 अकोला जिह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल पातुर शहरात नानासाहेबांचा प्राचीन वाडा (मंदिर )ही अंदाजे १६ व्या शतकातील प्राचीन वास्तु आहे.वीटा,दगड,चुना व माती मध्ये अप्रतिम बांधकामशैली असलेले हे ठिकाण आहे .टेकडीवरील प्रसिध्द रेणूका देवीच्या मंदीराच्या पाठीमागे हा वाडा आहे .आता नवीन बाळापूर वरून नांदेडकडे जाणाऱ्या बायपास ला लागूनच हा वाडा आहे .बायपास अंजून अपूर्ण असल्याने त्या मार्गाने सध्या जाता येत नाही

 .
वाड्यात चारही बाजूने असलेल्या तटबंदी तील कमानी   

 वाड्याचे मुख्य द्वार पूर्वेला आहे व त्यावर नगारखाना आहे .सपूर्ण वाडा हा बंदीस्त आहे ,चार कोपऱ्यावर चार बुरुज आहे .वाडयाच्या मध्यभागी मंदीर आहे व गाभाऱ्यात नानासाहेबांची समाधी आहे .गाभाऱ्याच्या बाहेर सभामंडप आहे त्यात बांधकामाच्या सुंदर नक्षिकामासह कमानी आहेत .मंदीराला देवळ्या असून त्यात आता तुटलेल्या अवस्थेतील मूर्ति आहेत्त .सभामंडपातच गोड पाणी असलेली बंदीस्त विहीर आहे.मंदिराच्या बाजूला मुकुंदराज महाराजांची समाधी सांगितली जाते .त्या पाठीमागे त्यांच्या शिष्याच्या आनखी दोन समाधी आहेत त्यावर एक दगडात कोरीव नक्षीकाम केलेली अंबारीसह अशी सुंदर हत्तीची मूर्ती आहे .
 
वाड्यातील शिष्यांची समाधी
दीपमाळ
कोरीव नक्षीकाम केलेला हत्ती

संपूर्ण वाड्याला मजबूत कोट आहे .या कोटात कमानीसह बांधकाम करुन त्यावर वीटाचेंच छत असलेले निवासादी साठी तयार केलेले दिसतात .एकाच वेळी शेकडो व्यक्ती सुरक्षितपणे राहतील अशी व्यवस्था या वाड्याचा बांधकाम रचनेनुसार आहे .कमानीच्या खोलीमधून अरुंद असा जीना वर कोटावरील छतावर घेऊन जातो .या छतावरून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येते .याच इमारतीचा तळघरही असल्याचे दिसते पण त्याचा रस्ता बंद आहे .मंदिरासमोर तीन एकत्र स्वरूपाच्या दिपमाळा आहे .या वाडयात अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही पूर्वी झालेले आहे.नानासाहेबांचे पातुर अशी या शहराची ओळखच आहे .या वाटेवरून जात असतांना  अवश्य बघावा असा हा वाडा आहे.

विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान पातूरची रेणूका माता

    अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्व असलेलं गाव म्हणजे पातुर. मात्र हे गाव त्याच्या ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे ते येथील ग्रामदैवत रेणुका मातेच्या मंदिरामुळं. जागृत देवस्थान अशी पातूरच्या रेणुकेची ओळख आहे. अतिशय लोभस आणि मनमोहक रूप असलेल्या रेणुकेचं हे ठिकाण डोंगरावर आहे. विश्वस्त मंडळाच्या कल्पकतेतून सध्या या मंदिर आणि परिसराचा झपाट्याने विकास सुरु आहे. नवरात्रीसह वर्षभर येथे भक्तांची मोठी गर्दी झालेली असते. ऐतिहासिक महत्त्व असलेलं पातूर :  अकोला जिल्ह्यातील पातुर हे तालुक्याचे गाव आहे. याच पातुरला 'नानासाहेबांचे पातुर' या नावानेही ओळखले जातेय. नानासाहेब म्हणजे 'नानासाहेब पेशवे'.  या गावाचे मोठे ऐतिहासिक महत्व आहे. रेणुका मातेच्या मंदिरासमोरच्या डोंगरात लेण्या आणि भुयार आहेत. काही वर्षांपूर्वी गावात एका किल्लाही होता. या साऱ्या गोष्टी पातुरचे इतिहासासोबाताचे नाते आणि वैभवशाली संबंध सांगत आहेत.
     आदिशक्तीची अनेक पीठं महाराष्ट्रात आहेत. अकोला जिल्ह्यातील देवींच्या अनेक शक्तीपीठांनी येथील अध्यात्मिक विश्व समृद्ध केलं आहे. अकोला जिल्ह्यातील पातुर गावाची अध्यात्मिक ओळख दृढ आणि मजबूत केली आहे ती डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या मंदिराने. गावाच्या बाहेर बाळापुर मार्गावर हे मंदिर आहे. पातूरची रेणुका माता ही माहूरच्या रेणुकेचं प्रतिरुप : येथील रेणुका माता ही माहूरच्या रेणुकेचं प्रतिरूप मानलं जातं. त्यामुळे अकोला जिल्ह्यासह विदर्भातील भक्तांसाठी पातुर म्हणजे जणू 'प्रती माहूर'च आहे. याठिकाणी नवरात्रासोबतच वर्षभर भाविकांची मांदियाळी असते. विशेष म्हणजे देवीच्या 108 शक्तीपीठांपैकी एक समजल्या जाणाऱ्या चिंचोली रुद्रयानी येथील रुद्रयनी देवीचं मंदिर आणि डोंगर येथून दृष्टीक्षेपात पडतं. या ठिकाणी आज दिसत असलेले मंदिर पहिल्यांदा पन्नास वर्षांपूर्वी दिसले. या ठिकाणी आज असलेली मूर्ती आधीच विराजमान होती. मात्र माळरान आणि जंगलाचा भाग असल्याने या ठिकाणी कुणीही येत नव्हतं. त्यातच ही टेकडी अत्तरकर यांच्या मालकीच्या शेतीचा भाग होती. या ठिकाणी आज असलेली मूर्ती एका हिवराच्या झाडाखाली विराजमान होती. त्यानंतर तात्यासाहेब अत्तरकर यांच्या कल्पकतेतून या मंदिराच्या निर्मितीला प्रारंभ झाला. याठिकाणी श्रीकृष्ण, राम-सीता-लक्ष्मण आणि दत्तात्रयाच्या तीन मंदिरांचं बांधकामही पूर्ण झालं आहे. गेल्या काही वर्षांत भक्तांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या मंदिराला आधी पायऱ्या नव्हत्या. त्यानंतर दगडांच्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. आता या मंदिराला 256 पक्क्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. संपूर्ण डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले असून या ठिकाणी सुंदर सुविचार लिहिण्यात आले आहेत. मंदिर परिसरात पाण्याची व्यवस्था, भक्तनिवास यासोबतच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराजवळून बोर्डी नदी वाहते. निसर्गरम्य परिसर असलेल्या या ठिकाणी दर मंगळवारी मोठ्या प्रमाणात भक्त येत असतात. तर नवरात्रातील नवरात्रातील नऊ दिवसात देवी स्वतः मंदिरात वास करत असल्याची भावना असल्याने येथे भक्तांची मोठी गर्दी झालेली असते.


 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

Aihole

 आयहोळ येथील डोल्मेन :        सध्या बहुतेक पर्यटक आयहोळला चालुक्यांच्या सुरवातीच्या काळात बांधलेल्या मंदीरांना भेट देण्यासाठी येतात. मात्र ल...