निसर्ग सौंदर्याने नटलेले आणि कळसूबाईच्या डोंगररांगांचे मुकुट मणी शोभावे असे सह्याद्रीतील एक दुर्ग रत्न म्हणजे रतनगड होय.उत्तरेला महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई रांग आणि त्यातील राकट अलंग,मदन्,कुलंगगड सारखे प्राचीन दुर्ग, दक्षिणेला घनचक्करचा नावाप्रमाणे आडवा तिडवा पसरलेला डोंगर आणि आजोबा,कात्राबाई सारखी रौद्र कातळकड्याची छाती मिरवणारी शिखरे, पश्चिमेला अपरांत अर्थात कोकण आणि पुर्वेला नीलमण्यासारखा विल्सम डॅममुळे तयार झालेला भंडारदरा धरणाचा जलाशय या कोंदणात अगदी अचुक बसवलेले हे रत्न म्हणजे रतनगड. एखादा गड अवशेषांमुळे किती समृध्द असु शकतो याचे उदाहरण म्हणजे हा दुर्ग ! प्रत्यक्ष रतनगडावर असलेली गुहा आणि त्यातून होणारा नदीचा उगम, द्वारशिल्पांनी समृध्द गडाचे महाद्वार, वेगळ्याच प्रकारचा गोल बुरुज, नेढ, शेजारी परिसरात असणारे खुट्टा, बाण असे रौद्रभीषण सुळके, कातळकोरीव टाके, कातळकोरीव पायर्या, गडाला असणार्या अनेक वाटा, उपवाटा हे सर्व खुद्द गडावर तर गड परिसरात प्राचीन शिल्पपटांनी महिरप केलेले मंदीर , पुष्करणी, अनेक वन्य पशुंना राखून असणारे कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य, नव्यानेच प्रकाशात आलेले नैसर्गिक आश्चर्य सांदण दरी, रंधा धबधबा, कोकणकडा, पावसाळ्यात सुरु होणारे असंख्य धबधबे तर उन्हाळ्यात जणु निसर्गाने निर्माण केलेल्या प्रकाशाच्या माळा उजळणारे काजवे आणि या प्राचीन खुणात जणु नवी भर म्हणजे ब्रिटिशकालीन विल्सन धरण व त्याचा तुषारस्नान घडवणारा अंब्रेला फॉल्स आणि उदंचन पध्दतीचा घाटघरचा वीज निर्मिती प्रकल्प ! रतनगड परिसरात गेल्यावर या सर्वाचा आनंद घ्यायचा तर हातात आठवडा तरी पाहिजे,अर्थात इतका वेळ हाती नसला तर प्रत्येक फेरीत थोड्या थोड्या गोष्टी पहाता येतील. खरोखर निसर्गाने मनसोक्त उधळण केलेला हा परिसर, धन लुटावे तेवढे कमीच.
भंडारदरा परिसराचा नकाशा
भंडारदरा धरण.......
नगर जिल्हा बेलाग किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे मग त्यामध्ये हरिश्चंद्रगड असो किंवा रतनगड असो, पावसाळ्यायमध्ये हे किल्ले ढगाला भोक पाडून वरती उठून दिसतात अशी यांची अवाढव्य उंची, सदैव धुके, थंडावा, निरव शांतता व पायथ्याशी जंगलात फक्त पक्ष्यांचा किलबिलाट....!!भंडारदरा धरण परीसरातील घनदाट झाडीमुळे व निसर्गाच्या अक्राळ विक्राळ कातळ कड्यांमुळे हा भाग मनामध्ये खूपच धडके भरवणारा आहे. एखाद्या राजाच्या मुकुटावरती जसा हिरा शोभून दिसावा त्याप्रमाणे कळसूबाई पर्वतरांगेतील हा किल्लाही तितकाच सुंदर उठून दिसतो. नेहमीच्या धकाबुकीच्या जीवनातून वेळ काढून प्रत्येक शिवप्रेमीने आवर्जून बगावा असा हा किल्ला. स्वर्ग हि संकल्पना आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत पण ती काल्पनिक संज्ञा आहे, तुम्हाला जर खरोखरच स्वर्गाहुनीही सुंदर अस काही बघायचं असेल तर पावसाळ्यात हरिश्चंद्रगड किंवा रतनगड ला अवश्य भेट द्या, जीवनात सुंदरता काय असते याची प्रचिती फक्त इथे येऊन अनुभवण्यात आहे ती कुठेच पाहायला भेटणार नाही. धरतीवरती नारीला जरी जेवढी सुंदरता असेल त्यापेक्षाही हजारो पटींनी ठासून सुंदरता इथल्या दगड मातीत, काळ्या कातळात, त्या डोंगर कपाऱ्यातून घोंघावणाऱ्या वाऱ्याला, धुक्याचा प्रत्येक स्पर्श इथल्या दगड धोंड्याला होऊन त्यातून निथळणाऱ्या थेंबाला, मन कासावीस करणाऱ्या इथल्या परिसराला त्या पक्षांच्या किलबिलाटाला, इतिहासाच्या पराक्रमाची पदर असणाऱ्या गडतटांना, भक्कम बुरुजांना, 350 वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या स्वराज्याच्या प्रत्येक शिलेदाराच्या पदस्पर्शाच्या कातळातील पायऱ्यांना....!!
इथल्या प्रत्येक गोष्टीला....प्रत्येक वस्तूला. त्यामुळेच रतनगड पाहिला नाही असा ट्रेकर खरं म्हणजे क्वचितच सापडेल.
आधी या प्राचीन दुर्गाच्या इतिहासात नजर टाकु आणि मग याची मनसोक्त सफर करुया. गडाच्या इतिहासात डोकावले असता थेट पुराणापर्यंत संदर्भ मिळतात. पुराणात असा उल्लेख आहे की समुद्रमंथन झाल्यावर देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले व नेवासे या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन केले. त्यात राहु नावाचा एक दानव शिरला व त्याने अमृत प्राशन केले हे पाहुन विष्णुने त्या दानवाचा शिरच्चछेद केला. त्याचे धड राहुरी या ठिकाणी पडले तर शीर रतनगडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरुन वाहू लागली त्या धारेचे नदीमध्ये रुपांतर झाले व या नदीस अमृतवाहीनी असे नाव पडले. गडाची नेमकी उभारणी कोणी केली हे ज्ञात नसले तरी कातळकोरीव पायर्या आणि मंदीर ,पुष्करणी आणि इतर वास्तु ध्यानात घेतल्यास गडाची उभारणी सातवाहन किंवा राष्ट्रकुट काळात झाली असावी. गडाच्या बुरुज आणि दरवाज्याच्या बांधणीवर यादवकालीन प्रभाव जाणवतो आहे. शिवकाळात या गडाची फारशी माहिती मिळत नाही.शिवाजी महाराजांनी इ,स.१६७० मध्ये पट्टा, हरिश्चंद्रगड आदी रतनगडाच्या परिसरातील गडांना वेढा घालून ते जिंकल्यावर कदाचित रतनगड देखील ताब्यात घेतला असला पाहिजे. कदाचित त्याच्या आधीच मराठ्यांनी तो झडप घालून मोघलांकडून मिळवला असला पाहिजे,पुढे रतनगड शिवकाळात मराठ्यांच्या अंमलाखाली राहीला. मोघल सेनानी मातबरखान याने १६८८ मध्ये रतनगड मराठ्यांकडून जिंकून घेतला. मातबरखानाने रतनगडाचा उल्लेख रोहतगड असा केला आहे,मातबरखनाने लिहीले आहे कि "कुलंग,बाबहार्,तबाका व रोहतगड हे जिंकुन घेण्याच्या तयारीत होता. रोहतगड हा घाटाच्या माथ्यावर आहे". या परिसरात कळसुबाई रांगेत कुलंगगड आहे, सहाजिकच घाटमाथ्यावरील किल्ला म्हणजे रतनगड असणार यात शंका नाही. मात्र मराठ्यांना मोघलांकडून रतनगड लवकर जिंकून घेता आला नाही. इ.स. १७४७-४८ मध्ये या परिसरातील गड मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतले, त्यात रतनगड होता. १७६३ साली हा किल्ला महादेव कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची नोंद गॅझेटमध्ये आढळते. नानासाहेब पेशव्याच्या काळात रतनवाडीच्या मंदिरासाठी काही रक्कम दिल्याचे कळते. त्यावेळी बाळाजी कारळेने हा किल्ला घेतला होता. रतनगडाच्या भौगोलिक स्थानामुळे १८१८ सालापर्यंत रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. यात सह्याद्रीच्या वरची राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी अशी परगण्याची ६० खेडी होती. इ.स.१८२० मधे इंग्रज कॅप्टन गोड्डार्डने हा किल्ला घेतला पण नंतर आधीचा किल्लेदार गोविंदराव ह्याने १८२४ साली किल्ला परत हस्तगत केला. त्याला रामजी भांगरे याचा पाठिंबा होता. हा प्रतिकार फार वेळ टिकला नाही व रतनगड पुन्हा इंग्रजांकडे गेला. इथे परत ह्या प्रकारचे उठाव होऊ नयेत यासाठी इंग्रजांनी वरती जाणाऱ्या कातळवाटा सुरुंगाने उडवल्या. १७९८ ते १८४८ या ५० वर्षांच्या काळात डोंगराळ भागात राहणा-या कोळी, भिल्ल, व ठाकर या पराक्रमी वीरांनी इंग्रजांना कडवा संघर्ष करून सळोपळो केले. अकोल्याच्या कोळी बांधवांनी, रामजी भांगरे, राघोजी भांगरे, रामा किरवा, गोविंदराव खाडे इत्यादींनी इंग्रज सरकार विरोधात प्रखर लढा दिला. रामजी भांगरे यांची इंग्रजांनी पोलीस जमादार म्हणून नेमणूक केली होती तरीही त्यांनी इंग्रजांच्या अनेक जाचक अटींविरोधात आवाज उठविला. भिल्ल कोळी जमातीतील लोकांच्या मदतीने रामजीने अनेक जुलमी सावकारांवर दरोडे टाकले. रामजीचे बंड मोडण्यासाठी कॅप्टन मॅकींटोष याने सर्व बाजूंनी नाकाबंदी करून त्याच्या काही साथीदारांना पकडले. रामजीचा कडवा साथीदार रामा किरवा त्यांच्या हातून निसटला. त्याने पुढे आपल्या चपळ हालचालीने इंग्रजांना बेजार केले. अखेरीस कॅ.लेफ्टनंट फोर्बस् याने रामा किरवाला त्याच्या साथीदारांसह पकडले. राजद्रोहाच्या आरोपाखाली त्याला नगरच्या किल्ल्यात १८३०मध्ये फाशी दिले. रामजीलाही काळ्या पाण्याची शिक्षा झाली. इंग्रजांच्या व सावकारशाहीच्या विरोधात लढून फाशी गेलेला रामा किरवा हा महाराष्ट्रातील पहिला हुतात्मा ठरला. पुढे रामजीचा मुलगा राघोजी यानेही इंग्रजांविरुद्धचा असंतोष धगधगता ठेवला. तो आपल्या कुटुंबासह देवगावला रहात होता. राघोजी हा उमदा, चपळ, शूर व धाडसी वीर होता. राघोजीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी इंग्रजांनी त्याच्या आईचा छळ सुरु केल्याने तो आणखीनच संतापून इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. त्यातच त्याला पकडण्यात इंग्रजांना यश आले. त्याला हातपाय बांधून राजुरच्या कोठडीत टाकले. परंतु त्याच्या आईच्या कल्पकतेने व पहा-यावरील जावजी बांबळेच्या सहका-याने तो सुटला. आणि परत देवगावात जाऊन देवजी महार, पाडोशीचा खंडू साबळे, चिचोंडीचा भाऊ धनगर यांच्या साथीने टोळी उभारून १८४४-४५ या काळात त्याने इंग्रजांना व सावकारांना त्रस्त करून सोडले. १८४५च्या चकमकीत राघोजीचे गुरु देवजी महार ठार झाल्याने तो खचला. राघोजी धार्मिक वृत्तीचा असल्याने आंबिवलीच्या पाटलाने त्याला दिंडीत वारकरी म्हणुन सहभागी केले. लेफ्टनंट गेलने २ जानेवारी १८४८ रोजी संन्याशाच्या वेशातील राघोजीला पंढरपूर येथे चंद्रभागेच्या वाळवंटात पकडले. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला चालवून २ मे १८४८ रोजी ठाण्याच्या तुरुंगात त्याला फाशी दिले. ठाण्याच्या तुरुंगात या आद्य क्रांतिकारकाचा पुतळा असुन दरवर्षी २ मे रोजी त्याचे पुण्यस्मरण केले जाते.
गडावर जाण्याच्या वाटा :
रतनगडावर जायचे तर पायथ्याच्या दोन गावातून विवीध पर्याय उपलब्ध आहेत. एक वाट साम्रदगावातून थेट रतनगडावर चढते तर रतनवाडी हे गडाच्या पायथ्याचे दुसरे गाव आहे जिथून दोन वाटा रतनगडावर चढतात.. रतनवाडी हे गडाच्या पायथ्याचे गाव असुन सांदण दरीसाठी प्रसिध्द असलेले साम्रद गाव देखील गडाच्या घेऱ्यातच आहे.
रतनगड आणि परिसराचा नकाशा
मुंबईकडून रतनवाडीमार्गे रतनगडाकडे येणारा रस्ता
पुण्याकडून रतनवाडीमार्गे रतनगडाकडे येणारा रस्ता
रतनगड ते हरिश्चंद्रगड वाट
रतनवाडी गावात मुंबईवरुन जायचे असेल तर इगतपूरी - घोटी - शेंडी मार्गे जाता येते. तर पुण्यावरुन जायचे झाल्यास पुणे-नाशिक रोडवरील संगमनेर वरुन अकोले- शेंडी किंवा पुणे-आळेफाटा-ओतुर-कोतुळ-ब्राम्हणवाडा-राजुर-शेंडी असे जाता येते. पुण्याहून संगमनेर जवळपास १५६ कि. मी. आहे आणि तेथून अकोले ४० कि. मी. अंतरावर आहे.
शेंडी गावातून रतनवाडीकडे जाण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत.
१) शेंडी गावातून मुरशेत गावी यावे. इथून लाँच उपलब्ध आहे. या लाँचने गावापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. सकाळी ८.०० वाजता शेंडीहून पहिली लाँच आहे. जर पाणी कमी असेल तर लाँच आपल्याला रतनवाडीच्या अलिकडे सोडते. मग थोडे चालणे होउन आपण रतनवाडीला पोहचतो.
२) शेंडी ते रतनवाडी अशी बससेवा देखील उपलब्ध आहे. मात्र हा मार्ग फारच लांबचा आहे. भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळील शेंडी गावातुन एक फाटा साम्रदकडे तर दुसरा फाटा रतनवाडीकडे जातो. शेंडी-साम्रद -रतनवाडी असा गाडी रस्ता आहे.स्वतःचे वाहन असेल तर हा पर्याय सोयीचा.
३) शेंडी गावातून मुथखेल-कोलटेंभे मार्गे रतनवाडीला जाता येते.भंडारदरा जलाशयाच्या दक्षिण किनार्यावरुन जाणारी हि वाट पाबरगड, घनचक्कर यांच्या पायथ्याकडून जाते.
रतनवाडी गावातून गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :
१) रतनगड व खुट्टा सुळका यांच्या मधून :-
एक वाट रतनगड व खुट्टा सुळका यांच्या मधून जाते. या वाटेने गडावर जातांना ५० ते ६० कातळात कोरलेल्या पायर्या लागतात. या मार्गे गडावर पोहोचण्यासाठी २ तास लागतात. वाट सोपी आहे.
२) शिडीची वाट :-
ही वाट गडाच्या डावीकडून जाते. या वाटेने गडावर जातांना दोन शिड्या लागतात. गडावर जाण्यास साधारण २ तास पुरतात, वाट तशी सोपी आहे.
राहाण्याची सोय :
शिडीच्या वाटेने वर चढल्यावर पहिल्या दरवाजाच्या उजव्या बाजूस तीन गुहा आहेत. यात ७० ते ७५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.ज्या दुर्ग प्रेमींना रतनगडासोबत पाचनई मार्गे हरीशचंद्रगड करायचा असेल त्यांनी साम्रद मार्गे त्र्यंबक दरवाजाने चढून शिडीच्या मार्गे रतनगड उतरून कात्राबाई खिंडी कडे जाणाऱ्या मार्गे पाचनई गाठायची. रतनगड करून सांधण व्हॅली देखील पाहू शकता.त्र्यंबक दरवाजाने रतनगड चढून शिडीच्या मार्गे उतरून कात्राबाई खिंडीमार्गे पाचनई मध्ये कलाडगड अनुभवून पुढे हरिश्चंद्रगड देखील करू शकता.
रतनगडाची समुद्रसपाटीपासुन उंची साधारण ३५०० फुट आहे. रतनगड व आसपासचा परीसर संपुर्ण फिरायचा असल्यास रतनवाडी गावातुन चढुन साम्रद गावात उतरावे किंवा साम्रद गावातुन चढण्यास सुरवात करावी व रतनवाडीत उतरावे. साम्रद गावातुन जाताना पाणी भरुन वाटाडय़ा सोबतीला घेणे गरजेचे आहे कारण वाटेत कोठेही पाणी नाही. गडावर जायची वाट जंगलातून जात असली तरी काही ठिकाणची खडी चढण मात्र दमवते. या वाटेने जाताना डावीकडे खोल दरीतील बाणचा सुळका आपले लक्ष वेधून घेतो.
याशिवाय कोकणातून डेहणे गावातून देखील रतनगडावर वाट चढते.मात्र हि वाट खडतर आणि वेळखाउ असल्यामुळे फक्त पट्टीच्या ट्रेकरनीच याचा वापर करावा.शिवाय कोकण दरवाज्याने येणार्या वाटेचा जुना मार्ग इंग्रजांनी सुरुंग लावून नष्ट केल्यामुळे या वाटेने यायचे तर प्रस्तररोहण करुन तांत्रिक चढाईची तयारी आणि साधने पाहिजेत.
आपण या सर्व वाटांची माहिती घेउया.
१) सर्वप्रथम मुड्शेत मार्गे रतनवाडीला जाणारी वाट
रतनगड, अमृतेश्वर मंदिर ही दोन्ही ठिकाणं भंडारदरा धरणाच्या ईशान्य दिशेला आहेत. भंडारदरा धरणाच्या शेजारी असणाऱ्या शेंडी गावाजवळून भंडारदरा धरणाला वळसा घालून गेल्यास १८ किलोमीटर अंतरावर रतनवाडी गाव आहे. या रस्त्यावर वाटेत आपणास भंडारदरा गाव लागते. रतनवाडी या गावात अमृतेश्वर महादेवाचे मंदिर आहे. शेंडी गावाजवळूनच आणखी एक रस्ता भंडारदरा धरणाच्या पश्चिमेकडून मुर्शेत-पांजरे-साम्रदमार्गे रतनवाडीला जातो. मुर्शेत-पांजरे-साम्रदमार्गे हे अंतर ३१ किलोमीटर आहे. परंतु हा रस्ता पहिल्या रस्त्यापेक्षा सोयीस्कर आहे. त्याचप्रमाणे मुर्शेत-पांजरे-साम्रदमार्गे गेल्यास अलंग-मदन-कुलंग हे किल्ले आणि सांदणदरी पहावयास मिळते. ही सगळी ठिकाणं (कळसुबाई, सांदन दरी, अलंग-मदन-कुलंग, रतनगड, अमृतेश्वर मंदीर तसेच, न्हानी, महाकाल आणि रंधा धबधबा) एकाच वेळी पाहायची असल्यास पाच दिवस तर आरामात लागतात.
स्वतःची गाडी असेल आणि महत्वाचं म्हणजे वेळ असेल तर या जलाशयाला वळसा घालून मुरशेतला न जाता अकोले आणि शेंडीच्या मधून एक रस्ता सरळ पहिल्या रतनवाडीत जातो तिथे पोहोचायचे. पहिल्या रतनवाडी मधून पुढे अर्ध्या तासात दुसरी म्हणजेच पायथ्याची रतनवाडी लागते. यालाच श्री क्षेत्र अमृतेश्वर म्हणून ओळखले जाते. प्रवरा नदीच्या उगमस्थानी बांधलेले हे अतिप्राचीन मंदिर बघून त्याच्या जवळच असलेली पुष्करणी म्हणजेच गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार श्री विष्णूतीर्थ बघायचे.मंदिर बघून झाले की प्रवरा नदी पात्राला डाव्या हाताला ठेवत छोट्या बंधाऱ्या पासून प्रवास सुरु करायचा. पायवाट तशी मळलेली आहे त्यामुळे रस्ता सापडतो परंतु तरी सोबत वाटाड्या असेल तर मार्ग चुकण्याची भीती कमी होते.
२) मुरशेतमार्गे होडीचा प्रवास :-
दुसर्या पर्याया प्रमाणे शेंडी ते रतनगडाचा प्रवास हा शेंडी मधून सुरू करायचा आणि तिथून पायी मुरशेत गाठायचे. शेंडी मधून रतनवाडीला जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध आहे परंतु या जलाशयाला वळसा घालून जाणारा मार्ग आपला प्रवासाचा वेळ ३ तास आणखी वाढवतो, त्यापेक्षा शेंडी मधून आपण एक अर्ध्या तासाच्या पायी पायपीटीनंतर मुरशेत गाठायचे.मुरशेत वरून पहिल्या रतनवाडीला पोहोचायला होडीचा थरार अनुभवायचा. मुरशेतवरुन चालत जलाशयाच्या काठावर यावे.इथून लॉंच उपलब्ध आहेत त्याच्या माध्यमातून भंडारदरा धरणाचा बॅकवॉटर पार करून पहिल्या रतनवाडी गावात पोहोचायचं. लॉंच साधारणतः ७ वाजता सुरू होतात त्यामुळे जेवढे लवकर शक्य होईल तितका प्रयत्न करा. गडावर मुक्काम करू शकता परंतु जर सुट्टीच्या काळात गेलात तर गर्दीमुळे जागेचा अभाव पडू शकतो.अर्थात लाँचवाले अव्वाच्या सव्वा भाडे मागतात.मोठा ग्रुप असेल तरच लाँच परवडते.
भंडारदरा जलाशयाचे पाणी आणि रतनगड
हि लाँच एका किनार्यावरुन समोरच्या किनार्यावर आपल्याला सोडते.यामुळे भंडारदरा जलाशयाला घालावा लागणारा मोठा वळसा टळतो आणि कमी वेळात आपण रतनवाडी गावात पोहचतो. लाँचमधून उतरल्यानंतर रतनवाडीला पोहचायला बरेच चालावे लागते.हल्ली या वाटेवर बरीच रिसॉर्ट झाली आहेत.इथे ट्रेकर्सची आणि पर्यटकांची रहायची सोय होउ शकते.या वाटेने रतनगडाकडे जाताना दक्षिणोत्तर पसरलेला रतनगड्,त्याच्या उत्तरेला असलेला खुट हा सुळका आणि रतनगडाचे नेढे स्पष्ट दिसते.
रतनगडाचे नेढे म्हणजे डोंगराला पडलेले आरपार नैसर्गिक छिद्र, हे वैशिष्ट्यपुर्ण आहे.वास्तविक अशी नेढी राजगड्,मदनगड, मोहनदरी, कण्हेरागड, पिंपळा अशी सह्याद्रीतील अनेक गडांवर आहेत.मात्र रतनगडाचे हे नेढे वैशिष्ट्यपुर्ण मानावे लागेल, कारण हे उत्तर-दक्षिण आहे.सहाजिकच वर्षातील नेमकी वेळ साधली तर त्या नेढ्यातून सुर्यास्ताच्या वेळी सुर्य आरपार जाताना पहायला मिळु शकेल.मात्र हा नेमका दिवस कोणता हे एखादा स्थानिक व्यक्तिच सांगु शकेल. पण योग असल्यास हा दुर्मिळ किरणोत्सव बघता येइल. तासा-सव्वा तासाची चाल संपवून आपण एकदाचे पायथ्याच्या रतनवाडीत दाखल होतो.जलाशयातून हा मार्ग जातो त्यामुळे आपला बराच प्रवास वाचतो.रतनवाडी गावातून आपण अर्धा तासाच्या प्रवासानंतर दुसऱ्या रतनवाडीमध्ये पोहोचायचे.हेच ते गड पायथ्याचे रतनवाडी गाव. (रतनवाडी मार्गे साम्रद गावात पोहोचून देखील आपण गडप्रवासाला सुरुवात करू शकता)या दोन्ही पर्यायी वाटा भंडारदरा जलाशयाच्या उत्तरेने कळसुबाई डोंगररांगेच्या पायथ्यातून जातात.
३) मुथखेलमार्गे :-
तिसरा पर्याय म्हणजे अर्थाच भंडारदरा जलाशयाच्या दक्षिण बाजुने जाणारा रस्ता. शेंडी-भंडारदरा-मुतखेलमार्गे रतनवाडीला गेल्यास वाटेत आपणास, न्हानी आणि महाकाल धबधबा दिसतो.या रस्त्याने निघाल्यावर भंडारदरा गावाच्या पुढे आल्यास, या रस्त्याने जाताना एका ठिकाणी एक महसूल आकारणी चौकी दिसते. येथे प्रत्येक व्यक्ती आणि वाहनासाठी ठरलेल्या दराप्रमाणे शुल्क जमा केला जातो. शुल्क दिल्यावर आपण रतनवाडीच्या दिशेने निघायचे. वाटेत आपल्याला अनेक ठिकाणी कॅम्पिंग सेवा देणार्यांचे फलक लावलेले दिसतात. शंभर रुपये वाहन शुल्क आणि प्रत्येक व्यक्तीसाठी पंधरा रुपये असा एकूण एकशेतीस रुपये पर्यटन शुल्क दिल्यानंतर आपली अपेक्षा असते की, रतनवाडीकडे जाणार रस्ता खूप चांगला असेल. परंतु,याबाबत आपला पूर्णपणे भ्रमनिरास होतो. अठरा किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी जवळपास एक तास लागतो.
मुथखेलमार्गे रतनवाडीचा नकाशा
रंध्या शेजारील धबधबा
शेंडी - भंडारदरा
मुतखेल
कोलटेंबे येथील धबधबा
रतनवाडीकडे जाणारी वाट
रतनवाडी
४) साम्रद गावातून चढणारी वाट :-
अलिकडेच प्रकाशात आलेले महाराष्ट्रातील एक अद्वितीय निसर्गनवल म्हणजे सांधन दरी,सोशल मेडीयाच्या कृपेने इथे आता प्रचंड गर्दी होते.सांधन दरी बघणे, इथे चालणारे रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, जायंट स्विंग सारखे साहसी खेळ, काजवा महोत्सव यामुळे एकेकाळी एकुटवाणे आणि दुर्लचित असणारे साम्रद गाव प्रकाशझोतात आले आहे.
सांदण दरी आणि साम्रदचा परिसर
वास्तविक हे साम्रद रतनगडाच्या घेर्यातील गाव.सहाजिकच इथूनही रतनगडावर जाणारी वाट आहे. मात्र जवळपास नव्वद टक्के दुर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि पर्यटक रतनवाडीच्या वाटेने चढतात.अर्थात त्या वाटेने गेल्यास रतनवाडीतील अमृतेश्वर मंदीर, पुष्करणी बघायला मिळेत हा फायदा आहे.पण वेगळी वाट आणि सह्याद्री परिसरातील रौद्र निसर्ग अनुभवायचा असेल तर साम्रदच्या वाटेने रतनगड एकदा नक्कीच सर करा. साम्रद गावातुन जाताना पाणी भरुन वाटाडय़ा सोबतीला घेणे गरजेचे आहे कारण वाटेत कोठेही पाणी नाही.
डेहणेमार्गे साम्रद व रतनगडाकडे चढणारी वाट
या वाटेने जायचे झाले तर शक्यतो आदल्या रात्री साम्रदला मुक्काम करणे श्रेयस्कर. इथे आता मुक्कामाची भरपुर सोय झाली आहे.साम्रदला शेंडीमार्गे येता येईल किंवा खुप भटकंतीची हौस असेल तर आजोबाच्या पायथ्याशी असलेल्या डेहणे गावातून करोली घाट मार्गे किंवा बाण सुळक्याजवळून चढणार्या वाटेने साम्र्दला येता येईल. साम्रदवरून रतनगडाकडे चढणारी वाट खुट्याच्या उजवीकडून जाते.साम्रदच्या पुढच्या साम्रदवाडीतून निघाल्यावर पठारावर आडवा येणारा ओढा ओलांडून शेताच्या बाजुने पुढे जात रहायचे. शेत संपल्यावर दोन वाटा फुटतात. उजवीकडील वाट उतरुन बाण सुळक्याकडे जाते.तर डावीकडील वाट खुट्टा, रतनगडाकडे जाते.साम्रदपासून या वाटनाक्याला यायला वीस मिनीटे पुरतात. डावीकडे वळून खुट्ट्याच्या रोखाने चालायला सुरवात केली कि वाट दाट झाडीतून चढणीला लागते.साधारण वीस मिनीटे चढले कि वाट मोकळ्यावर येते.या जागेवरुन खुट्टा समोरच दिसतो.जर खुट्ट्यावर चढाई करायची असेल तर स्पष्ट अशी वाट नाही. त्यामुळे जुन्या वाटेच्या खुणा शोधत आपणच वाट तयार करायची. आणि खुट्ट्याच्या पायथ्याशी पोहचून प्रस्तररारोहणाची हौस भागवायची.मात्र आपल्याला तांत्रिक चढाई करायची नसेल आणि आपल्याकडे प्रस्तरारोहणाची साधने नसतील तर खुट्ट्याचा नाद सोडायचा आणि मोहरा रतनगडाकडे वळवायचा.
साम्रद गावातून रतनगड विलक्षण देखणा दिसतो.
साम्रद गावातून रतनगडची वाट झक्क मळलेली.
रतनगडाकडे चढताना मागे दिसणारे कळसूबाई रांगेतील अलंग,मदन्,कुलंग आणि कळसुबाई शिखर
रतनगड चढताना सांधण दरी, शिपणूर, घाटघर धरण व साम्रद गाव
रतनगडाकडून ‘बाण’ सुळक्याकडे कोसळलेलया दरीचं रौद्र अन् खोलवर दर्शन
बाण सुळका
रतनगड आंणि खुट्टा यांच्यामधील खिंड
रतनगडाच्या कातळकड्याला लगटून जाणारी वाट
त्र्यंबक दरवाज्यासमोरच्या उभ्या पायर्याचा मार्ग
कातळात कोरलेला त्र्यंबक दरवाजा
त्र्यंबक दरवाजा आतून
खड्कावर कोरलेले शिवलिंग
आपण उभ्या असलेल्या डोंगरावरुन जरा डावीकडे वळून खुट्याचा उजव्या पायथ्याला यायचे आणि तसेच पुढे उजवा ट्रॅवर्स मारून २० मिनीटाचा चढ चढून खुटा आणी रतनगडाच्या खिंडीत यायचे.इथे दोन वाटा फुटतात. डावीकडची वाट रतनगडाच्या डोंगराला पुर्वेकडून वळसा घालून कात्राबाई-रतनगड वाटेला मिळते. तर उजवीकडची वाट रतनगडाच्या कातळकड्याला लगटून त्रंबक दरवाज्याखाली असलेल्या पायर्याकडे जाते. या वाटेने जाताना डावीकडे कातळकडा तर उजवीकडे पातळवेरी गेलेली दरी आणि त्यात असलेल्या बाण सुळक्याचे दृष्य दिसते. कातळाला छेदणा-या एका जलौघानं कोरलेल्या घळीतून त्र्यंबक द्वाराच्या अरुंद उभ्या पाय-या खणल्या आहेत. पाठीमागची खोSSSल दरी, पाठीवरचं ओझं, मनातली थोडीशी भीती अन् उभ्या पाय-यांवर लागणारी धाप – सगळ्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत त्र्यंबक द्वार गाठायचे आणि तिथून गडमाथा.साम्रद वरून निघाल्यावर त्रिंबक दरवाज्यात पोचायला १.५ तास लागतो.. पण पहील्या चढा नंतर खुट्टा पायथा ते त्रिंबक दरवाजा जबरदस्त काटेरी झाडे-झुडूपे आहेत. चांगलेच ओरबाडून निघते हे लक्षात ठेवायचे.
५) कल्याण दरवाज्याची वाट :-
रतनगडाला एकूण तीन दरवाजे आहेत. रतनवाडीकडील गणेश दरवाजा, साम्रदचा त्र्यंबक दरवाजा आणि कोकण बाजूकडे असल्यामुळे कोकण ऊर्फ कल्याण दरवाजा.गडावर असलेल्या राणीच्या हुड्यापासून डावीकडे जाऊ लागायचं. पुढे जाऊन उजव्या बाजूच्या टेकडीला वळसा घातला की नेढ्याकडे जाता येतं. आणखी थोडं पुढं गेलं की डाव्या हाताला भरभक्कम तटबंदीत बांधलेला एक दरवाजा दिसतो. त्याचं नाव कोकण उर्फ कल्याण दरवाजा. अर्थात सध्या तरी या कल्याण दरवाज्याच्या खालची वाट इंग्रजांनी सुरुंग लावून नष्ट केली आहे,त्यामुळे ना इथून वर येता येते ना उतरता येते. अर्थात सह्याद्रीच्या दर्याखोर्यात भटकंती करणार्या दुर्गवीरांनी हे आव्हानही पेलले आणि या दरवाज्याकडे येणारी वाट शोधली. पुण्याचे जुनेजाणते भटके आणि दुर्गाअभ्यासक श्री. दिलीप वाटवे यांनी या कल्याण दरवाज्याकडे येणारी वाट शोधून काढली. त्यांनी या खडतर वाटेचा कसा मागोवा घेतला हे जाणून घेउया त्यांच्याच शब्दात !
कल्याण
दरवाजा. दरवाज्याच्या बाहेर खोल दरी आहे जिथून खाली उतरण्याची वाटच दिसत
नाही. जर इथून उतरायला वाटच नाहीये तर मग इथं दरवाजा का बांधला असावा? या
दरवाज्याचं नाव कोकण ऊर्फ कल्याण दरवाजा असं असल्यानं इथून कल्याणकडे वाट
उतरून जात असावी का? असेल तर नेमकी कुठे उतरत असेल? जर वाट असेल तर तिथे
वाट असल्याच्या काही खाणाखुणा असतील का? वगैरे अनेक प्रश्न मनात येत होते
आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांची मग शोधाशोध सुरू होती. अगदी गुगल मॅप
पासुन ते जुन्या जाणत्या ट्रेकर्सना विचारून झालं होतं. पण कुणीच मनाचं
समाधान मात्र करू शकलं नव्हतं. प्रत्यक्ष तिथं जाऊनच शोधाशोध करावी लागणार
असं एकंदरीत दिसत होतं. शोध घ्यायला जायची इच्छा तर खुप होती पण मुहुर्त
काही लागत नव्हता.
नुकताच
११-१२ नोव्हेंबरला डेहण्यातून अवघड असा 'पाथरा घाट, आजोबा आणि गुयरीदार'चा
ट्रेक केला. गुयरीदारच्या वाटेने डेहण्यात परतताना एक नवीन घाटवाट कळली,
तिचं नाव 'चिकणदरा' आणि ही वाट कोकणातील डेहण्यातून साम्रदला तर जातेच पण
ती रतनगडाच्या कल्याण दरवाज्यातूनही गडावर चढून जात असावी असा स्थानिक
लोकांचा अंदाज होता. अर्थात या वाटेने कुणीच गेले नसल्याने त्याबाबत
खात्रीशीर मात्र कुणीच काही सांगू शकत नव्हते. आता एवढी माहिती मिळाल्यावर
मागे पडत असलेल्या प्रश्नांनी पुन्हा डोके वर काढले. मग आता शांत बसणं शक्य
नव्हतं. लवकरच ही शोधमोहिम हाती घ्यावी लागणार होती.
आजोबाचा
ट्रेक संपवून पुण्याला परतताना मनात 'चिकणदरा' सारखा घोळत होता. कशी असेल
ती वाट? किती वेळ लागेल? कुठे कातळारोहण करावे लागेल का? त्यासाठी काही
साधनसामुग्रीची आवश्यकता भासेल का? असे एक ना अनेक विचार मनात येत होते.
चारपाच दिवसांनी आजोबाच्या धुंदीतुन बाहेर आल्यावर हळूच सोबत्यांना
चिकणदर्याला जाण्यासाठी खडा टाकला. माझ्या मनातला विचार सर्वांनीच उचलून
धरला. लगेचच डेहण्यातल्या पाटेकरांशी त्याबाबत बोललो. आमचं जवळजवळ या अनवट
वाटेने जाण्याचं नक्की झालंही होतं, तारीखही ठरली होती दहा डिसेंबर म्हणजे
बरोबर एक महिन्यानेच आणि त्यादृष्टीने सगळी तयारीसुध्दा झाली होती पण नेमकं
'ओखी' चक्रीवादळ जोराचा पाऊस घेऊन आलं. आता आम्हाला आमचा बेत रहीत करावा
लागतोय की काय अशी भीती वाटू लागली. देव कृपेने पुढच्या दोन दिवसांत ते
शमलं आणि आमचं जाण्याचं नक्की झालं.
नऊ
डिसेंबरच्या रात्री जेवण करून निघालो. माळशेज घाटाच्या अलिकडे एका
धाब्यावर चहाला थांबलो तर गाडीच्या चाकातून हवा जात असल्याचं लक्षात आलं.
मागल्या वेळेसारखा याही वेळेस गाडीने दगा दिला होता. पण एक बरं होतं की
ज्या ठिकाणी चाक पंचर झालं तिथून पुढे फक्त अर्ध्या किलोमीटरवरच पंचर
काढण्याचं दुकान होतं. दुसर्या दिवशी डेहणे, डोळखांब, तळेगाव सारख्या
ठिकाणी पंचर काढता आलं असतं पण संध्याकाळी ट्रेक संपायला किती वाजतायत
त्यावर ते अवलंबुन असणार होतं. बरं जातानाच वाटेत परत कुठे पुन्हा पंचर
झालं असतं तर मग अजुन अवघड झालं असतं त्यामुळे असा धोका न पत्करता खुबीतच
थोडा वेळ वाया जाणं आम्हाला परवडणारं होतं. एवढं सगळं करून डेहण्यात
पोहोचायला रात्रीचे साडेतीन वाजले. दोनएक तास गावातल्या मारूती मंदीरात झोप
काढली.
सकाळचं
आवरून बरोबर सहाला आरती केली आणि पाटेकरांकडे नाष्ट्याला हजर झालो.
आजोबाच्या ट्रेकच्या वेळचे पोहे काही पोटभरीचे झाले नव्हते म्हणून यावेळी
सरळ पोळी-भाजीच नाष्ट्याला सांगितली होती.
आमच्या वाटाड्यांनी म्हणजे देवू शिवारींनी वोरपडीतुन येऊन रात्रीच पाटेकरांकडे येवून मुक्काम केला होता.
त्यांचंही
आवरून झालं होतं त्यामुळे वेळ न घालवता वाल्मिकनगरहुन शाई नदीच्या पात्रात
असलेल्या वाटेने तडक निघालो. ही वाट आमच्या ओळखीची होती कारण याच वाटेने
आम्ही महिन्याभरापुर्वी आजोबावरून उतरलो होतो.
पहाटेच्या
धुक्यात खुटा-रतनगड, कात्राबाई, करंडा आणि आजोबा ओझरते जाणवत होते.
त्यांच्यामागे होत असलेल्या सुर्योदयामुळे सह्याद्रीचा राकटपणा जाणवत होता.
आमच्या
थोडंसं डाव्या बाजूला रतनगडाच्या खुटा सुळक्यासारखाच एक सुळका दिसत होता.
याला कुईरानाचा कडा किंवा कुईरानाचा कापरा असं स्थानिक लोक म्हणतात.
त्याच्या मागच्या बाजुला एक खिंड जाणवत होती. आम्हाला त्या खिंडीत जायचं
होतं. त्यातून एक नाळ शाई नदीच्या पात्रात उतरत होती. या खिंडीतून
उतरणार्या वाटेलाच चिकणदरा किंवा चिकणमातीचा दरा म्हणतात.
नदीपात्राच्या
बाजूने गच्च झाडीतुन प्रवास करत आम्ही सर्व जवळजवळ मुख्य रांगेला भिडलो
होतो. ऊन लागत नसल्यामुळं पहिला थांबा उंबराच्या पाण्यापाशीच घेतला.
नदीपात्राच्या
बाजूला एक उंबराचं झाड आहे. त्या झाडाच्या बाजूला कुठेही खड्डा खणला तरी
बारमाही पाणी मिळू शकतं. डिसेंबर महिना असल्यानं आम्हाला पाण्यासाठी खड्डा
काही करावा लागला नाही. इथून पुढं ज्या वाटेने आम्ही परत खाली उतरणार होतो
त्या बाणच्या नाळेत पोहोचेपर्यंत आम्हाला पाणी मिळेल याची शाश्वती नव्हती
म्हणून पोटभर पाणी पिऊन घेतलं आणि बाटल्याही तंतोतंत भरून घेतल्या.
आता
बाकी आमची वाट डाव्या बाजूच्या डोंगरधारेवर चढू लागली होती. खरंतर
चिकणदर्याच्या खिंडीतून उतरलेली नाळ थोडी पुढे उतरत होती पण आम्ही एक
छोटासा शॉर्टकट मारून खिंडीत पोहोचणार होतो. सुरवातीची वाट दाट झाडीतून
होती आणि वाट तयार करतच चढावं लागत होतं.
साधारण
तासाभराच्या चढाईनंतर वाट एका सोंडेवर आली. इथे डोक्याएवढ्या उंचीचं गवत
होतं. पण जसजसं वर चढत गेलो तसं ते कमी उंचीचं होत गेलं.
आता
ही सोंड ओलांडून आम्हाला पलिकडच्या नाळेत शिरायचं होतं. पायाखाली वाळलेलं
निसरडं गवत आणि जोरात वाहू लागलेल्या थंडगार बोचर्या वार्यामुळे जीव
मुठीत घेऊनच चढावं लागत होतं. त्यातच डाव्या बाजुला चढाची बाजू तर उजव्या
बाजूला निसरडा उतार आणि वाट तर फक्त एक पाऊल बसेल एवढी.
पाऊल
पुढे टाकलं तरी ते कधी घसरेल याचा नेम नसे. त्यामुळे काहीजण तर चक्क
चतुष्पाद झाले होते. 'बुडत्याला काडीचा आधार' कशाला म्हणतात त्याचा
प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेत होतो.
आता
आम्ही वरच्या कड्याला भिडलो होतो. एक बरं होतं की आता कड्याला धरता येत
होतं. आडवं जात नाळेत शिरलो आणि मस्त झाडी लागली. अशा अवघड टप्प्यावरून
शेवटचा माणूस येईपर्यंत थांबणं गरजेचं होतं. अर्थात त्यामूळे सर्वांनाच
थोडी विश्रांती मिळणार होती आणि खिंड आता आटोक्यात आली होती त्यामुळे
थांबायला काहीच हरकत नव्हती.
वाट
नाळेच्या कधी अल्याड तर कधी पल्याड जात चढत होती. जसजसं खिंडीत जात होतो
तसतसं वरच्या बाजूने ढासळलेल्या दगडांच्या ढिगावरून चालून जावं लागत होतं.
एखाद्या मोठ्या दगडावरही पाय ठेवल्यानंतर तो कधी खाली घसरेल याचा नेम
नव्हता. ज्याला जसं जमेल तसं पण सावधगिरीने चालत हळूहळू सर्वजण खिंडीत
पोहोचले. विश्रांती घेत असताना पाटेकरांशी पुढच्या वाटेबद्दल चर्चा केली.
आमच्याबरोबर
आलेले दोन्ही वाटाडे इथून पुढे रतनगडाकडे कधीच न गेल्याने निदान इथपर्यंत
तरी त्यांचं काम झालं होतं आणि माझं सुरू झालं होतं. आतापर्यंत केलेल्या
डोगरयात्रांमुळे पदरी जमा असलेला अनुभव पणाला लागणार होता. शिवारी आणि
पाटेकर आमच्यासोबत येण्यास थोडे नाखुषच दिसत होते. पण आम्हाला रतनगडाची वाट
शोधायचीच असल्याने खिंडीत आम्ही रतनगडावर जाण्याची तयारी केली. उजव्या
बाजूच्या धारेवर चढलो. थोडं वर गेल्यावर समोरच भलामोठा कातळ आडवा आला.
खरं
म्हणजे इथून रतनगड अजिबात दिसत नव्हता. निदान समोरच्या कातळावर चढून गेलो
म्हणजे काहीतरी अंदाज आला असता. त्यासाठी कातळावर चढून जाणं भाग होतं. एक
नक्की होतं की जर इथून रतनगडावर जायला वाट असेल तर त्याकाळी कातळारोहण करून
नक्कीच जात नसणार. पायर्या असायलाच हव्या होत्या. त्यादृष्टीने थोडी
शोधशोध केल्यावर त्या गवसल्या आणि सर्वांनाच आनंद झाला. पायर्यांच्या
मागच्या बाजूला थेट कडा होता पण पायर्या असल्याने तशी भिती वाटत नव्हती.
ही जर रतनगडाची वाट असेल तर या ठिकाणी एखादी चौकी असायला हवी होती पण झाडी
एवढी माजलेली होती की शोधणं अवघड होतं.
समोरच
कुईरानाचा कडा किंवा कुईरानाचा कापरा नावाचा आतापार्यंत कुणीही चढाई
केलेला सुळका लक्ष वेधुन घेत होता. याची चढाईची उंची ३००-३५० फुट नक्कीच
असेल. त्यासाठी एकदा पुर्ण तयारीनिशी आणि वेळ काढून यावे लागेल.
आम्ही
ज्यासाठी इतक्या लांबुन इथे आलो होतो ते स्वप्न आज पुर्ण होणार अशी
सर्वांनाच आशा वाटु लागली. इथून पुर्वी रतनगडावर जायला नक्की वाट होती याची
खात्री पटली होती. आता आम्हाला फक्त पायर्यांचा माग काढत जायचं होतं.
पायर्या चढून वर गेल्यावर अजून एक छोटा कातळटप्पा लागला तिथल्या
पायर्यांवरून चढल्यावर समोरच्या छोट्या टेकडीमागे असलेला रतनगड
नेढ्यावरच्या झेंड्यामुळे चटकन ओळखता आला.
समोर
दिसणार्या टेकडीच्या उजव्या बाजूला कडा जाणवत होता आणि टेकडीवर चढून
जाणंही सोपं दिसत नव्हतं त्यामुळे वाट टेकडीच्या डाव्या बाजूने जात असणार
हे उघड होतं. वाटेत भयानक झाडी माजलेली असल्याने वाट तयार करतच जावं जावं
लागत होतं त्यामुळे वेळ प्रचंड खर्ची पडत होता. संध्याकाळपर्यंत आम्हाला
डेहण्यात पोहोचायचं असल्यानं विश्रांतीसाठी कुठेही थांबा न घेता रतनगडाच्या
दिशेने चालत होतो. जुनी कारवी मोडून पडली होती आणि नवीन कारवी त्यामधूनच
आली होती त्यामुळे एखादं पाऊल खाली पडलेली कारवी मोडून कधी खालच्या
खड्ड्यात जाईल याचा नेम नसायचा. त्यातच मधे उगवलेली आग्याबोंड अंगाला लागली
की प्रचंड खाज सुटत असे. काटेरी झुडपे तर अगणित होती त्याने कुणाला ओरखडत
होतं तर कुणाच्या अंगात काटा मोडत होता. त्यामुळे एका रेषेत चाललेल्या
आमच्या टोळीचा म्होरक्या थकल्यावर आम्ही थोड्या थोड्या वेळाने तो बदलत
होतो.
खरं
म्हणजे आम्ही अंदाजेच रतनगड आणि धारेच्या सांध्याकडे चढून जात होतो पण
मधेच आलेल्या एका छोट्या कातळटप्प्यावर खोदीव पायर्या दिसल्या आणि आम्ही
योग्य दिशेने चाललो आहोत याची खात्री पटली. तसं आम्ही विश्रांतीसाठी कुठे
थांबतही नव्हतो. मागून 'ए जरा थांबा. अंतर पडलंय' अशी आरोळी ऐकू आली की
'अरे चला, संपलंच. थोडंच राहिलंय' असं म्हणून रेटून नेत होतो. घड्याळातली
वेळ अडीच वाजल्याचे दाखवत होती. म्हणजे आम्हाला तसा बराच उशीर झाला होता.
अंधार पडायच्या आत बाणच्या नाळेने उतरून निदान खालच्या कुंडांपर्यंत तरी
पोहोचायला हवं होतं. त्यामुळे थांबून चालणारच नव्हतं. पण काही वेळाने एक
वेळ अशी आलीच की मागच्या थकलेल्या मंडळींसाठी थांबावच लागलं. आता इथून पुढं
यायची त्यांची अजिबात तयारी नव्हती. खरं म्हणजे रतनगड अगदी हाकेच्या
अंतरावर दिसत होता. तो इतका जवळ होता की गडावरच्या मंडळींचे बोललेले आवाजही
स्पष्ट ऐकू येत होते. त्यामुळे थकलेल्या मंडळींना आम्ही वाटेत थांबवून
काही मोजके जण गडाकडे निघालो. मागे थांबलेल्या मंडळींमधे आमचे दोन्ही
वाटाडे होते हे काही वेगळं सांगायला नको. थकलेलं टोळकं मागे थांबल्यानं एक
गोष्ट बाकी आमच्या पथ्थ्यावर पडणार होती ती म्हणजे त्यांची विश्रांती.
दुसरं असं की आम्ही वर जाऊन येईतोपर्यंत त्यांची जेवणे पण होणार होती. पुढे
डेहण्यापर्यंत चालण्याच्या दृष्टीनं ही गोष्ट चांगलीच झाली होती. खरं तर
जिथे पाणवठा मिळेल तिथे थांबून जेवण करण्याचे ठरविले होते. पण उंबराच्या
पाण्यापासून इथंपर्यंत आम्हाला कुठेही पाणी सापडलं नाही. पाणवठा मिळेपर्यंत
सोबतचा पाणीसाठा पुरवून वापरावा लागणार होता. रतनगडापर्यंतची वाट कशी असेल
याचा अंदाज नसल्याने कातळारोहणासाठी लागणारी जुजबी सामग्री सोबत घेवून वेळ
न दवडता पुढे निघालो. आम्ही जसजसं वर चढत होतो तसं झाडांच्या झरोक्यातून
रतनगडाची तटबंदी, बुरूज दिसत होते.
रतनगडावरून
उतरलेली धार मागे पाहिलेल्या टेकडीपर्यंत आलेली होती. तिच्यावर हळूहळू चढत
रतनगडाच्या आणि टेकडीला जोडलेल्या धारेच्या सांध्यात पोहोचलो. इथेही
अपेक्षेप्रमाणे पायर्या असायला हव्या होत्या तशा त्या दिसल्याच. फारशी
शोधाशोध करावी लागलीच नाही. त्या पायर्यांचा माग घेतघेत वर चढत गेलो. पण
एकवेळ अशी आली की पुढे पायर्या संपल्या आणि नव्वद अंशाचा कडा लागला.
जवळच
प्रबळगड आणि कलावंतीणच्या खिंडीत आहे किंवा रायगडाच्या भवानी कड्याखाली
आहे तसं एक टाकं दिसलं. गडावर चढून जाण्यासाठी अवघड प्रकारचं कातळारोहण
करावं लागलं असतं आणि त्यासाठी वेगळ्या नियोजनाची गरज होती. आम्हाला फक्त
वाट शोधायची असल्याने आम्ही त्या नियोजनाने आलो नव्हतो. त्यामुळे इथून पुढे
आम्ही काही गेलो नाही. अगदी रतनगडावर कातळारोहण करून गेलोच असतो तरीही
डेहणे गाठण्यासाठी खुप मोठा वळसा पडला असता. मागे थांबलेल्यांची एकंदर
अवस्था बघता त्वरीत परत आम्ही फिरण्याचा निर्णय घेतला. तसं फक्त आम्ही वाट
शोधण्यासाठी आलो होतो आणि आम्हाला ती गवसली होती. आम्ही परत फिरून आमच्या मागे थांबलेल्या सोबत्यांपर्यंत येईस्तोवर त्यांचं जेवण होऊन एक झोप काढून झाली होती.
थकलेली
मंडळी ताजीतवानी झाल्यावर त्यांना पुढे पाठवून देऊन आम्ही पटापट आमची
जेवणे उरकली आणि ते खिंडीत पोहोचेपर्यंत त्यांना मागुन जाऊन गाठलं.
खिंडीपासून
पंधरा-वीस मिनीटात एका मोकळ्या पठारावर आलो. या ठिकाणावरून रतनगड आणि खुटा
अगदी पुर्णपणे दिसत होते. पठाराच्या आसपास बांबुची बेटे भरपुर दिसली आणि
साम्रदची मंडळी बांबु नेण्यासाठी इथे वरचेवर येतात त्यामुळे या पठारावरून
बाणच्या नाळेत जाईपर्यंतची वाट अतिशय मळलेली होती.
मळलेली
वाट नाळ ओलांडून साम्रदकडे निघुन गेली आणि आम्ही बाणच्या नाळेतुन उतरू
लागलो. थोडं उतरून गेल्यावर स्वच्छ पाण्याचा साठा मिळाला.
चिकणदर्याखालच्या उंबराच्या पाण्यानंतर आत्ताच पाणी मिळालं होतं. बाणची
नाळ माझ्या चांगल्या परिचयाची होती. जानेवारी २००८ च्या पुणे
व्हेंचरर्सच्या बाण मोहीमेत मी इथं आठवडाभर मुक्कामाला होतो. आता बारीक
नाळेतून मोठ्या झालेल्या नाळेत आलो आणि समोर ८१० फुटांचा बाण सुळका,
सांधणदरीची भेग आणि त्यामागे करवली घाट दिसु लागला.
बाणच्या
पायथ्यातून मोठमोठे कातळटप्पे उतरावे लागत होते. सुर्यास्तही होऊ लागला
होता त्यामुळे आता जेवढ्या लवकर सांधण खालच्या कुंडांपर्यंत जाता येईल
तेवढं जावं लागणार होतं. कारण अंधार पडल्यावर चालण्याचा वेग मंदावतो.
बाणच्या नाळेतुन पुर्णपणे खाली उतरून जाता येत नाही. मधे दोन-तीन मोठाले
कातळटप्पे आहेत. त्यामुळे बाणची नाळ सोडून आम्हाला डाव्या बाजूच्या नाळेत
उतरावे लागणार होते. त्यासाठी अगोदर डाव्या धारेवर चढावे लागले. इथे
पोहोचेपर्यंत पुर्णपणे अंधार पडला. त्यामूळे इथून पुढचे फोटो काढता आले
नाहीत. डाव्या धारेवरून नाळेत
उतरण्याची वाट इतकी सरळसोट होती की सुरक्षा दोर वापरण्याखेरीज पर्यायच
नव्हता. एखादे मोठे झाड पाहून त्याला दोर बांधायचा. एकएक करत सर्वजण खाली
आले की शेवटचा भिडू गाठ सोडून दोर त्याच झाडाला इंग्रजी 'U' सारखा ओवायचा
आणि दोन्ही टोके खाली सोडायचा. मग दुहेरी झालेला दोर धरुन खाली बाकीच्या
सोबत्यांपर्यंत उतरायचा. असं करत करत आमची जत्रा अंधारात खाली उतरत होती.
जवळजवळ हा प्रकार आम्ही आठ-दहा वेळा तर नक्कीच केला. बराच वेळ असं आम्ही
उतरत होतो. काहीच दिसत नसल्याने तळ किती लांब आहे ते समजत नव्हते. एकदाच्या
सांधणदरी खालच्या ओळखीच्या खुणा दिसल्या आणि सुटकेचा निश्वास सोडला.
रात्रीचे साडेआठ वाजले होते आणि डेहण्यापर्यंत अजुनही दोनएक तासांची चाल
बाकी होती. पण एक बरं होतं की वाट मळलेली, सपाटीची आणि निर्धोक होती. नाही
म्हणायला कोल्हेकुई ऐकू येत होती पण तेवढीच. उठतबसत एकदाचे साडेदहा वाजता
सर्वजण डेहण्यात पोहोचलो. आम्हा
सर्वांची पुण्यातून निघुन डेहण्यात पोहोचण्याच्या चोवीस तासात फक्त दोनच
तास झोप झाली होती आणि इथून पुढे पुण्यापर्यंत पाच तास झोप होणार नव्हती.
म्हणजे पुण्यात पोहोचण्या आधीच्या तीस तासात सोळा तास ट्रेक, दहा तास
ड्रायविंग, दोन तास आवरण्याचे आणि फक्त दोन तास झोप. एकूण पाटेकरांचा या
ट्रेकचा चालण्याबद्दलचा अंदाज साफ चुकला होता. हा ट्रेक एक दिवसाचा खासच
नाही. बहूतेक सर्वांनाच दुसर्या दिवशी
कामावर जायचे होते त्यामुळे डेहण्यात थांबण्याचा प्रश्नच नव्हता.
पाटेकरांकडे चहा घेतला आणि तडक पुण्याकडे निघालो ते याच परीसरात अजून एक
नवीन सापडलेल्या घाटवाटेत परत येण्यासाठीच.
अमृतेश्वर महादेव मंदीर आणि पुष्करणी :-
रतनगडावर चढणार्या सर्व वाटांची आपण माहिती घेतली. अर्थात पाच वाटांपौकी तीन वाटा रतनवाडीमार्गे गडावर जातात.सहाजिकच बहुसंख्य दुर्गप्रेमी आणि पर्यटक रतनवाडीमार्गेच गडावर जातात.याला अर्थात आणखी एक कारण आहे.रतनवाडीत असणारे शिल्पसमृध्द मंदीर आणि पुष्करणी.सोशल मेडीयावर या गडाचे ,मंदीराचे आणि पुष्करणीचे फोटो पसरल्यावर हा दुर्लक्षित परिसर एकदम प्रकाशात आला. एकेकाळी गडाच्या पायथ्याचे हे शांत्,निवांत आणि साधेसे गाव एकदम बदलले. पार्कींग जागा, प्रसाधन गृहे, सिमेंटच्या कमानी या बदलांनी हे अगदी पर्यटनस्थळ स्थळ झाले.
हे सगळे ठिक पण त्यामुळे रतनवाडीचे मुख्य आकर्षण असलेले पुष्करणी तलाव कोमेजुन गेल्यागत भासते.. आधी बघीतलेल्या फोटोंमध्ये उठून दिसणारे अमृतेश्वर मंदीर व पुष्करणी तलाव सध्याच्या आधुनिकीकरणामध्ये लपले जात आहेत असे वाटते. आता इथे बर्याच गाडयांची वर्दळ सुरु असते. मोठ्या संख्येने रिसॉर्ट झालेत. आता हे बदल म्हणजे प्रकाशझोतात आलेल्या पर्यटन स्थळ झाल्याची चिन्ह.. अर्थात याची दुसरी बाजु हि कि येथील गावकर्यांना तेवढेच उपजिवीकेचे साधन मिळाले आणि शहरावरचा भार थोडा कमी झाला.
मेरु पर्वताची दोरी करुन आणि मंदार पर्वताचा रवी करुन देव आणि दानवांनी समुद्रमंथन करुन चौदा रत्न बाहेर काढली. त्यातील एक रत्न या वाडीच्या वाट्याला आले, अशी श्रध्दा आहे.म्हणून या वाडीचे नाव 'रतनवाडी' आणि पाठचा डोंगर म्हणजे रत्नगड अथवा रतनगड. या रतनवाडीच्या तीन वाड्या आहेत.पैकी तीर्थाच्या वाडीत आहे, पाषाण शिल्प उर्फ अमृतेश्वराचे मंदीर.
या रतनगडाची जलकन्या म्हणजे प्रवरा नदी.शंकराच्या जटेतून गंगा उगम पावावी, तशी रतनगडाच्या कुहरातून हि सरिता झुळझुळ करीत वहाती होते, गडाच्या अंगाखांद्यावरुन उड्या मारत पायथ्याच्या अमृतेश्वराचे पादप्रक्षालन करते आणि सागराच्या ओढीने निघणार तोच भंडारदर्याजवळ बांध घालून तीला अडवून पाण्याच्या प्रचंड साठा केला आहे. आज या मंदीराभोवती फार झाडी नसल्यामुळे ते लांबूनच नजरेला पडते.मात्र धरण होण्याआधी कदाचित इथे घनदाट झाडी असावी. थोड आडवाटेला असणारे मात्र आता जाणे सोयीचे झालेले हे शिवस्थान आवर्जून जाउन पहावे असेच आहे.
आपल्या संस्कृतीत जिथे नदीचा उगम होतो तिथे हमखास महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. सह्याद्रीत भटकंती करताना नाशिक ते जुन्नर या भागात उगम पावणाऱ्या नद्यांच्या उगमस्थानाजवळ शिवभक्त शिलाहार राजा झंज याने बारा शंकराची मंदिरे बांधली ही आख्यायिका ऐकायला मिळते. अपरादित्याच्या पन्हाळे येथील ताम्रपटातील्,नवव्या ओळीत उल्लेख मिळतो तो असा-
दहाव्या शतकापासून राज्य करणार्या ठाण्याच्या शिलाहार वंशातील शंकरराजाने गोवा ते भीमा पसरलेल्या सह्यराजीत बारा शिवालयाची उभारणी केली. अरब इतिहासकार आणि भूगोलतज्ञ अल मसुदी याने आपल्या प्रवासवर्णनात सन ९१६ मध्ये शिलाहारांसंदर्भात पुढीलप्रमाणे नोंद करून ठेवली आहे. “सामूर (चौल) येथे राज्य करणाऱ्या राजाचे नाव झंज (Djandja) असे आहे.”
झंज राजाने बांधली म्हणून ज्या मंदिरांचा उल्लेख केला जातो, ती मंदिरे पुढीलप्रमाणे.
०१. गोदावरी नदी, त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक (अहिल्यातीर्थानजीक असलेले भग्न शिवालय)
०२. वाकी नदी, त्रिंगलवाडी, जिल्हा नाशिक
०३. बाम नदी, बेलगांव, जिल्हा नाशिक
०४. धारणा नदी, तऱ्हेळे, जिल्हा नाशिक
०५. कडवा नदी, टाकेद, जिल्हा नाशिक
०६. प्रवरा नदी, रतनवाडी, अमृतेश्वर मंदिर, जिल्हा अहमदनगर
०७. मुळा नदी, हरिश्चंद्रगड, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, जिल्हा अहमदनगर
०८. पुष्पावती नदी, खिरेश्वर, नागेश्वर मंदिर, जिल्हा पुणे
०९. कुकडी नदी, पूर, कुकडेश्वर मंदिर, जिल्हा पुणे
१०. मीना नदी, पारुंडे, ब्रम्ह्नाथ मंदिर, जिल्हा पुणे
११. घोड नदी, वचपे, सिध्देश्वर मंदिर, जिल्हा पुणे
१२. भीमा नदी, भोरगिरी येथील शिवमंदिर, भोरगिरी, जिल्हा पुणे
शिलाहार घराण्याच्या तीन शाखा मानल्या जातात.पहिली शाखा उत्तर कोकणातील, दुसरी शाखा दक्षिण कोकणातील तर तिसरी शाखा दक्षिण महाराष्ट्रातील. वरील मंदिरांची यादी बघितल्यास यातील एकही मंदिर उत्तर कोकणात नाही आहे. ही सगळी मंदिरे घाटमाथ्यावर आहेत. जर झंजाने मंदिर ताम्रपटातील नोंदीनुसार शंकराची मंदिरे बांधली असतील तर त्याची नोंद झंजानंतर सत्तेवर आलेल्या गोग्गी आणि छद्वैदेव यांनी का नाही घेतली ?
मुळात शिलाहार घराण्याचा उत्तर कोकण शाखेचा इतिहासातील घडामोडीवर नजर टाकल्यास त्याचा पट असा आहे. इ.स. ९१० मध्ये हा शंकर राजा सत्तेवर होता. त्याची मुलगी चांदुरचा राजा चौथा भिल्लम याला दिली होती.पुढे या झंझाचा भाउ गोज्जिराज हा इ.स. ९३० मध्ये राजा झाला.त्याला तीन मुलगे, थोरला वज्जड याने सन ९४५ ते ९७५ या काळात गादी सांभाळली.त्याचा मुलगा अपराजित याने ९७५ ते १०१० या काळात सत्तेची सुत्रे सांभाळून भिल्लम, एयपदेव, गोम्म या राजांना मदत केली. तसेच सत्ताश्रय चालुक्याचा १००९ मध्ये पराभव केला.शिलाहार घराण्याच्या ठाणे शाखेचा हा पहिला राजा ठरला. वज्जडचा धाकटा भाउ अरिकेसरी म्हण्जे गोज्जिराजाचा दुसरा मुलगा याचा काळ १०१७ ते १०२५ असा आहे.पण त्याने चालुक्यांचे मंडलिकत्व पत्करले. त्याचा भोज परमार राजाने पराभव केला.वज्जडाचा सर्वात धाकटा मुलगा चित्तराजदेव सत्तेत आला.पुढे १०३० मध्ये कंदब राजांनी शिलाहारांना आपले मांडलिक बनवले. शिलाहार घराण्यात पुढे १०४७ ते १०७० या काळात ममवाणी उर्फ मुमुंणी हा सत्तेवर आला. त्यानेही कंदबांचे मांडलिकत्व पत्करलेच पण कंदब राजा पुष्टीदेव याला आपली मुलगीही दिली. त्याचा दिवाण जोगतैय्या याने अम्बरनाथ येथील सुप्रसिध्द मंदीराचा जीर्णोद्धार केला.
जर झंज राजाच्या काळात ह्या मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली असे मानले आणि ही मंदिरे त्याच्या कार्यकालात पूर्ण न होता नंतरच्या राजांच्या कार्यकालात पूर्ण झाली असे मानले, तर त्या राजांनी शिलालेख नोंदून ठेवले असते. उदा. अंबरनाथ शिवमंदिरातील राजा मम्मुनी याचा शिलालेख. छित्तराजा हा पण मोठा शिवभक्त होता. त्याने अंबरनाथ येथील प्रसिध्द भूमिज शैलीतील शिवमंदिर बांधायला सुरुवात केली. पण ते मंदिर छित्तराजाच्या कारकिर्दीत पूर्ण न होता मम्मुनी राजाच्या कार्यकालात पूर्ण झाले. तर अंबरनाथ मंदिरात तश्या अर्थाचा शिलालेख कोरून ठेवला आहे.
झंज राजाने बांधली म्हणून जी बारा मंदिरे सांगितली जातात, त्यापैकी फक्त हरिश्चंद्रेश्वर, अमृतेश्वर आणि नागेश्वर हीच तीन मंदिरे मूळ रुपात आहेत. बाकीची मंदिरे धरणाच्या पाण्यात गेलेली आहेत किंवा त्यांचे आधुनिकीकरण झालेले आहे.मंदिराची शैली ओळखण्यासाठी मंदिराचे शिखर महत्त्वपूर्ण ठरते. हरिश्चंद्रेश्वर मंदिर नागर शैलीत, अमृतेश्वर मंदिर भूमिज शैलीत आणि नागेश्वर मंदिर फांसणा शैलीत आहेत. कुकडेश्वर मंदिराचा शिखर नष्ट झालेले असल्यामुळे त्याची निश्चित शैली सांगता येणार नाही. जर झंज राजाने ही मंदिरे बांधली आहेत, तर त्यांची शैली वेगवेगळी का?तसेच झंज राजा मंदिरे बांधतो ती पण त्याच्या राजधानीपासून भरपूर लांब ठिकाणी. असे का? त्याला मंदिरे बांधायचीच असती तर ती त्याने राजधानीच्या आसपास बांधली असती. ज्या प्रदेशात ही सगळी मंदिरे आहेत तो प्रदेश झंज राजाच्या ताब्यात होता का हे पण आपल्याला माहिती नाही. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील नद्यांच्या उगमावर असलेली बारा मंदिरे झंज राजानेच बांधलेली आहेत ह्या दाव्याला आपल्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही आहे.
मंदिराच्या इतिहासाचा पट समजावून घेतल्यावर निघुया रतनवाडीच्या अमृतेश्वराच्या दर्शनाला ! अप्रतिम कोरीव शिल्पकलेचा नमुना असलेले हे अद्भुत मंदिर आवर्जून वेळ देवून पहावे असे आहे. चालुक्य शैलीतील हे मंदिर म्हणजे अप्रतिम शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे. सह्याद्रीच्या इतक्या गाभ्यात सात आठशे वर्ष महामुर पावसाला तोंड देत हे मंदिर आजही भक्कमपणे उभे आहे याचे आश्चर्य वाटते.
पूर्वेकडील प्रवेशद्वार
कोणत्याही शिवमंदीराची रचना नंदीमंडप, सभामंडप ,गाभारा आणि शिखर अशी असते. हिच रचना असलेल्या या मंदिराच्या गर्भगृहास पुर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजुने प्रवेशद्वारे आहेत. मंदिर वास्तुशैलीतील हे विशेष याच भागातील सिद्धेश्वर व हरिश्चंद्रगड येथेही पाहण्यास मिळते. या आगळय़ा शैलीमुळे नंदीमंडपातून गाभारा आणि त्यानंतर सभामंडप असा आपला प्रवास होतो. ४५ ते ४८ फुट उंच चुना विरहित जोडकाम केलेले हे मंदिर पुर्ण दगडी असून त्याची लांबी ७० फुट व रुंदी ३६ फुट आहे. मंदीरासमोर विस्तिर्ण प्राकार आहे.या मंदीराचे खरे नाव अमृतेश्वर पण आता त्याला अनंतेश्वर, रत्नेश्वर अशी नावेही मिळाली आहेत. मंदिराचे एक मुख्य प्रवेशद्वार पुढे असले तरी थेट मंदिराच्या गर्भगृहातच उघडणारे प्रवेशद्वार मागच्या बाजुला आहे.
मंदिराचा गाभारा कायम पाण्याने भरलेला असतो.
पश्चिमेकडील प्रवेशद्वार
भुमिज पद्धतीचे हे मंदिर शिल्पकलेने नटलेले आहे.मंदिराच्या प्रवेशद्वारावरच गणेशपट्टी लावली आहे त्याखाली शिवयंत्र तर खाली उंबरठ्यावर कीर्तिमुख आहे. दाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल कोरलेले आहत. मंदिराच्या सभामंडपात खांबांवर कोरलेले गंधर्व क्षय अश्या रितीनी कोरले आहेत जणू संपूर्ण मंदिराचा भार ते आपल्या खांद्यावर पेलत आहेत. तिथेच डाव्या बाजूला शिव पार्वतीची मूर्ती आहे.
गर्भगृहाच्या दारी कीर्तिमुख, शंख, कमळवेलींच्या पायघडय़ा घातल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहाला मागच्या बाजूला एक अर्धमंडप आहे. मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर नक्षीकामाने सुशोभित असे चौरसाकृती खांब आहेत. या खांबांचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यावर वर्तुळाकृती आहेत. अगदी वरती कीचकहस्त आहेत. मंडपाचे छत घुमटाकार असून त्यावर ठरावीक अंतर सोडून नर्तक व वादकांच्या तिरप्या प्रतिमा आहेत.
मंदिराचे शिखर भूमिज प्रकारचे असून शिखरावर चारही बाजूंनी एक एक अशा चार वेली आहेत त्यावर पुन्हा शिखरांच्या छोटय़ा प्रतिकृतींची रचना केलेली आहे. मंदीराच्या कळसावर उभे थरपट्टे, कलशाच्या वर्तुळाकार आकार, प्रत्येक बाजुच्या दोन थरामध्ये तीन उभ्या पट्ट्यात पंधरा उपशिखरे आहेत.या उपशिखरावर नाजुक आडवे कोरीवकाम आहे,थराच्या टोकाला व्यालमुख तर पायाकडे त्रिदल कमानीत मुर्ती कोरलेल्या आढळतात. रथपट्ट्याच्या कडेला कंगोर्याची नक्षी, तर समोरच्या बाजुवर नाजुक वेलबुट्टी दिसते. मंदीराच्या अंतराळावर पाच उपशिखरे आणि त्यावर त्रिदली कमान आहे. कमानीच्या दोन्ही बाजुला उपशिखरे आहेत. सातव्या शतकातील लाकडी रचनांचा प्रभाव इथे दिसतो.
मंदिराच्या भिंतीवरचे कोरीव काम विविध मूर्ती, प्रवेशद्वारावरील मैथुन शिल्पे व देवदेवतांच्या कोरीव मूर्ती, शिवपूजेचा देखावा, नृत्य शिल्पे, नक्षीकाम अत्यंत सुंदर आहे. यातील समुद्रमंथनाचा देखावा तर अवश्य पाहावा असाच आहे.
मंदिरात प्रकाश येण्यासाठी जागोजागी दगडी जाळय़ांची रचना केलेली आहे. मंदिराच्या मागच्या प्रवेशद्वारातून आत जाताच वर छताकडे पाहिले असता तिथे उलटे वीरगळ रचलेले आहेत. मंदीराच्या बाहेरील वीरगळांची येथल्या पावसामुळे खूपच हानी झालेली आहे पण आतले वीरगळ अगदी उत्तम स्थितीत आहेत. अर्थात हे पाहण्याकरीता झोपून वर विजेरीचा झोत मारावा लागतो नाहीतर अंधारामुळे ते दिसत नाहीत.
नंतरच्या काळात जोडला गेलेला स्तंभ
मंदिरावरील नक्षीकाम अतुलनीय असले तरी, मंदिरामध्ये एक त्रुटी आहे. ती म्हणजे पूर्वेच्या प्रवेशद्वाराच्या दर्शनी बाजूने तीन स्तंभ दिसतात. खरंतर निरखून पाहिल्यावर दिसेल की, मधला जो स्तंभ आहे त्याच्यावर असणाऱ्या कमानीला तडा गेलेला आहे. त्यामुळेच नंतरच्या काळात हा तिसरा स्तंभ जोडला गेला असावा. तिसरा स्तंभ नसता तर, निश्चितच मंदिराची दुरावस्था झाली असती.
मंदिराच्या आवारात एक गधेगाळ असुन त्यावरील शिलालेख पूर्णपणे झिजल्याने वाचता येत नाही मात्र हा शिलालेख अमृतेश्वर मंदिराला दिलेल्या दानाबद्दलचा असावा व हे दान मान्य न करणाऱ्यास शापवाणी कोरलेली असावी. पेशवेकाळात या मंदिरासंबधी उल्लेख आढळतो तो असा:-श्री महादेव रतनगडी किल्ल्याखाली आहे, त्यास बालाजी कराळे यांनी किल्ले रतनगड समयी नवस केला, त्याप्रमाणे रतनगड देविले सदरहून सामान श्रीच्या गुरवाजवळ देऊन नित्य नैवेद्य व नंदादीप ताकीद करुन चालविणे म्हणून मोरो महादेव यास सनद दिली.
काही शतकापुर्वी पुर्वी दगडा मध्ये बांधलेले नानाविविध कोरीव कामाच्या शिल्पाने नटलेले हे अम्रतेश्वर मंदिर पाहुन मन प्रसन्न होते. हजारो वर्षापूर्वी केलेल्या मंदिरावरचे कोरीव शिल्प अवर्नणीय...त्याला तर तोडच नाही. मंदिराच्या स्थापत्याने आपल्यातील फोटोग्राफरने हाक दिली जाते आणि मग आम्ही वेग-वेगळ्या कोनात(अँगलने)मंदिर अणि त्याच्या आजुबाजुच्या निसर्गाला कॅमेर्यात मनसोक्त टिपावा.
पुष्करणी :-
मंदिराच्या जवळ चौरस बांधणीची व पायऱ्यांची पुष्करणी आहे. अमृतेश्वराची ही पुष्करणी तब्बल वीस फूट लांब-रुंद जमिनीलगत असुन कोरीव, आखीव-रेखीव अशी तिची रचना आहे. एका बाजूने आत उतरण्यासाठी पायऱ्या असुन आत फिरण्यासाठी धक्के ठेवलेले आहेत. सभोवतीच्या भिंतीत नक्षीदार १२ देवळ्या असून त्यात गदाधारी, चक्रधारी व शेषधारी अशा भगवान विष्णूच्या मूर्ती आहेत. त्यांच्या डोईवर पुन्हा छोटय़ा-छोटय़ा कोरीव शिखरांची रचना केलेली आहे. या देवळ्यात गणेशाची एक मूर्ती सोडल्यास सर्व ठिकाणी विष्णूचे अवतार दाखवले आहेत. ही जलवास्तू जेवढी देखणी, तितक्याच नितळ पाण्याचीही तिला साथ मिळालेली आहे.
जलकुंड
पुष्करणी समोरील श्री गणेश आणि भगवान विष्णु यांच्या मुर्त्या.--->>>
स्थानिक लोक या पुष्करणीला विष्णूतीर्थ म्हणतात आणि समुद्रमंथनाच्या चौदा रत्नातून हे मंदिर आणि तीर्थ तयार झाल्याची कथा ऐकवतात. रतनगडावर प्रवरा नदीचा उगम होउन ती या तीर्थात प्रगट होउन पुढे जाते अशी श्रध्दा आहे. कदाचित हि पुष्करणी खोदून त्यातून निघालेल्या दगडातून मंदिराची उभारणी केली आहे.अर्थात हे मंदिर किंवा पुष्करणी यांचे शिल्पकार किंवा अर्थसहाय्य करणारे दाते अज्ञात आहेत.
मंदिर व पुष्करणी डोळसपणे पहायला हाताशी कमीतकमी दोन तासाचा अवधी असायला हवा. अमृतेश्वराच्या मंदिराशी साधर्म्य साधणारे एक मंदिर नाणेमावळ प्रांतात आढळून येते. किल्ले चावंडजवळील कुकडी नदीच्या उगमापाशी असणारे कुकडेश्वर मंदिर व किल्ले चावंडवरील पुष्करणी हेदेखील समकालीन असावेत.
रतनगडाच्या माथ्याचा नकाशा
रतनगडाकडे :-
पुष्कर्णी पाहून गावातील लोकांना गडावर जाण्याचा मार्ग विचारून आपण आपली वाट धरायची. अर्थात आधी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या न चुकता भरुन घ्यायच्या.कारण रतनवाडी ते गडमाथा या वाटचालीत फक्त एकाच ठिकाणी पिण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे.
रतनगडाकडे जाताना
रतनगड मुख्य रस्त्यापासून बराच आत डोंगररांगेच्या आड असलेमुळे तो लवकर ओळखू येत नाही, त्यामुळे रस्ता बरोबर विचारावा.
वाटेत दिसणारे तळे
प्रवरा नदी पात्राला डाव्या हाताला ठेवत छोट्या बंधाऱ्या पासून प्रवास सुरु करायचा.जाताना रस्त्यात एका ठिकाणी मोठं तळं दिसते. प्रवरानदीच्यापात्राच पाणी साठून हे तळ निर्माण झालेलं आहे. तळ्याच्या पाण्यामध्ये ठीक ठिकाणी वाहून आलेली झाड दिसतात.
प्रवरा नदीचा प्रवाह
पावसाळा संपल्यानंतरचा काळ असल्यास नदीचा प्रवाह पूर्णपणे आटलेला असतो. परंतु या ठिकाणी पावसाळ्यात नदीचा प्रवाह धोकादायक असतो. नदी पात्रातून जाणारी वाट संपल्यावर अचानक चढण असणारे डोंगर सुरु होतात. घनदाट झाडीतून, प्रवरा नदीच्या उगमाकाठून मार्ग काढत, आदिवासी लोकांचे जीवनमान बघत गडाच्या मुख्य पायथ्याला येऊन पोचतो.
प्रवरा नदीचे पात्र, पावसाळ्यात हेच ओलांडणे प्रसंगी धोकादायक असते
पायवाट तशी मळलेली आहे त्यामुळे रस्ता सापडतो परंतु तरी सोबत वाटाड्या असेल तर मार्ग चुकण्याची भीती कमी होते. इथून वर पहिले तरी तुम्हाला गडाचे मुख्य शिखर दिसणार नाही एवढी याची उंची आहे. सुरवातीला नदीच्या बाजूने जाणारी वाट सोडली तर पुढे अगदी राजमार्ग..
प्
रतनगडाकडे वाटचाल
गडावर चढणारी वाट
अशीच वाट वासोटयाला जाताना आहे.. वाटेत जागोजागी दिशादर्शक बाण आढळतात..त्यामुळे हरवलात तर तुमचीच चुकी वा निष्काळजीपणा समजा.. एकदा चढाई सुरु झाली की दम काढणारे जेमतेम दोन तीन चढ आहेत. धापा टाकत आपण गडाच्या पहिल्या पठारावर येऊन पोहचतो, क्षणभर विश्रांती. घ्यायचॉ. इथून आतापर्यंतची केलेली चढाई लक्षात येते..इथून प्रवरा नदी व आजूबाजूचा परिसर दिसतो.
साम्रद - पाचनई वाटेवरुन दिसणारा रतनगड
२ तासांच्या जंगलातील पायपीटीनंतर आपण एका फाट्यावर येऊन थांबतो. थोड्याच वेळात वाट एका चौकात येऊन थबकते,चौक म्हणजे दहा - बारा जण सहज मुक्काम करतील अशी जागा आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी जाताना आपण एका माहिती फलकपाशी येऊन पोचतो,इथे रतनवाडीतून रतनगडाकडे चढणार्या पायवाटेला साम्रद -पाचनई हा इंग्रजांनी बनवलेली पायवाट आडवी जाते. याच पायवाटेवर कुमशेत गावाजवळ इंग्रजकालीन बांधकामाची अजून एक खुण शाबुत आहे, तो म्हणजे मैलाचा दगड.या दगडावर इंग्रजीत लिहिलंय ‘Samrad 12 | Pachnai 6’.
आपल्या वाटेला हि वाट छेदते. डावीकडे जाणारी वाट ही कात्राबाई खिंडीकडे जाते तर उजवीकडील वाट साम्रदकडे आणि सरळ वर चढणारी वाट अर्थातच गडमाथ्याकडे.
साम्रद- पाचनई मार्गावरील आणि रतनगडाच्या चढाई दरम्यान लागणारा पाण्याचा एकमेव स्त्रोत
या वाटेने डाव्या हाताला थोडे अंतर गेल्यावर पिण्यायोग्य पाण्याचे टाके लागते.पुर्ण वाटचालीत हाच एक पाण्याचा शाश्वत स्रोत असल्यामुळे इथे पिण्याचे पाणी मनसोक्त प्यायचे व न चुकता भरुनही घ्यायचे.कारण पुढे गडमाथ्यापर्यंत जाईपर्यंत पाणी नाही.येथून सरळ उजव्या बाजूने जाणाऱ्या गडाच्या दुसऱ्या व खड्या रस्त्याने जंगलातून वाट काढत आपण जायचे.
गडाच्या निम्म्या उंचीवर पोहचल्यावर दिसणारा भंडारदरा जलाशय
चढाईचा तिसरा आणि अंतिम टप्पा
भर दिवसा आतमध्ये काळोख व अंगातून घाम निघेल अशी चढाई, यातून आपण दुसऱ्या पठारावर येतो, जेंव्हा दुसऱ्या पठारावर बाहेर येतो तेंव्हा समोरचे दृश्य पाहून मन भारावून जाते, आपल्या समोर उभा असतो तो रांगडा रतनगडाचा तिसरा टप्पा ! या वाटेने जंगलातून अर्धा तास चालत आपण पहिल्या शिडीजवळ येऊन पोहोचतो.जंगलातून मार्ग असल्याने थोडी सतर्कता आणि काळजी नक्की घ्यायला पाहिजे.
येथुन पुढे दोन लो़खंडी शिड्या लागतात.फार काळजीपुर्वकरीत्या एका वेळी एकच जण शिडी चढु शकतो.कारण चढताना शिडी हालते. दुसर्या शिडीच्या वेळी पायर्यानी (खडकामध्ये कोरलेल्या)जायचा पर्याय सुद्धा आहे.ह्या शिड्या लावण्यापुर्वी या मार्गाने लोक कसे येत असतील असा विचार मनाला शिवुन जातो.
अंतिम टप्प्यातील लोखंडी शिड्या, रतनगड
वाटेत दिसणारा खुटा सुळका
जुन्या आणि हलणारी पहिली शिडी
त्याजागी बसवलेली नवीन शिडी
इथे जवळपास पंधरा मीटर उंचीचा कडा दिसतो. इथल्या पहिल्या टप्प्यातील पायर्या बहुधा ब्रिटीशांनी तोडल्या असाव्यात.मात्र काळजीचे कारण नाही.कारण आपण दुर्गप्रेमीचीं काळजी वाटून मायबाप सरकारने इथे शिडी बसवली होती.अर्थात वर्षानुवर्ष ती वापरुन आणि उन्हा,पावसामुळे गंजुन हि शिडी धोकादायक झाली होती.आता मात्र याच शिडीवर नवी शिडी बसवली आहे.
पुर्वी इथेच बसवलेली शिडी तिच्या दुरावस्थेमुळे ट्रेकर्सलोकांमध्ये खूप प्रसिद्ध होती.. त्या शिडीमुळे म्हणे थ्रिलींग अनुभव घेता येत होता.. खासकरुन भर पावसात.. ! आता मात्र त्या जुन्या शिडीवरच नव्याने लोखंडी शिडी बसवलेली आहे.. मार्ग अगदी सुकर करुन ठेवला आहे..
तसेच ही शिडी चढून झाली लगेच दुसरी शिडी डोंगराच्या अरुंद घळीत बसवलेली आहे.याच शिडी शेजारी जुना कातळकोरीव पायर्यांचा मार्ग दिसतो. ज्यांना हौस आहे त्यांनी प्राचीन कोरलेल्या दगडी पायर्यांचाच वापर करायला हरकत नाही. तेवढेच थ्रिल !पहिल्या दोन शिड्या चढताना आपल्याला घाम फुटतो,
यानंतर समोर पहिला दरवाजा दिसतो.या दरवाज्याची वाट म्हणजे अरुंद घळ आहे.इथेही जपून चढायचे. त्यात पावसाळ्याचे दिवस असतील तर पावसामूळे शेवाळ आलेले असते त्यामुळे या वाटेवर प्रत्येक पाऊल काळजीनेच टाकावे...!!
रतनगडाचा पहिला गणेश दरवाजा
गणेश दरवाजावरील गणेशाच शिल्प
गणेश दरवाज्यातून दिसणारी कळसुबाइ रांग
ह्या शिडीने वा पायर्यांनी वरती आलो की समोरच गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ आपण येऊन पोहोचतो, त्याचं नाव गणेश दरवाजा! दरवाज्याच्या माथ्यावर भैरवनाथाची मूर्ती आणि डावीकडे कातळात कोरलेली श्री गणेशाची मूर्ती. दरवाजातून पुढे गेल्यावर आपल्याला हनुमान दरवाजा लागतो पण पहिले तिकडे न जाता आपण उजव्या हाताला जाणाऱ्या रस्त्याने गुहेकडे यायचे..
गणेश दरवाज्यातून शिडी चढून रत्नाबाईच्या गुहेकडे
इथून पुढे आलो की एका कडयाला रेलिंग लावले आहेत.. नि अगदी सहज चढून जाउ शकतो तिथेही अगदी दोन छोटया लोखंडी शिडया बसवलेल्या आहेत.. या शिडयांमुळे आता पर्यटक पण जरा थोडा घाम गाळून वरती आले तर सहज चढून जातील अशी सोय करण्यात आली आहे.
रत्नाबाईच्या गुहेकडे जाणारी वाट
.शिडया पार करुन वरती आलो की एक वाट उजवीकडे हनुमान दरवाज्याकडे वळते तर दुसरी डावीकडे गुहेकडे जाते..
रतनदेवीचे मंदिर......
यातील पहिली गुहा आपल्याला लागते ती म्हणजे रत्नादेवीच मंदिर होय. ही १५ फूट लांब आहे.याच गुहेच्या रत्नादेवीची शेंदुर लावलेली पाषाणमुर्ती अर्थात तांदळा आहे.. नि बाजूलाच अगदी छोटया आकारात श्रीगणेशांची देखील पाषाण-मुर्ती आहे.. कात्राबाई, रत्नादेवी आणि कळसुबाई या तीन बहिणी होत्या आणि पुढे त्यांचीच नावे या पर्वत शिखरांना देण्यात आली, अशी आख्यायिका इथे सांगितली जाते. या गुहेत देखील ६-७ लोकांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते. दुसरी गुहा तुलनेने मोठी (साधारण ३० फूट) आहे. या गुहेला लोखंडी ग्रीलचा दरवाजा बसवला आहे. राहण्यासाठी अतिशय सुरक्षित अशी ही जागा आहे.
या परिसरात माकडांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे.आणि मानवी वावराला ती सरावली आहेत.त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहाणे उत्तम.इथे सॅक या माकडांच्या हाती लागणार नाही याची काळजी घ्यावी.गुहेत सॅक ठेवून गडभ्रमंतीला बाहेर पडायचे असेल तर गुहेच्या लोखंडी ग्रीलला न विसरता कुलुप लावावे. अन्यथा आपल्या सॅकची माकडांनी चेन उघडून तपासणी केलीच म्हणून समजावे. दोन्ही गुहा पाउलवाटेच्या डाव्या बाजूस कातळामध्ये खोदलेल्या.. तर उजव्या बाजूस भला मोठा निसर्गाचा मोकळा पट...मग गुहेतच बसून निसर्गाची चलचित्रे न्याहाळत बसायचे... किती मस्त जागा..!
दोन्ही गुहांच्या समोरीला कडयावर रेलिंग बसवले आहेत नि चक्क सौरउर्जेवर चालणारे दिव्याचे थांब.. ! अर्थात हे दिवे सोय म्हणून बसविले असले तरी दिव्याच्या प्रकाशामुळे गुहेच्या तोंडाशीच बसून रात्री आकाशातील तारकांचा खेळ मात्र दिसत नाही.गुहा तशा आकाराने मोठ्या आहेत व तिथे वस्ती करण्यास योग्य जागा आहे. पण लोकांच्या वाढत्या गर्दीमुळे तिथे कचऱ्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
आता या पायपीटीनंतर तहान लागणे साहजिकच आहे आणि आपल्या मावळ्यांना, लेकरांना सह्याद्री तहानलेलं कसं ठेवेल? पुढे आपल्याला एक प्रशस्त गुहा लागते हीच ती राहण्याची गुहा अथवा वस्तीची गुहा होय. समोरच कातळकोरीव थंड पाण्याचं टाकं आपल्याला लागत. टाक्यातील पाणी पिऊन जणू काही असं वाटत की सह्याद्री माझी पोटच्या लेकरसारखीच काळजी घेतंय.आधी इथे खाण्यासाठी काही मिळत नव्हते, पण एका गावकर्याने (नाथु) ह्या गुहेतच एका कोनाडयात खाण्या-पिण्याची सोय केली आहे..मग मॅगी-चहा-भजी अगदी पिठला भाकरसुद्धा मिळू शकेल..इथे जवळच पाण्याचे टाकेही असल्याने इथुनच प्रवरा नदीचा उगम झाल्याचे म्हटले जाते.
हनुमान दरवाजा
आता पुन्हा मागे येऊन हनुमान दरवाजातून आत जायचे.तिसरी शिडी चढून आपण हनुमान दरवाज्यापाशी पोहचतो दरवाजाचा वरील नक्षीकाम आणि मूर्तिकाम इतिहास अभ्यासकांसाठी उपयुक्त असे आहे.गुहेच्या रांगेतच थोडा वरती पण अगदी जवळ हा दरवाजा लागतो.. इथेही बाहेरून हनुमान आणि बाजूस रिद्धी सिद्धी असलेला गणपती यांची शिल्पे आहेत... तर आतल्या बाजूने अजुन दोन शिल्पे आहेत, गरुड देवता, मस्त्य शिल्प.
रतनगडाच्या हनुमान दरवाज्यावर असलेली द्वारशिल्प
एखाद्या दुर्गाच्या दरवाज्यावरची द्वारशिल्प हा एक अभ्यासाचा विषय आहे. इथे आपल्याला एक पुर्ण वेगळेच शिल्प दिसते, असे शिल्प किमान महाराष्ट्रातील अन्य गडाच्या दरवाज्यावर पहाण्यात नाही. बहुतेकदा शरभ, गंडभेरुंड, गणपती, मारुती अशी शिल्प आपल्याला गडाच्या दरवाज्याच्या रक्षक देवता म्हणून दिसतात.इथे मात्र वरचे शरीर मानवी तर खालचे अर्धे शरीर मस्य असे आगळेच शिल्प दिसते.त्याचा नेमका अर्थ समजत नाही. इथेच असे शिल्प का कोरले असावे ? असा मनात प्रश्न घोळवतच पुढच्या गडफेरीला निघायचे.हे शिल्प मत्स्यावतारातील विष्णूचे असावे असा अंदाज आहे. पायथ्याशी असलेल्या पुष्करणीतील विष्णुमुर्ती आणि इथे महाद्वारावरची पहिल्या अवतारातील विष्णुमुर्ती यांचा काही परस्पर संबध असावा का ?
कडेलोट पॉईंट आणि त्यापुढे लांबवर असणारा आजोबागड
हा दरवाजा ओलांडला की तुम्ही खर्या अर्थाने रतनगडाच्या माथ्यावर येता.ह्या दरवाज्यातून उजवीकडे जाण्याएवजी डावीकडच्या वाटेने खाली उतरलो की तिथे कडेलोट करण्याजोगी जागा आहे..इथे फिरताना पायाखाली बघाणे आवश्यक आहे. भिती साप/विंचू यांची तसेच लोकांनी वाटेतच करुन ठेवलेल्या घाणीची वाटते.कडेलोट पॉइंटपासून आजोबा डोंगर दिसतो. या ठिकाणावरून खाली लांबच लांब खोल दरी दिसते. येथील दरी पाहून नेहमी ट्रेक करणाऱ्यांच्याही मनात धडकी भरावी अशी या दरीची खोली आहे. त्यातच तेथे वेगाने वाहणारा वारा अतिशय भयंकर भासतो.
दरवाज्यातून वरती आलो की समोरच अवाढव्या रांगडा पहाड नजरेस पडतो, याचे नाव करंडा.. नि त्याला लागूनच कात्राबाईची सराळसोट कडा असणारी डोंगररांग.. नि शेवटाला ह्यांच्यामध्ये मीच सर्वात उंच म्हणत अभिमानाने उभा असणारा आज्या पर्वत..म्हणजेच आजोबा !आज्जा पर्वताचे कडे बघितल्यावर कोंकणकड्याची आठवण झाली. हे आपण इथेच अनुभवू शकतो. आजोबा शिखर अन् थोडं त्याच्या खाली सीतेचा पाळणा.पश्चिमेकडील हा पर्वतांचा नजारा बघताना सहाजिकच ओठावर महाराष्ट्र गीताच्या ओळी येतात." राकट देशा,कणखर देशा ,दगडांच्या देशा " हे असे का म्हणत असतील याची प्रचिती क्षणा-क्षणाला येत असते. सह्याद्रीच्या परिसरातून काही मोजक्या ठिकाणावरुन अफाट दृष्य दिसते, त्यात या जागेचा समावेश करावाच लागेल. याच ठिकाणावरून अग्नेयाला आडवातिडवा पसरलेला घनचक्करचा पहाड व त्याला जोडून पाबरगड दिसते.
रतनगडावरुन दिसणारा सह्याद्री
अगदी जवळ रतनगडाच्या कड्याला चिकटलेला अग्निबाण सुळका दिसतो. साम्रद ते हरिश्चंद्रगड या वाटेने कुमशेतकडे जाताना या सुळक्याचे अगदी पायथ्याकडून दर्शन होते.
राणीचा हुडा (कोट)
हा परिसर बघून गडाच्या पश्चिमेकडून उत्तर टोकाकडे निघायचे. इथे आपल्याला एक सुटा टेहळणीचा भग्नावस्थेतील मनोऱ्यासारखा गोल बुरुज दिसतो. इतिहास अभ्यासक असाल अथवा जिज्ञासू भटके असाल तर या बुरुजविषयी नक्की प्रश्न मनात येतो.वास्तविक बहुतेक वेळा बुरुज तटाबंदीच्या माळेत गुंफले असतात.पण काहीवेळा लांबवर नजर ठेवण्यासाठी जमीनीलगतच्या किल्ल्यावर मधोमध असे सुटे बुरुज बघायला मिळतात.उदा. नळादुर्ग, सिंधुदुर्ग, देवगड, पण इथे हा असा बुरुज का उभारला आहे याचे कोडे वाटते. कारण हा बुरुज एका बाजूला नसून मध्यवर्ती ठिकाणी आहे, कदाचित या बुरुजाचा उपयोग गडाखाली नव्हे तर गडावरच टेहाळणी साठी करत असतील असे वाटते.एकंदरीत रतनगड मनात असे अनेक प्रश्न निर्माण करतो हेच खरे. यालाच राणीचा हुडा म्हणून ओळखले जाते.वास्तविक असे नाव पडण्यामागे कदाचित याची कलात्मक बांधणी कारणीभुत असाची. नुसतेच कोरडे लष्करी स्थापत्य न करता याला नक्षीकामही केलेले दिसते.अलिकडे या राणीच्या हुडाजवळ तर कचरा पडलेला दिसतो.येथे वाड्याचे अथवा सदरेचे अवशेष दिसतात. राणीच्या हुडाच्या अगदी मागे एक छोटे पाण्याचे टाके लागते.. परंतु यातील पाणी पिण्यायोग्य नक्कीच नाहीये.
रतनगडावरील तळे
थंडगार पाण्याचे टाके..
पिण्यास योग्य अश्या पाण्याच्या टाक्यासाठी अजून थोडे पुढे गेले की तीन खोदलेल्या पाण्याच्या टाक्या लागतात.. त्यात सर्वात वरच्या टाकीतले पाणी पिण्यास योग्य आहे. इथे एका टाक्यात नंदी आणि शिवलींग पहायला मिळते. या भागातील गडाची तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक आहे.गडाच्या रतनवाडीकडील भागात गडावरील सर्वाधिक अवशेष आहेत.
हि टाकी,बुरुज आणि तटबंदी पाहून १० मिनिटे चालल्यावर डावीकडील बाजूस साम्रद गावाकडील कोकण दरवाजा लागतो,
कोकण दरवाजा
दरवाजा उध्वस्त स्थितीत आहे, येथून उतरणारी वाट मात्र मोडकळीस आलेली आहे. या वाटेने उतरणे धोकादायक आहे. इंग्राजांनी याचा उतरण्याचा मार्ग सुरुंग लावून उध्वस्त केला आहे.त्याचा प्रवेशमार्ग दगडधोंड्यानी बुजलेला दिसतो.
येथून पुढे गेल्यावर दोन विस्तीर्ण टाके लागतात. या टाक्यावर एका ठिकाणी शिवलिंग कोरलेले आहे. याच्या पुढे आपल्याला एक वेगळीच रचना दिसून येते.
येथे जमिनीला समांतर असे एक टाके असुन या टाक्याच्या आत शिरण्यासाठी एक छोटासा दरवाजा आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर आत दगडात कोरलेल्या दोन मोठया खोल्या आहेत. यातील एक खोली अर्धवट खोदलेली असुन दुसरी खोली २०x३० आकाराची आहे पण या खोलीत पाणी साठलेले आहे. या टाक्याच्या दुसर्या बाजुस चर खोदलेला असुन चराच्या सुरवातीच्या तोंडास दरवाज्यासारखे बांधकाम आहे. काही लोकांच्या मते येथे तळघर किंवा भुयार असावे.
सप्तमातृका टाक्या
पुढे आणखी थोडे गेल्यावर अनेक टाक्यांची रांगची रांग आढळते. या टाक्या पाण्याने भरलेल्या आहेत.त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.एवढ्या उंचीवर पाणी पाहुन अचंबा वाटतो.शेवटी काय निसर्गाची करणी ! ए़कंदरीत एकाच जागी कोरलेली टाकी, पुष्करणी, मंदिराची रचना यातील साम्य पहाता या परिसरातील अलंग, कुलंग, हरिश्चंद्रगड, चावंड हे सर्व गड समकालीन असावेत.
हि टाकी पाहून पायवाटेने जात असताना एकाबाजुला खुप खोल दर्या दिसतात. (त्या दर्यांमध्येच निसर्गनवल सांदण दरी आहे. अर्थात सांदन दरी लक्षात आली नाही तरी त्याचा परिसर ध्यानात येतो.) इथेच दरीत बाण सुळक्याचे रौद्र दर्शन होते.
सोनकीची फुले आणि रतनगड
पावसाळ्यात किंवा पावसाळा संपल्यावर इथे आलो असलो तर येथुन पुढे उंच वाढलेल्या गवतातुन जावे लागते.पुढे तर गवताची उंची पाच फुटापेक्षा जास्त असु शकते. अर्थात पाउस सरता सरता रतनगडावर आलो तर पावसाळी फुलांनी फुललेल्या रतनगडावर विवीध रंगी फुलांनी साजरी केलेली रंगपंचमी बघायला मिळते.सोनकीची पिवळी फुले, तेरड्याचा गुलाबी नखरा आणी दर सात वर्षांनी फुलणारी जांभळ्या रंगाची कारवी याने अवघा परिसर निसर्ग सौंदर्य मुक्तहस्ते उधळत असतो.
नेढे (अर्थात वातखिडकी ), रतनगड
आता आपण जाउया गडावरील एका निसर्गनवलाकडे, ज्याने खालपासूनच आपली उत्सुकता ताणून धरलेली असते, ते म्हणजे नेढे !गडाच्या कातळभिंतीला आरपार मोठे छिद्र(भगदाड) पडलेले दिसते.यालाच नेढ म्हणतात. हवा,पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्या माऱ्याने दगड एका कमकुवत ठिकाणी नैसर्गिकरित्या झिजतो आणि अखंड दगडात सुईच्या छिद्राप्रमाणे भासणारे असे नेढे तयार करतो. हे नेढे इतके मोठे आहे की रतनवाडीतून येताना सुद्धा याचे पुसटशे दर्शन होते.
गडाच्या उत्तर टोकाजवळ असलेली कातळ भिंत आहे, त्याची चढण खुप कठीण आणि दमछाक करणारी आहे. याच रस्त्याने चढाई करून वर गेले कि आपण नैसर्गिक रित्या तयार झालेल्या नेढया जवळ येऊन पोचतो यातून थंड हवा वाहत असते, धुक्याच्या वेळेस येथील अनुभव खूप मजेशीर येतो. नेढ्यातून कोंकणातला आणि घाटावरचा नजारा भन्नाटच! हे नेढ म्हणजे निसर्गाचा आविष्कारच. दहा - बारा जण सहज बसतील अशी नैसर्गिक वातानुकूलित जागा म्हणजे भारीच,राजगडाच्या नेढ्याची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही. हे नेढे राजगडच्या नेढ्याएवढे मोठे नसले, तरीहि आकर्षक आहे. नेढ्यातून चहू बाजुंचा परिसर दिसतो. येथून अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई, आजोबा, हरिश्चंद्रगड, खुट्टा, माहुली हा सर्व परिसर दिसतो. या नेढ्याच्याही वर जाउन बसता येते. नेढे ओलांडून पुढच्या बाजूने डाव्या बाजूला खाली उतरावे,
नेढ्यातून खाली उतरल्यावर जाणारी रत्नुबाईच्या गुहेकडे उजवी दिशेन फुटणारी वाट
इथून आपल्याला दोन वाटा लागतात, डाव्या बाजूला खुट्याखालचा दरवाजा आहे तर उजव्या बाजूचा मार्ग गुहेतील मंदिराकडे जातो. नेढ्याच्या दुसर्या बाजुने उतरल्यावर अर्ध्या तासावरच प्रवरा नदीचे उगमस्थान आहे.प्रथम आपण डाव्या बाजूच्या खुट्याखालच्या दरवाजाकडे जावे.
खिंडीत जाणाऱ्या पायऱ्या आणि त्यांना वेढून असलेली हिरवाई
रतनगडाला चिकटून असणारा खुटा सुळका व पार्श्वभुमीवर असणारी कळसुबाई रांग
इथे माचीसारखी सपाटी असून समोरच रतनगडाच्या मुख्य डोंगराला खेटून उभा असणारा खुटा सुळका आपले रौद्र रुप दाखवतो. या माचीवर उध्वस्त मंदिर असुन घराचे काही अवशेष आढळतात. या माचीवरुन एक दरवाजा खाली उतरतो. या दरवाज्याला म्हणतात 'त्रिंबक दरवाजा'.हा महादरवाजा गोमुखी म्हणजे वळून उतरताना दिसतो. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाची रचना थेट "जीवधन" च्या दरवाजाची आठवण करून देणारी आहे.इथे दरवाज्याची दुक्कल आहे.
पहिला दरवाजा
महादरवाजा ( त्रिंबक दरवाजा )
दरवाज्यातून खाली उतरल्यावर नेहमीच्या देवडया नि मोठी भिंत लागते..
जिच्यामधूनच बाहेर पडण्यास दरवाजा लागतो व पुढे उतरण्यासाठी मोठया उंचीच्या
दगडात कोरलेल्या पायर्या.. बहुतांशी तुटलेल्या अवस्थेत आहेत..
ब्रिटीशांची अवकृपा असावी बहुदा..
या दरवाजातून खिंडीत जाणाऱ्या खोल खोदीव पायऱ्या सुंदर आणि भीषण दिसतात. ३० ते ४० कातळात कोरलेल्या पायर्याही आहेत. संपूर्ण दरवाजा कातळात कोरलेला आहे. त्र्यंबक दरवाज्यात पोहोचलो तेव्हा अशा अवघड जागेतून वाट असेल याची कल्पनाच करवत नाही. उतरताना काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. अक्खा दगड चिरून बनवलेल्या या पायऱ्या म्हणजे खरच डोकं सुन्न व्हायला होतं. अप्रतिम ! वास्तविक रतनगडाच्या कड्याला बाहेरुन वाट खोदायच्या एवजी आतून अशी कातळकोरीव वाट कोरण्याचे सुचले त्या कारागिराचे कौतुक वाटते. किल्ल्यावरील सगळ्यात भयानक वाटणारा हा रस्ता आहे कारण काळ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या, खाली खोल दरी, आणि पावसाळ्यात पायर्यावर्ती शेवाळ वाढलेमूळे निसरड्या झालेल्या पायऱ्या. सर्व काही बांधकाम अचंबित करण्यासारखं. आता इथे सध्या रेलिंग लावले आहे पण पूर्वीच्या वेळेस मावळे कसे येत असतील हि नुसती कल्पनाच केलेली बरी.
त्रिंबक दरवाजापासून खाली गेल्यावर रतनगडाच्या कातळकड्याला लगटून जाणारी पायवाट
दरवज्यातुन उतरताना समोर खोलवर दरी आणि बाण सुळक्याचे राकट दृष्य
दिसत असते. यानंतर वाट रतनगडाच्या कातळकड्याला लगटून जाते. दगडांवरची कसरत
करुन ,ट्रॅव्हर्स पार करून खुट्याच्या खिंडीत आलो कि इथून डाव्या बाजूला
साम्रदची वाट अन् उजवी रतनवाडीकडे.
रतनगड आणि खुट्टा यांच्यामधील खिंड
ही वाट परत दाट झाडीत शिरते. या वाटेन
उतरण्यासाठी आपल्याला दोन पर्याय उपलब्ध असतात. साम्रद किंवा
रतनवाडी.आपल्या इच्छेने वाट निवडून पुढील मार्गक्रमणा करायची.
जर
तुम्ही मुक्कामाच्या हेतूने आले असाल तर पुन्हा त्या गुहेकडे जायचे आणि जर
तुमच्याकडे अंधार होण्यासाठी आणखी ३ तासांचा कालावधी असेल तर त्र्यंबक दरवाजाने खाली उतरून खुट्ट्या शेजारून जाणाऱ्या पुर्वेकडे जाणार्या पायवाटेने रतनवाडीत पोहोचू शकता आणि तिथूनच पश्चिमेकडे उतरणार्या वाटेने साम्रद गावात देखील पोहोचू शकता.गड
बघायला ३ तास पुरेसे होतात परंतु जर गडावर जाण्यासाठी रतनवाडीमध्ये तुम्ही
सकाळी ७ वाजेच्या आत आलात तर आरामात संध्याकाळी ४ वाजेपर्यंत गड बघून या
पूर्ण ट्रेक चा मनसोक्त आनंद घेऊ शकता. लॉंच साधारणतः ७ वाजता सुरू होतात
त्यामुळे जेवढे लवकर शक्य होईल तितका प्रयत्न करा. गडावर मुक्काम करू शकता
परंतु जर सुट्टीच्या काळात गेलात तर गर्दीमुळे जागेचा अभाव पडू शकतो.
ज्या
दुर्ग प्रेमींना रतनगडासोबत पाचनई मार्गे हरीशचंद्रगड करायचा असेल त्यांनी
साम्रद मार्गे त्र्यंबक दरवाजाने चढून शिडीच्या मार्गे रतनगड उतरून
कात्राबाई खिंडीकडे जाणाऱ्या मार्गे पाचनई गाठायची. रतनगड करून सांधण
व्हॅली देखील पाहू शकता.त्र्यंबक दरवाजाने रतनगड चढून शिडीच्या मार्गे
उतरून कात्राबाई खिंडीमार्गे पाचनई मध्ये कलाडगड अनुभवून पुढे हरिश्चंद्रगड
देखील करू शकता.
संदर्भ :- १) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स २) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे ३) दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर ४) किल्ले - गो. नी. दांडेकर ५) दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर ६) ट्रेक द सह्याद्रीज ७) सह्याद्री - स. आ. जोगळेकर ८) दुर्गकथा - निनाद बेडेकर ९) दुर्गवैभव - निनाद बेडेकर १०) इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर ११) महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर १२) www.trekshitiz.com हि वेबसाईट १३) www.durgbharari.in हि वेबसाईट १४) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर १५) आडवाटेवरचा महाराष्ट्र - प्र.के.घाणेकर १६) आव्हान - आनंद पाळंदे १७) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट १८) https://ratanwadi.blogspot.com/p/blog-page.html , https://trekventure.blogspot.com/2014/12/blog-post_5.html हे ब्लॉग
हुश्श...एकदाचे
पोहोचलो.पाठीवरचे गाठोड बाजुला टाकले आणि वारा खात बसलो. हेच ते गडाचे
आकर्षण...या कातळभिंतीला आरपार मोठे छिद्र(भगदाड) पडलेले दिसले.यालाच नेढ
म्हणतात.येथे आम्ही थोडा विसावा घेतला.
अमृतेश्वर मंदिर व मंदिरावरील शिल्पे
पुष्करणी व आजूबाजूला विखुरलेली शिल्पे
अमृतेश्वर मंदिर
फोटो गॅलरी
अमृतेश्वर मंदिर
उंची : ३७३० फुट
प्रचि १५: शिडी पे शिडी !
या टप्यात आलो नि आपले पुर्वज स्वागतासाठी हजर झाले...
प्रचि १९:
प्रचि२०:
प्रचि २१: दरवाजा आतल्याबाजूने.. नि गुहेकडे जाणारा रस्ता
नाशिक व नगर जिल्ह्याच्या सीमेवर एक डोंगररांग पसरली आहे. त्याच डोंगर-रांगेत महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणजे शैल कळसुबाई वसलेले आहे. तिच्या सभोवताली तेवढेच रुबाबदार व तोलामोलाचे मानकरी आहेत. त्यातलाच हा एक "रतनगड". एकीकडे घनदाट जंगल तर दुसरीकडे भंडारदऱ्याचा प्रचंड असा जलाशय यामध्ये रतनवाडी हे गाव आहे. या रतनवाडीत साधारणतः १२०० वर्षापूर्वीचे हेमाडपंथी अमृतेश्वराचे यादवकालीन सुंदर व विलोभनीय असे मंदिर आहे. मंदिराच्या जवळच सुंदर बांधलेली पुष्करणी आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट नमुना असलेले पुरातन अमृतेश्वर मंदिर रतनवाडी गावात आहे. हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे.
रतनवाडी गावातून एक जीप करून भंडारदरा आणि भंडारदरा वरून कसारा कडे जाणारी बस पकडून आम्ही आमच्या ट्रेकची सांगता केली. सार्वजनिक वाहनांतून फिरल्याने थोडा जास्त थकवा जाणवला. पण नेहमीच्या सुखदायी दिवसांपेक्षा एक दिवस खाजगी वाहने न वापरता ट्रेक करण्यात खरी मज्जा असते.
अमृतेश्वर मंदिर
फोटो गॅलरी
अमृतेश्वर मंदिर
या टप्यात आलो नि आपले पुर्वज स्वागतासाठी हजर झाले...
प्रचि १६:
प्रचि २१: दरवाजा आतल्याबाजूने.. नि गुहेकडे जाणारा रस्ता
रतनगड हा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील किल्ला आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची ३६०० फुट आहे.
कसे जाल ? गडावर जाण्यासाठी पायथ्याशी रतनवाडीला पोहचायला हवे. रतनवाडीस संगमनेरहुन अकोले-राजुर-भंडारदरामार्गे जाता येते.
इतिहास १७६३ साली हा किल्ला महादेव कोळी सरदार
जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच
विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही
सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी,
वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये
कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. १८२४ साली किल्लेदार गोविंदराव खाडे हे
महादेव कोळी शेवटचे किल्लेदार होते. पुढे इंग्रजांचा विरुद्ध उठावात
आदिवासी सेनानी राघोजी भांगरेनी गड ताब्यात घेतला.
किल्ल्याला गणेश, हनुमान, कोकण आणि त्र्यंबक हे चार प्रवेशद्वार आहेत किल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते डिसेंबर आहे.
भारतात मूर्तिपूजेची सुरुवात
कधीपासून झाली यामध्ये संशोधकांचे अनेक मतप्रवाह आहेत. मूर्ती पूजेचे
अस्तित्व फार प्राचीन काळापासून आहे .सिंधू संस्कृतीमधील अवशेषावरून
आपल्याला काल निश्चितीसाठी मदत होते. हडप्पा व मोहेंजोदडो मधील सापडलेले
अनेक अवशेष आपल्याला याची साक्ष देतात .मध्य एशियामधील पर्वतमय प्रदेशातील
सुमेरियन या संस्कृतीमध्ये मानव देहधारी देवतांचा उल्लेख मिळतो. ही
संस्कृती जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक मानली जाते. प्राचीन
मेसोपोटोमियातील संस्कृतीमध्येही पुरातत्त्व अवशेषावरून मूर्ती व शिल्पे
आदींचे निर्माण झाल्या विषयाची माहिती मिळते. ज्या धर्मामध्ये मूर्ती पूजेस
सुरुवात झाली, स्वाभाविकच आहे त्या अगोदरच मूर्ती शिल्प बनविण्याच्या
कलेचा विकास झाला असावा. मेसोपोटोमिया मध्ये इसवीसन पूर्व 15 शतकात मिश्र
लोकांनी त्यांच्या इष्टदेवतेची मूर्ती भव्यसमारंभात विधीपूर्वक आणली होती.
ही घटना मूर्ती पूजेच्या त्या काळापासून असलेल्या अस्तित्वाची जाणीव करून
देते. पतंजलीभाष्य, कौटिल्यांचे अर्थशास्त्र, महाभारत, आदिग्रंथामध्ये
मूर्ती शिल्पे ,मंदिरे याचा उल्लेख आढळतो. पाणिनी देखील आपल्या ग्रंथात
त्याचा उल्लेख करतात.
बौद्ध धर्मात लेणी निर्माणाची सुरुवात केली
गेली त्या काळात शैलाश्रये ही ध्यान साधनेसाठी वापरली जात असत. हीनयान
लेणीमध्ये स्तूपांची चैत्यगृहाची निर्मिती झाली ,पुढे महायानांनी मोठ्या
प्रमाणात लेण्यांमध्ये बुद्ध मूर्तीचे निर्माण केले. महाराष्ट्रात जवळपास
शेकडो च्या वर लेण्या आढळतात या लेण्या प्रामुख्याने बौद्ध ,जैन व हिंदू
आहेत. राष्ट्रकूटांच्या काळात कोरले गेलेले वेरूळ येथील कैलास लेणे हे
अप्रतिम मानले जाते. भारतात गुप्त काळात मूर्तिकलेचा अधिक विकास झाला
आपल्या देशात जवळपास सर्व धर्मात मूर्तिकलेला व शिल्पकलेला फार महत्त्व
दिले गेले व यामधून मूर्ती पूजनासही सुरुवात झाली. शिव उपासनेला भारतात
विशेष महत्त्व आहे. गुप्तकाळात मूर्तिकलेच्या दृष्टीने ठरलेला सुवर्णकाळ हा
शिवाच्या मानव रुपी मूर्ती निर्माणास पोषक ठरला अशा मूर्तींची संख्या कमीच
आहे पण लिंगमूर्ती ची संख्या अधिक निर्माण झाली. यामध्ये एकमुखी, बहुमुखी,
द्विमुखी, पंचमुखी, अष्टमुखी असे प्रकार आहेत पण गुप्तकाळात एकमुखी लिंग
अधिक निर्माण झालेले आढळते. जीवाला शिवाची प्राप्ती आणि प्रकृती व पुरुष या
प्रतीकांच्या रूपाने लिंग पूजेस प्रारंभ झाला. याचे आणखीही काही प्रकार
आहेत यामध्ये स्वयंभू लिंग की जे नैसर्गिक भूमी मधून निघालेले असते
.बाणलिंग काकडी किंवा अंड्याच्या आकाराचे असते व ते पवित्र नदी मधून
प्राप्त होते.
*छत्रभं त्रपुषाकारं कुक्कुं टाण्डनिभं तथा ।*
*अर्धेंन्दु सदृशं चाथ बुब्दुदाभं पंचमम्।।*
शिल्परत्नाच्या
उत्तर भागात, दुसऱ्या अध्यायात छत्राप्रमाणे, काकडी प्रमाणे, कोंबडीच्या
अंड्याप्रमाणे तसेच अर्धचंद्र सदृश्य आणि जल थेंबाप्रमाणे अशा पाच प्रकारचा
लिंगाचा वरचा भाग असतो असे म्हटले आहे. राजलिंग ,घटितलिंग मानुषलिंग ही
बसवून तयार केली जातात .याचा आकार मोठा असतो. राज लिंगामध्ये अगोदर
सांगितल्याप्रमाणे एक मुखी ,बहुमुखी असे प्रकार असतात घटित लिंगामध्येही
अष्ठेत्तर लिंग, सहस्रलिंग असेही प्रकार येतात.
नवव्या शतकापासून
ते तेराव्या शतकापर्यंत अनेक शिवमंदिरांचे निर्माण झाले. ओंकारेश्वर,
त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर यासारखी ज्योतिर्लिंगे तर आपण ओळखतोच. याशिवाय
महाराष्ट्राच्या अनेक भागात शिव मंदिरांचे निर्माण झाले मार्कंडेश्वर
,धुपेश्वर, माणकेश्वर, सिद्धेश्वर पाताळेश्वर ,हरिश्चंद्रेश्वर अमृतेश्वर
,असे अनेक मंदिरे सांगता येतील अशापैकीच एक अमृतेश्वर या शिवमंदिरास भेट
देण्याचा योग आला नावाप्रमाणेच निसर्गाच्या सौंदर्यातून सतत अमृत वर्षाव
होत रहावां असंच हे ठिकाण .अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात रतनवाडी या
ठिकाणी हे मंदिर आहे. महाराष्ट्राच्या गंगेत सामावणाऱ्या प्रवरेचा उगम याच
स्थानावरून होतो हेच ते शिवस्थळ आहे. प्राचीन मंदिराच्या पाठीमागे
पाठीराखा सारखा वाटणारा प्रचंड असा प्राचीन रतनगड आपल्याला दिसतो.
सानंददरी ,कळसुबाई, हरिश्चंद्रगड ,अलंग, मदन कुलंग ही सह्याद्रीची वैभव
संपदा याच अमृतेश्वराच्या परिसरात आहे. पुण्यावरून 200 तर मुंबईवरून 180
किलोमीटर अंतरावर हा अमृतेश्वर येतो .संगमनेर- अकोले -राजुर - भंडारदरा
मार्गे देखील पोहोचता येते. कळसुबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या भागात हे
मंदिर आहे. भंडारदरा धरणाच्या बॅक वॉटरवर येणाऱ्या या मंदिराचे सौंदर्य
अत्यंत मनमोहक आहे. भूमीज प्रकारातील नागरशैलीमधील सुमारे 1300
वर्षांपूर्वीच्या या काळ्या दगडात अप्रतिम नक्षीकाम असलेल्या प्राचीन
मंदिराचे निर्माण झाले आहे. मुख्य मंदिरावर शिखरी-शिखर प्रकारातील छोटी
छोटी शिखरे अगदी सूक्ष्म शिल्पकलेतून साकारलेली दिसतात. आमलकापर्यंत दोन्ही
बाजूने चौकोनाकार लता कोरलेल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच
खुलून दिसते. मंदिरासमोर नंदी मंडपात नंदी विराजमान आहे त्यासमोरच गाभारा
आहे. गाभाऱ्यातून पुढे सभामंडपात जाता येते. सभामंडपातील खांबावरील कोरीव
काम 1000 वर्षांपूर्वीच्या शिल्पकलेच्या सुवर्ण युगाची आठवण करून देते. या
सभा मंडपात आपण हरवून जातो. जणू काही पुन्हा त्या काळात गेलो की काय असा
भास होतो भूमिती- बीजगणिताच्या कसोटीच्याही पलीकडे असणाऱ्या भौमितिक रचना,
मूर्तिकाम, शिल्पपट ही आजच्या विज्ञान युगातील तंत्रज्ञानाला मागे टाकताना
दिसतात.
यक्ष ,भारवाहक, प्राणी, पक्षी, वेदिका, देव, दानव, अप्सरा,
सुरसुंदरी आदी शिल्प येथे कोरलेली आहेत. मंदिरावर काम शिल्पे देखील आहेत.
पुराणातील समुद्रमंथनाचा देखावा येथे शिल्पीत केला आहे. गर्भगृहाच्या वर
कीर्तीमुख, शंख व कमळ वेली आहेत बाहेरच्या भागातही कीर्ती मुख्य कोरलेली
आहेत .प्रकाश योजनेसाठी दगडी जाळ्या आहेत. गाभाऱ्यात शिवलिंग स्थापित आहे.
प्रत्येक प्राचीन मंदिराजवळ पाण्याची व्यवस्था म्हणून पुष्करणी अथवा
बारावाची व्यवस्था ही मंदिर स्थापत्यचा एक भाग असतो या ठिकाणी सुद्धा जवळच
20 फूट लांब-रुंद पुष्करणी आहे. यात चारही बाजूला देवकोष्टके आहेत.त्यात
गणेश व विष्णूची मूर्ती स्थापित केलेली दिसते. बारावातील पाणी हे
अमृतेश्वरासारखेच अमृतमय व नितळशार आहे. समुद्रमंथनातील प्राप्तरत्नांपैकी
एक अशी ही पुष्करणी असल्याची कथा सांगितली जाते. समुद्रमंथनातून
प्राप्तरत्नांपैकीच हा अमृतेश्वराचा निसर्गाचा परिसर आहे की काय असंच
वाटायला लागतं. येथून काढता पाय घ्यावा असं कधी मुळी वाटतच नाही. इथेच
अमृतेश्वराच्या कुशीत रमावं असंच वाटतं. पश्चिमेकडून रतनगड अडवतो त्याचा
अंगठा ही आनंदाचा संकेत देत इथेच थांबा असं म्हणतो. पूर्वेकडील निळाशार
भंडारदरा गारवा देत हेच म्हणतो की तुम्हीही एकदा या अमृतेश्वराच्या
दर्शनाचा लाभ घेऊन आपल्या अमृततुल्य जीवनात या अमृत रुपी निसर्गाचा आस्वाद
घ्या.
जगात कुठेही जा सह्याद्रीचं सौंदर्य तुम्ही अगदी सूक्ष्मपणे न्याहाळा असे सौंदर्य तुम्हाला कुठेच मिळणार नाही.
No comments:
Post a Comment