Monday, October 17, 2022

पळसंबे लेणी

गगनबावडा म्हणजे निसर्गदत्त सौंदर्याचं माहेरघर. याच तालुक्यातील हिरवाईने नटलेला परिसर म्हणजे पळसंबे येथील रामलिंग गुहा आणि मंदिर होय. पावसाळ्यात आकर्षक धबधबा, हिवाळ्यात धुके, उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण अशा तिन्ही ऋतूमध्ये निसर्गप्रेमींचे आवडते ठिकाण बनले आहे. कोल्हापूर शहरापासून ४२ किलोमीटरवर तसेच गगनबावडा मार्गावर पळसंबे हे गाव आहे. पांडवकालीन लेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामलिंगमधील अखंड शिळेमध्ये असलेले मंदिर वैशिष्टपूर्ण असून, गुहा गारवाही देते. 
    पळसंबे या गावापासुन दक्षिणेकडे तीन किलोमीटर ३ कि. मी. अंतरावर असणार हे ठिकाण आहे. एकीकडे मन उत्स्फुर्त करून टाकणारा रौद्र सह्याद्री आणि दुसरीकडे अंतर्मुख करून टाकणाऱ्या या लेण्यातील शांतता. सगळंच भिन्न तरी, मनाला भिडणारं. बाहेर थांबल्यानंतर या ठिकाणची कल्पनाही येत नाही. येथे केवळ हिरवीगार झाडे दिसतात. गावकऱ्यांनी मात्र या पर्यटनस्थळाला अद्याप व्यावसायिक रूप दिलेले नाही, हे विशेष. धार्मिक परंपरा असलेल्या या ठिकाणी एकतर शालेय सहली किंवा कौटुंबिक सहलीच भेट देत असतात. मंदिराकडे जाण्यासाठी आता दगडी फरशा लावून वाट केली आहे. पण कोणताही कृत्रिमपणा येथे येणार नाही, याचीही दक्षता घेतली आहे. पावसाळ्यात सह्याद्रीच्या रांगातून कोसळणारे अनेक धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची पावले वळतात. रामलिंगचा धबधबा सुरक्षित आणि पावित्र्य जपलेला असा आहे. हा धबधबा ८-१० फुटांवरून कोसळत असल्याने पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. पुरातत्व खात्याच्या माहितीनुसार ही सहाव्या शतकातील हिंदु लेणी असल्याचे बोलले जात आहे; पण स्थानिक नागरिकांनी मात्र याला पांडवकालीन गुहेचा दर्जा देत प्रार्थनास्थळच ठेवले आहे. अज्ञातवासात पांडवांनी या ठिकाणी तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. या ओढ्याच्या पात्रात रामलिंगेश्वर मंदीर आहे.इथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.
                 लाल मातीच्या वाटा न तिला जोडुन उतरण्यासाठी केलेल्या पायऱ्या, गर्द झाडांची सावली आणि अस्ताव्यस्त वाढलेल्या वेली जणु वेटोळे घालुन बसलेले भुजंग, सगळीकडे पाय घट्ट रोवून बसलेला जांभा दगड, आणि आपल्या आवाजाने आपलं अस्तित्व दाखवत जंगलातून वाहत येणारा खळाळता ओढा.समोर लक्ष वेधून घेणारं एकपाषाणी मंदिर. एका बाजूला किंचित कलल्यासारखं जांभ्या दगडात कोरलेल. मंदिराच्या गर्भगृहात कुठलीच मूर्ती नाही त्यामुळे येथे ध्यान धारणा केली जात असावी असा अंदाज आहे.
          पळसंबा हे पळस व आंब्यापासुन रेशमी कापडाकरिता केशरी रंग बनविण्याचे व निर्यात करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्या अनुशंगाने पळसंबे कदाचित चिंतनाचे व बोरबेट हे व्यापारी ठिकाण असण्याची शक्यता आहे. या दोन्ही लेण्या कोकणात आढळणाऱ्या इतर लेण्याप्रमाणे कडा ठाणाळे/ पन्हाळे काजी प्रमाणे साधे आहे. 
लेण्याचे ठिकाण हे प्राचीन तात्कालिन व्यापारी मार्गाचा हा भाग असावा. या सर्व लेण्या जांभ्या दगडात कोरल्या आहेत. या लेण्या ऒढ्याच्या पात्राच्या वरील बाजुस असाव्यात परंतु कालांतराने  पात्राशेजारील दगडांचे स्खलन होऊन ही लेणी पात्रात आली असावी. 
        एकपाषाणी किंवा मोनोलिथ मंदिरे ही एकाच पाषणात साकारलेली असतात. पळसंबे येथे अशी चार मंदिरे आहेत. यातील पहिले मंदिर अखंड जांभ्या पाषणात कोरलेली आहेत. ही मंदिरे म्हणजे ध्यानगृह असावीत , असा अंदाज आहे. आजूबाजुला गर्द वनराई आणि शेजारी वाहणारा शांत झरा मनाला एक वेगळीच प्रसन्नता देऊन जातात. 














          ओढ्याच्या पात्रात असलेली हि तीन एकाश्म मंदीरे तीन वेगवेगळ्या स्थापत्यशैलीची आहेत. हि तीन स्वरुपे म्हणजे १) सर्वतोभद्र मंदीर २) मंडप किंवा सभागृह नसलेले मंदीर आणि ३ )अर्धमंडप किंवा मंडप असलेले मंदीर. याठिकाणी आणखी एक मंदीर आहे.पण हे मंदीर उंच उठावात कोरले असून शाला स्वरुपाचे आहे.
       सर्वतोभद्र मंदीर अत्यंत साधे असून चार दरवाजे असलेले आणि प्रत्येक दरवाज्यापुढे एक अर्धमंडप असलेले गर्भगृह असे त्याचे स्वरुप आहे. यातील मुखमंडप दोन स्तंभावर पेललेला असून मुखमंडपाच्या वरच्या अंगाला चैत्यगवाक्षे आहेत. मंदीराच्या बाह्य भिंतीवर कोणतेही अलंकरण नाही. हे मंदिर ध्यानमंदिरच असावे. जांभ्या पाषणातील मंददिराचे शिखर द्रविड शैलीतील आहे.या मंदिराचे शिखर उतरत्या छपरासारखे असून या मंदिराला चारही बाजूला प्रवेशद्वारे आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर भव्य नासी आहे. 
    या मंदीरापासून काही अंतरावर ओढ्याच्या खालच्या अंगाला आणखी एक एकाश्म मंदीर आहे.याची एकंदरीत घडण पाहता या मंदिराचे काम अपूर्ण राहिले असावे असा अंदाज बांधता येतो. हे मंदीर एकाच बाजुने खुले असून दोन स्तंभानी प्रवेशद्वार बनले आहे. स्तंभाच्या एकाच बाजुस म्हण़जे द्वाराच्या दोन्ही बाजुस वामनभिंती आहेत. या मंदिराच्या दोन स्तंभावरील घोड्याच्या नालेसारखा आकार आहे. त्याला गवाक्ष किंवा नासी म्हणतात. मुखभागावर चैत्यगवाक्ष कोरली असून त्यावर शिखर आहे.आज या शिखराचे केवळ दोन तलच शिल्लक आहेत. मंदीराचा अंतर्भाग आयताकृती असून त्याच्या मागील भिंतीलगत पुजेची मुर्ती किंवा पुजावास्तु होती असे दिसते. आज ती अस्तित्वात नाही. या मंदीराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदीराच्या पायालगतच्या भागात दाखवलेली दोन कोरीव लघुमंदीरे.म्हणजे  या मंंदिराच्या बाहेरच्या बाजूवर मंदिराचीच लहान प्रतिमा कोरलेली आहे. हि मंदीरे मुख्य मंदीराच्या कोरीव प्रतिकृती असल्या तरी ती या मुख्य मंदीराचे वास्तुशास्त्रीय घटक नाहीत. मंदीराच्या बाह्य अंगाला चिकटवल्यासारखे वाटणार्‍या या लघुमंदीराचे स्वरुप अर्ध- खुले गर्भगृह, त्यावर शाला शिखरे आणि कुट शिखरे असलेले विमानाचे दोन तल, त्याच्यावर स्तुपिका आणि सगळ्याच्या वर कळस असे आहे. पावसाळ्यात या मंदिराच्या बाजूचा प्रवाह मोहक असतो.
          या दोन मंदीराच्या तुलनेत ओढ्याच्या वरच्या अंगाला असलेले मंदीर अधिक उल्लेखनीय आहे.हे ध्यानमंदिर आहे , मुखमंडप, उतरते छप्पर असलेला मंडप आणि नेहमीचे दाक्षिणात्य पध्दतीचे शिखर असलेले गर्भगृह असे या मंदीराचे स्वरुप आहे. या अष्टकोनी स्तुपेवर एकेकाळी कळस असावा. मंडप चौरसाकृती असून दोन्ही बाजूनी खुला आहे. म्हणजेच या मंडपाच्या दोन्ही बाजुना वामनभिंती आहेत. या मंडपाला अर्धगोलाकृती शाला पद्धतीच्या शिखराचे आच्छादन आहे. या मंडपाच्या वरकरणी सपाट वाटणार्या छतावर फळ्या कोरल्या आहेत. या फळ्या किंवा रिपा पुर्व- पश्चिम असून टोकांना बाहेरच्या मागच्या उतारावर समप्रमाणात तिरप्या झाल्या आहेत. गर्भगृहाच्या अंतर्भागाची रुंदी खोलीपेक्षा अधिक आहे.गर्भगृहाच्या भिंतीलगत पीठ आहे.या पीठावर पुजेची मुर्ती ठेवली असावी.परंतु आज या पीठावर काहीही नाही. मंडपाचे छप्पर तिरप्या उताराचे असून त्यावर चार कळस आहेत.या छोट्या छोट्या शिखरांना कर्णकुट म्हणतात तर त्याच्या बाजूच्या घोड्यासारख्या आकाराला पंजर म्हणतात. कर्णकुट दुसरे काही नसून विद्यमान मंदिराची प्रतिकृती असते. या मुख्य शिखरावर सर्वत्र लहान मोठे कळस असल्याचे दिसून येते.कर्णकुटाच्या खालच्या बाजूला चौकोनी जाळी पाहायला मिळते. या जाळीला द्रविड शैलीमध्ये जालक म्हणतात. शिखरावर जी अष्टकोनी छत्री दिसते त्याला अल्पविमान असे म्हटले जाते.  शिखराच्या तळाच्या कोपर्‍यात कुट शिखरे असून दोन कुट शिखराच्या मधल्या भागात कमानीच्या आकाराचे दरवाजे कोरले आहेत. 
     पहिल्या मंदिराच्या बाजूला असलेले मंदिर मात्र आकाराने खूपच लहान आहे. अर्धगोलाकृती शिखर द्रविड शैलीतील आहे.  
       या मदिरांचा सविस्तर अभ्यास अद्याप झालेला नाही.  एकंदरीत भिंतीवर अर्धउठावात कोरलेली मंदीर असणारी गुंफा, शाला-शिखर आणि ओढ्याच्या प्रवाहात असणारी तीन एकाश्म मंदीरे. हे एक महाराष्ट्रातील अद्वितीय मंदीर संकुल आहे. मात्र या संकुलात कोणताही शिलालेख अजून तरी आढळलेला नाही, तसेच कोणतीही मुर्ती नाही. त्यामुळे या मंदीराचा काळ त्याच्या स्थापत्यशैलीवरुन ठरवावा लागतो. एका मंदीराच्या विमानाच्या शाला शिखरावर कोरलेल्या लकुलिशाच्या मुर्तीशिवाय इथे दुसरी कोणती मुर्तॉ नाही. ओढ्याच्या सर्वात वरच्या अंगावर असणार्या मंदीरात निश्चितपणे मुर्ती असावी.आज मात्र ती येथे नाही. या एकाश्म मंदीराच्या बाह्य अंगावर कोणतेही अलंकरण नसले तरी मंदीराच्या शिखराचे स्वरुप, मंडपावरील त्रिकोणाकृती उतरते छप्पर आणि वाकाटककालीन स्तंभाची आठवण करुन देणारे स्तंभप्रकार यावरुन हि मंदीरे सहाव्या शतकात घडवली गेली असली पाहिजेत. 
         मोठाली दगडे , पाषाण , त्यावर उगवलेले गवत , झाडी , पक्ष्यांचे आवाज अशा रम्य सानिध्यात आणि पिकलेल्या करवंदांचा आस्वाद घेत होणारी क दिवसाची टूर आठवड्याभरातील कामाचा स्ट्रेस कुठल्याकुठे पळवून लावेल.इथे असणारी झाडी, वाहणार निखळ पाणी. इथला निसर्ग तुम्हाला त्यांच्याशी सामावून घेतो. इथल्या वातावरणात गुढ आहे, शांतता आहे आणि आपल्या स्पंदनाशी जोडली जाणारी जवळीकता ही आणि ती अनुभवण्यासाठी तिथं एकदा जायला हवं…
कसे जाल?
पळसंबे हे गगनबावडा तालुक्यात येते. कोल्हापूरपासून ४३ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. गगनबावड्याच्या अलीकडे डाव्या बाजूला जाण्यासाठी वळण लागते. तेथे आत पाच किलोमीटरवर हे ठिकाण आहे. शहरातून फार तर एका तासात येथे जाता येते. जाताना सोबत वॉटर बॅग आणि थोडे खाद्यपदार्थ घ्याच.

































पळसंबे येथुन काही अंतर गेल्यानंतर बोरबेट गावाच्या टोकाशी असणाऱ्या डोंगरावर चढाई करुन वर गेल्यास आपण बोरबेट पठारावर पोहोचतॊ. या पठारावर हिनयान पद्धतीची लेणी आहे. सध्या येथे मोरजाई देवीचे मंदीर आहे. येथे अनेक वीरगळी, सती शिळा आहेत..या लेण्यापर्यंत पठारावरुन जात असता तीन दगडी चौकटी लागतात. येथे दरवाजा किंवा तटबंदीचे अवशेष अस्तित्वात नाहीत मात्र या चौकटी मात्र दिमाखात उभ्या आहेत. लेण्याच्या प्रवेशद्वाराजवळ दिपमाळ तसेच दगडी समाध्या इतिहासाचे साक्षीदार उन वारा सहन करत उभी आहेत. येथे अनेक दगड अस्ताव्यस्त पसरले आहेत. त्यावरुन ते तटबंदीचे दगड असावेत, असे निदर्शनास येते. 

 






कोल्हापूर जिल्ह्याचा तीन टक्के भाग व्यापलेला
एक तालुका म्हणजे गगनबावडा.
महेश कोठारी यांच्या 'पछाडलेला' या
चित्रपटाच्या शुटींगच्या निमित्ताने मी गगनबावडा
येथे गेलो होतो. गगनबावडया पासून साधारण ९
किमी. अंतरावर एक भव्य ऐटबाज हवेली आहे.
ही हवेली छत्रपती शाहू महाराजांच्या
पंतप्रधानांनी बांधली आहे. बहुधा त्यांचे उपनाव
केळकर होते असे ऐकिवात आहे.
या हवेली मध्ये आल्यावर थंड गारवा,
निलगिरीची रांगेनी उभी राहिलेली झाडे आणि
नयनरम्य परिसर यांनी मन अतिशय मोहून
जाते. या हवेलीमध्ये गतकाळाचे वैभव,
मराठयांची शान, यांच्या निशाण्या सतत साद
देत राहतात. हवेलीची भव्यता प्रथम दर्शनीच
नजरेत भरते. सुरवातीला मोठे पोर्च, लांबलचक
पाय-या आहेत. आतल्या दालनां मधील काळोख
पचवण्यासाठी एक आंतरिक धीटपणा लागतो.
आपणच आपल्या आत्म्याला जणू भेटायला
आलो आहोत, असा भास होतो.
जेंव्हा आपण अगदी एकटे असतो, फक्त आपले
आपणच असतो, तेंव्हा मनाच्या गाभा-यात
शांतता दरवळत राहीली, तर तेच आपले खरेखुरे
श्रेय. हा अनुभव इथे येत राहतो.
आतल्या भव्य मोठमोठया पण अंधाऱ्या चार
खोल्या सोडल्या की वर जाणारा एक उंच
पायऱ्यांचा जीना लागतो. या जिन्याने वर
पोहोचल्या वर हंडया -झुंबरेअसलेला उठ -बस
करण्याचा खास दिवाण आहे.
त्याची शान, आजूबाजूची झाडे आणि भरपूर
मोकळी जागा यामुळे मनातील सर्व प्रकारची
किल्मिषं दूर होतात. याजागी असणाऱ्या दोनही
भव्य दिवाण खान्यांना मोठया खिडक्या जशा
आहेत, तसेच मोठे व्हरांडे देखील आहेत.
एक कोठीची किंवा साठवणीची खोली बाजूलाच
आहे. त्या पलीकडे निजायच्या खोल्या लागतात.
शिसवी पलंग, जुन्या काळातील घडवंच्या यांनी
ह्या खोल्या सजल्या आहेत.
या हवेलीच्या आवारात माझ्या नजरेस आलेल्या
दोन विहिरी आहेत.
जिन्यावरून पुन्हा खाली आल्यावर थोडं पुढे
सरल्यानंतर डावीकडे दोन खोल्या व बाथरूम
आहे. तिथून मागच्या मोकळया अंगणात पाऊल
पडल्यावर बऱ्याच वेळानंतर प्रकाश दिसल्याची
गंमत वाटते. तिथे समोरच पाटाचं
खळखळ वाहणारं पाणी येतं. मनसोक्त पाण्यात
डुंबण्यासाठी या पेक्षा मस्त जागा या परिसरात
दुसरी नाही. हवेलीच्या चहु बाजूला बागा आहेत.
वॉकमन लावून गाणी ऐकत या झाडांच्या
रांगामधून फिरण्याचा आनंद अवर्णनीय आहे.
मुशाफिरी करणाऱ्या मनाला गेलेल्या काळातील
गेलेले वैभव आठवून चटका मात्र सारखा
लागतो. आपला परंपरागत इतिहास, पेशव्यांचा
कालखंड, मराठयांचा उदय, सरंजामशाही,
शाहू राजांचा कालखंड याच्या अस्तित्त्वाच्या
खुणा या हवेलीच्या भव्यते मध्ये सापडतात.
अनेक मराठी मालिका व चित्रपटांचे शुटिंग या
हवेलीमध्ये झाले आहे. विविध प्रसंगी, विविध
प्रकारे इथल्या जागेचा उपयोग करता येतो.
या हवेलीची शान, वैभव, शांत परिसर, झाडी,
मागेच डोंगराळ अरण्य यामुळे निर्भरशील
दिग्दर्शकांना प्रस्तुत लोकेशनचा वापर करावा
असं वाटत राहीलं तर काहीच नवल नाही.
गगनबावडा या शब्दामध्ये आकाश व बावडी
म्हणजे विहीर हे दोन शब्द आहेत.
आकाश जेंव्हा विहिरीत पडतं, त्यावेळी आपल्या
मनामध्ये पसरणारी निळाई ही याच बावडयात
कशी?..., असं वाटत राहतं.
एक असीम तन्मयता आपल्यात सामावते.
या जागेची हीच तर मज्जा आहे.
इथे नागर परिसरातील कोलाहल नाही.
फॅशन नाही.
गलबला नाही. गिचमिड नाही.
म्हणूनच इथल्या 'बावडयात गगन'
डोकावतं.
गगन बावडया तील ही विशाल हवेली
म्हणूनच माझं एक खास आवडीचं ठिकाण आहे.
भरत जाधव.. चित्रपट अभिनेता..
शब्दांकन : व्हि. जी..

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...