पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण ध्रुव असे दोन ध्रुव आहेत, तर भुतलावरचे सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट हे तिसरा ध्रुव मानले जाते. प्रत्येकाचे एव्हरेस्टच्या माथ्यावर स्वप्न असते. किमान बहुतेक डोंगरप्रेमी हे स्वप्न पाहतात. अर्थात एव्हरेस्ट किंवा सागरमाथा गाठायचा तर प्रचंड शारीरिक क्षमाता, वेळ, आर्थिक सुस्थिती आणि मुख्य म्हणजे प्रतिकुल हवामानाला तोंड द्यायची तयारी आणि कदाचित शेवटच्या क्षणी अपयश स्विकारायची तयारी लागते. बहुतेकांना हे शक्य नसते.त्यामुळे हिमायलातील एव्हरेस्ट साध्य होत नसले तरी किमान अग्निपुत्र सह्याद्रीतील एव्हरेस्ट म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ( सह्याद्री रांगेतील नव्हे, सह्याद्रीतील सर्वोच्च माथा आहे अन्नामुडी शिखर ) अर्थात पर्वतांची राणी कळसुबाई सर करण्याचे लक्ष असते आणि बहुतेक जण ते साध्य करतात.
कळसुबाई....
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर...
पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत पाच हजार फूटांवर तीन शिखरे आहेत. कळसूबाई (१६४६ मीटर), किल्ले ‘साल्हेर’ वर असलेले ‘परशुराम मंदिर’ चे शिखर (१५६७ मीटर) आणि मुडा (गावाळदेव) शिखर (१५३२ मीटर). त्यानंतर तोरणा किल्ला आणि इतर शिखरांचा क्रमांक लागतो.
कळसुबाई नावामागची कथा आणि परिसर :-
वास्तविक कळसुबाई हा काही गड,किल्ला नाही.केवळ एक गिरीशिखर आहे. याची सर्वात जास्त असणारी उंची हेच वैशिष्ट्य ! त्यामुळ्र कळसुबाईचा तसा इतिहासात काही उल्लेख नाही. मात्र या शिखराविषयीची एक दंतकथा प्रचलित आहे. प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती राहाळात राहत होती. कामाच्या निमित्ताने ती इंदुरे गावात आली. इंदुरे गावात ती पाटलाच्या घरी काम करू लागली. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती, की मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा, पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले. पाटलाने कळसूला केरकचरा काढण्यास व भांडी घासण्यास लावली. त्यामुळे कळसू चिडून डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसुबाईचा डोंगर होय. तिने भांडी घासली ती जागा थाळेमेळ आणि केरकचरा काढला ती जागा काळदरा या नावाने ओळखतात. काही दंतकथांमध्ये, कळसूने शिखरावर देहत्याग केला. त्यामुळे ते शिखर तिच्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तेथे तिचे मंदिर उभारण्यात आले असा उल्लेख आढळतो. त्या शिखरासंबंधी असणारी आणखी एक कथा म्हणजे १८६० साली आर्चडीकन गेल या इंग्रजाने रात्रीच्या वेळेस शिखरावर चढाई केली. गेलने पहाटेच्या समयी शिखरावरून सूर्योदय पाहिला. त्या दृश्याने प्रभावित झालेल्या गेलने कळसुबाई शिखराला ‘दि किंग ऑफ द डेक्कन हिल्स’ असे म्हटले! जगभरातील असंख्य शिखरावर पदन्यास करणारे प्रख्यात गिर्यारोहक इयान मॅकनॉट डेव्हिस यांनी २००३ मध्ये कळसूबाई शिखरावरही आरोहण केले. इंटरनॅशनल माऊंटेनियरिंग अँन्ड क्लाइंबिंग फेडरेशनचे ते अध्यक्ष. हिमालयन क्लब या प्रख्यात क्लबने सर्वांत जुन्या गिर्यारोहण संस्थेच्या पंचाहत्तरी सोहळ्याला उपस्थिती लावणासाठी ते मुंबईला आले होते. त्यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी लोरॅटो, ब्रिटिश गिर्यारोहक बॉब पेट्टी ग्रु, जपानी गिर्यारोहक तोमात्सु नाकामुरा व हिरोशी साकाई आदी नामवंत गिर्यारोहक होते. त्यांच्या सोबत हिमालय अक्षरशः पायी तुडवणारे गिर्यारोहक हरीश कपाडिया, जगदीश नानावटी, डॉ. एम.एस. गिल असे दिग्गज भारतीय गिर्यारोहकही शिखरावर आले होते. जणू काही जगातील नामवंत गिर्यारोहकांच हे ‘लघु आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक संमेलन’च तिथं त्या दिवशी भरलं होतं.
याच भागात कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य आहे. तेथे बिबट्या, रानडुक्कर, लांडगे, कोल्हे, नीलगाय, ससे, भेकरे, सांबर, हरीण, शेकरू, रानमांजर, चिंकारा, उदमांजर, तरस असे अनेक प्राणी आढळतात. सोबत मोर, पोपट, दयाळ, ससाणा, कृष्ण गरूड, धोबी, शिंपी, खाटीक, सुगरणी, बगळे, करकोचे, रंगीत करकोचे, खंड्या, बंड्या. स्थानिक आणि स्थलांतरित असे शंभर प्रकारचे पक्षीही पाहण्यास मिळतात.अलीकडेच हरिश्चंद्रगड-कळसूबाई परिसर अभयारण्य म्हणून घोषित झाला आहे. इथलं जैववैविध्य अनेकांना आकर्षित करत आहे. पण संगमनेरच्या बी.एस.टी. महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागात प्राध्यापक असणाऱ्या डॉ. मोहन वामन यांनी ‘इकॉलॉजिकल स्टडीज ऑफ कळसूबाई-हरिश्चंद्रगड-रतनगड फॉरेस्ट’ असे अभ्यासपूर्ण संशोधन करून पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती म्हणजे पीएचडी ही पदवी मिळवली आहे. इथे औषधी वनस्पतींच्या शोधात येणारे वैदू, असंख्य पर्यटक, नवरात्रात येणारे भाविक, अतोनात होणारी कारवी या वनस्पतीची बेकायदा तोड आणि इतरही अनेक कारणांनी इथल्या जैवविविधतेवर संकट कोसळले आहे. अनेक दुर्मिळ वनस्पतींचे येथील अस्तित्वही धोक्यात आलं आहे. असं या संशोधनात आढळलं आहे.
कळसुबाई मंदिरावरून कळसुबाई शिखर हे नाव पडलेले आहे .शिखरावर कळसुबाई देवीचे मंदिर असून अनेक भाविकांची ही देवी कुलदैवत आहे. नवरात्रात नऊ दिवस मोठय़ा संख्येने भाविक शिखराला भेट देतात. प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी देवीची पूजा करतात . देवीची ओटी भरतात. अमावस्या पौर्णिमेला गर्दी असते .नवरात्र, दिवाळी आणि होळी या सणाला यात्रा भरते . शिखरावरील मंदिराचे बांधकाम इंदोर गावातील कोळी समाजाने केले असे सांगितले जाते. त्यानंतर त्या शिखराला कळसुबाई शिखर म्हणून संबोधू लागले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही अकोला तालुक्यातील "महादेव कोळी " समाज कळसुबाईला आपली देवी मानतात. कळसुबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे. कळसूबाई नजीकच भंडारदरा धरण असून हजारो पर्यटक तेथे येतात. पर्यटकांचे आकर्षण असणारी साम्रद येथील सांदण दरी, घाटघर, रतनगडसारखी पर्यटन ठिकाणे याच परिसरात आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी रोपवे व्हावा ही अनेक दिवसांपासूनची मागणी आहे.
या शिखरावर बारमाही वर्दळ असते. जुलै ते सप्टेंबर हा पावसाळा असतो. तुम्हाला हिरवेगार पर्वत पाहायला मिळतात आणि मुसळधार पावसात ट्रेकिंगचा अनुभव येतो. पावसाळ्याचा हंगाम हा पीक सीझन असल्यामुळे या मार्गावर खूप गर्दी असते. चिखलाच्या पायवाटेमुळे ते खूप निसरडे आणि धोकादायक बनतात. सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे फुलांचे हंगाम आहेत. हे शरद ऋतूतील महिने आसपासच्या शिखरांचे आणि किल्ल्यांचे स्पष्ट दृश्य बघता येते. शिखरावरून सूर्योदय पाहण्यासाठी योग्य हवामान म्हणजे नोव्हेंबर ते एप्रिल. या कालावधीत रात्रीचा ट्रेक देखील करता येतो.
पोहोचण्याच्या वाटा :-
महाराष्ट्र सह्याद्रीचं हे सर्वोच्च शिखर. त्याची समुद्रसपाटीपासून उंची भरते १६४६ मीटर्स म्हणजे ५४३१ फूट. तळवटीतल्या बारी या गावापासून तब्बल ८०० मीटरची डोंगरचढाई केली की या शिखरमाथ्यावर पोहोचता येतं.
कळसूबाईला जाण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, ठाणे, हे जिल्हे सोयीचे ठरतात तसंच कल्याणपासुनही हे शिखर जवळ आहे. कळसूबाई इगतपुरीच्या अग्नेय दिशेस वसलं असून मुंबई-कल्याण मार्गे तुम्ही खासगी वाहनांनी कळसूबाईला येणार असाल तर कसारा घाटातून नागमोडी वळणांनी इंदोरे गावातून तुम्हाला कळसुबाई चढता येऊ शकते, जे वसलय अगदी डोंगराच्या पायथ्याशी, बारी या गावातून सुद्धा कळसूबाई सर करु शकते. पण जर का तुम्ही ट्रेकसाठी कळसूबाईला चालले असाल तर चढताना इंदोरे मार्गाहून व उतरताना बारी गावाच्या मार्गे आल्यास तुम्हाला खर्या अर्थाने ट्रेक केल्याचा आनंद मिळू शकतो, कारण दोन्ही मार्ग भिन्न असल्यामुळे साहस कशाला म्हणतात हे नवोदित ट्रेकर्सना सुद्धा अनभवून घेता येतं.
बारी , पेंडशेत, उदडवणे आणि इंदोरे या चार गावातून कळसुबाईला जाता येते. या शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट ही बारी गावातून जाते. हे गाव अकोले तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यात आहे .बारी गावातील लोकांचे भात शेती इतकच उत्पन्न आहे. जून ते सप्टेंबर भरपूर पाऊस असतो.बारी गावात पिण्यासाठी उन्हाळ्यात पाणी बोरवेलचे मिळते. पर्यटन आणि वाहतुकीची साधने यामुळे कळसुबाई गिर्यारोहणचे महत्व या अलीकडील दहा वर्षात वाढले. बारीतुन कसारा घाट मार्गे मुंबईला थेट बसची सोय आहे . बारी मधून मुंबईला जायला तीन तास लागतात .नगरला तीन तास लागतात. बारीमधून बाजाराला लोक घोटी (खुर्द)ला जातात. बारी गावाला वेगवेगळ्या मार्गाने जाता येते त्यापैकी नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. स्वतःचे वाहन असल्यास मुंबई - कसारा मार्गे घोटी (खुर्द) गाठावे. घोटी - सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे.या फाट्यावरुन भंडारदर्याला जातांना, भंडारदर्याच्या अलिकडे ६ कि.मी अंतरावर ‘बारी’ हे गाव आहे. इगतपुरीवरून भंडारदर्याला जाणार्या एसटीने बारी या गावी उतरता येते. पुणे -अहमदनगर मार्गाने शिरूर मधून आळेफाटा-कोतुळ-राजूर-भंडारदरा-बारी असे पोहचता येते . शिर्डी मधून सिन्नर घोटी खुर्द वरून बारीला पोहचता येते .शिवाय शिर्डी मधून संगमनेर-अकोले-राजूर -भंडारदरा-बारी असे कळसुबाईला पोहोचता येते. येथून शिखरावर जाण्यास ३ तास लागतात. वाटेत तीन ठिकाणी आता लोखंडी शिडया बसविलेल्या आहेत. गावातच सामान ठेवून ५ ते ६ तासात शिखरावर जाऊन परत येता येते. गावातून बाहेर पडल्यावर एक ओढा लागतो. हा ओढा ओलांडून झाल्यावर थोडयाच अंतरावर एक मंदिर लागते. या मंदिराच्या मागच्या बाजूने जाणारी वाट थेट शिखर माथ्यापर्यंत घेऊन जाते.
पेंडशेत वरून लांब पडते पेंडशेत मार्गे कळसुबाईला चढण्यासाठी अवघड रस्ता आहे .शेवटच्या शिडी जवळ एक पठार आहे. त्या पठारावर सर्व वाटा एकत्र येतात. दक्षिणेला भंडारदरा धरण आहे. पश्चिमेला शहापूर तालुका ठाणे जिल्ह्यात येतो. उत्तरेला नाशिक मधील सिन्नर तालुका येतो. दक्षिणेला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका घाटघर कोकणकडा पासून लागतो .
पुणे ते कळसूबाई शिखर हा प्रवास कमीतकमी खर्चात पूर्ण करायचा असल्यास खालील टप्पे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
पुणे ते कल्याण-कल्याण ते इगतपुरी-इगतपुरी ते घोटी-घोटी ते बारी-बारी ते कळसूबाई.
पुणे जंक्शन वरून सकाळी ७ वाजताचा आसपास सहयाद्री एक्सप्रेस असते. या रेल्वेने तुम्ही कल्याण ला पोहचू शकता तेही लवकरात लवकर आणि फक्त ६० रुपयांचा तिकीट मध्ये.
हा प्रवास साधारण ३-३:३० तासात होतो.म्हणजे आपण सकाळी ११-११:३० दरम्यान कल्याण जंक्शन वर पोहचू.
जर तुम्ही सकाळी निघताना नाश्ता केला नसेल तर कल्याण जंक्शनच्या बाहेर नाश्ताची उत्तम ठिकाणे आहेत.
कल्याण जंक्शन वरून इगतपुरी पर्यंत जाण्यासाठी पॅसेंजर किंवा एक्सप्रेस रेल्वे उपलब्ध आहेत कारण येथील लोकल रेल्वे फक्त कसारा घाट पर्यंत आहे.तर कल्याण जंक्शन वर इगतपुरी या स्टेशनचे तिकीट काढावे आणि या तिकिटांची किंमत ४५ रुपये आहे. इगतपुरी ला जाण्यासाठी उत्तर भारतात जाणारी प्रत्येक रेल्वे ही थांबते व शक्यतो फलाट क्रमांक हा ४-५ वरून रेल्वे असते. इगतपुरीला जाणाऱ्या रेल्वेची वारंवारता ही उत्तम आहे म्हणजे रेल्वे ची जास्त वाट पाहावी लागत नाही. हा प्रवास कदाचित कंटाळवाणा होऊ शकतो कारण या रेल्वेत उत्तर भारतीय प्रवासी प्रचंड अशिस्त असतात त्यामुळे गर्दीत मध्येच हा प्रवास करावा( अर्थात हाडाचा ट्रेकर आणि भटक्या इथेही आनंद घेईल). आसनगाव- कसारा घाट गेल्यावर इगतपुरी येते.
येथे उतरल्यावर इगतपुरी ची बाजारपेठ आहे. उपयोगी वस्तू इथे मिळू शकतात. या स्टेशनच्या बाहेर लगेच रिक्षा उपलब्ध असतात. जर तुमचा ग्रुप मोठा असेल येथून बारी पर्यंत तुम्हाला जीपची सोय होऊ शकते ,ज्याचे भाडे हे २५००रुपये पर्यंत असते. पण आपल्या कमीतकमी खर्चाचा प्रवासाला हा ऑप्शन योग्य नाहीच. त्यासाठी बाहेर रिक्षावाले हे तुमचा ग्रुप ला १२०-१५० रुपये मध्ये घोटी या गजबजलेल्या बाजारपेठेपर्यंत १५-२०मिनिट मध्ये आणून सोडतात.
संगमनेर व इगतपुरी तालुक्याचा सीमेवर असल्याने घोटी मध्ये बरेच लोकांचे येणे जाणे असते. या बाजार पेठेतुन बारी गावात जाण्यासाठी तुम्हाला वडाप म्हणजे जीप हाच एकमेव पर्याय आहे. हे स्थानिक जीप वाले संपूर्ण जीप भरेपर्यंत निघत नाहीत त्यामुळे येथे वाट बघायची तयारी ठेवा. पण एकदा का जीप निघाली की थेट बारी गावात आणून सोडते. हा प्रवास फार मस्त आहे. वाटेत प्रचंड पहाडी भिंती लागतात. आपण घोटी ते बारी गाव येथे पाऊण-१ तासात येऊन पोहोचतो. म्हणजे पुणे ते बारी या गावात येताना आपल्या कडून पुणे-ठाणे-नाशिक-अहमदनगर एवढे जिल्हे पालथे घातले जातात. हा एवढा मोठा प्रवास स्वस्तात मस्त आणि वेगवेगळे अनुभव देणारा ठरतो. थोडक्यात पुण्याहून सकाळी ७ वाजता निघालेले तुम्ही सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत बारी गावात येऊन पोहोचता तेही कमीतकमी खर्चात!!!!
पुढे आपण इंदोरे आणि उदडवणेमार्गे चढणार्या वाटांची सविस्तर माहिती घेउया.
शिखराकडे :-
बारी गावात प्रवेश करताना वीरगळ- सतीशिळा आहेत. जिल्हापरिषदेच्या शाळेला बगल देऊन तुम्ही कळसूबाईच्या पायथ्याकडे मार्गक्रमण करायला सुरवात करायची.थोडं अलीकडेच, कोणत्याही उपाहारगृहाजवळ गाडी लावता येईल. खाऊ-पाण्याच्या पाठपिशव्या पाठीला लटकावून मारूती मंदिराजवळून, पुढे गल्ली-बोळानं 'देवाची वाट' धरायची. येथील गावकरी आपुलकीने वाट ही दाखवतात. पायथ्याजवळील दुकानात पिण्याचा पाण्याचा बाटल्या मिळू शकतात. शेतमाळ्यातून गेलेल्या वाटेने आपण कळसूबाईच्या प्रवासाला सुरुवात करायची.
काहीजण कळसुबाई शिखरावरुन सुर्योदय बघण्याचे नियोजन करतात. त्यासाठी मात्र साधारण रात्री साडे तीन- चार वाजता सुरवात करायला लागते. हा ही एक अनुभव आहे, जो ज्यांना शक्य आहे, त्यांनी घेतला पाहीजे.
वरील फोटोत दिसणारी कमान पार केली की डोंगर चढाईला सुरुवात होते. येथून वर जाताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. वर जाउन परत येईपर्यंत अंधार होणार आहे त्यामुळे पुरेसा प्रकाश देणाऱ्या बॅटरी जवळ ठेवा. वर जाताना एकूण ३ लोखंडी शिड्या लागतात. दोन शिड्या पार केल्यानंतर एक विहीर लागते. या विहिरीपर्यंत वाट ही सोपी परंतु कस लावणारी आहे आणि या विहिरी पर्यंत तुम्हाला स्थानिक गावकऱ्यांची हॉटेल्स उपलब्ध. या हॉटेल्स मध्ये सरबत,नाश्ता, पाणी,जेवणापासून झोपण्याची सोय होउ शकेल. अर्थात यासाठी पैसे खर्च करण्याची तयारी ठेवावी. पण या हॉटेल्समूळे तुम्ही वाट हरवण्याची शक्यता ही नाही. काही लोक पैसे देऊन वाटाड्या देऊ इच्छितात पण त्याची काही गरज नाही. जसजसे वर जाऊ तसा हा प्रवास फार सुंदर होत जातो. फक्त एकच करायचे कचरा, बाटल्या या ठिकठिकाणी लावलेल्या कचरपेटीत टाकाव्या. पायथ्यापासून शिखरावरच्या विहिरीपर्यंत पोहचायला किमान २-२:३० तास तरी लागतील.
बारी गाव ओलांडले कि नंतर 'मुंज्याच्या दरा', त्यापाठोपाठ ओढा, अन मग बांधही मागे टाकत आपण सरळ 'शिखराच्या दिशेने 'आक्रमण' सुरू करायचे.गाव संपताच वाट ही आपलं 'सोज्वळपण' गुंडाळून घेते आणि काहीसं अवखळ होत ती वर वर चढू लागते. झाडांच्या आडव्या-तिरक्या मुळ्या, दगड-खडकांचे टप्पेही आता वाटेतील पायऱ्या बनून आपल्याला मदत करु लागतात.
वरील फोटोत दिसणारी कमान पार केली की डोंगर चढाईला सुरुवात होते. येथून वर जाताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. वर जाउन परत येईपर्यंत अंधार होणार आहे त्यामुळे पुरेसा प्रकाश देणाऱ्या बॅटरी जवळ ठेवा. वर जाताना एकूण ३ लोखंडी शिड्या लागतात. दोन शिड्या पार केल्यानंतर एक विहीर लागते. या विहिरीपर्यंत वाट ही सोपी परंतु कस लावणारी आहे आणि या विहिरी पर्यंत तुम्हाला स्थानिक गावकऱ्यांची हॉटेल्स उपलब्ध. या हॉटेल्स मध्ये सरबत,नाश्ता, पाणी,जेवणापासून झोपण्याची सोय होउ शकेल. अर्थात यासाठी पैसे खर्च करण्याची तयारी ठेवावी. पण या हॉटेल्समूळे तुम्ही वाट हरवण्याची शक्यता ही नाही. काही लोक पैसे देऊन वाटाड्या देऊ इच्छितात पण त्याची काही गरज नाही. जसजसे वर जाऊ तसा हा प्रवास फार सुंदर होत जातो. फक्त एकच करायचे कचरा, बाटल्या या ठिकठिकाणी लावलेल्या कचरपेटीत टाकाव्या. पायथ्यापासून शिखरावरच्या विहिरीपर्यंत पोहचायला किमान २-२:३० तास तरी लागतील.
| मुंज्याचा दरा |
बारी गाव ओलांडले कि नंतर 'मुंज्याच्या दरा', त्यापाठोपाठ ओढा, अन मग बांधही मागे टाकत आपण सरळ 'शिखराच्या दिशेने 'आक्रमण' सुरू करायचे.गाव संपताच वाट ही आपलं 'सोज्वळपण' गुंडाळून घेते आणि काहीसं अवखळ होत ती वर वर चढू लागते. झाडांच्या आडव्या-तिरक्या मुळ्या, दगड-खडकांचे टप्पेही आता वाटेतील पायऱ्या बनून आपल्याला मदत करु लागतात.
| अवखळ वाट |
चढाई सुरू झाली कि वीरळ झाडी अन वाऱ्याचा अभाव यामुळे आपल्या 'दमा'ची 'चाचपणी' एव्हाना सुरू होते.पण, तेवढ्यात आपल्याला एक कौलारु मंदिर दिसते. हळूहळू त्यापुढील पार, त्यावरील आणि त्याभोवती इतरत्र शेंदरी रंगातील काही 'देवादिक' अन चार-सहा 'दुकानंही' दिसतात. अर्थात हि आहे 'माची' तथा जहागिरदारवाडी. मंदिर परिसर बराचसा स्वच्छ आणि विलोभनीय दिसतो. छोट्या विसाव्याची संधी घ्यायची.
पायथ्याला कळसूबाईचे स्थापन केलेले हे मंदिर आहे जे वृद्ध , बालके ,जे वरपर्यंत जाऊ शकत नाहीत,त्यांच्यासाठी आहे. त्यांनी येथून दर्शन घेऊन समाधान मिळवावे यासाठी हे मंदीर.याला कळसूबाईचं खालचं मंदिर म्हणतात. समोरच एक ऐसपैस पार आहे. इथून पुढच्या चढणीवर अनेक रानवाटा लागतात. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, मुख्य मळलेली पाऊलवाट सोडायची नाही.

येथेच कळसूबाई देवस्थानची लोखंडी कमान आहे. 'श्री माता कळसूबाई निवासीनी'चं दर्शन घेऊन पुन्हा आपली वाट पकडत शिखरमंदिराकडे मार्गस्थ व्हायचे. छोट्याशा लोहकमानीतून वर निघाली कि लगोलग, प्रथम उजवीकडे एक नव्यानं बनत असलेलं, एक बनलेलं तर डावीकडेही एक अशा गडमार्गातील या पहिल्या उपहारगृहांचं दर्शन होते.
या माचीपर्यंत आलेली पाऊलवाट आता थोडी रुंद अन सपाट अशी 'बनवलेली' दिसते पण पुढच्या चौथ्या-पाचव्या मिनिटालाच तिनं पुन्हा त्वरेने चढाई सुरू होते. रस्त्यात मध्येच दगडी लागतात. मग खडक-मातीच्या पायऱ्याही लागल्या. पाच एक मिनिटांतच छोटा खडकटप्पाही लागतो. हा 'सांबरखडक'! दोन एक मिनिटांतच तोही संपला कि वाट केवळ मातीच्याच सातआठ पायरीटप्प्याने बनलेल्या वाटेने सरळ 'सावरधावे'तल्या 'कळसुबाई हॉटेला'त पोहोचते अन पुन्हा तशाच तीनचार पायऱ्या चढून बाहेरही निघते अन पुढे चालू लागते.
चढायला सुरवात करुन बराच वेळ झालेला असतो. झाडी अद्यापही तुरळकच असल्याने वातावरणामधील उष्मा जाणवतो. वाट आता एका सुकल्या ओहोळमार्गाला साथीला घेत काही मिनिटांतच एक दगड-मातीयुक्त पण रचीव असा छानसा पायऱ्यांचा टप्पा पार करीत सरळ 'टीवई'च्या पोटातील तथा 'लहान टीवई'मधील 'कळसूबाई प्रसन्न'मध्ये घुसते. हे इथलं उपहारगृह! इथं थोडावेळ विसावायचे. इथलं लिंबूजलपान होताच पुन्हा पुढच्या मार्गाला कुच करावे.
आता रचीव दगडांचा असाच आणखी एक पायरीमार्ग आपल्याला वर घेत पुढे एका ओबडधोबड पायरीवाटेला जुळवत चारदोन मिनिटांतच 'टिवई'वर पोहोचवतो. या वाटेवरचा नियम म्हणून की काय इथंही एक उपाहारगृह दिसलं. 'टीवई' म्हणजे एक बऱ्यापैकी सपाट जागा! सपाट असल्यानं इथून बाजूचे पर्वत, हिरवाई असा मनोहारी भोवताल दृष्टीस पडतो. शिखर अद्यापही दृष्टिपल्याडच असते; मात्र, शिखरमार्ग आणि त्या मार्गातील तीनही शिड्या मात्र इथून स्पष्ट दिसतात.
वाटेची सततची वळणे नि सलग उभी अन खडकाळ-मुरमाड अन धोंड्यांनी युक्त अशी चढाई, हे इथलं विशेष! आणखी विशेष म्हणजे वळणावरच्या जवळजवळ सर्वच उंच-सपाट टप्प्यांवर मुबलक अल्पोपहार तथा पेयपान केंद्रे! ..आणि त्यांच्या मधूनच, अगदी पोटातून, वाटेचे, आणि अर्थातच 'वाटसरूं'चेही, येणे-जाणे! आणि वाट.. ती तर सदोदित वर्दळीचीच! आणि रविवार असेल प्रश्नच नाही. अगदी पूर्णतया वर्दळीची! त्यामुळे, संपूर्ण गडवाट ही मातकट, रुळलेली अन उठावदार! अगदी डोळे झाकून चालावं अशीच!!''
| टीवईच पोट तथा लहान टीवई |
वाटेची सततची वळणे नि सलग उभी अन खडकाळ-मुरमाड अन धोंड्यांनी युक्त अशी चढाई, हे इथलं विशेष! आणखी विशेष म्हणजे वळणावरच्या जवळजवळ सर्वच उंच-सपाट टप्प्यांवर मुबलक अल्पोपहार तथा पेयपान केंद्रे! ..आणि त्यांच्या मधूनच, अगदी पोटातून, वाटेचे, आणि अर्थातच 'वाटसरूं'चेही, येणे-जाणे! आणि वाट.. ती तर सदोदित वर्दळीचीच! आणि रविवार असेल प्रश्नच नाही. अगदी पूर्णतया वर्दळीची! त्यामुळे, संपूर्ण गडवाट ही मातकट, रुळलेली अन उठावदार! अगदी डोळे झाकून चालावं अशीच!!''
येथून पुढं ही वाट थोडी खडकाळ बनते. भलेच दगड-धोंडे कवेत घेत वर वर चढू लागते. मग, असंच एक वळण घेताच आपणांस अचानक समोर दिसतात त्या सुंदर अन सुबकशा पायऱ्या! अन आधार व सुरक्षिततेसाठी बाजूस लोखंडी कठडेही!
"तीन शिड्या, मंग थोडं रेलिंग आन मंग मंदिरच!"असं गावकऱ्यांनी खालीच सांगितलेलं असतंय.
त्यामुळे इथं पोहोचल्यावर आपणांस पहिली शिडी आल्याचा भास होऊन आनंदून जायला होतं; मात्र, हा आनंद क्षणिकच ठरतो. कारण, प्रत्यक्षात पहिली शिडी अद्यापही थोडी पुढे तर शिखरमंदिर सुमारे तासभरावर असते.
"तीन शिड्या, मंग थोडं रेलिंग आन मंग मंदिरच!"असं गावकऱ्यांनी खालीच सांगितलेलं असतंय.
| टीवई तथा मोठी टीवई |
गावांतील काही लोकांकडून असे समजते, की दोन वर्षांपूर्वी शिखरापर्यंत जाण्यासाठी कच्चा छोटा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. त्यासाठी काही निधीही जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला होता. मात्र शिखरापर्यंत कच्चा छोटा रस्ता तयार करणे अवघड असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घेण्याची गरज आहे असे लक्षात येताच काम सोडून देण्यात आले. मंजूर निधीचा वापर कड्याच्या ठिकाणी रेलिंग लावणे आणि पायऱ्या तयार करणे यासाठी झाला.
अशा या लोखंडी कठड्यांची सुविधा असलेल्या या पायरीवाटेचे साधारण चार एक वळणटप्पे संपल्यानंतर आपण येतो 'चांदसुर्या'त! अर्थात, पहिल्या शिडीजवळ! या टप्प्यावर पूर्वी माता कळसूबाईच्या 'पादूका' होत्या; मात्र इथल्या 'रस्तासुधार' कार्यात त्या इथून हलविल्या गेल्याने आज त्या इथं दिसून येत नाहीत. थोडासा वक्राकार हा शिडीमार्ग संपताच आपणांस प्रथमच आठ-दहा कोरीव पायऱ्या लागतात. इथून सहज मागे पाहता खोलवर खाली आपणांस दिसते ती 'मोठी टीवई', आणि त्याखालोखाल वाटेतील काही उपहारगृहे, ती माची, अर्थात ती जहागिरदारवाडी, तो बांध, ते बारी गाव, ती विखुरलेली काही घरे, त्या वाड्या-वस्त्या, ते समोरील डोंगर आणि एकूणच मस्त हिरवाई असलेला मनोहारी भोवताल दिसून येतो. ही सर्व दृश्ये छायाबद्ध करीत अन मनकप्प्यात साठवून घेत आपण पुन्हा मार्गी लागायचे.
अशा या लोखंडी कठड्यांची सुविधा असलेल्या या पायरीवाटेचे साधारण चार एक वळणटप्पे संपल्यानंतर आपण येतो 'चांदसुर्या'त! अर्थात, पहिल्या शिडीजवळ! या टप्प्यावर पूर्वी माता कळसूबाईच्या 'पादूका' होत्या; मात्र इथल्या 'रस्तासुधार' कार्यात त्या इथून हलविल्या गेल्याने आज त्या इथं दिसून येत नाहीत. थोडासा वक्राकार हा शिडीमार्ग संपताच आपणांस प्रथमच आठ-दहा कोरीव पायऱ्या लागतात. इथून सहज मागे पाहता खोलवर खाली आपणांस दिसते ती 'मोठी टीवई', आणि त्याखालोखाल वाटेतील काही उपहारगृहे, ती माची, अर्थात ती जहागिरदारवाडी, तो बांध, ते बारी गाव, ती विखुरलेली काही घरे, त्या वाड्या-वस्त्या, ते समोरील डोंगर आणि एकूणच मस्त हिरवाई असलेला मनोहारी भोवताल दिसून येतो. ही सर्व दृश्ये छायाबद्ध करीत अन मनकप्प्यात साठवून घेत आपण पुन्हा मार्गी लागायचे.
आता, कुठं लोखंडी कठड्यांसह तर कुठे त्याविरहित, कुठं नैसर्गिक कोरीव तर कुठं कृत्रिम बांधीव अशा पायरीवाटेने वीसएक मिनिटांची वळणे अन चढाईमिश्रित अशी वाटचाल करीत आपण दुसऱ्या शिडीजवळ येतो. इथून वर येताच दिसणारा मघाचाच तो निसर्गनजारा पुन्हा पाहण्याचा मोह आपण आवरू शकत नाही. साहजिकच, काही वेळ ते नेत्रसुख पुनश्च लुटत आपण पुन्हा 'वाटे'ला लागतो. पाचच मिनिटांत आपण 'लागे'त येतो. इथंही एक उपहारगृह आहेच.
| अवखळ वाट |
| 'जांभळाचं पाणी' |
या वाटेच्या उजवीकडे
इंदोरे घळ किंवा गोटीची वाट लागते, तर डावीकडे आहे करंडाखिंड किंवा
पांझराखिंड. उडदावणे या गावातून कळसूबाई डोंगर चढाई करण्यासाठी या कारंडा
खिंडीतून जावे लागते. याशिवाय इंदोरे या गावातूनही उत्तरेकडील वाटेने
कळसूबाई शिखरावर पोहोचता येते. नवरात्रात इकडे आलं तर या साऱ्याच वाटांवर
राहाळातील ग्रामस्थांची रीघ लागलेली असते.यापुढील छोट्याशाच चढाईत, पाचएक मिनिटांवरच, तिथल्या सपाटीवरील एका रचिव दगडी ओट्यावर आणखी एक लिंबूपाणी केंद्र दिसतं. आणखी थोडं पुढे जाता पुन्हा थोडी सपाटी लागते. मग थोडी उजवी, थोडी डावी करताच आपणांस समोर दिसतो एक अतिशय सुंदर असा नजारा! तो अंतिम टप्पा! ती टेकडी.. आणि तीवरील तो गडमाथा आणि तो फडकता भगवा! गड आता पूर्णतया जवळ आलेला असतो. या पुढच्या वाटचालीत अनेक रानफुलं आणि झुडुपांचं दर्शन होते. आजूबाजूचे दगड धोंडेनी कातळ खरखरीत कडा असलेले दिसतात.
संपूर्ण ट्रेकदरम्यान नजरेला पडणारी एक गोष्ट मात्र सातत्याने खटकते. ठिकठिकाणी त्या मोठमोठय़ा दगडांवर खडूने काढलेले मोठमोठे बदाम आणि त्यात बाण, नावे, अक्षरे वगरे केलेलं नक्षीकाम. मुळात किल्ले, लेणी आणि अशा सुंदर शिखरांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी दगडांवर असे काहीबाही लिहून आपण साक्षर आहोत हे सिद्ध करणाऱ्यांची सांस्कृतिक चीड, सात्त्विक संताप, मनस्वी कीव वगरे जितकी यावी तितकी कमीच. दगडावर असं नाव कोरून अमर होता येतं असा या अश्मयुगीन धोंडय़ांचा समज असावा कदाचित.
जस जसे आपण उंच जात असतो तस तसे परिसरातील सर्व शिखरे खुजी होत जातात आणि आपण सर्वोच्च शिखराकडे मार्गक्रमणा करीत आहोत याची जाणीव होते.
आपण जरी कळसुबाईला एक दिवसाचा गिरीभ्रमणाचा आनंद किंवा काहीजण पिकनिक म्हणून येत असले तरी स्थानिक लोकांचे आयुष्य अतिशय खडतर आहे याची जाण ठेवली पाहिजे. या एरवी निर्मनुष्य असणाऱ्या कळसूबाई शिखर परिसरात पांझरा/पांजरे गावातील पाच लहान मुली (एकमेकींच्या बहिणी) आपल्या घरच्या शेळ्या राखण्यासाठी एका छोट्याशा गुहेत पावसाळा वगळता ७-८ महिने दिवाबत्तीशिवाय वास्तव्याला असतात. सुमारे शंभर-दीडशे शेळ्या आणि या पाच हिरकण्या इथे असतात. सुमारे एक हजार मीटर/तीन हजार फूट उंचीवर जवळच्या पाणवठ्याचं पाणी, रानभाज्या आणि भाकरी यांच्यावर गुजराण करीत सुमती, मंदा, सुमन, काळाबाई आणि विमल या उघडे आडनावाच्या मुली अवघ्या ५-१० वर्षांच्या आहेत. त्यांचा हा वनवास मात्र त्यांना शिक्षणापासून दूर ठेवतो आहे. पण त्यांचे हे धाडस अतुलनीयच मानावे लागले. जर आपण कळसुबाईला किंवा परिसरात येणार असु तर आपल्याला शक्य ती मद्त स्थानिक लोकांना करता येईल असे पाहिले पाहिजे.
आणखी थोडंसं पुढे निघताच आपण येतो इथल्या 'तळा'वर! होय, हा एक छोटासा 'तळ'च असतो. ही असते इथली एक लहानशी सपाटी आणि या सपाटीवरील वाटेच्या दोहोबाजूसही आपणांस दिसून येतो तो पूजासाहित्याची दुकाने आणि उपहारगृहांचा आणखी एक छोटासा समूह! आणि.. नावही याचे 'तळ'च! अगदी एखाद्या 'तळा'ला साजेसा!
या तळाला लागूनच असते एक लहान अन छानशी विहीर.. अगदी थंड अन गोड अशा पाण्याची! तिथल्याच उपलब्ध पोहऱ्याने पाणी शेंदून काढून, पोटभर पाणी पिऊन घ्यायचे आणि पुढे पाणी मिळण्याची शक्यता नसल्यामुळे थोडं सोबतही घ्यावे. पुन्हा आपली वाटचाल सुरु होते. कळसूबाई ने जिथे भांडी घासली होती तिथे ही विहीर निर्माण झाल्याचे आख्यायिका आहे. एकूण या विहिरीजवळ चे सोयीयुक्त घरगुती हॉटेल हे रात्री मुक्काम करण्यासाठी शेवटचे ठिकाण आहे. पुढे मुक्काम करायचा असेल तर सोबत तंबू म्हणजे टेंट असणे आवश्यक आहे.
येथून पुढील वाट ही पूर्ण पणे निर्जन आहे आणि ही वाट कधीही संपणारी वाटते. वरील टप्प्यात एका खांबावर एक लाईटचा दिवा चालू आहे इथं पर्यंत येण्यासाठी जागोजागी दिशादर्शक बाण हे दगडांवर रेखाटलेले आहेत.
येथून पुढील वाट ही पूर्ण पणे निर्जन आहे आणि ही वाट कधीही संपणारी वाटते. वरील टप्प्यात एका खांबावर एक लाईटचा दिवा चालू आहे इथं पर्यंत येण्यासाठी जागोजागी दिशादर्शक बाण हे दगडांवर रेखाटलेले आहेत.
पोटभर पाणी पिल्यानं आपण ताजेतवाने तर झालेलोच असतो शिवाय अंतिम टप्पाही जवळ आल्याचं पाहून इथवर येता झालेला शीणही केंव्हाच पळून गेलेला असतो. आणखी थोडं वर निघता शिखरमाथ्याखालील तो संपूर्ण कठडामार्ग, ती अंतिम शिडी आणि फडकता भगवा असं मनमोहक दृश्य नजरेला खूपच भावतं. पाय आता आणखी भर भर चालण्याचा प्रयत्न करतात. ते काहीसं जमतही! आणि. अखेर तिसरी शिडी चढली जाते. आपण आता अंतिम टप्पात येतो. आता शिखरमंदीर केवळ काही फुटांवरच असते.आता वेध लागतात शिखराचे आणि शिखरावरून दिसणाऱ्या भोवतालाला निरखण्याचे व त्याची छायाचित्रे काढण्याचे. मंदिर दृष्टिपथात येताच पावल जवळपास धावतच सुटतात. हातात मोबाइल वा टॅबलेट नसतानाही मिळालेला हा ‘टेम्पल रन’चा अनुभव जाम थ्रिलयुक्त भन्नाट असतो.
एखाद्या डोंगरी किल्ल्याचा बालेकिल्ला असावा अशी शेवटची टेकडी लागते. तिथवर जायला पूर्वीची साखळीची वाट, अलीकडेच लोखंडी शिडी लावलेली वाट आणि थोड प्रस्तरारोहण करीत शिखरमाथा गाठायला २-३ पाऊलवाटाही आहेत.
कळसूबाईच्या माथ्यावरचा मोठा प्रस्तर आधी चढून जायला लागायचा. आता मात्र तिकडे लोखंडी शिडी लावली आहे. अगदीच उत्साह असेल अंगात तर डाव्या बाजूच्या जुन्या मार्गानं साखळी पकडून वर चढून जाता येतं. येथे तिसरी आणि शेवटची शिडी लागते आणि ती पार केल्यावर थोड्याशा चढाईनंतर तुम्ही पोहोचता महाराष्ट्रातील सर्वोच्च जागेवर, महाराष्ट्राचे एव्हरेस्ट ,सहयाद्रीची अनभिषिक्त सम्राज्ञी शैल कळसूबाई वर!!! मंदिराच्या आतमध्ये मात्र कळसुबाईची मुर्ती नाही, तर तांदळा स्वरुपात मुर्ती आहे.अश्या अनगड ठिकाणाची देवता देखील तशीच हवी ना !
जवळपास ४ तास चढाई केल्यानंतर देवीच्या दर्शनाला माथ्यावर पोहचतो. माथ्यावरील मंदिर एकदम लहान आहे. छपरासकट संपूर्ण बांधकाम दगडी आहे. उंची फार तर ४-५ फूट असेल. बाहेरुनच देवीचं दर्शन घेतलं. आणि महाराष्ट्रातल्या सर्वोच्च शिखरावर आपण पोहोचलो असतो. आकर्षक आणि देखण्या अशा शेंदरी रंगामध्ये रंगवलेलं ते मंदिर.. बाजूचा त्या काही फडकत्या भगव्या पताका असलेले ते ध्वज.. मंदिराजवळील ती पूजासाहित्याची दुकाने आणि काही 'हौसे-नवसे' भक्त तर काही आपले 'छंदबंधू' तथा 'भटकंतीभाऊ' अशी भाऊ-भक्तांची मांदियाळी! गडावर क्वचितच दिसणारं असं नवखं दृश्य आपलं दुरुनच चांगलंच लक्ष वेधून घेतं.
इथे शिखरावर येताच आसपास काही माकडे दिसतात. ‘तुम्ही इथे येणारे पहिलेच नाही, गर्व नको लेको’ हे अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठीच तर निसर्गाने ही पूर्वजांची योजना तिथे केलेली नसेल ना!
शिखराच्या कळसूबाई मंदिरातील देवीदर्शन झालं की आजूबाजूला काही ठिकाणी लोखंडी रेलिंग लावलं आहे. तिथवर जाऊन चहूकडे नजर फिरवावी. तिथून दिसणारा सभोवतालचा नयनरम्य परिसर न्याहाळणे हा एक अनुभव आहे. प्रत्येक दुर्गप्रेमीने तो प्रत्यक्ष घ्यायलाच हवा. अहाहा... काय वर्णन करावं…अगदी नाकासमोरच असलेल्या डोंगरगर्दीत 'अलंग-मदन-कुलंग' हे अफलातून असं गडत्रिकुट त्यांच्या बेलाग-बुलंद रूपाने आपल्याला भलंच मोहात गुंतवितं तर त्याअलीकडील छोटंसं 'ढेकूळ'ही आपल्या चांगलंच नजरेत भरतं. येथून नजर हटते न हटते तोच डावीकडील रतनगड, त्याबाजूचा खुटा अन पाबरगड स्पष्ट तर अगदी कारंडा, आजोबा, पाथरा, कात्राबाई, मुढा, घनचक्कर ही अख्खी रांगही अस्पष्टशी परंतु सरावानेच नजरेत भरते. त्याखालील भंडारदऱ्याचा विशाल जलाशय नि भोवतालची निसर्गसृष्टीही प्रसन्न नेत्रसुख देते.
| अगदी मागे.. अलंग-मदन-कुलंग |
तिथं पोहोचताच दिसणारं अगदी नाकासमोरच असलेल्या डोंगरगर्दीत 'अलंग-मदन-कुलंग' हे अफलातून असं गडत्रिकुट त्यांच्या बेलाग-बुलंद रूपाने आपल्याला भलंच मोहात गुंतवितं तर त्याअलीकडील छोटंसं 'ढेकूळ'ही आपल्या चांगलंच नजरेत भरतं. येथून नजर हटते न हटते तोच डावीकडील रतनगड, त्याबाजूचा खुटा अन पाबरगड स्पष्ट तर अगदी कारंडा, आजोबा, पाथरा, कात्राबाई, मुढा, घनचक्कर ही अख्खी रांगही अस्पष्टशी परंतु सरावानेच नजरेत भरते. त्याखालील भंडारदऱ्याचा विशाल जलाशय नि भोवतालची निसर्गसृष्टीही प्रसन्न नेत्रसुख देते.
| विस्तीर्ण भंडारदरा जलाशय अन त्यामागे अस्पष्टसा रतनगड |
उत्तरेला तर अख्खी सातमाळ रांगच, अगदी अचला, अहिवंत ते अगदी रवळ्या-जवळ्यापर्यंत, आपल्याला लुभावते.रामशेज किल्ला, त्याच्यामागून डोकावणारे सातमाळा डोंगररांगेतील सप्तशृंग-मार्कंडा-धोडप खुणावतात.
मन आणि नेत्राला स्वच्छंद सुखावत मातादर्शनासाठी मागे येताच समोर, पूर्वेकडील औंढा, पट्टा, बितनगडही आपल्याला तेवढंच सुखवितात. डावीकडची शेंडी, आंबेवाडी, उडदावणे, पांजरे, इंदोरे तर आल्या बाजूची बारी, पेनशेत ही गावेही या 'गडगोकुळा'त स्वच्छंद नांदताना दिसतात. आई कळसुबाईचं दर्शन तर भलंच पण हे 'गडगोकुळ'ही आपल्याला चांगलंच मंत्रमुग्ध करते.पश्चिमेकडे दूर अंतरावरील माहुली, माथेरान, पेब, स्वच्छ हवा असेल तर हरिश्चंद्रगड, कात्राबाई दिसू शकतात. ज्या बाजूनं वर चढून आलो तिकडं छोटसं बारी गाव दिसत होतं. भाताची ती शेतं आता छोटी-छोटी खाचरं भासत होती. ते दृश्य डोळ्यात साठवून घ्यायचे आणि मग पुन्हा ती लोखंडी शिडी उतरुन परतीच्या वाटेला लागायचे.
अर्थात कळसुबाईची हि भेट धावती करायची कि इथे एक मुक्काम करायचा याचा निर्णय आपण आपली वेळ आणि सवड पाहून करु शकतो. येथे शिखरावर प्रचंड वेगाने वारे वाहतात, मुक्काम कोठे करायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. पण एक भन्नाट अनुभव घ्यायचा असेल येथेच योग्य जागा शोधून टेंट टाकून तळ ठोका. सोबत गरम कपडे असुद्यात. रात्री वाहणारा वारा आणि दिवसभर केलेल्या प्रवासामुळे,चढाईचा श्रमामुळे चटकन डोळा लागतो आणि केव्हा घोरायला लागतो हे ही कळत नाही. जाग आली तर ती सुद्धा टेंट चा हालचालीमुळे!!!
रात्रीचा गाढ झोपेमुळे आणि आजूबाजूचा वातावरणातील जादुई हवेमुळे कधीही लवकर न उठणारे येथे स्वतःहून पहाटे उठून बसतात आणि मग आस लागते सुर्यदेवतेचा आगमनाची. हा सूर्योदय काय जादू दाखवतो हे पाहून निशब्द व्हाल आणि या क्षणी विविध रंगाछटांनी आभाळ हे भरून जाते.येथे अनुभवलेली पहाट अन तो सूर्योदय हा तुमचा आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण ठरतो! हा अनुभव घ्यायचा असेल तर लगेच तयारीला लागा.
“सह्याद्रीच्या उच्च शिखरा
नाव तुझे कळसूबाई
राकट विलोभनीय
सर्वार्थानं शोभे हे रुप
एव्हरेस्टला ही साद घालशी
भूषण आमच्या महाराष्ट्र देशी....”
या शिखरसाम्राज्ञीवर उभारल्यावर इथला सुर्यास्तही तितकाच खास असतो. शक्य झाल्यास त्याचाही अनुभव घ्यावा.
यापुर्वी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही ऋतुत कळसुबाईवर स्वताचा असा वेगळा नजारा पहायला मिळतो.पावसाळ्यात इथे निसर्ग उधाणलेला असतो. प्रचंड उंचीमुळे कळसुबाई ढगांच्या वर असते. सहाजिकच 'आज मै उपर,आसमां नीचे' अशी अवस्था बघायला मिळते.
जर सकाळी लवकर किंवा भल्या पहाटे कळसुबाई चढायला सुरवात केली, तर सकाळी उगवत्या सुर्याची किरणे योग्य कोनात आणि खाली बाष्पयुक्त ढग असतीत तर इंद्रवज्र उर्फ गोल इंद्रधनुष्य आणि त्यात आपली सावली पहायला मिळते. दुर्मिळ असा हा क्षण साधता आला तर मणिकांचन योग होतो.
खाली उतरताना पाहिलेला सुर्योदयचा आनंद आणि सर्वोच्च शिखरावर जाऊन आलेला अभिमान सतत चेहऱ्यावर पसरलेला असतो. खाली उतरताना लवकर उतरण्याचा प्रयत्न करा. वाटेत लागणाऱ्या कोणत्याही हॉटेलमध्ये पोटभर नाश्ता करा.(कारण पुढे प्रवासात जेवायला मिळायची संधी कमी असते.)
इंदोरे मार्गे कळसुबाई शिखर :-
आता इंदोरे गावाकडून कळसुबाई शिखराच्या चढाईची माहिती घेउया. कळसुबाई शिखराला डाव्या आणि उजव्या बाजुला थोडी सपाटी आणि त्याला जोडणार्या डोंगरधारा आहेत. त्यामुळे या दोन्ही बाजुने चढणार्या वाटा आहेत. दक्षिणेकडून उडदवणे गावातून तर उत्तरेकडून इंदोरे गावातून वाट चढते.इंदोरे हे गाव कळसुबाईच्या उत्तर पायथ्याशी वसले आहे. इंदोरेला जायचे असेल तर घोटीवरुन भंडारदर्याकडे जाताना कळसुबाईच्या पायथ्याच्या बारी गावाच्या अलिकडे इंदोरे गावाचा फाटा येतो. हाच रस्ता पुढे अलंग-मदन-कुलंग या दुर्गत्रयीच्या पायथ्याच्या आंबेवाडीकडे जातो.इंदोरेला जायचे तर घोटीवरुन खाजगी जीप घासाघीस करुन ठरवावी लागते. स्वतःचे वाहन असेल तर अर्थातच उत्तम.इंदोरे गावातून शिखराकडे जाण्यासाठी वाटाड्या मिळु शकतो. इंदोरेकडून चढणार्या वाटेवर हल्लीच कोणीतरी लाल रंगाचे बाण रंगवले आहेत. इकडून कळसुबाई शिखराचा त्रिकोणी आकार दिसतो. इंदोरेकडील वाट हि सर्वात सोपी आहे.मुख्य म्हणजे या वाटेवर शिड्या नाहीत. त्याएवजी कातळकोरीव पायर्या आहेत.स्थानिक लोक या वाटेने केवळ पाउण ते एक तासात शिखरावर पोहचतात.बारीच्या वाटेने चढताना शेवटपर्यंत शिखर दिसत नाही तर या वाटेने चढताना शिखरमाथा सतत नजरेसमोर असतो.
आता इंदोरे गावाकडून कळसुबाई शिखराच्या चढाईची माहिती घेउया. कळसुबाई शिखराला डाव्या आणि उजव्या बाजुला थोडी सपाटी आणि त्याला जोडणार्या डोंगरधारा आहेत. त्यामुळे या दोन्ही बाजुने चढणार्या वाटा आहेत. दक्षिणेकडून उडदवणे गावातून तर उत्तरेकडून इंदोरे गावातून वाट चढते.इंदोरे हे गाव कळसुबाईच्या उत्तर पायथ्याशी वसले आहे. इंदोरेला जायचे असेल तर घोटीवरुन भंडारदर्याकडे जाताना कळसुबाईच्या पायथ्याच्या बारी गावाच्या अलिकडे इंदोरे गावाचा फाटा येतो. हाच रस्ता पुढे अलंग-मदन-कुलंग या दुर्गत्रयीच्या पायथ्याच्या आंबेवाडीकडे जातो.इंदोरेला जायचे तर घोटीवरुन खाजगी जीप घासाघीस करुन ठरवावी लागते. स्वतःचे वाहन असेल तर अर्थातच उत्तम.इंदोरे गावातून शिखराकडे जाण्यासाठी वाटाड्या मिळु शकतो. इंदोरेकडून चढणार्या वाटेवर हल्लीच कोणीतरी लाल रंगाचे बाण रंगवले आहेत. इकडून कळसुबाई शिखराचा त्रिकोणी आकार दिसतो. इंदोरेकडील वाट हि सर्वात सोपी आहे.मुख्य म्हणजे या वाटेवर शिड्या नाहीत. त्याएवजी कातळकोरीव पायर्या आहेत.स्थानिक लोक या वाटेने केवळ पाउण ते एक तासात शिखरावर पोहचतात.बारीच्या वाटेने चढताना शेवटपर्यंत शिखर दिसत नाही तर या वाटेने चढताना शिखरमाथा सतत नजरेसमोर असतो.
इंदोरे गावातून दिसणारे कळसुबाई शिखर
अर्थात हि वाट तुलनेने रुळलेली नाही आणि बहुतेकवेळा स्थानिक गावकरी वापरतात. त्यामुळे शक्यतो वाटाड्या घेतलेला चांगला. मुख्य म्हणजे या वाटेवर घसारा असल्यामुळे उत्तम ग्रीप असणारे शुज आवश्यक आहेत. हि वाट थोडी कातळावरुन एका सपाटीवर पोहचते.इथे एकच झाड आहे.इथून आपल्याला दोन डोंगर चढायचे असतात. या वाटेवर मातीचा घसारा आहे.तो मात्र जपून पार करायचा. सगळ्यात शेवटी कातळटप्पा लागतो. या वाटेवर कोणतीही तांत्रिक चढाई नाही, त्यामुळे रोप वगैरे लागत नाहीत.मात्र पुरेसा अनुभव आणि ग्रीप असणारे बुट, काठी हे आवश्य्क आहे.पावसाळ्यात हा मार्ग टाळलेला बरा.
सुरवातीला चढाई सुरु केली कि खालून भिमाकाय कडा दिसतो. तिथे चढणारी वाट मात्र घसार्याची आहे. पावसाळ्यात तर हि वाट घसरगुंडीसारखी होते. हा टप्पा गाठला कि मोठे मोठे दगड असलेला एक उभा चढ लागतो.इथे दगड आणि जमिन असल्यामुळे अजिबात ‘ग्रीप’ मिळत नाही.तिथून काही वेळातच अजून एक मोठा पण सोपा चढ चढलो कि एका पठारावर पोहोचतो. इथे थोडा वेळ विश्रांती घ्यायची मात्र नजर घडाळ्यावर ठेवूनच कारण ‘थांबला तो संपला ‘ हे लक्षात ठेवायचे.
पुढचा बराच चढ सरळ रस्ता आहे.यानंतर आपण एका मोकळ्या पठारावर पोहोचतो. इथे खुप वारे असते.रौद्र रूप’,’तुफान’,’सोसाट्याचा’ अश्या सर्व विशेषणांच्या पार होत हे वारे वहात असते. त्या पठारावर मध्ये एक छोटस तळ आहे व उघड्यावरच मारूतीची एक मूर्ती आहे. क्षणभर वाटून गेल इथे आपल्या पुत्राला भेटायला साक्षात पवनदेव तर नाही ना आले, असे वाटते.
काही वेळ त्या पठारावर घालवल्यावर हळूहळू पुढील पायपीट सुरु करायची.एव्हाना आपण निम्मी चढण पार केलेली असते.काही वेळाने एका डोंगराला वळसा घालून पुढे गेल्यावर एक अतिशय कठीण घळ लागते. इथे बाजूला वर चढायला दगडी पायरया आहेत. त्या दगडी पायरया चढून झाल्यावर एव्हाना चांगलाच थकवा आलेला असतो म्हणून वर थोडी विश्रांती घ्यायची. अर्थात आपण उंची गाठल्यामुळे हवेत गारवा आलेला असतो.हवा स्वच्छ असेल तर इथूनच आपल्याला अंतिम लक्ष्य अर्थात कळसुबाईचे शिखर दिसते. यानंतर शेवट्ची टेकडी चढून आणि कातळटोपीला बसवलेली शेवटची शिडी चढून आपण माथ्यावर एकदाचे पाउल ठेवतो.
उडदवणे मार्गे कळसुबाई शिखर :-
उडदवणे हे गाव अलंगगडाच्या पायथ्याचे गाव म्हणून भटक्यांना परिचित आहे.मात्र या गावातून एक वाट थेट कळसुबाईला जाते याची फार थोड्यांना माहिती आहे.ज्यांना थोड्या ऑफबीट वाटा वापरायच्या आहेत्,त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. मात्र या वाटेने उडदवणे ते कळसुबाई हि वाटचाल जवळपास २० कि.मी. आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. या वाटेने जाताना डाव्या हाताला कळसुबाई डोंगररांग सतत सोबत असते. या डोंगररांगेतील तीन शिखरे किर्डा ( ११८७ मीटर ) ,साकिरा ( १५८० ) आणि सरते शेवटी कळसुबाई ( १६४८ मीटर ) अशी शिखरे पार करुन आपण शैल कळसुबाईच्या माथ्यावर पोहचतो. तेव्हा पुरेशी शारिरीक क्षमता, अनुभव असलेल्यांनीच हि वाट वापरावी.
अर्थातच या वाटेन जायचे तर वाटाड्याशिवाय पर्याय नाही.
कळसुबाई शिखराचे उडदवणे गावातून दर्शन
उडदवणे कडून शिखराकडे चढणारी वाट
खुप अंतर चालून आलो तरी अद्याप कळसुबाई शिखराचे दर्शन नाही.
चालताना मागे वळून बघीतल्यावर दिसणारा अलंगगड
उडदवणे गाव खुप मागे राहिले आहे.
भंडारदरा जलाशयाचे दर्शन
रॉक पॅच
हा ट्प्पा मात्र खरोखर अवघड आहे. इथे केवळ अर्धा ते एक फुटाचे होल्ड आहेत.आणि चुक करायला काहीही संधी नाही.कारण मागच्या बाजुला दरी आहे.
रॉक पॅचच्या आधीचा ट्रॅव्हर्स
वाटेत असणारा पाण्याची एकमेव उपलबधता
संदर्भ :-
१) अहमदनगर जिल्हा गॅझेटीयर
२) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर
३) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
४) www.trekshitiz.com हि वेबसाईट
५) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
६) डोंगरमैत्री - आनंद पाळंदे
७) http://ratangadbhandardaratrek.blogspot.com, https://vayudatt.wordpress.com, http://ishwargaikwad.blogspot.com, https://pilankar.wordpress.com हे ब्लॉग
१) अहमदनगर जिल्हा गॅझेटीयर
२) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर
३) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
४) www.trekshitiz.com हि वेबसाईट
५) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
६) डोंगरमैत्री - आनंद पाळंदे
७) http://ratangadbhandardaratrek.blogspot.com, https://vayudatt.wordpress.com, http://ishwargaikwad.blogspot.com, https://pilankar.wordpress.com हे ब्लॉग
































































No comments:
Post a Comment