Thursday, October 20, 2022

पाबरगड

     कोणताही गिरिदुर्ग मुलतः लष्करी कारणामुळे उभारलेले ठाणे असते.सहाजिकच गड्,दुर्गावरच्या इमारती,तट,बुरुजाचे बांधकाम, वाटा या सर्वांचे बांधकाम करताना संरक्षण हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून बांधणी केली असते. अर्थात गडमाथ्याचा विस्तार, भौगोलिक स्थान, प्रमुख शहरापासूनचे अंतर या सर्वांचा विचार करुन गडाचा विस्तार निश्चित केला असतो. यामुळे जाही गड्,किल्ले अवशेष संपन्न दिसतात, तर केवळ निरीक्षणाचे ठाणे म्हणून उभारलेले काही गडावर अत्यल्प अवशेष नजरेला पडतात. अश्याच गिरीदुर्गापैकी एक म्हणजे कळसुबाई-हरिश्चंद्रगड या परिसरातील भंडारदरा धरणाच्या पाण्यात प्रतिबिंब पहाणारा पाबरगड.हा गड तसा अनवटच म्हणायला हवा. अगदी नियमित दुर्गभ्रमंती करणारेही क्वचितच या गडावर गेले असतील. पायथ्याचे गावकरीही इथे पायधुळ झाडतात, ती गडमाथ्यावर असणार्या दैवतांमुळे, ते ही कारणानिमीत्ताने. 

    
 
        नगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसर म्हणजे भटक्यांचे नंदनवन. इथेल किल्ले म्हणजे रांगडे सौंदर्यसह्याद्रीच्या कातळकड्यांनी वेढलेला हा भाग रतनगड, अलंग, मदन, कुलंग या सारख्या अनेक किल्ल्यांची माळ ल्यालेला आहे. एकाहून एक सरस असलेले हे किल्ले जातीवंत भटक्याचा देखील कस काढणारे आहे. या किल्ल्र्‍यांची उंची खूप, चढायला कठीण आणि जाण्याचे मार्गही जरा कठीणच आहेत. चढाईच्या बाबतीत दुर्गप्रेमींची परीक्षा घेणारा या माळेतील अजुन एक मणी म्हणजे किल्ले पाबरगड. याच्या नावात पहा-बर-गड असे असले तरी पहाण्यासाठी हा गढ तितकासा सहजसाध्य नाही. याचे कारण म्हणजे गडावर जाण्यासाठी करावी लागणारी तीन तासाची खडी चढाई. हा किल्ला छोटासाच पण रांगडागडी, आपले दंड थोपटून उभा आहे.  वास्तविक हा गड आधी ट्रेकर्सच्या वावराने आणि सांदण दरी, रंधा धबधबा अश्या प्रसिध्द झालेल्या स्थळांमुळे पर्यटकांच्या गर्दीने हा परिसर फुलून जातो. पण तरीही पाबरगडावर जाण्याचे कोणी मनावर घेत नाही. गडाची चढणही खडतर, मुरुमाड, गवताळ घसारा आणि सावली देणार्या झाडांची वानवा. सहाजिकच उपेक्षेच्या गर्तेत सापडलेल्या या गिरीदुर्गाला आज भेट द्यायची आहे. 
 
 
 
 
नदीचे खोरे.. सर्वात उंच दिसतो तो पाबरगड !

      भंडारदरा - संगमनेर मार्गावर ‘ पाबरगड’ आहे. गुहिरे हे पाबरगडचा पायथ्याचं गाव, पाबरगडच्या घेऱ्यात असलेल्या मुद्खेल व गुहीरे या दोन्ही गावातुन गडावर जाण्यासाठी वाट असली तरी मुदखेल येथुन गडावर जाणारी घळीची वाट घसाऱ्याची व तीव्र चढाईची असल्याने या वाटेचा वापर शक्यतो टाळलेला बरा. या वाटेच्या तुलनेने गुहीरे गावातुन गडावर जाणारी काहीशी सोपीच म्हणावी लागेल. गुहीरे गाव घोटी - संगमनेर मार्गावर वसलेले असुन इगतपूरी किंवा घोटीहून संगमनेर, अकोले किंवा पुणे अशी कोणतीही बस पकडून या गावात जाता येते. मुंबई-नाशिक महामार्गावरील घोटी फाट्यापासून हे अंतर ३७ कि.मी.आहे. पाबरगडसाठी तुमची खाजगी गाडी असेल तर उत्तम. कारण मुंबई ते गुहिरे अंतर १८२ किमी आहे. त्यामुळे प्रवासाला ४ ते ५ तास लागतात. मुंबईवरुन जायचे असेल तर इगतपुरी किंवा घोटी वरून पुणे, संगमनेर आणि अकोले ला भंडारदरा, राजूरमार्गे जाणारी भेटेल ती एसटी पकडणे सोयीचे. सकाळी ५ ची इगतपुरी- पुणे एसटी ५. १५ ला घोटीला येते. त्याने सकाळी ६. ४५ ला गुहिरेला पोहचता येते. कसारा ते गुहिरे एकूण अंतर ६७ किमी आहे. एसटीने या प्रवासाला एक तास वीस मिनटं लागतात. घोटी ते गुहिरे पर्यंत अंतर ४०. ७ किमी आहे. गुहेरी एसटी थांब्याचा बाजूने गावात डांबरी रस्ता जातो. रस्त्याने आत गेलो असता सरळ आपण मारुतीच्या मंदिराजवळ पोहचतो. 

 गुहिरे गावातून दिसणारा पाबरगडच्या शिखर
    रस्ता

        गुहिरे गावात शिरण्यापूर्वी काही अंतरावरून गडाचे ओझरते दर्शन होते. भंडारदराचा विल्सन धरणाच्या पुढे आहे. भंडारदरा धरणाचा दरवाजा समोर आल्यावर, रस्त्याला समोर पूर्ण डोंगर आडवा दिसतो. तोच हा पाबरगड. विशेष म्हणजे पाबरगड आपल्याला गुहिरे गावातून पूर्ण दिसत नाही. गावातून केवळ गडाचं शिखर दिसते.  गावात आल्यावर त्याच्या अलीकडे असलेल्या दुसऱ्या डोंगरामुळे हा गड नजरेस पडत नाही. गावातून जेव्हा आपण ट्रेक करत डोंगराच्या सोंडेवर पोहचतो तेव्हा पूर्ण गड दिसू लागतो.या डोंगराची एक धार गावाच्या मागील बाजुस उतरलेली असुन या धारेवरूनच पाबरगडवर जाण्याचा मार्ग आहे.

गावातील मारुतीरायांचे देऊळ..(रात्री गावात थांबायचे झाले तर उत्तम जागा).
 देवळाच्या बाजूलाच काही विरगळी आहेत..

 गावात मुक्काम करायचा असल्यास गावातील हनुमान मंदीरात रहाता येते तसेच मंदिराजवळ असलेल्या घरात चहा-पाण्याची व जेवणाची घरगुती सोय होते. मंदिराच्या आवारात काही घडीव थडी मांडलेली आहेत. 
प्राचीन असे वाटणारे घराचे जोते/ चौथरे

गावातून जाताना काही घरांचे जोते बघितल्यावर हि घर जुन्या काळातील असावीत असे वाटते.

               गुहीरे गावातील हनुमान मंदीराच्या मागून एक वाट गडावर जाते.मंदिराच्या उजव्या बाजूने, एक मोठी वाट सरळ जाते. ती पुढे जाऊन एका घरा समोर रस्ता संपतो आणि वाट डावीकडे वळते. त्या वाटेने आपण गावाच्या पाठी मागे जातो. वाटेतच एका पाण्याची आधुनिक टाकी लागते. तिच्या जवळून वाट डोंगरावर चढते. 
 
 पाबरगडाच्या कुशीत वसलेले गुहिरे गाव
 
 
 पाण्याची टाकी व गुहिरे गाव
 
या धारेवर गावकऱ्यांचे गोठे असल्याने तेथे जाणारी वाट चांगली मळलेली आहे. तिथून पुढे आपल्याला शेतातून सिमेंटची टाकीच्या बाजूने वाट वर डोंगरात जाताना दिसते. त्या वाटेने चालू लागावे. टाकीचा बाजूने वर चढल्यावर पुढे वाटेला वाट फुटतात. या धारेने वर चढुन आल्यावर पाबरगड व त्यापुढे असलेला डोंगर व त्याची या पठाराकडे उतरत आलेली सोंड याचे दर्शन होते. 
 
 गुहिरे गावातून पाबरगडाकडे चढ्णारी वाट
 
येथुन गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. पहिली वाट म्हणजे या उतरत आलेल्या सोंडेवरून वरील डोंगराच्या तळाशी जाणे व तेथुन डोंगराचा कडा डावीकडे व दरी उजवीकडे ठेवत पाबरगड व त्यासमोरील डोंगर यामधील खिंडीत जाणे. दुसरी वाट म्हणजे सोंडेवर न चढता उजवीकडील पायवाटेने सोंड व डोंगर यांना तळातुन वळसा मारत पाबरगड व समोरचा डोंगर यामधील घळीच्या तळात येणे व तेथुन उभा चढ चढुन वरील खिंडीत येणे. यातील दुसरी वाट पहिल्या वाटेच्या तुलनेने सोपी असली तरी शेवटच्या टप्प्यात मात्र चांगलीच थकवणारी आहे. 

 

 
सोंडेवरून गडावर वाट कशी जाते लाल तुटक रेषेने अंदाजे दाखवले आहे. अचूक दाखवता येत नसल्याने अंदाजे दाखविलं आहे.
       इथे पठारावर असलेल्या आंब्याचा झाडाकडून उजवीकडे गेल्यावर आपण  एका मोकळ्या जागी पोहचतो. तिथून सोंडेच्या टोकाला जाऊन तिथून वाट गडावर जाते, सोंड चढायला सुरवात करायची. सोंडेवर पोहचताच आपल्याला उजवीकडे आडवा पाबरगडचा मुख्य डोंगर दिसायला लागतो. आणि खाली भंडारदरा धरणाचा पसरलेला जलाशय. पहिली वाट पकडल्यास पुढे आपण एका कातळ कड्यापाशी येतो, त्याला उजवीकडे ठेऊन वर जाता येते. कातळकड्याच्या वर पोहोचल्यावर थोडी सपाटी लागते. या सपाटीवर बरीच झाडे आहेत.

सोंडेचा डोंगर संपला एकदाचा.. मागे धुक्यात धुंद असणारा पाबरगड

 
 
 
 माथ्याच्या आधी लागणारी टेकडी
 
 पावसाळ्यात येथील वातावरण मंत्रमुग्ध करुन टाकणारे असते. या पठारावरुन किल्ल्याचे लपलेले टोक दिसते. किल्ल्याच्या समोर असणार्‍या डोंगराची एक सोंड या पठारावर आलेली दिसते. या सोंडेवरुन चढायला सुरुवात केल्यावर अर्ध्या तासात वाट उजवीकडे वळते आणि कडा डावीकडे ठेऊन किल्ल्याच्या दिशेने सरळ पुढे जाते. वीस मिनिटात आपण किल्ला आणि समोरच्या डोंगराची खिंड यामध्ये येऊन पोहोचतो. 
 
 

 

 
  
ह्या कातळटोपीच्या बाजूने उजवीकडून पाठी दिसणाऱ्या पाबरगड कडे वाट जाते. खालील फोटोत वाटेतून जाताना काढलेला फोटो
 

इथून अजून पाबरगडचा मुख्य डोंगर पुढे आहे. त्यासाठी पुढे चाल करायची. डोंगरावर आल्यावर, आपल्याला समोर डोंगराची कातळ टोपी किंवा डोंगराचे दुसरे शिखर लागते. ह्या कातळाच्या बाजूने उजवीकडून वाट पुढे गडाकडे जाते.वाट कडेने जात असल्यामुळे जरा जपून  जायायला लागते. उजवीकडे खाली दरी लागते. त्यात डोक्यापर्यंत गवत असल्यामुळे पुढची वाट लगेच दिसत नाही. येथेच वर असलेला छोटासा कातळकडा चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या माचीवर (पठारावर) पोहचतो. 
 
 

          हि वाट कातळटोपीचा डोंगर जेथे संपतो आणि पाबरगडाचा डोंगर लागतो. त्या घळीमधून उजवीकडे पाबरगडावर जाते. कातळाटोपीच्या बाजूचा वाटेने घळी मध्ये पोहचायला  २० मिनटं लागतात. तिथून उजवीकडे वर पाबरगडचा मुख्य डोंगर चडू लागायचे.पायथ्यापासुन या खिंडीत येण्यासाठी दीड तास पुरेसा होतो. येथे कातळकडयाला लागुनच गडावर जाणारी वाट आहे. 
 
 
 
खिंडीतून गडावर जाणाऱ्या वाटेवर अवघड ठिकाणी वनखात्याने २०२१ साली संरक्षक कठडे व ३० फुट उंचीच्या दोन शिड्या लावल्याने पुढील वाट सोपी झालेली आहे. या वाटेने थोडे पुढे आल्यावर वनखात्याने लावलेली पहिली शिडी लागते. या शिडीखाली तसेच शिडीच्या वरील भागात कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसुन येतात. येथुन पुढील वाट दाट कारवीच्या रानातुन वर चढत जाते. गडावरील भैरोबाच्या दर्शनाला गावकरी जात असल्याने वाट चांगली मळलेली आहे. या वाटेने साधारण २० मिनिटे चढाई केल्यावर आपण किल्ल्याच्या कातळकड्यापाशी येतो. येथून किल्ल्याच्या माथ्यावर जाणारी वाट असुन वनखात्याने या ठिकाणी दुसरी शिडी लावलेली आहे. शिडी चढण्याआधी एक पायवाट कडयालगत पुढे जाताना दिसते.
पहिली गुहा
 
या वाटेवर दोन गुहा बाजूबाजूला आहेत. ह्या दोन्ही गुहा बघितला वर नेसर्गिक वाटतात. त्यातली पहिला गुहा पूर्णपणे कोरडी आहे. पहिल्या गुहेत काही प्रमाणात खोदकाम केलेले आहे. येथे कातळात कोरलेले आयताकृती आकाराचे पाण्याचे कोरडे टाके आहे. गडावर रहायचे असल्यास १०-१२ लोक या गुहेत सहज राहु शकतात. 
 


 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 दुसऱ्या गुहेत असलेली महादेवाची पिंड आणि त्याचा सामोर भग्न अवस्थेत असलेला नंदी
 
या गुहेच्या पुढील भागात दुसरी नैसर्गिक गुहा आहे. त्या गुहेत शिरल्यावर डाव्या बाजूला कातळावर एक लहान पिंड लागते, आणि त्याचा समोर जीर्ण अवस्थेत असलेला नंदी दिसतो. बाकी गुहेत साधारण अर्धाफुट खोल एवढं पाणी साचलेला आहे.यातील पाणी वरवर खराब दिसले तरी पाण्याचा वरचा थर बाजूला केला की, आत सुंदर, सुमधुर पाणी आहे. पाणी स्वच्छ आणि पिण्यायोग्य आहे. पाण्याचे टाके बर्‍यापैंकी मोठे नि खोल कपारीपर्यंत पसरलेले आहे.. थोडक्यात पाण्याचा मुबलक साठा ! रविवारी गावातले बरेचशे भाविक या गडावरच्या ‘भैरोबा’ देवतेला भेटायला येतात.. भैरोबाचे मंदीर गडाच्या अगदी माथ्यावर आहे.. तिथे जाण्यापुर्वी या शिवलिंगाचे दर्शन घेतात.. बाजुलाच असणार्‍या टाकीतल्या पाण्याचा अभिषेक करुन हात जोडून भैरोबाच्या दर्शनाला पुढे जातात..रविवारी आपण पाबरगडावर आलेलो असु तर या गावकर्यांची सोबत आपल्याला लाभते.
 
   गुहा बघून पुन्हा जिथे गडाचा कातळ (कातळटोपी) लागतो तिथे यावे. गडाचा शेवटचा टप्पा म्हणजे कातळटप्पा तसा चढायला कठीण आणि पावसाळ्यात आल्यास तो अजूनच निसरडा असतो. या कातळट्प्प्याने चढताना एका अडचणीच्या ठिकाणी वाट अवघड जाते. एक चुकीची स्टेप किंवा पाय सरकला तर सरळ खाली दरी. मात्र सुदैवाने आता इथे वनखात्याने शिडी बसवून हा टप्पा सोपा केला आहे आणि आपल्यासारख्या भटक्यांचा दुवा घेतला आहे. 

 
कातळाच्या पायऱ्या आणि बाजूला दिसणारं बुरुज अथवा चौकीचा चौथरा
शिडी चडून वर आल्यावर, आपल्याला वर कातळातल्या पायऱ्या लागतात. आणि उजवीकडे बहुतेक उध्वस्त बुरजाचा अथवा चौकी (किंवा घराचा) चौथऱ्याचा पायथ्या दिसतो. इथून आपण पाच मिनटात गड माथ्यावर पोहचतो. 

 
 
पठारावर तीन पाण्याची टाकं आहेत. त्र्‍यांच्या समोर शिवलींग आहे टाक्यातील पाणी खराब आहे.
       दुसऱ्या टाक्याकडून पुढे जाणारी वाट गडाच्या माथ्यावर जाते पण या वाटेने न जाता आपण दरीच्या काठाने तसेच पुढे जावे. साधारण ५० पाउले पुढे गेल्यावर आपल्याला खालील बाजुस उतारावर असलेला गडाचा उत्तराभिमुख दरवाजा व त्याशेजारी असलेली तटबंदी नजरेस पडते. दरवाजाची अर्धी कमान ढासळलेली असुन त्याखाली कातळात कोरलेल्या १०-१२ पायऱ्या आहेत. गडावर येण्याचा हा मुळ मार्ग आज वापरात नसुन आपण गडावर केलेला प्रवेश हा भग्न तटबंदीतुन झालेला आहे. दरवाजा पाहुन मुळ वाटेपाशी परतायचे आणि किल्ल्याच्या पठारावर पोहोचायचे. 
 
 

पठारावर कातळात कोरलेली पाण्याची चार टाकी असुन या टाक्याच्या काठावर भैरोबाचे भग्न मंदिर आहे.उघड्यावर आहे.


  भैरोबाचे छप्परवजा मंदीर
 
 
 
 
 
भैरोबा मंदीर आणि गणपतीची मुर्ती
 
 मंदिराची बाजूची दगडाची भिंत साधणारं गुडघ्यापर्यंत अजून साबूत आहे. मंदीरात काळा व भगवा शेंदूर फासलेले भैरोबाचे दोन तांदळा असुन एक गणपतीची मूर्ती आहे. मंदिराला लागूनच, पाठी पाच सहा टाक्यांचा समूह लागतो. त्यातील ३ टाकीत पाणी दिसते. पण पाणी पिण्यायोग्य नाही. ह्या टाकीच्या बाजूने, वाट पुढे हनुमानाच शिल्प असलेल्या टाकीकडे जाते. तर मंदिराचा बाजूने एक वाट डावीकडे गडाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या टाक्यांकडे घेऊन जाते. तर एक वाट समोर गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाते.
 
 पाबरगडाचा सर्वोच्च माथा
 
 भैरोबाचे दर्शन झाल्यावर तेथील टेकडी चढुन आपण गडाच्या सर्वोच्च भागात येतो.या भागात वेताळाचे भग्न मंदिर व तांदळा वगळता इतर कोणतेही अवशेष दिसत नाही. गडमाथा समुद्रसपाटीपासुन ४११५ फुट उंचावर असुन गडाची माची दोन डोंगरावर विभागली आहे. किल्ल्याचे बहुतांशी अवशेष हे आपण असलेल्या पुर्व-पश्चिम माचीवर पसरलेले असुन दक्षिणोत्तर असलेल्या दुसऱ्या भागात केवळ पाण्याचे एक टाके आहे. हा संपुर्ण परिसर साधारण १५ एकर आहे. 
 
 
 
 
 अलंगगड
 
 कळसुबाई शिखर
 
 रतनगड

भंडारदरा जलाशय आणि कळसुबाई रांग

येथुन अलंग-मदन-कुलंग,रतनगड,पट्टा हे किल्ले तसेच कळसुबाई,घनचक्कर,मुडापर्वत ही शिखरे नजरेस पडतात. पाबरगडाच्या खालील भागात भंडारदर्यालचा अथांग जलाशय पसरलेला आहे.

      आता आलो त्या मार्गाने परत न जाता विरुद्ध दिशेने टेकडीखाली उतरावे. येथे उतरताना माचीवर असलेली एकुण चार टाकी नजरेस पडतात. यातील तीन टाक्यात हिरवेगार पाणी असुन एक टाके मात्र फुटलेले आहे. माचीच्या या टोकावर एका मोठ्या वास्तुचे अवशेष आहेत. या माचीवरून संपुर्ण टेकडीला वळसा घालता येतो पण काही ठिकाणी वाट धोक्याची आहे. या टेकडीला डावीकडुन वळसा घालत म्हणजे टेकडी उजव्या बाजुस व दरी डाव्या बाजुस ठेवत थोडे पुढे आल्यावर तीन भुमिगत दरवाजे पहायला मिळतात. स्थानिक लोक या ठिकाणास कोठार म्हणुन ओळखतात.
 
 मुळात हे पाण्याचे एक टाके असुन त्याच्या दर्शनी भागात असलेल्या दोन खांबांमुळे हे तीन वेगळे दरवाजे असल्यासारखे वाटतात. हे टाके गडाची प्राचीनता दर्शविते. या टाक्याचे आतील बाजुस दोन भाग पाडलेले असुन उतारावर असल्यामुळे वरील बाजुने वाहुन आलेली माती याच्या मधील तोंडावर मोठ्या प्रमाणात जमा झालेली आहे. टाके पाहुन झाल्यावर मागे फिरावे व आता टेकडीच्या उजवीकडून आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करावी. या वाटेने जाताना दरीकाठावर चौकीचे अवशेष दिसुन येतात. टेकडीला फेरी मारताना हि वाट खाली किल्ल्याच्या माचीसारख्या दिसणार्याे दुसर्याा डोंगरावर जाते. या दोन डोंगरांना जोडणाऱ्या घळीत किल्ल्याचा दुसरा दरवाजा असुन आज त्याचे केवळ अवशेषच शिल्लक आहेत. घळीत उतरल्यास खालील बाजुस या दरवाजाचा चौथरा व काही बांधकाम पहायला मिळते. हा दरवाजा कोकण दरवाजा म्हणुन ओळखला जातो. मुतखेल गावातुन येणारी वाट घळीतुन या दरवाजाने वर येते. गडाच्या दुसऱ्या डोंगरावर एक कोरडे टाके व दोन चौथरे वगळता इतर कोणतेही अवशेष नाहीत. हे सर्व पाहुन झाल्यावर मूळ वाटेवर येत आपली टेकडीची पुढील फेरी सुरु करावी. वाटेच्या पुढील भागात कातळात कोरलेले पाण्याचे एक मोठे टाके असुन या टाक्याच्या काठावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे.
हनुमान टाके (मारुतीरायांपर्यंत पोचण्यास कोरलेल्या पायर्‍या आहेत)

हे टाके पाण्याने भरलेली आहे पण पाणी पिण्यायोग्य वाटत नाही. हनुमंताचे  शिल्प एक ते दीड फूट उंचीच असून टाकीच्या वर कातळाचा भिंतीवर साधारण १० फुटावर असेल. मूर्तीच्या बाजूला छोट्या कातळ पायऱ्या  तिथं पर्यंत पोहचण्यासाठी कोरलेल्या दिसतात. पठारावरुन बालेकिल्ला डावीकडे ठेवत, एक वाट किल्ल्याच्या माचीसारख्या दिसणार्‍या दुसर्‍या भागावर जाते.

 घळ नि बाजूच्या डोंगरावर जाणारी वाट
गडाची एक सोंड बाहेर येते. त्याच वर असलेली टाकी लाल वर्तुळात दर्शवली आहे
टाकीच्या बाजूने पुढे वाट थोडी खाली जाताना दिसते. हि वाट आपल्या उजव्या बाजूला बाहेर दिसणारी डोंगराची एक शाखा/ सोंड आली आहे. त्याचावर जाते.  तेथे हि १/२ टाकी आहेत. हि शाखा /सोंड गड माथ्याच्या उंची पेक्षा थोडा खाली असल्यामुळे ती तुम्हाला सर्वोच्च माथ्यवरून किंवा शिल्पच्या टाकीजवळून हि दिसते. इथे जाउन यायचे तर अजून येऊन जाऊन वीस मिनटं लागतात.
   टाके पाहुन पुढे आल्यावर आपण भैरोबा मंदीराजवळ पोहोचतो व आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण गडफेरी करण्यास साधारण एक तास लागतो. इतिहासात या किल्ल्याची कोठेच नोंद आढळत नसली तरी मराठ्यांचा या भागातील वावर पहाता शिवकाळात हा किल्ला स्वराज्यात असावा असे वाटते.
 गड चढायला अंदाजे साडेतीन तास आणि उतरतेवेळी सव्वा दोन तास लागतात. अर्थातच वाट चुकली नाही तर ! एकंदरीत प्रसिध्दीच्या झोतापासून दुर असणारा हा गड माथ्यावरुन भंडारदरा- कळसुबाई परिसराचे दृष्य एका वेगळ्या कोनातून दाखवतो. यासाठी तरी पाबरगडाला अवश्य भेट दिली पाहिजे. 
संदर्भ :-
१) अहमदनगर जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
४) www.durgbharari.in हि वेबसाईट
५) www.trekshitiz.com  हि वेबसाईट
६) https://kunalstrek.blogspot.com, https://yorocks.wordpress.com/ हे ब्लॉग
७) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट





















































पाबरगड ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  




/2018/12/youtube-httpsyoutu.html





No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...