
व्यापाराला चालना द्यायची असेल तर त्याच्यासाठी काही मुलभूत गोष्टींची आवश्यकता असते. त्यात दळणवळणासाठी चांगले रस्ते आणि दळणवळणाची साधने यांना अतिशय महत्व आहे. दळण वळणाच्या या साधनांमुळे व्यापारवृध्दी होत असते.
मानवाने आपले भटके जीवन संपवले आणि तो एके ठिकाणी वस्ती करुन राहू लागला. अशा छोट्या वस्त्यांना जोडणारे लहान मार्ग तयार झाले व त्या मार्गांवरुन अशा वस्त्यांमधे वस्तूंची देवाणघेवाणही चालू झाली. काही विशिष्ठ वस्त्यांवर मानवाला लागणार्या नैसर्गिक गोष्टींची मुबलकता असल्याने अशा वस्त्यांवर लोकसंख्या वाढू लागली. लोकसंख्या वाढीमुळे अशा वस्त्यांवर मानवाच्या रोजच्या जीवनाशी निगडीत असणार्या वस्तूंची गरजही वाढली. त्यातूनच मग अशा वस्त्यांना जोडणारे मोठे रस्ते निर्माण झाले व त्या रस्त्यांवरुन दळण वळण चालू झाले.
ह्डप्पा व मोहेंजोदडो येथे झालेल्या उत्खननात उत्कृष्ट दर्जाच्या नियोजीत शहरांचे पुरावे मिळाले आहेत.भाजलेल्या विटांपासून बांधलेली घरे, रुंद रस्ते,रस्त्याच्या कडेला पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेली गटारे तसेच घराच्या आवारात बांधलेल्या विहीरी अशाअनेक पुराव्यांवरुन हे लोक पारंगत होते याची कल्पना येते. अशा शहरांना जोडणारे अनेक रस्ते त्याकाळात बांधले गेले. या लोकांचा व्यापार हा केवळ त्या वस्त्यांपुरताच नव्हता. त्यांचा व्यापार हा सुदुर मेसोपोटेमीयापर्यंत चालत असे.
छोट्या छोट्या वस्त्यांमधूनच पुढे छोटी जनपदे, महाजनपदे व मोठी साम्राज्ये निर्माण झाली. प्राचीन भारतातील अनेक मोठ्या शहरांचा उल्लेख आपल्याला प्राचीन ग्रंथांमधे सापडतो. आजच्या सारखे रस्त्यांचे जाळे नसले तरी या शहरांना जोडणारे अनेक महामार्ग त्याकाळी बांधले गेले होते. या मार्गांवरुन अनेक श्रेणी व्यापारासाठी मार्गक्रमण करत असत. गंगा व यमुना या नद्यांच्या खोर्यातील प्रदेश हा अत्यंत सुपिक आहे. त्यामुळे प्राचीन काळी या खोर्यांमधे अनेक मोठ मोठी शहरे अस्तित्वात आलेली दिसतात. पाटलीपुत्र (सध्याचे पटना), श्रावस्ती (उत्तर प्रदेश), राजगृह (बिहार) ही मगधांची राजधानी, संकिस्सा (उत्तर प्रदेश), कपिलवस्तू (नेपाळ), बनारस, नालंदा (बिहार), विदिशा (मध्य प्रदेश), तक्षशीला (पाकिस्तान) अशी अनेक मोठी शहरे उत्तर भारतात भरभराटीला आली होती. या सर्व शहरांना जोडणारे रस्ते होते. याचबरोबर गंगा व यमुना नदीच्या पात्रांमधून जहाजातून मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे.
उत्तर भारतातून दक्षिणेकडे येताना मधे विंध्य पर्वतरांग ओलांडावी लागते. याचबरोबर वाटेत नर्मदा नदीही ओलांडावी लागते. या पर्वत रांगेतून अनेक घाटमार्गाने अथवा या पर्वतरांगेला वळसा घालून दक्षिणेकडे येता येते. उत्तर भारतातून या मार्गांनी अनेक व्यापारी तांडे दक्षिणेकडे येत असत. तगर (तेर), प्रतिष्ठान (पैठण), जुन्नर, अमरावती (आंध्र प्रदेश) तसेच भरुकच्छ (भडोच), शुर्पारक /सुप्पारक (नालासोपारा), चौल या बंदरांचा उल्लेख आलेला आहे. उत्तर भारतातील आणि दक्षिणेकडील शहरे जोडणारे अनेक मार्ग होते.
वैदिक साहित्यात व्यापारासाठी वाणिज असा शब्द आढळतो. ऋग्वेदात असलेल्या काही उल्लेखांमधे आपल्याला वस्तुविनिमयाचे (Barter) संदर्भ सापडतात. ऋग्वेदात आलेल्या एका ऋचेमधे एक ऋषी दुसर्या ऋषींना इंद्राच्या मूर्तीची किंमत दहा गायींएवढी सांगतात. आर्य कुठून भारतात आले या बद्दल अनेक मतांतरे सापडतात. वैदिक साहित्यात मोठ्या व लांबवर जाणार्या मार्गांवरुन चालणार्या दळणवळणाचा उल्लेख सापडतो. याचबरोबर ऋग्वेदात नद्या पार करण्यासाठी बांधण्यात येणार्या सेतूंचाही उल्लेख सापडतो. अथर्ववेदातील उल्लेखाप्रमाणे मालवाहतूक करणार्या गाड्यांचे मार्ग हे काहीसे उंच असत आणि या मार्गांच्या दोन्ही बाजूस झाडे लावलेली असत. हे मार्ग अनेक गावांमधून व शहरांमधून जात असत. अथर्ववेदात या मार्गांवरील तीर्थांचा उल्लेख सापडतो. जिथे नद्या ओलांड्याव्या लागत तेथे घाट बांधले जात. अशा ठिकाणी वाटसरूंना मुक्काम करावा लागत असे. त्यातुनच विश्रामगृहे व अतिथीगृहे बांधली गेली. अशा नद्या किंवा डोंगर पार करण्याच्या जागीच अनेक तीर्थक्षेत्रे विकसीत झालेली दिसतात. नद्यांच्या संगमांच्या ठिकाणी एकाच वेळी दोन नद्या पार करता येत असल्याने तेथेही तिर्थस्थाने निर्माण झाली. अथर्ववेदात अशा जंगलातून जाणार्या मार्गांवर असलेल्या श्वापदे आणि लुटमारांपासून सुरक्षित राहण्यासाठी इंद्राची प्रार्थना करावी असे म्हणले आहे. वैदिक काळात व्यापारी या मार्गांवरुन मार्गक्रमण करत. त्यांचा उद्देश व्यापारातून पैसा मिळवणे हा तर होताच त्याबरोबर आपल्याला अधिक फायदा मिळवण्यासाठी मार्गक्रमण करुन ते दूरवरच्या शहरांमधे आपला माल विकण्यासाठी जात होते.
बौध्द जातककथा या इ.स.पू. २ र्या शतकात लिहिल्या गेल्या. जातककथांमधे तत्कालीन सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब पडलेले आहे. या कथांमधे अनेक श्रेणींचा उल्लेख आलेला आहेच त्याच बरोबर अनेक व्यापारी मार्गांचाही उल्लेख आलेला आहे. यात सार्थवाह कुठल्या मार्गाने जात असत याचेही उल्लेख आलेले आहेत. प्राचीन काळी लोक अनेक उद्देशाने प्रवास करत असत. व्यापाऱ्यांशिवाय यात्रेकरु, विद्यार्थी, भिक्षू तसेच मनोरंजन करणारे कलाकारही प्रवास करत असत. अशा प्रवास करणार्या लोकांच्या अनेक कथा आपल्याला जातककथांमधे सापडतात. एका कथेत एक ब्राह्मण जहाजातून सुवर्णद्वीपाला (आग्नेय आशिया) गेल्याचा उल्लेख आलेला आहे. दरिमुख जातकात दरिमुखाने तक्षशीला येथे आपले शिक्षण घेतले व त्याने विविध प्रदेशांची यात्रा केली. एक अश्वविक्रेत्याची कथा येते. त्यात तो उत्तर भारतातील मार्गाने आपले ५०० अश्व घेऊन वाराणसीला पोहोचला असा उल्लेख सापडतो. या जरी कथा असल्या तरी या कथांमधे तत्कालीन मार्ग, श्रेणी यांचा उल्लेख महत्वाचा ठरतो.
प्राचीन व्यापारी मार्गांचा आढावा घेताना आपल्याला मौर्य साम्राज्यकालीन परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे ठरते. आधीच्या छोट्या छोट्या जनपद, गणराज्यांनंतर मौर्यांचे एकसंघ असलेले मोठे साम्राज्य पहिल्यांदाच अस्तित्वात आले. मौर्य साम्राज्याचा विस्तार किती होता या बद्दल अनेक मतांतरे असली तरी याचा अंदाज आपल्याला सम्राट अशोकाने लिहिलेल्या शिलालेखांवरुन घेता येतो. सम्राट अशोकाने हे लेख लोकवस्तीजवळ, व्यापारी मार्गांवर तसेच तीर्थस्थानांजवळ कोरवले आहेत. याच लेखांवरुन मौर्य साम्राज्याचा विस्तारही आपल्याला कळतो. या सर्व लेखांचा विषय धर्माज्ञा असून त्या लोकांनी वाचाव्यात व त्याचे पालन करावे हा त्यामागील हेतू आहे. या लेखांमधे कलिंग, गांधार, अपरान्त, केरल या प्रदेशांची तसेच चोल, पांड्य, यवनराज अंतियक अशा त्याच्या साम्राज्याशेजारील राजवटींचा उल्लेख आलेला आहे. अशोकाचे हे प्रस्तरलेख गिरनार (गुजराथ), कालसी (देहरादून), शहाबाझगढी (पेशावर), मन्सेरा (हजारा, पाकिस्तान), धौली (ओडिशा), जौगढ (ओडिशा), सोपारे (नालासोपारा), एर्र्गुड्डी (आंध्र प्रदेश) येथे आहेत. ह्या सर्व ठिकाणी त्याकाळी मोठ्या प्रमाणावर वर्दळ चालत असावी. त्याच बरोबर अशोकाचे अनेक लेख भारतातील मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांमधेही सापडले आहेत. यावरुन या सगळ्या प्रदेशांमधे रस्ते होते व त्यांचा वापर व्यापारी व यात्रेकरु मोठ्या प्रमाणात करत असावेत.
या मोठ्या नगरांना जोडणारे मार्ग त्याकाळी होते. जसे जमिनीवरुन जाणारे मार्ग होते तसेच नद्यांच्या पात्रांमधून जहाजमार्गेही मार्गक्रमण चालत होते. त्याकाळी मुख्यत: उत्तर भारतातील उत्तरपथ आणि दक्षिण भारतातील दक्षिणपथ हे मुख्य मार्ग होते ज्यावरुन लोक मोठ्या प्रमाणात मार्गक्रमण करत असत. उत्तरपथ हा तक्षशीला येथुन चालू होत असे. हा मार्ग गंगेच्या त्रिभुज प्रदेशातील महत्वाचे बंदर ताम्रलिप्ती पर्यंत जात असे. याच बरोबर उत्तर भारतातील महत्वाची नगरे बनारस, मथुरा, कौशांबी, श्रावस्ती, राजगृह, पाटलीपुत्र या सर्व शहरांना जोडणारे रस्ते होते. याचबरोबर गंगा व यमुना नदीच्या पात्रांमधून जहाजे वापरुन मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. बनारसच्या पुढे गंगा व ब्रह्मपुत्रा यांचा जेथे संगम होतो तेथून ब्रह्मपुत्रेच्या पात्रातून जहाजातून आसामकडे मार्गक्रमण केले जात असे. दक्षिणेकडे जाणारे मुख्य मार्ग म्हणजे मथुरेकडून चंबळच्या खोर्यातून एक मार्ग उज्जैन व महिष्मती (माहेश्वर) येथे जात असे. तेथुन तो मार्ग सातपुडा पर्वतरांग व तापी नदीचे खोरे पार करुन एक मार्ग सुरतकडे तर दुसरा मार्ग पश्चिम घाटाकडे जात असे. राजस्थानातून एक मार्ग अरवली पर्वतरांगांमधून दक्षिणेकडे जात असे. उज्जैनवरुन माळव्यामार्गे भरुकच्छ (भडोच) आणि सुप्पारक (सोपारा) या बंदरांकडे जाणारे मार्ग होते. दक्षिणेकडे पैठण, जुन्नर येथून नाणेघाटातून अपरांतात उतरणारा घाटमार्ग पुढे कल्याणहून चौल व सोपारा या बंदराकडे जाता येते. सह्याद्रीतील अनेक घाटमार्गातून कोकणात उतरता येते. या मार्गांवरुन मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. माळव्यातून येणारा एक मार्ग नाशिकमार्गे सोपार्याकडे जात असे. प्रयागवरुन एक मार्ग नागपूर येथून आंध्र प्रदेशकडे जात असे. परंतू या मार्गात मोठी मोठी अरण्ये असल्याने हा मार्ग फारसा वापरात नव्हता. पश्चिम महाराष्ट्रातून अनेक मार्ग दक्षिणेकडे कांजिवरम, कलीकत व रामेश्वरला जात असत. कृष्णा व तुंगभद्रा नदीच्या खोर्यांमधून अनेक मार्ग दक्षिणेकडे जात असत. दक्षिणेकडील मार्गांचे फारसे लिखित पुरावे आढळत नाहीत.
हे मार्ग महत्वाच्या शहरांना जोडत असत व अशा अनेक मार्गांवरुन प्रवासी, यात्रेकरु, भिक्षू आणि व्यापारी तांडे मार्गक्रमण करत असत.

क्रमशः
देशाचा कारभार चालवण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात पैशांची जरुरी भासत असते. सरकारचे उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे कर. देशातील नागरिकांकडून सरकार वेगवेगळ्या करांद्वारे पैसे गोळा करते. यात मुख्यत: आयकर, व्यवसायाशी निगडीत असलेला व नुकताच लागू झालेला GST अशा करांबरोबरचबरोबर सरकार अनेक वेगवेगळे कर नागरिकांकडून गोळा करते.

भारत सरकारने कर किंवा शुल्क गोळा करण्यासाठी वेगेवेगळी तिकीटे काढली. ही तिकीटे तंबाखूवरील कर, मद्यावरील कर, करमणूक कर, टेलिफोन कर, शेअर व्यवहारातील कर, दस्तऐवजावरील कर, पासपोर्ट फी, व्हिसा फी, परिक्षा फी, कोर्ट फी अशा कामांकरता वापरली जात. या तिकीटांना रेव्हेन्यू किंवा फिस्कल तिकीटे असे म्हणले जाते. आपण वापरतो ती रेव्हेन्यू तिकीटे टपाल खात्यामार्फत वितरीत केली जातात पण ही तिकीटे टपाल पाठवण्यासाठी वापरली जात नाहीत. ही तिकीटे एखाद्या पावतीवर किंवा वस्तूवर चिकटवली जातात. या चिकटवलेल्या तिकीटांवरुन त्या वस्तूवरील कर किंवा शुल्क भरल्याचे कळते. याचप्रमाणे कोर्टातील विविध दस्तऐवजांवर कोर्ट फी तिकीटे लावलेली असतात. स्टॅम्प पेपर हे देखील फिस्कल या प्रकारातच येतात. कोर्ट फी स्टॅम्प व स्टॅम्पपेपर यांचे वितरण महसूल खात्यामार्फत केले जाते.
ब्रिटिश सरकारने फिस्कल तिकीटांमार्फत वेगेवेगळ्या गोष्टींवरील शुल्क गोळा करण्यास सुरुवात केली. कोर्टातील दाव्यांच्यासाठी जशी कोर्ट फी तिकीटे असत तशीच कोर्टातील एखाद्या दस्ताची दुसऱ्या प्रतीच्या लिहणावळीसाठी कोर्ट फी तिकीटांमार्फत शुल्क आकारले जाई. मनोरंजनाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या तिकीटांवरही कर वसूल केल्याची फिस्कल तिकीटे लावलेली असत. याचबरोबर अनेक संस्थानांनी आपली फिस्कल तिकीटे काढली होती. हैद्राबाद संस्थानाने जंगलातील झाडे तोडण्यासाठी किंवा तेथे गुरे चरण्याच्या परवानगीसाठी फिस्कल तिकीटे काढली होती. याचबरोबर ताडीच्या व्यवसायाच्या परवान्यांसाठीही त्यांनी तिकीटे काढली होती.
प्राचीन भारतातील कररचना
राज्यकारभार करतानाच राज्यकर्त्याला जनतेसाठी कल्याणकारी कामेही करावी लागतात. पण यासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा? त्यासाठी राज्यकर्त्याला कररुपाने पैसे गोळा करावे लागतात आणि या पैशातून जनतेला उपयोगी पडतील अशी कामे तो करतो.
कौटिल्याने इ.स.पू. ३र्या शतकात अर्थशास्त्रावर ग्रंथ लिहिला. हा कौटिल्य म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचा सल्लागार आर्य चाणक्य असावा असे मत अनेक तज्ज्ञांनी मांडले आहे. तर कौटिल्याच्या या ग्रंथाचे नाव जरी अर्थशास्त्र असले तरी त्यात त्याने राज्य कसे चालवावे, शत्रू कसा ओळखावा, शत्रूवर मात करण्यासाठी कुटिल डाव कसे रचावेत अशा अनेक विषयांचा उहापोह केलेला आहे. त्यातच त्याने कररचनेवरही भाष्य केले आहे. त्यात तो म्हणतो कर हा फुलातील मधासारखा असावा. मधमाशी जेव्हा फुलातील मध शोषुन घेते तेव्हा फुलाला कुठलाही त्रास होत नाही.त्याचप्रमाणे जनतेकडून कर घेताना त्याचा त्रास जनतेला होता कामा नये. जर कराचा त्रास जनतेला होत असेल तर राज्यकर्त्याविषयी जनतेच्या मनात असंतोष निर्माण होतो. यातूनच राज्यसत्ता उलथून टाकण्याचे प्रयत्न सुरू होतात असे सर्वकालीन सत्य त्याने सांगितले आहे.
वैदिक काळात (वेदांचा काळ कुठला हे अद्याप ठामपणे कोणीच सांगू शकलेले नाही) भारतात अनेक लहान लहान जनपदे होती. जनपति हा जनपदांचा राजा असे. पण या काळात जनपतिला त्याच्या जनपदातील जनतेकडून कर गोळा करण्याचा कुठलाही अधिकार नव्हता. या जनपदांमधे सतत लढाया चालत. त्यांच्यातील बलवान जनपदांनी त्यांच्यापेक्षा दुर्बल जनपदांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यातूनच पुढे गणराज्यांचा उगम झाला. गणराज्यांमधे मात्र आपल्याला राज्यकाराभारात सुसुत्रता आलेली दिसते. राज्यकारभार चालवण्यासाठी वेगवेगळे विभाग तयार केले जात. हे विभाग त्यांना नेमून दिलेली कामे करत असत. गणराज्यांमधे प्रशासकीय विभाग असे. या विभागामार्फत करवसुली केली जात असे.
कर गोळा करण्याची पध्दत प्रत्येक गणराज्यामधे वेगवेगळी होती. या पध्दतीत सुसुत्रता आली ती मौर्य साम्राज्याच्या उदयानंतर. एकतर मौर्य साम्राज्याच्या अधिपत्याखाली मोठा भूभाग होता. त्यामुळे त्यांना कररचनेच्यादृष्टीने साम्राज्याच्या सर्व भागात करांमधे समानता आणणे गरजेचे होते. भारतातील अनेक व्यापारी मार्गांची माहिती मागील लेखांमधे आलीच आहे. या मार्गांवरुन मोठ्या प्रमाणात मालाची आवक-जावक चालू असे. अशा महामार्गांवर ठिकठिकाणी नाके असत. या नाक्यांवर जकात वसूल केली जात असे. साधारणत: मालाच्या किंमतीच्या १/५ इतकी जकात आकारली जात असे. कुठल्याही वस्तूची किंमत ठरवणे जिकिरीचे असे. त्याकाळीही जकात चुकवण्यासाठी वस्तूंच्या किंमती कमी सांगितल्या जात असाव्यात. सांगितलेली किंमत ही जकात वसूल करणार्या अधिकार्याला योग्य वाटली नाही तर तो एखाद्या तज्ज्ञ माणसातर्फे त्या वस्तूची योग्य किंमत ठरवत असे आणि त्यानुसार कर आकारत असे.
कुठल्याही मालाची किंमत ठरवण्यासाठी त्याची शुध्दता, वजन आणि मापे याचे प्रमाणिकरण आवश्यक असते. सिंधु संस्कृतीच्या उत्खननात अशी अनेक प्रमाणित वजने व मापे सापडली आहेत. याचबरोबर मनु, याज्ञवल्क्य, नारदस्मृती या ग्रंथांमधे वजने आणि मापांची माहिती दिलेली आहे. मौर्यकाळात उद्योगधंदे, व्यवसाय व व्यापारावर शासनाचे नियंत्रण असल्याने वजने व मापे यांच्यात सुसुत्रता होती. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात याची सविस्तर माहिती आलेली आहे. या वजने व मापांची कोष्टके कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आलेली आहेत.
परदेशातून वेगवेगळ्या प्रकारचा माल आयात होत असे. या आयात मालासाठी अनेक परवाने घ्यावे लागत. हे परवाने देणे व या परवान्यांचे शुल्क वसूल करण्यासाथी अंत:पाल नावाचा अधिकारी असे. त्याला सरहद्दीतून परवाना दिलेलाच माल देशात जात आहे ना यावर नजर ठेवावी लागे. वेगवेगळी हत्यारे, शस्त्रास्त्रे व पशू यांना आयात बंदी असे व मालात अशा वस्तू सापडल्यास मोठा दंड करुन या वस्तू जप्त केल्या जात. तसेच वेशीपासून जवळच्या गावापर्यंत या मालाच्या संरक्षणाची जबाबदारी या अधिकार्याची असे. या प्रवासात कुठल्याही प्रकारे मालाचे नुकसान झाले किंवा चोरी झाली तर त्या अधिकार्याला नुकसानभरपाई द्यावी लागत असे. आयात करणार्या प्रत्येक व्यापार्याचा एक शिक्का असे. त्यावरुन माल कुठल्या व्यापाराचा आहे हे कळत असे. शिक्का नसेल किंवा मालावर मारलेला शिक्का बदललेला असेल तर व्यापार्याकडून दंड वसूल केला जाई.
मौर्यकाळात वेगवेगळे व्यवसाय व व्यापार होते पण शेती हा त्यातील प्रमुख व्यवसाय होता. राज्यातील सर्व जमिन ही सरकारी असे. ही जमीन शेतीसाठी वापरायला दिली जात असे. त्या बदल्यात शेतकर्यांना सारा द्यावा लागत असे. शेतीत उत्पादीत होणार्या धान्यातील काही भाग सरकार जमा करावा लागत असे. याच बरोबर जमिनीवरील करही द्यावा लागत असे. याचबरोबर शेतीला लागणार्या पाण्यावरही कर द्यावा लागत असे. सम्राट अशोकाच्या शिलालेखांमधे या करांची, ते कर गोळा करणार्या अधिकार्यांची माहिती आलेली आहे. याचबरोबर रोजच्या खर्चासाठी निरनिराळ्या संघांना दिलेल्या जमिनींवरील माफ केलेल्या करांचीही माहिती आलेली आहे.
मौर्यकाळातील करांमधील ही सुसुत्रता मात्र नंतरच्या राजवटींमधे मात्र फारशी आढळत नाही.
ओडिशा स्थापत्यशैलीची सुरुवात ५ व्या शतकात झालेली होती. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नेश्वर या नावांनी असलेल्या मंदिराचा एक समूह भुवनेश्वरमध्ये आहे. या सर्व मंदिरांमधील शत्रुघ्नेश्वर हे मंदिर सर्वात प्राचीन आहे. शत्रुघ्नेश्वर मंदिराच्या बाजूलाच लक्ष्मण व भरत ही मंदिरे आहेत. पण या दोन्ही मंदिरांची बरीच पडझड झालेली आहे. या तीनही मंदिरांच्या समोरील बाजूस रामेश्वर हे मंदिर आहे. पण त्याच्या स्थापत्यशैलीवरुन ते नंतरच्या काळात बांधले गेले असावे असा अंदाज बांधता येतो.
लिंगराज मंदिराच्या परिसरात बिंदुसागर तलावाच्या भोवती अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. अनेक मंदिरे ही खाजगी जागेतही आहेत. या सर्व मंदिरांमधील काही मंदिरे म्हणजे मुक्तेश्वर, परशुरामेश्वर, वेताळ, सिध्देश्वर ही शैव मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांमधे अनंत वासुदेव हे एकमेव वैष्णव मंदिर आहे.
परशुरामेश्वर मंदिर
हे मंदिर ६ व्या शतकात बांधले गेले. हे मंदिर पश्चिमाभिमूख असून हे मंदिर आत्ताच्या जमिनीच्या पातळीपासून थोडे खाली आहे. गर्भगृहावर शिखर म्हणजेच रेखा देऊळ असून त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. ओडिशा शैलीतील मंदिरांमधे गर्भगृहाच्या समोर भोगमंडप असतो व त्यावर पॅगोडाच्या आकाराचे शिखर असते. या शिखराला ओडिशा शैलीमधे पिढा देऊळ असे संबोधले जाते. परशुरामेश्वर मंदिरात गर्भगृहासमोर आयताकृती मंडप असून त्यावर शिखर नाही. मंडपाचे छप्पर उतरते आहे. मंडपाच्या भिंतींना जाळीच्या खिडक्या आहेत. मंदिर हे शिवाचे असून या मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीवर सप्तमातृका व गणपतीचे सुंदर शिल्प आहे. याचबरोबर मंदिराच्या बाहेरील भिंतींवर अनेक कोनाडे (देवकोष्ट) आहेत. या देवकोष्टांमधे कार्तिकेय व गणपतीची शिल्पे आहेत. याच बरोबर बाहेरील भिंतींवर अनेक प्राण्याची व उपासकांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. या मंदिराच्या परिसरातच एक सहस्त्रलिंगही आहे. ऒडिशा मधे लकुलीश या शिव भक्ताने स्थापन केलेल्या पाशुपत पंथाचा प्रभाव होता. परशुरामेश्वर मंदिरावर लकुलीशाचे शिल्पांकन आढळते.

वेताळ मंदिर
वेताळ देऊळ हे परशुरामेश्वर या मंदिराच्या नंतरच्या कालखंडात बांधले गेले. या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे त्याचे शिखर. दक्षिणेकडील मंदिरांना गोपुरे असतात. त्याच पध्दतीचे हे शिखर आहे. या शिखराला खाकरा शिखर असे म्हणले जाते. या मंदिराला इंग्रजी T आकाराचा मंडप असून त्यावर कुठलेही शिखर नाही. या मंदिराच्या प्राकारात आणखी चार लहान मंदिरे आहेत. या मंदिराचे नाव वेताळ असले तरी गर्भगृहात चांमुडा देवी आहे. या मंदिरावरही लकुलीशाची प्रतिमा कोरलेली आहे.

मुक्तेश्वर मंदिर
एका प्राकारात असलेले ह्या मंदिरावरील नक्षीकाम अतिशय सुंदर आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख असून या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वाराशी असलेले मकरतोरण. या मंदिरामधे पूर्ण विकसीत झालेली ऒडिशा शैली बघायला मिळते. या मंदिराच्या मागील बाजूस एक पाण्याचे कुंड आहे. मुक्तेश्वर मंदिराच्या शेजारीच सिध्देश्वर मंदिर आहे.

अनंत वासुदेव मंदिर
बिंदूसागर तलावाच्या काठाशीच अनंत वासुदेव हे एकमेव विष्णूचे मंदिर आहे. मंदिराचे विधान (Plan) हा लिंगराज मंदिराप्रमाणेच आहे. या मंदिरात एका बाजूस मोठी पाकशाळा असून त्यात मंदिरात चढवण्यात येणारा भोग किंवा प्रसाद बनवला जातो. मातीच्या मडक्यांमधे भाताचे विविध प्रकार, भाज्या यापासून हा प्रसाद बनवला जातो.

राजा राणी मंदिर
११ व्या शतकात भुवनेश्वरच्या पूर्व भागात राजा राणी हे मंदिर बांधले गेले. एकांम्र पुराणात या मंदिराचे नाव इंद्रेश्वर असे आले आहे. या मंदिराचे शिखर हे पारंपारीक ओडिशा शैलीतील नसून ते नागर शैलीतील शेखरी शिखर आहे. मात्र गर्भगृहासमोरील जगमोहनावर मात्र पिढा देऊळ आहे. हे मंदिर बहुधा दोन वेगवेगळ्या कालखंडात बांधले गेले असावे कारण मंदिराच्या स्थापत्यात दोन वेगवेगळ्या प्रकारचे दगड वापरण्यात आले आहेत. सध्या मंदिराच्या गर्भगृहात कुठलीही मूर्ती नाही. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर सुंदर असे दिग्पाल कोरलेले आहेत. याचबरोबर भास्करेश्वर हे शिलास्तंभावर बांधलेले मंदिरही भुवनेश्वरच्या पूर्व भागात आहे.

भुवनेश्वरमधील या मंदिरांबरोबरच ओडिशातील एका वैशिष्ठ्यपूर्ण मंदिराचा उल्लेख करणे गरजेचे आहे. भुवनेश्वरपासून २० कि.मी. अंतरावर हिरापूर येथे चौसष्ट योगिनी नावाचे मंदिर आहे. शाक्त संप्रदायातील तंत्रमार्गी उपासकांचे हे मंदिर आहे. भारतात जी थोडी योगिनींची मंदिरे आहेत त्यातील हिरापूर हे एक महत्वाचे मंदिर आहे. ६४ योगिनींचे आणखी एक मंदिर मध्य प्रदेशातील रानीपूर येथे आहे. ६४ वेगवेगळ्या योगिनींच्या या मंदिराची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिराची रचना गोलाकार असते व मध्यभागी शिव किंवा भैरवाची स्थापना केलेली असते. मंदिराच्या गोलाकार भागात ६४ देवकोष्टांमधे ६४ योगिनींच्या मूर्ती असतात. हिरापूर येथील मंदिराचा व्यास ९ मीटर आहे. हे मंदिर इ. स. ९ – १० व्या शतकात बांधले गेले.

ओडिशातील मंदिरांचा घेतलेला हा आढावा येथे संपतो. ही मंदिर शैली ऒडिशाबाहेर फारशी बघण्यास मिळत नाही. या मंदिरांवरील कोरीवकाम, त्यांचे स्थापत्य यांचा आढावा लेखाद्वारे घेणे अशक्य आहे. त्यासाठी प्रत्यक्ष या मंदिरांना भेट दिली पाहिजे.
समाप्त


एखाद्या
गावावर एखादया देवतेचा किती प्रभाव असावा हे समजून घ्यायचं असेल तर
तुम्हाला जगन्नाथपुरीला गेलेच पाहिजे, इथे फिरताना सगळीकडे तुम्हाला
जगन्नाथाचे अस्तित्व जाणवत राहते. जगन्नाथाचे मोठे डोळे सतत तुमच्यावर नजर
ठेवत असताना तुम्हाला जाणवतात.
जगन्नाथपुरी हे तीर्थक्षेत्र भुवनेश्वर पासून ६४ किमी अंतरावर आहे.समुद्र किनाऱ्यावर वसलेले कोणार्कचे मंदिर बघुन आपण अचंबित होतो. याच समुद्र किनार्याने आपल्याला पुरीला जाता येते.भारतातील चार धामांमधील हे एक प्रमुख धाम आहे.
ओडिसामधील सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व मंदिरांमधे जगन्नाथपुरीचे मंदिर सर्वात उंच व भव्य आहे. हे मंदिर निलगिरी नावाच्या टेकडीवर आहे. या मंदिराच्या कळसाची उंची सुमारे २१४ फुट असून हे मंदिर ४००००० वर्ग फुट एवढ्या परिसरात पसरले आहे. या मंदिर परिसराला २० फुट उंचीची भव्य अशी तटबंदी आहे. मंदिराला चार दरवाजे असून मंदिरात प्रवेश करण्यासाठी सिंहद्वार हे मुख्य द्वार आहे. याच भव्य सिंहद्वारासमोर कोणार्कहून आणलेला अरुणस्तंभ बसवण्यात आलेला आहे. हे मंदिर इ.स. १२ व्या शतकात बांधले गेले. गंग वंशातील चोडगंगदेव याने हे मंदिर बांधले असावे असा अंदाज बांधला जातो तर काही तज्ज्ञांच्या मते अनंक भीमदेव याने हे मंदिर बांधले. या मंदिराच्या कळसावर गरुडध्वज असून पंचधातूचे सुदर्शनचक्र आहे. संपुर्ण कळसावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. ओडिशा मंदिरशैलीत गर्भगृहावरील कळसाला रेखा-देऊळ असे म्हटले जाते. देवळाच्या परिसरात आणखी ३० लहान मोठी वेगवेगळ्या देवतांची मंदिरे आहेत. देवळाच्या सर्व बाजूंवर सुंदर कोरीवकाम केलेले असून त्यात अनेक देवदेवतांची शिल्पे आहेत. देवदेवतांच्या बरोबरच अनेक कामशिल्पेही कोरलेली आहेत. गर्भगृहात जगन्नाथाबरोबर बलभद्र (बलराम) आणि सुभद्रा यांच्याही प्रतिमा आहेत. या मूर्ती लाकडापासून बनवलेल्या आहेत. मूर्तींना नाक, डोळे, तोंड एवढेच अवयव आहेत. जगन्नाथाला दिवसाच्या वेगवेगळ्यावेळी भोग चढवला जातो. इंग्रज कोणार्कला जसे ब्लॅक पॅगोडा असे म्हणत तसे जगन्नाथाच्या मंदिराला व्हाईट पॅगोडा म्हणत.
जगन्नाथपूरी हे जगन्नाथाच्या मंदिरासाठी जेवढे प्रसिध्द आहे तेवढेच ते तेथील आषाढात निघणार्या जगन्नाथ रथयात्रेसाठी प्रसिध्द आहे . मंदिराच्या गर्भगृहातील मूर्ती या यात्रेला एका मोठ्या लाकडी रथामधे बसवून त्यांची नगरयात्रा काढली जाते. रथाला ओढण्यासाठी मोठे दोरखंड लावलेले असतात व भक्त हा रथ ओढत असतात. या रथाच्या चाकाखाली चिरडून मेल्याने मोक्ष मिळतो अशी एक भावना भक्तांमधे होती. त्यामुळे अनेक भक्त रथासमोर प्राणत्याग करत. आता या प्रथेला बंदी घालण्यात आलेली आहे.
याचबरोबर पुरी मधे ८ व्या शतकातील शंकराचार्याचा मठ आहे. १५ व्या शताकातील बंगाल येथील वैष्णव संत चैतन्यमहाप्रभू यांचे अनेक दिवस येथे वास्तव्य होते.
क्रमश:
भारतीय टपाल खात्याने कोणार्कच्या सुर्यमंदिरावर आधारीत अनेक तिकीटे वेळोवेळी वितरीत केली आहेत.

स्वातंत्र्यप्राप्तीला दोन वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने १५ ऑगस्ट १९४९ या दिवशी भारतीय टपाल खात्याने पुरातत्व आणि ऐतिहासिक वारसा स्थळांवर आधारीत एक तिकीटांची मालिका काढली. या मालिकेमधे भारतातील विविध भागातील पुरातत्वीय व ऐतिहासिक स्थळांची चित्रे होती. त्यात भुवनेश्वर येथील लिंगराज नावाच्या मंदिराचे चित्र असलेले तिकीट दोन वेगळ्या रंगात छापण्यात आले होते.
ओडिशा स्थापत्य आणि मंदिर शैली
ओडिशा या राज्याचा इतिहास आपल्याला सम्राट अशोकाच्या काळात (इ.स.पू. ३ रे शतक) घेऊन जातो. सम्राट अशोकाच्या काळापासूनची अनेक स्थापत्य ओडिशा मधे आजही सापडतात. भुवनेश्वर पासुन जवळ असलेल्या धौली या गावात अशोकाने लिहिलेला एक प्रस्तरलेख सापडला आहे. या प्रस्तरलेखावर एका हत्तीचे शिल्प कोरलेले आहे. तसेच खुद्द भुवनेश्वरमधे अशोकाचा एक स्तंभ आहे. या स्तंभावरतीच नंतरच्या काळात भास्करेश्वर हे मंदिर बांधण्यात आले व स्तंभाचे रुपांतर शिवलिंगात करण्यात आले. सम्राट अशोकाने कलिंग देशावर स्वारी केली त्यावेळी झालेला संग्राम भुवनेश्वर परिसरातच झाला असे मानले जाते.

याचबरोबर भुबनेश्वर जवळच असलेल्या उदयगिरी व खंडगिरी या टेकड्यांवर जैन गुंफा कोरलेल्या आहेत. या गुंफासमुहातच जगप्रसिध्द खारवेलाचा लेख आहे. या शैलगृहांचा कालखंड इ.स.पू १ ले शतक आहे.
भारतातील मंदिर स्थापत्याचा अभ्यास करताना ओडिशा मंदिर शैलीचा वेगळा अभ्यास करणे जरुरीचे ठरते. साधारणत: नागर स्थापत्यशैली, द्राविड स्थापत्यशैली आणि हेमाडपंती (खरे तर अशा नावाची कुठलीही मंदिर स्थापत्य शैली अस्तित्वात नाही) या आपल्याला माहित असतात. ओडिशातील मंदिरांची स्थापत्यशैली नागर असली तरी ही मंदिरे वेगळी भासतात. याचबरोबर मंदिरांच्या स्थापत्यात वेगवेगळे प्रयोगही केलेले आढळतात. साधारणत: इ. स. ५ व्या शतकापासून ही मंदिरे बांधण्यास सुरुवात झाली.
भुवनेश्वर या शहरासंबंधी अनेक पौराणिक कथा सापडतात. प्राचीन काळी येथे भगवान विष्णूचे चक्रतीर्थ होते. येथील वनामधे एकच आम्रवृक्ष असल्याने त्याला एकाम्रकानन असेही नाव होते. भगवान शंकराला एकांतवासाची इच्छा झाली तेव्हा त्याने भगवान विष्णूस या वनात राहण्याची परवानगी मागितली. विष्णूंनी शंकराला तेथे कायम वास्तव्य करण्याची विनंती केली.
भुवनेश्वर येथील मंदिर समुहाजवळ बिंदूसागर नावाचा एक मोठा तलाव आहे. त्याबद्द्लची कथा अशे सांगितली जाते की शंकराने या स्थानाचे सुंदर वर्णन पार्वतीला ऐकवले. ते ऐकुन पार्वती या वनात गौळणीच्या रुपात येऊन शिवाची उपासना करु लागली. तिचे अलौकिके सौंदर्य बघुन कृत्ती आणि वास हे दोन राक्षस मोहित झाले. पार्वतीने या दोन्ही राक्षसांचा विनाश केला. या लढाईमूळे तिला अत्यंत तृषा लागली व ती भागवण्यासाठी शंकरांनी येथे बिंदूसागर नावाचे सरोवर निर्माण केले. या तलावाची लांबी १४०० फूट व रूंदी १२०० फूट आहे. या तलावापाशी श्राध्दतर्पण केले जाते तसेच ग्रहण, पर्वकाळात येथे स्नान करणे विशेष पवित्र मानले जाते.
या एकांम्र परिसरातील बिंदूसागर तलावाच्या आसपास जवळ जवळ सहा ते सात हजार मंदिरे होती. त्यातील ५०० मंदिरांचे अवशेष शिल्लक आहेत व १०० मंदिरे चांगल्या स्थितीत आहेत. या परिसरात मुक्तेश्वर, परशुरामेश्वर, लिंगराज, वेताळ अशी अनेक प्रसिध्द मंदिरे वेगवेगळ्या कालखंडात बांधली गेली. या मंदिरांसाठी वालुकाश्माचा वापर करण्यात आलेला आहे. काही भागात जांभ्या दगडाचाही वापर केलेला आढळतो.
हे मंदिर इ.स. ११ शतकात केसरी राजवटीच्या काळात बांधले गेले. मंदिराच्या प्रकारात प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे आहेत. आत जाताच प्रथम गणेशमंदिर, नंदिस्तंभ आणि त्यानंतर भोगमंडप लागतो. भोगमंडपानंतर नृत्यमंडप व जगमोहन व गर्भगृह आहे. गर्भगृहावर १२७ फुटाचे शिखर आहे. या मंदिराचा जगमोहन म्हणजेच सभामंडप १०० फूट उंच आहे.

लिंगराज मंदिराच्या गाभार्यातच तीन बाजूना गणेश, पार्वती व कार्तिकेयाची लहान मंदिरे असुन गाभार्यात स्वयंभू शिवलिंग आहे. हे लिंग म्हणजे ८ फूट व्यासाची मोठी शिळा असून त्याच्याभोवती निमुळती होत जाणारी काळ्या पाषाणाची शाळुंका आहे. लिंगराज मंदिराच्या प्राकारात महाकालेश्वर, लक्ष्मी-नृसिंह, यमेश्वर अशी अनेक देवतांची मंदिरे आहेत.
क्रमश:
प्राचीन काळी भारतातील व्यापाराला चालना देणारे अनेक मार्ग आपण पाहिले. दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतात मोठमोठ्या शहरांमधे उत्तम असे मार्ग होते. देशातंर्गत चालणार्या व्यापाराला त्यामुळे मोठी गती मिळालेली दिसते.
हा लेख आहे बहुचर्चित रेशीममार्गाविषयी. याच मार्गावरुन प्रामुख्याने चीन व भारत या देशांमधून पाश्चिमात्य देशांना मुख्यत: रोमला मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वस्तूंची आयात व निर्यात चालत असे. या मार्गाविषयी आपल्या मनात मोठे कुतुहल असते. हा मार्ग कोठून जात असे, या मार्गाने कुठल्या वस्तूंची आयात व निर्यात चालत असे, या मार्गाचा वापर कशामुळे बंद झाला असे अनेक प्रश्न सोडवण्याचा अनेक अभ्यासकांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केला. त्यात अनेक मतांतरे आढळतात.
रेशीममार्ग हा चीनकडून रोमकडे जाण्याचा मार्ग होता. या मार्गावरुन रोमला चीनमधील रेशमाची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असे. त्यामुळे या मार्गाला रेशीममार्ग असे म्हणले गेले. चीनकडून हा मार्ग तकलामकान नावाच्या वाळवंटातून जात असे. या मार्गावर यास्कंद, काशगर,अक्सा, तुसफान, खोतान, गिलगीट व समरकंद ही मोठी व महत्वाची शहरे होती.
इ. स. पू. ३ र्या शतकात चीनमधे हान राजवट होती. हुणांच्या टोळ्या या त्यावेळी लुटमार करण्याकरता चीनवर सतत आक्रमण करत असत. त्यांच्या या हल्ल्यांपासून संरक्षणासाठीच हान राजांनी इ.स.पू २२१ मधे जगप्रसिध्द असणारी चीनची भिंत बांधली.
रेशीममार्गाच्या शोधाची कथा मोठी रंजक आहे. हान साम्राज्यातील ’वो ती’ या राजाला हुणांचा बंदोबस्त करायचा होता. त्याला हुणांचे शत्रू असलेल्या यु ची या आणखी एका टोळीची माहिती मिळाली. शत्रूचा शत्रू आपला मित्र या विचाराने त्याने आपला दूत ’चॅंग चेन’ याला यु ची टोळीशी मैत्री करण्याच्या विचाराने पाठवले. इ. स. पू १३२ साली चॅंग चेन हा या कामगिरीवर निघाला पण तो नेमका हुण टोळीच्या हाती पडला. त्या टोळीबरोबर १० वर्षे तो कैदी म्हणुन भटकत होता. त्यानंतर तो या टोळीतून निसटून पळाला. याच दरम्यान यु ची टोळीने आपले भटकंती संपवून एके ठिकाणी बस्तान बसवले. त्यामुळे त्यांची आक्रमकता कमी झाली होती. वर्षभर त्यांच्यामधे राहुन चॅंगने त्यांच्या व्यापाराविषयी बारीकसारीक माहिती मिळवली. त्यानंतर तो परतीच्या वाटेला लागला. परतीच्या वाटेवर त्याला हुणांनी पुन्हा पकडले. पण हुणांच्या टोळ्यांमधे पडलेल्या फुटीमुळे तो पळून जाण्यात यशस्वी झाला व तो दिड वर्षानी पुन्हा चीनमधे पोहोचला.
चॅंगमुळे चीनी सम्राट वो ती ला बॅक्ट्रिया व प्रशियाबद्द्लची माहिती कळली. तसेच त्याला ली जिएम म्हणजेच रोमबद्दलचीही माहिती कळाली. या मार्गाने रोमशी व्यापार करता येऊ शकतो या विचाराने मग या मार्गांवर ठिकठिकाणी चिनी सम्राटांनी आपली लष्करी ठाणी वसवली. समरकंद येथे दोन मार्ग येऊन मिळतात. पहिला मार्ग खोतान वरुन काशगर मार्गे समरकंदला येऊन मिळे तर दुसरा मार्ग तुसफान वरुन अक्सामार्गे समरकंदला येई. या सर्व महत्वाच्या शहरात व तकलामकान वाळवंटातील पाणवठ्यांवर चिनी सम्राटांनी लष्करी ठाणी वसवली. त्यामुळे हुण टोळ्यांच्या धाडींवर मोठ्या प्रमाणात आळा बसला.
मग या मार्गाने चीनने व्यापारास सुरुवात केली. या मार्गाने पहिल्यांदा रेशीम पाठवण्यात आले. ह्या रेशमाचा व्यापार पहिल्यांदा बॅक्ट्रिया व प्रशिया या भागात सुरु झाला. पार्थियन टोळ्यांकडील रेशमी झेंडे बघून या कापडाविषयी रोमन लोकांमधे त्याबद्द्ल कुतुहल निर्माण झाले. मग याच पार्थियन लोकांनी चीनकडून येणारे रेशीम रोमला विकण्यास सुरुवात केली. इ.स.पू. पहिल्या शतकात रेशीम रोममधे पोहोचले आणि रोमन लोकांमधे रेशमाविषयी प्रचंड आकर्षण निर्माण झाले. त्यामुळे रेशमाचे भाव प्रचंड प्रमाणात वाढले. रेशीम बनवण्याची प्रक्रिया गुप्त ठेऊन पुढे २५०-३०० वर्षे हा रेशमाचा व्यापार सुरु होता. प्लिनी या रोमन इतिहाकाराने लिहिलेल्या ’द नॅचरल हिस्ट्री’ या ग्रंथात त्याचे एक निरिक्षण नोंदवले आहे. त्यात तो म्हणतो की चिनी लोक रेशीम हे झाडांच्या पानांपासून बनवतात.
रेशीम मार्गापासून एक फाटा तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान येथून हिंदुकुश पर्वतातून खैबरखिंडमार्गे भारतात येत असे. याचमार्गाने भारताचा रोमशी व्यापार चालू झाला. रोम साम्राज्याचा भारताबरोबर व्यापार चालू झाला व त्यानंतर रोमचा चीनशी असलेला व्यापार कमी होत गेला. उत्तर भारतात असलेल्या उत्तम मार्गांमुळे विविध वस्तुंची निर्यात रोमला होत असे. भारतातून रोमला देवदारचे उत्तम प्रतीचे लाकुड, सूत,सुती कापड, कापूस, केशर, हस्तिदंत याच बरोबर वाघ, चित्ता, मोर, गेंडे या सारखे प्राणी निर्यात होत असत. त्याबदल्यात रोमकडुन सोने व चांदी यासारखे धातू, गुलाम स्त्रिया व द्राक्षाचे उत्तम प्रतीचे मद्य आयात होत असे.
या मार्गावरुन मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असला तरी या मार्गावर अनेक नैसर्गिक तसेच मानवनिर्मित संकटांशी सामना करावा लागत असे. या मार्गावरुन जाताना वाळवंटी प्रदेश तसेच अनेक डोंगरांना ओलांडावे लागत असे. या मार्गावरील वातावरणही अतिशय विषम होते. उन्हाळ्यात अतिशय उष्ण तर हिवाळ्यात हाडे गोठवणाऱ्या थंडीला तोंड द्यावे लागत असे. या मार्गावरुन सामान वाहुन नेण्यासाठी घोडे, खेचर व उंटासारख्या प्राण्याचा वापर करावा लागे. याच बरोबर बिकट व अवघड असलेल्या रस्त्यांची स्थितीही अतिशय खराब होती. या निसर्गनिर्मिती संकटांबरोबरच चाचेगिरी व लुटमारीला सामोरे जावे लागे. अनेक ठिकाणी व्यापार्यांकडून सक्तिने वसुली केली जात असे. या मार्गावरुन मार्गक्रमण करणारे प्रवासी या सर्व संकटांना कंटाळले. या सर्व संकटांना टाळण्यासाठी मग एका नविन मार्गाचा शोध लावला गेला. प्रवासी रोमकडून भुमध्य समुद्रामार्गे इजिप्तच्या पश्चिम किनार्यावरील अलेक्झांड्रीयाला येऊन तेथून इजिप्तच्या पुर्व किनार्याला येत असत.
तेथून लाल समुद्रातून अरेबियात पोहोचून किनारा किनार्याने भारताच्या पश्चिम किनार्यांवरील भरुकच्छ किंवा चौल या बंदरांशी पोहोचत असत. यामुळे उत्तर भारताकडे चालत असलेला व्यापार हा दक्षिणेकडे सरकला. या नविन मार्गाच्या शोधामुळे हुण शकांच्या टोळ्यांच्या धाडीची भीती नष्ट झाली. याच बरोबर संपुर्ण भारताशी व्यापार करणे शक्य झाले. पश्चिम किनार्यांवरील उतरवलेला माल हा घाटमार्गांनी संपुर्ण भारतभर पाठवला जाऊ लागला. या नविन मार्गामुळे पार्थियनांच्या हातात असलेल्या व्यापाराला ओहोटी लागली. त्यामुळे त्यांनी समुद्रात राक्षस व दानव असल्याच्या अफवा उठवल्या.
या नवीन मार्गाच्या शोधाबरोबरच हिप्पॅलस या ग्रीक खलाश्याने मोसमी वार्यांचा शोध लावला. हे वारे फेब्रुवारी ते जून पश्चिमेकडून पुर्वेकडे वाहतात व ऑक्टोबर ते जानेवारी पुर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात असा महत्वाच शोध लागल्याने फेब्रुवारीत रोममधुन निघालेल्या जहाजांना या वार्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असे. ही जहाजे जून महिन्यात भारतात पोहोचत. जून ते ऑक्टोबर येथे व्यापार करुन ते परतीच्या वार्याबरोबर रोमला पोहोचत. एका अनामिक लेखकाच्या ’पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी’ या इ.स.पू पहिल्या शतकात लिहिलेल्या ग्रंथात या वार्यांचा उल्लेख केलेला आहे.
दक्षिण भारतातील या बंदरातून रोमकडे चंदन, हस्तिदंत, मसाल्याचे पदार्थ, निलगिरी, रक्तचंदन याची निर्यात होऊ लागली. हा व्यापार भारताच्या दृष्टिने अत्यंत फायदेशीर होता. भारतातील खंबायत व मन्नार तेथील आखातांमधे मोठ्या प्रमाणात मोती मिळत. भारतातून या मोत्यांची मोठ्या प्रमाणात रोमला निर्यात होऊ लागली. रोममधील लोकांमधे मोत्यांचे आकर्षण मोठ्या प्रमाणात होते. दागदागिने, पोषाखात तर त्यांचा वापर ते करतच होते पण अगदी द्राक्षाच्या मद्यातही मोत्यांचे चुर्ण घालून ते पित असत. मोत्यांच्या बदल्यात रोमहून मोठ्या प्रमाणात सोने भारतात येऊ लागले. त्यामुळे रोममधे सोन्याचा तुटवडा निर्माण झाला.
इ. स. २ र्या शतकात रोमची अर्थव्यवस्था डळमळीत झाली. त्यानंतर भारतातून येणार्या वस्तूंवर निर्बंध घालण्यात आले. तसेच रोममधे तेथील राजा नीरो याच्या विरुध्द उठाव झाला. यानंतर हा व्यापार अरब लोकांच्या हातात गेला. भारतातील व्यापारी फारतर इजिप्तपर्यंत जात असत तर काही मोजकेच रोमन व्यापारी भारतात येत असत. त्यामुळे अरबांचे या व्यापारावर नियंत्रण आले व त्यांनी मोठ्या प्रमाणात नफेखोरीला प्रारंभ केला. इ.स, तिसर्या शतकात रोमन साम्राज्य लयास गेले व हा मोठ्या प्रमाणात चालणारा व्यापार थंडावला. रोमन साम्राज्य बुडण्यामागे भारताबरोबरील व्यापार हेही एक कारण होते.
समाप्त
१९८५ साली अमेरिका व फ्रान्स येथे Festival of India हा समारोह आयोजित करण्यात आला. त्या निमित्ताने ७ जुन १९८५ रोजी भारतीय टपाल खात्याने दिदारगंज येथे सापडलेल्या यक्षीची प्रतिमा असलेले तिकिट वितरीत केले. हे मौर्यकालीन शिल्प सध्या बिहारची राजधानी पटना येथील संग्रहालयात आहे.
दिदारगंज यक्षी शिल्प
सम्राट चंद्रगुप्त मौर्याने इ.स.पू ३२० मध्ये मौर्यसाम्राज्याची निर्मिती केली. भारताचा बराचसा भाग त्याने आपल्या राजवटीखाली आणला. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र (सध्याचे पटना) हि होती. त्यामुळे मौर्य राजवटीत निर्माण झालेले कलावशेष हे पाटलीपुत्र व त्याच्या सभोवतालच्या परिसरात सापडले आहेत. त्या काळातील बरेचसे स्थापत्य हे लाकूड व विटा यामधे केलेले असल्यामुळे कालौघात ते नष्ट झाले असावेत.
दगडांवर कोरीवकाम/ शिल्पकलेची सुरुवात हि मौर्य काळातच झाली. बाराबर येथील प्रस्तरात कोरलेल्या गुंफा या मौर्यकालीन आहेत. तसेच पाटणा येथील कुमराहार येथे झालेल्या उत्खननात एका राजवाड्याचे अवशेष मिळाले आहेत. अशोकाच्या काळात त्याने अनेक एक पाषाणी स्तंभ उभारले.
१९१७ साली पटना येथे ५ फुट ४ इंच उंची असलेल्या हे यक्षीचे शिल्प उजेडात आले. प्रारंभी हे शिल्प कुठल्यातरी देवतेचे असावे असा अंदाज बांधण्यात आला पण या यक्षीच्या उजव्या हातात एक चवरी धरलेली दाखवली असुन तिचा डावा हात तुटलेला आहे. यावरुन हे शिल्प कुठल्यातरी सेविकेचे असावे असा निष्कर्ष काढण्यात आला. हे शिल्प वालुकाश्मात बनवलेले असुन त्यावर काचेसारखी झिलई दिलेली आहे. गोलाकार मुख असलेल्या या यक्षीचे गाल मांसल असुन डोळे, नाक व ओठ तिच्या सौदर्याची प्रचिती देतात. तिने आपल्या केसांची सुंदर केशरचना केलेली असुन तिच्या संपुर्ण अंगावर अलंकार घातलेले आहेत. कलाकाराने तिच्या पुष्ट शरिरावर स्नायुंच्या पडलेल्या वळ्यांचे उत्कृष्ठ शिल्पांकन केलेले आहे. तिने आपल्या कमरेला वस्त्र घातलेले असुन त्या वस्त्राच्या कापडावरील घड्याही शिल्पकाराने दाखवलेल्या आहेत. स्तन पृष्ट व कटी बारीक अशी भारतीय परंपरेने मान्य केलेली स्त्री सौंदर्याची लक्षणे या मुर्तीत दाखवलेली आहेत.

२७ जुलै १९७८ या दिवशी भारतीय टपाल खात्याने Museums of India या विषयावर आधारित चार तिकीटांचा संच वितरीत केला. या तिकीटांवर भारतातील वेगवेगळ्या संग्रहालयातील दुर्मिळ वस्तूंची चित्रे छापलेली होती. या तिकिटांवर अनुक्रमे कच्छ संग्रहालयातील ऐरावताचे शिल्प, हैद्राबाद येथील सालारजंग संग्रहालयातील जहांगीर बादशहाची कट्यार, कल्पद्रुम शिल्प आणि दिल्ली येथील नॅशनल म्युझियम मधील कुषाणांच्या सुवर्णमुद्रा यांची चित्रे छापण्यात आली होती.
संग्रहालयात आपल्याला मानवी संस्कृतींचे, साहित्याचे आणि कलेच्या वारश्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते. संग्रहा्लयांचे विविध संस्कृतींचा अभ्यासात विशेष महत्व आहे. भारतातील पहिले संग्रहालय हे कोलकाता येथे १८१४ साली एशियाटीक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेने स्थापन केले. पुढील काळात भारतात वेगवेगळ्या विषयांशी संबंधीत अनेक संग्रहालये स्थापन करण्यात आली. सध्या भारतात ३६० पेक्षा अधिक संग्रहालये आहेत.
कल्पद्रुम
हे शिल्प इ.स.पू २र्या शतकातील असून ते सर अलेक्झॅंडर कनिंगहॅम यांनी शोधुन काढले. हे शिल्प बेसनगर येथील एका स्तंभाच्या शीर्षावर होते. भारतीय संस्कृतीतील कल्पवृक्ष या संकल्पनेवर आधारीत हे शिल्प असावे. शिल्पात एका पिंपळाच्या वृक्षाचे शिल्पांकन असून त्याच्या खालील बाजूस वेदिका कोरलेली आहे. तसेच या शिल्पात नाण्यांचा वर्षाव करणारे घडे तसेच नाण्यांनी भरलेल्या व फांद्यांना बांधलेल्या पिशव्यांचे शिल्पांकन केलेले आहे.
कल्पवृक्ष हा स्वर्गीय वृक्ष आहे. याचा उल्लेख आपल्याला पुराणांमध्ये सापडतो. या वृक्षाखाली बसून जी कामना केली जाते ती कामना हा वृक्ष पूर्ण करतो अशी या मागची संकल्पना आहे. सांची व भारहूत येथील शिल्पांमध्येही कल्पवृक्षाचेही शिल्प सापडते. मानसार ग्रंथात त्याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. कल्पवृक्षाच्या खोडापाशी एक सर्प वेटोळे घालून बसलेला असतो, वृक्षावर अनेक प्रकारच्या वेली, वेगवेगळ्या आकाराची पाने व विविध रंगाची फुले असतात. त्याच्या फांद्यांच्यामधल्या जागी देवता, विद्याधर आणि वानर असतात असे वर्णन आलेले आहे.
२७ जुलै १९७८ या दिवशी Museums of India या विषयावर भारतीय टपाल खात्याने चार तिकीटांचा एक संच वितरीत केला. त्यातील एक तिकीट कुषाणांची नाणी हे होते.
कुषाण राजवट
चीनच्या वायव्य प्रांतात इ. स. पू १६५ मध्ये युह ची नावाची जमात राज्य करत होती. यांचे राज्य ५ वेगवेगळ्या प्रातांत विभागलेले होते. त्या प्रांतांवर वेगवेगळ्या टोळ्या राज्य करत होत्या. त्यातील कुई शुआंग नावाच्या टोळीचा सरदार कुषाण हा अत्यंत शूर व पराक्रमी होता. त्याने इतर चारही टोळ्यांवर आपले वर्चस्व स्थापित केले.
इ.स. १ ले शतक ते इ.स. ३ रे शतक या काळात कुषाणांचे राज्य भारताच्या वायव्य प्रांतात होते.
कुजुल कडफायसीस हा या राजवटीचा संस्थापक समजला जातो. कुजुल कडफायसीस याने पाचही टोळ्यांना एकत्र करुन बलाढ्य राज्याची निर्मिती केली. कुजुल कडफायसीस हा जवळ जवळ ८० वर्षे राज्यावर होता. त्याने आपला राज्यविस्तार मोठ्या प्रमाणात केला. त्याने काबूल, कंदाहार व वायव्य भारतातील गांधार प्रातावर राज्य करणार्या शक आणि इंडोग्रीक राजांचा पराभव केला. कुजुल कडफायसीस याची प्रारंभीच्या नाण्यांवर एका बाजुला इंडो ग्रीक राजा हर्मेस (Hermaeus) चेहेरा आहे. त्याच्या बाजूला खरोष्टी लिपीत त्याचे नाव आहे. मागील बाजूस कुजुल कडफायसीसचे नाव आलेले आहे. त्यामुळे प्रारंभीच्या काळात कुजुल कडफायसीस हा हर्मेसचा सामंत असावा किंवा त्यांचे संयुक्त राज्य असावे. यानंतरच्या कुशाणांच्या सगळ्या नाण्यांवर शक शासकांचा प्रभाव दिसतो. एका बाजूस राजाची प्रतिमा व दुसर्या बाजूस देवतेची प्रतिमा अशा प्रकारची नाणी त्यांनी पाडली.

कुजुल नंतर त्याचा मुलगा विम तख्तू हा राज्यावर आला. त्याची नाणी काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सापडली आहेत.
त्यानंतर राज्यावर आलेल्या विम कडफायसीस याने सिंधू नदीच्या पलीकडील पंजाब प्रांत, काश्मीर, सिंध व उत्तर प्रदेशचा भाग जिंकून बनारसपर्यंत आपला राज्यविस्तार केला. भारतात आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सोन्याची नाणी पाडणारा हा पहिला राजा होता. याच्या नाण्यांवर मागील बाजूस शिव, नंदी व त्रिशुळ कोरलेले दिसते. या परकीय राजांनी स्थानिक लोकांच्या देवता आपल्या नाण्यांवर कोरल्या. यावरून त्यांचे एतद्देशीय समाजाशी एकीकरण झाल्याचे दिसून येते.
विम कडफायसीस नंतर कुषाण राजवटीतील बलाढ्य राजा म्हणजे कनिष्क. कनिष्काने प्रारंभी विम कडफायसीस सारखीच नाणी काढली. नंतर त्याने नाण्यांवर येणारी ग्रीक, खरोष्टी व प्राकृत भाषांच्या बरोबरच तोखारियन भाषेचाही वापर केलेला दिसतो. कनिष्काच्या नाण्यांवरही ग्रीक, रोमन, इराणी तसेच भारतीय देवतांच्या प्रतिमा आढळतात.
कनिष्कानंतर हुविष्क हा राजा झाला. त्याने आपल्या नाण्यांसाठी सोने, चांदी, तांबे या धातूंचा वापर केला. हुविष्काच्या नाण्यांवर विशाख, महासेन व स्कंद यांच्या प्रतिमा पहिल्यांदा येतात.

वासुदेव दुसरा हा कुषाण राजवटीतील शेवटचा राजा होय. याच्या नाण्यांवर ब्राह्मी लिपी वापरलेली आढळते. याची नाणी आकाराने मोठी व कमी जाडीची आहेत.
यानंतर अरबांचा उपद्रव वाढल्याने तसेच पश्चिम किनार्यांवरील बंदरे बंद झाल्याने कुषाण साम्राज्याला उतरती कळा लागली.
कालियामर्दन, कास्यशिल्प, इ. स. ९ वे शतक
१९८२ साली लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या Festival of India या
प्रदर्शनाच्या निमित्ताने भारतीय टपाल खात्याने वितरीत केलेल्या
तिकीटांच्या संचात एक तिकीट हे कालियामर्दन शिल्पाचे होते. कास्य धातूचे
(Bronze)हे अतिशय रेखीव शिल्प दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात आहे.
कालियामर्दनाचे हे शिल्प दक्षिण भारतातील
असून त्याचा निर्मितीचा काळ अंदाजे ९ वे शतक आहे. या शिल्पात
कालियानागाच्या डोक्यावर बालकृष्ण नाचताना दाखवला आहे. कृष्णाचा उजवा हात
हा अभयमुद्रेत दाखवलेला असून त्याने डाव्या हातात नागराज कालियाची शेपटी
धरलेली आहे. कृष्णाच्या गळ्यात व शरीरावर वेगवेगळ्या प्रकारच्या
दागिन्यांचे शिल्पांकन केलेले आहे. पाच फण्यांचा कालिया हा कृष्णाला शरण
येउन अंजलीमुद्रेत दाखवला आहे. भारतीय धातुशिल्पांमधील हे एक अतिशय सुंदर
शिल्प आहे.
कालिया मर्दन
भगवान श्रीकृष्ण हे आपल्याला महाभारतामुळे माहिती आहेत. परंतू श्रीकृष्णाची उपासना भारतात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. कृष्ण हा गोपालक समाजाचा देव असावा. इ. स. पू २ र्या शतकातील बॅक्ट्रिया येथील अॅगॅथोक्लीस या राजाच्या नाण्यांवर कृष्ण व बलरामाच्या प्रतिमा कोरलेल्या आढळतात.
महाभारतात कृष्ण हा पांडवांच्या मार्गदर्शकाच्या भुमिकेत येतो. त्याच्या बाललीला व इतर पराक्रमाच्या कथा या महाभारताच्या मागाहून जोडण्यात आलेल्या खिलपर्वात येतात. या कथा हरिवंश या ग्रंथात प्रथम आल्या व तेथून महाभारताला जोडण्यात आल्या. हरिवंशाच्या निर्मितीचा काळ सुमारे चौथे शतक हा असावा. पुतना राक्षसीचा वध, शकटासुर, वृषभासुर, केशी दैत्याचा वध, गोवर्धन पर्वत उचलण्याचा पराक्रम, कंस वध या कथा हरिवंशात आलेल्या आहेत. कालियामर्दनाची कथाही हरिवंशातच येते.
यमुनेच्या तीरावर वसलेल्या मथुरानगरीत गोपालक रहात असत. एक दिवस अचानक या गोपालकांच्या गाई व गुरे विषबाधेने मरु लागली. याचा शोध घेता कृष्णाला यमुना नदीत असलेला नागराज कालिया याच्या विषाने ही गुरे मरत आहेत असे कळले. बालकृष्णाने यमुनेत उडी मारुन कालिया नागाशी युद्ध केले आणि त्याला पराभूत केले व कालिया नागाच्या डोक्यावर नाचू लागला. हे पाहुन कालियाच्या राण्या त्याला विनवू लागल्या. पुन्हा यमुनेच्या पाण्यात विष सोडणार नाही या अटीवर कृष्णाने कालिया नागाला सोडून दिले अशी ही कथा आहे.
हे टपाल तिकीट ३ नोव्हेंबर १९७२ रोजी तिसऱ्या एशियन इंटरनॅशनल ट्रेड फेअर च्या निमित्ताने काढण्यात आले. गौतम बुध्दांच्या हातावर चक्र काढलेले आहे.
भाषा निर्माण होण्यापूर्वी मानव एकमेकांशी हातवारे संवाद साधत असे यातूनच हस्तमुद्रांची निर्मिती झाली असावी. हस्तमुद्रा म्हणजे दोन्ही हातांचा व बोटांचा वापर करुन आपल्या मनातील भाव सांगणे. हस्तमुद्रांचा वापर मुर्तीशास्त्राबरोबरच भारतीय नृत्य आणि नाट्यशास्त्रातही मोठ्या प्रमाणात केला गेलेला आहे. रोजच्या जीवनात आपणही मुद्रांचा वापर करत असतो. नमस्कार करणे, हस्तांदोलन करणे अशा मुद्रा आपण दैनंदिन जीवनात वापरत असतो.
मुद्रांचा वापर अनेक मूर्तींमधे केलेला दिसतो. हातांच्या मुद्रांवरुन ती मुर्ती आपल्याला काही सांगू पहात असते. मुर्तींची निर्मिती जेव्हापासून सुरु झाली तेव्हापासून कलाकारांनी हस्तमुद्रांचा उपयोग करुन मुर्तीच्या माध्यमातून काही संदेश दिलेला दिसतो.
गौतम बुध्दांच्या मुर्तींमध्ये अशा अनेक हस्तमुद्रांचा उपयोग केलेला दिसतो. अभयमुद्रा, भुमीस्पर्शमुद्रा, धर्मप्रवर्तनमुद्रा, ध्यानमुद्रा, वरदमुद्रा, वितर्कमुद्रा इ. अशा अनेक हस्तमुद्रांचा वापर केलेला आढळतो. या सर्व हस्तमुद्रांमधुन गौतम बुध्दांची मुर्ती आपल्या साधकापर्यंत आपला संदेश पोचवत असते.
भय आणि चिंता हे दुबळेपणाचे लक्षण मानले जाते. अभयमुद्रेतील मूर्ती आपल्या भक्तांना ’कुठलेही संकट आले तरी तू भिऊ नकोस. मी सतत तुझ्याबरोबर आहे’ असे आश्वस्त करत असते. या मुद्रेत हात वर उचललेला असतो व हाताची बोटे वर सरळ असतात.

गौतम बुध्दांना बोधी प्राप्त झाली त्यावेळी त्यांनी भुमीला स्पर्श करुन तिला साक्षी होण्यास सांगितले. भुमिस्पर्श मुद्रेत गौतमांनी आपला उजवा हात भुमीला स्पर्श केलेला दाखवलेला असतो.

गौतम बुध्दांना बोधी प्राप्त झाली व त्यांनी धर्मचक्राला गती प्राप्त करुन दिली. या मुद्रेला धर्मप्रवर्तनमुद्रा असे म्हणतात.

गौतम बुध्दांच्या अनेक मूर्ती या ध्यान अवस्थेत असतात. एकाग्रता आणि ध्यान अवस्था दर्शवणारी ही हस्तमुद्रा आहे.

आपल्या भक्तांना मदत, दान आणि त्यांच्यावरील दया दाखवण्यासाठी वरदमुद्रा दाखवण्यात येते. गौतम बुध्दांच्या मुर्तींमध्ये या मुद्रेचा वापर करण्यात आलेला आहे.

वितर्क मुद्रेतील मुर्ती धर्मातील तत्वांवरील चर्चा करत आहे असा अर्थ सुचित केलेला असतो.

हे शेअर करा:
१९८५ साली अमेरिका व फ्रान्स येथे Festival of India हा विशेष समारंभ आयोजित करण्यात आला होता. निमित्ताने ७ जुन १९८५ साली भारतीय टपाल खात्याने यौधेय मुद्रेची प्रतिमा असलेले तिकीट प्रसारित केले.
यौधेय गणराज्य
यौधेय हे गणराज्य किंवा जनपद साधारणत: इ.स.पू २ र्या शतकापासून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश तसेच राजस्थान या प्रांतावर राज्य करत होते. या गणराज्याच्या अस्तित्वाचे भौतिक पुरावे फारसे मिळत नसले तरीही त्यांची नाणी बर्याच प्रमाणात मिळालेली आहेत. तसेच यौधेय गणराज्याचे उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमधे आलेले आहेत. पाणिनीच्या अष्टाध्यायी मधे यौधेयांचा आयुधजिवी असा उल्लेख सापडतो. शस्त्र हेच त्यांच्या उपजिविकेचे साधन होते. यौधेय हे उशीनराचे वंशज असल्याचा उल्लेख हरिवंशात येतो. अर्जुनाने यौधेय, मालव व त्रिगर्त यांचा पराभव केला असा उल्लेख महाभारतातील कर्णपर्वात तसेच द्रोणपर्वात आलेला आहे.
यौधेयांची अनेक तांब्याची नाणी सापडली आहेत. सतलज आणि यमुना नद्यांच्या खोर्यांमधे यांची अनेक नाणी सापडली आहेत. त्या नाण्यांवर ’यौधेयगणस्य जय:’ व ’भगवतो स्वामिन ब्राह्मण यौधेय देवस्य’ असे लेख सापडतात. यौधेय या गणाचे मुख्य काम युध्द करणे असल्याने यांच्या नाण्यांवर देवांचा सेनापती कार्तिकेयाचे अंकन केलेले दिसते. यांच्या नाण्यांवर बहुधान्यके यौधेयनाम असाही लेख आलेला आहे. बहुधान्यक म्हणजे सध्याचे रोहतक असावे. यौधेयांची चांदीची नाणीही मिळाली आहेत. यौधेयांच्या मातीच्या मुद्रा लुधीयाना प्रांतात सापडल्या आहेत.

यौधेय हे गण युध्दप्रविण होते. सिकंदरने भारतातील पंजाब प्रांत पादाक्रांत केला. पण त्याचे थकलेले सैन्य हे यौधेयांच्या धास्तीने व्यास नदीपलीकडे असलेल्या त्यांच्या प्रांतावर चालून जाण्याचे धाडस करु शकले नाही. क्षत्रप राजा रुद्रदामनच्या जुनागढ येथील शिलालेखात त्याने यौधेयांचा पूर्ण नाश केला असा उल्लेख येत असला तरी इ.स. ३ र्या शतकात यौधेयांनी आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित केली. पंजाब प्रांतातून कुषाणांची सत्ता नष्ट करण्याचे बरेचसे श्रेय हे यौधेयांचे आहे. पुढे गुप्त राजवटीने यौधेय गणांचा पुर्ण नाश केला.
तिकिटावर असलेल्या यौधेयांच्या तांब्याच्या मुद्रेवर हरिणकुळातील प्राण्याचे अंकन केलेले आहे. त्याच्या वरती एक कलश असुन कलशाच्या वरच्या बाजूस ’श्री’ हे शुभचिन्ह अंकित केलेले आहे. या नाण्याच्या मागील बाजूस कार्तिकेयाचे अंकन केलेले आहे.

हे शेअर करा:
जुलै, १९८७ रोजी रशियामधे Festival of India या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. या आधी ब्रिटन, अमेरिका आणि फ्रान्स या देशात झालेल्या Festival of India या प्रदर्शनांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. रशियातील प्रदर्शनाच्या निमित्ताने भारतीय टपाल खात्यातर्फेसद्य स्नात शिल्पाचे हे तिकीट वितरीत करण्यात आले.
संघोळ
संघोळ हे पंजाबमधील लुधियाना प्रांतातील समराल तालुक्यात असून तेथे सिंधु संस्कृतीपासून मानवी वस्तीचे पुरावे सापडतात. संघोळ हे बौध्द पंथाचेही एक प्रमुख केंद्र होते. सम्राट अशोकाच्या काळात येथे स्तूप व विहारांची उभारणी झाली. संघोळचे प्राचीन नाव संघपूर असे होते. येथे सापडलेल्या एका गुप्तकालीन भाजक्या मातीच्या मुद्रेवर संघोळचा उल्लेख नंदिपूर असा आलेला आहे. महत्वाच्या व्यापारी मार्गावर असल्याने संघोळ हे कुशाणांच्या राज्यातील अतिशय महत्वाचे केंद्र होते. संघोळ येथे झालेल्या उत्खननांमध्ये मिळालेल्या नाण्यांवर व मुद्रांवर अनेक देवदेवतांच्या प्रतिमा आहेत. त्यावरुन संघोळ हे महत्वाचे धार्मिक केंद्रही असावे. कुशाण काळात मध्य देशातील आणि गांधारमधील यात्रेकरु, व्यापारी, कलाकार यांचे संघोळ हे प्रमुख केंद्र होते. इ.स. ५ व्या शतकात हुणांनी आक्रमण करुन हे शहर उध्वस्त करुन टाकले.
संघोळ येथे झालेल्या उत्खननामध्ये अनेक वनस्पती सापडल्या आहेत. हडप्पाकालीन (इ.स.पू. १९००-१४००) गहू, ज्वारी, बाजरी, डाळी यांचे जळालेले (Carbonized) अवशेष मिळाले आहेत. याच बरोबर आवळा, द्राक्षे, संत्री व अफू यांच्या बियाही सापडल्या आहेत. याच बरोबर कुशाण काळातील (इ.स. १००-३००) तांदूळ, डाळी, मसाल्याच्या वनस्पती, कापुस अशा अनेक वनस्पतींचे अवशेष मिळाले आहेत.
इ.स. ७ व्या शतकात भारतात आलेला चिनी प्रवासी ह्युएनस्तंग याने संघोळला भेट दिली होती. त्याच्या प्रवास वर्णनात संघोळचा उल्लेख शे-टो-टू-लू असा आलेला आहे. त्याच्या वर्णनात येथे एक स्तूप व दहा संघाराम होते असा उल्लेख आलेला आहे.
या गावात एक किल्ला असुन गावाभोवती मातीने बांधलेली संरक्षक भिंत आहे. १९८५ साली झालेल्या उत्खननात या भिंतीपासून काही अंतरावर स्तूपाचे व विहारांचे अवशेष सापडले व हे गाव अचानक प्रकाशात आले. या स्तूपाच्या प्रदक्षिणापथा भोवती असलेल्या वेदिकेवर अनेक शिल्पे होती. १६ मीटर व्यासाच्या या स्तूपाची रचना धर्मचक्राप्रमाणे होती. स्तूपाचे बांधकाम विटांचे होते. स्तूपातील अवशेष पात्रात दात व अस्थी मिळाल्या आहेत. या पात्रावर उपासक अयभद्रस असे नाव कोरलेले आहे. हा स्तूप इ.स. पहिल्या शतकातला असावा असा अभ्यासकांनी अंदाज बांधला आहे.
स्तूपाच्या वेदिकेवर एकुण ११७ शिल्पे होती. ही सर्व शिल्पे मथुरा शैलीतील होती. त्यात मुख्यत: स्त्री प्रतिमा जसे शालभंजिका, यक्षिणी, दर्पणधारीणी, बासरी वाजवणारी अशी विविध शिल्पे तेथे होती. ह्या शिल्पांसाठी वालुकाश्म दगड वापरण्यात आला आहे. यातीलच एक शिल्प म्हणजे सद्यः स्नात. नुकतीच न्हाऊन आलेली युवती आपले केस सुकवत असुन तिच्या केसातून पडणारे पाण्याचे बिंदू हे जणू काही मोतीच आहेत असे वाटून ते टिपणारा हंसपक्षी असे शिल्पांकन केलेले आहे.
१९८१ साली श्रवणबेळगोळ, कर्नाटक येथील गोमटेश्वराच्या शिल्पाला एक हजार वर्षे पुर्ण झाली यावेळी ९ फेब्रुवारी १९८१ रोजी भारत टपाल खात्यातर्फे हे तिकीट वितरीत केले गेले.
गोमटेश्वर
गोमटेश्वर हा आद्य जैन तीर्थंकर वृषभनाथांचा (आदिनाथांचा)पुत्र. तो गोमटस्वामी किंवा बाहुबली या नावाने देखील प्रसिध्द आहे. गोमटेश्वराची पारंपारिक जैन कथा अशी सांगितली जाते की गोमटेश्वराला भरत नावाचा थोरला सावत्र भाऊ होता. वृषभनाथाने आपले राज्य दोघात वाटुन दिले होते. पुढे भरत हा दिग्विजयासाठी निघाला व त्याने बाहुबलीच्या राज्यावर आक्रमण केले. भरताने बाहुबलीस आपले सर्वभौमत्व मान्य करावे असा निरोप पाठवला. बाहुबलीने त्याला उलट निरोप पाठवला की “ मी गुणांचा उपासक असुन केवळ त्यापुढेच नम्र होईन.” व त्याने भरताला युध्दाचे आव्हान दिले.
युध्दात होणारा संहार टाळण्यासाठी दोघांनी द्वंद्वयुध्द करण्याचा निर्णय घेतला. सर्व प्रकारच्या युध्दांमध्ये भरत पराभूत झाला. आपण आपल्या थोरल्या भावाची मनखंडना केली याचे दु:ख बाहुबलीला झाले व त्याने आपले राज्य भरताला देउन टाकले व तो सत्यज्ञानासाठी तपस्येसाठी निघुन गेला.
त्याच्या घोर तपस्येमध्ये त्याच्या अंगावर लता वेली चढल्या, बाजुला वारुळे झाली तसेच नागही वेटोळे घालून बसले. बाहुबलीला मात्र याची जाणीव नव्हती. एवढी घोर तपस्या करुनही त्याला मुक्ती मिळेना. या चिंतेने भरत वृषभनाथांकडे गेला. त्यांनी भरताला सांगितले की तो तुझ्या राज्यात तप करत असल्याचे शल्य त्याला डाचते आहे. हे ऐकुन भरत बाहुबलीकडे गेला व त्याला म्हणाला “ही पृथ्वी कोणाच्याही मालकीची नाही व तू हे शल्य तुझ्या मनातून काढून टाक” हे बाहुबलीने ते मान्य केले व त्याला केवल ज्ञान प्राप्ती झाली.
बाहुबलीच्या मूर्ती भारतभर आढळतात. बदामी येथील गुंफा क्र. ४ तसेच वेरुळ येथे इंद्रसभा या गुहेमध्ये बाहुबलीचे शिल्पांकन केलेले आढळते.

तिकीटावरील मुर्ती ही कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील आहे. ही मुर्ती राछमल्ल या गंग राजाच्या कारकिर्दीत त्याच्या पत्नीच्या आग्रहास्तव चामुंडराय या त्याच्या मंत्र्याने विंध्यगिरी नामक पर्वतावर एकसंध पाषाणात कोरली. ही मुर्ती कायोत्सर्ग मुद्रेत आहे. या मुर्तीच्या पायापाशी मराठी, कानडी आणि तेलगू भाषेतील लेख आहेत. त्यातील मराठी भाषेतील व देवनागरी लिपीतील लेख काही तज्ज्ञांच्या मते सगळ्यात प्राचीन आहे. या मुर्तीची उंची ५६ फुट ६ इंच असुन ही मुर्ती (जगातील एकपाषाणी मुर्तीपैकी सगळ्यात उंच) इ. स. ९८३ साली कोरण्यात आली.
दर बारा वर्षांनी हजारो भाविक गोमटेश्वराच्या या मूर्तीला महामस्तकाभिषेक घालण्यासाठी एकत्र येतात. या मुर्तीला हळद, चंदन, दुध, पाणी, ऊसाचा रस, भाताचे पीठ, केशर तसेच चांदी व सोन्याच्या फुलांनी हा अभिषेक केला जातो.
११ जानेवारी १९८९ रोजी लखनौ राज्यसंग्रहालयाच्या स्थापनेला १२५ वर्षे झाली. त्यानिमित्ताने भारतीय टपाल खात्याने संग्रहालयातील मातीच्या मुद्रेवर (terracota seal) दुर्गेची प्रतिमा असणारे टपाल तिकीट वितरीत केले.
राज्यसंग्रहालय, लखनौ
लखनौ संग्रहालयाची स्थापना १८६३ साली झाली. लखनौ परगण्याचे आयुक्त कर्नल अॅबोट यांच्या पुढाकाराने हे संग्रहालय छोटी छत्तर मंझिल येथे सुरु करण्यात आले. या संग्रहालयात ८३,००० हून अधिक वस्तूंचा संग्रह आहे त्यात मुख्यत: पुरावस्तू, नाणी, कलावस्तू तसेच अनेक प्रकारचे अलंकार, शस्त्रास्त्रे, हस्तलिखिते, वाद्ये यांचा समावेश आहे. या संग्रहालयातर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. या विषयासंबधीत व्याख्याने, कार्यशाळा, माहितीपूर्ण चित्रफितींचे प्रदर्शन तसेच वेगवेगळे विषय घेऊन संग्रहालयात वस्तूंची प्रदर्शने भरवली जातात. संग्रहालयाचे स्वतंत्र असे सुसज्ज ग्रंथालय आहे. संग्रहालयातील वस्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयोगशाळा आहे. संग्रहालयातील वस्तूंचे छायाचित्रण करण्यासाठी तसेच दुर्मिळ वस्तूंच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस व फायबरच्या प्रतिमा बनवण्याचा स्वतंत्र विभागही आहे.
दुर्गा
भारतात मातृदेवतांची उपासना प्राचीन काळापासून चालू असलेली सापडते. पुढे या स्त्री देवतांची उपासना करणारा शाक्त प्रंथ अस्तित्वात आला. या शाक्त देवतांमधे उमा, गौरी, पार्वती, चामुंडा, चंडी, काली, कपालिनी, भवानी अशा अनेक देवींचा समावेश होतो. याच देवतांमधील एक प्रमुख देवी म्हणजे दुर्गा. प्राचीन काळात भारतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या देवींची उपासना केली जात होती. पुराणकारांनी या सर्व देवींना दुर्गेच्या रुपात एकरुप केले.
दुर्ग राक्षसाचा वध केल्याने तिला दुर्गा असे संबोधले जाते. शंकर, यम, चंद्र, इंद्र, वरुण, सुर्य व भूमी या सगळ्यांच्या अंशापासून दुर्गेची उत्पत्ती झाली असे मार्कण्डेयपुराणात सांगितले आहे. महाभारतातही दुर्गेचा उल्लेख नारायणाची स्त्री असा आलेला आहे. नवदुर्गा स्तोत्रात दुर्गेच्या नऊ रुपांचे वर्णन सापडते. हिचे वसतीस्थान विंध्यपर्वत असल्याने तिला हरिवंशात विंध्यवासिनी असे संबोधले आहे.
मार्कण्डेयपुराणात आलेल्या देवीमहात्म्यात ७०० श्लोक असून त्याला दुर्गासप्तशती असे म्हणले जाते. यात महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती या तीन स्वरुपात केलेले दुर्गेचे वर्णन सापडते. मधुकैटभ, महिषासूर, चंडमुंड, शुंभनिशुंभ या दैत्यांचा तिने वध केल्याच्या कथा यात येतात. दुर्गेचे दुसरे रुप म्हणजे चंडी. त्यामुळे दुर्गासप्तशतीला चंडीयाग असेही म्हणले जाते.
दुर्गादेवीच्या पराक्रमाचा उत्सव हा अश्विन शुध्द प्रतिपदेपासून नऊ दिवस साजरा केला जातो. दुर्गेची उपासना विविध प्रांतात प्रचलित आहे. बंगालमधे ती कालीच्या रुपात पुजली जाते. गोमंतकात तिला शांतादुर्गेच्या रुपात पुजतात.
दुर्गा ही चतुर्भुज, अष्टभुज, दशभुज दाखवलेली असते. तिच्या हातांमधे चक्र, पाश, शुल, खड्ग ही शस्त्रे असतात. ती सिंहारुढ असते.
१९८२ साली मार्च ते नोव्हेंबर लंडन येथे Festival of India हे प्रदर्शन भरले होते. हे प्रदर्शन भारतीय कला, संस्कृती या विषयांना वाहिलेले होते. त्या निमित्ताने भारतीय टपाल खात्यातर्फे तीन तिकीटांचा एक संच प्रकाशित करण्यात आला. एका तिकीटावर प्राचीन शिल्पकला, दुसर्या तिकीटावर कालियामर्दन व तिसर्या तिकीटावर उटी येथील रेडिओ टेलिस्कोपचे चित्र होते.
तिकीटावरील चार मृगांचे हे शिल्प नाचना, मध्य प्रदेश येथील पार्वती मंदिराच्या एका भिंतीवर होते. पुढील बाजूस उजवीकडे एक मोठी शिंगे असलेला नर दाखवला असुन मागील बाजुस दोन लहान मृग बसलेले आहेत. त्यांच्या मागे मोठमोठ्या शिळा दाखवलेल्या आहेत.
पार्वती मंदिर, नाचणा
भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात प्राचीन काळापासून झाली होती. मंदिरांचे उल्लेख आपल्याला अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये मिळतात. हिरोडोटस याने इ.स.पू २ र्या शतकात विदिशा येथे एक विष्णू मंदिर बांधले होते हे सांगणार एक शिलालेख तेथे मिळाला आहे. ही मंदिरे बांधण्यासाठी लाकूड किंवा विटा या सारखे माध्यम वापरले असावे जे कालौघात नष्ट झाले. त्यामुळे आपल्याला मंदिरांचे भौतिक पुरावे हे गुप्त काळापासूनचे मिळतात. मौर्य साम्राज्यानंतर इ. स. ३ र्या शतकात भारत हा गुप्तांच्या एकछत्री अमलाखाली आला होता. यामुळे मिळालेले स्थैर्य व शांतता या या कालखंडात कला व स्थापत्यामधे बरीच प्रगती झाली.
गुप्तकाळात बांधलेल्या मंदिरांपैकी उदयगिरी (मध्य प्रदेश) येथील गुंफा मंदिरे, सांची येथील मंदिर, तिगावा येथील विष्णू मंदिर, नाचना येथील पार्वती मंदिर, भुमरा येथील शिव मंदिर तसेच देवगड व भीतरगाव येथील मंदिरे आजही अस्तित्वात आहेत. या सर्व मंदिरांचे विधान (Plan) आटोपशीर आहेत. चौरसाकृती गाभारा, त्याला एक प्रवेशद्वार, समोर चार खांबांवर तोललेले मुखदर्शन आणि गर्भगृह अशी रचना आपल्याला या मंदिरांमधे सापडते.

नाचना येथील पार्वती मंदिर हे साधरणत: पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधले गेले. वालुकाश्म दगड वापरून बांधलेले हे मंदिर शिवाचे आहे. पश्चिमाभिमुख असलेले हे मंदिर एका उंच जगतीवर (Platform) बांधलेले आहे. वर जाण्यासाठी पायर्या असून आत चौरसाकृती गर्भगृह आहे. गर्भगृहाला प्रकाशासाठी व वायुविजनासाठी जाळीच्या खिडक्या आहेत. चार द्वारशाखांवर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहाच्याभोवती जगतीवर प्रदक्षिणापथ आहे. द्वारशाखांच्या खालील बाजूस डावीकडे गंगा व उजवीकडे यमुनेचे शिल्प कोरलेले आहे.

https://indologythroughphilately.wordpress.com/2016/07/05/mrugashilpa/































No comments:
Post a Comment