Thursday, June 20, 2024

चतुर्थमितीचे इतर लेख

 http://www.chaturthamiti.in/2022/06/blog-post.html#google_vignette

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी


॥ श्री गणेशाय नमः ॥

भारतीय संस्कृती साठी वैदिक आणि पौराणिक हे महत्त्वाचे कालखंड आहेत . या कालखंडामधले काही देव, दैवत, यक्ष, गंधर्व, अप्सरा,दहा दिशांचे दिक्पाल हे जरी कालबाह्य झाले असले तरी मुर्त्यांचा स्वरूपातून ते आजही नजरेस पडतात . यातल्या बऱ्याचशा मुर्त्या त्यांच्या शैलीवरून ओळखता येतात पण बऱ्याचश्या किल्ल्याच्या मुख्य दारावर आढळणारी शरभ ह्या प्राण्याची शिल्पं आजही सर्वसामान्यांना गोंधळात टाकतात .


 चित्र क्रमांक १ . जलदुर्ग अर्नाळा येथील प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प .

चित्र क्रमांक एक मध्ये दिसणारा हत्तीच्या वरचा वाघ की सिंह असा बुचकळ्यात टाकणारा प्राणी म्हणजेच शरभ होय ! शरीर यष्टी वाघ सिंहाशी जरी मिळतीजुळती असली तरी तोंड मात्र अगदी वेगळं आहे . सर्वात महत्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे ह्या शरभांचं शिल्प गडांच्या दरवाजावर का असतं ? त्यासाठी थोडा पुराणांचा संदर्भ घेऊया .

विष्णूनें नृसिंहरूप धारण करून हिरण्यकशिपूस मारले; पण खून चढल्यामुळे त्याची उग्रता कमी होईना; तेव्हां सर्व सृष्टि शंकरास शरण गेली; शंकराने दोन तोंडे, आठ पाय, दोन पंख व लांब शेपूट असलेल्या शरभाचे रूप धारण करून नृसिंहास फाडले आणि त्याचे कातडे पांघरले व डोके मुकुटावर धारण केले अशी एक कथा आहे. ( संदर्भ : मूर्तिविज्ञान, डॉ. गणेश हरि खरे ) .

हल्लीच्या काळामध्ये जसे सामर्थ्याचे प्रतीक पंचमुखी हनुमानाची प्रतिमा किंवा चित्र दरवाजावर लावण्याची पद्धत आहे तीच पद्धत जुन्या काळामध्ये किल्ल्यांच्या दरवाजावरती शरभाचे शिल्प कोरण्यात दिसून येते . तसंच लढाईच्या वेळेस स्फुरण चढण्यासाठी हर हर महादेव म्हणणार्या मराठ्यांच्या किल्ल्यांवर शंकराचे रूप असणाऱ्या शरभाचं शिल्प हा निव्वळ योगायोग असावा का? तसंच महापराक्रमी राजांच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ कोरल्या जाणाऱ्या काही वीरगळांच्या कलशाभोवती देखील शरभ आढळतात . वीरगळ म्हणजे ?

 शरभ या प्राण्याचे अनेक प्रकार असून त्यात पंखधारी , पंख विरहित , गज जेता म्हणजे ज्याने पायात हत्तींना दाबून धरले आहे ( ह्यावरून शरभाच्या सामर्थ्य आणि विराटरूपाची कल्पना करता येते . ) , व्याघ्रजेता म्हणजे ज्याने वाघाला स्वतःच्या पायात धरले आहे असे अनेक प्रकार आहेत .


 चित्र क्रमांक २ . भुईकोट सोलापूर येथील बुरुजावरील शरभशिल्प .

सोलापूरच्या भुईकोटात जीर्णोद्धाराच्या वेळेस ही  शरभ शिल्प कोरण्यात आली . महाराष्ट्रातले बरेचसे किल्ले मराठ्यांनी जिंकल्यावर त्यांचा  जीर्णोद्धार करण्यात आला .


 चित्र क्रमांक ३ . जलदुर्ग किल्ले जंजिरा ( मुरुड ) येथील प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प .

किल्ले जंजिरा हा सिद्दी नावाच्या मुसलमान राज्यकर्त्याने बांधलेला किल्ला होता . हा अभेद्य किल्ला आजवर कोणत्याही हिंदू राज्यकर्त्यांनी जिंकला नाही हे जग जाहीर आहे .तरीही या किल्ल्यामध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजावर ती शरभाचे शिल्प दिसून येतं .


 चित्र क्रमांक ४ . किल्ले शिवनेरी ( शिव जन्मभूमी जुन्नर ) येथील आतल्या प्रवेशद्वारा वरील केवल शरभ शिल्प .


 चित्र क्रमांक ५ . किल्ले शिवनेरी ( शिव जन्मभूमी जुन्नर ) येथील आतल्या प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प .

चित्र क्रमांक . ५ मधील शरभ हा व्याघ्रजेता शरभ आहे . म्हणजे त्याने वाघाला पायात धरले आहे किंवा त्यावर विजय मिळवला आहे . शरभाचे बारकाईने निरीक्षण केल्यास त्याचे पंख दिसून येतात . उघडलेले तोंड आणि बाहेर आलेली जीभ त्याच्या आक्रमकतेचे प्रदर्शन करतात .


 चित्र क्रमांक ६ . किल्ले शिवनेरी ( शिव जन्मभूमी जुन्नर ) येथील मुख्य प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प .

चित्र क्रमांक सहा मध्ये शरभाचं सर्वात आक्रमक रूप दिसतं . द्विगज विजयी शरभात् पराभूतौ पक्षीदेहधारी गंडभेरुंड,  म्हणजे  एका पायात गंडभेरूड ( दोन तोंडे असणारा पक्षी ) तर बाकी दोन पायात हत्तींना चिरडणारा असा शरभ शिवनेरीच्या प्रवेश द्वारावर आढळतो . ह्या शरभाचं पण अत्यंत बारकाईने निरीक्षण केल्यास त्याचे पंख दिसून येतात म्हणून त्याचं पक्षीदेह धारी असं यथार्थ वर्णन केले आहे .

 गंडभेरुंड हासुद्धा एक पौराणिक पक्षी असून तोही  अत्यंत सामर्थ्यवान आहे . त्याची छायाचित्रे आणि माहीती मी वेगळ्या लेखात सविस्तर पणे देईन .

लोभ असावा !
- राहुल अभ्यंकर , विरार .

अतिरिक्त माहिती आणि छायाचित्रांसाठी इंस्टाग्राम वर फॉलो करा.
 
 

विरगळ - Hero stone नौकादलाचा वीरगळ ( महाराष्ट्रातील एकमेव ) एकसार ( बोरिवली , मुंबई )

                      ॥ श्री गणेशाय नमः ॥


हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसि महिम् ।
तस्मादुतिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय ॥ 

भगवदगीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या ३६ व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करताना म्हणतात की " हे अर्जुना ! युद्धासाठी तयार हो कारण युद्धात मरण पावला तर तुला स्वर्गप्राप्ती होईल आणि जर का तुझा विजय झाला तर पृथ्वीचे राज्य उपभोगायला मिळेल त्यामुळे युद्धाचा निश्चय कर आणि तयार हो. "

आपल्या शास्त्रानुसार फार पूर्वीपासून युद्धांमध्ये वीरमरणाची प्राप्ती व्हावी याला अपार महत्व दिले गेलंय. आणि अशा या वीरांचे स्मरण येणाऱ्या पिढीला कायमस्वरूपी होत राहावं म्हणून जो शिल्प विशेष उदयाला आला तो म्हणजे विरगळ (Herostone )! वीरगळ समजून घेण्यासाठी त्याच्या मुळ संरचनेला समजून घ्यावं लागतं. काळ आणि स्थानपरत्वे त्याच्या रचनेत थोडं भिन्नत्व आहे परंतु वीर मरण आलेल्याचं स्वर्गरोहण आणि स्वर्गप्राप्ती या मूलभूत गोष्टी प्रत्येक शिल्पात आढळून येतात . 

वीरगळ बनवण्याची संकल्पना ही साधारणतः सातवाहन काळ म्हणजे सुमारे २२०० वर्षांपूर्वीपासून चालत आली आहे .सातवाहनांच्या व्यतिरिक्त वाकाटक, शिलाहार, राष्ट्रकुट, यादव ते अगदी मराठा साम्राज्य पर्यंत नियमित युद्ध आपण ऐकत आलो आहोत . साम्राज्यविस्तार आणि साम्राज्य संरक्षण ह्या दोन्हीसाठी युद्ध अटळ होतं. आज आपण जो वीरगळ बघणार आहोत तो महाराष्ट्रातला अत्यंत अनोखा असा नौकायुद्धाचा प्रसंग कोरलेला आणि महाराष्ट्रातला एकमेव ( नौकायुद्धाचा प्रसंग कोरलेला ) शिल्पपट आहे.

 चित्र क्रमांक १ . बोरीवली मधील एकसार गावातील शिलाहार कालीन नौकादल निदर्शक वीरगळ .

वर निर्देशित केल्याप्रमाणे चित्र क्रमांक एक मध्ये वीरगळाच्या दुसऱ्या टप्प्यात शिवपिंडी दिसून येते आणि संपूर्ण चित्रात वेगळी आणि उठावदार दिसणारी वस्तू म्हणजे त्या शिवपिंडीवर वाहिलेलं गुलाबी रंगाचे फूल ! वस्तुतः याच्या बाजुलाच एक अत्यंत सुंदर आणि लहानसं शिवमंदिर आहे .पण जुनं ते सोनं या हिशोबाने लोक आजही या वीरगळावरच्या शिवपिंडीला आस्थेने पुजतात .त्यामुळे आजही अज्ञान आणि आस्थेचा सुंदर मिलाफ बऱ्याचशा वीरगळांवरती दिसून येतो . म्हणूनच या लेखामध्ये मी वीरगळाचा प्रत्येक टप्पा आणि कप्पा उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे .

चित्र क्रमांक २ . एकसार गावातील वीरगळाचा सर्वात खालचा कप्पा (लढाई निर्देशक ).

सर्वसाधारणतः वीरगळाचा सर्वात खालचा टप्पा हा वीराच्या मृत्यूचं कारण दर्शवण्यासाठी असतो . यामध्ये विविध प्रकार असून त्याप्रमाणे वीरगळांचं वर्गीकरण केलं जातं. चित्र क्रमांक दोन मध्ये दाखवल्याप्रमाणे सदर वीरगळ हा नौका दलाच्या युद्धामध्ये आलेल्या वीराच्या वीरमरणाला दर्शवण्यासाठी उभारला गेला आहे . या सर्वात खालच्या कप्प्यामध्ये ३ नौका दिसून येतात. बारकाईने निरीक्षण केल्यास त्या शिडाच्या नौका होत्या हे दिसून येतं .सातवाहन काळामध्येच मोसमी वाऱ्यांचा शोध लागला होता आणि त्याचा वापर मुख्यत्वे व्यापारासाठी केला जात होता .सातवाहनांच्या नाण्यांवरती मिळालेलं जहाजाचं चित्र हे अधोरेखित करतं की अगदी तेव्हापासून आरमाराचं अस्तित्व भारतात होतं. शिडांव्यतिरिक्तही वल्ह्यांचा वापर नौकानयनासाठी केला जात असल्याचं दिसतं. मधल्या बोटीत बारकाईने लक्ष दिलं तर लढणारी माणस धनुष्यबाणाचा वापर करताना दिसतात तर काहीजण वल्ही मारताना दिसतात त्याचबरोबर नौकेच्या शेवटी एक माणूस सुकाणू धरून नौकेला दिशा दाखवताना स्पष्ट दिसून येतो आणि त्याला लागूनच असलेला दुसरा माणूस शिडाची दोरी सांभाळताना दिसतो. शिल्पकाराच्या कमी जागेत खच्चून जास्त शिल्प भरण्यामागचा उद्देश हा त्या घनघोर लढाईचं स्पष्ट शिल्पांकन व्हावं असा दिसतो. थोडक्यात ज्या वीराला मरण आलं ते ह्या नौका दलाच्या युद्धामध्ये आलं आणि ती लढाई बरीच घनघोर झाली असावी असं यातून आकलन होतं .


चित्र क्रमांक ३ . एकसार गावातील वीरगळाचा खालून दुसरा कप्पा ( स्वर्ग प्राप्ती निर्देशक )

सर्वात खालच्या कप्प्यात लढाईचा प्रसंग घडल्यावर त्याच्या वरच्या कप्प्यात सहसा त्या वीराला स्वर्ग प्राप्ती झाली असं अभिप्रेत करणारे शिल्प कोरलं जातं. वीराचं शौर्य आणि पराक्रम या कप्प्यातून सहज दाखवलं जातं. चित्र क्रमांक तीन मध्ये मध्यभागी असलेली शिवपिंडी वीर शिवाचा उपासक असल्याचा दर्शवते. त्याच बरोबर वीरमरण आल्यामुळे त्याच्या स्वर्ग प्राप्तीचा प्रसंग दर्शवते.  चित्र क्रमांक तीन मध्ये शिवपिंडीवर  (उजवीकडे) वाहिलेल्या गुलाबी रंगाच्या फुला च्या बाजूला एक पुरोहित उभा दिसतो. उजव्या हातातल्या भस्माच्या पुरचुंडीतून तो शंकरावरती भस्मलेपन करत असल्याचं दिसतं. पुरोहिताच्या मागे असलेल्या अप्सरा या सितार / वीणा सदृश्य तंतुवाद्य घेऊन गायन वादन करताना दिसतात. त्याच सोबत अप्सरांच्या वरती पुरोहिताचे काही शिष्यगण हे मंत्रोच्चारण करताना दिसतात . शिवपिंडीच्या दुसऱ्या बाजूला (डावीकडे) वीरगती प्राप्त झालेला वीर ( शिल्प भग्नावस्थेत ) चौरंगावर बसलेला दिसून येतो.  पुरोहित त्या वीराला वेदमंत्र सांगतात .

चित्र क्रमांक ४ . एकसार गावातील वीरगळाचा खालून तिसरा कप्पा  (स्वर्गरोहण )

वेदमंत्रांनी संपन्न झालेल्या शिव पूजनानंतर स्वर्गप्राप्ती झालेल्या वीराला अप्सरा स्वर्गात घेऊन जातात. चित्र क्रमांक चार मध्ये मधोमध वीर चौरंगावर बसलेला आढळतो ( वीराची मूर्ती पूर्ण भग्नावस्थेत ). त्याच्या आजूबाजूला चवऱ्या ढाळत उभ्या असलेल्या अप्सरा त्याच्या स्वर्गरोहणाची स्थिती दर्शवतात. वीराचा वेगळा कप्पा हा त्याने गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमाचं द्योतक असतं. बऱ्याचदा अप्सरा वीराला खांद्यावर उचलून नेताना दाखवतात किंवा या शिल्पाप्रमाणे त्याच्यासाठी विशेष यानाची व्यवस्था केली जाते. 

चित्र क्रमांक ५ . एकसार गावातील वीरगळावरील कलश (मोक्षप्राप्ती ).

वीरगळावरचा कलश मांगल्यासोबतच मोक्षप्राप्तीचंही प्रतिक आहे. चित्र क्रमांक पाच मध्ये कलश अत्यंत सुबकपणे कोरलेला आहे .त्यावरती श्रीफळ ( नारळ ) शोभून दिसतं . श्रीफळाभोवती यक्षिणी फेर धरून नाचताना दिसतात . कलशाचं भव्य आकारमान आणि सौंदर्य , सुबकता हे एका राजाचं वीरगळ असल्यांचं दर्शवतात. कारण इतकं भव्य, सुबक आणि सुरेख शिल्प कोरणाऱ्या शिल्पकाराला उत्तम मानधन द्यावं लागे आणि त्यासाठी राजा किंवा त्याचं राजघराणंच समर्थ असे.

सर्वसाधारणतः कोणत्याही वीरगळावर ब्राम्ही किंवा तत्सम लिपीतला शिलालेख उपलब्ध नसतो. त्यामुळे त्यामागचा अचूक इतिहास हा छातीठोकपणे सांगता येत नाही. परंतू इतिहासकारांच्या मते एकसार येथील वीरगळाबाबत दोन मतप्रवाह आहेत. प्रसिद्ध तत्त्ववेत्ता हेन्री कझिंग यांच्या मते शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचा राजा महादेव यादव यांच्यात तेराव्या शतकात झालेल्या घनघोर युद्धात वीरमरण पावलेल्या सोमेश्वराचे हे शिल्पचित्रण आहे. तर डॉ. शिल त्रिपाठी यांच्या मते हे स्मारक गुजरातच्या परमार भोज राजा याच्या कोकण विजयाचे प्रतीक आहे. व इ.स. १०२० साली साष्टी येथील नौकादल निदर्शक वीरगळ जमीन एका ब्राम्हणाला दान दिली, असा निष्कर्ष काढला आहे. 

संदर्भग्रंथ : - इतिहासाचे मूक साक्षीदार वीरगळ आणि सतीशिळा, श्री. अनिल दुधाणे.
 
 

सोलापूरजवळील सकाट गावातील वीर स्त्रीचा वीरगळ .

 ॥ हर हर महादेव ॥


चूल आणि मूल इतकीच चाकोरीबद्ध भूमिका स्रियांनी निभावली हे आपल्याला इतिहासकारांनी मनावर अगदी सहजपणे ठसवलं. पण भारतीय इतिहास केवळ पुस्तकांमधून नाही तर शिलालेख, बारव, मंदिरं आणि वीरगळ अशा अनेकोत्तम साधनांमधून वाचता येतो. आपल्याकडे लागते ती केवळ दृष्टी ! 

मागे सोलापूरच्या सहलीमध्ये सकाट गावात एक वीरगळ माझ्या दृष्टीस पडला. मारुतीच्या मंदिरात मारुतीच्या मूर्तीशेजारीच असे दोन वीरगळ पहायला मिळतात. ही गोष्ट मला सर्वत्र आढळली की वीरगळांचा संदर्भ काहीकदा लागत नसल्याने ते गावाच्या वेशीवर, देवळांमध्ये किंवा किल्ल्यांवर कुठेतरी कडेला लावून ठेवलेले दिसतात.


चित्र क्र १ . वीरगळाचे छायाचित्र .


चित्र क्र २. वीरगळाचे संपादित केलेलं छायाचित्र .

वीरगळ म्हणजे एक शिल्पपटच असतो. आणि म्हणून त्याला टप्प्या टप्प्यानेच समजून घ्यावं लागतं.

टप्पा क्र १. खालून पहिला कप्पा.

नेहमीप्रमाणे वीरगळाचा खालचा कप्पा हा वीराच्या मृत्यूचं कारण दर्शवतो. इथे पुरुषांऐवजी दोन स्त्रिया ( पिवळा रंग ) हातात ढाल आणि तलवार घेऊन लढताना दिसतात. गुडघ्यापर्यंत आलेली वस्त्रं, केसांचा बांधलेला अंबाडा, कानात झुलणारी भली मोठी कर्णकुंडलं लक्ष वेधतात. ( चित्र क्र १ . पाहावे ) . 

टप्पा क्र २ . खालून दुसरा कप्पा.

खालून दुसरा कप्पा हा मृत्यूपश्चात घडणाऱ्या गोष्टींचं वर्णन करतो. युद्धभूमीत मृत्यू आलेल्याला स्वर्ग मिळतो अशी शास्त्रात नोंद आहे. त्याप्रमाणे दोन अप्सरा ( हिरवा रंग )ह्या मृत्यू पावलेल्या स्रीला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी आलेल्या दिसतात. स्वतःच्या खांद्यावर बसवून त्या वीर स्त्रीच्या आत्म्याला स्वर्गात नेताना दिसतात. वीर स्त्री स्वत:चे दोन्ही हात अप्सरांच्या खांद्यावर ठेवून उभी दिसते. सोबतच अप्सरा हातातल्या चवऱ्या ( लाल रंग ) ढाळताना दिसतात. चवऱ्या म्हणजे पूर्वी राजे महाराजांच्या बाजूला दासी उभी राहून वारा घालत ते साधन. 

टप्पा क्र ३ . खालून तिसरा कप्पा.

या कप्प्यात वीर स्त्री मांडी घालून बसलेली दिसते. समोरच असलेल्या शिवपिंडी समोर नतमस्तक होऊन शिवआराधना करताना दिसते. स्वर्ग प्राप्ती झाल्यानंतर स्वतःच्या आराध्य देवाचं पूजन करण्याचा प्रसंग सर्वच वीरगळांवर आढळतो. असं असलं तरी बहुतांश वीरगळांवर शिवपिंडच आढळते हे विशेष.

टप्पा क्र ४ . सर्वात वरचा कप्पा.
 
सर्वात वरचा कप्पा हा सदर वीरेला मोक्ष प्राप्ती झाली हे कलशाच्या माध्यामतून दर्शवतो. कलश हा वीरगळाचा आणि वीर मनुष्याचं अंतिम ध्येय दर्शवतो. सहसा कलशाच्या रक्षणासाठी वाघ हत्ती शरभ इ. प्राणी किंवा काही मंगलचिन्ह कोरलेली असतात. ती इथे कुठेही मला आढळली नाहीत.

नेहमीप्रमाणे वीरगळावर कोणताही शिलालेख नसल्याने त्याचा काळ, लढाईचं विशिष्ट कारण इ. गोष्टींचा सहज बोध होत नाही. पण अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या प्रसिद्धी पावलेल्या रणरागिणींसोबतच अश्या काही प्रसिद्धी न पावलेल्या स्त्रियाही संसारासोबतच संरक्षणातही कर्तव्य चोखपणे बजावत होत्या हे कौतुकास्पदच ! 

लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार.
 
 

वीरगळ - गोधन संरक्षक ( भंडारदरा रतनवाडी )

गोधन संरक्षणाचा वीरगळ - अमृतेश्वर मंदिराजवळ , रतनवाडी, भंडारदरा

॥ हर हर महादेव ॥

यांत्रिकीकरण आणि औद्योगिकरणाच्या आधीच्या युगात पशुधन हे पण माणसाची मालमत्ता समजली जाई . ब्रिटीश काळात आणि थोडं त्यापूर्वीच्या काळात ओसरीवर झोपाळा , स्वतःची विहीर आणि गुराढोरांचा पसारा असणारा माणूसही श्रीमंत समजला जाई . शेतीसाठी पशूपालनाची गरज आणि त्या निमित्ताने का होईना पशू पक्ष्यांशी माणसांचा जिव्हाळा होता . वैदिक काळात तर गायींचा वापर चलन म्हणून केला जाई . मग कालांतराने विकत घेतलेल्या वस्तूच्या मोबदल्यात अर्धी गाय किंवा पाव गाय देणे शक्य नसल्याने इतर वस्तूंची देवाणघेवाण सुरु झालं . याची अखेर चलन व्यवस्थेत झाली तरी पशुधन, गोधन हे शब्द आजही व्यवहारात आहेत . ( संदर्भ : - प्राचीन भारतीय नाणकशास्त्र , एम. के . ढवळीकर ) . 

 ह्या पशुधनावर अनेकदा हल्ले होत असत . कधी श्वापदं ( वाघ , सिंह , कोल्हा इत्यादी ) , तर कधी टोळीयुद्ध, तर कधी चोर दरोडेखोर, इतर राज्यातले सैनिक इत्यादी पशुधनावर हल्ला करत असत . अशा वेळेला स्वतःचं पशुधन वाचवायला लोक प्राणांची बाजी लावायला ही कमी करत नसत . आणि जर या प्रसंगात ते मृत्यूमुखी पडले तर त्यांच्या बलिदाना प्रित्यर्थ त्यांच स्मारक दगडात घडवलं जाई जे येणाऱ्या पिढ्यांना साक्ष देई . असाच एक पशुधनाशी संबंधित एक वीरगळ आपण पाहणार आहोत .


चित्र क्र . १. बेवारस पडलेले वीरगळ, रतनवाडी , भंडारदरा .


चित्र क्रमांक १ मध्ये वीरगळ असेच झाडाच्या कडेला टेकवून ठेवलेले दिसत आहेत . न जाणो किती ऊन पावसाळे पाहीले असतील त्यांनी ! 


चित्र क्र . २ वर्षानुवर्षांच्या ऊन पावसाच्या आघाताने झिजलेला वीरगळ

चित्र क्रमांक दोन मध्ये झिजलेला वीरगळ दिसतो . वीरगळावर बहुतेक वेळा कोणत्याही प्रकारचं लेखन केलं जात नाही . त्यामूळे त्याच्या इतिहासाचा स्पष्ट मागोवा घेता येत नाही . तरीही त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून प्रसंग पुन्हा एकदा उभा केला जाऊ शकतो. सदर वीरगळ झिजला असल्याने मी त्याला थोडं संपादित करून समजता येईल असा प्रयत्न केला आहे .


चित्र क्र . ३ . वीरगळाचे संपादित केलेले छायाचित्र .

चित्र क्रमांक ३ मध्ये दाखावलेल्या वीरगळाचे एकूण ४ कप्पे करून त्याला समजता येईल आणि प्रसंग पुन्हा उभा करता येईल . ( चित्र क्रमांक २ आणि ३ ची तुलना करून पाहाणे ) .

कप्पा क्र १ - सर्वात खालचा कप्पा .

सर्वसाधारणतः वीरगळाचा सर्वात खालचा कप्पा हा त्याच्या मृत्युचं कारण दर्शवतो . सर्वात खालच्या कप्प्यात ( पिवळ्या रंगात ) वीर मरून पडलेला दिसतो . त्याच्या सभोवती ( पांढऱ्या रंगात ) पशुधन उभे दिसते. प्रथमदर्शनी पाहताना असे वाटू शकते की तो वीर त्यांच्या पायदळी आला असावा . मात्र ते तसं नसून त्यांना वाचवताना तो धारातिर्थी पडला असं अभिप्रेत आहे.

कप्पा क्र . २ खालून दुसरा कप्पा

हा कप्पा घनघोर युद्ध दर्शवतो . धारातिर्थी पडलेला वीर ( पिवळ्या रंगात डावीकडे ) हातात ढाल आणि तलवार ( हिरवा रंग ) घेऊन लढताना दिसतो . तर त्याच्या समोर घोड्यांवर ( पांढरा रंग ) बसून हातात तलवारी ( हिरवा रंग ) घेऊन  दोन स्वार ( पिवळा रंग ) येताना दिसतात . लढाई तुल्यबळ नसली तरी अशा सेने समोर धावून जाऊन त्वेषाने लढण्याचा पराक्रम वीराने केलेला दिसतो .

कप्पा क्र . ३ खालून तिसरा कप्पा

हा कप्पा वीराला वीरगती प्राप्त झाली असं दर्शवतो . डावीकडे एक पुरोहीत ( पिवळा रंग ) ( जटाभारा वरून ओळखावं ) शिवपिंडीवर भस्मलेपन करताना आणि मंत्रोच्चारण करताना दिसतो . उजवीकडे दोन वीर ( पिवळा रंग ) शिवलिंगाची पूजा करताना दिसतात . वीर मरणामुळे झालेली स्वर्गप्राप्ती ह्या कप्प्यात दर्शवतात .

कप्पा क्र . ४ सर्वात वरचा कप्पा .

हा कप्पा कलश ( आकाशी रंग ) दर्शवतो . सदर कलश हा त्या वीराला मोक्ष प्राप्त झाला याचं प्रतिक आहे . सर्वसाधारणतः कलशाभोवती वाघ, सिंह किंवा शरभ ( शरभ म्हणजे ? ) हे कलशाचे संरक्षक म्हणून कोरले जातात . किंवा सुर्य चंद्र ( यावत् चंद्र दिवाकरो ) कोरले जातात . सदर  वीरगळावर कलशाभोवती जे काही कोरलं आहे ते अत्यंत अस्पष्ट आहे त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही .

थोडक्यात सदर वीरगळ न बोलताही त्या काळची शिल्पकला , समाजव्यवस्था, लोकांच्या मनोअवस्था आणि तत्कालीन समजुतीं बदद्ल बरंच काही सांगून जातो . म्हणूनच यांचं संवर्धन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे . वस्तूचं मूल्यं माहीत नसेल तर कसं काय कोणी तिला सांभाळेल ? ती कळावी म्हणून हा लेखप्रपंच .

लोभ असावा ....!
राहुल अभ्यंकर , विरार

अजून माहीती, छायाचित्र आणि अभिप्रायासाठी इन्स्टाग्राम वर संपर्क करा .
 
 

हरीहरात्मक रुक्मिणी पांडुरंग मूर्ती, वेरूळ !

श्री गणेशाय नमः

मूर्ती शास्त्राचा अभ्यास करताना मूर्ती वैविध्याचाही अभ्यास आपसूकच घडतो आणि ह्याची प्रचिती मला वेरूळ इथल्या हरिहरत्मक रुक्मिणी पांडुरंग मूर्ती या मूर्तीचा अभ्यास करताना आली. एखादी मूर्ती स्वतःमध्ये शंकर विष्णू आणि पांडुरंग या तिघांचं जर तेज धारण करत असेल तर त्याच्या सौंदर्याची कल्पना करा.
आता सर्वप्रथम मूर्तीची माहिती आणि थोडासा इतिहास समजून घेऊया. ही मूर्ती वेरूळ इथल्या बारा ज्योतिर्लिंग पैकी घृष्णेश्वर मंदिराच्या एक किलोमीटरच्या अंतरावर टोपरे कुटुंबीयांच्या घराजवळ सुप्रतिष्ठित आहे. मूर्तीच्या दैनिक पूजेचे आणि सेवेचे सौभाग्य टोपरे कुटुंब गेली सातशे वर्ष सांभाळत आहेत. मी प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांनी माझं उत्तम स्वागत केलं आणि त्याचबरोबर संपूर्ण वेळ चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत मूर्ति बद्दलच्या माझ्या प्रश्नांचं उत्तम निरसन केलं त्याबद्दल त्यांचे अनंत आभार ! 
ही मूर्ती तिथे कशी आली याबद्दलची कथा त्यांच्याकडूनच ऐकायला मिळाली ती खालील प्रमाणे :
खूप पूर्वी सातशे वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याला जमीन नांगरताना जमिनीत काहीतरी अडलं आणि काय आहे हे बघायला गेला तर जमिनीतून रक्ताची धार निघत असताना त्याला दिसलं. आजूबाजूची जमीन खणून मोकळी केल्यावर त्याला सदर मूर्ती नजरेस पडली. त्यावेळेस त्या गावांमध्ये मल्हार स्वामी म्हणून एक महाराज तपश्चर्या करत होते. शेतकऱ्याने त्यांना भेटून विनंती केली की मला शेतामध्ये नांगरताना अशी मूर्ती सापडली आहे आणि माझ्याकडनं तर तिची पूजा अर्चा होणे शक्य नाही तर तिला तुमच्या सानिध्यात आणून ठेवतो जेणेकरून तिची दैनिक पूजाअर्चा करणे सोपे होईल. महाराजांनी संमती दिली आणि शेतकऱ्याने त्या काळामध्ये उपलब्ध असलेल्या गाडीवरती दोन बैल लावले आणि त्यावर ती मूर्ती उचलून ठेवली. पण दोन बैलांनी ती मूर्ती पुढे खेचली जाईना तेव्हा आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे चार बैल आठ बैल असं करत करत बऱ्याच बैलांची शक्ती वापरूनही ती मूर्ती काही हलेना. शेवटी परत महाराजांकडे येऊन त्या शेतकऱ्यांनी प्रसंग कथन केला आणि त्यांना शेतात येण्याची विनंती केली. महाराज मूर्ती सापडलेल्या शेतात आले आणि त्यांनी मूर्तीला हात जोडले आणि सांगितलं की तुम्ही माझ्यासोबत चला. बाकी शेतकऱ्यांनी ती मूर्ती उचलून महाराजांच्या डाव्या खांद्यावर दिली आणि इतकी प्रचंड मूर्ती महाराजांनी एकट्याने उचलून त्यांच्या मठाजवळ आणून सुप्रतिष्ठित केली. नांगरताना झालेल्या जखमेचा व्रण आजही या मूर्तीवर दिसून येतो. सातशे वर्षांपूर्वी शेतात सापडली म्हणजे या मूर्तीचा मूळ किती जुना असेल यासाठी कल्पनेचाच आधार घ्यावा लागेल !



चित्र क्र १ हरिहरात्मक रुक्मीणी पांडुरंग 

मूर्तीबद्दल विवेचन करायचं झाल्यास तिचं नाव हरिहरात्मक रुक्मिणी पांडुरंग का असावं तर ह्याची दोन कारणं, एक म्हणजे मल्हार स्वामी यांनी स्वतः हे नाव या मूर्तीला दिलं आणि मूर्तीचे अलंकार त्याची आयुधं या सगळ्याचा विचार केला तर यामध्ये शंकर आणि विष्णूची आयुधं आढळून येतात. मूर्ती अष्टभुजा म्हणजे आठ हातांची आहे. प्रत्येक हातात आठ वेगवेगळी आयुधं दिसून येतात. 
विष्णूच्या आयुधांबद्दल :
विष्णूची आयुधं म्हणजे शंख चक्र गदा आणि कमळ. मूर्तीच्या उजव्या हातात गदा आणि कमळ आढळून येतात. गदा भलीमोठी असून त्यावर किर्तीमुख आणि मारुती कोरलेला दिसतो. मूर्तीच्या डाव्या हातात शंख आणि चक्र आढळते. शंखाच्या बनावटीवरून तो पांचजन्य शंख असल्याचे अंकित होते. पांडुरंगाच्या हातातही शंख दिसतो त्या अनुषंगाने ही पांडूरंगाची मूर्ती असल्याचा अंदाज बांधता येतो.
शंकराच्या आयुधांबद्दल :
ह्या मूर्तीत शंकराची काही आयुधं आहेत पण ती सुस्पष्ट नाहीत. मूर्तीच्या उजव्या हातात सर्वात वरती तलवार / खड्ग सदृश्य आयुध तर उजव्या हातात पाठच्या बाजूला भाल्या सदृश्य आयुध आढळतं. डाव्या हातात वरच्या बाजूला टंक ( दोन्ही बाजूला त्रिशूळ ) सदृश्य आयुध दिसतं तर डाव्या हातात (शंखाच्या वरच्या बाजूस ) सर्प पकडलेला दिसतो. खड्ग, सर्प आणि टंक ह्या आयुधावरून शंकराची मूर्ती असल्याचा संदर्भ देता येतो.
बाकी मूर्तीला रुक्मीणी का म्हणतात हे मल्हार स्वामींनाच ठाऊक. 


 चित्र क्र २ मूर्तीची डावी बाजू

चित्र क्र ३ मूर्तीची उजवी बाजू

बाकी एकंदर मूर्ती अत्यंत सुबक, आखीव रेखीव आणि प्रमाणबद्ध आहे. हातात अंगठ्या, बाजूबंद इत्यादी अलंकार सुंदर कोरले आहेत. दगडावर वज्रलेप केला असल्यामुळे दगडाचा पोत ( texture ) कळू शकला नाही पण मूर्तीची प्राचीनता पाहून तिच्यावर होयसळ कलेची छाप असवी हे नक्की !

लोभ असावा !
राहुल अभ्यंकर , विरार !
Instagram - Chaturthamiti
 
 
 

त्रिंगलवाडी गावातील घोडेस्वार सतीशिळा

॥ हर हर महादेव ॥

वीरगळांचे अनेक प्रकार आढळतात. त्यातला सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे सतीशिळा. वीरगळ हा वीराच्या मृत्युचे कारण दर्शवतो तर सतीशिळा ही त्या वीराची पत्नी त्याच्या मृत्युनंतर  सती गेली हे दर्शवते. सतीशिळा ओळखावी कशी हे समजण्यासाठी वीरगळाचे नीर निरीक्षण करावे. त्याच वीरगळावर जर कुठेही कोपरापासून दुमडलेला हात दिसला ( चित्र क्र १ ) तर त्या वीरगळाला सतीशिळा म्हणतात. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या ( ईगतपूरी, नाशिक ) पायथ्याशी प्राचीन जैन लेणी आहेत. त्यांच्या जवळ आढळलेल्या सतीशिळेबद्दल.



चित्र क्र १. सतीशिळेचं छायाचित्र.


चित्र क्र. २. सतीशिळेचं संपादीत छायाचित्र.


 चित्र क्र ३. सतीशिळेचा खालचा टप्पा

 चित्र क्र. ४. सतीशिळेचा मधला कप्पा


नेहमी प्रमाणे वीरगळ आणि सतीशिळा टप्प्या टप्याने समजून घेऊ.

कप्पा क्र १ . सर्वात खालचा कप्पा . चित्र क्र ( ३ )

सर्वात खालच्या कप्प्यात सती जाणारी स्त्री घोड्यावर बसलेली दिसते . सोबत तिच्या सहचरणी आहेत . त्यांच्या डोक्यावर सतीचे वाण आहे. 

कप्पा क्र. २ वीरगळाच्या  उजव्या बाजूला कोपरातून दुमडलेला हात ( चित्र क्र २ नारिंगी रंग )

स्वातंत्र्य पूर्व काळापर्यंत सती जाण्याची प्रथा होती.  सती जाणे म्हणजे पतीच्या निधनानंतर पत्नीने त्याच्या चितेवर आत्मदहन करून घेणे. ( सदर प्रथा काळाच्या ओघात बंद झाली असल्याने त्यावर कोणतीही टिपण्णी म्हणजेच कमेंट करू नये ही वाचकांना नम्र विनंती ). जसं युद्धात वीरमरण आलं की स्वर्ग मिळे ही भावना समाजात रूढ होती तीच भावना सती जाणे ह्या चाली बद्दल होती. त्यामुळे वीराच्या चितेवर सती जाणं हे भाग्याचं समजलं जाई. सदर वीराची पत्नी सती गेली हे दर्शवण्यासाठी कोपरापासून दुमडलेला हात दाखवला आहे. हातावर ठळकपणे दिसणाऱ्या बांगड्या पत्नी सौभाग्यासह स्वर्गवासी झाली हे ठळकपणे दर्शवण्यासाठी आहेत.

कप्पा क्र. ३ वीरगळाचा खालून दुसरा कप्पा ( चित्र क्र. ४ )

हा टप्पा वीराच्या मृत्युनंतरचा प्रसंग दर्शवतो. सदर वीर हा मृत्युपश्चात शिवपिंडीची पूजा आणि आराधना करताना दिसतो. पाय दुमडून बसलेला नंदी, त्याच्या पाठीवरचं कुबड अगदी स्पष्ट दिसतं. वीराच्या पाठी त्याची पत्नी सुद्धा हात जोडून बसलेली दिसते. शिव आराधना करून त्यांना स्वर्गप्राप्ती झाली असं दर्शवले आहे.

कप्पा क्र. ४ सूर्य, चंद्र आणि कलश 

चित्र क्र २ मध्ये कलशाच्या खाली चंद्रकोर आणि संपूर्ण सूर्य कोरलेले दिसतात. यावत्चंद्रदिवाकरो  म्हणजेच जोवर आकाशात चंद्र सूर्य असतील तोवर यांची किर्ती टिकेल असा त्याचा अर्थ आहे. पण त्यावर शिलालेख नसल्याने लढाईचं कारण, वीराचं नाव आणि इतर बारकावे लक्षात येत नाहीत. सर्वात वर कलश काढलेला आहे. कलशाचा अर्थ सदर वीर दांपत्याला मोक्षपद मिळाला असा असतो. 


लोभ असावा !

राहुल अभ्यंकर, विरार.

 

शिलालेखांचं नंदनवन - समुद्राकाठची कुडा लेणी, मुरुड !

॥ श्री गणेशाय नमः ॥

एखाद्या लेण्यामध्ये शांतचित्ताने डोळे मिटून ध्यान करावं आणि डोळे उघडल्यावर साक्षात समुद्र देवाचे दर्शन व्हावं असा अनुभव देणारं एकमेव लेणं हे कोकणात मुरुड मध्ये मांदाड गावाजवळ कोरलेलं आहे. नेहमीप्रमाणे एखाद दुसरे लेणं नसून इथेही २६ लेण्यांचा समूह दिसतो. कोकणाची ओळख असलेल्या जांभा खडकांमध्ये ही लेणी नाहीत हेही त्याचं एक वैशिष्ट्य ! लेणी बेसॉल्ट खडकात कोरलेली असून त्यात बुद्ध, समुद्री घोडा आणि दान देणाऱ्या युगुलाचं शिल्प इत्यादी अनेक शिल्प आढळतात. सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे प्रत्येक लेण्यांच्या दारावर आढळणारे शिलालेख आणि त्यांना कोरताना कोरक्याने वापरलेली प्रतिभा संपन्न वळणं. जुन्नर, नाशिक इत्यादी ठिकाणी आढळणाऱ्या शिलालेखांपेक्षा या शिलालेखांमधली ब्राम्ही लिपी ही थोडी वेगळी आहे आणि तिचं सौंदर्य अगदी दुरूनही नजरेत भरतं.


 चित्र क्र १ . मांदाड येथील कुडा लेणी ( छायाचित्र सौजन्य: maharashtratourism.co.in)

लेण्यांचे ठिकाण निवडताना दगडाची निवड,दगडाचा पोत, दगडाचे पाणी साठवण्याची क्षमता आणि तीव्र उन्हाळ्यात टाक्यांमध्ये पाणी आटल्यास आजूबाजूला बारमाही वाहणाऱ्या नदीची व्यवस्था या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जात असे. त्यातल्या त्यात ही लेणी समुद्राच्या काठावर आहेत आणि त्यातून दिसणारं समुद्राचं दृश्य अगदी विहंगम आहे.


चित्र क्र . २ कुडा लेण्यांमधील बुद्ध शिल्प .


चित्र क्र . ३ लेण्यांच्या प्रवेशद्वारातील बुद्ध  शिल्प


चित्र क्र . ४ दान करणाऱ्या युगुलांचं शिल्प

ह्या लेण्या हिनयान आणि महायान पंथांच्या मिश्रणातून बनलेल्या लेण्या आहेत . इसवी सन पूर्व काळात लेण्या खोदायला सुरुवात झाली होती. त्यामुळे हिनयान पंथात आढळणाऱ्या लेण्यांची वैशिष्ट्य जसं की लेणी समूह चैत्यगृह, विहार आणि स्तूप इथे आढळतात. सोबतच महायान पंथाची वैशिष्ट्य म्हणजेच गौतम बुद्धांची शिल्प ही कालांतराने महायान पंथ सुरू झाल्यानंतर इथे कोरली गेली.  लेण्यांची एकंदर दुमजली रचना आहे . पहिल्या मजल्यावर लेणी,त्याच्यात काही शिल्पं, पाण्याच्या टाक्या आणि प्रत्येक ठिकाणी आढळणारे शिलालेख आहेत . तर दुसऱ्या मजल्याच्या सुरुवातीला एक भव्य स्तूप, त्याभोवती प्रदक्षिणापथ आणि शिलालेख आढळून येतात. संपूर्ण दुसरा मजला चढून गेल्यावरती लेण्यांचा समूह, शिलालेख आणि पाण्याची टाकी या गोष्टी आढळतात. दुसऱ्या मजल्यावर कुठेही शिल्पकाम आढळून येत नाही.

 

चित्र क्र . ५ . ब्राम्ही लिपीतील शिलालेख


चित्र क्र . ६ शिलालेखातील सुस्पष्ट अक्षरं आणि झोकदार वळणं असलेली अक्षरं


चित्र क्र . ७ शिलालेखातील ऊन पाऊस वारा झेलूनही सुस्पष्ट असलेली अक्षरं


चित्र क्र . ८ प्रवेशद्वारावरील शिलालेख


चित्र क्र . ९ पाण्याच्या टाक्यांवरील शिलालेख

चित्र क्रमांक पाच ते नऊ हे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आढळणारे शिलालेख दर्शवतात. ब्राम्ही लिपी अत्यंत आकर्षक पद्धतीने अनेकविध झोकदार वळणं घेत कोरलेली इथे बघायला मिळते. दगडावर शिलालेख कोरताना तो अत्यंत काळजीपूर्वक नाजूकपणे आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने कोरलेला दिसतो. ब्राह्मी लिपीच्या अक्षरांची खरी नजाकत अनुभवायचे असेल तर या लेण्यांना नक्की भेट द्या ! दोन एक हजार वर्षांमध्ये पाहिलेली स्थित्यंतरं लेण्यांच्या अक्षर सौंदर्याला बाधा पोहोचू शकली नाहीत हे विशेष ! व्हरांड्यात, भिंतीवर, पाण्याच्य टाक्यांवर अशी जळी स्थळी शिलालेखांनी नटलेली ही लेणी अक्षरप्रेमींसाठी नंदनवन आहेत. केवळ ब्राम्ही भाषेचं मूलभूत ज्ञान असणाऱ्यांनाही हे शिलालेख मंत्रमुग्ध करून टाकतील इतकं नक्की !


चित्र क्र . १० लेण्यांच्या खिडकीतून दिसणारा समुद्र


चित्र क्र . ११ लेण्यांच्या वरच्या भागातून दिसणारं समुद्राचं विहंगम दृष्य.

समुद्राचा सहवास लाभलेल्या लेण्या भारतात अगदी तुरळकतने आढळतात. मांदाड गाव हे पूर्वी खूप प्रसिद्ध बंदर होतं आणि या गावाला रोम ग्रीस इत्यादी ठिकाणाहूनही पर्यटकांनी भेट दिल्याच्या नोंदी आहेत. लेण्यांचं भौगोलिक स्थान बघितल्यास लेण्या केवळ वर्षावासासाठी नसून सदर बंदरावरती टेहळणीसाठी ही वापरल्या जात असाव्यात त्याच सोबत बंदरातून येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचारही करण्याचे उपयोगात येत असाव्यात असं प्रकर्षाने जाणवते.

तळ टीप : लेणी गुगल मॅप वर निट दर्शवलेली नसल्याने जवळपास जाऊन गावात चौकशी करत पुढे जावे .

लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार .
 
 

खांडेपार लेणी - गोव्यातील जांभा खडकातील लेणी !

॥ हर हर महादेव ॥

जांभा खडकातल्या लेण्यांचं अस्सल सौंदर्य पाहायचं असेल तर गोव्यात खांडेपार नावाचं गाव गाठावं. गोव्यातल्या ५१ संरक्षित स्मारकांपैकी एक म्हणजे फोंडा येथील खांडेपार नदीजवळील खांडेपार लेणी ! स्थापत्य शास्त्रातल्या नेहमीच्या ठोकताळ्यांना बगल देत वेगळ्याच पद्धतीने बनवलेल्या लेण्या पाहायला मिळतात. सर्वसाधारण लेण्यांच्या आजूबाजूला आणि वरती खडक पाहायला मिळतो ज्यामध्ये लेण्या कोरलेल्या असतात. पण खांडेपारच्या लेण्यांमधे चक्क दगडात कोरलेलं शिखर दिसतं (चित्र क्र १ पहा). सध्या ही शिखरं अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. ह्या लेण्या दगडात कोरलेल्या वाटत नाहीत. उलट दगड आणून मंदिर बांधाव अश्या पद्धतीने बांधल्या आहेत. पण नीट निरीक्षण केलं तर कोरीव काम की बांधकाम असा प्रश्न पडतो हे त्याचं सौंदर्य विशेष !

 

चित्र क्र १. खांडेपारची लेणी.


चित्र क्र २. लेण्यांच्या आतली संरचना

एकूण ४ लेण्यांचा समूह पाहायला मिळतो. त्यात तीन लेण्या एकमेकांना लागून आहेत. यातल्या प्रत्येक लेण्यांमध्ये २ खोल्या आहेत. जवळूनच खांडेपार नदी वाहते. सर्व लेण्या अगदी साध्या आहेत. जांभा खडकांचं सौंदर्यच त्याला उठाव देण्यासाठी पुरेसं आहे.

  


चित्र क्र ३. लेण्यांच्या छतावरील कमळाच्या पाकळ्यांचं शिल्प

लेण्यांच्या छतावर कमळाच्या पाकळ्यांचं शिल्प आहे. चित्रात ते अस्पष्ट दिसत आहे त्यामुळे ते कळून येत नाही. दारांवर लाकडी दरवाजासाठी चौकट बसवता येईल अशी संरचना आढळते. त्यांचबरोबर भिंतीतले कोनाडे, पाण्याचा निचरा व्हावा म्हणून केलेली लहान भोकं प्रत्येक लेण्यात दिसून येतात. एकंदरीतच राहणाऱ्यांच्या निवासाची उत्तम सोय केलेली दिसते.


चित्र क्र ४. भिंतीतले कोनाडे.


चित्र क्र ५. एका लेण्यातून दिसणारं दुसरं लेणं.


चित्र क्र ६. चौथ्या लेण्यातील लिंगपीठ आणि योनीपीठ .

ह्या लेणीसमूहात चौथं लेणं स्वतःच स्वतंत्र अस्तित्व राखून आहे. तीन लेण्या आणि त्यातल्या सहा खोल्या निवासासाठी तर चौथं लेणं हे भगवंतासाठी राखून ठेवलं असावं असं वाटतं. सध्या जरी पूजाकार्य होत नसलं तरी जुन्या काळात हे नक्कीच छोटेखानी देऊळ असावं असं त्याच्या सद्यस्थितीवरून वाटतं. ह्या चौथ्या लेण्यात योनीपीठावरील लिंगपीठ आढळून येतं. हरवाळे लेण्यांप्रमाणेच इथेही शिव उपासना घडत असावी. सध्याचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे गणेश मूर्ती असलेला मातीचा दिवा !

चित्र क्र ७. गणेश मूर्ती असलेला मातीचा दिवा.

हा दिवा अतिशय आकर्षक आहे. ह्यात दोन हातांचा गणपती आढळतो. आखूड मांड्या, लांबलचक सोंड, आशिर्वादाचा हात, दुसऱ्या हातात मोदक, डोक्यावर लहानसा मुकूट ही मूर्ती वैशिष्ट्ये दिसतात. सोबत चार दिव्यांसाठी केलेली योजना दिसते. 

 

चित्र क्र ८. लेणी परिसरातलं पक्षीवैभव - दयाळ पक्षी


चित्र क्र ९. नदीवरील झोकदार वळण.

लेण्यांचा परिसर लोकवस्ती पासून जरासा लांब आहे. त्यामुळे ह्या निसर्ग रम्य परिसरात नेहमी पक्ष्यांची वर्दळ असते. चित्र क्र ८ मध्ये मला दिसलेला दयाळ पक्षी कॅमेर्‍यात मी टिपून घेतला. लेण्यांच्या समोरून खांडेपार नदी वाहते. पाण्याच्या संथ प्रवाहावरून नदीच्या खोलीची कल्पना करावी . पाणी इतकं स्वच्छ, शुद्ध, आणि निर्मळ आहे की त्यात पडलेलं प्रतिबिंब आणि वरचं आसमंत ह्यात फरक न ओळखता यावा ! 

कमेंट आणि शेअर करून आपला लोभ व्यक्त करावा !
राहुल अभ्यंकर, विरार 
Instagram -  chaturthamiti
 
 
 

लज्जागौरी - स्त्रीच्या मातृत्वाचे पूजन !

॥ श्री गणेशाय नमः ॥


धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही चतुसूत्री आपल्या शास्त्रात प्राचीन काळापासून सांगितली आहे. भारतातली आणि भारताबाहेरील काही निवडक मंदिरं पाहताना तुम्हाला ही चतुसूत्री आवर्जून पाहायला मिळेल. देवळांच्या बाह्य भिंती म्हणजेच मंडोवरावर धर्म, अर्थ आणि काम ह्या संदर्भात अनेक शिल्प आढळतात. धर्म सांगण्यासाठी रामायण महाभारत आणि पुराणातल्या इतर अनेक कथांचा वापर करून विविध शिल्प घडवलेली दिसतात. तर पूर्वीच्या काळात अर्थकारण कसं चालायचं याचा दृष्टांत म्हणून शेतीकाम, पशुपालन इत्यादी अनेक शिल्प बाह्य भिंतीवर आढळतात( जी लोकांनी हेतू पुरस्करपणे नेहमी दुर्लक्षित ठेवली). काम शिल्प ही केवळ खजूराहो मंदिरात आहेत असा अनेकांचा गैरसमज आहे मात्र ते तसे नसून काम शिल्प बऱ्याचशा मंदिरांच्या मंडोवरावर आढळतात. मुळातच, एखाद्या गोष्टीचा मूळ हेतू ज्ञात नसल्यास त्याबद्दल वावड्या उठणं अत्यंत स्वाभाविक ! धर्म, अर्थ, काम हे बाहेर बाह्य भिंतींवर कारण मोक्ष मिळण्याआधी हे सर्व करणे गरजेचे असे शास्त्रकारांनी सांगितले. आधी प्रपंच करावा नेटका ! हे सर्व जगून देवळाबाहेरच ठेवून देवळाच्या आत मोक्ष मिळावा म्हणून प्रवेश करावा ही इतकी साधी सोपी शास्त्रकारांची योजना !

काम शिल्पांसोबतच त्याच धाटणीतली परंतु एक आगळी वेगळी मूर्ती मंदिरांच्या बाह्य भिंतीवर आढळते ती म्हणजे लज्जागौरी ! लज्जागौरी म्हणजेच स्त्रीच्या मातृत्वाचे पूजन. आपल्याला ज्या स्त्रीने जन्म दिला ती स्त्री म्हणजे निसर्गाची एक किमयाच ! अगदी पूर्वापार मनुष्य प्राण्याला जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती वाटली किंवा जेव्हा जेव्हा तो त्या गोष्टीला पूर्णतः वश करू शकला नाही तेव्हा तेव्हा त्याने त्या गोष्टीचं पूजन केलं. उदाहरणादाखल पर्जन्य, अग्नी, वायू आकाशातले तारे जसे की सूर्य, चंद्र इत्यादी गोष्टी एक तर भयामुळे किंवा मनुष्याची त्यांच्या प्रति असलेल्या कृतज्ञतेमुळे पूजनीय झाल्या. तसंच मातृत्व ही सुद्धा इतक्या सहस्त्र वर्षांनंतरही अनाकलनीय आणि अचाट संकल्पना आहे ! म्हणूनच लज्जा गौरीच्या मातीच्या , काष्ठ म्हणजे लाकडावर कोरलेल्या आणि दगडात कोरलेल्या मूर्ती अगदी मोहेंजोदारो काळापासून आढळतात.

आता लज्जा गौरीची प्रतिमा ओळखायची कशी ? सर्वप्रथम लज्जा गौरी म्हणजे स्त्रीची नग्न प्रतिमा ! इथेच सर्वसामान्य मनुष्य गोंधळून जातो की पूजनच करायचं तर नग्न प्रतिमेचे कारणच काय ? आता हे समजून घ्या की मातृत्वाचे पूजन म्हणजे जन्म होण्यापूर्वी योनीद्वारे गर्भधारणा,  गर्भात असताना आपण आईशी नाळेने जोडलेलो असतो म्हणून बेंबी, योनी द्वारे स्त्री प्रसूती करते म्हणून पुन्हा योनी, आणि जन्मानंतर अपत्याचे स्तनांद्वारे पालनपोषण आई करते म्हणून हे अवयव अतिशय महत्वाचे ! त्यामुळे हे सर्व अवयव ठसठसशीत पणे दिसावेत म्हणूनच नग्न प्रतिमेची योजना, अन्य दुसरे कारण नाही. त्यातही योनीचा भाग जास्त ठळकपणे दिसावा म्हणून मांड्यांची रचना इंग्रजी अक्षर ( M ) प्रमाणे केलेली दिसते. 


चित्र क्र. १ भिवंडी येथील लोणाडच्या शिवमंदिरातील लज्जागौरी


चित्र क्र. २ मोढेरा येथील सूर्य मंदिरातील मुख्य मंदिराच्या बाह्य भिंतीवरील राणीच्या प्रसुतीचे शिल्प पट


चित्र क्र. ३ मोढेरा येथील सूर्य मंदिराच्या नृत्य मंडपाच्या बाह्य भिंतीवरील लज्जा गौरीचे शिल्प.


 चित्र क्र ४ अंबेजोगाई येथील शिवमंदिराच्या बाह्य भिंतीवरील लज्जा गौरी शिल्प.

लज्जा गौरीच्या अनेक मूर्ती भारतभर आढळतात त्यात तीन वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आढळून येतात. पहिला प्रकार म्हणजेच या मूर्तीला स्त्रीचा चेहरा आढळून येतोआणि त्यासोबतच वर उल्लेख केल्याप्रमाणे मातृत्व निर्देशक अवयव ठळकपणे दर्शवलेले असतात. ह्या मधला दुसरा आणि तिसरा प्रकार वैशिष्ट्यपूर्ण आहे. वैशिष्ट्यपूर्ण ह ह्यासाठी की शास्त्रकारांनी हे वेळेवरच जाणले की लज्जा गौरीचे नग्न शिल्प जर चेहऱ्यासकट दर्शवलं तर मनुष्य चेहऱ्याकडे आकर्षित होऊ शकतो आणि मातृत्व पूजन होण्याऐवजी वासनेची निर्मिती होऊ शकते. हे टाळण्यासाठी बऱ्याच ठिकाणी एकतर चेहऱ्याऐवजी कमळ दर्शवलं आहे किंवा धडाखालचा भागच शिल्पांकित केला गेला. अशा पद्धतीने मूळ हेतुला फाटा न देता मातृत्व पूजनावर शास्त्रकारांनी भर दिला. लज्जा गौरीचं स्वतंत्र शिल्प असलेली देवळही आढळतात आणि त्यांचे पूजनही केलं जातं आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे वेगवेगळ्या मंदिरांच्या बाह्य भिंतीवरही लज्जा गौरी आढळते मात्र ती शोधावी लागते.

आज आपण भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे असं जरी म्हणत असलो तरीसुद्धा जन्म हा स्त्रीच देऊ शकते पुरुष केवळ निमित्त मात्र ! जुन्या काळामध्ये ही वीर पुरुष हे स्वतःच्या आईच्या नावाने किंवा आईच्या कुळाने ओळखले. देवकीनंदन कृष्ण, कौशल्या पुत्र राम हे पुराणातले संदर्भ, तर थोडंसं मागे गेलो तर 2200 वर्षांपूर्वी असलेल्या सातवाहन सत्तेत गौतमीपुत्र सातकर्णी हा बलाढ्य राजा स्वतःच्या आईचे नाव लावत असे. शहाजीराजांचे पुत्र असले तरी छत्रपती शिवाजी महाराज हे ओळखले जातात जिजाऊ मातेमुळेच ! पण असो कालाय तस्मै नमः ।

लज्जा गौरी या शिल्पाला इतरही अनेक पैलू आहेत जे सर्व समावेशक लेखांमध्ये देता येत नाही त्यामुळे त्यांचा संक्षेप देतो. अधिक माहितीसाठी मला संपर्क करा. 

संदर्भ: - लज्जागौरी, रा. चिं. ढेरे.

लोभ असावा !
राहुल अभ्यंकर , विरार !
 

चेन्नकेशवा मंदिर, बेलूर, कर्नाटक, भाग १

॥ ॐ केशवाय नमः ॥


चेन्न म्हणजे कानडी भाषेत सुंदर आणि केशवा म्हणजे विष्णू,  आणि सुंदर अश्या विष्णूचे मंदिर तेच चेन्नकेशवा मंदिर. कर्नाटक राज्यातल्या हासन जिल्ह्यात बेलूर या गावात हे भव्य दिव्य मंदिर आहे. भव्यतेची कल्पना मंदिर बांधायला १०३ वर्षे लागली यावरूनच घ्यावी. तेराव्या शतकात होयसळ  साम्राज्यात हे मंदिर बांधले गेलं. मंदिराचा आवार अतिप्रचंड असून आत मध्ये साक्षात श्री विष्णूंची पूजा घडत असल्यामुळे आध्यात्मिक स्पंदनं सक्रिय आहेत. 


चित्र क्र १ मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार



मंदिराचे मुख्य भाग

१) गोपूर
२) गरुड मूर्ती आणि गरुड ध्वज
३) मुख्य मंदिर
४) मुख्य मंदिराची लहान प्रतिकृती
५) झोपाळा - विशिष्ट दिवशी देवाला झोपाळ्यात बसवून झोके देतात ,
६) कल्याण मंडप - गावातल्या लोकांसाठी लग्ना साठी सभागृह.
७) देवीचं देऊळ.
८) बारव - देवळासाठी पाण्याची व्यवस्था, लहान विहीर.
९) कृष्ण मंदिर.
१०) मंदिराभोवतीचं दगडी कुंपण ( विविध नागदेवता आणि इतर देवतांची शिल्पं आणि सोबतच अनेक वीरगळ. )

आता मंदिराच्या वेगवेगळ्या भागांची महत्वाची माहिती घेऊया.


चित्र क्र २ गोपूर

मंदिरा समोरच अतिशय भव्य गोपूर दिमाखात उभं आहे. मंदिराच्या सभोवती दगडी भिंत आहे. गोपुराच्या खालून देवळात प्रवेश करता येतो. देऊळ तेराव्या शतकात पूर्ण झालं. आणि गोपुराचं बांधकाम सोळाव्या शतकात विजयनगर साम्राज्यातल्या राज्यकर्त्यांनी पूर्ण केलं. देवळाच्या बाह्य भिंतीवर काम शिल्पं अत्यंत कमी प्रमाणात आहेत मात्र गोपुरावर काम शिल्पं कोरलेली आहेत. गोपुराचा सर्वात वरचा भाग गायीच्या कानासारखा असल्यानं त्याला गोपूर म्हणतात.



चित्र क्र ३ गरुड मूर्ती आणि गरुडध्वज

गोपुरातून आत प्रवेश केल्यावर आपली भेट होते विष्णूच्या वाहनाशी म्हणजे गरुडाशी. पाठी पसरलेले पंख, हातावरील बाजूबंदामधे सर्प, बोटांमधल्या अंगठ्या , पाठीमागची प्रभावळ, डोक्यावरचा मुकूट, धन्युष्याच्या आकाराच्या भुवया, आणि गरूडाचं मानवी देह धारण केलेलं रूप सहज लक्ष वेधून घेतं. सदर मूर्ती आतल्या देवासमोर हात जोडून उभी आहे. गरुड म्हणजे प्रचंड सामर्थ्य. एका अखंड दगडात घडवलेल्या ह्या मूर्तीला नतमस्तक होऊन पुढे मुख्य देवळाकडे वळूया.


चित्र क्र. ४ मुख्य देवळाच्या प्रवेशद्वारावरील मकर तोरणातील गरुड शिल्प .


चित्र क्र ५ . मकरतोरणातील गरुड शिल्प किर्तीमुख उग्र नरसिंह आणि विष्णूचे दशावतार.


चित्र क्र 6 . मकरतोरण

देवळांच्या मुख्य प्रवेशद्वारावर आढळणारं महत्त्वाचे शिल्प म्हणजे मकर तोरण. मकर हा पौराणिक प्राणी असून तो अनेक वेगवेगळ्या प्राण्यांपासून बनलेला आहे. डुकराचं अंग, सिंहाचे पाय, माकडाचे डोळे, मोराची पिसं, हत्तीची
 सोंड, गायीचे कान आणि मगरीचे तोंड अशा सात प्राण्यांची वैशिष्ट्य एकत्र करून मकर हा प्राणी बनतो.
सोबतच विष्णूचे दशावतार म्हणजेच मत्स्य कुर्मवराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की हे वाचकांच्या डावीकडून उजवीकडे या क्रमाने कोरलेले दिसतील. ( लाल रंगाची वर्तुळं ) . 
मधोमध उग्र नरसिंह हिरण्यकश्यपूच पोट फाडताना दिसतो. हा नरसिंह होईसळ घराण्याचे कुलदैवत मानलं जातं.
नरसिंहाने सोळा हातांचं रूप धारण केलेले दिसतय. सर्वात वरच्या हातात हिरण्यकश्यपूचं आतडं फाडून बाहेर काढलं हे दर्शवताना शिल्पकाराने साखळी सदृश्य आतडी दाखवलेली दिसते.उरलेल्या हातांमध्ये एका हाताने हिरण्यकश्यपूच डोकं पकडलेले दिसतं तर दुसऱ्या हाताने त्याचा पाय धरलेला दिसतो.बाकी हातांमध्ये विविध आयुध म्हणजेच गदा कमळ धनुष्य आणि भाले पकडलेले दिसतात ज्यांच्या सहाय्याने नरसिंह इतरही राक्षसांचा संहार करताना दिसतो.
सोबतच वरती किर्तीमुख दिसतं. ( पिवळा आयत )


चित्र क्र ६ सिंहावर विजय मिळवणाऱ्या राजाचं शिल्प

होयसळांच्या सर्वात पहिल्या राजाने सिंहासारख्या ताकदवान प्राण्याची शिकार केली होती. त्यामुळे चित्र क्र ६ मध्ये दिसणारं शिल्प हे जणू त्यांचं राजचिन्ह म्हणावं लागेल. आणि त्यांनी बांधलेल्या मंदिराच्या दारात ते आवर्जुन आढळतं .


चित्र क्र ७ प्रवेशद्वाराच्या डावीकडील मदनाचं शिल्प


चित्र क्र ८ प्रवेशद्वाराच्या उजवीकडील रतीचं शिल्प

मंदिराच्या प्रवेशद्वारावर मदन रतीचा शिल्प आढळतं पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे मदन आणि रती दोघेही वेगवेगळे दाखवलेले आढळतात. याचा अर्थ असा की कामादी विचार हे देवळाच्या बाहेरच सोडून मग देवळाच्या आत शिरावं . 
 
मंदिराचा आवाका प्रचंड असल्याने पुढील लेखात मंदिराचा अंतर्भाग, बाह्य भिंतीवरील शिल्पं आणि प्रांगणातील इतर गोष्टी अंतर्भूत केल्या जातील. पुढील लेखांची लिंक मिळवण्यासाठी खालील गुगल फॉर्म मध्ये आपला ई मेल आयडी नोंदवावा. अधिक माहीती आणि छायाचित्रांसाठी इंस्टाग्राम वर संपर्क करा ( वेबसाईट वरील Follow us वर क्लिक करा. )

लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार .
 
 
 
 

चेन्नकेशवा मंदिर भाग २ मंदिराचे अंतरंग

॥ ॐ केशवाय नमः ॥

प्रवेशद्वारातील गोपूर, गरुड मूर्ती, मकर तोरण , नरसिंह, दारातील द्वारपाल जय - विजय आणि मदन रतीचं शिल्प पाहून आपण मंदिरात प्रवेश करतो. ( जर तुम्ही भाग एक वाचला नसेल तर येथे क्लिक करा). आणि समोर दिसणार भगवंताचं मोहक रूप चित्तवृत्ती बदलून टाकतं. चित्र क्रमांक एक मध्ये दिसणाऱ्या लाल रंगाच्या पडद्यामागे भगवंताच्या दोन वेगवेगळ्या मूर्ती दिसतात.एक आहे ती नऊ फुटाची काळ्या दगडामध्ये घडवलेली विष्णूची मूर्ती ,मूर्तिशास्त्रा प्रमाणे अचल मूर्ती ह्या प्रकारात मोडणारी. अचलमूर्ती म्हणजे सुप्रतिष्ठित केलेली आणि जिला गर्भगृहाच्या बाहेर कधीही काढलं जात नाही. त्यासोबतच भगवंताची एक धातूची चल मूर्ती असते जिच्यावरती नित्य अभिषेक आणि इतर उपचार केले जातात.त्याचसोबत रथोत्सवाच्या वेळी या चल मूर्तीलाच बाहेर काढून मिरवलं जातं.सदर मंदिरात गर्भगृहाचे छायाचित्र काढण्यास मनाई आहे. त्यामुळे भगवंताच्या चल आणि अचल दोन्ही छायाचित्रांचा इथे संक्षेप देतो .

चित्र क्र १ मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील मकरतोरण , विष्णू लक्ष्मीचं शिल्प आणि द्वारपाल

भगवंताच्या लोभस मूर्तीच्या दर्शनानंतर आपण हळूहळू भानावर यायला लागतो.समोर दिसायला लागतात ते म्हणजे मकर तोरण गर्भगृहाच्या आजूबाजूला उभे असलेले द्वारपाल आणि एकूण 48 स्तंभ ज्यांनी मंदिराचा अंतर्भाग बेमालूम खुलवलेला आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर आपल्याला मकर तोरण बघायला मिळतं आणि त्या मकर तोरणाच्या केंद्रभागी श्री विष्णू आणि लक्ष्मीचं शिल्प बघायला मिळते.द्वारपाल हे साक्षात श्री विष्णूंचे द्वारपाल असल्यामुळे त्यांनीही हातामध्ये भगवंताचीच आयुधं धारण केल्याचं बघायला मिळतं. भगवंताच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल असण्याचे कारण म्हणजे गर्भगृहामध्ये सत्पात्र व्यक्तीलाच प्रवेश मिळावा. आजही मुख्य गर्भगृहामध्ये सोवळे नेसल्याशिवाय प्रवेश वर्ज्य आहे.

चित्र क्र. २ द्वारपालांचं शिल्प

द्वारपालांच्या शिल्पात हातातली गदा शंख हे आयुधं साक्षात श्री विष्णूंची असल्याने सहजगत्या हे अधोरेखित करता येतं की हे श्रीविष्णूंचे द्वारपाल आहेत.सोबतच त्यांचा कंबरपट्टा , यज्ञोपवीत ,बाजूबंध , हातातल्या अंगठ्या इत्यादी अलंकार लक्षवेधक आहेत. प्रत्येक शिल्पाच्या पाठीमागे प्रभावळ अगदी लक्ष देऊन बघावी अशी आहे.

चित्र क्र 3 मोहीनीचं शिल्प

मंदिराच्या अंतर्भागात दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत आणि त्यातला एक महत्त्वाचा स्तंभ म्हणजे मोहिनी रूप. समुद्रमंथनातून निघालेल्या अमृताचे वाटप करताना भस्मासुराचा वध करण्यासाठी श्रीविष्णूंनी मोहिनी रूपधारण केलं होतं. या शिल्पाचं करताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूर्तीच्या भुवया धनुष्यासारख्या आहेत म्हणून कामाक्षी, डोळे माशासारखे आहेत त्यामुळे मीनाक्षी, चंद्रासारखा मोहक चेहरा असल्यामुळे चंद्रमुखी अशी विविध नाव या एकाच मूर्तीला लागू पडतात. शरीर शास्त्रानुसार मानवी देह हा एक समान सात भागांमध्ये विभागला जातो ज्यामध्ये एक सप्तमांश भाग हा चेहऱ्याच्या किंवा हाताच्या वितेच्या आकाराचा असतो आणि ही कसोटी या मूर्तीला तंतोतंत लागू  पडते .

चित्र क्र ४ मंदिरातले स्तंभ 

मंदिराच्या शिखराचा भार हा वेगवेगळ्या ४८ स्तंभांवर पेललेला आहे. प्रत्येक खांबावरती पाच वेगवेगळे स्तर आहेत जे पाच वेगवेगळ्या दगडात घडवून मग एकमेकांसोबत इंटरलॉकिंग पद्धतीने जोडलेले आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की प्रत्येक स्तंभ हा वेगवेगळ्या पद्धतीने घडवलेला आहे आणि प्रत्येकावरती वेगवेगळे भौमितिक आकार आणि वेगवेगळं नक्षीकाम केलेला आहे. आजच्या अत्याधुनिक काळातल्या लेथ मशीन वर घासून घडवलेल्या एखाद्या यंत्राचा भाग असावा अशा पद्धतीने हे दगड घासून कोरून गुळगुळीत घडवलेले आहेत. जाणकार व्यक्ती हे स्तंभ बघताना मंत्रमुग्ध होतील यात शंका नाही.

चित्र क्र ५ नृत्यमंडपाच्या वरील शिखराच्या अंतर्भागातील ब्रम्हा विष्णू महेशाची संगममूर्ती .

आपल्या जीवनात भगवंताचे स्थान परमोच्च आहे आणि त्या भगवंताला अंगभोग आणि रंगभोगाने सेवा अर्पण करायची असते. अंग भोग म्हणजे सुगंधी उटणे स्नान वस्त्रालंकार इत्यादी सह षोडशोपचार पूजा तर रंगभोग म्हणजे भोजनातर नृत्य गीत वादन इत्यादींनी देवतांचे मनोरंजन करणे. सदर मंदिरात मंदिराच्या गाभाऱ्यासमोरच नृत्य मंडप आहे ज्यात स्वयं महाराणी भरतनाट्यम हा नृत्य प्रकार करून भगवंताला रंगभोग अर्पण करत असे. त्याच नृत्य मंडपाच्या वरच्या बाजूला शिखरात ब्रम्हा विष्णू महेशाची संगम मूर्ती पाहायला मिळते. शिखराच्यावरच्या भागातून खाली आल्यास कमळाप्रमाणे फुलत जाणार ब्रह्मस्वरूप, मधोमध नरसिंहाची मूर्ती आणि ती मूर्ती धारण केलेलं दंडगोलाकार रचनेतलं शिवलिंग. त्याचसोबत बाजूला सूरसुंदरींची चार शिल्पही बघायला मिळतात( चित्र क्र ५ ).

चित्र क्र ६ महाराणी रंगभोग अर्पण करताना भरतनाट्यम मुद्रा

चित्र क्र ७ भरतनाट्यम मुद्रा

महाराणीची भरतनाट्यम मुद्रा पाहताना शंकराच्या तांडव नृत्याची आठवण येते. एका पायावर तोलून धरलेला शरीरभार, अंगावरचे दागिने, हातांच्या मुद्रा, डोक्यावरील केशरचना आणि सर्वात मुख्य म्हणजे नृत्यात तल्लीन झालेल्या चेहऱ्यावरच्या भावमुद्रा. सोबतच पायापाशी लहान आकाराच्या मुर्त्यांमध्ये साथ देणारे, ढोल वाजवणारे आणि राणीच्या काही दासींची शिल्पं कोरलेली दिसतात.

चित्र क्र ८ नृत्य मयुरीच शिल्प

पूर्वीच्या काळात अशी धारणा होती की स्त्रीला मोरासारखं नृत्य करता आलं पाहिजे आणि पोपटासारखं बोलता आलं पाहिजे. चित्र क्रमांक आठ मध्ये एक सूर सुंदरी हातावरती पोपट आणि मोराच्या संगमाने बनलेल्या पक्ष्याशी बोलताना दिसते. पूर्वीच्या काळात संदेश वहनासाठी कबूतर पाळले जायचे जे लिहिलेली चिठ्ठी मालकापर्यंत पोहोचवत असत.त्याचप्रमाणे पोपटही पाळले जायचे जे आपण बोललेले शब्द दुसऱ्या व्यक्तीला पुन्हा एकदा बोलून दाखवून आपला संदेश पाठवत असत. 

चित्र क्र ९ स्नानानंतर केस झटकणारी स्त्री
चित्र क्रमांक नऊ मध्ये नुकताच स्नान करून आलेली स्त्री स्वतःचे ओले केस झटकताना दिसते. मूर्तीचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केल्यास तिच्या केशसंभाराच्या टोकाला शिल्पकाराने बारीक बारीक पाण्याचे थेंब दाखवलेले आहेत.सदर कृती करताना पायांची विशिष्ट ठेवण, अंगावरचे दागिने आजूबाजूचे नक्षीकाम या सगळ्या गोष्टी सुद्धा पाहण्यासारख्या आहेत.

चित्र क्र ११ मंदिराच्या आतला मुख्य स्तंभ

चित्र क्रमांक ११ मध्ये दाखवलेला स्तंभ हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे.मंदिराच्या आत मध्ये आणि बाहेर अनेक वेगवेगळ्या सुरसुंदरी आणि देवतांची शिल्प भिंतीवरती पाहायला मिळतात. त्या सर्व शिल्पांची लहान प्रतिकृती या एकाच स्तंभावर पाहायला मिळते. या स्तंभावर अनेक देवतांची शिल्प आहेत त्यामुळे पुजारी पूजा करताना मुख्य गाभाऱ्यात पूजा झाल्यानंतर या स्तंभाचीही पूजा करतात आणि त्या भोवती प्रदक्षिणा घालतात. असं म्हणतात की या स्तंभाला घातलेली प्रदक्षिणा ही पूर्ण मंदिराच्या प्रदक्षिणे समान आहे. एक भव्य दिव्य प्रतिकृती जी अख्ख्या मंदिराच्या कानाकोपऱ्यात आहे आणि तीच हुबेहूब प्रतिकृती या एका स्तंभावर अगदी लहानशा आकारात कोरलेली आहे हे बघताना खूप आश्चर्य वाटतं.

चित्र क्र १२ भविष्यात येणाऱ्या कलाकारासाठी सोडलेला रकाना

ह्या स्तंभातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे यामध्ये एक रकाना रिकामा सोडलेला आहे.ज्यांनी हे मंदिर घडवलं त्या कलाकारांच्या अंतकरणात असं होतं की कलेला कधीही मरण नाही.तर आमच्या नंतरही कोणीतरी यावं आणि भगवंताच्या दारात त्यांना त्यांची शिल्पकला सादर करता यावी. म्हणून मुख्य स्तंभामध्ये त्यांनी हा रकाना रिकामा सोडलाय. पण अजूनही त्यांच्या तोडीचा कोणी शिल्पकार हा रकाना घडवू शकला नाही हे आपलं दुर्दैवच.

पुढच्या लेखामध्ये मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवरील वेगवेगळ्या शिल्पांची माहिती आपण घेणार आहोत. त्यासाठी संपर्कात रहा. तुमचा माझा प्रत्यक्ष संपर्क घडत नसल्यास खालील "stay connected with chaturthmiti" या लिंक वरती क्लिक करून आपला ई-मेल आयडी नोंदवावा. 


लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...