Friday, June 14, 2024

मुर्ती शास्त्र आणखी माहिती

 

अप्रतिम अतुलनीय अर्धनारीश्वर (राजापुर, जि. हिंगोली)

औंढा नागनाथ जवळ राजापुर येथे तीन मुर्ती आहेत. यात सरस्वती आणि योग नरसिंह यांच्या मुर्ती आहेत. तिसरी अप्रतिम मुर्ती आहे अर्धनारीश्वराची. शिव पार्वतीची संयुक्त मुर्ती. उजव्या बाजुला शिव आहे आणि डावीकडे पार्वती. पत्नी ही नेहमी डाव्या बाजूला दाखवली जाते म्हणूनच वामांगी असा शब्द आला आहे.
  या शिल्पकाराचे कसब अगदी एक एक जागी आढळते. पार्वतीचा मुकुट सजलेला (करंडमुकुट) आणि शिवाचा मुकुट जटांचा. तिच्या कानात सुंदर नाजूक कुंडले तर शिवाच्या कानात सर्पाकार कुंडले. पार्वतीला हातभर काकणं, तोडे. बाजुबंद, खालच्या हातात नाजुकपणे धरलेला कमंडलू. कमरेला मेखला. कमाल म्हणजे तिच्या वस्त्रांवरची नक्षीही दाखवलेली आहे. पायात तोडे तर आहेतच पण अंगठ्या जवळच्या बोटात जोडवे पण आहेत. वरच्या हातात आरसा आहे.
    शिवाच्या वरच्या हातात त्रिशुळ आहे. खालच्या हातात अक्षयमाळा आहे. बाजुबंद सर्पाकार राकट आहे. पायात रूंडमाळा दिसतात, पण हीच माळ पार्वतीच्या बाजूने नाजूक दागिना बनते. गळ्यातील माळेचेही असेच. शिवाच्या बाजूने सरळ ठाशीव दिसणारी माळ पार्वतीच्या स्तनांवरून वळण घेत कलात्मक डौलदार बनते. तिचे वार्‍यावर उडणारे वस्त्र आणि शिवाचे जाडे भरडे वस्त्र.
खाली शिवाचे वाहन नंदी आहे आणि पार्वतीचे सिंह न दाखवता लोध (मुंगुस किंवा घोरपड) दाखवले आहे.
महाराष्ट्रात अर्धनारीश्वराच्या मुर्ती फार थोड्या आहेत. ज्या आहेत त्या मंदिराच्या बाह्य भागावर कोरलेल्या आढळून येतात. मुख्य मुर्ती म्हणून कोरलेवी हाच एकमेव अप्रतिम नमुना.

 .अत्यंत विचित्र वाहनांवर आरूढ झालेल्या देवींचे दर्शन !

 









.अत्यंत विचित्र वाहनांवर आरूढ झालेल्या देवींचे दर्शन !
( गाढव, कोंबडा, घुबड, मांजर, उंट, मगर )
आपल्या देशात शेती संदर्भातील मुख्य कामे आटोपली की नंतरच्या काळामध्ये, विविध सण साजरे केले जातात. गणपती उत्सवानंतर नवरात्रोत्सव हे स्त्रीशक्तीला अधिक प्राधान्य देणारे पर्व आहे. मेहनत आणि हवामानामुळे खर्च झालेली शारीरिक ताकत पुन्हा प्राप्त करण्यासाठी, याकाळात शक्तीची आराधना केली जाते. सप्तशतीच्या पाठातील देवीच्या युद्धाची वर्णने ही साहित्यात एकत्रितपणे अभावानेच आढळणाऱ्या रौद्र, भीषण, वीर, अद्भुत आणि बीभत्स रसाचा आविष्कार करणारी आहेत. एका स्त्रीच्या नेतृत्वाने, पराक्रमाने इतक्या क्रूर आणि शक्तिवान मायावी शक्तींना हरविले हे महत्वाचे आहे. जगामध्ये स्त्रीशक्तीचे असे उदाहरण प्रत्यक्षात सोडा पण वाङ्मयातसुद्धा आढळणार नाही. आपल्याकडे स्त्रीला कमी लेखले जाते असे म्हणण्यावर हे पूर्ण वेगळे उदाहरण आहे. जगाला छळणाऱ्या अत्यंत ताकतवान, बलदंड, क्रूर, असुरी शक्ती जर कुणी संपविल्या असतील तर त्या स्त्री शक्तींनी, देवींनी ! असामान्य सिद्धी लाभलेल्या पुरुष-असुरांना संपविण्यासाठी पुरुष देव नाही तर स्त्री देवता उभ्या राहिल्या. त्यांनी या असुरांना घनघोर, मायावी युद्धात लीलया हरविले, ठार मारले. म्हणूनच नवरात्र हा एक प्रकारे स्त्री शक्ती जागविण्याचा उत्सव आहे. यातील प्रत्येक तिथीला, देवी विविध रूपामध्ये अवतरते. नवरात्रीत देवी नऊ विविध रूपांमध्ये पुजली जाते. तसाच सप्तमातृका, ६४ योगिनी, सात आसरा, देवीची महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे, देशभरातील आणि शेजारील देशातील देवी सतीची ५१ शक्तिपीठे यासह देवीच्या सर्व मंदिरांमधून नवरात्रोत्सव साजरा केला जातो.
सर्वसाधारणपणे आपण देवीच्या ज्या मूर्ती पाहतो त्यात तिचे वाहन म्हणून वाघ, सिंह, मोर, हंस इत्यादी प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात. पण आपल्या धर्मामध्ये अत्यंत विचित्र वाहनांवर आरूढ झालेल्या अनेक देवी आहेत. त्याची थोडी माहिती घेऊ या. देवी आणि वाहने या प्रतीकात्मक, सांकेतिक गोष्टी आहेत. विविध देवी म्हणजे विविध प्रकारच्या लहरी असल्या पाहिजेत. या लहरी वाहून नेणारी माध्यमे म्हणजे ही वाहने ! एकाच प्रकारचे प्रक्षेपणास्त्र बोट, रॉकेट लॉंचर, विमान अशा वेगवेगळ्या वाहनांवरून डागल्यास त्याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. तशीच या देवी लहरींची वाहनानुसार शक्ती बदलत असलेली पाहिजे. ( यावर माझ्या कुवतीनुसार माझा अभ्यास सुरु आहे. त्याचा तपशील पुन्हा केव्हातरी देईनच ! )
पण या सर्वपरिचित वाहनांपेक्षा अत्यंत विचित्र वाहनांवर आरूढ झालेल्या अनेक देवी आहेत. कांही वेळा एकच देवी वेगवेगळी वाहने वापरते असेही दिसते. तिच्या शक्तीचे आणि लढ्याचे स्वरूप, कारण, तिचा सहकारी, जागा, तिचा शत्रू इत्यादींनुसार वाहन बदललेले दिसते. नेहेमीच्या आयुष्यात आपण ज्यांना अत्यंत अपवित्र, अशुभ, त्याज्य प्राणी / पक्षी मानतो त्यांनासुद्धा देवीने आपले वाहन बनविले आहे. साप हे कामाख्या देवीचे वाहन मानले गेले आहे. तारिणी देवीचे बदक, सप्तमातृकांतील एक चामुंडा देवीचे कुत्रा, कारकरी योगीनीचे खेकडा, गौरी योगिनींची घोरपड,जलकामिनी योगिनीचा बेडूक, रतीचे कबुतर अशी आश्चर्यकारक वाहन मालिका आहे. संबंधित देवीच्या शक्तीनुसार पूरक वाहनांची निवड करण्यात आली आहे. आपली पुराणातील कथांमध्ये कल्पिलेली अशीच अन्य कांही वाहने, देवी आणि माहिती --
घुबड ----- हा पक्षी अशुभ, अपवित्र मानला जातो. तरीही देवी लक्ष्मीने त्याला आपले वाहन मानले आहे. लक्ष्मीला सर्वात भीती चोरीची असते आणि चोरीची शक्यता रात्री अधिक असते.घुबड हा अत्यंत बुद्धिवान पक्षी आहे. घुबड अत्यंत सूक्ष्म आवाज ऐकू शकते. केवळ आवाज ऐकून ते शिकार करते. त्याच्या पंखांचा आवाज येत नाही इतके ते उडताना सावध असते. असे वाहन हे रात्रीसुद्धा लक्ष्मीचे अधिक सक्षमतेने रक्षण करते असे मानले जाते. त्याच्या हुशारीचा एक गंमतीदार पुरावा म्हणजे घुबडांच्या समूहाला पार्लमेंट म्हटले जाते. लक्ष्मीच्या घुबड या वाहनामुळे तिला उलूकवाहिनी असे नाव पडले आहे.
कोंबडा -- किन्नर ( तृतीयपंथी ) पंथाची पूजनीय बहुचरा देवी ही कोंबड्यावर आरूढ झाली आहे. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात तिचे मंदिर आहे.
मांजर --- मुलाच्या जन्मानंतर सठी / षष्ठीची पूजा केली जाते. ही षष्ठी देवी लहानमुलांची रक्षणकर्ती आहे. या षष्ठीदेवीचे वाहन चक्क मांजर आहे. मांजर हे वाहन असलेली " षष्ठी " ही एकमेव देवी आहे.
गाढव---- स्कन्द पुराणानुसार देवदेवतांनी भगवतीच्या आराधनेसाठी जेव्हा यज्ञ केला त्यातून शितलादेवी प्रकटली. ही देवी गोवर, कांजिण्या, देवी, ज्वरजन्य विकार यांचा नाश करते. या देवीचे वाहन चक्क गाढव हे आहे. नवरात्रीतील सातव्या दिवशीचे देवीचे रूप असलेली कालरात्री या देवीचे वाहनसुद्धा गाढव आहे.
उंट ------ गुजरात व राजस्थानमध्ये मोमाई माँ, उंटेश्वरी किंवा दशा माँ या नावांनी ओळखली जाणारी देवी ही उंटावर विराजमान झालेली आहे. आपले आरोग्य, पिकाचे आणि पशुधनाचे संरक्षण या साठी शेतकरी तिची भक्ती करतात. तिला माती पासून बनविलेला छोटा उंट अर्पण केला जातो. नल राजा आणि दमयंती यांनीही हिची भक्ती केल्याची कथा आहे.
मगर ---- महानदी गंगेचे देवी स्वरूपात पूजन केले जाते. क्षमाशीलता आणि पावित्र्य यांची ती अधिपती आहे. या रूपामध्ये गंगेचे वाहन मगर आहे.
कासव --- यमुना नदीलाही देवता स्वरूपात पुजतात. तिला यामिनी, कालिंदी असेही संबोधले जाते. ती मृत्यूच्या भयापासून रक्षण करते. गोड्या पाण्यातील कासव हे तिचे वाहन कल्पिलेले आहे.
एकंदरीत काय, तर माणसाने कितीही भेदभाव उभे केले असले तरी देव मात्र त्याने बनविलेल्या कुठल्याही प्राण्याला, माणसाला, पक्षाला अपवित्र, अशुभ, त्याज्य, निरुपयोगी मानत नाही. त्या प्रत्येकात त्याने कांही ना कांही असामान्य शक्ती घातलेली आहे. त्यातून देवी म्हणजे मातृशक्ती ! तिने अशा तऱ्हेने प्रत्येकाला दिलेले स्थान, केलेला सन्मान हा याच महत्वाच्या गोष्टीचा प्रत्यय आहे. विज्ञान सुद्धा सर्व प्राणी हे जैव साखळीच्या महत्वाच्या कड्या आहेत असे मानते.
सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
सौजन्य -- सर्व चित्रे आणि कांही माहिती -- विकिपीडिया,गुगल
©( हा लेख व चित्रे शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावीत )
***** मकरंद करंदीकर.
makarandsk@gmail.com
http://maharashtra-bhakti-shakti.blogspot.com/2023/10/blog-post.html

सप्तमातृका

 आशुतोष बापट

आपल्या पुराणांमध्ये  कथांच्या माध्यमातून वेगवेगळे तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. वराहपुराणदेखील सप्तमातृकांच्या माध्यमातून असेच मोठे तत्त्वज्ञान मांडते.

एखादे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना सहजगत्या समजावे म्हणून विविध पुराणांमधून कथा रचल्या गेल्या. त्या कथा एखाद्या देवतेच्या जन्माच्या किंवा एखाद्या देवतेने एखाद्या राक्षसावर मिळवलेल्या विजयाच्या असतात. बरीचशी पुराणे ही त्या त्या देवतेच्या सामर्थ्यांची वर्णने करतात. पुराणांतून काही सुंदर कथा सांगितलेल्या आहेत. सप्तमातृका ही संकल्पना मातृका, मातृदेवता इथपासून ते महादेवाला अंधकासुरवधाच्या वेळी मदत करण्यासाठी विविध देवांनी आपल्यापासून निर्माण केलेल्या शक्ती इथपर्यंत विस्तृतपणे वर्णिलेल्या दिसतात. वेगवेगळी पुराणे सप्तमातृकांबद्दल कथा सांगतात. त्यात बरीचशी सुसंगती असली तरी काही ठिकाणी विपर्यास किंवा काहीशी वेगळी कथा सांगितलेली दिसते. या सर्व पुराणांत वराहपुराण सप्तमातृकांची कथा सविस्तर सांगते. ती पुढीलप्रमाणे-

कश्यपाला दितीपासून दोन पुत्र झाले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपु. त्या दोन्ही असुरांना विष्णूने अनुक्रमे वराह अवतार घेऊन आणि नरसिंह अवतार घेऊन ठार मारले. हिरण्यकशिपुचा मुलगा प्रल्हाद हा तर महान विष्णुभक्त होताच. प्रल्हादाने हिरण्यकशिपु नंतर उत्तम राज्यकारभार केला आणि नंतर सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून संन्यास घेतला. त्यानंतर असुरांचा राजा झालेला अंधकासुर यानेही कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून विविध वर प्राप्त करून घेतले आणि त्यामुळे तो शक्तिशाली बनला. अर्थातच तो उन्मत्त झाला आणि सर्व देवांना त्रास देऊ लागला. देवांनी मदतीसाठी कैलासावर महादेवाकडे धाव घेतली. शंकर भगवान या सर्व देवांची तक्रार ऐकत असतानाच प्रत्यक्ष स्वत: अंधकासुर, पार्वतीचे अपहरण करण्याच्या हेतूने कैलासावर दाखल झाला. शिव तत्काळ अंधकासुराशी लढण्यासाठी सज्ज झाले. त्यांनी लगोलग वासुकी, तक्षक, आणि धनंजय या तीन नागांचा बंध आपल्या कमरेभोवती बांधला. त्याच वेळी नील नावाचा अजून एक राक्षस महादेवाला मारण्यासाठी हत्तीच्या रूपात तिथे येऊन ठेपला. शिवाचे वाहन असलेल्या नंदीला हे समजले आणि त्याने शिवाचाच अंश असलेल्या वीरभद्राला याची कल्पना दिली. वीरभद्राने सिंहाचे रूप घेतले आणि त्याने हत्तीच्या रूपातील नील राक्षसाचा वध केला. त्यानंतर त्याने हत्तीचे कातडे शिवाला भेट दिले. शिवाने ते कातडे अंगावर पांघरले आणि तो अंधकासुराशी युद्ध करण्यास सज्ज झाला. अंगावर हत्तीचे कातडे पांघरलेले, सर्पाची आभूषणे अंगावर ल्यालेली, हातात त्रिशूळ धारण करून शिव आपल्या गणांसमवेत अंधकासुराशी युद्ध करू लागला. विष्णू आणि इतर देवगण शिवाच्या साहाय्याला धावून आले. परंतु घनघोर युद्ध सुरू झाले आणि इतर देवांना तिथून पळून जावे लागले. शेवटी शिवाने आपला त्रिशूळ अंधकासुराच्या पोटात खुपसला आणि त्याला उंच उचलून घेतले.

परंतु अंधकासुराच्या अंगातून रक्ताचे थेंब गळू लागले. ते थेंब जमिनीवर पडताच त्यातून एकेक अंधकासुराच्या रूपातील राक्षस निर्माण होऊ लागला. अशा रीतीने हजारो अंधकासुर तिथे निर्माण झाले. विष्णूने आपल्या सुदर्शनचक्राने हे इतर मायावी अंधकासुरांना ठार मारले. अंधकासुराच्या अंगातून रक्ताचे आणखी थेंब जमिनीवर पडू नयेत म्हणून शिवाने आपल्या तोंडातून ज्वाळा निर्माण केल्या आणि त्या ज्वाळेतून योगेश्वरी नावाची एक शक्ती निर्माण केली. त्याबरोबर इंद्र आणि इतर देवतांनीही आपापली शक्ती निर्माण करून ती शिवाच्या मदतीला तिथे पाठवली. ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्माणी, इंद्राची शक्ती इंद्राणी/ऐन्द्री, महेशाची माहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, आणि यमाची शक्ती चामुंडा अशा या सात शक्ती देवता तिथे उत्पन्न झाल्या. त्यांना सप्तमातृका असे संबोधले जाऊ लागले. त्या शिव आणि अंधकासुर यांच्या युद्धात मध्ये आल्या आणि त्यांनी अंधकासुराच्या अंगातून होणारा रक्तस्राव आपल्या शक्तीने थांबवला. या लढाईत शेवटी अंधकासुराची शक्ती संपत आली आणि शिवाने त्याचा पराभव केला. अशा रीतीने या सप्तमातृकांचा उदय झाला. या मातृकांच्या हातात त्या त्या देवाची आयुधे होती. तसेच त्या मातृका त्या त्या देवतांच्या वाहनांवर बसून आलेल्या होत्या.

वराहपुराणात विस्तृतपणे मांडलेली ही आहे सप्तमातृकांची कथा. विविध पुराणांमधून मातृका, त्यांचा उगम, त्यांचे कार्य याबद्दल कथा वाचायला मिळतात. त्यात वराह, विष्णू, मत्स्य, कूर्म आणि देवीपुराणाचा समावेश होतो. तसेच शिल्पशास्त्रावर आधारित असलेल्या ‘सुप्रभेदागम’ या ग्रंथातही मातृकांचा उल्लेख केलेला आहे. परंतु वराहपुराणात वर उल्लेख केलेली अगदी विस्तृत कथा पाहायला मिळते. शिवाय इतर सर्व पुराणांत या मातृकांची संख्या सात सांगितलेली असताना वराहपुराण मात्र ही संख्या आठ असल्याचे सांगते. सर्वात आधी उल्लेखिलेली योगेश्वरी ही देखील एक मातृका आहे असे वराहपुराणात म्हटलेले आहे.

अंधकासुराशी साम्य दाखवणारी अशीच एक कथा मरकडेयपुराणात येते. त्यानुसार शुंभ नावाच्या राक्षसाशी अंबिकेचे युद्ध झाले. त्या युद्धात अंबिकेला या मातृकांनी मदत केली. कारण शुंभ दैत्याला वर मिळालेला होता की त्याच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडला की त्यातून अजून एक असुर निर्माण होईल. त्याच्या रक्ताचे थेंब या मातृकांनी वरच्यावर धरून ठेवले आणि शुंभाचा निपात केला. असुराचा मोठय़ा प्रमाणावर रक्तपात झाला आणि त्यामुळे तो हतबल होऊन पराभूत झाला. अगदी शिव-अंधकासुर युद्धासारखीच ही कथा आहे. अंधकासुराची कथा पुढे वाढवली आहे ती कूर्मपुराणाने. अंधकासुराच्या वधानंतर शिवाने भरव आणि या मातृकांना पाताळलोकात जाऊन वास्तव्य करायला सांगितले. त्यानुसार त्यांनी पाताळलोकात प्रयाण केले. परंतु भरव जो शिवाचाच अंश होता तो शिवामध्ये विलीन झाला. मातृकांना आता कोणताही आधार राहिला नाही आणि त्या विध्वंसक बनल्या. त्यांनी सर्वत्र विध्वंस करायला सुरुवात केली. शेवटी भरवाने नरसिंहाला पाचारण केले आणि त्या मातृकांना शांत करण्यास सांगितले. नरसिंहाने त्या मातृकांना शांत केले आणि तेव्हापासून त्यांचे स्वरूप हे उपकारक बनले. अशा विविध पुराणांतून या सप्तमातृकांचे आगळेवेगळे पलू आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सर्वत्र एक मुख्य धागा समान दिसतो की कोणा दैत्याच्या निर्मूलनासाठी विविध सात देवतांनी आपल्या शक्ती महादेवाच्या मदतीसाठी निर्माण केल्या, आणि त्या पुढे सप्तमातृका म्हणून प्रसिद्ध झाल्या. अनेक अभ्यासकांनी मातृकांचा अभ्यास करताना त्यांचे उल्लेख अगदी ऋग्वेदापासून मिळतात असेही प्रतिपादन केलेले आहे. त्यावर मतमतांतरेदेखील आहेत. पण या सप्तमातृका पुढे मूर्तीरूपात आल्या आणि त्या प्रसिद्ध झाल्या. बदामीचे चालुक्य आणि त्यांच्या नंतरचे कल्याणी चालुक्य या सप्तमातृकांचे उपासक होते. त्यांच्या मंदिरस्थापत्यात सप्तमातृका पट्ट प्रकर्षांने पाहायला मिळतात. या मातृकांची संख्या सात असली तरी काही ठिकाणी ती आठ, १६, ३२ झालेली दिसते. या सातमातृकांच्या शिवाय माहेन्द्री, नारसिंही, वैनायकी, नारायणी, अंबिका, भद्रकाली, काली, योगेश्वरी यांचे शिल्पांकनदेखील पाहायला मिळते.

शक्ती हा शब्द लिहिताना ‘ती शक्ती’ या उद्देशाने वापरला असल्यामुळे, हा शब्द स्त्रीिलगी आहे हे वाचल्यावर लगेच समजते. परंतु मूर्ती घडवताना मात्र त्यांचे नेमके स्वरूप समजण्यासाठी त्या मूर्ती स्त्रीरूपात घडवल्या जातात. आकर्षक आणि नेमक्या सप्तमातृकांच्या मूर्ती विविध मंदिरांमधून दिसतात. त्या मूर्ती कशा तयार कराव्यात याचे काही एक शास्त्र आहे. शिल्पशास्त्राची माहिती देणाऱ्या विविध आगम ग्रंथांमधून या सप्तमातृकांच्या मूर्ती, त्यांची ठेवण, त्यांची वाहने यांची विस्तृत माहिती दिलेली आहे. त्यानुसार ब्रह्माणी ही ब्रह्मदेवासारखी, वैष्णवी ही विष्णूसारखी अशा रीतीने त्या त्या देवाच्या शक्ती या त्या त्या देवतेनुसार शिल्पांकित केल्या गेल्या पाहिजेत. ब्रह्माणी म्हटले की तिचे वाहन आणि तिची आयुधे हे ब्रह्मदेवासारखी असायला हवीत. मग ब्रह्माणी शिल्पांकित करताना स्त्रीप्रतिमा जी बसलेल्या स्थितीत आहे. जिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. जिच्या वरच्या पाठीमागील हातात सुळा आणि अक्षमाला असून, तिचा उजवा हात अभय मुद्रेत तर दावा हात वरद मुद्रेत असावा. तिचे वाहन हंस दाखवलेले असावे आणि तिच्या मस्तकी जटामुकुट दाखवावा. हे असे पाहिले म्हणजे ही प्रतिमा ब्रह्माच्या शक्तीची आहे असे समजते. या सर्व मातृकांचा उजवा हात हे अभय मुद्रेत तर डावा हात वरद मुद्रेत दाखवलेला असतो. पाठेमागे असलेल्या दोन हातात आयुधे असतात. आणि पायाशी त्या त्या देवतेची वाहने असतात. वैष्णवी असेल तर पाठीमागच्या हातात शंख आणि चक्र तर पायाशी गरुड, डोक्यावर किरीट मुकुट. इंद्राणीच्या वरच्या हातात वज्र आणि शक्ती तर पायाशी वाहन हत्ती. तिचा रंग लाल तर डोक्यावर किरीट. विष्णूधर्मोत्तरपुराणानुसार तिला सहस्त्र नेत्र आणि तिचा रंग सोनेरी असावा.

चामुंडा शिल्पित करताना अत्यंत भयावह अशी दाखवलेली असते. केस अस्ताव्यस्त पिंजारलेले, शरीरावर मांस नाही. सगळ्या बरगडय़ा दिसताहेत, पायाचे स्नायू दिसतात. तिने मुंडक्यांचा मुकुट परिधान केलेला आहे. एका हातात मुंडके आणि दुसऱ्या हातात कपाल धरलेले. तिचे सुळे बाहेर आलेले दिसतात. कधी कधी तिच्या पोटावर विंचू शिल्पित केलेला असतो. मानवी शव हे तिचे वाहन असून ती त्यावर उभी दाखवतात. पूर्वकरणागम या ग्रंथानुसार तिचे तोंड उघडे दाखवतात आणि तिच्या डोक्यावर चंद्राची कोर दाखवतात. तिचे वाहन घुबड असते तर तिच्या ध्वजावर गरुड असतो. माहेश्वरी शिल्पांकित करताना तिच्या वरच्या दोन हातांत शूल आणि अक्षमाला असते, तिचा मुकुट हा जटामुकुट असतो तर तिचे वाहन नंदी असतो. विष्णुधर्मोत्तरपुराणानुसार तिला पाच तोंडे दाखवलेली असतात, त्या प्रत्येकाला तीन डोळे दाखवलेले असतात. तिचा रंग पांढरा असून तिच्या सहा हातात सूत्र, डमरू, शूल आणि घंटा तर पुढचे दोन हात वरद आणि अभय मुद्रेत दाखवलेले असतात. कुमार म्हणजेच कार्तिकेयाची शक्ती कौमारी शिल्पांकित करताना तिच्या दोन हातांत शक्ती आणि कोंबडा दाखवतात. उर्वरित हात अर्थातच अभय आणि वरद मुद्रेत असतात. वाराही दाखवताना तिचे तोंड वराहाचे असते. तिच्या दोन हातांत हल आणि शक्ती असते तर तिच्या मस्तकी करंडमुकुट असतो. विष्णुधर्मोत्तरपुराण या तपशिलात काही गोष्टींची भर घालते. त्यानुसार तिला सहा हात असून त्यात दंड, खड्ग, खेटक आणि पाश असतात. उर्वरित दोन हात अभय आणि वरद मुद्रेत असतात. पूर्वकरणागमानुसार तिच्या हातात शारंग धनुष्य दाखवलेले असते. तसेच अनेक ठिकाणी या सप्तमातृकांच्या शेजारी असलेला वीरभद्र हा वीणावादन करताना दाखवलेला असतो.

सप्तमातृकांची वाहने, आयुधे त्याचे मुकुट यांची माहिती असल्यावर आपल्याला विविध मंदिरांमधून शिल्पांकित केलेले सप्तमातृकापट्ट पाहताना त्यांची तपशीलवार माहिती होते. कर्नाटकात विविध मंदिरांमधून हे पट्ट पाहायला मिळतात. सागर या गावाजवळ असलेल्या केळदी या गावी असलेल्या मंदिरात सुंदर असा सप्तमातृका पट्ट दिसतो. महाराष्ट्रातसुद्धा मुख्यत्वे मराठवाडय़ात हे असे सुंदर आणि देखणे सप्तमातृकापट्ट मंदिरांतून पाहायला मिळतात. लातूर इथल्या मंदिरात असाच सुंदर सप्तमातृका पट्ट आहे. तसेच धर्मापुरी इथे असलेल्या किल्ल्यात पूर्वी एखादे मंदिर असावे. त्या मंदिरांचे अवशेष त्या किल्ल्यात तटबंदीमध्ये वापरलेले दिसतात. त्या अवशेषातच एक सुंदर सप्तमातृकापट्ट पाहायला मिळतो. सप्तमातृकांच्या शेजारी एका बाजूला वीरभद्र तर दुसऱ्या बाजूला गणपती कोरलेला असतो. गणपती हा गणांचा अधिपती असल्यामुळे या सप्तमातृकांच्या बाजूला त्याचे शिल्पांकन केलेले असते. सप्तमातृकांची सर्वात भव्य आणि मोठी शिल्पे आपल्याला वेरूळच्या लेणीमध्ये पाहायला मिळतात. वेरूळच्या कैलास लेणीत यज्ञशाळा म्हणून ठिकाण आहे. तिथे भव्य आकाराच्या सप्तमातृका कोरलेल्या पाहायला मिळतात. पण त्या खूपच भग्न झालेल्या आहेत. इथे त्या सप्तमातृकांसोबत राणी माणकावतीचे शिल्पसुद्धा आहे. इथल्या रामेश्वर लेणीत (लेणी क्रमांक २१) सप्तमातृकांचे भव्य शिल्प पाहायला मिळते. अतिशय देखण्या, डौलदार सप्तमातृका या लेणीमध्ये कोरलेल्या पाहायला मिळतात. मराठवाडय़ाचे वैभव असलेल्या औंढय़ा नागनाथ मंदिरावर असलेल्या सप्तमातृकांचा पट्ट अत्यंत देखणा आहे. काही शिल्पे भग्न झालेली दिसतात तरीसुद्धा त्यांचे सौंदर्य काही कमी होत नाही. इथे सप्तमातृकांच्या मधोमध गणपती शिल्पित केलेला आहे. खूप सुंदर अशा या मातृकांच्या पायाशी त्यांची वाहने आणि हातात विविध आयुधे दाखवलेली आहेत.

शेजारी बसलेल्या सप्तमातृका  हे सगळीकडे दिसतेच, परंतु महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्य़ात मुखेड गावी दाशरथेश्वर मंदिराच्या बाह्य़िभतींवर नृत्य करणाऱ्या सप्तमातृकांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर कल्याणी चालुक्यांच्या राजवटीमधले आहे. अतिशय सुंदर अशा या मातृका काहीशा भग्न झालेल्या आहेत. मात्र त्यांचा आवेश, नृत्य करताना शरीराला आलेला बाक आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव निव्वळ देखणे आहेत. सप्तमातृकांचे अगदी निराळे  या ठिकाणी पाहायला मिळते.

प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना काही गोष्टी प्रकर्षांने जाणवतात त्या म्हणजे एखादे गहन तत्त्वज्ञान सर्वसामान्य माणसांना सांगायचे असेल तर ते विविध कथांद्वारे सांगितले जाते. पुराणेसुद्धा आपल्याला अनेक देवदेवता, राक्षस यांच्या कथा सांगतात मात्र त्या पाठीमागे काही ना काही तत्त्वज्ञान सांगायचे असते. सप्तमातृकांच्याद्वारे वराहपुराण असेच एक मोठे तत्त्वज्ञान आपल्यासमोर मांडू पाहते आहे. त्यानुसार शिव, अंधकासुर किंवा या मातृका ही सगळी रूपके आहेत. ती आपल्या मनाच्या विविध अवस्थांची प्रतीके म्हणून पाहायला हवीत. शिव आणि अंधकासुराचे युद्ध म्हणजे आत्मविद्या किंवा आत्मज्ञान आणि अज्ञानरूपी अंधकार यांचे युद्ध समजले गेलेले आहे. तसेच हे पुराण पुढे असेही सांगते की या सात मातृका म्हणजे मानवी स्वभावाचे दोष सांगितलेले आहेत. योगेश्वरी हे काम अथवा इच्छा, महेश्वरी हे राग-क्रोध, वैष्णवी हे लोभ, ब्रह्माणी मद, कौमारी मोह, इंद्राणी मत्सर, वाराही असूया आणि चामुंडा हे पशुत्व याचे प्रतीक आहेत. ज्ञानरूपी शिवाने हे सगळे दोष आपल्या काबूत ठेवले आणि त्यामुळे त्याला अज्ञानरूपी अंधकासुरावर विजय मिळवता आला. मनाचे हे सगळे कंगोरे जरी असले तरी ते काबूत ठेवून योग्य दिशेने त्यांचा वापर केला तर अज्ञानरूपी अंधकाररूपी अंधकासुराचा नायनाट करणे सर्वसामान्य व्यक्तीलादेखी सहज शक्य असते. गहन तत्त्वज्ञान सरळ सोप्या गोष्टींमधून लोकांसमोर मांडायचे पुराणांचे हे कसब म्हणूनच वाखाणण्याजोगे आहे.

(संदर्भ : एलिमेंट ऑफ हिंदू आयकॉनोग्राफी- टी. ए. गोपीनाथ राव)

देवी विशेष
जय पाटील – response.lokprabha@expressindia.com

देवदेवतांच्या आपल्या मनातील कल्पना कशा तयार झाल्या, याचा मागोवा घेताना आपण विविध चित्रे, मूर्ती, शिल्पांपर्यंत पोहोचतो. देशाच्या निरनिराळ्या भागांत आढळणाऱ्या पारंपरिक कलाप्रकारांत शक्तीची अर्थात देवीची विविध रूपे प्रतिविंबित झालेली दिसतात. स्थल-कालानुसार त्यात बदलही होत गेल्याचे दिसते.

देवी कधी एखाद्या गुंफेत रेखाटलेल्या प्राचीन चित्रांतून दर्शन देते, कधी एखाद्या पुरातन मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान झालेली दिसते, कधी एखादे पट्टचित्र व्यापून उरते, कधी लघुचित्रांमधील नजाकतदार आकृतींतून लक्ष वेधून घेते, कधी ती धातूच्या डौलदार मूर्तीतून प्रकट होते, कधी सांकेतिक यंत्राच्या रूपात तर कधी एखाद्या नवचित्रकाराच्या कुंचल्यातून उमटते. शक्तिरूपाविषयीच्या मानवी संकल्पना कशा विकसित होत गेल्या असाव्यात, याचा अजमास बांधण्यासाठी ही चित्र-शिल्पे आपल्याला साहाय्य करतात.

देवीविषयीच्या श्रद्धा-परंपरांवर ‘मरकडेय पुराणा’तील ‘देवीमाहात्म्या’चा प्रभाव सर्वाधिक दिसतो. देवीच्या सध्या उपलब्ध असलेल्या अनेक चित्र-शिल्पांतून याच माहात्म्यातील कथा कथन केलेल्या दिसतात. सृष्टीच्या तीन अवस्थांचे वर्णन करणाऱ्या देवीमाहात्म्याच्या पहिल्या भागात सृष्टीचा रचनाकार ब्रह्माचा वध करण्यासाठी मधु आणि कैतभ हे दोन दैत्य निघालेले असतात. ब्रह्मा विष्णूला रक्षणाची विनंती करतो. मात्र महामायेच्या प्रभावामुळे विष्णू निद्रिस्त असतो. महामायेने आपला प्रभाव दूर करावा, यासाठी ब्रह्मा तिची आराधना करतो. विष्णू निद्रेतून जागा होतो आणि दैत्यांना पराभूत करतो. दुसऱ्या भागात पाशवी शक्तींच्या रूपात महिषासुर दाखवण्यात आला आहे. त्याचा अडथळा दूर करण्यासाठी देवी महिषासुरमर्दिनीच्या रूपात अवतीर्ण होते. तिच्या विकट हास्याने धरणी हादरते. त्यामुळे चिडलेला महिषासुर वाघ, हत्ती आणि म्हशीचे रूप घेऊन देवीवर आक्रमण करतो. तरीही देवी त्याचा वध करते. तिसरा भाग आहे शुंभ निशुंभाच्या पराभवाचा. यात असुरांनी सर्व रत्नांवर ताबा मिळवलेला असतो, मात्र सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे देवी, हे त्यांच्या लक्षात येते. असुरांना देवी मिळावी, म्हणून ते प्रयत्न सुरू करतात. युद्धात जो माझा पराभव करील, त्याला मी प्राप्त होईन, असे आवाहन देवी करते. तिला आणण्यासाठी चंड आणि मुंड या दैत्यांना पाठवण्यात येते. मात्र देवी कालीचे उग्र रूप धारण करते. तिच्या हाती छाटलेले मुंडके आणि तलवार असते. गळ्यात मानवी मुंडक्यांची माळ असते. तिची त्वचा काळसर झालेली असते. देवी त्यांना पराभूत करून अजिंक्य राहते. चंड-मुंडाला पराभूत केल्यामुळे ती चामुंडा म्हणूनही ओळखली जाते.

या कथा कधी लघुचित्रांच्या तर कधी शिल्पांच्या रूपात समोर येतात. यातील महिषासुरमर्दिनीचे रूप अनेक चित्र-शिल्पांत दिसते. सहाव्या शतकातील महिषासुरमर्दिनीचे शिल्प महाराष्ट्रातील घारापुरी येथे आढळले आहे. बेसाल्ट खडकातील हे शिल्प भग्नावस्थेत आहे. मध्य प्रदेशात आढळलेले नवव्या शतकातील शिल्प मात्र उत्तम स्थितीत आहे. वालुकाश्मात कोरलेल्या या शिल्पातील देवीला चार भुजा आहेत, त्यापैकी एका हातात ढाल तर दुसऱ्या हातात तलवार आहे. ती महिषासुरावर आरूढ झाली असून आकाशातून देव हे दृश्य पाहात आहेत. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धातील गुलेर शैलीतील एका चित्रात देवी महिषासुराचा वध करताना दिसते. यात अष्टभुजा देवी वाघावर आरूढ होऊन महिषासुरावर त्रिशूळ उगारलेल्या स्थितीत दिसते. तिचा वाघ बैलाच्या पाठीवर उभा आहे आणि त्या बैलाचे तिने छाटलेले मुंडके बाजूलाच पडलेले आहे. तिच्या हातांत आसुड, तलवार, ढाल, त्रिशूळ, गदा, घंटा, धनुष्य अशी विविध अस्त्रे आहेत. ही सर्व अस्त्रे तिने महिषासुरावर रोखलेली आहेत. सर्व देव आकाशातून हे दृश्य पाहताना दिसतात. १७७० ते १७८० दरम्यानच्या एका चित्रातही हे दृश्य आहे. बंगालमध्ये आढळलेल्या एका शिल्पात महिषासुराचा वध अतिशय कलात्मकतेने साकारण्यात आला आहे.

कर्नाटकात आढळलेल्या १०व्या शतकातील शिल्पात दुर्गा आसनस्थ दिसते. तिला चार भुजा असून त्यांपैकी एका हातात तलवार आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यातील एका चित्रात दुर्गेने शुंभ, निशुंभाशी केलेल्या युद्धाचे दृश्य चितारण्यात आले आहे. यातही दुर्गा अष्टभुजा रूपात असून वाघावर स्वार झाली आहे. युद्धातील तीन प्रसंग एकाच चित्रात दर्शवण्यात आले आहेत. महिषासुरवधाच्या चित्रात आणि या चित्रात देवीच्या हाती असलेली अस्त्रे जवळपास सारखीच आहेत. फक्त यात एका चित्रात देवी शंख फुंकताना दिसते. हे चित्र पंजाब हिल्स शैलीतील आहे.

याच ‘र्मकडेय पुराणा’त असलेल्या ‘भद्रकाली माहात्म्य’ किंवा ‘दारिका वधम्’ या भागात दारिकासुराचा वध करण्यासाठी देवीने भद्रकालीचे रूप घेतल्याची कथा आहे. त्यावर आधारित चित्रात देवी दारिकासुराचा वध करून त्याच्या पाठीवर उभी राहिलेली दिसते आणि ब्रह्मा, विष्णू आणि शिव तिचे गुणगान करताना दिसतात. १६६०-७०च्या दरम्यानचे हे चित्र बासोहली शैलीतील आहे.

अष्टलक्ष्मींपैकी एक असलेली गजलक्ष्मी देशात विविध शिल्पांत आणि चित्रांत पाहायला मिळते. तंजावर शैलीतील चित्रांत ती कमळावर पद्मासनात बसलेली दिसते. चार भुजा असलेल्या या देवीच्या वरच्या दोन हातांत कमळाची फुले आहेत. दोन्ही बाजूंना हत्ती आहेत. औरंगाबादमधील पितळखोरा येथे आढळलेल्या दुसऱ्या शतकातील शिल्पात गजलक्ष्मी कमळावर आसनस्थ दिसते. तिच्या दोन्ही बाजूंना हत्ती उभे असून ते जलाभिषेक करताना दिसतात. गुजरातमध्ये आढळलेल्या बाराव्या शतकातील शिल्पात मात्र तिने वरील दोन हातांमध्येच हत्ती पेललेले दिसतात. तिसऱ्या शतकातील नाण्यावर आढळलेली गजलक्ष्मीची प्रतिमा सध्या उपलब्ध असलेल्या प्रतिमांपैकी सर्वात जुनी प्रतिमा आहे. कोकण आणि गोव्यात ही देवी गजान्तलक्ष्मी, भाऊका, केळबाई या नावांनी ओळखली जाते. ही समृद्धीची देवता आहे. तिच्या दोन्ही बाजूंना असलेल्या हत्तींच्या सोंडेतून जलाभिषेक होताना दिसतो. त्यामुळे काही भागांत तिची पर्जन्यदेवता म्हणूनही आराधना केली जाते.

काळाच्या विविध टप्प्यांत मौखिक परंपरा, लिखित साहित्यातून देवीची विविध रूपे भक्तांसमोर येत राहिली. संपत्ती, समृद्धी, विद्या, वंशवृद्धी, पर्जन्य, दुष्ट शक्तींपासून रक्षण अशा विविध उद्देशांनी कित्येक शतके शक्तीच्या या रूपांची पूजा केली गेली. त्याचे प्रतिबिंब विविध कलांतून उमटत राहिले. देवीची रूपे कलात्मक स्वरूपात मांडून अनेक अनामिक कलाकारांनी कलेचा इतिहास समृद्ध केला आहे.

हे

शोध महिषासुरमर्दनीचा!

भारतातील अनेक भागांत शक्तीची उपासना करण्यासाठी देवीच्या दुर्गा या रूपाची पूजा केली जाते. महिषासुरमर्दनिी, भवानी, कात्यायनी इत्यादी नावांनी लोकप्रिय असलेल्या या देवतेच्या मूर्तीच्या उगमाचा आणि विकासाचा पुरातत्त्वीय पुरावे, प्राचीन साहित्य, नाणी, शिलालेख आणि मूर्तीशास्त्र यांच्या आधारे घेतलेला हा वेध.

प्रागतिहासिक काळापासून मानव विविध रूपातील देवतांची आराधना करत आला आहे. स्त्रीच्या सृजनशक्तीचा आदर करण्यासाठी म्हणूनच त्याने शक्तीची, स्त्रीरूपातील देवतांची पूजा करायला सुरुवात केली असावी. जगभर मिळणाऱ्या प्रागतिहासिक काळातील मातृदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या मूर्ती याची साक्ष देतात. ऑस्ट्रिया आणि चेक रिपब्लिक येथे सापडलेल्या मातीच्या व दगडी प्रतिमा तीस ते अठ्ठावीस हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. या प्रतिमांना आता व्हीनस म्हणून ओळखले जाते. शताल हुउक (तुर्कस्थान), टेपे सरब (इराण), टेपे गवरा (इराक), मुंडिगाक (अफगाणिस्तान) इत्यादी ठिकाणांबरोबरच भारत व विद्यमान पाकिस्तानातील सिंधू संस्कृतीच्या स्थळांमध्ये मातृदेवतांच्या मातीच्या भाजलेल्या मूर्ती उत्खननात सापडल्या आहेत. या मूर्ती साधारणपणे आठ ते चार हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. अर्थातच या मूर्ती वरील प्रत्येक संस्कृतीमध्ये कोणत्या नावाने ओळखल्या जात होत्या हे सांगणे शक्य नाही. पण संशोधक त्यांना मातृदेवता असे संबोधतात. दक्षिण भारतात आदिचन्नलूर येथे लोहयुग संस्कृतीतील मातृदेवतेची तांब्याची मूर्ती सापडली आहे. पुणे जिल्ह्यतील इनामगाव येथे झालेल्या उत्खननात एका मातीच्या छोटय़ा पेटीसारख्या आवरणात ठेवलेली स्त्रीदेवतेची मूर्ती सापडली होती. सुरुवातीला अत्यंत साध्या असणाऱ्या मातृदेवतांच्या या भाजक्या मातीच्या मूर्ती मौर्य, शुंग, कुशाण राजांच्या काळात इसवी सनापूर्वी तिसरे शतक ते इसवी सनाचे तिसरे शतक विविध अलंकारांनी सजलेल्या अशा देखण्या बनवल्या जाऊ लागल्या. याच काळातील स्थानिक स्त्रीदेवता म्हणून पुजल्या जाणाऱ्या यक्षींच्या दगडी मूर्ती विदिशा, बारहूत, मथुरा, सांची येथे आढळल्या आहेत.

02-devi-lp

भारतात कुशाण राजांच्या काळात मोठय़ा प्रमाणावर देवतांच्या पाषाणाच्या प्रतिमा निर्माण होऊ लागल्या होत्या. सरस्वती, लक्ष्मी, पार्वती या ब्रह्मा, विष्णू, आणि महेशाशी संबंधित देवतांच्या प्राचीन प्रतिमा उत्तरभारतात सर्वत्र आढळतात. विशेषत शैव आणि शाक्त पंथाशी संबंधित दुर्गा या देवीच्या अनेकविध प्रतिमा सापडतात. आगमग्रंथांनुसार तिची नऊ रूपे आहेत. त्याव्यतिरिक्त देवीचे महिषासुरमर्दनिी हे रूप भारतात अत्यंत लोकप्रिय आहे. या दुर्गा महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीचा उदय आणि आतापर्यंत झालेला प्रवास जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न.

प्राचीन संस्कृत साहित्यातील संदर्भ

या दुर्गादेवीचे लिखित पुराव्यातील प्राचीनत्व शोधण्यासाठी भारतातील सर्वात प्राचीन वैदिक साहित्याचा संदर्भ तपासावा लागतो. ऋग्वेद व अथर्ववेद संहितांतील देवतांमध्ये इंद्र, मित्र, वरुण, अग्नि इत्यादी पुरुषदेवतांचे प्राबल्य आहे. याशिवाय अदिती, पृथ्वी, वाक्, श्री, यमी, उषा इत्यादी स्त्रीदेवता वेदांमध्ये आढळतात. परंतु कात्यायनी, पार्वती, उमा याची नावे या वेदांमध्ये येत नाहीत. कृष्ण यजुर्वेदाच्या तत्तिरीय आरण्यकात रुद्राच्या पत्नी म्हणून अंबिका आणि उमा यांचा उल्लेख येतो. याच तत्तिरीय आरण्यकात कात्यायनी, कन्याकुमारी, दुर्गी यांना एकाच देवीची नावे म्हणून संबोधले आहे. तसेच वरदा, वेदमाता इत्यादी स्त्रीदेवतांचाही उल्लेख केला आहे. परंतु या स्त्रीदेवतांचे महत्त्व काय होते हे सांगता येत नाही.

केनोपनिषदात रुद्रपत्नी उमेचा उल्लेख हैमवती म्हणजे हिमवत पर्वतातील मुलगी असा आढळतो. रुद्र या पर्वताशी संबंधित देव असल्यामुळे त्याची पत्नी हिमवत पर्वताशी संबंधित असणे साहजिकच आहे. उत्तर वैद्री काळातील हिरण्यकेशी गृह्य़सूत्र या ग्रंथामध्ये भवानी, दुर्गा, भद्रकाली या देवींची नावे येतात. तर बौधायन गृह्य़सुत्रात दुर्गाकल्पच आढळते. पारस्कर गृह्य़सूत्रातील ‘शूलगव’ यज्ञाच्या विधीत आहुती देताना शर्वाणी, भवानी इत्यादी देवशक्तींना आहुती द्यावी, असे वर्णन आढळते.

इसवीसनापूर्वी पाचव्या शतकात संस्कृत व्याकरणकार पाणिनी याने रचलेल्या अष्टाध्यायी या ग्रंथात भवानी, शर्वाणी, रुद्राणी आणि मृडाणी यांचा उल्लेख आहे. शिवाच्या भव, शर्व, रुद्र आणि मृड या चार रूपांच्या शक्ती म्हणून आपण त्यांना ओळखू शकतो. अर्थात या काळात त्यांचे किती महत्त्व होते ते मात्र कळत नाही.

03-devi-lp

इसवीसनापूर्वी तिसऱ्या शतकात कौटिल्याने लिहिलेल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात नगराच्या मध्यभागी इतर देवतांबरोबरच मदिरा नावाच्या देवीचे मंदिर उभारावे असे सांगितले आहे. काही संशोधकांच्या मते मदिरा ही कृषीदेवता होती, तर काहींच्या मते ही दुर्गा असावी. या अर्थशास्त्र ग्रंथातच एके ठिकाणी तळघरांच्या दाराच्या चौकटीवर देवी प्रतिमा काढावी असे सांगितले आहे.

रामायणामध्ये लक्ष्मीच्या प्रतिमेच्या काही उल्लेखांव्यतिरिक्त शक्तीपूजनाचे संदर्भ आढळत नाहीत. महाभारताच्या विराट आणि भीष्म पर्वात देवीचे स्तवन सापडते. महाभारतात ती विन्ध्यवासिनीच्या स्वरूपात येते.

भास या प्रसिद्ध संस्कृत नाटककाराच्या नाटकांत कात्यायनी, दुर्गा इत्यादी देवींचे उल्लेख येतात. ‘स्वप्नवासवदत्त’ या भासाच्या प्रसिद्ध संस्कृत नाटकात पाटलीपुत्र येथे कात्यायनीचे मंदिर असल्याचा उल्लेख आहे. तसेच कात्यायनीने शुंभ, निशुंभ, महिष यांचा वध केल्याचे वर्णन येते. शुद्रकाने लिहिलेल्या ‘मृच्छकटिक’ या संस्कृत नाटकातील नायक चारुदत्त याला मारणाऱ्या चांडाळाची कुलदेवता म्हणून दुग्रेचा उल्लेख आहे. दन्डीने लिहिलेल्या ‘दशकुमारचरित’ या संस्कृत ग्रंथात दुग्रेचा उल्लेख ‘विन्ध्यवासिनी दुर्गा’  म्हणून अनेकदा येतो. तिच्या आशीर्वादाने एका राजाला अपत्यप्राप्ती झाल्याचा उल्लेख आहे तसेच तिचे मंदिर असल्याचाही उल्लेख या ग्रंथात येतो.

‘हर्षचरित’ या बाणाभट्ट लिखित गद्यपद्यमिश्रित संस्कृत काव्यात हर्षांच्या दरबारात जाताना वाटेतील एका मल्लकूट गावाच्या बाहेर ‘चंडी कानन’ म्हणजे चंडीचे अरण्य असल्याचा उल्लेख येतो. या अरण्यातील झाडांवर कात्यायनी देवीच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या व वाटसरू या प्रतिमांना वंदन करत असे वर्णन बाणाभट्ट याने केले आहे. बाण याने लिहिलेल्या ‘कादंबरी’ या संस्कृत ग्रंथात एक चंडीचे देऊळ असल्याचा व तेथे एक द्रविड पुजारी असल्याचा उल्लेख आहे. याच ग्रंथात राणी अपत्यप्राप्तीसाठी चंडिकेची उपासतापास करून आराधना करते असे दर्शविले आहे.

याशिवाय विविध पुराणातून दुग्रेची तसेच महिषासुरमर्दनिीची महती वर्णिलेली आहे. वामन पुराणात महिषासुराची वधाची कथा येते. या कथेनुसार महिषासुराने देवीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा देवीने त्याला अट घातली की जर महिषासुराने तिला युद्धात हरवले तरच ती त्याच्याशी लग्न करेल. यानंतर झालेल्या युद्धात देवीने त्याचा पराजय करून त्याचा वध केला. अर्थात नंतरच्या काही पुराणातून ही कथा बरीच बदललेली दिसते. पण या कथेचे शुंभनिशुंभ वधकथेशी खूप साम्य आहे. त्यावरून पुराणनिर्मितीच्या काळात शुंभनिशुंभांचा वध करणारी विंध्यवासिनी कौशिकी देवी आणि महिषासुर मर्दनिी यांचे एकीकरण करण्यात आले असावे कारण त्यानंतर महिषासुरमर्दिनीला देखील विन्ध्यवासिनी म्हणून ओळखले जाऊ लागले. या प्राचीन साहित्यिक उल्लेखांवरून दुर्गा महिषासुरमर्दिनीचा नुसता उल्लेख ते तिच्या पराक्रम कथा यांचा आलेख मिळतो.

प्राचीन कोरीव लेखांमधील दुर्गा

भारतात सापडणाऱ्या कोरीव लेखांतून विविध प्रकारची तत्कालीन माहिती आपल्याला मिळते. अर्थातच त्यातून भारताच्या वेगवेगळ्या भागातील धार्मिक माहितीदेखील मिळते. देवीपुजेच्या इतिहासावर प्रकाश टाकणाऱ्या काही शिलालेखांचा उल्लेख इथे केला पाहिजे राजस्थानातील ‘होटी सादडी’ या गावातील भवरमाता मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर इसवीसनाच्या सहाव्या शतकातील एक शिलालेख आहे. त्यात आरंभी तीक्ष्ण शूल हातात घेऊन असुराचा वध करणाऱ्या देवीला नमन केले आहे. ही देवी उग्र सिंहांच्या रथात बसलेली असून ती भक्तांचे कल्याण करते, अशा आशयाचा हा शिलालेख आहे. येथे देवीचे वर्णन करताना ती शिवाची अर्धागी असल्याचा उल्लेख केला आहे. या सर्व वर्णनावरून येथे सिंहवाहिनी दुर्गा अपेक्षित असावी यात शंकाच नाही. या शिलालेखाचा उद्देश राजाने देवीचा उत्तम प्रासाद (मंदिर) बांधला होता हे नोंदवण्याचा होता.

04-devi-lp

याशिवाय बिहारमधील नागार्जुनी टेकडय़ांमधील सहाव्या शतकातील अनंतवर्मन राजाच्या दोन लेखांमध्ये देवीचा उल्लेख आहे. यातील एका लेखात भूतपती आणि देवीच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना केली होती असा उल्लेख आहे. भूतपती हे शिवाचेच एक नाव आहे, त्यामुळे ही देवी शिवशक्ती दुर्गा असावी. तर दुसऱ्या शिलालेखात महिषासुराच्या शिरावर देवीने ठेवलेल्या पायाला भक्तीभावाने नमन करून राजाने ‘अद्भुत विन्ध्य भूधर गुहे’मध्ये कात्यायनी देवीची प्राणप्रतिष्ठा केली असे नमूद केले आहे. याच शिलालेखात भवानी देवीसाठी राजाने एक गाव दान दिल्याचा उल्लेख आहे. गुहेत स्थापन केलेल्या कात्यायनी देवीच्या पूजेअच्रेसाठी या गावातील उत्पन्नाचा वापर व्हावा हे उद्दिष्ट होते. महिषासुरमर्दनिी, कात्यायनी व भवानी या देवीच्या तीनही रूपांचा उल्लेख हे या शिलालेखाचे वैशिष्टय़ आहे.

बसंतगढ (राजस्थान) येथील खिमेलमाता मंदिरापाशी सापडलेला इसवीसनाच्या सातव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील एक शिलालेख या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या शिलालेखाच्या आरंभी दुर्गा आणि क्षेमकरी क्षेमार्या यांना आवाहन केले आहे. तसेच या लेखात स्थानिक लोकांनी एकत्र येऊन मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. त्यात श्रीमातेच्या एका गणिकेचे नावही नमूद केले आहे. विविध आगमग्रंथानुसार नवदुर्गामध्ये गणले जाणारे क्षेमंकरी हे दुग्रेचेच कल्याणकारी रूप आहे. येथील देवीचे सध्याचे खिमेलमाता हे नाव क्षेमार्या या संस्कृत नावाचा स्थानिक भाषेतील अपभ्रंश आहे.

भरमोर (हिमाचल प्रदेश) येथील इसवीसनाच्या सातव्या शतकातील लक्षणा देवीच्या पितळी मूर्तीच्या पीठावर एक कोरीव लेख आहे. या लेखात राजाने पुण्यप्राप्तीकरिता लक्षणा देवीची स्थापना केली तसेच गुग्ग याने देवीची ही प्रतिमा घडवली असा उल्लेख केला आहे. प्रस्तुत लक्षणादेवीची मूर्ती महिषासुरमर्दनिीचीच आहे.

प्रतापगढ (राजस्थान) येथे सापडलेल्या दहाव्या शतकातील दानलेखाच्या आरंभी महिषासुराला मारणाऱ्या दुग्रेचे स्तवन केले आहे. याच लेखात कात्यायनी देवीचाही उल्लेख येतो.

या सर्व पुराव्यान्संदर्भात अमरकोश या संस्कृत कोशात येणारी दुग्रेची नावे बघणे आवश्यक ठरते. अमरकोशात तिची खालील नावे दिलेली आहेत.

उमा कात्यायनी गौरी काली हैमवतीश्वरी॥

शिवा भवानी रुद्राणी शर्वाणी सर्वमंगला।

अपर्णा पार्वती दुर्गा मृडाणी चंडिकांबिका॥

आर्या दाक्षायणी चव गिरिजा मेनकात्मजा।

आत्तापर्यंत आपण बघितलेली विविध ग्रंथातील व कोरीव लेखांतील नावे म्हणजे शैव अगर शाक्त पंथातील दुग्रेची विविध रूपे मानली जात होती हे अमरकोशातील या नोंदीवरून स्पष्ट होते.

प्राचीन नाण्यांवरील सिंहवाहिनी देवी

प्राचीन अफगाणिस्तानात नना या नावाची इराणी देवता प्रसिद्ध होती. कुशाण राजांच्या नाण्यावर ती आपल्याला दिसते. ही नना सिंहावर बसलेली दाखवली जाते. कुशाण राजांच्या कंदाहार ते पटनापर्यंत पसरलेल्या साम्राज्यात त्यांनी अनेक स्थानिक देवदेवतांना नाण्यावर स्थान दिले होते. अफगाणिस्तानातील रोबाटक या ठिकाणी सापडलेल्या इसवीसनाच्या दुसऱ्या शतकातील कुशाण राजांच्या अधिकाऱ्याच्या शिलालेखात इतर देवतांबरोबर याच नना आणि उमा यांचा अत्यंत आदरपूर्वक उल्लेख केला आहे. इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात कुशाण राजा हुविष्क याच्या नाण्यांवर सिंहवाहिनी नना व सिंहवाहिनी उमादेखील दिसते. हेच ननाचे व उमेचे सिंहवाहिनी रूप नंतर दुग्रेला प्राप्त होते.

या कुशाण राजांच्या नंतर उत्तर भारतात आलेल्या गुप्त राजांनी देखील अत्यंत सुंदर नाणी पाडली होती. चंद्रगुप्त या गुप्त घराण्यातील राजाच्या नाण्यावर एक सिंहवाहिनी देवी आहे. तिच्या एका हातात पाश आहे तर दुसऱ्या हातात निधीश्रुंग घेतलेले आहे. काही संशोधक या देवीला सिंहवाहिनी दुर्गा मानतात. अशा प्रकारे सिंह हे वाहन दुग्रेच्या प्रतिमेत येते.

प्राचीन शिल्पातील दुर्गा महिषासुरमर्दनी

तामलुक (पश्चिम बंगाल) येथे सापडलेली शुंग काळातील एक छोटय़ा उठावातील मृण्मूर्ती उल्लेखनीय आहे. ही स्त्री मूर्ती सालंकृत असून तिचा केशसंभारही फार मोठा दाखवलेला आहे. तिच्या केशसंभारात पाच छोटी आयुधे दागिन्यांसारखी दाखवण्यात आलेली आहेत. ही आयुधे म्हणजे अंकुश, त्रिशूळ, परशु, वज्र आणि ध्वज ही आयुधे नंतरच्या काळात देवीच्या मूर्तीमध्ये बघायला मिळतात. त्यामुळे काही संशोधक या मृण्मूर्तीला दुग्रेची आद्य प्रतिमा मानतात अर्थातच ही आयुधे शौर्य आणि राजवैभव दर्शवत असल्यामुळे ही स्त्रीदेवता महत्त्वाची असणार हे नक्की.

कुशाण काळात (इसवीसनाचे पहिले ते तिसरे शतक) या काळातील काही महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती मिळाल्या आहेत. ही चतुर्भुज देवीची मूर्ती दोन हातांनी एका महिषाला पकडून मारते आहे. अशा आविर्भावातील आहे. देवीचे मागचे दोन्ही हात आता दिसत नाहीत. तिने कानात जड कुंडले घातली आहेत. कुशाण काळातील अशा काही मूर्ती उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सापडल्या आहेत.

गुप्तकालात (इसवीसनाचे चौथे ते पाचवे शतक) ज्याप्रमाणे अनेक देवीदेवतांच्या मूर्तीची मानके बनली तशीच ती दुर्गा महिषासुरमर्दनिीच्या मूर्तीचीही बनली. उदयगिरी मध्य प्रदेश येथील लेण्यामध्ये गुप्त काळातील एक सुंदर द्वादशभुजांची महिषासुरमर्दनिी कोरलेली आहे. तिने हातामध्ये वज्र, खड्ग, त्रिशूळ, भाला, घंटा इत्यादी घेतले आहे. तिचा डावा पाय महिषासुराच्या डोक्यावर ठेवलेला आहे तर हातातील त्रिशुळाने त्याचा वध करते आहे.

बदामीच्या चालुक्यांच्या काळात (सहावे ते आठवे शतक) निर्माण झालेल्या ऐहोळे येथील दुग्रेच्या प्रतिमेचा उल्लेख करणे आवश्यक आहे. ऐहोळे येथील दुर्गामंदिर म्हणून ओळखले जाणाऱ्या मंदिराच्या बाहय़भागावर एक महिषासुरमर्दनिीची अत्यंत मनमोहक मूर्ती आहे.

वर उल्लेख केलेल्या भारमोर हिमाचल प्रदेश येथील शिलालेखात उल्लेखलेली लक्षणादेवी ही देखील महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. जवजवळ चार फूट उंचीची ही पितळी मूर्ती सातव्या शतकातील आहे. या चतुर्भुजी देवीच्या हातात त्रिशूळ खड्ग आणि घंटा आहे. एका हाताने तिने जमिनीवर पडलेल्या महिषाची शेपटी पकडली आहे आणि हातातील त्रिशुळाने ती महिषाचा वध करीत आहे.

महाराष्ट्रात वेरुळ येथील लेण्यामधेही महिषासुरमर्दनिीच्या प्रतिमा कोरल्या आहेत. वेरुळ येथील कैलास मंदिरात सिंहावर आरूढ झालेली देवी महिषासुराचा वध करते आहे असे चित्रण केले आहे. पल्लवराजांच्या काळात निर्माण झालेल्या महाबलीपुरम येथील एका रथमंदिरात सिंहावर आरूढ झालेल्या देवीचे अंकन आहे. येथे देवी तिच्या सेनेसह महिषासुराशी युद्ध करताना दाखवली आहे. इथे महिषासुर मानवी रूपात दाखवलेला असून त्याचे मुख मात्र महिषाचे आहे.

पाल राजांच्या काळात बंगाल, ओरिसा या प्रदेशात दुग्रेच्या उपासनेचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झालेला होता. या भागात अनेक भुजांच्या महिषासुरमर्दिनीच्या प्रतिमांचा विकास झालेला आपल्याला दिसतो. या प्रतिमांचा अभ्यास करताना असे दिसून येते की सुरुवातीला सिंह हा फक्त देवीचे लांच्छन म्हणून मूर्तीमध्ये येतो, पण नंतर तो देवीला महिषासुराला मारण्यात मदत करताना दाखवला जातो. तसेच इसवीसनाच्या सातव्या शतकांनंतरच्या मूर्तीत महिषाच्या कापलेल्या मानेतून असुर बाहेर येतांना दाखवण्यात येऊ लागला.

भारताबाहेरील दुर्गा महिषासुरमर्दनिीच्या प्रतिमा

भारताबाहेरही अफगाणिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, कंबोडिया, जावा, इंडोनेशिया इत्यादी देशामध्ये महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती सापडतात. अफगाणिस्तानातील गझनी येथील टेपे सरदार या ठिकाणी एक महिषासुरमर्दिनीची भंगलेली भव्य मूर्ती मिळाली आहे ती काबूल येथील राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती.

कंबोडिया येथील महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीमध्ये चोल मंदिरातील मूर्तीचा प्रभाव पडलेला आहे. या महिषासुरमर्दनिीच्या मूर्तीच्या पीठावर महिषमुखाचे रेखाचित्र कोरलेले असते त्यावरून या प्रतिमेची ओळख आपल्याला पटते.

अवघ्या भारतभर आणि अफगाणिस्तानपासून ते इंडोनेशियापर्यंत आढळणाऱ्या या दुर्गा महिषासुरमर्दनिीचे आपल्या महाराष्ट्राशी विशेष नाते आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपकी एक असलेल्या जगदंबा तुळजाभवानीची प्रतिमा महिषासुरमर्दनिी या स्वरूपातीलच आहे. पंधराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या ‘महिकावतीची बखर’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या गद्यपद्यमिश्रित बखरीत श्रीदेवी आद्यशक्ती जगदंबिका महाराष्ट्राधर्मरक्षिका असा तिचा उल्लेख येतो. तर सोळाव्या शतकातील सुलतानशाहीने गांजलेल्या अवस्थेत संत एकनाथांनी

नमो निर्गुण निराकार, मूळ आदिमाया तूं साकार

घेऊनि दहा अवतार, करिसी दुष्टांचा संहार

दार उघड, बया दार उघड

अशा आळवणीनंतर म्लेंच्छांचा संहार करण्यासाठी तिची प्रार्थना केली होती.

सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी देवीच्या आशीर्वादानेच महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन करून अलौकिक असा इतिहास रचला. तसेच तिची नित्य पूजा व्हावी म्हणून प्रतापगडावर भवानी देवीची प्रतिष्ठापना करून तिचे मंदिरही बांधले होते.

एकोणिसाव्या शतकात बंगालमधील दुर्गापूजनाचा प्रभाव बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीतील ‘वंदे मातरम्’ या गीतावर पडलेला दिसून येतो. इंग्रजांच्या पारतंत्र्यात अडकलेल्या भारतमातेला आदिशक्तीच्या रूपात कल्पून तिचा महिमा त्यांनी पुढील ओळींत वर्णन केला आहे.

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी

कमला कमलदलविहारिणी

वाणी विद्यादायिनी

नमानि त्वां

नमामि कमलां अमलां अतुलां

सुजलाम् सुफलाम् मातरम्॥

अशा रीतीने आदिशक्तीच्या दशभुजा दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या तिन्ही रूपांत मातृभूमीचे वर्णन करून बंकिमचन्द्रांनी प्राचीन भारतीय परंपरेशी आपली नाळ जोडली.

अशा या दुर्गा महिषासुरमर्दिनीच्या विविध प्रतिमांचा, तिच्या संदर्भातील पुरातत्वीय पुराव्यांचा, शिलालेखांचा व तिच्या उपासनेच्या मध्ययुगीन, अर्वाचीन इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात येणारी महत्त्वाची बाब म्हणजे संकटांवर मात करण्यासाठी व शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तिची वीरांकडून केली जाणारी आराधना. प्राचीन काळापासून देवीच्या इतर रूपांपेक्षा दुर्गा महिषासुरमर्दनिी रूपात देवीची आराधना विशेषत वीरपुरुषांनी का केली असावी याचा बोध दुर्गा सप्तशतीमध्ये दिलेल्या ‘महिषान्तकरी येन पूजिता स जगत्प्रभु’ (ज्याने महिषासुरमर्दनिीला पूजिले तो जगाचा स्वामी होतो) या वाक्यावरून होतो.
आनंद कानिटकर – response.lokprabha@expressindia.com

शिव: मूर्तीशास्त्र

 

बदलती शिल्पे, बदलता समाज

 बॉस्टनच्या म्युझियम ऑफ फाईन आर्टस (कला संग्रहालया) मध्ये आम्ही काय खाल्ले सारखे (अजूनच) रटाळ डिटेल्स कोणाला नको असतील असे धरून पुढे चालू करते...

आर्ट म्युझियम म्हटले की खरे तर आपल्या डोळ्यांसमोर शिल्पे, भिंतीवर अडकवलेली चित्रे, फारतर कलात्मक गालिचे अशा वस्तू येतात, पण बहुदा टीव्ही येत नाहीत/नसावेत. पण आम्ही खाणे आटपून मधल्या चौकातून जिन्याकडे जायला निघालो तो काही लोक भिंतीला टेकून समोर पाहत हसत असल्याचे दिसले. तर त्यांच्यासमोर भिंतीवर एकत्र जोडलेल्या पंधरा-वीस लहान टीव्हींचा एक संच होता. प्रत्येक टीव्हीत एका व्यक्तीचा क्लोजअप, आणि कानाला हेडफोन लावून ऐकू येत असलेले गाणे म्हणत असल्याचे चित्रीकरण दिसत होते. बाथरूममध्ये कोणी गात असताना जसे कोणी ऐकत नाही म्हणून निर्धास्त असतो तसे मन लावून गाणे म्हणत स्वतःत गुंगून गेलेल्या त्या सर्व लोकांना पाहून थोडी गंमत वाटली. पं. भीमसेन जोशी, लता, अशा अनेक गायकांचे "मिले सूर मेरा तुम्हारा" ज्यांना परिचित आहे त्यांना यात फारसे वेगळेपण वाटणार नाही. फरक फक्त एकच होता की सर्वजण एकच गाणे एकाच वेळी म्हणताना दिसत होते, त्या सर्वांचे मिळून एकच एक जोडलेले चित्र तयार झाले होते. त्यांच्याकडे बघताना असे वाटले की येत्या काळाची ही झलक आहे. खरे तर म्युझियममधील वस्तूंना "हात लावू नये" ही सूचना आपण बरेचजण पाळत असतो, पण तरी मनात आणल्यास वस्तू इथे समोरच आहे, मनात आणल्यास तिला स्पर्श करता येऊ शकतो ह्याची मनात जाणीव असते, खोलीतले गंध, दगडी शिल्पाचा थंडगारपणा, ह्या गोष्टी हा अनुभव घडवत असतात. पण कोणी सांगावे कदाचित पुढच्या काळात कलेचे आविष्कार बघण्याच्या पद्धती कदाचित स्पर्शरहित असू शकतील?!

खरे तर यापुढे अधिक फिरण्याचे मनात नव्हते. पण मागे एकदा येथे आलेले असताना म्युझियममधील भारतीय उपखंडाच्या दालनात खास राजस्थानी मिनिएचर (लहान) चित्रे बघून तशी चित्रे काढण्याच्या आणि रंगवण्याच्या संधीचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला होता. त्याची आठवण आली आणि म्हटले जाण्याआधी परत एकदा तिथे जाऊ या.
या दालनाकडे जायला एक मोठी खोली ओलांडून जावे लागले. मिनिमलिस्ट (कमीतकमी) अशा सामानात विमानतळांवर असतात तशा काँप्युटरांच्या पुढे बसलेले म्युझियमचे कर्मचारी पाहून म्युझियमची वाटचाल स्पर्शरहित होण्याकडे चालली आहे असा संशय अशामुळे जरा दाटच झाला!

पण एकदा का या भारतीय दालनात आले की परत त्या कधीच्या काळी घडवलेल्या दगडा-मातीच्या वस्तू आपल्यापासून हाताच्या अंतरावर असतात. हडप्पा/मोहेंजोदारो येथील लहानलहान मातीच्या रांजणांपासून ते बौद्ध, जैन, हिंदू शिल्पकला, आणि काही मुस्लिम प्रभावाखालची चित्रे येथे ठेवलेली आहेत. यातील वस्तू इजिप्तमधील वस्तूंइतक्या भव्य नाहीत, काही तर दहा एक शतके इतक्याच जुन्या, म्हणजे खरे तर बर्‍यापैकी अलिकडच्या काळातील आहेत, त्यामुळे या वस्तूंना इजिप्तसारखे वलय नाही. शिवाय इजिप्तमधील प्रदर्शनाची जाहिरात कितीही भरभक्कम केली असली तरीही या दालनात आल्यावर एक प्रकारचा आपलेपणा वाटतो. तरी इथल्या भारतीय हॉटेलांमध्ये गेलो, की तिथे भिंतीवर लावलेले गणपती, राधा-कॄष्ण, फारतर लामणदिवे, किंवा उंच पितळी समया, आग्रा शैलीतली चित्रे, नक्षीकाम केलेली लाकडी पार्टिशने अशा सवयीच्या झालेल्या शोभेच्या वस्तूंकडे दुर्लक्ष करून आपल्या टेबलाकडे जाण्याचा एक प्रकारचा कोडगेपणा देखील आलेला असतो. त्यामुळे परत जेव्हा कुठेतरी खणून काढलेल्या ह्या वस्तू दिसतात त्यावेळी त्यांच्याकडे हॉटेलमधील शोभेच्या वस्तूंकडे पाहतो त्यापेक्षा वेगळ्या नजरेने पाहिले पाहिजे हे मुद्दाम लक्षात ठेवावे लागते. मग त्या नुसता वस्तू न राहता त्यात मागील संस्कृतीच्या खुणा, तंत्रज्ञानात झालेली प्रगती, तत्कालिन व्यापार-उदीमाची व्यापकता असे थोडे थोडे लक्षात येत जाते. थोडा का होईना इतिहास वाचलेला असला, की ह्या म्युझियमांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळते हेही खरे. शिवाय एखाद्या समाजाच्या आशा-आकांक्षांमध्ये काळाप्रमाणे होणारे बदलही जाणवू शकतात. म्युझियममध्ये आम्ही बरेच काही पाहिले, बरेच फोटो काढले. फोटो काढताना लक्षात आले नाही, पण नंतर असे वाटले की यात स्त्रियांच्या शिल्पांमध्ये काळानुरूप होत गेलेले बदल आपोआप थोडेफार टिपले गेले असे वाटते. शिल्पे करण्याच्या माध्यमात, तंत्रात आणि सादरीकरणातही खूपच फरक पडल्याचे दिसते.

ख्रिस्तपूर्व काळात स्त्रियांना देवतेचा दर्जा (मातृदेवता) दिला असावा अशी समजूत आहे. यापैकी पहिल्या मूर्तींची डोळे दाखवण्याची पद्धत अतिशय सोपी, लहान मुलांनाही करता येईल अशी दिसते. स्त्री असूनही मूर्तीच्या डोक्यावर एक प्रकारची पगडी दिसते आहे. पहिली मूर्ती करणे विशेष अवघड नाही. दुसर्‍या मूर्तीवर मात्र श्रम घेतले आहेत हे स्पष्ट आहे. ह्या स्त्रीने घातलेल्या विशिष्ट दागिन्याला छन्नविरा म्हणतात असे कळले. हा दागिना त्याकाळात बराच लोकप्रिय असावा. ह्या नटलेल्या मूर्तीवरून ती देवता असावी असे दिसत नाही. एखादी नर्तकी, आकर्षक स्त्री असावी तशी दिसते.

डोळे दाखवण्याची पद्धत आता खालच्या मथुरा येथील प्रतिमेमध्ये वेगळी, जरा सुधारलेली दिसते. शिवाय ही प्रतिमा भट्टीतून भाजून काढलेली आहे.
कान झाकून जातील इतकी मोठी कर्णभूषणे दिसतात. एवढे मोठे कानातले घातले तर कान ओघळतील असे आम्हाला सांगत, तसे त्यांना लहानपणी कोणी सांगितले नसावे! डोक्यावर बांधलेली तीन गोलाकार आभुषणे नक्की कशासाठी आहेत समजत नाही.

नंतरच्या स्त्रीप्रतिमांमध्ये आकार, लय, प्रमाणबद्धपणा, मोकळेपणा अधिक जाणवू लागतो. सांचीच्या प्रसिद्ध स्तूपाच्या एका तोरणावरील यक्षीचे अवशेष (इ. स. पहिले शतक).


या यक्षीला "फर्टिलिटी गॉडेस" म्हटले आहे. बुद्धानंतरच्या काही शतकांत अनेक स्तूप, लेणी बांधली गेली.

broken image

बुद्धाने तर करीत असलेला संसार सोडून दिला. त्याच्या गोष्टीत "मार" नावाचा राक्षस येतो, खरे तर मार म्हणजे बुद्धाला निर्वाणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणारा मोह. अमरावतीच्या स्तूपावरील ह्या चित्रात मार आपल्या मुलींना बुद्धाचे लक्ष त्यांच्याकडे जावे म्हणून पाठवतो. पण अशा सर्व मोहांवर विजय मिळवल्यानंतर बुद्धाला निर्वाण प्राप्त होतेच. वरील शिल्पातून दिसते ती बौद्ध शिल्पकलेची जुनी परंपरा आहे, या परंपरेने बुद्धाचे मनुष्यस्वरूपात चित्रण केले जात नाही, तर चित्रात बुद्ध असल्याचे त्याच्या पादुका, सिंहासन (कारण तो राजपुत्र होता) आणि बोधीवृक्ष यावरून दाखवले जाते. या शिल्पात स्त्रिया आहेतच, पण दुर्लक्षित आहेत.

मग येतात "हिंदू" देव-देवता. यात दोन्ही देव आणि देवता यांना महत्त्वाची स्थाने मिळालेली दिसतात. त्यांचे चेहरे आधीच्या शिल्पकलेहून अधिक आकर्षक, आणि नाजूक दिसतात. देव जरा कुटुंबवत्सलही झालेले दिसतात! सुंदर चेहरे, दागदागिने, दोनांहून अधिक हात असे या शिल्पांचे स्वरूप दिसू लागते. शंकर, पार्वती यांचे कुटुंब म्युझियममध्ये आहेच. गणपतीदेखील आपल्या दोन्ही पत्नींसह आहे. हरीहर (शंकर आणि विष्णू यांच्या संगमाने तयार झालेला - काही संशोधकांच्या मताने शैव आणि वैष्णव यांच्या "समन्वय" काळातील ) गोतावळ्यासह येथे आहे. तशीच महिषासुरमर्दिनी दुर्गा आहे. जावा येथील महिषासुरमर्दिनीचे हे नवव्या-दहाव्या शतकातले शिल्प. या दुर्गेचा चेहरा अगदी भारतीय म्हणावा असा नाही, त्यावर जावा येथील कारागिरांचीच छाप आहे. पण बाकी शिल्प मात्र भारतातील दुर्गेप्रमाणेच आहे.

broken image

रामायणातील सीताहरणाच्या दृष्याचे इंडोनेशियातील अकराव्या शतकातील शिल्प दिसते -म्हणजे या काळात रामायण इंडोनेशियापर्यंत पोचले होते.

तेराव्या शतकापर्यंत स्त्रियांचे प्रेमिक म्हणून मोकळेपणाने चित्रीकरण झालेले दिसते. हे हस्तिदंतामध्ये कोरलेले ओरिसामधले एक शिल्प. इथले कोरीवकाम अधिक वाढलेले दिसते, दागदागिने, आकार, विषय सर्वच दृष्टींनी कला विकसित झाल्याचे दिसते.

माती, दगड, हस्तिदंत, लाकूड अशा विविध माध्यमांमधून तयार केलेली ही शिल्पे बदलती सामाजिक स्थिती दाखवत असावीत असे वाटले. जरी एका दालनातील काही चार-दोन शिल्पांवरून तत्कालिन समाजाचे यथार्थ चित्र उभे करणे शक्य नसले तरी कळते की या शिल्पांमध्ये वैविध्य आहे, वस्तू तयार करण्याची तंत्रे हळूहळू पण खात्रीने विकसित होत गेली आहेत, त्या शिल्पांचे विषय बदलत गेले आहेत, याचाच अर्थ समाज गतिशील होता, भरभराटीस येत होता. भारताला स्वतःचा इतिहास नाही असे म्हणणार्‍या मार्क्सच्या लिखाणाचा प्रसिद्ध संशोधक डी. डी. कोसंबी यांनी कठोर समाचार घेतला आहेच, पण ही अशी शिल्पेही हे दाखवून देण्यास ठोस पुरावा ठरावी.




भारतात जे दैवत सर्वाधिक पुजले जाते ते म्हणजे शिव. शिव हा दोन्ही प्रकारे पुजला जातो. लिंग स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात.

लिंग पूजा ही पार सिंधू संस्कृतीपासून पाहण्यात येते. अर्थात त्याकाळी लिंग पूजा ही शिव अथवा रूद्र देवतेची नसून ती होती प्रजनन शक्तीची. निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या चमत्काराचे प्रतिक म्हणून स्त्रीशक्तीची उपासना योनीपूजेच्या स्वरूपात तर पुरुष शक्तीची उपासना लिंग स्वरूपात करण्यास प्रारंभ झाला असे म्हणता यावे. पुढे वैदिक आर्यांनी ह्या दोन्ही पूजांना आपल्यात सामावून घेत शिव व शक्ती यांच्या उपासनेच्या प्रथा रूढ केल्या.

वेदांमध्ये शिवलिंगाचे वर्णन कुठे येत असल्याचे मला ठाऊक नाही पण रूद्राचे वर्णन मात्र येते. हा रूद्र मूळचा अनार्य. वैदिकांनी तो आपल्यात सामावून घेतला पण आजही कुठेतरी त्याचे मूळचे अनार्य स्वरूप आपल्याला भैरव, वीरभद्र आदी रूपांमध्ये दिसून येते. ह्या रूद्रालाच नंतर शिव समजले जाऊ लागले.

ऋग्वेदात रूद्राचे वर्णन पुढीलप्रमाणे येते.

ऋग्वेद मंडळ १, सूक्त ४३

गाथपतिं मेधपतिं रुद्रं जलाषभेषजम |
तच्छंयोः सुम्नमीमहे ||
यः शुक्र: इव सूर्य: हिरण्यमिव रोचते |
श्रेष्ठ: देवानां वसुः ||
शं नः करत्यर्वते सुगं मेषाय मेष्ये |
नर्भ्यो नारिभ्यो गवे ||

सर्व स्तुतींचा नाथ, सर्व यागांचा स्वामी, व जलौषधींचा प्रभु असा जो रुद्र त्याचेजवळ स्वकल्याणेच्छु भक्त जे धन मागतो, त्याच धनाची आम्ही याचना करतो.
हा देवांचे श्रेष्ठ वैभव असून, ह्याचें तेज देदीप्यमान सूर्याप्रमाणें व कांति सुवर्णाप्रमाणें आहे.
हा आमचा अश्व, आमचा मेंढा, मेंढी, आमचे नोकर, दासी व धेनु ह्यांना उत्तम रीतीने आनंदांत राहतां येईल असे करतो

ऋग्वेद मंडळ २, सूक्त ३३

स्थिरेभिरङगैः पुरुरूप उग्रो बभ्रुः शुक्रेभिः पिपिशेहिरण्यैः |
ईशानादस्य भुवनस्य भूरेर्न वा उ योषद्रु॒द्रादसु॒र्यम् ॥
अर्हन् बिभर्षि सायकानि धन्व अर्हन् निष्कं यजतं विश्व:रूपं ॥
अर्हन् इदं दयसे विश्वं अभ्वं न वै ओजीयः रुद्र त्वत् अस्ति ॥

नानाप्रकारची रूपें धारण करणारा, उग्र व जगाचा आधार अशा भगवान् रुद्राची अंगयष्टि अत्यंत सुदृढ असून त्या आपल्या शुभ्रतेजस व सुवर्ण स्वरुपानेंच तो फार शोभिवंत दिसतो. सर्व भुवनांची समृद्धि, आणि सर्व भुवनांचा प्रभु अशा ह्या भगवान् रुद्रापासून त्याचे ईश्वरी सामर्थ्य दूर झालें असें कधींही होत नाहीं.
तूं हातांत धनुष्यबाण घेतले आहेस ते तुलाच शोभतात, तर्‍हेतर्‍हेचे स्वच्छ आणि पवित्र पुष्पहार तू घातलेले आहेस तेही तुलाच शोभतात. हें विश्व येवढें अवाढव्य व भयंकर पण त्याच्यावरही तूं दया करतोस ही थोरवी तुझीच. कारण हे रुद्रा, तेजस्वीपणांत तुझ्यापेक्षां वरचढ असा कोणी आढळणारच नाही.

ऋग्वेद मंडळ ७ सूक्त ४६

मा नः वधीः रुद्र मा परा दाः मा ते भूम प्रऽसितौ हीळितस्य
आ नः भज बर्हिषि जीव:शंसे यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥

आम्हाला मारू नको आणि दूर टाकून किंवा परक्यांच्या हातांतही देऊन टाकू नकोस. अथवा आमचा पराभव करू नकोस. तुझ्या क्रोधरूपाच्या पापरूपी बंधनांत आम्ही बद्ध न होऊं. हविचा स्वीकार कर. तुम्ही सदा सुवचनांनी आमचा प्रतिपाळ करा.

नमुन्यादाखल दिलेल्या वरील सूक्तांमध्ये रूद्राचे मूळचे अनार्य स्वरूप त्याच्या क्रोधरूपाने प्रकट होत्सेते दिसते.

रूद्राचे जसे भयानक म्हणून वर्णन आले आहे त्याच प्रमाणे तो भयनाशक अथवा कल्याणकारक असल्याचेही वर्णन ऋग्वेदांत आलेले आहे. जलाषभेषज अथवा जलौषधींचा प्रभू असे रूद्राला मानले गेले आहे. रूद्राला शिवाचे स्वरूप कधी आले ते नेमके सांगता येत नाही मात्र हा बदल वेदोत्तर काळात घडला आणि गुप्तकाळापासून (इ.स.३५०-५००) शिवाला आजचे स्वरूप प्राप्त व्हायला सुरुवात झाली असे म्हणावयास हरकत नाही.

अर्थात हा लिंग,, रूद्र, शिव हा बराच मोठा विषय असून ह्याच्या फारश्या खोलात न जाता आपण आता शिवलिंगे आणि शिवमूर्तींचे मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने काही प्रकार बघूयात.

शिवलिंगे

शिवलिंगाची रचना सर्वसामान्यपणे शाळुंका अथवा योनी व त्यामध्ये लिंग अशा प्रकारची असते. ह्यालाच सयोनीज शिवलिंग असे म्हणतात. हे आपल्या नेहमीच्या माहितीतले शिवलिंग.

पिंपरी दुमाला येथील यादवकालीन मंदिरातील सयोनीज शिवलिंग.
a

आता आपण यातील काही भन्नाट प्रकार पाहूयात. यातील काही प्रकार पूर्वीच माझ्या पाटेश्वर मंदिरावरील लेखात आलेलेच होते.

१. एकमुखलिंग

यामध्ये शिवलिंगावर एक मुख कोरलेले असते.

पाटेश्वर येथे अशा प्रकारचे एक शिवलिंग आहे. ह्या एकमुखलिंगाभोवती लहान लहान अयोनीज लिंगांनी फेर धरलेला आहे.

पाटेश्वर येथील एकमुखलिंग
a

२. चतुर्मुखलिंग

यातील शिवलिंगावर चार मुखे कोरलेली असतात. सर्वसाधारणपणे ही चार मुखे म्हणजे शिवाची चार रूपे असतात. अघोर, उष्णीषिन्. योगी आणि स्त्री.
महाभारतातल्या अनुशासनपर्वातील उमामाहेश्वर संवादानुसार तिलोत्तमा नावाच्या अत्यंत सुंदर अप्सरेला आपल्या भोवती फिरताना पाहून तिच्या फिरण्याच्या दिशेप्रमाणे शंकराला चार मुखे उत्पन्न झाली. तसेच त्यात शंकर पुढे म्हणतो की पूर्वेकडील मुखाने मी इंद्रपद भोगतो, उत्तरेकडील मुखाने मी तुझ्याशी रतीक्रिडा करतो, पश्चिमेकडील मुखाने मी सर्व प्राण्यांना सुख देतो तर दक्षिणेकडील मुखाने मी रौद्र असून त्याद्वारे मी संहार करीत असतो.

तर काही संशोधकांच्या मते ही चार मुखे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सूर्य ह्यांची प्रतिके असतात.

पाटेश्वर येतीलच चतुर्मुखलिंग.

a

३. दिक्पालरूपी शिवलिंग.

हे ही शिवलिंग पाटेश्वर येथीलच आहे. यात शाळुंकेवरील शिवलिंगाभोवती चक्र, चांदणी, बदाम यांच्या आकृत्या आहेत. एकूण दहा चिन्हे यावर कोरलेली आहेत. यातील आठ चिन्हे म्हणजे अष्टदिक्पालांचे प्रतिक असावे तर उरलेली दोन सूर्य आणि विष्णूची प्रतिके असावीत.

a

४. अष्टोत्तरशत लिंग.

अष्टोत्तरशतलिंगामध्ये सर्वसाधारणपणे मुख्य लिंगावर लहान लहान अशी १०८ अयोनीज शिवलिंगे कोरलेली असतात.

पाटेश्वर येथील अष्टोत्तरशत लिंग
a

५. सहस्त्रलिंग

सहत्रलिंगांमध्ये सर्वसाधारणपणे मुख्य लिंगावर लहान लहान अशी १००० अयोनीज शिवलिंगे कोरलेली असतात.

पाटेश्वर येथीलच अजून एक सहस्त्रलिंग

a

६. कोटीलिंग

हा प्रकार पण सहस्त्रलिंगासारखाच पण यातील अयोनीज लिंगांची संख्या हजारापेक्षाही अधिक असते तेव्हा त्याला कोटीलिंग म्हणतात.

पाटेश्वर येथील कोटीलिंग
a

शिवलिंगांचे ढोबळमानाने काही प्रमुख प्रकार आपण बघितलेच. पाटेश्वरला यापेक्षाही अधिक प्रकारची लिंगे आहेत पण ती याधीही लेखात येऊन गेलेलीच आहेत आणि त्यातील बरीचशी तांत्रिक पंथाशी संबंधित आहेत म्हणूनच आता यावर अधिक काही न लिहिता आपण शिवमूर्तींकडे वळूयात.
यातील बहुतेक शिवमूर्ती वेरूळ येथील लेण्यांत आढळतात. वेरूळ लेण्यांविषयीच्या अधिक माहितीविषयी माझी वेरूळ लेणींविषयीची लेखमाला पाहावी.

शिवमूर्ती

सर्वसाधारणपणे शिवमूर्तींची मांडणी म्हणजे चार हात, हाती डमरू, त्रिशुळ, कमंडलु, अक्षमाला, गळ्यात नाग, वाहन नंदी अशी. पण शिवमूर्तींचेही अनेक प्रकार आहेत त्यातील काही मोजके प्रकार आता येथे बघू.

यातील पहिलीच मूर्ती पाहूयात ती लिंगोद्भव शिवाची.
ही मूर्ती लिंग आणि मूर्ती अशा दोन्ही प्रकारांत गणली जाते.

१. लिंगोद्भव शिव.

एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांत श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. तेव्हा एक दैदिप्यमान अग्निस्तंभ प्रकट झाला. याचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. विष्णू वराहाचे रूप घेऊन पाताळ शोधायला गेला तर ब्रह्माने हंसरूप घेऊन आकाशात मुसंडी मारली. जेव्हा कुणालाही कसलाही थांग लागेना तेव्हा ते दोघेही शिवाला शरण गेले तेव्हा दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत असे सांगून शिवाने लिंगोद्भव स्वरूपात आपले रूप प्रकट केले.

वेरूळ कैलास लेण्यातील लिंगद्भव शिवप्रतिमा
a

पुण्यातील त्रिशुंड गणेश मंदिरातील लिंगोद्भव प्रतिमा. a

२. लिंगिन शिवमूर्ती

हा एक शिवमूर्तीचा आगळावेगळा प्रकार. सर्वसाधारणपणे ही मूर्ती उमामाहेश्वर प्रकारात दिसते. यात शिवाने शिवलिंग धारण केलेले दिसते. यालाच लिंगायत मूर्ती असेही काहीजण म्हणतात. आजही लिंगायत लोक आपल्याकडे सतत शिवलिंग धारण करत असतात.
उमामाहेश्वर प्रकार (म्हणजे शिव पार्वती यांच्या एकत्रित मूर्ती) यातच अंतर्भूत असल्याने त्याचे वेगळे वर्णन करीत नाही.

वेरूळच्या कैलास लेणीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील गोपुरावर असणारा हा लिंगिन शिव

a

वेरूळ कैलास लेणीच्याच प्रदक्षिणापथावर असलेला हा लिंगिन शिव
a

प्रदक्षिणापथावरच असलेली लिंगिन शिवाची अजून एक प्रतिमा.
ह्याने आपल्या उजव्या हातातील बोटांमध्ये शिवलिंग धारण केले आहे.

a

३. त्रिमुखी शिव.

ह्याला तीन मुखे असतात. त्रिमुखी शिवाची सर्वात प्रसिद्ध प्रतिमा म्हणजे घारापुरी येथील ब्रह्मा-विष्णू-महेश अशी मानली गेलेली शिवप्रतिमा. वास्तविक ही प्रतिमा ब्रह्मा-विष्णू-महेश अशी नसून शंकराच्याच सदाशिव रूपाची आहे.

वेरूळ येथील त्रिमुखी शिव
a

४. चतुर्मुख शिव.

ह्याच्या नावाप्रमाणेच ह्याला चार मुखे आहेत. काही संशोधक ह्यालाच सदाशिव (पंचमुखी शिव) असे मानतात ह्याचे पाचवे मुख हे दाखवले नसते व ते आकाशाच्या दिशेने असे मानले जाते.

पाटेश्वर येथील चतुर्मुख शिव

a

५. लकुलीश शिव

इसवीसनाच्या पहिल्या शतकानंतर व गुप्तकाळाच्या आधी लकुलीश नावाच्या मुनीने पाशुपतमताची स्थापना केली. हे मत ळूहळू मान्य होत जाऊन लकुलीश हा शिवाचेच प्रतिक झाला. ह्याची मुख्य लक्षणे म्हणजे ह्याच्या हातात सोटा अथवा लगूड असते आणि हा उर्ध्वरेता असतो. ह्याचा एक हात नेहमी वरदमुद्रेत असतो. लकुलीश शिवाची मूर्ती पद्मासनी अथवा उभ्या अशा दोन्ही प्रकारांत सापडते.

वेरूळ लेणी क्र. २९ मधील पद्मासनस्थ लकुलीश शिवाची मूर्ती

a

वेरूळ कैलास लेणीतील (लेणी. क्र. १६) उभ्या अवस्थेतील उर्ध्वरेता लकुलीश
a

६. अजएकपाद शिव

हा शंकराच्या मूर्तीचा एक अतिशय दुमिळ प्रकार. महाभारतात वर्णिल्याप्रमाणे हा रूद्र कुबेराबरोबरच धनाचे रक्षण करत असतो. याचे तोड बकर्‍याचे असल्याने हा अग्नीशी समान मानला जातो तर ह्याने आपले संतुलन एकाच पायांवर खुबीने साधलेले असते.

पाटेश्वर येथील अजएकपादाची दुर्मिळ प्रतिमा

a

७. नटराज शिव अथवा नृत्य मूर्ती

हा एक सर्वपरिचीत प्रकार. नटराज प्रकारात शिव हा नृत्यमुद्रेत दिसतो. शिवाने १०८ प्रकारे नृत्य केले अशी मान्यता आहे. तांडवनृत्यसुद्धा ह्या नटराज प्रकारातच येते.
नटराज शक्यतो चारापेक्षा अधिक हातांचा दर्शवला जातो. ८, १०, १६ हातांचेही नटराज आहेत. हातांमध्ये त्याने खङग, शक्ती, दंड, त्रिशुल, नाग, ज्वाला इत्यादी आयुधे धारण केलेली असतात.

वेरूळ लेणी क्र. २१ रामेश्वर येथील कटीसमनृत्यमुद्रेत असलेली शिवप्रतिमा
a

वेरूळ लेणी क्र. १६ येथील शिवतांडव प्रतिमा
a

८. कल्याणसुंदर मूर्ती

शिवपार्वती विवाहाचे अंकन दाखवणार्‍या मूर्तीस कल्याणसुंदर मूर्ती म्हणतात. ह्या मूर्तींमध्ये शिवाने पार्वतीचा हात आपल्या हाती घेतलेला असतो. ब्रह्मदेव हा भटाचे काम करत असतो तर दिक्पाल, विष्णू आदी देव शिवाच्या विवाहाप्रित्यर्थ आलेले असतात.

वेरूळ लेणी क्र. २९ मधली कल्याणसुंदर मूर्ती
a

वेरूळ लेणी क्र. २१ मधली कल्याणसुंदर मूर्ती
a

९. सोमास्कंदमूर्ती

या मूर्तीमध्ये शिव आणि पार्वती यांचे मध्ये लहानसा स्कंद अथवा कार्तिकेय असतो.. अर्थात स उमा स्कंद (उमेसहित स्कंद) तो उभा, बसलेला किंवा आईच्या किंवा बाबांच्या मांडीवरही दाखवला जातो.

वेरूळ कैलास लेणीमंदिराच्या अंतराळात सोमास्कंद मूर्ती कोरलेली आहे.
a

आतापर्यंत आपण उमामाहेश्वर आणि केवल शिव प्रकारच्या मूर्ती पाहिल्या आता शिवाच्या मूर्तींचे अजून काही प्रकार बघू.

यात येतात ते अनुग्रह आणि संहारमूर्ती

सुरुवातीस अनुग्रहमूर्ती पाहूयात.

१०. अनुग्रहमूर्ती

अनुग्रहमूर्ती म्हणजे शंकराच्या वरप्रदानास अथवा अनुग्रहास प्राप्त झालेल्या व्यक्तिची कथा.
ह्यात रावणानुग्रह आणि मार्केंडेयानुग्रह असे दोन उपप्रकार येतात.

१०.१ रावणानुग्रहशिवमूर्ती

कुबेराचा पराभव करून त्याचे पुष्पक विमान पळवून रावण कैलासपर्वतावर शंकराचे दर्शन घेण्यास येतो. शिवपार्वतीची क्रिडा चालू असल्याने द्वारपालांनी हाकलून दिलेला गर्वोन्मत्त रावण कैलास पर्वतच उचलण्याचा बेत करतो. आपल्या सर्व हातांनी कैलास पर्वत तळापासून उचलायला लागतो. तर शंकर मात्र भयभीत पार्वतीला आणि भेदरलेल्या शिवगणांना धीर देऊन आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलासास दाबून धरतो. कैलासाच्या ओझ्याखाली चिरडत चाललेला रावण प्राणांची भीक मागून शिवस्तुती गाऊन शंकराचा अनुग्रह प्राप्त करून घेतो अशी याची थोडक्यात कथा.

वेरूळच्या कैलास लेणीत रावणानुग्रहाचे अतिशय अप्रतिम शिल्प आहे.

शिल्पपटात कैलास पर्वत उठावात कोरलेला आहे तर त्याच्या खालच्या भागात खोबणी करून त्यात रावणाचे शिल्प कोरलेले आहे. रावणाची मस्तके सुटी आहेत. कैलास उचलताना रावणाने एक पाय गुडघ्यात मुडपून दुसरा पाय जमिनीवर घट्ट रोविला आहे. आपल्या वीस हातांनी सर्व शक्ती पणास लावून त्याने कैलास अर्धवट उचललेला आहे. इतकी प्रचंड ताकत पणास लावताना साहजिकच रावणाची मान तिरकी झालेली असून कानातले एक कुंडल खांद्यावर टेकलेले आहे तर दुसरे कुंडल हवेत झुलत आहे. कैलास पर्वतावरील घनदाट वनराजी त्यावर झाडे आणि त्यावरील भयभीत मर्कटे कोरून दाखवली आहे. वृक्षराजीच्या वर भयभीत शिवगण तर शेजारी दोन द्वारपाल कोरलेले आहेत. पार्वतीच्या शेजारी असलेली एक दासी पाठमोरी होऊन पळून जात आहे. तर भयभीत पार्वतीला निर्विकार शंकर धीर देत असून एका पायाने कैलास दाबून धरत आहे. आकाशात अष्टदिक्पाल रावणाचे हे गर्वहरण पाहावयास जमले आहेत.

a

वेरूळ लेणी क्र २९ मधील रावणानुग्रहशिवमूर्ती
a

वेरूळ लेणी क्र. २१ (रामेश्वर) येथील रावणानुग्रहशिवमूर्ती. लक्ष्यपूर्वक पाहिल्यास रावणाचे दहावे मुख हे गर्दभाचे असल्याचे दिसेल.

a

a

गोंदेश्वर मंदिर, सिन्नर येथील बाह्यभिंतीवर कोरलेली रावणानुग्रहशिवमूर्ती
a

१०.२ रावणानुग्रहशिवमूर्ती प्रकार दुसरा

रावणानुग्रहशिवमूर्तीचा अजून एक प्रकार वेरूळ येथील कैलास लेणीच्या प्रदक्षिणापथावर पाहावयास मिळतो. या कथेप्रमाणे वरप्राप्तीसाठी रावण दहा हजार वर्षे तप करतो प्रत्येक सहस्त्र वर्षानंतर आपले एकेक मस्तक कापून शंकराला अर्पण करतो जेव्हा शेवटी आपले शेवटचे मस्तक कापून देण्यास सिद्ध होतो तेव्हा भगवान शंकर प्रकट होऊन त्याला वर प्रदान करतात.

अर्थात यातील गंमत म्हणजे ही कथा आहे मूळची ब्रह्मदेवासंदर्भात. वाल्मिकी रामायणाप्रमाणे रावण हा ब्रह्मदेवाला मस्तके अर्पण करून वरप्राप्ती करून घेतो. तर येथे मात्र शिवाची कथा कोरलेली आहे. एकंदरीतच वैदिक देवता विस्मृतीत जात असताना शैव, वैष्णव पंथांचे प्राबल्य कसे वाढायला लागले होते याचा हा एकप्रकारे पुरावाच.

मूळ वाल्मिकीरामायणातील श्लोक पहा.

दशवर्षसहस्रं तु निराहारो दशाननः ।
पूर्णे वर्षसहस्रे तु शिरश्चाग्नौ जुहाव सः ||

एवं वर्षसहस्राणि नव तस्यातिचक्रमुः ।
शिरांसि नव चाप्यस्य प्रविष्टानि हुताशनम् ॥

अथ वर्षसहस्रे तु दशमे दशमं शिरः ।
छेत्तुकामे दशग्रीवे प्राप्तस्तत्र पितामहः ॥

पितामहस्तु सुप्रीतः सार्धं देवैरुपस्थितः ।
तव तावद् दशग्रीव प्रीतोऽस्मीत्यभ्यभाषत ॥

शीघ्रं वरय धर्मज्ञ वरो यस्तेऽभिकाङ्‌क्षितः ।
कं ते कामं करोम्यद्य न वृथा ते परिश्रमः ॥

कथेचा थोडक्यात आशय वर दिलाच असल्याने आता याचे परत भाषांतर करीत नाही.

वेरूळ येथील कैलास लेणीतील प्रदक्षिणापथावरील रावणानुग्रहशिवमूर्ती

a

१०.३ मार्कंडेयानुग्रहमूर्ती

अनुग्रहमूर्तीचाच पुढचा प्रकार म्हणजे मार्कंडेयानुग्रहशिवमूर्ती. अर्थात हीच मूर्ती शिवाच्या संहारमूर्तीमध्येही गणली जात असल्याने हिच्याबद्दल अधिक उहापोह मी पुढील संहारमूर्ती प्रकरणात करतो.

११. संहारमूर्ती.

ह्या मूर्तीचे शिवाचे संहाररूप अथवा रौद्ररूप दाखवतात. सज्जनांच्या रक्षणासाठी, असुरांच्या नाशासाठी शिवाने रौद्ररूप धारण करून त्यांचा संहार केला. ह्या सर्व कथा संहारमूर्तींमध्ये कोरलेल्या असतात. संहारमूर्तींमध्येच भैरवाचाही समावेश आहे पण आपण भैरवमूर्ती नंतर एका स्वतंत्र प्रकरणात पाहूयात.

संहारमूर्तीमध्ये पहिली मूर्ती घेऊ ती म्हणजे कालारी शिव अथवा मार्कंडेयानुग्रहमूर्ती

११.१ कालारी शिव अथवा मार्कंडेयानुग्रहशिवमूर्ती.

ह्या मूर्तीचा समावेश एकाचवेळी अनुग्रह आणि संहार अशा दोन्ही प्रकारांमध्ये होतो याचे कारण म्हणजे मार्कंडेयावर अनुग्रह करून शिव साक्षात कालरूपी यमाचे पारिपत्य करीत आहे.

याची थोडक्यात कथा अशी.

पुराणकथेप्रमाणे निपुत्रिक असलेल्या मर्कंड ऋषींच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन शंकर त्यांना अतिशय विद्वान पुत्र होईल असा आशिर्वाद देतो. मर्कंडाचा हा अल्पायुषी पुत्र शिवाच्या उपासनेत गढून जातो. मार्कंडेय १६ वर्षाचा होतो तेव्हा त्याचे प्राण हरण करायला खुद्द यम तिथे येतो. प्रार्थनेत गढलेल्या मार्कंडेयाच्या गळ्यात यम आपला यमपाश आवळतो. मार्कंडेयासारख्या भक्ताला यम ओढून नेत आहे हे शिवाला सहन न होऊन तो पिंडीतून प्रकट होऊन साक्षात यमधर्मावर क्रोधाने लत्ताप्रहार करून त्याला दूर ढकलून देतो. भयभीत यम शंकराची प्रार्थना करून त्याजकडे अभयदान मागत आहे. यमधर्मरूपी साक्षात कालाचे पारिपत्य करून मार्कंडेयाला जीवदान दिल्याने शिवाच्या ह्या रूपाला कालारी शिव अथवा कालांतक शिव असेही म्हटले जाते.

वेरूळ येथील कैलास लेणीच्या प्रदक्षिणापथावर असलेली कालारी शिव प्रतिमा
a

वेरूळ येथील कैलास लेणीमधील कालारी शिवप्रतिमा
a

११.२ व ११.३ गजासुरसंहारमूर्ती आणि अधकासुरवधमूर्ती

ह्या दोन्ही मूर्तीबाबत एकच कथा आहे.

अंधक नावाच्या असुराला ब्रह्मदेवाच्या वराने आपल्या जमिनीवर पडणार्‍या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून एकेक असुर निर्माण होईल अशी शक्ती प्राप्त होते. अंधकासुराच्या प्रभावाने हैराण झालेले देव शंकराकडे अभय मागण्यासाठी जातात त्याच वेळी नीलासुर नावाचा राक्षस हत्तीचे रूप धारण करून शंकराचे पूजन करणार्‍या ऋषींना त्रास देतो. शंकर आधी गजासुराचा वध करून त्याच एक दात उपटतो आणि त्यानंतर त्याचे गजचर्म अंगाभोवती गुंडाळून एका हाती वाडगा धरून त्रिशुळाने अंधकासुराचा वध करतो. आपल्या त्रिशुळावर उचलून धरलेल्या अंधकाचे रक्त वाडग्यात गोळा करतो तसेच वाडग्याबाहेर पडणारे रक्ताचे चुकार थेंब त्वरेने शोषून घेण्यासाठी आपल्या योगसामर्थ्याने मातृकेची (चामुंडेची) उत्पत्ती करतो.

वेरूळच्या कैलास लेणीतील गजासुरवधाची ही मूर्ती

a

वेरूळच्या लेणी क्र. २९ मधील अंधकासुरवधाचे हे अतिशय प्रत्ययकारी शिल्प. पहा शिवाचे डोळे कसे भयानक क्रोधाने खोबणीतून पार बाहेर आलेले आहेत.

a

कैलास लेणीतील प्रदक्षिणापथावरील अंधकासुरवधाचे अजून एक शिल्प

a

११.४ त्रिपुरांतकशिवमूर्ती

तारकासुराचे तीन मुले विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष यांनी ब्रह्मदेवाची आराधना करून आकाशगामी असलेली अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि लोहमय अशी तीन फिरती पुरे प्राप्त करून घेतली. ही तिन्ही पुरे एकाच रेषेत असतांनाच एकाच बाणाने ह्यांचा विध्वंस करू शकणाराच त्रिपुराचा वध करू शकेल असा वर त्यांनी मिळविला. तीन फिरत्या पुरांमुळे अतिशय बलवान झाएल्या ह्या तीन्ही असुरांचा शंकराने विष्णूरूपी बाण करून त्यांचा नाश केला अशी ही थोडक्यात कथा.

वेरूळ येथील प्रदक्षिणापथावरील त्रिपुरांतक शिवमूर्ती.

a

सप्तस्वरमयशिव

 https://bhatakbhavani4216.wordpress.com/2020/12/11/%e0%a4%b8%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5/

December 11, 2020Posted inUncategorized

आधुनिकतेच्या शिखरावर असलेली मुंबई तेवढीच प्राचीन सुद्धा आहे. याच मुंबईच हृदय समजला जाणाऱ्या परिसरात म्हणजेच परळ गावात एक प्राचीन शिवमूर्ती आहे. परळ गावातील #चण्डिकादेवी किंवा बारदेवीच्या मंदिराच्या शेजारीच ही मूर्ती आहे. १९३१ मध्ये रस्त्याचे बांधकाम चालू असताना सापडलेली ही मूर्ती स्थानिकांच्या हट्टामुळे (अर्थात चांगलंच आहे) आजही इथेच आहे. पुरातत्व विभागाच्या माहिती प्रमाणे ही मूर्ती गुप्त कालीन म्हणजेच इसवी सनाच्या पाचव्या किंवा सहाव्या शतकातील असावी.
.
जवळपास १३७ इंच उंचीची ही मूर्ती ७७ इंच रुंदीच्या भागावर उठावशीर कोरलेली आहे. मध्यभागी मुख्य प्रतिमा, तिच्या डोक्यावर एकावर एक अश्या दोन मूर्ती तर मुख्य मूर्तीच्या खांद्यातून दोन मूर्ती, आणि त्या वरील मूर्तीच्या खांद्यावरून दोन मूर्ती त्रिभंगावस्थेत अश्या एकूण सात मूर्ती नजरेला पडतात. मुख्य मूर्तीच्या पायाजवळ एकूण पाच वादक बसलेले आहेत.

सात पैकी सहा मूर्ती ह्या द्विभुज असून, या मूर्तीच्या डाव्या हातात एक हातात कमंडलू आणि दुसरा हात मुद्रा अवस्थेत आहेत. मध्यभागी सर्वात वरची मूर्ती मात्र दहा हातांची आहे. या मूर्तीच्या उजव्या हातात हातात कमंडलू, चक्र, खेटक, तलवार, आणि एक हात मुद्रा अवस्थेत आहे, तर डाव्या बाजूला एक हात अभिषेक मुद्रेत असून इतर हातात धनुष्य, दोन भरीव चक्र आणि एका हातात कमंडलू आहे.

एकाही मूर्तीवर मुकुट नसला तरी केसांची जटामुकुट सारखी अतिशय सुंदर आणि वेगळी रचना, डोक्यावर चंद्रकोर, गळ्यात हार, नक्षीदार कटीवस्त्र,कानातील कुंडल, हातात कडे, यांनी युक्त ह्या मूर्ती अतिशय सुंदर दिसतात.

काही अभ्यासकांच्या मते मधल्या तीन मूर्ती म्हणजे तमोगुणी शिव, सत्वगुणी विष्णू, आणि राजस ब्रह्मा असावा, तर इतर चार मूर्ती ह्या सद्योजात, वामदेव, अघोर, आणि तात्पुरुष असावेत. तर काहींच्या मते मधल्या मूर्ती ह्या पाश, पशु आणि पती असावे तर इतर प्रतिमा या विद्या, क्रिया, योग आणि चर्या हे शिवसिद्धांताचे लक्षण असावेत.

सी शिवरामन या मूर्तीला शिवाची सप्तस्वरमय मूर्ती असे म्हणलेले आहे, मात्र मुख्य प्रतिमेपैकी कोणाकडेही कोणतेही वाद्य नसल्याने हा विचार विवादित आहे. तर पायाजवळ बसलेले वादक हेच शिवाच्या सप्तस्वरमय रुपाकडे संकेत करीत आहेत, त्यामुळं सुरांशी मेळ घातला जाऊ शकतो असेही काहींचे म्हणणे आहे.

महेश तानाजी देसाई

#भ्रमणगाथा

 

गुड्डीमल्लमचे शिवलिंग



इ. स. पूर्व तिसऱ्या शतकातील ही मूर्ती असून पुरुष लिंग अकरातील देशातील पहिली मूर्ती आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात ही मूर्ती आहे. लिंगाच्या समोर एक व्यक्ती उजव्या हातात शिंग असलेला प्राणी धरलेला असून डाव्या हातात कुंभ आणि परशु घरलेला आहे. मूर्ती पाच फूट उंचीची असून स्थान महात्म्य नुसार परशु रामाने आई रेणुकेला मारल्या नंतर तो प्रायश्चित करण्यासाठी तिथे गेला होता. प्रायश्चित करीत असताना परशुराम रोज एक दैवी फुल शिवलिंगावर अर्पण करीत असे. या दैवी फुलाचे रक्षण करण्यासाठी चित्रसेन नावाचा यक्ष सोबत ठेवलेला होता. या यक्षास रोज एक प्राणी आणि भांडे भर ताडी द्यावयाचे कबूल करण्यात आले होते. कारण रोज एकच दैवी फुल उगवत असे. ते फूल परशुराम लिंगावर अर्पण करीत असे. एक दिवस यक्ष चित्रसेनलाही भक्ती करावीशी वाटली. ते दैवी फुल त्याने शिवाला अर्पण केल्याने दोघात घनघोर युद्ध झाले. शेवटी शिव प्रसन्न होऊन दोघांनाही आपल्यात सामावून घेतले. स्थानिक भाषेमध्ये पल्लव म्हणजे युद्धभूमी तर गुड्डी म्हणजे मंदिर होय. या प्रदेशावर पल्लव, गंगपल्लव, बना, चोल यांच्या राजवटी होत्या. मंदिराच्या बाह्य अंगावर यासंदर्भात शिलालेखही कोरलेले आहेत. अगदी असेच एक शिल्पपट कुशान काळातील इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील असून ते मथुरा संग्रहालयात ठेवण्यात आलेले आहे. प्रस्तुत मूर्तीत शिवलिंग, परशुराम आणि यक्ष चित्र सेन दिसून येतात.

.....................

प्रा. डॉ. अरविंद सोनटक्के

मूर्तिशास्त्र अभ्यासक,

दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर जि. नांदेड.

9423139676

(फोटो नेट साभार)
 

शिव ते महादेव - सांस्कृतिक प्रवाह



शिव हा अखिल भारतात सर्व जाती-जमातींचा पूज्य असा महादेव आहे. वैदिकांचा रुद्र, द्रविडांचा शिव आणि इतर अनेक जाती-जमातींचे तत्सदृश्य देव यांचा गुणधर्म समन्वय होऊन संप्रदायांचा पौराणिक शिव आकाराला आला आहे. रुद्र शिव असे त्याचे संयुक्त रूप आहे. शिवाचे स्वभावधर्म रुद्राला लागू होतात. रुद्र अग्नी तत्त्वातून उगम पावल्यामुळे अग्निज्वाला उर्ध्वगामी असतात. त्या वरून रुद्राच्या ऊर्ध्व लिंगाची कल्पना केली गेली असावी. शिवलिंगाला ज्योतिर्लिंग म्हणतात त्याचे रहस्य हेच आहे. अग्नि वेदीवर जळत आणि तापत राहतो; म्हणून शिवरूपात त्याला शांत करण्यासाठी त्याच्या मस्तकी अभिषेकाची संततधार धरावी लागते. शिव किंवा शिवभक्त आपल्या शरीरावर भस्मचर्चन करतात त्यातही रुद्राचे अग्नीशी तादात्म्य सूचित होते.

रुद्राच्या घोर व अघोर अशा दोन तनु मांडलेल्या आहेत. यजुर्वेद आणि अथर्ववेदात रुद्राला मारक असे म्हटले आहे. तर यजुर्वेदात त्यास अघोर म्हणजे सौम्य रूप विशद केला आहे. भव आणि शर्व ही शिवाची दोन प्रसिद्ध नावे आहेत. या दोन्ही मुळात भिन्न देवता होत्या. शिवमहात्म्य वाढल्यावर या दोन्ही देवता शिवाच्या भूपती आणि पशुपती या स्वरूपात विलीन झाल्या. अशाप्रकारे अनेक देवतांना आपल्यात समाविष्ट करून शिव हा महादेव बनला. 

या महादेवाची पुजा लिंगरूपात करावी असे पुराणांनी सांगितलेले आहे. ही लिंग पूजा फार प्राचीन असून तिचे अवशेष सर्व जगामध्ये आढळतात. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात ह्या गोष्टीचा पुरावा मिळालेला आहे. तिथे सापडलेल्या एका खापरावर एक त्रिमुख पूर्णाकृती उमटवलेली असून ती ऊर्ध्वमेंढर (उत्थित लिंग ) दाखवलेली आहे. सिंधू संस्कृतीतल्या लोकांचा हा उपास्यदेव असावा आणि त्याची पूजा लिंगरूपात करीत असावेत हे तिथल्या अवशेषावरून कळून येते. 

शाळुंका आणि त्यावर ऊर्ध्व लिंग आकृती ही दोन्ही मिळून लिंग प्रतिक बनते. शाळुंका हे योनी प्रतीक आणि ऊर्ध्व पाषाण हे लिंगप्रतीक समजावे. विश्वाच्या उत्पत्तीला कारणीभूत होणारी स्त्री-पुरुषांची ही जननेंद्रिय सिंधू संस्कृतीच्या लोकांनी तसेच इतरही अनेक आदिम जमातींनी शिवलिंग स्वरूपात उपास्य बनवली. लिंगा बद्दल लिंगपुराणात सयोनी लिंगाचे वर्णन दिलेले आहे. लिंग वेदी अर्थात शाळुंका म्हणजे पार्वती व लिंग म्हणजे साक्षात महेश्वर होय. त्या दोघांच्या पूजनाने शिवपार्वतीची पूजा केल्यासारखे होते. 

शिवलिंग निर्मिती कशी करावी याविषयी तपशील सुप्रभेदागम मध्ये दिलेला आहे. 

लिंगे ही आदिम काळापासून भारतात दिसून येतात, जी नंतर शिवलिंगा सोबत जोडली गेली. श्रीपरीपूर्णानंद वर्मा म्हणतात की, जगाच्या कानाकोपऱ्यात वासना आणि प्रजनन या दोन कारणांमुळे लिंग पूजेचा प्रसार झाला होता. कटनर असे म्हणतात की, लिंग पूजा सर्वप्रथम इजिप्त देशात सुरू झाली. जी चौथ्या शतकापर्यंत टिकून होती. आयसीस याने लिंग पूजेचा प्रारंभ केला होता. आयसीसीच्या मंदिरातही अग्नि पेटत ठेवत असत. या अग्नीचे पूजन "अक्षतयोनि" कुमारिकाच करीत असत. यातही शिव संकल्पनेचे आदिम रूप आम्ही पाहू शकतो. शिवाचा आणि अग्नीचा असलेला सहसंबंध, त्याचे शिखी हे नाव, त्याचा अग्नीमुळे तिसरा नेत्र, शाश्वत प्रजनन शक्ती दर्शविणारा त्याचे ऊर्ध्व लिंग, काम दहनाचा केलेला पराक्रम. तसेच शिव ज्ञानस्वरूप असून काम दहन केले म्हणजे पार्वतीचे लैंगिक सुख हिरावून घेतले असे मात्र नाही. आपल्या ज्ञानाग्नीने अविद्या आणि अज्ञानरूपी तमांचा नाश केला असे म्हणता येईल.

शिवाने वैदिक परंपरेला असंख्य कथा दिल्या. रुद्र आणि योगिनी हे शिवाशी संबंधित आहेत. शिव हा योगापासून भोगा पर्यंत, सर्व शाखांचा उद्गाता, विषा पासून गांजा पर्यंत, कामापासून वैराग्य पर्यंत पुरुषोत्तमाचे सर्व बिंदू शिवा मध्ये आहेत.

वात्सायनाने कामसूत्र लिहीत असताना त्याचे सर्व श्रेय शिवाला दिलेले आहे. पहिल्यांदा काम कलाही शिवाने पार्वतीला सांगितली, ती नंदीने ऐकली. त्यावर नंदीने अनेक खंडाचा ग्रंथ लिहिला तो सामान्यांना वाचणे शक्य नसल्यामुळे त्याचे लघुरूप मी मांडत आहे असे मुनी वात्सायन म्हणतात. कालिदासाच्या कुमारसंभवात शिवपार्वतीच्या समागमाचे सविस्तर वर्णन मांडलेले दिसून येते.

शिव म्हणजे मंगल, रौद्र, सौम्य, संहारक, नवसर्जन, सुखनिधान, भयंकर & आशुतोष अशा रूपात आढळतो. सर्जक नसला तरी सर्जनाचे बीज धारण करणारा आहे. अमरकोशात शिवाची 48 नावे आहेत. या नावात त्याच्या रूपाची, लंच्छनाची, कार्याची माहिती देणारी आहेत. ऋग्वेद मधील रुद्र पुढे शिव झाले. हे शिवरूप लिंग पूजेच्या माध्यमातून समाजात स्थापित झाले. पुढे यातूनच कलामुख, लकुलिश, कपालिक, वीरशैव असे पंथ निर्माण झाले. यास तत्वज्ञानाची जोड होतीच. शिव दर्शनिक आणि लोकप्रचलित अशी दोन रूपे ही पहावयास मिळतात. तो योग्याचा परमपुरुष असून स्वतः ही महायोगी आहे. शिवपुरानातील अद्भुत आणि अलौकिक कथा त्याच्या संहारक आणि उपकारक कामाची माहिती देतात.

शिव गजासूरला मारतो तर मार्कंडेयला जीवदान देतो. दक्ष यज्ञ संपवितो तर जगाला वाचविण्यासाठी हलाहल प्राशन करतो. तपोभंग करणाऱ्या मदनाला जाळतो तर अर्जुनाचा, विष्णुचा अनुग्रह करतो. स्वर्गातून येणाऱ्या गंगेचा ओघ मस्तकी धारण करून वाट मोकळी करून देतो. अशा कितीतरी कथा सांगता येतील.

मूर्ती कलेत सदाशिव, गंगावतरण, स्त्री पुरुष समानता दर्शविणारी अर्धनारीश्वर, सामान्य लोकभावना प्रकट करणारी कल्याणसुंदर, वृषभवाहन, अंधःकासुर वध, रावणानुग्रह, लिंगोदभव, त्रिपुरानंतक, नृत्य शिव, भिक्षाटण शिव, गौरीहर, अष्टमुख, सोमस्कंद, चांडेशनुग्रह, महेशमूर्ती, एकादश रुद्र, बालशिव असे कितीतरी प्रकार आढळून येतात.

..……...…......….........

डॉ. अरविंद सोनटक्क

मूर्तीशास्त्र अभ्यासक,

दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर जिल्हा नांदेड.
 

 

कृष्ण आणि पुतना


लेख - १५

कृष्ण हे भारतीय धार्मिक परंपरेमध्ये असलेले असे चरित्र आहे ज्याने सर्वांना त्याच्या कथांमध्ये बांधून ठेवले आहे. बाळकृष्ण, यशोदेला प्रश्न विचारून भंडावून सोडणारा कृष्ण, गोपिकांबरोबर खेळणारा कान्हा, कंस वध करणारा जबाबदार तरुण कृष्ण आणि महाभारतात अर्जुनाचा सारथी होऊन आयुष्याचे आणि या सृष्टीचे तत्वज्ञान गीतेत संगणारा, विश्र्वरूप दर्शन देणारा भगवान श्रीकृष्ण. अशा अनेक वेगवेगळ्या रूपांमध्ये तो आपल्याला दिसतो. वेगवेगळ्या कलांमध्ये देखील कृष्णाची ही रूपं आपल्याला बघायला मिळतात. कृष्ण चरित्रतला महत्त्वाचा भाग म्हणजे त्याने बाळ असताना केलेला अनेक असुरांचा वध.

पुतना नावाच्या एका राक्षसिणीला कृष्णाचा वध करायला कंस मामाने पाठवले. आपल्या स्तनांना विषाने भरून ती यशोदेच्या घरात रूप बदलून आली. योग्य संधी साधून तिने कृष्णाला स्तनपान करायला घेतले. पण शेवटी दैवी अवतार असलेल्या कृष्णाने तिचे हे रूप ओळखून तिचा वध केला अशी ही कथा आहे.
मध्य प्रदेशात विदिशा जवळ बिजा मण्डल नावाचे एक प्रचंड मोठे पण भग्न मंदिर आहे. त्या मंदिराच्या एका खांबावर हे छोटेसे शिल्पं आहे. यामध्ये एक स्त्री आपल्या मांडीवर घेऊन त्या बाळाला स्तनपान करते आहे. स्तनपान हे मातृत्वाचे महत्त्वाचे लक्षण आहे. आपल्या बाळाला जवळ घेऊन, घट्ट पकडून ही क्रिया होते. पण या शिल्पामध्ये त्या स्त्री ने बाळाला स्तनपान देताना देखील आपले दोन्ही हात हे वर घेतले आहेत आणि हाच फरक आहे कलाकाराने दाखवला आहे.

एवढ्याश्या शिल्पातून एवढी मोठी कथा दाखवणाऱ्या कलाकाराचे कसब किती अगाध असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. कृष्ण आणि अनुषंगाने वैशव प्रभाव भारतात मोठ्या प्रमाणात वाढण्यात भारतीय कलांचे योगदान खूप मोठे आहे.

शिल्प - कृष्ण आणि पुटना
बिजा मण्डल, मध्य प्रदेश
९ वे शतक

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

 

शिव


लेख - २

शंकर किंवा शिव हा भारतात पुजल्या जाणाऱ्या महत्वाच्या देवतांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा देव. या शंकराचे मूळ काही हजार वर्ष मागे जाते. अतिप्राचीन कालखंडात लिंग रूपाने पूजन होणारा देव, जनन आणि पुनर्निर्मिती दाखवणारा देव, वेदांमध्ये दिसणारा रुद्र, महायोगी शिव, सगळं काही आपल्या क्रोधाने नष्ट करणारा प्रलय आणि त्याच वेळेला परम भक्ताच्या मागण्या पूर्ण करणारा शिव, अशा शेकडो छटा या महादेवाच्या आहेत. स्मशानात अंगाला राख फासून राहणाऱ्या साधुंपासून ते तलम वस्त्र घालून राजवाड्यात राहणाऱ्या राजापर्यंत सगळ्यांना याने आपल्यात सामावून घेतले आहे. मंदिराच्या गर्भ गृहात प्रामुख्याने लिंग स्वरूपात याचे पूजन होत असेल तरीही शिल्पशास्त्रात शंकर या संकल्पनेवर मोठ्या प्रमाणात प्रयोग  झाले आहेत.

शंकराच्या शिल्पामध्ये काही प्रमुख गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. डोक्यावर असलेल्या जटा किंवा जटा मुकुट, कपाळावर कोरलेला तिसरा डोळा, हातात पकडलेला त्रिशूळ, शिवाला अत्यंत प्रिय असलेले वाद्य म्हणजेच डमरू, इत्यादी लांच्छने बघून शिवाचे शिल्प ओळखता येते.

आता या फोटोमध्ये असलेल्या शिवाचे निरीक्षण करूयात. आधी सांगितल्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे असे निरीक्षण करायचे आहे. मूर्ती स्थानक म्हणजेच उभी आहे, हातामध्ये पकडलेला त्रिशूळ आणि त्या दंडाला खाली वेटोळे दिलेला नाग, कमरेवर नेसलेले वाघाचे कातडे (गुडघ्याजवळ वाघाचे तोंड दिसेल), डोक्यावर असलेला जटा मुकुट, पाठीमागे कोरलेली प्रभावळ किंवा वलय हे त्याच्या दैवत्वाचा पुरावा देतात.
लिंगपुराण, शिवपुराण, इत्यादी पुराणांमध्ये शंकराच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. वेदांमध्ये छोट्या प्रमाणात दिसणारा रुद्र ते पौराणिक कालखंडात प्रमुख देव म्हणून दिसणारा शिव हा प्रवास खरंच अद्भुत आहे.

मूर्ती - केवल शिव, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, मुंबई

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर 

9960936474


आता संहारमूर्तीपैकीच एक असलेल्या शिवाच्या भैरवरूपाबाबत आपण पाहू.

१२. भैरव

भैरव हे शंकराचे पूर्ण रूप होय. तो सर्व जगाचे भरण करतो आणि रूपाने भीषण आहे म्हणूनच ह्या रूपाला भैरवरूप असे म्हणतात. भैरवमूर्ती महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आढळतात. साक्षात यमरूपी काळही त्याला घाबरून असतो म्हणून त्याला काळभैरव असेही संबोधले जाते.
बटबटीत डोळे, ओठांतून बाहेर पडणारे दात, गळ्यात नरमुंडमाला, त्रिशुळावर किंवा हातात नरमुंड लटकावलेले, नरमुंडातील गळणारे रक्त चाटणारे एक किंवा अधिक कुत्रे (भैरवाचे वाहन्ही कुत्राच आहे), सर्परूपी दागिने ही भैरवाची प्रमुख वैशिष्ट्ये. भैरवमूर्ती बरेचदा नग्नावस्थेतही दाखवलेल्या असतात.

भैरवाबाबतची कथा अशी-
ब्रह्मदेवाने रूद्र उत्पन्न केला आणि त्याला कपालि या नावाने संबोधून पृथ्वीचे रक्षण कराण्यास सांगितले. या नावामुळे स्वतःचा अपमान झाल्याचे वाटून रूद्राने आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाने ब्रह्माचे पाचवे मस्तक तोडून त्याला चतुर्मख केला. तथापि ते मस्तक त्याच्या हाताला चिकटून राहिले. ह्यापासून मुक्त होण्यासाठी ब्रह्मदेवाने त्याला १० वर्षे कापालिक व्रत करण्यास सांगितले. रूद्राने केसाचे जानवे आणि अस्थींचा हार घातला. जटामुकुटावर नरमुंड ठेवले व हातात रक्ताने भरलेले कपाल घेऊन तीर्थाटन केले व काशीस त्याच्या अंगठ्यास चिकटलेले मस्तक गळून तो मुक्त झाला.
शंकराच्या ह्या रूपालाच भैरवरूप म्हटले जाते.

भैरवमूर्तींचे असंख्य प्रकार आहेत. कोकणात आढळणार्‍या वेताळ मूर्ती म्हणजे असितांग भैरवाचाच एक प्रकार.
सामान्य, क्षेत्रपाल, चंड, स्वच्छंद, स्वणाकर्षण, आसितांग्, बटुक, कापाल, भीषण, घोर असे भैरवाचे विविध प्रकार.

वेरूळ येथील लेणी क्र. २१ येथील असितांग भैरव.
a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या बाह्यभिंतीवर कोरलेली भैरवमूर्ती.
a

खिद्रापूर येथीलच गजारूढ भैरव
a

गोंदेश्वर मंदिर, सिन्नर येथील भैरवमूर्ती
a

भुलेश्वर मंदिर, पुणे येथील उजवीकडील दोन भैरवमूर्ती

a

पूरच्या कुकडेश्वर मंदिरावरील भैरव प्रतिमा

a

रांजणगावाजवळील पिंपरी दुमाला येथील दुर्लक्षित मंदिराच्या बाह्यभागावरील ही भैरव प्रतिमा

a

पेडगाव येथील अप्रतिम शिल्पकेलेने समृद्ध असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाह्यभिंतीवरील भैरव मूर्ती
a

भैरव प्रतिमा पाहून झाल्यावर मी आता इशाण प्रतिमांकडे वळून लेखाचा समारोप करतो.

१३. इशण

हा अष्टदिक्पालांपैकी एक. इंद्र, अग्नी, वायु, वरूण, कुबेर, यम, निऋती आणि इशान्य दिशेचा पालन करणारा हा लोकपाल म्हणजे इशण अथवा इषान. हे शिवाचेच एक रूप. ह्याची लक्षणे सर्वसामान्यपणे शंकराचीच असतात. म्हणजे त्रिशुळ, डमरू वगैरे.

पेडगाव येथील अप्रतिम शिल्पकेलेने समृद्ध असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाह्यभिंतीवरील ही इशण मूर्ती
a

टोके गाव, प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर मंदिरातील विष्णू उपमंदिरावरील ही इशण मूर्ती
a

आतापर्यंत आपण काही प्रकारची शिवलिंगे तर बर्‍याच प्रकारच्या शिवप्रतिमा पाहिल्या. यातले बरेचसे प्रकार उदा. दक्षिणामूर्ती, भिक्षाटनमूर्ती, चंद्रशेखरमूर्ती, गंगाधरमूर्ती, वीरभद्र आदिंची छायाचित्रे माझ्याजवळ नसल्याने इथे द्यायच्या राहून गेल्यात. जर कुणाजवळ तशा मूर्तीची छायाचित्रे अथवा वर्णन असेल तर ते येथे अवश्य द्यावेत.

पुढेमागे क्वचित विष्णू, दिक्पाल, मातृका यांवरही लिहिण्याचा विचार आहे. बघू कधी आणि कसे जमते ते.

लकुलिश, भैरव, एकपाद अज आणि बाकी तीनचार फॉर्म हे एकदम वेगळे वाटले. सहस्रलिंग व कोटिलिंग हे जबरीच आहे. शिल्पांबद्दल म्हणायचे तर वेरूळची शिल्पे सर्वांत जबराट वाटली.

हा फोटो मी बागडोगराला असलेल्या BSF च्या वसाहतीमध्ये असलेल्या मंदिरातून घेतला आहे. हे मंदिर जनतेसाठीपण खुले आहे. मंदिराच्या परिसरातून पाय हलत नव्हता. इतका छान निसर्ग की........................ बस्स........!!!

इतकी शांतता की............. फक्त शांततेचाच आवाज येत होता.

बाप्पा, आईबाबांच्या मांडीवर न बसता पुढ्यात बसले आहेत. आणि बाप्पाच्या पुढ्यात, खड्ड्यामध्ये शिवलिंग आहे....

मित्र विवेक चौधरींनी कांचीपुरमच्या कांची-कामाक्षी मंदिरातील एका खांबावरील दक्षिणामुर्ती शिवांची शिल्पमुद्रेचा फोटो काढला होता तो सादर.

1

दक्षिण भारतात शिवाच्या रुपात ते विविध कला व ज्ञानाचे गुरू मानले जातात. त्यांचे तोंड दक्षिण (यम) दिशेला असून वडाच्या झाडाखाली ते एक पाय मांडीवर घेऊन आसनस्थ आहेत. त्यांच्या सोबत अनेक विषयाचे विचारक व साधक ज्ञान प्राप्तीसाठी दाटीने मिळेल त्या दगडाधोंड्यांवर बसून विचारविनिमय करताना दिसतात. कधी कधी नंदी बाजूला ते निरखनाता दिसतो. उजव्यापायांच्या खाली एका बुटक्या अपस्मार नावाच्या दैत्याला शिवांनी त्याने अज्ञान, संशय व दुर्मतीला पायाने दाबून धरलेले आहे असे मानले जाते. या रूपात शिव चार हाताचे असून एका मागच्या हातात धगधगता अग्नी वा मशाल तर दुसऱ्या हाती जपमाला तर कधी ताडपत्रांची चवड, धरलेली दिसते. काही ठिकाणी ते वीणावादन करताना किंवा वीणा बाजून ठेवलेली असे दिसतात. उजवा हात इथे त्यांनी आपल्या हृदयाला उजव्या बाजूला असल्याचा संकेत करताना दिसतो.
7

या चित्रात उजवा खालचा हात कर्तरिमुद्रेत तर डावा वरदमुद्रेत दिसतो. कर्तरी मुद्रा ज्ञान मुद्रेसमान असावी. पैकी तीन उघडलेली बोटे गर्व, दुष्कृत्य व स्वतः बद्दलची भ्रामक वा आभासी समजूत यांच्यापासून दूर अंगठा म्हणजे शिवतत्व आणि तर्जनी म्हणजे जीव तत्व यांचे एकत्र येणे असे मानले जाते.

9

या मंदिरातील आणखी एक मुर्ती श्वानवाहन कालभैरवाची आहे. यावर आणखी प्रकाश टाकला जावा ही विनंती.

भारतीय मूर्तीशास्त्र हे डॉ. नी. पु. जोशींचे पुस्तक सुरेख आहे पण अतिशय संक्षिप्त माहिती आहे.
दक्षिणामूर्ती शिवाचे वर्णन खासच. ही अशी एक मूर्ती बहुधा वेरूळ येथे आहे. पण माझ्या नजरेतून मात्र निसटली.
शेवटची मूर्ती पण जबरी. मस्तकी अग्नीज्वाळांसारखे उभे राहिलेले केस हे पण भैरवाचे एक लक्षण आहे.

लिंग,, रूद्र, शिव हा बराच मोठा विषय असून ह्याच्या फारश्या खोलात न जाता आपण आता शिवलिंगे आणि शिवमूर्तींचे मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने काही प्रकार बघूयात.

या वाक्यासाठी टाळ्या. लेख मुद्देसूद कसा लिहावा आणि होणारी पुढील चर्चा अपेक्षित चौकटीत कशी राहील याचा एक उत्तम आदर्श म्हणता येईल असे हे वाक्य आहे. !

पण लिंगपूजेविषयी वेदांमध्ये (किमान ऋग्वेदात) माहिती नाहिये. कारण तू म्हणतो तसे काळाच्या ओघात रुद्राचे पुढे शिवात रुपांतर केले गेले. पण रुद्र ही अनार्य देवता माझ्यामते नव्हती. कारण ऋग्वेदांत रुद्राचे उल्लेख आहेत त्यावरुन ती वैदिक देवता आहे हे मान्य करण्यास हरकत नसावी. अर्थात ऋग्वेदांत वेळोवेळी भर पडलेली आहे. रुद्राचा उल्लेख नंतर जोडला गेला आहे किंवा कसे याबद्दल मात्र मला कल्पना नाही. ही बाब अभ्यासकांवर सोडूयात.

३. दिक्पालरूपी शिवलिंग.
यामध्ये तू निदर्शित आणून दिलेल्या चिन्हांमुळेच हे शिवलिंग दिक्पालांचे आहे हे सिद्ध होते. तुझा तर्क योग्यच आहे.

सहस्त्र व कोटी लिंगेही आवडलीत. हजार पेक्षा जास्त अयोनिज लिंगाला कोटीलिंग म्हणणे सयुक्तीक ठरते कारण प्रत्यक्ष १ कोटी अयोनिज लिंगे कोरणे कारागिरांच्या वेळेचा अपव्यय आणि अशक्य"कोटी"तही आहे.

मूर्तींकडे वळताच पहिल्या ६ मूर्त्या पाहून एक क्षण माझ्या आवडत्या नटराजाचा विसर पडला होता. प्रत्येक लिंग व मूर्तीच्या ओघाने दिलेली माहिती सुंदर आहे. शेवटी आधीच्या वेरुळ मालिकेत पाहिलेला माझा आवडता नटराज ७ क्रमांकावर दिसला आणि अधिकच आनंद झाला.
शिवाने नुसते १०८ मुद्रांमध्ये नृत्य केले अशी मान्यताच नाही तर शिवाला नृत्यकलेचा उद्गाताही मानले जाते. शास्त्रशुद्ध पद्धतीने नृत्य शिकण्यासाठी शिवाची आराधना त्यासाठीच केली जाते. मलाही ही माहिती सुदैवाने अलिकडेच वाचल्यामुळे कळाली.

१०.१ रावणानुग्रहशिवमूर्ती च्या ओघाने आलेली कथा ज्ञानात छान भर टाकते आहेच शिवाय मूर्तिचे विश्लेषणही चित्तवेधक आहे.

संहारमूर्ती नावाप्रमाणेच साजेश्या आहेत. त्यातली अंधकासुरवधाची संहारमूर्ति तुझ्या वेरुळच्या लेखात आधी पाहिली होती. ती खरोखर संहारक दिसते.

भैरवावर संक्षेपाने पण नेमकी माहिती तू दिली आहेस.
अधिक माहितीसाठी - भैरवावर रा.चिं.ढेरे यांनी लज्जागौरी ग्रंथात बरेच सुंदरपणे सांगितले आहे. मातृकांवरही त्यातच विपुल लेखन आहे. ते तू वाचले असशीलच. पण पुढील लेखनासाठी संदर्भ तपासून बघण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.

दिक्पालांवर तुझ्या लेखाची मात्र प्रतिक्षा करतो आहे. दिक् पाल तू आधी लिही असा आग्रह करु इच्छितो. कारण दिक् पालांचे दिशांवर नियंत्रण असल्याकारणाने वैज्ञानिक भूमिकेतूनही या दिक् पालांचे महत्त्व आहेच. पण मूर्तीविज्ञानात त्याची दखल तू कशी घेतोस याची उत्सुकता आहे :)

शिव म्हणा, रुद्र म्हणा कि आणखी काहि. आर्य, अनार्य, द्रविड, वैदीक वगैरे संस्कृतींचे पडसाद त्या त्या काळच्या मुर्तीशास्त्रात आढळतात. पण हि मंदीरे आणि मुर्त्या केवळ काहि कथाबीजांवर आधारीत असतात का? कि त्या प्रदेशाचा राजा, मुर्तीकाराला अभिप्रेत भाव, अ‍ॅक्च्युअल स्थापत्य करणार्‍यांच्या सोयी-एक्स्पर्टीज-मर्यादा, उपलब्ध साधनं, जसं पाषाण वगैरे घटक कंसीडर केल्या जात असतील? सर्वात महत्वाचं म्हणजे प्राचीक काळापासुन अनेक प्रकारच्या उपासना पद्धतींच्या अनाकलनीय प्रॅक्टीस प्राचारात होत्या व आहेत. जर हि मंदीरं त्या विशिष्ट उपासनेकरता बनविली जात असतील, किंवा उपलब्ध मंदीरात एखादी उपासना सुरु करण्यात येत असेल तर त्या मुर्ती किंवा मंदीराच्या रचना व आवार त्या उपासनेला अनुकुल बनवण्यात येत असावं काय? अशी कुठली सिग्नेचर व्यवस्था दिसुन येते का? केवळ मातृभाव, प्रजजन गौरव किंवा शौर्य कौतुक करायला म्हणुन हि मंदीरं बांधण्यात आलि असं वाटत नाहि. व्हॉट माइट बी द अदर साईड?

ह्या मूर्ती शक्यतो ग्रांथिक वर्णनांवर आधारीत असतात. काही मूर्ती चक्क वेदांतील उल्लेखाबरहूकूम बनवलेल्या आहेत. उदा. पाटेश्वरातील अग्नी वृषाची अतिशय दुर्मिळ मूर्ती. पुराणांत, रामायण, महाभारत आदी महाकाव्यांत बरीच वर्णने आली आहेत. त्यानुसारही मूर्टी घडवल्या जातात. अर्थात प्रत्यक्ष पूजेच्या मूर्ती शक्यतो साध्या असून मंदिरांच्या अथवा लेण्यांच्या बाह्यभितींवर पुराणातले प्रसंग कोरलेले आढळतात.
मूर्ती कोरण्याच्या बाबतीत परंपरांचे दोन प्रकारे पालन केलेले आढळते जसे पहिला प्रकार म्हणजे विष्णू, ब्रह्मा, शिव, स्कंद किंवा इतरही बर्‍याच देवता. यांची लक्षणे सर्व ठिकाणी सारखीच आढळतात. उदा. शिवाच्या हाती त्रिशूळ - डमरू, विष्णूच्या हाती शंख-चक्र. ही परिस्थिती सहसा कुठेच बदलत नाहीच.
तर दुसरा प्रकार म्हणजे लेणी-मंदिरे कोरण्याच्या कलेतील बदल. माझ्या मते भारतात बौद्द लेण्यांपासून प्रेरणा घेण्यात आली. काळानुसार शैलीत बदल दिसत असला तरी मूळ गाभा एकच असल्याचे दिसते.

वेगवेगळ्या राजवटींमध्ये मूर्ती कोरण्यात फरक असला तरी मूळ मूर्तीची लक्षणे तीच असल्याचे दिसते. राष्ट्रकूट कला ही सहसा द्राविड पद्धतीची दिसते साहजिकच त्यांनी ऐहोळे, पट्टदकल, महाबलीपुरम इत्यादी प्राचीन मंदिरांच्या शैलीवरून प्रेरणा घेतल्याचे दिसते. तर होयसाळांनी मूळ गाभा तोच ठेवून मूर्ती अतिशय सालंकृत करून नवीनच होयसाळ शैली निर्माण केली जी आज होयसाळ स्कूल म्हणून ओळखली जाते. अर्थात ह्यात तिकडच्या ग्रेनाईट दगडाचा पण तितकाच महत्वाचा वाटा.

सहासा ही मंदिरे सर्वसाधारण उपासनेसाठी बनवली जात असावेत. प्रसंग कोरण्याचा सर्वात मोठा हेतू मला असा वाटतो म्हणजे त्याकाळी बौद्ध धर्माच्या वाढत्या प्रसारामुळे मूळ वैदिक धर्मापासून दूर जाणार्‍या जनतेला परत आपल्या धर्माकडे वळवून घेणे. अर्थात त्याचा बौद्ध धर्मावर प्रतिकूल परिणाम झालाच. वेरूळसारख्या तिभव्य लेण्याच्या निर्मितीनंतर अजिंठा जवळजवळ विस्मृतीत गेले.
माझ्या मते तरी धर्मप्रसारासाठीच आणि त्यानंतर वेगवेगळ्या राजवटींशी असलेल्या स्पर्धेतून देखणी मंदिरे उभारली गेली. उपासना हा हेतू बहुधा गौणच होता.
अर्थात हिंदूंमध्ये तेव्हाही तंत्र उपासना चालत होतीच पण सहसा यासाठी जनतेपासून फटकून असणार्‍या, एकाकी, निर्जन जागांचा उपयोग केला गेला. उदा: पाटेश्वर.


वेगवेगळ्या प्रदेशांतील मूर्तींचे चेहरे पहाताना त्या त्या प्रदेशातील लोकांच्या चेहरेपट्टीशी ते मिळतेजुळते वाटतात. उदा.राणीवाव या लेखांतल्या स्त्रीमूर्ती या पातळ ओठांच्या आणि सडपातळ बाहू-दंड-मांड्यादि अवयवांच्या वाटतात. जैनांच्या महावीरमूर्तीचे ओठ हे अगदी वेगळे असतात. म्हणजे वरच्या ओठाच्या दोन पाकळ्या अर्धगोलाकार वरती वळलेल्या वगैरे. वेगवेगळ्या देशांतील बुद्धप्रतिमा पहातानाही असेच वाटते. दक्षिण भारतातील स्त्रीमूर्ती अतिसौष्ठवपूर्ण आणि धष्टपुष्ट वाटतात. हा माझा दृष्टिभ्रम आहे की खरेच असे काही असू शकते?
चित्रकलेतही वेगळ्या वंशाच्या लोकांनी काढलेली भारतीयांची चित्रे वेगळी म्हणून ओळखू येतात. अपरे आणि पातळ नाक, गोलसर (आपल्याकडले मीन, हरिण वगैरेसारखे लांबट असतात) डोळे ,लांब मान, उतरता आणि विस्तृत स्कंधप्रदेश असा थोडा वेगळेपणा दिसतो. असो. मूर्तिशास्त्राचा काहीच अभ्यास नाही तेव्हा इथेच थांबावे हे बरे.

अर्थात त्याकाळी लिंग पूजा ही शिव अथवा रूद्र देवतेची नसून ती होती प्रजनन शक्तीची. निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या चमत्काराचे प्रतिक म्हणून स्त्रीशक्तीची उपासना योनीपूजेच्या स्वरूपात तर पुरुष शक्तीची उपासना लिंग स्वरूपात करण्यास प्रारंभ झाला असे म्हणता यावे.

कमाल असते नाही अशा योगायोगांची ? विचक्राफ्ट संबंधि सर्व मुळ माहितिस्त्रोतात ते फक्त निसर्गधर्म/शक्ति/देवता मानतात व त्यात पुरुषाला होर्न(शिंग असलेला) गॉड ऑफ हंटिग अन स्त्रिला गॉडेस ऑफ फर्टिलिटी मानुन पुजा/विधी करतात.


आंध्रप्रदेशात गुडिमल्लम इथे इसापूर्व ३ शतकातील एक शिव मंदिर आहे. तिथे असलेली ही अनोखी मुर्ती. (फोटो विकिवरून साभार)

gudimallam




Simple, Free Image and File Hosting at MediaFire
वर हत्तेचे शेपूट दिसत आहे तर फाडलेल्या हत्तेचे तोंड खाली. कापलेला असल्यामुळे चार बाजूला चार पाय व हाताने त्याचे कातडे सावरलेले दिसत आहे....

सर्व मूर्ती सहाव्या शतकांनतरच्या आहेत . आठव्या शतकांनतरच्या मूर्ती फार आखीव रेखीव होऊ लागल्या (=सुबक ?)आणि भाव लोप पावले .

गंडकी नदीतल्या काळ्या शाळीग्रामाचा वापर थोडा नंतर सुरू झाल्यावर काही ठिकाणची लिंगे नंतर बदलण्यात आली असावीत .

परकी आक्रमणांत लिंगे फोडली गेल्यावर तेथे नवीन न बसवता "गुप्तलिंग " म्हणू लागले असावेत .(भिमाशंकर ?)

परकी आक्रमणांत लिंगे फोडली गेल्यावर तेथे नवीन न बसवता "गुप्तलिंग " म्हणू लागले असावेत .(भिमाशंकर ?)

सहमत. आज जिथे लिंग दिसत नाही ती बहुतांश मूर्तीभञ्जकांनी भग्न केलेली आहेत. काही मोरीच्या वाटेवर तर काही विहिरीतून पाणी शेंदताना उभे राहण्याच्या जागी बसवली गेलेली.

असेच एक सासवडच्या चांगावटेश्वर मंदिरातील भग्न शिवलिंग. धडधडीतपणे फोडून काढल्याचे दिसत असूनही हे शिवलिंग गुप्त आहे असे तिथल्याच एका फलकावर लिहिलेले आहे.

a


आताचे शिवाचे स्वरूप हे आर्यांचा रुद्र आणि द्रविडांचा लिंगरूप शिव यांचे एकत्रिकरण असावे असेच दिसते. त्यामुळेच शिवाची उपासना सर्वात व्यापक प्रदेशात होते. नेपाळातील पशुपतीनाथापासून ते थेट रामेश्वरपर्यंत.

सिंधु संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या महत्त्वाच्या गोष्टींमधे पशुपतीस्वरूप त्रिमुखी देवतेचे शिल्प आणि लिंगसदृश शिल्प आहे.

http://www.hindunet.org/hindu_history/sarasvati/html/Trefoil1.htm

http://en.wikipedia.org/wiki/Indus_Valley_Civilization

https://sites.google.com/site/kalyan972/culturallegacy

http://lafinefleurduyoga.over-blog.com/article-16057840.html

इथे त्यांची छायाचित्रे पाहता येतील. अर्थात हा आताच्या स्वरूपातील शिव नाही तर अगदी प्राथमिक काळातील शिवसदृश देवता (पशुपती) आणि आदिम रहिवाशांची लिंगपूजा असावी.

शिवमूर्तींबाबत पं महादेवशास्त्री जोशी यांच्या 'भारताची मूर्तीकला' या पुस्तकात रुद्र हा अग्नितत्त्वापासून उत्पन्न झाला असे वेदातील उल्लेख आणि सिंधुसंस्कृतीतील पशुपती आणि लिंग या शिल्पांबद्दल उल्लेख देऊन पुढे या दोन्हीचे एकत्रित रूप म्हणजे आजचे शिवाचे स्वरूप यबद्दल विस्ताराने लिहिले आहे. या पुस्तकात शिवाच्या मूर्तीबद्दल पं. जोशी म्हणतात, " शाळुंका ही पार्वतीस्वरूप तर शिवलिंग हा महेश्वर. शाळुंकेसहित लिंगाची पूजा केल्याने दोन्हीची पूजा केल्यासारखे होते. शाळुंका कशी निर्माण करावी? शाळुंकेच्या घेराचे ३ प्रकारे आहेत. लिंगाच्या घेराच्या तिप्पट तो अधम, दीडपट तो मध्यम तर चौपट तो उत्तम. शाळुंकेची उंची विष्णुभागाइतकी असावी, तिचा आकार चतुष्कोण, द्वादशकोण, षोडषकोण किंवा गोल असावा. अभिषेक हा शिवलिंगाचा मुख्य उपचार असल्याने शाळुंकेला पन्हळ ठेवणे आवश्यक आहे. शिवलिंग शाळुंकेत स्थापन करताना त्याचे ब्रह्मभाग व विष्णुभाग हे भूमीत जायला हवेत. रुद्रभाग तेवढाच वर असावा."

मूर्तींच्या प्रकारात पं जोशी दक्षिणामूर्ती असा एक प्रकार देतात. तो बुद्धी देणारा आणि सामान्य मानवरूपात दाखवला जातो. आणखी एक प्रकार म्हणजे अर्धनारीश्वर. मूळ लिंग आणि शाळुंका या स्वरूपातील शिवाची मूर्ती बनवायला सुरुवात झाली तेव्हाचे रूप म्हणजे एकाच मूर्तीत सामावलेले शिव आणि पार्वेती.

"नंदी, गणेश, स्कंद, भैरव, पार्वती (दुर्गा) हे शिवाच्या परिवारातील देव आणि त्यांच्या मूर्ती शिवाच्या मूर्तीबरोबर किंवा वेगळ्या बघायला मिळतात."

गोवा आणि कोकणात शिवगणांमधे वेताळ आणि अन्य स्थानिक राखणदार समजले गेलेल्या देवांचा समावेश होतो.

betal

हा लोलये येथील बेताळ.

ling1

ling2

ling3

ही हरवळे (साखळी) येथील गुहांतील वैशिष्ट्यपूर्ण आकाराची शिवलिंगे. यांच्याबद्दल जास्त माहिती मिळू शकली नाही पण कदाचित ती तांत्रिक पूजेशी संबंधित असू शकतील असे वाटते.


सविस्तर प्रतिसाद आणि त्यातील दुवे आणि छायाचित्रांबद्दल धन्स.

गुहेतील शिवलिंगे अगदी आदिम काळातील म्हणजे दिसतात. ह्यांचा काळ नक्की कोणता ते माहित करून घ्यायला आवडेल. पण तांत्रिक पंथातील वाटत नाही. ही शिवलिंगांच्या प्राथमिक अवस्थेतील दिसतात. पुरुष शिश्नाचा आकार असलेली. बहुधा २००० वर्षे जुनी.

पं. महादेवशास्त्री जोशी यांचे भारताची मूर्तीकला हे पुस्तक नक्कीच विकत घेईन.

एकाच्या म्हणण्याप्रमाणे बहुतेक चौथ्या शतकातल्या मानवनिर्मित गुहा असाव्यात. हे फार जुने ठिकाण आहे. इथे एक जुनी जैन बस्ती आहे तसंच एक बुद्धप्रतिमाही सापडली होती.

साधारण अशा आकाराची लिंगे घारापुरी बेटावर आणि ख्मेर अंगकोरवट इथे मिळाल्याचे उल्लेख सापडले. तर खरोखरच तिथे तशा अकाराची चित्रं पहायला मिळाली.

http://blogs.bootsnall.com/theglobaltrip/updates/005873.shtml

http://en.wikipedia.org/wiki/Khmer_architecture

शिवप्रभाव मुर्ती, लिंग, नाणी आणि लोककथा यांच्या रुपांत पामिरचे पठार (आत्ताचे ताजिकिस्तान, किर्घिजिस्तान, अफगाणिस्तान आणि हिंदुकुश पर्वतराजी आणि तिच्या आजूबाजूचा प्रदेश), भारत, ब्रम्हदेश ते इंडोनेशियासह दक्षिणपूर्व आशियात अगदी व्हिएतनामपर्यंत सापडतो.


शिवप्रभाव मुर्ती, लिंग, नाणी आणि लोककथा यांच्या रुपांत पामिरचे पठार (आत्ताचे ताजिकिस्तान, किर्घिजिस्तान, अफगाणिस्तान आणि हिंदुकुश पर्वतराजी आणि तिच्या आजूबाजूचा प्रदेश), भारत, ब्रम्हदेश ते इंडोनेशियासह दक्षिणपूर्व आशियात अगदी व्हिएतनामपर्यंत सापडतो.

परकी आक्रमणांत लिंगे फोडली गेल्यावर तेथे नवीन न बसवता "गुप्तलिंग " म्हणू लागले असावेत .(भिमाशंकर ?)

सहमत. आज जिथे लिंग दिसत नाही ती बहुतांश मूर्तीभञ्जकांनी भग्न केलेली आहेत. काही मोरीच्या वाटेवर तर काही विहिरीतून पाणी शेंदताना उभे राहण्याच्या जागी बसवली गेलेली.

असेच एक सासवडच्या चांगावटेश्वर मंदिरातील भग्न शिवलिंग. धडधडीतपणे फोडून काढल्याचे दिसत असूनही हे शिवलिंग गुप्त आहे असे तिथल्याच एका फलकावर लिहिलेले आहे.

a


एक "भैरव" अनेक वर्षापूर्वी नेपाळमध्ये पाहिला होता. या भैरवाला अल्कोहोलचा नैवेद्य आवडतो. माझ्याकडील स्थिरचित्रात याचे चित्र आहे ते जोडत आहे "नैवेद्य" मूर्तिवर दिसत असलेल्या छिद्रात टाकायचा असतो असे आठवते.

bhairav
पण योग्य चित्र निवडल्याची खात्री नसल्याने पट्कन सापडलेला एक दुवा देखील जोडत आहे.

http://brookstonbeerbulletin.com/beer-in-art-45-the-hindu-god-shiva-as-b...


क प्रष्ण आहे की शिवलिंगाचे श्रुंग हे उत्तर दिशा दर्शवते किंवा उत्तरेकडे असते हे खरे आहे का? 

होय, शाळुंकेची वहाण उत्तरेकडे असावी अश्या तर्‍हेने शिवलिंग स्थापलेले असते.

दिशेबद्दल माहिती नाही.
पण शिवलिंगाची पन्हळ (शाळुंकेचा लांबट भाग) हा साधकाच्या उजवीकडे असावा असा संकेत आहे.

पाटेश्वरची शाक्तपंथीय शिवलिंगे ह्या संकेताला छेद देतात.

a--a

पण कदाचित श्रुन्ग हे उत्तर दिशेला ठेव्ण्याच्या पद्धती साठी सुद्धा असु शकेल? हे दिशादर्शकाचा वापर करुन ठरवता येवु शकेल.

बहुतेक वेळा शिवमंदीरात जाताना शिवपिंडीचे दर्शन घ्यायला पायर्‍या उतरून खाली जावे का लागत असावे? कोकणातील बिमलेश्वर सारख्या मंदिराचे एखाद दुसरा अपवाद वगळता हेच सगळीकडे दिसून येते..

प्रॅक्टिकल शक्यता अशी की शिवलिंगावर अभिषेक सतत सुरू असतो. त्यातील इकडे तिकडे उडालेले पाणी गाभार्‍यातच रहावे आणि त्या पाण्याने सगळे देऊळ ओले/निसरडे होऊ नये यासाठी कदाचित अशी रचना करत असावेत.

तसेच एक अजुन पाहिले आहे की शिव मंदीराला लागुनच पाण्याचा स्त्रोत किंवा तलाव असतो...पूर्वीच्या काळी ओलेत्यानेच महादेवाची पुजा / दर्शन करावे असा प्रघात असावा असे मला वाटते. { हा माझा फक्त अंदाज आहे.}

शिवमंदिरांमधील शिवपिंडी ह्या सभामंडपाच्या पातळीतच आहेत.
कोल्हापुरच्या अंबाबाईच्या मंदिरातील शिवमंदीर हे तर एक माळा वर आहे.


उज्जैन जवळही एक भेरवनाथाचे मंदीर आहे.त्यालाही दारुचाच "भोग" चढवतात.आमचे कुलदैवत असलेल्या कर्‍हाडजवळील भैरोबाला पुर्वी गांजाची चिलीम भरुन नेवैद्य दाखवायचे असे आमचे सासरकडच्या वडीलधार्‍यांनी सांगीतलेले पुसटसे स्मरते आहे.

कुडाळ मधिल मुर्तींना अजुनही गांजाचा नैवद्य लागतो माहितेय पण कराडमधील कोणतं मंदिर कळेल का ???

बदामिच्या गुंफेंत आणि परिसरां त छान लिंगे आणि साडेसहाफुटी पूर्ण शिवमूर्ती अखंड आहेत .

ऐहोळे गावातील मंदिरातल्या पिंडीवर पाणी टाकले की त्यात नंदीचे प्रतिबिंब दिसते (मोटरच्या आरशात दिसते तसे)




शिव म्हणा, रुद्र म्हणा कि आणखी काहि. आर्य, अनार्य, द्रविड, वैदीक वगैरे संस्कृतींचे पडसाद त्या त्या काळच्या मुर्तीशास्त्रात आढळतात. पण हि मंदीरे आणि मुर्त्या केवळ काहि कथाबीजांवर आधारीत असतात का? कि त्या प्रदेशाचा राजा, मुर्तीकाराला अभिप्रेत भाव, अ‍ॅक्च्युअल स्थापत्य करणार्‍यांच्या सोयी-एक्स्पर्टीज-मर्यादा, उपलब्ध साधनं, जसं पाषाण वगैरे घटक कंसीडर केल्या जात असतील? सर्वात महत्वाचं म्हणजे प्राचीक काळापासुन अनेक प्रकारच्या उपासना पद्धतींच्या अनाकलनीय प्रॅक्टीस प्राचारात होत्या व आहेत. जर हि मंदीरं त्या विशिष्ट उपासनेकरता बनविली जात असतील, किंवा उपलब्ध मंदीरात एखादी उपासना सुरु करण्यात येत असेल तर त्या मुर्ती किंवा मंदीराच्या रचना व आवार त्या उपासनेला अनुकुल बनवण्यात येत असावं काय? अशी कुठली सिग्नेचर व्यवस्था दिसुन येते का? केवळ मातृभाव, प्रजजन गौरव किंवा शौर्य कौतुक करायला म्हणुन हि मंदीरं बांधण्यात आलि असं वाटत नाहि. व्हॉट माइट बी द अदर साईड?

ह्या मूर्ती शक्यतो ग्रांथिक वर्णनांवर आधारीत असतात. काही मूर्ती चक्क वेदांतील उल्लेखाबरहूकूम बनवलेल्या आहेत. उदा. पाटेश्वरातील अग्नी वृषाची अतिशय दुर्मिळ मूर्ती. पुराणांत, रामायण, महाभारत आदी महाकाव्यांत बरीच वर्णने आली आहेत. त्यानुसारही मूर्टी घडवल्या जातात. अर्थात प्रत्यक्ष पूजेच्या मूर्ती शक्यतो साध्या असून मंदिरांच्या अथवा लेण्यांच्या बाह्यभितींवर पुराणातले प्रसंग कोरलेले आढळतात.
मूर्ती कोरण्याच्या बाबतीत परंपरांचे दोन प्रकारे पालन केलेले आढळते जसे पहिला प्रकार म्हणजे विष्णू, ब्रह्मा, शिव, स्कंद किंवा इतरही बर्‍याच देवता. यांची लक्षणे सर्व ठिकाणी सारखीच आढळतात. उदा. शिवाच्या हाती त्रिशूळ - डमरू, विष्णूच्या हाती शंख-चक्र. ही परिस्थिती सहसा कुठेच बदलत नाहीच.
तर दुसरा प्रकार म्हणजे लेणी-मंदिरे कोरण्याच्या कलेतील बदल. माझ्या मते भारतात बौद्द लेण्यांपासून प्रेरणा घेण्यात आली. काळानुसार शैलीत बदल दिसत असला तरी मूळ गाभा एकच असल्याचे दिसते.

वेगवेगळ्या राजवटींमध्ये मूर्ती कोरण्यात फरक असला तरी मूळ मूर्तीची लक्षणे तीच असल्याचे दिसते. राष्ट्रकूट कला ही सहसा द्राविड पद्धतीची दिसते साहजिकच त्यांनी ऐहोळे, पट्टदकल, महाबलीपुरम इत्यादी प्राचीन मंदिरांच्या शैलीवरून प्रेरणा घेतल्याचे दिसते. तर होयसाळांनी मूळ गाभा तोच ठेवून मूर्ती अतिशय सालंकृत करून नवीनच होयसाळ शैली निर्माण केली जी आज होयसाळ स्कूल म्हणून ओळखली जाते. अर्थात ह्यात तिकडच्या ग्रेनाईट दगडाचा पण तितकाच महत्वाचा वाटा.

सहासा ही मंदिरे सर्वसाधारण उपासनेसाठी बनवली जात असावेत. प्रसंग कोरण्याचा सर्वात मोठा हेतू मला असा वाटतो म्हणजे त्याकाळी बौद्ध धर्माच्या वाढत्या प्रसारामुळे मूळ वैदिक धर्मापासून दूर जाणार्‍या जनतेला परत आपल्या धर्माकडे वळवून घेणे. अर्थात त्याचा बौद्ध धर्मावर प्रतिकूल परिणाम झालाच. वेरूळसारख्या तिभव्य लेण्याच्या निर्मितीनंतर अजिंठा जवळजवळ विस्मृतीत गेले.
माझ्या मते तरी धर्मप्रसारासाठीच आणि त्यानंतर वेगवेगळ्या राजवटींशी असलेल्या स्पर्धेतून देखणी मंदिरे उभारली गेली. उपासना हा हेतू बहुधा गौणच होता.
अर्थात हिंदूंमध्ये तेव्हाही तंत्र उपासना चालत होतीच पण सहसा यासाठी जनतेपासून फटकून असणार्‍या, एकाकी, निर्जन जागांचा उपयोग केला गेला. उदा: पाटेश्वर.

थोडे धार्ष्ट्य : वेगवेगळ्या प्रदेशांतील मूर्तींचे चेहरे पहाताना त्या त्या प्रदेशातील लोकांच्या चेहरेपट्टीशी ते मिळतेजुळते वाटतात. उदा.राणीवाव या लेखांतल्या स्त्रीमूर्ती या पातळ ओठांच्या आणि सडपातळ बाहू-दंड-मांड्यादि अवयवांच्या वाटतात. जैनांच्या महावीरमूर्तीचे ओठ हे अगदी वेगळे असतात. म्हणजे वरच्या ओठाच्या दोन पाकळ्या अर्धगोलाकार वरती वळलेल्या वगैरे. वेगवेगळ्या देशांतील बुद्धप्रतिमा पहातानाही असेच वाटते. दक्षिण भारतातील स्त्रीमूर्ती अतिसौष्ठवपूर्ण आणि धष्टपुष्ट वाटतात. हा माझा दृष्टिभ्रम आहे की खरेच असे काही असू शकते?
चित्रकलेतही वेगळ्या वंशाच्या लोकांनी काढलेली भारतीयांची चित्रे वेगळी म्हणून ओळखू येतात. अपरे आणि पातळ नाक, गोलसर (आपल्याकडले मीन, हरिण वगैरेसारखे लांबट असतात) डोळे ,लांब मान, उतरता आणि विस्तृत स्कंधप्रदेश असा थोडा वेगळेपणा दिसतो. असो. मूर्तिशास्त्राचा काहीच अभ्यास नाही तेव्हा इथेच थांबावे हे बरे.





नायिका भेद

मध्ययुगीन यादवकालीन मंदिरांमध्ये आपणास सुरसुंदरी आणि नायिकापट्ट आढळतात. सुरसुंदरी म्हणजे नृत्यमुद्रेतील अथवा वाद्यमुद्रेतील स्त्री प्रतिमा. ह्या एकतर विविध वाद्ये तरी वाजवत असतात किंवा नर्तन तरी करत असतात. तर नायिका म्हणजे वाद्यविरहित स्त्री प्रतिमा. ह्या बहुतांशी नृत्यमुद्रेत दिसत नाहीत. नायिका ह्या विविध शृंगारमुद्रेत किंवा काही विशिष्ट क्रिया करताना आपणास आढळतात. उदा. वेणी घालणे, भांग पाडणे, पुत्र सांभाळणे इ. तत्कालीन जनजीवनातील एकूण चालीरितीच ह्या शिल्पांद्वारे प्रकट होतात असे मला वाटते.

खजुराहोची मंदिरे ह्या नायिकापट्टांबाबत परिपूर्ण आहेत असे मी मानतो. येथे जवळपास सर्वच प्रकारच्या नायिकांची शिल्पे शिल्पकारांनी मोठ्या विलक्षण नजाकतीने कोरलेली आहेत. अर्थात खजुराहो मी अजून पाहिलेले नाही. पण पुणे, नाशिक, कोल्हापूर परिसरातील काही प्राचीन मंदिरे धुंडाळतांना विविध प्रकारच्या नायिकामूर्ती पाहण्यात आल्या त्यापैकीच काही येथे मांडत आहे. यांतील बहुतेक सर्वच मूर्ती त्रिभंग प्रकारातल्या आहेत.

१. पुत्रवल्लभा.

ह्या नायिका म्हणजे वात्सल्याच्या मूर्तीच. ह्यांचा हातात अथवा कडेवर ह्यांचा पुत्र दाखवलेला असतो व ह्या ममतेने त्याचे लाड करत असतात.

ही सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील पुत्रवल्लभा. हिने आपल्या तळहातावर पुत्राला तोलून धरले आहे.

a

सिन्नरच्याच गोंदेश्वर मंदिरातील ही अजून एक पुत्रवल्लभा. हीने आपल्या पुत्राला एका हातावर घेतले असून दुसरा हात आधारासाठी चौकटीवर ठेविला आहे.

a

ही रांजणगावजवळील पिंपरी दुमाला नावाच्या लहानशा गावातील सोमेश्वर मंदिराच्या भिंतीवर असलेली पुत्रवल्लभा. हीने दोन्ही हातांनी पुत्राला तोलून धरले असून त्याचे मस्तकाचे ती अवघ्राण करीत आहे.

a

२. पत्रलेखिका.
ह्या नायिका पत्र लेखन करताना दिसतात. ह्यांच्या अत्यंत सुडौल मूर्ती खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात आहेत.

खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातील हे सौष्ठवपूर्ण पत्रलेखिका. नीट निरखून पाहिल्यास हीने अंगंठा आणि तर्जनी यांमध्ये लेखणी हाती धरिली आहे तीही स्पष्टपणे दिसून यावी. हिने चेहरा मात्र पत्राकडेच वळवला असल्याने आपल्याला हिचा चेहरा मात्र दिसत नाही.

a

खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातीलच अजून ही एक पत्रलेखिका. ही मात्र आपल्याला हीचा चेहरा दाखवतेय.

a

कोपेश्वर मंदिरापासून अगदी जवळच असलेल्या खिद्रापूरच्या जैन मंदिरातील ही एक अजून पत्रलेखिका.

a

३. आलस्यसुंदरी.

ही नुकतीच झोपेतून उठलेली असल्याने दोन्ही हात डोक्यावर नेऊन आळोखेपिळोखे देऊन आलेला आळस दूर करायचा प्रयत्न करत असते.

पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिरातील ही आलस्यसुंदरी पहा.

a

४. कर्पूरसुंदरी

ह्या नायिका आपला प्रचंड केशसंभार खांद्यावरून शरीराच्या पुढच्या भागावर घेऊन त्याची वेणी घालायचा प्रयत्न करीत असतात.

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील ही कर्पूरसुंदरी

a

खिद्रापूरच्याच जैन मंदिरातील ही अजून एक कर्पूरसुंदरी.

a

५. दर्पणसुंदरी अथवा दर्पणा.
मध्ययुगीन मंदिरात या नायिकांचे प्रकार बहुधा सर्वात जास्त दिसत असावेत. ह्यांच्या हातात बहिर्वक्र आरसा असतो. तत्कालिन कालखंडात काचेचे आरसे नसल्याने शिसे गुळगुळीत दगड घासून घासून गुळगुळीत केले जात आणि जास्तीत जास्त दृश्य दिसावे म्हणून हे आरसे बहिर्वक्र केले जात. ह्या नायिका आरशात बघून त्या भांग पाडणे, शृंगार करणे, कुंकूम रेखाटणे इत्यादी क्रिया करीत असतात.

पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर मंदिरातील ही दर्पण सुंदरी
आरशात बघून आपल्या डोईवरचे केस ही नीट निरखून सजविते आहे.

a

सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील ही एक दर्पणा.

a

गोंदेश्वरातीलच अजून ही एक दर्पणा.

a

खिद्रापूरच्या जैन मंदिरातील ही अजून एक दर्पणसुंदरी.

a

भुलेश्वरातील ही एक दर्पणा

a

हे शिल्प माझ्या सर्वाधिक आवडीचे. किती निगुतीने ही आपले सौंदर्यप्रसाधन करीत आहे. हे ही शिल्प भुलेश्वर मंदिरातलेच.

a

६.
ह्या प्रकाराला नक्की काय म्हणतात ते मला माहित नाही. पण ही शिल्पे फार मजेशीर आहेत. आपला साजशृंगार आटोपून आपल्या प्रियकराची वाट बघणार्‍या अथवा त्याच्या भेटीसाठी निघालेल्या ह्या सुंदरी. ह्या नखशिखांत आवरून तयार असतानाच एखादे चावट मर्कट ह्यांचे वस्त्र अलगद वर उचलून अथवा ओढून ह्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि ह्या नायिका पणे सलज्जतेने त्यांना चापट मारतांना आढळतात. मनुष्याचा चावटपणाच ह्या मर्कटांच्या रूपाने येथे चित्रित केलाय की काय न कळे.

पिंपरी दुमाला येथील ही नायिका. एक मर्कट तिला त्रास देत असून ती एका हाताने माकडाला दूर करण्याचा प्रयत्न करीत असून दुसरा हात चापट देण्याच्या आविर्भावात तिने वर उचलला आहे.

a

ही खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातील अत्यंत देखणी सुंदरी मर्कटला कसे हाकलीत आहे पहा.

a

ही खिद्रापूरच्या जैन मंदिरातील दोन नायिका. दोहींचेही वस्त्र मर्कटाने उचलले असून सुंदरी चपेटदान आविर्भावात आहेत.

a--a

ही सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील सुंदरी. हिला दोन्ही बाजूंनी दोन मर्कटे छळत आहेत.

a

७.
हा अजून एक वेगळा प्रकार.
हा स्त्रीचे सामर्थ्य दाखवणारा. हीने आपल्या एका हातात मुंगूस तर दुसर्‍या हातात साप धरीला असून त्या दोघांनाही ही झुंजवत आहे. जणू माझी तुमच्यावर पूर्ण हुकूमत आहे असेच ती दर्शवीत आहे.

खिद्रापूरच्या जैन मंदिरातील ही तशा प्रकारची प्रतिमा.

a

८.
हा सुद्धा एक वेगळाच प्रकार.
ह्या नायिकेच्या पायात रूतलेला काटा हीची बुटकी सखी दूर करीत आहे किंवा हीचे पैंजण ती नीट बांधत आहे.
पेडगावच्या मंदिरातील हे शिल्प

a

सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील अशाच प्रकारची ही एक नायिका.

a

९. शुकसारिका.

हा शिल्पाचा प्रकार अतिशय दुर्मिळ. हा मला फक्त पेडगावच्या मंदिरात बघायला मिळाला. भुलेश्वर मंदिरात शुकसारिका नक्कीच असावी मात्र तिकडील शिल्पे मूर्तीभंजकांच्या तडाख्यात सापडून प्रचंड प्रमाणात भग्न झालेली असल्याने ओळखू येत नाहीत.
ह्या प्रकारच्या शिल्पात नायिकेने एका हातात आंबे असलेली डहाळी पकडली असते तर दुसर्‍या हातात पोपट असतो.

पेडगावच्या मंदिरातील ही शुकसारिका बघा.
हीने आपल्या डाव्या हातात आंब्याची डहाळी पकडलेली असून उजव्या हातात पोपट आहे. तो पोपट तिच्या भरीव उरोजालाच आंबे समजून त्यांना आपल्या चोचीने स्पर्श करू पाहात आहे. अर्थात मूर्तीभंजकांच्या हल्ल्यांमुळे हीचा उजवा हात त्यावरील शुकासह भग्न झालेला असून आपल्याला केवळ तिच्या हातातील आंब्याच्या डहाळीमुळे व उजव्या हाताच्या स्थितीवरून ही शुकसारिका असल्याची कल्पना येते.

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील ही शुकसारिका

a

१०. विषकन्या.

तत्कालीन कालखंडात शत्रूला संपवण्यासाठी विषकन्यांचा सर्रास वापर होईल. शत्रूला आपल्या सौंदर्याने भुलवून विषप्रयोगाद्वारे ह्या त्याचा मृत्यू घडवून आणत.

शिल्पांमधले ह्यांचे चित्रण सहजी ओळखता येते. अतिशय सुंदर, सुडौल, पूर्णतया नग्न, मस्तकी अथवा गुढघ्यावर सर्पांचा वेढा ही यांची प्रमुख लक्षणे. काही वेळा ह्यांच्या पायांत पादत्राणे सुद्धा आढळून येतात.

पिंपरी दुमाला मधील ही विषकन्या. हिने आपल्या मस्तकी काहीतरी धरीले असून पायांत सर्पांचा वेढा आहे.

a

भुलेश्वर मंदिराच्या बाह्यभिंतीवरील ही विषकन्या पाहा. हीने आपल्या मस्तकी सर्प धारण केला आहे.

a

सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील ही विषकन्या. हीने आपल्या खांद्यावरून सर्प धारण केला असून ही आपले विभ्रम दाखवीत आहे. हिच्या पायांकडे पहा. चक्क चपला/ सॅन्डल्स दिसत आहेत.

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातल्या बाह्य भिंतीवरची ही अत्यंत सौष्ठवपूर्ण विषकन्यका. हीने आपल्या कमरेवरून सर्प गुंडाळलेला असून ती आपले नानाविध विभ्रम दाखवीत आहे. हिने सुद्धा पादत्राणे परिधान केलेली आहेत.

a

अत्यंत सुंदर मूर्ती व त्यांचे फोटो. 'त्रिभंग' म्हणजे नेमके काय? 'तीन ठिकाणातून वळवलेले शरीर' (उदा. कंबर, खांदे व मान) असा त्याचा अर्थ आहे का? तसेच 'नायिका' ची व्याख्या काय आहे?

'नायिकाभेद' शीर्षक वाचून भरतमुनींच्या 'अष्टनायिका' अर्थात 'वासकसज्जा' 'विरहोत्कंठिता' 'स्वाधीनभर्तृका' 'कलहांतरिता' 'खंडिता' 'विप्रलब्धा' 'प्रोषितभर्तृका' आणि 'अभिसारिका' नायिकांबद्दल हा लेख असेल, असे वाटले होते.
अन्य ग्रंथात बारा, सोळा, नायिका असल्याचेही वाचनात आले त्यापैकी एक 'प्रवत्स्यत्वल्लभा' आहे. अन्य नावे अजून सापडली नाहीत.
तुम्ही इथे दिलेली नावे कोणत्या ग्रंथात नोंदलेली आहेत? ही पण अगदी वेगळी, आणि खास शिल्पांसाठी योजलेली वाटतात.
भरतमुनिंच्या 'अष्टनायिकां'च्या मूर्ती आहेत का? (चित्रे बरीच आढळतात). पूर्वी चित्रकार दीनानाथ दलाल यांनी या अष्टनायिकांची सुंदर चित्रे काढली होती.
या विषयावर अत्यंत सुंदर धागा काढलात, हे थोरच.

धन्यवाद.

त्रिभंग म्हणजे तीन कोनांतून वळवलेले शरीर. शरीराला उठाव देण्यासाठी त्रिभंग मुद्रा शक्यतो वापरली जाते. शीर, धड आणि कंबर किंवा गुढघा.

ह्याच मुद्रांचे अबंग, समभंग, अतिभंग असेही प्रकार आहेत.

चित्र आंतरजालावरून.
a

भरतमुनींच्या अष्टनायिका पाहिल्या नाहीत कधी. पण हे सर्वच प्रकार खजुराहोतल्या मंदिरांवर मोठ्या नजाकतीने कोरलेले दिसतील.
बाकी मी लिहिलेल्या लेखांतील नावे ही मूर्तीशास्त्रातील तज्ज्ञांकदून माहित झालेली आहेत. पुस्तकांत बहुधा मी तरी वाचली नाहीत कुठे.


वरील त्रिभंगाच्या इथे दिलेल्या चित्रातील सर्व आकृतींचे चेहरे, छाती आणि कंबर समोरच्या बाजूनेच दिसते आहे (Front view) माझ्या माहितीप्रमाणे सबंध शरीर उभा पीळ दिल्यासारखे तीन ठिकाणातून वळलेले असते, त्याला 'त्रिभंग' म्हणतात. उदाहरणार्थ क्रमांक १० विषकन्या, आणि खिद्रापूरच्या जैन मंदिरातील दोन नायिका. शिल्पकलेच्या दृष्टीने अशी शिल्पे जास्त प्रगत होत. ही जास्त सुंदर, रमणीय, कमनीय वाटतात.
उदाहरणार्थ खालील शिल्पे: डावीकडील इजिप्शियन शिल्प ठोकळेबाज वाटते, तर उजवीकडील ग्रीक शिल्प (आणि त्याखालील फ्रेंच शिल्प) त्यामानाने खूपच खर्‍यासारखे, जिवंत वाटते.

m...

....



.
Odalisque - Sculpture by French Artist James Pradier 1841


मी दिलेल्या चित्रातील शेवटची आकृती फक्त त्रिभंगाची. डावीकडून अभंग, समभंग, अतिभंग आणि शेवटी त्रिभंग असे प्रकार आहेत.
इजिप्शियन शिल्पे बरीचशी अभंग आणि समभंग यामध्ये मोडली जातात.

यातल्या माकडे ज्याना सतावत आहेत त्या अभिसारिका आहेत. प्रियकराला भेटायला जाताना कोणतेही संकट आले तरी न भिणार्‍या. साजशृंगार करणार्‍या वासकसज्जा. तर पायात पैंजण घालणार्‍या/आळिता लावणार्‍या स्वाधीनभर्तृका. (त्यांच्या पायाशी बसलेल्या आकृत्या सखीच्या नाही तर प्रियकराच्या असाव्यात.)

शुकाबरोबर असलेल्या नायिका प्रोषितभर्तृका, म्हणजे त्यांचे नायक दूरदेशी गेले आहेत आणि त्याला ही नायिका संदेश पाठवत आहे.

या नायिकांशी संबंधित राग रागिण्याही सांगितलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल चौरा आणि चित्रगुप्त यानी विस्ताराने लिहावे ही विनंती.


भरतमुनिंच्या अष्टनायिकांखेरीज अन्य ग्रंथातील नायिकांची ही जंत्री:

स्वकीया, परकीया, पुनर्भू, सामान्या, मुग्धा, मध्या, प्रगल्भा, धीरा, धीराधीरा, अधीरा, ज्येष्ठा, कनिष्ठा, ऊढा, अनूढा, अन्य-संभोगदु:खिता, वक्रोक्तिगर्विता, प्रेमगर्विता, सौंदर्यगर्विता, मानवती, ज्ञातयौवना, अज्ञातयौवना, नवोढा, विश्रब्धनवोढा, गुप्ता, विदग्धा, वाग्विदग्धा, क्रियाविदग्धा, लक्षिता, कुलटा, अनुशयना, मुदिता, प्रोष्यत्पतिका, प्रवत्स्यत्पतिका, ज्योत्स्नाभिसारिका, शुक्लाभिसारिका, तमिस्त्राभिसारिका, कृष्णाभिसारिका, दिवसाभिसारिका, रक्ता, विरक्ता, निजतानुरागिनी, व्यंग्याविदग्धा, मर्मपीड़िता, अद्भुता, उद्भूदिता, आसाध्या, सुखसाध्या, कामवती, अनुरागिनी, प्रेमअशक्ता ...

याशिवाय वयाच्या दृष्टीने केलेले नायिकांचे वर्गिकरणः
देवी (वयवर्षे ७ पर्यंत)
देवगंधर्वी (वयवर्षे ७ - १४)
गंधर्वी (वयवर्षे १४ - २१)
गंधर्वमानुषी (वयवर्षे २१ - २८)
मानुषी (वयवर्षे २८ - ३५)

गूगल शोध घेतला असता येथे बरीच शिल्पे मिळतात. खजुराहो मैथुनशिल्पांमुळे उगा बदनाम झालेले आहे. वास्तविक पाहता अशी शिल्पे १० ते १५% च्या वर नाहीत. तरीही शोधात हीच शिल्पे समोर येतात. यातूनच चाळणी लावून नायिकांची काही शिल्पे मिळतीलच.

नायिका कश्याला म्हणायचे? हे राहूनच गेले.
बालिका, किशोरी, प्रौढा, स्त्री, नारी, अबला, यापेक्षा वेगळा खास शब्द 'नायिका' असल्याने त्याचा विशिष्ट अर्थ असणार. ('नायकीण' म्हटले, की आणखी वेगळी अर्थछटा प्राप्त होते).
नायिकांप्रमाणेच भरतमुनिंनी 'नायक' चार प्रकारचे सांगितले आहेतः
धीरललित, धीरप्रशान्त, धीरोदात्त, आणि धीरोद्धत.
अग्निपुराणात नायकांचे आणखी चार प्रकार सांगितलेतः अनुकूल, दर्क्षिण, शठ, आणि धृष्ठ.
(हे सर्व गूगलबाबाने सांगितले, पण यामुळे अग्निपुराण वगैरे वाचले पाहिजे, असे वाटते)

आताच माझ्या संग्रहातील फोटो धुंडाळता धुंडाळता खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील ही शुकसारिका दिसली.
वर धाग्यातही अद्यतन केले आहेच. इथेही शुक मूर्तीभंजकांनी भग्न केलाय.

a


१) कुठे ही जाताना शिल्पे घाई घाईत पाहू नका.
२) त्या त्या काळची एकादी रीतभात शिल्पातून व्यक्त होउ शकते. उदा बेलूर ला उंच टाचेची चप्प्ल घालतेली बाई ( शिल्पातली )पाहिल्याचे आठवते.
३)एखादा प्रसंग चित्रित ( शिल्पित )केला असेल तर पात्रांचे भाव पहा !
४)दागदागिने , केशरचना, निरखून पहा.
५)शिल्पासाठी वापरलेल्या दगडाची बलस्थाने वा मर्यादा यांची माहिती शिल्पाद्द्लचे मत बनविताना जरूर घ्या
६)काही पुन्हा पुन्हा दिसणार्‍या मुद्रा उदा. सिंह मुख , ड्रॅगन सद्द्र्श राक्षस मुदा ई चा अभ्यास करा.

वरील नायिका या मुख्य नायिकाभेदातील उपभेद असाव्यात…

अ) धर्मानुसार भेद:
१) स्वीया अथवा स्वकीया: स्वत:ची पत्नी वा स्त्री
२) अन्या अथवा परकीया: दुसऱ्याची स्त्री
दोन प्रकार १) ऊढा- लग्न झालेली २) अनूढा लग्न न झालेली
३) साधारण- गणिका, वेश्या, पैश्यासाठी प्रेम करणारी

ब) वयोमानानुसार अथवा दशानुसार भेद:
१) मुग्धा: जिच्या अंग प्रत्यंगात नुकतेच यौवानाकुर फुलू लागले आहेत व जी कामक्रीडे विषयी संपूर्णपणे उनभिज्ञ आहे
दोन भेद: १) अज्ञात यौवाना: यौवानाची जाणीव नसलेली, २)ज्ञात यौवाना: यौवानाची नुकतीच जाणीव होवू लागलेली
२) मध्या: लज्जा व काम जिच्यात समप्रमाणात आहेत. ( जिला कामक्रीडा माहित आहे, आवड आहे, परंतु प्रचंड लाजाळू स्त्री )
३) प्रौढा: किंचित लज्जा व कामाचे परिपूर्ण आणि संपूर्ण कामकलेमध्ये प्रविण असलेल्या स्त्रिया. अथवा प्रगल्भा.

क) अवस्थानुसार भेद:
१) वासक सज्जा: प्रियकर घरी येणार म्हणून साजश्रुंगार करत नटणारी व त्यातच दंग असणारी स्त्री.
२) वीरहोत्कांठीता: प्रियकराच्या विरहाने व्याकूळ झालेली स्त्री.
३) स्वाधीनपतीका: पती जिच्या संपूर्ण अधीन आहे अशी स्त्री
४) कलहांतरिता: प्रथम प्रियकराशी भांडण उकरून काढणारी व तो रागावून निघून गेल्यावर भांडण मिटवण्यास उत्सुक असणारी पश्यातापदग्ध स्त्री
५) खंडिता: प्रियकराच्या अंगावर रतीचिन्हे पाहून रागावणारी, दु:ख,व्यक्त करणारी स्त्री
६) विप्रलब्धा: प्रियकराने सांगितलेल्या संकेतस्थळी येवून तो तेथे न आल्याने दु:खित झालेली स्त्री
७) प्रोषितपतिका: जिचा पती परदेशात गेला आहे अशी स्त्री
८) अभिसारिका: कामार्त होऊन कशाचीही लाजलज्जा न बाळगता प्रियकराला भेटण्यासाठी धावत सुटलेली स्त्री

ड) वर्णानुसार भेद:
१) दिव्या: देवांच्या ( ब्राह्मणांच्या ) स्त्रिया
२) आदिव्य: मानव स्त्रिया
३) दिव्या दिव्या: भूतलावर जन्म घेतलेल्या देव स्त्रिया. उदा. सीता

ई) प्रकृत्यानुसार भेद:
१) उत्तमा: पतीच्या सुखात आपले सुख मानणारी. तो कितीही हरामखोर असला तरी न रागावता स्वतः सदाचरण करणारी
२) मध्यमा: पतीचे दोष-गुण पाहून राग-लोभ-प्रेम व्यक्त करणारी
३) अधमा: पती कितीही चांगला वागला तरी दुराचरण करणारी

फ) स्वभावानुसार भेद:
१) अन्यसुरत दु:खिता: दुसऱ्या स्त्रीच्या अंगावर आपल्या पतीची रतीचिन्हे पाहून दु:ख करणारी स्त्री
२) मानवती: पतीचा अपराध त्याच्या लक्ष्यात आणून देणारी मानीपणा करणारी स्त्री
३) गर्विता:
प्रेमगर्विता: पतीच्या स्वतःवरील प्रेमाचा गर्व करणारी
रुपगर्विता: स्वतःच्या रूपाचा गर्व करणारी
गुणगर्विता: स्वतःच्या गुणाचा गर्व असणारी


मखर, अर्थात मकरतोरण


मखर, याचा उगम मकर अथवा मगरापासून होतो. मगरीच्या (मकराच्या) मुखातून निघालेले तोरण म्हणजे मकरतोरण. याचाच पुढे अपभ्रंश होत जाऊन आजचे मखर तयार झाले. काळानुरूप बदल होत जाऊन हल्ली तोरणाचा उगम मूळ मकरमुख जरी फारसे दिसत नसले तरी नक्षी मात्र अगदी तशीच आहे.

१. वेरूळच्या कैलास लेण्यातील गंगा. बघा ही मकरावर आरूढ असून तिच्या दोन्ही बाजूंच्या स्तंभांवर मकरतोरण आहे.

a

२. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील महावीराची प्रतिमा. मस्तकी असलेल्या कळसावर मकरतोरण आहे.
a

३. खिद्रापूरच्याच मंदिराच्या बाह्यभिंतीवरील अजून एक मकरतोरण

a

४. खिद्रापूरच्याच मंदिराच्या बाह्यभिंतीवरील अजून एक मकरतोरणांकित प्रतिमा
a

५. सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील स्तंभावरील माहेश्वरी (प्रतिहारी)
a

६. गोंदेश्वराच्याच स्तंभावरील अजून एक मकरतोरण
a

७. अंजनेरीच्य विष्णूमंदिरातील वैष्णव प्रतिहार
a

८. अंजनेरीच्या विष्णूमंदिराच्या बाह्य भागावरील मकरतोरणात असलेला विदारण नरसिंह
a

९. नारायणपूरच्या नारायणेश्वराच्या राऊळातील शैव प्रतिहार
a

१०. भुलेश्वर मंदिरातीलल मकरतोरण सभोवती असलेला भैरव प्रतिहारी
a

११. भुलेश्वरातील मकरतोरणांकित मूषकारूढ विनायकी, नंदीवर आरूढ असलेली माहेश्वरी आणि मयुरारूढ कौमारी
a

१२. भुलेश्वरातील मकरतोरणांकित प्रेतवाहिनी चामुंडा, गजारूढ ऐन्द्री
a

१३. सिन्नरच्या ऐश्वर्येश्वर मंदिरातील अत्यंत देखणे मकरतोरण. मध्यभागी शिवतांडवनृत्य
a

१४. हे मकरतोरण मात्र सर्वात अर्वाचीन. पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिराच्या दर्शनी भिंतीवर. १८ व्या शतकातील.
a



मखराची कूळकथा आवडली. तोरणात मकराला स्थान द्यायचं काय विशेष कारण असावं? मकर हे गंगेचं वाहन मानलं गेलं. गजेंन्द्र मोक्षाची कथा मकराशी संबंधित. तसाच "सुंदर ते ध्यान" अभंगात "मकर कुंडले तळपती श्रवणी" असा उल्लेख विठोबाच्या बाबत आहे. यात कुंडलांनाही मकराचा आकार आहे का?


तोरणात मकराला स्थान द्यायचे नक्की कारण माहीत नाही बहुतेक शिल्पात येणारी लयबद्धता हेही कारण असावे किंवा मकर पवित्र मानले जात असावे. बाकी मकर हे गंगेबरोबरच वरूणाचेही वाहन आहे. बाकी विष्णूच्या कानात मकर कुंडले असतात त्यामुळे विठोबाच्याही ती असल्यास त्यात काही नवल नाही.

हा वेरूळ लेणीतील मकरारूढ वरूण

a

आणि ही दिवेआगरमधली विष्णूच्या कानातील मकरकुंडले (१२ वे शतक)
a


भुलेश्वरातील तोरणावरील डिझाईन अप्रतिम, सिन्नरच्या ऐश्वर्येश्वर मंदिरातील तोरण पाहून हे दगडात कोरलेले मानवनिर्मित काम वाटतच नाही.
सध्या दिसणार्‍या मंदिरातील सोनेचांदीच्या प्रभावळीतपण मकर आहेच. पण या तोरणाच्या शीर्षस्थानी असणार्‍या मुखासंबंधी सांग ना. काही म्हणतात तो वीरभद्र तर काही महिष.

तोरणाच्या शीर्षस्थानी किर्तीमुख असते. थोडक्यात सिंहमुख.

मंदिरात येऊ पाहणार्या दुष्ट शक्तींना किर्तीमुखे रोखत असतात अशी मूळ धारणा.


अगदी पूर्वी वास्तु लाकडाच्या असत, त्यातील अवश्यक बाबी (उदा. लाकडी खांबांवर तुळया टाकताना दिलेले रुंद टेकू, तसेच तुळयांची भिंतींच्या बाहेर निघणारी टोके इ.) पुढे लेणी खोदताना आवश्यक नसूनही त्या खोदल्या जात. याची उदाहरणे आहेत का काही तुमच्या फोटोंमधे?
...s




तशी बरीच उदाहरणे आहेत.

हे पहा वेरूळचे सुतार लेणे. हे चैत्यगृह आहे. पण याची रचना हुबेहूब लाकडी कामासारखी केलीय.
a

हा पहा अजिंठ्याचा चैत्य. इथे छतावरील लाकडी फासळ्यांची जागा अखंड कोरीव दगडी फासळ्यांनीच घेतलीय.
a

आणि तुम्ही वर दिलेत तशा शैलीत असणारा देवगिरी किल्ल्यातील हा दगडी सज्जा.
a


मकर आणि नाग (आणि काही ठिकाणी सिंहसुद्धा) अतिपूर्वेला जाता जाता त्यांचा काल्पनिक संकर होऊन ड्रॅगन बनला असावा काय? ड्रॅगनही असाच प्रवेशद्वारावर अथवा घरावर पहारा देत दुष्ट शक्तींना पिटाळून लावतो असे तिकडे समजतात.

मकर आणि नाग (आणि काही ठिकाणी सिंहसुद्धा) अतिपूर्वेला जाता जाता त्यांचा काल्पनिक संकर होऊन ड्रॅगन बनला असावा काय?

त्याबद्दल नक्की काही सांगता येत नाही. पण जगातील बहुतेक प्राचीन संस्कृतींमध्ये काही ना काही गोष्टी समान आहेत. ड्रॅगनचे मूळ कितपत जुने ते काही माहित नाही.

पण हा अजिंठा लेणीतील १७ च्या क्रमांकाच्या विहारातील हे चित्र रोचक ठरावे.
a


प्रचलित हिंदू धर्मातील देवतांचे सगुण रूप

दोन महिन्यांपूर्वी हिंदू धर्मग्रंथाच्या कालाबद्दल एक लेखमाला मी उपक्रमवर लिहिली होती. त्या वेळी काही संदर्भ वाचन करत असताना एक प्रश्न माझ्या डोक्यात घोळत असे. सध्या आपण ज्या देवतांचे पूजन करतो त्या देवतांना सध्या प्रचलित असलेली त्यांची सगुण रुपे कोणी व कधी दिली असावीत? म्हणजे गणपतीला गजमुख दाखवायचा किवा शंकराला जटा व गळ्याभोवती नाग या स्वरूपातच दाखवायचा. लक्ष्मीला कमलपुष्पातच उभे करायचे.

यापैकी ही रुपे कधी दिली गेली असावीत या संबंधी अंदाज बांधणे त्या मानाने सोपे आहे. मोहोंजोदारो व हडाप्पा संस्कृतीमधे देवताना सगुण रूप होते परंतु त्या वेळी प्रजननक्षमता (Fertility) हीच देवता पूजत असत. या देवतेच्या सगुण रूपाला अदिती असे नाव होते असे काही तज्ञांचे म्हणणे. म्हणजे सध्याच्या प्रचलित देवता इ.स.पूर्व 1300 च्या आधी तरी नव्हत्या एवढे ढोबळपणे म्हणता यावे. आर्य टोळीवाले मूर्ती पूजकच नव्हते. त्यांचे देव म्हणजे इंद्र, वरुण, सूर्य, रुद्र व विष्णू. या देवतांचे पूजन ते अग्नीच्या माध्यमातून करत. आर्य संस्कृती भारतात रुजली तेंव्हाही सध्याच्या देवतांची सगुण रूपे नसणार. म्हणजेच आपण इ.स.पूर्व 1000 पर्यंत आलो. हा काल व इ.स,पूर्व 500 हा बौद्ध धर्माच्या उदयाचा काल या मधेच देवतांना सध्याची सगुण रूपे दिली गेली असावीत असे मला वाटते.

परंतु या सर्व देवतांना ही सगुण रूपे कोणी दिली असावीत याचा काहीही अंदाज मला तरी बांधता येत नाही. बघुया दुसर्‍या कोणी उपक्रमीला काही सांगता येते का?

त्यांचे देव म्हणजे इंद्र, वरुण, सूर्य, रुद्र व विष्णू. या देवतांचे पूजन ते अग्नीच्या माध्यमातून करत.
इंद्र, वरुण, सुर्य, रुद्र, विष्णू यांच्या पैकी बरेच जण खरेच (म्हणजे सगुणच)आर्य टोळ्यांचे नेते होते. अग्नीच्या माध्यमातुन पूजनाचा संबंध सरळसरळ यज्ञ व आहूतीशी संबंधित आहे.

आर्य संस्कृती भारतात रुजली तेंव्हाही सध्याच्या देवतांची सगुण रूपे नसणार.
सहमत.

मधेच देवतांना सध्याची सगुण रूपे दिली गेली असावीत असे मला वाटते.

सहमत. ही अशी रुपे देण्यामागे तत्कालिन समाजामनावर भीती, लालसा या बाबींचा वापर करुन अधिपत्य गाजवणारी व्यवस्था निर्माण करणे हा हेतू होता. हा हेतू आजतागायतही सफल झालेला आहे. ही सगळी सगुण रुपे होऊन गेलेल्या नायकांवर काल्पनिक देवत्व आरोपित करुन, त्यांच्या पराक्रमांच्या अतिरंजित कहाण्या निर्माण करुन त्यांच्या आधारे निर्माण करण्यात आली. या रुपांचा तत्कालिन नायकांच्या खऱ्या रुपाशी फारसा संबंध नसुन ती रचणाऱ्याच्या मानसिकतेत त्या रुपाच्या उपयोजनाची काय संकल्पना असेल त्यावर आधारीत आहेत. ही रुपे नायकांची असल्याकारणाने ती रचनाकर्त्यांच्या समुहाचेच प्रातिनिधित्व करणारी आहेत.

अवांतर
ही सगुण रुपरचना करतांना अर्थात खलनायकांचीही सगुण रुपे तयार करावी लागली. देवांचे नायक जसे चित्रित झाले तसे राक्षसांचेही खलनायक चित्रित करावे लागले. वास्तविक राक्षस हे ही अस्तित्वात असलेल्या भारतातील पूर्वप्रस्थापित टोळ्यांचे नायकच होते. परंतु ते शत्रु असल्या कारणाने त्यांची रुपे लांब नखे , सुळे दात, शिंगे, अस्ताव्यस्त वाढलेले केस, काळाकुट्ट रंग, गडगडाटी हास्य करणाऱ्या भेसूर मुद्रा अशा तऱ्हेची रेखाटली गेली. पण अशी काही मानवजात अस्तित्वात असावी असे वाटत नाही. आणि हे मानव नसुन हिंस्र पशू असते तर देवनायकांना त्यांच्याशी इतकी दमछाक होईपर्यंत लढायचे कारणही नव्हते. असो. जेणेकरुन या खलनायकांचे सगुणरुप चित्रण ही लबाडी आहे हे दिसून येते. तशीच देवदेवतांची सगुण रुपे तयार करणे हा ही एक लबाडीचाच भाग आहे.

आपल्या देवी देवतांना सगुण रुपे देण्यात राजा रविवर्मा आणि इतर चित्रकारांचा मोठा हात आहे. हल्लीच लोकप्रभामध्ये यावर लेख होता. येथे वाचा.

रविवर्मा यांनी लक्ष्मी आणि सरस्वती यांना नऊवारी साड्या आणि शिवलेले ब्लाऊज नेसवले. वीणा घेऊन मोरावर बसलेली सरस्वती आणि कमळात उभी राहिलेली लक्ष्मी यांना रेखाटताना त्यांनी एका पारशी महिलेला (लेखात पारशी माणसाची बायको असे म्हटले आहे परंतु काळ लक्षात घेता पारशी माणसाची पारशी बायकोच असावी असे वाटते.) मॉडेल म्हणून वापरले होते. ही चित्रे आज घराघरातून पूजली जातात. :-)

असो.

दुसर्‍या शतकातील शंकराची मूर्ती पहा. तिच्या गळ्यात नाग नाही. हातात त्रिशूळ आहे आणि शंकर मिशीधारी दिसतो. शंकराच्या हातातील त्रिशूळही पाश्चात्य ट्रायडेंटशी (पसायडन किंवा नेपच्यूनच्या हातातील) मेळ खातो. नंतरच्या चित्रांत मात्र त्रिशूळाचा आकार आणि स्वरुप बदलेले दिसते. (असेही असू शकेल की ही मूर्ती गांधारातील असल्याने वेगळी घडवली असेल.)



पूजेसाठीचे ढोबळ पिंड "सगुण" म्हणून चालेल का?

पूजनासाठी ढोबळ पिंडे (शेंदूर फासलेले, कधीकधी मोठे डोळे चितारलेले लंबगोल पाषाण) ही बहुधा फार प्राचीन काळापासून वापरात असावी. या वेगवेगळ्या "आया" आणि "बा" आहेत.

काही भक्तश्रीमंत ग्रामदैवतांची ओळख प्रमुख पौराणिक देवांशी जुळवल्याच्या घटना अगदी अलिकडे सुद्धा दिसतात.

खंडोबाचा शंकराशी संबंध, महाराष्ट्रातील बहुतेक आयांचा पार्वतीशी संबंध, काही आयांचा विष्णुपत्नीशी संबंध, लिंगरूप दैवताचा वैदिक रुद्राशी संबंध...

असे करता पौराणिक/वैदिक देवाला दृश्य-स्पर्शरूप मिळते. ते दृश्य-स्पर्शरूप लोकांमध्ये आधीच पूजनीय असल्यामुळे, त्या पिंडाची पूजनीयता नव्याने पटवून द्यावी लागत नाही.

दा. ध. कोसंबी यांच्या "मिथ अँड रिऍलिटी" मध्ये महाराष्ट्रातील अनेक आई-देवतांबद्दल समूळ संशोधनासहित चर्चानिबंध आहे. त्यात काही वैदिक/पौराणिक<->लौकिक/स्थानिक दैवतांच्या जोड्यांची चर्चा सापडेल - जोड्यांमधली दैवते मुळात वेगळी असली तरी क्षेत्रमाहात्म्यात अभेद झालेली आहेत.

मनुष्याकार नसलेल्या पूजनीय पाषाणांवरती मनुष्याकृती मुखवटे चढवतात, ही प्रथा तर सर्वांच्या ओळखीचीच असेल. गोव्यातील शंकरांच्या पिंडींवर मुखवटे असतात. हल्लीच वैष्णोदेवीच्या देवळात गेलो, तिथे दैवते अखंड नैसर्गिक अभिषेक होत असलेले "स्टॅलॅक्टाइट" आहेत. पण त्यांच्यापुढे देवीचा घडीव मुखवटा आहे.

कोकणातल्या एका घरगुती पूजाविधीमध्ये देवीचा मुखवटा तांदळाच्या उकडीने बनवतात. या रूढीत सुद्धा काहिशा-निर्गुण पिंडाला दिखाऊ सुंदर सगुण रूप देण्याची लोकपरंपरा दिसते, असा माझा कयास आहे.

पुरीच्या जगन्नाथाच्या कथेतून सगुण-निर्गुण पिंडांबद्दल लोकांच्या श्रद्धेमध्ये जो तणाव आहे, त्याचे अंशदर्शन घडते. (राजाला जगन्नाथाची मूर्ती सुबक बनवायची होती, पण विश्वकर्म्याने ढोबळ पिंडे बनवली...)

मूर्तीपूजा अस्तित्वात आल्यावर प्रत्येक कालखंडातील शिल्पकार, चित्रकार यांनी आपापल्या कुवती आणि समजानुसार देवांना रेखाटले असावे. 

 पुरीच्या जगन्नाथाच्या कथेतून सगुण-निर्गुण पिंडांबद्दल लोकांच्या श्रद्धेमध्ये जो तणाव आहे, त्याचे अंशदर्शन घडते. (राजाला जगन्नाथाची मूर्ती सुबक बनवायची होती, पण विश्वकर्म्याने ढोबळ पिंडे बनवली...)

सहमत आहे. गणपतीच्या बहुतांश देवळांतील मूर्ती (त्यांना मूर्ती तरी म्हणावे का नाही असा संभ्रम होतो) ढोबळ असतात. गणेशोत्सवातल्या गणपतीसारख्या मूर्ती सहसा देवळात नसतात. शंकराच्या देवळात सहसा पिंडच असते.

वैष्णव देवळांतल्या (राम, कृष्ण, दत) मूर्ती मात्र सुबक असतात का? हे अर्वाचीन देव (दत्त अर्वाचीन आहे यात शंका नाही) असावेत का?

बाबासाहेब जगताप यांनी म्हटल्याप्रमाणे सरंजामशाहीत एखाद्यावरील अतिरेकी निष्ठा हा गुण आवश्यक होता. त्या गुणाचा विकास करण्याचे काम भक्तीमार्गाच्या प्रसारातून साधले गेले.

 

गणपतीला गजमुख दाखवणे हे किमान ९ व्या शतकाआधीपासून असावे असे विकीपीडियाच्या संदर्भावरून वाटते. ११ व्या शतकापूर्वी गणपतीचे सध्याचे रूप व्यवस्थित प्रचलित झाले होते असे वाटते. विकीवरच श्रीलंकेत २र्‍या शतकातली गणपतीची या प्रकारची मूर्ती आहे असे म्हटले आहे. पण मूर्तीच्या चित्राचा दुवा मिळाला नाही.

कमळ हे भारतीय साहित्यात खूपच महत्त्वाचे फूल आहे. ऋग्वेदातही सरस्वती नदीच्या पात्रातील कमळांचा उल्लेख आहेच. नंतरच्या काळात शिल्पकलेतही याचा उपयोग आहेच. गजलक्ष्मीचे बर्‍यापैकी प्राचीन बौद्ध शिल्प (शुंग काळ, ख्रिस्तपूर्व १ -२ शतके) - यात हत्ती, अर्थातच पण पायाशी कमळही आहे.

काही अधिक चित्रे इथे -

 

आपल्या' माणसासारखी मार्तंड भैरवाची मुर्ती - राजेंद्र गलांडे.

   ( Image - Goa History Musium, Photo - Adv.Rajendra Galande )

    इसवी सन १४ व्या शतकात गोवा राज्यातील  उसगाव, पोंडा,  येथे सापडलेली ही मार्तंड भैरवाच्या मुर्तीची दाढी मिशांची स्टाईल आपल्याला आवडलीच पण या भैरवाला माणसांसारखे दोनच हात आहेत.
करावी का अशी स्टाईल?


जगातील पहिले व्यंगचित्र ( शिल्प ) - महेन्द्र शेगावकर


जगातील पहिले व्यंग चित्र (शिल्प) 

भरहूतच्या स्तुप स्तंभावरचेच..... 

कारण हे शिल्प इ.स.पु. दुसऱ्या शतकात साकारल्या गेले !
 दंतवैद्याकडे पाळलेले माकड असते . वैद्यबुआ एका व्यापाऱ्याचा दुखरा दांत उपटून त्याला वेदनामुक्त करतात , त्याचा मोबदला म्हणून व्यापारी सुकामेवा , फळे , खजूर व द्रव्यही देतो .
माकडाने हे बघितले ,. त्याने ठरविले ,की आपणही वैद्य झालोच पाहिजे .
त्याने त्याचा व्यवसाय सूरु केला ......
एक व्यापारी आपला दांत उपटून घेत आहे . भल्लीमोठी सांडसी लावलेली आहे . तीला दोर बांधून हत्ती ओढत आहे . हत्तीला उत्साह यावा म्हणून काही माकडे ढोल, पिपाणी, ताशे वाजवत आहेत ....
एक माकड तर चक्क हत्तीच्या शेपटीचा कडाडून चावाच घेत आहे ...
दुखरा दांत व माकडचाळे पाहून  त्राग्याचे भाव व्यापाऱ्याचे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहेत ...
आज हे शिल्प कलकत्ता वस्तुसंग्राहलयात आहे .
बौध्द जातककथामध्ये काही विनोदी जातककथाही आहेत .त्यातील ही एक विनोदी जातककथा आहे ,.
 " आधा अधूरा हकीम , मरिज के लिए  जान का खतरा ! " 
- महेन्द्र शेगांवकर, महाराष्ट्र.

 नवदुर्गा ९ दिवस ९ मूर्ती


महालक्ष्मीची ही अप्रतिम मुर्ती माझ्याकडे आहे. २५ वर्षांपूर्वी बी. रघुनाथ प्रकल्पासाठी मला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला तेंव्हा माझ्या मित्रांनी कौतूकाने ही मुर्ती दिली. पुस्तकाला पुरस्कार मिळाला तेंव्हा सरस्वती दिली असती तर संयुक्तीक ठरले असते. पण माझ्या मित्रांना वाटले याने "लक्ष्मी"ची उपासना करावी. ती मला नाही जमली. जूनी मंदिरं मुर्ती यांच्या जिर्णोद्धाराचा प्रकल्प हाती घेतला आहे. तेंव्हा स्वत:जवळची ही सुंदर मुर्ती घासून पुसून पुजावी नित्य स्मरावी जेणे करून आपल्या कामाचे नित्य स्मरण होत राहील. आज घटस्थापना. देवीच्या सर्व रूपातील प्रतिमांचे स्मरण.


काल मी महालक्ष्मीच्या माझ्या जवळ असलेल्या मुर्तीचा फोटो टाकला होता. आजचा हा फोटो आहे माझ्या सासुरवाडीच्या (सखारामपंत डांगे) घराण्याच्या देवीचा. कुंभारी, ता.जि. परभणी येथील ही देवी. हे मंदिर २ वर्षांपूर्वी पर्यंत अगदी साधं छोटं होतं. शेंदूर फासलेला दगड इतकंच देवीचं रूप होतं. गावकर्
यांची मोठं मंदिर बांधलं. माझ्या चारही मेहूण्यांनी मिळून हा सुंदर तांदळा मंदिरात बसवला. मोठ्या वहिनी सौ. विंदा डांगे यांनी या मंदिराच्या जिर्णोद्धाराचा ध्यासच घेतला होता. स्वत: चकरा मारून काम करवून घेतले. देवीला दागिने घडवले. मुकूट बसवला. मंदिराला कळस चढवला. आता मंदिराला आणि तांदळ्याला सौंदर्य प्राप्त झाले. बहुतांश ठिकाणी अगदी बेढव असे शेंदूर फासलेले दगड देवी म्हणून पुजले जातात. त्या ठिकाणी चांगल्या मुर्ती अथवा तांदळे बसवायला काय हरकत आहे? याला शास्त्रात आधारही आहे. आक्रमणांच्या काळात मुर्ती नष्ट झाल्या त्यांचा विध्वंस झाला. आता ते सारं विसरून नव्याने काही का केल्या जावू नये? तशीही आपल्याकडे बदलाची मोठी परंपरा आहे.

तूळजापुरची भवानी माझ्या घराण्याची कुलदैवता आहे. आमच्या नित्यपुजेत देवीचा टाक आहे पण मुर्ती नव्हती. जय संतोषी माता चित्रपटामुळे सिंहावर बसलेली देवीची प्रतिमाच सगळ्यांच्या मनात ठसली आहे. प्रत्यक्षात महिषासुर मर्दिनी रूपातील अष्टभुजा देवीची मुर्ती सहसा आढळत नाही. मला ही मुर्ती तूळजापुरात एका दूकानात दिसली आणि पाय खिळूनच राहिले. एक तर मुर्ती मुळच्या देवी रूपातील, दूसरं म्हणजे महिषासुराला मारतानाचा सगळा आवेश मुर्तीत उतरलेला. सगळ्याच मुर्तीला एक अप्रतिम अशी लय आहे. या मुर्तीची मागची नागप्रतिमा असलेली प्रभावळ, त्यावरचे किर्तीमुख सगळंच मोहक वाटले. २० वर्षांपासून ही मुर्ती माझ्या जवळ आहे. मागच्या प्रभावळीत लहान छिद्र आहेत. त्यात फुलांचे देठ अडकवून छान आरास करता येते. खालचे चौकोनी जड आसन वेगळे करता येते. मागची प्रभावळही वेगळी होते. त्रिशुळपण वेगळा करता येतो. जमिनीशी बरोबर ४५ अंशाचा कोन साधणारी त्रिशुळाची रचना गणित तत्वाशी जुळते. या मुर्तीने मला मोहित केले. प्रथेप्रमाणे मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. पण खरी प्राण प्रतिष्ठा माझ्या मनातच झाली. डाव्या हातात महिषासुराचे शीर आहे आणि उजव्या हातातील त्रिशुळ त्याच्या मानेवर रूतवला आहे. बाकी सहाही हातात शस्त्र आहेत. देवीच्या अष्टकातील विष्णुदासांचे पद या मुर्तीला पाहून मला नेहमी आठवते

अष्टादंड भुजा प्रचंड सरळा
विक्राळ दाढा सुळा
रक्त श्रीबुबूळा प्रताप आगळा
ब्रम्हांड माळा गळा
जिव्हा ऊर स्थळा रूळे लळलळा
कालांत कल्पांतके
साष्टांगे करीतो प्रणाम तुजला
जय जय महाकालीके



देवी विविध रूपात पूजली जाते. करमाळा येथे कमला भवानी या नावाने भवानीची पुजा होते. ही महिषासूरमर्दिनी या रूपातील भवानी नसून कमळात बसलेली अशी आहे. रावराजे निंबाळकर यांनी हे मंदिर उभारले व देवीची प्राणप्रतिष्ठा केली. सैराट चित्रपटातील मंदिर ते हेच. येथील कमला भवानीची पितळी मुर्ती आमच्या घराण्यात माझ्या मोठ्या चुलत भावाकडे पुजली जाते. महालक्ष्म्या अतिशय आकर्षक व जिवंत भासणार्या ज्यांच्याकडे मांडल्या जातात ते हेच घर. माझा पुतण्या सखाराम उमरीकर या देवीची रोज आकर्षक सजावट करतो. ही कमलाभवानी महिषासुरमर्दीनी सारखी उग्र रूपातील नसून प्रसन्न अशी आहे.


ही अतिशय वेगळी अशी स्त्री रूपातील मूर्ती अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) येथील मंदिरावरची आहे. आता महादेव मंदिर म्हणून ओळखलं जात असलेलं हे मुळचं विष्णु मंदिर. शंख चक्र गदा पद्म यांचे चारी हातातील स्थान पाहून विविध नावे विष्णुला दिली जातात. अशी २४ नावं विष्णुची आहेत. त्यातील वरच्या उजव्या हातात चक्र, वरच्या डाव्या हातात शंख, खालच्या उजव्या हाती पद्म आणि खालच्या डाव्या हातात गदा असेल तर त्याला जनार्दन असे नाव आहे. दू:ख हरण करणारा असा हा जनार्दन. या विष्णुची शक्ती म्हणून जिचे वर्णन केले जाते ती म्हणजे उमा. ही त्या उमा शक्तीची मुर्ती आहे. ही विष्णुची पत्नी लक्ष्मी नव्हे. कुठल्याही देवतेच्या उजव्या बाजूला जी स्त्री प्रतिमा कोरली जाते ती त्याची शक्ती असते. (आई, मुलगी, बहिण, सुन या नात्यातील सर्व स्त्रीयांची जागा उजव्या बाजूस असते) डाव्या बाजूला असते ती पत्नी (वामांगी).
या अभ्यासामुळे अन्वा मंदिरांवरील विष्णुच्या शक्तींचा दृश्य पुरावा समोर आला. या मंदिरात मी बर्याचदा गेलो आहे. नुकताच गेलो होतो तेंव्हा हा फोटो काढून आणला. डाॅ. देगलुरकरांच्या पुस्तकात यावर विस्तृत विवरण आहे. विष्णुची २४ नावं आणि त्यांच्या शक्ती सांगितल्या आहेत.
नवरात्रीत पुरूषाची शक्ती असलेली अशी स्त्री तिचीही मनोमन पुजा झाली पाहिजे.



लोभस पुत्रवल्लभा
स्त्रीला माता म्हणून आपण संबोधतो तिचा गौरव करतो पण मातृरूपात तिची प्रतिमा फारशी आढळत नाही. होट्टल (ता, देगलूर जि. नांदेड) येथील मंदिरावरील या शिल्पाने माझे लक्ष्य वेधून घेतले. लहान मुल कडेवर घेतले आहे. एरव्ही स्त्रीयांच्या स्तनांचा उपयोग वासने संदर्भातच येतो. इथे त्या लहान बाळाचा हात स्तनांवर दाखवून मातृत्व सुचीत केले आहे. एकुणच हे शिल्प लोभस आहे. ही स्त्री काही कामात व्यग्र आहे आणि जबाबदारी म्हणून लेकरू काखोटीला मारले असेही नाही. उजव्या हातातील खेळण्याने ती त्याला खेळवते आहे, लाड करते आहे. ते मुलही मान उंचावून तिकडे पाहते आहे. स्त्रीच्या चूहर्यावर तृप्तीचे भाव आहेत. अशा मुर्तीला पुत्रवल्लभा या गोड नावाने संबोधले जाते. महाराष्ट्रात उत्तर चालूक्य कालीन (११ वे ते १३ वे शतक) मंदिरांवर सुरसुंदरींची अतिशय देखणी कमनीय अशी शिल्पे आढळून. त्यातील हे एकदम वेगळे लोभस शिल्प "पुत्र वल्लभा" . आज नवरात्रीच्या सहाव्या दिवशी मातृदेवता नमोनम: (जानेवारी महिन्यात होट्टल महोत्सवासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी
Vincent Pasmo
या फ्रेंच मित्राने टिपलेले हे छायाचित्र)



केवळ पत्रसुंदरी नव्हे तर ज्ञानमार्गीणी
पत्रसुंदरीचे हे देखणे शिल्प धारासूर (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील गुप्तेश्वर मंदिरावरचे आहे. शिखर शाबुत असलेले ९०० वर्षांपूर्वीचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर. मुळचे हे विष्णु मंदिर. या मंदिरावर सुरसुंदरींची अप्रतिम शिल्पे आहेत. काल होट्टल येथील ज्या पुत्रवल्लभेचे छायाचित्र टाकले होते तसेल याही मंदिरावर आहे. मध्ययुगीन कालखंडात स्त्रीयांना ज्ञानाचा अधिकार नाकारला गेला होता. पण पूर्वीच्या कालखंडातील स्त्रीया ज्ञानाच्या बाबतीत सक्षम होत्या याचा ठोस पुरावा या शिल्पातून मिळतो. या शिल्पाला "विरह कंठिता" असेही संबोधले जाते. पण त्यातून प्रेयसी किंवा विरहिणी इतकाच मर्यादीत अर्थ निघतो. खरं तर हीला लेखीका किंवा ज्ञानमार्गीणी असे संबोधन द्यायला हवे. कारण ती लिहीत आहे त्या कागदाच्या दोन्ही बाजूला उभे दंड आहेत. म्हणजे पोथीसारखी रचना सुचीत होते. हे केवळ पत्र उरत नाही. शिवाय तिच्या चेहर्यावरचे भाव विरहणीचे नाहीत.
सुरसुंदरी या शब्दांतून स्त्रीचे शारिरीक सौंदर्य जास्त सुचीत होते. पण कालची पुत्रवल्लभा, आजची ही लेखीका आणि उद्या जिच्यावर लिहीतोय ती शत्रु मर्दिनी या शिल्पांचा "सुंदरी" इतका मर्यादीत विचार करून चालणार नाही. स्त्री व्यक्तीमत्वाचा सर्वांगिण विकास दर्शविणारी ही शिल्पे आहेत. यातून एक सक्षम स्वतंत्र व्यक्तिमत्वाची स्त्री सुचित होते. "अबला" हे तीचे मध्ययुगीन कालखंडातले निर्माण झालेले चित्र मागे पडते. आज सप्तमी, सातवी माळ. त्या निमित्ताने बुद्धीमान स्त्रीचे हे शिल्प अवलोकनार्थ.
(छायाचित्र अरविंद शहाणे या परभणीच्या मित्राने आठच दिवसांपूर्वी काढलेले आहे. या मंदिरावर सविस्तर व्हिडियो त्याने व मल्हारीकांत देशमुख या मित्राने तयार केलाय. त्याचा पहिला भाग u tube वर आहे. जरूर बघा.)



रणझूंझार शत्रुमर्दिनी
आज अष्टमी. नवरात्रीच्या आरतीत "अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा नारायणी हो" अशी ओळ आलेली आहे. महिषासुराचा वध करणार्या देवीची उग्र प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर असते. पण अशी लढव्वयी शत्रुचा शिरच्छेद करणारी योद्धा स्त्री प्रतिमा मात्र कधी डोळ्यासमोर येत नाही. होट्टल (ता. देगलूर जि. नांदेड) येथील मंदिरावर अशा स्त्रीचे शिल्प कोरलेले आहे. हीला "शत्रु मर्दिनी" या नावाने संबोधले जाते. हीच्या डाव्या हातात नरमुंड आहे आणि उजव्या हातात खङग आहे. संस्कृत ग्रंथ "क्षीरार्णव" यात शत्रुमर्दिनी रूपाचे वर्णन आले आहे. या वर्णनाचा दृश्य पुरावा होट्टलच्या मंदिरावर आहे.
अशी शिल्पं मराठवाड्यात धारासुर (ता. गंगाखेड, जि. परभणी) धर्मापुरी (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथेही आहेत. या शिवाय लढाउ स्त्रीयांची छोटी शिल्पेही मराठवाडा परिसरांतील मंदिरांवर आढळून आलेली आहेत.
हा परिसर नेमका मातृदेवतांचा आहे. दक्षिणेतील मात्ृसत्ताक समाज व्यवस्थेचे पुरावे आपल्याकडे स्पष्ट दिसून येतात. पैठणचे सातवाहन राजे आईचेच नाव लावायचे (गौतमीपुत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र आळूमावी इ.इ.). मामाची मुलगी बायको केली जाते याचाही संदर्भ मातृकुळाशी नातं घट्ट जोडण्याचा आहे.
आपल्याकडे सार्वजनिक संबोधन "ओ मामा, ओ मावशी" असंच आहे. उत्तरेकडच्या पुरूषसत्ताक प्रदेशात हेच संबोधन "ओ चाचा, ओ चाची" असं आहे. दक्षिणेत स्त्रीया केवळ "सुरसुंदरी" नसून आपल्या सर्वांगिण व्यक्तीमत्वाच्या विविध पैलूंनी झळाळून दिसतात. ही अतिशय वेगळी स्त्री प्रतिमा. अष्टमीला सामान्य स्त्रीच्या रूपातीला झुंजार अष्टभुजेला नमन. (छायाचित्र सौजन्य
Vincent Pasmo
)



विद्या कलेची अधिष्ठाती सरस्वती
एखादा खजिना अचानक सापडावा तशी सरस्वतीची ही अप्रतिम मुर्ती अनपेक्षीत जागी दृष्टीस पडली. औंढा नागनाथ जवळ राजापुर नावाच्या छोट्या गावी साध्या चौथर्यावर ही मुर्ती ठेवलेली आहे. गणेश चाकुरकर हा इंजिनिअरिंगचा मित्र औंढ्याला नौकरीला होता. त्याच्याकडे गेलो असताना त्याने या गावी नेले. या परिसरात तीन मुर्ती लोकांना सापडल्या. योग नरसिंहाची सिद्धासनातील मुर्ती, अर्धनारेश्वर मुर्ती आणि तिसरी ही सरस्वतीची उभी मुर्ती.
अशा मुर्तीला स्थानक मुर्ती असे संबोधतात. (बसलेल्या मुर्तीला आसनस्थ मुर्ती म्हणतात) हीच्या वरील उजव्या हातात फासा आहे, खालील उजव्या हातात अक्षयमाला असून हा हात वरदमुद्रेत आहे. वरच्या डाव्या हातात एकतारी वीणा आहे, खालच्या डाव्या हातात पुस्तक आहे. तीच्या गळ्यातील हातातील कमरेवरील दागीन्यांचा मणी न मणी मोजता यावा इतके हे कोरीवकाम अप्रतिम आहे. डाव्या बाजूला खाली मोत्याची माळ तोंडात घेतलेला हंस आहे. खाली अंजली मुद्रेतील भक्त/सेवक उजव्या बाजूला तर डाव्या बाजूला चामरधारीणी दिसते आहे. शिल्पकलेचा अप्रतिम नमुना म्हणून या मुर्तीचा गौरव डाॅ. देगलुरकरांनी आपल्या पुस्तकात केला आहे. अशा मुर्ती घडवण्यासाठी गंडकी म्हणजेच नर्मदा नदितील शिळांचा वापर केला जातो.
ही मुर्ती कुठल्या भव्य सुप्रसिद्ध मंदिरातील नाही. एका साध्या गावात गावकर्यांनी निष्ठेने या मुर्ती छोट्या जागेत जतन करून ठेवल्या आहेत. खरं तर या सुंदर मुर्तीसाठी मोठं शिल्पकामयुक्त दगडी मंदिर उभं करायला पाहिजे.
गेली ९ दिवस विविध मुर्तींवर लिहीलं. या मालिकेतील हे शेवटचं टिपण. स्त्री रूपातील या विविध शक्तींना मनोमन नमन. (छायाचित्र सौजन्य श्रीकृष्ण उमरीकर)

मुर्ती मालिका -१


 

जय देव जय देव जय व्यंकटेशा

ही सुंदर बालाजी मूर्ती मला आज सकाळीच सई चपळगावकर हिने पाठवली. त्यांच्या घराण्याची ही कुलदेवता आहे. कर्नाटका सीमेवर चपळगावकर ह्यांचे मूळ गाव आहे. वैष्णव कुटुंबात बालाजी कुलदैवत असते. विष्णूची नेमकी कोणती मूर्ती बालाजी व्यंकटेश ह्या नावाने संबोधली जाते? तर उजव्या वरील हातात चक्र वरील डाव्या हातात शंख, खालील उजवा हात वरद मुद्रेत आणि खालील दावा हात कटीवर. पुरीचा जग्गनाथ, तिरुपतीचा बालाजी आणि पंढरपूरचा विठ्ठल ही तीन मुळचे लोक दैवते. जग्गनाथ "अन्न ब्रह्म", बालाजी "कांचन ब्रह्म" आणि विठ्ठल "नाद ब्रह्म" म्हणून ओळखले जातात. व्यंकटेश बालाजीची आतिशय सुंदर आरती समर्थ रामदास यांनी रचिली आहे. ती बऱ्याच जणांना माहित नाही. इथे देत आहे. रा. चिं. ढेरे यांनी "श्रीव्यंकटेश्वर आणि श्रीकालहस्तीश्वर" या आपल्या पुस्तकात दिली आहे. देवीचे नवरात्र असतात त्याच वेळी बालाजीचे ही नवरात्र असतात. त्याला ब्रह्मोत्सव म्हटले जाते. बालाजी आणि पद्ममावती विवाह सोहळाही ह्या काळात लावले जाते.
जय देव जय देव जय व्यंकटेशा
आरती ओवाळू तुज रे जगदीशा ॥ धृ०||
अघहरणी पुष्करिणी अगणित गुणखाणी ।
अगाध महिमा स्तवितां न बोलवे वाणी ॥
असंख्य तीर्थावळी अचपळ सुखदानी ।
अभिनव रचना पहातां तन्मयता नयनीं ॥ १ ||
अतिसुखमय देवालय, आलय मोक्षाचे ।
नाना नाटक रचना, हाटक वर्णाचे ॥
थकित मानस पाहे स्थळ भगवंताचे ।
तुळणा नाही हे भू-वैकुंठ साचे ॥ २ ||
दिव्यांबरधर सुंदर तनु कोमल लीळा ।
नाना रत्ने, नाना सुमनांच्या माळा ॥
नानाभूषणमंडित वामांगी बाळा ।
नाना वाद्ये मिनला दासांचा मेळा ॥ ३||

औंढा नागनाथ मंदिरात काचेत ठेवलेली ही विष्णुमुर्ती शिल्पकलेचा अत्युच्च नमुना मानली जाते. या मुर्तीला केशव हे नाव दिलेले आहे. उजव्या खालच्या हातात पद्म, उजव्या वरच्या हातात शंख, डाव्या वरच्या हातात चक्र व खालच्या हातात गदा आहे. मुर्तीवर इतके बारीक कोरीवकाम आहे की बोटावरचे नखंही दिसतात. मराठवाड्यात सापडलेल्या बहूतांश विष्णु मुर्ती केशवराज मुर्ती अशाच प्रकारातील आहेत. या रूपातील विष्णुची जी शक्ती आहे तीला किर्ती" या नावाने संबोधले जाते. मागच्या प्रभावळीत दशावतार कोरलेले आढळून येतात. १९७२ च्या दूष्काळात रोजगार हमी योजनेत तळ्याचा गाळ काढत असताना ही मुर्ती सापडली. ही मुर्ती गर्भगृहा जवळ ठेवलेली आहे. तिथून काढून मंदिर आवारतच पण बाहेर ठेवावी. जेणेकरून शिल्प अभ्यासकांना नीटपणे पहाता येईल. तसेही आत गर्दी करणारे आंधळे भाविक इकडे पहातच नाहीत. आणि ज्यांना पहायची आहे त्यांना धक्कीबुक्की गर्दीत पहाताही येत नाही. (छायाचित्र सौजन्य अमर रेड्डी)


राजस सुकूमार असा विठ्ठल
तुकाराम महाराजांनी "राजस सुकुमार मदनाचा पुतळा" अशी ओळ ज्याच्याकडे पाहूनच लिहिली असावी अशी ही सुंदर विठ्ठल मुर्ती. सिंधुरवदन गणेशामुळे सर्व परिचित असलेल्या खाम नदीकाठच्या शेंदूरवादा (ता. गंगापुर, जि. औरंगाबाद) या गावात एका छोट्या लाकडी माळवदाच्या वाडा वजा मंदिरात ही मुर्ती ठेवलेली आहे. शिवकालीन संत मध्वमुनीश्वरांचे हे ठिकाण. इथे त्यांची समाधी आहे. जहागीरदार कुटूंबियांनी मध्वमुनीश्वरांचा आश्रम नक्षीदार कमानी दगडी ओवर्या असा भव्य बांधुन काढला आहे.
मध्वमुनीश्वर नियमित पंढरपुरची वारी करायचे. शरिर थकल्यावर त्यांनी विठ्ठलाला पत्र लिहिलं आणि येणं शक्य नाही असं म्हणत इथूनच नमस्कार केला. मग विठ्ठलाने त्यांना दृष्टांत देवून मीच तूझ्याकडे येतो असं सांगितले. तीच ही विठ्ठल मुर्ती. दरवर्षी मध्वमुनीश्वरांचा उत्सव साजरा होतो तेंव्हा ही मुर्ती मिरवणुकीने मध्वमुशीश्वर आश्रमात नेली जाते.
समचरण कर कटीवर ठेवलेले अशी ही काळ्या पाषाणातील देखणी मुर्ती. याच मंदिरात गरूडाचीही छोटी मुर्ती आहे. विठ्ठलाच्या प्राचीन सुबक देखण्या मुर्ती फार थोड्या आहेत. आणि ज्या आहेत त्या काहीश्या ओबडधोबड. शिवाय प्राचीन अशी विठ्ठलाची मंदिरेही फारशी नाहीत. पंढरपुर शिवाय पानगांव (ता. रेणापुर जि. लातुर) हाच एक ठळक अपवाद. हे प्राचीन विठ्ठल मंदिर शिल्प सौंदर्याने नटलेले आहे.
विठ्ठलाची मुर्ती एकटीच असते. सोबत रूक्मिणी नसते. अगदी पंढरपुरलाही रूक्मिणी मंदिर वेगळे आहे. यावर अरूण कोलटकर यांची वामांगी नावाची अप्रतिम कविता आहे. नंतरच्या काळात विठ्ठल रूक्मिणी यांच्या मुर्ती एकत्र तयार केल्या जायला लागल्या. या विठ्ठल मुर्तीचे पाय अतिशय देखणे आहेत. "पायावर डोकं ठेवणं" याला वारकरी संप्रदायात वेगळे महत्व आहे.
ही देखणी दूर्मिळ विठ्ठलमुर्ती जरूर पहा. या गावावर एक छोटा video आम्ही केला आहे. यावर लेखही मी माझ्या blog वर टाकला आहे. जरूर पहा. (छायाचित्र सचिन जोशी शेंदूरवादा)
(फेसबुकवर विविध मुर्तींवर रोज लिहीतो आहे. हे लिखाण म्हणजे छोटे टीपण असते. अशा तीन चार मुर्तींवरचे लिखाण एकत्र करून ते या लेखमालिकेत देत आहेत. नवरात्रीत रोज एक मुर्तीवर लिहीले होते. त्यांचे एकत्रीकरण करून नवदुर्गा 9 दिवस 9 मुर्ती हा लेख तयार केला होता. तो पण ब्लॉगवर टाकला आहे.) श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

मुर्ती मालिका -२


शेंदूर्णीचा त्रिविक्रम विष्णु

वामनाने तीन पावलांत स्वर्ग पृथ्वी पाताळ जिंकून घेतले या रूपाला त्रिविक्रम विष्णु म्हटलं जातं. सहसा केशवराज विष्णु या रूपातील मुर्ती जास्त आढळून येतात (पद्म, शंख, चक्र, गदा असा शस्त्र क्रम). त्रिविक्रम रूपातील मुर्तीच्या हातातील शस्त्र क्रम पद्म, गदा, चक्र आणि शंख असा असतो (डावीकडून उजवीकडे). अशी ही त्रिविक्रम विष्णु मुर्ती शेंदूर्णी (ता. जामनेर, जि.जळगांव) येथे आहे. या विष्णुच्या शक्तीला क्रिया असे म्हणतात. सोयगांव पासून हे गांव अतिशय जवळ आहे. या मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे बाजूची प्रभावळ ही जवळपास मुर्ती इतकीच आहे. एरव्ही प्रभावळीवर कोरलेले दशावतार फार लहान असतात. पण इथे मुर्तीच्या सोबत जणू सर्व विश्वच कोरले आहे. आणि त्याचे कारणही परत तीन पावलांत जग व्यापणारा त्रिविक्रम दाखवायचा आहे.
Jitendra Vispute
आणि
Sudhir Mahajan
या मित्रांमी ही मुर्ती माझ्या निदर्शनास आणून दिली. त्यांचे धन्यवाद. कुणाकडे त्रिविक्रम विष्णु मुर्तीचे अजून स्षष्ट फोटो असतील तर जरूर टाका. जेणेकरून प्रभावळीवरील मुर्ती वाचता येतील. ही मुर्ती अगदी उकिरड्यात पडलेली होती. शेंदूर्णीच्या एका सत्पुरूषाला दृष्टांत झाला. उकिरडा उकरला गेला आणि ही पाच फुटी भव्य मुर्ती सापडली.
येथे आषाढी एकादशीला व कार्तिकी एकादशीला त्रिविक्रमाची मोठी यात्रा भरते.आषाढी एकादशीला पंढरपूरचा विठ्ठल शेंदुर्णीला त्रिविक्रमाच्या मंदिरात आलेला असतो अशी श्रद्धा आहे. शेंदुर्णीच्या ज्या सत्पुरूला त्रिविक्रमाच्या मूर्तीचा साक्षात्कार झाला ते सत्पुरूष कडोबा महाराज. त्यांचे शेंदुर्णीला मोठे मंदिर आहे. यात्रेकरू त्रिविक्रमांच्या दर्शना सोबतच कडोबा महाराजांचे ही श्रध्देने दर्शन घेतात. (लेखक मित्र रविंद्र पांढरे यांनी दिलेली माहिती).
या दंत कथेतला खरेखोटेपणा आपण बाजूला ठेवू. पण गावकर्यांनी भव्य मंदिर उभारून या अप्रतिम मुर्तीची जोपासना केली हे महत्वाचे. ग्रामीण पर्यटन वाढवायचे तर अशी ठिकाणं लोकांपर्यंत समोर आणली पाहिजेत. तिथपर्यंत किमान चांगले रस्ते बनवले पाहिजेत.



उग्र नरसिंह
हळेबीडू येथील होयसळेश्वर मंदिरावर बाह्य भागात ही आसनस्थ मुर्ती दिसली आणि माझे पाय खिळले. नरसिंहाची हिरण्यकश्यपुचे पोट फाडतानाची मुद्रा सर्वत्र आढळते. पण या ठिकाणी हिरण्यकश्यपुच्या पोटातील आतडे बाहेर काढून त्याची कलात्मक नक्षी दाखवली आहे ती पाहून मी चकित झालो. तिथे आलेल्या एका जर्मन अभ्यासकाने मला हेही सांगितले की या आतड्याची लांबी त्या आकाराच्या माणसाच्या आतड्या इतकीच शिल्पात दाखवली आहे. माझ्या जवळ मोजायची काही साधने नव्हती. पण ८०० वर्षांपूर्वी एका शिल्पकाराला मानवी शरिरशास्त्राची पोटातील अवयवांसह पूर्ण माहिती होती आणि ती तो कलात्मक पातळीवर दाखवून देवू शकत होता हे थक्क करणारे आहे. ही आतड्याची माळ डाव्या बाजूची पूर्ण आहे. उजव्या बाजूला तुटलेली दिसते आहे.
हा नरसिंह आठ हातांचा आहे. चार हातात विष्णुची आयुधं (शंख चक्र गदा इ. दिसत आहेत) दोन हातांनी हिरण्यकश्यपुचा पाय आणि डोके पकडले आहे. आणि बाकी दोन हातांनी नखाच्या सहाय्याने पोट फाडलेले दिसत आहे.
वरील मुर्ती उग्र नरसिंह अथवा विदारण नरसिंह म्हणून ओळखली जाते. नरसिंहाच्या अजून दोन मुर्ती प्रचलीत आहेत. योगमुद्रेतील शांत सौम्य मुर्तीला योग नरसिंह म्हणतात. तिसरी मुर्ती लक्ष्मी बरोबरची तिला लक्ष्मी नरसिंह किंवा भोग नरसिंह असे म्हणतात,
नरसिंहाची जी प्राचीन मंदिरे आहेत त्यात गोदावरी काठी नांदेड जिल्ह्यात राहेर येथे आहे (बाकी बहूतांश मंदिरे तुलनेने अलीकडच्या काळातील आहेत).
नांदेड परभणी परिसरात या तीन प्रकारच्या नरसिंहाला बोली भाषेत आग्या नरसिंह, योग्या नरसिंह आणि भोग्या नरसिंह अशी नेमकी अनुप्रास जुळणारी नावे आहेत.
प्रत्यक्ष मंदिरं कमी असली तरी बहूतांश विष्णु मंदिरांवर उग्र नरसिंहाचे शिल्प बाह्य भागात, देवकोष्टकात आढळून येते.



योग नरसिंह
काल उग्र नरसिंहाच्या मुर्तीवर लिहिले होते. आज ही दूसरी अप्रतिम शिल्पकामाचा नमुना असलेली "योग" नरसिंह मुर्ती आहे. औंढा नागनाथ जवळ राजापुर इथे ज्या तीन मुर्ती आहेत त्यातील ही दूसरी (सरस्वतीच्या मुर्तीबाबत पूर्वी लिहीलं आहे). अर्ध सिद्धासनातील हा नरसिंह असून चेहरा सौम्य आहे. योग नरसिंह मुर्तीला योगपट्टा असतो. तो इथे दिसत नाही. हंपी येथील प्रसिद्ध जी मुर्ती आहे तिला योगपट्टा स्पष्ट आणि मोठा दिसून येतो. ही मुर्ती साडेतीन फुटाची आहे.
अर्ध सिद्धासनातील नृसिंह मुर्ती फारच थोड्या आहेत. हा नरसिंह दोनच हातांचा आहे त्यामुळे पण याचे वेगळेपण दिसून येते (पैठण येथे १४ हातांची विदारण नृसिंह मुर्ती आहे). राजापुर येथील तिन्ही मुर्ती त्यांच्या विलक्षण शिल्पसौंदर्याने अभ्यासकांना चकित करतात. या मुर्तींचा कालखंड १३ व्या शतकापर्यंत मागे जातो. विष्णुच्या याच अवतारातील मंदिरे ११ व्या ते १४ व्या शतकात जास्त आढळून आली आहेत. बाकी विष्णु अवताराची मंदिरे जवळपास नाहीतच. (फोटो सौजन्य हरिहर भोपी, औंढा)

मुर्ती मालिका -३


१४ हातांचा विदारण नरसिंह

नरसिंह रूपातील विविध मुर्ती प्रचलीत आहेत. त्यातील विदारण्य म्हणजेच उग्र नरसिंह मुर्तीला चार, सहा, आठ हात दाखवले जातात. पण पैठण येथील ही मुर्ती सगळ्यांत वेगळी यासाठी आहे की तिला सगळ्यात जास्त म्हणजे १४ हात दाखवले आहेत. उजव्या बाजूला खङग, अंकुश, पद्म, बाण, चक्र दिसून येतात. तर डाव्या बाजूला खेटक (ढाल), फासा, गदा, खङग, शंख दिसून येतात. दोन हात हिरण्यकश्यपुचा पाय आणि डोकं धरून ठेवत आहेत. तर दोन हात त्याचे पोट फाडत आहेत.
ज्या आसनात नरसिंह बसलेला आहे त्याला वामललितासन म्हणतात. (उजवा पाय वर घेतलेला, डावा पाय जमिनीवर)
या मुर्तीकारापुढे आवाहन होते ते १४ हातांचा तोल राखत मुर्ती प्रमाणबद्ध ठेवणे. शिवाय विविध आयुधे स्पष्टपणे शिल्पांकीत करणे. चार फुटाच्या या मुर्तीत ही किमया कलात्मक रित्या साधल्या गेली आहे. हिरण्य कश्यपुच्या हातातही शस्त्र आहेत. तोही राजा असल्याने त्याला मुकुट दाखवला आहे. नरसिंहाची आयाळही दागिन्या सारखी गळ्याभोवती शोभून दिसते आहे. कलात्मक दृष्ट्या या मुर्तीचे मोल खुप मोठे आहे.
(फोटो सौजन्य
Sudhir Mahajan
, मुर्तीची माहिती सचिन देव या अभियांत्रिकीच्या मित्राने पुरवली. या मुर्तीचे पुजारीपण त्याच्या घराण्यात आहे. डाॅ. गो.ब. देगलूरकरांनी या मुर्तीचे सविस्तर सुरेख विश्लेषण आपल्या पुस्तकात केले आहे)



हरी—हर जूळ्या मुर्ती (वडगल्ली, परभणी)
विविध मुर्तींवर लिहीतो आहे. पण माझ्या अगदी घराजवळ (नानलपेठ, परभणी) माझ्या आजोळच्या वडगल्लीत इतकी अप्रतिम शिल्पं आहेत याची जाणीवच झाली नाही. या मुर्तींजवळ आम्ही नियमित खेळलो आहोत. बहुतांश भाविक गाभार्यातील महादेवाच्या पिंडीला आणि हनुमानाला फुलं वहायचे. या मुर्ती बिचार्या एकट्याच आहेत म्हणून त्यांना मी आवर्जून फुल वहायचो. विविध तज्ज्ञांची पुस्तकं चाळताना आता लक्षात येतंय या मुर्तींचे महत्व आणि वैशिष्ट्य.
फोटोत उजव्या बाजूची मुर्ती केशव विष्णुची आहे. औंढ्याच्या अशाच मुर्तीवर याच सदरात लिहिले आहे. डावीकडची मुर्ती "केवल शिव" या नावाने ओळखली जाते. या शिवाच्या वरच्या उजव्या हातात त्रिशुळ आहे. त्याचा दंडच शिल्लक आहे. खालचा उजवा हात वरद मुद्रेत आहे. त्या हातात अक्षय माला आहे. वरच्या डाव्या हातात सर्प आहे. खालच्या डाव्या हातात बीजपुरक आहे. जास्त बीज असलेलं फळासारखं दिसणारं हे सृजनाचे प्रतिक मानलं जातं. संहारक मानल्या जाणार्या शिवाच्या हातात सृजनाचे प्रतिक हे वेगळेपण आहे. समभंग अवस्थेत उभ्या शिवाच्या चेहर्यावर शांत भाव आहेत. औंढा नागनाथ मंदिरावर अशा सहा मुर्ती बाह्य भागात कोरलेल्या आहेत. मुर्तीच्या पायाशी नंदी आहे पण त्याचे मुख तुटले आहे. माणकेश्वर मंदिरावर पण केवल शिवाचे सुरेख शिल्प आहे.
जबरेश्वर महादेव मंदिरात नंदीच्या पाठीमागे या दोन मुर्ती कोनाड्यात ठेवलेल्या आहेत. मंदिर संपूर्ण नविन झालं आहे. पूर्वी मंदिरा समोर बारव होती ती आता बुजवल्या गेली. या दोन मुर्ती मुळ मुख्य मंदिरात कुठे बसवलेल्या असतील हे आता कळत नाही पण त्यांच्या एकसारख्या शैलीमुळे अगदी आजूबाजूला असतील हे सहज लक्षात येतं. जी महादेवाची पिंड आता गाभार्यात आहे ती स्वयंभु असून मंदिराची दूरूस्ती ६० वर्षांपूर्वी झाली तेंव्हा पिंड काढताच आली नाही. प्रचंड मोठ्या शिळेचा ती भाग होती. मग तिच्यावर आच्छादन टाकुनच दूरुस्ती केल्या गेली अशी लहानपणीची आठवण आई सांगते (आईचा जन्म १९४९). गाभार्यात हनुमानाची स्थापना भिंतीवर केली आहे. पण ही मुळ मुर्ती नसणार. मुळात हे जबरेश्वर (शिव) आणि जगदीश्वर (विष्णु) असे मंदिर असेल का? कारण या मुर्ती मंदिराच्या बाह्य भागातील वाटत नाही.


अप्रतिम अतुलनीय अर्धनारीश्वर (राजापुर, जि. हिंगोली)
औंढा नागनाथ जवळ राजापुर येथे तीन मुर्ती आहेत. यातील सरस्वती आणि योग नरसिंह यावर याच मालिकेत लिहीलं आहे. तिसरी अप्रतिम मुर्ती आहे अर्धनारीश्वराची. शिव पार्वतीची संयुक्त मुर्ती. उजव्या बाजुला शिव आहे आणि डावीकडे पार्वती. पत्नी ही नेहमी डाव्या बाजूला दाखवली जाते म्हणूनच वामांगी असा शब्द आला आहे.
या शिल्पकाराचे कसब अगदी एक एक जागी आढळते. पार्वतीचा मुकुट सजलेला (करंडमुकुट) आणि शिवाचा मुकुट जटांचा. तिच्या कानात सुंदर नाजूक कुंडले तर शिवाच्या कानात सर्पाकार कुंडले. पार्वतीला हातभर काकणं, तोडे. बाजुबंद, खालच्या हातात नाजुकपणे धरलेला कमंडलू. कमरेला मेखला. कमाल म्हणजे तिच्या वस्त्रांवरची नक्षीही दाखवलेली आहे. पायात तोडे तर आहेतच पण अंगठ्या जवळच्या बोटात जोडवे पण आहेत. वरच्या हातात आरसा आहे.
शिवाच्या वरच्या हातात त्रिशुळ आहे. खालच्या हातात अक्षयमाळा आहे. बाजुबंद सर्पाकार राकट आहे. पायात रूंडमाळा दिसतात, पण हीच माळ पार्वतीच्या बाजूने नाजूक दागिना बनते. गळ्यातील माळेचेही असेच. शिवाच्या बाजूने सरळ ठाशीव दिसणारी माळ पार्वतीच्या स्तनांवरून वळण घेत कलात्मक डौलदार बनते. तिचे वार्यावर उडणारे वस्त्र आणि शिवाचे जाडे भरडे वस्त्र.
खाली शिवाचे वाहन नंदी आहे आणि पार्वतीचे सिंह न दाखवता लोध (मुंगुस किंवा घोरपड) दाखवले आहे.
महाराष्ट्रात अर्धनारीश्वराच्या मुर्ती फार थोड्या आहेत. ज्या आहेत त्या मंदिराच्या बाह्य भागावर कोरलेल्या आढळून येतात. मुख्य मुर्ती म्हणून कोरलेवी हाच एकमेव अप्रतिम नमुना. (फोटो सौजन्य विजय कांबळे हिंगोली राजापुर)

मुर्ती मालिका -४


अनंतशयन विष्णु

पैठणच्या नृसिंह मंदिरातील ही देखणी मुर्ती. शेषशय्येवर विष्णु पहूडले आहेत. झोपले हा शब्द आपण चुकीने वापरतो, उजवा वरचा हात माने खाली घेतल्याने मान उंचावली आहे. ही अगदी नैसर्गिक सहज अशी अवस्था शिल्पकाराने रेखली आहे. नाभीतून निघालेल्या कमळावर ब्रह्मदेव विराजमान आहेत. लक्ष्मी उजवा पाय चेपत आहे. डावा पाय घडी करून कासवाच्या पाठीवर टेकवला आहे. मुर्तीच्या पाठशिळेवर नक्षीत दहा अवतार कोरलेले आहे. शेषाचा फणा बरोबर चेहर्याला मध्यभागी कल्पुन समतोल साधत शिल्पांकीत केलेला दिसतो.
ही मुद्रा विश्वनिर्मितीचे प्रतिक मानली जाते. आपल्यातून सर्व विश्व निर्माण करून त्याकडे कौतूकभरल्या नजरेने भगवान पहात आहेत. पद्मनाभ विष्णुची जी शक्ती आहे तीला श्रद्धा म्हणतात. जगाची निर्मिती ही श्रद्धेतून झाली असंही मानलं जातं. लक्ष्मीच्या बाजूला हात जोडल्या अवस्थेत गरूड आहे.
सप्त फण्यांच्या शेषाच्या ९ वेटोळ्यांवर भगवान पहूडले आहेत. या सर्पाची त्वचा हूबेहूब खालच्या वेटोळ्यांवर दाखवत शिल्पकाराने कमाल केली आहे. (फोटो सौजन्य सुधीर महाजन)



वेळापुरची अप्रतिम हर गौरी मुर्ती (शिवपार्वती)
शिवाची पूजा मुर्ती रूपात कुठेच केली जात नाही. पण वेळापुर (ता. माळशिरस, जि. सोलापुर) हे एकमेव मंदिर आहे जिथे शिव मुर्तीरूपात पार्वती सोबत पुजला जातो. स्थानिक चुकीने या मुर्तीला अर्धनारी नटेश्वर या नावाने संबोधतात. प्रत्यक्षात ही एक मुर्ती नसून उमा महेश्वराची संयुक्त मुर्ती आहे.
यादवांच्या काळातील १३ व्या शतकातील हे प्राचीन मंदिर. महादेवाच्या शाळुंकेवर पिंड असावी तशी ही मुर्ती शिल्पांकित केली आहे.
शिवाच्या उजव्या वरच्या हातात त्रिशुळ आहे. खालचा हात वरद मुद्रेत असून हातात अक्षयमाला आहे. डाव्या वरच्या हातात नागफणा असून हा हात पार्वतीच्या केसांच्या पाठीमागे आहे. खालचा डावा हात पार्वतीच्या कंबरेवर आहे. शिवाच्या जटामुकूटावर चंद्र सुर्य कोरलेले आहेत.
पार्वतीचा उजवा हात शिवाच्या खांद्यावर आहे. दूसर्या हातात फासा आहे.
शिवाचा जटामुकूट तर पार्वतीचा मराठमोळा शोभणारा अंबाडा प्रभावळी सारखा डोक्या मागे कोरलेला आहे. अंबाजोगाई, निलंगा येथील उमा महेश्वर मुर्तीत पार्वतीचा केशसंभार असाच दर्शविला आहे. पार्वतीच्या उजव्या पायाची बोटं दूमडलेली दिसत असून बोटात जोडवं घातलेलं दिसून यावं इतकी बारीक कलाकुसर आहे. याच पायाच्या तळव्यावर चक्र कोरलेलं आहे. पार्वतीच्या खाली गणेश असून शिवाच्या बाजूने खाली नंदी आहे.
मागची प्रभावळ अतिशय कोरीव असून त्यावर अष्ट दिकपाल कोरलेले आहेत. (आठ दिशांच्या आठ देवता असतात. पूर्व-इंद्र, पश्चिम-वरूण, दक्षिण-यम, उत्तर-कुबेर, आग्नेय-अग्नी, नैऋत्य-निऋती, वायव्य-वायु, ईशान्य-ईशान) विष्णु आणि ब्रह्मदेवाच्या मुर्तीही प्रभावळीवर आहेत. मध्यभागी किर्तीमुख आहे.
एकप्रकारे पंचमहाभुतांसह सर्व प्रमुख देवता कोरून सगळे विश्वच मुर्ती रूपात मांडले आहे. याचीही वेगळी दखल घ्यावी लागेल.
उमा महेश्वर मुर्तीत पार्वतीही शिवाच्या खांद्यावर हात ठेवलेली दाखली जाते हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. खांद्यावरचा हात बरोबरीचे मैत्रिचे नाते सुचवतो.
Shrikant Borwankar
ने फार छान शिर्षक सुचवले "ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा". आरतीमधील या ओळी याच मुर्तीकडे पाहून लिहिल्या गेल्या असाव्यात.
Ashutosh Bapat
सर तूमच्यामुळे आज या मुर्तीवर लिहिलं. पार्वतीच्या पायाशी घोरपड तसल्याने तिला गौरी असे संबोधतात. असा खुलासा सायली पलांडे दातार यांनी केला आहे.
Saili Palande-Datar
(फोटो सौजन्य अर्धनारी नटेश्वर संस्थान, वेळापुर).
या अप्रतिम दूर्मिळ अशा मुर्तीला मंदिराला जरूर भेट द्या.



हम्पी येथील भव्य योग नरसिंह
हम्पी या पुरातन राजधानीची खुण दाखवणार्या दोन मुख्य गोष्टी आहेत. एक आहे विजय विठ्ठल मंदिर आणि दूसरी आहे ही अति भव्य नरसिंह मुर्ती. नॅशनल बुक ट्रस्टनी विजय नगरवर जे पुस्तक प्रकाशीत केलं त्याच्या मुखपृष्ठावर हाच नरसिंह आहे.
विजयनगर साम्राज्यातील या दोन्ही देवता महाराष्ट्रासाठी आस्थेचा विषय आहेत.
या नरसिंह मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची भव्यता. प्रत्यक्ष मुर्ती इतकी भव्य तर ते मंदिर केवढे असेल? एकसंध दगडात मुर्ती सोबतच मागचा भव्य शेषही कोरलेला आहे. खालच्या आसना सगट या मुर्तीची उंची २५ फुट इतकी आहे. योग मुद्रेतील या नरसिंहाच्या पायात योगपट्टा आहे. याच्या डाव्या मांडीवर लक्ष्मीचीही अतिशय देखणी मुर्ती होती. पण ती आता नाही. मुर्तीचे हातही खंडित झाले आहेत. शेषशायी विष्णुच्या माथ्यावर जसा ७ फण्याचा नाग असतो तो तसा इथेही दिसतो आहे. माथ्यावरचा मुकूट विजयनगर साम्राज्याचे वैशिष्ट्य दर्शविणारा आहे. नरसिंहाची ही सगळ्यात भव्य अशी मुर्ती समजली जाते.
याचं एक अतिशय वेगळेपण म्हणजे समोर उभं राहून चेहर्याकडे आपण बघत राहिलो तर हळु हळु इतर सर्व गोष्टी दिसेनाश्या होतात. हे उग्र सिंहमुख किंचित हसून आपल्याकडे मायाळुपणे पाहते आहे असा भास होतो. दूष्ट शक्तींचा नाश करणारा मी सज्जनांच्या पाठिशी आहे आहे असा विश्वास हा नरसिंह आपल्याला देतो. मुर्तीकडे पाठ फिरवून आपण परतत असताना एकदा तरी मागे वळून पाहण्याचा मोह होतोच. मागे वळल्यावर मुर्ती परत आपल्याला बोलावते आहे असे जाणवते.
सध्या मुर्ती भोवतीची जी दगडी रचना आहे ती बाजूला करून मुर्ती खुली केल्यास तिची भव्यता अजून जाणवेल. (फोटो मी स्वत: काढलेला आहे. विजय नगर साम्राज्या बद्दल भरपुर माहिती उपलब्ध आहे. त्यावर परत वेगळं लिहित नाही.)
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद. 9422878575

मूती मालिका -५


भक्ताची भव्य मूर्ती (औंढा नागनाथ, जि.हिंगोली)

देवदेवतांच्या कलात्मक आणि भव्य मूर्ती आपण पाहतो पण सामान्य भक्ताची मूर्ती आणि तिही इतकी भव्य? हे आश्चर्य औंढा नागनाथ येथील मंदिरावर आढळून येतं. मूर्तीची भव्यता लक्षात यावी म्हणून मी हा पाठभिंतीचा पूर्णच फोटो मुद्दाम दिला आहे. दोन्ही हात जोडलेले, पद्मासनात बसलेली, चेहर्यावर शांत भाव असलेली, कुठलेच अलंकरण नसलेली ही मानवी मूर्ती लक्ष वेधून घेते. औंढ्याचं मंदिर पश्चिमाभिमुख आहे. त्याबद्दल सांगताना संत नामदेवांना मंदिरात प्रवेश करू दिला नाही, मग त्यांनी आपल्या भक्तीच्या शक्तीने देवालाच बदलण्यास भाग पाडले, आणि मंदिर फिरून पश्चिमेला आले. यातला खरेखोटेपणा माहित नाही कारण ही दंतकथा आहे. पण पूर्वेला एका भक्ताची भव्य मूर्ती मंदिरावर कोरून भक्तीची महती किती याचा पुरावाच इथे आढळतो.
गर्भगृहाच्या पाठभिंतीवर ही मूर्ती पूर्वेला तोंड करून विराजमान आहे. अशाच अजून दोन मूर्ती दक्षिण आणि उत्तरेला गाभार्याच्या बाह्यांगावर आहेत. दीड मिटर बाय दीड मिटर इतक्या भव्य कोनाड्यात या मूर्ती आहेत. मुर्तीच्या बाजूला छत्रचामर धारिणी आहेत. मुर्तीच्या माथ्यावर साधी टोपी आहे. त्यावर चंद्रासारखी आकृती कोरलेली आहे.
मंदिराला प्रदक्षिणा घालून आपण मागे या मूर्तीच्या समोर दगडी पायर्यांवर बसूलो तर एक वेगळाच अनुभव येतो. भक्तीतून येणारी शांत समाधानाची भावना मनात जागी येते. आपण मूर्तीसमोर हात जोडतो पण इथे मूर्तीच आपल्या समोर हात जोडते आहे, आपल्यातले पावित्र्य देवत्व जागवते आहे असे काही विलक्षण जाणवते. देवदर्शन करून घाईघाईत निघून जाणार्या अंधभक्तांचे काही सांगता येत नाही पण खरा भक्त, रसिक, शिल्पप्रेमी या मूर्तीच्या प्रेमात पडून समोरच्या दगडी पायर्यांवर बसून राहतो हे निश्चित.
तज्ज्ञांनी यावर अजूनही सविस्तर कुठे काही लिहीलं नाही (three huge sculptures probably of devotee इतकाच उल्लेख गो.ब. देगलुरकरांच्या पुस्तकात आहे). या प्राचीन भव्य मंदिरावर सर्वात मोठ्या आकारात या मानवी मूर्ती कशासाठी कोरल्या गेल्या आहेत? का हा कुणा देवतेचाच प्रकार आहे? कुणाला याची माहिती असल्यास खुलासा करावा.
Vincent Pasmo
या फ्रेंच मित्राला या मूर्तीने फारच आकर्षीत केले. हा फोटो त्यानेच काढला आहे.

(ह्या मूर्तीबद्दल तज्ञ चर्चा करत आहेत. अजून ह्याचा खुलासा झाला नाही.)



लोलितपाद नटराज (लेणी क्र. २१, वेरूळ)
नटराजाची प्रतिमा जी आपल्या सतत डोळ्या समोर येते ती एक पाय वर उचललेली व एका पायावर शरिराचा सगळा भार तोलून धरणारी अशी असते. ही प्रतिमा तंजावरच्या मंदिरातली आहे. दहाव्या शतकातील. पण त्याच्या जवळपास ३०० वर्षे आधी नटराजाची प्रतिमा कोरल्या गेली आहे वेरूळला. २१ क्रमांकाची ही लेणी "रामेश्वर लेणी" नावाने ओळखली जाते. नटराजाचे हे सर्वात पुरातन कलात्मक आणि भव्य असे शिल्प आहे. या नटराजाला "लोलितपाद नटराज" म्हणतात. शिवाने व्याघ्रचर्म कटीस परिधान केले आहे. दोन्ही बाजूला वादक दिसून येतात. अंतराळात ब्रह्मा, विष्णु, इंद्र यांची शिल्पे आहेत. एक परिपूर्ण कलात्मक दृश्य अशी या शिल्पपटाची ओळख आहे. १४ व्या क्रमांकाच्या लेणीतही नटराज शिवाचे अप्रतिम शिल्प आहे.
गायन वादन नृत्य यांचे सगळ्यात जूने संदर्भ औरंगाबाद परिसरांतील लेण्यांत सापडतात हा पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. आम्रपालीचे एक विलक्षण शिल्प औरंगाबाद लेण्यात याही पूर्वीच्या काळात कोरलेले आहे.
महाराष्ट्राची सांगितिक कलात्मक अस्मिता या शिल्पाला मानले पाहिजे कारण हे तंजावरच्या आधीचे आहे अशी आग्रही भुमिका
Mahagami Gurukul
गुरूकुलाच्या संचालिका विख्यात ओडिसी/कथ्थक नृत्यांगना पार्वती दत्ता या मांडत असतात. वेरूळ लेण्यात नृत्य विषयक भरपुर मुद्रा आढळून येतात.
शार्ङगदेवाचा संगीत रत्नाकर हा ग्रंथही याच परिसरात देवगिरी किल्ल्यावर रचला गेला. तेव्हा ही भुमी कलेची भुमी आहे हे निश्चित. मराठवाडा परिसरांतील मंदिरांवर बाह्य भागात वादन, नृत्य करणारी सुरसुंदरींची शिल्पे अधिक आहेत. होट्टल येथे नृत्य गणेश आहे. जामखेडच्या (जि. जालना) खडकेश्वर महादेव मंदिरात लहान आकारात गायन वादन नृत्य करणार्या स्त्रीयांचे स्तंभ शिल्प आहे.
नटराज शिवाच्या विविध मुद्रा मराठवाड्यातील औंढा, उमरगा, माणकेश्वर, निलंगा येथील मंदिरांवर आहेत.
(हे शिल्प नटराज शिवाचे नसून नटेश शिवाचे आहे आसे तज्ञ सांगत आहेत. शिवाय हा लोलीत पद शिव नाही. यावर अजून प्रकाश पडला पाहिजे.)

(फोटो सौजन्य
Akvin Tourism sustainable travel in India
)



विजय विठ्ठल (हंपी, कर्नाटक)
कर्नाटकातील ही छोटी विठ्ठल मुर्ती मराठी माणसासाठी अस्मितेचे मोठे प्रतिक आहे. विजय नगरहून भानुदास महाराज (एकनाथांचे पणजोबा) यांनी विठ्ठल मुर्ती पंढरपुरला आणली अशी दंतकथा आहे. पण कर्नाटकांत हंपी येथे प्रचंड मोठे असे जे विजय विठ्ठल मंदिर आहे तिथे मात्र आता कुठलीच मुर्ती नाही. या मंदिर परिसरात जो अतिशय सुंदर दगडी रथ आहे त्यावर ही विठ्ठल मुर्ती कोरलेली मला आढळली. विठ्ठलाचा हा एक पुरावा. या रथाचे वैशिष्ट्य म्हणजे खाली जी चाकं दिसत आहेत ती संपूर्ण फिरत होती. लोक सारखं फिरवून नुकसान करायला लागले म्हणून दगड लावून चाकांना स्थिर केले आहे. विठ्ठल भोळ्या भक्तांचा साधाभोळा देव आहे असं म्हणतात. पण इथे मंदिराचे प्रचंड मोठे आवार पाहून विठ्ठलाची "श्रीमंती" डोळ्यात भरते. मराठी माणसांनी पंढरपुर सोबत हंपीच्या विठ्ठल मंदिराची यात्रा केली पाहिजे. आपल्या विठ्ठलाचे ऐश्वर्य डोळे भरून बघितलं पाहिजे. साध्या पालखीतून आपण दिंड्या घेवून पंढरपुरला जातो पण याच आपल्या विठ्ठलाचा रथ किती राजेशाही होता हे बघितलं पाहिजे.
पंचेवीस तीस फुटीं उंच सलग असे दगडी खांब आणि तसलेच आडवे बीम वापरून जी भव्यता हंपीच्या मंदिरांना आलेली आहे ती विलक्षण आहे. अन्यथा इतक्या लांबीचे दगड कुठल्या जुन्या मंदिरामध्ये वापरलेले आढळत नाहीत. मंदिरातला गरूड खांब, हा भव्य रथ विठ्ठल विष्णुचाच अवतार समजला जातो याचा पुरावा दाखवतो. रथयात्रा ही प्रामुख्याने वैष्णव देवतांची निघते. महाराष्ट्राने पालखी हा रथाला शोधलेला वेगळा वैशिष्ट्यपूर्ण पर्याय आहे का? याचाही शोध घेतला पाहिजे. विठ्ठल हे दैवतच मुळात सनातन धर्मातील एक क्रांती आहे असं जाणवतं. या दैवतेला वाहन नाही, हीच्या हातात शस्त्र नाही, ही दैवता कोप पावून कुणाला शाप देत नाही की वरदान देत नाही. पुंडलीकाने फेकलेल्या वीटेवर कटीवर हात ठेवून उभी आहे. त्यामुळे भजनात रमलेला तुळशी माळ घातलेल्या वारकर्याच्या भोळ्या भक्तीत बुडालेला विठ्ठलच आपल्याला जवळचा वाटतो. विजयनगरचा विजय विठ्ठल अंतराने आणि रूपानेही दूरचा भासतो. आपल्याला काळ्या पाषाणातील विठ्ठलाचे "सावळे सुंदर" रूप पहायची सवय. त्यामुळे हा विठ्ठल वेगळा वाटतो. कुठे संगमरवरी दगडांत कुणी विठ्ठलाची मुर्ती घडवली तर मला नाही वाटत ती मराठी माणसाला आपलिशी वाटेल म्हणून. बहिणाबाईंनी त्यामुळेच लिहून ठेवलंय
सोन्या रूप्यानं मढला
मारवाड्याचा बालाजी
शेतकर्याचा विठोबा
पाना फुलांतच राजी
रा.चिं. ढेरे सारख्या अभ्यासकाने मांडले की पुरीचा जग्गनाथ, तिरूपतीचा बालाजी आणि पंढरपुरचा विठोबा ही मुळची लोकदैवतं नंतर विष्णुचे अवतार म्हणून स्विकारली गेली. जग्गनाथ "अन्नब्रह्म", बालाजी "कांचनब्रह्म" तर विठ्ठल "नादब्रह्म" मानल्या जातो. तुळशीमाळ गळ्यात घातलेला विठ्ठल आर्तपणे आळवलेल्या भजनानेच संतुष्ट होतो.

श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

मूर्ती मालिका -६

 


रावणानुग्रह मूर्ती (औंढा, हळेबीडू)

डावीकडील शिल्प औंढ्याच्या नागनाथ मंदिरावरील आहे. या शिल्पाला "रावणानुग्रह" असे नाव डाॅ. देगलुरकरांच्या पुस्तकात आढळते. कैलास पर्वतावर शिव पार्वती बसलेले आहेत. शिवाच्या उजव्या वरच्या हातात त्रिशुळ आहे. डावा हात पार्वतीच्या कमरेवर आहे. पार्वतीचा उजवा हात शिवाच्या उजव्या खांद्यावर आहे. हा पर्वत रावणाने उचलून धरला आहे. रावण वज्रासनात बसलेला आहे. शिव सव्यललितासनात बसलेला आहे (उजवा पाय खाली सोडलेला, डाव्याची मांडी). पार्वती वामललितासनात (डावा पाय मोकळा, उजव्या पायाची मांडी) असून शिवाच्या मांडीवर बसलेली आहे.
असेच शिल्प वेरूळला कैलास लेण्यात आणि "सीता की नहानी" नावाने ओळखल्या जाणार्या २९ क्रमांकाच्या लेण्यातही आहे.
उजवीकडचे शिल्प हळेबीडूच्या होयसळेश्वर मंदिरावरचे आहे. इथे रावणाचे पाच तोंडं दिसत आहेत. शिव पार्वती ज्या कैलास पर्वतावर बसलेले आहेत त्या पर्वताचे बारकावे तिथले प्राणी पक्षी पशु यांच्यासह दाखवले आहेत. हे थक्क करणारे आहेत. एक बाय दोन फुटाच्या या छोट्या दगडी तूकड्यात इतके बारकावे कोरणे म्हणजे किती कौशल्याचे काम.
पर्वताच्या टोकावर बसलेले शिव पार्वती जे या चराचराचे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या उच्चासनावरून हे सहज सुचित होते. या मूर्तीचा अर्थ अभ्यासक वेगवेगळा लावतात. पण हळेबीडूच्या मूर्तीतून शिव पार्वती सोबतच प्रकृती आणि पुरूष असे म्हणता येईल. शिवाय रावणाने कितीही हलविण्याचा प्रयत्न केला तरी प्रकृती आणि पुरूष यांच्या मुळे हे चराचर व्यवस्थित चालू आहे असाही अर्थ लावता येतो. रावणाला पर्वत ओलांडायचा होता. पण शिव पार्वती त्यावर विलास करत होते. त्यामुळे कुणालाच तिथून जायची परवानगी नव्हती. रावणाला आपल्या शक्तीवर गर्व होता. त्याने पर्वतच हलवायला सुरवात केली. मग शिवाने त्याला जखडून ठेवले. मग रावणाने शिवाची तपस्या केली व अनुग्रह मागितला. अशी काहीशी पुराणकथा सांगितली जाते. यावर कुणाला काही माहिती असेल तर प्रकाश टाकावा.

महाराष्ट्र हा उत्तर चालूक्यांच्या अधिपत्या खाली होता. अकराव्या बाराव्या शतकांतील बर्याच मंदिरांच्या शैलीवर उत्तर चालूक्यांचा प्रभाव जाणवतो. मराठवाड्यातील बरेच प्राचीन शिलालेख कानडीतले आहेत.
मंदिरांवरचे असे शिल्पामधले बारकावे आपण पहातच नाहीत. घाईघाईने मंदिराला प्रदक्षिणा घालून निघून जातो. अशा कृतीतून आपण अप्रतिम अशा शिल्प सौंदर्यालाच "बायपास" करून निघून जातो. अनाम कलाकाराने मोठ्या मेहनतीने आयुष्य खर्च करून घडवलेली ही सौंदर्यपूर्ण शिल्पे किमान जरा वेळ देवून बघितली तरी पाहिजेत. (शिल्पाबाबत अजून काही माहिती असेल तर जरूर सांगा. चुका दाखवा. तूमच्या भागातील माहितीतील मूर्तींबाबत सांगा. त्यांचे फोटो पाठवा. मंदिर व शिल्प कोशाचा एक छोटा प्राथमिक भाग म्हणून ही मालिका सुरू केली आहे. त्यासाठी सर्वांच्या मदतीची गरज आहे.) (औंढ्याचा फोटो सौजन्य
Travel Baba
)



चक्रव्युह छेदणारा अभिमन्यु (होयसळेश्वर. हळेबीडू)
कर्नाटकातील होयसळेश्वर मंदिर शिल्पकलेचा अत्युच्च नमुना आहे. या मंदिरावर बाह्य भागात एक फुट उंच आणि दोन अडीच फुट रूंद असा हा सुंदर शिल्पपट आहे. महाभारतात ज्याचे वर्णन आलेले आहे तो चक्रव्युह या ठिकाणी कोरलेला आहे. रथावर अर्जूनपुत्र अभिमन्यु स्वार आहे. सहस्त्रावधी बाणांनी तो लढतो आहे. त्याला कर्णाने पूर्णत: घेरले आहे. त्याचे बाण आपल्या बाणांनी रोकले आहेत. डाव्या बाजूला भीम आणि हिडिंबेचा पुत्र घटोत्कच दाखवला आहे. त्याच्या हातात गदा आहे. इतक्या छोट्या शिल्पात राक्षस कुळातील घटोत्कच वेगळा दाखवत शिल्पकाराने कमाल केली आहे.
खरी कमाल तर चक्रव्युहात बारीक बारीक कोरलेल्या सैन्याला दाखवून केली आहे. हा फोटो मी साध्या मोबाईलच्या कॅमेर्यातून काढलाय. मोठ्या कॅमेर्यातून फोटो काढून enlarge करून बघितल्यास बारकावे अजून नीट समजतील.
होयसळ शैलीत शिल्पकलेने कळस गाठला होता असं म्हणतात ते उगीच नाही. हळेबीडू आणि बेलूरच्या मंदिरात त्याचा प्रत्यय दर्शकांना जरूर येतो. ही मंदिरे आपल्या एखाद्या मोठ्या सहलीचा भाग म्हणून गडबडीत पाहू नका. किमान एक संपूर्ण दिवस इथे घालवला पाहिजे. तर इथलं शिल्प सौंदर्य समजू शकेल. बारकावे पहायचे तर आठवडा लागतो.


नटेश शिव (नीलकंठेश्वर मंदिर, निलंगा, जि. लातुर)
शिवाच्या विविध मनमोहक मूर्ती मराठवाड्यात आहेत. निलंग्याच्या मंदिरावर बाह्यभागावर देवकोष्टकात ही मुर्ती आहे. उजवा हात अभय मुद्रेत असून हातातअक्षयमाला आहै. वरच्या हातात त्रिशुळ आहे. डाव्या वरच्या हातात खट्वांग आहे. खालच्या हातात बीजपुरक (मातुलिंग) आहे. शिवाच्या उजव्या बाजूस खाली नंदी बसलेला आहे. डाव्या बाजूस गंगा आहे. डावा पाय जमिनीवर टेकवला असून उजवा पाय गुडघ्यात दूमडून वर उचलला आहे. अशा १०८ नृत्यप्रकार सांगितले जातात त्यातील ही मुद्रा भुजंगतलास म्हणून ओळखली जाते. मूर्ती तीन फूटाची आहे.
१२ व्या शतकातील हे उत्तर चालुक्य कालीन मंदिर त्रिदल पद्धतीचे आहे. मुख्य गाभार्यात शिवलिंग असून इतर दोन गाभार्यांत विष्णु व हर गौरी (शिव पार्वती एकत्र) या मूर्ती आहेत. (माया पाटील शहापुरकर यांच्या "मंदिर शिल्पे' या ग्रंथात या मंदिरावर सविस्तर लिहिले आहे. ही माहिती त्यातीलच आहे.)
शिवाच्या या नृत्य मूर्तीला नटेश असे म्हणतात. नटराज हा शब्द आपण शिवाच्या सगळ्याच नृत्य मूर्तीला वापरतो. पण तो तसा नाही. (फोटो सौजन्य डाॅ. दत्तात्रय दगडगावे, लातुर)
- श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद 9422878575.

मूर्ती मालिका - ७


नृत्य गणेश (होट्टल, ता. देगलूर, जि. नांदेड)

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!
होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिराच्या बाह्यअंगावर उत्तरेला ही अप्रतिम अशी नृत्य गणेशाची तीन फुट उंच सुबक मूर्ती आहे. हा सहा हातांचा गणेश आहे. उजव्या बाजूला वरच्या हातात परशु आहे. उजव्या मधल्या हातात भग्नदंत आहे. डाव्या बाजूला वरच्या हातात नाग आहे. डाव्या मधल्या हातात मोदक आहेत.
खालचे दोन्ही हात सुंदर अशा नृत्यमुद्रेत आहेत. डाव्या हाताच्या या मुद्रेला "गजहस्त" असे म्हणतात. डावा पाय जमिनीवर समर्थपणे रोवलेला आहे याच्या नेमकं उलट उजव्याचा केवळ अंगठाच कलात्मकरित्या वळवून जमिनीवर टेकवला आहे. अगदी असं वाटतं प्रत्यक्ष गणराज नाचत असताना त्याचे छायाचित्र घेतले आणि त्या छायाचित्रावरून हे शिल्प कोरले. मेखलेची मी माळ मध्यभागी खाली सुटली आहे ती बरोबर डावीकडे झुकली आहे. केवळ स्थीर उभा गणेश असता तर ही माळ ओळंबा रेषेत जमिनीच्या दिशेने सरळ दाखवली असती. माथ्यावरच्या मुकुटाच्या झिरमाळातील मध्यभागीचे पदकही जरा डावीकडे झुकलेले दाखवले आहे.
डावा पाय सरळ असल्याने ती मेखला खाली दिसते आहे तर उजवा पाय वर उचलला असल्याने मेखलेची माळ वर सरकली आहे. शिल्पकाराची खरेच कमाल आहे.
गणेशाचे वाहन मुषक खाली उजव्या बाजूला आहे.
या भागातील अशा काही कलात्मक मूर्तीतून संगीत या प्रदेशात समृद्ध असल्याचे पुरावे मिळतात.
(फोटो सौजन्य
Travel Baba
)



प्राचीन भव्य गणेश मूर्ती
दिपावली शुभचिंतन !
ही गणेशमूर्ती अजिंठा डोंगरांतील वेताळ वाडी किल्ल्या जवळील रूद्रेश्वर लेण्यांतील आहे. अजिंठा गावाच्या अलीकडे डाव्या बाजूला एक रस्ता ‘अजिंठा व्ह्यु पॉईंट’ कडे जातो. या रस्त्यावरून पिंपळदरी गावापासून डावीकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर हळदा म्हणून गाव आहे. याच हळद्याच्या पुढे वेताळवाडीचा किल्ला आहे. या ठिकाणाला अजिंठा रोडवरून गोळेगांवपासून उंडणगाव मार्गाने पण जाता येते.
वेताळवाडी किल्ल्याला वळसा घालून सोयगांव रस्त्यावर जाताना वाडी गावांतून एक छोटी वाट रूद्रेश्वर लेणीच्या डोंगराकडे जाते.
डोंगरमाथ्यावरून कोसळणार्या सुंदर धबधब्याने दगड कापत कापत एक सुबक अशी खोबण तयार केली आहे. याच खोबणीत रूद्रेश्वर लेणी कोरली गेली आहे. ही लेणी अजिंठा लेणीच्याही आधी पितळखोरा लेणी काळातील आहे. (इ.स. पूर्व १०० वर्ष).
लेणीसाठी डोंगरावरून उतरणारी एक अवघड अशी पायवाट आहे. लेणीत महादेवाची सुंदर अशी पिंड, समोर सुबक नंदी आहे. या लेणीतील खरे आकर्षण म्हणजे वरच्या छायाचित्रात असलेली गणेशमूर्ती. सहा फुटाची भव्य अशी ही गणेशमूर्ती दगडांत कोरलेली आहे. त्या काळातील इतकी भव्य प्राचीन दुसरी गणेशमूर्ती महाराष्ट्रात नाही ( माहित असल्यास कृपया खाली काॅमेंट करावी). उजवा पाय उंचावलेला व डावा पाय दुमडलेला अशी ही देखणी गणेशमूर्ती आहे. कमरेला नागाने वेढा घातलेला आहे. शेंदूर फासल्याने मुळचे सौंदर्य लक्षात येत नाही. मूर्तीची भव्यता डोळ्यांत सहज भरते. समोरच्या दरवाज्यांतून वरून पडणार्या पाण्याचा अखंड नाद कानात घुमत राहतो. मूर्तीसमोरच्या छोट्या ओटयावर डोळे मिटून हात जोडून बसल्यास हा पाण्याचा नाद अथर्वशिर्ष उच्चारत असल्याचा भास होत राहतो.
या मूर्ती शेजारी उग्र नरसिंहाचे शिल्प कोरलेले आहे. डाव्या बाजूला वीणावादिनी सरस्वतीचे शिल्प आहे.
वरतून कोसळणार्या धबधब्याच्या पाण्यातूनच लेणीत जाता येते. पावसाळा उताराला लागतो तेंव्हा ही धार बारीक होवून जाते. उन्हाळ्यात मग धबधबा पूर्णच कोरडा पडतो. तरी समोरच्या कुंडात थोडे पाणी साठलेले असते. (फोटो सौजन्य
Travel Baba
)


भोग नरसिंह आणि योग नरसिंह
डावीकडची साधी सुबक मूर्ती आहे भोग नरसिंहाची. यालाच लक्ष्मी नरसिंह असेही म्हणतात. डाव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. मागे ९ फण्यांचा नाग आहे. मूर्तीला फार विशेष अलंकरण असं काही केलेलं नाही. ही मूर्ती बोरकीनी नावाच्या सेलू तालूक्यातील देवगाव फाट्या जवळील छोट्या गावातील आहे. प्राचीन जूनं मंदिर आता आधुनिक करण्यात आलं आहे. मंदिरा जवळ पडझड झालेली प्राचीन बारव आहे. या बारवेची दूरूस्ती डागडूजी होण्याची अत्यंत गरज आहे.
उजवीकडची मूर्ती योग नरसिंहाची आहे. ही मूर्ती आधीच्या मूर्तीपेक्षा प्राचीन आहे हे सहजच लक्षात येते. ही मूर्ती नांदेड जवळच असलेल्या शंखतीर्थ येथील मंदिरातील आहे. नरसिंहाच्या चेहर्यावरील भाव शांत आहेत. योग मूद्रेतील दोन हात आहेत त्यातील उजव्या हातात अक्षमाला आहे. पायात योगपट्टा आहे. मागे प्रभावळ असून त्यावर दशावतार कोरलेले आहेत. या मंदिराचा अतिशय चांगल्या पद्धतीनं जिर्णोद्धार झाला आहे.
शंखतीर्थ गोदावरी नदीच्या काठावर आहे. या जागेला गोदावरीचे नाभीस्थान समजले जाते. तसा गौरवपूर्ण उल्लेख दासगणु महाराजांनी आपल्या गोदा महात्म्यात केला आहे. नरसिंह मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ही मंदिरे नेहमीच पाण्याच्या जवळ बांधली जातात. नदी नसेल तर किमान सुंदर बारव तरी मंदिरा जवळ असतेच.
ही दोन्ही मंदिरं जिर्णोद्धाराचे दोन नमुने आहेत. बोरकिनी येथे आधुनिक सिमेंटीकरणाच्या नादाला लागुन प्राचीनत्व नष्ट केल्या गेलं तर शंखतीर्थ येथे काळजीपूर्वक जिर्णोद्धार झाला जेणेकरून मंदिराचे प्राचीनत्व बर्याच प्रमाणात राखले गेले.
(फोटो सौजन्य भोग नरसिंह- मल्हारीकांत देशमुख परभणी, योग नरसिंह- डाॅ. नंदकुमार मुलमुले नांदेड)

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

मूर्ती मालिका - ८


सूर्य नारायण मूर्ती (होट्टल, ता. देगलूर, जि. नादेड)

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा. या नविन वर्षात तूमच्या परिसरातील प्राचीन मंदिरं आणि मूर्तींचे संवर्धन होवो.
ही मूर्ती आहे सूर्य नारायणाची. होट्टल येथील प्राचीन मातीत गाडल्या गेलेल्या भग्न सोमेश्वर मंदिराच्या बाह्य भागातील ही मूर्ती. मूद्दामच आजूबाजूचा परिसर ध्यानात यावा म्हणून हा फोटो असा घेतला. अकराव्या शतकातील हे प्राचीन मंदिर (तसा जूना शिलालेखच इथे सापडला आहे).
या मूर्तीला नूसती सूर्य मूर्ती न म्हणता सूर्य नारायण म्हणतात कारण विष्णुच्या रूपातील हा सूर्य आहे. पाठीमागे नागाचा फणा आहे. त्याच्या वर किर्तीमुख कोरलेले आहे. मुकूट, गळ्यातील अलंकार, मेखला, यज्ञोपवीत असा अलंकारांनी नटलेला हा सूर्य. दोन्ही हातात पद्म असून ही कमळं खांद्याच्या वरती दाखवलेली आहेत. सूर्य मूर्तीचे हे एक वैशिष्ट्य सांगितले जाते. पायाशी लहान आकारात सात अश्व कोरलेले आहेत. सूर्याच्या रथाला एक चाक असते, सात अश्व असतात आणि अरूण नावाचा सारथी तो रथ हाकत असतो असे वर्णन प्राचीन ग्रंथात केलेले आहे.
मूर्तीच्या उजव्या बाजूस उषा आणि डाव्या बाजूस प्रत्युषा (संध्याकाळ) यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत आठवड्याचे सातही दिवस सूर्याचा रथ धावत असतो असे यातून सुचवायचे आहेत.
विष्णुशी साधर्म्य दाखवल्याने हीला संयुक्त मूर्ती मानली जाते.
सूर्यमूर्ती महाराष्ट्रात तूलनेने फारच कमी आहेत. केवळ सूर्याचे म्हणता येईल असे एकच मंदिर वाघळी (ता. चाळीसगांव, जिं जळगांव) येथे अभ्यासकांना आढळून आले आहे.
होट्टलच्या या मंदिराची अवस्था वाईट आहे. परिसरात घाण, दारूच्या बाटल्या, कचरा साठलेला आहे. अतिशय मौल्यवान शिल्प खजाना धुळखात पडलेला आहे. होट्टल येथील अन्य दोन मंदिरांचा जिर्णोध्दार झाला असून हे मंदिर जिर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत मातीत गाडून घेवून तप:श्चर्या करत बसले आहे.


कला सरस्वती
प्राचीन काळातील मूर्ती अविष्कार समोर ठेवत असताना आधुनिक काळातला शिल्पाविष्कार नोंद केला पाहिजे असे जाणवले. सरस्वतीची ही आधुनिक काळातील मूर्ती औरंगाबादच्या महागामी गुरूकुलात वटवृक्षाच्या छायेत विराजमान आहे. सरस्वती मूर्तीत वीणा दूय्यम स्वरूपाची किंवा लहान दाखवलेली असते. ही सरस्वती ठळकपणे लक्षात रहाते ती जवळपास सरस्वतीच्याच आकारातील उभ्या वीणे मुळे. सरस्वती विद्येची देवता तर आहेच. पण वीणावादनामुळे तीचं नातं संगीताशी अतिशय उत्कट असं आहे. या सरस्वतीच्या डाव्या खालच्या हातात पुस्तक आहे. उजवा वरचा हात वरदमूद्रेत असून त्याच हातात अक्षमाला आहे. उजव्या खालच्या हातात पद्म आहे. डावा वरचा हात वीणेवर आहे. या वीणेच्या भोपळ्यावरही अप्रतिम अशी कलाकुसर आहे. महागामी नृत्यगुरूकुल असल्याने असेल कदाचित पण ही वीणाही कुशल नर्तकीसारखी डौलदार जाणवते. वीणेचा वरचा भाग मयुरमुखाच्या आकारात कोरलेला आहे. सरस्वतीच्या पायाशी मोर असून त्याची डौलदार मानही नृत्यमुद्रा सुचवते. ही सरस्वती कमळासनावर उभी आहे.
ही मूर्ती तब्बल साडेपाच फुट उंच आहे. शिल्पकला आधुनिक काळात जपणे, तिला प्रोत्साहन देणे यासाठी महागामी ला विशेष धन्यवाद.
Mahagami Gurukul
. या सरस्वतीला मी "कला सरस्वती" असे ठेवले आहे.


भग्न मंदिरावरील उग्र नरसिंह
दोनच दिवसांपूर्वी सूर्य नारायणाचे शिल्प आणि त्याची माहिती दिली होती. त्याच होट्टल (ता. देगलूर जि. नांदेड) येथील जिर्णावस्थेतील सोमेश्वर महादेव मंदिरावरील हे दूसरे अप्रतिम शिल्प. हा आहे उग्र नरसिंह. मांडीवरील हिरण्यकश्यपुचे पोट फाडणारे दोन हात आणि शंख चक्र धारण करणारे दोन हात असे चार हात ओळखता येतात. बाकी शिल्पावर दशावतार कोरलेले दिसत नाही. डोक्यामागे नागफणा आहे. नरसिंहाचा मुकुट स्पष्टपणे दिसतो.
मंदिराच्या बाह्य भागावर मुख्य देवकोष्टकांतील ही मूर्ती असावी. जशी सूर्य नारायणाची आहे.
मंदिराची अवस्था पाहून याची दूरूस्ती करण्यास असमर्थ ठरलेली सरकारी यंत्रणा आणि सरकारवर दबाव टाकू शकणारे आपण या सगळ्यांच्याच नालायक वृत्तीचे पोट या नरसिंहाने फाडावे असे फार तीव्रतेने वाटते.
दिवाळीच्या नंतर एक महिन्याने देवदिवाळी असते. आशा करू की या देवदिवाळीला सर्वांना सुबुद्धी सुचून प्राचीन मंदिरांची दूरूस्ती जिर्णाद्धाराची कामे मार्गी लागतील.
या मंरदिरासाठी चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने ११०१ मध्ये देणगी दिल्याचा शिलालेख याच मंदिरापाशी सापडलेला आहे. मंदिराचा कालखंड अकराव्या शतकाच्या शेवटचा असल्याचे यातून निष्पन्न होते.
मंदिराचा जिर्णोद्धार आपल्याला करता येत नसेल तर देवदिवाळीच्या दिवशी या प्राचीन शीलालेखाच्या बाजूलाच अजून एक शिलालेख लिहून ठेवण्याची गरज आहे. "आम्ही या मंदिराची दूरूस्ती करू शकत नाही. करीता हे मंदिर जमिनीत गाडून टाकण्यात येत आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा शके १९४२ देवदिवाळी १५ डिसेंबर, २०२०, स्वतंत्र भारतातील लोकसभेत/विधानसभेत निवडून आलेले सर्व जनतेचे राजे, सर्व लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी आणि १३५ करोड गौरवशाली इतिहास संस्कृती प्रेमी जनता."
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

मूर्ती मालिका -९


नर्तकाची देखणी मूर्ती

अजिंठ्याच्या जवळ अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) येथे उत्तर चालूक्य कालीन मंदिर आहे. या मंदिवरील विष्णु शक्तीच्या मूर्तींमुळे अभ्यासकांचे लक्ष इकडे वेधले गेले. याच मंदिरावर प्रदक्षिणा पथावर उजव्या बाजूला ही नर्तकाची मूर्ती मला आढळून आली. या पूर्वी तीन चार वेळा मंदिर बघितले पण ही मूर्ती लक्षात आली नव्हती. नर्तकी, अप्सरा, सुरसुंदरी या नावाने ओळखल्या जाणार्या स्त्री शिल्पांची माहिती होती. अशी भरपुरं शिल्प मंदिराच्या बाह्य भागावर आढळून येतात. पण या तूलनेत मोठ्या आकारातील (शिल्पाची उंची दीड फुट) नृत्य पुरूष (नर्तक) शिल्पांची संख्या फारच कमी आहे.
या नर्तकाचे कानातले, गळ्यातले, दंडावरचे ठळक ढोबळ वाटणारे दागिने वेगळेपण सांगतात. स्त्रीयांचे दागिने नाजूक कोरलेले असतात. कमरेला असलेली मेखला जाड माळेसारखी दाखवलेली आहे. स्त्रीयांच्या मेखलेचा नाजूकपणा इथे नाही. नर्तकी-नर्तकांचे डोळे काजळाने अधोरेखीत केले असल्याने ठसठशीत दिसून येतात. या नर्तकाचे डोळे तसेच आहेत. ओडीसी नृत्यात यासारखी मुद्रा असलेले गुरू केलूचरण महापात्रा यांचे छायाचित्र प्रसिद्ध आहे. कथ्थक मध्येही याला साधर्म्य साधणारी मुद्रा आढळते. लेणी आणि मंदिरांवर आढळून येणार्या नृत्यमुद्रांवरूनच नंतरच्या काळातील नृत्य प्रकार समृद्ध होत गेले असं अभ्यासक सांगतात.
या मंदिर सभामंडपात भव्य अशी वर्तुळाकार रंगशीळा आहे. भोवती आसन कक्ष आहेत. म्हणजे देवतेच्या समोर नृत्य सादर केले जायचे व ते पाहण्यासाठी लोक आसनांवर बसून असायचे. मंदिरांचा मुख्य मंडप हा कलाविष्काराचे केंद्र होता.
Mahagami Gurukul
तूमच्याकडे अशा शिल्पांवर अभ्यास झालेला असेल तर जरूर माहिती सांगा.
(छायाचित्र सौजन्य संदिप देशमुख कौठेककर)



ज्ञानेश्वरीतील षड्भुज गणेश
ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात सहा भुजांच्या गणेशाचे वर्णन आलेले आहे. षड् दर्शनांचे रूपक म्हणून या ओव्या आहेत असे मानल्या जायचे. पण गंगाधर मोरजे यांनी संशोधन पत्रिकेत एक लेख लिहून हे केवळ रूपक नसून अशी गणेश मूर्ती प्रत्यक्ष पाहूनच ज्ञानेश्वरांनी ओव्या लिहील्या असणार असे प्रतिपादन केले. यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर असलेली अशी गणेश मूर्ती कामाची नसून प्रत्यक्ष महाराष्ट्रातच शोध घेतला पाहिजे. त्या अनुषंगाने एक गणेश मूर्ती मोरजे यांनी सर्वांच्या नजरेस आणून दिली (संशोधन पत्रिका, इ.स. १९७२). परांडा किल्ल्यात ही मूर्ती सध्या स्थित आहे. ती नेमकी कुठली आहे सांगता येत नाही.
ज्ञानेश्वरीतील ओव्या अशा आहेत
देखा षड्दर्शने म्हणिपती । तेचि भुजांची आकृति ।
म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधें हाती ।।१०।।
तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु ।
वेदान्तु तो महारसु । मोदकु मिरवे ।।११।।
एके हाती दंतु । जो स्वभावता खंडितु ।
तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ।।१२।।
आता या वर्णनाप्रमाणे परांडा किल्ल्यातील गणेश मूर्तीकडे आपण बघितल्यास हे वर्णन तिथे चपखल बसते. उजवा वरचा हात खंडित आहे. उजव्या खालच्या हातात भग्न दंत आहे. डाव्या वरच्या हातात कमळ आहे. डाव्या खालच्या हातात मोदकपात्र आहे.
ज्ञानेश्वरीत वर्णन केल्याप्रमाणे कमळ सांख्य दर्शनाचे प्रतिक, खंडित दात बौद्ध मताचे प्रतिक, न्याय दर्शनासाठी हातात परशु आहे (हा हात खंडित आहे), सिद्धांत भेदासाठी अंकुश आहे, उत्तर मीमांसेसाठी रसाळ मोदक आहेत, पूर्व मिमांसेसाठी वरद मुद्रा आहे (हा हातही खंडित आहे). मूर्ती १ मीटर २४ सेमी इतकी मोठी आहे.
नृत्य गणेश म्हणून स्थानिकांना परिचित असलेली परांडा किल्ल्यातील ही गणेश मूर्ती इतकी महत्वाची आणि मोलाची आहे. महाराष्ट्रात सहा हातांची गणेश मूर्ती अजून कुठे असल्यास जरूर कळवा. संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल. होट्टलच्या नृत्य गणेशाला हे वर्णन जास्त लागु पडते कारण त्याचा अभय मुद्रेतील हात स्पष्ट दिसतो. पण दूसरी अडचण हातातील पद्माची येते. हा गणेशही सहा हातांचा आहे. पण बाकी वर्णन जूळत नाही.
(परांडा किल्ल्यात या मूर्ती ठेवल्या त्या दालनात फारसे कुणी जात नाही. या किल्ल्याला आम्ही भेट दिली तेंव्हा या दालनात आवर्जून गेलो. या षड्भुज नृत्य गणेशाचे छायाचित्र घेतले. या लेखासाठी वापरलेले छायाचित्र मात्र किल्ल्याचा अभ्यास ज्यांनी सविस्तर केलेला आहे त्या अजय माळी या मित्राने पाठवले आहे. संदर्भ सौजन्य: संदीप पेडगांवकर, गणेश वाचनालय, परभणी.)
(ज्ञानेश्वरी भावदर्शन या शंकर महाराज खंदारकर यांच्या ग्रंथातून ओव्यांचे अर्थ घेतले आहेत.)



सारीपाट खेळणारे शिव पार्वती
वेरूळला कैलास लेण्या शिवाय इतर लेण्यातही खुप शिल्पवैभव आहे. ते फारसं बघितलं जात नाही. आता २१ क्रमांकाच्या "रामेश्वर" नावाने ओळखल्या जाणार्या लेणीत हा सुंदर शिल्पपट आहे. याचा कालखंड कैलास लेण्याच्या आधीचा आहे. हेच शिल्प छोट्या आकारात बाजूचे सेवक वगळून परत केलास लेण्यातही आहे.
शिव पार्वती सारीपाट खेळत आहेत. शिवाची हार झाली असून तो पार्वतीला विनवणी करत आहे की अजून एक संधी दे, अजून एक डाव खेळू. शिवाचा उजवा वरचा हात तर्जनी उंचावलेला दिसतो आहे. या "एक" चा दूसरा अर्थ "तू जिंकलीस काय आणि मी जिंकलो काय आपण एकच तर आहोत" अशी मखलाशी पण आहे.
शिवाच्या उजव्या खालच्या हातात फासे आहेत. डावा एक हात मांडीवर रोवला असून डाव्या वरच्या हाताने पार्वतीचा पदर पकडला आहे. शिव झुकलेला आहे जरासा पार्वतीच्या दिशेने.
याच्या उलट जिंकलेली पार्वती निवांत डावा हात बाजूच्या गिरदीवर रोवून जरा मागे रेलली आहे. उजवा हात चेहर्याच्या दिशेने "आँ असं कसं? मी जिंकले आता माझी अट पूर्ण करा" अशा मुद्रेत आहे. तिची दासी लडिवाळपणे तिच्या वेणीशी खेळत आहे. दूसरी दासी पंख्याने वारा घालत आहे. एका बाजूला एक सेवक त्रिशुळ सांभाळत उभा निवांत आहे. दूसर्या बाजूचा सेवक हातावर हात ठेवून गदा जमिनीवर टेकवून उभा आहे. मध्यभागी बसलेला डावाकडे पहात "असं कसं घडलं? देवाधिदेव महादेव कसे हारले" या आचंब्यात आहे.
या शिल्पाचा सगळ्यात सुंदर लोभसपणा म्हणजे संपूर्ण मानवी भावभावना दर्शवणारे दैवतांचे शिल्प आहे. अन्यथा देवी दैवता त्यांची शस्त्रे आणि वाहने आणि दागिने आभुषणे यांनीच जखडलेले असतात.
याच शिल्पाच्या खाली शिवाचे वाहन नंदी मध्यभागी दाखवला असून सगळे गण त्याची थट्टा मस्करी करत आहेत आणि तोही मस्त आनंद घेत डूलत आहे असे दाखवले आहे. (तो फोटो नाही घेता आला)
दैवताचे लोभस मानवीपण दाखवणार्या या कलाकाराला साक्षात दंडवत. ( छायाचित्र सौजन्य
Travel Baba
)
- श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

मूर्ती मालिका -१०

पारशिवनीची महालक्ष्मी

महालक्ष्मी म्हणजे कोल्लापुर इतकेच आपल्याला माहित असते पण कोल्हापुरच्या मूर्ती सारखीच अप्रतिम मूर्ती नागपुरपासून उत्तरेला रामटेकच्या दिशेने पारशिवनी गावात स्थित आहे. एक मिटर उंचीची ही मूर्ती खोदकामात सापडली. मूर्तीच्या उजव्या हातात बीजपुरक आहे, वरच्या हातात गदा आहे. डाव्या वरच्या हातात खेटक म्हणजेच ढाल आहे तर डाव्या खालच्या हातात पानपात्र आहे. कोल्हापुरची महालक्ष्मी पण अगदी अशाच आयुधांनी युक्त आहे. हीला अंबाबाई असे पण संबोधतात. महालक्ष्मी असा शब्द आला की तीला विष्णुपत्नी असं मानण्याची प्रथा आहे. पण महालक्ष्मी ही केवळ विष्णुपत्नी नव्हे. मुक्तेश्वरांनी (एकनाथांच्या मुलीचा मुलगा) महालक्ष्मीची जी आरती लिहीली आहे त्यातील एका कडव्यात
तारा सुगतागमी शिवभजका गौरी
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री नीजबीज निगमागम सारी
प्रकटे पद्ममावती जीन धर्माचारी
असे वर्णन आले आहे. म्हणजे बौद्धांची तू तारा आहेस, शैवांची गौरी आहेस, सांख्यांसाठी तू प्रकृती आहेस, आगम पंथियांसाठी गायत्री आहे आणि जैनांसाठी पद्मावती आहेस. आरती म्हणताना आम्ही "तारा शक्ती अगम्य" अशी अगम्य भाषा करून बौद्धांचा संदर्भ उडवला. तर "नीज धर्माचारी" असा शब्द वापरून जीन धर्मियांचा म्हणजेच जैनांचा संदर्भ उडवला.
पारशिवनीची ही महालक्ष्मी अतिशय देखणी आहे. तिच्या मुकुटांत सयोनीलिंग आहे. पाठशिळेवर खाली सिंह, मग घोडा मग व्याल कोरलेले आहेत. पायाशी खाली चामरधारिणी आहेत. गळ्यात हार, कर्णभुषणे, मेखला असे अतिशय नजाकतीनै कोरलेले आहेत. पंचमहाभुतांचे प्रतिक म्हणून पाठशिळा पंचकोनात कोरलेली असते. तशी ती इथेही आहे.
(फोटो व माहिती सौजन्य प्रविण योगी, पोलीस अधिकारी हिंगोली)


चामूंडा : भयानक व बिभत्स रसाचे दर्शन
आपल्या परंपरेत मानवी भावभावनेतील सर्व रसांचा विचार केला गेला आहे. काही गोष्टी नकोशा वाटतात पण त्यांचे अस्तित्व मात्र असते. असे दोन रस भयानक आणि बिभत्स यांचे दर्शन चामुंडा मूर्तीत दाखलेले आहे. ही मूर्ती नीलकंठेश्वर मंदिर निलंगा (जि. लातुर) मंदिराच्या बाह्य भागावर देवकोष्टकांतील आहे.
उजव्या हातात सुरा, वरच्या हातात त्रिशुळ, डाव्या वरच्या हातात खट्वांग (मानवी कवटीपासून केलेले हत्यार), डावा मधला हात तोंडात असून त्याची नखं ती दाताने कुरतडत आहे, खालच्या हातात कपाल व नरमुंड आहे. एक हात खंडित आहे. ही सहा हाताची चामूंडा आहे.
पोटावर विंचू आहे. सर्प बंध आभुषण म्हणून स्तनाभोवती कमरेला दाखवलेले आहेत. जांघेत घंटा दिसून येते आहे. नरमुंडमाला पायावर लोंबत आहे.
तिचे वाहन प्रेत पायाशी आहे. उजवीकडे पिशाच्च नाच करत आहे. डाव्या बाजूला कुत्रे आहे. वर मान करून नरमुंडातील रक्त ते चाटत आहे. देवीची हाडे स्पष्ट दिसतात. हाडं आणि कातडी असे मांसरहित रूप चामुंडेचे ग्रंथात वर्णीलेले आहे. स्तन शुष्क असून खाली लोंबत आहेत. (उन्नत उभारलेले स्तन समृद्धतेचे मातृत्वाचे प्रतिक समजले जाते)
भयानक व बिभत्स रसाचे दर्शन या मूर्तीत शिल्पकाराने घडवले आहे. नउ रसांची नावे लक्षात ठेवण्यासाठी एक छोटी कविता आहे
'अद्भुत' वाटे 'भयानका'चे
'बिभत्स' दर्शन होता जगाचे
मनात 'करूणा' दाटून येते
'रौद्रा'तूनी जन्म 'वीरा'स देते
'हास्या'त 'शृंगार' शोभे विहंगम
सगळ्या रसाचा 'शांतीत' संगम
सप्तमातृकां पैकी चामुंडा एक मानली जाते. या मातृकांची संख्या आठ, नऊ पण सांगितली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने सप्तमातृका आढळून येतात.
(फोटो सौजन्य दत्ता दगडगावे, लातूर. चामुंडा रूप विवरण डाॅ. माया पाटील (शहापुरकर) यांच्या ग्रंथाच्या आधाराने)



आळतं सुंदरी
प्राचीन मंदिरांच्या मंडोवरावर (बाह्यभागावर) सुरसुंदरींची शिल्पे हे एक वैशिष्ट्य आढळून येतं. १२ व्या शतकातील प्राचीन अशा गुप्तेश्वर मंदिर (ता. गंगाखेड जि. परभणी) येथे "आळतं सुंदरी"चे हे शिल्प कोरलेलं आहे. मंदिराच्या उत्तर भागात विष्णुचे पद्मनाभ रूपातील शिल्प देवकोष्टकात आहे. त्याच्या बाजूला हे शिल्प आहे. मंगल कार्य घरात असेल तेंव्हा उखळा जात्याचा मुहूर्त केला जातो. उखळ जात्याची पूजा करून पाच स्त्रीया त्यावर ठेवलेले विडे उचलून उखाणे घेतात. यावेळी वधु, करवली, तिची आई किंवा वरमाय यांना न्हाउ घातलं जातं. व नंतर त्यांच्या पायावर ओल्या कुंकवाचे पट्टे रेखतात. स्वस्तीक काढलं जातं. याला "आळतं" म्हणतात.
या शिल्पात ही नववधु वेलीला टेकुन उभी आहे. तिच्या तळपायावर दूसरी स्री आळतं भरत आहे. हे खोड वेलीचं आहे कारण याच परिसरांत जात्यावरच्या ओव्यांत एक गोड असा संदर्भ आलेला आहे
दारी मांडव ग घाला ।
फुला सगट जाईचा ।
छंद मुलाच्या आईचा ।।
दारात वेल आहे आणि त्या फुलांचा सुगंध सर्व परिसरात भरून राहिला आहे. शिल्पाच्या वरच्या भागात वेलीचा पर्णविस्तार नक्षीच्या माध्यमातून दाखवला आहे. या शिल्पातील स्त्रीचा जो केसांचा मोठा अंबाडा दाखवला आहे त्यावर गजरा माळलेला आहे.
काही शिल्पं "सुरसुंदरी" या शब्दांत बसत नाहीत. पत्र सुंदरी, शत्रु मर्दिनी, पुत्र वल्लभा अशी शिल्पं ज्यांच्यावर याच सदरात लिहिलं आहे ती स्त्री स्वभावाचे विविध पैलू दाखवतात. ती केवळ शृंगारापुरती मर्यादीत नाही हे स्पष्ट करतात. ही आळतं सुंदरी पण अशीच वेगळी आहे. या परिसरांतील रिती रिवाज परंपरा यांचे प्रतिबिंब यात उमटले आहे. अभ्यासक डाॅ. ए.डि. शिंदे सर यांनी आळतं सुंदरी हे नाव या शिल्पाला दिलं. मला हे मोठं वैशिष्ट्यपूर्ण असं शिल्प वाटलं. या मंदिराला जरूर भेट द्या.
(फोटो सौजन्य अरविंद शहाणे, परभणी. swaraj infotain या u tube वाहिनीवर या मंदिवर बनवलेले दोन माहितीपट उपलब्ध आहेत त्याची link इथे देतोय https://youtu.be/CaPlMqklJmI )
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

मूर्ती मालिका -११

सुरसुंदरी

मंदिराच्या बाह्यांगावर अतिशय आकर्षक, डौलदार, सौष्ठवपूर्ण अशी स्त्री शिल्पे आढळून येतात. त्यांना सुरसुंदरी असे म्हणतात. इथे उदाहरणादाखल होट्टल (ता. देगलूर, जि. नांदेड) च्या मंदिरावरील ३ सुरसुंदरींचे छायाचित्र घेतले आहे. सगळ्यात डावीकडची आहे ती तंतू वाद्य वाजविणारी "तंत मर्दला". आज स्त्रीया गाताना नृत्य करताना आढळतात. पण त्या मानाने वाद्य वादन करताना फारशा आढळून येत नाहीत. पण प्राचीन मंदिरांवरील शिल्पात वादक स्त्रीया दर्शविलेल्या आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळात स्त्रीया संगीताच्या क्षेत्रात सर्वच अंगांनी आपले योगदान देत होत्या.
मधली आहे तिच्या हातात देवी देवतांच्या हातात असते तसे बीजपुरक आहे व दूसरा हात अक्षमालेसह वरद मूद्रेत आहे. स्त्रीला देवते इतके महत्व आम्ही देतो हे सामान्य स्त्रीचेच शिल्प कोरून सिद्ध केले आहे. ही सुरसुंदरी त्या दृष्टीने वेगळी आणि महत्वाची ठरते.
सगळ्यात उजवीकडची आहे ती "दर्पणा". सौंदर्याचा एक सुंदर अविष्कार यातून समोर येतो. दूसर्यावर प्रेम करायच्या आधी आरशात पाहून आपण आपल्याच प्रेमात पडायचे ते वय असते. नेमका हाच क्षण शिल्पात पकडला आहे. राजेंद्रकृष्ण यांनी शब्दबद्ध केलेले सी. रामचंद्र यांचे सुंदर गाणे आहे (अमरदीप, १९५८, देव आनंद, वैजयंतीमाला).
झुलेसे घबराके उतरा जो बचपन
भुलेसे एक दिन देखा जो दर्पण
लागी अपनी नजरीया कटार बनके
कोई दिल मे समा न जाये प्यार बनके
तशी ही दर्पणा.
सुरसुंदरी केवळ स्त्रीच्या बाह्य सौंदर्याचा अविष्कार प्रकट करतात असे नव्हे. एकुणच स्त्रीचे जे विविधअंगी विविधपैलू व्यक्तिमत्व आहे त्याचा आविष्कार प्रकट करतात. ही शिल्पे होट्टल, माणकेश्वर, गुप्तेश्वर मंदिर धारासुर, धर्मापुरी, निलंगा येथील मंदिरांवर मोठ्या सख्येने आणि आकर्षक पद्धतीनं आढळून येतात.
(छायाचित्र
Travel Baba
)



अंजली मूद्रेतील हनुमान आणि गरूड
आपल्याकडे हनुमानाची मूर्ती म्हणजे शेंदूर फासलेला दगड. अगदी देखणी कोरीव मूर्ती कुठे दिसत नाही. द्रोणागिरी पर्वत हाती घेवून उडणारा पवनपुत्र अशी मूर्ती मंदिरात आढळून येते. पण ही मूर्ती हात जोडलेली म्हणजेच अंजली मुद्रेतील आहे. या हनुमानाच्या अंगावर बारीक अशी वस्त्रे प्रावरणे आणि आभुषणे कोरली आहेत. त्याची गती दाखविण्यासाठी कोपरावरून मागे सोडलेले वस्त्राचे गोंडे जमिनीला समांतर असे उडताना दाखवले आहेत. कानातले कुंडलेही छान आहेत.
बाजूची मूर्ती गरूडाची आहे. हा गरुडही अंजली मूद्रेत आहे. त्याचे बाकदार नाक उठून दिसते.एरवी भेदक दिसणारे त्याचे नेत्र शांत दिसत आहेत. पंख पसरलेले रेखीव असे कोरले आहेत. खाली त्याच्या वस्त्राची टोकं कोरलेली आहेत. हे वस्त्रही कलाकुसरयुक्त आहे कारण गरूड विष्णुचे म्हणजेच ऐश्वर्यसंपन्न देवतेचे वाहन आहे. याचा मुकूटही देखणा आहे.
या दोन्ही मूर्ती शेंदूरवादा येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूस ठेवलेल्या आहेत. विठ्ठल देवता वैष्णव देवता आहे. स्वाभाविकच गरूड तिथे असणं समजू शकतो. विठ्ठलाला विष्णुचा ९ वा अवतार मानलं जातं. पण हनुमानाची मूर्ती इथे का? याचं कोडं उलगडत नाही. (यावर राहूल देशपांडे या मित्राने केलेला खुलासा समर्पक व समाधानकारच आहै. .. दास मारुती हा कायम भागवत पंथात आराध्य देवतेसमोर उभे असण्याचा उल्लेख आहे."गरुड हनुमंत पुढे उभे राहती..." हे वाक्य आहेच आरती मध्ये.)
मध्वमुनीश्वरांच्या काळापासूनचे (इ.स. १६६०) हे विठ्ठल मंदिर आहे. तेंव्हा या मूर्तीही ३६० वर्षांपासूनच्या आहेत. खाम नदीच्या काठी औरंगाबादपासून अगदी जवळ ३० किमी. अंतरावर गंगापूर तालूक्यात हे गांव आहे.



एकनाथांचा विजय विठ्ठल
काल कार्तिकी एकादशी होती. हीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशीनंतर देव निद्राधीन होतात. बरोबर ४ महिन्यांनी म्हणजेच कार्तिकी एकादशीला त्यांची निद्रा पूर्ण होते. हे चार महिने संत विद्वान अभ्यासक मंडळी पंढरपुरातच मुक्काम ठोकून ग्रंथांवर कुटचर्चा विचारविनिमय अभ्यास प्रवचन करतात.
सामान्य लोकांच्या दृष्टीने विचार केला तर हा काळा खरीपाचा म्हणजेच कोरडवाहू शेतीचा मोठा हंगाम असतो. शेतीची कामे असतात. कार्तिकी एकादशी तर पीक घरात येते. पुढचा रब्बीचा हंगाम सगळ्या शेतकर्यांसाठी नसतो. कारण मग ती पाण्यावरची म्हणजेच ओलीताची शेती असते.
या कार्तिकी एकादशीला पैठणच्या नाथांच्या देवघरातला पुजेतला पांडुरंग म्हणून काही मूर्तींचे फोटो व काही माहिती सोशल मिडियावर पसरत होती.
हा सोबत दिलेला त्या मूळ पांडुरंग मूर्तीचे छायाचित्र. पांडुरंगाचे दोन्ही हात कटेवर ठेवलेले असतात. कानात मकर कुंडले. पायाखाली वीट असते. समचरण असा हा विठ्ठल उभा असतो. अहोबिल येथे प्राप्त झालेली विठ्ठल मूर्ती किंवा तिरूपती येथील मूर्ती अशीच समपाद असून डाव्या हातात शंख व उजवा हात वरद मूद्रेत आहे. पांडूरंगाला विष्णुचाच अवतार मानल्याने शंख त्याच्या हातात दाखवला जातो. पंढरपुरच्या मूर्तीचे दोन्ही हात कटीवर आहेत. डाव्या हातात ज्ञानाचे प्रतिक शंख व उजव्या हातात पावित्र्याचे प्रतिक पद्म आहे (दूरूस्ती प्रवीण योगी यांनी सुचवली).
नाथांच्या पुजेतील मूर्तीही अशीच आहे. फक्त वरद मूद्रेतील उजवा हात वरच्या ऐवजी खालच्या बाजूला वळलेला आहे.
पंचधातूची ही दिडफुटाची मूर्ती वजनदार असून पायावर सोन्याचा पत्रा मढवला आहे.
आपल्या संत मंडळींनी पांडुरंगासाठी कितीतरी सुंदर अभंग रचले आहेत. पण प्राचीन काळातील आणि भारताच्या सर्व भागात उच्चारले जाणारे अष्टक म्हणजे शंकराचार्यांनी रचलेले पांडुरंग अष्टक "भजे पांडुरंगम" अतिशय प्रासादीक आणि गोड आहे. (फोटो सौजन्य
Yogesh Kate
)

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

मूर्ती मालिका -१२


औंढ्या नागनाथचा केवल शिव

शिवाची मूर्ती ज्या आणि जितक्या विविध भावमूद्रेतल्या आढळून येतात तशा इतर कुठल्याच देवतेच्या नाहीत. औंढा नागनाथच्या प्राचीन मंदिरावर शिव विविध मूर्तीं पैकी हा एक वैशिष्ट्यपूर्ण "केवल शिव".
शिवाचा उजवा खालचा हात वरद मूद्रेत असून त्यावर अक्षमालाही आहे. उजव्या वरच्या हातात त्रिशुळ आहे. डाव्या वरच्या हातात नाग धारण केला आहे. वैशिष्ट्य म्हणजे या नागाचा शेपटाकडचा भाग खाली भक्तांच्या माथ्यावर आशिर्वाद वाटावा असा पसरला आहे. उजव्या त्रिशुलधारी हातात तोडे आहेत. पण डाव्या नाग धारण केलेल्या हाताला सर्पाचाच वेढा तोड्या सारखा दाखवला आहे. कलात्मकतेची कमाल आहे. डाव्या खालच्या हातात बीजपुरक आहे. शिवाच्या उजव्या बाजूला नंदी बसलेला आहे.
शिवाची आभुषणेही उग्र रूपातच दाखवली जातात. पण इथे केवल रूपात ही आभुषणे जाडसर ठोकळच पण कलात्मक दाखवून शिल्पकाराने आपल्या प्रतिभेची पावतीच दिली आहे. पायात रूळणारी नररूंडमाळ इथे जाडसर दागिना दर्शवली आहे. कानात झुलणारे वर्तूळाकार कुंडल, यज्ञोपवितही कलात्मकरित्या खाली जावून परत वर मेखलेच्या पट्टीत अडकवले आहे.मुद्रा केवळ सौम्य नसून जरासे स्मित करणारी आहे. या मुर्तीच्या वरच्या हातातील त्रिशुळ, सर्प आणि खालचा नंदी झाकला तर आपण खुशाल याला विष्णु म्हणू शकतो. खालच्या भक्तांसोबत एक चामरधारिणीही आहे.
केवल शिवाचा अर्थ एकट्या शिवाची मूर्ती असा ढोबळ नाही. उत्पत्ती स्थिती लय यात लयाची देवता असलेल्या शिवाची केवल शिवाची मूर्ती फार वेगळं काही सुचवते. जिर्ण झालेलं, नकोसं असलेलं, विहित कार्य संपलेलं ते मी नष्ट करतो. आणि नविन सुंदर रसरशीत अर्थपूर्ण जगण्याला निर्माण होण्यासाठी जागा करून देतो असा व्यापक सुंदर अर्थ "केवल शिवा"चा लावता येतो. सनातन धर्मात मृत्युला वाक्याच्या शेवटचा पूर्णविराम न मानता दोन वाक्याच्या मधला ठिपका मानतात. (पूनर्जन्म संकल्पना) केवल शिवाची ही किंचित स्मित शांत मूद्रा त्या आगामी जिवाच्या स्वागतासाठी उत्सुक अशी आहे. शिवलीलामृतात
कारूण्य सिंधू भवदू:ख हारी
तूजवीण शंभो मज कोण तारी
अशी प्रार्थना याच आर्ततेतून उमटते.
महाकवी गालिबला आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या काशी विश्वनाथ मंदिर, तो परिसर आणि आख्या काशी नगरीचेच फार अप्रुप वाटले. त्याने या शहरावर फार्सीत कविता लिहिली. (गझल नाही, नज्म म्हणजे कविता) शिवाच्या सान्निध्यात आपल्याला शांती लाभली हे वर्णन करणारी गालिबची ही कविता. मूळ कविता फार्सी. तिचे नाव "चराग-ए-दैर".त्याचा गद्य अनुवाद निशिकांत ठकार सरांनी केलाय. पद्य अनुवाद मी केलाय.
दिव्यांचे देऊळ
आपल्या रंगभर्या मस्तीने
स्वर्गाला लाजविणार्या बनारसला
न लागो कुणाची वाईट नजर
पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे म्हणतात
इथल्या मरणाला लाभतो
अमरत्वाचा जर
हे मंदिर आहे
रंगीबिरंगी आश्चर्याचे जग
इथल्या वसंतात
सदोदीत फुलण्याची धग
इथे शरद बनून राहतो
उजळ कपाळीचा चंदनटिळा
आणि वसंतवारा घालतो
फुललहरींचे जानवे
इथली धुसर संध्या
स्वर्गीच्या भुवयांमधल्या
कुंकवागत जाणवे
पैगंबराला दिसलेल्या दिव्य प्रकाशापासून
घडलेल्या इथल्या मूर्ती
त्यांच्या चेहर्यावर
गंगेकाठच्या दिव्यांच्या
लवथवत्या उत्साहाची पूर्ती
सूर्य-चंद्र जेंव्हा रेंगाळतात
पूर्व क्षितीजावर टेहळण्यासाठी
ही काशी सुंदरी उचलते गंगेचा आरसा
आपले लावण्य न्याहळण्यासाठी
तार्यांनी खच्चून भरल्या एका रात्री
विशुद्ध भाव बाळगून गात्री
मी विचारले एका साधुला
महाराज,
या दु:खी जगातून
निष्ठा-प्रेम-भलेपणा-विश्वास
यांनी घेतला अखेरचा श्वास
बापलेक दाबताहेत परस्परांचा गळा
भावाचा भावाच्या वाईटावर डोळा
सार्या कोमल भावनांचा
झाला लय
मग का होत नाही प्रलय ?
का वाजत नाही शेवटची रणभेरी ?
अंतिम संहाराची
कोणा हाती दोरी ?
मंद हसू ओठांवर खेळवत
प्रेमभाव डोळ्यांत मिळवत
तो म्हणाला
ही नगरी आहे
विधात्याचे प्रिय काळीज-वतन
तो होऊ देणार नाही ही नष्ट
वा हीचे पतन
हे एैकून अभिमानाच्या गुलालाने
भरून गेले बनारसचे कपाळ
विचारांच्या पंखांना शिवता येऊ नये
असे उंचावले बनारसचे आभाळ
हा केवल शिव पाहून मला गालिबच्या या ओळी आठवल्या.
(छायाचित्र
Travel Baba
.)



लक्ष्मी नारायण अलिंगन मूर्ती
औंढा नागनाथ मंदिर ज्योतिर्लिंग मंदिर आहे तेंव्हा स्वाभाविकच शिवाच्या मूर्तींचे प्रमाण अधिक आहे. याच मंदिराच्या मंडोवरावरील ही एक सूंदर लक्ष्मी नारायण अलिंगन मूर्ती लक्ष वेधून घेते.
विष्णुच्या हातातील गदा स्पष्ट दिसते. दूसर्या हातात काय आहे स्पष्ट दिसत नाही. ही मूर्ती निवडण्याचे मुख्य कारण विष्णुचा लक्ष्मीच्या कमरेवरचा डावा हात आणि लक्ष्मीचा विष्णुच्या खांद्यावरचा उजवा हात. लक्ष्मीची उंचावलेली मान. तिच्या डाव्या हातात कमळाची कळी आहे. विष्णुला सखा मित्र सोबती मानणारी ही मूद्रा फार मोहक आहे. विष्णुचा उजवा पाय गुडघ्यात जरा वाकला आहे. लक्ष्मीचा डावा पाय असाच गुडघ्यात वाकुन मग खाली आला आहे. हा पाय भंगला असून परत खाली तळव्यापाशी जरा दिसतो आहे. तिच्या कानातले वर्तूळाकार कुंडल आणि त्यात परत एक फुल मोठं मोहक आहे.
विष्णुच्या बाजूने खाली गरूड हात जोडून मांडी टेकवून बसला आहे. त्याचे पंख मागे दिसत आहेत.
आपल्याकडे "लक्ष्मी नारायणा" सारखा जोडा म्हणायची पद्धत आहे. या म्हणीचं हजार वर्षांपूर्वीचे हे शिल्पांकित देखणं दृश्यरूप. इथे दोघांची उंचीही जवळपास समान दाखवली आहे. विष्णु जरासा डावीकडे झुकलेला आणि लक्ष्मीही त्या बाजूने जराशी झुकलेली आहे. अतिशय लालित्यपूर्ण अशी ही मूद्रा आहे. त्याचा डावा आणि तिचा उजवा पाय ठामपणे जमिनीवर रोवलेले आहेत. तर विष्णुच्या उजवा तळव्याची बोटंच जमिनीवर टेकतात. लक्ष्मीचा डावा तळवाही असाच अधर आहे. चार पैकी दोन पाय भक्कम आणि बाकी दोन ललित या कल्पनेला दाद दिली पाहिजे. सुखी संसाराचे रहस्यच शिल्पकाराने मांडलय.
दोघांचेही चेहरे समोर असले असते तर हे शिल्प सपाट वाटले असते. पण लक्ष्मीच्या संपूर्ण मूर्तीला ३० अंशाचा जरासा कोन देवून शिल्पकाराने जो ३ डि परिणाम साधलाय त्याला तोड नाही. कमाल आहे.
लक्ष्मी नारायणाच्या स्थानक मूर्ती (उभ्या असलेल्या) फार कमी आहेत. याच मंदिरावर अशी अजून एक मूर्ती आहे. लोणारला दैत्यसुदन मंदिरावर पण एक आहे. पण ही सर्वात लालित्यपूर्ण.
(छायाचित्र सौजन्य
Travel Baba
)



नृत्य भैरव होट्टल
शैव मंदिरांवर भैरवाच्या मूर्ती प्रामुख्याने आढळून येतात. या मूर्तीचे हात खंडीत आहेत. या हातात त्रिशुळ, डमरू अशी आयुधे सहसा असतात. शिवाय एका हातात नरमुंड ही असते. मूर्तीच्या डाव्या बाजूला खाली श्वान दाखवले आहे वर मान केलेले. ते नरमुंडातून ठिबकणारे रक्त चाटत असते. भैरवाच्या अंगावर वस्त्र नाहीत. पायावर नरमुंडमाला लोंबत आहे. डोक्यावर मागे ज्वालेसारखे दिसणारे प्रभामंडल आहे. कपाळावर पट्टा आहे. पाठशिळेच्या वरच्या भागात किर्तीमुख आहे. सहसा भैरवाचे डोळे बटबटीत, चेहरा भयानक दाखवला जातो. पण इथे चेहरा सौम्य आहे. मांडीवर साप गुंडाळलेला आहे. कमरेच्या मेखलेची माळ मांडीवर रूळत आहे. त्याच्या खालच्या टोकाला घंटा आहेत.
पायात नुपुर आहेत. पायाचा कमरेपर्यंतचा भाग एका रेषेत, कमरेपासून मानेपर्यंत दूसर्या कोन रेषेत. आणि मानेपासून वरती परत वेगळ्या रेषेत अशी ही त्रिभंग मूद्रा आहे. नृत्यमुद्रेत हीची गणना होत असल्याने नृत्य भैरव असा याचा विचार करावा लागेल.
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणचे पादत्राणे. उंच टाचेच्या सँडल्स असतात त्या प्रकारचे वेगळे असे हे पादत्राण आहे. हे अशा पद्धतीनं कुठे दिसत नाही.
होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिराच्या बाह्य भागावर ही भैरवमूर्ती आहे. याच्या आजूबाजूला सुरसुंदरींची शिल्पे आहेत. या मूर्तीला मिळालेले स्थान तिला देवता मानल्याचे सुचित करते.
छायाचित्र सौजन्य
Travel Baba
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

 मूर्ती मालिका -१३

लोभस पुत्रवल्लभा

गुप्तेश्वर मंदिर धारासुर (ता. गंगाखेड, जि. परभणी) मंदिरावरील हे अतिशय लोभस असे शिल्प. कडेवर मुल असलेले जे सुरसुंदरी चे शिल्प असते त्याला "पुत्रवल्लभा" असे नाव आहे. यातही विविध पद्धतीनं आई आणि बाळाचे नाते दाखवले आहे. बाळाला ती खुळखुळा वाजवुन खेळवते आहे, नुसतेच कडेवर घेतले आहे, स्तनपान करतानाची अप्रतिम शिल्पे आहेत. पण हे जरा हटके आहे. यात हे बाळच आईचा मुका घेते आहे. आईने डाव्या हाताने त्याची कंबर सावरून धरली आहे. उजवा हात बाळाच्या मानेला सांभाळत आहे. या स्वर्गसुखाने दोघांनीही डोळे मिटून घेतले आहेत.
बाळाच्या पायातला वाळा विशेष उल्लेखनीय आहे. हे बाळ नुकतेच चालायला लागले असावे. म्हणून हा चांदीचा वाळा पायात आहे.
प्रेमचंद यांची एक सुंदर लघुकथा आहे. आईच्या बोटाला धरून जत्रेत फिरणारे मुल खेळणी, मिठाई, रहाटपाळणा असे विविध गोष्टींसाठी हट्ट करते आहे. पण गरिब आई त्याला फारसे काही घेवून देवू शकत नाही. पोराचा हट्ट वाढत जातो. तो हात झटकतो आणि मिठाईच्या आकर्षणाने कुठेतरी ओढला जातो. पोर जत्रेत हरवते. आई बाजूला नाही हे ध्यानात येताच त्याला रडू फुटते. आजूबाजूचे लोक त्याला समजावू लागतात. खेळणी देतात, मिठाई देतात, फुगे देवू करतात,रहाटपाळण्याचे आमिष दाखवतात. पण आता पोराला फक्त आईच हवी असते.. बाकी काहीच नको असते. फ.मुं. शिंदे यांनी आपल्या कवितेत लिहिल्या प्रमाणे
आई एक नाव असते
घरातल्या घरात
गजबजलेले गाव असते
केवळ गावच नाही तर लहानपणी आई म्हणजे बाळाचे सर्व विश्वच असते. आसा गोड मतितार्थ या शिल्पात अनामिक कलाकाराने १००० वर्षांपूर्वी कोरून ठेवला आहे. मराठवाडा हा मातृसत्ताक प्रदेश असल्याचे भरपुर ऐतिहासिक पुरातत्वीय पुरावे सापडले आहेत. पैठणचे सातवाहन राजे आईचेच नाव लावायचे. गौतमीपूत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र आळूमावी अशी चांदिची नाणीच सापडलेली आहेत. शिळालेखही आहेत.
मातृशक्तीचा हा एक लोभस आविष्कार, "पुत्रवल्लभा". मला एक शंका आहे. हे शिल्प निर्माण करणारी स्त्रीच असली पाहिजे. इतका नेमका क्षण पुरूषाला पकडता नसता आला. पण दूसरीकडून दासू वैद्य च्या कवितेप्रमाणे पण शक्य आहे
प्रत्येक आईचा मुलगा
कवी असतोच असे नाही
पण प्रत्येक मुलासाठी
त्याची आई एक कविता असते
हे शिल्प जर पुरूषाने घडवले असेल तर त्याची भावना दासूच्या कवितेसारखीच राहिली असेल.


रूसलेली पार्वती आणि शांत शिव
त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताच्या बाजूला शिव मंदिराच्या मंडोवरावर हे अतिशय वेगळं मनोज्ञ असं शिल्प आहे. डमरूआणि नाग दोन हातात असून पायाशी नंदी आहे, गळ्यातही नागबंध आहे. त्यावरून हा शिव आहे हे स्पष्ट होते. पार्वती डोळ्यात काजळ भरत आहे. तिच्या दूसर्या हातात आरसा आहे. लक्ष वेधण्यासाठी शिवाच्या डाव्या हातात दंडासारखे दिसणारे जे आयुध आहे त्याला पार्वतीने आपला उजवा पाय लावला आहे. शिवाच्या उजव्या खालच्या हातात बीजपुरक आहे.
हे शिल्प अलीकडच्या काळातले असल्याने फारसे बारीक नक्षीकाम त्यावर आढळून येत नाही. पार्वतीचे वस्त्र, त्याचा मागे दाखवलेला पदर सुंदर आहे. साधेच पण प्रमाणबद्ध आकर्षक असे हे शिल्प. यात कुठला पौराणीक संदर्भ न दाखवता नवरा बायकोच्या नात्यातील सहज भाव दाखवला म्हणून वेगळे उठून दिसते.
गौरी रूसली असं म्हणण्यापेक्षा शिवच रूसला आहे आणि त्याचे लक्ष वेधण्यासाठी खालील ओळीतील भावना पार्वती व्यक्त करत आहे.
दर्पण देखू रुप निहारु
और सोला सिंगार करू
फेर नजरीया बैठा बैरी
कैसे अखिया चार करू
(प्रसन्न माळेकर या मित्राने सुचवलेल्या समर्पक ओळी)
नाशिकचे मित्र
Ashok Darke
यांनी हा फोटो पाठवला. असे शिल्प कुठे आढळत नाही. याचा काही वेगळा संदर्भ असेल तर तज्ज्ञांनी विषद करून सांगावा. एरव्ही सामान्य दर्शकांसाठी "तूम रूठी रहो मै मनाता रहू" असं एका ओळीत या शिल्पाचे वर्णन करता येईल. देव असला म्हणून काय झालं आहेत तर नवरा बायकोच ना..


देखणा द्वारपाल
प्राचीन मंदिरांवर विविध शिल्पे आढळून येतात ती केवळ सहज म्हणून कोरलेली नसतात. त्यांची एक परिभाषा असते. ते शिल्प तिथेच का कोरले याचे विशिष्ट कारण असते. छायाचित्रातले हे जे शिल्प आहे ते द्वारपालाचे आहे. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करतानाच्या दरवाज्याची जी चौकट असते त्यावर अतिशय कलात्म नक्षीकाम असते. त्याला द्वारशाखा म्हणतात. या द्वारशाखा एक दोन तीन अगदी माणकेश्वर मंदिर (ता. भुम जि. उस्मानाबाद) इथे तर तब्बल सात द्वारशाखा आहेत. या द्वारशाखेच्या तळाशी द्वारपालाचे शिल्प कोरलेले असते. हे शिल्प होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिराच्या द्वारशाखेवरील द्वारपालाचे आहे.
या द्वारपालाच्या हातात डमरू आणि त्रिशुळ आहे. यावरून हा शैव द्वारपाल असल्याचे अनुमान काढता येते. म्हणजे हे मंदिर शैव देवतेचे आहे हे ठरवता येते.
आक्रमकांच्या भितीने बहूतांश मंदिराच्या गर्भगृहातील मूर्ती भक्तांनी मुळ जागेवरून दूसरीकडे नेवून ठेवल्या. मग बराच काळ लोटल्यावर सगळं काही स्थिरस्थावर झाल्यावर रिकामा गाभारा पाहून स्थानिक भाविकांनी घडवायला सोपी म्हणून महादेवाची पिंड आणून बसवली. मग मंदिर मुळ कुठल्या देवतेचे? हे ओळखणं अवघड होवून बसले. अभ्यासकांनी हे दाखवून दिले की जी मुख्य देवता मूर्ती आहे त्या अनुषंगाने द्वारपाल, ललाटबिंबावरील देवता, बाह्य भागातील देककोष्टकांतील देवता यावरून काही अनुमान काढता येते.
गर्भगृहातील अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्यासाठी जी प्रणाल असते तिलाही अर्थ आहे. तिथे गोमुख कोरले आहे किंवा मकर प्रणाल आहे याचेही अर्थ आहेत.
अतिशय देखणी अशी ही शैवद्वारपालाची मूर्ती आहे. आजूबाजूला इतर भक्तगणांची शिल्पे आहेत. सर्वच नृत्याच्या ललित मूद्रेत आहेत. भोवती सुरेख नक्षी आणि किर्तीमुखही कोरलेले आहे.
मंदिराचा मुख्यमंडप आणि गाभारा यांना जोडणार्या जागेला अंतराळ असा शब्द आहे. या ठिकाणी अंधारच असल्याने इथली शिल्पकला दूर्लक्षीत राहते. प्राचीन मंदिरात गेलात तर गर्भगृहाच्या द्वारशाखा आवर्जून बारकाईने न्याहाळा. खुप सुंदर कलाकृती इथे दिसतील.
फोटो सौजन्य.
Travel Baba
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

 मूर्ती मालिका -१४


श्रीधर विष्णु
मंदिरांच्या बाह्य भागातील देवकोष्टकांत कोणती देवता आहे त्यावरून आतील मूख्य मूर्तीबाबत अनुमान लावले जाते. ही विष्णुची मूर्ती गुप्तेश्वर मंदिराच्या (धारासूर, ता. गंगाखेड, जि. परभणी) दक्षिणेला बाह्य भागातील देवकोष्टकांत स्थित आहे. उजव्या खालच्या हातात पद्म, वरच्या हातात चक्र, डाव्या वरच्या हातात गदा आणि खालच्या हातात शंख असा क्रम आहे. या विष्णुला श्रीधर असे नामाभिधान आहे. या विष्णुची जी स्त्री शक्ती आहे तीला "मेधा" असे संबोधतात. अशी विष्णुची २४ नावे आणि त्यांच्या २४ शक्ती आहेत. या मूर्तीला मोजकेच पण रेखीव असे दागिने दाखवले आहेत.
जो पाय उभा आहे नेमके बरोबर त्याच बाजूला विष्णु जरा कललेला दाखवला आहे. दूसरा पाय दूमडलेला असून त्याचा तळवा आत वळवलेला आहे. खाली टेकलेल्या पायाची बोटंच फक्त जमिनीला स्पर्श करत आहेत. टाच अधर आहे. डौलदारपणा मूर्तीला प्राप्त झाला आहे. नसता शास्त्र सांगत आहे त्याप्रमाणे श्रीधर विष्णु म्हणजे पद्म चक्र गदा शंख दाखवलेकी काम संपले. पण इथे या डौलदारपणात शिल्पकाराची प्रतिभा दिसून येते. डावी मांडी मुडपलेली असल्याने त्या ठिकाणची गादी दबलेली आहे. उलट उजवा पाय खाली सोडला असल्याने त्याखालच्या गादीला उभार आहे. या बारकाव्यांतून कौशल्य दिसून येतो.
मूर्ती उभ्या स्वरूपात असेल तर तीला स्थानकमूर्ती म्हणतात. बसलेली असेल तर आसनस्थ म्हणतात. गर्भगृहातील जी मुख्य मूर्ती आहे ती केशव विष्णुची आहे. ही मूर्ती प्रत्यक्ष या मंदिरात नसून बाजूच्या मंदिरात आहे. गुप्तेश्वर मंदिराच्या गाभार्यात सध्या महादेवाची पिंड आहे.
(छायाचित्र सौजन्य
Arvind Shahane
परभणी)



अनंतशयन विष्णु
(मूर्ती व्रताचा ५० वा दिवस म्हणजेच सुवर्ण महोत्सव)
मूर्तीबद्दल सांगण्याआधी नकळत सहज घडलेल्या या व्रताबद्दल सांगतो. घटस्थापनेच्या दिवशी (१७नोव्हेंबर) माझ्या घरातील महालक्ष्मीच्या मूर्तीपासून याची सुरवात झाली. नवरात्राप देवीच्या मूर्तींपुरतं ठरवलं होतं. पण दसर्याच्या दूसर्या दिवशी
Sai Chapalgaonkar
ने तिच्या घरच्या पुजेतील व्यंकटेश बालाजीच्या मूर्तीचा फोटो पाठवला. मग त्यावर लिहिलं. आणि मग लिहितंच गेलो. पन्नास दिवस लिहायचे ठरवले कारण माझे पन्नासावे वर्ष चालू आहे. ही मी मलाच दिलेली भेट आहे. पुढेही लिहित राहिन पण असं व्रत म्हणून रोजच लिहिन असं नाही. आपण सगळ्यांनी दिलेला प्रतिसाद आश्चर्यकारक माझ्यासाठी अभूतपूर्व असा राहिला.
सुरवात घरच्या मूर्तीने केली आता शेवटही घराजवळच्या मूर्तीनेच करतो आहे. (उद्या ५१वा दिवस. समापन म्हणजेच काल्याचे किर्तन म्हणतात तसे एका अप्रतिम भव्य मूर्तीवर लिहिणार आहे. या देखण्या मूर्तीने आपण भैरवी करू.)
अनंतशयन असा हा अप्रतिम विष्णु मंदिराच्या बाह्य भागावर कुठे सहसा आढळत नाही. ही मूर्ती परभणीच्या क्रांती चौकातील राम मंदिरात आहे (टाकळकर कुटूंबियांचे हे मंदिर आहे).
उजव्या वरच्या हातावर मस्तक विसावलेले आहे. उजव्या पायाशी लक्ष्मी असून ती पाय चुरत आहे (याला पाय दाबणे म्हणत नाहीत). तिच्या बाजूला भुदेवी हात जोडून उभी आहे. नाभीतून उगवलेल्या कमळावर ब्रह्मदेवाची प्रतिमा कोरलेली आहे. पाठशिळेवर दहा अवतार कोरलेले आहेत. खाली नागाच्या वेटोळ्यांची मउ शय्या आहे. डोक्याशी नागाचा फणा आहे.
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे पाठशिळेवर कोरलेले अष्टदिक्पाल. कंसात दिशा आणि वाहन दिले आहेत. इंद्र (पूर्व -ऐरावत)), अग्नी (अग्न-मेष) , यम (दक्षिण-महिष), निऋती (नैऋत्य-श्वान), वरूण (पश्चिम-मकर), वायु (वायव्य-मृग), कुबेर (उत्तर- नरवाहन) , ईशान (ईशान्य-वृष). शिल्पात त्यांची वाहने पण दाखवली आहेत. अभ्यासक या शिल्पाला फार महत्वाचे मानतात त्याचे कारणच ही वैशिष्ट्ये आहेत. बारवेत अशा शिल्पाची स्थापना केलेली असते.
उद्या या मूर्ती व्रताचे उद्यापन करूया. आपणा सगळ्यांचे मन:पूर्वक धन्यवाद. देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्राचीन मंदिरे मूर्ती संवर्धनाचा जागृतीचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती.
(अष्टदिक्पाल संदर्भ "भारतीय मूर्तीशास्त्र" या
प्रदीप म्हैसेकर
च्या पुस्तकातून)
(छायाचित्र सौजन्य मल्हारीकांत देशमुख, परभणी)



सर्वांगसुंदर भव्य देखणा शार्ङगधर बालाजी
मूर्ती प्रेमींनी आयुष्यात किमान एकदा तरी पहावीच अशी सुंदर मूर्ती म्हणजे मेहकरचा (जि. बुलढाणा) शार्ङगधर बालाजी. पु.ल. देशपांडे यांनी लिहिलं आहे, "मेहकरचा बालाजी पाहून पटतं लक्ष्मी नारायणाच्या प्रेमात का अडली असेल ते."
साडेअकरा फुटाची ही भव्य काळ्या पाषाणातील मूर्ती शिल्पकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. आयुधांचा क्रम बघितला तर उजव्या खालच्या हातात पद्म, वरच्या हातात गदा, डाव्या वरच्या हातात चक्र आणि खालच्या हातात शंख आहे. विष्णुच्या या रूपाला त्रिविक्रम म्हणतात. पण मेहकरला या मूर्तीला शार्ङगधर बालाजी म्हटले जाते. मूर्तीचा अप्रतिम असा मुकूट आहे त्यावर शार्ङग नावाचे धनुष्य हाती घेतलेले विष्णुची प्रतिमा आहे म्हणून याला शार्ङगधर म्हणतात.
मूर्तीच्या पाठशिळेवर दशावतार कोरलेले आहेत. डावीकडून क्रमाने मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह या नंतर ब्रह्मदेवाची प्रतिमा कोरलेली आहे. त्या वर वामन अवतार आणि मध्यभागी सर्वात वर शिखरावर विष्णु प्रतिमा आहे. खाली उतरताना दूसर्या बाजूने परशुराम, महेश, राम, बलराम, बौद्ध आणि कल्की अशा दशावतार अधिक ब्रह्मा विष्णु महेश १३ प्रतिमा आहेत.
डाव्या उजव्या बाजूला जय विजय आहेत. मूर्तीच्या उजव्या बाजूला खाली भुदेवी आणि डाव्या बाजूला महालक्ष्मी आहे.
मूर्तीची प्रमाणबद्धता, अलंकरण याचे वर्णन करावे तितके थोडे आहे. ही मूर्ती ७ डिसेंबर १८८५ रोजी मेहकरच्या एका गढीत खोदकाम करताना सापडली. इंग्रज अधिकार्यांनी रितसर पंचनामा करून मूर्ती इंग्लंडला पाठविण्याचे ठरवले. पण गावकर्यांनी मूर्ती गावाबाहेर जावू द्यायची नाही असा पण केला. तातडिने तीची विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केली. हजारो लोकांनी प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती हलवू देणार नाही असा आग्रह धरला. शेवटी धार्मिक बाबीत हस्तक्षेप करायचा नाही या १८५८ च्या राणीच्या जाहिरनाम्यातील कलमाच्या अनुषंगाने इंग्रज अधिकार्यांनी आपला निर्णय मागे घेतला.
आठ वर्षात मंदिराचे बांधकाम लोकांनी पूर्ण केले आणि मग ही मूर्ती तिथे स्थापित केली. उद्या ७ डिसेंबरला मूर्ती सापडली त्या घटनेला १३२ वर्ष पूर्ण होतील. त्या लोकांनी शिकस्त केली म्हणून मूर्ती वाचली. म्हणूनच ही सर्वांगसुंदर मूर्ती आज आपल्या देशात आपल्या डोळ्यासमोर आहे. या मूर्तीचा चांगला फोटो मला भेटू शकला नाही. कदाचित शार्ङगधराचीच इच्छा तूम्ही त्याला प्रत्यक्ष पहावे अशी असेल. मूर्ती व्रताची सांगता करताना माझा आग्रह नव्हे हट्ट आहे. ही मूर्ती एकदा पहाच.
मेहकरचे ज्येष्ठ मराठी कवी ना. घ. देशपांडे यांनी या मूर्तीवर सुंदर काव्य रचले. तिनेच मी या मूर्ती व्रताच्या काल्याच्या किर्तनाचा शेवट करतो.
त्रिविक्रमा हे, हे जगदंतर, सुंदर शार्ङगधरा
तव चरणाशी लक्ष्मी सुंदर
जय विजयाचे युगूल मनोहर
अवताराची तूझी प्रभावळ मनमोहन श्रीधरा ।।१।।
तूझे गीत गाते हे मंगल
अविरत निर्मळ गंगेचे जळ
पिउन ते, ही सस्यश्यामला प्रमुदित होते धरा ।।२।।
शिखराभवती शुभ्र पाखरे
प्रदक्षिणा करतात तूला रे
धुंडतात हे तुला सारखे अगोचरा गोचरा ।।३।।
पडतो मी पण तू वरती धर
व्यथित असा मी तू करूणाकर
हे करूणामय तूझ्यात आहे पूर्णकृपेचा झरा ।।४।।
- ना.घ. देशपांडे
(श्री व्यंकटेश व कालहस्तीश्वर, ले. रा.चिं. ढेरे, प्रकाशक पद्मगंधा)
सर्व वाचकांचे शतश: आभार. मूर्ती व्रत येथे समाप्त झाले. मूर्तींवर वेळोवेळी लिहितच राहिन. मंदिर मूर्ती कोशाचे मोठे काम हाती घेतो आहोत त्यात तूम्हा सर्वांचा सहभाग राहू द्या सहकार्य करा. प्राचीन मंदिरे व मूर्तींचे जतन संवर्धन अभ्यास या चळवळीस सहकार्य करा.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

 मूर्ती मालिका - १५

 

येरगी येथील काळम्मा

सरस्वतीची एक अतिशय सूंदर मूर्ती होट्टल पासून जवळच असलेल्या येरगी (ता. देगलूर जि. नांदेड) येथे आहे. स्थानिक लोक "काळम्मा" या नावाने तीची पूजा करतात.
ही मूर्ती आसनस्थ आहे. सरस्वती ओळखु येते कारण डाव्या वरच्या हातात आपण ज्याला एकतारी म्हणून ओळखतो तशी एकतंत्री वीणा आहे. त्याच बाजूला खालच्या हातात पुस्तक आहे. उजवा खालचा हात नीट दिसत नाही त्या हातात अक्षमाला आहे. वरच्या हातात अंकुश आहे. हळेबीडू येथील नृत्त मूद्रेतील सहा हातांच्या सरस्वतीच्या एका हातात अंकुश दाखवलेला आहे. तसा तो येथे आढळून येतो. कधी अंकुशाच्या ऐवजी पाश दाखवलेवा असतो. वीणा आणि पुस्तक जास्त आढळून येतात. त्यावरूनच ढोबळमानाने ही मूर्ती ओळखता येते.
मूर्तीच्या अंगावरील दागिने विशेषत: गळ्यातील हार अप्रतिम आहे. असे चौरसाकृती "नेकलेस" अगदी आजही फॅशनच्या नावाने लोकप्रिय आहे. त्याची पाळंमुळं या आठशे वर्षांपूर्वीच्या मूर्तीमध्ये सापडतात. होयसळ शैलीतले हे शिल्पांकन आहे.
पाठीमागे सहा देवतांच्या मूर्ती आहेत. अजून एक मूर्ती जी छायाचित्रात दिसत नाही ती असावी म्हणजे या सप्त मातृका असतील. पायाशी हंस कोरलेला आहे. पण खंडित असल्याने त्याची ओळख नीट पटत नाही.
Ainoddin Warsi
या मित्राने मूर्तीचा फोटो पाठवला.
Rajesh Kulkarni
यांनी या ठिकाणाची माहिती पुरवली. अभ्यासकांनी या सरस्वती मूर्तीवर अजून प्रकाश टाकावा. सरस्वती मंदिर म्हणून या ठिकाणाचा विकास झाला पाहिजे.
(आपणा सगळ्यांच्या प्रेमानं मी खरंच अवघडून गेलोय. नवनविन मूर्तींची माहिती आपण पाठवत अहात. हे मूर्ती व्रत आता माझे एकट्याचे उरले नसून सर्वांचेच झाले आहे. तूम्ही पाठवत असलेल्या फोटोंचे माहितीचे मन:पूर्वक स्वागत. मी माझ्या कुवतीप्रमाणे याला न्याय देत राहिन. परत धन्यवाद. रोज शक्य नाही पण शक्य तसे लिहित राहिन.)



मकर तोरणावरील देखणा नटेश
मंदिराच्या मुख्य मंडपातून गर्भगृहाकडे जाताना जो पॅसेज लागतो त्याला अंतराळ म्हणतात. या भागात डाव्या उजव्या भिंतींवर देवकोष्टके असतात. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची जी चौकट असते तिच्या वरच्या भागाला मकर तोरण म्हणतात. होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिराच्या मकर तोरणावर हा नृत्य करणारा शिव कोरला आहे ( नृत्य शिव म्हणजे नटराज नव्हे). नटराज मूद्रेशिवाय शिवाच्या नृत्य मूद्रीत शिल्पांना नटेश असे म्हणतात. डावा पाय जमिनीवर आणि उजवा पाय उचललेला अशी ही मूद्रा आहे. (नटराज मूद्रेत उजवा पाय जमिनीवर आणि डावा उचललेला असतो) आजूबाजूला भक्तगण वाद्य वाजवत संगीतात गुंग झालेले आहेत. भक्तांच्या चार मूर्ती असून दोन वाद्य वाजवत आहेत तर दोन ललित मूद्रेत उभ्या असून नृत्याला साथ देत आहेत. मुख्य नर्तकाच्या मागे "कोरस" म्हणून कसे इतर उप नर्तक नाचत असतात तसे.
मगरीच्या मुखातून निघालेले नक्षीचे तोरण शिवाच्या माथ्यावर आहे. हे तोरण मोठे कलात्मक आणि सुंदर आहे. डाव्या खालच्या हातात बीजपुरक आहे. उजव्या वरच्या हातात डमरु आणि खालचा हात वरद मूद्रेत असून त्याच हातात अक्षमाला आहे. पायाशी नंदी बसलेला आहे.
हे मंदिर शिवाचे आहे हे सुचित करणारे हे शिल्पांकन गर्भगृहाच्या चौकटीवर दिसून येते. मंदिरांवरच्या शिल्पात खुप अर्थ दडलेला असतो. केवळ कोरायचे म्हणून शिल्प कोरले असे होत नाही. या शिल्पातील इतर मूर्तीही लयबद्ध आहेत. तोरणाच्या वरतीहि डाव्या उजव्या कोपर्यात गंधर्व किन्नर कोरलेले दिसून येतात. शिडी लावून वर चढून ही शिल्पं नीट पाहिली पाहिजेत. त्यांची सुंदर छायाचित्र, चलचित्रण (व्हिडिओ) करून ठेवले पाहिजे. म्हणजे सामान्य रसिकांना त्याचा आनंद घेता येईल. अन्यथा शिल्पातले बारकावे लक्षात येत नाहीत. खुप वरचे किंवा पुरेसा प्रकाश नसलेल्या जागचे दिसतही नाही.
छायाचित्र सौजन्य


पशु पक्षी शिल्पं घोटण
मंदिरांवर कोरलेल्या शिल्पांमागे काही एक अर्थ दडलेला असतो. पण काही शिल्प काही वास्तुरचना या सौंदर्याचा भाग बनुन निखळ कलात्मक आविष्कार बनुन येतात. पशु पक्षांच्या या सहा जोड्या घोटण (ता. शेवगाव जि. नगर) थेथील मल्लिकार्जूनेश्वर मंदिरावरील आहेत. मंदिराच्या पायाशी गजथर, अश्वथर असतो. पण हे प्राणी युद्धात वापरले जाणारे आहेत. मोर हंस गरुड हे देवतांचे वाहन आहैत. पण घोटण मंदिरावरील ही शिल्पे मुख्य मंडपावरील खांबांवर स्वतंत्र शिल्प म्हणून कोरलेली आहेत हे विशेष. बदक, हत्ती, हंस, वराह, हरिण आणि वानर अशा या सहा जोड्या आहेत. यातही परत नर मादी असं काही दाखवलं असतं तर त्यालाही काही वेगळा अर्थ देता आला असता. इथे तसंही नाही. केवळ जोड्या आहेत. मुख्य मंडपाच्या स्तंभांवर पौराणीक संदर्भ कोरलेले असतात किंवा नक्षी असते. पण इथे प्रामुख्याने पशु पक्ष्यांच्या जोड्या आहेत.
तेराव्या शतकातील या मंदिराचा जिर्णोद्धार पेशवेकाळात १८ व्या शतकात करण्यात आला. पुरातत्व खात्याकडून हे मंदिर चांगल्या पद्धतीनं जतन केलं गेलं आहे. पैठणपासून दक्षिणेला २० किमी अंतरावर हे मंदिर आहे. इथपर्यंत जाण्यासाठी रस्ता चांगला आहे.
(छायाचित्र
Vincent Pasmo
)

श्रीकांत उमरीकर औरंगाबाद 9422878575

मूर्ती मालिका -१६



गणेशासोबत नृत्यमग्न उंदीर उंदरी
गणेशाच्या विविध मोहक शिल्पकृती मंदिरांवर आढळून येतात. यातील नृत्यगणेश तर खुपच सुंदर आहेत. घोटण (ता. शेवगाव जि. नगर) येथील खांबांवर पशु पक्षांची शिल्पे ठळकपणे आढळून येतात. छायाचित्रातील शिल्पाने मला चकितच केले. शिल्पात नृत्य करणारा गणेश आहे. पण त्याच्या सोबत कोण आहे? तर दोन उंदीर दिसत आहेत. कमरेखाली उंदीर आणि वर मनुष्य. यातही परत डाव्या बाजूला आहे ती स्त्री तर उजव्या बाजूला पुरूष. उंदरी नाचत आहे तर उंदीर झांज वाजवत आहे. या मंदिरातील पशुपक्षांची शिल्पे संख्येन जास्त आणि ठळक आहेत. या शिल्पात गणपतीचे वाहन म्हणून छोटासा उंदिर न दाखवता त्याच्या सोबत नृत्य करणारी तेवढ्याच आकाराची ही उंदिर नवरा बायकोची जोडी. या कलाकाराच्या कल्पकतेला सलाम. (या आकृती किन्नरांच्या आहेत असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यावर इतर अभ्यासकांनी प्रकाश टाकावा.)

(छायाचित्र Vincent Pasmo




अशोक वनात हनुमान
घोटणच्या मल्लिकार्जूनेश्वर मंदिरात (ता. शेवगांव जि. नगर) पशुपक्ष्यांची शिल्पे लक्षणीय आहेत हे मी आधी सांगितले होतेच. या शिल्पात सीतेच्या शोधातील हनुमान दाखवला आहे. शिल्पाची झीज झाली शिवाय मोडतोड झाल्याने आधी लक्ष्यात नाही आले. तेथील पुजार्याने सांगितल्यावर नीट लक्ष्य देवून बघितले. मग हनुमानाने पुढे केलेले बोट म्हणजे तो सीतेला अंगठी दाखवतोय हे लक्ष्यात आले. बाजूला दोन बलदंड स्त्रीया म्हणजेच राक्षसी आहेत. अंगठी दिसताच सीतेने मान वरती केली, अंगठीसाठी हाताची ओंजळ पुढे केली. एरव्ही सीता खाली मान घातलेली दाखवली जाते. पण रामाची अंगठी दिसताच ती आनंदली. या शिल्पकाराने नेमका हा क्षण टिपला आहे. मागची अशोकाचे खोड सरळ न दाखवता कलात्मक असे त्रिभंग मुद्रेत उभ्या असलेल्या सुरसुंदरी सारखे दाखवले आहे. हनुमान हा आकाराने लहान होवून सीते समोर उभा राहिला असे वर्णन रामायणात आहे. इथे शिल्पकाराने त्याचाही विचार केलाय हे विशेष. बसलेल्या सीतेइतकीच हनुमानाची उंची आहे.
जेंव्हा हे शिल्प संपूर्ण चांगल्या स्थितीत असेल तेंव्हा त्याचे सौंदर्य काय आणि किती असेल. आज केवळ अवशेषांवरून अंदाज लावला तर त्याचे सौंदर्य जाणवते. मंदिरावरची छोटी शिल्पे आकारामुळे दूर्लक्षीत राहतात पण त्यांच्यातही मोठा अर्थ दडलेला असतो.
(छायाचित्र
TravelBaba
)  



मानस्तंभावरील जैन देवता
चारठाणा (ता. जिंतूर जि. परभणी) येथ ३४ फुटी उंच भव्य सुंदर आणि कलात्मक असा मानस्तंभ आहे. याचा कालखंड १३ व्या शतकातील आहे. पैठण आणि वेरूळच्या कैलास लेण्यात असलेल्या स्तंभांशी याची तूलना करता येते. याच्यावर चार दिशांना चार मातृदेवता कोरलेल्या आहेत. देवतांच्या वर छोट्या देवकोष्टकात जैन तीर्थंकारांच्या मूर्ती असल्याने या जैन मातृदेवता असल्याचे अनुमान निघते.
पूर्वेकडील चक्रेश्वरी जिच्या हातात चक्र असून वाहन गरुड ,उत्तरेकडील पद्मावती जिचे वाहन हंस , पश्चिमेकडील अंबिका जिचे वाहन सिंह , दक्षिणेकडील ज्वालामालिनी जिचे वाहन वृषभ व अष्टभुजा .
याच स्तंभाच्या समोर मंदिराच्या द्वारशाखेवरील तोरणाचे अवशेष आढळून येतात. इथे उत्खननास परवानगी मिळाल्यास मंदिर सापडण्याची शक्यता अभ्यासक ज्यांनी या मूर्तीवर/ स्तंभावर संशोधन केलेले
Laxmikant Sonwatkar
हे सांगतात.
हा सगळा परिसर निव्वळ उकिरडा बनला आहे. स्वच्छता अभियान राबवून गावकरी प्रयत्न करत आहेत. पण उत्खननास परवानगी आणि निधी मिळाल्या शिवाय इथला प्रश्न निकाली निघणार नाही. सरकारी निधी न मिळाल्यास जैन संघटनांनी याकडे लक्ष द्यावे निधी उपलब्ध करून द्यावा ही कळकळीची विनंती.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

मूर्ती मालिका - १७



विष्णुची वराह मूर्ती
मत्स्य, कुर्म या नंतर तिसरा अवतार वराह मानला जातो. वैष्णव मंदिरांवर वराह अवताराच्या मूर्ती प्रामुख्याने आढळून येतात. ही वराहमूर्ती जाम (ता. जि. परभणी) येथील प्राचीन मंदिरावरची आहे. मुख वराहाचे व शरिर मानवाचे अशी स्थानक मूर्ती (म्हणजे उभी) या प्रकारातील हा नृवराह म्हणून ओळखला जातो. उजव्या खालच्या हातात गदा आहे. वरच्या हातात पद्म आहे. त्यातही वैशिष्ट्य म्हणजे वरती कमळ फुललेले तर खालच्या बाजूस कळी आहे. डावा मुडपलेला हात आहे त्यावर लक्ष्मी विराजमान आहे. त्या हातात शंख आहे. डाव्या खालच्या हातात चक्र आहे. डावा पाय शेष नागाच्या फण्यावर टेकवला आहे. शिवाय कासवही या पायाखाली आढळून येते. मूर्तीला सुंदर अलंकारांनी मढवले आहे. शंख पकडला त्या हातात शंखाला पकडण्यासाठी सोन्याची साखळी गुंफावी असाही दागिना दिसून येतो. शंखाच्या खोबणीत बोटं बरोबर बसवली आहेत. शंख कसाही पकडला आहे असे नाही. उजव्या हाताची गदा ऐटदारपणे जमिनीवर रोवलेली आहे. सगळ्याच मूर्तीला एक छानसा डौल प्राप्त झालेला आहे. जामचे मंदिर वैष्णव मंदिर असल्याने विष्णुने सुंदर कलात्मक प्रतिमांचे अंकन यावर आढळून येते.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.
(छायाचित्र सौजन्य
Arvind Shahane



वेरूळ लेण्यातील वराह अवतार शिल्प
काल जाम येथील वराह अवतार शिल्पाची चर्चा केली होती. तेंव्हा कैलास लेण्यातील याच शिल्पाचा विषय निघाला होता. हे शिल्प वेरूळच्या लेणी क्र. १४ मधील आहे. या लेणीला "रावण की खाई" म्हणून ओळखले जाते. हिरण्याक्षाने वसुंधरेला समुद्रतळी नेले होते. विष्णुने वराह अवतार घेवून तिला वर काढले अशी कथा आहे.
नागाच्या आभोगावर, वेटोळ्यावर उभा असणारा वराह. एक पाय पुढे, एक हात कमरेवर. याला आढील आसन म्हणतात याला. काहीतरी जगावेगळा पराक्रम करून पृथ्वीला पाण्या बाहेर काढलेला आश्वासक आवेग जाणवतो इथे. पृथ्वी अतिशय मनापासून हुश्श म्हणून त्याला धन्यवाद म्हणत असावी इतकी सहज सुंदर आहे. तिच्या कानात असणारे एक कुंडल माने जवळ आहे तर दुसरे लांब आहे.
खाली बाजूला हिरणाक्ष आणि त्याची पत्नी हात जोडून उभ्या असलेल्या दिसतील. पाताळ, पाणी असणारा प्रदेश, इतर असंख्य गोष्टी आणि नाग देवता यांचे नाते सर्वश्रुत आहे.
इथे वराहाने धरलेले चक्र आणि पृथ्वीची त्रिभंग मूर्ती खूप महत्त्वाची. हातात चक्र नेमकेपणाने धरले आहै. महाभारत मालिकेत मध्ये नितीश भारद्वाज किंवा सगळे नर्तक धरतात तसे कधीही धरत नाहीत.
भुदेवीने आपला उजवा हात वराह मुखावर सहजपणे टेकवला आहे. तिच्या दूसर्या हातात कमंडलू दिसत आहे. पाठीमागे अर्धवर्तूळांतून समुद्र सुचीत केलेला आहे. वराह अवतार शिल्प मराठवाड्यात बर्याच ठिकाणी आढळून येतात.
वराह अवताराचे या प्रदेशातील हे सर्वात भव्य शिल्प आहे.
(पुरक माहिती
Rahul Deshpande
यांनी दिली)
छायाचित्र सौजन्य
Travel Baba Voyage



योगमुद्रेतील विष्णु
जाम (ता.जि.परभणी) येथील मंदिरावर बाह्यभागात दशावतार मूर्ती शिल्पांकित आहेत. त्यावरून या मूर्तीला चुकून बौद्ध अवतारातील विष्णु संबोधले जाते. पण मूर्तीला चार हात असून वरच्या दोन हातात शंख आणि चक्र स्पष्ट दिसत आहेत. त्यावरून हा विष्णु असल्याचे स्पष्ट होते. खालील दोन हात योगमुद्रेत असून उजव्या हातात पद्म आहे. पद्ममासनातील ही मूर्ती दूर्मिळ आहे. अशीच मूर्ती उमरगा येथील शीव मंदिरावर देखील आहे. योगासनातील या विष्णुमूर्तीवर अलंकरण अतिशय किमान दाखवलेले असते. मस्तकापाठिमागे प्रभावळ दिसून येते. याच मूर्तीला हातातील आयुधांच्या क्रमावरून "आसनस्थ केशव" असे संबोधन देगलुरकरांनी आपल्या संशोधनात वापरले आहे. गदेचा अपवाद वगळता बाकी आयुधांचा विचार केल्यास ते बरोबरही वाटते.
या योगमुद्रेतील मुर्तीचे बुद्ध मुर्तीशी साम्य चटकन डोळ्यात भरते. याच परिसरातील विष्णु मुर्तींवर दशावतारांचे अंकन दाखवत असताना ९ वा अवतार बुद्ध दाखवला जातो. औंढा येथील केशव मुर्तीवर तो दाखवलेला आहे.
छायाचित्र सौजन्य
Arvind Shahane
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

मूर्ती मालिका - १८


उमा महेश्वर (सिद्धेश्वर मंदिर, लातुर)

लातुर शहराचे मुळ नाव रत्नपुर. येथे रत्नेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर असल्याचे सांगितले जाते. त्या मंदिरातील हे अप्रतिम उमा महेश्वर शिल्प. जे आता सिद्धेश्वर मंदिरात जरा अडगळीत पडलेले आहे. याचे पूर्ण छायाचित्र घेण्याचा प्रयत्न गिरीश कुलकर्णी व भाउसाहेब उमाटे यांनी केला. पण ते जमले नाही. हे छायाचित्र निवृत्त शिक्षक एस.के. माने यांनी पाठवले आहे.
या शिल्पात शिव सव्य ललितासनात असून (डाव्या पायाची मांडी घातलेली उजवा पाय मोकळा खाली टेकवलेला) पार्वती वाम ललितासनात (उजव्या पायाची मांडी, डावा पाय खाली सोडलेला) मांडीवर बसलेली आहे. शिवाच्या डाव्या वरच्या हातात त्रिशुळ आहे, डाव्या खालच्या हातात बीजपुरक आहे. उजवा एक हात पार्वतीच्या स्तनांना स्पर्श करत असून दूसरा हात पाठीमागे आहे. त्या हातात सर्प असावा. नीट दिसत नाही. पार्वतीचा उजवा हात शिवाच्या खांद्यावर आहे त्याची बोटं दिसतात. डाव्या हातात बीज पुरक आहे. एरव्ही जटा मुकुटात असणारा शीव येथे करंड मुकूटात आहे. कपाळावर मुकुटाची छान नक्षीदार महिरप आली आहे. पार्वतीही अशाच नक्षीदार मुकुटात दाखवली आहे. शिवाला नेहमी सर्पालंकार दाखवतात. पण इथे गळ्यात, कानात, दंडात, छातीवर सुंदर अलंकार आहेत. पायाशी नंदी आहे. या शिल्पाच्या उजव्या बाजूस गणेश आणि डाव्या बाजूस कार्तिकेय आहेत. एका फ्रेममध्ये येत नसल्याने त्यांची छायाचित्रे दिली नाहीत.
शिव पार्वतीच्या मध्ये एक हात दिसत आहे पण तो कुणाचा हे ओळखु येत नाही. पार्वतीचा तो हात असेल तर तिचा चौथा हात कुठे असेल?
ही मूर्ती फार मोठा ठेवा आहे. अभ्यासक जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा. सध्या ज्या अडचणीच्या जागी आहे तिथून बाहेर काढून तिची स्थापना चांगल्या ठिकाणी करावी. जेणेकरून छायाचित्र नीट काढता येईल, अभ्यासकांचे लक्ष जाईल.



सारिपाट खेळणारे शिवपार्वती (लेणी क्र १४ वेरूळ)
शिवपार्वती सारिपाट खेळत आहेत असे मोठ्या आकारातील दोन शिल्पपट वेरूळमध्ये आहेत. सारिपाटसाठी संस्कृतमध्ये "अक्षक्रिडा" असा शब्द वापरला जातो. एका शिल्पावर पूर्वीच या सढरात लिहिले होते. अजून एक संधी मागणारा शिव असा त्या शिल्पपटाचा आशय होता. वरिल शिल्पपट अजून मनोज्ञ आणि देवतांचेपेक्षा स्वाभाविक मानवी भावनांना शिल्पांकित करतो.
खेळताना शिवाने काहीतरी लबाडी केली आहे. चिडून पार्वतीने तोंड फिरवले आहे. शिव तीचा हात धरून साॅरी म्हणतो आहे. मागे गणेश भृंगी चामरधारिणी आणि बाकी गण आहेत.
या शिल्पाचे खरे सौंदर्य खालच्या बाजूस दडलेले आहे. शिवाचा नंदी मोकळा सहज उभा आहे. त्याच्या भोवती शिवगण मस्त त्याची मजा घेत आहेत. कुणी त्याच्या गळ्यातली घंटा वाजवत आहे. कुणी शेपटीशी खेळत आहे. कुणी पाय धरला आहे. कुणी पाठीवर चढू पहात आहे. विठु माझा लेकुरवाळा तसा हा नंदी आहे. एखादा समजूतदार ड्रायव्हर असेल तर त्याच्या कारशी गल्लीतील पोरांनी खेळावं तसं हे शिल्प आहे.
देवतांचे मानवी स्वभावाप्रमाणे चित्रण हे वैशिष्ट्य इथे आढळून येते.
वेरूळला कैलास लेण्यांशिवायही खुप सुंदर शिल्पे आहेत. पर्यटक तिकडे फिरकत नाहीत. इतर लेण्यांसाठी म्हणून खास वेरूळला भेट द्या. कैलास तर जागतिक चमत्कार आहेच. पण इतरही ठिकाणं पाहिली पाहिजेत.
कोरोना आपत्तीत दीर्घ काळ बंद ठेवलेल्या वेरूळच्या लेण्या १० डिसेंबरला खुल्या करण्यात आल्या. पहिल्याच दिवशी अगदी पहाटे जावून
Akash Dhumne
आणि
Vincent Pasmo
या मित्रांनी वेरूळचा दौरा केला. लेणी खुली होईल तेंव्हा पर्यटक म्हणून पहिलं पाउल आपलं असावं असा आग्रह व्हिन्सेंट या फ्रेंच मित्राचा होता. त्याच्या औरंगाबाद प्रेमाला सलाम. हे छायाचित्र आकाशने घेतले आहे.



गुढ शिल्पे (गोकुळेश्वर, चारठाणा)
काही मंदिरांवर तंत्रमार्गी, अघोरपंथी, शाक्तपंथी अशी शिल्पे कोरलेली आढळून येतात. त्यांचा अर्थ त्या संप्रदायातील एखाद्या कृतीशी निगडीत असतो. पण सामान्य दर्शकाला मात्र कळत नाही.
हे शिल्प चारठाणा (ता. जिंतूर जि. परभणी) येथील गोकूळेश्वर मंदिराच्या मुखमंडपाच्या स्तंभावरील आहे. यात एकुण पाच मानवी आकृती दिसून येतात. पण पाय मात्र ८ आहेत. दोन्ही टोकाच्या दोन स्त्रीया आहेत. अगदी मधला पुरूष आहे. पण त्या बाजूचे दोन कोण हे चटकन कळत नाहीत. कारण त्यांचे केस स्त्रीयांसारखे मागे बांधलेले आहेत. पण छाती सपाट दाखवली असल्याने त्यांना स्त्री संबोधता येत नाही.
मधल्यांनी बाजूच्यांच्या डोक्यावर हात ठेवले आहेत. शिवाय सर्वात मधल्याचे वाटणारे दोन्ही हात बाजूच्या स्त्रीयांच्या हातात आहेत. हेच हात मधल्या पुरूषांचेही भासतात. पायासोबतच हाताचीही संख्या आठच आहे.
यातील टोकाच्या स्त्रीया स्वतंत्र आहेत. मधले तीनही एकमेकात अडकलेले आहेत. एक तर्क असा मांडता येतो. पुरूषाच्या उजव्या बाजूस त्याची शक्ती असते आणि डाव्या बाजूस पत्नी (वामांगी). बहूतेक देवतांच्या बाबत हे शिल्पांकित केलेले आढळून येते. येथे सामान्य पुरूषाच्या बाबतीतही हे सुचित केले असावे. आणि आज कार्टून काढताना जशी चलचित्र (animation) काढली जातात तसे उजवीकडचे चित्र पहिले, दूसरे चित्र दोन्ही स्त्रीयांचे हात हाती घेतलेले. आणि तिसरे मग पूर्णत: डावीकडच्या स्त्रीच्या डोक्यावर हात ठेवला असे. मधला पुरूष एकच असावा. फक्त तीन अवस्थांत दाखवला आहे. याला एक गती आहे. ही नृत्यातीलही एक गतीमान अशी मुद्रा असू शकते. कारण डाव्या बाजूच्या स्त्रीच्या हातात टिपरी सारखे काही दिसत आहे.
याचा तंत्रमार्गातही काही वेगळा अर्थ असू शकेल. केसांची आणि पायांची रचना यातून पुरूषांत स्त्रीचा अंश आहे असेही सुचवायचे असावे.
Laxmikant Sonwatkar
तूमच्या सारख्या अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकावा. Dr-Arvind Sontakke हे तूम्हा अभ्यासकांना आव्हान ठरणारे विषय आहेत.

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

 मूर्ती मालिका -१९



सुखासनातील केवल शिव
औंढा येथील नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर अभ्यासक भक्त शिल्पशास्त्राचे विद्यार्थी सर्वांसाठीच आकर्षणाचे ठिकाण आहे. या मंदिरावर विविध मूर्ती आहेत. त्यांचे आव्हान अभ्यासकांना नेहमीच राहिलेले आहे.
सुखासनात बसलेली ही मूर्ती. वरच्या हातात त्रिशुळ आणि सर्प आहे. या सर्पाचा फणा उगारलेला नसून खाली झुकलेला शांत असा दाखवला आहे. खालचे दोन्ही हात वरद मुद्रेत आहे. डाव्या खालच्या हातात काय आहे लक्षात येत नाही पण अगदी याच मूद्रेतील इतर एका ठिकाणी याचे वर्णन शक्ती असे देगलुरकरांनी केले आहे. अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकावा. तसेच त्रिशुळाच्या जागी खट्वांग आहे अशाही सुखासनातील मूर्ती आहेत.
खाली बसलेला नंदीही मान खाली घालून शांत बसलेला आहे. शिवाच्या चेहर्यावरील भाव शांत आहेत. उजव्या पायाचा दूमडलेल्या पंजा शिल्पकाराने मोठा कलात्मक असा कोरलेला दिसून येतो. लांब कर्णभुषणे लक्ष वेधून घेतात. गळ्यात कमरेला पायात अगदी मोजकेच पण रेखीव अलंकार आहेत. एरवी शिवाचे अलंकार नागबंधादी किंवा उग्र असे दर्शवलेले असतात.
हे बारकावे पाहिल्यावर हे शिल्पकार कुणी साधे पाथरवट नसून अभ्यासु साधना करणारे प्रतिभावंत असल्याची खुण पटते.
पुरूष देहाचे सौंदर्य वर्णन करताना कमरेचे वर्णन "सिंहकटी" असे केलेले असते. या वर्णनात वरील मूर्ती बरोबर बसते. शिवाची कटी तशीच दाखवली आहे.
औंढा नागनाथाला भेट देणार्यांना विनंती आहे कृपया घाईघाईने दर्शन आटोपून निघून जावू नका. अप्रतिम असा शिल्प खजिना मंदिरावर आहे. कोरणार्यांनी आपले आयुष्य पणाला लावले. तूम्ही डोळे भरून किमान पहा तरी.

छायाचित्र सौजन्य

Travel Baba Voyage

 


विष्णुची शक्तीरूपे

अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) मंदिरावरील विष्णुची शक्ती रूपातील शिल्पे भारतीय मूर्तीशास्त्राला मोठे योगदान आहे असे अभ्यासक मानतात. हातातील आयुधे शंख चक्र गदा आणि पद्म यांचा जो क्रम आहे त्यानुसार विष्णुची २४ नावं आहेत. या २४ नावांसाठी २४ शक्ती आहेत. यातील उजव्या बाजूने म्हणजेच प्रदक्षिणा क्रमाने गदा, शंख, चक्र आणि डाव्या खालच्या हातात पद्म अशा विष्णुला वासुदेव संबोधले जाते. या छायाचित्रात याच क्रमाने आयुधे धारण केलेली जी स्त्री प्रतिमा आहे तीला लक्ष्मी असे संबोधले जाते (देवता म्हणून असलेली लक्ष्मी मूर्ती वेगळी). या मूर्तीचे शास्त्रा प्रमाणे केलेले विश्लेषण वेगळे. पण एक ललित कलाकृती म्हणूनही ही लोभस वाटते. उजवा हात ज्या पद्धतीने गदेवर टेकवला आहे, त्याचे लालित्य आणि गदेच्या सरळपणावर तोललेला सर्व शरिराचा भार, दूमडलेला उजवा पाय आणि रोवलेला तिरका डावा पाय, कमरेपासूनचे वरचे सर्व शरिर ९० अंशात फिरवून समोर आणले आहे जेंव्हा की पायाची दिशा वेगळी आहे. गदेच्या वरच्या टोकावर टेकवलेला पंजा हाच संपूर्ण शिल्पाचा तोल सांभाळणारा मध्यबिंदू जाणवतो.
अन्वा मंदिरावर २४ पैकी १७ शक्ती रूप शिल्पे आजही शाबूत आहेत. त्यांचे शिल्पांकन शास्त्रा सोबतच शिल्प सौंदर्य म्हणूनही थक्क करणारे आहे.



शेषशायी विष्णु आणि समुद्रमंथन
ज्याठिकाणी बारवा, कुंड, पुष्करणी आहेत अशा जागी शेषशायी विष्णुचे शिल्प कोरलेले आढळून येते. हे शिल्प सहसा मंदिरावर नसते. मराठवाड्यातील प्राचीन बारवांमध्ये अशी शिल्पे आढळून आलेली आहेत. यातही हे शिल्प अजून वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण या ठिकाणी समुद्रमंथनाचा देखावा शिल्पांकित केला आहे. गोसावी पिंपळगांव (ता. सेलु, जि. परभणी) येथील दूर्लक्षीत असे प्राचीन मंदिर, तेथील बारव या परिसरांत आमचे भटके पुरातत्व प्रेमी मित्र मल्हारीकांत देशमुख यांना हे शिल्प आढळून आले. शेषशायी शिल्पांवर दशावतार कोरलेले असतात, अष्टदिक्पालांच्या प्रतिमा असतात. पण इथे समुद्र मंथनाचा प्रसंग कोरलेला आहे.
देव आपल्या उजव्या बाजूला आहेत. त्यांच्या बाजूला वासुकीच्या शेपटाचा भाग आहे. दानव डाव्या बाजूला आहेत त्या बाजूला नेमका नागाचा फणा दाखवला आहे. जेणेकरून विषाची बाधा दानवांना व्हावी.
विष्णुचे पाय चुरणारी लक्ष्मी दिसत नाही. तो भाग भंगला आहे. बाकी शंख, चक्र, गदा ही आयुधं स्पष्टपणे ओळखु येतात.
असा शिल्पखजिना गावोगाव विखुरला आहे. गोसावी पिंपळगाव हे अडवळणाचे गाव. गावकर्यांनी मंदिर परिसर चांगला जपला आहे. अभ्यासकांनी अशा शिल्पांचा सविस्तर अभ्यास करून त्यांना प्रकाशात आणले पाहिजे. यातील शास्त्रीय बारकावे समोर आले पाहिजेत. ही विखुरलेली शिल्पे जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र आणून त्यांचे संग्रहालय झाले पाहिजे.
परभणी जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील अभ्यासक, पुरातत्व प्रेमी, सामाजीक कार्यकर्ते यांची एक समिती नेमून या कामाला गती दिली आहे. त्यांचे मन:पूर्वक
अभिनंदन
. इतरही जिल्ह्यात असा पुढाकार जिल्हाधिकार्यांनी घ्यावा. त्याला सर्व इतिहास प्रेमींनी सहकार्य करावे ही अपेक्षा. (परभणी जिल्ह्याच्या समितीत मी स्वत: आहे. परभणी जिल्ह्यातील प्राचीन शिल्पे मुर्तीं बाबत काही माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा. २८ डिसेंबरपासून समितीचा स्थळ पहाणीचा दौरा सुरू होतो आहे)
छायाचित्र सौजन्य
Malharikant Deshmukh
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

 मूर्ती मालिका -२०


 द्राक्ष सुंदरी

होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) मंदिरावरची सुरसुंदरींची शिल्पे मोठी आकर्षक सौष्ठवपूर्ण सौंदर्यपूर्ण अशी आहेत. चित्रातील सुरसुंदरीला नेमकं काय नाव आहे मला माहित नाही. तिच्या डाव्या हातात द्राक्षाचा घोस दिसतो आहे म्हणून मी तीला "द्राक्ष सुंदरी" असं नाव ठेवलं. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकावा.
हीच्या गळ्यातील दागिना जरा वेगळा दिसतो आहे. शिवाय जानव्या सारखी एक साखळी डाव्या खांद्यावरून दोन वक्षां मधून खाली कमरेकडे आली आहे. हा प्रकारही वेगळा वाटतोय. उजवा हात जो खाली सोडलेला आहे त्यावरचे एक कंकण खाली झुकलेलं आहे. केसांची रचना पण मोठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. पाठीमागे मानेखाली उतरलेला हा केसांचा शेपटा वेगळा आकार ल्यालेला आढळतो. किंवा तो पातळ कापडात गुंडाळलेला आहे की काय असे वाटते. डावा पाय हा जमिनीला टेकला नसून भिंतीला टेकवलेला दिसतो आहे. दोन पायांच्या मधून सोडलेला कटीवस्त्राचा शेव लयबद्ध असा डावीकडे वळलेला आहे. या सुंदरीचे स्तन अतिशय प्रमाणबद्ध दाखवलेले आहेत. उन्नत दाखवण्याच्या नादात काही शिल्पात एकुण शरिर रचनेचा तोलच बिघडतो.
ठाम सरळ रेषेतील उजवा पाय वगळता डावा पाय व दोन्ही हात यांची रचना लयबद्ध अशी मोहक केलेली आहे. चेहरा नेमका उजवे पाउल जिकडे आहे त्याच्या विरूद्ध वळलेला आहे. "जा तोसे नाही बोलू कन्हैय्या" असा भाव जाणवतो. पाउल तर तिकडे वळले आहे पण "आम्ही नाही जा" अशी स्त्री सुलभ भावना आहे.
छायाचित्र सौजन्य
Travel Baba Voyage



तोरण शिल्पाचा 3D नमुना
होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिरांचा विविध पैलूंनी बारीक विचार झाला पाहिजे. आता हे जे शिल्प आहे ते गर्भगृहाच्या द्वारशाखेवरील तोरणाचे आहे. समोरून पाहताना हातात माळा घेतलेले यश किन्नर दिसतात. त्यांच्या हातातील माळांची सुरेख अशी नक्षी बनलेली आढळून येते. या भागात सहसा अंधार असतो त्यामुळे संपूर्ण शिल्पाकडे लक्ष जात नाही. पण या तोरणावर प्रकाश टाकला आणि खालची बाजू बघितली तर आपण चकित होतो. हे शिल्प 3D आहे. आपल्याला दिसते ती छाती पासून वरची बाजू दर्शनी प्रतलात आहे. पण कमरेपासून खालची बाजू दूसर्या प्रतलात आहे. ९० अंशाचा कोन करून या मानवी आकृत्या वळवलेल्या आहेत. शिल्पकलेतील हे मोठं आव्हानात्मक काम आहे. अशाच पद्धतीने द्वारशाखेवर नृत्य करणारे स्त्री पुरूष दाखवलेले आहेत. म्हणजे शिल्पकलेत एकाच प्रतलाचा वापर न करता दोन दिशा दोन प्रतलात शिल्प कोरलेली आढळून येतात. हे केवळ सौंदर्यपूर्णच आहे असे नाही तर गणिताचा अभ्यास करून निर्माण झालं आहे.
प्राचीन मंदिरांबाबत अशा काही बाबी खरंच आचंबीत करतात. वास्तुशास्त्र, शिल्प सौंदर्य, विज्ञान, गणित असा अद्भुत संगम इथे पहायला मिळतो. दगडाची प्रतवारी शोधून मगच शिल्प कोरले जाते. दगडी चिर्यांची रचना नुसती सौंदर्यपूर्ण नसते तर त्यात शास्त्रही सांभाळलेले असते.
Travel Baba Voyage
अशा अवघड जागी वर चढून फोटो काढल्या बद्दल धन्यवाद मित्रा.



युद्ध शिल्पे
घोटण (ता. शेवगांव, जि. नगर) येथील मल्लिकार्जूनेश्वर मंदिरावर पशु पक्षांची वैशिष्ट्यपूर्ण शिल्पं असल्याचे याच मालिकेत पूर्वी लिहिलं होतं. याच मदिराच्या स्तंभांवर युद्ध आणि युद्ध सराव अशी काही शिल्पे आढळून आली. ही शिल्पे पण वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पहिल्या शिल्पात तलवार घेवून लढणारे दोन योद्धे दिसत आहेत. त्यांनी शिरस्त्राण घातलेले आहेत. प्रत्यक्ष युद्धापेक्षा हा युद्ध सराव असावा. दूसरे शिल्प कुस्तीचे आहे. खेळा सोबतच युद्धाची तयारी म्हणून प्रशिक्षणाचा भाग असावा.
तिसर्या शिल्पात हत्ती आणि घोडा आहे. हत्तीने सोंडेत एक माणूस पकडला आहे. समोरचा घोडा उधळलेला आहे. हत्तीवर माहूत नाही. प्रत्यक्ष युद्धातीलच एक क्षण शिल्पात फोटोसारखा पकडला आहे. चौथे आणि शेवटचे शिल्पही असेच गतीमान आहेत. यात दोन अश्वस्वार दिसत आहेत. दोघांच्याही हातात भाले दिसत आहेत. दोघांच्या मध्ये जमिनीवर एक योद्धा आहे. घोडे मागील दोन पायांवर आहेत. युद्धाचा जोर इथे दिसून येतो. वीररसात ही शिल्पे न्हावून निघाली आहेत.
छायाचित्र सौजन्य
Travel Baba Voyage
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

मूर्ती मालिका -२१



लाकुड नव्हे हा दगड आहे
वेरूळ लेण्यातील ३२ क्रमांकाच्या लेणीत स्तंभावरील हे नक्षीकाम नजरेस पडले आणि पाय अक्षरश: थिजलेच. पर्णयुक्त घटाचे शिल्प खुप ठिकाणी पहायला मिळते. त्यावर उत्तम नक्षीकामही केलेले असते. पूर्ण कलशास स्त्री गर्भाचे प्रतिक मानले जाते. हे मंगल प्रतिक आहे. पूर्ण कलश म्हणजेच पाण्याने भरलेला, त्यावर पर्ण आणि या कलशास हार, रत्नांच्या माळांनी शृंगारलेले असते.

वेरूळच्या या स्तंभावर प्राचीन मांगल्य संकल्पना प्रमाणे शिल्पांकन आहेच. पण मुख्य म्हणजे शिल्पकाराने कलाविष्कारासाठी स्वातंत्र्य घेत ज्या अप्रतिम पद्धतीने बारकावे कोरले आहेत ते थक्क करणारे आहेत. कलशाच्या मुखातून खाली लोंबलेली पाने आणि त्यांना समतोल करण्यासाठी सोन्याचा मोत्याचा गोफ अशा माळा बघत रहाव्यात अशा आहेत.

कलशावर पण नक्षी कोरलेली आहे. हे सगळं एका अखंड स्तंभाचा भाग आहे. सगळं दालनच एका दगडात कोरलेलं. चुकीला जागाच नाही. मंदिराच्या उभारणीत तरी एखादा दगड शिल्पकामात डावा वाटला तर बाजूला काढता येतो. लेणीत म्हणजेच लयन स्थापत्यात चुकीला जागाच नाही. हे लक्षात घेतलं म्हणजे या कामाचे मोल कळते. कलशाच्या चारही बाजूला खाली यक्ष किन्नरही कोरलेले आहेत. वेरूळचे वैशिष्ट्य म्हणजे भव्यता. पण कुठेही बोजडपणा नाही. कवेत येणार नाहीत असे रूंद आणि उंच खांबही विलक्षण सुंदर आहेत. कलात्मक दृष्ट्या नाजूक कलाकुसरीने मढलेले आहेत.
या लेण्यांच्या शिल्पकलेने वेडे होवून परत परत भेट देणार्यांची संख्या प्रचंड आहे. वेरूळ अजिंठ्याचा नाद लागला की माणूस "आषाढी कार्तिकी" वार्या करत राहतो.
Vincent Pasmo
हा आमचा वेडावलेला फ्रेंच मित्र वर्षातून किमान एकदा तरी वेरूळची वारी करतोच. काही परदेशी पर्यटक तर तिथेच मुक्काम ठोकुन असतात. भारतीय भावा बहिणींना हात जोडून विनंती तूम्ही कैलास लेण्याशिवाय बाकीच्या सुंदर लेण्यांना किमान एकदा भेट द्या. शांतपणे लेण्या बघा. कुठून कुठे जाताना रस्त्यात वेरूळ लागलं म्हणून वचावचा पाहून पळून जावू नका.

छायाचित्र
Travel Baba Voyage




विष्णुचे शक्तीरूप - शांती

अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) मंदिरावरील विष्णुची शक्तीरूपे विशेष आहेत. मुर्तीशास्त्र अभ्यासकांत या मंदिराची ओळखच त्यामुळे आहे. या पूर्वी या सदरांत काही शक्तीरूपांचा परिचय दिला होता. सोबतच्या छायाचित्रात जे शक्तीरूप आहे त्याच्या हातातील आयुधांचा क्रम उजव्या खालच्या हातात चक्र, वरच्या हातात शंख, डाव्या वरच्या हातात पद्म आणि डाव्या खालच्या हातात गदा असा आहे. अशा विष्णुला मधुसूदन संबोधले जाते. मधुसूदन विष्णुच्या या शक्तीरूपाला शांती म्हणतात. (देगलुरकरांच्या पुस्तकांत santi असे लिहिले आहे. सांती असाही याचा उच्चार होतो. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकावा)

शास्त्राप्रमाणे मुर्ती कोरल्यावर शिल्पकाराने पुढे जावून जो कलाविष्कार घडवला आहे तो विलक्षण आहे. चक्र असलेला हात आणि गदेवरचा हात यात नृत्याची मुद्रा वाटावी असा समतोल आहे. शंख व पद्म धारण केलेल्या हातांची बोटे विलक्षण कलात्मक अशी वळवलेली आहेत. दोन्ही पाय दूमडलेले वक्राकार आहेत. डाव्या पायाचा तळवा संपूर्ण मुडपून समोरच्या बाजूला दिसतो आहे. गदाही सरळ नसून तिरपी आहे. कानातील कुंडले चक्राच्या आकाराची आहेत. गळ्यात एक हार मानेजवळ तर दूसरा दोन वक्षांच्या मधुन कलात्मकरित्या खाली ओघळला आहे. ठाम सरळ रेषा शिल्पात कुठेच नाही. अगदी बाजूच्या नक्षीतही नाही. मुर्तीच्या बाजूचे दोन उभे भक्कम स्तंभ जन्म आणि मृत्युचे प्रतिक मानले तर बाकी सगळ्याच शिल्पात लालित्य भरून राहिले आहे. कदाचित जन्म आणि मृत्यु या दोन बिंदूमध्य लालित्यपूर्ण आयुष्य जगले तर "शांती" लाभते असंही शिल्पकाराला सुचवायचे असेल.
छायाचित्र सौजन्य
Travel Baba Voyage



भैरव मूर्ती - वालूर
वालूर (ता. सेलू जि. परभणी) येथे वाल्मिकेश्वर मंदिर आहे. मंदिर आता नव्याने बांधलेले आहे पण हा परिसर प्राचीन अवशेषांनी भरलेला आहे. शेषशायी विष्णु, हात जोडलेला गरूड, आसनस्थ शिव पार्वती, विष्णुच्या हातातील चक्र, रिद्धी सिद्धीसह गणेश असे कैक अवशेष या परिसरात विखुरलेले मंदिरा समोरच्या वडा खाली आढळून येतात. एक प्राचीन बारव आहे जी आता जवळपास बुजली आहे.

मंदिराच्या भिंतीला टेकून ही भैरवाची मूर्ती ठेवलेली आहे. याच्या वरच्या दोन हातात त्रिशुळ आणि डमरू आहे. डोक्यावरचे केस मुंड माळेने बांधलेले आहेत. मस्तकामागे ज्वालेप्रमाणे गोलाकार प्रभा मंडळ आहे. खालचा उजवा हात भंगलेला असून डाव्या हातात नरमुंड आहे. डाव्या बाजूला खाली या नरमुंडातून टपकणारे रक्त चाटणारा कुत्रा आहे. नग्न भैरवाच्या कमरेला साखळी असून मांड्यांवर घंटा लोंबत आहेत. डाव्या बाजूला गण आहे. उजव्या बाजूस भुतनाथ आहे. गुडघ्यावरून खाली मुंडमाला लोंबते आहेत.

ललित मुद्रेत भैरव उभा आहे. एरव्ही उग्र दाखवला जाणारा हा भैरव इथ शांत चेहर्याचा दाखवलेला आहे.
या परिसरातील प्राचीन शिल्पावशेष, मंदिरांची अवस्था, बुजलेल्या बारवा पाहून अतोनात दू:ख होते. इतकी अनास्था का आहे? जरा जागरूकता दाखवली तर भव्य वाडे असलेले हे एकेकाळचे संपन्न गाव संस्कृती ग्राम म्हणून (हेरीटेज व्हिलेज) पर्यटकांचे आकर्षण बनु शकते.

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

मूर्ती मालिका -२२


शिव पार्वती पाणिग्रहण

कैलास लेणं हे केवळ अप्रतिम शिल्पसौंदर्याने नटलेले आहे, वास्तुशास्त्राचा अद्वितिय नमुना आहे इतकंच नव्हे. तर या लेण्यात संस्कृतीक चालीरिती कोरलेल्या आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. अगदी आजही सनातन पद्धतीने जो विविहसोहळा पार पडतो त्यात "पाणिग्रहण" असा विधी आहे. तेराशे चौदाशे वर्षांपूर्वी कोरलेल्या या लेण्यांत हाच विधी अशाच पद्धतीने शिल्पांकित केला आहे.

हा प्रसंग शिव पार्वती विवाह सोहळ्याचा आहे. शिवाचा डावा हात पार्वतीच्या उजव्या खांद्यावर आहे. उजवा हात हातात घेतला आहे. पार्वती सलज्ज अशी जराशी मान खाली झुकवून उभी आहे. दोघेही ललित मुद्रते सहजतेने उभे आहेत. सुख दू:खात हीला सोबत घेवून धर्म अर्थ काम मोक्ष हे चारी पुरूषार्थ मी प्राप्त करेन, हीला सुखात ठेवेन, ही माझी सहधर्मचारीणी आहे अशा आशयाचे हे संस्कृत मंत्र आहेत. हे आजही उच्चारले जातात. शिव पार्वती जसे उभे आहेत अगदी तसेच आजही जोडप्याला उभे केले जाते. पत्नी ही नेहमी डाव्या बाजूला दाखवली जाते. म्हणूनच तीला "वामांगी" असा शब्द आहे. उजव्या बाजूला आई, बहिण, मुलगी, सुन अथवा पुरूषाची शक्ती दर्शविलेली असते.

खाली ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. जे की या विवाह सोहळ्याचे पौराहित्य करत होते. कैलास लेणे या दृष्टीनेही पहायला पाहिजे.
छायाचित्र
Travel Baba Voyage



विष्णुची शक्ती रूपे - सरस्वती
अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) येथील मंदिरावर विष्णुची शक्तीरूपे शिल्पांकीत आहेत. त्यातील काहींचा परिचय या मालिकेत पूर्वी आला आहे. छायाचित्रातील मूर्तीच्या हातात प्रदक्षिणा क्रमाने (डावीकडून उजवी कडे, घड्याळ्याच्या काट्या प्रमाणे) गदा, शंख, पद्म आणि चक्र अशी आहेत. या विष्णुला संकर्षण म्हणून संबोधले जाते. प्रतिभाशक्ती किंवा वाणी ही संकर्षण विष्णुची वैशिष्ट्ये मानली जातात. स्वाभाविकच या विष्णुची जी शक्ती आहे तिला सरस्वती हे नाव आहे. वीणा पुस्तक धारिणी म्हणून ज्या सरस्वती देवतेची पुजा होते ती सरस्वती वेगळी. ही केवळ शक्ती रूप आहे.
या शक्तीच्या चेहर्यावर शांत भाव आहेत. प्रतिभेच्या पाठिशी बळ असावे लागते. नुसती दूबळी प्रतिभा कामाची ठरत नाही. संकर्षण विष्णुला बलाची देवता मानले जाते. साहजिकच त्याची शक्ती असलेली सरस्वतीही सामर्थ्यवान समजली जाते. ज्या प्रतिभेच्या पाठिशी सामर्थ्य आहे तिथे स्थिरता येते. आणि त्या स्थिरतेतून समाधान. म्हणूनच ही मुर्तीच्या चेहर्यावरील भाव शांत समाधानी दिसून येतात.

२४ पैकी १७ शक्ती रूपाच्या मुर्ती आजही अन्वा मंदिरावर शाबूत आहेत. अभ्यासकांनी जाणकार पर्यटकांनी त्या आवर्जून नजरेखालून घालाव्यात.

विष्णुच्या हातात आयुधांचा जो क्रम आहे त्या प्रमाणे जी नावे दिली आहेत व त्या सोबत शक्तीची जी नावे आहेत ला तक्ता अभ्यासकांसाठी देत आहे. पद्म, गदा, शंख, चक्र यांच्यासाठी प-ग-श-च ही लघु नावे वापरली आहेत. हा क्रम प्रदक्षिणा मार्गाप्रमाणे आहे.
१. केशव-किर्ती (पशचग) २. नारायण- कांती (शपगच) ३. माधव - तुष्टी (गचसप) ४. गोविंद - पुष्टी (चगपश) ५. विष्णु - ध्रती (गपशच) ६. मधुसुदन - शांती (चशपग) ७. त्रिविक्रम - क्रिया (पगचश) ८. वामन - दया (शचगप) ९. श्रीधर - मेधा (पचगश) १०. ऋषिकेश - हर्षा (गचपश) ११. पद्मनाभ-श्रद्धा (शपगच) १२. दामोदर-लज्जा (पशगच) १३. वासुदेव-लक्ष्मी (गशपच) १४. संकर्षण - सरस्वती (गशपच) १५. प्रद्युम्न - प्रीती (चशगप) १६. अनिरूद्ध - रती (चगशप) १७. पुरूषोत्तम - वसुधा (चपशग) १८. अधोक्षज - त्रायी (पगशच) १९. नरसिंह - विद्युत (चपगश) २०. अच्युत - सुगंधा (गपचश) २१. उपेंद्र - विद्या (शगचप) २२. जनार्दन - उमा (पचशग) २३. हरी - शुद्धी (शचपग) २४. श्रीकृष्ण - बुद्धी (शगपच)
(संदर्भ : Temple Architecture and Sculpture of Maharashtra - Dr. G.B. Deglurkar - page no. 362)
( इंग्रजीत ही यादी आहे. संस्कृत उच्चार वेगळे असतील तर कृपया चुक लक्षात आणून द्या. वामन आणि अच्युत शक्तींची नावे क्रिया आणि दया अशीही दिलेली आहेत. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकावा. त्रिविक्रम विष्णुचा आयुधक्रम मुळ पुस्तकात चुकला आहे. तो इथे दूरूस्त करून दिला आहे)



भव्य द्वारपाल
कैलास लेणं (वेरूळ, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद) विविध कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यातील एक वैशिष्ट्य आहे भव्यता. ही भव्यता कलात्मक आहे. केवळ प्रचंड मोठी एखादी ओबडधोबड वास्तु आहे असे नव्हे.
कैलास लेण्यातील दर्शनी भागातील हे दोन द्वारपाल. सामान्य मानवी आकारापेक्षा जरा मोठेच आहेत. हातातील गदा जमिनीवर रोवून द्वारपाल अतिशय रिलॅक्स असे उभे आहेत. त्यावर त्यांची ढोपरं विसावली आहेत. त्यांच्या गळ्यातले दागिने, पायातले तोडे, कमरेची मेखला संपन्नता दर्शवतात. या भव्य मंदिरात प्रवेशणार्या भक्तांकडे ते कौतूकाने पहात आहेत.
राष्ट्रकुटांची सत्ता या काळात शिखरावर होती. त्यामुळे संपन्नता भव्यता शांतपणा असा भाव आपल्याला इथे पहायला मिळतो. ज्या ८ व्या शतकात लेणं कोरल्या गेलं त्या काळाचाही विचार केला पाहिजे.
कैलास लेण्याचा विचार असा विविध पैलूंनी करता येतो. प्रत्येकवेळी भेट दिली की काहीतरी वेगळंच लक्षात येतं. सौंदर्याची प्रचिती प्रत्येकवेळी नव्याने येते.
Travel Baba Voyage
thanks for pic.
- श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

मूर्ती मालिका - २३



लोभस बाळं व सप्तमातृका
वेरूळ (ता. खुलताबाद जि. औरंगाबाद) मधील कैलास लेणं वगळलं तर इतर लेण्याकडं पर्यटकांचे पाउल वळत नाही. "रावण की खाई" नावाने ओळखले जाणार्या १४ व्या क्रमांकाच्या लेण्यातील या सप्त मातृका. बसलेल्या सात स्त्रीया आणि त्यांच्या भोवती बागडणारी मुलं असा हा सुंदर लोभस शिल्पपट आहे. मुल आईच्या पायाशी घोटाळत असून मांडीवर घेण्याचं आर्जव करत आहे, कुठे मांडीवर बसून स्तनांना तोंडात घेवू पहात आहै, कुठे मांडीवर उभं राहून आईच्या कानातल्यां आभुषणाशी खेळत आहे, या सातही मातृका अलंकाराने नटलेल्या आहेत. पुत्रवल्लभेचं एक अतीव समाधान या मूर्तींच्या चेहर्यावर आहे. स्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता म्हणतात हे तंतोतंत सिद्ध करणारं हे शिल्प. ही बाळं नग्न आहेत. यातूनही परत एक निर्व्याजता दाखवली आहे. बोरकरांच्या पाणी कवितेत एक ओळ अशी आलेली आहे
खोल काळ्या बावडीचे
पारदर्शी मग्न पाणी
कोकरूसे नाचणारे
खेळणारे नग्न पाणी
तशी ही बाळं आई भोवती नागव्याने बागडत आहेत. देवदेवतांची शिल्पं पाहताना त्यातील स्वाभावीक मानवी भाव भावनांचे जे दर्शन होते त्याकडे आपले दूर्लक्ष होते. सप्तमातृका खुप ठिकाणी कोरलेल्या आढळून येतात. पण अशी लोभसता कुठे नाही. या शिल्पाचा कुणी फारसा उल्लेख करत नाही याची खंत वाटते. "वेरूळ लेणी" याच नावाने मधुसूदन नरहर देशपांडे यांचे सुंदर पुस्तक अपरांत प्रकाशनाने प्रकाशीत केले आहे. त्यात यावर लिहिले आहे. वेरूळ लेणी पाहायला येणार्यांनी या पुस्तकाचा वापर जरूर करावा.
Travel Baba Voyage
मित्रा तूझे छायाचित्रासाठी आभार. आम्हा भारतीयांना आमच्या संस्कृतीची ओळख करून देणार्या तूझ्या सुसंस्कारीत फ्रेंच मानसिकतेला लाख लाख प्रणाम.



द्वारशाखेवरील 3D शिल्प

होट्टल मंदिरातील गर्भगृहाच्या तोरणावरील 3D शिल्पाचा उल्लेख यापूर्वी या मालिकेत आला आहे. हे आताचे शिल्प आहे अन्वा (ता. भोकरदन जि. जालना) येथील महादेव मंदिराच्या द्वारशाखेचे. अतिशय आकर्षक अशी ही द्वारशाखा. एकुण पाच द्वारशाखा या मंदिराला आहेत. शार्दूल शाखा, पुष्प शाखा, स्तंभ शाखा, पुष्प शाखा अशा क्रमाने चार शाखा आहेत आणि पाचवी छायाचित्रात दिसणारी विद्याहार शाखा. गायन वादन नृत्य करणारे स्त्री पुरूष यावर कोरलेले आहेत. यात मध्यभागी पुरूष आहेत आणि आजू बाजूला छोट्या आकारात स्त्रीया आहेत.
कोपर्याचा वापर करून त्यावर अशी नक्षी कोरायची हे आवाहन शिल्पकाराने लिलया पेलले आहे. आश्चर्य म्हणजे यातील प्रत्येक शिल्प वेगळे आहे. एकच आकृती परत परत डिझाईनचा भाग म्हणून काढलेली नाही. प्रत्येक शिल्पाचा वेगळा विचार केला आहे हे विशेष. या द्वारशाखांवर एका बाजूला विष्णु आणि एका बाजूला लक्ष्मी कोरलेली आहे. आपण ज्याला एकसारखे बारीक डिझाईन समजतो ते एकसारखे नसते. जवळून बारकाईने निरिक्षण केल्यास त्यातील फरक लक्षात येतात आणि थक्क व्हायला होतंं. एका पुष्पशाखेत कळी पासून अर्ध उमलले, पुर्ण उमललेले, कोमेजलेले अशा सर्व अवस्था दाखवलेल्या आहेत. एक एक मंदिर पहायचे तर किमान एक दिवस तरी पूर्ण घालवला पाहिजे. ज्या अनाम शिल्पकारांनी आयुष्य खर्च करून हे निर्माण केलं त्यांच्यासाठी किमान दिवस तर खर्च करून कलेला दाद द्यावी.



द्वारपाल - वालूर
वालूर (ता. सेलु, जि. परभणी) हे अतिशय प्राचीन वारश्याने संपन्न असे गाव.
Malharikant Deshmukh
या मित्राने याच गावावर लिहिलं आहे. या गावातील सिद्धेश्वर मंदिरावरील हे द्वारपाल. वेरूळच्या कैलास लेण्यांतील द्वारपालांवर नुकतंच लिहिलं होतं. त्याच्या साधारण ५०० वर्षानंतरचा या मंदिराचा कालखंड असावा. द्वारपालांचे मुकुट, पाठीमागची प्रभावळ, अलंकरण यादवांच्या काळातील समृद्धी दर्शवते. उत्तर यादवांच्या काळातील मंदिरं आणि बारवा या परिसरांत प्रामुख्याने आढळतात. सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकुट, चालूक्य आणि यादव या राजघराण्यांची समृद्धी या भागातील प्राचीन वारशावरून स्पष्ट होते.
या दोन्ही द्वारपालांचे दरवाजाच्या दिशेचे पायाचे पंजे आत वळलेले आहेत आणि विरूद्ध दिशेचे सरळ समोर आहेत. म्हणजे आतून काही आज्ञा आली की आत वळायचेच आहे. या शिल्पांत उभं राहण्याची ललित मूद्रा मोहक आहे. मंदिराचा जो भाग शिल्लक आहे त्यावर फारसे शिल्पांकन नाही. इथेच एक मैथून शिल्पाची शिळा निखळून पडली आहे. त्यावरून आणि या द्वारपालांवरून कोसळलेल्या भागात काही शिल्पे असावीत याचा अंदाज येतो.
या मंदिराच्या प्रदक्षिणा पथावर वाळवणं घातली आहेत. भिंतींना खिळे ठोकून दोर्यांवर कपडे वाळत घातले आहेत. मंदिराच्या बाजूने गटार वहाते आहे. मंदिराच्या भिंतीला लागुन चुली मांडल्या आहेत पाणी तापविण्यासाठी. त्याची काजळी भिंतींवर चढत आहे. मंदिराच्या छतावर गवत वाढले आहे. काय अनास्था आहे कळत नाही. अशा उकिरड्यात हे शिल्पसौंदर्य पडलेलं आहे.

- श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

मूर्ती मालिका - २५




भैरव मूर्ती - निलंगा
निळकंठेश्वर मंदिर (ता. निलंगा जि. लातूर) येथील विविध मूर्तींवर याच मालिकेत लिहिलं आहेच. आजची अप्रतिम मूर्ती भैरवाची आहे. मुर्तीच्या उजव्या वरच्या हातात डमरू आहे. खालचा हात भग्न आहे. डाव्या हातात त्रिशुळ असून खालच्या हातात नरमुंड आहे. त्यातून टपकणारे रक्त पिण्यासाठी कुत्रा जिभ चाटत दोन पायांवर उभा आहे. भैरवाच्या पायावर मुंडमाळ लोंबत आहे.
भैरवमूर्ती नग्न दाखवली जाते तशीच ती इथेही आहे.
भैरवाच्या डोक्यामागे ज्वालेसारखे दिसणारे प्रभामंडळ आहे. कपाळावर पट्ट आहे, कानात कुंडले, गळ्यात हार, कटिसूत्र, मांडीवरील साखळ्यांना घंटा आहेत. दंडांवर बाजूबंद आहेत. पायात तोडे आहेत. डाव्या बाजूला कुत्रा असून उजव्या बाजूला भुतनाथ आहे.
भैरवाच्या चेहर्यावरचे भाव उग्र असतात पण हा भैरव शांत चेहर्याचा दर्शवलेला आहे. याला काही वेगळे नाव असेल तर तज्ज्ञ अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकावा.
छायाचित्र सौजन्य : दत्ता दगडगावे, लातूर



वामन-दामोदर दूर्मिळ विष्णुमूर्ती
पैठण (ता. पैठण जि. औरंगाबाद) येथील धूंडीनाथ महाराज मठात असलेल्या लक्ष्मी नृसिंह मूर्तीबाबत याच मालिकेत लिहिलं होतं. त्याच जागी या दोन विष्णुमूर्ती आहेत. सहसा विष्णुच्या "केशव" मूर्ती जास्त ठिकाणी आढळतात (पद्म, शंख, चक्र, गदा असा आयूधक्रम). पण या दोन मूर्ती वेगळ्या आढळ्याने मी चकित झालो. डावीकडची मूर्ती वामन या नावाने ओळखली झाते. आयुधांचा क्रम प्रदक्षिणा मार्गाने असा आहे- शंख, चक्र, गदा, पद्म. या मूर्तीला ग्रीवीका, उदरबंध अलंकार वेगळे आहेत. बाकी हाता पायातील तोडे मेखला दूसर्या मूर्तीसारखेच आहेत. पाठशीळा पंचकोनी आहे.
उजवीकडची मूर्ती दामोदर नावाने ओळखली जाते. प्रदक्षिणा क्रमाने आयुधं अशी - पद्म, शंख, गदा, चक्र. या मूर्तीच्या गळ्यात ग्रीवीका नसून हार आहे. करंड मुकूटच आहे पण जास्त उंच आहे. मागची प्रभावळ मोठी आहे. खाली चामरधारिणी, सेवक आहेत. याची पाठशीळा अर्धवर्तूळाकार आहे.
या मठाचा जिर्णाद्धार होणे अभ्यासकांच्या, वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही गरजेचे आहे. आपण सगळे मिळून यासाठी प्रयत्न करू या.
Travel Baba Voyage
thanks for taking this pic in very critical position as the doors are closed and u took it from a small hole.
Akash Dhumne
मित्रा तू ही जागा दाखवलीस. परत एकदा धन्यवाद!



चामुण्डा - गुप्तेश्वर मंदिर
गुप्तेश्वर (धारासुर ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील मंदिर वास्तुशास्त्र, शिल्पसौंदर्य यांच्या दृष्टीने अप्रतिम असा नमुना आहे. या मंदिरावरील चामुण्डेचे हे शिल्प. हीचे वर्णन उग्र देवता म्हणून केले जाते.
हीच्या उजव्या हातात त्रिशुळ आहे. खालचा हात भंगलेला आहे. डाव्या हातात खट्वांग आहे. डाव्या खालच्या हाताची नखं ती कुरतडत आहे. पोट खपाटीला गेलेले. पोटावर विंचु कोरलेला पण तो स्पष्ट दिसत नाही. शुष्क स्तन लोंबत आहेत. मांस नसलेले कातडीत गुंडाळलेली अस्थीपंजर असे तिचे वर्णन आहे. तसेच पाय दाखवलेले आहेत. मुंडमाळा पायावर रूळत आहे. स्तनांच्यावर नागबंध आहे. कमरेलाही नागबंध आहे.
बिभत्स रसाचे दर्शन शिल्पकाराने दाखवले आहे. चेहर्यावरचे भावही तसेच आहेत. द्वीभंग अशी ही चामुण्डा नृत्यमुद्रेत आहे.
(चामुण्डा आणि भैरवी यांतील फरक तज्ज्ञांनी स्पष्ट करावा.)
Arvind Shahane
मित्रा तू मेहनतीने या मंदिराचे फोटो घेतलेस शिवाय दोन भागात मोठा माहितीपट तयार केलास. तूला परत एकदा धन्यवाद.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

मूर्ती मालिका २६


अंजली मुद्रेतील केवल शिव

औंढा (ता. औंढा जि. हिंगोली) येथील नागनाथ मंदिर अभ्यासकांसाठी आणि ज्योतिर्लिंग असल्या कारणे भक्तांसाठी प्रसिद्ध आहे. त्या मंदिरांवरील काही मूर्ती आजही अभ्यासकांसाठी आवाहन आहेत. ही जी मूर्ती आहे ती शैव देवतेची आहे. हातात त्रिशुळ, पात्र, वरद मुद्रेतील हातात अक्षमाला, कमंडलू दिसून येत आहेत. पायाशी मुंडमाला लोंबत आहे. खाली शिवाचे वहान नंदी आहे. मधले दोन हात अंजली मुद्रेत आहेत. अंजली मूद्रेतील तीन भव्यमुर्ती याच मंदिरावर आहेत. आणि त्या शिवाच्याच असल्याचे अभ्यासकांनी पूर्वीच्या पोस्टवर चर्चा करताना सांगितले होते. त्या मूर्ती दोन हातांच्या आहेत. इथे तर सहा हात आहेत.
अंजली मुद्रा आणि नमस्कारासाठी जोडलेले हात यात फरक आहे. नमस्कारासाठीच्या मुद्रेत समांतर असे तळवे एकमेकांना जोडलेले असतात. अंजली मुद्रेत तळवा आणि बोटं यांच्यात कोन केलेला असतो.
एकुण लक्षणं पाहता ही मूर्ती अंजली मुद्रेतील केवल शिवाची असावी असे सिद्ध होते. अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकावा. हीला भीक्षाटन शिवमूर्ती असे नाव धम्मपाल माशाळकर यांनी सुचवले आहे. वैराग्य भावना या ठिकाणी जाणवते. मस्तकाच्या पाठीमागे प्रभावळ दाखवलेली आहे. पायात हातात कमरेला अलंकरण केलेले आहे. दंडातही बाजूबंद आहेत.
Dr-Arvind Sontakke
छायाचित्र सौजन्य
Travel Baba Voyage




घोड्याच्या पायदळी शिक्षा
गोकुळेश्वर मंदिर चारठाणा (ता. जिंतुर जि. परभणी) येथील मंदिराच्या खांबावर हे शिल्प आहे. या पूर्वीही खांबावरील गुढ शिल्पावर लिहिले होते. या शिल्पात चार व्यक्ती दिसत आहेत. घोड्याच्या पुढे आणि मागे शस्त्रधारी सैनिक दिसत आहेत. त्यांच्या हातात तलवार, खड्ग किंवा दंडा असे काहीतरी दिसत आहे. एक सैनिक घोड्यावर बसलेला आहे. जो आरोपी आहे तो वाकलेला असून त्याची मान खाली झुकलेली आहे.
हत्तीच्या पायी तुडवणे अशी एक मृत्युदंडाची शिक्षा असते. तसेच गाढवावरून धिंड अशीही एक शिक्षा आहे. इथे घोडा आहे. घोड्याच्या पायी तुडवणे अशीही शिक्षा असावी.
काही शिल्पे ही केवळ शिल्पे नसतात. त्यामागे धार्मिकते पलिकडचा त्या काळातील समाज जीवनाशी संबंधीत काही संकल्पनांचा गुढ अर्थ असतो. याचा वेगळा विचार झाला पाहिजे.
शिल्पांचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी मंदिराचे निरिक्षण करण्यात वेळ खर्च करावा लागतो. परत परत त्या मंदिराला भेट द्यावी लागते.
Travel Baba Voyage
thanks for this latest pic.



भैरवी - जाम मंदिर
जाम (ता.जि. परभणी) येथील मंदिराच्या बाह्यांगावर इतर सुरसुंदरीच्या सोबत ही मूर्ती आहे. हीच्या डाव्या हातात खट्वांग आहे. पायाशी मुंडमाळ लोंबत आहे. या दोन खुणांवरून ही शैव उग्र देवता असल्याचे मानता येते. उजवा हात खंडित आहे. त्यावर कोणते शस्त्र आहे दिसत नाही. बाकी देहावरचे अलंकरण अतिशय व्यवस्थित सुंदर आहे. ग्रीविका आहे, हार लोंबतो आहे छातीवर, कमरेला मेखला आहे. मांड्यांवर मोत्याच्या माळा लोंबत आहेत. पायात तोडे आहेत. चेहरा जरा उग्र आहै.
या मंदिराचा जिर्णोद्धार करतान हे सिमेंटचे ओघळ मूर्तीवर आलेत. अतिशय देखण्या अप्रतिम शिल्पाची आपणच अशी वाट लावतो. भंजकांनी मूर्ती फोडल्या यावर आपला संताप उसळतो. मग हे स्वातंत्र्या नंतरचे विकृतीकरण करणारे कोण समजायचे?
फोटो सौजन्य :
Arvind Shahane
- श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

उकिरड्यावर पडलेले होट्टलचे शिल्पवैभव


उरूस, 22 जानेवारी 2020

नांदेड जिल्ह्यात देगलूर तालूक्यात तेलंगणा सीमेवर होट्टल नावाचे गांव आहे. चालूक्यांची उप राजधानी असलेले हे गांव शिल्पवैभवाने अतिशय समृद्ध आहे. या गावांतील दोन मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात आला. आज याच मंदिरांच्या परिसरात होट्टल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते आहे.  एक हजार वर्षांपूर्वीची ही अतिशय समृद्ध अशी नगरी. जूने भक्कम दगडी वाडे आजही गावात आहेत. परिसरांतील 22 गावे ज्यांच्या देशमुखीखाली होती अशा तालेवार देशमुखाची प्रचंड गढी या गावात आहे. गढीची पडझड झालेली असली तरी प्रवेशद्वार आणि त्या भोवतीची भक्कम भिंत जून्या वैभवाची साक्ष देते.

मुख्य महादेव मंदिराचे चिरे, नक्षीदार 20 खांब, बाह्यांगावरच्या सूरसूंदरींची शिल्पे, नृत्य गणेशाचे अप्रतिम शिल्प यांचा शोध घेवून मंदिराचे बांधकाम परत करण्यात आले. स्थानिक पाथरवटांचे सहकार्य घेत रिकाम्या जागी त्याच आकाराचे दगड कलात्मक रित्या बसविण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर काम करणार्‍या इनटॅक्ट (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ऍण्ड हेरिटेज) संस्थेच्या सहकार्याने गुरूतागद्दी सोहळ्याच्या निधीतून या कामासाठी काही निधी उपलब्ध करून देण्यात आला.

जिर्णाद्धार झालेली दोन मंदिरे पाहून एकीकडे पुरातन ठेव्याबद्दल अभिमान वाटत असतानाच समोर येते दुसरे भग्न मंदिर. जमिनीखाली अर्धे गाडले गेलेले हे मंदिर आपल्या शिल्पवैभवाने एकीकडे पाहणार्‍याचे डोळ्याचे पारणे फेडते आणि परिसराची दुर्दशा बघून डोळ्यात पाणीही आणते.

मंदिराच्या परिसरांत कित्येक शिल्पे विखुरलेली आहेत. काही शिल्पांभोवती उकिरडा साठला आहे. प्रातर्विधीसाठी लोक या जागेचा वापर करताना पाहून त्याच दगडांवर डोके आपटून घ्यावे अशी भावना दाटून येते. मंदिर परिसरांत दगडी बांधकाम असलेली बारव आहे. तिथे प्रचंड झाडी गवत वाढले आहे. पाण्याचा उपसा नसल्याने हिरवट शेवाळ्याचा थर साचला आहे. गाळ प्रचंड असल्याने पाण्याला दुर्गंधी येते आहे. निगराणी अभावी दगडी चिरे ढासळून गेले आहेत.

पुरातत्व विभाग काय करतो आहे? किंवा लोकप्रतिनिधी सरकारी अधिकारी काय करत आहेत? या सोबतच आधी सामान्य नागरिक म्हणून आपण या पुरातत्वीय महत्त्वाच्या ठेव्याची अशी अवहेलना का करतो आहोत? हा प्रश्‍न सतावतो. या मंदिराच्या परिसराची किमान साफसफाई, कुंपण घालून त्याचे संरक्षण इतकी साधी गोष्ट आपणाला का जमत नाही?

एक शिव-हरेश्वराची सुंदर मुर्ती गावात नालीच्या कडेला पडून आहे. हत्तीचे सुंदर शिल्प उकिरड्यावर लोळत आहे. होट्टल महोत्सव पाहण्यासाठी आलेला व्हिन्सेंट पास्किलीनी हा परदेशी फ्रेंच प्रवासी उपहासाने म्हणाला, ‘तूम्ही भारतीय इतके श्रीमंत अहात की अप्रतिम अशी शिल्पे तूम्ही उकिरड्यार फेकून देता.’ आता या उद्गारावर काय प्रतिक्रिया द्यावी?

ज्या मंदिराचा जिर्णोद्धार केला गेला आहे तेथपासून ते जमिनीत गाडल्या गेलेल्या दुसर्‍या मंदिरापर्यंत सरळ असा दगडी मार्ग असल्याचे अभ्यासक सांगतात. रस्त्यात असलेल्या मानवी वस्तीचे अतिक्रमण काढले तर हा संपूर्ण मार्ग दृष्टीपथास येवू शकतो.

आजही दगडी काम करणारे कारागीर येथे आहेत. त्यांची काम करण्याची तयारी आहे. त्यांचा तो पोटपाण्याचा उद्योग असल्याने गरजही आहे. मग या पाथरवटांच्या साहाय्याने ही कामं आपण का नाही मार्गी लावू शकत? निवेदनं द्या, प्रस्ताव तयार करा, मग सरकारी पातळीवर हालचाली होणार, सरकारी पातळीवरची उदासीनता हे सगळं असह्य आहे. आपल्या लोकप्रतिनिधींना याची जाण जेंव्हा येईल तेंव्हा येईल पण आधी किमान आपण स्थानिक पातळीवर शक्य होईल ते काम केले पाहिजे. त्यासाठी गावकर्‍यांनी आधी पुढाकार घेतला पाहिजे.
मंदिरांचा जिर्णोद्धार, परिसराची स्वच्छता, होट्टल पर्यंत येण्यासाठी पक्क्या चांगल्या रस्त्याचे निर्माण यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगार निर्मिती होईल. केवळ चर्चा करण्यापेक्षा आपण कृती करू या.

होट्टल असो की चारठाणा की मराठवाड्यातील अजून इतरत्र असलेली जूनी मंदिरे आणि प्राचीन वारसा सांगणार्‍या वास्तू यांचे जतन करण्यासाठी आपण सगळे मिळून चळवळ उभारू या. ज्यांना ज्यांना या कामात सहभागी होण्यात रस आहे, इच्छा आहे, मदत करायची आहे, सुचना आहेत, जे अभ्यासक आहेत त्यांनी संपर्क साधावा. आपण सगळे मिळून मराठवाडा पातळीवर ऐतिहासिक वारसा जतन चळवळीची उभारणी करू या.    श्रीकांत उमरीकर 9422878575

संस्कृती संवर्धनाचा चारठाणा पॅटर्न सर्वत्र राबवूया !


सोमवार दि. 13 जानेवारी 2020

या लेखासाठी वापरेले चित्र चारठाणा येथील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा मानस्तंभाचे चित्र आहे. संपूर्ण महाराष्ट्रात असे केवळ तीन स्तंभ आहेत. पहिला स्तंभ सातवाहनाच्या काळातील पैठण येथे आहे. दुसरा स्तंभ त्यानंतर जवळपास आठशे वर्षांनी खोदलेल्या कैलास लेण्यात आढळून येतो. आणि तिसरा स्तंभ त्यानंतर चारशे वर्षांनी उत्तर चालूक्य किंवा यादवांच्या काळातील चारठाणा (ता. जिंतूर, जि. परभणी) येथे आहे.

रविवार दिनांक 12 जानेवारी 2020 ला या गावात वारसा पदयात्रा (हेरिटेज वॉक) चे आयोजन ग्रामस्थ, इतिहास प्रेमी, परातत्त्व अभ्यासक, कलाकार यांनी केले होते. या पदयात्रेत सामील चित्रकार सरदार जाधव यांचे पाय या स्तंभाजवळ येताच खिळून राहिले. सोबतचे पुढे निघून गेले तरी सरदार जाधव त्याच जागी बसून राहिले. खाणं पिणं विसरून त्यांनी तीन तासांत हे अप्रतिम असे चित्र रेखाटले.



हा स्तंभ जैनमंदिर वास्तुशास्त्राचा एक भाग असल्याची माहिती भरपुर अभ्यास करून इतिहास अभ्यासक तज्ज्ञ लक्ष्मीकांत सोनवटकर यांनी मांडली. अगदी स्तंभावरील मातृका शिल्पांचा बारीक बारीक तपशील सांगत आपल्या मताला पुष्टी दिली. ज्या दिशेला मुर्ती आहे त्या दिशेचेही संदर्भ जेंव्हा त्यांनी दिले तेंव्हा इतिहास अभ्यासक तर सोडाच पण सामान्य दर्शकांनीही तोंडात बोटे घातली.

आज या स्तंभाच्या परिसरात अक्षरश: उकिरडा झालेला आहे. सामान्य लोक या परिसरात प्रात:विर्धी करत आहेत. स्तंभाच्या जवळच शीरच्छेद झालेली अशी यक्षाची मुर्तीती भग्न अवस्थेत पडून आहेत.

या स्तंभाच्या पूर्वेला मंदिराचे प्रवेशद्वार असावे अशी रचना मातीच्या ढिगार्‍यात स्पष्ट आढळून येते. या परिसराचे उत्खनन केल्यास मंदिर सापडण्याची शक्यता दाट आहे. पण केवळ आणि केवळ आपल्या अनास्थेपोटी हा सगळा परिसर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या अभियानात लोकांनी परिसराची साफसफाई केली. किमान जाण्यासाठी वाट तरी तयार झाली. स्तंभाच्या दगडी पायाजवळ जागा स्वच्छ झाली. पण बाकी परिसर वाढलेला झाडोरा, बाभळीची झाडे, घाण कचरा अजून शिल्लक आहे.

असे वातावरण असताना व्हिन्सेंट पास्किलीनी हा फ्रेंच पर्यटक डिसेंबर 2018 ला या गावी आला. येथील पुरातन वारसा पाहून त्याला प्रचंड असे कुतूहल निर्माण झाले. या गावाला ‘हेरिटेज व्हिलेज’ दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करण्याची गरज त्याने बोलून दाखवली. त्याची तळमळ पाहून ग्रामस्थ, इतिहास अभ्यासक, पुरातत्त्व तज्ज्ञ यांनाही या विषयाचे गांभिर्य लक्षात आले.

पाहता पाहता वर्षभर विविध घटक कार्यरत झाले. रवी पाठक सारखा एक चित्रपट दिग्दर्शक या पसिरावर अतिशय सुंदर असा माहितीपट (डॉक्युमेंटरी) तयार केली. लक्ष्मीकांत सोनवटकर सारखे इतिहास अभ्यासक या पसिराची माहिती गोळा करून त्याचे पुस्तक करण्याच्या मार्गाला लागले आहेत. येथील मंदिर शिल्पातील नृत्य करणार्‍या अप्सरा, त्यांच्या हातातील वाद्ये यांची माहिती होताच महागामी गुरूकुलाच्या सुप्रसिद्ध नृत्यांगना पार्वती दत्ता या गावात सांस्कृतिक वारसा सप्ताहाचे आयोजन करून त्यात गायन वादन नृत्य सादर व्हावे अशी आग्रही मागणी केली आहे. डॉ. दुलारी गुप्ते कुरेशी, डॉ. प्रभाकर देव, सुरेश जोंधळे यांच्यासारखे तज्ज्ञ प्रत्यक्ष या सांस्कृतिक वारसा पदयात्रेत सामील होवून या अभियानाला नैतिक बळ पुरवत आहेत. नानासाहेब राऊत सारखे लोकप्रतिनिधी स्थानिक व्यवस्था काटेकोरपणे राबवून पाहूण्यांचे आगत स्वागत आस्थेने करत आहेत. गावाच्या भल्यासाठी गावकर्‍यांकडून संपूर्ण सहकार्य करण्याची केवळ हमीच देत नाहीत तर तसे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करत आहेत.

सांस्कृतिक जागृती अभियानाच्या आठवडाभर आधीपासून गावात ग्राम स्वच्छता अभियान चालू करण्यात आले होते. उर्दू शाळेतील मुसलमान मुला मुलींनी गावातील उकंडेश्वर मंदिराची साफसफाई करून उदारामतवादी सहिष्णु परंपरेचा एक जिवंत पुरावाचा दिला. माजी सरपंच अजगर देशमुख यांनी पुढाकार घेवून सर्व मुस्लिम समाज या अभियानात सहभागी केला. या भागांतील सुफी संतांच्या दर्ग्यांच्या परिसरांतही अभियान राबविण्याची तयारी दर्शविली.

भारताची संस्कृती जनजीवन संपन्न वारसा चालीरिती समजून घेण्यासाठी परदेशी विद्यार्थी आपल्याकडे आणि आपले विद्यार्थी परदेशात अशी एक योजनाच रोटरी क्लबच्या वतीने राबविण्यात येते. चित्रकार, पुराण वस्तुच्या संग्राहक, पर्यटक मेधा पाध्ये या अशा तीन परदेशी विद्यार्थ्यांना घेवून या अभियानात सहभागी झाल्या होत्या. या परदेशी विद्यार्थ्यांनी आवर्जून भारतीय वेष परिधान केला होता. शिवाय इतर गावकर्‍यांसोबत मांडी घालून पत्रावळीवर जेवण केले.

प्रा. शिवा आयथळ हा परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयातील विज्ञानाचा प्राध्यापक. मूळचा कर्नाटकातील असलेल्या शिवाचा जन्म परभणीचाच. कर्नाटकांत संस्कृती संवर्धनाची जी जागृती आहे ती आपल्या जन्मभूमीत मराठवाड्यात नाही याची खंत त्याला वाटते. चारठाण्याच्या अभियानात तो उत्स्फुर्तपण सहभागी झाला. आपल्या कॅमेर्‍याने हे अभियान टिपताना त्याने उत्कृष्ठपद्धतीने आपल्या फर्ड्या इंग्रजीत लिहून काढले. समाज माध्यमातून त्याची हा विषय जगभर पोचविण्याची त्याची ही प्रामाणीक धडपड फार महत्वाची आहे.

शाश्‍वत पर्यटनासाठी झटणार्‍या आकाश धुमणे या तरूणाने औरंगाबादेतून सर्व तज्ज्ञ अभ्यासकांना मुद्दामहून गाडी करून या पदयात्रेसाठी आणले. मराठवाडा परिसरात शाश्‍वत पर्यटन वाढावे यासाठी गेली तीन वर्षे व्हिन्सेंट या फ्रेंच मित्राच्या सहकार्याने हा तरूण प्रयत्न करतो आहे. परदेशातील पर्यटक आपल्या संपन्न सांस्कृतिक वारश्याकडे आकर्षित करण्यासाठी  केला जाणारा हा प्रयास प्रशंसनीय आहे. पर्यटकांना अजिंठा वेरूळ बिबी का मकबरा देवगिरी किल्ला या शिवाय दाखवायला खुप काही आपल्याकडे आहे हेच लक्षात घेतले जात नाही. केवळ जून्या वास्तुच नव्हे तर आपली परंपरा, जत्रा, सांस्कृतिक महोत्सव, संगीत, खाद्य पदार्थांचा आस्वाद या पर्यटकांना दिला पाहिजे या बाबत शाश्‍वत पर्यटन आग्रही आहे.

पर्यटकांना राहण्यासाठी आपले जूने वाडे डागडुजी करून वापरता येवू शकतात. आपला परिसर तेथील जनजीवन या सर्वांचा विचार शाश्‍वत पर्यटनात केला जातो. मराठवाड्यातील वस्त्र विणण्याची अतिशय मोठी समृद्ध अशी परंपरा पर्यटकांना आकर्षित करू शकते. पण यासाठी वेगळे असे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
मल्हारीकांत देशमुख सारख्या परभणीच्या चळवळ्या पत्रकाराने वंशपरंपरागत त्याच्या घराण्यात या चारठाणे गावची चारआणे देशमुखी होती हे ऋण ध्यानात ठेवून या सगळ्या प्रकल्पाला गती दिली. घरात दु:खद प्रसंग घडला असतानाही वैयक्तिक दु:खावर मात करून अभियानाला बळ पुरवले हे विशेष.

चारठाण्याच्या सांस्कृतिक वारसा पदयात्रेच्या निमित्ताने मराठवाड्यातील कितीतरी सांस्कृतिक विषय ऐरणीवर आले आहेत. मराठवाड्यातील जाणत्या विचारी लेकांनी एकत्र येवून या विचारपुर्वक कृती करण्याची गरज आहे. सरकारी यंत्रणेत काम करणारे अधिकारी आपल्याच समाजाचा एक घटक आहेत. त्यांच्याकडून आपल्या परिसरांतील शाश्‍वत पर्यटनाच्या संधी शोधून त्यांचा विकास करण्याची गरज आहे. राजकीय नेते शेवटी आपणच निवडून दिलेले आहेत. त्यांच्यावर जनतेचा दबाव या कामांसाठी आपणच निर्माण करावा लागणार आहे. चारठाण्याच्या ग्रामस्थांनी एक पाऊल पुढे टाकले आहेच. संपूर्ण मराठवाड्यात अशी जागृती होण्याची गरज आहे.

सुरेश जोंधळे यांनी नांदेड जिल्ह्यात होट्टल महोत्सवाच्या माध्यमांतून एक मोठे काम आधीच सुरू केले आहे. शिवरात्रीला औंढा नागनाथ येथे सांस्कृतिक महोत्सव घेता येवू शकतो. जालना जिल्ह्यात अंबडला दत्तजयंतीला संगीत महोत्सव गेल्या कित्येक वर्षांपासून चालू आहे. या वर्षी तो होवू शकला नाही. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अंबडला असलेली जूनी मंदिरे बारवा या ठिकाणीही हेरिटेज वॉक आयोजीत करता येवू शकतो. उस्मानाबाद येथील माणकेश्वर मंदिर अप्रतिम वास्तुकलेचा नमुना आहे. जालना जिल्ह्यातीलच भोकरदन तालूक्यातील अन्व्याच्या मंदिरातील शिल्पसौंदर्य चकित करणारे आहे. त्याचीही दखल घेतली गेली पाहिजे. मराठवाड्यात किमान 25 जूनी अप्रतिम मंदिरे डॉ. प्रभाकर देव यांनी अधोरेखीत केली आहेत. त्या त्या स्थळी हेरिटेज वॉक आयोजीत करून जागृती घडविता येवू शकते.

अंबाजोगाई तर मराठी भाषेचे जन्मस्थान आहे. या परिसरांत सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करता येवू शकते.
चला मित्रांनो संस्कृती संवर्धनाचा चारठाणा पॅटर्न सर्वत्र राबवू या !

प्राचीन भव्य गणेशमुर्तीच्या निमित्ताने



13 सप्टेंबर 2019

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने एका भव्य गणेशमुर्तीचे छायाचित्र फेसबुकवर टाकले. बाजूच्या नयन्यरम्य धबधब्याचेही छायाचित्र सोबत होते. त्या परिसरातील तीघे व सोबत जो होता तो तरूण मित्र वगळता कुणालाच ते ठिकाण ओळखता आले नाही. मला खंत वाटली. आपल्या परिसरातील एक भव्य अशी गणेशमुर्ती निसर्गरम्य परिसरांत असताना आपण ती पहात नाहीत, त्याची किमान माहितीही नसते. आपली पुरातन स्थळांबाबतची ही अनास्था चिंताजनक आहे.

एक कॉम्रेड मित्राने तर ‘शेतकरी संघटनेचे असून तूम्ही गणपती बाबत पोस्ट टाकतात..’ असाही आक्षेप घेतला.
अजिंठ्याच्या डोंगरांमध्ये निसर्गरम्य अशा परिसरात एकूण 5 किल्ले आहेत. प्राचीन लेण्या, मंदिरे, जंगल यांनी हा परिसर समृद्ध आहे. बहुतेकांना केवळ अजिंठ्याचीच माहिती असते. अगदी अजिंठा गावाचीही माहिती नसते.

ही गणेशमुर्ती अजिंठा डोंगरांतील वेताळ वाडी किल्ल्या जवळील रूद्रेश्वर लेण्यांतील आहे. अजिंठा गावाच्या अलीकडे डाव्या बाजूला एक रस्ता ‘अजिंठा व्ह्यु पॉईंट’ कडे जातो. या ठिकाणाहून अजिंठा लेणीचे नयनरम्य असे दृश्य दिसते. या रस्त्यावरून पिंपळदरी गावापासून डावीकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर हळदा म्हणून गाव आहे. याच हळद्याच्या पुढे वेताळवाडीचा किल्ला आहे. या ठिकाणाला अजिंठा रोडवरून गोळेगांवपासून उंडणगाव मार्गाने पण जाता येते. हा रस्ता हळदा घाटामुळे अजूनच जास्त निसर्गरम्य आहे.

वेताळवाडीचा किल्ला यादवांच्या काळातील असून देवगिरी किल्ल्यापेक्षाही प्राचीन आहे. वेताळवाडी किल्ल्याला वळसा घालून सोयगांव रस्त्यावर जाताना वाडी गावांतून एक छोटी वाट रूद्रेश्वर लेणीच्या डोंगराकडे जाते. काही अंतरावर ही कच्ची सडक आहे. वाटेत तीन मोठे खळाळणारे झरे लागतात. ते ओलांडून गेल्यावर रूद्रेश्वर डोंगराची प्रत्यक्ष चढण सुरू होते. या जागेपासून दगड मातीची पायवाट लेणीपर्यंत पोचते.

डोंगरमाथ्यावरून कोसळणार्‍या सुंदर धबधब्याने दगड कापत कापत एक सुबक अशी खोबण तयार केली आहे. याच खोबणीत रूद्रेश्वर लेणी कोरली गेली आहे. ही लेणी अजिंठा लेणीच्या काळातील आहे. म्हणजे जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीची ही लेणी आहे. लेणीसाठी डोंगरावरून उतरणारी एक अवघड अशी पायवाट आहे.

लेणीत  महादेवाची सुंदर अशी पिंड, समोर सुबक नंदी आहे. या लेणीतील खरे आकर्षण म्हणजे वरच्या छायाचित्रात असलेली गणेशमुर्ती. सहा फुटाची भव्य अशी ही गणेशमुर्ती दगडांत कोरलेली आहे. एकसंध दगडांत कोरलेली इतकी प्राचीन दुसरी गणेशमुर्ती महाराष्ट्रात नाही. उजवा पाय उंचावलेला व डावा पाय दुमडलेला अशी ही देखणी गणेशमुर्ती आहे. कमरेला नागाने वेढा घातलेला आहे. शेंदूर फासल्याने मुळचे सौंदर्य लक्षात येत नाही. मुर्तीची भव्यता डोळ्यांत सहज भरते. समोरच्या दरवाज्यांतून वरून पडणार्‍या पाण्याचा अखंड नाद कानात घुमत राहतो.

मुर्तीसमोरच्या छोट्या ओटयावर डोळे मिटून हात जोडून बसल्यास हा पाण्याचा नाद अथर्वशिर्ष उच्चारत असल्याचा भास होत राहतो. (हे वाचून माझ्यावर हिंदुत्ववादी असल्याची ज्यांना टिका करावयाची आहे त्यांना खुली सुट आहे)


या मूर्ती शेजारी उग्र नरसिंहाचे शिल्प कोरलेले आहे. गणपतीच्या बाजूला नरसिंह असे इतरत्र कुठेच आढळत नाही. डाव्या बाजूला वीणावादिनी सरस्वतीचे शिल्प आहे.

वरतून कोसळणार्‍या धबधब्याच्या पाण्यातूनच लेणीत जाता येते. पावसाळा उताराला लागतो तेंव्हा ही धार बारीक होवून जाते. उन्हाळ्यात मग धबधबा पूर्णच कोरडा पडतो. तरी समोरच्या कुंडात थोडे पाणी साठलेले असते.

यादव सम्राट भिल्लम देव याच्या काळातील पुरातन किल्ला या लेणीच्या समोरच आहे. या किल्ल्याला भक्कम अशी तटबंदी आहे. जवळपास सर्वच तटबंदी अजून शाबूत आहे. दोन मोठे भक्कम दरवाजे या किल्ल्याला आहेत. किल्याच्या डोंगरावरच एक लेणी अजून दुर्लक्षीत अवस्थेत आहे. झाडांनी झाकलेला तिचा काही भाग फक्त दिसतो. अजून तिथले संशोधन उत्खनन शिल्लक आहे. या लेणीला जायला रस्ता नाही.

वाडीच्या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम चालू आहे. अधी तर किल्ल्यावर जायला नीट रस्ताच नव्हता. गुराख्यांनी जी पायवाट तयार केली तिनेच जाता यायचे. आता दगड फोडून एक जरा बर्‍यापैकी रस्ता तात्पुरता तयार केला गेला आहे. पण अजून भरपुर काम बाकी आहे. किल्ल्यावर उत्तर बाजूला पडून गेलेल्या हवामहलाच्या सुंदर चार कमानी शिल्लक आहेत. या कमानीतून खानदेशचा परिसर दिसतो. हे ठिकाण म्हणजे दक्षिण भारताचे उत्तरेकडील महाद्वारच होय. या घाटांतून पूर्वीच्या काळी वाहतूक व्हायची. उत्तर दक्षिणेला जोडणार्‍या रस्त्यावरचा हा किल्ला आहे. सामरिक दृष्ट्या या किल्ल्याचे स्थान महत्त्वाचे आहे.

अशी प्राचीन ऐतिहासिक पुरातत्वीय दृष्ट्या महत्त्वाची निसर्गरम्य स्थळे आपल्या अगदी जवळ असून (औरंगाबाद करांसाठी) दुर्लक्षीत आहेत. मराठवाडा बाहेरच्या लोकांना याची माहिती नसणे समजू शकतो. पण मराठवाड्यांतील किंवा अगदी औरंगाबाद शहरांत वर्षानुवर्षे वास्तव्यास आसणार्‍यांनाही याची माहिती नाही.

हे ठिकाण ऐतिहासीक, धार्मिक पौराणिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेच पण सोबतच निसर्गरम्यही आहे. एरव्ही लांब लांब जावून तिथली वर्णनं एकमेकांना सांगणार्‍यांना ही जवळची ठिकाणं दिसत नाहीत का? दरवर्षी परदेशी चकरा मारणारे किंवा आम्ही दरवर्षी तिरूपतीला जातो म्हणजे जातोच असे अभिमानाने सांगणारे इतक्या जवळच्या ठिकाणी एखादी चक्कर का मारत नाहीत?

भारतीय माणसांनी आपल्या देशांतच पर्यटन केले पाहिजे हा एक मुद्दा मोदींनी 15 ऑगस्टच्या भाषणांत मांडला होता. इतकी साधी गोष्ट आपण केली तर आपल्या देशांतील पर्यटनाला किती प्रचंड गती येईल. यातून रोजगाराची निर्मिती होईल.

औरंगाबाद परिसरांत व्हिन्सेंट पास्मो हा आमचा फ्रेंच मित्र गेली 4 वर्षे शाश्‍वत पर्यटनासाठी फिरतो आहे. मनापासून प्रयत्न करतो आहे. त्याच्यासारख्या परदेशी माणसाला या परिसरांतील धार्मिक ऐतिहासिक पुरातत्वीय निसर्गरम्य ठिकाणांचे महत्त्व जाणवते आणि आपण जे इथलेच आहोत त्यांना मात्र अनास्था आहे याची तीव्र खंत वाटते. दु:ख होते.

‘अजिंठा-गौताळा पर्यटन परिक्षेत्र’ या नावाने एक मोठा पर्यटन प्रकल्प या भागांतील मंडळी राबवू पहात आहेत. महाराष्ट्रातील माझ्या पर्यटन प्रेमी मित्रांना विनंती आहे की त्यांनी सहकार्य करावे. केवळ पर्यटन प्रेमीच नव्हे तर इतरही नागरिकांनी आपल्या आपल्या परिने योगदान द्यावे. अजिंठा पाहताना अजून किमान एक दिवस या परिसरांत फिरायचे असा जरी निर्धार प्रत्येकाने केला तरी हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध बनण्यास वेळ लागणार नाही. कागदोपत्री औरंगाबादला पर्यटनाची राजधानी म्हणून भागणार नाही. सरकारी योजनांकडे पहात बसून हातावर हात धरून बसून चालणार नाही. प्रत्येकाने या परिसरांत वर्षांतून किमान एक चक्कर मारायची एकढं केलं तरी प्राथमिक पातळीवर पुरेसे आहे.

चला मित्रांनो पाटणादेवी- पितळखोरा-गौताळा अभयारण्य-अंतूर किल्ला-मुर्डेश्वर-जंजाळा किल्ला-घटोत्कच लेणी-वाडीचा किल्ला-रूद्रेश्वर लेणी-अजिंठा-जाळीचा देव-अन्व्याचे प्राचीन मंदिर या परिसरात फेरफटका मारू या... !
(अजिंठा गौताळा टुरिस्ट कॉरिडोर प्रकल्पाचे काम चालू झाले आहे. ज्यांना या कामात सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी कृपया संपर्क साधावा.)
        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

उकिरड्यावर पडलेले होट्टलचे शिल्पवैभव


उरूस, 22 जानेवारी 2020

नांदेड जिल्ह्यात देगलूर तालूक्यात तेलंगणा सीमेवर होट्टल नावाचे गांव आहे. चालूक्यांची उप राजधानी असलेले हे गांव शिल्पवैभवाने अतिशय समृद्ध आहे. या गावांतील दोन मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात आला. आज याच मंदिरांच्या परिसरात होट्टल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते आहे.  एक हजार वर्षांपूर्वीची ही अतिशय समृद्ध अशी नगरी. जूने भक्कम दगडी वाडे आजही गावात आहेत. परिसरांतील 22 गावे ज्यांच्या देशमुखीखाली होती अशा तालेवार देशमुखाची प्रचंड गढी या गावात आहे. गढीची पडझड झालेली असली तरी प्रवेशद्वार आणि त्या भोवतीची भक्कम भिंत जून्या वैभवाची साक्ष देते.

मुख्य महादेव मंदिराचे चिरे, नक्षीदार 20 खांब, बाह्यांगावरच्या सूरसूंदरींची शिल्पे, नृत्य गणेशाचे अप्रतिम शिल्प यांचा शोध घेवून मंदिराचे बांधकाम परत करण्यात आले. स्थानिक पाथरवटांचे सहकार्य घेत रिकाम्या जागी त्याच आकाराचे दगड कलात्मक रित्या बसविण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर काम करणार्‍या इनटॅक्ट (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ऍण्ड हेरिटेज) संस्थेच्या सहकार्याने गुरूतागद्दी सोहळ्याच्या निधीतून या कामासाठी काही निधी उपलब्ध करून देण्यात आला.

जिर्णाद्धार झालेली दोन मंदिरे पाहून एकीकडे पुरातन ठेव्याबद्दल अभिमान वाटत असतानाच समोर येते दुसरे भग्न मंदिर. जमिनीखाली अर्धे गाडले गेलेले हे मंदिर आपल्या शिल्पवैभवाने एकीकडे पाहणार्‍याचे डोळ्याचे पारणे फेडते आणि परिसराची दुर्दशा बघून डोळ्यात पाणीही आणते.

मंदिराच्या परिसरांत कित्येक शिल्पे विखुरलेली आहेत. काही शिल्पांभोवती उकिरडा साठला आहे. प्रातर्विधीसाठी लोक या जागेचा वापर करताना पाहून त्याच दगडांवर डोके आपटून घ्यावे अशी भावना दाटून येते. मंदिर परिसरांत दगडी बांधकाम असलेली बारव आहे. तिथे प्रचंड झाडी गवत वाढले आहे. पाण्याचा उपसा नसल्याने हिरवट शेवाळ्याचा थर साचला आहे. गाळ प्रचंड असल्याने पाण्याला दुर्गंधी येते आहे. निगराणी अभावी दगडी चिरे ढासळून गेले आहेत.

पुरातत्व विभाग काय करतो आहे? किंवा लोकप्रतिनिधी सरकारी अधिकारी काय करत आहेत? या सोबतच आधी सामान्य नागरिक म्हणून आपण या पुरातत्वीय महत्त्वाच्या ठेव्याची अशी अवहेलना का करतो आहोत? हा प्रश्‍न सतावतो. या मंदिराच्या परिसराची किमान साफसफाई, कुंपण घालून त्याचे संरक्षण इतकी साधी गोष्ट आपणाला का जमत नाही?

एक शिव-हरेश्वराची सुंदर मुर्ती गावात नालीच्या कडेला पडून आहे. हत्तीचे सुंदर शिल्प उकिरड्यावर लोळत आहे. होट्टल महोत्सव पाहण्यासाठी आलेला व्हिन्सेंट पास्किलीनी हा परदेशी फ्रेंच प्रवासी उपहासाने म्हणाला, ‘तूम्ही भारतीय इतके श्रीमंत अहात की अप्रतिम अशी शिल्पे तूम्ही उकिरड्यार फेकून देता.’ आता या उद्गारावर काय प्रतिक्रिया द्यावी?

ज्या मंदिराचा जिर्णोद्धार केला गेला आहे तेथपासून ते जमिनीत गाडल्या गेलेल्या दुसर्‍या मंदिरापर्यंत सरळ असा दगडी मार्ग असल्याचे अभ्यासक सांगतात. रस्त्यात असलेल्या मानवी वस्तीचे अतिक्रमण काढले तर हा संपूर्ण मार्ग दृष्टीपथास येवू शकतो.

आजही दगडी काम करणारे कारागीर येथे आहेत. त्यांची काम करण्याची तयारी आहे. त्यांचा तो पोटपाण्याचा उद्योग असल्याने गरजही आहे. मग या पाथरवटांच्या साहाय्याने ही कामं आपण का नाही मार्गी लावू शकत? निवेदनं द्या, प्रस्ताव तयार करा, मग सरकारी पातळीवर हालचाली होणार, सरकारी पातळीवरची उदासीनता हे सगळं असह्य आहे. आपल्या लोकप्रतिनिधींना याची जाण जेंव्हा येईल तेंव्हा येईल पण आधी किमान आपण स्थानिक पातळीवर शक्य होईल ते काम केले पाहिजे. त्यासाठी गावकर्‍यांनी आधी पुढाकार घेतला पाहिजे.
मंदिरांचा जिर्णोद्धार, परिसराची स्वच्छता, होट्टल पर्यंत येण्यासाठी पक्क्या चांगल्या रस्त्याचे निर्माण यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगार निर्मिती होईल. केवळ चर्चा करण्यापेक्षा आपण कृती करू या.

होट्टल असो की चारठाणा की मराठवाड्यातील अजून इतरत्र असलेली जूनी मंदिरे आणि प्राचीन वारसा सांगणार्‍या वास्तू यांचे जतन करण्यासाठी आपण सगळे मिळून चळवळ उभारू या. ज्यांना ज्यांना या कामात सहभागी होण्यात रस आहे, इच्छा आहे, मदत करायची आहे, सुचना आहेत, जे अभ्यासक आहेत त्यांनी संपर्क साधावा. आपण सगळे मिळून मराठवाडा पातळीवर ऐतिहासिक वारसा जतन चळवळीची उभारणी करू या.    श्रीकांत उमरीकर 9422878575

शिव किरात - संजय सोनवणी.

✍️
शिव हा परंपरेने जसा योगी मानला गेला आहे तसाच तो शिकारीही (किरात) आहे. हरप्पा येथील पट्टीकेत शिवाची ही दोन्ही रुपे चित्रीत केली गेली आहेत. बारकाईने पहा, शिकारी शिवाच्या हातात त्रिशुळाचे आद्य रूप आहे (दोन फाळ वरच्या दिशेऐवजी खालच्या दिशेने आहेत) शैव संस्कृतीचे हे सुस्पष्ट पुरातन पुरावे आहेत...जी आजही जपली जात आहे.
✍️
- संजय सोनवणी,

l

मंदिरात लिबरल धोरण

l

अग्नीचा एडका, कुबेराचा मुंगूस, इंद्राचा ऐरावत.... ही वाहनसाखळी ठरवतांना काही लॉजिक असते का मूर्तिशास्त्रात ?

अर्थातच.
उदा. यज्ञात अग्नीला हवि अर्पण केला जातो. तो मुख्यतः बोकडाशी संबंधित असल्याने एडका हे अग्नीचे वाहन ठरवले गेले. " अजापुत्रम बली दद्यात" हे तर प्रसिद्धच आहे. वायूचे वाहन हरीण हे हरिणाच्या वेगाने धावण्याच्या असलेल्या पद्धतीमुळेच बनवले गेले. ऐरावत हा समुद्रमंथनातून बाहेर पडला आणि इंद्रानेते वाहन म्हणून स्वीकारले. वरुण ही जलदेवता, साहजिकच मगर हे त्याचे वाहन झाले.
येथे एक नमूद करावेसे वाटते, कुबेराचे वाहन हे मुंगूस नव्हे, मुंगूस हे धनाचे प्रतीक असल्याने ते कुबेरासोबत असते. कुबेर हा नरवाहन. तो यक्षांचा अधिपती.

एकंदरीत त्या त्या देवतांच्या स्वभावामुळे किंवा पौराणिक कथेत असलेल्या प्रसंगामुळे त्या त्या देवतांना विशिष्ट वाहने मिळाली आहेत.

कुबेराचे वाहन हे मुंगूस नव्हे, मुंगूस हे धनाचे प्रतीक असल्याने ते कुबेरासोबत असते. कुबेर हा नरवाहन. तो यक्षांचा अधिपती.
वल्ली उर्फ प्रचेतस, कुबेर या विषयावरच अधिक माहिती देणारा धागा काढावा ही विनंती ! तुम्ही दिलेल्या फोटोत धनाची थैली आणि मुंगस मला का दिसत नाही ते कळेना !
धागा नेहमी प्रमाणेच उत्तम आहे ! :)

जाता जाता :- का कोणास ठावूक परंतु लोक दिवाळीत लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कुबेर पुजन करायचे विसरत चालले आहेत का ? असे वाटते.
या दिवशी गणपती-लक्ष्मी आणि कुबेर यांचे पुजन एकत्रीत करणे महत्वाचे असते.

तुम्ही दिलेल्या फोटोत धनाची थैली आणि मुंगस मला का दिसत नाही ते कळेना !

कुबेराच्या खांद्यावरुन डोक्यावरुन जाणारी एक फुगीर भाग असलेली लांबलचक माळ दिसेल तीच धनाची थैली. ह्याच्या एका टोकाला मुंगुसाचे शिर व दुसर्‍या टोकाला फुगीर भाग दाखवलेला आहे तीच धनाची थैली.



२४ अवतार म्हणजे २४ रुपांतरे. शंख, चक्र, गदा, पद्म या लक्षणांच्या क्रमानुसार त्यांची विविध नावे ठरतात.
उदा.
केशव- (डावीकडून)पद्म, शंख, चक्र, गदा
नारायण - शपगच
माधव-गचशप

अशी गोविंद, विष्णू, मधूसूदन अशी संध्येतील २४ नावे.


http://www.misalpav.com/node/50494















वैनायकी – योगिनी, शक्ती की मातृका?
पंकज समेळ,
गणपती हे हिंदूंचे आराध्य दैवत आहे. गेली अनेक शतके ह्या देवतेने आपल्या मनावर भुरळ घातली आहे. गजमुख, लंबोदर, उजव्या हातात लाडू आणि पायाजवळ उंदीर हे गणपतीचे रूप आपल्या मनात पक्के बसले आहे. परंतु, जर असे सांगितले, गणपती जसा पुरुषरुपात असतो, तसाच तो स्त्रीरुपात देखील असतो तर. आज आपण सर्वसामान्यांना अपरिचित अशा स्त्रीरूपातील गणपतीची अर्थात वैनायकीची थोडक्यात माहिती करून घेऊया आणि महाराष्ट्रातील वैनायकी मूर्तींची ओळख करून घेऊया.
निसर्गाने स्त्रीला गर्भधारण करण्याची शक्ती दिली आहे. त्यामुळेच अनादी कालापासून मानवाने स्त्रीला शक्तीरुपात पुजण्यास सुरुवात केली. संकटाच्या काळात पुरुष स्त्रीकडे ऊर्जास्त्रोत म्हणून पाहत आलेला आहे. पण ती शक्ती किंवा ऊर्जा सहचारिणीच असली पाहिजे असा काही नियम नाही. ती शक्ती किंवा ऊर्जा कोणीही असू शकते. अनादी कालापासून शक्ती म्हणजे स्त्री असे समीकरण चालत आले आहे. मूर्तीशास्त्रानुसार कोणत्याही देवतेची शक्ती दाखवताना संबंधित देवतेची मूर्ती स्त्रीरुपात दाखवली जाते.
भारतीय मूर्तिशास्त्रात विनायक किंवा गणेशाची शक्ती असलेल्या वैनायकी किंवा गणेशानी बद्दल फार कमी माहिती वाचायला मिळते. वैनायकी देवता विनायकी, विघ्नेश्वरी, गणेशानी, गणेश्वरी, गजानना, गणपतीहृदया इ. विविध नावांनी ओळखली जाते. ह्या देवतेचा उदय कधी झाला ह्याबद्दल निश्चित माहिती नाही. मध्यकाळात हिंदूधर्मातील पाच मुख्य देवतांपैकी एक म्हणून गणपतीची उपासना होण्यास सुरुवात झाली आणि त्याचबरोबर उदयाला आलेल्या गाणपत्य संप्रदाय आणि योगिनी संप्रदाय यांच्यामुळे वैनायकी देवतेला महत्त्व प्राप्त झाले असावे. एच. डी. भट्टाचार्य यांच्या मते गणेश मुख्य देवता म्हणून पुजला जाऊ लागला त्याच वेळी गणेशाची शक्ती गणेशानी हिची पूजा होऊ लागली.
काही पुराणांनी वैनायकीचा उल्लेख योगिनी म्हणून केला आहे. स्कंदपुराणाच्या काशीखंडात (४५वे प्रकरण) व्यासऋषी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना स्कंदऋषी चौसष्ट योगिनींची नावे सांगतात आणि त्यातील पहिले नाव गजानना आहे. मत्स्यपुराणामध्ये २०० स्त्रीदेवतांचा उल्लेख आहे आणि वैनायकी त्यापैकी एक आहे. पण अग्नीपुराणात उल्लेखलेल्या योगिनींच्या नावामध्ये वरील एकाही नावाचा उल्लेख नाही आहे. देवी-सहस्त्रनाम ग्रंथात देवीच्या एक हजार नावांचा उल्लेख केला आहे. त्यात विनायकी, लंबोदरी आणि गणेश्वरी ह्या तीन नावांचा उल्लेख आला आहे. रिखिआन (१०वे शतक), बेडाघाट (११वे शतक), हिरपूर, झारिआल (१०वे शतक) येथील चौसष्ट योगिनी मंदिरांमध्ये इतर योगिनींच्या बरोबर वैनायकीसुध्दा आढळून येते. भारतीय संग्रहालय, कोलकाता (The Indian Museum, Kolkata) येथे मध्यप्रदेशातील सतना येथे सापडलेल्या योगिनींचा समूह जतन करून ठेवला आहे. या योगिनी समुहातील सिंहारूढ श्री वसभा (श्री वृषभा) ही योगिनी वैशिष्ठ्यपूर्ण आहे. श्री वृषभा योगिनीच्या मांडीवर विनायक आणि डाव्या पायाजवळ वैनायकीची मूर्ती आहे. मूर्तीच्या मागील दोन हातात कमळ आणि फुलआणि पुढील उजव्या हातात तुटलेली गदा आणि डाव्या हातात मोदकपात्र असावे (असावे ह्याच्यासाठी कारण हा हात नष्ट झालेला आहे).
श्री वसभा (श्री वृषभ) आणि वैनायकी (१०वे शतक), भारतीय संग्रहालय, कोलकाता वैनायकी आणि इतर योगिनी (१०वे शतक), रीखीआन, उत्तरप्रदेश
वैनायकी (१०वे शतक), चौशष्ट योगिनी मंदिर, हिरापूर, ओरिसा
जैन धर्मातसुध्दा योगिनींपैकी एक म्हणून वैनायकीची उपासना केली जात होती. जैन मंदिर, बडोदा येथील हंस विजय संग्रहात चतुष्षष्टियोगिनी (हस्तलिखित क्र. ३९६) हस्तलिखितात महायोगी, सिध्दीयोगी, प्रेताक्षी, डाकिनी आणि इतर योगिनींच्या नावाबरोबर गणेश्वरी हे नाव आलेले आहे. तांत्रिक योगिनींची नावे जैन धर्मात कशी आली हे कळायला काहीच मार्ग नाही आहे.
बौध्दधर्माच्या वज्रयान पंथातसुध्दा वैनायकीचे गणपतीहृदया नावाने वर्णन आले आहे. धर्मकोशसंग्रह ग्रंथात गणपतीहृदया या देवीचे वर्णन एकमुख, द्विभुज, एक हात वरद आणि दुसरा हात अभयमुद्रेत आणि नृत्यस्थिती असे करण्यात आले आहे.
मथुरा येथील शासकीय संग्रहालयात असलेली वैनायकीची मूर्ती भारतातील सगळ्यात जुनी मूर्ती असावी. ह्या मूर्तीचा काळ गुप्त राजवंशाच्या सुरुवाताचा आहे असे मानले जाते. लोहरी (उत्तरप्रदेश) येथील योगिनी संकुलातील वैनायकीची मूर्ती थोडी वेगळी आहे. प्रतिहार काळातील (९वे शतक) ही मूर्ती असून ह्या मूर्तीच्या डाव्या हातात इंद्रासारखे वज्र आहे. तर उजव्या हातात लाडूऐवजी एखादे फळ धरले आहे. ह्या वैनायकीचे वाहनसुध्दा हत्ती आहे. त्यामुळे हि मूर्ती वैनायकीची असली तरी त्यात इंद्राणी (इंद्राची शक्ती) हिचे गुणधर्म दाखवले आहेत. रीखीआन (उत्तरप्रदेश) येथील वैनायकीला चार हात असून डोक्यावर मुकुट घातलेला आहे आणि गळ्यात हार घातलेला आहे. ह्या मूर्तीला नेसवलेली साडी कंबरेभोवती खोचण्यात आलेली आहे. मध्यप्रदेशातील सुहानिआ येथे सापडलेली मूर्ती ग्वाल्हेर येथील पुरातत्व संग्रहालयात ठेवलेली आहे. वैनायकी त्रिभंग मुद्रेमध्ये असून आपले संपूर्ण वजन डाव्या पायावर घेतले आहे. ह्या मूर्तीच्या हातात कमळपुष्प, तलवार, परशू आणि लाडूंचा वाडगा हातात धरला आहे. ह्या मूर्तीच्या उजव्या पायाजवळ बासरीवादक आणि डाव्या पायाजवळ मृदुंगवादक आहे.
वैनायकी (प्रतिहारकाळ, ९वे शतक), लोहरी, उत्तरप्रदेश वैनायकी (१०वे शतक), सुहानिया, मध्यप्रदेश. पुरातत्व संग्रहालय, भोपाळ वैनायकी (४थे शतक, गुप्तकाळ), मथुरा, उत्तरप्रदेश. शासकीय संग्रहालय, मथुरा
वैनायकीबद्दल लिहित असताना श्रीनटराज मंदिर (चिदंबरम, तामिळनाडू) येथील वैनायकीचा उल्लेख टाळून चालणार नाही. मूर्तिशास्त्रानुसार या मंदिरातील वैनायकी वेगळीच आहे. ह्या मूर्तीचा कंबरेच्या वरील भाग वैनायकीचा, तर कंबरेच्या खालील भाग व्याल या काल्पनिक प्राण्याचा आहे. भारतीय कलेत गजव्याल, शुकव्याल, सिंहव्याल, सर्पव्याल, शार्दुलव्याल इ. अनेक प्रकारचे व्याल बघायला मिळतात. परंतु वैनायकी आणि व्याल यांचे संयुक्त शिल्प दुर्मिळच म्हणावे लागेल. विजयनगर काळातील म्हणजे १६ व्या शतकातील ह्या शिल्पाची आजही स्थानिक लोकांकडून पूजा केली जाते.
वैनायकी आणि व्याल संयुक्त शिल्प (१६वे शतक, विजयनगरकाळ), श्रीनटराज मंदिर, चिदंबरम, तामिळनाडू
वैनायकीची चित्र लघुचित्र (Miniature Paintings) आणि हस्तलिखितांमध्ये सुध्दा बघायला मिळतात. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात १८व्या शतकातील चंबा शैलीतील लघुचित्र आहे. ह्या चित्रात नटेश तांडव नृत्य करत असून त्याच्या शेजारी विनायक, कार्तिकेय आणि गण दाखवले आहेत. ह्या चित्रात विनायक वीणा वाजवत असून नटेशाच्या डाव्या बाजूला गजमुख, चोळीधारण केलेली, दोन मृदुंग वाजवणारी आणि कमरेला व्याघ्रचर्म गुंडाळलेली वैनायकी चित्रित केलेली आहे. कोलकातास्थित एशिआटीक सोसायटीत गणपतीहृदया देवतेचे अत्यंत सुंदर लघुचित्र आहे. हे लघुचित्र वज्रयान पंथाच्या धारणी-संग्रह ह्या ग्रंथात आहे. चित्रात देवता पांढऱ्या रंगात रंगवलेली असून पायाजवळ निळ्या रंगात उंदीर आहे. ह्या चित्राजवळ नेवारी संवत ९६३ (सन १८४३) आणि सर्वात शेवटी “आर्य्यश्रीगणपतिहृदयनामधारणी समाप्त” लिहिले आहे.
राष्ट्रीय संग्रहालयात १८व्या शतकातील चंबा शैलीतील लघुचित्रात डाव्या कोपऱ्यात वाद्य वाजवणारी वैनायकी गणपतीहृदया (सन १८४३), नेपाळ. एशियाटिक सोसायटी, कोलकाता
वैनायकीची ओळख करून घेतल्यानंतर महाराष्ट्रातील वैनायकी मुर्त्यांची ओळख करून घेऊया. महाराष्ट्रात १७-१८व्या शतकात घडवलेली पितळेची मूर्ती लखनऊ येथील राज्य संग्रहालयात आहे. त्याशिवाय यादवकालीन असलेल्या भुलेश्वर (पुणे), पाटेश्वर (सातारा) आणि आंबेजोगाई येथे वैनायकी दिसतात. या तीन ठिकाणांव्यतिरिक्त महाराष्ट्रात अजून तरी वैनायकी बघायला मिळालेल्या नाही आहेत.
पाटेश्वर मंदिरात असलेली वैनायकी
साताऱ्यापासून साधारणपणे ११ किमीवर देगाव येथे पाटेश्वर हा हिंदूलेणी समूह आहे. येथील पाटेश्वर मंदिरात वैनायकी मूर्ती आहे. मूर्ती रेखीव, चतुर्भुज आणि शिलाखंडावर सुखासनात बसलेली आहे. मागील उजव्या हातात परशु आणि डाव्या हातात पाश आहे कि अजून दुसरे काही आहे हे निश्चित करता येत नाही आहे. पुढील उजव्या हातात दात असून डाव्या हातात लाडूपात्र आहे. सोंडेचे टोक वळसा घालून लाडूंना टेकलेले आहे. मूर्तीच्या अंगावर वक्षभूषण, कंठभूषण, कमरपट्टा, कंकणे आणि वळे हे अलंकार असून, त्यांच्यावर विशेष अशी कलाकुसूर नाही आहे. डोक्यावर किरीटमुकुट असून, मुकुटाभोवतीप्रभावळ आहे. डाव्या पायाची आडवी मांडी घातलेली असून उजवा पायाचा गुडघा किंचित वर उचललेला असून पाय खाली टेकलेला आहे. पायाजवळ मूषक वाहन कोरलेले आहे.
पाटेश्वर मंदिरातील वैनायकी
भुलेश्वर मंदिरातील वैनायकी
पुणे – सोलापूर महामार्गावर यवतच्या आधी साधारणपणे १-२ किमीवर भुलेश्वरफाटा आहे. हा रस्ता थेट भुलेश्वर मंदिराजवळ जातो. दूरसंचार विभागाचा मनोरा हि भुलेश्वरची ओळख. हा संपूर्ण परिसर दौलतमंगळ किल्ला किंवा भुलेश्वर मंदिर या नावाने ओळखला जातो. भुलेश्वर मंदिरात प्रदक्षिणामार्गावर थोड्या उंचावर दोन वैनायकी मूर्ती दिसतात. परंतु येथील वैनायकी इतर देवतांच्या शक्तीबरोबर (मातृका) आढळून येतात. हे दोन्ही मातृकापट असावेत. पहिल्या मातृकापटात वैनायकी, माहेश्वरी आणि ब्राम्ही या तीन मातृका आहेत. या शिल्पपटात वैनायकी माहेश्वरीच्या उजव्या हाताला तर ब्राम्ही डाव्या हाताला आहे. येथील वैनायकी पद्मासनात बसलेली आणि सालंकृत आहे. दुसरी वैनायकी वैष्णवी आणि कौमारी या मातृकांबरोबर आहे. पहिल्या वैनायकीप्रमाणेच हि वैनायकीसुध्दा सालंकृत आणि पद्मासनात बसलेली आहे.
वैनायकी, माहेश्वरी आणि ब्राम्ही वैनायकी
वैनायकी, वैष्णवी आणि कौमारी वैनायकी
वैनायकीबद्दल चालेलेला गोंधळ मत्स्यपुराणातील अंधकासुरवधाची कथा वाचल्यानंतर अजूनच वाढतो आणि प्रश्न पडतो वैनायकीला योगिनी म्हणायचे की शक्ती की मातृका? कारण मत्स्यपुराणातील कथेनुसार भगवान शंकरांनी अंधकासुराचा वध करताना, त्याचे रक्त जमिनीवर पडल्यानंतर नवीन अंधकासुराची निर्मिती होऊ नये म्हणून युद्धात त्याच्या पडलेल्या प्रत्येक रक्ताचा थेंब भक्षण करण्यासाठी मातृकांची निर्मिती केली. त्यापैकीच वैनायकी हि एक मातृका.
वैनायकी आणि इतर मातृकांची निर्मिती शंकराने केली, म्हणून ती गणेशाची माता असे काही मानल्यामुळे, अनेकदा सप्तमातृकापटांमध्ये गणपती दाखवलेला असतो. वेरूळ लेण्यातील सप्तमातृकापटामध्ये गणपती कोपऱ्यात असून शेजारी सर्व मातृका दाखवल्या आहेत. याच शिल्पात भैरवसुद्धा दाखवलेला आहे. मुंबईतील जोगेश्वरी लेण्यांमध्ये गणपती सप्तमातृकांसोबत नसून, त्यांच्या समोर असलेल्या उपलेण्यात आहे. येथील सप्तमातृका काळाच्या ओघात नष्ट झाल्या असल्या तरी, त्यांच्या खुणांवरून त्यांचे अस्तित्व ओळखता येते. परंतु, पाटेश्वर येथे असलेल्या मातृकापटात गणेश किंवा गणेशानी यांना स्थान देण्यात आलेले नाही हे महत्वाचे.
सप्तमातृका, वेरूळ लेणे
वैनायकीची वरील सर्व माहिती वाचल्यानंतर एक गोष्ट समजते ती म्हणजे हिंदू आणि जैन ग्रंथात चौसष्ट योगिनीमध्ये असलेला तिचा समावेश. वैनायकीची पूजा कधी योगिनी, कधी शक्ती (स्वतंत्र देवता), तर कधी मातृका म्हणून मध्ययुगात होत होती.
वैनायकी कधी योगिनी, कधी शक्ती, तर कधी मातृका अश्या वेगवेगळ्या स्वरूपात पुढे आल्यामुळे वैनायकीबद्दल असलेली उत्सुकता अधिकच वाढत जाते. तसेच वैनायकीबद्दल मूर्तिशास्त्रामध्येसुध्दा जास्त माहिती मिळत नसल्यामुळे वैनायकी भोवती एक वेगळेच गूढवलय निर्माण झाले आहे. वैनायकीचे कोडे सोडवायचे असेल तर तिच्याबद्दल अजून संशोधन होणे गरजेचे आहे आणि ह्या संशोधनातूनच वैनायकीची नवीन माहिती आपल्यासमोर येईल.
संदर्भ
गणेशा – द एन्चॅन्टर ऑफ थ्री वर्ल्ड्स, लेखक – पॉल मार्टिन दुबोस, अनुवाद – डॉ. किरीट मनकोडी
Iconography of Vainayaki, Author – B. N. Sharma




सप्तमातृका
पंकज समेळ,
प्रागैतिहासकालापासून मानवाने मातृदेवतांचे पूजन केले आहे आणि त्याचे पुरावे उत्खननात मूर्त्यांच्या रुपात सापडले आहेत. साधारणपणे २५००० वर्षांपूर्वी उत्तर पुराश्मयुगीन मानव स्त्रीदेवतेची पूजा करत होता हे बागोर (उत्तर प्रदेश) येथे केलेल्या उत्खननात आढळून आले. येथे केलेल्या उत्खननात गोलाकार कट्ट्यावर त्रिकोणी आकाराचा दगड आढळून आला. या दगडावरील त्रिकोणी चिन्ह कोरलेले नसून नैसर्गिक आहे. तेथील बैगा आणि कोल जमातीच्या स्त्रिया अशा प्रकारच्या दगडांची पूजा कढाई-की-देवी या नावाने करतात. ही देवी आरोग्याचे आणि सुफलनाचे प्रतिक मानली जाते. सिंधू संस्कृतीच्या अनेक स्थळांवर केलेल्या उत्खननात मातृदेवतांच्या स्त्री-मूर्ती सापडलेल्या आहेत. त्याचबरोबर एका सिंधू मुद्रेवर कोरलेल्या सात स्त्रियांचे शिल्पांकन महत्त्वाचे ठरते, कारण सप्तमातृकांचा तो सर्वात जुना पुरावा असावा.
भुलेश्वर मंदिरातील मातृका ( फोटो )
सप्तमातृकांच्या उत्पत्तीबद्दल पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत. महाभारतातील कथेनुसार प्रल्हादानंतर सत्तेवर आलेल्या अंधकासुराला मारण्यासाठी प्रमुख देवतांनी आपली शक्ती निर्माण करून त्यांना युध्दात पाठवले. कुर्मपुराणानुसार अंधकासुर मारला गेल्यानंतर भैरवाने ह्या मातृकांना पाताळात पाठवले. परंतु ह्या मातृकांनी स्वतःची भूक भागवण्यासाठी सर्वत्र हाहाकार माजवण्यास सुरुवात केली. त्यांना शांत करण्यासाठी भैरवाने नरसिंहाची प्रार्थना केली आणि नंतर नरसिंहाने पाताळात जाऊन मातृकांना शांत केले. सुप्रभेदागम ग्रंथानुसार निर्रिता राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रम्हाने सप्तमातृकांची निर्मिती केली. देवीने केलेल्या सिंहनादापासून सप्तमातृकांची उत्त्पती झाली अशी कथा वामनपुराणामध्ये सांगिलते आहे. मार्कंडेयपुराणानुसार अंबिका व चामुंडा यांनी रक्तविज राक्षसाला युध्दात मारून टाकले. या युध्दात इतर मातृकांनी अंबिका व चामुंडा यांना मदत केली होती. सप्तमातृकांचा उल्लेख ऋग्वेद, गोभिलस्मृती, मत्सपुराण, वराहपुराण इ. धार्मिक ग्रंथात वाचायला मिळतो.
वेरूळ लेण्यातील सप्तमातृका ( फोटो )
सप्तमातृका ह्या प्रमुख देवतांच्या शक्ती मानल्या जातात. मातृकांची संख्या सुरुवातीच्या काळात ७ किंवा ८ होती. पण पुढील काळात त्यांची संख्या १६, ३२ आणि ६४ अशी बघायला मिळते. देवी भागवतांत ३२ मातृकांची यादी दिलेली आहे. ब्रह्माची ब्राह्मी/ब्रह्माणी, इंद्राचीइंद्राणी/ऐन्द्री, महेशाचीमाहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, यमाची चामुंडा या प्रमुख देवतांच्या शक्ती. त्याशिवाय शिवदूती, नारसिंही, योगेश्वरी, काली, वारुणी आणि वैनायकी या मातृकांचे संदर्भसुध्दा विविध पुराणांमध्ये वाचायला मिळतात.
पाटेश्वर लेण्यातील अष्टमातृकापट ( फोटो )
भारतातील सर्वात जुना सप्तमातृकापट मथुरेजवळील धनगाव येथे सापडला. हा शिल्पपट कुषाणकालीन असून सद्यस्थितीत मथुरा संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेला आहे. यातील मातृकांचा उजवा हात अभयमुद्रेत आणि डाव्या हातात कमंडलु धरलेला आहे. ह्या सर्व मातृका कोणत्याही आयुधाशिवाय आणि वाहनाशिवाय आहेत. कुमारगुप्त पहिला याचा मांडलिक विश्ववर्मन याच्या गंगाधर शिलालेखानुसार (सन ४२३-४२४) विश्ववर्मन याने मातृदेवतेचे मंदिर उभारले होते. बदामी येथील चालुक्य राजवंश सप्तमातृकांची पूजा करत होते आणि त्यांचे शिलालेख ह्या गोष्टीची साक्ष देतात.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयातील सप्तमातृका शिल्प ( फोटो )
सुरुवातीच्या काळात कोणत्याही वाहन आणि आयुधाशिवाय असलेल्या मातृकांच्या मूर्तिशास्त्रात हळूहळू बदल होत गेले. मातृका ह्या प्रमुख पुरुष देवतांच्या शक्ती असल्यामुळे आणि शक्ती हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे, त्यांच्या मूर्तीस्त्रीरुपात घडवल्या जातात. प्रमुख देवतेची मातृका प्रमुख देवतेसारखीच असली पाहिजे, तसेच मातृका बसलेल्या असाव्यात, त्यांना चार हात असावेत, त्यापैकी उजवा हात अभयमुद्रेत, डावा हात वरदमुद्रेत आणि उरलेल्या दोन हातात प्रमुख देवतेची आयुधे असावीत असे तसेच सुप्रभेदागम या ग्रंथात सांगितले आहे. सप्तमातृकांच्या मुर्त्या दिसायला एक सारख्याच असतील, तर अशावेळी त्यांच्या वाहनांवरून आणि आयुधांवरून मातृकांची ओळख ठरवता येते. काही शिल्पपटांमध्ये मातृकांच्या मांडीवर किंवा त्यांच्या शेजारी मातृत्वाचे प्रतिक म्हणून लहान मुले दाखवली आहेत. गुप्तकाळापासून सप्तमातृका शिल्पपटात सुरुवातीला वीरभद्र (शिव) आणि सर्वात शेवटी गणपतीचे अंकन करण्यास सुरुवात झाली. अनेकदा वीरभद्र वीणावादन करताना दाखवलेला असतो. सप्तमातृका पटाशिवाय वैष्णवी, इंद्रायणी, माहेश्वरी, वाराही, चामुंडा, वैनायकी इ. मातृकांच्या स्वतंत्र प्रतिमासुध्दा बघायला मिळतात.
शिवाशी निगडीत असल्यामुळे शैवमंदिरात किंवा शैवलेण्यात सप्तमातृकांचे शिल्पांकन अनेकदा बघावयास मिळते.
राजा दिनकर केळकर संग्रहालयातील सप्तमातृकापट
मातृकांचे वर्णन
ब्रह्माणी: हिला चार मुखे असून अंग सुवर्णासारखे तेजस्वी असते. उजवा हात अभय मुद्रेत, डावा हात वरद मुद्रेत आणि पाठीमागील एका हातात अक्षयसूत्र आणि दुसऱ्या हातात कमंडलु असते. हिने पिवळे वस्त्र (पितांबर) परिधान केलेले असते. तसेच तिच्या डोक्यावर करंडमुकुट असतो. ब्रह्माणी लाल रंगाच्या कमळावर बसलेली असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: हंस
वैष्णवी: उजवा हात अभय मुद्रेत, डावा हात वरद मुद्रेत आणि पाठीमागील एका हातात चक्र आणि दुसऱ्या हातात शंख असतो. हिने पिवळे वस्त्र (पितांबर) परिधान केलेले असते. तसेच डोक्यावर किरीटमुकुट असतो. वाहन आणि ध्वजचिन्ह: गरुड
इंद्राणी: इंद्राणीला चार डोळे आणि चार हात असतात. उजवा हात आणि डावा हात अनुक्रमे अभय मुद्रेत व वरद मुद्रेत असून इतर दोन हातात वज्र आणि शक्ती धारण केलेली असते. हिचा रंग लाल असून डोक्यावर किरीट असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: ऐरावत/हत्ती
माहेश्वरी: हिला चार हात असून उजवा हात आणि डावा हात अनुक्रमे अभय मुद्रेत व वरद मुद्रेत असतो. इतर दोन हातात शूल आणि अक्षमाला धारण केलेली असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: वृष/बैल
कौमारी: चार हातांपैकी उजवा हात अभय मुद्रेत आणि डावा हात वरद मुद्रेत असतो, तर इतर दोन हातात शक्ती आणि कोंबडा असतो. वाहन आणि ध्वजचिन्ह: मोर
वाराही: हिचे मुख वराहासारखे असून डोक्यावर करंडमुकुट असतो. तिच्या हातात हल आणि शक्ती असून इतर दोन हात अभय व वरद मुद्रेत असतात. वाहन आणि ध्वजचिन्ह: महिष
चामुंडा: इतर मातृकांपेक्षा हिचे शिल्पांकन भयावह असते. केस विस्कटलेले असतात. डोळ्यांचा रंग लाल असतो. हातात कपाल आणि शूल असून इतर दोन हात अभय व वरद मुद्रेत असतात. यज्ञोपवीत म्हणून मुंडक्यांची माला आणि मुंडक्यांचा मुकुट धारण केलेला असतो. छातीच्या बरगड्या दिसत असतात, स्तन ओघळलेले असून सुळे बाहेर आलेले असतात. कधीकधी हिच्या पोटावर विंचूचे शिल्प असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: गिधाड/कावळा/शव
वैनायकी, पाटेश्वर लेणी
वैनायकी, भुलेश्वर मंदिर
वैनायकी, भुलेश्वर मंदिर
वेगवेगळी पुराणे सप्तमातृकांच्या उत्त्पतीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगत असताना वराहपुराण त्यांचा संबंध आठ मानवी दोषांशी जोडतो. वराहपुराणानुसार योगेश्वरी, माहेश्वरी, वैष्णवी, ब्रह्माणी, कौमारी, इंद्राणी, चामुंडा आणि वाराही या मातृका अनुक्रमे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, पैशून्य(पशुत्व) आणि असूया या दोषांची प्रतिके आहेत.
घारापुरी लेण्यातील सप्तमातृका
महाराष्ट्रातील काही सप्तमातृका शिल्प
घारापुरी लेणी
वेरूळ लेणी (भव्य आकारातील मातृका)
वाडेश्वर मंदिर, अंभई (ललाटबिंबावर सप्तमातृका)
भुलेश्वर मंदिर, यवत (वैनायकी मातृका)
पाटेश्वर मंदिर व लेणी परिसर (अष्टमातृका आणि मंदिरात वैनायकीची स्वतंत्र प्रतिमा)
धर्मापुरीचा किल्ला (अंबेजोगाईपासून साधारणपणे २५ किमी)
औंढ्या नागनाथ मंदिर, औंढ्या नागनाथ
दाशरथेस्वर मंदिर, मुखेड (नृत्य करण्याऱ्या सप्तमातृका)
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई
जोगेश्वरी लेणी, जोगेश्वरी-मुंबई
राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे
टाकळी ढोकेश्वरची लेणी
श्री योगेश्वरी मंदिर, अंबाजोगाई (कळशावर असलेली वैनायकी)
संदर्भ
भारताची कुळकथा, डॉ. मधुकर केशव ढवळीकर
भारतीय मूर्तिशास्त्र, डॉ. नी. पु. जोशी
Iconography of the Saptamatrikas, O. P. Misra
Elements of Hindu Iconography, T. A. Gopinatha Rao


ब्रह्मदेव – वारसा ठाण्याचा
पंकज समेळ,
हिंदूधर्मातील त्रिदेवांपैकी एक देव ब्रह्मा. ब्रह्माच्या उत्त्पतीच्या अनेक कथा आहेत. एका कथेनुसार अनैसर्गिक बीज आणि विष्णुरूप योनी यांच्या संयोगाने एक सोन्याचे अंडे प्रगट झाले आणि त्यातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. कूर्मपुराणानुसार विष्णूच्या नाभीतून उगवलेल्या कमळातून ब्रह्मा प्रकट झाला. कूर्मपुराणातील दुसऱ्या कथेनुसार जल आणि आकाश तत्वापासून वराहरुपात ब्रह्मा प्रगट झाला. नंतर त्याने स्वतःपासून प्रजापती उत्पन्न केले. या प्रजापतींनी सृष्टी निर्माण केली. म्हणून ब्रह्मदेवाला ‘पितामह’ या नावाने ओळखले जाते. धाता, प्रजापती, विधाता इ. त्याची इतर नावे आहेत. कूर्मपुराणात ब्रह्माची परामूर्ती प्रजापती, हिरण्यगर्भ, वेदार्थवेदी भगवान आणि रजोगुणमय अशी चाररूपे सांगितली आहेत.
ब्रह्मदेव हे रजोगुणांचे प्रतिक आहे. निर्मिती करणे हे मुख्य कार्य असल्यामुळे ब्रह्माने युध्द केल्याच्या, कोणाचा संहार केल्याच्या कथा ऐकायला मिळत नाहीत. देव आणि असुर या दोघांनाही ब्रह्मा वंदनीय होता. असुरांनी ब्रह्मदेवाची खडतर तपश्चर्या करून उत्तमोत्तम वर मिळवल्याच्या कथा पुराणात वाचायला मिळतात आणि यामुळेच ब्रह्मदेवाने असुरांना वर द्यायचे, वरामुळे असुर उन्मत्त होऊन सर्वत्र हाहाकार माजवायचे व नंतर मग त्या असुरांना रोखण्यासाठी वरातून पळवाट काढून विष्णु व शंकर असुराचा नाश करणार असा क्रम असलेल्या अनेक पुराणकथा वाचायला मिळतात. त्याचबरोबर त्रिपुरासुराबरोबरच्या युध्दात ब्रह्माने शंकराच्या रथाचे सारथ्य केले, तसेच शिव-पार्वती यांच्या विवाहात त्याने पुरोहिताची भूमिका पार पाडली होती.
विष्णु आणि शंकर यांच्या जोडीने ब्रह्माची पूजा होत होती. परंतु ब्रह्मदेवाची स्तुती करणारा विशिष्ट संप्रदाय नसणे, असुरास प्रोत्साहन, असत्य कथन, सावित्रीचा शाप, कन्यासक्ती इ. कारणांमुळे मध्यकाळापर्यंत ब्रम्हपूजा अस्तंगत झाली. ललितविस्तार आणि दिव्यावदान या बौध्द ग्रंथात ब्रह्मदेवाचा उपास्य देवता म्हणून उल्लेख आलेला आहे.
ब्रह्मदेवाला पूर्वी पाच डोकी होती. पण ब्रह्माने शिवाचा विरोध केल्यामुळे भैरवाने त्यांचे डोके तोडले. पुढे ब्रह्मदेवाने शिवाचे स्तवन करून शिवास प्रसन्न करू घेतले. ब्रह्महत्येचे प्रायश्चित म्हणून भैरव ते कपाल घेऊन भिक्षा मागण्याकरिता निघून गेला. रुपमण्डण ग्रंथानुसार चार वेद, चार युगे आणि चार वर्ण यांचे प्रतिक म्हणजे ब्रह्माची चार मस्तके.
मूर्तिशास्त्रानुसार ब्रह्माला चार हात असतात. वाहन हंस असून तो कमळावर बसलेला असतो किंवा उभा असतो. हातात पुस्तक, माळा, कमंडलू, यज्ञपात्रे, वरदअभय मुद्रा असतात. ब्रह्मा संहारकर्ता नसल्यामुळे त्याच्या हातात कोणतेही शस्त्र नसते. शरीर थोडे स्थूल असून पोट थोडे सुटलेले असते.
भारतात ब्रह्माची मंदिरे फार कमी आहेत. त्यापैकी पुष्कर (राजस्थान) आणि खेडब्रह्म (गुजरात) ही मुख्य ठिकाणे मानायला हरकत नाही.
ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आणि ठाण्याचा वारसा असलेली ब्रह्मदेवाची मूर्ती काही वर्षांपूर्वी सिध्देश्वर तलावातील गाळ काढताना मिळाली. मूर्तीचा निश्चित काळ सांगता येत नसला तरी मूर्ती साधारणपणे ८००-१००० वर्ष जुनी आहे. या संपूर्ण परिसरावर इ.स. ८०० ते १२५० अशी साधारणपणे ४५० वर्षे शिलाहार राजघराण्याची राजवट होती. एवढी सुंदर मूर्ती कोणत्याही राजाश्रयाशिवाय निर्माण करणे शक्यच नाही. त्यामुळे ही मूर्ती शिलाहारकालीन आहे असे गृहीत धरायला हरकत नाही. शिलाहार राजघराण्याची पहिली राजधानी पुरी आणि दुसरी राजधानी श्रीस्थानक म्हणजे सध्याचे ठाणे.
उत्तरकोकण वर राज्य करणारे शिलाहार राजे राष्ट्रकूट राजघराण्याचे मांडलिक होते. कान्हेरी लेण्यात उत्तर शिलाहारांचा पहिला ज्ञात शिलालेख आहे. शके ७८५ मधील या लेखात पुल्लशक्तीने महासामंत हे बिरूद लावलेले आहे. तसेच आपले वडील कपर्दिन यांना महासामंत आणि कोकणवल्लभ ही बिरुदे राष्ट्रकुट राजा अमोघवर्ष याच्यामुळे प्राप्त झाली असे सांगतो.
शिलाहार राजघराण्याने ठाणे आणि परिसरात अनेक सुंदर मंदिरे बांधली. ठाण्यातील तलावपाळीजवळील कौपिनेश्वर मंदिर, अंबरनाथ येथील शके ९८२ मधील सुप्रसिद्ध शिवमंदिर, लोणाड येथील शिवमंदिर इ. मंदिरांचे बांधकाम शिलाहारकालात झाले हे निश्चितपणे सांगता येते. तसेच शिलाहारांच्या शिलालेखातूनसुध्दा अनेक मंदिराचे उल्लेख वाचायला मिळतात (उदा. व्योमेश्वर, षोंपेश्वर). त्याचबरोबर आटगाव येथील भग्नशिवमंदिर पण शिलाहारकालातील असावे असे त्याच्या स्थापत्यशैलीवरून वाटते.
सिध्देश्वर राममंदिरातील ब्रह्मदेवाची मूर्ती सुमारे ५ फुट उंच, समभंग अवस्थेत आणि कमळावर उभी आहे. समभंग म्हणजे दोन्ही पायावर सरळ उभी असणारी आणि शरीराला कोठेही बाक नसणारी मूर्ती. मूर्तिशास्त्रात मूर्तीच्या उभे राहण्याच्या स्थितीवरून समभंग, अभंग, त्रिभंग आणि अतिभंग असे चार प्रकार असतात.
मूर्तीचे चारी हात भंगले असल्यामुळे कोणत्या हातात काय धारण केले असावे हे सांगता येत नाही.मूर्तिशास्त्राप्रमाणे हातात अक्षमाला, वेद, कमंडलू व यज्ञपात्रे किंवा वेद, यज्ञपात्रे व दोन हात वरदअभय मुद्रावस्थेत असावेत. मूर्तीला चार डोकी असून तीन दर्शनी भागात, तर चौथे डोके मागच्या बाजूला आहे. सर्व तोंडास दाढी आणि मिशी दाखवली आहे. डोक्यावर कोरीवकाम केलेला जटामुकुट आहे. कानात कुंडले, यज्ञोपवीत आणि कटीसूत्र धारण केले आहे. अंगावर वेगवेगळे अलंकार दाखवले आहेत. मूर्तीला कोरलेल्या भुवया नाजूक आणि एकमेकांना जोडलेल्या आहेत. मूर्तिशास्त्रानुसार ब्रह्माचे शरीर स्थूल आणि पोटथोडे सुटलेले असते. पण शिल्पकारांनी मूर्ती तयार करताना ह्या गोष्टीला छेद दिलाआहे.
मुर्तीच्या दोन्ही बाजूला स्त्रिया दाखवल्या असून त्या बहुदा सावित्री व गायत्री किंवा गायत्री व सरस्वती असाव्यात. दोन्ही बाजूंना हंस हे वाहन कोरले आहे. मूर्तीच्या मागे कलाकुसरयुक्त सुंदर प्रभावळ असून तिच्यावर किर्तीमुखे कोरलेली आहेत.
सिध्देश्वर तलाव परिसरात ब्रह्मदेवाचे मंदिर असावे. या मूर्तीची नित्यनेमाने पूजा होत असावी. काळाच्या ओघात मंदिर नष्ट झाले आणि नंतर मुर्तीभंजंकापासून मूर्ती वाचवण्यासाठी मंदिराजवळ असलेल्या तलावात (आताच्या सिध्देश्वर तलावात) लपवून ठेवली असावी. परंतु ही मूर्ती कोणत्या राजवटीच्या काळात तलावात लपवून ठेवली आणि महाराष्ट्रात ब्रह्मदेवाची पूजा कधी बंद झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही . नालासोपारा येथील चक्रेश्वर मंदिरात असलेल्या ब्रह्मदेवाच्या मूर्तीची स्थानिकांकडून अजूनही नित्य पूजा केली जाते ही उल्लेखनीय गोष्ट आहे.
ब्रह्मदेवाच्या मूर्तीच्या समोर असलेल्या राममंदिराच्या मागे ३-४ मूर्तींचे अवशेष पडलेले आहेत. पण त्या मूर्ती कोणाच्या आहेत हे काही कळून येत नाही. एका मूर्तीच्या गळ्यात कोरलेला हार अप्रतिम आहे. दुसऱ्या एका मूर्तीच्या आजूबाजूला जैन तीर्थंकरसदृश्य मुर्त्या कोरलेल्या आहेत. दुर्दैवाने ती मूर्ती कोणाची आहे हे समजून येत नाही.
सद्यस्थितीत ठाण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या ह्या मूर्तीला संवर्धनाची गरज आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे खंडित झालेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही. परंतु अजूनही काही भाविक ह्या मूर्तीची पूजा करतात. या मूर्तीला शेंदूर, फुले, हळदकुंकू इ. घटकांमुळे हानी पोचत आहे. त्यामुळे मूर्तीला आणि इतर अवशेषांना संग्रहालयात हलवणे ही काळाची गरज आहे किंवा सध्याच्या जागी त्यांचे योग्य संवर्धन करणे.
संदर्भ
भारतीय मूर्तिशास्त्र, डॉ. नी. पु. जोशी
Elements of Hindu Iconography, T. A. Gopinatha Rao
 
 
 

वैनायकी – गणपतीची शक्ती

विनायक परब

१९०९ सालच्या त्या घटनेनंतरची सर्वात महत्त्वाची घटना होती ती १९३१ सालची.

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत गणपतीसारखीच सोंड असलेली, मात्र स्त्रीरूप असलेली वैनायकी किंवा विनायकीची मूर्ती वा तिच्या प्रतिमा सापडल्या आहेत. मात्र ती नेमकी कोण, पत्नी, शक्ती की मातृका, हा प्रश्न कायम आहे. पुरातत्त्वतज्ज्ञ आणि प्राच्यविद्यातज्ज्ञ शोध घेत असलेल्या या वैनायकीचे गूढ उकलले तर विनायक म्हणजेच गणपती आपल्याला नव्याने आकळेल.

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यामध्ये असलेल्या ‘आर्किऑलॉजिकल सव्‍‌र्हे

ऑफ इंडिया’च्या एका गोडाउनमध्ये १९०९ साली प्रतिहार शैलीतील एक मूर्ती सापडली, ही मूर्ती गजाननाची आहे, असे सुरुवातीस वाटले, मात्र नंतर व्यवस्थित पाहिले असता ती मूर्ती सोंड असलेल्या स्त्रीरूपाची आहे, असे संशोधकांच्या लक्षात आले. त्या मूर्तीचा कालखंड शैलीनुसार निश्चित करताना लक्षात आले की, ती १० व्या शतकातील आहे. गणपतीसारखीच सोंडधारी पण स्त्रीरूपिणी म्हणून सुरुवातीस तिचे नामकरण विनायकी किंवा वैनायकी असे करण्यात आले. दरम्यानच्या काळात या वैनायकीचा उल्लेख कुठे प्राचीन धर्मग्रंथांमध्ये सापडतोय का, याचीही चाचपणी पुरातत्त्वतज्ज्ञांनी आणि प्राच्यविद्या संशोधकांनी केली. त्या वेळेस तिचे संदर्भही एक एक करत सापडत गेले. काही पुराणांमध्ये तिचा उल्लेख सापडला तो वैनायकी म्हणून. काही कथांमध्येही तिचा संदर्भ सापडला. तेव्हापासून ते आजपर्यंत पुरातत्त्वतज्ज्ञ आणि प्राच्यविद्यातज्ज्ञ या वैनायकीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यात अद्यापही पूर्ण यश आलेले नाही.

णपतीसारखीच सोंड असलेली मात्र स्त्रीरूप असलेली ही वैनायकी किंवा

विनायकी या दोन नावांशिवाय स्त्रीगणेश, गजानन (गजमुख असलेली), विघ्नेश्वरी म्हणूनही शास्त्र-पुराणांमध्ये ती ओळखली जाते. ती नेमकी कोण, हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. काहींच्या मते ती गणेशाची सहचारिणी आहे, काहींच्या मते ती त्याची शक्ती आहे तर काहींच्या मते ती ६४ किंवा ८४ योगिनींपैकी एक आहे, तर काहींच्या मते ती मातृकांपैकी एक असून गणेशाचे आणि तिचे नातेसंबंध हे आई व मुलाचे आहेत. ही एवढी म्हणजेच आई-मुलापासून ते अगदी त्याची शक्ती किंवा सहचारिणी असण्यापर्यंतची त्यांची नाती व्यक्त होण्याची कारणे ही वैनायकीच्या आजवरच्या झालेल्या किंवा करण्यात आलेल्या चित्रणामध्ये दडली आहेत. हे चित्रण कधी तिच्याशी संबंधित कथांमध्ये येते, कधी चित्रांमध्ये पाहायला मिळते तर कधी लेण्यांमध्ये किंवा मंदिरांमध्ये शिल्पित झालेले दिसते. या साऱ्याचा हा अभ्यासात्मक आढावा!

१९०९ सालच्या त्या घटनेनंतरची सर्वात महत्त्वाची घटना होती ती १९३१ सालची. आर. डी. बॅनर्जी यांनी त्यांच्या ‘हैहयाज् ऑफ त्रिपुरी अ‍ॅण्ड देअर मॉन्युमेंट्स’ या त्यांच्या पुस्तकामध्ये आणखी एका अशाच सोंडधारी स्त्रीप्रतिमेची म्हणजेच वैनायकीची नोंद केली. हे शिल्प मध्य प्रदेशातील बेडाघाट येथे पाहायला मिळते. त्यानंतर अनेक संशोधकांनी त्यांच्या त्यांच्या परीने घेतलेल्या शोधामध्ये देशभरातील वैनायकींची नोंद होऊ लागली. मग लक्षात आले की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत (या दोन्ही ठिकाणी वैनायकी सापडली आहे.) वैनायकीचे अस्तित्व आहे. महाराष्ट्रामध्येदेखील तीन वैनायकी सापडल्या आहेत, त्यातील एक प्रतिमा सध्या राज्यात नाही तर इतर दोन प्रतिमा या मंदिरातील शिल्पांमध्ये कोरलेल्या आहेत. किंबहुना यातील एका शिल्पकृतीमुळे या संदर्भातील संशोधनाला वेगळा आयाम मिळाला आहे.

आजवर भारतीयांनी गणपतीकडे पाहिले ते दैवत म्हणून. त्यामुळेच त्याला

धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले. मात्र गणपती या देवतेचा पुरातत्त्वीय अंगाने शास्त्रीय शोध घेण्याची गरज होती. ही गरज पूर्ण केली ती पॉल मार्टिन दुबोस यांनी. जन्माने फ्रेंच असलेले पॉल भारतीय शिल्पशास्त्र आणि वास्तुरचना यांनी प्रभावित होऊन भारतात आले. त्यावर त्यांनी संशोधनही केले. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, भारतीयांनीदेखील आजवर गणपतीवर सर्वसमावेशक असे संशोधन केलेले नाही. मग त्यांनीच ते संशोधन करण्याचा ध्यास घेतला. स्वत: संन्यस्त आयुष्य जगत त्यांनी हे संशोधन काम पूर्णही केले. याच संशोधनादरम्यान त्यांना वैनायकीही लक्षात आली. तिचाही शोध त्यांनी सर्वत्र भारतभर फिरून घेतला आणि मग गणपतीवर त्यांनी केलेल्या संशोधनामध्ये त्यांनी एक प्रकरण वैनायकीवरच बेतले. त्यांचा हा संशोधन प्रबंध फ्रँको इंडियाच्या प्रोजेक्ट फॉर इंडियन कल्चरल स्टडीजअंतर्गत फ्रँको इंडियानेच ‘गणेशा-द एन्चॅन्टर ऑफ थ्री वल्र्ड्स’ या नावाने प्रकाशित केला. फ्रेंचमध्ये प्रकाशित झालेला हा मूळ शोधप्रबंध इंग्रजीमध्ये आणण्याचे काम प्रसिद्ध पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. किरीट मनकोडी यांनी केले.

पॉल मार्टिन दुबोस यांनी या संशोधनामध्ये भाविकाचा दृष्टिकोन यशस्वीपणे

टाळला. त्यामुळे या संशोधनाला शास्त्रीय मूल्य प्राप्त झाले आहे. त्यासाठी ते संस्कृत शिकले, गणेश साहित्य, गणेश प्रतिमा-प्रतीके यांचा सखोल अभ्यास केला. गणेशाचे प्रतिमाशास्त्र, त्यात वेळोवेळी झालेले बदल, भारतीय शिल्पशास्त्राच्या पद्धती-परंपरा आणि गणेशाशी संबंधित सर्व कथा-दंतकथा-रूपके यांचाही अभ्यास केला. त्याच्या शास्त्रीय परिष्करणातून हे संशोधन पुढे आले. वैनायकीचा शोध घेताना पॉल यांना लक्षात आले की, तिच्या इतर प्रचलित नावांबरोबर गणेश्वरी, गणेशनी आणि लम्बोदरी अशीही तिची आणखी तीन नावे आहेत. या साऱ्याचे संदर्भ सापडतात. शिवाय उत्तर भारत आणि मध्य भारतात त्याचप्रमाणे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, ओरिसा आणि आसाम या ठिकाणी ती मोठय़ा प्रमाणावर सापडते, पाहायला मिळते.

दक्षिण भारतात राजेंद्र चोला या राजाच्या कालखंडात (११ वे शतक) कोरण्यात

आलेल्या शिलालेखांमध्येही तिचा उल्लेख पॉलना आढळला. बंगळुरूजवळ असलेल्या कोलार येथे ‘गणेशनी’ असा तिचा उल्लेख असून ६४ योगिनी आणि मातृकांमध्ये तिचा उल्लेख येतो. तसेच मदुराई आणि सुचिंद्रमच्या मंदिरांमध्ये असलेल्या स्तंभांवरही तिची प्रतिमा शिल्पित झालेली दिसते.

उत्तर कर्नाटकातील शिराळी येथील संग्रहालयामध्ये दोन वैनायकी प्रतिमा

संग्रहामध्ये आहेत, त्यातील एक लखनौ येथील तर दुसरी महाराष्ट्रात सापडलेली वैनायकीची ब्राँझमधील प्रतिमा समाविष्ट आहे. (महाराष्ट्रातील प्रतिमा १६ व्या शतकातील आहे) म्युनिच म्युझियममध्ये ही वैनायकीची प्रतिमा असून ती भारतातील केरळमध्ये सापडलेली होती. ही प्रतिमाही १६ व्या शतकातीलच आहे. जशी ही प्रतिमा शिल्पकृतींमध्ये दिसते तशीच ती लघुचित्रांमध्ये किंवा इतर चित्रांमध्येही पाहायला मिळते.

प्राचीन भारतीय साहित्यांमध्येही वैनायकीचा संदर्भ येतो. लिंगपुराण,

स्कंदपुराणातील काशीस्कंदामध्ये त्याचप्रमाणे गोरक्षसंहितेमध्येही गजानन किंवा वैनायकीचा संदर्भ येतो. विष्णुधर्मोत्तर पुराणामध्ये तिचा उल्लेख मातृका म्हणून येतो. अंधकासुराच्या वधाच्या वेळेस त्याचे रक्त पडल्यानंतर प्रत्येक थेंबातून होणाऱ्या अंधकासुराच्या नव्या निर्मितीच्या वेळेस युद्धात त्याचा पडलेला प्रत्येक थेंब खाली न पडू देता तो भक्षण करण्यासाठी शिव शंकरांनी मातृकांची निर्मिती केली, त्यात वैनायकी होती असा संदर्भ येतो. मत्स्यपुराणामध्येही हीच कथा देण्यात आली असून त्यात शंकराने निर्मिती केलेल्या २०० देवतांमध्ये ती होती, असे म्हटले आहे. याचा अर्थ तिचा संबंध मातृका असण्याशी आहे. शिव शंकरांची शक्तीरूपिणी म्हणून ती गणपतीची आई असा संदर्भ काही संशोधकांनी लावला आहे. म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला गणपतीच्या शिल्पकृतींसमोर सप्तमातृका पाहायला मिळतात. महाराष्ट्रात औरंगाबाद लेण्यांमध्ये गणपतीच्या एका बाजूस मातृका तर दुसऱ्या बाजूस बुद्ध शिल्पित करण्यात आले आहेत. तर मुंबईतील जोगेश्वरी लेण्यांमध्येही गणपतीच्या शिल्पाच्या बरोबर समोरच्या बाजूस सप्तमातृका कोरलेल्या असून त्या शिल्पकृतीची बरीचशी झीज झाली आहे. मात्र त्या सप्तमातृका आहेत, हे पुरते लक्षात येते.

वैनायकीची शिल्पे ही बसलेली, उभी किंवा नृत्यावस्थेतील आहेत. तिला दोन किंवा चार हात दाखविलेले आहेत. दगडामध्ये कोरलेल्या अनेक प्रतिमांची झीज झालेली आहे किंवा मग त्या तुटलेल्या तरी आहेत त्यामुळे तिची अस्त्र-शस्त्रे यांची नेमकी माहिती हाती नाही. पण काही प्रतिमांमध्ये लक्षात आलेल्या अस्त्रांमध्ये परशू, वज्र, साप, तुटलेला हत्तीचा दात (एकदंताशी नाते सांगणारा), मोदकपात्र किंवा वीणा यांचा समावेश आहे. शिवाय अभय किंवा वरद म्हणजे रक्षण करणारी किंवा वर देणारी या मुद्राही तिच्या हातांमध्ये पाहायला मिळतात. या मुद्रांवरून तिचे देवत्व पुरते सिद्ध होते. रिखिआन (१० वे शतक), बेडाघाट (११ वे शतक), हिरपूर, झारिआल (ओरिसा- १० वे शतक) या सर्व ठिकाणी ती मातृका म्हणून किंवा ६४ योगिनींपैकी एक म्हणून येते. प्रसिद्ध अभ्यासक देवांगना देसाई यांनीही त्यांच्या संशोधन प्रबंधामध्ये तिचा उल्लेख योगिनी म्हणूनच केला आहे.

चिदम्बरम आणि मदुराईतील मूर्तीमध्ये ती व्याघ्रपाद म्हणजे वाघाचे पाय

असलेली अशी दाखविण्यात आली आहे. जे. ए. बॅनर्जी यांनी त्यांच्या शोधप्रबंधामध्ये तिचा उल्लेख गणेशाची स्त्रीरूपिणी किंवा रिद्धी, सिद्धी, बुद्धी, पुष्टी, भारती किंवा नीला सरस्वतीप्रमाणेच त्याची सहचारिणी म्हणून केला आहे. मात्र यातील एक महत्त्वाचा फरक इथे लक्षात घ्यायलाच हवा तो म्हणजे वैनायकी वगळता सर्व सहचारिणी या मानवी स्त्रीरूपातच शिल्पित किंवा चित्रित झाल्या आहेत. रिखिआन येथील वैनायकीचे ९ व्या शतकातील शिल्प हे सर्वात जुने शिल्प मानले जाते.

वैनायकी ही गणेशाची शक्तीरूपिणी स्त्री असण्याची शक्यता असल्याचे दोनच संदर्भ संपूर्ण भारतात सापडतात. त्यातील एक संदर्भ हा उदयपूरच्या उदयेश्वर मंदिराच्या गर्भगृहामध्ये आहे. तर दुसरा संदर्भ म्हणजेच शिल्प १२ ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रातील औंढय़ा नागनाथ मंदिरावर आहे. या दोन्ही ठिकाणी गणपती वैनायकीसोबत पाहायला मिळतो. त्यातही औंढय़ा नागनाथचे शिल्प सर्वाधिक महत्त्वाचे आहे. कारण हे जगातील एकमेव शिल्प आहे, ज्यात गणपती, सिद्धी, बुद्धी आणि वैनायकीच्या सोबत दिसतो.

मात्र देवतेची शक्ती म्हणजे त्याची पत्नी नाही हे समीकरणही इथे लक्षात घ्यावे लागते. शक्ती म्हणजे ऊर्जा. अगदी अश्मयुगापासून माणसाला स्त्रीमधील प्रसवण्याची शक्ती म्हणजे ऊर्जा असे वाटत आहे. ती शक्ती आहे, असे माणसाने मानले. म्हणूनच जगभरात सर्वत्र देवतेच्या सापडलेल्या पहिल्या प्रतिमा या लज्जागौरीच्या म्हणजेच मातृकेच्या पायविलग अवस्थेतील तिचे जननेंद्रिय स्पष्टपणे दाखविणाऱ्या अशा आहेत. किंबहुना म्हणून कोणत्याही देवतेची शक्ती किंवा ऊर्जा दाखविताना ती स्त्रीरूपातच दाखविली जाते. मात्र याचा अर्थ ती त्याची पत्नी असा होत नाही. किंबहुना म्हणूनच वैनायकीबाबतचे हे गूढ अद्याप उकललेले नाही. ती नेमकी कोण, पत्नी, ऊर्जा म्हणजेच शक्ती की मातृका हा प्रश्न अद्याप कायम आहे. हे गूढ उकलेले त्या वेळेस विनायक म्हणजेच गणपती आपल्याला नव्याने आकळेल असे संशोधकांना वाटते आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेशाशी संबंधित हे स्त्रीरूप समजून घेणे सयुक्तिक ठरावे.

संदर्भ – गणेशा-द एन्चॅन्टर ऑफ थ्री वर्ल्ड्स- पॉल मार्टिन दुबोस, अनुवाद- डॉ. किरीट मनकोडी आणि पुरातत्त्वतज्ज्ञ व प्रतिमाशास्त्रातील जाणकार डॉ. किरीट मनकोडी यांच्याशी वेळोवेळी झालेला संवाद.

विनायक परब – vinayak.parab@expressindia.com

 
 अष्टदिक्पाल


प्राचीन मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, प्रवेशद्वारांवर, तसेच सभामंडपामध्ये, अंतराळात आपणास अनेक मूर्ती कोरलेल्या दिसतात - शिव, विष्णू, देवी आदी देवता, सुरसुंदरी, नर्तक, वादक ह्याशिवाय सर्वसाधारणपणे हटकून दिसतात त्या लोकपालांच्या अर्थात दिक्पालांच्या मूर्ती. हे दिक्पाल त्या त्या विशिष्ट दिशांचे आणि उपदिशांचे पालन करतात, असे मानले जाते. इंद्र, अग्नी, वायू, यम, कुबेर, वरुण, ईशान आणि निर्ऋती ह्या त्या दिशांच्या देवता. मुख्य दिशांच्या देवतांची नावे वेगळी, मात्र उपदिशा आणि त्यांच्या देवता यांची नावे एकमेकांना समांतर असलेलीच आढळून येतात. उदा. आग्नेयेचा दिक्पाल अग्नी, नैर्ऋत्येचा निर्ऋती, ईशान्येचा ईशान आणि वायव्येचा वायू. ही उपदिशांची नावे त्या त्या देवतेपासूनच पडलेली आहेत, हे उघड आहे. इंद्र, अग्नी, वायू, यम, वरुण आणि ईशान ह्या वैदिक देवता आहेत, कुबेर हा यक्षांचा अधिपती, तर निर्ऋती हा चक्क राक्षस आहे. अगदी क्वचित ह्या दिक्पालांच्या मूर्ती त्यांच्या शक्तीसहदेखील आढळतात. दिक्पाल मूर्ती ओळखणे तसे सोपे आहे. त्यांची वाहने आणि हातातील आयुधे यावरून ते सहज जाणून घेता येते. चला तर मग, आता एकेक दिक्पालाची विस्ताराने माहिती घेऊ.

इंद्र (पूर्व दिशेचा अधिपती)

हा देवतांचा राजा. ऐरावत हत्ती हे त्याचे वाहन. वेदांतील सर्वाधिक प्रसिद्ध देवता म्हणजे इंद्रच. इंद्राची पूजा पूर्वी इंद्रध्वजाच्या रूपाने जनमानसात प्रचलित असे. ह्या इंद्रध्वजाच्या पूजेचे वर्णन माझ्या 'गुढीपाडवा - शक्रोत्सवातील इंद्रध्वजपूजेचे प्राचीन साहित्यातील वर्णन' ह्या लेखात विस्ताराने दिलेले आहे. इंद्राची पत्नी शची. काही ठिकाणी इंद्र शचीसह दिसतो. इंद्राची मूर्ती ओळखणे अगदी सोपे. हत्तीवर स्वार किंवा पायाशी हत्ती अशा पद्धतीने इंद्र दाखवला जातो. हातातील आयुधे म्हणजे वज्र, अंकुश.

कायगाव टोके मंदिरात असलेली इंंद्राची मूर्ती - हातात अंकुश, गदा, अक्षमाला आणि कमंडलू आहेत, तर वाहन हत्ती हे पायाशी आहे.

a

वेरुळ येथील धुमार लेणीत शिल्पपटात असलेली इंद्राची मूर्ती

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातली हत्तीवर स्वार इंद्राची मूर्ती, हाती वज्र आणि अंकुश आहेत.

a

पेडगाव येथील लक्ष्मीनारायण मंदिरातील इंद्राची मूर्ती

a

अग्नी (आग्नेयेचा अधिपती)

वैदिक देवतांत इंद्रानंतर कोणाचे स्थान असेल तर ते अग्नीचे. यज्ञाच्या माध्यमातून देवांना हवी पोहोचवण्याचे काम करणारा तो अग्नी. अग्नीची मूर्ती ओळखायची सर्वात सोपी खूण म्हणजे त्याचे वाहन एडका. यज्ञात अजापुत्राला अर्थात बोकडाला यज्ञपशू म्हणून महत्त्वाचे स्थान असल्याने अग्नीचे ते वाहन असल्यास नवल नाही. अग्नीच्या इतर लक्षणांमध्ये त्याची आयुधे म्हणजे ध्वज, कमंडलू, अ़क्षमाला, शक्ती. आयुधात बर्‍याच वेळा पोथी, गदा, स्रुक, स्रुवा अशी भिन्नताही आढळते.

कायगाव टोके येथील अग्नीचे शिल्प

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरावरील बाह्य भिंतीवर असलेली एडक्यावर स्वार अग्नी मूर्ती

a

पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाह्य भिंतीवरील अग्नी शिल्प

a

वेरुळच्या प्रवेशद्वारावर कोरलेली अग्नी मूर्ती

a

ह्याशिवाय पाटेश्वर येथील लेणीत अग्नीची एक वेगळीच प्रतिमा बघायला मिळते.
ऋग्वेदातील चौथ्या मंडलातील ५८व्या सूक्तातील तिसर्‍या श्लोकात अग्नीचे वर्णन पुढील प्रकारे आले आहे -

चत्वारि शर्ङगा तरयो अस्य पादा दवे शीर्षे सप्त हस्तासो अस्य |
तरिधा बद्धो वर्षभो रोरवीति महो देवो मर्त्यां आ विवेश ||

अग्नी हा ४ शिंगे, ३ पाय, २ मस्तके, ७ हस्त आणि ३ ठिकाणी बांधलेला एक वृषभच आहे.

चार शिंगे म्हणजे चार वेद, ३ पाय म्हणजे दक्षिण, गार्हपत्य आणि आहवनीय हे तीन प्रकारचे अग्नी, २ मस्तके म्हणजे एक मानवाचे (हवन करणार्‍या ऋषीचे) आणि दुसरे वृषभाचे (हे बांधलेल्या यज्ञपशूचे प्रतीक), ७ हस्त म्हणजे काली, कराली इत्यादी सात प्रकारच्या ज्वाला. असा हा अग्निवृष.

पाटेश्वर येथील अग्निवृष

a

अग्निवृष

a

वरुण (पश्चिम दिशेचा अधिपती)

वरुण ही जलदेवता. पश्चिमेकडील बाजूस समुद्र असल्याने साहजिकच हा पश्चिमेचा अधिपती झाला. पाश हे वरुणाचे प्रमुख आयुध आणि जलदेवता असल्याने मकर हे त्याचे वाहन झाले. जलदेवता असल्याने काही वेळा एका हातात तर काही वेळा दोन्ही हातात कमळे आढळतात. समुद्रच नव्हे, तर सरोवरे, नद्या जिथे जिथे जल असेल त्यांचा स्वामी वरुण बनला.

कायगाव टोके येथील वरुणाची मूर्ती

a

पेडगाव येथील वरुणाची मूर्ती, मकर हे वाहन पायापाशी दिसेल.

a

वेरुळ येथील कैलास लेणीतील वरुणाची मूर्ती

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील मकरारूढ वरुण

a

वायू (वायव्येचा अधिपती)

वैदिक ग्रंथांत वायूस महत्त्वाचे स्थान नाही, मात्र महाभारत, रामायण हा महाकाव्यांत अनुक्रमे भीम आणि हनुमान यांचा जनक म्हणून मानाचे स्थान आहे, तर वायूच्या आराधनेसाठी वायुपुराणही निर्मिले गेले. वायूच्या मूर्तीच्या निर्मितीत त्याच्या अंगभूत लक्षणांचा पुरेपूर वापर केला गेल्याचे आपणास दिसते. वायूच्या दोन्ही हातात फडफडत्या पताका/ध्वज दिसतात, वायूचे वस्त्रदेखील फडफडताना दिसते, वायुमूर्ती ओळखण्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्याचे वाहन हरीण. वेगाने धावत असल्याने हरीण हेच वायूचे वाहन बनल्यास त्यात काहीच नवल नाही.

कायगाव टोके येथील दोन्ही हातांत फडफडत्या पताका, कमंडलू, अक्षमाला आणि वाहन हरीण यांनी युक्त अशी वायुमूर्ती

a

पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिरातील बाह्य भिंतीवरील वायुमूर्ती

a

वेरुळ लेण्यातील वायुमूर्ती

a

यम (दक्षिण दिशेचा अधिपती)

यम ही वैदिक देवता. सूर्याचा पुत्र. मृतांना स्वर्गास अथवा नरकास पोहोचवणारा हा देव. मृतांना नेण्यास हा आपल्या दूतांना पाठवतो. दक्षिण दिशा मृतांची मानली गेली आहे, साहजिकच यमाकडे दक्षिणेचे आधिपत्य आले किंवा यमाकडे दक्षिण दिशेचे आधिपत्य आहे, म्हणूनही दक्षिण दिशेस मृतांची दिशा मानले गेले असावे. ऋग्वेदातील १० मंडलातील यम-यमी संवाद हे संवादसूक्त अतिशय प्रसिद्ध आहे. तर महाभारतात पतिव्रतोपाख्यानात सत्यवान-सावित्री आणि यम यांची कथा विस्ताराने आली आहे. मार्कंडेयास नेण्यास आलेल्या यमाचे पारिपत्य करणार्‍या शिवाची कथा तर प्रसिद्धच आहे. कालारी शिव अर्थात मार्कंडेयानुग्रह मूर्तीत शिव आणि यमाचे शिल्पांकन केलेले आढळते. यम हा काळाचे/मृत्यूचे प्रतीक, साहजिकच त्याचे वाहन रेडा हेच आहे. इतर लक्षणांत पाश, दंड, खड्ग, अक्षमाला/कमंडलू ही आयुधे अंतर्भूत आहेत.

कायगाव टोके येथील यमाची प्रतिमा - हाती दंड, यमपाश, अक्षमाला आणि पापपुण्याची नोंदवही आहे.

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या स्वर्गमंडपातील यमाचे शिल्प

a

कैलास लेणे, वेरुळ येथील यमाचे शिल्प

a

कुबेर (उत्तर दिशेचा अधिपती)

कुबेर हा विश्रव्याचा पुत्र असल्याने याला वैश्रवण असेही म्हणतात. हा यक्षांचा अधिपती. साहजिकच यक्षांप्रमाणेच ह्याचे शरीरही स्थूल दाखवले जाते. 'कुसित बेरं शरीरं यस्य सः' - अर्थात ज्याचे शरीर कुरूप, बेढब असा तो कुबेर. अर्थात कुबेराच्या सर्वच मूर्ती स्थूल आहेत असेही नाही. त्याच्या मूर्ती सडपातळही आहेत. कुबेर हा जैन आणि बौद्धांमध्येही आढळतो. बौद्धांमध्ये तो जंभाल होतो. त्याची पत्नी भद्रा ही बौद्धांमध्ये हरिती होते.

कुबेराची मूर्ती ओळखणे तसे अवघड, कारण कुबेराची लक्षणे एकसारखी नाहीत. त्याचे प्रमुख वाहन नर. स्थूल असल्याने पालखीद्वारे हा उचलला जात असल्याने कुबेराला नरवाहन म्हणतात. काही वेळा कुबेराचे वाहन हत्ती किंवा घोडा हेसुद्धा दाखवल्याचे दिसते. मात्र कुबेर ओळखण्याचे एक हमखास लक्षण म्हणजे त्याच्या हाती असलेली धनाची पिशवी आणि मुंगूस. कुबेर हा देवांचा धनाध्यक्ष. साहजिकच त्याच्या हाती धनाची पिशवी असते, तर मुंगूस हेसुद्धा धनाचे प्रतीक. मुंगूस दिसल्यावर धनलाभ होतो असे आजही मानतात. मात्र मुंगूस हे कुबेराचे वाहन नव्हे.

कायगाव टोके येथील कुबेर प्रतिमा. येथे वाहन हे हत्ती असून हाती धनाची पिशवी घेतलेली आहे.

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील घोड्यावर बसलेल्या कुबेराची प्रतिमा

a

पेडगाव येथील मुंगूस आणि धनाची पिशवी हाती घेतलेला कुबेर

a

वेरुळ येथील क्र. २०च्या लेणीतील तुंदिलतनू असलेला कुबेर

a

वेरुळ येथील बौद्ध लेणीतील जंभाल आणि हरितीची प्रतिमा

a

निर्ऋती (नैर्ऋत्येचा अधिपती)

निर्ऋतीचे नाव ऋग्वेदात आढळते, मात्र त्याबद्दल अधिक माहिती मिळत नाही. वेदात हा राक्षस म्हणूनच ह्याचा उल्लेख येतो. काही पुराणे निर्ऋतीला स्त्रीरूपी मानतात आणि अलक्ष्मी म्हणूनही निर्ऋतीचे नाव येते. वेदोक्त देवतांच्या रूपांमध्ये विविध कथापुराणांद्वारे हळूहळू बदल होत जाताना निर्ऋतीला दिशाधिपतीचे काम आले असावे, असे म्हणता येते. निर्ऋतीच्या मूर्तीही तुलनेने मोजक्याच आढळतात, ज्या मंदिरांमध्ये दिक्पाल मूर्ती आहेत, तिथेही काही वेळा निर्ऋतीची मूर्ती नसते. मात्र निर्ऋतीची मूर्ती जिथे असेल तिथे ती ओळखणे मात्र सोपे आहे. निर्ऋती हा प्रेतवाहन किंवा नरवाहन. हाती खड्ग, खेटक, नरमुंड ही सर्वसाधारण लक्षणे आणि चेहरा उग्र, दाढा विचकलेल्या असे रूप.

कायगाव टोके येथील निर्ऋतीची मूर्ती. हाती खड्ग, खेटक (ढाल), नरमुंड आणि एक हात अभयमुद्रेत आहे.

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील नरवाहन निर्ऋतीची मूर्ती

a

खिद्रापूरच्याच कोपेश्वर मंदिरातील प्रेतवाहन निर्ऋतीची मूर्ती

a

ईशान (ईशान्येचा अधिपती)

ईशान हे शिवाचेच एक रूप आहे, त्यामुळे ह्याच्या मूर्तीची लक्षणे जवळपास सर्वच शिव आणि भैरवासारखीच आहेत. हाती डमरू, कमंडलू, त्रिशूळ, नाग. याचे वाहन बैल. भैरवमूर्ती आणि ईशान यांच्यामधील फरक म्हणजे भैरव रौद्र आणि काही वेळा नग्न असतो आणि भूतगण, नरमुंडही बाजूला असतो, तर ईशान मूर्ती सौम्य असते.

कायगाव टोके येथील ईशान मूर्ती

a

पेडगाव येथील ईशान मूर्ती

a

पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर मंदिरातील ईशान मूर्ती

a

मातृका

ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा |
वाराही च तथेन्द्राणी चामुण्डा सप्तमातरः ||

ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, इंद्र आदी देवतांच्या अंशापासून मातृका उत्पन्न झाल्या, असे विविध पुराणांमध्ये उल्लेख आहेत, तर अंधकासुरवध कथेत शिवाने मारलेल्या अंधकासुराच्या रक्तापासून नवीन असुर उत्पन्न होऊ नयेत म्हणून त्यांचे रक्त पिण्यासाठी योगेश्वरी आणि इतर मातृका उत्पन्न केल्या, असा उल्लेख आहे. वर श्लोकात उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा ह्या सप्तमातृकांसह कधीकधी आठवी मातृका नारसिंहीसुद्धा दिसते. मातृका ह्या शाक्त अथवा तंत्र पंथामधील समजल्या जातात. ह्या मातृकांचे शिल्पांकन सर्वसाधारणपणे वेगवेगळे आढळत नाही, त्या पट स्वरूपातच आपल्याला दिसतात. सप्तमातृकापटात नेहमी मातृकांच्या एका बाजूला वीरभद्र आणि दुसर्‍या बाजूला गणेश आढळतो. ह्या दोघांच्या मध्ये सात मातृका आपल्या बाळांसह दिसतात. तर प्रत्येक मातृकेच्या खालील बाजूस त्यांची वाहने कोरलेली असतात. क्वचित प्रसंगी मातृकांची वेगवेगळी शिल्पेदेखील दिसतात. चामुंडा मात्र जवळपास सर्वत्रच स्वतंत्र कोरलेली आढळते.

मातॄकांची वाहने पुढीलप्रमाणे

ब्राह्मी - हंस
माहेश्वरी - बैल
कौमारी - मोर
वैष्णवी - गरुड
वाराही- वराह, घुबड
इंद्राणी - हत्ती
चामुंडा- प्रेत

आता काही सप्तमातृकापट पाहू या.

वेरुळ येथील कैलास लेणीतील सप्तमातृकापट

कैलास लेणीतील यज्ञशाळेतील समोरील बाजूस कोरलेला आहे हा प्रचंड सप्तमातृकापट. या सप्तमातृकांची पूजा नेहमी यज्ञाच्या वेळी केली जायची. वाराही, ऐंद्री, वामनी (ब्राह्मणी), नारसिंही या वैदिक अंश असलेल्या तर माहेश्वरी, कौमारी आणि चामुंडा या अनार्य अंश असलेल्या सप्तमातृका. यातील प्रत्येक मातेच्या हाती अथवा मांडीवर त्यांची बाळे आहेत. ह्या देवता म्हणजे जननशक्तीचे जणू एक प्रतीकच. अतिशय देखण्या आणि सालंकृत असलेल्या ह्या मूर्ती आज भग्नावस्थेत आहेत. मूर्तिभंजकांनी मातृकांची मस्तके जरी नष्ट केली असली, तरी प्रत्येक मूर्तीच्या खाली तिचे वाहन कोरलेले आहे, त्यावरून ह्या मातृका सहज ओळखू येतात. येथील एक वाहनांतील बदल म्हणजे वाराहीचे वाहन महिष असून चामुंडेचे शृगाल आहे.

a

वेरुळ येथील लेणी क्रमांक १४ येथील सप्तमातृकापट (येथे चामुंडेचे वाहन घुबड हे आहे)

a

वेरुळ येथील कैलास लेणीच्या डावीकडील लहानशा लेणीतील उभ्या स्थितीत असलेल्या सप्तमातृकांचा पट

a

टाकळी ढोकेश्वर येथील सप्तमातृकापट

लेणीतील प्रवेशद्वारातून आत जाताच डावीकडे एक भव्य सप्तमातृकापट आहे. वीरभद्र (नंदी), ब्राह्मणी (स्त्री), माहेश्वरी (नंदी), कौमारी (मोर), वैष्णवी (गरुड), वाराही (वराह), ऐंद्राणी (हत्ती), चामुंडा (कुत्रा) आणि शेवटी मोदकपात्रासह गणेश असा हा शिल्पपट.
ब्राह्मणीचे वाहन नेहमी हंस असते, इथे मात्र ते स्त्रीरूपात दाखवलेले आहे. प्रत्येक मातृकेच्या हाती अथवा मांडीवर त्यांची बाळे आहेत. वाराही ही वराहमुखी दाखवली असून चामुंडा तिच्या नेहमीच्या भयप्रद रूपात आहे.

a

ह्याशिवाय खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातदेखील दोन सप्तमातृकापट आहेत.

a

a

आता मातृकांची काही एकल रूपातील शिल्पे पाहू या. (सर्व शिल्पे कायगाव टोके मंदिरातील)

माहेश्वरी - डमरू, खड्ग, नाग, वाहन- बैल

a

कौमारी -कमंडलू, पुस्तक, बीजापूरक आणि पंखा, वाहन - मोर

a

वैष्णवी - शंख, चक्र, कमळ, वाहन - गरुड

a

ऐंद्राणी - पाश, अंकुश, वाहन - हत्ती

a

वराहमुखी वाराही - वाहन - महिष

a

याशिवाय चामुंडेची स्वतंत्र शिल्पे तर पुष्कळ दिसतात, चामुंडा ओळखणे तर अगदी सोपे. मातृकापटांतील चामुंडेचे वाहन प्रेत, शृगाल, घुबड अशा भिन्न रूपांत दाखवलेले असले, तरी एकल चामुंडा मूर्तीत प्रेत हे वाहन असते. चामुंडेच्या पोटात विंचू असतो, जो तिच्या भुकेचे प्रतीक आहे. हातपायांचा अस्थिपंजर असून स्तन लोंबते असतात. रूप कराल असून दाढा विचकलेल्या असतात. भयप्रद स्वरूपाची चामुंडा बर्‍याच वेळा शीळ घालण्यार्‍या मुद्रेत असलेल्या दिसून येते.

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील चामुंडा

a

पिंपरी दुमाला येथील चामुंडा मूर्ती

a

सर्वात शेवटी भुलेश्वर येथील सर्वांगसुंदर चामुंडा पाहू.

a

अष्टदिक्पाल आणि मातृका आपण वरील लेखात विस्ताराने पाहिले. आणखीही माहिती देता आली असती, मात्र ती तांत्रिक आणि किचकट झाली असती - उदा., पुराणांत वर्णन केल्याप्रमाणे असलेले त्यांचे रंग, त्यांच्या वाहनांचे विस्तारपूर्वक वर्णन, शिल्पशास्त्रात असलेली त्यांची संस्कृत वर्णने. येथे मी त्यांची सर्वसाधारण माहिती येथील मंदिरांच्या अनुषंगाने आणि ह्या मूर्ती सहजी ओळखता येईल अशा प्रकारे मांडली. काही शिल्पे भग्न झाल्यामुळे त्यात कदाचित काही त्रुटी असण्याचा संभव आहे - उदाहरणार्थ, खिद्रापूर मंदिरातील निर्ऋती आणि कुबेर यांच्या मूर्तीत गल्लत झाली असण्याचा संभव आहे. घोडा असलेली मूर्ती कदाचित कल्कीची असू शकते आणि नरवाहन असलेला निर्ऋती हा कदाचित कुबेर असू शकतो. मूर्ती उंचावर असल्याने आणि छायाचित्रातील लक्षणे पुरेशी स्पष्ट दिसत नसल्याने ही चूक होऊ शकते. इतर स्रोतातून अधिक माहिती मिळाल्यास स्वागतच आहे.

धन्यवाद.
 
http://www.misalpav.com/node/50642


आग्नेय आशियातील विष्णुमूर्ती...

सकाळ वृत्तसेवा

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

आग्नेय आशियामध्ये शंकरासोबतच विष्णूची उपासना किमान दीड हजार वर्षांपूर्वी सुरू झाली होती, हे तेथील शिलालेख आणि मूर्तींच्या पुराव्यांवरून लक्षात येते. त्यातील काही मोजक्या आणि महत्त्वाच्या मूर्तींची ओळख आजच्या लेखात करून घेणार आहोत.

आपल्या देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात कुशाण राजवंशाच्या काळातील (आजपासून सतराशे वर्षांपूर्वीच्या) विष्णुमूर्ती आढळलेल्या आहेत. त्यानंतर आलेल्या गुप्त राजवंशाच्या काळातील (आजपासून सोळाशे वर्षांपूर्वीच्या) विष्णुमूर्ती मध्य प्रदेशातील उदयगिरी लेण्यांत किंवा मथुरा इथे सापडल्या आहेत. या आपल्या देशातल्या प्राचीन विष्णुमूर्ती आहेत. याच काळात शैव आणि वैष्णव पंथ आताच्या भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडून आग्नेय आशियातील थायलंड, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम इत्यादी देशांमध्ये पोहोचले. भूतलावरील राजा हा सृष्टीचे पालनपोषण करणाऱ्या विष्णुसमान किंवा विष्णूचा अवतार आहे ही भारतीय संकल्पनासुद्धा आग्नेय आशियातील या देशांमध्ये दिसून येते.

थायलंड : आग्नेय आशियात सापडणाऱ्या सर्वांत प्राचीन विष्णुमूर्तींपैकी एक विष्णुमूर्ती आपल्याला थायलंडमध्ये सापडते. दक्षिण थायलंडमधील चैय्या इथे सापडलेली ही विष्णुमूर्ती भारतातील कुशाण आणि गुप्त राजवंशाच्या काळातील मूर्तींशी साम्य दाखवणारी आहे. इसवीसन चौथ्या/पाचव्या शतकात म्हणजे आजपासून सोळाशे ते पंधराशे वर्षांपूर्वी ही मूर्ती तयार करण्यात आली होती.

ही मूर्ती चतुर्भुज विष्णूची आहे. या मूर्तीत विष्णूच्या मस्तकावर किरीट असून कानात मोठी कुंडलं आहेत. मूर्तीचा मागील डावा हात तुटलेला असून मागील उजव्या हाताने गदा धरलेली आहे. पुढील उजवा हात अभय मुद्रेत असून पुढील डाव्या हातात शंख धरलेला आहे. अशा पद्धतीने कमरेपाशी शंख धरलेल्या भारतातील कुशाण राजवंशाच्या आणि गुप्त राजवंशाच्या काळातील विष्णुमूर्ती उत्तर भारतात आढळून आलेल्या आहेत.

काही अभ्यासकांच्या मतानुसार चैया येथील ही विष्णुमूर्ती म्हणजे आग्नेय आशियातील आता उपलब्ध असलेली सर्वांत प्राचीन विष्णूमूर्ती आहे. इसवीसनाचे चौथे शतक किंवा पाचवे शतक या दरम्यानच्या कोणत्या काळात ही मूर्ती घडवण्यात आली असावी, याबद्दल अभ्यासकांत मतमतांतरे आहेत. काही असले तरी भारतातील विष्णुमूर्तीचा प्रचंड प्रभाव असणारी ही आग्नेय आशियातील महत्त्वाची मूर्ती आहे, हे नक्की. याशिवाय थायलंडमध्ये इतरही अनेक ठिकाणी विष्णूमूर्ती सापडल्या आहेत. थायलंडमधील प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील तेथील शैव आणि वैष्णव पंथांचा प्रभाव तेथील हिंदू मंदिरे आणि देवतांच्या मूर्तींवरून लक्षात येतो.

कंबोडिया : कंबोडियातील सोळाशे वर्षांपूर्वीच्या शिलालेखांतूनसुद्धा विष्णुमंदिरांना दिलेली दानं नमूद केलेली आहेत. त्या काळातील काही विष्णुमूर्तीदेखील सापडल्या आहेत. मात्र विष्णुभक्तीचा कळस आपल्याला अंकोरवाट नावाने प्रसिद्ध असणाऱ्या मंदिरात बघायला मिळतो. हे मंदिर कंबोडियातील सूर्यवर्मन (दुसरा) या राजाने बाराव्या शतकात बांधलं. तेथील शिलालेखांत या राजाचे नाव परमविष्णुलोक असे नोंदलेले आहे. या मंदिरातील समुद्रमंथनाचे शिल्प अत्यंत प्रसिद्ध आहे. समुद्रमंथनाच्या या शिल्पात कुर्मावतारासह विष्णूची मूर्तीदेखील पहायला मिळते.

या मंदिराशिवाय अंकोरच्या परिसरात थोम्मानन, बांते सम्रे इत्यादी विष्णुमंदिरं आढळून येतात. या सर्व मंदिरांवरील शिल्पांमध्ये आपल्याला विष्णू, राम, कृष्ण यांच्या मूर्ती आणि त्यांच्याशी संबंधित कथांची शिल्पं कोरलेली आढळतात. कंबोडियामध्ये विष्णूच्या दगडी शिल्पांखेरीज ब्राँझच्या मूर्तीदेखील सापडल्या आहेत. यातील आठशे वर्षांपूर्वीची गरुडारूढ विष्णूची एक मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. कंबोडियातील अनेक मंदिरांच्या भिंतीवर आढळणाऱ्या गरुडारूढ विष्णूच्या दगडी मूर्तींसमान ही ब्राँझची मूर्ती घडवलेली आहे.

व्हिएतनाम : मध्य आणि दक्षिण कंबोडियातील वैष्णव पंथाचा प्रभाव व्हिएतनाममध्येदेखील पडला होता. त्यामुळे व्हिएतनाममध्येदेखील इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून विष्णुमूर्ती निर्माण केल्या जात होत्या. येथील एका विष्णुमूर्तीच्या वरील दोन हातांत शंख आणि चक्र दिसून येते. तर खालील डावा हात हा गदेवर ठेवलेला आहे. या मूर्तीत विष्णूचे कुरळे केस दाखवले असून मस्तकावर किरीट आहे.

ही विष्णुमूर्ती साधारणपणे तेराशे वर्षांपूर्वीची आहे. या मूर्तीच्या अंगावर कोणतेही दागिने कोरलेले नाहीत. त्या काळी कंबोडिया, व्हिएतनाम येथील मूर्तींना कानातील, गळ्यातील सोन्याचे दागिने घातले जात असत, हे तेव्हाच्या शिलालेखांवरून समजते. व्हिएतनाममधील या मूर्ती अत्यंत प्रमाणबद्ध आणि सुरेख पद्धतीने घडवलेल्या आहेत. व्हिएतनाममधील मी सन या प्राचीन शैव तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शेषशायी विष्णूची मूर्तीदेखील सापडली होती, याबद्दल आपण व्हिएतनामवरील एका लेखात बघितले आहे.

इंडोनेशिया : इंडोनेशियातील प्राचीन हिंदू मूर्तींमध्ये काही विष्णुमूर्तीदेखील आहेत. इंडोनेशियातील जावा बेटावर सापडलेल्या विष्णुमूर्तींपैकी एका मूर्तीवर वर उल्लेख केलेल्या थायलंडमधील चैय्या येथील मूर्तीचा प्रभाव आहे. तर येथेच सापडलेल्या दुसऱ्या एका विष्णुमूर्तीत अधिक कोरीव काम केलेले आढळून येते. या चतुर्भुज विष्णूच्या हातात शंख, चक्र, गदा घेतलेली दिसून येते. या मूर्तीच्या मस्तकावर कोरीव किरीटमुकुट घातलेला आहे. या मूर्तीच्या कमरेच्या वस्त्रावरील चुण्यादेखील अत्यंत बारकाईने दाखवलेल्या आहेत. ही मूर्ती अंदाजे इसवीसनाच्या पाचव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे दीड हजार वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आली होती, असे अभ्यासकांचे मत आहे. या सुरुवातीच्या काळातील विष्णुमूर्तींखेरीज इतरही विष्णुमूर्ती इंडोनेशियामध्ये सापडतात. इंडोनेशियातील प्रंबानन येथील अकराशे वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या प्रसिद्ध मंदिरसमूहात एक विष्णुमंदिरदेखील आहे.

इंडोनेशियातील दीड हजार वर्षांपूर्वीच्या पूर्णवर्मन नावाच्या राजाच्या एका शिलालेखाशेजारी दोन पावले कोरलेली आहेत. ही पावले त्रिविक्रम विष्णूची असल्याचे तसेच पूर्णवर्मन राजा हा विष्णुसमान असल्याचे त्या शिलालेखातून नमूद केलेलं आहे. भूतलावरील पूर्णवर्मन राजा हा विष्णूचा अवतार आहे, हे सांगण्याचा प्रयत्न राजाने या शिलालेखातून केलेला आहे.

आग्नेय आशियातील मोजक्याच विष्णुमूर्तींबद्दल माहिती करून देण्याचा प्रयत्न या लेखातून केलेला आहे. परंतु आग्नेय आशियातील या विविध देशांमध्ये विष्णूच्या अनेक मूर्ती सापडल्या आहेत. अगदी शैवपंथाइतका नसला तरी वैष्णवपंथाचा प्रभाव आग्नेय आशियातील या देशांमध्ये होता हे तेथील विष्णुमंदिरे, शिलालेख आणि मूर्तींवरून लक्षात येते.

(सदराचे लेखक सांस्कृतिक वारसा अभ्यासक आहेत.)

 मूर्ती मालिका -१३

लोभस पुत्रवल्लभा

गुप्तेश्वर मंदिर धारासुर (ता. गंगाखेड, जि. परभणी) मंदिरावरील हे अतिशय लोभस असे शिल्प. कडेवर मुल असलेले जे सुरसुंदरी चे शिल्प असते त्याला "पुत्रवल्लभा" असे नाव आहे. यातही विविध पद्धतीनं आई आणि बाळाचे नाते दाखवले आहे. बाळाला ती खुळखुळा वाजवुन खेळवते आहे, नुसतेच कडेवर घेतले आहे, स्तनपान करतानाची अप्रतिम शिल्पे आहेत. पण हे जरा हटके आहे. यात हे बाळच आईचा मुका घेते आहे. आईने डाव्या हाताने त्याची कंबर सावरून धरली आहे. उजवा हात बाळाच्या मानेला सांभाळत आहे. या स्वर्गसुखाने दोघांनीही डोळे मिटून घेतले आहेत.
बाळाच्या पायातला वाळा विशेष उल्लेखनीय आहे. हे बाळ नुकतेच चालायला लागले असावे. म्हणून हा चांदीचा वाळा पायात आहे.
प्रेमचंद यांची एक सुंदर लघुकथा आहे. आईच्या बोटाला धरून जत्रेत फिरणारे मुल खेळणी, मिठाई, रहाटपाळणा असे विविध गोष्टींसाठी हट्ट करते आहे. पण गरिब आई त्याला फारसे काही घेवून देवू शकत नाही. पोराचा हट्ट वाढत जातो. तो हात झटकतो आणि मिठाईच्या आकर्षणाने कुठेतरी ओढला जातो. पोर जत्रेत हरवते. आई बाजूला नाही हे ध्यानात येताच त्याला रडू फुटते. आजूबाजूचे लोक त्याला समजावू लागतात. खेळणी देतात, मिठाई देतात, फुगे देवू करतात,रहाटपाळण्याचे आमिष दाखवतात. पण आता पोराला फक्त आईच हवी असते.. बाकी काहीच नको असते. फ.मुं. शिंदे यांनी आपल्या कवितेत लिहिल्या प्रमाणे
आई एक नाव असते
घरातल्या घरात
गजबजलेले गाव असते
केवळ गावच नाही तर लहानपणी आई म्हणजे बाळाचे सर्व विश्वच असते. आसा गोड मतितार्थ या शिल्पात अनामिक कलाकाराने १००० वर्षांपूर्वी कोरून ठेवला आहे. मराठवाडा हा मातृसत्ताक प्रदेश असल्याचे भरपुर ऐतिहासिक पुरातत्वीय पुरावे सापडले आहेत. पैठणचे सातवाहन राजे आईचेच नाव लावायचे. गौतमीपूत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र आळूमावी अशी चांदिची नाणीच सापडलेली आहेत. शिळालेखही आहेत.
मातृशक्तीचा हा एक लोभस आविष्कार, "पुत्रवल्लभा". मला एक शंका आहे. हे शिल्प निर्माण करणारी स्त्रीच असली पाहिजे. इतका नेमका क्षण पुरूषाला पकडता नसता आला. पण दूसरीकडून दासू वैद्य च्या कवितेप्रमाणे पण शक्य आहे
प्रत्येक आईचा मुलगा
कवी असतोच असे नाही
पण प्रत्येक मुलासाठी
त्याची आई एक कविता असते
हे शिल्प जर पुरूषाने घडवले असेल तर त्याची भावना दासूच्या कवितेसारखीच राहिली असेल.


रूसलेली पार्वती आणि शांत शिव
त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताच्या बाजूला शिव मंदिराच्या मंडोवरावर हे अतिशय वेगळं मनोज्ञ असं शिल्प आहे. डमरूआणि नाग दोन हातात असून पायाशी नंदी आहे, गळ्यातही नागबंध आहे. त्यावरून हा शिव आहे हे स्पष्ट होते. पार्वती डोळ्यात काजळ भरत आहे. तिच्या दूसर्या हातात आरसा आहे. लक्ष वेधण्यासाठी शिवाच्या डाव्या हातात दंडासारखे दिसणारे जे आयुध आहे त्याला पार्वतीने आपला उजवा पाय लावला आहे. शिवाच्या उजव्या खालच्या हातात बीजपुरक आहे.
हे शिल्प अलीकडच्या काळातले असल्याने फारसे बारीक नक्षीकाम त्यावर आढळून येत नाही. पार्वतीचे वस्त्र, त्याचा मागे दाखवलेला पदर सुंदर आहे. साधेच पण प्रमाणबद्ध आकर्षक असे हे शिल्प. यात कुठला पौराणीक संदर्भ न दाखवता नवरा बायकोच्या नात्यातील सहज भाव दाखवला म्हणून वेगळे उठून दिसते.
गौरी रूसली असं म्हणण्यापेक्षा शिवच रूसला आहे आणि त्याचे लक्ष वेधण्यासाठी खालील ओळीतील भावना पार्वती व्यक्त करत आहे.
दर्पण देखू रुप निहारु
और सोला सिंगार करू
फेर नजरीया बैठा बैरी
कैसे अखिया चार करू
(प्रसन्न माळेकर या मित्राने सुचवलेल्या समर्पक ओळी)
नाशिकचे मित्र
Ashok Darke
यांनी हा फोटो पाठवला. असे शिल्प कुठे आढळत नाही. याचा काही वेगळा संदर्भ असेल तर तज्ज्ञांनी विषद करून सांगावा. एरव्ही सामान्य दर्शकांसाठी "तूम रूठी रहो मै मनाता रहू" असं एका ओळीत या शिल्पाचे वर्णन करता येईल. देव असला म्हणून काय झालं आहेत तर नवरा बायकोच ना..


देखणा द्वारपाल
प्राचीन मंदिरांवर विविध शिल्पे आढळून येतात ती केवळ सहज म्हणून कोरलेली नसतात. त्यांची एक परिभाषा असते. ते शिल्प तिथेच का कोरले याचे विशिष्ट कारण असते. छायाचित्रातले हे जे शिल्प आहे ते द्वारपालाचे आहे. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करतानाच्या दरवाज्याची जी चौकट असते त्यावर अतिशय कलात्म नक्षीकाम असते. त्याला द्वारशाखा म्हणतात. या द्वारशाखा एक दोन तीन अगदी माणकेश्वर मंदिर (ता. भुम जि. उस्मानाबाद) इथे तर तब्बल सात द्वारशाखा आहेत. या द्वारशाखेच्या तळाशी द्वारपालाचे शिल्प कोरलेले असते. हे शिल्प होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिराच्या द्वारशाखेवरील द्वारपालाचे आहे.
या द्वारपालाच्या हातात डमरू आणि त्रिशुळ आहे. यावरून हा शैव द्वारपाल असल्याचे अनुमान काढता येते. म्हणजे हे मंदिर शैव देवतेचे आहे हे ठरवता येते.
आक्रमकांच्या भितीने बहूतांश मंदिराच्या गर्भगृहातील मूर्ती भक्तांनी मुळ जागेवरून दूसरीकडे नेवून ठेवल्या. मग बराच काळ लोटल्यावर सगळं काही स्थिरस्थावर झाल्यावर रिकामा गाभारा पाहून स्थानिक भाविकांनी घडवायला सोपी म्हणून महादेवाची पिंड आणून बसवली. मग मंदिर मुळ कुठल्या देवतेचे? हे ओळखणं अवघड होवून बसले. अभ्यासकांनी हे दाखवून दिले की जी मुख्य देवता मूर्ती आहे त्या अनुषंगाने द्वारपाल, ललाटबिंबावरील देवता, बाह्य भागातील देककोष्टकांतील देवता यावरून काही अनुमान काढता येते.
गर्भगृहातील अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्यासाठी जी प्रणाल असते तिलाही अर्थ आहे. तिथे गोमुख कोरले आहे किंवा मकर प्रणाल आहे याचेही अर्थ आहेत.
अतिशय देखणी अशी ही शैवद्वारपालाची मूर्ती आहे. आजूबाजूला इतर भक्तगणांची शिल्पे आहेत. सर्वच नृत्याच्या ललित मूद्रेत आहेत. भोवती सुरेख नक्षी आणि किर्तीमुखही कोरलेले आहे.
मंदिराचा मुख्यमंडप आणि गाभारा यांना जोडणार्या जागेला अंतराळ असा शब्द आहे. या ठिकाणी अंधारच असल्याने इथली शिल्पकला दूर्लक्षीत राहते. प्राचीन मंदिरात गेलात तर गर्भगृहाच्या द्वारशाखा आवर्जून बारकाईने न्याहाळा. खुप सुंदर कलाकृती इथे दिसतील.
फोटो सौजन्य.
Travel Baba
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

 मूर्ती मालिका -१४


श्रीधर विष्णु
मंदिरांच्या बाह्य भागातील देवकोष्टकांत कोणती देवता आहे त्यावरून आतील मूख्य मूर्तीबाबत अनुमान लावले जाते. ही विष्णुची मूर्ती गुप्तेश्वर मंदिराच्या (धारासूर, ता. गंगाखेड, जि. परभणी) दक्षिणेला बाह्य भागातील देवकोष्टकांत स्थित आहे. उजव्या खालच्या हातात पद्म, वरच्या हातात चक्र, डाव्या वरच्या हातात गदा आणि खालच्या हातात शंख असा क्रम आहे. या विष्णुला श्रीधर असे नामाभिधान आहे. या विष्णुची जी स्त्री शक्ती आहे तीला "मेधा" असे संबोधतात. अशी विष्णुची २४ नावे आणि त्यांच्या २४ शक्ती आहेत. या मूर्तीला मोजकेच पण रेखीव असे दागिने दाखवले आहेत.
जो पाय उभा आहे नेमके बरोबर त्याच बाजूला विष्णु जरा कललेला दाखवला आहे. दूसरा पाय दूमडलेला असून त्याचा तळवा आत वळवलेला आहे. खाली टेकलेल्या पायाची बोटंच फक्त जमिनीला स्पर्श करत आहेत. टाच अधर आहे. डौलदारपणा मूर्तीला प्राप्त झाला आहे. नसता शास्त्र सांगत आहे त्याप्रमाणे श्रीधर विष्णु म्हणजे पद्म चक्र गदा शंख दाखवलेकी काम संपले. पण इथे या डौलदारपणात शिल्पकाराची प्रतिभा दिसून येते. डावी मांडी मुडपलेली असल्याने त्या ठिकाणची गादी दबलेली आहे. उलट उजवा पाय खाली सोडला असल्याने त्याखालच्या गादीला उभार आहे. या बारकाव्यांतून कौशल्य दिसून येतो.
मूर्ती उभ्या स्वरूपात असेल तर तीला स्थानकमूर्ती म्हणतात. बसलेली असेल तर आसनस्थ म्हणतात. गर्भगृहातील जी मुख्य मूर्ती आहे ती केशव विष्णुची आहे. ही मूर्ती प्रत्यक्ष या मंदिरात नसून बाजूच्या मंदिरात आहे. गुप्तेश्वर मंदिराच्या गाभार्यात सध्या महादेवाची पिंड आहे.
(छायाचित्र सौजन्य
Arvind Shahane
परभणी)



अनंतशयन विष्णु
(मूर्ती व्रताचा ५० वा दिवस म्हणजेच सुवर्ण महोत्सव)
मूर्तीबद्दल सांगण्याआधी नकळत सहज घडलेल्या या व्रताबद्दल सांगतो. घटस्थापनेच्या दिवशी (१७नोव्हेंबर) माझ्या घरातील महालक्ष्मीच्या मूर्तीपासून याची सुरवात झाली. नवरात्राप देवीच्या मूर्तींपुरतं ठरवलं होतं. पण दसर्याच्या दूसर्या दिवशी
Sai Chapalgaonkar
ने तिच्या घरच्या पुजेतील व्यंकटेश बालाजीच्या मूर्तीचा फोटो पाठवला. मग त्यावर लिहिलं. आणि मग लिहितंच गेलो. पन्नास दिवस लिहायचे ठरवले कारण माझे पन्नासावे वर्ष चालू आहे. ही मी मलाच दिलेली भेट आहे. पुढेही लिहित राहिन पण असं व्रत म्हणून रोजच लिहिन असं नाही. आपण सगळ्यांनी दिलेला प्रतिसाद आश्चर्यकारक माझ्यासाठी अभूतपूर्व असा राहिला.
सुरवात घरच्या मूर्तीने केली आता शेवटही घराजवळच्या मूर्तीनेच करतो आहे. (उद्या ५१वा दिवस. समापन म्हणजेच काल्याचे किर्तन म्हणतात तसे एका अप्रतिम भव्य मूर्तीवर लिहिणार आहे. या देखण्या मूर्तीने आपण भैरवी करू.)
अनंतशयन असा हा अप्रतिम विष्णु मंदिराच्या बाह्य भागावर कुठे सहसा आढळत नाही. ही मूर्ती परभणीच्या क्रांती चौकातील राम मंदिरात आहे (टाकळकर कुटूंबियांचे हे मंदिर आहे).
उजव्या वरच्या हातावर मस्तक विसावलेले आहे. उजव्या पायाशी लक्ष्मी असून ती पाय चुरत आहे (याला पाय दाबणे म्हणत नाहीत). तिच्या बाजूला भुदेवी हात जोडून उभी आहे. नाभीतून उगवलेल्या कमळावर ब्रह्मदेवाची प्रतिमा कोरलेली आहे. पाठशिळेवर दहा अवतार कोरलेले आहेत. खाली नागाच्या वेटोळ्यांची मउ शय्या आहे. डोक्याशी नागाचा फणा आहे.
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे पाठशिळेवर कोरलेले अष्टदिक्पाल. कंसात दिशा आणि वाहन दिले आहेत. इंद्र (पूर्व -ऐरावत)), अग्नी (अग्न-मेष) , यम (दक्षिण-महिष), निऋती (नैऋत्य-श्वान), वरूण (पश्चिम-मकर), वायु (वायव्य-मृग), कुबेर (उत्तर- नरवाहन) , ईशान (ईशान्य-वृष). शिल्पात त्यांची वाहने पण दाखवली आहेत. अभ्यासक या शिल्पाला फार महत्वाचे मानतात त्याचे कारणच ही वैशिष्ट्ये आहेत. बारवेत अशा शिल्पाची स्थापना केलेली असते.
उद्या या मूर्ती व्रताचे उद्यापन करूया. आपणा सगळ्यांचे मन:पूर्वक धन्यवाद. देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्राचीन मंदिरे मूर्ती संवर्धनाचा जागृतीचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती.
(अष्टदिक्पाल संदर्भ "भारतीय मूर्तीशास्त्र" या
प्रदीप म्हैसेकर
च्या पुस्तकातून)
(छायाचित्र सौजन्य मल्हारीकांत देशमुख, परभणी)



सर्वांगसुंदर भव्य देखणा शार्ङगधर बालाजी
मूर्ती प्रेमींनी आयुष्यात किमान एकदा तरी पहावीच अशी सुंदर मूर्ती म्हणजे मेहकरचा (जि. बुलढाणा) शार्ङगधर बालाजी. पु.ल. देशपांडे यांनी लिहिलं आहे, "मेहकरचा बालाजी पाहून पटतं लक्ष्मी नारायणाच्या प्रेमात का अडली असेल ते."
साडेअकरा फुटाची ही भव्य काळ्या पाषाणातील मूर्ती शिल्पकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. आयुधांचा क्रम बघितला तर उजव्या खालच्या हातात पद्म, वरच्या हातात गदा, डाव्या वरच्या हातात चक्र आणि खालच्या हातात शंख आहे. विष्णुच्या या रूपाला त्रिविक्रम म्हणतात. पण मेहकरला या मूर्तीला शार्ङगधर बालाजी म्हटले जाते. मूर्तीचा अप्रतिम असा मुकूट आहे त्यावर शार्ङग नावाचे धनुष्य हाती घेतलेले विष्णुची प्रतिमा आहे म्हणून याला शार्ङगधर म्हणतात.
मूर्तीच्या पाठशिळेवर दशावतार कोरलेले आहेत. डावीकडून क्रमाने मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह या नंतर ब्रह्मदेवाची प्रतिमा कोरलेली आहे. त्या वर वामन अवतार आणि मध्यभागी सर्वात वर शिखरावर विष्णु प्रतिमा आहे. खाली उतरताना दूसर्या बाजूने परशुराम, महेश, राम, बलराम, बौद्ध आणि कल्की अशा दशावतार अधिक ब्रह्मा विष्णु महेश १३ प्रतिमा आहेत.
डाव्या उजव्या बाजूला जय विजय आहेत. मूर्तीच्या उजव्या बाजूला खाली भुदेवी आणि डाव्या बाजूला महालक्ष्मी आहे.
मूर्तीची प्रमाणबद्धता, अलंकरण याचे वर्णन करावे तितके थोडे आहे. ही मूर्ती ७ डिसेंबर १८८५ रोजी मेहकरच्या एका गढीत खोदकाम करताना सापडली. इंग्रज अधिकार्यांनी रितसर पंचनामा करून मूर्ती इंग्लंडला पाठविण्याचे ठरवले. पण गावकर्यांनी मूर्ती गावाबाहेर जावू द्यायची नाही असा पण केला. तातडिने तीची विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केली. हजारो लोकांनी प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती हलवू देणार नाही असा आग्रह धरला. शेवटी धार्मिक बाबीत हस्तक्षेप करायचा नाही या १८५८ च्या राणीच्या जाहिरनाम्यातील कलमाच्या अनुषंगाने इंग्रज अधिकार्यांनी आपला निर्णय मागे घेतला.
आठ वर्षात मंदिराचे बांधकाम लोकांनी पूर्ण केले आणि मग ही मूर्ती तिथे स्थापित केली. उद्या ७ डिसेंबरला मूर्ती सापडली त्या घटनेला १३२ वर्ष पूर्ण होतील. त्या लोकांनी शिकस्त केली म्हणून मूर्ती वाचली. म्हणूनच ही सर्वांगसुंदर मूर्ती आज आपल्या देशात आपल्या डोळ्यासमोर आहे. या मूर्तीचा चांगला फोटो मला भेटू शकला नाही. कदाचित शार्ङगधराचीच इच्छा तूम्ही त्याला प्रत्यक्ष पहावे अशी असेल. मूर्ती व्रताची सांगता करताना माझा आग्रह नव्हे हट्ट आहे. ही मूर्ती एकदा पहाच.
मेहकरचे ज्येष्ठ मराठी कवी ना. घ. देशपांडे यांनी या मूर्तीवर सुंदर काव्य रचले. तिनेच मी या मूर्ती व्रताच्या काल्याच्या किर्तनाचा शेवट करतो.
त्रिविक्रमा हे, हे जगदंतर, सुंदर शार्ङगधरा
तव चरणाशी लक्ष्मी सुंदर
जय विजयाचे युगूल मनोहर
अवताराची तूझी प्रभावळ मनमोहन श्रीधरा ।।१।।
तूझे गीत गाते हे मंगल
अविरत निर्मळ गंगेचे जळ
पिउन ते, ही सस्यश्यामला प्रमुदित होते धरा ।।२।।
शिखराभवती शुभ्र पाखरे
प्रदक्षिणा करतात तूला रे
धुंडतात हे तुला सारखे अगोचरा गोचरा ।।३।।
पडतो मी पण तू वरती धर
व्यथित असा मी तू करूणाकर
हे करूणामय तूझ्यात आहे पूर्णकृपेचा झरा ।।४।।
- ना.घ. देशपांडे
(श्री व्यंकटेश व कालहस्तीश्वर, ले. रा.चिं. ढेरे, प्रकाशक पद्मगंधा)
सर्व वाचकांचे शतश: आभार. मूर्ती व्रत येथे समाप्त झाले. मूर्तींवर वेळोवेळी लिहितच राहिन. मंदिर मूर्ती कोशाचे मोठे काम हाती घेतो आहोत त्यात तूम्हा सर्वांचा सहभाग राहू द्या सहकार्य करा. प्राचीन मंदिरे व मूर्तींचे जतन संवर्धन अभ्यास या चळवळीस सहकार्य करा.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

 मूर्ती मालिका - १५

 

येरगी येथील काळम्मा

सरस्वतीची एक अतिशय सूंदर मूर्ती होट्टल पासून जवळच असलेल्या येरगी (ता. देगलूर जि. नांदेड) येथे आहे. स्थानिक लोक "काळम्मा" या नावाने तीची पूजा करतात.
ही मूर्ती आसनस्थ आहे. सरस्वती ओळखु येते कारण डाव्या वरच्या हातात आपण ज्याला एकतारी म्हणून ओळखतो तशी एकतंत्री वीणा आहे. त्याच बाजूला खालच्या हातात पुस्तक आहे. उजवा खालचा हात नीट दिसत नाही त्या हातात अक्षमाला आहे. वरच्या हातात अंकुश आहे. हळेबीडू येथील नृत्त मूद्रेतील सहा हातांच्या सरस्वतीच्या एका हातात अंकुश दाखवलेला आहे. तसा तो येथे आढळून येतो. कधी अंकुशाच्या ऐवजी पाश दाखवलेवा असतो. वीणा आणि पुस्तक जास्त आढळून येतात. त्यावरूनच ढोबळमानाने ही मूर्ती ओळखता येते.
मूर्तीच्या अंगावरील दागिने विशेषत: गळ्यातील हार अप्रतिम आहे. असे चौरसाकृती "नेकलेस" अगदी आजही फॅशनच्या नावाने लोकप्रिय आहे. त्याची पाळंमुळं या आठशे वर्षांपूर्वीच्या मूर्तीमध्ये सापडतात. होयसळ शैलीतले हे शिल्पांकन आहे.
पाठीमागे सहा देवतांच्या मूर्ती आहेत. अजून एक मूर्ती जी छायाचित्रात दिसत नाही ती असावी म्हणजे या सप्त मातृका असतील. पायाशी हंस कोरलेला आहे. पण खंडित असल्याने त्याची ओळख नीट पटत नाही.
Ainoddin Warsi
या मित्राने मूर्तीचा फोटो पाठवला.
Rajesh Kulkarni
यांनी या ठिकाणाची माहिती पुरवली. अभ्यासकांनी या सरस्वती मूर्तीवर अजून प्रकाश टाकावा. सरस्वती मंदिर म्हणून या ठिकाणाचा विकास झाला पाहिजे.
(आपणा सगळ्यांच्या प्रेमानं मी खरंच अवघडून गेलोय. नवनविन मूर्तींची माहिती आपण पाठवत अहात. हे मूर्ती व्रत आता माझे एकट्याचे उरले नसून सर्वांचेच झाले आहे. तूम्ही पाठवत असलेल्या फोटोंचे माहितीचे मन:पूर्वक स्वागत. मी माझ्या कुवतीप्रमाणे याला न्याय देत राहिन. परत धन्यवाद. रोज शक्य नाही पण शक्य तसे लिहित राहिन.)



मकर तोरणावरील देखणा नटेश
मंदिराच्या मुख्य मंडपातून गर्भगृहाकडे जाताना जो पॅसेज लागतो त्याला अंतराळ म्हणतात. या भागात डाव्या उजव्या भिंतींवर देवकोष्टके असतात. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची जी चौकट असते तिच्या वरच्या भागाला मकर तोरण म्हणतात. होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिराच्या मकर तोरणावर हा नृत्य करणारा शिव कोरला आहे ( नृत्य शिव म्हणजे नटराज नव्हे). नटराज मूद्रेशिवाय शिवाच्या नृत्य मूद्रीत शिल्पांना नटेश असे म्हणतात. डावा पाय जमिनीवर आणि उजवा पाय उचललेला अशी ही मूद्रा आहे. (नटराज मूद्रेत उजवा पाय जमिनीवर आणि डावा उचललेला असतो) आजूबाजूला भक्तगण वाद्य वाजवत संगीतात गुंग झालेले आहेत. भक्तांच्या चार मूर्ती असून दोन वाद्य वाजवत आहेत तर दोन ललित मूद्रेत उभ्या असून नृत्याला साथ देत आहेत. मुख्य नर्तकाच्या मागे "कोरस" म्हणून कसे इतर उप नर्तक नाचत असतात तसे.
मगरीच्या मुखातून निघालेले नक्षीचे तोरण शिवाच्या माथ्यावर आहे. हे तोरण मोठे कलात्मक आणि सुंदर आहे. डाव्या खालच्या हातात बीजपुरक आहे. उजव्या वरच्या हातात डमरु आणि खालचा हात वरद मूद्रेत असून त्याच हातात अक्षमाला आहे. पायाशी नंदी बसलेला आहे.
हे मंदिर शिवाचे आहे हे सुचित करणारे हे शिल्पांकन गर्भगृहाच्या चौकटीवर दिसून येते. मंदिरांवरच्या शिल्पात खुप अर्थ दडलेला असतो. केवळ कोरायचे म्हणून शिल्प कोरले असे होत नाही. या शिल्पातील इतर मूर्तीही लयबद्ध आहेत. तोरणाच्या वरतीहि डाव्या उजव्या कोपर्यात गंधर्व किन्नर कोरलेले दिसून येतात. शिडी लावून वर चढून ही शिल्पं नीट पाहिली पाहिजेत. त्यांची सुंदर छायाचित्र, चलचित्रण (व्हिडिओ) करून ठेवले पाहिजे. म्हणजे सामान्य रसिकांना त्याचा आनंद घेता येईल. अन्यथा शिल्पातले बारकावे लक्षात येत नाहीत. खुप वरचे किंवा पुरेसा प्रकाश नसलेल्या जागचे दिसतही नाही.
छायाचित्र सौजन्य


पशु पक्षी शिल्पं घोटण
मंदिरांवर कोरलेल्या शिल्पांमागे काही एक अर्थ दडलेला असतो. पण काही शिल्प काही वास्तुरचना या सौंदर्याचा भाग बनुन निखळ कलात्मक आविष्कार बनुन येतात. पशु पक्षांच्या या सहा जोड्या घोटण (ता. शेवगाव जि. नगर) थेथील मल्लिकार्जूनेश्वर मंदिरावरील आहेत. मंदिराच्या पायाशी गजथर, अश्वथर असतो. पण हे प्राणी युद्धात वापरले जाणारे आहेत. मोर हंस गरुड हे देवतांचे वाहन आहैत. पण घोटण मंदिरावरील ही शिल्पे मुख्य मंडपावरील खांबांवर स्वतंत्र शिल्प म्हणून कोरलेली आहेत हे विशेष. बदक, हत्ती, हंस, वराह, हरिण आणि वानर अशा या सहा जोड्या आहेत. यातही परत नर मादी असं काही दाखवलं असतं तर त्यालाही काही वेगळा अर्थ देता आला असता. इथे तसंही नाही. केवळ जोड्या आहेत. मुख्य मंडपाच्या स्तंभांवर पौराणीक संदर्भ कोरलेले असतात किंवा नक्षी असते. पण इथे प्रामुख्याने पशु पक्ष्यांच्या जोड्या आहेत.
तेराव्या शतकातील या मंदिराचा जिर्णोद्धार पेशवेकाळात १८ व्या शतकात करण्यात आला. पुरातत्व खात्याकडून हे मंदिर चांगल्या पद्धतीनं जतन केलं गेलं आहे. पैठणपासून दक्षिणेला २० किमी अंतरावर हे मंदिर आहे. इथपर्यंत जाण्यासाठी रस्ता चांगला आहे.
(छायाचित्र
Vincent Pasmo
)

श्रीकांत उमरीकर औरंगाबाद 9422878575

 मूर्ती मालिका -१६



गणेशासोबत नृत्यमग्न उंदीर उंदरी
गणेशाच्या विविध मोहक शिल्पकृती मंदिरांवर आढळून येतात. यातील नृत्यगणेश तर खुपच सुंदर आहेत. घोटण (ता. शेवगाव जि. नगर) येथील खांबांवर पशु पक्षांची शिल्पे ठळकपणे आढळून येतात. छायाचित्रातील शिल्पाने मला चकितच केले. शिल्पात नृत्य करणारा गणेश आहे. पण त्याच्या सोबत कोण आहे? तर दोन उंदीर दिसत आहेत. कमरेखाली उंदीर आणि वर मनुष्य. यातही परत डाव्या बाजूला आहे ती स्त्री तर उजव्या बाजूला पुरूष. उंदरी नाचत आहे तर उंदीर झांज वाजवत आहे. या मंदिरातील पशुपक्षांची शिल्पे संख्येन जास्त आणि ठळक आहेत. या शिल्पात गणपतीचे वाहन म्हणून छोटासा उंदिर न दाखवता त्याच्या सोबत नृत्य करणारी तेवढ्याच आकाराची ही उंदिर नवरा बायकोची जोडी. या कलाकाराच्या कल्पकतेला सलाम. (या आकृती किन्नरांच्या आहेत असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यावर इतर अभ्यासकांनी प्रकाश टाकावा.)

(छायाचित्र Vincent Pasmo




अशोक वनात हनुमान
घोटणच्या मल्लिकार्जूनेश्वर मंदिरात (ता. शेवगांव जि. नगर) पशुपक्ष्यांची शिल्पे लक्षणीय आहेत हे मी आधी सांगितले होतेच. या शिल्पात सीतेच्या शोधातील हनुमान दाखवला आहे. शिल्पाची झीज झाली शिवाय मोडतोड झाल्याने आधी लक्ष्यात नाही आले. तेथील पुजार्याने सांगितल्यावर नीट लक्ष्य देवून बघितले. मग हनुमानाने पुढे केलेले बोट म्हणजे तो सीतेला अंगठी दाखवतोय हे लक्ष्यात आले. बाजूला दोन बलदंड स्त्रीया म्हणजेच राक्षसी आहेत. अंगठी दिसताच सीतेने मान वरती केली, अंगठीसाठी हाताची ओंजळ पुढे केली. एरव्ही सीता खाली मान घातलेली दाखवली जाते. पण रामाची अंगठी दिसताच ती आनंदली. या शिल्पकाराने नेमका हा क्षण टिपला आहे. मागची अशोकाचे खोड सरळ न दाखवता कलात्मक असे त्रिभंग मुद्रेत उभ्या असलेल्या सुरसुंदरी सारखे दाखवले आहे. हनुमान हा आकाराने लहान होवून सीते समोर उभा राहिला असे वर्णन रामायणात आहे. इथे शिल्पकाराने त्याचाही विचार केलाय हे विशेष. बसलेल्या सीतेइतकीच हनुमानाची उंची आहे.
जेंव्हा हे शिल्प संपूर्ण चांगल्या स्थितीत असेल तेंव्हा त्याचे सौंदर्य काय आणि किती असेल. आज केवळ अवशेषांवरून अंदाज लावला तर त्याचे सौंदर्य जाणवते. मंदिरावरची छोटी शिल्पे आकारामुळे दूर्लक्षीत राहतात पण त्यांच्यातही मोठा अर्थ दडलेला असतो.
(छायाचित्र
TravelBaba
)  



मानस्तंभावरील जैन देवता
चारठाणा (ता. जिंतूर जि. परभणी) येथ ३४ फुटी उंच भव्य सुंदर आणि कलात्मक असा मानस्तंभ आहे. याचा कालखंड १३ व्या शतकातील आहे. पैठण आणि वेरूळच्या कैलास लेण्यात असलेल्या स्तंभांशी याची तूलना करता येते. याच्यावर चार दिशांना चार मातृदेवता कोरलेल्या आहेत. देवतांच्या वर छोट्या देवकोष्टकात जैन तीर्थंकारांच्या मूर्ती असल्याने या जैन मातृदेवता असल्याचे अनुमान निघते.
पूर्वेकडील चक्रेश्वरी जिच्या हातात चक्र असून वाहन गरुड ,उत्तरेकडील पद्मावती जिचे वाहन हंस , पश्चिमेकडील अंबिका जिचे वाहन सिंह , दक्षिणेकडील ज्वालामालिनी जिचे वाहन वृषभ व अष्टभुजा .
याच स्तंभाच्या समोर मंदिराच्या द्वारशाखेवरील तोरणाचे अवशेष आढळून येतात. इथे उत्खननास परवानगी मिळाल्यास मंदिर सापडण्याची शक्यता अभ्यासक ज्यांनी या मूर्तीवर/ स्तंभावर संशोधन केलेले
Laxmikant Sonwatkar
हे सांगतात.
हा सगळा परिसर निव्वळ उकिरडा बनला आहे. स्वच्छता अभियान राबवून गावकरी प्रयत्न करत आहेत. पण उत्खननास परवानगी आणि निधी मिळाल्या शिवाय इथला प्रश्न निकाली निघणार नाही. सरकारी निधी न मिळाल्यास जैन संघटनांनी याकडे लक्ष द्यावे निधी उपलब्ध करून द्यावा ही कळकळीची विनंती.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

 मूर्ती मालिका - १७



विष्णुची वराह मूर्ती
मत्स्य, कुर्म या नंतर तिसरा अवतार वराह मानला जातो. वैष्णव मंदिरांवर वराह अवताराच्या मूर्ती प्रामुख्याने आढळून येतात. ही वराहमूर्ती जाम (ता. जि. परभणी) येथील प्राचीन मंदिरावरची आहे. मुख वराहाचे व शरिर मानवाचे अशी स्थानक मूर्ती (म्हणजे उभी) या प्रकारातील हा नृवराह म्हणून ओळखला जातो. उजव्या खालच्या हातात गदा आहे. वरच्या हातात पद्म आहे. त्यातही वैशिष्ट्य म्हणजे वरती कमळ फुललेले तर खालच्या बाजूस कळी आहे. डावा मुडपलेला हात आहे त्यावर लक्ष्मी विराजमान आहे. त्या हातात शंख आहे. डाव्या खालच्या हातात चक्र आहे. डावा पाय शेष नागाच्या फण्यावर टेकवला आहे. शिवाय कासवही या पायाखाली आढळून येते. मूर्तीला सुंदर अलंकारांनी मढवले आहे. शंख पकडला त्या हातात शंखाला पकडण्यासाठी सोन्याची साखळी गुंफावी असाही दागिना दिसून येतो. शंखाच्या खोबणीत बोटं बरोबर बसवली आहेत. शंख कसाही पकडला आहे असे नाही. उजव्या हाताची गदा ऐटदारपणे जमिनीवर रोवलेली आहे. सगळ्याच मूर्तीला एक छानसा डौल प्राप्त झालेला आहे. जामचे मंदिर वैष्णव मंदिर असल्याने विष्णुने सुंदर कलात्मक प्रतिमांचे अंकन यावर आढळून येते.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.
(छायाचित्र सौजन्य
Arvind Shahane



वेरूळ लेण्यातील वराह अवतार शिल्प
काल जाम येथील वराह अवतार शिल्पाची चर्चा केली होती. तेंव्हा कैलास लेण्यातील याच शिल्पाचा विषय निघाला होता. हे शिल्प वेरूळच्या लेणी क्र. १४ मधील आहे. या लेणीला "रावण की खाई" म्हणून ओळखले जाते. हिरण्याक्षाने वसुंधरेला समुद्रतळी नेले होते. विष्णुने वराह अवतार घेवून तिला वर काढले अशी कथा आहे.
नागाच्या आभोगावर, वेटोळ्यावर उभा असणारा वराह. एक पाय पुढे, एक हात कमरेवर. याला आढील आसन म्हणतात याला. काहीतरी जगावेगळा पराक्रम करून पृथ्वीला पाण्या बाहेर काढलेला आश्वासक आवेग जाणवतो इथे. पृथ्वी अतिशय मनापासून हुश्श म्हणून त्याला धन्यवाद म्हणत असावी इतकी सहज सुंदर आहे. तिच्या कानात असणारे एक कुंडल माने जवळ आहे तर दुसरे लांब आहे.
खाली बाजूला हिरणाक्ष आणि त्याची पत्नी हात जोडून उभ्या असलेल्या दिसतील. पाताळ, पाणी असणारा प्रदेश, इतर असंख्य गोष्टी आणि नाग देवता यांचे नाते सर्वश्रुत आहे.
इथे वराहाने धरलेले चक्र आणि पृथ्वीची त्रिभंग मूर्ती खूप महत्त्वाची. हातात चक्र नेमकेपणाने धरले आहै. महाभारत मालिकेत मध्ये नितीश भारद्वाज किंवा सगळे नर्तक धरतात तसे कधीही धरत नाहीत.
भुदेवीने आपला उजवा हात वराह मुखावर सहजपणे टेकवला आहे. तिच्या दूसर्या हातात कमंडलू दिसत आहे. पाठीमागे अर्धवर्तूळांतून समुद्र सुचीत केलेला आहे. वराह अवतार शिल्प मराठवाड्यात बर्याच ठिकाणी आढळून येतात.
वराह अवताराचे या प्रदेशातील हे सर्वात भव्य शिल्प आहे.
(पुरक माहिती
Rahul Deshpande
यांनी दिली)
छायाचित्र सौजन्य
Travel Baba Voyage



योगमुद्रेतील विष्णु
जाम (ता.जि.परभणी) येथील मंदिरावर बाह्यभागात दशावतार मूर्ती शिल्पांकित आहेत. त्यावरून या मूर्तीला चुकून बौद्ध अवतारातील विष्णु संबोधले जाते. पण मूर्तीला चार हात असून वरच्या दोन हातात शंख आणि चक्र स्पष्ट दिसत आहेत. त्यावरून हा विष्णु असल्याचे स्पष्ट होते. खालील दोन हात योगमुद्रेत असून उजव्या हातात पद्म आहे. पद्ममासनातील ही मूर्ती दूर्मिळ आहे. अशीच मूर्ती उमरगा येथील शीव मंदिरावर देखील आहे. योगासनातील या विष्णुमूर्तीवर अलंकरण अतिशय किमान दाखवलेले असते. मस्तकापाठिमागे प्रभावळ दिसून येते. याच मूर्तीला हातातील आयुधांच्या क्रमावरून "आसनस्थ केशव" असे संबोधन देगलुरकरांनी आपल्या संशोधनात वापरले आहे. गदेचा अपवाद वगळता बाकी आयुधांचा विचार केल्यास ते बरोबरही वाटते.
या योगमुद्रेतील मुर्तीचे बुद्ध मुर्तीशी साम्य चटकन डोळ्यात भरते. याच परिसरातील विष्णु मुर्तींवर दशावतारांचे अंकन दाखवत असताना ९ वा अवतार बुद्ध दाखवला जातो. औंढा येथील केशव मुर्तीवर तो दाखवलेला आहे.
छायाचित्र सौजन्य
Arvind Shahane
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

मूर्ती मालिका - १८


उमा महेश्वर (सिद्धेश्वर मंदिर, लातुर)

लातुर शहराचे मुळ नाव रत्नपुर. येथे रत्नेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर असल्याचे सांगितले जाते. त्या मंदिरातील हे अप्रतिम उमा महेश्वर शिल्प. जे आता सिद्धेश्वर मंदिरात जरा अडगळीत पडलेले आहे. याचे पूर्ण छायाचित्र घेण्याचा प्रयत्न गिरीश कुलकर्णी व भाउसाहेब उमाटे यांनी केला. पण ते जमले नाही. हे छायाचित्र निवृत्त शिक्षक एस.के. माने यांनी पाठवले आहे.
या शिल्पात शिव सव्य ललितासनात असून (डाव्या पायाची मांडी घातलेली उजवा पाय मोकळा खाली टेकवलेला) पार्वती वाम ललितासनात (उजव्या पायाची मांडी, डावा पाय खाली सोडलेला) मांडीवर बसलेली आहे. शिवाच्या डाव्या वरच्या हातात त्रिशुळ आहे, डाव्या खालच्या हातात बीजपुरक आहे. उजवा एक हात पार्वतीच्या स्तनांना स्पर्श करत असून दूसरा हात पाठीमागे आहे. त्या हातात सर्प असावा. नीट दिसत नाही. पार्वतीचा उजवा हात शिवाच्या खांद्यावर आहे त्याची बोटं दिसतात. डाव्या हातात बीज पुरक आहे. एरव्ही जटा मुकुटात असणारा शीव येथे करंड मुकूटात आहे. कपाळावर मुकुटाची छान नक्षीदार महिरप आली आहे. पार्वतीही अशाच नक्षीदार मुकुटात दाखवली आहे. शिवाला नेहमी सर्पालंकार दाखवतात. पण इथे गळ्यात, कानात, दंडात, छातीवर सुंदर अलंकार आहेत. पायाशी नंदी आहे. या शिल्पाच्या उजव्या बाजूस गणेश आणि डाव्या बाजूस कार्तिकेय आहेत. एका फ्रेममध्ये येत नसल्याने त्यांची छायाचित्रे दिली नाहीत.
शिव पार्वतीच्या मध्ये एक हात दिसत आहे पण तो कुणाचा हे ओळखु येत नाही. पार्वतीचा तो हात असेल तर तिचा चौथा हात कुठे असेल?
ही मूर्ती फार मोठा ठेवा आहे. अभ्यासक जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा. सध्या ज्या अडचणीच्या जागी आहे तिथून बाहेर काढून तिची स्थापना चांगल्या ठिकाणी करावी. जेणेकरून छायाचित्र नीट काढता येईल, अभ्यासकांचे लक्ष जाईल.



सारिपाट खेळणारे शिवपार्वती (लेणी क्र १४ वेरूळ)
शिवपार्वती सारिपाट खेळत आहेत असे मोठ्या आकारातील दोन शिल्पपट वेरूळमध्ये आहेत. सारिपाटसाठी संस्कृतमध्ये "अक्षक्रिडा" असा शब्द वापरला जातो. एका शिल्पावर पूर्वीच या सढरात लिहिले होते. अजून एक संधी मागणारा शिव असा त्या शिल्पपटाचा आशय होता. वरिल शिल्पपट अजून मनोज्ञ आणि देवतांचेपेक्षा स्वाभाविक मानवी भावनांना शिल्पांकित करतो.
खेळताना शिवाने काहीतरी लबाडी केली आहे. चिडून पार्वतीने तोंड फिरवले आहे. शिव तीचा हात धरून साॅरी म्हणतो आहे. मागे गणेश भृंगी चामरधारिणी आणि बाकी गण आहेत.
या शिल्पाचे खरे सौंदर्य खालच्या बाजूस दडलेले आहे. शिवाचा नंदी मोकळा सहज उभा आहे. त्याच्या भोवती शिवगण मस्त त्याची मजा घेत आहेत. कुणी त्याच्या गळ्यातली घंटा वाजवत आहे. कुणी शेपटीशी खेळत आहे. कुणी पाय धरला आहे. कुणी पाठीवर चढू पहात आहे. विठु माझा लेकुरवाळा तसा हा नंदी आहे. एखादा समजूतदार ड्रायव्हर असेल तर त्याच्या कारशी गल्लीतील पोरांनी खेळावं तसं हे शिल्प आहे.
देवतांचे मानवी स्वभावाप्रमाणे चित्रण हे वैशिष्ट्य इथे आढळून येते.
वेरूळला कैलास लेण्यांशिवायही खुप सुंदर शिल्पे आहेत. पर्यटक तिकडे फिरकत नाहीत. इतर लेण्यांसाठी म्हणून खास वेरूळला भेट द्या. कैलास तर जागतिक चमत्कार आहेच. पण इतरही ठिकाणं पाहिली पाहिजेत.
कोरोना आपत्तीत दीर्घ काळ बंद ठेवलेल्या वेरूळच्या लेण्या १० डिसेंबरला खुल्या करण्यात आल्या. पहिल्याच दिवशी अगदी पहाटे जावून
Akash Dhumne
आणि
Vincent Pasmo
या मित्रांनी वेरूळचा दौरा केला. लेणी खुली होईल तेंव्हा पर्यटक म्हणून पहिलं पाउल आपलं असावं असा आग्रह व्हिन्सेंट या फ्रेंच मित्राचा होता. त्याच्या औरंगाबाद प्रेमाला सलाम. हे छायाचित्र आकाशने घेतले आहे.



गुढ शिल्पे (गोकुळेश्वर, चारठाणा)
काही मंदिरांवर तंत्रमार्गी, अघोरपंथी, शाक्तपंथी अशी शिल्पे कोरलेली आढळून येतात. त्यांचा अर्थ त्या संप्रदायातील एखाद्या कृतीशी निगडीत असतो. पण सामान्य दर्शकाला मात्र कळत नाही.
हे शिल्प चारठाणा (ता. जिंतूर जि. परभणी) येथील गोकूळेश्वर मंदिराच्या मुखमंडपाच्या स्तंभावरील आहे. यात एकुण पाच मानवी आकृती दिसून येतात. पण पाय मात्र ८ आहेत. दोन्ही टोकाच्या दोन स्त्रीया आहेत. अगदी मधला पुरूष आहे. पण त्या बाजूचे दोन कोण हे चटकन कळत नाहीत. कारण त्यांचे केस स्त्रीयांसारखे मागे बांधलेले आहेत. पण छाती सपाट दाखवली असल्याने त्यांना स्त्री संबोधता येत नाही.
मधल्यांनी बाजूच्यांच्या डोक्यावर हात ठेवले आहेत. शिवाय सर्वात मधल्याचे वाटणारे दोन्ही हात बाजूच्या स्त्रीयांच्या हातात आहेत. हेच हात मधल्या पुरूषांचेही भासतात. पायासोबतच हाताचीही संख्या आठच आहे.
यातील टोकाच्या स्त्रीया स्वतंत्र आहेत. मधले तीनही एकमेकात अडकलेले आहेत. एक तर्क असा मांडता येतो. पुरूषाच्या उजव्या बाजूस त्याची शक्ती असते आणि डाव्या बाजूस पत्नी (वामांगी). बहूतेक देवतांच्या बाबत हे शिल्पांकित केलेले आढळून येते. येथे सामान्य पुरूषाच्या बाबतीतही हे सुचित केले असावे. आणि आज कार्टून काढताना जशी चलचित्र (animation) काढली जातात तसे उजवीकडचे चित्र पहिले, दूसरे चित्र दोन्ही स्त्रीयांचे हात हाती घेतलेले. आणि तिसरे मग पूर्णत: डावीकडच्या स्त्रीच्या डोक्यावर हात ठेवला असे. मधला पुरूष एकच असावा. फक्त तीन अवस्थांत दाखवला आहे. याला एक गती आहे. ही नृत्यातीलही एक गतीमान अशी मुद्रा असू शकते. कारण डाव्या बाजूच्या स्त्रीच्या हातात टिपरी सारखे काही दिसत आहे.
याचा तंत्रमार्गातही काही वेगळा अर्थ असू शकेल. केसांची आणि पायांची रचना यातून पुरूषांत स्त्रीचा अंश आहे असेही सुचवायचे असावे.
Laxmikant Sonwatkar
तूमच्या सारख्या अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकावा. Dr-Arvind Sontakke हे तूम्हा अभ्यासकांना आव्हान ठरणारे विषय आहेत.

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

 मूर्ती मालिका -१९



सुखासनातील केवल शिव
औंढा येथील नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर अभ्यासक भक्त शिल्पशास्त्राचे विद्यार्थी सर्वांसाठीच आकर्षणाचे ठिकाण आहे. या मंदिरावर विविध मूर्ती आहेत. त्यांचे आव्हान अभ्यासकांना नेहमीच राहिलेले आहे.
सुखासनात बसलेली ही मूर्ती. वरच्या हातात त्रिशुळ आणि सर्प आहे. या सर्पाचा फणा उगारलेला नसून खाली झुकलेला शांत असा दाखवला आहे. खालचे दोन्ही हात वरद मुद्रेत आहे. डाव्या खालच्या हातात काय आहे लक्षात येत नाही पण अगदी याच मूद्रेतील इतर एका ठिकाणी याचे वर्णन शक्ती असे देगलुरकरांनी केले आहे. अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकावा. तसेच त्रिशुळाच्या जागी खट्वांग आहे अशाही सुखासनातील मूर्ती आहेत.
खाली बसलेला नंदीही मान खाली घालून शांत बसलेला आहे. शिवाच्या चेहर्यावरील भाव शांत आहेत. उजव्या पायाचा दूमडलेल्या पंजा शिल्पकाराने मोठा कलात्मक असा कोरलेला दिसून येतो. लांब कर्णभुषणे लक्ष वेधून घेतात. गळ्यात कमरेला पायात अगदी मोजकेच पण रेखीव अलंकार आहेत. एरवी शिवाचे अलंकार नागबंधादी किंवा उग्र असे दर्शवलेले असतात.
हे बारकावे पाहिल्यावर हे शिल्पकार कुणी साधे पाथरवट नसून अभ्यासु साधना करणारे प्रतिभावंत असल्याची खुण पटते.
पुरूष देहाचे सौंदर्य वर्णन करताना कमरेचे वर्णन "सिंहकटी" असे केलेले असते. या वर्णनात वरील मूर्ती बरोबर बसते. शिवाची कटी तशीच दाखवली आहे.
औंढा नागनाथाला भेट देणार्यांना विनंती आहे कृपया घाईघाईने दर्शन आटोपून निघून जावू नका. अप्रतिम असा शिल्प खजिना मंदिरावर आहे. कोरणार्यांनी आपले आयुष्य पणाला लावले. तूम्ही डोळे भरून किमान पहा तरी.

छायाचित्र सौजन्य

Travel Baba Voyage

 


विष्णुची शक्तीरूपे

अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) मंदिरावरील विष्णुची शक्ती रूपातील शिल्पे भारतीय मूर्तीशास्त्राला मोठे योगदान आहे असे अभ्यासक मानतात. हातातील आयुधे शंख चक्र गदा आणि पद्म यांचा जो क्रम आहे त्यानुसार विष्णुची २४ नावं आहेत. या २४ नावांसाठी २४ शक्ती आहेत. यातील उजव्या बाजूने म्हणजेच प्रदक्षिणा क्रमाने गदा, शंख, चक्र आणि डाव्या खालच्या हातात पद्म अशा विष्णुला वासुदेव संबोधले जाते. या छायाचित्रात याच क्रमाने आयुधे धारण केलेली जी स्त्री प्रतिमा आहे तीला लक्ष्मी असे संबोधले जाते (देवता म्हणून असलेली लक्ष्मी मूर्ती वेगळी). या मूर्तीचे शास्त्रा प्रमाणे केलेले विश्लेषण वेगळे. पण एक ललित कलाकृती म्हणूनही ही लोभस वाटते. उजवा हात ज्या पद्धतीने गदेवर टेकवला आहे, त्याचे लालित्य आणि गदेच्या सरळपणावर तोललेला सर्व शरिराचा भार, दूमडलेला उजवा पाय आणि रोवलेला तिरका डावा पाय, कमरेपासूनचे वरचे सर्व शरिर ९० अंशात फिरवून समोर आणले आहे जेंव्हा की पायाची दिशा वेगळी आहे. गदेच्या वरच्या टोकावर टेकवलेला पंजा हाच संपूर्ण शिल्पाचा तोल सांभाळणारा मध्यबिंदू जाणवतो.
अन्वा मंदिरावर २४ पैकी १७ शक्ती रूप शिल्पे आजही शाबूत आहेत. त्यांचे शिल्पांकन शास्त्रा सोबतच शिल्प सौंदर्य म्हणूनही थक्क करणारे आहे.



शेषशायी विष्णु आणि समुद्रमंथन
ज्याठिकाणी बारवा, कुंड, पुष्करणी आहेत अशा जागी शेषशायी विष्णुचे शिल्प कोरलेले आढळून येते. हे शिल्प सहसा मंदिरावर नसते. मराठवाड्यातील प्राचीन बारवांमध्ये अशी शिल्पे आढळून आलेली आहेत. यातही हे शिल्प अजून वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण या ठिकाणी समुद्रमंथनाचा देखावा शिल्पांकित केला आहे. गोसावी पिंपळगांव (ता. सेलु, जि. परभणी) येथील दूर्लक्षीत असे प्राचीन मंदिर, तेथील बारव या परिसरांत आमचे भटके पुरातत्व प्रेमी मित्र मल्हारीकांत देशमुख यांना हे शिल्प आढळून आले. शेषशायी शिल्पांवर दशावतार कोरलेले असतात, अष्टदिक्पालांच्या प्रतिमा असतात. पण इथे समुद्र मंथनाचा प्रसंग कोरलेला आहे.
देव आपल्या उजव्या बाजूला आहेत. त्यांच्या बाजूला वासुकीच्या शेपटाचा भाग आहे. दानव डाव्या बाजूला आहेत त्या बाजूला नेमका नागाचा फणा दाखवला आहे. जेणेकरून विषाची बाधा दानवांना व्हावी.
विष्णुचे पाय चुरणारी लक्ष्मी दिसत नाही. तो भाग भंगला आहे. बाकी शंख, चक्र, गदा ही आयुधं स्पष्टपणे ओळखु येतात.
असा शिल्पखजिना गावोगाव विखुरला आहे. गोसावी पिंपळगाव हे अडवळणाचे गाव. गावकर्यांनी मंदिर परिसर चांगला जपला आहे. अभ्यासकांनी अशा शिल्पांचा सविस्तर अभ्यास करून त्यांना प्रकाशात आणले पाहिजे. यातील शास्त्रीय बारकावे समोर आले पाहिजेत. ही विखुरलेली शिल्पे जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र आणून त्यांचे संग्रहालय झाले पाहिजे.
परभणी जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील अभ्यासक, पुरातत्व प्रेमी, सामाजीक कार्यकर्ते यांची एक समिती नेमून या कामाला गती दिली आहे. त्यांचे मन:पूर्वक
अभिनंदन
. इतरही जिल्ह्यात असा पुढाकार जिल्हाधिकार्यांनी घ्यावा. त्याला सर्व इतिहास प्रेमींनी सहकार्य करावे ही अपेक्षा. (परभणी जिल्ह्याच्या समितीत मी स्वत: आहे. परभणी जिल्ह्यातील प्राचीन शिल्पे मुर्तीं बाबत काही माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा. २८ डिसेंबरपासून समितीचा स्थळ पहाणीचा दौरा सुरू होतो आहे)
छायाचित्र सौजन्य
Malharikant Deshmukh
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.


 द्राक्ष सुंदरी

होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) मंदिरावरची सुरसुंदरींची शिल्पे मोठी आकर्षक सौष्ठवपूर्ण सौंदर्यपूर्ण अशी आहेत. चित्रातील सुरसुंदरीला नेमकं काय नाव आहे मला माहित नाही. तिच्या डाव्या हातात द्राक्षाचा घोस दिसतो आहे म्हणून मी तीला "द्राक्ष सुंदरी" असं नाव ठेवलं. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकावा.
हीच्या गळ्यातील दागिना जरा वेगळा दिसतो आहे. शिवाय जानव्या सारखी एक साखळी डाव्या खांद्यावरून दोन वक्षां मधून खाली कमरेकडे आली आहे. हा प्रकारही वेगळा वाटतोय. उजवा हात जो खाली सोडलेला आहे त्यावरचे एक कंकण खाली झुकलेलं आहे. केसांची रचना पण मोठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. पाठीमागे मानेखाली उतरलेला हा केसांचा शेपटा वेगळा आकार ल्यालेला आढळतो. किंवा तो पातळ कापडात गुंडाळलेला आहे की काय असे वाटते. डावा पाय हा जमिनीला टेकला नसून भिंतीला टेकवलेला दिसतो आहे. दोन पायांच्या मधून सोडलेला कटीवस्त्राचा शेव लयबद्ध असा डावीकडे वळलेला आहे. या सुंदरीचे स्तन अतिशय प्रमाणबद्ध दाखवलेले आहेत. उन्नत दाखवण्याच्या नादात काही शिल्पात एकुण शरिर रचनेचा तोलच बिघडतो.
ठाम सरळ रेषेतील उजवा पाय वगळता डावा पाय व दोन्ही हात यांची रचना लयबद्ध अशी मोहक केलेली आहे. चेहरा नेमका उजवे पाउल जिकडे आहे त्याच्या विरूद्ध वळलेला आहे. "जा तोसे नाही बोलू कन्हैय्या" असा भाव जाणवतो. पाउल तर तिकडे वळले आहे पण "आम्ही नाही जा" अशी स्त्री सुलभ भावना आहे.
छायाचित्र सौजन्य
Travel Baba Voyage



तोरण शिल्पाचा 3D नमुना
होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिरांचा विविध पैलूंनी बारीक विचार झाला पाहिजे. आता हे जे शिल्प आहे ते गर्भगृहाच्या द्वारशाखेवरील तोरणाचे आहे. समोरून पाहताना हातात माळा घेतलेले यश किन्नर दिसतात. त्यांच्या हातातील माळांची सुरेख अशी नक्षी बनलेली आढळून येते. या भागात सहसा अंधार असतो त्यामुळे संपूर्ण शिल्पाकडे लक्ष जात नाही. पण या तोरणावर प्रकाश टाकला आणि खालची बाजू बघितली तर आपण चकित होतो. हे शिल्प 3D आहे. आपल्याला दिसते ती छाती पासून वरची बाजू दर्शनी प्रतलात आहे. पण कमरेपासून खालची बाजू दूसर्या प्रतलात आहे. ९० अंशाचा कोन करून या मानवी आकृत्या वळवलेल्या आहेत. शिल्पकलेतील हे मोठं आव्हानात्मक काम आहे. अशाच पद्धतीने द्वारशाखेवर नृत्य करणारे स्त्री पुरूष दाखवलेले आहेत. म्हणजे शिल्पकलेत एकाच प्रतलाचा वापर न करता दोन दिशा दोन प्रतलात शिल्प कोरलेली आढळून येतात. हे केवळ सौंदर्यपूर्णच आहे असे नाही तर गणिताचा अभ्यास करून निर्माण झालं आहे.
प्राचीन मंदिरांबाबत अशा काही बाबी खरंच आचंबीत करतात. वास्तुशास्त्र, शिल्प सौंदर्य, विज्ञान, गणित असा अद्भुत संगम इथे पहायला मिळतो. दगडाची प्रतवारी शोधून मगच शिल्प कोरले जाते. दगडी चिर्यांची रचना नुसती सौंदर्यपूर्ण नसते तर त्यात शास्त्रही सांभाळलेले असते.
Travel Baba Voyage
अशा अवघड जागी वर चढून फोटो काढल्या बद्दल धन्यवाद मित्रा.



युद्ध शिल्पे
घोटण (ता. शेवगांव, जि. नगर) येथील मल्लिकार्जूनेश्वर मंदिरावर पशु पक्षांची वैशिष्ट्यपूर्ण शिल्पं असल्याचे याच मालिकेत पूर्वी लिहिलं होतं. याच मदिराच्या स्तंभांवर युद्ध आणि युद्ध सराव अशी काही शिल्पे आढळून आली. ही शिल्पे पण वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पहिल्या शिल्पात तलवार घेवून लढणारे दोन योद्धे दिसत आहेत. त्यांनी शिरस्त्राण घातलेले आहेत. प्रत्यक्ष युद्धापेक्षा हा युद्ध सराव असावा. दूसरे शिल्प कुस्तीचे आहे. खेळा सोबतच युद्धाची तयारी म्हणून प्रशिक्षणाचा भाग असावा.
तिसर्या शिल्पात हत्ती आणि घोडा आहे. हत्तीने सोंडेत एक माणूस पकडला आहे. समोरचा घोडा उधळलेला आहे. हत्तीवर माहूत नाही. प्रत्यक्ष युद्धातीलच एक क्षण शिल्पात फोटोसारखा पकडला आहे. चौथे आणि शेवटचे शिल्पही असेच गतीमान आहेत. यात दोन अश्वस्वार दिसत आहेत. दोघांच्याही हातात भाले दिसत आहेत. दोघांच्या मध्ये जमिनीवर एक योद्धा आहे. घोडे मागील दोन पायांवर आहेत. युद्धाचा जोर इथे दिसून येतो. वीररसात ही शिल्पे न्हावून निघाली आहेत.
छायाचित्र सौजन्य
Travel Baba Voyage
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575


व्याल मूर्ती

 February 9, 2021

मंदिरांच्या भीतीवर, स्तंभांवर, द्वारशाखांवर दिसणारा अक्राळ विक्राळ चेहऱ्याचा हा प्राणी म्हणजेच ‘व्याल‘ होय. यालाच वारालक, वराल, वीराल,व्रलीका, वरालीक, अशी नावे आहेत. दक्षिण भारतात ‘याली‘ तर ओरिसात याला “बीडाल” म्हणतात.
व्याल निर्मिती नेमकी कधीपासून चालू झाली यावर अभ्यासकांत दुमत आहे. मात्र व्याल ही संकल्पना सिथीयन किंवा ऍकमेनिडियन(इराणी) शिल्पकलेतून गांधार स्थापतींच्या माध्यमातून मौर्यकालखंडात भारतात आली असावी. गुप्तकाळात आणि नंतर मध्ययुगात व्यालाचा वापर वाढला होता. मूळ इराणी परंपरेतील व्यालाला असलेले पंख मात्र भारतीय शिल्पात दिसून येत नाहीत. सांची स्तूपावरील आणि जुनागढ(क्षत्रप काळ) संग्रहालयातील व्याल हे पंखयुक्त आहेत.

नंतरच्या होयसळ, चौल, पल्लव या सर्वच स्थापत्यकारांनी व्यालाचा पुरेपूर वापर केला. दहाव्या शतकातील ब्रह्मपुरीश्वर मंदिरात व्यालाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार बघायला मिळतो. या नंतरच्या विजयनगर स्थापत्यात व्याल मूर्ती सर्वाधिक वापरल्या गेल्या. कलात्मक दृष्ट्या खुजुराहो च्या व्यालमूर्ती डोळ्यात भरतात.
शिल्पशास्त्रातील अभ्यासक याला एक कल्पनाविलास मानतात, याच संकल्पनेतून विष्णूचा हायग्रीव, वराह अवतार, हत्तीची सोंड असलेला श्री गणेश, हनुमान, या देवता सुद्धा उत्क्रांत झालेल्या आहेत.
हीच पशु-मानव संकल्पना मूर्तिकारांनी मंदिरांच्या सुशोभिकरणासाठी वापरली आहे.
सुळे व जीभ बाहेर आलेली, आखूड कान, बटबटीत डोळे, उग्र अविर्भाव असे अर्ध मानव अर्ध प्राणी असलेले. माणसाचे धड त्यावर सिंहाचे शीर,सोबतच हत्ती, साप, वाघ, माकड, हरीण, कोंबडा, मोर अश्या अनेक प्राण्यांचे शरीरापासून बनलेले जवळपास विसपेक्षा जास्त प्रकारच्या व्यालमूर्ती श्री ढाके यांनी त्यांच्या प्रबंधात मांडल्या आहेत. वास्तुशिल्पात गजव्याल, अजव्याल, वृषव्याल, अश्वव्याल, सर्पव्याल, नरव्याल,सिंहव्याल, मेशव्याल,खरवव्याल, गंडकीव्याल, अशे अनेक प्रकारचे व्याल आपल्याला भारतात पाहायला मिळतात.
व्याल हे सहसा एकटे खोदले जात नाहीत, कधी ते हत्तीवर आरूढ झालेले, कधी हत्तीच्या पायाखाली चिरडले गेलेले, कधी आपल्या पाठीवर एखादी सुरसुंदरी वाहणारे, कधी झेप घेण्याच्या पवित्र्यात, कधी कोण्या योध्यासोबत युद्ध करताना, तर कधी द्वारशाखेत एकमेकांवर एक असे सलग व्याल खोदले जातात.

सोबत दिलेल्या छायाचित्रांमध्ये असेच काही व्याल मूर्ती दाखवलेले आहेत, पैकी तामिळनाडूच्या धारसुरम इथल्या मंदिरात स्तंभ तोलणारे व्याल किंवा याली हे विशेष असून, सिंहाचे शरीर, हत्तीची सोंड, शिंगे, गाईची शेपटी अस त्यांचं स्वरूप आहे.


सोळाव्या शतकानंतर मात्र मंदिरं स्थापत्यातील बाह्य नक्षीकाम मंदावले आणि आपसूकच व्यालमूर्ती सुद्धा मंदिर स्थापत्यातुन नाहीश्या झाल्या.

व्यलशाखा – भुलेश्वर मंदिर, यवत
व्याल – भुलेश्वर मंदिर, यवत
द्वारशाखेवरील व्यालशाखा – श्री गोदेश्वर मंदिर, सिन्नर, नाशिक
गजव्याल-सिंहव्याल, भुलेश्वर मंदिर, यवत
योध्याशी युद्ध करणारा व्याल
स्तंभ तोलणारे गजव्याल -ऐरावतेश्वर मंदिर, तमिळनाडू
हत्तीवर आरूढ व्याल – गोदेश्वर मंदिर, सिन्नर, नाशिक

महेश तानाजी देसाई

#भ्रमणगाथा

#fearless Explores

 https://bhatakbhavani4216.wordpress.com/2021/02/09/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80/


रहस्य महादेवाच्या पिंडीचे

 By पं.नरेंद्र धारणे (धर्म अभ्यासक)


भगवान महादेवाचे भक्त श्रावणाबरोबरच वर्षभर शिवपूजा करत असतात. पूजेसाठी पिंडी कशी असावी, पूजेत कोणते साहित्य वापरावे व कोणते वापरू नये याला आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. अनेक भक्तांना तर याविषयी काही माहीत नसते. आपण आज याबद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

देवघरातील पिंडी

-घरातील देवघरात महादेवाची पिंडी ठेवावी, मूर्ती नको.

-देवघरातील पिंडीवर नाग नसावा.

-पिंडी साधी दगडी असली तरी चालते, मात्र शक्यतो पितळेची असावी.

-देवघरातील पिंडी तीन इंचांपेक्षा मोठी असू नये, ती तीन इंचांपेक्षा छोटी असावी.

भगवान महादेव हे देवाधिदेव असून हे न्यायप्रिय दैवत आहे आणि त्यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत. जसे देव, दानव, यक्ष, किन्नर, भूत, प्रेत, पिशाच, आणि इतरही अनेक योनीजीव महादेवास भजतात. जेथे महादेवाची मूर्ती/चित्र असते तेथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात.

जोतिर्लिंगांच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत, तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्त अदृश्य रूपाने उपस्थित असतात, तथा उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थरूपाने वाहत असते, ते ओलांडून गेल्याचे पातक लागते.

महादेवाची मूर्ती फक्त स्मशानात असते, देवघरात महादेवाची मूर्ती नसावी. मानवाला पिंडीपूजन सांगितले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवाच्या मुख्य शक्तिपीठांवर महादेवाची पिंडी लिंगरूपाने स्थापन केलेली समजते.

बारा ज्योतिर्लिंगे ही लिंगे म्हणजेच पिंडीरूपाने आहेत, यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते. महादेवाला नित्य शुद्ध पाण्यासह रुद्रसूक्त पठण करीत जलाभिषेक करावा. महादेवाला जल अतिप्रिय आहे. एखाद्याने महादेवास जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात. महादेवाला मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जलरुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते.

गुरुचरित्रात म्हटले आहे, की नित्याच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य, आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो.

श्रीमद्‍भागवतात म्हटले आहे, की महादेवाची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रिया राहते आणि सर्व सुखसमृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते.

भगवान शंकराविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते. उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

खालील सात वस्तू भगवान शंकराला कधीही अर्पण करू नका. का? तर जाणून घ्या.

१. शंख ः शिवपुराणानुसार भगवान शंकराने शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता. तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्याची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते.

२. हळद-कुंकू ः भगवान शंकर आजन्म वैरागी होते. त्यामुळे शृंगाराशी संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते. त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकराला अर्पण केले जात नाही. या गोष्टी भगवान विष्णूला अर्पण केल्या जातात.

३. तुळशीपत्र ः असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती. भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता. त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता.

४. नारळपाणी ः नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून शुभकार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला

जातो. पण, भगवान शंकराला अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते.

५. उकळलेले दूध ः उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकराला अर्पण करू नये. त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते. त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे.

६. केवड्याचे फूल ः भगवान शिवाच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकराने शाप दिला होता.

७. कुंकू किंवा शेंदूर ः कुंकू किंवा शेंदुराचा वापरही भगवान शंकराची पूजा करण्यात वर्ज्य केला आहे.

।।ॐ नमः शिवाय।।

(लेखक ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

व्याल मूर्ती

 February 9, 2021

मंदिरांच्या भीतीवर, स्तंभांवर, द्वारशाखांवर दिसणारा अक्राळ विक्राळ चेहऱ्याचा हा प्राणी म्हणजेच ‘व्याल‘ होय. यालाच वारालक, वराल, वीराल,व्रलीका, वरालीक, अशी नावे आहेत. दक्षिण भारतात ‘याली‘ तर ओरिसात याला “बीडाल” म्हणतात.
व्याल निर्मिती नेमकी कधीपासून चालू झाली यावर अभ्यासकांत दुमत आहे. मात्र व्याल ही संकल्पना सिथीयन किंवा ऍकमेनिडियन(इराणी) शिल्पकलेतून गांधार स्थापतींच्या माध्यमातून मौर्यकालखंडात भारतात आली असावी. गुप्तकाळात आणि नंतर मध्ययुगात व्यालाचा वापर वाढला होता. मूळ इराणी परंपरेतील व्यालाला असलेले पंख मात्र भारतीय शिल्पात दिसून येत नाहीत. सांची स्तूपावरील आणि जुनागढ(क्षत्रप काळ) संग्रहालयातील व्याल हे पंखयुक्त आहेत.

नंतरच्या होयसळ, चौल, पल्लव या सर्वच स्थापत्यकारांनी व्यालाचा पुरेपूर वापर केला. दहाव्या शतकातील ब्रह्मपुरीश्वर मंदिरात व्यालाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार बघायला मिळतो. या नंतरच्या विजयनगर स्थापत्यात व्याल मूर्ती सर्वाधिक वापरल्या गेल्या. कलात्मक दृष्ट्या खुजुराहो च्या व्यालमूर्ती डोळ्यात भरतात.
शिल्पशास्त्रातील अभ्यासक याला एक कल्पनाविलास मानतात, याच संकल्पनेतून विष्णूचा हायग्रीव, वराह अवतार, हत्तीची सोंड असलेला श्री गणेश, हनुमान, या देवता सुद्धा उत्क्रांत झालेल्या आहेत.
हीच पशु-मानव संकल्पना मूर्तिकारांनी मंदिरांच्या सुशोभिकरणासाठी वापरली आहे.
सुळे व जीभ बाहेर आलेली, आखूड कान, बटबटीत डोळे, उग्र अविर्भाव असे अर्ध मानव अर्ध प्राणी असलेले. माणसाचे धड त्यावर सिंहाचे शीर,सोबतच हत्ती, साप, वाघ, माकड, हरीण, कोंबडा, मोर अश्या अनेक प्राण्यांचे शरीरापासून बनलेले जवळपास विसपेक्षा जास्त प्रकारच्या व्यालमूर्ती श्री ढाके यांनी त्यांच्या प्रबंधात मांडल्या आहेत. वास्तुशिल्पात गजव्याल, अजव्याल, वृषव्याल, अश्वव्याल, सर्पव्याल, नरव्याल,सिंहव्याल, मेशव्याल,खरवव्याल, गंडकीव्याल, अशे अनेक प्रकारचे व्याल आपल्याला भारतात पाहायला मिळतात.
व्याल हे सहसा एकटे खोदले जात नाहीत, कधी ते हत्तीवर आरूढ झालेले, कधी हत्तीच्या पायाखाली चिरडले गेलेले, कधी आपल्या पाठीवर एखादी सुरसुंदरी वाहणारे, कधी झेप घेण्याच्या पवित्र्यात, कधी कोण्या योध्यासोबत युद्ध करताना, तर कधी द्वारशाखेत एकमेकांवर एक असे सलग व्याल खोदले जातात.

सोबत दिलेल्या छायाचित्रांमध्ये असेच काही व्याल मूर्ती दाखवलेले आहेत, पैकी तामिळनाडूच्या धारसुरम इथल्या मंदिरात स्तंभ तोलणारे व्याल किंवा याली हे विशेष असून, सिंहाचे शरीर, हत्तीची सोंड, शिंगे, गाईची शेपटी अस त्यांचं स्वरूप आहे.


सोळाव्या शतकानंतर मात्र मंदिरं स्थापत्यातील बाह्य नक्षीकाम मंदावले आणि आपसूकच व्यालमूर्ती सुद्धा मंदिर स्थापत्यातुन नाहीश्या झाल्या.

व्यलशाखा – भुलेश्वर मंदिर, यवत
व्याल – भुलेश्वर मंदिर, यवत
द्वारशाखेवरील व्यालशाखा – श्री गोदेश्वर मंदिर, सिन्नर, नाशिक
गजव्याल-सिंहव्याल, भुलेश्वर मंदिर, यवत
योध्याशी युद्ध करणारा व्याल
स्तंभ तोलणारे गजव्याल -ऐरावतेश्वर मंदिर, तमिळनाडू
हत्तीवर आरूढ व्याल – गोदेश्वर मंदिर, सिन्नर, नाशिक

महेश तानाजी देसाई

#भ्रमणगाथा

#fearless Explores

 https://bhatakbhavani4216.wordpress.com/2021/02/09/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80/

किर्तीमुख

अनेक मंदिरांच्या प्रवेशव्दारापाशी एक राक्षसाच्या मुखासारख एक शिल्प कोरलेले दिसते.मुख्यत: शिवाच्या मंदिरात गर्भगृहाच्या उंबरठ्यावर. या शिल्पाच नाव आहे "किर्तीमुख". ही किर्तीमुख मंदिराच्या प्रवेशव्दारापाशी ठेवण्या मागची सुध्दा एक पौराणिक कथा आहे.. जालंधर नावाचा एक राक्षस होतो. त्याला प्रचंड भुक लागायची.कितीही खाल्ले तरी त्याची भुक कधी शमायची नाही. तो महादेवाचा भक्त होता त्याने घोर तपश्चर्या केली. कालांतराने महादेव त्याला प्रसन्न झाले.महादेवाने त्याला वर मागण्याची आज्ञा दिली. तेंव्हा प्रचंड भूकेची जाणीव झालेल्या त्या असूराने भुकेपासून मुक्ती मिळावी हि प्रार्थना केली. महादेवाने त्याला स्वत:च शरीर पायापासून खायला सांगितले,त्या असुराने तसे केलं, तरीही त्याची भूक भागली नाही. त्यावर उपाय म्हणून शंकराने त्याला सांगितले, की तू माझ्या दारात येऊन बस आणि येणार्‍या जाणार्‍या सर्व भाविकांची पाप खा. तुला ती कधीच कमी पडणार नाही. तेव्हा पासून या किर्तीमुखाच शिल्प शिवमंदिराच्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली. अनेक मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी ही किर्तीमुख आहेत.

अनेक ठिकाणी लहान लहान किर्तीमुखांतून फुलाच्या माळांची तोरण विणलेली दाखेवलेली आहेत.मंदिरांवर किर्तीमुखाची विविध स्वरुपातील शिल्पे आढळतात. खिद्रापुरच्या कोपेश्वर मंदिरावर जवळजवळ सोळा प्रकारात सादर केलेली किर्तीमुख त्यातील कलाकुसर यास तोड नाही. या प्रत्येक किर्तीमुखाची ठेवण वेगळी आहे. नक्षीकाम करणार्‍याने शिवापार्वतीलाही किर्तीमुखात बद्ध केलेले आहे. अनेक ठिकाणी किर्तीमुखातील नक्षीकामातून मोर आणि हंस साकारलेले दिसतात, याशिवाय फळफुले सुध्दा बहरलेली दिसतात. काही ठिकाणी व्याघ्र ही साकारलेले दिसतात. वानर सुद्धा किर्तीमुखाच्या शिल्पात दाखवितात. काही मंदिरात सभामंडपातही खांबांवर किर्तीमुख कोरलेली आहेत. कालांतराने या कथेचे पौराणिक संदर्भ पुसट झाले व किर्तीमुख हे डेकोरेटिव्ह मोटिफ म्हणुन मंदिर स्थापत्यामध्ये वापरले जाऊ लागले.


 https://quoramarathivipsessions.quora.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%86%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87
 
 श्री गणेशाच्या consort किंवा पत्नी संबंधी विविध प्रांतात अनेक परंपरा आहे. त्याच्या चार ठळक परंपरा खालील प्रमाणे आहेत:

1. ब्रह्मचारी गणेश:

एकामध्ये गणपती हा ब्रह्मचारी ब्रह्मचारी मानला जातो व त्याला रूढार्थाने पत्नी नाही.

2. दुसरी परंपरा- गणेश व रिद्धी सिद्धी

बहुतांशी देवांना साधारण एक पत्नी आणि एक व अधिक शक्ती कल्पिले गेल्या आहेत. ब्रह्मदेवाने तीन वर किंवा मूल्ये म्हणून रिद्धी, सिद्धी व बुद्धी गणपतीला प्रदान केल्या आहेत असे मानले जाते. त्यांनाच स्त्री स्वरूपात कल्पून गणेशाच्या बाजूला आपल्याला रिद्धी व सिद्धी यांचे अंकन दिसते. असे अंकन पेशवे काळापासून पुढे सामान्यतः सापडते पण त्याचे काही पूर्व मध्ययुगीन अंकन औंढा, हिंगोली येथील नागनाथ ज्योतिलिंग मंदिरावर ही आढळून येते. अनेक ठिकाणी त्यानं पत्नी मानत नसल्यामुळे त्यांना गणेशाच्या दोन्ही बाजूस उभे दाखवण्याची पद्धत आहे.

# रिद्धीसिद्धी समावेत गणेश- नागनाथ मंदिर, औंढा, हिंगोली, महाराष्ट्र 12वे शतक

3. तिसरी परंपरा -शक्ती गणेश

# शक्ती गणेश- मध्यप्रदेश- बारावे शतक- खाजगी संग्रह

साधारण सहाव्या शतकापासून भारतात गणेशाच्या विविध शक्तींसोबत मूर्ती आढळतात. त्यात स्रीरूपी शक्ती, गणेशाच्या मांडीवर किंवा बाजूला बसलेल्या दाखवल्या असून गणेशाची सोंड त्यांच्या हनुवटीला किंवा गुप्तांगाना स्पर्श करताना धकावलेली असते. तंत्रमार्गातील अश्या गणेशमूर्तींना "शक्ती गणेश" किंवा "उच्छिष्ट गणेश"असे म्हणतात.

नारद पुराणात "उच्छिष्ट गणपती उपासना" दिलेली आहे ज्यात विविध गणेश व त्यांच्या शक्तींची नांवे उद्धृत केली आहेत. तसेच, ब्रह्मांड पुराण व शारदातीलक या ग्रंथांमध्येही गणेश व शक्तींची नावे आढळतात.

4. चौथी परंपरा- शारदा गणेश:

गणेशाचे शारदा म्हणजेच सरस्वती व लक्ष्मीबरोबर अंकन दाखवण्याची परंपरा संपूर्ण सांसारिक सुखाशी निगडित आहे. महाराष्ट्रात याचे सर्वात जुने अंकन हे पन्हाळेकाजी येथील नाथपंथी लेण्यांमध्ये पाहायला मिळते. क्वचित प्रसंगी, आधुनिक काळातील मूर्तींमध्ये बुद्धीच्या जागी सरस्वतीला आणि रिद्धीच्या जागी लक्ष्मीला कल्पून अंकन केलेले आढळते.

बुद्धीच्या देवता हे समान कार्यक्षेत्र असल्यामुळे म्हणून अनेकदा गणपती व शारदेला एकत्र दाखवण्याची पद्धत आहे. अश्या मूर्तींमध्ये शारदा की गणेशाची पत्नी असावी, अशी कल्पना केलेली आढळते. पण,अश्या मूर्तींना कुठलाही मूर्तीशास्त्रीय आधार नाही. भक्तांच्या कल्पना शक्तीचा तो आविष्कार समजावा लागेल.

# 19व्या शतकातील कंपनी शैलीतील पेन्सिल स्केच

उदा. पुण्याच्या मंडई येथील शारदा गणेश ही मूर्ती 127 वषे जुनी असून तिच्या वेगळेपणामुळे भरपूर लोकप्रिय आहे.

महात्मा फुले मंडई (पूर्वीचे रे मार्केट) येथे नथुराम डोंगरे पैलवान म्हणू प्रसिद्ध होते. तुळजापूरची तुळजाभवानी ह्या त्यांच्या कुलदेवतेला त्यांनी संतती होण्यासाठी नवस केला व संतती झाल्यावर पूर्ण केला. त्या मंदिरावरील शारदा गणेशाची मूर्ती त्यांनी पहिली होती. आख्यायिका सांगते की देवी तुळजाभवानी, डोंगरे यांच्या स्वप्नात येऊन यांना शारदा गणेशाची मूर्ती निर्माण करून तिची पूजा करावयास सांगून गेली. त्याप्रमाणे त्यांनी ही वेगळी शारदा गणेशाची मूर्ती, नाईक कुंभार यांना घडवायला सांगितली. ही कागदी लगद्यापासून केलेली मूर्ती घडवताना सांगलीचे संस्थानिक, पटवर्धन यांचे मार्गदर्शन लाभले.

 

नवदुर्गा - प्रतिमा शास्त्रीय लक्षण

ओळख मूर्तीशास्त्राची

पट्टदकल येथील मंदिराच्या गर्भगृहात असलेली महिषासुर मर्दिनी 

कलेच्या क्षेत्रात दुर्गा देवीच्या मूर्तीची निर्मिती कधी पासून प्रारंभ झाली हे निश्चित सांगता येत नसले तरी साधारणतः शुंग कालपासून पाषाण निर्मित दुर्गा देवी पहावयास मिळते. असे काही अभ्यासक मानतात. कारण या पाषाण शिल्पात सिंह ही काही ठिकाणी कोरलेला आढळून आला आहे. गुप्त काळात दुर्गा देवीची अशी अनेक शिल्प आहेत. ज्या मध्ये स्कंद कार्तिकेय देवीच्या मांडीवर बसलेला कोरलेला आहे. गुप्त काळानंतर सिंह वहिनी दुर्गा प्रतिमा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या दिसतात. देवी महात्म्य, मत्स्यपुराण, रूपमंडन या ग्रंथात देवीस कात्यायनी म्हटलेले आहे. 

निरनिराळी रूपें घेऊन आदिशक्तीने चण्ड, मुण्ड, शुंभ, निशुंभ, वगैरे राक्षसाचा संहार केला. त्यात महिषासुरांचा संहार करणारी जी देवी तिला दुर्गा असें म्हणतात. रंभ नावाच्या असुराला महिषीपासून अग्नीच्या प्रसादाने झालेला मुलगा महिषासुर याने ब्रह्मदेवाची आराधना केली. त्याच्या इच्छेप्रमाणें त्याला अमरत्व तर मिळाले नाही पण एवढी सूट मिळाली की, त्याचे मरण स्त्री शिवाय दुसऱ्याच्या हातून होणार नाही. स्त्री ही अबला असल्यामुळे आपणास कोणतीही भीती असणार नाही, असे समजून महिषाने पराक्रम गाजविण्यास सुरवात केली आणि देवांना सगळी- कडून हुसकवून लावले. इंद्र, अग्नी, वायू, चंद्रमा, यम, वरून इत्यादी देवतांचे अधिकार स्वतः उपभोगू लागला. स्वर्गावर नियंत्रण प्रस्थापित केले. ब्रम्हा, विष्णु व शंकराच्या नेतृत्वाखाली सर्व देवांनी आपापल्या सम्मिलित तेजाने एक स्त्री उत्पन्न केली. (शिव तेजाने देवीचे मुख, यमाच्या तेजाने केश, विष्णूच्या तेजाने भुजा, चंद्रमाच्या तेजाने वक्ष:स्थल, इंद्राच्या तेजाने कटीप्रदेश, वरूनाच्या तेजाने जंघा आणि मांड्या, पृथ्वीच्या तेजाने नितंब निर्माण झाले. अशाच प्रकारे ब्रम्हाच्या तेजाने चरण तथा सूर्याच्या तेजाने पायाची बोटे, कुबेराच्या तेजाने नासिका, प्रजापतीच्या तेजाने दात, अग्नीच्या तेजाने तीन नेत्र, संध्याच्या तेजाने बाहू तथा वायूच्या तेजाने कान निर्माण झाले. अशा प्रकारे प्रसन्न देवतांनी आपले आयुधे देवीस दिले.) हीच महाशक्ति होय. हिचेच निरनिराळ्या रूपाने वर्णन मिळते. याच देवीने पुढे महिषासुराचा वध केला व पुनश्च दैवी संपत्ति आणि समृद्धीची स्थापना केली. तिचे वाहन अर्थात् सिंह हा तिला हिमालयाकडून मिळाला होता. त्याचप्रमाणें निरनिराळी आयुधें ही वेगवेगळ्या देवांकडून मिळाली. आज देशांत साधारणपणे ज्या दुर्गेची आराधना चालू आहे ती महिषासुरमर्दिनी दुर्गा होय. तिचे बाहू, आयुधे, रूप वगैरेचा विस्तार फार मोठा आहे. पण ढोबळमानाने नवदुर्गा म्हणून हिची नऊ रूपें - शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चित्रघंटा, कूष्माण्डा, स्कन्दमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदा प्रसिद्ध आहेत. ही नांवे काशीकडे आहेत. इतरत्र नावात भिन्नता आहे. देवीच्या या रुपास विशेष रूप किंवा विशेष अवतार असे म्हणता येईल. देवीचे रूप हे शक्ती समुच्चयाचे प्रतीक असल्याने कदाचित याच मुळे सर्वाधिक दुर्गा देवीच्या मूर्ती निर्माण केल्या असाव्यात.

शिव-शक्ती दुर्गा (दुर्गा-वैरोचनी) चा सर्वात प्राचीन संदर्भ तैत्तिरीय अरण्यकमध्ये उपलब्ध आहे. येथे रुद्राचे वर्णन दुर्गा वैरोचनी असे केले आहे, जे त्याच्या पत्नी अंबिकेच्या अनेक नावांपैकी एक आहे. बौधायन गृह्य सूत्रात दुर्गेच्या उपासनेच्या पद्धतीचे वर्णन केले आहे, परंतु पौराणिक कालखंडात आढळणारे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आजपर्यंत समोर आले नव्हते. उदाहरणार्थ, या काळात दुर्गेशी संबंधित सिंहाची कल्पना अजून आली नव्हती. गृह्यसूत्रांच्या काळापर्यंत सिंहाच्या उग्र आणि सौम्य स्वरूपाची कल्पना जन्माला आली होती. महाभारतातील दुर्गास्तोत्रानेही याची पुष्टी केली आहे.

पौराणिक कालखंडात दुर्गेच्या अनेक पैलूंची तपशीलवार कल्पना केलेली दिसते. मार्कंडेय पुराणातील देवीमाहात्म्यामध्ये संध्या, सरस्वती, चंडिका, गौरी, महालक्ष्मी, ललिता इत्यादी दुर्गेची अनेक नावे काल्पनिक वयाच्या आधारे देण्यात आली आहेत. एक वर्षाची मुलगी संध्या, दोन वर्षांची सरस्वती, सात वर्षांची चंडिका, आठ वर्षांची शांभवी, नऊवर्षाची दुर्गा, दहा वर्षांची गौरी, तेरा वर्षांची महालक्ष्मी आणि सोळा वर्षांची ललिता अशी त्यांची नावे आहेत. 

दुर्गेस गृह्यसूत्रांमध्ये एक महत्त्वाची देवी म्हणून वर्णन केले आहे आणि महाभारतातील सर्वोच्च अस्तित्व म्हणून स्वीकारले गेले आहे. पुराण आणि आगम साहित्यात नऊ प्रकारच्या दुर्गा (नवदुर्गा) सांगितल्या आहेत. या नवदुर्गा मूर्तींची नावे मार्कंडेयपुराण, अग्निपुराण, गरुडपुराण आणि आगमामध्येही उपलब्ध आहेत. पुराण आणि आगमाच्या वरील वर्णनांप्रमाणेच, इतर वास्तुशास्त्रातही दुर्गा (नवदुर्गा) च्या नऊ मूर्तींचे वर्णन केले आहे, परंतु वरील शास्त्रांच्या नवदुर्गा-सूचीचे कोणत्याही सूचीशी पूर्ण साम्य नाही, फक्त क्षेमंकरी आणि हरसिद्धी हे दोन नाव आगमाच्या यादीतून घेतलेले दिसतात. अपराजितपृच्छ आणि देवतामूर्तीप्रकरणात दुर्गेच्या सर्व नऊ मूर्तींचे वर्णन आहे आणि रूपमंडनमध्ये फक्त तीन मूर्तींचा उल्लेख आहे. अपराजितपृच्छात नमूद केलेल्या नव दुर्गा मूर्ती म्हणजे महालक्ष्मी, नंदा, क्षेमंकरी, शिवदुती, महारंडा, भ्रमरी, सर्वमंगला, रेवती आणि हरसिद्धी. देवमूर्तीप्रकरणातही याच दुर्गेच्या मूर्तींचे वर्णन आहे, फक्त दोन नावांमध्ये काही बदल झाले आहेत. येथे शिवदूतीला सर्वती आणि भ्रमरीला भ्रमणी असे म्हणतात. रूपमंडनमध्ये महालक्ष्मी, क्षेमांकरी आणि हरसिद्धी या तीन दुर्गा मूर्तींचा उल्लेख आहे. अपराजितपृच्छ आणि रूपमंडनमध्ये या दुर्गा मूर्तींचे वाहन सिंह असे वर्णन केले आहे. इतर प्राचीन धर्मग्रंथांपैकी अग्निपुराण आणि गरुडपुराणातही दुर्गेच्या सिंह वाहनाचे वर्णन आढळते. उल्लेख केलेल्या सर्व दुर्गा मूर्ती चतुर्भुज आहेत. त्यांचे वेगवेगळे तपशील पुढीलप्रमाणे आहेत.

मार्कंडेयपुराणामध्ये वर्णन केलेल्या नवदुर्गा मूर्ती शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता कात्यायनी, कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री अशा सांगितल्या आहेत. तर अग्निपुराण नुसार रूद्रचंडा, प्रचंडा, चंडोग्रा, चंडनायिका, चंडा, चंडवती, चंडरुपा, अतीचंडा आणि उग्रचंडा ही नावे येतात तर आगम ग्रंथानुसार नीलकंठी, क्षेमंकरी, हरसिद्धी, रुद्राक्षदुर्गा, वनदुर्गा, अग्निदुर्गा, जयदुर्गा, विद्यावासिनी आणि रिपुमर्दिनीदुर्गा सांगितले आहे. तसेच अपराजितपृच्छा नुसार महालक्ष्मी, नंदा, क्षेमंकरी, शिवदुती, महारंडा, भ्रमरी, सर्वमंगला, रेवती आणि हरसिद्धी असे वर्णन उपलब्ध होते. दुर्गा सप्तशतीमध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मंडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नवदुर्गांचा उल्लेख आहे.

प्रतिमा शास्त्रानुसार देवीच्या हातांच्या संख्येचे पुढील प्रमाणे वर्णन करण्यात आले आहे. 

महालक्ष्मी, नंदा, क्षेमंकरी, शिवदुती, महाचंडा, भ्रमरी सर्वमंगला, रेवती, हरसिद्धी या चतुर्भुज तर कात्यायनी दशभुजा, भद्रकाली अष्टादशभुजा (१८), दुर्गा षोडशभुजा किंवा अष्टादशभुजा (१६/१८), चामुंडा चतुर्भुज किंवा अष्टभुजा (४/८) असाव्यात. 

देवी शिल्पात विविध भुजाधारिनी कोरलेली पहावयास मिळते. देवीच्या मूर्तीतील वरील हातात कधी कधी एखादी दोर किंवा साप सदृश्य वस्तू दाखविण्यात येते. त्यास काही अभ्यासक केसांच्या जटा किंवा केसात माळण्यासाठी असलेली माला संबोधतात. परंतु वामन पुराणानुसार, 'रुरू नावांच्या असुराने कालीवर आक्रमण केले. तिने आपल्या खट्वांगाने त्याला मारले व असुराचे कानापासून पायापर्यंतचे कातडे काढून त्याने आपल्या जटा बांधल्या. एक अवखळ जटा बांधली जात नाही असे पाहून तिने तिला उपटून जमिनीवर रागाने आपटले. भूमिवर पडलेल्या त्या जटेपासून चण्डमारीची उत्पत्ति झाली.' अशी कथा येते. याच कथेवर आधारित एक मूर्ती बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील धर्मापुरी येथील केदारेश्वर मंदिरावरील बाह्यांगवर पहायला मिळते. (प्रस्तुत मूर्ती आमच्या मूर्ती शास्त्र अभ्यास सहलीत अनेक चर्चेअंती काली असल्याचे शिक्का मोर्तब झाले. परंतु दैत्य कोण हे लक्षात येत नव्हते. बऱ्याच ग्रंथात धुंडोळा घेतल्या नंतर मी आणि श्री लक्ष्मीकांत सोनवटकरांनी ही रुरू या दैत्याला मारणारी वामन पुराणातील काली असल्याचे मराठवाडा इतिहास परिषदेत सिध्द केले.)


 नवदुर्गा हिचे मूर्ती शास्त्रीय लांच्छने या अनुषंगाने आपण देविरुप पुढील प्रमाणे पहाणार आहोत.

धार्मिक ग्रंथानुसार आजचे रुप क्षेमंकरी असले तरी प्रतिमा लक्षणानुसार पहिले रूप हे महालक्ष्मी आहे. (अपराजितपृच्छ, रूपमंडन, देवतामूर्तीप्रकरण) 

महालक्ष्मी - 

या दुर्गेच्या मूर्तीचे वर्णन तिन्ही शास्त्रांमध्ये आहे. या शास्त्रानुसार महालक्ष्मीच्या निळ्या गळ्यात नाग धारण केलेला असावा आणि तिचा एक हात वरद मुद्रेमध्ये आणि उरलेले तीन हात त्रिशूल, खेटक आणि पानपात्र सोबत असावेत. शिल्पकलेतील दुर्गेच्या महालक्ष्मी-स्वरूपाचे चित्रण दुर्मिळ आहे. वर सांगितलेली शास्त्रवर्णनाशी तंतोतंत जुळणारे महालक्ष्मीचे एकमेव शिल्प चित्तौडगड-विजय स्तंभवरील 'नवदुर्गा समूहा'मध्ये आढळते.

नंदा: 

या मूर्तीचे वर्णन केवळ अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तीप्रकरणात केले आहे, रूपमंडन मध्ये उपलब्ध नाही. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तिप्रकरणावरून असे ज्ञात होते की, देवी नंदाच्या हातात अनुक्रमे अक्षसूत्र, खड्ग, खेटक आणि पानपात्र असावे.

क्षेमंकरी- 

क्षेमंकरीची प्रतिमा-लक्षणे तिन्ही शास्त्रांमध्ये आहेत, परंतु यातील रूपमंडनाचे वर्णन इतर दोन ग्रंथांतील वर्णनांपेक्षा काहीसे वेगळे आहे. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तिप्रकरणानुसार क्षेमंकरीचा एक हात वरद मुद्रेमध्ये असावा आणि उरलेल्या तीन हातात अनुक्रमे त्रिशूळ, कमळ आणि  पानपात्र असावे. रूपमंडनमध्ये क्षेमंकरीच्या हातात अनुक्रमे वरद मुद्रा, त्रिशूल, खेटक आणि पानपात्र असे वर्णन केले आहे. त्यामुळे देवीच्या तिसर्‍या हातातील कमळाऐवजी खेटकाचा उल्लेख बदलून महालक्ष्मी व क्षेमंकरी यांच्या हातातील शस्त्रे एकच असल्याचे सांगितले जाते.

शिवदूती किंवा सर्वती- 

दुर्गेच्या चौथ्या मूर्तीला अपराजितपृच्छा मध्ये शिवदूती आणि देवतामूर्तीप्रकरणात सर्वती असे म्हटले जाते, परंतु दोन्ही शास्त्रात उपलब्ध या मूर्तीची वैशिष्ट्ये सारखीच आहेत. रूपमंडन मध्ये या मूर्तीचा उल्लेख नाही. इतर दोन शास्त्रांनुसार, दुर्गेची ही मूर्ती कमंडलू, चक्र, खेटक आणि पानपात्राने सुसज्ज असावी. शिल्पकलेमध्ये महालक्ष्मी आणि नंदाप्रमाणे दुर्गेच्या शिवदुती किंवा सर्वती स्वरूपाचे दुर्मिळ चित्रण आढळते.

महारंडा – 

महारंडाचा उल्लेख रूपमंडनमध्ये नाही आणि या मूर्तीची वैशिष्ट्ये इतर दोन शास्त्रांमध्ये काही वेगळ्या प्रकारे दिली आहेत. अपराजितपृच्छा नुसार महारंडाची मूर्ती खड्ग, त्रिशूळ, घंटा आणि खेटक यांनी सज्ज असावी, तर देवतामूर्तीप्रकरणात महारंडा अनुक्रमे खड्ग, त्रिशूळ, घंटा आणि पानपात्र या लांच्छणाने सुसज्ज असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे देवतामूर्तीप्रकरणात देवीच्या शेवटच्या हातातील पात्राचा उल्लेख खेटकाऐवजी बदलला आहे. शिल्पकलेमध्ये क्षेमंकारीप्रमाणेच महारंडाचे सामूहिक आणि स्वतंत्र अशा दोन्ही स्वरूपात चित्रण करण्यात आले होते. 

भ्रमरी किंवा भ्रमणी- महारांडाप्रमाणेच या दुर्गेच्या मूर्तीचा उल्लेखही रूपमंडनमध्ये नाही आणि इतर दोन ग्रंथांमध्येही देवीचे नाव आणि तिच्या शेवटच्या हातातील शस्त्र बदलले आहे. अपराजितपृच्छात दुर्गेच्या सहाव्या मूर्तीला भ्रमरी असे म्हणतात आणि तिच्या हातात अनुक्रमे खड्ग, डमरू, खेटक आणि पानपात्र असल्याचे वर्णन केले आहे, तर देवतामूर्तीप्रकरणात दुर्गेच्या सहाव्या मूर्तीचे नाव भ्रमणी आणि शेवटच्या हातात पानपात्र ऐवजी पाश असल्याचा उल्लेख आहे आणि इतर तीन हातांची शस्त्रे निश्चितपणे खड्ग, डमरू आणि खेटक आहेत. शिल्पकले मध्ये भ्रमरी किंवा भ्रमणी यांच्या वरील वर्णनांशी साधर्म्य असलेली मूर्ती दुर्मिळ आहेत. 

सर्वमंगला- 

सर्वमंगलाचा उल्लेख केवळ अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तीप्रकरणात आहे, रूपमंडनमध्ये नाही. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तीप्रकरण नुसार, सर्वमंगला आपल्या हातात अनुक्रमे अक्षसूत्र, वज्र, घंटा आणि पात्र धारण करते.

रेवती- 

सर्वमंगलाप्रमाणे रेवतीचा उल्लेख रूपमंडन मध्ये नाही आणि इतर दोन शास्त्रांमध्ये वर्णन केलेली या देवीची हातातील शस्त्रे सारखीच आहेत. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तिप्रकरण या दोन शास्त्रांनुसार, रेवतीच्या हातात अनुक्रमे दंड, त्रिशूळ, खटवांग आणि पानपात्र असले पाहिजेत.

हरसिद्धी- 

हरसिद्धीचे मूर्ती लक्षण तीनही शास्त्रांमध्ये आढळते. या शास्त्रानुसार हरसिद्धीने आपल्या हातात अनुक्रमे कमंडलू, खड्ग, डमरू आणि पानपात्र धारण केले पाहिजे.

सामुहिक चित्रणांमध्ये वरील प्रमाणे उल्लेखित मूर्ती या केवळ चित्तोडगड-विजय स्तंभाच्या नवदुर्गा-समूहात कोरलेल्या आढळून येतात.

संदर्भ ग्रंथ कर्त्याचे आभार 

🙏🏻

धारासुर येथील दुर्गा प्रतिमा (फोटो - श्री जयराम कदम यांच्या कडून साभार)

पट्टदकल येथील दुर्गा देवीच्या मूर्तीचे विविध अंगाने घेतलेले फोटो (फोटो - श्री अमर रेड्डी यांच्या कडून साभार)

 https://olakhmurtishatrachi.blogspot.com/2023/10/blog-post.html

पाल शिल्प कलेतील मातृ भावना...


पाल कालखंडात दहाव्या शतकात निर्माण झालेली साधारणतः लांबी 35" (89 सेमी) असलेली ही मूर्ती आहे. एका ऋषीची पत्नी सुचिस्मती हिला स्वतः शिवासारखा मुलगा हवा होता. तिची इच्छा लक्षात घेऊन तिच्या पतीने वाराणसी (बनारस) येथे एका लिंगाची पूजा केली आणि शिवाने स्वत:ला सुचिस्मतीचा मुलगा म्हणून जन्म घेतला, ज्याचे नाव गृहपती होते. ऋषी पत्नीच्या इच्छेसाठी, शिवाने हे नाव आणि रूप धारण केले, तर गृहापती हे नाव अग्निशी संबंधित असून शिव व अग्नी यांचा सहसंबंध ही पौराणिक कथेत सापडतो. ही आख्यायिका पाल राजवंशात शिल्पांमध्ये वारंवार दर्शविली जाते, ज्यामध्ये आई आणि मूल एका भव्य पलंगावर झोपलेले दर्शवितात. शिल्पपटाच्या मध्यभागी आई आणि मुल दाखविले जाते. प्रस्तुत शिल्पात सुचिस्मतीच्या पायाची मालिश करणारी एक महिला परिचारक कोरलेली असते; तर दुसरी हाती पंखा घेतलेली परिचारिका ही डोक्याजवळ असते. शिल्पाच्या वरील बाजूस लिंग आणि कमलस्थित गणेश असतो. त्या सोबतच नऊ ग्रह कोरलेले असतात. खालील बाजूस म्हणजे पलंगाच्या समोर, उपासकांच्या लघु आकृती आणि विविध धार्मिक वस्तू दाखवतात. आई सुंदर पोशाख घातलेली असून तिचे खांदे आणि डावा हात एका मोठ्या उशीवर टेकवलेले आहेत. तिने तिचा उजवा हात वर केलेला असून ती कमळ धारिनी आहे, ती तिच्या शेजारी झोपलेल्या बाळाच्या संदर्भाने विचार करते आहे, असे वाटते. प्रस्तुत शिल्प सुव्यवस्थित, भव्य रचनेसह निर्माण करण्यात कलाकार यशस्वी झालेला आहे. हे शिल्प केवळ पाल शिल्पकलेलाच नव्हे तर भारतीय शिल्पकलेला समृद्ध करते, जिथे पाल कलेतील आई आणि मुलाची कथा शिल्पित आहे, जी एका दैवी जन्माचा संदर्भ देते. असे असले तरी सुलभ मातृ भाव स्पष्ट होण्यास भारतीय शिल्प कला धर्म आणि धर्माच्या माध्यमाने मानवी भावना समृध्द करते असेच म्हणावे लागेल.
संदर्भ ग्रंथ कर्त्याचे आभार 🙏
मातृदिनाच्या शिल्प शुभेच्छा 
 

माणकेश्वर मंदिरावरील कर्पूरमंजिरी




कल नुमाइश में फिर गीत मेरे बिके
और मैं क़ीमतें ले के घर आ गया,
कल सलीबों पे फिर प्रीत मेरी चढ़ी
मेरी आँखों पे स्वर्णिम धुआँ छा गया।

नुकतीच ही गजल वाचण्यात आली. कोण्या अनामिकाने हे लिहलेले वाचून मन खिन्न झाले. नुकतेच माणकेश्वर (तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद) येथील माणकेश्वर मंदिरास भेट दिली. मंदिर आणि गावाचे नाव एकच असल्याने शोधणे अवघड नाही. (गुगल बाबा आहेतच) अतिशय भव्य असे त्रिदल मंदिर, सुंदर रेखीव काम केलेल्या द्वारशाखा, बाह्यांगावर भग्न सुरसुंदरी यांची रेलचेल, रिकामी देवकोष्ट सारे काही मन उदास करणारे असले तरी, जे शिल्लक आहे; ते नसे तोकडे असे म्हणून गोड करून घ्यायचे ठरविले आणि निघालो एक एक शिल्प पाहत. त्यातील प्रत्येक शिल्पाचे वेगळेपण हळूहळू जाणवायला लागले. केश रचना, अलंकार, मेखला, वस्त्रालंकार, उभे राहण्याची ढब. त्यातील दर्पणा, शुकसारिका, विन्यासा, केतकीभरणा, चामरा, पद्मगंधा, तोरणा, मुग्धा, अलसा असे एक एक शिल्प न्याहाळताना अचानक एके ठिकाणी थबकलो. असे शिल्प पहिले नव्हते, असे नाही. पण यातील सौंदर्य काही वेगळेच भासत होते. ही आहे 'कर्पुरमंजिरी' म्हणजे जी, 'न्हाऊन झाल्यावर केसातून पाणी पिळून काढत असलेली'  शिल्पांकित केली जाते. स्नान केल्या नंतर स्त्री अधिक प्रसन्न, उल्हासित आणि कामुक भासते. क्षिरार्णव या ग्रंथात 'नग्नभावे कृतस्नाना नम्ना कर्पुरमंजिरी' असे वर्णन येते. चितोड येथील कीर्ती स्तंभावर हिच्या शिल्पासह कर्पूरमंजिरी असे नाव कोरलेले आढळते. तिच्या मऊ मुलायम केसातून निथळणारे थेंब हंस किंवा चातक आसुसले पणाने पित असताना दाखविले जाते. बहुतांश ठिकाणी केवळ कल्पना करावी लागते. कारण चातक किंवा हंस यांची उपस्थित नसते. प्रस्तुत शिल्पात त्रिभंग अवस्थेत ही ' ललना ' उभी असून अंगप्रत्यांगाने ती नुकतीच तारुण्यात प्रवेश केलेली नवयौवना आहे अशी भासते. गळ्यामध्ये ग्रैवैयक, स्तनहार, बाजूबंद, कंकण, मेखला, तोडे, पदजालक हे तिच्या कमनीय देहावर शोभून दिसतील असे मोजकेच अलंकार तिने परिधान केलेले आहेत. कदाचित तिरप्या चेहऱ्यावर सुंदर असे शिरोभूषण असावे. तसेच धनुष्याकृती भुवया, धारदार नासिका, पातळ नाजूक ओठ, आंब्याच्या कोई सारखी हनुवटी तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालीत असावेत. आज आपण केवळ कल्पना मात्र करू शकतो. 
बांधेसूद शरीर, हाताच्या पंजाने मोजता येईल अशी नाजूक कटी, डाव्या पायावर सर्व शरीराचा भार असल्याने अगदी गोलाईयुक्त नाजूक डावा कमरेचा भाग, देहूडा पाऊली उभी असलेली ही सूरसुंदरी तिच्या कमनीय देहाचा प्रत्येक अवयव तारुण्याची उधाण ल्यालेला दाखवण्यात कलाकाराला विलक्षण यश लाभलेले आहे. तिचे गोलाकार स्तन मंडळे दाखविण्यात कलाकाराचे कसब पणाला लागलेले आहे. अत्यंत रेखीव अवयवाची ही सूरसुंदरी आपल्या उजव्या हाताने केस सांभार सांभाळत; असलेले घनदाट केस हळुवार पिळत असताना तिच्या केसातून ठिबकणारे थेंब जणू काही मोती आहेत. असे समजून हंस पक्षी ते मोती टिपण्याच्या तयारीत आहे. सदरील शिल्पात कोरलेला हंस आपली चोंच उघडून प्रत्येक थेंब अधाशासारखा पिण्यास व्याकुळ झालेला आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रस्तुत शिल्प केवळ एक बाय तीन फूट एवढ्या जागेत कोरलेले आहे. 
( हंस हा तसा शाकाहारी प्राणी असून क्वचित प्रसंगी पाण्यातील किडे खातो. त्याचे पाणी आणि दलदलीच्या ठिकाणी वास्तव्य असते. हंस मोती खातो अशी धारणा प्राचीन काळापासून साहित्यात दिसून येते. परंतु यात कवी कल्पनेच्या पलीकडे वास्तवाशी संबंध नाही. )
संदर्भ ग्रंथ कर्त्याचे आभार.
IRS & I-SARC


शिल्पकलेतील त्रिपुरांतक शिव आणि त्रिपुरारी पौर्णिमा



आज कार्तिक स्नान समाप्ती आणि कार्तिक महिन्यातील ही पौर्णिमा. आजचा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते. कार्तिक महिन्यातील या पौर्णिमेच्या दिनानिमित्त अनेक पौराणिक संदर्भ आहेत. तसेच बौद्ध आणि शीख धर्मातही आजचा दिवस तसा महत्त्वपूर्ण दिवस आहे. त्रिपुर संहारा ची कथा महाभारतामध्ये वाचायला मिळते. तारकासुराची तीन मुले होती. विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष. या तिघांनी ब्रह्मदेवाची आराधना करून तीन अभेद किल्ल्यांचे स्वामित्व प्राप्त करून घेतले होते. यासोबतच असाही वर मिळून घेतला होता की, हे तीनही किल्ले त्यांच्या इच्छेप्रमाणे फिरत असतील. एक हजार वर्षात एकदाच ते एका सरळ रेषेत येतील आणि याच वेळी एकाच बाणाने हे तीन पूर नष्ट केल्या जाऊ शकतील. मयासूर या स्थापतीने सोने, चांदी व लोखंडाचे तीन किल्ले निर्माण करून दिले. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने तीन पूर मिळविल्यानंतर हे तिन्ही बांधव बलवान होऊन देवांना छळण्यास प्रारंभ केला. एक हजार वर्षानंतर जेव्हा ही तीनही पूर एकाच बिंदूवर येणार होती, त्यावेळी सर्व देवतांनी देवाधिदेव महादेव यांच्याकडे प्रार्थना केली की, हे तिन्ही पूर नष्ट करण्यास आपण पुढाकार घ्यावा. शिवाने या असुरांच्या नाशा साठी सर्व देवतांच्या शक्तीची मागणी केली. त्यानुसार देवतांच्या शक्तीच्या साह्याने हे तिन्ही पुर नष्ट करण्यास शिव सज्ज झाले. विष्णू, सोम, अग्नी आणि यम यांचा बाण निर्माण केला गेला. अग्नि यास बाणाची दांडी बनविले गेले, सोम बाणाचे शीर्ष झाला. तर स्वतः विष्णू बाणाचे टोक झाले. मेरू पर्वताचे धनुष्य निर्माण केल्या गेले. नागराज वासुकी यांची प्रत्यंचा निर्माण केली गेली. साक्षात पृथ्वीचा रथ केला, मंदार पर्वताचा अक्ष करून त्यास चाके म्हणून तेजोमय सूर्य आणि चंद्र बसविले गेले. रथाचे उपचक्र म्हणून पर्वतराज हिमालय आणि विद्याद्री यांची व्यवस्था केली गेली. सप्तऋषींना चाकावर गोलाकार बसविण्यात आले. गंगा, सरस्वती आणि सिंधू या नद्यांना चाकाच्या अक्षाच्या खिट्या किंवा पाचर बनविण्यात आले. रथाचे छत म्हणजे आकाश, चार वेद हे रथाचे चार अश्व झाले. नागराज कालपृष्ठ, नहुष, करकोटक आणि धनंजय हे अश्वाना बांधून ठेवणारे पट्ट झाले. यासोबतच कृती, सत्य, वैराग्य आणि ऐश्वर्य यांना घोड्याचे लगाम बनविले गेले. आणि त्यानंतर शिवाने हे तीनही पूर एकाच बाणात नष्ट केली. या समयी शिवाच्या रथाचे सारथ्य प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने केलेले होते.
वेरूळच्या कैलास लेणीमध्ये त्रिपुरांतक शिवाचे अतिशय सुंदर शिल्प कोरलेले आहे. दक्षिण भारतामध्ये असे शिल्प मोठ्या प्रमाणात उपलब्ध असले तरी, वेरूळच्या कैलास लेणीतील त्रिपुरांतक मूर्ती ही वेगवान हालचाल करीत असलेली, अचूक शरसंधान, रथाची गतिमानता या सर्व बाबींचा बारकाईने विचार करून शिल्पकाराने हे शिल्प घडविले आहे. प्रस्तुत शिल्पात शिवाने दोन्ही पायात अंतर ठेवून रथावर उभे असून स्वतःचा तोल सांभाळीत असल्याचे सहज जाणवते. शिवाची उभी राहण्याची ढब, आकर्ण खेचलेली धनुष्याची दोरी, शिवाच्या हाती कोरलेले आयुधे सारे काही उत्कृष्टपणे कोरली आहेत. शरसंधान करीत असताना शिल्पात बाण दाखविलेला नाही. याचा अर्थ धनुष्यातून बाण निघालेला आहे. शिल्पातील घटनाक्रम पाहता बाणाने आपले काम अचूक केले असल्याचे जाणवते. धनुष्य ओढून नुकताच बाण सोडला आहे. ज्यामुळे तीन पैकी एक पूर उध्वस्त झाल्याचं शिल्पात दाखवताना धनुष्याच्या खाली आकाशातून एक व्यक्ती पडताना कोरलेला असून हा पहिला पूर, असुर किंवा किल्ला आहे. रथातील गतिमानता स्पष्ट करण्यासाठी घोडे आणि रथ हे काटकोनात असलेल्या भिंतीच्या कोपऱ्यात कोरून कलाकाराने हवे ते दृश्य साकार करण्यात यश मिळविले आहे. 
बौद्ध धर्मातील मान्यतेनुसार, कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धाचा एक शिष्य धम्म सेनापती सरीपुत्राचे परीनिर्वाण झाले होते. त्यामुळे बौद्ध उपासक आणि उपासिका अष्टशिलांचे पालन व उपवास तसेच बुध्द वंदना करतात. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. अशा या तिन्ही धर्माच्या पवित्र दिनी आपणा सर्वास मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

फोटो Google
संदर्भ ग्रंथकर्त्याचे आभार

IRS & I - SARC

#त्रिपुरांतक #त्रिपुरारी #पोर्णिमा #कार्तिक #शिव #महादेव #त्रिपुरी #मयासुर #पूर #किल्ला


आलिंगन - अद्वैताचे पहिले प्रतीक

आलिंगन या शब्दाला गळाभेट किंवा ऊरभेट असेही म्हणतात. अलिंगनाला अद्वैताचे पहिले प्रतीक मानण्याचे कारण म्हणजे कामशास्त्रानुसार दोन जीवांचे परस्पर मिलन यास आलिंगन असे म्हटले आहे. या दोघांच्या भेटीत जी ओढ, व्याकुळता आणि प्रेमभाव प्रकट करण्याची क्षमता आहे; ती पाहता हे दोन्ही जीव एकरूप झालेले असतात. म्हणूनच त्यास अद्वैत असे म्हटले तरी चालेल अमीर खुसरो या उर्दू कवीने म्हटले आहे...
मन तू शुधम
तू मन शुधी 
तन मन शुधम
जू जॉ शुधी
ता कस न गोयद बादअजी
मन दिग्रम तू दिग्री
याचा अर्थ मी तू झालो, तू मी झालीस. आता कोणीही असं म्हणू शकणार नाही की, तू आणि मी वेगवेगळे आहोत. यातील तनाची आणि मनाची एकरूपता स्पष्ट होते. हे जरी खरे असले तरी, सामान्यपणे आलिंगन म्हणजे भेट एवढाच अर्थ आपण घेतो. पण कामशास्त्रज्ञांनी यातही अनेक भेद दिलेले आहेत. आलिंगना संदर्भात एका कवीने म्हटले आहे.
मिठी या शब्दात
एवढा मिठास आहे
नुसता उच्चारला तरी
कृतीचा भास आहे.
असेच एक आलिंगन शिल्प वेरूळच्या कैलास लेणीमध्ये प्रदक्षिणा पथावर पाहण्यास मिळते. यामध्ये अभिसारिका नाईकेचे हे शिल्प कोरलेले असून, ती नुकतीच साज शृंगार करून घरातून बाहेर पडलेली आहे आणि तो इथेच कुठेतरी आजूबाजूला लपून बसलेला आहे याची तिला जाणीवही झालेली आहे. कदाचित त्याच्या लपण्या पाठीमागील कारणही तिला माहीत असावे. तो जे काही करणार आहे; त्यास तिचा नकारही नाही. अशी नटून थटून बाहेर पडलेली ही नायिका पाहताच अचानक तो तिच्या समोर येतो आणि अंबाड्याला धरून हलकेसे तिचा चेहरा वळवून पटकन तिचे चुंबन घेऊन शीघ्रतेने तिथून निघून जातो. अगदी काही क्षणात घडलेलं हे सारे नाट्य त्या शिल्पकाराने अचूकपणे कोरलेले आहे. हे शिल्प पाहताना एक बाब निश्चितपणे जाणवते की, तो जे काही करणार आहे याची तिला पुरेपूर जाणीव असून ती थोडी सावध पवित्रा घेत असावी, असे शिल्प पाहताना जाणवते. त्याच्या चुंबनाला ती प्रतिसाद देत असली तरी तिचे नेत्र मात्र लोकलज्जेस्तव इतरत्र भिरभिरत आहेत, असे वाटते. सातवाहन राजा हाल याने लिहिलेल्या गाथासप्तशती या काव्यात्मक कथासंग्रहात आलेल्या एका कथेतील काव्याचा श्री राजा बढे यांनी केलेला मराठी मधील अनुवाद इथे तंतोतंत लागू होतो.
केस ओढूनी बळजबरीने तिजसी अभिमुख करूनी l
चुंबुनी अदरा पाजीत मदिरा आपल्या ओठांमधूनी ll 
वाकुनी करी कमान उलटी ही बाणांची दोरी l
तशी तिलाही हवीहवीशी वाटते ही बळजोरी ll 
हळूहळू घे घोट टेकता ओठावरती ओठ l
रागाची रामबाण औषध की जीवनीचा घोट ll 
अभिसरिका - कामदेवाच्या शक्तिशाली बाणाच्या घावाने उत्पन्न ज्वरने अंग थरथरत, रोमांच उत्पन्न करणारे कर्णफुल घालून, स्वतःला सजवून, आनंद पूर्वक निडर वृत्तीने प्रेमी सोबत रतिक्रीडा करण्यासाठी जी जाते; किंवा समाजाच्या नजरा चुकून जी आपल्या प्रियकरांकडे अभिसार (छद्यरूपेनगमन ) करते ती अभिसारिका होय.
फोटो - डॉ कामाजी डक यांच्या कडून साभार
संदर्भ ग्रंथ कर्त्याचे आभार. 🙏
 

शोध - शीतला देवीचा'



आज शीतला सप्तमी निमित्ताने.....

ठिकाण - मुखेड, महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर वसलेले तालुक्याचे गाव.

स्थळ - दशरथेश्वेर मंदिर, मुखेड.


माता शीतला देवीची मूर्ती नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात दशरथेश्वर मंदिराच्या बाह्यांगावर पाहावयास मिळते. ही देवी आयुर्वेद आणि आध्यात्म यांची यथायोग्य सांगड घालताना दिसून येते.


जगातील प्राचीन उपासनेत शक्ती उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व दिसून येते. मानवी जीवनात स्त्रीचे असलेले महत्त्व याचे मुख्य कारण असू शकते. मातेच्या रूपात प्रजनन आणि संगोपन या दोन्ही गोष्टी स्त्रीकडे असल्यामुळे मातृ उपासना जगामध्ये सुरू झाली असावी. भारतात आणि भारताबाहेर कित्येक ठिकाणी मातृ देवतेच्या मूर्ती आढळून येतात. बलुचिस्थान, इराण, मेसोपोटेमिया, तुर्कस्तान, पॅलेस्टाईन, सीरिया, इजिप्त येथेही स्त्री अथवा मातृ देवतेच्या मूर्ती आढळून आलेले आहेत. निरनिराळ्या मूर्तीचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की, शक्तीची उपासना तीन प्रकारे केल्या जाते. एक म्हणजे दिगंबर रूपा मध्ये, दुसरे रूप म्हणजे लहान मुलासह आणि तिसरा भाग म्हणजे दिग्वसना स्त्री दाखवितात पण मुखाच्या ठिकाणी कमलासारखी फुले, पशु किंवा पक्षाचे तोंड असते. नांदेड जिल्ह्यातील तालुका मुखेड येथे दशरथेश्वर मंदिर असून हे शिवमंदिर आहे. मंदिराच्या बाह्य अंगावर अप्रतिम असे शिल्पांकन असून त्यात नृत्य मग्न सप्तमातृका ही आहेत. जे की इतर कुठल्याही मंदिरावर आढळून येत नाहीत. याच बाह्य भागावरील मूर्तीत उत्तरेकडील शिल्पपटात पश्चिमाभिमुख एक मूर्ती असून ही मूर्ती शितला देवीची आहे. या मूर्तीस अनेक अभ्यासकांनी ज्येष्ठा देवी असल्याचे म्हटले आहे. मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये ही मूर्ती असून ही देवी स्थानक आणि चतुर्भुज आहे. तिने उजव्या खालील हातात सुरा, उजव्या वरील हातात केरसुनी, डाव्या वरील हातात सूप आणि डाव्या खालील हातात कपाल पत्र घेतले आहे. ही सारी लक्षणे मूर्ती शास्त्रा नुसार शितला देवीची ठरतात. परंतु काही अभ्यासक ही मूर्ती लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी किंवा ज्येष्ठा असल्याचे प्रतिपादन केले आहे. देवीने डोक्यावर मुकुट घातला असून त्यावर एक असुर मुंड आहे. कानात कुंडले आणि डाव्या खांद्यावरून मुंडमाला धारण केलेली आहे. देवीची प्रतिमा नग्न असून पादपिठावर तिचे वाहन गाढव कोरण्यात आलेले आहे. स्कन्द पुराणातील शितलाष्टकानुसार सदर देवीचे वर्णन पाहता ही मूर्ती शितला देवीची मूर्ती ठरावी. या अनुषंगाने आपण काही बाबींचा मागोवा घेऊयात. 


स्कन्द पुराणातील भगवान शिव रचित शितलाष्टका नुसार, "गाढवावर विराजमान, दिगंबरा, हातात झाडू अथवा कलश धरण करणारी, सुप अलंकृत मस्तकवाली, भगवती शितलास मी वंदन करतो." असे पहिल्या चरणात म्हटले आहे. सदर मूर्ती ही दिगंबरा असून हाती झाडू, सूप, कपाळ पात्र आणि सुरा आहे. स्कन्द पुराणातील वर्णना प्रमाणे हाती कलश नसून सुरा दाखवण्यात आलेला आहे. कारण ही मूर्ती संहार मूर्ती असून ती ज्वरासूर अर्थात ज्वर दैत्याचा अंत करीत आहे. बाकी सारी लक्षणे शीतला देवींचीच आहेत. त्यासोबतच गळ्यात असलेली मुंड माला ही लक्षणे ही शिवाशी संबंधित आहेत. त्याचप्रमाणे किरीट मुकुटावर ही एक मुंड कोरण्यात आलेला आहे. देवीच्या बाजूला तिचे गण वेताळ आणि पिशाच्य दाखविलेली आहेत. सदरील मूर्ती आकाराने 106 cm बाय 52 cm आहे. मूर्तीतील प्रत्येक आयुधांचा आपण प्रथमतः विचार करु. सुरा अथवा छुरीका हे संहार शास्त्र आहे. या मूर्ती मध्ये कलश नसून ती ज्वर दैत्याचा नाश करीत असल्याने सुरा दाखविलेला आहे. तर झाडू हे स्वच्छता दर्शक लक्षण आहे. तर सूप हे थंड हवा देण्यासाठी वापरण्यात येते. कपाल पात्र हे दैत्य रक्त प्राशन करण्यासाठी उपयोगात आणले जाते. ही देवी वैज्ञानिक दृष्टीने महत्वपूर्ण आहे. दाहज्वर, पीतज्वर, कांजण्या, दुर्गंधी युक्त फोडे, नेत्र विकार हे रोग दूर करणारी देवता म्हणून शितला देवी ओळखली जाते. सदरील देवी जवळ लिंबाचे डहाले ठेवली जातात कारण त्या मुळे शीतलता निर्माण होते. हाती असलेला झाडू हे स्वच्छता आणि सुरक्षितता राखण्यास प्रेरणा देणारे आहे. ऋतू परिवर्तनाणे वातावरणात अनेक बदल होतात. त्या साठी सफाई वर भर दिला गेला पाहिजे. कांजण्या झाल्यावर शरीर दाह कमी करण्यासाठी सुपाने वारे देऊन रोग्याला आराम मिळून देता येते. तर गाढव हे वाहन दाखविण्यामागे ही वैज्ञानिक करणे आहे. गाढवाची लिद रोग्याच्या अंगास लावल्याने त्याचा शरीरा वरील फोडचे डाग कमी होतात. कांजण्या झाल्यामुळे अंगावरील फोडे फोडण्याचे काम झाडूने अथवा फडा घेऊन करता येते. लिंबाची पाने ही फोडे सडू नयेत किंवा त्याचे संक्रमण होऊ नये यासाठी उपयोगी येतात. अशा रोग्यांना थंड पाणी प्यावे असे वाटत असल्याने, शितला देवीच्या हाती कलश दाखविला जातो. कांजण्या हा आजार खूप जुना असून ग्रीक मध्ये इसवी सन पूर्व बाराशे मधील एका ममीचा मृत्यू कांजण्या आजाराने झाल्याचे मानले जाते.



सदरील मूर्तीच्या गळ्यात यज्ञोपवीत प्रमाणे डाव्या खांद्यावरून रुळणारी मुंडमाला ज्यामध्ये एकूण 18 मुंडांची माळ स्पष्ट दिसून येते. ही मुंड माला पाहता शिव परिवारातील देवता शितलादेवी असल्याचेच सिद्ध होते. ज्येष्ठा ही विष्णू परिवारातील देवता असल्याने तिच्या गळ्यात मुंड माला येणे आणि कपाल पात्र धारण करणे कदापी ही शक्य नाही. पूर्वाश्रमीच्या अभ्यासकांकडे असलेली अपुरी साधने, संशोधकांची मर्यादा आणि ही शीतला माता असू शकते असे कदाचित वाटलीच नसावे. त्यामुळे या शीतला देवीच्या मूर्तीस अनावधानाने अलक्ष्मी किंवा ज्येष्ठा असे संबोधले असावे. असेही पौराणिक कथेनुसार अलक्ष्मी ही संहार रूपात दाखविली जात नाही. म्हणूनच मुखेड स्थित दशरथेश्वर मंदिरावरील मूर्ती ही ज्येष्ठा किंवा अलक्ष्मी ची नसून ती शीतला मातेची मूर्ती असल्याचे ठामपणे म्हणता येईल. माता शितलादेवी स्वच्छतेची जाणीव करून देते. देवी शीतला ही संक्रमना पासून बचाव करण्याची शिकवण देणारी वैज्ञानिक देवी आहे.


आभार - श्री Gajendra Birajdar, प्रा. डॉ. Sanjeev Doibale, श्री Aditya Phadke आणि श्री Laxmikant Sonwatkar 


प्रा. डॉ. अरविंद सोनटक्के

दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर. ता. भोकर जि. नांदेड

9423139676


ता. क. -

1) शीतला देवी (मरिआई, पोचम्मा, खरजू आई ई.) प्रमाणे ज्या देवता प्राचीन व पूर्व मध्ययुगीन काळात निर्माण झाल्या, त्यांचे पूजन गावा बाहेर होत असे. आज काही जणांचा असा गैरसमज आहे की, या देवता विशिष्ट जातीच्या आहेत म्हणून गावा बाहेर ठेऊन पूजन केले जाते. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, या संक्रमन काळात आयुर्वेदतील उपचारास अनुसरून तयार झालेल्या देवता असून संक्रमन आजार गावा बाहेर असावा या हेतू मुळे बाहेर ठेवलेल्या आहेत. त्यास विशिष्ट जाती अथवा धर्माचा संबंध नाही.


2) आज संपूर्ण जग covid-19 या आजाराशी लढत आहे. आपणही मागील सहा-सात महिन्यापासून स्वतःला कोंडून घेतलेले आहे, इतरांपासून स्वतःला अलिप्त करून घेतले आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे वातावरण निवळेल. परंतु समस्त मानव जातीला निसर्गाने आपला प्रकोप दाखविला आहे. यापासून जोपर्यंत बोध घेणार नाही. तोपर्यंत मानव समाज कधीही सुरक्षित असणे शक्य नाही. आमच्या पूर्वजांनी अशा अनेक संक्रमित आजारांना तोंड दिलेले आहे. त्यांच्याशी लढता लढता आयुर्वेदिक उपचार ही सांगितलेली आहेत. हे आयुर्वेदिक उपचार सर्वसामान्य माणसाला समजावेत, त्याचा सहज अर्थबोध व्हावा यासाठी संबंधित आजार आणि त्यावरील उपचार या अनुषंगाने काही देवता आणि त्यांच्या पौराणिक कथा निर्माण झाल्या आहेत. या देवता आजच्या आधुनिक युगातही आपले वैज्ञानिकत्व टिकून आहे. भारतीय पौराणिक कथेमध्ये ज्या अनेक देवी देवता आहेत. त्यातीलच एक देवी म्हणजे चामुंडा, ही प्रेतासनावर विराजमान असते. हिचे वाहन प्रेत दाखवण्या पाठीमागे कदाचित असे कारण असावे की, चामुंडा ही संहार देवी असून तिच्या भयंकर संहार सत्रा नंतर असेच संक्रमित आजार पसरत असावेत आणि असे संक्रमित आजार जेव्हा निर्माण होतात. तेव्हाचा चामुंडेच्या पायाखाली असलेल्या प्रेताप्रमाणे निपचित पडून राहावे. अन्यथा मानव समूहाला कायमचे निपचित व्हावे लागेल. हाच जणू संदेश त्या मूर्तीतून दिला गेला असावा. चामुंडा देवी प्रमाणेच संक्रमित आजाराच्या वेळी घ्यावयाची काळजी आणि सुरक्षितता तसेच स्वच्छते संदर्भाने संदेश देणारी एक देवी म्हणजे ती माता शीतला होय. या माता शीतला देवीची मूर्ती नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात दशरथेश्वर मंदिराच्या बाह्यांगावर पाहावयास मिळते. ही देवी आयुर्वेद आणि आध्यात्म यांची यथायोग्य सांगड घालताना दिसून येते.


3) मंदिर दशरथेश्वेर या नावाने ओळखले जाते. दशरथ यांचा ईश्वर म्हणजे दशरथेश्वेर असा अर्थ होतो. विशेषतः ईश्वर हा शब्द केवळ शिवा सोबतच जोडला जातो. जसे गुप्तेश्वर, केदारेश्वर, काळेश्वर, घृषणेश्वेर, सोमेश्वेर ई. मुखेडचे मंदिर एक तर दशरथ नावाच्या कोणीतरी दाणी व्यक्तीने निर्माण कार्यात सहकार्य केले असावे असेही म्हणता येईल. परंतु प्राचीन भारतीयांची मानसिकता पाहता असे घडले नसावे. माझा निष्कर्ष असा आहे की, राम पिता दशरथ यांचे दैवत / ईश्वर या अर्थाने दशरथेश्वर असे नामाभिधान मिळाले असावे.

 

नाग पंचमी - कला आणि सांस्कृतिक संदर्भ



भारतीय लोक धर्मामध्ये नाग पूजनाची परंपरा प्राचीन काळापासून लोकप्रिय असल्याचे दिसून येते. परिणाम स्वरूप भारताच्या विविध भागात नागाची अनेक स्वतंत्र मूर्ती पाहावयास मिळतात. भारतातील कुठल्याही शहरात अथवा लहानातील लहान खेड्यात गेल्यास नाग शिल्पे दृष्टीस पडणार नाहीत असे गाव मिळणे विरळच. एखादे मंदिर, झाड, तलावाच्या शेजारी किंवा घाटावर एका सपाट शिळेवर वळसे दार शरीर असलेल्या नागांचे शिल्प हमखास असतेच. त्यावर कधी हळद, कुंकू तर कधी शेंदूर लावलेले दिसते. काही ठिकाणी 'नाग युगल' एकमेकांना वेटोळे घातलेली शिल्पे पाहावयास मिळतात. नागांशी संबंधित असंख्य कथा या देशात अस्तित्वात आहेत. आदिवासी, अवैदिक, वैदिक समाजात वेगवेगळ्या कथांची गुंफण असून अशा कथातून भारतीय संस्कृती भक्कमपणे उभी आहे. नागाशी संबंधित असलेले अनेक शिल्पे असून सूर्य व नागाचे अनन्य संबंध सर्वश्रुत आहेतच. लोकजीवनातील नागांच्या महात्म्या मुळेच हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मामध्ये ही उपदेवतेच्या रुपाने नागांना मान्यता मिळालेली दिसते. विविध धर्मातील प्रमुख देवते सोबत त्यांचा संबंध जोडलेला दिसून येतो. असे मानले जाते की नागांची उत्पत्ति श्रावण मास मधील शुक्ल पक्षातील पंचमीच्या दिवशी झालेली आहे. संपूर्ण देशात या दिवशी नागाची विधिवत पूजा होत असते. यास 'नागपंचमी' या नावाने ओळखले जाते. बंगालमध्ये नागदेवी 'मनसा' तिचे पूजनही मोठ्या उत्साहाने साजरे केली जाते. कश्मीरी ग्रंथ 'नील मत पुराण' यात विविध ठिकाणी जवळपास पाचशे वेळेस नागदेवतेचा उल्लेख आलेला आहे.

 प्राचीन काळापासून भारत निसर्गपूजक देश असल्याने सूर्य पूजेचे उल्लेख ऋग्वेदात आलेली आहेत. सादृश्यधिष्टीत कल्पनेच्या जोरावर नाग आणि सूर्याच्या अनेक कथा गुंफण्यात आलेल्या आहेत. नाग हा सूर्या प्रमाणेच गायब होतो, सूर्या प्रमाणेच विद्युल्लता नागाच्या ठायी दिसते, सूर्याची दाहकता व नागाचे विष यांची तुलना, सूर्याचे तेज व नागाचा लखलखीतपणा यातील साम्यस्थळे पाहून नाग आणि सूर्य यांचे एकत्रीकरण पौराणिक कथेतून शिल्पकलेत उतरलेले दिसते. त्यासोबतच नागाचा लिंग सदृश्य आकारही त्यास लैंगिक प्रतीक बहाल करते.

 नाग पूजेची सुरुवात सर्वप्रथम इजिप्तमध्ये झाली असे मत सी. एफ. ओल्डहॅम यांनी आपल्या The sun and the Serpent a contribution to the History of Serpent Worship या ग्रंथात मांडले आहे. तर ग्राफिटन एलीएट स्मिथ यांनी, 'Geographical Distribution of the Practice of Mummification.' यात संशोधनपर अभ्यास करताना सूर्य पूजा आणि सर्प पूजा यांचा जन्म ईजिप्तमध्ये झाला असल्याचे सूचित केले आहे. जगात जिथे जिथे या पूजा केल्या जातात. त्या इजिपशीयन प्रभावातून केल्या जातात असेही ते मानतात. परंतु या मताला लायन कॅप यांनी मात्र विरोध दर्शविला आहे. ते Lost continent's the Atlantis the me in History science and literature या ग्रंथात असे म्हणतात, "संस्कृतीचे एकच एक केंद्र असते व तिथून ती संस्कृती जगात प्रसरण पावते असे समजणे योग्य नाही. वास्तविक संस्कृतीचे विशेष जगात अन्यत्र पसरत असतात. म्हणून इजीप्तच्या लोकांना किंवा अन्य कोणत्याही लोकांना अशी श्रेय देणे योग्य होणार नाही."

        ll भीती मधून नाग पूजा ll

 जगभरातील सर्वच प्राथमिक धर्मामध्ये व आदिम समाजांमध्ये नागपूजा प्रचलित असल्याचे आढळते. भारतात सर्वत्र नागपूजा प्रचलित आहे. वेदपूर्व काळापासून भारतात नागपूजा प्रचारात होती. मोहोनजोदाडो येथील उत्खननामध्ये सुद्धा नाग मूर्ती आढळल्या आहेत. नाग विषारी असल्यामुळे मनुष्याला त्याची फार भीती वाटते. ऋग्वेदामध्ये नागाचा उल्लेख 'अहि' या शब्दाने केला असून तेथे त्याची क्रूर, घातकी व भयंकर असे वर्णन केलेली आहेत. नागाची स्तुती करून त्याला वश करून घेतले तर त्यापासून भय राहणार नाही. या कल्पनेने यजुर्वेदात नाग स्तुतीपर मंत्र आढळतात. नागपूजा नागापासून वाटणाऱ्या भयातून सुरू झाली असावी. शतपथ ब्राह्मणात नाग माता कद्रू हिला पृथ्वीचे प्रतीक समजून पूज्य मानले आहे. सर्प वेध या नावाचा अथर्ववेदाचा एक उपवेद आहे. त्यात सर्पाचे विष उतरविण्यासाठी, त्यांना वश करण्यासाठी अनेक मंत्र सांगितले आहेत. करकोटक नागाचे स्मरण करणे हे पापनाशक आहे असे मानले जाते. नागांना संतुष्ट करण्यासाठी सर्पबळी , नागबळी इत्यादी विधी गृह्यसूत्र मध्ये सांगितलेले आहेत. अशाप्रकारे नागापासून आपले संरक्षण व्हावे, या उद्देशाने प्राचीन काळापासून नागपूजा भारतात प्रचारात आली आहे.

 मराठीत नागशीला म्हणून संबोधन केल्या जाणाऱ्या या शिला सारा भारत नागपूजक होता हे सिद्ध करतात. नागाला विषारी दंश असल्याने मानवजातीला त्याची प्रारंभी पासूनच भीती होती. त्याचे हे अस्त्र किती घातक आहे. याची प्रचिती सातत्याने मानवाने घेतलेली असल्याने तो या नागां पासून दूर राहात असे. भीतीतून आकर्षणाचा जन्म झाला. या सर्प योनीची भीती इतकी जबरदस्त होती की, त्यातून तो नागपूजेकडे वळला. नागाचे जमीन आणि पाण्यात ही वास्तव्य, कात टाकून द्विजत्व प्राप्त करून घेणे, त्याच्या द्विजिव्हा, हस्त - पाद - पंख विरहित शरीर, आश्चर्यकारक संभोग, अप्रतिम नागफना, त्याचा फुत्कार, त्याची भेदक नजर या सर्वांमुळे नाग मानवजातीत कुतूहल आणि आदराचा विषय बनला व त्यातूनच वेगवेगळ्या समजुती प्रचलित होऊन नागपूजा अस्तित्वात आली असावी. लोक धर्मात नागांचा उल्लेख अर्धमानव रूप आणि इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करणारा अशी ही तयार झाली. लोकपरंपरेत नाग पूजनाची असलेल्या प्रबळ लोकप्रियते मुळे नाग शिव, बौद्ध आणि जैन तीर्थनकार सारख्या महत्वपूर्ण देवते सोबत संबंध जोडला गेला. ही प्रक्रिया शुंग - कुशान काळापर्यंत पूर्ण झाली होती. सृष्टीच्या संहार कार्याशी संबंधित म्हणूनच शिवाच्या गळ्यात तसेच हातातील भूषणाच्या रूपात नागाला विशिष्ट स्थान प्राप्त झाले. शिवा सोबत असलेला नाग हा काल किंवा मृत्यूचा सूचक म्हणून एक चेतावनीच्या रूपाने पाहता येते. बौद्ध परंपरेत नंद, उपनंद् आणि मुचलिंद या नागांचा उल्लेख येतो. तर जैन परंपरेत सुपार्श्वनाथ आणि पार्श्वनाथ यांचे लांछन नाग आहे. पार्श्वनाथाची यक्ष, यक्षिणी हे सुद्धा नागराज धरणेद्र आणि त्याची राणी पद्मावती यांच्या रूपाने आहेत. मथुरा, भरहुत, सांची आणि अमरावती येथे शुँग, कुषाण, सातवाहनकालीन बौद्ध स्तूपावर नागांचे प्रचुर अंकन मिळते.

 नाग पूजेचा प्रारंभ नेमका कधी झाला याचा निश्चित पुरावा अद्याप सापडलेला नाही. नाग पूजा निर्मिती पाठीमागे मनोवैज्ञानिक भीती, पौराणिक साहित्यातील उल्लेख तर कुठे जनजातीय संस्कृती आणि तांत्रिक प्रतिकाच्या रूपातून तर कुठे भौगोलिक परिस्थितीच्या कारणाने भारतात नागपूजा अस्तित्वात आली असावी. लोक धर्मात ज्या स्थानीय देव- देवता असतात. त्यात नागाने आपले अस्तित्व नेहमीच टिकून ठेवले आहे. भारतीय तंत्रशास्त्रात नागाचे विशिष्ट महत्त्व असून योगातील 'कुंडलिनी' शक्तीचे प्रतीकही नागाला समजले जाते. नाग पूजेचे धागेदोरे शोधत असताना एक बाब निश्चितपणे जाणवते ती ही की, नागाची पूजा हा भारतीयांचा आत्मा असावा. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेकडून पश्चिमे पर्यंत, मैदान असो की उंच पर्वते, लोक परंपरेचे आद्यरूप एक सारखीच दिसून येतात. मानवी हतबलता आणि प्राण्यांमध्ये असलेलं बल यामुळे प्राण्या मधल्या असलेल्या अज्ञात शक्तीला घाबरून त्याची पूजा अर्चना सुरू झाली असावी असे वाटते. नागपूजा कदाचित अतिप्राचीन पूजेमध्ये येत नसावी. तरी नाग पूजेचे पदचिन्ह जगातल्या सर्वच संस्कृतीत आणि कानाकोप-यात पाहायला मिळतात. आणि भारतात तर मूर्ती पूजेच्या स्वरूपात नाग पूजेचे विशेष महत्त्व आहे. भारतीय साहित्यामध्ये तीन प्रकारचे स्वरूप पाहायला मिळतात.

1. देवता गंधर्व अप्सरा हे सात्विक प्रकारात येतात.

2. यक्ष, किन्नर आणि दैत्य हे राजस प्रकारांमध्ये मोडतात

3. राक्षस, नाग, प्रेत हे तामस प्रकारांमध्ये मानले जातात.

भारतीय साहित्यात नाग हा शब्दप्रयोग देवत्व प्राप्त झालेल्या सापांसाठी वापरला असावा असे वाटते. श्रीमद् भगवद् गीतेतील दहाव्या अध्यायात 28 आणि 29 व्या श्लोका मध्ये सर्प आणि नाग असे वेगवेगळे शब्द आलेले आहेत. काही जण अनेक फणा असलेल्यांना नाग, तर एक फणा असलेला सर्प असे मांनले आहे. महाभारतातील आस्तिक उपाख्याना नुसार हे समानार्थी शब्द असावेत असे वाटते. नाग आणि सर्प यात विषधर आणि विषहीन असाही भेद असावा असे काही जणांचे म्हणणे आहे. नागवंशी हा शब्दप्रयोग त्या राजवंश यांनी केला असावा जे स्वतःचा वंश नाग माता -  पित्यापासून निर्मित मानतात. किंवा जे नागपूजेशी संबंधित आहेत त्यांनाही नाग लोक म्हणत असावेत. काहीही असले तरी शेवटी भारतीय राजनेतिक इतिहासात नागांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे.

          II नाग पूजा स्वरूप II 

 भारतात कोब्रा सापाला नाग मानले जाते. पौराणिक कथेनुसार नाग सामान्य सर्प जाती नसली तरी आज व्यवहारिक रूपाने कोब्रालाच नाग मानले जाते. उत्तर भारतात काही ठिकाणी नाग म्हणजे पूर्वज असे मानले जातात. नागाचे रूप घेऊन ते आपल्या घर परिवाराची सुरक्षा करीत असतात. नागपंचमीच्या दिवशी घरातल्या कुठल्याही एका कोपऱ्यात वाटीभर दूध ठेवले जाते. यासोबतच काही भागात पुत्र प्राप्ती नंतर बाळाचे जावळ काढल्यानंतर घरात किंवा घराच्या बाहेर पाच सर्पाकृती काढल्या जातात. दुसऱ्या पुत्र प्राप्ति नंतरच हे प्रतीक मिटवून नवीन प्रतीके निर्माण केली जातात. राजस्थानातील काही भागात ऋषीपंचमीच्या दिवशीच नाग पूजा केली जाते. गढवाल लोक परंपरेनुसार अलकनंदा नदीच्या परिसरात नाग वास्तव्य करतात, असे मानतात. इलाहाबादच्या दारागंज मध्ये वासुकी नागाचे प्रसिद्ध मंदिर आहे. प्रतिवर्ष नागपंचमीला येथे यात्रा भरते. बिहारमधील नालंदा परिसरात अनेक नागमूर्ती आढळून आले आहेत. इथेच चतुर्मुखी नागफणा असलेली स्त्री मूर्ती मिळाली आहे. तामिळनाडूमध्ये शेष नागाची पूजा केली जाते. नागपंचमी पश्चात जन्मलेल्या मुला, मुलींची नावे नागराज किंवा नागमणी असे ठेवली जातात. काठीयावड मध्येही मंदिरे आहेत. औरंगाबाद जवळील पैठण ही क्षेत्रही नाग वंशाची संबंधित आहे. ब्राह्मण कन्या गोदावरी नदीत स्नानाला गेल्यावर शेषनाग तिच्या सौंदर्यावर मुग्ध झाला. त्यांच्या प्रेमाचा परिणाम म्हणजे राजा शालिवाहन चा जन्म होय. नाग पूजेच्या संदर्भाने बत्तीस शिराळा या गावी घडलेली घटना महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे. नाग पंचमीला शेतात नांगर फिरविल्याने नागाची पिल्ले दगावली. त्यामुळे क्रोधित नागिन संबंधिताच्या घरातील सर्वांनाच दंश केला. सासरी असलेल्या मुलीला ही दंश करण्यासाठी ती गेली असता. ती नाग पूजेत भक्तिभावाने मग्न असलेली दिसून आली. तेव्हा नागीनीने प्रसन्न होऊन सर्वांना जिवंत केले. नागपंचमीला महाराष्ट्रात मुलीला सासरी ठेवत नाहीत. लोकपरंपरेत असे म्हटले जाते की,

आता नागपंचमीच I

नाग आल्याची खेळायला I

मी ग भैय्याला सांगयितु I

बारा सणाला नेऊ नको I

पंचमीला र ठेवू नको I 

तर

 पंचमीचा सण आला डोळे माझे ओले

 बांधिले ग सख्यांनी झाडाला हिंदोळे ( तारा भवाळकर, लोक संचित )

हे सारे नाग पंचमीचे महत्व अधोरेखित करतात.

 ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, गृह्यसूत्र, रामायण, महाभारत, मैत्रेयी सहिता आणि पुराणात नागांचे अनेक उल्लेख आढळतात. ते ही वेगवेगळ्या समानार्थी शब्दाने. नाग पूजेच्या  संदर्भाने भारतीय साहित्यात विविध विधी सांगितलेल्या आहेत. अथर्ववेदात नागाला चारी दिशांचा दिक्पाल म्हटलेले आहे. ललितविस्तार या बौद्ध ग्रंथात नागाला लोकपाल रुपात मान्यता दिलेली दिसते. नागराजा तक्षकाने स्वेच्छेने राजा परिक्षितला दंश केला नव्हता. तर ऋषीच्या शापाला पूर्ण करण्यासाठी तो दंश होता. असे नारदाने परीक्षित पुत्र जनमेंजय यास सांगून सर्पसत्र किंवा नागयज्ञ बंद करावयास लावला. त्यावेळी राजा जन्मेजय याने प्रायश्चित करण्याची तयारी दर्शविली. तेव्हा नारद मुनी ने सांगितले की, " सामूहिक रुपाने तुझ्या प्रजेने प्रतिवर्ष नागांची पूजा करावयास हवी. " असे म्हणतात की तेव्हापासून नागपंचमीला सुरुवात झाली. नाग संबंधी अनेक मिथके आपल्याला पाहावयास मिळतात. पंचतंत्राच्या कथित नागा संबंधी भरपूर लिखाण आढळून येते. नल दमयंती कथेत ही नल राजाने नागाची केलेली प्राण रक्षा आणि त्यातून नागाने केलेले सहकार्य वाचावयास मिळते.

         ll नाग नगरे ll

 भारताचे अतिशय प्राचीन नगर जे वायव्य सीमेवर भारताच्या प्रवेशद्वारावर वसलेले नगर म्हणजे तक्षशिला होय. जगातील विद्या अभ्यासाचं प्राचीनतम केंद्र, भारतीय लोक परंपरेनुसार ही नागराजा तक्षकाची नगरी. उत्तर प्रदेशातील अहिच्छत्र नगरी ही परंपरेने नागांची जोडल्या जाते. तिचे नावच अही म्हणजे नाग. हा तिचा नागाची संबंध सांगणारे आहे. मध्य प्रदेशात गोलियर जवळ हे शहर होते. प्राचीन पद्मावती नगरी ही पुराण प्रसिद्ध नगर. पुराणात येथील नागवंशी राज्यांची विस्तृत वर्णने आहेत. येथील नागसेन नामक राजाचा उल्लेख सम्राट हर्षवर्धन याचा राजकवी बाणभट्ट याने आपल्या हर्षचरित्रात केला आहे. नागद, नागपूर, नागापूर, नागग्राम, नागठाणा, नाग हल्ली, नागुर, नागझरी अशी नाग नामक गावे भारतात सर्व प्रांतात आहेत. हल्लीचे पद्म पवया हे ग्वालियर जवळ आहे. पूर्वी पद्मावती या नावाने प्रसिद्ध होते. येथे वृषनाग, भीम नाग, स्कंद नाग, वसू नाग, व्याग्र नाग आदी राजांची नाणी सापडली आहेत.

          ll नाग वंश ll 

 नाग वंशाच्या उत्पत्तीच्या अनेक कथा तील ही एक कथा आहे की, कश्यप ऋषी ला कद्रू व वनिता नावाच्या पत्नी होत्या. कद्रूच्या पोटी जी संतान झाली ती नाग या नावाने प्रसिद्ध झाली. अनेक पुराणांमध्ये थोड्याफार फरकाने आली आहे. वासूकी हा नाग राजा होता त्याची राजधानी भोगावती नगरी होती. या वासुकी नंतर देवदत्त पर्यंत अनेक महान नागराजे होऊन गेले. या नागांना विविध पुराणानुसार एक, पाच किंवा सात पासून हजार पर्यंत फणा असल्याचा उल्लेख मिळतो. अनंत हा सहस्त्र फणा असलेला नाग होता. त्यावर विष्णू झोपलेला आहे असे मानतात. विष्णू त्यावर झोपला म्हणजे नागा वर विष्णूने वर्चस्व निर्माण केले असेही मानले जाते. तर नाग शिवाच्या गळ्यात असल्याने नाग लोकांचा आणि शिवाचा अनन्यसाधारण संबंध स्पष्ट होतो. नंदीवर शिव प्रसन्न झाल्यावर नंदीचा सन्मान करण्यासाठी आलेल्या नाग मंडळींची यादी वराहा पूराणात दिली आहे. नागांच्या संबंधाने सर्वात विस्तृत वर्णन माया शिल्प या ग्रंथामध्ये उपलब्ध होते. या ग्रंथात वासुकि, तक्षक, कारकोटक, पद्म, महापद्म, शंखपाल आणि कुलिक या सात प्रमुख नागांच्या लक्षणांचे वेगवेगळे उल्लेख केलेले आहेत. तक्षकाच्या मस्तकावर स्वस्तिक आणि महापद्म याच्या मस्तकावर त्रिशुल असायला हवा. अंशुमदभेदागम मध्ये चतुर्भुज आणि त्रिनेत्र नाग देवतांचे उल्लेख आढळून येतात.

 धार्मिक ग्रंथानुसार, कुण्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असल्यास नागपंचमीच्या दिवशी भगवान शिव आणि नागदेवतेची पूजा करावी. असा उल्लेख आढळून येतो. या अर्थी नाग ही देवता सामाजिक, धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातूनही रूढ झाली म्हणावी लागेल. हिंदू धर्म मान्यतेनुसार पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर विराजमान आहे. पौराणिक मान्यतेनुसार असलेल्या प्रमुख नागांचा तपशील पुढील प्रमाणे -

 शेष - अनंत या नावानेही शेष नागाचा ओळखले जाते. शेषनागाने गंधमादन पर्वतावर तपस्या केल्यानंतर ब्रह्माजीच्या वरदानाने पृथ्वीचा भार सांभाळण्याचे काम त्याच्याकडे सोपविण्यात आले. हरिवंश पुराणानुसार ब्रह्मदेवाने वासुकीला नागांचा राजा, तक्षकाला सापांचा राजा आणि शेषाला सर्वच विषदंती प्राण्यांचा राजा बनविला. यावरून शेषनागाचे महत्त्व सिद्ध होते. धार्मिक ग्रंथानुसार लक्ष्मण आणि बलराम शेषनागाचे अवतार रूप आहेत. हाच शेषनाग विष्णू चा सेवक म्हणून क्षीरसागरा मध्ये आहे. विष्णू विश्राम मुद्रेत शेष नागच्या वेटोळ्यावर झोपलेले असतात. श्रीकृष्ण जन्म समयी वासुदेव कृष्णाला यमुना पार करत असताना प्रचंड वर्षा होत होती. त्यावेळी शेषनागाने आपला फणा कृष्णा वर धरून यमुना पार करण्यास मदत केली होती.

 वासुकी - हा समस्त नागांचा राजा. वासुकी हा शिवाच्या कंठास लपेटलेला असतो असेही म्हणतात. समुद्रमंथनाच्या वेळी दोरीच्या रूपाने वासुकीचा उपयोग केला गेला होता. शिवाच्या त्रिपुरांतक अवतारात शिवाने एकाच बाणात असुरांची तीन पुरे नष्ट केली होती. त्यावेळी धनुष्यबाणाची प्रत्येंचा वासुकी बनला होता. कथासरित्सागर या ग्रंथानुसार लता देशाचा राजा वासुकीच्या संबंधाने आदर भाव प्रकट करण्यासाठी प्रति वर्ष उत्सव करीत असे. 

 तक्षक - शृंगी ऋषीच्या शापाची अंमलबजावणी करण्यासाठी तक्षक नागाने राजा परीक्षिताला डसले होते. त्यामुळे तक्षकाचा बदला घेण्यासाठी परीक्षित पुत्र जनमेंजयने सर्प यज्ञ केला होता. तेव्हा सर्व साप यज्ञात येऊन पडू लागले. त्यावेळी आस्तिक मुनीने तक्षकाची रक्षा केली. तक्षकच शिवाच्या गळ्यात असलेला नाग आहे असे ही मानले जाते. तक्षकाचा पुत्र अश्वसेन पाताळात राहत असे. खांडव वन अग्निकांड पासून तो अर्जुनाचा विरोधी होता. त्यामुळे कुरुक्षेत्र रणभूमीवर अश्वसेन कौरवांच्या बाजूने सामील झाला होता. अथर्व वेदा नुसार तक्षक हा सर्वाधिक विष असलेला नाग होता असे म्हटले आहे. कौशिक सूत्रानुसार गृहरक्षे साठी तक्षका समोर बळी द्यावा असे म्हटले आहे. असे म्हटले जाते की, तक्षशिला येथे तक्षक संप्रदायाचा प्रभाव होता. मध्यप्रदेशात तक्षकेश्वर या नावाने इंदोर जवळ नवाली गावात एक मंदिर आहे.

 करकोटक - यास शिवाचा गण असेही म्हणतात. हरिवंश पुराणात या नागाचा विशेष उल्लेख मिळतो. नल-दमयंती कथेतही करकोटक येतो. आपल्या आईच्या शापातून मुक्त होण्यासाठी महाकाल वनात शिवलिंगाची पूजा केली होती.

 कालिया - याचा निवास आपल्या कुटुंबासह यमुना नदी मध्ये होता. त्यामुळे यमुने मध्ये विष पसरले होते. कृष्णाने कालियाला युद्ध करून यमुना सोडण्यास भाग पाडले.

 सिंधू संस्कृतीत नागांची असलेली शिक्के, भरहुत सांची आणि अमरावती येथील नागांचे शिल्पांकन यासोबतच पुढे गुप्त काळामध्ये नाग मूर्तीचे तीन प्रकारे शिल्पांकन व्हायला सुरुवात झाली.

1) मानवाकार मूर्ती ( डोक्यावर नागफणा )

2) मानव सर्प विग्रह ( कमरेच्या वर मानव रूप )

3) पूर्ण नाग रूप.

महाराष्ट्रातील काही वंशाची नावे 'शेष' अशी आहेत. प्रख्यात शिंदे घराणे हेही नागपूजकच होते. कर्नाटक, महाराष्ट्रात अनेक शिंदे घराणे आहेत. राष्ट्रकूट नृपती गोविंद तृतीय याच्या नेसरी ताम्रपटात त्याचा सामंत नाग हस्ती याचा उल्लेख येतो. कर्नाटक राज्यातील चंद्रवल्ली, बागलकोट, भैरवमट्टी, हरिहर, मात्रहल्ली येथील शिलालेखात नागवंशी राज्यांचे अनेक उल्लेख येतात. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे ही नागवंशीय शिंदे यांची एक शाखा राज्य करीत होती. पैठणचे सातवाहन हे नाग वंशियच राजे होते. महाराणी नागनिका ही नाग कन्याच.

          ll नाग प्रतीके ll

 भारतीय कलेने भावना प्रकट करण्यासाठी प्रतीकांना जन्म दिला. जसे नाग कश्यप आणि कद्रू यांचे पुत्र असल्याचे पुराणात उल्लेख आहेत. पौराणिक नाग लोकांमधील अनंत, वासुकी, शेष हे नाग मानवा अनुकूल होते. तर तक्षक, कारकोटक, कालिया हे मानव वैरी होते. नाग हा वारूळात राहतो आणि वारूळ हे भू देवतेचे प्रतीक मानले आहे. त्यामुळे भूमीच्या सृजन शक्तीशी त्याचा संबंध जोडला गेला. शिव आणि विष्णु या दोघांचाही नागाशी संबंध आहे. नागफणी धारण करणारी कालिकादेवी आहे. त्याचप्रमाणे गणेशाच्या पोटावर ही नागबंध आवळलेला असतो. कंसाच्या कैदेतून बाहेर पडल्यानंतर पावसापासून रक्षण करण्यासाठी वासुकी नागाने कृष्णावर फना छत्र धरलेले होते. बुद्धांच्या जन्मानंतर नंद व उपनंद या नागांनी स्नान घातले होते. तर ज्ञान प्राप्ती नंतर मुचलिंग नागाने त्यांच्यावर आपला संरक्षक असे फनाछत्र धरले होते. जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे नाग हेच अभिज्ञान चिन्ह आहे. कामठा किंवा मेघमालि हा पूर्वजन्मीचा पार्श्वनाथाचा भाऊ जो वैरी बनला होता. त्याच्या हल्ल्यापासून यक्ष धरणेद्र हा आपल्या सात फण्याचे छत्र पार्श्वनाथच्या डोक्यावर धरले असल्याचे शिल्प वेरूळ लेणीत आहे.

श्रवणबेलगोळ येथील गोमटेश्वराच्या प्रचंड मूर्ती भोवती अनेक वारुळे निर्मिले असून त्यातून नाग बाहेर येत आहेत असे शिल्पात दाखवले आहे. नाग हे योगाचे ही प्रतिक मानले जाते. त्या कारणाने शिवाची योगी राजत्व दाखविण्यासाठी नाग शिवा जवळ सातत्याने दाखविला जातो. अशी ही पौराणिक मान्यता आहे.

    ll आयुध रूपातील नाग प्रतीक ll

 बहुतांश देवतेसमोर नाग हे चिन्ह आयुध म्हणून दाखवण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात शिवा सोबत सर्प / नाग हे लांछान कायमस्वरूपी जोडले गेलेले आहे. प्रतिमा लाक्षणिक विवरण पाहता विष्णुधर्मोत्तर पुराण, मत्स्यपुराण, मानसार, मयमत, कामिकागम, अंशुमतभेदागम, देवता मूर्ती प्रकरण, आदी शिल्प शास्त्रीय ग्रंथात शिवाच्या आयुधात कृष्णमृग, खडग, खेटक, वज्र, परशु, त्रिशूल, खट्वांग, डमरू, पाश, हस्ती चर्म, दंड, कपाल, अक्षमाला, धनुष्य, शंख, चक्र, गदा आणि सर्प किंवा नाग सांगितला आहे.

    ll नाग आणि लैंगिक काम प्रतीक ll 

 नाग किंवा साप यांना लैंगिक भावनेचे प्रतीक मानण्यात येते. ज्यावेळी एखादा साप खांबाला वेढा देऊन बसतो तेव्हा तो खांब प्रेरित झालेले लिंग वाटतो. साप हा पुरुषवाचक शब्द म्हणून वापरला जातो. या सरपटणाऱ्या प्राण्यात लिंगाची रचना असल्यामुळे ते वासनेचे प्रतीक आहे. त्यासाठी त्याला वैशेयिक मन, संभोग इच्छा आणि संभोग इच्छा कमी होणे इत्यादीचे प्रतिनिधित्व सरपटणारे प्राणी करतात. ज्या वेळी स्त्री व पुरुष उत्तम परिस्थितीत व तंदुरुस्त शरीराने एकमेकांकडे आकर्षित होतात. त्यावेळी त्यांच्या लिंगाची व योनीची स्थिती एखाद्या वळवळणाऱ्या प्राण्या सारखी होते. ग्रीक कथेत एडम व इव्हा यांच्याजवळ साप हे प्रतीक यामुळेच दाखवण्यात येते. प्रसिद्ध मनोवैज्ञानिक सिगमंड फ्रॉइड याने सुद्धा नागाला काम प्रतीक मानले आहे. त्यांच्या मतानुसार, आदिम समाजातील स्त्रिया नागाची पूजा काम प्रतिकाच्या रूपानेच करत असत. कदाचित यामुळेच जगभरात आणि विशेषतः भारतामध्ये नागपूजा या स्त्रियाच करतात. नागाची पुत्रप्राप्तीसाठी आराधना करणे किंवा शिवा सारखा श्रेष्ठ पती मिळावा यासाठी शिवपूजन करणे या पाठीमागे ही कामभावना प्रेरित असावी असेही मानले जाते. वांझ स्त्रिया पुत्र प्राप्ती साठी नागशिळेची पूजा करतात. नागाच्या काम रूपा संदर्भाने कश्मीरी लोक कथेनुसार, सुरिनसर किंवा सुनासर ही झील अध्यात्मिक बाबतीत  पवित्र मानली जाते. हा संदर्भ महाभारत काळाशी जोडला जातो. वनवासात असतांना पांडव जम्मू येथे गेले होते. ज्यावेळी नागकन्या उलुपी सोबत अर्जुनाचा विवाह झाला होता. तसेच माणिपूर राज्याची राजकन्या चित्रगंधा हिच्यासह ही अर्जुनाने विवाह केला होता. कालांतराने त्यांना बब्रुवाहन नामक वीर पुत्र जन्माला आला. अर्जुनाचे वास्तव्य तिथे अल्पकाळ असल्याने पुत्र जन्माची वार्ता अर्जुना पर्यंत पोहोचली नाही. महाभारताच्या युद्धसमाप्तीनंतर पांडवांनी अश्वमेध यज्ञ केला होता. यज्ञाचा अश्व बब्रुवाहन यांनी रोखून धरला होता. तो सोडविण्याचा प्रयत्न अर्जुनाने केला असता. युद्ध कौशल्यात अर्जुन कमी पडला. त्यामुळे अर्जुनाला मूर्च्छा आली. ही वार्ता चित्रगंधा हिला कळाली असता ती रणभूमीवर आली आणि पुत्र बब्रुवाहन यावर ती क्रोधित झाली. वडिलाला जिवंत करण्यासाठी बब्रुवाहन यांनी वैद्यची मदत घेतली. वैद्यांनी उपचार सांगितला की, पाताळ लोकातून नागमणी (वनौषधी) आणावी लागेल. त्यासाठी बब्रुवाहन याने पाताळ लोकात बाण मारला. त्या बाणाने इच्छित नागमणी आणला. त्या साठी नागकन्या उलुपीने साह्य केले. त्या नागमणीच्या सह्याने अर्जुन जागा झाला. ज्या मार्गाने बाण गेला आणि ज्या मार्गाने बाण परत आला तिथे दोन्ही बाजूने झील तयार झाली असे मानले जाते. तेव्हा पासून नवविवाहिता या झीलची तीन वेळा परीक्रमा करून नाग देवतेचा आशीर्वाद घेऊन वैवाहिक जीवनाला प्रारंभ करते.

 वारूळ हे भूमीचे - भूमीच्या सृजनेंद्रीयचे याचे प्रतीक आहे. नर नाग हे पुरुषी तत्त्वाचे प्रतीक आहे. त्याची उपासना प्राधान्याने संतान दाता देव म्हणूनही होते. दक्षिणेत अनेक जमातीत वधूने व विवाहित स्त्रियांनी नाग पूजा करण्याची चाल आहे. काही ठिकाणी विवाहित स्त्रिया वारुळाची पूजा करतात. संतान प्राप्तिची अपेक्षा करणाऱ्या स्त्रिया नागाच्या अथवा नाग युगालाच्या मूर्तीची पूजा करतात. नवस फेडण्यासाठी नागमूर्ती तयार करून मंदिराच्या आवारात अथवा झाडांच्या पायथ्याशी प्रतिष्ठित करतात.

 नागाचे संतान दायी सामर्थ्य भारतीय जनमानसातील अनेक धारणांमधून व्यक्त होत असते. दक्षिणेतील सर्व प्रमुख क्षेत्रपाल देव आपले नागरूपात्व सांभाळून आहेत. ग्रामीण भागातून आजही अशी दृढ समजूत आहे की, एखाद्या गर्भवती स्त्रीने साप पाहिला असता, त्याचे तत्क्षणी डोळे जातात आणि ती स्त्री प्रसूत झाल्यावर तिच्या नान्ही घराचा गंध अनुभवल्यावर तो नाग पुन्हा डोळस होतो. ती गरोदर असताना त्या स्त्रीचा आणि पुरुषाचा संबंध येऊ नये किंवा समागम घडू नये, असा निषेध त्यात अभिप्रेत असावा. सर्व पुरुष नागाचे प्रतिनिधी आहेत आणि नाग हे पुरुषी तत्त्वाचे प्रतीक आहे. म्हणून वारुळाची पूजा भूमीच्या सृजनेंद्रीयचे प्रतीक म्हणून केली जाते. वारूळास पृथ्वीची योनी म्हणतात. योनी रूपिनी भुदेवी आहे. योनी प्रतीक म्हणून नैसर्गिक वारूळची उपासना अति प्राचीन काळापासून आजपर्यंत दक्षिण भारतात तरी अखंड प्रचलित आहे. वारूळ ही फारच नाजूक असल्यामुळे वारूळ सादृश्य घडीव शीला मूर्तीचे प्रचलन क्वचित कोठे असल्याचा पुरावा उपलब्ध आहे. वारुळाच्या शीला रूप प्रतिकृती नंतर नाभी पर्यंतच्या योनी मूर्ती घडविल्या जाऊ लागल्या. तसेच प्रसवा बरोबरच पोषणाचा ही मातृत्वाशी संबंध असल्यामुळे योनि प्रमाणेच स्थानांना उठाव देणाऱ्या स्कंदा पर्यंतच्या मूर्तीची निर्मिती होत गेली. भू देवीच्या सर्जक आणि पोषक इंद्रियांच्या मूर्तीचा हा वारूळ ते योनी - स्तन - युक्त मूर्ती पर्यंतचा क्रमविकास श्री रा. चि. ढेरे यांनी सिद्ध केला आहे.

 II काम शास्त्रीय ग्रंथानुसार नाग II

कल्याणमल्ल, कोक्कोक, दीक्षित श्यामराज, श्री प्रोढदेवराज, मथुरा प्रसाद दीक्षित यांनी नायिकेच्या माणस प्रकृतीचा ही उल्लेख केलेला आहे. देव सत्वा, यक्ष सत्वा, मनुष्य सत्वा, पिशाच्च सत्वा, नाग सत्वा, काक सत्वा, वानर सत्वा आणि खर सत्वा असे प्रकार सांगण्यात आलेले आहेत. सत्व या शब्दाचा अर्थ शील असा होतो. अर्थात नायिकेच्या चारित्र्य आणि वागणुकीवरून हे सत्वाचे प्रकार दिलेले आहेत. त्यानुसार जी नेहमी एखादी घटना किंवा काम विसरते, विसराळू स्वभावाची जी नेहमी व्याकुल, घाबरलेली असते, सापाप्रमाणे दीर्घ श्वास घेणारी, नेहमी निद्राधीन राहणारी, नेहमी जांभळी देणारी ती नाग सत्वा जाणावी. असे म्हंटले आहे.

 वरील विवेचनावरून असे म्हणता येईल की,

1) सर्वच प्राचीन मानवी सभ्यतेत नागा विषयी भीतीतून आदरभाव निर्माण झाला.

2) नाग सादृश्यधिष्टीत कल्पनेच्या जोरावर सूर्या सोबत संबंध जोडून कथा निर्मिती केल्या गेल्या.

3) नाग हे अत्यंत जहाल विष बाळगून असल्यामुळे आमचाही वंश नागसम आहे. हे दाखविण्यासाठी कुळवंश प्रतिकाच्या रूपाने नाग हे 'कुलचिन्ह' म्हणून ज्या जमातींनी किंवा राज वंशानी स्वीकारले त्यास नागलोक या नावाने ओळखण्यात येते.

4) नागाची शरीर रचना ही पुरुष लिंगाप्रमाणे असल्यामुळे आणि वारूळ स्त्री लिंग अथवा भूमिचे / सृजनाचे प्रतीक म्हणून स्वीकारले गेले असावे.

5) दक्षिणेतील अनेक क्षेत्रपाल देवता आपले नागरूप प्रकट करताना दिसतात.

6) आशीर्वाद देत असताना हाताची मुद्रा ही पाच फडा असलेल्या शेषनागाची मुद्रा मानली जाते. यज्ञोपवीतातील एका सूत्राचे नाव नाग तंतू असे आहे.


( संदर्भ ग्रंथ कर्त्यांचे आभार, फोटो स्त्रोत :- श्री प्रवीण योगी यांच्या कडून मिळाले.)

डॉ. अरविंद सोनटक्के,

दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर. जि. नांदेड.

(9423139676)

© पोस्ट शेअर करा पण माझ्या नावासह © 😊🙏


🐍 नाग पंचमीच्या सोनटक्के परिवाराकडून आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🐍

 

धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिरावरील मोहिनी की काली : एक शोध





भारतीय मूर्ती कलेचा इतिहास समजून घेण्यासाठी पुराणाचा अभ्यास असणे अनिवार्य आहे. कारण देवी-देवतांच्या नाना विधिरूपे पुराणानीच बहाल केलेली आहेत. त्यातीलच काही रुपे धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिरावर पाहावयास मिळतात. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील धर्मापुरीच्या मंदिरावर असलेल्या एका देवी शिल्पास मोहिनीचे शिल्प असे अभ्यासकांचे म्हणणे असून हे मोहिनीचे शिल्प नसून कालीचे शिल्प आहे.

 गावाजवळच एका खडकाळ शेतात चालुक्यकालीन कलेचा अप्रतिम अविष्कार असलेले केदारेश्वर मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे धर्मापुरीतील जतन केलेले असे एकमेव मंदिर होय. नुकतेच या मंदिराचा पुरातत्व विभागाकडून जीर्णोद्धार करण्यात आला. अर्ध मंडप, मंडप, अंतराळ, गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. हे केदारेश्वर मंदिर चालुक्य  राजा विक्रमादित्य सहावा याने बांधल्याची नोंद आढळून येते. मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिराच्या जंघा भागावर आकाराने पुष्ट असलेल्या शैव-वैष्णव तसेच शक्तांची मिळून एकूण 68 मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यातील मंदिराच्या पश्चिम पूर्व कोपऱ्यात अर्थात अग्नेय दिशेला पूर्वेकडे तोंड करून दक्षिण दिशेकडून अनुक्रमे आठव्या क्रमांकाची सुमारे 102 सेंटिमीटर उंच आणि 46 सेंटिमीटर रुंद अशी कालीची संहार मूर्ती आहे. या मूर्तीस अभ्यासकांनी भस्मासुराला मारणारी मोहिनी आहे असे म्हटले असले तरी, मूळच्या मोहिनी आणि भस्मासुराच्या कथेशी ही कथा जुळत नाही. मूळच्या मोहिनी रूपातील विष्णूची कथा अशी आहे की, भस्मासुराला मारण्यासाठी विष्णूने अतिशय आकर्षक असे स्त्री रूप घेतले होते. भस्मासुरास शिवाने दिलेले वरदान असे होते की, " तो ज्याच्या मस्तकावर हात ठेवील तो भस्म होऊन जाईल." मिळालेल्या वरदानाच्या प्रचीती साठी भस्मासूर शिवाच्याच मस्तकावर हात ठेवण्यासाठी मागे लागला. तेव्हा शिवाचे रक्षण करण्यासाठी विष्णूने मोहिनी रूप घेऊन भस्मासुरा समोर आली असता; तिच्या अप्रतिम सौंदर्यावर भाळून भस्मासुराने मोहिनी समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्या वेळी "मी एक नर्तकी असून मला नृत्यात प्रवीण असलेल्या व्यक्ती सोबतच लग्न करावयाचे आहे." असे मोहिनीने म्हटल्यामुळे भस्मासुराने मोहिनीस नृत्य शिकवावे अशी विनंती केली. त्याच्या विनंतीस होकार देत मोहिनी भस्मासुरास नृत्य शिकवू लागली. अशा पद्धतीने मोहिनी रूपातील श्रीविष्णूने भस्मासुरास नृत्यास भाग पाडले. नृत्याच्या विविध मुद्रेत मोहिनीने (विष्णूने) स्वतःच्या मस्तकावर अचानक हात ठेवला व मिळालेल्या वरदानास विसरून तसेच कृत्य भस्मासुरा कडून झाले आणि स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवताच भस्मासुर जागीच भस्म झाला. हे विश्लेषण पाहता प्रस्तुत मूर्ती मोहिनीची असावी अशी यत्किंचित ही शक्यता नाही. केदारेश्वर मंदिरावरील सदरील मूर्तीचे अवलोकन केले असता. श्यामा रहस्य या ग्रंथातील कालिच्या वर्णनाप्रमाणे चतुर्भुज, मुंड माला विभूषित, घोर दंतावली, पुष्ट आणि उन्नत स्तना असलेली, असे वर्णन सांगितलेले आहे. प्रस्तुत शिल्पात स्त्रीरूपी देवता राक्षसाच्या मुखवरील त्वचा सोलून काढीत असल्याने ती मोहिनी रूप होऊ शकत नाही. तर या शिल्पातील स्त्री देवता अलिढासनातील स्थानक मूर्तीत चतुर्भुज असून प्रदक्षणा क्रमाने उजवा हात चेहऱ्यावरील कातडी सोलून काढीत आहे. तर उजव्या वरच्या हातात त्रिशूल किंवा खट्वांग प्रमाणे तुटलेले शस्त्र दिसते आहे. डाव्या वरच्या हाताने राक्षसाने मारलेल्या खडगास वरच्यावर रोखून धरलेला असून खालच्या डाव्या हाताने राक्षसाचे केस गच्च धरलेले आहेत. देवीची शरीररचना प्रमाणबद्ध सुंदर असली तरी, बाहेर आलेले सुळे दात, त्रिशूल किंवा खट्वांग, शरीरावर रेंगाळणारी मुंड माला या लक्षणांवरून ती काली असून मोहिनी ठरत नाही. वामन पुराणात रूरू नावाच्या असुराने काली वर आक्रमण केले असता तिने आपल्या खट्वांगाने त्याला मारले व त्या असुराचे कानापासून पायापर्यंतचे कातडे सोलून काढून त्या कातड्याच्या वादी बनविल्या आणि त्याने आपल्या जटा बांधल्या. असा उल्लेख आलेला आहे. या कथानकावरून ही मूर्ती कालीची आहे, हे स्पष्ट होते. वामन पुराणातील या कथानकाप्रमाणे मूर्तीतील देवीने डाव्या हाताने राक्षसाचे किंवा दैत्याचे केस धरून उजव्या हाताने त्याच्या चेहऱ्यावरील त्वचा पूर्णपणे सोलून काढलेली आहे. त्यामुळे राक्षसाची कवटी दिसत असून डोळे कवटीच्या खोबणीतून बाहेर आलेली आहेत. तसेच नाकाचे हाड ही स्पष्ट दिसते  आहे. ओढून काढलेली त्वचा गळ्याजवळ एकत्र जमलेली असून त्वचेचा नाकावरील भाग, डोळ्यांची बुबुळे असलेली पोकळ जागा तसेच ओठ ही कोरलेले दिसतात.

 शिल्पकलेच्या दृष्टीने प्रस्तुत शिल्प निर्माण करणे ही कलाकाराच्या कलेची कसोटी होती असे म्हणावे लागेल. कारण या शिल्पात चेहऱ्यावरून सोलून काढली त्वचा दाखविण्याचे कसब सामान्य शिल्पीचे नक्कीच नाही. धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिरास भेट दिल्यास नक्कीच हे शिल्प आपले लक्ष वेधून घेणारे असणार आहे हे निश्चित. नेहमी देवतेच्या रूपा वरून राक्षस शोधत असतो पण इथे राक्षसा वरून देवतेची ओळख पटली हे विशेष आहे. रुरू सिद्ध झाल्या वरच काली पूर्ण झाली असे म्हणावे लागेल.

 टीप :- या शिल्पा संबंधी मराठवाडा इतिहास परिषदेच्या 40 व्या अंकात शोधनिबंध सादर करण्यात आला आहे. अभ्यासूंनी मूळ शोधनिबंध पहावा.

 

मिथक शिल्पे – किन्नर किन्नरी

सामना ऑनलाईन

>> आशुतोष बापट

ग्रीक पुराणकथांमधील पंखधारी घोडा अर्थात पेगॅससबद्दल काही कथा आपण बघितल्या. याच पंखधारी घोडय़ाबद्दल अजून एक बाब म्हणजे कॉरिन्थच्या नाण्यांवर पंख असलेल्या पेगॅससचा छाप दिसून येतो. इ.स.पूर्व 4 थ्या शतकातील कॉरिन्थच्या चांदीच्या नाण्यावर पंखधारी पेगॅसस कोरलेला आहे. त्याच कालखंडात निर्माण झालेल्या लाम्पसॅकसच्या नाण्यांच्या मागच्या बाजूवरसुद्धा पंखधारी अश्वाचे शिल्प बघायला मिळते. म्हणजेच कलेमध्ये या पंखधारी घोडय़ाचे स्थान जसे शिल्पांमध्ये आहे तसेच ते नाण्यांवरसुद्धा दिसून येते. पंखधारी घोडय़ासारखा अजून एक चमत्कारिक प्राणी आपल्याला दिसतो तो म्हणजे पंखधारी हत्ती.

अमरावती, सांची, नागार्जुनकोंडा इथल्या उडणाऱया हत्तींची शिल्पे बुद्धजन्माच्या चमत्काराची घटना दाखवतात. या शिल्पांमधे जरी हत्तींना पंख दाखवले नसले तरीसुद्धा त्यांच्या शिल्पांवरून ते आकाशात विहार करताहेत हे स्पष्टपणे समजून येते. अर्थात हत्तींना पंख दाखवणे हे काही हिंदुस्थानी कलाकारांना अगम्य नव्हते. अमरावती इथल्या शिल्पांमधून आपल्याला पंख असलेले हत्ती शिल्पांकित केलेले बघायला मिळतात.





 

पुणे परिसरातील योग-साधना व संबंधित शिल्पे

Travels and tourism, History and culture, Archaeology, Anthropology, Folk culture, Yoga, Hindi literature, Environment, Geography, Manuscripts, Iconography etc.

आधुनिक जीवनशैलीमुळे आरोग्यसंबंधीच्या निर्माण झालेल्या अनेक समस्या तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेला ताण-तणाव, यांवरती उपाय म्हणून योगसाधनेकडे जग मोठया आशेने पाहत आहे. दैनंदिन जीवनात आरोग्य विषयीचे महत्त्व आपल्या पूर्वजांनी फार पूर्वीपासूनच ओळखले होते. यासाठी त्यांनी योगसाधनेला आपलेसे केले. अनेक ऋषी-मुनींनी योगविद्येच्या बळावर आपले व इतरांचे जीवन आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न केला. जागो-जागी असणारे सांप्रदायिक मठ तसेच गुहा-कंदरांमध्ये ही साधना चालत असे. वरचेवर यात नवनवीन प्रयोग झाल्याने ही विद्या भरभराटीस आली. कित्येक प्राचीन मंदिरांवरती शिल्पकलेच्या रुपात आपल्याला याचे पुरावे मिळतात.


अर्ध-मत्स्येंद्रासन, ब्रह्मनाथ मंदिर, पारुंडे
आपला हा प्राचीन वारसा अनेक ग्रंथ व मौखिक परंपरेने तर जपला गेला आहेच, परंतु हा एवढया पुरताच मर्यादित न राहता शिल्पकलेच्या माध्यमातूनही जोपासण्याचा प्रयत्न झाला. योगविषयीची अनेक आसने, मुद्रा, प्राणायामांचे प्रकार शिल्पबद्ध केले गेले. पुणे परिसरात व जिल्ह्यात इतरत्र अशा प्रकारची शिल्पे व अवशेष आपल्याला पहावयास मिळतात.
आज पुणे शहरातील ‘अय्यंगार योग संस्था’ तसेच लोणावळ्यातील ‘कैवल्यधाम’ व ‘लोणावळा योग संस्था’ योगविद्येच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यरत असल्या तरी, ही परंपरा पुण्यासाठी नवीन नाही. इसवीसन १७५४ ते १७७० या काळात सोमवार पेठेत बांधल्या गेलेल्या त्रिशुंड गणपती मंदिर व मठात योगविद्येची साधना केली जात असे. साधकांना योग्य प्रकारे साधना करता यावी म्हणून विशिष्ट खोल्यांची रचनाही येथे केली गेली होती. येथे ‘धुम्रपान’ नावाची एक विशिष्ट साधना होत असे. त्यामध्ये हठयोगाचे साधक स्वतःला छताला उलटे टांगून घेत व खाली निखाऱ्यामध्ये काही औषधी वनस्पती टाकल्या जात व त्यापासून निघालेला धूर ते नाकाद्वारे घेत असत. यामध्ये संभवतः दशनामी गोसावी पंथातील साधक हठयोगाची साधना करीत. येथे काही योगसाधकांच्या समाध्याही आहेत. अशा या योग-स्मारकाचे संवर्धन करून त्याचा विकास करणे अगत्याचे आहे.
पुण्यापासून साधारणतः ५४ किमी अंतरावर पिंपरी-दुमाला नावाचे गाव आहे. येथील सोमेश्वर मंदिरावर कुंडलिनी योग विषयीचे महत्त्व सांगणारे दुर्मिळ शिल्प आहे. सुमारे सातशे वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले गेले. या मंदिराच्या प्रदक्षिणामार्गावर संभवतः आदिनाथांची एक अतिशय दुर्मिळ प्रतिमा आहे. आदिनाथ अर्थात शिव. यामध्ये ते समाधिस्थ योगीच्या रुपात साकारले गेले असून ते पद्मासनात बसले आहेत. त्यांचा उजवा हात ‘सूची’ मुद्रेत आहे. सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे शिल्पकाराने त्यांच्या डोक्यावर अर्धवट उमललेले कमळ दाखविले आहे. हे कमळ योग साधनेत खूप महत्त्वाचे प्रतिक मानले जाते. मानवी शरीरात कुंडलिनीरूपाने ‘शक्ती’ सुप्त अवस्थेत असते तसेच मस्तकातील सहस्रारांत शिवाचा निवास असतो. कुंडलिनीचा प्रवास मेरुदंडाजवळील मूलाधार चक्रापासून सुरु होऊन त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धाख्य चक्र आणि आज्ञा चक्र अशा सहा चक्रांना ओलांडून सहस्रारांत संपतो. योगी ह्या कुंडलिनीरुपी शक्तीला जागृत करून सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून शक्ती व शिवाचे मिलन सहस्रारांत घडवून आणतो आणि हे सहस्रार रुपी कमळ उमलले जाते अर्थात योग्यास परमानंदमय समाधी प्राप्त होते. असे हे अनन्यसाधारण शिल्प येथील मंदिरावर कोरण्यात आले आहे. पुणे परिसरात योगसाधनेचा प्रचार-प्रसार किती मोठ्या प्रमाणात झाला होता याचे हे उत्तम उदाहरणच होय. सोमेश्वर मंदिरांवरील या शिल्पांमध्ये नाथ संप्रदायातील इतर हठयोगीही दाखविले आहेत. यामध्ये मत्स्येंद्रनाथ व गोरक्षनाथांची शिल्पे या भागात दुर्मिळच म्हणावी लागतील. योगसाधनेच्या उज्ज्वल परंपरेमध्ये पिंपरी-दुमाला येथील मंदिरावरील हठयोगाच्या महान गुरूंची शिल्पे राष्ट्रीय संपदा ठरावीत अशी आहेत.

कुंडलिनी योग संबंधीचे शिल्प, पिंपरी-दुमाला
कुंडलिनी योगाचे ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथात भरपूर विवेचन केले आहे. आळंदी येथे इंद्रायणी काठी तर ८४ सिद्धांचा मेळा भरत असे. या सिद्धांपैकी काही सिद्ध हे हठयोगी होते. ज्ञानेश्वरांच्या परंपरेतील नाथ-योग्यांच्या समाध्या आजही ज्ञानेश्वर मंदिर परिसरात पहावयास मिळतात.
पुण्यापासून साधारणतः ५४ किमी अंतरावर प्रसिद्ध असणाऱ्या प्राचिन भुलेश्वर मंदिरातही सिद्धांची बरीच शिल्पे आहेत. त्यांना पद्मासन, सिद्धासन यांसारखी विभिन्न आसने व मुद्रांमध्ये दर्शविले आहे. किंबहुना येथील एक सुंदर शिल्प विशिष्ट अशा द्विपादशिरासनात असून साधकाने यात आपल्या पाठीमागे दोन्ही पाय एकमेकांत अडकविले आहेत. 
द्विपादशिरासन/पाशिनी मुद्रा, भुलेश्वर मंदिर
जुन्नरपासून साधारणतः १० किमी अंतरावरील पारुंडे गावातील ब्रह्मनाथ मंदिराच्या खांबांवरती विविध ध्यान-धारणा व आसनातील अनेक शिल्पे कोरण्यात आली आहेत. उर्ध्व-धनुरासन, गरुडासन, नौकासन, प्रसारित-पादोत्तानासन, गोमुखासन, पाद-पश्चिमोत्तानासन, अनंतासन, अर्ध-मत्स्येन्द्रासन, क्रौंचासन अशा किती तरी आसनांचे प्रकार येथे कोरले गेले आहेत.
पाद-पश्चिमोत्तानासन, ब्रह्मनाथ मंदिर, पारुंडे
येथूनच पुढे हरिश्चंद्रगडावर प्रसिद्ध योगी चांगदेव यांनी ‘तत्त्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्यामुळे हा परिसर एकेकाळी योग साधकांच्या गर्दीने फुलून गेलेला असावा असे दिसते. अशा या दर्जेदार वारशामुळे सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रांबरोबरच योगसाधनेच्या परंपरेतही पुणे परिसर व जिल्ह्याचे महत्त्व ठळकपणे दिसून येते.
योग विद्येचे जागतिक महत्त्व ओळखून या स्थळांचे व्यवस्थितरित्या संगोपन व संवर्धन होणे गरजेचे आहे. योगसाधनेच्या परंपरेत आपणासही असा प्राचीन वारसा लाभला आहे, याचा अभिमान सर्वांनी बाळगायला हवा. या अवशेषांचे अस्तित्त्व टिकून राहणे म्हणजे आपले व आपल्या पूर्वजांचे अस्तित्त्व टिकून राहण्यासारखे आहे. हा अनमोल ठेवा नाहिसा होण्याअगोदर त्याची माहिती सर्वदूर पोहोचवून त्याचे महत्त्व जगासमोर मांडणे गरजेचे आहे. संपूर्ण विश्व योगसाधनेला जवळ करीत असताना आपणही या निमित्ताने आपल्या पूर्वजांप्रमाणे योगविद्येला अंगीकारून आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवायला हवे. आपल्या भारतीय योगपरंपरेचे हे प्राचीन दुर्मिळ पुरावे निश्चितच संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक व प्रेरक ठरतील व आपल्या पूर्वजांचे महान कार्य शिल्परूपाने बोलू लागतील.
 
 https://vijaysardehindi.blogspot.com/2020/06/travels-and-tourism-history-and-culture.html
 
 

मिथक शिल्पे – किन्नर किन्नरी

सामना ऑनलाईन

>> आशुतोष बापट

ग्रीक पुराणकथांमधील पंखधारी घोडा अर्थात पेगॅससबद्दल काही कथा आपण बघितल्या. याच पंखधारी घोडय़ाबद्दल अजून एक बाब म्हणजे कॉरिन्थच्या नाण्यांवर पंख असलेल्या पेगॅससचा छाप दिसून येतो. इ.स.पूर्व 4 थ्या शतकातील कॉरिन्थच्या चांदीच्या नाण्यावर पंखधारी पेगॅसस कोरलेला आहे. त्याच कालखंडात निर्माण झालेल्या लाम्पसॅकसच्या नाण्यांच्या मागच्या बाजूवरसुद्धा पंखधारी अश्वाचे शिल्प बघायला मिळते. म्हणजेच कलेमध्ये या पंखधारी घोडय़ाचे स्थान जसे शिल्पांमध्ये आहे तसेच ते नाण्यांवरसुद्धा दिसून येते. पंखधारी घोडय़ासारखा अजून एक चमत्कारिक प्राणी आपल्याला दिसतो तो म्हणजे पंखधारी हत्ती.

अमरावती, सांची, नागार्जुनकोंडा इथल्या उडणाऱया हत्तींची शिल्पे बुद्धजन्माच्या चमत्काराची घटना दाखवतात. या शिल्पांमधे जरी हत्तींना पंख दाखवले नसले तरीसुद्धा त्यांच्या शिल्पांवरून ते आकाशात विहार करताहेत हे स्पष्टपणे समजून येते. अर्थात हत्तींना पंख दाखवणे हे काही हिंदुस्थानी कलाकारांना अगम्य नव्हते. अमरावती इथल्या शिल्पांमधून आपल्याला पंख असलेले हत्ती शिल्पांकित केलेले बघायला मिळतात.

 हिंदुस्थानी पौराणिक कथांमधील इंद्राचा ऐरावत हा हत्ती आणि बौद्ध धर्मातला ऐरावत हे दोन्हीही हत्ती खूप उंच, अगदी स्वर्गापर्यंत भरारी घेतात असेच समजलेले आहे. याच ऐरावताच्या रूपावरून प्राचीन हिंदुस्थानी कलाकारांना हत्तींना पंख दाखवण्याची कल्पना सुचली असावी. पावर्ती सम्राटाची सात लक्षणे म्हणून जी रत्ने दाखवतात, त्यापैकी हत्ती हे एक रत्न आहे. ज्याला ‘उपोसतन श्रेणीचे’ रत्न समजले जाते. कलिंगबोधी जातकामधील राजपुत्र हत्तीवर बसून आकाशात फिरून येतो अशी कथा येते, तर वेस्संतर जातकानुसार पाऊस पाडणारा हत्ती हा एक स्वर्गीय हत्ती दाखवला असून तो उडू शकतो असे उल्लेख येतात. उडणे ही ािढया पक्ष्यांशी संबंधित असल्यामुळे शिल्पांमध्ये जमिनीवरील प्राण्याच्या शरीराला पक्ष्याचे पंख जोडलेले दाखवून तो एक उडणारा प्राणी म्हणून दाखवला जातो. हत्ती, हत्तीशास्त्र यावर ग्रंथनिर्मितीसुद्धा झालेली आहे. त्यातलाच एक ‘मातंगलीला‘ हा हत्तीशास्त्रावरील महत्त्वाचा ग्रंथ. या ग्रंथात हत्ती आणि त्यांना असलेल्या पंखांची चित्रे काढलेली आहेत. तंजावर इथल्या सरस्वती महाल ग्रंथालयात हा ग्रंथ बघायला मिळतो.

पंखधारी हत्तींनंतर एक महत्त्वाचा प्रकार आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे किन्नर आणि किन्नरी हा होय. त्यांच्याबद्दल खूप रंजक अशा कथा प्रसिद्ध आहेत.

किन्नर आणि किन्नरी

किं-नर? म्हणजे हे नर आहेत का ? किन्नर या नावातच हा प्रश्न विचारला आहे. माणसासारखे दिसणारे, पण मनुष्यप्राणी नाहीत असे हे जीव आहेत. अर्धा माणूस, अर्धा घोडा आणि पक्षी असे स्वरूप असणारे हे किन्नर. हे किन्नर यक्ष, गंधर्व या श्रेणीत मोडतात. प्राचीन हिंदुस्थानी कलेमध्ये किन्नरांचे आकर्षक शिल्पांकन केले आहे. तिथे त्यांचे दर्शन अनेकदा होते. सांची, भारहूत, अमरावती, नागार्जुनकोंडा, मथुरा इथल्या शिल्पांमधून आपल्याला बऱयाच ठिकाणी किन्नर शिल्पे दिसून येतात. अजिंठा चित्रकलेतही किन्नरांचे चित्रांकन केलेले आहे. बऱयाचदा हे किन्नर, स्तूपाच्या भोवती कोरलेले दिसतात. इथे ते स्तूपाची पूजा करताना दाखवलेले असतात. हातात फुलांचा हार किंवा हातात तबक आणि त्या तबकात फुले घेऊन ते स्तूपाच्या पूजेला जाताना दाखवतात. ते बोधीवृक्ष, धर्मपा यांच्या समवेत दिसतात, तर काही ठिकाणी ते हातात तंतुवाद्य घेतलेले दिसतात. प्राचीन हिंदुस्थानी कलेत किन्नरांचे शिल्पांकन विपुल प्रमाणात बघायला मिळते.
किन्नरींची शिल्पे ही किन्नरांच्या इतकी विपुलतेने दिसत नाहीत. किन्नरी ही सर्वसाधारणपणे किन्नरासोबतच दाखवलेली असते. अजिंठय़ाच्या चित्रकलेत किन्नर-किन्नरींची चित्रे फार सुरेख चितारलेली आहेत. अजिंठय़ाच्या भित्तीचित्रात हातात झांजा घेतलेल्या किन्नरीचे चित्र फारच लक्षवेधक आहे. विष्णुधर्मोत्तर पुराणात किन्नराचे वर्णन अर्धा माणूस आणि अर्धा घोडा असे आलेले आहे, परंतु बौद्ध धर्मीयांच्या समजुतीनुसार किन्नर म्हणजे अर्धा माणूस आणि अर्धा पक्षी होय. बोधगयेला एका यक्षाचे शिल्प आहे. तिथे त्या यक्षाचे डोके घोडय़ाचे आहे. वस्तुत ही एक किन्नरी असून जातकातील चित्रकथेनुसार तिला गंधर्व मानले गेले आहे. जातकातील नोंदीनुसार किन्नर हे परी वर्गातले असून ते नेहमी जोडीने जाताना दाखवतात. त्यातून त्यांचे एकमेकांप्रती प्रेम आणि निष्ठा दाखवली जाते. चंद किन्नर जातकात अशाच एकनिष्ठ प्रेमाचा दाखला दिलेला आहे. किन्नर हे दीर्घायुष्यासाठीदेखील प्रसिद्ध आहेत. जातकांमधून किन्नरांचे वर्णन करताना त्यांना निष्पाप आणि निरुपद्रवी दाखवतात. ते निरागसपणे पक्ष्यांसारखे उडय़ा मारतात, संगीत आणि गाण्याचे त्यांना वेड असते. किन्नरी झांजा वाजवते तर किन्नर बासरी वाजवतात. जातक 481 मध्ये या निरागस जिवांबद्दल अजून एक वर्णन आले आहे. त्यानुसार किन्नरांना पकडले जाते आणि पिंजऱयात बंदिस्त करून नजराणा म्हणून राजाला सादर केले जाते, तर जातक 504 मधे एका किन्नराचे आत्मचरित्रच वाचायला मिळते. महाकवी कालिदास आपल्या ‘कुमारसंभव’ या नाटकात किन्नरांचे वर्णन करताना म्हणतो की, यांचा अधिवास हा हिमालयात असतो, तर जातक 485 मध्ये असे सांगितले आहे की हे किन्नर पंडारक, त्रिकुटक, मल्लनगिरी, चंदपबट आणि गंधमादन या पर्वतांवरसुद्धा राहतात.
किन्नरांबद्दल अजून काही गमतीशीर गोष्टी आहेत. त्या पुढच्या भागात बघू या.
asप्ल्tदेप्.trाक्s@gस्aग्त्.म्दस्

 

मिथक शिल्पे – आकाशगामी

सामना ऑनलाईन

>> आशुतोष बापट 

मागील लेखात आपण आकाशगामी म्हणजेच व्योमचरिन् या वर्गातले प्राणी बघायला सुरुवात केली होती. या प्रकारात एकापेक्षा एक आकर्षक आणि विस्मयकारक प्राणी भरलेले आहेत. त्यातल्या ग्रिफिनपर्यंत आपण येऊन पोचलो होतो. भारतीय कलेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ग्रिफिन हे नंतरच्या काळात दिसणाऱया श्येन, गरुड आणि शुक-व्याल या संकल्पनेचे प्राथमिक रूप म्हणता येईल. भारतीय कलेत दिसणाऱया ग्रिफिनच्या शिल्पासारखेच ग्रिफिनचे एक शिल्प मिलेटस इथल्या ग्रीक देवता अपोलोच्या मंदिरातील एका स्तंभावर कोरलेले दिसते. त्याशिवाय इ.स.पूर्व 4-5 व्या शतकातील तिओस आणि थ्रेसच्या नाण्यांवरसुद्धा ग्रिफिनचे शिल्प आढळून येते.

ग्रिफिनबद्दल काही सुरस कथा प्रसिद्ध आहेत. ग्रिफिन हे जगाच्या उत्तर टोकावर हायपरबोरीयनचे शेजारी म्हणून वास्तव्याला असतात. ते सोन्याच्या खजिन्याचे राखणदार असतात. या खजिन्यावर एकच डोळा असलेल्या अरिमास्पियन्सचे लक्ष असते. ते हा खजिना चोरण्याच्या प्रयत्नात असतात. ग्रिफिन, हायपरबोरीयन आणि अपोलो यांचेसुद्धा सुरेख संबंध या कथांमधून येतात. अपोलो या ग्रीकांच्या देवतेने हायपरबोरीयनसमवेत काही काळ घालवला होता. त्यामुळे हायपरबोरीयन्स हे पवित्र समजले गेले. कालांतराने अपोलो आणि हेलीयस या सूर्यदेवतांचे एकत्रीकरण झाले किंवा अपोलोलाच पुढे हेलीयस असे संबोधले जाऊ लागले तेव्हा हे ग्रिफिन हेलीयसचे सारथी झाले होते. हेलीयसचा रथ हे ग्रिफिन आकाशमार्गे ओढून नेतात असे वर्णन अनेक कथांमधून येते.

 एखाद्या प्रांतातल्या लोकप्रिय झालेल्या लोककथा, त्यातले संदर्भ तसेच ठेवून किंवा त्यात काही जुजबी बदल करून जगाच्या विविध भागात प्रसारित होत असतात. ग्रिफिनच्या बाबतीत प्रसिद्ध असलेल्या अशाच काही कथांमधून ग्रिफिन्सचे वास्तव्य उत्तर भारतात असल्याचेही उल्लेख आलेले आहेत. उत्तर भारतात ग्रिफिन्सचे वास्तव्य होते. तिथे त्यांनी वाळवंटातून सोनेरी वाळू खणून काढली. त्यामुळे साहजिकच त्यांच्या शेजाऱयांचे त्या सोन्याच्या वाळूवर लक्ष गेले. ती वाळू त्यांना चोरायची तर होती, पण त्याच्या रक्षणासाठी बसलेले हे ग्रिफिन्स फारच उग्र आणि भयंकर होते. पण त्या शेजाऱयांना तर ती सोनेरी वाळू हवी होती. मग या ग्रिफिन्सच्या शेजाऱयांनी सोनेरी वाळू चोरण्यासाठी एक शक्कल लढवली. त्यांनी ग्रिफिन्सना आवर्जून खायला आणून दिले आणि जेव्हा ग्रिफिन्स खाण्यात व्यग्र होते, तेव्हा त्यांनी ती सोनेरी वाळू चोरून नेली.

पंखधारी हरीण किंवा काळवीट

पंखधारी हरीण किंवा काळविटाची दोन शिल्पे आपल्याला सांचीला दिसतात. सांची स्तुपाच्या उत्तर तोरणावर पाठीला पाठ लावून बसलेल्या या दोन पंखधारी हरणांचे शिल्प आहे. टोकदार शिंगे असलेल्या या हरणांनी आपले पंख उंचावलेले आहेत. अतिशय मोहक आणि आकर्षक असे हे शिल्प आहे. यांनाच पुढे हरीण-व्याल म्हणून संबोधले जाऊ लागले. याच तोरणाच्या मागच्या बाजूवर पंखधारी काळविटाचे एकमेव शिल्प आहे. यालासुद्धा हरीण-व्याल असेच म्हणतात. सांचीसारखेच अमरावती आणि मथुरा इथे आपल्याला पंखधारी हरीण (हरीण-व्याल) शिल्पांकित केलेले दिसून येतात.

पंखधारी घोडा 

उडणारे घोडे किंवा पंख असलेल्या घोडय़ाचे उल्लेख भारतीय आणि परकीय साहित्यातून जरी विपुल प्रमाणात दिसत असले, तरी त्या मानाने त्यांचे कलेमध्ये शिल्पांकन फारच थोडे दिसते. अशी शिल्पे दुर्मीळच म्हणायला हवीत. मात्र एक सुंदर शिल्प आपल्याला सांची स्तुपाच्या कठडय़ावर दिसते आणि दुसरे शिल्प अमरावती कलेमधे दिसून येते. हिंदू पौराणिक कथांमधून दिसणारा ‘उच्चैश्रवा’ नावाचा घोडा, हा या पंखधारी घोडय़ाचे मूळ रूप असण्याची शक्यता आहे.

बौद्ध साहित्यात बर्याच जातक कथा आहेत. या कथांमधून गौतम बुद्धाचे पूर्वीचे जन्म आणि त्यात त्याने समाजासाठी केलेले योगदान सांगितलेले असते. त्या जातक कथांच्या विषयानुसार त्यांना विविध नावे दिलेली आहेत. अशाच एका ‘वलहंस जातका’त या पंखधारी घोडय़ाचा उल्लेख येतो. या घोडय़ाचा संदर्भ बौद्ध संकल्पनेतील एका रत्नाशी आहे. तो असा की, बौद्ध संकल्पनेनुसार चक्रवर्तीपदाची काही लक्षणे आहेत. ज्यानुसार चक्रवर्ती हा सप्त रत्नांनी सुशोभित केलेला असतो. म्हणजेच त्याच्या बाजूने सात रत्ने दाखवलेली असतात. त्यातील एक रत्न म्हणजे वलह श्रेणीतला एक घोडा असतो. आणि म्हणून हा घोडा या जातककथेत दिसून येतो. या जातककथेनुसार हा घोडा, ‘विदुरपंडित’ जातकातल्या पुणक यक्षासारखा आकाशात उडू शकतो. बहुदा या कथांमधून आलेल्या उडणाऱया घोडय़ांच्या कल्पनेवरून, शिल्पकारांना प्रेरणा मिळाली असावी आणि म्हणून त्यांनी पुढे अशा उडणाऱया घोडय़ांची शिल्पे निर्माण केली असावीत.

ग्रीक पुराणकथांमधूनही उडणाऱया घोडय़ाचे उल्लेख येतात. तिथे पेगॅसस नावाच्या पंख असलेल्या घोडय़ाची कथा आहे. पॉसिडॉनचा मुलगा असलेला हा पेगॅसस. या पेगॅससचा एका पाण्याच्या झऱयाशी संबंध आलेला आहे. त्याच्या जन्माची कथा मोठी रंजक आहे. त्याच्या आईचे डोके पर्सियसने कापले. त्यानंतर तिच्या रक्तबंबाळ शरीरातून हा पेगॅसस जोरदार उसळी मारून बाहेर पडला. तो फारच उत्तेजित झालेला होता. जन्माला आल्यावर त्याने आकाशात उंच झेप घेतली. तो पहिल्यांदा जिथे विश्रांतीसाठी थांबला ते ठिकाण म्हणजे कॉरीन्थचे एक्रोपोलीस होते. नंतर तो जेव्हा पेरेनाच्या कारंज्यापाशी पाणी पिण्यासाठी थांबला तेव्हा अथेन आणि पॉसिडॉनच्या मर्जीने बेलेरोफोन याने पेगॅससला शांत केले आणि तो त्याच्यावर स्वार झाला. याच पेगॅससवर आरूढ होऊन बेलेरोफोनने युद्धात मोठमोठे विजय मिळवले. चिमेरावर मिळवलेला विजय हा त्यातल्याच एक होय. पुढे पेगॅससने त्याच्या बेलेरोफोन या स्वाराला धुडकावून लावले आणि तो उंच उंच उडत पार स्वर्गात गेला. तिथे त्याने झ्यूसबरोबर वास्तव्य केले. वीज आणि ढगांचा गडगडाट आणण्याच्या कामात त्याने झ्यूसला मोलाची मदत केली. काही लेखकांनी पेगॅससला इरॉस किंवा म्युझेसचा अश्व म्हणून संबोधले आहे. पेगॅससने ज्या ठिकाणी हेलीकॉनला आपल्या खुराने मारले, त्या ठिकाणी पाण्याचा झरा उत्पन्न झाला. ज्याला ‘अश्वाचा झरा’ असे नाव पडले. ट्रोजनजवळ असलेला हिप्पोक्रीन नावाचा झरा आणि अक्रोकोरीन्थस जवळचा पिरेन झरा यांच्या उत्पत्तीची कथासुद्धा अशीच सांगितली जाते.

ashutosh.treks@gmail.com

 
 

मिथकशिल्पांचे प्रकार

सामना ऑनलाईन

>> आशुतोष बापट

आपण बघितले की, के. कृष्णमूर्तींनी त्यांच्या पुस्तकात हे इहामृग, व्याल किंवा जे काल्पनिक प्राणी वर्णन करून सांगितले आहेत, ते साधारणत तीन प्रकारांत विभागले आहेत. आकाशगामी प्राणी (व्योमचरिन्), जमिनीवरचे प्राणी (भूचरिन्) आणि पाण्यातले प्राणी (जलचरिन्). काल्पनिक प्राणी चित्रित किंवा शिल्पांकित करताना त्या प्राण्यांना दाखवलेल्या विशिष्ट अवयवांवरून त्यांचे वर्गीकरण तीन प्रकारांत केलेले आहे. मूलत तो प्राणी कोण आणि त्याला कुठले अवयव जोडले आहेत याचा विचार करून हे प्रकार ढोबळमानाने ठरवले गेले आहेत. प्राणी कुठल्या गटात बसतो वगैरे तांत्रिक बाबी सोडल्या जरी असल्या तरी यातली नाटय़मयता, प्राण्यांचे नवीन रूप, काही प्राण्यांचे परकीय कलेशी असलेले साधर्म्य यांचा ऊहापोह के. कृष्णमूर्तींनी केलेला आहे. या तीन वर्गीकरणांतला पहिला प्रकार आहे तो आकाशात उडणारे प्राणी. त्यांना ‘व्योमचरिन्’ असे म्हटले आहे.

आकाशगामी (व्योमचरिन्) – आकाशगामी म्हटले की, साहजिकच उडणे ही क्रिया अपेक्षित आहे आणि उडणे या क्रियेशी जोडला गेलेला अवयव म्हणजे पंख. त्यामुळे प्राणी जरी संमिश्र असला तरी त्याला पंख दाखवले की, तो उडणारा आहे हे लगेच समजून येते. ‘आकाशगामी’ या नावातच स्पष्ट होतं की, असे संयुक्त, काल्पनिक प्राणी (व्याल) ज्यांना पंख दाखवलेले असतील, त्यामुळे या प्रकारात जे प्राणी समाविष्ट केले आहेत त्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे बघता येतील. यामध्ये पंखधारी सिंह, पंखधारी आणि शिंग असलेले सिंह, ग्रिफिन म्हणजे पंखधारी गरुडरूपी सिंह, पंखधारी हरीण, काळवीट, पंखधारी घोडे, पंखधारी हत्ती, किन्नर आणि किन्नरी, पंखधारी आणि हत्तीमुखी बैल म्हणजे पंखधारी गरुडरूपी सिंह, पंखधारी पाणमांजर, पंखधारी बकरी, सिंहमुखी कोंबडा, पंखधारी आणि सिंहाचे शरीर असलेले पुरुष आणि स्त्राr, पाच फणे असलेला नाग आणि गरुड, पक्ष्याचे शरीर असलेली स्त्राr. एवढय़ा विविधतेचे प्राणी आपल्याला ‘आकाशगामी’ म्हणजे ‘व्योमचरिन्’ या श्रेणीमध्ये सापडतात. या प्राण्यांचे शिल्पांकन किंवा चित्रांकन कुठे केलेले आहे तेसुद्धा बघू या.

 पंखधारी सिंह – पंखधारी सिंह दाखवताना सिंहाच्या पुढच्या पायाच्या बाजूने बाहेर आलेले पंख दाखवलेले असतात. त्यामुळे हे जणू आकाशातून विहार करणारे कुणी राक्षसच असावेत असा बघणाऱयाला भास होतो. हे पंखधारी सिंह शक्यतो कुठल्या तरी खांबांच्या शीर्षस्थानी कोरलेले असतात. शीर्षस्थानी कोरल्यामुळे उंचावर असलेले त्यांचे अस्तित्व ते प्राणी आकाशगामी असल्याचे दर्शवतात. अशा उंचावर कोरल्यामुळे या प्रजातीचे वास्तव्य अंतरिक्षात असते असे शिल्पकाराला ठळकपणे दाखवून द्यायचे असते. शिल्पकलेमधे पंखधारी सिंह हा बऱयाच ठिकाणी आढळतो. त्यातही विशेषकरून बघायचे झाल्यास सांची इथले शिल्प, भारहूत, अमरावती, नागार्जुनकोंडा, मथुरा इथली शिल्पे आपल्याला प्रामुख्याने विचारात घ्यावी लागतील. यातही एक आश्चर्यकारक गोष्ट दिसून येते ती म्हणजे वाकाटक-गुप्त काळात हा प्रकार कलाकारांमध्ये फारसा लोकप्रिय नव्हता असे दिसते. कारण या काळातील अजिंठा लेण्यांमधील चित्रकलेत असे पंखधारी सिंह कुठेही दिसत नाहीत. तस गांधार कलेच्या कलाकारांनीसुद्धा यांचे शिल्पांकन आपल्या शिल्पकलेत केलेले दिसत नाही.

हिंदुस्थानी साहित्यात याचा उल्लेख ‘वाल्मीकी रामायणा’त ‘सिंहा: पक्षगम:’ असा केलेला आहे (रामायण, किष्किंधा 42, 16) त्या उल्लेखानुसार या पंखधारी सिंहांचे वास्तव्य जिथे सिंधू नदी समुद्राला मिळते त्या ठिकाणी असलेल्या सोमगिरी पर्वतावर होते. या स्थानाला पश्चिम दिशेचे टोक म्हणजे शेवटचे स्थान असे म्हटलेले आहे. यावरून असाही एक अंदाज बांधता येतो की, लेखकाने इराण, मेसोपोटेमिया इथल्या पारंपरिक कलाकृतींच्या पार्श्वभूमीवर हे लेखन केले असावे. कारण त्या प्रदेशात अशा अजस्र आकाराची शिल्पनिर्मिती केली जात असे. या शिल्पकृतींच्या कथा त्या देशांतून समुद्रमार्गे येणारे व्यापारी आणि प्रवासी यांच्याकडून लेखकाने ऐकलेल्या असणार आणि त्यानुसार त्याने आपल्या लिखाणात त्यांचा उल्लेख केलेला असणार. याचेच काही नमुने एका उत्खननात सापडले आहेत. इ.स.पूर्व 5 व्या शतकातल्या अॅकिमेनिड काळातला तो नमुना आहे. इकबाटन इथे झालेल्या उत्खननात काही सोन्याची भांडी मिळाली, ज्यावर पंखधारी सिंहाचे शिल्प कोरलेले सापडले. हमादान इथल्या उत्खननात कपडय़ावर लावायच्या सोन्याच्या बटणाच्या रूपात पंखधारी सिंह सापडले. तसेच पर्सिपोलीस इथल्या उत्खननात तलवारीच्या म्यानावर पंखधारी सिंहाची आकृती कोरलेली मिळाली.

पंखधारी शिंग असलेला सिंह – प्राचीन हिंदुस्थानी मूर्तींमध्ये अशा प्रकारच्या सिंहाचे शिल्प अगदी क्वचितच आढळते, पण जी शिल्पे उपलब्ध आहेत, त्यातले सर्वात सुंदर असे शिल्प सांची इथे आहे. पंखधारी, शिंग असलेला हा सिंह असून त्याच्या पाठीवर एक स्वार बसला आहे. त्या स्वाराने हातात लगाम धरलेला दाखवलेला आहे. काहीसा उग्र दिसणारा हा प्राणी आपल्याला सांची इथे बघायला मिळतो. याच्या तुलनेत अमरावती आणि नागार्जुनकोंडा इथे असलेले पंखधारी शिंग असलेले सिंहाचे शिल्प अगदीच साधे आहे.

ग्रिफिन (पंखधारी गरुडरूपी सिंह)
सिंहाचे शरीर, गरुडाची किंवा पोपटाची चोच आणि गरुडाचे पंख असलेला हा संमिश्र प्राणी. या प्राण्यांचे शिल्पांकन आपल्याला सांची इथे बऱयाच प्रमाणावर आढळते. चारही पाय दुमडून बसलेला हा प्राणी आपले पंख फुलवून मागे वळून बघतो आहे असे हे शिल्प. इथे सिंहाची आयाळ ठसठशीतपणे दाखवलेली आहे. सांची स्तूपाच्या पश्चिम तोरणावर समोरच्या बाजूला एकतर मागच्या बाजूला दोघे पाठीला पाठ लावून बसलेले ग्रिफिन आपल्याला दिसतात. इथेच 2 ाढमांकाच्या स्तूपाच्या कठडय़ावर अशा ग्रिफिनचे शिल्पांकन केलेले आहे. अशाच प्रकारचा एक ग्रिफिन मथुरा कलेमध्येसुद्धा बघायला मिळतो.

हिंदुस्थानी कलेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ग्रिफिन हे नंतरच्या काळात दिसणाऱया श्येन, गरुड आणि शुक-व्याल या संकल्पनेचे प्राथमिक रूप म्हणता येईल. या ग्रिफिनच्या काही सुरस कथा आहेत. त्या पुढच्या भागात बघू या.

 

मिथक शिल्पे – शिल्प आणि चित्रांचा संदर्भ

सामना ऑनलाईन

>> आशुतोष बापट

साहित्यातील संदर्भ पाहिल्यानंतर आपण या काल्पनिक विश्वातील प्राण्यांचे अजून कुठे कुठे संदर्भ येतात हे शोधायला गेलो की, अर्थातच कलेमध्ये त्याचे पडलेले प्रतिबिंब स्पष्ट दिसून येते. मुळात साहित्यात जे संदर्भ आले आहेत त्याचे रूपांतर कलेत होणे हे अगदी क्रमप्राप्तच आहे म्हणा. ‘मिथीकल अॅनिमल्स इन इंडियन आर्ट’ या आपल्या पुस्तकात श्री. के. कृष्णमूर्ती यांनी या संकल्पनेचा सगळा ऐतिहासिक आढावा घेतलेला आहे. त्या पुस्तकावर आधारित असलेले आणि अजून बरेच निरनिराळे संदर्भ जोडून प्रसाद प्रकाशनाने ‘मिथक शिल्पे’ हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकात के. कृष्णमूर्ती यांनी विचारात घेतलेली ‘इहामृग’ ही संकल्पना, त्याचे कलेत पडलेले प्रतिबिंब हे मांडले आहेच, पण त्याशिवाय श्री. ढाकी यांनी पुढे मांडलेली ‘व्याल’ ही संकल्पना आणि त्याचे हिंदुस्थानी कलेत दिसणारे रूप याचासुद्धा विचार केला आहे. तसेच के. कृष्णमूर्ती यांनी सांची, अमरावती, नागार्जुनकोंडा इथली शिल्पे आणि अजिंठा लेणीतील भित्तिचित्रे यांचाच समावेश त्यांच्या पुस्तकात केला आहे. मात्र मराठी पुस्तकात विविध लेण्यांमध्ये दिसणारे हे काल्पनिक प्राणी आणि पुढे मंदिरांवर विपुल प्रमाणावर दिसणाऱया व्याल प्रतिमा यांचासुद्धा समावेश केलेला आहे.

के. कृष्णमूर्ती यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे की, त्यांनी फक्त इ.स.च्या 6व्या शतकापर्यंतचा कालावधी लक्षात घेऊन त्या कालावधीत आढळणारी मिथक शिल्पे विचारात घेतली आहेत. कारण पुढे श्री. ढाकी यांनी ‘व्याल’ ही संकल्पना त्यांच्या पुस्तकातून विस्तृतपणे उलगडून दाखवली. त्यांनी ‘द व्याल फिगर्स ऑन द मेडिएव्हल टेंपल्स ऑफ इंडिया’ या त्यांच्या पुस्तकात ‘व्याल’ या संकल्पनेबद्दल खूप सखोल अभ्यास मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अंदाजे इ.स.च्या 4थ्या शतकापासून ‘व्याल’ ही संकल्पना विकसित झाल्याचे दिसून येते.

 वर म्हटल्याप्रमाणे श्री. के. कृष्णमूर्ती यांनी इहामृगाचे कलेतील संदर्भ शोधण्यासाठी भारहूत, सांची, अमरावती, नागार्जुनकोंडा, मथुरा आणि गांधार इथली शिल्पे आणि अजिंठा लेण्यांतली चित्रे यांचा विचार इथे केला आहे. हिंदुस्थानी कलेवर परदेशी कलेचा किती प्रभाव पडतो हेसुद्धा इथे दिसून येते. शिल्पातून दिसणारे हे इहामृग म्हणजे कलाकारांच्या अफलातून कल्पनाशक्तीतून निर्माण झालेला एक सुंदर कलाविष्कार आहे. प्राचीन कलेत अशा काल्पनिक किंवा पौराणिक प्राण्यांची विविधता फार मोठी आहे. ते प्राणी किती आहेत आणि कोणकोणते आहेत याची एक झलक बघायची म्हटली तर आपल्या समोर कलेचे एक मोठे दालनच उघडले जाते. ज्यात पंख असलेला सिंह, चोच असलेला सिंह, शिंग असलेला सिंह, किन्नर-किन्नरी, चेहरा माणसाचा आणि शरीर सिंहाचे किंवा हत्तीचे असा प्राणी, अर्धा माणूस आणि अर्धा घोडा, हत्तीचे तोंड असलेला माणूस, बकरीचे तोंड असलेला माणूस, सिंह-मगर-माशाची शेपूट असा संयुक्त प्राणी, पंख असलेले हरीण, पंख असलेला बैल, हत्तीचे तोंड आणि पंख असलेला बैल, पंख असलेली बकरी, गरुडाचे शरीर आणि पंख असलेला पुरुष किंवा स्त्री, नरसिंह आणि त्याला पंख, सिंह-मगर, हत्ती-मासा, हरणाला माशाची शेपूट, बकरीला माशाची शेपूट, हत्तीला विंचवाची शेपूट, सिंहाचे पंजे असलेला बैल आणि त्याला माशाची शेपूट, माशाची शेपूट असणारी जलपरी, घोडय़ाचे तोंड असलेला समुद्री मासा ज्याला हॉर्सफिश असे म्हणतात, पंख असलेली बकरी आणि तिला माशाची शेपूट असे अक्षरश अगणित व्याल प्रकार आपल्या प्राचीन हिंदुस्थानी कलेत दिसून येतात.

या काल्पनिक संमिश्र प्राण्यांबद्दल कलाकारांच्या मनात काय कमालीचे आकर्षण होते आणि त्याचबरोबर त्यांच्या कल्पनाशक्तीची झेप किती अफाट होती हे यावरून दिसून येते. कुठल्याही दोन भिन्न प्राण्यांच्या शरीराचे विशिष्ट भाग एकत्र करून एक नवीनच प्राणी सादर करायचा असा जणू छंदच त्यांना जडला होता. या संकल्पनेचे कलेमध्ये सादरीकरण करताना या कलाकारांची कल्पनाशक्ती किती अचाट होती याची जाणीव, हे सगळे व्याल बघताना आपल्याला प्रकर्षाने होते. हे सगळे इतक्या मोठय़ा संख्येने असलेले आणि विविध प्रकारचे प्राणी आपल्यासमोर सांगताना त्यांची वैशिष्टय़ानुसार निरनिराळ्या गटात विभागणी केली आहे. हे एवढे सगळे विविध प्रकार एकत्र करताना त्यांची काही वैशिष्टय़े लक्षात घेऊन ती इथे सादर केली आहेत. त्यांचे अवयव किंवा कुठल्या प्राण्याचे अवयव त्यांना जोडले आहेत हे विचारात घेऊन त्यांचे साधारण वर्गीकरण केले आहे. के. कृष्णमूर्तींनी त्यांच्या पुस्तकात हे इहामृग किंवा व्याल मांडताना ते साधारणत तीन प्रकारांत विभागले आहेत. आकाशगामी प्राणी (व्योमचरिन्), जमिनीवरचे प्राणी (भूचरिन्), आणि पाण्यातले प्राणी (जलचरिन्) असे हे तीन प्रकार होत. या प्राण्यांना दाखवलेल्या विशिष्ट अवयवांमुळे त्यांचे वर्गीकरण अशा तीन प्रकारांत केलेले आहे. यातले काही प्राणी दोन गटांतसुद्धा मोडतात. मूलत तो प्राणी कोण आहे आणि मग त्याला कुठले अवयव जोडले आहेत याचा विचार इथे केला आहे. मूलत तो प्राणी जर जमिनीवरचा असेल आणि त्याला पंख जोडले असतील तर त्याचा समावेश आकाशगामी प्राण्यात केला आहे. त्याचे बदललेले रूप कोणते आहे यावर तो कुठल्या गटात बसतो हे ठरवले आहे. या काही तांत्रिक बाबी जरी असल्या तरी यातली नाटय़मयता, त्या प्राण्यांचे नवीन तयार झालेले रूप, त्यातल्या काही प्राण्यांचे परकीय कलेशी असलेले साधर्म्य किंवा पूर्णपणे परदेशी कलेतच त्यांचा असलेला आढळ यांचा ऊहापोह त्या त्या वेळी केलेला आहे. के. कृष्णमूर्तींनी तर अनेक प्राण्यांच्या कथा, लोककथा यांचे खूप रंजक वर्णन केले आहे. यातल्या प्रत्येक प्रकारातील गमतीशीर प्राणी आपण इथे बघणार आहोत.

ashutosh.treks@gmail.com

 

मिथक शिल्पे – इहामृग

सामना ऑनलाईन

>> आशुतोष बापट

मिथक शिल्पे म्हणजे प्राणी वा पक्ष्यांचे एकत्रीकरण किंवा त्यांचे संमिश्र रूप. थोडक्यात काय तर एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया प्राण्याचे शरीर अशी संयुक्त रचना करून तयार केलेली शिल्पे. अशी शिल्पे आपल्याला फार प्राचीन काळापासून भारतीय कलेमधे दिसून येतात. या प्रकाराला सरसकट ‘व्याल’ असे सध्या जरी म्हणत असले तरी ‘व्याल’ हा शब्द इ.स.च्या साधारण 6 व्या शतकानंतर वापरला जाऊ लागला. संयुक्त प्राणी ज्याला इंग्रजीत ‘मिथीकल अॅनिमल’ असं म्हटलं गेलं आहे. हे अशा प्रकारचे काल्पनिक प्राणी कलेत दाखवणे ही कलाकाराच्या कल्पनाशक्तीची उत्तुंग भरारी म्हणावी लागेल. कलाकारांच्या या कल्पनाशक्तीला जोड मिळाली ती या प्राण्यांच्या साहित्यातून येणाऱया वर्णनांची आणि त्याचबरोबर परकीय कलेच्या प्रभावाची. भारतीय कलेमध्ये अशा संयुक्त प्राण्यांच्या वापराचे संदर्भ आपल्याला अगदी प्राचीन साहित्यातून मिळतात. साहित्यात अशा प्राण्यांना ‘इहामृग’ असे म्हटले गेले आहे.

‘इहामृग’ याचा शब्दश अर्थ ‘इच्छाधारी हरीण’ असा होतो किंवा त्याचा अर्थ एक काळवीट असा आहे. मात्र ‘इहामृग’ हा शब्द काही विशिष्ट हेतूनेच वापरला जातो. काही प्राचीन साहित्यात काही ठिकाणी असेही उल्लेख सापडतात की, माणसाचा तोंडावळा हा कुठल्या तरी प्राण्याच्या किंवा पक्ष्याच्या रूपाशी साम्य दाखवतो. मग यातूनच पुढे माणसाचे शरीर आणि कुठल्याशा प्राण्याचे किंवा पक्ष्याचे तोंड असलेला प्राणी दाखवणे किंवा दोन भिन्न प्राण्यांचे एकत्रीकरण करून एखादी काल्पनिक कलाकृती करणे हे कसब कलाकारांनी साधले. यालाच पुढे ‘इहामृग’ असे म्हणू लागले. थोडक्यात काय तर ‘इहामृग’ म्हणजे कलाकाराच्या डोक्यातून आलेली कुठल्याशा संमिश्र प्राण्याची एक विलक्षण काल्पनिक प्रतिमा होय.

 साहित्यातले संदर्भ

प्राचीन भारतीय साहित्यात इहामृगाचे खूप संदर्भ सापडतात. या संदर्भांचे धागेदोरे अगदी ऋग्वेदापर्यंत गेलेले आहेत. ऋग्वेदात ‘इहामृग’ असा शब्द येत नाही, तर ‘यातु’ असा शब्द आहे. उलुकयातु म्हणजे घुबड, स्वयातु म्हणजे कुत्रा, कोकायातु म्हणजे कोकिळा, सुपर्णयातु म्हणजे गरुड तर गृध्रयातु म्हणजे गिधाड. ऋग्वेदात या सगळ्यांचा इंद्राशी संबंध जोडलेला दिसतो. ऋग्वेदात इंद्राला ‘नृयातु’ असा शब्द आहे.

माणसाचे शरीर आणि प्राण्याचे शरीर हे अर्थातच भिन्न-भिन्न साच्यांतून तयार झालेले आहे. या दोन भिन्न साच्यांच्या एकत्रीकरणातून म्हणा किंवा दोन भिन्न गोष्टींच्या संयोगातून काही काल्पनिक प्रकार उदयाला आले. कलेमध्ये असे एकत्रीकरण दाखवण्याची कल्पना हळूहळू विकसित होत गेली आणि त्यातूनच गणपती, हयग्रीव, हनुमान, वृक्षकपी, नृसिंह, नृवराह असे निरनिराळे आकार, आकृतिबंध किंवा प्रारूपे विकसित होत गेली. ऋग्वेदात अशा काही चमत्कारिक प्रारूपांचे किंवा आकृतिबंधांचे संदर्भ आलेले आहेत. जसे की चार शिंगे, दोन डोकी, तीन पाय, सात हात असलेला बैल दिसतो. तिथे त्याला ‘अग्नी’ असे संबोधले गेले आहे. तसंच ऋग्वेदात कुणा चार शिंगांच्या रेडय़ाचेसुद्धा वर्णन येते. अथर्ववेदात दहा डोकी असलेल्या ब्राह्मणाचा उल्लेख येतो. ‘दशशीर्ष दस्य’ असे त्याला म्हटलेले आहे, तर ‘शतपथ ब्राह्मणा’त दहा डोक्यांचे वासरू आणि दोन तोंडांचा गरुड यांचा उल्लेख आलेला आहे. हे सगळे प्रकार ‘इहामृग’ या संकल्पनेत गणले गेलेले आहेत. थोडक्यात काय तर प्राचीन काळी कुठल्याही अद्भुत किंवा चमत्कारिक प्राण्याला ‘इहामृग’ म्हणत असत असं दिसतं.

‘वाल्मीकी रामायणा’त इहामृगाचं चित्रमय वर्णन येते. त्यातील उल्लेखानुसार या इहामृगांचे शिल्पांकन अत्यंत सुबकतेने राजवाडय़ाच्या खांबांवर कोरलेले आहे. मात्र हे आकृतिबंध त्या खांबांवर नक्की कुठे आणि कशा प्रकारे कोरले होते याबद्दल रामायण काही बोलत नाही. त्यामुळे हे इहामृगांचे कोरीवकाम नेमके कुठे केले असेल याबद्दल निव्वळ अंदाजच बांधावा लागतो. वरील उल्लेख रामायणाच्या ‘सुंदरकांडा’त काही ठिकाणी आलेले आहेत. महाभारतातसुद्धा इहामृगासंबंधी काही संकल्पना येतात. ‘मीनवजी’ किंवा ‘गजवक्रतजश’ अशा नावाने येणारे ते उल्लेख होत (इशानाम गजवत्रानाम मुलुकानाम ततैवच मीनवाजी स्वरूपानाम). याचा अर्थ हत्तीचे किंवा घुबडाचे डोके असलेले मासे ‘मत्स्यअश्व’ या कल्पनेशी जवळीक दाखवतात.

वैदिक साहित्य किंवा रामायण, महाभारतासारखी महाकाव्ये यातून ‘इहामृग‘ ही संकल्पना कशी डोकावते, याचे थोडे थोडे विस्कळीत का होईना, पण काही संदर्भ आणि त्याची उदाहरणे आपल्याला दिसतात. यावरून ही संकल्पना तत्कालीन कलाकारांना माहिती तर होतीच, शिवाय ती त्यांच्या आवडीचीही असावी हे म्हणायला जागा आहे.

 ashutosh.treks@gmail.com

 
 

मिथकशिल्पे – भारतीय कलेतील पौराणिक प्राणी

सामना ऑनलाईन

>> आशुतोष बापट

प्राचीन भारतीय मंदिरे, लेणी हे आपले स्थापत्य वैभव. आपल्या पूर्वसुरींनी निर्माण केलेले हे स्थापत्य आज आपल्याला त्यांच्या कर्तृत्वाची, सामर्थ्याची आणि वैभवाची गाथा सांगतात. मंदिरे, मूर्ती, मंदिरांची रचना, त्यांचे स्थापत्य अशा अनेक विषयांवर विविध अभ्यासकांनी विपुल लेखन केले आहे. मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्र हा विषयच मुळी असा आहे की, त्यावर विविधांगांनी अभ्यास करता येतो. त्यावर लेखन करता येते आणि मग त्यातले निरनिराळे पैलू उलगडून दाखवता येतात. मंदिर हे केवळ त्या देवाचे निवासस्थान न राहता ती एक सामाजिक संस्था होऊन जाते. समाजात घडणाऱया विविध गोष्टींचे प्रतिबिंब मंदिरांवर निरनिराळ्या शिल्पांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळते. मग कधी ही शिल्पे युद्धाची असतात, कधी माणसाच्या दैनंदिन जीवनात घडणाऱया प्रसंगांची असतात, कधी देवदेवतांची असतात, तर कधी कामशिल्पेसुद्धा मंदिरावर कोरलेली आढळतात. या प्रत्येक शिल्पाच्या तिथे असण्याला काहीतरी अर्थ असतो, त्याचे काहीना काही प्रयोजन असते. उगाचच जागा आहे म्हणून कुठलेसे शिल्प मंदिरावर कोरले आहे असे अजिबात होत नाही. मग त्या शिल्पामागे कुठलीशी पौराणिक कथा असेल, त्या-त्या विशिष्ट देवतेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्या देवतेचे सामर्थ्य दाखवणारी ती शिल्पे असतील किंवा कुठल्या तत्त्वज्ञानाची ओळख त्या विशिष्ट शिल्पाच्या माध्यमातून करून दिलेली असेल. प्रत्येक शिल्प हे काहीतरी प्रयोजन घेऊनच मंदिरावर विराजमान झालेले असते. त्यामुळे या शिल्पांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर विविधता दिसून येते. त्यांचे विषय वेगळे, त्यांची शैली वेगळी, त्यांची तऱ्हाच निराळी.

मंदिरांवर, लेणींमध्ये किंवा विविध स्थापत्यावर दिसणाऱया विविध शिल्पांमध्ये प्राणी आणि पक्ष्यांचे शिल्पांकन बघायला मिळते आणि यातसुद्धा संमिश्र प्राणी आणि पक्षी कोरलेले जेव्हा दिसून येतात तेव्हा ते बघून नक्कीच आश्चर्य वाटते. काय प्रयोजन असेल असे संमिश्र प्राणी-पक्षी इथे कोरण्याचे हे समजून येत नाही. वाघ, सिंह, मोर, गरुड, नंदी असे प्राणी आपण समजू शकतो. विविध देवतांची ती वाहने म्हणूनसुद्धा त्यांचे शिल्पांकन मंदिरावर केलेले आढळते. मात्र कधी कधी माणसाचे तोंड आणि सिंहाचे शरीर किंवा शिंग असलेला सिंह आणि पंख असलेला बैल असे जेव्हा शिल्पांकन केलेले दिसते तेव्हा मात्र यामागचे कारण काय असेल ते समजत नाही. ही शिल्पे उगाचच कोरली असतील का? की ही शिल्पे म्हणजे कलाकारांचा निव्वळ कल्पनाविलास असेल? फक्त भारतातच अशी शिल्पकला दिसून येते की जगभर हा प्रकार दिसतो? अशा संमिश्र शिल्पांना काय म्हणतात? यांचे संदर्भ कुठे साहित्यात म्हणा किंवा शास्त्रग्रंथात दिसून येतात का? असे असंख्य प्रश्न आपल्या समोर येऊन उभे राहतात आणि मग त्या प्रश्नांची उत्तरे शोधायला गेलो की, एकेक सुंदर आणि आश्चर्यकारक गोष्टी समोर येऊ लागतात. शिल्पकलेतील एक निराळेच दालन आपल्या समोर उघडले जाते. थक्क करणाऱया विविध कथा समोर येतात आणि मग आपण शिल्पकलेतील या रंजकतेचा मागोवा घेऊ लागतो. संमिश्र प्राणी, काल्पनिक प्राणी किंवा पौराणिक प्राणी अशी विविध नावे घेऊन ही शिल्पे आपल्या समोर येतात आणि त्यांचे अंतरंग उलगडू लागतात.

 या लेखमालेत आपण मंदिरांवर, लेणींमध्ये आणि विविध स्थापत्यांवर कोरलेले पौराणिक प्राणी किंवा काल्पनिक संमिश्र प्राणी यांची माहिती घेणार आहोत. इंग्रजीत या प्राण्यांना ‘मिथिकल अॅनिमल’ असे संबोधले जाते. याचा शब्दश अर्थ ‘पौराणिक प्राणी’ असा होतो. मात्र याचा पौराणिक प्राण्यांबरोबरच काल्पनिक प्राणी असाही उल्लेख असायला हवा. कारण महाकाव्ये, पुराणे यातून उल्लेख आलेले हे प्राणी मुळात काल्पनिक आहेत. माणसाच्या कल्पनाविलासातून त्यांची निर्मिती झाली आहे. साहित्यात त्यांची निर्मिती होताना मुख्यत्वे दोन विविध प्राण्यांचे एकत्रीकरण करून एखाद्या प्राण्याचे चित्रण केले गेले आहे. एका प्राण्याचे डोके आणि दुसऱया प्राण्याचे धड यांच्या एकत्रीकरणातून असे प्राणी कल्पिले गेले.

प्राचीन भारतीय कलेचा अभ्यास करताना, विशेषत शिल्पकला आणि चित्रकला या कला विविध विषयांनी, देवदेवतांच्या कथांनी आणि त्यावर आधारित शिल्पांनी, पानाफुलांच्या सजावटींनी बहरलेल्या दिसतात. याशिवाय विविध पशुपक्षी यांचाही इथे समावेश होतो. या लेखमालेचा विषय हा प्राचीन भारतीय कलेत दिसणाऱया पशुपक्ष्यांशीच निगडित आहे. जरी हा विषय भारतीय कलेत दिसणाऱया पशुपक्ष्यांसंबंधी असला तरी इथे पशुपक्ष्यांचे निव्वळ वर्णन नसून, निरनिराळ्या पशुपक्ष्यांचे एकत्रीकरण करून तयार झालेले विलक्षण, मोहक असे काल्पनिक प्राणिविश्व आणि त्यांच्यामुळे बहरलेली भारतीय कला दाखवण्याचा प्रयत्न या लेखमालेत केला आहे.

ashutosh.treks@gmail.com

 

मिथक शिल्पांचे देखणेपण

सामना ऑनलाईन

आशुतोष बापट / वारसा वैभव

प्राणी वा पक्ष्यांचे एकत्रीकरण किंवा त्यांचे संमिश्र रूप म्हणजे एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया प्राण्याचे शरीर अशी संयुक्त रचना करून तयार केलेली शिल्पे आपल्याला प्राचीन काळापासून हिंदुस्थानी कलेत दिसून येतात. या व्यालप्रतिमा म्हणजेच मिथकशिल्पांचे देखणेपण उठून दिसते.

शंकराच्या मंदिरात गेल्यावर गाभाऱयाच्या उंबरठय़ावर एक राक्षसाचे तोंड कोरलेले दिसते. कार्ल्याच्या लेणीत गेल्यावर तिथल्या खांबांवर कुणी चमत्कारिक प्राणी दिसतात. राशीपा बघताना धनु राशीचे चिन्ह दाखवताना अर्धा घोडा आणि अर्धा माणूस दाखवतात. काही काही देवळांवर चांगले तीन फूट उंचीचे प्राणी दिसतात. त्यांचे तोंड हत्तीचे असते आणि उरलेला देह सिंहाचा असतो. हंपीला गेल्यावर तिथल्या विठ्ठल मंदिराच्या खांबावर एक निराळाच प्राणी दिसतो. वेगवेगळ्या प्राण्यांचे अवयव एकत्र करून घडवलेला हा प्राणी असतो. त्याचं नाव काही सांगता येत नाही. त्याचं नक्की रूप काय आहे हेदेखील समजत नाही. काय असतं हे सगळं? कशासाठी अशी रचना केलेली असते? या प्राण्यांची काही कथा आहे का? असे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात आणि त्याची समाधानकारक उत्तरे काही मिळत नाहीत.

या सगळ्या प्राण्यांना मिथक प्राणी, पौराणिक प्राणी किंवा काल्पनिक प्राणी असे म्हणतात. या सगळ्याचा एक सोपा शब्द नंतर समोर येतो तो म्हणजे ‘व्यालशिल्पे’. यांना व्याल असे संबोधले जाते. प्राणी वा पक्ष्यांचे एकत्रीकरण किंवा त्यांचे संमिश्र रूप म्हणजे एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया प्राण्याचे शरीर अशी संयुक्त रचना करून तयार केलेली शिल्पे आपल्याला प्राचीन काळापासून हिंदुस्थानी कलेत दिसून येतात. या प्रकाराला ‘व्याल’ असा शब्द जरी सध्या रूढ झालेला असला तरी हा शब्द साधारण इ.स.च्या 6 व्या शतकानंतर वापरला जाऊ लागला. संयुक्त प्राणी ज्याला इंग्रजीत ‘मिथीकल अॅनिमल‘ असं म्हटलं गेलं आहे, त्याला आपण पौराणिक किंवा खरं तर काल्पनिक प्राणी म्हणू शकतो. हे असे प्राणी कलेत दाखवणे ही कलाकाराच्या कल्पनाशक्तीची भरारी म्हणावी लागेल. कलाकारांच्या या कल्पनाशक्तीला जोड मिळाली आहे ती या प्राण्यांच्या साहित्यातून येणाऱया वर्णनांची आणि त्याचबरोबर परकीय कलेच्या प्रभावाची. हिंदुस्थानी कलेमध्ये अशा संयुक्त प्राण्यांच्या वापराचे संदर्भ आपल्याला प्राचीन साहित्यांतूनही मिळतात. साहित्यात अशा प्राण्यांना ‘इहामृग’ असे म्हटले गेले आहे.

प्राचीन हिंदुस्थानी साहित्यात विविध ग्रंथांसोबतच मत्स्य, लिंग, हरिवंश, वायू, ब्रह्म, वामन या पुराण ग्रंथांमधूनही विविध ठिकाणी इहामृगाचा उल्लेख आलेला आहे. किंबहुना पौराणिक लेखकांनी या इहामृगांची एक यादीच दिलेली आहे. गजानन, ह्यानन, सिंहानन, व्याघ्रानन, मृगेंद्रवदन, खरमुख, मकरानन, इहामृगमुख, काकमुख, गृद्धमुख अशी अनेक नावे या यादीत दिसून येतात. कालिदासाचे प्रसिद्ध नाटक ‘रघुवंश’ यातही अर्धा हत्ती-अर्धा मत्स्य अशा एका दैत्याचा उल्लेख येतो.

इ.स.पूर्व दुसऱया शतकापासून लयनस्थापत्य महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. चैत्यगृह आणि विहार असे लेण्यांचे स्वरूप असते. लेणीचा दर्शनी भाग (फसाड) आकर्षकरीत्या कोरलेला दिसतो. लेण्यांमध्ये असलेल्या स्तंभांवर आपल्याला प्राणी कोरलेले दिसून येतात. बेडसे आणि कार्ले तसेच लेण्याद्री इथे या प्राण्यांच्या पाठीवर कुणी एकटा स्वार तर कधी दंपती बसलेली दाखवतात. मात्र या लेण्यांमधून खूप सुंदर असे संमिश्र प्राणी कोरलेले दिसून येतात. पितळखोरा, भाजे, जुन्नर, लेण्याद्री, नाशिकची पांडवलेणी या लेण्यांतून स्फिंक्स, सेंटॉर, किन्नर कोरलेले आहेत. म्हणजे नुसते सांची, अमरावती, मथुरा इथल्या कलेतच नाहीत तर या लेण्यांतूनही या पौराणिक प्राण्यांचे दर्शन कलाकारांनी आपल्याला करून दिले आहे. यात पंख असलेला सिंह, चोच असलेला सिंह, माणसाचा चेहरा असलेला सिंह, पंख असलेले घोडे, हत्ती अशी विविधता दिसते. नाग व गरुडाचे मानवीकरण केलेली शिल्पे कोरलेली आहेत.

संमिश्र प्राणी किंवा संमिश्र पक्षी यांचे कलेतील सादरीकरण आपण सांची, भारहूत, अमरावती, नागार्जुनकोंडा इथे तसेच अजिंठा इथल्या लेणींमधील चित्रकलेत बघितले. ‘इहामृग’ अर्थात संमिश्र प्राण्यांची संकल्पना पुढे ‘व्याल’ या संकल्पनेत परावर्तित झालेली दिसून येते आणि इ.स.च्या 6 व्या शतकानंतर बांधलेल्या अनेक मंदिरांवर हे व्याल किंवा असे संमिश्र प्राणी मोठय़ा प्रमाणावर कोरलेले दिसून येतात. हे व्याल कोरताना भिन्न प्राण्यांची शरीरे एकत्र करून हे काल्पनिक प्राणी कोरले गेले आहेत. एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया एका किंवा एकापेक्षा जास्त प्राण्यांच्या शरीराचे भाग एकत्र करून असे व्याल कोरले गेले. ज्या प्राण्याचे तोंड कोरलेले असेल त्याच्या नावाने तो व्याल ओळखला जातो. उदाहरणार्थ, हत्तीचे तोंड आणि शरीर सिंहाचे असे शिल्प असेल तर त्याला ‘गजव्याल’ असे म्हटले जाते. मग मकरव्याल, अश्वव्याल, अजव्याल, गणेशव्याल अशा असंख्य व्याल प्रतिमा मंदिरांवर कोरलेल्या दिसून येतात. खजुराहो इथल्या मंदिरांवर असे व्याल दिसून येतात. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर गडचिरोली जिह्यातल्या मार्कंडा मंदिरावर खूप मोठय़ा संख्येने व्याल कोरलेले आहेत. तारकाकृती आकारामुळे मंदिराच्या बाह्य भिंतीना अनेक कोन निर्माण होतात. उठाव असलेल्या भिंतींवर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात, तर त्या दोन मूर्तींच्या आतमध्ये असलेल्या कोनांवर व्याल प्रतिमा कोरलेल्या असतात. या व्याल प्रतिमांचे देखणेपण आणि त्यांचा ठसठशीतपणा प्रकर्षाने उठून दिसतो.

छत्तीसगडच्या पाली इथल्या मंदिरावर नरव्यालाची मूर्ती आहे. चेहरा माणसाचा आणि उर्वरित शरीर प्राण्याचे असा हा नरव्याल इथले मुख्य आकर्षण म्हणायला हवा. इथले व्यालसुद्धा हत्तीच्या पाठीवर दाखवलेले आहेत. याचा अर्थ हत्ती आणि या व्याल प्रतिमा यांचा काहीतरी संबंध असण्याची दाट शक्यता दिसते. या मंदिरावरचे व्याल फारच देखणे आहेत आणि देवतांना जसे विविध दागदागिने दाखवतात तसे विविध दागिने या व्यालांच्या अंगावर कोरलेले दिसतात. इतकी सुंदर शिल्पकला अर्थातच चकित करून टाकते. तत्कालीन कलाकारांची कलासक्त नजर आणि कुठलीही गोष्ट सादर करताना ती अतिशय मोहक रूपात सादर केली पाहिजे ही ओढ प्रकर्षाने जाणवते.

> ashutosh.treks@gmail.com

 
 

रथ सहस्ररश्मीचा

 चोवीस महाकाय रथचक्रे, दगडात कोरलेली, पण अशा कौशल्यानं, वाटावे लाकडातून कोरलेली ही खरीखुरी रथचक्रे आहेत. या चाकांना जोडणारी आख आणि त्यावर बसवलेली भलीमोठी मेखही तशीच, अगदी खऱ्या रथाच्या चाकांसारखी. तो २४ चाकांचा महाकाय रथ बघताना आपण स्थळकाळाचे भान हरपून जातो. वाटतं, आता कोणत्याही क्षणी सारथी चाबूक उगारेल आणि रथाला जुंपलेले सात विराट अश्व क्षणात विजेच्या वेगाने दौडू लागतील. त्या घोड्यांची नावे तरी कशी सुंदर आणि अर्थपूर्ण, गायत्री, वृहति, उष्णिक, जगती, त्रिष्टुप, अनुष्टुप आणि पंक्ती, संस्कृत काव्यछंदांची नावे. त्या सात घोड्यांचे लगाम हाती धरलेला सारथी तो अरुण आणि त्या अलौकिक रथाचा स्वामी म्हणजे साक्षात सूर्यदेव! सहस्ररश्मी भगवान सूर्यदेव आपल्या सात अश्वांच्या रथात बसून दिवसभराच्या प्रवासाला निघाले आहेत ह्या पौराणिक कथेला दिलेले सुरेख मूर्तस्वरूप म्हणजे ओडिशा मधले कोणार्क येथील प्रसिद्ध सूर्यमंदिर.

हे मंदिर मी जेव्हा प्रथम बघितले तेव्हा मी कितीतरी वेळ अक्षरशः अवाक् होऊन उभी होते. कोणार्कच्या सूर्यमंदिराचे कितीही फोटो बघितलेले असले तरी जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ती विराट रथचक्रे आणि त्यावर विसावलेला तो महाकाय रथरुपी सभामंडप पाहता तेव्हा कितीही अरसिक असलात तरी तुमच्या अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय राहात नाहीत. कोणार्कचे हे मंदिर म्हणजे दगडात रचलेली एक पवित्र सूर्यऋचा आहे. कोणार्कच्या या सूर्यमंदिराच्या स्थळ महात्म्याविषयी अनेक कथा प्रसिद्ध आहेत. श्रीकृष्णपुत्र सांब कुष्ठरोगाने ग्रस्त झाला होता. श्रीकृष्णाने त्याला सूर्यदेवाची उपासना करायला सांगितली. कुष्ठरोगातून मुक्त होण्यासाठी सांबाने ओडिशा राज्यात येऊन चंद्रभागा नदीच्या तीरावर सूर्योपासना केली.

सांबाला नदीपात्रात सूर्यमूर्ती सापडली आणि त्याने चंद्रभागा नदी समुद्राला मिळते त्या पवित्र ठिकाणी प्रथम सूर्यमंदिर उभारले अशी इथल्या भाविकांची धारणा आहे. आज चंद्रभागा नदी सुकून गेली आहे. समुद्रही मंदिरापासून तीन किलोमीटर मागे गेलेला आहे. आज कोणार्कमध्ये जे मंदिर उभे आहे ती वास्तू तेराव्या शतकात बांधली गेली आहे. गंगवंशीय राजा पहिला नरसिंहदेव आणि त्याची पत्नी सीतादेवी ह्यांनी हे सूर्यमंदिर उभारले. पहिला नरसिंहदेव हा अत्यंत शूर आणि कर्तबगार राजा होता. अनेक शत्रूंवर विजय मिळवून कलिंगाचे राज्य संघटित केले. या विजयाचे प्रतीक म्हणून त्याने कोणार्कचे सूर्यमंदिर बांधायला घेतले व आपला आपला कीर्तिस्तंभ तिथे उभा केला. तो अरुणस्तंभ सध्या जवळच्याच जगन्नाथ पुरी येथे श्री जगन्नाथ मंदिरासमोर आहे. कोणार्कच्या ह्या सूर्यमंदिराच्या निर्मितीसाठी १२ हजार स्थपती आणि शिल्पी बारा वर्षे खपत होते आणि या मंदिराच्या उभारणीसाठी राजा नरसिंहदेवाने आपले बारा वर्षांचे उत्पन्न खर्च केले असे अकबर कालीन इतिहास ग्रंथ ‘ऐन-ए-अकबरी’मध्ये नमूद केलेले आहे.

कोणार्कच्या सूर्यमंदिरासाठी वालुकाश्म व क्लोराइट शिस्ट अश्या दोन प्रकारचा दगड वापरला आहे. मला ओडिशा मधल्या एका शिल्पकाराने त्या दगडांची फूल खाडिया आणि मुग्नी अशी स्थानिक नावे सांगितली होती. वालुकाश्म हा दगड खडबडीत पण टणक असतो तर क्लोराइट शिस्ट खाणीतून काढल्यावर मऊ असतो पण पुढे ऊन वारा पाऊस पिऊन टणक होत जातो. नवीन दगड मऊ असल्यामुळे स्थपती आणि शिल्पकारांना अतिशय बारीक, नाजूक कोरीव काम करणे सोपे होते. कोणार्कची रथचक्रे बघताना त्यावरचे शिल्पांकन अगदी दागिन्यांच्या तोडीचे वाटते ते या दगडामुळे.

कोणार्कच्या मंदिराच्या बांधणीत वास्तुकला व शिल्पकला ह्यांचा इतका सुंदर संगम झालेला आहे की वास्तूचे सौष्ठव आणि प्रमाणबद्धता बघणाऱ्याला जास्त भुरळ घालते की मंदिरावरचे कोरीव काम हे सांगता येत नाही. सध्या अस्तित्वात असलेला सूर्यरथाच्या स्वरूपातला सभामंडप, ज्याला कलिंग स्थापत्याच्या भाषेत ‘जगमोहन’ हे नाव आहे, त्याचीच उंची जवळजवळ ४० मीटर आहे. त्याच्या पाठीमागे असलेल्या गर्भगृह आणि मुख्य शिखर ह्यांनी मिळून बनलेल्या रेखादेवळाची उंची त्याच्या जवळजवळ दुप्पट असली पाहिजे असे पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे मत आहे. जगमोहनाच्या पुढे त्याच्या अर्ध्या उंचीचा नटमंडप आहे. चढत्या भाजणीने वाढत जाणारी मंदिराच्या विविध भागांची उंची भाविकांची नजर आपसूकच रेखा मंदिराच्या कळसाकडे नेते. ही ऊर्ध्वगामी दृष्टिरेषा हे नागर मंदिरांच्या स्थापत्यशैलीचे खास वैशिष्ट्य आहे.

कलिंग स्थापत्यशैली हा नागर शैलीचाच एक उपप्रकार मानला जातो. कलिंग स्थापत्याप्रमाणे मंदिराच्या वास्तूचे तीन भाग असतात, गर्भगृह म्हणजे रेखा देऊळ, ज्याचे शिखर उंच आणि निमुळते असते व वर गोलाकारआमलक असतो. रेखा देवळाच्या पुढे असतो तो मुख्य सभामंडप, ज्याला त्याच्या पिरॅमिड सारख्या शिखरामुळे पिढा देऊळ असे नाव आहे. यालाच भद्र देऊळ किंवा जगमोहन असेही म्हणतात. रेखादेऊळ उंच आणि निमुळते असते तर पिढा देऊळबुटके आणि पसरट असते. दोन्ही वास्तूंची उंची आणि आकार ह्यामध्ये एक सुंदर समन्वय असतो ज्यामुळे दर्शनाला आलेल्या भाविकांना भव्यतेची, दिव्यतेची अनुभूती येते. जगमोहनाच्याही पुढे नटमंडप किंवा नृत्यमंडप असतो, जो आकाराने सगळ्यात लहान असतो. या तिन्ही वास्तूंची प्रमाणबद्धता कोणार्कमध्ये इतकी सुरेख जमून आलेली आहे की आजच्या भग्नावस्थेत देखील मंदिर पाहून आपण पूर्णपणे भारावून जातो, आणि मनात विचार येतोच की पूर्णावस्थेतले रेखा देऊळ, त्यातली सूर्यनारायणाची मूर्ती, त्याला जोडून असणारे त्याच्या रथाच्या स्वरूपातले भव्य भद्रदेऊळ व त्यापुढील नृत्यमंडप यासर्व वास्तू त्यांच्या वैभवाच्या परमशिखरावर असताना किती देखण्या दिसत असतील!

कोणार्कच्या या सूर्यमंदिराची खासियत म्हणजे इथले भद्र देऊळ किंवा जगमोहन. कोणार्कच्या रथचक्रांचे फोटो आपण सर्वांनीच पाहिले असतील. पण एकेकट्या रथचक्राचे फोटो बघणे आणि प्रत्यक्ष अतिभव्य आकाराच्या रथाप्रमाणे रचलेले ते संपूर्ण वास्तूस्थापत्य अनुभवणे ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट असे म्हणतात खरे पण कोणार्कचा हा भव्य सूर्यरथ प्रत्यक्षात इतका भव्य आहे की कुठलीही प्रतिमा त्यापुढे फिकीच वाटेल. मुळात दगडाचे विशाल सूर्यमंदिर रथाच्या आकारात कल्पून ते प्रत्यक्षात आणणे ही कल्पनाच किती उदात्त आहे!

एका उंच, प्रशस्त जगतीवर म्हणजे जोत्यावर हा विराट मंदिररूपी रथ उभा आहे. जगतीच्या चारी भिंतींवर मिळून बाराचक्रांच्या जोड्या कोरलेल्या आहेत ज्या वर्षांच्या बारा महिन्यांचे प्रतीक आहेत. १२ फूट व्यासाच्या प्रत्येक चक्राला आठ बारीक व आठ जाड आऱ्या कोरलेल्या आहेत. या आठ आठ आरी म्हणजे दिवसाचे आणि रात्रीचे प्रत्येकी आठ प्रहर आहेत. सूर्यदेवाच्या रथाला जोडलेले सात अश्व म्हणजे सप्ताहाच्या सात दिवसांचे प्रतीक आहे. बरे शिल्पकाराचे आणि स्थपतीचे कौशल्य केवळ इथेच संपत नाही, मंदिराच्या काही चक्रे म्हणजे वेळ दाखवणारी सौरघड्याळे आहेत. सूर्याचे किरण आऱ्याच्या मध्यावर पडून त्याची सावली वेळेनुसार प्रत्येक आऱ्यावर येते. प्रत्येक आरीवर बारीक पट्टी आहे, त्यावर वेळेनुसारत्या काळची आदर्श दिनचर्या कशी होती ते दाखवले आहे. म्हणजे दुपारपर्यंत कामे, मग थोडी वामकुक्षी, त्यानंतर मनोरंजन, सायंकाळची कामे, आणि रात्री झोप इत्यादीचे बारकाईने शिल्पांकन केले आहे. हे सर्व समजून घ्यायचे असेल तर आपल्याला कोणार्कमध्ये चांगला प्रशिक्षित गाईड घेणे फार आवश्यक आहे, कारण या मंदिरात शिल्पांची इतकी लयलूट आहे आणि त्यामागचा कार्यकारणभाव इतका गहन आहे की गाईड नसला तर नव्वद टक्के बारकावे आपल्याला उमजणारच नाहीत.

असे म्हणतात की राजा नरसिंहदेवाच्या काळात जेव्हा सूर्य मंदिर बनवले तेव्हा त्यावर २० टन वजनाचा प्रचंड लोहचुंबक होता. पण जवळच समुद्र असल्यामुळे खलाशांच्या होकायंत्राला अडथळा होऊ लागल्याने तो चुंबकच काढून टाकला गेला. त्यावेळी मंदिराला झालेली इजा व पुढे सोळाव्या शतकात काला पहाड नावाच्या इस्लामी सरदाराने ओडिशास्वारीत या मंदिराचा केलेला विध्वंस यामुळे मंदिराचा बराच भाग कोसळला होता. मंदिर भग्न झाल्यावर लोकांनी तिथे जाणे बंद केले व कोणार्कचे मंदिर हळूहळू वाळूने भरू लागले. रेती अर्धवट गाडले गेलेले हे मंदिर नंतर १८९३ मध्ये ब्रिटिशपुरातत्व शास्त्रज्ञांनी उकरून काढले. पुढे भारतीय पुरातत्व विभागाने या प्राचीन वास्तूवरील वाळूचे प्रचंड आवरण दूर करण्याचे काम १९०१ पासून हाती घेतले.

आज जे मंदिर आपल्याला दिसते ते भग्नावस्थेत आहे. मंदिराचा गाभारा उध्वस्त झालेला आहे. बाहेरच्या देवकोष्ठातील काही सूर्यमूर्ती वस्तुसंग्रहालयात गेलेल्या आहेत तर काही गायब झालेल्या आहेत. मुख्य गाभाऱ्यातली सूर्यमूर्ती कोठे आहे ते कोणालाच माहिती नाही. जगमोहनाची नाजूक परिस्थिती पाहता ब्रिटिशांनी आत वाळू भरून वास्तू पूर्णपणे सील केली आणि बाहेर टेकूसाठी लोखंडी पिंजरा उभारलेला आहे. एकूण वास्तूच्या सौंदर्याशी तो पिंजरा अत्यंत विसंगत आणि कुरूप दिसतो, पण करणार काय? शिल्पकला आणि स्थापत्य या दोन्ही गोष्टींनी नटलेले कोणार्कचे हे सूर्यमंदिर एकाच वेळी अभिमान आणि विषाद अशा परस्परविरोधी भावना दाटून येतात. प्रत्येक भारतीयाने पाहिलेच पाहिजे असे हे मंदिर आहे.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत)

 
 

पाचवीला पुजलेली सटी

 

सटीचा लेखाजोखा

      आतल्या खोलीतून नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय. बाहेरच्या बाजूला मात्र काही साहित्याची जमवाजमव चाललीय. ‘मालटा’ नावाने ओळखला जाणारा दगडी दिवा, जाते, पाटा-वरवंटा अशा दगडी साहीत्याची यादी केली जातेय. कधीकाळी नेहमीच्या वापरात असलेल्या या वस्तू,  पण सध्याच्या काळात मिळवणे दगडासारखेच कठीण झाल्यासारख्या. ही सर्व जमवाजमव चालली आहे ती जन्माला आलेल्या बालकाला कुठलीही बाधा होऊ नये, त्याला चांगले आयुष्य व आरोग्य लाभावे या हेतूने केल्या जाणाऱ्या पाचवीची. सहसा मुलीकडे होणारा हा विधी. संपूर्ण महाराष्ट्रात थोड्याफार साम्य-भेदाने होत असलेला हा विधी पश्चिम किनारपट्टीवरील रायगड परिसरातही होताना दिसतो.
    या विधीवेळी लहान बाळाला वस्त्रांशिवाय निंगडीच्या म्हणजेच निरगुडीच्या पानांवर झोपवले जाते. या पानांवरून उचलण्याचा मान आत्याचा असतो. निरगुडी ही वनस्पती आयुर्वेदाच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे मानले जाते. पाचवीच्या या विधीमध्ये एका सुपात तांदळावर कलश ठेवतात. त्यावर नारळ ठेवून केळीच्या पानाचा लहानसा भाग उभा केला जातो. समोर पानाचे पाच विडे मांडून त्या विड्यांवर सुपारी,बदाम, खारीक,अक्रोड,हळकुंड यांसारखे पदार्थ मांडले जातात. या दिवशी घुगऱ्या ,उकडीच्या पीठाचे मुटके, पिठाचा दिवा बनवला जातो. बाळंतिणीच्या खाटेच्या चार पायांजवळ चार पीठाचे दिवे व एक दिवा मोरीजवळ ठेवतात.
    जिल्ह्याच्या उत्तर भागातील विधीमध्ये नाममात्र फरक असतो. इथे पाट्यावर वरवंटा ठेवून सात विड्याची पाने देठ खाली करून वरवंट्याला टेकून ठेवतात .पानाच्या टोकांना शेंदूर लावतात. काजळाची दोन बोटे प्रत्येक पानाला दोन डोळे म्हणून लावतात. काही ठिकाणी रुईच्या पानांवर ‘सटी व लाठा’ अशी दोन चित्रे काढली जातात. समोर पीठाचे सात दिवे व पाटयाच्या चार कोपऱ्यांना चार पीठाचे दिवे लावतात. प्राचीन परंपरेची जपणूक करणारा मालटा हा दगडी दिवा पाट्याच्या मध्यभागी लावतात. नंतर पूजन करून नैवैद्य दाखवला जातो.

    याच विधीला ‘सटी’ असेही म्हटले जाते. ही सटी म्हणजे ‘सटवाई’ किंवा ‘सटवी’ या नावाने ओळखली जाणारी आणि प्राचीन काळापासून पुजली जाणारी मातृदेवता. अगदी शिवी म्हणून वापरला जाणारा हा शब्द खरंतर मूळ संस्कृत ‘षष्ठी’ या शब्दापासून तयार झाला आहे. मुलाच्या जन्मानंतरच्या सहाव्या रात्री ‘सटवी’ देवीची शांती करण्यासाठी रात्रभर दिवा लावून ठेवतात. पाट्यावर एक नारळ, कोरा कागद, पेन किंवा पेन्सिल, मुलगा असेल तर हातोडा व मुलगी असेल तर कोयती असे एक शस्त्रही ठेवतात व त्यांचे पूजन करतात. त्या रात्री देवी स्वत: येऊन त्या मुलाच्या कपाळावर त्याचे अदृश्य पण अटल भवितव्य आणि स्वभाववैशिष्ट्य लिहिते, असा समज आहे. यालाच ‘ब्रम्हलिखित’ असे म्हटले जाते. "सटीचा लेखाजोखा, न चुके ब्रम्हादिका" अशी एक म्हण या देवीबाबत प्रचलित आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या देवीची पूजा जास्त प्रचलित आहे. रस्त्याच्या कडेला किंवा चौरस्त्यावरील दगडावर दिसणाऱ्या लाल रेघा, अर्पण केलेले अन्न आणि कापलेला लिंबू ह्या सटवीच्या व्रताच्या खुणा. रात्रीच्या वेळेस उपासक स्त्रीद्वारे हे क्रियाकर्म केलेले असते.

 सटवी, सटुआई, सटी,षष्ठी,रानसटवाई, छटी, घोडा सटवाई या नावांनी ओळखली जाणारी ही मातृदेवता आहे तरी कोण?
या मातृकेशी विशिष्ट प्रकारचे नाते असलेल्या स्कंदाला ‘षष्ठीप्रिय’ म्हणतात. स्कंद म्हणजेच शिवपुत्र कार्तिकेय. काश्यपसंहितेप्रमाणे षष्ठी ही स्कंदाची बहिण आहे. स्कंद व विशाख हे तिचे दोन भाऊ. तर याऊलट ‘देवी भागवत पुराण’ व महाभारतानुसार ती स्कंदाची पत्नी आहे. इथे ती देवमेना या आणखी एका उपनावाने ओळखली जाते. सुश्रुतसंहिता षष्ठीला ‘रेवती’ हे आणखी एक नाव देते.  कुषाणकाळातील एका मूर्तीमध्ये षष्ठी स्कंद आणि विशाख या दोघांमध्ये उभी असलेली दिसते. तिचे षष्ठी हे नाव सार्थक करणारी ही मूर्ती आहे. कारण या शिल्पात तिच्या खांद्यावर ओळीने पाच डोकी दिसतात. कुषाणकाळानंतर शिल्प क्षेत्रांत हा प्रकार लुप्त झाला. सटवाई देवी अनेक गावांची ग्रामदेवता आहे. हिच्या देवळाचे सहसा बांधकाम करीत नाहीत. फक्त आडोसा असतो. असे असले तरी गुप्त काळांत मात्र बांधकाम होत असल्याचे दिसते. स्कंदगुप्ताच्या काळातील एका लेखांत छंदक नावाच्या व्यक्तीने षष्ठीदेवीचे एक मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. याच काळात षष्ठीदेवीच्या नावाला धरून मुलांची नावे ठेवण्याची पद्धत होती. सन ५३२ मध्ये मध्यप्रदेशातील मंदसोर येथे कोरलेल्या यशोधर्मन उर्फ विष्णुवर्धन याच्या लेखांत ‘षष्ठीदत्त’ नावाची व्यक्ती आढळते, तसेच द्रोणसिंहाच्या भामोद्रामोहता ताम्रपटाचा क्षत्रक नावाचा लेखक ‘षष्ठीदत्तां’चा मुलगा होता. बंगाली लोकांत षष्ठीचरण हे नाव आज ही आढळते.
   प्राचीन काळापासून या देवीला पुजले जात असले तरी  पुरूषांचा तिच्या पूजेशी काही संबंध नसतो. षष्ठी-सटी-सटवी म्हणजेच शक्तीचे दुर्गा हे रुप मानले असले तरी लोकमताप्रमाणे ती अविवाहित आहे. ‘म्हसोबाला नाही बायको आणि सटवीला नाही दादला’ असे म्हटले जाते. याच कारणांमुळे ‘पाचवी-सटी’ या कार्यक्रमाच्या वेळेस पुरुषांची उपस्थिती टाळली जाते. परंतु कालांतराने जसे दगडी दिव्याची जागा धातूच्या दिव्याने घेतली, तसेच या ‘लेडीज स्पेशल’च्या कार्यक्रमात पुरूषांनीही शिरकाव केला. कोणत्याही कार्यक्रमाची सांगता ‘मांस-मद्या’शिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशी श्रद्धा असणारा एक वर्ग या प्राचीन संस्कृतीला अर्वाचीन पद्धतीने साजरा करतोय. ‘अर्थ समस्या’ नावाची गोष्ट पाचवीलाच पुजलेल्या मुलींच्या पालकांसाठी ही नवी प्रथा अनर्थाकडे नेत आहे. यामुळे आधीच समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या मुलीकडील लोकांना हा ‘जादाचा भुर्दंड’ बसतो. अर्थात संस्कृतीत घडणारे नवे बदल स्विकारायला हवेतच, पण हे बदल असंस्कृत नसतील याची काळजी घ्यायला हवी. या नव्या प्रथांना आवर घालायलाच हवा. देवी सटवाईच या नव्या प्रथाकारांच्या भाळी सद्बुद्धी लिहो, ही सदीच्छा!

                          - तुषार म्हात्रे , पिरकोन (उरण)
 
 https://tusharki.blogspot.com/search?updated-max=2019-11-20T06:40:00%2B05:30&max-results=7&start=21&by-date=false
 
 

 https://indraneelb.blogspot.com/2021/03/blog-post_91.html

कृष्ण आणि पुतना


लेख - १५

कृष्ण हे भारतीय धार्मिक परंपरेमध्ये असलेले असे चरित्र आहे ज्याने सर्वांना त्याच्या कथांमध्ये बांधून ठेवले आहे. बाळकृष्ण, यशोदेला प्रश्न विचारून भंडावून सोडणारा कृष्ण, गोपिकांबरोबर खेळणारा कान्हा, कंस वध करणारा जबाबदार तरुण कृष्ण आणि महाभारतात अर्जुनाचा सारथी होऊन आयुष्याचे आणि या सृष्टीचे तत्वज्ञान गीतेत संगणारा, विश्र्वरूप दर्शन देणारा भगवान श्रीकृष्ण. अशा अनेक वेगवेगळ्या रूपांमध्ये तो आपल्याला दिसतो. वेगवेगळ्या कलांमध्ये देखील कृष्णाची ही रूपं आपल्याला बघायला मिळतात. कृष्ण चरित्रतला महत्त्वाचा भाग म्हणजे त्याने बाळ असताना केलेला अनेक असुरांचा वध.

पुतना नावाच्या एका राक्षसिणीला कृष्णाचा वध करायला कंस मामाने पाठवले. आपल्या स्तनांना विषाने भरून ती यशोदेच्या घरात रूप बदलून आली. योग्य संधी साधून तिने कृष्णाला स्तनपान करायला घेतले. पण शेवटी दैवी अवतार असलेल्या कृष्णाने तिचे हे रूप ओळखून तिचा वध केला अशी ही कथा आहे.
मध्य प्रदेशात विदिशा जवळ बिजा मण्डल नावाचे एक प्रचंड मोठे पण भग्न मंदिर आहे. त्या मंदिराच्या एका खांबावर हे छोटेसे शिल्पं आहे. यामध्ये एक स्त्री आपल्या मांडीवर घेऊन त्या बाळाला स्तनपान करते आहे. स्तनपान हे मातृत्वाचे महत्त्वाचे लक्षण आहे. आपल्या बाळाला जवळ घेऊन, घट्ट पकडून ही क्रिया होते. पण या शिल्पामध्ये त्या स्त्री ने बाळाला स्तनपान देताना देखील आपले दोन्ही हात हे वर घेतले आहेत आणि हाच फरक आहे कलाकाराने दाखवला आहे.

एवढ्याश्या शिल्पातून एवढी मोठी कथा दाखवणाऱ्या कलाकाराचे कसब किती अगाध असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. कृष्ण आणि अनुषंगाने वैशव प्रभाव भारतात मोठ्या प्रमाणात वाढण्यात भारतीय कलांचे योगदान खूप मोठे आहे.

शिल्प - कृष्ण आणि पुटना
बिजा मण्डल, मध्य प्रदेश
९ वे शतक

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

 

शिव


लेख - २

शंकर किंवा शिव हा भारतात पुजल्या जाणाऱ्या महत्वाच्या देवतांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा देव. या शंकराचे मूळ काही हजार वर्ष मागे जाते. अतिप्राचीन कालखंडात लिंग रूपाने पूजन होणारा देव, जनन आणि पुनर्निर्मिती दाखवणारा देव, वेदांमध्ये दिसणारा रुद्र, महायोगी शिव, सगळं काही आपल्या क्रोधाने नष्ट करणारा प्रलय आणि त्याच वेळेला परम भक्ताच्या मागण्या पूर्ण करणारा शिव, अशा शेकडो छटा या महादेवाच्या आहेत. स्मशानात अंगाला राख फासून राहणाऱ्या साधुंपासून ते तलम वस्त्र घालून राजवाड्यात राहणाऱ्या राजापर्यंत सगळ्यांना याने आपल्यात सामावून घेतले आहे. मंदिराच्या गर्भ गृहात प्रामुख्याने लिंग स्वरूपात याचे पूजन होत असेल तरीही शिल्पशास्त्रात शंकर या संकल्पनेवर मोठ्या प्रमाणात प्रयोग  झाले आहेत.

शंकराच्या शिल्पामध्ये काही प्रमुख गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. डोक्यावर असलेल्या जटा किंवा जटा मुकुट, कपाळावर कोरलेला तिसरा डोळा, हातात पकडलेला त्रिशूळ, शिवाला अत्यंत प्रिय असलेले वाद्य म्हणजेच डमरू, इत्यादी लांच्छने बघून शिवाचे शिल्प ओळखता येते.

आता या फोटोमध्ये असलेल्या शिवाचे निरीक्षण करूयात. आधी सांगितल्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे असे निरीक्षण करायचे आहे. मूर्ती स्थानक म्हणजेच उभी आहे, हातामध्ये पकडलेला त्रिशूळ आणि त्या दंडाला खाली वेटोळे दिलेला नाग, कमरेवर नेसलेले वाघाचे कातडे (गुडघ्याजवळ वाघाचे तोंड दिसेल), डोक्यावर असलेला जटा मुकुट, पाठीमागे कोरलेली प्रभावळ किंवा वलय हे त्याच्या दैवत्वाचा पुरावा देतात.
लिंगपुराण, शिवपुराण, इत्यादी पुराणांमध्ये शंकराच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. वेदांमध्ये छोट्या प्रमाणात दिसणारा रुद्र ते पौराणिक कालखंडात प्रमुख देव म्हणून दिसणारा शिव हा प्रवास खरंच अद्भुत आहे.

मूर्ती - केवल शिव, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, मुंबई

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर 

9960936474

 
 नवरात्रोत्सव⛳⛳

नवरात्र हा सण देवी दुर्गेचा!! महिषासूर नावाच्या म्हशीच्या तोंडासारख्या  राक्षसावरील मिळवलेल्या विजयाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. 


आख्यायिकानुसार

राक्षसांच्या वाढत्या अत्याचारांचा नाश करण्यासाठी समस्त देवतांनी दुर्गेची निर्मिती केली. ह्या आगाऊ

महिषासुराने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. पण दुर्गेने लग्न करण्याआधी एका युद्धामध्ये स्वतःला हरवण्याची अट महिषासुराला घातली.  इथेच फसला तो.... हे युद्ध ९ दिवस आणि ९ रात्र चालले होते. दहाव्या दिवशी दुर्गा देवीचा विजय झाला! 


 तेव्हापासूनच 

उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेंपर्यँत देवी सामर्थ्य व शौर्याचप्रतीकच  झालेली दिसते!

महिषातकरी येन पूजिता स जगतप्रभूं.... अर्थात ज्याने महिषासुरमर्दिनी ला पूजिले तो जगाचा स्वामी होतो...! हे ही रूढ झाले असेल... बऱ्याचदा पूजेअंती/ युद्धविजयप्राप्ती करिता तत्कालीन वीरराजे महाराजे महिषासुरमर्दिनीला म्हशीं/रेड्याचाच बळीसुद्धा देत!!!


 याचे काल्पनिक का असेना पण उदाहरण म्हणून अगदी अलीकडील बिग बजेट असलेल्या बाहुबली चित्रपटाचे देता येईल😎 यात भल्लाळदेव युद्धाच्याप्रारंभी एक घाव दोन तुकडे करत महाकाय रेड्याचा कार्यक्रम करतो....

तर त्यांचाच भाऊ बाहुबली आधुनिकप्रगल्भते चा दाखला देतांना प्राणिप्रेम व्यक्त करत अवघ five ml blood sample देत रेड्याला जीवदान देतो!🤣🤣😂😂(हे पाहून त काही जणांनी बाहुबली ला देशद्रोही, सेक्युलर,पुरोगामी ही ठरविले असेल🙉🙊🙈) 


असो...

थोडक्यात सांगायचे झालं तर राज्य,राजवट कुठलीही असो...

चौल-चालुक्य असो की होयसळ...

चंदेल असो की परमार...

राष्ट्रकूट असो की यादव....


देवीचं महिषासुरमर्दिनी स्वरूप हे प्रचंड लोकप्रिय होतं...

म्हणूनच आजही त्या त्या राजवटीच्या अस्तित्वातच्या ठिकाणी महिषासुरमर्दिनी च देखणं रूप शिल्प/मूर्ती रुपात आपल्याला दर्शन देते म्हणजे देतेच! आपल्या देशातलं कुठलंही म्युझियम महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती शिवाय अपूर्णच म्हणावं लागेल! तर काही ठिकाणी पूर्णपणे झीज झालेल्या मूर्ती ही दिसतील, बरं ह्या ओळखन ही अगदी सोपं आहे ४ ते १० हात, प्रत्येक हातात काहींना काही शस्त्र आहेच,

पायथ्याशी चिरफाड झालेला महिषासुर त्याच्या बाजूला दुर्गेच वाहन आक्राळ विक्राळ सिंह.... बस ऐवढंच,.... 

शेवटी जाता-जाता...बरं त्या सर्वच हातात शस्त्रच आहे...ऐकाही हातात ती दांडिया ची टिपरी नाहीये त्यामुळे ते हल्ली आडमाप मेकअप करून दांडियाचा धांगडधिंगा कुठून आला माहिती नाही!!

🤦🏽‍♂️🙈🙊🙉


नवरात्रोत्सवाच्या मनस्वी शुभेच्छा....

⛳🛕🐾🐅🌳✍🏾निखील...

 

किर्तीमुख.....

भटका जीव

🦑🦑🦑 किर्तीमुख🦑🦑🦑


आपले मंदिरे नुसती बांधायची म्हणून अजिबात बांधलेली नाहीत, मंदिर कुठलंही बघा त्यामागे मंदिराची रचना, स्थान, भौगोलिक स्थिती या सर्वांचा जबरदस्त मेळ घालुनच ते बनविलेले असते, त्यावर असलेल्या प्रत्येक शिल्पाकृतीचाही काहींना काही अर्थही  नक्कीच असतो... पण माहिती अभावी आज मात्र कशाचा कशालाच ताळमेळ नसतो... आणि म्हणून अनावधानाने त्या-त्या शिल्पाचे, मूर्तीचे नुकसान ही होत असते,आता हेच बघा ना

तुम्ही मंदीरात गेल्यावर मंदिरांच्या प्रवेशव्दारापाशी एक राक्षसाच्या तोंडासारख एक शिल्प कोरलेले असंत. 

या शिल्पाला “किर्तीमुख” अस म्हणतात. हे किर्तीमुख मंदिराच्या प्रवेशव्दारापाशी ठेवण्या मागच्या दोन प्रचलित पौराणिक कथा आहे.त्यातील पहिली.....

जालंधर नावाचा एक राक्षस होता. तो महादेवाचा मोठा भक्त होता त्याला प्रचंड भुक लागायची. कितीही खाल्ले तरी त्याची भुक कधी संपायची नाही. अश्याही स्थितीत त्याने घोर तपश्चर्या केली. 

 महादेव प्रसन्न झाले....

 बोलले....काय पाहिजे...???

  जालंधर न मागून-मागून मागितल तरी काय, त भूक लागली खायला द्या😂😂

  महादेवाने त्याला स्वत:च शरीर  खायला सांगितले,त्याने पायापासून खायला सुरवात केली उरलं फक्त तोंड आणि डोकं...तरीही त्याची भूक संपली नाही....! देवा अजून भूक लागली...म्हटल्यावर भोळ्याशंकराने मस्तपैकी स्माईल देऊन त्याला जालीम उपाय सांगितला...की जिथं जिथं मी असेल... तिथं तिथं माझ्या दारात येऊन बस आणि येणार्‍या  सर्वांची पाप खाऊन टाक...!!!

न संपणारा भंडारा आहे तो...

 कितीही खाय...तुला ती कधी कमी पडणार नाही.🤣🤣

आणि म्हणून या किर्तीमुखाच शिल्प मंदिरा च्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली !!

कथा दुसरी.....


        एकदा पार्वतीच्या सौंदर्याची महती ऐकून महा शक्तिशाली जलंधर राक्षसाने पार्वतीस लग्नाची मागणी घालण्यास राहू ला आपला दूत म्हणून पाठवले. राहू कैलासावर गेला, आणि त्याने जलंधरासाठी पार्वती ला मागणी घातली. हे  ऐकून संतापलेल्या महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यातून एक भीषण आक्राळविक्राळ प्राणी तयार झाला, आणि तो राहूवर धावून गेला. त्या प्राण्यांचे महाभयंकर रूप पाहून राहूची चिक्कार फाटली...! मग करेल तरी काय... त्याने महादेवाच्या पायावर डोकं ठेवल...! त्यामुळे महादेवाने राहूला माफ केले. राहू तिथून निघून गेल्यावर महादेव परत ध्यानस्थ झाले.

पण बाहेर आलेल्या प्राण्यांची भूक वाढत होती. त्याने महादेवाला विचारले, मी खाऊ तरी काय? महादेवांनी सांगितले, की खा स्वतःलाच.... देवाधिदेव महादेवाची चा हुकूम सर आखोंपर मानून ह्या प्राण्यांने स्वतः ला पायापासून खायला सुरवात केली आणि खात खात त्याचे फक्त डोकेच उरले. तरीही त्याची भूक भागली नाही. महादेवाचे ध्यान संपल्यानंतर त्यांना दिसले ते फक्त त्याचे डोके!!🦑 पहिला प्रश्न देवा भूक लागली😂😂


 या खाऊगिरी वर महादेव जाम खुश झाले. त्यांनी त्या डोक्याला नाव दिले कीर्तिमुख  आणि काम ही दिलं.... तेच पाप खायचं✨

ह्या जगात कधीही न संपणारी गोष्ट म्हणजे मनुष्याचे पाप,अमर्याद अशी भूक लागलेल्या किर्तीमुखाला देवाने काम दिले भक्तांची पापं खाण्याचे.!!!

ऐकंदरीत दोन्ही कथा मिळत्या-जुळत्या...!!!

व आशय ही सारखाच....


फक्त महादेवच नाही... तर  मंदिर  कुठलही असो आता हा दिसतो म्हणजे दिसतोच!!!

जागा मात्र कधी-कधी बदलत असतो...कधी मंदिराच्या शिखरावर...कधी मूर्ती मागच्या प्रभावळीवर....कधी प्रवेशद्वारच्या वर....


 जागा कुठंही असो पण काम आपलं तेच पापखायच...

असा हा कीर्तिमुख🦑✨

हल्लीच्या काळात यांच्यावरही बेरोजगारी च संकट आलं आहे....

कारण आपले येडे अंधभक्त🤦🏽‍♂️.....!!!याच्यावर पाय ठेवून मंदिरात जाण्याऐवजी यालाच ऑइल पेंट मारत आहे...कुणी पेढा खाऊ घालत आहेत...कुणी हळदी-कुंकू खाऊ घालत आहेत... तर कुणी याच्यावर बेलफुल टाकून बुजवून टाकत आहेत ह्याला....!!!🙈🙉🙊

 हे टाळायला पाहिजे🙏🏽🙏🏽

कदाचित याचमुळे  तो सध्या जरा नाराज दिसतो...🙃🙏🏽

वरच सर्व दोन-तीन वेळा वाचलं की तुम्ही कुठल्याही प्राचीन मंदिरात जा... तुम्हांला  किर्तीमुख दिसलाच म्हणून समजा...😊

(📸फोटू:-हिंडून फिरून मीच काढलेले आहेत)

✍🏾निखील

आदिशक्ती महादेवी

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
28 Sep 2014 - 6:27 pm

नवरात्र उत्सवानिमित्त इथल्या काही लेण्या, मंदिरांतून टिपलेली आदीशक्तीची ही काही रूपं.

सुरुवात करूयात ती वैदिक कालखंडाच्याही आधीपासून असलेल्या स्त्री शक्तींपासून.

लज्जागौरी

लज्जागौरी ही स्त्रीच्या प्रजनन शक्तीचे प्रतिक. वैदिक कालखंडाच्याही अगोदरपासून अशा मूर्ती प्रचलित होत्या. वैदिक कालखंडात ह्या प्रकारच्या मूर्ती तंत्रमार्गात समाविष्ट झाल्या. मुख्यतः ह्या मूर्तींना मस्तकाच्या जागी कमळ असते. तर काही वेळा ह्या मस्तकासह असतात. ह्या नग्न असून उपड्या बसलेल्या स्थितीत असतात. ह्या मूर्तींच्या अशा स्वरूपामुळेच ह्यांचे नष्टचर्य ओढवले. परकिय आक्रमकांबरोबरच स्वकीयांनीही ह्यांना नष्ट केले.

१. ही पेडगावच्या भैरवनाथ मंदिरातील लज्जागौरीची प्रतिमा. इ.स. साधारण १३ वे शतक. यादव राजवट.
हिच्या योनीतून दोन सर्प बाहेर आले असून ते पुरुष शक्तीचे प्रतिक आहेत.
a

२. ही वेरूळमधली रामेश्वर लेण्यातील (लेणी. क्र. २१ ) येथील नंदीपीठाच्या मागील बाजूस कोरलेली आहे. इ.स. ७ / ८ शतक.

a

सप्तमातृका

ब्राम्ही माहेश्वरीचैव कौमारी वैष्णवी तथा।
वाराही च तथेंद्राणी चामुंडा: सप्तमातरः॥

सप्तमातृका मूळाच्या अनार्य देवता. कोकणात ह्यांनाच साती आसरा अथवा जलदेवता म्हणत असावेत. सृजनशक्तीची ही प्रतिकं. यातल्या ब्राह्मी, कौमारी, ऐन्द्राणी आणि वैष्णवी ह्या वैदिक अंश असलेल्या तर माहेश्वरी, वाराही, चामुंडा ह्या मूळच्या अवैदिक अर्थात अनार्य अंशाच्या. काही वेळा सात मातृकांबरोबरच आठवी नारसिंहीही दिसते.
सप्तमातृका ह्या नेहमी पट ह्या स्वरूपात दिसतात. म्हणजे सुरुवातीला वीरभद्र आणि शेवटी गणेश आणि मध्ये सात मातृका त्यांच्या बाळांसह. मातृका ओळखणे तसे फार सोपे. मातृकांखालीच प्रत्येकीची वाहने कोरलेली असतात.

ब्राह्मणी - हंस
माहेश्वरी - बैल
कौमारी - मोर
वैष्णवी - गरूड
वाराही - वराह किंवा महिष. ही काही वेळा वराहमुखी पण दाखवली जाते.
ऐन्द्राणी - हत्ती
चामुंडा - प्रेत, शृगाल, कुत्रा किंवा घुबड

यातली चामुंडा सर्वात सुप्रसिद्ध. कदाचित चालुक्यांची ती कुलदेवता असल्याने तीला मानाचे स्थान मिळालेय. कंकालस्वरूप शरीर, लोंबलेले स्तन, पोटात असलेला विंचू (हे तिच्या सतत जागृत असलेल्या भुकेचे प्रतिक) आणि पायांतळी प्रेत ही तिची सर्वसाधारण लक्षणे. सप्तमातृकापटांसह ही एकच मातृका स्वतंत्ररीत्या कोरलेलीही बर्‍याच वेळा आढळते.

वेरूळच्या 'रावण की खाई' (लेणी क्र. १५) मधील सप्तमातृका पट

३. ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी अनुक्रमे हंस, बैल, मोर आणि गरूड ह्या वाहनांसह

a

४. वाराही, ऐन्द्राणी आणि चामुंडा अनुक्रमे वराह, हत्ती आणि घुबड ह्या वाहनांसह
a

वेरूळ येथील कैलास एकाश्ममंदिरातील यज्ञशाळेतील सप्तमातृका

५. वीरभद्र (नंदी), ब्राह्मणी (हंस) आणि माहेश्वरी (बैल)
a

६. कौमारी आणि वैष्णवी अनुक्रमे मोर आणि गरुडासह
a

७. वाराही (महिष), ऐन्द्राणी (हत्ती) आणि चामुंडा (शृगाल अथवा कुत्रा)
a

८. सप्तमातृकापट कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर

a

९. पूर्णपणे उभ्या स्थितीतील सप्तमातृकापट, वेरूळ

a

१०. चामुंडा, सोमेश्वर मंदिर, पिंपरी दुमाला (१३ वे शतक)
a

११. चामुंडा, भुलेश्वर मंदिर, यवत (१२ -१३ वे शतक)

a

१२. चामुंडा, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर (११-१२ वे शतक)

a

१३. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातीलच अजून एक देखणी चामुंडा

a

सप्तमातृकांसोबतच नंतरच्या काळात गणेशाचे स्त्रीरूपसुद्धा तंत्र पंथात समाविष्ट झाले. विनायकी अथवा गणेशिनी ह्या नावाने हे रूप ओळखले जाते.

१४. पाटेश्वर येथील विनायकी, साधारण १४ वे शतक
a

१५. भुलेश्वर येथील विनायकी

a

सरिता देवता

भारतात नद्यांनासुद्धा देवता मानले जाते. गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या तीन प्रमुख सरिता देवता. ह्या आपल्याला वेरूळ येथे कोरलेल्या दिसतात. गंगेचे वाहन मकर, यमुनेचे कूर्म तर सरस्वतीचे कमळ

१६. मकरारूढ गंगा
a

१७. कूर्मारूढ यमुना
a

१८. कमलारूढ सरस्वती
a

१९. वेरूळ येथील रामेश्वर लेणीतील (क्र. २१) गंगेचे अप्रतिम शिल्प
a

२०. यमुना, धुमार लेणे (लेणी क्र. २९), वेरूळ

a

पार्वती
बहुतेक वेळा पार्वतीची मूर्ती ही उमा-माहेश्वर अशा स्वरूपात आढळते. स्वतंत्रपणे कोरलेल्या तीच्या अगदी मोजक्या मूर्ती आढळतात. पार्वतीचे वाहन गोधा अर्थात घोरपड, पार्वतीच्या भोवती पाच अग्नी दाखवतात. ४ यज्ञकुंडातले अग्नी आणि पाचवा सूर्य. शंकर हा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तीने पंचाग्नीसाधन करून कठोर तप केले अशी पौराणिक कथा.

२१. वेरूळ येथील लंकेश्वर लेणीतील पार्वती. लक्षपूर्वक पाहिल्यास पार्वतीच्या एका हाती गणेश तर दुसर्‍या हाती शिवपिंडी दिसेल. भोवती अग्नी धगधगत असलेले दिसतील, वाहन गोधा

a

२२. पार्वती, धुमार लेणे (लेणी क्र. २९), वेरूळ

a

अन्नपूर्णा
हे ही देवीचेच एक स्वरूप. पार्वतीचा अवतार. आपल्या घरी अन्नपूर्णा सौख्य आणि समृद्धी घेऊन येते अशी समजूत. तिची सर्वसाधारण लक्षणे म्हणजे एका हातात पळी तर दुसर्‍या हाती कणीस, तर कधी कमंडलू. खिद्रापूरच्या मंदिरात अंतराळाच्या भिंतीत अन्नपूर्णेची पळी हातात घेतलेली एक सुरेख मूर्ती आहे. दुर्दैवाने माझ्याकडील ते छायाचित्र खराब झाले.

२३. वेरूळच्या कैलास एकाश्ममंदिरातील प्रदक्षिणापथाच्या भिंतीत कोरलेली अन्नपूर्णा
a

लक्ष्मी

लक्ष्मी म्हणजे धनाची देवता. हिंदू धर्मात ती कोठून आली हे विवाद्य आहे. काही जण ती जैन तर काही जण ती बौद्ध धर्मातून आली असे मानतात तर बरेच जण ती मूळची हिंदू धर्मातीलच असे मानतात. माझ्यापुरते मी ती सप्तमातृकांतील वैष्णवीतून उत्क्रांत झाली असावी असे मानतो.

लक्ष्मीचे सर्वपरिचीत स्वरूप हणजे गजान्तलक्ष्मी.
सरोवरातील कमळपुष्पावर आरूढ लक्ष्मीला दोन गजांकडून जलाभिषेक होत आहे हे तिचे स्वरूप.

२४. गजान्तलक्ष्मीचे सर्वात सुंदर रूप वेरूळ येथे शिल्पांकित केलेले आहे.
a

२५. गजान्तलक्ष्मी, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
a

२६. गजलक्ष्मी, रावण की खाई (लेणी क्र. १५)
a

२७. लक्ष्मी, यज्ञशाळा, कैलास लेणे, वेरूळ

a

दुर्गा

हे शक्तीचे सर्वात सुप्रसिद्ध स्वरूप. हिचे वाहन सिंह. आदिशक्तीने निरनिराळी रूपे घेऊन राक्षसांचा संहार केला. पैकी महिषासुराचा वध करणारी ती दुर्गा अथवा महिषासुरमर्दिनी. हिला ८, १०, १६ किंवा १८ हात दाखवतात. हिची आयुधे म्हणजे ढाल, तलवार, त्रिशूळ, धनुष्य, अंकुश, बाण, मुंड, अक्षमाळा, दंड, शंख, पद्म, चक्र, परशु. पैकी चक्र हे विष्णूकडून तर त्रिशूळ हे शंकराकडून तिला मिळाले असे मानतात. दुर्गेची रूपे केवल दुर्गा व महिषासुरमर्दिनी अशा दोन्ही स्वरूपात दिसतात. केवल दुर्गा म्हणजे सिंहारूढ असणारी दुर्गा तर महिषासुरमर्दिनी ह्या रूपात ती महिषाचा संहार करताना दाखवली जाते.

आता दुर्गा व महिषासुरमर्दिनीची विविध रूपे पाहूयात.

२८. दुर्गा, यज्ञशाळा, वेरूळ
a

२९. दुर्गा, रावण की खाई (लेणी क्र. १५) वेरूळ
a

३०. दुर्गा, सिद्धेश्वर मंदिर, कायगाव टोके (१८ वे शतक)
a

३१. महिषासुरमर्दिनी, कैलास लेणे वेरूळ, येथे महिष राक्षस स्वरूपात दाखवलाय तर त्याचे महिष असणे हे डोक्यावरील दोन शिंगांद्वारे सूचित केलेय.

a

३२. महिषासुरमर्दिनी, कैलास लेणे, वेरूळ
a

३३. महिषासुरमर्दिनी, रामेश्वर लेणे, लेणी क्र. २१, वेरूळ
a

३४. महिषासुरमर्दिनी, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
a

३५. महिषासुरमर्दिनी, भुलेश्वर मंदिर, यवत
a

३६. महिषासुरमर्दिनी, चांगावटेश्वर मंदिर, सासवड, १३ वे शतक
a

आतापर्यंत ढोबळमानाने आपण काही रूपे अगदी संक्षिप्त स्वरूपात पाहिली. भैरवी, सरस्वती, हरिती, ज्येष्ठा गौरी, अंबिका अशी अजूनही काही रूपे आहेत त्यावर परत कधीतरी.

छान, लेख आणि फोटोंच्या निमीत्ताने नवरात्रात देवींच दर्शन सोबत इतिहासाच जरास ज्ञान मिळण्याचा योग धन्यवाद. अशात मराठी विकिवरील गौरीपूजन लेखाच्या निमीत्ताने जरा गूगल शोध झालेलाच आहे तर या निमीत्ताने काही शंकांची माहिती अनुषंगिक विषयांतराचा भाग म्हणून कुणी देऊ शकल्यास हवी आहे.

१) सबंध भारतात मिळून किमान ९ प्रकारच्या गौरीपूजनाच्या परंपरा आढळल्या त्या खालील प्रमाणे

*विवीध गौरी आणि त्यांची व्रते:

**ज्येष्ठा गौरी
**करवा चौथ - हे गौरी गणेशाशी संबंधीत व्रत असण्याबद्दल दुजोरा हवा
**जयपार्वती व्रत - आषाढ महिन्यातील गूजराथेतील व्रत - अधिक माहिती हवी
**स्वर्णगौरी व्रत - शुक्ल तृतीया भाद्रपद (गणेश चतुर्थीच्या आधीचा दिवस - कर्नाटक - अधिक माहिती हवी
**चैत्र गौरी - अधिक माहिती हवी
**सौभाग्य गौरी व्रत - आंध्रप्रदेश - अधिक माहिती हवी
**मंगळा गौरी - अधिक माहिती हवी
**केदार गौरी व्रत -तामीळनाडू - अधिक माहिती हवी
**ललिता गौरी - अधिक माहिती हवी
**लज्जा गौरी -

१ अ) लज्जा गौरीचे पूजन होत होते असे इतिहास विषयक लेखांवरून वाटते या पूजनाचे आणि व्रताचे नेमके स्वरूप काय होते;

१ आ) लज्जागौरीचा आणि इतर गौरी पूजन प्रथांचा आपापसात काही संबंध आहे का ?

१ इ) भारत भरातील सर्व गौरी पूजने परस्परांशी संबंधीत असतील तर हे संबंध नेमके कोणते आणि हि सर्व प्रकारची गौरी पुजने वेगवेगळ्या दिवशी होण्याची कारणे काय असावीत

१ उ) ज्येष्ठा गौरींच्या बाबतीत गौरी आणि महालक्ष्मी हि दोन्ही नावे प्रचलीत दिसतात; बर्‍याच ठिकाणी गौरी हे पार्वती स्वरूप असल्याचे उल्लेख येतात तर लक्ष्मी ही विष्णू पत्नी मानली जाते तर यात काही सरमिसळ/ गल्लत होते आहे का ?

लज्जागौरीचे पक्षी योनीदेवतांचे / मातृदेवतांचे पूजन वैदिक काळाआधीपासून होत होते. डेक्कन कॉलेजातील ताम्रपाषाण विथिकेमध्ये इनामगाव उत्खननात मिळालेल्या स्त्री देवतेची मातीपासून तयार केलेली मूर्ती (टेराकोटा) आहे जी मी स्वतः पाहिली आहे. डेक्कन कॉलेजच्या संग्रहालयातील विथिंकेवर कधीतरी धागा काढण्याचा विचार आहे.

लज्जागौरी वर रा. चिं. ढेरे यांनी याच नावाचे एक पुस्तक लिहिले आहे त्यात आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे बहुधा मिळतील. मी ते पुस्तक वाचलेले नाही, संग्रहीपण नाही. पैसाताई अधिक माहिती देऊ शकेल.

बाकी गौरी म्हणजे पार्वती. शुभ्र हिमालयाची ती मुलगी म्हणून गौरी हे नाव.

प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना
ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना
माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना
श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना
ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता

लज्जागौरी प्रतिमेतिल सर्प पुरुष शक्तीचे प्रतिक कसे ?

लज्जागौरी प्रतिमेतीलच असे नव्हे तर एकूणांतच हिदू मिथकांत सर्पांना प्रजननाचे प्रतिक (symbol of fertility) मानले गेले आहे. ह्याशिवाय येथे सर्प योनीतून बाहेर आले असून स्त्रीने ते धरून ठेवले आहेत. साहजिकच ते पुरुष शक्ती दर्शवत असावेत.

थोडा आणखी विदा हवा कारण स्त्रियांना फर्टिलिटी सीमबोल/गॉड असे म्हटले जाते अर्थात ही अनार्याची वा जेंव्हा देव न्हवते तर निव्वळ निसर्ग दैवत गणला जात होता त्याकालीन बाब आहे आणि लज्जा गौरी जर अनार्या-अवैदिक असेल तर ती स्वत:च सिम्बोल ऑफ़ फर्टिलिटी ठरते व पुरुष हां होर्न गॉड ऑफ़ हंटिंग म्हणजेच शिंग असलेला शिकारिचा देवता ठरतो. पुरूषाचे हे शिंग चित्र व मूर्तिमधे प्रामुख्याने डोक्यावर दाखवलेले असे आणखी कुठे नाही :)

म्हणून एकाच ठिकाणी दोन दोन साप ही कलात्मकता नसून इतर काही दर्शवत असावेत असा संशय उरतो

 अजून विदा काहीच नाही. मूळात ही प्रतिमा बर्‍याच उशिरा घडवली गेली आहे. यादवकाळात, साधारण १३ व्या शतकात. तेव्हा लज्जागौरीच्या प्रतिमा घडवणे जवळपास बंद झाले होते शिवाय त्या काळात आर्य-अनार्य, वैदिक- अवैदिक लागू होण्याचा काही प्रश्नच नाही

 

लज्जागौरी: हे स्त्रीच्या जननशक्तीचे देवतास्वरूप आदिम काळापासून जवळपास सर्व जगभर मानले गेलेले. रेणुका, यल्लम्मा, एकवीरा, जोगुळांबा, सांतेरी ही सगळी एकाच मातृशक्तीची रूपे मानली गेली आहेत. सांतेरी ही वारूळस्वरूपात पुजली जाते. वारूळ ही भूमीची योनी तर नाग हा पुरुषतत्त्वाचे प्रतीक मानला गेला. मुरुगन, खंडोबा, जोतिबा, रवळनाथ, भैरव हे क्षेत्रपाल त्यामुळे नागरूप मानले जातात. वारूळ आणि नाग हे स्त्री-पुरुष मीलनाचे आणि जननशक्तीचे प्रतीक ठरले. वारुळात रहाणारा नाग लज्जागौरीच्या शिल्पात का असावा त्याचं हे कारण आहे.

http://www.misalpav.com/node/25606 या धाग्यावरील प्रतिसादात काही माहिती लिहिली होती. ती इथे पेस्ट करीत आहे.
आसरा हा शब्द अप्सरा यावरूनच आला आहे. आणि मूळ मातृकांनाच लोकव्यवहारात साती आसरा हे नाव मिळाले. नुकतेच पं महादेवशास्त्री जोशी यांचे "भारताची मूर्तीकला" हे पुस्तक हाती आले आहे. त्यात ते म्हणतात की या मातृका म्हणजे ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, यम, इंद्र, रुद्र यांच्या क्रियाशक्ती आहेत. त्या आपापल्या स्वामींचीच आयुधे व वाहने धारण करतात. या ७ जणींत महालक्ष्मीचा अंतर्भाव केला की त्या अष्टमातृका होतात. काही लोक महालक्ष्मीच्या जागी योगेश्वरी किंवा चर्चिका यांची स्थापना करतात.

ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा |
वाराही च तथेन्द्राणी चामुंडा सप्तमातरः ||

असा त्यांचा उल्लेख असलेला श्लोक आहे.

या सप्तमातृकांच्या रक्षणासाठी एका बाजूला वीरभद्र तर दुसर्‍या बाजूला गणपती असतो. या सार्‍या वर्णनावरून त्या मूळ अनार्यांच्या देवता असाव्यात हे स्पष्ट आहे. या मुलांचे रक्षण करणार्‍या मातृका आहेत तशाच "बालघातिनी माता" सुद्धा वर्णन केल्या आहेत. त्यांच्यात पूतना चे नाव आहे. त्यावरून साती आसरांनी पाण्यात ओढून नेले किंवा कोणाचा बळी मागितला इ. कहाण्या प्रचलित झाल्या असाव्यात.

प्रत्येक मातृकेचा एक प्रिय वृक्ष असतो पाणवठ्याजवळ किंवा डोंगरकपारीत मातृकांची स्थाने असतात.विवाह वगैरे मंगलकार्यात सुपार्‍या मांडून मातृकापूजन करतात. तसेच सुलभ प्रसूतीसाठीही मातृकापूजन केले जाते. उत्तर भारतात या मातृका १६ मानल्या गेल्या आहेत. आणि तिकडे मातृकापूजन जास्त लोकप्रिय आहे.

स्त्रीरूपी गणेश/विनायकीबद्दल ढेरे म्हणतात की लक्ष्मीची मोठी बहीण म्हटलेली अलक्ष्मी (ज्येष्ठा) हिचे रूप विनायकाप्रमाणेच (गजमुख, लंबोदर इ.)वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे सर्व गुण लक्ष्मीच्या उलट सांगितले आहेत. गणेश हा जसा विघ्नकर्ता आणि नंतर विघ्नहर्ता मानला गेला तशीच लक्ष्मी आणि अलक्ष्मी ही एकाच देवतेची द्वंद्वात्मक रूपे आहेत. अलक्ष्मी विघ्ने आणणारी देवता मानली गेली आहे. तशीच बालघातिनी सप्तमातृकांमधीलही एक मातृका मानली गेली आहे. उद्दालक मुनीने तिच्याशी विवाह करून तिच्या अशुभ आवडी पाहून तिचा त्याग केला अशी एक कथा आहे. गणेशाचे एक नाव ज्येष्ठराज आहे. तर लक्ष्मीबरोबर गज हे असतातच. अशा गजान्तलक्ष्मीचे चित्र दाराच्या पट्टीवर कोरण्याची पद्धत होती. असा हा लक्ष्मी, ज्येष्ठा आणि गणेश यांचा परस्पर संबंध आहे. या शिल्पांमध्ये मुळात कदाचित या अलक्ष्मीला स्थान दिलेले असावे. जे काळाच्या ओघात स्त्रीरूप गणेश असे मानले गेले.

विष्णु, महेश इ. देवांना त्यांची रूपे आणि गुण बहुधा गुप्तकाळात मिळाले. तशाच मातृकांनाही गुप्तकाळात सध्याची नावे आणि गुण शिल्पे तयार करण्यासाठी म्हणून दिले गेले असावेत. मातृकापूजा ही त्याच्याही फार आधीची. वेगळ्या नावांनी आणि मुख्यतः बालघातिनी स्वरूपात, त्यांनी मुलांचा घात करू नये म्हणून त्यांची पूजा आदिम काळापासून केली जात होतीच. आधीच्या काळात पूतना, षष्ठी, शकुनी, ज्येष्ठा (दु:सहा) शीतला, मातंगी इ मातृकांची नावे होती. स्कंद हा मातृकांचा पुत्र आणि मुळात तोही बालग्रह मानला गेला होता. नंतरच्या काळात त्यांच्या भीतीने पूजा करायचा रिवाज विसरला गेला आणि त्यांना आताचे वरद रूप मिळाले.

अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेल. जाणून घेण्याचा उद्देश हा की काही लोककथा संस्कृत मिथकांनी दखल घेण्या पुर्वी पासूनच्या असू शकतील का ? कारण असंख्य भारतीय शिल्पातून अ‍ॅक्रॉस इंडीया प्रतिकांचा नेमकेपणा काटेकोरपणे जपला गेला असावा असे वाटते. ज्या काळात चित्रकलेसाठी कागदासारखे एका ठिकानाहून दुसर्‍या ठिकाणी चित्र नेण्याचे चांगले माध्यम नव्हते. संस्कृत जाणणार्‍या प्रत्येकाला स्वतःला शिल्पकला येत नसेल आणि शिल्पकला येणार्‍या प्रत्येकाला संस्कृत येत नसेल. एकच शिल्पकार कितीही म्हटले तरी त्या काळात अडवळणाच्या जागी जाऊन किती लेण्यांचा अभ्यासकरून लक्षात ठेऊन पुन्हा दुसर्‍या जागी जाऊन सेम टू सेम प्रतिकांची शिल्पे बनवणार.

अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्‍या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का ?

 

अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेल

तशी बरीच आहेत. मुख्यतः अवैदिक शिल्पे उदा. गणेश वगैरे. अर्थात ही शिल्पे घडवली गेली तदनंतर. पण काही उत्खननांत हत्ती मुखाची टेराकोटा शिल्पे आहेत. शिवाय योनी, लिंग आदी जननशक्तीसंदर्भातही बरीच शिल्पे सिंधू खोरे, राखीगढी, इनामगाव,, नेवासा इथल्या उत्खननांमध्ये मिळाली आहेत. अशा प्रकारची शिल्पे नंतर वैदिकांमध्येही समाविष्ट झाली.

अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्‍या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का?

तसे काही उल्लेख नाहीत पण एकंदरीत मौर्यकालीन शिल्पकलेवर ग्रीक, रोमन शैलीचा मोठा प्रभाव होता. संस्कृतींचे आदानप्रदान व्यापारानिमित्ताने इकडून तिकडे होत राहिल्यामुळे शिल्पशास्त्रातही तदनुषंगाने बदल घडत गेले.

 

गजहा - शिवाची रौद्र आणि संहारक रूपातली मूर्ती.

॥ हर हर महादेव ॥

ब्रम्हा विष्णू आणि महेश यापैकी महेश म्हणजेच शंकर ही विनाशाची देवता मानली जाते. शिव हा काही नुसतेच तत्परतेने जाऊन दैत्यांचा तावडीतून आपल्या भक्तांना सोडवतो असे नाही, तर तो मृत्यूची देवता 'यम' व प्रेमाची देवता 'मदन' यांना सुद्धा वेळप्रसंगी निष्प्रभ करतो व त्यांच्यावर विजय मिळवतो. तसेच आचरणात काही आगळीक केली म्हणून तो ब्रह्मदेवालाही धडा शिकवतो. तसेच त्रासदायक ठरू लागल्यावर तो नरसिंहालाही क्षमा करत नाही. त्यामुळेच शिव हा संहारक तर आहेच पण तो भयावह सुद्धा आहे.

गजहा 

सर्वांत प्राचीन संहारक मूर्ती ही गजहामूर्ती असून ती इसवीच्या ६व्या शतकातील आहे. कूर्मपुराणामध्ये  विस्ताराने सांगितली आहे. लिंगपूजा व तपश्चर्या करणाऱ्या ब्राह्मणांना हत्तीच्या रूपात येऊन त्रास देणाऱ्या नीलासुर नावाच्या दैत्याचा शिवाने कसा नाश केला. याची ही कथा आहे. असे सांगितले जाते की ही घटना वाराणसी येथे घडली. होती. शिवाने या हत्तीरूपी दानवाचा वध केला आणि त्याचे चामडे स्वतः पांघरले व वाराणसी इथे कृत्तिकेश्वर नावाच्या शिवलिंगाची पूजा करणाऱ्या ब्राह्मणांना या दैत्याच्या त्रासातून मुक्त केले. याच घटनेचे दुसरे पण काहीसे निराळे वर्णन हे वराहपुराणामध्ये येते. ते असे की, असुरांचा राजा अंधक हा पार्वतीच्या रूपावर मोहित झाला. त्याचवेळी त्याचा सहाय्यक नीलासुर हा हत्तीचे रूप घेऊन शिवाला मारण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. ज्या वेळी नंदीला या नीलासुराच्या पापी कृत्याचे वृत्त समजते तेव्हा तो हे सर्व वीरभद्राला जाऊन सांगतो. त्याबरोबर तत्काळ वीरभद्र तिथे येऊन हत्तीच्या रूपातील नीलासुराचा वध करतो व त्याचे कातडे शिवाला अर्पण करतो. शेवटी शिवाच्या हातून अंधकासुराचाही वध होतो. 

 चित्र क्र १ . हळेबीडू कर्नाटक येथील गजहा मूर्ती.

कर्नाटकातल्या हासन जिल्ह्यात हळेबीडू येथे होयसळेश्वर मंदिर आहे. त्यात आतमध्ये शिव लिंग आहे आणि शिवाचे पूजन केले जाते. या मंदिराच्या बाह्य भिंतीवर गजहा मूर्तींचे दर्शन घडते.
येथे शिवाला आठ हातांचा दाखवलेला आहे. त्यापैकी वरचे दोन हात हत्तीचे चामडे डोक्यावर उचलून धरताना दिसतात. शिवाभोवती गजचर्माची प्रभावळ दिसते. चारही टोकांना हातीचे चार पाय दिसतात. शंकराचा उजवा पाय हत्तीच्या डोक्यावर दिसतो. सर्वात वरच्या भागात हत्तीचे शेपूट दिसते. हत्तीच्या गंडस्थळावर, मानेवर सोंडेवर आणि पायात उत्तम अलंकार दिसतात.

शिवाची मूर्ती त्रिभंग मुद्रेत दाखवलेली आहे.त्रिभंग मुद्रा म्हणजे पाय धड आणि चेहरा हे तिन्ही एका रेषेत न दाखवता तिघांनाही वेगवेगळ्या अक्षांमध्ये दाखवलं जातं. भरतनाट्यम नृत्य प्रकारात अशा मुद्रा आवर्जून बघायला मिळतात. सदर हत्ती रुपी दैत्याचा विनाश केल्याने शिव अत्यानंदाने नृत्य करताना दिसत आहे.
समोरील दोन हात नृत्य करताना आवश्यक असणारा तोल सांभाळताना दिसत आहे. तर उरलेल्या दोन हातात त्रिशुळ आणि डमरू दिसतात. एका हातातलं आयुध अस्पष्ट आहे तर उरलेल्या हातात मानवी मुंडकं शिवाने धारण केलेले दिसते.
 चित्र क्र २ . शिल्पातलं शंकराचं मुख त्रिनेत्र आणि अलंकार .

शिवाने उत्कृष्ट अलंकार धारण केलेले दिसतत. कवट्या असलेला मुकुट, हातातल्या अंगठ्या, बाजूबंध, डाव्या दंडावर किर्तीमुख, कंबरपट्टा, पायातले तोडे निरखून पाहावेत असे आहेत. संहारक मूर्ती असल्यामुळे शंकराचा तिसरा डोळा ही दाखवलेला आहे. त्याच सोबत दोन सुळे तोंडातून बाहेर येताना दाखवले आहेत. शिवाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजेच गळ्यातला सर्प आणि त्यांचं वाहन नंदी हे सुद्धा शिल्पामध्ये कोरलेले दिसतात .

अशाच प्रकारच्या गजहा मूर्ती भारतभर आढळतात. काही ठिकाणी हात कमी जास्त आहेत आणि आयुधांमध्ये फरक दिसून येतो. 

संदर्भ :- शिवमूर्तये नमः, डॉ. गो बं देगलूरकर.

लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार .

.http://www.chaturthamiti.in/2022/10/blog-post.html

 

विष्णु की प्रतिमाएं

जौनपुर

 22-07-2020 08:36 PM
द्रिश्य 3 कला व सौन्दर्य

भारतीय कला में मूर्तियाँ अत्यंत ही महत्वपूर्ण हैं, इन मूर्तियों में अनेकों देवी देवताओं आदि का अंकन किया गया है जिसमे हमें हिन्दू, बौद्ध और जैन देवी देवताओं की मूर्तियाँ देखने को मिलती हैं। इन मूर्तियों को विभिन्न शैलियों से निर्मित किया गया है जैसे मथुरा कला शैली, सारनाथ कला शैली, गुप्त कला शैली,. प्रतिहार कला शैली तथा परमार कला शैली आदि। हिन्दू देवताओं के मूर्ती परंपरा की बात करें तो विष्णु भगवान् का मूर्तिशास्त्र में अनेकों विभिन्न प्रकार के विवरण हमें देखने को मिलते हैं। विष्णु की मूर्तियाँ अनेकों प्रकार से विकसित हुयी हैं तथा ये मूर्तियाँ विष्णु के विभिन्न अवतारों पर आधारित हैं जिन्हें की दशावतार के नाम से जाना जाता है। गुप्त काल को हिन्दू कला का स्वर्ण युग माना जाता है, यह वही काल है जब भारतीय हिन्दू मंदिर परंपरा की शुरुआत होती है जिसके उदाहरण हमें साँची के मंदिर संख्या 17 से देखने पर मिल जाते हैं, इसके अलावां नाचना कुठार, ललितपुर के देवघर आदि से भी इस काल के कला का विकास देखने को मिलता है। हिन्दू मूर्तियों का विकास मौर्य साम्राज्य से होना शुरू हो चुका था जिसका अनुपम उदाहरण मौर्य कालीन बलराम की प्रतिमा है। कुशाण काल के दौरान भी हिन्दू प्रतिमाशास्त्र का विकास बड़े पैमाने पर हुआ जिसका उदहारण हमें विभिन्न मूर्तियों से देखने को मिल जाता है, मथुरा कला के दौरान शिवलिंग तथा अन्य मूर्तियों का विकास बड़े पैमाने पर हुआ। यह गुप्त काल ही था जब हिन्दू मूर्ती कला का विकास अपने चरम पर पहुंचा, भूमरा का एक मुखी शिवलिंग, अहिक्षेत्र से प्राप्त गंगा और यमुना की प्रतिमाएं आदि इस काल के कला का एक अनुपम और महत्वपूर्ण उदाहरण पेश करने का कार्य करती है। दशावतार के मंदिर में बनी अनेकों प्रतिमाएं इस काल की कला के विषय में अभूतपूर्व उदाहरण पेश करते हैं। चौथी शताब्दी ईस्वी के पहले तक वासुदेव-कृष्ण की पूजा विष्णु की तुलना में कहीं अधिक हुआ करती थी और यही कारण है की इसके पहले की विष्णु की मूर्तियाँ प्रकाश में बहुत ही सीमित संख्या में आई हैं। गुप्त काल के दौरान ही विष्णु के मूर्तिशास्त्र का विकास होना शुरू होता है। इसी दौरान विष्णु की चतुरानन प्रतिमा का भी विकास हुआ। चतुरानन अर्थात चार भुजाओं वाला। विष्णु को चार मुखों वाला भी मूर्ती शास्त्र में दिखाए जाने की परंपरा की भी शुरुआत होती है, बैकुंठ विष्णु, वराह अवतार, मत्स्य अवतार आदि प्रतिमाओं का विकास होता है। विष्णु के प्रतिमाओं में नरसिंह की प्रतिमा तथा कच्छप या कछुए के रूप में दिखाया गया है, विष्णु के निवास स्थान को छीर सागर के रूप में भी जाना जाता है और विष्णु छीर सागर में शेषनाग के ऊपर विराजित होते है, मूर्ती शास्त्र में इससे जो प्रतिमा सम्बंधित है वह है शेषासई विष्णु की प्रतिमा। विष्णु को पैर के निशान के रूप में भी प्रस्तुत किया जाता है तथा इस निशान को विष्णुपाद के रूप में जाना जाता है। विष्णु को मुख्य रूप से शंख, चक्र, गदा और पद्म धारण किये हुए दिखाया जाता है। चतुर्मुखी विष्णु को बैकुंठ विष्णु के नाम से भी जाना जाता है जिसमे विष्णु के चार मुख का अंकन किया जाता है तथा इनके आस पास नायिकाओं, नायकों तथा गन्धर्वों आदि का भी अंकन किया जाता है तथा इस प्रकार की मूर्ती में विष्णु को खड़े हुए दिखाया जाता है तथा इनमे 4 से 8 भुजाओं का अंकन किया जाता है। विष्णु के वाहन गरुण का अंकन भी विष्णु की प्रतिमाओं पर किया जाता है। नरसिंह की प्रतिमा में विष्णु को पुरुष आकृति का ही दिखाया जाता है परन्तु इसमें उनके मुख को सिंह के मुख की तरह प्रदर्शित किया जाता है। विष्णु की इस तरह की प्रतिमाओं में मुख्य रूप से हिरण्याक्ष वध का अंकन किया जाता है। नरसिंह की मूर्तियों में विष्णु को 4 भुजाओं के साथ प्रदर्शित किया जाता है तथा इन मूर्तियों में आयुध के रूप में चक्र, गदा, नाखून आदि का अंकन किया जाता है। वाराह प्रतिमा में विष्णु का अंकन जंगली सूकर के रूप में किया जाता है जिसमे विष्णु को भू देवी को अपने सींगो पर उठाते हुए दिखाया जाता है। विष्णु की एक मात्र प्रतिमा जो विष्णु के सभी अवतारों को एक साथ प्रदर्शित करती है को विश्वरूप की प्रतिमा के रूप में जाना जाता है।

सन्दर्भ :
https://en.wikipedia.org/wiki/Vishvarupa
https://vedicfeed.com/symbols-of-lord-vishnu/
https://en.wikipedia.org/wiki/Hindu_art#Development_of_the_iconography_of_Vishnu
https://en.wikipedia.org/wiki/Vaikuntha_Chaturmurti
https://en.wikipedia.org/wiki/Narasimha
https://en.wikipedia.org/wiki/Varaha
चित्र सन्दर्भ:
मुख्य चित्र में दशावतार मंदिर (देवगढ़, ललितपुर) में स्थापित अनंतसई विष्णु की प्रतिमा को दिखाया गया है। (Flickr)
दूसरे चित्र में क्रमशः सारनाथ, मथुरा और गुप्त शैली में बनायीं गयी भगवान विष्णु की प्रतिमाओं को दिखाया गया है। (Prarang)
तीसरे चित्र में गुप्त काल में बनायीं गयी विष्णु प्रतिमाओं को दृश्यांवित किया गया है। (Prarang)
चौथे चित्र में मौर्यकालीन मुद्रा और मूर्तिकला में बलराम छवि दिखाई गयी है। (Prarang)
पांचवे चित्र में (दाएं और बाएँ) अहिछत्र गंगा, जमुना और भूमरा की एकमुखी शिवलिंग का चित्र है। (Prarang)
छठे चित्र में चतुरानन विष्णु की देव प्रतिमाओं को दिखाया गया है। (Prarang)
सातवें चित्र में भगवन विष्णु की चतुर्मुखी प्रतिमा को दिखाया गया है। (Prarang)
आठवें चित्र में बैकुंठ विष्णु को देवी लक्ष्मी के साथ गरुण पर सवार दिखाया गया है। (Publicdomainpictures)
नौवें चित्र में भगवान् विष्णु की नरसिंह अवतार की मूर्ति प्रदर्शित की गयी है। (Wikimedia)
दसवें चित्र में भगवान् विष्णु के विराट स्वरूप (विश्वरूप) और देवगढ़ (ललितपुर) में स्थापित शेषनाग पर सवार भगवान् विष्णु की प्रतिमाओं को दिखाया गया है। (Prarang)
 
 https://www.prarang.in/jaunpur/posts/4675/the-evolution-of-the-art-of-vishnu
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...