Wednesday, November 1, 2023

वेळापुर अर्धनारीनटेश्वर मंदीर

 सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे हेमाडपंथीय वास्तुकलेचा उत्तम नमुना असणारे हर्नेश्वर महादेव मंदिर हे अर्धनारीनटेश्वराचे हे जगातील एकमेव असे मंदिर आहे. वेळापूर हे ठिकाण देवगिरीच्या यादवांच्या काळात भरभराटीस आले होते. हे ठिकाण देवगिरीची दक्षिण सीमा आहे. त्या काळी हे ठिकाण व्यापार आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जात होते. यादव कालीन राजा रामचंद्र [१२७१ ते १३१०] यांच्या बद्दलचे शिलालेख यावर कोरलेले आहेत। मराठी आणि संस्कृत भाषेत असणा-या या शिलालेखात देवराव यांच्या नावाचा उल्लेख आहे. 
    जगातील एकमेव अर्धनारीनटेश्वराचे मंदीर असे म्हणुन जरी या मंदिराचा उल्लेख करण्यात आला तरी मात्र आपल्या पुरातन खात्याकडुन अगदीच दुर्लक्षित म्हणावे या अवस्थेत हे मंदिर आहे. मंदिराबद्दल पुजारी सोडले तर कोणालाच माहिती नाही. मंदिर भारतीय पुरातन वास्तू संरक्षण खात्याच्या देखरेखीत आहे. मंदिराची पूजाअर्चा व्यवस्थाही पुजारी गुरव महादेव व गौरीहर विश्वनाथ हे परंपरेने करत आहेत. पुरातत्वखात्याने आपल्या वेबसाईटवर या मंदिराचा उल्लेख  केला आहे. [अ.नं. १०७]
  वेळापूर हे आळंदी-पंढरपूर या श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी मार्गावर वसलेले एक ऐतिहासिक गांव आहे. या गावापासून श्री क्षेत्र पंढरपूर हे केवळ ३२ कि.मी., श्री क्षेत्र सिद्धरामेश्‍वर (सोलापूर) १०० कि.मी., श्री क्षेत्र तुळजापूर १५० कि.मी., श्री क्षेत्र अक्कलकोट १५० कि.मी., शिखर शिंगणापूर (मोठा महादेव) ५० कि.मी., श्री क्षेत्र गोंदवले ६० कि.मी., निरा-भिमा या पवित्र नद्यांच्या संगमावरील श्री क्षेत्र निरा-नरसिंहपूर २५ कि.मी., जैन धर्मियांचे क्षेत्र दहिगांव हे ५० कि.मी. अंतरावर आहे तर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झालेले अकलूज हे १० कि.मी. अंतरावर आहे. अकलूजमध्ये श्री अकलाई, आनंदी गणेश, शिवपार्वती मंदिर, श्रीराम मंदिर, श्री साईबाबा मंदिर, यांच्यासह शिवसृष्टी, सयाजीराजे वॉटर पार्क, शिवामृत गार्डन, विद्युत कारंजे अशी पर्यटनस्थळेही आहेत.वेळापूरच्‍या मंदिरात जाण्‍यासाठी अकलूज किंवा पंढरपूर या दोन ठिकाणाहून एस.टी. मिळतात. ते मंदिर पंढरपूरच्‍या तुलनेत अकलूजवरुन जवळ आहे. रेल्‍वेने येणा-यांना माढा तालुक्‍यातील कुर्डूवाडी रेल्‍वेस्‍थानकावर उतरता येते. तेथून पंढरपूरला येऊन एस.टी.मार्गे वेळापूर गाठावे लागते. रेल्‍वेने पंढरपूर रेल्‍वे स्‍थानकावर पोचण्‍याची सोय आहे.




temple

इतिहास
     देवगिरीच्या यादवांच्या काळात वेळापूर प्रामुख्याने भरभराटीस आले. खूप वर्षापूर्वी वेळापूरचे स्थान जसे बदलत गेले तसे नावही बदलत गेले. यादवांच्या काळापर्यंत वेळापूरचे नांव एकचक्रनगर असे होते. महाभारताचा कालावधी पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. त्याकाळी दक्षिणेकडचा भाग हा दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध होता. यावरूनच वेळापूरचा भागही दंडकारण्यात समाविष्ट होता आणि या दंडकारण्यात अनेक ऋषी-मुनींनी तपश्‍चर्या केली आहे. म्हणजेच फार प्राचीन काळापासून ही भूमी तपोभूमी, पावनभूमी अशी आहे. शांडिल्य ऋषीसह अनेकांनी येथे तपश्‍चर्या केली आहे असे परंपरा मानते. महाभारत ते यादवकाल या कालावधीमध्ये वेळापूरबाबतचे पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र यादवकालापासून इ.स.१३०० पासूनचे पुरावे येथे आढळतात. देवगिरीची दक्षिण सीमा म्हणजे वेळापूर. वेळ म्हणजे सीमा. पूर म्हणजे भोवती तटबंदी असलेले गांव. यावरून वेळापूर हे नांव या गावास यादवांच्या काळातच मिळाले असावे असे वाटते. माणदेश व इतर भागावर लक्ष ठेवण्यासाठी वेळापूर येथे उपराजधानीप्रमाणे यादवांचे लष्करी ठाणे होते व यादवांच्या वतीने या ठाण्याचा कारभार बाईदेवराणा हे पहात होते. एक मध्यवर्ती लष्करी ठाणे म्हणून वेळापूरला अनन्य साधारण महत्त्व होते. त्या काळात सर्वच दृष्टीने वेळापूर भरभराटीस आलेले होते. त्याकाळात पर्यटनस्थळ म्हणा किंवा सांस्कृतिक केंद्र म्हणा, येथील श्री अर्धनारी नटेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. या जीर्णोद्धाराचा संकल्पक बाईदेवराणा होते. स्वतःच्या अधिकारात त्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. शिलालेखातील उल्लेख पाहता पूर्वी हे मंदिर होते. पण स्वरूप छोटे म्हणजे मुख्य गाभारा, गाभाऱ्यात पिंड व आतील नंदी, तो ही उघड्यावर एवढेच असावे. नंतर सर्व बाजूंनी जीर्णोद्धार झाल्यानंतर बाहेरच्या नंदीची प्रतिष्ठापना केली असावी. 
एकमेकांना सामोरे असणार्या दोन अर्धमंडपांनी युक्त आणि मध्यभागी अंकण असलेला अर्धखुला मंडप आणि मंडपाच्या उरलेल्या दोन्ही बाजुस एकमेकासमोर असलेली अंतराळयुक्त गर्भगृहे असा या मंदीराचा तलविन्यास आहे. अर्धमंडपांना वामनभिंती आहेत. दोन्ही अर्धमंड्पात जाण्यासाठी पायर्या आहेत. मंडपाच्या चारही कोपर्यामध्ये अंतराळाच्या प्रवेशमार्गाच्या दोन्ही बाजुस देवकोष्टे आहेत. दोन्ही गर्भगृहे एकाच आकाराची असली तरी त्या दोन्हीमध्ये फरक आहे. आज पडझड झालेल्या गर्भगृहाचे अंतराळ दुसर्या गर्भगॄहाच्या अंतराळाच्या तुलनेत लहान आहे. स्तंभाचा घटकक्रम किंवा स्तंभरचना अलंकरण नसलेले प्रवेशमार्ग आणि याच परिसरात सापडलेले शिलालेख लक्षात घेता हे मंदीर यादव राजा रामचंद्र याच्या कारकीर्दीच्या शेवटी किंवा कदाचित चौदाव्या शतकाच्या सुरवातीला बांधले असावे असा अंदाज व्यक्त करता येतो. 

 रचना :-         

            अर्धनारी नटेश्वर वेळापूरचे ग्रामदैवत. मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर उजव्या बाजूस छोट्या बांधकामामध्ये सुंदर ऐटीत बसलेली गणेशमूर्ती दिसते. डाव्या बाजूस उंच दीपमाळ आहे. तेथे मोठी बारव आहे. बारवेमध्ये पाण्याला सर्व बाजूंनी झरे असल्याने बारव उन्हाळ्यात कधीही कोरडी पडली नाही. मुख्य मंदिरासमोर बारवेत नैऋत्य कोप-यामध्ये लहान मंदिर आहे. त्यामध्ये दोन शिवलिंगे आहेत. त्यांना काशीविश्वनाथ व रामेश्वर स्थान असे म्हणतात. ही दोन्ही शिवलिंगे पावसाळ्यात पाणी पातळी वाढल्यानंतर पाण्याखाली जातात, म्हणून बारवेतील जलाला सर्व तीर्थांचे महत्त्व लाभते अशी भाविकांची धारणा आहे. त्यांच्या शेजारी वायव्य बाजूला बळीश्वर मंदिर आहे. बळीश्वर मंदिराचे बांधकाम दगडी पाषाणामधील खांब व शिळा यांमध्ये बांधलेले आहे. ते मंदिर मुख्य मंदिराच्या समोर बारवेशेजारी थोडे खाली, जमिनीमध्ये असलेले दिसते. मंदिराच्या गाभा-यामध्ये दोन शिवलिंगे आहेत. 



मुख्य शिवलिंग सुंदर आहे. छोटा नंदी आहे. बाहेरील बाजूस उंच आसनावर गणेशमूर्ती आहे. दुस-या दोन आसनांवरील दोन मूर्ती पुरातन वास्तू खात्याकडे आहेत. त्याच्यासमोर नागदेवता. त्या प्रत्यक्षात दक्षिणेकडे मुखाकडून एकमेकाला वेटोळे घातलेल्या स्वरूपात दोन नाग मूर्ती आहेत.डाव्या बाजूला एक गोमुख असून पहिल्या पायरीजवळ एक शिलालेख कोरलेला आहे. मंदीराचा जीर्णोद्धार इ.स.१३०० व इ.स.१३०५ या टप्प्यात झाल्याचा उल्लेख शिलालेखात आढळतो. सध्याची मूर्ती प्रतिष्ठापना सोमवार दि.२२ नोव्हेंबर १३०५ रोजी केल्याचा उल्लेख तीन शिलालेखातून आढळतो.

 
 
     मुख्य मंदिराकडे जावे लागते ते प्रवेशद्वारापासून बारवेला डाव्या बाजूने वळसा घालून, पिंपळ वृक्षाखालून. मंदिराबाहेर चौकोनी उंच आसनावर दगडी मंडपामध्ये नंदी आहे. नंदीच्या शिंगामधून मंदिराच्या कळसाचे प्रथम दर्शन होते. नंदी मानेने थोडा वळून बघत थाटात बसलेला आहे. नंदी आकाराने मोठा आहे. नंदी मंडपाला चार खांब आहेत.
    मुख्य अर्धनारी नटेश्वर मंदिरात प्रवेशासाठी तीन पाय-या आहेत. दोन्ही बाजूंला आसनव्यवस्था आहे. प्रथम मंदिरामध्ये दक्षिणमुखी सिद्धिविनायक गणेशमूर्ती आहे. त्यानंतर चालुक्य काळापासून पूजनीय असलेल्या सप्तमातृका पाहावयास मिळतात. त्यांच्यानंतर मंदिरात डाव्या बाजूस दोन खण आतमध्ये महान शिवोपासक, शांडिल्य ऋषींचे शिवलिंगरूपी पूर्वाभिमुख स्थान आहे. शांडिल्य ऋषींनी दंडकारण्यात असलेल्या या वेळापूर (एकचक्रनगर) या ठिकाणी तपस्या केली. त्यांनी प्रदोष व्रताचे महात्म्य सांगितले.
     एकमेकांना सामोरे असणार्या दोन अर्धमंडपांनी युक्त आणि मध्यभागी अंकण असलेला अर्धखुला मंडप आणि मंडपाच्या उरलेल्या दोन्ही बाजुस एकमेकासमोर असलेली अंतराळयुक्त गर्भगृहे असा या मंदीराचा तलविन्यास आहे. अर्धमंडपांना वामनभिंती आहेत. दोन्ही अर्धमंड्पात जाण्यासाठी पायर्या आहेत. मंडपाच्या चारही कोपर्यामध्ये अंतराळाच्या प्रवेशमार्गाच्या दोन्ही बाजुस देवकोष्टे आहेत. दोन्ही गर्भगृहे एकाच आकाराची असली तरी त्या दोन्हीमध्ये फरक आहे. आज पडझड झालेल्या गर्भगृहाचे अंतराळ दुसर्या गर्भगॄहाच्या अंतराळाच्या तुलनेत लहान आहे. स्तंभाचा घटकक्रम किंवा स्तंभरचना अलंकरण नसलेले प्रवेशमार्ग आणि याच परिसरात सापडलेले शिलालेख लक्षात घेता हे मंदीर यादव राजा रामचंद्र याच्या कारकीर्दीच्या शेवटी किंवा कदाचित चौदाव्या शतकाच्या सुरवातीला बांधले असावे असा अंदाज व्यक्त करता येतो.


 
समोर भव्य नंदीमंडप, सभागृह, सभागृहा मधील कक्षासने ही सर्व रचना अत्यंत सुंदर आहे. सभागृहात डाव्या बाजूला असणाऱ्या दक्षिणी भिंतीत ब्रह्मा, मद्विश्‍वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी व चामुंडा अशा सात मातृका, वीरभद्र व गणपती आहे. बाजूस उपदेवता, उत्तरेला शेजघर आहे. छतास काही विरगळ वापरले आहेत.   गर्भगृहाच्या स्तंभावर चालूक्यकालीन सुंदर नक्षीकाम हे शिल्पकाम पाहणाऱ्यासा आकर्षित करते.


  तसेच या मंदिराचे आणखीन एक खास वैशिष्ट्य असे की गर्भगृहाच्या द्वारशाखेवर असलेली गजलक्ष्मी. ही फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. कारण शक्यतो मंदिराच्या - गाभाऱ्याच्या दरावाज्यावर गणपती कोरलेला असतो. पूर्वी गजलक्ष्मी आराध्य मानत असल्यामुळे दोन्हीकडे हत्ती आणि मध्यभागी लक्ष्मी बसलेली आहे.
        मुख्य गाभार्‍यात शिवलिंगावर सालंकृत शंकर-पार्वतीची मूर्ती उभी आहे. वर किर्तीमुख, किर्तीमुखापासून दोहोबाजूस अष्टगण, ब्रह्मदेव, विष्णू, पायाजवळ नंदी, अस्थिपंजर, उभी सरस्वती, उंदीर, गणपती अशा प्रतिमा कोरल्या आहेत. उजव्या बाजूस शेजघर आहे. त्यामध्ये सागाचा पलंग देवाच्या विश्रांतीसाठी आहे.
मुख्य गाभा-यामध्ये मध्यभागी शिवलिंग आकारामध्ये शिवलिंगाच्या अर्ध्या अर्ध्या स्वरूपाला मूळ एकाच शिवलिंगात शिवपार्वतीच्या स्वतंत्र पूर्ण मूर्ती आहेत. ती मूर्ती अर्धी नसून शिवलिंगाच्या दोन भागांमध्ये आलिंगन स्वरूपात आहेत. शिव व शक्ती ह्या लिंग स्वरूपात एकरूप असल्याने तेथे शिवपार्वती स्वरूपातील एकलिंगामध्ये प्रकट आहेत. त्यामुळे त्या मूर्ती शिवपार्वती, उमामहेश्वर अर्धनारी नटेश्वर, शिवशक्ती अशा नावांनी पूज्य मानल्या गेल्या आहेत. शिवाची मूर्ती चतुर्भुज आहे. जटेमध्ये उजव्या बाजूस सूर्य व डाव्या बाजूस चंद्र कोरलेले आहेत असे वाटते. विश्वातील सर्वांत तेजस्वी रत्न जटेमध्ये धारण केलेले आहे. कपाळाच्या वर जटेखाली मुंडमाळा बांधलेल्या आहेत. शिवाचा चेहरा ध्यानमुद्रेत, नाजूक हास्य असलेला, सुंदर आहे. त्याने कानामध्ये कुंडले धारण केलेली आहेत. मूर्ती गळ्यापासून खाली पायांपर्यंत सुवर्णालंकाराने नटलेली आहे. अलंकार नाजूक आकारात पाषाणामध्ये कोरलेले आहेत. बोटावरील नखे व रेषा आणि लहान कोरलेली जटेची केशरचना कोरीव आहे. शिवाच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ व दुस-या हातामध्ये जपमाळ घेतलेली आहे. जपमाळेचा अंगठा तुटलेला असून त्यामध्ये चांदीसारख्या धातूचे हाड पाहावयास मिळते. म्हणतात, की अफझलखानाच्या स्वारीच्या वेळेस मूर्तीचे संरक्षण व्हावे म्हणून पूर्वजांनी मूर्ती समोरील बारवेत ठेवली. त्यावेळी तिला थोडी इजा पोचली व नंतर तिची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
       शिवाने डाव्या बाजूचा हात पार्वतीच्या डोक्यावरील अंबाड्याच्यावर ठेवलेला आहे. त्याने हातामध्ये पाच फड्या असलेला शेषनाग पकडलेला आहे. दुस-या हाताने पार्वतीला कमरेला आलिंगन दिलेले आहे.  उजव्या हातात त्रिशूल असून दुसरा हात आशिर्वादात्मक उभा आहे. अंगठ्यात जपमाळ असून अंगठा, अनामिका, करंगळीचा छेद गेला आहे. पार्वतीमातेची मूर्ती नाजूक चेहरा असलेली, उजवा हात शिवाच्या खांद्यावर आलिंगन दिलेला आहे. दुस-या हातात कमळ व पाश घेतलेला आहे. पार्वतीच्या दोन हातांमध्ये बांगड्या, बोटांमध्ये  अंगठ्या, गळ्यामध्ये विविध हार, पायात जोडवी, पैंजण वगैरे दागिने कोरलेले आहेत. तीमधून जुनी अलंकारकला पाहण्यास मिळते. नाकामध्ये नथ घालण्यासाठी छिद्र ठेवलेले आहे. इतके नाजूक काम मूर्तीमध्ये केले आहे. अंबाडा ही केशरचना बारीक कलाकुसरीने साधली आहे. तिच्या कानात कर्णफुले पाहण्यास मिळतात. पार्वतीचा चेहरा, नाक, डोळे बघितल्यावर वाटते, की साक्षात पाहते अशी शिवलिंग आकारात शिवशक्ती एकरूप दाखवल्या आहेत. शंकरमूर्ती दोन्ही पायावर उभी असली तरी तो डाव्या पायावर रेलला आहे व उजवा पाय किंचीत सैल आहे. पार्वती डाव्या पायावर देहुडाचरण मुद्रेत उभी आहे. उजव्या तूळ पायावर चक्र आहे. या चक्रामुळेच या गावास एकचक्रनगर नाव असावे व येथे भिम-बकासुराच्या युद्धात बकासुराचा वध झाला असावा व त्यानंतर या गावाचे नांव वेळापूर झाले असावे असाही समज येथे आहे. हे मंदिर गजलक्ष्मीस अर्पण केले आहे.





 

  मूर्तीला बाह्य पोषाख फेटा, धोतर, साडी, यांसारखी वस्त्रे नेसवली जातात. मूर्तीला पाषाणाची प्रभावळ आहे. त्यामध्ये शिवाच्या हातातील त्रिशुळाच्या वर ब्रम्हदेवाची लहान आकारामध्ये मूर्ती कोरलेली आहे. त्याच्यावर चार यमइंद्र, वरुण, कुबेर, ईशान अशा देवता मिळून अष्टदेवता आहेत. त्यांच्या मध्यभागी कीर्तिमुख मुख्य दोन्ही मूर्तींच्या वर मधोमध अतिशय सुंदर पाहून कीर्तिसंपन्न शिवपार्वती पाहण्यास मिळतात. पार्वतीच्या डाव्या बाजूस अष्टदेवतांच्या खालील बाजूस विष्णूची मूर्ती कोरलेली आहे. त्यामुळे ब्रम्ह, विष्णू यांच्या मूर्ती शिवशक्तीसहित पाहण्यास मिळतात व त्या दर्शनाने सर्वांनंद प्राप्त होतो. तो शिवदरबारच आहे… शिवाच्या चरणाजवळ मूर्तीमध्ये भृगू ऋषी उभे आहेत. त्यांची मूर्ती ही अस्थिपंजर, अशक्त रूपात उभी दिसणारी आहे.
    श्री अर्धनारी नटेश्‍वराच्या मूर्तीची रचना अत्यंत कोरीव असून ही मूर्ती सालंकृत आहे. शिल्पकलेच्या दृष्टीने अत्यंत उच्चप्रतीची शिल्पकृती आहे. मूर्तीकाराने मूर्ती कोरताना वस्त्रांऐवजी अलंकाराचा वापर खुबीने केला आहे. अत्यंत देखणी अशी ही मूर्ती १.१५ मीटर उंचीची आहे.  तेथेच पार्वतीचे वाहन घोरपड आहे व शेजारी सर्वांत प्रथम पूज्य अशी गणेशाची मूर्ती आहे. त्या मूर्तीचे काम अतिशय नाजूक आहे.

    अर्धनारी नटेश्‍वराची अधिक माहिती घ्यायची झाल्यास  शतकानुशतके भगवान शंकराची पूजा केली जात आहे. परंतु फार कमी लोकांना माहित आहे की शंकराचे दुसरे रूप आहे अर्धनारीनटेश्वर! वास्तविक शंकराने हे रूप स्वेच्छेने घेतले. स्त्री-पुरुष समान आहेत हा संदेश त्यांना यामधून द्यायचा होता. तेव्हा सर्वप्रथम जाणून घेऊया, कोणत्या कारणास्तव भगवान शंकराला हे रूप धारण करावे लागले.
       भगवान शंकराच्या अर्धनारीनटेश्वर अवतारात आपण पाहतो की त्यांचे अर्धे शरीर स्त्रीचे आहे आणि अर्धे शरीर पुरुषाचे आहे. हा अवतार स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देतो. समाजात, कुटुंबात आणि जीवनात पुरुषाचं महत्त्व तितकंच आहे जेवढं स्त्रीचं आहे. त्यांचे आयुष्य एकमेकांशिवाय अपूर्ण आहे, दोघेही एकमेकांना पूर्ण करतात.
शिवपुराणानुसार, ब्रह्माजींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले, जेव्हा ब्रह्मांडाची वाढ होत नव्हती. तेव्हा त्यांनी मैथुनी सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला. पण तोपर्यंत शिवापासून स्त्रियांच्या कुळाचा जन्म झाला नव्हता. तेव्हा ब्रह्मदेवाने शिवाला शक्तीने संतुष्ट करण्यासाठी तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येने संतुष्ट होऊन भगवान शंकर अर्धनारीनटेश्वराचे रूप धारण करून त्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्या शरीरातील देवी शक्तीचे अंश वेगळे केले. त्यानंतर ब्रह्माजींनी त्यांची पूजा केली. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन, शक्तीने त्याच्या कपाळाच्या तेजाने आणखी एक शक्ती निर्माण केली, जी दक्षाच्या घरी मुलगी म्हणून जन्मली.
     स्त्रियांना पुरुषांइतकाच मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी, असा संदेश देवाने अर्धनारीनटेश्वराचे रूप घेऊन दिला आहे. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये.तर, अशी ही अर्धनारीनटेश्वराची कहाणी!भारतात भगवान शंकराला काही ठिकाणी अर्धनारीनटेश्वर या स्वरूपातही पुजले जाते. देशात अशी जवळपास पंधरा सोळा मंदिरे आहेत, त्यापैकी एका मंदिराची, वेळापूर येथील अर्धनारीनटेश्वर मंदिराची
   अर्धनारी नटेश्वराची पुराणात अशी कथा आहे, की एकदा भगवान शंकर व पार्वती बसले असताना अनेक देव व ऋषी भृगू तेथे आले. त्यांनी शिवपार्वती, दोघांना प्रदक्षिणा घातली आणि वाकून नमस्कार केला. पण भृगू यांनी पार्वतीमातेकडे दुर्लक्ष केले. तिला नमस्कारपण केला नाही. कारण ते फक्त शंकराचे भक्त होते. देवी पार्वतीला ते आवडले नाही. पार्वतीने भृगू ऋषींना शाप दिला, की भृगूच्या शरीरामधील मांस-रक्त नाहीसे होईल! लगेच तसे झाले व शरीर हाडावर फक्त कातडे घातल्यासारखे झाले. त्यांना नीट उभे राहता येईना, तेव्हा शंकरांना त्याची दया आली. शंकरांनी भृगूंना उभे राहण्यासाठी तिसरा पाय दिला. भृगू आनंदी झाले व ते आनंदाने नाचू लागले. पार्वतीला ते आवडले नाही. तेव्हा पार्वतीने तपश्चर्या करून शंकराकडून वर प्राप्त केले, की शिवपार्वती कधीही वेगवेगळे होणार नाहीत. त्यामुळे शंकरांनी अर्धनारी नटेश्वर असे स्वरूप धारण केले.





 
         मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटेसे मंदिर भग्नावस्थेत अजूनही उभे आहे. आसपासच्या अनेक मंदिरात वेगवेगळ्या आकाराच्या अनेक पिंडी आहेत. मंदिरातील मूर्ती अतिशय देखणी असून तत्कालीन कलेचा एक अद्वितीय नमुना म्हणता येईल. पांढऱ्याशुभ्र वस्त्रात असणारी ही मूर्ती असून मूर्तीच्या वरील भागात - गोलाकार - सप्तऋषींच्या प्रतिमा कोरलेल्या असून मध्यभागी कीर्तिमुख आहे. पार्वतीच्या पायावर एक चक्र आहे तर पायाच्या बाजूला गणपती, एक पुरातन ऋषी यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.
 
 शाडिल्य ऋषी स्थानावर उत्तरेकडे मुख व हंस वाहन असलेली चतुर्भुज देवाची मूर्ती थोड्या भंगलेल्या अवस्थेत पाहावयास मिळते. तिच्या शेजारी, सिंहावर आरुढ झालेली, दशभुजा असलेली, विविध शस्त्रे हातात घेऊन उभी, महिषासुराचा वध करणारी देवीची पुरातन मूर्ती आहे. तीही काही ठिकाणी भंग पावली आहे. मंदिराच्या उत्तरेकडे गणेशाची बिगरसोंडेची मूर्ती आहे. तिचे तोंड पूर्वेकडे आहे. तीही भंग पावलेली आहे. त्याशेजारी चामुंडा देवीची मुखामध्ये बोट धरलेली मूर्ती दक्षिणमुखी आहे. तिच्या वरच्या बाजूला सप्तमातृका आहेत.


मंदिराचे शिखर हे सुंदर असून जमिनीपासून थोड्या उंच भरावावर बांधकाम असून मंदिर दगडाचे आहे. शिखर जुन्या पद्धतीचे वीट व चुना यांचे आहे. मंदिर फार पुरातन असून मंदिराचा इतिहास व ब-याच दंतकथाही ऐकण्यास मिळतात. बळी मंदिराचे शिखरही तशाच पद्धतीचे आहे. मंदिरामध्ये काही साधू-संतांनी तपस्या करून संजीवन समाधी घेतल्या आहेत. त्यांपैकी काही बांधलेल्या आहेत. प्रत्येक समाधीवर शिवलिंग आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस (उत्तरेस) ओळीने मंदिरांसारख्या बांधलेल्या तीन साधूंच्या, सत्पुरुषांच्या फार जुन्या समाधी आहेत.
 मंदिरामध्ये अर्धनारी नटेश्वर वार्षिक उत्सव यात्रा चैत्र (मार्च) महिन्यामध्ये गुढीपाडवा सणापासून सुरू होतो. चैत्र शुद्ध पंचमी शिवपार्वती विवाह हा वार्षिक उत्सव चालू होतो. पंचमीला हळदी उत्सव (चैत्र शुद्ध अष्टमी), लग्न उत्सव. चैत्र प्रतिपदा राजो पालखी(वरात) यात्रा उत्सव अष्टमीपर्यंत असतो. वार्षिक यात्रा उत्सवाला हजारो भाविक येतात.



श्रावण महिन्यामध्ये शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी होते. श्रावणामध्ये भक्त प्रभू शिवपार्वती पूजा, पोषाख, खाऊच्या पानाची मखर (शिखर) पूजा नवसाने व खुशीने भगवंतांची कृपा, यश, कीर्ती, सुख, संपन्न करण्यासाठी, फलप्राप्तीसाठी करतात. खाऊचे पान पूजा व बिल्व पूजा सुंदर असते. नवरात्रदेवी (अश्विन) महिन्यात शिव व अंबा यांच्या दर्शनाला भक्त शक्ती व शिव दर्शन घेतात. कार्तिक उत्सव – दीपोत्सव सर्व मंदिरात ब-याच वर्ते पासून होतो. मंदिर दीपप्रकाशाने सुवर्णमय दिसते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये व श्रावणामध्ये सोळा सोमवार व्रत केलेली व भाविकाची व्रत सांगता (उद्यापन) अभिषेक होतात. महाशिवरात्रीला दिवसभर भक्तांची दर्शनासाठी गर्दी, अभिषेक, जागर व रांगोळी उत्सव व वर्षभर नित्य पूजा; अभिषेक, आरती वगैरे परंपरेने गुरव सेवा करतात. येणा-या भक्तांना भक्तनिवास आहे व मंदिरामध्ये अन्नदान सोमवार व गुरूवार या दोन दिवशी असते.

वेळापूरचे ते मंदिर किती काळापासून अर्धनारी नटेश्‍वराचे मंदिर म्‍हणून ओळखले जाते याद्दलची नेमकी माहिती उपलब्‍ध नाही.  वेळापूर परिसरात त्या मंदिराविषयीची माहिती देणारे तीन ते चार शिलालेख आढळतात. त्‍यात दिलेल्‍या माहितीप्रमाणे अर्धनारी नटेश्‍वराचे समजले जाणारे ते मंदिर प्रत्‍यक्षात वटेश्‍वर नामक देवतेचे असल्‍याचा पुरावा सापडतो. मात्र ती मूर्ती आणि ते मंदिर परिसरातील ग्रामस्‍थांमध्‍ये अर्धनारी नटेश्‍वराच्‍याच नावाने ओळखले जाते.
  वेळापूरच्‍या मंदिरातील देवतेविषयी डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी ‘प्राचीन मराठी कोरीव लेख’ या बृह्दग्रंथात वेळापूर येथील शिलालेखांचा अभ्‍यास करताना पूरक माहिती दिली आहे. डॉ. तुळपुळे यांचे ते पुस्‍तक पुणे विद्यापीठाने पन्‍नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध केले आहे.
 श्री अर्धनारी नटेश्‍वर ग्रामदैवताची यात्रा चैत्र पौर्णिमेस होते. शुद्ध पंचमीस हळदी, अष्टमीस लग्न व पौर्णिमेस वरात आणि वद्य अष्टमीस सोळावी असा महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. या कालावधीत विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते.
   यादवकालीन या मंदिरामुळे वेळापूरला अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झाले असले तरी पर्यटनदृष्ट्या, सोईसुविधांच्यादृष्टीने वेळापूर दुर्लक्षित राहिले आहे. माजी उपमुख्यमंत्री आ.विजयसिंह मोहिते-पाटील यांनी तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत भक्तनिवास येथे बांधले आहे. येणार्‍या पर्यटकांसाठी त्याचा चांगला उपयोग होत आहे. याबरोबरच मल्लसेठीचे स्मारक, अंबाबाई मंदिर, कांचन महाल, नाथ मंदिर, खंडोबा मंदिर, काळा मारूती आदि प्राचिन मंदिर येथे पहायला मिळतात. या मंदिराभोवती उंच जाळीसह संरक्षक भिंत, जमिनीवर दगडी फरशी बसवून तेथील परिसर स्वच्छ केला आहे.
 पुरातन खात्याने १९७० साली मूर्ती संग्रहालय बांधले आहे. या संग्रहालयामध्ये वेळापूर व महाळूंग परिसरातील अनेक विरगळ एकत्र केले आहेत. या विरगळा पर्यटकांच्या व वेळापूरच्या दृष्टीने ऐतिहासिक अनमोल ठेवा आहे. या विरगळा अशा पद्धतीने ठेवण्यात आल्या आहेत की त्या विरगळातून सारेगमपधनीसा या सप्तसुरांची निर्मिती होते. परंतू केंद्रीय पर्यटन खात्याच्या दुर्लक्षपणामुळे या इमारतीची पडझड सुरू झाली आहे. ही एक धोकादायक इमारत म्हणून सध्या बंद ठेवली आहे. त्यामुळे पर्यटकांना या विरगळांचा अनमोल ठेवा पहायला मिळत नाही. इमारत धोकादायक झाल्याने हा अनमोल ठेवा त्या इमारतीखाली गाडला जाण्याची भिती निर्माण झाली आहे. पर्यायी इमारत म्हणून केंद्रीय पुरातत्व विभागामार्फत अजून काहीही हालचाल येथे झालेली नाही.
     वेळापूर मध्ये इतर वेगवेगळ्या दैवतांची प्राचीन मंदिरे आहेत. "माऊली" या मराठी चित्रपटाची शूटिंग इथे झाली आहे.काही प्रमुख मंदिरे आहेत त्यामध्ये ज्योतिबा मंदिर, कलावंती मंदिर, खंडोबा मंदिर आणि अर्धनारी नटेश्र्वर मंदिर आहेत. व्यवस्थापन करणाऱ्यांनी मंदिरांची काळजी व्यवस्थित घेतली आहे. नाथ मंदिर सभोवताली सुंदर बगीचा फुलवला आहे. पंढरपूर पुणे रोड वर बस स्टँड पासून अगदी जवळ, रोडच्या दोन्ही बाजूस दोन मंदिरे आहेत.


1. नाथ मंदिर...
मंदिराला तीन द्वार आहेत. सर्व बाजूंनी रचना ही समानच दिसते. प्रशस्त असे मंडप आणि गाभारा अशी हेमाडपंथी शैलीतील रचना असलेले हे मंदिर आहे. मंदिरात भैरवनाथ आणि पार्वतीची मूर्ती आहे. मंदिराच्या बाजूला प्रशस्त असे सभामंडप ही आहे.









2. कलावंती महाल
मंदिर आणि शेजारी तलाव अशी इथे रचना आहे. नेत्रदीपक अशी रचना असलेले हे मंदिर ज्यात मूर्ती नाही. त्यामध्ये सतिशिळ बाहेरून आणून ठेवलेली आहे. नाथ मंदिरासमोर एक पिंड पडलेली आहे, ती कदाचित येथील असू ही शकते. मंदिरामध्ये नंदी आहे ज्याचे शिर मोडलेले आहे. मंदिराला तिन्ही बाजूंनी येजा होऊ शकते. पुरातत्व खात्याने मंदिर आणि तळे शेजारी सुरक्षा भिंत बांधलेली आहे.
















3. खंडोबा मंदिर
पुरातन मंदिर हे ही पाहण्यासारखे आहे. समोर मनमोहक अश्या तीन दिकमली आहेत. मंदिराला प्रशस्त असे सभामंडप आहे. मंदिरा शेजारी पडीक वास्तू आहेत. त्या पडीक वस्तू एक मोठा दरवाजा असल्यासारखा भासतो. तो खंडोबा मंदिराला जाणारा दुसरा मार्ग आहे असे वाटते.

 येथे दोन प्रशस्त ऐतिहासिक वाडे आहेत. त्यापैकी एक पार्वतीच्या वाड्यात सध्या शाळा बांधण्यात आली आहे. ह्या वाड्यात यादवांचा खजिना होता. येथे मंदिरासाठी देणगी स्विकारली जाई. तसा उल्लेख तेथे सापडलेल्या शिलालेखात आहे. याची नोंद इतिहासकारांनी आपल्या संशोधनात नमूद केली आहे. वि.का.राजवाडे, गो.स.सरदेसाई, सेतू माधवराव पगडी, डॉ.तुळपुळे यांच्यासह अनेक संशोधकांनी वेळापूरला भेट देवून येथील इतिहास वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.  त्यांच्या ग्रंथामध्ये वेळापूरचे बरेच उल्लेख आढळून आले आहेत. 

संदर्भ :-
१) सोलापुर जिल्हा गॅझेटीयर
२) https://shodhitihasacha.in/ardhanarinateshwar-mandir-velapur-solapur-819239123333/
३)  https://bhunga.blogspot.com/2007/12/blog-post.html
४) https://www.whatshot.in/pune/made-out-of-boulders-this-12th-century-temple-houses-a-unique-idol-thats-half-shiv--half-parvati-c-29129
५) http://velapurnews.blogspot.com/2014/02/blog-post_20.html
६) https://www.thinkmaharashtra.com
७) http://ardhanarinateshwar.blogspot.com/2012/10/blog-post.html



 चालुक्य कालीन वेळापूर चे अर्धनारीनटेश्वर मंदिर.

 चालुक्य कालीन वेळापूर चे अर्धनारीनटेश्वर मंदिर.











चालुक्य कालीन वेळापूर चे अर्धनारीनटेश्वर मंदिर.. स्थापत्य,रचना,महादेवाचं एक वेगळं रूप...प्रसन्न आणि भारावणारं वातावरण!!!!!
चालुक्य साम्राज्य हे भारतातील एक महान साम्राज्य . अतीशय शूर, पराक्रमी आणि हुशार राजे हे या चालुक्यांच्या वंशात होऊन गेले.जसे की पहिला पुलकेशी,दुसरा पुलकेशी, विनायदीत्य,विजयादित्य,विक्रमादित्य दुसरा,सोमेश्वर, अशी भली मोठी यादी आहे चालुक्यांची.
ई.स. 6 व्या ते जवळपास 12 व्या शतकापर्यंत साधारण 600 वर्षे चालुक्य राजांची भारतातील विविध भागावर सत्ता होती.चालुक्य राजा पहिला पुलकेशी याने चालुक्य साम्राज्याची स्थापना केली.एके काळी कदंब राजाचे मंडलिक असलेलं चालुक्य कुटुंब नंतर च्या काळात पूर्ण भारताचे सत्ताधीश झाले व संपूर्ण भारतावर राज्य केलं.
चालुक्यांच्या मान्यतेनुसार त्यांच्या वंशाचा उत्पत्ती ही ब्रम्हा पासून झाली आहे आणि त्यांचे पोषण सप्तमात्रुकांच्या स्थनपानावर झाले आहे.
चालुक्य हे सुरवातीला फक्त यज्ञ आणि कर्मकांड करायचे.ते अगोदर विष्णू पूजक होते.त्यांचे राजचिन्ह हे ही विष्णूचा अवतार असलेले "वराह" हे आहे.दक्षिणेमध्ये सगळ्यात अगोदर मंदिर बांधायला सुरुवात चालुक्यांनी केली.वातापी म्हणजेच आजच्या काळातील कर्नाटकातील बदामी हे शहर होय. ही चालुक्यांची राजधानी होती.अगोदर विष्णू भक्त असणारे चालुक्य काही काळानंतर हे कट्टर शिव भक्त झाले.त्यानंतर 600 वर्षाच्या एकूण कारभारात चालुक्यांनी हजारो शिव मंदिर बांधली.त्यापैकी काही काळाच्या ओघात नष्ट झाली आणि काही अप्रतिम मंदिर आजही 1500 वर्षानंतर मजबुतीने उभी आहेत.विशेष म्हणजे चालुक्यांनी त्याकाळात जैन मंदिर ही बांधली.ती ही बदामी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात.त्यातील काही मंदिर ही कर्नाटकातील बदामी, पटडक्कल ,एहोळ,याठिकाणी आजही आहेत.
त्यातील एक चालुक्यांनी बांधलेलं आणि नंतर देवगिरीच्या यादवांनी व नंतर अहिल्याबाई होळकरांनी त्याचा जीर्णोद्धार केला. हे असं शिव मंदिर सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर या ठिकाणी आहे.इथेच आज सहकुटुंब भेट दिली.
साधारणतः एका आयतामधून निघणार दुसरा आयत आणि असे अनेक स्तर अशी एकंदरीत या मंदिरांची बांधायची पद्धत असते.या वेळापूरच्या मंदिराचे स्थापत्य असेच आहे.चालुक्यांच्या शिव मंदिरात सप्तमातृका यांचे शिल्प नक्कीच बघायला मिळते.ते इथेही आहे.
मंदिराच्या प्रवेश द्वारातून आत गेल की एक प्रसन्नता मनात भरते आणि आपण चालुक्य काळात प्रवेश केला आहे , असं वातावरणात जाणवायला लागतं.प्रत्येक ऐतिहासिक मंदिरात एक वेगळीच ऊर्जा असते व ती या मंदिरात आल्यावर चटकन आपल्याला जाणवते.आत गेल्या गेल्या त्या काळातील बारव दरवाजातच आहे.या मंदिराच विशेष म्हणजे या मंदिरात एक बाहेर आणि एक अर्धनारी नटेश्वराच्या मूर्ती समोर असे दोन मोठे नंदी आहेत.
यादवकालीन 2 शिलालेख या मंदिरात आहेत.एक शिलालेख बारवेच्या प्रवेशालाच एका दगडावर आहे आणि दुसरा मंदिरच्या बाहेरच्या व्हरांड्यात ठेवलेल्या दगडावर आहे.
या मंदिराच आणखी एक विशेष म्हणजे इथे शंकराच्या पिंडीवर महादेव आणि पार्वतीची मूर्ती आहे ती म्हणजेच अर्धनारी नटेश्वराची मूर्ती.
हीच मूर्ती जी चालुक्य कालीन आहे .त्याच काळातील आहे.एवढी जुनी कलाकृती आपल्या जवळपास कदाचितच कुठे तरी तुम्हाला पाहायला मिळेल.गाभार्याच्या प्रवेश द्वारावर गणपती नसून गजलक्ष्मीची सुंदर छोटी मूर्ती कोरलेली आहे .
यामध्ये शंकराची चतुर्भुज मूर्ती आहे.पार्वती चा एक हात शंकराच्या उजव्या खांद्यावर आहे ,तिच्या दुसऱ्या हातात शस्त्र आहे.महादेवाच्या जटांमध्ये सूर्य चंद्र आहेत.महादेवाच्या पायात भृगु ऋषी आहेत. दोन्ही मूर्त्यांच्या अंगावर संपूर्ण दागिने कोरलेले आहेत. पार्वतीच्या उजव्या पायात एक चक्र आहे, त्यामुळेही या वेळापुर गावाला अगोदर एकचक्र नगर असेही नाव होते.महादेवाची अनेक मंदिरांमध्ये फक्त पिंड च आहे.पण मी पाहिलेलं ज्यामध्ये पिंडीवर महादेव आणि पार्वतीची मूर्ती असलेलं एकमेवद्वितीय मंदिर आहे.परिसर एकदम स्वच्छ आणि प्रसन्न आहे.
मंदिराच्या वातावरणातील प्रसन्नता आपल्याला चालुक्यांच्या काळात घेऊन जाते...बाकी सगळं स्थापत्य हे थोडस यादवकालीन आणि बाकी चालुक्य कालीन असं मिक्स आहे. परिसरात अनेक पिंडी आणि छोटी मंदिर आहेत. काही मंदिरांची आणि पिंडीची अवस्था वाईट आहे.हा परिसर Archeological Survey Of India च्या ताब्यात आहे.
मंदिराच्या सभा मंडपात असणार सप्तमातृकांचं शिल्प आपल्याला हे मंदिर चालुक्यांच आहे असं ओरडून सांगत राहतं. बाहेर दगडाची असणारी जी आजकाल विरळ झालेली आहे अशी दगडांची दीपमाळ इथे पाहायला मिळते.
वातावरणातील प्रसन्नता,झिमझीम ,हलका पाऊस,हवेतील गारवा आणि अप्रतिम वास्तुकला असलेलं चालुक्य कालीन मंदिर ...वा जगायला अजून काय पाहिजे... अन्न, वस्त्र आणि इतिहास!!!!
वेळात वेळ काढून नक्की भेट द्या...
कुणी येणारं नसेल बरोबर तुमच्या,सोबत पाहिजे असेल,चालुक्यांचा इतिहास पण तुम्हाला ऐकायचा असेल तर मला घेऊन जा बरोबर...मलाही आवडेल परत एकदा यायला...फक्त चहा आणि वडापाव ची सोय करावी लागेल...
हर हर महादेव🙏🙏🙏🙏
@राहुल झाडे
@इंजिनियर्स डायरी




4. अर्धनारी नेटश्र्वर मंदिर.
वेळापूर चे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे हे मंदिर. मंदिरासमोर असणारे बारवं आणि त्यात असणारी मंदिरे आकर्षक वाटतात. मंदिरासमोर दोन नंदी आहेत. यादवकालीन शिलालेख ही या मंदिरात सापडतात.
वेळापूर
































No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...