Saturday, November 4, 2023

निजाम दरबारातील राजनर्तकी 'माहेलका' हिला प्रभावशाली महिला का म्हटले जाते? ती शूर मराठा राजे रावरंभा यांच्या प्रेमात होती का?

 

माहेलका ही निजाम दरबारातील प्रसिद्ध राजनर्तकी, कवयित्री, लावण्यखणी, गानसुंदरी, शूर योद्धा आणि कुशल राजनीतीज्ञ म्हणून ओळखली जाते. तिचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. १८ व्या शतकात माहेलकाने जे काही साध्य केले, ती त्या काळातील स्त्रियांसाठी असामान्य गोष्ट होती.

मुस्लिम राजनर्तकी असली तरी ती घरंदाज वाटत असे. सुंदरता तर तिच्या नसानसांत भिनली होती. माहेलका ही इतिहासात 'चंदा बाई' किंवा 'महेलका चंदा' या नावानेही ओळखली जाते.

'माहेलका चंदा बाई' या नाटकातील एक दृश्य

(स्त्रोत: द हंस इंडिया)

१७६३ मध्ये माहेलकाची आई दख्खनची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे निजामाच्या दरबारात आली. तिने प्रशासनातील एका कोषागार अधिकाऱ्याशी लग्न केले. तिने आपल्या मुलीचे नाव 'चंदा बीबी' असे ठेवले. माहेलकाला तिची निपुत्रिक मावशी मेहताब हिने दत्तक घेतले होते.

कुशल योद्धा

माहेलकाने वयाच्या चौदाव्या वर्षी तलवारबाजी, भालाफेक, धनुर्विद्या, घोडेस्वारी यामध्ये नैपुण्य मिळवले होते. राज्यकर्ते अनेक बाबतीत तिचे सल्ले घेत असत. निजाम दुसरा ह्याच्याबरोबर ती लढाया, मोहिमा तसेच शिकारीवर जात असे. तिने कोलारची लढाई (१७८१), निर्मलची लढाई (१७८२) आणि पांगलची लढाई (१७८९) या तीन लढायांमध्ये भाग घेऊन आपले युद्ध कौशल्य दाखवले होते.

(स्त्रोत: हेरिटेज लॅब)

मर्दानी पोशाखात ती युद्धात सहभागी होत असे. राज्यासाठी तिने दिलेल्या योगदानाबद्दल निजाम अलीने तिला विविध प्रसंगी जहागीर आणि सोने, चांदी आणि जड जवाहर देऊन सन्मानित केले होते.

उर्दूमध्ये लिहिणारी आणि गझल संकलित करणारी पहिली महिला

१७९८ मध्ये शायरी/गझलांचे संकलन करणारी ती पहिली महिला होती. 'दिवाण-ए-चंदा' हा तिचा १२५ गझलांचा हस्तलिखित संग्रह होता. १७९९ मध्ये मीर आलम बहादूर यांच्या घरी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान तिने सर जॉन माल्कम यांना हा गझल संग्रह सादर केला होता.

(स्त्रोत: हेरिटेज लॅब)

तर १८२४ मध्ये तिचा 'गुलजार-ए-महलका' (Gulzar-e- Mahlaqa) या नावाने ३९ कवितांचा संग्रह मरणोत्तर प्रकाशित झाला. माहेलकाने इस्लामचा अभ्यास केला असला तरी तिच्यावर हिंदू ग्रंथ आणि तत्वज्ञानाचाही प्रभाव होता.

राजकीय सल्लागार

निजामाने तिची नियुक्ती 'उमराह' (सर्वोच्च खानदानी पद) या पदावर केली होती. एक 'उमराह' म्हणून ती दरबारात उपस्थित राहू शकत होती आणि निजामाला राज्य धोरणाबद्दल सल्ला देऊ शकत होती.

श्रेष्ठ गायिका आणि नृत्यांगना

माहेलका हिच्यावर गूढवादी कवी सिराज औरंगाबादी यांच्या साहित्याचा प्रभाव होता. तिची पहिली भाषा उर्दू होती. परंतु ती अरबी, पर्शियन आणि भोजपुरी भाषा देखील अस्खलितपणे बोलत असे.

रावरंभा यांच्या समोर नृत्य सादर करताना माहेलका

(स्त्रोत: हेरिटेज लॅब)

कथ्थक नृत्य प्रकारातील दख्खन शैली सध्याच्या काळात अस्तित्वात नसली तरी माहेलकाने या नृत्य प्रकारात विशेष प्राविण्य मिळवले होते. ती स्वतः मास्टर पन्ना महाराज आणि खुशहाल खान (तानसेनचा पणतू) यांच्याकडून नृत्य, भारतीय शास्त्रीय संगीत शिकले. तिची लोकप्रियता एवढी होती की राज्यात होणाऱ्या मुशायर्‍यांमध्ये भाग घेणारी ती एकमेव महिला होती.

कलेची संरक्षक आणि आश्रयदाता

माहेलकाने नवीन पिढीतील ३०० तवायफ/नर्तिका यांना नृत्य आणि संगीताचे प्रशिक्षण देण्यासाठी एक सांस्कृतिक केंद्र उघडले होते. तेथे ती इतर शिक्षकांसोबतच स्वतः संगीत आणि कथ्थक नृत्य मुलींना शिकवत असे. तिने ग्रंथालयाचीही स्थापना केली होती. एवढंच नव्हे तर माहेलकाबाई दरवर्षी भागानगर येथे ७ दिवसीय वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करत असे–ज्याला ‘उर्स’ किंवा 'जत्रा' म्हणत. या मेळाव्यासाठी ती अनेक साहित्यिक, प्रतिष्ठित आणि विद्वान पुरुष, तपस्वी, कलाकार यांना मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करत असे.

ऐतिहासिक नोंदीनुसार माहेलकाबाईने मुलींच्या शिक्षणासाठी १ कोटी रुपये दान केल्याची माहिती आहे. तिच्या मृत्यूच्या वेळी तिने आपली संपत्ती बेघर, गरीब महिला आणि अनाथ मुलींसाठी सोडली. माहेलकाबाई ही एक सामाजिक जाणीव असलेली महिला होती. मुलींचा शैक्षणिक/सांस्कृतिक विकास व्हावा म्हणून तिने प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था स्थापन केल्या व समाजाचे ऋण फेडले. ही त्या काळातील अनोखी गोष्ट होती. तिच्या जहागिरीतील एक हवेली आणि जमीन देखील सध्याच्या उस्मानिया विद्यापीठाला देण्यात आली. विद्यापीठापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर माहेलकाने बांधलेली एक 'बारव' सुध्दा आहे.

(स्त्रोत: हेरिटेज लॅब)

उमराव जान अदा या कादंबरीची प्रेरणा

सज्जाद शाहिद यांच्या मते मिर्झा हादी रुसवा यांच्या 'उमराव जान अदा' या कादंबरीची महेलकाबाई प्रेरणा होती. 'उमराव जान अदा' ही उर्दू साहित्यातील पहिली कादंबरी म्हणून ओळखली जाते.

प्रभावशाली महिला

नृत्यप्रवीण माहेलकाचे लावण्य आणि गायनावर खुश होऊन निजाम अलीने तिला चंदा बिबीला 'माहेलका' अर्थात 'चंद्रमुखी' हा किताब बहाल केला होता.

(स्त्रोत: डेक्कन क्रोनिकल)

हैदराबादच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या निजामाच्या काळात ती दरबारातील एक प्रभावशाली महिला म्हणून ओळखली जात असे. तिला पालखीचा मान होता. एखाद्या ठिकाणी भेट देण्यासाठी कूच करायचे असल्यास तिच्यासाठी ५०० सैनिकांची तुकडी राखीव असे. तिला अंगरक्षक म्हणून १०० सैनिक आणि इतर अधिकारही देण्यात आले होते.

हैदराबाद राज्यात सार्वजनिकरित्या मान्यता मिळालेली माहेलका एकमेव स्त्री होती. तसेच तिच्या काळातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी ती एक होती. माहेलकाचा प्रभाव राजघराण्यातील स्त्रियांपेक्षा खूप जास्त असल्यामुळे तिचा दर्जा निश्चितच उंचावला होता.


अठराव्या शतकात रंभाजीराव निंबाळकर यांचे घराणे मराठ्यांच्या इतिहासात एक पराक्रमी घराणे म्हणून नावाजलेले होते. रावरंभा निंबाळकर यांच्या वंशजांकडे निजामाकडून जहागिरी म्हणून उस्मानाबाद, सोलापूर, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील काही गावे आणि २२ हजारांची मनसब मिळाली होती. हैदराबादची निजामशाही स्थापन करण्यात रंभाजींची मोठी भूमिका होती.

रंभाजी यांचे शौर्य आणि पराक्रमावर खुश होऊन निजाम अलीने त्यांना 'रावरंभा' ही पदवी दिली आणि तेव्हापासून रंभाजी हे 'रावरंभा' या नावाने ओळखले जाऊ लागले. 'रावरंभा' या शब्दाचा अर्थ होतो विजेता किंवा सतत जिंकणारा! हैदराबाद येथील चारमिनारच्या बाजूला 'रावरंभा की देवडी' नावाने त्यांचे निवासस्थान शहरात प्रसिद्ध होते.

राजे रावरंभा हे करमाळ्याचे शूर मराठा आणि जहागीरदार होते. निजामशाहीत त्यांचं वास्तव्य भागानगरला (हैदराबाद) होते. राजनर्तकी माहेलका ही त्यांची प्रेयसी होती. एका प्रसंगी तिच्या दिवाणखान्यात भेट झाल्यावर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. असं म्हणतात की दोघांमध्ये घनिष्ठ संबंध होते, पण त्यांचा विवाह होऊ शकला नाही. माहेलकाने तर आपला जीव रावरंभा यांच्यावर ओवाळून टाकला होता. परंतु निजामशाहीतील काही मुस्लिम सरदार माहेलकाच्या सौंदर्यावर फिदा झाल्यामुळे दोघांच्या प्रेमाला अनेक दिव्यातून जावं लागलं, असे सांगितले जाते.

(स्त्रोत: pintrest)

'निजाम आणि मराठे' हा ऐतिहासिक लेखसंग्रह तसेच गुलाम हुसेनखानच्या 'गुलजारे आसफिया' या ग्रंथातील माहितीवरून निजाम आणि मराठे यांचे संबंध इ.स. १८०० पर्यंत घनिष्ठ होते, असे दिसते.

तर 'माहेलका' ह्या अशोक निंबाळकर लिखित कादंबरीत दोघांचा मिलाफ, प्रेम, विरह आणि त्याकाळातील अनेक प्रसंगांचे रंजक आणि उत्कंठावर्धक वर्णन आहे. परंतु पुस्तकातील प्रत्येक घटना/वर्णन सत्य असेलच असे नाही. तरीही त्यातील वाचलेल्या/उपलब्ध माहितीवरून काही आख्यायिका/प्रसंग सांगण्याचा प्रयत्न करतो.

पुण्यात पेशवे सवाई माधवराव यांचा विवाह ठरला होता. निजामाला पेशव्यांघरचे निमंत्रण आणि शाही नजराणा प्राप्त झाला होता. परंतु पेशवे दगलबाजी करतील या भीतीपोटी निजामाने विवाहास जाण्याचे टाळले.

श्रीमंतांच्या लग्नात निजामातर्फे त्याचा मुलगा फर्जंद सिकंदरजहा, रावरंभा आणि नवाब शर्फुलउमरा यांना पाठवण्यात आले. त्यावेळी रावरंभांनी माहेलका हिलाही सोबत घेतले होते. त्या दरम्यान पुण्याजवळ निजामाचे वऱ्हाड काही दिवस मुक्कामी होते.

सुप्रसिद्ध नर्तकी माहेलकाबाई ही सवाई माधवरावांच्या लग्नात पुण्यास पोहोचली होती. तिच्या बरोबर दहा नर्तकींचा ताफा होता. पुण्यातील मंडळींना मैफलीतील माहेलका बाईचे नाचगणे फार आवडले. त्यावेळी पुण्यातील प्रसिद्ध गायिका वेंकटनरशी हिचा माहेलका समोर काहीच प्रभाव पडला नाही. दोघींमध्ये झालेल्या मुकाबल्यात माहेलकाबाई जिंकली.

माहेलकाचे लोभसवाणे सौंदर्य पेशवाईतील सर्वांना मोहून गेलं. माहेलका मुकाबल्यात तिच्यापेक्षा दस पटीने सरस ठरली. त्यामुळे ही खबर साऱ्या पुण्यात गेली होती.

आख्यायिका अशी आहे की,

लग्न उरकल्यानंतर नाना निवांत झाले होते. एक दिवस घोड्यांच्या बाजारात ते फेरफटका मारण्यासाठी आले. तेथे एक अफगाणी जातीचे घोडे विकणारा सौदागर सहा घोडे घेऊन आला. त्याने प्रत्येक घोड्याची किंमत दोन हजार रूपये सांगितली. नाना फडणीसाने दीड हजार देऊ केले. सौदागर परत चालला, तेव्हा माहेलकाने दोन हजार प्रत्येक घोड्याची किंमत देऊन सहा घोडे विकत घेतले. नाना फडणीसाला एका नर्तकीने घोडे विकत घ्यावे, याचे आश्चर्य वाटले. त्यांनी चौकशी केली तेव्हा माहेलकाने सांगितले की, "माझे प्राणप्रिय, यजमान रावरंभा निंबाळकर यांना घोड्यांचा शौक आहे. त्यांच्याकरिता मी घोडे खरेदी केले आहेत!"

निरोपाच्यावेळी माहेलकाच्या सन्मानार्थ सवाई माधवराव पेशव्यांचा खास दरबार भरला होता.

नाना म्हणाले, "माहेलकाबाई तुम्ही श्रीमंतांच्या मैफलीत नृत्य गायन सादर केलेत. श्रीमंत आपल्या नैपुण्यावर प्रसन्न आहेत. पेशवाईत कोणत्याही कलाकाराची उपेक्षा होत नाही. तुमच्या कलेची कदर म्हणून एक लक्ष रुपये बिदागी व मानाचे वस्त्र श्रीमंतांनी देऊ केले आहे. त्याचा स्वीकार व्हावा!"

त्यावर महेलका पेशव्यांस म्हणतात, "मला संपत्तीचा मोह नाही हूजुर…त्याची मला कधीच कमतरता पडली नाही. माझ्या अन्नदात्याच्या कृपेने माझ्या घरी संपत्ती पाणी भरते. पैशाचे लोभी नाही आम्ही. त्यामुळे आपल्या लक्ष रुपयांचे मला मोल नाही. आमचे यजमान रंभाजी अशी लक्ष रुपयांची खैरात रोज वाटतात कलाकारांना..!"

हे ऐकून सारा दरबार स्तब्ध झाला. परंतु तुमच्याकडून जरा जास्तीची उम्मीद आहे, असं माहेलका म्हणाली. पेशव्यांनी विचारणा केल्यावर तिने आपल्या मनातील भावना बोलून दाखवली की "पेशव्यांनी निजमावर चाल करू नये!"

हे वाक्य ऐकल्यावर सवाई माधवराव थोडे विचलित झाले. सिकंदरला हसू आवरत नव्हतं. रावरंभानाही माहेलका असा मुत्सद्यासारखा डाव टाकेल, याची कल्पना नव्हती.

श्रीमंतांकडे पाहून माहेलका म्हणाली, "हुजुरांना हे मान्य नसेल तर त्यांनी जरूर त्यांचा विचार बदलावा. आमच्या कडून बेअदब झाली असेल तर गुस्ताखी माफ हो..!"

त्यावर पेशवे म्हणाले, "माहेलकाबाईंना ना आम्ही मुकरलो, ना तुमच्याकडून बेअदबी झाली. आम्ही असे वचन देतो की मराठे कधीच स्वतःहून निजामशाहीवर हल्ला करणार नाहीत. पण हे वचन तोपर्यंत, जोवर निजामशाहीकडून काही आगळीक होत नाही. त्यांनी जर का कुरापत काढली तर मात्र आम्हीही निजामशाही बुडवल्याशिवाय राहणार नाही. हा आमचा वादा आहे!"

यावर "निजाम दरबार तसे काही करणार, याची आम्ही हमी देतो," असे माहेलकाने उत्तर दिले. पेशव्यांनी रावरंभा यांचेही कौतुक केले. माहेलकाची तारीफ करत श्रीमंत म्हणाले, "सिकंदर साहेब ज्या दरबारात अशी मर्दानी असेल, त्याला कसलाच घोर नसावा!

१७९२ मध्ये माहेलकाच्या आईचे निधन झाल्यानंतर तिने एक लाख रुपये खर्च करून मुघल आणि राजस्थानी शैलीत तिची एक भव्य कबर बांधली. माहेलकाची कबरही तिच्याच शेजारी आहे.

(स्त्रोत: हेरिटेज लॅब)

(स्त्रोत: गौरी शंकर यांच्या ब्लॉग वरून साभार)

The Romance of Muslim Savant Courtesan Mahlaqa Bai & the robust handsome Hindu Maratha General Rambhaji Nimbalkar is easily one of the, if not THE, most famous romances in history of Deccan. It must be affirmed that Mahlaqa Bai was solely committed as lover to Rao Rambha alone.

असं म्हणतात की, रावरंभांनी माहेलकाशी लग्न करायचा निर्धार मनात पक्का केला होता. परंतु त्यांनी तिच्याशी लग्न करू नये, म्हणून राज घराण्यातूनही विरोध होता. पुढे १८२४ मध्ये माहेलकाचे अकाली निधन झाले. तिच्या मृत्यूचे दुःख आणि विरह सहन न झाल्यामुळे काही काळानंतर रावरंभा वतनात परतले. काही अभ्यासकांच्या मते माहेलकाने आत्मघात करून स्वतःचे जीवन संपवले.

तळटीपा

8.5 ह वेळा पाहिले गेले
अपव्होट्स पहा
कॉपी करण्यासाठी नाही
 
 
https://mr.quora.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%80

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...