>> नीती मेहेंदळे
राजगुरू नगर म्हणजे पूर्वीचं खेड शहर. पुण्यातलं एक महत्त्वाचं तालुक्याचं शहर. देशसेवक शहीद राजगुरूंच्या इतिहासकालीन वाडय़ासाठी प्रसिद्ध असलं तरी त्याचा भवताल अधिक पुरातन मंदिरं, किल्ले यांनी समृद्ध आहे.
चाकणहून राजगुरू नगरला जाताना भीमा-भामा नद्यांचे पूल ओलांडले की, उजव्या बाजूने पाबळकडे जाणारी वाट धरायची. कान्हेरसरआधी एक लांबच लांब पसरलेला रस्ता लागतो, तो निमगावच्या टेकडीच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. हा सगळा रस्ता तसा चढणीचा. खालची आळी, वरची आळी म्हणावी इतका. त्या टेकडीला भक्कम तटबंदी आणि बुरूजयुक्त बांधकाम दिसतं. ते खंडोबा देवस्थानाचं. जेजुरीच्या खंडोबाची आठवण करून देणारं. टेकडी चढायला पायऱयाही आहेत. भव्य प्रवेशद्वारातून आत दोन देवळ्या आहेत. देवळ्यांना धरून पूर्ण मंदिराला फेर धरून अनेक दालनं बांधून काढली आहेत. समोरच प्रशस्त नंदी मंडप आणि मधोमध मंदिर असं स्वरूप आहे. जेजुरीप्रमाणे इथेही हळदीचा भंडारा ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या गजरात लावला जातो. मंदिरासमोर उंच दीपमाळा आहेत. त्या होळकरांनी दान केल्याची ग्वाही देणारा एक शिलालेखही दीपमाळेवर दिसतो. नवसाला पावणारा म्हणून बारमाही या खंडोबा देवस्थानात गर्दी असते.
निमगावहून पाबळला जाणारा रस्ता पकडला की, मध्ये एक फाटा सरळ वाफगावकडे जातो. हे होळकर वातावरण असलेलं गाव. मल्हारराव, अहिल्याबाई, तुकोजीराव आदी होळकर प्रभृतींचे वास्तव्य असलेला एक सुरेख भुईकोट या गावात आहे. सरदार यशवंतराव होळकर यांचं तर हे जन्मस्थान. आत विष्णू मंदिर व मोठी बारव आहे. सदर, राणी महाल आदी वास्तू मजबूत अवस्थेत आहे. किल्ल्याच्या आत होळकर वाडा असून आज त्यासमोर शाळा भरते. या अतिभव्य किल्ल्यासमोर राजेश्वराचं अहिल्याबाईंनी बांधलेलं सुंदर मंदिर दिसतं. मंदिराचा परिसर लहानसा असला तरी त्याला चहूबाजूंनी तटबंदी आहे. आत मोठा नंदी मंडप असून मंदिराबाहेरच्या द्वारपालाच्या मूर्ती महेश्वर मंदिरांची आठवण करून देणाऱया आहेत. आत भव्य सभामंडप, रंगशिळा, आणि गाभारा असे मंदिराचे स्वरूप दिसते. सभामंडपावर व गाभाऱयावरचे वितान म्हणजेच छत भव्य आहे. गाभाऱयात उतरून जावे लागते. मंदिर व किल्ला आज संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत. दुर्गसंवर्धन समूहाची माणसं तिथे किल्ल्यात साफसफाई करताना आढळली. त्यांच्याकडून तपणेश्वर, सिद्धेश्वर, उद्धेश्वर, नागेश्वर अशी काही अजून शिवमंदिरं गावात असल्याचं समजलं. पैकी सिद्धेश्वर प्राचीन असून त्याची अवस्था अगदीच वाईट आहे. अहिल्याबाईंचं शिवमंदिरप्रेम तर सर्वज्ञात आहे. हे वारसे जतन करणं आपलं कर्तव्य आहे. पाबळ येथील मस्तानीची समाधी असलेला वाडा असाच आज दुर्लक्षित अवस्थेत आहे. वाडय़ात पाऊल ठेवताच का कोण जाणे, पण एक हुरहुर जाणवते. धुरंधर बाजीराव पेशव्यांच्या जीवनात महत्त्वाचं स्थान असलेल्या मस्तानीच्या उपेक्षित जीवनाची अखेरही तशीच एका कोपऱयात कसलाही अभिनिवेश नसलेली उपेक्षित झाली. आज या स्थानाची किंमत शेजारी खेटून असलेल्या एका कब्रस्तानाहून जास्त राहिलेली नाही. फरक एवढाच की, तिचं स्मारकस्थळ म्हणून एक वाडा बांधून काढला आहे. तिच्या स्मारकाच्या बाजूला सती स्मारकही बांधलेलं दिसतं.
mehmehen@gmail.com
No comments:
Post a Comment