महाराष्ट्रात नृसिंहाची मंदीर खूप कमी दिसतात. प्राचीन आणि ठराविक मुख्य मंदिरांपैकी 'निरा नृसिंहपुर' हे एक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील अनेक भक्तांचा 'श्री नृसिंह' कुलस्वामी आहेच पण ज्यांचा कुलस्वामी नाही, त्यांनाही भयमुक्त करणारा हा श्री विष्णू अवतार आकर्षित करताना दिसतो.
निरानरसिंहपूर हे स्थान आग्नेय दिशेस असून पुणे जिल्याचे ते शेवटचे टोक आहे.क्षेत्राच्या एका बाजूने निरा नदी तर दुसऱ्या बाजूने भीमा नदी आणि तिसऱ्या बाजूस या उभयतांचा संगम. तीन बाजूने पाणी व एका बाजूस जमीन असे हे रमणीय स्थान आहे. भिमा नदीनं पश्चिम - उत्तर - पूर्व असा वळणदार घेतलेला वळसा आणि दक्षिणेकडून भिमेला पूर्वेस मिळालेली निरा नदी, यामुळं निरा नृसिंहपुर हा अगदी सिंहाच्या नखाच्या आकारातील भूप्रदेश दिसतो. आणि या अवतारी ठिकाणाबद्दल हेही एक वैशिष्ठ्य म्हणावं लागेल.
येथील श्री नरसिंह हा महाराष्ट्र ,कर्नाटक आणि मध्य-प्रदेश यातील अनेक नरसिंह भक्तांचा कुलस्वामी आहे.या सर्व भक्तांचे श्री नरसिंह हे अधिष्ठान आहे.ते या क्षेत्रास मानतात.इतकेच काय तर ज्यांचा कुलस्वामी नाही अशा हि अनेकांना क्षेत्राचे महात्म्य व रमणीयता जाणवली व ती त्यांनी मान्य केली.अनेक भक्त येथे दर्शनासाठी येतात व नरसिंहाचा आशीर्वाद घेतात. तसेच या क्षेत्राला भाविक पृथ्वीचे मध्यस्थान/ नाभिस्थान आहे असे मानतात. निरा, भीमा आणि ही गुप्त गंगा असा त्रिवेणी संगम असल्यानं निरा नृसिंहपूर हे 'दक्षिण प्रयाग' म्हणून ओळखले जाते. ही प्रल्हादाची जन्मभूमी आणि तपोभूमी मानली जाते. या पवित्र क्षेत्राला महर्षि व्यास, आद्य शंकराचार्य, आद्य माधवाचार्य असे महात्मे येवून गेले. संत तुकाराम, त्यांची शिष्या बहिणाबाई कुलकर्णी,अहिल्याबाई होळकर, तात्या टोपे, दुसरे बाजीराव पेशवे इत्यादि इथे नृसिंह दर्शनास येऊन गेले.
नीरा आणि भीमा नद्यांचा संगम
पवित्र स्थानाला खूप मोठा इतिहास आहे.पूर्वी पासूनच हे स्थान प्रसिद्ध आणि धार्मिक आहे.नपूर्वी प्रभू रामचंद्र यांनी आपली पवित्र यात्रा रावणाचा वध केल्यानंतर मुनी अगस्ती यांच्या सांगण्यावरून पूर्ण केली. त्यांनी हि यात्रा निरा-नरसिंहपूर येथूनच सुरु केली होती.हे स्थान खूप सुंदर आणि धार्मिक आहे. अनेक मुनी आणि भक्त येथे पूजेसाठी येतात. असे म्हटले जाते कि महर्षी व्यास सुद्धा येथे काही कालावधीसाठी राहिले होते.समर्थ रामदास यांनी दोन वेळा निरानरसिंहपूर येथे भेट दिली याची प्रचीती येते.शके १५५३ च्या एकादशीस समर्थ पंढरपुरास आले होते.चंपाषष्ठी साठी त्यांना पालीच्या खंडोबाला जायचे होते.ते येथे आले होते आणि त्यांनी संगमावर स्नान ,संध्या आटपून त्यांनी एक सुंदर कीर्तन सादर केले होते.
निरा आणि भीमा नदीच्या संगमावर असलेला अंडाकृती प्रचंड असा घाट शके १५२७ मध्ये बांधून पूर्ण झाला.हे बांधकाम कोणी त्रिमलापाळ दाधजी मुधोजी यांनी केले.सदरील बांधकाम सतत ३ वर्षे चालू होते. त्यानीच संगमावरील सोळाखांबी दिसणारं ओवऱ्यांचं अश्वस्थ नृसिंह मंदिर बांधलं.
पुढे शके १७८७ साली रघुनाथ राव विन्चुरकर यांनी देवालयाचा एकदरीत जीर्णोद्धार केला त्यासंबंदीचा शिलालेख देवालयात उपलब्ध आहे.
डावीकडे विश्वेश्वर मंदिर, समोर मूळ नृसिंह मंदिर आणि उजवीकडे दुर्मिळ 'तरटी' वृक्ष
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचा मुक्काम नृसिंहपुर जवळील अकलूज येथे पडला होता. परधर्माचा तिरस्कार आणि धर्मस्थळे उद्ध्वस्त करण्यात त्याचा हातखंडा होताच. त्यावेळी पूजाऱ्यांनी दोन्ही नृसिंहाच्या मूर्ती या तरटी वृक्षाखाली तळघरात लपविल्या होत्या.
गॅजेटमधील निरा-नरसिंहपूरची नोंद
श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर या क्षेत्राची मुंबई इलाख्याच्या गॅझेटिअरमध्ये (पान २६१, खंड अठरा, भाग-३ (१८८५) नोंद घेण्यात आलेली आहे. प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यात श्रीनृसिंह जयंती नवरात्र उत्सव भक्तिभावाने साजरा होतो. ‘नृसिंह जयंती’च्या दिवशी भव्य सोहळा संपन्न होतो. याप्रसंगी हजारो भाविक उपस्थित राहतात व आपल्या दैवतापुढे नतमस्तक होतात. या ऐतिहासिक क्षेत्राचे महत्त्व ओळखून शासनाने सन २००१ मध्ये या क्षेत्रास राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषीत केले आहे.
दैत्यासुर हिरण्यकश्यपू वधासाठी घेतलेला श्री विष्णूंचा नृसिंह हा चौथा अवतार मानलं गेलं आहे. तर याआधी हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरणाक्ष, ज्यानं अत्याचारानं पृथ्वी रसातळाला नेली होती, त्याच्या निर्दालनसाठी तिसऱ्या अवतारात श्री विष्णूंनी वराह अवतार घेतला. आपला बंधू हिरणाक्षाच्या वधामुळं हिरण्यकश्यपू सुडानं पेटून उठला. श्री विष्णूला संपविण्यासाठी त्यानं ब्रह्मदेवाची घोर आराधना सुरू केली.
दरम्यान इंद्रानं त्याच्या राज्यावर हल्ला चढवून हिरण्यकश्यपूची पत्नी 'कयाधू'चं हरण केलं. गर्भावस्थेत असलेल्या कयाधूची नारदांनी सुटका केली आणि आपल्या आश्रमात नेलं. त्रिकालज्ञानी नारदांनी कयाधूच्या गर्भातील प्रल्हादाला दिव्यज्ञानाचा उपदेश केला.
ब्रम्हदेवाकडून अमरत्वाचा वर घेवून हिरण्यकश्यपू परतल्यानंतर प्रल्हादाचा जन्म झाला. नारद कृपेनं असुरपुत्र प्रल्हाद विष्णुभक्त झाला. पुढे नारदांकडे तो भीमा निरेच्या संगमावर येऊन भक्ति करू लागला. तिथं त्यानं वाळूची नृसिंहाची मूर्ती बनवून मनोभावे पूजु लागला. कालांतरानं श्री विष्णु प्रसन्न होऊन त्यास वर मागण्यास सांगितले. प्रह्लादानं श्री विष्णूना त्या मूर्तीत कायम वास्तव्य करण्यास सांगितलं. श्री विष्णूनी विनंती मान्य करून, मूर्तीचं दर्शन घेणाऱ्या भक्तांचे नित्य रक्षण करण्याचं वचन प्रल्हादास दिलं.
आपला बंधु हिरणाक्षचा वध करणाऱ्या विष्णूप्रती प्रल्हादाची भक्ति बघून हिरण्यकश्यपू संतापून उठत असे. अनेक प्रयासांनी प्रल्हाद विष्णूभक्तिपासून ढळत नसल्याचं पाहून त्यानं प्रल्हादास जीवे मारण्याचे प्रयत्न केले. अंती भरसभेत हिरण्यकश्यपूनं प्रल्हादास विष्णूचं अस्तित्व विचारलं. सर्वव्यापी असल्यानं प्रल्हादानं समोर दिसणाऱ्या खांबाकडं बोट दाखवलं.
संतापून हिरण्यकश्यपूनं हातातील गदेनं त्या खांबावर प्रहार केले. त्यावेळी ब्रह्मांड फुटावेत असे खांबातून अति भयंकर आवाज झाले. मानवी धड आणि सिंहाचं तोंड असं श्रीहरी विष्णू भयंकर रुपात प्रकटले. कराल दाढा, चंचल तीक्ष्ण जीभ, कान शंकुसारखे ताठ होते. नाकपुड्या पर्वतातील गुहेसारख्या, तर मस्तक आणि वक्षस्थळ विशाल दिसत होतं. चढवलेल्या भुवयांमुळं चेहरा उग्र झाला होता. नखं हीच त्यांची शस्त्र होती. त्यांच्या जवळ जाणंही अशक्य होतं. तरीसुद्धा हिरण्यकश्यपूनं धाव घेवून त्यांना ललकारलं.
नृसिंह रूपातील श्री विष्णुंनी त्याला गदेसह अलगद उचलून, श्री ब्रम्हाच्या वरदानाचा मान राखत, ना घरात ना दरात तर दोन्ही दारांच्या उंबऱ्यावर बसून; ना जमीन ना आकाश तर आपल्या मांडीवर उताणा पाडून; ना दिवसा ना रात्री तर संध्याकाळी; ना मानव ना प्राणी तर नर आणि सिंहाचा जोड अवतार घेऊन हिरण्यकश्यपूची छाती विदीर्ण केली. त्याला दूर फेकून दिलं. आजूबाजूच्या शस्त्रधारी राक्षासांनाही त्यांनी क्षणात संपविलं.
क्रोधानं तप्त, लाल झालेल्या नृसिंह मुखातून बाहेर आग पडू लागली. त्यांना शांत करण्यासाठी प्रत्यक्ष देवांचीही तारांबळ उडाली. शेवटी देवांनी प्रल्हादाला विनवणी केली.
प्रल्हाद उग्ररूपी नृसिंहाकडे गेला आणि नमस्कार घातला. लोक भयमुक्तीसाठी या आवताराचं स्मरण करतील अशी नरहरीस ग्वाही दिली. तेव्हा त्यांनी शांत होऊन देवी लक्ष्मी आणि शेषनागासह सर्वांना दर्शन दिलं. प्रल्हादास अनेक आशीर्वाद देऊन निघून गेले.
श्री विष्णुंनी घेतलेल्या या चौथ्या चमत्कारिक अवतार कथेवर भगवान व्यासांनी स्वतंत्र नृसिंहपुराण लिहिलं आहे. पद्मपुराणात निरा नृसिंहपुर हे सुदर्शनीय क्षेत्र आहे.
मंदिराचे बांधकाम हे नदीकाठच्या उंचवट्यावर केलेले असल्याने दुरूनच मंदिराचे दर्शन घडते. नदीच्या संगमावर असलेले हे मंदीर पेशवेकाळात बांधलेले असुन मध्ययुगीन वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे. मंदीराच्या पायऱ्या चढताना पायऱ्यावर बसवलेले दगडी हत्ती आपले लक्ष वेधुन घेतात.
मंदिराच्या चारही बाजूंनी रुंद व भक्कम असा तट असुन दर्शनी भागात दरवाजावर नगारखाना बांधलेला असुन शेजारी दोन बुरुज बांधलेले आहेत. या संपुर्ण तटाच्या आतील बाजुस दगडी ओवऱ्या बांधलेल्या आहेत. मुख्य मंदिराचे गर्भगृह, सभामंडप व मुखमंडप असे भाग पडले आहेत. संपूर्ण बांधकाम दगडी असून छतावर नक्षी व विविध देवतांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराचे दगडी खांब अतिशय कुशलतेने घडविलेले आहेत. रंगशिळेच्या मंडपाचे दोन्ही बाजूस दरवाजे आहेत. ह्या सर्व दरवाजावर जय विजय कोरलेले असुन पितळी दरवाज्यावरील जय-विजयाची सुबकता व मुद्रा विलोभनीय आहेत. वेगवेगळया प्रकारच्या नक्षी, घाटदार खांब ,कंगोरे प्रमाणबद्ध व अतीव देखणा असा पितळी दरवाजा येथे आहे.
१५२७ चा संगमावरील घाट
भीमा निरा संगम
मंदिराचा परिसर जरी मोठा असला तरी निरनिराळ्या भागांच्या बांधणीचा काळ वेगवेगळा आहे. वास्तुशैलीतील फरक त्यानुसार दिसून येतो. कळसांवरील मूर्तींमध्ये दशावतारांच्या मूर्ती साकारताना स्थानिक प्रतिमांचाही अंतर्भाव आहे.
‘गेलो नरसिंह पुरा। नरसिंह दारूषणे पतका पुरलासे अंतु। नीरेभीवरे संगमी स्नान । करोनिया तेथे पै झाली सुस्नातू’ तेराव्या शतकात संत नामदेवमहाराजांनी तीर्थयात्रेदरम्यान नीरा नरसिंहपूरला भेट दिल्याचा उल्लेख त्यांच्या अभंगातून दिसून येतो. इथल्या पुराच्या पाण्याच्या पातळी ४६६.५ मीटर असून मंदिराचं जोतं ४६८ मीटर या पातळीला सुरू होतं.
अर्थातच तटबंदीचं उंच जोतं हा मंदिराच्या स्थापत्याचा महत्त्वाचा भाग आहे. कधी अती पूर आला व गाव पाण्याखाली गेलं तरी ग्रामस्थांना मंदिराचा निवारा आश्वासक आहे. उंच तटबंदीच्या आतमध्ये मंदिराचं संकुल असून तिन्ही बाजूंनी टप्प्याटप्प्यानं उतरत जाणारे घाट म्हणजे उंचीवरील मंदिरासाठी बांधलेली संरक्षण भिंत व पाषाणातील सुबक पायऱ्या जोतेसंवर्धनाचं काम चोख बजावतात.
पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळ घडीव काळ्या पाषाणात पायऱ्या, उत्तम भाजलेल्या नारिंगी वीटकामाचे बुरुज व त्यावर सागवानी लाकडाचा कलाकुसरीनं परिपूर्ण नगारखाना अशा तीन वेगवेगळ्या सामग्रीतून साकारलेली सौंदर्यपूर्ण रचना आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर नजरेस पडतो तो लाकडातील सभामंडप. यादवकालीन मंदिराचा सभामंडप मूळ मंदिराच्या आकारमानाशी प्रमाणबद्धता साधून पेशवाईच्या कालखंडात बांधलेला आहे.
मुख्य मंदिराभोवती तीन बाजूंनी असलेल्या दगडी ओवऱ्या पश्चिमेकडील नगारखान्याला मिळतात. नगारखान्याच्या पहिल्या मजल्यावर प्रशस्त दालन आहे. दुसऱ्या मजल्यावरून संपूर्ण परिसराचं, नदीपात्राचं, घाटांचं, विहंगम दृश्य नजरेस पडतं. मंदिराच्या पूर्वेकडील ओवऱ्या मूळ यादवकालीन असल्याचं बांधणीच्या तपशिलांवरून दिसून येतं. याच ओवऱ्यांमधून पुढं संगमावर जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे.
सोळखांबी मंदिर - भीमा निरा संगम
संगमावर सोळाखांबी मारुतीचं मंदिर असून त्यापुढं संगमावर नदीकाठी दशक्रियाविधी करण्याची परंपरा आहे.
नृसिंह हे विष्णूचं दशावतारातील रूप असल्यामुळे दशावतारातील अनेक प्रतिमा मंडपावरील व रंगमंडपावरील चुन्याच्या मूर्तिकामातून दिसून येतात. नृसिंह हे विष्णूचं उग्र रूप मानलं जातं. ज्या वेळी नरसिंहाबरोबर लक्ष्मीची स्थापना असते तेव्हा लक्ष्मीनृसिंह हे विष्णूच्या शांत रूपाचं प्रतीक मानलं जातं. मुख्य गाभाऱ्याच्या दक्षिणेला लक्ष्मीचं मंदिर व गुप्तगंगा आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र नीरानरसिंहपूर इथल्या मंदिराला श्रीलक्ष्मीनरसिंह देवस्थान म्हटलं जातं. मुख्य मंदिराच्या भोवती असलेल्या ओवऱ्यांव्यतिरिक्त दक्षिणेला श्रीदत्तमंदिर असून उत्तरेला शिवमंदिर आहे.
मुख्य शिखरावर लक्ष्मी, शिव, मारुती, सरस्वती यांच्या पट्ट्यावरील मूर्तींच्या तुलनेत मोठ्या आकारांच्या मूर्ती पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर अशा चार दिशांना साकारताना शिखराच्या तळभागावरील सर्व प्रतिमा हत्तीवर स्वार असलेल्या व्यक्तींच्या, देवतांच्या रूपामध्ये आहेत. मंदिरपरिसर, प्रवेशद्वार, अर्धमंडप, घाट इथंही हत्तीच्या मूर्तींचं अस्तित्व स्पष्ट जाणवतं. बुद्धिमत्ता, ऐश्वर्य, बलाढ्यतेचं प्रतीक असलेल्या गजराजांच्या प्रतिमाचं अस्तित्व ठळकपणे प्रतीत होतं. इथल्या घाटांना ठरावीक नावं असली तरी सुमारे ८०० मीटर लांबीचे घाट हे नीरानरसिंहपूरचं वैशिष्ट्य आहे व त्यांचंही संवर्धन होत आहे.
काळ्या पाषाणातील भव्य मंदिराच्या शिखरावर निरनिराळ्या आकारांतील चुन्यातील १७६ मूर्ती आहेत. वास्तुकला, मूर्तिकला, अभियांत्रिकीशास्त्र, नृसिंहलक्ष्मी व भक्त प्रल्हाद यांच्या आख्यायिकांची जोड असलेलं मंदिराचं महत्त्व भक्तांसाठी अनमोल आहे.
सुमारे ३०० वर्षांपूर्वी बांधलेल्या मुख्य मंदिराच्या चुन्यातील कळसाची काळानुरूप पडझड झाली होती. मंदिराची व परिसराची रेखांकनं झाल्यावर मंदिराच्या जतन-संवर्धनाचा आराखडा तयार होऊन काम सुरू झालं. मंडपाच्या लाकडावरील तैलरंग उतरल्यावर त्यांचं मूळ स्वरूप उजळपणे दिसू लागलं. कालबाह्य लाकडं उतरवून नवीन लाकडांची जोड मिळाल्यामुळे मंडपाचं स्थैर्य अबाधित झालं आहे. महत्त्वाचं आव्हान हे शिखराचं व मूर्तींच्या संवर्धनाचं होतं.
चुन्यात योग्य मिश्रण साधून कळसाचं संवर्धन तामिळनाडूतील कारागिरांनी पूर्ण केलं. कळसाला धक्का न लावता पहाड उभारून हे काम करावं लागतं व उंचावर वारा ऊन्ह-पाऊस हे सगळं सांभाळून कारागिरी साधणं हे कौशल्याचं काम असतं. आवारातच जुनी चुन्याची घाणी व दगडी चाक असून त्याचंही संवर्धन करण्यात आलं. कालौघात झालेली विसंगत बांधकामं उतरवण्यात आली. लाकडी नगारखान्याची जुनी खराब झालेली लाकडं बदलून नगारखाना नव्यानं पुनरुज्जीवित करण्यात आला आहे.
तिथल्या दालनात जतन-संवर्धनाच्या कामाचं व मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व दाखवणारी गॅलरी तयार होत आहे. आवारातील लहान-मोठ्या मंदिरांचं मूळ स्वरूपामध्ये जतन झालं. रंगशीळामंडपाच्या दगडांची स्वच्छता झाल्यावर तिथं पूरक अशी विद्युतव्यवस्था करण्यात आली. मूळ गाभाऱ्याला चिकटवलेल्या आधुनिक फरशा काढून दगडी भिंतीचं संवर्धन करण्यात आलं आहे.
यंत्राकर बांधलेल्या चबुतऱ्यावर श्रीमुर्ती विराजित असून त्यावर 'श्री'चे अंतराळ व गर्भगृह बांधलेलं दिसतं. पुढे विठ्ठल शिवदेवांचे पुत्र शिवाजी विठ्ठल यांनी मंदिराच्या अंतराळापुढील दगडी मंडप, पश्चिम दरवाजा व नगारखाना बांधवून घेतला. त्यांचे पणतू विठ्ठल नरसिंह यांनी मंदिराचा लाकडी सभामंडप, धर्मशाळा आणि पूर्वेकडील अभेद्य तटात दोन्ही बाजूचे भक्कम दिसणारे बुरूज बांधले.
श्री मूर्तीचा प्रमुख गाभारा त्या पुढील गर्भागार,रंग शिलेचा सभामंडप हे संपूर्ण दगडी बांधकाम असून दगडी छतावरील नक्षी व विविध देवाच्या मूर्ती लक्षणीय आहेत. घडीव दगडी खांब कुशलतापूर्वक आहे.पितळी दरवाज्यापुढे लाकडी मंडप असून त्यापुढे भक्त प्रल्हादाचे मंदिर आहे. रंग शिळेच्या मंडपाचे दोन्ही बाजूस तीन दरवाजे आहेत.ह्या सर्व दगडी दरवाज्यावर जय विजय घडविलेले असून, पितळी दरवाज्यावरील जय-विजयाची सुबकता व मुद्रा विलोभनीय आहेत.वेगवेगळया प्रकारच्या नक्षी, घाटदार खांब ,कंगोरे प्रमाणबद्ध व अतीव देखणा असा पितळी दरवाजा येथे आहे.
श्री प्रल्हाद मूर्ती
'श्री' चे शेजघर
विष्णूभक्त ब्रम्हदेवाकृत आणि विष्णूभक्त प्रल्हादाकृत अशा दोन नृसिंह मूर्ती आज नीरा नृसिंहपूरच्या मंदिरातील एकाच गाभाऱ्यात स्थापित दिसतात. गाभाऱ्यातील प्रल्हादाकृत हि आद्य मूर्ती असून ही वालुकाश्माची म्हणजे वाळूच्या दगडाची असल्याचे मानले जात होते. ती पश्चिमाभिमुख आहे. त्यामुळं मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाज्याला 'महादरवाजा' म्हटलं जातं. या वाळूच्या मूर्तीची झीज होऊ नये म्हणून, मूर्तीवर वज्रलेप केल्याची माहिती मंदिरातील पुजाऱ्यांनी देतात. ब्रम्हदेवाकृत काळ्या पाषाणातील दुसरी श्रीमुर्ती या मूळ मूर्तीच्या डाव्या बाजूस त्याच गाभाऱ्यात उत्तराभिमुख दिसते. श्री विष्णुंचं नृसिंह अवतारातील भीषण रूप शांत झालेलं या मूर्तीत दिसतं. त्यामुळं या मूर्तीस 'शामराज' म्हणतात.
नरसिंह मूतीर्चे संवर्धनाचे काम करताना यावर पहिला वज्रलेप हा १८८१ मध्ये करण्यात आला होता. २००९ पर्यंत जवळपास सात वेळा त्यावर वज्रलेप करण्यात आला. यामध्ये एम.सिल आणि ईपोक्सी सारख्या द्रवणांचा वापर करण्यात आला होता आणि १८८१ पूर्वी वज्रलेपाच्या खाली चुना आणि वाळूचे मिश्रण करून मूर्तीवर लेपन करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या दोनशे वर्षात मूळ मूर्ती कोणीही पाहिलेली नव्हती. ही मूर्ती वालुकामय पाषाणाची आहे असा आजवर लोकांचा समज होता. त्यामुळेच मूतीर्चा काळ ठरवता येत नव्हता. मूर्तीचे सर्व लेपन काढून टाकल्याने मूळ मूर्ती ही काळ्या पाषाणाची ( बेसाल्ट) असून, वाकाटक व त्या समकालीन मूतीर्शी साम्य दर्शविणारी असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. या मूर्तीवरचे १५४८० किलोचे जुने वज्रलेप व कॉंक्रिटचे लेपन काढून रासायनिक लेपन करण्यात आले या मूर्तीच्या दृढीकरणासाठी पुरातत्व खात्याकडून त्यावर रासायनिक लेपन करून तिचे संरक्षण करण्यात आले आहे.

'श्री'च्या मूर्तीसमोर चांदीनं मढवलेली आडवी दांडी दिसते. समई, पूजा साहित्य ठेवण्यासाठी तिचा वापर होतो. चांदीत मढवलेल्या दांडीवर शंख, चक्र कमळ, गदा अशी श्री विष्णूची शुभ चिन्हे कोरलेली दिसतात.
नृसिंहाची मुर्ती पश्चिमाभिमुख असुन काळ्या पाषाणात घडवलेली हि मुर्ती वीरासनात आहे. उजवा पाय गुडघ्यात मुडपलेला असुन डाव्या पायाची मांडी घातलेली तर उजवा हात उजव्या गुडघ्यावर व डावा हात कंबरेवर आहे. मुर्तीचे मुख सिंहासारखे रुंद असुन डोळे मोठे व चेहऱ्यावर उग्र भाव आहे. चेहरा व शरीराचा भाग हा सिंहासारखा दर्शविलेला असुन हातपाय मात्र मानवी आहेत. हि मुर्ती साधारणतः पाचव्या शतकातील आहे. नरसिंहाची मुळ मूर्ती काळ्या पाषणात कोरलेली असुन तिच्यावर चुना आणि वाळुचे मिश्रण करून लेपन करण्यात आले आहे. शके १७८७ साली रघुनाथराव विंचुरकर यांनी या देवालयाचा जीर्णोद्धार केलेला असुन त्या संबंधीचा शिलालेख मंदीरात पहायला मिळतो. मंदिराच्या परीसरात लक्ष्मी,भक्तप्रल्हाद,श्रीदत्तात्रय,भीमाशंकर,विठ्ठल-रुक्मिणी,शाकंबरी,काशीविश्वेश्वर गणपती,काळभैरव,रामेश्वर या देवतांची मंदिरे आहेत.
पश्चिम दारावरील घंटा
याशिवाय मंदिराच्या आवारात काही विरगळ व नागशिल्प दिसून येतात. मंदिराच्या पुढील बाजुस दीपमाळ व जानकेश्वर नावाचे शिवमंदिर असुन जानकीबाई यांच्या स्मरणार्थ रघुनाथ विंचूरकर यांनी शके १८०३ साली हे शिवमंदिर बांधले. मंदिराच्या पश्चिम दरवाजात एक मोठी घंटा बांधलेली असुन ती १७३९ साली चिमाजीअप्पांनी वसई जिंकल्यानंतर तेथील चर्चमधुन आणल्याचे सांगीतले जाते.पेशवे यांनी या घंटा निरनिराळ्या देवस्थानाला पाठवून दिल्या. त्यापैकीच एक सदाशिव माणकेश्वर यांच्या प्रयत्नाने निरा नरसिंहपूर येथे आणण्यात आली. निरा आणि भीमा नदीच्या संगमावर असलेला घाट शके १५२७ मध्ये बांधून पूर्ण झाला. हे बांधकाम त्रिमलापाळ दाधजी मुधोजी यांनी केले. हे बांधकाम पुर्ण करण्यास साधारण ३ वर्षे लागली. नरसिंहपूर देवालयात भक्तांसाठी खोल्या उपलब्ध आहेत पण सोय न झाल्यास टेंभुर्णी येथे जावे लागते.
श्री काशी विश्वेश्वर शिवलिंग
प्रल्हाद मंदिर
देवालयाच्या आतील बाजूस असणाऱ्या परिवार देवता खालील प्रमाणे
१) शेजघर : हे रंगशिळेच्या गाभाऱ्यात असून शेजघरात दोन पलंग आहेत.एक श्री नरसिंहाचा व दुसरा शामराजाचा .पलंगावर गाद्या ,गिर्द्या ,उश्या व श्रींची प्रतिमा आहे.
२) स्तंभ-नरसिंह : रंग शिळेच्या सभा मंडपातील एका स्तंभावर हिरण्यकश्यपूच्या वधाचा प्रसंग कोरलेला आहे.
३) लक्ष्मी मंदिर : श्री नरसिंहाचे डावे बाजूस श्री महालक्ष्मीचे मंदिर आहे. श्री महालक्ष्मीची रेखीव व सुंदर मूर्ती गंडकी शिळेची आहे.मूर्ती उभी आहे.पूजा बांधल्यावर बसल्यासारखी दिसते.या मंदिराचे शिखर हे दगडी आहे.हे शिखर निरा नदीच्या पात्रापासून सुमारे १५० फुट उंच आहे.शिखराच्या दोन दगडामध्ये एक लहानशी पहात आहे.त्यातून दिवस रात्र पाणी जीरपते.उगमस्थान अज्ञात असलेला हा लहानसा पाझर येथे गुप्त गंगा म्हणून ओळखला जातो.हा एक चमत्कारच आहे.तर्क शास्त्राने याचा उलगडा करता येत नाही.
४) भक्त प्रल्हाद मंदिर : श्री नरसिंहाच्या समोर लाकडी सभामंडपात भक्त प्रल्हादाचे मंदिर आहे. हात जोडून उभी राहिलेली ही मूर्ती काळ्या पाषाणाची आहे.प्रल्हाद कृत नरसिंह मूर्ती व प्रल्हाद मूर्ती एकमेकांच्या समोर असून नरसिंह मूर्तीच्या पायांच्या समपातलीस या मूर्तीचे मस्तक येते हे एक विशेष आहे.
५) श्री दत्तात्रय मंदिर : दत्तासाठी एक छोटेसे देवालय बांधलेले आहे.हे बांधकाम संपूर्ण लाकडी असून दत्तमूर्ती पांढऱ्या संगमरवरी दगडाची आहे.हि मनोहर मूर्ती सिंहासनावर स्थापित आहे.
६) भीमा शंकर : देवाच्या उजव्या बाजूस भीमा शंकराचे छोटेसे देऊळ आहे. शाळूकिंच्या मानाने पिंडी उंच आहे.
७) विठ्ठल-रुक्मिणी : भीमा शंकराच्या उजव्या बाजूस छोट्या देवळात विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत.दोन्ही मूर्ती पाहिल्यास पंढरपूरची आठवण येते.
८) राघवेंद्र स्वामी वृंदावन : मद्व संप्रदायाचे श्रद्धास्थान मंत्रालय स्थित श्री राघवेंद्र स्वामी हे भक्त प्रल्हादाचा अवतार होत.वृंदावन प्रवेशानंतर त्यांचा प्रत्यक्ष वास मंत्रालय क्षेत्री आहे.मंत्रालय सवे निरा नरसिंहपूर क्षेत्री मी विशिष्ट काळी निवास करेल अशी त्यांची भविष्यवाणी असल्याने शके १८५० साली श्री राघवेंद्र स्वामींचे वृंदावन श्री नरसिंह देवालयात बांधले गेले.दरवर्षी श्रावण महिन्यात आराधना महोत्सव साजरा केला जातो.
९) शालीग्राम : शाकंबरीच्या मंदिराजवळ शालीग्रामाच्या आकाराचा एक मोठा पाषाण आहे.
१०) तरटी नरसिंह : मोठा ओटा त्याच्या केंद्र स्थानी तरटी वृक्ष त्याच्या खाली श्रींच्या चार पादुका असून मंदिरा शेजारच्या दुसऱ्या तरटी वृक्षास पार बांधलेला आहे.
११) शाकंबरी : अठरा भूजांनी युक्त अशी देवीची मूर्ती या मंदिरात आहे.
१२) काशी विश्वेश्वर : खोल गाभारा असलेले शिकार युक्त व महादेवाच्या पिंडी प्रमाणे दिसणारे एक ओबडधोबड मध्यम देऊळ ,समोर बसविलेला एक मोठा दगडी नंदी व गाभाऱ्यातील पिंडी शाळुंका हा काशी विश्वेश्वर येथे आहे.पिंड काढली असता खोलगट भाग दिसतो त्यात तीन लिंग आहेत ते ब्रह्मा ,विष्णू आणि महेश
१३) काळा दत्त : काशी विश्वेश्वराच्या उजव्या बाजूस एका देवळात पाषाणाची दत्ताची मूर्ती आहे.त्यास काळा दत्त असे म्हणतात.
१४) मुहूर्त गणपती : एका स्तंभावरील कमानीत गजाननाची मूर्ती आहे.मुख्य देवालय बांधण्याअगोदर ही मूर्ती स्थापन केली.
१५) काळभैरव : पूर्व दरवाज्याकडे भैरव नाथाचे देऊळ ओवरीत आहे.हे स्थान सोनारी येथील भैरव नाथाच्या दोन मूर्ती आहेत.
१६) रामेश्वर : लक्ष्मी मंदिर लगत एक रामेश्वराचे हे देऊळ आहे.
नीरा नदीवरील पवित्र तीर्थे ::
१) लक्ष्मी तीर्थ : मुख्य देवालयाच्या पश्चिम दरवाजाच्या डाव्या बाजूस घाट असून त्यावर श्रीलक्ष्मीचे देवालय आहे.या स्थानीय लक्ष्मीने तपश्चर्या केल्याने तिचा चंचलत्वाचा दोष निघून गेला.त्यामुळे या तीर्थास लक्ष्मी तीर्थ म्हटले जाते.
२) पद्म तीर्थ : लक्ष्मी तीर्थाच्या वरील बाजूस पद्म तीर्थ आहे.लक्ष्मीने तप केले तेव्हा श्री नरसिंह प्रसन्न झाले. भागवत दर्शनाच्या आनंदाने लक्ष्मीच्या हातातील पद्म या स्थानी गळून पडले.तसेच कुबेराला धनप्राप्ती याच ठिकाणी झाली.
३) शंख तीर्थ : नरसिंहाचे शंख नावाचे आयुध या ठिकाणी वास्तव्य करते.
४) पिशाच्च विमोचन तीर्थ : पित्र-पिशाच्च योनीतून मुक्त होण्यासाठी या तीर्थावर स्नान करणेविषयी सांगितले आहे.या तीर्थावर नारायण नागबली , त्रिपिंडी (पिंडदान) , कालसर्प योगशांती , ग्रहशांती , नक्षत्र शांती या सारखे विधी केल्याने सर्व दोष नाहीसे होतात.
५) नरसिंह तीर्थ : हिरण्यकश्यपूचा वाढ केल्यानंतर श्री नरसिंहानि याच स्थानी वास्तव्य केले . हे स्थान एकांत रम्य असून येथे नीरा नदीवर घाट बांधला आहे.या घाटावर डोंगर कपारीतील मंदिरात श्री नरसिंहाची तांदळास्वरूप मूर्ती आहे.बाजूस यात्रेकरूंसाठी ओवऱ्या बांधल्या असून त्यापैकी एका ओवरीत मारुतीची मूर्ती आहे. येथील एकांत इतका अदभूत आहे की येथे जलप्रवाहाच्या ध्वनीशिवाय अन्य कोणताही ध्वनी येथे ऐकू येत नाही.
तसेच याठिकाणी हंसतीर्थ , इंद्रतीर्थ, तारातीर्थ, दुर्वासतीर्थ , कपिलतीर्थ,गणेशतीर्थ इत्यादी तीर्थे आहेत.
भीमा नदीवरील पवित्र तीर्थे ::
१) दुर्गा तीर्थ : या तीर्थावर दुर्गा मातेचे स्थान असून डोंगर कपारीत छोटेसे देऊळ बांधलेले आहे.तेथे दुर्गेचा तांदळा आहे.यालाच ईवराई असे म्हणतात.
२) कोटी तीर्थ : या तीर्थावर नारदमुनींचा आश्रम होता.या ठिकाणी सर्व देव देवता श्री नरसिंहाची उपासना करतात.
३) गो तीर्थ : कामधेनुने या ठिकाणी नरसिंहास अभिषेक केला.
४) भानू तीर्थ : भगवान सुर्यानारायांची हि तपोभूमी. सूर्यग्रहण , संक्रमण व पर्वकाळ , रविवार , रथसप्तमी या दिवशी येथील स्नानाचे महत्त्व आहे.
५) चक्र तीर्थ : भक्तप्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवंतांनी चक्र पाठविले. त्याचा उदय या स्थानी झाला.
तसेच या ठिकाणी नदतीर्थ , पाशतीर्थ, लांगलतीर्थ, मौसलतीर्थ असे अनेक तीर्थे संगमा सानिध्यात आहेत.
श्री’स होणारे नित्य पूजा विधी व उपचार ::
काकड आरती : पहाटे पाच वाजता सूर्योदयापूर्वी पूजाधिकारी देवालयाची द्वारे उघडून श्री’सह सर्व परिवार देवतांना काकड्याणे ओवाळतात.यावेळेस श्रींस खिचडीचा नैवैद्य दाखविला जातो.
प्रातःपूजा : सकाळी ७ वाजता पहिल्या प्रहरात हि पूजा पूर्ण होते.श्री नरसिंह व श्री शामराज या दोन्ही मूर्तीस पंचामृत स्नान घालून षोडशोपचार पूजा होते.नरसिंहपूर प्रथेनुसार ऋग्वेदीय व सामवेदीय सुक्तांनी तसेच पौराणिक मंत्रांनी पूजा केली जाते.नंतर श्री मूर्तीस पोशाख परिधान केला जातो.धूप दीपाने आरती होऊन श्रीस पायसाचा नैवैद्य दाखविला जातो.नंतर परिवार देवतांची पूजा केली जातो.
माध्यान्हपूजा : दुपारी १२ वाजता श्रींस पुरणपोळीचा महानैवैद्य दाखविला जातो.व महाआरती केली जाते.
सायंपूजा : सायंकाळी ७ वाजता श्रींस पंचोपचारे मंत्र स्नान घालून धूप दीप नैवैद्य युक्त पूजा केली जाते.या वेळी नगार खाण्यातील नगारा नौबत ,झांज , घाटी वाजवली जाते.
शेजारती : रात्रौ ९ वाजता श्रींची शेजारती केली जाते.शेजारती नंतर चम्पूप्रार्थना म्हणण्यात येऊन श्रींस दुधाचा नैवैद्य दाखविण्यात येतो.या सर्व विधी नंतर श्री नरसिंहाची क्षमा मागून पूजाधिकारी द्वारे बंद करतात.
पूजा-विधी ::
नीरा-नरसिंहपूर येथे आल्यानंतर श्रींना कुलधर्म कुलाचार करता येतो.या मध्ये प्रकार पुढीलप्रमाणे :
१) महापूजा , महावस्त्र1 सेवा ( पवमान पंचसुक्त दुग्ध अभिषेक , महानैवैद्य, कुलधर्म कुलाचार )
२) पंचामृत अभिषेक ( अभिषेक , महानैवैद्य, कुलधर्म कुलाचार )
३) पाद्यपूजा अभिषेक (पुरुषसुक्त अभिषेक)
४) चरण पूजा
५) नंदादीप सेवा (अखंड/वार्षिक/मासिक/साप्ताहिक)
६) वसंत पूजा
७) कुंकुमार्चन
८) महानैवैद्य, कुलधर्म कुलाचार
९) अलंकार पूजा
१०) महालक्ष्मीस साडी व ओटी अर्पण
1. श्रींची महावस्त्रे: धोतर/ सोवळे, शाल / उपरणे , बाराबंदी (अंगरखा),पुणेरी पगडी
2. महालक्ष्मीची महावस्त्रे: नऊवारी साडी व खण/पीस
मराठी वर्षामध्ये होणारे सण व उत्सव ::
चैत्र : गुढी पाडव्याच्या दिवशी श्रींना पवमान (पंचसुक्त) अभिषेक करण्यात येतो.व अलंकार पूजा बांधण्यात येते तसेच मंदिरात गुढी उभारण्यात येते.रामनवमी दिवशी रामजन्म सोहळा तसेच हनुमान जयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.या दरम्यान शिखर शिंगणापूर येथे श्री महादेवाच्या दर्शनासाठी यात्रेकरू मोठ्या प्रमाणावर येतात.
वैशाख : वैशाख नवरात्र महोत्सव – हा येथील सर्वात मोठा उत्सव. वैशाख शुद्ध ६(षष्ठी) श्रींचे नवरात्र उत्सवास प्रारंभ होऊन वैशाख शुद्ध १४ (चतुर्दशी)या दिवशी नरसिंह जयंती सायंकाळी जन्मकाळ सोहळा होतो.वैशाख शुद्ध १५ (पौर्णिमा) या दिवशी पारणे केले जाते त्या रात्री श्रींच्या पादुका पालखीत ठेवून सवाद्य मिरवणूक काढली जाते. दुसरे दिवशी दही हंडी काला व लळीत होऊन उत्सवाची समाप्ती होते या दरम्यान उत्सवामध्ये श्रींसमोर भक्ती संगीत , भजन , व्याख्यान , प्रवचन व रात्रौ नारदीय कीर्तन सेवा इत्यादी कार्यक्रम केले जातात. उत्सव काळात श्रींस विविध अलंकार पूजा चंदनउटी पूजा , पुष्प रचना पूजा , महावस्त्र पूजा बांधण्यात येतात.संपूर्ण वैशाख महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नरसिंह भक्त कुलधर्म कुलाचार करण्यासाठी येतात.
जेष्ठ : जेष्ठ शु. १ ते जेष्ठ शु. १० या दशहार पर्वकाळामध्ये श्रींस अनेक भक्तांकडून सेवा अर्पण केली जाते. वटपौर्णिमेस सुवासिनीकडून वडपूजन केले जाते.
आषाढ : आषाढी एकादशीस श्रींना महापूजा करण्यात येते.आषाढ शु. १५ ( गुरु पौर्णिमा ) स भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात.
श्रावण : नागपंचमीच्या दिवशी मंदिरामध्ये नागपूजन व सामुदाईक श्रावणी केली जाते.तसेच गोकुळ अष्टमीस सप्ताह आयोजन करून श्रीकृष्ण जन्म साजरा केला जातो.
भाद्रपद : गणेश चतुर्थी उत्सव – मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.गणपती अथर्वशीर्ष पठण व गणेश यागाचे आयोजन केले जाते.
आश्विन : अश्विन शु.१ ते अश्विन शु.९ शारदीय नवरात्र उत्सव मंदिरामध्ये साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी श्रींस व महालक्ष्मीस महाअभिषेक , महावस्त्र पूजा अर्पण करण्यात येते.सायंकाळी सीमोल्लंघणासाठी श्रींची पालखी निघते.गावाच्या वेशीवर जाऊन आपटा पूजन करून सोने लुटण्याचा कार्याक्रम होतो.नरक-चतुर्दशी दिवशी पूजाधिकारी दंडवते यांच्याकडे कुरवंड्या श्रींस ओवाळतात.श्रींस अलंकार पूजा बांधलेली असते.श्रींची पालखी संगमावर जाते.
कार्तिक : बलीप्रतीपदेदिवशी पहाटे श्रींस अभ्यंग स्नान घालून श्रींस अलंकार पूजा बांधली जाते ,या दिवशी डिंगरे पूजाधिकारी यांच्याकडे कुरवंड्या असतात. याहि दिवशी पालखी संगमावर जाते. तुळशी विवाह- कार्तिक शु.१२ या दिवशी श्रींचा तुल्शीशी विवाह लावला जातो.वैकुंठ चतुर्दशीस गरुडाची (वाहन) सवाद्य मिरवणूक काढली जाते.
मार्गशीर्ष : मार्गशीर्ष शु. पौर्णिमा या दिवशी दत्त जयंतीचा उत्सव होतो.शके १७८७ साली रघुनाथराव विंचूरकरांनी देवालयाचा जीर्णोद्धार करून याचा उत्सर्ग केला होता.याचा वर्धापनदिन प्रतिवर्षी मार्गशीर्ष व.९-१० या दिवशी केला जातो.
पौष : भोगीच्या दिवशी श्रींची पालखी निघते.मकर संक्रांतीचे दिवशी सुवासिनी श्रींस व लक्ष्मीस वाणवसा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
माघ : माघी एकादशी व महा शिवरात्रि या दिवशी नीरा-भीमा संगम स्नान करून भक्त दर्शनास येतात.
फाल्गुन : पौर्णिमेचे दिवशी देवालायामध्ये होळीकापूजन करतात. रंगपंचमीचे दिवशी श्रींस श्वेत रंगाचा पोशाख परिधान करून श्रींचे अंगावर केशरी रंगाची उधळण केली जाते.
नीरा-नरसिंहपूर येथे कसे याल? ::
१) बस सेवा –
पुणे येथून सोलापूर जाणाऱ्या बसने टेभुर्णी येथे उतरावे.टेंभुर्णी येथून अकलूज जाणाऱ्या बसने संगम चौक येथे उतरावे.तेथून रिक्षाद्वारे नीरा-नरसिंहपूर येथे यावे.पुणे ते नरसिंहपूर अंतर १८५ किमी आहे.
पुणे-इंदापूर- टेंभुर्णी- संगम-नीरा नरसिंहपूर
पंढरपूर अकलूज मार्गाने येताना अकलूजहून टेंभुर्णी जाणाऱ्या बसने संगम येथे उतरावे. तेथून रिक्षाद्वारे नीरा-नरसिंहपूर येथे यावे.
पंढरपूर-अकलूज- संगम-नीरा नरसिंहपूर
२) रेल्वे सेवा –
पुणे स्टेशन येथून सोलापूरला जाणाऱ्या रेल्वेने कुर्डूवाडी जंक्शन येथे उतरावे.कुर्डूवाडी ते टेंभुर्णी बसने प्रवास करावा. टेंभुर्णी येथून अकलूज जाणाऱ्या बसने संगम चौक येथे उतरावे.तेथून रिक्षाद्वारे नीरा-नरसिंहपूर येथे यावे.
पुणे-कुर्डूवाडी- टेंभुर्णी- संगम-नीरा नरसिंहपूर
नरसिंहपूरला भेट देण्याची योग्य वेळ :-
नीरा नरसिंहपूर येथे वर्षभरामध्ये कधीही येऊ शकता.पावसाळ्यामध्ये तुम्ही नीरा व भीमा या दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांचा आनंद घेऊ शकता.हिवाळा व उन्हाळा या दोन ऋतूमध्ये आल्हाददायक वातावरणामध्ये येऊ शकता.
निवास व्यवस्था :-
नीरा नरसिंहपूर देवालयात भक्तांसाठी देवालयात खोल्या उपलब्ध आहेत व क्षेत्रोपाध्याकडे निवास व भोजन व पूजाविधी करण्याची सोय आहे.तसेच लॉजिंगसाठी टेंभुर्णी येथे व्यवस्था आहे.
या राज्यसंरक्षिनत स्मारकासाठी शासनाने २६० कोटी ८६ लाख रुपयांचा विकास
आराखडा मंजूर केलेला आहे. विकास आराखड्यानुसार भक्त व पर्यटक निवास
बांधकाम, सार्वजनिक सोयी सुविधा, माणकेश्वरवाडा संरक्षण भिंतीचे संवर्धन व
बांधकाम, घन कचरा व्यवस्थापन, विद्युतीकरण, पथदिवे, विद्युत जनित्र,
रस्त्यांचे रुंदीकरण व पथ सुशोभिकरण, बुडीत बंधारा बांधणे, जलक्रीडा
प्रकाराकरीता धक्के व तराफे बांधणे, दळणवळण सोयीसुविधा इत्यादी कामे
प्रस्तावित आहेत. यातील मंदिर परिसराचा पर्यटनाचा विकास करणे,
मंदिर-नगारखाना, राज्यसंरक्षिेत स्मारक व विंचूरकरवाडा जनत/दुरुस्ती व
सुमारे 800 मीटर लांबीचा पूर्वेकडील भिमा नदी व दक्षिणेकडील निरा नदीवरील
संगम घाटाची पुरातत्वीय शास्त्र संकेतानुसार जतन, दुरुस्ती इत्यादी कामे
सुरु आहेत.
संदर्भ :-
१) सोलापुर जिल्हा गॅझेटीयर२) https://www.esakal.com/saptarang/anjali-kalamdani-writes-nira-narsingpur-temple-pjp78
३) https://sahyadri300.blogspot.com/
४) http://www.niranarsingpur.in/p/history.html
५) https://mr.vikaspedia.in/education/apala-maharashtra
६) 094206 66068
https://www.facebook.com/niranarsingpur.in/
७) https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/shri-laxmi-narsimha-nira-narsingpur-123050300014_1.html
८) https://globalhinduism.online/?p=885
९) https://www.mymahanagar.com/maharashtra/it-is-the-original-form-of-the-statue-of-narasimha/31226/
१०) www.trekshitiz.com

































No comments:
Post a Comment