Thursday, November 9, 2023

दिवाळीत फटाके वाजविणे ही खरंच भारतीय प्राचीन परंपरा आहे का?

 
डॉ. शमिका सरवणकर

भारतीय सण हे ऋतूबदलाचे द्योतक असतात. आज जरी या सणांचे मूळ महत्त्व विस्मरणात जावून केवळ बाह्य उत्सवाचे स्वरूप शिल्लक राहिलेले असले तरी, भारतीय संस्कृतीच्या प्राचीन रचनाकारांनी निसर्गात होणाऱ्या सूक्ष्म बदलांचे निरीक्षण करून निसर्गातच आढळणाऱ्या गोष्टींच्या सहाय्याने हे सण कसे साजरे केले जावेत याची मांडणी केली होती, याला दिवाळी देखील अपवाद नाही. तेल-उटण्याने केलेले अभ्यंग स्थान, स्निग्धता वाढविणारा फराळ, दिव्यांची आरास या सर्व गोष्टींमागे निसर्गात होणारे परिवर्तन दडलेले आहे. परंतु काही गोष्टी सणाच्या निमित्ताने जोडल्या जातात, आत्मसात केल्या जातात आणि संस्कृतीचा भाग होतात. यात भल्या- बुऱ्या अशा दोन्ही परंपरांचा समावेश असतो. सध्या दिवाळीच्याच निमित्ताने एक मुद्दा गाजतो आहे, तो म्हणजे फटाक्यांचा. मुंबईत वाढलेल्या प्रदूषणामुळे न्यायालयाकडून फटाक्यांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे अनेक स्वरूपाच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटताना दिसतात. हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, हिंदू सणांच्या वेळीच असे नियम कसे येतात इत्यादी. त्याच पार्श्वभूमीवर दिवाळीच्या दिवसांत फटाके वाजविणे ही परंपरा प्राचीन आहे का? हे जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.

फटाके लोकप्रिय का?

फटाक्यांच्या इतिहासाविषयी ‘अ शॉर्ट हिस्टरी ऑफ फायरवर्क्स इन अमेरिका’ या पुस्तकात लिहिताना लेखक आणि इतिहासकार जॅक केली हे अग्नीचे महत्त्व विशद करतात. ते लिहितात अग्नी आपल्या चिंता आणि स्वप्ने दोन्ही भस्मसात करतो. अग्नी मानवाशी जलदगतीने संवाद साधतो. अग्नी केवळ पवित्र आणि भयंकरच नाही, तर अग्नी त्याच्या तेजस्वी रूपात मनोरंजनाचेही काम करतो. म्हणूनच उत्सवाच्या दिवसातील प्रकाश आणि फटाक्यांची रात्र जगाला सतत मंत्रमुग्ध करते यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.

फटाक्याचा शोध नेमका कोणाचा?

भारतात कुठलाही सण असो विशेषतः दिवाळी साजरी करताना फटाक्यांचा वापर नेहमीच होताना दिसतो. किंबहुना हा आपल्या संस्कृतीचा भाग मानला जातो. अभ्यासकांनी केलेल्या संशोधनानुसार इसवी सनाच्या १४ व्या शतकात भारतीय युद्धात ‘बारूद’ वापरला जावू लागला. याविषयी सविस्तर संशोधन पी. के. गोडे यांनी १९५० साली लिहिलेल्या “हिस्टरी ऑफ फायर वर्क्स इन इंडिया बिटवीन १४०० अँड १९००” या शोध निबंधात मांडले आहे. फटाक्यांचा वापर भारतात १४ व्या शतकापासून करण्यात येऊ लागला असे नमूद करण्यात आलेले आहे.

चिनी शोध

बारूद किंवा गनपावडरचा शोध मध्ययुगीन चिनी किमयागारांनी दहाव्या किंवा अकराव्या शतकात अपघाताने लावला, असे मानले जाते. सुरुवातीच्या कालखंडात हा अपघाती आविष्कार “डेव्हिल्स डिस्टिलेट” म्हणून संबोधला जात होता. या आविष्काराच्या प्रकाशाने आणि आवाजाने प्रेक्षक घाबरले त्यामुळेच या आविष्काराला डेव्हिल्स डिस्टिलेट संबोधले गेले होते. नंतरच्या काळात चिनी लष्करात गनपावडरचा वापर अधिकाधिक होवू लागल्याने त्याचे सामाजिक- राजकीय- आर्थिक मूल्यही वाढले. गनपावडरचा पांढरा, जादूई दिसणारा धूर यामुळे सार्वजनिक क्षेत्रात त्याचे प्रदर्शन अधिक लोकप्रिय झाले. यातूनच अरबांनी हे तंत्रज्ञान चीनमधून भारत आणि युरोपमध्ये नेले, असे मानले जाते.

सुधारित भारतीय फटाके

पी के गोडे यांनी नमूद केल्याप्रमाणे, हे तंत्र भारतात आल्यानंतर त्या तंत्रात अनेक बदल झाल्याचे आढळते. भारतात हे फटाके तयार करताना, चिनी तंत्रानुसार साहित्य न मिळाल्याने भारतात स्थानिक सामग्रीचा वापर करण्यात आला. त्यामुळे भारतात फटाक्यांची सुधारित आवृत्ती आढळते.

१४ व्या शकापूर्वी भारतात फटाके होते का?

अगदी प्राचीन काळापासून सोरामीठ (Saltpetre- KNO3) वापरण्याचा इतिहास आहे. भारतातही सोरामीठाचा वापर अश्मयुगीन काळापासून होत असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. याचा वापर स्फोटके तयार करण्यासाठी केला जातो. प्राचीन भारतात वेगवेगळ्या शस्त्रांमध्ये याचा वापर केला जात होता, याचे पुरावे शुक्रनीति, कौटिल्याचे अर्थशात्र यांसारख्या ग्रंथामध्ये सापडतात. त्यामुळे प्राचीन भारतीयांना युद्धभूमी किंवा तत्सम शस्त्रांसाठी लागणारी स्फोटके तयार करण्याचे ज्ञान होते हे सिद्ध होते. येथे लक्षात घेण्याच्या मुद्दा असा, चीनकडे फटाक्यांचा मनोरंजनासाठीच्या वापराचे आणि निर्मितीचे श्रेय जाते.

मध्ययुगीन भारतीय उत्सवांमध्ये फटाके

अब्दुर रज्जाक याने भारतातील काही सुरुवातीच्या कालखंडातील फटाक्यांच्या आतषबाजीच्या सार्वजनिक कार्यक्रमाविषयी नोंदी केल्या आहेत. अब्दुर रज्जाक हा १४४३ सालामध्ये विजयनगरचा राजा देवराया दुसरा याच्या दरबारात तैमुरीद सुलतान शाहरुखचा राजदूत म्हणून होता. त्याने आपल्या नोंदीत महानवमी उत्सवाचे वर्णन केले आहे, रज्जाकने नोंद केल्याप्रमाणे, या कार्यक्रमात फटाक्यांच्या आतषबाजीचे आयोजन केले होते. या काळात भारताला भेट देणारा इटालियन प्रवासी ‘लुडोविको डी वर्थेमा’ याने विजयनगर शहराचे आणि तेथील हत्तींचे वर्णन करताना फटाक्यांचा संदर्भ दिला आहे, त्यांनी नमूद केल्याप्रमाणे येथील हत्ती फटाक्यांना खूप घाबरतात. एकूणच विजयनगर साम्राज्यात फटाके आणि आतषबाजी सामान्य होते, हे लक्षात येते. अनेक मध्ययुगीन भारतीय राज्यांमध्ये सण, कार्यक्रम आणि विवाहसोहळ्यांसारख्या विशेष प्रसंगी फटाके आणि आतषबाजी हा शाही मनोरंजनाचा एक प्रकार म्हणून अस्तित्वात होता.

फटाक्याची सूत्रे

१५ व्या शतकात रचल्या गेलेल्या कौतुकचिंतामणी या गजपती प्रतापरुद्रदेव (१४९७-१५३९) लिखित ग्रंथात फटाक्यांची निर्मिती सूत्रे दिली आहेत. इब्राहिम आदिल शाह हा इ.स. १६०९ च्या सुमारास विजापूरचा सुलतान होता. त्याने एका दरबाऱ्याच्या मुलीच्या लग्नात चांगलाच हुंडा दिला होता, त्या मुलीचे लग्न निजामशाहीचा सेनापती मलिक अंबर याच्या मुलाशी झाले होते. या लग्नात सुमारे रु. ८०,००० इतका खर्च फटाक्यांवर केला गेला होता” असे दिवंगत इतिहासकार सतीश चंद्र यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध ‘मिडिव्हल इंडिया : फ्रॉम द सुलतानेट टू मुघल्स’ या पुस्तकात नमूद केले आहे. यासारख्या कार्यक्रमांसाठी मुख्यत्वे राजाकडून देणगी दिली जात होती. तसेच सामान्य जनतेसाठी हे कार्यक्रम खुले असतं. नागरिकांनाही फटाके वाजवण्याची सोय होती. दुआर्टे बार्बोसा, हा पोर्तुगीज भारतातील लेखक आणि अधिकारी होता, याने आपल्या प्रवास वर्णनात १५ व्या शतकातील एका विवाहाचे वर्णन केले आहे. हा विवाह ब्राह्मण वधू आणि वराचा होता. या विवाहात लोकांचे संगीताच्या आणि नृत्याच्या माध्यमातून मनोरंजन केले गेले, तसेच या लग्नात फटाक्यांची आतषबाजी ही झाली, असे तो नमूद करतो. याचाच संदर्भ घेवून पी के गोडे नमूद करताना लिहितात या कालखंडात गुजरातमध्ये फटाके तयार करण्याचे प्रमाण अधिक होते.

पौराणिक संदर्भ

या कालखंडातील पौराणिक कथांमध्ये, काव्यामध्ये फटाक्यांचा, आतषबाजीचा संदर्भ सापडतो. त्यामुळे या कथांच्या लेखकांना, कवींना फटाके आणि आतषबाजी यांचे ज्ञान असल्याचे समजते. १६ व्या शतकात संत एकनाथ स्वामी यांनी ‘रुक्मिणी स्वयंवर’ या काव्यात रुक्मिणी आणि श्री कृष्णाच्या विवाहाच्या वेळेस वापरल्या गेलेल्या रॉकेटपासून आधुनिक फुलबाज्या सारख्या समतुल्य फटाक्यांच्या श्रेणीचा उल्लेख केला आहे.

दिवाळीसाठी सार्वजनिक आतषबाजी

अठराव्या शतकापर्यंत, राज्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या मोठ्या दिवाळी कार्यक्रमांमध्ये मनोरंजनांसाठी फटाके वाजवले जावू लागले. पेशव्यांची बखर या मराठा इतिहासावर प्रकाशझोत टाकणाऱ्या ग्रंथात कोटाह (आधुनिक कोटा, राजस्थान) मधील दिवाळी उत्सवाचा उल्लेख आहे. या बखरीत महादजी सिंधिया (शिंदे) पेशवे सवाई माधवराव यांचे वर्णन करतात, या वर्णनात दिवाळीचे संदर्भ येतात. या संदर्भानुसार “दिवाळी सण कोटा येथे ४ दिवस साजरा केला जातो, त्यावेळेस लाखो दिवे प्रज्वलित केले जातात. या ४ दिवसांत कोटाचा राजा त्याच्या राजधानीच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी करतो. त्या आतषबाजीला… “फटाक्यांची लंका” म्हणतात. याच कार्यक्रमात महादजी सिंधिया यांनी मध्यभागी उभारलेल्या रावणाच्या प्रतिमेचे वर्णन केले आहे, मूलतः हे लंकादहनाचे दृश्य आहे. एकूणच दिवाळ सणाच्या दिवशी कोटा मध्ये फटाक्यांच्या माध्यमातून लंका दहन केले जात होते. हे ऐकून पेशव्यांनी त्यांच्या मनोरंजनासाठी अशाच प्रकारे फटाक्यांची आतषबाजी करण्याचा आदेश दिला. परिणामी दिवाळीच्या दिवसात पुण्याची जनता भव्य फटाक्यांच्या आतषबाजीसाठी साक्षीदार ठरली होती. एकूणच मुघलांच्या आगमनानंतर फटाक्यांच्या सार्वजनिक आतषबाजीच्या कार्यक्रमांचे प्रस्त वाढलेले दिसते. तत्पूर्वी सार्वजनिकरित्या आतषबाजीचे कार्यक्रम होत होते याविषयी तुरळक उदाहरणे उपलब्ध आहेत.

अधिक वाचा: Killers of the Flower Moon: रूपेरी पडद्यावर आलेले ‘अमेरिकन- इंडियन्स’च्या हत्याकांडामागचे गूढ आहे तरी काय?

इंग्रजी फटाके

रायबहादूर डी.बी. पारसनीस यांच्या ऐतिहासिक वृत्तांतात इंग्रजी फटाके भारतात १७ व्या शतकात आल्याचे नमूद केले आहे, ब्रिटिश किमयागारांनी कलकत्ता येथे त्याचे सार्वजनिक कार्यक्रम केले. पारसनीस यांनी १७९० सालच्या सुमारास भारतात एका कुशल इंग्लिश पायरोटेक्निशियनच्या आगमनाचा उल्लेख केला आहे, ज्याच्या कर्तृत्त्वामुळे त्याला औधचा नवाब असफ-उद-दौल्लाकडे पाठवले होते. तेथे त्याने रंगीबेरंगी अग्निफुले (fireflowers), मासे, सर्प आणि तारे इत्यादी आकारांच्या फटाक्यांच्या आतषबाजीने सर्वांचेच मन मोहून टाकले होते. एका प्रदर्शनात त्याने आकाशात मशीद उभी केली होती. एकूणच १९ व्या शतकाच्या आरंभापर्यंत भारतातल्या जनमाणसांसाठी फटाके हे सर्वसामान्य होते. भारतात बर्‍याचदा फटाके बनवणारे हे गनपावडरचे निर्माते देखील होते, त्या साठीच कच्चा माल भारतात नेहमीच सहज उपलब्ध होता आणि त्याचा मोठ्या प्रमाणात युद्धात वापर केला जात असे. असे असले तरी अठराव्या शतकाच्या अखेरीस, डायनामाइटसारख्या नवीन स्फोटकांच्या शोधाने लष्करातील गनपावडरचा वापर टप्प्याटप्प्याने बंद झाला. तसेच या पावडरचा वापर केवळ फटाके बनविण्यापुरता मर्यादित ठरला.

आधुनिक भारतातील फटाके

मध्ययुगीन भारतातील फटाक्याच्या वर्णनावरून फटाके महाग होते, असे लक्षात येते. म्हणूनच मुख्यतः राज्यकर्त्यांकडून वैयक्तिक आणि नागरिकांच्या मनोरंजनासाठी किंवा आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या व्यक्तींद्वारे आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात वापरले जात होते. वसाहती काळात, बहुतेक स्वदेशी उद्योगांप्रमाणेच, भारताच्या फटाक्यांच्या उत्पादनाला आणि विकासालाही युरोप आणि चीनमधून आयात होणाऱ्या मालामुळे नुकसान सहन करावे लागले. भारतातील पहिला फटाका कारखाना कोलकात्यात एकोणिसाव्या शतकात सुरू झाला. स्वातंत्र्यानंतर, तमिळनाडूमधील ‘शिवकाशी’ हे फटाक्यांच्या आयातीवरील निर्बंधांचा फायदा घेऊन भारताचे ‘फायरक्रॅकर हब’ म्हणून उदयास आले.
वसाहती आणि मध्ययुगीन काळाच्या काळाच्या विपरीत गेल्या तीन दशकांत भारतीय मध्यमवर्गाची लोकसंख्या वाढली आणि आर्थिक भरभराट झाली तसेच देशांतर्गत उद्योगातून फटाक्यांचे उत्पन्न वाढले. त्यामुळे याबाबतीत भारताने कधीही मागे वळून पाहिले नाही.

 

दिवाळी : फटाक्यांचा इतिहास माहीत आहे का? -

 

पुढारी ऑनलाईन डेस्क

दिवाळी
दिवाळी : फटाक्यांचा इतिहास माहिती आहे का? 

दिवाळी म्हंटलं की… दिवे, आकाशकंदील, समई, पणती आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे फटाके समोर दिसतात. यातून आनंदाचा, उत्साहाचा प्रकाश सर्व ठिकाणी पसरतो. फटक्यांमधून निघणारा कारंजासारखा अग्नी आकर्षक आणि मोहक वाटतो. या अग्नीबद्दल बोलताना प्रसिद्ध इतिहासकार जॅक केल्ली म्हणतो की, “अग्नी हा पवित्र, दाहक आणि भयंकरच नाही तर तो मनोरंजकही आहे.” त्यामुळे फटाक्यांची ही रात्र सर्वांना मंत्रमुग्धदेखील करते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांचा इतिहास जाणून घेणं महत्वाचं ठरतं.

भारतात फटक्यांचा वापर कधी करण्यात आला असावा बरं? त्या संदर्भात इतिहासकार पी. के. गोडे यांच्या १९५० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘हिस्ट्री ऑफ फायरवर्क्स इन बिट्वीन 1400 ते 1900’ या पुस्तकात असं म्हंटलंय की, भारतात दिवाळीच्या सणाला फटाक्यांचा वापर सामान्य असला तरी, इ.स. १४ शतकात फटाक्यांचा वापर करण्यात आला असावा, असा अंदाज आहे. कारण, त्याचवेळी भारतीय युद्धांमध्ये दारू (बारुद) वापरण्यास सुरूवात झाली होती.

चीनमध्ये सर्वप्रथम फटाक्यातील दारूचा (गन पावडर) शोध लागला. तेव्हा त्याला ‘डेव्हिल्स डिस्टिलेट’ या नावाने ओळखले गेले. हा शोध सर्वांनाच धक्कादायक असला तरी त्यांना नव्या अविष्काराचा आनंदही होता. सुरुवातीला लष्करी वापरासाठी त्याचा फटक्यांचा वापर करण्यात आला. नंतर सांस्कृतिक कार्यक्रमांतूनही (पायरोटेक्निकल शो) त्याचा वापर वाढला. ही कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणारी गन पावडर चीन आणि अरब देशांतून भारत आणि युरोपमध्ये पहिल्यांदा पाठविण्यात आली.

दिवाळी

भारतात १४४३ मध्ये विजयनगरचा राजा दुसरा देवराया याच्या दरबारात महानवमी सणाच्या निमित्ताने फटाक्यांचा वापर हा करण्यात आला, अब्दर रज्जाक यांनी नमूद करून ठेवलं आहे. याच काळातील इटालियन प्रवासी लुडोव्हिको दी वर्थेमा यांनी विजयनगरमधील हत्तीसंदर्भात  लिहून ठेवलं आहे की, “हत्तींना फटाक्यांची भीती वाटते. फटाके वापरले गेले तर उधळलेल्या हत्तींना नियंत्रणात आणणं खूप अवघड होऊन जाईल.”

मध्ययुगीन भारतात सण-समारंभामध्ये विशेष करून लग्नांमध्ये आतषबाजी किंवा फटाक्यांच्या शोंचे आयोजन केले जात होते. तो मनोरंजनाचा प्रकार होता. आतिषबाजीसाठी लागणारे मिश्रण किंवा फटाके तयार करण्याचे तंत्र ‘कौतुकचिंतामणी’ या ग्रंथामध्ये आढळतात. ओरिसातील प्रतिष्ठित लेखक गजपती प्रताप रुद्रदेव यांनी म्हंटलंय की, इ.स १४०० मध्ये चीनमधून पायकोटेक्निकचे सूत्र भारतात आणलं गेलं.

दिवाळी

इतिहासकार सतीश चंद्रा हे आपल्या ‘मध्ययुगीन भारत : मुघलांची सल्तनत’ या पुस्तकात अशी नोंद करतात की, इ.स १६०९ मध्ये विजापूरचा सुलतान इब्राहीम आदिल शहा याने आपल्या मुलीच्या लग्नात फटक्यांसाठी ८० हजार रुपये खर्च केले होते. भारतात असे आतषबाजीचे किंवा फटक्यांच्या शोचे आयोजन पूर्वीपासून करण्यात येत होते. भारतातील पोर्तुगिज अधिकारी दुओर्टे बार्बोसा यांना लिहून दिले की, “गुजरातमधून प्रवास करताना एका ब्राह्मण फॅमिलीमध्ये लग्नाच्या कार्यक्रमात राॅकेट, फटाके आणि आतषबाजी लावण्यात आलेले होते. गुजरातमध्ये त्यावेळी फटक्यांचे प्रमाण जास्त होते.”

पौराणिक आणि धार्मिक ग्रंथांमध्ये फटाक्यांचा उल्लेख आढळतो. संत एकनाथ महाराजांच्या ‘रुक्मिणी स्वयंवर’ या ग्रंथात रुक्मिणीचं आणि कृष्णाच्या लग्नाचे वर्णन आहे. त्यामध्ये राॅकेट, फुलझडी, फटाक्यांचा सविस्तर वर्णन केलेले आढळते. १८ व्या शतकापासून दिवाळी मनोरंजनांच्या उद्देशातून फटाक्यांच्या वापरांची खरी सुरुवात झाली. ‘पेशव्यांची बखर’मध्ये उल्लेख आहे की, कोटाह (कोटा, राजस्थान) दिवाळी साजरी करण्यात येत होती. त्यावेळी महादजी सिंधिया पेशवे सवाई माधवराव यांना दिवाळीसंदर्भात सांगतात की, “कोटामध्ये दिवाली ४ दिवसांची साजरी केली जाते. तेव्हा लाखो दिवे लावले जातात… असे सविस्तर वर्णन पेशव्यांना सांगितले. सिंधिया यांचं वर्णन ऐकून पेशव्यांनीही दिवाळी आपल्या इकडे फटाके आणि आतिबाजीचे आदेश दिले.

दिवाळी

१७९० मध्ये रायबहादूर डी. बी. पारसनीस यांनी फटाक्यांच्या संदर्भातील भाषांतरीत काही वृत्तांत लिहिले. हे वृत्तांत त्यांनी कलकत्त्यातील इंग्रजांना आणि औधचे नवाब असफ-उद-दौल्लाह यांच्याकडे पाठवले. त्यात त्यांना फटक्यांचं वर्णन केलेलं आहे. रायबहादूर वर्णन केलं आहे की, फटक्यांपासून तयार केलेले राॅकेट, फुलबाजे, मासे, साप यांचे आकर्षक वर्णन केले आहे. हे फटाके आकाशात फुटतात तेव्हा ते नेत्रदीपक असतं, असंही त्यांनी सांगितलं आहे.

पेशवाई संपत चालली होती, मुघल साम्राजही अखेरचा श्वास घेत होती आणि ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व वाढत चाललं होतं तेव्हा त्यांना फटक्यांसंदर्भात काहीच माहिती नव्हती. पण, दिवाळीतील आतिषबाजीबद्दल माहिती होती. त्यावेळी गनपावडरचे निर्मातेच फटाक्यांची निर्मिती करत होते. त्याचा कच्चा माल भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. त्याचा युद्धातही वापर जास्त होत होता. नंतरच्या कालावधीत डायनामाईटचा वापर लष्कारात होऊ लागला. त्यामुळे गनपावडर मागे पडली. नंतर मध्ययुगीन तंत्रज्ञान पुढे आले. १९ व्या शतकात पहिल्यांदा भारतात कोलकाता येथे फटाक्याचा कारखान सुरू करण्यात आला. नंतरच्या काळात तामिळनाडू फटकेनिर्मितीमध्ये आघाडीचे ठिकाण म्हणून पुढे आले.


दिवाळीतील किल्ला :-

      मित्रानो, महाराष्ट्र आणि दैदीप्यमान इतिहास याची आठवण आली कि एकच नाव आपल्या डोळ्यासमोर येते.छत्रपती श्री शिवाजी महाराज ! तीनशे वर्ष पारतंत्र्याच्या अंधकारात पडलेल्या महाराष्ट्र भुमीला पुन्हा एकदा स्वातंत्र्याची तेजस्वी पहाट बघायला मिळाली ती शिवरायांंच्या कृपेने.समुद्र,शिवराय आणि अर्थातच अग्निपुत्र सह्याद्रीच्या त्रिवेणी संगम झाला आणि पातशाही गुलामगिरीच्या बेड्या तुटल्या.शिवाजी महाराजांच्या या  हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या लढ्यात त्यांना मोलाची साथ दिली ती या भुमीतील तान्हाजी,बाजी,मुरारबाजी या जिद्दी,काटक मावळ्यांनी आणि तितकीच महत्वाची आणि मोलाची साथ होती ती सह्याद्री आणि परिसरात असलेल्या जवळपास चारशे किल्ल्यांची !
    ज्या क्षणी पोटात बाँब घेउन पहिले विमान उडाले त्याक्षणी गड्,कोटांचे महत्व कमी झाले.मात्र अगदी आजच्या साय-फाय पिढीलाही हे किल्ल्यांचे आकर्षण कायम आहे.दिवाळीत नवीन कपडे,फराळ्,फटाके याबरोबरच किल्ला बनवण्याची वर्षानुवर्षे प्रथा आहे.दिवाळीच किल्ला का बनवायचा ? याचे उत्तर नसले तरी एक उत्कृष्ट प्रथा जगातील एकमेव लँड ऑफ फोर्ट असणार्‍या महराष्ट्रात आहे,हे आपले भाग्य. 
  गेली साठ-सत्तर वर्ष अनेक पिढ्या किल्ले बनवत आहे.वर्षभर आपल्या आजुबाजुच्या गड्,कोटांना भेटी देउन मुल त्याची प्रतिकृती दिवाळीत बनवतात.यामध्येही काहीजण कल्पकता दाखवतात आणि स्वतःची कल्पनाशक्ती वापरुन हवा तसा किल्ला बनवतात.शाळेचे प्रोजेक्ट नसणाच्या काळात मुलांची सर्जनशीलता जपणारी हि आदर्श परंपरा !
     आता बघुया दिवाळीतील किल्ला बनवायचा कसा ?
  सर्वप्रथम कोणता आणि कोणत्या प्रकारच्या किल्ला बनवणार ते नक्की करा. बहुतेकदा किल्ला म्हणले कि आपल्या डोळ्यासमोर डोंगरी गड किंवा गिरीदुर्ग आले तरी भुईकोट किंवा पाण्याने वेढलेले जलदुर्गही तयार करता येतील. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले बनवण्याचा उपक्रम हाती घेता येईल. जो गड तयार करायचा आहे,त्याची संपुर्ण माहिती गोळा करा. सध्याच्या काळातील ई-गुरू म्हणता येईल अश्या गुगल्,यु ट्युब, फेसबुकच्या कृपेने गड्,कोटांची भरपुर माहिती उपलब्ध आहे. व्हिडीओ बघून गड नेमका कसा आहे याचा अंदाज घेता येईल्,त्याप्रमाणे आवश्यक साहित्य गोळा करता येईल.बहुतेक गड्,कोटांचे नकाशे,तसेच गुगल मॅपचे थ्री डी फोटो उपलबध आहेत.त्याप्रमाणे वीटा, दगड यांचा उपयोग करुन किल्ल्याचा साधारण आकार रचता येईल.त्यावर घट्ट चिखलाचा थर द्यावा,( चिखल पातळ झाला तर मोठ्या प्रमाणात लागेल ) या चिखलात हळीव्,मोहरी,धने,मेथी असे सहज उपलब्ध असणार्या धान्याच्या बीया घालाव्यात.किल्ल्याचे दरवाजे आणि इमारती काळ्या कार्डबोर्ड पेपेरने तयार करुन त्यावर पांढर्‍या रंगाने रंगवून दगडी चिरे दाखवता येईल. तटवंदी हा सर्वात महत्वाचा भाग. हि तटबंदी विवीध प्रकारे करता येईल.काहीजण प्लॅस्टर ऑफ पॅरीसची तटवंदी करतात.किंवा चिखलाची तटबंदी तयार केउन त्याला रंग लावतात. पण बांधकामाला लागणारी मोठ्या किंवा मध्यम आकाराची खडी उपलब्ध झाल्यास अगदी खरीखुरी वाटेल अशी तटवंदी तयार करता येईल.त्यात हे दगड ओळीने रचून त्यावर प्लॅस्टर ऑफ पॅरीसचा थर ओतायचा.पहीला थर वाळला कि दुसरा असे करुन अगदी मुळ किल्ल्यासारखी दिसणारी तटबंदी बनवता येईळ. मातीची किंवा प्लॅस्टरची तटवंदी विशेषतः भुईकोट किंवा जलदुर्ग बनवायचा असेल तर धातुची जाळी उभी ठेवून त्याच्यावर प्लॅस्टर लिंपुन भक्कम तटबंदी तयार होइल. काळ्या डिस्टेंपरने किंवा कोळसा उगाळून त्याचा रंग तयार करुन तटबंदी रंगवता येईल.
  एकदा मुख्य किल्ला आणि तटबंदी तयार झाल्यावर किल्ल्याच्या आतील वास्तू जश्या राजवाडा, धान्याचे किंवा दारुगोळ्याचे कोठार व इतर वास्तु काळ्या कार्डबोर्ड पेपेरने तयार करुन, मुळ किल्ल्याच्या नकाशाप्रमाणे योग्य त्या जागी ठेवा.गडावरचे तलाव आणि पाण्याची टाकी हा आणखी एक महत्वाचा घटक. प्लॅस्टीकच्या किंवा चिनीमातीच्या डिश वापरुन पाण्याचे तलाव दाखवता येतील. जलदुर्ग करायचा असेल तर भोवती वीटांची भिंत रचा,तसेच त्याला वाळू व थोडे सिमेंट मिसळून गिलावा करा,म्हणजे त्यातून पाणी गळणार नाही. 
    किल्ला तयार करताना बी पेरले असले तरी लगेच उगवेल असे नाही. यासाठी लाकडाच्या मिलमधून लाकडाचा भुस्सा आणावा.थोडा भुस्सा हिरव्या रंगात रंगवून व थोडा न रंगवता किल्ल्याच्या सर्व बाजुने टाकावा.यामुळे अगदी नॅचरल लुक मिळतो. पुढे गडावर विकत आणलेले सैनिक, तोफा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवा. गडाच्या दरवाज्यावर भगवा झेंडा बसवा. गडावरुन कोणत्या दिशेला इतर गड दिसतात्,त्याच्या पाट्या करुन लावता येतील.
          मुख्य किल्ला झाल्यावर परिसरात असलेली महत्वाची गावे दाखवता येतील.यासाठी कार्डबोर्डची छोटी घरे व झाडांच्या काठ्यांना कापुस चिकटवून तो हिरव्या रंगाने रंगवून झाडे दाखवता येतील.गावांच्या नावाच्याही पाट्या करा म्हणजे किल्ला बघायला येणार्‍यांना त्याची माहिती होइल. किल्ला तयार झाल्यावर एका मोठ्या शीटवर किल्ल्याचे फोटो आणि माहिती प्रिंट करुन आणा किंवा हाताने माहिती लिहून फोटो चिकटवता येतील. यामुळे नुसता किल्ला तयार न होता, मुलांना आणि किल्ला बघायला येणार्‍यांना गडाचा इतिहास आणि भुगोल माहिती होईल. 
    शाळेच्या सक्तीने केलेल्या जाणार्‍या प्रोजेक्टपेक्षा स्वखुषीने केलेला हा प्रोजेक्ट मुलांना नविन काही केल्याचा आनंद देउन जाईल. मुख्य म्हणजे मोबाईल आणि गेममध्ये डोके खुपसून बसलेल्या या पिढीला मातीत हात घालून काही करण्यात देखील आनंद आहे,याची जाणीव होईल. यामध्ये पालकांचा सहभाग असेल तर आणखी जास्त चांगले.ते शक्य नसेल तरी किमान आपल्या परिसरातील एखाद्या किल्ल्याला सहकुटूंब भेट देण्याची जबाबदारी घ्यावी. गडावर जाणे म्हणजे केवळ पिकनिक हा दृष्टीकोन न ठेवता आणि फक्त सेल्फीच्या मोहात न पडता, पालकांनी आधी गडाची माहिती मिळवावी आणि ती आपल्या मुलांपर्यंत पोहचावी.आपला दैदीप्यमान वारसा पुढ्च्या पिढीकडे हस्तांतरीत करणे हि आपलीच जबाबदारी आहे.यातूनच नकळत मुलांवर संस्कार होत असतात.
   आपल्याला हि माहिती कशी वाटली ते जरुर कळवा आणि काही सुधारणा असल्यास जरुर सांगा.धन्यवाद !
जय शिवराय !
श्री. स्वप्निल जिरगे
99660022621

 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...