Wednesday, February 23, 2022

विष्णू मंदिरे

 

आग्नेय आशियातील विष्णुमूर्ती...

सकाळ वृत्तसेवा

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

आग्नेय आशियामध्ये शंकरासोबतच विष्णूची उपासना किमान दीड हजार वर्षांपूर्वी सुरू झाली होती, हे तेथील शिलालेख आणि मूर्तींच्या पुराव्यांवरून लक्षात येते. त्यातील काही मोजक्या आणि महत्त्वाच्या मूर्तींची ओळख आजच्या लेखात करून घेणार आहोत.

आपल्या देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात कुशाण राजवंशाच्या काळातील (आजपासून सतराशे वर्षांपूर्वीच्या) विष्णुमूर्ती आढळलेल्या आहेत. त्यानंतर आलेल्या गुप्त राजवंशाच्या काळातील (आजपासून सोळाशे वर्षांपूर्वीच्या) विष्णुमूर्ती मध्य प्रदेशातील उदयगिरी लेण्यांत किंवा मथुरा इथे सापडल्या आहेत. या आपल्या देशातल्या प्राचीन विष्णुमूर्ती आहेत. याच काळात शैव आणि वैष्णव पंथ आताच्या भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडून आग्नेय आशियातील थायलंड, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम इत्यादी देशांमध्ये पोहोचले. भूतलावरील राजा हा सृष्टीचे पालनपोषण करणाऱ्या विष्णुसमान किंवा विष्णूचा अवतार आहे ही भारतीय संकल्पनासुद्धा आग्नेय आशियातील या देशांमध्ये दिसून येते.

थायलंड : आग्नेय आशियात सापडणाऱ्या सर्वांत प्राचीन विष्णुमूर्तींपैकी एक विष्णुमूर्ती आपल्याला थायलंडमध्ये सापडते. दक्षिण थायलंडमधील चैय्या इथे सापडलेली ही विष्णुमूर्ती भारतातील कुशाण आणि गुप्त राजवंशाच्या काळातील मूर्तींशी साम्य दाखवणारी आहे. इसवीसन चौथ्या/पाचव्या शतकात म्हणजे आजपासून सोळाशे ते पंधराशे वर्षांपूर्वी ही मूर्ती तयार करण्यात आली होती.

ही मूर्ती चतुर्भुज विष्णूची आहे. या मूर्तीत विष्णूच्या मस्तकावर किरीट असून कानात मोठी कुंडलं आहेत. मूर्तीचा मागील डावा हात तुटलेला असून मागील उजव्या हाताने गदा धरलेली आहे. पुढील उजवा हात अभय मुद्रेत असून पुढील डाव्या हातात शंख धरलेला आहे. अशा पद्धतीने कमरेपाशी शंख धरलेल्या भारतातील कुशाण राजवंशाच्या आणि गुप्त राजवंशाच्या काळातील विष्णुमूर्ती उत्तर भारतात आढळून आलेल्या आहेत.

काही अभ्यासकांच्या मतानुसार चैया येथील ही विष्णुमूर्ती म्हणजे आग्नेय आशियातील आता उपलब्ध असलेली सर्वांत प्राचीन विष्णूमूर्ती आहे. इसवीसनाचे चौथे शतक किंवा पाचवे शतक या दरम्यानच्या कोणत्या काळात ही मूर्ती घडवण्यात आली असावी, याबद्दल अभ्यासकांत मतमतांतरे आहेत. काही असले तरी भारतातील विष्णुमूर्तीचा प्रचंड प्रभाव असणारी ही आग्नेय आशियातील महत्त्वाची मूर्ती आहे, हे नक्की. याशिवाय थायलंडमध्ये इतरही अनेक ठिकाणी विष्णूमूर्ती सापडल्या आहेत. थायलंडमधील प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील तेथील शैव आणि वैष्णव पंथांचा प्रभाव तेथील हिंदू मंदिरे आणि देवतांच्या मूर्तींवरून लक्षात येतो.

कंबोडिया : कंबोडियातील सोळाशे वर्षांपूर्वीच्या शिलालेखांतूनसुद्धा विष्णुमंदिरांना दिलेली दानं नमूद केलेली आहेत. त्या काळातील काही विष्णुमूर्तीदेखील सापडल्या आहेत. मात्र विष्णुभक्तीचा कळस आपल्याला अंकोरवाट नावाने प्रसिद्ध असणाऱ्या मंदिरात बघायला मिळतो. हे मंदिर कंबोडियातील सूर्यवर्मन (दुसरा) या राजाने बाराव्या शतकात बांधलं. तेथील शिलालेखांत या राजाचे नाव परमविष्णुलोक असे नोंदलेले आहे. या मंदिरातील समुद्रमंथनाचे शिल्प अत्यंत प्रसिद्ध आहे. समुद्रमंथनाच्या या शिल्पात कुर्मावतारासह विष्णूची मूर्तीदेखील पहायला मिळते.

या मंदिराशिवाय अंकोरच्या परिसरात थोम्मानन, बांते सम्रे इत्यादी विष्णुमंदिरं आढळून येतात. या सर्व मंदिरांवरील शिल्पांमध्ये आपल्याला विष्णू, राम, कृष्ण यांच्या मूर्ती आणि त्यांच्याशी संबंधित कथांची शिल्पं कोरलेली आढळतात. कंबोडियामध्ये विष्णूच्या दगडी शिल्पांखेरीज ब्राँझच्या मूर्तीदेखील सापडल्या आहेत. यातील आठशे वर्षांपूर्वीची गरुडारूढ विष्णूची एक मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. कंबोडियातील अनेक मंदिरांच्या भिंतीवर आढळणाऱ्या गरुडारूढ विष्णूच्या दगडी मूर्तींसमान ही ब्राँझची मूर्ती घडवलेली आहे.

व्हिएतनाम : मध्य आणि दक्षिण कंबोडियातील वैष्णव पंथाचा प्रभाव व्हिएतनाममध्येदेखील पडला होता. त्यामुळे व्हिएतनाममध्येदेखील इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून विष्णुमूर्ती निर्माण केल्या जात होत्या. येथील एका विष्णुमूर्तीच्या वरील दोन हातांत शंख आणि चक्र दिसून येते. तर खालील डावा हात हा गदेवर ठेवलेला आहे. या मूर्तीत विष्णूचे कुरळे केस दाखवले असून मस्तकावर किरीट आहे.

ही विष्णुमूर्ती साधारणपणे तेराशे वर्षांपूर्वीची आहे. या मूर्तीच्या अंगावर कोणतेही दागिने कोरलेले नाहीत. त्या काळी कंबोडिया, व्हिएतनाम येथील मूर्तींना कानातील, गळ्यातील सोन्याचे दागिने घातले जात असत, हे तेव्हाच्या शिलालेखांवरून समजते. व्हिएतनाममधील या मूर्ती अत्यंत प्रमाणबद्ध आणि सुरेख पद्धतीने घडवलेल्या आहेत. व्हिएतनाममधील मी सन या प्राचीन शैव तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शेषशायी विष्णूची मूर्तीदेखील सापडली होती, याबद्दल आपण व्हिएतनामवरील एका लेखात बघितले आहे.

इंडोनेशिया : इंडोनेशियातील प्राचीन हिंदू मूर्तींमध्ये काही विष्णुमूर्तीदेखील आहेत. इंडोनेशियातील जावा बेटावर सापडलेल्या विष्णुमूर्तींपैकी एका मूर्तीवर वर उल्लेख केलेल्या थायलंडमधील चैय्या येथील मूर्तीचा प्रभाव आहे. तर येथेच सापडलेल्या दुसऱ्या एका विष्णुमूर्तीत अधिक कोरीव काम केलेले आढळून येते. या चतुर्भुज विष्णूच्या हातात शंख, चक्र, गदा घेतलेली दिसून येते. या मूर्तीच्या मस्तकावर कोरीव किरीटमुकुट घातलेला आहे. या मूर्तीच्या कमरेच्या वस्त्रावरील चुण्यादेखील अत्यंत बारकाईने दाखवलेल्या आहेत. ही मूर्ती अंदाजे इसवीसनाच्या पाचव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे दीड हजार वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आली होती, असे अभ्यासकांचे मत आहे. या सुरुवातीच्या काळातील विष्णुमूर्तींखेरीज इतरही विष्णुमूर्ती इंडोनेशियामध्ये सापडतात. इंडोनेशियातील प्रंबानन येथील अकराशे वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या प्रसिद्ध मंदिरसमूहात एक विष्णुमंदिरदेखील आहे.

इंडोनेशियातील दीड हजार वर्षांपूर्वीच्या पूर्णवर्मन नावाच्या राजाच्या एका शिलालेखाशेजारी दोन पावले कोरलेली आहेत. ही पावले त्रिविक्रम विष्णूची असल्याचे तसेच पूर्णवर्मन राजा हा विष्णुसमान असल्याचे त्या शिलालेखातून नमूद केलेलं आहे. भूतलावरील पूर्णवर्मन राजा हा विष्णूचा अवतार आहे, हे सांगण्याचा प्रयत्न राजाने या शिलालेखातून केलेला आहे.

आग्नेय आशियातील मोजक्याच विष्णुमूर्तींबद्दल माहिती करून देण्याचा प्रयत्न या लेखातून केलेला आहे. परंतु आग्नेय आशियातील या विविध देशांमध्ये विष्णूच्या अनेक मूर्ती सापडल्या आहेत. अगदी शैवपंथाइतका नसला तरी वैष्णवपंथाचा प्रभाव आग्नेय आशियातील या देशांमध्ये होता हे तेथील विष्णुमंदिरे, शिलालेख आणि मूर्तींवरून लक्षात येते.

(सदराचे लेखक सांस्कृतिक वारसा अभ्यासक आहेत.)

डायरेक्ट विष्णूची देवळेही कधी बघितलेली नाहीत पण विष्णूच्या अवतारांची कित्येक देवळे असतात.

म्हणजे वैष्णव हे मुर्तीपूजा न मानणारे किंवा अज्ञेयवादी असावे का? आणि त्याच मुळे शैव आणि वैष्णव असे वाद होत असतील?

माझी दोन्ही पंथांबद्दलची माहिती तोकडी आहे, पण असा विचार मनात आला.

पुरातत्व विचार करता प्रचेतस भाऊ डिटेल सांगतीलच पण एकंदरीत विष्णू मंदिर हे पहिल्यांदा गुप्तकाळात बांधलेले रेफरन्स वाचलेले आठवतात (संदर्भ व्ही डी महाजन, के कृष्ण रेड्डी) ह्या (गुप्तकालीन) मंदिरांचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे मंदिराच्या आवारात असलेला पवित्र गरुड स्तंभ हा होय.

जिथे भगवंत मंदिर असते तिथे मूर्ती विष्णू चेच असते. शेषशायी पद्मनाभ किंवा शंख चक्र गदाधारी किंवा अभयहस्त व्यंकटेश हा विष्णूचा अवतार नव्हे तर प्रत्यक्ष विष्णू आहे. आणि तशी मंदिरे आहेत.
प्रसिद्ध मंदिर तिरुपती.
अप्रसिद्ध मंदिर बार्शी

पुण्यातील विष्णू मंदिरे -

१) नवा विष्णू मंदिर - बाजीराव रस्त्यावर शनिपाराजवळ नातूबागेपाशी नवा विष्णू मंदीर आहे. सार्वजनिक काका या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जोशी कुटुंबियांच्या मालकीचे हे मंदिर आहे.

२) बिजवर विष्णू मंदिर - शनिवार पेठेत वीर मारूतीशेजारी बापट कुटुंबियांच्या मालकीचे छोटे विष्णू लक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर १८३८ मध्ये स्थापन झाले.

३) कसबा गणपती मंदिराशेजारील केदारेश्वर बोळात पौरोहित्य करणाऱ्या कानडे कुटुंबियांचे खासगी विष्णू मंदिर आहे. हे मंदिर त्यांनी १९७४ मध्ये स्थापन केले.

४) शनिवार पेठेत रमणबाग चौकात माणकेश्वर विष्णू मंदिर आहे.

५) २९१, सोमवार पेठ येथे एक विष्णू मंदिर आहे.

६) लक्ष्मी रस्त्यावर बेलबाग विष्णू मंदिर हे सुप्रसिद्ध मंदिर आहे.

७) पर्वती टेकडीवर एक विष्णू मंदिर आहे.

८) पु. लं. च्या काही लेखात पुण्यात बायकी विष्णू मंदिर आहे असा उल्लेख आहे. याचा संदर्भ सापडत नाही.

 

शैव वैष्णव ही काय भानगड आहे कुणी थोडक्यात सांगेल का? नेट वर फापटपसारा आहे.

थोडक्यात शैव हे शिवाला मानणारे तर वैष्णव हे विष्णूला मानणारे. पुढे शैव आणि वैष्णव पंथांपासून अनुक्रमे पाशुपत आणि पांचरात्र ही दोन भिन्न मतेही तयार झाली. प्राचीन काळी ह्या दोन पंथांमध्ये संघर्षही फार होत असावा पण कालांतराने दोन्ही पंथ काहीसे एक करण्याचा प्रयत्न झाला. रामायण महाभारता हे स्पष्टपणे दिसून होते. उदा. रामाने, कृष्णाने केलेली शिवस्तुती किंवा शंकराने गायलेले विष्णूचे गोडवे. हे प्रकार शैव वैष्णवांमधील कटुता दूर करण्याकरताच निर्माण केले गेले ह्यात शंका वाटण्याचे काही कारण नाही.

महाशिवरात्रीचा उपवास दरवर्षी करतो पण थेट विष्णुच्या नावे बहुतेक तरी कुठलिही पूजा वगैरे कुटूंबात झाल्याचे आठवत नाही.

सहसा अभिषेकाच्या वेळी विष्णूपूजा होत असते. सत्यनारायण पूजा ही विष्णूपूजाच आहे.

महाराष्ट्रीयन हे शैव असावे कि वैष्णव ???

दोन्हीही आहेत. मात्र शैव प्रभाव जास्त आहे. शिव हे तळागाळात पोहोचलेले दैवत आहे. कुठल्याहि गावात भैरवनाथ असतोच.

मला वाटते विष्णू सहस्रनाम सोडून थेट विष्णूच्या नावाने काही स्तोत्र/पूजा वगैरे नसतात. पण विष्णूच्या अवतारांच्या नावाने उत्सव वगैरे असतात (रामनवमी, जन्माष्टमी वगैरे). डायरेक्ट विष्णूची देवळेही कधी बघितलेली नाहीत पण विष्णूच्या अवतारांची कित्येक देवळे असतात.

विष्णूचे अवतार स्वरुपात उन्नयन झाल्याने विष्णूची देवळे कमी आहेत मात्र ती आहेत. कोकणात अधिक प्रमाणात दिसतात.

म्हणजे वैष्णव हे मुर्तीपूजा न मानणारे किंवा अज्ञेयवादी असावे का? आणि त्याच मुळे शैव आणि वैष्णव असे वाद होत असतील?

नाही, मूर्तीपूजा उलट वैष्णवांत जास्त प्रचलित आहे असेच म्हणता यावे. शिवाची पूजा ही मुख्यतः लिंगस्वरुपातच किंवा भैरव आदी ग्रामदेवता ह्या स्वरुपात होते.

मूर्तीपूजा न मानणे ही संकल्पना भारतीय परंपरेत बहुतेककरुन आढळत नाही

वेदकाळी महाभारतकाळी मूर्तीपूजा प्रचलित नव्हती, इंद्र, ब्रह्मा, स्कंद, रूद्र (अनार्य) ह्या वैदिक देवतांचे प्राबल्य होते. भारतात युधिष्ठिर, हरीवंशात श्रीकृष्ण ह्यांचा दिनक्रम विस्ताराने आलेला आहे, पण त्यात कुठेही मूर्तीपूजेचे वर्णन नाही, मात्र मूर्तीपूजा नव्हतीच असेही नाही, महाभारतात भीष्मपर्वाच्या आरंभी अपशकुनांचे वर्णन आलेले आहे ते असे. अर्थात हे वर्णन सौतीने इसवी सन पूर्व ३०० च्या दरम्यान घातले असावे.

देवताप्रतिमाश्चैव कम्पन्ति च हसन्ति च।
वमन्ति रुधिरं चास्यैः स्विद्यन्ति प्रपतन्ति च॥
देवांच्या प्रतिमा कंपायमान होतात, हसतात, रक्ताची उलटी करतात, स्वेद बाहेर टाकतात.

कैरातपर्वात अर्जुनाचा किराताच्या हातून पराभव झाल्यावर त्याने मातीपासून शिवलिंग स्थापन केल्याचेही वर्णन आहे.
मात्र असे असले तरी त्याकाळी मूर्तीपूजेचे प्रमाण नगण्य होते असेच दिसून येते. प्रजेमध्ये कदाचित असू शकेल.

असं वाटत नाही, निर्गुण निराकार भक्ती , मानसपूजा, अद्वैत उर्फ नॉन ड्युअलिजम ह्यांची वाढ अन इतिहास पाहता कोणे एकेकाळी अमूर्त भक्ती भारतीय परंपरेत बऱ्यापैकी रुळलेली संकल्पना असावी असे वाटते,

अमूर्त भक्ती वैदिक सूक्तांद्वारे होतच होती. मात्र बौद्ध धर्माच्या उदयानंतर मूर्तीपूजेचे प्रमाण वाढत गेले, अद्वैत मत सुरुवातीला नव्हतेच, ते शंकराचार्यांनी मांडले, त्याआधी द्वैतीच होते.

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...