महाराष्ट्रात असलेल्या अनेक दुर्गजोडीतील सर्वात प्रसिद्ध असलेली दुर्गजोडी म्हणजे लोहगड-विसापुर. मुंबई-पुणे हा प्रवास रस्त्याने जुन्या पुणे-मुंबई हायवेने वा एक्प्रेस वेने किंवा रेल्वेने करताना हि दुर्गजोडी सहजपणे नजरेस पडते. पवना मावळात असणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचा संरक्षक असणारा हा लोहगड पुणे - मुंबई हमरस्त्यावरून सहजच नजरेस पडतो. पुण्या आणि मुंबईपासून जवळ असल्या कारणाने येथे ट्रेकर्स मंडळींची नेहमीच ये जा चालू असते. लोहगड म्हटलं की पुणे आणि परिसरातील दुर्गप्रेमींना आठवतो तो हिरवाईने नटलेला विंचू काटा ! पुणे आणि मुंबई परिसरातील दुर्गप्रेमी सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी गडावर येत असतात. लोहगड परिसरात विसापूर, तुंग आणि तिकोणा हे किल्ले आहेत. याच डोंगराच्या पोटात भाजे आणि बेडसे या प्रसिध्द लेण्या आहेत. महामार्गापासून जवळच असल्याने पायथ्याच्या गावात सर्व सुखसुविधा आहेत.
 |
 विसापूर लोहगड जोडगोळी |
लोहगड्,चिसापुर परिसर
लोहगड व विसापुरवर जाणारे मार्ग
लोणावळ्याकडून लोहगडावर येणारा मार्ग
लोहगडाचे हवाई दृष्य ( सौजन्य- श्री.उध्दव ठाकरे )

विसापुर गडाचे हवाई दृष्य
लोहगड विसापुर हि दुर्गजोडी पुणे-मुंबई या एन वर्दळीच्या रस्तालगतच खडी असल्यामुळे इथे जाणे तुलनेने सोपे आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लोहगडवाडी येथे जाण्यासाठी पक्का रस्ता असुन लोणावळा व मळवली या दोन्ही मार्गांनी तेथे जाता येते. थंड हवेचे ठिकाण म्हणुन या भागात पर्यटकांचा चांगलाच वावर असल्याने काहीशी महागडी असली तरी दोन्ही ठिकाणाहून तेथे जाण्यासाठी खाजगी वाहनांची सोय आहे. अन्यथा मळवली स्थानकावर उतरून चालत देखील लोहगडावर जाता येते.
१) पूण्यावरून अथवा मुंबईवरून:-
पूण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या पुढे असणार्या मळवली स्थानकावर उतरावे. तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणरी वाट पकडावी. मळवलीहून चालत जाताना सर्वप्रथम भाजे येथे विसापुर किल्ल्याच्या पोटात इ.स.पुर्व दुसऱ्या शतकात खोदलेली सातवाहनकालीन लेणी लागतात. यानंतर लोहगडकडे जाणारी वाट पकडावी.वाट मोठी आणि प्रशस्त आहे. तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलिकडेच एक गाव आहे त्याचे नाव लोहगडवाडी.खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास पोहचतो आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर पोहचतो.या मार्गे लोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.

लोणावळा ते लोहगड रस्ता
२ लोणावळ्याहून:-
लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडावाडी पर्यंत जाता येते.लोणावळ्यावरुन पवना धरणाकडे जाणार्या रस्त्याने थोडे पुढे आवंढे गाव ओलांडल्यानंतर आधी एक डायनासॉर पार्क बघायला मिळते.त्यानंतर पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो, तेथून ३ ते ४ किमी अंतरावर लोहगडावाडी आहे.उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत.साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे.मात्र येथे एसटी महामंडळाची सोय नाही.
स्वत:चे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून जीपने जाता येते. मात्र जीपचे भाडे १००० रु आहे.या वाटेने जाताना काही रिसॉर्ट उभारलेली दिसतात, तसेच गुरुमाई आश्रम देखील लागतो.
पवनानगरमधून होणारे लोहगडाचे दर्शन
३ काळे कॉलनीहून :-
काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे. तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो. पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेकडीवर जातो. तेथून एक मळलेली पायवाट आपणास लोहगडावाडीत घेऊन जाते. या टेकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात.
मळवली गावातून होणारे लोहगडाचे दर्शन
लोहगड विसापुरवर जाणारे बहुतेक दुर्गप्रेमी मळवली स्थानकावर उतरुन भाजे लेणी बघून लोहगडवर जातात.आपणही याच मार्गाची माहिती घेउया. मळवली स्थानकावर उतरुन एक्प्रेस वेवरचा पुल ओलांडून खाली उतरलो कि आपल्याला मळवली गाव लागते.या गावाचे चित्रकलेशी नाते आहे.भारतातील सुप्रसिध्द चित्रकार राजा रविवर्मा यांनी आपली चित्रे छापण्यासाठी मळवली येथे शिळा (प्रेस) छापखाना उभारला. या छापखान्यातून हजारो देवदेवतांची चित्रे सार्या भारतभर पूजली जाऊ लागली. आज आपल्याला हि शिळाप्रेस बघता येत नसली तरी प्राचीन दुर्ग आणि लेण्यांच्या सानिध्यात उभारलेल्या या प्राचीन चित्रांच्या वारश्याचा योगायोग साधला गेला आहे.

यानंतर साधारण दोन कि.मी.वाटचाल करुन आपण भाजे गावात प्रवेश करतो.इथे आपल्याला एक पावसाळी धबधबा दिसतो.शेजारुन भाजे लेण्याकडे जाणारी वाट गेली आहे.भाजे लेण्याची सविस्तर माहिती आपण नंतर घेणार आहोत.तेव्हा आपण प्रशस्त वाट पकडून लोहगडच्या मार्गावर लागयचे.
पावसाळा असेल तर वाटेत छोटे-मोठे धबधबे सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर खळाळत वहात असतात. त्यांना डोळ्यात साठवत-अनुभवत पुढे चालू लागायचे. डांबरी रस्त्याने चालायचा कंटाळा आला तर वाट वाकडी करून डोंगरवाट पकडून शॉर्ट्कट मारायचा. या वाटेने जाताना आपल्याला वाटत असते कि आपण विसापुरकडे निघालो कि काय.मात्र जेव्हा आपण लोहगड, विसापुरच्या खिंडीत पोहचतो तेव्हा उजवीकडचा रस्ता विसापुरच्या दिशेने तर डावीकडचा रस्ता लोहगडकडे जातो.इथे येणारे बहुसंख्य दुर्गप्रेमी,पर्यटक आधी लोहगड बघतात.फार कमी जण विसापुरला जातात.आपणही आधी लोहगडाचे दर्शन करु.
लोहगड व विसापुर यामध्ये असलेली खिंड गायमुख म्हणुन ओळखली जाते.या खिंडीत कपला नावाची जागा असुन येथे असलेल्या दगडी चौथऱ्यावर घोडा, उंट, हत्ती व इतर काही प्राण्यांची शिल्प ठेवलेली आहेत. या चौथऱ्याजवळ बलभीम हनुमानाची मुर्ती असुन काही अंतरावर टहाळदेव नावाचा शेंदूर फासलेला दगड आहे. यासंदर्भात एक दुर्गकथा सांगितली जाते.
 |
| Gaimukh Khind with Lohagad on right and Visapur on left |

कोण्या एकेकाळी एका सुलतानाने लोहगडाला असलेले नेढे किंवा नैसर्गिक खिंडार आणि विसापुर किल्ल्याची तटबंदी यांना जोडणारा जाड दोरखंड बांधला आणि आसपासच्या गावात दवंडी पिटली कि या दोरखंडावरुन जो कोणी एका टोकावरुन दुसर्या टोकापर्यंत जाईल त्याला अर्धे राज्य बक्षीस मिळेल.पण हे आव्हान स्विकारायला कोणीच पुढे येईना. शेवटी एका अज्ञात माणसाने सुलतानाचे हे आव्हान स्विकारले.एके पहाटे त्याने त्या दोरखंडावरुन चालत जाण्याचे ठरवले. सुलतान स्वतः विसापुर किल्ल्यावर हे धाडस बघायला उपस्थित होता. मग ठरल्याप्रमाणे लोहगडाच्या नेढ्याजवळ लावलेल्या दोरखंडावरुन त्या माणसने चालायला सुरवात केली.मोठ्या हिंमतीने तो अंतर पार करु लागला.जसजसा तो माणुस विसापुर किल्ल्याच्या जवळ पोहचु लागला तसतसा सुलतानाचा पारा चढू लागला. एका सामान्य माणसाने सुलतानाचे आव्हान स्विकारावे आणि यशस्वीरित्या पार करावे हे त्या सुलतानाला पटेना.तो माणुस दोरखंडावरुन विसापुर किल्ल्याच्या अगदी नजीक पोहचला.आता तो विसापुरवर पोहचून विजयी होणार, तोच त्या सुलतानाने दोरखंड कापून टाकला. त्यामुळे तो दुर्दैवी माणुस उंचावरुन कोसळून मृत्युमुखी पडला. ज्याठिकाणी ती व्यक्ती पडली तिथे एक दगड बसवून त्याची समाधी उभारण्यात आली.त्याला श्रध्दांजली म्हणून त्याठिकाणी डहाळी तोडून वहाण्याची प्रथा रुढ झाली.टहाळी तोडून वहाण्याची प्रथा असल्यामुळे या समाधीला नाव पडले 'टहाळदेव'.अर्थात या कथेला कोणतेही एतिहासिक संदर्भ नाहीत.


लोहगड व विसापुर यामध्ये असलेली खिंड गायमुख म्हणुन ओळखली जाते.या खिंडीत कपला नावाची जागा असुन येथे असलेल्या दगडी चौथऱ्यावर घोडा, उंट, हत्ती व इतर काही प्राण्यांची शिल्प ठेवलेली आहेत. या चौथऱ्याजवळ बलभीम हनुमानाची मुर्ती असुन काही अंतरावर टहाळदेव नावाचा शेंदूर फासलेला दगड आहे.
लोहगडाचे नेढे
इथेच आपण लोहगडाकडे म्हणजे आपल्या उजव्या हाताला लोहगडाच्या कड्यावर नजर टाकली तर दगडात तयार झालेले नैसर्गिक छिद्र ज्याला नेढे म्हणतात ते तयार झालेले दिसते.असे नेढे सह्याद्रीतील काही मोजक्या गडांना पहायला मिळते.उदा.राजगड्,मदनगड, मकरंदगड्,मल्हारगड, मोहनदरी,कणेरा,पिंपळा इत्यादी.या नेढ्यापाशी जाणे अवघड असल्यामुळे दुरुनच ते पहायचे आणि लोहगड्वाडीच्या दिशेने निघायचे.
लोहगडवाडीतील शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश पुतळा
लोहगडवाडी हि गडाची एकेकाळची बाजारपेठ असल्याने गावात आजही जुन्या वाडय़ांचे चौथरे, बांधीव विहिरी व जुनी मंदिरे दिसतात. लोहगडवाडीतच शिवछत्रपतींचा सिंहासनाधीश पुतळा दिसतो.
लोहगडवाडीच्या पार्श्वभुमीवर असलेला विसापुर

लोहगडाच्या पायथ्याची लोहगडवाडी
एकेकाळी साध्या घरांची हि वाडी काळाच्या ओघात बघता बघता बदलली.इथेपर्यंत डांबरी गुळगुळीत सडक आली.चारचाकी वहाने आणि दुचाक्या इथे पोहचल्या.गडावर प्रचंड वर्दळ वाढली.गावात सोयी झाल्या.आता दुर्गप्रेमी इथे मुक्काम करु शकतात.इथे चहा,नाष्टा तसेच जेवण्याची सोय होते.गावातील काही संपर्क क्रमांक सोयीसाठी देतो.
लोहगड माची श्री.बाळू- 9860213155
मोहन विखरे 8007783706
शंकर विखरे 7798239146
भाजे गाव
योगेश पद्मुळे ( भोजन व्यवस्था ) 9765918980
लोहगडवाडी इथून गडाकडे जाणारी नव्याने बांधलेली पायऱ्यांची वाट आहे. या पायऱ्यांनी चढाई सुरु करण्यापूर्वी पायऱ्यांच्या डावीकडे काही अंतरावर कोरडी पडुन पानांनी भरलेली एक जुनी विहीर आहे. या विहीरी संदर्भात एक कथा अशी सांगितली जाते कि या विहीरीत पडून एक जोडपे मृत्युमुखी पडले.त्यामुले लोहगडवाडीतील लोक जागा सोडून गेले.किल्ल्यावर जाताना दुसऱ्या दरवाजानंतर तटबंदीबाहेर असलेले भुयाराचे दुसरे तोंड या विहिरीत येत असल्याचे गावकरी सांगतात. या पायऱ्यावरून जाताना उजवीकडे एक वाट जंगलात गेलेली दिसते. या वाटेने पुढे गेल्यास कातळात कोरलेल्या दोन गुहा दिसतात.
लोहगडवाडीत लोहगडाची माहिती सांगणारा फलक आणि नकाशा बसविला आहे.
या वाटेवर एक दगडी चाक व दोन तोफा ठेवलेल्या असुन या वस्तु अलीकडच्या काळात पायऱ्यांचे उत्खनन करताना सापडल्या आहेत. लोहगडवाडीतून गडावर जात असताना वाटेवर चार दरवाजे लागतात. या दरवाज्यांच्यामध्ये असलेल्या नागमोडी वाटेने गडाकडे जावे लागते. पावसाळ्यामध्ये या वाटेवर पाणी आणि शेवाळे असते, त्यावेळी गडावर जात असताना आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
अलिकडे इथे गेट बसविण्यात आले आहे.जर आपल्याकडे कॅमेरा किंवा व्हिडीओ कॅमेरा असेल तर त्याचे २५/- ( रुपये पंचवीस ) पुरातत्वखात्याच्या ऑफिसमध्ये भरावे लागतात.सध्या गड फक्त सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० या वेळेतच बघता येतो.
नेहमीप्रमाणे भारतीय पुरातत्व खात्याच्या भोंगळ कारभाराचे दर्शन झाले. जुन्या पायऱ्या बदलून नव्या पायऱ्या बसविल्या आहेत. मन विषण्ण करणारे दृश्य मागे सारत पायऱ्यांच्या या वळणदार वाटेवर असलेल्या लोहगडच्या पहिल्या गणेश दरवाजात आपण पोहचतो.

.त्याकाळी महत्वाचा बुरुज, प्रवेशदार बांधकामानंतर वारंवार ढासळत असता, ते कायम टिकून राहण्यासाठी असा नरबळी देण्याची प्रथा होती. या दरवाजाच्या संदर्भात एक कथा सांगितली जाते.ज्यावेली इ.स. १७८९ मध्ये नाना फडणवीस यांनी या बुरुजाचे बांधकाम सुरु केले तेव्हा बांधकाम टिकेना.त्यामुळे बांधकामाचे साहित्य तसेच पडून राहीले.पुढे एकदा नाना फडणवीस निजले असताना त्यांच्या स्वप्नात येउन एका पुरुषाने त्यांना सांगितले कि बुरुजाच्या पायात बळी द्यावा लागेल तरच बुरुजाचे बांधकाम्टिकेल.अखेर सावळे नावाच्या गृहस्थाने आपला थोरला मुलगा व सुन यांचा या बुरुजापाशी बळी दिला व त्यांना बुरुजाच्या खाली पुरुन टाकले.त्यानंतर मात्र बुरुजाचे बांधकाम निर्विघ्नपणे पार पडले.यामुळे लोहगड गावाची पाटीलकी जी घडशी यांच्याकडे होती, ती काढून घेउन नाना फडणवीस यांनी साबळे यांना दिली.
गणेश दरवाजाच्या आतील बाजूलाच एक लहान खोली आहे. खोलीत दोन प्रशस्त झरोके दिसतात. त्यांचा रोख लोहगडवाडीच्या दिशेनं किल्ल्याचा रस्ता जिथून सुरू होतो, तिथं तोफमारा करण्यासाठी रोखलेला दिसतो.
या दरवाजाला मजबूत, रुंद तटबंदी असून, तोफमारा करण्यासाठी झरोके दिसतात. तसेच बंदूक आणि बाणांचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. या सर्व जंग्यांचा रोख गडावर येणाऱ्या पायऱ्यांवर वेगवेगळ्या कोनातून ठेवलेला दिसतो.
आजही सर्व प्रकारचे घाव सोसत हा दरवाजा भक्कमपणे उभा आहे. तर लाकडी दरवाजा नव्याने बसवण्यात आला आहे. या लाकडी दरवाजावर खिळे आहेत.
 |
| पहारेकऱ्यांच्या देवड्या |
तसेच आतील बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत.
गणेश दरवाजा जवळील शिलालेख
तिथेच एक शिलालेख आहे. या शिलालेखानुसार –
“बाळाजी जनार्दन (नाना) फडणीसांच्या आज्ञेवरून धोंडो बल्लाळ निजसूरे यांनी गणेश दरवाजा बांधला. दरवाज्याच्या बांधकामाला शके १७१२ साधारण नाम सवंत्सरे अश्विन शुद्ध नवमी रविवार (1 नोव्हेंबर 1790) रोजी सुरुवात होऊन शके १७१६ आनंदनाम संवत्सरे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी बुधवार (11 जून 1794 )रोजी बांधकाम पूर्ण झाले. दरवाज्याचे बांधकाम जयाजी धनराम या गवंड्याने , तर दरवाज्याचे लाकडी काम त्र्यंबक सुताराने केले.”
सध्या या शिलालेखातील ‘श्री गणेशाय नम: गणेश दरवाजा बांधला
बाळाजी’…ही ओळ नष्ट झाली आहे.
गणेश दरवाज्यातून आत गेल्यावर समोर असलेल्या मोकळ्या जागेत काही तोफा पडलेल्या आहेत.तर बाजूस बुरुजात एक खोली आहे.
या गणेश दरवाज्याला लागून बुरुजाच्या बाहेरुन पहार्याची जागा ज्याला फांजी म्हणतात तिथे जाता येते.
इथे पहारेकर्यांना फिरण्यासाठी शेरहाजी तसेच तोफांची तोंड रोखता यावीत यासाठी तटबंदीला खिडक्या आणि बंदुकांसाठी जंग्या बघायला मिळतात.
इथे आपल्याला तटात लपविलेला शौचकुप पहायला मिळतो.
तिच्या खिडकीतून गडाखालील मोठा परिसर दृष्टीक्षेपात येतो. भक्कम दरवाजा व सभोवताल न्याहाळून पुढे निघालो. गणेश दरवाजाच्या वर प्रशस्त जागा आहे. काही बांधकामाचे अवशेष व येथे प्रवेश करण्यासाठी छोटा मजबूत दरवाजा आहे.गडाच्या संरक्षणाच्या दृष्टीने गणेश दरवाजा महत्वाचा आहे. या दरवाजाच्या आत गणपतीची व गौरीची मूर्ति छिन्नविछीन्न अवस्थेत होती असा उल्लेख आहे.सध्या मात्र या मुर्ती बघायला मिळत नाहीत,
नारायण दरवाजा
हे सर्व पाहून गडाच्या दुसऱ्या म्हणजेच नारायण दरवाजाकडे निघावे. सुबक बांधणीचा भक्कम बुरुज व सुस्थितीत असलेल्या बांधीव पायऱ्यां आपल्याला नारायण दरवाजापर्यंत पोहोचवतात

.
या दरवाजाच्या दर्शनी भागात दोन्ही बाजूला शरभ प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजाच्या लगतच पहारेकऱ्यांच्या विश्रांतीची जागा आहे.
नारायण दरवाजातून दिसणारे दृश्य
नारायण दरवाज्यातून हनुमान दरवाज्याकडे निघाल्यावर दोन कातळकोरीव कोठ्या लागतात.पुर्वीच्या काळी त्यात भात व नाचणी ठेवत असे सांगितले जाते.
हनुमान दरवाजा :-
हा दरवाजा गडाचा सर्वात जुना दरवाजा. लोहगडच्या इतर दरवाजांपेक्षा या दरवाजाची बांधणी वेगळी आहे. हा दरवाजा औरंगजेबाने बांधला असे सांगतात.मात्र त्याची बांधणी लक्षात घेता, तो निजामशाहीच्या काळात बांधला गेला असावा.


तिसरा 'हनुमान दरवाजा' भव्य आणि सर्वात प्राचीन आहे. दरवाजाच्या दगडी चौकटीवर दोन्ही बाजूस 'शरभ' कोरलेले दिसतात.हि शरभ शिल्प म्हणजे हा दरवाजा मुस्लिम राजवटीत बांधला गेल्याचा स्पष्ट पुरावा म्हणता येईल. याही दरवाजांच्या लाकडी दारांवर लोखंडी खिळे आणि साखळदंड आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी असणाऱ्या देवड्या दिसतात, तर समोर त्यांना राहण्यासाठी खोल्या दिसतात. सध्या त्या थोड्याफार उध्वस्त दिसतात. या दरवाज्यासमोर खडकात कोरलेल्या हनुमानाचे शिल्प आहे अशी नोंद श्री.चि.ग.गोगटे लिखीत ग्रंथात मिळते,पण आज हे हनुमान शिल्प दिसत नाही.तसेच याच पुस्तकात हे चारही दरवाजे सुस्थितीत असल्याचे म्हणले गेले आहे.व दरवाज्याजवळ व गडमाथ्यावर बर्याच तोफा असल्याचे उल्लेख मिळतात.पण आज मुळ दरवाजे अस्तित्वात नाहीत तसेच तोफांची संख्या बघता बर्याच तोफा गायब केल्या असाव्यात.
चौथा दरवाजा :-
चौथ्या दरवाजाला लागूनच असलेल्या बंदिस्त जागेलाच जोडून गडाचा म्हणजेच महादरवाजा आहे.
महादरवाजाच्या दर्शनी भागात एका बाजूला हनुमानाचे तर दुसऱ्या बाजूला गरुडाचे शिल्प कोरलेले आहे. इथून वळणावळणांचा गडावर येणारा पायऱ्यांचा मार्ग दिसतो. इथल्या तटबंदीवरून आणि जंग्यातून किल्ल्यात येणाऱ्यांवर सहज मारा करू शकतो. गडावर येण्याच्या सुरवातीपासून ते मुख्य दरवाजात येईपर्यंत शत्रूवर नजर ठेवण्यासाठी आणि मारा करण्याची अप्रतिम लष्करी व्यवस्था या किल्ल्यास आहे. त्यामुळंच कदाचित छत्रपतींच्या पहिल्या सुरत लुटीचा सर्व खजिना सरसेनापती नेतोजी पालकरांनी या किल्ल्यावर ठेवला असावा. महादरवाजाच्या आतील कमानीतून आपला गडप्रवेश होतो.
ज्यांना दुर्गस्थापत्याचा अभ्यास करायचा आहे,त्यांनी लोहगडला भेट देउन या चारही दरवाज्यांची रचना आवर्जून निरखावी.एका दरवाज्याच्या मार्यात दुसरा दरवाजा, डोंगराच्या नैसर्गिक रचनेचे यथायोग्य उपयोग आणि लष्करी दृष्ट्या शत्रुला अभेद्य असा प्रवेशमार्ग कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोहगडाचे हे चार दरवाजे.लोहगडवाडीतून अवघ्या अर्ध्या तासात गडमाथा गाठता येतो.
या चार दरवाज्यापैकी हनुमान दरवाजा हा मुळ दरवाजा आहे,तर बाकीचे तीन म्हणजे गणेश,नारायण आणि महादरवाजा यांचे बांधकाम नाना फडणवीस यांनी केले. लोहगडच्या सुरवातीच्या परिसरात माकडांचा खूप वावर आहे. बरोबर काही खायचं असल्यास इथली माकडं धिटाईनं पिच्छा पुरवतात. सीलबंद बिसलेरी बाटल्यांची झकाणं उघडणं आणि बॅगेंची सहजपणे तपासणी करतानाही दिसतात.
लोहगडच्या सुरवातीच्या परिसरात माकडांचा खूप वावर आहे. बरोबर काही खायचं असल्यास इथली माकडं धिटाईनं पिच्छा पुरवतात. सीलबंद बिसलेरी बाटल्यांची झकाणं उघडणं आणि बॅगेंची सहजपणे तपासणी करतानाही दिसतात.
लोहगड माथ्याचा नकाशा
महादरवाज्यापाशी पोहोचून काही पायऱ्या चढून उंचावर असलेल्या गडमाथ्याकडे जावे. महादरवाज्याचे काम नाना फडणीसांनी केले होते. महादरवाजाच्या आतील कमानीतून आपला गडप्रवेश होतो.एकूण या गडमाथ्याचा आकार त्रिकोणी आहे.
लोहगडाचे पठार्,मागे डावीकडे दिसणारा तिकोना तर उजवीकडे दिसणारा तुंग गड व पवना जलाश्याचे पाणी
लोहगडावरुन दिसणारा मोरगिरी किल्ला
या बाजुने दक्षिणेला पवना धरणाच्या पाण्याने वेढलेला तुंग उर्फ कठीणगड तसेच एखाद्या त्रिकोणी पिरॅमिडसारखा तिकोना उर्फ वितंडगड दिसतो.खाली पवना धरणाचे दृष्य दिसते. तर नैऋत्येला मोरगिरी हा अपरिचीत दुर्ग दिसतो.
महादरवाजाने आत आल्यावर समोरच गोलाकार घुमट असलेला दर्गा असुन या दर्ग्यात एक थडगे आहे. त्या कोणाच्या असाव्यात याचा ठोस पुरावा मिळत नाही. काही अभ्यासकांच्या मते इतिहासातील नोंदींनुसार ही एका राजपूत किल्लेदाराच्या बायकोची समाधी असल्याचे सांगितले जाते.तर काहींच्या मते हि औरंगजेबाच्या बेगमेची कबर मानली जाते.
 |
| पाण्याची टाकी (बुजलेली) |
या दर्ग्याच्या मागील बाजुस खडकाच्या पोटात तीन लहान गुहा व पाण्याची टाकी आहेत.मात्र गोगटे यांच्या पुस्तकातील उल्लेखाप्रमाणे चार भुयारे व पाण्याचे टाके असा आहे.तसेच या भुयारात खांब कोरलेले आहेत.याचा अर्थ हि भुयारे किंवा लेणी खुप प्राचीन असणार हे निश्चित.लोहगड प्राचीन दुर्ग आहे याचा हा स्पष्ट पुरावा.
|  |
| सदरेवरील तोफ |
दर्ग्याशेजारी गडाची भग्न राजसदर असुन सदरेच्या चौथऱ्यावर दोन तोफा ठेवलेल्या आहेत. तोफ काही हौश दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथयात बसवलेली आहे.मशीदीला लागून आहे ती धाकटी सदर तर पुढे उंचवट्यावर आहे ती थोरली सदर.जरा पुढे दिसणारा चौथरा लोहारखान्याचा आहे.गडावर तलवार व इतर शस्त्रे घडवण्यासाठी लोहारखाना आवश्यक होता.
या दर्ग्याजवळ चुन्याचा घाणा असुन उजव्या बाजुस ध्वजस्तंभ आहे. याच्याजवळ एक फुटलेली तोफ पडलेली दिसते. एके ठिकाणी चुना मळण्याच्या घाण्याचे चाक पडलेले आहे.
पुढे गेल्यावर समोर एक मंदिर दिसते.
उजवीकडं फलकावर गडावरील महत्वाची ठिकाणं आणि त्यांची दिशा दाखवलेली दिसते.

हे पाहून सदरेच्या उजव्या बाजूस नव्याने उत्खनन झालेल्या ठिकाणी गेलो. या ठिकाणी वास्तूंचे तलविन्यास दिसतात.
त्र्यंबकेश्वर महादेवाचे मंदिर लागते. या मंदिरात महादेवाची पिंड व महाराजांची प्रतिमा आहे. मंदिराच्या समोरच एका छोट्या कोनाड्यात मारुतीचे शिल्प आहे. तर मंदिराच्या प्रांगणात ध्वजस्तंभावर भगवा ध्वज डौलाने फडफडत असतो.
या मंदिराच्या मागील बाजुस कातळात कोरलेली पाण्याची सात टाकी असून एकही
टाक्यात पिण्यायोग्य पाणी नाही. येथुन सरळ गेल्यावर अष्टकोनी आकाराचे
लहानसे तले असुन त्याशेजारी पिण्याच्या पाण्याचे भुमीगत टाके आहे. या तलावाला त्रिंबक टाके असे म्हणतात.
मंदिराच्या बाजूला एक तलाव व पलीकडे पाण्याचे टाके आहे. या टाक्यातील
पाण्याची चव म्हणजे अमृताहूनि गोड..
पिण्याच्या पाण्यासाठी गडावर हि एकमेव सोय असुन या पाण्यात रंगीत गप्पी
मासे सोडले आहेत.
या टाक्यापुढे असलेल्या पठारावर कुणा मुस्लीम अवलीयाची
कबर आहे. सध्या या कबरीचे उदात्तीकरण करण्याचे कार्य सुरु आहे. या कबरीच्या संदर्भात एक हकीकत सांगितली जाते. हि कबर शेख उमर या मुसलमान अवलीयाची आहे.हा शेख उमर आपल्या सहा बंधुसह अरबस्थानातून भारतात आला.याच्या सहा बंधुंपैकी एक बाबा मलंग ज्याचा दर्गा कल्याणजवळील मलंगगडावर आहे, तर दुसरा शेख सल्ला ज्याची कबर शनिवार वाड्यासमोर आहे.बाकी तीन बंधुची नावे मिळत नाहीत.या सहाही बंधुंचा ऊदेश इस्लामचा प्रचार करउन हिंदुस्थानातील जनतेला बाटवून मुस्लिम करणे हा होता.हा शेख उमर जेव्हा लोहगडावर आला तेव्हा इथे एक साधु पुरुष तपश्चर्या करीत बसला होता.शेख उमर याने त्या साधू पुरुषाच्या पायाला धरुन उचलून खाली दरीत फेकून दिले.हा साधू लोहगड, विसापुरच्या खिंडीत मृत्युमुखी पड्ला.तो ज्या ठिकाणी पडला तिथे स्थानिक लोक त्याची वनदेव म्हणून पुजा करतात. दरवर्षी पौष पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते,
या कबरीच्या
आसपास साचपाण्याचे दोन तलाव आहेत. या शिवाय गडाच्या विसापुरच्या दिशेने
असलेल्या उत्तर टोकावर कातळात कोरलेले अजून एक टाके पहायला मिळते.
लोहगडावरचे प्रशस्त पठार
थोड्याच वेळात लोहगडाच्या साधारण मध्यभागी असलेल्या १६ कोनी तलावाजवळ येऊन पोहोचलो. या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.

या पायऱ्यांच्या बाजूला एक शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखानुसार-
“शके १७११ सौम्यनाम संवत्सरात हे तळे बाळाजी जनार्दन (नाना) फडणीस
यांच्या आज्ञेनुसार धोंडो बल्लाळ निजसूरे यांनी बांधले.बाजी चट हा गवंडी
होता” या शिलालेखानुसार शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू म्हणजेच नाना फडणवीस यांनी हा तलाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधवला. सध्या हा तलाव कोरडा ठणठणीत पडलेला आहे. नाना फडणीस यांनी या तळ्यात संपत्ती लपवली असावी या संशयाने इंग्रजांनी या तळ्याचा पश्चिम काठ फोडला. नंतर इंग्रजानी तो काठ बांधुन काढला पण हे काम निट न झाल्याने त्यात पाझर राहीला व तळे कायमचे कोरडे पडले.लोहगडाच्या माथ्याची समुद्रसपाटीपासून उंची सर्वोच्च ठिकाणी ३४०२ फुट आहे.
तलावाचे बांधकाम, शिलालेख वगैरे पाहून गडाचे मुख्य आकर्षण असलेल्या विंचूकाटा माचीकडे निघावे.'विंचूकाटा' हे लोहगडचं प्रमुख वैशिष्ठय आणि आकर्षण आहे.
विंचुकाटा माचीकडे जाताना वाटेत काही कातळात खोदलेली तळी दिसतात. तसेच काही कातळकोरीव गुहाही दिसतात.
मोठ्या तळ्याच्या पुढे विंचुकाट्याकडे जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात.
पुढे गडाच्या पडझड झालेल्या बुरजाजवळ जावे.येथे आल्यावर आपल्याला किल्ले राजगडावरील संजीवनी माचीची आठवण होते कारण इथे आपल्याला दिसते ती लोहगडावरील बलाढ्य विंचवाच्या नांगीसारखी दिसणारी विंचूकाटामाची. ही माची गड माथ्याच्या उंचीपेक्षा थोड़ी कमी आहे.साधारण १.५ किमी लांब व ३० मी रुंद ही डोंगरसोंड दोन्ही बाजूने तटबंदीबांधून बंदिस्त केलेली आहे. डोंगराची नैसर्गिक सोंडेचा योग्य तो वापर करुन आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यास उपयोग केला आहे.
पुर्वी लोहगडावरुन विंचुकाटा माचीवर उतरण्याच्या वाटेवर दरवाजा असल्याचा उल्लेख आहे.माचीची सुरक्षेचा विचार केला तर असा दरवाजा अपेक्षित आहे.मात्र सध्या हा दरवाजा अस्तित्वात नाही.



आभाळात घुसलेला विंचूकाटा-लोहगडाची एक माची
विंचुकाटा माचीवर उतरण्यासाठी पुर्वी हा कातळटप्पा उतरायला लागायचा
आता विंचुकाटा माचीवर उतरण्याच्या वाटेवर रेलिंग केले आहे.
या माचीवर उतरण्यासाठी अरुंद, खडकाळ पायवाट आहे आणि पावसाळ्यात वाऱ्याचा प्रचंड वेग, पावसाचा जोरदार मारा व धुके अशा वातावरणात इथून जाणे म्हणजे कठीणच !
तटबंदीवर चढण्या उतरण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्यांची व्यवस्था दिसते.या माचीवर घरांचे भग्न अवशेष दिसतात. तटबंदीत ठिकठिकाणी छोट्या छोट्या खोल्या असून शौचकूपांची व्यवस्थाही दिसते. या माचीच्या सुरवातीलाच खडकात कोरलेली एक मोठी पाण्याची टाकी दिसते. त्यात पाणी आहे पण सध्या पिण्यायोग्य नाही. बहुतेक पहारेकऱ्यांसाठी ही राहण्याची जागा असावी. किल्ल्याच्या पश्चिमेला या माचीचा आकार निमुळता होत पुढे टोकाला गोलाकार विंचवाच्या नांगीसारखा दिसतो. त्यामुळं या माचीला 'विंचूकाटा' नांव पडलं असावं. मूळ किल्ल्याच्या उंचीपेक्षा या माचीची उंची थोडी कमी असल्यानं, माचीवर येण्यासाठी एक कातळटप्पा सांभाळून उतरावा लागतो.
विंचूकाटा
विंचुकाटा माचीवरील पाण्याचे टाके
विंचुकाटा माचीच्या टोकाशी
विंचुकाटा माचीच्या चिलखती बुरुजात उतरण्यासाठी असलेला दरावाजा

विंचूकाट्याच्या शेवटी असलेला चिलखती बुरुज

विंचूकाट्यावर उतरायचा मार्ग माचीच्या या भागात असलेल्या सैनीकांसाठी पूर्वीच्याकाळी पाण्याची उत्तम सोय
केलेली आढळते. या माचीवर आयताकृती आकाराचे कातळात कोरलेले मोठे टाके असुन
सध्या वापर नसल्याने शेवाळामुळे यातील पाणी हिरवेगार झाले आहे. माचीच्या या
तटामध्ये काही शौचकूप आढळून येतात तर टोकाला एक दुहेरी तटबंदीचा भक्कम
बुरूज पहायला मिळतो. या बुरुजाच्या आत तटात उतरण्यासाठी दोन्ही बाजूना
दरवाजे बांधलेले आहेत. विंचूकाट्याच्या खाली दाट जंगल आहे. गडाच्या
आजुबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी व इंद्रायणी खोऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी या
माचीचे बांधकाम करण्यात आले असावे. माचीचा हा भाग व टोकावरील बुरुजाला
आतुन फेरी मारल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. गडाच्या माथ्यावरून आपल्याला
विसापूर, तुंग, तिकोणा, मोरधन,कोरीगड हे किल्ले तसेच भातराशी व मोरगीरी
डोंगररांग व पवना-इंद्रायणी नदीचे खोरे इतका विस्तृत प्रदेश सहजपणे नजरेस
पडतो.
विंचूकड्याच्या टोकावरील चिलखती बांधणीच्या बुरुजावर ध्वजस्तंभ आहे.तर शेवटी गोलाकार टोकाला बाहेरील तटबंदीच्या आत अंदाजे तीन चार फूट अंतर सोडून दुसरी मजबूत तटबंदी आणि दगडी बांधकाम दिसतं. दोन्ही तटबंदीच्या जागेमधून अर्धगोलाकार वळसा मारू शकतो. तटबंदीत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असून दोन्ही बाजूला अतिशय ठेंगणे म्हणजेच तीन - साडेतीन फुटांच्या चौकटीतून वाकून जावं लागतं. त्यापैकी डावीकडील दरवाजात दगड ढासळल्याने जाता येत नाही. पण उजवीकडून जाता येते. या टोकाला दुहेरी तटबंदीनं संरक्षित केलं असून शिल्पकलेचा हा एक उत्तम नमुना आहे.

समोरच असलेला विसापूर किल्ला

विसापूर-थोडा अधिक जवळून विंचुकाटा माचीवरुन दिसणारा भाजे लेण्यांचा डोंगर
लोहगडावरुन दिसणारा एक्प्रेस हायवे

विंचुकाटा माचीवरुन दिसणारे दृष्य
बरेच भटके हा 'विंचूकाटा' किल्ल्यावरून दुरूनच बघतात आणि परततात. पण लोहगड ज्यांना पूर्णत्वानं बघायचा आहे त्यांनी विंचूकाट्याच्या शेवटच्या टोकाला आवश्य भेट द्यावी. या कड्यावर वाऱ्याचा जोरदार मारा आहे. तटबंदीखाली प्रचंड दरी आणि दरीत जंगल दिसतं. पावसात लोहगडची भटकंती मस्त आहे, पण इथला जोरदार पाऊस आणि वाऱ्याच्या माऱ्यामुळं माचीवर विशेष काळजी घ्यावी लागते. या बुरुजावरून मावळचे विहंगम दृश्य दिसते. समोरच्या डोंगरावर भाजे लेणी दिसतात.तर खिंडीने वेगळा केलेला विसापुर अगदी जवळ भासतो. विसापुरच्या मागे त्रिकोणी शिखराचा भातराशी डोंगर दिसतो. तर उत्तरेला कार्ले लेण्याचा डोंगर दिसतो.

विंचुकाटा माची बघून आपण गडावरचे शेवटचे ठिकाण पहाणार आहोत, "लक्ष्मी कोठी"! या वाटेत एक पडके बांधकामाचे अवशेष आहेत. ही मशीद म्हणून सांगितले जाते. पण तिची एकंदर बांधणी पाहता तेएखाद्या वाड्याचे बांधकाम आहे. पुढे चालत गडाच्या लक्ष्मी कोठी जवळ आपण पोहचतो.इथेही
एक तोफ भग्न अवस्थेत पडलेली आहे.


गडाच्या ईशान्य कोपर्यात लोहगड-विसापुर खिंडीच्या बाजुला या कोरीव कोठ्या आहेत.इथे आपल्याला खजीनदाराची कोठी व लक्ष्मी कोठी अश्या कोठ्या बघायला मिळतात. खजीनदाराची कोठी ७० फुट लांब व ५० फुट रुंद आहे.

लक्ष्मीकोठी ही एक कातळात कोरलेली प्रशस्त मोठी गुहा असून, आत दगडी खांबांनी आधार दिलेल्या बऱ्याच खोल्या आहेत. आत अंधार असल्यानं तिथं टॉर्चची गरज आहे. सुरवातीची खोली मोठी हॉलसारखी दिसते. सरासरी शंभर माणसं एकावेळी राहतील इतकी ही गुहा मोठी दिसते. देवळाच्या गाभाऱ्यात समई विझल्यानंतर जसा गंध येतो, तसा एक विशिष्ट तेलकट गंध इथं नेहमी अनुभवास येतो. पहिल्या सुरत लुटीचा खजिना या लक्ष्मीकोठीत ठेवला होता. या गोष्टीवरून लोहगडची सुरक्षितता आणि अभेद्यतता लक्षात यावी. या कोठीच्या अलीकडेच आणखी एक प्रशस्त गुहा असून , गुहेतील जमिनीवरील कातळात ओळीनं कोरलेले चौरस हौद दिसतात. हि कोठी तीन भागात विभागलेली असुन या कोठीत ५० माणसे सहजपणे राहु शकतात पण सध्या पुरातत्व खात्याने गडावर रहाण्यास मनाई केली आहे. हि कोठी म्हणजे एक अपुर्ण लेणे असुन त्यात काही दालने कोरलेली आहेत.

या सर्व गुहेंना दगडी चौकट व समोर बांधीव दगडी भिंती दिसतात. बाजूलाच घोड्यांच्या पागा असलेला फलक दिसतो. या सर्वांसमोर तटबंदिखाली लोहगडवाडी दिसते तर समोर बुलंद 'किल्ले विसापूर' लक्ष वेधून घेत राहतो. गडावरून समोर आग्नेयेला पिंपरी चिंचवड शहरास पाणीपुरवठा करणारा अवाढव्य 'पवना जलाशय' दिसतो.कधी काळी लक्ष्मीकोठी येथे लोमेश ऋषिंचे वास्तव्य होते असे म्हणतात.
लोहगडाची पुर्ण भटकंती झाल्यावर आपण या प्राचीन दुर्गाच्या इतिहासात डोकावणार आहोत. लोहगड केंव्हा बांधण्यात आला याची इतिहासात नोंद नाही. परंतु गडाच्या अभेद्य आणि पोलादी तटबंदीवरून गडाच्या इतिहासाबद्दल कयास बांधला जातो. लोहगडाजवळ दगडात कोरण्यात आलेल्या भाजे आणि बेडसे या प्राचीन लेण्यांच्या पूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी, असा अंदाज बांधता येतो. लोहगडावर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव या सर्व राजवटींनी राज्य केलेले आहे. इ. स. १४८९ मध्ये मलिक अहंमदशाहने शिवनेरीवर निजामशाहीची स्थापना केली, त्यावेळी पुणे परिसरातील बहुतेक सर्व किल्ले जिंकून घेतले होते. त्यापैकीच लोहगड हा एक किल्ला होता. पुढे अहमदनगरचा सातवा निजामशहा म्हणजेच दुसरा बुर्हाण निजाम (इ.स. १५९०-९४) याचा भाउ गादीवर आला असताना,त्याने बुर्हाणला या गडावर इ.स. १५६४ मध्ये कैदेत ठेवले.पुढे इ. स. १६३० मध्ये लोहगड आदिलशाहीच्या आधिपत्याखाली आला. त्यानंतर कालांतराने इ.स. १६५७ मध्ये शिवाजीमहाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला. त्यावेळी लोहगड–विसापूर हा परिसर स्वराज्यात सामील करून घेतला. इतिहासातील नोंदीनुसार इ. स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात लोहगड मुघलांच्या स्वाधीन करण्यात आला होता. त्यानंतर १६७० मध्ये झालेल्या लढाईमध्ये मराठ्यांनी मोघलांकडून किल्ला परत जिंकून घेतला. पुढे पहिल्या सुरत लुटीच्या वेळी, लुटलेली संपत्ती घेउन शिवाजी राजे बोरघाटमार्गे स्वराज्यात येताना त्यांना लोणावळ्याजवळ शहाजी राजे कर्नाटकात मृत्युमुखी पडल्याची बातमी मिळाली.त्यामुळे त्याना तातडीने राजगडावर जाणे भाग होते.त्याबेळी सुरत लुटीत मिळालेली संपत्ती लोहगडावर ठेवून महाराज राजगडावर गेले.हि संपत्ती नेताजी पालकरांनी लोहगडावर ठेवली होती.व नंतर ती राजगडाकडे रवाना झाली. महाराजांच्या मृत्युनंतर तो पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला. इ. स. १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी ताराबांईबरोबर झालेल्या संघर्षात कान्होजी आंग्रेना आपल्या बाजुला वळवून लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला होता.लोहगड इ. स. १७२० मध्ये कान्होजी आंग्रे यांच्याकडून पेशव्यांकडे आला. त्यानंतर इ.स.१७७० मध्ये नाना फडणवीस यांच्या सांगण्यानुसार जावजी बोंबले या कोळी सरदाराने गड आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. नानांनी आपले सर्व द्रव्य धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली लोहगडावर आणले.दरम्यान नानानी किल्ल्यावरील सोळा कोनी विहीर, नारायण दरवाजा आणि किल्ला आणखी मजबूत करण्यासाठी इतर बांधकामं करून घेतली. त्यानंतर त्यांनी सर्व संपत्ती लोहगडावर हलवली नानांनी गडाच्या दक्षिण पायथ्याला असलेल्या आंबेगावात एक मोठा वाडा बांधला तसेच पवना नदीस घाट घातला. या घाटावर त्यांनी महादेवाचे एक कळशीदार मंदिरही बांधले. आज या सर्व वास्तु पवना धरणाच्या पाण्यात निद्रिस्त झाल्या आहेत. .इ.स. १८०० मध्ये नाना फडणवीस मरण पावल्यानंतर १२ नोव्हेंबर १८०२ रोजी नानांची पत्नी जिऊबाई लोहगडावर येउन राहीली. पुढे १८०३ पर्यंत लोहगड धोडोपंताच्या ताब्यात होता. पुढे १८०३ ला लोहगड दुसऱ्या बाजीरावांनी तो पुन्हा जिंकून घेतला. मात्र इंग्रज अधिकारी जनरल वेलस्लीने मध्यस्थी करुन असे ठरले कि धोंडोपंताने बाजीरावाशी इमानाने वागावे व बाजीरावाने गड धोंडोपंताच्या ताब्यात ठेवावा.मात्र पुढे बाजीराव देवदर्शनाला जात असताना कृष्णेकाठी असलेल्या एका किल्ल्यावरुन बाजीराव यांच्यावर गोळी मारली गेली.मग मात्र वेलस्लीने लोहगड ताब्यात घ्यायचे ठरविले.लोहगडाला वेढा घालताच धोंडोपंत वेलस्लीला शरण आले.वेलस्लीने गड ताब्यात घेउन नाना फडणवीस यांच्या पत्नीला सालीना १२०० रुपयाची नेमणुक देउन पनवेलला पोहचते केले.गद इंग्रजांच्या ताब्यात आल्यावर त्यांनी ऑक्टोबर १८०३ मध्ये पुन्हा बाजीरावच्या ताब्यात दिला.मात्र पुढे इंग्रज व बाजीराव यांच्यात बेबनाव झाला.

त्यामुळे इंग्रजांनी लोहगडाचा ताबा मिळविण्याचे ठरविले. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. एकाच डोंगरावर असणार्या जुळ्या किल्ल्याचे दुर्दैव लोहगडाच्या नशीबी आले.विसापुर पडल्यामुळे लोहगडाचे मरण नक्की झाले. इंग्रजांनी विसापुर येथुन लोहगडावर तोफांचा मारा केल्याने ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले. १८४५ पर्यंत ब्रिटिशांच्या सैन्याची एक तुकडी या किल्ल्यावर होती. नांव सार्थ करणाऱ्या या किल्ल्यास दैदिप्यमान इतिहास असून जास्तीत जास्त काळ 'लोहगड' मराठेशाहीत राहिला..
एकंदरीत मुख्य वर्दळीच्या मार्गाच्या अत्यंत जवळ , रस्ते वैगरे सुविधा असल्यामुळे पोहचायला सोपा, उत्तम दुर्गबांधणीचा नमुना,आवर्जून पहावीत अशी द्वाररचना आणि द्वारशिल्प्,शिलालेख, माथ्यावरील अवशेष, कातळकोरीव गुहा आणि शिलालेख्,माची,माथ्यावरुन दिसणारे भन्नाट दृष्य इत्यादी सर्व दुर्गवैषिट्ये एकाच गडावर बघायची असल्यास लोहगडाला आवर्जून भेट देण्याशिवाय पर्याय नाही.हा प्राचीन दुर्ग आपलीच वाट पहात आहे.
संदर्भः-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर'
२) सांगाती सह्याद्रीचा-यंग झिंगारो ट्रेकर्स
३) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!-प्र.के.घाणेकर
४) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
५) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
६) महाराष्ट्र देशातील किल्ले’ या चिं. ग. गोगटे
७) www.trekshitiz.com हि वेबसाईट
८) www.durgbharari.in हि वेबसाईट
९) श्री.सागर बोरकर यांचे लिखाण
१०) https://sahyadri300.blogspot.com/2021/04/lohagad.html#comment-form हा ब्लॉग
No comments:
Post a Comment