Tuesday, February 15, 2022

कार्ले लेणी

भारताच्या पश्चिम समुद्रकिनार्‍यालगतच असलेल्या सह्याद्री पर्वतराजीच्या एका कानाकोपर्‍यात असलेल्या नाणेघाटाच्या माथ्यावर असलेल्या गुंफेला दख्खनच्या पठारावर इ.स.पूर्व 200 पासून पुढील 400 वर्षे राज्य करणारे एक राजघराणे व त्यांचे साम्राज्य यांच्याशी नाते असणारे अवशेष बघायला मिळतात. या साम्राज्याचा अगदी अल्पसा शोध घेण्याचा जरी प्रयत्न करायचा असला तरी पश्चिम घाटावरील पुण्याजवळच्या डोंगरलेण्यांपासून ते मध्य भारतातील सांची, आंध्र प्रदेशातील अमरावती, आणि उत्तरेला असलेल्या नाशिक आणि औरंगाबाद जवळील पितळखोरे या ठिकाणांना भेट देण्याची किमान आवश्यकता आहे. निदान इ.स.नंतरच्या पहिल्या शतकात कोरल्या गेलेल्या व त्या काळातील बौद्ध चैत्य-गृह व विहार यांचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणून ज्यांची गणना केली जाते त्या कार्ले येथील गुंफांना भेट तरी आवश्यक आहे.
  


   कार्ल्याच्या गुंफा भारतातील महत्त्वाचा असा मानला जाणार्‍या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या (AH 47) जवळच फक्त काही किमी अंतरावर आहेत. मुंबईहून पुण्याला येत असताना खंडाळ्याचा घाट चढून वर आल्यावर लागणारे लोणावळा गाव पार केले की तिथून  ८ ते१० किमी अंतरावर एक छोटेखानी रस्ता डावीकडे वळतो. या रस्त्यावर कार्ले लेणी अशी पाटी असल्याने शोधायला फारसे प्रयास पडत नाहीत. रस्त्याच्या सुरूवातीसच एक मोठी कॉन्क्रीटची कमान आपले स्वागत करते. परंतु ही कमान एकवीरा देवीच्या मंदिराकडे तुम्ही आला आहात म्हणून तुमचे स्वागत करते, कार्ले लेण्यांकडे आल्याबद्दल नाही. हे एकवीरा देवीचे मंदीर कार्ल्याच्या लेण्यांच्या अगदी मुखाशी प्रस्थापित केलेले आहे. या आधी सुमारे 55ते 60 वर्षांपूर्वी  हे एकवीरा देवीचे देऊळ फारसे लोकप्रिय नव्हते. गेल्या काही दशकांत भारतात एकूणच देवळांना जास्त जास्त लोकप्रियता दिवसेंदिवस लाभत चालली आहे. त्याचप्रमाणे कदाचित या देवळालाही आता लोकप्रियतेचा लाभ झालेला दिसतो आहे.
     सह्याद्री पर्वतराजीच्या कुशीत दडलेला कार्ले लेणी परिसर ब्रिटिश राजवटीत मुंबई प्रांताचा (Bombay Province) एक भाग होता. या काळातील ब्रिटिश शासनाने हा भाग, याचा इतिहास व या भागातील जनजीवन यांचे अतिशय बारकाईने केलेले अचूक वर्णन 'गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेंसी' ( Gazetteer of Bombay Presidency) या नावाने प्रसिद्ध करून ठेवलेले आहे. १८५५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या ग्रंथामध्ये कार्ले परिसराचे एवढे अचूक वर्णन केलेले आहे की त्याचा संदर्भ आजही घेता येतो. कार्ले परिसराबद्दल हा ग्रंथ सांगतो की,
“ इंद्रायणी नदी खोर्‍याची उत्तर सीमा असलेल्या पर्वत रांगांमध्ये, तळ जमिनीपासून पर्वत शिखराच्या उंचीच्या एक तृतियांश किंवा साधारण 400 फूट एवढ्या उंचीवर व पुणे शहराच्या वायव्येला 35 मैलावर असलेली कार्ले लेणी ही वेहरगाव या खेड्याच्या हद्दीत मोडतात. ( हे वेहरगाव म्हणजे विहारगावच. लगतच्या डोंगरावर बौद्धविहार असणार्‍या पायथ्याच्या गावाचे नाव विहारगाव असणे हे इतिहासाला धरूनच आहे. दुसरे असे की आपल्या मराठीतल्या र्‍हस्व इ चा उच्चार इंग्लिश मध्ये नेहमीच आय ( I ) या अक्षरातून व्यक्त होतो असे नाही. ब्रिटिशांनी त्या उच्चारासाठी कित्येकदा ( E ) हा स्वर वापरला आहे. एकोणिसाव्या शतकात भारतात छापलेल्या इंग्लिश पुस्तकांतून याची अनेक उदाहरणे दिसतात. मुंबईतल्या विहार तलावाच्या नावाचे लेखनही ( E ) वापरूनच केलेले होते.  कार्ला हे नाव ‘कोरलेले’ या विशेषणावरून आलं असावं, अशी समजूत आहे. या ठिकाणी भगवान बुद्धाचा प्राचीन विहार असल्यामुळे या ठिकाणाला विहारगाव (वेहेर) गाव असं नाव मिळालं, असंही मानलं जातं. ) लेण्यांच्या समोरील बाजूस असलेल्या सपाट जागेवरून दक्षिण व पूर्व दिशेला भातशेतीची सपाट जमीन सलगपणे दिसत राहते. मधून मधून दिसणारे गर्द झाडीचे घोळके व सगळीकडे तुरळक दिसणारे झाडांचे ठिपके, यामुळे या जमिनीचा सपाट सलगपणा भंग झाल्यासारखा वाटतो. खोर्‍याच्या पलीकडच्या सीमेवर, मधेमधे असलेल्या खिंडींमुळे तुटक तुटक भासणार्‍या उंच पर्वतांची एक निसर्ग रमणीय व नयनमनोहर रांग दिसते. या रांगेमध्ये असलेल्या खिंडींमधून आणखी दूरवर असलेली पर्वतशिखरे दिसतात. सर्वात पूर्वेला गोल डोक्याची कुडव टेकडी दिसते. त्याच्या पश्चिमेला बादरसी शिखर दिसते. या शिखराच्या आणखी पलीकडे पूर्वेला असलेला सपाट माथ्याचा विसापूर व पश्चिमेला असलेला गोल माथ्याचा लोहगड हे दोन किल्ले दिसतात. याकिल्याच्या शेजारी विंचवाची नांगी या नावाने ओळखला जाणारा सुळका दिसतो. याच्या पश्चिमेला असलेल्या खिंडीमधून लांबवरचे तुंग शिखर दिसते आणि त्याच्या पलीकडे पश्चिमेला साखरपठाराचा सपाट माथा व त्याच्या मागे लांबवर मोरगिरी व जांभुळणी ही पर्वत शिखरे दिसतात.”
            सध्या जुन्या काळच्या खेडेगावातील कौलारू घरांऐवजी भडक रंगांत रंगवलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या घरांच्या पुंजक्यांचे ठिपके जागोजागी अनेक ठिकाणी दिसतात . या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रिसॉर्ट्स व पिकनिक स्पॉट्सचे पेव फुटल्यासारखे दिसते . मात्र या पर्यटक सुविधा कार्ले लेण्यांमुळे नक्कीच निर्माण झालेल्या नसून ही एकवीरा देवीची कृपा आहे हे नक्की. या देवीच्या मंदिरामुळेच हा भाग पर्यटकांत बराच लोकप्रिय झालेला असावा. अनेक भक्त मंडळी दर्शनाला येत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा छोटी दुकाने,चहा कॉफी,फराळाचे जिन्नस विकणारे हॉटेलवाले आणि लॉजेस यांची एक रांगच उभी राहिली आहे. या भाऊगर्दीतून हळूहळूच आपण कार्ल्याच्या डोंगराच्या तळाशी जाऊन पोहचतो. समोर एक गुळगुळीत,काळाशार डांबरी रस्ता वर डोंगर चढून जाताना दिसतो .हा डांबरी रस्ता अंदाजे निम्मी चढण तरी वाचवतो. वर पोचल्यावर गाड्या ठेवण्यासाठी एक चांगला वाहन तळ बांधलेला आहे व वाहनाची देखभाल करण्यासाठी तेथे कर्मचारी हजर असतात. 10 रुपये फी भरून एकदा पावती घेतली की वाहन तेथे सोडून निर्धोक मनाने पुढे जाता येते. या वाहनतळाच्या एका टोकाला भक्कम बांधणीच्या दगडी पायर्‍या बर्‍याच उंचीपर्यंत वर जाण्यासाठी बांधलेल्या आहेत. 
        पायर्‍यांच्या दुतर्फा जिथे शक्य असेल तेथे टपर्‍यांच्या रांगा उभ्या आहेत. फुले, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, सोललेल्या काकड्या, ताजे घुसळलेले ताक, लिंबाचे सरबत आणि देवीचे फोटो व पूजासाहित्य अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या टपर्‍यांच्यातून विक्रीला ठेवलेल्या दिसत आहेत. यातल्या पुष्कळ दुकानदारांनी देवीच्या आरत्या किंवा भक्तीपर गीतांच्या कॅसेट्स कानठळ्या बसतील इतपत मोठ्या आवाजात सतत चालू ठेवलेल्या असतात. आपल्या दुकानाची विक्री वाढवण्याचा बहुदा त्यांचा प्रयत्न चालू असावा. एकूण प्रकार कोणत्याही देवाची जत्रा किंवा उरूस यामध्ये जसा असतो तसाच साधारण आहे. कार्ले येथील गुंफा बघायला जाताना अचानक सुरू झालेला हा गोंधळ व कोलाहल माझा मूड एकदम बिघडवूनच टाकतो व कोठून येथे येण्याचा मूर्खपणा केला असे वाटते. या पायर्‍या अशा पद्धतीने बनवलेल्या आहेत की एका बाजूला काळ्याकभिन्न पाषाणाची एक भिंतच उभी आहे तर दुसर्‍या बाजूला अगदी पायर्‍यांलगत उभ्या खडकांत तयार झालेली एक अरूंद व खोल घळ आहे.हि बाजूची खोल घळ कचर्‍याने संपूर्णपणे भरून गेली आहे. प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या, कप, कागदाचे तुकडे,पत्रावळी, निर्माल्य आणि फेकलेले शिळे खाद्यपदार्थ या सारख्या सर्व गोष्टींनी ती घळ भरून वाहते आहे. ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या स्थानाला तेथे असलेल्या देवळाच्या लोकप्रियतेची किंमत अशाप्रकारे एक विशाल कचरापेटी बनून मोजावी लागते आहे. येणारे भाविक, दुकानदार व विक्रेते हे सर्व या घाणीला तितकेच जबाबदार आहेत यात शंका नाही.
           अगदी ८०-८५ सालापर्यंतही मळवलीला उतरणारे लोक बुद्धविहारांसाठीच येत असत. एकवीरेचे देऊळ अगदी छोटेसेच असे होते आणि तिथे पूजा आरत्यांची फारशी धामधूमही नसे. पूजासाहित्याचे अवडंबरही नसे. कोळी बांधव पूजाप्रसादाचे साहित्य स्वतःबरोबर घेऊनच डोंगर चढत असत. त्यामुळे ही यात्रा खडतर मानली जात असे. ही देवी जशी कोळ्यांची कुलदेवता तशी कायस्थांचीही. शिवसेनेच्या उदयाबरोबर इथे वर्दळ आणि गजबज वाढली. तसे रायगड जिल्ह्यातही कडाप्पा येथे एकवीरेचे पुरातन स्थान आहे आणि कुलाबा जिल्ह्यातले समस्त कायस्थ ह्या देवीला जात असत. हेही स्थान तसे दुर्गमच (होते) असे म्हणता येईल. आता वाहतुकीचे आणि वसतीचे अनेकानेक पर्याय उपलब्ध होऊ लागल्याने दुर्गमता आणि खडतरपणा संपला आहे. एवरेस्ट् च्या शिखरमाथ्यावरही जिथे गर्दीमुळे अपघात घडू लागले आहेत तिथे सह्याद्रीची काय कथा.

         कार्ल्याचे हे एकवीरेचे स्थान (देऊळ नव्हे.) पुरातन असावे. राजवाड्यांच्या मते बौद्धविहारकाळा आधीपासून या स्थानाचे महत्त्व असावे. त्यांनी 'एकवीरा' नामाचा संबंध अक्कवीरा, अक्कम्मा,अल्लम्मा, येल्लम्मा असा काहीसा लावलेला आहे एव्हढेच नव्हे तर या आदिम दैवतापुढे पशुबळी होत असत (हे तर आत्ता-आत्तापर्यंत सुरू होते.) आणि त्यासाठीच इथे गौतम बुद्धाचा अहिंसेचा संदेश देणारे विहार मुद्दाम बांधले असावेत असेही एक मत वाचल्याचे आठवते.
          बॉम्बे गॅझेटियर मध्ये दिलेल्या माहितीनुसार (सन१८८५) सध्याचे देऊळ १८६६ मधे बांधलेले आहे. स्थानिक आख्यायिकेप्रमाणे याच्या आधीचे देऊळ चार पिढ्या जुने होते. कोळी मंडळींनी भेट दिलेल्या देवळाच्या घंटेवर 1857 हे साल इंग्रजीमध्ये कोरलेले आहे. स्थानिक दंतकथेप्रमाणे हे देऊळ कार्ले चैत्यगृहापेक्षा पुरातन असून या देवळाची कीर्ती कमी व्हावी म्हणून बौद्ध काळात येथे चैत्य कोरला गेला असावा.अर्थात त्यात तथ्य काहीच नाही.
           आपल्या मनातले क्लेशदायक विचार बाजूला सारत पायर्‍यांच्या शेवटी असलेल्या एका प्रांगणात पोहचावे. या प्रांगणाच्या एका बाजूला ज्याच्यातच लेणी खोदलेली आहेत असा पाषाणाचा उभा कडा आहे तर बाकी बाजूंना भारतीय पुरातत्व खात्याने मजबूत कुंपण घातलेले आहे. त्यामुळे सुदैवाने लेण्यांच्या जवळ दुकानदार व खाद्यपदार्थ विक्रेते यांचा उपद्रव होत नाहीये. आत प्रवेश मिळवण्यासाठी एक छोटीशी फी द्यावी लागते. विक्रेत्या मंडळींपासून सुटका करून घेण्याची बहुदा ती फी असावी असेच मला वाटत राहते. आत आलेल्या 10 पर्यटकांपैकी बहुदा 9 तरी एकवीरा देवीच्या दर्शनासाठी म्हणूनच आलेले असावेत. कार्ले लेण्यांमधील गुंफांमधील 8 क्रमांकाची गुंफा ही चैत्यगृहाची गुंफा असल्याने सर्वात महत्त्वाची समजली जाते. या गुंफेचे मुख (Facade) अतिशय भव्य व सौंदर्यपूर्ण आहे यात शंका नाही. 
                 परंतु एकवीरा देवीची या भव्य मुखाच्या समोर प्रतिष्ठापना करून व त्यावर पत्र्याचे छप्पर असलेले एक मंदिर बांधून काय औचित्य साधले गेले असावे हे कळणे अवघड आहे. या मंदिरामुळे या पुरातन चैत्यगृह गुंफेच्या भव्य मुखाचे सौंदर्य नीट दिसत नाही. परंतु एकवीरा देवीचे मंदिरही खूपच जुने आहे व रायगड जिल्ह्याच्या किनार्‍यावर मासेमारी करणार्‍या कोळी मंडळींचे हे एक महत्त्वाचे दैवत आहे या गोष्टी लक्षात घेतल्या तर एकवीरा मंदिर त्या स्थानावर नसते तर चैत्यगृह किती जास्त भव्य दिसले असते या सारख्या विचारांना काहीच अर्थ नाही.
   प्रश्न हा निर्माण होतो कि समुद्रावर मासेमारी करणार्‍या कोळ्यांचे दैवत इतके लांब कार्ले गावात कसे ?
    कोळी समाज हा एक आदिवासी समाज आहे. ते मूळचे महादेव कोळी. नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात ते जास्त आढळतात. शेकडो वर्षापूर्वी त्यातलेच काही घाटातून खाली उतरले आणि कोंकणातल्या किनारपट्टीवर उतरले आणि त्यांचे नशीब फळफळले. त्यांना मच्छीमारीचा कायमस्वरूपी व्यवसाय मिळाला. त्यांच्या जमिनींचे सोने झाले.शिवाय मुंबईसारख्या महानगराचे सान्निध्य मिळून त्यांचे आदिवासीपण महानगराच्या सर्वभक्षी राक्षसी जबड्यात लोप पावले.(ही एक चांगलीच गोष्ट झाली.ठाणे-कुलाबा जिल्ह्यातल्या वारली लोकांचे आणि खेडा,डांग,उंबरगाव, दमण इथल्या दुबळी लोकांचेही असेच पुरते शहरीकरण झाले आहे.) दूरचित्रवाणीनेही या समृद्धीची दखल घेऊन त्यावर मालिका निघू शकण्याइतपत मुख्य प्रवाहात स्थान या कोळी बांधवांना मिळाले आहे. किनारपट्टीवर मासेमारी करणारे कोळी मच्छीमार कोळी बनले. आता मच्छीमार कोळी आणि महादेव कोळी (जे अजूनही पुरते आदिवासी आहेत) हे दोघेही म. कोळी असा उल्लेख करु शकतात.मुद्दा एव्हढाच की कोळी समाजाचे भौगोलिक स्थान हे केवळ किनारपट्टीपुरते संकोचित नाही.
         तसेही कोणाचे कुलदैवत कुठे असावे ह्याचे नियम किंवा अंदाज लागू शकत नाहीत. मानवी स्थलांतराच्या अभ्यासातून ते थोडेफार उमगू शकते. कोंकणस्थांची कुलदेवता जोगेश्वरी ही मराठवाड्यातल्या 'जोगाईचे आंबे' इथे असते. राजस्थान-गुजरातेतल्या लोहाणा-पांचाळांची हिंगजलाज माता बलुचिस्तानात असते. देशस्थांचा व्यंकटेश दक्षिणेला असतो.कश्मीरातल्या पंडितांचे गोव्यातल्या एका मठाशी नाते असते (होते)वगैरे वगैरे.
        मराठा राज्य शिवपूर्व काळात नव्हते तेव्हा इतर कुणीच नव्हते का? तर होते. स्वतंत्र शहाण्णव मराठा घराणी होती. तशीच कित्येक ठिकाणी कोळी होते. ही त्याकाळात लढवय्यी जमात होती. ह्यातलेच काही लोक समुद्रकिनारी गेले त्यांना "समुद्र कोळी" /मच्छिमार म्हणतात. मुरुडा जंजिरा हा शिवाजी महाराजांनी कधीही न जिंकलेला किल्ला काही जंजिर्‍याच्या सिद्दीने बांधलेला नव्हता. सिद्दी येण्यापूर्वी तो कोळ्यांच्या ताब्यात होता. ( रामभाउ पाटील कोळी हा तिथला प्रमुख होता.)तसेच कोंढाणाही कोळ्यांच्या ताब्यात होता. तुघलकाने तो जिंकल्यावर काही सर्वच्या सर्व कोळी नष्ट झाले नाहित. कित्येक तिथेच लढाउ शिपाई, नम्हणून नव्याने सैन्यात दाखल झाले. आजही कोंढाण्याच्या खाली कोळ्यांची एक वस्ती दिसते. एक मंदिरही आसपास आहे म्हणतात. पण हे कोळी समुद्र कोळी नव्हेत. लोहगड वगैरे इतर नाणेघाट सह्याद्रीच्या कडेने उभे असलेले कित्येक् इतर दुर्गम किल्ले हे ही त्यावेळी कोळ्यांच्या ताब्यात असावेत.(कोळी हे यादवांची कागदोपत्री चाकरी राखून असावेत.यादव गेले की हे स्वतंत्र) हे राज्यकर्ते कोळी. भारतात एकसलग राज्ये नव्हती. विविध जाती जमाती होत्या. आपण आदिवासीम्हणू शकतो अशी काहिशी रचना होती. अफगाण व आसपासच्या भागात नाही का मुघल सत्तेला कायम आफ्रिदी, तिक्रिती , हजारा अशा कित्येक टोळ्यांचा सामना करावा लागे, तसाच. फक्त ह्या टोळ्या मुस्लिम नव्हत्या.
        ठाकर हे वारल्यांच्या आधीपासून सह्याद्रीची राने राखून होते आणि त्यांचे अस्तित्व फक्त उत्तर भागात नाही तर सर्वत्र पसरलेले होते. ठाकर लोकांच्या थोडे खालच्या रानात कोळी लोकांची वस्ती होती. ह्यांच्या मधलेच समुद्र कोळी हे मासेमारी वर जगत आणि समुद्र किनारयाने राहत. कोळी जातीचे मूळ वंशज कोल हे होते.राघोजींचा जन्म महादेव कोळी जमाती झाला. इ.स. १८१८ साली पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारांत गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदार्‍या, वतनदार्‍या काढल्या. परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला.
म्हणजेच कोळ्यांकडे काही किल्ले, जहागिरी तरी एकोणीसाव्या शतकापर्यंत तरी असावेतच.डिसेंबर १७९२ मध्ये चित्रकार जेम्स वेल्स याने या ठिकाणाला भेट दिली तेव्हा हे एकवीरा या नावे ओळखले जात होते. या चित्रमालिकेविषयी अधिक माहिती ब्रिटिश लायब्ररीच्या वेबसाईटवर ठिकाणी मिळेल.


कार्ले लेण्याची पार्श्वभुमी आणि एकवीरा देवीच्या इथल्या स्थानाची माहिती घेतल्यावर आता जाउया थेट इतिहासात ! कार्ले लेण्याची उभारणी कशी झाली असावी हे आता जाणून घेउया. जवळपास २२०० वर्ष आपण मागे जाणार आहोत. अग्निपुत्र सह्याद्रीच्या या परिसरात आज जरी प्रचंड वर्दळ असली तरी या काळात इथे फक्त व्यापारी लोकांचे तांडे घाटाची चढाई,उतराई करायचे तीच वर्दळ होती. सह्याद्रीची हि शिखर निमुटपणे हे तांडे पहात रहायची. ऋतुमागून ऋतु बदलत रहायचे.उन्हाळ्यात काळसर पिवळसर दिसणारं आणि उन्हाच्या कडाक्याने रापलेलं सह्यशिखरे पावसकाळ सुरु झाला की हिरवा शालु पांघरायची. पाणावलेल्या खडकातनं अलगद धिटुकले कोंब बाहेर नवनिर्मीतीसाठी बाहेर पडायचे.. रानवेलींना धुमारे फुट लागत, विविधरंगी फुलं अलगद उमलू लागत. गिरीशिखरांच्या अंगाखांद्यांवरुन निर्झर खळाळत वाहात. सारी सृष्टी तजेलदार होवून अवघं अवघं चैतन्यानं भरुन जात असे. पुन्हा हिवाळ्याचे वेगळेच रुप गिरीकंदराना मिळे.सकाळच्या कोवळ्या उन्हात तांबुस रंगाच चमकणारे शरीर गर्द धुक्यात लपेटून जणु थंडीपासून बचाव करत.पुन्हा एकदा ग्रीष्माची चाहूल लागे आणि तहानेने व्याकुळ झालेली हि गिरीशिखरे पावसाची आतुरतेने वाट पहात रहात. असेच एक दिवस अचानक त्याच्या पायथ्यातून आडवाटेने एक श्रमणांचा तांडा हाती होते फक्त छिन्नी आणि हातोडे या डोंगरांचू वाट चढू लागला. अंगी काही नवं भव्य दिव्य असं निर्माण करण्याची प्रचंड उर्मी घेउन पाय रोवत हे स्थपती पोहचले माथ्याजवळ. मानवी वावराची सवय नसलेले वन्यजीव सैरावैरा पळू लागले. श्रमणांचा तो प्रचंड तांडा बघून वानरं कल्लोळू लागली, कुणी येक ते सरसर झाडावर गेले, कुणी डोंगराच्या खबदाडीत जाऊन बसले, कुणी हळूच खडकाआडून हळूच डोके वर काढून दात विचकू लागले. कारागिर कातळकड्याशी भिडू लागले. कुणी दोरांची शिडी करुन त्याच्याशी झट्या घेऊ लागले, कुणी खोबण्यांतून वाट काढू लागले, कुणी माथ्यावर जाऊन वेलींच्या साहाय्याने कातळास येंगू लागले, कुणी आपल्या हत्यारांनी खडकास चाचपून पाहू लागले, कुणी पुढ्यातल्या दरीचा अदमास घेऊ लागले, कुणी असे अवघें अवघें त्या भक्कम पहाडाचा वेध घेऊ लागलें.

कार्ल्याचे एक जुने चित्र - (ब्रिटिश लायब्ररीवरून साभार)


'Ekvera'. Coloured aquatint by Thomas Daniell after James Wales.

         त्यांच्यातच होता वैजयंती नगरीचा भूतपाल नामक श्रेष्ठी. वैजयंती म्हणजे आजचं कर्नाटकातलं वनवासी. आपल्या पाथरवटांसह त्याने त्या भव्य कातळी छातीचा अदमास घेतला. त्या पाथरवटांसह काही यवनी शिल्पकारही होते. त्या भव्य पहाडाच्या समोरच एक देखणं लेणं शंभर एक वर्षांपूर्वी कुणीतरी निर्मिलं होतं त्यातल्या त्रुटींवर मात्र करण्याचं आव्हान त्या भूतपालासमोर होत. त्या लेण्याची भव्य कमान खडकाचा आडोसा नसल्याने पर्जन्यधारांमध्ये कणाकणानं झिजली जात होती, तिथले खांब कलते होते.राजमाचीच्या पोटात खाली कोरलेल्या कोंढाणे लेण्यात पर्वताच्या तळावटी कोरल्याने पर्जन्यकाळात पाणी गळत असे .आता हि चुक सुधारायची होती.म्हणूनच लेणे कोरायचे होते ते माथ्यापाशी. भूतपालाने मागच्या चुकातून धडा घेतला. त्याने काही आराखडे तयार केले. बुद्धाला मनोमन वंदन केलं आणि छिन्नीचा एक अलवार घाव हळूच त्या भव्य पहाडावर घातला.ऐन कोकणात वाकून बघणारा राजमाची, त्याच्या अल्याड-पल्याड ढाक आणी मृगगड आणी अगदी परसातलाच भक्कम लोहगड-विसापूर, अश्या किल्ल्यांचा अभय असल्यावर लेणीकारांचे हात मुक्तपणे चालले असतील. असे चहूबाजूला अभय असल्याखेरीज आपल्या कडील लेणी खोदली गेली नाहीयेत.
    भूतपाल निर्मित करत असलेल्या लेण्याला हळूहळू आकार येऊ लागला. सर्वात आधी वरची अश्वनालाकृती कमान खोदली गेली. त्यानंतर हळूहळू अंगच्याच खडकाचा आधार घेऊन गजपृष्ठाकार छत खोदण्यात येऊ लागलं, पाणी पडू नये म्हणून बाहेरची जवनिकाही खोदण्यात आली. आयोनियाहून काही यावनी शिल्पकारही आले होते. पर्सिपोलिस शहरातल्या स्तंभांच्या धर्तीवर चैत्यगृहातले स्तंभ कोरण्यात येऊ लागले. इतकं प्रचंड खर्चिक काम पाहून सामान्य लोकसुद्धा दानधर्म करु लागले. कुणी हालिक, कुणी श्रेष्ठी, कुणी व्यापारी तर कुणी राजा. पश्चिम किनार्‍याअवर धेनुकाकट इथे यवनांची मोठी वस्ती आहे. तिकडील यवनही खूप मोठा दानधर्म सुरु करु लागले.

अर्थात या लेण्याचे गोवर्धन उचलायचा तर त्याला आर्थिक मदत हवीच.त्यासाठी अनेक धनिक व्यापारी सरसावले.त्याचे उल्लेख कोरून ठेवले गेले.
 कुणी महारठी अग्निमित्रणक सिंहस्तंभ उभारत होता.
महारठीस गोतिपुतसग्निमित्रणकस सिहथबो दानम्.
तर कुणी धेनुकाकट येथील अत्तरांचा व्यापारी दरवाजांसाठी दान देत होता.
धेनुकाकट गंधिकस सिहदतस दानम् घरमुघ.
कुणी शूर्पारकाचा सातिमित शारीर अवशेषांसह स्तंभांची देणगी देत होता.
सोपारका भयंतानं धमुतरियानं भाणकस सातिमितकस ससरीरो थबो दानम्.
तर कुण्या गृहस्थाची माता भायिला स्तंभासाठी दान देत होती.
गहतस महादेवणकस मातु भायिलाया दानम्.
ह्या सर्व लहानमोठ्या दात्यांच्या श्रमाने, कुणाच्या पैशाने एक भव्य लेणं वेगानं तयार होवू लागलं.

भूतपालाच्या डोळ्यांदेखतच हे भव्य लेणं पूर्ण झालं. ज्याचं स्वप्न त्यानं पाहिलं होतं ते आज सत्यात उतरलं होतं. दूरच्या द्राविड देशांतून तो केवळ असा कातळ शोधत शोधत आला होता. त्याचा तो शोध आज पूर्ण झाला होता. आपलं सर्व कसब पणास लावून त्याने एक अजोड चैत्य आज पूर्ण केला होता. अशी निर्मिती पूर्वीही कधी झाली नव्हती ह्या पुढेही कधी होणार नव्हती. बोरघाट, राजमाची कोकणदरवाजा, आंबेनळी घाट, कुसुर, फेण्यादेवी, कुरवंडा, फल्याण, सव, पायमोडी हे प्रमुख आणी अजून काही घाटवाटावरून जाणारे कार्ला लेण्यांत टेकून गेलेच असणार.

त्याने त्या चैत्यगृहातील जवनिकेच्या डाव्या बाजूच्या भिंतीत ह्या निर्मितीची नोद करुन ठेवली जी ह्यापुढेही अजून कोण्या नवशिल्पकारांना प्रेरणा देत राहावी.

वैजयंतितो सेठीना भूतपालेन सेलघरम परिनिठापितम् जंबुदिपम्हि उतमम्

   भूतपालाने निर्मिलेलं लेणं पूर्ण झालं होतं. इथली राजकीय स्थितीही बदललेही होती. आयोनिया, अरबस्तान, रोम आदी शहरांमधून येणार्‍या मणी, सोने, चांदी, रत्ने, प्रवाळ, नक्षीदार भांडी, उंची मद्यपेये इ. वस्तू समुद्रमार्गे चेऊल ( चौल) , कलियान ( कल्याण ) शूर्पारक ( नालासोपारा ) बंदरात येऊन पडू लागल्या होत्या. सार्थवाह बैलांच्या तांड्यावर त्या वस्तू लादून घाटमार्ग पार करू लागले व प्रतिष्ठान ( पैठण ), तगर ( तेर ), नासिक, ब्रह्मपुरी ( कोल्हापुर) आदी शहरांत येऊ लागले व तिथे त्या वस्तू देऊन तलम रेशमी वस्त्रे, मसाल्याचे पदार्थ, कापूस, हस्तीदंती वस्तू, लोणी, तूप, मध, चंदन आदी माल परत समुद्रापार नेऊ लागले. ह्या वापारामुळेच सातवाहन साम्राज्य बलाढ्य होऊ लागले व त्याच सुमारास ह्या व्यापारावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी येथे पश्चिमी क्षत्रपांचा प्रवेश होणे हा नियतीचाच खेळ होता. हे क्षत्रप म्हणजे कुशाणवंशीय कनिष्काने नेमलेले प्रांताधिकारी. कनिष्काने आधी कच्छ जिंकून तेथे कार्दमक वंशीय चष्टनाची नेमणूक केली तर शूर्पारकाच्या उजवीकडच्या प्रांतात अश्मकाच्या वरील भागात भूमकाची नेमणूक केली. कनिष्काच्या मृत्युनंतर कुशाण साम्राज्य कमजोर होवून हळूहळू लयास जाऊ लागले व ह्याच सुमारास क्षत्रपांची महत्वाकांक्षेने उचल खाऊ लागली. भूमकाने गुर्जर, काठेवाड, माळवा, कुकूर प्रांताचा ताबा मिळवला. भूमकाचा पुत्र नहपान हा पित्याहूनही अधिक महत्वांकांक्षी, स्वपराक्रमाने त्याने इकडील आद्य सत्ताधीशांना हळूहळू प्रतिष्ठानपावेतो ढकलत नेले. शिवस्वातीची राज्यलक्ष्मी हरण केली. हा नहपान मोठा चतुर होता. संस्कृतीविहीन, धर्मविहीन रानटी टोळ्यांतला हा शकवंशीय. पण दुसर्‍याचे राज्य हरण करतानाच इकडील सामान्य जनतेला आपलेसे करण्याचे धोरण मात्र त्याने स्वीकारले. भूमकाने केलेला राज्यविस्तार त्याने गोवर्धन जिंकून अधिक वाढवला व त्याची नजर नंतर तेथून ४० कोसांवर असलेल्या सह्याद्रीच्या गाभ्यातील मावळ प्रदेशावर पडली. मामलहार प्रांत त्याने लवकरच आक्रमिला. नहपानाने त्याची मुलगी दख्खमित्ता (दक्षमित्रा) हिचे लग्न त्याने दिनिकाचा पुत्र उशवदात (ऋषभदत्त) ह्याचेशी लावून दिले. हा उशवदात मोठा दानशूर. ह्याने जो दानधर्म केला तो मनापासून केला का केवळ इथल्या अज्ञ जनांना आपलंसं करण्यासाठी केला हे  समजणं अवघड जातंय. उशवदाताने इथे येऊन त्या डोंगरापासून पाच मैलावर असलेले करजिक (करजगाव) गाव धर्मादाय केले त्याबद्दलचा एक लेखच त्याने त्याच्या अंतर्भागात खोदलेल्या त्या भव्य लेण्याच्या एका भिंतीवर कोरून ठेवला.

सिधं | रञो खखरातस खतपस नहपानस जामातरा दीनीकपुतेन उसभदातेन...........भोजापयिता वलूरकेसु लेणवासिनं पवजितानं चातुदिसस सघसयानपथ गामो करजिको दतो सवान वासवासितानं |

राजा क्षहरात वंशीय क्षत्रप नहपान ह्याचा जावई दिनिकाचा पुत्र ऋषभदत्त ह्याने तीन हजार गाई दान दिल्या, बनासा नदीवर सुवर्णदान करुन घाट बांधला, देवांना व ब्राह्मणांना सोळा गावे दान दिली. पुण्यक्षेत्र प्रभास येथे ब्राह्मणांना ८ भार्या दान केल्या, दरवर्षी एक लाख जनांना भोजन घातले त्याने ह्या वलूरक लेण्यात वर्षाऋतूत राहणार्‍या सर्व भि़क्षूंच्या निर्वारार्थ करजिक गाव दान दिले.
   नहपान हा महाक्षत्रप झाल्यानंतरच सातवाहन साम्राज्य खूपच क्षीण झाले होते. पश्चिमेकडून होणार्‍या व्यापारावर शकांचे नियंत्रण प्रस्थापित झाले होते. सातवाहनांशी होणारा व्यापारच बंद पडल्यावर धनाचा ओघ वेगाने आटू लागला. सातवाहनांचे बलशाली साम्राज्य केवळ प्रतिष्ठान आणि त्याच्या आसपासचा प्रदेश इतक्या मर्यादित परिसरापुरतेच सिमीत झाले होते. शिवस्वाती सातकर्णी अतिशय नाकर्ता ठरला होता. अशातच शकसंवताच्या जवळजवळ प्रारंभीच शिवस्वाती आणि गौतमी बलश्रीच्या पोटी एक पराक्रमी पुत्र जन्माला आला, तो म्हणजे गोतमीपुतस सातकनिस अर्थात गौतमीपुत्र सातकर्णी.
         जनांना संघटीत करुन ह्याने आधी बेणा (वैनगंगा) नदीकाठचा प्रदेश जिंकून घेतला आणि पौनी (पवनार) प्रदेशावर ताबा मिळविला व स्वत:स बेणाकटकस्वामी असे घोषित करुन घेतले. त्यानंतर त्याने नाशिकजवळील गोवर्धनावर स्वारी करुन नहपान क्षत्रपाचा संपूर्ण पराभव केला. गोवर्धनातील विजयी शिबिरातून त्याने जवळील त्रिरश्मी पर्वतावरील भिख्खूसंघासाठी अजकालकीय नावाच्या शेताचे दान दिले. युद्धाच्या ह्या धामधूमीत नहपान मात्र पसार झाला आणि सह्याद्रीच्या निबिड पर्वतराजीचा आश्रय घेऊन लपला. पण गौतमीपुत्राने त्याचा पाठलाग सोडला नाही. गोवर्धन ते ह्या वलुरकादरम्यानच्या सह्याद्री पर्वतात त्याचे नहपानाबरोबर तुमूळ युद्ध झाले शेवटी त्याने नहपानाचा संपूर्ण वंशविच्छेद केला व स्वतःस क्षहरातवंसनिर्वंसकरस असे म्हणवून घेतले. परकीय शकांपासून त्याने ह्या भूमीला मुक्त केले व महाराष्ट्राच्या आद्य राजवंशाची पुनर्स्थापना केली. नहपानाचा नासिक्यातील पराभव ते त्याचा सह्याद्रीत झालेला वंशसंहार ह्या घटना केवळ १५ दिवसांतच वेगाने घडून आल्या.त्यानंतर गौतमीपुत्राने वलुरक लेणीसमूहाला भेट देऊन करजक ग्राम पुन्हा धर्मादाय केले.  या सर्व घटना घडल्या शकसंवत ४७ च्या आसपास. 

मामाडे अमच परगत. मसु एथ लेनेस वालुरकेस वाथवान
पवजितान भिखुन निकायस महासघियान यपनय एथ मामालारे उतरे मगे गामे करजके..........भिखुहलपरिहारे च एथ निबधापेहि अवियेन आनत छतो विजयठसातारे दतो ठे पटिका सव १० [+] [८]

मामाड येथील अमात्य (पुरुगुप्त) यास आज्ञा करतात की येथील वलुरक लेण्यांत वास्तव्य करणार्‍या महासंघिक नामक भिक्षू संघाला निर्वाहाकरिता मामाड आहारातील उत्तरेच्या मार्गावरील करजक ग्रामात आम्ही भिक्षुहल दिले आहे म्हणून तुम्ही त्यांना त्या करजक गावातील भिक्षुहलाचा ताबा द्यावा.
या करजक ग्रामातील भिक्षुहल जमिनीच्या सवलती आम्ही देत आहोत- या जमिनीत कोणी (अधिकार्‍यांनी) प्रवेश करु नये, त्यात हस्तक्षेप करु नये तशाच अन्य सवलती दिल्या आहेत. या सर्व सवलती तुम्ही त्यांना द्याव्या आणि हा करजक गाव आणि त्याच्या भि़क्षुहलविषयक सवलती यांची नोंद तुम्ही करवावी. ही आज्ञा तोंडी दिली आहे. ती या विजयी शिबिरात राजाने दिलेली आहे. ती पट्टीका संवत्सर १८, वर्षापक्ष ४, दिवस १ या दिवशी शिवस्कंदगुप्ताने तयार केली.

  इतिहासाचा इतका पट उलगडल्यानंतर आता जाउया या भारतातील एका अद्वितीय चैत्याच्या भेटीला. 


कार्ल्याचे तीमजली विहार-

 सुरुवातीच्या लेण्यांतील महायान काळातील बुद्धप्रतिमा व विहार

वर जायला खोदून काढलेला अंगच्याच कातळातील जिना-

विहारातून दिसणारे एकवीरा मातेचे मंदिर
 
  कार्ले लेणी समुहात भिख्खूंच्या वास्तव्यासाठी खोदलेली निवास स्थाने किंवा विहार, पाण्याच्या टाक्या हे सगळे विचारात घेतले तर एकूण सोळा गुंफा आहेत. कार्ल्याची लेणी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इथे एकाच समूहात एक चैत्यगृह (ज्यामध्ये स्तूप असतो असे प्रार्थनास्थळ) आणि १५ विहार (विश्रांतीचे ठिकाण) अशी एकूण १६ लेणी आहेत. विहार एक मजली किंवा तीन मजली आहेत.एका गुंफेतून दुसरीकडे जाता यावे यासाठी पाषाणाच्या आतून जिना आणि मार्ग खोदलेले आहेत. सुरवातीला जेव्हा हि लेणी खोदण्यासाठी कारागीर इथला कातळ फोडु लागले तेव्हा दगडाच्या कपच्या निघू लागल्या. हा दोष लक्षात आल्यावर त्यांनी त्या जागेत थोडे खोदकाम करुन त्यात विहार केले आणि खडकाच्या वरील भागात खोदकाम करुन कायमस्वरुपी निवासाचे विहार निर्माण केले. गेल्या दोन हजार वर्षात झालेल्या पाउसपाण्यामुळे इथल्या कातळाचा दर्शनी भाग कोसळला असावा असे अवशेषावरुन दिसून येते. ह्या मजल्यांवर जाण्यासाठी अंगचेच भुयारी जिने खोदून काढलेले आहेत. येथे असलेल्या भारतीय पुरातत्व विभागाने वरच्या पातळीवरील सर्व गुंफाना लाकडी दारे बसवून त्यांना कुलुपे ठोकून टाकली आहेत. त्यामुळे वरच्या पातळीवरील गुंफा बघणे शक्य होत नाही. साधारण ३ वर्षांपासून येथे जाण्याचा हा मार्ग बंद करून टाकण्यात आलेला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही विहारांत जायला बंदी आहे.सुरुवातीच्या विहारातच बोधीसत्वाची मूर्ती आहे. हा महायान विहार अर्धवट खोदलेल्या अवस्थेत आहे. ह्या अर्धवट विहारांवरुन लेणी कशी खोदण्यात येत असे ह्याची कल्पना सहजी करता येत असे.
       कार्ले लेण्यातील बौद्ध भिख्खूंचे निवासस्थान असलेली फक्त एक गुंफा बघण्यासाठी उघडलेली असते. समोर एक व्हरांडा,त्याच्या मागे हॉल व हॉलच्या तिन्ही भिंतींमध्ये भिख्खूंचे कक्ष अशी रचना आहे. व्हरांडा व हॉल या मध्ये असणार्‍या भिंतीत दोन गवाक्षे आहेत व एक प्रवेशद्वार आहे. हॉलच्या मागच्या भिंतीवर मध्यभागी भगवान बुद्धांचे एक बास रिलिफ म्हणजे उठावाच्या पद्धतीचे शिल्प कोरलेले आहे. येथे वास्तव्य करणार्‍या भिख्खूंचे आयुष्य अतिशय साधे व आत्यंतिक कष्टप्रद असले पाहिजे या बद्दल काहीही शंका नाही.
 

भारतातील सर्वोत्कृष्ट चैत्यगृह- गुंफा क्रमांक ८:-

   आता आपण कार्ले लेणीसमुहातील सर्वात महत्वाचे लेणे पहाणार आहोत. कार्ले येथील चैत्यगृह संपुर्ण पश्चिम भारतातील लयनस्थापत्यातील सर्वोत्कृष्ट चैत्यगृह आहे. हे लेणे वापरात असताना त्याच्या आसपास आणखी सोळा लेणी खोदली गेली. हि लेणी महायान काळातही वापरात होती असे दिसते.म्हणून हे ठिकाण महत्वाचे बौध्द केंद्र होते असे मानण्यास जागा आहे.कार्ल्याची लेणी ही खास समजली जातात - कारागिरी आणि लोकांचे योगदान अशा दोन्ही अर्थाने. इ. स. च्या पहिल्या शतकात यांचे बांधकाम सुरू झाले असावे.येथील खांब प्रेक्षणीय आहेत, अष्टकोनी खांबांवर वरच्या भागात कोरलेली शिल्पे आहेत. शिल्पांमध्ये हत्ती, पुरूष आणि स्त्रिया आहेत. जोडप्यांची कोरीव शिल्पे बाह्य भागात आहेत, आणि एक खास असा सिंहांचा स्तंभही आहे. आणि रचना ही एकाच मोठ्या योजनेचा भाग असल्याप्रमाणे आहे (नंतर आधीच्या बांधकामाला न शोभणारी अशी भर घातलेली नाही). सर्व थरातील लोकांनी दान देऊन ही लेणी बनवली आहेत असे आढळून आले आहे. पण लेण्यांचे काम हे भूतपाल नावाच्या व्यापार्‍याने करवून आणवले. कार्ल्याचे जुने नाव वेळूरक असे असावे. धेनूककट आणि सोपारा, तसेच वेजमती या गावांमधील लोकांनी, (धेनूककट येथील "यवनांनी") या कामाला पैशाचे पाठबळ (दान) दिले असेही दगडांवर कोरलेले मिळते. ऋशभदत्त (उसवदत्त) आणि वशिष्ठीपुत्र पुळुमवी ( सातवाहन राजा, उच्चार माहिती नाही) ही जमीन वेळूरक संघाला दिली असे उल्लेख आहेत.

कार्ले येथील चैत्यगृहाची रचना
 
        सर्वोत्कृष्ट चैत्यगृह असलेले लेणे क्रमांक ८ हे १३.८० मीटर रुंद, ३७.८७ मीटर खोल आणि १४.०२ मीटर खोल आहे. या लेण्यांची आतली स्थिती अधिक चांगली आहे. आतील भागात इतर लेण्यांत जसे पावसाने नुकसान झाले आहे तसे इथे दिसत नाही याचे कारण थोडा आडोसा व्हरांड्यासारख्या भागाने तयार झाला आहे. आतील लाकडी छतही जवळजवळ २००० वर्षांनंतरही बर्‍यापैकी सुस्थितीत आहे.कार्ले चैत्याची रचना तशी सह्याद्रीत असणार्‍या सर्वसाधारण चैत्यगृहांसारखीच. पुढ्यात जवनिका, जवनिकेतल्या भिंतींवर उंचच उंच गवाक्षांसारखी रचना. मधेमध्ये युगुलं कोरलेली. ही युगुलं ह्या लेणीसाठी दानधर्म केलेल्या दात्यांची असावीत. त्यानंतर मुख्य चैत्यगृहात प्रवेश, दोन्ही बाजूंना पर्सिपोलीटन धर्तीच्या स्तंभांच्या रांगा, त्यांजवर हत्ती घोडे आणि त्यांवर बसलेली युगुलं खोदलेली. गजपृष्ठाकार छत आणि त्या छताच्या शेवटाकडे आणि दोन्ही बाजूंच्या मधोमध एक भव्य स्तूप. अगदी हर्मिकेवरील २२०० वर्ष जुन्या लाकडी छतासह अस्तित्वात असलेला.याची आता सविस्तर माहिती घेउया.
     .या गुंफेच्या प्रवेशद्वाराजवळ पुरातत्त्व खात्याने आणखी एक मजबूत कुंपण उभारलेले आहे व आत जाण्याआधी एक सुरक्षा रक्षक तुम्ही प्रवेशपत्रिका घेतलेली आहे किंवा नाही हे परत एकदा तपासतो. प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस डावीकडे सम्राट अशोक कालीन स्थापत्याला अनुसरून असलेला (इ.स.पूर्व 300 ते 200 या कालातील) आणि 16 बाजू असलेला असा एक भव्य सारनाथ येथील अशोकस्तंभाच्या धर्तीचा  सिंह स्तंभ अर्थात अशोकन लायन पिलर उभा आहे.हा सिंहस्तंभ अग्मिमित्रणकाने उभारलेला आहे.अतिशय भव्य. घेरा इतका प्रचंड कि चार माणसांच्याही कवेत मावू शकणार नाही. महाराष्ट्रात असे अशोकस्तंभ केवळ दोनच ठिकाणी आहेत. एक इथे आणि दुसरा कान्हेरी येथे. कान्हेरी ही कार्ले चैत्याची भ्रष्ट नक्कल आहे. तिथे चैत्यगृहाच्या बाहेरील दोन्ही बाजूस असे एकेक स्तंभ आहेत. त्याजवरुन कार्ले येथेही पूर्वी अजून एक सिंहस्तंभ असावा असे वाटते. अर्थात आज केवळ एकच स्तंभ येथे शिल्लक दिसतोय. या शीर्षयुक्त स्तंभापैकी एक ध्वज सिंहध्वज आहे. हा सिंहध्वज सारनाथ येथील अशोकस्तंभाच्या धर्तीचा आहे. दुसरा ध्वज कोणता हे आज कळणे कठीण आहे. बहुधा दुसरा ध्वज चक्रध्वज असावा. कान्हेरी येथील चैत्यगृहाचे बरेच घटक कार्ले येथील चैत्यगृहाशी मिळते जुळते आहेत. आणि कान्हेरी येथील चैत्यगृहाला दुसर्‍या बाजुला चक्रध्वज आहे. यावरुन कार्ले येथील दुसरा ध्वज चक्रध्वज किंवा सिंहध्वज असावा. ध्वजालगतची भिंत अगदी सिंहाच्या पातळीपर्यंत उंच आहे व त्यात खाचा आहेत यावरुन लेण्याच्या दर्शनी भागात लाकडी पृष्टभाग बसवला जात असावा असा निष्कर्ष काढता येतो.
        हा स्तंभ एकसंध असून, त्याची उंची साधारणपणे ४० फूट आहे. या स्तंभाची बैठक वर्तुळाकार असून, अंग सोळा कोनांमध्ये घडवले आहे.  ह्याची रचना अदभुत आहे. उंचच उंच जवळपास सोळा कोनी स्तंभ, त्यावर आमलक, त्यावर हर्मिकेची चौकट आणि त्यावर सिंहप्रतिमा. निर्विवादपणे देखणा हा स्तंभ आवर्जून निरखावा असाच आहे.

 चैत्यगृहाच्या पुढील भागात असलेला विशाल सिंहस्तंभ
 
या स्तंभाच्या डोक्यावर चारी दिशांना तोंड करून बसलेले चार सिंह कोरलेले आहेत. या चार सिंहांच्या मागील बाजू एकमेकास जोडलेल्याच ठेवलेल्या आहेत. या वरून हे चारी सिंह एकाच पाषाणातून कोरले आहेत हे स्पष्ट होते. खालून बघताना या सिंहांच्या मुखात कोरलेले दात स्पष्ट दिसू शकतात. या अशोक स्तंभाला लागूनच व संपूर्ण चैत्यगृहाचे पाऊसपाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून पाषाणातच कोरलेल्या एका बाह्य पाषाण पडद्याचे अवशेष आजही स्पष्टपणे दिसत आहेत. हा पडदा चैत्यगृहाच्या तळाच्या पातळीवर खोदलेल्या 3 दणकट स्तंभांच्या मजबूतीवर जागेवर राहिलेला असावा. या पडद्याच्या वरच्या भागात चैत्यगृहात हवा व उजेड भरपूर प्रमाणात यावे यासाठी म्हणून खोदलेल्या 3 मोठ्या गवाक्षांचे अवशेष दिसत आहेत. या पडद्याच्या दोन्ही कडांच्या जवळील भिंती आजही उभ्या आहेत. या भिंतींवर चौरस आकाराची अनेक छिद्रे पाषाणात पाडलेली दिसतात.या छिद्रात लाकडी खुंटी ठोकून त्यावर सजावटीचे आणि रेशमी किंवा जरीचे भरतकाम केलेले कापडी किंवा रेशमी फलक  त्या काळी टांगत असत. या सर्व सजावटी नंतर हे चैत्यगृह किती भव्य आणि रूबाबदार दिसत असेल याची कल्पना आजही करता येते. आज या बाह्य पडद्याच्या बाजूच्या भिंती व तळाला असलेले स्तंभांचे अवशेष एवढेच काय ते शिल्लक आहे. या बाह्य पडद्याच्या व त्याच्या मागे असलेल्या अंतर्गत पडद्यांच्या मध्ये एक पडवी आहे. ही पडवी 15.85 मीटर (52फूट) रूंद आणि 4.57 मीटर (15फूट) खोल या आकाराची असून या पडवीतून आपल्याला पुढील व्हरांड्याकडे जाता येते. 
 
 
 a
 चैत्यगृहाच्या वरांड्यातील चैत्यकमानी, सज्जे, प्रासाद व मुर्ती-
 
   पुढचा व्हरांडा आणि चैत्यगृह यांमध्ये पाषाणातच खोदलेला आणखी एक पडदा आहे. या पडद्याच्या वरच्या भागात हवा खेळती राहण्यासाठी व उजेड आत येण्यासाठी म्हणून खोदलेले एक भव्य अर्धवर्तुळाकार आकाराचे गवाक्ष आहे. प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर चैत्यगृहाच्या व्हरांड्यात आल्यानंतर पिंपळपानाकृती कमान आपले लक्ष वेधून घेते. या कमानीवर लाकूडकामासाठी खाचा केलेल्या आहेत.
 
 
 
 
a
    
 
    कार्ले येथील हत्तींचे शिल्प
   कारागिरांनी सह्याद्रीच्या कठीण दगडात निर्माण केलेले बहुमजली कोरीव काम बघून मन मंत्रमुग्ध होऊन जातं. दोन्ही बाजूंना तळाशी तीन मोठे हत्ती कोरले आहेत, जणू काही हत्तींनी ते संपूर्ण काम आपल्या पाठीवर तोलून धरले असल्याचा भास होतो. या लेणींमध्ये हत्ती, बुद्ध वेदिका, गवाक्षे, सज्जे, चैत्यकमानी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रचना आहेत. मध्येमध्ये आकाशभ्रमण करणारे यक्ष आणि गंधर्वसुद्धा या ठिकाणी कोरलेले दिसतात. हे सगळेच कोरीव काम अप्रतिम आणि त्या वेळच्या लोकांच्या कष्टांची, कौशल्याची आणि चिकाटीची जाणीव करून देणारे आहे.
 कार्ले चैत्याची रचना तशी सह्याद्रीत असणार्‍या सर्वसाधारण चैत्यगृहांसारखीच. पुढ्यात जवनिका, जवनिकेतल्या भिंतींवर उंचच उंच गवाक्षांसारखी रचना.व्हरांड्यातून चैत्यगृहात प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वारे खोदलेली आहेत. या अंतर्गत पडद्याच्या बाह्य (बाह्य पडद्यासमोर असलेला) पृष्ठभागाच्या द्वारे आणि गवाक्ष सोडून राहिलेला उर्वरित सर्व भाग हा 'बास रिलिफ'(bass reliefs)उठावाच्या शिल्पांनी सजवलेला आहे. या शिवाय पुढील व्हरांड्याच्या दोन्ही बाजूंच्या भिंती व बाह्य पडद्याच्या कडांचा आतील पृष्ठभागाचा भाग यावरही शिल्पे कोरलेली आहेत. कोरलेल्या शिल्पांच्यात, त्या कालात अगदी सर्वसामान्यपणे वापरात असलेले कठड्यांवरील कोरीवकाम (या प्रकारचे कोरीव काम सांची येथील स्तूपाच्या बाह्य भिंतीवर दिसते.),  कार्ले चैत्यगृहात बाहेरील पडदा व बाजू यावर बुद्ध शिल्पे बर्‍याच् नंतर म्हणजे महायान पंथ रूढ झाल्यावर बसवलेली आहेत. (साधारण इ.स. 200)

a

a

ह्या शिल्पांच्या वर आहे ती गवाक्षांसारखी उंचच उंच रचना. इथे अगदी त्रिमितिय आभास दिसत आहे. प्रत्येक मजल्याला वेदिकापट्टी व त्यांवर पिंपळपानाकृती गवाक्ष. असे एकावर एक मजले.






 
1


 


 

 

मधूनच युगुलांमध्ये बोधीसत्व, अवलोकितेश्वर आदी प्रतिमा कोरलेल्या दिसत आहेत. ही महायान शिल्पकला. बोधीसत्वाच्या ह्या मूर्ती ३र्‍या/४ थ्या शतकात येथे कोरलेल्या असाव्यात.

a

 युगुले व इतर नक्षीकाम यांचा समावेश आहे. येथे अनेक मिथुन युगलांच्या जोड्या कोरलेल्या आहेत. शिल्पकारांनी स्त्रियांच्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत बांगड्या, पायात विविध आकाराचे तोडे, कमरेला मेखला, गळ्यातील हार, कर्णफुले आणि कपाळावर ठसठशीत कुंकू अशी विविध प्रकारची आभूषणं अतिशय सुरेखपणे कोरली आहेत. ही युगुलं ह्या लेणीसाठी दानधर्म केलेल्या दात्यांची असावीत. काही ठिकाणी भगवान बुद्धांचे नंतरच्या कालात बसवले गेलेले पुतळेही दिसत आहेत. अशा प्रकारची कोरीव शिल्पे कर्नाटकतील ऐहोले किंवा पट्टडकल येथेही बघता येतात. मात्र तेथील शिल्पातील स्त्री-पुरुष व कार्ले येथील शिपातील स्त्री-पुरुष यांच्या शरीराची ठेवण,बांधा, केशरचना, वस्त्रप्रावरणे आणि अंगावरील अलंकार यात बराच फरक दिसून येत असल्याने या परिसरात राहणारे त्या काळचे लोक व ऐहोले-पट्टडकल मधील लोक यांत बराच फरक असला पाहिजे हे स्पष्ट होते. मोकळ्या जागेच्या दोन्ही बाजूंना भिंतीवरही अप्रतिम कोरीव काम करण्यात आलं आहे. 

a---a

 पहा ही पुष्ट युगुलं. किती देखणी आहेत ही. हीनयान शिल्पकलेचा अतिशय उत्कट अविष्कार.
कुणी एकमेकांच्या कवेत हात घालून उभं आहे तर कुणी किंचितसं फटकून उभं आहे.

a---a

 कुणी उभ्याउभ्याच नमस्कार करीत आहे तर कुणी अगदी आरामात मस्तकी हात घेऊन उभं आहे.

a

 काय देखणे विभ्रम आहेत एकेकाचे.

a

 ह्यांचे वेष तरी पाहा ना. साधा, जणू ही शेतकरी कुटुंबे आहेत. पुरुषांनी मुंडासं बांधलंय. कासोटा पक्का खेचून बांधलाय. स्त्रीयांच्या कपाळी मोठा दागिना, कानांत डूल, गळ्यात माळ आणि कमरेला मेखला. साधासाच पण सुंदर वेष.

 

  भारतातील सर्वात मोठे चैत्यगृह

  त्यानंतर मुख्य चैत्यगृहात प्रवेश करुया. 

 ओळींत असलेल्या कोरीव स्तंभ व त्यावर कोरलेली शिल्पे छतावरील फासळ्यांसह
 

बाहेरील सिंहस्तंभाची प्रतिकृती मध्यभागी स्तूप, उजवीक्डे सिंहस्तंभ व डावीकडे चक्रस्तंभ (हा चक्रस्तंभ कदाचित पुर्वी अस्तित्वात असावा)

a

 दोन्ही बाजूंना पर्सिपोलीटन धर्तीच्या स्तंभांच्या रांगा, त्यांजवर हत्ती घोडे आणि त्यांवर बसलेली युगुलं खोदलेली. गजपृष्ठाकार छत आणि त्या छताच्या शेवटाकडे आणि दोन्ही बाजूंच्या मधोमध एक भव्य स्तूप. अगदी हर्मिकेवरील २२०० वर्ष जुन्या लाकडी छतासह अस्तित्वात असलेला. ह्याच चैत्याच्या मधल्या दरवाजाच्या उजव्या बाजूच्या पट्टीकेवर कोरलेला दिसतोय तो ऋषभदत्ताचा शिलालेख.कार्ले लेण्यांमधील चैत्यगृह हे संपूर्ण भारतात सापडलेल्या या प्रकारच्या लेण्यांमध्ये सर्वात मोठे व विशाल आहे असे म्हणता येते. पुढच्या दरवाजापासून मागील भिंतीपर्यंत या कक्षाची खोली 37.87 मीटर असून रूंदी 13.87मीटर तर उंची 14.02मीटर एवढी आहे. या चैत्यगृहाची रचना म्हणजे एक प्रार्थना कक्ष व त्याच्या पुढे एक व्हरांडा अशी आहे.


 प्रार्थनाकक्षाचे 3 भाग करता येतील. यात मध्यवर्ती मोकळी जागा,या जागेच्या दोन्ही बाजूंना असलेल्या स्तंभांच्या ओळी व त्यांच्या बाजूंना असलेले कडेचे पॅसेज यांचा समावेश करता येईल. स्तंभांच्या ओळी मागील बाजूला असलेल्या स्तूपाच्या मागे अर्धवर्तुळाकार आकारात एकमेकाला जाऊन मिळतात. या रचनेमुळे मागील बाजूस असलेला हा स्तूप पूजास्थान असल्याचे स्पष्टपणे लक्षात येते. आत खोदलेले स्तंभ त्या कालातील स्थापत्याप्रमाणे अतिशय हुशारी व कष्टपूर्वक कौशल्याने खोदलेले आहेत. प्रत्येक स्तंभाची रचना बघितली तर पायर्‍या पायर्‍या काढलेला पिरॅमिडच्या आकाराचा तळाचा भाग,त्यावर एखाद्या माठासारखा गोलसर दिसणारा भाग आणि त्यावर अष्टकोनी आकाराचा स्तंभ अशीच आहे. स्तंभांच्या माथ्यावर उलट्या ठेवलेल्या फुलदाणीसमान दिसणारा भाग,त्याच्यावर एक गोल चकती व त्यावर परत पायर्‍या काढलेला पण उलटा ठेवलेला पिरॅमिड अशी रचना दिसते.

   हा माथ्याचा भाग व छत यामध्ये असलेल्या स्तंभशीर्षांवर (capital) स्त्री,पुरूष आरूढ असलेले हत्ती व घोडे हे प्राणी कोरलेली शिल्पे आहेत. स्तूपाच्या मागील बाजूस असलेले7स्तंभ फक्त अष्टकोनी आकाराचे असून त्यावर कोणतेही कोरीव काम नाही. 
a
स्तंभांच्या ओळीच्या बाजूला असलेल्या पॅसेजचे छत सपाट आहे. मात्र मध्यवर्ती भागातील छत हे वक्राकार आकाराचे आहे आणि ही वक्रता मागील बाजूस असलेल्या स्तूपाच्या डोक्यावर असलेल्या छताच्या अर्धवर्तुळाकार वक्रतेला बेमालूमपणे मिळवलेली आहे. छताच्या आतील बाजूस, छताच्या वक्रतेला मिळून येतील अशा आकाराच्या शिसवी लाकडाच्या तुळया एकमेकाला समांतर अशा बसवलेल्या आहेत.या तुळयांच्या मध्ये स्तंभांच्या ओळींना समांतर असे शिसवी वासे बसवलेले आहेत. 

कार्ले चैत्यातील लाकडी फासळ्या आणि स्तूपावरील हर्मिकेवरील छत्र आजही तितकेच जुने आहे. अर्थात काही काही फासळ्या मात्र जीर्णोद्धार करताना नव्याने बसवलेल्या दिसतात. ह्या फासळ्या बसवताना दोन्ही बाजूंना आधी खाचा कोरल्या जायच्या व त्यात ह्या फासळ्या बसवल्या जायच्या. अर्धवर्तुळाकार अशा ह्या फासळ्या स्तूपानजीक गेल्यावर मात्र एकत्रित येतात व त्यामुळे स्तूप कमालीचा देखणा दिसत राहतो.

कार्ल्याचा स्तूपही भव्य. खाली जोतं जे पाताळ दर्शवतं. जोत्यावर वेदिकापट्टी. बांधीव स्तूपांवर वेदिकापट्टी ही रुंद आणि विस्तीर्ण असे ज्यावरुन चालत स्तूपाला फेरी मारणे शक्य व्हावे पण सह्याद्रीतील गिरिकुहरांत असणार्‍या कोरीव स्तूपांवर हे शक्य नाही. वेदिकापट्टीच्या वर गोलाकार अण्ड जे पृथ्वीचं प्रतिक आहे. आणि त्या अण्डावर हर्मिकेची चौकट व त्यावर सात पायर्‍या जे बौद्ध धर्मातील सप्तस्वर्गांचं प्रतिक आहे. ह्या हर्मिकेत एक छिद्र. स्तूप कोरल्यावर ह्या छिद्रात बुद्धाचे किंवा काही श्रेष्ठ बौद्ध धर्मगुरुंचे शारीर अवशेष ठेवले जात. हर्मिकेवरील ह्या छिद्रात लाकडी छत्र बसवले जाई. भाजेतील छत्र आज नाहिसे झाले आहे तर बेडसे चैत्यातील कमळाच्या फुलासारखे देखणे छत्र आजही विद्यमान आहे तर ह्या कार्ले स्तूपातील छत्र चौकोनी असून आजही तितकेच देखणे आणि त्याने जणू संपूर्ण स्तूपाला कवेत घेतल्यासारखे दिसू लागते. भूतपालाने हे छत्र प्रथम चैत्यावर धरले असेल, नहपान क्षत्रप, त्याचा जावई ऋषभदत्त पत्नी दक्षमित्रासह ह्याच चैत्याला नमन करत असेल, गौतमीपुत्रानेही ह्याच चैत्याला वंदन केले असेल आणि वाशिष्ठीपुत्र पुळुवामी सुद्धा ह्याच चैत्यगृहात प्रार्थना करण्यासाठी येत असेल. आज  त्याच चैत्यासमोर आपण उभे आहोत, जिथे हे दिग्गज आणि कित्येक अनामिकही पूर्वी येऊन गेले असतील.

a

a---a



 

स्तूप, हर्मिका, लाकडी छत्र व छतावरील अजूनही शाबूत असलेल्या लाकडी फासळ्या

छतात बसवलेल्या शिसवी तुळया व वासे हे सर्व 2000 वर्षांपूर्वी बनवलेले मूळ स्वरूपातील आहेत. हे लाकूड सर्व लाकडांत दणकट व वाळवी न लागणारे असे मानले जाते. मात्र या एवढ्या अवाढव्य तुळया व वासे त्यावेळी कसे बनवले असतील व उचलून जागेवर कसे बसवले असतील याची कल्पनाच करता येत नाही.
a

          ह्याच चैत्यगृहात एका स्तंभांवर एक आश्चर्य कोरलेले आहे. ते म्हणजे स्फिंक्स. स्फिंक्स हा ग्रीक दंतकथांमधील मानवी शिर आणि शरीर सिंहाचे असलेला काल्पनिक प्राणी. इजिप्तच्या पिरॅमिड्ससमोरील स्फिंक्स तर प्रसिद्धच आहे. पण भारतातही काही लेण्यांत ह्या स्फिंक्स प्रतिमा कोरलेल्या आहेत. स्फिंक्सबरोबरच अजूनही काही काल्पनिक प्राणी इकडील लेण्यांत दिसत राहतात. पैकी स्फिंक्स, ग्रिफिन, अथेनियन घुबड मी नाशिक लेण्यांत पाहिले आहेत तर भाजे लेण्यांत मी पॅगेसस, सेंटॉर इत्यादी प्राणी कोरलेले पाहिलेले आहेत. कार्ले लेण्यात मात्र केवळ स्फिंक्स आहे आणि तोही एकमेव. हा स्फिंक्स येथे शोधणॅ तसे जिकिरीचे आहे. हा आहे स्तूपाच्या डावीकडील खांबावरच्या मागच्या बाजूस. ही जागा प्रचंड अंधारी आहे. कृत्रिम प्रकाशझोताशिवाय हा स्फिंक्स दिसणे केवळ अशक्य आणि दिसला तरी हा स्फिंक्स उंचीवर असल्याने ह्याला नीटसे टिपता येणे तसे दुर्लभ आहे. ह्या स्फिंक्सवरही एक युगुल आरुढ झालेले दिसते.

          चैत्यगृहाच्या आत भगवान बुद्धांचे अस्तित्व कमल पुष्प किंवा स्तूप चित्र यासारख्या सांकेतिक चित्रांनीच फक्त दर्शवलेले आहे व भगवान बुद्धांचे शिल्प कोठेही दाखवलेले नाही. यावरून कार्ले बौद्ध मठ हा हिनयान कालखंडातील असला पाहिजे हे स्पष्ट होते. इ.स.पूर्व पहिले शतक ते इ.स. नंतरचे दुसरे शतक या कालखंडात हा मठ प्रथम खोदला गेला असे इतर पुराव्यावरून दिसते. चैत्यगृहाच्या बाहेर असलेल्या पडद्यावर बुद्धमूर्ती शिल्पे दिसतात. ही शिल्पे महायान कालात किंवा इ.स.200 ते 400 या कालात कधीतरी बसवली गेलेली असावीत.
    कार्ले लेण्यातील शिलालेख :-
कार्ले गुंफांना भेट दिल्यावर  प्रश्न निर्माण होतो की या गुंफांचा आणि या कालखंडातच (इ.स.पूर्व 200 ते इ.स.200) महाराष्ट्रावर व भारतीय द्विपकल्पावर राज्य करणार्‍या सातवाहन साम्राज्याचा संबंध कसा जोडायचा? या साम्राज्याच्या पाऊलखुणा या गुंफांमध्ये कोठे शोधायच्या? या शोधाची गुरुकिल्ली नाणेघाट प्रमाणेच या गुंफांमध्ये सापडणार्‍या शिला लेखांतच असली पाहिजे. सुदैवाने कार्ले गुंफा या भारतवर्षातील अनेक शक्तिमान व धनवान मंडळींच्या मदतीतून खोदल्या गेलेल्या असल्याने या ठिकाणी तब्बल 21 शिलालेख सापडतात. या शिला लेखांचा अर्थ लागला की या कालातील राजकीय परिस्थितीवर प्रकाश पडण्याची शक्यता दिसते.  लेण्याच्या सुरवातीला असलेल्या सिंहस्तंभावर असलेल्या शिलालेखापासून सुरवात करुया.

a

a

 लेण्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुंना असलेल्या जवनिकेत प्रचंड गजराज कोरलेले दिसतात.ह्या हत्तींसाठी दान कोणी दिलंय त्याचा शिलालेख या खांबावर कोरला आहे.
थेरानाम भयंत इंददेवस हथि च पुवा दो हथिनम् च उपरिमा हेथिमा च वेयिका दानम्

अर्थात दोन हत्ती व हत्तींच्या वर व खाली असलेल्या वेदिकांची भदंत इंद्रदेव ह्याने दिलेली देणगी.

  आणखी एका शिलालेखाचा आपण सविस्तर विचार करु.हा  शिलालेख समोरच्या व्हरांड्यातील डाव्या कडेच्या भिंतीवर कोरलेल्या तीन हत्तींच्या मस्तकावरील मोकळ्या कोरलेला आहे. या शिलालेखाचा विचार करण्याचे कारण म्हणजे हा शिलालेख हे चैत्यगृह कोणाच्या देणगीतून बनवले गेले आहे याचा स्पष्ट निर्देश करतो आहे. मूळ प्राकृतमधील शब्द असे आहेत.
 
"वेजयंतिता सेठिणा भूतपालेना सेलघरं परिनिठपितं जम्बुदिपाम्हि उत्तम "

बर्जेस याने केलेले या शिलालेखाचे भाषांतर खालीलप्रमाणे आहे.

“Seth Bhutapala from Vaijayanti has established a rock -mansion, the most excellent in Jambudweepa.”
         या शिलालेखाचे महत्त्व लक्षात येण्यासाठी थोड्या खुलाशाची गरज आहे असे वाटते. प्रचलित मराठीमध्ये या शिलालेखाचा अर्थ असा लावता येतो की संपूर्ण भारतीय द्वीपकल्पात सर्वोत्तम असलेले हे चैत्यगृह वैजयंती येथील एक श्रेष्ठी भूतपाल यांनी स्थापन केले. वैजयंती हे नाव कर्नाटकमधील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील बनवासी या गावाचे पुरातन काळातील नाव आहे. श्रेष्ठी म्हणजे कोणीतरी VIP किंवा महत्त्वाची व्यक्ती! म्हणजे हा शिलालेख आपल्याला सांगतो आहे की बनवासी गावातील भूतपाल या महत्वाच्या व्यक्तीने हे चैत्यगृह स्थापन केले आणि ते भारतवर्षातील सर्वोत्तम आहे. या बनवासी गावात कोणतेही पुरातन बौद्ध मठ वगैरे मिळालेले नाहीत. फक्त या कालखंडापासून अस्तित्वात असलेले मधुकेश्वर म्हणून एक शिव मंदीर आहे. या मंदीराला, शिल्प कोरलेली एक शिला, सातवाहन राजा हरितापुत शतकर्णी (इ.स.दुसरे शतक) याने दान केली होती व ही शिला आपल्याला आजही बघण्यास मिळते. या बनवासी गावापासून सुमारे 550 किमी (350मैल) अंतरावर असलेल्या या बौद्ध चैत्यगृहाची स्थापना करण्यासाठी बनवासी गावातील एक कोणी श्रेष्ठी एवढ्या उदारपणे मदत करतो आणि यानंतर 100 वर्षांनी राज्यावर आलेला सातवाहन राजा या दूरवरच्या मंदिराला एका शिल्प शिला भेट देतो; याचा अर्थ, इ.स.पहिले शतक या कालखंडापासूनच (ज्यावेळी कार्ले चैत्यगृह निर्माण केले गेले.) बनवासी गाव सातवाहन राजांच्या शासनाखाली तरी होते किंवा निदान बनवासी गाव व सातवाहन राजे यांचा काहीतरी निकट संबंध होता असा लावता येणे शक्य आहे. सातवाहन साम्राज्य कोठेपर्यंत पसरलेले होते त्याचा हा एक अप्रत्यक्ष पुरावाच म्हणता येईल.
   दुसरा शिलालेख चैत्यगृहाच्या बाहेर असलेल्या अशोक स्तंभावर कोरलेला आहे. प्राकृतमधील या शिलालेखाचे शब्द असे आहेत.

"महारठिस गोतिपुत्रस अगिमित्रणकस सिहयभो दानं "

बर्जेस भाषांतराप्रमाणे याचा अर्थ असा लावता येतो.

“From Agnimitranaka, son of Goti, a (Maharathi) great warrior, the gift of a lion pillar”

    अर्थ अगदी सरळ असल्याने त्यावर भाष्य करण्याची काहीच जरूरी नाही. सुरूवातीस या शिलालेखातील अग्निमित्र ही व्यक्ती म्हणजे शुंग राजघराण्यातील दुसरा राजा हा असला पाहिजे असे भाष्य बुहलर सारख्या काही इतिहास संशोधकांनी केलेले आहे.(कालिदासाच्या मालविकाग्निमित्र नाटकाचा हाच राजा नायक आहे.) परंतु या राजाचा काल इ.स.पूर्व 152 ते 141 हा असल्याने या स्तंभावर कोरलेले नाव या राजाचे नाही हे मान्य झाले. या स्तंभावरील अग्निमित्र हा एक महारथी आहे. सातवाहन शासनकालात महारथी हे नाव धारण करणार्‍या व्यक्ती या राज्याच्या एका भागाचे संपूर्ण शासन सांभाळणार्‍या महत्वाच्या पदावरील व्यक्ती असत. नाणेघाट गुंफेत महारथी "त्रिनक यिरो" याचा पुतळाच राजे,राणी व राजपुत्र यांच्या पंक्तीत उभारलेला होता व त्या पुतळ्याच्या डोक्यावर हे नावही कोरलेले होते. कित्येक महारथी स्वत:च्या नावाची नाणी पाडून घेत असत. अशी नाणी आजही उपलब्ध आहेत. या महारथी अग्निमित्राने जर स्वत:च्या नावाबरोबर आपल्या राजाचे नाव सुद्धा जर या स्तंभावर कोरून घेतले असते तर आपल्याला कितीतरी जास्त माहिती मिळू शकली असती.

    कार्ले गुंफांमध्ये फिरताना लक्षात येते की अनेक ठिकाणी म्हणजे भिंतीवरील दोन बास रिलिफ शिल्पांमध्ये, शिल्पातील रेलिंगवर, स्तंभांवर अशा अनेक ठिकाणी शिलालेख कोरलेले आहेत. एक रोचक गोष्ट अशी की दिसणारे हे सर्व शिलालेख फक्त प्राकृत भाषेत आणि ब्राम्ही लिपीमध्ये लिहिलेले आहेत. यावरून ज्या कालखंडामध्ये हे शिलालेख लिहिले गेले आहेत त्याची अचूक कल्पना येते. यापैकी बहुतांशी शिलालेख (एकवीस पैकी वीस) फक्त गुंफा क्रमांक 8 किंवा चैत्यगृह या ठिकाणीच कोरलेले आहेत. कार्ले बौद्ध मठाचा खर्च व तेथे निर्माण केलेल्या सर्व गुंफा व त्यातील शिल्पे यांच्या निर्मितीचा खर्च हा पूर्णपणे त्या कालातील सत्ताधीश व धनिक यांच्याकडून मिळालेल्या देणग्यांवरच चालत असे. यामुळे या चैत्यगृहातील बहुतेक शिलालेख, ते शिल्प किंवा स्तंभ हा कोणाच्या देणगीतून मिळालेल्या धनातून बनवले गेले आहेत हे फक्त सांगतात.त्यामुळे त्या काळातील काही गावांची नावे व व्यक्तींची नावे एवढीच माहिती त्यातून मिळत असल्याने या शिलालेखांना फारसे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व आहे असे मला तरी वाटत नाही. चैत्यगृहातील 15 शिलालेख या प्रकारचे आहेत व त्यामुळे या 15 शिलालेखांचा विचार करायचे फारसे कारण नाही.

कार्ले लेण्यातील जवळपास सर्वच स्तंभ शिलालेखांनी भरलेले आहेत. इतके विपुल शिलालेख कार्ले व्यतिरिक्त कान्हेरी लेणीसमूहांतही आहेत.

a

a---a

a---a

a

a---a

a---a

    चैत्यगृहातील उरलेले 5 शिलालेख व गुंफा क्रमांक 12 येथील एक महत्त्वाचा शिलालेख यांना ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे. या उरलेल्या 6 शिलालेखांपैकी 4 शिलालेखात, कोणत्या राजाच्या कारकीर्दीतील कोणत्या वर्षी ते शिल्प किंवा विहार खोदण्यासाठी धन दिले गेले याचा स्पष्ट उल्लेख असल्याने सातवाहन साम्राज्याच्या इतिहासाशी या शिलालेखांचा थेट संबंध जोडता येतो. सम्राट अशोकाच्या निधनानंतर सातवाहन घराणे दख्खनवर किंवा भारतीय द्वीपकल्पावर राज्य करू लागले असे म्हणता येते. सम्राट अशोकाने खोदवून घेतलेल्या एका शिलालेखात या राजघराण्याचा स्पष्ट उल्लेख असल्याने सातवाहन राजे सम्राट अशोकाचे मांडलिक राजे म्हणून दख्खनवर राज्य आधीपासूनच करत होते हे दिसून येते. सम्राटाच्या निधनानंतर लगेचच बहुदा सातवाहन राजांनी आपण सार्वभौम राजे असल्याचे जाहीर केलेले असावे. इ.स.पूर्व 220 ते179 या कालखंडात होऊन गेलेले या राजघराण्यातील पहिले तीन राजे होते सिमुक, कृष्ण व श्री सातकर्णी !
यानंतर आपण उरलेल्या व ते शिलालेख लिहिले गेले त्या वेळी राज्यावर असलेल्या राजांच्या नावाचे उल्लेख असलेल्या 4 शिलालेखांकडे वळूया. 14 क्रमांकाच्या शिलालेखामध्ये "वशिष्ठीपुत्र स्वामी श्री पुलुवामी" या सातवाहन राजाचा ऊलेख आहे. गुंफा क्रमांक 12 मध्ये असलेल्या 20 या क्रमांकाच्या शिलालेखामध्ये याच राजाचा उल्लेख "वशिष्ठिपुत्र श्री पुलुमयी" असा केलेला आहे. 19 क्रमांकाच्या शिलालेखात "गौतमीपुत्र सातकर्णी" याच्या नावाचा उल्लेख आहे असे मानले जाते. राजाचे नाव कोरलेले आहे तेथील अक्षरे पुसट झाल्याने दिसू शकत नाहीत. मात्र इतर संदर्भामुळे याच राजाचे नाव तेथे कोरलेले असावे या अंदाजाला पुष्टी मिळू शकते. शिलालेख क्रमांक 13 मध्ये "थोर राजा क्षह(स)रत क्षतप नहापन" राजाच्या नावाचा उल्लेख आहे. परंतु ऐतिहासिक क्रमाने गेले पाहू असता हा नहापन राजा इतर राजांच्या पूर्वी गादीवर होता असे दिसते त्यामुळे शिलालेख क्रमांक 13 चा विचार आपण सर्वप्रथम करुया.
      इ.स.पूर्व 220 मध्ये राजा सिमुक याने प्रस्थापित केलेले व त्याचा भाऊ कृष्ण व पुत्र श्री सातकर्णी (नाणेघाट प्रसिद्ध) यांनी वर्धित केलेले सातवाहन साम्राज्य पुढील वारसदार राजांच्या अधिपत्याखाली अबाधित राहिले. या पुढच्या कालखंडात लंबोदर(इ.स.पूर्व 87-69),अपिलक (इ.स.पूर्व 69-57),मेघस्वाती (इ.स.पूर्व 57-39)आणि स्वाती (इ.स.पूर्व 30-21) या राजांनी राज्य केले. मात्र या पुढची 40 वर्षे या साम्राज्यासाठी संपूर्ण अनागोंदी कारभार, बंडे व गोंधळाची ठरली. राज्याच्या वारसदारांचे आपापसातील कलह, अंतर्गत भांडणे, परदेशी सैन्याची आक्रमणे आणि बंडे यामुळे ही राजसत्ता या काळात अगदी खिळखिळी झाली होती. या 40 वर्षात 5 राजे गादीवर आले व गेले. इ.स.22 मध्ये अरिष्टक हा राजा गादीवर आला व अतिशय आकुंचित झालेल्या सातवाहन साम्राज्यावर त्याने पुढील 25 वर्षे किंवा इ.स.47 पर्यंत राज्य केले. या राजाच्या अखेरच्या दिवसात, गुजराथ व काठेवाड भागात आपली सत्ता प्रस्थापित करण्यात आधीच सफल झालेला शक क्षत्रप "भुमक" याने सातवाहन साम्राज्याचा भाग असलेल्या माळवा प्रांतावर स्वारी केली व अरिष्टक राजाच्या सैन्याचा पराभव करून माळवा प्रांत ताब्यात घेतला.
   क्षत्रप "भुमक" याचा वारसदार इ.स. 55 ते 60 या कालात कधीतरी सत्तेवर आला. मात्र तो भुमकाचा पुत्र होता की नाही यासंबंधी काहीच माहिती उपलब्ध नाही. इ.स.70 पर्यंत या पराक्रमी राजाने सातवाहनांकडून पूर्व माळवा (आकार), पश्चिम माळवा (अवंती), कोकण (अपरान्त) आणि उत्तर व मध्य महाराष्ट्र हे भाग जिंकून घेतले. या शिवाय त्याचे राज्य आधीच उत्तर गुजराथ, काठेवाड आणि पार अजमेर पर्यंतचा मध्य राजस्थानचा भाग या प्रदेशात विस्तारलेले होतेच. सातवाहनांवरील विजयानंतर हे राज्य उत्तरेला अजमेर ते दक्षिणेला पुणे,पश्चिमेला काठेवाड मधील द्वारका ते पूर्वेला मध्यप्रदेशातील सागर या चार सीमांपर्यंत विस्तारले.
        क्षत्रप भुमक याचा वारसदार असलेल्या व या विस्तीर्ण राज्याचा कर्ता होता "क्षहरत किंवा क्षसरत क्षत्रप नहापन".या राजाच्या नावाचा उल्लेख, शिलालेख क्रमांक 13 मध्ये असल्याचे आपण आधीच पाहिलेले आहे.क्षत्रप नहापन हा इ.स. 55 मध्ये गादीवर आला व इ.स.105 पर्यत तो राज्यकारभार बघत होता.       
      कार्ले मठ शुएन झांग याच्या भारत भेटीच्या वेळी अस्तित्वात नसावा कारण तो कार्ले मठाबद्दल काहीच लिहित नाही. त्याने फक्त  नाशिक येथील पांडवलेणी बद्दल उल्लेख केलेला आहे.या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर इ.स.400 पर्यंत या मठात राबता असावा असे वाटते.नाशिक लेण्यातील (पांडवलेण्यातील) नहपान क्षत्रपाचा जावई ऋषभदत्ताच्या शिलालेखात नहपानाचा उल्लेख क्षत्रप म्हणून् आला आहे तर त्याच्या कारकिर्दीचे वर्ष ४२ असे नोंदवलेले आहे.तर जुन्नरच्या मानमोडी लेण्यांमधील् शिलालेखात नहपान क्षत्रपाचा उल्लेख महाक्षत्रप म्हणून येतो.
[रञो] महाखतपस सामिनहपानस
[आ]मतस वछतगोतस अयमस
[दे]यधम च [पो]ढि मटपो च पुञथय वसे ४० [+] ६ कतो |

राजा महाक्षत्रप स्वामी नहपानाच्या वत्सगोत्री अर्यम अमात्याने हे टाके व हा मंडप (विहार) पुण्याप्राप्तीसाठी धर्मदाय म्हणून वर्ष ४६ मध्ये केला.

पांडवलेण्यातील आणि जुन्नरच्या ह्या शिलालेखांवरून ४ वर्षात नहपान क्षत्रपावरून महाक्षत्रप पदापर्यंत वर चढला. कदाचित सातवाहनांचे खूपसे राज्य त्याने मिळवल्याने हा किताब त्याला (कुषाणांकडून?) मिळालेला असू शकतो.

पण त्याचे हे महाक्षत्रपपद फार काळ टिकले नाही. लवकरच गौतमीपुत्र सातकर्णीने नाशिकच्या डोंगररांगांमध्ये नहपानाचा संपूर्ण पराभव करून त्याचा निर्वंश केला व आपले राज्य परत मिळवले.
मगध देशामध्ये राज्य करणार्‍या शुंग राजघराण्याची इ.स.पूर्व 26 मध्ये संपुष्टात आलेली कारकीर्द व कुषाणांचा इ.स. नंतरच्या पहिल्या शतकामध्ये झालेला उदय या दोन घटनांच्या मधल्या कालखंडातील उत्तर व वायव्य भारताचा इतिहास, फार अल्प माहिती उपलब्ध असल्याने, बराचसा अज्ञातच आहे असे म्हणता येते. इ.स.पूर्व 170 मध्ये कुषाण (Yueh-chi) या नावाने ओळखल्या जाणार्‍या भटक्या टोळ्यांना चीनच्या वायव्य भागातून पिटाळून लावून त्यांना पश्चिमेकडे प्रस्थान करण्यास भाग पाडले गेले. या टोळ्यांच्या पश्चिमेकडच्या प्रस्थानात त्यांची प्रथम उझबेकीस्तान मधील सिर दर्या (Syr Darya) नदीच्या उत्तरेला वसाहत करून राहणार्‍या शक किंवा शे (Saka or Scythians or Se) या दुसर्‍या टोळीच्या लोकांशी गाठ पडली. हा प्रदेश सुपीक असल्याने साहजिकच या दोन्ही टोळ्यांमध्ये युद्धे होऊन त्यात कुषाण किंवा Yueh-chi टोळ्यांनी, शक टोळ्यांना सिर दर्या नदीच्या खोर्‍यातून हाकलून लावले व या टोळ्या तेथे स्थायिक झाल्या. पराभूत शक टोळ्यांनी दक्षिणेकडे हेलमंड (Helmand)नदीच्या खोर्‍यात आपले बस्तान बसवले. अफगाणिस्तानातील सध्याच्या सिस्तान(Sistan) या शहराजवळ असलेला या नदीच्या खोर्‍याचा भाग शकस्तान (Sakastan) या नावानेच ओळखला जाऊ लागला. काही कालानंतर Yueh-chi टोळ्या द्क्षिणेकडे सरकल्या व त्यांनी शक टोळ्यांना शकस्तान मधूनही आणखी दक्षिणेकडे पिटाळण्यास सुरुवात केली. शक टोळ्या इ.स.पूर्व 90 ते 60 या कालात कधीतरी भारतामध्ये उत्तरेकडून आल्या. मौस किंवा मोगा (Maues or Moga) हा भारतातील पहिला शक सम्राट; त्याने पाडलेल्या नाण्यांमुळे इतिहासकारांना माहिती आहे. सिस्तान मधून प्रयाण करून त्याने प्रथम सिंधू नदीचे खोरे व मुखाचा प्रदेश ताब्यात घेतला. या नंतर शकांनी सिंधू खोरे व पंजाब मधे आपले बस्तान बसवले व शक साम्राज्य भारतात प्रस्थापित केले. पहिल्या शतकात, कुषाणांचा उदय होईपर्यंत, शक राज्यकर्ते उत्तर व वायव्य भारतावर राज्य करत होते.
शक राज्यकर्त्यांपैकी एक पाती याच कालखंडात पश्चिम भारतावर आपले राज्य स्थापण्यात यशस्वी झाली. मात्र हे शक राज्यकर्ते स्वत:ला क्षत्रप म्हणूनच ओळखत असत. त्यांनी उत्तरेकडील सिंध व पंजाब मधील शक राज्यकर्त्यांचे मांडलिक किंवा feudatory governors म्हणूनच राज्य केले. पुढे पेशवाई मध्ये ज्या प्रमाणे संपूर्ण सत्ता हातात असूनही पेशव्यांनी सातार्‍याच्या महाराजाचे पंतप्रधान पेशवे म्हणून राज्यकारभार पाहिला त्या पद्धतीचीच बहुदा ही व्यवस्था होती. उत्तरेकडे शक राजांची राजसत्ता उलथवून कुषाण राजसत्ता स्थापन झाली तेंव्हा पश्चिम भारतातील शक राज्यकर्त्यांनी त्यांचे मांडलिक म्हणून स्वत:ला घोषित केले. क्षत्रप(Ksatrapa) हा शब्द मुळात इराणी शब्द क्षत्रपवंश (Ksatrapavans) या शब्दावरून आलेला आहे. अखमद राजांच्या पुरातन लेखांत प्रांतीय राज्यपालांना (provincial governors) क्षत्रपवंश या शब्दाने उल्लेखिलेले आहे. क्षत्रप शब्दाच्या या परदेशी मूळावरून, पश्चिम भारतातील क्षत्रप राज्यकर्ते, मुळात परकीय असण्याच्या शक्यतेला चांगलीच पुष्टी मिळते. क्षत्रपांच्यापैकी सर्वात प्राचीन राजघराणे हे क्षहरत किंवा क्षसरत (Ksaharata) या नावाने ओळखले जाते. आधी बाघितल्याप्रमाणे, भुमक (Bhumaka) हा या राजघराण्याचा सर्वात आधीच्या काळातला म्हणून परिचित असलेला राजा आहे. नहापन (Nahapana) हा भुमकानंतर राजा म्हणून गादीवर आला. भुमक व नहापन यांच्यामधील नाते हे ज्ञात नसले तरी नहापन भुमकाचा पुत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नहापन साधारण इ.स. 55 मध्ये गादीवर आला आणि त्याने इ.स. 105 पर्यंतच्या प्रदीर्घ कालावधीत राजसत्ता अनुभवली. या काळात नहापनाने आपले राज्य माळवा, दक्षिण गुजराथ, कोंकण व उत्तर महाराष्ट्र या भागापर्यंत वाढवले. राज्याचा हा विस्तार त्याने प्रामुख्याने सातवाहनांचे राज्य जिंकून केला.
 नहापनाची कन्या दक्षमित्रा हिचा विवाह ऋषभदत्त किंवा उषभदत्त याच्याबरोबर झालेला होता. त्यांच्या पुत्राचे नाव मित्रदेवनक असे होते. ( कार्ले येथील चैत्यगृहातील डाव्या बाजूच्या सातव्या स्तंभावर, या उषभदत्तपुत्र मित्रदेवनकाचे नाव कोरलेले आहे. या स्तंभावरील शिलालेखाचा दोन कारणांसाठी विशेष उल्लेख केला पाहिजे. पहिले कारण म्हणजे प्रचलित पद्धतीनुसार या मित्रदेवनकाने आपल्या नावाचा उल्लेख दक्षमित्रापुत्र असा न करता पित्याचे नाव लावून उषभदत्तपुत्र असा केला आहे. दुसरे कारण म्हणजे हा मित्रदेवनक आपण धेनुकाकट, या अजूनपर्यंत तरी शोध न लागलेल्या, गावाचा रहिवासी असल्याचे सांगतो आहे. धेनुकाकट ही नहापनाच्या राज्याच्या व उषभदत्त कारभारी असलेल्या प्रांताची राजधानी असण्याची यामुळे शक्यता वाटते.) उषभदत्त किंवा ऋषभदत्त याचे नाव जरी भारतीय वाटत असले तरी मुळात तो शक किंवा परकीयच होता व दक्षिण गुजराथ, भडोच ते सोपारा हा उत्तर कोंकणातील भाग आणि महाराष्ट्राचे नाशिक व पुणे जिल्हे या सर्व भागांचा राज्यकारभार, नहापनाचा कारभारी म्हणून चालवत असे. ऋषभदत्त हा सढळ हाताने धार्मिक स्थळांना देणग्या देत असे व याचसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने दिलेल्या देणग्या व दानांचा दूरदूर ठिकाणी पसरलेल्या अनेक शिलालेखांत उल्लेख सापडतो. कदाचित आपण परकीय राज्यकर्ता असल्याने या देणग्या देण्याने स्थानिक जनतेला आपल्याबद्दल आत्मियता वाटावी हे कारणही या देणग्यांमागे असू शकते.

कार्ले येथील 13 क्रमांकाचा शिलालेख याच पद्धती प्रमाणे उषभदत्तने कार्ले मठातील भिख्खू:ना दिलेल्या देणग्यांचे एक दानपत्र आहे. याबरोबरच आपण किती दानशूर आहोत हे ही लोकांना पटवून देण्याचा तो येथे प्रयत्न करताना दिसतो आहे.

मूळ प्राकृतातील लेख असा आहे.

(1) सिधं रञो खहरातस खतपस नहापानस जामातरा दिनिकापुतेन उसभदातेनत्रि
(2) गोसतसहसदेण नदिया बणासयं सुवण(ति) रयकरण (देवा)ण ब्रम्हणानंसोळस गा-
(3) मदे(न) पभासे पूततिथे ब्रम्हणाणं अठभायाप(देण)गावसापि त्रिसतसहसं
(4) दाययिता वलूरकेसु लेणवासान पवजितान चातुदिससघस
(4) यापणय गामो करजिको दतो सवानं(व)सावासितानं

ई.सेनार्टच्या भाषांतराप्रमाणे हा शिलालेख सांगतो की

“Success ! By Usabhadata, the son of Dinika (and) son-in-law of the Kharata Khatapa Nahapana, who gave three-hundred-thousand cows, who made gifts of gold and a tirtha on the river Banasa, who gave to [the Devas] and the Bramhanas sixteen villages, who at the pure tirtha Pabhasa gave eight wives to the Brahmanas and who also fed annually a hundred-thousand (Bramhanas), - there has given the village of Karajika for the support of the ascetics living in the caves at Valuraka without any distinction sect or 0rigin, for all who would keep the warsha (Rainy season) (there).”

या शिलालेखाचे प्रचलित मराठीमध्ये भाषांतर केले तर साधारण असे होईल.

" सिद्धं! दिनिका पुत्र आणि क्षरत क्षतप नहापन याचा जामात ऋषभदत्त, ज्याने 3लक्ष गाई दान दिल्या, ज्याने सुवर्ण दान केले आणि बाणसा नदीवर तीर्थक्षेत्र निर्माण केले, ज्याने देवाब्राम्हणांना सोळा गावे दान दिली, ज्याने सोमनाथ किंवा प्रभास पट्टण येथे आठ ब्राम्हणांना कन्यादान केले, जो प्रतिवर्षी एक लक्ष ब्राम्हण भोजने घालतो, त्याने वालुरका येथील गुंफांमध्ये वास्तव्य करणार्‍या व मूलत: कोणत्याही प्रदेशातील किंवा कोणत्याही पंथाचे असले तरी त्यांच्यात कोणताही भेदभाव न करता या भिख्खू:ना वर्षा कालातही उदरनिर्वाह करता यावा म्हणून करजिका हे ग्राम दान दिले आहे.”
काही खुलासा केल्यावर या शिलालेखाचा अर्थ स्पष्ट होतो. बाणसा या नावाच्या दोन नद्या या कालात अस्तित्वात होत्या. पहिली नदी गुजरातच्या अबु पर्वतावरून उगम पावून कच्छ्च्या रणात समुद्राला जाऊन मिळत असे. तर दुसरी नदी पूर्व राजस्थानमध्ये उगम पावून चंबळ नदीला जाऊन मिळत असे. यापैकी एका नदीवर या ऋषभदत्ताने एक तीर्थक्षेत्र निर्माण केले होते. सोमनाथ मंदिराजवळच्या गावात राहणार्‍या आठ ब्राम्हणांचा विवाहखर्च याने केला होता. परंतु माझ्या दृष्टीने या शिलालेखाचे खरे महत्त्व हे आहे की हा शिलालेख, आपण जिंकलेल्या प्रदेशातील संस्कृतीशी, तिथल्या चालीरितींचे पालन करून, आपण किती एकजीव झालो आहोत हे दाखवण्याचा शक राज्यकर्त्यांचा हा एक प्रयत्न आहे. मात्र मूळ शिलालेख अतिशय खराब अवस्थेत असल्याने प्रत्येक शब्दनशब्द सत्य असेल असे मानता येणार नाही. मात्र नाशिक किंवा इतर ठिकाणच्या ऋषभदत्ताच्या शिलालेखांवरून साधारण हा अर्थ काढता येईल असे वाटते.
   यानंतर आपण जाउया १९ क्रमांकाच्या शिलालेखाकडे वळतो. हा शिलालेख, बाहेरचा व्हरांडा व चैत्यगृह यामध्ये असलेल्या दगडी भिंतीच्या समोरील पृष्ठभागावर (नंतरच्या काळात बसवल्या गेलेल्या) बुद्धमूर्तीच्या वरील भागावर आणि या पडद्याला असलेले मध्यवर्ती द्वार व उजव्या हाताचे द्वार यामध्ये कोरलेला आहे. हा शिलालेख अत्यंत महत्त्वाचा वाटतो कारण वर निर्देश केलेल्या शिलालेखाच्या (क्रमांक १३ ) कालानंतर झालेल्या एका महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेचा, हा शिलालेख मूक साक्षीदार आहे.क्षत्रप नहापन इ.स. ५५ मध्ये राज्यावर आला व त्याने इ.स. ८६ पर्यंत सततच्या युद्धांमध्ये सातवाहन सैन्याचा पराभव करून, सातवाहन साम्राज्याचा महाराष्ट्र, कोकण व दक्षिण गुजराथ मधील बहुतेक प्रदेश जिंकून घेतला. शक राज्यकर्ते भारतीय नसून अफगाणिस्तानातून आलेले असल्याने, नहापनाच्या विजयानंतर हा भाग परकीय राज्यसत्तेच्या अंमलखाली किंवा पारतंत्र्यात गेला होता असे म्हणता येते. या कालात, हल मंतलक, पुरिंद्र्सेन, सुंदर, सातकर्णी, चकोर स्वातीकर्ण आणि शिवस्वाती या राजांनी उरल्या-सुरल्या सातवाहन साम्राज्यावर राज्य केले होते.
      इ.स. 86 मध्ये, शिवस्वाती या राजानंतर गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा सातवाहन गादीवर आरूढ झाला व दख्खनमधील तत्कालीन राजकीय परिस्थितीला वेगळेच वळण मिळाले. शिवस्वाती या आधीच्या राजाबरोबर गौतमीपुत्राचे काही नातेसंबंध होते किंवा नाही हे ज्ञात नाही. मात्र त्याच्या राज्यारोहणाच्या वेळी सातवाहन साम्राज्याचे ग्रह सर्वात खालच्या स्थानावर पोचलेले होते हे खात्रीलायकपणे म्हणता येते. नहापनाने सातवाहन राज्याचे अनेक प्रांत जिंकून घेऊन त्यावर पूर्ण स्वामित्व मिळवलेले होते. उत्तरेला कुषाण राजा कनिष्क हा सत्तेवर आला होता व तो पूर्वेकडून आक्रमण करून सातवाहन राज्याचा मिळेल तो भाग गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात होता. परंतु आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत, अतिशय तेजस्वी व आकर्षक व्यक्तिमत्व असलेल्या या राजाने, उच्च दर्जाचे व्यक्तिगत शौर्य, रणनीती आणि सेनानेतृत्व यांचे प्रदर्शन करून नहापनाच्या ताब्यात असलेला सातवाहन साम्राज्याचा प्रदेश तर परत जिंकून घेतलाच परंतु युद्धकक्षा नहापनाच्या राज्यामध्ये नेऊन काठेवाड व आग्नेय राजस्थानमधील कुकुर प्रांतही जिंकून घेतला. गौतमीपुत्र सातकर्णी याच्या नहापनावरच्या विजयानंतर नहापन राजाचे तर उच्चाटन झालेच पण त्याचा क्षहरत किंवा क्षसरत राजवंशही नष्ट झाला. गौतमीपुत्र सातकर्णी राजाचे नहापन राजा विरूद्धचे हे युद्ध म्हणजे महाराष्ट्राचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते आणि नंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी अदिलशाही व मुघली साम्राज्यंविरूद्ध केलेल्या स्वराज्य स्थापनेच्या युद्धाइतकेच हे ही युद्ध महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होते असे म्हणायला हरकत नाही. 
  एवढ्या विवेचनानंतर आपण परत एकदा १९ क्रमांकाच्या शिलालेखाकडे वळूया. हा शिलालेख ज्या राजाच्या कारकिर्दीत खोदला गेला आहे त्याचे नाव दुर्दैवाने कालौघात नष्ट झालेले आहे. मात्र मजकुरावरून, हा शिलालेख १३ क्रमांकाच्या किंवा राजा नहापनाच्या कालानंतर लिहिला गेल्याचे स्पष्ट होते.१३ क्रमांकाच्या शिलालेखात करजिका हे ग्राम भिख्खूंच्या उदरनिर्वाहासाठी दान दिल्याचा स्पष्ट उल्लेख असल्याचे आपण बघितले आहे. हा शिलालेख परत एकदा हे ग्राम याच कारणासाठी इनाम दिले असल्याचे सांगतो आहे. याचा स्पष्ट अर्थ असा लावता येतो की दुसरी राजवट आलेली असल्याने आधीच्या राजवटीत दिली गेलेली इनामे, नवीन राजवटीत तशीच चालू ठेवण्यासाठी नवे शासकीय आदेश आवश्यक होते व ते दिले गेल्याचे हे एक रेकॉर्ड आहे. लाभार्थींजवळ नवा आदेश काढल्याचा पुरावा हवा म्हणून हा शिलालेख कार्ले येथे कोरलेला आहे. 

शिलालेख क्र्. १९ चे प्राकृत रूप पुढीलप्रमाणे (संदर्भ . वा. वि. मिराशी )

(१) . . . . . . . . . . .[आनपयति] [*] मामाडे अमच परगत . मसु एथ लेनेसु वालुरकेसु वाथवान
(२) पवजितान भिखुन निकायस महास[घि]यान यपनय एथ मामालाहा उतरेमगे [गामे] करजके[सु*]
(३)भिखुहले[ल] ददम [|*] एतेस तु गाम करजके भिखुहल ओयपापेहि [|] एतस चस
(४) गामस करजकान भिखुहलपरिहार वितराम [|] अपावेस अनोमस पारिहारिक च [|*] एतेहि न परिहारेहि परिहरह [|] एतस चस गामे करजकेसु
(५)भिखुहलपरिहारे च एथ निबधापेहि [|*] अवियेन आनत . . . छतो विजयखधावारे दतो ठे रञा [|*] पटिका सव १० [+*] [८]**
(६) वा प ४ दिव १ सिवखदगुतेन कटा [|]

** ब्युह्ररने हे चिन्ह '४' चे मानले आहे. सेनार्टला ते संशयास्पद वाटले तरी त्यानेही तेच दिले आहे. पण ते '८' चे द्योतक असावे असे रॅप्सनने दाखवले आहे.

 ई. सेनार्टने केलेल्या भाषांतराप्रमाणे शिलालेखातील मजकूर असा आहे.
“ [King........ ] commands the officer at Mamada : For the support of the sect of the Mahasamghikas, of the mendicant friars dwelling here in (these} caves of Valuraka, all pervaded with religion (?), we give as monks' land the village Karajaka here in theMamda district on the northern road. To them I have secured the property of the village ofKarajaka as monks' land, and to this village of Karajaka we grant the immunities belongingto monks' land, not to be entered (by royal officers) and to enjoy (all kinds of)limmunity ; with all these immunities I have invested it. And this village of Karajaka and the immunities enjoyed by monks' land I have had registered here. Ordered verbally, writergiven at the victorious camp (?) The deed was executed by Sivaskandagupta in the year 14, on the 1st day of the 4th fortnight of the rainy season.”
      या शिलालेखावरून हे स्पष्ट होते की शिवस्कंदगुप्त या शासकीय लिपिकाने, १४ व्या वर्षातील हेमंत ऋतूच्या चौथ्या पंधरवड्यातील पहिल्या दिवशी, विजयी झालेल्या राजाच्या तोंडी आज्ञेप्रमाणे, ही सूचना काढलेली आहे. या सूचनेप्रमाणे मामदा किंवा मावळ जिल्ह्यातील करजका गाव हे वेलुरका मठातील भिख्खूंच्या उदरनिर्वाहासाठी इनाम गाव म्हणून दिलेले आहे आणि या गावात राजाच्या अधिकार्‍यांच्या प्रवेशावर प्रतिबंध असून या गावाला सर्वप्रकारचे संरक्षण दिलेले आहे हे स्पष्ट होते.गौतमीपुत्र सातकर्णीच्या या लेखात आपल्याला बरीच महत्वाची माहिती समजते, ती म्हणजे लेणे ज्या प्रांतात येते त्याला 'मामाड आहार' ( म्हणजे प्रांत ) म्हणले आहे.हा मामाड विभाग म्हणजे या लेणीच्या आजुबाजुचा सध्याचा मावळ तालुका.मामड या प्राकृत शब्दाचे रुपांतर नंतर मावळ या शब्दात झाले.येथे महासंघीय या बौध्दशाखेचा शाखेचा वलुरक संघ होता.या लेण्याचे मुळ नाव देखील वलुरक लेणे होते.
   या शिलालेखामध्ये निर्देश केलेले १४ वे वर्ष हे इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे वाटते. शके १४ हे वर्ष म्हणजे इ.स. ९२ हे वर्ष येते. या वर्षी म्हणजे राज्याभिषेक झाल्यापासून फक्त सहा वर्षात गौतमीपुत्र सातकर्णी राजाने सध्याच्या पुणे जिल्ह्याचा हा भाग, शक राजवटीपासून मुक्त केल्याचा हा स्पष्ट पुरावा आहे. व या नोंदीमुळेच हा शिलालेख याच राजाच्या कारकिर्दीत खोदला गेला असला पहिजे असे आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. 

सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याच्या 24 वर्षाच्या राज्यकालानंतर इ.स.110 मध्ये त्याचा पुत्र वशिष्ठीपुत्र पुळुमावी हा सातवाहनांच्या गादीवर आला. पुळुमावीने 28 वर्षे राज्य केले. इ.स. 115ते 125 या कालखंडात राज्यावर असलेल्या उज्जैन येथील क्षत्रप राजा चष्टन याचा तो समकालीन होता. उत्तरेकडील पर्थियन सम्राटाने चष्टन याला सातवाहनांचा बिमोड करून दख्खन परत जिंकून घेण्यासाठी पाठवले तेंव्हा तो अजमेर येथे होता. चष्टन क्षत्रपाने चढाई करून माळव्यामधील उज्जैन व त्या पाठोपाठ कच्छ व उत्तर गुजराथ हे भाग पुळुमावी कडून जिंकून घेतले व तो उज्जैन मधून राज्यकारभार पाहू लागला. पुळुमावी या युद्धात पराभूत झाल्याने माळवा व उत्तर गुजराथ हे भाग आपल्या राज्यातून गेल्याचे नाईलाजाने त्याला बघत बसावे लागले. मात्र राज्याचा आणखी कोणताही भाग हातातून जाणार नाही याची काळजी तो घेऊ लागला. दरम्यान चष्टन राजाचा मृत्यू झाल्याने त्याचा मुलगा जयदमन हा गादीवर आला. आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या काळात पुळुमावीने जयदमनचा पराभव करून त्याला परत मांडलिक केले असावे असे मानले जाते. पुळुमावीच्या राज्यकालाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध असल्याने तो किंवा त्या कालातील सातवाहन साम्राज्याचा इतिहास बराचसा अज्ञातच आहे. परंतु जी तुटपुंजी माहिती उपलब्ध आहे त्यावरून अतिशय कर्मठ हिंदू असलेला पुळुमावी राजा आपल्या कर्तुत्ववान वडिलांचा यथार्थ वारसदार होता असे दिसते. सर्व धर्मांबद्दल समभाव बाळगण्याचे आपल्या वडिलांचे धोरण त्याने पुढे चालवले असावे असे दिसते. अनेक बौद्ध मठांना त्याने सढळ हाताने देणग्या दिल्याचे आढळून येते.

कार्ले येथील 14 क्रमांकाच्या शिलालेखात कार्ले बौद्ध मठाला एक गाव इनाम म्हणून दिल्याची नोंद आहे. प्राकृतमधील हा शिलालेख असा आहे.

1.सिधं [I ] रञो वसिठिपुतस सामिसिरि [पु][ळुमावि]स
सवछरे सतमे [गि]म्हपखे पचमे
2. [दि]वसे पथमे एताय पुवाय ओखळ्कियान महारथिस
कोसिकिपुतस मितदेवस पुतन
3. [म] हारथिना वासिठिपुतेन सोमदेवेन गामो दतो वलुरकसघस
वलुरकलेतात सकरूकरो सदेय
4. मेयो [ I]

बर्जेस याने केलेल्या भाषांतराप्रमाणे या शिलालेखाचा मजकूर याप्रमाणे आहे.

“King Vasisthiputa, the illustrious lord (Swami Shree) (Pulumavi) in the year 7th of summer the fifth fortnight and first day. On that day , a great warrior, Vasithiputa Somadeva, son of the great warrior of Okhalakiyas, Kosikiputa Mitadeva gave a village to the Sangha at Valuraka”

शिलालेखाचा अर्थ सहज समजण्यासारखा आहे. ओखळक येथील महारथी कौशिकीपुत्र मित्रदेव याचा पुत्र महारथी वासिष्ठीपुत्र सोमदेव याने एक गाव वलुरक लेण्यातील वलुरक संघाला दिल्याचे यात नमूद केलेले आहे. हा गाव लहान मोठ्या करांसह व देय (रोख नाणी) व मेय (धान्यादिक) यांसह दिलेला आहे. प्र्स्तुत शिलालेखाचा काल वासिष्ठीपुत्र पुळुमावि याच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षातील पाचव्या ग्रीष्म पक्षातील प्रथम दिवस हा असल्याचेही येथे नमूद केलेले आहे.

कार्ले येथील 20 क्रमंकाचा शिलालेख हा मुख्य चैत्यगृहामध्ये नसून बौद्ध भिख्खूंचे वसतीस्थान असलेल्या 12क्रमांकाच्या विहारामधील 2क्रमांकाच्या द्वाराच्या वरील बाजूस कोरलेला आहे.

1.सिधं रञो वासिठिपुतस सिरिपुळुमाविस सवछरे चतुर्विसे
हेमंतान पखे ततिये दिवसे बि-
2.तिये उपासकस हरफरणस सेतफरणपुत्तस्य सो [व] सकस्य अबुला-
माय वथवस्य इम देयधम म[ड] पो
3.नवगभ माहासघियानं परिगहो सघे चातुदिसे दिन मातापितुनं
पुजा[ये] सवसतानं हितसुघस्थये एकविसे स-
4.वछरे निठितो सहेत च मे पुन बुधरखितेन मातर चस्य
[उ]पासिकाय बुधरखितस मातु देयधंम पाठो अनो

बर्जेसच्या भाषांतराप्रमाणे या शिलालेखातील मजकूर याप्रमाणे आहे.

“ To the perfect! The king Vasisthiputa, the illustrious _Shree) Pulimavi in the year (of his reigh) twenty four, in the third fortnight of the winter months, the second day. This meritorious gift of a nine celled-mandapa by the (Upasaka) layman Harapharans, son of Satapharana, a Sovaska, native of Abulama, for the possesion of Sangha of the mahasanghas of the four quarters. For the continuance in welfare and happiness of father and mother abd all people and living beings. Established in 21st year and with me Budharakhita and his mother Upasika. And in addition the meritorious gift of another passage by the mother of Budharakhita”

या शिलालेखातील महत्त्वाचा वाटणारा भाग म्हणजे हरफरण व त्याचे वडील असलेले सतफरण या दोन व्यक्तींची नावे. ही दोन्ही नावे भारतीय वाटत नाहीत. बर्जेसच्या मताने ही नावे पार्थियन वाटतात. त्याच प्रमाणे या व्यक्ती जेथून आलेल्या होत्या ते अबुलामा हे गाव भारतातील असेल असे वाटत नाही. पुळुमवी राजाच्या काळात सातवाहन साम्राज्याला सतत पार्थिअन सम्राटाचा क्षत्रप असलेल्या राजा चष्टन याच्या आक्रमणाचे भय होते. त्यामुळे या काळात महाराष्ट्राता असलेल्या एक बौद्ध मठाला दोन पार्थियन व्यक्तींनी दिलेली ही देणगी मोठी वैशिष्ट्यपूर्ण वाटते.
या लेखमालिकेत उल्लेख आलेल्या सर्व राजांनी आपली छबी असलेली नाणी आपापल्या कारकिर्दीमध्ये पाडलेली होती. या नाण्यांवरून हे राजे कसे दिसत असत याची कल्पना येऊ शकते. कार्ले गुंफांमधील शिलालेख त्या काळच्या इतिहासावर फारसा प्रकाश टाकू शकत नसले तरी ते खोदले गेल्याचा कालसमय निश्चित करू शकतात. यामुळे इ.स.पहिल्या शतकामध्ये महाराष्ट्रात वास्तव्य करणार्‍या स्थानिक जनतेचे आयुष्य कसे असेल? ते कोणत्या प्रकारचा पेहराव करत असत याची थोडीफार तरी कल्पना नक्कीच येऊ शकते. कार्ले गुंफांचे तेच महत्त्व आहे
आणखी दोन शिलालेखांचा विचार करुन आपण थांबुया.
 
 शिलालेख खालील प्रमाणे

धेनुकाकटकेण वढकिना  सामिकेण वेणूवास पुतेण घरस मुघं कतं दार मुधुकस

इतकाच लेख वाचता येतो

त्यानुसार याचा अर्थ होतो, धेनुकाकटमधील सुतारकाम करणारा वेणूवास यांचा मुकगा सामीक याने दरवाजाची कमान तयार केली आहे असा उल्लेख या शिलालेखातून निघतो  यानंतरचा शिलालेख उध्वस्त झालेला आहे त्यामुळे त्याने काय तयार केले हे सांगता येत नसले तरीया शिलालेखातून आजच्या सुतार काम करणाऱ्या सुतार  लोकांसाठी महत्वाचा संदेश आहे तो म्हणजे इथे असणारा त्यांच्या पूर्वजांचा इतिहास आहे हा
ह्या लेखात सुतार असणारा वेणूवास त्यांचा मुलगा सामीक याने दरवाजाची कमान तयार करून दिलेली आहे यानुसार चैत्यगृहाच्या डाव्या बाजूला दरवाजा असावा व कारण त्यावर कोणता ही शिलालेख सापडत नाही
     कार्ले चैत्यातील स्तंभांच्या कामासाठी धेनुकाकटच्या बर्‍याच यवनांनी देणगी दिलेली आहे. आधी मला हे धेनुकाकट म्हणजे डहाणू असे काही तज्ञांचे मत आहे. नहापन् क्षत्रपाची राजधानी भडोच येथे बहुदा होती असे मानले जाते. उत्तर कोकण व पुणे नाशिक हे जिल्हे त्याच्या राज्याचे सर्वात दक्षिणेकडचे जिल्हे असल्याने या जिल्ह्यांसाठी नियुक्त कारभार्‍याचे निवासस्थान डहाणूला असणे तर्कसंगत असावे. धेनुकाकट येथे वास्तव्य असलेल्या आणखी काही लोकांनी,ज्यात 2 ग्रीक (यवन) आणि काही इराणी नावे आहेत, कार्ले येथील स्तंभ दान केलेले आहेत. या कारणांसाठी धेनुकाकट हे गाव फारसे दूर नसावे. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशात तर मुळीच नसावे असे या तज्ञांचे मत.
   पण नाशिकच्या त्रिरश्मी लेण्यांतील ऋषभदत्ताच्या शिलालेखात दाहानुका ह्या नदीचा उल्लेख आलाय. ही दाहनुका म्हणजे आजच्या डहाणूतील खाडी. तेव्हा डहाणू म्हणजे धेनुकाकट हे तसे संभवत नाही. डॉ. दामोदर कोसंबींच्या मते धेनुकाकट म्हणजे आजच्या कार्ल्याजवळचेच देवघर. पण हा तर्क योग्य वाटत नाही कारण धेनुकाकटच्या यवनांनी इतर दूरच्या लेण्यांनाही देणग्या दिलेल्या आहेत. काही संशोधकांच्या मते धेनुकाकट म्हणाजे आजच्या आंध्र प्रदेशातील पूर्व किनार्‍यावरील एखादे शहर असावे.धेनुकाकट हे सध्याच्या तेलंगणात असलेल्या अमरावतीतील बौध्द स्तुपाच्या शिलालेखामध्ये असणारे 'धत्रकड' अथवा 'धान्यकाकड' म्हणजे सध्याचे धरणीकोट हे शहर असावे असे हे तज्ञ मानतात.
पण कार्ले लेण्यातील शिलालेखांचा काल बघता यवनांची वस्ती पूर्व किनार्‍यावर असणॅ तसे असंभाव्य वाटते तेव्हा धेनुकाकट हे पश्चिम किनार्‍यावर भडोच ते आजच्या उत्तर मुंबई दरम्यान कुठेतरी असावे अशी शक्यता आहे. हे यवन नेहमीच किनार्‍याचा आश्रय धरुन राहात कारण ते हाडाचे व्यापारी होते.यवन म्हणजे ग्रीक.ग्रीसच्या दक्षिणेकडील प्रदेश म्हणजे आयोनिया. ह्या आयोनियातून आलेल्या लोकांना आयोनियन म्हणत. त्याचाच अपभ्रंश म्हणजे यवन.मात्र पुढे सर्व परकीय लोकांना यवन हा शब्द वापरला जाउ लागला.या लेखात येणारी यवनांची नावे देखील रोहमित्र्,सिंहध्वज, यशवर्धन अशी भारतीय वळणाची आहेत.त्यामुळे हे परकीय यवन नसून भारतीय यवन असावेत, जे बौध्द संघाला दान देत होते.कदाचित हे यवन महाराष्ट्राच्या विवीध भागात वस्ती करुन रहात असावेत.प्राचीन काळचे म्हणजे इसवी सन सहाशे च्या आधीचे जे यवनांसंबंधित उल्लेख आहेत ते सगळे ग्रीकांचे समजावेत.महाभारतातही यवन, शक, पुलिंद, म्लेच्छ अशा परकीय आक्रमकांचे उल्लेख आहेत. म्लेच्छ म्हणजे संस्कृत भाषा न जाणणारा.म्हणुन तो स्फिंन्क्स तिथे आला असावा.
   पण तरीही एक मुद्दा रहातोच. जसे इथे सिद्दीचे वंशज आहेत अजुन आणि तसे ओळखुही येतात (तोच प्रकार पारशी जमाती बाबत.) तसा प्रकार ह्या ग्रीकांबाबत झाला नाही का? म्हणजे आजकाल तसे वेगळे ओळखु येणारे कोणी ग्रीक असे दिसत नाहीत. का ही जमात फक्त कामानिमित्त येणारी व परत जाणारी असु शकेल.? पण त्याकाळात तसे होणे म्हणजे फार अवघडच आहे.कित्येक यवनांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. २००० वर्षे झाली हो. इतक्या काळात सहज बदल झाला असेल दिसण्या बोलण्या वागण्यात.तसेही यवन हे व्यापारी असल्याने परत जातही असावेत.
  पहा तरी ह्या स्तंभांना कुणी कुणी देणगी दिलीय ते.

धेनुकाकटा उसभदत पुतस मितदेवणकस थबो दानम
धेनुकाकटच्या उसभदत्ताच्या पुत्राने मित्रदेवणकाने दिलेले स्तंभाचे दान

धेनुकाकटा धंमयवनस
धेनुकाकटच्या धर्म नामक यवनाचा

धेनुकाकटशिवाय उमेहनाकटच्या यवनाने देखील येथील येथील स्तंभासाठी देणगी दिलीय

उमेहनाकटा यवनस विटसमगतानं दानं थबो
उमेहनाकट येथील यवन विटसमगत याने दान दिलेला स्तंभ

तर कुण्या गोणेकाक नामक गावातील धमुल उपासकाने देखील एक स्तंभ दान दिलेला असतो.
गोणेकाकस धमुल उपासकसं देयधंमं थंवो
यानंतर आणखी एक शिलालेख असा.कार्ला बुद्ध लेणी येथील चैत्यगृहात एका स्तंभावर असणारा शिलालेख खालील प्रमाणे

सोपारका भयतान धमुतरियान भानकस सातिमितस ससरीरो थभो दानं

याचा अर्थ असा आहे
सोपारा अर्थात आजचे नालासोपारा येथील भदंत धमुतरिय यांच्या बहिणीचा मुलगा स्वातीमित्र याने शरीर अवशेषांच्या सह स्तंभाचे दान दिले आहे
 
इथे स्वातीमित्र आपल्या शरीराचे अवशेष दान देण्याचे सांगतो.हे शरीर अवशेष लेण्यात कोठे ठेवत असत ? वरील फोटोत दखविल्या प्रमाणे स्तंभाच्या मध्ये एक खोलगट जागा आहे त्यामध्ये अस्थी ठेवण्यास जागा आहे अश्या पद्धतीचा स्तंभ कोणत्याच लेण्यांमध्ये सापडत नाही
   भारतातील या सर्वोत्कृष्ट चैत्यगृहाची आजची अवस्था काय आहे ? एकवीरा मंदीरात मोठ्या संख्येने भाविक येतात. मंदिरात पूजा करण्यासाठी वेळ मिळत नसल्यानं भाविक चैत्यगृहात पुजा करतात. अंगात  येणे वगैरे प्रकार चालतात. नवीन पिढी हि लेणी पहाण्यास येते. काही पाहण्याऐवजी तिथं उभं राहून फोटो काढून घेण्यात त्यांना अधिक स्वारस्य दिसते.एकवेळ तेही ठीक आहे. पण खरा कहर म्हणजे हि मुल स्तुपावर सुटे पैसे फेकताना दिसतात.यामध्ये ज्याचं नाणं तीन प्रयत्नांत स्तुपावर राहील (किंवा घरंगळणार नाही), त्याची मनोकामना पूर्ण होईल, अशी अंधश्रध्दा आता पसरली आहे. बुद्धिदेवता भगवान बुद्धाच्याच डोक्यावर नाणं फेकून मनोकामना पूर्ण करण्याच्या मागे लागलेल्या या तरुणांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
   एकंदरीत प्राचीन वैभव पाहीलेली हि लेणी काळाच्या बदललेल्या पटामुळे आणि उपेक्षेमुळे खिन्नपणे हा बदल स्विकारत इथल्या महान इतिहासाबध्दल मुक झाल्यासारखी वाटतात.एखाद्या अभ्यासकाचे पाय या शैलकृत्यांना लागावेत आणि जुन्या वैभवाच्या दिवसाची उजळणी व्हावी इतक्याच अपेक्षेत डोळे लावून बसली आहेत.
संदर्भः-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) Burgess, James, Report on the Buddhist Cave Temples & Their Inscriptions. Varanasi, 1964. 
३) Fergusson, James; Burgess, James, Cave Temples of India, London, 1880
४) श्री सागर बोरकर, रविंद्र मिनाक्षी मनोहर यांचे लिखाण
५) लेणी- प्र.के.घाणेकर
६) श्री.आनंद कानिटकर यांचा लेख
७) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स






 On entering the premises you are captivated by the collosal grandeur of the structure. These caves (three in number)had been carved out of the rock solid mountains by Buddhist (Theravada) monks around 2nd century BC. Kings from the Satavahana dynasty (Vashisthaputa Pulamavi) , the Saka kshatrapas (Usavadatta , son in law of Nahapana) and Yavanas from Dhenukakata & Umehakakata (unknown towns) patronised these caves. Their details of donations (from as far as Sopara or present day Nalasopara, Vejayamti or present day Banarasi in N.Kanara) made to the monasteries are mentioned in form of inscriptions on the stone walls, pillars.
There were subsequent additions to the structure in the forthcoming years. The initial structures being made by Hinayana Buddhists, there were no images of the Buddha, but the caves passed hands to the Mahayanas ( by 7th century AD) and Buddha sculptures (Buddha preaching while being seated on a lion engraved throne besides sculptures of three huge beautifully carved elephants) made way in the caves.

pic:Shivalinga in a cave (right side from the chaityagriha)
pic: Hanumana stone carving outside the cave.

Later Hindu dwellings led to the formation of Hindu temples inside the premises with statues of Godess Ekvira being the most prominent.

http://travelzunlimited.blogspot.com/2010/11/trilogy-of-karla-bhaje-bedse-caves.html

 I was awestruck by the quality of architecture two thousand years back. I wondered about the technology used and the skill of the artisans. Its difficult to imagine that this entire cave temple was built from the mighty mountain with just a chisel and a hammer.


Pic: inscriptions in brahmi (below) and modi (above) scripts mentioning donation details to the monastery


We spent about an hour in Karla and then proceeded towards the Bhaja caves, which are located near the village Malavali (around 10kms away from Karla). We passed through a railway gate before reaching the village.
Here too we had to park our vehicle at the foothills.

arla Caves, one of the most famous centres of early rock-cut architecture is a group of 16 rock excavations. The grand Chaitya griha of Karla is the grandest and the largest of all the chaita-grihas of India. Karla is situated near Lonavala on the Pune-Mumbai highway. An Hindu temple, Ekvira Mandir is located in front of the main Chaityagriha.

Karla Caves 002

Karla Caves 003

Karla Caves 004

Karla Caves 005

Karla Caves 006

Karla Caves 007

Karla Caves 008

Karla Caves 009

Karla Caves 010

Karla Caves 011

Karla Caves 012

Karla Caves 013

Karla Caves 014

Karla Caves 015

Karla Caves 016

Karla Caves 017

Karla Caves 018

Karla Caves 019

Karla Caves 020

Karla Caves 021

Karla Caves 022

Karla Caves 023

Karla Caves 024

Karla Caves 025

Karla Caves 026

Karla Caves 027

Karla Caves 028

Karla Caves 029

Karla Caves 030

Karla Caves 031

Karla Caves 032

Karla Caves 033

Karla Caves 034

Karla Caves 035

Karla Caves 036

Karla Caves 037

Karla Caves 038

Karla Caves 039

Karla Caves 040

Karla Caves 041

Karla Caves 042

Karla Caves 043

Karla Caves 044

Advertisements
Report this ad









ब्राह्मी लिपीतील इथल्या खांबावर कोरलेले विपुल शिलालेख (यातील बहुतेक दातृत्वाचे आहेत)







चैत्यातील एका स्तंभांवर बौद्धांची पवित्र चिन्हे कोरली आहेत. अशोकचक्र, स्तूप आणि अशोकस्तंभ. ही चिन्हे प्रचंड देखणी आहेत.

a








उत्तर् व वायव्य भारतात शकांचे साम्राज्य इ.स.पूर्व 90ते 60 या कालात कधीतरी आले व इ.स. 80 ते90 च्या सुमारास कुषाणांनी हा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला असे वाटते. या मधल्या कालात शकांनंतर, पार्थिअन् व पहलवी राजे या भागात् राज्य् करत् होते. यापैकी कोणत्या राजाने क्षत्रप् चष्टनाला पुळुमावी विरुद्ध् मोहिम् काढण्याची आङ्या दिली ते सांगणे कठीण् आहे. परंतु सनावळ बघता हा राजा गोंडोफेरेस असू शकतो किंवा कोणी पहलवी राजा असू शकतो. कुषाण राजा कनिष्क किंवा त्याच्या आधीचा राजा विमा काडफिसेस सुद्धा असू शकतो. सांगणे खूपच कठिण आहे.


अवांतर शंका क्र १ :- मानववंश शास्त्र दृष्टीने शक = सिथियन हे बरोबर का?(मागील भागांत शकांचा उल्लेख होता, म्हणून विचारले.)
आणि सिथियन हे आजच्या अनेक राजपूत घराण्यांचे पूर्वज; हे ही बरोबर का?
कारण तसे असेल तर शकांचे भारतीयीकरण झाले असे म्हणणे ठीक; पण शकांना पिटाळून लावले, शकांपासून मुक्ती मिळ्वली असे
बरेच जण म्हणतात, ते बरोबर कसे?

अवांतर शंका क्र २ :- पर्थियन म्हणजे इराणच्या उत्तर पूर्व भागाच्या आसपास(पश्चिम उत्तर अफगाणिस्तान व् त्यापलीकडील मध्य आशिया) असणार्‍या पठारी भागातील जमाती ना?
काहीजण दक्षिणेतील पल्लव राजवंशाची नाळ पर्थिअयनांशी जोडतात, म्हणून विचारले.

अवांतर शंका क्र३ :- शिलालेखातील भाषा आजच्या मराठीच्या थोडीही आसपासची वाटत नाही. सातवाहन कालात मराठीची पायाभरणी होउन गेली होती असे ऐकले होते.(तिकडे "अभिजात भाषा" वरील फडात वाचले.)

1.. शक म्हणजे सिथिअन हे बरोबर आहे. त्यांचे राज्य राजस्थान मध्ये बराच काळ होते त्यामुळे काही राजपुत राजघराण्यात त्यांचा वंश आला असण्याची शक्यता आहे. परंतु असे जनरलायझेशन करता येईल असे वाटत नाही. जिनिऑलॉजिकल संशोधनाप्रमाणे सर्व उत्तर भारतीय एकाच हॅपलो गटाचे आहेत हे सिद्ध झालेले आहे.

2. पल्लव राजे मुळात कोठून आले हे कसे सांगणार? जर चीन मधून आलेले शक व कुषाण किंवा युरोप मधून आलेले इंग्रज भारतावर राज्य करू शकले तर अफगाणिस्तान मधल्या पार्थियन लोकांनी दक्षिणेकडे राज्य स्थापण्यात काहीच असंभव नाही.

3. प्राकृत भाषा ही सर्व भारतीय (तमिळ वगळून) भाषांचे उगमस्थान आहे.संस्कृत मधून प्राकृत आले की प्राकृत मधून संस्कृत हे आधी कोंबडी का अंडे हे सांगण्यासारखेच आहे. शिलालेखांच्यातील प्राकृत वा मराठी यात खूपच साधर्म्य आहे असे मला तरी वाटते.














लेणी संवर्धक




संदर्भ :

देव, शां.भा.


a

---








विसापूर लोहगड जोडगोळी 




भाग २


 

No comments:

Post a Comment

Aihole

 आयहोळ येथील डोल्मेन :        सध्या बहुतेक पर्यटक आयहोळला चालुक्यांच्या सुरवातीच्या काळात बांधलेल्या मंदीरांना भेट देण्यासाठी येतात. मात्र ल...