पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरून पसरत गेलेली सह्याद्रीची रांग ही भटक्यांना नेहमीच साद घालणारी. सह्याद्रीच्या या भागातुन अनेक घाटवाटा खाली कोकणात उतरताना दिसतात. कोकणातील पाली गावातून घाटमाथ्यावर येण्यासाठी प्राचिन काळापासून नाणदांड घाट, घोडदांड घाट, सवाष्णीचा घाट, भोरप्याची नाळ हे तीन घाटमार्ग आहेत. कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठे पर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली होती. घाटाच्या खाली असणारे सुधागड, सरसगड ,मृगगड तर वरील भागात असणारे घनगड,तेलबैला कैलासगड, कोराईगड याची साक्ष देतात. घाटमाथ्यालगतचा हा भाग या परिसरात येणाऱ्या छत्तीस गावांमुळे छत्तीस कोरबारसे म्हणुन ओळखला जातो. याच मावळात येणारा हा घनगड हा आड बाजूला असलेला छोटेखानी किल्ला आहे.काही जण घनगडाचा उल्लेख धनगड असा करतात्,मात्र तो चुकीचा असून घनगड हेचा या किल्ल्याचे नाव आहे.लोणावळ्याच्या परीसरात असल्यामुळे मुंबई - पुण्याहून एका दिवसात हा किल्ला पाहून परत येता येते. गडाची उंची समुद्रसपाटीपासून २७९० फुट तर एकोले गावापासुन ६०० फुट आहे.
घनगड आकाराने छोटा असला तरी याचा इतिहासात उल्लेख येतो.गडावर खांब सोडून कोरलेली टाकी पहाता हा गड निश्चितच प्राचीन आहे.गडाच्या खालच्या बाजुला खडसांबाळे लेणी आहेत जी इस पुर्व दुसर्या शतकातील आहेत.तसेच सुधागडासारखा प्राचीन गड आहे.याचा अर्थ हा गड देखील तितकाच प्राचीन असावा. याचा उपयोग कोकणात उतरणाऱ्या वाटांवर नजर ठेवण्यासाठी व कैदी ठेवण्यासाठी केला जात होता. अर्थात आधी कोळी सामंत, मग निजामशाही, मग शिवशाही असा या गडाचा प्रवास आहे.शिवछत्रपतींनी १६५६ -५७ मध्ये लोहगड ते घनगड असे या परिसरातील किल्ले स्वराज्यात आणले.पुरंदर तहानंतर मात्र घनगड शिवाजी महाराजांच्या ताब्यात नव्हता, जो पुढे १६७० मध्ये मोघलांकडून हिसकावून घेतला.
त्यानंतर मात्र घनगडाचे थेट उल्लेख येतात ते पेशवाईत. पेशवेकाळात बरेचदा या किल्ल्याचा तुरुंग म्हणुन वापर केलेला आढळतो.सदाशिवरावभाऊंच्या तोतया सुखनिधान कनौजी ब्राम्हण याला या किल्ल्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे याच घनगडासंदर्भात एक दुर्गकथा आहे.
नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर रगुनाथराव पेशवे उर्फ राघोबादादा पेशवे झाले.पण नारायणरावांच्या हत्येत राघोबादादांचा समावेश असल्यामुळे सखारामबापु बोकील्,नाना फडणवीस ,हरिपंत फडके यांनी त्यांना विरोध केला.त्यामुळे ८ फेब्रुवारी १७७४ रोजी राघोबादादांना पेशवे पदावरुन दुर करुन सवाई माधवराव पेशव्यांना पेशवाईची वस्त्रे दिली गेली.मात्र राघोबादादांशीही काही सरदार एकनिष्ट होतेच्,त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे सखाराम हरी गुप्ते.
अर्थात पुणे दरबारातील नाना फडणसीसांसारख्या राघोबादादाच्या विरोधकांना हे आवडणे शक्य नव्हते.त्यांनी राघोबा समर्थक सरदारांना त्यांच्या बायकामुलांसहीत कैद करण्यास सुरवात केली. सुरवातीला अहमदनगरच्या किल्ल्यात, मग पुरंदरवर आणि अखेरीला घनगडावर सखाराम गुप्ते यांना नेण्यात आले.अखेरीस ऑक्टोबर १७७१ मध्ये घनगडावर त्यांचा मृत्यु झाला. पण हा नेमका कसा झाला याचा समकालीन्,अस्सल व विश्वासार्ह पुरावा नाही.यामुळे त्यांच्या मृत्युसंदर्भात काही दंतकथा निर्माण झाल्या. गुप्ते घराण्यातील दंतकथेनुसार सखाराम यांना जवळपास चौदा महिने कैद झाली तरी पोटभर अन्न दिले नाही,तसेच त्यांच्या पायात जड बेडी अडकवली होती.मात्र यास्थितीतही त्यांची स्वामीनिष्ठा कायम होती. घनगडासारख्या दुर्गम भागातील गडावर कैद झालेल्या सखाराम गुप्ते यांनी नाना फडणविसांना पत्र लिहीले कि 'तुम्ही मला मारण्याची योजना आखत असाल तर मला एखाद्या बलाढय शत्रुबरोबर युध्द करायला पाठवा.लढता लढता मला मरण आले तरी ते अधिक सन्मानाचे असेल'.
मात्र या पत्रातील मजकुर नाना फडणवीसांना चांगलाच झोंबला.त्यांना तो आपला अपमान वाटला.त्यांनी चिडून सखाराम गुप्ते यांचा कडेलोट करावा असा हुकुम दिला.त्याप्रमाणे हुकुमाची अमंलबजावणी झाली.
याच दंतकथेबाबत आंबेगावकर गुप्ते घराण्यात थोडी वेगळी माहिती मिळते.ती कथा अशी, सखाराम हरी जेव्हा घनगडावर कैदेत होते,तेव्हा त्यांची पत्नी आवई हिने त्यांना भेटण्याची परवानगी मिळवली.आवई जेव्हा मंगळागौरीच्या पुजेस बसली होती तेव्हा पुने दरबाराचे परवानगीचे पत्र तिला मिळाले.ते पत्र मिळताच मंगळागौरीची पुजा तशीच अर्धवट सोडली आणि पतिदर्शनासाठी घनगडाकडे धावली.परंतु ती गडावर चढते न चढते तोच सखाराम गुप्ते यांचा कडेलोट करण्यात आला.तेव्हापासून आंबेगावकर गुप्त्यांच्या घराण्यातील स्त्रीया मंगळागौर पुजीत नाहीत.
आणखी एका दंतकथेनुसार घनगडावरील कैदेतून सुटका होण्याच्या सर्व आशा संपुष्टात आल्यावर आणि कैदेत अन्नपाणी नीट न मिळाल्याने सखाराम गुप्ते यांनी 'रघुनाथराव्,रघुनाथराव' असे म्हणत बेडीवर डोके आपटून जीव दिला.
अर्थात सखाराम गुप्ते यांचा मृत्यु घनगडावर झाला याखेरीज इतर सर्व दंतकथांना कोणाताही एतिहासिक पुरावा मिळत नाही.
पुढे मार्च १८१८ मध्ये कर्नल प्रॉथर याने घनगडाचा ताबा घेउन हा गड इंग्रजांच्या ताब्यात आणला.
घनगडावर जाण्यासाठी एकच वाट आहे अणि ती एकोले या किल्ल्याच्या पायथ्याच्य गावातूनच वर जाते. एकोले गावात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१) मुंबई आणि पुण्याहून लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भांबुर्डेकडे जाणारी एस. टी पकडावी.लोई १२ वाजता आणि संध्याकाळी ५ वाजता ( मुक्कामी ) अश्या बस आहेत.लोणावळ्यावरुन भांबुर्ड्याला जाण्यासाठी दुपार लोणावळा ते भांबुर्डे हे अंतर ३२ कि.मी चे आहे. भांबुर्डे गावातून चालत १५ मिनिटात एकोले गावात पोहोचता येते. एकोले गावातूनच किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे. गावातील हनुमान मंदिराच्या विरुध्द बाजूस (रस्त्याच्या डाव्या बाजूला) गडावर जाणारी पायवाट आहे. ही वाट थेट किल्ल्यावर जाते.
२) एकोले हे गडाचे पायथ्याचे गाव लोणावळ्यापासून भुशी धरण- कोरीगड-सालतर-भांबुर्डेमार्गे ३५ किमी अंतरावर आहे. या मार्गावर रहदारी फ़ारशी नसल्याने खाजगी वहानाने गेलेले चांगले.खाजगी वहानाने घनगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्या एकोले गावात जाण्यासाठी प्रथम लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भूशी डॅम, आय.एन.एस.शिवाजी मार्गे ऍम्बी व्हॅलीच्या दिशेने जावे. लोणावळ्यापासून २० किमीवर असलेल्या पेठशहापूर गावातून (हे कोरीगडाच्या पायथ्याचे गाव आहे.) उजव्या बाजूचा फाटा भांबुर्डे गावाकडे जातो. येथून खडबडीत डांबरी रस्ता १२ किमीवरील भांबुर्डे गावात जातो. भांबुर्डे गावात मुख्य रस्ता सोडून उजव्या बाजूचा रस्ता पकडावा, हा रस्ता ३ किमीवरील एकोले गावात जातो.या रस्त्यावर भांबुर्डे गावाच्या पुढे एकोले गावाचा फाटा लागतो. या फाट्यावर डावीकडे नवरा-नवरी-भटोबाचे सुळके आपलं लक्ष हमखास वेधून घेतात. येथुन एकोले गाव व घनगड किल्ला ३ कि.मी. अंतरावर आहे.
३) पुणे -पिरंगुट-मुळशी -ताम्हिणीमार्गे देखील भांबुर्डे गावात जाता येईल.मात्र हा रस्ता काही ठिकाणी खराब आहे. हे अंतर साधारण ९० कि.मी.भरते.या स्रत्याने घनगडाबरोबरच कैलासगड देखील बघता येईल.
कोणत्याही मार्गाने आले तरी आपण पायथ्याच्या एकोले गावात पोहचतो.इथून पायथ्याशी घनदाट झाडीने वेढलेला घनगड मोठा साजीरा दिसतो.येकोले गावात पुर्वी फारश्या सुविधा नव्हत्या.आतामात्र इथे चहा,नाष्ट्याची तसेच जेवणाची सोय होउ शकते.

जेवणाची सोय करण्यासाठी महिला बचतगटाच्या सौ.सुरेखा राउत ( मोबाईल- ) यांना संपर्क करावा.
गावाच्या अलिकडे गडाकडे जाणारी वाट सुरु होते.अलिकडे बर्याच जणांनी इथे जागा विकत घेउन फार्महाउस बांधली आहेत.गडाकडे जाणार्या मार्गावर दिशादर्शक फलक लावले आहेत.
अशाच एका फार्महाउसजवळून वाट झाडीत शिरते.काही अंतर गेल्यावर डाव्या हाताला एका उंचव्टयावर एक उध्वस्त शिवमंदीर दिसते.
मात्र सध्या या ठिकाणी पत्र्याची शेड उभारुन शिवपिंडीला निवारा दिला आहे.शेजारी काही मुर्ती,नंदी ,काही तोफगोळे आणि वीरगळी बघायला मिळतात. हे मंदीर चटकन लक्षात येत नाही,तेव्हा नीट लक्ष ठेवून हे मंदीर बघायचे आणि पुढे वाट्चाल सुरु ठेवायची.
वाट दाट झाडीतून जात असल्यामुळे वाटचाल सुखद होते. एकच प्रशस्त वाट आहे ,तरी रस्ता चुकू नये म्हणून दगडावर बाण काढले आहेत.
थोड्यावेळाने दोन छोटी सिमेंटची मंदीरे दिसतात.हि वनदेवाची मंदीरे आहेत. यानंतर वाट मंदपणे चढायला सुरवात होते. थोड्यावेळाने आपण एका सपाटीपाशी येतो.
इथे आपल्याला नव्याने बांधलेल्या गारजाई देवी मंदिरापाशी पोहोचतो.
या मंदिराच्या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीत 'श्री आई महाराजाची व किले घनगडाची' असा तारीख नसलेला शिलालेख कोरलेला आहे. या मंदिराच्या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीत शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख अगदीच अलीकडच्या काळातील वाटतो.
मंदिरात गारजाई देवीची मुर्ती व इतर मुर्त्या असुन मंदिराच्या समोर एक चौकोनी दिपमाळ व काही वीरगळ पडलेले आहेत.
मंदिराच्या समोर एक भलामोठा दगडी तोफगोळा आहे. घनगडावर मुक्काम करावयाचा झाल्यास हे मंदिर उत्तम आहे पण पाण्याची सोय मात्र नाही. या मंदिराच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने चढून गेल्यावर ५ मिनिटात आपण किल्ला व शेजारचा डोंगर यामधील खिंडीत पोहोचतो.
घनगडाचा नकाशाखिंडीतून डावीकडील बाजुस सपाटी आहे.त्या सपाटीचा बुरुजासारखा उपयोग करुन घनगडाच्या पश्चिम पठारावर लक्ष ठेवण्यासाठी उपयोग केला आहे. या बाजुला कोकणच्या बाजुने गेलेली खोल दरी दिसते. तसेच समोर अस्ताव्यस्त पसरलेला सुधागड दिसतो. हा गडाचा बाहेरील भाग असुन येथे या दरीवर व समोरच्या डोंगरावर लक्ष ठेवण्यासाठी कड्यात एक गुहा खोदलेली आहे. तेथे पोहोचण्यासाठी या कड्यातच खोबण्या खोदल्या आहेत. या छोट्या गुहेतून खालच्या परिसराचा सुंदर देखावा आपल्याला दिसतो.
तसेच दगड एकमेवावर रचल्यासारखे दिसणारा एक सुळका आहे.त्याला "मेरुलिंग" असे स्थानिक म्हणतात.या मेरुलिंगवरही जाता येते.पण वाट घसार्याची आहे.त्यामुळे शक्यतो टाळावे.
गुहा पाहून गडाच्या मुख्य दरवाज्यापाशी यावे. गडाच्या तटबंदीवर डागडुजी केलेली असुन दोन बुरुजांमधील दरवाजात जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
या पुर्वाभिमुख प्रवेशव्दारातुन आत गेल्यावर वाट वळते आणि उत्तराभिमुख दुसर्या दरवाज्यातून गडात प्रवेश होतो.
इथे सपाटी असून समोरच कातळात कोरलेल्या दोन गुहा दिसतात. यात ८-१० जणांना सहज रहाता येईल.
मात्र या गुहा स्वच्छ नाहीत तसेच जमीनही ओबडधोबड आहे.
तर डाव्या बाजुला म्हणजे सपाटीच्या उत्तर बाजुला एक प्रचंड मोठा खडक वरच्या कातळातून निसटून खाली आलेला आहे. हा दगड कातळाला रेलून उभा राहील्यामुळे येथे कमान तयार झालेली आहे.
या कमानीतून पुढे गेल्यावर वरच्या बाजूस कातळात कोरलेली एक छोटी गुहा असुन या गुहेत वाघजाई देवीची अलीकडील काळातील भग्न झालेली दगडी मूर्ती आहे. गुहेच्या पुढे एक कातळ टप्पा असुन तो पार करून एक पाण्याचे टाके पाहता येते.
शिवाजी ट्रेल ह्या संस्थेने येथे लोखंडी दोरी बसवल्याने हे टाके पहाणे सोपे झाले आहे. पावसाळ्यात निसरड्या वाटेमुळे घनगडावर जाणे टाळावे.ते पाहून परत प्रवेशव्दारापाशी यावे. प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला १५ फुटाच्या कडा आहे. हा कडा पार केला की आपण थेट किल्ल्यातच प्रवेश करतो.
या ठिकाणी असलेल्या पायऱ्या इग्रजांनी सुरुंग लावून उध्वस्त केल्याने वर सहजपणे जाता येत नव्हते
पण शिवाजी ट्रेल ह्या संस्थेने येथे आता लोखंडी शिडी बसवलेली आहे. शिडीच्या शेवटच्या पायरीसमोर कातळात कोरलेले टाक आहे. यातील पाणी गार व चवदार असून बारमाही उपलब्ध असते. शिडी चढून गेल्यावर कड्याला लागुनच कातळात कोरलेल्या पायऱ्याची वाट सुरु होते. या वाटेने पुढे गेल्यावर आपण घनगड व बाजूचा डोंगर यामधील वरच्या भागात पोहोचतो.
या ठिकाणी कातळात कोरलेली एक गुहा आहे. ही गुहा पाहून परत पायवाटेवर येऊन १०-१२ पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेली गुहा दिसते.
गुहेच्या पुढे पाण्याची ४ कोरलेली टाक आहेत. त्यातील पहीले टाके उघडयावर असुन दुसरे खांब टाके आहे. या खांब टाक्याचा विचार करता गड निश्चितच प्राचीन आहे. तिसर टाक जोड टाक असुन खडकात कोरले आहे. चौथ टाक छोट असुन त्याची अलीकडेच सफाई झाल्याने त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथुन मागे फिरून काही पायऱ्या चढल्यावर आपण पुर्वाभिमुख पडक्या प्रवेशव्दारातून थेट गडाच्या माथ्यावर प्रवेश करतो.
आजमितीस दरवाज्या शेजारचे बुरुज व भिंती फक्त उभ्या आहेत. यातील एका बुरुजात तळघरासारखे बांधकाम आहे पण येथे मोठया प्रमाणात पडझड झाल्याने आत शिरता येत नाही. गडाच्या माथ्यावर प्रचंड गवत माजले असून बरेचसे अवशेष या गवतामुळे दिसत नाहीत. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला असलेल्या पायवाटेने थोड पुढे गेल्यावर कोरड पडलेल पाण्याच टाक आहे.
त्याच्या वरच्या बाजूला पायऱ्या असलेल पाण्याच टाक आहे.
बालेकिल्ल्यावर पाण्याची एकुण चार टाकी असुन दोन कोरडी पडलेली आहेत. पुढे गडाच्या टोकाला सदरेच्या इमारतीचे अवशेष आहेत. गडमाथ्यावर झेंड्याच्या आजुबाजुला देखील बरेच ठिकाणी बांधकामाचे अवशेष दिसतात.
दरवाजाच्या डाव्या बाजुच्या टोकाला दुमजली मोठा बुरुज असुन त्याचा वरील मजला पुर्णपणे कोसळलेला आहे. यात तोफेसाठी झरोके आहेत.
हा बुरुज पाहून दरवाजाकडे आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. किल्ल्याच्या माथ्यावरून आजूबाजूचा विस्तीर्ण घाटमाथा आणि कोकण याचे सुंदर दर्शन होते.
गडाच्या पश्चिमेला सुधागड, सरसगड तर उत्तरेला तैलबैलाची भिंत आणि घनगड यांच्यामधील दरी हा परिसर तसेच नाणदांड घाट ,सवाष्णीचा घाट ,भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा दिसतात.
पुर्वेला भांबुर्ड्याजवळील नवरा नवरी सुळके आणि मुळशी धरणाचा परिसर दिसतो. गडाचा माथा छोटा असल्यानं अर्ध्या तासात पाहुन होतो. संपुर्ण गड फिरण्यास मात्र दिड तास लागतो.
मुंबई - पुण्याहून पहाटे खाजगी वहानाने निघाल्यास कोराईगड, तेलबैला( मधील खाचेपर्यंत) व घनगड हे तीनही किल्ले एका दिवसात पहाता येतात.
संदर्भ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर
३) सांगाती सह्याद्रीचा-यंग झिंगारो ट्रेकर्स
४) डोंगरयात्रा-आनंद पाळंदे
५) दंतकथा किल्ल्यांच्या-महेश तेंडूलकर
६) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
७) www.trekshitiz.com हि वेबसाईट
८) www.durgbharari.in हि वेबसाईट
http://www.thegypsyprincess.com/2016/01/Ghanagad-Tailbail-SoloRnT.html































































.jpg)


No comments:
Post a Comment