Tuesday, February 15, 2022

तैलबैला

पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरून पसरत गेलेली सह्याद्रीची रांग ही भटक्यांना नेहमीच साद घालणारी. सह्याद्रीच्या या भागातुन अनेक घाटवाटा खाली कोकणात उतरताना दिसतात. कोकणातील पाली गावातून घाटमाथ्यावरील लोणावळा - खंडाळा परीसरात येण्यासाठी प्राचिन काळापासून तीन घाटमार्ग आहेत. कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठे पर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली होती. घाटाच्या खाली असणारे सुधागड,सरसगड,मृगगड तर वरील भागात असणारे घनगड,तेलबैला कैलासगड, कोराईगड याची साक्ष देतात. तेलबैला हा यातील एक किल्ला त्याच्या दोन अजस्त्र कातळभिंतीमुळे प्रसिद्ध आहे. किल्ल्याचे स्थान,आकार आणि त्यावरील अवशेष पाहाता हा फक्त टेहळणीचा किल्ला होता.
 
 
सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हारसामुळे झालेली आहे. लाव्हरसाचे थर थंड झाल्यावर पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकांमुळे लाव्हारसाचे थर एका वर एक थर जमत गेले. त्यानंतर उन, वारा, पावसाने या थरांची झीज होऊन वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाल्या. त्यापैकी एक रचना म्हणजे "प्रस्तर भिंती"; तैलबैला उर्फ कावडीचा डोंगर हे अशा रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. डाईक म्हणजे लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. तैलबैलाचा डोंगर हा अशाच प्रकारच्या दोन कातळभिंतीमुळे लक्ष वेधून घेतो. तैलबैलाची भिंत साधारणपणे १०१३ मीटर / ३३२२ फूट उंच असून उत्तर - दक्षिण अशी पसरलेली आहे. या भिंतीच्या मध्यावर "V " आकाराची खाच आहे. यामुळे या भिंतीचे २ भाग झालेले आहेत. या भिंतींच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे.दोन दगडी ब्रेडचे स्लाईस अशी प्रतिमा या दोन पाषाणभिंतीची मनात कोरली जाते. 
डाईक अश्मची भिंत सह्याद्रीत तसे हे तेलबैला, मोरोशीचा भैरवगड, सातमाळ्याचा धोडप ही सर्व डाईकचीच उदाहरणे. प्रत्येकाचे रूप वेगळे तितकेच मोहक तेवढेच सुंदर. तेलबैल्याची माहिती घेण्यापुर्वी डाईक म्हणजे काय ते सविस्तर पाहुया.

 
 
 
 
ज्वालामुखी झाला कि त्यातून लाव्हा रस बाहेर येतो.हा लाव्हा रस घट्ट झाला कि त्यातून पर्वतशिखरांची निर्मिती होते. मात्र काहीवेळ या निर्माण झालेल्या शिखरांना तडे जातात आणि त्यात मोठ्या खाचा पडतात.यातून लाव्हा रस पुन्हा भुपृष्टावर येतो आणि त्या खाचेतच थंड होतो.खाचेत लाव्हा रसापासून तयार झालेली रचना स्थिर असते तर मुळचे शिखर वारा,पाउस,उन यामुळे विदारण पावते म्हणजेच त्याची झीज होते.आणि सभोवतालचा कातळ नष्ट होउन फक्त आतली भिंत स्थिर स्वरुपात उभी रहाते.या रचनेला डाईक स्ट्रक्चर म्हणतात.भू-शास्त्रीय भाषेत अशा सुळक्यांना व्होल्कॅनिक प्लग तर कातळभिंतींना डाइक म्हणतात. डाईक म्हणजे लाव्हारसाच्या साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. तेलबैलाच्या या अजस्त्र भिंती म्हणजे या डाइकचीच अफलातून रचना आहे. या जुळ्या भिंतींचा निसर्गाविष्कार जगांत कुठेही नाही.
सह्याद्रीचा महाराष्ट्रापुरता विचार केला तर डाईक प्रकारचे प्रस्तर नाशिक जिल्ह्यापासून दिसतात ते थेट पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागापर्यंतच.मात्र अपवाद म्हणूनही सातारा,सांगली,कोल्हापुर भागात डाईक रचन दिसत नाहीत.सर्वपरिचित रायरी-गुयरी डोंगररांग म्हणजेच रायगड हा प्रंचंड मोठी डाईक रचनाच आहे.तसेच राजगडाची सुवेळा माची देखील डाईक आहे.अगदी छोट्या आकाराच्या डाईकपासून प्रचंड आकाराच्या पर्वताच्या स्वरुपात या डाईक महाराष्ट्रात पहायला मिळतात.धोडप्,माळशेज घाटातील भैरवगड, मोहनदर उर्फ शिडका असे अनेक गड डाईक रचनेवर उभारलेले दिसतात. 
        डाईक हि भुशास्त्रीय संकल्पना समजून घेतल्यावर तैलबैला आणि परिसराच्या इतिहासाकडे येउया. तेलबैल्याची इतिहासात काही नोंद मिळत नाही.इथे कोणती लढाई झाल्याचाही उल्लेख नाही.तसे बघीतले तर अत्यंत तोकडी जागा असल्यामुळे हा काही लढाउ गड असणे शक्य नाही.काहीच्यां मते हा गड नाही.पण फक्त मोक्याची जागा आणि लढाईच्या दृष्टीने महत्वाचे स्थान किंवा रहदारीच्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी योग्य जागा इतकाच उपयोग असलेले माळशेज घाटातील भैरवगड,भीमाशंकरजवळचा पदरचा किल्ला, प्रबळगडाजवळचे कलावंतीण सुळका किंवा इर्शाळगड किंवा इतर काही गडावरही फारसे अवशेष दिसत नाहीत.तरीही त्यांची गड म्हणून नोंद आहेच.तेलबैल्याचे कागदोपत्री नाव काही दुसरे होते याची खात्री करावी लागेल.
   मात्र जवळ असलेले सुधागड्,सरसगड हे कोकणातील प्राचीन किल्ले, नजीकच्या कड्यात कोरलेली ठाणाळे,खडसांबाळे हि इ.स.पुर्व दुसर्‍या शतकातील प्राचीन लेणी आणि दुरवर नजरेला पडणारा प्रदेश यामुळे तेलबैल्याची दक्षिण भिंत हे एक निरीक्षणाचे ठाणे म्हणून वापरात असणार.अन्यथा इथे असणार्‍या कातळकोरीव गुंफा,पाण्याची टाकी, दक्षिण भिंतीवर चढणार्या कातळकोरीव पायर्‍या हे सर्व दुर्ग असण्याची लक्षणे आहेत.इथून चार घाटवाटा कोकणात उतरतात.या वाटावरुन प्राचीन काळी कोकणातील चौल, महाड बंदरात उतरलेला माल देशावर आणला जाई.हा माल बैल किंवा गाढवावर लादून आणला जात असे.कोकणातून माल घेउन चढाई करुन दमलेले बैल जेव्हा मुक्कामाला या गावात येत असत, तेव्हा त्यांच्या पायाला तेल लावून त्यांना पुढच्या प्रवासासाठी तयार केले जाई.म्हणून या गावाचे नाव तेलबैल्या पडले, असे स्थानिक गावकरी सांगतात.यात तथ्य किती ? हे सांगता येत नसले तरी हे घाटवाट खुप वर्ष वापरात आहेत हे नक्की.
तेलबैल्या परिसरातून उतरणार्‍या घाटवाटा

आता या वाटांची माहिती घेउया.
१) भोरप्या घाट :-
   तेलबैल्या पठाराच्या दक्षिण बाजूने हा घाट खाली दरीत उतरुन सुधागडाकडे जातो.सुधागडाचे मुळ नाव भोरपगड.सहाजिकच भोरपगडाकडे जाणारा भोरप्या घाट.मात्र आज या वाटेने फारसे कोणी उतरत नाही.भोरप्याला स्थानिक लोक वाघुरधव किंवा वाघाची नाळ म्हणतात अन भोरप्या हे नाव क्वचितच वापरतात. वाघुरधव का ? तर घाटाच्या पायथ्याला पाण्याचे डोह असून वाघ तिथं पाणी प्यायला यायचे किंवा या नाळेत वाघांचा वावर असायचा म्हणून वाघाची नाळ.
 भोरप्या घाट माथ्यावरून तैलबैला दृश्य
 
  बैलगाडी रस्त्याने अर्धा तासात तैलबैला गावातून निघून भोरप्याच्या नाळेच्या मुखाशी पोहचता येते.अर्थात या मार्गाने उतराई करायची असेल तर वाटाड्या आवश्यक आहे. किर्र जंगलाच्या वाटेने उतराई करत साधारण निम्मी नाळ उतरुन आले कि काही सोपे कातळटप्पे उतरत पुढील वाटचाल सुरु होते.साधारण सपाटीने भक्कम दगडगोट्यांवरून पुढची वाट उतरते
 
पायथ्यातून भोरप्या घाट/वाघ नाळ/वाघुरधव   
भोरप्या घाट/वाघ नाळ/वाघुरधव सुरुवात  
भोरप्या घाट माथा जंगलटप्पा सुरुवात  
तिवई डोंगर
भोरप्या नाळेकडे वाटचाल
 
  भोरप्या घाटाची नाळ जिथं उतरते तिथेच छोटासा झरा आहे  नाळ संपवून खाली सपाटीवर आलो कि याच ठिकाणी बरेच पाण्याचे डोह आहेत जिथे वाघ पाणी प्यायला यायचे म्हणे म्हणून भोरप्या घाटाला वाघुरधव(वाघाचे डोह)किंवा वाघाची नाळ हे नाव स्थानिकांमध्ये प्रसिध्द आहे.इथून ओढ्याच्या काठाने पश्चिमेकडे वाटचाल करत सपाटीवर यायचे. नाळेच्या उजव्या बाजूने गणपती खिंड गाठता येते. 
गणपती खिंडीतून पूर्वेकडे घनगड अन मारठाण्याचा डोंगर 
गणपती खिंडीतून घोडेजिन घाटाची सोंड
 
सुधागडाची पूर्व कातळभिंत

सुधागडाचा कडेलोट कडा
 
   नाळेच्या डाव्या बाजूला गेल्यावर खिंड गाठली कि खिंडीतून मागे घोडेजिन घाटाच्या सोंडेचे संपूर्ण दर्शन होते.डावीकडे इटुकला घनगड उंचावर दिसतो.सुधागडाच्या पूर्व कातळभिंतीचे सूंदर दर्शन झाले.तिवईचा वेढा डोंगर उंचावलेला दिसतो.अर्थात एकंदरीत या वाटेचा खुप कमी वापर होतो. 

२) घोडेजीनची वाटः-
तेलबैला गावातून १० मिनिटांत तैलबैलाची वाट सोडून पश्चिमेकडे निघालो कि तैलबैला डावीकडे ठेवत काही वेळ चालल्यावर दक्षिणेला सुधागडाच भव्य पठार लक्ष वेधून घेत.डोळे बारीक केल्यास सुधागडावरील भोराई देवीच मंदीर सहजपणे दिसत.
घोडेजिन वाटेवरून मागे दिसणारा तैलबैला 

अर्ध्या तासात आपण सवाष्णी घाटाच्या माथ्यावर पोहोचतो.सवाष्णी,वाघजाई या दोन घाटवाटा बऱ्यापैकी वापरात असल्यामुळे त्यांचा माथा गाठणं तसं अवघड नाही.इथून घोडेजिन माथ्याकडे निघावे.
सवाष्णी पासून डावीकडे १० मिनिटे आडवे गेल्यावर घोडेजिन घाटाच्या माथ्यावर पोहोचलो.
घोडेजिन माथ्यावरून दिसणारा भव्य सुधागड

भव्य सुधागड अगदीच पुढ्यात दिसतो.उजवीकडे धोंडसे गाव,सरसगड नजरेस पडतात.धोंडसे गावातून सुधागडला जाणाऱ्या महादरवाजाच्या वाटेचे सुंदर दर्शन घोडेजिन माथ्यावरून होते.डावीकडे केवणीच भव्य पठार अन नाणदांड घाटाची सोंड ओळखणं तस अवघड नाही.
नेहमीच्या डोंगरसोंडेवर असणाऱ्या घाटांसारखीच घोडेजिन घाटाची सुरुवात होती.तीव्र उताराच्या वाटेने उतराई सुरु होते.वाट जास्त वापरात नसल्याने घसारा बराच आहे.
या सुळक्यांच्या डावीकडे गणपती खिंड आहे 

घोडेजिन माथ्यापासून तासभर उतराई केल्यावर आपण एका मोठ्या ओढ्यात पोहोचतो.इथून सुधागड गाठायचा असेल तर उजवीकडे वळावं.साधारण तासाभरात महादरवाज्याने सुधागडला पोहोचता येईल.डावीकडे काही सुळके अन गणपती खिंड दिसते.
३) सवाष्णी घाट :-
 तेलबैला डावीकडे ठेवत सवाष्णी घाटाकडे जाणारी वाट आहे. हि वाट स्थानिक गावकर्‍यांच्या वापरामुळे मळलेली आहे.एकदा गावकर्यांकडून वाट समजून घेतली कि चुकण्याची फारशी शक्यता नाही.

सवाष्ण घाटाच्या दिशेने निघालो तेव्हा वाटेत हे विस्तीर्ण पठार लागले -

 तेलबैल्याचे पठार ओलांडून टोकापाशी आलो कि नजाकतदार दृश्य पहायला मिळते.एका बाजूला सरळ खोल दरी, दुसर्‍या बाजूला डोंगरभिंत, मध्ये तीव्र तिरप्या उताराची पायवाट अशी सुरूवात असलेला घाट सुंदर का असणार नाही? घाटवाटेची ही सुरूवात -

डावीकडे प्रचंड सुधागड.सुधागडाची तटबंदी व चोर दरवाजा दिसत असतो. तर खाली कोकणातील ठाणाळे, नाडसूर हि गाव दिसत असतात.सवाष्णी घाट आता सुरू झाला कि पहिलाचं टप्पा निसरडा. काळजीपूर्वक पावलं टाकायची. घसरला तर खैर नाही.
    सवाष्ण घाटाच्या 'बारशा'ची कहाणी मनोरंजक आहे. आता असं नाव कसं काय पडलं त्याला इतिहास आहे.एका समजुतीनुसार पेशवे काळात  पंत सखाराम त्यांची पत्नी  येथे पडून मरण पावली. तिची समाधी घाटात आहे.तर दुसर्‍या मतानुसार  कोण्या काळी  एक सवाष्ण घरातून पळाली आणि डोंगर उतरून जायला या वाटेवर आली. वाट न सापडल्यामुळे कातळातच पायर्‍या खणती झाली, आणि अखेर इथेच दिव्यलोकी प्रयाण करती झाली, म्हणून हा सवाष्ण घाट!
वाटेत कातळात कोरलेल्या या पायर्‍या लागतात ('त्या' सवाष्णीने खोदलेल्या असाव्यात. इथेच जवळपास तिची समाधीही आहे, 
पण या पायर्‍या फक्त सुरुवातीच्या थोड्या अंतरापुरत्याच! काही वेळातच वाट दाट झाडीत शिरते.
वाटेत एक बांधकाम लागले. (स्थानिक लोकांपैकी कुणीतरी वाडा/गोठा बांधला असावा)
पुढे एका पठारावर विश्रांती घ्यायची. एव्हाना गाव नजरेच्या टप्प्यात आलेले असते.


या वाटेवर हा ओढा लागतो जो कड्यावरून झेप घेऊन ठाणाळे लेण्यांशेजारून कोसळतो .
 
 ठाणाळे गाव
 
तसेच खाली उतरत उतरत तासा-दीडतासाने शेवटचा टप्पा उतरलो कि धोंड़श्याच्या बैराम पाड्यात पोहचतो.इथून इच्छा असेल तर सुधागड नाहीतर घरी.
जाता जाता - या भागामध्ये उन्हाळ्यात अथवा कोरड्या ऋतुमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. वाघजाई मंदिरापाशी असणार्‍या पाण्याशिवाय, थेट ठाणाळे गावापर्यंत कुठेही पाणी नाही. काही वर्षांपूर्वी या भागात सॅकमध्ये पुरेसे पाणी न घेता आलेल्या एका भटक्याचा तडफडून मृत्यू झाल्याची कथा गावात सांगितली जाते. पावसाळ्यामध्ये सुरू असणारे दोन धबधबे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बंद होतात. तेव्हा भटक्यांनी पुरेसे पाणी सोबत बाळगावे, ही सूचना!
 ४) वाघजाई घाटाने :-
  तेलबैल्या गावातून बरेच चालत पठाराच्या शेवटी पोहोचलो कि वाघजाई घाटाची वाट सामोरी येते.असंख्य फुटलेल्या गुरांच्या वाटा या पठारावर असल्यामुळे नेमकी वाट गावकर्‍यांना विचारुन घेतलेली चांगली."वाघजाई घाटवाट" हा ठाणाळे गावात उतरतो तर "सवाष्णीची घाटवाट" धोंडसे गावात उतरते.

वाघाजाई घाटाने जाण्यासाठी पठाराच्या शेवटी पोहोचलो कि समोर मोठी दरी, खाली उजवीकडे ठाणाळे , डावीकडे धोंडसे आणी बलदंड पहारेकरी सुधागड आणी मागे  डाईक रचनेचा काळाने बनवलेला अद्भुत चमत्कार, म्हणजे तेलबैल्याच्या पाषाण भिंती !

त्या संपूर्ण कड्यावरून काही अंतरावरून एकूण दोन धबधबे खाली उड्या घेतात आणि त्यांचाच पुढे ओढा बनून ठाणाळे गावामागून वाहतो.
वाघजाई देवीचे छोटेखानी मंदिर खूप शांत आणि रम्य आहे.

धबधब्याजवळून दिसणारे विहंगम दृश्य -


मंदिरातली पंच-दैवते

वाघजाई मंदिराच्या जवळ या पायर्‍या लागतात. वाघजाई मंदिराशेजारूनच एक मोठा धबधबा वाहतो.


खाली उतरताना एक सपाटी लागते. या सपाटीच्या उजव्या अंगाला एक धनगरबाईची झोपडी आहे. सर्व धनगरवाडा डोंगराच्या पायथ्याला आहे. उजवी वाट झोपडीच्या दिशेने, तर डावी वाट आपली वाघजाई घाटाची.

हि सपाटी पार केली कि पुढे टेकाड लागते.याला वळसा घातला कि आजूबाजूला दगडधोड्यांच्या राशी दिसतात.
वाट उतरत पुन्हा एका पठारावर येते. इथून खाली उतरले कि उजवीकडे पाण्याची टाकी दिसतात.(पाणी पिण्यायोग्य नाही).

 इथून ठाणाळे गावा शेजारची आदिवासी वस्ती दिसते.

ठाणाळेतून थेट लेण्यांकडे जाणारी व लेण्या वगळून तैलबैलाकडे जाणारी वाट या दोन वेगळ्या वाटा आहेत. वाटेत एका पठारावरून लेण्यांकडे वाट जाते. तेव्हा वाघजाई घाटाने उतरताना आपल्याला लेण्याकडे जाणारा फाट दिसतो.मात्र तो टाळून सलग खाली उतरलो कि आपण ठाणाळे गावात पोहचतो.  
      तेलबैल्याच्या परिसराऊन उतरणार्‍या या सर्व घाटवाटांची माहिती घेतल्यावर आता तेलबैल्याला जायचे कसे ते बघुया. तेलबैल्याला जाण्यासाठी विवीध पर्याय आहेत. 

 तेलबैल्या परिसराचा नकाशा

 सर्वसामान्य पर्यटक आणि दुर्गभ्रमंती करणार्‍यांसाठी 
१) तैलबैला गावात पोहोचण्यासाठी प्रथम मुंबई / पुणे येथून लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भांबुर्डेकडे जाणारी एस. टी पकडावी.पेठशहापूर (हे कोरीगडाच्या पायथ्याचे गाव आहे.) लोणावळा येथून भांबुर्डयासाठी एसटी बस दुपारी १२.०० आणि संध्याकाळी ५.०० वाजता सुटते. लोणावळा येथून तेलबैलाचे अंतर हे ३५ किलोमीटर आहे. भांबुर्डा येथून तैलबैलाचा फाटा अंदाजे ८.५ किमी अंतरावर आहे.
मुख्य रस्त्यावरून उजव्या बाजूला वळणार्‍या रस्त्यावर किल्ले तैलबैला असा फलक लावलेला आहे. या फाट्यावर उतरावे.फाट्यापासून तैलबैला हे गाव साधारण ३ किमी अंतरावर असून, हे अंतर पायी १५ ते २० मिनिटात कापून आपण गावामध्ये पोहोचतो.लोणावळा बस स्थानकातून संध्याकाळी तैलबैला गावासाठी थेट बस सुटते. तैलबैला गावातून तुुम्ही गडावर जाल. 
२) पुण्यावरून तेलबैला गावाचे अंतर जवळपास १०० कि.मी. आहे.पुणे येथील स्वारगेट बस स्थानकामधून रोज दुपारी ३.०० वाजता 'तैलबैला' या गावाला जायला एस.टी. सुटते.हि बस मुक्कामी असते. ताम्हिणी घाटाच्या अलीकडे निवे पिंपरी येथूनही एक रस्ता तेलबैलाकडे जातो. पुण्याहून जाणारी बस याच मार्गाने तैलबैल्याला जाते.स्वारगेट बस स्थानकाशी संपर्क साधुन अधिक माहिती घ्यावी.
    मुळशी मार्गे येणारा हा रस्ता असा आहे.पुणे-पिरंगुट-पौड्,मुळशी -ताम्हिणी- निवे गावापाशी उजवे वळण घ्यायचे. MKCS आश्रमाच्या मार्गाने भांबुर्डे गाव गाठायचे.भांबुर्डे गावात आपल्याला नवरा-नवरी सुळक्यांचे जवळून दर्शन होते. पुणे ते ताम्हिणी हा ७० कि.मी.चा रस्ता उत्तम असून ताम्हिणी ते तेलबैला हा रस्ता मात्र कच्चा आहे.या रस्त्याने बाईक किंवा एस.यु.व्ही.कार असेल तर अडचण नाही मात्र इतर गाड्या काळजीपुर्वक न्यावा लागतात.
३) लोणावळा येथून येकोले बस पकडून तेलबैला फाट्यावर उतरुन चालत गाव गाठता येते.मात्र येकोलेला जाणारी एकच बस असल्यामुळे कोराईगडाच्या पायथ्याशी असलेल्या अंबवणे गावापर्यंत बर्‍याच बस आणि खाजगी वहातुक आहे.आंबवणे येथे उतरुन चालत तेलबैल्या गाठता येते.
सालतर गावात असणारी मारुतीची मुर्ती

या मार्गावर सालतरच्या डोंगरात खिंड आहे.एस.टी.बस सेवा सोयीचे नसल्यामुळे स्वत:च्या गाडीने जाणे सोयीचे आहे. मात्र सालतर खिंडीतील रस्ता नव्याने बनविताना वनखात्याने विरोध केल्याने हा रस्ता अर्धवट आहे.त्यामुळे दोन कि.मी.च्या रस्त्यासाठी सालतर-बार्पे-भांबुर्डे असा मोठा वळसा मारावा लागतो.नीट चौकशी करुन ट्रेकचे नियोजन करावे.
       ज्या दुर्गभटक्यांना थोड्या वेगळ्या वाटा चोखाळायच्या आहेत किंवा घाटवाटांची भटंकंती करायची आहे,त्यांच्यासाठी तेलबैल्याला जाण्यासाठी आणखी दोन पर्याय आहेत. 
१) पाली-सरसगड-ठाणाळे लेणी-वाघजाई घाट-तैलबैला- कोरीगड.
२) पाली-सरसगड-सुधागड-सवाष्णीचा घाट-घनगड-तैलबैला- कोरीगड.
   एकंदरीत कोणत्याही मार्गाने आले तरी तेलबैल्या दुर्गावर जाण्याची पायवाट तेलबैल्या गावातूनच आहे. तैलबैला गावात असलेल्या हनुमान मंदिरामध्ये रहाण्याची सोय होते.  

पुर्वी गावामध्ये जेवणाची सोय नव्हती.आता मात्र इथे मोठ्या संख्येने पर्यटक्,दुर्गभटके आणि प्रस्तरारोहण करणारे येत असल्यामुळे गावात एक्,दोन ठिकाणी जेवणाची सोय होते.गडावर जाण्यापुर्वीच जेवणाची ऑर्डर देउन ठेवली तर परत आल्याबरोबर जेवण करुन निघता येते.
 
 

  तेलबैल्या गावातून या निसर्ग चमत्काराकडे बघताना आपण मुग्ध होतो.छोटीसी टेकडी आणि त्याच्या माथ्यावर असलेले पावाच्या दोन स्लाईस सारख्या दिसणार्‍या प्रंचंड कातळभिंती !गावकर्यांनी याला 'कावडीचा डोंगर' असे यथार्थ नाव दिले आहे. 
 
तैलबैला गावातून थेट विशाल भिंतींच्या दिशेने प्रशस्त पायवाट जाते.या वाटेने भिंतीच्या उजव्या बाजूने चालत गेल्यावर, आपण तैलबैलाच्या माचीवर येऊन पोहोचतो. 
 
इथे एक छोटा सुळका आहे.त्यावर चढून या भिंतीकडे बघताना एक वेगळीच भावना होते.इथे अलिकडेच भगवा ध्वज लावला आहे.गडाची इथे पर्यंतची चढण सोपी असल्यामुळे तेलबैल्या गावातून अवघ्या पंधरा मिनीटातच आपण इथे पोहचतो. इथे उत्तर बाजुची भिंत आपल्या समोर असते.
 
 या भिंतीला उजव्या हाताला ठेवून म्हणजे टेकडीच्या पुर्व अंगाने रुळलेली माचीवरून सरळ जाणारी वाट तैलबैलाच्या "V " आकाराच्या खिंडीत येऊन पोहोचते. 
 
पुर्वी या खिंडीत पोहचायचे तर कातळ कोरीव पायर्‍यावरुन सोपे प्रस्तरारोहण करायला लागायचे.आता मात्र गावकर्यानी खिंडीपर्यंत जाण्यासाठी उत्तम पायर्या बांधलेल्या आहेत. 
 
खिंडीत उभं राहील्यावर तैलबैलाच्या कातळभिंतींच्या विशालतेचा अंदाज येतो.या भिंतीच्या मध्यावर V आकाराची एक खाच आहे जी खालूनही स्पष्टपणे दिसते. या खाचेमुळे या भिंतीचे २ भाग झालेले आहेत. सामान्य भटक्यांचे दुर्गभ्रमण हे या खिंडीपर्यंतच होते. ह्या कातळभिंतींची उंची साधारण ९०० फुट असावी. 



 
 
 दक्षिण दिशेकडे पसरलेल्या भिंतीच्या पोटामध्ये एक गुहा असून तेथे छोटेखानी मंदिर आहे. आहे.

 

पुर्वी हा देव उघड्यावरच धुपत होता. अर्थात देव म्हणजे गुहेमध्ये २-४ शेंदूर लावलेले दगड आहेत, याच या गिरीकंदराच्या अनगड देवता .इथे देवाचा कौल घेण्यासाठी येतात. हे ग्रामस्थांच श्रद्धास्थान असून २०१३ मध्ये तेथे छोटेखानी मंदिर उभारण्यात आले आहे.
 
 गुहेमध्येच उजव्या बाजूला दोन बारामाही पिण्यायोग्य पाण्याची टाकी आहेत. या गुहेमध्ये ३ ते ४ जण व्यवस्थित राहू शकतात. 




 खिंडीतून ५-६ पावलं खाली येऊन डाव्या बाजूस गेल्यावर उत्तरेकडे पसरलेल्या भिंतीच्या पोटात आपल्याला २ गुहा बघायला मिळतात. त्यामधील एक गुहा छोटी तर दुसरी गुहा थोडीफार मोठी आहे. एका गुहेच्या पुढे एक सुकलेल टाकं आहे. गिर्यारोहणाच सामान न वापरता आपण खिंडीतील ही ठिकाणे पाहू शकतो. 
सर्वसामान्य पर्यटक आणि दुर्गभटके यांच्यासाठी तेलबैल्यावर बघण्यासारखे इतकेच आहे.हे सर्व अवशेष पाहून खिंडीत आरामात बसायचे. उत्तर आणि दक्षिण बाजुला प्रंचंड भिंती असल्यामुळे बहुतेकदा इथे उन नसते.मस्त सावली आणि भर्राट वारा खात परिसर न्याहाळायचा. पश्चिमेला खाली कोकणातील रायगड जिल्ह्याचा सुधागड तालुका पसरलेला दिसतो.
 
सह्याद्रीच्या एन कण्याला चिकटलेला आणि प्रशस्त माथ्याचा सुधागड नैऋत्येला दिसतो.
 
हवा स्वच्छ असेल तर लांबवर कातळटोपी घातलेला सरसगड माथा उंचावताना दिसतो. 
 
 
 
दक्षिणेला मोठ्या डोंगराला चिकटलेला छोटासा घनगड लक्ष वेधतो.तेलबैल्या आणि घनगडमधील दरी तर आवर्जून जाउन पहावी अशीच. 
लांब आग्नेयेला भांबुर्डे गावाच्या मागे नवरा-नवरी सुळके दिसतात.त्याचा एकंदरीक आकार बघून ताजमहालाची आठवण होते. 

 
 
तर तेलबैल्याच्या वायव्येला सालतरचा भोजाचा डोंगर पसरलेला दिसतो.
 
तेलबैल्याच्या टेकडीच्या पश्चिम बाजुला खाली मोठे गवताळ पठार पसरलेले आहे.इथूनच सवाष्णी घाट् ( घोडेजीनची वाट ),वाघजाई घाट्,भोरप्या घाट, अश्या वाटांनी खाली कोकणात उतरता येइल.
 
 

 
 
  कॅम्पिंग करण्यासाठी हे पठार म्हणजे एकदम आदर्श जागा.विस्तिर्ण पसरलेली गवताळ सपाटी, प्रदुषणमुक्त वातावरण आणि भन्नाट निसर्ग.इथून दिसणारा सुर्यास्त आणि रात्री होणारे तारकांचे दर्शन याचा प्रत्येक निसर्गप्रेमीने जरुर अनुभव घ्यावा. 
       उत्तर दिशेकडे पसरलेल्या कातळभिंतीच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी पण पूर्णपणे गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. या भिंतीमध्ये दक्षिणेकडील भिंतीप्रमाणे कुठेही गुहा किंवा पाण्याचे टाके नाही. खाचेच्या वर प्रत्यक्ष भिंतीवर चढण्यासाठी इथे प्रस्तरारोहणाच्या मोहिमा व शिबिरे होतात. तेलबैला गावातुन फक्त खिंडीपर्यंत जाऊन यायचे असल्यास दोन अडीच तास पुरेसे होतात पण कातळभिंतीवर चढायचे असल्यास हाताशी एक पुर्ण दिवस हवा.
    जे लोक अधिक तयारीने आलेले आहेत त्यांना तैलबैल्याच्या दक्षिण भिंत्,तसेच उत्तर भिंतीवर प्रस्तरारोहण करता येईल.तसेच दक्षिण भिंतीच्या माथ्यावरुन उत्तर भिंतीवर व्हॅली क्रॉसिंग देखील केले जाते.या सर्व मोहीमांची आपण माहिती घेउया.
पहिली प्रस्तरारोहण चढाई
      तैलबैलाची उजवीकडील बाजू सर्वात कठीण आणि चौथ्या श्रेणीत गणली जाते. प्रस्तरारोहण चढाईला सुरुवात केली कि ८० फुटावरील पहिले स्टेशन आहे. याच्यानंतर दुसरे स्टेशन तसेच तिसरे स्टेशन करत अंतिम टप्प्यात पोहोचुन चढाई पुर्ण केली जाते.
दुसरी प्रस्तरारोहण चढाई
       तेलबैलाच्या मध्यस्थानी मंदिराकडील डाव्या बाजूची प्रस्तरारोहण चढाई ही प्रथम श्रेणीतील आहे. क्लायम्बिंग करून पहिले स्टेशन गाठता येते. अशाप्रकारे दुसरे स्टेशन तसेच तिसरे स्टेशन करत अंतिम टप्प्यात माथा गाठला जातो.
तिसरी प्रस्तरारोहण चढाई
    सुधागड किल्ल्याकडे बाजू अवघड असून, ही तिसऱ्या श्रेणीत गणली जाते. प्रथम 50 फुटांचा कातळकडा चढून प्रस्तराच्या कंगोऱ्यावर पोहचायचे.  पुढील 90 अंशातील कातळकडा चढताना कस लागतो. तिरक्‍या रेषेत चढाई करत 80 फुटांवर दुसरा टप्पा गाठतात. त्यानंतर पुढील 30 फूट  50 फुटांची अंतिम चढाई पूर्णपणे दगड, मातीमिश्रित ठिसूळ संरचनेची (स्क्री) आहे. त्यामुळे या मार्गात अत्यंत सावध राहत आणि दगड ढासळणार नाहीत याची काळजी घेत सुळक्‍याच्या माथ्यावर पोहचता येते.

चौथी प्रस्तरारोहण चढाई
 तेलबैलाच्या मध्यस्थानी मंदिराकडील उजव्या बाजूची प्रस्तरारोहण चढाई ही दुसऱ्या श्रेणीत गणली जाते.

तेलबैल्याच्या दोन्ही भिंतीवर चढणार्‍या या चार वाटा असल्या तरी बहुतेक जण दक्षिण भिंतींच्या उत्तर बाजुच्या कड्यावर चढाई करतात.आपणही तेलबैल्याच्या याच प्रस्तरारोहण मार्गाची आधी माहिती घेउया.
   तेलबैल्या दक्षिण भिंतीची वाटेची सुरवात तेलबैल्याच्या खिंडीतून होते. सुरवातीला कमरेचा खोगीरपट्टा(सीट हार्नेस), स्क्रुड कॅरॅबिनर्स, डिसेंडर, कमरेला सुरक्षेचा उपाय म्हणुन स्लिंग (अत्यंत दणकट रोप) अशा सगळ्या साहित्यानिशी चढाईला सुसज्ज व्हायचे.पहिला प्रस्तरारोहणाचा ४० फुटांचा टप्पा पार करावा लागतो. हा टप्पा पार करता यावा म्हणुन रोप व्यतिरिक्त शिडी लावली तर चढाई अधिक सुरक्षित होते. अर्थात हा टप्पा सोपा नक्कीच नाही. रोप लाइनच्या आणि हलत्या शिडीच्या सहाय्यानी हा टप्पा पार करणं शक्य होते. दोन्ही हातांनी एकतर शिडीला किंवा रोपला धरुन शिडीवर पाय टाकत जाताना हाताची आणि खांद्यांची वाट लागते. कारण प्रत्येक वेळेस आपल्याला स्वतःचं शरीर जोर लावुन वरती खेचावं लागते.
पहिल्या टप्प्यासाठी लावलेली शिडी

 हा ३० ते ४० फुटांचा टप्पा पार केल्यावर अजुन एका २५ फुटांच्या कातळ टप्प्याशी आपण येऊन पोहोचतो. हा पुढचा टप्पा छोटा असला तरी ह्याला "एक्सपोजर" खुप आहे आणि जाण्याची जागासुधा त्यामानाने खुपच छोटी आहे. ह्या टप्प्यावर तीन रोपलाईन्स, होत्याच पण त्याशिवाय पाय ठेवायला सोपं जावं म्हणुन "स्टाईप्स"सुधा मारुन ठेवल्या होत्या. 

दुसऱ्या टप्प्यानंतर लागणाऱ्या अरुंद पायऱ्या

   हा कातळटप्पा पार केला की अजुन एक छोटासा टप्पा लागतो. इथे प्रचंड प्रमाणात "स्क्री" ( घसारा ) आहे. त्यामुळे पावलं जपुन टाकावी लागतात. तर असे एकुण तीन टप्पे पार करुन आपण समीटला म्हणजे गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो. गडाच्यामाथ्यावरुन आपण विस्तृत मुलुख बघु शकतो. म्हणजे घाट माथा आणि खाली कोकण. गडावरुन एका बाजुला सुधागड आणि पालीचा सरसगड, तर दुसऱ्या बाजुला घनगड दिसतो. आणि ह्या सगळ्यांमधे काही दिसत असेल तर फक्त  सह्याद्रीचं रौद्र रूप !
गडाचा माथा
 
 हा कातळटप्पा पार केला की अजुन एक छोटासा टप्पा लागतो. इथे प्रचंड प्रमाणात "स्क्री" आहे. त्यामुळे पावलं जपुन टाकावी लागतात. तर असे एकुण तीन टप्पे पार करुन  समीटला म्हणजे गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो.
गड माथ्यावरुन दिसणारा सुधागड

 गडाच्यामाथ्यावरुन आपण दोन वेगवेगळ्या लेव्हल्स सहज पाहु शकतो. वर म्हणजे घाट माथा आणि खाली कोकण. गडावरुन एका बाजुला सुधागड आणि पालीचा सरसगड, तर दुसऱ्या बाजुला घनगड दिसतो. आणि ह्या सगळ्यांमधे काही दिसत असेल तर फक्त पाताळ. सह्याद्रीचं रौद्र रूप आपल्याला इथुन दिसतं.
 
उतरताना केलेलं रॅपलिंग

  

 
  गडावरुन खाली उतरणे हे हि कसोटी बघणारे आहे. प्रस्तरारोहणाचे दोन टप्पे पार करुन आपण टाक्यापाशी येऊन पोहोचतो. इथुन १५० फुटाचा टप्पा पार करायचा असतो. याचं वैशिष्ठ्य ते असं की ३०-४० फुटांचा टप्पा पार केला की एक पुढे आलेला प्रस्तर (ओव्हरहॅग) येतो की जिथुन पुढे आपल्याला कसलाही आधार न घेता हवेमधे ९० अंशामधे बसुन रोपच्या साहाय्याने खाली यावं लागतं. रॅपलिंगचा खरा आनंद आपल्याला इथे मिळतो. हा सरसरत खाली जाण्याचा टप्पा पार करायला सधारण ४ ते ५ मिनिटं लागतात. हे सगळे थ्रील अनुभवून आल्यानंतर झालेला आनंद आणि  समाधान हे शब्दामध्ये उतरवणं खरच कठीण आहे. ज्याला याचा अनुभव घेता येईल त्याने खरच तो घ्यावा. 
 
 
 
 उत्तर भिंतीची उत्तर बाजुने चढाई:-
    दक्षिण भिंतीची चढाई तुलनेने सोपी असल्यामुळे इथे बरेच प्रस्तरारोहक रॉक क्लायंबिंगचा आनंद घेतात.मात्र तेलबैल्या टेकडी चढताना आपल्याला उत्तर भिंतींची उत्तर बाजु समोर दिसत असते.हि बाजु चढाईसाठी कठीण मानली जाते.

 

 
 
 
ज्यांना हिमालयातील अवघड गिरीशिखरांच्या मोहिमा करायच्या आहेत ते गिर्यारोहक इथे सराव करतात. या सुळक्‍याचा 90 अंशांतील कातळकडा आणि अंतिम टप्प्यातील अवघड चढाईमुळे गिर्यारोहकांचा पूर्णपणे कस लागतो.  
     एकंदरीत दुर्गभ्रमंती करणारे,निसर्गप्रेमी, प्रस्तरारोहक, घाटवाटा तुडवणारे, भुगर्भ शास्त्रज्ञ या सर्वांना तेलबैल्याच्या या जुळ्या भिंती साद घालत असतात.त्यांना प्रतिसाद देउन केव्हा निघताय तेलबैल्याला ?



















संदर्भ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
४ ) डोंगरमैत्री- आनंद पाळंदे
५) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६) www.durgbharari.in  हि वेबसाईट
७) https://www.prasannawagh.com/2018/06/ghodejin-bhorpya-ghat-tailbaila.html, https://mazbhraman.blogspot.com/2017/08/blog-post.html 
  हे ब्लॉग
                                                                  

No comments:

Post a Comment

Aihole

 आयहोळ येथील डोल्मेन :        सध्या बहुतेक पर्यटक आयहोळला चालुक्यांच्या सुरवातीच्या काळात बांधलेल्या मंदीरांना भेट देण्यासाठी येतात. मात्र ल...