Tuesday, February 15, 2022

कैलासगड

    पुणे शहराच्या पश्चिमेकडे भोर, मुळशी, वेल्हा व मावळ असे सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमधे वसलेले काही तालुके आहेत. छत्रपती शिवरायांच्या कालखंडाचा ऐतिहासिक वारसा लाभलेले तालुके म्हणून जशी या तालुक्यांची ओळख आहे, तसेच निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेले तालुके म्हणूनही या तालुक्यांकडे पाहिले जाते. यातील पुणे शहराला सर्वांत जवळचा असणारा तालुका म्हणजे मुळशी. एका बाजूला उंचच उंच डोंगरकडे, तर दुसऱ्या बाजूला काळजाचा ठाव घेणाऱ्या खोल दऱ्या, पावसाळ्यात कोकणाच्या बरोबरीने पडणारा धो-धो पाऊस, कडय़ाकपारीतून वाहणारे धबधबे, या सर्वांमुळे पुणेकरांचे आवडते विकेंड डेस्टीनेशन असणारा ताम्हीणी घाट याच मुळशी तालुक्यातून कोकणात उतरतो. ट्रेकर्सना साद घालणारी देवकुंड, प्लस व्हॅली, घनगड, तैलबैला, अंधारबन अशी आवडती ट्रेकिंगची ठिकाणे देखील याच मुळशी तालुक्यातली. पण हि गर्दीची ठिकाणे टाळून जर का ट्रेकिंगची आणि पावसाळ्यातील निसर्गाची खरी मजा लुटायची असेल तर मुळशी तालुक्यातील कैलासगडाला भेट देणे क्रमप्राप्त आहे. 

        लोणावळ्याच्या डोंगररांगेत उगम पावणार्‍या मुळा नदीवर टाटांनी मुळशी हे धरण बांधलेले आहे. पुण्यातून ताम्हिणी घाटाने कोकणात उतरताना मुळशी गाव सोडले की विशाल जलपात्राने भरलेला मुळशी जलाशय दिसायला लागतो. या जलाशयात त्याचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग करणारा एक भला मोठा डोंगर घुसला आहे. या डोंगराच्याच एका सोंडेवर कैलासगड किल्ला आहे. थोडक्यात सांगायचं तर कैलासगड मुळशी धरणाच्या पसाऱ्याच्या अगदी मधोमध उभा आहे. मुळशी येथील डोंगररांगांमधून कोकणात उतरायला ताम्हिणी घाटाच्या बरोबरीने इतर काही लहान पुरातन घाटमार्ग अस्तित्वात होते जे सध्या वापरात नाहीत. अशा घाट मार्गांवर देखरेखीसाठी इथे काही किल्ले उभारले गेले आणि त्यांपैकी एक आहे कैलासगड. सामान्यांना तर सोडाच पण ब-याच डोंगरभटक्यानासुद्धा हा किल्ला माहीत नाही. कैलासगड किल्ल्याला येथील स्थानिक रहिवासी घोडमांजरीचा डोंगर असेही म्हणतात.किल्ल्याच स्थान आणि आकार पाहाता हा टेहळणीचा किल्ला होता. लोणावळ्याहून भुशी डॅम, INS शिवाजीला जाणार्‍या रस्त्याने पेठ शहापूर - भांबुर्डे - मार्गे पुढे जात असतांना भांबुर्डेच्या पुढे उजव्या बाजूला डोंगररांग तर डाव्या बाजूला मुळशी धरणाच्या पाण्याचा फ़ुगवटा आपली साथ संगत करत असतो. या डोंगररांगेत सवाष्णी घाटावर लक्ष ठेवणारे तैलबैला, घनगड हे किल्ले आहेत. याच रस्त्यावर असलेल्या वडुस्ते गावाच्या पुढे कैलासगड किल्ला आहे. मुंबई आणि पुण्याहून हा किल्ला एका दिवसात पाहाता येतो.
  कैलासगडाच्या इतिहासाचा विचार केला तर किल्ल्यावरील टाक्यावरून हा किल्ला प्राचीन असावा असे वाटते. कैलासगडाचा इतिहास फारसा उपलब्ध नाही. किल्ल्यातील टाक्यावरून हा किल्ला शिवपूर्वकाळापासुनच अस्तित्वात असावा असे वाटते. ऐतिहासिक कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख ताराराणीच्या काळात इ.स. १७०६ मध्ये शंकराजी नारायण सचिवांनी हणमंतराव फ़ाटकांना लिहिलेल्या एका पत्रात मिळतो. या पत्रात त्यांना लिहिले आहे हणमंतराउ फाटक हल्फ हजारी यासि शंकराजी नारायण सचिव... तुम्ही पुर्वी किले कैलासगड व किले सिंहगड गानिमापासून हस्तगत केले. त्याचा सरंजाम पूर्वी तुमचा हुजुरुत करून दिला. तो तुमच्या तुम्हास करारा आहे. यावरून इ.स. १७०६ पुर्वी हणमंतराव फाटकांनी कैलासगड जिंकला हे स्पष्ट होते. महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान असलेला स्वराज्य निर्मितीचा इतिहास येथल्या बलदंड आणि राकट अशा गड-कोटांवर घडला. एकेकाळी वैभवात नांदणारे हेच गड-किल्ले दिवसागणिक ढासळत चालले आहेत. गड-किल्ले फिरणा-या भटक्या डोंगरमित्रांनी इथे एकदा तरी भेट दयावी. पावसाळ्याच्या दिवसात मात्र या किल्ल्यावर जपून भ्रमंती करावी. 
पुणे ते कैलासगड रस्ता
कैलासगडला जायचे तर दोन पर्याया आहेत.
१) पुण्यावरुन :-
  पुणे-मुळाशी-ताम्हणी मार्गे कैलासगड ७८ किलोमीटरवर आहे. पुणे मार्गे येतांना भादसकोंडा गावाच्या पुढे कैलास गडाची खिंड आहे.पुण्यातून जायचे झाल्यास पौड, मुळशी, ताम्हिणी अशी गावे ओलांडत ताम्हिणी घाटाच्या थोडेसे अलिकडे एक रस्ता सह्यधारेच्या कडेकडेने लोणावळ्याकडे जातो. या रस्त्यावर पिंप्री गावानंतर रस्त्याला एक फाटा लागतो. या फाट्यावर डावीकडे जाणारा रस्ता भांबुर्डेमार्गे लोणावळ्याकडे जातो तर सरळ जाणारा रस्ता वांद्रे गावामार्गे वडूस्ते या कैलासगडाच्या पायथ्याच्या गावात पोहोचतो. पिंप्री फाटा वरून एक रस्ता पिंपरी गाव (अंधरबन ट्रेक सुरवातीचा पाँईट) मार्गे ताम्हीनी घाटातुन पालीला जातो. तर एक रस्ता वाद्रे.गावातुन वडुस्ते गावात. आंबेगावापासुन पुढील बहुतेक रस्ता खराब आहे.
२) मुंबईवरुन :-
 मुंबईकरांना कैलासगड लोणावळ्यावरून जवळ पडतो तर पुणेकरांना ताम्हिणी घाटातून. लोणावळ्याकडून जायचे झाल्यास भुशी डॅम, INS शिवाजी मार्गे सहारा अँबी व्हॅलीकडे जाणार्‍या रस्त्याने सर्वात आधी कोरीगडाच्या पायथ्याचे पेठशहापूर व नंतर सालतर खिंडीमार्गे भांबुर्डे गाव गाठायचे. भांबुर्डे गावानंतर लागणारा नदी पुल ओलांडून डावीकडे वांद्रे गावामार्गे वडूस्ते या कैलासगडाच्या पायथ्याला असणाऱ्या गावात पोहोचता येते. .लोणावळ्याहून वडुस्ते गावात पोहोचल्यावर , तोच रस्ता पुढे ताम्हणी घाट आणि मुळशी मार्गे पुण्याकडे जातो.मुंबई ते वडुस्ते साधारण १३७ किमी आहे. आणि लोणावळा ते वडुस्ते हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लोणावळ्यापासून भुशी धरण कोरीगड-भांबर्डे–अहिरवाडी- पिंप्री फाटा- वांद्रे मार्गे ५१ किमी अंतरावर आहे.  लोणावळे - वडुस्ते अशी एसटी बस आहे. पण या मार्गावर इतर रहदारी फ़ारशी नसल्याने. खाजगी वहानाने गेलेले चांगले. 
    याशिवाय मुंबईवरुन मुंबई-गोवा हायवेमे प्रवास करुन  कोकणातून हि पालीमार्गे - ताम्हीणीघाट - पिंपरी गाव - पिंप्री फाटा मार्गे - वडुस्ते येऊ शकतात. पण तुम्हाला ह्या मार्गे अंदाजे २५/३० किमी जास्त अंतर कापायला लागेल.
     पुणे शहरापासुन कैलासगड एका दिवसात पाहुन होतो. मात्र मुंबई शहरातूनही पहाटे लवकर निघाल्यास लोणावळा मार्गे कैलासगडला एका दिवसाची दुर्गदर्शनाची मोहीम सहज शक्य आहे. 
ताम्हिणी घाटातील सुर्यास्त
सनसेट पॉईंट हॉटेल




किल्ल्यावर रहाण्याची सोय नाही.तसेच किल्ल्यावरील पाणी पिण्यायोग्य नाही या सर्व गोष्टी लक्षात ठेवून कैलासगड ट्रेकचे नियोजन करावे.बरोबर जेवण तसेच किमान तीन लिटर पाणी सोबत घ्यावे. गावात गाडी पार्क करण्यासाठी सध्या तरी कोणते शुल्क घेत नाहीत. वडुस्ते गावात रहाण्याची किंवा जेवणाची पुर्वी सोय नव्हती.मात्र अलिकडेच हॉटेल अजित अ‍ॅग्रो टुरिझम,द वॉटरफ्रंट रिसॉर्ट ( संपर्क क्रमांक-९५२९७६७४१४) तसेच साखरे फार्मस अशा सोयी झाल्यामुळे वडुस्तेमध्ये आता मुक्काम करता येतो.तसेच अलिकडे असलेल्या पिंपरी गावात कॅम्पिंगची सोय आहे.तसेच इथे हॉटेल्स असल्यामुळे जेवणाची सोय होते. पिंपरीला अंधारबन फार्म स्वराज्य हॉटेल ( संपर्क क्रमांक -७६६६०६६५८५ ) अंधारबन होम स्टे अशी हॉटेल्स आहेत.
कैलासगडाचा वडुस्ते गावातून टिपलेला दृश्य
वडुस्ते गावात पोहचल्यावर थोडे पूढे गेल्यावर वडुस्ते गावाच्या पुढे दोन किलोमीटरवर कैलास गडाची खिंड आहे.. या खिंडीतूनच कैलासगडाला जाणारी पायवाट आहे. वडूस्ते गावातून खिंडीकडे जाताना उजव्याबाजूला मुळशीचे जलाशय तर डाव्याबाजूला एक अजस्त्र पसरलेली आडवी भिंत दिसत राहते. हाच तो कैलासगड.  
कैलासगड/ घोडमांजरीचा डोंगराचा फलक
k2

k4

खिंडीत पोहोचल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला एक ट्रान्सफार्मर दिसतो तर उजव्या बाजूला कैलासगडाची एक डोंगरधार खाली उतरलेली आहे. येथेच "गड किल्ले सेवा समिती चिंचवड" व "स्वराज्य प्रतिष्ठान मुळशी" यांनी कैलासगड उर्फ घोडमांजरीचा डोंगर अशी माहिती लिहलेला बोर्ड लावलेला आहे.ट्रान्सफॉर्मरची खुण लक्षात ठेवावी म्हणजे कैलासगडाचा रस्ता हमखास सापडेल.
जिथे गडाची वाट सुरवात होते तिथे उजवाबाजूला कैलासगडचा डोंगर आणि डाव्या बाजूला छोटी टेकडी आहे. नीट बघितल तर हि पूर्ण गडाचा डोंगराची अखंड सोंड आहे. पण रस्तामुळे सोंड विभागून डाव्याबाजूला छोटी वेगळी टेकडी झाली आहे. आणि उजव्या बाजूला गड वेगळा झाला आहे.  

k7
गडावर जाण्याची वाट ठळक असुन चुकण्याचा शक्यता कमी आहे. वाटेतील झाडावर काही ठिकाणी गडावर जाणारा मार्ग दाखवणारे बाणाचे चिन्ह लावलेले आहेत.वाट फारशी अवघड नाही मात्र कैलासगडाचा डोंगर पूर्णपणे गवताळ असल्याने वाटेमध्ये फारशी सावली लाभत नाही. वाटेत कोठेही पाणी देखील उपलब्ध नसल्याने जवळ पुरेसे पाणी असणे आवश्यक आहे.
Side view of the trek route
Front view of the trek route
Top view of the trek route.
 गड चढायला सुरवात करताच १५ मिनिटात आपण एका दरीजवळ पोहोचतो. हा झाला पहिला टप्पा. 
k3

येथुन मागे वळून पाहिल्यावर  गडाच्या तिन्ही बाजूंना पसरलेला मुळशी जलाशयाचा पसारा आणि हिरवाईने नटलेल्या टेकड्या दिसायला लागतात आणि इथवर आल्याचे समाधान वाटते.
डोंगराचा सोंडेची पहिली टेकडी आणि त्याबाजूला लाल रंगात अंदाजे दाखवलेली वाट.

     आता येथून पुढे पायवाट समोर असणाऱ्या उंच टेकडीवर वर चढताना दिसते. या पहिल्या टप्यावरून समोर दिसणारा डोंगर म्हणजे कैलासगड असेल असे वाटले तरी कैलासगड लपला आहे या उंच टेकडीच्या मागे. हि पुढे आलेली टेकडी किल्ल्याच्या मुख्य डोंगराला भिडलेली असल्यामुळे प्रथमदर्शनी आपल्याला हि टेकडी म्हणजेच कैलासगड वाटतो.आता समोरच्या टेकडीवर चढणारी पायवाट धरायची आणि डोंगर उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत पुढच्या २० मिनिटात या टेकडीच्या माथ्यावर पोहोचायचे. 
या वाटेने चढत असता, अजून एक वाट उजवीकडे वर जाते ती वाट बहुतेक दुसऱ्या टेकडीवर जात असावी. पण ती वाट न पकडता सरळ जी डावीकडची पायवाट जाते त्याने चालत राहावे.आता मात्र येथून कैलासगडाचा मुख्य डोंगर आपल्या नजरेच्या टप्प्यात येतो. 
येथे आपण चढून आलेली टेकडी आणि समोर कैलासगडाच्या डोंगराची सरळसोट खाली उतरलेली एक डोंगरधार यामुळे एक छोटी खिंड तयार झाली आहे. ह्या खिंडीत पोहोचणे हा झाला कैलासगड चढाईचा दुसरा टप्पा.  सुदैवाने या वाटेला कोठेही फाटे फुटलेले नसल्याने वाट चुकण्याची शक्यता नाही. 
k5
पावसाळ्यात मात्र या वाटेवर भयंकर झाडी वाढते. पुरुष पुरुष उंच वाढलेल्या या झाडीतून मार्गक्रमण करत असताना पायाखाली येणारी वाट व्यवस्थित आहे ना याची खात्री करत अक्षरशः वाकूनच चालावे लागते. अगदी ३-४ फुटावरचा माणूसही दिसणार नाही इतके भयंकर गवत कैलासगडाच्या या वाटेवर सरत्या पावसाळ्यात उगवते. तसेच डोंगराला वळसा घालत असताना वाटेत १-२ लहान धबधबेही आडवे येतात ज्यामुळे पायाखालचा दगड निसरडा झाल्याने जरा जपून चालावे लागते.
 
 आता ही खिंड पार केल्यावर पायवाट सरळ किल्ल्यावर न चढता पुन्हा किल्ल्याचा डोंगर उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत वळसा घालू लागते. काही ठिकाणी सरळ रेषेत तर काही ठिकाणी खडय़ा चढणीची असणारी ही पायवाट आणखी दोन टप्पे पार केल्यावर शेवटी गडाचा डोंगर डावीकडे ठेवत वर चढू लागते. काही ठिकाणी सरळ रेषेत असणारी ही वाट मध्येच खडय़ा चढणीची आहे. एका बाजूला खोल दरी, पायाखालचा मुरमाड घसारा आणि दुसऱ्या बाजुस डोंगराचा कडा यामुळे ही वाट दमछाक करणारी व नवशिक्या भटक्यांसाठी धोकादायक आहे. किल्ल्याचा डोंगराला वळसा घालत डोंगर उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत पायथ्यापासून साधारण तासाभरात आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो.
k15

k9
सुमारे दीड तासाच्या चढणीनन्तर कैलासगडाच्या माथ्यावर आपण पोहोचतो. येथे उजव्या हाताला थोडेसे पठार असुन तेथे भगवा ध्वज उभारलेला दिसतो आणि डाव्या हाताला गडाचा मुख्य विस्तार दिसतो.
गडावर झेंड्याचा पुढे सुकलेला छोटा तलाव

त्याच्या पुढे एक पावसाळी साचपाण्याचा छोटा तलाव दिसतो. 
 
 
या टोकावरून समोरच अस्ताव्यस्त पसरलेला मुळशी जलाशय व धरणाची भिंत आणि त्याच्या आजुबाजुला पसरलेला हिरवागार परिसर दिसतो तर डावीकडे घनगड आणि तैलबैला असा दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. पठाराच्या विरुध्द बाजूला एक छोट टेकाड आहे. उत्तर टोकावरील हे तुरळक अवशेष पाहून आता आपला मोर्च्या गडाच्या दक्षिणटोकाकडे वळवायचा. दक्षिणेकडे चालायला सुरवात करताच समोर एक छोटे टेकाड व त्यावर जाणारी स्पष्ट पायवाट दिसते. गडाच्या दक्षिण टोकावर जाण्यासाठी हि छोटी टेकडी चढावी लागते. पण टेकडी चढायला सुरवात करण्याआधी मुख्य पायवाटेच्या थोडे अलीकडे वाटेला दोन फाटे फुटतात. यापैकी डावीकडची वाट थोडी खाली उतरताना दिसते तर समोर उजवीकडची वाट वर टेकाडावर चढते. डावीकडील अस्पष्ट पायवाट आपल्याला गडावरील खोदीव गुहांकडे घेऊन जाते. त्यामुळे समोरचे टेकाड न चढता आधी या डावीकडील पायवाटेला लागायचे.
 सध्या हि वाट अतिशय धोकादायक झालेली असुन दोरीशिवाय या वाटेने जाणे शक्य नाही. पावसाळ्यात तर ही वाट पूर्णपणे झाडीत हरवून जाते त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक ह्या अवघड वाटेने उतरून पुढच्या १० मिनिटांत खोदीव गुहांसमोर पोहोचायचे. 


 हि अर्धवट खोदलेली गुहा असुन त्यात पाणी साचून पाण्याची टाकी झाली असावी असे वाटते. गडाचा इतिहास शिवपुर्वकाळात नेणारी ही टाकी.गडाच्या भिंतीत कोरलेल्या या लेण्यासारख्या गुहा म्हणजे सध्याची गडावरची पाण्याची टाकीच म्हणता येतील. पण हि टाकी सध्या वापरात नसल्यानं यातलं पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. गडाच्या पोटातील या खोदीव गुहा टाक्यांवरून त्या नि:संशय प्राचीन असाव्यात असे वाटते. गुहा पहायच्या आणि पुन्हा त्याच अवघड पायवाटेने परत वर येऊन आता टेकाडावर चढणाऱ्या पायवाटेला लागायचे.
टाकी पाहून परत पठारावर येऊन डावीकडच्या टेकाडावर चढून गेल्यावर उजव्या बाजूला एक पडकी वास्तू दिसते. येथे बहुदा देवीचे मंदिर असावे कारण स्थानिक लोक आजही या ठिकाणी देवीचे ओटीचे सामान ठेवतात. येथे समोरच उध्वस्त घरांचे काही चौथरे पाहायला मिळतात.माथ्यावरुन संपुर्ण गड व त्याचा परिसर नजरेस पडतो. गडमाथ्याची समुद्रसपाटीपासून उंची आहे ३३३० फुट.
गडाचा उंच माथा आणि त्याचा खाली लाल रंगाच वर्तुळ केलेली जुने अवशेष असलेली वास्तू. ज्या मध्ये पिंपळाच झाड आले आहे
वरील फोटोत लाल रंगाच वर्तुळ करून दाखवलेली वास्तू ज्या मध्ये पिंपळाचा झाड आले आहे

   पश्चिमेकडे बांधकाम अवशेषांचे ढीग दिसतात पण कुठल्याही वास्तुचा अंदाज करता येत नाही इतकं दुर्लक्ष या किल्ल्याकडे झाले आहे. गडावर किल्ला म्हणता येईल अशी तटबंदी व बुरुज कोठेही दिसत नाही. माथ्यावरून पुन्हा खाली वास्तुजवळ येऊन किल्ल्याच्या पुढील टोकावर जातांना डाव्या बाजूला २ ते ३ फुटांची एक रचीव दगडांची भिंत घातलेली दिसते. 
शंकराची पिंड

शंकराची पिंडी भवती असलेली पडकी भिंत 
k14
या शिवपिंडी भोवती दगडे रचून छोट्या भिंती उभारल्या मुळे गडमाथ्यावर हि शिवपिंडीची जागा सहज सापडते. बेवारस अवस्थेत उघड्यावर असलेली हि दुर्गदेवता पाहुन जरा वाईट वाटते.  गडाच्या डोंगर दक्षिणेला असलेल्या डोंगराला भिडलेला असुन या भागाच्या टोकावर दगडांची रचीव तटबंदी आहे. बहुतेक गडाचा पसारा इथवरच असावा कारण पुढे काही अवशेष किंवा वास्तु काहीच दिसत नाही. इथे आपली दुर्गवारी पूर्ण होते. किल्ला फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो.
     आता गड उतरण्यासाठी आपल्यासमोर दोन पर्याय उपलब्ध आहेत. एकतर आल्यावाटेने गड उतरून पुन्हा ट्रान्सफार्मर असणाऱ्या खिंडीत परत यायचे किंवा मग गडाच्या दक्षिण टोकावरून भादसकोंडा या दुसऱ्या गावात उतरायचे. भादसकोंडा गावात उतरणारी वाट मात्र फारशी मळलेली नसल्याने एकदा स्थानिक माहितगार बरोबर असेल तरच या वाटेने खाली उतरावे. 
k16
भादसकोंडा गावातील वाघोबा देवस्थान

भादसकोंडा गावाच्या पायवाटेने खाली उतरल्यावर वडुस्ते - ताम्हणी रस्त्याच्या कडेला वाघदेवाचे एक मंदीर आहे.

भादसकोंडा येथील नैसर्गिक गुहा

तसेच या मंदिरापासून काही अंतरावर एक नैसर्गिक गुहा देखील आहे ज्याला "भादसकोंडा" लेणे असे म्हणले जाते. या वाटेने खाली उतरून डांबरी रस्त्याने १० मिनिटात आपण खिंडीपाशी पोहोचतो.
संदर्भ :-
१) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
२) www.trekshiti.com हि वेबसाईट
३) www.durgbharari.in हि वेबसाईट
४)  http://www.behistorical.com/kailasgad-fort-trekking-information-near-pune/
https://punetrekss.blogspot.com/2021/01/kailasgad-fort-trek-nov2020.html,
 https://trekkersig.in/%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%A1-kailasgad/
 https://www.discovermh.com/kailasgad-fort/
 https://www.forttrekkers.com/kailasgad-fort-pune.html,
https://durgwedh.blogspot.com/2017/10/kailasgad.html,
https://kunalstrek.blogspot.com/2017/02/blog-post.html,
हे ब्लॉग


No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...