Tuesday, February 15, 2022

येलघोल लेणी

मावळ तालुका! निसर्गाने नटलेल्या या तालुक्याला मानवनिर्मित शिल्पांचंही वरदान लाभलं आहे. मावळातील भाजे, बेडसे आणि कार्ले लेणी अप्रतिम आहेत. त्यामुळे या भागातील इतर लहान लेण्यांकडे फारसे कोणी फिरकत नाही. मावळात या भागात, इतरत्र सुद्धा लहान विहार आणि लेणी आहेत. कार्ले, भाजे व बेडसे यांसारख्या परिचित कातळशिल्पांसोबतच तिकोना, पाटण, घोरवडेश्वर अशा अल्पपरिचित लेण्यांना अनेक लोक अधूनमधून भेट देत असतात. अशाच या संपन्न भागात एक सुंदर लेणं वसलेलं आहे. फार थोड्या लोकांना माहिती असणारं; पण नक्कीच प्रेमात पाडणारं असं हे येलघोलचं लेणं! एक लहान अपरिचित पडके लेणे बेडसे लेण्याजवळ, दक्षिणेला येलघोल गावाजवळ डोंगरात आहे. जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्गेस या इंग्रज विद्वानांनी भारतातील लेण्यांचा रितसर अभ्यास करुन केव्ह टेंपल्स ऑफ इंडिया शीर्षकाचे पुस्तक १८८० साली प्रकाशित केले. त्यांनी नमुद केलेल्या मावळातील लहान लेण्यांमध्ये येलघोलचा उल्लेख आढळत नाही.
      येलघोल हे पुणे जिल्ह्यतील मावळ तालुक्यात असणारे एक छोटेसे गाव. डोंगराच्या कुशीत वसलेले. एरवी हे गाव नकाशावर शोधतानाही आपली दमछाक होईल, इतकं याचं अस्तित्व छोटं आहे. पण एका प्राचीन ठेव्यामुळे हे गाव हळूहळू भटकंतीच्या नकाशावर येऊ लागले आहे. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात पवन मावळात वसलेले आहे. दोन लहान डोंगर रांगांच्या मध्ये हे गाव वसलेले आहे. मावळात रिहे, आंधळे नावाची दोन गाव आहेत. 
तसे पाहिले तर सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या या गावावर निसर्गाचा आशीर्वाद तसा जन्मापासूनच. त्यातही पावसाळा हा जास्तच कृपा दाखविणारा. आपल्यापैकी अनेकांना येलघोल हे नावही माहीत नसण्याची शक्यताच अधिक. एखाद्या आडवळणावर असणाऱ्या गावाला जशा अनंत अडचणी भोगायला लागतात, तशाच या गावालाही जन्मापासूनच त्या चिकटलेल्या आहेत. कच्चे रस्ते, चांगल्या शाळांची अन् दवाखान्यांची वानवा, उन्हाळ्यात पाण्यासाठीची वणवण.. वगैरे..वगैरे.. पण ही सारी गावे या अडचणींचा सामना करीत असतात. विकासापासून शेकडो मैल दूर असणाऱ्या या गावावर मात्र निसर्गाची कृपादृष्टी असते. याच नैसर्गिक वरदानावर हे गाव वेगळे ठरले आहे. तर सांगायचा उद्देश हा की, या येलघोल गावात एक प्राचीन लेणं लपलेलं आह. 
येलघोल लेण्याकडे जाण्याच्या मार्गाचा नकाशा
 
    येलघोल या गावाला निसर्गाचं वरदान लाभलं आहे, हे गावात गेल्यागेल्याच समजतं. या लेण्यांना भेट द्यायला मात्र थोडे कष्ट घ्यावे लागतात. महाराष्ट्रात ज्या – ज्या अर्धवट गुहा, लेण्या सापडतात त्यापैकीच एक लेणी म्हणजे हे येलघोल. येथे प्राचीन काळी एक लेणं एक सुंदर निर्मिती होता होता राहिलं. याचं आणखी एक दुर्दैव म्हणजे या लेण्याचा उल्लेख कुठल्याही पुस्तकात अथवा शासनाच्या गॅझेटमध्ये सापडत नाही. अपवाद फक्त काही भटकंती लेख. अशी ही अगदीच दुर्लक्षित आणि अपरिचित लेणी पाहण्यासाठी आपल्याला मोठी कसरत करत यावे लागते. आपले स्वत:चे वाहन असेल तर उत्तम. कारण येथे दळणवळणाची साधने फारच कमी आहेत आणि थेट येलघोलपर्यंत तर एसटीही येत नाही. येलघोलला जाण्यासाठी सर्वप्रथम कामशेतला यावं. त्यानंतर कामशेतवरून बेडसेमार्गे तिकोनापेठ / काळे कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याला लागावं. साधारण १० किमी अंतरावर कडधे नावाचं गाव लागतं. कडधे गावातील मुख्य चौकातून डावीकडे वळावं. (हा रस्ता सरळ सोमाटणे फाट्यावर जातो). साधारण ३ ते ३.५ किमी पुढे गेल्यावर अर्डव नावाचं गाव लागतं, तिथून उजवं वळण घेऊन पुढे ६-७ किमी अंतरावर असणाऱ्या येलघोल गावात आपण येऊन पोहोचतो. रस्त्याने येतानाच या गावाची दुर्गमता आपल्या ध्यानात येते. 
गावात थेट मारुती मंदिरापाशी गाडी लावावी. मंदिरापाशी असणाऱ्या अवशेषांमधून येलघोल या गावाला पुरातन इतिहास असणार हे लगेच समजून येतं. त्याचं कारण म्हणजे मंदिराशेजारी असणाऱ्या ७-८ समाध्यांचे अवशेष. एका सरळ रेषेत हे अवशेष मांडून ठेवण्यात आले आहेत. मंदिराच्या दरवाज्याशेजारी असणारं गजलक्ष्मीचं शिल्प आपलं लक्ष वेधून घेतं. गजलक्ष्मीचं शिल्प सापडणं म्हणजे या भागात समृद्धी नांदत होती हे सहज लक्षात येतं. गजलक्ष्मीच्या शेजारीच असणारा दगडात कोरलेला मारुती आपलं लक्ष वेधून घेतो. समोरच असलेल्या छोट्या घुमटीमध्ये भैरोबाची मूर्ती ठेवलेली आहे. या सर्व अवशेषांमुळे आणि इथून जवळच असणाऱ्या तिकोना व बेडसे लेणी व येलघोल इथं असणारी हिनयान पद्धतीची लेणी, यामुळे येलघोल गावाला त्याकाळात बऱ्यापैकी महत्त्व असणार, हा निष्कर्ष काढायला काहीच हरकत नाही. काळाच्या ओघात कदाचित इथले पुरावे गेलेही असतील; पण अधिक संशोधन केल्यास इथं काही महत्त्वाचे अवशेष सापडू शकतात.या येलघोल गावाजवळ म्हणजे काही किलोमीटर अंतरावरच तिकोणा, बेडसे आणि घोरावडेश्वर या लेण्यांच्या खाणाखुणा आहेत. त्यामुळे या भागात देखील त्याच काळात अशा लेण्यांचे खोदकाम झाल्याचे अनेक अभ्यासकांचे मत आहे.
      येळघोळ  गावांच्या भवताली दोन जुळ्या समांतर डोंगररांगा आहेत. यातील एक डोंगररांग माण गावापासुन वायव्येकडे ज्ञानपुरीच्या मांडवी डोंगरापर्यंत तर दुसरी डोंगररांग घोटवडे गावापासुन वायव्येकडे ज्ञानपुरीच्या मांडवी डोंगरापर्यंत पोहोचली आहे. या दोन रांगा मांडवीच्या डोंगराला एकत्र आल्या आहेत. मांडवी पासुन पुन्हा या डोंगरांना शाखा फुटल्या आहेत. एक शाखा पश्चिमेकडे तिकोना किल्याकडे तर दुसरी शाखा पुर्वेकडे छोटी आणि मोठी सुळुक या जोड गोळीकडे, पवनेकाठी आर्डव गावापर्यंत पसरली आहे. यातील छोटी सुळुक आणि मोठी सुळुक या डोंगरांच्या भागात डोंगरात येळघोळ कपार-लेणे आहे. याच भागात खडकवाडी गावा जवळ डोंगराच्या कुशीत धबधब्याजवळ एक नैसर्गिक कपारीत खडकवाडी कपार लेणे आहे आणि येळघोळ गावा जवळ डोंगराच्या कुशीत धबधब्याजवळ एक नैसर्गिक कपारीत येळघोळ कपार लेणे आहे. येळघोळ कपार लेणे बौद्ध लेणे आहे, हे येथील स्तुपावरुन स्पष्ट होते. खडकवाडी कपार लेणे येळघोळ कपार-लेण्याच्या उत्तरेकडे अंदाजे २.५ किमी अंतरावर संमांतर डोंगरावर आहे.

           गावात लेण्यांची चौकशी केली तर लोकही अगदी आपुलकीने रस्ता दाखवितात. गावापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर ही लेणी आहे. फक्त पायवाट आहे. त्यामुळे हा प्रवासही पायीच करावा लागतो. येलघोल गावात असणाऱ्या मंदिरापासून येलघोल लेण्यांकडे जाणारा कच्चा रस्ता आहे, जो थेट लेण्यांकडे घेऊन जातो. गावकऱ्यांना रस्ता विचारायचा असल्यास ‘गडदची गुहा कुठे आहे’ म्हणून विचारावं; कारण इथं ही लेणी ही गडदचं स्थान म्हणून ओळखली जातात. मंदिराच्या उजवीकडून लेण्यांना जाण्यासाठी रस्ता जातो. इथून सरळ जाऊन तिसऱ्या फाट्याला उजवीकडे सिमेंटच्या रस्त्यावर वळावं आणि सरळ चालत राहावं ते लेणी येईपर्यंत. येलघोल गाव ते लेणी हे अंतर साधारणपणे २-२.५ किमी असेल. एक उत्तम पावसाळी भटकंती करायची असल्यास हा २-२.५ किमीचा रस्ता तुम्हाला निराश करणार नाही. वाटेत ठिकठिकाणी सुंदर रानफुलं फुललेली आणि खळखळत वाहाणारे झरे पावसाळ्यात हमखास पाहायला मिळतात.
      साधारण अर्ध्या -पाऊण तासात आपण येलघोलच्या लेणीपाशी पोहोचतो. मजल दरमजल करत तुम्ही लेण्यासमोर येऊन पोहोचता आणि तो परिसर आणि ती शांतता पाहून मन अगदी प्रसन्न होते. येथे पोहोचल्यावर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ही लेणी एका नैसर्गिक कपारीत अथवा घळीतच असून, त्याच्या अगदी शेजारून एक धबधबा लेणीसमोरच कोसळतो. यामुळे हे दृश्य पावसाळ्यात खूपच सुंदर दिसते. तर अशा नैसर्गिक कपारीतच ही लेणी खोदलेली आहे.पुण्याची शिवथरघळ म्हणून प्रसिद्ध व्हावं, इतकं सुंदर स्थळ. 

      येळघोळ गावाच्या पश्चिम दिशेला, गावाच्या पातळीपासुन थोडे उंचीवर डोंगराच्या कुशीत धबधबा आहे. लेण्यांच्या अगदी शेजारून एक १०-१५ फुटांचा धबधबा पडत असतो आणि आपण त्या धबधब्याचा गंभीर आवाज कानांवर साठवून घेत लेण्यांमध्ये शिरतो. लेण्यातील शांतता मन मोहून टाकते. धबधब्याच्या उत्तरेकडे एक नैसर्गिक कपार तयार झाली आहे. कपार अंदाजे १५ मीटर रुंद, ५ मीटर लांब, आणी २.-३ मीटर उंच आहे. कपारीच्या एका बाजूला धबधबा आहे. येथील दगड सच्छिद्र असुन त्याला भेगा आहेत. कपारीच्या आत मागच्या भिंतीमागे, लहान दगड आणि दगडा दगडा अध्ये पोकळ्या अशी नैसर्गिक रचना आहे. खोदायला सोपे जाईल म्हणुन मुळ कपारीचा वापर लेणे बनवण्यासाठी केला आहे. लेण्याच्या बाजूला पाण्याच्या प्रवाहात लहान मोठया कोसळलेल्या शिळा पडलेल्या आहेत.हे लेणं म्हणजे निव्वळ एक गुहा आहे. 

  पूर्वेस तोंड करून असलेल्या या लेणीच्या उजव्याच बाजूला एका दगडात कोरलेला स्तूप दिसतो. हीनयान पंथीयांचं अस्तित्व दाखवणारा हा स्तूप/दागोबा आहे. अगदी कार्ले किंवा भाजेप्रमाणे भव्य नाही; पण जुन्या काळात या स्तुपावर नकीच सुंदर नक्षी असली पाहिजे. साधारण ५-५.५ फूट उंचीचा स्तूप लेण्याच्या एका कोपऱ्यात कोरला आहे.साधारण पाच फूट उंचीचा हा स्तूप आहे. तसेच डाव्या बाजूला खोल्यांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत दिसते. तसेच लेण्याच्या मध्यभागावरील भिंतीवर बऱ्याच मानवी आकृत्या कोरलेल्या दिसून येतात. कुतूहल चाळविणाऱ्या या आकृत्यांचे प्रयोजन काय? 
 
 
 

   
येलघोल गावाजवळ म्हणजे काही किलोमीटर अंतरावरच तिकोणा, बेडसे आणि घोरावडेश्वर या लेण्यांच्या खाणाखुणा आहेत.
  येळघोळ कपार लेणे मुख्य व्यापारी मार्गाजवळ नसले तरी हे कपार लेणे, बेडसे आणि खडकवाडी या दोन लेण्यांच्या जवळ आहे. हे कपार लेणे तिकोना आणि ज्ञानपुरी खिंडीजवळ आहे. बेडसे आणि येळघोळ या बौद्ध लेण्यांचा या लेण्याशी संबंध असावा. खडकवाडी कपार लेणे आणि येळघोळ कपार लेणे यातील बैठकांची (बाकांची) रचना एक सारखी वाटते. या व्यतिरिक्त खडकवाडीच्या कपार लेण्यात आढळणारे दंडगोलाकृती लेण्याचे अवशेष आणि येळघोळ कपार लेण्यात आढळणारे संपुर्ण दंडगोलाकृती लेणे यात साधर्म्य आहे. खडकवाडीच्या दंडगोलाकृती लेण्याची पडझड झाली आहे. लेण्यासमोरे पडलेल्या मोठया दगडांवरुन पडझड झाल्याचे स्पष्ट होते. येळघोळ चे दंडगोलाकृती लेणे बर्यापैकी शाबूत आहे. मावळात अशा दंडगोलाकृती लेण्यांची कमी नाही. जेम्स फर्ग्युसन, जेम्स बर्गेस आणि एस. नागराजु यांच्या मते असे लेणे स्तुपासाठी बनवले असावे. मावळातल्या काही लेण्यात असे दंडगोलाकृती चैत्यगृह आहेत. बेडसे, भाजे (#२६) येथे अशा दंडगोलाकृती चैत्यगृहात कोरलेला स्तुप आहे. तर भाजे(#२४), शिलाटणे, येळघोळ, वाळख, आणि खडकवाडी येथे अशा दंडगोलाकृती चैत्यगृहात कोरलेला स्तुप नाही. याचा अर्थ येथे दगड विटांपासुन बांधलेला किंवा लाकडाचा बांधीव स्तुप असावा. आज मात्र या ठिकाणचे दंडगोलाकृती चैत्यगृह लेणे रिकामे आहे. मावळातल्या विविध दंडगोलाकृती लेण्यांमध्ये काही स्तुप असलेल्या आणि स्तुप असलेल्या लेण्यांचा व्यास एकसारखाच आहे. मावळातल्या या दंडगोलाकृती लेण्यांव्यतिरिक्त कोकणात कोंडिवते, कान्हेरी आणि जुन्नर जवळ तुळजा लेणी येथे दंडगोलाकृती लेणे (चैत्यगृह) आढळते. येळघोळ चे दंडगोलाकृती चैत्यगृह येथे बनवलेले पहिले लेणे असावे. येथील इतर काम नंतर झाले असावे.




 



   येळघोळ च्या लांब बाकाकडे पहाता येथे खूप उपासक जमा होत असावेत. अभ्यासासाठी किंवा एखाद्या धार्मिक विधी साठी ते जमा होत असावेत. येथे अंदाजे २०-२५ उपासक बाकावर बसू शकतील एवढी या बाकाही रुंदी आहे.
येळघोळच्या कपार लेण्यात उजवीकडे (उत्तरेकडे) स्तुप आहे. स्तुपाच्या बाजूला एक दगडात कोरलेला रांजण (गोल टाके) आहे. स्तुपावर हर्मिका नाही. कदाचित पूर्वी येथे हर्मिका आणि यष्टी असावी. स्तुपावर मध्यभागी एक भोक आहे. येथे कदाचित हर्मिका आणि यष्टी असावी. या व्यतिरिक्त स्तुपावर तीन चोकोनी भोक आहेत. यात कदाचित त्या काळात येथे असलेल्या भदंत किंवा महत्वाच्या माणसांची आठवण म्हणून त्यांचे शारीरिक अवशेष ठेवले असावेत. येळघोळ लेणे त्या काळात महत्वाचे असावे. स्तुपावर कोणतेही नक्षीकाम नाही. स्तुपावर वरच्या बाजूला छतावर काही महत्वाच्या खुणा आढळतात. या ठिकाणी लाकडाचा चैत्यगृह असावा. छतावर अर्धगोलाकार कोरीव काम आहे. स्तुपासमोर च्या जमिनीत आज फारशा खुणा नसल्या तरी येथे लाकडी चैत्यगृह असावा असे वाटते. 
 
याव्यतिरिक्त येथे एक दगडात कोरलेला रांजण आहे. असाच हुबेहूब रांजण शिलाटणे लेण्यात आढळतो. यात कदाचित पाणी अथवा धान्य साठवून ठेवत असावेत. गोल टाक्यांची परंपरा जुनी असावी. नंतर च्या काळात टाकी चौकोनी झाली.
 
 
 
स्तूपाच्या विरुद्ध बाजूला एक छोटी खोली (विहार?) खोदायचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो. तेसुद्धा काम अर्धवट सोडलं आहे. या लेण्यांबद्दल विशेष वाटावं असं एकच... म्हणजे इथं कोरण्यात आलेली शिल्पं. एका रेषेत थोड्या थोड्या अंतरावर ५ ते ६ शिल्पं कोरायचा प्रयत्न केलेला इथं दिसतो. आता ही शिल्पं बुद्धांची म्हणायची, तर इथं महायान पंथीयांचा वावर झाल्याचं नाकारता येत नाही; कारण हीनयान पंथीय बुद्धांची मूर्ती कधीही कोरत नसत. मूर्ती फारशा स्पष्ट नाहीत. त्यामुळे त्या नक्की कुणाच्या आहेत याचा अंदाज लावणं तसं अवघड आहे; पण बुद्धांच्या आकृतीशी थोडंफार साम्य त्या नक्कीच दर्शवतात. यांची निर्मिती कोणत्या काळातील आहे याबद्दल कसलीही माहिती मिळत नाही. त्यामुळे यांचे संशोधन होणे अत्यंत गरजेचे आहे. याबरोबरच या लेण्यांचा परिसर जर पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत साफ केला तर अनेक बाबी उजेडात येतील यात शंका नाही. 
 
 
 
       संपूर्ण लेणी पाहाण्यासाठी साधारण १५-२० मिनिटं पुरतात. एक नवीन सुंदर ठिकाण पाहिल्याचं समाधान मिळवत आपण येलघोल सोडतो ते पुन्हा इथं येण्यासाठीच...येलघोल लेण्यांना भेट द्यायला सप्टेंबर हा महिना सर्वांत चांगला; कारण वाटेवर अनेक प्रकारची रानफुलं फुललेली आपल्याला दिसतात. इथल्या धबधब्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर भर पावसात जावं. इथूनच जवळ असलेली बेडसे, भाजे व तिकोन्याची लेणीसुद्धा पाहण्यासारखी असून, जर व्यवस्थित नियोजन केलं, तर एका दिवसात ही चारही लेणी पाहून होऊ शकतात. लेण्यांच्यासोबतच आपण तुंग-तिकोना किंवा लोहगड-विसापूर यांच्यासारखे किल्लेही बघून येऊ शकतो. अर्थात, हे सर्व बघण्यासाठी अधिक दिवसांचा कालावधी हवा.ज्यांना तंगडतोडीबरोबर प्रवासही करायचा आहे त्यांनी येथे जरूर यावे.तसे या लेण्यांमध्ये फारसे अवशेष सापडत नाहीत; पण माझ्या मते, कधी कधी वास्तूची भव्यता ही केवळ आकारात न मोजता, ती वास्तू जो आनंद आपल्याला देते, यात जर मोजता आली, तर कदाचित त्या वास्तूकडे आपण एका वेगळ्या नजरेने बघू शकू. महाराष्ट्रात ज्या ज्या अर्धवट गुहा आहेत, ही त्यापैकीच एक. 
 तुम्हाला ही गर्दीच्या ठिकाणी सोडून इतर ठिकाणी फिरण्याची इच्छा असेल, तर येलघोलला नक्की भेट द्या. रानफूल, भातशेती, धबधबा, गावचं गावपण जपून ठेवलेली मावळातील माणसं, डोंगरावर उतरलेलं धुकं आणि ट्रेक अनुभवायचा असेल तर येलघोल निसर्गसुंदरतेने नटलेलं ठिकाण आहे. येथे सुधारणा/विकास नाही झाला तेच चांगलं आहे. विकासाच्या नावाखाली निसर्ग पायदळी तुडवला जातो ते येथे नाही. त्यामुळे येलघोल विकासापासून लांब असलेलं सुंदर ठिकाण आहे.
 
संदर्भ :-
१) https://maharashtratimes.com/lifestyle-news/mawal-yelghal-leni/articleshow/55228608.cms
 २) https://www.loksatta.com/lokbhramanti/ancient-caves-in-maharashtra-1589096/ 
३) श्री.विवेक काळे यांचे लिखाण
४) http://narendrasathe.blogspot.com/2017/12/blog-post.html

          

 

No comments:

Post a Comment

Aihole

 आयहोळ येथील डोल्मेन :        सध्या बहुतेक पर्यटक आयहोळला चालुक्यांच्या सुरवातीच्या काळात बांधलेल्या मंदीरांना भेट देण्यासाठी येतात. मात्र ल...