महाराष्ट्रात गडकोट किती? नेमके सांगता यायचे नाही. पण तीन,चारशे तरी नक्कीच असतील. वेगवेगळय़ा कालखंडात तयार झालेल्या या गडकोटांमध्ये स्वत:ची ओळख मात्र फारच थोडय़ांना! राजगडाला जसा त्याचा बालेकिल्ला, तोरणाच्या माच्या, रायगडावरील वास्तुविशेष, लोहगडाची प्रवेशद्वारे, हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा, चावंडचे सप्ततळे.. ही यातली काही उदाहरणे! या गडांची ही विशिष्ट ओळख मनात घोळवतच अनेक जण या दुर्गाच्या वाऱ्या करतात. या अशाच पैकी एक लोणावळय़ाजवळचा विसापूर! त्याच्याही वाटय़ाला असे एक वैशिष्टय़ आले आहे, ते म्हणजे या गडाची आगळीवेगळी, अद्वितीय आणि आजही अखंडित असलेली अशी तटबंदी! विसापूरचा हा तट म्हणजे निष्ठेचा एकेक दगड चढवत विणलेला जणू भरजरी शेलाच!
थंड हवेचे ठिकाण म्हणून “लोणावळा-खंडाळा’ प्रसिद्ध आहेच. पण तरुणांच्या आवडत्या ट्रेकिंगसाठीही हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. मावळातून कोकणात उतरणाऱ्या पायवाटा व मोठे घाटरस्ते आहेत. पावसाळा सुरू झाला की तरुणाईच्या चर्चेत येतो तो लोणावळा-खंडाळाचा परिसर. हिरवागार डोंगर, हिरवी-पोपटी भातखाचरे, कडेकपारीतून कोसळणारे धबधबे व सोबतीला सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील शिवाजी महाराजांचे गडकोट. त्यांना येथील निसर्ग वेड लावतो. मग वेडे होण्यासाठी भटक्यांची पावलेही या मावळाकडे वळतात. लोहगड, विसापूर, राजमाची किल्ला, ढाकचा बहिरी म्हणजे ट्रेकर्स लोकांची पंढरीच.
कुणी इथल्या लेण्या-दुर्गावर निघतात. काही इथल्या धरणांवर विसावतात, काहींना फक्त इथल्या वाटांवर फिरण्यात मजा वाटते. विविध जातीची फुले, पक्षी पाहण्यात वेळ निघून जातो. देहुरोडजवळील कुंडमळ्यात निसर्गाची किमया पाहता येते. इंद्रायणी नदीच्या पाण्याने येथील कातळात रांजणखळगे तयार झाले आहेत. मावळातील दिवसभराची ही भटकंती चिंब भिजवून टाकते.
येथील सगळाच भाग निसर्गत:च सुंदर आहे. येथे पोहचण्यासाठी घाटरस्ते, मोठे टुमदार बंगले, भव्य हॉटेल्स, हेलीपॅड, उद्याने, धरणे पर्यटकांना आकर्षित करतात. हा सारा परिसर अमूल्य अशा झाडा-झुडुपांचा आहे. मावळातील या परिसरात अनेक औषधी वनस्पती सापडतात. शनिवार, रविवार या ठिकाणी असंख्य ट्रेकर्स पाठीवर बॅग घेऊन येथील डोंगरवाटा तुडवताना दिसतात. मात्र, दळणवळणा अभावी खासगी वाहन घेऊनच ही भटकंती करावी लागते.


महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध दुर्गजोडी म्हणजे लोहगड-विसापुर. मावळ तालुक्यात लोणावळ्याच्या पूर्वेस व मळवली रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेस हा किल्ला असून तो समुद्रसपाटीपासून ३०३८ फूट तर पायथ्यापासून १२०० फुट उंचीवर आहे. मुंबईहून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की, लोहगड-विसापूर ही किल्ल्यांची जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेते. मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो लोहगड, मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो.पुणे – मुंबई मार्गावरील भाजे हे प्राचीन बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले गाव याच्या पायथ्याशी आहे. कोकण व देश यांमधील परिसरावर नजर ठेवण्यासाठी या दुर्गजोडीची निर्मीती करण्यात आली. किल्ले विसापूर म्हणजे पवन मावळच्या संरक्षक दुर्गचौकडीपैकी एक. या चौकडीमध्ये आकाराने सर्वात मोठा आणि सर्वात उंच असा विसापूर किल्ला चहूबाजूंनी कातळकडय़ांचे नैसर्गिक संरक्षण असलेला पुराणपुरुष आहे. ह्या गडावर दोन लहानशी टेकाडे आहेत ज्यामुळे हा गड लोहगडापेक्षा काकणभर उंच भासतो. किल्ल्यावरचे प्रशस्त पठार आणि अखंड तटबंदी हीच खरी या किल्ल्याची ओळख आहे. लोहगडासारख्या किल्ल्याचा शेजार असूनही गडाची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे.
विसापुरची सफर करण्यापुर्वी आधी या प्राचीन गडाच्या इतिहासात डोकावुया. खरेतर ज्या गडाच्या पोटात लेणी तो गड नि:संशय दोन-एक हजार वर्षांपूर्वीचा मानावा. विसापुरला चिकटूनच बावीसशे वर्ष जुनी भाजे लेणी असल्यामुळे हा गडही निश्चित तितकाच प्राचीन असणार! ऐन बोरघाटाजवळ गडाची योजना, पोटातील भाजे लेणी, गडावरील खोदकामे, त्यावरील ब्राह्मी लिपीतील लेख या साऱ्यांमुळे लोहगड-विसापूरचा इतिहास प्राचीन काळापर्यंत निश्चितपणे जातो. पण गडाला आजचे जे रूप दिसते ते मराठेशाहीतील आहे. लोहगडामुळेच हा गड मजबूत केलेला असावा. किल्ल्यासमीप दुसरा पर्वत असू नये, असल्यास तो त्याच्या आहारी आणावा. ते शक्य न झाल्यास त्यास तटबंदी घालून मजबूत करावा. शिवरायांच्या आज्ञापत्रातील हा नियमच विसापूरच्या दुर्ग बांधणीस कारणीभूत ठरला असावा.
पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेल्या या किल्ल्याचा पूर्ण इतिहास ज्ञात नाही पण गडाचा इतिहास शोधता तो थेट सातवाहन काळात जातो. किल्ल्याच्या परिसरात भाजे व बेडसे या बौध्द्कालीन लेणी आहेत, त्यामुळे किल्ल्याची निर्मिती त्या काळात किंवा त्याही पूर्वी झालेली असावी. इ.स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी लोहगड,विसापूर हा प्रदेश स्वराज्यात सामील करून घेतला. शिवकालात हा किल्ला इसागड या नावानेही ओळखला जात होता. याचा प्राचीन स्वतंत्र इतिहास फारसा ज्ञात नाही. परंतु लोहगडाच्या इतिहासातच तो सामावलेला असावा. १६६५ च्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर आग्रा भेट व स्वराज्याला स्थिर करण्याच्या धामधुमीत पाच वर्ष गेली. सन १६७० मधे शिवाजी महाराजांनी गेलेले सगळे किल्ले परत जिंकुन घेतले. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला पुन्हा मुघलांकडे गेला. १६८२ मध्ये मराठ्याचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. मराठे इ.स. १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवडात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले. तो तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहचले. म्हणजेच सन १६८२ सालच्या मराठे आणि मोघलांच्या लढाईत मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. या लढाईत मराठ्यांची मोठी जीवितहानी झाली. सन १७१३ मधे कान्होजी आंग्रेने तो जिंकला. सन १७२० च्या आसपास शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर पेशवे बाळाजी विश्वनाथ ह्यांनी कान्होजी आंग्रेशी मसलत करुन राजमाची सोडून इतर सर्व किल्ले शाहू महाराजांना द्यायला सांगितले व कान्होजी आंग्रे यांनी मान्य केले. याच काळात पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी या किल्ल्याचे बांधकाम केल्याचे ओझरते उल्लेख आढळतात. हे बांधकाम म्हणजे विसापुर किल्ल्याची आजही सुस्थितीत दिसणारी तटबंदी आहे. पेशवाईत या किल्ल्याचा उपयोग तुरूंगासाठी करण्याचा विचार होता. इ.स.वी. पेशव्यांच्या काळात तुळाजी आंग्रे यांचा मुलगा विसापूर किल्यामध्ये काही काळ कैदेत होता असे उल्लेख पत्रांमध्ये आढळतात परंतु कालांतराने तो येथून पळून गेला. इ.स.वी. सन १७५३-५४ मध्ये विसापूर किल्यावर दुखण्याची साथ आली होती त्यावेळेस दुर्गाजी नावाचा एक सरदार विसापूर किल्यावर हवालदार म्हणून काम करत होता. ४ मार्च १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने हा किल्ला जिंकून इंग्रजांच्या ताब्यात आणला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून निघून गेले.

आता आपण निघुया विसापुरवर चढाई करण्यासाठी.या गडाचा आकार फुलपाखरासारखा आहे.प्रशस्त पसरलेल्या पठाराला दोन ठिकाणी खाच असल्यासारखी नाळ आहे.अर्थात विसापुरवर चढणार्या वाटा या नाळेतूनच वर येतात. गडावर उत्तर तसेच दक्षिण बाजुने चढता येते. गडावर जाण्यासाठी तीन वाटा. एक भाजे लेणी शेजारच्या ओढय़ाच्या कडेने वर जाणारी. दुसरी उत्तरेकडील पाटण गावातून वर चढणारी, तर तिसरी लोहगड-विसापूर दरम्यानच्या गायमुख खिंडीतून विसापूरला वळसा मारत वर जाणारी.
विसापुरवर चढणार्या वाटांचा नकाशा
मुंबई-पुणे लोहमार्गावर मळवली या रेल्वे स्थानकावर उतरून भाजे गावात यावे. भाजे गावातून या गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक गडाखालील भाजे लेणी पाहात शेजारच्या ओढय़ाच्या कडेने वर जाणारी तर दुसरी लोहगड-विसापूर दरम्यानच्या गायमुख खिंडीतून विसापूरला वळसा मारत वर येणारी. यातील भाजे लेण्यांकडून येणारी वाट थोडी साहसाची तर कोकण दरवाज्याकडून म्हणजेच लोहगडकडून येणारी वाट सोपी पण लांबची. उत्तरेकडील वाट दिल्ली दरवाज्याने तर दक्षिणेकडील कोकण दरवाज्यातून गडावर शिरते असे या वाटांचे उल्लेख आहेत. हे दिल्ली व कोकण दरवाजे आज जरी येथे दिसत नसले तरी त्यांच्या खुणा मात्र ओळखू येतात. ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकल्यावर तोफानी हे दोनही दरवाजे उध्वस्त केले.
विसापुर चढताना एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे.विशेषत भाजे लेण्याकडून येणार्या वाटेने विसापुर चढत असाल तर वाट चुकण्याची शक्यता बरीच आहे. इथे येणारे जवळजवळ प्रत्येक ग्रूप वाट चुकतातच पासून हरवलात तर पाण्याची कुठेही सोय नाही, आणि अशावेळी चकवेही लागतात, वर्तमानपत्रातून विसापूरमध्ये हरवलेल्या ट्रेकर्सचे भयभीत वृत्तांतही वाचायला मिळतात.विशेषतः पावसाळ्यात इथे वाट चुकून काही अपघात झालेत.तेव्हा बरोबर वाटाड्या घेणे उत्तम.
विसापुरवर वाट चुकल्याचा एक प्रातिनिधीक अनुभव आपण वाचुया.हा अनुभव श्री.नितेश साने यांचा आहे.
आम्ही थंडीत विसापूर वर भटकंती साठी गेलो होतो. ४ जणांचा आमचा गट होता. जाताना चढायला ऊन डोक्यावर आल्यामुळे चढताना दमछाक होत होती. परत उतरेपर्यंत आमच्याकडचा पाणीसाठासुद्धा संपला होता. वाटेत एक झरा बघून आम्ही एक पाण्याची बाटली भरून घेतली होती, परंतु ते पाणी पिण्याजोग नव्हतं. अर्ध्यापर्यंत म्हणजे जेव्हा आम्ही गड उतरून पाठावर आलो तेव्हा साधारणतः दुपारचे १:३० वाजले होते. सर्वांना प्रचंड तहान लागलेली होती, परंतु पायथा पाऊण ते एक तासात गाठता येईल असा आमचा तर्क असल्यामुळे, आम्ही तसेच चालत होतो. पठारावर आल्यावर मात्र आम्हाला ज्या वाटेने आलो ती वाट सापडेना. साधारण एका झाडाची खुण माझ्या लक्षात होती, त्या खुणेच्या डावीकडून आम्ही चालू लागलो. साधारणतः १५ ते २० मिनिटं चालल्यावर आम्हाला वाट चुकली आहे हे लक्षात आलं. पण परत माघारी वळून पाठराकडे चालायचे म्हणजे ३०-४० मिनिटाचे अंतर होते. पठारावर एक छोटे पत्र्याचे घर आहे तेथे आम्हाला सहज स्थानिक लोकं भेटली असती व आम्ही त्यांना रस्ता विचारून खाली उतरू शकलो असतो. परंतु बऱ्याच पुढपर्यंत आल्यामुळे आम्ही माघारी फिरायचा बेत रद्द केला. तसेच पुढे जात राहिलो; थोड्या वेळाने आम्ही अशा जागी येउन पोहोचलो जेथे पायवाट संपली होती व डावीकडे धबधब्याच्या खुणा दिसू लागल्या.
थोडा विचार केल्यानंतर धबधब्याच्या वाटेनी खाली उतरायचे ठरवले. हि वाट पुढे अवघड वाटल्यास परत माघारी वळून, आलो त्या वाटेने पठार गाठायचे ठरले. धबधब्याच्या वाटेनेच आम्ही खाली उतरू लागलो. (ही चूक वाचकांनी करू नये) थोडे अंतर पुढे गेल्यावर आम्हाला, साधारण १५ फूट उंच कडा (rock patch) लागला. कडा उतरायला जरा अवघड होता. एकदा उतरलो तर परत हा कडा चढता येईल याची खात्री वाटत नव्हती. तरीही तो कडा कसातरी धडपडत उतरलो. यापुढे ५ मिनिटेही चाललो नसू तोपर्यंत आधीच्या कड्याच्या दुप्पट उंचीचा व त्याहूनही उतरायला खूपच अवघड असा कडा आम्हाला लागला. उतरताना एक जरी पकड चुकली तरी आम्ही सरळ ३०-३५ फूट खाली पडणार होतो. आता मात्र आमच्यात दोन गट पडले. एका गटाच्या मते हा शेवटचा कडा असावा व हा उतरला कि सरळ वाट असावी व त्यामार्गे पायथ्यापर्यंत जातं येईल. मला मात्र पायथा जवळपास कुठे असेल याची धुसरशी सुद्धा शक्यता वाटत नव्हती. त्यातच पुढे जर याच्याहून अवघड कडा लागला तर हा कडा परत चढणं केवळ अशक्य होतं. परंतु आमच्या चौघात एक निर्णय होईना, शेवटी चार पैकी तिघांनी परत फिरण्याचा पर्याय निवडला व आम्ही परत आल्या वाटे माघारी फिरलो. आता आल्या वाटेनी पठार गाठायचा होतं. पहिल्या वेळी उतरलेला कडा कसा बसा परत चढलो. परत आम्ही उलटे धबधब्याच्या उगमाकडे आलो. एकदा मागे वळून पहिला तेव्हा भाजे गावातील मंदिराचा कळस दिसला. शेवटी जेथे आम्ही धबधब्याच्या वाटेला येउन मिळालो होतो तेथे येउन पोहोचलो. आम्ही आलो ती पायवाट अचानक नाहीशी झाली होती. खूप शोध घेऊनही पायवाट आम्हाला सापडली नाही.
आता आम्ही पुरते हरवलो होतो. आम्ही तसेच जंगल तुडवत वाट काढत वरती जाऊ लागलो परंतु काही केल्या मार्ग सापडेना. थोडे चाललो की अशा ठिकाणी पोहोचत होतो जिथून पुढे जाणे शक्य नव्हते. घड्याळाकडे लक्ष गेले तेव्हा ४:१५ वाजले होते. म्हणजे अंधार पडायला साधारण १ ते १:१५ तासच उरला होतं. असेच चालत असताना समोरच्या झाडीत काहीतरी हालचाल झाली. क्षणभर आम्ही दचकलो पण सुदैवाने त्या झाडीतून एक बैल चालत आला. पठारावरील वस्तीच्या जवळ पोहोचल्याची हि खुण असावी असं आम्हाला वाटलं. मग आम्ही चालत राहिलो, मदतीसाठी हाका मारू लागलो. थोड्याच वेळात पठार लागले व त्यावरील घर स्पष्ट दिसू लागले. थोड्या वेळाने आमच्या आवाजाला प्रतिसाद आला. आता आम्ही वेगाने त्या दिशेने जाऊ लागलो. अखेर आमच्यासारखाच हरवलेला, पण आमच्याहून मोठा अजून एक गट सापडला. त्यांना नुकत्याच गावातल्या एक आजी वाटाड्या म्हणून भेटल्या होत्या. त्या गटाला वर गडाकडील वाट दाखवून त्या आजी आम्हाला वाट दाखवण्यासाठी आल्या. अखेर बरोबर वाटेला लागल्याच्या खुणा सापडल्या. पठारावरील ज्या झाडाच्या डाव्या बाजूने आम्ही वळलो, त्याच्याच उजवीकडून बरोबर वाट होती. परंतु दोनही वाटा पुढे विरुद्ध दिशेला जात असल्यामुळे आमची वाट चुकली. त्यानंतर अर्ध्या तासात आम्ही खाली उतरून पायथ्यापाशी पोहोचलो.
भाजे गावातील मंदिरापाशी गेल्यावर वरती गडाकडे एक नजर टाकली. धबधब्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. ज्या कड्यापाशी आम्ही माघारी वळलो, तो कडा व्यवस्थित ओळखू येत होता. त्या कड्याच्या थोडसं पुढे ६० ते ७० फूट खोल दरी होती. पावसाळ्यात येथूनच धबधबा कोसळताना मी पाहिलं होतं. येथून उतरणे पूर्णतः अशक्य होते. त्यामुळे पहिला कडा न उतरता माघारी फिरल्याचे मनोमन समाधान वाटले व माझ्या गिर्यारोहणाच्या छोट्याश्या यादीत या अविस्मरणिय अनुभवाची भर पडली!
विसापूर किल्ल्यावर ट्रेकिंग करताना काही दुर्घटनाही झाल्या आहेत.अश्याच एका दुर्घटनेची माहिती घेउया.तळेगावातील जनरल हॉस्पिटलमधील आठ ते दहा शिकाऊ डॉक्टर सोमवारी विसापूर किल्ला परिसरात ट्रेकिंगला गेले होते. यावेळी किल्ला चढत असताना, अमर कोरे नावाचा तरुण रस्ता चुकला आणि अवघड ठिकाणी अडकला. तिथून ना त्याला वर चढणे शक्य होते, ना खाली उतरणे.
अशा परिस्थितीत अमर कोरेचा सहकारी कौशिक पाटीलने लोणावळ्यातील शिवदुर्ग टीमशी संपर्क साधला. मोबाईल लोकेशन पाठवून त्यांची मदत मागितली. सुदैवाने
शिवदुर्गचा कार्यकर्ता सागर कुंभार हा भाजे लेणी परिसरातच होता. त्याने तत्परता दाखवत घटनास्थळी पोहोचला. सागर कुंभारने त्याची टीम आणि रेस्क्या साहित्य मागवून घेतलं.
सुमारे अर्धा ते पाऊण तासात लोहगड मार्गे ही बचाव टीम गायखिंडीत दाखल झाली. किल्ल्यापर्यंत गाडी जाणे शक्य नसल्याने, पायी प्रवास करत टीम किल्ल्याजवळ पोहचली. दुपारी दोनच्या सुमारास रेस्क्यू कार्य सुरु केलं. त्यांतर संध्याकाळी साडेचार वाजता अमरची सुटका करण्यात आली. अडकलेल्या अमरची अडीच तासात सुटका केली असली तरी तो साडेचार तास एका दगडला पकडून बसला होता.
आता विसापुरवर चढणार्या तिन्ही वाटांची सविस्तर माहिती घेउया.
१) भाजे लेणी मार्गे :-
पहिली वाट आपण समजावून घेउ ती भाजे लेण्याजवळून.लोहगड्,विसापुर बघायला येणारे बहुतेक पर्यटक भाजे लेण्यांना भेट देतातच.
मळवली ते भाजे गावा दरम्यान नव्याने उभारलेले मंदीर
भाजे गावातून लेण्यांकडे जाताना सुरवातीला पावसाळी धबधबा लागतो.पायर्याच्या वाटेने आपण चढलो कि तिकीट काउंटर लागतो.
या तिकीट काउंटरपासून उजवीकडे जाणारी वाट विसापुर गडाकडे जाते. या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाड्या घेणे आवश्यक ठरते. हि वाट सुरवातीला चढते आणि एका पठारावर येते.
उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात.
एके ठिकाणी आपल्याला विसापुर-लोहगड आणि त्यांच्यामधील गायमुख खिंडीचे दर्शन होते.
तसेच इथेच आपल्याला त्रिकोणी शिखर असलेल्या भातराशी डोंगराचे दर्शन होते.याचा आकार बघीतला कि याला किती यथार्थ नाव ठेवले आहे हे पटते.
पुढची वाट दाट झाडीतून आहे.इथून आपल्याला गडाच्या पुर्व टोकाकडे जायचे आहे.इथून गडाकडे नीट लक्ष ठेवायचे.गडमाथा उजवीकडे ठेवत आपल्याला वाटेने चालायचे असते.
हि वाट पुढे एका ओढ्यात चढते.मोठे दगड असलेल्या ओढ्यातून चढत आपल्याला गड माथा गाठावा लागतो.
हा ओढा म्हणजे विसापुरला असलेली नाळ आहे.इथून वर चढल्यावर आपण मोडकळीस आलेल्या पायर्यांपाशी पोहोचतो
येथे बाजूलाच एक कोरीव गुंफा आणि त्याच्या बाजुला मारुतीचे शिल्प आहे.
विसापुरची हि मारुतीची शिल्प मोठी वैशिष्ट्यपुर्ण आहेत.हि मारुतीची शिल्प
निश्चितच प्राचीन नसणार.बहुधा शिवकालात हे मारुती कोरले असावेत.वीरासनात
उभा असलेला हा मारूती गडांवरच्या मारूतीच्या शिल्पांमध्ये सर्वात देखणा
ठरावा. इथे मारुतीचे शेपुट त्याच्या माथ्यावर गोल फिरून आलेले आहे.जणु
'पुच्छ ते मुरडीले माथा' या वर्णनाप्रमाणे. तसेच मारुतीला शेंडी असून ती
बांधलेली आहे. गळ्यांत पदक रूळत आहे, हातापायांत तोडे आहेत, कमरेला मेखला
आणि शेल्याचा पायघोळ पदर आहे, एक भलीमोठी पुष्पमालाही त्यांच्या अंगावर
रूळत आहे, खांद्याला तलवार लटकलेली असून एक हात कटेवरी तर एक हात अभयदान
दिल्याच्या मुद्रेत आहे, पायांतळी एक राक्षस चिरडलेला असून फुललेली शेपूट
मस्तकावर अगदी छत्रासारखी उभी राहिलेली आहे. अज्ञात कारागिरांनी अगदी
निगुतीने हे शिल्प कोरलेले आहे.

मारुती शिल्प नक्कीच शिवकालीन आहे. पण ह्या शिल्पाच्या बाजूच्या खोदीव गुहा
मात्र आपल्याला थेट २००० वर्षांच्याही मागे नेतात. खडकात अंतर्भागात खोलवर
गेलेल्या ह्या गुहांचे खोदकाम सातवाहनकालीन, छिन्नी, हातोड्यांनी तासून
काढलेल्या त्यांच्या खुणा आजही दिसून येतात.

बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची रहाण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते.
२) गायमुख खिंडमार्गे :-
दुसरी वाट तुलनेने सोपी आणि न चुकण्यासारखी आहे. भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत मोठ्या प्रशस्त रुळलेल्या वाटेने यावे.
गायमुख खिंडीतून उजवीकडे जाणारी वाट लोहगडाकडे जाते तर गायमुख खिंडीतून डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते.हि वाट बर्यापैकी प्रशस्त आहे.रस्त्यावर सर्व ठिकाणी दिशादर्शक बाण आहेत.. या वाटेने पावसाळ्यात जाताना विसापुरच्या तटबंदीतून पडणार्या पाण्याचा धबधबा दिसतो.
या वाटेने जाताना विसापुरच्या कातळकड्याकडे लक्ष ठेवायचे.एके ठिकाणी कडा आत जाउन पावसाळी ओढ्यामुळे नाळ तयार झालेली दिसते.याच वाटेने आपल्याला विसापुरला जायचे आहे.हि वाट चुकल्यास सरळ वाट भातराशी डोंगराकडे जाते.
पुर्वी हा फाटा लक्षात आला नाही तर वाट चुकण्याची शक्यता होती.आता मात्र इथे चहा,नाष्ट्याची एक टपरी झाली आहे.त्यामुळे इथे विचारुन बरोबर वाट विचारुन विसापुरवर जाता येते.
हि पुर्ण वाट ओढ्यातून वर चढते.या वाटेवर असलेला दरवाजा इंग्रजांनी उध्वस्त केला.
एक बुरुज तर आहे असा कोसळून ओढ्यातून खाली घसरत आलेला दिसतो.
तटबंदी आत जात-जात जिकडे मिळते त्याठिकाणाहून एक पाण्याचा मार्ग खाली येतो. हाच तो वर जायचा मार्ग. सर्वात वरती मिळालेली तटबंदी तुटलेली आहे. तिच्याकडे लक्ष्य ठेवत चढले म्हणजे रस्ता चुकायचा प्रश्नच नसतो. अर्थात खालच्या टप्यात बरीच झाडी असल्याने आपल्याला आपले डोंगरी कौशल्य वापरावे लागते पण पाण्याच्या वाटेवरून उलट वर जात राहिलो तर फारसा त्रास पडत नाही.
३) पाटण गाव मार्गे :-
मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्स्प्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता आहे.
पाटणच्या पाठीशी विसापूर खड्या पहारेकर्यासारखा उभा आहे. त्याच बाजूला गडाचा दरवाजा आहे.
पायथ्यापासून चढायला सुरवात केली कि थोड्याच उंचीवर एके ठिकाणी कातळातील पायर्या लागतात. अर्ध्या-पाऊण तासात बर्यापैकी उंची गाठली कि एका सपाटीवर पोचल्यावर एक बर्यापैकी मोठी वाट पूर्वेकडे विसापूरला डाव्या बाजूने वळसा घालून जाताना लागते.
त्या वाटेने जायचे नसून गावाच्या मागेच असलेल्या एका नाळेतून वाट आहे , हे लक्षात ठेवायचे.एकदा नाळे पोहचलो कि इथून पुढची वाट चुकायची शक्यता कमी होते.
नाळेतील वाट
हा रस्ता बर्यापैकी वहीवाटीचा आहे.याच वाटेला भाजे लेण्याकडून येणारी वाट उजवीकडून मिळते.या वाटेने वर चढलो कि भाजे लेण्याकडून येणार्या वाटेला आपण मिळतो आणि गुहा आणि मारुतीच्या शिल्पापाशी पोहचतो.
आपण आता भाजे किंवा पाटणमार्गे गडावर आलेल्या वाटेने विसापुर माथ्याची माहिती घेउया.
मारुतीचे शिल्प आणि पहारेकर्याच्या कोठ्या पाहून आपण कातळकोरीव पायर्या चढून गडमाथ्यावर दाखल होतो.कातळ कोरीव पायर्यांचा हा मार्ग निश्चितच प्राचीन.
पावसाळ्यात याच पायरी मार्गावरुन पाणी वहात असते.

यापैकी उत्तरेकडील वाट दिल्ली दरवाजाने तर दक्षिणेकडील कोकण दरवाजातून गडावर शिरते असे या वाटांचे उल्लेख आहेत. गंमत अशी, की हे दिल्ली व कोकण दरवाजे आज तरी इथे दिसत नाहीत. हा सारा आपला कागदोपत्रीचा इतिहास! ब्रिटिशांच्या हल्ल्यात या दरवाजांनी कधीच माना टाकल्या आहेत. यातील दिल्ली दरवाजाने गडात शिरतो.
या वाटेने गडमाथ्यावर जाताना डाव्या हाताला पाण्याच्या कोरीव टाक्या दिसतात.भलेमोठे सपाटीचे पठार आणि मधोमध बालेकिल्ल्याची ती छोटीशी टेकडी अशी विसापूरची रचना.


वर येताच विसापूरचा मोठा भाऊ लोहगड रामराम घालतो. पण त्याचे निमंत्रण थोडेसे बाजूला ठेवत आपण विसापूरचा पाहुणचार घेऊ लागायचे. समोरच डाव्या हाताला सदर लागते. या सदरेशेजारीच एक भलीमोठी तोफ पडलेली आहे. अर्धा भाग उघडा तर अर्धा गाडलेल. विसापूरच्या या तोफेविषयी चिं.ग. गोगटे यांच्या १८९६ मधील महाराष्ट्रातील किल्ले या पुस्तकातील उल्लेख असा आहे कि सुमारे १० फूट लांबीच्या या तोफेवर इंग्लडमधील टय़ुडर नामक राजघराण्याचे राजचिन्ह असलेले गुलाबाचे फूल आणि मुकुट आहे. ER ही इंग्रजी अक्षरे कोरलेली आहेत. इंग्रजांच्या जहाजावर कान्होजी आंग्रेनी छापा टाकून वरील तोफ हस्तगत केली व ती पेशव्यांना दिली. इ.स.१८१८ नंतर किल्ला सोडताना ब्रिटिशानी या तोफेच्या कानात खिळे मारून ती निकामी करून टाकलेली आहे. सध्या मात्र हि तोफ बघायला मिळत नाही. गडावर आणखी दोन तोफा वायव्य बुरुजावर आहेत. गडावरील पाण्याची टाक्यांची संख्या बघता इथे मोठ्या प्रमाणात सैन्य असणार.शिवाय तटबंदी आणि त्यातील तोफांच्या कोनाड्यांची संख्या बघता इथे तोफाही मोठ्या प्रमाणात असणार.मग आज या तोफा गेल्या कोठे ?
विसापूरवरच्या या दोन्ही तोफांना स्वच्छ करत त्यांचा हा इतिहास शोधणे गरजेचे वाटते. खरेतर प्रत्येकच गडावरील या अशा वास्तू-वस्तूंचे योग्य जतन-संवर्धन करत त्यांचे संशोधन व्हावे, त्याची माहिती तिथेच गडावर मांडावी..
आपण आपले पुढील दुर्गदर्शनाला निघूयात. विसापूरच्या या सदरेच्या मागे गडावरील बालेकिल्ल्याची टेकडी!
पण किल्लेदाराच्या वाडय़ाचे आणि शिबंदीच्या काही घरटय़ांचे अवशेष सोडले तर हा बालेकिल्ला फक्त नावापुरताच! नाही म्हणायला गणेशाची एक सुंदर मूर्ती या भग्नावस्थेतही चैतन्य निर्माण करत असते.बालेकिल्ल्याला स्वतंत्र अशी संरक्षण रचना नाही. या बालेकिल्ल्यावर मोठ्या प्रमाणात झाडी आहे.या बालेकिल्ल्याच्या भोवतीने गडावर सर्वत्र सपाटीची जागा आहे. या सपाटीवरून उत्तर-पूर्व-दक्षिण आणि पश्चिम अशा दिशेने गडप्रदक्षिणा सुरू करावी.
सुरुवातीलाच महादेवाचे एक छोटेखानी मंदिर लागते. या मंदिरासमोरच्या दीपमाळेवर गणेशासह काही शिल्पं आहेत.
या मारुती मंदिराकडून उत्तरेकडच्या तटावर यावे. वाटेत एका वीरपुरुषाची प्रतिमा असलेली घुमटी लागते. कोणातरी वीराचे हे स्मारक! याशिवाय या उत्तरेकडील तटावर एकदोन ठिकाणी काही आकृत्या-शिल्पंही कोरलेली आहेत.
इथेच आपल्याला पाण्याची असंख्य टाकी आणि पावसाळी तलाव दिसतात. गडावर पाण्याची जी व्यवस्था केली आहे ती पहाता या गडावर शिबंदी मोठ्या प्रमाणात असणार यात शंका नाही.
विसापुर गडाच्या या ईशान्य बाजुला भातराशी डोंगर दिसतो.
उत्तर दिशा सोडून पुढे पूर्वअंगाने दक्षिणेकडे जाऊ लागलो, की वाटेत आणखी एक खोदलेला तलाव दिसतो. या गडावर चारही दिशांना असे छोटे-मोठे तलाव खोदून पाण्याची उत्तम सोय केलेली आहे. एप्रिल ते जून दरम्यानचा कालावधी सोडला तर वर्षभर यातील पाणीसाठा उपयोगी पडतो. दक्षिण बाजूस गडाचा दुसरा, कोकण दरवाजा येऊन मिळतो. एकेकाळचा हा राजमार्ग पण आज दगडमातीच्या ढिगाऱ्यात तो चोरून उभा आहे.
या दरवाजातून आत आलो, की लगेच काही खोदीव कोठय़ा आणि टाक्या लागतात. या गुहा बहुदा शिबंदीसाठी अथवा कोठारासाठी वापरत असावेत.
यातील काही टाक्यांवर ब्राह्मी लिपीतील लेख आहेत. हे ब्राम्ही शिलालेख इ.स.वी सनाच्या दुसऱ्या शतकातील आहेत.पुण्याच्या संशोधिका डॉ. शोभना गोखले यांनी या लेखांचे संशोधन केलेले आहे.यातील एक ब्राम्ही शिलालेखाचे वाचन असे आहे.
" सातवाहन राजा वासिष्ठीपुत्र पुळूमावी याच्या कारकीर्दीतील पंचविसाव्या वर्षी "
म्हणजे विसापूर किल्ला सातवाहनकालीन होता हे नक्की.कदाचित गडावर त्याकाळी फक्त पाण्याची टाकी असावीत.कारण जवळ असणारी बेडसे आणि भाजे या लेण्यांमध्ये येणारे बौध्द भिक्षु आणि व्यापारी यांच्यासोयीसाठी पाण्याची व्यवस्था असावी. गडावर सहा ब्राम्ही लेख आहेत पैकी चार ब्राम्ही शिलालेख हे अर्धवट आहेत आणि दोन ब्राम्ही शिलालेख हे पूर्ण आहेत. विसापुरच्या प्राचीनत्वावर हे शिक्का मोर्तब म्हणावे लागेल.
खरेतर ज्या गडाच्या पोटात लेणी, तो नि:संशय दोन-एक हजार वर्षांपूर्वीचा मानावा असा एक तर्क आहे. ऐन बोरघाटाजवळची गडाची योजना, पोटातील भाजे लेणी, गडावरील खोदकामे, त्यावरील ब्राह्मी लेख या साऱ्यांमुळे या लोहगड-विसापूरचा इतिहास प्राचीन काळापर्यंत निश्चितपणे जातो. मुस्लीम राजवटीमध्ये या गडाचा उल्लेख ‘इसागड’ असा येतो. पण गडाला आजचे जे रूप आले आहे, ते मराठेशाहीतील! यातही लोहगडमुळेच हा गड मजबूत केलेला असावा. ‘किल्ल्यासमीप दुसरा पर्वत असू नये, असल्यास तो त्याच्या आहारी आणावा. ते शक्य न झाल्यास त्यास तटबंदी घालून मजबूत करावा.’ शिवरायांच्या आज्ञापत्रातील हा नियमच विसापूरच्या दुर्गारोहणास कारणीभूत ठरला असावा.
फुटक्या तटबंदीमागे दडलेला गडाच्या अंगचा मूळचा कातळ
गडावरील हे अभेद्य बांधकाम गडाच्या पश्चिम तटरुपात आहे. विसापूरला उत्तर, पूर्व आणि दक्षिण या तीनही दिशांना तुटलेले खोल कडे आहेत. तेव्हा गड राखायचा असेल तर तो खरा पश्चिमेकडूनच. तेव्हा दिल्ली दरवाज्यापसून ते थेट लोहगड-विसापूर दरम्यानच्या खिंडीपर्यंत तब्बल एक किलोमीटर लांबीचा आणि आठ ते दहा फूट रूंदीचा असा तट घालण्यात आलेला आहे. विसापूरचा सारा जीव त्याच्या या तटात आहे.
कोरीव चिऱ्यातील बांधकाम, रेखीव रचना, तटावरील रुंद रस्ता, जागोजागी तटात चढण्या-उतरण्यासाठी ठेवलेले जिने, आतील व्यक्ती बाहेर दिसणार नाही अशी तटाची उंची, अर्धवर्तुळाकार बुरूज, या तटबुरुजांना बंदुका-तोफांच्या माऱ्यासाठी जागोजागी ठेवलेल्या जंग्या, तटावरील देवतांची शिल्पे व प्रतिके, तटाच्या आतील शिबंदीची घरे, पाण्याच्या टाक्या, दारूगोळ्याची कोठारे, तटाच्या पोटातील खोल्या अगदी शौचकूपांची रचनादेखील या तटबंदीत पहाता येतात. साऱ्या महाराष्ट्रातील डोंगरी किल्ल्यात विसापुर या गिरीदुर्गाची तटबंदी विशेष आहे. काय नाही या तटबंदीत? साऱ्या महाराष्ट्रात अद्वितीय असे हे बांधकाम! तो बांधण्यासाठी लागलेला दगड किल्ल्यावर खोदलेल्या टाक्यांमधूनच मिळवला आहे. या पश्चिम भागात टेकडीलगत अनेक टाक्या खोदलेल्या दिसतात.
महाराष्ट्रात एवढे गडकोट, पण विसापूरच्या या तटाची सर कुणालाही नाही. केवळ ही तटबंदी पाहण्यासाठी दुर्गभटके विसापूरच्या वाऱ्या करतात. संध्याकाळी इथे तटावर आलो, की लोहगडाकडून येणारा पश्चिमेचा वारा बरोबर शिवकाळातील अनेक आठवणीही घेऊन येतो. सूर्यास्ताची सोनेरी किरणे इथे उतरू लागल्यावर तर सारा तटच उजळून निघतो. त्याचे ते जागोजागीचे गवाक्ष-खिडक्या जिवंत होतात, मावळतीचा दिनकर त्यात रंग-रूप भरू लागतो. संध्येच्या त्या पवित्र समयी मग विसापूरचा हा सारा तट एखाद्या ‘त्रिपुरी’चेच लेणे भासू लागतो!
ती बांधण्यासाठी लागलेला दगड किल्ल्यावर खोदलेल्या टाक्यांमधूनच मिळवला आहे. या पश्चिम भागात टेकडीलगत या अशा अनेक टाक्या खोदलेल्या दिसतात.येथून थोड पुढे गेले असता पाण्याची खोदीव टाकी पहायला मिळतात यातील दोन पाण्याच्या टाक्यांवर ४ ब्राम्ही शिलालेख आहेत तसेच तेथील पाचव्या टाक्यावर आपल्याला त्रिरत्न आणि धर्मचक्र कोरलेले आपल्याला पहायला मिळते.
विसापुरचा पश्चिम बाजुचा बालेकिल्ला
गडाच्या दक्षिण टोकाशी आपण येउन पोहचतो.येथून अगदी समोरच लोहगड फारच सुरेख दिसतो. जरा दूरवर दक्षिणेकडे तुंग, तिकोना व पवना धरण दिसते.
भाजे चैत्यगृह

कोरीव स्तूपांची ओळ
गडाच्या या टोकावरुन वायव्येला तळाशी भाजे लेणी आणि भाजे गाव दिसते.
यापुढे एक मोठा तलाव आणि त्याच्या काठावर मारुतीचे शिल्प कोरलेले दिसते.हे शिल्प देखील वैशिष्ट्यपुर्ण आहे.जणू ही शक्तिदेवताच पाण्यात उतरली आहे.इथेही मारुतीचे शेपुट त्याच्या मस्तकावर वळण घेतलेले आहे.उजवा हात चपेटदान मुद्रेत असून डाव्या हातात हे शस्त्र दिसते. या मारुतीने शेंडी बांधली आहे.मात्र बहुतेकदा मारुतीच्या शिल्पाच्या पायाच्या बाजुला पाणी असल्यामुळे त्याच्या पायात राक्षसाला चिरडले आहे कि नाही हे पहायला मिळत नाही.हा मारुती बहुधा टाके खोदताना कोरलेला असणार.म्हणजे गडावरील हि सर्व मारुतीची शिल्प आणि टाकी एकाच कालखंडात म्हणजे बहुधा शिवकालात कोरली असावीत.
आपल्याकडे कुठल्याही गडकोटांवर अशी मारुती, गणेश, महादेव आणि शक्तिदेवतेची मंदिरे हमखास दिसतात. विसापूरवर तर यातील एकटय़ा मारुतीची सहा राऊळे आहेत. या अशा अनामिक शक्तींमुळेच मग या अनगड गडांवरून फिरताना कधीही एकटे वाटत नाही. सतत कुणीतरी पाठीशी असल्यासारखे वाटते.
एका ठिकाणी एकात एक गुंफलेल्या सात टाक्यांचा समूह आहे. गडावरील या टाक्या खोदूनच जलसंचय केला आणि दगडही मिळवला.
बांधकामासाठी लागणारा चुना मळण्यासाठी लावलेली घाणी आजही इथे या पश्चिम तटाशेजारी त्याच्या चाकासह उभी आहे.
शेजारीच दोन मोठी दगडी जातीही दिसतात यापैकी एक जाते तुटलेले आहे. सैन्य पोटावर चालते.विसापुरसारख्या बुलंद गडावर असणार्या शिबंदीसाठी मुदपाकखान्याची किंवा स्वयंपाकघराची व्यवस्था असणारच.आज हि इमारत दिसत नसली तरी त्याची एक खुण म्हणुन हे जाते शिल्लक आहे.
सगळे कसे ताजे वाटते. असे वाटते, जणू आत्ता हे सारे काम संपवून ते मजूर-कामगार गडाखाली उतरलेत. कुठल्याही वस्तूंभोवतीच्या संस्कृतीशी असे एकरूप झालो की त्या आपल्याशी बोलू लागतात.
हा तट आणि त्याचे हे वैभव पाहत पुन्हा वायव्येकडील शेवटच्या बुरुजावर यावे.
यावरील दुसरी भली मोठी तोफ विसापूरच्या सामर्थ्यांचा परिचय करून देत असते. गडावरची तोफ केव्हा बनवली ते साल त्यावर कोरलेले आहे.
इथून थोडेसे पुढे गेल्यावर आपल्याला एक चोर दरवाजा आणि त्याच्या पायऱ्या पहायला मिळतात. या चोर दरवाज्याच्या बाजूस आपल्याला दुहेरी तटबंदी पहायला मिळते. सह्याद्रीचे शिलेदारांनी अलीकडेच या बुरुजाच्या जमिनीखाली गाडल्या गेलेल्या गुप्त दरवाजाला मोकळा श्वास मिळवून दिला तसेच अपार कष्टांनी पाच फूट जमिनीखाली गाडली गेलेली तोफ बाहेर काढली. १८१८ नंतर विसापूरवर दोन तोफा असल्याची नोंद होती व आता त्यामध्ये तिस-या तोफेची नोंद झाली आहे. या बुरुजावरूनच थोडय़ा वेळापूर्वी पाहिलेला पश्चिमेकडचा सारा तट एका नजरेत येतो.
हा तट जिथे संपतो त्या ईशान्येकडील बुरुजावर एक गोल चौथरा बांधलेला आहे. त्याच्या बाजूने चर खोदलेला आहे. एखादे दगडी चाक फिरवण्यासाठीचीच ही रचना. पण ही काही चुन्याची घाणी नाही, तर सर्व दिशांना तोफ फिरवण्यासाठीची योजना आहे.


आता येउया गडाच्या वायव्य भागाकडे.इथे आपल्याला छप्पर उडालेली परंतु अजूनही भिंती शाबुत असणारी इमारत दिसते,हि इमारत कदाचित धान्याचे कोठार किंवा दारुगोळा कोठार असेल असा अंदाज होता,पण श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड- विसापूर विकास मंचातर्फे लोहगड व विसापूर किल्ल्यांवर गेली 19 वर्षे दुर्गसंवर्धनाचे काम सुरु असताना कार्यकर्ते गड भ्रमंती करत असताना दारुगोळा कोठारासमोर कार्यकर्त्यांना एक तोफगोळा जमिनीतून वर आलेला दिसला तो तोफगोळा बाहेर काढल्यानंतर अन्य ठिकाणी शोधले असा अजून एक तोफगोळा कार्यकर्त्यांना सापडला. हे दोन तोफगोळे सापडल्याचे पुरातत्व विभागाला कळवण्यात आले आहे.

मागील वर्षी याच ठिकाणी तीन तोफगोळे कार्यकर्त्यांना सापडले होते ते पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्यात आले. त्यावर्षी मंचाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उत्खनन करण्याची पुरातत्व विभागाला मागणी केली तरी पुरातत्व विभागाकडून काही प्रतिसाद मिळाला नाही याची खंत मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी केली. आता तरी पुरातत्व विभागाने या ठिकाणी उत्खनन करून अजून काही सापडते का हे पहावे, अशी अपेक्षा करतो असे सचिन टेकवडे यांनी सांगितले.
सापडलेले तोफगोळे हे कुल्फी तोफगोळे प्रकारातील असून यामध्ये तोफेत दारू भरून नंतर वाती द्वारे हे उडवले जातात, अशी माहिती डेक्कन कॉलेजचे इतिहास संशोधक सचिन जोशी यांनी दिली.सदर या तोफगोळ्याचे वजन हे पाच ते दहा किलो आहे यावरुन हि इमारत नक्कीच दारुगोळ्याच्या कोठाराची असेल.
 |
Ruins of Peshawa's mansion
|
तसेच इथे आणखी एका वाड्याचे अवशेष दिसतात.
या बुरुजाच्या अलीकडे टेहळणीसाठी पुन्हा एक स्वतंत्र बुरूज बांधलेला आहे. किल्ले स्थापत्यातील हा एक आगळा प्रकार! तेला-तुपाच्या टाक्याही इथे दिसतात.
एकंदरीत प्रशस्त पसरलेला हा गड नीट निरखायचा तर पुर्ण दिवस पाहीजे.पण अगदी गडबडीत पहायचा तरी चार-पाच तास लागतील्,मात्र बहुतेक दुर्गभटके लोहगडाला भेट देउन परत जातात.वास्तविक त्याचा हा प्राचीन साथीदार आवर्जून पहावा असाच आहे.तेव्हा लोणावळा परिसरातील गड-किल्ले बघण्याचे नियोजन असेल तर विसापुरला अवश्य भेट द्या.
विसापूर किल्ला – धबधबा प्रस्तरारोहण – (प्रथम चढाई)३ जून १९९९
श्रेणी – अति अवघड-कठीण
उंची – १४० फूट
मार्ग – पुणे-मुंबई लोहमार्गावरील मळवली स्थानकावर उतरावे.स्थानकाबाहेर पडून भाजे लेणी व लोहगड रस्त्यावर न जाता डावीकडे नैऋत्य दिशेस पाटण गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने चालण्यास सुरवात करावी.२० मिनिटाच्या चालीनंतर ‘मालेवाडी’या डोंगर वस्तीकडे जाणाऱ्या रुळलेल्या पायवाटेवर चालण्यास लागावे,पुढे २७ खोदीव पायऱ्या आहेत.मालेवाडीच्या वाटेवरून विसापूर किल्ल्याची तटबंदी आणि कातळकड्यातील पांढरट रंगाचा १४०’धबधबा लक्ष वेधून घेतो.पायथ्याला प्रस्तरारोहण सरावास योग्य असे प्रचंड मोठे ३-४ खडक पडलेले आहेत. वावर नसल्याने खाज कुईलीचे रान माजले आहे.कारवीच्या गचपणातून वाट काढत चढाई मार्गाच्या पायथ्याला पोचावे.(वेळ-१.३० तास)
निवारा- मालेवाडी किंवा जंगलात तंबू ठोकून राहता येईल.(सदर चढाई एक दिवसात पूर्ण होणारी असल्याने प्रस्तारोहण साहित्य आणि जुजबी,उपयुक्त साहित्य जवळ बाळगावे.मुक्कामाची गरज भासणार नाही.)
पाणी – पाटण,मालेवाडी येथील विहिरीवरून पुरेसा पाणी साठा घेऊन दिवस भर पाणी पुरवावे.
आरोहण – अंगावर येणारे छोटे छोटे कडे आणि कठीण,चिमटीत पकडता येतील अश्या होल्ड्सने सुरवात होते.
प्रथम टप्पा – ८० फूट – १२ ‘ मुक्त चढाई करावी.#१ बोल्ट आहे.उजवीकडे सरकून अतिशय अवघड चढाई करून एका दमात ८०’उंची गाठावी,मार्गात थांबण्यासाठी कोठेही मोठे होल्ड्स नाहीत.
दुसरा टप्पा – १५ फूट – उजवीकडे अति अवघड तिरकी चढाई करून छोट्या खोबणीत पोचावे,#१ बोल्ट आहे.
तिसरा टप्पा – ३५ फूट – ५ फुटावरील #बोल्टमध्ये सुरक्षा दोर अडकवून अवघड मुक्त चढाई करावी,मार्गात #1क्रमांकाचा फ्रेंड वापरावा,आणि एकमेव सपाट माची (ledge) गाठावी.येथून २०-२५ फुटावर धबधब्याचे मुख दिसू लागते.
चौथा टप्पा – १५ फूट – मुक्त चढाई करीत #१ मेख मारावी.धबधब्याच्या मुखाशी #२ बोल्ट मारले आहेत.येथून दोर ओवून खाली उतरावे.येथून पुढे मुखाशी अडकलेले दगड,माती असल्याने चढाई करणे धोक्याचे आहे.
वेळ – ६ तास
साधने – १५०’दोर (२),फ्रेंड्स,चोक्स
*#*धबधब्याच्या वर २५-३० फूट उंचीवर विसापूर किल्ल्याची मोडकळीस आलेली तटबंदी,फुगलेली माती,गवताचा घसारा आहे,येथून पुढे चढाईचे धाडस करू नये.सदर मार्ग चढाई तंत्र सराव,जोडीदारासोबत साहचर्य यासाठी उपयुक्त आहे.
मार्गात कोठेही सुटावलेले दगड,कपच्या,माती,गवत नाही. पुर्वानुभवाशिवाय सलग मुक्त चढाई करण्याचे धाडस करू नये,#१ व #२ बोल्ट १२’ आणि ६०’ अंतरावर आहेत.
*#*३ जून १९९९ रोजी ”आरोहक”पुणे च्या विवेक मराठे,विकास भोंडवे,समीर पटवर्धन,भूषण थत्ते यांनी प्रथम चढाईत भाग घेतला.मुख्य चढाई विवेक मराठे आणि विकास भोंडवे या जोडीने केली आणि माथा गाठला.
विवेक मराठे ११/३/२०१६
संदर्भ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा-यंग झिंगारो ट्रेकर्स
३) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची-प्र.के.घाणेकर
४) डोंगरयात्रा-आनंद पाळंदे
५) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा- सतिश अक्कलकोट'
६) महाराष्ट्र देशातील किल्ले-चि.ग.गोगटे
७) www,trekshitiz.com हि वेबसाईट
८) www.durgbharari.in हि वेबसाईट
९) http://niteeshsane.blogspot.com/, https://mpcnews.in/maval-visapur-fort-bomb-near-lohgad-120617/ हे ब्लॉग
यातील एकाच्या भिंतीवर तर हनुमानाचे एक भव्य शिल्पही कोरलेले आहे. एका ठिकाणी एकात एक गुंफलेल्या सात टाक्यांचा समूह आहे. गडावरील या टाक्या खोदून जलसंचय केला आणि दगडही मिळवला!
बांधकामासाठी लागणारा चुना मळण्यासाठी लावलेली घाणी आजही इथे त्याच्या चाकासह उभी आहे. शेजारीच काही दगडी जातीही दिसतात.
तटाचे हे वैभव पाहात पुन्हा वायव्येकडील शेवटच्या बुरुजावर यावे. यावर ती दुसरी भलीमोठी तोफ विसापूरच्या सामर्थ्यांचा परिचय करून देत असते. या बुरुजावरूनच थोडय़ा वेळापूर्वी पाहिलेला पश्चिमेकडचा सारा तट एका नजरेत येतो.
Moving ahead, we saw the ruins of Peshwa palace.
As we went along the wall, it took us 2 hours to come to a full circle. Content with the picturesque views and taking loads of memories, we started our descend.
As we started to return on our bike, we were stalled by heavy traffic. It took us 1:30 hours to reach to Old Mumbai Pune highway from the base of the fort and totally 3 hours to reach home. Being a Sunday, it was too crowd, so people who want to avoid traffic, better to start early.
Soon, it was time for our return and we chose alternate route to descend. This alternate route also goes from the stream.
हा ट्रेक.



हा एक कोलाज केलेला फोटु.
No comments:
Post a Comment