शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी आपण पुण्यातून सर्व सदस्यांना सोयीच्या ठिकाणावरुन पिक अप करुन सातारा-उंब्रजमार्गे कोयनानगरला जाणार आहोत. इथून वनखात्याची परवानगी घेउन जीपने भैरवगडला जाणार आहोत. वन खात्याचा प्रति व्यक्ती परवाना, प्रति वाहन परवाना, जीपचा ट्रान्स्पोर्ट चार्ज यामुळे ट्रेकची फी वाढली आहे, याची कृपया नोंद घ्यावी.भैरवगडाकडे जाणारा वन खात्याच्या अखत्यारीत असल्यामुळे कच्चा आहे, त्यामुळे आपले वाहन नेणे सोयीचे ठरणार नाही.
जाताना नाव या गावी नाष्टा करायचा आहे. इथून कोळणे, पाथरपुंजमार्गे भैरवगडला जाउन तिथे भैरवगडाचे भौगोलीक वैशिष्ट्य, इतिहास, इथून दिसणारा परिसर याची माहिती घ्यायची आहे. भैअरवगडाला तीन बुरुज, उध्वस्त दरवाजा आणि कातळकोरीव पाण्याचे टाके, तसेच जवळ असलेले नव्याने बांधलेले भैरवनाथाचे मंदीर प्रेक्षणीय आहे. भैरवगडाची चढाई जेमतेम अर्ध्या- पाउण तासाची आहे.
हा प्रवास घनदाट जंगलाचा असून नशीबात असेल तर वन्य प्राण्याचे दर्शन होउ शकेल. भैरवगड बघून साधारण १२ वाजेपर्यंत परत येउन दुपारचे जेवण करुन आपण पाटणमार्गे गाडी रस्त्याने दातेगडाच्या पायथ्याशी पोहचायचे आहे. दातेगड चढायला अर्धा तास भरपुर होतो. इथे जांभा दगडात कोरलेला दरवाजा, गणपती, मारुती यांच्या मुर्ती, तलवारीच्या आकाराची कात़ळकोरीव विहीर प्रेक्षणीय आहे. इथला इतिहास समजून घेउन साधारण पाच वाजता परतीच्या वाटेला लागायचे आहे. वाटेत संध्याकाळचा चहा होइल. साधारण साडे आठ ते नउ वाजेपर्यंत पुण्यात पोहचणे अपेक्षित आहे.
उन्हाळ्यात फार उंच गड चढणे शक्य होणार नाही, हे लक्षात घेउन दोन्ही सोप्या गडांची आपण भटकंती करणार आहोत. शारीरीक दृष्ट्या सक्षम असणारी कोणत्याही वयोगटाची व्यक्ती या ट्रेकमध्ये सामील होउ शकते.
काही गोष्टीची नोंद घेणे आवश्यक आहे.
१) भैरवगडाचा प्रवास हा संपुर्ण वन खात्याच्या अखत्यारीतील रस्त्याने अस्णार आहे. सर्व सदस्यांनी त्यांचे नियम आणि कायदे पाळणे आवश्यक आहे. कोणीही नियमभंग केल्यास ती संबधीत व्यक्ती जबाबदार असेल आणि कारवाईला सामोरी जाईल. ट्रेकचे आयोजक जबाबदार असणार नाहीत.
२) सर्वांनी पैसे दिलेल्या अकाउंटला जमा करुन आपला सहभाग निश्चीत करायचा आहे. पुण्यातून गाडी ठरवणे , तसेच कोयनानगरवरुन जीप ठरवणे यासाठी आधी किती सदस्य येणार आहेत हे नक्की माहिती असेल त्याप्रमाणे जीपचे नियोजन करावे लागते. तेव्हा पैसे भरले तरच आपला सहभाग नक्की केला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. एनवेळी आल्यास जीप ठरवणे अवघड होइल हे कृपया लक्षात घ्यावे.
जे सदस्य थेट कोयनानगरला भेटणार आहेत, त्यांनी शक्यतो आधीच पैसे जमा करायचे आहेत. त्यांच्यासाठी ट्रेकची फि १२५०/- ( एक हजार दोनशे पन्नास रुपये फक्त ) असेल.
३) येताना बरोबर टोपी, गॉगल, चांगले ग्रीप असणारे शुज किंवा सँड्ल आवश्यक आहेत. तसेच बरोबर किमान २ लिटर पाणी प्रति व्यक्ती सोबत ठेवावे. तसेच येताना आपले शासनमान्य ओळखपत्र ( जसे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स ) असणे आवश्य्क आहे. तसेच एक आय कार्ड साईज फोटो आणावा. जर कोणी डिजीटल कॅमेरा किंवा व्हिडीओ शुटींग कॅमेरा आणला तर त्यासाठी वन खाते वेगळे शुल्क आकारते , तो खर्च संबधीत सदस्याचा असेल.
४) पुण्यातून येणार्या सदस्यांसाठी सकाळ्चा नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा ट्रेकच्या शुल्कात समाविष्ट आहे. या व्यतिरीक्त होणारा खर्च त्या सदस्याने करायचा आहे. प्रवास नॉन ए.सी. गाडीने असणार आहे. कार्यक्रमात एनवेळी कोणताही बदल करण्याचा अधिकार संयोजकांनी राखून ठेवलेला आहे.
संपर्क
श्री. स्वप्निल जिरगे
श्री. भृशुंड गणपती मंदिर, मेंढा, भंडारा - मराठी कट्टा
श्री. भृशुंड गणपती मंदिर, मेंढा, भंडारा
संकलन – सुधीर लिमये पेण
प्राचीन स्थंडिलग्राम नावाने प्रसिद्ध असलेल्या मेंढा या गावी वैनगंगा नदीच्या तीरावर विदर्भातील अष्टविनायकांपकी हा गणपती वसलेला आहे. भंडारा या जिल्हय़ाच्या ठिकाणाचे एक उपनगर असलेला हा भाग. या गणपतीला भृशुंडगणपती हे नाव कसे मिळाले याबद्दल एक सुंदर कथा आपल्याला गणेशपुराणात मिळते.
नामा कोळी लोकांना त्रास देत असे. तो या परिसरात वाटमारी करीत असे. एकदा तो गणेशतीर्थ या ठिकाणी अंघोळीला गेला असता मुद्गल ऋषी तिथून चालले होते. ते तोंडाने गजानन गजानन असे नामस्मरण करीत होते. नामा कोळ्याने त्यांना मारण्यासाठी आपली तलवार उपसली आणि तो आता वार करणार एवढय़ात ती तलवार गळून जमिनीवर पडली. नामा कोळ्याला पश्चात्ताप झाला आणि आपली पापे धुण्यासाठी काय करावे याची याचना त्याने मुदगल ऋषींकडे केली. मुदगल ऋषींनी त्याला सांगितले की ते परत येईपर्यंत नामा कोळ्याने श्री गणेशाय नम: असा जप सुरू करावा. तसेच त्यांनी एक वाळकी काठी दिली आणि तिला रोज पाणी घालायला सांगितले. जेव्हा त्या काठीला पालवी फुटेल तेव्हा मी परत येईन, असे आश्वासन मुद्गल ऋषींनी दिले. नामा आता मंत्राचा जप करू लागला. अनेक वष्रे अशीच गेली आणि मुदगल ऋषी तिथे परत आले. त्यांना त्या काठीच्या जागी एक भलामोठा वृक्ष आणि एक मुंग्यांचे वारूळ दृष्टीस पडले. वारुळातून श्री गणेशाय नम: असा आवाज येत होता. ऋषींनी ते वारूळ बाजूला करून पाहिले तर त्यांना नामा कोळी नामस्मरण करताना आढळला. तो गणेशसाधनेत इतका गणेशमय होऊन गेला होता की त्याला नाकाच्या ठिकाणी गणपतीप्रमाणे सोंड फुटली होती. मुदगल ऋषींनी त्याचे तप आणि त्याची सोंड पाहून त्याचे नामकरण भृशुंड ऋषी असे केले. या भृशुंड ऋषींनीच इथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. मुदगल ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला की आणि जो कोणी या ठिकाणी दर्शनाला येईल त्याला सर्व शक्ती प्राप्त होतील असे सांगितले.
मंदिरातील गणेशाची मूर्ती आठ फूट उंचीची मोठी भव्य असून ती सव्यललितासनात बसलेली आहे. पायाशी नागाचे वेटोळे, त्यावर गणेशाचे वाहन उंदीर आणि त्यावर हा गणपती विराजमान झालेला आहे. मूर्ती चतुर्भुज असून एक हात वरद मुद्रेत तर इतर हातात अंकुश, पाश आणि मोदकांनी भरलेले पात्र दिसते. मूर्तीच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग शिल्पित केलेला दिसतो. इथेच एक शिवपिंडी असून त्याला जागृतेश्वर असे म्हणतात. मंदिराच्या आवारात एका चौथऱ्यावर अंदाजे आठ फूट उंचीची मारुतीची मूर्ती आहे. शिवाय परिसरात अनेक समाध्या दिसतात.
अष्टविनायक वरदविनायक (महड) - मराठी कट्टा
अष्टविनायक वरदविनायक (महड)
वरदविनायक या रूंपात हा गणपती सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करतो. पुणे-मुंबई महामार्गापासून तीन किमी दूर खोपोली जवळ आणि पुण्याहून ८० किमी दूर हे मंदिर मुंबईच्या जवळ स्थित आहे. पालीपासून दोन तासांच्या अंतरावर खोपोलीजवळ इमॅॅजिका मार्गे महामार्गावरून उत्तरेकडे सरळ आणि खोपोलीच्या आधी हे मंदिर वसलेले आहे
श्री क्षेत्र वरदविनायकाची कथा
आख्यायिकेनुसार
कौन्डीन्यपूरचा सम्राट भीम आणि त्याची राणी यांना मूल नव्हते. ऋषी
विश्वामित्र हे जंगलात तपस्या करीत होते. त्यांना भेटायला ते दोघे गेले.
तेव्हा विश्वामित्र यांनी त्यांना एकाक्षर गणेश मंत्र त्यांना दिला. त्या
मंत्राच्या जपामुळे त्यांना रुक्मंद नावाचा सुपुत्र झाला. राजकुमार रुक्मंद
लवकरच लहानाचा मोठा झाला.
राजकुमार एकदा शिकारीला जंगलात गेला असता ऋषी वाचक्नवी यांच्या आश्रमात राहिला. तेव्हा ऋषींची पत्नी मुकुंदा राजकुमार रुकंद याच्या प्रेमात पडली. पण राजकुमाराने तिचे प्रेम स्वीकारण्यास नकार दिला आणि तो आश्रम सोडून निघून गेला. मुकुंदा राजकुमारासाठी झुरत असलेली पाहून इंद्राने रुक्मंद याचा वेश धारण केला आणि तो मुकुंदाकडे गेला. त्यातून मुकुंदाला दिवस गेले आणि तिने ग्रीत्सम्द नावाच्या मुलाला जन्म दिला. ग्रीत्सम्द याला जेंव्हा आपल्या जन्माविषयी समजले तेंव्हा तो आपल्या आईला शाप देतो आणि पुष्पक अरण्यात जाऊन तपस्या करू लागतो. त्याच्या तपाने गणपती प्रसन्न होतो आणि त्याला सांगतो की त्याला एक अतिशय धाडसी मुलगा होईल ज्याला केवळ भगवान शंकर हरवू शकतील.
ग्रीत्सम्द याने गणपतीला तेथेच कायमचा निवास करण्यास सांगितले आणि ब्रम्हज्ञान देण्याची विनंती केली. आज त्या जंगलाला भद्रका असे म्हणतात. ग्रीत्सम्द याने त्या जागी गणपतीचे मंदिर बांधले आणि तिथे स्थापना केलेल्या गणपतीला वरदविनायक म्हणतात. असे मानले जाते की माघी चतुर्थीला जर इथे प्रसाद म्हणून मिळालेला नारळ खाल्ल्याने पुत्र प्राप्ती होते. त्यामुळे माघी उत्सवात या अष्टविनायकाच्या देवळात भक्त अतिशय गर्दी करतात.
Varad Vinayak ganapati
श्री वरदविनायक मंदिर आणि परिसर
१९८०
मध्ये श्री धोंडू पौडकर यांना मूर्ती तळ्यात सापडली होती. ही देवळाच्या
गाभाऱ्याच्या बाहेर आहे. मूर्तीची अवस्था एकदम वाईट होती, म्हणूनच
देवळाच्या ट्रस्टींनी तिचे विसर्जन केले आणि त्याजागी नवीन मूर्तीची
स्थापना केली. काही लोकांनी यावर हरकत घेतली आणि कोर्टात केस दाखल केली.
म्हणून आता इथे आपल्याला दोन मुर्त्या दिसतात, एक गाभाऱ्याच्या बाहेर आणि
एक गाभाऱ्याच्या आंत. एक मूर्ती आहे जी शेंदुराने माखलेली असून तिची सोंड
डावीकडे आहे आणि दुसरी आहे ती शुभ्र संगमरवरी असून तिची सोंड उजवीकडे आहे.
गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या
दिसतात आणि मग गणपतीच्या दोन मुर्त्या. या मुर्त्या पूर्वाभिमुख आहेत. या
देवळात एक नंदादीप अखंड तेवत आहे. असे म्हणतात की हा नंदादीप १८९२ पासून
अखंड जळतो आहे. मंदिराच्या चारी बाजूला ४ हत्तींचे पुतळे आहेत. मंदिराचा
हॉल ८० फुट लांब आणि ८० फुट रुंद असून शिखराची उंची २५ फुट असून ते सोनेरी
आहे. शिखरावर नागाची नक्षी आहे.
हे एकच असे मंदिर आहे जिथे भक्त मूर्तीच्या जवळ जाऊन स्वतः नैवेद्य दाखवू शकतात.
श्री वरदविनायक पूजा आणि उत्सव
हा
गणपती नवसाला पावणारा आहे असे मानतात. इथे येणारे भाविक दुपारी १२ पर्यंत
स्वहस्ते गणपतीची पूजा करू शकतात. दुपारी १२ ते २ या वेळात प्रसाद वाटला
जातो.
गणेश चतुर्थी आणि माघ प्रतिपदा ते पंचमी (गणेश जयंती) या दिवसात उत्सव साजरा केला जातो. गणेश जयंतीच्या उत्सवात पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी होते. शिवाय अंगारकी आणि संकष्टी चतुर्थी यादिवशी विशेष पूजा केल्या जाते.
पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे यादरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात. खासगी टूर कंपन्यासुद्धा या टूर्स आयोजित करतात. भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसोर्ट उपलब्ध आहेत.
जवळची इतर दर्शनीय स्थळे:
बोरघाटाच्या पायथ्याला खोपोली येथे योगीराज गगनगिरी महाराजांचा आश्रम. अंतर अंदाजे १११ किमी
खंडाळा व लोणावळा ही थंड हवेची ठिकाणे. अंतर अंदाजे १२६ किमी
कार्ले येथील कोरीव लेणी व एकवीरा मातेचे मंदिर. अंतर अंदाजे १०९ किमी
संत तुकाराम यांचे वास्तव्य असलेले देहू हे स्थळ. अंतर अंदाजे १४७ किमी
अष्टविनायक लेण्याद्री - मराठी कट्टा
अष्टविनायक लेण्याद्री
लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. ते नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-नारायणगांव-जुन्नर यामार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे. गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरीजा हिचा पुत्र. अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून ते १८ गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलात स्थित आहे. हे गणेश मंदिर ८ व्या गुहेत आहे. या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असेसुद्धा संबोधिले जाते.
श्री क्षेत्र गिरिजात्मकाची कथा
गणेश पुराणानुसार देवी
सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले. भाद्रपद चतुर्थीच्या
दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनविली. गणपतीने
या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर सहा हात आणि तीन डोळे
असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला. असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात
गणपती लेण्याद्रीवर १५ वर्षे राहिला. या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा
संहार केला.
श्री गिरिजात्मक मंदिर आणि परिसर
या मंदिरापर्यंत
पोचण्यास ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी
यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम
गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. अशा पाठमोऱ्या मूर्तीचीच पूजा केल्या जाते.
देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो
आणि त्यामुळेच या देवळात एकही इलेक्ट्रिक बल्ब नाही. या मूर्तीची सोंड
डावीकडे आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर
आहेत. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहेत. हे मंदिर पूर्णपणे दगडातून
कोरून बनविले गेले असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही. मंदिरासमोर
पाण्याची दोन कुंडे आहेत.
असेसुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या. इथे मुख्य मंडप असून त्याला सभा मंडप म्हणतात आणि त्याला १८ लहान खोल्या असून यात्रेकरू इथे बसून ध्यान करू शकतात.
पूजा आणि उत्सव
दर्शनाची वेळ सकाळी ६ ते संध्याकाळी ६ आहे. या मंदिरात दररोज सकाळी पंचामृत पूजा केली जाते. ही पूजा अतिशय महत्वाची आहे.
इथे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. बैलगाड्यांची शर्यत हा या उत्सवाचा एक लोकप्रिय भाग आहे. गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा ते माघ षष्टी पर्यंत साजरा केला जातो. या आठवड्यात मंदिरात अखंड हरीनाम साप्ताह आयोजित केला जातो.
जवळची इतर दर्शनीय स्थळे:
छत्रपती शिवाजीमहाराज यांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला. अंतर ६.२ किमी
ओतूर येथे प्राचीन कपर्दिकेश्वर मंदिर आणि संत तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्यस्वामी यांची समाधी. अंतर १७ किमी
कुकडी नदीच्या उगमाजवळील कुकडेश्वर मंदिर. अंतर ८.६ किमी
माळशेज घाटातील अभयारण्य. अंतर २८ किमी
ऐतिहासिक नाणेघाट. अंतर ३३ किमी
सिद्धेश्वर वृद्धेश्वर मंदिरशिवाजीनगर, पुणे - मराठी कट्टा
सिद्धेश्वर वृद्धेश्वर मंदिर, शिवाजीनगर, पुणे
पुण्यातील काही जुन्या आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी आणि सध्याच्या शिवाजीनगर गावठाणामध्ये असलेली मंदिरांची एक जोडगोळी मुठा नदीच्या काठावर काँग्रेस भवनाच्या समोर आहे. सदर मंदिरे सिद्धेश्वर वृद्धेश्वर मंदिर या नावाने ओळखली जातात. हि दोन्ही शंकराची मंदिर साधारण २५० /३०० वर्ष जुनी आहेत.
पूर्वीच्या काळी हा परिसर भांबवडा या नावाने ओळखला जात असे. इंग्रजांच्या राजवटीमध्ये त्याचा भांबुर्डा असा अपभ्रंश झाला. पुढे आचार्य अत्रे यांच्या प्रयत्नांनी त्याचे शिवाजीनगर असे नामकरण झाले.
यातील वृद्धेश्वर मंदिर इ.स.१७६० मध्ये सरदार घोरपडे बांधले. तर सिद्धेश्वर मंदिर नंतरच्या काळात अनामिक भाविकाने बांधले. पूर्वी या मंदिराशेजारी भरपूर मोकळी जागा होती. त्यात एक मोठा वाडा, मोठी धर्मशाळा होती. नदीच्या किनाऱ्यावर भक्कम भिंत होती. तसेच मंदिरा पासून नदीपात्रापर्यंत दगडी पायऱ्यांचा घाट बांधलेला होता. इ.स.१८०२ मध्ये होळकरांनी पुणे लुटलं, त्या वेळी त्यांचा मुक्काम या मंदिरा शेजारच्या वाड्यात होता. इ.स. १९६१ च्या पानशेतच्या पुरात वाडा आणि धर्मशाळा वाहून गेला. घाट अजूनही बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे.
सिद्धेश्वर मंदिरासमोर सुंदर नंदी मंडप आहे आणि त्यात नंदीची काळ्या पाषाणाची सुबक मूर्ती आहे. समोर छोटेसे सभागृह आहे. त्यात गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला कोनाड्यामध्ये डाव्या हाताला शेंदुरचर्चीत गणपतीची आणि उजव्या हाताला काळ्या पाषाणातल्या देवीची मूर्ती आहे. आत गाभाऱ्यामध्ये शंकराची पिंड आहे.
वृद्धेश्वर मंदिराचं बांधकाम जरी दगडामध्ये केलेलं असलं, तरी त्याचं शिखर चुनेगच्ची वीटकामाचं आणि वर निमुळतं होत गेलेलं आहे. अलीकडच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराला ऐसपैस लाकडी सभामंडप आहे. छतावर काचेच्या हंड्या लटकवलेल्या आहे. सभामंडपात मध्ये काळ्या पाषाणाची सुबक नंदीची मूर्ती आहे. सभामंडप आणि गाभारा ह्यामध्ये छोटासा अंतराळ आहे. गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला कोनाड्या मध्ये डाव्या हाताला शेंदुरचर्चीत गणपतीची आणि उजव्या हाताला काळ्या पाषाणातल्या देवीची मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव द्वारशाखा आहे. त्यावर वेलबुट्टी आणि नक्षीकाम कोरलेले आहे. खालच्या बाजूला कीर्तिमुख तर वर गणेशपट्टी आहे. त्याच्या वर मकर तोरण कोरलेले आहे. गाभाऱ्यात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरून जावे लागते. आत गाभाऱ्यामध्ये शंकराची पिंड आहे.
संदर्भ:
मुठेकाठचे पुणे– प्र. के. घाणेकर
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन
आठवणी इतिहासाच्या
अष्टविनायक बल्लाळेश्वर (पाली) - मराठी कट्टा
अष्टविनायक बल्लाळेश्वर (पाली)
पाली येथील हे मंदिर बल्लाळेश्वर या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले एकमेव मंदिर आहे. हे मंदिर मुंबई-पुणे महामार्गे मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे येथून ११ किमी अंतरावर पाली येथे आहे. हे मंदिर कोकणातील रायगढ जिल्ह्यात असून ते पुण्याहून चांदणी चौक-पाषाण-बालेवाडी-महामार्गे दोन तासांच्या अंतरावर आहे. महामार्गावरील खोपोली टोल नाक्याहून यु टर्न घेऊन डावीकडे वळावे आणि लगेच उजवीकडे आणि पुलाच्या दक्षिणेला इमँजिका मार्गे सुधागढजवळ पाली स्थित आहे.
श्री क्षेत्र बल्लाळेश्वराची कथा
आख्यायिकेनुसार
ही त्रेता युगातील कथा आहे. पाली या गावी कल्याण नावाचा एक वाणी त्याची
पत्नी इंदुमती बरोबर राहत होता. त्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा होता.
बल्लाळ हा मोठा गणेशभक्त होता. तो त्याच्या मित्रांसोबत गणपतीची पूजा करीत
असे. एके दिवशी या मुलांना गावाच्या बाहेर एक भला मोठा धोंडा आढळून आला.
बल्लाळाच्या आग्रहामुळे मुळे त्या धोंड्याला गणपती मानून त्याची पूजा करू
लागले. ती मुले गणेशभक्तीमध्ये इतकी गुंग होऊन जायची की त्यांना तहान-भूक,
दिवस-रात्र कशाचेही भान उरत नसे.
सर्व मुलांचे पालक त्यांच्या परतण्याची वाट बघत होते. जेव्हा मुले परत आली नाहीत तेव्हा सर्व पालक बल्लाळचे वडील कल्याण याच्याकडे गेले आणि त्यांनी बल्लाळाची तक्रार केली. त्यामुळे कल्याण क्रोधीत झाला आणि हातात काठी घेऊन मुलांना शोधायला निघाला. त्याला मुले गणेश पुराण ऐकत असलेली सापडली आणि त्याला त्याचा क्रोध अनावर झाला. संतापाच्या भरात त्याने काठी घेऊन मुलांनी बांधलेले ते छोटेसे देऊळ तोडून टाकले. त्याने बल्लाळाला रक्तबंबाळ होईपर्यंत बदडून काढले. त्याने बल्लाळाला एका झाडाला बांधून ठेवले आणि पूजेचे सर्व साहित्य त्याने फेकून दिले. ज्याला मुले गणपती म्हणत होती, ज्याची पूजा करीत होती त्या भल्या मोठ्या धोंड्यालासुद्धा त्याने फेकून दिले. कल्याण म्हणाला, “आता बघू या कोणता देव तुझे संरक्षण करतो ते.” असे म्हणून तो घरी निघून गेला.
जरी बल्लाळाला शारीरिक जखमा, तहान आणि भूक याचा त्रास होत होता तरी त्याने त्याची शुद्ध हरपेपर्यंत गणेशजप चालूच ठेवला. त्याची अशी भक्ती बघून गणपती द्रवला आणि तो ब्राम्हणाचा वेश घेऊन बल्लाळाकडे आला. त्याने बल्लाळाला स्पर्श केला. बल्लाळाची तहान आणि भूक नाहीशी झाली, त्याच्या जखमा भरून आल्या. बल्लाळाने ब्राम्हणाच्या वेशात आलेल्या गणपतीला ओळखले आणि त्याने देवाच्या पायावर लोटांगण घातले. तेव्हा गणपतीने त्याला एक वर मागण्यास सांगितले. बल्लाळाने गणपतीला तिथेच राहण्याची विनंती करत लोकांची दुःखे दूर करण्यास सांगितले. गणपती म्हणाला, “माझा एक अंश इथेच राहील, माझ्या नावाआधी तुझे नाव घेतल्या जाईल. इथे मला लोक बल्लाळ विनायक यानावाने बोलावतील.” गणपतीने बल्लाळाला आलिंगन दिले आणि तो जवळच्या धोंड्यात लुप्त झाला. त्या धोंड्याला पडलेल्या भेगा नाहीश्या झाल्या आणि तो पुन्हा अखंड झाला. त्या दगडाच्या मूर्तीला आपण बल्लाळेश्वर या नावाने ओळखतो. कल्याण वाण्याने जो दगड फेकून दिला होता त्यालासुद्धा धुंडीविनायक असे संबोधिले जाते. ही एक स्वयंभू मूर्ती असून त्याची पूजा बल्लाळेश्वराच्या पूजेआधी केल्या जाते.
श्री बल्लाळेश्वर मंदिर आणि परिसर
एका दगडी
सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख असून
तिची सोंड डावीकडे वळलेली आहे. मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी असून त्यावर
रिद्धी आणि सिद्धी चामरे धरलेले दिसून येतात. मूर्तीचे डोळे आणि बेंबी
हिरेजडीत आहे. ही बल्लाळेश्वराची मूर्ती तीन फुट उंच आहे.
हे मंदिर अशाप्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात दक्षिणायनात सुर्याद्याच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. मंदिर हे संपूर्णपणे दगडी असून या दगडांना शिश्याच्या रसाने एकमेकांबरोबर चिटकवलेले आहे.
साधारणतः गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो परंतु बल्लाळेश्वराच्या मंदिराची ही खासियत आहे की इथे गणपतीला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो.
या मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या आकाराप्रमाणेच ही गणपतीची मूर्ती आहे. जेव्हा या डोंगराच्या फोटोला बघून गणपतीची मूर्ती पाहिल्यावर हे साम्य विशेष करून जाणवते.
श्री बल्लाळेश्वर पूजा आणि उत्सव
मंदिर सकाळी
८ पर्यंत भाविकांसाठी खुले असते. म्हणजे भाविक गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू
शकतात. नंतर मात्र भाविक गाभाऱ्यात प्रवेश करू शकत नाहीत. गणेश चतुर्थी आणि
गणेश जयंती हे उत्सव साजरे केले जातात. गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा
ते माघ पंचमी साजरा होतो. चतुर्थीला महानैवेद्य तर पंचमीला दहीकाला याचा
नैवेद्य असतो. भाविक असे मानतात की गणपती स्वतः येऊन त्या नैवेद्याला ग्रहण
करतो आणि स्वतःच्या बोटांचे ठसे नैवेद्यावर सोडतो. पाचही दिवस गणपतीची
पालखी निघते. तसेच भजन-कीर्तन असा भरगच्च कार्यक्रमसुद्धा असतो.याशिवाय
अंगारकी आणि संकष्टीसुद्धा साजरी केल्या जाते.
पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे यादरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात. खासगी टूर कंपन्यासुद्धा या टूर्स आयोजित करतात. भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसोर्ट उपलब्ध आहेत.
जवळची इतर दर्शनीय स्थळे
मंदिराच्या जवळच सरसगड नावाचा किल्ला आहे. अंतर अंदाजे २.३ किमी
सुधागड या किल्ल्यात भृगु ऋषींनी स्थापन केलेले भोराईदेवीचे देऊळ आहे. अंतर अंदाजे ११ किमी
पालीपासून तीन किमी अंतरावर सिद्धेश्वर येथील शंकराचे स्वयंभू मंदिर.
पालीपासून चार किमी वर उध्दर हे स्थान जिथे रामाने जटायूचा उद्धार केला
पालीपासून तीन किमी अंतरावर गरम पाण्याचे झरे असलेले उन्हेरे हे स्थान
पुई येथे एकवीस गणेश मंदिरे आहेत. अंतर अंदाजे २३ किमी
ठाणाळे येथे कोरीव लेणी आहेत. अंतर अंदाजे १३ किमी
No comments:
Post a Comment