Friday, June 23, 2023

धोडपचा किल्ला (DHODAP FORT)

गड, किल्ल्यांचा खजिना म्हणजे नाशिक जिल्हा ! या एकाच जिल्ह्यात ५८ गिरीदुर्ग आहेत. नाशिक जिल्ह्याच्या मधोमध महाराष्ट्राच्या भुगोलातील आणि इतिहासातील देखील महत्वाची अशी सातमाळा रांग आहे. नाशिकच्या उत्तरेस साधारण साठ किलोमीटर अंतरावर पिंगलवाडी गाव आहे. तिथपासून ते चांदवड पर्यंत सह्याद्रीची एक डोंगररांग पश्चिम-पूर्व पसरलेली आहे. ह्या रांगेला अजंठा-सातमाळ रांग असे म्हणतात. सातमाळ रांगेत अचला, अहिवंत, सप्तशृंगी, मार्कंड्या, रवळ्या-जवळ्या, धोडप, इखारा सुळका, कांचना, कोळधेर, राजधेर, इंद्राई आणि चांदवड अशी किल्ल्यांची साखळीच आहे. या सातमाळा रांगेच्या साधारण मधोमध एखाद्या शिवलिंगासारखा दिसणारा अनेक भुशास्त्रीय वैशिष्ट्य बाळगणारा धोडपचा किल्ला खडा आहे. 

   

हट्टी गावातून धोडप किल्ला












धोडपची विवीध रुपे


धोडपचे हवाई दृष्य

   धोडप किल्ल्याची समुद्रसपाटी पासून उंची १४७३ मीटर आहे. महाराष्ट्रात कळसुबाई आणि साल्हेर ही पहिल्या दोन क्रमांकाची उंच शिखरे आहेत. सर्वात उंच 'किल्ल्याचा' मान साल्हेरचा ! उंचीनुसार धोडपचा महाराष्ट्रात पाचवा क्रमांक लागतो.
 सह्याद्री हा बेसाल्ट खडकापासून बनला आहे. हा खडक जसा कणखर, राकट आणि अभेद्य आहे तसाच हा मऊ आणि आखीव रेखीव आणि सुंदर सुद्धा आहे. ह्या सह्याद्री मधे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भिंती, कडे, नेढे, गुहा ज्या नैसर्गिक रित्या तयार झाल्या आहेत त्या पाहायला मिळतात. अश्याच काही नैसर्गिक कलाकृती आम्ही धोडप किल्ल्यावर आहेत. धोडप किल्ला म्हणजे निसर्गाच्या कलात्मक रचनेचा सुरेख नमुना आहे. धोडप प्रसिद्ध आहे तो त्याच्या dyka रचनेमुळे . Dyka म्हणजे काय? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जमिनीतून लाव्हा रस बाहेर येतो. या लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण आकार तयार झाले. त्यापैकी एक रचना म्हणजे डाईक.
सह्याद्रीच्या सातमाळा रांगेत डाईकची अश्मरचना अनेक ठिकाणी दिसून येते. लोणावळ्या जवळच्या तैल बैलाचा डाईक प्रसिद्ध आहे.तसेच नाणेघाटाच्या जवळच्या भैरवगड किल्ल्यावर पहायला मिळते. धोडपचा डाईक लांबलचक पसरलेला तर आहेच, शिवाय त्याला मध्ये बरोबर चौकोनी आकाराची खाच पडली आहे. या डाईकच्या खाचेचे सर्वात उत्तम दर्शन घ्यायचे झाल्यास धोडप सुळक्याच्या उत्तर टोकाला जायला हवे, तिथपर्यंत जाण्याची वाट फारशी बिकट नाही. धोडपचा डाईक आकाराने अजस्त्र आहे. सुमारे ७०० मिटर लांब तीस पस्तीत मिटर रूंद आहे.
     धोडपचं दुसरे भौगोलिक आश्‌चर्य म्हणजे व्होल्कॅनिक प्लग, अर्थात ज्वालामुखीय उद्रेकातून शंखुसारखा उठावलेला डोंगरमाथा, जणू काही डोंगराला घातलेली पगडीच. हाच तो धोडपचा सुळका, अखिल सह्याद्रीत आपल्या वैशिष्टपूर्ण आकारासाठी ओळखला जातो. (याची पूर्व बाजू आरोहणाच्या दृष्टीने सोपी, तर पश्चिम बाजू मध्यम जोखिमेची आहे) त्यावेळी इथला जो भूभाग होता त्याचे बंध झुगारून तप्त लाव्हा रस पृथ्वीच्या उदरातून उफाळत वर आला आणि त्यातून या डाईक व प्लगची निर्मीती झाली. डाईकची भिंत आणि प्लग यामुळे धोडप किल्ला फार दूर अंतरावरून सहजपणे ओळखू येतो. या प्लगच्या अर्थात, सुळक्याच्या पोटात दक्षिण मुखी अनेक गुहा कोरण्यात आल्या आहेत. यातील बहुतांशी गुहा या पाणी साठविण्यासाठी खोदण्यात आल्या आहेत. काही गुहांचा आकार अजस्त्र आहे. यारून धोडपच्या किल्ल्यावर मोठा राबता असल्याचे अनूमान निघते. याशिवाय याच व्हॉल्कॅनिक प्लग उर्फ सुळक्याला  डोंगरातून आरपार गेलेली विशाल गुहा जीला नेढ म्हणतात, ते आहे. एकाच ठिकाणी तीन भौगोलिक आश्चर्ये असेला धोडप हा अनोखा किल्ला म्हणायला हवा.   
        एकाच वेळी इतिहास, भुगोल आणि भुशास्त्रीयदृष्ट्या महत्वाच्या या गडाला जाणे मात्र जिकीरीचे आहे. मुंबई-आग्रा महामार्गाच्या इतक्या जवळ असूनही धोडपच्या पायथ्याच्या गावी पोहचणे हि एक कसरत आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकच्या पुढे ५५ किमी अंतरावर वडाळीभोई फाटा आहे. या फाट्यावरून धोडांबे गाव ९ कि .मी अंतरावर आहे.वडाळीभोई गावातून डावीकडे वळणारा फाटा आपल्याला धोडांबे मार्गे हट्टी गावात घेऊन जातो. हट्टीगाव धोडपच्या पायथ्याचे गाव आहे (पुण्याहून अंदाजे ३०० किमी). पुण्यावरुन इथे येण्यासाठी पुणे - नगर - शिर्डी - मनमाड - चांदवड - वडाळीभोई  - हट्टी असा पर्यायी रस्ता आहे. पुणे नाशिक महामार्गापेक्षा हा रस्ता जास्ती चांगला आणि चार पदरी आहे.अर्थात या रस्त्याने ४०-४५ किमी जास्ती होतात. अर्थात या मार्गाने येताना अंकाई-टंकाई, कात्रा, हडबीची शेंडी, चांदवडचा किल्ला अश्या अनेक किल्ल्यांचे दर्शन होते हा फायदा. वडाळीभोईला आठ किलो मीटरवरच्या धोडंबे गावापर्यंत प्रवासी जीपची ये-जा सतत सुरू असते, (धोडांबे गावात प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे.) धोडांबे पासून ५ कि. मी अंतरावर हट्टी गाव लागते. (येथे जाण्यासाठी वहान मिळणे कठीण आहे. संपूर्ण भाडे (सर्व सिट्सचे) दिल्यास वहान मिळते.) हट्टी गाव हे धोडप किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.हट्टी इथे जाण्यासाठी सायंकाळी ६-००ची नाशिक-हट्टी बस हि एकच बस आहे, मात्र यामुळे रात्री धोडपगडावर चढून मुक्काम करणे अशक्य आहे. धोडांबे ते हट्टी जाण्यासाठी जीप चालक २०० ते ५०० रुपये असे कितीही मागू शकतात. एकंदरीत हा गड बघायचा तर स्वतःचे वाहन असणे हाच उत्तम पर्याय आहे. 

गडावर लावलेला फलक
       पायथ्याच्या हट्टी गावात जिर्णशीर्ण अवस्थेतले चिरेबंदी वाडे लक्ष वेधून घेतात. त्यांचा चौसोपी दगडी पाया, मोठमोठे लाकडाचे खांब, चुन्यातल्या विटांच्या भिंती, वैशिष्टपूर्ण खिडक्या नी दरवाजे गतकाळात येथे केवढे वैभव नांदत असेल याची साक्ष देतात. गावात बहुतांशी परदेशी मंडळी राहतात. हे प्रामुख्यान राजस्थानातून आलेले राजपूत आहेत. बरेच राजपूत सरदार मोगलांच्या चाकरीत असताना त्यांच्या सोबत राजस्थानातून आलेले राजपूत कालांतराने बांगलाणच्या विविध ठिकाणी स्थायीक झाले. हट्टीत मात्र त्यांची संख्या सर्वाधिक आहे. लढवैय्या राजपूतांनी कोणत्या कालखंडात आपल्या तलवांरी सोडून गुराख्याचे व खव्याचे काम हाती घेतले याचा निश्चीत काळ समजण्यास मार्ग नाही.
आज त्यांचा खव्याचा उद्योग मान टाकण्याच्या स्थितीत आहे. अशीच अवस्था इथल्या अहिरांच्या काचेच्या बांगड्यांच्या उत्पादनाची झाली व कोळशाच्या अभावामुळे व काचेच्या बांगळ्यांची बदलत्या काळात मागणी घटल्यामुळे हा व्यवसाय केव्हाच बंद झालाय. धोडंब्याचा कातडी कमावण्याचा व्यवसाय अखेरची घटका मोजतोय. या परिसरात गेल्या दशकात टोमॅटो सॉस व विदेशी दारू निर्माण करण्याचे कारखाने मात्र उभे राहिलेत.गडांचे राजनैतिक महत्व इंग्रजांनी देशावर कब्जा केल्या पासून संपले. १८१८च्या सुमारास इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतांशी गडांचे मार्ग तोफा, सुरूंग लाऊन उध्वस्त केले आणि कोणे एकेकाळी तलवारींचा खणखणाट करणार्‍या योध्यांनी नंतर हातात चक्क डाव घेऊन कुटुंबाचा गाडा चालविला, त्याचे उत्तम उदाहरण हट्टीत बघायला मिळते. आता तेही मिळायचे असे म्हणावे लागेल, कारण वनकात्याने गडावरचा लाकुडफाटा तोडून खवा आटविण्यास बंदी घातली आहे. हे एक प्रकारे चांगलेच झाले असे म्हणावे लागेल. 
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव प्रवीणसिंह परदेशी यांचे हे मुळ  गाव . त्यांच्याच सहकार्याने इथे एक निसर्ग पर्यटन केंद्र साकारत आहे . त्या केंद्रामध्येच एक डेरेदार पिंपळाच्या झाडाखाली बांधलेला एक सुबक पार आहे .गावात शिरतानाच प्रचंड विस्तारलेला धोडप किल्ला आणि इखारा सुळका आपले लक्ष वेधून घेतो.
धोडपचा ब्रिटीशकालीन नकाशा

धोडप गडाचा नकाशा


 किल्ले धोडपकडे चढणार्या वाटा

       हट्टीप्रमाणेच कुंडाणे गावातून देखील गडावर चढाई करता येते. धोडप गडावर जाण्यासाठी इतरही काही मार्ग आहेत. नाशिक -कळवण-ओतुर या मार्गेही गडावर चढाई करता येते.ओतूर' येणारी वाटेचे अंतर बरेच लांब असून या वाटेने येताना दोन डोंगर ओलांडून यावे लागते.  मात्र हट्टी गावातून जाणारा मार्ग हाच सर्वात सोयीचा आहे. हट्ट याचा अर्थ जनावर. कदाचित याचवरून हट्टी नाव पडले असावे. धोडपच्या डोंगरात उगम पावणाऱ्या नद्या म्हणजे नेत्रावती व कोलथी या होय.
धोडपकडे जाताना या गडाच्या इतिहासात डोकावुया. सातमाळा रांगेतील डोंगरांचे उल्लेख प्राचीन काळापासून एतिहासिक आणि धार्मिक वागमयात दिसून येतात. यामध्ये नवानाथ कथासार तसेच इतर पौराणिक वागमय येते. या डोंगररांगेतील मार्किंड्या आणि चांदवड हे दुर्ग राष्ट्रकुट व यादव राजवटीत राजधानीचे दुर्ग होते. वणी येथे मिळेलेल्या ताम्रपटानुसार नवव्या शतकात राष्ट्रकुट राजा तिसरा गोविंद याची राजधानी मार्किंड्यावर होती. धोडप गडाजवळच्या इखार्या सुळक्याच्या पायथ्याला असलेला गोरक्षनाथांचा आश्रम लक्षात घेता धोडपगडाची निर्मिती अकराव्या ये बाराव्या शतकात झाली असावी असा निश्चित अंदाज बांधता येतो. इ.स. १३४७ मध्ये दक्षिणेत बहामनी सत्तेचा उदय झाला, पुढे या सत्तेची एक शाखा अहमदनगरची निजामशाही यांची या भागावर सत्ता होती. धोडपचा विकास याच काळात झाल्याचे मानले जाते. इसवीसनाच्या तेराव्या शतकापर्यंत चांदवड भागावर यादवांचे राज्य होते. यावरुन कादचित धोडप गड यादवांच्या साम्राज्याचा भाग होता असे म्हणता येइल. पुढे १४ व्या शतकात हा गड निजामशाही अंमलाखाली गेला. अहमदनगरच्या निजामशाही सत्तेने १६ व्या शतकाअपासून ते इ.स. १६३६ पर्यंत या किल्ल्यावर अधिराज्य गाजवले. बुर्हाण निजामशहा ( १५०८- ५३) हा सताधीश असताना त्याने धोडपचे नाव 'धारपवणिक' असे ठेवले.इ.स. १६२६ ते १६३६ या कालखंडात मोघल आणि निजामशाही यांचा नाशिक भागात मोठा संघर्ष झाला. शहाजीराजे भोसले हे निजामशाहीच्या बाजुने मोघलांशी लढत होते. तर मोघल सेनेचे नेतृत्व शाहिस्तेखान, खानदौरन, खानजमान व अलवर्दीखान हे करत होते. मोघलांची लश्करी ताकद प्रचंड होती. शाहिस्तेखानाच्या हाताखालचा सेनानी अलवर्दीखानाने देहेर जिंकून १७ मार्च १६३६ रोजी इंद्राई हा गड जिंकला. इंद्राई गडाचा किल्लेदार गंभीरराव याला लाच देउन हा गड जिंकला. यानंतर कांचना व राजदेहेर हे किल्ले जिंकुन जुन १६३६ मध्ये अलवर्दीखान धोडप किल्ल्याकडे वळाला. यावेळी धोडपचा किल्लेदार भोजबल म्हणून होता. मोघलांनी या भागातील जवळपास सर्व किल्ले जिंकल्याचे भोजबलला समजले होते. त्यामुळे त्याने फारसा प्रतिकार न करता अलवर्दीखानाकडे निरोप पाठवला कि मला एक लाख रुपये व योग्य मनसब दिल्यास मी हा किल्ला मोघलांच्या स्वाधीन करायला तयार आहे. भोजबलची विनंती मान्य करण्यात आली. त्याला एक लाख रुपये नगद तसेच एक हजार जात आणि आठशे स्वार अशी मनसब देण्यात आली. अलवर्दीखानाने या भागातील धोडप, राजधेर, इंद्राइ, रावळ्या-जवळ्या, कांचना इत्यादी किल्ले जिंकल्याचा उल्लेख इंद्राई, धोडप व राजधेर किल्ल्यावर असलेल्या फारशी शिलालेखात आहे.  
    इ.स. १६७०-७१ मध्ये खानदेश, बागलाण या मोघलांच्या ताब्यातील प्रदेशावर हल्ले करुन शिवाजी महाराजांच्या सैन्याने हा मुल्हेर, चौल्हेर, होलगड ( हातगड ) असे किल्ले जिंकले,.बागलाण्चा सुभेदार मोघल सरदार नेकनामखान याचे दळण वळण तोडले आणि  शिवाजी महाराजांच्या सैन्याने चांदोर टेकड्यातील  धोडप किल्ल्याला वेढा घातला 
पण धोडपचा किल्लेदार मुहम्मदझमानने हा हल्ला तर थोपवून धरलाच पण त्याच वेळी दाउदखान सैन्य घेउन त्याच्या मदतीला आला आणि बागलाणातून अमरसिंग चंदावत देखील आला. यामुळे मुहम्मदझमान याने दाद न दिल्याने किल्ला ताब्यात आला नाही. मुहमद झमानने औरंगजेबाला केलेल्या अर्जात तो म्हणतो, 'सिवाच्या फौजेने येउन किल्ल्यास वेढा दिला.पण बादशाही कृपेने किल्ल्यावर दारुगोळा भरपुर असल्यामुळे शत्रु काही करु शकला नाही'. किल्लेदार मुहमद झमान याने शिवाजी महाराजांच्या सैन्याला केलेल्या प्रतिकाराची बातमी औरंगजेबाला समजली. बादशहाने मुहमद झमानचे कौतुक केले व तुला मनसब वाढवून मिळेल असे सांगितले. त्याचबरोबर दाउदखान व बहादुरखान यांना मुहमद झमानच्या मदतीला पाठविण्याचा हुकूम मोघल वजीर असदखानाला दिला.मुघलांचे  सैन्य धोडपच्या जवळपास आल्याने मराठ्यांना इ.स.१६७० मध्ये वेढा उठवावा लागला. वास्तविक मराठ्यांनी या काळात साल्हेरसारखे महादुर्ग जिंकले, पण धोडप अभेद्यच राहिला. यानंतर मुहमद सईद हा धोडपचा किल्लेदार झाला. 
   पुढे औरंगजेब स्वराज्य जिंकण्यासाठी दक्षिणेत उतरला. त्यामुळे मोघल व मराठे यांच्यात तीव्र संघर्ष सुरु झाला. याच काळात राजा दुर्गसिंह बुंदेला हा धोडपचा किल्लेदार होता.  शाहाअलम याने औरंगजेबाला केलेल्या अर्जात तो म्हणतो, 'धोडपचा किल्लेदार राजा दुर्गसिंग उत्तम मनुष्य असून हुजुरांच्या उपयोगाचा आहे. आशा करतो कि हुजुर्रांनी त्यास बोलावून घ्यावे आणि धोडपच्या किल्लेदारीवर दुसर्या कोणास तरी नेमावे.'यानंतर
  शहा आलमच्या सुचनेनुसार राजा दुर्गसिंह बुंदेला याला बादशहाच्या चाकरीत बोलवण्यात आले. तसेच त्याला एक हजार जात व दुघोडी एक हजार स्वार या मुळ मनसबीसह वीस लाख दाम इनाम देण्यात आले. त्याच्या जागी औरंगजेबाने महमदबंदी अली बल्की याच्या फौजेतील  शियाबुद्दीन उर्फ नेकनामखान यास धोडपच्या किल्लेदारीवर नेमले व खिल्लत दिली. यावेळी नेकनामखानची मुळ मनसब सातशे जात व चारशे साठ स्वार होती, त्यात शंभर जात व दोनशे चाळीस स्वार एवढी बाढ करण्यात आली. 
नेकनामखान किल्लेदार म्हणून रुजु होताच मराठ्यांनी धोडप, रवळ्या-जवळ्या व अहिवंत परिसरात पुन्हा एकदा गनिमी काव्याने हल्ले सुरु केले. यावेळी नेकनामखानाच्या सैन्याशी मराठे सैनिकांची चकमक झाली. इ.स. १६८२ च्या पत्रात नेकनामखान औरंगजेबाला लिहीतो, 'शत्रुचे लोक हनुमंतगड ( अहिवंतगड ), रवळ्या-जवळ्या वगैरे चार किल्ल्यामधून चौथाई वसूल करण्यासाठी आले होते. त्यावर मी माझे सैनिक नेमले. शत्रु सैनिकांशी सामना झाल्यावर अदमासे दहा-पंधरा लोक मारले गेले व इतर अनेक जखमी झाले. पंधरा लोकांना पकडून हुजुर पाठवले आहेत. माझ्याकडील बहुतेक लोक कामास आले अगर जखमी झाले'.
  यानंतर इ.स. १६९९ मध्ये अब्दुल हसन हा मोघल सरदार धोड्पच्या किल्लेदारीवर नेमला गेला. यानंतर आपण धोडपचा पेशवाई कालखंडातील इतिहास बघुया. इ.स. १७२० मध्ये मोघलाचा प्रसिध्द सरदार निजाम उल मुल्क याने हैद्राबादमध्ये स्वतंत्र राज्य स्थापन केले. या राज्याला 'हैद्राबादची निजामशाही' म्हणून ओळखले जाउ लागले. सातमाळा रांगेतील जवळपपास सर्वच किल्ले या निजामशाहीच्या अखत्यारीत आले. नानासाहेब पेशवे व हैद्राबादचा निजाम यांच्यात झालेल्या इ.स. १७५२ च्या भालकीच्या तहाप्रमाणे धोडप किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. यावेळी अप्पाजी हरी हे धोड्पचे किल्लेदार होते.तर १७६५ च्या एका कागदपत्रानुसार धोडपचा किल्लेदार म्हणून उमाजी हरीचा उल्लेख होतो.हा उमाजी हरी अप्पाजी हरींचा भाउ होता का ? हे समजत नाही. तसेच पुढील काळात किल्लेदार बनलेला बाजीराव अप्पाजी हा अप्पाजीचा मुलगा होता का ? याबाबतही माहिती मिळत नाही. दुर्गविषयक काही ग्रंथामध्ये अप्पाजी हरी व बाजीराव अप्पाजी हे एकाच वेळी धोडपचे अधिकारी होते अशीही माहिती मिळते.मात्र ती सत्य असेल असे वाटत नाही. पुढे इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांचे सेनापती सदाशिवराव भाउ धार्मिक विधीसाठी वणी, सप्तशृंग येथे आले असता त्यांनी धोड्प किल्ल्याला भेट देउन पहाणी केली. धोडपला सदाशिवराव भाउ आवर्जून भेट देतात यातच या गडाचे लष्करी महत्व अधोरेखीत होते. पुढील काळात दुसरा बाजीराव यानेही या गडाची माहिती मागवली होती. 
पेशवे काळात धोडपचा उपयोग मुख्यत्वे तुरुंग म्हणून करण्यात आला. याबाबत काही संदर्भ एतिहासिक कागदपत्रात मिळतात. इ.स. १७६६ मध्ये थोरले माधवराव पेशवे यांच्या काळात धोडप किल्ल्यात कैद असलेल्या दोन वंजारी स्त्रीयांना कैदेतून मुक्त करण्याची आज्ञा दिली होती. या स्त्रियांनी कोणता गुन्हा केला होता, याची माहिती मात्र मिळत नाही. माणिकपुंज भागातील दरोडेखोर व लुटारू गावज्या भिल्ल याने कसाबखेडा गावातील लोकांना लुटले म्हणून पेशवे सरकारांनी त्याला धोडपच्या किल्ल्यातील तुरुंगात ठेवले होते. तसेच धोडपच्या किल्लेदाराने त्याची चौकशी करावी व तो दोषी आढळल्यास त्याला फासावर लटकवावे असा आदेशही दिला होता. 
इ.स. १७७५ च्या सुमारास कोरेगाव वाईचा खेमाजी बर्गे पाटील याच्यावर त्याच गावातील महिपतराव कुलकर्णी याच्या खुनाचा आरोप होता. त्यामुळे तो धोडपच्या किल्ल्यात कैदेत होता. खेमाजीला निर्दोष सोडवण्यासाठी त्याचे नातेवाईल दिव्य करणार होते. शत्रुला फितुर झालेला भास्कर नारायण याला धोडप किल्ल्यात कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले होते. नारायणराव पेशवे यांच्या खुनाचा मुख्य आरोपी सुमेरसिंह गारदी याचा मेहुणा नथुराम वलद संभुनाथ हा दिंडोरी येथे अटकेत होता. बारभाई सरदारांनी इ.स. १७७६ मध्ये सवाईराव माधवराव पेशव्यांच्या नावाने आदेश काढून नथुरामची रवानगी धोडपच्या तुरुंगात केली. 
    गुजरात मधील दौलत बाबुराव यांच्या पथकातील चाकर मुदबख्त्या हा आपल्या मालकाच्या काही वस्तु चोरुन पळाला होता. तो वांबोरी परगाणे येथील पाटणे महाल गावी मुक्कामी थांबला असता या गावातील भुता पाटील्,बाबाजी पाटील इत्यांदीनी त्याचा खुन करुन त्याच्याकडील चीज वस्तु हिसकावून घेतल्या. या खुनातील सर्व गुन्हेगार धोडप किल्ल्यात कैदेत होते. 
    नाशिकचे काही ब्राम्हण मद्यपान करतात अशी तक्रार पेशवे सरकारकडे गेली असता, पेशव्यांनी या आरोपींना अटक करुन धोडप किल्ल्यात कैदेत ठेवण्याचे आदेश काढला होता. याबरोबर धोडप किल्ल्यावर कायदा आणि सुव्यवस्थेशी संबधीत इतरही अनेक घटना घडलेल्या दिसून येतात. इ.स. १८०२ च्या सुमारास मराठा सरदारामध्ये आपसात संघर्ष सुरु झाला. त्यातून दुसरा बाजीराव पेशवा व यशवंतराव होळकर यांच्यात यादवी युध्दाला सुरवात झाली. यशवंतराव होळकरांच्या सैन्यात पेंढार्यांचा भरणा असून पेंढार्यांचे सैन्य जाळपोळ , नासाडी व लुटालुट करण्यात पटाईत होते. दरम्यान पँढारी सरदार अजबसिंह आणि सुजकुम यांनी धोडप किल्ल्यावर हल्ला केला. धोडपचा तात्कालीन किल्लेदार बाजीराव अप्पाजी याने आपल्या १६०० सैन्यासह प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा पराभव होउन धोडप पेंढार्याच्या ताब्यात गेला. यानंतर पेंढार्‍यानी धोडप परिसरात मोठी जाळपोळ , लुटालुट केली.  त्यानंतर तेथे कधी भरभराटी पुन्हा आली नाही. पुढे पेशव्यांनी धोड्पचा किल्ला पुन्हा जिंकला व होळकरांचे बंड मोडून काढले. 
 माधवराव पेशवे
 
  इ.स. १७६१ च्या पानिपतच्या युध्दात मराठ्यांची अनेक कर्ती माणसे मृत्युमुखी पडली. विश्वासराव, सदाशिवराव भाउ तसेच नानासाहेब पेशव्यांच्या मृत्युमुळे मराठेशाही उन्मळून पडली. त्यातून पुढील पेशवा कोण होणार हा प्रश्न उपस्थित झाला. नानासाहेब पेशव्यांचा लहान भाउ रघुनाथराव हा जाणता माणुस असला तरी मराठा सरदारांचा त्याच्या लहरी स्वभावावर विश्वास नव्हता. अश्या परिस्थित नानासाहेबांचा द्वितीय पुत्र माधवराव हे पेशवे बनले. परंतु माधवरावांना पेशवेपद देणे रघुनाथरावांना आवडले नाही.पुढे राघोबादादांनी कारस्र्थाने करुन मराठा साम्राज्यात दुहीची बीज पेरली. पुढे इ.स. १७६८ मध्ये रघुनाथरांवांनी काही बंडखोर सरदार साथीला घेउन माधवराव पेशव्यांविरुध्द बंड पुकारले. तेव्हा थोरले माधवराव पेशवे यांनी रघुनाथरावांच्या विरोधात मोहीम काढली.  भोसले, गायकवाड व इंग्रज यांची मदत घेऊन राघोबादादा बंड करणार असे दिसू लागताच माधवरावाने राघोबाला भोसले व मोगल यांची मदत मिळण्याआधी त्याचा बिमोड करायचे ठरविले. एकंदर ४० हजार फौज घेऊन माधवराव निघाले. त्यावेळी माधवरावांनी उत्तरेतील बलाढ्य मराठा सरदार महादजी शिंदे यांना आपल्या मदतीला बोलावून घेतले. त्यानुसार मे १७६८ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे महादजी पेशव्यांच्या सैन्याला येउन मिळाले. दरम्यानच्या काळात चांदवड परिसरात राघोबादादा आणि माधवराव  पेशवे यांच्या सैन्यात चकमकी होत होत्या. दोन्ही बाजुचे काही जेष्ठ सरदार आपाआपल्या परिने दोन्ही बाजुने समेट व्हावे यासाठी धडपडत होते. राघोबादादा आनंदवल्लीहून तळ हलवून धोडपच्या आश्रयाला आला. राघोबा दादाकडे २५ हजार सैन्य होते.जुन १७६८ पासून रघुनाथराव त्यांच्या सहकारी सरदारांसह धोडप किल्ल्याच्या परिसरात छावणी करुन होता. ११ जुन १७६८ ला पेशवा माधवराव ससैन्य धोडप गडापासून काहीशा अंतरावर असलेल्या धोडंबे गावी पोहचले. अश्याप्रकारे दोन्ही बाजुंचे सैन्य एकमेकांच्या टप्प्यात आले. रघुनाथराव यांच्या पक्षात चिंतो विठ्ठल रायरीकर, मोरो विठ्ठल रायरीकर , सदाशिव रामचंद्र, गणेश विठ्ठल, केदारजी शिंदे, हरिपंत भिडे, गंगोबा तात्या चंद्रचुड, मानाजी शिंदे, आबाजी महादेव व बर्गे इत्यादी सरदार होते. तर माधवराव पेशव्यांच्या पदरात महादजी शिंदे, नारो शंकर, तुकोजी होळकर, गोपाळराव रास्ते इत्यादी सरदार होते. 
 
रघुनाथराव पेशवे
 
रघुनाथरावांच्या बाजुने सर्व सामोपचाराचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यावर अखेर १२ जुन १७६८ रोजी दोन्ही सैन्यात धोडप किल्ल्याच्या पायथ्याला युध्दाची सुरवात झाली. लढाईच्या सुरवातीला माधवराव पेशव्यांच्या तोफखान्याने राघोबादादांच्या सैन्याची मोठी हानी केली. त्यानंतर हातघाईची लढाई सुरु झाली. यावेळी रघुनाथरावाचे प्रमुख सरदार चिंतो विठ्ठल व मोरो विठ्ठल हे जखमी झाले. दरम्यान युध्द सुरु असताना जोरदार पाउस सुरु झाल्यामुळे दोन्ही सैन्य मागे हटले. याच पावसाचा लाभ घेउन राघोबादादा व त्याचे अनेक सरदार धोडप किल्ल्यावर पळून गेले. माधवरावांच्या सैन्याने माचीपर्यंत लूट केली. खजिन्याचा उंट लुटला, किल्ल्याला वेढा दिला,  पाउस उघडल्यावर युध्द पुन्हा सुरु झाले व अल्पावधीत माधवराव पेशव्यांच्या सैन्याचा विजय झाला. रघुनाथरावाच्या पक्षातील मोरो विठ्ठल याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. दुसर्या दिवशी माधवराव पेशवे यांनी बाळकृष्ण दिक्षीत यांना बोलणी करण्यासाठी धोडप किल्ल्यावर पाठवून दिले. यानंतर रघुनाथराव त्याच्या सर्व सरदारांसह शरण आले.  त्याला शनिवारवाडयात (पुणे) बंदोबस्तात ठेवण्यात आले.राघोबादादांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली. त्यांच्या पक्षातील सर्व बंडखोर सरदारांना कठोर शिक्षा सुनावण्यात आली. याव बरोबर माधवरावांना हत्ती, उंट, घोडे, तोफा च खजिना अशी लुट मिळाली. 
   पुढे पेशवे धोड्पचे किल्लेदार बाजीराव अप्पाजी याला कळवितात, कि कर्नाटकातील मोहिमांसाठी शंभर सैनिकांचे पथक तातडीने पाठवावे. त्यावर बाजीराव अप्पाजी पेशव्यांना कळवितो कि 'इथे आधीच सैन्य कमी असल्यामुळे मी फक्त पन्नास सैनिकांना पाठवू शकतो'. यानंतर इ.स. १७९८ च्या सुमाराला पेशव्यांनी धोडपचा अधिकारी बाळाजी केशव यास आज्ञापत्र पाठवून बागलाण, नाशिक भागातील पठाण आणि पेंढारी यांचा बंदोबस्त करण्यास सांगितले. अशाच प्रकारचे एक पत्र पेशव्यांनी धोड्पचा किल्लेदार जीवा़जी यशवंत याला पकडण्यासाठी पाठविले होते. 
श्रीमंत माधवराव पेशवे प्रत्येक श्रावण मासात ब्राम्हणांना मोठ्या प्रमाणात दक्षिणा वाटत असत. त्याला रमणा म्हणत. याच्या बंदोबस्तासाठी इ.स. १८६० मध्ये धोडपवरुन ७५ सैनिक आणायचे ठरविले होते. 
                 इ.स.१८१८ मध्ये दुसरा बाजीराव पेशवा ब्रिटीशाना शरण गेल्याने इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्ज याने लढाई न करता हा किल्ला मराठ्याकडून ताब्यात घेतला. यावेळी किल्ल्यावर ३७ सैनिक, काही तोफा व १५९० तोफगोळे होते. कॅप्टन ब्रिग्जने या किल्ल्याचे वर्णन  "खडकाळ स्वरुपातला मोठा डोंगर , जो चांदोर (चांदवड) रांगेतील मजबूत बांधणीचा किल्ला आहे" असे केले आहे.

ह्या मारुती मंदिराजवळून जाणारा रस्ता  गडमाथ्यवर जातो 

 गावातून धोडपच्या दिशेने निघाले कि उघड्यावर असलेल्या हनुमानाच्या मुर्तीचे दर्शन होते. इथून गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. धोडप हा गड आधारण इशान्य नैऋत्य पसरला आहे. याच्या आग्नेय बाजुला सातमाळा डोंगररांग पसरली असून त्याच दिशेन एका डोंगरावर इखारा सुळका आहे. 


"इखारा" सुळका 
या इखार्याकडे एक वाट खिंडीतून जाते. या वाटेने आपण चढून गेल्यास वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी इथे एक बुरुज उभा केलेला दिसतो.  बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असुन फांजीमध्ये तोफेचा मारा करण्यासाठी झरोके व बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. बुरुजाच्या पुढील भागात कळवण दरवाजाच्या दिशेने बांधत नेलेली तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक आहे.
या बुरुजा जवळ काही समाधी तसेच एका उध्वस्त वाड्याचे अवशेष दिसून येतात. एकंदरीत या नैसर्गिक पठाराचा उपयोग दुर्ग विशारदाने संरक्षणाच्या दृष्टीने एखाद्या माचीसारखा केला आहे.  दरीच्या उजव्या काठाने फेरी मारताना या भागातील तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक असल्याचे दिसुन येते.
खिंडीतून दिसणारा बुरुज
धोडांबे गावाजवळ जाताना परतीच्या प्रवासात लागलेला राजवाडा 

बुरुजावर गडाची माहिती देणारा फलक

बुरुजाच्या सुबक जंग्या आणि ह्या भागातील तटबंदी वेळ देऊन बघण्यासारखी आहे.
हट्टी दरवाजा

आतील भागातील पहारेकर्यांच्या देवड्या

 ह्याच बुरुजाजवळ एक प्रशस्त दरवाजा आजे. हाच तो हट्टी दरवाजा. हा दरवाजा म्हणजे एक प्रकारची चौकीच आहे. हा दरवाजा आपल्याला मराठवाड्यातील भुईकोट किल्ल्याच्या दरवाजाची आठवण करून देतो. दरवाजा चांगलाच प्रशस्त असुन दरवाजाच्या आतील भागात उंच चौथऱ्यावर दोन्ही बाजुस ओवऱ्या बांधलेल्या आहेत.  दरवाजाच्या दर्शनी भागात महीरप असुन वरील बाजुस नक्षी व दोन कमलपुष्पे कोरलेली आहे. दरवाजाच्या इमारतीचे छत सहा घुमटावर तोललेले आहे.  दरवाजात थेट प्रवेश करता येऊ नये यासाठी समोरील बाजुस तटबंदी बांधुन आत येण्याचा मार्ग वळणदार व चिंचोळा केलेला आहे.दरवाजा उत्तराभिमुख आहे, पण आपण बाहेर पाडण्यासाठी उंबरा ओलांडला की वाट काटकोनात उजवीकडे वळते. अश्या बांधणीचा प्रमुख उद्देश हाच की लांबून किल्ल्याच्या दरवाजा कोणाला दृष्टीस पडू नये. या दरवाजाबाहेर कधीकाळी दुसरा दरवाजा असल्याच्या खुणा दिसुन येतात. ह्या दरवाज्यातून बाहेर पडल्यावर काही पावलांनी दोन वाटा दिसतात. डावीकडची वाट समोरील इखारा सुळक्यापाशी व तेथुन कांचनबारीच्या दिशेने जाते तर उजवी वाट उतरुन हट्टी गावात पोहचते.
  या बुरुजाच्या मागच्या बाजुला प्रशस्त पठार आहे. या पठारावर एक पाण्याचा मोठा तलाव आहे. 
''ध' धोडप चा !


हा तलाच साचपण्याचा असून यात वर्षभर पाणी असते. माचीवरील वास्तु बांधण्यासाठी काढलेल्या दगडांमुळे याची निर्मीती झाली असावी.या माचीवर चरायला येणार्या गुरांसाठी हा पाण्याचा एकमेव स्त्रोत. हे पाणी पिण्यायोग्य नसले तरी यात धोडप गडाचे प्रतिबिंब आवर्जून पहावे असेच. पावसाळ्यात या तलावाजवळ आल्यास कोतवाल, खंड्या, मैना असे अनेक पक्षी दिसतात.  इथून धोडपकडे पाहिल्यास एखाद्या सपाटीवर ठेवलेल्या शिवलिंगासारखा त्याचा आकार दिसतो. इथे याच परिसरात आणखी एक नवल आहे, ते म्हणजे कपारीत चालणारी गाय. मात्र हि कपार सापडणे अवघड आहे.एखादा स्थानिक माणुस सोबत असेल तरच हे शक्य होते. 
कपारीतील गाय साधारण कोठे आहे याचा स्थानदर्शक नकाशा ( काळे वर्तुळ दाखवलेल्या जागी गायीचा पुत़ळा होता )

आता कपारीतील गायीची कथा समजून घेउया. यासाठी वरील नकाशा उपयोगी पडेल. धोडप किल्ल्याच्या उत्तर बाजुला ओतुर नावाचे गाव आहे. धोडपच्या दक्षिणेला असणार्या हट्टी गावात एक चुनकळीपासून बनवलेला गायॉचा पुतळा होता.हा पुतळा धोडप आणि हट्टीच्या मधोमध होता, तर ओतुरला असाच चुनकळीपासून बनवलेला वासराचा पुतळा होता. या मायलेकरांची ताटातुट झाल्यामुळे हे दोन्ही पुतळे एकमेकाकडे हळूहळू सरकु लागले.गायीचा पुतळा धोडप किल्ल्याच्या डोंगरात एका कपारीत शिरला.  वासराचा पुतळा जेथे होता तेथे त्या गावातील लोकांनी विटांचा का कसलातरी कारखाना काढला होता. त्या पुतळ्याची अडचण म्हणून एक दिवशी एकाने रात्री तो पुतळा तोडून तो घरी गेला. आणि आश्चर्य म्हणजे, दुसऱ्या दिवशी तो पुतळा तसा च्या तसा होता. त्यानंतर सर्व लोकांच्या साक्षीने तोडलेला तो पुतळा दुसऱ्या दिवशीही तसाच अभेद्य होता. किल्ल्याच्या विरुद्ध बाजूस असलेली गाय आणि वासरू हे एकमेकांच्या ओढीने एकमेकांकडे आकर्षिले जात होते. एकमेकांकडे 'चालत' मार्गक्रमण करत आहेत अशी गावकर्यांची समजुत आहे. हि 'गाय' म्हणजे 'गायीचा पुतळा' दर 'वसुबारस' आणि 'कोजागरीला' काही गव्हाचे दाणे इतके अंतर पुढे सरकते.'गाय डोंगराला कपार पाडून कपारीत आत घुसली असून ती वासराच्या दिशेने निघाली आहे, मात्र आता ते वासरू कुठे आहे कोणालाच माहीत नाही. 







    इथे आपण धोडपच्या डोंगराला असलेली नैसर्गिक खाच बघू शकतो.कपार.बरीच खोल आहे.कपारीच्या आत  मध्यभागी  एक गाई सदृश आकृती ( मागून गाय जशी दिसते तशी) दिसते आहे. मागचे दोन पाय स्पष्ट दिसत असून शेपटी हि दिसते. गाय मागून बघितल्यास दुधाचे पान्हे जसे दिसतात तसेच दिसत आहे.अर्थात कदाचित हा गायीच्या आकाराचा निसर्गतः तयार झालेला खडक असावा. कथा कदाचित नंतर जोडली गेली असावी. मात्र आपल्याला वेळ आणि या कपारीची जागा नीट माहिती असेलच तरच हि 'कपारीतील गाय' बघायला मिळू शकते. 
 मारुती मंदिर  .

     इथून काही अंतर पुढे गेल्यावर एक उध्वस्त मारुती मंदीर बघायला मिळते. या मारुतीच्या घुमटीच्या मागील बाजुस काही वास्तुंचे अवशेष विखुरलेले आहेत. वाटेच्या पुढील भागात काही घडीव दगडात बांधलेल्या समाधीं तसेच कबरी आहेत. काळाच्या ओघात यांची देखील पडझड झालेली आहे. यानंतर आपण धोडपच्या माचीपाशी येतो.इथे दोन वाटा फुटतात. एक वाट उत्तरेकडे जाते. हि वाट ओतुरमार्गे कळवणकडे जाते,या वाटेच्या शेवटी एक सुस्थितीतील दरवाजा आहे.त्याचे बुरुजदेखील उत्तम अवस्थेत आहेत. याला कळवण दरवाजा म्हणतात.इथे धोडपची हद्द समाप्त होते.
जर हा दरवाजा बघायचा असेल तरच या वाटेला जायचे अन्यथा समोर गडाकडे म्हणजे पश्चिमेकडे जाणार्या वाटेने गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहचायचे. 






शिलालेख 


 या देवनागरी शिलालेखाचे वाचन असे आहे. हा शिलालेख कोरीव प्रकारचा असून देवनागरी लिपीत आहे. यामध्ये पाच ओळी असून त्याचे वाचन असे आहे
१) नाशका - - - - - - 
२) _ _ _ _ _ _ कणे_ _ _   किळे
३) धाड( प) नवमसे 
४)  _ _ _ _ _ _ णे _ _ _  _
५) 






एका बाजुला धोडपचा काळा कुळकुळीत कडा आणि दुसर्या बाजुला दरी अश्या मोक्याच्या जागी या दरवाज्याची उभारणी केली आहे. या दरवाज्याच्या बाजूला दोन भक्कम बुरुज उभे आहेत, ह्याच प्रवेश  द्वारावर एक शिलालेख कोरलेला दिसून येतो.प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर आपला किल्ल्याच्या माचीवर प्रवेश होतो. या किल्ल्यावर सोनारवाडी, अलंग आणि गोवळवाडी अशा तीन आदिवासी वस्त्या आहेत. आदिवासी आणि परदेशी समाजाची कुटुंबे अजूनही किल्ल्यावर राहून दुधाचा व्यवसाय करून गुजराण करीत आहेत.किल्ल्याची माची पूर्व- पश्चिम पसरलेली असून 'सोनारवाडी' ही गवळी लोकांची छोटीशी वस्ती याच माचीवर आहे. येथे दुधाचा उत्कृष्ट मावा मिळतो. माचीवरील फरसबंदी वाटेने जातांना डाव्या बाजूला २ बुजलेल्या विहीरी आढळतात. पुढे काही अंतरावर डाव्या बाजूस एक छोट हनुमान मंदिर आहे. त्याच्या अवतीभवती दुरावस्थेतील २ - ४ शिवलिंग व नंदी दिसून येतात. 

   या दरवाज्यातून आत गेले कि वीसेक मिनिटांच्या चढाई नंतर आपण एका खोदीव टाक्यापाशी पोहचतो. ह्या टाक्याच्या एका भिंतीमध्ये एक कोनाडा आहे. त्यात गणेशाची मूर्ती आहे. टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही.इथे एक गणपतीची मुर्ती असल्यामुळे याला 'गणेश तळे' म्हणतात.
सोनारवाडी



 टाक्यावरून थोडं पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या निम्म्या टप्प्यावर येतो इथे जेमतेम सात-आठ घरांची एक वस्ती आहे. ह्याला सोनारवाडी म्हणतात. परंतु आता इथे कोणी राहत नाही. बहुतेकवेळा पावसाळ्यात गुरांना चारा उपलब्ध असतो तेव्हा हे सोनार लोक इथे वस्तीला असतात. ह्या माचीवर नव्या घरांसोबत जुन्या घरांच्या बांधकामाची बरीच जोती दिसतात.खरे तर इतक्या दुर्गम ठिकाणी हे लोक इतक्या जिद्दीने रहात आहेत हे बघून कौतुक वाटते. थोडीफार नाचणी पिकणारी शेती ,दुधासाठी गायी, गुरे आणि मोठ्या कष्टाने उपलब्ध होणारे पाणी याचा विचार केला तर केवळ आपले पुर्वज या जागी नांदले म्हणुन त्याच जागी रहाण्याचा या लोकांचा अट्टाहास थक्क करुन  जातो. आता मात्र या लोकांनी तयार केलेला खवा जवळच्या बाजारपेठेत जातो आणि यांच्या गाठी चार पैसे लागतात. आपल्या धोडपच्या भेटीत या लोकांकडे खवा असेल तर आपल्यालाही या भेसळी शिवाय मिळणार्या खव्याची चव चाखता येईल. 
   किल्ल्यावर किती राबता होता हे ओळखायचं असेल तर त्या किल्ल्यावरील बांधकामाच्या जोतींची संख्या लक्षात घ्यावी. आणि इथे भरपूर जोती दिसतात. एक बैलगाडी आरामात जाईल इतकी मोठी पायवाट आणि वाटेच्या दोन्ही बाजूला बांधकामांच्या अनेक जोती दिसून येतात. दोन घरांच्या मध्ये योग्य अंतर ठेवलं आहे  पूर्वीच्या काळात सुद्धा उगाच कुठेही घरं आणि बांधकाम न करता, बांधकाम करण्यामागे किती 'प्लॅनिंग' होतं ते कळून येतं (ज्याचा आज अभाव दिसतो).सोनारवाडी वरून २ वाटा फुटतात, त्यातील उजव्या बाजूची वाट आपल्याला गडावर घेऊन जाते, पण गडावर न जाता प्रथम संपूर्ण माची पाहून घ्यावी.
त्याच रस्त्याने (कुठलाही फाटा ना घेता) सरळ पुढे गेल्यावर अनेक मंदिरे दिसतात. जवळपास प्रत्येक मंदिराशेजारी एक विहीर आहे. बहुतांश विहिरी आकाराने लहान आणि विटांनी बांधलेल्या आहेत. विहिरींमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पण एकाही विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नाही.
वाटेत काही खोदीव पाण्याची टाकी व एक अर्धवट बुजलेले भुयार सुद्धा आहे . या भुयाराचे दुसरे टोक बहुदा किल्ल्याच्या कातळ कड्यावर उघडत असावे कारण खालून गावातून ते स्पष्ट दिसते सोनारवाडी वरून सरळ जाणार्‍या वाटेवर डाव्या बाजूस, खालच्या अंगाला सुस्तिथितील तटबंदी दिसते. थोडेसे खाली उतरून ही तटबंदी जवळून पहाता येते. 


पायवाटेने पुढे जाताना वाटेच्या आसपास काही घरांचे चौथरे तसेच भिंती पहायला मिळतात. वाटेने सरळ पुढे आल्यास उजवीकडे गणपतीचे मंदिर असुन या मंदिराशेजारी एक बांधीव व एका कोरीव अशी दोन पाण्याची टाकी आहेत. वरील बाजुस असलेल्या बांधीव टाक्यातील पाणी पिण्यासाठी व तेथे सांडून खाली कोरीव टाक्यात जमा झालेले पाणी जनावरांसाठी व इतर कामासाठी वापरले जात असावे. या मंदिराच्या डाव्या बाजुस दरीकाठावर भग्न शिवमंदिर असुन त्यासमोर विटांनी बांधलेल्या नंदीमंडप व त्यातील नंदी आजही आपले स्थान टिकवून आहेत. या मंदिराजवळ कातळात कोरलेले पाण्याचे एक टाके आहे.

धोडप हट्टी  गावातून चढताना मध्य भागात पोहोचल्यावर शंकर मंदिराजवळ तुम्हाला ह्या पादुका दिसतील 


शिवमंदिर 



  पायवाटेने सरळ पुढे आल्यावर दुसरे शिवमंदीर असुन या दोन्ही शिवमंदीराची रचना एकसमान आहे. या सिध्देश्वर नहादेवाचे मंदीराचा जीर्णोद्धार करण्यात आला असुन मंदीरात शिवलिंग तर बाहेर नंदीमंडपात नंदी स्थापन केलेला आहे. मंदीरात  पूजा अर्चा स्वच्छता करण्यासाठी सध्या तिथे एका साधुबाबांचे वास्तव्य आहे . या  साधुबाबांनी सुमारे २ वर्षापूर्वी दीक्षा घेतली आहे व संसार त्याग करून तप करण्यासाठी ते इथे दाखल झाले आहेत.   शेजारीच पाण्याचे टाके आहे. धोडपवर बहुतेक ट्रेकर्स माथ्यावरच्या देवीच्या गुहेत मुक्काम करत असतात.मात्र त्या गुहेत उंदरांचा सुळसुळात असल्यामुळे रहाणे त्रासदायक ठरते.त्या एवजी या मंदीरात मुक्काम करणे सोयीचे आहे.  मंदीराबाहेर पत्र्याचा निवारा उभारलेला असुन पावसाळा वगळता २०-२२ लोक येथे सहज मुक्काम करू शकतात. मंदिराच्या मागील बाजुस एक लहान पायविहीर असुन यातील पाणी पिण्यायोग्य आहे. मंदिरापुढे असलेल्या झाडाखाली दोन चरणपादुका तसेच काही घडीव अवशेष पहायला मिळतात. 








ह्या मंदिरांपासून पुढे पंधरा वीस मिनिट सरळ चालत गेल्यावर आपण पूर्वाभिमुख दरवाजाकडे येऊन पोहोचतो. या दरवाज्याच्या बाजूला उध्वस्त तटबंदी व बुरुज आहेत. आतील बाजूस पहारेकार्‍यांसाठी देवड्या आहेत.दरवाज्यातून पुढे जाणारी वाट " रावळ्या - जावळ्या" या जोड दुर्गांवर जाते.या वेशीबाहेरच काही लोक वस्ती करून राहतात, त्याला गवळीपाडा असे म्हणतात. 
विहिरीचे प्रवेशद्वार 

विहिरींची  महिरप आणि पायऱ्या

विहिरीचे विटांचे आकर्षक बांधकाम





   
 प्रवेशव्दार पाहून आल्या वाटेने परत सोनारवाडी पर्यंत यावे व गडावर जाणार्‍या वाटेने चढाईला सुरुवात करावी. सुरुवातीलाच वाटेच्या उजव्या बाजूला एक स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आपलं लक्ष वेधून घेतो. दोन मजली विहीर ! ही बारव खालच्या भागात दगडात व वरच्या भागात विटात घडवली आहे. अनेक प्रकारचे कमानी बांधकाम लक्ष वेधून घेते. बारवचे पाणी कमालीचे थंड आहे, परंतू त्यात फार मोठ्या प्रमाणावर घाण साठली आहे, ते न केवळ पिण्यासाठी उपयोगाचे, हातपाय धुण्यासही सुरक्षित नाही.  जिने उतरून विहिरीचे घुमटाकार छत आणि कमानी असलेल्या उंच व मोठ्या खिडक्या आवर्जून बघण्यासारख्या आहेत. विहिरीत खाली उतरायला पायऱ्या आहेत. विहिरीला फार पाणी नसल्यानं सगळ्या पायऱ्या उतरून अगदी तळाशी जाता येते. पहिला मजला संपल्यावर पायऱ्यांची दिशा काटकोनात उजवीकडे वळते. हि बारव बर्यापैकी सुस्थितीत आहे. 
धोडपवरच्या विहीरींना पाय विहीर, अंधारी विहीर्,बाळ विहीर अशी नावे आहेत. धोडपच्या विस्तीर्ण पठारावर तसेच बालेकिल्ल्यावर धाडे टाका, नतैयाचा टाका, नाना टाका, देवीचा टाका, गणपती टाका, गोमुखी दरवाजा टाका अशी नावे असलेली टाकी आहेत. 
गडाची दिसणारी तटबंदी 

आता धोडपच्या बालेकिल्ल्याकडे चढाई सुरु करायची. बालेकिल्ल्याच्या वाटेवर सुरवातीला काही कोरीव दगड पडलेले असुन येथे उजवीकडे झाडीत एक समाधी चौथरा पहायला मिळतो. बालेकिल्ल्याची वाट म्हणजे उभा चढ असुन या वाटेवर काही ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत तर काही ठिकाणी हा मार्गच कातळात कोरलेला आहे. या वाटेने साधारण अर्धा तास वर चढल्यावर आपण गडाच्या कातळ कड्याशी येतो.
  पुर्वी हा कातळ टप्पा असा चढायला लागायचा
लोखंडी जिना. ह्या इथे कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. त्यांची पडझड झाली आहे.
अवघड चढण सोपी करण्यासाठी लोखंडी शिड्या लावल्या आहेत 


 या ठिकाणी वर चढण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या असुन आता वनखात्याने त्यावर लोखंडी शिडी लावलेली आहे. खरंतर ह्या ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या स्पष्ट दिसतात ज्या मूळ वाटेच्या होत्या, पण त्यांचा एक मोठा भाग ढासळून ही वाट अवघड होऊन बसली आहे. त्यामुळे हा लोखंडी जिना लावला आहे.आपण पायऱ्या किंवा शिडीने वर जाऊ शकतो. 
शिडीच्या खाली अलीकडे डाव्या बाजुस वनखात्याने लोखंडी कठडे लावलेले असुन या वाटेने चालत पुढे गेले असता आपण एका लहानशा घळीत पोहोचतो.
 कधीकाळी या ठिकाणी गडावर जाण्याचा मुळमार्ग व त्यात दरवाजा असल्याच्या खुणा दिसुन येतात. 
जागो जागी  संरक्षक रेलिंग्स लावल्या आहेत हे एका अर्थी गडाचं राकट  सौन्दर्य विद्रुप पण करते पण दुसरी बाजू पहिली तर सुरक्षेसाठी खूप आवश्यक आहे  

ढासळलेला बुरुज 

येथुन वर चढुन कातळ डाव्या बाजूला व दरी उजवीकडे ठेवत आपण शिडीच्या वरील साधारण १० मिनिटाच्या चालीनंतर आपण  गडाच्या दुसऱ्या उत्तराभिमुख दरवाजात पोहोचतो. या वरील वाटेवर देखील वनखात्याने लोखंडी कठडे लावलेले आहेत.  
देवड्या 

हा दरवाजा आता उध्वस्त अवस्थेत असला तरी त्यामध्ये असलेल्या देवड्या सुस्थितीत आहेत. गडाचा हा दरवाजा दर्शनी दोन बुरुजांच्या मागे दुसऱ्या दोन बुरुजात बांधलेला असुन हे तटबंदी थेट बालेकिल्ल्याच्या कातळाला भिडवून त्यात तिसरा बुरुज बांधलेला आहे. दरवाजाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर विटा आढळतात. 
पडझड झालेला किल्ल्याचा दरवाजा

ह्या दरवाज्याचे बांधकाम किंवा जीर्णोद्धार पेशवेकाळात झाला असावा. अगदी अश्याच प्रकारच्या विटांचे बांधकाम कुलंग किल्ल्यावरील बांधकामात आपल्याला आढळते.या दरवाज्याच्या डाव्या बाजूस असलेला बुरुज अजून तग धरून उभा आहे. या बुरुजाच्यावर दिसणार्‍या चर्या आवर्जून पहाण्यासारख्या आहेत.  ह्या बुरुजावर प्रचंड गवत आणि तण वाढलेले बघून वाईट वाटते. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा हा बुरुज काही वर्षांनी धारातीर्थी पडेल आणि राहतील ते फक्त दगडधोंडे. ह्या ठिकाणी एक बुलंद बुरुज उभा होता हे फक्त वाचनातून आणि फोटोमधूनच कळू शकेल. आपल्या वारसा स्थळांचं जतन आपण नीट करू शकत नाही हे किती त्रासदायक सत्य आहे.या भागातील दरीकाठावर असलेली तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत असुन त्यावरील चर्या सुस्थितीत आहे. 
दरवाजाची तटबंदी बालेकिल्ल्याच्या कातळाला जेथे भिडली आहे तेथे बुरुजाजवळ पाण्याचे टाके असुन या टाक्याच्या उजवीकडे हनुमंताचे तर डावीकडे गणपती व भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. हनुमंत टाके म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्याशेजारी काही अंतरावर अर्धवट कोरलेले दुसरे कोरडे टाके आहे. 
बालेकिल्ल्यावरुन दिसणारा माचीचा भाग. धोडपची खालची माची आणि त्यावरील मंदिरे

दरवाजाच्या आतील भागात बऱ्यापैकी सपाटी असुन हा संपुर्ण भाग तटबंदीने बंदिस्त केलेला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात घराचे चौथरे विखुरलेले आहेत. 



मुख्य द्वाराजवळ आल्यावर आपल्याला तटबंदी दिसते 

येथुन गडमाथ्याकडे पाहिले असता तळातील कातळ कोरून त्याच्या वरील भागात एका सरळ रेषेत घडीव दगडात बांधलेली बालेकिल्ल्याची तटबंदी व त्यातील बुरुज दिसुन येतात. दरवाजातुन आत आल्यावर वर चढत जाणाऱ्या वाटेने १० मिनिटात आपण बालेकिल्ल्यात प्रवेश करणाऱ्या सर्पाकृती आकाराच्या कातळकोरीव मार्गावर पोहोचतो. या मार्गावर प्रवेश करण्यापुर्वी डावीकडे कातळात कोरलेली पाण्याची दोन मोठी टाकी पहायला मिळतात. 
काही मिनिटांचा चढ चढून गेल्यावर दगड कोरून बांधलेला दरवाजा सामोरा येतो. हा दरवाजा म्हणजे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार. येथील दगडी खोदीव पायऱ्या बघण्यासारख्या आहेत. 
या कातळकोरीव मार्गाच्या दुसऱ्या वळणावर कातळात कोरलेले दोन पर्शियन शिलालेख आहेत. 
दरवाज्याच्या डाव्या बाजूला खडकावर मोठा एक शिलालेख

हा शिलालेख फारसी भाषेत असून उठावाचा आहे. हा दहा ओळीचा शिलालेख आहे

दरवाज्याच्या डाव्या बाजूला खडकावर मोठा एक शिलालेख
सातमाळ रांगेतील धोडप किल्ला अलावर्दीखानाने जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे

  हा शिलालेख उठावाचा असून फारसी लिपीतील आहे. याचे वाचन असे
१) हिजरी १०४६ मोहर्र्म महिन्याच्या पंचवीसाव्या दिवशी, म्हणजेच
२) वर्ष १० वे तीर महिन्याच्या ९ व्या दिवशी मेहरबानीने
३ ) प्रेषीत मुहमफाचे व त्याच्या वंशज
४) _ _ _ _ _ _ छत्रछायेखाली
५) आणि दुसरा शुर शहाजहान बादशहा, त्याचा नम्र सेवक
६) अलावर्दीखान तुर्कमान किले धोडप
७) त्यासोबत इतर चौदा किल्ले जे _ _ _ 
८) चार महिन्यामध्ये जिंकले _ _ _किले चांदोर ( चांदवड ) ,किले इंद्राई
९) किले राजदेहेर, किले कोळदेहेर, किले कांचना, किले मांचना
१०) किले कण्हेरा, किले जोला ( जवळ्या) किले रोला ( रवळ्या ), किले मार्कंड्या
११) किले अहिवंत, किले अचलगड, किले रामसेज
 याचा अर्थ बादशहा शहाजहानचा सेवक अलवर्दीखानाने इ.स.१६३६ मध्ये किल्ले धोडप जिंकलयाचा उल्लेख आहे.याशिवाय चार महिन्यात अलावर्दीखानाने सातमाळा रांगेतील इतर १२ किले जिळ्कल्याचा उल्लेख आला आहे.

 
बालेकिल्ल्याच्या दरवाज्याची खोदीव वाट. फोटो मध्ये उजवीकडून येऊन यु टर्न घेऊन डावीकडे दरवाजा आहे. 

दरवाज्याला अडसर लावण्यासाठी चौकोनी खोबण्या.
   या दरवाजाला 'दौलत दरवाजा' म्हणतात. या दरवाजाचा आतील भाग म्हणजे १५ फुट लांबीचा भुयारी मार्ग आहे. भुयारात प्रवेश करणारा दरवाजा उत्तराभिमुख असुन बाहेर पडणारा दरवाजा पूर्वाभिमुख आहे. दरवाजा बंद केल्यावर अडसर म्हणून लावतात त्या अडण्याच्या खोबण्यासुद्धा इथे बघायला मिळतात. या दरवाज्याच्या उंबर्यापाशी दोन कीर्तिमुख कोरली असून दोन्ही बाजुला पाच खोबणी कोरल्या आहेत. ह्या दरवाज्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दगडात पोखरून बांधलेल्या पहारेकर्यांच्या देवड्या. उंदराच्या बिळाप्रमाणे कातळ पोखरून ह्या देवड्या बांधल्या आहेत. पायवाट ह्या 'बोगद्यातून' पलीकडे जाते. मशाली आणि दिवे लावायचे कोनाडे आणि महिरपी पुसटश्या दिसतात. अंधारातच वाट डावीकडे काटकोनात वळते. हे द्वार संरक्षणदृष्ट्या इतके मजबुत आहे कि हा दरवाजा लढवला तरीही बालेकिल्ल्याचे शत्रुपासून सहज संरक्षण होईल.
धोडपच्या बालेकिल्ल्यावर उघडणारा एखाद्या बोगद्यासारखा दरवाजा

दरवाजाच्या आतील वाट एका बाजूने कातळात कोरलेली असुन दुसऱ्या बाजुला तटाने बंदीस्त केली आहे. दरवाज्यातून बाहेर आल्यावर आपण जवळपास माथ्यावरती पोहचतो.

 दरवाजाचा वरील भाग बुरुजाने बंदिस्त केलेला असुन तेथुन दरीच्या काठाने पुढे गेले असता डावीकडे उतारावर कातळात कोरलेले टाके दिसते तर उजवीकडे दरी काठावर एक बुरुज असुन त्यावर शेंदूर फासलेले नरशिल्प आहे.दरवाजाचा हा भाग पाहुन झाल्यावर मूळ वाटेवर परतावे व आपली पुढील गडफेरी सुरु करावी. येथुन पुढे जाताना उजव्या बाजुस पडझड झालेली कातळकोरीव वास्तु तर डावीकडे घडीव दगडात बांधलेली तटबंदी पहायला मिळते. 

येथुन कातळात कोरलेल्या काही पायऱ्या चढुन वर आल्यावर १५ मिनीटात आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो. बालेकिल्ल्याच्या सुरवातीस उजवीकडे पडझड झालेली एक सुंदर वास्तु असुन हि वास्तु नेमकी काय असावी याचा बोध होत नाही. या वास्तुचे एक दालन आजही सुस्थितीत असुन जवळच पाण्याचे भरलेले टाके आहे. वाड्याच्या फक्त भिंती शाबूत आहेत. अवशेषांवरून हा तीन विभागात असावा असं वाटलं. पहिल्या भागात स्वागत कक्ष (किंवा लिविंग रूम?), मधले माजघर, आणि सर्वात आत निजण्याची जागा (बेडरूम). भिंतीमध्ये सुंदर महिरपी कोनाडे आहेत. काही ठिकाणी हिन्दू पद्धतीची मंदिरे पाडून वाड्याचे बांधकाम करण्यात आले असावे, असे काही चिरे बघून जाणवते. धोडप अधिक काळ मोगलाइत होत्या, त्यावेळी गडावरची मंदिरे पाडण्यात आल्याचे जाणकार मंडळी सांगतात. एके ठिकाणी आम्हाला कळसाच्या आतील बाजूची मोरपट्टी दिसली, त्यावरून येथे कोणे एकेकाळी फार मोठे मंदिर हिन्दू राजांनी बांधले असावे, याचा शक्यता जाणवते. 

राजवाड्याचे अवशेष

राजवाड्याच्याच बांधकामातील एक भाग असणारे हत्ती शिल्प

पूर्वीच्या काळच्या भिंतींवरती, खासकरून घरांच्या भिंतींवरती छप्पर कसे असावे हे ही वास्तू बघितल्यावर उमगते. दगडी भिंतीवर आतल्या बाजूला वाढीव, तासून अंतर्गोलाकार भाग असणारे दगड ठेवले होते. ह्या दगडांच्या आतील वाढीव भागांवर त्याच प्रकारचे दगड, फक्त भिंती च्या रेषेत न ठेवता, थोडे आतल्या बाजूला लावलेले. असं करत पूर्ण छप्पर झाकून जाईपर्यंत  दगडांची रचना केलेली दिसते. अर्थात, ही फक्त एक प्रकारची बांधकाम शैली झाली. वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या राजवटीमध्ये बांधकाम शैली मध्ये  फरक  दिसून येतो.
भग्न अवशेष - ३ 

भग्न अवशेष - ४
 भग्न अवशेष - १ - उरल्यासुरल्या अवशेषांमध्ये सुद्धा पूर्वीची कलकौशल्य दिसून येते
 भग्न अवशेष - २ 

 या वाड्याच्या शेजारीच दोन टाकी आहेत. समोर काही अंतरावर अजून एका दरीकाठावर उध्वस्त वाड्याचे अवशेष आणि त्याला लागून एक टाकं आहे.हा वाडा त्याच्या भिंती व कमानीसह उभा आहे.  पूर्व कड्या लगत वाड्याचे भग्नावशेष विखुरले आहेत. तिथे शेवाळेली पाण्याची दोन टाकी आहेत. वाड्यांच्या चिरेबंदी भिंती ढासळल्या आहेत. तर एकेठिकाणी चिरेबंदी छत अजूनही टिकून आहे. त्याचे स्थापत्य, त्याची सांधणी थक्क करून सोडते. इथल्या बांधकामाला चौकोनी आकाराचे दगड छताला अजूनही सुस्थितीतपणे टिकून आहेत,
वाड्याच्या उजवीकडे साचपाण्याचा तलाव असुन येथे दरीकाठावर झाडीत लपलेली तटबंदी पहायला मिळते. वाटेच्या डावीकडे एक मोठा समाधी चौथरा आहे. 
धोडप चा सुळका


 
  या वास्तु पाहुन आपण निघालो कि समोर दिसणाऱ्या शंकराच्या पिंडीसारख्या प्रचंड उभ्या कातळाला ज्याला भुशास्त्रीय भाषेत 'व्हल्कॅनिक प्लग' म्हणतात तो सामोरा येतो. व्होल्कॅनिक प्लग, अर्थात ज्वालामुखीय उद्रेकातून शंखुसारखा उठावलेला डोंगरमाथा, जणू काही डोंगराला घातलेली पगडीच. हाच तो धोडपचा सुळका, अखिल सह्याद्रीत आपल्या वैशिष्टपूर्ण आकारासाठी ओळखला जातो. (याची पूर्व बाजू आरोहणाच्या दृष्टीने सोपी, तर पश्चिम बाजू मध्यम जोखिमेची आहे) त्यावेळी इथला जो भूभाग होता त्याचे बंध झुगारून तप्त लाव्हा रस पृथ्वीच्या उदरातून उफाळत वर आला आणि त्यातून या डाईक व प्लगची निर्मीती झाली. या सुळक्याला स्थानिक लोक 'शेंडी' म्हणतात. बालेकिल्ल्यावरील सुळक्याला पुर्णपणे फेरी मारता येते. पण काही ठिकाणी वाट निमुळती आहे तेव्हा जाणकार लोकांनी जावे, नवख्याने पाय आवरता घ्यावा हे चांगले.

 
 ह्या कातळावर माथ्यावर जाण्यासाठी मार्ग नाही. प्रस्तरारोहण करावे लागते.सुळक्याच्या दिशेने निघाल्यावर सुळक्याच्या वरील भागात असलेली आयताकृती आकाराची गुहा दिसते. या गुहेत जाणारी वाट अवघड नसली तरी घसारायुक्त असल्याने शक्य असले तरच या गुहेत जावे अन्यथा दुरूनच दर्शन घ्यावे.या गुहेत जाण्याचा  शेवटच्या कातळटप्पा कठिण आहे. हि गुहा दोन खांबांची असून. त्यात माणूस कसा बसा बसू शकतो, उभे राहण्याचा प्रश्नच नाही. त्यातही भिंतीवर काहींनी आपली नावे लिहून ठेवली आहेत.  या गुहेचा उपयोग कशाकरिता करत असावेत? टेहाळणी, संपत्ती ठेवण्यासाठी की दारूगोळा की आणखी काही?समजत नाही. 

सुळक्याच्या दक्षिण बाजुला एक फार मोठी नैसर्गिक गुहा आहे, धेाडपचे हे दिसरे भौगोलिक आश्चर्यच म्हणायला हवे. सुमारे पन्नास फुट लांबीच्या या गुहेचे तोंड दक्षिण बाजूने उघडते गुहा पूर्वेकडे अरूंद होत जाते आणि अचानकपणे दक्षिण बाजुला वळसा घेत डोंगरातून आरपार जाते. म्हणजे दक्षिण बाजूने किंवा पश्चिम बाजूने या गुहेतून आरपार बघितले जाऊ शकते.
  सातमाळ डोंगरांच्या परिसरात अनेक डाईकच्या अश्मरचना व नेढी बघायला मिळतात. धोडपची ही गुहा म्हणजे आतून वळसा घेतलेलं एक प्रकारचं नेढच आहे. सर्वात मोठं नेढं अर्थातच धोडपच्या वायव्य दिशेला असलेल्या पिंपळागड उर्फ कंडाळ्यावर आहे. सप्तश्रृंगीगडा समोरच्या मोहनदरी किल्ल्यावरचे नेढे चौकोनी आकाराचे आहे. पिंपळागडचे नेढे मधल्या भागात उंचावलेले तर दोन्ही बाजुला अरुंद होत जाणारे आहे. त्याचा आकार पन्नास फुटाहून मोठा आहे. याच परिसरातल्या रामजी पांगेराच्या हौतात्मासाठी ओळखल्या जाणार्‍या कण्हेरगडावरही नेढं आहे. 
या प्लगच्या अर्थात,  सुळक्याच्या पायथ्याशी आल्यावर सुळक्याच्या पोटात वेगवेगळ्या स्तरात कोरलेल्या ८-१० गुहा नजरेस पडतात. यातील काही गुहा अर्धवट कोरलेल्या असुन काही गुहामध्ये पाण्याची टाकी आहेत. काही गुहांचा आकार अजस्त्र आहे. यारून धोडपच्या किल्ल्यावर मोठा राबता असल्याचे अनूमान निघते.यातील शेवटच्या दोन गुहा ४०-५० माणसे राहु शकतील इतक्या प्रशस्त असुन त्यात वेगवेगळी दालने आहेत.  .हट्टी गावातून इथवर जाण्यासाठी २.५ ते ३ तास लागतात.
गुहेतील शंकराची पिंड आणि नंदी 



यातील एका दालनात देवीचे लहानसे मंदिर उभारलेले आहे.हि बहुधा गडदेवता असणार. गुहेबाहेर पाण्याने भरलेले खांबटाके असुन यातील पाणी थंडगार व पिण्यायोग्य आहे. या टाक्यात शस्त्र आहेत असे स्थानिक लोक सांगतात. सुर्यकिरण या पाण्यात पडल्यास ती शस्त्रे दिसु शकतात असे स्थानिक लोक सांगतात. या टाक्याला 'देवी टाके' म्हणतात. धोडपवर वर्षभर पुरेल इतके अतिशय चवदार व स्वच्छ पाणी या टाक्यात साठते. गडावरची बाकी सर्व टाकी शेवाळेलेले, हिरवट पाण्याने भरली आहेत. तेव्हा किमान देवी टाक्याची स्वच्छता राखण्याची जबाबदारी येथे भेट देणार्‍या प्रत्येकाचीच..प्रत्यक्षात मात्र या टाक्यात प्लास्टिकची खाद्यपदार्थांची वेष्टने, पाण्याच्या बाटल्या व अन्य घाण टाकून ठेवल्याने पाणी काळजीपूर्वक उपसावे लागते. टाके कमालीचे खोल असल्याने व पुढच्या भागात पाण्याची खोली जास्त असल्याने त्यातून पाणी उपसणेही सोपे नाही. टाक्याशेजारील कोरड्या टाक्यात भग्न नंदी व शिवलिंग ठेवलेले आहे. या टाक्याशेजारी दूरवर पसरलेली नैसर्गिक गुहा असुन या गुहेचे दुसरे तोंड सुळक्याच्या मागील बाजुस आहे.

गुहेजवळ लावलेला फलक

अशी नयनरम्य सकाळ फक्त गडांवरच !
    या गुहेतील मुक्काम आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा एक वेगळाच आनंद देऊन जातो. टाक्याशेजारील कोरड्या टाक्यात भग्न नंदी व शिवलिंग ठेवलेले आहे. या टाक्याशेजारी दूरवर पसरलेली नैसर्गिक गुहा असुन या गुहेचे दुसरे तोंड सुळक्याच्या मागील बाजुस आहे. 
 महाराष्ट्रातल्या गडकिल्यांवर, गुहांमध्ये मुषकराजांचे अस्तित्व अनेक ठिकाणी आहे, परंतू धोडपवर ते जास्त मोठ्या प्रमाणावर आहे. ज्येष्ठ लेखक आनंद पाळंदेंच्या एका वर्णनात धोडपच्या गुहेतल्या उंदरांबद्दल वाचण्यात आले होते. ते प्रमाण आता अफाट वाढले आहे. त्याच्या सपाट्यात काय सापडेल अनं काय नाही'.येथे मुक्काम करायचा तर उंदरांची जोखिम पत्कारूनच.या धोडपच्या गुहेत एकदा अंधार दाटला की काहीच सुरक्षित राहू शकत नाही, तिथे फक्त मुषकराजांचे अधिराज्य. त्यावर आजघडीला तरी काही पर्याय नाही. याला उत्तम पर्याय म्हणजे एकतर स्वतःचे तंबु घेउन जाणे आणि गुहेच्या बाहेर मुक्काम करणे. किंवा माथा बघून पुन्हा माचीवर उतरुन शिवमंदीरात मुक्काम करणे.
   गुहेमध्ये देवीची विलोभनीय मूर्ती आहे. तिला नमन करून आता जायचे शेवटच्या पण सर्वात महत्वाच्या आकर्षणाकडे , डाईक !
धोडप गडावरील गुहेच्या जवळून काढलेले छायाचित्र : लोहगडचा विंचूकडा आणि रायगडचे टकमक टोकासारखे हे दिसते 



हेच ते 'डाईक' अंदाजे चारशे फूट,उंच  नैसर्गिक दगडी भिंत !




धोडपचं दुसरे भौगोलिक आश्‌चर्य म्हणजे  डाईकची भिंत ! हि भिंत आणि प्लग यामुळे धोडप किल्ला फार दूर अंतरावरून सहजपणे ओळखू येतो. सह्याद्रीच्या एका उंच आणि विशिष्ट भौगोलिक रचना असलेल्या किल्ल्यावरून दिसणाऱ्या दृश्याने मनास जे समाधान आणि जो अनुभव मिळतो, तो शब्दांकित करणं केवळ अशक्य !! हा अनुभव प्रत्यक्ष तेथे जाऊनच अनुभवण्यासारखा आहे.सह्याद्रीच्या सातमाळा रांगेत डाईकची अश्मरचना अनेक ठिकाणी दिसून येते. धोडपचा डाईक अखिल महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. डाईक म्हणजे डोंगरांची अगदी पातळ कातळ भिंत...समोरून अफाट मोठा दिसणारा कातळ बाजूने पातळ पडद्या प्रमाणे दिसतो. सुमारे ३ कोटी वर्षापूर्वी दोन महाखंडांच्या टकरीनंतर पृथ्वीवर जी उलथापालथ झाली त्याचा हा परिपाक. लोणावळ्या जवळच्या तैलबैलाचा डाईक प्रसिद्ध आहे. 





धोडपचा डाईक लांबलचक पसरलेला तर आहेच, शिवाय त्याला मध्ये बरोबर चौकोनी आकाराची खाच पडली आहे. या डाईकच्या खाचेचे सर्वात उत्तम दर्शन घ्यायचे झाल्यास धोडप सुळक्याच्या उत्तर टोकाला जायला हवे, तिथपर्यंत जाण्याची वाट फारशी बिकट नाही. गुहेसमोरून जाणारी वाट आपल्याला या डाईकरुपी भिंतीच्या माथ्यावर घेउन जाते. सहसा सह्याद्रीतील बहुतेक डाईकच्या मथ्यावर जायचे तर प्रस्तरारोहण करावे लागते. इथे मात्र आपण थेट माथ्यावर असतो. हि डाईक नैऋत्येकडे निमुळती होत जाते. खालून हि  डाईक बघताना आपल्याला खुप निमुळती असेल असे वाटते. प्रत्त्यक्षात ती बर्यापैकी रुंद आहे. 

या डाईकवर वनखात्याने चक्क लोखंडी खांबांचे सुरक्षा कठडे बसवले आहेत. येथे मोठी गर्दी झालीच तर लोक दरीत घसरून पडू नयेत अशी या मागची भावना ठेवून केलेले हे बांधकाम,  प्रत्यक्षात एका अजोड भौगोलिक आश्चर्याच्या सौंदर्याला बाधाच पोहोचवत आहे. या डाईकवर सुमारे सातशे फुटांचा भल्या मोठ्या आकाराच्या लोखंडी सुरक्षा कठड्यांचा खटाटोप करण्यात आलाय. यातले काही कठडे दोनच वर्षांच्या उन्मळून पडण्यास सुरूवातही झाली आहे. 


    पायथ्याकडून धोडपकडे बघताना आपल्याला या डाईकला चौकोनी खाच दिसते. खालून या खाचेच्या आकाराचा अंदाज येत नाही. मात्र हि खाच जवळपास १०० फुट लांब आणि तितकीच खोल आहे. या खाचेच्या निर्मितीबाबत मात्र प्रवाद आहेत.काहींच्या मते हि नैसर्गिक खाच आहे, तर काही तज्ञांच्या मते हि मुद्दाम तयार केलेली आहे. वास्तविक अशी खाच धुळे जिल्ह्यातील भामेरला , तसेच पिसोळगडाला आहे.या दोन्ही ठिकाणच्या खाचा नैसर्गिक आहेत. मात्र संभाजीनगर जिल्ह्यातील सुतोंडा गडाला अशीच खाच मानवनिर्मित वाटते.मात्र धोडपची खाच माझ्या मते नैसर्गिक आहे. एकतर तसेही या डाईकरुपी भिंतीवर चढणे अशक्य आहे. शिवाय खाच निर्माण करुन लष्करीदृष्ट्या काहीही फायदा नाही. शिवाय खाचेची भिंत ओबडधोबड आहे. स्थानिक मंडळी यासंबंधिची सप्तश्रृंगी देवीची दंतकथा सांगताना, देवी कोपली त्यावेळी तिने धोडपवर येऊन डोंगरावर आपला गुडघा मारला तेव्हा पासूनची ही खाच आहे, हीच देवी धोडपच्या गुहेत विराजमान असल्याची काही मंडळींची धारणा आहे या खाचेमुळे पुढील डोंगरसोंड किल्ल्यापासुन वेगळी झाली असुन या खाचेच्या टोकावर गोलाकार बुरुज असल्याच्या खुणा दिसुन येतात. येथे आपली बालेकिल्ल्याची फेरी पूर्ण होते.
धोडपची हि मोहीम आपण सरत्या पावसाळ्यात आयोजित केलेली असेल तर संध्याकाळी आपल्याला आकाशात रंगाची उधळण अनुभवता येत. 




    बालेकिल्ल्यावरून सातमाळ डोंगररांगेतील रवळ्या- जावळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी,कांचना-मांचना, प्रेमगिरी, साल्हेर-सालोटा,चौल्हेर, कण्हेरगड,चांदवड, इंद्राई, राजदेहेर,कोळधेर, अहीवंतगड, अचला या सारखे लहानमोठे १६ किल्ले तसेच हंड्या, इखारा हे सुळके पहायला मिळतात. पायथ्यापासून बालेकिल्ल्यावर यायला व तो संपुर्ण फिरण्यासाठी साधारण पाच तास लागतात.किल्ल्याचा परीसर साधारण ४२५ एकरवर पसरलेला असुन संपुर्ण किल्ला पहाण्यास साधारण आठ तास लागतात. किल्ल्यावरील बारमाही पाण्याचे टाक, रहाण्यासाठी प्रचंड मोठी गुहा व भरपूर अवशेष यामुळे धोडप किल्ला एक दिवस मुक्काम करून पहाण्यासारखा आहे.

अ‍ॅडव्हेंचर पार्क,  धोडप :-

    राज्यातील पहिले साहसी खेळांचे केंद्र चांदवड तालुक्यात असलेल्या धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी साकारण्यात आले आहे. वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीतून हे केंद्र साकारले असून, त्यासाठी तब्बल अडीच कोटी रूपये खर्च झाला आहे. या केंद्रामुळे जिल्ह्यातील साहसी पर्यटनाला चालना मिळेल अशी आशा आहे. 
    धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हट्टी गावात वन खात्यातर्फे साहसी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रात प्रस्तरारोहणाची कृत्रिम भिंत, आवरोहण, झिप लाईन यासह विविध अथडळे असे १७ साहसी प्रकार करण्याची संधी पर्यंटकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यात क्लायम्बिंग वॉल, बर्मा ब्रीज, फ्लाइंग फॉक्स लाइन, झिप लाइन, वॉल बॅरियर, बॅरेल क्रॉसिंग, चिंपाजी स्विंग, आइसलैंड हुपर, झुमरिंग, कमांडो नेट, हॉरिजेन्टल लॅडर्स, टार्झन स्विंग, टायर क्रॉसिंग, टायर ब्रीज, टायर वॉल, साईडवे स्विंग, झीग-झॅक स्विंग हूपर, रनिंग ट्रॅक, हॉरिजेन्टल स्विंग यासारख्या साहसी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.सर्वसामान्यांना करता येण्यासारखेच हे प्रकार आहेत. त्याच प्रमाणे येत्या काही दिवसात येथे घरगुती पद्धतीचे भोजनही या ठिकाणी उपलब्ध आहे.या प्रकल्पामुळे हट्टी गावात ठिकठिकाणचे साहसी पर्यटक येणार असून, गावाच्या विकासाला हातभार लागणार आहे. आजवर ट्रेकर मंडळी या गावात येत होती; मात्र त्यांची संख्या खुप नगण्य होती. ज्यांना कठीण श्रेणीतल्या धोडप किल्ल्यावर जायचे नसेल, अशा सर्वसामान्यांना या किल्ल्याच्या पायथ्याला मुक्कामाची व वेगवेगळे अथडळे खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याठिकाणी पर्यटकांच्या दृष्टीने सर्व सुविधा मिळाव्यात म्हणून निसर्ग निर्वाचन केंद्र, उपहारगृह, ४० लोक राहू शकतील अशी निवास व्यवस्था, वनतळे, पॅगोडा, तंबू, साहसी क्रीडा पर्यटन, विद्यार्थी यांच्यासाठी 'ॲडवेंचर थीम पार्क' तयार करण्यात आले आहे.  निसर्ग पर्यटन केंद्रातील निसर्ग निर्वाचन केंद्र (धोडप संग्रहालय) पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. या ठिकाणी घोडप किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्यात आली असून, यामध्ये या किल्ल्याचा इतिहास, प्राणी, पक्षी, वनस्पती यांची माहिती आढळते.

     या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी हट्टी गावावर राहणार असून, त्याचे व्यवस्थापन, देखभाल व संरक्षण हे सर्व गावालाच करावे लागणार आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून हा प्रकल्प पुढे चालवावा जाणार आहे. या प्रकल्पासाठी गावच्या काही तरूणांना प्रस्तरोहणाचे धडे दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे गावात स्वच्छता, येणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तम प्रकारचेय घरगुती जेवणाची सोय गावाला करावी लागणार आहे. हट्टीच्या पर्यटनामुळे इथल्या डोंगरावर तयार होणारा दर्जेदार खवा आता राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचायला मदत होणार आहे.


इखारा सुळका :-
  बरेच जण सातमाळा रांगेतील गड सलग पहातात.कारण मुख्य शहरापासून हि सातमाळा रांग तुलनेने लांब असल्यामुळे एखाद्या गडाला भेट देण्यापेक्षा सवड काढून सलग मोहीम आखलेली सोयीची ठरते. सहाजिकच धोडपचा प्रशस्त गड पाहून शिवाजी महाराजांचा सुरत मोहिमेवेळचा दाउदखानाचा पराभवाचा सोनेरी क्षण उराशी बाळगणार्या कांचन- मांचन या जोड दुर्गांना भेट देण्यासाठी बरेच जण धोडप ते कांचन असा प्रवास करतात. यामध्ये मध्येच इखारा या सुळक्याला भेट देता येते.
 धोडपच्या माचीवर उतरुन तलाव व हट्टी दरवाज्यातून जाणारी वाट इखारा सुळकयाकडे जाते. बुरुज व थोडी तटबंदी ओलांडली कि पुढे खिंड लागते. खिंड ओलांडून पलिकडच्या पठारावर जायचे. उजवीकडे फुटणारी  वाट खाली उतरते. समोरच्या टेकडीला वळ्सा घालून आपण इखाराच्या आश्रमात पोहचतो. धोडपवरुन इथे पोहचायला दोन तास लागतात. हा आश्रम नाथपंथीय साधुंचा आहे. आश्रमात शंकराचे , विठ्ठलाचे मंदीर आहे. विहीरही आहे.इथे दुध, ताक मिळू शकते. मंदीरात वीस, पंचवीस जणांना मुक्काम करता येईल अशी जागा आहे. 




इखारा (विखारा ) सुळक्याच्या पायथ्याशी असलेलं गोरक्षनाथ मंदिर



इथून इखारा सुळक्यावर चढाई करायची असल्यास सुळक्यापासून एक डोंगरसोंड आश्रमापर्यंत उतरली आहे. या डोंगरसोंडेवरील पायवाटेने निम्मा चढ चढायचा आणि डावीकडे वळून धोडपच्या दिशेने असलेल्या उतारावरुन वळसा घालायचा. पलीकडच्या टोकाला पोहचले कि उजवीकडे वरच्या बाजुला एक मातीची घळ खाली उतरते. त्या घळीतील मातीच्या उतारावरुन घसार्यातून वाट काढत सुळक्याच्या पायथ्याच्या पठारावर पोहचायचे. इथून समोर इखाराची चिमणी म्हणजे सुळक्याला असलेली उभी खाच दिसते. गवतातून वाट काढत तिथे पोहचायचे. आश्रमातून इथे येण्यासाठी एक तास लागतो.सुळक्याचा पहिला टप्पा मेख मारुन दोर लावून चढावा लागतो. पन्नास फुटानंतर चिमणी लागते. अंतिम टप्पा चाळीस फुट आहे आणि तो चालत पार करता येतो. एकंदरीत हि चढाई सोप्या श्रेणीची आहे. 

संदर्भ :-
१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
३) दुर्गभ्रमंती नाशिकची - अमित बोरोले
४) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! - प्र.के. घाणेकर
५) दुर्ग या दिवाळी अंकातील प्रा. नितीन जाधव यांचा लेख
६) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा- सतिश अक्कल्कोट
७) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
८) www.trekshitiz.com हि वेबसाईट
९)  www.durgbharari.in   हि वेबसाईट
१०) http://sagarshivade07.blogspot.com/2013/11/blog-post.html
११) http://bhushankarmarkarworld.blogspot.com/2016/07/
१२)  

 http://narendralakhan7.blogspot.com/2019/03/dhodap-fort.html















मुख्य दरवाज्याजवळील शिल्प 




































तळटीप : 

लेखातील अनुभव हा खरा आणि याची देही, याची डोळा अनुभव असला तरी लेख गूढकथा अथवा फँटसी प्रकारातील लिहिलेला आहे. 

http://sagarshivade07.blogspot.com/2013/11/blog-post.html



 







No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...