अंचलेश्वर मंदिर, गांजीभोयरे, ता. पारनेर

अंचलेश्वर मंदिर, गांजीभोयरे, ता. पारनेर

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या तालुक्याच्या ठिकाणापासून ११ किमी अंतरावर गांजीभोयरे हे ऐतिहासिक दृष्टया समृद्ध असलेलं एक लहान गाव आहे. या गावात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे सरदार पांढरे यांचा वाडा आहे. त्याला गावकरी गढीचा वाडा म्हणून ओळखतात. या वाड्याचे आजमितीस केवळ प्रवेशद्वार तेवढे शिल्लक आहे. या शिल्लक असलेल्या प्रवेशद्वारावरून आपल्याला वाड्याच्या भव्यतेची कल्पना येऊ शकते. गावात आपल्याला जागोजागी अश्या भग्न वाड्याचे अवशेष विखुरलेले दिसून येतात. याच गावात ओढ्याच्या कडेला तटबंदीत असलेले अंचलेश्वराचे पुरातन मंदिर व बारव गावाच्या समृद्ध इतिहासाच्या पाऊलखुणा अजूनही जपून आहे.अंचलेश्वर मंदिर.

गावातील सरदार पांढरे यांच्या वाड्याच्या शेजारीच आपल्याला एक ओढा वाहताना दिसतो. हा ओढा ओलांडला की उजव्या बाजूला तटबंदीत अंचलेश्वर मंदिर व बारव आपल्याला दिसून येते. मंदिर पुरातन असून गावकऱ्यांनी रंगरंगोटी करून जीर्णोद्धार केल्याने त्याचे मूळ सौंदर्य हरवले आहे. नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची प्राथमिक रचना आपल्याला दिसून येते. मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर व दक्षिण दिशेला देखील प्रवेशद्वार आहेत. दक्षिण दिशेला बारव असून बारवेतून मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत.

बारवेच्या बाजूचे प्रवेशद्वार मात्र सध्या वापरात नाही. नंदीमंडपात दोन नंदी प्रतिमा आपल्याला दिसून येतात. प्रवेशद्वारावर काही स्त्री शिल्पे असून शिल्पकाम अगदीच साधे असून मंदिर स्थापत्य परंपरेतील अखेरच्या कालखंडातील हे मंदिर असावे. पारनेर ला कधी गेलात तर जवळच असणाऱ्या गांजीभोयरे या लहान गावाला देखील आवर्जून भेट दिलीत तर गावाचा समृद्ध इतिहास सर्वांपर्यंत पोहचण्यास नक्कीच मोलाची मदत होऊ शकते.

Rohan Gadekar

 https://www.discovermh.com/anchaleshwar-temple-ganjibhoyre/

 

 महाराष्ट्रात सर्वात जास्त गढी आपल्याला नगर जिल्ह्यात पहायला मिळतात. सरदार पांढरे घराण्याची गढी म्हणुन ओळखली जाणारी अशीच एका गढी आपल्याला पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे गावात पहायला मिळते. काही मोजकेच अवशेष आपल्या अंगाखांद्यावर बाळगणारी हि गढी आजही काळाशी झुंज देत ठामपणे उभी आहे. पुणे शहरापासुन ९० कि.मी.अंतरावर असणारे गांजीभोयरे गाव शिरूरपासून २२ कि.मी. अंतरावर तर पारनेर या तालुक्याच्या ठिकाणाहुन १० कि.मी अंतरावर आहे. कधीकाळी नगरकोटाच्या आत वसलेल्या या गावात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे होते पण आज मात्र या कोटाचे मोजकेच अवशेष शिल्लक आहेत. आपला गांजीभोयरे गावातील प्रवेश हा नव्याने बांधलेल्या दोन बुरुजामधील कमानीतून होत असला तरी कधीकाळी या ठिकाणी नगरदुर्गाचा मुख्य दरवाजा असल्याचे स्थानीक सांगतात. नगरदुर्गाचा दुसरा दरवाजा गावाबाहेर आजही शिल्लक असुन त्याची कमान मात्र नष्ट झाली आहे. प्रशस्त अशा या दरवाजाचे बांधकाम घडीव दगडात केलेले असुन वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. या दरवाजाजवळ चौकोनी आकाराची दगडी बांधणीतील बारव असुन या बारवेतील पाणी काढण्यासाठी चारही बाजुस रहाट आहेत. सरदार पांढरे यांची गढी गावाच्या एका टोकावर असुन कमानीतुन प्रवेश केल्यावर पाच मिनीटात आपण या गढीजवळ पोहोचतो. गढीची केवळ दर्शनी भागातील तटबंदी शिल्लक असुन उर्वरीत बाजुची तटबंदी नष्ट झाली आहे. हि तटबंदी रचीव दगडांची असुन या तटबंदीच्या उजवीकडील टोकावर एक बुरुज पहायला मिळतो. या बुरुजाचे बांधकाम देखील रचीव दगडांचे आहे. तटबंदीच्या मध्यावर घडीव दगडात चुन्यात बांधलेले दोन मोठे बुरुज असुन या दोन बुरुजात गढीचा मुख्य दरवाजा आहे. गढीचा दरवाजा आजही सुस्थितीत असुन त्याच्या दर्शनी भागात दोन कमळे व वरील बाजुस पानांची नक्षी कोरलेली आहे. दरवाजाच्या डावीकडील तटबंदीची पडझड झालेली असुन या टोकावर आपल्याला अर्धवट बुजलेली विहीर पहायला मिळते. गढीच्या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असुन या दाराला दिंडी दरवाजा आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन उजवीकडील देवडीतुन दरवाजाच्या वरील बाजुस व बुरुजावर जाण्यासाठी जिना आहे. यातील पायऱ्यांनी बुरुजावर आले असता संपुर्ण गढी तसेच गांजीभोयरे गाव व आसपासचा परीसर नजरेस पडतो. गढीच्या आतील सर्व वास्तु पुर्णपणे नष्ट झाल्या असुन त्यावर काटेरी झुडपे उगवली आहेत. गढीच्या समोरील बाजुस एक प्रशस्त दुमजली वाडा आहे. या वाड्याचा दर्शनी भाग आजही सुस्थितीत असुन याचा तळमजला घडीव दगडात तर वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. गढीभोवती फेरी मारली असता तीन-चार फुटापर्यंत शिल्लक असलेली तटबंदी व त्यातील दोन बुरुज पहायला मिळतात. गढी व नगरकोटाचे अवशेष पहाण्यासाठी पाउण तास पुरेसा होतो. गांजीभोयरे गावाचा इतिहास सुरु होतो तो निजामशाही काळापासुन. सातारा जिल्ह्यात असलेल्या माण तालुक्यातील वावरहिरे येथील पांढरे घराण्याला त्यांच्या पराक्रमासाठी गांजीभोयरे गावाची जहागीर मिळाली. त्याच काळात या गढीचे बांधकाम झाले असावे. विजापुर दरबारात असलेल्या सरदार मंडळीमध्ये पांढरे यांचे नाव येते. एका आदिलशाही पत्रात दख्खन मधील सरदार म्हणुन पांढरे यांचा उल्लेख नाईक निंबाळकर, जगदाळे, निकम,पिसाळ यांच्या सोबत येतो. गांजीभोयरे गावात असलेली बाजारआळी पहाता हे गाव आसपासच्या गावांची बाजारपेठ असावे असे वाटते.

© Suresh Nimbalkar

















 गांजी भोयरे गावातील धनगराची गढी, तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर , पुणे अहमदनगर मार्गावरिल शिरुर च्या पुढे निघोज फाटा लागेल त्या मार्गाने जावे रालेगण सिद्धि नंतर जवले गाव लागेल, निघोज मार्ग सोडून जवले गावातुन पारनेर कडे जावे, सांगावी गावा नंतर गांजी भोयरे गाव लागेल गावात जावे भव्य प्रवेशद्वार व चार बुरुज शिल्लक आहेत, प्रवेशद्वार बर्यापैकी व्यवस्थित आहे.

द्वारात लाकडी दरवाजे चा भाग आडवा पडलेला दिसतो, गढिचे सध्या चारच बुरुज शिल्लक दिसतात त्यातील एक खुपच भव्य आहे, यावरुन पुर्वी हि गढी किती भव्य असणार याची कल्पना येते, गढिचा पुर्व उत्तरेकडील भागच शिल्लक आहे, गावात विचारपूस केली असता हि धनगराची गढी आहे असे समजले पणं गढी नक्की कोनाची समजु शकले नाही गढिच्या मागे ओढ्या कडे शिव मंदिर आहे, गांजीभोयरे गाव जवले गावापासुन सात किमी आहे निघोज ला गेल्यास हि गढी पाहता येईल.
- बलराज मुदलियार