Sunday, December 13, 2020

द्रोणागिरी

 

द्रोणागिरी नाव ऐकल, की आपसूकच लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमंताने संजीवनीसह हिमालयातून उचलून आणलेला द्रोणागिरी आठवला ना. हा, रामायणात ही कथा आहे खरी, पण आपण जो द्रोणागिरी पाहणार आहोत तो निराळाच. दंतकथामुळे जरी या कथेशी जोडला गेला असला, तरी हा आहे एक योद्धा, फारसा चमकला नाही पण याने त्याचे महत्त्व मात्र वेळोवेळी दाखवून दिले.
उरण गाव पुर्वी कारंजा बेटावर होते. बेटाच्या चारही बाजूंनी पाणी होते. भेंडखळ खाडीमुळे अलग झालेल्या बेटावर उरण मध्यवर्ती होते. द्रोणागिरी चा किल्ला कधी बांधला यावर मतमतांतर आहेत. उरण बंदरावर लक्ष ठेवण्याच्या कामगिरीसाठी याची निर्मिती झाली असावी. इतिहासात डोकावताना उरण वर सातवाहन, त्रैकुटक, कलचुरी, कोकणचे मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव असा बराच सत्तापालट झालेला पहायला मिळतो. यापैकी यादव काळात हा किल्ला असल्याचा उल्लेख येतो. 

सन १३३२ मध्ये घणदेवीच्या नागरशाने प्रतापशाचा पराभव करुन, यादवांचा पेण पनवेलचा मुलुख जिंकला. त्यावेळेस उरणचा पट्टाही त्यांच्या ताब्यात गेला. पुढे नगरचा महंमद तुघलकचा हस्तक निका मलिकने नागरशाचे राज्य १३४८ मध्ये जिंकले आणि या भागावर मुसलमानी अंमल बसला. हा किल्ला निजामशाही -पोर्तुगीज-आदिलशाही असा सत्तापालट होत पुढे पोर्तुगीजांनी लाॅरेस आणि लुईस या युद्धनौकातून येऊन कारंजा, द्रोणागिरी जिंकला. 

१५३० मध्ये पोर्तुगीजांनी या किल्ल्याची दुरुस्ती केल्याचा उल्लेख येतो. 
१६१२ मध्ये कारंजा आणि उरण मध्ये काही मुसलमानांनी दंगा करून किल्ल्यावर हल्ला केला‌. किल्लेदार कैद करून किल्ल्यावर ताबा मिळवला. तेव्हा फिरंग्यांनी पुन्हा हल्ला केला. किल्ल्याचे दरवाजे फोडून किल्ला परत मिळवला. बंडखोरांची सरसहा कत्तल उडवली. ह्या घटनेचा सूड उगवण्यासाठी आबासखानाने कारंजा वर फौज नेली, पण फिरंग्यांनी त्याचा पराभव केला. तसेच मुसलमानी मुलखात धुमाकूळ घातला. ३००० लोक कैद करून नेले‌ यादरम्यान निका मलिकने साष्टी आगाशीकडे स्वारी केली. आगाशीला वेढा घातला म्हणून फिरंगी सेंट फ्रॅन्सिस मोनेस्टरीत आसऱ्याला गेले. त्यांनी आपली बायका मुले वसईला पाठवली. 

१६८२ मध्ये संभाजी महाराजांनी चौल रेवदांड्याला वेढा घातला होता. पण हा वेढा फिरंग्यांनी उधळून लावला. याचा वचपा संभाजी महाराजांनी उरण कारंजा बेट जिंकून काढला.

२८ जानेवारी १६८४ ला केजविनने इंग्लंडच्या राजाला पाठविलल्या पत्रात "संभाजीने एलिफंटा आणि कारंजा बेट घेतल्याचे लिहिले आहे. तसेच पोर्तुगीजांचा ४० मैल लांबीचा प्रदेश बेचिराख करून ख्रिश्चनांची कत्तल केली असेही तो म्हणतो "

औरंगजेबाच्या स्वारीच्या धामधुमीच्या काळात कारंजा, उरण मराठ्यांनी गमावले. या नंतर यासंबंधीचा उल्लेख येतात ते थेट आंग्र्यांच्या कारकिर्दीत, 

३२ मे १७३८ व्हाइसरॉय कौंट द सांदोमिल याने मुंबई च्या इंग्रज सेनापती जाॅन हाॅर्न  ला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो की,
 "मानाजी आंग्रेंच्या पस्तीस गलबतांना आपण मुंबई बेटातून  ठाण्याला जाण्याची परवानगी दिलीत. हे सैन्य कारंजावर हल्ला करायला जाणार होते. पण कारंजावर हल्ला होणार असल्याचा सुगावा या किल्ल्याच्या कॅप्टनला लागल्याने, त्याने या हल्ल्यास तोंड देण्याची कडेकोट तयारी केल्याचे कळताच ही गलबते  गायीच्या बेटांना रसद पोहचवण्यासाठी ठाण्यातल्या बंदरात व तेथून मुंबई बंदरातून माघारी फिरली. ह्या घटनेचा मला आपणाकडे निषेध करायचा आहे. आपल्या हातून तटस्थतेचा भंग झाला आहे."

चौलचा कॅप्टन ज्युआंव द फ्रिअश सार्मेतू (१० जानेवारी १७३९ ) व्हाइसरॉय ला लिहिलेल्या पत्रात म्हणतो, 
" मानाजी आंग्रेनी तीस गलबते तयार केली आहेत. आपल्या सरदारांकरता सोन्याचांदीची अनेक कडी तयार केली आहेत. कारंजावर हल्ला करण्याचा त्यांचा बेत आहे. हा किल्ला घेण्याचे त्याने बाजीरावाला वचन दिले आहे असेही कळते. बाजीराव खुद्द या ठाण्याला आणि किल्ल्याला वेढा देण्यासाठी येणार आहे अशी बातमी आहे. मी आपणाला ह्या ज्या बातम्या सादर करत आहे.  त्या माझ्या गुप्तहेरांनी आणलेल्या आहेत. कारंजाच्या किल्लेदारासही मी त्याच्यावर होणाऱ्या संभाव्य हल्ल्याची पूर्वसूचना दिली आहे "
वरील पत्रातील हा किल्ला घेण्याचे आधीपासूनच प्रयत्न चालू असल्याचे समजते.

वसईच्या प्रसिद्ध मोहीमेदरम्यान हे प्रयत्न फळास आले. दोन वर्षे ही मोहीम चालली. मराठ्यांनी पोर्तुगीजांचा उत्तर कोकणातील मुलुख जिंकण्याचा सपाटा लावला होता. मराठ्यांनी पोर्तुगीज गुडघ्यावर आणला होता. वसईच्या गळ्याला मराठे भीडले होते आणि ह्या परीस्थितीचा फायदा घेऊन मानाजी आंग्रेनी कुलाबा किल्ल्यातून उत्तरेस असलेल्या कारंजा बेटावरील द्रोणागिरीची मोहीम आखली. मानाजीच्या या मोहिमेबाबत मराठी कागदपत्रे सविस्तर बोलत नाहीत. त्रोटक माहितीच मिळते. 

पेशवे दप्तर भाग ३४ मधील पत्र क्रमांक १७९ मध्ये बाजीराव चिमाजी आप्पांना लिहितात
" राजश्री मानाजी आंगरे उरणास लागले आहेत. त्यांचे पत्र आपणास आले होते त्याची नक्कल पाठविली ते पावले. सारांश त्यास स्थळ हस्तगत झाले नाही, यत्नात आहेत कदाचित त्यांनी हस्तगत केल्यास स्थळाचा पर्याय आपणास पहिला लिहिलेलाच आहे. मानाजी आंग्रे कुलाबा बोलवीत नाहीत. तेव्हा फौज इकडे पाठवून देऊ म्हणून लिॎ तरी उत्तम आहे. तिकडे प्रयोजन न लागल्यास इकडे पाठविली पाहिजे. वरकड त्याजपासून स्थळ आपले हवाला करून घ्यायचा विचार पहिला आपणास लिहिला आहे, तदनुरुप स्थळ आपले हवाला होये ते केले पाहिजे लोभ असो दीजो असा आसीर्वाद"
दुसरा उल्लेख पेशवे दप्तर भाग २२ पान १९२ वरील नोंद "फिरंगियाचे उरूणचे ठाणे मानाजी आंगरे यांनी घेतले." इतकीच मिळते
पण पिसुर्लेकर आणि डॅनव्हर्स यांनी मात्र बरी हकिकत दिली आहे.
पिसुर्लेकर म्हणतात " कारंजे हे फार सुरक्षीत ठाणे होते. पुर्वी वेळोवेळी जी ठाणी आपल्या हाती काहीही झाले तरी राखावयाची असे फिरंगी सरकारने ठरवले होते. त्यातच या ठाण्याचा समावेश होत होता. या वेळी तेथील कप्तान जोसे लुई द सिल्वा हा होता. आंग्र्याने वसईच्या वेढ्याचा प्रसंग साधून, आपल्या कुलाब्यास ते ठाणे जवळ आहे असे पाहून उरणावर चाल केली. मार्चच्या ४ थ्या तारखेस तो कारंजा बेटात उतरला. त्यांचे बरोबर २००० लोक होते. त्याने उरणाचे कोळीही फिरवले होते पाच दिवस वेढा चालला. आंग्र्यांच्या बातेऱ्यांच्या मारापुढे टिकाव न लागून शेवटी किल्लेदाराने १० मार्च रोजी कौल घेतला. आंग्र्याने त्या सर्व लोकांस मुंबईस पावते केले. कप्तान मात्र चौलास निघून गेला."
डॅनव्हर्स म्हणतो " ७ मार्च रोजी ( १८ मार्च पोर्तुगीज तारीख ) आंग्र्याने ४० गलबतांतून २००० लोक नेऊन कारंजावर हल्ला केला. ५ दिवस वेढा चालवून ते बेट जिंकले बेटावर १०० शिपायांची शिबंदी होती. त्यापैकी ३ लोक मारले गेले "
या मोहिमेत मानाजीचे किती नुकसान झाले याबाबतीत मात्र नोंदी नाहीत.

मानाजीने कारंजा जिंकल्यावर, तिथल्या काही लोकांनी इंग्रजांकडे कारंजा घेण्याविषयी सुत्र लावले होते. पण मुंबईकरांचे कौन्सिलच म्हणाले की बारा ते पंधरा हजार लोक कारंजा जिंकण्यास लागतील. त्यासाठी निरनिराळ्या उतारावर बंदोबस्तासाठी ठेवलेले आपले लोक काढून आणावे लागतील. मरोळ येथे मराठयांची मोठी फौज जमा झाल्याची बातमी आली आहे. आपण कारंजावर हल्ला केला तर उतारावर मराठे गर्दी करतील. शिवाय कारंजा जिंकल्यावर ते राखणे कठीण आहे. शिबंदीचा खर्च फार लागेल. किल्ला पडका व नादुरुस्त आहे. आणि शेजारच्या टेकडीवरून त्यावर मारा होऊ शकतो. किल्ला राखण्यासाठी दुसरा किल्ला बांधावा लागेल. शिवाय मराठे कारंजा हे ठाणे पोर्तुगीजांचेच समजत असल्यामुळे ते हल्ला केल्याखेरीज राहणार नाहीत. मानाजीने हे ठाणे मराठ्यांतर्फे काबीज आहे असे ते म्हणतात. म्हणूनच कारंजाचा विचार सोडून द्यावा. तेथले सातशे आठशे आगरी लोक मानाजीस मिळाल्यामुळे मसलत कठीण आहे. या सर्वांचा विचार करता मानाजीच्या नवीन शेजार उपद्रवी ठरणार आहे. (the rise of Bombay retrospect) 
मराठ्यांच्या ताब्यात किल्ला आल्यानंतर या किल्ल्यावर किल्लेदार म्हणून सेखोजी सकपाळ याची नेमणूक झाली. मराठा सत्तेच्या निशाणाखाली नांदणाऱ्या द्रोणागिरीचा मधला बराच काळ लोटला  पण नारायणराव पेशव्यांच्या खूनानंतर याच्यावरील मराठा सत्तेला ग्रहण लागले. इंग्रजांच्या रूपाने शत्रुची नजर कारंजावर वळली. नारायणरावांचा खून आणि राघोबा दादा प्रकरणात पुणे दरबार गुंतलेला पाहून मुंबईच्या टोपीकरांनी आपला फायदा करून घ्यायचे ठरवले. साष्टी, वसई, कारंजा हा प्रदेश आपल्या ताब्यात असावा अशी इंग्रजांची फार इच्छा होती. माधवरावांच्या काळात वाटाघाटी करून हा मुलुख दाबण्याचा त्यांचा मनसुबा होता. पण त्यात इंग्रजांना यश आले नाही नारायणराव पेशव्यांच्या खूनानंतर पुणे दरबारात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तीचा फायदा आपल्या साष्टी घेण्यास होईल. पुणे दरबार राघोबा प्रकरणात गुंतलेले आहे.  त्यामुळे फारसा विरोध होणार नाही. असा सल्ला इंग्रज वकील माॅस्टीनने मुंबई काऊन्सिलला दिला. मध्यंतरी राघोबा सुरतेला इंग्रजांच्या आश्रयाला आल्यावर, त्यांच्याकडून साष्टी पदरात पाडून घेण्याचा इंग्रजांचा हेतू होता पण हे सारे चालू असताना पोर्तुगीज साष्टीवर हल्ला करणार असल्याची बातमी मुंबई काऊन्सिलला मिळाली तेव्हा वेळ न घालवता काऊन्सिलने ९ डिसेंबर १७७४ रोजी  राॅबर्ट गाॅर्डन यांच्या हाताखाली ६२० गोरे शिपाई, १००० काळे शिपाई, तोफखाना २०० गोलंदाज घेऊन खुष्कीच्या मार्गाने ठाण्यावर पाठवले २९ डिसेंबरला इंग्रजांनी ठाणे जिंकले यानंतर कर्नल किटींगच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याने उरण करंजा इत्यादी ठाण्याजवळील प्रदेश जिंकून साष्टी वर अधिपत्य मिळवले 

कर्नल किटींगच्या नेतृत्वाखाली झालेल्या वेसावे कारंजा मोहिमेची bomby presidency part 2 मधील नोद


पुढे १७७६ मध्ये  मराठ्यांसोबत झालेल्या पुरंदरच्या तहात इंग्रजांना ठाणे, साष्टी चा मुलुख मिळाला हा तह आणि पुढे इंग्रज मराठा दरम्यान घडलेल्या घडामोडी विस्तारभयास्तव टाळतो आहे पण इथून पुढे द्रोणागिरी, कारंजा मराठा सत्तेपासून कायमचे दुरावले. कधी डौलाने उभा असणारा हा गड काळाच्या पडद्याआड गेला. अव्वल इंग्रजी अंमल याने मुकाट पाहिला.
असा हा अनेक उलथापालथ पाहिलेला लढवय्या मग चला या इतिहासाच्या साक्षीदाराला भेटूया.

मुंबई, ठाणे, पनवेलहून उरणला जाण्यासाठी बसेस आहेत. तसेच आता रेल्वेने ही नेरूळ उरण मार्ग जोडण्यात येत आहे. उरण बस स्थानकात उतरलो की द्रोणागिरी किल्ल्याचा  डोंंगर दिसतो. समुद्रसपाटीपासून याची उंची ९१० फूट आहे. उरण जवळील करंजा टेकडीवर हा किल्ला आहे. 

उरण बसस्थानकाजवळून दिसणारा द्रोणागिरी
बस स्थानकातून बाहेर पडल्यावर डाऊर नगरकडे डोंगर समोर ठेऊन चालत निघालो,की दहा मिनीटात पायथ्याशी असलेल्या झोपड्यांपाशी पोहोचतो, झोपड्यांचा  पायथ्याला विळखा पडलेला दिसतो. आपल्याकडे ऐतिहासिक स्थळांविषयी असणारी उदासीनता इथेही दिसून येते. याच झोपड्यांमधून वाट काढत प्रथम उजवीकडे वळून मग डावीकडे वळालो की वर डोंगरावर जाणारी ठळक वाट दिसते. या वाटेने आपण पाच मिनिटे चालत गेलो की ओ एन जी सी चे कुंपण दिसते. कुंपणापासून पुढे आल्यावर समोर  
गडावर जाणारी वाट


दोन वाटा फुटलेल्या दिसतात यातल्या उजवीकडे जाणाऱ्या वाटेने चालत निघालो, की दहा मिनीटात आपण एका बुरुजासमोर उभे ठाकतो.
गडावरील बुरुज

असा एकटा बुरूज पाहता या बुरूजाला धरून गडाच्या खालच्या बाजूसही तटबंदी असावी असे वाटते येथून खाली नजर फिरवली तर ओ एन जी सी प्लांट आणि पुढे समुद्रकिनारा दिसतो. इथून पुढे आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. समोर एक चौथारा आणि सी आर पी ची चौकी दिसते. ही चौकी किल्ल्यावर कशाला? आहो इथून खाली ओ एन जी सी प्लांट आणि त्याभोवतालच्या परीसरावर लक्ष ठेवतात. गडावर येणाऱ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव  चौकीवर रीतसर आपल्या नावाची नोंद करावी लागते.
गडावरुन दिसणार दृष्य

चौकीच्या समोरून आपण उजवीकडे पाहीले, तर दुरपर्यंत पसरलेला समुद्रकिनारा आणि मुंबापुरीच्या बॅक बे, नरीमन पाँईंट, गेटवे ऑफ इंडिया, घारापुरी या भागाचा नजारा तर डाव्या बाजूला  रेवस मांडवा आणि त्या मागील खांदेरी उंदेरी ही जोडगोळीही नजरेस येते. चौकीच्या बाजूनेच आपण एका तटबंदीपाशी  येतो, त्या तटबंदीत असलेल्या प्रवेशद्वारातून आपला किल्ल्यात प्रवेश होतो.
बालेकिल्ल्याची तटबंदी आणि दरवाजा
खर तर आपला प्रवेशच मुळी बालेकिल्ल्याच्या बाजूने होतो. मुख्य प्रवेशद्वार हे नाही हे ध्यानात येते मुख्य प्रवेशद्वार वर येताना डावीकडे असलेल्या वाटेने वर गेल्यास दिसते.

एन. एस. पेन्हा चर्च
 तर बालेकिल्ल्याच्या बाजूने किल्ल्यात आल्यावर समोर प्रथम दिसते ती एक भग्न चर्चची उत्तराभिमुख वास्तू, या चर्चचे नाव एन. एस. द पेन्हा ते फादर अंतोनो द पोर्तो याने बाधून घेतले होते याव्यतिरिक्त नोसा सेन्होरे, सँम फ्रान्सिस्को ही चर्चेसही त्याने बांधून घेतली होती. या चर्चेस शिवाय फादर जनरल टी जेरोपिनो दा पेक्सावने एन एस दो रोझारिओ व डॉमिनिअन हार्मिटेज ही दोन चर्चेसही बांधून घेतली होती. सध्या मात्र एन एस पेन्हाचेच अवशेष पहायला मिळतात. चर्चचे प्रवेशद्वार बरेच उंच आहे. छत गजपॄष्ठाकार आहे. भिंतीत तीन खिडक्या आणि तीन झरोके आहेत. चर्चच्या उजव्या भिंतीत  एक दरवाजा आहे चर्चच्या बाहेरील दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन कमान असणाऱ्या भिंती आहेत. या चर्चच्या बाजूलाच गागौणी आणि गिजौणी ही पाण्याची टाकी आहेत.

गागौणी आणि गिजौणी पाण्याची टाकी


इतर किल्ल्यावर आढळणाऱ्या पाण्याच्या टाक्यांपेक्षा ही टाकी वेगळी आहेत. टाक्यांवर वीटांनी बाधलेल्या 
कमानी आहेत टाक्यांमधील पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. 

चर्च आणि पाण्याची टाकी एकत्र

चर्चच्या मागील बाजूस बालेकिल्ल्याची तटबंदी आहे, तसेच समोर पडझड झालेली तटबंदी आहे. या तटबंदीच्या बाजूने पुढे एक पायवाट जाते. या वाटेने आपण किल्ल्याच्या मुख्य महादरवाजापाशी पोहोचतो.
महादरवाजा
दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे चौकटीचा काही भाग आणि देवड्या शिल्लक आहेत. दरवाजच्या उजव्या देवडीत दरवाजावर असणाऱ्या गणेशपट्टीतला गणपती ठेवलेला आहे.
महादरवाज्याची ची देवडी आणि देवडीतील गणपतीबाप्पा (कीस्टोन)
खरं तर हा कमानीचा 
किस्टोन आहे. गडावर येणारे लोक यांची पूजा करतात महादरवाज्याचे ढासळलेले दगड खाली वाटेवरच पसरले आहेत. दरवाजा पाहून आल्या वाटेने परत फिरण्याआधी तसेच वर येऊन  डावीकडील पायऱ्यांची वाट पकडून पुढे चालत निघावे. जिथे पायऱ्या संपतात तेथून डावीकडे जाणारी वाट धरून  आपण झाडीतून एका झेंडा लावलेल्या पत्र्याच्या शेडजवळ पोहोचतो. या शेडमध्ये वेताळाची शेंदूर फासलेली दोन अडीच फूट उंचीची शिळा आहे.
वेताळ देव
स्थानीक लोक  या वेताळाची पूजा करतात. या वेताळाला नमस्कार करून याच्या पुढे झाडीतून एक वाट पुढे जाते.


गडावर झाडे झुडपे आणि गवत खूप वाढले आहे, त्यामुळे या वाटेवरून जाताना सावधतेने जावे लागते. थोड्या अंतरावर पाण्याचे एक मोठे जोडटाके लागते.
जोडटाके
यातला पाणीसाठा मात्र पिण्यायोग्य नाही. या टाक्यांपासून वळून डाव्या हाताने, खालच्या बाजूने असेच झाडीतून वाट काढत आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो की एक ठिकाणी मोकळे मातीने भरलेले आणि एक फुटलेले अशी दोन पाण्याची टाकी लागतात.

फुटलेले आणि गाळाने ओहोरलेली दोन  टाकी
इथून झाडीतून तसेच पुढे निघालो की आपण बालेकिल्ल्याच्या उजव्या तटबंदी जवळ पोहोचतो. बालेकिल्ल्याचा भाग झाडोऱ्याने भरलेला आहे. काही चौथारे आहेत. पण आता हे अवशेष पाहून नक्की सांगता येणार नाही की इथे काय आणि कोणत्या इमारती होत्या. अशा प्रकारे गडाचे ज्ञात अवशेष आणि वास्तु पाहून होतात. खरे तर गडावर माजलेल्या झाडोऱ्यामुळे गड पाहताना आणि अवशेष शोधताना फार अडचण होते. काही अवशेष कदाचित अजून ही लपून असतील शोध घेणे आणि गडावरील झाडी झुडपे हटवून गडाचे अवशेष मोकळे करणे गरजेचे आहे. काही संस्था गडसंर्वधनाचे कार्य करत आहेत त्यांना लोकांचा पाठिंबा मिळायला हवा.

 गड फिरायला एक तास पुरेसा होतो. द्रोणागिरी किल्ला तर बळकट होताच, पण सोबतीला उरणचा भुईकोटही त्याचा चिलखत बनला होता. थोडा त्याचाही परामर्श घेऊ. आज उरण गाव असलेल्या ठिकाणी उरणचा कोट पोर्तुगीजांनी बांधला होता. त्याचे प्रमुख प्रवेशद्वार कोटनाक्याजवळ (उरण काळाधोंडा) होते. डुक्करखार भागातही एक दरवाजा होता. या कोटास चार बुरुज होते. हल्लीच्या उर्दु शाळेजवळ तोफेचा बुरुज होता. कोटात शस्त्रागार, दप्तरखाना आणि शिबंदी होती. आज मात्र हा कोट एका भिंतीपुरता शिल्लक आहे. उरण शहराच्या मध्यवर्ती विमला (भीमाळे तलाव- तळे खोदताना भीम राजाचा अशी अक्षरे असलेला दगड सापडला तर यावरून हे नाव) तलाव आहे.
विमला (भीमाळे) तलाव
या तलावाचा १८६०  साली उरणच्या मामलेदारांनी जिर्णोद्धार करून तलावास आताचे रुप दिले. या बांधकामासाठी उरणच्या भुईकोटाचे दगड वापरले होते.

 तर अशी ही उरणच्या द्रोणागिरीची सफर सुफळ संपूर्ण...

संदर्भ:-
१) पोर्तुगीज दप्तर
२) the rise of Bombay a retrospect
3) gazetteer of  the Bombay presidency vol 1  part 2
४) पेशवे दप्तर भाग २२ आणि ३४

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...