सध्याच्या ठाणे शहराच्या खाडीकडील भागात या किल्ल्याची तटबंदी होती. मूळ किल्ला पूर्ण स्वरुपात शिल्ल्क नाही. तथापि आज जिल्हाधिकारी कार्यालयावरुन सरळ पुढे जाणाऱ्या रस्त्यावर जी कारागृहाची इमारत आहे ती मूळ किल्ल्याचा भाग होती.
पेशव्यांच्या काळात मराठ्यांचे सामर्थ्य खूपच वाढले होते व त्यांची सीमा थेट फिरंगाणाला जाऊन भिडली होती. पण पेशवे आणि पोर्तुगीजांमध्ये सतत काही ना काही कुरबुरी व युद्धे चालूच होती. इ.स. 1723 व इ.स. 1730 मध्ये त्यांची मोठी युद्धेही झाली होती. त्यामुळे पोर्तुगीजांनी मराठ्यांची धास्तीच घेतली होती. आज ना उद्या जर मराठ्यांशी युद्धप्रसंग ओढवला तर आपल्या प्रांताची दूरदर्शीपणाने कायमची बळकटी करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी ठाणे येथे किल्ला बांधायचे ठरवले. त्यांना हा किल्ला एवढा मोठा बांधायचा होता की वेळप्रसंग पडल्यास त्यात सर्व पोर्तुगीजांना आश्रय घेता येईल. शिवाय हा किल्ला साष्टीच्या वाटेवरच असल्यामुळे या किल्ल्याच्या सहाय्याने साष्टीच्या वाटाही रोखून धरता येतील.
थोडक्यात या साऱ्या परिस्थितीचा नीट विचार करुन पोर्तुगीजांनी ठाणे येथे युद्धकाळात स्वयंपूर्ण राहून झुंज देऊ शकेल असा भव्य किल्ला बांधण्याचे ठरवले. ठाण्याला लुई बतेलोची गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली त्याचवेळी त्याच्याबरोबर अंद्रे रिबेरो कुतिन्हु हा नामांकित इंजिनिअर किल्ल्याचा आराखडा तयार करण्यासाठी पाठविण्यात आला होता. या इंजिनिअरने सर्व पाहणी करुन प्रथम तीन नकाशे तयार केले व ते गोव्याला व्हॉइसरॉयच्या मान्यतेसाठी पाठवून दिले. व्हॉइसरॉयने त्यातील एक नकाशा पसंत केला; त्यात काही बदल सुचवले व किल्ला बांधण्यास मंजूरी दिली.
आज जी वास्तू ठाण्याचा तुरुंग म्हणून उभी आहे ती किल्ल्याचा थोडासा भाग आहे, संपूर्ण किल्ला नाही. या भागाची बरीच तटबंदी मूळ किल्ल्याची तटबंदी असावी असे मानण्यास जागा असली तरी तटबंदीचा वरचा भाग, म्हणजेच कठडे व त्यात असणारे गोळीबार गवाक्षांसारखे घटक आज नष्ट झालेले आहेत. तटबंदीचा बाह्य पृष्ठभाग उताराचा आहे.
तुरुंगाची कार्यालयीन इमारत खास पोर्तुगीज शैलीतील असून एकेकाळी ती किल्ल्याचा एक भाग होती. आज ही इमारत कारागृहाच्या दर्शनी भागातच आहे. ब्रिटिश काळातच किल्ल्याचा आतील भाग पाडून टाकून त्या ठिकाणी कैद्याच्या बराकी उभारण्यात आल्या होत्या. आज कदाचित त्यात आणखी भर पडली असेल. आज हा किल्ला तुरुंग असल्याने संपूर्ण वास्तूच प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यामुळे या किल्ल्याचा तलविन्यास व इतर तपशील जाणीवपूर्वक देण्यात आलेले नाहीत.
आधीच नमूद केल्याप्रमाणे तटबंदीच्या वरच्या बाजूचे घटक आज शिल्लक नाहीत. मुख्य तटबंदीलाही सिमेंट काँक्रीटचा गिलावा करण्यात आला आहे. आतील वास्तूही ब्रिटिशांच्याच काळात पाडून टाकण्यात आल्या आहेत. म्हणजेच आजच्या किल्ल्यात किल्ल्यातील कोणताही वास्तुघटक मूळ स्वरुपात शिल्लक नाही. पुरातत्व शास्त्राच्या परिभाषेत सांगायचे तर या किल्ल्याचे प्राचीनत्व नष्ट झाले आहे.
साष्टी बेटाच्या उत्तरेस असलेला हा किल्ला तत्कालीन भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता खरोखरीच मोक्याच्या जागी होता. या किल्ल्याला लागून असलेल्या खाडीतून पश्चिमेस वसई मार्गे अरबी समुद्रात तर पूर्वेकडून मुंबई बंदर व पनवेल या ठिकाणी जाता येत असे.
या किल्ल्याचे प्राचीनत्व नष्ट झाले असले तरीही या किल्ल्याचे स्थान, आकार व ढोबळ स्वरुप याचा अंदाज बांधता येईल इतपत अवशेष शिल्लक असल्यामुळे या किल्ल्याचा अंतर्भाव नामशेष झालेल्या किल्ल्यात न करता ‘पाश्चिमात्यांनी बांधलेले किल्ले’ या भागात करण्यात आला आहे.
प्राचीन काळापासून ठाणे हे स्थानकीय पत्तन-बंदर म्हणून प्रसिद्ध होते, हे आपण मागील काही लेखांतून वाचले आहे. ठाण्याच्या खाडीकिनारी प्राचीन काळापासून ठाण्यासह चेंदणी बंदर, महागिरी बंदर, कोलशेत, नागला बंदर, गायमुख बंदर, घोडबंदर इत्यादी
बंदरे अंतरा अंतरावर व्यापारी बंदर म्हणून उदयास आली होती. अरब व्यापाऱ्यांनी या बंदरांच्या सहाय्याने तत्कालीन राज्यकर्त्यांच्या आर्थिक संपन्नतेत मोलाची भर घालून ठाणे भरभराटीला आणले होते.इ. स. १४९८ सालात वास्को ड गामा याचे पहिले पाऊल मलबारवर पडले आणि मग त्याच्या पाठोपाठ अब्बुकर्क याने भारतीय किनारपट्टीवर घट्ट पाय रोवीत अल्पावधीत इ. स. १५१०साली गोव्यात पोर्तुगीजांची सत्ताही स्थापन केली. 'ज्याचा सागर त्याचा किनारा' या न्यायाने दूरवरून आलेल्या-दर्यावर्दी पोर्तुगीजांनी सागरावर विजय मिळवित भारताच्या पूर्व-पश्चिम किनारपट्टीवर अत्याधुनिक बंदुका-तोफांच्या जोरावर कब्जा केला. दरम्यान, हुमायून बादशहाने गुजरातवर चाल केली तेव्हा घाबरून गुजरातच्या शहाने पोर्तुगीजांची मदत घेतली आणि त्या बदल्यात मुंबईच्या सात बेटांसह ठाणे, वसई प्रांत-पोर्तुगीजांना बहाल केला.
इ. स. १५३३-३४च्या सुमारास पोर्तुगीजांची ठाण्यावर सत्ता सुरू झाली, यामुळे प्राचीन काळापासून देशोदेशी चालत आलेला अरब व्यापाऱ्यांचा व्यापार-उदीम बंद पडला, ठाण्याला अवकळा येऊ लागली. संपूर्ण अरब व्यापाऱ्यांना संपविण्याचे पोर्तुगीजांचे धोरण होते, त्या दृष्टीने ठाणे खाडीकिनारी जागोजागी लहानसहान चौकीवजा गढी बांधण्यात आल्या. या गढीनेच सुमारे दोनशे वर्षे पोर्तुगीजांचे ठाण्यावरील राज्य अबाधित राहिले, ही वस्तुस्थिती आहे.
मराठे व पोर्तुगीजांचे संबंध बिघडू लागले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण येथे बांधलेला दुर्गाडी किल्ल्याचा अपवाद वगळता ठाणे खाडी परिसरात पोर्तुगीजांनी बेलापूर, ठाणे, हिराकोट, पारसिक, पिंपळास कोट, कांबे किल्ला, खारबावची गढी, नागला कोट, गायमुख गढी, मालजगढी, घोडबंदर किल्ला, धारावी किल्ला आणि वसई किल्ला असे डझनावरी किल्ले उभे केले. यातील खाडीमार्गे काही किल्ल्यांना भेट दिली असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ठाण्यात केरळच्या धर्तीवर बॅक वॉटर परिभ्रमण प्रकल्प राबविण्यास बराच वाव आहे. सह्याद्रीत उगम पावलेली भातसा व उल्हास नदी आपल्या उपनद्यांबरोबर दर पावसाळ्यात प्रचंड गाळ घेऊन येत असल्यामुळे ठाण्याजवळ अनेक बेटे तयार झाली आहेत. ठाणे खाडीतून कल्याण, भिवंडी, गायमुख, बेलापूर या भागातून फिरताना आपणास ती जागोजागी दिसतात. या बेटांवर खारफुटीचे जंगल, एखादे गांव किंवा उंच टेकडीवर गढी किंवा किल्ला आपल्या नजरेस पडतात. कल्याणचा दुर्गाडी किल्ला आपणास माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी खाडीकिनारी दुर्गाडी किल्ला बांधून स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ येथे रोवली. या दुर्गाडी किल्ल्याच्या पश्चिमेला-अलिमधर, अंजूर, पिंपळास अशी गावे आहेत. येथील पिंपळास गावातील टेकडीवर पोर्तुगीजांनी गढीवजा कोट बंधला. पिंपळास गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या किल्ल्याची माहिती मला अंजूरचे विजय नाईक यांनी तेव्हा दिली होती. चिमाजी अप्पा पेशवे यांच्या वसई स्वारीत अंजूरच्या गंगाजी नाईकांनी मोलाची कामगिरी बजावली होती. त्यांचे विजय नाईक वंशज होत. आज पिंपळास गडाची तटबंदी ढासळली आहे. काही इमारतींचे अवशेष अद्याप इतिहासाची साक्ष देत आहेत.
पूर्वेकडून वाहत आलेली कामवारी नदी भिवंडीला वळसा मारून कांबे किल्ला, भिवंडीचा भुई-कोट व बंदराला आणि पुढे खारबाव किल्ल्याला स्पर्श करत गायमुखसमोर ठाणे खाडीला मिळते. कांबेपासून खारबावपर्यंत कामवारी नदीत गाळ साचल्यामुळे भरतीचे पाणी आता भिवंडी बंदर आणि कांबे किल्ल्यापर्यंत आता येत नाही. परंतु दीडशे वर्षांपूर्वी भिवंडी व कांबे किल्ल्यापर्यंत व्यापारी आणि आरमारी जहाजांची ये-जा होती. २४ एप्रिल १७३० साली मराठ्यांनी कांबे किल्ला जिंकून घेतला. कांबे किल्ल्याच्या पश्चिमेला भिवंडी-वसई रोडवर कामवारी खाडीच्या किनारी खारबाव गाव आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक तुकाराम पोशा चौधरी यांचे हे गाव. खारबाव गावातील एका लहानशा टेकडीवर पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आहे. किल्ल्याची तटबंदी ढासळली असून किल्ल्यात जरीमरीचे देऊळ आहे.
कामवारी खाडीच्या मुखासमोर नागला बंदर आणि त्याच्या मागील डोंगरावर नागला कोट कालपरवापर्यंत उभा होता. पण दगडखाणीतील प्रचंड पैशांमुळे तो सफाचाट करण्यात आला आहे. बाजूला किल्ल्यातील तीन साडेतीन फूट रुंदीच्या उंच भिंतीचा फोटो आहे. आता तेथे काही नाही. बाजूच्या टेकडीवर पोर्तुगीजांचे होपचर्च आहे. त्याची अलीकडेच डागडुजी करण्यात आली आहे. येथून भोवताल न्याहाळावा. एखाद्या चित्रकाराने सुंदर देखावा काढावा तसे हिरवेगार डोंगर. या डोंगरामधून झोकदार वळण घेत जाणारे खाडीचे विशालपात्र आणि त्यातून जाणारे पडाव, रेतीचे ट्रॉलर, गायमुखचा डोंगर आणि त्यावरील किल्ला पाडून मोठा केलेला रस्ता, त्यावरून जाणारी वाहने, रस्त्यालगत खाडीकिनारी ओतले जाणारे रेतीचे प्रचंड ढीग आणि या ढिगाऱ्यातून डोकावणारा गायमुख किल्ल्याचा उरला सुरला एकमेव चौकीवजा बुरूज असा हा अनेक चित्रपटात दाखवला जाणारा, भान हरपून टाकणारा इथला रम्य परिसर आपल्या नकळत कॅमेऱ्यात बंद होतो.
गायमुखजवळ डोंगरदाटीत अरुंद झालेली खाडी पुढे घोडबंदरजवळ रुंद होते. घोडबंदर किल्ला आता सर्वांनाच माहीत झाला आहे. घोडबंदरच्या पुढे ठाणे खाडी विशाल दर्याचे रूप घेते. तिच्या उत्तर किनाऱ्याला वसईचा किल्ला आहे. त्याच्यासमोर दक्षिण किनाऱ्यावर धारावी किल्ला आणि बंदर आहे. अलीकडेच किल्ले वसई मोहिमेचे अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी पोर्तुगीजकालीन धारावी किल्ल्याचे चित्र पाहिल्यावर मूळचा किल्ला बराच मोठा असल्याचे दिसून आले. त्यांनी आपल्या सग्यासोबत्यांना बरोबर घेऊन झाडीत लपलेला दर्याबुरुजाचा शोध घेतला. त्यावर उगवलेल्या झाडावेलींचा गुंतावळा तोडून साफसफाई केल्यावर दर्याबुरूज, ब्रिटिशकालीन कस्टमनिवास, समुद्र ते टेकडीवर जाणारी दुहेरी तटबंदी, पहाऱ्याच्या जागा, मुख्य प्रवेशद्वार आदी इमारतींचे अवशेष नव्याने उजेडात आणले. चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत धारावी किल्ला अतिशय महत्त्वाचा होता. मराठ्यांनी तो प्रथम ताब्यात घेतला आणि वसई किल्ल्याला मदत पुरविणाऱ्या जहाजांची कांडी केल्यावर पोर्तुगीजांना गोव्याकडून मिळणारी रसद बंद झाली. निकराच्या लढाईनंतर अखेर पोर्तुगीजांना वसई कायमची सोडावी लागली. पोर्तुगीजांनी सर्वांत शेवटी ठाण्याचा किल्ला बांधला. पण तो पूर्ण व्हायच्या आतच मराठ्यांनी मार्च २७ ते २९, १७३७ साली तो जिंकून घेतला. ठाणे शहरात आणखी एक किल्ला आहे. त्याचे नाव हिराकोट. ब्रिटिशकाळात डायमंड फोर्ट म्हणून तो प्रसिद्ध होता. ठाण्याचे सुभेदार रामजी बिवलकर यांची कचेरी यात होती. इंग्रजांनी हिराकोटचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केला होता. पण मराठेशाहीत किल्ल्याच्या मागे असलेल्या महागिरी बंदर व चेंदणी बंदरावर येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर नजर ठेवण्याचे, जहाजातून येणाऱ्या मालाची चढउतार, आवक-जावक इत्यादी नोंदणीचे व्यवहार सुभेदारांच्या समोर त्यांच्या कचेरीत चालायचे. ठाणे खाडीचे महत्त्व, त्यावरील प्राचीन बंदरे आणि मध्ययुगीन गढी-कोटांचे राज्य आता संपले आहे, असे म्हणून कसे चालेल. यासाठीच हा इतिहासाचा जागर.

चिमाजी आप्पा यांनी अतुलनीय शौर्याने पोर्तुगीजांच्या ताब्यातील ठाण्याचा किल्ला काबीज केला. भारतीय राज्यकर्त्यांनी पाश्चात्य साम्राज्याकर मिळविलेल्या या इतिहासातल्या पहिल्या विजयाची गाथा.
साडेतीनशे वर्षांची गुलामगिरीची रात्र संपून महाराष्ट्रावर ६ जून १६७४ ला हिंदवी स्वराज्याची पहाट झाली. श्रीशिव छत्रपती झाले. पण ठाण्यात आणि गोव्यात फिरंग्यांचा म्हणजेच पोर्तुगीजांचा जुलमी अंमल सुरूच होता. अखेर अंजूरचे गंगाजी नाईक यांनी १७२१-२२ साली बाजीराव पेशव्यांकडे फिरंग्यांविरुद्ध तक्रार केली, ‘वसई आणि साष्टी प्रांत फिरंग्यांकडे आहे. त्याने देवस्थाने, तीर्थे व महाराष्ट्र धर्माचा लोप केला आहे. हिंदू लोक भ्रष्ट करून त्यांना ‘क्षार’ केले आहे. म्हणून साहेबी मसलत करून प्रांत मजकूर सर करून देवस्थापना व स्वधर्म स्थापना करावी.’
१७३४ साली गंगाजी नाईक व वासुदेव जोशी यांच्या तक्रारीची दखल घेऊन, छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद घेऊन बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी आप्पा पोर्तुगीजांना साष्टीतून हद्दपार करण्यासाठी वसई मोहिमेवर निघाले. मराठ्यांची फौज साष्टी किल्ल्यावर आणण्याचे महत्त्वाचे काम गंगाजी बंधू बुबाजी नाईक यांनी पार पाडले. चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखालील मराठी सैन्य राजमाची, प्रबळगड, खिडकाळी, शिळ मार्गे कळव्यात आले. लढणारी तुकडी साष्टीकडे (ठाण्याकडे) रवाना झाली.
२६ मार्च १७३७ ला कळव्याकडून आलेल्या या तुकडीने जेरोनिमो हा पाणबुरूज काबीज केला. इशारतीच्या तोफा होताच बदलापूर मुक्कामी असलेले चिमाजी आप्पा सैन्यासह कळव्यात आले. आप्पासाहेबांनी स्वतःच्या हातांनी चिखलावर पेंढा पसरवून मराठी सैनिकांना प्रोत्साहन दिले. रातोरात मराठी सैन्य कळव्याची खाडी ओलांडून साष्टीत (ठाण्यात) शिरले. २७ व २८ मार्च रोजी चिमाजी आप्पांनी साष्टीतील सर्व चौक्या पहाऱ्यांचा बंदोबस्त केला. जो जेरोनिमो बुरुज काबीज करून मराठे साष्टीत घुसले त्याचे नामकरण ‘फत्तेबुरुज’ करण्यात आले. अपुरा दारुगोळा आणि शिबंदी यामुळे पोर्तुगीज आपल्या कुटुंबकबिल्यासह गलबतातून वसई आणि उरणकडे पळून गेले. २९ मार्च १७३७ ला ठाण्याच्या किल्ल्यावर मराठ्यांचा जरीपटका डौलाने फडकला. पोर्तुगीज साष्टीतून कायमचे हद्दपार झाले. हिंदुस्थानी उपखंडात प्रस्थापित झालेली परकीय सत्ता समूळ नष्ट झाल्याची घटना इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली. चिमाजी आप्पांच्या ठाणे किल्ला विजयाने वसई मोहिमेच्या विजयाची नांदी झाली. पुढे चिमाजी आप्पांनी वसईवर जरीफटका फडकवून या मोहिमेची इतिश्री केली. पेशव्यांनी अणजूरकर नाईकांना पत्र लिहून त्यांची सरबराई केली.
पोर्तुगीजांनंतर मराठेशाहीचा अस्त झाला. इंग्रजांचे परचक्र आले. त्यांनी ठाण्याच्या किल्ल्याचे जेलमध्ये रूपांतर केले. या जेलमध्ये स्वा. वि. दा. सावरकर, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, दत्ताजी ताम्हाणे यांना इंग्रजांनी बंदिवान केले होते. जुलमी इंग्रज कलेक्टर जॅक्सनचा वध करणाऱ्या क्रांतिकारक हु. अनंत कान्हेरे, हु. कृष्णाजी कर्वे, हु. विनायक देशपांडे यांना फाशी देण्यात आली. असा आहे आमचा ठाणे किल्ला. आज जरी तो ठाण्याचा तुरुंग म्हणून ओळखला जात असला तरी तो आपल्या स्वातंत्र्याचे, आद्यक्रांतिकारकांचे स्मारक आहे. तो मुक्त झाला पाहिजे. ठाण्यात जुलमी राजवटीने भग्न केलेल्या इतिहासाचे अवशेष विखुरलेले आहेत. ते एकत्र करून त्याचे एक भव्य संग्रहालय ठाण्यात उभारण्यासाठी कोकण इतिहास परिषद झटत आहे. सरकारने या कामात त्यांना सहकार्य करावयास हवे. ठाण्याच्या पूर्व भागात मिठबंदर येथे नऊ ते दहा तोफा बेवारस अवस्थेत पडल्या आहेत त्यांचे योग्य जतन व्हायला हवे.
चिमाजी आप्पा यांनी आपल्या अतुलनीय शौर्याने पोर्तुगीजांच्या ताब्यातील ठाण्याचा किल्ला काबीज केला. भारतीय राज्यर्कत्यांनी पाश्चात्य साम्राज्याकर मिळविलेला हा इतिहासातला पहिलाच विजय. मराठी दौलतीसाठी परकीय सत्तेविरुद्ध लढत, त्यांना धडा शिकवून त्यांच्या प्रबळ धार्मिक व राजकीय महत्त्वकांक्षांना मर्यादा घातल्या.
गायमुखजवळ डोंगरदाटीत अरुंद झालेली खाडी पुढे घोडबंदरजवळ रुंद होते. घोडबंदर किल्ला आता सर्वांनाच माहीत झाला आहे. घोडबंदरच्या पुढे ठाणे खाडी विशाल दर्याचे रूप घेते. तिच्या उत्तर किनाऱ्याला वसईचा किल्ला आहे. त्याच्यासमोर दक्षिण किनाऱ्यावर धारावी किल्ला आणि बंदर आहे.
अलीकडेच
किल्ले वसई मोहिमेचे अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी पोर्तुगीजकालीन धारावी
किल्ल्याचे चित्र पाहिल्यावर मूळचा किल्ला बराच मोठा असल्याचे दिसून आले.
त्यांनी आपल्या सग्यासोबत्यांना बरोबर घेऊन झाडीत लपलेला दर्याबुरुजाचा शोध
घेतला. त्यावर उगवलेल्या झाडावेलींचा गुंतावळा तोडून साफसफाई केल्यावर
दर्याबुरूज, ब्रिटिशकालीन कस्टमनिवास, समुद्र ते टेकडीवर जाणारी दुहेरी
तटबंदी, पहाऱ्याच्या जागा, मुख्य प्रवेशद्वार आदी इमारतींचे अवशेष नव्याने
उजेडात आणले. चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत धारावी किल्ला अतिशय
महत्त्वाचा होता. मराठ्यांनी तो प्रथम ताब्यात घेतला आणि वसई किल्ल्याला
मदत पुरविणाऱ्या जहाजांची कांडी केल्यावर पोर्तुगीजांना गोव्याकडून मिळणारी
रसद बंद झाली. निकराच्या लढाईनंतर अखेर पोर्तुगीजांना वसई कायमची सोडावी
लागली. पोर्तुगीजांनी सर्वांत शेवटी ठाण्याचा किल्ला बांधला. पण तो पूर्ण
व्हायच्या आतच मराठ्यांनी मार्च २७ ते २९, १७३७ साली तो जिंकून घेतला. ठाणे
शहरात आणखी एक किल्ला आहे. त्याचे नाव हिराकोट. ब्रिटिशकाळात डायमंड फोर्ट
म्हणून तो प्रसिद्ध होता. ठाण्याचे सुभेदार रामजी बिवलकर यांची कचेरी यात
होती. इंग्रजांनी हिराकोटचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केला होता. पण
मराठेशाहीत किल्ल्याच्या मागे असलेल्या महागिरी बंदर व चेंदणी बंदरावर
येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर नजर ठेवण्याचे, जहाजातून येणाऱ्या मालाची
चढउतार, आवक-जावक इत्यादी नोंदणीचे व्यवहार सुभेदारांच्या समोर त्यांच्या
कचेरीत चालायचे. ठाणे खाडीचे महत्त्व, त्यावरील प्राचीन बंदरे आणि
मध्ययुगीन गढी-कोटांचे राज्य आता संपले आहे, असे म्हणून कसे चालेल. यासाठीच
हा इतिहासाचा जागर.




No comments:
Post a Comment