Sunday, December 13, 2020

ठाण्याचा इतिहास

 

व्यापार आणि पर्यटन हातात हात घालून राज्याच्या तिजोरीत भर घालत तिथल्या विकासात महत्त्वाची भूमिका वटवते याचे ठाणे हे उत्तम उदाहरण आहे. पर्यटकाला आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी नैसर्गिकपणे ठाण्यात उपलब्ध होत्या. त्यांची वर्णने पर्यटकांच्या नोंदवहीतून, पुस्तकातून आज उपलब्ध झाली आहेत. मात्र, आज ठाणे काँक्रीटच्या जंगलात हरवले आहे. त्यातूनच वाट काढत थोडे इतिहासात डोकवूयात.

पश्चिमेला स्थितप्रज्ञ येऊरचा डोंगर, पूर्वेला बाकदार वळसा घालत जाणारी चमचमती ठाण्याची खाडी आणि या दोघांच्यामध्ये निसर्गसुंदर टुमदार ठाणे कधीकाळीच वसलेले आहे. वनसृष्टीचे वदरान लाभलेल्या ठाण्याची ख्याती तेव्हा दूरवर पोहचली होती ती स्थानकीय पत्तन ( ठाणे बंदर) म्हणून, सह्याद्रित उगम पावलेल्या उल्हास नदीने अलगद कवेत घेतलेल्या ठाणे किनाऱ्यावर चेंदणी, महागिरी, कोलशेत, नागला, गायमुख, घोडबंदर इत्यादी प्राचीन बंदरे त्या काळी अस्तित्वात असावीत. ही सर्व स्थानिकीय पत्तन म्हणून ओळखली जात होती. सुमारे दोन अडीच हजार वर्षांपासून येथे व्यापारी जहाजे व परदेशी पर्यटकांची ये-जा होती. अरब, इराण, सिलोन, ब्रह्मदेश, चीन, जपान, सुमात्रा, इजिप्त, ग्रीक, रोम इत्यादी देशातून आलेल्या कित्येक प्रवाशांनी ठाण्याच्या निसर्गसंपन्नतेचे वर्णन करून ठेवले आहे. इथल्या परिसराची बंदरांची चित्रे काढली आहेत. वस्तूंची अदलाबदल, नाण्यांची देवाणघेवाण झाली आहे. या सर्वांतून ठाण्याची राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक आणि आर्थिक संपन्नत्तेची माहिती आपल्याला मिळते.

ठाण्यासह कोकणाच्या ग्रीस, रोम, इजिप्त व कृष्णवर्णीय (अफ्रिका) देशांशी असलेल्या व्यापारी व सांस्कृतिक संबंधांची माहिती स्ट्रेबो (इ. स. २४), हिप्पॅालस (इ. स. ४७) यानेच मोसमी वाऱ्याचा शोध लावला. त्यामुळे समुद्रातून सरळ रेषेत व जलद गतीने भारताचा किनारा गाठणे शक्य झाले. प्लिनी (इ. स ७७) ग्रीक भूगोल तज्ज्ञ टॉलेमी (इ. स. १३५- १५०) याने पेरीप्लस ऑफ युरेशिएन या पुस्तकात केलेल्या वर्णनात सोपारा, कल्याण, ठाणे यांचा उल्लेख आहे. सुलेमान ताजीर ( इ. स. ८५१) अलमसुदी (इ. स. ९५६) रशिदिद्दीन (इ. स. १३००) अल इद्रीसी (सुमारे १३ वे शतक) इब्न बतुता (१३४०) या सर्वांनी कोकण व ठाण्याचे वर्णन केले आहे. यातून काकण-ताना, तलाह असा उल्लेख येतो. इ. स. १३२१ ते १३४१च्या सुमारास जॉर्डनस व फियर ओडोरिक हे ग्रीक ख्रिस्ती प्रसारक ठाण्यात आले होते. त्यात जॉर्डनस म्हणतो ठाण्यात विविधतेने नटलेली वनश्री होती. वेगवेगळ्या प्रकारची झाडे, वृक्ष, वेली यांनी परिसर समृद्ध झालेला होता. उत्तम प्रतीचा साग, बांबा, पळस, शिसव, सावर, ऐन, धावडा हे वनवृक्ष होते. तर, आंबा, जांभूळ, चिंच, फणस, कवळ, पिंपळ यांची भरपूर झाडे होती. ठाण्यात ताड वृक्ष तर जागोजागी होते, खाडी किनारी तिवरे, पानफूटी, ढोण्याची झुडपे गडद हिरवाईने ठाण्याच्या सौंदर्यात भर टाकत होती.

येऊर, उपवन व पारसिक डोंगराच्या परिसरात घट्ट झाडीमुळे पट्टेदार ढाण्या वाघ, बिबटे, तरस, अस्वल, कोल्हे, रानडुकरे, हरणे, भेकर, निलगाय, साळुंद्री इत्यादी वन्यप्राणी गेल्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत भरपूर संख्येने होती. मोर, ससाणे, घारी, घुबडे, वटवाघळे, पोपट, पारवे, खंड्या आदी पक्षांचाही भरणा मोठ्या प्रमाणात होता. सरपटणारे अजगर, नाग, घोणस, धामण इत्यादी सापही मोठ्या प्रमाणात आढळत होते. जॉर्डनने ठाण्याच्या जंगलपट्टीत पट्टेदार वाघ, चित्ते बिबटे यांच्याबरोबर काळेचित्ते असल्याचेही म्हटले आहे. गेंडे, सुसरी, वेगवेगळ्या प्रकारची माकडे, वानर यांचा उल्लेख केला आहे. याचा अर्थ दोन-तीन शतकांपूर्वीच काळेचित्ते, गेंडे, सुसरी ठाण्यातून नष्ट झाले असावेत. जॉर्डनसच्या मते ठाण्याच्या परिसरातील साग उत्तम प्रतीचा व घट्ट पोताचा होता. सागाच्या लाकडावर सोडलेला बाण लाकडाला न वेधता त्यावर आपटून बाजूला जात असे. असेच मत १७८८ मध्ये ठाण्यात आलेला ब्रिटिश प्रवासी होते यांनी मांडले आहे. इ. स. १७८२साली आलेले दोन ब्रिटिश चित्रकार ए. वेंडर हेन आणि विल्यम कारपेंटर यांनी ठाणे किल्ला, बंदर व शहराची वस्तुनिष्ठ चित्र काढली आहेत. पण त्यांच्याही आधी इ. स. १५०२ साली लुडविगो व्हर्देमा, इ. स. १६७३-७५मध्ये आलेला इंग्रज प्रवासी फ्रायर, इ. स. १६९५ला इटालियन गॅमेल्ली करेरी, रशियाचा निकिटीन, फ्रान्सचा अॅन्क्वेटील ड्यू पेरा फोर्वेस इत्यादी प्रवाशांनी ठाण्याच्या वैभवाची वनसृष्टीची तसेच शेती व फळबागांच्या उत्कृष्ट लागवडीची माहिती दिली आहे. इथला कलिंगड अतिशय गोड असल्याचे फ्रेचरने म्हटले आहे. तसेच रात्री हिंस्र जनावरांच्या भीतीमुळे जागता पहारा ठेवणे आवश्यक असे. वाघ, बिबळे, गुरे पळवीत. रात्री वाघांच्या डरकाळ्या, कोल्हेकुई, तरसाचे भेसूर हसणे यामुळे लोक त्रस्त होत असत असे फ्रेचरने म्हटले आहे. ही सर्व माहिती डॉ. दाऊद दळवी यांनी त्यांच्या 'असे घडले ठाणे' या पुस्तकात दिली आहे.

घनदाट वनसृष्टीने बहरलेला चेंबूरचा डोंगर आणि निसर्गरम्य श्री स्थानक ठाण्याला आपल्या कवेत घेणाऱ्या ठाणे खाडीने प्राचीन काळापासून देशोदेशी संवाद साधत ग्रीस, रोम, इजिप्त, इथिओपिया, आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदर व नगरांची व्यापार उदिमाबरोबर सांस्कृतिक देवाणघेवाणही केली. कुतुहलापोटी निरनिराळे देश पाहणारे पर्यटक ठाण्यात येऊ लागले. त्यापैकी स्ट्रेबो, प्लिनी, टोलेमी, मार्कोपोलो इत्यादींनी केलेल्या नोंदीमध्ये सोपारा (ओपारा-ओफीर), कल्याण (कलियन), मुंबईची सात बेटे (हिप्पोक्युरा) आणि ठाणे (हेप्टानेसिया) ही नावे ठाण्याच्या व तिच्या अवतीभोवतीच्या परिसराचे प्राचीनत्व सिद्ध करतात.

एकेकाळी देशोदेशी संवाद साधणाऱ्या ठाणे, राबोडीची आजची स्थिती काय दर्शवते, तर ठाण्यापासून घोडबंदरपर्यंतच्या १६ किमीच्या अंतरात मोठमोठ्या संकुलाच्या रूपाने काँक्रिटची जंगले उभी राहिली आहेत. त्यासाठी खारफुटी तिवरांची सरसकट कत्तल करण्यात आली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात जीवसृष्टी नष्ट झाली आहे. ठाण्यात केरळच्या धर्तीवर बॅकवॉटर परिभ्रमण प्रकल्प राबवावा ही इतिहासप्रेमी नागरिकांची जुनीच मागणी आहे. वसई, ठाणे, कल्याण, भिवंडी, बेलापूर या ५० किमीच्या सागरी प्रवासात अनेक ऐतिहासिक स्थळे, कोट, किल्ले, सागर परिचय केंद्र, गायमुखसारखा नितांत सुंदर किनारा असे ठाणे खाडीचे वैभव जलमार्गाने पाहण्याचा आनंद काही औरच आहे. दुर्गप्रेमी, पक्षीमित्र, इतिहासाचे अभ्यासक, पर्यावरण आणि जीवसृष्टीचे अभ्यासक यांना ठाण्याची खाडी खुणावते आहे. विद्यमान सरकारने आता ठाणे खाडीतून प्रवासी वाहतूक सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. सरकार आणि ठाणेकरांनी मनावर घेतले तर पुन्हा ठाणे खाडीचे नाव देशपातळीवर चमकू लागेल आणि नवी-जुनी जलस्थानके, बंदरे नव्याने उभे राहतील.

ठाण्यातील नाथपंथ आणि किल्ले

…ठाण्यातील बऱ्याचशा गड-किल्ल्यांना पुराण काळात महत्त्व होते. विशेषत: प्राचीन काळात नाथपंथीयांचा प्रभाव दर्शविणारे अजापर्वत, सिद्धगड, मलंगगड, नलदुर्ग, त्रैकुटक उर्फ माहुलीगड, हरिश्चंद्रगड, मच्छिंद्रगड, गोरक्षगड ही सर्व गडांची नावे नवनाथांशी निगडित आहेत. दहाव्या शतकातील मच्छिंद्रनाथ आणि ठाण्यातील शिलाहार राजांचा कालखंड लक्षात घेतला तर या गड-किल्ल्यांना किमान हजार बाराशे वर्षे होऊन गेल्याचे दिसून येते. यातील मुरबाड तालुक्यातून देशावर जाणारा प्राचीन राजमार्ग म्हणून प्रसिद्ध असलेला नाणेघाटापासून जवळच तळकोकणातील गोरक्षगड, त्यावरील सातवाहनकालीन लेणे व त्याच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यावरील शिलालेख पाहता गोरक्षगडाला किमान दोन हजार वर्षे झाली आहेत. ठाण्यातील अशा या पुरातन गडांवर नवनाथांचा आणि गुरू परंपरा पुढे चालविणाऱ्या त्यांच्या शिष्यांचा वावर होता. याचे अनेक पुरावे समाधी, पादचिन्हे आणि शिलालेखांच्या रूपाने उपलब्ध आहेत.

शिलाहार आणि यादवांच्या कारकिर्दीत नाथ संप्रदाय वाढीस लागला. गुरूदत्त संप्रदाय व नाथपंथ हे पुरातन धर्मपंथ आहेत. नाथपंथाची स्थापना आदिनाथ म्हणजे स्वत: शंकर यांनीच केली अशी आख्यायिका आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिले तर ज्ञानेश्वरांच्या आधी साधारण दोनशे वर्षे गोरक्षनाथांनी त्याची स्थापना केली असे दिसते. स्वत: ज्ञानेश्वर नाथपंथी होते. त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ हेच त्यांचे गुरू होते. निवृत्तीनाथांना गहिनीनाथांपासून दीक्षा मिळाली. 'नाथ संप्रदाय उदय विस्तार' यामध्ये नवनाथांची नावे दिली आहेत. नाथ संप्रदायाच्या प्रार्थनेत ही नावे प्रथम घेतली जातात ती अशी : चैतन्य दत्तात्रेयाय नम:, या खालोखाल मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, रेवणनाथ, चर्पटनाथ, नागनाथ, भर्तरिनाथ या नवनाथांपासून गुरू-शिष्यांची परंपरा सुरू झाली. भिक्षांदेही वा संवाद साधण्यासाठी 'अलख निरंजन' या शब्दाने सुरुवात होते. आपले गुरू मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात सुख विलासात अडकून पडले म्हणून त्यांना सोडवायला गोरक्षनाथ स्त्रीवेशात वादकाच्या रूपात गेले. तेथे त्यांनी वाजवलेल्या प्रत्येक वाद्यातून 'चलो मच्छिंदर गोरख आया' या बोलाने मच्छिंद्रनाथ सावध झाले आणि आपल्या शिष्यासोबत स्त्री राज्यातून बाहेर पडले. नाथ संप्रदायाची स्थापना गोरक्षनाथांनी केली. त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ यांनी भारतभर संचार केला. महाराष्ट्रासह भारतात ठिकठिकाणी मठ स्थापन केले. पण ठाण्याशी त्यांचा निकटचा संबंध होता. हे येथील डोंगर, गुहा-घळी, गड-किल्ले यांच्या नावावरूनच दिसून येते. यापैकी एक आहे गोरक्षगड.

मुरबाडजवळ सह्याद्रीच्या ऐन कुशीत गोरख तथा गोरक्षगड आणि मच्छिंद्रगड नावाचे दोन सुळके आहेत. हे स्थान नाथपंथीयांना अतिशय प्रिय आहे. गुरूदेव दत्ताचे एक जागृत स्थान म्हणूनही याची प्रसिद्धी आहे. गोरक्षगडाच्या पायथ्याशी असलेल्या हेरी गावात गोरक्षनाथांची एक कुटी आहे. तेथे सोमनाथ बुवांचे वास्तव्य होते. या कुटीत गोरक्षनाथांच्या संगमरवरी पादुका आहेत. येथून गोरखगड व मच्छिंद्रनाथ सुळक्यांचे विलोभनीय दर्शन होते.

ठाण्याच्या सरहद्दीवरील निसर्गरम्य आणि तितकाच गूढ भासणाऱ्या हरिश्चंद्रगडावर नाथपंथीयांचे वास्तव्य होते. ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई या नाथपंथीय भावंडांना भेटायला चांगदेव महाराज हे वाघावर बसून आल्याची कथा सर्वश्रूत आहे. यावेळी मुक्ताबाईने चांगदेवाला 'कोरा' संबोधून त्याचे गर्वहरण केल्यावर चांगदेव मुक्ताबाईचा शिष्य झाला. या चांगदेवाचे वास्तव्य हरिश्चंद्रगडावर होते. त्याने तेथील केदारेश्वर गुहेतील कमरेइतक्या खोल पाण्यात उभे राहून कठोर तपसाधनेद्वारे 'हठयोग सिद्धी' प्राप्त करून घेतली होती व हरिश्चंद्रगडावर चांगदेवाने 'तत्त्वसार' नावाचा ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथाच्या शेवटी त्याने लिहिले आहे,

हरिश्चंद्र नाम पर्वतु। तेथ महादेओ भक्तु

सुरसिद्धगणी विख्यातु। सेविजे जो।।

हरिश्चंद्र देवता। मंगळ गंगा सरिता

सर्व तीर्थ पुरविता। सप्तस्थान।।

ब्रह्मस्थळें ब्रह्म न संडितु। चंचळवृक्ष अनंतु

लिंगि जगन्नाथु। महादेओ।।

ऐसा सर्वांचा समाओ। कळी संसारू दु:खाचा प्रवाहो

तो देओ मोक्षाचा उत्साओ। शनै: शनै:।।

जो तीर्थासि तीर्थ। केदारेंसि तुकिताति

आणि क्षेत्रिं निर्माती। प्रबंधु हा।।

हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि तेथील लेण्यांवर एकूण आठ शिलालेख आहेत. त्यावरून तेथे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव व संत नामदेव येऊन गेल्याचे दिसते. तसा स्पष्ट उल्लेख पाच क्रमांकाच्या शिलालेखात आहे. येथील सर्व लेखांचे वाचन डॉ. वि. भि. कोलते यांनी केले असून 'महाराष्ट्रातील काही ताम्रपट व शिलालेख' या आपल्या ग्रंथात ते प्रसिद्ध केले आहे. क्रमांक सात आणि आठव्या शिलालेखात नंदनाथ आणि गयनाथ तथा गहिनीनाथ व दखिणनाथ व त्याचा शिष्य सपकनाथ यांचा उल्लेख असून हे तिन्ही लेख हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागील लेण्यांच्या दर्शनी स्तंभावर कोरले आहेत. यावरून हरिश्चंद्रगडावर अनेक नाथ योगी राहत होते व तेथे मच्छिंद्रनाथ-गोरखनाथांपासून सुरू झालेली गुरू-शिष्यांची परंपरा जोपासणारे नाथ संप्रदायाचे गुरूकुल किंवा मुख्य केंद्र असल्याचे सिद्ध होते.

कल्याणच्या मलंगगडावरही नाथ योगी राहत होते. गडावरील काही समाध्या ह्या अद्याप अज्ञात आहेत. खुद्द मलंग बाबाची समाधी, त्याभोवती ठेवलेल्या वस्तू आणि समाधी मंदिरावरील चिन्हे पाहता आणि गडावरील नलराजाची मुलगी त्या सत्पुरुषाची शिष्या झालेली पाहता ही नाथ परंपरेतील गुरू-शिष्याची जोडी असावी. इ. स. १७८० साली कॅप्टन ऑबीन्गटन याने मलंगगड मराठ्यांकडून जिंकला पण फार काळ तो त्याच्या ताब्यात राहिला नाही. इ. स. १७८२ साली पेशव्यांशी झालेल्या तहात इंग्रजांनी मलंगगड परत केला. हा विजय त्या सत्पुरुष मलंग बाबामुळे मिळाला असे समजून पेशव्यांनी त्या समाधीच्या पूजे-अर्चेसाठी व देखरेखीसाठी कल्याणच्या काशिनाथ केतकर या ब्राह्मणाची नेमणूक केली, ती आजतागायत त्या घराण्यात चालू आहे.

गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ यांची समाधी नेमकी कुठे आहे, त्याबद्दल मतभिन्नता आहे. हरिश्चंद्रगड, कुकडेश्वर, भीमाशंकर, कुंडलेश्वर या सह्याद्रीच्या शिखरमाथ्यावरील प्राचीन शिवमंदिरांच्या सान्निध्यात असलेला सिद्धगड ऋषी-मुनींच्या सिद्ध साधकांच्या वास्तव्याने पुनित झाला आहे. हे त्यावरील गुहा-घळी आपल्याला सांगतात, मात्र मुरबाड तालुक्यातील सिद्धगडाच्या बाजूला मच्छिंद्रगड आणि गोरक्षगड नावाचे दोन प्राचीन गड आहेत. त्यापैकी गोरक्षगडाच्या पोटात सातवाहनकालीन गुंफा आहेत. यातील एका गुंफेत सातकर्णी राजा व राणी दोन घोड्यांवर समोरासमोर बसले असून बाजूला कावड घेऊन सेवक उभा आहे. गडाच्या प्रवेशद्वाराच्या पायरीवरील शिलालेखावरून व गुहेतील शिल्पपटावरून या गडाला किमान दोन हजार वर्षे झाली असावीत. गोरक्षनाथांच्या निर्वाणानंतर गोरक्षगडाच्या शिखरमाथ्यावर त्यांचे लहानशे घुमटाकार समाधी मंदिर बांधले असून त्याच्या बाजूला पादुका ठेवण्यात आल्या आहेत. गोरक्षगडाला बिलगून असलेल्या मच्छिंद्रगडावर किल्ल्याचे कोणतेच अलंकार नाहीत पण नवनाथ संप्रदायामुळे नवनाथ या पुराणग्रंथातील आद्य गुरू-शिष्यांची नावे परंपरेने या दोन्ही सुळक्यांना लाभली. शिलाहारकालीन जनमानसात नाथ संप्रदायाचा असलेला प्रभाव व ठाण्यातील या प्राचीन गडावरील नाथ योगींचा वापर पाहता हे नाथांचे गड आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

पुरातत्त्व विभाग आणि लोकसहभाग


इतिहास संशोधन म्हटले की पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्याशी संबंध येतोच. पुरातत्त्व विभाग, मुंबई येथे तंत्रसहाय्यक पदावर असलेले माझे मित्र भालचंद्र कुलकर्णी यांची रत्नागिरीला पोस्टिंग झाल्यावर तिथल्या पत्रकार परिषदेत मुंबईतील एकसार येथील वीरगळ रत्नागिरीला आणण्याचे घोषित केले. एकसारचे हे वीरगळ श्रीस्थानक-ठाण्याचा शिलाहार राजा सोमेश्वर व देवगिरीचा महादेव यादवराजा यांच्यात झालेल्या घनघोर युद्धाचे स्मारक आहे. शिलाहारांचा हा एकमेव स्मृतीस्तंभ तेथेच असणे योग्य आहे, असे ठाण्याच्या इतिहासाच्या अभ्यासकांना वाटत होते. ठाण्याच्या अस्मितेचा हा प्रश्न असल्याने कोकण इतिहास परिषदेमार्फत निषेध नोंदवून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले व त्याची एक एक प्रत, सांस्कृतिक खाते, ठाणे जिल्हाधिकारी, आयुक्त व लोकप्रतिनिधींना पाठविली. त्याच्या पुढच्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांचे पत्र आले. त्यात त्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले. आज वीरगळ आहेत त्याच जागी म्हणजे एकसार, बोरीवली येथे आहेत. भालचंद्र कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली, पण मनात कटुता ठेवली नाही. पुरातत्त्व विभाग आणि लोकसहभाग यांच्यातील दरी जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत ठिकठिकाणी विखुरलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन संवर्धन होणे कठीण आहे.

सन १९९७मध्ये भिवंडी तालुक्यातील लोणाड येथील प्राचीन मंदिर पाहायला गेलो. लोणाड येथील टेकडीवर पाचव्या-सहाव्या शतकातील कोकण मौर्याच्या काळातील लेणी आहेत. लोणाड येथील मंदिराला लोणादित्य असेही म्हटले जाते, ती या मंदिराची रचना रथाकार असल्यामुळे. पण या मंदिरात सूर्यमूर्ती वा तत्सम कोणतेही लक्षण दर्शविणारी शिल्पे नाहीत. मंदिराच्या अंतराळ भागातील खोल गाभाऱ्यात शिवलिंग आहे. गर्भगृहावरील छत सोडल्यास मंदिराची फार वाताहत झाली आहे. मंदिराचे शिल्पांकित दगड सगळीकडे विखुरले आहेत. यात गणेश, लक्ष्मी, लज्जागौरी, मैथुन शिल्पे आणि काही भंग झालेल्या मूर्ती आहेत. इ. स. ९९७ (शके ९१९) आषाढ वद्य ४, श्रीस्थानक येथील शिलाहार राजा अपरादित्य याने भिवंडीजवळील या मंदिराला देवाच्या पूजेसाठी 'दक्षिणायन दान' म्हणून भादाणे गाव इनाम दिले, अशा आशयाचा अपरादित्य राजाचा प्रधान मंगलय्या याचा पुत्र अन्नपय्या याने कोरलेला ताम्रपट सापडला आहे. याचा अर्थ लोणाडचे शिवमंदिर सुप्रसिद्ध अंबरनाथ देवालयाच्या पाऊणशे वर्षे आधी बांधण्यात आले आहे. शिवाय शक संवत ११०६ (इ. स. ११८४)चा द्वितीय अपरादित्याचा शिलालेखही सापडला असून तो मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये ठेवण्यात आला आहे. शिवमंदिराच्या उजव्या बाजूला सूचनाफलक लावला होता. 'सुरक्षित वास्तू - ही प्राचीन वास्तू १९५८च्या २४व्या प्राचीन वास्तू आणि पुरातत्त्वीय स्थळे व अवशेष कायद्यान्वये राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून जाहीर करण्यात आले आहे. जी व्यक्ती या वास्तूचा नाश, स्थलांतर आणि स्वरूप बदल, खराबी वा दुरुपयोग करेल वा हिला धोक्यात आणेल ती व्यक्ती तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा ५०००/- रु. दंड अथवा दोन्हीही शिक्षेस पात्र राहील.' (आता २०१० पासून एक लाख रुपये व २ वर्षे शिक्षा असा बदल करण्यात आला आहे). आता इथला सूचनाफलक काही वर्षांपूर्वी काढून त्या जागेवर इमारत बांधण्यात आली आहे. इथल्या मंदिरावशेषांना पाय फुटले असून गावातीलच घरांच्या जोत्यांना मंदिराचे दगड वापरण्यात आले आहेत. बोर्ड लावल्यानंतर पुरातत्त्व खात्याची माणसे इकडे फिरकली नसावीत.

आज तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. ऐतिहासिक वास्तू, मंदिरे जशीच्या तशी उभी करण्याची क्षमता स्थापत्य विशारद यांच्याकडे आहे. पण राजकारणातील गैरकारभारामुळे चांगल्या कामाचा फज्जा उडतो आहे. पुरातत्त्व विभाग, लोकांचा सहभाग आणि सरकार यांनी मनावर घेतले तर बऱ्याचशा ऐतिहासिक वास्तू, वस्तू वाचविता येतात, जतन संवर्धन करता येते, असा प्रसंग नुकताच ठाण्यात घडला आहे. लोणाड गावापासून एक किमी अंतरावर चौधरपाडा गाव आहे. येथील बाबू वाकडे यांच्या शेतात कित्येक वर्षांपासून एक शिलालेख पडला होता. त्यावर शक संवत ११६१ विकारी संवत्सर, माघ कृष्ण चतुर्दशी शिवरात्री म्हणजे इंग्रजी तारीख २४ जानेवारी १२४० श्रीकेशीदेव दुसरा (अपरार्कराज याचा पुत्र) याचे सोमेश्वर (रामेश्वर) मंदिर व लवणे तटातील लोणादित्य मंदिरासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती आहे. ही शिला १ फूट जाड, १ फूट ५ इंच रुंद व ६ फूट उंच असून शिलालेखात वरच्या बाजूला मध्यभागी मंगलकलश व त्याच्या दोन बाजूस चंद्र-सूर्य असे चित्र कोरले असून त्याखाली देवनागिरी संस्कृतमध्ये २२ ओळी आहेत व सर्वांत खाली मैथुन शिल्प (गर्दभ शापवाणी) कोरले आहे. या शिलालेखातील वरच्या काही ओळी शिलाहार राजांची वंशावळ आहे. त्यानंतर ब्रह्मपुरी (चौधरपाडा) येथील बोपग्राम अंतर्गत मांजसपल्ली हे गाव सोमेश्वराची पूजा-अर्चा करणारे ब्राह्मण कुटुंब सोमनायक, सूर्यनायक, गोविंदनायक आणि नवनायक यांना दान दिले अशी नोंद असून त्यापुढे केशीदेवाचे मंत्री महामात्य झांपडप्रभू, राजदेव पंडित आणि खजिनदार अनंत प्रभू यांची नावे कोरली आहेत. यासंबंधी बॉम्बे गॅझिटियर खंड १मध्ये पंडित इंद्रजी यांनी लेख प्रसिद्ध केला आहे. हा शिलालेख म्हणजे राजाज्ञा होती. या आज्ञेचा अथवा नियमांचा भंग करणाऱ्यांसाठी गर्दभ शापवाणी (स्त्री आणि गाढव मैथुन शिल्प)चा धाक घालण्यात आला आहे. याचा नेमका अर्थ स्थानिक ग्रामस्थांना माहीत नसल्यामुळे या शिळेला स्पर्श झाल्यास गावावर संकट येईल, अशी त्यांना भीती वाटत होती. बाबू वाकडे यांच्या शेतात पडलेल्या शिलालेखाचे भाषांतर ठाण्याचे प्राच्यविद्या अभ्यासक व कोकण इतिहास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दाऊद दळवी यांनी 'असे घडले ठाणे' या त्यांच्या पुस्तकात प्रसिद्ध केले होते. सातशे- आठशे वर्षे ऊन, वारा, पाऊस झेलीत शेतात पडलेली, महसुलासंबंधी ऐतिहासिक महत्त्व असलेली शिळा सुरक्षित स्थळी हलवावी, असे डॉ. दळवी यांनी सुचवताच गावावर कोप होईल म्हणून गावकऱ्यांनी विरोध केला. गावकऱ्यांचे प्रबोधन करणे आवश्यक होते. दरम्यान काही वर्षे गेली. एका व्यासपीठावर जिल्हाधिकारी जऱ्हाडसाहेब आणि डॉ. दळवी एकत्र आल्यावर शिलालेखाबाबत दोघांत चर्चा झाली आणि राज्य सरकारच्या अखत्यारित चौधरपाड्यातील शिलालेख जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

२९ जून २०१२ला जिल्हाधिकारी साहेबांना पत्र लिहिले. पुरातत्त्व विभागाशी चर्चा झाली. १७ जुलै २०१२ला विलास वाहणे, तांत्रिक सहाय्यक, पुरातत्त्व विभाग, मुंबई आणि पुरातत्त्व विभागाचा कॅमेरामन-छायाचित्रकार पासलकर, भिवंडीचे तहसीलदार दौडकर, पोलिस निरीक्षक, पडघा पोलिस ठाण्याचे मंडळ अधिकारी, भिवंडीचे तलाठी, लोणाडचे सरपंच, पोलिस पाटील आणि ग्रामस्थ व मी स्वत: बाबू वाकडेच्या शेतात जाऊन शिलालेखाची पाहणी केली. मी आणि पासलकरांनी त्याची छायाचित्रे काढली, मग बाबू वाकडे यांच्या घरातच सभा घेऊन या शिलालेखाचे जतन संवर्धन करणे आवश्यक असून ते योग्य जागी हलविली जाईल, या संबंधीची ग्रामस्थांना माहिती दिली आणि पंचनाम्यावर सर्वांच्या सह्या घेण्यात आल्या. आणि अचानक १ ऑगस्ट २०१२ ला जिल्हाधिकारी साहेबांची बदली झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील भिंतीलगत जिथे शिलालेख उभारायचा होता, तिथे पाया खोदण्यात आला होता. दक्षिण प्रांतातून आलेल्या नवीन जिल्हाधिकाऱ्यांना ठाण्याच्या इतिहासाशी काही देणे घेणे नव्हते. त्यामुळे शिलालेखाची स्थापना रखडली. दरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. चौधरपाड्यातील ग्रामस्थ आता जागृत झाले होते. बाबू वाकडे यांच्या घराण्यातील कृष्णा वाकडे हे भिवंडी तहसील कार्यालयात लिपीक आहेत. त्यांनी ग्रुप ग्राम पंचायत आणि वारकरी संप्रदाय यांच्या पुढाकाराने महाशिवरात्रीला २०१४ रोजी रामेश्वर मंदिराजवळ शिलालेखाची साग्रसंगीत पूजा करून लोकांना दिसेल असा लोखंडी जाळीआड सुरक्षित आणून ठेवला आहे. मागे मार्बलवर डॉ. दाऊद दळवी यांनी भाषांतर केलेला लेख असून ग्रामस्थ, पर्यटक आणि इतिहास अभ्यासक यांना माहिती मिळण्याची सोय झाली आहे. असे गावागावांतील ग्रामस्थांनी मनावर घेतले तर स्थानिक इतिहासाला बळकटी येईल. आपल्या अवतीभोवती असलेल्या ऐतिहासिक वास्तू, मंदिर, मूर्तीशिल्पांचे जतन संवर्धन करण्याचा आदर्श चौधरपाडा ग्रामस्थांनी समोर ठेवला आहे. त्याचे कौतुक व्हायला हवे.

ठाण्यातील बंदरे आणि किल्ले

प्राचीन काळापासून ठाणे हे स्थानकीय पत्तन-बंदर म्हणून प्रसिद्ध होते, हे आपण मागील काही लेखांतून वाचले आहे. ठाण्याच्या खाडीकिनारी प्राचीन काळापासून ठाण्यासह चेंदणी बंदर, महागिरी बंदर, कोलशेत, नागला बंदर, गायमुख बंदर, घोडबंदर इत्यादी बंदरे अंतरा अंतरावर व्यापारी बंदर म्हणून उदयास आली होती. अरब व्यापाऱ्यांनी या बंदरांच्या सहाय्याने तत्कालीन राज्यकर्त्यांच्या आर्थिक संपन्नतेत मोलाची भर घालून ठाणे भरभराटीला आणले होते.
    इ. स. १४९८ सालात वास्को ड गामा याचे पहिले पाऊल मलबारवर पडले आणि मग त्याच्या पाठोपाठ अब्बुकर्क याने भारतीय किनारपट्टीवर घट्ट पाय रोवीत अल्पावधीत इ. स. १५१०साली गोव्यात पोर्तुगीजांची सत्ताही स्थापन केली. 'ज्याचा सागर त्याचा किनारा' या न्यायाने दूरवरून आलेल्या-दर्यावर्दी पोर्तुगीजांनी सागरावर विजय मिळवित भारताच्या पूर्व-पश्चिम किनारपट्टीवर अत्याधुनिक बंदुका-तोफांच्या जोरावर कब्जा केला. दरम्यान, हुमायून बादशहाने गुजरातवर चाल केली तेव्हा घाबरून गुजरातच्या शहाने पोर्तुगीजांची मदत घेतली आणि त्या बदल्यात मुंबईच्या सात बेटांसह ठाणे, वसई प्रांत-पोर्तुगीजांना बहाल केला.
     इ. स. १५३३-३४च्या सुमारास पोर्तुगीजांची ठाण्यावर सत्ता सुरू झाली, यामुळे प्राचीन काळापासून देशोदेशी चालत आलेला अरब व्यापाऱ्यांचा व्यापार-उदीम बंद पडला, ठाण्याला अवकळा येऊ लागली. संपूर्ण अरब व्यापाऱ्यांना संपविण्याचे पोर्तुगीजांचे धोरण होते, त्या दृष्टीने ठाणे खाडीकिनारी जागोजागी लहानसहान चौकीवजा गढी बांधण्यात आल्या. या गढीनेच सुमारे दोनशे वर्षे पोर्तुगीजांचे ठाण्यावरील राज्य अबाधित राहिले, ही वस्तुस्थिती आहे.
    मराठे व पोर्तुगीजांचे संबंध बिघडू लागले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण येथे बांधलेला दुर्गाडी किल्ल्याचा अपवाद वगळता ठाणे खाडी परिसरात पोर्तुगीजांनी बेलापूर, ठाणे, हिराकोट, पारसिक, पिंपळास कोट, कांबे किल्ला, खारबावची गढी, नागला कोट, गायमुख गढी, मालजगढी, घोडबंदर किल्ला, धारावी किल्ला आणि वसई किल्ला असे डझनावरी किल्ले उभे केले. यातील खाडीमार्गे काही किल्ल्यांना भेट दिली असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ठाण्यात केरळच्या धर्तीवर बॅक वॉटर परिभ्रमण प्रकल्प राबविण्यास बराच वाव आहे. सह्याद्रीत उगम पावलेली भातसा व उल्हास नदी आपल्या उपनद्यांबरोबर दर पावसाळ्यात प्रचंड गाळ घेऊन येत असल्यामुळे ठाण्याजवळ अनेक बेटे तयार झाली आहेत. ठाणे खाडीतून कल्याण, भिवंडी, गायमुख, बेलापूर या भागातून फिरताना आपणास ती जागोजागी दिसतात. या बेटांवर खारफुटीचे जंगल, एखादे गांव किंवा उंच टेकडीवर गढी किंवा किल्ला आपल्या नजरेस पडतात. कल्याणचा दुर्गाडी किल्ला आपणास माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी खाडीकिनारी दुर्गाडी किल्ला बांधून स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ येथे रोवली. या दुर्गाडी किल्ल्याच्या पश्चिमेला-अलिमधर, अंजूर, पिंपळास अशी गावे आहेत. येथील पिंपळास गावातील टेकडीवर पोर्तुगीजांनी गढीवजा कोट बंधला. पिंपळास गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या किल्ल्याची माहिती मला अंजूरचे विजय नाईक यांनी तेव्हा दिली होती. चिमाजी अप्पा पेशवे यांच्या वसई स्वारीत अंजूरच्या गंगाजी नाईकांनी मोलाची कामगिरी बजावली होती. त्यांचे विजय नाईक वंशज होत. आज पिंपळास गडाची तटबंदी ढासळली आहे. काही इमारतींचे अवशेष अद्याप इतिहासाची साक्ष देत आहेत.
    पूर्वेकडून वाहत आलेली कामवारी नदी भिवंडीला वळसा मारून कांबे किल्ला, भिवंडीचा भुई-कोट व बंदराला आणि पुढे खारबाव किल्ल्याला स्पर्श करत गायमुखसमोर ठाणे खाडीला मिळते. कांबेपासून खारबावपर्यंत कामवारी नदीत गाळ साचल्यामुळे भरतीचे पाणी आता भिवंडी बंदर आणि कांबे किल्ल्यापर्यंत आता येत नाही. परंतु दीडशे वर्षांपूर्वी भिवंडी व कांबे किल्ल्यापर्यंत व्यापारी आणि आरमारी जहाजांची ये-जा होती. २४ एप्रिल १७३० साली मराठ्यांनी कांबे किल्ला जिंकून घेतला. कांबे किल्ल्याच्या पश्चिमेला भिवंडी-वसई रोडवर कामवारी खाडीच्या किनारी खारबाव गाव आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक तुकाराम पोशा चौधरी यांचे हे गाव. खारबाव गावातील एका लहानशा टेकडीवर पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आहे. किल्ल्याची तटबंदी ढासळली असून किल्ल्यात जरीमरीचे देऊळ आहे.
    कामवारी खाडीच्या मुखासमोर नागला बंदर आणि त्याच्या मागील डोंगरावर नागला कोट कालपरवापर्यंत उभा होता. पण दगडखाणीतील प्रचंड पैशांमुळे तो सफाचाट करण्यात आला आहे. बाजूला किल्ल्यातील तीन साडेतीन फूट रुंदीच्या उंच भिंतीचा फोटो आहे. आता तेथे काही नाही. बाजूच्या टेकडीवर पोर्तुगीजांचे होपचर्च आहे. त्याची अलीकडेच डागडुजी करण्यात आली आहे. येथून भोवताल न्याहाळावा. एखाद्या चित्रकाराने सुंदर देखावा काढावा तसे हिरवेगार डोंगर. या डोंगरामधून झोकदार वळण घेत जाणारे खाडीचे विशालपात्र आणि त्यातून जाणारे पडाव, रेतीचे ट्रॉलर, गायमुखचा डोंगर आणि त्यावरील किल्ला पाडून मोठा केलेला रस्ता, त्यावरून जाणारी वाहने, रस्त्यालगत खाडीकिनारी ओतले जाणारे रेतीचे प्रचंड ढीग आणि या ढिगाऱ्यातून डोकावणारा गायमुख किल्ल्याचा उरला सुरला एकमेव चौकीवजा बुरूज असा हा अनेक चित्रपटात दाखवला जाणारा, भान हरपून टाकणारा इथला रम्य परिसर आपल्या नकळत कॅमेऱ्यात बंद होतो.

गायमुखजवळ डोंगरदाटीत अरुंद झालेली खाडी पुढे घोडबंदरजवळ रुंद होते. घोडबंदर किल्ला आता सर्वांनाच माहीत झाला आहे. घोडबंदरच्या पुढे ठाणे खाडी विशाल दर्याचे रूप घेते. तिच्या उत्तर किनाऱ्याला वसईचा किल्ला आहे. त्याच्यासमोर दक्षिण किनाऱ्यावर धारावी किल्ला आणि बंदर आहे. अलीकडेच किल्ले वसई मोहिमेचे अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी पोर्तुगीजकालीन धारावी किल्ल्याचे चित्र पाहिल्यावर मूळचा किल्ला बराच मोठा असल्याचे दिसून आले. त्यांनी आपल्या सग्यासोबत्यांना बरोबर घेऊन झाडीत लपलेला दर्याबुरुजाचा शोध घेतला. त्यावर उगवलेल्या झाडावेलींचा गुंतावळा तोडून साफसफाई केल्यावर दर्याबुरूज, ब्रिटिशकालीन कस्टमनिवास, समुद्र ते टेकडीवर जाणारी दुहेरी तटबंदी, पहाऱ्याच्या जागा, मुख्य प्रवेशद्वार आदी इमारतींचे अवशेष नव्याने उजेडात आणले. चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत धारावी किल्ला अतिशय महत्त्वाचा होता. मराठ्यांनी तो प्रथम ताब्यात घेतला आणि वसई किल्ल्याला मदत पुरविणाऱ्या जहाजांची कांडी केल्यावर पोर्तुगीजांना गोव्याकडून मिळणारी रसद बंद झाली. निकराच्या लढाईनंतर अखेर पोर्तुगीजांना वसई कायमची सोडावी लागली. पोर्तुगीजांनी सर्वांत शेवटी ठाण्याचा किल्ला बांधला. पण तो पूर्ण व्हायच्या आतच मराठ्यांनी मार्च २७ ते २९, १७३७ साली तो जिंकून घेतला. ठाणे शहरात आणखी एक किल्ला आहे. त्याचे नाव हिराकोट. ब्रिटिशकाळात डायमंड फोर्ट म्हणून तो प्रसिद्ध होता. ठाण्याचे सुभेदार रामजी बिवलकर यांची कचेरी यात होती. इंग्रजांनी हिराकोटचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केला होता. पण मराठेशाहीत किल्ल्याच्या मागे असलेल्या महागिरी बंदर व चेंदणी बंदरावर येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर नजर ठेवण्याचे, जहाजातून येणाऱ्या मालाची चढउतार, आवक-जावक इत्यादी नोंदणीचे व्यवहार सुभेदारांच्या समोर त्यांच्या कचेरीत चालायचे. ठाणे खाडीचे महत्त्व, त्यावरील प्राचीन बंदरे आणि मध्ययुगीन गढी-कोटांचे राज्य आता संपले आहे, असे म्हणून कसे चालेल. यासाठीच हा इतिहासाचा जागर.  

साष्ठीची बखर : सारांशलेखन

आजच्या धावपळीच्या जीवनात जून्या बखरी मिळवणे, त्या वाचणे, त्यातील वेगळी वाक्यरचना, शब्द समजुन घेत कालक्रमाने बखरीचा घटनाक्रम समजुन घेणे इतके सामान्याला जमणे कठीण. अशाने हा अमूल्य ठेवा लोप पावत जातो. म्हणून बखरीबद्दल उत्सुकता वाढावी, ज्यांना इच्छा असुनही वरील काही कारणांमुळे बखर वाचन होत नाही त्यांच्यासाठी हा सारांश रुपी लेख लिहीतोय. साष्ठीच्या बखरीत ब-याच ठिकाणांचा उल्लेख आहे जी आजही आहेत. सारांश लेख वाचून इतिहासाबद्दल आत्मियता, उत्सुकता वाढून पुर्ण बखर, इतर जुने साहित्य वाचनाची प्रेरणा मिळावी ही इच्छा!! इतिहास अभ्यासक मित्रपरिवाराने अभिप्राय/लेखातील त्रुटी मला कळवून सुधारण्याची संधी द्यावी.

साष्ठी म्हणजे ठाणे. शके १६६४ (इ.स. १७४२) मध्ये लिहील्या गेलेल्या या साष्ठीच्या बखरीचा लेखक अज्ञात आहे. कै. महादेव गोविंद रानडे याच्याकडून मिळालेली बखरीची देवनागरीतील हस्तलिखीत नकल इ.स. १७७२ मध्ये “बखर काव्येतिहास संग्रह ७” मध्ये प्रसिध्द झाली. मूळ प्रत श्री. सरनाईक इनामदार अंजूर तालुका भिवंडी यांच्याकडे आहे असे प्रसिध्द करताना तळटिपेत म्हटले आहे. बखरीत इ.स.१७८२ च्या तहाचा उल्लेख असल्याने वाढीव भाग मूळ बखरीत नंतर वाढवला आहे असे मत पडते.

साष्ठीची बखर म्हणजे ठाण्याची बखर : सारांशलेखन

ठाण्यात साधारण संभाजीराजांच्या उत्तरार्धात फिरंग्यांनी धर्मांतराचा उद्योग सुरु केला. बखरीत या जुलुमी धर्मांतराचे वर्णन दिले आहे. उदाहरण म्हणून त्या वर्णनातील हा भाग पहा “मुलखांत एखादे गावी शेंदरासा सुपारीएवढा धोंडा सापडला म्हणजे तो गांव नेऊ धरुंन बाटवावा”. अशा प्रकारच्या उच्छादाला कंटाळून वांद्रे गावचे सोळोंकी नावाचे गृहस्थ कळव्यास राहण्यास आले. त्यांनी संभाजीराजांकडे या प्रकरणाची तक्रार केली. पण स्वराज्याचा तो धामधुमीचा काळ होता. त्यात संभाजीराजांचे वीरमरण, पुढे राजाराम, शाहु अशी सत्तांतरे झाली. यात या तक्रारीचे काय झाले याबाबत बखरकाराने मौन बाळगले आहे. पुढे बाजीरावांच्या काळात बखर जाते.

कुलाब्याचे कान्होजी आंग्रे व गंगाजी नाईक यातील बेबनावाचा उल्लेख आहे. त्यासमयी शाहु महाराजांच्या आज्ञेने बाजीराव पेशवे कल्याण मोहीमेसाठी इकडे आले. बाजीरावांचे सैन्य असताना आपण मुलुखात शिरणे योग्य नाही हा विचार करुन गंगाजींनी ठाण्याची धर्मांतराची तक्रार बाजीरावांना रामचंद्रपंत महादेव यांकरवी कळवली.

मग मोहीम ठरली. त्याचे वर्णन आहे पण मोहीम कोणाच्या अंर्तगत आखली गेली याचा उल्लेख नाही. राऊत कळवेकरांनी फौज कळवा ते ठाणे, नारायणजी सुतारांनी दादरच्या खाडीतुन वसई किल्ल्यात व लाडकोजी हैबतरावांनी धारावीत नेण्याचे ठरले. नामाजी देसाई व बेंडजी देसाई यांनी वांद्रे, वेसावे कबुल केले.

रामचंद्रपंत व गंगाजी नाईक यांची भेट कल्याणला झाली. तेथुन गंगाजी १०० मनुष्य घेऊन मरोळची माडी जिंकायला गेले. ही बातमी फिरंग्याला फूटली. आणि त्यांनी घोडबंदरापासुन ते ठाण्याच्या बंदराच्या पाणबुरुजापर्यंत तारवांचा वेढा टाकला. त्या वेढ्यात गंगाजी नाईक सापडला. आणि त्यांना मदत करायला आलेल्या बाबाजी हिंदुराव व जिवाजीराव भाले यांची मिळून २०० माणसे फिरंग्यांनी धरली. त्यातली बराचश्या माणसांना दंड देऊन सोडविले. तर काहींना गोव्याला नेऊन मारले.

या प्रकारानंतर गंगाजी आणि बाजीराव यांत साष्ठीबद्दलची (ठाणे) मलसत काही ना काही कारणांनी होऊ शकली नाही. यासाठी बखरकार पुढील कारणक्रम देतो : अनामतखानाची दिल्लीवरुन आलेली स्वारी, बाजीराव-किलीजखान युध्दासाठी एका बाजुस, त्यांची अनामतखानावर फत्ते, जुन्नरला गंगाजी-बाजीराव मनसुब्याच्या तयारीत, पिलाजी जाधवरावांनी या मनसुब्याला घातलेला मोडता, बाजीराव-किलीजखान अनबन, पुढे ६ महीने बाजीराव-मोगल भांडण, रामचंद्रपंतांचे निवर्तन.

रामचंद्रपंतांनंतेर कल्याणचे अमलदार भाऊ कृष्णराव यांनी फिरंग्यांशी स्नेहाचे संबंध ठेवले. फिरंग्यांनी आपले खरे रुप दाखवत आखाडात कल्याण लुटले. यावेळी भाऊ कृष्णराव व गंगाजींनी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरुन फिरंग्यांस नामोहरम करत त्याला खाडीतुन कल्याणाबाहेर हाकलले.

यापुढे २ वर्षांनी फिरंग्याला कल्याण हवे झाले त्यावरुन कांबेखाडीत झालेल्या लढाईत गंगाजीं व पिलाजी जाधवराव (बाजीरावांच्या वतीने) यांनी फिरंग्याला हरवले. तेथुन पुढे ते थेट साष्ठी जिकांयला निघाले. कळवा व पुढे ४ दिवसांत मांडवी जिकंले. जिवधन, टकमक, तांदुळवाडी, कामनदुर्ग वसविले. तेव्हा गंगाजींच्या साष्ठीतील २२ असामी फिरंग्याने पकडले. त्यांच्यासाठी फिरंग्याशी तह झाला व तुर्तास सारे शांत झाले.

नंतर कल्याणचे अमलदार म्हणून वासुदेव जोशी आले. बाजीरावांची चिमाजी आप्पांसोबत मोठ्या सरदारांची मसलत बसली. त्यात बाजीरावांच्या पुण्याच्या लोकांना गंगाजीं काय काय दाखवणार व मोहीम कशी कशी पुढे सरकणार हे ठरले. याची इत्यंभूत माहीती बखरकाराने लिहीली आहे. त्याचवेळी फिरंग्यांच्या पाद्र्यानी इकडे ठरवले की ठाण्याचा कोटाचे काम लवकर संपवू. एकदा कोट झाला की धर्मांतराचा वरवंटा परत फिरवू. यावरुन दिसुन येते की तहामुळे या मधल्या काळात धर्मांतरे थांबली असावीत.

फिरंगी ठाणे कोटाच्या कामात गुंतला. चिमाजी आप्पा सातारा तर बाजीराव हिंदुस्थानात गेले होते. सालाभरात श्रावणात गंगाजीने पुन्हा ठाण्याचा विषय पुण्यात काढला आणि अखेर मसलतीचा दिवस ठरला. चैत्र शुध्द ६ उपरांत ७. शंकराजीपंत सरदार, खंडोजी मानकर, होनाजी बाळ कवडे, कृष्णाजी नाईक, शिवाजीनायक अवघे फौजेनिशी सज्ज झाले. राजमाची, मलंग वाडी (मलंगगड?), तुंगारचे रान (तुगांरेश्वर?) अशी सारी फौज तैनात झाली. लढाईला तोंड फुटले. बुरुजक-यांना नशा देऊन ठाण्याचा पाणबुरुज घेतला. फौज माजिवाड्यातुन पुढे ठाण्यात पसरली. यावेळी आप्पासाहेबांनी बदलापूर मुक्कामी ठाण्याच्या तोफा ऐकल्या. ते तडक रात्रीच निघाले. पहाटे कळव्यास पोहचले आणि तेथे वाटेतच त्यांना पाणबुरुजाची बातमी मिळाली. त्यानी पाणबुरुजाचे नाव ‘फत्ते-बुरुज’ ठेवले. शके १६५९ पिंगलनामसंवत्सरे, माहे चैत्र शुध्द ७, रविवार दिवसी साष्ठीत लष्कराची वस्ती पडली. पुढे बखरकाराने माणिकपुरा, दादर, वेसावा, पारसिक, बेलापूर, मांडवी, जिवधन, अर्नाळा जिंकल्याची सविस्तर वर्णने लिहिलेत. सारांशलेख असल्याने ती वर्णने ईथे मी देत नाही. मांडवी, तांदूळवाडी, टकमक, वेसावे, कादुर्ग, मनोबर व बेलापूर साष्ठीत आले.

ठाण्यावर अंमल बसला पण वसईची मसलत अजून बाकी होती. त्यासाठी माहीम, शिरगावांस मराठ्यांचे मोर्चे बसले. फिरग्यांनी मोठा तिखट मारा केला. खबर लागताच आप्पासाहेब बु-हाणपुरातुन धावून आले. पण फिरंग्यांच्या ठाणे जिकंण्याच्या मनसुब्यामुळे आप्पांना साष्ठीत पाचारण केले. मग माहीमऐवजी आप्पा ठाण्याला गेले व तेथे त्यानी बळकटी केली. ईकडे धारावीच्या लढाईत फिरंग्यांची ५०० माणसे पडली आणि त्यांचे ठाणे जिकांचये मनसुबे धुळीस मिळाले.

पुढे पावसाळा आल्याने आप्पासाहेब पुण्याला गेले. पावसाळ्यानंतर फिरंगी पुन्हा ठाण्यावर चालुन आला. यावेळी मल्हारजी होळकर ठाण्याला होते. पाणबुरुजाच्या लढाईत फिरंगी हरले आणि वसईला निघून गेले. मागाहून गंगाजी नाईक व कर्णाजी शिंदे वसईला गेले. मागे पिलाजी जाधवराव, मल्हारजी होळकर, राणोजी शिंदे, राणोजी शितोळे, गणपतराव ब्राम्हण, रामचंद्र हरी व बापूजी भिवराव वसई मोहीमेच्या तयारीस लागले. इकडे खंडोजी मानकर व कृष्णाजी नाईक यांनी मडचा कोट घेतला.

आता बखरीत वसईच्या लढाईचे विस्तृत वर्णन आहे. सारांशलेखात ते मी देत नाही. थोडक्यात असे वसईत मोठी लढाई झाली. पिलाजी जाधवराव, मल्हारजी होळकर, राणोजी शिंदे, राणोजी शितोळे, गणपतराव ब्राम्हण, रामचंद्र हरी, शिवाजी नाईक यांच्या फौजा फिरंग्याविरुध्ग लढल्या. ४००० मनुष्य पडले. अखेर शके १६६१ सिध्दार्थी नामसंवत्सरे वैशाख शुध्द ९ या दिवशी फिरंगी तह करुन गोव्यास निघून गेला. वसई जिकंली !!!!

साष्ठी आणि वसई संग्रामात केलेल्या पराक्रमाबद्दल गंगाजी नाईकाल सनदा मिळणार होत्या. ते काम कसे रेगांळले याचे सकारण वर्णन बखरकार करतो. शेवटी परगणे मालाड, परगणे मरोळ, तर्फ आटगाव व परगणे साहिवान याच्या पाटिलकीच्या सनदा गंगाजीस मिळाल्या. शके १६९६ मध्ये इंग्रजांनी मुंबईहून पलटणे आणून ठाण्याचा कोट जिंकला.

महिकावतीची बखर

महिकावतीची बखर हे इतिहासआचार्य कै. वि. का. राजवाडे यांनी लिहिलेले आणि वरदा प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले पुस्तक ३-४ वर्षापूर्वी अचानक माझ्या वाचनात आले. त्यानंतर हे पुस्तक मी अनेकदा वाचून काढले. पुस्तकाची पहिली आवृत्ती १९२४ साली तर दुसरी आवृत्ती १९९१ साली प्रकाशित झाली होती. मला मिळालेले पुस्तक २० वर्षे जुने असून ते अद्याप सुस्थितीत आहे. राजवाडे यांना ही बखर कल्याणच्या सदाशिव महादेव दिवेकर नामक व्यक्तीने वसईच्या हिरा हरी भंडारी यांच्याकडून मिळवून दिली होती. सध्या ही बखर बहुदा राजवाडे यांच्या धुळे येथील संस्थेत आहे. राजवाडे यांनी या बखरीचा अभ्यास करून एकूण ४९ मुद्यांवर ११० पानी जी प्रस्तावना तयार केली ती खूपच महत्वाची आहे.
महिकावती म्हणजे माहीम. हे माहीम म्हणजे मुंबईचे माहीम नसून पालघर येथील केळवे-माहीम मधील माहीम आहे. उत्तर कोकणचा इतिहास सांगणारी ही बखर साधारणपणे १४व्या शतकात लिहिली गेली असून ह्या बखरीमधला इतिहास काळ शके १०६० म्हणजे ई.स. ११३८ पर्यंत मागे जातो. आत्तापर्यंत सापडलेल्या सर्व बखरींमध्ये ही अत्यंत जुनाट अशी बखर आहे.
ह्या बखरीचे एकूण ६ प्रकरणे असून त्यात विविध प्रकारची माहिती दिली आहे. ती कोणती ते आपण बघू...
१. पूर्वपरंपरा - वर्णउत्पत्ती - वर्णावर्ण - व्याख्या : हे प्रकरण शके १५०० (इ.स. १५७८) च्या आसपास भगवान दत्त नामक व्यक्तीने लिहिले.
२. राजवंशावळी : हे प्रकरण शके १३७० (इ.स. १४४८) च्या फाल्गुन महिन्यात केशवाचार्य या व्यक्तीने लिहिले.
३. निवाडे व हकीकती : हे प्रकरण शके १३७० (इ.स. १४४८) नंतर केशवाचार्य या व्यक्तीने लगेचच लिहिले आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणाचा काळ हा पहिल्या प्रकरणाच्या आधीचा आहे हे वाचकांच्या लक्ष्यात आले असेलच. असे का तो प्रश्न पुढे दूर होईल. शिवाय शके आणि इसवी सन यातील ७८ वर्षांचा फरकही लक्ष्यात आला असेलच. आता पुढचे प्रकरण बघुया..
४. श्रीचिंतामणीकौस्तुभपुराण : हे प्रकरण शके १५०० (इ.स. १५७८) च्या आसपास भगवान दत्त नामक व्यक्तीने लिहिले.
५. पाठाराज्ञातीवंशावळी : हे प्रकरण शके १४६० (इ.स. १५३८) मध्ये लिहिले गेले.. कर्ता मात्र अनामक आहे.
६. वंशावळी : हे प्रकरण शके १४०० (इ.स.१४७८) मध्ये लिहिले गेले आहे असे ह्या प्रकरणाचा अनामक कर्ता सांगतो.
पहिल्या ३ प्रकरणाप्रमाणे येथेही सहाव्या प्रकरणाचा काळ हा पाचव्या आणि पाचव्याचा काळ चौथ्या प्रकरणाआधीचा आहे. असे का हे आपण आता बघुया.
वरील लिखाण नीट वाचल्यास हे स्पष्ट होते की प्रकरण २ व ३ ही सर्वात आधी लिहिली गेली. ती केशवाचार्याने लिहिली. ह्यात माहिम प्रांतामधील सर्व कुळांची वंशपद्धती आली आहे. प्रकरण २ व ३ नंतर थेट ६ वे प्रकरण लिहिले गेले. ह्यात फक्त प्रकरण २ आणि ३ मध्ये राहून गेलेल्या कोळंबा-शिळंबा कुळांची वंशपद्धती आली आहे. त्यानंतर प्रकरण ५ वे लिहिले गेले. ह्यात महिकावती प्रांतात पाठारे प्रभू कसे आले त्याची हकीकत आहे. प्रकरण ५ व ६ यांचा कर्ता मात्र अनामक आहे. ह्यानंतर सुमारे ५० वर्षांनी भगवान दत्त नामक व्यक्तीच्या हाती ही ४ प्रकरणे गेली. त्याने प्रकरण २ व ३ वरती प्रकरण १ आणि ५ व ६ वरती प्रकरण ४ अशी स्वतंत्र प्रकरणे चढवली. अश्याप्रकारे प्रकरण १-२-३ आणि प्रकरण ४-५-६ अश्या दोन स्वतंत्र बखरी तयार झाल्या. पुढे अजून कोणा एका दुसऱ्या अनामिकाच्या हाती ही सर्व प्रकरणे इ.स. १६०० च्या आसपास पडली त्याने ती एकत्र करून सबंध ग्रंथ तयार केला. थोडक्यात इ.स. १४४८ ते इ.स. १६०० अशी १५० वर्षे ह्या बखरीत लिखाणाची भर पडत गेली.
मुळात केशवाचार्याने हे लिखाण का केले आणि कोणाच्या सांगण्यावरून केले ते आपण आता बघुया...
शके १३७० (इ.स. १४४८) मध्ये मालाड (मुंबई) येथील देसला उर्फ देसाई नायकोराव याने केशवाचार्याला वंशपद्धतीचे कर्म करावयास सांगितले. बखरीतील पान ५३ वर केशवाचार्य लिखाणाचे कारण सांगतो.
"सर्व कोंकणप्रांत म्लेच्छानी आक्रमण करून, येथून तेथून चोहीकडे सर्वत्र म्लेच्छावर्णा खाली पृथ्वी बुडून गेली. वर्णावर्ण वोळख नाहीशी झाली स्वकुळाची वास्तपुस्त कोणाच्या गावी हि राहिली नाही. क्षत्रियांनी राज्याभिमान सांडिला, शस्त्रे सोडिली व केवळ कृषिधर्म स्वीकारुन कित्येक निव्वळ कुणबी बनले, कित्येकांनी कारकूनवृत्ती आदरिली, कांहिक सेवावृत्ति अंगीकारून निभ्रांत शुद्र ठरले, शाणी कित्येक नष्ट होऊन नामशेष हि राहिले नाहीत. बहुत आचारहीन झाले. गोत्र, प्रवर, कुळस्वामी, कुळगुरु ह्यांची बहुतेकांस आठवण हि राहिली नाही. अशी ह्या तीन शें वर्षात भ्रष्टता माजली व महाराष्ट्रधर्म अज्जी बुडाला. अश्या संकटसमयी श्रीदेवी कुळस्वामिणी, मालाडचा देसला जो नायकोराव त्याच्या स्वप्नात येऊन, सांगती झाली की, नायकोरावा, उठ, महाराष्ट्रधर्म रक्षिण्याकरीता अठरा पगड जातीचा मेळावा कर आणि केळव्यापासून मुंबईपर्यंतच्या सर्व गावचे, सर्व जातींचे व सर्व गोत्रांचे खलक जमवून, त्यांस केशवाचार्याच्या मुखे महाराष्ट्रधर्म सांगीव"
'ह्यानंतर मालाडच्या नायकोरावाने केशवचार्याच्या संमतीने मालाड उर्फ म्हालजापूर येथील जोगेश्वरीच्या देवळापुढे विस्तीर्ण मंडप रचून, तीन हजार साहा शें पंचावन्न लोक (३६५५) जमा केले. त्यात नायक (नाईक), देसाई, पुरोहित, कुळगुरु, आचार्य, उपाध्ये, जोशी व इतर मुख्य मुख्य वृतीवंत पाच शें एकवीस (५२१) होते. ब्राह्मणांनी लक्ष्मीसूतांनी भगवती दुर्गादेवीचे स्तवन केले व श्रीदेवी आद्यशक्ति जगदंबिका महाराष्ट्रधर्म रक्षिका जी जगन्माता दुर्गादेवी ती तुम्हा सर्वांवर सुप्रसन्न असो असा आशीर्वाद दिला. नंतर केशवचार्याने सर्व शिष्टांची संमती घेऊन जमलेल्या सर्व लोकांस प्रस्तुत लिहिली जाणारी वंशपद्धती राजा बिंबापासून (इ.स. ११३८) अद्ययावत कथन केली व महाराष्ट्धर्माचे निरुपण केले. त्या वंशपद्धतीच्या व महाराष्ट्रधर्मकथनाच्या सासष्ट (६६) नकला करून, साक्ष-शिक्यानिशी त्या नकला त्या-त्या कुळास, वंशास व जातीस प्रमाणपूर्वक दिल्या. कुळांनी, वंशांनी व जातींनी त्या शिरी वंदन करून ठेविल्या.'

ज्या महाराष्ट्रधर्माचा उच्चार १७व्या शतकात समर्थ रामदासस्वामींनी आणि १९ व्या शतकात महादेव गोविंद रानडे यांनी केला तो मुळात प्रथम १५व्या शतकात केशवचार्याने केला होता.

त्या ६६ नकलांपैकी आज एकही बखरप्रत उपलब्ध नाही. राजवाडे यांना मिळालेली प्रत ही देखील मूळ बखरीची नक्कल आहे. नक्कल करताना १५० वर्षे लिखाणाची भर पडत राहिलेल्या ह्या बखरीमध्ये काही त्रुटी निर्माण झालेल्या आहेत. पण म्हणून ह्या बखरीचे महत्व कमी होत नाही. अजून काही नक्कल केलेल्या प्रती किंवा मूळ प्रती सापडल्या तर सध्या उपलब्ध असलेल्या प्रतीमधल्या त्रुटी सुद्धा कदाचीत भरून निघतील आणि उत्तर कोकणचा आणि महाराष्ट्रधर्माचा जुना वैभवशाली इतिहास नव्याने आपल्यासमोर मांडला जाईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
 
"क्षत्रियांनी राज्याभिमान सांडिला, शस्त्रे सोडिली व केवळ कृषिधर्म स्वीकारुन कित्येक निव्वळ कुणबी बनले" - बर्याचदा आमच्या कडे (विदर्भा मधे) नेहेमी चर्चा असते - आपण मराठा (युद्ध करणारे) की कुणबी (शेती करणारे) - हे परिवर्तण कोकणातच नव्हे तर अख्या मर्हाटा मधे झाले असावे.

महिकावतीची बखर ही १४ व्या ते १६ व्या शतकात लिहिली गेली असल्याने ह्यात जुन्या मराठी शब्दांचा प्रचंड समावेश आहे. कै. राजवाडे यांनी बखरीमधल्या एकूण शब्दांची संख्या मोजली ती सुमारे १२ हजार इतकी भरली. ह्यात १०३ यावनी उर्फ फारशी शब्द आलेले आहेत असे त्यानी प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. १२ हजारात फक्त १०३ शब्द म्हणजे मुसलमानी सत्ता येऊनही रोजच्या व्यवहारात डोईजड होईल इतकी ती कोकणात तरी फैलावली नव्हती असेच म्हणावे लागेल. संपूर्ण बखरीमध्ये उत्तर कोकण म्हणजे मुंबई - ठाणे आणि आसपास परिसरातील गावांची, नद्यांची, किल्ल्यांची आणि प्रांतांची एकूण ३९६ नावे आलेली आहेत. त्यातील महत्वाची आणि मोजकी ६० नावे पुढे देत आहे. त्यांच्या जुन्या नावांपुढे सध्याची नावे तिथे कंसात दिलेली आहेत...
१. आगाशी (आगाशी- विरार जवळ)
२. उतन (उत्तन - भाईंदर जवळ)
३. कळवे (कळवा - ठाणे शहर)
४. कान्हेरी (बोरीवली)
५. कोंडीवटे (कोंदिवडे - कर्जत - राजमाची पायथा)
६. आन्धेरी (अंधेरी)
७. कानझुरे (कांझूर - कांझूरमार्ग)
८. कालिणे (कालिना - सांताक्रूझ)
९. कोपरी (कोपरी - ठाणे पूर्व)
१०. कोलसेत (कोलशेत - ठाणे - घोडबंदर)
११. उरण (उरण)
१२. आसनपे (आसनगाव?)
१३. कल्याण (कल्याण)
१४. कांधवळी (कांदिवली)
१५. खरडी (खर्डी - कसारा जवळ)
१६. घोडबंदर (घोडबंदर ठाणे)
१७. चेउल (चौल - अलिबाग)
१८. डिडोशी (दिंडोशी)
१९. तांदूळवाडी पैलदेची (तांदूळवाडी - पालघर जवळ)
२०. ताराघर (तारापूर - पालघरजवळ)
२१. तुरफे (तुर्भे)
२२. गोराई (गोराई)
२३. चरई (चरई - ठाणे पश्चिम)
२४. चेने (चेना - ठाणे घोडबंदर)
२५. चेंभूर (चेंबूर)
२६. जवार (जव्हार)
२७. डोंगरी (डोंगरी - मुंबई)
२८. दहीसापूर (दहिसर?)
२९. गोरगाव (गोरेगाव)
३०. चेंदणी (चेंदणी - ठाणे खाडीकडील भाग)
३१. जुहू (जुहू)
३२. तळोजे महाल (तळोजा - पनवेलजवळ)
३३. दांडाळे (दांडाळेतळे वसई)
३४. नागावे (नायगाव)
३५. बोरवली (बोरीवली)
३६. भाईखळे (भायखळा)
३७. महिकावती (माहीम - पालघर)
३८. बिंबस्थान (केळवे - पालघर)
३९. देवनरे (देवनार)
४०. नाउर (नाहूर - मुंबई)
४१. मणोर (मनोरी - मुंबई)
४२. मागाठण (मागाठणे - मुंबई)
४३. वरोळी (वरळी)
४४. वासी (वाशी)
४५. वाळुकेश्वर (वाळकेश्वर)
४६. वेउर (येऊर - ठाणे)
४७. वोवळे (ओवळे - ओवळा - ठाणे घोडबंदर)
४८. वरसावे (वर्सोवा)
४९. वांदरे (बांद्रा - मुंबई)
५०. विह्रार (विरार)
५१. माझिवडे (माजिवडा - ठाणे घोडबंदर)
५२. काशीमिरे (काशीमिरे - मीरारोड मधील)
५३. सीरगाव (शिरगाव - पालघर)
५४. मुंबई (मुंबई)
५५. मुळूद (मुलुंड)
५६. सानपे (सानपाडा?)
५७. साहार (सहार - मुंबई विमानतळ भाग)
५८. सीव (शिव - सायन)
५९. साष्टी (ठाणे परिसर)
६०. सोपारे (नालासोपारा)
 
यातल्या दोनतीन नावाबाबत वेगळे मत आहे. बखर-उल्लेखित कोंडवटें हे कर्जतजवळील कोंडवटें नसून महाकाली डोंगर व आसपासचा भाग म्हणजे कोंडवटे गाव होते. या भागाला अद्यापही कोंदिविटा/कोण्डिवटा म्हटले जाते. बखरलेखनकाळात हे गाव चर्चेत असावे कारण त्या काळात(लेखनकाळात) इथे पुष्कळ प्रमाणात धर्मांतरे झाली. साष्टी प्रांतातले सर्वात जुने सुमारे पाचशे वर्षाpoorveeMche चर्च याच परिसरात मरोळ येथे आहे.
 १)मणोर म्हणजे मालाडजवळचे खाडीपल्याडचे मनोरी नव्हे तर नॅशनल हाय्वे आठ वरचे पालघर तालुक्यातले मनोर हे गाव होय. मनोरी हे अगदीच चिमुकले गाव आहे. मनोर हे पालघर-वाडा रस्त्यावरचे मोठे ठाणे आहे.
२)आसनपे म्हणजे आसनगाव नसून सध्याच्या अंधेरी-घाटकोपर रस्त्यावरचे आसलफे (असल्फा) असावे.
३)कालीणे म्हणजे सध्याचे कालीना मानल्यास बखरीचा काळ फारच अलीकडचा ठरतो. कारण सध्याचे कलीना म्हणजे जिथे मुंबई विश्वविद्यालयाचे मुख्य ठाणे आहे ते कोळे-कल्याण म्हणून सन १९८०पर्यंत प्रसिद्ध होते. आणि तिथल्या धर्मांतरित ईस्ट्-इंडिअन समाजाच्या कागदपत्रांमधून त्याचे स्पेलिंग caliana (उच्चार कल्याना) असे केलेले मी वाचलेले आहे. कोळे-कल्याणचे कलीणे हे रूपांतर अगदी अलीकडचे आहे. अलीकडचे म्हणजे सांताक्रूझ्(पूर्व)-वाकोला भागात मूळ धर्मांतरित मराठीभाषक क्रिश्चनांखेरीज इतर भाषकांची वस्ती वाढू लागल्यानंतरचे. मूळ लोक कलियाना असाच उच्चार करीत होते. नंतरच्या लोकांनी मात्र तो कलीना केला आणि स्पेलिंगमध्ये सी ऐवजी के करून मधला ए गाळून टाकला. हे मुद्दाम झाले नाही. नव्या लोकांना ग्रामनावांची माहिती इंग्रजी स्पेलिंग वरून झाली आणि त्या स्पेलिंगचे त्यांना वाटले तसे उच्चार त्यांनी केले. ह्याच परिसरात एक कोळीवाडी नावाचे ठिकाणही आहे. त्याचे स्पेलिंग मूळ कोलिवारी या आगरी-कोळी उच्चारानुसार colivary असे होते. आता त्याचा उच्चार कोल्व्हेरी असा होतो आणि व्हाय धिस कोलावेरी हे गाणे प्रसिद्ध झाल्यापासून तर तो कोलावेरी असाही होऊ लागला आहे. या सगळ्याचा शोध घेणे मोठे रंजक ठरते.
४) वरसावे नावाविषयीही असेच म्हणता येईल. वरसावे म्हणजे आजचे अंधेरीनजिकचे वर्सोवा नव्हे. हे वरसावे गाव मुंबई-ठाणे रस्त्यावर घोडबंदर नाक्यानजिक आहे. येथे एक छोटीशी खाडी आहे.तिला 'वरसावे खाडी' म्हणतात. या खाडीवर जो पूल आहे त्यालाही 'वरसावे पूल' म्हणतात. डिसेंबर २०१३ मध्ये हा पूल खचल्यामुळे राष्ट्रीय हमरता आठवर कमालीची वाहतूक कोंडी होत होती.
सध्याचे वर्सोवा (अंधेरीनजिकचे)याचे जुने नाव वेसावें असे आहे. मूळचे जुने धर्मांतरित कोळी याला वेस्सोवा म्हणतात. हिंदू कोळी येसांव किंवा येसांवे म्हणतात. लिहिताना वेसांवे लिहितात. आपल्याकडे कोंकणात बोलीभाषेत नपुंसकलिंगी एकारान्त ग्रामनामे आकारान्त उच्चारण्याची चाल होती. जसे आपटें-आपटा, रोहें-रोहा, मसुरें-मसुरा, भोगवें-भोगवा, वांदरें-वांद्रा वगैरे. त्यानुसार वेसांव्याचे वेसावा झाले असावे. पण वेर्सोव्यातला 'र' त्यात कुठून आला ते कळत नाही. कदाचित वेस्सावा हा परिपूर्ण उच्चार व्हावा यासाठी ब्रिटिशांनी मध्ये 'आर' टाकला असावा, जो त्यांच्या उच्चारानुसार 'सायलेन्ट' असतो पण त्याआधीच्या अक्षराचा उच्चार लांबवतो. वरसावे हे वेगळेच गाव आहे.
५) मुंबई म्हणजे आजची सगळी मुंबई नव्हे, तर आजच्या मुंबईतल्या मूळ सात बेटांपैकी सर्वात मोठे असलेले डम्बेल च्या आकाराचे छोटेसे मुंबई बेट, जे मलबार हिल, गिरगाव, चरणी,मुगभाट,ठाकुरद्वार,धोबीतलाव,गवळी तळे या सध्याच्या भागापुरते मर्यादित होते. हे बेट मूळ सात बेटांमध्ये सर्वात मोठे असल्याने भराव घालून बेटे संलग्न केल्यावर या सर्वच भूभागाला मुंबई नाव मिळाले.
६)कान्हेरी म्हणजे बोरिवली नव्हे. कान्हेरी हे आजच्या बोरिवली तालुक्यातले एक मोठे गाव होते. येथे बौद्धांच्या जगप्रसिद्ध गुंफा आहेत. हे कान्हेरी भारताच्या पश्चिम किनार्‍यावरचे एक मोठे बौद्ध विद्यापीठ होते, अगदी नालंदा-तक्षशिलासारखे, आणि ते पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत जागते होते. आजचा बोरिवली भाग हा १९६० पर्यंत ठाणे जिल्ह्याचा भाग होता. किंबहुना वांद्र्याच्या पुढची सर्व पश्चिम उपनगरे ब्रिटिश काळात ठाणे जिल्ह्यातच मोडत होती.
७)साष्टी हा तत्कालीन ठाणे जिल्ह्याचा एक भाग होता. वांद्र्याच्या पुढे वसईखाडीपर्यंतचा प्रदेश साष्टीमध्ये मोडत असे. पूर्व किनार्‍यावर मात्र कुरले, चेंबूर वगैरे वेगळी गावे होती. उत्तरेला वसईची खाडी आणि दक्षिण-पूर्व दिशांना माहीमची खाडी यामुळे साष्टी हा प्रदेश एक द्वीपकल्पच होता.
८) 'भाइखळे हे नामरूपसुद्धा अलीकडचे वाटते. बखरलेखनकाळात हे रूप प्रचलित होते असल्यास बखरलेखनकाळ फार जुना नसावा असे अनुमान काढण्यास जागा आहे. (येथे बहावा-स्थानिक भाषेत 'बाया'ची झाडे होती म्हणून या भागाला बायाखळे हे नाव पडले अशीही एक व्युत्पती सांगितली जाते, जी अर्थात पटण्याजोगी नाही.) ठाणे जिल्ह्यात विशेषतः वसई-विरार पट्ट्यात पाणी साठवण्यासाठी केलेले खड्डे अजूनही. दृष्टीस पडतात. या खड्ड्यांना बावखल/बावखोल म्हणतात. हा एक शेतात खणलेला शंभरदीडशे फूट व्यासाचा मोठा आणि उथळसर खड्डा असतो. त्याच्या केंद्रभागी एक कठडा नसलेली विहीर असते. पावसाचे पाणी या खड्ड्यात साठून रहाते आणि जमिनीत खोल मुरते. हे पाणी शेत शिंपण्यासाठी वापरले जाते. आधुनिक शेततळ्यांचा हा जुना अवतार होय. या बावखल/बायखलावरून भायखळा शब्द आला असण्याची शक्यता या निमित्ताने इथे नोंदून ठेवावीशी वाटते. न जाणो कोणी संशोधक पुढे कधीतरी हा प्रतिसाद वाचेल आणि त्या दिशेने पुरावे गोळा करेल. स्थानिक लोकभाषा आणि जीवनपद्धतीशी परिचित नसल्यामुळे भल्याभल्या संशोधकांच्या नजरेतून अनेक मुद्दे निसटले आहेत.
  आगशी म्हणजे गच्ची किंवा गच्चीसारखा सपाट प्रदेश. जूं, जुवें म्हणजे पाणथळ भागातला थोड्याश्या उंचवट्याचा प्रदेश. मुंबईच्या आसपास अशी अनेक जूंगावे आहेत, कोंकणातही कुंभारजुवे वगैरे गावे आहेत. मिर्‍ये हे तसेच एक नाव. जलमय प्रदेशातला उंचवट्याचा डोंगरी भाग म्हणजे मिर्‍यें अथवा मिरें.
नागाव, नायगांव ही गावे मुंबई -रायगड पट्ट्यात निदान तीन आहेत.
कदाचित दमणगंगा ते गोमंतक या कोंकणकिनारपट्टीत समान संस्कृती एकेकाळी नांदत असावी म्हणून अशी साम्ये दिसत असावीत.
 बोधगयेमध्ये महाबोधी विहाराजवळ मुचलिंद विहार आहे. अवघ्या शंभर पावलांच्या अंतरावर मुचलिंद राजानं तिथं तळं बांधलं होतं. तळं आणि महाबोधी विहाराचा मुकुट एकाच समान पातळीवर आहेत. राजा मुचलिंद हा आताच्या मुलुंड नगरीचा बुद्धकाळातील राजा. त्याच्या नगराची सीमा सोपाऱ्यापासून सुरू होऊन मुलूंड आणि त्यानंतर बरीच मोठी विस्तारलेली होती. मुचलिंदनगर ही त्याची राजधानी. मुचलिंदचं कालांतराने अपभ्रंश होऊन झालं मुलुंड.
शके १०६० (इ.स. ११३८)ची गोष्ट. सरस्वती नदीच्या काठी असलेल्या पालणपुर देशात अणहिलवाडपाटणवर चौलुक्य उर्फ सोळंकी नावाचे राजे राज्य करीत होते. त्यांच्या चंपानी उर्फ चांपानेर नावाच्या संस्थानावर बिंब ह्या आडनावाचे एक सूर्यवंशी क्षत्रिय कुल त्यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. ह्या बिंबांचा पैठण येथे राज्य करणाऱ्या भौम या क्षत्रिय राजघराण्याबरोबर घनिष्ट संबंध होता. भौम राजघराणे जसे महाराष्ट्रिक होते तसे चौलुक्य आणि बिंब देखील महाराष्ट्रिकच होते. शके १०६० साली गोवर्धन बिंब हा बिंब घराण्याचा राजा होता. त्याचा लहान भाऊ प्रताप बिंब याने उत्तर कोकणावर स्वारी करण्याची योजना शके १०६० मध्ये आखली. त्यावेळी उत्तर कोकणावर शिलाहारांचे राज्य होते. दक्षिण कोकणातील शिलाहारांचे राज्य कदंबांनी हिसकावून घेतलेले होते. गेली ५० वर्षे शिलाहार आणि कदंब यांच्या लढायांमध्ये कोकणात गोंधळ माजलेला होता आणि शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली होती. अशातच उत्तरेकडून चढाई करण्याचा मनोदय प्रताप बिंब याने नक्की केला. सोबत ८ प्रमुख अधिकारी आणि १० हजार फौज घेऊन तो मोहिमेस निघाला.
प्रताप बिंब चांपानेरवरून निघाला तो थेट नर्मदा उतरून, पैठण येथे भौम राजाकडे गेला. तिथे तो संपूर्ण फौजेसह तब्बल २ वर्ष राहिला. प्रताप बिंबला मोहिमेवर निघताना बहुदा पैशाची बरीच अडचण होती असे दिसते नाहीतर तो २ वर्षे काहीही न करता पैठण येथे बसून राहिला नसता. भौम राजाने सुद्धा त्याला जवळ ठेवून घेतले आणि त्याच्या १० हजार फौजेचा खर्च पाहिला याचा अर्थ त्यांच्याच निश्चित जवळचे संबंध होते. अखेर २ वर्षांनी त्याने पैशाची व्यवस्था लावली आणि तो मुंबई-ठाणे भागावर चाल करून आला. यायचा मार्ग मात्र त्याने थोडा उत्तरेवरून घेतला होता. पैठणवरून जुन्नरकडे आल्यावर तो घाट उतरून खाली यायच्या ऐवजी वर गेला आणि दमण म्हणजे सध्याच्या महाराष्ट्र-गुजरात उत्तर सीमाभागाकडून खाली चाल करून आला. कदाचित थेट हल्ला करण्याऐवजी उत्तरेकडून भगदाड पाडत खाली येणे त्याला जास्त सोपे वाटले असावे. ह्या वाटचालीत त्याला हरबाजी देशमुख हा शूर लढवय्या सामील झाला. भौमराजाने सुद्धा निघताना प्रतापबिंबला स्वतःकडची २ हजाराची फौज दिली. त्या फौजेचे नेतृत्व करायला त्याने सोबत दिला होता बाळाजी शिंदे. हा बाळाजी युद्धात प्रखर म्हणून प्रचंड नावाजलेला होता.
प्रताप बिंबाच्या फौजेने सर्वप्रथम दमण प्रांतावर हल्ला चढवला. तिथे राज्य करीत असलेला काळोजी सिरण्या नामक राजा प्रताप बिंबास लगेचच शरण आला. कालोजीच्या हाताखाली असलेला दमण ते चिखली हा भाग बिंबाने ताब्यात घेतला. प्रताप बिंबाने तेथील व्यवस्था पाहण्यासाठी हरबाजी कुळकरणी (कुलकर्णी) नावाचा अधिकारी नेमला आणि तो पुढे निघाला. उंबरगाव - डहाणू - तारापूर करत तो महिकावतीस उर्फ माहीम येथे येऊन पोचला. तेथे विनाजी घोडेल म्हणून कोणी राजा राज्य करीत होता. त्यास बिंबाने दूर सारले आणि देशाची स्थिती अवलोकन केली. त्यास असे आढळले की, शिलाहारांसारख्या सुसंस्कृत मराठ्यांच्या हातून अश्या शुल्लक लोकांच्या हाती इथली सत्ता गेल्यामुळे सुपीकता ओसरून, प्रदेश देशोधडीला लागला होता. नयनरम्य असे समुद्रतीर वैराण आणि उद्वस्त झालेले होते. हे सर्व पाहून प्रतापबिंब खूप दु:ख्खी झाला. त्याने पैठण आणि चांपानेरवरून ब्राह्मण आणि मराठे लोक आणून इथली वसाहत पुन्हा स्थिरस्थावर करावयाचा निर्णय घेतला. तसे पत्र त्याने आपला मोठा भाऊ गोवर्धन बिंब आणि पैठणला भौमाकडे रवाना केले. आपला पुत्र मही बिंब यास देखील इथे धाडून द्यावे असे त्याने आपल्या मोठ्या भावाला कळविले.
दुसरीकडे प्रताप बिंबाने आपला मुख्य प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी याला ठाणे - साष्टी आणि मुंबईचा मुलुख काबीज करण्यासाठी पाठविले. त्याच्यासोबत किती फौज दिली हे मात्र बखर स्पष्ट करीत नाही. बाळकृष्णराव सोमवंशी याने पहिल्याच फटक्यात ठाण्यावर हल्ला चढवत यशवंतराव शिलाहार (शेलार) याला ठार केले आणि शिलाहारांची उरली सुरली सत्ता ठाण्यातून उपटून टाकली. बाळकृष्णराव सोमवंशी पुढे खाडी ओलांडून कळवा येथे पोचला. तेथे कोकाट्या नावाच्या कोण्या मराठ्याचा अंमल होता. तो बाळकृष्णरावास शरण आला. बाळकृष्णराव तिथून मुंबईच्या दिशेने निघाला आणि मढ येथे पोचला. तिथून तो जुहू मार्गे वाळूकेश्वरी पोचला. तिथे असलेले बाणगंगा तीर्थ आणि हनुमानाच्या प्रतिमा पाहून तो निश्चित आनंदाला असेल. त्याने फौजेसकट तिथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आणि 'येथील सर्व देश रान होऊन गेला आहे. आपण स्वतः: एकदा येऊन पहावा' अश्या आशयाचे पात्र प्रताप बिंबास पाठविले. प्रताप बिंबाने माहीम प्रांताप्रमाणे वाळूकेश्वरी देखील वसाहत बसविण्याचा निर्णय केला.
प्रताप बिंबास दमण ते महिकावती आणि बाळकृष्णराव यास महिकावती ते वाळुकेश्वर हे अंतर पार करायला फार तर २ महिने लागले असावेत. गेल्या ५० वर्षातील लढाया - जाळपोळ यांनी प्रदेश इतका वैरण होऊन गेला होता की हा संपूर्ण प्रदेश हातात घ्यायला बिंबास फार प्रयास पडले नाहीत. पण खरे प्रयास पुढे होते. बाहेरून लोक आणून देश पुन्हा बसविणे हे काम नक्कीच सोपे नव्हते. १६४२-४४ मध्ये दादोजी कोंडदेव आणि मासाहेब जिजामाता यांना पुणे वसवताना जे कष्ट करावे लागले तेवढेच किंवा त्यापेखा जास्त कष्ट प्रताप बिंबास पडले असावेत. शेती, ग्रामसंस्था, व्यापार-उदीम हे पुन्हा सुरू व्हावे यासाठी त्याने काही निश्चित धोरणे आखली असतील. इ.स. ११४० मध्ये स्वतःच्या राजधानीचे गाव म्हणून त्याने केळवे-माहीम निश्चित केले. त्याचे कारण बखरकार असे सांगतो की, दमण ते वाळुकेश्वर हे अंतर २८ कोस असून (आजच्या भाषेत ८४ मैल किंवा १३४ किमी.) केळवे-माहीम हा त्याचा मध्य बिंदू आहे. राजधानीचे ठिकाण बनवूनही त्याने तिथे काही विशेष बांधकाम केले असावे असे वाटत नाही. कारण आज कुठल्याच प्रकारचे अवशेष संपूर्ण केळवे-माहीम प्रांतात आढळत नाहीत. पैशाची टंचाई आणि देश वसाहत बसवायच्या जबाबदारीमुळे त्याने बहुदा ते टाळले असावे.
काही महिन्यात प्रताप बिंबाचा मुलगा मही बिंब चांपानेर वरून महिकावतीस पोचला. त्याने देश वसाहत वसवण्यासाठी सोबत अनेक लोक आणले होते. त्यात ६६ मुख्य कुळे होती. बखरकार लिहितो की त्यात २७ सोमवंशी, १२ सूर्यवंशी आणि ९ शेषवंशी कुळे होती. या शिवाय वाणी, उदमी, गुजर, वैश्य, लाड, दैवज्ञ अशी काही कुळे होती. भौमाने जी कुळे पैठणवरून पाठवली त्यात मुख्य ब्राह्मण कुळे होती. शास्त्री, वैदक, पंडित, आचार्य, उपाध्ये, ज्योतिषी, पुरोहित ही यादी बखरकार देतो. ह्यातील प्रमुख कुळे घेऊन प्रताप बिंब वाळुकेश्वर येथे गेला. बाळकृष्णराव फौजेसकट जिथे मुक्काम करून होता तिथे त्याने स्वतःचा राज्यारोहणसमारंभ करून घेतला. ह्या समारंभानिमित्ताने त्याने शेषवंशीयांचे कुलगुरु असणाऱ्या गंगाधर नाईक सावखेडकर यांस पसपवली गाव तर राजपुरोहित असणाऱ्या विश्वनाथपंत कांबळे यांस पाहाड गाव इनाम दिला. प्रताप बिंब स्वतः काही काल वाहिनळे - राजणफर येथे राहिला आणि मग कान्हेरी येथील गुहेमध्ये देखील त्याने काही काळ मुक्काम ठोकला. मरोळ येथील महाळजापूर (एकूण २२ गावे), मालाड येथील नरसापूर (एकूण २२ गावे), उत्तन (२२ गावे) आणि घोडबंदर (एकूण ३३ गावे) अश्या विविध ठिकाणी त्याने नवीन वसाहत बसविली. ३ वर्षाकरिता व्यापारी जकात नाही असा बंदोबस्त देखील केला.
आज मुंबईमध्ये पसपवली, पाहाड, वाहिनळे - राजणफर ही गावे कोठे आहेत? ह्याबद्दल कोणी अधिक माहिती देऊ शकेल का?
 पसपवली हे पोवाईच्या आसपासचे गाव होते. मला वाटते पोवाई तलाव बांधला तेव्हा या गावची बरीचशी जमीन पाण्याखाली गेली. असे वाचल्याचे अंधुकसे आठवते की या भागात कोणी पारसी उसाची शेती करीत असे. विकीवर सुद्धा ही माहिती होती असे वाटते. बहुधा भांडुप,पांजरापोळ या शीर्षकाखाली होती का? आता शोधावे लागेल.
पाहाड म्हणजे गोरेगावचा पूर्वेकडचा डोंगराळ भाग. खरे तर गोरेगाव पश्चिम हे बहुतेक सर्व दलदलीतून भराव घालून सन १९४८ च्या आसपास बनवलेले आहे. त्या वर्षी पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांसाठी गवर्न्मेंट कॉलनी (सध्याचे सिद्धार्थ नगर) ही वसाहत अक्षरशः दलदलीत पत्रे ठोकून लष्कराच्या बराकींसारखी बांधली गेली. त्यानंतर संपूर्ण ओशिवडें खाडी बुजवून मोतिलाल नगर,बांगुर नगर वगैरे वसाहती झाल्या. जुन्या काळी पाहाड किंवा पाहाडी हाच मुख्य इलाका होता आणि गोरेगाव हा त्याचा एक छोटासा भाग होता. रेल्वे आणि स्वामी विवेकानंद रस्ता(पूर्वीचा घोडबंदर रोड) झाल्यावर गेल्या दीडशे वर्षांत या सर्व भागाचा भूगोल बदलला. रेल्वे आणि रस्त्याच्या कडेने वस्ती वाढली आणि पाहाडी भाग दुर्लक्षित राहिला तो थेट अहमदाबाद रस्ता(पश्चिम द्रुतगती मार्ग) तयार होईपर्यंत. त्यानंतर मात्र पूर्व भागाची देखील लोकसंख्या भराभर वाढली. या विषयी असे सांगितले जाते की तत्कालीन ठाणे जिल्हा आणि मुंबई येथे १९४८ साली अलीकडच्या २००५ सालासारखी अतिवृष्टी झाली तेव्हा या नवीन बांधकामामुळे खाडीचा प्रवाह अडून संपूर्ण पश्चिम गोरेगाव जलमय झाले होते. दहीसर गावातही दहिसर नदीच्या पात्रात (पुलाखाली)मोठमोठे ओंडके अडकून पाणी गावात शिरले होते.
राजणफर विषयी नक्की माहिती नाही पण वान्दरें येथे राजण नावाचे गावठाण आहे.
वाहिनळे विषयी सुद्धा माहिती नाही पण विल्ले-पारले या जोडगावातले एक गाव (सध्याचे इर्ला) पूर्वी विहिळ्ळे होते असे जुने लोक सांगत. हे शक्य वाटते कारण आगरी क्रिस्टिअन भाषेत 'ळ','ड' चा 'र' आणि 'व' चा 'अ' होतो. आणि दुसरे म्हणजे ब्रिटिशांनी विशेषनावातल्या ळ साठी 'डबल एल' ही अक्षरे वापरलेली दिसतात (उदा.नाळा-सोपारा) जी विल्ले च्या स्पेलिंग मध्ये आत्ता-आत्तापर्यंत होती. अर्थात हा अंदाज आहे.
कांजुरचा ऐतिहासिक संदर्भ असल्यास कृपया द्यावा. कांजूरचा कानझुरे असा उल्लेख या बखरीत आहे. पण पुर्वी कांजुरला महसूल जमा करण्यासाठी यावे लागत असे, अशी माहिती ऐकिवात आहे. कृपया माहित असेल तर, संदर्भ द्यावा.
शके १०६२ (इ.स. ११४०) मध्ये प्रताप आणि मही बिंब वाळुकेश्वर येथे असताना अपरादित्य शिलाहाराने वसई खाडीच्या उत्तरेकडील भागावर पुन्हा स्वारी केली आणि प्रताप बिंबाने जिंकून घेतलेला भाग पुन्हा स्वतःकडे घेतला. बिंबाचे खुद्द राजधानीचे गाव केळवे-माहीम आणि सोपारा वगैरे प्रदेश शिलाहाराने जिंकून प्रताप बिंबला ठाणे-साष्टी बेटात कोंडून टाकले. केळवे-माहीम हातचे गेल्यामुळे प्रताप बिंबाने वांदरयाच्या दक्षिणेस एक नवे माहीम निर्माण केले आणि त्याला आपली राजधानी नेमले. हेच ते मुंबईचे माहीम. ह्या स्थानाचे नाव मुळच्या केळवे-माहीम मधील माहीम वरून पडले हे देखील ह्या बखरीत स्पष्ट होते. प्रताप बिंबाचा पुत्र मही बिंब शांत बसणाऱ्या पैकी नव्हता. त्याने ठाण्या पलीकडे जाऊन शिलाहारांच्या कल्याण प्रांतावर हल्ला चढवला आणि ते हस्तगत केले. अशाप्रकारे साष्टी बेटांमाधून शिलाहारांची इ.स. ११४१ च्या आसपास हकालपट्टी झाली मात्र शूर्पारक उर्फ नालासोपाराच्या उत्तरेकडे पुढची सव्वाशे वर्षे त्यांनी राज्य उपभोगिले.
शके १०६९ (इ.स. ११४७) मध्ये प्रताप बिंब माहीम (मुंबई) येथे वारला. त्याच्या मागून त्याचा पुत्र मही बिंब गादीवर आला. त्याने शके १०६९ ते ११३४ (म्हणजे इ.स. ११४७ ते १२१२) अशी तब्बल ६५ वर्षे सुखाने राज्यकारभार केला. ह्या दरम्यान शके १११० (इ.स. ११८८) मध्ये चेउल येथील भोज राजा दक्षिणेवरून ठाण्यावर चालून आला. उरण - पनवेल काबीज करत तो खाडी पलीकडे कळव्याला येऊन पोचला. मही बिंबला ह्याची खबर लागली होतीच. त्याने सेनापती केशवराव आणि हंबीरराव यांना ८ हजार फौज देऊन ठाण्याला रवाना केले होते. कळव्याला ह्या २ फौजेमध्ये तुंबळ युद्ध झाले. ह्यात खुद्द भोज राजा प्राणास मुकला. कच न खाता भोजाच्या मुख्य प्रधानाने दुसरा हल्ला चढवला मात्र त्याला सेनापती केशवरावाने यमसदनी धाडले. तरी सुद्धा न डगमगता भोजाचा एक पाळक पुत्र तिसरा हल्ला करावयास सज्ज झाला. त्यास हंबीररावाणे ठार मारले. आता मात्र भोजाचे उरले सुरले सैन्य पळत सुटले. मही बिंबाच्या फौजेचा मोठा विजय झाला. बिंबाने खुश होऊन अनेक वृत्या आणि पदव्या यांचे दान केले. सेनापती केशवरावाला त्याने गळ्यातील पदक देऊन चौधरीपणा अर्पण केला. देवनारच्या एका पाईकाला (शिपायाला) ठाकूर पद दिले. उत्तनच्या १२ शिपायांना राउत पद मिळाले.
ह्यानंतरच्या काही काळात मही बिंबाने शिलाहारांच्या ताब्यात असलेला सोपारा ते केळवे-माहीम आणि पुढे संजाण - नवसारी (महाराष्ट्र उत्तर सीमा) असा प्रदेश पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. मात्र तो नेमका कधी घेतला हे बखर स्पष्ट करीत नाही. आता मुंबई, ठाणे - साष्टी - कल्याण आणि सोपारा ते नवसारी अश्या विस्तृत प्रदेशावर त्याचे राज्य पसरलेले होते.
मही बिंबला अनेक बायका होत्या पण त्याला बहुदा एकही पुत्र नव्हता. त्याच्या उतार वयात त्याने कामाई नावाच्या स्त्री बरोबर लग्न केले आणि अखेर तिच्याकडून त्याला पुत्र झाला. त्याचे नाव केशवदेव ठेवले. शके ११३४ (इ.स. १२१२) मध्ये जेंव्हा मही बिंब वारला तेंव्हा हा केशवदेव अवघ्या ५ वर्षांचा होता. तेंव्हा अर्थातच राज्याचा कारभार कामाई देवीवर येऊन पडला. वयाने तरुण आणि रूपाने सुंदर असणाऱ्या कामाईवर राज्याच्या प्रधानाची वाकडी नाराज एव्हाना वळली होती. हे समजून आल्यावर राणी कामाईने तिच्या विश्वासातला माहिमचा एक सरदार हरदोपूर यास ह्यासंबंधी कळविले. हरदोपूराने विश्वासाचे राउत एकत्र केले आणि रात्रीच प्रधानाच्या महालात घुसून त्याचा शिरच्छेद केला. त्यानंतर काही काळाने हरदोपूरने केशवदेव बिंबाचा राज्यारोहण समारंभ घडवून आणला. अशा तर्हेने बिंब घराण्याचा तिसरा राजा राज्य करू लागला. केशवदेव बिंबाने राजा झाल्यावर अनेकांना इनामे दिली आणि ऐश्वर्याने राज्य केले असे बखर म्हणते. याचाच अर्थ त्याचा आजा प्रताप बिंब याने घेतलेल्या मेहनतीचे फळच तो चाखत होता असे म्हणावयास हरकत नाही. देशोधडीला लागलेला प्रांत गेल्या ८० वर्षात शेती, व्यापार-उदीम यांची भरभराट होऊन पुन्हा एकदा स्थिरस्थावर झाला होता.
वयात आलेल्या केशवदेवाने राजपितामह अशी पदवी धारण केली आणि त्याच्या बडेजावीचे पोवाडे त्याचा भाट संस्थानिकांच्या आणि मांडलिकांच्या राजधान्यासमोरून गाऊ लागला. चेउल येथील भोज घराण्याचा बिंब घराण्यावर राग होता. ३० वर्षांपूर्वी झालेला पराभव अजूनही भोजांच्या जिव्हारी लागलेला होताच. त्यांनी पुन्हा एकदा युद्धाचा पवित्रा घेतला आणि ठाण्यावर चालून आले. केशवदेवास ही बातमी कळतच त्याने सर्व देसाई एकत्र केले. बिंबाचे सैन्य पुन्हा एकदा खाडी उतरून कळव्याला भोजाचा मुकाबला करायला सज्ज झाले.
बखर म्हणते, 'परदळ देखता केशवदेवाने देसायांना हांकारा दिला. देसाय देसाय देश मिळाला. सिंद्याचा जमाव थोर झाला. नगाऱ्या घाव घातला. कर्णे, बांके, शिंगे, दफ, काहाळा, विराणी वाजली. पाईकापाईक झाली. कळव्या युद्धा थोर झाले.'
युद्धामध्ये देवनार येथील विनायक म्हातरे (म्हात्रे) याने बाण मारून राजा भोजाच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला. तुंबळ युद्धात भोज पुन्हा एकदा अपयशी झाला. इतक्यात म्हसगडचा संस्थानिक जसवंतराव भोजाच्या मदतीला धावून आला. पुन्हा एकदा लढाई माजली. ह्यावेळी बिंबाच्या फौजेमधल्या सिंद्यानी पराक्रम दाखवला आणि जसवंतरावास जिवंत पकडला. युद्धानंतर झालेल्या तहात केशवदेवाने जसवंतरावास जीवदान देऊन सोडून दिले आणि भोजासमोर मैत्रीचा हात पुढे केला. ही घटना शके ११४६ (इ.स. १२३४)च्या आसपास घडली. तेंव्हा केशवदेव अवघ्या १७ वर्षांचा होता.
उत्तरकोकणात हे सर्व सुरू असताना घाटावर मात्र चालुक्यांचे राज्य संपुष्टात येऊन देवगिरीच्या यादवांचे राज्य आलेले होते. बिंब, भोज यासारखे राजे स्वतंत्र होते की ते ह्या सम्राटांचे मांडलिक होते हे बखरीत कुठेच नीटसे स्पष्ट होत नाही. बिंब मुळचे जिथले होते तिथे ते चौलुक्यांचे उर्फ सोळंकी राजांचे मांडलिक होते पण कोकणात ते स्वतंत्र होते का ते समजत नाही. चौलुक्य आणि चालुक्य हे सुद्धा एकमेकांचे शत्रू होते. आता चालुक्यांच्या जागी यादव येऊन बसले होते. बिंब चौलुक्यांच्या बाजूला तर जसवंतराव आता यादवांच्या बाजूला जाऊन बसला होता. अशातच एक छोटीशी घटना घडली ज्याने कोकणात पुन्हा युद्धाचे वातावरण तापू लागले.
झाले असे की, भोजराजाने कोकणातून केशवदेव बिंबासाठी एक आंब्याची फर्मास पाठवली होती ती ह्या जसवंतरावाने मधल्यामध्ये हडप केली. केशवदेवाने जसवंतरावाकडे निरोप पाठवला की,'तुमच्या सारख्या भल्या लोकांनी चोऱ्या कराव्या हे युक्त नव्हे.' ह्यावर जसवंतरावाने उलट निरोप धाडला. 'मगदूर असेल तर आमच्या गडाला येऊन, किल्ल्याकुलुपे फोडून आंबे परत घेऊन जावे.' हे ऐकून केशवदेव बिंब पुन्हा एकदा युद्धास उद्युक्त झाला. गेल्यावेळी ह्या जसवंतरावला जिवंत सोडावयास नको होते असे त्याला नक्कीच वाटून गेले असेल. केशवदेवाने पुन्हा एकदा सूर्यवंशी, सोमवंशी आणि शेषवंशी देसायांना एकत्र केले आणि तो भैसेदुर्गवर चालून गेला. हा वेढा तब्बल १२ वर्षे सुरू होता.
बखरकार म्हणतो,'चिंचाचे चिंचवणी खाऊन त्याच्या चिंचोऱ्या ज्या पडल्या, त्या रुजून, त्यांचे वृक्ष होऊन, त्यांच्या चिंचा केशवदेवाच्या सैनिकांनी खादल्या.'
शेवटी आन्धेरीचा (अंधेरी) कोणी म्हातरा (म्हात्रे) तिथे कामाला होता त्याने भेद केला आणि किल्ला एकदाचा केशवदेवाच्या हाती आला. पुन्हा एकदा जसवंतराव केशवदेवाच्या हाती सापडला. केशवदेवाने त्यास ठार केले की नाही हे बखरीत स्पष्ट नाही पण जिवंत सोडले असेल असे प्रसंगावरून वाटत नाही. कारण बखरीत पुढे कुठेच ह्या जसवंतरावचा उल्लेख येत नाही. लढाई जिंकली म्हणून केशवदेवाने सर्व सरदारांना यथायोग्य इनामे दिली. ही लढाई अंदाजे शके ११५४ (इ.स. १२३२) मध्ये झाली. ह्यानंतर अवघ्या ५ वर्षात केशवदेव अचानक वारला. मरतेवेळी तो अवघ्या ३० वर्षाचा होता आणि त्यास कोणीच पुत्र-संतान नव्हते. अखेर सर्व देसायांनी मिळून मुख्यप्रधान जनार्दन यास गादीवर बसवायचा निर्णय घेतला.

नागरशा आणि बिंबदेव यादवाचे आगमन ...

शके ११५९ (इ.स. १२३७) मध्ये सर्व देसायांच्या संमतीने जनार्दन प्रधान गादीवर आला. मात्र तो फार काळ सत्ता उपभोगू शकला नाही. अवघ्या ४ वर्षात घणदिवीचा राजा नागरशा ठाण्यावर चालून आला. ह्यावेळेस मात्र जनार्दन प्रधान युद्ध जिंकू शकला नाही. नागरशाने युद्ध जिंकले आणि जनार्दनासच आपला मुख्य प्रधान बनवले. अशा तर्हेने बिंब राजघराण्याची सत्ता संपुष्टात आली. नागरशाने सर्व देसायांना एकत्र जमवून देशाचे कागद तपासले आणि ज्यांच्याकडे केशवदेवाचा शिक्का असलेला कागद होता त्यांच्या वृत्या तशाच पुढे चालू ठेवल्या.
केशवदेव बिंबाचा शिक्का असा होता -
बकदालभ्य यदा गोत्र प्रभावती कुलदेवता
ठाणे स्थाने कृतं राज्य मम मुद्रा विराजते

ह्याच दरम्यान नागरशाला पुत्र प्राप्ती झाली. त्याचे नाव त्रिपुरकुमर ठेवले. नागरशाने पुढील ३० वर्षे विनासायास राज्य केले. शके ११९३ मध्ये (इ.स. १२७१) पुन्हा एकदा उत्तर कोकण ढवळून निघाले. झाले असे की नागरशाचे ३ मेव्हणे नानोजी, विकोजी, बाळकोजी हे नागरशाकडे ठाणे, मालाड आणि मरोळ ही गावे बक्षिस मागत होते. त्रिपुरकुमर वयात येतोय हे पाहून त्यांना त्यांची स्वतंत्र व्यवस्था लावावीशी वाटली असेल. अर्थात ही मागणी नागरशाने नाकारली. ह्यावरून नाखूष होऊन ते ३ मेव्हणे देवगिरीला रामदेवराय यादव याच्याकडे आश्रयाला गेले. रामदेवराय नुकताच सम्राट पदावर आरूढ झालेला होता. त्याने तिघांचे म्हणणे ऐकून घेतले आणि नागरशाला जेरबंद करतो असे सांगितले. रामदेवरायाने आपला प्रधान हेमाडपंडित याला तिघांबरोबर सैन्य देऊन रवाना केले. हे सैन्य कळवा येथे पोचले असता ठाणे-चेंदणी येथील पाटलाने पिटाळून लावले. त्रिपुरकुमर ह्या सैन्याचा पाठलाग करू लागला. हे सैन्य माहुली किल्ल्याच्या आश्रयास गेले असताना तिथे त्यांच्याबरोबर युद्ध करून त्रिपुरकुमर विजयी झाला.
नागरशाने विजयानंतर विशेष हालचाल केली नाही म्हणून रामदेवरायदेखील शांत होता. रामदेवराय कोकणासाठी एक योजना मात्र निश्चितपणे आखत होता. त्याचे ४ पुत्र होते. शंकरदेव, केशवदेव, बिंबदेव आणि प्रतापशा. त्याने शंकरदेव यास स्वतःजवळ पैठण येथे ठेवून घेतले. केशवदेवास देवगिरी दिली, बिंबदेवास उदगीर प्रांत दिला तर प्रतापशाला अलंदापूरपाटण दिले. केशवदेव काही काळात वारला आणि त्याचा पुत्र रामदेवराय (दुसरा) हा देवगिरीच्या गादीवर आला. हाच तो रामदेवराय ज्याच्या काळात फक्त कोकणच नव्हे तर संपूर्ण दक्षिणपट हादरवणारी एक घटना घडली. ती म्हणजे नर्मदा ओलांडून अल्लाउद्दिन खिलजी देवगिरीवर चाल करून आला. साल होते शके १२१६ (इ.स.१२९४)
ह्यावेळी बिंबदेव यादव हा उदगीरहून गुजरातेकडे सरकला. बहुदा माळव्याच्या बाजूने अल्लाउद्दिनला पायबंद करायचा त्याचा डाव असावा पण तो फसला कारण जितक्या वेगाने अल्लाउद्दिन देवगिरीवर आदळला तितक्याच वेगाने तो परत गेला. देवगिरीला जाण्याऐवजी बिंबदेवाने ठाणे-कोकणच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. ह्या संपूर्ण प्रदेशावर त्याकाळी नागरशाची सत्ता होती. बिंबदेवाकडे नागरशाच्या तिप्पट-चौपट सैन्य होते. त्या जोरावर पुढच्या काही काळात बिंबदेव यादव याने नागरशाला हरवून त्याच्याकडून केळवे-माहीम, साष्टी, मुंबई हिसकावून घेतले आणि त्याला पेन - पनवेल - चेउल प्रांतात पिटाळून लावले. त्याने माहीम बेटात प्रमुख १२ सरदारांची नेमणूक केली. या शिवाय ४२ सूर्यवंशी, १२ सोमवंशी असे ५४ सरदार त्याने नेमले. हे सर्व ५४ सरदार म्हणजे कोकणात आलेले पातेणे उर्फ पाठारे प्रभू होय. प्रांताचे त्याने १५ मुख्य भाग केले आणि त्यावर फौज नेमून दिली. अशा प्रकारे देशाची व्यवस्था लावून तो महिकावती उर्फ माहीम येथे राहू लागला.
प्रतापबिंब - महीबिंब हे बिंब घराण्याचे राजे आणि बिंबदेव यादव हा यादव घराण्याचा राजा यातील फरक वाचकांच्या लक्ष्यात आला असेलच. नाव साधर्म्यामुळे गोंधळ होवू नये म्हणून इथे तसे स्पष्ट करीत आहे. शके १०६० साली प्रताप - मही बिंबाबरोबर ६६ सूर्य-सोम-शेषवंशी कुळे उत्तर कोकणात आली होती. त्यानंतर १५६ वर्षांनी शके १२१६ मध्ये बिंबदेव यादव याच्याबरोबर अजून ५४ सूर्य-सोमवंशी कुळे उत्तर कोकणात येऊन वसली.
 नागरशाचा प्रतिहल्ला

बिंबदेव यादव महिकावती, साष्टीआणि मुंबई भागात शके १२१६ ते १२२५ (इ.स. १२९४ ते १३०३) या दरम्यान राहत होता. यादवांचे मुळचे देवगिरी - पैठणचे राज्य कधीच खिलजीच्या हाती गेले होते. बिंबदेव आपल्या २ राण्यांबरोबर महिकावती येथे राज्य करू लागला. मोठ्या राणीचे नाव नगर सिद्धी होते आणि तिला प्रतापशा नावाचा पुत्र होता. धाकट्या राणीचे नाव गिरीजा होते आणि तिला पूरशा नावाचा पुत्र होता. शके १२२५ मध्ये बिंबदेव वारला आणि त्याचा ज्येष्ठ पुत्र प्रतापशा गादीवर आला. ह्या ९ वर्षात चेउल येथे नागरशा वृद्ध झालेला होता. त्याला त्रिपुरकुमर शिवाय केशवदेव नावाचा दुसरा पुत्र आणि एक मुलगी देखील होती. ह्या मुलीचे लग्न त्याने प्रतापशा यादव बरोबर लावले होते.
पुढे शके १२३२ मध्ये मात्र प्रतापशा यादव याला देवगिरी वरून मदत मिळायची फार अपेक्षा नसल्याने त्रिपुरकुमर याने नवी कुरापत काढली. मेढालगड नावाचा एक डोंगरी किल्ला त्याने आपला मेव्हणा प्रतापशा यासकडे मागितला. अर्थात त्याला प्रतापशाने नकार दिला. इतके कारण पुरे धरून त्रिपुरकुमरने आपला भाऊ केशवदेव यास सोबत घेऊन लढाईची तयारी केली. प्रतापशाने देवगिरीकडे मदतीचे हात पसरीले. देवगिरीवरून रामदेवरायने काही फौज रवाना केली पण त्रिपुरकुमरने त्यांना शहापूर - माहुली येथेच गाठून धुळीस मिळवले. दुसरीकडे प्रतापशाने स्वतः लढाईची काही तयारी केली होती पण जेंव्हा त्याला ही बातमी पोचली तेंव्हा तो निराश होऊन आपल्या फौजेसह डहाणू - सायवन येथील गगनमहाल येथे आश्रयास निघून गेला.
त्रिपुरकुमरने यादव फौजेचा माहुलीला पराभव केला म्हणजे त्याआधी साष्टी - कल्याण त्याच्या हातात आले होते हे स्पष्ट होते. आपल्या हातचा बराच भाग त्रिपुरकुमरने जिंकला आणि येणाऱ्या फौजेचा सुद्धा पराभव केला हे ऐकून, कच खाऊन प्रतापशा बहुदा थोडा मागे डहाणूला गेला असेल. इथे त्रिपुरकुमर फौज घेऊन महिकावतीच्या दिशेने वेगाने येत होता. दरम्यान रामदेवरायाने देवगिरीहून नवी फौज लढाई करता रवाना केली होती. ह्या दोन फौजा वैतरणा नदीच्या काठी असलेल्या तांदूळवाडी येथे समोरा समोर आल्या. पण आता त्रिपुरकुमर पराभूत होणार नव्हता. तुंबळ युद्धात त्याने पुन्हा एकदा यादव सेनेचा धुव्वा उडवला आणि प्रतापशाच्या महिकावातीवर पुन्हा एकदा कब्जा केला. पुढच्या काही काळात त्याने प्रतापशाच्या प्रमुख ५४ प्रभू सरदारांना आपल्याकडे वळवून घेतले आणि त्याना योग्य असे अधिकार देऊन टाकले. अशा तर्हेने नागरशाने आपले गेलेले राज्य पुन्हा मिळवून घेतले. मृत्युपूर्वी त्याला ते एक समाधान नक्कीच मिळाले असेल. नागरशा मागोमाग पुढच्या २० एक वर्षात त्रिपुरकुमर आणि केशवदेव हे त्याचे दोन्ही पुत्र मरण पावले. त्रिपुरकुमर मागून त्याचा पुत्र नागरशा दुसरा गादीवर आला.
तिथे २०-२५ वर्ष प्रतापशा मोजक्या डहाणू भागावर नियंत्रण ठेवून कसाबसा जगत होता. त्याचे सर्व सरदार अधिकारी नागरशाचे झालेले होते. उरलेल्या देसाई पाटलांना नागरशा दुसरा याने शके १२५४ (इ.स. १३३२) मध्ये फितवून प्रतापशा याचा सर्वनाश करून टाकला. अश्या तर्हेने नागरशाने यादव राजघराण्याचे नाव अवघ्या ३८ वर्षात कोकणातून पुसून टाकले. उत्तर भारत आणि महाराष्ट्रात मुसलमानांचे राज्य आलेले होते. फक्त उत्तर कोकणात नागरशा हा एकमेव स्वतंत्र हिंदू राजा उरला होता.

 कोकणात निका मलिकचे आगमन

 

शके १२५४ (इ.स.१३३२) मध्ये साष्टी - मुंबई भागात पुनःश्च सत्ता प्रस्थापित झाल्यावर नागरशा दुसरा याने आपल्या सरदारांना अनेक इनामे दिली. ह्यात एक जैतचुरी नावाचा त्याच्या विश्वासातील एक सरदार होता. त्याला नागरशा दुसरा याने त्याला साष्टी येथील बंदरकीचा मामला सुपूर्त केलेला होता. ह्या जैतचुरीस भागडचुरी आणि कमळचुरी असे २ पुत्र होते. त्यातील भागडचुरीच्या हातात बंदरकीच्या आसपासच्या जमिनीचा मामला सुपूर्त होता. ह्या भागडचुरीने नव्याने जानिमीची मोजणी केली. ७ हातांची एक काठी आणि १२ काठ्यांचा बिघा आणि १२८ बिघ्याचा एक चावर अशी नवीन पद्धत अमलात आणली. थोडक्यात त्याने एका चावर मधील बिघ्याची संख्या वाढवून नागरशा याला सरकारी उत्पन्न वाढवून दिले. ह्यामुळे नागरशा खुश असला तरी जमिनीचा सारा वाढल्याने सामान्य रयत मात्र नाराज होती.
३-४ वर्षात त्याची बुद्धी इतकी फिरली की त्याने मालाडच्या सोम देसायाच्या वहिनीला जबरदस्तीने पळवून नेण्याची भाषा सुरू केली. त्याने सोम देसाई, त्या बाईचा नवरा आणि घरातील इतर पुरुषांना बंदी केले. नशिबाने कोण्या एका आप्तेष्टाने त्या स्त्रीस रातोरात कुर्हार येथे नेऊन पोचवले. तिथून ती तिच्या माहेरी भाईंदर येथे गेली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तेंव्हा ती ४ महिन्याची गरोदर होती. इथे ती सुरक्षित नाही असे कळून आल्याने तिच्या माहेरच्यांनी तिला भिवंडी येथे तिच्या भावाकडे पाठवले. भागडचुरीला ती नेमकी कुठे गेली या गोष्टीचा पत्ता लागला नाही म्हणून त्याने तिच्या नवऱ्यास ठार केले. त्या स्त्रीस भिवंडी येथे पुत्र जन्मास आला. तो १२ वर्षाचा झाल्यावर त्याला स्वतःच्या आईकडून आपल्या वडिलांच्या हत्येची सर्व माहिती कळली. तेंव्हा त्याचा राग अनावर झाला आणि त्याने नागरशाला 'मी भागडचुरीला ठार मारणार म्हणून कळवले.'
ह्या १२ वर्षात भागडचुरीचा उच्छाद इतका वाढला होता की नागरशाला देखील तेच हवे होते. त्याने स्वतःची संमती त्या मुलास कळवली. एके दिवशी वेळ साधून त्या मुलाने सोबतीला काही लोक घेऊन भागडचुरीला देवीच्या जत्रेत गाठले आणि हल्ला केला. झटापटीत चुरी पळाला आणि खाडीत उड्या टाकून पळायला लागला. तेंव्हा त्या मुलाने जवळच असलेल्या होडीच्या तांडेलाला सांगितले की तू भागडचुरी मारशील तर तुला हवे ते देईन. ह्या आमिषाने तांडेलाने 'मला आपल्या जातीत घ्याल तर मारतो' असे वाचन मागितले. मुलानेही त्याची अट कबूल केली. त्यावरून तांडेलाने भागडचुरीला ठार केले. प्रसन्न होवून मुलाने प्रितीभोजन घातले आणि तांडेलाला सोबत भोजनास बसवून जातीत सरता देखील केले. हे ऐकून नागरशा संतापला आणि तांडेलाला जातीत घेणारया लोकांची अधिकारपदे त्याने काढून टाकली.
पण गम्मत म्हणजे तांडेलाने भागडचुरीला ठार मारलेच नव्हते. भागडचुरी त्यानंतर अनेक दिवस लपून बसला होता. त्याने देसायाच्या मुलाचा बदला घ्यायचे ठरवले होते. दुसरीकडे त्याने नागरशा विरुद्ध नगरच्या निका मलिक बरोबर संधान बांधले. हा निका मलिक म्हणजे महंमद तुघलक याचा दक्षिणेतील हस्तक होता. भागडचुरीने त्याचा नाथराव नावाचा एक भाट नागरशाकडे पाठवला आणि निका मलिकच्या नावाने त्यावर दबाव आणायचा प्रयत्न सुरू केला. पण नागरशा काही घाबरणारयांपैकी नव्हता. त्याने नाथरावाचे नाक कापून त्याला भागडचुरीकडे पाठवून दिले. भागडचुरीने ह्याचा फायदा घेत त्या भाटास निका मलिककडे पाठवून दिले. हे सर्व ऐकून-पाहून निका मलिक फौज घेऊन साष्टीवर चालून आला. त्याच्या फौजेने ठाण्यावर हल्ला करत नागरशाच्या फौजेला मागे रेटले. शिव आणि कान्हेरी अश्या दोन्ही ठिकाणी देखील नागरशाची फौज अपयशी ठरली. तो स्वतः वाळूकेश्वरी होता. तो मलिकवर चालून आला. भायखळ्याला झालेल्या तुंबळ युद्धात नागरशा ठार झाला. अशा तर्हेने शके १२७० (इ.स. १३४८) मध्ये ठाणे - कोकणात मुसलमानी राज्य आले. मलिकने नागरशाचा पुत्र लाहूरशा याला मंडलिक बनवून घेतले.
बखर म्हणते की, 'कलियुगात असे होणार अशी भाक लक्ष्मी-नारायणाने कलीस दिली होती. ती भाक शक १२७० मध्ये पूर्ण खरी ठरली. हरिहर गुप्त झाले. ऋषी बद्रीकाश्रमास गेले. वसिष्ठ राजगुरूंनीही पाठ फिरविली. त्यामुळे सोमवंशी व सूर्यवंशी यांची शस्त्रविद्या लुप्त होऊन म्लेच्छांचा जय झाला.'
म्लेच्छांचे राज्य आल्यावर मात्र सर्व सूर्यवंशी - सोमवंशी देसाई - पाटील सामान्य रयत होऊन बसले. मलिक संपूर्ण प्रदेशाचा कारभार भागडचुरीच्या सल्ल्याने पाहू लागला.

कोकणात निका मलिकचे आगमन


शके १२५४ (इ.स.१३३२) मध्ये साष्टी - मुंबई भागात पुनःश्च सत्ता प्रस्थापित झाल्यावर नागरशा दुसरा याने आपल्या सरदारांना अनेक इनामे दिली. ह्यात एक जैतचुरी नावाचा त्याच्या विश्वासातील एक सरदार होता. त्याला नागरशा दुसरा याने त्याला साष्टी येथील बंदरकीचा मामला सुपूर्त केलेला होता. ह्या जैतचुरीस भागडचुरी आणि कमळचुरी असे २ पुत्र होते. त्यातील भागडचुरीच्या हातात बंदरकीच्या आसपासच्या जमिनीचा मामला सुपूर्त होता. ह्या भागडचुरीने नव्याने जानिमीची मोजणी केली. ७ हातांची एक काठी आणि १२ काठ्यांचा बिघा आणि १२८ बिघ्याचा एक चावर अशी नवीन पद्धत अमलात आणली. थोडक्यात त्याने एका चावर मधील बिघ्याची संख्या वाढवून नागरशा याला सरकारी उत्पन्न वाढवून दिले. ह्यामुळे नागरशा खुश असला तरी जमिनीचा सारा वाढल्याने सामान्य रयत मात्र नाराज होती.
३-४ वर्षात त्याची बुद्धी इतकी फिरली की त्याने मालाडच्या सोम देसायाच्या वहिनीला जबरदस्तीने पळवून नेण्याची भाषा सुरू केली. त्याने सोम देसाई, त्या बाईचा नवरा आणि घरातील इतर पुरुषांना बंदी केले. नशिबाने कोण्या एका आप्तेष्टाने त्या स्त्रीस रातोरात कुर्हार येथे नेऊन पोचवले. तिथून ती तिच्या माहेरी भाईंदर येथे गेली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तेंव्हा ती ४ महिन्याची गरोदर होती. इथे ती सुरक्षित नाही असे कळून आल्याने तिच्या माहेरच्यांनी तिला भिवंडी येथे तिच्या भावाकडे पाठवले. भागडचुरीला ती नेमकी कुठे गेली या गोष्टीचा पत्ता लागला नाही म्हणून त्याने तिच्या नवऱ्यास ठार केले. त्या स्त्रीस भिवंडी येथे पुत्र जन्मास आला. तो १२ वर्षाचा झाल्यावर त्याला स्वतःच्या आईकडून आपल्या वडिलांच्या हत्येची सर्व माहिती कळली. तेंव्हा त्याचा राग अनावर झाला आणि त्याने नागरशाला 'मी भागडचुरीला ठार मारणार म्हणून कळवले.'
ह्या १२ वर्षात भागडचुरीचा उच्छाद इतका वाढला होता की नागरशाला देखील तेच हवे होते. त्याने स्वतःची संमती त्या मुलास कळवली. एके दिवशी वेळ साधून त्या मुलाने सोबतीला काही लोक घेऊन भागडचुरीला देवीच्या जत्रेत गाठले आणि हल्ला केला. झटापटीत चुरी पळाला आणि खाडीत उड्या टाकून पळायला लागला. तेंव्हा त्या मुलाने जवळच असलेल्या होडीच्या तांडेलाला सांगितले की तू भागडचुरी मारशील तर तुला हवे ते देईन. ह्या आमिषाने तांडेलाने 'मला आपल्या जातीत घ्याल तर मारतो' असे वाचन मागितले. मुलानेही त्याची अट कबूल केली. त्यावरून तांडेलाने भागडचुरीला ठार केले. प्रसन्न होवून मुलाने प्रितीभोजन घातले आणि तांडेलाला सोबत भोजनास बसवून जातीत सरता देखील केले. हे ऐकून नागरशा संतापला आणि तांडेलाला जातीत घेणारया लोकांची अधिकारपदे त्याने काढून टाकली.
पण गम्मत म्हणजे तांडेलाने भागडचुरीला ठार मारलेच नव्हते. भागडचुरी त्यानंतर अनेक दिवस लपून बसला होता. त्याने देसायाच्या मुलाचा बदला घ्यायचे ठरवले होते. दुसरीकडे त्याने नागरशा विरुद्ध नगरच्या निका मलिक बरोबर संधान बांधले. हा निका मलिक म्हणजे महंमद तुघलक याचा दक्षिणेतील हस्तक होता. भागडचुरीने त्याचा नाथराव नावाचा एक भाट नागरशाकडे पाठवला आणि निका मलिकच्या नावाने त्यावर दबाव आणायचा प्रयत्न सुरू केला. पण नागरशा काही घाबरणारयांपैकी नव्हता. त्याने नाथरावाचे नाक कापून त्याला भागडचुरीकडे पाठवून दिले. भागडचुरीने ह्याचा फायदा घेत त्या भाटास निका मलिककडे पाठवून दिले. हे सर्व ऐकून-पाहून निका मलिक फौज घेऊन साष्टीवर चालून आला. त्याच्या फौजेने ठाण्यावर हल्ला करत नागरशाच्या फौजेला मागे रेटले. शिव आणि कान्हेरी अश्या दोन्ही ठिकाणी देखील नागरशाची फौज अपयशी ठरली. तो स्वतः वाळूकेश्वरी होता. तो मलिकवर चालून आला. भायखळ्याला झालेल्या तुंबळ युद्धात नागरशा ठार झाला. अशा तर्हेने शके १२७० (इ.स. १३४८) मध्ये ठाणे - कोकणात मुसलमानी राज्य आले. मलिकने नागरशाचा पुत्र लाहूरशा याला मंडलिक बनवून घेतले.
बखर म्हणते की, 'कलियुगात असे होणार अशी भाक लक्ष्मी-नारायणाने कलीस दिली होती. ती भाक शक १२७० मध्ये पूर्ण खरी ठरली. हरिहर गुप्त झाले. ऋषी बद्रीकाश्रमास गेले. वसिष्ठ राजगुरूंनीही पाठ फिरविली. त्यामुळे सोमवंशी व सूर्यवंशी यांची शस्त्रविद्या लुप्त होऊन म्लेच्छांचा जय झाला.'
म्लेच्छांचे राज्य आल्यावर मात्र सर्व सूर्यवंशी - सोमवंशी देसाई - पाटील सामान्य रयत होऊन बसले. मलिक संपूर्ण प्रदेशाचा कारभार भागडचुरीच्या सल्ल्याने पाहू लागला.

ठाणे - कोकणचे मुसलमानी राज्य


नागरशा राज्यभ्रष्ट झालेला पाहून भागडचुरी अर्थात आनंदला होता. प्रांताचा संपूर्ण कारभार मलिक भागडचुरीवर सोपवून होता त्यामुळे भागडचुरी आता अधिकच उद्दाम झाला होता. त्याने पुन्हा सोम देसायाशी असलेले जुने वैर उकरून काढले आणि जिच्यावर भागडचुरीची वाईट नजर होती त्या स्त्रीच्या माहेरच्या लोकांवर म्हणजे भाईदरच्या पाटलावर आरोप केले. सरकारच्या ३२ हजार सजगणी (सजगणी हा नाण्याचा प्रकार असून त्याचे मूल्य २ पैसे असे) पाटलाने खाल्याचा खोटा आरोप भागडचुरीने पाटलावर केला आणि त्यास कैद करून टाकले. शेवटी सोम देसला याने ते पैसे सरकारात जमा करून पाटलास सोडवून आणले. आता भागडचुरीने मालिकांचे काम भरले की हा सोम देसला लुच्चा असून त्यास दस्त करावयास हवे. मलिकने निष्कारण सोम देसला याला १६ हजार दाम दंड भरावयास सांगितले. ह्यावर सोम देसलाने नाराजी व्यक्त करून तो भरायला नकार दिला.
बास.. इतके कारण पुरे होऊन मालिकाने त्याची देसाई काढून भागडचुरीला देऊ केली. पण भागडचुरीला देसायाला संपवायचेच होते. त्याने सोम देसला आणि त्याचा भाऊ पायरुत याला जीवे मारल्याखेरीज देसाय पद घेणार नाही असे मलिकला कळवून टाकले. झाले.. ह्यावरून मालिकाने सोम देसला आणि त्याचा भाऊ पायरुत ह्यांना दिल्ली येथे नेऊन बादशहाकरवी त्यांचे जीव घेतले. बखर म्हणते की, बादशहाने पायरुताची चामडी सोलून त्यास ठार केले तर सोम देसल्याचे पोट चिरून, त्याच्या आतड्याची वात वळून आणि चरबीचे तेल जाळून, त्याचा दिवा लाविला. ही असली क्रूर आणि भयानक शिक्षा सोम देसल्याला आणि त्याच्या भावाला मिळाल्याने संपूर्ण भागात भागडचुरीची दहशत बसली. पण पायरुतचा मुलगा दादरुत ह्याला मात्र भागडचुरीचा बदला घ्यायचा होताच. त्याने पुन्हा विश्वासातील लोक जमवून भागडचुरी आणि कमळचुरी यांवर हल्ला चढवला. कमळचुरी जागीच ठार झाला पण भागडचुरी पुन्हा पळू लागला. ह्यावेळी मात्र तो फार पळू शकला नाही. कोणा गोम तांडेलाने कोयती हाणून त्याचा वध केला आणि दादरुतची वाहवा मिळवली.
भागडचुरीचा असा अंत झाल्याचे पाहून मलिक देखील सावध झाला. लोकांच्या कलेने घेतल्याखेरीज निभाव लागणार नाही हे त्याला ठावूक होते. त्याने नागरशा दुसरा याचा पुत्र लाहुरशा याला पुन्हा माहीमच्या गादीवर बसवले आणि कारभार हाकावयास सांगितले. हे सर्व अवघ्या वर्षभराच्या कालावधीत झाले. लाहूरशा याने ९ वर्ष माहीम वरून राज्यकारभार पाहिला. पुढे शके १२७९ (इ.स. १३५७) मध्ये मलिकने राज्य नायते राजांच्या हाती दिले. नायते हे शक १११६ पासून सामान्य देसाई होते. पुढे ते मुसलमान झाले आणि मलिकच्या दरबारात बहुदा त्यांनी वजन प्राप्त केले असेल. त्यांच्या कारकिर्दीत इतर देसाई आपापली कामे पाहून होते. कोणीही कुठलाही उठाव करण्याचा प्रयत्न केला नाही. लाहूरशा नंतर त्याच्या घराण्याचा कोणीही इतका बलशाली झाला नाही की तो पुन्हा उठाव करून राज्य हस्तगत करू शकेल. नायते याने मलिकच्या आणि पर्यायाने दिल्लीच्या पातशहाच्या आशीर्वादाने तब्बल ४० वर्षे राज्य केले. पुढे कोणी भोंगळे म्हणून राजे आले त्यांनी २० वर्षे राज्य केले. जव्हार येथे असणारा वाडा बहुदा ह्यांनीच बांधला. (मला खात्री नाही पण खूप वर्ष आधी गेलो होतो तेंव्हा पाहिल्याचे स्मरते) पुन्हा शके १३५१ मध्ये राज्य अमदाबादचा सुलतान (ह्यांचा नायते राजांशी जवळचा संबंध होता.) ह्याने घेतले. राज्य कोणाचेही असो, सर्वोच्च सत्ता दिल्लीची होती. पुढे अनेक वर्ष (अंदाजे ८०) अमदाबादचा सुलतान ठाणे -साष्टी आणि महिकावती भागावर राज्य करून होते.
नर्मदा ओलांडून अल्लाउद्दिन खिलजी दख्खनेत येणे ही जशी धक्कादायक घटना होती तशीच अजून एक घटना शके १४२२ मध्ये घडली. ती महिकावती प्रांतात घडली नसली तरी पुढच्या २०० वर्षात ह्या घटनेचा संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मोठाच परिणाम झाला. ती घटना म्हणजे २ तरावे घेऊन पोर्तुगीझ कोची बंदरात उतरले. आपण सर्वांनी वास्को-द-गामा हा भारतात आलेला पहिला पोर्तुगीझ दर्यावर्दी असल्याचे शाळेत वाचले आहे. पण बखरीत त्याचा उल्लेख येत नाही. कप्तान लोरेस लुईस देत्राव ह्याच्या नेतृत्वाखाली सिनोर देस्कोर आणि बोजीजुझ अशी २ जहाजे कोची बंदरात दाखल झाली होती. वास्को-द-गामा हा बहुदा यात असावा.
 नायटे भटकळ कारवारकडून गोव्यात आले अशी नोंद आहे. त्या काळात गोव्यात विजयानगरच्या सम्राटांचं राज्य होतं त्यामुळे ते तिथून आणखी उत्तरेकडे सरकले असतील हे सहज शक्य आहे. पण त्यांच्या या प्रवासाबद्दल अधिक माहिती मिळवायला पाहिजे.

कोकणातील फिरंगाण

शके १४२२ (इ.स. १५००) मध्ये पोर्तुगीझांनी कोची बंदर ताब्यात घेतले आणि वखार घालून व्यवसाय करू लागले. जागा बळकट करू लागले. अवघ्या १२ वर्षात तिथून गोवा आणि मग थेट वसई - दमण प्रांतात आले आणि तिथेही व्यापार करू लागले. वसईच्या दांडाळे तळे ह्याठिकाणी तटबंदी उभी करून त्यांनी वस्ती केली. अर्थात हे सर्व प्रांताचा मुसलमान सुभेदार याच्याकडून परवानगी घेऊन अधिकृतरित्या चाले. आवश्यक तेंव्हा पोर्तुगीझाचा वकील दिल्ली दरबारी हजेरी लावी. नंतर नंतर डच, ब्रिटीश, फ्रेंच जसजसे भारतात येऊ लागले तसे पोर्तुगीझाचे वकील हे कायम स्वरूपी दिल्ली-आग्रा येथे राहू लागले. सुरवातीला त्यांच्या हजेरीत आणि वजनामुळे इतर युरोपीय सत्तांना दिल्लीवरून सवलती मिळवून घेणे कठीण पडत होते.
पुढे तर गोव्यावरून आरमार आणून कप्तान आलमेद याने लष्करीदृष्ट्या वसई ते दमण हा भाग ताब्यात घेतला. थोडक्यात महिकावती प्रांतावर पोर्तुगीझ या नव्या राज्यकर्त्यांचे आगमन झाले होते. प्रांतातील देसायांना त्याने काही विशेष फरक सुरवातीला पडण्याचे कारण नव्हते. कारण मुसलमान राजे तसेच फिरंगी. धर्म-कर्म आणि व्यापार उदीम याला पोर्तुगीझांनी सुरवातीला कसलेच बंधन घातले नाही. जवळ-जवळ २५ वर्षे इथे बस्तान पक्के बसवल्यानंतर पोर्तुगीझांनी धर्मछ्ळ सुरू केला. अनेकांना बाटवले आणि जे तयार झाले नाहीत त्यांना कैद करून गोव्याला पाठवले. आजही वसई प्रांतात मोठ्या प्रमाणावर धर्मांतरित झालेले हिंदू आहेत. त्यांची आडनावे हिंदू असली तरी ते ख्रिस्त धर्माचे पालन करतात. ह्यात बहुसंख्य लोकांचे पूर्वज हे शेष, सूर्य आणि सोमवंशीय क्षत्रिय आहेत जे बिंब, यादव आणि नागरशाच्या काळात सुखाने नांदत होते. अजून एक म्हणजे वसई आणि आसपासच्या भागात जसे ख्रिस्त मोठ्या प्रमाणावर आढळतात तसे ते वैतरणा नदीच्या पलीकडे म्हणजे सफाळे, केळवे - माहीम उर्फ महिकावती आणि पुढे डहाणू - बोर्डी येथे आढळत नाहीत. ह्याचे कारण काय असावे?
बिंबदेव यादव याचा पुत्र प्रतापशां यादव महिकावती भागावर राज्य करत होता हे आपण मागे पाहिले आहेच. प्रतापशांची एक स्त्री होती जिच्या देवशा नावाच्या पुत्राला प्रतापशांने काही गावांचे हक्क दिलेले होते. ह्या देवशाचा पुत्र रामशा याने शके १२९४ (इ.स. १५७२) मध्ये वाडा-जव्हार आणि आसपासच्या भागातील १५७ गावे जिंकून राम नगर स्थापिले होते. आज ठाणे जिल्ह्यातील जे रामनगर आपण ऐकतो ते हेच. त्या प्रांतावर रामशा उर्फ यादवांचे वंशज राज्य करीत होते. ह्या प्रांतावर पोर्तुगीझांची नजर गेली आणि त्यांनी रामनगर ताब्यात घेण्याचे ठरवले. त्यावेळी तेथे कोणी कोळी उमराव होता त्याची मदत पोर्तुगीझांनी घेतली आणि त्याला चौथाई देऊन रामनगर सोबत तह केला. पोर्तुगीझांच्या जोरावर कोळी माजला आणि त्याने स्वतंत्र कारभार सुरू केला.
महिकावतीची बखर मधील प्रकरणे १ आणि ४ (जी खरेतर सर्वात शेवटी लिहिले गेली - पहा भाग १) ही ह्याच काळात लिहिली गेली. भगवान दत्त नामक लेखकाने पूर्वीची टिपणे वापरून बखरीत नव्याने माहिती जोडली आणि ती भावी पिढ्यांसाठी उपलब्ध करून दिली.
पुढे पोर्तुगीझांनी वसई ते डहाणू अशी २७ सागरी किल्ल्यांची साखळी उभी केली. हे किल्ले लहान असले, काही तर नुसते बुरुज सदृश्य असले तरी टेहाळणीच्या दृष्टीने मोक्याचे होते. दुसरीकडे अशेरी-अडसूळ, तांदूळवाडी, कोहोज, टकमकगड, काळदुर्ग हे डोंगरी किल्ले मजबूत करून पोर्तुगीझ वसई प्रांतात कायमचे बसले तें बसले. अखेर शके १६६१ (इ.स. १७३९) मध्ये चिमाजी आपा यांच्या वसई मोहिमेने तें तिथून हुसकावले गेले. २०० वर्ष पोर्तुगीझांनी दमण ते वसई आणि चौल - रेवदंडा भागात निर्विवाद राज्य केले. आजही त्यांचे अस्तित्व तेथे स्पष्टपणे जाणवते आणि खुपसे खुपते...
इथे बखरीचा ऐहासिक घटनाक्रम संपतोय मात्र पुढील भागापासून बखरीच्या अनुषंगाने इतर काही ऐतिहासिक समकालीन बाबींवर उजेड पाडण्याचा प्रयत्न करुया.
 पुर्वी घारापुरी, शूर्पारक (नाला सोपारा) -- नाणेघाट --- जून्नर हा व्यापाराचा मार्ग होता. त्याचा काही प्रभाव या भागावर पडलेला दिसत नाही. वसईचे ख्रिश्चन अगदी वेगळ्याच स्वभावाचे असत, कष्टाळू आणि प्रेमळ. त्यांच्या भाषेवर, नेसूवर पण वेगळाच प्रभाव आहे. आता माहीत नाही, पण पुर्वी त्या बायका पांढरा ब्लाऊज आणि एकाच प्रकारचे लाल रंगाचे चौकडीचे लुगडे नेसत.

पण शूर्पारकचे जेंव्हा सोपारे / सोपारा झाले त्याच दरम्यान येथील बंदराला ओहोटी लागलेली होती असे दिसते. कल्याण बंदर म्हणून नावारूपाला आले होते आणि अर्थात नाणेघाटाच्या जवळ असल्याने त्याला महत्व प्राप्त झाले असेल... वसईवर रजिन डिसिल्वा यांनी बरेच अभ्यासपूर्वक काम केले आहे. आता माझा मित्र श्रीदत्त राउत हा वसई किल्ला संवर्धन आणि त्याच्या अभ्यासात गेली ४-५ वर्ष बुडून गेला आहे. पोर्तुगीझ कागद तपासता यावे म्हणून त्यांची भाषा शिकणे, मराठा कागद वाचता यावेत म्हणून मोडी शिकणे असे बरेच काय काय करतोय. मध्ये तो गोव्याला देखील गेला होता काही कागदपत्र पहायला. 
 देवगिरीच्या लढाईचे सत्य


फारसी कागदपत्रे आणि काही मराठी संदर्भ यावरून शके १२१६ मध्ये (इ.स.१२९४) अल्लाउद्दिन खिलजी याने देवगिरीवर स्वारी केली आणि दख्खनेत मुसलमानी वरवंटा फिरवला असे वाचलेले बहुतेकांना ठावूक असते. पण अनेक ठिकाणी 'चार घटकेत रामदेवाचे राज्य अल्लाउद्दिनने घेतले' हा उल्लेख येतो तो चुकीचा आहे हे ह्या बखरीच्या संदर्भाने सांगावेसे वाटते. अल्लाउद्दिनने हल्ला करण्याआधी रामदेवरायाची स्थिती काही विशेष चांगली नव्हती. ठाणे-कोकणातील नागरशा सारख्या छोट्या राजाने देखील त्याचा पराभव केलेला होता हे आपण मागे पाहिले आहेच पण तरीही त्याने अल्लाउद्दिन विरुद्ध प्रखर लढा दिला होता. मुसलमानी आक्रमणाला तोंड देण्याची तयारी त्याने केली होती असेही दिसते.
रामदेवाने भुरदासप्रभू वानठेकर याच्याकडे सैन्याचे सर्व अधिकार दिले होते. तर भुरदासप्रभूचा पुत्र चित्रप्रभू याच्याकडे दुय्यम सेनाधिकार होता. सुमध नावाचा रामदेवाचा प्रधान होता. इतर अनेक मराठा संस्थानिक आणि ब्राह्मण मात्र रामदेवापासून फुटून फुटून निघाले होते. ह्याचे कारण त्यांच्यामधील वितुष्ट होते. ह्याच संधीचा फायदा घेऊन अल्लाउद्दिनने हे आक्रमण केले असावे का?
अल्लाउद्दिन खुद्द स्वतःच्या हसन आणि हुसेन २ मुलांसह देवगिरीवर वेढा घालून हल्ला चढवला असे बखर म्हणते. जेंव्हा खुद्द लढाई जुंपली तेंव्हा सुमधने तुंबळ युद्धात हसन यास यमसदनी धाडले. आपल्या भावाचा वध झालेला पाहताच हुसेन यादव सैन्यावर चाल करून आला. ह्यावेळी त्याला चित्रप्रभू सामोरा गेला. ह्या हल्यात चित्रप्रभूने हुसेन यास ठार केले. असे एका मागोमाग अल्लाउद्दिनचे दोन्ही पुत्र ठार झाले. तुर्की सैन्यात एकच बोंबाबोंब झाली. आता खुद्द अल्लाउद्दिन त्वेषाने चालून आला आणि पुन्हा एकदा खडाजंगी सुरू झाली. ह्यावेळी लढाईत भुरदासप्रभू धारातीर्थी पावन झाला. मुलांच्या मृत्यूने त्वेषात येऊन अल्लाउद्दिन जितक्या त्वेषाने चालून आला त्याहीपेक्षा अधिक त्वेषाने चित्रप्रभू आपल्या वडिलांच्या मृत्यूने अल्लाउद्दिन वर चालून गेला. पुन्हा एकदा यादव सेनेने म्लेच्छांच्या सैन्याला पराभूत करून पिटाळून लावले.
आता हे सर्व काही एका दिवसात झाले की काही दिवसात ते बखर स्पष्ट करत नाही. पण ह्यावरून यादव सेनेने पहिला विजय संपादन केला होता हे मात्र नक्कीच स्पष्ट होते.
आपल्या मुलांच्या मृत्यूने आणि पराभवाने क्रोधील अल्लाउद्दिन पुन्हा एकदा देवगिरीवर उलटून आला. ह्यावेळी त्याला रोखणे कोणालाच शक्य झाले नाही. चित्रप्रभू मारला गेला आणि अखेरीस म्लेच्छांचा जय झाला. महाराष्ट्रावर पाहिले मुसलमानी राज्य लादले गेले होते.
राजवाडे म्हणतात की, ह्या लढाईच्या वेळी रामदेवाबरोबर त्याचे संस्थानिक, मुत्सद्दी, सरदार आणि सामान्य लोक देखील सोबत नव्हते म्हणून तो हा पराभव थांबवू शकला नाही.
काय योगायोग आहे बघ. करबालाच्या लढाईत ठार झालेल्या भावांची नावेही हसन आणि हुसेनच. या दोंघांच्या मृत्यूचा विलाप म्हणून मोहरम चा दिवस मानतात.
या दोघांच्या मृत्यूनंतर जो विलाप झाला, तो मराठी गाण्यात आजही या रिवायतीच्या रुपाने उरलाय..
रंगीन पालना हौसेनं केला, माझा झुलनार निघून गेला...
आणि आपण मात्र, रामदेवाबाब चुकिचा इतिहास शिकवतो.

आद्य महाराष्ट्रिक

बखरीमध्ये जो ऐतिहासिक कालखंड दर्शवलेला आहे त्यावर आपण गेल्या १० भागांमध्ये नजर टाकली. वि.का.राजवाडे यांनी बखरीला दिलेल्या प्रस्तावनेमध्ये आद्य महाराष्ट्रीक नेमके कोण होते ह्याबद्दल काही विश्लेषण केलेले आहे. आता ते जरा बघुया.
पुरातन काळी महाराष्ट्राच्या उत्तर कोकण भागात गुहाशय, कातकरी (कातवडी), नाग, कोळी (कोल), ठाकर, दुबळे, घेडे, वारली, मांगेले (मांगेळे), तांडेले हे लोक वस्ती करून राहत होते. नागवंशीय लोक समूहाने कोकणात वस्त्या करत होते. आर्यादी भाषा बोलणारे जे लोक उत्तरेकडून आले त्यांचा नागांशी झालेल्या शरीर संबंधातून आजचे जे 'मराठे' ते उदयास आले.
महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर दुबळे आणि घेडे या जाती आहेत. ह्या दोन्ही जाती गुजराती बोलतात आणि शेती करून जगतात. भाषेवरून ते उत्तरेकडून आल्याची सहज अनुमान काढता येते. मुख्य व्यवसाय शेती असल्याने ह्या जाती समुद्राकडे कधी सरकल्या नाहीत आणि वर रानात देखील चढल्या नाहीत. ह्याच समकाळात वारली हा सह्याद्रीच्या जंगलात आपले स्थान राखून होता. वारली हे उत्तम मराठी बोलतात आणि ते सूर्य उपासक आहेत. इतर जातींच्या मनाने वारली हा बराच प्रगत होता असे दिसते. पण तो नेमका कुठून आला हे निश्चित सांगता येत नाही. तो बहुदा उत्तरेकडून म्हणजे सध्याच्या विंध्योत्तर भागातून आला असावा असा कयास राजवाडे यांनी मांडलेला आहे. समुद्रापासून साधारण १५ मैल अंतरावर असलेल्या रानात त्याचे वास्तव्य होते.
समकाळात मांगेले हे मुळचे आंध्रप्रदेशातून आलेले लोक समुद्र किनारी वसले. गोदावरीच्या सुपीक खोऱ्यातून त्यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे वाटचाल केली आणि येताना ते स्वतःचा मासेमारीचा धंदा येथे घेऊन आले. समुद्राशी निगडीत उपजीविका असल्याने त्यांनी समुद्र किनाऱ्यापासून अर्धामैल पर्यंतच्या टापूत वस्ती केली आणि आजही ते तेवढाच टापू बाळगून आहेत. समुद्र सोडून ते कधी डोंगराकडे सरकले नाहीत. आजही उत्तर कोकणातील समुद्र किनाऱ्यावर मांगेले मासेमारीचा धंदा करतात.
वारली जेंव्हा सह्याद्रीच्या डोंगररांगात वस्त्या करून राहू लागला तेंव्हा तेथे खूप आधीपासून कातकरी (कातवडी), ठाकर आणि डोंगरकोळी लोकांच्या वस्त्या होत्या. कातकरी हा सर्वात जुना. कातकरी हा शब्द कृतीपट्टीन ह्या शब्दावरून आला असावा असे अनुमान राजवाडे मांडतात. कृती म्हणजे कातडे आणि पट्ट म्हणजे वस्त्र. हे लोक मुळचे रानटी असून त्यावेळी प्राण्यांचे कातडे पांघरून राहायचे म्हणून त्यांना हे नाव पडले असावे. कातकरी जेंव्हा जंगलात राहत होते तेंव्हा त्याहीपेक्षा निबिड अशा डोंगर कपाऱ्यात गुहाशय राहत होते. कातकरी किमान कात तरी पांघरी मात्र गुहाशयाला ती कला देखील अवगत नव्हती. ह्या दोघांत कातकरी टिकला. गुहाशयामागून रानात नाग, ठाकर, कोळी आणि मग वारली आले.
ठाकर हे वारल्यांच्या आधीपासून सह्याद्रीची राने राखून होते आणि त्यांचे अस्तित्व फक्त उत्तर भागात नाही तर सर्वत्र पसरलेले होते. ठाकर लोकांच्या थोडे खालच्या रानात कोळी लोकांची वस्ती होती. ह्यांच्या मधलेच समुद्र कोळी हे मासेमारी वर जगत आणि समुद्र किनारयाने राहत. कोळी जातीचे मूळ वंशज कोल हे होते.
कातकरी लोकांच्या मूळ अनार्य भाषेचे रूप कसे असेल ह्याबद्दल आता पत्ता लागण्याचा जरा सुद्धा संभाव राहिलेला नाही. मांगेल्यांचे आणि वारली लोकांचे तेच. राजवाडे यांनी ह्याबद्दल बराच खेद व्यक केला आहे. परंतु त्यांनी बरीच मेहनत घेऊन अंदाजे स्थळ-काल दर्शवणारा एक तक्ता तयार केला आहे. तो असा...
अतिप्राचीन लोक - गुहाशय, कातकरी (कातवडी), नाग : शकपूर्व २००० च्या पूर्वी (अंदाजे शकपूर्व ५०००)
मध्यप्राचीन लोक- ठाकर, कोळी, वारली : शक पूर्व २००० ते १०००

प्राचीन लोक -
दामनीय, महाराष्ट्रिक : शकपूर्व ९०० ते ३००

पाणिनिकालीन लोक -
मांगेले, सातवाहन, नल, मौर्य : शकपूर्व ३०० ते शकोत्तर २००

जुने मराठे -
चौलुक्य, शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकुट : शकोत्तर ३०० ते ११००
जुने मराठे - बिंब, यादव : शकोत्तर ११०० ते १२७०
मुसलमानी राज्य - मलिक, अमदाबादचे सुलतान : शकोत्तर १२७० ते १४६०
युरोपियन - पोर्तुगीझ :शकोत्तर १४२२ ते १६६०
अर्वाचीन मराठे - भोसले : १६६० ते १७२५
युरोपियन - इंग्रज : शकोत्तर १७२५ ते १८६९
ह्या नोंदी घेताना त्यांनी 'इसवी सन'चा वापर न करता 'शक' वापरला आहे.
अपेक्षा आहे की येथे मांडल्या गेलेल्या अल्प माहितीमुळे आपल्या ज्ञानात काहीतरी भर निश्चित पडली असेल... पुन्हा भेटू एक नवीन ऐतिहासिक विषय घेऊन...
........................................ समाप्त ...........
बा द सातोस्करांनी गोव्याच्या इतिहासाचा अभ्यास करताना साहजिकच महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इतिहासपूर्व कालात महाराष्ट्रात निबिड अरण्य होतं. तिथे पहिली वस्ती करणारे प्रोटो-ऑस्ट्रेलाईड वंशाचे लोक होते. मग नाग-कोल-मुंड लोक आले असावेत. याचं कारण म्हणजे कोंकणी भाषेत या कोल मुंडांच्या भाषेचे काही अवशेष अजून आहेत. या कोल शब्दापासून 'कूळ' 'कोळी' वगैरे शब्द आले. त्यांच्या (सातोसकरांच्या) म्हणण्याप्रमाणे ईशान्येकडच्या नाग लोकांशी हे नाग संबंधित होते. छोटा नागपूर पठारावरून हे सगळ्या भारतभर पसरले असावेत अशी एक विचारधारा आहे. त्यांच्या पूजा अर्चनेच्या पद्धतींशी साधर्म्य दाखवणार्‍या पद्धती जसे की वारूळांची, धरित्रीची पूजा करणे अजूनही आपल्या गावोगावी टिकून आहेत.
मग आर्य आले. अगस्ती आणि परशुरमाच्या कथा हेच सागतात. आर्यांनी त्या मूळ रहिवाशांना आणि त्यांच्या दैवताना आपल्या राहणीत सामावून घेतले. आर्य लढवय्ये होते पण त्यानी मूळ रहिवाशांचा नाश केला नाही. द्रविड लोक हे दक्षिण भारतातच वस्ती करून होते. त्यांची संस्कृती स्वतंत्रपणे वाढली. या सगळ्या संस्कृतींचा थोडाफार तरी संघर्ष झालाच असेल, पण रेड इंडियन्सचं झालं तसं भारतात कोणाचंही झालं नाही. सगळ्या वंशांच्या लोकांचं मिश्रण मुख्यतः महाराष्ट्र् आणि काही प्रमाणात कर्नाटकात बघायला मिळतं. मराठी लोकांची शारीरिक ठेवण आर्य आणि प्रोटो ऑस्ट्रेलॉईड्स या दोन्हींची वैशिष्ट्य दाखवणारी दिसते.
पुढचा क्रम तू दिल्याप्रमाणेच सातोसकरांनी ठरवला आहे. महाराष्ट्रिक म्हणजेच महरट्ट. यांचे पूर्वज रट्ट लोक. या लोकांच्या बोलीवरूनच 'मराठे' आणि 'मराठी' ही लोकांची आणि भाषेची नावे आली असं म्हणतात.
यानंतर सातवाहन, मौर्य यांच्या सत्ता येऊन गेल्या. मग यादव, शिलाहार, चालुक्य इ. या सगळ्यांची राज्यं कोकण आणि गोव्यात असल्याचं सिद्ध करणारे शिलालेख आणि पट्ट कोकण आणि गोव्यात सापडले आहेत.
 राजवाडेंनी जेव्हा हे सगळं लिहिलं तेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासपूर्व कालाबद्दल आपल्याला काहीही पुरावा माहित नव्हता आणि म्हणून विविध वंशाच्या लोकांचे स्थलांतर, आपापसातल्या लढाया वगैरे तर्क तेव्हा केले जात (राजारामशास्त्री भागवतही वाचा).
या नागवंश वगैरे तर्काला कुठलाही पुरावा नाही. स्वातंत्र्योत्तर काळातील पुरातत्वीय संशोधनामुळे आता महाराष्ट्राचा वसाहतींचा इतिहास जवळजवळ सलगपणे साडेचार-चार हजार वर्षे मागे जातो. (त्यावरच/ पौराणिक मते महाराष्ट्रेतिहासाच्या उगमाविषयीच्या मताचं पुरातत्वीय दृष्ट्या खंडन करण्यासाठीच मी महाराष्ट्राचा आदिम इतिहास हा लेख लिहिला होता). त्याच्याही आधी प्रागैतिहासिक मानवाचे अस्तित्व इथे होतेच.
शिवाय आता जैविक वंश (biological race) ही संकल्पना अ‍ॅन्थ्रोपॉलॉजी या विद्याशाखेने जवळपास रद्दबातलच ठरवली आहे म्हणा ना! मग उरला तर्क वेगवेगळ्या जमाती, टोळ्या, मानवसमूह यांचे स्थलांतर वगैरेचा. तर पुरातत्वाला असा कुठलाही पुरावा सापडत नाहीये अजूनतरी. आणि भाषा आणि मानवसमूह हे कायमच एकास एक अशा गुणोत्तरात नसतात. समूह बदलतात, भाषा संक्रमित होत असतात, वेगवेगळ्या समूहांत स्वीकारल्या जातात, इ. इ.
शिवाय आपण ज्यांना आज आदिवासी जमाती म्हणून ओळखतो त्या इतिहासाच्या पूर्वीपासून आदिवासीच आहेत असा आपला एक समज असतो. तेही खरं नाही. आदिवासी आणि अ‍ॅबॉरिजिन्स यांच्यात फरक आहे. आजच्या आदिवासी जमाती या कधी काळी स्थायी शेतकर्‍यांचे समूह होते अशीही शक्यता असू शकते. महाराष्ट्राच्या इतिहासात मानवसमूहांनी एका उपजीविकेकडून दुसर्‍या उपजीविका पद्धतीत, किंवा भटक्या जीवनाकडून अर्ध भटक्या किंवा स्थायी किंवा उलट अशीही स्थलांतरं केलेली दिसतात.(यावर सुमित गुहांचं environment and enthnicity नावाचं एक खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे ते वाचा)
उदा: कातकरी हे पहिल्यापासून याच नावाने प्राचीन काळापासून ओळखले जायचे असं काही नाहीये. तसा पुरावा कुठे नाहीये. शिवाय राजवाड्यांनी मांडलेली सगळी गृहितकं/ व्युत्पत्ती ग्राह्य धरता येत नाहीत. बर्‍याचशा ओढूनताणून आहेत. तेव्हा कोण कुठून आलं वगैरे तपासणं पुराव्याशिवाय अशक्य आहे. शिवाय प्राचीन आणि मध्ययुगीने भारतात अशी लोकसमूहांची स्थलांतरं असंख्य वेळा घडली आहेत. आताही घडतात. त्याची तपशीलवार नोंद कशी असेल? तेव्हा ती सगळी शोधून काढून कुणात किती प्रमाणात काय मिसळण झाली हे कळणं कदापिही संभव नाही! त्यामुळे राजवाडे, सातोस्कर, डिकसळकर, इ. अनेक थोर आणि विद्वान संशोधकांची यासंबंधीची विधानंही स्वीकारता येत नाहीत.
सातवाहन काळात (इ.स पूर्व पहिलं शतक ते इ.स. चं तिसरं शतक) आपल्याला पहिला पुरावा मिळतो तो महारठि या स्थानिक कुळाचा. सातवाहन राणी नागणिका ही महारठिंची कन्या होती. सातवाहन इथले का आंध्रातले यावरून लई मारामार्‍या आहेत. कुठलेही असले तरी पेनिन्सुलर इंडियातले म्हणजे दक्षिणापथातले हे नक्की. (या कुलात शालिवाहन नावाचा कुठलाही राजा नव्हता) त्यांनी महारठिंशी सोयरिक करून राज्य बळकट केले असावे असा संशोधकांचा कयास आहे. पण त्याबरोबरच त्यांनी त्यांचे स्पर्धक गुजरात-उत्तर दख्खन मधील क्षत्रप राजे यांच्याशीही सोयरिक केली होती असा शिलालेखीय पुरावा उपलब्ध आहे.
महाराष्ट्राची इतिहासाची कालरेखा उद्या टाकेन. वरचे कालखंड जसेच्या तसे ग्राह्य धरू नयेत.
जुने मराठे- नवे मराठे असंही काही नाहीये. ती जुनी राजकुळं होती. ज्यांचे वंशज आजच्या मराठा जातीचे भाग आहेत. पण मराठा जातीची उत्पत्तीही इतकी सरळसोट/ लिनीअर नाही. त्यात अनेक कुलसमूह एकत्र येऊन मध्ययुगात एक समाजविभाग म्हणून उदयाला आलेत (रजपूतांसारखेच पण रजपूतांशी यांचा संबंध नाही दिसत)
आर्य समूहाचा आणि या आद्य कुलांचा दूरान्वयानेही परस्पर संबंध नाही. सातवाहन आणि वैदिक आर्यांमधे किमान हजार वर्षांचं अंतर आहे. आर्यन इन्व्हेजन थिअरी ही डेड थिअरी आहे. फक्त पोलेमिक्स करणारी लोकं ह्यावर टिप्पणी करत रहातात. पुरातत्व आणि प्राचीन इतिहासाच्या संशोधकांसाठी ही जुन्या जमान्यातली/ बासनात गुंडाळून ठेवलेली थिअरी आहे. पण तो स्वतंत्र विषय आहे आणि मला विषयांतर करायची इच्छा नाहीये.
राजवाड्यांना जाऊन आता शंभरावर जास्त वर्षं उलटली. त्यानंतर इतिहास आणि पुरातत्वाच्या अभ्यासाने गगनभरार्‍या घेतल्या आहेत. तेव्हा राजवाडे जे लिहितात ते तसंच्या तसं स्वीकारार्ह नाहीच नाही. त्याने राजवाड्यांचं मोठेपण लेशभरही कमी होत नाही. ते मोठेपण आहे त्यांच्या विचारपद्धतीत, त्यांच्या कार्यपद्धतीत, त्यांच्या अफाट आकलनशक्तीत, त्यांना असलेल्या इतिहाससंशोधनाच्या दूरगामी दृष्टीत (व्हिजन फॉर द डिसिप्लिन) आणि उभं आयुष्य या खटाटोपामागे, अस्सल साधनं गोळा करण्यासाठी अविश्रांत परिश्रम करण्यात!
तेव्हा राजवाड्यांचे (आणि नंतरच्या विद्वान संशोधकांचेही) लेखन प्रत्येक ओळीगणिक शिरोधार्य न मानता त्यांनी दाखवलेल्या संशोधनाच्या वाटांवरून चालायचा प्रयत्न करूयात. आणि त्यांच्याइतका त्याग न करता पण निदान थोडे कष्ट घेऊन या विद्याशाखांकडे चांगले विद्यार्थी कसे जातील याचा प्रयत्न करूयात. तीच त्यांची खरी आठवण जपणे ठरेल.

https://www.maayboli.com/node/26142

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...