https://www.facebook.com/shiledarswarajyache
आयुष्यभर अविवाहित राहून पित्याच्या सिंहासनाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेऊन राजकुमार देवव्रत भीष्म पितामह बनले. याचमुळं त्यांना इच्छामृत्यचे वरदान प्राप्त झाले. धर्मयुद्धाच्या दहाव्या दिवशी शरपंजरी झालेल्या भीष्मांनी स्वतःच्या इच्छेने मृत्यूला रोखून ठेवले आणि ५८ दिवसांनी मृत्यू स्वीकारला. ती तिथी होती माघ शुक्ल अष्टमी. हा दिवस भीष्माष्टमी म्हणून ओळखला जातो.
महाभारतातील भीष्मपर्वातील हा प्रसंग यवतच्या श्री भुलेश्वर मंदिरातील एका फलकावर कोरलेला आहे. यात शरपंजरी झालेले पितामह भीष्म आणि त्यांच्या शेजारी, भीम, अर्जुन, भगवान श्रीकृष्ण तसेच दुर्योधन आणि इतर लोक बसलेले पाहायला मिळतात.
वर्ष - दिड वर्षाआधीचा फोटो आहे हा.
अंबरनाथ(जि. ठाणे) इथल्या प्राचीन शिव मंदिरावरील "लिंगोद्भव शिव". या फोटोत एका मोठ्या ज्वालास्तंभाच्या एकाबाजूला त्रिमुखी ब्रह्मा तर दुसऱ्या बाजूला श्री विष्णू आहेत. पैकी श्री विष्णूंची मूर्ती आता तिथं नसल्याचं काही अभ्यासकांना निदर्शनात आलं आहे. ते हि जवळपास 25 वर्ष ह्या मंदिरावर अभ्यास करणाऱ्या Kumud Kanitkar मॅडम यांच्यामुळं.
Asi ची स्थापना झालेली त्यावेळी देशभरातून सुरवातीच्या ज्या वास्तू "SURVEY" साठी आणि संवर्धनासाठी निवडल्या गेल्या त्यापैकी एक म्हणजे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शिव मंदिर. शिलाहारांच्या अप्रतिम कला सौंदर्याने हे मंदिर सजलेले आहे. पुरातत्व विभागाने इथं पूर्णवेळ संरक्षक नेमलेले आहेत, मी जितक्यांदा इथं गेलोय मला इथं पुरातत्व विभागाचे कर्मचारी/अधिकारी इथं हजर असल्याचं दिसले होते. (अर्थात कॅमेऱ्याने फोटो काढू न देण्यासाठी अडवायला आले म्हणून कळलं की इथं पूर्णवेळ अधिकारी असतात
)
इतकं सगळं असताना इथलं शिल्प निखळत आणि काही महिन्यांनी कोणीतरी अभ्यासक इथं जाऊन हे सगळं सर्वांसमोर आनल्यानंतर मग प्रशासन त्याबद्धल पाठपुराव्याच्या कामी लागते.
एकीकडे कितीतरी तरुण इतिहास आणि पुरातत्वाच्या अभ्यास आणि त्यांच्या संवर्धनासाठी स्वतःला वाहून घेत असताना, दुसरीकडे ह्या अश्या वारसास्थळाची काळजी घेण्याची संपूर्ण तयारी आणि मानसिकता संपूर्णपणे अजूनही आपल्याकडे तयार झालेली नाहीय.
अजूनही आपल्याला ह्या सगळ्याचं महत्व कळलं नाहीय इतकं नक्की.
त्या दिवशी तुळापूर ला शंभूराजेंच्या समाधीस्थळावर नतमस्तक होऊन वाडेबोलाईला निघालो होतो.
महेश तानाजी देसाई
कोरेगावात मुख्य रस्ता सोडून पेरणे रोड ला लागलो आणि रस्त्याच्या बाजूला थोड्या अंतरावर दोन दगड
नजरेत आले. सवयीप्रमाणे शून्य मिनिटात गाडी थांबवली आणि रस्त्यापलीकडे कचऱ्याच्या साम्राज्यात विलीन झालेल्या ह्या कुण्या दानशूर राजाच्या आठवणी जपणाऱ्या शिळे समोर उभा राहिलो.
या शिळेच्या बाजूच्या शिळेवर सूर्यचंद्र आणि त्याखाली एका स्त्री सोबत संभोग करत असलेले गाढव असे शिल्प कोरलेले आहे. राजाज्ञा मोडणाऱ्या अथवा दान दिलेल्या जमिनीवर अतिक्रमन केल्यास असे करणाऱ्याच्या घरातील स्त्रियांसोबत असे कृत्य होईल अश्याप्रकारची शापवानीचे हे प्रतिकात्मक शिल्प आहे. यालाच गधेगळ सुद्धा म्हणतात. असे गधेगळ महाराष्ट्रात 10व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत सापडतात असे अभ्यासकांचे मत आहे. इतरत्र आढळणाऱ्या गधेगळावरील शिल्पाप्रमाणे हे शिल्प पूर्ण कोरून काढलेले नसून, फक्त OUTLINE कोरलेली आहे. कदाचित हे शिल्प अपूर्ण असू शकते.(?)

भगवान शिवाचा अपमान सहन न झाल्याने स्वतःला अग्नीच्या स्वाधीन करून सतीने पतीप्रेमाची परमोच्च सीमा तयार केली.. कदाचित याचमुळं पुढच्या काळात सती जाणे हे पुण्याचे आणि स्वर्गप्राप्तीचे कार्य मानले जाऊ लागले..अर्थात सती जाणारी स्त्री दिव्यत्वाला प्राप्त झाली.. याच कारणाने चितेवर जाण्याआधी सतीची नगरातून मिरवणून काढली जाई. सती जाणाऱ्या स्त्रीचे आशीर्वाद मिळवणे आणि तिच्या हातून "सतीचे वाण" स्वीकारण्यासाठी मिरवणुकीच्या मार्गावर सौभाग्यवती स्त्रिया गर्दी करत.
अश्याच सती जाणाऱ्या स्त्रियांची स्मृती जपण्यासाठी सतीच्या दगडांची अर्थात सतीशिळांची निर्मिती झाली. सतीशिळेच्या सर्वात खालच्या भागात पती समवेत चितेवर सती स्त्री दाखवली जाते, तिच्या भोवती अग्निज्वाळा बघायला मिळतात. त्याच्यावरच्या भागात घोड्यावरून चाललेली सतीची मिरवणूक असून ती आपल्या दोन्ही हातानी वाण वाटताना दिसते. दोन दासी आपल्या डोक्यावर मिरवणूकित वाटायच्या वस्तू डोक्यावर घेऊन सोबत चालत आहेत.
शिळेच्या मध्यभागी आकाशाकडे अर्थात स्वर्गाकडे निर्देश करणारा कोपरातून दुमडलेला हात असून हातात बांगड्या, बाजूबंद असे सौभाग्य अलंकार पाहायला मिळतात. हाताच्यावर शिवलिंगाच्या समोर सती स्त्री तर विरुद्ध बाजूला पुजारी बघायला मिळतो. सती जाणाऱ्या स्त्री ची कीर्ती युगायुगांपर्यंत राहील ह्याची ग्वाही देणारे चंद्र-सूर्य आणि मंगल कलश(कळसाकृती?) कोरलेले आहेत.
नंतरच्या काळात जशी विरगळांची निर्मिती कमी होऊन समाधी उभारणे चालू झाले अगदी तशेच सतीशिळांची जागा सतीवृंदावनांनी घेतली. असे सती वृंदावन महाराष्ट्रात जागो जागी बघायला मिळतात.
सदर सतीशिळा अष्टविनायक क्षेत्र असलेल्या रांजणगावच्या महागणपती मंदिराच्या आवारात आहे.

एक संमोहन तुटलं भंगलेलं.....
शीर आणि हात भंगलेली तीन मानवी शरीर आणि त्यांना जोडणारे फुटून गेलेले चार पाय, या चार पायांची आणि कंबरेखालील भागाची अशी रचना केलेली असते की यातलं प्रत्येक शरीर पूर्णत्वास जाते.. शक्यतो हातात मृदंग घेतलेला हा कलाकारांचा संच शब्दशः एकमेकांशी समरस होऊन आपली कला सादर करताना नजरेस पडतो...

आठव्या नवव्या शतकाच्या आसपास दक्षिणेत जैन पंथाने चांगलेच बस्तान बसवले होते, राजसत्तेच्या आणि पर्यायाने धर्मसत्तेच्या केंद्रस्थानी राहण्यासाठी जैनांनी वेळोवेळी आपल्यात बदल केला. पंचेंद्रियांवर विजय मिळवणाऱ्या जीन कल्पनेला पुढे जाऊन शत्रूवर विजय मिळवण्या योद्धयाचे स्वरूप दिले जाऊ लागले. अहिंसेला प्रमाण मानणार हा पंथ दक्षिण भारतातील सरदार आणि राजघराण्यांना आकर्षक वाटावा म्हणूनच त्याला वीरश्री पूर्ण परंपरेशी जोडले जाऊ लागले होते.

सून बीच दसकंधर देखा ।
आवा निकट जती कें बेषा ।।
जाकें डर सूर असुर डेराही।
निसि न निद, दिन अन्न न खाही।।
: रामचरित मानस
हे शिल्प लोणी भापकर इथल्या मल्लिकार्जुन मंदिराच्या समोरील पुष्करणी जवळील नंदी(?) मंडपाच्या बाह्यभागावर कोरलेले आहे.
हातात
आरसा दिसला की मूर्तीत दर्पणा शोधायची नेहमी घाई असते... पण मग निरखून
पाहिल्यावर डोळ्यासमोर उंची राहिली ती हस्तीदंता मध्ये कोरलेली #अर्धनारीश्वराची सुबक आकृती.......!!
इथला प्रत्येक सण, उत्सव, देव आणि इथं जन्मलेले राजे शेती आणि मातीशी बांधलेले आहेत.
युग युग सरली तरी या लोकनायकांचा प्रभाव समान्यजनांच्या मनातून उतरत नसतो...
त्रिविक्रमांनी बुद्धीचातुर्याने बळीला जिंकलं असलं तरी लोक आजही देवाकडे मागतात ते बळीच राज्यच

इडा पीडा टळू दे
बळी प्रतिपदा
वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशी
या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते.
समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. दिपावलीच्या सणासाठी घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात आजपासूनच करतात. घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

इस्लामी राजवटीच्या काळात जवळपास नामशेष झालेली ऐत्येदेशीय वास्तुकला सतराव्या-अठराव्या शतकात मराठा साम्राज्य स्थिर झाल्यावर पुनर्जीवित झाली.. ह्या मराठाकालिन वास्तुकलेचे एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या वास्तूंवर अंकित असणारी श्री गणेशाची वैशिष्ट्यपूर्ण शिल्प..
फोटोतील गणेशाचे शिल्प शेरी(लिंब) इथल्या बारा मोटेच्या विहिरीवरील स्तंभावर कोरलेले आहे...
जगाच्या पाठीवर भेटणाऱ्या वीरगळी अर्थात विराचे दगड म्हणजे एक गूढ इतिहासच, ह्या दगडांवर कोरलेल्या आकृत्या म्हणजे इतिहासाचे एक अविभाज्य अंगच, विरगळीना बोलता आलं असत तर शौर्य आणि पराक्रमाचा एक वेगळा इतिहास लिहिला गेला असता.
महाराष्ट्रात निरनिराळे अंकन असलेल्या अनेक विरगळी सापडतात, पायदळाच्या, घोडदळाच्या लढाया, मुष्टियुद्ध, बलिदान, शिकार असे नाना प्रकारचे अंकन यावर आपल्याला पाहायला मिळते. पण रायगड जिल्ह्यातील माणगाव जवळ एका स्तंभ विरगळीवर "दशानन रावणाचे" अंकन केलेले पाहायला मिळते.
आश्चर्य वाटतंय ना, तर हो ह्या विरगळीवर दहातोंडांचा धनुर्धारी रावण कोरलेला आहे. कुठं आहे हा आगळा वेगळा विरगळ आणि हे दशाननाचे अंकन नेमकं का केलेलं असावं हे जाणून घेण्यासाठी आमच्या YOU TUBE चॅनल ला भेट द्यायला विसरू नका....
त्या दिवशी आसूद च केशवराज मंदिर पाहून मुरुडच्या दिशेने निघालो होतो, रस्त्यात एका वळणावर एका लहान शेड वर दुर्गादेवी मंदिर अशी पाटी वाचली, मंदिर अगदीच वळणावर असल्याने गाडी थोडी स्लो होतीच. सवयीने मान वळवून मी मंदिरात नेमकी कसली मूर्ती आहे बघितलं. देवीची एखादी प्लास्टर किंवा मातीची नवी मूर्ती असावी अशी अपेक्षा होती. पण समोर दिसली ती विरगळीच्या आकाराची एक कोरलेली शिळा. पण नेमकं काय आहे हे काही कळलं नाही.
मुरुडवरून परतताना मात्र मुद्दाम गाडी बाजूला लावली, आणि ही आगळीवेगळी दुर्गादेवी नेमकी काय आहे बघायला गेलो. दोन भागात विभागलेल्या ह्या शिळेवर खालच्या भागात दोन्ही बाजूला दोन स्तंभाकृती आणि त्यांच्या मध्ये गाईचे दूध पिणारे वासरू अशी आकृती कोरलेली आहे. शिळेच्या वरच्या भागात दोन्ही बानूला दोन स्तंभ त्यांच्या मध्ये एक वरच्या बाजूला निमुळता होत जाणारा, सर्पकृती ने वेढलेला कळसासारखा भाग, ह्या कळसाला पाठीमागून आधार देणारी एक व्यक्ती आणि त्याच्या दोन्ही बाजूना नमस्कार मुद्रेत बसलेल्या इतर दोन व्यक्ती असा प्रसंग कोरलेला आहे. ही शिळा धेनूगळ असावी. मात्र शिळेच्या वरच्या भागातील मधोमध असलेल्या कलशाकृतीचे नेमकं प्रयोजन कळून येत नाही. सोबतच ह्या धेनूगळच नेमकं कोणत्या कारणाने दुर्गादेवी म्हणून नामकरण झालं असावं हे हु कळून येत नाही.
दापोली-हर्णे-मुरुड परिसरात भटकंती करताना हे सुंदर शिल्प पाहायला विसरू नका.
(शिल्पाविषयीची अधिक माहिती कोणाला असल्यास नक्की कळवा)
मागे कधीतरी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या नेसरीच्या लढाईवर एका समूहात चर्चा चाललेली.
त्यावेळी एका वाक्याचा उल्लेख आला, ते वाक्य म्हणजे "प्रतापराव गडावरून महादेवाचे दर्शनास गेले असता, खानाचा तळ जवळच असल्याची खबर आली".
खरंतर ह्या वाक्याचा नेमका संदर्भ कुठून आला होता हे आठवत नाही, पण नेमकं सरनोबत कोणत्या महादेवाच्या दर्शनास आले असतील ह्या विचारत गेल्या वर्षी नेसरी आणि त्या जवळची काही जुनी मंदिर बघायचा प्रयत्न केला. ह्यापैकी एक मंदिर तर प्रत्यक्ष सरसेनापती प्रतापराव आणि इतर सहा वीरांचे जे समाधी स्मारक उभारलेले आहे तिथंच आहे. ह्या मंदिराचे काही अवशेष त्या ठिकाणी अजूनही ठेवलेले आहेत.
तर सरसेनापती प्रतापरावांच्या समाधीस्थळापासून थोड्याच अंतरावर अजून एक जुने शिव मंदिर आहे ते म्हणजे श्री काशीलिंगेश्वर शिव मंदिर. ह्याच मंदिराविषयी माहिती देण्याचा हा लहानसा प्रयत्न.
कदाचिद्धारयेद् वस्त्रं पुष्पं वा व्यजनं तथा ।
एषा नारी महादिव्या-गुंठना रमणी प्रिया ॥ ४६० ।।
शिल्पप्रकाशात आलेल्या सोळा सुरसुंदरींपैकी ही एक होय. प्रेक्षकाकडे पाठ करून की पाठ फिरवून ही त्रिभंगात उभी आहे. ती होट्टल येथील परमेश्वराच्या मंदिराच्या भिंतीवर दिसते. काही वेळा तिचे हाती पंखा, फूल, वा नेसूचा पदर असतो.
होट्टल येथे ती सहजगत्या पाठमोरी उभी आहे, तिने उजवा पाय जमिनीत रोवला आहे तर डाव्या पायाची पिंढरी उजव्याच्या मागे घेऊन पायाची बोटे जमिनीवर अलगद टेकलेली आहेत. मस्तक थोडेसे बाजूला घेऊन,
आपण काढीत असलेल्या फुलांच्या नक्षीकडे ती एकाग्रतेने पाहते आहे. तिने उजवा बाहू अशा तऱ्हेने वर उचललेला आहे की त्याचे खालून झेपावणारा तिचा स्तन दृष्टोत्पत्तीस येतो. तिच्या मानेवर रुळणारा भरगच्च अंबाडा म्हणजे संतुलन राखण्यासाठीच असावासा वाटतो. तिच्या पाठीची सुसंवादी पन्हाळ तिच्या नैसर्गिक सौंदर्यात भरच घालते.
खरेतर पुष्पनक्षीचे चित्र काढताना ती स्वतःच चित्र झाली असे म्हणता येईल. तिला संपूर्ण पाठमोरी दाखविण्याऐवजी एका अंगाने दाखविण्याचे आणि फूल हाती घेतलेले दाखविण्याऐवजी फूल रेखाटताना दाखविण्याचे स्वातंत्र्य शिल्पकाराने येथें घेतले आहे..!

पक्षिणो विविधाः कार्याः करे च शुकसारिकाः
एषा कन्या सुविख्याता विदिता शुकसारिका
हातात पोपट असलेली सुरसुंदरी म्हणजे शुकसारिका संबंध देशातील मंदिरांच्या बाह्य भिंतीवर हिचे शिल्पांकन आढळते. इसवीच्या दुसऱ्या शतकात मथुरेच्या कलाकारांनी या रूपकाला पहिल्यांदा शिल्परूप दिले. संपूर्ण प्राचीन कालखंडात हिने आपली लोकप्रियता टिकवली. विविध विभ्रमात, वेगळाल्या प्रकारात, अनेक ढंगात हिला आणि पोपटाला शिल्पांकित करण्यात शिल्पींनी आपले कसब पणाला लावल्याचे दिसते.
सुंदरीच्या उजव्या हाताच्या मनगटावर बसून तिच्या डाव्या हातातील वाडग्यातील दाणे टिपणारा पोपट, असे हे सुंदर शिल्प, मार्कंडी मंदिराच्या बाह्य भिंतीवर आहे.

"स्त्री आणि माकड"
अस्थिर माकडाच्या रूपाने मनाची चंचलता दाखविण्याचा कलाकाराचा प्रयत्न आहे. या रूपकाचे देवळावरील अंकनाचे प्रयोजन हे की, देवळात जाणाऱ्या भक्तजनांनी कामादी विषयांपासून मनाला परावृत्त करावे. जसे वस्त्राला हिसडा देणाऱ्या माकडाला हाकलून लावण्याचा प्रयत्न शिल्पविषयातील स्त्री करीत असते. हा उपदेश स्त्री-पुरुषांना उद्देशून असणार. तरुण स्त्रियांनी त्यांचे मन विषयाप्रमाणे भरकटू न दिले पाहिजे आणि पुरुषांनी मोहाला बळी पाडणाऱ्या साक्षात रतीरूपी यौवनेपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे.
.
अंबरनाथ मंदिराच्या दक्षिणेकडील भागात असलेली हे स्त्री आणि माकड शिल्प, यात माकडाने तिचे वस्त्र खेचले असून त्याला हाकलून लावण्यात सुरसुंदरीची धांदल उडली आहे. तिच्या अंगावरील वस्त्र अंगावरून सरकले आहे. हेच वस्त्र ती डाव्या हाताने सावरते आहे आणि उजव्या हाताने त्या मर्कटाला दटावते आहे. तिची दृष्टी माकडाकडे आहे. नेसूचे वस्त्र आवरता आवरता तिची बरीच तारांबळ उडालेली आहे.
"ब्रह्मेशानजनार्दनार्क - हरिहरपितामहार्क"
उपासकानां कार्यार्थं ब्रह्मणो रूप कल्पना ।।
असे रामोपनिषदात म्हटले आहे. उपासक आपले कार्य सिद्धीस जावे म्हणून, ईप्सित साध्य व्हावे म्हणून, अनुकूल अशा देवता आणि त्यांची विविध रूपे आकाराला आणू लागले. या मतामतांच्या गलबल्यातून एकवाक्यता निर्माण करायची, तर या अनेक देवता एकत्र आणल्या की त्यांचे उपासकही एकत्र येतील, भेदभाव विसरतील ही अशा मिश्र वा संयुक्तमूर्ती निर्माण करण्यामागील भावना आहे.
◆पंथोपपंथाच्या आपापसातील वाद नाहीसे होऊन त्यांच्यात सामंजस्य निर्माण व्हावे यासाठी मिश्रमूर्तीची संकल्पना केली गेली. हरिहराच्या मूर्तीद्वारे शिव आणि विष्णू यांच्या उपासकांनी एकत्र यावे ही कल्पना होती. आता ब्रह्मा, शिव, विष्णू आणि सूर्य या देवतांच्या उपासकांनी एकत्र यावे म्हणून ब्रह्मेशानजनार्दनार्क या मूर्तीची निर्मिती झाली. हिला हरिहरपितामहार्क असेही म्हणतात.
◆ अपराजितपृच्छेप्रमाणे अशा मूर्तीला चार तोंडे व आठ हात असावेत व त्यात अनुक्रमे दोन कमळें, खटवांग, त्रिशूल, चक्र, शंख व कमंडलू-माळा अशी आयुधे असावीत.
◆ रुपावताराप्रमाणे समोर सूर्य त्याचे लक्षण म्हणून दोन हातात सकळा कमळ, उजव्या बाजूस शिव, शिवाचे लक्षण म्हणून खटवाग आणि त्रिशुळ, डाव्या बाजूला विष्णू, लक्षणे चक्र आणि शंख, मागच्याबाजूला ब्रह्मा हातात अक्षमाला आणि कमंडलू, असे चतुर्मुख आणि अठरा हातांचा असावा.
अशा मूर्ती खजुराहो, ओसिया (जोधपूरजवळचे), अंबरनाथ (महाराष्ट्र) येथेही आहेत. मार्कडी (जि. गडचिरोली) येथे मार्कडऋषी मंदिराच्या मंडोवरावर असलेली ही मूर्ती समभंग असून अर्थातच स्थानकावस्थेत आहे. ही अष्टभुज असून वरच्या दोन्हीकडील हातांत पद्म आहेत. त्यांच्याच उजवीकडे त्रिशूल व डावीकडील हातात स्त्रुक् आहे. त्यानंतरच्या हातात आहेत अक्षमाला आणि चक्र, उजवीकडील चौथा हात भग्न आहे, तर डाव्या हाती कमंडलू आहे. पायाशी अरुण बसलेला आहे सत्पाश्वरथात. त्याचे डाव्या हातात लगाम तर उजव्या हातात चाबूक आहे. त्याच्या मागे उभी आहे अभयमुद्रेत.
महाश्वेता म्हणजे भूदेवी, मूर्तीच्या पायाशी उजवीकडे लेखणीचारी दंड व डावीकडे दीत हाती असलेला पिंगल उभा आहे. या मूर्तीला अनेक अलंकारांनी शोभिवंत केलेले असल्यामुळे ती देखणी आणि तालेवार दिसते.
IN FRAME : मार्कंडादेव पुस्तकातील ब्रह्मेशजनार्दनार्क पाठीमागे अंबरनाथ मंदिराच्या पूर्व भद्रावरील मूर्ती.
Ref.
श्री देव, शां. भा. मार्कडी टेंपल्स
श्री जोशी -मूर्तीशास्त्र,
कुमुद कानिटकर - अंबरनाथ शिवालय
श्री.देगलूरकर - मार्कंडादेव
खरे- मूर्तीविज्ञान
Yali,
or Vyal is a Hindu mythological creature represented in many temples,
often sculpted onto the pillars. It is portrayed with the head and body
of a lion, the trunk and the tusks of an elephant, and sometimes with
equine features.

बिर्ला टेम्पल म्हणून प्रसिद्ध असलेले हे विठोबा मंदिर बिर्ला कुटुंबीयांनी 1965 च्या आसपास उभारलेले आहे.
मंदिराच्या बाह्यभागावर दशावतार, शिवाच्या अवतार मूर्ती, सुरसुंदरी, अष्टदिक्पाल, कृष्णलीला मूर्ती यांचे जणू एक साम्राज्यच उभं आहे.
प्राचीन हिंदूं देवदेवतांसोबतच छत्रपती शिवाजी महाराज, राजा विक्रमादित्य, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांची शिल्प सुद्धा मंदिराच्या आतल्या भागात कोरलेली आहेत.
Generally known as #Birla_Temple, built in around 1965, dedicated to Vithoba-rakhumai.located at Shahad, in Ulhasnagar taluka of MAHARASHTRA.
Temple is full of icons, sculptures, including images that of Dashavatar, Sursundari, shiva awatar murti, yaksha, sadhus, krishna awatar, ashtdikpala, and also much more..
Right from ancient hindu god and godess it also contains sculptures of King Shivaji Maharaj, King Vikrmadity, Mahatma gandhi and Lokmany Tilak..
वसईच्या मोहिमेत मराठ्यांनी पोर्तुगीज सत्तेला दिलेला राजकीय धक्का जसा महत्वाचा होता तसेच तिथलं धार्मिक पुनरुत्थान सुद्धा. पोर्तुगीजांनी वसई भागात जी मंदिरे उध्वस्त करून चर्च उभारले ते चर्च पाडून मंदिराचा जीर्णोद्धार मराठ्यांनी केला. वसईच्या मोहिमेच्या ऐतिहासिक विजयाच्या खुणा म्हणजे तिथल्या चर्च वरून उतरवलेल्या आणि आता महाराष्ट्रभरातल्या मंदिरांच्या आवारात टांगलेल्या घंटा.
अशीच एक भलीमोठी घंटा मेणवलीच्या घाटावर असलेल्या श्री मेणेश्वर महादेवाच्या मंदिरासमोर आहे. पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीसांनी कृष्णामाईवर घाट आणि हे श्री मेणेश्वर मंदिर उभारले. नानांचा कार्यकाळ हा वसई मोहिमेच्या खूप नंतरचा असल्याने ही घंटा वसई मोहिमेनंतर इतरत्र ठेवलेली असावी आणि नंतरहून नाना फडणवीसांनी ती मिळवून श्री मेणेश्वर महादेवाला अर्पण केलेली असावी.
मेणेश्वर महादेवाच्या समोर नंदिमांडपाच्या मागच्या बाजूला एक घुमटाच्या आकाराचे घंटाघर बांधून त्यात ही घंटा लावलेली आहे. आतला लोलक नसलेली ही घंटा सध्या वापरात नाही. (घुमटीजवळ ठेवलेला एक भलामोठा दगड वापरून घंटा वाजवणाऱ्यांची कमी नाहीय)
१०० से.मी x ९४ से.मी x 22 से.मी. च्या या घंटेच्या मंदिराकडील भागावर बरोबर मध्यभागी मदर मेरीची प्रतिमा असून तिच्या कडेवर बाल येशू ख्रिस्त आहे. या प्रतिमेच्या खालील बाजूस 1707 हा आकडा आहे. अर्थात हे साल घंटा घडवली ते आहे .या आकड्याच्या खालच्या बाजूस घंटेच्या तोंडापाशी लॅटिन भाषेतील बायबलमधील वचन आहे.
LAVDATE DOMINAM IN CM BALIS BENL SONANTIBVS. ज्याचा इंग्रजी अर्थ
PRAISE OUR LORD WITH HIGH SOUNDING
CYMBALS अर्थात "उच्च स्वरात वाजणाऱ्या घंटांनी परमेश्वराची स्तुती करा." असा आहे.
श्री मेणेश्वराच्या शिवालयातील पोर्तुगीज घंटेवरील १७०७ सालाचा आकडा, मदर मेरीची प्रतिमा आणि बायबलमधील वचन हे सर्व घंटा तयार करीत असतााच उठावदार पद्धतीने उमटविलेले असल्यामुळे ही घंटा म्हणजे वसई मोहिमेची निशाणी आहे इतकं नक्की. वाई-मेणवलीच्या भटकंतीत कृष्णेच्या घाटावर विराजमान ह्या विजयचिन्हाला भेट द्यायला विसरू नका..
भारतीय संस्कृती आणि परंपरेत नागांचे स्थान इतके पक्के झालेले आहे की इथं जन्माला आलेल्या प्रत्येक धर्म आणि पंथाना नागांना सोबत घेऊनच वाटचाल करावी लागली.....!
नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

प्रवासात गुगल मॅप वर दिसलेलं
च चिन्ह कधीच इग्नोर करायचं नाही...
.
गर्द झाडीने व्यापलेल अतिशय सुंदर आणि गूढ अस हे श्री वाकेश्वर शिवालय वाई

महाभारतातल्या एका कथेप्रमाणे गरुड हे कश्यप आणि विनिता यांचे अपत्य आहे. हा जन्मापासूनच अत्यंत तेजस्वी असून, पिंगट डोळ्यांचा आणि सुवर्णमय कंतीचा होता, मोठा भार(गुरुत्मन) वाहणारा म्हणून ह्याला गरुड म्हणतात.
विष्णूधर्मोत्तरपुराणांमध्ये गरुडाचे अंकन करताना, नाक घुबडासारखे, रंग लालसर, पंख, दोन हात नमस्कार मुद्रेत तर इतर दोन हातात छत्र व कुंभ असावेत. शुक्रनीती प्रमाणे नररूप गरुडाच्या डोक्यावर मुकुट, अंगद असावे.
श्री विष्णुचे लांच्छन किंवा वाहन म्हणून गरुडाचे अंकन वैष्णव परिवारात केलेलं पाहायला मिळते. श्री विष्णूच्या पायाजवळ उभा किंवा विरासनात नमस्कार मुद्रेत सालंकृत गरुडाचे अंकन केलेलं असते. गरुडाच्या हातात एक नाग दाखवलेला असतो, गरुडाचे आणि नागांचे वैर असले तरी हा नाग पाळल्यासारखा पकडलेला असतो, महाभारतात ह्या नागाचे नाव समुख असे आलेले आहे.
Photo : भाऊ दाजी लाड संग्रहालय, मुंबई
मॅण्टिनिया च्या लढाईत स्पार्टन्स च्या विरोधात विजय हातात असताना, एपीमेनॉडॉस ला एक बाण वर्मी लागतो, आपला अंत समोर बघून तो सैनिकांना डिओफँटस आणि आयोलायड्स ह्यांना युध्दाची सूत्र हातात घेण्याचा निरोप देतो, लढाईत दोघांचाही आधीच मृत्य झाल्याचं कळताच, तो सेनापतींना बोलावून हातात आलेला विजय सोडून स्पार्टन्स सोबत तहाची बोलणी करायला सांगतो. बायोटियाच्या संपूर्ण लष्करात उरलेले युद्ध निपटावेल असा एकही माणूस न्हवता....! युद्ध जिंकून सुद्धा थेंबन्सला ग्रीस वरचा हक्क सोडावा लागला..!!!
माँ जिजाऊंच्या प्रेरणेने आणी आई भवानीच्या आशीर्वादाने दख्खनेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा अग्निकुंड पेटवला आणि इथली गवताची पातीसुद्धा तलवार होऊन उभी राहिली. छत्रपतींनी दिलेला मंत्र घेऊन इथला प्रत्येक मावळा शेवटच्या श्वासापर्यंत झुंजत राहिला, छत्रपती कैलासवासी झाले, स्वराज्याची राजधानी मुघलांच्या ताब्यात गेली, जनतेला कोणी वाली नाही असे चित्र असताना सुद्धा ह्या मातीने युद्ध विराम स्वीकारला नाही, आणि अखेर मराठी राज्य बुडवायला आलेली आलमगिरास ह्या मातीत गाडूनच मावळ्यांनी तलवारी म्यान केल्या.
पुण्या-सुप्याच्या परगण्यातून चालू झालेला प्रवास एका जिद्दीने बघता बघता रायगडावर बत्तीस मण सुवर्ण सिंहासना च्या रूपाने जगभरात नावारूपाला आला. अखंड भरतभूमीचा शतकांचा दुष्काळ संपवून एतद्देशीय राजा छत्रपती झाला. मऱ्हाठा पातशाह झाला...!!
तमाम रयतेस छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
स्वराज्याच्या अग्निकुंडात समिधा बनून प्राणार्पण करणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात मावळ्यांना मानाचा मुजरा...!

वृषभावीण न होय शेती । कृषिकर्मावीण न धान्योत्पत्ति ।
धान्यावीण न बलसंपत्ती । आणि बलधनावीण सौख्य नसे ।।
यासाठी कृपा करून । सोडी अवघें गोधन । निजशिशूचें हनन । कदा मातेने करूं नये ॥
: गोदावरी महात्म
कदाचित म्हणूनच की काय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मिळणाऱ्या बहुतांश विरगळी ह्या गोधन संरक्षक प्रकारातील असतात.

महाराष्ट्र म्हणजे शूरवीरांची भूमी, आपल्या मातृभूमीसाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेले आहे. या वीरांच्या बलिदानाची गाथा कोरलेल्या दगडाला आपण वीरगळ असे संबोधतो. महाराष्ट्रातल्या गावागावात आपल्याला असे वीरगळ पाहायला मिळतात.
ही वीरगळ उभ्या आयताकृती दगडावर कोरलेली असून, वीरगळ चार भागात विभागलेली आहे. विरगळीच्या सर्वात खालच्या भागात वीरमरण प्राप्त झालेला वीर दाखवलेला आहे.
त्याच्या वरच्या भागात युद्धप्रसंग कोरलेला आहे, डाव्या बाजूला हातात भाला घेऊन शत्रूसैन्याशी लढणारा वीर असून, त्याच्यावर समोरून तीन शत्रुसैनिकांनी हल्ला केलेला आहे, विराने एका शत्रुसैनिकाला यमसदनी धाडलेले असून तो सैनिक विराच्या पायाजवळ पडलेला पाहायला मिळतो. युद्धप्रसंगाच्या अंकनावरून ही वीरगळ पायदळ लढाई निदर्शक विरगळ आहे.
ह्याच भागातील अंकनामध्ये आपल्याला विराच्या शरीरावरील आभूषणे स्पष्ट पहायला मिळतात, गळ्यात कंठा, कानात कुंडल, हातात कडा पायात वाळा अशी आभूषणे त्याने धारण केलेली असून, विराची केशरचना सुद्धा विशिष्ट आहे. त्याच्या कमरेला गुडघ्यापर्यंत येणारे कटीवस्त्र असून त्यावर मेखला आहे. कटीवस्त्राचा घोळ विराच्या दोन पायांच्या मध्ये दाखवलेला आहे .
त्यावरील कप्प्यात आपल्याला विराचे स्वर्गारोहन पाहायला मिळते. स्वर्गातील ५ अप्सरा वीराला सोबत घेऊन स्वर्गलोकाकडे मार्गक्रमण करत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या सर्वांचे अंकन अश्यापद्धतीचे केलेले आहे की अप्सरा वीराला घेऊन हवेतुन उडत चालल्याचे स्पष्ट कळते.
विरगळीच्या वरच्या भागात आपल्याला वीर नमस्कार मुद्रेत पाटावर बसलेला दाखवलेला आहे त्याच्या मागे एक दासी हातात चवरी घेऊन उभी आहे, तर समोर विराची इष्ट देवता म्हणजे नंदीच्या पाठीवर शिवलिंग दाखवले आहे . समोरच्या बाजूला पुजारी असून ते विराकरावी पूजा करून घेत आहेत.
विरगळीच्या सर्वात वरच्या भागात कलश कोरलेला असून युद्धात वीरमरण प्राप्त झालेल्या वीराला मोक्ष मिळाल्याची ती निशाणी आहे.
आपल्याही परिसरात किंवा गावात असे वीरगळ असल्यास आम्हाला नक्की कळवा....!
जुन्या काळी पत्नीने पती निधनानंतर सती जाण्याची म्हणजेच जिवंतपणी अग्निदाह करवून घेण्याची प्रथा होती. अशी पतिव्रता स्त्री देवपदाला पोहोचते, अशी त्या काळी जनमानसात समजूत असे. दक्षिण भारतात ज्या प्रमाणे वीरांच्या आठवणीत विरगळीची निर्मिती झाली. त्याचप्रमाणे अश्या सती गेलेल्या स्त्रियांच्या आठवणीत #सतीशीळा घडवल्या गेल्या.
मुरबाड मधील किल्ले गोरखगडाच्या पायथ्याला असलेल्या #डेरमाता मंदिरासमोरच अश्या दोन सतिशिळा बघायला मिळतात.
सतीशिळा क्रं. १. मंदिरात प्रवेश करताना डाव्या बाजुला असलेल्या या सतीशिळेवर सर्वात खालच्या कप्यात चिता पेटलेली दाखवली आहे, चिते वरती विराचं शव असून त्याच्या शेजारी वीराच्या पाच पत्नी दाखवलेल्या आहेत. दुसऱ्या भागात सतींची घोड्यावरून मिरवणूक काढलेली आहे. वीराच्या पाच पत्नी प्रत्येकी एका घोड्यावर आरूढ आहेत असं दाखवलेलं आहे. तिसऱ्या भागात पाचं सतींचे हात कोपऱ्यातून दुमडलेले दाखवलेलं आहे. चौथ्या भागात वीर आपल्या पाच पत्नीसह शिवलिंगाची पूजा करत आहे, सोबत स्वर्गाचा प्रतिनिधी पुरोहित देखील आहे.
सतीशीळा क्र.२. सर्वात खालच्या भागात मृत वीर आणि त्याची पत्नी दाखवलेली आहेत. दुसऱ्या भागात घोडयावर आरूढ झालेली स्त्री बसलेली दाखवलेलं आहे व तिचा हातात सतीचे वाण दिसत आहे. त्यावरच्या भागात सतीचा हात स्वर्गा च्या दिशेनं दाखवलेला आहे . कोपरापासून दुमडलेल्या हातात बांगड्या आहेत. सगळ्यात वरच्या भागात वीर सपत्नीक नमस्कार मुद्रेत बसलेला आहेत बाजूला शिवपिंडी त्या खाली नंदी व पुरोहित पूजा करताना दाखवलेले आहेत.
©श्रद्धा हांडे
तानाजी मालुसरे
सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे.
छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.
महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले.
स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले.
स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या(जिजाबाई) इच्छेखातर; कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्नात होते. त्यांनी ते लग्न अर्धे सोडले आणि जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. निघण्यापूर्वी त्यानी जे शब्द बोलले ते मराठ्यांसाठी बोधवाक्य आहे, "आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे."
गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य नवमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता चढणे दिवसासुध्दा अशक्य होते. तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७०रोजी घडली.
तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसऱ्या दिवशी राजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी समजल्यावर महाराजांना खूप दुःख झाले. महाराज म्हणाले "गड आला पण सिह गेला".अत्यंत दुःखी अश्या राजांनी आपल्या तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठ' (पोलादपुरजवळ) या गावी पाठवले. ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'विरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारक सुद्धा उभे केले गेले आहे
























No comments:
Post a Comment