https://www.maayboli.com/node/20320
मी इथे तिथे या पोस्ट्स टाकल्या होत्या, सगळ्यांच्या सोयीसाठी म्हणून त्या एकत्र करतो.
गड किल्ल्यांवर भटकायचे मला वेड होते. (होते अशासाठी म्हणतोय, कि आता भारतवारी
इतकी तोकडी असते, कि त्या दिवसात काहि योजना आखणे जमतच नाही. )
तसेच इथे जे लिहितोय, त्यापैकी बहुतेक महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना लागू पडते.
हिमालयात वगैरे फिरण्याचा, मला अनुभव नाही.
( हे सगळे अनुभवी ट्रेकर्सना बाळबोध वाटायची शक्यता आहे.)
हा एक साहसी खेळ वा छंद असला तरी, सुरक्षिततेची पुरेशी काळजी घेणे, गैर आहे,
असे नक्कीच नाही. जगभरात अशी काळजी घेतलीच जाते.
जाण्यापुर्वी :
व्यायामाची किंवा चालण्याची सवय नसेल, तर एकदम एखाद्या ट्रेकला जाण्याचा विचार करु नका.
महाराष्ट्रात तरी उंचीचा त्रास होणार नाही, पण दमण्याचा नक्कीच होईल. जर जायचे असेल,
तर त्याआधी एखादी टेकडी भरभर चढून बघा. टेकडी जवळपास नसेल, तर जिन्याने चढून बघा,
भरभर चालून बघा. असे करताना दम लागतोय का, चक्कर येते का हे बघा. असे झाल्यास
ताबडतोब वैद्यकिय सल्ला घ्या.
सोबती
सोबत्यांपैकी एखादा तरी अनुभवी हवा. तो जर त्या ठिकाणी आधीच जाऊन आला असेल, तर
उत्तमच. तसे नसेल तर दुसर्या एखाद्या अनुभवी ग्रुपमधे सामील व्हा. अशी माहिती नेटवर किंवा
वर्तमानपत्रात मिळतेच. पुर्वी व्हीटी/दादर स्टेशनवर चौकशी केली, तरी अनेक ग्रुप मिळत असत.
माहिती
शक्यतो जाण्यापूर्वी त्या जागेची पूर्ण माहिती करुन घ्या, आता नेटवर नकाशे उपलब्ध आहेत.
आजूबाजुंच्या गावांची नावे बघून ठेवा. त्यांचा दिशा बघून ठेवा. जवळपास एखादी नदी वा
जलाशय आहे का ते बघून ठेवा. घरातील लोकांना ठिकाणाची, सोबत्यांची माहिती जरुर द्या.
आजारपण
अंगात कुठलाही आजार असेल, तर ट्रेकला जाण्यापुर्वी पुर्ण बरे व्हा. आजारपणात ट्रेक केल्यास
आपल्याला तसेच सोबत्यांना त्रास होऊ शकतो. खेड्यापाड्यात वैद्यकिय सोयींची वानवा आहे.
गड किल्ले कुठेही पळून जात नाहीत. तेव्हा ते कधीही बघता येतात.
बूट
योग्य ग्रीप असणारे बूट अगदी आवश्यक आहेत. पण ते अगदी नवे नसावेत. नवे घेतल्यास
त्याची सवय करु घ्या.
प्रवासाची साधने
प्रवासांच्या साधनांची नीट माहिती घ्या. जातानाच, परतीच्या गाड्यांची चौकशी करुन ठेवा.
रेल्वेने जायचे असल्यास रिटर्न तिकिट वा कूपन्स घ्या. एसटी ची चौकशी महामंडळाकडे
करता येते, आणि ते व्यवस्थित माहिती देतात.
मोठा ग्रुप असल्यास, मोठी जीप वगैरे करणे जास्त सोयीचे पडते. सामान वाहून नेणे
सोपे पडते. अतिरिक्त सामान त्यात ठेवता येते. शिवाय येतानाचा प्रवासही जास्त
सुखकर होतो. निदान जवळच्या गावातून तरी अशी सोय करता येते का ते बघा.
बरोबर काय घ्याल ?
या सदराखाली लिहिण्यासारखे बरेच आहे.
अतिरिक्त कपडे :
शक्यतो नकोच. वापरण्यात असलेली जीनची पॅंट घाला, टिशर्ट घाला आणि एखादाच
टि शर्ट जादा घ्या. टिशर्ट पूर्ण बाह्यांचा असला तर चांगला. टिशर्ट चे रंग मातकट
तपकिरी वा हिरवे असावेत. लाल. पिवळे वा केशरी रंगाचे नसावेत. समजा येताना
कपडे बदलायचेच असतील, तर ते खाली गावात वा गाडीत काढून ठेवा. त्यांचे ओझे
गडावर नेण्यात काहीच अर्थ नसतो.
डोक्यावर टोपी असणे गरजेचे आहे. नाहीतर मोठा रुमाल बांधा. रुमाल जास्त सोयीचा
ठरतो, कारण गरज भासली, तर तो ओला करता येतो. शिवाय गाठ मारून, तो उडू न
देता, वापरता येतो.
डोळ्यावर गॉगल असला तर चांगले.
अंथरुण- पांघरुण
कॅरी मॅट नेणे सोयीचे ठरते, पण ती फ़ार रुंद नसावी. रुंद असल्यास तिचा आकार
गैरसोयीचा ठरतो. साधारण जाडिच्या माणसाला दिड ते दोन फूट रुंदी पुरेशी होते.
किल्यावर रात्र काढताना फ़ार लोळणे होत नाही. ओलसर जमिनीवर पण ती
अंथरता येते.
पांघरण्यासाठी, चादर वा ब्लॅंकेट घेण्यापेक्षा लोकरी शाल घ्या. ती वजनाला व
आकारमानालाही हलकी असते. शरीरातील उष्णता जमिनीमार्गे जास्त शोषली जाते
म्हणून, अंथरुणाकडे जास्त लक्ष द्या. अंथरुणासाठी, मॅटखाली निलगिरीचा पाला,
सागाची पाने, किंवा चवई (गडावर केळीच्या पानांसारखी पाने असणारे जे
झाड असते ते ) ची पाने अंथरता येतात. पण गवत शक्यतो नको कारण
त्यात किटक असतात. हॅमॉक नेता आले तर फार छान. त्याच्या दोऱ्या आणि
मजबुती मात्र आधी घरी तपासून पहा. स्लिपिंग बॅग पण उत्तम, पण आपल्याकडे
रात्री त्यात घाम फ़ुटतो.
शक्यतो बूट घालूनच झोपा. कानटोपीने वा रुमालाने कान झाकून घ्या. म्हणजे
किटकांपासून संरक्षण होते.
औषधे
उन्हामुळे, प्रवासामुळे, भुकेमुळे डोके दुखण्याचा त्रास अनेक जणांना होतो.
त्यासाठी क्रोसिन (पॅरासेटामॉल ) च्या गोळ्या असाव्यात. पण लक्षात घ्या
कि कुठलेच औषध रिकाम्यापोटी घ्यायचे नसते. तसेच या गोळ्या, दिवसातून
तीनपेक्षा जास्त घेऊ नयेत.याच गोळ्या साध्या तापावर चालतील.
पावसात भिजायची शक्यता असल्यास, त्रिभुवनकिर्ती च्या गोळ्या असाव्यात.
घसा धरायची शक्यता असल्यास, सेप्टीलीन असावी. सर्दीसाठी जर गोळी
घ्यायचीच असेल, तर त्याने गुंगी येणार नाही, अशी एखादी लिहून घ्या.
एस्टी वगैरे लागायची शक्यता असेल तर त्यासाठी गोळ्या घ्या.
आम्लपित्ताचा त्रास असेल तर आवळा कॅंडी जवळ ठेवा. भाजण्या खरचटण्यावर
चालू शकेल, असे एखादे मलम पण जवळ असू द्या.
जळण
गडावर जेवण शिजवायचा प्लान असेल, तर त्याबद्दल पुढे लिहितो, पण जळणा
साठी काय करावे, त्याबद्दल इथे लिहितो.
आपल्याकडे फ़्लिंट स्टोन मिळतो का त्याची कल्पना नाही. तो जवळ
असल्यास, आग पेटवणे सोपे जाते. लाकडे नेण्यापेक्षा कोळसे न्या.
(आता धूर न निघणारे कोळसे मिळतात.) मुंबईतही तुरळक ठिकाणी
कोळसे मिळू शकतात. किंवा ते घरच्या घरी तयार करता येतील. काहि लाकडे
पेटवून, ती जळू लागल्यावर त्यावर पाणी शिंपडा.
कोळसे घेताना, ते फ़ार लहान घेऊ नका. ते पटकन जळतात. मोठे
घेतल्यास त्याचे तूकडे करुन वापरता येतात.
लाकडे गोळा केल्यास ती नीट जळतीलच याची खात्री नसते. काही झाडांची
लाकडे नूसतीच धुमसतात. आंब्याची लाकडे चांगली जळतात. पण आयत्यावेळी
चांगली लाकडे मिळतील याची खात्री देता येत नाही.
गावात गोवऱ्या (शेण्या) दिसल्या तर चौकशी करा. त्या नीट जळतात. ढोरवाटेच्या
आजूबाजूला, सुकलेले शेण मिळाले तर घ्या, तेही नीट जळते.
काडेपेट्या घेतल्या तर दोन तीन जणांनी घ्या व त्या कोरड्या राहतील याची खात्री
करा. मेणबत्त्याही दोन चार असू द्या. आयत्यावेळी कोळसे पेटवायला त्या उपयोगी
पडतात. चूल पेटवण्यात सर्वात जास्त वेळ जातो, तो वाचवता येतो.
रात्री उजेडाचा फ़ार बाऊ करायची गरज नाही. साधारण अर्ध्या पाऊण
तासाच्या सरावाने, आपल्याला अंधारातही बऱ्यापैकी दिसते. समोर बघण्यापेक्षा डोळ्यांच्या
कडेने बघा, ते दृष्य जास्त स्प्ष्ट दिसते.
वाटेत एरंडाची झाडे दिसली किंवा कडूनिंबाची झाडे दिसली तर त्याच्या बिया घ्या.
या दोन्ही बिया, अत्यंत प्रखर ज्योतिने जळतात. एखाद्या तारेत त्या टोचून, पेटवल्या
तर छोट्या मशाली सारखा उजेड देतात.
भांडी
काहि गडांवर भांडी ठेवली आहेत. ती वापरुन, स्वच्छ करुन ठेवावीत अशी अपेक्षा असते.
दूर्गा भागवतांनी बिन भांड्यांचा स्वयंपाक कसा करता येतो ते लिहिले आहे, त्याबद्दल
लिहितोच. (नल दमयंति आख्यानातला नलाला तर आग्निशिवाय स्वयंपाक करण्याची
सिद्धी प्राप्त होती.) भांडी न्यायचीच असतील, तर स्टीलची न नेता, अल्यूमिनियम किंवा
हिंडालियमची न्यावीत. पाणी तापवण्यासाठी, इनॅमल वेअर चांगले. जेवण जेवण्यासाठी
पत्रावळ्या नेल्या तर चांगले. आता सुपारीच्या पानाच्या देठापासून केलेल्या पत्रावळ्या
मिळतात, त्या वजनाने हलक्या आणि मजबून असतात. त्यात जेवण वाढून सहज
उचलून घेता येते. असेच द्रोणही मिळतात. चवईची पाने मिळत असली, तर फ़ारच छान.
सागाच्या पानातही जेवता येते.
बिनभांड्यांच्या स्वयंपाकात गाकर किंवा बाट्या करता येतात. या प्रकाराची बरीच तयारी
घरी करता येते. पुरुषांनाही करता यावी, व आई, ताई वा सौ यांना त्रास होऊ नये, म्हणून
सविस्तर लिहितोय.
आधी करायची तयारी : चार जणांसाठी, एक किलो जाडसर कणीक घ्या. जाडसर नसेल तर
पाऊण किलो कणीक आणि पाव किलो बारिक रवा एकत्र करुन घ्या. त्यात एक टिस्पून
मीठ, अर्धा कप साखर, आणि स्वादाला थोडी वेलची किंवा बडीशेप पूड घाला. मग त्यात
पाव किलो साजून तूप घालून (जास्त चालेल) हाताने चोळून घ्या. हे सगळे मापाने मोजून
एका प्लॅष्टीकच्या जाडसर पिशवीत घ्या. पिशवी आकाराने मोठी घ्या. बस तयारी हि
एवढीच.
आता प्रत्यक्ष जेवण करण्यासाठी : या पिशवीत पिठ घेतले असेल त्यातच हे मळायला
घ्या. भसकन पाणी ओतू नका. जेवढे मापी पिठ असेल, त्याच्या अर्धे पाणी हळूहळू
घाला. तूप चोळले असल्याने, हे पिठ मळणे सोपे जाते. मळून घट्टसर पिठ भिजवा.
(घट्ट म्हणजे पुरीसाठी भिजवतात तेवढे घट्ट ) त्या पिशवीतच साधारण अर्धा तास
पिठ तसेच ठेवा. दरम्यान चूल पेटवायला घ्या.
आता या पिठाचे मोठ्या लिंबाएवढे गोळे करा. ते हाताने दाबून चपटे करा. त्याला
मेदूवड्यापमाणे आकार द्या. असा आकार केल्यास भाजणे सोपे जाते.
भाजण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. आग व्यवस्थित पेटली असेल, तर हे गोळे थेट
आगीत भाजता येतील. एखाद्या लांब काडीत हे दोनतीन गोळे अडकवून वरच्यावर गोल
फ़िरवत ते भाजता येतील. हे काम कोंडाळे करुन प्रत्येकाने केले तर जास्त मजा येते.
अल्यूमिनियम फॉईल असेल तर तिचे तूकडे करुन त्यात हे गोळे गुंडाळून भाजता येतात.
असे केल्यास त्या बाट्या वा गाकरांना राख लागत नाही. पण ते लवकर भाजले जातात
हे लक्षात ठेवून, ते उलटे पालटे करणे गरजेचे आहे. चूलीचे दगड पुरेसे उंच असतील, तर त्यावर
एक सपाट दगड आडवा ठेवून त्यावरही हे भाजता येते. असा दगड धुवून घेतला असेल
तर त्यावरच थेट हे गोळे वा गाकर भाजता येतात. पत्थर के कबाब, असेच भाजतात.
हे गोळे भाजत आले कि खमंग वास सुटतो. टिचकी मारल्यास पोकळ झाल्यासारखा
आवाज येतो. हे गोळे कुस्करुन त्यात तूप साखर घालून खाता येतात. यासोबत
आणखीहि काही प्रकार पुढच्या भागात लिहितो.
नियमित ट्रेकर्सनी पण इथे लिहावे, असे आमंत्रण देतोय.
अपूर्ण ..
या बाट्या किंवा गाकर बरोबर खाण्यासाठी एक प्रकार, तोही बिनभांड्याचाच.
माणशी एक या प्रमाणात, भरताचे वांदे घ्या. हे मध्यम आकाराचे घ्या. (घेताना
चमकदार, आकाराच्या मानाने हलके असे बघून घ्या ) सोबत आवडिप्रमाणे
हिरव्या मिरच्या, कांदे, लसूण घ्या. हे सगळे थेट आगीत फ़िरवून फ़िरवून भाजा.
वांगी, कांदे, लसूण यांची साले काढून ते पत्रावळीवर किंवा पानात कुस्करा, त्यात
मीठ व मिरच्या एकतर चुरडून घाला. हा प्रकार खायला अत्यंत रुचकर लागतो.
घरुन करुन नेता येण्यासारखे सुदानी पद्धतीचे वांग्याचे भरीत मी मागे लिहिले होते,
हे भरीत खराब होत नाही. व तोंडास रुची आणते.
खराब न होण्यासारखे, एक मिरचीचे लोणचे इथे देतो.
हिरव्या मिरच्यांचे तूकडे दोन वाट्या घ्या. पाउण वाटी चिंचेचा कोळ घ्या.
अर्धी वाटी तीळ भाजून घ्या. तेलाची फ़ोडणी करुन, त्यात जिरे, हिंग व
हळद घाला. त्यावर मिरच्यांचे तूकडे टाकून जरा परता. झाकण ठेवून वाफ़
येऊ द्या. मग त्यावर चिंचेचा कोळ, मीठ आणि लिंबाएवढा गूळ टाका, हे सगळे
मंद आचेवर, तेल वेगळे होईपर्यंत शिजवा. थंड झाले कि बाटलीत भरा.
सोबत भांडी असतील तर करता येतील असे पदार्थ.
खिचडीच करायची असेल, तर घरीच तांदूळ आणि मूगडाळ, तूपावर परतून घ्या
(धुवून, कोरडे करुन.) त्यातच आवश्यक तो मिठ मसाला घाला.
आयत्यावेळी, भांड्यात दुप्पट पाणी घालून ती भिजत ठेवा. आणि आग नीट पेटली
की त्यावर भांडे ठेवा. अधून मधुन ढवळत शिजवा. वऱ्याचे वा राळ्याचे तांदुळ पण
घेता येतील.
खिचडीपेक्षाही सोपा प्रकार म्हणजे बेसन भात.
यासाठी पुर्वतयारी म्हणून, तेलाच्या फ़ोडणीत, बेसन कोरडेच खमंग परतून घ्या. त्यात
हिंग, हळद, तिखट, मीठ घालून घ्या.
आयत्यावेळी भात शिजत आला कि, पाण्यात कालवून हे पिठ ओता. आणि
ते ढवलून शिजवा. हा प्रकार खमंग लागतो. सोबत तूप हवे.
बाजारात मिळणारी लसणेची चटणी अतितिखट असते. त्यापेक्षा ती घरी करुन न्या,
खोबरे न घालता, त्यात दाणे, तीळ, वगैरे वापरा.
मुक्कामाच्या जागी पोहोचल्या पोहोचल्या, सातुचे पिठ, थंड वा कोमट पाण्यात मिसळून
प्या. हे सातूचे पिठ गहू आणि हरबरा डाळ खमंग भाजून केलेले असते. त्यामूळे शिजवायची
गरज नसते. चहापेक्षा हे पिणे चांगले. (हे पिठ बाजारात मिळते.)
समजा रात्र पडायला अवकाश असेल, तर तरतरी आणणारा आणखी एक प्रकार म्हणजे,
माडगं. आपला पारंपारीक प्रकार आहे हा. यासाठी पाण्यात गूळ टाकून ते उकळा, आणि
मग त्यात कुळथाचे पिठ, थोड्या पाण्यात मिसळून टाका. सतत ढवळत ते शिजू द्या.
हा प्रकार चवदार लागतो, शिवाय अशक्तपणा घालवतो. थंडीपासूनदेखील बचाव करतो.
जेवणे आटपल्यावरदेखील हे पिता येते. गोड आवडत नसेल तर यात तिखट मीठ, व कोकम
घालून सुप करता येईल. हे कुळथाचे पिठ देखील बाजारात मिळते.
सगळे जेवण झाल्यावर, भांडे पाण्याने धुवून घ्या, आणि त्यात भरपुर पाणी घालून, त्यात
नाचणीचे सत्व मिसळा, हे भांडे रात्री मंद आचेवर ठेवा. सकाळपर्यंत उत्तम आभिल तयार
झालेली असेल. त्यात मीठ घालून चहा ऐवजी ती प्या. गड उतरण्यासाठी तरतरी येईलच,
शिवाय तहान लागणार नाही. नाचणीचे सत्व देखील बाजारात मिळते.
भांडे आगीने काळे होऊ नये म्हणून त्याच्या बुडाला, माती ओली करुन फ़ासून घ्या.
गडाच्या पायथ्याशी कुंभार असल्याची खात्री असेल, तर त्याच्या कडून मडके घेता येईल.
जेवण शिजवण्यासाठी मडके हवे आहे असे सांगितले तर तो खात्रीचे पक्के मडके देईल.
त्यात वरील सर्व प्रकार करता येतात.
मॅगी पेक्षा कप नूडल्स मिळाल्या तर त्या घ्या. त्यात फक्त गरम पाणी ओतले कि त्या
शिजतात. गुळपोळी, चिक्की, नाचणीची बिस्किटे, राजगिरा लाडू वगैरे प्रकार नाश्त्याला
उत्तम.
खाण्यासाठी आणखी पदार्थ, पाण्याची सोय, बरोबर घ्यायच्या वस्तू, उपयोगी पडणारी झाडे,
पुढच्या भागात.
अपूर्ण.
सोबत नेण्यासाठी चीज सॅंडविच हा पण एक चांगला प्रकार आहे. यासाठी शेडार चीज घ्या
किसणीला तेलाचा हात लावून ते किसून घ्या. मग त्यात थोडे तेल मिसळून त्यात बारिक
चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. हलक्या हाताने सगळे एकत्र करुन, थोडा
वेळ झाकून ठेवा. असे केल्याने सगळे फ़्लेव्हर्स मस्त एकरुप होतात. मग पावाच्या स्लाईसमधे
हे पसरुन घ्या. त्यावर मिरपुड किंवा चाट मसाला टाका. हे आदल्या रात्री करुन हवाबंद डब्यात
फ़्रिजमधे ठेवा, अर्धी चढाई झाल्यावर हे खा. याने भरपूर प्रथिने आणि कॅलरीज मिळतात.
चढाई सुरु करण्यापुर्वी न्याहारी अवश्य करा. कितीही चवदार लागत असली, तरी भजी, बटाटेवडे
खाऊ नका. एकतर त्यात फ़ारसे पोषणमूल्य नसते. शिवात तेच तेच तेल परत वापरल्यामूळे
ते खाणे अपायकारक ठरते. त्याच्या जागी, इडली सांबार, उपमा, कमी तेलातले पोहे, केक
चॉकलेट वगैरे खा.
कलिंगड, पपई, केळे, चिकू, द्राक्ष यासारखी फळे मिळाली तर अवश्य खा. (कलिंगडाचे
साल डोक्यावर ठेवल्यास, उन्हापासून संरक्षण होते.)
वाटेत खाण्यासाठी गोळ्यांपेक्षा खजूर, अंजीर, खारीक व बदाम घ्या. सुकवलेली केळी
सुकेळी या नावाने मिळतात, ती पण अवश्य घ्या. (मुंबईला दादरला शिवाजी मंदिराच्या
आसपास, किंवा वसईला ती मिळतात.)
शक्यतो मुक्कामाच्या ठिकाणी चिकन किंवा मांसाहार करु नका. त्या वासाने कोल्हे, तरस,
रानकुत्री, अस्वले आकर्षित होतात. (हा अनुभव मला आलेला आहे.)
पाणी
साधारणपणे तंदुरुस्त असलेला माणूस, अन्नावाचून आठ दहा दिवस तग धरु शकतो, पण
पाण्याशिवाय काहि तास राहणेहि कठीण आहे. महाराष्ट्रात दुर्गभ्रमणात पाण्याचा फार त्रास
होतो.
लघवीवाटे तसेच घामातूनही पाण्याचा निचरा होत असतो. अंगातील पाणी कमी झाल्यावर
बाकिच्या त्यासाबरोबरच, मानसिक त्रास देखील होतो. चिडचिड होणे, निर्णयक्षमता कमी
होणे, मनोधैर्य खचणे, असले प्रकार घडतात.
त्यामूळे गडावर पुरेसे पाणी उपलब्ध आहे, याची खात्री झाल्याशिवाय योजना आखू नयेत.
गडावर पाणी असले तरी, ते सापडायलाही हवे आणि ते खोल असेल तर ते तिथून काढूनही
घेता आले पाहिजे. गावकरी याबाबत योग्य ती माहिती देऊ शकतात. (याबाबतीत माझे
दोन अनुभव लिहायला हवेत. प्रबळगडावर पाणी आहे, याची पक्की माहिती आम्हाला होती
पण ते आम्हाला अजिबात सापडले नव्हते, व आम्हाला तिथला मुक्कामाचा बेत रद्द करावा
लागला. अंबोलीच्या एका कड्याखाली एक मठ आहे, तिथे जायची वाट खूप अवघड आहे, पण
त्या वाटेवर आम्हाला थंडगार पाण्याचा झरा दिसला होता, आणि आमची तहान भागली होती.)
तर निदान पाण्याच्या साठ्यापर्यंत पुरेल इतके पाणी सोबत नेणे आवश्यक आहे. तहान
लागल्यावर लगेच पाणी पिण्यापेक्षा आधी तोंडात गूळाचा खडा ठेवावा. (अर्थात त्यासाठी
सोबत गूळाचे खडे हवेत. आवडत असल्यास चिंच पण खावी) आपल्याकडे गूळपाणी
देऊन स्वागत करायची पद्धत आहे, ती अनुभवसिद्ध आहे.
आपण घामाबरोबर शरिरातून निघून जाणाऱ्या क्षारांचा विचार करत नाही. त्या क्षारांची पण
भरपाई होणे गरजेचे असते. त्यासाठी गूळ उपयोगी पडतो. बाजारात नारळाच्या पाण्याच्या
पावडरीची पाकिटे मिळतात. ती घेता येतील. कपभर साखर त्यात अर्धा चहाचा चमचा मीठ
व एक चहाचा चमचा लिंबूफ़ूल (बाजारात मिळते) मिसळून जवळ ठेवले, तर त्यातले
थोडे पाण्यात मिसळून सरबत करता येते.
समजा खूप गरम झाले तर पाणी दिसल्यावर आपण लगेच डोक्यावर पाणी ओततो,
पण ते धोकादायक आहे. त्यापुर्वी कपभर पाणी, मानेच्या मागे पाठीच्या कण्यावर ओतावे.
हे काम दुसरी व्यक्ती जास्त चांगल्याप्रकारे करु शकते.
वाटेत जाताना, कुठेही पाणी दिसले, तर रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या भरुन
घ्याव्यात. बाहेर आलेल्या कातळाखाली अनेकदा पाणी ओघळताना दिसते, तिथे थोडा
वेळ थांबून पाणी भरुन घ्यावे.
वाटेत सुकलेला ओहोळ दिसला, तर तिथे मातीत हातभर खणून बघावे, तिथे पाणी
सापडू शकते.
असे सापडलेले पाणी शुद्ध असेलच याची खात्री नसते. त्यामूळे ते शुद्ध करणे आवश्यक
आहे. काहि जणांना (उदा. मला ) कुठलेही पाणी बादत नाही, पण काहि जणांना त्याचा
त्रास होऊ शकतो.
तर पाणी शुद्ध करण्यासाठी, काय काय करता येईल ते बघू या.
तर ते पाणी आधी कापडाच्या चौपदरी घडीमधून गाळून घ्या. त्यात तुरटी फ़िरवून थोडा
वेळ ते तसेच ठेवा. गाळ खाली बसल्यावर वरचे पाणी अलगद काढून घ्या. ते पाणी शक्य
असल्यास गरम करुन प्या. (शास्त्रीय दृष्ट्या पाणी कमीतकमी २० मिनिटे उकळले पाहिजे.)
औषधाच्या दुकानात, क्लोरिन ड्रॉप्स मिळतात, ते अवश्य वापरावेत.
तहान कमी करण्यासाठी आणखी काही उपाय आहेत.
शक्यतो तेलकट आणि तिखट खाणे टाळा. पिण्याच्या पाण्यात तूळशीचे बी किंवा
सबजाचे बी टाकून प्या. वाटेत जिथे मिळतील तिथे उंबराची फळे खा.(महाराष्ट्रात बहुतेक
गावात, एष्टी स्टॅंडजवळ श्री दत्तगुरुंचे देऊळ असतेच. तिथे जवळपास हे झाड सापडेल. जंगलातही
हि झाडे दिसतात. याच वर्गातील वड, पिंपळ या झाडांना लागलेली फळे देखील खाता येतात.)
नाचणीचे पदार्थ खा. पण शरिरातील, पाणी कमी होऊ देऊ नका.
अपूर्ण
जंगलात भटकणार्यांना झाडांची थोडीफ़ार ओळख असतेच. काहि सहज दिसणाऱ्या झाडांचे काय
उपयोग होऊ शकतात ते बघू या.
उंबर, वड, पिंपळ, साग, चवई, एरंड, कडूनिंब यांचे उल्लेख वर ओघात आले आहेतच.
आंबा, पेरू या झाडांची कोवळी पाने खाता येतात. ती तूरट लागतात पण तोंडाला चव आणतात.
हिरड्याचे झाड ओळखता आले, आणि त्यावर हिरडे दिसले तरी ते खायला हरकत नाही, पण
ते चघळत चघळत खावेत. नाहीतर घसा बसतो.
आघाडा दिसला, तर त्याची कोवळी पाने घ्यावीत, त्याची भाजी करता येते. त्याचे तूरे टोचतात
त्यामुळे ती काळजी घेत, जर काड्या तोडता आल्यात, तर घ्याव्यात. त्यांचा टूथब्रश म्हणून
उपयोग होतो.
निगडी, निरगुंडी वा दगडीचा पाला मिळाला (याची पाने भाल्यासारखी असतात. खालच्या बाहूने
पांढरट असतात व याला निळे तूरे येतात.) तर तो अवश्य तोदून घ्यावा. अंथरुणाभोवती तो
पसरावा, व आगीवर टाकून त्याचा धूर करावा. किटक दूर पळतात.
करंजाची झाडे दिसली, तर त्याच्या शेंगा झाडाखाली पडलेल्या असतात. त्यातल्या बिया दगडाने
ठेचून, निघालेला रस अंगाला चोळला तर किटक चावत नाहीत. (याला फ़ार उग्र वास असतो.)
वाटेत तळे लागले, आणि त्यात रामबाण असले तर त्यातले काहि तोडून घ्यावेत. या रामबाणांचा जखमेवर लावण्यासाठी चांगला उपयोग होतो. ते कणीस कुसकरुन आतला कापुस जखमेवर लावायचा.
बहाव्याची झाडे दिसली, तर त्याच्या शेंगा तोडून घ्याव्यात. त्यातला गर गोड असतो. पण तो माफक प्रमाणातच खावा.
कांचन, कचनाराची झाडे दिसली तर त्याच्या कोवळ्या शेंगा व पाला खाता येतो.
पहिल्या पावसानंतर सगळीकडे, खास करुन कोकणात टाकळा उगवलेला दिसतो. तो कोवळा असल्यास खुडुन घ्यावा. त्याची भाजी करता येते. हिवाळ्यात त्याच्या शेंगा सुकलेल्या दिसतात. त्या घ्याव्यात.
त्यातल्या बिया काढून, त्या भाजून, कुटून पाण्यात उकळून त्याचा काढा करता येतो. तो कॉफ़िसारखा
लागतो. समजा तसा उपयोग नाही केला तरी त्या बिया सगळीकडे फेकल्यास चांगले, कारण
टाकळ्यामुळे कॉंग्रेस गवताला आळा बसतो.
पावसाळा स्थिरावल्यानंतर अनेक ठिकाणी अळू दिसतो. तो उपटून त्याचे कंद, उकडून वा भाजून खाता येतात. सुरणासारख्या / शेवळासारख्या दिसणार्या वनस्पतिंपासून मात्र लांब रहावे, त्या विषारी असण्याची शक्यता असते. तसेच मश्रुमहि अजिबात खाऊ नयेत.
उन्हाळ्यात जांभळा करवंदाबरोबर, अळू (एक प्रकारचे फळ), नेर्ली (अंबोली), तोरणं, फालसा, बेलफळं
मिळतात, ती पण अवश्य खावीत. उन्हाळ्याचा त्रास कमी होतो त्यामूळे.
उन्हाळ्यात सगळीकडे पांढरा कुडा फुललेला दिसतो, ती फुलेही खाता येतात. पिकलेली भोकरे तशीच खाता येतात किंवा पाण्यात कुस्करुन ते पाणी पिता येते.
अपूर्ण
बूट
योग्य ग्रीप असणारे बूट अगदी आवश्यक आहेत. पण ते अगदी नवे नसावेत. नवे घेतल्यास
त्याची सवय करु घ्या. >>> अगदी.. नविन बूट घालुन कधीच ट्रेक करु नये..पायांना बूटाची नि बूटांची पायांना सवय होणे महत्त्वाचे असते..
नवखे ट्रेकर्स असतात त्यांना नेहमी प्रश्ण पडतो.. की बूट कोणते घ्यावेत..
बहुतेकांचा गैरसमज असतो की बूटाचा जितका मोठा वा खडबडीत तळभाग असेल तितके
बूट चांगले.. तर काही जण वुडलँडचे महागडे बूट चांगले असा गैरसमज करून
बसतात..
पण मी बघितलेय.. जर तुमचा तुमच्या पादत्राणांवर विश्वास असेल तर बूटच हवेत
असे काही नाही.. पण बूट घातलेले कधीही चांगले..पण जर का ट्रेकमध्ये मुक्काम
असेल तर जाताना बॅगेतून स्लिपर/फ्लोटस नक्की घेवून जावी.. मी शक्यतो बूट
घालूनच वावरतो.. पण चप्पल असल्यास तितकेच पायाच्या तळव्यांना मोकळीक..
नि बूट कोणते घ्यायचे म्हणत असाल तर अॅक्शनचे ट्रेकींग शूज मिळतात
सगळीकडे.. या शुजबद्दल माझा अनुभव खूप चांगला आहे नि सध्या
ट्रेकर्समंडळीमध्ये याच शूजची चलती आहे.. प्रथमदर्शनी तुमच्यावर कदाचित हे
बूट छाप पाडणार नाहीत... बूटाचा तळभागदेखील तितकासा जाड नाहिये नि तितका
खडबडीतसुद्धा नाहीये... पण या बूटांचे वैशिष्ट्य म्हणजे
१) ह्याची जी ग्रिप आहे त्याला तोड नाहिये.. मी तिन्ही मोसमात वापरुन
पाहिले.. विशेषतः पावसाळ्यात.. पैसा वसूलच समजा.. (हेच जर का तुम्ही
वुडलँड वा स्पोर्टस शुज घालून गेलात तर धडपडुन धडपडून वैतागलाच समजा.. ! नि
एकदा पडलात की आत्मविश्वास ढळतोच..) उदा. मी मागे पावसात पेठचा किल्ला
केला होता.. वाट अगदी सोप्पी उतरणीची होती.. तरीपण ग्रुपमध्ये वुडलँडचे
मोठ्या तळभागाचे बुट घालुन आलेला एक मित्र सारखा पडत होता.. आपटत होता..
शेवटी बूट काढून त्याला उतरावे लागले.. !!
२) हे बूट पाण्यात भिजले वा हे बूट घालून नदीच्या मार्गातून गेलात तरी काही होत नाही या बुटांना ( इथे जर वुडलँडचे महागडे बूट घालुन गेलात तर गेलेच समजा तुमचे बूट..)
३) हे बूट फारच स्वस्त आहेत.. किंमत फक्त ६५० रुपये.. त्यात सहा महिन्यांची गॅरंटी.. !
४) तीन रंगात उपलब्ध आहेत.. त्यामुळे चॉईस आहे..
५) air ventilation चे असलेले वैशिष्ट्य.. हवा खेळती राहते..
६) बुटाचे तितकेसे वजनसुद्धा नाहीये.. त्यामुळे पायात बेडी अडकवल्याचा फिल येत नाही.. 
७) असेही म्हटले जाते की बर्फाळ प्रदेशात बर्यापैंकी तग धरु शकतात हे बूट.. (मला बर्फाळ प्रदेशातील अनुभव नाहीये.. तेव्हा ह्या विधानाला पक्के समजू नका.. नेटवर योग्य माहिती मिळेल.)
महागातले बूट घ्यायचे असतील तर Quechua walking shoes-Forclaz 500 हे पण चांगले आहेत असे ऐकून आहे.. किंमत अंदाजे ३५००/- रुपये..
यो अरे हिमालयातपण बेस्ट आहेत. माझा सख्खा भाऊ सुंदरडुंगा ग्लेशियर ट्रेक
करून आलाय या बुटांवर आणि त्याने १०० मार्क दिले आहेत. माझाही वैयक्तिक
अनुभव खूप चांगला आहे या बुटांबद्दल. मी सह्याद्रीत सगळ्या सिजनमध्ये घालून
फिरलोय आणि ट्रायल्ड आणि टेस्टेड आहेत.
पण मला एक विचारायचे होते. मला अनेकदा ब्लिस्टरस येतात. दोन-तिन प्रकारचे
शूज वापरून पाहिले पण परिणाम तोच. त्यामुळे होते काय की मोठ्या ट्रेकला वाट
लागते. यासाठी काय करता येईल. काय उपाय आहेत का?
बूटांचे कवतिक आपल्याला. डोंगरावर राहणारे तर अनवाणीच चालतात. मी त्यांच्या तळव्याचे निरिक्षण केलेय. एकतर त्यांच्या तळपायाची त्वचा आपल्यापेक्षा जाड असते. शिवाय एखाद्या निमुळत्या वाटेवरुन जाताना, ते अगदी कमी वेळ एका ठिकाणी पाय ठेवतात (भरभर चालतात) त्यामुळे त्यांच्या शरिराचा गुरुत्वमध्य पुढे सरकत जातो, घसरायला, पडायला, तोल जायला, त्यांच्या शरिराला अवधीच मिळत नाही.
दिनेशदा.. डोंगरात जाणाऱ्या नवख्या लोकांसाठी अतिशय उत्तम माहिती आहे आणि अनुभवी ट्रेकर्सना हे अजिबात बाळबोध वाटणार नाही...
पण 'जीन्स घाला' असा सल्ला का दिला आहात आपण? ते फारसे संयुक्तिक नाही असे माझे स्पष्ट मत आहे. ट्रेकला जीन्स घालायच्या मी चांगलाच विरोधात आहे. शिवाय लाल, पिवळे वा केशरी रंगाचे कपडे अंगावर घातले नाहीत तरी एखादा अश्या रंगाचा टी-शर्ट सोबत असावा. डोंगरात कुठेही हरवल्यास असा रंग कामाला येऊ शकतो. औषधाचे म्हणशील तर छोटीशी प्रथमोपचार पेटी सोबत हवीच. शिवाय प्रथमोपचार कसा करावा ह्याची सुद्धा थोडी माहिती हवी. तांत्रिक किंवा शास्त्रशुद्ध प्रशिक्षण असेल तर उत्तमच.
चूल तयार करताना सुद्धा कमीत कमी सरपण वापरून जेवण तयार करता यायला हवे. आपल्याकडे आता आकाराने लहान असा MSR स्टोव्ह सहज उपलब्ध आहे. तो पेट्रोल, डीझेल, रॉकेल अश्या कुठल्याही इंधनावर जळतो.
"रात्री उजेडाचा फ़ार बाऊ करायची गरज नाही. साधारण अर्ध्या पाऊण
तासाच्या सरावाने, आपल्याला अंधारातही बऱ्यापैकी दिसते. समोर बघण्यापेक्षा डोळ्यांच्या
कडेने बघा, ते दृष्य जास्त स्प्ष्ट दिसते" --- एकदम मस्त...आणि जेवणाच्या टिप्स अफलातून...
------ हे सर्व अनुभवानेच लिहिता येते...
अनेकदा ट्रेकर्स वाटेवर थांबल्यास घटाघट पाणी पिताना दिसतात. ह्यामुळे खुपसे पाणी शरीराला लागण्या ऐवजी लाघवी वाटे निघून जाते. ह्यापेक्षा दर ४-५ मिनिटांनी पाण्याचा एक-एक घोट घ्यावा.
जीन्स घालायचा पर्याय अगदी वाईट. कारण एकतर वजनाला जड आणि दुसरी गोष्ट चढायचं असेल तिथे पाय वर वै टाकायला जीन्समुळे खूप त्रास होतो. त्यामुळे ट्रेकमध्ये जीन्सच घालायची असेल तर जीन्स स्ट्रेचेबल असावी किंवा सरळ सुटसुटीत ट्रॅकपँट घालावी. पावसाळ्यात तर जीन्सला बीग नो नो.
हंटर शूज माझ्याही ब्लॅक लिस्टला. मला या अॅक्शनच्या ट्रेकींग शूजबद्दल माहिती नव्हती. मी पॉवरचे शूज वापरून बघितलेत पण अगदीच वाईट अनुभव. पीव्हीसी सोलचे शूज पावसाळ्यात अजिब्बात वापरू नयेत. त्यामुळे हल्ली माझी भिस्त फ्लोटर्सवरच, सह्याद्रीच काय अगदी हिमालयातपण आणि ते पण त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरलेत आजपर्यंत.
भडक रंगांच्या कपड्याने पक्षी बूजतात आणि जवळ येत नाहीत. हल्ली ट्रेक
मधे तसेही पक्षी फारच कमी दिसतात. एखाद्या भडक रंगाचा कपडा असल्यास त्याचा
उंचावर झेंडा बांधून संदेश देता येतो.
पण या बाबतीत आणखी एक सांगावेसे वाटते. एकदा आपण समूहाने जायचे ठरवले, तर
कायम एकत्र राहणे गरजेचे आहे, मी खूपदा बघितलेय कि एखाद दुसरा गडी मागे
राहतो. हे अगदी अयोग्य आहे. प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. एखाद्याला
जास्त विश्रांतिची गरज असते. त्यावेळी मागे पडणार्या भिडूसोबत राहून
त्याला मदत करणे, त्याचे मनोधैर्य वाढवणे गरजेचे असते. त्यामूळे होता होईतो
एकत्र वाटचाल करावी हे उत्तम. तसेच इतरांना सूचना न देता, अचानक वेगळी वाट
पकडणे, पुढे जाणे हे पण टाळावे. अनुभवी लीडर्स हा नियम कटाक्षाने पाळतात.
आडो, जीन्स बद्दल दोन चार बाबी अशा. कार्गो टाईप जीन्सच्या खिश्यात
बर्याच सटरफटर वस्तू ठेवता येतात. पाण्याची बाटली, कॅमेरा, औषधे, वगैरे.
त्यामूळे प्रत्येकवेळी सॅक उगडावी लागत नाही.
दुसरे म्हणजे धडपडल्यास, गुडघा खरचटणे कमी प्रमाणात होते (शिवाय गुडघ्यावर
ती फाटली तरी फॅशन म्हणून वापरता येते.) जिथे दगडाला गुडघे टेकून वर चढायचे
असते, रांगत वा बसत पुढे सरकायचे असते, तिथे पण जीन्समूळे शरिराला थोडेफार
पॅडींग मिळते. झोपताना जीन्सची घडी घालून, उशाला घेता येते. पण ती
स्ट्रेचेबल किंवा सॉफ्ट असावी. यावर काय मत ?
पक्का भटक्या - इंधनावर जळणारे स्टोव्ह्ज खरेच उत्तम, पण आपल्याकडे सार्वजनिक वाहनातून ज्वालाग्राही पदार्थ नेता येत नाहीत, म्हणून मी टाळायचो. शिवाय त्यात शेकोटीची मजा नाही ना ?
आणखी
एक दोन झाडांबद्दल. आपल्याकडे शेताच्या बांधावर बाभळी दिसतात. बाभळीच्या
झाडाची गाठ, शेकोटीसाठी उत्तम, पण ती खूप जड असल्याने, फार वाहून नेण्यात
अर्थ नाही. बाभळीच्या झाडावर कधीकधी डिंक दिसतो. तो अवश्य घ्यावा. तोंडात
घालून चघळायला मजा येते.
बाभळीच्या सालीच्या ढलप्या मिळाल्या, तर त्या घ्याव्यात. त्या लवकर पेटतात.
त्यांच्या राखेने दात घासता येतात. बाभळीचे काही काटे पण तोडून घ्यावेत.
हातापायात रुतलेले काटे काढायला उपयोगी पडतात. या काट्यांचा एक वेगळा
उपयोग, एका मित्राने दाखवला होता. आमच्या जवळ एक मोठा उडता किटक (त्याला
कोल्हापूरला पेळू म्हणतात ) आला होता. त्याला चिरडले असते, तर भयानक घाण
वास सुटला असता. त्या मित्राने, एका काडीने तो किटक दाबून ठेवला, आणि
त्याच्या मानेत तो काटा खुपसला. मग तो लांब नेऊन टाकला.
पाम वर्गातील झाडे आपल्याकडे जंगलात फार दिसत नाहीत. पण बहुतेक पाम झाडांच्या गाभ्यात भरपूर स्टार्च असतो, आणि तो खाता येतो. भारंगीची पाने, केनीची पाने खाता येतात, पण त्यांची ओळख नीट पटली पाहिजे.
आपल्याकडे थोडाफार बांबू दिसतो. त्याचे अनेक उपयोग करता येतात. (कोंब
मात्र खाऊ नयेत. त्याची भाजी करत असले तरी त्यातील सायनाईडचा अंश
काढण्यासाठी, ते कापून २४ तास पाण्यात ठेवावे लागतात. शिवाय बांबूचे कोंब
तोडायला कायद्याने बंदी आहे. हत्तीसारख्या प्राण्यांनी कोवळे कोंब नष्ट करू
नये, म्हणून निसर्गाने ते विखारी केले आहेत.) बांबू मधे पेराच्या आत कधी
कधी शुद्ध पाणी मिळते. बांबूवर ठोकून बघितल्यास आवाजावरुन ते कळते.
बांबूच्या आतमधे भात वगैरे शिजवता येतो.
त्याचा पेला म्हणून उपयोग करता येतो. छोटा असेल तर स्ट्रॉ म्हणून वापरता
येतो. बांबूचा एक अनोखा उपयोग, आमच्यासाठी दोन छोट्या मूलांनी केला होता.
त्यांच्या वाटेने उतरताना, एक पॅच असा होता, कि जिथे जेमतेम पाऊल टेकायची
जागा होती. एका बाजूला उभा कडा तर एका बाजूला खोल दरी होती. त्या दोन
मूलांनी, दरीच्या बाजूला तो बांबू धरून ठेवला आणि त्याचा कठड्यासारखा वापर
करत आम्ही तो पॅच पार केला. नंतर त्याच बांबूचा उपयोग करत, त्यानी आमच्या
बॅगा पण तशाच पुढे सरकवल्या.
पण ओळख नसल्यास, कुठल्याही झाडाचे, पान, फळ वा फूल खाऊ नये. आपल्याकडे काही विषारी झाडे आढळतात.
थोडे सुरक्षिततेबद्दल...
सध्या ट्रेकींगचे प्रमाण शहरी भागात मोठ्या प्रमाणावर वाढीला लागले आहे ही
एक चांगली गोष्ट आहे. पण या ट्रेकर मंडळींमध्ये किमती सामान (जसे महागडे
कॅमेरे, मोबाईल, घड्याळे, सोन्याचे दागिने इ.इ.) असतात हे पण गावकऱयांना
कळून चुकले आहे. त्यामुळे लहान गटात किंवा एकट्या-दुकट्या ट्रेकरवर हल्ला
करून त्याला लुटण्याचे प्रकार सह्याद्रीमध्ये वाढू लागले आहेत. ही एक अतिशय
गांभिर्याने घेण्याची बाब आहे. मध्यंतरी यावर सकाळमध्ये एक लेख आला होता.
त्याची लिंक सापडली की देतो.
पण काही गोष्टी कसोशीने पाळणे गरजेचे आहे. एक म्हणजे शक्यतो महागड्या वस्तू
ट्रेकिंगला नेऊच नये. एकतर त्या हरवल्या, तुटल्याफुटल्या तर सगळ्या
ट्रेकवर पाणी फिरते.
दुसरे, प्रत्येक मोठ्या गावात (काही लहान गावातही) पोलिस पाटलाचे किंवा
सरपंचाचे घर असते. तिथे जाऊन आपण कुठून आलो, कितीजण आहोत आणि कुठे जाणार,
किल्यावर मुक्काम करणार अथवा नाही याची थोडीफार कल्पना देऊन ठेवावी.
वाटमारू मंडळी ही त्याच भागातली असतात त्यामुळे गावातल्या लोकांनाही एक
अंदाज असतो.
हे करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अपघात किंवा अन्य आपत्कालीन
परिस्थिती उद्भवल्यास पोलिस पाटील आणि सरपंचाची मदत अतिशय महत्वाची ठरते.
त्यांचा दूरध्वनी क्रमांक घेऊन ठेवणे गरजेचे.
दिनेशदा, हो म्हणताय तशी कार्गो चालेल, पण तशी तर ती कॉटन मटेरियल मध्ये मिळतेच नां? जीन्स एवढ्याचसाठी नाही म्हटलं की एकतर जागा अडवते, वजनी असतेच. तसंच चढायचं वै असेल तर सोईची होत नाही.
बाकी तुम्ही वर सांगितलेला एकत्र राहाण्याचा मुद्दाही बरोबरच. ट्रेकिंगचा हा पहिला नियमच आहे की एकटं-दुकटं कुठेही जाणं टाळा, तसंच चालताना शक्यतो एकत्र राहावं. तसं अगदीच शक्य नसेल तर फार अंतर एकमेकांमध्ये ठेवू नये.
एक इथे अनुभव शेअर करावासा वाटतोय.
माझा एक मित्र आहे, जो आयुर्वेदीक डॉक्टर आहे व तो अगदी शाळेत असल्यापासून तो आमच्या बरोबर ट्रेकींगला येतोय. आता त्याचा वेगळा ग्रूप आहे व ते स्वतः ग्रूप्सना ट्रेकींगला घेऊन जातात. २ वर्षांपूर्वी ते रायरेश्वरच्या इथे कुठेतरी गेले होते. त्यांचा मला वाटतं ८-१० जणांचा ग्रूप होता व त्यातले काही जण पहिल्यांदाच ट्रेकिंगला गेले होते. त्यांचा २ दिवसांचा प्रोग्रॅम होता व डोंबिवलीतून बस घेऊन गेले होते. ज्या रस्त्याने ते जाणार होते तिथे जाण्यापूर्वी गावकर्यांनी त्यांना सांगितलं की ही वाट अजिबातच वहिवाटीची नाही. कोणीच जात नाही, जंगल आहे त्यामुळे या वाटेने जाऊ नका. पण नाही, त्यांच्या सांगणं अजिबात न ऐकता ते त्याच वाटेने गेले. दुसर्या दिवशी परत येणार होते परंतू त्यांना रस्ताच सापडला नाही. अर्थातच रस्ता चुकले त्यामुळे रात्रभर वेड्यासारखे जंगलात फिरत होते. बसच्या ड्रायव्हरला जिथे यायला सांगितलं होतं तो तिथे येऊन यांची वाट बघत उभा. हे जंगलात एंजॉय (??) करत आणि आमचे घरी बसून शंभर फोन.
सगळ्यांचा जीव टांगणीला लावून पण परत आल्यावर पश्चाताप नाही की काही नाही. त्यामुळे माझं एवढंच सांगणं की अशा मंडळींबरोबर जाणं शक्यतो टाळावं.
आणखी एका झाडाबद्दल. फड्या निवडूंग. ज्याची "पाने" नागफणीसारखी असतात
तो. त्याला कधी कधी लाल रंगाची फळे लागलेली दिसतात. त्यावर अगदी बारीक काटे
असतात. त्यामूळे एखादे पान, जाड कागद वगैरे घेऊन ते फळ तोडून घ्यावे.
आगीवर किंचीत भाजावे म्हणजे काटे जळतात. आणि मग त्या फळाचा लाल रस प्यावा.
तो गोड लागतो. शक्तीवर्धक असतो, तसेच खोकल्यावर औषधी असतो. पुर्वी
त्यापासून बालामृत नावाच टॉनिक करत असत. आता तो निवडूंगच कमी झाल्याने ते
टॉनिकही मिळेनासे झाले.
याच झाडावर अगदी बारीक लालसर रंगाचे किडे दिसतात. त्यांना घाबरायचे कारण नाही. कारण त्या किड्यांपासून लाल रंगाचा खाद्यरंग करतात.
आणखी एका निवडूंगाचा चीक वापरुन पाणी शुद्ध करता येते, असे वहिनी सांगत असे. (ती एव्हरेष्ट बेसकँप पर्यंत जाऊन आलीय.) तिला आठवत असेल, तर विचारुन लिहितो.
सांघिकरित्या दुर्गभ्रमण करताना अनेक गोष्टी लक्ष्यात घ्यावा लागतातच. एखादा कच्चा भिडू असेल तर त्याला सोबत घेऊन पुढे जाणे सर्वांना जमतेच असे नाही... मी देखील हे अनेकदा पाहिले आहे. मी स्वतः माझ्यासोबत असणाऱ्या सर्वांच्या शेवटी असतो. गेली ७-८ वर्षे माझा तोच शिरस्ता आहे. शिवाय माझ्याकडे प्रथमोपचार पेटी असते हे देखील एक कारण...
गडावर चुलीसाठी केल्या जाणाऱ्या आगीशिवाय इतर शेकोटी (कॅम्पफायर साठी वगैरे) करण्याच्या मी विरोधात आहे. तिथली लाकडे, सरपण अतिशय काळजी पूर्वक वापरले गेले पाहिले ह्या मताचा मी आहे. बहुदा माझ्या अनेक मतांमुळेच मी कुठल्याच ट्रेकिंग ग्रुपबरोबर कधी ट्रेकला जात नाही. नेहमी वैयक्तिक ट्रेकिंग करतो.माझ्यासारखे ज्यांना डोंगरातले नियम मान्य असतात अश्या लोकांबरोबर ट्रेक करण्यात निखळ आनंद असतो.
साधारणपणे आरोग्याच्या खालील तक्रारी प्रामुख्याने दिसतात. (त्याबद्दलच्या प्रथमोपचाराबद्दल लिहिणार का ?)
पाय मुरगळणे
अगदी कॉमन. कधी बूट दगा देतात तर कधी निसरडा रस्ता, कधी पाऊल वाकडे पडते.
याची जखम दिसत नसल्याने, दुसर्याला हे दिसत नाही. लंगडत चालण्याशिवाय
पर्याय नाही. स्प्रे वगैरे तात्पुरता आराम पडतो. कधी कधी सूज पण येते. पाय
बांधून ठेवता येतो, पण मग बूट घालता येत नाहीत, आणि चालणे आणखीनच अवघड
बनते.
खरचटणे / काटा टोचणे
यात तसे काळजी करण्यासारखे नाही. काटा शक्यतो लगेच काढून टाकावा, शक्य
झाल्यास तिथे औषध लावावे. गोखरू चा काटा मात्र प्रचंड वेदना देतो. हा काटा
पायाच्या बाजूने पण रुतू शकतो. पाऊल पुढे टाकणे अशक्य होते. काटा काढल्यावर
मात्र फारसे दुखत नाही.
किटक चावणे
हे पण अनेकदा घडते. काहि काहि किटकांचा नुसता स्पर्श देखील दाहक ठरतो.
एखादे जनरल पर्पज क्रीम असेल तर चांगले. कधी कधी निव्वळ माती ओली करुन
लावली तर आराम पडतो. बाकी रिअॅक्शन आली तर मात्र पंचाईत होते.
मधमाशा
झाडावरच्या पोळ्या बरोबरच, एखाद्या दगडाच्या कपारीच्या आतही त्यांचे पोळे
असते. (त्याबाहेर माशा घोंघावताना दिसतात.) त्यांना त्रास ने देणेच योग्य.
काहि फुलांवर त्या असतात. पण त्या आपल्या कामात मग्न असतात. त्यावेळी त्या
त्रास देत नाहीत. विडी सिगरेटच्या धुराने मात्र त्या विचलीत होतात.
समजा हल्ला झालाच, तर शरीराचे सर्व भाग, जास्त करुन चेहरा पुर्णपणे झाकून घेतला पाहिजे. काहि वेळाने त्या शांत होतात.
याबाबत मला कर्नाळ्याला वाईट अनुभव आला होता. मी घरुन टोमॅटो सॉस करुन नेला
होता. (जरा बरा झाला होता वाटते ) तो उघडल्याबरोबर त्यावर माशा आल्या. तसा
त्यात धोका नव्हता, पण माझ्या मित्राने चपलेने एक माशी मारली, मग मात्र
आमच्यावर हल्ला झाला. पळता भुई थोडी झाली. एका मित्राच्या केसात माशी चावली
होती. मोठ्या मुष्किलीने नांगी काढली होती तिची. काहि माशा चावल्यावे
प्रचंड आग होते, तसेच चेहरा खुप सुजतो. क्वचित पोट बिघडते.
कोळी
आपल्याकडे काहि विषारी कोळी दिसतात. नेहमीच्या वाटेवर आडवी येतील अशी त्यांची जाळी क्वचितच असतात. पण शक्यतो समोर बघत, आडवी येणारी जाळी, न तोडणे उत्तम.
विंचू चावणे
दगडाच्या खाली अनेकदा विंचू असतात. दिवसा ते क्वचितच बाहेर पडतात, पण रात्री मात्र ते फिरत असतात. विंचू दंश झाल्यावर प्रचंड वेदना होतात. छोटा विचू असेल तर काहि काळाने त्या कमी होतात. पण मोठा विंचू असला, तर ते धोकादायक ठरते.
साप चावणे
साप असेच शीर्षक असलेले एक छोटेसे सचित्र पुस्तक आता उपलब्ध आहे. ते किमान
चाळून ठेवावे. आपल्याकडे विषारी सापांच्या मोजक्याच जाती आहेत. सापाचे विष
हे त्याला महत्प्रयासाने बनवावे लागते. आणि त्याचा उपयोग प्रामुख्याने भक्ष
पकडण्यासाठी होतो. माणूस काहि सापाचे भक्ष नाही, त्यामुळे माणसावर त्याचा
वापर करुन ते फुकट घालवणे, सापाला परवडण्यासारखे नसते.
क्वचित सापाचा दंश हा स्वसंरक्षणार्थ होतो, पण जास्त करुन तो, त्याच्यावर
पाय पडल्याने होतो. भक्षाचा पाठलाग करुन पकडणे सापला शक्य नसते. तो अनेकदा
भक्षाच्या वाटेवर दबा धरुन बसलेला असतो.
त्यामूळे हातातील काठी दगडावर आपटत जाणे योग्य ठरते, म्हणजे सापाला आपली चाहूल लागते.
आजूबाजूने जाणारे, आडवे जाणारे, झाडावरुन वा गुहेच्या छतावरुन पडलेले साप,
आधीच घाबरलेले असतात. त्यांना त्यांच्या वाटेने जाऊ द्यावे.
रात्री बुट काढून ठेवले असतील, तर सकाळी पायात घालण्यापुर्वी नीट बघून घालावेत.
दुर्दैवाने साप चावलाच, तर उपचारापुर्वी त्याची ओळख पटवण्यासाठी त्याला
पकडणे वा मारणे गरजेचे आहे. (हा सल्ला मुंबईतील डॉक्टरने दिलेला आहे.)
याबाबतीत करायच्या प्रथमोपचाराची माहीती असणे आवश्यक आहे.
नाकाचा घोळणा फुटणे
यात नाकाच्या एका किंवा दोन्ही नाकपुडीतून अचानक रक्त वाहू लागते. हा तसा धोकादायक प्रकार नाही.
पण बघणार्याला तो घाबरवतो. काही वेळाने हे रक्त आपोआप थांबते. थोडी विश्रांती घेतल्याने व डोक्यावर पाणी ओतल्याने, आराम पडतो.
पोट बिघडणे
दुषित पाणी प्यायल्याने व काही इतर गोष्टी पोटात गेल्या तर पोट बिघडते. अशावेळी निसर्गाच्या हाकेला ओ देणे गरजेचे आहे. शक्य तितके पाणी पित राहिले, वा इतर द्रवपदार्थ घेत राहिले, तर काहि वेळाने आराम पडतो. फारच अशक्तपणा जाणवला, तर माघारी फिरणे उत्तम
अॅलर्जी
काहि झाडांच्या परागकणांची, धुळीशी अचानक अॅलर्जी येऊ शकते. अनावर
शिंका वा अंगावर लाल चट्टे येतात. अॅलर्जीची आधीच कल्पना असली तर त्या
गोळ्या जवळ बाळगणे योग्य. अंगावरच्या चट्ट्यांवर कोकम ओले करुन चोळले तर
आराम पडतो.
अॅलर्जीचे आणखी एक कारण म्हणजे खेकडे खाणे. डोंगरात, किंवा भाताच्या
शेतात, काळे पिवळे खेकडे दिसतात. (इथे अनेकवेळा त्यांचे फोटो दिसतात) खरे
तर आकाराने ते छोटेच असतात, शिवाय मोठे असले तरी, आतून पोकळ असू शकतात.
त्यामूळे त्यांना सोडून देणेच योग्य. खायचे ठरवले, तर ज्यांनी आधी खेकडे
खाल्ले नाहीत त्यांनी अजिबात खाऊ नयेत. शेलफिशची अॅलर्जी अगदी कॉमन आहे.
याबाबत जाणकारांनी आणखी लिहिले तर जास्त योग्य होईल.
एकदा
आपण समूहाने जायचे ठरवले, तर कायम एकत्र राहणे गरजेचे आहे, मी खूपदा
बघितलेय कि एखाद दुसरा गडी मागे राहतो. हे अगदी अयोग्य आहे. प्रत्येकाची
क्षमता वेगळी असते. एखाद्याला जास्त विश्रांतिची गरज असते. त्यावेळी मागे
पडणार्या भिडूसोबत राहून त्याला मदत करणे, त्याचे मनोधैर्य वाढवणे गरजेचे
असते. त्यामूळे होता होईतो एकत्र वाटचाल करावी हे उत्तम. तसेच इतरांना
सूचना न देता, अचानक वेगळी वाट पकडणे, पुढे जाणे हे पण टाळावे. अनुभवी
लीडर्स हा नियम कटाक्षाने पाळतात.
>>> अनुमोदन 
एSSS ओSSS
मागिल १०-१२ वर्षात पावसाळ्यात ग्रुपने ट्रेक करण्याचे प्रमाण फारच वाढले आहे... विशेषतः IT क्षेत्रातील तरुण जास्त आढळतात... तरूण वर्ग लवकरात लवकर गड काबिज करण्यास उत्सुक असतो, त्यामुळे लिडर आणि पुढे गेलेल्या ट्रेकर्स मधिल अंतर हाकेच्या पार जाते. तसेच पावसाळ्यात जंगल वाढलेले असल्याने पुढे गेलेले ट्रेकर्स नजरेच्या टप्प्यात रहात नाहीत. अश्या वेळी नावाने हाका मारणे सहसा टाळावे... "एSSS ओSSS" चे स्वर हवा कापत फार लांबवर पोहचतात हा अनुभव.
पावसाळ्यातील ट्रेक करायचा असल्यास सगळ्या सामानाची योग्य ती विभागणी करून वेगवेगळ्या प्लॅस्टिक पिशव्यांमधे भरावे... (कपड्यांची वेगळी पिशवी, खाण्याच्या सामानाची वेगळी, कॅमेरा, सेल, घड्याळ ई. साठी वेगळी पिशवी) या सगळ्या पिशव्या एक मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशवित भरून सॅकबंद करावी... कॅरीमॅटलासुद्धा प्लॅस्टिक गुंडाळलेले असेल तर उत्तम... ट्रेक दरम्यान कुठेही प्लॅस्टिकचा कचरा टाकू नये.
प्रथमतः कपड्यांचे वजन कमी वाटत असले तरी सतत सोबत बाळगल्याने त्यांचा
ताण मात्र जाणवू लागतो... जुलै मधील पन्हाळा ते विशाल गड हा तिन दिवसांचा
ट्रेक मी फक्त दोन जोड कपड्यांवर केला होता... दिवसभराचे ओले झालेले कपडे
जागा मिळेल तिथे निथळत ठेऊन, फक्त रात्री पुरता सुके कपडे अंगावर
चढवायचे... दुसर्या दिवशी परत (इच्छे विरुद्ध) ओले कपडे चढवून ट्रेकला
सुरवात करायची...
चिखल-मातीतीचा ट्रेक असल्यामुळे बर्याच जणांचे फ्लोटर त्यात रुतून बसत... त्यावेळी हंटरने चांगली साथ दिली... हंटर शूजचा आणखी एक फायदा म्हणजे जवळां पासून संरक्षण... करपेवाडी ते पांढरपाणीच्या जंगलात जळवांचा खूप त्रास होतो... तो त्रास टाळण्यासाठी सोबत तंबाखूचे पुडी किंवा बाटलीत तंबाखूचे पाणी बनवून घ्यावे... तंबाखूचे पाणी हाता पायावर चोळल्यास जळवांचा त्रास होत नाही.
रोहन, दिनेशदा... जळवा व इतर किटकां पासून संरक्षणाचे आणखी काही उपाय असतील तर जरूर सुचवा. राजगड उतरताना मधमांश्यानी खूप त्रास दिला होता... तसेच कुलुंगच्या ट्रेक मधे धार धार सोंड असलेल्या माश्यांनीही खूप त्रास दिला.
इथे बर्याच जणांनी दुर्गभ्रमण करताना काय काय खबरदारी घ्यावी हे लिहिलं आहेच. हे जितकं आवश्यक आहे तितकंच आवश्यक दुर्गभ्रमण करताना आपल्या अंगी काही गोष्टींची शिस्त बाळगणं.
१) जंगलात/डोंगरात/गड-किल्ल्यांवर जाताना मद्यपान, धुम्रपान या गोष्टी
करू नयेत. तुमच्याबरोबर कोणी करणारं असेल तर त्या व्यक्तिला योग्य शब्दांत
समज द्या.
२) आजकाल वाट ओळखण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत, कारण वाटांवर
गुटख्याची पाकिटं/चॉकलेटचे रॅपर्स पडलेलेच असतात. त्यामुळे ट्रेकला सुरुवात
करण्यापूर्वी या सुचना बरोबरच्या मंडळींना द्याव्यात व कोणी कचरा करताना
दिसलं तर त्यांना तो कचरा उचलायला लावावा.
मी माऊंटेनियरींगच्या कोर्स केला तेव्हाची गोष्ट. आम्हांला फिल्डवर न्यायच्या आधी व कोर्स सुरु होताना भरपूर गोष्टी (सॅक, आईस अॅक्स, बर्फातले बूट इ.इ.) दिल्या होत्या. त्या सामानात एक छोटा पाऊच होता, तो दिवसभर कमरेला लावायचा व आपल्या आजूबाजूला जो कचरा दिसेल तो त्यात गोळा करायचा असा नियमच होता.
३) हल्ली आपल्याकडे मोबाईलचा अति सुळसुळाट झालाय. बरं स्वतःचं मनोरंजन करावं तर ते नाही, उलट स्पीकर मोडवर आपल्या आवडीची गाणी जबरदस्ती दुसर्याला ऐकवण्याची फॅशन आहे. जंगलात असताना हे टाळा व तिथल्या निसर्गाचा/पशुपक्षांच्या आवाजाचा आनंद घ्या.
साधारणपणे झाडे फूलावर असली तर मधमाश्या जास्त अॅक्टीव्ह असतात. शिवाय जर उन्हाळा जास्त असेल, तर त्यांना पोळे थंड ठेवण्यासाठी पाण्याची गरज असते म्हणून त्या पाणी शोधत असतात. त्यांना शक्यतो त्रास न देणेच उत्तम. पण वर रोहितने लिहिले आहे त्या प्रमाणे, कृत्रिम सुगंध पण वापरु नयेत.
जळवा ज्यावेळी लागतात त्यावेळी एक खास पदार्थ त्या जखमेजवळ सोडतात.
त्याने रक्त गोठत नाही. पण त्यावेळी वेदनाही होत नाहीत. म्हणुन त्या
लागल्याच्या कळतच नाहीत. शिवाय त्यांना ओढून काढले (किंवा मिठ वा तंबाखुचे
पाणी टाकले ) तरी रक्तस्त्राव थांबत नाही. त्यामूळे त्या जखमेवर कापूस
किंवा वर्तमानपत्राचा तूकडा दाबून ठेवून रक्तस्त्राव थांबवायचा प्रयत्न
करणे आवश्यक आहे. तसेच फार रक्त गेले असेल, तर लगेच काहीतरी खाणे गरजेचे
आहे.
डॉ मीना प्रभूंच्या दक्षिण अमेरितील अनुभवानुसार, त्यावेळी जर कमी कपडे घातले तर जळवा लागल्याचे लगेच कळते आणि त्या काढता येतात.
सोबत घेण्याजोग्या आणखी काही वस्तू
चाकू
मी बघितलेय घरातल्या किचनमधल्या कुठलातरी चाकू घेतला जातो. त्याने धड
कांदापण कापता येत नाहि, आणि बहुदा तेवढाच उपयोग केला जातो. (कांदा
कापण्यापेक्षा तो मुठीने फोडून खाणे चांगले. आणि यासाठी लाल कांद्यापेक्षा
पांढरा कांदा चांगला.) एक उत्तम प्रतीचा चाकू जवळ बाळगणे चांगले. त्या
चाकूने मोठी फांदी, एखादा बांबू वगैरे पण कापता आला पाहिजे. स्विस आर्मी
नाईफ पण बरीच उपयोगी पडते.
दोर
दोराचे अनेक उपयोग होतात. एका रॉकपॅच वर मला चढायला जमत नव्हते. त्यावेळी
आधी वर चढलेल्या मित्राने आधी दोराने सामान ओढून घेतले. मग त्याच दोराला
लूप नॉट्स मारून, मी वर चढलो. पुरेसा मोठा दोर असेल तर त्यात काठ्या आडव्या
लावून, त्याची कामचलाऊ शिडी करता येते. खोल असलेले पाणी काढायला पण दोर
उपयोगी पडतो. गरज भासल्यास, दोर आडवा बांधून, त्यावर कपडे सुकवता येतात.
कपडे बदलण्यासाठी, अंघोळीसाठी आडोसा करता येतो.
वाहता ओढा / ओहोळ ओलांडायला पण दोर उपयोगी पडतो. एकाच्या कमरेला दोर बांधून
तो पुढे जाऊ शकतो. मग तिथे तो दोर बांधून त्याच्या आधाराने बाकीचे भिडू
जाऊ शकतात. वाहत्या पाण्याच्या खोलीचा, वा ओढीचा अंदाज सहसा येत नाही. एकदा
आम्ही असेच बरेच ओहोळ ओलांडल्यावर, अज्ञानात किती सुख असते ते कळले होते
!!
टेंट
माझ्याकडे आधी २ जणांचा आणि मग सहा जणांचा तंबू होता. सहा जणांचा असला तरी
त्याचे वजन फारसे नसते. (वरच्या प्रकारात वापरलेले दोर, माझ्या टेंटचेच
होते.)
बर्याच गडावर गुहा नसतात. असल्या तरी त्यात गर्दी असते किंवा त्या राहण्याजोग्या नसतात. अशावेळी
टेंट उपयोगी पडतो. किटकांपासून / वार्यापासून / पहाटेच्या दवांपासून
संरक्षण मिळते. टेंट घेतला तर अंथरुण पांघरुण कमी पुरते. हे टेंट फार
कल्पकतेने तयार केलेले असतात. व आत बर्याच सोयी असतात.
ते उभारायला फारसा वेळ लागत नाही की कष्टही पडत नाहीत. (पण टेंट उभारायची
परवानगी आहे कि नाही ते बघायला लागेल.) जर चांदण्यारात्री उघड्यावर झोपायचे
असेल, तरी टेंट न उभारता, तो अंथरुण म्हणून वापरता येतो. रात्री वाटलेच तर
तो उभारून, आत झोपता येते. गडावरच नाही, इतर ठिकाणी, उदा शेलू गावच्या
नदीकाठी, जव्हार गावाच्या बाहेर, मी टेंटमधे रात्र काढली आहे.
दिवाळी नंतर च्या बरयाच ट्रेक ला फटाके नेउन ते किल्ल्यावरुन दरीत भिरकावले
जातात आणि गायराणा ची वाट लागते. माकडांचा आपल्या खान्यान लाड होतो पन कधी
कधी त्या पायी ती आक्रमक बनतात......एखाद शेकरु लांब झाडावर आपल्या
कुटंबासह उड्या मारत असतं आणि त्यानी आपल्याकडं पहावं म्हणून बोंबा मारणारे
ट्रेकर पाहिले कि त्रास होतो.काहि माणसां(?) ना किल्ला चढल्यावर एक उद्योग
लयी आवडतो तो म्हणजे वरुन मोठाले दगड खाली दरित फेकाय्चे त्यांच्या*** .
रात्र काढण्या चं ठिकाणं काळ्जी पुर्वक निवडाव, कपडे आडकवायच्या जागा,
कोपरे, गुहांची, मंदिरां ची छत पहिल्यांदा निट निहाळावित तिथं मोठ्या पाली,
माश्यांची पोळी, एखाद्या विंन्चवाचं घरं क्वचीत छोटा सापं यांची
आश्रयस्थान असू शकतात.(भीती घालतं नाय भाऊ हे अनुभवाचं बोल
हायती.).रात्च्याला जंगलात ल्या शेतात जळनारं निखारं बी लालबुंद डोळ्या
वाणी वाटत्यात अन मनात वाघं येतो (मज्जा)
जंगलात फिरुनफिरुन परत तिथंच असं ही होत कधी कधी....
ट्रेकला घेउन जाताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॅक.. जी पाठीवर घेण्यावरचीच असावी.. झोळी वा खांद्यावर लटकवणारी बॅग सॅक नसावी.. तसेच कॉलेज वा ऑफीसला घेउन जाणारी सॅकदेखील शक्यतो वापरु नये.. तुम्ही ट्रेकला जाणार म्हणजे अनेक आवश्यक वस्तू घेउन जाणार.. डोंगरदर्यांमधून जंगल कापत जाणार.. तेव्हा सॅकही मजबूत हवीच.. खास ट्रेकवालीच सॅक घ्यावी.. समतोल साधण्यासाठी असणारे पट्टे, पाण्याची बाटली ठेवण्यास असणारे मोठे कप्पे नि अजून काही छोटे छोटे कप्पे अशा अनेक सोयी ट्रेकच्या सॅकमध्ये उपलब्ध असतात.. तिचा आकार मध्यम असल्यास उत्तम.. म्हणजे ट्रेक दोन-तीन दिवसाचा असो वा एक दिवसाचा.. कॅरी करण्यास सोयीस्कर पडते.. (तीन दिवसापेक्षा अधिक दिवसांचा ट्रेकही करत असाल तर दोन दोन वेगवेगळ्या सॅक जवळ ठेवल्यास उत्तम.. )
ट्रेकला जाण्याअगोदर सॅकची चेन तपासून पहावी.. जर बिघाड असल्यास त्वरीत
दुरुस्त करुन घ्यावी.. (कुलंगला दोघांच्या सॅक अश्याच अवस्थेत होत्या..
दोघा तिघांकडच्या चिमुकल्या सॅक (कॉलेजला जाणारी बॅगच म्हणा) बघून तर
हसायलाच आले..) अशी सॅकची अवस्था असताना तुम्ही तुमच्या पाउलखुणा
सोडण्याएवजी सॅकमधील वस्तू टाकत जाल..
सॅक पॅक करणे ही कला असते.. तुम्हाला योग्य तो समतोल राखणे गरजेचे असते.. त्यामुळे स व यी प्रमाणे सगळे सामान कोंबले तरी एक वेळ चालेल.. पण एकदा का पाठीवर घेतली की किती समतोल राखला जातोय हे नक्की तपासून पहावे.. अन्यथा डोंगरदर्यातून चालताना तोल जाण्याचा धोका उद्भवू शकतो..
पावसाळ्यात सॅकमध्ये मोठाली जाड प्लॅस्टीकची पिशवी घालून त्यातच सामान भरावे... तुमच्या वॉटरप्रुफ जॅकीट वा सॅकवर जास्त विश्वास न टाकल्यास उत्तम..
सॅक विकत घेण्यापूर्वी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची
प्रायोरिटी ठरवून घ्या..जर तुम्हाला एक-दोन दिवसांचे ट्रेक करण्यात जास्त
रस असेल तर वेगळ्या प्रकारची आणि मोठे ट्रेकसाठी वेगळी सॅक घेणे आवश्यक
आहे. सुरुवात छोट्या ट्रेकपासून करायची आणि नंतर मोठ्या ट्रेककडे वळायचे
तरपण वेगळे ऑप्शनस आहेत.
बरेचदा होते काय की सॅक खरेदी करायला गेल्यानंतर तिथे टांगून ठेवलेल्या
अनेक आकाराच्या आणि वैशिष्ट्यांचा सॅक पाहून गोंधळायला होते. त्यासाठी
आपल्याला नक्की कशासाठी सॅक घ्यायची आहे ते आधी पक्के ठरवून मगच दुकानात
जा.
१. अनेकांना मोठी सॅक घेण्याचा मोह होतो. नंतर उपयोगी पडेल या उद्देशाने
तशी सॅक घेतली जाते. पण मग १-२ दिवसांच्या ट्रेकला फारसे सामान नसताना ती
सॅक उगाचच रिकामी रिकामी वाटत रहाते आणि अनेकदा त्यात जागा आहे म्हणून
अनावश्यक सामान भरले जाते.
२. सॅक घेताना आपल्या खांद्यापासून कंबरेच्या थोडेवरपर्यंत अशा उंचीची घ्यावी. जास्त लांब असेल तर बसून उतरताना अडचणीचे ठरते.
३. शोल्डर स्ट्रॅप नीट तपासून घ्यावेत..जाड आणि रूंद पट्टे असतील तर सोयीचे
होते पण ते ऍडजेस्टबल असणे आवश्यक आहे. तसेच वेस्टबेल्ट आणि चेस्टबेल्ट
असणेही गरजेचे आहे. हे दोन्ही बेल्ट सॅक अंगाला पकडून ठेवायला मदत करतात.
तर चेस्टबेल्ट खांद्यावरच्या बेल्टला पुढे ओढून धरतात आणि वजन योग्य जागी
पडावे यासाठी मदत करतात.
४. बाजूचे कप्पे मोठे असतील तर त्यात पाण्याची बाटली आणि अन्य वस्तू भरायला
सोपे जाते. तसेच नंतर वाढत जाणाऱया वस्तू (कॅरीमॅट, तंबू, स्लीपींग बॅग
इ.) बांधायला काय सोयी आहेत हेही तपासून पहावे.
५. वॉटरप्रुफ सॅकच्या फार मोहात पडू नये. विशेषत सह्याद्रीत पाउस चार
महिनेच पडतो आणि त्या कोसळणाऱया पावसात वॉटरप्रुफ सॅकपण फारशा उपयोगी पडत
नाहीत हे मी पाहिले आहे. त्यामुळे दिनेशजींनी सांगितल्याप्रमाणे मोठ्या
प्लॅस्टिकच्या पिशवीत सामान भरून ठेवणे जास्त चांगले.
६. बंदाचे हुक्स, चेन्स या अतिशय काळजीपूर्वक तपासून पहाव्यात. हूक्स जर
हलक्या प्रतीच्या प्लॅस्टिकपासून बनवले असतील तर कालांतराने ते तुटू शकतात
आणि ट्रेकदरम्यान असे झाले तर हाल होतात.
एस्टीचे अद्ययावत वेळापत्रक जरी माझ्याजवळ नसले तरी काही आगारांचा टेलीफोन नंबर माझ्याजवळ आहे...
शहापुर - ०२५२७-२७२०७०
कल्याण - ०२५१-२३१५१२९
जुन्नर - ०२१३२-२२२०४८
ठाणे - ०२२-२५३३४८८४
महाड - ०२१४५-२२२१०२
माणंगाव - ०२१४०-२६३०३३
चिपळूण - ०२३५५-२५२००३
खेड - ०२३५६-२६३०२६
महाबळेश्वर - ०२१६८-२६०२५४
स्वारगेट - ०२०-२४४४१५९१
बाकी भटक्यांनी यात भर घालावी ही विनंती..
तसेच ट्रेक करताना जाणवते की बरेच वेळा आपण संदर्भ म्हणून वाचून गेलेल्या पुस्तकापैकी काही माहीतीत काळानुरूप बदल झाला आहे जसे की किल्यांवर जायच्या वाटा, गावांची/वाड्यांची नावे, एस्टीच्या वेळा, किल्यांवर पाहायची ठीकाणे इ. इ. मला वाटते की याही माहीतीचे कुठेतरी संकलन होणे गरजेचे आहे जेणेकरून त्या ठीकाणी प्रथम जाणार्या भटक्यांना त्याचा फायदा होईल..
प्रतिसादYo.Rocks | 27 September, 2011 - 22:58 नवीन
मुंबईतील ट्रेनच्या वेळेसाठी मी ही साईट वापरतो.. सर्वात बेस्ट.. नि खूपच उपयोगी..
नि एसटीसाठी ही साईट पण चांगलीच.. पण इथे स्पेलिंग हवी तशी टाईप व्हायला लागते..
http://msrtconline.in/timetable.aspx
सारन्ग | 28 September, 2011 - 17:50 नवीन
तसेच
ट्रेक करताना जाणवते की बरेच वेळा आपण संदर्भ म्हणून वाचून गेलेल्या
पुस्तकापैकी काही माहीतीत काळानुरूप बदल झाला आहे जसे की किल्यांवर जायच्या
वाटा, गावांची/वाड्यांची नावे, एस्टीच्या वेळा, किल्यांवर पाहायची ठीकाणे
इ. इ. मला वाटते की याही माहीतीचे कुठेतरी संकलन होणे गरजेचे आहे जेणेकरून
त्या ठीकाणी प्रथम जाणार्या भटक्यांना त्याचा फायदा होईल.. आशु दा एकदम
बरोबर
मी ज्यावेळेस चंदन वंदन केला होता त्यावेळेस सगळ्या पुस्तकात भुईंज वरून
गडावर जायला पाय वाट आहे असे सांगितले होते पण एका काकांनी सांगितले कि
इब्राहीम पूर वाडी तून पण रस्ता जातो , इब्राहीम पूर वाडी चंदन च्या
पायथ्याचे गाव आहे एकदम सोपी पायवाट गडावर जाते ,,,व चंदन उतरताना हि च
पायवाट एका ठिकाणी उजव्या बाजूला वळते व वंदन च्या थेट तटाला मिळते
तेच पांडवगडाच्या बाबतीत सगळेजण गडावर जायला रस्ता शेलारवाडी तून आहे अस
सांगतात पण पांडव गडावर राहणाऱ्या पारशाने आम्हाला गडाच्या मागच्या बाजूने
उतरणारा एक रस्ता दाखवला उतार तसा तीव्र आहे पण गड अगदी तासाभरात गाठता
येतो
वाई तून रविवार पेठेतून एक रस्ता बाहेर निघतो , पुढे हा रस्ता सरळ MIDC
जातो पण हाच रस्ता डाव्या बाजूने बोपर्डीच्या दिशेने जातो या रस्त्यावर एक
छोटासा पूल आहे व याच पुलाच्या डाव्या हाताने हि पायवाट पांडव गडावर जाते
पुलाच्या कडेला एक छोटेसे घर आहे
गडावर जाताना सहसा मी www.trekshitiz .com हे संकेत स्थळ वापरतो व जेवढ्या लागतील तेवढ्या प्रिंटस काढून घेतो
तुम्ही सगळे म्हणता त्याप्रमाणे मी एका excel sheet मध्ये किल्ल्याचे नाव,
त्याचे टोपण नाव ,किल्ल्यावर राहायची सोय काय आहे उदा. मंदिर , गुहा etc
.गडाच्या पायथ्याचे गाव , तालुका , जिल्हा , गडाचा प्रकार , गडाची श्रेणी
उदा. कठीण , सोपी, गडावर पोहचण्यास लागणारा वेळ , गडावरून दुसरे जवळचे गड ,
गडाला भेट देण्यास कोणता कालावधी योग्य आहे , गडावर जाताना घ्यायची
खबरदारी , गडावरील पाहण्यासारखी स्थळे , अशी बरीचशी माहिती लिहण्याचा
प्रयत्न करत आहे जवळ पास ४०० च्या वर गड झाले आहेत पण सध्या तात्रिक
अडचणीमुळे काम बंद आहे , घरी गेलो कि ती माहिती शक्य तितक्या लवकर पूर्ण
करून तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करीन
खाजखुजली वर चिखल लावला तरी देखिल बराच दाह कमी होतो... पाण्याची बाटली आणि पायाखाली माती असेल तर वेळ मारुन नेता येईल.
बरोबर काय घ्याल ?
ज्या ट्रेकर्सेनां चश्मा आहे, त्यांनी आजून एक चष्मा बॅगेत ठेवावा. चूकून
चष्मा फूटला/हरवला तर बॅकप असलेला बरा नाहितर ट्रेक चाचपडत करावा लागतो.
ज्यांना मोठ्या नंबरच्या चष्मा आहे त्यांनी तर ठेवावाच कारण अपूर दिसणं
जीवावर बेतू शकतं.
अॅक्शनचे ट्रेकींग शूज १ नंबर, अमेरीकेत ३-४ ट्रेक केले, तेव्हा हेच वापरले होते...चांगले २-३ वर्ष टिकतात
No comments:
Post a Comment