Sunday, August 8, 2021

लहुगड

औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक व धार्मिक वास्तू आहेत. त्याचप्रमाणे जगप्रसिद्ध लेणीही औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा, वेरूळ या ठिकाणी असून ही लेणी दगडात कोरलेली आहेत. त्याचप्रमाणे दगड तासून (कोरून) बेलाग बनवलेला देवगिरी किल्लाही सर्वांच्या परिचयाचा आहे. याच पंक्तीत बसणारा लहुगड हा दगडात कोरलेला एक छोटेखानी किल्ला आहे. हा किल्ला औरंगाबाद शहरापासून साधारण 40 कि .मी वर आहे.
औरंगाबाद उर्फ संभाजीनगर जिल्ह्यातील किल्ल्याचे नाव घेतले कि बहुतेकांना एकच नाव आठवते,ते म्हणजे देवगिरी उर्फ दौलताबाद किल्ला.मात्र याच औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा टेकड्या आहेत्,त्यामध्ये लहुगड्,भांगसाई असे सर्वसामान्य पर्यटकाना काय्,जातिवंत भटक्यांना अपरिचित असे छोटे पण देखणे गिरीदुर्ग आहेत.
    आज आपण ओळख करुन घ्यायची आहे ती लहुगडाची. लहुगड तसा "अवशेष संपन्न गड" म्हणुन परिचित नसला तरी प्रभु श्रीराम पुत्र "लव" च्या जन्मस्थानामुळे व रामेश्वर देवस्थानामुळे आसपासच्या गावांत धार्मिकस्थळ म्हणुन बराच प्रसिध्द आहे. तसेच दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा व सप्ताह असतो त्यामुळे जालना, संभाजीनगर, जवळगाव सारख्या शेजारच्या जिल्ह्यांत व तालुक्यात ही हे ठिकाण थोडेफार प्रसिध्द आहे. तसा हा भाग रामायणातील दंडकारण्यातला परंतु गडावरील कातळकोरिव पाण्याचे प्रशस्त टाके, पाहारेकऱ्यांच्या देवड्या, शिल्लक असलेली थोडीफार तटबंडी, व काही विरगळी पहाता पुर्वी गडावर बराच राबता असावा व या भागातही लढाया झालेल्या असाव्यात असा अंदाज बांधण्यास हरकत नाही. संभाजीनगर-अजिंठा, व संभाजीनगर-जालना या पुरातन मार्गांच्या मधुन अजिंठा डोंगररांग समांतर धावते. या दोन मार्गांना जोडणाऱ्या खिंडीवर लक्ष ठेवण्यासाठी लहुगडाची निर्मीती केली असावी.अर्थात संपुर्ण ईतिहास अजुनतरी उपलब्ध नाही. देवगिरीसारख्या राजधानीच्या गडाशी जवळीक, गडावर कातळात खोदलेली टाकी व गुहा पहाता हा गड ७व्या किंवा ८व्या शतकातला असावा. या परिसरात वाकाटक्,राष्ट्रकुट,चालुक्य अश्या सत्ता नांदल्या.गडाचे स्वरुप पहाता हा गड बहुधा राष्ट्रकुट काळातील असावा. लहुगड हा दोन डोंगराच्या मधील एका छोट्याश्या टेकडीवजा डोंगरावर आहे, 
अपरिचीत अश्या या छोटेखानी गडाकडे जायचे तर विवीध पर्याय आहेत.
स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून २ मार्गांनी लहूगडावर जाता येते.
१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून २९ किमी अंतरावर फुलंब्री गाव आहे. फुलंब्रीच्या पुढे ४ किमी अंतरावर पालफाटा आहे. या फाट्यावर उजवीकडे वळल्यावर आपण राजूर रस्त्याला लागतो. या रस्त्यावर पालफाट्यापासून ६ किमी अंतरावर जातेगाव फाटा आहे. या फाट्यापासून जातेगाव ३ किमीवर आहे. जातेगाव पासून नांद्रा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव ४ किमीवर आहे. नांद्रा गावाच्या मागे ३ किमीवर लहूगड आहे.
२) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १५ किमी अंतरावर चौका गाव आहे.या गावातून एक रस्ता २८ किमीवरील नांद्रा गावात जातो.नांद्रा गावाच्या मागे ३ किमीवर लहूगड आहे. हा रस्ता छोट्या गावांमधून फिरत जातो. रस्त्यात दिशादर्शक पाट्या नसल्याने चुकण्याचा संभव आहे.
३) औरंगाबाद - जालना रस्त्यावर औरंगाबाद पासून २१ किमी अंतरावर करमाड गाव आहे. या गावातून लाडसावंगी - अंजनडोह मार्गे जाणारा रस्ता लहूगडापर्यंत जातो. परंतू हा रस्ता बर्‍याच ठिकाणी कच्चा आहे.
स्वत:चे वहान नसल्यास
१) औरंगाबादहून लहूगडाच्या पायथ्याशी असलेल्या नांद्रा गावात जाण्यासाठी दुपारी १२ व संध्याकाळी ६ वाजता एसटीच्या बसेस आहेत. नांद्रा गावातून लहूगडावर चालत जाण्यास पाऊण तास लागतो.

२) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून २९ किमी अंतरावर फुलंब्री गाव आहे. फुलंब्री गावातून फुलंब्रीच्या पुढे ४ किमी अंतरावर जातेगावला जाण्यासाठी एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत. जातेगाव पासून नांद्रा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव ४ किमीवर आहे. जातेगाव ते नांद्रा सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत. नांद्रा गावाच्या मागे ३ किमीवर लहूगड आहे. नांद्रा गावातून लहूगडावर चालत जाण्यास पाऊण तास लागतो.
 बसचे वेळापत्रक
औरंगाबाद ते नांद्रा सकाळी १२.००, संध्याकाळी ६.०० ( मुक्कामी )
नांद्रा ते औरंगाबाद दुपारी ३, संध्याकाळी ६
      मुंबई,पुणे,नाशिक या भागातुन येणाऱ्या दुर्गमित्रांनी संभाजीनगर - सिल्लोड - फुलंब्री- जातेगाव- नांद्रा मार्गे येणे सोयीचे होइल तर नांदेड,परभणी,बुलढाणा या भागाकडुन येणाऱ्या दुर्गमित्रांनी प्रथम जालन्याला यावे. जालना ते बदनापुर २० कि.मी बदनापुरहुन २ कि.मी समोर आल्यावर सोमठाणा फाटा, येथुन सोमठाणा मार्गे फुलंब्री-राजुर रस्त्याला लागल्यावर डाव्याहाताला तळेगाव-पिरबावडा-जातेगाव लहुगड नांद्रा... तसेच जालना-करमाड-लाडसावंगी-लहुगड नांद्रा हे अंतर ६५ कि.मी असुन हा रस्ता चांगला आहे

       किल्ल्याजवळ पोहोचताच दोन्ही बाजूने असणाऱ्या डोंगरांच्या खिंडीमधून लहुगड उठवलेला दिसतो. पायथ्याला वडाचे एक खूप जुने झाड आहे जिथून गडावर जाणारा पायऱ्यांचा मार्ग सुरु होतो. प्रथम समोरच असणारे हनुमानाचे मंदिर पहायचे आणि “श्री क्षेत्र रामेश्वर, महाद्वार, लहुगड नांद्रा” असा मजकूर लिहलेल्या दगडी कमानीतून गडच्या पायऱ्या चढायला लागायचं. 


लहुगडाचा नकाशा

खरतर गडावर जाण्यासाठी ३ बाजूंना सिमेंटच्या पायर्‍या बांधून काढलेल्या आहेत. 
यातील खिंडीच्या जवळ असलेल्या पायर्‍यां जवळ मारूती मंदिर आहे. 
गड चढाईच्या सुरवातीलाच असणाऱ्या सिमेंटच्या पायऱ्या व डोंगरावर दिसणारे मंदिराचे आधुनिक बांधकाम पाहून हा किल्ला आपला पूर्ण भ्रमनिरास करणार असेच वाटते. 
मात्र किल्ल्यावर असणारे अनेक पुरातन व कातळकोरीव अवशेष आपली वाट पाहत असतात. 

       पायर्‍या चढतांना डाव्या बाजूस कातळात खोदलेला एक चौकोनी खळगा आहे व त्याच्या बाजूला एक शिवलिंग व नंदी आहे. 

या नंदीचे वैशिष्ट्य म्हणजे याचे शरीर नेहमी प्रमाणे ३ मितीत (३ डायमेंशन) असून तोंड मात्र २ मितीत (२ डायमेंशन) बनवलेले आहे. 
पुढे थोड्या पायर्‍या चढून उजव्या बाजूला वळल्यावर एका झाडाखाली गणपतीची पूरातन मुर्ती पहायला मिळते. पूर्वी ही मुर्ती गुहा मंदिरा समोरच्य देवळीत होती. तिथे नविन मुर्ती बसवल्यामुळे ही मुर्ती बाहेर ठेवण्यात आलेली आहे. येथेच उजव्या बाजूस गडावर पूर्वी रहात असलेल्या साधूचे मंदिर बांधलेले आहे. या मंदिराच्या पुढेच डाव्या बाजूला किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायर्‍या बनविलेल्या आहेत. 

पण तेथे न जाता प्रथम पायर्‍यांच्या बाजूला असलेले गुहा मंदिर पहावे. हे गुहा म्हणजे कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना आहे.






रामेश्वर गुहा मंदिरासमोरील अखंड कातळात कोरलेले तुळशी वृंदावनासारखे छोटे मंदिर

गुहेच्या समोरच कातळात खोदलेले चार फूट उंच मंदिर आहे.( राष्ट्रकुटांच्या काळात कोरलेली वेरुळचे कैलास लेणे असेच आधी कळस मग पाया या प्रकारचे आहे.तसेच लेणी  कोरताना सुध्दा माथ्याकडून पायाकडे खोदली जात.गड प्राचीन आहे याचा हा पुरावा मानता येईल ) आधी कळस मग पाया याप्रकारे कोरलेल्या या मंदिरात गणपतीची नविन मुर्ती व दोन पुरातन मुर्त्या ठेवलेल्या आहेत. गुहा मंदिराच्या डाव्या हाताला उघड्या चौथर्‍यावर अनेक मुर्तींचे मुखवटे, छोट्या पिंडी, नंदी मांडून ठेवलेले आहेत. त्याच्या पुढे कातळात खोदलेले रुंद व खोल पाण्याच प्रचंड मोठ खांब टाक आहे. 
गुहा मंदिराच्या वर असणार्‍या कातळावर पडणारे पाणी टाक्यात जमा होण्यासाठी कातळात पन्हाळी/ पाट कोरलेले आहेत. (या कातळावर बाधलेल्या सिमेंट्च्या पायर्‍यांमुळे ह्या पन्हाळी/ पाट काही ठिकणी बंद झालेल्या दिसतात.) टाक्यातील पाणी स्वच्छ दिसत असले तरी वटवाघुळामुळे पाण्याला प्रचंड घाण वास येतो. टाक्याला लागुनच मंदिराचे बाहेरील बाजूचे दोन गोलाकार खांब दिसतात. 
मंदिराच्या बाहेरच्या बाजूला दोन गोलाकार खांब कोरलेले आहेत. त्यानंतर थोडीशी जागा सोडून मंदिराचे दार कोरलेल आहे. दारावर व्दारपट्टीका व दोन बाजूंना खांब व नक्षी कोरलेली आहे. 
मंदिरात हवा व प्रकाश येण्यासाठी दरवाजाच्या दोनही बाजूंना खिडक्या कोरलेल्या आहेत. दरवाजातून आत गेल्यावर मंदिराचा कातळात कोरून काढलेला सभामंडप ४ खांबावर तोललेला दिसतो. 
या ४ खांबामधे नंदी बसवलेला आहे. मंदिराच्या गाभार्‍यात पिंड बसवलेली असून तिला रामेश्वर नावाने ओळखतात. गाभार्‍या समोर व डाव्या बाजूला अशा दोन खोल्या कोरून काढलेल्या आहेत. दुरुनही लोकांना दिसावा म्हणून गुहा मंदिरावर हल्लीच सिमेंटचा कळस बांधलेला आहे.
लहुगडाची माची

 मंदिराच्या समोर लाद्या बसवलेल्या आहेत. तसेच झाडांना पार बांधलेले आहेत. मंदिराच्या पुढे साधूबाबाची मठी व स्वयंपाक घर नव्याने बांधलेले आहे.तसेच समोरील झाडांना पार बांधलेले आहेत.   


गुहा मंदिर पाहून बाजूच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून प्रवेशव्दाराकडे जातांना जेथे पायऱ्या डावीकडे वळतात तेथे उजव्या हाताला एक टाक आहे. 

तिथून थोडेसे पुढे कातळात कोरलेले सुबक ठेंगणे प्रवेशव्दार पायऱ्या मार्गावरच आहे. 
प्रवेशव्दाराच्या आतल्या बाजूस डाव्या हाताला वरच्या बाजूस एक गुहा कोरलेली आहे. त्याचा वापर देवडी म्हणून होत असावा.
 गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर समोरच 8 टाक्‍यांचा समूह आहे. इथले जलव्यवस्थापन अभ्यासण्यासारखे आहे.हे पाण्याचे टाके संपुर्णतः भुमीगत आहे.फक्त आवश्यक असेल तिथे खड्डे करुन पाणी बाहेर काढण्याची सोय केली आहे.
     याच टाक्याच्या वरच्या बाजुला जो गडमाथा आहे त्याच्या कातळावर बरेच गोल खड्डे दिसतात. उतारावरुन जे पावसाचे पाणी वाहून जाते त्यातील गाळ बाजुला व्हावा हा या खळग्यांचा उद्देश.एकंदरीत दुर्गावरचे जलव्यवस्थापन कसे असु शकते याबाबतचा अभ्यास करण्यासाठी या चिमुकल्या किल्ल्याला जरुर भेट दिली पाहीजे.
        हे टाके पाहून उजव्या बाजूला वळून गड प्रदक्षिणा चालू करावी. प्रथम जमिनीच्या पोटात कोरलेले खांब टाक पहायला मिळत. पुढे ओळीने पाण्याची टाकं लागतात. त्यानंतर झाडीत लपलेले झेंडा टाक पाहून वळसा मारला की आपण गडाच्या पिछाडीला येतो. येथे कातळात कोरलेली 1 खांबी प्रशस्त गुहा आहे. या गुहेला एक दरवाजा व 4 खिडक्‍या आहेत. गुहेच्या थोडॅ पुढे किल्ल्याच्या मागील प्रवेशव्दाराचे अवशेष व अंजनडोह गावाकडे उतरणारी वाट आहे. ती पाहून गुहेच्या उजव्या बाजूने गुहेच्या वरच्या भागात जाणाऱ्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण सीता न्हाणीपाशी जाऊन पोहोचतो. येथे कातळात खोदलेले टाक व सीतेचे छोटे मंदिर आहे. ते पाहून उजवीकडे खाली उतरल्यावर कातळात कोरलेली प्रशस्त गुहा आहे. ती पाहून परत वर येऊन किल्ल्याच्या प्रवेशव्दाराकडे येतांना वाटेत एक पाण्याच टाक आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील सपाटीवर वास्तूंचे अवशेष आहेत. किल्ल्याचा माथा छोटा असल्यामुळे गडफेरी करायला अर्धा तास पुरतो.  
जमिनीत खोदलेले खांब टाके

हे टाके पाहून गडमाथा डावीकडे ठेवत उजव्या बाजूला वळून गड प्रदक्षिणा चालू करावी. प्रथम जमिनीच्या पोटात कोरलेले खांब टाक पहायला मिळते. यातील पाणी पिण्यायोग्य आहे.पुढे ओळीने पाण्याची टाकं लागतात. त्यानंतर झाडीत लपलेले झेंडा टाक पाहून वळसा मारला की आपण गडाच्या पिछाडीला येतो. या गडावर अशा प्रकारे किमान २० तरी पाण्याची टाकी नक्कीच असावीत.

किल्ल्यावर अशी अनेक खांब टाकी व गुहा आहेत

आता डोंगराला एक छोटा वळसा मारून थोडे खाली उतरले कि आपण येतो किल्ल्याच्या पिछाडीला. येथे कातळात कोरलेली एक प्रशस्त गुहा आहे. हि गुहा मुक्कामास अगदी योग्य असून आत एकाच बाजूस एक खांब शिल्लक आहे. या एक खांबी गुहेत प्रवेश करण्यासाठी एक छोटा दरवाजा व बाजूला हवेसाठी तीन खिडक्या काढलेल्या दिसतात. या गुहेच्या थोड पुढे किल्ल्याचे मागील बाजूचे भग्न प्रवेशव्दार, जुजबी तटबंदी व खाली उतरणाऱ्या काही जुन्या दगडी पायऱ्यांची वाट दिसते. हि वाट अंजनडोह गावाकडे उतरते. आपण मात्र या वाटेने खाली न उतरता पुन्हा गुहे जवळ परत येऊन गुहेच्या शेजारून वर जाणाऱ्या कातळात खोदलेल्या पावटया चढायच्या.
किल्ल्याच्या पिछाडीला असणारी मुक्कामासाठी योग्य गुहा
हि एक खांबी गुहा खूप प्रशस्थ आहे
किल्ल्याच्या पिछाडीला असणारी दगडी पायऱ्यांची वाट दिसते. हि वाट अंजनडोह गावाकडे उतरते. 

वर चढून आलो कि समोरच एका खोलगट भागात कातळात मधोमध खोदलेले एक मंदिर दिसते. याला सीता न्हाणी असे म्हणतात. मंदिरात पाषाणात कोरलेली एक स्त्री सदृश मूर्ती ठेवलेली आहे. अर्थात याला सीता न्हाणी का म्हणतात याची कल्पना नाही.औरंगाबाद परिसरातील बहुतेक लेण्यांच्या संबधीत ठिकाणी या सीता न्हाणीचा उल्लेख आढळतो.मंदिराच्या बाजूलाच पुन्हा एक खांब टाक कोरलेले दिसते. 


सीता न्हाणी
सीता न्हाणी जवळ असणारे मोठे खांब टाके


गडाच्या पिछाडीकडे असणारी अजून एक गुहा

हे सर्व कातळ खोदुन तयार केलेले बांधकामाचे अवशेष पाहून मन थक्क होते. इथून उजवीकडे खाली उतरल्यावर कातळात कोरलेली अजून एक प्रशस्त गुहा दिसते.
 या गुहेपासून देखील एक वाट गड पायथ्याच्या हनुमान मंदिराजवळ जाते. येथे आपली गडफेरी पूर्ण होत असल्याने आपण या दुसऱ्या वाटेने गडाचा पायथा गाठू शकतो किंवा मग आल्यावाटेने रामेश्वर मंदिराजवळून खाली उतरायचे.
लहुगड तसा आकाराने व चढाईला अगदीच सोपा असला तरी सर्व अवशेष नीट पाहण्यासाठी किमान दोन तासाचा कालावधी लागतो. गडावर खाण्याची कोणतीही सोय नाही मात्र पिण्याचे पाणी गडमाथ्यावरील काही टाक्यात किंवा रामेश्वर मंदिरासमोरील मठात उपलब्ध होऊ शकते. 

लहूगडाला लागून असणाऱ्या चांभार टेकडीवर असणारी गुहा 

लहूगडाच्या डाव्याबाजूस असणाऱ्या डोंगराला चांभार टेकडी असे म्हणतात. या डोंगरात देखील २ गुहा (लेणी) खोदलेल्या आहेत. त्यामुळे थोडा वेळ शिल्लक असेल तर गडापायथ्या पासून फक्त १५ मिनिटात हि लेणी आपण पाहू शकतो. 
   या किल्ल्याची समुद्रसअपाटीपासून उंची अंदाजे 2700 फूट इतकी असून पायथ्यापासून मात्र जेमतेम १०० मीटर असावी. लहूगडाचा ताबा सध्या एका साधूबाबाने घेतला असल्यामुळे आसपासच्या गावकर्‍यांनी गडावर बर्‍याच सोई निर्माण केल्या आहेत. गडावरील मंदिरात ४ जण राहू शकतात, तर मंदिरासमोरील ओट्यावर १५ जण आरामात राहू शकतात. याशिवाय गडावरच्या आश्रमात काही भाविक मुक्कामाला असतात.त्यांची परवानगी घेउन आश्रमात रहाता येते.गडावर सोय नाही मात्र स्वताचे जेवण बनवून खाता येईल किंवा जेवणाची सोय फुलंब्री किंवा औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर होऊ शकते.गडावर पिण्यायोग्य पाणी २ टाक्यात आहे. त्याबद्दलची माहीती किल्ल्यावरील साधूबाबा कडून घ्यावी.गडमाथ्यावरच्या टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरणे योग्य.गड पायथ्याशीही एक भक्त निवास आहे मात्र ते कुलुपबंद असते.चावी उपलब्ध झाली नाही तर गैरसोय होते,त्यामुळे गडावर मुक्काम करणे उत्तम. 
अशा या अजिंठा डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर कोरलेल्या या किल्ल्याला एकदा तरी आवर्जून भेट द्यावी.







संदर्भग्रंथ :-
१) औरंगाबाद जिल्हा गॅझेटीयर
२) www.trekshitiz.com हि वेबसाईट
३) www.durgbharari.in हि वेबसाईट
४) श्री. विनित दाते यांचा ब्लॉग


<iframe width="640" height="360" src="https://www.youtube.com/embed/zkpg1n4Az80" frameborder="0" allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen></iframe>

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...