अवघ्या विश्वाला अजिंठ्याच्या चित्र शिल्पांनी मोहिनी घातलेल्या या लेणीच्या मागील बाजूस तीन हजार वर्षांचे पुरातन गणेश (रुद्रेश्वर) लेणी आहे. सोयगावच्या दक्षिणेस पाच किलोमीटर अंतरावर अजिंठा पर्वतरांगेत हे महादेव मंदिर व गणेश लेणी आहे.
खानदेशाची शिवथर घळ म्हणता येईल अशा या लेण्यांना भेट द्यायची तर दोन मार्ग आहेत.औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर फर्दापुर आहे.फर्दापुरच्या नैऋत्येला पाच कि.मी.वर अजिंठा लेणी आहेत.फर्दापुरपासून सोयगावमार्गे वेताळवाडी गाव सुमारे २० कि.मी.अंतरावर आहे.वेताळवाडी गावाच्या मागे सुकलेला ओढा आहे.त्यावर पुल आहे.तेथून पायी डोंगर चढत सुमारे अर्ध्या तासात रुद्रेश्वर लेणी गाठता येतात.पायथ्यापासून पाचशे मीटर अंतर डोंगरावर चढून गेल्यानंतर थोड्या उतारानंतर खोल दरीवजा परिसरात गणेशलेणी आहेत. रुद्रेश्वर मंदिर म्हणूनही या स्थळाची ओळख आहे.
औरंगाबाद शहरापासून जळगाव रस्त्यावरील सिल्लोडपासून डाव्या हाताला वळून अंभईमार्गे हळदा घाट, वेताळवाडी मार्गाने गणेश लेणीच्या पायथ्यापर्यंत जाता येते.
हि लेणी अजिंठा व घटोत्कच लेणी यांच्या मधोमध आहेत.हि ब्राम्हणी लेणी असून आठव्या शतकातील असावी असे मानले जाते.थेट हळद्या घाटातून एक पाउलवाट लेण्यांच्या दिशेने येते.गावाकडून जाताना अगदी जवळ जाईपर्यंत आपल्याला लेण्यांचे दर्शन होत नाही.मात्र एकदा परिसर नजरेला पडला कि आश्चर्याचा सुखद धक्का बसतो.उंचावरुन पडणार्या धबधब्याचे पाणी कुंडात पडते.कुंडातील जास्तीचे पाणी वाहुन जाण्यासाठी पन्हाळी कोरल्या आहेत.


स्थापत्य आणि निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण असल्यामुळे हा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो.अर्थात लेण्यांपेक्षा इथला धबधबा हेच खरे आकर्षण आहे. धबधबा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील पर्यटक-भाविकांची गर्दी मोठी गर्दी होते.वर्षा काळात लेण्यांच्या वरच्या भागापासून दुधासारखी शुभ्र पाण्याची धार खाली पडते. या लेण्याच्या तळाशी एक छोटेसे तीर्थकुंड आहे. या तीर्थकुंडात धबधब्याचे पाणी पडते. हे पाणी पुढे सोना नदीस जाऊन मिळते. हे सोनानदीचे उगमस्थान आहे.उजवीकडच्या लेण्यात जाण्यासाठी कातळात पायर्यांचा जीना कोरला आहे.तो चढून गेला कि इंग्रजी एल आकाराची गुहा दिसते. तसेच लेण्यातील सिद्धिविनायकाचे हे जागृत देवस्थान समजले.

गणेश लेणीत प्रवेश करताच मोठा ४० ते ५० फूट लांब व १२ फूट उंचीचा सभामंडप आहे. भिंतीत ४ फूट उंचीवर भव्य व प्रसन्न मुद्रेतील मंगलमूर्ती आहे. मूर्ती डाव्या सोंडेची व पाच बाय पाच फुटांची आहे. या मूर्तीच्या मागील भुयार अजिंठा लेणीपर्यंत असल्याचे सांगण्यात येते. गणेशमूर्तीच्या बाजूस दगडी बैठकीवर महादेवाचे शिवलिंग आहे आणि नंदीही आहे, त्यास रुद्रेश्वर म्हणून ओळखले जाते. मंदिरातच गणेशमूर्ती शेजारी कोरलेल्या दगडात नृसिंहाची मूर्ती व, सप्तमातृक शिल्पे दिसतात. उजव्या खांबावर नरसिंहाचे व डाव्या खांबावर नटराजाचे शिल्प तीन फूट उंचीच्या आकारात कोरलेले आहे. अंगारकी व संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दर्शनाकरिता भाविक गर्दी करतात. शेजारीच प्रचंड असा पाण्याचा धबधबा कोसळत असतो.
श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. यानिमित्त लेणीजवळ बेल-फूल व प्रसादाची दुकाने आहेत. लेणीत पुरेसा प्रकाश नसल्यामुळे कोरीव काम पाहता येत नाही. पूर्वीच्या कोरीव कामाचे अवशेष भिंतीलगत दिसतात, मात्र नक्षीची बरीच झीज झाली आहे. लेणीवरून तीर्थकुंडात पडणारा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण आहे. धबधब्याचे पाणी भाविक-पर्यटक पिण्यासाठी वापरतात. लेणीजवळून सोयगावचे धरण आणि वेताळवाडी किल्ला दिसतो. हा निसर्गरम्य परिसर ‘टिपण्यासाठी’ हौशी छायाचित्रकारांची गर्दी असते. लेणीला २००६-०७मध्ये तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे, मात्र याअंतर्गत कोणतेही काम झाले नाही, असे स्थानिकांनी सांगितले.
संदर्भः-
१) औरंगाबाद जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
३) सहली एक दिवसाच्या परिसरात औरंगाबादच्या -पांडुरंग पाटणकर
५) विनोद प्रल्हाद तेली सोयगांव. मो नं 9595859290. यांचे लिखाण

No comments:
Post a Comment