
नाशिक म्हणजे दुर्गभटक्यांचं खास आवडीचं ठिकाण! याच जिल्हय़ात सहय़ाद्रीच्या मुख्य रांगेबरोबरच सेलबारी- डोलबारी-अजंठा-सातमाळ अशा विविध उपरांगा धावताना दिसतात. तिथल्या प्रत्येक उपरांगेला खास वैशिष्टय़ आणि सौंदर्यही लागलंय. याच उपरांगापैकी अजंठा-सातमाळची भटकंती हीदेखील कायमच स्मरणात राहणारी आहे. त्यामुळे या रांगेवरील किल्ल्यांची भटकंती करण्यासाठी अनेक दुर्गप्रेमी इथे कायमच येतात. त्यातल्या त्यात अजंठा रांगेची बात काही वेगळीच आहे. नाशिक-जळगाव-औरंगाबाद अशा तीन जिल्हय़ांना स्पर्शून गेलेली ही रांग जरी अजस्र् आणि रौद्र नसली तरी या रांगेवर विराजमान असलेले मध्यम आणि छोटेखानी किल्ले आपल्यासारख्या दर्दी भटक्यांना अजिबात निराश करीत नाही. याच डोंगररांगेच्या कुशीत पहुडलेलं गौताळा अभयारण्य तर वेळ काढून पाहायलाच हवं, असं आहे.
परंतु या रांगेवरती भटकंती करण्यास पुरेसा वेळ हवा. भौगोलिक अंतराचा विचार करता इथले किल्ले पाहण्यासाठी दोन-तीन दिवस तरी हाताशी ठेवावे लागतात. त्यामुळे अंतर जरी जास्त असले तरी दोन दिवसांत आणि तेही एका फेरीत बरेच किल्ले आरामात पाहून होतात. हा भाग बराचसा औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यांच्या सीमेवर असल्यामुळे या भागात आलो की, अजंठा रांग तुटक अथवा विलग दिसायला लागते. कमी पर्जन्य छायेच्या या प्रदेशावर मात्र सह्याद्रीच्या दुर्गरत्नांनी विशेष माया केलेली जाणवत राहते. पाऊस जरी कमी असला तरी याचा दुर्गाच्या देखणेपणावर काहीही फरक पडला नसल्याचे जाणवते.
गडावर प्रवेश करण्यापूर्वी गावात शंकाराचे पुरातन मंदिर आपल्या नजरेस पडते. मंदिर परिसरात पाण्याचे कुंड व काही पुरातन शिल्प आपले लक्ष वेधुन घेतात.
गावाला मात्र हजारो वर्षाचा वारसा आहे, असे तिथले ग्रामस्थ आपल्याला सांगतात. पूर्वी किल्ल्यांबरोबरच पायथ्याच्या गावांनाही अनन्यसाधारण महत्त्व असे. ही गावे म्हणजे जणू काही महत्त्वाच्या पेठाच असायच्या. त्यामुळे अशा गावांत प्राचीन मंदिरे, वाडे, तळी अशा वास्तू हमखास नजरेत पडतात. हा गडदेखील त्याला अपवाद नाही. गावातच शंभू महादेवाचं अतिशय प्राचीन मंदिर उभं असलेलं आपल्याला दिसते. छोटय़ा तळ्याच्या काठाला उभे असलेल्या या मंदिराभोवती अनेक सुंदर मूर्ती, नक्षीदार खांब, प्राचीन इमारतींचे दगड अस्ताव्यस्त पडलेले दिसून येतात. हे अवशेषदेखील अत्यंत सुबक आणि सुंदर असून यावरून हे मंदिर तत्कालीन काळात किती सुंदर असू शकते याचा अंदाज आपण बांधू शकतो. सध्या या मंदिरासमोर गावक-यांनी झाडं लावून सुंदर बाग फुलवली आहे. व तिची नियमित निगादेखील राखली जात असल्याचे दिसते. त्यामुळे हे ठिकाण पायथ्याचे सुंदर विश्रामाचं ठिकाण झालं आहे. वटवृक्षाच्या पारावर एक बुद्धमूर्ती व इतरही काही अवशेष मांडून ठेवलेले दिसतात.
गडाच्या सुरुवातीलाच भेटलेला हा प्राचीन ठेवा पाहूनच थेट गडालाच भिडायचे.
गावात प्रवेश करताना गावामागे असलेला मुख्य डोंगररांगेपासुन वेगळा झालेला किल्ल्याचा डोंगर नजरेस पडतो. गावातुन गडावर जाण्यासाठी ठळक पायवाट आहे.
गडाच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या कोरीव लेण्यात भवानी मातेचे मंदीर असल्याने माणिकपुंज ग्रामस्थांनी तिथपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असुन या मंदिरापर्यंत विजेचे खांब आहेत. माणिकपुंज गावातुन या लेण्यापर्यंत जाण्यासाठी १५ मिनिटे पुरेशी होतात.
गावापासून गडावर जाणारी वाट तशी ठसठशीत आहे. गडाच्या अर्ध्या वाटतेच खोदलेल्या या लेण्या म्हणजे आपल्या गडसफारीचा पहिला टप्पा! किल्ल्याची उंची अगदी बेताची आहे. किल्ल्याकडे जाणारा रस्ता कच्चा आहे. पंधरा मिनिटात पहिला टप्पा गाठून आपण मातेच्या मंदिरापाशी पोहोचतो.
लेण्यात जाण्याचा मार्ग कातळात कोरलेला असुन लेण्याचे खोदकाम दोन भागात केले आहे. यातील एका गुहेत पाण्याचे टाके असुन दुसऱ्या गुहेच्या आत तीन बाजुस तीन विहार आहेत. यातील दरवाजा समोरील विहारात ५ फुट उंचीची भवानी मातेची मुर्ती स्थापन केलेली आहे.माणिकपुंज गडाची स्वामीनी आहे हि भवानी माता. मातेची मूर्ती साधीशीच, मूर्तीवरील भाव ममतामयी, वात्सल्ययुक्त. चतुर्भुजा, दगडात कोरलेली, साडी नेसलेली; रोज पूजा होत असावी. मातेचा मळवट भरलेला होता, झेंडूचा तिहेरी हार गळ्यात घातलेला, प्रसन्न ध्यान दिसते.
देवीच्या मूर्तीला शेंदूर फासलेला दिसतो. तसेच मूर्तीसमोर त्रिशुलदेखील दिसतात.
लेण्यासमोर नव्याने बांधलेली दीपमाळ असुन आवारात भग्न झालेली गणेशमुर्ती आहे. एवढय़ा देवीच्या दर्शनासाठी बरेचसे भक्तगण निम्मागड चढून दर्शनासाठी नेहमीच येत असतात. त्यामुळे भक्तगणासाठी येथे विजेचीही सुविधा निर्माण केलेली दिसते. सर्वसामान्यांची गर्दी फक्त याच लेण्यांपर्यंत मर्यादित असते. इथून पुढच्या वाटेवर फक्त डोंगरप्रेमीच जाताना दिसतात. इथे येणा-या ब-याच भक्तांना याच्यावर किल्ला आहे हे माहितीच नाही. त्यामुळे किल्ल्यावर पुढे जाण्यासाठी आपण मात्र या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन गडाच्या माथ्याकडे निघायचे.
माथ्यावर
जाण्यासाठी लेण्याच्या उजवीकडे असलेल्या कातळात पायऱ्या खोदलेल्या आहेत.
या पायऱ्याच्या खालील बाजुस गडावर येणारा जुना मुळ मार्ग दिसतो. आपण
लेण्यापर्यंत चढुन आलेल्या पायऱ्या या अलीकडील काळात बांधलेल्या आहेत.
कातळात कोरलेल्या पायऱ्या चढुन वर आल्यावर उजवीकडे जाणारी वाट आपल्याला कडा
डावीकडे व दरी उजवीकडे ठेवत गडमाथ्याकडे नेते. या वाटेने जाताना कडयाच्या
काठावर असलेली गडाची ढासळलेली तटबंदी पहायला मिळते.
वाटेत पीरबाबाचे थडगे दिसले. पुढे कातळात खोदलेल्या सुबक पायऱ्या आहेत. त्या एका सुकलेल्या पाण्याच्या टाक्याकडे घेऊन जातात. थोडे चालून पुढे गेल्यावर मानवनिर्मित खिंड लागते. या खिंडीची निर्मिती गडाच्या संरक्षणासाठी केलेली असावी. खिंडीतून चौफेर विहंगम दृश्य दिसते.
खिंडीतून दिसणारे विहंगम दृश्य
नंतर पुढच्या टप्प्यावर पोहोचायला १०-१५ मिनिटे लागतात. इथे थंडगार पाण्याचे टाके झाडो-यात दडलेले दिसते. या परिसराची खूण म्हणजे इथे विशिष्ट आकाराची दोन वडाची झाडे आहेत. झाडांचे नैसर्गिकरित्या तयार झालेले असे आकार मुग्ध करतात.
झाडांचे विशिष्ट आकार
इथेही मोकळ्या नभाखाली मूर्ती स्थापून पूजा मांडली होती. या टप्प्यावरुनही सभोवतालच्या परिसराचे निसर्गरम्य दृश्य बघायला मिळते. उतरताना पीरबाबाचा दुसरा दर्गाही दिसतो.

गडाचा दरवाजा पुर्णपणे ढासळलेला असुन त्याचा केवळ तळपाया शिल्लक आहे. या उद्ध्वस्त दरवाजातुनच आपण गडावर प्रवेश करतो. मोडक्या तटबंदीतून आपण गडावर प्रवेश करतो.गडांची उंची कमी असल्याने मणिकपुंज गावातुन अर्ध्या तासात आपण गडावर पोहोचतो. अशा रीतीने गडाच्या दुस-या टप्प्याला सुरुवात होते.
गडाचा माथा आटोपशीर असल्यामुळे पाहण्यास अर्धा तास पुरतो. गडाच्या माथ्यावर आणखी एक कमी उंचीची टेकडी दिसते. परंतु या टप्प्यावर जाण्याआधी खालूनच एक फेरी मारायला सुरुवात करायची.
अत्यंत सुबकरीत्या खोदलेलं पाण्याचं टाकं आपल्याला दिसते.
या टाक्याच पुढेच काही अंतरावर एका मोठय़ा झाडाखाली पाण्याचं खांबटाकं दिसतं. हे खांबटाके प्राचीन असून सध्या अर्धवट बुजलेल्या अवस्थेत आहे. बाराही महिने यात पाणीपुरवठा असतो असे इथले ग्रामस्थ सांगतात. या टाक्याच्या पुढेच शेंदुर फासलेल्या विविध देवता मांडल्या आहेत. हे सारं पाहत आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर म्हणजेच तिस-या आणि अखेरच्या टप्प्यावर पोहोचायचे.
किल्ल्याचा माथा दक्षिणोत्तर ७ एकरवर पसरलेला असुन समुद्रसपाटीपासुन १९७० फुट उंचावर आहे. गडमाथ्यावर आल्यावर समोर दिसणाऱ्या टेकाडाच्या दिशेने गडफेरीला सुरुवात करायची. या टेकडावर आल्यावर डाव्या बाजुस खडकात खोदलेलं भलेमोठे पाण्याचे टाके नजरेस पडते तर उजव्या बाजुस खडकात खोदलेला वास्तुचा चौथरा दिसतो. बहुधा हि सदर असावी.
चौथरा चढण्याच्या पायऱ्या देखील खडकात खोदलेल्या आहेत.सदरेवर जाणा-या कोरलेल्या चार सुरेख पाय-या आणि त्याचा चौथरा तेवढा शाबूत आहे.
या ठिकाणी उतारावर तटबंदीचे दगड रचलेले आहेत. टेकाड उतरुन डावीकडे वळल्यावर एका मोठय़ा झाडाजवळ अर्धवट बुजलेले खडकात खोदलेले पाण्याचं खांबटाके दिसते. या टाक्यापासुन पुढे आल्यावर तिसरे लहान पण खोल पाण्याचे टाके नजरेस पडते. या टाक्यात मोठया प्रमाणात माती साठलेली आहे. हे टाके पाहुन पुढे आल्यावर टेकाडाच्या उतारावर कातळात कोरलेले बांधीव टाके दिसते. हे टाके उतारावर असल्याने पुर्णपणे मातीने भरलेले आहे. या वाटेने सरळ पुढे आल्यावर आपण किल्ल्यावर प्रवेश केलेल्या ठिकाणी पोहोचतो. दरवाजाच्या या भागात काही प्रमाणात तटबंदी पहायला मिळते. येथुन खाली न जाता सरळ पुढे आल्यावर आपण किल्ल्याच्या उत्तर टोकावर पोहोचतो. या ठिकाणी डोंगराला मोठी खाच मारून किल्ल्याचे उत्तर टोक पुढील डोंगरसोंडेपासुन वेगळे केलेले आहे. येथुन दरवाजाकडे परत आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते.
या गडाच्या इतिहासात डोकावल्यास सोळाव्या शतकाची सुरुवात ते मध्य म्हणजे ई. स. १५०८ ते १५५३ पर्यन्त किल्ला बुरहान अहमदकडे होता.सोळाव्या शतकाच्या सुरवातीस झालेल्या बहमणी व गुजरात सुलतान यांच्यातील लढाईत माणिकपुंज किल्ल्याचा ओझरता उल्लेख येतो. याशिवाय गावातील तळ्याच्या काठावर शंभु महादेवाचं प्राचीन मंदिर व या मंदिराभोवती अनेक सुंदर मुर्ती, नक्षीदार खांब व कोरीव दगड पडलेले पहायला मिळतात. कॅप्टन ब्रिग्ज यांनी १८१८ मध्ये माणिकपुंज किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी येथे पडझड झालेले दोन दरवाजे आणि खिंडारे पडलेली तटबंदी बघितल्याची नोंद केली आहे. तसेच येथे पाणीपुरवठा मुबलक असल्याचा उल्लेख आहे. 
नस्तनपुरची गढी आणि शनी मंदीर :-
चाळीसगाव -नांदगाव रस्त्यावर अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक नस्तनपूर येथे प्रभू रामचंद्र स्थापित प्रसिद्ध श्री शनिदेव मंदिर आहे.
” सूर्य पुत्रो देहो , विशालाक्ष: शिवप्रिय ।मंदचार प्रसन्नात्मा ,पिडां हरतू मे शनी । ओम शम शैनेश्चराय नम:।
पुण्यवान भारत भूमीत संतांच्या पदस्पर्शात पुलकीत झालेल्या महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याचे अलौकिक स्थान आहे. नांदगाव जवळील श्री क्षेत्र नस्तनपूर येथील प्रसिध्द शनिदेव ..! देशभरातील शनी महाराजच्या साडेसात पीठांपैकी नस्तनपूर हे स्वयंभू पूर्ण पीठ म्हणून अखिल भारतात ओळखलं जातं. आख्यायिकाप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी स्व हस्ते स्थापन केलेल्या साडेतीन पीठामध्ये नस्तनपूरला पूर्णपीठ म्हणून मान्यता आहे.येथे अमावस्येला यात्रा भरत असते . दूरवरून तसेच इतर राज्यातूनही भाविक येत असतात.
जवळच खोजा राजाचा किल्ला आहे. नस्तनपूर भुईकोट मात्र कोणाला माहीत नाही .या किल्ल्याबद्दल बऱ्याच दंतकथा सांगितल्या जातात.या ठिकाणी खोजा नाईक नावाचा ‘भिल्ल’ राजा होता. इंग्रजानी रेल्वे रूळ टाकताना या किल्ल्याचे तट पाडले, पण राजा खोजाने हे तट शिताफीने बांधले,रेल्वेरुळ बांधणीसाठी विरोध केला होता,मात्र पराभवानंतर हा खोजा राजा कुठे गेला हे कळले नाही असा इतिहास सांगितला जातो.

किल्ल्याच्या बुरुजाबाहेर तोफगोळे दिसून येतात. समोरच सहा- सात फुटाची भिंत आहे. हा किल्ला जवळपास नऊ एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरलेला असून गडाच्या तटबंदी आहेत. गडाचे बुरुज आणि त्यावरील बांधकाम ढासळलेल्या अवस्थेत आहे ; याकडे पुरातत्व खात्याने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
किल्ल्यात तीन मोठ्या विहिरी आहेत.बुरुज वास्तूचा ‘हवामहाल’ म्हणून वापर केला जात असावा असे म्हटले जाते.ब्रिटिशांनी बांधकामास मनाई केल्याने काम थांबविण्यात आल्याने किल्ला अर्धवटच राहिला , या किल्ल्याच्या विटा , दगड स्थानिक लोकांनी काढल्याने खूप पडझड झाली आहे. सध्या नस्तनपूर किल्ल्याची विदारक स्थिती आहे. तग धरून असलेले मोठे बुरुज कोरीवकाम असलेले मार्ग, दरवाजा, कचरा, घाण आणि मद्यपींचा मुक्त वावर यामुळे गडकिल्ल्यास अवकळा आली आहे. स्थिती गंभीर असून शासकीय यंत्रणा आणि पुरातत्व विभागानं याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे.




























No comments:
Post a Comment