Tuesday, August 31, 2021

पेडका

  प्राचीनकाळापासूनच औरंगाबाद जिल्हा आणि लगतचा प्रदेश दक्खनच्या पठारावर प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशमार्ग म्हणून ओळखला गेला आहे. उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणांवर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या उत्तरसीमेवरील अजिंठा-सातमाळा डोंगररांगांनी ठासून उभ्या आहेत. इथले डोंगर हिमालयाएवढे उंच नसतील किंवा सह्याद्रीइतके बेलाग, अवघड नसतील. परंतु त्यांचे भौगोलिक स्थानच त्यांना महत्त्वपूर्ण आहे. ह्या डोंगररांगांना अजून बळ मिळाले ते इथे वेगवेगळ्या शतकात बांधल्या गेलेल्या अंतूर, जंजाळा, लोंझा, कण्हेरगड, पेडका, सुतोंडा आणि वेताळवाडीसारख्या किल्ल्यांमुळे. 
  औरंगाबाद जिल्ह्य़ातील पितळखोरा ते अजिंठा या सातमाळ डोंगररांगेत अनेक किल्ले आहेत पण देवगिरी आणि वनखात्याच्या कृपेने अंतुर यासारखे प्रसिद्ध किल्ले सोडले तर इतर किल्ले तसे उपेक्षित आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी हे यादवांच्या राजधानीचे ठिकाण होते. त्यामुळे त्याकाळात राजधानीकडे येणार्‍या मार्गांवर टेहळणीसाठी किल्ल्यांची साखळी निर्माण करण्यात आली होती. यादवांचा पराभव झाल्यानंतर देवगिरीचे महत्व कमी झाले. त्यामुळे टेहळ्णीसाठी बनवलेल्या किल्ल्यांचे महत्वही कमी झाले व आडमार्गावर असल्यामुळे यातील काही किल्ले लोकांच्या विस्मरणात गेले. औरंगबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेला पेडका किल्ला यापैकी एक आहे.महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा अशी ओळख असलेल्या या जिल्ह्यात मुख्य पर्यटन ठिकाणे व त्यांना जोडणारे महामार्ग सोडले तर रस्त्याच्या बाबतीत भयानक स्थिती आहे. त्यामुळे या किल्ल्यांकडे कोणी फिरकत नाही. पण कन्नड तालुक्यात गौताळा अभयारण्याच्या दक्षिण दिशेला असलेला पेडका हा त्याच्यावरच्या पाण्याच्या स्थिरीकरणाची योजना बघण्यासाठी आवर्जून जाउन पहावा असाच आहे.
           स्थापत्यरचनेच्या दृष्टीने दक्षिण मराठवाड्यातील प्रत्येक किल्ल्याला जसे वैशिष्ट्यालंकार लाभले त्यामानाने औरंगाबाद जिल्ह्यातील सुप्रसिद्ध देवगिरी किल्ला सोडला तर इतर किल्ल्यांच्या रचना अगदी साध्याच आहेत. अजिंठा-सातमाळा डोंगररांगांमधील ह्या किल्ल्यांची निर्मिती मुख्यत्वे टेहळणीसाठी झाल्याचे दिसते. अंतुर, जंजाळा किल्ल्यांवर काही प्रमाणात वस्ती होती तर काही किल्ले फक्त टेहळणीसाठीच असल्याचा कयास तिथे सापडलेल्या पुरावशेषांवरून बांधता येतो.  दुर्दैवाने त्यांच्याविषयी फार ऐतिहासिक अभ्यास झालेला नसल्याने आपल्याला त्यांच्या स्वरूपाविषयी संपूर्ण कल्पना बांधता येत नाही. 
अस्सल दुर्गभटक्यांनाही अपरिचीत असलेल्या गडावर जायचे तर यातायात फार आहे.
१) औरंगाबादहून :- औरंगाबाद शहरापासून कन्नड हे तालुक्याचे गाव ६५ किमी अंतरावर आहे. कन्नडहून किल्ल्याजवळील कळंकी गाव २० किमी अंतरावर आहे. कळंकी गावात जाण्यासाठी एसटी व खाजगी जीप गाड्यांची सोय आहे. कन्नडवरुन पेडका किल्ल्याला जाण्यासाठी सकाळी ९ वाजता व दुपारी ४ वाजता बस आहे.कळंकी गावाजवळ अर्धे जमीनीत गाडले गेलेले मद्रासीबाबा हे प्राचीन मंदीर व पुरणवाडीचा धारेश्वर धबधबा हि प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.कळंकीहून दिड तासाच्या चालीवर पेडका किल्ल्याचा पायथा आहे. किल्ल्याचा उत्तर - दक्षिण पसरलेला माथा दिसतो. यातील दक्षिणेकडील (डाव्याबाजूच्या) डोंगरमाथ्याला २ सोंडा आहेत. किल्ल्यावर जाणारी वाट या २ डोंगरसोंडां मधील घळीतून वर चढते. दुसरी डोंगरसोंड पहिल्या डोंगरसोंडेच्या मागे लपलेली असल्यामुळे पठारावर जाईपर्यंत ती दिसत नाही. त्यासाठी पायथ्यापासून किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे चढत जावे. साधारणपणे ३० मिनिटात आपण पठारावर पोहोचतो. येथे गुराख्यांनी दगड एकमेकांवर रचून त्यांचा देव तयार केलेला आहे. येथून आपल्याला डोंगराच्या दोन्ही सोंडा दिसतात. या मधील घळीतून वर चढून डोंगरमाथा गाठावा.
  २) चाळीसगावहून :- चाळीसगाव नांदगाव रस्त्यावर चाळीसगावपासून २४ कि.मी. अंतरावर नायडोंगरी गाव आहे. (या गावातून राजदेहेर (ढेरी) किल्ल्याला जाणारा रस्ता आहे.) नायडोंगरी ते बोलठाण हे अंतर २८ कि.मी आहे. बोलठाण वरुन एक रस्ता ६ कि.मी वरील जेहुर गावात जातो. जेहूरहून ४ किमीवर पेडका गाव आहे. पेडका गावाच्या बाहेर पेडकावाडी धरण आहे. पेडका - कन्नड रस्त्यावर घाट सुरु होण्यापूर्वी डाव्या बाजूचा कच्चा रस्ता पेडकावाडी धरणाच्या भिंतीवर जातो.
  ३) मुंबई-पुण्याहुन येथे जाताना मनमाड-नांदगावमार्गे जाणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. मनमाड जेहुर हे अंतर ६८ कि.मी. असुन मनमाड-नांदगाव-जातेगाव–बोलठाण–जेहुर या मार्गाने किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते. औरंगाबादहुन आल्यास हे अंतर ७० कि.मी.असुन औरंगाबाद-वेरूळ-चापनेर मार्गे जेहुर येथे येण्यास ३ तास लागतात. जेहुर ते पेडकावाडी हे अंतर ५ कि.मी.असुन पेडकावाडी हे या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असले तरी जेहूर गावापासुन ३ कि.मी. अंतरावर असलेल्या गंगाआश्रमापासून तेथे जाणे सोयीचे आहे. या वाटेने कमी वेळात आपण किल्ल्याजवळ पोहोचतो. वाहनांची सोय केवळ जेहुरपर्यंत असल्याने स्वतःचे वाहन नसल्यास जेहुर ते गंगाआश्रम / पेडकावाडी हे अंतर पायी कापावे लागते. गंगाश्रमाकडे पोहोचल्यावर समोर दक्षिणोत्तर पसरलेल्या डोंगराच्या टोकावरील पेडका किल्ला आपले लक्ष वेधुन घेतो.
             कन्नड तालुक्यात गौताळा अभयारण्याच्या दक्षिण सीमेवर समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंचीवर २०°१४’४६” उत्तर अक्षांश व ७४°५७’४९.६” पूर्व रेखांशांवर वसलेला हा डोंगरी किल्ला. कन्नड ह्या तालुका ठिकाणाहून आतमध्ये जेऊरकडे जाणाऱ्या मार्गावर पेडकावाडी गावातून एक रस्ता पेडकावाडी धरणाकडे जातो. 
किल्ल्याच्या पायथ्याशी पेडकावाडी धरण आहे. ह्या धरणाच्या पश्चिमेकडे चालत मातीच्या बांधावरून आपण पेडका किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. 
येथून किल्ल्याचा उत्तर - दक्षिण पसरलेला माथा दिसतो. यातील दक्षिणेकडील (डाव्याबाजूच्या) डोंगरमाथ्याला २ सोंडा आहेत. किल्ल्यावर जाणारी वाट या २ डोंगरसोंडां मधील घळीतून वर चढते. दुसरी डोंगरसोंड पहिल्या डोंगरसोंडेच्या मागे लपलेली असल्यामुळे पठारावर जाईपर्यंत ती दिसत नाही. त्यासाठी पायथ्यापासून किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे चढत जावे. साधारणपणे ३० मिनिटात आपण पठारावर पोहोचतो.या पठाराची उंची तीन भागात विभागलेली असुन येथुन मळलेल्या पायवाटेने एक तासात आपण किल्ल्याच्या दोन सोंडेमध्ये असलेल्या घळीखाली पोहोचतो. 
किल्ल्याच्या या वाटेवर मोठया प्रमाणात स्फटिकाचे दगड दिसुन येतात. येथे येणाऱ्या गुराख्यांनी हे दगड जमा करून त्यांची या ठिकाणी मानवाकृर्ती बनवलेली आहे.हा गुराख्यांनी देव तयार केलेला आहे. पेडका वाडीतून येणारी वाट देखील याच ठिकाणी येते व येथुन खऱ्या अर्थाने गडचढाईला सुरवात होते. 
घळीतून किल्ल्यावर जाणारी वाट हि डाव्या सोंडेलगत असुन या वाटेने किल्ल्यावर जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या पायऱ्या मोठया प्रमाणात उध्वस्त झालेल्या आहेत. 

या वाटेने शेवटच्या टप्प्यात असलेल्या काही पायऱ्या चढुन किल्ल्याच्या डाव्या सोंडेवरील उध्वस्त पश्चिमाभिमुख दरवाजाने आपण किल्ल्याच्या माचीवर प्रवेश करतो.पठारावरून प्रवेशव्दारापर्यंत पोहोचण्यास ४५ मिनिटे लागतात.
     किल्ल्यावर येण्यासाठी हा एकमेव दरवाजा असुन पायथ्यापासुन किल्ल्यावर येण्यास दिड तास लागतो.
 किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ३०१० फुट असुन दक्षिणोत्तर असलेला हा किल्ला १२ एकर परिसरावर दोन भागात पसरलेला आहे. प्रवेशव्दार पश्चिमाभिमुख असून उध्वस्त झालेले आहे. प्रवेशव्दारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर किल्ला ३ टप्प्यात (भागात) पसरलेला दिसतो. 

सर्वात खालच्या भागात म्हणजेच दक्षिणेकडे पसरलेल्या पठारावर काही वास्तुंचे चौथरे दिसतात. ते पाहून मागे वळून पश्चिमेच्या दरीकडे चालत जावे. (दरी डाव्या बाजूला व डोंगर उजव्या बाजूला ठेवत) .माचीवर फेरी मारताना १-२ चौथरे अवशेष रूपाने दिसुन येतात. माचीवरून किल्ल्याची टेकडी उजवीकडे व दरी डावीकडे ठेऊन गेले असता या वाटेवर आपल्याला पाण्याची तीन टाकी पहायला मिळतात. 
यातील पहिले टाके खांबटाके असुन या टाक्याच्या पुढील भागात खुप मोठया प्रमाणात माती साठलेली आहे. किल्ल्यावर केवळ याच खांबटाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे.
या टाक्याच्या पुढील भागात कातळात खोदलेली एक गुहा असुन या गुहेत बांधलेल्या एका चौथऱ्यावर त्रिशुळ, नंदी व शिवलिंग ठेवलेले आहे. इथुन मागे फिरल्यावर वर चढताना अजुन एक कोरडे टाके असुन या टाक्यावर मोठया प्रमाणात झाडी वाढली आहे. या टाक्याच्या वरील भागात एक देवळी असुन त्यात शेंदूर फसलेले दगड ठेवलेले आहेत. हि आहे म्हसोबाची देवळी.
       देवळीच्या बाजूने किल्ल्याच्या माथ्यावर चढताना खालील बाजूस किल्ल्याच्या दोन टेकडी मधील भागात एक मोठा तलाव व गुहा दिसते पण तेथे न जाता किल्ल्याचा माथा सर्वप्रथम फिरून घ्यावा. 
आपण ज्या वाटेने वर चढतो त्याशेजारी डाव्या बाजुला एक उंचवटा दिसुन येतो. हा उंचवटा म्हणजे गाडलेला बुरुज असुन या बुरूजावरून किल्ल्यावर येणाऱ्या वाटेवर तसेच माथ्याखाली असलेल्या संपुर्ण माचीवर नजर ठेवता येते. माथ्याच्या मध्यावर केवळ एका घराचा चौथरा शिल्लक असुन त्यावर एक कबर उभारलेली आहे. या कबरीच्या पुढील भागात एक साचपाण्याचा तलाव पहायला मिळतो. याशिवाय माथ्यावर इतर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. गडमाथ्यावर एक मातीचा टेहळणी बुरुज आहे. या बुरुजावरून संपूर्ण गड दृष्टीक्षेपात येतो. गडावरून पूर्वेला चिवळी महादेवाचा डोंगर तर उत्तरेला कन्हेरगड दिसतो.


  महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर दिसणारी पाणी स्थिरीकरण रचना या किल्ल्यावर देखील पहायला मिळते. पेडका किल्ल्यावर पाणी स्थिरीकरणाची योजना राबवलेली पाहायला मिळते. किल्ल्यातील मोठ्या तलावाच्या वर डोंगर पसरलेला आहे. या डोंगरावरून वहात येणारे पाणी थेट मोठ्या तलावात जाऊन तो गाळाने भरू नये यासाठी या तलावाच्या वर २ छोटे तलाव बनवलेले आहेत. सर्वात वरच्या पठारावर (माथ्यावर) असलेल्या तलावात पठारावरून वाहाणारे पाणी व गाळ जमा होतो. तो तलाव भरला की वरचे पाणी बाजूच्या पन्हाळीतून खालच्या बाजूला असलेल्या गुहे जवळील बांधीव तलावात येते. इथे पाण्याला पुन्हा एकदा स्थिर करून त्यातील गाळ खाली बसवला जातो. या तलावाच्या बांधाच्या एका कडेला वरच्या बाजूस पाणी जाण्यासाठी पन्हाळी बनवलेली आहे. त्यातून पाणी खालच्या मोठ्या तलावात जमा होते. यामुळे मोठ्या तलावात फारच कमी प्रमाणात गाळ जमा होतो. याशिवाय २ अतिरीक्त पाणी साठे तयार होतात आणि दरवर्षी वरच्या २ छोट्या तलावातील गाळ कमी पैशात व मनुष्यबळात उपसता येतो. सध्या या तलावातील गाळ काढला जात नसल्याने हे सर्व तलाव मातीने भरले आहेत.
 म्हसोबाच्या देवळीच्या बाजूने किल्ल्याच्या दुसर्‍या टप्प्यावर चढून गेल्यावर आपल्याला खालच्या बाजूला मोठ तळ व त्यामागिल ३ गुहा दिसतात. (चौथी गुहा आपण उभे असलेल्या पठाराच्या खालच्या बाजूला असून ती मोडकळीस आलेली आहे.) या गुहा २ खांबांवर तोललेल्या आहेत. गुहा प्रशस्त असून साफसफाई न केल्याने त्या रहाण्या योग्य नाहीत. या परीसरात २-३ ठिकाणी शेंदुर फासलेले दगड असून त्याच्या जवळ त्रिशुळ उभे करून ठेवलेले आढळतात. लहान तलावाच्या बाजूस एक प्रशस्त गुहा असुन दोन खांबावर तोललेल्या या गुहेच्या आतील भागात एक दालन आहे. या गुहेत २०-२५ माणसे सहज राहु शकतात. या गुहेशेजारी दोन अर्धवट कोरलेल्या गुहा आहेत. संपुर्ण गडफेरीला १ तास पुरेसा होतो.
     किल्ल्यावरील अवशेष व आकार पहाता या किल्ल्याचा उपयोग केवळ टेहळणीसाठी होत असावा असे वाटते. किल्ल्यावरील पाण्याची टाकी आणि गुहा पहाता किल्ल्याची निर्मिती ६-७ व्या शतकात झाली असावी.ह्या किल्ल्याची निर्मिती कुणी का आणि कधी केली असेल हा प्रश्न अजूनतरी अनुत्तरीतच आहे. देवगिरी या यादवांच्या राजधानीकडे येणाऱ्या मार्गांवर टेहळणीसाठी किल्ल्यांची साखळी निर्माण केली गेली. यादवांचा पराभव झाल्यावर देवगिरीचे महत्व कमी झाल्याने टेहळणीसाठी बांधलेल्या या किल्ल्यांचे महत्वही कमी झाले. बादशाहनामा ह्या ग्रंथात मोगल बादशहा शहाजहान याच्या आज्ञेवरून मोगल सरदार सिपहंदरखान याने इ.स.१६३०-३१ मध्ये या भागावर स्वारी करून हा प्रांत ताब्यात घेतल्याचा उल्लेख येतो.  निसर्गसौंदर्याने नटलेल्या ह्या किल्ल्याला जरूर भेट द्यावी असाच हा किल्ला आहे.खाजगी वाहनाने चाळीसगाव अथवा मनमाडहून राजदेहेर व पेडका हे दोन्ही किल्ले एका दिवसात पाहुन पाटणादेवी येथे मुक्कामाला जाता येते. 
  संदर्भ :-
१) औरंगाबाद जिल्हा गॅझेटीयर
२) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
३) सहली एक दिवसाच्या परिसरात औरंगाबादच्या -पांडुरंग पाटणकर
४) www.trekshitiz.com   हि वेबसाईट
५) www.durgbharari.in  हि वेबसाईट

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...