Saturday, August 14, 2021

आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी

आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: ओनामा

Submitted by वरदा on 3 February, 2014 - 16:32

ओनामा

शेवटी एकदाची आमची दुक्कल मुक्कामाच्या ठिकाणी पोचली. मी आणि माझी सखी. काम माझं. ती सोबतीला. कारण माझ्यापेक्षा ती अनुभवी म्हणून. सकाळी पाचची एस्टी पकडलेली. झोप काढावी असं खरंतर डोक्यात होतं पण दोघींच्या धावपळीच्या वेळापत्रकातून बरेच महिन्यांनी निवांत मोकळा वेळ मिळालेला तेव्हा प्रवासभर अखंड टकळी सुरू होती - इतके दिवसांच्या साठलेल्या गप्पा, गॉसिप, पुस्तकं अन् काय. शिवाय माझ्यासाठी सगळ्यात मोठ्ठी एक्साइटमेन्ट म्हणजे माझ्या संशोधनाच्या फील्डवर्कचा ओनामा.
पुरातत्वशास्त्राच्या विद्यार्थीदशेपासूनच फील्डवर्क काही नवं नाही. शिक्षकांबरोबर उत्खननात भाग घेतला आहे, सीनियर मित्र-मैत्रिणींच्या विविध विषयातल्या संशोधनात, त्यासंबंधीच्या भटकंतीत भाग घेतला आहे. पण तेव्हा उमेदवारीच्या रोलमधे असल्याने फक्त जमेल तितकं काम करायचं एवढंच शिकलेय. संकल्पना, आखणी, नियोजन आणि प्रत्यक्ष फील्डवरची भटकंती स्वतःने करायची ही पहिलीच वेळ. त्यामुळे पहिलटकरणीच्या मनात असतं तसं एक्साईटमेन्ट, उत्सुकता, आपल्याला नक्की जमेल की नाही याची साशंकता, कामाच्या पसार्‍याचं दडपण असं बरंच काही आलटून पालटून वाटत होतं. सखी माझ्या आधी काही वर्षं मैदानात उतरल्याने हिंडण्याफिरण्यात अनुभवी. तिचा विषय वेगळा, शोधवाटा वेगळ्या, पण निदान पहिले काही दिवस तरी ती असणार आहे. एकदा सवय झाली, बावरलेपण गेलं की मग पुढची ४-५ वर्षं 'अ‍ॅकला चलो रे...' ची कास धरायची.

माझ्या संशोधनाचा हा अगदी प्राथमिक टप्पा आहे. महाराष्ट्रातल्या आद्य वसाहतींच्या मागावर मी आहे. सुमारे ४००० वर्षांपूर्वी उदयाला आलेली या ताम्रपाषाणयुगीन काळातली ही छोटी छोटी गावं दख्खनच्या पठारावर सर्वत्र पसरली होती. या अशा गावांची अनेक उत्खननं झालीयेत, त्यांचे अहवाल जगात नावजले गेलेत खरे, पण अजूनही दख्खनच्या पठारावरच्या अनेक भूभागांत संशोधन व्हायचं राहिलंय. या वसाहती तिथे होत्या का त्याचा शोध अजून अपूर्ण आहे. त्यातलाच एक भूभाग मी या प्रकल्पात पिंजून काढायचा ठरवलाय. हातात आहेत जवळजवळ ९५०० चौरस किमी, ९००च्या वरती गावं आणि ४-५ वर्षं. सगळी गावं पहाणं अर्थातच शक्य नसतं/ नाही. मग पुरातत्वशास्त्रातल्या नमुनाचाचणी आणि सर्वेक्षणाच्या पद्धतींमधे या विशिष्ट संशोधनाच्या गरजांप्रमाणे थोडाफार बदल करून सुमारे एक पंचमांश गावं पहायची ठरलीत. पण अजून तरी हे फक्त कागदावर नाचवलेले घोडे आहेत. अर्थात हे घोडे नाचवायलाही काही महिने खर्ची पडलेत. असंख्य वेळा असंख्य प्रकारचे नकाशे, गॅझेटीअर्स, सेन्सस, कलोनियल रेकॉर्ड्स, ग्रामसूची, गूगल अर्थ, या भागावर लिहिलं गेलेलं सर्व प्रकारचं लेखन, संशोधन, अगदी आधुनिक मराठी साहित्यही पालथं घातलंय. आणि मग काळजीपूर्वक गावांची एक संभाव्य यादी केलीये. त्यात प्रत्यक्ष काम करताना अनेक बदल होतील ही शक्यता लक्षात घेऊन लवचिकताही ठेवलीय. मग या भूभागाचे ३-४ भाग पाडून एकेका टप्प्यात त्या त्या भागातल्या मोठ्याशा गावात/ शहरात राहून आसपासचा प्रदेश तपासायचा असं ठरलंय. पण याही आधी एक टप्पा असतो तो म्हणजे आतापर्यंत पूर्वसूरींनी नोंदवून ठेवलेल्या पुरातत्वीय स्थळांना भेट देणे. आढावा सर्वेक्षण. आज त्या स्थळाची काय अवस्था आहे, तिथे नक्की काय अवशेष मिळतात, आधीच्या नोंदी कितपत बरोबर आहेत हे सगळं तपासून बघणे. यात महाराष्ट्रच नाही तर या भूभागाला लागून असलेल्या शेजारी राज्यातल्याही काही गावांना भेट द्यायचा बेत आहे. असो.

तर गाव तालुक्याचं. बर्‍याशा म्हणाव्या असं देवस्थानचं. त्यामुळे रहाण्याची ठीकठाक सोय आहे. बादरायण ओळखीतून एका काकांशी संपर्क झाला होता. त्यांनी अतिशय आपुलकीने आमची जबाबदारी घेतली आहे. खात्रीच्या लॉजमधे आमच्यासाठी एक खोली राखून ठेवली आहे. आम्हाला पोचेपोचेतो ११-११|| झाले. हातपायतोंड धुवून जरा बसेपर्यंत काका आलेच. त्यांना वाटलं की आज आमचा विश्रांतीचा दिवस. देवळात दर्शन करवून घरी जाऊन जेवायला घालायचा बेत होता. पण आम्ही तो तातडीने हाणून पाडला. आम्हाला लगेचच काम सुरू करायचंय म्हणून. गर्दीने ओसंडणार्‍या देवळात चांगलं रांगेशिवाय निवांत दर्शन होत असतानाही या नतद्रष्ट पोरी नाही म्हणताहेत असंही कदाचित काकांना वाटलं असेल. पण आमचा नाईलाज होता. पैसा आणि वेळ याच्या काटेकोर मर्यादा आहेत. हातात असलेल्या प्रत्येक दिवसाचा बेत आधीच ठरला आहे. कुठल्या दिवशी कुठल्या गावांना जायचं, काय करायचं हे नक्की आहे. मनाने असंख्यवेळा या गावांमधे हिंडून आलेय. आता फक्त सदेह तिथे जाऊन पडणंच काय ते बाकी आहे!

गावांना भेट देऊन संशोधन करायचं म्हणजे नक्की काय करायचं? हा प्रश्न मला घरीदारी कायमच विचारला जातो. तर मुळात मी शोधतेय पांढरीची टेकाडं. पांढरीचं टेकाड म्हणजे जुन्या वस्तींचे अवशेष एकावर एक साचून तयार झालेली उंचवट्याची जागा. अशा जागेत खापरं, हाडं, विटा, दगडाची/ गारगोटीची हत्यारं, मणी असं बरंच काय काय मिळतं. साधारणपणे इ.स. ९व्या - १०व्या शतकांनंतरचे अवशेष तर वीरगळ, शिल्पं, मंदिरं अशा वेगवेगळ्या स्वरूपात बहुसंख्य गावात आढळतात. पांढरी म्हणजे वसाहत आणि काळी म्हणजे शिवार-शेतजमीन अशी बहुतेक मराठी गावांमधे विभागणी असतेच. पण गावपांढरी म्हणजे आजची वस्ती आणि जुनी पांढरी, पांढरीचं टेकाड म्हणजे सहसा ऐतिहासिक-पुरातत्त्वीय अवशेषस्थळ असतं. मी या पांढरीच्या जागा तपासते. तिथे मिळणार्‍या अवशेषांवरून त्या पांढरीचं वय ठरवते. यात सगळ्यात महत्वाची ठरतात ती खापरं - मातीच्या फुटक्या भांड्यांचे तुकडे. पूर्वीच्या काळी धातूच्या भांड्यांपेक्षा मातीच्या भांड्यांचा वापर जास्त प्रमाणात होता. ही भांडी करायला सोपी, धातूपेक्षा कमी मूल्यवान आणि भंगुर असल्याने कुठल्याही पुरावशेषांमधे खापरांचं संख्यात्मक प्रमाण सर्वात जास्त असतं. शिवाय जगभर प्रत्येक संस्कृतीत, कालखंडात आणि प्रदेशात वेगवेगळी खापरे वापरली जात. एकासारखे दुसरे मिळत नाही. ती खापरे त्या त्या काळाची आणि संस्कृतीची निदर्शक असतात. इतक्या दशकांच्या संशोधनानंतर भारतातल्या सर्व भागांत कुठल्या काळात कुठली खापरं बनत असत याचं ज्ञान संकलित झालेलं आहे. मी ज्या वसाहती शोधतेय त्यांच्याकडे फक्त मातीची भांडी असत. लाल गेरु रंगावर काळ्या रंगाची सुंदर नक्षी काढलेली. तशी भांडी परत काही कधी महाराष्ट्रात बनली नाहीत. त्यामुळे माझं काम सोपं असणार आहे. रंगीत नक्षीदार खापरं शोधायचं.

तर निघाले गाव क्र. १ ला. गाव तसं तालुक्याच्या जवळच. जिल्ह्याकडे जाणार्‍या मोठ्या रस्त्यावर. थोडी पोटपूजा करून एस्टीस्टॅण्डवर येऊन टमटम पकडली आणि १५-२० मिनिटांत गावात पोचलो. १९६०च्या दशकात अभ्यासकांना इथून ताम्रपाषाणयुगीन खापरं मिळाली होती. तेव्हा आज तिथे कायकाय मिळतंय पहायला निघालो होतो. एका बर्‍याश्या ओढ्याच्या काठावर माळरान-मुरमाड जमिनीवर गाव. तो ओढा पुढे जाऊन तालुक्यापासून वहाणार्‍या मोठ्या नदीला मिळतो. गावात एक छोटंसं देवस्थान नुकतंच उदयाला यायला लागलंय.
जडशीळ पाठपिशवी घेऊन गावाच्या थांब्यावर उतरलो तेव्हा टळटळीत दुपार झालेली. पाठपिशवीत नोंदणीवही-पेन, मार्कर, मोजपट्टी, होकायंत्र, कॅमेरा, खापरं गोळा करायला मांजरपाटाच्या पिशव्या, नकाशे आणि थोडे तहानलाडू भूकलाडू. नवशिकी असल्याने फसफसून उतू जाणार्‍या उत्साहात आधी कुणाची तरी ओळख काढून मग जावं हे लक्षात आलं नव्हतंच. हमरस्त्यावर असल्याने थांब्यापाशी काही पान-विडीकाडीची दुकानं, चहाच्या टपर्‍या वगैरे. डिसेंबर असला तरी उकाडा आणि ऊन जाणवत होतं. त्यामुळे ही दुकानंसुद्धा पेंगुळलेली होती. शिवाय इथे वाटसरू, ट्रक-टेम्पो ड्रायव्हर यांचा राबता जास्त. तेव्हा तिथे न रेंगाळता चटचट पाय उचलून गावात शिरलो.
गावात एकदम सामसूम. शाळा, पंचायत कुठेशी आहे सांगायलाही कुणी नाही. काही पोरंटोरं लांबूनच टकमक बघत होती, कोण पाहुण्या आल्यात म्हणून. पण काही विचारायला गेलं की लांब पळत होती. थोड्या शोधाशोधीनंतर शाळा आणि पंचायत सापडल्या. दोन्हीला मोठ्ठं टाळं. एका पोराने शिक्षक बाहेरगावचे असल्याने सकाळच्या शाळेनंतर परत गेलेत अशी ज्ञानात भर टाकली आणि परत एकदा लंगडी घालत सायकलचं चाक फिरवत कोपर्‍यावरून वळून निघून गेला. एक दोन माणसं दिसली पण पंचायतीतल कुणी भेटेल का विचारल्यावर आम्हाला वरपासून खालपर्यंत न्याहाळत निघूनच गेली. अशीच ५-१० मिनिटं गेल्यावर २-३ बायका दिसल्या. आम्ही कोण याचीच चौकशी करायला तावातावाने आल्या होत्या. त्यांना जरा तपशीलात सांगितलं. इतिहाससंशोधक आहोत. जिल्ह्याचा इतिहास लिहितेय. तेव्हा गावाची माहिती घ्यायला आलीये.

एकुणात दोन्ही बाजूंनी प्राथमिक बोलणी झाल्यावर मी मुद्याला हात घातला. मी ज्या काळची पांढरीची टेकाडं शोधतेय ती सहसा गावाबाहेरच मिळाल्याचं आधीचे अहवाल सांगतात. त्यातली काही स्थळं पाहिली आहेतच. हे पाठ्यपुस्तकी ज्ञान डोक्यात पक्कं होतं. त्यामुळे जेव्हा त्या बायकांनी असं कुठलंही टेकाड गावाच्या आसपास पंचक्रोशीत नाही असं सांगितल्यावर एकदम गडबडायलाच झालं. मग वर्गातल्या नोट्समधला प्रश्न क्र.२ - घरं सारवायला माती कुठून आणता? (पांढरीची माती जशी खत म्हणून उत्तम, तशीच ती उपयोगी पडते मातीची घरं सारवायला. गावोगाव सिमेंटची घरं सर्रास बांधायला सुरवात झाली त्याच्या आधी हीच माती सारवण म्हणून, डागडुजी करायला म्हणून वापरली जात असे! कारण या मातीत एक चिकटपणा असतो आणि त्याने मातीच्या घराच्या भिंती जास्त टिकतात..) त्या म्हणल्या - ही काय गावातनंच की. रस्ता उकरून नाहीतर पलिकडच्या बखळीतून. आधी वाटलं थट्टा करतायत की काय. कारण अजूनही मी वर्गातल्या शिकवण्यात, आधीच्या संशोधकांच्या अहवालात आणि मी पाहिलेल्या इतर ताम्रपाषाणयुगीन स्थळांच्या अनुभवांत अडकले होते. पाठ्यपुस्तकं, वर्गातलं शिक्षण, इतरांचे अनुभव याचा आणि प्रत्यक्ष मैदानात उतरल्यावर दिसणार्‍या वास्तवाचा काही संबंध असलाच पाहिजे असं नाही. खरंतर बरेच वेळा तो नसतोच. अगदी एकाच भूभागातली एकाच काळातली पुरातत्वीय स्थळं वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात हे पुस्तकातच शिकलेलं पण नंतर सोयीस्कररीत्या विसरलेलं तत्व आठवलं. स्वतःच्या संशोधनाची कार्यपद्धती स्वतःलाच नव्याने बसवायला लागते. इतरांच्या पद्धती जशाच्यातशा लागू पडत नाहीत. हे नीटच उमगलं. डोक्यातली ही चक्रं फिरेपर्यंत काही क्षण गेले. तोपर्यंत अनुभवी सखीने 'अगं पांढर गावाखालीच असणार गं. असतं असं पण.' असं ज्ञानदान केलंच होतं. मग जरा आसपास परत नीट निरखून पाहिलं. खरंच की! गावाखालचा पांढरीचा उंचवटा, मातीचा फिकट पांढुरका रंग, जुन्या बखळीत उकरलं होतं तिथून डोकावणारे विटांच्या भिंतींचे मध्ययुगीन अवशेष असं सगळं दिसायला लागलं. आत्तापर्यंत पाहिलेल्या पांढरींवर वस्त्या नव्हत्या, त्यामुळे हा अनुभव नवाच आहे. जुन्या पांढरीवर गाव असलं की फार अडचणीचं असतं. कारण खाली काय आहे याचा पत्ता लावणं अवघड होतं. कुठेतरी गावात खोदकाम चाललं असेल तर थोडासा अंदाज येतो, पण असं खोदकाम करताना आपण तिथे हजर असणं हा एक दुर्मिळ योग असतो. नाहीतर मग कुठेतरी थोडीशी मोकळी जागा असेल तर खापरं दिसतात, पांढरीत काय दडलंय त्याचा अंदाज येतो. त्या बायका म्हणल्या एका ठिकाणी अशी खापरंबिपरं दिसतात पण तिथे तुम्ही कशा जाणार?' 'का बरं?' अवो, गावचा उकीरडा-हागंदारी हाय थितं... म्हटलं असूद्यात. बघू तर खरं. मग आमचा मोर्चा तिकडे वळला. हळूहळू गावात आम्ही आल्याची बातमी पसरायला लागली होती. लोकांची दुपारची विश्रांती संपल्यामुळे आयत्या करमणुकीसाठी सगळे जमायला लागले. प्रत्येक जण गटागटाने येऊन तेचतेच प्रश्न विचारत होते. प्रत्येक वेळा तीच उत्तरं देऊन अक्षरशः फेस आला. कितीही वैताग आला तरी चिडून बोलायची सोय नव्हती. आमचा वैताग त्यांना स्पष्ट दिसत होता आणि त्यामुळे तमाम जनतेची आणखीच करमणूक होत होती. उकिरडा गावाच्या एका कडेला, ओढ्याला लागून. सगळ्या कुजलेल्या कचर्‍याचा, घाणीचा वास भरून राहिला होता. पुढे पुढे या उकिरडे फुंकण्याला मी कितीही निर्ढावले असले तरी पहिल्या वेळेला कसंतरीच वाटत होतं. डोकं भणाणलं होतं. हातात झाडाची एक बरीशी काटकी. पायाखालच्या गोष्टी चिवडून खापरं शोधायला.
एक पाच मिनिटात हे सगळं विसरायला झालं कारण पायाखाली भरपूर खापरं दिसायला लागली होती. बहुतेक सगळी मध्ययुगीनच होती. पण स्वतःला काहीतरी मिळतंय याचा थरार केवळ अफलातून होता. जवळ जवळ अर्धा तास तिथे हिंडून खापरं वेचली. हे सगळं बघायला ही गर्दी जमलेली. अजून प्रश्नोत्तरांचं सत्र संपलं नव्हतंच. आम्ही आता एकीकडे यांत्रिकपणे उत्तरं देत होतो. तरण्या पोरांनी अगदी उघड टिंगलटवाळी करायला मनसोक्त सुरुवात केली होती. म्हातार्‍याकोतार्‍या आम्हाला 'चांगल्या घरातल्या सवाष्ण पोरीबाळींनी अशी घाणीत उतरण्याची कामं करू नयेत. चांगल्या नोकर्‍या कराव्या' असे सल्ले देत होत्या. तेवढ्यात तिथे एक म्हातारबाबा पोचले. त्यांनी एकूण रागरंग पाहिला आणि सगळ्यांना एका फटक्यात गप्प केलं. आमची (परत एकदा) विचारपूस झाली. एका शाळकरी पोराला ग्रामपंचायतीच्या शिपायाला असेल तिथून शोधून आणायचं फर्मान सुटलं. त्यांच्या शेतातही पांढरीचा काही भाग पसरलाय. तो दाखवायला म्हणून ते आम्हाला घेऊन गेले. आजच्यापेक्षा पूर्वी गावाचा विस्तार मोठा होता असं दिसलं. त्यामुळे पांढरीच्या एका टोकावर गावालगत शेती आहे. इतके वर्षं शेती करूनही अजून तिथे थोडीफार खापरं सापडतात. पुढचा तासभर उभ्या पिकाला सांभाळत दीड एकराचा प्रत्येक इंच आणि इंच पालथा घातला. १५-२० खापरं मिळाली. त्यातली दोन सातवाहनकालीन होती - म्हणजे सुमारे २००० वर्षांपूर्वीची. पण त्याआधीचे अवशेष मात्र हाती आले नाहीत. ज्यांनी प्रथम नमूद केले त्यांची नोंद विश्वासार्ह होती पण चाळीस वर्षांनंतर तिथे इतका जुना पुरावा मिळत नाहीये हेच खरं. मनातल्या मनात गावाच्या नावावर फुली पडली. इतकं हिंडून जीव तहानला होता. म्हातारबाबांनी भावजयीला सांगून चहा पाजला. हे सगळं चालू असताना पंचायतीचा शिपाई पण आमच्यात सामील झाला होता. अत्यंत भला माणूस होता. त्याने गावाची सगळी व्यवस्थेशीर माहिती दिली. आमच्या तांत्रिक मोजमापांमधे पण मदत केली.

यानंतर कूच केलं गावातल्या मंदिराकडे. दोन देवळं आहेत. एक पडकं. यादवकालीन. छत आणि बहुतेक भिंती गायब आहेत. लोकांनी दगड काढून घराच्या बांधकामात वापरले हे स्पष्टच दिसत होतं. आत कुठलीही मूर्ती नाही. याला लागूनच उलट्या दिशेला तोंड करून एक उत्तर पेशवाई कालीन देऊळ. आत विष्णुची यादवकालीन अतिसुबक आणि देखणी मूर्ती. पाहिल्यापाहिल्या मन प्रसन्न करणारी. देवळासमोर एका कडेला जुन्या मंदिराचे अवशेष, कळसाचा आमलक असं काहीबाही रचून ठेवलेलं. शेजारी २-३ वीरगळ आणि विष्णुच्या देवळाला टेकून ठेवलेला एक झिलई येईपर्यंत घासून गुळगुळीत केलेला आयताकार पंचकोनी दगड. त्याच्या डोक्यावर चंद्र-सूर्य, सवत्स धेनू आणि शिवलिंग अगदी सुबकपणे कोरलेलं. पण बाकी काही नाही. सपाट. कुठल्यातरी दानाची नोंद करायला शिलालेख कोरायची तयारी केली होती. काहीतरी अघटित घडलं म्हणा, राजाची/अधिकार्‍याची मर्जी फिरली म्हणा, यावच्चंद्रदिवाकरौ राहील असं दान द्यायचा बेतच रद्द झाला. पण असं काही होणार होतं हे सांगणारा हा मूक साक्षीदार दगड.
F1220025_0.JPG

या सगळ्याची तपशीलवार छायाचित्रं काढली. आलेच आहे तर सगळ्याच अवशेषांची नोंदणी करून घेतली. एकतर इथे परत यायची शक्यता कमी आणि इतरांनी कुणी या नोंदी अजून केलेल्या नाहीत. देवळाच्या पायर्‍यांवर निवांतपणे बसून महत्वाच्या मुद्यांची टिपणं लिहिली. तांत्रिक नोंदी संगतवार लिहिल्या. पूर्ण तपशीलवार अहवाल रात्री लिहिला जाईलच पण इथे पण ही टिपणं करून घेणं आवश्यक आहे. ताम्रपाषाणयुगीन अवशेष मिळाले नाहीत तरी बाकीच्या अवशेषांनी गावाचा इतिहास सांगितलाच होता. किमान २००० वर्षांपासून वसलेलं हे गाव पिढ्यानुपिढ्या शतकानुशतकं इथेच असंच उभं आहे. यादवकाळात बर्‍यापैकी भरभराटीला आलेलं हे गाव आज मात्र आसपासच्या इतर गावांसारखंच एक अनाम खेडं होऊन राहिलंय. इतिहासाच्या विस्मृतीची चादर पांघरून.

इतकं सगळं होईपर्यंत चारसाडेचार वाजले होते. दिवसाउजेडी मुक्कामाच्या ठिकाणी पोचणं कधीही चांगलं. तेव्हा परतीची वाट धरणं भाग होतं. म्हातारबाबांचा निरोप घेतला. पंचायतीचा शिपाई थोडा वेळ आधीच सरपंचाचं काहीतरी काम होतं म्हणून निघून गेलेला. म्हातारबाबा घराकडे निघून गेल्यागेल्या तरण्यापोरांची टवाळकी परत चालू झाली. बाकी सगळे त्यांच्याकडे निर्लेपपणे दुर्लक्ष करत होते. आम्हीही तितक्याच निर्लेपपणे दुर्लक्ष करून हमरस्ता गाठला. तेवढ्यात एस्टी आलीच आणि अर्ध्या तासात मुक्कामाला खोलीत परतलो.
हवं ते गवसलं नाही हे ठीक आहे पण स्वतंत्र संशोधनाचा ओनामा अगदीच काही वाईट झाला नाही. निदान जे मिळालं त्याचा संगतवार अर्थ लावू शकले याचा अपार आनंद झाला होता. पहाटेपासून असलेला अ‍ॅड्रेनेलिन रश आता संपला होता. त्यामुळे एकदमच शिणवटा आला होता. कसाबसा अहवाल लिहून संपवला. जेवण केलं. उद्याची तयारी केली. आणि आज नाही तरी उद्या नक्की यश मिळेल अशी स्वप्नं पहात झोपेच्या आधीन झाले.

(हा लेख माहेर दिवाळी अंक २०१२ मधे प्रकाशित झालेल्या लेखाचा पूर्वार्ध आहे. इथे त्याची 'अनकट व्हर्शन' देत आहे. उत्तरार्धासाठी दैनंदिनीचा भाग ४ बघा. पुनर्प्रकाशित करायची परवानगी दिल्याबद्दल माहेर संपादक मंडळाची आभारी आहे. हा लेख नंतर लिहिला गेल्याने आधीच्या तीन भागांमधल्या काही मजकुराची पुनरावृत्ती झाली आहे. ती दूर करायचा शक्यतोवर प्रयत्न केला आहे. तरी काही राहून गेले असल्यास 'अधिक ते सरते' करून घ्या ही विनंती)

आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी:१

Submitted by वरदा on 14 November, 2009 - 01:21

दिवस पहिला
तालुक्याच्या गावाला पोचले. बाबांच्या व्यावसायिक ओळखीतल्या एक मध्यमवयीन बाई ही या गावातली एकमेव परिचित व्यक्ती. त्यांच्याच ओळखीने दोन महिन्यांसाठी एका छोट्याश्या बंगलीतल्या दोन खोल्या भाड्याने घेतल्यात. गेल्या वर्षी ज्या गावात काम केलं तिथे एका हॉटेल मधे राहिले होते. तिथला मुक्काम छानच झाला पण भाड्याचं घर खूपच स्वस्त पडतं आणि सुरक्षितही वाटतं. त्यामुळे आमची स्वारी खूष!
त्या बंगल्यात सत्तरीच्या घरातले मालक - मालकीण रहातात. त्यांची सगळी मुलं परगावी रहायला आहेत. पण लोक चांगले आहेत. चार दिवसांपूर्वी जागा बघून भाडं देऊन गेले तेव्हाच मला ते आणि त्यांना मी पसंत पडले होते. घर पण छान आहे. शहाबादी फरश्यांचं, माझ्या आजोळच्या आठवणी ताज्या करणारं. आणि माझ्या खोलीच्या दारातून चार पायर्‍या उतरतात त्या फरशी घातलेल्या अंगणात. कडेने आंबा, सीताफळाची झाड, काही फुलझाडं आणि हौद. अगदी गोष्टीच्या पुस्तकात वाचतो ना तसंच!
काकांकडे चौकशी करून रात्रीच्या जेवणाचा डबा पण लावून टाकलाय.
माझ्याबरोबरचं सामान म्हणजे कपडे, कॅमेरा, होकायंत्र, टेप, खुरपी / trowel, मांजरपाटाच्या पिशव्या (खापरं गोळा करायला), नकाशे, नोंदणीवही, कोरडा फराळ, अभ्यासाची वह्या-पुस्तकं, २-४ गोष्टींची पुस्तकं, आणि सटरफटर. विंचवाचं बिर्‍हाड मांडायला कितिसा वेळ लागतो? साबण, कुंचा, मेणबत्त्या अशा संसारोपयोगी गोष्टींची खरेदीही झाली..

इकडेतिकडे चौकशी करून आणि एका इतिहासाच्या स्थानिक प्राध्यापकांशी फोनवरून बोलून एक विद्यार्थी मदतनीसही मिळालाय. त्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो माझ्याबरोबर येणार आहे.

रात्रीच्या जेवणाचा डबा पुण्याहून येतानाच आणला होता. ७ - ७॥ च्या सुमारासच खाऊन घेतला. आता निवांतपणे खोलीसमोरच्या पायर्‍यांवर बसलेय. उद्या सकाळपासून काम सुरू. उद्या ज्या ज्या गावांना जायचंय त्याची यादी करून, त्यांचे काही पूर्वीचे संदर्भ आहेत का ते तपासून, त्यांचे नकाशे सखोलपणे पाहून झालेत. इथे यायच्या आधी एकदा गूगल अर्थ वर जाऊन ही ठरवलेली गावं एकदा वरून न्याहाळून झालीत - त्याची टिपणं काढून झालीत.
पण आत्ता करायला काहीही नाहीये. फक्त चढणार्‍या रात्रीची शांतता मनात उतरवतेय. आणि उद्याची आतुरतेने वाट पहातेय. फील्डवर्क करताना इतर वेळी संसारात, अभ्यासात, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात, स्वैपाकपाण्यात हरवलेली मी माझी मलाच भेटायला येते. आता तिच्या-माझ्यात आणखी कुणीच नसतं. पुढचे काही दिवस फक्त स्वतःसाठी...
असो. ९ वाजलेत. नवर्‍याला फोन केला, त्याचा दिवसातला शेवटचा चहाचा कप पिणं चाललं होतं. मग माहेरीही फोन केला. आता झोपावं.

दिवस सहावा
सकाळी नेहमीप्रमाणेच ६ला उठले. पटकन आवरून केळी (यक! :(), लाडू असा पौष्टिक नाश्ता करून ७च्या सुमारास घराबाहेर पडले. बरोबर पाणी, कॅमेरा, नोंदणीवही, इतर औजारं/ हत्यारं घेतली. तशीही फील्डवर मी दुपारची जेवत नाहीच, पण अगदीच वाटलं तर असावं म्हणून बरोबर फळं, केक असं घेतलंय.

गेल्या पाच दिवसात १६ गावं हिंडून झाली आहेत. आपल्या देशात प्रत्येक गावात काही ना काही ऐतिहासिक अवशेष असतातच. अगदीच काही नाही तरी उत्तर मराठा कालीन वाडे तरी दिसतातच. पण मी शोधते आहे त्या सुमारे ३००० - ४००० वर्षांपूर्वीच्या वसाहती. मी काम करते त्या प्रदेशात पुरातत्त्वीय सर्वेक्षण जवळजवळ न झाल्यातच जमा आहे, त्यामुळे माझ्या कामाशी संलग्न नसले तरी जे काही unreported ऐतिहासिक पुरावे असतील (अगदी मध्ययुगापर्यंतच्या वस्त्यांचे अवशेष, मूर्ती, देवळं, वीरगळ, तटबंद्या, गढ्या, असं सगळं) त्यांची तपशीलवार नोदणी करते. कारण ज्या वेगाने हे पुरावे नष्ट होत आहेत ते पहाता आणखी ५ वर्षांनी तरी यातलं किती शिल्लक राहील माहित नाही. Sad त्यांची निदान प्राथमिक नोंदणी असावी असं मला वाटतं.

वीरगळ
hs.JPG

गेल्या पाच दिवसात भेट दिलेल्या गावांमधील १० गावांत इ.स. १० व्या शतकापासूनचे पुरावे मिळालेत. आणि उरलेल्या ६ गावांची प्राचीनता मात्र सुमारे २००० वर्षं मागे जाते. म्हणजेच तिथे सातवाहन कालीन वसाहती होत्या.
आज काय काय मिळणार आहे? माहीत नाही!

बसस्टँडवर आले. ज्या गावाला जायचं ठरवलं होतं त्याला जायला ८ वाजताची बस होती. (एस्टी च्या लाल डब्यांचं मात्र खरंच कौतुक आहे. ९० - ९५% गावांना निदान दिवसातून एकदा तरी गाडी जाते.) आजही माझा मदतनीस माझ्या बरोबर होता. खूपच चटपटीत आणि छान मुलगा आहे. मला मनापासून मदत करतो.
८ ची गाडी ८। ला सुटली. मी आणि माझा मदतनीस एकूण या गर्दीत उठूनच दिसत होतो. त्यामुळे नेहेमीप्रमाणेच लोक आमच्याकडे माना वळवून वळवून पहात होते. त्यात माझा पोषाख नक्कीच विनोदी दिसत असणार - अंगात धुवट सलवार कुर्ता, ओढणी, गळ्यात ठसठशीत काळी पोत, कपाळाला कुंकू, वरती एकदम छोटे कापलेले केस आणि पायात भरभक्कम ट्रेकिंग शूज. गळ्यात स्कार्फ आणि पाठीला सॅक!
कुंकू आणि मंगळसूत्र हे फील्डमधले माझे सर्वात महत्त्वाचे साथीदार. एरवी या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहणारी मी खेडोपाडी हिंडताना मात्र आदर्श भारतीय नारी असते. कारण गळ्यात काळी पोत पाहिल्यावर गावातल्या लोकांची माझ्याकडे पहायची नजर आमूलाग्र बदलते. बहुतेक वेळा आपुलकीच (आणि काही ठिकाणी खणा-नारळाची ओटीही) वाट्याला येते. घर-संसार असूनही असं काम करत हिंडणार्‍या माझं त्यांना जेवढं आश्चर्य वाटतं त्यापेक्षाही सगळ्यांना अगणित पट कौतुक वाटतं ते मला हे सगळं करायची परवानगी देणार्‍या माझ्या मालकांचं (नवर्‍याचं) आणि सासूचं. त्यांची ती स्तुती ऐकून माझा नवरा म्हणजे पृथ्वीवर अवतरलेला देवदूतच असा मला साक्षात्कार होतो आणि अशा संतमहात्म्यांचे घर माझ्या नशीबात आल्याचे लक्षात येऊन मी धन्य धन्य होते! Proud

असो. नकाशात दिसत होतं की गाव क्र.१ जवळून नदी वहाते आणि पल्याडच्या काठाला २-३ छोट्या टेकाडांसारखे उंचवटे होते. तसेच गावाच्या बाजूला, अल्याडच्या काठाला पांढरीचा मळा असा उल्लेख दिसत होता. आधी पल्याडच्या काठाला गेलो. तिथे पोचल्यावर लक्षात आलं की हे उंचवटे खडकाचे / नैसर्गिक होते. तरीसुद्धा आसपास थोडीशी शोधाशोध केली. गारगोटीची हत्यारं कुठे मिळताहेत का पाहिलं. काहीच नव्हतं! मग परतून चालत चालत मुख्य रस्त्याला लागलो. पुलाच्या अलिकडे एक पत्र्याच्या भिंतींची पण मोठ्ठी शाळा होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात बरेचसे शिक्षक अजूनही बाहेरच रेंगाळत होते. शिवाय थोड्या वेळापूर्वी त्यांनी आम्हाला तिकडे ओढ्याच्या दिशेने जाताना पाहिलेले असणार.. त्यांनी लगेच आम्हाला थांबवून चौकशी सुरू केली. मला आता या चौकशीची सवय झाली आहे. साधारणपणे प्रश्नांचा क्रम असा -
१. तुम्ही कोण?
२. कुठून आलात?
३. काय काम?
४. या कामाचा काय उपयोग?
५. सरकार तुम्हाला या कामासाठी किती पैसे देतं? (मी विद्यावृत्तीवर किंवा वर्षभर काम करून त्या पैशांवर हे काम करते हे उत्तर बहुतेक लोकांना खोटंच वाटतं..)
६. तुमचे मालक काय करतात? कुठे रहातात? (या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर मी पुणे असंच देते. माझा नवरा अमराठी आहे आणि मी कलकत्त्याहून इतक्या दूर फक्त कामासाठी आलेय ही लोकांच्या समजशक्तीच्या परिघाबाहेरची गोष्ट असते असा माझा अनुभव आहे.)
७. मुलंबाळं?
८. सासरी कोणकोण असतं? ते तुम्हाला असा संसार सोडून कसं काय बरं जाऊ देतात?
९. इथे तालुक्याच्या गावाला कुठे / कोणाकडे रहायला? ते तुमचे नातेवाईक का? असल्यास नक्की नाते काय? त्यांच्या घरी कोण कोण असतं? या सर्वांचा पोटापाण्याचा उद्योग काय?
हे सगळे अगदी चाकोरीतले प्रश्न. यात स्थळकाळसापेक्षतेनुसार भर पडत असतेच. म्हणजे जमीन अधिग्रहणाची काही भानगड होणार नाही ना? तुम्हाला गुप्तधन मिळतं का? सोनं शोधायला आलात का? आमच्या गावातली अमकीतमकी अडचण सरकारी अधिकारी समजावून घेत नाहीत, तुम्ही त्यांच्या वरच्या अधिकार्‍यांना सांगाल का? इ. एवढी सगळी उत्तरं देऊनही कधी कधी लोक गावातून हाकलून देतात..
तर या शिक्षकांबरोबर हे नेहेमीचे संवाद झाल्यावर त्यातले एकजण म्हणाले, 'माझं गाव इथून ५-६ किमी वर आहे. आमच्याच शेतात पूर्वी एक पांढरीचं टेकाड होतं. तुम्हाला पहायचं असेल तर दुपारी १ वाजता शाळा सुटते तेव्हा या. मी घेऊन जाईन." लगेचच हो म्हणून टाकलं. आणि मोर्चा गाव क्र. १ कडे वळवला.
गावात गेल्यावर आम्हाला पाहून लोक जमा झालेच. परत एकदा प्रश्नोत्तरांचं सत्र झालं. या सर्व लोकांनी मला एका सुरात ठामपणे सांगितलं की इथे असं जुनं टेकाड वगैरे काहीच नाही. गावात फक्त एक सतीचा हात, खंडोबाचं देऊळ आणि म्हसोबाचं देऊळ आहे. मग थोडसं खोदून विचारलं की इथला पांढरीचा मळा कुठे आहे म्हणून. तेव्हा २-३ जणांनी एकमेकांकडे पाहिलं आणि जरा उग्रपणेच मला सांगण्यात आलं की पूर्वी एका शेतात होतं पण आता तिथे काहीही नाही. तुम्ही तिथे जाऊ नका. तरीही चिकटपणाने आणखी थोडा मन वळवायचा प्रयत्न केला. पण गावकर्‍यांनी जाम दाद लागू दिली नाही. मीही मग निघाले. पुढच्या गावाला...

गाव क्र.२ फाट्यावरून साधारण २-३ किमी आत डांबरी रस्त्याने सरळ चालत गेल्यावर. सकाळची एकमेव बस कधीच निघून गेल्याने बाकी कुठल्याही वाहनाची वाट न पहाता त्या दिशेला पाय वळवले. हे या तालुक्यातलं सर्वात छोटं गाव. ३०० च्या आतबाहेर लोकसंख्या. पण एकूण नकाशातल्या खाणाखुणा सांगत होत्या की इथे हटकून काहीतरी मिळायची शक्यता आहे. दोन्ही बाजूला शेतं, शिवारं आणि माणसांचीही वर्दळ नसणारा निवांत रस्ता - चालायला मजा येत होती.
गावात पोचलो. माझ्या अवताराकडे बघून भराभरा लोक गोळा झाले. एक छोटीशी शाळा होती. तिथले शिक्षक, विद्यार्थी सगळेच शाळा सोडून आमच्या भोवती जमले. परत एकदा प्रश्नोत्तरं! हा कार्यक्रम चालू असताना तिथला एक माणूस माझ्याकडे आ वासून पहात होता. त्याने शेवटी न राहवून विचारलंच की, "पण मला एक सांगा, तुम्हाला आमच्या गावाचं नाव मुळात कळलंच कसं? आमचं गाव इतकं छोटं आहे तालुक्याच्या अधिकार्‍यांना सुद्धा पटकन लक्षात येत नाही. मग तुम्हाला नाव कसं कळलं? आणि आमच्या गावात जुनी खापरं मिळतात हे तरी कसं कळलं?" शांतपणे पाठपिशवीतून नकाशा बाहेर काढला. त्यात गावाचं नाव लिहिलेलं दाखवलं, आणि गावात पांढर आहे का अशी फक्त चौकशी करतेय, नक्की माहित नाही असं सांगितलं. मग तो संशयात्मा शांत झाला. आता सगळेच माझ्या बरोबर निघाले. गावाच्या कडेला एक अवशिष्ट टेकाड आहे - तिथे खापरं मिळतात म्हणून त्याला कुंभारवाडा म्हणतात.

पांढरीच्या टेकाडावर पडलेला खापरांचा खच
scatter.JPG

खापरं पाहून लक्षात आलं की इथे सुमारे २००० वर्षांपूर्वी वस्ती होती. नदीच्या काठापासून जरा आत, चढावर, जिथे पावसाळ्यात पुराचे पाणी पोचणार नाही अशा ठिकाणी सातवाहन कालात एक छोटंसं गाव त्यांची छोटीशी सुखं-दु:खं पोटाशी धरून इथे नांदत होतं. त्यानंतरच्या कालखंडातल्या वस्तीचा मात्र काहीच पुरावा दिसला नाही. कोण्या अज्ञात कारणाने उजाड झालेल्या गावाची एक अज्ञात कहाणी...
या अवशेषांची व्यवस्थित पहाणी, मोजणी, नोंदणी करून खापरं गोळा केली, फोटो काढले, गावाची इतर माहिती लिहून घेतली. एका म्हातारबुवांनी त्यांच्या व्याह्यांच्या आजोळच्या गावात पण एक मोठी पांढर आहे अशी माहिती पुरवली. हे गाव पण माझ्या कामाच्या कक्षेत येत असल्याने त्याचे नाव टिपून ठेवले. मग शाळेच्या व्हरांड्यात बसून फळं आणि केक खाल्ला. गावकर्‍यांनी चहाही पाजला. सगळ्यांना अच्छा म्हणून गाव सोडलं.

चालत चालत शाळेपर्यंत यायला सव्वा वाजला. ते शिक्षक त्यांच्या मित्राबरोबर वाटच पहात होते. तेवढ्यात खाजगी वाहतूक करणारा टेंपो आला आणि त्यात बसून आम्ही गाव क्र.३ कडे निघालो. गावात पोचल्यावर परत एकदा प्रश्नोत्तरांचं सत्र! पण या वेळी उत्तरं द्यायचा भार बहुतांशी माझ्या मदतनिसाने आणि त्या शिक्षकांनी सांभाळला (मदतनिसाची ही सगळ्यात महत्त्वाची मदत - गावकर्‍यांशी बोलणे. कारण गटागटाने येऊन गावकरी तेच तेच प्रश्न विचारतात, आणि तीच तीच उत्तरे परत परत देताना तोंडाला अक्षरशः फेस येतो! काम करायला अजिबात सुचत नाही) मग २-३ मोटरसायकली घेऊन आम्ही त्या शेताकडे निघालो.
गावापासून शेत साधारणपणे ३ कि.मी, नदीच्या काठावर. १३ एकरांचं. या शिक्षकांच्या पणजोबांनी जेव्हा ही जमीन विकत घेतली तेव्हा इथे १० एकरांपेक्षा मोठं आणि १५-२०फूट उंच असं एक पांढरीचं टेकाड होतं. जमीन लागवडीखाली आणण्यासाठी म्हणून ही पांढर पूर्णपणे खणून काढली आणि जवळजवळ हजारभर बैलगाड्या पांढरीची माती आसपासच्या शेतकर्‍यांना विकली. (या मातीत नायट्रोजन आणि फॉस्फेटचं प्रमाण जास्त असल्याने खत म्हणून या मातीचा फार उत्तम उपयोग होतो. बहुतेक सगळ्याच गावांमधे पांढरीची माती राजरोसपणे विकली जाते. शिल्पं, देवळं निदान धर्माच्या नावाखाली तरी जतन करून किंवा किमानपक्षी आहेत त्या अवस्थेत ठेवली जातात. पण ही पांढरीची टेकाडं मूर्ती, देऊळ या कुठल्याही अवशेषांपेक्षा कैकपट महत्त्वाचे पुरावे असतात..) गेले ७० वर्षं त्या जमीनीत शेती होतेय. सध्या जमीन नांगरटीसाठी मोकळीच पडली आहे. हे सगळं ऐकून माझ्या उंचावलेल्या अपेक्षा एकदम जमिनीवर आल्या. तरी उभं पीक नाही हे काय कमी आहे अशी मी स्वतःची समजूत घातली. तिथे पोचले आणि आजूबाजूला पहिलं तर काय - अहो आश्चर्यम! त्या शेतात सातवाहनकालीन खापरं, गारगोटीची हत्यारं इ. चा खच पडला होता. शिवाय अनेक हाडं, शंखांच्या बांगड्यांचे तुकडे असं काय काय होतंच! इतके वर्षांच्या शेतीनंतरही मला इतकं मिळतंय तर मुदलात ते टेकाड पुरातत्त्वीय पुराव्यांनी किती समृद्ध असणार! आत्तापर्यंत मला मिळालेली बहुतेक सर्व सातवाहनकालीन गावं छोटी, २-३ एकरांची होती. पण इथली गोष्टच वेगळी असणार!

सर्व जागेची तपशीलात पहाणी, मोजणी, नोंदणी केली, खापरं व इतर अवशेष गोळा केले. एवढ्यात ते शिक्षक म्हणाले की इथे नदीच्या पात्रात एक महादेवाचं ठाण आहे, ते पण तुम्ही बघा.
ठीक आहे. चला. इथे नदीचा काठ चांगलाच उंच आहे - किमान ३०-४० फूट. आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेला धरून डिसेंबर मधे सुद्धा नदीचं पात्र कोरडं ठणठणीत होतं. या पात्रात मधोमध काही उंच खडक आहेत. त्यावर आडोशाला ठेवलेली एक शंकराची पिंड आहे. दरवर्षी गावोगावहून काही विशिष्ट समाजाचे लोक इथे यात्रेसाठी येतात. ही सगळी माहिती लिहून घेतली. आता ऊन अगदी कळाकळा तापलं होतं, हिवाळा चालू आहे याचा संशयसुद्धा येऊ नये इतकं! आणि नदीच्या पात्रातल्या खडकांमुळे तर आणखीच चटके बसत होते. तेव्हा तिथलं काम आटपून गावाकडे परतलो.
गावात गेल्यावर ते शिक्षक जेवायला घालायला निघाले होते. कसंबसं त्यांना थोपवलं. आणि जेवणाचा आग्रह चहाच्या कपावर आणून थांबवला.
या गावात पण पांढर आहे, म्हणजे गावच पांढरीच्या टेकाडावर वसलंय. अशी पांढरीवर वस्ती असली की फार अडचण होते. कारण खाली काय आहे याचा पत्ता लावणं अवघड होतं. कुठेतरी गावात खोदकाम चाललं असेल तर थोडासा अंदाज येतो, पण असं खोदकाम करताना आपण तिथे हजर असणं हा एक दुर्मिळ योग असतो. नाहीतर मग कुठेतरी थोडीशी मोकळी जागा असेल तर खापरं दिसतात, पांढरीत काय दडलंय त्याचा अंदाज येतो. आणि बहुतेक सगळ्या गावांत अशी मोकळी जागा म्हणजे गावचा उकीरडा-कम- सार्वजनिक उघड्यावरचा संडास. तेव्हा या सगळ्या जागेची बारकाईने छाननी/ पहाणी करून त्यातून खापरं वगैरे वेचणं ओघाने आलंच. अगदी शब्दशः उकीरडे फुंकणं!! बरेच वेळा गावातली माणसंच काय पण उकीरड्यातली कुत्री आणि डुकरं पण आश्चर्याने बघत रहातात माझ्याकडे. Proud
असो. तर ही खापरं वेचून परत येऊन एका घराच्या पायरीवर बसले. थोडं पाणी मागवून ती खापरं धुऊन पाहिली, तेव्हा लक्षात आलं की सगळीच साधारणपणे १२ व्या शतकाच्या नंतरची आहेत. असू देत. पिशवीत भरली. गावाची इतर माहिती, मौखिक इतिहास इ. लिहून घेतलं. तालुक्याच्या गावाला जाणारी बस ५-५। ला होती. वेळ कमी होता पण तेवढ्यात गावातले जीर्णोद्धार केलेले खंडोबाचे देउळ पाहून घेतले. आजचा दिवस नेहमी पेक्षा थोडा वेगळा ठरलाय कारण गावोगाव आढळणारी मंदिरं, मूर्ती, वीरगळ यापैकी आज काहीच दिसलं नाहीये. एवढ्यात गाडी आलीच. गाडीत चढताना लक्षात आलं की देवळाच्या समोरच्या पारावर एक गजलक्ष्मीचं सुंदर शिल्प ठेवलंय. मघाशी त्या बाजूला बसल्याने झाडाच्या आड असलेलं शिल्प इतका वेळ दिसलंच नव्ह्तं. मग घाईघाईने उतरून त्याचा फोटो काढला आणि पळतपळतच सुटणार्‍या बसमधे चढले.

गजलक्ष्मी
gajalakshmi.JPG

घरी परतेपर्यंत ६॥ झाले. येऊन आंघोळ करून कपडे धुऊन वाळत टाकले. खापरांच्या पिशव्या एकीकडे नीट लावून ठेवल्या. थोडं कंटाळल्यासारखं झालं होतं पण चालढकल करण्यात काही अर्थ नव्हता. म्हणून परत एकदा वही-पेन हातात घेतलं. दिवसभराच्या कामाचा कच्च्या नकाशांसह, आराखड्यांसह एक तपशीलवार वृत्तांत लिहिला. हिशोब लिहिला. यात तास-दीड तास गेलाच. तेवढ्यात रात्रीचा डबा आला. जेवता-जेवताच नवर्‍याचा फोन आला. आज काय काय मिळालं याची परत एकदा उजळणी झाली.
उद्याच्या दिवसाची तयारी केली. कुठल्या गावांना जायचंय, त्याची यादी निश्चित केली, नकाशांवरून नजर फिरवली. खापरांसाठी नव्या पिशव्या सॅकमधे घातल्या, पाण्याची बाटली भरून ठेवली. आणि मग सकाळी स्टँडवर घेतलेलं आणि संध्याकाळपासून खुणवणारं वर्तमानपत्र हातात घेतलं.

फील्डमधे सगळेच दिवस सारखे नसतात. बरे वाईट सगळेच प्रकार वाट्याला येतात. त्या तुलनेत आजचा दिवस फारच आरामाचा गेला - शिवाय कामही बर्‍यापैकी मनासारखं झालं. या आनंदात डोळे कधी मिटले कळलंच नाही.

(टीपः इथे लिहिलेले सर्व प्रसंग, लोक, गावे खरीखुरी आहेत. फक्त माझं हे संशोधन अजून पूर्ण झालेलं नसल्याने इथे गावांची नावं वगैरे दिली नाहीयेत. आणि मजकुराबरोबर दिलेले फोटो त्या त्या गावांचे नसून प्रातिनिधिक आहेत. हे सर्व फोटो माझ्या अप्रकाशित संशोधनाचा भाग असल्याने कृपया कुणी कॉपी करून वापरू नयेत. धन्यवाद  )

आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: २

Submitted by वरदा on 5 December, 2009 - 15:21

भाग १ - आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी (सचित्र) http://www.maayboli.com/node/11999

भाग २:
दिवस - दमवणारा
आज जरा लांबचा पल्ला गाठायचा होता, त्यामुळे थोडीशी लवकरच निघाले. मदतनिसाच्या सांगण्यावरून स्टँडकडे न जाता गावाबाहेर जाणार्‍या रस्त्याकडे पावलं वळवली. त्याच्या मते आजच्या पहिल्या गावाला जाण्यासाठी तिथून बस, खाजगी गाड्या असे वेगवेगळे पर्याय असतील. गाव जिल्ह्याकडे जाणार्‍या मोठ्या रस्त्यावर आहे, सगळ्याच लांबपल्ल्याच्या एस्ट्या तिथे थांबतात असं नाही.
फाट्यावर पोचलो. पाहिलं तर आसपास जिपा नाहीत. तिकडे जाणार्‍या गाड्या अर्ध्या तासापूर्वी निघून गेलेल्या. पुढची फेरी परत दीडतासानंतर. आणि कुठल्यातरी नव्या नियमामुळे बसगाड्याही इथे थांबत नाहीयेत. एकदम चिडचीडच झाली. मदतनिसाचा चेहेरा एवढुस्सा झालेला! गाव क्र. १ या रस्त्यावरून ६ किमी. पण इथे असं वाट पहात उभं किती वेळ रहाणार? त्यापेक्षा चालायला सुरूवात केली. सकाळच्या वेळी मस्तपैकी गुळगुळीत मोठ्या डांबरी रस्त्याच्या कडेकडेने गार वारा अंगावर घेत चालायला मजा येत होती. तरी सगळं वेळापत्रक पुढं ढकललं जातंय आणि तेही दिवसाच्या सुरवातीलाच म्हणून थोडं वैतागल्यासारखंच झालं होतं. शिवाय जाणार्‍या-येणार्‍या वाहनातली लोकं थोडीशी विचित्रपणे पहात होती, की या मोठ्या रस्त्यावर हे दोघंजण असे मधेच कुठे चालत निघालेत.. मोटरसायकली मुद्दाम जवळून जात होत्या. एकदोनदा शिट्ट्या, कॅटकॉल्स पण ऐकून घ्यावे लागले. शांतपणे मान खाली घालून चालत राहिले. व्वा! मागनं बस आली आणि आम्ही हात दाखवल्यावर चक्क थांबली. उरलेले ३ किमी ५ मिनिटात संपले.

गाव क्र. १. या गावातल्या पाटील कुटुंबाशी बादरायण ओळख आधीच काढून ठेवली होती. त्यांना काल निरोपही गेला होता की मी सकाळी जाणार आहे म्हणून. आमची वाट पाहून पाटीलकाका शेतावर गेले होते. त्यांच्या कॉलेजात जाणार्‍या मुलाने अगत्याने बसवून घेतले. शेतावर निरोप पाठवला आणि आमच्या चहापाण्याची व्यवस्था करायला आत जाऊन सांगून आला. गावातल्या जरा सधन-सुखवस्तू कुटुंबात गेलं की साहजिकच बायकांचा भाग वेगळा असतो. पाहुणी म्हणून मला बैठकीत बसवलं जातं आणि पुरुषमाणसंच माझ्याशी बोलतात. घरातल्या सास्वा-सुना-लेकींचं दर्शन फक्त चहा-बिहा देताना, तेही बैठकीच्या उंबर्‍यावरूनच. त्याही टकामका बघत असतात की ही कोण पाहुणी अवतरलीये म्हणून.
खरंतर त्यांच्याशी गप्पा मारायला मला आवडतात. एरवी न कळणारी अनेक माहिती, आख्यायिका, समज, श्रद्धा अशा खास बायकांच्या विश्वातल्या गोष्टी कळतात. म्हणजे गावातले म्हातारेकोतारेही या गोष्टी सांगतात पण बायकांची version थोssडीशी वेगळी असते बर्‍याचवेळा - कुठेही कधी न ग्रथित होणारी ही परंपरा. आधीच आपल्याकडे कागदपत्र सोडून मौखिक परंपरेला/ इतिहासाला फार क्वचित विचारलं जातं. आणि त्यातही ही मौखिक माहिती बहुदा गावातले पुरुषच देणार. आपल्याकडे इतिहासाच्या साधनसामग्रीतही शुचितेची उतरंड आहे, एक उच्चनीच भेदाभेद आहे. त्यात ही बायकांची मौखिक परंपरा उतरंडीच्या कायम तळातच!!
पण अशा घरांमधे हा संवाद साधणं जिकिरीचं आणि वेळखाऊ असतं. वर्षभरात संसारातून वेळ काढून २-३ महिन्यात धावतपळत फील्डवर्क, इतर अभ्यास, माहेर, मित्रमैत्रिणी अशी तारेवरची कसरत करणारी मी अगदी काट्यावर चालत असते. त्यामुळे दुर्दैवाने याचा पाठपुरावा करण्याइतका वेळ माझ्याकडे कधीच नसतो. नुसत्या नजरानजरीवर, स्मितहास्यावर आणि 'येते हं मावशी/ ताई/ वहिनी/ आजी' या वाक्यावर आमचा संवाद संपतो. याउलट गरिबाच्या घरांमधे जागेच्या कमतरतेमुळे सगळं कुटुंबच समोर असतं. आणि मग अशा घरांमधल्या आज्ज्या पुढाकार घेऊन, अगदी कानामागून पदर घेऊन, सखोलपणे माझी तपास-चौकशी करतात. चार अनुभवाच्या शहाणपणाच्या गोष्टी सांगतात. एखादी शाळकरी नातबित असेल तर तिच्या पाठीत एक धपाटा घालून मी कसं एवढं शिकून सवरूनही कुंकू-मंगळसूत्र घालायला विसरले नाहीये हे तिला दाखवण्यात येतं.

असो. तर काका शेतावरनं परतले. त्यांनी गावाची जुजबी माहिती दिली. त्यांच्या लहानपणी गावात एक ताम्रपट मिळाल्याची आणि पुण्याचे काही प्रसिद्ध इतिहास संशोधक तो घेऊन गेल्याची गोष्टही सांगितली. पण तो ताम्रपट काही कारणाने कधीच प्रसिद्ध न झाल्याने मी त्यांना काहीच माहिती देऊ शकले नाही. मी आज या गावात आलेय कारण याच्या पंचक्रोशीतल्या गावात एका यादवकालीन शिलालेखात एका देवस्थानासाठी इथली जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. तेव्हा हे गाव यादवपूर्वकालीन हे तर नक्की. त्याचा पुरातत्त्वीय पुरावा आहे का हे पडताळून पहायचंय.
गावाची पहाणी करायला बाहेर पडलो. इथे पण गाव पांढरीवर आहे. आणि मोठ्या रस्त्यावर असल्याने सिमेंटची बांधकामं पण बरीच आहेत. खापरं मिळणं अवघडच दिसत होतं. तेवढ्यात कुणीतरी खबर आणली की रेशनच्या दुकानात खणाखणी चाललीये परवापासून आणि तिथे खापरंही मिळतायत. तिथे गेलो तर दुकान बंद. मग मालकाला बोलावून उघडलं. जुन्या वाड्यातलं ते दीडखणी दुकान. आधीच खूप अंधारं आणि त्यात दिवे गेलेले (तसेही ग्रामीण भागात रोज १२-१४ तास दिवे नसतातच!). दुकानाचा पाया खणून पूर्णपणे आतून नव्यानी दुकान बांधून काढायचा घाट मालकाने घातला होता. सगळी जमीन खणून ४ फूट तरी खाली गेले होते. त्या अंधारात खड्डाच काय पण बाजूची भिंतसुद्धा दिसत नव्हती. तेवढ्यात कुणीतरी कंदिल आणला, टॉर्च आणला. थोड्या वेळाने एक मिणमिणता इमर्जन्सी लाईटही आणला. मग मी खड्ड्यात उडी मारली. कारण चढा-उतरायला काही व्यवस्था नव्हतीच. त्या अंधारातच मी माती सावडून खापरं गोळा केली. आता पुढचा प्रश्न! त्या चारफुटी खड्ड्यातनं जेमतेम पाचफुटी मी शिडीशिवाय कशी बाहेर पडणार? अर्थात हे माझ्या डोक्यात येण्याआधीच बाकीच्यांच्या डोक्यात आलं होतं आणि ३-४ विटा आणवल्या होत्या. मग त्या एकावर एक रचलेल्या विटा, मधेच अर्धवट बाहेर आलेला एक दगड आणि वरून दोघांनी दिलेले हात अशा मदतीने अस्मादिक बाहेर पडले!
बाहेर येऊन उजेडात खापरं पाहिली तर फुस्स! सगळी मराठाकालीन किंवा थोडीशी आधीची. मुकाट पिशवीत भरली आणि गावाला चक्कर मारायला बाहेर पडले. गावात एक हेमाडपंती/ यादवकालीन मंदिरही आहे. तिथे गेलो. नेहेमीप्रमाणेच वरच्या शिखराची पडझड झालीये. आत फोटो-बिटो काढून झाल्यावर ते काका सहज म्हणाले, की त्यांच्या लहानपणी या शिखराची डागडुजी करायचे प्रयत्न झाले होते. मी विचारलं 'कशी केली ही डागडुजी?' ते उत्तरले 'जे दगड उरले होते वरती ते पांढरीच्या मातीने लिंपून' (पांढरीची माती जशी खत म्हणून उत्तम, तशीच ती उपयोगी पडते मातीची घरं सारवायला. गावोगाव सिमेंटची घरं सर्रास बांधायला सुरवात झाली त्याच्या आधी हीच माती सारवण म्हणून, डागडुजी करायला म्हणून वापरली जात असे! कारण या मातीत एक चिकटपणा असतो आणि त्याने मातीच्या घराच्या भिंती जास्त टिकतात..) माझे डोळे लकाकले! म्हणजे त्या मातीबरोबर नक्की खापरं असणार, निदान त्यांचे छोटे तुकडे तरी! मग उत्साहाने काका आणि मदतनीस दोघांनाही घेऊन बाहेरच्या मंडपाच्या चौथर्‍यावरून छताला वेंगून वरती चढले. वरती आता काहीच नाही. ४ -५ दगड आणि सपाट छप्पर. पण माझ्या अंदाजाप्रमाणे छोटी छोटी खापरं होतीच. आणि त्यात काही सातवाहनकालीन खापरंही मिळाली!!! एवढ्या खटाटोपाचं सार्थक झालं म्हणायचं!

गावाच्या बाहेर १-१॥ किमी वर एक ओढा नदीला मिळतो. त्या संगमावर एक छानसं देऊळ आहे. आहे उत्तर मराठाकालीनच पण एकदम निवांत. शिवाय देवळाच्या बाहेर पारावर आणि आजूबाजूला बरेचसे वीरगळ आणि गणपतीची मूर्ती. म्हणजेच हे देऊळ/स्थान मुळात निदान यादवकालीन तरी असणारच. नंतर त्याचा जीर्णोद्धार होत राहिला असणार. देवळाच्या मागच्या बाजूला मोठीमोठी झाडं आणि मधेच सपाट मोकळवण. अगदी मस्त पिकनिक स्पॉट!
निवांत पाय पसरून बसले आणि गावाची आणि देवळाची माहिती लिहायला घेतली. तेवढ्यात मोबाईल खणखणला. नवरा. आत्ता? या वेळी फोन? वाईट बातमी देण्यासाठी होता. आमच्या अत्यंत जिवलग मित्राच्या वडलांना कामनिमित्त कलकत्त्यात आले असता ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने आयसीयूत ठेवल्याची खबर कळली. माझा हा अगदी सख्खा मित्र - आत्तापर्यंतच्या आयुष्यातली माझी एक महत्त्वाची कमाई. आत्ता तो काकांबरोबर एकटाच होता. बाकी कुटुंब शेकडो मैल दूर. परत हा प्रचंड हळवा! मलाच गलबलून आलं. त्याला फोन लावला. मी तरी काय बोलणार त्याच्याशी आणी तो तरी काय सांगणार? मी त्याक्षणी तिथे असते तरी काय करू शकले असते? जे काही शक्य होतं ते माझा नवरा करतच होता. पण काकांचं काही खरं नाहीये याची कल्पना नवर्‍याने आधीच दिली होती.
अर्थात मला काही माझं काम थांबवता येणार नव्हतंच. तेव्हा या हतबलतेला तात्पुरतं तरी निग्रहाने बाजूला ठेवून पुढच्या वाटचालीसाठी उठले.

संगमाच्या त्या बाजूला, ओढा ओलांडून गाव क्र. २. शाळेच्या इमारतीतच एका बाजूला पंचायत ऑफिस. गावात जर कुणाची ओळख नसेल तर सरळ शाळेत किंवा पंचायतीत घुसायचं. म्हणजे निदान गाव हिंडून दाखवायला कुणी स्थानिक सोबत मिळते. या पंचायतीत कसली तरी मीटिंग चालली होती. एकूणच पंचायत सदस्य थेट कुठल्यातरी ग्रामीण मराठी चित्रपटातून/ तमाशापटातून आणून बसवल्यासारखे. मी गावात कशासाठी आलेय (इतिहास संशोधक आहे - गावाचा इतिहास - जुन्या मूर्ती/ देवळं आहेत का?, इ. इ.) हे बहुदा सगळं डोक्यावरून गेलं असणार. कारण माझ्या प्रास्ताविकानंतर पाच मिनिटं गाढ शांतता पसरली होती. तेवढ्यात काहीतरी अर्ज द्यायला एक गावकरी शिक्षक आत आले. तेव्हा घाईघाईने सरपंचाने माझी व्यवस्था त्यांच्यावर सोपवली.
गावात/ गावाबाहेर पांढर वगैरे असल्याचं कधी त्यांच्या ऐकिवात नाही. पण गावात एक मारुतीचं प्राचीन देऊळ आहे, फक्त ते सध्याच सिमेंटमधे नव्याने बांधून काढलंय अशी 'उत्साहवर्धक' माहिती कळली. मारुतीच्या देवळाबाहेर २-३ वीरगळ, एक गणपती. म्हणजे गाव निदान यादवकालीन! गावात खरंचच कुठं पांढर असल्याचं जाणवलं नाही. फक्त मारुतीच्या देवळापाशी पुसट शंका यावी अशा खुणा दिसल्या. २-४ छोटी खापरंही मिळाली पण मध्ययुगीन.
गावाच्या समोर, नदीच्या पल्याडच्या काठाला आणखी एक गाव. तिथे पांढर आहे का? या प्रश्नावर गावकर्‍यांमधे दोन तट पडले. आहे - नाही वरून. निर्णय काही लागेना. शेवटी खुद्दच जाऊन पहावे म्हणून निघाले. गावापासून खाली सुमारे १ किमी वर एक बंधारा. बंधारा ओलांडून थोडं चढावर गाव. दुपारी १२॥ -१ ची वेळ. एकंदरीतच गावात शुकशुकाट होता. डावीकडे एक मोठी शाळा होती. आत गेलो. शिक्षकांच्या खोलीत. सगळेचजण उत्सुकतेने गोळा झाले. पण इथे स्थानिक शिक्षक कुणीच नव्हते. सगळेच परगावचे. मग एका गावकर्‍याला पकडून आणलं. त्याने सांगितले की इथे पांढर वगैरे काही नाही. (हे गाव काही दशकांपूर्वी जुन्या जागेतून २ किमी स्थलांतर करून आलंय, आणि त्या जुन्या गावात मोठी पांढर आहे. पण ही बातमी मला अजून २ आठवड्यांनी कळणार होती!) तेवढ्यात तिथल्या एका शिक्षकाने त्याच्या गावाला मोठी पांढर आहे अशी खबर दिली. ठीक आहे. माहिती टिपून घेतली. हेही नसे थोडके म्हणून परतीच्या मार्गाला लागले.
परत नदी ओलांडून गाव क्र. २ ला आले. इथून गाव क्र. ३ गाठायचंय. अंतर फार नाही. ७-८ किमी. पण जायला डांबरी रस्ता नाही. तालुक्याच्या गावातून वर्तुळाच्या त्रिज्येसारख्या फुटणार्‍या दोन शेजारशेजारच्या रस्त्यांवर गाव क्र. १ आणि गाव क्र. ३. त्यांना जोडणारी मधली पायवाट शेता-शिवारातून जाणारी. वळणा-वाकणाची. गाव क्र. २ सोडून जिल्ह्याकडे जाणार्‍या डांबरी सडकेला लागलो. थोड्या पुढे डावीकडे पायवाट लागली. बैलगाड्या/ ट्रॅक्टर जाऊन जाऊन त्यात खोल चाकोर्‍या पडलेल्या. एकूणच रस्ता खाचखळग्यांचा. वरून ऊन मी म्हणायला लागलं होतं. मला काही भूक लागली नव्हती पण माझा मदतनीस वाढत्या वयाचा पोरगा. तो काही बोलत नाही पण भूक लागल्याचं चेहर्‍यावर स्पष्ट दिसतं. त्याला चालताचालताच केळी खाऊ घातली. दोन्ही बाजूला उभी शेतं - माणसंच काय, काळं कुत्रं सुद्धा दिसत नव्हतं आसपास. रस्ता चुकलो तर नाही ना असाही संशय एकदा मनात डोकावून गेला. तब्बल दीड तास पायपीट केल्यावर समोर गाव दिसायला लागलं.

गावात दुपारचा शुकशुकाट. शाळाही बंद होती. थोडं पुढं गेल्यावर एक मारुतीचं देऊळ, त्याच्या बाहेर ठेवलेल्या काही यादवकालीन मूर्ती, वीरगळ दिसले. त्याचे फोटो काढले. आसपास नजर टाकल्यावर लक्षात आलं की गाव पांढरीवरच आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या घरांखालचा उंचवटा अगदी स्पष्ट दिसत होता. पण अजूनही गावकरी दृष्टीस पडत नव्हते. एकदोघी बायका दिसल्या. त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर त्या चक्क तोंड फिरवून घरात गेल्या आणि धाडकन दारं बंद केली. मग आजूबाजूला पडलेली ३-४ खापरं उचलली. (आणखी काही खापरं दिसायचा चान्सच नव्हता या सिमेंटच्या घरांभोवती). त्या पांढरीच्या उंचवट्याचा फोटो काढणार इतक्यात एक मध्यमवयीन बाई 'काय ग ए भवाने! कशाचा फोटु काढतीयेस?' म्हणून खेकसून अंगावरच आली. ती माझी कुठलीच गोष्ट/ स्पष्टीकरण ऐकायला तयार नव्हती. शेवटी तिचा नाद सोडून गावाच्या वेशीकडे निघाले. पंचायतीचं ऑफिसही बंद. त्याच्या समोर चारपाच गुंडांसारखी दिसणारी आडमाप उग्र माणसं बसली होती. चिक्कार प्यायलेली. तो भपकारा मला इतक्या लांबूनही जाणवत होता. प्रश्नोत्तरांचं सत्र सुरू झालं पण ते 'तुम्ही कोण? कुठल्या? काय काम?' इतक्यावरच आटपलं. त्यांनी सांगितलं की 'तालुक्याच्या गावाला पार्टीचे साहेब आल्याने सगळी पंचायत, शाळाशिक्षक ही मंडळी त्यांच्या बरोबर मीटिंगला गेलीयेत. सरपंचाच्या परवानगीशिवाय आम्ही गावाची काहीही माहिती देऊ शकत नाही. एवढंच काय, पुरुषमाणूस नसताना तुम्हाला गावात हिंडायची परवानगीही देऊ शकत नाही. तेव्हा तुम्ही आपलं जायचं बघा!' ('पुरुषमाणूस नसताना' हा विनोद मला आत्ता आठवून जाम हसू येतंय पण त्या क्षणी संताप संताप झालेला!). माझी तरीही थोडी वाद घालायची तयारी होती पण मदतनिसाने जवळजवळ हाताला खेचतच मला गावाबाहेर काढले. तो म्हणाला, 'ताई, हे गाव प्रसिद्धच आहे आडमुठेपणा आणि गुंडगिरीबद्दल! तू उगाचच त्यांना उचकवू नकोस. आत्ताच्या आत्ता चल इथून.' तो स्थानिक असल्याने त्याला माझ्यापेक्षा नक्कीच जास्त माहित! गुपचूप गावाबाहेर पडले.

शेजारीच ओढा ओलांडून गाव क्र. ४. इथे मी २-३ वर्षांपूर्वी एकदा येऊन गेलेय.. इथलीही लोकं अशीच आडमुठी आणि अज्जिबात मदत न करणारी. गेल्या वेळी मला आणि माझ्या मैत्रिणीला थोडी टिंगलटवाळीही सहन करायला लागली होती. पण पंचायतीच्या शिपायाने आणि एका म्हातारबुवांनी खूप मदत केलेली. या गावात पण पांढर वस्तीखालीच आहे. गाव साधारण १०-१२ व्या शतकातलं तर निश्चितच. माझ्या आधी १९६० च्या दशकात संशोधकांना इथे ४००० वर्षांपूर्वीची खापरं सापडलेली, पण आता त्याचा कुठे मागमूसही नाही. गावात गेले आणि पाहिलं तर काय! निर्मल ग्राम योजनेअंतर्गत सगळ्या रस्त्यांवर खडी-डांबर ओतून पक्के रस्ते केलेले. त्यामुळे उरलीसुरली पांढरही पूर्णपणे दबली गेलीये. जाऊन तिथल्या देवळाच्या पायर्‍यांवर बसले. देऊळ उत्तर मराठाकालीन पण आत विष्णुची १२ व्या शतकातली एक अतिशय सुरेख मूर्ती आहे. समोरच वीरगळ, इतर मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या. या सगळ्याचं फोटो डॉक्युमेंटेशन आधीच्या भेटीतच केलंय. पायर्‍यांवर बसून पाच मिनिटं दम खाल्ला, थोडं पाणी प्यायलं, आणि त्या पंचायतीच्या शिपायाला शोधायला निघाले. इथले लोकपण हो-नाही सांगायलाही तयार नाहीत. शेवटी बर्‍याच शोधाशोधीनंतर कळलं की तो शिपाई दोन दिवसांसाठी बाहेर गेलाय.
एवढं सगळं होईपर्यंत ४॥-५ वाजले होते. तेव्हा आता परतीची वाट धरणं गरजेचं होतं. आणि या गावात आणखी काहीही शोधाशोध करता येणार नाहीये हेही स्पष्टपणे कळलं होतं. मुकाट गावाबाहेर पडले. स्टॉपवर उभं राहिल्यावर कळलं की अजून तासभर तरी बस नाहीये. एवढ्यात आजूबाजूला निरुद्योगी रिकामटेकडी लोकं जमायला सुरवात झाली. आता कुठल्याच प्रश्नोत्तरांचा सामना करायची ताकद संपली होती. आणि इथे या चौकशीतून काही साध्यही होणार नव्हतं. शेवटी मी आणि माझा मदतनीस दोघंही चालतच तालुक्याच्या गावाच्या दिशेने निघालो. आम्ही इतकं ७-८ किमी चालणार नव्हतोच पण निदान लोकांची कटकट टळली! आसपासची जमीन सुपीक, हिरवी. उतरत्या उन्हात हिरव्या पोपटी छटा मस्त खुलून दिसत असणार. पण आज त्याचंही मला फारसं आकर्षण वाटत नव्हतं. २-३ किमी चालल्यानंतर मागनं एक टमटम आली. खचाखच भरलेली. आम्ही दोघंजण शिकली सवरलेली म्हणून त्यातच सरकून आम्हाला आतमधे जागा करून दिली. दहा मिनिटात तालुक्याच्या गावाला परत!

घरी आल्यावर नेहेमीची चक्रं सुरू झाली - आवरणं, कपडे धुणं, वृत्तांत लिहिणं इ. इ.
आज पहिलं गाव सोडलं तर ठोस असं काहीच हातात आलं नाही. नुसतीच शारिरीक आणि मानसिक दमणूक झाली असं खूप तीव्रतेने वाटून गेलं, पण असतात असेही काही दिवस अशी स्वतःचीच समजूत घातली आणि उद्या काय करायचं त्याची आखणी करायला सुरूवात केली!

आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: ३

Submitted by वरदा on 7 December, 2009 - 22:39

आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी (सचित्र) http://www.maayboli.com/node/11999
आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: २ http://www.maayboli.com/node/12433

दिवस - आठवणीतला
गेल्या ३-४ दिवसांपासून कुणीच मदतनीस नव्हता. त्यात दोन दिवस मीही घसा दुखणं, कणकण यांनी बेजार झाले होते (माझ्या तब्बेतीचे हे हातखंडा खेळ!). बरोबर कुणी नसलं की कामाचा वेग मंदावतो. एकटीने काम करणं थोडंसं कंटाळवाणंही होतं. शिवाय गावकर्‍यांच्या त्याचत्याच प्रश्नांना परतपरत उत्तरं द्यायची आणि एकीकडे कामही करायचं याचा ताण येतो. शारिरीक आणि मानसिक, दोन्हीही. त्यातही ठराविक काम ठराविक दिवसांत झालंच पाहिजे अशी माझी मीच आखून घेतलेली डेडलाईन असते. त्यामुळे काल रात्री नाही म्हटलं तरी थोडं डिप्रेस्ड वाटत होतं. फोनवरून नवर्‍यापाशी थोडी भुणभुणही केली होती की तू मदतीला ये म्हणून.. त्याला अशी अचानक रजा घेऊन, ऑफिसचं काम, त्याचं फील्डवर्क बाजूला ठेवून इतक्या दूर येणं शक्य नाही हे माहित असतानाही. जेव्हा अगदी कुठल्या महत्त्वाच्या ठिकाणी मी चाचणी उत्खनन करणार असेन किंवा पांढरीच्या एखाद्या उभ्या कडेची तासणी (section scraping) करणार असेन तेव्हा तो मला मदत करायला येणार आहे असं आमचं ठरलंच आहे. (skilled labour, परत फुकट! नाहीतर याच क्षेत्रातला नवरा केल्याचा काय उपयोग? :P) आधी नवरा जरा समजुतीच्या स्वरात, आंजारून गोंजारून बोलत होता पण माझी कटकट थांबत नाहीये हे पाहून "फक्त हिंडून सर्वेक्षण करणं ही साधी गोष्टही जमणार नसेल तर सगळं सोडून घरी बस" असा उपदेश त्याने केला. "शेकडो जण असा एकट्याने सर्व्हे करतात तेव्हा उगीचच सबबी सांगू नकोस" या त्याच्या म्हणण्यात तथ्य आहे हे माहित असल्याने गप्प बसले. पण तरीही मनाची उभारी कुठेतरी गेलीच होती.

या पार्श्वभूमीवर सकाळी ८ ची बस पकडली. गाव तालुक्याच्या ठिकाणापासून २०-२५ किमी वर. एकदम आतल्या बाजूला. दिवसातून दोनदाच बस जाते. गाडीत फारशी गर्दी नव्हती. माझ्या अवताराकडे आणि जडच्याजड पाठपिशवीकडे बघून कंडक्टरने 'काय मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह का?' असा प्रश्न टाकलाच! हे छोट्या गावांना जाणार्‍या एस्ट्यांचे ड्रायव्हर आणि कंडक्टर नेहेमी त्याच त्याच गाड्यांवर असल्याने त्यांना रोजची लोकं पाठ असतात. आणि नवा माणूस काय कामासाठी चालला असेल याचाही ढोबळ अंदाज असतो. माझं 'इतिहाससंशोधक आहे' हे उत्तर ऐकून अंदाज चुकल्याचं आश्चर्य त्याचा चेहेर्‍यावर उमटलं. पण मी त्या गावाचा इतिहास शोधायला चाललेय म्हणून आनंद पण प्रकट केला. "वा! गावात एक हेमाडपंती देऊळ आहे बरं का! नक्की बघा." असंही तिकिट देता देता सांगायला विसरला नाही. आमच्या या संवादाकडे माझ्या शेजारची म्हातारी मोठ्या कुतुहलाने पहात होती. तिने पण "पोरी, तू आपली आधी साळंत जा. तुला लागंल ती माहिती आन मदत भेटंल थितं!" असा सल्ला दिला.
जवळजवळ पाऊण तासाने गावात पोचले. ८००च्या आसपास लोकसंख्या असलेलं हे गाव नदीकाठापासून १००-२०० फूट आत. चढावर. पुराचं पाणी येऊ नये म्हणून बहुदा. १९६० च्या सुमारास एक इतिहाससंशोधक/ पुरातत्त्वज्ञ या गावाला भेट देऊन गेलेत. त्यांनी इथल्या देवळांची, मूर्तींची तपशीलवार खानेसुमारी केलीये. पण गावात पांढर आहे का? कुठल्या कालखंडातला पुरावा इथे मिळतो? या गोष्टींचा अभ्यास त्यांनी केला नाही. या गावाचा उल्लेखही पलिकडच्या गावातल्या एका शिलालेखात मिळतो. तेव्हा याच्या पुरातत्त्वीय आणि शिलालेखीय पुराव्याची सांगड घालायला मी इथे पोचलेय.
गावात उतरले. समोरच शाळा दिसली. ७वी पर्यंत. आसपासच्या गावांतनंही इथे पोरं शिकायला येतात. शाळा सकाळची. मी आत शिरले तेव्हा पाणी प्यायची सुट्टी चालू होती. पोरांचे खेळ तुफान रंगले होते. मला पाहून एकदम सगळं थांबलं. मी शिक्षकांची खोली कुठंय ते विचारलं. पोरी लाजून पळाल्या तर पोरं आ वासून बघत होती. त्यातल्याच एकाने जरा धिटाईने लांबूनच खोली दाखवली. मी तिथे गेले. आत ३-४ शिक्षक बसले होते. त्यांच्याशी नमस्कार-चमत्कार झाले. सगळेच जण बाहेरगावचे, तरुण. ते म्हणाले "इथले मुख्याध्यापक गेली बावीस वर्षं याच शाळेत आहेत, शिवाय शेजारच्याच गावचे. तेव्हा ते येईपर्यंत थांबा थोडंसं. ते तुमच्यासंगत बरोब्बर माणूस लावून देतील बघा."
चहा पीत पीत शिक्षकांशी गप्पा झाल्या. त्यातल्या काही जणांना M.Phil करायचं होतं. मग मी M.Phil कुठनं केलं, वेगवेगळ्या विद्यापीठांचे वेगवेगळे नियम, अर्हतेच्या अटी, फिया, गाईड, इतर खर्चाची कलमं यावर एक परिसंवादच झाला म्हणा ना! तेवढ्यात मुख्याध्यापक आले. ५०-५५ चे. बुटके, सडसडीत, काळसर वर्णाचे. चेहेर्‍यावरून तरी बरे वाटले. मी काही बोलायच्या आतच इतरांनी उत्साहाने माझी ओळख करून दिली. मुख्याध्यापकांनीही अगदी अगत्यानं मदत करायचं आश्वासन दिलं. म्हणले "७वीतल्या ३-४ पोरी लावून देतो तुमच्यासंगत, त्या दाखवतील तुम्हाला गाव." आणि नको नको म्हणत असतानाही परत एकदा चहा मागवला.

मी मुख्याध्यापकांच्या ऑफिसमधे एका कोपर्‍यात बसले होते. पाहिलं तर सगळे शिक्षक त्यांच्याभोवती कोंडाळं करून, मधूनच माझ्याकडे तिरके कटाक्ष टाकत, त्यांच्याशी कुजबुजत्या सुरात काहीतरी खलबत करू लागले. माझ्याबद्द्ल बोलत होते का? काही कळेना. २-४ मिनिटं अशी बोलणी झाल्यावर एकदम पांगापांग झाली आणि मुख्याध्यापकांनी फायलीत डोकं खुपसलं. थोड्या वेळाने मी त्यांना मुली देताय ना? अशी आठवण करून दिली. ते आपले हो हो म्हणून दुसरीच कामं करत होते. बरं, सरळ नाहीही म्हणत नव्हते. मला काही कळेना, आता नक्की काय करायचं? तेवढ्यात एक शिक्षक आत आले आणि त्यांना म्हणाले, "झालं सगळं! आता विचारा त्यांना". मी आपली बावळटसारखी पहात होते दोघांकडे. मग मुख्याध्यापक शांतपणे बोलते झाले, "आज सावित्रीबाई फुले जयंती आहे. आम्ही दरवर्षी समारंभ करतो. तुम्ही आलाच आहात तर तेवढ्या अध्यक्ष व्हा. नाही म्हणू नका." मी गारच पडले! भाषणं, वक्तृत्त्व या गोष्टींपासून मी चार पावलं लांबच रहाणं पसंत करते. शिवाय वयोवृद्ध व्हायला अजून अनेsक वर्षं बाकी असल्यानं (आणि ख्यातनाम व्हायचा कधीही संभव नसल्यानं) अध्यक्षपद घ्यायचं म्हणजे काय याचीही पटकन कल्पना करवेना. बरं, मी माझ्या इंटरनॅशनल वेषात. धुवून धुवून काळ्याची करडी झालेली सलवार, त्यावर तेवढाच जुनाट शेवाळी कुर्ता आणि फ्लुरोसंट पोपटी रंगाची ओढणी. पायात चॉकलेटी बूट आणि गळ्यात केशरी स्कार्फ. अगदी पंचरंगी पोपट! हे सगळं किती विनोदी आणि एक्झॉटिक दिसत असेल असा एक अत्यंत अस्थानी (आणि खास बायकी) विचारही मनाला चाटून गेला. Proud
मला अगदी व्यवस्थित कोंडीत पकडलं होतं त्या सरांनी. मी अध्यक्षपद स्वीकारल्याशिवाय मला मदत मिळणार नाही हे उघडच होतं. शेवटी हो म्हणायलाच लागलं. "दरवर्षी प्रत्येक कार्यक्रमासाठी नवा अध्यक्ष कुठून आणणार? तुम्ही आयत्या आल्याच आहात तर... " असं मला स्वच्छपणे सांगण्यातही आलं! मला आपलं पोपटाच्या डोळ्याप्रमाणे माझं काम खुणावत होतं. तेव्हा "जे काय भाषण-बिषण करायचं असेल ते तुम्ही थोडक्यात आटपा, माझ्याकडे फारसा वेळ नाही." असं काहीसं अनिच्छेनंच मी त्यांना सांगितलं आणि त्या समारंभाकडं गेलो. शाळेच्या एका व्हरांड्यात टेबल, ३-४ खुर्च्या, एकीवर सावित्रीबाईंचा फोटो, आणी समोर पटांगणात बसलेली मुलंमुली. सुमारे १००. गुणिले दोन नजरा माझ्यावर खिळलेल्या. माझ्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झालं, सावित्रीबाईंच्या फोटोला हार घालण्यात आला. मुख्याध्यापकांनी थोडक्यात माझी ओळख करून दिली आणि म्हणले, "आता माननीय अध्यक्षा त्यांचं मनोगत ऐकवतील". इतका वेळ मी हसू दाबत तिथे बसले होते. 'मी - अध्यक्षा' या विनोदावर आणि घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होतील या कल्पनेने मला वारंवार हसण्याची उबळ येत होती. त्यावर एकदम बर्फाच्या पाण्याचा शिपकारा बसावा तसं झालं. मनोगत? माझं? च्याXX हे काय आणखी आता? असा विचार करतच मी उभी राहिले.

आणि खाडकन सगळ्या परिस्थितीचं भान आलं. सावित्रीबाईंच्या पुण्यतिथीसाठी एका आडगावात का होईना, लायकी नसतानाही मला अध्यक्षा केलंय; आणि याचं मला काहीच मोल वाटत नाहीये? इतकी करंटी मी कशी झाले?
काय बोलावं याची मनात जुळवाजुळव करू लागले आणि विचारांची साखळी मनात तयार होत असतानाच इकडे माझ्याच नकळत बोलायला लागले. "मी काही अशी कुणी महान नाहीये की आज इथे या खुर्चीत बसायचा मान मला मिळावा. पण आज तुम्ही ज्या कुतुहलाने माझ्याकडे पहाताय, मी अशी गावं हिंडत हिंडत संशोधन करत तुमच्याकडे आलेय त्याचं एकमेव कारण म्हणजे सावित्रीबाई! त्या होत्या म्हणून मी आज ही अशी आत्मविश्वासाने तुमच्यापुढं उभी आहे." अचानक गळा भरून आला, छातीत दुखल्यासारखं व्हायला लागलं. पुढे काही बोलवेचना. मग स्वतःला थोडं सावरलं. पुढेही आणखी काहीतरी बोलले, पण ते विचार करून बोलल्यामुळे यांत्रिक होतं आणी कदाचित म्हणूनच आता आठवतसुद्धा नाहीये. पोरांनी आदेशानुसार टाळ्या-बिळ्या वाजवल्या. पण त्या क्षणी मी सगळ्यापासून दूर गेले होते. मनात फक्त एकच वाक्य घुमत होतं "त्या होत्या म्हणून आज मी इथे आहे".
शहरात वाढलेली, क्वचितप्रसंगी झगडा करून पण अट्टाहासाने हवं तेच शिक्षण घेतलेली, हवा तोच पेशा आणि हवा तो आणि हवा तेव्हाच आयुष्याचा जोडीदार निवडलेली मी मुलगी - हे सगळं जगायचं स्वातंत्र्य कुठेतरी गृहीतच धरत गेलेले! इतर बायका-मुलींना नेहेमीच इतकं स्वातंत्र्य मिळत नाही हे आजूबाजूला दिसत असतानाही त्याची आतपर्यंत जाणीव गेले कित्येक वर्षांत झाली नाहीये. शिवाय माझ्या पेशातही स्त्री-पुरुष भेद सुदैवाने आत्तापर्यंत मला कुणी जाणवू दिला नाहीये. स्वतःकडे आणि इतरांकडेही एक 'व्यक्ती' म्हणून बघायची सवय अंगात मुरलीये. इतकी की बाहेरच्या जगात वावरताना स्वतःचं बाईपण मधनंमधनं विसरायलाच होतं.
पण आज हे सगळं सगळं तळापासून ढवळून निघालं.
मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे पण तेवढीच एक बाई आहे - आणि माझा हा 'व्यक्ती'पणा कडचा प्रवास इतका सुकर झाला त्यात माझ्यावर सावित्रीबाई आणि त्यांच्या उत्तरसूरींचं फार फार मोठं ऋण आहे हे कधी नव्हे ते प्रकर्षाने जाणवलं. आतमधे कसलीतरी लखलखीत जाणीव झाली!

परत एकदा शिक्षकांचा गराडा. त्यांचं काम झाल्याने सगळेच खुशीत होते. मग त्यातल्यात्यात चुणचुणीत अशा ५ पोरींना बोलावून माझ्याबरोबर गाव हिंडायला सांगितलं. पोरी तशा लाजर्‍याबुजर्‍याच होत्या, पण शाळेतून बाहेर पडल्यावर कळ्या खुलल्या. ताई ताई म्हणून हात धरून गप्पा मारायला सुरवात केली.
इथेही गावाखाली पांढर दबली गेलीये. त्यामुळे पांढरीची माती वापरून बांधलेल्या पण आता पडलेल्या जुन्या दगडी इमारतींच्या बखळींमधे जाऊन खापरं शोधली. मध्ययुगीन खापरंच फक्त मिळाली. जरी १२-१३ व्या शतकातलं देऊळ आणि मूर्ती तिथे होतं तरी आणखी काहीच महत्त्वाचं मिळालं नाही. याच्याही आधीचा पुरावा नक्कीच जमिनीच्या पोटात असणार पण माझ्या नशिबात नव्हता. एकीकडे पोरींना किती प्रश्न विचारू आणि किती नको असं झालं होतं! मी या खापरांचं काय करते, इतिहास कसा लिहितात, तो शाळेच्या पुस्तकात कसा येतो इथपासून सुरू करून ते मी घरी काय घालते साडी की ड्रेस, काय खाते, कायकाय स्वैपाक येतो, 'वशाट' खाते का, नवर्‍याशी भांडते का, नवे सिनेमे पाहिले का, शाहरुख आवडतो का असे सगळे प्रश्न विचारून झाले. त्यांच्या खळखळून हसण्याला आणि एकमेकींना चिडवण्याला तर काही सुमारच नव्हता!
पंचकन्यका
IMG_0475.JPG

सगळं गाव फिरून झालं. आता १० मिनिटांत एस्टी येणार होती. पोरींचा निरोप घ्यायला लागले. तेव्हा माझा हात धरून म्हणाल्या - " ताई, आम्हीपण तुमच्यासारख्या शिकणार, आणि संसार केला तरी स्वतःच्या पायावर उभं रहाणार.' आत्ता लिहिताना मलाही ही प्रतिक्रिया साचेबंद वाटतेय, पण हे सांगताना त्यांच्या डोळ्यातले आशेचे भाव मात्र अगदी खरेखरे होते!

बस आली! सगळ्यांनी मला टाटा करून हाताला हात लावून निरोप दिला. मन इतकं भरलं होतं की पुढच्या गावाला जायचा बेत रद्द करून मी घरी परतले.

आज या गोष्टीला दोन वर्षं उलटून गेलीत. परत कधी त्या गावात जायचा योग आला नाही. माहीत नाही या मुलींची आयुष्यं काय वळणं घेणारेत! काही काळाने मला विसरूनही जातील. पण माझ्या मनाच्या/ आठवणीच्या खास कप्प्यात हा दिवस कायमचाच जाऊन बसलाय. आत्तापर्यंत बरेच जणांना मिळतात तशी मलाही काही बक्षिसं मिळालीयेत, थोडंफार शैक्षणिक यश मिळालंय, पण त्या दिवशी अनाहूतपणे लाभलेलं सावित्रीबाईंच्या नावाचं ते अध्यक्षपद माझ्यासाठी त्या सगळ्यासगळ्यापेक्षा कितीतरी अप्रुपाचं आहे. खरंचच!!!

आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: ४

 वर्ष ३रे: दिवस २६वा

या वर्षीच्या फील्डवर्कचा हा शेवटचा दिवस. इतर आर्किऑलॉजिस्ट्सप्रमाणे मीही वर्षातून काही ठराविक काळ या भटकंतीला (किंवा उत्खननाला) देऊ शकते. उरलेले महिने या काळात शोधलेल्या अवशेषांचं अभ्यास आणि विश्लेषण करण्यात जातात. रोजच्या संसारातून, एरवीच्या अभ्यासातून मला काही मोजके आठवडेच या कामाला देता येतात. सुदूर पूर्व भारतातून वर्षात एकदाच महाराष्ट्रात येणं शक्य असतं. त्या महिन्यांमधेच फील्डवर्क, ग्रंथालयातलं संदर्भवाचन, माहेरपण-नातेवाईक, मित्रमैत्रिणी, इतर कामं असा भरगच्च कार्यक्रम कट्टाकट्टी वेळेत बसवलेला असतो. त्यामुळे किमान २ महिने आधी फील्डवर्कची पूर्ण आखणी झालेली असते. आधी जिथे जाणार तिथे ओळख काढून विश्वासू माणसांशी किंवा इतिहासाचे कुणी प्राध्यापक असले तर त्यांच्याशी संपर्क करणे. खात्रीच्या लॉजमधे किंवा भाड्याने खोली घेऊन रहायची सुरक्षित सोय करणे. कुठल्या दिवशी किती आणि कोणती गावं करायची - त्यातली एस्टीच्या टप्प्यात कुठली - कुठली पायी करायची - मदतनीस कोण कोण मिळणार आहे - त्यांच्याकडे मोटरसायकल असली तर उत्तमच, निदान काही गावं मोटरसायकलवर हिंडून पटापटा संपवता येतील - यात कुठेही न बसणारी, दूरची, जिथे एस्टी जात नाही अश्या गावांची यादी करून तिथे जाण्यासाठी निदान २-३ दिवस भाड्याने गाडी ठरवणे - याला किती तरतूद करावी लागेल याचा अंदाज घेणे. म्हणजे जे सगळं कलकत्त्यात बसूनच करता येतं, ते फोनाफोनी करून ठरवून टाकणं. पहिल्या वेळी हे सगळं आखणी करून नियोजन करायचं प्रचंड दडपण आलं होतं ते आठवलं की गंमत वाटते. आता अंगवळणी पडलंय.

आढावा सर्वेक्षणाचा टप्पा धरून माझ्या कामाचं हे तिसरं वर्ष. या तीन वर्षांत सव्वाशेच्या आसपास गावं धुंडाळून झालीत. गावांमधली आणि गावांबाहेरची धरून जवळजवळ १३५ पुरातत्त्वीय स्थळांची नोंदणी करून झाली आहेत. बहुतेक गावात अशी नोंद करणारी, अभ्यास करणारी मी पहिलीच आर्किऑलॉजिस्ट आहे. मी काम करते त्या प्रदेशात पुरातत्त्वीय सर्वेक्षण जवळजवळ न झाल्यातच जमा आहे, त्यामुळे माझ्या कामाशी संलग्न नसले तरी जे काही आतापर्यंत न नोंदले गेलेले ऐतिहासिक पुरावे असतील (अगदी मध्ययुगापर्यंतच्या वस्त्यांचे अवशेष, मूर्ती, देवळं, वीरगळ, तटबंद्या, गढ्या, असं सगळं) त्यांची तपशीलवार नोदणी करते. कारण ज्या वेगाने हे पुरावे नष्ट होत आहेत ते पहाता आणखी ५ वर्षांनी तरी यातलं किती शिल्लक राहील माहित नाही. त्यांची निदान प्राथमिक नोंदणी असावी असं मला वाटतं.

या वर्षी ज्या गावात मुक्काम आहे ते तालुक्याचंही नाही आणि जिल्ह्याचंही नाही. पण बर्‍यापैकी मोठं आहे. माझ्या कामासाठी मध्यवर्ती आहे. एक चटपटीत विद्यार्थी मदतनीसही मिळालाय. त्याला जेव्हा आणि जसा वेळ असेल तसा तो माझ्याबरोबर येतो. त्याच्या आणि गावातल्या काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीने जिथे जाणार तिथे सहसा आधी ओळख काढून ठेवते. किंवा ज्या गावात जाईन तिथूनच शेजारच्या गावांमधे कुणाला संपर्क करायचा ते विचारून घेते. शक्य असलं तर तिथूनच फोन लावून त्या गावकर्‍याच्या मध्यस्थीने बोलून घेते. समजा यातलं काहीही झालेलं नसलं तरी आता सरावाने गावकर्‍यांकडून कशी मदत मिळवायची हे व्यवस्थित जमतं.
आज मला ज्या गावांना जायचंय तिथे थेट एस्टी जात नाही. तेव्हा मदतनीस मोटरसायकल घेऊन आला होता. पेट्रोलचे पैसे अर्थातच मी देते. शिवाय मदतनीसाला रोजचा मेहेनताना असतोच. विद्यार्थ्यांना पॉकेटमनी मिळतो आणि मला विश्वासू साथीदाराची सोबत मिळते.

सकाळी ८-८|| ल भरपेट नाश्ता करून निघालो. मी फील्डवर दुपारची जेवत नाहीच. एकतर वेळ जातो आणि जेवल्यावर जी सुस्ती येते त्याने दिवसाच्या उत्तरार्धातलं काम नीट होत नाही. मदतनिसाला हवा असल्यास तो डबा आणतो. किंवा माझ्याकडे 'असूदेत' म्हणून फळं, केक, बिस्किटं असा खाऊ असतो त्यावर चालवून घेतो.

गाव क्र. १ मुक्कामाच्या ठिकाणापासून २५-३० किमी.वर. साधारण १०-१२ किमी नंतर डांबरी रस्ता सोडून आतल्या कच्च्या रस्त्याला लागलो. दोन्ही बाजूंना उभी शेतं. बहुतेक ऊस, थोडी ज्वारी आणि तुरळक गहू. रात्री/पहाटे जेव्हा वीज येईल तेव्हा शेताला पाणी दिल्याने सकाळी थंडगार बोचरे वारे काकडायला लावत होते. पण तासादोनतासात उन्हाचा चटका जाणवायला लागतो त्यामुळे फालतू ओझं वाढवणार्‍या स्वेटरच्या फंदात आम्ही दोघंही पडत नाही. कान-नाक व्यवस्थित झाकून घेतले की झालं. वाटेत दुधाच्या जिपा, डांबरी रस्त्यावरच्या बसथांब्याकडे जाणारे काही लोक अशी तुरळकच वाहतूक होती. येणारेजाणारे कुतुहलाने आमच्याकडे पहात होते. ओढणीसकट सलवारकुर्ता, खाली भरभक्कम ट्रेकिंग शूज, पाठपिशवी घेऊन मी बाहेरची कुणीतरी गावात चाललेय हे स्पष्ट होतं.

या गावाला मी जातेय कारण इथून ६ किमी अंतरावर असलेल्या गावात एक १३व्या शतकातला शिलालेख आहे आणि त्यात या गावातली जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. बहुतेक महाराष्ट्रभर १०-१२व्या शतकात मिळणार्‍या शिलालेख-ताम्रपटांतील गावांची नावं एखादा चुकार अपवाद सोडता आजही फारशी बदलली नाहीयेत त्यामुळे अशी गावं शोधणं सोपं जातं. गाव किमान हजारभर वर्षं तरी जुनं आहे हे निश्चित. पण आता या भूप्रदेशात इतकी भटकंती करून, अनेको गावं पाहून झालेल्या मला आतनं सारखं वाटतंय की या गावात आणखी काहीतरी जुने अवशेष मिळायला हवेत. शिवाय तिथपासून ५ किमी अंतरावर एक मोठ्ठी ताम्रपाषाणयुगीन वसाहत मिळाली आहे.

गावात पोचायला नऊ-सव्वानऊ झाले. नदीच्या काठावर तीसेक फूट उंच कपारीवर हे गाव वसलंय. एकदम छोटं. जेमतेम २०० उंबर्‍यांचं. कितीही मोठा पूर आला तरी गावाला ढिम्म काही होत नाही. १९६०च्या दशकात इथे एक अभ्यासक येऊन गेले होते. इथल्या मंदिरांची आणि मूर्तींची खानेसुमारी त्यांनी केली होती. पण पांढरीविषयी काहीच संशोधन, नोंदणी केली नव्हती. त्यांच्या नोंदीप्रमाणे गावाला ५ फूट रुंद तटबंदी आणि घडीव वेस होती. आता त्यातले फक्त काही दगड शिल्लक आहेत.

गावात सकाळच्या कोवळ्या उन्हात गल्लीबोळांना नुकतीच जाग येत होती. कपारीवर नदीला पाठमोरं गाव. गावात शिरताना डावीकडे काही अंतर बाहेर मराठाकाळातली एक समाधी अर्धवट ढासळलेल्या, रान माजलेल्या अवस्थेत पडली होती. थोडीफार सिमेन्टची पक्की घरं, थोडी विटा-मातीची. पांढरीच्या टेकाडावर गाव वसलंय हे नीटच दिसत होतं. विशेषतः नदीकडच्या बाजूला चांगलाच उंचवटा दिसत होता.
बाहेर ४-५ तरुण मुलं कोंडाळं करून बोलत उभी होती. मदतनिसाच्याच वयाची. त्यांच्याशी ओळख काढून मदतनिसाने आमचं काम सांगितलं. तीही लगेच गाव दाखवायला तयार झाली. हे सगळं लांबून गावातून काही जण बघत होते. ते पुढे सरसावले. बहुतेक सगळे मध्यमवयीन पुरुष. अशी अनोळखी शहरी पाहुणी बघितली की सहसा बायका पुढ्यात येतच नाहीत. अगदी अपवादात्मक चारपाच गावांमधे मला बायकांनी पुढे होऊन मदत केली आहे. नाहीतर बोलणंचालणं गावातल्या पुरुषांशीच. त्यातल्यात्यात प्रौढ, प्रतिष्ठित किंवा जाणत्यांशी. बायका घराच्या दारातून कुतुहलाने बघत असतात.खरंतर त्यांच्याशी गप्पा मारायला मला आवडतात. एरवी न कळणारी अनेक माहिती, आख्यायिका, समज, श्रद्धा अशा खास बायकांच्या विश्वातल्या गोष्टी कळतात. आधीच आपल्याकडे कागदपत्र सोडून मौखिक परंपरेला/ इतिहासाला फार क्वचित विचारलं जातं. त्यातही जातीपातीनुसार फरक पडतो. ब्राह्मण, मराठा, धनगर, इतरेजन सगळ्यांच्या गोष्टींमधे फरक असतो. अनेक ठिकाणी ब्राह्मण-मराठ्यांना शिवकाळात किंवा नंतर वतनं/ जोसपण/ कुलकर्णीपण मिळालंय. मग त्यांनी सांगितलेला मौखिक इतिहास हा त्यात्या कुळाच्या त्या गावातल्या प्रवेशानंतरच्या घडामोडी सांगणारा असतो.

तर आम्हाला मदत करायला सरसावलेल्या लोकांनी नेहेमीप्रमाणे सखोल चौकशी करून आमचा ताबा घेतला. या पोलिसी खाक्याच्या इत्थंभूत माहिती काढून घेणार्‍या चौकशीची आता सवय झाली आहे. त्यातले एकदोघे जरा शिकलेसवरलेले वाटत होते. थोडे वयस्कर होते. एक जेमतेम शाळेचं तोंड पाहिलं असेल नसेल असे पैलवानबाप्पू होते. आकडेबाज मिश्या, कानाची भजी झालेली, घोगरा, धमकीच्याच सुरात बाहेर निघणारा आवाज असा अगदी द.मां.च्या कथेतल्या पात्रासारखा थाट होता. पण एकुणात माझ्या कामाचा उद्देश त्यांच्या लक्षात आला होता. गाव धुंडाळायला निघालो. वेशीच्या आत शिरल्याशिरल्या एक यादवकालीन 'हेमाडपंती' मंदिर आहे असा पूर्वीच्या नोंदीत उल्लेख आहे. आता फक्त त्याचा चौथरा, चंद्रशिला आणि गाभार्‍याचा उंबरा एवढंच जाग्यावर राहिलंय. दगड सगळे घरांच्या बांधकामाला गेले असावेत. एरवी प्रत्येक गावात आढळणारे वीरगळ मात्र इथे अजिबात नाहीत. हे पाहिल्यावर एक आधी न लक्षात आलेली बाब एकदम लख्ख जाणवली. या गावात शेकडा नव्व्याण्णव कुटुंबं एका विशिष्ट उपजातीची आहेत. या उपजातीचं संख्याबाहुल्य असलेली आणखी तीन गावं आजपर्यंत पाहिलीत. आणि एकाही गावात वीरगळ नाही आणि पूर्वीही कधी नव्हता याबद्दल गावकरी ठाम होते. माझ्या अभ्यासाचा विषय हा नाही खरा पण डोक्यात एक नोंद झालीये. परत कधीतरी कुठेतरी आयुष्यात या धाग्यांशी-अर्ध्यामुर्ध्या नोंदींशी भेट होईलच.

जरी माझं खरं उद्दिष्ट पांढरीचा तपास हे असलं तरी मी चौकशीची सुरुवात सगळ्यात ठळकपणे उठून दिसणार्‍या पुरावशेषांपासून करते. म्हणजे देवळं, मूर्ती, वीरगळ, गढ्या, हुडे, इ. मग हळूहळू गाडी खापरं, पांढरी अशा रुळांवर न्यायची.
मघाशी मागच्या बाजूला जो पांढरीचा उंचवटा दिसला होता तिकडे गेलो. तिथे पांढरीच्या सगळ्यात उंच भागावर गाव-आईचं ठाण. काही अनघड दगड आणि एक नैसर्गिक त्रिकोणाकृती शिळा त्यांच्या मध्यभागी. सगळ्या दगडांना शेंदूर लावलाय. हे गावातलं सगळ्यात पावरबाज दैवत. आईचा कौल घेतल्याशिवाय कुठलंही काम होत नाही.
इतर ठिकाणी पांढर घरांखाली दबली गेली आहे, पण इथे ठाणाच्या आसपास ना शेतासाठी-घरासाठी माती काढून नेलीये ना तिथे कुठलं बांधकाम आहे. हा पुरावशेष, खापरं शोधण्यासाठी एकदम आदर्श भाग दिसला. मी ही अशी तुटकीफुटकी खापरं का उचलतेय याचं त्यांना कळेल असं स्पष्टीकरण दिलं. त्यावरून काळ कसा कळतो ते आजचे माठ, मला मिळालेली वेगवेगळी खापरं, या सगळ्यांचा वेगवेगळा रंग, पोत, आकार, असलीच तर नक्षी याची तुलना करून थोडक्यात समजावून सांगितलं. मग उत्साहाने ते सगळेचजण मला मदत करायला लागले. प्रत्येक गावात याच गोष्टीची थोड्याफार फरकाने पुनरावृत्ती होते.

एकुणातच ठाणाच्या आसपास बारकाईने पहाताना लक्षात आलं की मध्ययुगीन खापरं तर आहेतच पण सातवाहनकालीन खापरांचाही अक्षरशः खच पडलाय. २-३ सातवाहनकालीन शंखांच्या बांगड्यांचे तुकडे, गारगोटीच्या छिलक्यांपासून तयार केलेली धारदार सूक्ष्मास्त्रं आणि ती तयार करताना काढून टाकलेले बारकेबारके छिलके असंही कायकाय मिळतंय या पांढरीतून. एका ठिकाणी एका उथळ खड्ड्यात एक कुत्र्याचं बारकुसं पिल्लू मरून पडलं होतं. बहुदा गारठ्याने. त्याच्या शेजारी मला चारपाच खापरं पडलेली दिसली. लांबून पाहूनच जी शंका आली होती ती जवळ जाताच खरी ठरली. नक्षी नसलेली पण नि:संशय ताम्रपाषाणयुगीन खापरं. आनंदाने जीव पिसासारखा हलका हलका झाला. थोडं पुढे गेल्यावर आणखी असेच काही तुकडे मिळाले. गावची वसाहत किमान तीन ते साडेतीन हजार वर्षं जुनी आहे हे नक्की झालं.

पूर्ण गावाला चक्कर मारून नीट सगळं शोधायला, पांढरीची तांत्रिक मोजमापं घेऊन त्याच्या नोंदी घ्यायला आणखी एक तासभर लागला. पलिकडची मध्ययुगीन समाधीही बघून, नोंदवून झाली. सगळ्या अवशेषांचे, पांढरीचे, गावाचे, गावाभोवतीच्या परिसराचे, कपारी-नदीकाठाचे व्यवस्थित फोटो काढून झाले. आढावा सर्वेक्षणाच्या अनुभवांवर आधारित मी प्रत्येक पुरातत्वीय स्थळामधे कुठली आणि कसली माहिती (अवशेष, तांत्रिक नोंदी, पर्यावरण, भूगोल, अक्षांश-रेखांश, पाण्याचे स्त्रोत, जमिनीचा प्रकार आणि कस, गावची मौखिक माहिती, कच्चा नकाशा, इ. इ.) टिपून घ्यायची याचे रकाने करून एक माहितीतक्ता तयार करते. शक्यतोवर गावातल्या गावात बसूनच. जास्तीची माहिती, निरिक्षणं हा अहवाल रात्री तपशीलात लिहायचा. तो तक्ता भरून झाला. गावातल्या एकमेव दुमजली घरात वरती छतावर जाऊन गाव आणि परिसराचं विहंगमावलोकन करून काही टिपणं केली. यानंतर मला गावाबाहेर वेशीसमोर एका ठिकाणी घेऊन गेले. तिथे एक शेंदूर फासलेला दगड होता. हा गावचा म्हसोबा. म्हसोबाच्या पलिकडे थोडी दलदल आणि झुडपांचं रान माजलं होतं. पैलवानबापूंनी तिथे पूर्वी एक तळं होतं असं सांगितलं. ते तळं कुणाच्या पाहण्यात नाही पण तिथे ते होतं ही मौखिक परंपरेने आलेली माहिती सगळेच गावकरी सांगतात. तेवढ्याच भागात दलदल आणि तिथली झुडपं जास्त हिरवीकच्च होती हे मात्र खरं. १९७२ च्या दुष्काळात इथे रस्त्याचं काम चालू असताना जमिनीत पुरलेलं सोन्याचे जिन्नस असलेलं एक मडकं सापडलं होतं असंही काही वयस्क लोकांकडून कळलं. त्याचं पुढे काय झालं ते सोयीस्कररीत्या कुणालाच आठवत नव्हतं ते सोडून द्यायचं.

सगळं झाल्यावर शेजारच्याच चहाच्या टपरीवर गेलो. स्पेशल चहाची ऑर्डर गेली. मघाचपासून पैलवानबापूंच्या मनात काहीतरी प्रश्न उसळ्या मारतोय हे मला जाणवलं होतं. थोडा वेळ आढ्याकडे नजर लावून विचार करून मला म्हणाले - 'ताई, आमचं ह्ये गाव, ही पांढर इतकी जुनी हाय ना?' म्हटलं 'हो'. 'म्हंजे इथे पण - ते कुठलं खणलं न्हवतं का जुनं गाव, तसंच म्हंजे म न दे... म ज ना.... म न जा दो.....' ते शब्दाला जामच अडखळले होते. मलाही आधी नीट कळलं नव्हतं पण एकदम ट्यूब पेटली. विचारलं -'तुम्हाला मोहेन्जोदडो म्हणायचंय का?' त्यांच्या चेहर्‍यावर एकदम दिलखुलास हसू पसरलं. 'होय की, तेच बघा की काय ते.. मंग आमच्या गावाला पण..' मी घाईघाईने खुलाश्यात घुसले, की नाही इथे उत्खनन एवढ्यात तरी होणार नाहीये. सध्या लोक जमीन अधिग्रहण, सेझ याच्या अर्ध्याकच्च्या अफवांनी घाबरलेले असतात. अनेक ठिकाणी समजावून सांगूनही तांत्रिक मोजमापं घेऊ द्यायला कटकटी करतात. जीव अगदी मट्ट्याला आणतात. खुलासा ऐकून पैलवान एक क्षणभर माझ्याकडे टक लावून म्हणाले -'नाही हो ताई, तसं न्हाई म्हणायचंय. पन त्या इतक्या प्रशिद्द मनजादोड (शेवटपर्यंत ते नाव त्यांना म्हणता आलं नाहीच) सार्कंच आमचं गाव पण लई जुनंय म्हणा की. लईच आपरुक वाटतंय बगा.'
मला काय म्हणावं ते सुचेना. कुठलं दूरदेशचं मोहेन्जोदडो. त्याच्या प्राचीनतेविषयी इतिहासाच्या पुस्तकात - स्वतःच्या म्हणा, पोराच्या म्हणा - वाचलेली माहिती लक्षात ठेवून, त्याच्याशी तुलना करून स्वतःच्या गावाच्या जुनेपणाविषयी अप्रूप बाळगणारा, त्याचा मनापासून आनंद होणारा असा मला भेटलेला हा एकमेव गावकरी. बहुदा अगदी शिकले सवरलेले गावकरीपण देवळांच्या प्राचीनतेत, मूर्तींच्या तपशीलात आणि देवाच्या आख्यायिकांमधेच जास्त गुंतलेले असतात. इथेही त्या पैलवानांच्या इतर साथीदारांना या संवादाचं काहीही सोयरसुतक नाही हे स्पष्ट होतं. मी मात्र वय, लिंग, शिक्षण, सामाजिक स्तर या सगळ्यांच्या पलिकडे जाऊन ऐतिहासिक माहिती जाणून घेऊन त्याने हरखून जाणारा समानधर्मा अचानक भेटल्याच्या खुशीत होते.

आता गाव क्र. २ कडे मोर्चा वळवला. रोज वेगवेगळ्या कोंदणातली गावं बघतेय. काल मैलोन् मैल पसरलेल्या अथांग दगडी माळाच्या मधोमध असलेल्या एका छोट्या गावापाशी, वर्षातून जेमतेम आठवडाभर पाणी वहाणार्‍या कोरड्याठक्क ओढ्याच्या काठी शेजारीशेजारी दोन सातवाहनकालीन वसाहती पाहिल्या. आजचा प्रवास नदीकाठाने, हिरव्या शिवाराच्या आणि तुडुंब भरलेल्या नदीच्या सोबतीने.
हे गाव नदीच्या काठावरच पण थोड्या वरच्या अंगाला. रस्ता नदीकाठानेच. इथल्या सरपंचाचं नाव आधीच्या गावातून कळलं होतंच. या दोन गावांची जोड पंचायत आहे. त्यामुळे मदतीचा प्रश्न सुटल्यासारखाच आहे. गावाला भेट देणारी मी पहिलीच आर्किऑलॉजिस्ट.
गाव नदीपासून थोडं आत, उंचवट्यावर. पण इथे कडेकपारी नाहीत. नदीत म्हशी आणि पोरं निवांत डुंबत होती. बायका धुणं धूत होत्या. गावात शिरल्यावर समोरच पंचायत-शाळा यांची जोडइमारत दिसली. सरपंचांना फोन गेला होता आणि ते काही शिक्षकांबरोबर आमची वाटच पहात होते.

गाव तसं मोठं आहे आणि बहुतेक सगळी घरं पक्क्या विटा-सिमेन्टची. त्यामुळे पांढरीचा अदमास येणं अवघड होतं. तरी २-३ जुन्या वाड्यांच्या बखळींमधे मातीसाठी उकराउकरी झाली होती त्यामुळे आम्ही तिकडे गेलो. बहुतेक सगळीच खापरं मध्ययुगीन आणि मराठाकालीन होती. तरी त्यात तीन खापरं सातवाहनकालीन निघाली. गावात यादवकालीन मंदिर नाही, मूर्ती नाहीत, की वीरगळही नाही. असं काही या गावात होतं याची जुन्याजाणत्यांना आठवणही नाही. ग्रामदैवतं दोन. पीर आणि अंबाबाई. पण दोन्ही ठाणं आधुनिकच. गावाविषयी, ग्रामदैवताविषयी मौखिक परंपरेतून, आख्यायिकांमधून सांगितल्या गेलेल्या गोष्टी जवळजवळ नाहीतच. या परिसरातल्या कुठल्याही ताम्रपट-शिलालेखातही गावाचा उल्लेख नाही. म्हणजे सातवाहन कालात जरी इथे वसाहत असली तरी ती नंतर कदाचित उजाड झाली असेल आणि मध्ययुगात किंवा मराठाकाळात इथे परत एकदा वस्ती झाली असेल असं मला वाटतं. उत्खनन केल्याशिवाय याचं खात्रीशीर उत्तर मिळणार नाही पण माझ्या संशोधनाचा हा विषयही नाही. पांढरीतून आणि गावातून मिळालेल्या पुरावशेषांमधून निघालेली एक तर्कसुसंगत शक्यता एवढंच.
पूर्ण गावाला आणि गावातून एकदा नीट चक्कर मारली. काही तांत्रिक मोजमापं घेतली. माहितीतक्ता लिहिला. फोटो काढले. आणि आजच्या वेळापत्रकातल्या पुढच्या गावात कुणाला भेटायचं याची माहिती घेतली. परत एकदा गोडमिट्ट स्पेशल चहा आला. (दिवसातून असे दोन चहा झाले की माझ्या शरीराची दिवसभराच्या ग्लुकोजची गरज सणसणीत भागत असणार आणि म्हणूनच तहानभुकेचा, उन्हातान्हाचा लवमात्रही त्रास न होता मी काम करत रहाते. एकदम नक्कीच.)

गाव क्र. ३. हे गावपण नदीच्या काठालाच. आणखी थोडं वरती. खरंतर हे गाव माझ्या मूळ यादीत नव्हतं पण दशक्रोशीतल्या सगळ्या गावातून इथल्या पांढरीविषयी मला सांगितलंय त्यामुळे इथे जायचंय.
अगदीच गावढं म्हणावं इतकं छोटं गाव आहे. गाव क्र. १ पेक्षाही छोटं. शेजारच्याच गावात एक शिलालेख आहे. त्यात आसपासच्या बहुतेक गावांची नावं आहेत. पण या गावाचं नाही. गावात जवळजवळ १५फूट उंचीचं पांढरीचं टेकाड आणि त्यावर काही घरं. यातली बरीच पांढर शेतकर्‍यांनी खणून काढून शेताला घातली आहे. एकुणातच या सर्व प्रदेशात खताचा स्वस्त पर्याय म्हणून ही माती वापरतात. (यात नायट्रोजन, फॉस्फेट आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं). फक्त १५-२० रु. ला एक ट्रक. एकदम जास्त उचललीत तर त्यातही सूट. अनेक ठिकाणी मी पांढरीची चौकशी केली की त्यांना मी ही माती विकत घ्यायला आलेय असं वाटतं त्यामुळेच हे दर मला माहिती आहेत. पहिल्यांदा अगदी नवखी असताना हे ऐकलं तेव्हा 'मातीमोल' म्हणजे काय याचा अर्थ नीटच उमगल्यासारखा झालेला. कवडीमोलाच्या भावाने हे अवशेष असे नाहिसे होताना पाहून खरोखरीच छातीत बारीक कळ आली होती. आता निर्ढावले आहे. कितीक शेतातल्या पांढरी एखाददोन दिवसात बुलडोझर लावून उडवलेल्या पाहिल्यात, ऐकल्यात. ही सामायिक जमीन मोकळी करून गावातल्या भूमिहीन कुटुंबांना देण्यासाठी हे सर्रास होतं. मी फक्त दिसेल ते व्यवस्थित तपशीलवार नोंदून ठेवण्याच्या पलिकडे काहीही करू शकत नाही. आपल्याकडे दर गावाआड कुठल्याना कुठल्या काळाची पांढर असते. किती वाचवणार? भूतकाळापेक्षा जिवंत माणसांचं जगणं जास्त महत्वाचं आहे हे मलाही पटतं. पण गावोगावच्या इतिहासाचे अमूल्य ठेवे असे पोरासोरी नष्ट होताना पहाणंही काळजाला घरं पाडणारं असतं. असो.

गावातले बहुतेक सगळे जण रहायला शेतीवरच्या वस्त्यांवरून पांगलेत. त्यामुळे गावात फारशी जाग नाही. मात्र आम्ही येणार असल्याचा फोन आधीच्या गावातून गेला होता त्यामुळे तरुण उपसरपंच आणखी दोघाचौघा जाणत्यांना घेऊन वस्तीवरून आले होते.
गावातली बहुसंख्य वस्ती एका विशिष्ट उपजातीची. त्यांचे पूर्वज नऊ पिढ्यांपूर्वी जगायला म्हणून शेजारच्या राज्यातल्या गावातून बाहेर पडले ते फिरत फिरत या बारमाही नदीच्या काठाला येऊन इथे अखेर स्थायिक झाले. अजूनही या कुटुंबांचे मूळ गावाशी, त्या ग्रामदैवताशी संबंध आहेत. मूळ भाषा जवळ जवळ विसरलेत पण तिथल्या नातेवाईकांशी संबंध आहेत. रोटीबेटी व्यवहारही होत रहातात. या अशा हकिकती मी या आधीही अनेक गावांमधे ऐकल्यात. सगळ्या मौखिक परंपरा प्रत्येक वेळीच विश्वासार्ह असतात असं नाही, पण या स्थलांतरांच्या कथांमधे लोक कायम मूळ गाव, नाव असे तपशील सांगत असतात तेव्हा त्यात तथ्य असतंच असतं. माणसाचं पूर्वजांची नाळ पुरलेल्या मातीशी नातं इतकं सहजी तुटत नसतंच. शहरात जन्मलेली, वाढलेली मीच नाही का वडिलांनी त्यांच्या लहानपणीच सोडलेल्या गावाचं नाव अभिमानाने माझं गाव म्हणून सांगत! विकून टाकलेल्या घराच्या एका जुन्या बखळीशिवाय आमचं तिथे काहीच नाही, आता नातेवाईकही नाहीत. ४-५ वेळाच गेलेय तिथे पण प्रत्येक वेळी जीव अपार सुखावलाय. आयुष्यात कधी बक्कळ पैसा मिळाला की आमच्या या गावात चौसोपी वाडा बांधून रहायची स्वप्नं मी अजूनही पहातेच की!

तर मूळ मुद्दा पांढर. गावभर पांढरच पांढर. हव्वी तेवढी तपासा, वरवर उकरून बघा. छोटीशी दीड एकराचीच आहे. तपासायला, शोधाशोध करायला आणि तांत्रिक मोजमापं घ्यायला फारसा वेळ लागला नाही.
इथेही मोठ्या प्रमाणात सातवाहनकालीन खापरं मिळतात. आणि मध्ययुगीनही. पण यादवकालीन मंदिर, मूर्ती असं काहीच नाही. नाही म्हणायला गावच्या हद्दीबाहेर एका चौथर्‍यावर एक वीरगळ. त्याला भंडारा-फुलं वाहून पूजा केलेली दिसली. इतके शेकड्याने वीरगळ बघितलेत पण त्याची पूजा प्रथमच पहात होते. गावकर्‍यांनी सांगितलं की इथे रामोश्याचं एकच घर आहे आणि हा दगड त्यांच्या पूर्वजाची समाधी आहे. अंगावर सर्रकन काटा आला. वीरगळ म्हणजे लढाईत किंवा चकमकीत मारल्या गेलेल्या वीराची स्मृतिशिला, समाधी - साधारण ८०० ते १००० वर्षांपूर्वीची - हे मला आर्किऑलॉजिस्ट म्हणून चांगलंच माहिती आहे. पण बहुतेक सगळा ग्रामीण समाज या बाबतीत अनभिज्ञ असतो. काहीतरी कोरलेले दगड म्हणून देवळाला टेकू देऊन ठेवलेले असतात. आजपर्यंतच्या (आणि नंतरच्याही) भटकंतीत मौखिक परंपरेतून आलेला वीरगळाचा हा अर्थ, हा उल्लेख एकमेव. आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाचा.

या सगळ्याचे तपशीलवार फोटो काढले. निग्रहाने चहाला नाही म्हटलं. आणि मोटरसायकलवर टांग टाकून परतीची वाट पकडली. दुपारचे तीनच वाजले होते. यावर्षीचं काम ठरवल्याप्रमाणे वेळेत आणि व्यवस्थित पार पडलं म्हणून जिवाला निवांतपणा आला होता. परीक्षेचा शेवटचा पेपर संपल्यावर येतो तसा रिकामपणा आला होता. खोलीवर जाऊन अहवाललेखन, हिशोब, आवराआवरी, निरोपानिरोपी करायची होती. पुढच्या वर्षीचा पडाव दुसर्‍या बंदराला जाऊन थडकणार. परत इथे कधी येणं होईल माहित नाही. ही बारमाही नदी, तिच्य उपनद्या, तिचं खोरं साथीला असेलच पण हा भूप्रदेश नसेल. रहातील फक्त निवडून घेतलेले पुरावशेष, त्यांच्या नोंदी, काही लोकांशी जडलेली जिव्हाळ्याची नाती आणि माझ्या मनात उमटलेली या गाव-शिवारांची, लोकांची असंख्य छायाचित्रं आणि आठवणी.

(हा लेख माहेर दिवाळी अंक २०१२ मधे प्रकाशित झालेल्या लेखाचा उत्तरार्ध आहे. इथे त्याची 'अनकट व्हर्शन' देत आहे. पुनर्प्रकाशित करायची परवानगी दिल्याबद्दल माहेर संपादक मंडळाची आभारी आहे.)

ही लेखमालिका इथेच संपवत आहे. हे लिहायला सुरुवात केली तेव्हा इतकं सारं लिहेन आणि त्याला इतका भरभरून प्रतिसाद मिळेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. मला फुटकळ का होईना लेखकू करण्याबद्दल तुम्हा सर्वांचे आणि माबोचे मनःपूर्वक आभार.

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...