पहिली माळ: श्री सुंकाई
पहिली माळ: श्री सुंकाई
सडये-पिरंदवणे-वाडाजून या गावची ग्रामदेवता म्हणून पुजली जाणार्या सुंकाईचे स्थान भौगोलिकदृष्ट्या बरोबर तिन्ही गावांच्या मध्यावर आहे. फार कर्मकांडात, आणि सण-उत्सवात न रमणारी अशी ही शांतप्रिय देवी आहे, असे सुंकाईबाबत म्हणावे लागेल.
सुंकाई बसणीच्या महालक्ष्मीप्रमाणे मुर्तीस्वरूप नाही. ती तांदळा स्वरूप आहे. हा तांदळाही साळुंकेत बसविला आहे. त्यामुळे प्रथमदर्शनही पाहता ती मोठी शिवपिंडच भासते. मात्र ही साळुंका आसनस्वरूप आहे. तर तांदळा हीच मुख्य देवता आहे. महाराष्ट्रात तांदळा स्वरूपात अनेक देवीस्थानं आढळतात. त्यांचे तांदळा अर्थात निर्गुण-निराकार स्वरूपामुळे त्यांचा उगम कधीचा आहे, हे सांगणे तसे कठीणच. कोकणात भूमका आणि तांदळा स्वरूपात देवीची देवस्थाने आहेत. ती जितकी प्राचीन तितकीच जागृत मानली जातात. सुंकाई त्यापैकीच प्राचीन देवस्थान असावे.
सुंकाई नावात विशेष अर्थ जाणवत नाही. कदाचित मुळ शब्द ‘सुखाई’ असण्याची दाट शक्यता आहे. सुख देणारी आई ती सुखाई.. सामान्यत: बोलीभाषेत सुखाईचा अपभ्रंश होऊन कालौघात ‘सुंकाई’ असे नामाभिमान झाले असण्याची शक्यता दाट आहे.
सुंकाईचे विशेष म्हणजे तीच्या मागे बसलेले सारे तीचे सेनापती. हे सेनापती ‘भूतम्हारक्या’ म्हणून पुजले जातात. भूतम्हारक्या ही बहुजन समाजातील देवता आहे. त्यातील ‘म्हारक्या’ हा शब्द विशिष्ठ समाजदर्शक आहे. हे भूतम्हारक्याही तांदळा-पाषाण स्वरूपात आहेत. त्यांचे पुजाविधी सुंकाईप्रमाणेच श्रद्धेने केले जातात.
सुरूवातीलाच म्हटल्याप्रमाणे सुंकाई ही कर्मकांडात आणि सण-उत्सवात न रमणारी देवी आहे. या देवस्थानात विशेष सण-उत्सव होत असल्याचे माहिती नाही, आणि असले तरी ते ‘तात्पुरत्या’ स्वरूपाचे. एक दिवशीय नाम एक्का ही परंपरा येथे पार पडते, मात्र ती खूपच अलिकडील असल्याचे गावकरी सांगतात. नवरात्रही येथे विशेषत्वाने साजरा होत नाही. कोणताही भक्तीजागर येथे होत नसतानाही सुंकाई घराघरात एका कारणास्तव श्रध्देय आहे ते कारण म्हणजे ‘राखण’. शेतकरी-बहुजन समाजात सुंकाईच्या सेनापती गणांच्या संतुष्टीकरणासाठी, शेतीवाडीच्या, कुटुंबाच्या भल्यासाठी घरगुती राखण दिली जाते. ही राखण भूतम्हारक्या या सेनापती देवांना दिली जाते. तो बहुजन देव असल्याने त्याला आरवत्या कोंबड्याचा बळी दिला जातो. कोंबड्याच्या बळीची ही राखण देवळामागील स्थानावर दिली जाते. तर देवीपुढे नारळ फोडला जातो. ही राखण देण्यापुर्वीचा विधी अंत्यत महत्वाचा आहे. आणि या विधीमुळेच सुंकाईचं स्थान घराघरात अधिक घट्ट आणि श्रध्देय झालेलं आहे. तो विधी म्हणजे ‘पाषाणाद्वारे देवीची राखणेला मान्यता घेणे...’
राखण देण्याआधी ती देण्यार्याने (यजमान्याने) देवीला राखण देतोय ती मान्य आहे की नाही..? याची विचारणा करावी लागते. गुरव मंडळी ती पाषाण हलवून करत असतात. गुरवांचा देवीशी पाषाण हलवून संवाद होतो. हा संवाद जनसमान्यांना अत्यंत भावतो, साक्षात देवीच आपलं गार्हाणं ऐकतेय... ही संकल्पनाच सामान्य शेतकरी, गावकरी यांना भन्नाट वाटत असते. पाषाण हलविण्याच्या संवादात देवी बर्याचदा भक्तावर रागावलेलीच असते. गुरव यजमान्याच्यावतीने तीची समजूत घालतात, आणि राखण मान्य करण्यास राजी करतात. अर्थात देवी संवादातून मान्यता दर्शवते. आणि पाषाण ‘हलका’ येतो. पाषाण हलका येणे म्हणजे सारेकाही देवीने मान्य केले आहे, आर्शीवार्द दिला आहे, याचे सुतोवाच.. यानंतर राखणेचा विधी पार पडतो.
कुटुंबाची जशी राखण मृग नक्षत्रात पार पडते, तशीच राखण सडये-पिरंदवणे-वाडाजून या गावांची ‘गावकीची राखण’ शिमग्यात देवीला दिली जाते. तिचाही विधी साधारणत: वरिलप्रमाणेच असतो. मात्र या राखणेत देवीच्या गार्हाण्याचं स्वरूप हे गावाच्या कल्याणाचं.. रक्षणाचं असं व्यापक असतं. राखणेचे बळीविधी हे देवळाच्या बाहेरील स्थानावर होत असतात, तरीही ‘सुंकाई’चे देऊळ हे सोमेश्वर देवस्थानातील अन्य देवस्थानांसोबत का नाही..? ते असे कुटाबाहेर का..? ही शंका मात्र साहजिकच पडते.
सण-उत्सवाच्या गजबजाटात नसलेली ही देवी येथील गावकर्यांच्या मात्र अतीव श्रध्देचा भाग आहे, आणि म्हणूनच सडये-वाडाजून या दोन्ही गावच्या नमन मंडळांची नावे ही सुंकाईच्याच नावावरून ठेवण्यात आली आहे.
सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त आज ही शब्दरूपी पहिली माळ सुंकाईला अर्पण करत आहे..
-अमोल पालये, सडये-पिरंंदवणे.
मो.9011212984.
गांगोबा-भराडीन-आदिष्टीच्या सानेवरून..
गांगोबा-भराडीन-आदिष्टीच्या सानेवरून..
(ललित लेख)
मु.भावेआडम
हे रत्नागिरी तालुक्यातील तसं कुठे लेखी नसलेलं गाव माझं दुहेरी आजोळ आहे.
गोरिवले आणि घवाळी अशी दुहेरी भावकी माझी आजोळ घरं आहे. याशिवाय इतरही
बरीच नातीगोती याच गावात आहे. ती अशी एकत्र असल्याने एकाचवेळी भेटू शकतात,
म्हणून जायलाही आवडतं. शिमगोत्सव हा या गावाचा लोकोत्सव. पार्वती
घवाळीणीच्या कडेवर बसून मी इथला शिमगोत्सव पाहत आलो आहे. तो पाहण्याचं
भाग्य आनंदाचं. दोन वर्षापूर्वी आडमच्या शिमग्याला गेलो होतो. त्यानंतर
जाणे झाले नाही. यंदा योग जुळून आला आणि गांगोच्या चरणी माथा टेकला.
पौर्णिमेला गांगोबा-आदिष्टीचा शिमगा सानेवर साजरा झाला. शिमगा संपला.. मी
आलो, पण मन मात्र आदिष्टीच्या निर्जन सानेवर ठेवून आलोय. झरझरणारी
वार्याची झुळुक अजूनही त्या मनाला घरी आणावीशी वाटत नाही..
यंदाच्या
शिमग्यात इथं एक आधुनिक बदल दिसला. चाकरमान्यांचा ओढा या शिमग्यात मोठा
असतो. यावर्षीही तो नटून-थटून आला होता. मात्र यावेळी बहुतेकसा चाकरमानी
आपल्या दुचाकीवर बसून आला होता. सानेवर खूप गाड्या लागलेल्या. मी चालणारा
माणूस. मला दगड-धोंड्यातून चालायला आवडतं. पण मामा म्हणाला, गाडीवरून जाऊ.
आदिष्टीच्या कातळावरच्या देवळाजवळ गाडी केव्हापासून जायला लागली..? हे मला
कोडचं वाटलं. चला तर चला.. पोहोचताच सानेपासून दूर मामाने चपला काढायला
लावल्या. सानेवर चप्पल न्यायची नाही, हा श्रध्देचा नियम सार्यांनीच पाळला
होता. मी रानातला माणूस, तो नियम मला काही जड नव्हता. पण सांगायची गंमत
म्हणजे, भावेआडमचं नाव ज्यांच्या नावावरून पडलंय, ते परगावी असणारे खोत
मात्र कातळावरची साधी गवताची तुसं पायाला डसत होती म्हणून नाजुकपणे चालत
होते. ते पाहून मला हसायला येत होतचं, पण ज्या भूमीने आपली नाळ केवळ
जन्मानं नाही, तर नावानंही जोडली आहे, त्यांचं तिथल्या मातीशी नातं किती
बेगडी आहे, याची जाणीव ते सारं मुरडणं पाहताना झाली.
सानेवर
पालखी विराजमान होती. त्यात चांदीची मोठाली तीन रुपं होती. पहिले भारदार
मिशींचे श्रीदेव गांगोबा, त्यानंतर सौभाग्य लेणं ल्यालेल्या श्रीदेवी
आदिष्टी आणि श्रीदेवी भराडीण. त्या मातृदेवतांना वंदन केले. कोकणात भराडी
आदिष्टीची स्थानं खूप आहेत. आडोमलाही ती आहे, याचं मला कौतूक वाटलं. मग
देवळात गेलो. देवूळ अजून जुनं आणि कौलारू आहे. त्याच्या भिंती अभेद्य
जाडजुड चिर्याच्या आहेत. देवळात दोन पाषाणमुर्ती आहेत. त्या दोन्ही
मातृदेवता श्री भराडीण आणि श्री आदिष्टी. मला गांगोबा कुठं दिसले नाहीत.
म्हटलं, दुसरीकडे कुठे तरी स्थान असेल. मामाला विचारलं, तर तो म्हणाला,
तिथचं छोटा नुसता पाषाण आहे. मला तो दर्शन घेताना दिसलाच नाही. मला पुन्हा
एका गोष्टीचं नवल वाटलं. इथं स्त्रीदेवतांना पुरुष देव गांगोबापेक्षा
भराडीन आणि आदिष्टी या स्त्रीदेवांचे स्थान वरचे आहे. माझी ही चिकीत्सा
मातृदेवतांचा शोध घेत देवस्थानच्या काळाचा वेध घेत गेली.. गावोगावच्या
कातळांवर का या देवता बसल्या असतील..? हातात तलवारी घेवून त्या शस्त्रसज्ज
का असतील..?
सानेवर आलो. तिथं
अथक ढोलवादन चालू होते. मोजकी दुकानं सजली होती. भव्य वटवृक्षाची आणि इतर
झाडांची छाया सार्या सानेवर पडली होती. चाकरमानी येत होते. देवदर्शन घेत
होते. अखिल शिमग्याचं आकर्षण असलेली नवी लग्न झालेली जोडपी येत होती. देव
दर्शन घेत होती. मानकर्यांच्या आणि मग गावकर्यांच्या नमस्कार करत होती.
मानकरी खुर्चीत बसले होते. बाकी गावकरी चटयांवर बसले होते. मी पाहुणा होतो.
मी चटईवर बसलो. भन्नाट वारं जीवाला विसावा देत होतं. वाटत होते, असाच
आदिष्टीचरणी विसावा घ्यावा.
पालखी
सानेवरून उठली आणि खेळू लागली. अवघे चाकरमानी आपली ताकद अजमावू लागले. ही
पालखी नाचविणे म्हणजे ताकद अजमाण्याचेच काम होते. ते काही येरागबाळ्याचे
काम नव्हे, हे खोतांनी जेव्हा खांद मारला आणि दोन झोक्यातच ते आटपले,
तेव्हाच कळले. पालखी जडीव आणि घडीव आहे. शिवाय तिला तोडे वगैरे लावलेले
आहेत. त्यात जी तीन रुपं आहेत, तीही वजनदार आहेत. लुक्या माणूस जास्तीत
जास्त चारपाच हेलकावे तीला देवू शकतो. अवघ्या चाकरमान्यात दोघां-तिघांनीच
ती पालखी मस्तकी शेषासारखी उचलून घेतली. मात्र दिड-दोन तास हा खेळ अथक चालू
होता. सारा चाकरमानी घामाघुम होऊन आनंद लुटत होता.
हे
सारे चालू असतानाच दुसरीकडे शेंडा उभा करण्याची लगबग चालू झाली. हे
कोकणातल्या शिमगोत्सवातील मोठं दिव्यचं. एकीच बळ दाखविणारा हा दिव्य सोहळा.
तो सुध्दा देवाच्या दारात..! सुरमाड हा भरीव आणि जड वृक्ष. तो मध्यरात्री
जंगलातून तोडून खांद्यावरून आणला जातो. चाकरमानी तो अनवाणी पायाने कोणतीही
इजा न होता खांद्यावरुन आणतात. ते कसे आणतात..? ते काही मी पाहिलेले नाही.
पण पहायची इच्छा आहे. कारण सुरमाड जिथं रूजलेला असतो, तिथं काही कुणी
डांबरी रोड बांधलेला नसतो. मुळात तिथं रस्ता नसतो. तिथं असतात घब्या,
दर्या, दगड-धोंडे.. मात्र हे सारं निविघ्न पार पडत आलेलं आहे. हे सारं
पाहताना एकीकडे मॅनेजमेंटचे विद्यार्थी आणि दुसरीकडे अर्धशिक्षित गावकरी..
याबाबत नेमकं उत्तर शोधताना गडबडायला होतं.
हा
सुरमाड उबा करायचा.. त्यालाच शेंडा उभा करणे म्हणतात. तो उभा करण्याची
जय्यत तयारी सुरू झाली. बांबुच्या डेलक्या बांधून झाल्या. मग सारे जुटले.
सुरमाड किंचित उचलून त्याखाली आडवे व्हलटे टाकले.. मग एकच गजर करत सारे
माडाला तोरण बांधण्यास धावू लागले. माडाला येणारी झुंबर काढून त्याला
आंब्याचा टाळा अडकवून ते तोरण माडाला बांधण्यात आले. शेवटी टोकाला भगवे
निषाण. आता तो माड नव्या नवरीसारखा सजला.. हिरवं लेणं ल्याला. आजपर्यंत
बर्याचवेळा हा सोहळा पाहिलाय. पण प्रत्येकवेळी ‘हे क्रेनशिवाय कसं उभं
करणार..?’ हा प्रश्न शेंडा उभा राहिपर्यंत पडतोच. यावेळीही तो पडला. खड्डा
आणि खोड यांची जागा सेट झाली. आणि सार्यांनी गांगोबाचा जयघोष करत
शेंड्याला हात घातला. त्या एकजुटीपुढे तो माडही थिजला असेल, आणि अंग चोरून
बसला असला.. इतक्या सहजतेनं ते अजस्त्र झाड झटाझट वर उचलू लागलं.
डेलक्यांनी त्याला आधार दिला. दुसर्या बाजूने शेड्याने त्याला खेचला गेला.
आणि झरदिशी तो शेंडा जेव्हा उभा राहिला तेव्हा सार्यांच्या चेहर्यावर जो
आनंद होता, तो अवर्णनीय. माझ्या चेहर्यावर वेगळेच भाव होते, काय जजमेंट
आहे यार.. किती शिस्त.. कसलाही गलबला नाही.. ओरड नाही.. आणि विशेष म्हणजे
हे सारं करताना कोणी नियंत्रक नाही.. वर्षानुवर्षांचा हा श्रध्दामय सराव
आहे. आज काळ किती पुढं गेला. जुन्या रुढीनांही धक्का बसत चाललाय. एकीत बेकी
निर्माण झालेय. गावं फुटत चालली आहेत.. आणि अशावेळीही हा कोकणच्या होळीतला
शेंडा दिमाखात उभा राहतो आहे. हे सारं पाहताना खरचं कधी कधी बुचकळ्यात
पडायला होतं.
शेंडा उभा राहिला.
त्याची पुजा झाली. गार्हाणे झाले. होम पेटला, पालखीने त्याभोवती फेर्या
मारल्या.. आडमच्या शिमग्याचं एक पर्व संपलं. हे सारं सुखनैव होतं. दगदगीत
वाढणार्या चाकरमान्यांसाठी काळाच्या ओघात त्याची गरजही वाढेल, आणि तो
दरवर्षी आणि जोरात शिमगोत्सव साजरा होईल.
- अमोल पालये.
मु.पो.-सडये-पिरंदवणे.
मो.9011212984
श्री जोगेश्वरी
श्री जोगेश्वरी
(दुसरी माळ)
![]() |
| जुन्या मंदिराचे चित्र |
सडये-पिरंदवणेतील साडेतीनशे वर्षांपूर्वीचे श्रीजोगेश्वरी मंदिर रत्नागिरीपासून 12 कि.मी. अंतरावर कोतवडे गावाजवळ आहे. सडये-पिरंदवणे हे एक छोटंसं निसर्गरम्य गाव. त्याची एक वाडी- टोळवाडी. त्याला लागूनच भावे-अडोम, केळ्ये, वेेत्तोशी व बसणी ही गावठाणातील खाडीलगतची वस्ती. अलीकडे व पलीकडे डोंगर व मध्ये पावसाळ्यात तुडुंब भरून खळाळत वाहणारा ओढा. काही वर्षांपूर्वी पूल बांधला गेला आणि ही गावं रत्नागिरीच्या जवळ 12 कि.मी.वर सरकली.
रिक्षाने रत्नागिरीहून पिरंदवण्याला अर्ध्या तासात पोहोचता येऊ लागले. पिरंदवणे येथील साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या श्रीजोगेश्वरी (जुगाई) मंदिरातील श्रीजोगेश्वरी म्हणजे साठे, साठये, साठये, गोंधळेकर, गोवंडे, धारू तसेच अन्य काही कुटुंबीयांची कुलदेवता. इतिहासाची पाने मागे उलटली तर 13 व्या शतकापासून पिरंदवणे, टोळवाडी येथे साठयांची वस्ती असल्याची नोंद आहे. पूर्वजांना मिळालेल्या इनामाच्या सनदेत जमिनीच्या दळ्यांची नावे सापडतात. इ. स. 1635 च्या सुमारास श्रीजोगेश्वरी मंदिराची स्थापना झाल्याचा उल्लेख सापडतो. पुढे साधारण पाऊणशे वर्षांनी चुन्याच्या बांधकामाचे एकास एक असे तीन घुमट असलेले टुमदार मंदिर उभे राहिले. पुढे भक्तजनांना बसण्यासाठी विस्तीर्ण जागा असून बाजूला जांभा दगडाच्या बैठका असलेले सभास्थान बांधण्यात आले. हेमाडपंथी बांधणीचे हे देऊळ शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. श्री परशुराम देवस्थानची छोटी प्रतिकृती असाही या मंदिराचा बोलबाला आहे. पुढे 20 वर्षांनी देवीच्या पांढर्या (मार्बल) दगडातील मूर्तीची स्थापना करण्यात आली.
टोळवाडी शाखेचे पाचव्या पिढीतील मोरभट महादेव भट व त्यांचे चुलतबंधू शंकरभट पनभट यांचे पणजोबा महादेव भट हरभट यांना दृष्टांत झाला व श्रीजोगेश्वरी देवीने नवरात्र उत्सवात मी नेवरेकार्यातीखाली पुसाळे गावातील 12 वाडयांपैकी सडये येथे येत असल्याचे सांगितल्याची आख्यायिका आहे. त्यानुसार पिरंदवण्याच्या श्री सोमेश्वराच्या आवारातच या श्रीजोगेश्वरी देवीची स्थापना त्यांचे नातू महादेव भट बाळंभट यांनी इ. स. 1635 मध्ये केल्याचे इतिहास कथन करतो.
![]() |
| मंदिराच्या आतील भाग |
स. 1840 च्या आसपास महादजी हरभट यांनी जोगेश्वरी मंदिरासमोर श्री हनुमानाच्या मूर्तीची स्थापना केली. या मंदिराच्या जवळच ग्रामदेवता श्री सुकाईदेवीचे छोटे मंदिर आहे. कालांतराने श्रीजोगेश्वरी मंदिराच्या आवारात विहिरीची बांधबंदिस्ती करून दोन खोल्यांची धर्मशाळा बांधून घेतली गेली. बाहेरून उत्सवासाठी, पुराणकीर्तनासाठी येणार्या मंडळींची सोय झाली. अनेकांचे मदतीचे हात पुढे आले आणि परिसर सुशोभित केला गेला. इ. स. 2002 मध्ये पिरंदवणे येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने, शृंगेरीच्या जगद्गुरू शंकराचार्याचे मार्गदर्शन घेऊन, साठे, साठये, साठये कुलपुरस्कृत न्यासाच्या विद्यमाने या पुरातन व स्वयंभू श्रीजोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे. अर्थात, मंदिराच्या अंतर्गत वास्तुशैलीला कोणताही धक्का न लावता पंचधातूच्या मूर्तीला सप्तनद्यांचा जलाभिषेक करून शंकराचार्य जयंतीला तिची स्थापना करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत श्रीमंत बाजीराव पेशवे, त्यांचे गुरू श्री ब्रम्हेंद्रस्वामी यांनी श्रीजोगेश्वरी मंदिरास भेट दिल्याची आणि श्रीजोगेश्वरी, श्री सोमेश्वर व श्री सुकाई देवालयांना एकत्रितपणे काही जमिनी इनाम दिल्याच्या नोंदी आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीला असताना या मंदिरात बर्याचवेळा आल्याचा उल्लेख आहे. त्यांची दोन व्याख्यानेही या आवारात झाली होती.
साठे मंडळींना धार्मिक विधी व पुराणाचे अधिकार पिढीजात असल्याने चैत्री पौर्णिमेस गोंधळ आणि नवरात्र उत्सवात रोजचे पुराण व धार्मिक कार्यक्रम मंदिरात साजरे होतात. दरवर्षी शंकराचार्य जयंती आणि नवरात्रात ललिता पंचमीला देवीचा उत्सव साजरा केला जातो. अप्रतिम कलाकुसरीने सजलेल्या चांदीच्या प्रभावळीत देवीची मूर्ती बघताना डोळ्यांचे पारणे फिटतेच. मंदिर पिरंदवण्यातील मुख्य रस्त्यावरच असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे हे अगदी नित्य भेटीचे स्थान आहे. डोंगराच्या कुशीत, चिटपाखरू दिसणार नाही अशा निर्जन परिसरात, हिरव्या वनश्रीच्या छायेत, ध्वनिप्रदूषणाच्या अभावात, गर्दी, गोंगाट, कोलाहल यांपासून मुक्त, नीरव शांततेची, एकांताची अनुभूती देणार्या ठिकाणी श्रीजोगेश्वरी देवीचे वास्तव्य म्हणजेच दर्शनाच्या निमित्ताने सर्वाना निसर्गसान्निध्याचे, सहवासाचे आवतणच!
(सदर लेख इंटरनेटवरून साभार घेतला आहे.- संकलक: अमोल पालये.)
तिसरी माळ: श्री जाखमाता
तिसरी माळ: श्री जाखमाता
सडये-पिरंदवणेच्या सडा-कातळ भागात श्री जाखमाता देवीचे प्राचीन स्थान आहे, आज ते कमालीचे दुर्लक्षित झाले आहे.
कोकणात जाखमातेची अनेक मंदिरे आहेत, तेथे मोठा उत्सवही साजरा केला जातो. सडये-पिरंदवणेतील श्री श्रेत्र जाखमाता देवस्थान सीमेवर वसले आहे. सडये-पिरंदवणे आणि केळ्ये या दोन गावांच्या डोंगरी सीमेवर जाखमातेचे स्थान आहे. ही देवी सीमेवर वसली असल्याने तीला क्षेत्रदेवता असे म्हणतात. क्षेत्रदेवता या गावांच्या-सीमांचं रक्षण करतात. म्हणून सड्ये-पिरंदवणे गावांचे रक्षण जाखमाता करते अशी भाविकांची श्रध्दा आहे. जाखमातेचीही मुर्ती नाही. तीसुध्दा भुमका-तांदळा स्वरुपातील देवता आहे.
केवळ प्रासंगिक वेळी तिथे आज पुजा अर्चा होते. तर काही भाविकांकडून वार्षिक पुजाविधी केला जातो. विशेष म्हणजे संगमेश्वरात जाखमातेचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. येथिल शिंपणे उत्सवाला सडये-पिरंदवणेतून युवक मोठ्या संख्येने जातात, मात्र स्वत:च्या जन्मभूमीतील क्षेत्रदेवता जाखमातेकडे कुणीच जात नाही.
कोकणात अनेक ठिकाणी जाखमाता देवीची मंदिरेही आहेत. जाखडी या कोकणातील पारंपरिक नृत्यकलेच्या नावाशी साधर्म्य असलेला जखडणे या शब्दाच्या उत्पत्तीतून जाखमाता हा शब्द आलेला आहे. त्यामुळे भक्तांशी घट्ट नाते सांगणारी देवी असा तर्क काढला जातो. आजही या जाखमाता देवीचे महात्म्य भक्तांच्या श्रद्धेमुळे अधोरेखित झालेला आहे. (या देवस्थानाविषयी सध्यातरी अधिक माहिती उपलब्ध नाही.)
लेखन: अमोल पालये,
सडये-पिरंदवणे. मो.9011212984.
चौथी माळ: श्री भराडीण
चौथी माळ: श्री भराडीण
सडये-पिरंदवणेच्या सड्यावरील निर्जन भागात श्री भराडीण मातेचे देवस्थान आहे. काही वर्षापुर्वीच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाने तेथे छोटेखानी मंदिर उभारले आहे.
सिंधुदुर्गात आंगणेवाडीच्या भराडीबाईची (देवीची) यात्रा प्रसिध्द आहे. ती भराडी आणि सडयेच्या सड्यावरील भराडीण वेगवेगळी नसून एकच आहे. सडये-पिरंदवणेच्या आसपास कासारवेलीतही सडा भागात भराडीण देऊळ आहे. भराडीण ही सुध्दा भुमका स्वरुपातील देवी आहे. सड्यावरील देवळात तीची चार भुजा, मुख अशी कोरीव मुर्ती नाही. तर आहेत ते केवळ पाषाण.
कोणत्याही गावात स्री देवता मोठ्या संख्येने आढळतात. सडये-पिरंदवणे त्याला अपवाद नाही. या सार्या देवस्थानांमागे गुढ इतिहास दडलेला आहे. हा इतिहास सडये-पिरंदवणेच्या संस्कृतीशी निगडीत आहे. सड्यावरील देवळात भराडीण एकटीच नाही. तीच्यासोबत अन्य गणगोतही आहेत. (ते कोण? याचा शोध चालू आहे.) सिंधुदुर्गात भराडणीला बाई म्हणतात. (देवी अपवादाने.) सडयेतील भराडीणही कुणी देवी नसावी, तर ती एक महापराक्रमी लढाऊ वृत्तीच बाईच असावी. कारण ती गावात न वसता सडये-पिरंदवणेच्या सीमेवर वसली आहे. सीमेवर देशाचे रक्षण करणारे जवान राहतात. सैनिक राहतात. भराडीण गावाची रक्षणकर्ती आहे, अशी भाविकांची श्रध्दा आहे. भराडीण जर रक्षणकर्ती असेल असेल. ती सीमेवर राहत असेल तर ती नक्कीच लढवय्यी असणार.. एका भुप्रदेशाची प्रमुख असणार.
कदाचित भराडणीचा कुठेना कुठे तरी संदर्भ मातृसत्ताक कुटुंबपध्दतीशी असण्याची शक्यता आहे. मातृसत्ताक पध्दतीतील ती शुरवीर रणरागिणी असावी. जेणेकरून आज तीचा डंका सर्वत्र वाजत असावा. तीचा उत्सव एकेकाळी जोरात व्हायचा, असे जाणकार सांगतात. ‘भराडणीशी नमन झाले..’ असे उल्लेख मिळाले आहेत. आज मात्र मोजकेच भक्त भराडीणला जाऊन पुजाविधी करत असतात. सडयेतील काही भाविक दिवाळीदिवशी भराडी-जाखमाता-सुखाई दर्शनाचा त्रिवेणी संगम साधत असतात.
रत्नागिरीचे पेंटर नंदू सोहनी हे भराडणी देवींचे निस्सीम भक्त आहेत. अगदी दूरवरूनही ते याठिकाणी हजेरी लावत असतात. चहुबाजुंनी पसरलेला काळा विस्तीर्ण कातळ.. वार्याची शीळ आणि निरव शांतता.. असे हे सर्वांग सुंदर स्थळ आहे.
-अमोल पालये.
सडये-पिरंदवणे, मो.9011212984.
पाचवी माळ: सातेरीचा देव्हारा
पाचवी माळ: सातेरीचा देव्हारा
| शिवलकर बांधवांचे कुलदैवत: श्री सातेरी देवस्थान, शिवोली-गोवा |
कोकणात सर्वात मोठा भक्ती संपद्राय कोणता असेल तर तो रवळनाथ आणि सातेरी.
‘सडये’ या गावाचे नामाभिमान गोव्यातील सडये या गावावरून देण्यात आले आहे. त्याला कारणही तसेच ठाम आहे. गोव्यातील सडये या गावातील तमाम शिवलकर, मयेकर ही कुटुंबे गोव्यातून रत्नागिरीत पोर्तूगीज काळात स्थलांतरीत झाली. तेव्हा त्यांनी येथे येताना आपली संस्कृती येथे आणलीच, मात्र आपलं गावही ते येथे येताना घेवून आले. ते गाव म्हणजे आजचे सडये.
रत्नागिरीतील सडये गावाच्या खाडीकिनारी भागात शिवलकरांची वस्ती आहे. हे शिवलकर गोव्यातील शिवोली गावचे. त्यांची कुलदेवता म्हणजे सातेरी. तीच्यावर त्यांची प्रगाढ श्रध्दा. या सातेरीचे भव्य देवस्थान सडये येथे नाही, मात्र श्रध्देकारणे काही वर्षापूर्वी शिवोली सेवा मंडळ, सडये- शिवलकरवाडी यांनी देवस्थान उभारले आहे. हे देवस्थान पहायला गेल्यास छोटेखानी आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख येथे ‘सातेरीचा देव्हारा’ केला आहे.
दैंनंदिन पुजा येथे होत असते. काही वर्षापासून येथे घटस्थापनेचा उत्सव साजरा केला जातो. येथिल देवस्थान नवेच आहे, मात्र कोकणात सातेरीचा जो भक्तसंपद्राय आहे, तो संबंध राज्यभर व्यापलेला आहे.
सिंधुदुर्ग, गोवा परिसरातील प्रमुख देवता म्हणजे सातेरी. या भागातील प्रत्येक गावात या देवतेचे मंदिर असतेच. वारूळ हेच तिचे प्रतीक. सिंधदुर्गात जिल्ह्यात सातेरी देवीची प्रसिद्ध अशी 79 मंदिरे आहेत. तशीच ती गोाव्यातही मोठ्या संख्येने आहेत. परशुरामाची माता रेणुका ही सुद्धा एक ग्रामदेवता मानली गेली आहे. तिचा वारूळाशी संबंध अनेक कहाण्यांमधून सांगितला गेला आहे. रेणुका ही वारूळात जन्मली आणि वारूळातूनच अदृश्य झाली अशी कथा आहे. दक्षिण कोकणात वारुळाच्या पूजेची प्रथा त्यातूनच निर्माण झालेली असावी असे जाणकार सांगतात. सातेरी म्हणजे सप्त मातृकापैकी एक किंवा त्यांचा समुदाय असावा, असे मत पंडित महादेवशास्री यांनी व्यक्त केले आहे.
भारतात मातृपूजा आर्येत्तरांनी (द्रविड) चालू केली. तिची परंपरा अद्यापही खंडित झालेली नाही. सातेरीदेवीला कुठे माऊली असेही म्हणतात. वेंगुर्ले शहरापासून अंदाजे 2 की.मी. अंतरावर सातेरी देवी मंदीर कॅम्प परिसरातील परबवाड्यात आहे. सातेरीचे मंदिर रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. वेंगुर्ले ते कुडाळ या मार्गावरील सर्व गाड्या कॅम्पहून जातात. वेंगुर्ले गाव सर्व सोयीयुक्त असून गावचे ग्रामदेवता रामेश्वर व श्री देवी सातेरी आहे. वेंगुर्ला शहराची निर्मिती होण्यापुर्वीचे हे मंदीर असून ही शिवाची आदिशक्ती सातेरी हे नाम धारण करून आणसुर येथे अवतरली. मंदिर शिवकालीन असून मंदिराचे व्यवस्थापन परब घराण्याकडे आहे. गाभार्यात वारूळ असून या वारूळात सातेरी देवी वास्तव्यास आहे असे भक्त मानतात.
या वारुळालाच मूर्ती मानून सातेरी देवीची पूजा केली जाते. या भागात तांदळाचा प्रसाद लावून देवीशी संवाद साधला जातो. अनेक भक्तांच्या समस्या देवी चुटकीसरशी सोडविते, अशी भाविकांची श्रध्दा आहे. या वारूळाच्या शेजारील गाभार्यात अनेक सुंदर कोरीव मूर्ती आहेत. त्यानंतर सातेरीदेवी गाव राहाटीत राज्यसत्तेची प्रमुख अधिकारी झाली. अनेक लोक देवीकडे प्रसाद (कौल) घेऊन आपल्या समस्यांचे समाधान करतात. दर दिवशी भाविक लोक देवीची ओटी भरतात आणि आपल्या समस्या देवीसमोर मांडतात, आणि पुढील काही महिन्यात त्यांच्या समस्या सुटलेल्या असतात. अशी ही देवी नवसाला पावणारी असल्यामुळे दर मंगळवारी आणि शुक्रवारी ह्या देवीच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते. देवीच्या दर्शनाला भाविक मोठया संख्येने येतात, असे हे कोकणातील एक जागृत देवस्थान आहे.
-संकलन: अमोल पालये.
सडये-पिरंदवणे. मो.9011212984.
सहावी माळ: श्री केळबाई
सहावी माळ: श्री केळबाई
आजची सहावी माळ सडयेतील मयेकर कुटुंबियांचे कुलदैवत श्री केळबाई देवीच्या नावाने वाहत आहे.
शिवलकर कुटुंबियांचे कुलदैवत सातेरीचा जसा मोठा भक्तसंपद्राय आहे, त्याप्रमाणे मयेकर कुंटुंबियांच्या केळबाईचाही खूप मोठा भक्तसंपद्राय रत्नागिरीसह सिंधुदुर्ग-गोव्यात आहे. रत्नागिरीसह सडये गावातील मयेकर बांधव हेही शिवलकर कुंटुंबियांप्रमाणे गोव्या राज्यातील ‘मये’ या गावचे आहेत. पोर्तुर्गीज काळात त्यांनी स्थलांतर केल्यानंतर आपलं कुलदैवत श्री केळबाई देवी आपल्यासोबत घेवून आले. सडये पंचक्रोशीत या कुलदैवताचे मंदिर कोठेही नव्हते, मात्र अलिकडे सडये गावच्या सीमाक्षेत्र परिसरात आरे या गावी केळबाई देवीची मुर्ती स्थापना करण्यात आली आहे. मुर्ती पाषाणाची असून अतिशय सुंदर आहे. याठिकाणी देवीची नैमित्तिक पुजा, सण-उत्सव मयेकर बांधवातर्फे साजरे करण्यात येतात.
![]() |
सिंधुदुर्गात देवीला बाई म्हणण्याची प्रथा आहे. अवघ्या कोकणातील प्रसिध्द लोकदैवत भराडीला रत्नागिरीत भराडीण देवी असे संबोधतात, तर सिंधुदुर्गात तीला भराडीबाई असे म्हणतात. केळबाईलाही असेच बाई उपनाव लावण्यात आले आहे. देवीचे मुळ स्थान केळ या वृक्षाखाली आहे. त्यामुळे ही देवता भूमका या प्रकारात मोडते. त्यामुळे तिचे प्राचीनत्व अधोरेखित होते. केळीचा वृक्ष या देवीचे मुळ स्थान आहे, म्हणूनच तिला केळंबा असे म्हणतात. पुढे त्याचा नामविस्तार होत केळबाई झाले असावे.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात केळंबा अर्थात केळबाईचे भव्य मंदिर असून तेथे जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा होतो. केळंबा किंवा कळंबा असेही या देवीला म्हटले जाते. कोकणात या नावाला बाई लागल्याने तीचे केळबाई झाले.
- अमोल पालये.
सडये-पिरंदवणे.
सातवी माळ: श्री महालक्ष्मी
सातवी माळ: श्री महालक्ष्मी
सातव्या माळेचं हे दैवत म्हणजे अखंड बसणी पंचक्रोषीसह चाकरमान्यांचा अतीव श्रध्देचा विषय आहे. महालक्ष्मीचा नवरात्रीतला थाट.. महालक्ष्मीचा शिमगोत्सवी रूबाब.. आणि भक्तांमध्ये महालक्ष्मीचा असलेला दरारा.. हे सारंच न्यारं.. भव्य.. विलोभनीय आहे. महालक्ष्मीविषयी लिहावे तेवढे थोडे, बोलावे तेवढे कमी आहे. सातव्या माळेत फक्त महालक्ष्मीचा शोध आणि बोध घेण्याचा प्रयत्न..
बसणी गावातील महालक्ष्मी-रवळनाथ हे देवस्थान सडये-पिरंदवणेसह बारा वाड्याचं ग्रामदैवत आहे. यामध्ये प्रामुख्याने पिरंदवणे, वाडाजून, सडये, बसणी, आरे, काळबादेवी, कासारवेली याअंतर्गत येणार्या अनेक वाड्यांचा समुह महालक्ष्मीचरणी लीन झालेला पहायला मिळतो. (यातील रवळनाथ हा कोकणचा स्वामी आणि शेतकर्यांचा देव आहे. रवळनाथाचा भक्त संपद्राय हा अखंड कोकणात मोजता येणार नाही एवढा मोठा आहे. मात्र या लेखमाळांमध्ये फक्त ‘देवी’ंचा शोध घेत असल्याने महालक्ष्मीचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया.)
रत्नागिरीत महालक्ष्मीची देवालये मोठ्या संख्येने आहे. सडये-पिरंदवणे केंद्रस्थान गृहित धरून कोतवडे बाजारपेठ येथे महालक्ष्मी मंदिर आहे. त्याचप्रमाणे कोतवडे उंबरवाडीतही महालक्ष्मी मंदिर आहे. त्यानंतर हे तिसरे बसणीतील महालक्ष्मी मंदिर. रत्नागिरीत अन्यत्रही महालक्ष्मीची मंदिरे आहेत. बसणी, कोतवडेची महालक्ष्मी जरी मुर्तीस्वरूपात असली तरी काही महालक्ष्मी या निर्गुण-निराकार तांदळा, पाषाण-भूमका स्वरूपात आहेत. बसणीची महालक्ष्मीची पाषाण मुर्ती जितकी देखणी आहे, तितकेच तीचे पालखीतील ‘रूपे’ही विलोभनीय आणि सुवर्णकांतीचे आहे.
महालक्ष्मी म्हटलं की सामान्यत: कोल्हापूरनिवासिनी कथित महालक्ष्मीशी संबंध भाविकांकडून जोडला जातोच. मात्र कोल्हापूरची देवी ही महालक्ष्मी नाहीच, तर ती अंबाबाई आहे. ही अंबाबाई सिंधुदुर्गातील भराडीबाई, केळबाई यांच्या कुळातील असण्याची शक्यता आहे. महालक्ष्मी हे देवीचे रूप म्हणजे विष्णुपत्नी. सामान्यत: विष्णूपत्नी लक्ष्मी म्हटलं की, कमळात विराजमान आणि भक्तांवर कृपाशिर्वाद देणारी शांतमुर्ती. बसणी येथील महालक्ष्मी मात्र तशी न दिसता ती कायम युध्दसज्ज आहे. तिच्या हातात तलवार आहे. एका हातात ढाल आहे. नेत्र रोखून पाहणारे आहेत. ती शांत नाही, ती आक्रमक आहे.. त्यामुळे बसणीची महालक्ष्मी ही क्षेत्रदेवता असण्याची दाट शक्यता आहे. क्षेत्रदेवता असल्याने तीच्यावर क्षेत्राचे रक्षण करण्याचे जबाबदारी सोपवलेली असल्याने ती कायम शस्त्रसज्ज आहे. क्षेत्र देवता म्हणण्याला आणखी एक बाजू मजबूत करते, ती म्हणजे देवीचे पारंपारिक विधी. क्षेत्रदेवतेसंबधी जे जे विधी केले जातात, तेच विधी या महालक्ष्मीसंदर्भात केले जातात. उदा.बळ वगैरे.
आतापर्यंतच्या सहा देवतांमध्ये सर्वांत भक्तप्रियतेचा मान महालक्ष्मीकडे आहे. त्याला कारणही तसेच आहे. सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे महालक्ष्मीचा दरारा प्रचंड आहे. पालखीतून ती चालताना रवळनाथ या पुरुष देवाच्याही पुढे ती चालत असते. हा तिचा दरारा ‘मातृसत्ताक कुटुंबपध्दती’कडे निर्देश करतो, असे म्हणायला हरकत नाही. इथल्या भक्तांची तिच्यावर जितकी श्रध्दा आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक जीव मुंबैकर चाकरमान्यांचा तीच्यावर आहे. तीला खांद्यावर घेवून मिरवण्याची हौस म्हणजे धावपळीतल्या मुंबईकराच्या जगण्याचं ‘टॉनिक’ आहे.
![]() |
| रवळनाथ |
एखांद देवस्थान लोककथांमुळे अधिक लोकप्रिय होतं. बसणीची महालक्ष्मी त्याला अपवाद नाही. तिच्या लोककथा अत्यंत रोचक आहेत.
लोककथा 1.- ती श्री रवळनाथांची बहिण आहे. तर लोककथा 2.- केळये गावातील ग्रामदेवता नवलाई, पावणाई, वाघजाई या तीच्या भावजया आहेत. लोककथा 3.-रवळनाथ-महालक्ष्मी जरी भावंड असली तरी मानवी प्रवृतीचे गुणदोष त्यांना लावत त्यांचे परस्परात वैचारिक मतभेद असल्याचे सांगतात.
या लोककथांचे पालन करण्यासाठी या दोन्ही देवतांच्या पालख्या कधीही समोरासमोर आणल्या जात नाहीत. (वर्षातून फक्त एकदा दोन्ही भावंड, आणि तीन भावजया यांची भेट घडविण्याचा दिव्य सोहळा पार पडतो.) अशी लोककथा आणि प्रथा असणारं हे कोकणातलं एकमेव देवस्थान असेल.
महालक्ष्मीच्या लोकप्रियतेचं आणखी एक कारण म्हणजे तीची आक्रमक वृत्ती. सळसळत्या तरूणाईला शांत नव्हे, आक्रमक नेता आवडतो. (उदा. भारतीय राज्यव्यवस्था) महालक्ष्मी ही आक्रमक आहे. तीच्या हातातील तलवार-ढाल हे शौर्याचे प्रतिक आहे. म्हणूनच महालक्ष्मीच्या बगाडा उत्सवात तरूणाई उभारलेल्या लाटेवर स्वार होवून चित्तथरारक खेळ करते, आणि महालक्ष्मीला अभिप्रेत शौर्याचे दर्शन घडविते.
सुरूवातीला म्हटल्याप्रमाणेच महालक्ष्मीविषयी लिहावे तेवढे थोडेच आहे.. जे सहसा माहित नाही, त्याचा उल्लेख केला आहे. सध्यातरी एवढेच.
-अमोल पालये, सडये-पिरंदवणे.
मो.9011212984.
आठवी माळ: श्री धरणकरीण
आठवी माळ: श्री धरणकरीण
![]() |
| धरणकरणीचे स्थान |
सडये-पिरंदवणे क्षेत्रातील अंत्यत निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या श्री धरणकरणीला आठवी माळ अर्पण करीत आहे. या परिसरातील ही एकमेव जलदेवता आहे. तिच्या नावातच ती ‘जलासरा’ असल्याचे सुचित होत आहे. पिरंदवणेच्या टोळवाडीचा चढ चढला की पुढे मोरेश्वर मंदिराजवळच शिंदेवाडी येथे श्री धरणकरणीचे छोटेसे मंदिर आहे. अतिशय निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे.
![]() |
| धरणकरणी स्थानाशेजारील ग्रामदेव श्री सप्तेश्वराचे निसर्गरम्य मंदिर. |
![]() |
| निसर्गरम्य वाडी |
महसुलीदृष्ट्या शिंदेवाडी हा भाग मु.पो.भावेआडम या गावात येतो, मात्र सडये-पिरंदवणेपासून तो खूपच जवळ आहे. शिंदेवाडीत धरणकरणीचे छोटेखानी मंदिर आहे. मंदिरात मुर्ती नाही, तर तांदळा आहेत. या तांदळा म्हणजेच धरणकरणीचे प्रतिकात्मक रूप. वास्तवात मात्र वाहणारा ओढाच धरणकरीण अर्थात जलदेवी आहे. मंदिराच्या अगदी चवथर्याला लागूनच दगडांमधून पाण्याचा झरा वाहत असतो. पावसात तो मोठा होतो.
ही वाडी म्हणजे जणू दगडांची वीणच. मोठमोठोल दगड, अवघड चढ, त्याला पोखरून केलेल्या पाखाड्या, वाटा आणि चढ उतारात वसवलेली घरं.. बाकी घनदाट जंगल. म्हणूनच टूमदार धरणकरणीचं देवूळ मागे ओढा आणि घनदाट झाडी.. हे चित्र पावसात पाहणे म्हणजे खरोखरच्या धरणकरणीला जवळून पाहण्याचा अनुभव..
कोतवडेतील लावगणवाडी येथेही अशाचप्रकारे नैसर्गिक धरण क्षेत्रात धरणकरणीचे स्थान आहे.
- अमोल पालये, सडये-पिरंदवणे.
मो.9011212984
नववी माळ: श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई
नववी माळ: श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई
रत्नागिरी जिल्ह्यात नवलाई, पावणाई, वाघजाईची अनेक ठिकाणी मंदिरे आहेत. त्यामुळे या तिन्ही देवता सर्वांनाच परिचित आहेत. विशेष म्हणजे केळये गावातील या तिन्ही ग्रामदेवता भूमका स्वरूपातील आहेत, हे त्यांचे प्राचीनत्व अधोरेखित करते. जरी त्या भूमका असल्या तरी त्यांची पालखीतील रूपे ही अतिशय विलोभनीय आहेत. केळये ग्रामी या देवतांची एकाच ठिकाणी मंदिर नाहीत, तर ती वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. सडये-पिरंदवणे गावाची श्री देवी भराडणीपासून सीमा ओलांडली की या तिन्ही देवतांचे कार्यक्षेत्र सुरू होते. अर्थात पलिकडच्या भागात केळये गाव लागते. या तिन्ही देवता आक्रमक आहेत. युध्दसज्ज आहेत. त्यातील वाघजाई ही शौर्यदेवता आहे. पराक्रमी आहे. हे तिच्या नावावरूनच स्पष्ठ होते. ती साक्षात वाघ या वाहनावर बसली आहे, म्हणून तीला वाघजाई म्हणातात.
लोककथेनुसार वाघजाईसह तीन देवतांच्या पालखीला ‘चोर पालखी’ संबोधली जाते. यामध्ये चोरी-मारीचा उल्लेख नसून ‘चोर’ म्हणजे ‘गुप्त’ असा अर्थ अभिप्रेत आहे. पुर्वी वाघजाईची पालखी शिमगोत्सवात ग्रामप्रदक्षिणेला सीमा ओलांडून गावात येई, तेव्हा ती सरळ मार्गाने न येता आडमार्गाने म्हणजेच कातळ-सडा मार्गाने रात्रीची मार्गक्रमणा करे. हा मार्ग अतिशय घनदाट अरण्याचा, दगड-धोंड्याचा खडतर असा आहे. या मार्गावरून सर्वसामान्य सहसा प्रवास करत नसत, तर तो चोरट्या कारवायांसाठी चोरांनाच उपयोग ठरणारा असे. कारण या मार्गाने येणे कोणाच्याही नजरेत येणारे नसे. तद्वत तो ‘गुप्तमार्ग’ ओळखला जातो. या मार्गाने पालखी येत असल्याने तीचे बोलीभाषेत नामकरण ‘चोरपालखी’ असे झाले.
अशा चोरमार्गाने पालखी येण्यासही भलेभक्कम कारण आहे. ते कारणही मजबूत आणि विचार करण्यासारखे आहे. वाघजाई ही वाघावर बसलेली आहे. वाघ हे तीचे वाहन आहे. कोकणात वाघ या प्राण्याप्रती त्यामुळेच श्रध्दाभाव निर्माण झालेला आहे. वाघजाईची पालखी जर सरळ मार्गाने गावतून फिरली, तर तीचे वाहन वाघ याला ते उपद्रव देणारे ठरेलच, शिवाय लोकांनाही ते संकटात आणणारे ठरेल. त्यामुळे जो वाघाचा परिसर आहे, त्याच परिसरातून पालखी गेली, तर वाघजाईच्या वाहनाला कोणताही उपद्रव होणार नाही, असा हा अत्यंत दूरदृष्ट्रीचा विचार या प्रथेत केला आहे, आणि आजही तो कशोशीने पाळला जात आहे.
या तिन्ही देवस्थानचा शिमगोत्सव दणक्यातच साजरा होतो. लोककथांद्वारे नवलाई, पावणाई, वाघजाई या बसणीतील श्री रवळनाथांच्या तीन सौभाग्यवती मानल्या गेल्या आहेत. त्यामुळे बसणी आणि केळये गावचा शिमगोत्सव हा एकत्रित साजरा होत आला आहेच, शिवाय तो शांततेत साजरा होत आला आहे, हे विशेष आणि कोकणातील एकमेव उदाहरण असेल.
अगदी काहीवर्षापूर्वी या तिन्ही सौभाग्यवती देवता आपल्या पतीरायाला भेटण्यासाठी शिमगोत्सवाच्या फाल्गून पंचमीला केळये गावातून भावेआडम, टोळवाड, पिरंदवणे, सडये मार्गे बसणीत येत असत. त्यावेळी त्यांचा येतानाचा थाट.. त्यांचे होणारे स्वागत.. तो जल्लोष.. आणि दोन गावांची एकात्मता.. हे सारं चित्र अचंबित करायला लावणारं असायचं. जेव्हा या तिघी एका पालखीतून येत तेव्हा सारे
‘इन रे इन आणि रवलनाताच्या बायका तीन रे.. होलये..’
असा जयघोष करत तेव्हा आसमंत दणाणून जाई.
काळाच्या ओघात या केळये ग्रामस्थांनी पालखीच्या दिर्घ प्रदक्षिणेला आवर घातला, आणि फक्त बसणी सड्यावरून खाली उतरत बसणीत पालखी आणण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे बसणी वगळता इतर गावांना देवीदर्शनापासून मुकावे लागले. मात्र देवीची ओटी वा दर्शनासाठी या वंचित गावकर्यांनी, महिलांनी बसणीत सानेवर यावे.. तेथे पाहिजे तेवढे दर्शन दिले जाईल, हा पर्याय ठेवला आणि पुन्हा नवलाई, पावणाई, वाघजाई दर्शनासाठी भाविकांचा लोंढा बसणीकडे वाहू लागला.
पुर्वी या तिन्ही देवींची पालखी टोळवाड-पिरंदवणे मार्गे मानाची घरे घेताना बसणीत जाईपर्यंत पहाट व्हायची. मात्र ती परंपरा केळये ग्रामस्थांनी काळाच्या ओघात बंद केली. बदल स्विकारला. हे खरोखरच कौतूकास्पद म्हणावेे लागेल.
सध्या पालखीतून नवलाई, पावणाई, वाघजाई बसणी सडयावरून पंचमीला आपल्या पतीरायांना भेटण्यासाठी सायंकाळी बरोबर सहा वाजता बसणीत सानेवर विराजमान होतात. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ओटी भरणे, दर्शनाचा भव्य सोहळा पार पडतो. त्यानंतर पाच देवतांचा अपुर्व भेट सोहळा पार पडतो. तो शब्दांच्या वर्णानापलिकडचा आहे.
वाघजाई, नवलाई, पावणाई या तिन्ही देवतांच्या मागे ‘आई’ विशेषण लागले आहे, या नावामुळेच सारा जिव्हाळा दाटला आहे.
...
अशारितीने नवदिवस नवरात्रीच्या नव माळांमध्ये सडये-पिरंदवणे परिसरातील सर्व देवतांना एकत्रितरित्या सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यासार्या माहितीमागे विविध ग्रंथ, साहित्य, संदर्भ, लोककथा, सण-उत्सव, निरीक्षण, प्रत्यक्षभेटी यांचा अभ्यास आहे. या नव माळांना आमचे मित्र श्री. संजय मयेकर यांनी आपल्याकडील देखणी छायाचित्रे उपलब्ध करून दिली. त्यामुळे ही मालिका रंगतदार झाली. त्यामुळे त्यांचे विशेष आभार!
या सार्या देवतांचा आणि देवस्थानांचा सखोल शोध यापुढेही असाच चालू राहणार आहे. तोपर्यंत धन्यवाद!
संकलक-
अमोल पालये. सडये-पिरंदवणे.-रत्नागिरी.
मो.9011212984
भुताची शिकार
नव्वदच्या दशकानंतर कोकणातली भूतं फारच कमी होऊ लागली आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे भीती कमी होऊ लागली. ही भीती कमी होण्यासाठी गाववाड्यातून बरेच बदल व्हावे लागले. पुर्वी गावात भुतांचे वसतीस्थान असणारे वटवृक्ष वृक्षतोडीमुळे संपले. गावात तेव्हा वीजही नव्हती. अख्खी रात्र रॉकेलच्या दिव्यावर घालवावी लागे. आता मात्र घराघरातून दिवे लागलेच. शिवाय गावच्या रस्त्यावरही सौरदिवे पेटलेत. रात्री फिरताना आता पूर्वीसारखी भीती उरलीच नाही. मोबाईल, टिव्ही अशी मनोरंजनाची साधनं आली आली, आणि आजी-आजोबांनी सांगितलेल्या भुताच्या गोष्टीही कुणी ऐकेनासं झालं. परिणामी भुतमहात्म्याचे मौखिक साहित्यही लुप्त होत चालले. शिकलेल्या पिढीपुढे पुर्वीसारखे भुत पाहिल्याचे दावेही आता कुणी करत नाही..... तरीही कधीतरी, कुठेतरी भुताच्या गोष्टींना रंग भरतोच. आणि त्या घटना घडलेल्या घटनेपेक्षा अधिक रंगतदार होऊन अविश्वसनीय बनत जातात.
अशीच ही एक भुताची रंगतदार कथा.. फार जुनीही नव्हे, आणि नवीही नव्हे. फक्त नऊ-दहा वर्षापूर्वीची. रत्नागिरी तालुक्यातील शहरापासून जेमतेम बारा-तेरा कि.मीच्या गावातली..(नाव मुद्दाम सांगत नाही.) आजही त्या घटनेची आठवण गावकरी काढतात.. जे भूत मानेवर बसतं.. होत्याचं नव्हतं करतं.. अशा सर्वसत्ताधीश भुताला ठार केल्याची ही रंगतदार कथा आहे. आणि खास त्या गावकर्यांच्याच शैलीत तुमच्यासमोर मांडली आहे..
‘‘...त्याचं काय झालं म्हायत्याय काय.. वैशाखाचं दिवस व्हतं. पावसं जवल आलीला. आनी आगोटीच्या कामाची नुसती वलाटीला धांदल उडाली व्हती. तं त्या दिवसी कोन कलमाचं कवाल तोडीत व्हता.. कोन भाजावलीचं खाजं टाकीत व्हता. आनी सांच्याला काम हुराकलं, तसं सगलं घराशी आलं. मग आंगोल-पांगोल केलीव. राधाकिस्नाची आरत केलीव. आनी जेवया बसलीव. मिट्ट कालोक पडलीला. तं काय सांगू तुमाला, यकायकी कोनसं मोटमोट्यानं हुंकारं मारयाला लागलं.. कोकलू लागलं.. काय कलना नाय म्हनू बाह्यरं बॅटरी मारून बगतलीलं तं कायपन दिसना नाय. कदी उगवतीला आवज येयं व्हता तं कदी मावलतीला.. तं कदी समशानाकडंन पन येय.. सगलीच बावारली. पोराबाला घाबारली. उरात टरकी भरलं असं कोनसं मोट्यानं वरडं.. रडंपन.. काय काय गडी बाह्यरं आलं आनी बगू लागलं, पन काय पन दिसना नाय हो.. पन मग लय रात पडली तसा आवाज थांबला यकदाचा..दुसरा दिवस सुकासुकी गेला. पन रातरी तीच तर्हा. सांजावलं तसं कालचचं कुकारं आयकया येव लागलं. गावात लय कंदाल उटली. सगलं कावकाव करया लागलं.. कोन आसलं नी कोन नाय.. काय पत्त्याच लागत नवता. आता आमचं क्यास यवढं काल्याचं पांढरं झालं, पन असला परकार कदी घडला नवता. गावाच्या खालच्या अंगाला नद लागते. नद वलांडली की सडा. परत वरच्या अंगाला पन सडा. मदी गाव. गावात लायट व्हती, पन रस्त्यावरनं सगला कालोख. रातरीचं बाह्यरं पडयाचं सगलं वांद. आनी या असल्या साडेसातीतनं बाह्यरं पडून काय बगयाचं म्हटलं तं बाया मानसा बाह्यर पडूच देत नव्हती. म्हनीत,
‘‘जाव नका भायरं. भूत हाय तं गावाच्या मानंवर बसया आलीलं.. भूतचं आसं वराडतं.. रडतं.. पंडीबायचं भूत हाय तं.. खानार गावाला. भोगा आता कर्माची फला..!’’
मग कायभूत म्हटल्यावर सगल्यांचीच टरकी उडाली. त्यातनं पंडीबायचं भूत म्हटल्यावर तरण्या पोरांची गालनच उडाली.तं भूत हरपरकारानं गावाला तरास देया लागलं. कधी कुकारं करी.. कदी रडं.. कदी यगलचं क्याक.. क्याक.. आवाज करीत सगल्यांची पाचावर धारन बसवी. सगल्या वलाटीला आडचं टरकी भरवलान व्हती. कदी ढगातनं आवाज येयं, तं कदी झाडावरनं.. कदी घरावरनं येयं.. बरं तितं बगया जाव तं तितं कोनपन नसं. पोराबालांनी ताप घेतलांनी, रातरीची बाह्यर पडनासीचं झाली. लगवीला बाह्यर येयाचं पन वादं झालं. बरं दिवसाचं काय तं कसलापन तरास देत नवंत. रात झाली की तेेचा दिवस झाला सुरू. काय करयाचं तचं कलत नव्हतं... बायकांनी तं नुसता इट आनलानी व्हता. तोंडाला येल तं बडबडत व्हत्या. शिव्या घालून भूताचं तलपाट करीत व्हत्या. त्या बडबडीतनचं या भुताला पंडीबायचं नाव पडलं व्हतं..तं तेचं काय झालं तं सांगता.हं भूत केकाटन्या कैक आदी कदीच्या बर्याच वर्षाची ही कंदाल...! पंडी ही वलाटीची देकणी पोर व्हती. गावातलं लय प्वॉर तिच्यावर लायन मारायचं. पन वलाटीच्या यकापन पोराच्या ती हाताशी काय लागली नाय. ती तिसर्याबरोबरचं पलून गेली. पन पुढं तिच्याबाबतीत लय भयानक आयकायला मिलालं. ती पलून गेल्यानंतर नदीच्या वरच्या आंगाला तिचा मुडदाच गावला व्हता. पोलिसांनी पंचनामा करून तेचा तपास चालू केला व्हता. पुडं काय झालं तं कललंच नाय. आता भूत बनून ती गावाला तरास देतेय.. असी सगल्यानीच काव काव सुरू केलानी.. आनी सगलं आनकीनच घाबारलं. त्यात पंडीवर लायनं मारनारं प्वारं तं अगदीच हडबाडलं. तेनला वाटलं आता पंडी आपल्याला खानार.. पन हं भूत कोनाला खायत पन नवतं, आनी कोनच्या मानवरं पन बसत नवतं.. फकस्त यकच करी, अख्या रानात रडारड.. वरडावरड करून कालजाचं पानी पानी करून टाकी.रोजच असं व्हयाला लागलं. देवाला नारल पन देलीला. पन काय गुन नाय. अशा कंदालीत म्हैना गेला. कसं दिवस काडलीलं तं आमचं आमाला म्हायतं.. घाबरून घाबरून कालजाला भोका पडली, पन भूत काय दमना नाय.. अकेरी अकेरीला काय झालं.. सगलंच चिडलं. म्हनू लागलं,
‘‘ह्यं भूत नाय अवदसा हाय.. ह्येला धडा शिकवाय लागलं..’’
वलाटीचं सगलंच प्वार खवाललं. मेलं सगलं भुताला मारयाचं म्हनू लागलं. पोरा बुदी तेरा.. अशी मेल्यांची अवस्था. आमी शान्यासुरत्यांनी तेनला सांगतलवं,
‘‘बाबानो, असलं काय करया जाव नका, म्हागात पडलं. पन तं प्वारं कसलं आयकतात.. बरकनदार तं. म्हनालं आता कायपन होवं दे, तेची वाट लावयाचीच..’’
पोरांनी जय्यत तयारी केलानी. बंदूका आनलानी. काडतूसा भरलानी. राकेलची केना.. गवताचं पेढं.. दगडी-धोंड.. काय इचारू नका. ती तयारी बगून सगलंच गाववालं तेंच्यात सामील झालं. आता भीती सोपली आनी राग डोसक्यात भरला व्हता..त्या दिवसीची तर्हा...रात झाली, तसा रोजचा परकार सुरू झाला. गेल्या म्हैन्याभराचा अंदाज पोरांनी घेतलांनी व्हता. हं भूत नदीच्या वरच्या आंगाकडच्या सड्यावर र्हात व्हतं. कारन कालोखातनं वरडत.. रडत तं तिकडनचं येयाचं. आनी अक्क्या वलाटीत धुमाकूल घालयाचं. पोरांनी बरोबर निशानी साधलानी व्हती.. कुनी नदीवर र्हायचं.. कुनी सड्यावर पलयाचं.. दगडी कुनी मारयाच्या.. ऍटमबाम कुनी फोडयाचंं.. कुनी काय काय करयाचं.. आसं सगलं ठरलं. वीस-पंचवीस पॉर तरी होतं खलाटीला. बारक्या पोरांनी दगडं-धोंडी पिशव्या भरून गोला केलांनी व्हतं. कदी नवं त्या बायकाही रातोरात घराबाह्यरं पडल्या. कुकार्याला सुरूवात व्हताच पोरांनी आवाजाच्या रोकानं दगडी मारयाला सुरवात केलानी.. वीस-पंचवीस दगडी आपल्या आगानं येताच भूत खवाललं, आनी तेच्या आंगाची आगच झाली. तसं मग तेचं भलं मोटं धुड वरवर फिरताना दिसया लागलं.. सगल्या बायकापोरांनी ‘ह्य बगा.. तं बगा.. तिकडं पलालं.. मारा.. मारा.. ’ असा नसुता किचाट केलानी. त्याबरोबर तं भूत आनकीनचं भडाकलं. बायामानसांचा किचाट... पोरांची दगडफेक.. बरकनदारांचा गोलीबार.. वलाटी नुसती पेटली व्हती! तेच्यात झालं काय, जरा कुटं बसयाला भूताला थाराच मिलाला नाय. कारन जरा कुटं झाडापेडात तं घुसलं की तिथं पोराबाला नुसती दगडी-धोंडं मारून तेला अर्धमेलं करीत..
लोका जेवान-खानं इसरून त्या भूताला सोपवायला बाह्यर पडली व्हती. रात उलटून जाव लागली, तरी तं भूत काय गावत नव्हतं आनी पोराबाला काय दमत नवती. पन दगडी मारून म्हना नायतं बंदुकीनं म्हना तं चांगलच घायाल झालं व्हतं.. आनी जसंजसं घायाल व्हैत व्हतं तसं तसं तं आनकीचनच केकटत व्हतं. तं जसं केकटं तशा बायका नको नको त्या शिव्या घालून तेचं वाटोलं करीत व्हत्या.अकेरीला भूताची ताकद आटपाय लागली. आज असं काय व्हैल असं तेला वाटलं नव्हतं.. पन तं जसं घायाल व्हयाला लागलं तसं तं रडया लागलं आनी नदीकडं धावया लागलं. पोरांनी, बरकनदारांनी तेचा पाटलाग केलानी. सडा चढता चढता पोरांचा भात्या फुगला. दमलं पन व्हतं.. भूताच्या आवाजाच्या रोकानं सगलं सड्यावर आलं. आनी अचानक त्या कालोकात आवाजच बंद झाला.. भूत कुटं गायब झालं, काय कलंना नाय. अक्का सडा पोरांनी काट्याकुट्यातून पिंजलांनी. पन छ्या... खय दिसनां. मग काय सुचलं पोरांनला. सगला सर्वा देलानी पेटवून.. हा धूर आनी आग उटली. म्हनू लागलं,
‘‘आसलं इतं तं जलून जायलं..’’ ..
पन काय चमत्कार झाला, आग जसी भडाकली तसं झालवंडातनं तं भूत परत वर उडालं. आनी केकटू लागलं. त्याबरोबर सगल्यानी एकच कंदाल केली. आता तं चांगलंच हेलबांडलं व्हतं. ताकद तेच्यात उरलीच नव्हती. वरच्या वर फडफडत व्हतं.. केकटत व्हतं.. रडत व्हतं.. बरकनदारांनी तिच संधी साधलानी.. नेम धरलांनी. धडाधड गोल्या मारलांनी!गेलं महिनाभर गावाला तरास देनारं ह्य भलं मोटं भूत धापकन खाली पडलं. सगल्यांनी यकच धाव घेतलानी. भूत खाली पडताच आनकी चारपाच गोल्या घातलानी. अकेरीच्या मरनाचा केकाट आला. भूत मेल व्हतं..! व्हय भूत मेलं होतं!! सगल्या बायकांनी शिव्या घालून तेला अभिशेक केलांनी आनी पायातल्या खेटरांनी तेची पूजा केलानी. सगल्यानी मग गवताच्या सर्व्यातच भूताला कांड लावून मुठमाती देलानी..
अशी ही चक्क भुताच्या शिकारीची कथा.कुकारं करणारं.. रडणारं.. चित्रविचित्र, बिभत्स आवाज काढत आक्रोश करणारं हे भूत म्हणजे दुसरं तिसरं कुणी नव्हतं. ते होतं एक मादी जातीचं बलाढ्य पंखाचं हिंस्त्र घुबड! या लक्ष्मी वाहन घुबडाला दिवसाचं दिसत नाही. फक्त रात्रीचं दिसतं. वलाटीला ते केवळ रात्रीचा त्रास देण्यामागे कारण हेच होतं. या मादी जातीच्या घुबडाची बहुधा शेताच्या बांधावरच्या कलमात ढोली (घरटं) होती. कवळ तोडल्यानं (कलम तोडल्यानं) ते घरटं अंड्यासहित नष्ट झालं. त्या गोष्टीची त्या काहीशा हिंस्त्र प्राण्याला भारी चीड आली. आपल्या अस्तित्वालाच... रहिवासालाच धोका निर्माण झाल्यावर हल्ली कोकणात बिबट्याची धाड थेट घरात घुसण्यापर्यंत पडू लागली आहे, हे आपण ऐकले असाल. हीच परिस्थिती त्या मादी जातीच्या घुबडाबाबत घडली. वलाटीला त्रास देण्यामागे हेच कारण होतं.
आता घुबडाचा आक्रोश.. म्हणजे हुंकारणं.. रडणं.. वगैरे.. याबाबत बोलायचे म्हटले तर घुबड हे असेच विचित्र ओरडते की, एखाद्या कमजोर माणसाला त्याच्या ओरडण्याने हार्टऍटकही येण्याची शक्यता असते. तर अशा या घुबडाला त्या गावकर्यांनी भूत समजून केवळ अज्ञानापोटी मारले. ...अशा या कथेला तुम्ही भूताची कथा म्हणायचे की एक पर्यावरण कथा? याचा निर्णय वाचकांनी आपआपल्या रसिकतेनुसार घ्यावा.
- अमोल पालये.




































No comments:
Post a Comment