Thursday, February 29, 2024

शिवमंदिर – ओढा (नाशिक)

 

 

 https://bhatakbhavani4216.wordpress.com/2021/01/13/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0-%e0%a4%93%e0%a4%a2%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95/

काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वर फिरणारा एक फोटो आणि सोबत, “नाशिकरोड जवळील ओढा गावातील शिवमंदिर” इतकीच माहिती मिळाली.. पण याच्या पुढे काहीच माहिती सापडत न्हवती. मग काय अचानक बेत करून आपली भटक भवानी काढून नाशिकचा रस्ता धरला..
मुंबई – आग्रा हायवे ने नाशिक गाठून नंतर निफाड, ओरंगाबाद रस्त्यावरच ओढा गाव आहे. गावातील गोदावरीच्या काठावरील गणेश घाट आणि श्री सिद्धिविनायक मंदिरासाठी गाव प्रसिद्ध आहे. गावातील छत्रपती शिवाजी महाराज ग्रामपंचायत कार्यालयाजवळून एक रस्ता गणेश घाटाकडे जातो, याच रस्त्यावर डाव्या बाजूला हे जीर्ण शिव मंदिर आहे. मंदिराचा कळसाचा भाग कोसळला असून उर्वरित मंदिर सुद्धा खंडर बनलेले आहे. मंदिरासमोर कोण्या गोसाविबुवांची समाधी आहे. समाधीसमोर दिवाबत्तीची सोय केलेली आहे. मात्र समाधी नेमकी कोणाची याविषयी माहिती मिळत नाही. काही पायऱ्या चढून समाधीवर आले असता समाधीवर एक शिवलिंग ठेवलेले आढळते. हे बघून मंदिराकडे यायचे. तीन-चार फूट उंचीच्या पिठावर हे मंदिर उभारलेलं आहे. मंदिरात प्रवेश केला की आधी आतून निघणारा चिमण्यांच्या थवा आपले स्वागत करतो. मंदिराच्या बाहेरील भागातील खांबांच्या वर आपल्याला मंदिराच्या छताचा बाबर तोलणारे यक्ष आहेत.
मंदिर मुखमंडप आणि गाभारा असे दोन भागांचे असावे. बाहेरील भागात दोन्ही बाजूंना दोन देवकोष्टके आहेत मात्र ती रिकामीच आहेत. मूळ स्तंभांच्या सोबतच टेकू म्हणून एक लाकडी स्तंभ इथे लावलेला आहे. गाभाऱ्याच्या चौकटीवर ललाट पट्टीवर श्रीगणेशाचे शिल्प आहे. त्याच्या वर अजून एक श्री गणेश कोरलेले असून ही मूर्ती #उजव्या_सोंडेची आहे.
हे बघून आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो. मध्यभागी साधारण १२ खांबाचा चौकोनी असा गाभारा इथं तयार झालेला आहे, भग्नावस्थेत गेलेल्या मंदिरात पूज्य देवता किंवा शिवलिंग नाही. सध्या ही जागा रिकामीच आहे, गाभाऱ्यातील शिवलिंगच जागेवर माती आणि दगड आहेत. गाभाऱ्याच्या मागील बाजूला एक खिडकी/ वातायन आहे. याच्या चौकटीवर खालील बाजूला देवी चे शिल्प आहे. गाभाऱ्यात आजूबाजूला मात्र कोळी, उंदीर या प्राण्यांचेच साम्राज्य आहे.
मंदिर भग्नावस्थेत असल्याने इथं कोणीच फिरकत नाही, म्हणूनच की काय वाढलेल्या झुडपात सध्या साप आणि इतर प्राण्यांनी आपला ठाण मांडलेला आहे.
गणेश घाटावर नवीन शिवमंदिर, हनुमान मंदिर, गणेश मंदिर आणि प्रशस्त बांधलेला घाट इतकं सगळं बघितलं की मग हा प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा असा दुरावस्थेत का? अस प्रश्न आपल्याला नक्किच पडेल. ओढा गावात श्री गणेशांच्या दर्शनाला जाणारी भाविकांनी एखादा क्षण इथं थांबून या शिवमंदिराचे देव दर्शन नाही तरी देऊळ दर्शन करायला हरकत नाही.

शिवमंदिर
गोसाविबुवांची समाधी आणि शिवमंदिर
मुखमंडपाचे स्तंभ
मुखनमंडपातील स्तंभावरील यक्ष मूर्ती
मुखमांडपातील मूळ स्तंभ,त्या शेजारी लाकडी खांब, आणि मागे रिकामी देवकोष्टक
रिकामी देवकोष्टक
गाभाऱ्याची द्वारशाखा
ललाटबिंब/गणेश पट्टीवरील उजव्या सोंडेचे श्री गणराज
१२ खांबी गाभारा,
मूर्तीविरहित रिकामी गाभारा
वितान – छत
वातायन – खिडकी
खिडकीच्या चौकटीवरील शिल्प
मंदिरासमोर समाधी
गणेश घाट आणि मंदिरे
श्री शिवमंदिरे
ओढा गाव याच श्री सिद्धिविनायक मंदिरा साठी प्रसिद्ध आहे.

टिम : भ्रमणगाथा Fearless Explorer’s. Cont 9137132689

 

तातोबा मंदिर, ओढा | Tatoba Temple, Odha | Discover Maharashtra

Discover Maharashtra

तातोबा मंदिर, ओढा | Tatoba Temple, Odha

नाशिक हे गोदावरी नदीच्या काठी वसलेलं एक प्राचीन शहर आहे. या शहरात तसेच परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. यातील काही वास्तू आज चांगल्या स्थितीत आहेत तर काही काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नाशिकहुन निफाडकडे जाताना साधारण १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओढा गावातील अशीच एक ऐतिहासिक वास्तू आज अखेरच्या घटका मोजत आहे.तातोबा मंदिर, ओढा(Tatoba Temple)

गोदावरीच्या कुशीत पहुडलेलं ओढा तसं लहानसं गाव. नाशिकच्या पंचवटीमधील प्रसिद्ध काळाराम मंदिराचा जीर्णोद्धार करणारे रंगराव ओढेकर याच गावातील. गावातील आजमितीला जमीनदोस्त झालेल्या ओढेकरांच्या वाड्याच्या मागील बाजूस असलेले तातोबा मंदिर आज विस्मृतीत गेले आहे. मंदिराची पडझड होत असून काटेरी झुडुपांनी मंदिराला वेढा घातला आहे. पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित स्मारकात समावेश असूनही ही वास्तू पूर्णपणे दुर्लक्षित राहिली आहे.

मंदिराचे बांधकाम साधारण १३-१४ व्या शतकातील असावे असे वाटते. गावातील तातोबानावाची व्यक्ती इथे कायम दिवे लावीत असे त्यामुळे या मंदिराला तातोबा मंदिर हे नाव पडले असे ग्रामस्थ सांगतात. पण खरं तर हे मंदिर नाही कारण आत कुठल्याही देवतेची मूर्ती नाही. प्राचीन काळात हा ऋषीमुनींचा मठ असावा व अध्ययन-अध्यपनासाठी या वास्तूचा वापर होत असावा असे अभ्यासक सांगतात. मंदिरा समोर कुण्या अनामिक सत्पुरुषाची समाधी आपल्या नजरेस पडते.
स्थानिकांसोबतच पुरातत्व विभागाने देखील दुर्लक्ष केल्याने आज ही वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. नाशिकच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या वास्तू आपला वैभवशाली इतिहास सांगत आहेत. केवळ आवश्यकता आहे तो संवाद साधन्याची.

रोहन गाडेकर

 

निळकंठेश्वर महादेव मंदिर, देवघर | Discover Maharashtra

Discover Maharashtra

निळकंठेश्वर महादेव मंदिर, देवघर | Nilkantheshwar Mahadev Temple, Deoghar

निळकंठेश्वर महादेव मंदिर, देवघर | Nilkantheshwar Mahadev Temple, Deoghar –

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात नाशिकपासून साधारण ४० किलोमीटर अंतरावर असणारं देवघर तसं अगदी छोटसं गावं. जेमतेम हजार लोकवस्ती असणाऱ्या या गावात एक प्राचीन वास्तू आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे. निळकंठेश्वर महादेव या नावाने ओळखले जाणारे निळकंठेश्वर महादेव मंदिर मंदिर नाशिकच्या समृद्ध इतिहासाचे साक्षीदार राहिले आहे. Nilkantheshwar Mahadev Temple, Deoghar.

उत्तराभिमुख असणाऱ्या या मंदिराचा आजमितीस केवळ अंतराळ व गर्भगृहाचा भाग शिल्लक आहे. गर्भगृहात आज एक मूर्ती उभी असून झीज झाल्याने मूर्ती ओळखणे कठीण झाले आहे. मंदिराचे शिखर फासना शैलीतील म्हणजेच उतरत्या पायऱ्यांचे आहे. याच स्थापत्य शैलीतील मंदिरे आपल्याला त्रंबकेश्वर जवळील अंजनेरी गावात देखील बघायला मिळतात.

पुरातन निळकंठेश्वर मंदिरा समोरच आता ग्रामस्थांनी नव्याने मंदिराचे बांधकाम केले आहे. मंदिरात पुरातन मंदिरामधील निळकंठेश्वर महादेवाची प्रतिमा ठेवलेली दिसून येते. मंदिर परिसरात आपल्याला काही मूर्ती, वीरगळ, शिवलिंग, नंदी व इतर भग्नावशेष नजरेस पडतात. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिभावाने महादेवाचे दर्शन घेतात.

रोहन गाडेकर

 

नागेश्वर शिवमंदिर, कर्जत | Nageshwar Shiva Temple, Karjat | Discover Maharashtra

Discover Maharashtra

नागेश्वर शिवमंदिर, कर्जत | Nageshwar Shiva Temple, Karjat

नागेश्वर शिवमंदिर, कर्जत –

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत हे एक तालुक्याचे ठिकाण असून नगर जिल्ह्यापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर आहे. अलीकडच्या काळात कर्जत शहराची ओळख शिक्षण पंढरी अशी होत असली तरी प्राचीन काळापासून या शहराला ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली आपणास दिसून येते. येथील पुरातन मंदिरे पाहिल्यानंतर शहराच्या समृद्ध व वैभवशाली इतिहासाची आपल्याला जणू खात्री पटते.

शहरातील पूर्वेकडील भागात नकटीचे देऊळ म्हणून ओळखले जाणारे यादवकालीन शिवमंदिर आहे. हे मंदिर भारतीय पुरातत्व खात्याने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. समोरच मल्लिकार्जुन या नावाने ओळखले जाणारे आणखी एक पुरातन मंदिर असून दोन्ही मंदिरापासून साधारण शंभर मीटर अंतरावर नागेश्वर नावाने ओळखले जाणारे शिवमंदिर आहे. ही सर्व मंदिरे आजही शहराच्या समृद्ध सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देत आहेत.

नागेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असून नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गाभारा अशी मंदिराची रचना आपल्या नजरेस पडते. मंदिराची रंगरंगोटी करण्यात आलेली आहे तसेच गर्भगृहावरील शिखर नव्याने बांधले गेले आहे. मुखमंडप कक्षासनयुक्त असून दोन वामन स्तंभावर तोललेला आहे. सभामंडपात चार स्तंभ आहेत. गर्भगृहात आपल्याला दक्षिणोत्तर नागेश्वर महादेवाचे शिवलिंग नजरेस पडते.

मंदिराच्या डाव्या बाजूला सतीशिळा, वीरगळ, नागशिल्पं व काही शिल्पांवशेष आपल्याला दिसतात. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर परिसरात आपल्याला अनेक नागशिल्पं नजरेस पडतात. गावोगावी दिसणाऱ्या ह्या नागशिल्पांचा नेमका अर्थ आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासातून मिळतो.

नागवंशीय लोक जेव्हा आपल्या धर्मप्रचारासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी आपल्या राजांची आठवण म्हणून मोठ्या मोठ्या शिळांवर या राजांची प्रतिमा कोरली. मध्ययुगीन काळात याच नागशिल्पांचा वापर मंदिरावर देखील करण्यात येऊ लागला. ह्यात काळानुसार अनेक बदल होत गेले आणि नागपंचमी ह्या सणाला हीच नागशिल्प जी कधीकाळी नागराजांची आठवण होती नागपंचमीच्या सणाला पुजली जाऊ लागली.

– रोहन गाडेकर

 

 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...