लेखक: रुपेश प्र. मयेकर.
दर रात्री तुम्ही तुमच्या घरी एखाद्या सोफ्यावर, खुर्चीवर बसून किंवा
पलंगावर, गादीवर झोपून माझ्या गोष्टी वाचता, तुमच्या साठी हे किती सोप्पं
आहे ना! पण तुम्हाला जराही कल्पना आहे का? तुमच्या घराबाहेर, त्या काळोख्या
अंधारात रात्रीच्या वेळी काय घडतं ते? तुमच्या प्रत्येकांच्याच घरापासून
जास्त दूर तर नक्कीच नाही, पण तिथे एक रात्रीची निपचित पडलेली जागा मात्र
नक्कीच असते. तुम्ही त्याच्या बाबतीत जास्त जाणत नसाल, पण, 'तो' तिथेच
त्याच जागी असतो. सर्व मोठ्या शहरांत आणि छोट्या गावांतही, अशा अनेक मानव
विरहीत एकाकी जागा असतातच जिथे 'तो' वास करतो.
'बागुलबुआ'
लेखक: रुपेश प्र. मयेकर.
प्रकाशन: १०-०१-२०१८
©RUPESH MAYEKAR ®2017
(या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षीत आहेत.)
कथा: काल्पनिक/भयकथा.
लहानपणी मी छोट्याश्या गावात राहत होेतो. तिथे लोकवस्ती फार कमी होती.
साहजिकच तेथील घरेही फार दूर-दूर होती. माझी आई मला संध्याकाळची दूध किंवा
बिस्किटे आणायला म्हणून दुकानात पाठवायची. पण त्या दुकानापर्यंत
जाण्यासाठी मला एक मोठा एकाकी रस्ता चालावा लागत असे. दिवसा तो,
आंब्याच्या, वड-पिंपळांच्या, चिंचा-जांभळांच्या जुन्या झाडांच्या सावलीत
झाकलेला साधारण रस्ताच वाटायचा. मी तेव्हा, त्या रस्त्याला अजिबात घाबरत
नसे, पण रात्रीच्या भयाण शांततेत तो रस्ता भितीदायक, अंगावर भितीने शहारे
आणणारा, हात-पाय गारठवणारा असा झपाटलेला भासत असे.
तिथे जवळपास कोणतीच वस्ती नव्हती, तिथे कसलेही रस्त्यावरचे दिवेही
नव्हते. तिथे अतिशय काळोख होता, इतका काळोख कि अंधार या शब्दालाही लाजवेल.
इतका अंधार, जो संपूर्ण रात्रीलाच गिळून टाकेल. रस्त्या कडेला वाढलेली उंचच
उंच झाडे रात्रीच्या चंद्र आणि ताऱ्यांचा उजेडही अडवत होती, त्यामुळे
मनात नसूनही त्या जागेवरुन हळू-हळू रस्ता चाचपडत चालावे लागत असे. तो अनुभव
एखाद्या भुयारातून चालण्या सारखाच असे. नजर पोहोचेल तिथवर कोणतीच जाग
नाही. पाठीमागे मात्र घरांचा आपल्यापासून दूर-दूर जाणारा उजेड. जेव्हा
जेव्हा रात्रीचं मला त्या मार्गाने जावं लागे, तेव्हा तेव्हा माझ्या अगदी
जिवावर येई. मी फक्त एकच प्रार्थना करत असे, माझ्या सोेबत कुणीतरी गावातलं
असावं, जेणे करुन मला तो रस्ता एकट्याने पार करावा लागू नये. पण माझ्यासोबत
कोणीही येत नसे. मी जेव्हा तो संपूर्ण झपाटलेला रस्ता एकटाच चालत असे,
तेव्हा माझी नजर बाजूच्या झाडांवर स्थिर असे. त्या झाडांमागून मला कोणी
पाहत तर नसेल ना? किंवा तिथे कोणी लपून माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत
तर नसेल ना? तिथे 'तो' नक्कीच असू शकतो. हो, कारण माझी आई सुद्धा मला
त्याच्या बद्दल नेहमीच सांगायची. तो कशा प्रकारे झाडांमध्ये लपून बसतो. आणि
रस्ता चुकणाऱ्या लहान मुला-मुलींवर कशाप्रकारे हल्ला करतो! हो तो तोच
ज्याला सगळे जण 'बागुलबुआ' म्हणतात.
माझ्या डोळ्यांच्या कडेने कदाचीत मला त्याची विचित्र आकृती कोणत्याही
क्षणी दिसू शकते. जी त्या अंधाऱ्या भागातून माझ्याकडे पाहत असेल. जी
अचानकच माझ्यावर झेपावेल. मला फरफटत त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत
घेऊन जाईल. माझ्या शरीरावरची चांबडी अक्षरश: कपडे फाडावेत तशी तो चिरेल.
माझी अशी अवस्था करेल, जी मी बोलूही नये आणि या सर्व गोष्टींचा कोणाला
पत्ताही लागणार नाही. मला खात्री नव्हती, कि मला त्या अंधारात नक्की कोणती
आकृती पहायला मिळेल. पण माझे विचार, ते दिवसेंदिवस अजूनच सखोल होऊ लागले
होते. माझ्या मनात त्याची आकृती आपोआपच जन्म घेत होती. तो एखाद्या माणसा
सारखाच असेल पण तो खुप उंच असेल, त्याचा चेहरा एखाद्या कवटी सारखा असेल.
त्याच्या तोेंडात लहान मुलांच मांस खाणारे तिक्ष्ण दात असतील. त्याच्या
हाताच्या पंजांना मोठी धारदार नखे असतील. त्याचे आग ओकणारे डोळे असतील. तो
लपून हल्ला करणारा असल्याने त्याने एखादं घोंगड पांघरलेलं असेल. मला सारखं
वाटायचं, तो त्या झाडांमागे त्यांच्या बुंध्या आड लपलेला असेल. जो कसलाही
आवाज न करता झाडामागून येऊन रात्रीच्यावेळी एकट्याने त्या रस्त्याने
जाणाऱ्या लहान मुला-मुलींना उचलून घेऊन जात असेल.
एके रात्री तर, त्याने मला अक्षरश: पकडलेच होते. मी त्या रस्त्याने
त्या रात्री एकटाच चालत होतो. समोर नेहमीसारखाच काळोख होता. तेव्हा मला
त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली. मला जाणवलं तो तिथे काळोखात माझी वाट
पाहत होता. मी धावायला सुरुवात केली. मला त्याच्यापासून दूर पळायचं होतं,
पण मला जाणवत होतं, तो माझ्या पाठीच होता. मी जोर-जोरात धावू लागलो. त्याचे
गरम श्वास मला माझ्या मानेवर स्पष्ट जाणवत होते. मी धावलो. जेवढं शक्य,
तेवढ्या ताकदीने धावू लागलो. मी तोपर्यंत थांबलो नाही, जोपर्यंत माझं घर
मला दिसलं नाही. त्याने जवळ जवळ मला पकडलेच होते. पण मी कशी तरी त्याच्या
तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेतली होती. मी घरी जाऊन कपाटाच्या आरशा समोर
उभा राहीलो. मी घामाघूम झालो होतो. माझे हृद्य इतके धडधडत होते जणू ते
कोणत्याही क्षणी माझ्या तोंडून बाहेरच पडेल. आरशा समोरुन जाता-जाता मला
माझ्या शर्टाच्या कडेला काहीतरी दिसलं. मी आरशाकडे पाठ करुन मान जमेल तेवढी
वळवून माझं शर्ट निरखू लागलो. आणि मला आश्चर्याचा झटकाच बसला! माझं शर्ट
पाठून कोणीतरी धारदार शस्त्राने फाडलं होतं. मला एकदम धडकीच भरली. मी
किंचीतशा अंतराने वाचलो होतो. तेव्हा पासून मी त्या रस्त्याने एकटं जायचं
बंदच करुन टाकलं.
'एखाद्या रात्री मी घरी आलोच नाही तर!' मी आईला कळवळून सांगत होतो. ती
माझ्यावर जोरजोरात हसू लागली. काय मुर्खा सारखा बोलतोस? ती माझी समजुत
काढू लागली.
'तिथे रात्रीचं, अंधारात कोणीतरी असतं.' मी तिला माझं म्हणणं पटवून देत होतो.
तिथे कोणीही नाही बाळा! ति माझी समजूत काढतच होेती. कारण, तिने मला
सांगितलेल्या बागुलबुआच्या कथा या काल्पनिक होत्या याची तिला जाणीव होती.
माझे कपडेही अंधारात एखाद्या झाडा-झुडपात अडकून फाटले असणार याचीही तिला
खात्री होती.
या मोठ्या माणसांना या जगाबद्दल काय माहीत आहे? जे आम्हा लहानांना
जाणवतं ते या मोठ्या माणसांना का पटत नाही? हि मोठी माणसच आधी या
'बागुलबुआंच्या' कथा आम्हाला सांगतात मग आम्हाला आलेले अनुभव त्यांना खोटे
का वाटतात? मला माहीत होेतं, मी माझं म्हणणं या वयाने मोठ्या असलेल्या
माणसांना कधीच पटवून देऊ शकत नाही. पण मला हेही माहीत होतं, त्या अंधारात
त्या झाडांमागे कोण लपून आहे ते.
आज या गोष्टीला खुप वर्ष होऊन गेली. मी सुद्धा या गोष्टी जवळ-जवळ
विसरुनच गेलो आहे. आज माझे फेसबुक वर मोठे हॉरर ग्रुप आहेत, माझे हॉरर पेज
आहेत. पण तरीही मी या लहानपणीच्या गोष्टी विसरुन गेलो आहे.
पण काल एक बातमी अचानक माझ्या कानी पडली. जि ऐकून माझ्या मनाच्या
पुस्तकातील पाने सर्रकन् मागे फिरली. मी ज्या रस्त्याला लहानपणी घाबरायचो,
त्याच रस्त्यावरुन एक लहान मुलगा काही दिवसांपूर्वी गायब झाला होता. कालच
त्याचा मृतदेह त्याच झाडांमध्ये काही जणांना आढळला. त्याच्या शरीरावर
तिक्ष्ण नखांचे वार झाले होते. सर्वांनी त्याला पाहून हाच अंदाज मांडला कि
त्याच्यावर एखाद्या जंगली प्राण्याने हल्ला केला आहे. त्याची अशी अवस्था
केली आहे कि, त्याची कोणी ओळखही पटवू शकत नाही.
माझ्या मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेल्या आठवणी आज पुन्हा ताज्या
झाल्या आहेत. मला माहीत आहे त्या मुलाला कोणी मारलं आहे. त्या मुलाला
नक्कीच माझ्या इतकं जोरात पळता आलं नसणार. तो त्याच झाडाआड लपून बसलेला
असणार आणि त्याने त्याला पकडलं असणार. तो दुसरा तिसरा कोणीही नाही. माझी
लहानपणीची भिती, 'बागुलबुआ' च आहे.
आज मी तिथे राहत नाही. पण अजूनही मला अंधाऱ्या एकाकी जागेची भिती ही
वाटतेच. मला सारखं वाटतं, त्या अंधाऱ्या जागेतून ते डोळे माझा वेध घेत
आहेत. कारण मला खात्री आहे, तो अशा सर्वच ठिकाणी आहे. शू~~~~ कदाचीत
आत्ताही तुमच्या घराबाहेर तो तुमची वाट पाहत अंधारात दडून बसलेला असेल.
समाप्त.
चार हडळी'
लेखक: रुपेश प्र. मयेकर.
प्रकाशन: ११-०१-२०१८
©RUPESH MAYEKAR ®2017
(या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षीत आहेत.)
हि फार जुनी गोष्ट आहे. शहरापासून लांब एक छोटंस गाव होतं. त्या
गावाला जोडणारा एकूलता एक असा कच्चा रस्ता होता. त्या रस्त्याच्या कडेलाच
एक चिंचेचे भले मोठे झाड होेते. त्या झाडावर चार हडळी राहत होत्या. त्या
तशा वाईट नव्हत्या, पण माणसांना घाबरवायला त्यांना खुपच आवडायचं. गावाला
जोडणारा तो एकूलता एक रस्ता असल्याने, गावकऱ्यांनाही नाईलाजाने तेथूनच
ये-जा करावी लागत असे. पण त्या हडळी गावकऱ्यांना इतक्या घाबरवत कि गावातील
कोणीही तिथून एकटं-दुकटं चालायची हिम्मतच करत नसे. गावकऱ्यांनी खुप
प्रयत्न केले, अनेक तांत्रिक-मांत्रिक बोलावले. पण तेही त्या हडळींची करामत
पाहून पाठीला पाय लावून पळाले. शेवटी ते झाड तोडायचंही काहींनी ठरवलं, पण
प्रत्यक्षात तिथे जायला मात्र कोणी तयारच नसे. शेवटी हिम्मत करुन अख्ख गाव
एके दिवशी तिथे चिंचेच्या झाडाजवळ पोहोचलं. त्यांनी त्या झाडावर कुऱ्हाडी
मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे कुऱ्हाडी पकडलेले हात, त्यांवर
त्यांना चेटकीणींच्या हातांचा स्पर्श झाला आणि सगळे गावकरी घाबरुन पळून
गेले. गावकऱ्यांचा तोही डाव फसला.
त्या गावात एक अतिशय साधा मुलगा रहायचा, त्याचं नाव होतं 'रुप्या'. 😆
गावातील सगळेच जण त्याच्या साधेपणावर हसत असत. गावातील लोकच काय? तर त्या
चार हडळींचाही तो एक खेळणच होता. गावातील लोक गावाबाहेर त्या रस्त्याने
जाताना नेहमीच झुंडाने जात. पण रुप्या सोबत मात्र मुद्दामूनच कोणीही येत
नसे. त्याला बिचाऱ्याला जिव मुठीत घेऊन तिथून एकट्यालाच जावं लागे. आणि
त्याची वाट बघत तिथे त्या हडळी असायच्याच. कधी चित्र-विचित्र आवाज करुन, तर
कधी प्रत्यक्षात त्याच्या समोर येऊन त्या त्याला घाबरवत.
एके दिवशी रुप्याला गावात परतायला जरा उशीरच झाला. त्याच्या
ध्यानी-मनी त्या हडळीच! तो जरा चाचपतच तिथे जाऊ लागला. रात्रीचा काळा कुट्ट
अंधार, त्यात थंडीचे दिवस. त्याने लांबूनच त्या चिंचेच्या झाडाकडे त्याची
नजर फिरवली. त्याला तिथे त्या चिंचेच्या झाडा खाली कोणीतरी दिसले. पण ते
त्या हडळींपैकी कोणी नव्हंत. त्याच्या हातात रॉकेलवर पेटणारा दिवा होता. तो
एक साधू होता. आता रुप्याला सोबत मिळणार होती. त्याला थोडा धिर आला,
म्हणून तो धावतच त्या साधूच्या दिशेने गेला. इतक्यात चिंचेच्या झाडावरुन
त्या हडळी सरसरत खाली उतरल्या. त्यांनी त्या साधूला घेरलं. रुप्या आल्या
पावली तसाच पाठी फिरला. तो दुसऱ्या एका झाडाआड लपून ते दृष्य पाहू लागला.
तिथे, त्या हडळी चित्र विचित्र आवाज करु लागल्या. आपले रुप बदलू लागल्या.
झाडा सभोवताचं वातावरणही बदलून साधूला घाबरवू लागल्या. पण त्या गोष्टींचा
त्या साधूवर मात्र काहीच परिणाम झाला नाही. उलट रागाने त्या साधूनेच त्या
हडळींना श्राप दिला. 'मी तुम्हाला श्राप देतो. तुम्हाला माणसांना उगाचच
छळायला मजा येते ना? मग, आज पासून तुम्ही कोणत्याही माणसाशी काहीही बोलायचा
प्रयत्न करायचा नाही. तुम्ही ज्या माणसा समोर तुमचे शब्द उच्चाराल, त्या
माणसाच्या तुम्ही कायमच्या आज्ञेत रहाल. तो जे बोलेल ते तुम्हाला आयुष्यभर
ऐकावं लागेल. तो जे बोलेल ते तुम्हाला करावं लागेल.' असं म्हणून तो साधू
तिथून रागा-रागातच निघून गेला.
त्या हडळी तिथेच दु:खी होऊन बसल्या. घडला प्रकार रुप्या थोड्या
अंतरावरुन पाहत होताच. त्याला घरी जायचं होतं, पण त्या हडळी तिथेच बसून
होत्या. अखेर बऱ्याच वेळाने थोडीशी हिंम्मत करुन रुप्या त्या झाडा जवळून
मान खाली घालून गेला. त्या हडळींनी इतक्या वर्षात आज पहील्यांदाच रुप्याला
घाबरवण्याचा एक साधा प्रयत्नही केला नव्हता. रुप्याच्या हे लक्षात आलं.
म्हणजे साधूचा श्राप? किमान त्या श्रापाला त्या घाबरल्या तरी होत्या.
रुप्या दोन पावलं मागे आला. त्याने त्यांच्याकडे पाहीलं. हिच वेळ होती,
दरदिवशी असं घाबरत-घाबरत राहण्या पेक्षा आज काय ते होऊनच जाऊ दे. असला-नसला
सर्व धीर एकवटवून रुप्या त्यांच्या जवळ गेला. चंद्राच्या उजेडात तर त्या
फारच भयानक वाटत होेत्या. त्यांच्या श्वासांचा आवाज काही पावलं दूरही
स्पष्ट ऐकू येत होता. तो आवाज एखाद्या मांसाहारी प्राण्यासारखा भितीदायक
वाटत होता.
'मी तुमचं काय बिघडवलय? तुम्ही मला का सतावता?' रुप्याने त्यांना विचारले.
त्यांचे श्वास वाढत होते. त्यांना फार राग येत होता. त्यांचे डोळे
रागाने मोठे झाले होते. पण त्या अजूनही झाडाखाली बसूनच होत्या.
'इथे तुम्ही मला घाबरवता, आणि तिथे गावातले. ते माझ्या साधेपणावर
हसतात. पावला-पावलांवर माझी खेचतात. माझ्या सारख्याने जगावं तरी कसं?'
हे ऐकताच त्यांतील एक हडळ जागेवरच धाडकन् उभी राहीली. ती रागाने तळमळत
होती. ती त्याला खाऊ कि गिळू करु पाहत होती. रुप्या घाबरुन दोन पावलं मागे
झाला.
इतक्यात दुसरी हडळ उभी राहीली, ती पहीलीला शांत करत म्हणाली, 'अे
त्याच्याची अजिबात बोयलू नतो. माइत आए ना त्या शादूचा श्लाप!' 😦😧
हे ऐकून पहीली हडळ बोलली, 'मी कुते काय बोयली?' 😕😠😬
त्यावर तिसरी हडळ धाडकन् उभी राहून रागात बोलली, 'अले तू बोयली ती बोयलीश, पन तू का बोयलीश?' 😣😡😤
त्या चार हडळींपैकी तिन हडळी, लुलब्या भाषेत का होईना रुप्या समोर बोलल्याच.
हे सर्व पाहत असलेली चौथी हडळ जागेवर बसूनच जोर-जोरात हसू लागली. तिला
हसताना पाहून त्या तिघी एकमेकांशी रागात बोलू लागल्या. 'अले इला काय जालं
हशायला?' 😕😑
चौथी हडळ म्हणाली, 'तू बोयलीश, तू बोयलीश आनि तू पन बोयलीश. पन मी नाय बोयली.' 😄😅
त्या चारही हडळी मुर्खपणामुळे म्हणा, किंवा त्यांच्या अल्लड
स्वभावामुळे रुप्या समोर बोलल्या. आणि दुसऱ्याच क्षणी त्या साधूचा श्राप
खरा ठरला.
आज रुप्याला गावात मान आहे. त्याच्या गोष्टींची गावात चर्चा आहे.
कारण, आज रुप्या जिथे जिथे जातो, तिथे तिथे त्याच्या सोबत त्या चार हडळीही
त्याच्या मानगुटीवर बसून फिरत असतात. 😁😂
समाप्त.
कथा: विनोदी/भयकथा.
भिती- रात्रीच्या एका प्रवासाची
१.हाकामारी
लेखक: रुपेश प्र. मयेकर
प्रकाशन: १५-०३-२०१८
© RUPESH MAYEKAR ® 2017
(या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षीत आहेत.)
मी माझ्या दोन मित्रांसोबत एका सहलीला जायच ठरवलं होतं. सहलीचे ठिकाण
हे मुंबई पासून लांब होतं. जिवनात काहीतरी रोमांचक करावं हाच यामागचा मुळ
उद्देश होता. विशाल ने त्याच्या ओळखीने एका चार चाकी गाडी चा बंदोबस्त केला
होता. नयन आणि मी आम्ही दोघांनी दोन-तिन दिवस पुरेल इतक सुकं खाद्य आणलं
होतं. सहलीचा एकूण खर्च आम्ही तिघेही समान करणार होतो. प्रवासात लागणारं
सारं सामान आणि काही पैसे घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली.
संध्याकाळी ६ वाजता आम्ही आमची गाडी काढली. आम्ही तिघेही आळी-पाळीने
गाडी चालवणार होतो. प्रवासाची सुरुवात अगदी छान झाली. पण जस जशी रात्र होऊ
लागली तस तसे आमचे चेहरेही थोडे गंभीर होऊ लागले.
रात्रीचे साधारण १० वाजले होते. नयन गाडी चालवत होता. मी त्याच्या
बाजूलाच बसून त्याला मार्ग दाखवत होतो. विशाल, पाठच्या सिट वर एकटाच बसला
होता. अचानक त्याला कसला तरी आवाज आला, त्याने नयनला लागलीच गाडी थांबवायला
सांगितली.
तो सांगत होता, त्याला कोणीतरी त्याच्या नावाने हाक मारली होती. गाडी
रस्त्याच्या कडेला लावून आम्ही खाली उतरलो. रस्त्यावर पुर्ण अंधार होता.
मधूनच एकादी गाडी हॉर्न वाजवत वाऱ्याच्या वेगात पळत असे. कदाचीत विशाल ला
कसला तरी भास झाला असावा. काही अंतरावरच एक हॉटेल दिसत होतं. भुक तर लागली
होेतीच. आम्ही गाडीत बसून हॉटेल जवळ आलो. आम्ही तिथे थोडावेळ जेवायला
थांबलो. गाडीत बसून पाय आखडले होते. जेवल्यावर सहजच ५ मिनीटे फेरफटका
मारावा म्हणून आम्ही रस्त्याच्या कडेने मागे-मागे आलो त्याच दिशेने चालू
लागलो. थोडं अंतर चालल्यावर अचानक आमच्या कानावर एक हाक ऐकू आली. कोणीतरी
विशाल ला हाक मारली होती. रस्त्यावर संपूर्ण अंधार होता. रस्त्याच्या एका
बाजूला डोंगराची कडा तर दूसरीकडे खोल दरी होती. तिथे घनदाट झाडं वाढली
होती. आवाज तिथूनच येत होता. काही कळायच्या आतच आम्हाला दुसरी हाक ऐकू आली.
विशाल काही बोलणार, तेवढ्यात मी त्याला शांत केलं.
इतक्यात माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला, मी घाबरलो. वळून
पाहिलं तर तो एक सामान्य माणूस होता. तो विचारु लागला, एवढ्या रात्री
तुम्ही इथे काय शोधत आहात? थोडंस स्वत:ला सावरुन आम्ही आमचा अनुभव त्यांना
सांगितला.
त्यावर, थोड्याशा गंभिर स्वरात तो बोलला. इथे भुताटकीचे अनेक प्रकार
घडतात. इथे रात्रीची हाकामारी फिरते. बऱ्याच जणांना इथे त्यांच्या
नावाच्या हाका ऐकू आल्या आहेत. असं म्हटलं जातं, जो कोणी तिच्या हाकेला 'ओ'
देतं, त्या व्यक्तिला ती आपल्या सोबत घेऊन जाते.
याची सुरुवात खुप वर्षांपूर्वी झाली. असं मानलं जातं, याच रस्त्यावर
खुप वर्षांपूर्वी एक खुप मोठा अपघात झाला होता. रात्रीच्या वेळी एक गाडी
याच खोल दरीत कोसळली होती. त्या अपघातात, अनेक जणं मृत्यूमुखी पडले आणि
त्यातच एक बाई गंभीर स्वरुपात जखमी झाली होती. तरीही तिने हार मानली नाही.
ति कशीबशी या रस्त्याच्या कडेला आली. ति येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे
मदतीसाठी विन्हवण्या करत होती. पण शेवट पर्यंत तिची कोणीच मदत केली नाही.
तिचा इथेच या रस्त्याच्या कडेलाच तडफडत दुरदैवी मृत्यू झाला.
तेव्हा पासून ति सुडाच्या भावनेत इथे प्रत्येक रात्र भटकत असते. आणि
वाटसरुंना त्यांच्या नावाने हाका मारते. जो कोणी तिच्या हाकेला प्रत्युत्तर
देतो त्या व्यक्तिचा ती जिव घेते.
नशीबाने आमच्या पैकी कोणीही तिच्या हाकेला उत्तर दिलं नव्हतं. तिथे
जास्त वेळ थांबणं आता आम्हाला धोक्याचं वाटत होतं. आम्ही लगेचच हॉटेल मध्ये
गेलो. तिथून आमच्या गाडीत बसून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो.
क्रमश:
भिती- रात्रीच्या एका प्रवासाची
२. पालखी
लेखक: रुपेश प्र. मयेकर
प्रकाशन: १७-०३-२०१८
© RUPESH MAYEKAR ® 2017
(या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षीत आहेत.)
हाकामारीचा अनुभव फारच भयंकर होता. त्यातून आम्ही कशीबशी स्वत:ची
सुटका करुन घेतली होती. आता गाडीचा ताबा मी घेतला होता. विशाल पाठच्या सिट
वर अजून त्या हाकामारीच्याच विचारात होता. कोणीतरी त्याला हाक मारली होती,
आणि हि गोष्ट कोणाच्याही बाबतीत घडली असती तरी, त्या व्यक्तिची अवस्था हि
विशाल सारखीच झाली असती. याच कारणामुळे, मी नयनला पाठी विशालच्या सोबत
बसायला सांगितले होते.
रात्रीचे साधारण ११ वाजले होते. मी एक शॉर्टकट निवडला होता. हा रस्ता
बऱ्यापैकी मोकळाच होता. मुंबईची हद्द केव्हाच पाठी सुटली होती.
अचानक, दूरवर कसला तरी आवाज ऐकू आला. जस जशी आमची गाडी पुढे सरकत
होेती, तसतसा आवाज अजून जवळ-जवळ येत होता. मी गाडी थांबवली. रात्रीच्या
शांततेत आवाजाचा अंदाज येत नव्हता, सारं काही घुमत होतं, ते जे काही होतं,
ते याच मार्गाने येत होतं. जोर जोरात ढोल ताशे वाजत होते. आम्ही गाडी
रस्त्यातच टाकून आत झाडीत पळालो. आधीच हाकामारीचा अनुभव आम्हाला आला होता,
त्यात अजून काहीही वेडंवाकडं पहायची आमची हिम्मत नव्हती. आम्ही जंगलात तिस
एक मिटर आत शिरलो होतो. तिथून आम्हाला आमची गाडी आणि तो रस्ताही निट दिसत
होता.
मी विशाल सोबत उभा होतो. नयन एका झाडाखालून हे दृष्य पाहत होता. मी
एकवेळ त्या झाडावरुन माझी नजर फिरवली, ते झाड फार जुनं आणि विचित्र आकारात
वाढलं होतं. तिथे तो आवाज आमच्या अजून जवळ येत होता. आणि अचानक आम्हाला ते
दृष्य दिसले. रस्त्यावरचे दिवे लावावेत तसा मशालीचा उजेड रस्ताभर पसरला
होता. त्या उजेडात चित्र, विचित्र आकार रस्त्यावर हलताना दिसत होते.
झाडांवरुन काळ्या सावल्या उड्या मारत जात होत्या. भयंकर आरोळ्या कानी पडत
होत्या. हे तेच होतं का? जे मी याआधी बऱ्याच वेळा लोकांच्या तोंडून ऐकलं
होतं?
इतक्यात अंगावर शहारे आणणारा एक शंखनाद झाला. ढोल जोर-जोरात बडवले जात होते.
ती भुतांची पालखी होती. पण ती, मी जशी ऐकली होती, तितकी साधी तर
नक्कीच नव्हती. त्यात खुप जणांचा समावेश होता, हे त्यांच्या किळसवाण्या
आरोळ्यांतून जाणवत होतच. शिवाय, त्यातील काही जणं वानरांसारखे झाडांवरुनही
उड्या मारत होते. ते सगळेच त्या जळत्या मशालीच्या उजेडात हिंस्र वाटत होते.
लांबून ते स्पष्ट दिसत नसले तरी त्यांचा विवस्त्र नाच काळजाची थरकाप
उडवणारा होता. त्यातच त्यांच्या वाद्यांचा आवाज आमच्या भितीत अजून भर घालत
होता.
असं म्हटलं जातं, या भुतांच्या पालखीच्या सर्वात पुढे स्वत: वेताळ
असतो. तो शंख नादाने पालखीचा रस्ता ठरवतो. त्याच्या पाठून सर्व प्रकारची
भुते नाचत असतात. आणि मधोमध असते ती त्यांची पालखी. जो कोणी हि पालखी
पाहतो, त्याचा मृत्यू निश्चित असतो.
मला भिती वाटत होती, मी विशाल ला तिथून जंगलात अजून आत जायचं
सांगितलं, मी नयनच्या दिशेने टॉर्च मारली. पाहतो, तर काय? नयन त्या
झाडाखाली बेशुद्ध पडला होता. आम्ही धावतच त्याच्या जवळ पोहोचलो.
इतक्यात सगळे ढोल नगाडे थांबले. अचानकच सर्वत्र स्मशान शांतता पसरली
होती. मी हळूच पाहिलं, तर ते सगळे आमच्या गाडी जवळ येऊन थांबले होते. काही
जणं तर गाडीच्या छतावर बसून, सर्वत्र कोणाचा तरी शोध घेत होते. आम्ही नयन
ला त्याच अवस्थेत खांद्यावर उचललं आणि फरफटत जंगलात जेवढं शक्य होईल तितकं
आत घेऊन गेलो. बऱ्याच वेळाने पुन्हा शंख नाद झाला आणि ढोल वाजू लागले.
आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला.
आम्ही त्यांतील काही अमानवी आकृत्या पाहिल्या होत्या. पण, प्रत्यक्ष पालखी आणि वेताळाला मात्र आम्ही पाहिलं नाही.
पण या सर्वात नयन अचानक बेशुद्ध का पडला होेता? आणि यात त्या झाडाचा तर काही संबंध नव्हता ना?
क्रमश:
भिती- रात्रीच्या एका प्रवासाची
३. चकवा
लेखक: रुपेश प्र. मयेकर
प्रकाशन: १९-०३-२०१८
© RUPESH MAYEKAR ® 2017
(या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षीत आहेत.)
आम्ही नुकतीच वेताळाची पालखी पाहिली होती. आमची गाडी ज्या रस्त्यावरुन
जाणार होती, त्याच रस्त्यावरुन ति येणार असल्याने आम्ही रस्त्याच्या कडेला
आमची गाडी तशीच सोडून जंगलात निघालो होतो. त्यातच नयन एका झाडाखाली आपोआप
बेशुद्ध होऊन पडला होता. पालखीतील भुतांनी आम्हाला पाहू नये, म्हणून आम्ही
नयनला घेऊन जंगलात अजून आत गेलो होतो. भुतांची पालखी एव्हाना दूर वर गेली
होती.
आम्ही नयनला शुद्धीत आणण्याचा बराच प्रयत्न करत होतो, त्याचे गाल
थापटत होतो, हात चोळत होतो. थोड्या वेळाने तो शुद्धीत आला. तसा आमच्या
जिवात जीव आला. त्याला शेवटचा त्या पालखीचाच आवाज लक्षात होता. पण, भुतांची
पालखी बाजूने गेल्यावर कोणी बेशुद्ध पडल्याचं आम्ही तरी ऐकलं नव्हतं. दहा
मिनीटे तिथेच आराम करुन आम्ही रस्त्याच्या दिशेने निघालो. आम्ही चालता
चालताच रात्रीच्या या प्रवासात, अचानक आलेले आमचे अनुभव एकमेकांना सांगत
होतो. दहा मिनीटे झाली, विस मिनीटे झाली एव्हाना रस्ता किमान आमच्या
दृष्टीक्षेपात तरी यायला हवा होता. पण ते जंगल अजूनच घनदाट होत चाललं होतं.
मी दोघांनाही थांबवलं. मी माझ्या मनातील काळजी दोघांना बोलून दाखवली.
त्यांनाही पटलं, पण आम्हाला खात्री होती आम्ही योग्य त्याच दिशेने जात
आहोत. पण मग एव्हाना रस्ता यायला हवा होता!
आम्हाला चकवा तर लागला नव्हता ना? चकवा लागल्यावर मनुष्य एकाच ठिकाणी
घुटमळत राहतो. तो तहानेने व्याकूळ होतो. बऱ्याच लोकांना हि चकवा लागलेली
माणसे जंगलात किंवा एखाद्या विहरीत बेशुद्ध अवस्थेत मिळाली आहेत.
विशाल आणि नयन घाबरले होते. आता मलाच काहीतरी करायला हवे होते.
अंधारात दिशा ठरवणं फारच कठीण होतं, जिथे नजर पोहोचेल तिथवर फक्त झाडेच
दिसत होती. माझी नजर आकाशाकडे वळली आणि मला इथून सुटण्याचा मार्ग सापडला.
आकाशातील ध्रुव तारा त्याची जागा कधीच बदलत नाही. त्याच्या आधारे आपण
इथून नक्कीच बाहेर पडू याचा मला विश्वास होता. पण, चकवा लागणे काय असतं, ते
मला एका तासाने कळलं. आम्ही जवळ जवळ तासभर तिथेच घुटमळत होेतो. आम्ही
तहानेने अगदी व्याकुळ झालो होतो. आमच्या डोळ्यांपुढे अंधारी येत होती.
आकाशातील तारे आमच्या डोक्यावरुन हळूच कधी जागा बदलत होते काहीच कळत
नव्हतं. शेवटी दमून आम्ही तिथेच बसलो. सकाळ झाल्या शिवाय इथून बाहेर पडणं
आम्हाला तरी शक्य वाटत नव्हतं.
इतक्यात आम्हाला कसला तरी आवाज आला. कोणीतरी आमच्या दिशेने येत होतं.
मी चारही बाजूंना पाहिलं, तिथे नक्कीच कुणीतरी होतं. तेवढ्यात एक विचित्र
माणूस मशाल घेऊन झाडीतून धावताना आम्हाला दिसला.
तो माणूस नक्की कोण होता? आम्हाला या चकव्यातून कोण बाहेर काढणार होतं? आणि नयन ची तब्येत बरी झाली होती का?
क्रमश:
भिती- रात्रीच्या एका प्रवासाची
४.कोल्ली देवा
लेखक: रुपेश प्र. मयेकर
प्रकाशन: २१-०३-२०१८
© RUPESH MAYEKAR ® 2017
(या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षीत आहेत.)
कोणीतरी आमच्या दिशेने येत असल्याचं आम्हाला जाणवलं! अचानकच, एक माणूस
हातात मशाल घेऊन धावताना आम्हाला दिसला. तो सारखा इकडून तिकडे धावतच होता.
थांबण्याचं नावच घेत नव्हता. मध्येच चित्र विचित्र आवाज काढत होता. मध्येच
हसत होता. त्याच्या वागण्यावरुन तरी तो साधारण वाटत नव्हता.
आम्ही लपूनच बसलो होतो. तो कदाचीत आम्हाला इथून बाहेर काढू शकत होता.
पण तो कोणी चोर-लुटारु असला तर? कसलीही शक्यता नाकारता येत नव्हती. पण
आम्हाला त्या चकव्यातून लवकरात लवकर बाहेर पडायचं होतं.
मी विशालला विचारलं, आपण त्याच्याकडे मदत मागूयात का? आमच्याकडे दुसरा
कोणताच पर्याय नव्हता. विशालने सुद्धा होकारार्थी मान डोलावली. मी पुर्ण
धिर एकवटवून पुढे सरसावलो. मी त्याला हाक मारणार, इतक्यातच माझा हात
कोणीतरी धरला. माझ्या हाताला झालेले ते थंड स्पर्श माझ्या अंगावर अक्षरश:
शहारे आणून गेले.
ते एक भूत आहे. त्याला अजिबात हाक मारु नकोस. एका बाईचा खोल आवाज
माझ्या कानी पडला. मी मागे वळून पाहिले, तर माझ्या पाठी एक बाई उभी होती.
तिने, माझा हात घट्ट पकडून मला पाठी खेचले. तिने आम्हाला शांत राहण्यास
सांगितले.
तो माणूस अजूनही तिथेच घुटमळत होता. हातात मशाल घेऊन पालखीतील
भुतांसारखा एकटाच नाचत होता. कदाचीत त्या भुतांतीलच एक, रस्ता चुकून इथे तर
आला नसावा? ति आम्हाला हळू- हळू त्याच्या पासून दूर घेऊन गेली.
काही काळ कोणीच कोणाशी काहीच बोलत नव्हत. शेवटी मलाच रहावलं गेलं नाही. मीच त्या बाईला, त्या माणसा बद्दल विचारले.
ती म्हणाली, ते एक भूत आहे. त्याला कन्नड भाषेत कोल्ली देवा म्हणतात.
खुप वर्षांपुर्वी या जंगलात त्याच प्रांतातील एका माणसाचा इथे रात्रीचा खुन
झाला होता. तेव्हा पासून त्याचं भुत हे इथेच असच भटकत आहे. तसं बघायला
गेलं, तर हा कोल्ली देवा कोणालाच कधी स्वत:हून इजा पोहोेचवत नाही. तो
स्वत:च्याच धुंदीत हातात मशाल घेऊन असाच नाचत असतो. पण जर त्याच्या
रस्त्यात कोणी आडवे आले, किंवा त्याचा मार्ग कोणी कापला किंवा त्याच्याशी
कोणी काही बोलायला गेले, तर मात्र तो तुम्हाला अशा प्रकारे घाबरवतो, कि
तुम्ही त्याचा कधी स्वप्नातही विचार करु शकणार नाही. तो सरळ तुमच्या शरीरात
प्रवेश करतो, आणि तुम्हाला ते भोगायला लावतो जे तो स्वत: इतक्या
वर्षांपुर्वी भोगलं होतं. तो त्या व्यक्तिला आधी आजारी पाडतो मग तो
त्याच्या शरीरातून बाहेर पडतो आणि त्या माणसाचा तो खुन करतो.
हे सगळं ऐकायलाच किती भयानक होतं! ति बाई आम्हाला, इतक्या रात्री त्या
भुताची गोष्ट सांगत होती, आणि ते ऐकून का कुणास ठाऊक पण आमचे सर्वांचेच
डोळे आपोआपच जड होऊ लागले होते. ति बोलत असताना तिच्या तोंडून ऐकू येणारे,
तिच्या दातांचे कडकड आवाज आम्हाला धडकीच भरत होते. तो हातात मशाल घेऊन
धावणारा, भुत होता हे त्याच्या वागण्यातून दिसत होतेच. पण हि बाई नक्की कोण
होेती? आणि ती आम्हाला या चकव्यातून बाहेर काढणार होती का?
क्रमश:
भिती- रात्रीच्या एका प्रवासाची
५.निशी
लेखक: रुपेश प्र. मयेकर
प्रकाशन: ३१-०३-२०१८
© RUPESH MAYEKAR ® 2017
(या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षीत आहेत.)
रात्रीचे दोन वाजले होते. आम्ही त्या बाईच्या मागे-मागे चालत होतो. पण
ती नक्की कोण होती? तिने जेव्हा मला पाठी खेचण्यासाठी म्हणून माझा हात
पकडला, तेव्हा तिचा हात मला बर्फा सारखा थंड लागला होता. आम्ही जंगलात,
चकवा लागल्याने भटकलो होतो खरं! पण ती? ति बाई एवढ्या रात्री जंगलात काय
करत होती?
आम्ही तरी काय करणार होतोे म्हणा. नुकतच तिने आम्हाला एका भुता पासून
वाचवलं होतं. जर ति वेळेत तिथे आली नसती तर? पण ति तिथे अचानक आलीच कशी?
माझं मन दोन्ही बाजूने विचार करत होतं.
आमच्याकडे टॉर्च होती. पण ती? ति मात्र टॉर्च शिवायच जंगलातून मार्ग काढत
होती. एखादी बाई इतक्या रात्री एवढी शांत कशी राहू शकते? तिच्या बोलण्यात,
वागण्यात जी सहजता होती, ति कोणाही माणसात किमान एवढ्या रात्री जंगल सदृष्य
भागात असणे कठीणच होती.
ति बाईच होती? कि एखाद्या बाईचं भूत? आम्हा तिघांनाही अचानकच
डोळ्यांवर झोप वाटू लागली. आमचे डोळे अचानकच जड होऊ लागले. आम्ही तिघेही
एकमेकांचे हात पकडून त्या बाईच्या पाठून चाललो होतो.
तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, तिचे पाय! हो तिचे पाय पहायला हवे! मी
माझ्याकडच्या टॉर्च चा उजेड तिच्या पायांवर मारत होतो. पण आधीच डोळे जड
झाल्याने स्पष्ट असं काहीच दिसत नव्हतं.
मी माझे डोळे जमेल तितके मोठे उघडले, आणि तिचे पाय पाहू लागलो. तिचे
पाय, चक्क उलटे होते! मी घाबरलो. मी विशालचा हात पकडला आणि त्यालाही
थांबवलं. नयनही तिथेच थांबला. काय झालं? विशाल ने मला विचारले. त्याचा आवाज
ऐकून ति बाई आहे त्या स्थितीतच पुतळ्यासारखी थांबली. मी विशालला तिच्या
पायाकडे पहाण्याचा इशारा केला. पण त्याच्या डोळ्यांवरही प्रचंड झोप होती.
मला तिचे उलटे पाय स्पष्ट दिसत होते. सर्वत्र एकच शांतता पसरली होती!
आणि तिने तिचं डोकं अचानकच १८० अंशात पाठी फिरवलं. माझं हृद्य जोरजोरात
धडकू लागलं, माझ्या तोंडून आवाजच फुटत नव्हता. मी जागेवरच बेशुद्ध होऊन
पडलो.
माझ्या पाठोपाठ विशाल आणि नयन सुद्धा बेशुद्ध होऊन खाली पडले. आम्ही
जिच्याकडे मदतीच्या नजरेने पाहत होतो, तिच आमच्यापुढे संकट बनून उभी होती.
इतक्या रात्री आमची मदत तरी कोण करणार होतं? आमचा अंत हा असाच होणार होता?
बराच वेळ स्मशान शांतता होती. डोळ्यांपुढे फक्त अंधार होता. आम्हाला
आम्ही आकाशात उंचावर उडत असल्याचा भास होत होता. कसलाही आवाज नाही, कसलीही
जाणीव नाही. सगळं काही कसं रिकामी रिकामी वाटत होतं, असून नसल्यासारखं!
इतक्यातच, एक आवाज आमच्या कानी पडला, पोरांनू, पोरांनू उठा झेपत नाय तर इतकी पिता कशाला?
इच्छा नसतानाही मी माझे डोळे कसेतरी उघडले. मी रस्त्याच्या कडेला
आमच्या गाडी शेजारीच पडलेलो होतो. बाजूला विशाल आणि नयन दोघेही आडवे तिडवे
झोपलेले होते. त्या माणसाने मला हटकले. मी बऱ्याच प्रयत्ना नंतर त्याला हे
पटवू शकलो, कि आम्ही कोणतंही मादक पेय प्यायलेलो नाही.
आमच्या सोबत घडलेला प्रसंग मी त्याला सांगितला. ते सांगत असताना मी
नयन आणि विशालला पण जाग केलं. का कोणास ठाऊक पण मी सांगितलेले, आम्हाला
आलेले भुताटकीचे अनुभव त्या माणसाला पटले! कदाचीत त्यालाही याचा अनुभव
असावा. आम्ही सोबत आणलेलं, पाणी आमच्या तोंडावर मारलं, डोळे पाण्याने ओले
केले, तशी डोळ्यावरची झोपेची झापड कमी होऊ लागली. त्या माणसाने, त्या
बाईबद्दल सांगायला सुरुवात केली.
ति निशी होती. ते एक प्रकारचं भूतच आहे. पण एका अर्थाने, चांगलं भुत
आहे. ते इतर भुतांप्रमाणे रात्रीचच इकडे तिकडे भटकत असतं. पण एखादी व्यक्ति
रस्ता चुकली, तर तिला ती अंधारातही रस्ता दाखवते. त्या व्यक्तिला ती
त्याच्या मार्गी पोहोचवते. जसं कि तुम्हाला तिने इथवर पोहोचवलं.
पण मग आम्हाला अचानक झोप का येऊ लागली? त्यावर तो माणूस बोलला. हे सगळं त्या निशी मुळेच झालं, ति आपल्या निद्रेवर ताबा मिळवू शकते.
पण मग आम्ही जंगलात झोपलो होतो, आणि अचानक इथे आमच्या गाडी पाशी कसे येऊन पोहोचलो? तिने आम्हाला उचलून इथे आणलं?
यावर तो माणूस म्हणाला, तुम्ही स्वत:च्या पायाने इथे आलात.
पण आम्हाला त्याचं म्हणणं पटत नव्हतं.
तो पुढे सांगू लागला, ति याचसाठी ओळखली जाते. तुम्ही जंगलात झोपी
गेलात खरे! पण नंतर तुम्ही तिच्या इशाऱ्याने, तिच्याच दाखवलेल्या मार्गाने
झोपेत चालत इथे आलात असाल. असं म्हणतात, जि माणसं झोपेत चालतात, ति या
निशी भुताच्याच ताब्यात असतात. बराच वेळ आम्ही त्याचं बोलणं सुन्न होऊन ऐकत
होतो.
आम्हाला चकव्यातून एका भुतानेच बाहेर काढलं होतं. पण आता पुढे काय?
आणि या माणसाला आमचा इतका पुळका का? कि हा सुद्धा एक भुतच आहे?
क्रमश:
No comments:
Post a Comment