Thursday, November 20, 2025

नाशिक ३

 

नाशिकचे प्रसिद्ध नारोशंकर मंदिर व वसई विजयाचे प्रतीक असणारी घंटा

नाशिक एक मंदिरांचे नगर,
मंत्रभूमी पासून यंत्रभूमी पर्यंतचा नाशिक नगराचा प्रवास म्हणजे भारतीय संस्कृतीचे प्रतीक होय!
नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठावर पेशवे काळात अनेक मंदिरे व घाट बांधण्यात आले, कोरीव व नक्षीदार भव्यता , घाटांची प्रशस्तता हि नाशिक संस्कृतीची वैशिष्ट्ये व त्यापैकी एक नारोशंकर मंदिर।
नारोशंकर मंदिर गोदेच्याच अगदी काठावर, या मंदिरास रामेश्वर देखील म्हणतात. नाशिक मधील प्रमुख मंदिर, सगळ्यात सुंदर कलाकुसर असणारे हे मंदिर बघणे म्हणजे एक अद्भुत आनंद होय!
या मंदिराची स्थापना सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांनी ई. स.1747 साली केली तेव्हा या काळातील 18 लाख रुपये खर्च आल्याची नोंद आहे (या
काळात सोने सुमारे 15 रु तोळे होते) पुढे ई स 1756 साली मंदिरासमोरील नदीकाठी घाट सुमारे 60 हजार रुपये खर्च करुन बांधल्याचा उल्लेख आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरास किल्ल्यासारखी तटबंदी व घुमटाकार बुरुज आहेत एकंदरीत नदीच्या पुरापासून रक्षणासाठी हि काळजी घेतलीय. मंदिराच्या तटबंदीस पूर्व व पश्चिम द्वार असून मुख्य मंदिर पश्चिमाभिमुख आहे.या मंदिराची शैली हेमाडपंथी असून काहीशी वेसर म्हणजेच संमिश्र आहे, मंदिरास मुखमंडप, सभामंडप, अंतराळ ,गर्भगृह असून त्यातील शिवलिंग हे नाशिक मधील सर्वात मोठे शिवलिंग आहे. मंदिरावर आत व बाहेर खूप सुंदर शिल्प आहेत, विशेषतः सभामंडपाच्या आतील छतावर सुरसुंदरी व अष्टदिक्पाल आहेत, त्यासोबतच अनेक शाक्त कापालिक पंथाची प्रतिकचिन्हे या मंदिरावर आढळतात.




नारोशंकर मंदिरावरील प्रसिद्ध घंटा
या मंदिरावरील वैशिष्ट्य म्हणजे पेशवे काळातील वसई विजय प्राप्त झाल्यावर तेथील चर्च मधील घंटा या मंदिराच्या मुख्य द्वारावर बसवली आहे,अशीच एक घंटा नाशिक जवळील जलालपुर शिव मंदिरावर आहे व भीमाशंकर , मेणवली,(वाई) येथे अशा महाकाय घंटा आहेत, नारोशंकर मंदिरावरील या घंटेवर 1721 अशी आद्याक्षरे आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या मानचिन्हामध्ये या घंटेचे चिन्ह आहे, तसेच गोदावरीला पूर आल्यावर पूर्वी या घंटेला पाणी लागले की तिचा आवाज जुन्या नाशिकच्या परिसरात पोहचत त्यावरून पुराचा अंदाज लावला जाई,आत्ता पर्यन्त 1872,1965,1973साली पाणी घंटेला लागल्याचे सांगितले जाते तर 2016 साली घंटेवरून पाणी गेले होते.
प्रा रामनाथ रावळ

 

नाशिक धमाका : भाग एक

 https://mazbhraman.blogspot.com/2017/10/blog-post.html


चौल्हेर 

विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रसादचा नाशिक प्लान. सलग तीन दिवस सुट्टी. सीमोल्लंघन करायचा बेत आखला.नाशिक म्हणजे गडकिल्ल्यांची खाणंच. ट्रेकर्सची फारशी गर्दी नसलेले आडवाटेवरचे हे किल्ले. सातमाळ,डोलबारी,सेलबारी रांगा,पावसानंतरचं बागलाण अनुभवण्यास मन आतुर झालं. राजेंद्रनगर एक्सप्रेसनं नाशिकला निघालो. रात्री अडिचच्या सुमारास नाशकात उतरलो. शहर तसं बऱ्यापैकी जागं झालं होतं. पुणेकर मंडळी बिटको चौकात भेटणार होती. त्यांची वाट पाहत असताना फुल्ल तळीरामांनी थोडा उपद्रव करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही दाद न दिल्यामुळे वाद घालण्याचा त्यांचा प्रयत्न असफल ठरला. काही वेळात पुण्याच मंडळ पोहोचल. गाडी सटाण्याच्या दिशेत निघाली बागलाणात. बसल्या बसल्या डुलकी येऊ लागली. चौल्हेरवाडीत पोहोचेपर्यंत सकाळ झाली. मॅगीचा नाश्ता उरकत पावलं डोंगर सोेंडेवरून चौल्हेरकडे निघाली. चढाई तशी सोपी पण काही ठिकाणी बऱ्यापैकी चढ असणारी. नेहमीप्रमाणे डांगे सर व संजय सर आघाडीवर होते. वाटेत झाडं नसल्याने ऑक्टोबरचा उन्हाळा जाणवू लागला होता. चढण पार करत कातळ पायऱ्यापाशी आलो. पुढे भुयारी दरवाजे तीन एका ओळीत. अफलातून  अशी वास्तूकला.

चौल्हेर दरवाजा व कातळ पायऱ्या 

पठारावर आलो. तर चौल्हेरला गड किल्ले सुळक्यांनी वेढलेलं. टकारा सुळका,साल्हेर सालोटा,भिलाई,हरगड,मुल्हेर,मोरा,मांगी,तुंगी आणि पुसट दिसणारे बिश्ता अजमेरा.कोथमिऱ्या थाटात उभा होता. बालेकिल्ल्यावर जाताना डाव्या बाजूस एक प्राचीन मंदिर आहे. ते पाहून पाण्याच्या टाक्यापाशी यायचं. तृप्त होत दगडी जिना चढत माथ्यावर आलो. येथे काही जुने अवशेष आढळतात. पाण्याची  टाकी आहेत पण पाणी पिण्यायोग्य नाही. वरून बलदंड धोडपचं व् अख्या सातमाळ रांगेच दर्शन घडतं. 

कोथमीऱया 

गडावरील मंदिर 

डोळ्यांना मिळालेल्या मेजवानीनंतर गड उतरायला सुरूवात केली. माती बारीक दगड(स्क्री) यावरून उतरत गाव गाठलं. गावात पोहोचताच गावकऱ्यानं गरमागरम पिठलं भाकरी खाऊ घातली. सध्या काही ठिकाणी किल्ल्यांच्या गावात सुरू असलेल्या बाजारूवृत्तीत ती  चतकोर भाकर सुखाऊन गेली. पुढंच लक्ष होतं भिलाई. गावात पोचेपर्यंत सूर्यदेव माथ्यावर आले होते. शिदोरी सोडली गेली. पोटोबा आटपत फार विश्रांती न घेता भिलाईकडे चालू लागलो. अंगावर येणारा चढ खालून दिसत होता. उन्हाचे चटके बसत होते.तरी नेटाने चढत होतो. श्वासाची गती वाढू  लागली. थोडं वर गेल्यावर वाऱ्याचा सुखद स्पर्श व भवताली डोंगररांगा सोबतीला होत्याच. 


भिलइ 

थोड़ पुढे जाताच पाण्याचं टाकं लागतं. थोडी अंगावर येणारी तिरकस चढाई करत छोटा कातळटप्पा पार करत माथ्यावर यावे. डोंगर सभवताल न्याहाळावा. आलो त्या वाटेने खाली उतरत डाव्या बाजूस थोडी चाल ठेवत कातळात कोरलेलं मंदिर पहात उतरण्यास सुरूवात केली. निसरडी जेमतेम पाऊल मावेल अशी अरूंद वाट. एका बाजूला घसारा. पावलं तोलून मापूनच टाकावी लागतात. काही ठिकाणी बारीक रेतीवरून धावतच जावं लागत( स्क्री वर पाय टिकत नाहीत). असं करत करत पोहोचलो एकदाचे पायथ्याशी. पुढचा प्रवास बसचा सावरपाड्यापर्यंत. गावातील बहुतेक माणसं साल्हेरच्या यात्रेला गेल्याने वाटाड्याची शोधाशोध सुरू होती. दोन तीन पोरं तयार झाली. पण वेळ संध्याकाळची व वाट जंगलाची असल्याने ते थोडं जिकीरचं  होतं. शेवटी वाटाड्या मिळाले. पिंपळ्यावर जाऊन मुक्काम करण्याचे ठरले. अंधार पडायच्या आत पोहोचण गरजेचं होतं. भरभर निघालो. काही वेळातच धरणाच्या परिसरात आलो.

मागे पिंपळ्या 


मावळतीचे रंग 
 

नारायणराव पश्चिमेकडे कललेले, धरणाचं शांत पाणी,थोडी गार हवा, मोहरलेली पिवळी फुलं त्या पार्श्वभूमीवर मागे उभा असलेला पिंपळ्या व त्याचं आकर्षित करणारं भलं मोठं नेढं. सारचं क्षणभर थांबून पहाण्यासारखं. वाट काढत पुढे चढण नंतर पठार लागलं. पुन्हा चढण पठार. एव्हाना भास्कर मावळतीकडे झूकू लागला. त्या शांत वातावरणात रंग उधळत होता. सांजरंग चढ़त होते. सुखद अस चित्र.  त्याकडे पहात पठारावरची रपेट सुरू होती. हे अखेरचं पठार. समोर पिंपळ्या नजरेत येऊ लागला. आणि खडा चढही. अंधार पडू लागला होता. टॉर्चच्या झोतात सत्तर अंशातली चढण चढत होतो. पाठीवरच्या ओझ्यामुळे थकलो होतो. पंधरा ते वीस मिनिटात नेढ्यात आलो. भलं मोठं शे दिडशे माणसं सहज मावतील असा त्याचा विस्तार.याची आख्यायिका सांगितली जाते की परशुरामानी समुद्र हटवताना साल्हेर वरुन मारलेल्या बाणामुळे निर्माण झालं.  वारा सू सू करत कानात शिरत होता. नेढ्यात थोडं ताजतवान वाटत असलं तरी भर्राट वाऱ्यात रात्र काढणं शक्य नव्हतं. नेढ्यापुढील गुहेत डेरा टाकला. पायपीटीमुळे सपाटून भूक लागली. मिळेल ते पोटात ढकलत आडवे झालो. पिंपळ्यावरच्या झूंजूमुंजू पहाटेसोबत उठलो. सारं आवरत नेढ्यापुढील लहानश्या कातळटप्प्यावरून माथा गाठला.  नजर स्थिरावली क्षितिजावर उगवत्या दिनकराकडे. तो आपली तांबूस सोनेरी किरणं बाहेर फेकत हळूहळू क्षितिजावर येत होता. नाशकातल्या सह्यमंडळातील शिखरं, रांगा लख्ख दिसत होत्या. पश्चिमेला हातगड़ उत्तरेस  साल्हेर सालोटा दर्शन देत होते. अलौकिक असं दृष्य.  पुन्हा एकदा नाशिक रांगांची उजळणी  झाली. येथील किल्ल्यांचे वैशिष्ट्य अस की दुरवरच्या रांगा अनुभवता येतात मग ती सातमाळ असो की डोलबारी सेलबारी. हे दृश्य तासंतास निरखावसं वाटत. नारायणराव बऱ्यापैकी वर आले होते. पुढच्या किल्ल्याकडे कूच करायचे होते. सत्तर अंशातल्या उतारावरून सावध उतरत पठारावर आलो व धडधडत गावात धरणात  डुंबण्यासाठी. 


पिंपळगडाचं नेढं 

नाशिक डोंगररांगा 

पिंपळ्यावरील नयनरम्य  सूर्योदय 

पिंपळ्यावर  निळूभाऊ 
 

कहाणी ‘नासक’ हिऱ्याची

 nasak

महाराष्ट्रातल्या नाशिक शहरापासून जवळच असलेल्या प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरातील भगवान शिवशंकराच्या मुकुटाबद्दल एक खास गोष्ट अशी, की या मुकुटामध्ये एके काळी शोभत असणारा बहुमूल्य हिरा आता या मुकुटामध्ये नाही. एके काळी अनेक राजे महाराजे, मुघल सम्राट, धनाढ्य सावकार, अनेक रत्नांचे व्यापारी, इतकेच नाही तर खुद्द पेशव्यांच्या संग्रही असणारा हा हिरा ‘नासक ‘ या नावाने ओळखला जातो. तब्बल ४३.३८ कॅरट वजनाचा हा हिरा जगातील सर्वात मोठ्या आणि बहुमूल्य रत्नांपैकी एक आहे. एके काळी त्र्यंबकेश्वर मंदिरातील भगवान शंकराच्या मुकुटामध्ये हा हिरा जडविलेला असून, हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
nasak1
या हिऱ्याला ‘नासक’ हे त्याचे नाव, नाशिक गावावरून पडले असल्याचे म्हटले जाते. अतिशय बहुमूल्य ‘होप डायमंड’, ‘ओर्लोव’, ‘द रीजेंट’ आणि ‘कोहिनूर’ या हिऱ्यांच्या प्रमाणेच नासक हिरा देखील आंध्र प्रदेशातील गोलकोंडा येथील कोलुर किंवा अमरागिरीपैकी कोणा एका खाणीतून मिळाला. दक्षिण अफ़्रिकेमध्ये हिऱ्याच्या खाणींचा शोध लागेपर्यंत गोलकोंडा येथे असणाऱ्या खाणी हिऱ्यांचे महत्वपूर्ण स्रोत होत्या. त्याकाळी अस्तित्वात असलेल्या नियमांच्या अनुसार या खाणींमध्ये सापडणारे मोठे हिरे सरकारी खजिन्यामध्ये जमा करावे लागत असत. १६८७ साली मुघल सत्तांनी गोलकोंडा आपल्या ताब्यात घेतल्यानंतर नासक हिरा त्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर मराठ्यांनी जेव्हा आपले साम्राज्य उत्तर हिंदुस्तानापर्यंत विस्तारले, तेव्हा युद्धातून वसूल झालेल्या खंडणीद्वारे नासक हिरा मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर हा हिरा त्र्यंबकेश्वरी शिवशंकराच्या मुकुटामध्ये कसा पोहोचला याची हकीकत विशेष आहे.
nasak2
त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिकपासून सुमारे २८ किलोमीटर अंतरावर आहे. सध्या उभे असलेले त्र्यंबकेश्वर मंदिराचे निर्माण अठराव्या शतकामध्ये नानासाहेब पेशव्यांनी करविले होते. नासक हिरा मराठ्यांच्या ताब्यात आल्यानंतर बहुधा नानासाहेब पेशव्यांनी सोन्याच्या मुकुटामध्ये हा हिरा जडवून हा मुकुट त्र्यंबकेश्वर मंदिराला भेटीदाखल दिला असावा असा इतिहासकारांचा कयास आहे. पण या बद्दल कोणताही ऐतिहासिक दाखला उपलब्ध नसल्यामुळे याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नाही. मुकुटामध्ये जडविलेला हा हिरा १८१७ सालापर्यंत देवस्थानामध्येच राहिला. त्यानंतर असे म्हटले जाते, की दुसरे बाजीराव पेशवे यांच्या आज्ञेवरून हा हिरा मुकुटातून काढून पेशव्यांच्या संग्रही जमा केला गेला. साधारण त्याच काळादरम्यान मराठे आणि इंग्रजांमध्ये युद्ध सुरु झाले, आणि यामध्ये पेशव्यांचा पराभव झाला.
nasak3
युद्धातून पळ काढून सुमारे पाच महिने दुसरे बाजीराव पेशवे ठिकठीकाणी आश्रय शोधत होते. ब्रिटीशही सातत्याने त्यांच्या मागावर होते. या काळामध्ये नासक हिरा बाजीरावांकडे होता. १८१८ साली अखेरीस बाजीरावांनी शरणागती पत्करली आणि नासक हिरा कर्नल ब्रिग्ज यांच्या हवाली केला. ब्रिग्ज यांनी हा हिरा भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल मार्केस ऑफ हेस्टींग्ज यांना सुपूर्त केला. त्यानंतर हा हिरा मराठ्यांकडून जप्त झालेल्या इतर मौल्यवान संपत्तीच्या सोबत इंग्लंडच्या दरबारी पाठविण्यात आला. हा हिरा लंडनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानंतर केवळ ३००० पाउंड्स रक्कम देऊन ‘रंडेल अँड ब्रिज’ नामक हिरे व्यापाऱ्यांनी हा हिरा खरेदी केला. त्यानंतर या हिऱ्याला पुनच्श पैलू पाडून नव्या रूपातील हा हिरा ड्युक ऑफ वेस्टमिन्स्टर यांना विकण्यात आला. त्यांनी हा हिरा त्यांच्या तलवारीवर जडवून घेतला.
nasak4
१९२७ साली हा हिरा न्यूयॉर्क येथील रत्नांचे व्यापारी जॉर्ज मौबुसेन यांना विकण्यात आला. मौबुसेन यांच्याकडे असलेल्या बहुमूल्य हिऱ्याची कुणकुण लवकरच इतरांना लागताच हा हिरा मिळविण्याच्या प्रयत्नात अनेक चोऱ्या घडवून आणण्यात आल्या. १९३० साली हा हिरा चोरण्याचा पुनश्च प्रयत्न झाला, मात्र हा हिरा एका मळक्या, चुरगळलेल्या पाकिटामध्ये लपविलेला असल्याने वाचला. १९३३ साली हा हिरा शिकागो येथे ‘वर्ल्ड फेअर’ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर हा हिरा लेबनीझ अरबपती रॉबर्ट मौआवाद यांच्याकडे गेला, तो आजतागायत त्यांच्या संग्रही आहे. हा हिरा मूळ ज्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील मुकुटामधून काढून घेण्यात आला होता, तो मुकुट दर सोमवारी संध्याकाळी चार ते पाच या वेळामध्ये दर्शनासाठी खुला करण्यात येतो. या मुकुटामध्ये जडविलेली इतर रत्ने त्यावर जशीच्या तशी असली, तरी या मुकुटाची शान असलेला नासक हिरा मात्र आज त्या मुकुटावर नाही.

'नासक' नावाचा हिरा आणि दुसर्‍या बाजीरावाची संपत्ति

 माझ्या समजुतीनुसार बाजीराव आणि अन्य हिंदुस्तानी राजे-महाराजे आणि नबाब ह्यांच्याकडून ब्रिटिशांनी वेळोवेळी ज्या रकमा आणि जडजवाहीर युद्धाच्या मार्गाने मिळविले त्यांचे पुढे काय झाले ह्याबद्दल आपल्याकडे स्पष्ट अशी काहीच माहिती उपलब्ध नाही. ती संपत्ति ब्रिटिशांनी 'लुटली' एवढेच आपण म्हणू शकतो. आता बुक्स.गूगल सारख्या स्थळांमुळे १८व्या-१९व्या शतकातले छापील साहित्य आपल्याला नव्याने उपलब्ध झाले आहे आणि बाजीरावच्या संपत्तीचे काय झाले ह्याचे पुष्कळसे समाधानकारक उत्तर मिळू शकते. ते वाचकांना मनोरंजक वाटेल अशी अपेक्षा आहे.
 


नासक हिरा
 
२० जुलै १८३७ ह्या दिवशी लंडनमध्ये अनेक मौल्यवान रत्ने लिलावात विकली गेली. त्यांमध्ये 'नासक' नावाचा एक हिरा आणि एकेकाळी अर्काटच्या नबाबाच्या तिजोरीत असलेले काही दागदागिने ह्यांचाहि समावेश होता. 'नासक' हिरा 'डेक्कन प्रा‍ईझ मनी'चे विश्वस्त ड्यूक ऑफ वेलिंग्टन आणि कर्नल अर्बथनॉट ह्यांच्या आज्ञेवरून विक्रीस आला होता. तो विकत घेतला मार्क्विस ऑफ वेस्टमिन्स्टर ह्यांनी. त्यांनी तो आपल्या समारंभांमध्ये वापराच्या तलवारीच्या मुठीमध्ये बसवला. ती तलवार कमरेला लटकावूनच ते नुकत्याच राज्याभिषेक झालेल्या विक्टोरिया राणीच्या वाढदिवस दरबाराला २४ मे १८३८ ह्या दिवशी उपस्थित राहिले होते. ब्रिटिश साम्राज्याच्या दूरदूरच्या कानाकोपऱ्यात अगदी ऑस्ट्रेलिया-न्यू झीलंडपर्यंतच्या वृत्तपत्रांनी ह्या हिराखरेदीची दखल घेतली.

'नासक' ह्या नावानं आजहि ओळखल्या जाणाऱ्या हिऱ्याचं हे नाव आपल्या नाशिक ह्या गावावरून पडलेलं आहे. ह्या नावामागे मराठेशाहीच्या अस्ताच्या दिवसांतले आणि कोणास फारसे माहीत नसलेले मनोरंजक तपशील दडलेले आहेत.

ह्या हिऱ्याला हे नाव का पडलं ह्याची प्रचलित कथा अशी आहे की हा हिरा कोणे एके काळी त्र्यंबकेश्वराच्या देवळाच्या संपत्तीचा भाग होता. दुसऱ्या बाजीरावानं तो तेथून आपल्या ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून विजेत्या इंग्रजांनी तो मिळवला. हिऱ्याचे मूल्य वाढविण्यासाठी कोणीतरी बुद्ध्याच बनवलेली अशी ही कपोलकल्पित कथा दिसते. कसे ते पुढे पाहूच.

खडकीच्या लढा‍ईत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी १७ नोव्हेंबर १८१७ ह्या दिवशी पुणं सोडलं आणि पेशवे पुढं आणि इंग्रज मागं अशी शर्यत सुरू झाली. पेशवे पुण्याहून प्रथम नाशिक-खानदेशाकडं गेले. तेथून चांद्याकडं आणि अखेरीस उत्तरेकडं पेशवे सरकत असतांना अखेर सर जॉन माल्कम -महाबळेश्वरातील माल्कमपेठवाला- ह्यानं त्यांना गाठलं आणि अखेर पेशव्यांनी सत्ता सोडून बिठूरास पेन्शन घे‍ऊन राहण्याचं मान्य केलं. पेशव्यांची खाजगी मालमत्ता इंग्रजांनी लढाईतली लूट म्हणून ताब्यात घेतली.

इंग्रजांच्या वतीनं कमिशनर म्हणून पुण्यातून मा‍उंटस्ट्यु‍अर्ट एल्फिन्स्टन सूत्रं हलवीत होता. त्याला कोठूनतरी बातमी लागली की उत्तरेकडं सरकतांना पेशव्यांनी नाशिकला एका विश्वासू व्यक्तीच्या घरात काही जडजवाहिर लपवून ठेवलं आहे. बातमी कळताक्षणी त्यानं आपल्या हाताखालच्या कॅ. ब्रिग्जला हे जडजवाहिर शोधून ताब्यात घेण्याची कामगिरी सोपविली. कॅ. ब्रिग्ज लगोलग नाशिकास रवाना झाला आणि त्या व्यक्तीच्या घराचा शोध घे‍ऊन त्यानं घराची खणती केली. अपेक्षित घबाड त्याच्या हाती लागलं. हे घडलं २ मे १८१८ च्या रात्री. ह्या घटनाक्रमाला आधार आहे तो म्हणजे 'डेक्कन प्रा‍ईझ मनी' बाबतचा तत्कालीन इंग्रजी वृत्तपत्रांमधून वेळोवेळी आलेला मजकूर. कोणाच्या घरात हा ऐवज दडविण्यात आला होता हे नाव आज कळू शकत नाही.

'डेक्कन प्रा‍ईझ मनी' म्हणजे काय? तत्कालीन रिवाजानुसार परपक्षाचा पराभव झाल्यावर त्या पक्षाची जी काही दौलत विजेत्यांच्या हातात पडेल तिचे सैनिकांमध्ये वाटप करून सैनिकांना खूष ठेवण्याची पद्धत युरोपात रूढ होती. अशा लुटीमध्ये सर्वोच्च राजसत्तेपासून मोहिमेत भाग घेतलेले सर्व अधिकारी आणि सामान्य सैनिकांपर्यंत प्रत्येकाचा दर्जानुसार वाटा असे. हे वाटप कसे करायचे ह्याचेही नियम ठरलेले होते. तदनुसार किरकोळ मूल्याच्या वस्तू जागीच विकून सर्वसामान्य सैनिकांमध्ये ती रक्कम वाटत असत. अधिक मौल्यवान वस्तू, विशेषेकरून जडजवाहिर आणि हिऱ्यांसारख्या वस्तु, इंग्लंडला पाठवून तिथं त्या सरकारजमा होत आणि कालांतरानं योग्य किमतीला त्या विकून त्या रकमेचंहि वाटप होत असे. पेशवा‍ईच्या अस्तानंतर अशा प्रकारे नागपूरकर भोसले, होळकर आणि पेशवे ह्यांच्याकडून इंग्रजांनी बरीच लूट ताब्यात घेतली. त्यांपैकी मौल्यवान अशा वस्तु आणि जडजवाहिर इंग्लंडमध्ये पाठवलं. हाच 'डेक्कन प्रा‍ईझ मनी. ह्या रकमेचं व्यवस्थित वाटप व्हावं म्हणून ती ड्यूक ऑफ वेलिंग्टन आणि कर्नल अर्बथनॉट ह्यांच्या ताब्यात विश्वस्त म्हणून देण्यात आली. विश्वस्तांचं ऑफिस ८ रीजंट स्ट्रीट इथं होतं. विश्वस्तांनी आपलं काम कसं केलं ह्याचे अनेक तपशील इंग्लंडमधील तत्कालीन वृत्तपत्रांमधून वाचायला मिळतात. ड्यूक ऑफ वेलिंग्टनकडं हे काम सोपवलं जाण्याचं कारण म्हणजे त्या काळात त्यांच्या नावाचा फार मोठा दबदबा होता. नेपोलियनवर नुकताच विजय मिळवून त्यांनी आपलं इतिहासातलं स्थान पक्कं केलं होतंच. ह्याशिवाय दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात त्यांचा महाराष्ट्राशी चांगलाच परिचय झालेला होता.

थोडक्यात म्हणजे मराठ्यांच्याबरोबरच्या अखेरच्या लढा‍ईत इंग्रजांच्या हातात एक खूप मोठी रक्कम आली आणि तिचं वाटप करण्यासाठी तिच्यातला महत्त्वाचा भाग इंग्लंडमध्ये पोहोचला. लुटीतल्या बऱ्याच गोष्टी जागीच विकून रकमेचं वाटप केलं होतं. निवडक निवडक वस्तु ज्या इंग्लंडला गेल्या त्यांमध्ये 'नासक' हिराहि होत. १६ मार्च १८२१ च्या एका वृत्तपत्रात असं नाव दिलेला एक मोठा हिरा इंग्लंडात ये‍ऊन पोहोचल्याचा उल्लेख मिळतो. ह्या उल्लेखावरून असं वाटतं की हिरा नाशिकला मिळाला म्हणूनच त्याला 'Nassuck' हे नाव मिळालं. इथं हे लक्षात घ्यायला हवं की तेव्हांच्या सर्व इंग्रजी लिखाणात नाशिकचा उल्लेख Nassuck असाच केलेला आढळतो. ह्या सर्व खजिन्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी विश्वस्तांना बरीच वर्षं मेहनत घ्यावी लागली. पुढची पंधरा‍एक वर्षं तरी हे काम चालू असल्याचं दिसतं.

एव्हढा वेळ लागायचं कारण असं की प्रत्यक्ष लूट घेतांना जागेवर असलेले आणि जागी नसलेले तरी ज्यांचं लुटीमध्ये योगदान होतं अशा दोन्ही गटांना वाटा घेण्याचा अधिकार होता पण कोणाचा किती वाटा ह्याबद्दल बरेच मतभेद होते. एकूण मोहिमेचा प्रमुख जनरल हिस्लॉप आणि त्याचा राजकीय वरिष्ठ कलकत्तेकर गवर्नर-जनरल मार्क्विस ऑफ हेस्टिंग्ज ह्या दोघांमध्ये बरेच मतभेद होते. हिस्लॉपची तक्रार होती की आपल्या मागणीकडं पाहण्याचा ड्यूक ऑफ वेलिंग्टनचा दृष्टिकोण उपेक्षेचा आणि तुच्छतेचा आहे. नाशिकच्या खणतीच्या दिवसातला तिथं उपस्थित असलेला अधिकारी कर्नल मॅकडॉवेलची तक्रार होती की पुण्याहून आलेल्या ब्रिग्जनं त्याला अंधारात ठे‍ऊनच आपला कार्यभाग साधला आणि त्याला न्याय्य हिश्श्यापासून वंचित ठेवलं. अशा एक ना दोन अनेक वादांमुळं हे प्रकरण पुढं पंधरा‍एक वर्षं खदखदत होतं. वृत्तपत्रांमधून आणि पार्लमेंटात अनेकदा त्यावर प्रश्न विचारले गेले. अखेरीस १८३६-३७ साली प्रकरण अखेरीस मार्गी लागलं आणि 'नासक' हिरा विकायला बाहेर आला.

अशी अनेक वादांच्या भोवऱ्यात सापडलेली रक्कमहि तशीच जबरदस्त असली पाहिजे. एका ठिकाणी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ती ७२ लाख रुपये इतकी होती. त्यावेळेस सोन्याचा भाव १८-१९ रुपये तोळा होता असं धरलं तर आजच्या किमतीनं ह्या लुटीची किंमत ६-७ अब्जाच्या घरात जाते. हे जरा ढोबळच अनुमान आहे पण रक्कम खूपच मोठी होती एवढं कळायला पुरेसं आहे.

आणखी एका वादाचा इथं उल्लेख करायला हवा. सिंहगड किल्ला २ मार्च १८१८ ह्या दिवशी पाडाव झाला आणि मराठ्यांनी किल्ला खाली केला. त्यावेळी ठरलेल्या अटींनुसार किल्ल्यातील लोकांना केवळ आपापले वैयक्तिक सामान बाहेर काढण्याची अनुमति देण्यात आली होती. नारो गोविंद औटी नावाचा बाजीरावाचा विश्वासू किल्ल्यात होता आणि तो बाहेर पडताना त्याच्याजवळ सोन्याच्या नाण्यांनी भरलेले चार पेटारे होते. ह्या नारो गोविंदाचा सर्व इंग्रजी लिखाणामध्ये केलेला उल्लेख Narroba Govind Outia असा आहे. नारो गोविंदच्या दाव्यानुसार ती सुमारे ३६ लाखाची मालमत्ता त्याची खाजगीतली होती. इंग्रजांना शंका होती की मालमत्ता बाजीरावाची असली पाहिजे आणि तसं असलं तर तिच्यावर विजेते म्हणून त्यांचा अधिकार होता. ती त्या जागी जप्त केली गेली पण नारो गोविंद आणि इंग्रजांच्यातील हा वाद बरेच वर्षं चालू रहिला. मध्यन्तरी केव्हातरी नारो गोविंदाचा मृत्यु झाला पण त्याच्या वतीनं दोघा मारवाडी व्यक्तींनी दावा पुढं चालू ठेवला. हा दावा त्यांनी रोख पैसे दे‍ऊन बहुधा नारो गोविंदाच्या पुढच्या पिढ्यांपासून विकत घेतला असला पाहिजे. आश्चर्याची गोष्ट अशी की मुंब‍ईच्या सुप्रीम कोर्टात निर्णय नारो गोविंदाच्या बाजूनं लागला. त्या निर्णयाविरुद्ध कंपनी सरकारनं लंडनला प्रिव्ही कौन्सिलमध्ये अपील दाखल केलं. ह्या अपीलाचा निर्णय लागेपर्यंत डेक्कन प्रा‍ईझ मनीचं वाटप केलं जा‍ऊ नये अशी पार्लमेंटात मागणी आली आणि त्यानुसार वाटप थांबवून ठेवण्यात आलं. प्रिव्ही कौन्सिलचा हा निर्णय कंपनीच्या अपीलाच्या बाजूनं लागला पण हे होता होता १८३० साल उजाडलं. हा निर्णय वाचायला उपलब्ध आहे.

'नासक' हिऱ्याचं पुढं काय झालं? अक्रोडाच्या आकाराच्या ह्या हिऱ्याचं वजन ८९ कॅरटहून थोडं अधिक होतं. त्याचं तेज वाढविण्याच्या हेतूनं त्याला नंतर दोनदा पैलू पाडण्यात आले. हिरा मार्क्विस ऑफ वेस्टमिन्स्टरच्या पुढील पिढ्यांच्या ताब्यात पुढची सत्तर‍एक वर्षं होता. तदनंतर तो तीनचार वेळा युरोप-अमेरिकेत विकला गेला आणि सध्या तो एका धनाढ्य अमेरिकनाच्या मालकीचा आहे. ही शेवटची विक्री १९७० मध्ये झाली. आजची त्याची किंमत सुमारे ३० लाख अमेरिकन डॉलर्स असावी असा तर्क केला जातो. मराठेशाहीचा असा एक अवशेष एका अमेरिकेतल्या तिजोरीत बंद आहे. काळाचा चमत्कार - दुसरं काय?

  १७२६ सालापर्यंत भारत हा हिऱ्यांचा एकमेव मोठा सोर्स होता. जगात दुसरीकडे कुठेच हिऱ्यांच्या खाणी नव्हत्या. ब्रासिल आणि साऊथ आफ्रिका इथे खाणी नंतर सुरु झाल्या. दक्षिण भारतात गोवळकोंड्याच्या राज्यात खाणी असल्यामुळे जगभरचे व्यापारी भारतातून हिरे विकत घेत. तुम्ही तावर्निए अथवा बर्नियर यांचे नाव ऐकले असेल. ते भारतात हिऱ्यांच्या शोधात आले होते. गोवळकोंड्याचा राज्याची जी खंडणी मोगलांना जात असे त्यात हिरे असत.

जहांगीर बादशाहने आपल्या डायरीत आपल्या मुलात कोणते गुण आहेत ते लिहिले आहे - त्याचा मुलगा बाबा खुर्रम (म्हणजे शहाजहान) याला हिऱ्यांची उत्तम पारख होती. (ती डायरी मोठी मजेशीर आहे पण तो वेगळा विषय आहे) असा हिऱ्यांचा खजिना अकबर, जहांगीर आणि शहाजहान यांनी सतत १०० वर्षे जमवला होता. औरंगजेबाला जमवण्यात काही रस नव्हता पण त्याने आहे तो जपून ठेवला. मग १७३९ साली नादिरशाहने सगळी रत्ने लुटली. ती शीख, इराणी, रशियन, अफगाण आणि आता कतार, कुवेत इथेही सापडतात. काही पाचूंवर आपल्याला या सगळ्या मालकांची नवे कोरलेली सापडतात (अकबर - जहांगीर - शहाजहान - औरंगझेब - नादीर शाह अफसर - अहमद शाह अब्दाली) त्यातून आपल्याला हा इतिहास कळतो. एक लेख टाकेन निवांत कधी तरी यावर.

आज जसे लोक गुंतवणूक म्हणून सोने अथवा जमीन घेतात तसा हिरे हा मातबर लोकांसाठी एक गुंतवणुकीचा मार्ग होता आणि स्वतःचा मोठेपणा दाखवण्याचा मार्ग देखील. मराठ्यांनी निझामाला नमवून बऱ्याचदा खंडणी घेतली. इतरही प्रांतात दरवर्षी चौथाई वसूल केली. त्यामुळे त्यांच्याकडे १०० वर्षांच्या राजवटीत पैसे आणि हिरे जमलेच होते. पुष्कळदा सैनिकी खर्च वारेमाप होई आणि उत्पन्न पुरे पडत नसल्यामुळे कर्ज घायची वेळ येई ती गोष्ट वेगळी, पण खेळते भांडवल बरेच होते. 

दोन लेख सापडले . पहा आवडतात का.

http://madhukidiary.com/jehangir-the-curious-emperor-from-jahangir-nama/

आणि

https://www.livemint.com/Leisure/VP1pnZYhc8q2s6A3U42QzI/The-naturalist-with-a-hint-of-cruelty.html

 कुतुबशाही राज्यांची राजधानी गोलकुंडा किल्लयाच्या पायथ्याशी असलेल्या बाजारपेठेत हिऱ्याची विक्री होत असे. पण तेथे हिरे सापडत नसत. तेथून जवळ वाहणाऱ्या कृष्णा आणि पालार या नद्यात वाहत येणाऱ्या वाळूतून पॅनिंग करून ते निवडले जात . गोलकुंडा अथवा त्या जवळपास कुठेही हिऱ्याच्या 'खाणी' नव्हत्या.. 

पन्ना येथे हिऱ्यांची खाण होती. सध्या ती बंद आहे असे वाटते.

किंबरलाईट नावाचा एक अश्मांचा प्रकार आहे. त्यात हिरे नैसर्गिकरीत्या असू शकतात. अशा दगडामध्ये हिऱ्या खाणी असतात. पन्ना जवळ माझगाव येथे अशा प्रकारचे दगड आहेत. कृष्णा व पलार या नद्यांच्या उगमा पर्यंतच्या भागा पर्यंत हे दगड असायला पाहिजेत. पण अजून पर्यंत सापडलेलेले नाहीत . फार पुरातन असल्याने त्यांची खूप झीज झाली असणार. दगडांची वाळू झाल्यावर ती वाळू आणि तिच्याबरोबर न झिजणारे खडे ( हिरे ) नदीच्या पात्रात वाहत जात असले पाहिजेत.

 

रामशेज the miracle.


रामशेज किल्ला

“ खान मियाँ आपसे एक चीझ बोलनी थी, म्हणजे गुस्ताखी माफ करा पण राहावलं नाही म्हणून आपल्यासमोर बोलण्याचा गुन्हा करतोय”, एक सरदार आपले हात जोडून भीत भीत शहाबुद्दीनखाना समोर उभा राहिला.
“ क्या हुवा, आज इतनी हिम्मत की हमे सीख देने की जरूरत कर रहे हो तुम?”, खानाने आपले डोळे मोठे करून त्याच्या कडे नजर फेकली आणि आपल्या छावणीत हुक्क्यावर ताव मारायला सुरुवात केली.
“ हुजूर हा किला आपल्याकडून पडणार नाही ऐसा मुझे लगता हैं, हुजूर नाराज मत होना लेकिन, किलेकी दिवारे बुलंद हैं और उपर जाने मैं बहोत दिक्कत हो रहीं हैं हमारे फौज को. मैं पुरा किला बघून आलो खालून, वर चढायला जागाच नाही और सब जगाह हलकी मिट्टी हैं कहीं भी उपर तक झाडी नहीं जहाँ से जाना मुंकीन हैं, मुझे लगता हैं आप ये मसला छोड दो क्यूनकी किलेकी उंचाई बहोंत कम हैं, तोह ते मराठे आरामसे मारू शकतात आपल्याला वर जाऊ तसे.” सरदार ने मुह तो खोला मगर शहाबुद्दीन खान चवताळला आणि त्याने त्याला कैद करण्याचा हुकूम दिला.
बाहेर येऊन त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेढ्याकडे आणि वर किल्ल्याकडे नजर केली तशी वरची माणसं आपल्याकडे पाहून खिदी खिदी हसतायत की काय असा भास त्याला झाला.

 त्याने सरदाराचं बोलणं मनावर घेतले नाही आणि रामशेज चक्क 6 वर्ष(1682 ते 1689)लढला.
हा सगळा प्रकार मी जेव्हा रामशेज च्या तटबंदीवरुन चालत होतो तेव्हा मला जाणवला की खरच असंच काहीसं झालं असेल या किल्ल्यावर. उंची इतकी कमी की कोण कुठून येतंय हे गरुड नजरेने टिपता येतंय तर मग कसली भीती मराठ्यांना. वेचून वेचून मारत असतील मुघलांना. बरं जंगल ही नाहीच केवळ पूर्ण उंचीच्या25% च गवत बाकी पूर्ण उघडा त्यामुळे चारही बाजूने स्पष्ट सगळं मला दिसत होतं.
वर 600 मावळे होते असा उल्लेख इतिहासात आहे. कमाल वाटते मला त्या मावळ्यांनी6 वर्षे कसा लढवला असेल हा किल्ला? वर जागाही अमाप नाहीच की घरं बांधून राहता येईल, ती शक्यताच नाही, त्यामुळे तंबू ठोकून राहणे हा पर्याय असावा असं मला वाटतं.
एकंदरच रामशेज हा किल्ला मूर्ती लहान पण कीर्ती महान या म्हणीत चपखल बसण्यासारखा आहे. वर बांधकाम खूपच थोडं आहे, पायऱ्या आता बांधल्या आहेत. रामाचं सुबक आणि मधुर जलाच्या म्हणजे टाक्याच्या वर छान मंदिर आहे. वर गेलं की उजव्या हाताला बांधीव दरवाजा आहे त्याच्या पुढेही पायऱ्या आहेत पण तो का बांधला असावा आणि त्यामागचा उद्देश हा इतिहास आपल्या पोटात घेऊन विसावलाय त्यामुळे त्याचा उलगडा होत नाही. त्याच पायऱ्या साधारण 10 फुटांवर संपतात तिथे परत खडक आहे म्हणजेच खाली उतरायला नो entry मग तिथे पायऱ्या का बांधला परत तोच प्रश्न? आणि त्यात त्या खडकाला एक छोटं छेद आहे त्याचा उलगडा तर होतच नाही त्यामुळे ते बघून किल्ल्याला चक्कर मारावी आणि परत उतरावं. गावाकडच्या टोकाला एक खोदीव खड्डा दिसतो आणि त्याच्या सर्व बाजूंनी बांबू रोवता येतील असे बारीक खड्डे दिसतात त्यावरून तंबू कसे ठोकले जायचे ह्याचा थोडा विचार करता येऊ शकतो. असेच खड्डे काही ठिकाणी अजून आहेत.




 तर असा हा रामशेज पहावा आणि 10 मिनीटात पायऱ्यांनी खाली उतरावं. येताना रामाच्या मंदिरातील पाणी प्यावं तृप्त व्हावं आणि बाटलीत भरून घरी घेऊन यावं. लोकांची अशी श्रद्धा आहे की ते पाणी इतकं शुद्ध आहे की लोकं ते पाणी घरी आणून त्याने घरच्या देवांना अंघोळ घातली जाते. मी पाणी प्यायलं आहे खरच आजच्या काळात शुद्धता काय हे त्याने समजलं.
तर असा हा अभेद्य रामशेज पाहायला नक्की सर्वांनी एकदा तरी जावंच.
चढायला लागणारा वेळ – 20 मिनटं
मुंबई-ठाणे येथून जाण्यासाठी नाशिक मार्गे त्रंबकेश्वर रस्त्यावर 12 किमी वर रामशेज गाव आहे. गावात श्री हनुमानाचे सुबक आणि मोठे मांदिर आहे.
पुण्याहून सुद्धा नाशिक मार्गे रामशेज ला जात येते.
खालच्या गावात जेवणाची सोय होते.
अतिशय छोटा पण किर्तीने मोठा असलेला आणि इतिहासात आपली विशिष्ट ओळख असलेला हा रामशेज एकदा तरी पहावा.

सुमंत परचुरे.
झुंजार हायकर्स- ठाणे.




 

रामशेज

पेठ पासून अर्ध्‍या तासाच्‍या अंतरावर आशेवाडी नावाचे गाव आहे. ते रामशेज किल्ल्याच्या पायथ्‍याशी असलेले गाव.आशेवाडी गावाच्‍या फाट्यावर उतरून ५ मिनिटात आशेवाडी गावात पोचले, की रामशेज किल्‍ल्यावर चढाई करता येते. गावातून दृष्टीक्षेपात असलेल्या गडावर पोचण्‍यासाठी एक तास पुरतो.


आशेवाडी गावातून दिसणारा रामशेज किल्ला. 



गावात असलेल्या  दुकानांमधून टाईम पास पोटोबा करून किल्ल्याच्या दिशेने वाटचाल चालू होते. गावाबाहेर पडताच आजूबाजूचा मोकळा निसर्ग मी-मी म्हणू लागतो. आजूबाजूला चालू असलेले खाणकाम दुर्लक्ष करण्यास भाग पाडतो. मोरांचा आवाज ऐकत त्यांना लोकेट करत करत आपण अर्धा किल्ला चढलेला असतो.

गावाबाहेर पडताना किल्ल्याच्या मुख्य कड्याचे दर्शन होते. किल्ला डावीकडे ठेवत वाटचाल करत सुमारे दहा मिनिटात किल्ल्यावरील मंदिर व गुहा दृष्टीपथात येते आणि वाटेचे कन्फर्मेशन देते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर पाय-या लागतात.



किल्ल्याची उंची पाहता खरेच हा किल्ला पासष्ठ महिने  कसा काय लढवला असेल असे वाटून जाते. मुघलांनी किल्ल्याच्या उंचीचे लाकडी मचाण बांधून त्यावरून तोफमारा चालवला होता हे खरेच वाटायला लागते. कुठे मचाण बांधली असेल? किल्ल्यावरून त्या मचाणावर दगडफेक करून त्या कश्या उधवस्त केल्या जात असतील? या विचारातच आपण रामाच्या मंदिरापर्यंत पोहोचतो.

आता इतिहासातून बाहेर येऊन आजूबाजूला मान वळवली की, आपली चढाई आपोआप थांबते. आपल्या मनात ऐतिहासिक द्वंद्व चालू असताना इथे तर निसर्गाचा निसर्गासाठीचाच अद्वितीय सोहळाच चालू असतो. आकाशभर काळ्या ढगांनी ढकलाढकली चालू केलेली असते. एका उंच टेकाडाशी रिंगण करून फेर धरल्यासारखा भास होत असतो. सूर्यनारायणांचे लक्ष असतेच त्यामुळे या रिंगणाला सोनेरी किनार लाभते. टेकाडा-पलीकडून उंची घेतलेला वारा आता आपल्यापर्यंत येऊन ढगातील चोरून आणलेल्या दवाने आपले पापणीचे केसही भिजवतो.
Felicitation by Nature to Nature !


घड्याळाकडे लक्ष जाते आणी आपण कल्पनेतून वर्तमानात येतो. पायऱ्या चढून भल्यामोठ्या चाफ्याचा झाडापाशी आलो की चाफ्याच्या वासाने मंदिरात शिरताना आपले मनही शुचिर्भूत झाल्यासारखे वाटते.

गडावर शिरताना वाटेत एक गुहा दिसते. त्‍या गुहेत रामाचे मंदिर आहे. गुहेच्या एका बाजूला शिलालेख कोरलेला आहे. गुहेच्या खालच्या बाजूला पाण्याचे एक बारमाही टाके आहे. त्‍यामुळे गुहेत एकदम गारेगार वातावरण असते. पुजारी काकांशी थोड्या गप्पा टप्पा झाल्यावर त्यांनी गुहेखाली असलेल्या पाण्याच्या टाकीत उतरायची वाटही दाखवली. वर्षातून एकदा पावसाळ्याच्या आधी गावातून वीज पंप येथे आणून या टाकीतील सगळे पाणी काढून साफ सफाई ते करतात. बारमाही जिवंत झरा असल्याने दोन दिवसात परत टाकी भरून जाते आणि अतिरिक्त पाणी खालूनच वाहून  झाडांना जाते.

राम मंदिर व  प्रशस्त गुहा. 


गुहे समोरच्या तुटलेल्या पाय-या थेट गडावर जातात. त्‍यावरून पुढे गेल्यानंतर आपण गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात पोचतो. येथूनच थोडे खाली बुजलेल्या अवस्थेतील गुप्त दरवाजा आहे. या वाटेने आपण अर्ध्या तासात आशेवाडीत पोहोचतो. येथूनच समोरचा देहेरगड व भोरगड किल्ला दिसतो. सद्यस्थितीत तेथे मिलिटरी बेस असल्याने तेथे जाण्यास परवानगी घ्यावी लागते.
गुप्त दरवाजापासून वर जाणारी वाट रामशेजच्या दुस-या टोकाकडे जाते तेथून देहेर व आजूबाजूच्या परिसराचे मस्त दर्शन होते. तेथून फिरून आल्यावर परत पायऱ्यांच्या सुरवातीला आल्यास तेथून एक वाट खाली जाते. तेथे किल्ल्याच्या अभेद्य दरवाज्याचे दर्शन होते. येथून खाली गुहे सदृश्य जाणारी वाट ही राम मंदिराच्या बाजूस असलेल्या गुहेत निघते.



येथून बाहेर येऊन थोडे डावीकडे पठार लागते. येथे छोटी तळी आणि असंख्य मासे. गार पाण्यात पाय सोडून तळव्यांना थंडक द्यायची आणि थोडा पोटोबा करून घायचा.



येथून पुढे मोकळ्याढाक पठारावर थोडी वामकुक्षी घेतानाच वर नजर जाताच समजते कि, किल्ल्यावर आपल्याखेरीज अजून कोण तरी आहे आणि आपल्यावर लक्ष ठेऊन आहे.
ब्राम्हणी घार आपल्या जोडीला असतेच. दोन तीन पंख मारून मग खूप वेळ निवांत उडत असलेली घार आणि उतारावर गाडी बंद करून फुकट जाणारा मी या दोघात का कुणास ठाऊक साम्य वाटून जाते.




आता उन्हे सरली आणि पाय परतीच्या वाटेला लागले. जाताना वाटेतच चामरलेणी आहेत त्याही करायच्या होत्या. किल्ला उतरून आल्यावर रस्त्यावरच यष्टीची वाट बघत ठाण मांडली. सुमारे पंधरा मिनिटात यष्टी आली आणि दहा रुपयात चामरलेणी फाटा.

रामशेज किल्ल्यावरून सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावर असलेला चामर लेणींचा डोंगर दृष्टीस पडतो. त्याहीपलीकडे दूर पांडवलेणींचा डोंगर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल, तर उजव्या बाजूला दूरवर अंजनेरी व ब्रह्मगिरीचे पर्वत न्याहाळता येतात.
 
 

रामसेज, वाघेरा, खैराई


नाशिक पेठ रस्त्यावरच्या जकात नाक्‍यापुढे आशेवाडी गाव आहे. आतिथ्यशील गावकऱ्यांच्या आशेवाडीत मारुतीचं प्रशस्त मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारून छोटेखानी रामसेज किल्ल्यावर चढाई करता येते. आशेवाडीच्या दिशेला दिसणारा रामसेजचा बुधला डावीकडे ठेवत पुढे गेल्यावर रामसेज किल्ल्यावर चढणाऱ्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांनी वर चढून आल्यावर गडावर प्रवेश करण्यापूर्वी रामाचं मंदिर आणि थंडगार पाण्याची टाकी आहे. मारुती ते राम, हे अंतर आहे फक्‍त एका तासाचं! रामसेज गडमाथ्यावर कोरडी पाण्याची टाकी, पडक्‍या जोत्याचे अवशेष आहेत. माथ्यावर सुस्थितीत असलेलं मंदिर आहे. त्यात वा रामाच्या मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते. आशेवाडीकडला बुधला व त्याजवळच ध्वजस्तंभ ही गडफेरीत करण्याची इतर ठिकाणं. रामसेजवरून समोर प्रशस्त भोरगड दिसतो. संरक्षण यंत्रणांची रडार सिस्टिम असल्याने भोरगडावर मात्र आपल्याला प्रवेश नाही. दिसायला छोटा असणाऱ्या रामसेजवर मोठा इतिहास घडलेला आहे. मुघलांविरुद्ध तब्बल पाच वर्षं या किल्ल्याने टिकाव धरला होता. एकेक किल्ला असा पाच वर्षं लढवण्याच्या क्षमतेतच स्वराज्याचं सामर्थ्य दडलं होतं. रामसेजवरून पुन्हा नासिककडे येताना म्हसरूळनजीक जैन चांभारलेणी आहेत. वेळ असल्यास ती जरूर पाहून घ्यावीत. म्हसरूळकडून एक रस्ता थेट वाघेऱ्यापर्यंत जातो. वाघेरा घाटमाथ्यावरचं गाव आहे. गावाच्या समोरच एक मोठा बंधारा व जलाशय आहे. जलाशयाच्या पाठी उभा आहे उंच वाघेरा. वाघेऱ्याचे कडे थेट घाटाखाली उतरलेले आहेत. धरणाच्या पाण्यावर व सुपीक जमिनीवर शेती करणाऱ्या गावकऱ्यांना वाघेरा किल्ल्याचा रस्ता विचारायचा. वाघेरा जलाशयाचा बांध उजवीकडे जिथे वाघेऱ्याच्या सोंडेला चिकटलेला वाटतो, त्या डोंगरधारेवरून गडावर चढाई करायची. घाटाखाली उतरलेल्या गडाच्या उंचच उंच कातळभिंती उजवीकडे ठेवत गडाची माची गाठायची. पाठीवर सामान नसल्यास माची गाठायला एक तास पुरे. माचीवरून वाघेऱ्याचा उंच सुळकेवजा उंचवटा, गडमाथा दिसतो. दहा-एक मिनिटांच्या सोंडेवरील सपाट चालीनंतर गडाच्या सुळकेवजा गडमाथ्याला भिडायचं. इथे पाण्याची कोरडी टाकी आहेत. इथून गडमाथा गाठायला दोन वाटा आहेत. गडमाथा डावीकडे ठेवत वळसा घालून चढणारी निसरडी वाट अथवा सोपं 10 फुटांचं प्रस्तरारोहण करून सरळ वर चढणारी कातळाची वाट. कोणत्याही वाटेने गडाचा सुळकेवजा माथा गाठायचा. तिथे उघड्यावर शिवलिंग आहे. फडकणाऱ्या भगव्या झेंड्याबरोबर गड सर झाल्याबद्दल ग्रुप फोटो काढायचा. अंजनेरी, ब्रह्मगिरी आणि आजुबाजूच्या परिसरावर नजर फिरवायची आणि परतीला लागायचं. वाघेरा गावातून गडमाथा गाठायला आणि स्थलदर्शनासाठी दोन तास पुरे. गडावर पाणी नसल्याने वा सावलीसाठी झाड नसल्याने सोबत आणलेलं पाणी प्यायचं आणि आल्या वाटेने गड उतरायचा. वाघेऱ्यातून घाट उतरून हरसूल गाठायचं. हरसूवरून ओझरखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाणापाडा आहे. ठाणापाड्याला आश्रमशाळेसमोरून खैराई किल्ल्यावर चढाई करायची. निघताना टॉर्च घ्यायला मात्र विसरायचं नाही. खैराई किल्ला फारसा प्रसिद्ध नसलेला, दुर्लक्षित. ट्रेकिंगसंबंधीच्या पुस्तकात त्याचा उल्लेख नाही. नासिकचे हेमंत पोखरणकर यांनी त्याबद्दल माहिती पुरवली म्हणून आम्ही हा किल्ला करू शकलो. आश्रमशाळेसमोरून खैराई माचीवरचा माचीपाडा गाठायला पाऊण तास पुरे. माचीपाड्यातल्या गावकऱ्यांचं आतिथ्य स्वीकारून गड चढायला लागायचं. माचीवर पोहोचल्यावर डौलदार, बहरलेलं शेत आपलं स्वागत करतं. संध्याकाळी ते पिवळं शेत सोनेरी दिसू लागतं. माचीच्या टोकाला गडाजवळ दुतर्फा घरं आहेत. लुसलुशीत कोकरांबरोबर फोटो काढून झाले की गड चढायचा. गडाला बऱ्यापैकी तटबंदी आहे. माचीपाड्याकडला बुरुज नाक्‍यासमोर ठेवून चढत राहायचा. अर्ध्या तासाने आपण एका टेपावर येऊन पोहोचतो. इथून बुरुजाकडे तुटलेल्या तटावरून गडावर प्रवेश करता येतो. अथवा बुरूज व गडमाथा उजव्या अंगाला ठेवून गडमाथ्याला वळसा घालून गडाच्या पश्‍चिमेकडून गडावर सोप्या वाटेने प्रवेश करायचा. खैराईचा गडमाथा छोटेखानीच आहे. पण मनाला प्रसन्न वाटतं. गडावर पाण्याची टाकी आहेत. त्यातलं पाणी पावसाळ्यात पिण्यास हरकत नाही. गडाच्या तटावरून गड-प्रदक्षिणा करता येते. गडावर उघड्या मंदिराकडे दोन लहान तोफा पडलेल्या आहेत. मावळतीच्या रंगात गड फारच सुंदर भासतो. मावळणाऱ्या सूर्याला दंडवत घालून अंधार पडण्यापूर्वी माचीपाडा गाठायचा. माचीपाड्यावरून सोप्या वाटेने आल्याप्रमाणे ठाणापाडा गाठायचं. स्वतःची गाडी सोबत असेल व चालणारे भिडू असतील तर एका दिवसात हे तिन्ही किल्ले पाहून मुक्कामाला त्र्यंबकेश्‍वर वा अंजनेरी गाठता येतं. वाघेरा घाटाच्या खालचा खैराई तांत्रिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यात असला तरी भौगोलिकदृष्ट्या तो ठाणे जिल्ह्यात वाटतो. नाशिक त्र्यंबकेश्‍वरच्या आसपासच्या या किल्ल्यांची सफर आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते.
शंभू राजे छत्रपती झाल्यावर त्यांच्या जीवनाचा आणि असाधारण मुत्युचाही आढावा घेतला असता, पदोपदी आपल्याला या वाक्याची प्रचिती येते. याचं शंभू राजांचा मुसद्दीपणा आणि आम्हा चिवट मराठयांचा इतिहास ठासून सांगणारा 'रामशेज', आमचा आजचा पहिला किल्ला. औरंगजेबाला सुमारे साडेपाच वर्ष झुंजवणारा आणि या लढ्यात हात हलवत माघार घ्यायला लावणारा...रामशेज. हा किल्ला जरी लहान असला तरी त्याचा इतिहास खूपच मोठा आहे.

शहाजहान हा जेव्हा शहाजीराज्यांच्या विरोधात दक्षिणेत उतरला तेव्हा त्याने त्याच्या दख्खन मोहिमेचा मुहूर्त 'रामशेज' हा निजामशाहीचा किल्ला घेऊन केला. आपल्या वडिलांचा तक्ता गिरवत औरंगजेब, महाराज्यांच्या मृत्यूनंतर, स्वराज बुडवायला आपली साडेपाच लाखांचं सैन्य घेऊन उत्तरेतुन निघाला. दख्खन मोहिमेची सुरवात रामशेज घेऊन करायचा त्याचा मानस होता. मुघलांच्या ताब्यातील गुलशनाबाद (नाशिक) पासून १० मैलावर असलेला 'रामशेज' हा घ्यावा म्हणून त्याने शहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग याला ४० हजार सैन्य, तोफखाना यांच्यासह पाठविले आणि तो किल्ल्याभोवती वेढा टाकून बसला. या वेळी किल्ल्यावर फक्त ६०० मावळे होते, आणि त्यांचा झुंजार किल्लेदार. दुदैवाने त्या किल्लेदाराच नाव, पुरेश्या कागदपत्रांच्या आभावे अवगत नाही. मुघलानी गडावर पहिला हल्ला चढवला आणि मावळ्यांच्या दगडाच्या मऱ्यात परत फिरला. शहाबुद्दीन जवळ जवळ २ वर्ष किल्या घेण्याचा प्रयत्न करत राहिला पण त्याला यश आलं नाही. मग औरंगजेबाने, 'खान जहान बहादूरखान कोकलताश' याला मदतीसाठी पाठवले. यानेही बरेच प्रयत्न केले; तोफांसाठी डोंगरएव्हढे दमदमे उभारले ते पण तटबंदी भेदू शकले नाहीत. मग त्याने दूसरी योजना केली, दारुगोळा, तोफा, वाध्ये एका ठिकाणी गोळा केले जेणेकरून या बाजूने हल्ला होईल म्हणून मावळे बेसावध होतील आणि एक लहान तुकडी दुसरीकडून जाऊन किल्ला घेतील. पण या गनिमी काव्याचे जनक मराठेच होते, त्यांनी सैन्य विभागून मुघलांची पुन्हा फजिती केली. एवढे प्रयत्न करूनही अपयश पदरी पडलेल्या बहादूरखानाने मग दैवाची साथ घेतली, ऐका मंत्रिकाकरवी १०० तोळा वजनाचा सोन्याचा नाग अग्रभागी घेऊन किल्ल्यावर चाल केली आणि वरून आलेल्या दगडाने त्या मंत्रिकालाच टिपल्यावर पुन्हा मागे धूम ठोकली. आता साडे तीन वर्षे उलटूनही किल्ला येत नाही म्हणून वैतागून औरंगजेबाने तिसरा सेनापती बदलला; कासम खान. यालाही काही यश येत नव्हतं, याच गमक म्हणजे..शंभू राजांचा मुसद्दीपणा. या पूर्ण काळात किल्ल्याच्या वेढ्याला, बाहेरून त्रास देण्याचं आणि रसद तोडण्याचं काम राजांनी 'मानाजी मोरे आणि रुपाजी भोसले' या सरदारांना दिलं होतं आणि ते हे चोख बदवत होते. सुमारे साडेपाच वर्ष मराठ्यांनी अशी कडवी झुंज दिल्यावर औरंगजेबाने या किल्ल्याचा नाद सोडला. पुढे हा किल्ला बदलेल्या किल्लेदाराच्या फितुरीने मुघलांना मिळाला. 

आजून एक आख्यायिका या किल्ल्याच्या नावाला जोडलेली आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात पंचवटीत होते तेव्हा ते इथे आरामसाठी येत असत म्हणूनच 'रामशेज' म्हणजेच रामाची शय्या.

हा झाला इतिहास आता भूगोल पाहू...आमच्या नजरेतून
किल्ला तसा लहानसाच आहे. गडाची उंची साधारण ३२०० फुट एवढी आहे. नाशिक पासून पुढे पेठ मार्गावर आशेवडी या गावाजवळ हा किल्ला आहे. किल्ल्याची वाट डाव्या बाजूने जाते. काही चांगल्या तर काही ढासळलेल्या पायऱ्या चढून आम्ही मंदिराजवळ आलो. एका गुहेत बांधलेलं रामाचं मंदिर सुंदर आहे. मंदिराच्या भिंतीवर एक शिलालेख आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूला एक लहानशी गुहा आहे तीत शंकराची लहानशी पिंड आणि नंदी ठेवला आहे. या गुहेच्या छताला एक दगडाचा झरोका आहे तो किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागून असलेल्या चोर दरवाज्याचा आहे. मंदिराच्या मागेच एक पाण्याचं कुंड आहे, यातले पाणी पिण्यायोग्य आहे. या पाण्याची चव घेऊन डाव्या बाजूला असणाऱ्या काही पायऱ्या तुडवत आम्ही गडमाथ्यावर आलो. इथे समोरच जमिनीत खोदलेला चोरदरवाजा आहे. हा दरवाजा गडाच्या दुसऱ्या बाजूने उघडतो पण आता मातीत बुझुन गेलेला आहे. दरवाज्याच्या कमानी आजही लक्ष वेधून घेत होत्या. हा दरवाजा नंतर पाहू म्हणून आम्ही उजवीकडे वळालो. लगेचच उजव्या बाजूला काही प्रशास्र पायऱ्या  घळीत किल्ल्याचा मुख्य दरवाजाला घेऊन गेल्या. या दरवाज्याच्या पुढे किल्ल्याची प्राचीन मुख्य वाट असावी. या किल्ल्याच एक वैशिष्ट म्हणजे मुख दरवाज्याला लागूनच एक लहानसा पायऱ्यांचा चोर दरवाजा खोदलेला आहे, याने एखादा लहानसा माणूस फक्त खाली जाऊ शकतोकारण याचं लहानसं कवडस्या सारखा एक्सिट पॉईंट. आधी सांगितल्या प्रमाणे हाच तो गुहेच्या छताचा कवडसा. इथे सचिन आणि माझी मतभिन्नता झाली, त्याच्या मते हा चोरदारवाजा नाही कारण त्याची साईझ सचिन पास होईल इतकीही नव्हती. पण मला तो चोरदारवाजा वाटला ते त्या एक्सिट पॉइंटच्या मागे, पायऱ्या संपतात तिथे कोरलेल्या लहानश्या देवडी मूळे. असो, दोघंही या विषयावर, घरी येईपर्यंत बोलत होतो. किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा उभ्या कातळात कोरलेल्या आहे, लागूनच कातळाचेच बुरुज उभे केले आहेत. दरवाज्यावर दोन लक्ष्मीकमळ कोरलेली आहेत दोन्ही बाजूंना, त्या काळातील वैभवाच प्रतिक. हा किल्ला साधारण १२०० वर्षे अगोदर राष्ट्रकुटांच्या कालावधीत बांधला गेला असावा पण अजूनही या कातळात चिनी हतोड्याचे घाव जिवंत दिसतात. प्रवेशद्वार पाहून आम्ही पुन्हा बाहेर येऊन उनजीवकडे, किल्ल्याच्या मुख्य भागी वळलो. थोडं पुढे गेल्यावर काही दगडात कोरलेली पाण्याची टाकी आणि बांधलेलं एक तलाव दिसलं. टाक्यांच्या वर देवीचं मंदिर दिसत होतं. या टाक्यांना उनविकडे आणि त्या मंदिराला उजवीकडे ठेवून आम्ही किल्ल्याचा दुसरा चोरदरवाजा पाहायला निघालो. हा दरवाजाही, जमिनीत खोदलेला असून खाली उतरण्यासाठी काही पायऱ्या केलेल्या आहेत. त्या पार करून आम्ही एक दरवाज्यातून आम्ही एका सुंदर ठिकाणी पोहीचलो. समोर भोरगड आणि देहेरगडचा डोंगर आणि परिसर, ऊन-ढगांच्या लपंडावाट मन रामवून टाकत होता. इथे पाच-एक मिनिट बसून, काही प्रोफाईल फोटोजचा क्लिकक्लिकाट केला. या दरवाज्यातून वर गडमाथ्यावर जाताना काही आजून पाण्याची टाकी, उध्वस्त वास्तू लागल्या. फिरून देवीच्या मंदिरापासून आम्ही पुन्हा मुख्य दरवाज्या जवळ येऊन डावीकडे माची पाहण्यास निघालो. माचीवर एक पाण्याचं टाकं आणि एक अलीकडे लावलेला ध्वजस्तंभ आहे. इथे एका सापाचे दर्शन झाले आणि आम्ही पुन्हा दरवाज्यापाशी आलो. समोरचा राहून गेलेला चोर दरवाजा पहिला. हा दरवाजा गडाच्या दुसऱ्या बाजूला उघडतो पण आता बुझुन गेला आहे. दोन कमानी पार करून एका कातळात कोरलेल्या मोठ्या गुहेजवळ हा दरवाजा घेऊन गेला. पुढे जायची वाट बंद झाली आहे. हा चोर दरवाजा पाहून आम्ही आमची गडफेरी पूर्ण केली. किल्ला फिरायला आम्हाला दोन तास लागले, वर यायला जेवढा वेळ लागला होता त्यापेक्षाही जास्त. किल्ला आहेच तसा!














रामशेजवरून आम्ही निघालो पूर्वेला देहेरगडकडे. तो समोर दिसत होता म्हणून न विचारता आम्ही आशेवडी गाव गाठलं. देहेर आणि भोरगड हे दोन्ही किल्ले एकमेकांना लागून आहेत, पैकी भोरगडवर ऐरफोर्स ने रडार्स बसवलंइ आहेत म्हणून तिथे जाता येत नाही. एकाच खिंडीतून हे किल्ले वेगवेगळे केले आहेत. गाववल्याने सांगितलेले नो परमिशन ऐकून आम्ही मागे फिरलो आणि मुख्य रास्तानं, अशेवडीच्या पुढे ७-८किलोमीटर वर रासेवाडी गावाकडून लेफ्ट घेऊन 'देहेरवडी' गाठली. इथून किल्ला समोर दिसतो. डोंगराच्या सोंडेवरून किल्ला गाठायला दीड तास लागला. किल्ल्यावर पहाण्यासाख फारसं काही नाही आहे आता. पायऱ्या, एक उद्धस्त प्रवेशद्वार, आणि काही पाण्याची टाकी आहेत. याची गडफेरी आटपून आम्ही डोंबिवली गाठली. 



जाता जाता एक विचार..…. नेहमीच मनात येतो तो आमच्या. आमचा पर्सनल...
इतिहास.... साडे पाच वर्षांचा ज्वलंत लढा आणि विजय हिंदुस्थान बादशहा औरंगजेबविरुद्ध; पण आमच्या शालेय जीवनात एक ओळ सुद्धा नाही. बहुतेक दोन्ही छत्रपती भोसले आडनाव लावत होते म्हणून...गांधी किंवा नेहरू असते तर...दिवसागणिक वर्णन भोकवून घेतलं असतं आमच्याकडून शाळेत!.....
आम्ही शिकलो तो इतिहास परतंत्राचा, लोर्ड्स आणि गव्हर्नरचा....पण आमचा खरा इतिहास अशाच रक्ताने मिळवलेल्या स्वातंत्र्याचा आहे...आणि तो सुरू होतो सिकंदरच्या काळापासून...
आम्हाला पुस्तकातून शिकवला जातो १५० वर्षांच्या गुलामीचा इतिहास पण आता मनात मात्र....स्वराज्य आणि स्वातंत्रलढा...

अलौकिक झुंजीचा साक्षीदार किल्ले रामशेज (Ramsej Fort An Eye witness of Exctraordinary Battle)

नाशिक पट्टा हा किल्ल्यांच्या साखळ्यांनी परिपूर्ण असा आहे हे आपणा सर्वांस माहित आहे.प्रभू श्री रामाचा पदस्पर्श ह्या भूमीला लाभलाय,आणि पौराणिक संदर्भाने जिथे प्रभू श्री रामचंद्र विश्रांती घ्यायचे त्या डोंगराला रामशेज म्हंटले जाते.हाच आपला सर्वांचा आवडता आणि सुपरिचित झुंजीचा साक्षीदार रामशेज किल्ला होय.सुमारे साडे पाच वर्ष मोगली फौजांना आणि मातब्बर सरदारांना सळो कि पळो करून सोडणारा अशी ह्या किल्ल्याची ओळख.रामशेज ला जाण्यासाठी नाशिक पासून साधारण १४ ते १५ किलोमीटर वर असणारे आशेवाडी गाव गाठायचे.गावातून समोरच कातळ टोपी दिसते तोच रामशेजचा किल्ला.किल्ल्यावर जाणारी वाट मळलेली आहे किल्ला डाव्या बाजूला ठेवून सुरुवातील बांधीव पायऱ्या चढून त्या नंतर मळलेल्या वाटेने सरळ किल्ला चढत जायचे.चढताना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराअलीकडील राम मंदिर स्पष्ट दिसते त्यामुळे वाट चुकण्याचा संभव नाही.

पायथ्यापासून दिसणारी रामशेज किल्ल्याची कातळटोपी

साधारण ४५ मिनिटे ते १ तासाच्या चढाई नंतर आपण गुहेपाशी पोहोचतो.ह्या गुहेत शिवपिंड ठेवलेली आहे. हि गुहा पाहून सरळ गेल्यावर श्री रामाचे मंदिर लागते मंदिराच्या मागच्या भिंतीवर (जी किल्ला चढताना समोर लागते) एक शिलालेख कोरलेला आहे.ह्या शिलालेखावरचा मजकूर हा पुढील प्रमाणे आहे –
१. ।। श्री गणेशाय नम:।।
२. स्वस्तिश्री म नृपशालिवाहन शक १६८२ विक्रमनाम
३. संवत्छरे: श्रीराजा शाहूचरणि दृढभाव: पंत
४. प्रधान बाळाजि बाजिराव: सुभेदार आपा स ब (स)
५. (दा) शिव: सटवोजि मोहिते हंबिरराव
६ (फ)किर मुहहंमद कारिगर

Advertisements
REPORT THIS AD

शिलालेखाचा सारांश-शालिवाहन शकाच्या १६८२व्या वर्षी विक्रमनाम संवत्सरात छत्रपती शाहू महाराजांचे पेशवे
बाळाजी बाजीराव (नानासाहेब पेशवे) यांनी सुभेदार (आपाजी सदाशिव?), शेवटची ओळ लागत नाही परंतु त्याचा साधारण अर्थ सटवोजी हंबीरराव मोहिते यांच्या सहकार्याने किल्ल्याचा तट, बुरूज, दरवाजा किंवा अन्य वास्तू यांचा जिर्णोद्धार केला. हे बांधकाम फकीर मुहम्मद याने केले असा होतो.
ह्या शिलालेखावरून स्पष्ट होते कि इ.स १७६० (शके १६८२) साली किल्ला मराठ्यांकडे होता व किल्ल्याचा तट, बुरूज, दरवाजा किंवा अन्य वास्तू यांचा जिर्णोद्धार केला गेला.मंदिरात श्री राम ,लक्ष्मण आणि सीता मातेची मूर्ती आहे.मंदिर छोटेखानी आणि सुंदर आहे.मंदिराच्या डाव्या बाजूस पाण्याचे टाके आहे.हे पाहून सरळ पायरी मार्गाने चालत आपण उध्वस्त प्रवेशद्वाराने किल्ल्यात प्रवेश करतो.

शिलालेख

किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याचे दोन भाग पडतात डाव्या बाजूला आहे तो पठाराचा भाग आणि उजव्या बाजूला पाण्याची टाकी आणि उध्वस्त अवशेष असलेला किल्ल्याचा डोंगर माथा.प्रथम उजवीकडे जाण्याआधी प्रवेश द्वाराला समांतर उतरत गेल्यावर कमानी असलेला दरवाजा लागतो.मी समांतर ह्या साठी म्हणतोय कारण दरवाजा उतरल्यावर आपल्याला राम मंदिराजवळ असलेले गुहेचे छत दिसते आणि गम्मत म्हणजे ह्या छताला भोक आहे ते आपल्यला आतून स्पष्ट दिसते.दरवाज्याचे प्रयोजन बघून नक्कीच या ठिकाणी किल्ल्याला दुहेरी तटबंदी असावी असे वाटते. दरवाजा अत्यंत रेखीव आहे , दरवाजा पाहून पुन्हा मागे यायचे आणि उजव्याबाजूस सरळ चालत गेल्यावर दगडी पायऱ्या लागतात त्या उतरल्यावर आणखी एक छोटा दरवाजा लागतो आणि पुढे छोटेखानी तटबंदी लागते हि बहुदा टेहळणीची जागा असावी .इथून रामशेज खालील परिसर आणि नाशिक कडे जाणारा रास्ता पाहायला मिळतो.हे पाहून वर यायचे आणि सरळ चालत जाऊन डोंगर माथ्यावर जायचे.

किल्ल्याला च्या मुख्य दरवाज्याला आतून समांतर असणारा दुसरा दरवाजा
गडमाथ्याच्या डाव्या बाजूला असणारा दुसरा कमान असलेला दरवाजा

गडमाथ्यावर जाताना थोडा अलीकडे चुन्याच्या घाण्याची जागा लागते ती पाहून पुढे गेल्यावर आधी काही कोरडी टाकी आणि देवीचे मंदिर लागते.मंदिर पाहून सरळ चालत राहायचे आणि माथ्याच्या टोकापर्यंत जायचे , वाटेत काही उध्वस्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात.अवशेष पाहून आपण माथ्याच्या टोकाला पोहोचतो इथे खराब टाक्यांचा समूह पाहायला मिळतो. किल्ल्यांवरच्या टाक्यांची संख्या पाहता किल्ला छोटा असून किल्ल्यावर बराच राबता असावा असे वाटते.हे पाहून परत किल्ल्याच्या पठाराच्या मार्गावर निघायचे परंतु पठारावर जाण्याआधी वाटेत टाकी लागतात त्याला समांतर एक छोटी पायवाट खाली कड्या पर्यंत जाते.इथे किल्ल्यातील गुप्त दरवाजा लागतो. काटकोनात उतरून हा चोर दरवाजा आपणास दिसतो फार फार तर २ माणसे उभे राहू शकतात एवढी जागा आहे.दरवाज्याच्या छतावर कमळपुष्प कोरले आहे.किल्ल्यावरील हा छोटेखानी गुप्तदरवाजा किल्ल्याचे मुख्य आकर्षणच म्हणायला हवे.दरवाच्याची रचना पाहून मन थक्क होते.

तटबंदी आणि चुन्याचा घाना

कोरडी पाण्याची टाकी
चोरदरवाजाच्या छतावरील कमलपुष्प
चोरदरवाजा

चोरदरवाजा पाहून सरळ किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूस यायचे इथे एक सुंदर मोठा भगवा ध्वज उभारलेला आहे. ध्वजालिकडे दोन मोठी खराब टाकी लागतात.इथे आपली गडफेरी संपते.पाऊस सुरु झाल्या झाल्या अथवा सुरु होताना जे मळभ असणारे वातावरण असते त्या वातावरणात ह्या किल्ल्यावर जरूर जावे.मराठ्यांच्या इतिहासातील एका अलौकिक झुंझीच्या साक्षीदार असणाऱ्या ह्या छोटेखानी किल्ल्याला जरूर भेट द्या.

गड माथ्यावर असणाऱ्या झेंड्यासोबत मी

गडाच्या इतिहासाबद्दल – रामशेज हा किल्ला १६३५ साली शहाजहान ने स्वारी केली तेव्हा मोघलांकडे होता हे धोडप , राजदेहेर ह्या किल्ल्यांवर असणाऱ्या शिलालेखांवरून कळते.तेव्हा रामसेज किल्ल्याबरोबरच त्या पट्ट्यातील चांदवड, धोडप , इंद्राई, राजदेहेर इत्यादी किल्ले अलावर्दीखान तुर्कमान ह्याने घेतले असे शिलालेखात कोरले आहे.रामशेजवर औरंगजेबाने शहाबुद्दीनखान ह्याची नियुक्ती केली , तसेच त्याच्याबरोबर राव दलपत आणि इतर बुंदेले सरदार सुद्धा होते.प्रारंभी बुंदेले व त्यांच्या सरदारांचा किल्ल्यावरील ५०० ते ६०० लोकांच्या शिबंदीसमोर काही टिकाव लागला नाही.त्यातच मे १६८२ साली संभाजी महाराजांनी रुपाजी भोसले व मानाजी मोरे ह्यांना वेढा फोडण्यासाठी पाठवले त्यावेळी शहाबुद्दीन खानाच्या सैन्याबरोबर तुंबळ युद्ध झाले आणि मोगलांना माघार घ्यावी लागली.ह्या विजयाने किल्ल्यावरील शिबंदीत जोर चढला.शहाबुद्दीन खानाकडून काही एकट्याने होत नाही म्हंटल्याबर औरंगजेबाने बहादुरखानास शहाबुद्दीन च्या मदतीस कुमक देऊन पाठवले.शहाबुद्दीन ने किल्ल्याला वेढा घालणे , सुरुंग लावणे , मोर्चे बांधणे , दमदमे तयार करून वर चढवणे हे सर्व प्रयत्न केले पण किल्लेदारासमोर त्याचे काही चालेना.शिवाय खानाने केलेल्या दुसऱ्या कडक हल्ल्यात राजा राव दलपतराय ह्याला दगड लागला त्यामुळे मोगलानी पुन्हा माघार घेतली. शेवटी बादशहाने शाबुद्दीनखानाला परत बोलावले व जुन्नर ला पाठवले आणि वेढ्याची जबाबदारी खानजहान बहादूर कोकलताश ह्या एकट्यावर आली.

कोकलताश ने तर आणखी नवीन योजना आखली त्याच्या योजने प्रमाणे किल्ल्याच्या एका बाजूला हल्ला करायचा म्हणून तोफा दारुगोळा त्या बाजूस आणून हशमांनी आणि सैन्याने जमवाजमव करून गर्दी करून आवई उठून द्यायची आणि दुसऱ्या बाजूस किल्ल्याच्या जिथे शिबंदी नाही किंवा कमी आहे तिथे काही निवडक सैनिकांनी जाऊन किल्ल्यावर हल्ला करायचा. परंतु किल्लेदार इतका हुशार होता कि त्याला हि योजना कळली व त्याने सुद्धा आपल्याला जस काय माहित नाही असे दाखवून मुद्दाम दुसऱ्या बाजूने येणाऱ्या मोगली गटावर हल्ला करण्यासाठी आलेल्या सैनिकांना सडकून काढून मोगलांच्या योजनेवर अक्षरशः पाणी फिरवले. अजून कहर म्हणजे सैन्याने कोण्या एका तांत्रिकाला पकडून आणले आणि तो म्हणाला कि मला १०० तोळे वजनाचा सोन्याचा साप द्या मी तो मंत्रून हातात घेईल मग कुठलीही अडचण न येता तुम्ही किल्ल्यात प्रवेश करू शकाल.एके दिवशी ह्या तांत्रिकाला आघाडीवर ठेवून मोगली सैन्य येताना मराठ्यांना दिसले आणि मराठ्यांनी दगडांचा मारा गोफणीने सुरु केला, ह्या माऱ्यात तांत्रिकाला दगड लागला त्यात तो साप उडाला आणि तांत्रिक जागच्या जागी कोसळला हे पाहून मोगली सैन्याने माघार घेतली.ह्या पराभवाने संतापून औरंगजेबाने कोकलताशला पण पुन्हा बोलवून घेतले आणि वेढा उठला.त्यानंतर संभाजी महाराजांनी किल्लेदाराचे कौतुक करून त्याची बदली एका प्रमुख किल्ल्यावर केली.पुन्हा बादशहाने कासीमखान किरमाणी नावाच्या सरदाराला किल्ला घेण्यासाठी पाठवले पण त्याच्याकडून सुद्धा काही झाले नाही.अशाप्रकारे सण १६८७ पर्यंत किल्ला भांडला आणि शेवटी फितुरीनेच तो मोगलांकडे आला.

मी हि झुंज स्थलाभावी फार थोडक्यात सांगितली ,ह्या लढाईवर सविस्तर लिहिण्यासारखे आहे.थोडक्यात काय माझा एक एक एक एक वर्ष लढू शकतो हे महाराजांचे वाक्य रामशेज आणि मराठ्यांनी सार्थ केले.

संदर्भ- ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – डॉ. सदाशिव शिवदे ,तारीखे दिल्कुशा ह्या भीमसेन सक्सेना च्या ग्रंथाचा श्री. सेतुमाधवराव पगडी ह्यांनी केलेला मराठी अनुवाद – मोगल आणि मराठे , तसेच ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ६ मधील अखबार

https://rockpachh.wordpress.com/2021/05/09/ramsej-fort-an-eye-witness-of-exctraordinary-battle/
 
 

गरज वारसा सर्वेक्षणाची!

नाशिक एक ऐतिहासिक संस्कृती पुढे घेऊन जाणारं गाव आहे. येथील समृद्ध सांस्कृतिक ऋणानुबंधाला लोकसंस्कृतीचे कोंदण लाभले आहे. येथील प्रत्येक वारसा हा प्रत्येक श्वासातून समूहमनाचा ठेका घेताना दिसतो. प्रत्येक वारशामध्ये संस्कारसक्षम स्पर्श अनुभवता येतो. हा वारसा जपण्यासाठी तो नेमका कुठे, कसा जगतो आहे, हे शोधायलाच हवे. म्हणून गरज आहे वारसा सर्वेक्षणाची.

मानवी संस्कृतीच्या विकासात वारसा निर्मितीला महत्त्वाचे स्थान आहे. जगण्याच्या सजगतेतून प्रथा, परंपरांचा जन्म झाला. आपल्या आजूबाजूला जे काही घडतं आहे, त्याच्या नोंदी गुफांमध्ये चित्रांच्या माध्यमातून रेखाटला गेला. शिकार, शेती, लग्न, मिरवणुका, लढाईचे प्रसंग हजारो वर्षांपासून जपलले आपण पाहतो. वारसा विकासालाही टप्पे होते, असे म्हंटले तर वावगे ठरू नये. गुफांमधील ही चित्र पुढे मूर्ती कलेतून दिसू लागली. भाषा, लिपी विकसित होऊ लागली अन् चित्रांच्या जागी रेषांनी आकारलेली लिपीही एक वारसा ठरली. निसर्गाकडून माणूस देव या संकल्पनेकडे वळाला. मूर्तीपूजा जसजशी विकसित झाली तसतशी

लेणी, मंदिरे आकाराला येऊ लागले. भाषाही दरम्यानच्या काळात बोलकी होऊ झाली. वस्ती करून राहू लागलेला माणूस आपल्या पाऊलखुणा सिंधू-सरस्वती संस्कृतीसारख्या स्थळांतून अगदी नाशिक-जोर्वे सारख्या स्थळांपर्यंत पुढच्या पिढ्यांसाठी वारसा म्हणून उभ्या ठाकल्या. उत्खननातून आता या पाऊलखुणा समोर आल्याने मानवी संस्कृती कधी अन् कशी बहरली हे समोर आले आहे. ही स्थळे आपला वारसा ठरू लागली आहेत. पण माणूस येथेच थांबला नव्हता. त्याने प्रगतीची कास कधी सोडली नाही. राहण्यासाठी घरे, जगणे सोपे करण्यासाठी वेगवान हत्यारे, गरजेची भांडी, जगण्यासाठी अन् मेल्यानंतर काय या नीतीमूल्यांची ठेवण सुरू केली. पंथ, धर्म, सत्तेतील जयविजय, आक्रमण, सत्तांतर, व्यापार हे बदल जसजसे मानवाने स्वीकारले तसतशी त्याच्या जगण्यातील बदलही पुढे आले. बदलाचे आव्हानही त्याने स्वीकारले अन् लेणी, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले, वाडे, नदी, लोकसंस्कृती, सणउत्सव, प्रथा, परंपरा, चित्रकला, काष्ठशिल्प, देवदेवतांची शिल्पे, लोककला, लोककथा, अख्यायिका, गीते, संस्कार हे सर्वकाही त्याने अन् आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी जपून ठेवले. बदलत्या काळानुसार यातील अनेक वारसास्थळे (स्थळ म्हणजे फक्त वास्तू नव्हे; लोकपरंपरा, प्रथा देखील.) लोप वापली, काही नव्याने निर्माण झाली तर अनेक वारसास्थळे लोप वापण्याच्या स्थितीत आहेत. या लोप वापत असलेल्या दृश्य अन् अदृश्य वारसा स्थळांचे जिल्ह्यानुसार सर्वेक्षण होणे व त्यावर चिंतन होणे आवश्यक आहे. असे न झाल्यास हा वारसा हातातून निसटेल ही भीती कायम आहे. फक्त पुरातत्त्व विभाग सर्वच वारसा स्थळांचे संवर्धन करण्यात सक्षम नाही. त्यामुळे आपला वारसा लोकांनीच जपायला हवा, यासाठी एक मोठी चळवळ उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र यासाठी नेमक्या कोणत्या पद्धतीने कामाला सुरूवात झाली पाहिजे. याबाबत मार्गदर्शन व जिल्ह्यातील वारसास्थळांचे सर्वेक्षणाचा गोवर्धन पर्वत पुरातत्त्व व गॅझेटिअर या दोन विभागांनी उचलायला हवा. या दोन विभागांवर जबाबदारी टाकण्यात अथवा त्यांच्याकडून अपेक्षा करण्याच कारणही तसं आहे. राज्य पुरातत्त्व विभागाच्या संचालकपदी असलेले तेजस गर्गे अन् गॅझेटिअर विभागाच्या कार्यकारी संपादक व सचिवपदी असलेले डॉ. दिलीप बलसेकर हे दोघेही नाशिककर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षाही खूप आहेत. वारसा संवर्धन क्षेत्रात चांगले काम अपेक्षित असेल तर त्यांना नाशिककरांनीही योग्य साथ द्यायला हवी अन् या विभागांना लोकसहभाग आवश्यक असेल तर वारसा सर्वेक्षण, संवर्धन, जतनाची कामे कशी केली जातात याचे प्रशिक्षण त्यांनी नाशिककरांना द्यायला हवे. तरच वारसा जतन अन् संवर्धनाच्या विकासवाट अधिक समृद्ध अन् सोप्या होतील. मात्र, यापूर्वी गरज आहे ती आपल्या जिल्ह्यात नोंदविल्या न गेलेल्या गावागावांतील वारसा स्थळांच्या सर्वेक्षणाची. अशा सर्वेक्षणातूनच एकमेकांतील दूरावा दूर करून संवाद निर्माण करता येईल.

वारसा म्हणजेच हेरिटेजबाबत लोकांमध्ये जनजागृती होत आहे. जुनं ते सोनं याचही महत्त्व लोकांच्या लक्षात येऊ लागलं आहे. त्यामुळे आपण आता जतन, संवर्धन प्रक्रियेकडे वळायला हवं. मात्र वारसा स्थळांचं जतन-संवर्धनापूर्वी गावागावांतील वारसा नेमका काय आहे, कोणत्या स्थितीत आहे यावर मंथन व्हायला हवं. ऐतिहासिक, सांस्कृतिक व कलात्मक वारसा शोधणं, मिळणं ही सर्वेक्षणाच्या पातळीवर पहिली मोहीम. या वारशाची नोंद घेणे ही दुसरी पायरी. तर मिळालेल्या वारशाचे विश्लेषण, त्याची स्थिती अन् त्यासाठी काय करता येर्इल ही वारसा संवर्धन आणि जतनची शेवटची पायरी ठरते. उदाहरणच द्यायचे झाले तर गोदाकाठी पूर्वी चित्रकथी नावाची एक लोककला सादर व्हायची. ही आता फक्त कोकणात दिसते. गोदाकाठी कागदावर, कापडावर काढलेल्या चित्रांच्या मदतीने त्या चित्रांचे वर्णन गीतातून केले जायचे. रामायण, महाभारत, अनेक अख्यायिकांचे हे हक्काचे ठिकाण होते. जनजागृतीचे संदेशही या चित्रकथीतून दिले जायचे मात्र आता ही लोककला नामशेष झाली आहे. अशीच आणखी एक लोककला म्हणजे बोहाडे. गावागावांतील उत्सवांमधून सादर होणारे बोहाडे, आखाडी आता बंद होऊ लागले आहेत. बोहाड्यांना दारूची लागण झाल्याने या कार्यक्रमांमधून होणारा वाद नको म्हणून हा लोककला प्रकार नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर काही गावांनी हा वारसा काळजाशी जपला आहे. या महत्त्वाच्या घटनेची नोंद मात्र ना पुरातत्त्व विभागाने घेतली आहे ना गॅझेटिअर विभागाने. कॉर्पोरेट संस्था प्रदर्शनापुरत्याच लोककलांचा आधार घेताना दिसतात. पण ठोस काम त्या करताना दिसत नाहीत. अशाच उपेक्षेतून बोहाडे ही परंपरा बंद होत आहे.

बोहाडे लोककलेचा एक भाग असूनही लोककथा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. फक्त लोककलाच नाही तर या लोककलेवर विसंबून असलेले कलाकारही विवंचना सहन करीत जगत आहेत. सरकारने पुढाकार घेऊन सुरू केलेले उपक्रमही ढेपाळले आहेत. हरसूल येथे मुखवट्यांचे संग्रहालय उभारण्यात आले. पण, दुर्लक्ष अन् इच्छाशक्तीच्या अभावामुळे सर्वकाही कुलपात पडून आहे. उत्साहाच्या भरात लाखो रूपये खर्च करून उपक्रमांचे काय होते हे हरसूलचे उदाहरण ताजे आहे. बोहाडे परंपरा अन् त्यांच्या मुखवट्यांना लोकाश्रय अन् सरकारचा आश्रय मिळाला तर लोककलेचे जतन अन् संवर्धन होर्इल. शिवाय, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही वेग येर्इल. अशीच तऱ्हा आहे आदिवासी लोककला, कलाकार अन् प्रथा, परंपरांची. राष्ट्रीय पातळीवर वाद्य वाजवणारे कलाकार नाशिकमध्ये आहेत. मात्र त्यांना राजाश्रय नसल्याने त्यांची कला नामशेष होण्याच्या स्थितीत आहे. सध्या अनेक कलाकार मोलमजुरी करून जीवन कंठत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध तारपा वादक हरी दत्ता चारस्कर. हा कलाकार वारसा नाही का? त्यांना जपण्यासाठी प्रयत्न करायला नकोत का? त्यांची कला पुढच्या पिढ्यांकडे जाऊ शकेल, असे वारसा लोककला विद्यापीठ नाशिकमध्ये उभे राहू शकत नाही का? या प्रश्नांची उत्तरं फक्त विचारमंथन करून मिळणार नाहीत. कारण, जागेवरून बसून मंथन करण्यापलीकडे म्हणजे नाशिकचा नेमका वारसा काय आहे अन् तो जपण्यासाठी काय करायला हवे यावर आता फिल्डवर्क या ठोस उपाययोजनेची गरज आहे.

नाशिकमधील प्राचीन मंदिरांची स्थिती तर अत्यंत दयनीय आहे. हा वारसा जपला जावा असे कोणालाही वाटत नाही, अशी परिस्थिती आहे. याचा फायदा एखादा नेता, अँटिक वस्तूंचा एजंट घेताना दिसतो. गावात नवीन मंदिर बांधून देतो म्हणून गावातील जुन्या मंदिरातील शिल्प ट्रक भरून घेऊन गेल्याची उदाहरणे नाशिकमध्ये कमी नाहीत. यास आपली मानसिकताही तितकीच कारणीभूत आहे. मंदिर भग्न झालं, शिल्प भंगली म्हणजे अनिष्ट काही होर्इल, या भीतीने अनेक गावकऱ्यांनी ही प्राचीन शिल्प, मूर्ती चक्क ट्रक भरून समुद्रात नाहीतर नदीत सोडून दिल्याची उदाहरणेही नाशिकमध्ये सापडतात. अशा एजंटांना रोखण्यासाठी आपल्याकडे कोणतीही व्यवस्था नाही. कायदा आहे पण कोणी तक्रार करीत नाही, तोपर्यंत हा कायदा कोणतीही भूमिका घेताना दिसत नाही. या सगळ्यामुळेच वारसा अज्ञात आहे अन् नष्ट होण्याच्या स्थितीत आला आहे.

वीरगळ, प्राचीन मंदिरे, इतिहास, मंदिरांवरील चित्र, प्राचीन मठ, पेशवेकालीन वाडे, वीरगळी, आदिवासींचे चिरे, बारवा, यादवकालीन विहीरी, ऐतिहासीक जलयोजना, नदीवरील घाट, शिलालेख, ताम्रपट, पोथ्या, जुनी कागपत्रे असा अन् खुपसा वारसा जपण्यासाठी जोपर्यंत गावागावातून सर्वेक्षण करून नोंदी होत नाहीत. तोपर्यंत अवतीभवती वारसा आहे, तो जपला पाहिजे अन् त्यातूनही आपल्या गावाचा विकास होऊ शकतो ही भावना ग्रामस्थांमध्ये जोपर्यंत रूजविण्यासाठी प्रयत्न होत नाही, तोपर्यंत सगळे प्रयत्न निरर्थक ठरतील. पुरातत्त्व अन् गॅझेटिअर या दोन विभागांना लोकाभिमुख व्हायचे असेल तर त्यांनी त्याची सुरूवात अशा सर्वेक्षणातून करायला हवी. तरच लोकांना त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण होर्इल. या चळवळीला लोक पाठिंबा, सहभाग मिळेल अन् वारसा जनतसंवर्धनाचा श्रीगणेशाही होर्इल. 

राजधानीचे अजमेर सौंदाणे

गाव म्हणून असलेल्या गुणांशिवाय आणखी काही वैशिष्ट्यांनी एखादं गाव सजलेलं असेल तर तेथे राहणाऱ्यांच्या मनातही त्या वेगळेपणाविषयी कुतुहल निर्माण झालेलं असतं. मात्र मनातल्या त्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सटाणा तालुक्यातील अजमेर सौंदाणेचा इतिहास आजही अज्ञात आहे. ही सफर त्या गावाबद्दलचं कुतुहल वाढवते.

गाव म्हणजे काय? गावाला वेस का असते? एक वेशीचं अन् दोनहून अधिक वेशी असतील तर? गावाला कोट का असतो? वेस, कोट नसलेली गावे कशी असतात? बाराबलुतेदारी असलेले गाव म्हणजे काय? गावाबद्दलच्या अशा अन् अशासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं माणूस समूहाने राहू लागला तेव्हापासूनच्या त्याच्या जगण्यातल्या जडणघडणी अभ्यासल्या की मिळू लागतात. गावच्या हद्दीला शीव म्हटले जाऊ लागलं अन् माणसं राहतात त्या पांढरीला गावठाण. गाव मोठं असेल तर दोनपेक्षा अधिक वेशी आणि मग त्यानुसार बंदोबस्तासाठी सैनिकांची गरजही पडते. जातीनुसार व्यवसाय, जबाबदाऱ्या व राहण्यासाठी गल्ल्यानिर्माण झाल्या. एकमेकांमध्ये देवाणघेवाण व व्यवहार अन् आली करव्यवस्था यातून पाटील, कुलकर्णी, वतनदार व इतर ग्रामाधिकारी निर्माण झाले. प्रथा, उत्सव, परंपरा या गावाला एकजीव करतात. देशाभिमानाप्रमाणेच गावाभिमान निर्माण झालेला गावोगावी दिसतो. पोरगा किती लांब गेला तरी गावाला विसरत नाही. कारण त्यांच्या आठवणींच्या पाऊलखुणांनी गाव सोडलेलं नसतं. आशा, आकांक्षा, राजकारण, समाजकारण, विश्वास, नातीगोती यांच्या मंथनातून गाव असचं उभं राहतं. असाच अनुभव सटाण्यातील अजमेर सौंदाण्याची सफर करताना येतो.

नाशिकहून सटाणा पोहचलात की, सटाण्यातून अजमेर सौंदाणे पाच-सहा किलोमीटवर आहे. अजमेर हे गाव गायमुख (लखमी नालाही म्हणतात) व डोहणी नदीचा संगमावर वसलेले आहे. गावात जाण्यासाठी नदीवरील पूल ओलांडून जावे लागते. मात्र, त्यापूर्वी उजव्या हाताला शनीमंदिर आपले स्वागत करते. शनीमंदिराशेजारी एक व समोरच्या बाजूला एक अशा दोन बारवा पहायला मिळतात. दोन्ही बारवा बऱ्याचशा बुजल्याने आता वापरात नाहीत. त्या आता एखाद्या कुंडासारख्या दिसतात. एका बारवेला दोन्ही बाजूने पायऱ्या आहेत. शनी मंदिरासमोर पूर्वजांच्या आठवणीत तयार केलेले काही चिरे झाडाखाली पहुडलेले दिसतात. तेथून पुलाकडे जाताना डाव्या हाताला मूर्तीकार किशोर सोनवणे यांचा स्टुड‌िओ आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांच्यासह अनेक महापुरूषांचे फायबरचे मोठाले पुतळे तेथे पहायला मिळतात. गावात कलाकार नसेल तर ते गाव काय कामाचं, हा सोहळा पाहताना वाटतं.

‘शिल्पांच्या वेगळेपणात जीव ओतण्यातच मजा आहे’, असे म्हणणारे सोनवणे मनाला भावतात. अजमेरची सुरूवातच कलेने झाल्यामुळे गाव नक्कीच वेगळं असणार या ओढीनं मन गावच्या वेशीबाहेर तिच्या भव्यतेला पाहत थबकतं. २१ तोफांची सलामी द्यावी त्याप्रमाणे ‘आमच्या गावाला २१ बुरूज आहेत’, असे चंद्रकांत ध‌िवरे, किरण पवार, अनिल पवार ही ग्रामस्थ मंडळी अभिमानाने सांगतात. अजमेर सौंदाणे म्हणजे काय? या प्रश्नांचे उत्तर अजूनही अनुत्तरीच होतं. अजमेर म्हणजे अजय मेरू. अजमेरची ओळख गावाच्या शेजारी असलेल्या अजमेर किल्ल्यावरून मिळालेली आहे. पूर्वी हे गाव किल्ल्यावर होतं. तेथून ते पायथ्याशी असलेल्या पाडेश्वर मंदिरालगत आलं. पाडेश्वर हा परिसर वनविभागाच्या अंतर्गत असल्याने निसर्गसौंदर्य अमाप आहे. गाव तेथून ते शनीमंदिराजवळील पांढरीवर आलं आणि गावाने पुन्हा नदी ओलांडून आता सध्या जेथे गाव आहे तेथे विसावलं. चार ठिकाण बसलेल्या या गावाचे हे विस्थापन त्या राजसत्तेच्या काळात गरज म्हणून अथवा परिस्थिती म्हणून झालं असावं. हा मेरू म्हणजे डोंगर अथवा किल्ला अजय राहिला असेल म्हणून त्याला अजमेर म्हटले गेले असावे.

पूर्वी गावाचे नाव फक्त अजमेर असेल. कालौघात व्यापारासाठी हे गाव प्रसिद्ध झाल्याने सौद्याचं सौंदाणे असं म्हटलं गेलं असावं म्हणून गाव अजमेर सौंदाणे म्हणून ओळखलं जावू लागलं. खरंतर हा सगळा झाला अंदाजाचा खेळ. मात्र, मूर्तीकार किशोर सोनवणे हे गाव अभिरांची वस्ती मानतात. अभिरांची वस्ती असेलेले अजमीर पुढे अजमेर झाले असावे असे, ते सांगतात. अभिरांचा या परिसराशी आलेला संबंध पाहिला तर हा अंदाजही मनाला स्पर्श करून जातो. म्हणूनच ही अभिरांची राजधानीही म्हटली जाते. आजही अजमेरकर राजधानीचे गाव म्हणवून घेतात. त्यानंतर तेलीराजा, राजपूत राजांची ही राजधानी राहिली. मीर कासिमने गाळणा घेतला तेव्हा ही राजधानी उद्धवस्त केली अन् अजमेर किल्ल्यावरील मोठाले लोखंडी आठ दरवाजे गाळण्यावर ओढून नेले. हे दरवाजे इतके भक्कम अन् जड होते की, दरवाजा ओढणारे हत्ती मरण पावला होता. गाळण्याच्या शिलालेखात अजमेरचा उल्लेख अन् ते दरवाजे तेथे असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

अजमेर सौंदाणेच्या वेशीबाहेर छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रतापांचा पुतळा आहे. समोरच रामाचे मंदिरही आहे. अजमेरची वेस काही वेळ पहात रहावीशी वाटते, ती तिच्या अजूनही असलेल्या भक्कमपणामुळे अन् ध्रुव ताऱ्यामुळे. असे म्हटले जाते की, उत्तरमुखी असलेली या वेशीवर मध्यरात्री ध्रुवतारा डोक्यावर येतो. गावाला उत्तर-दक्षिण वेस, तसेच इतर दिशांनाही लहान लहान ये-जा करण्यासाठीचे दरवाजे होते. वेशीच्या कोटाला २१ बुरूज होते. यातील १७ बुरूज कोटांचा भाग होते तर तीन वेशी वेसदरवाजा दिसणार नाही, अशा पद्धतीने कोटाबाहेर होते. यातील १८ बुरूजांचे अवशेष आजही पहायला मिळातात. वेशीवरच्या काष्ठशिल्पांचे सौंदर्य नजरेत साठवून समोरच्या पेठ गल्लीतून गावात शिरताना एका प्राचीन इतिहास असलेल्या गावात प्रवेश करीत असल्याचा आंनद मिळतो. लहान, मोठे वाडे तर गावाच्या नसानसात फुलले अन् आता मावळतीलाही लागले आहेत. गावगाड्यानुसार सुतारगल्ली, शिंपीगल्ली, चांभार, पेठ, धनगर, माळी अशा गल्ल्या फिरताना अंड्याच्या आकाराचे हे गाव एक वेगळाच अनुभव देते. पूर्वीपासून गावात ५२ जातीचे लोक गुण्यागोंविदाने राहतात. पेठ गल्लीवर धन‌िकांचे वर्चस्व दिसते. पेठ गल्लीत सावकारांचे आता आतापर्यंत वर्चस्व होते, असे गुलाबराव मगर सांगतात. त्यांचे १६ खणी वाडे आजही पहायला मिळतात. उन्हापासून बचावासाठी गावात आजही धाब्याची घरे पहायला मिळतात. अर्थात नवीन सिमेंटच्या बांधणीच्या घरांची संख्या वाढू लागली आहे. मगर तसेच इतर काही मंडळी मूळची राजपूत राजस्थानहून येथे विसावली, असे भूषण मगर सांगतात.

पेठ गल्लीतून आखाडा नावाच्या पडक्या इमारतीपाशी आले की, पुन्हा अजमेरचा एक अनोखा पैलू समोर येतो. या आखाड्यात दोन-तीन लहान तोफा आहेत. तसेच आखाड्याच्या तळघरात तलवारी होत्या. आता त्या जम‌िनत गाडल्या गेल्या आहेत. त्या तोफांचा वापर पेंढाऱ्यांना पळवून लावण्यासाठी केला जात. असे सांगितले जाते की, पेंढाऱ्यांना पळवून लावण्यासाठी त्यावर या तोफांच्या माध्यमातून गव्हाची गरमगरम खळ उडविली जात असे. खळीच्या गरम चटक्यांमुळे ते प्रचंड भाजत. मात्र खळी उडविणारेही जखमी होत असल्याने गावात भाजली त्वचा लवकरच बरी करण्यासाठी त्या विशिष्ट्य औषधीही बनविली जाते. प्रत्येक घरात हे औषध कसे बनवायचे याचे पिढ्यान् पिढ्या धडे दिले जायचे. आता मात्र यांची गरज भासत नसली तरी कोणाला भाजले तर अजमेरकरांच्या औषधाची सर्वांना आठवण होते. आखाड्याचा दरवाजा व त्यावरील नक्षीकाम पाहून दक्षिण दरवाजा व त्याची जाडजूड भिंत पाहून पुन्हा गावातील आणखी एक वेगळेपणावर लक्ष जातं. ते म्हणजे अजमेरच्या घोंगड्या या आजही प्रसिद्ध आहेत. बकरी, मेंढींच्या लोकरापासून घोंगड्या बनविण्याचा मोठा व्यवसाय पूर्वी गावात होता. आता बोटावर मोजण्याइतक्यात कुटुंबांमध्ये घोंगड्या बनविल्या जातात. परंतु त्यांनाही प्रचंड मागणी आहे. अगदी ४०० ते दोन हजार रूपयांपर्यंत घोंगड्या विकल्या जात असल्याचे जिभाऊ केदा नंदाळे यांनी सांगितले. घोंगड्या हातात घेऊन त्या पाहण्याचा आनंद काही वेगळाच. तेथून गावातील महादेव, हनुमान, दत्तमंदिर, राममंदिर, विठ्ठल, भवानी मंदिर पाहत पाहत वेशीबाहेरचा देवळाणेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत काही समाधी पहायला मिळतात. त्या कोणाच्या आहेत याचा काही तपास लागत नाही. मात्र एक समाधी आत बाहेरून चित्रांनी सजलेली होती. आता तिच्यावरचा फिकट रंग आणि आतील चित्रांच्या छटा तेवढ्या शिल्लक आहेत. या समाधीशेजारील दगडी शिवमंदिरही पाहण्यासारखे आहे. गावाच्या अवतीभवती वीरगळी असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

पहाडेश्वर मंदिराला लागून असलेल्या डोंगर सोंडेवरूनच किल्ल्यावर जाणारी वाट सुरू होते. वाटेत दगडावर कोरलेले शिवलिंग आहे. तर समोरच्या डोंगरात एका गुहेत आदिवासींचा डोंगरदेव आहे. गडाचा दरवाजा आजमितीस अस्तित्वात नाही. उजव्या हाताला उद्धवस्त बुरुज व तटबंदीचे अवशेष तेवढे पहायला मिळतात. तेथून गडमाथा नजरेस पडतो. अजमेराचा पसारा फार नाही. दोन तलाव, दोन पाण्याची टाके पहायला मिळते. टेहाळणीसाठी असलेल्या अजमेराहून मोरागड, रतनगड, कऱ्हा, तांबोळ्या, मांगी-तुंगीचे सुळके, बिष्ठा, डेरमाळ, पिसोळ, साल्हेर, सालोटा, मुल्हेर तसेच दुंधागड दिसतात. त्यामुळे अजमेरा गिर्यारोहकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.

अभिरांचे, तैली राजाचे, राजपुतांचे राजधानीचे अजमेर पूर्वी कसे असेल? या स्वप्नरंजनात अजमेरचे वास्तव दर्शनही अनोखे आहे. अजमेर राजधानी होते की नाही हे माहीत नाही. मात्र ते लढवय्ये होते हे नक्की! कारण लढवय्येपणाच्या खाणाखुणा इंग्रजांविरोधातील शेतसारावाढ लढा, जंगल सत्याग्रह, बागलाण सत्याग्रह, भिलवाड सत्याग्रह तसेच स्वातंत्र्यचळवळीतही अजमेरचे गणेश कुलकर्णी, रामचंद्र कुलकर्णी, नरहर शेठ, गोविंद शेठ यांच्यासह अनेक मंडळी सहभागी झाली अन् लढली. आज अजमेर सौंदाणे आपल्या इतिहासाला घेऊन झेपावू पाहत आहे. ते त्यांच्या इतिहासाच्या जोरावरच. मात्र गावातील अनेक खाणाखुणा अन् त्या आठवणी जपल्या गेल्या पाहिजेत. तरच इतिहास दीर्घकाळ प्रेरणा देत राहिलं.

सरसेनापती उमाबाई दाभाड्यांचे अभोणा

पराक्रमाची पराकाष्टा करणारी इतिहासातील अनेक पात्रे अज्ञात असली तरी त्या इतिहासाच्या पैलूंची चमक कधी कमी होत नसते. पेशवाईतील इतिहासाला पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई खंडेराव दाभाडे यांनी पराक्रमाची झालर चढवली अन् नाशिकच्या अभोणा गावाच्या इतिहासाला शौर्याचे अनोखे कोंदणही मिळाले. अभोणा फक्त गाव नाही तर देशातीलच नव्हे, तर बहुधा जगातील पहिली महिला सरसेनापती देणारी ती भूमी ठरली आहे.

भारताचा इतिहास अनेक लढवय्या रणरागिणींनी उजळून निघालेला आहे. यात झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, ताराराणी भोसले अशी अनेक नावे घेता येतील. यात एक वेगळे नाव म्हणजे पेशवाईतील सरसेनापती श्रीमंत उमाबाई खंडेराव दाभाडे. पेशवाईतील हा वेगळा पैलू अनेकदा नजरेआड झालेला दिसतो. मात्र पेशवाईतील हे एक वास्तव एक नव्या रणरागिणीची वेगळी ओळख करून देते. उमाबाईंचा आणि नाशिकचा संबंध काय हे पाहण्यासाठी सरदार दाभाड्यांची कारर्कीद जाणून घेणे गरजेचे आहे. छत्रपतींच्या गादीची धुरा सांभाळणाऱ्या पेशवाईने इतिहासाला एक वेगळाच आयाम दिला. तसेच पेशवाईला शौर्याचा रंग देण्यात त्यावेळच्या पराक्रमी सरदारांचे महत्त्वही तेवढेच आहे. छत्रपतींसाठी अन्‌ पेशव्यांच्या आदेशावर जीव ओवाळून टाकणा-या अनेक सरदारांच्या पराक्रमाने मराठेशाहीचा इतिहास उजळून निघाला आहे. यात महाराष्ट्रातील सतराव्या शतकातील एक प्रसिद्ध मराठा घराणे म्हणजे पुण्यातील तळेगावचे दाभाडे घराणे. या घराण्याचा मूळ पुरूष बजाजी व त्यांचा मुलगा येसाजी हे शिवाजी महाराजांचा पदरी होते. छत्रपतींनंतर संभाजी राजांनीही त्यांना रायगडाची धुरा दिली.

संभाजीनंतर ते राजारामांच्या सेवेत दाखल झाले. येसाजींना खंडेराव आणि शिवाजी ही दोन मुले होती. तर खंडेरावांना त्रिंबकराव व यशवंतराव ही दोन मुले होती. खंडेराव पराक्रमी निघाले. त्यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. शाहू महाराजांनी खंडेरावांना सेनाखासखेल अन्‌ नंतर १७१७ मध्ये सेनापतीपदी नेमले. खंडेराव दाभाडेंनी उत्तर सरहद्दीवर राहून खानदेश, वऱ्हाड व गुजरात या तीनही प्रांतावर आपली पकड घट्ट केली. खंडेरावाच्या मृत्यूनंतर शाहूने त्रिंबकरावास सेनापतिपद दिले. अंतर्गत वादातून झालेल्या डभईच्या लढाईत बाजीराव पेशव्यांकडून त्रिंबकराव मारले गेले अन्‌ येथूनच खंडेरावांची पत्नी अन्‌ त्रिंबकरावांची आई उमाबाईंचा पेशव्यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. शाहूंनी बाजीरावांसह तळेगावात जाऊन उमाबाईंची समजूत काढून त्रिंबकरावाचा भाऊ यशवंतरावांना सरसेनापतिपदाची वस्त्रे दिली. यशवंतराव अल्पवयीन असल्याने सरसेनापतिपदाचा कारभार उमाबाई पाहू लागल्या अन्‌ त्या पेशवाईतील पहिल्या महिला सरसेनापती झाल्या. उमाबाई या अभोण्याच्या ठोके घराण्यातील कन्यारत्न. त्यांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा शोधत अभोण्यात पोहचलो अन्‌ थक्क करणारे वास्तव डोळ्यापुढे तरळले.

नाशिकहून सप्तश्रृंगीगडाकडे जाणाऱ्या रस्त्याने नांदुरी गाव आले की, तेथून अभोणा गावाकडे जाणारा रस्ता लागतो. या फाट्यावर उजव्या हाताला एका झाडाखाली आदिवासींची चिरे अन्‌ एका भग्न गणेशमूर्तीसह अनेक देवतांचे भग्न अवशेष ठेवलेले दिसतात. ते पाहून पाच किलोमीटवर असलेल्या अभोण्याकडे जाताना मध्येच मोहनदरी फाटा लागतो. फाट्यावर आदिवासींचे लाकडी चिरे पहायला मिळतात. ते पाहून आपण एका ऐतिहासिक मराठा सरदाराच्या गावात जात आहोत याची उजळणी मनात सुरू होते. गिरणा नदीच्या काठावर वसलेले अभोणा ही एक प्रसिद्ध बाजारपेठ असल्याने पहिल्यापासूनच हे वर्दळीच ठिकाण. आता एखाद्या विकसित शहरासारखं रुप घेऊ लागलं आहे. पण गिरणापात्रात मधोमध असलेली एक प्राचीन वास्तू या विकासापासून आपल्याला लांब घेऊन जाते अन्‌ अभोण्याच्या इतिहासात हरवून टाकते. ठोके-देशमुख या अभोण्यातील सरदार घराण्याची शान गिरणाच्या पुरामुळे उद्धवस्त झालेल्या वास्तूतून पहायला मिळते. हत्ती, घोडे बांधण्याची व्यवस्था, देवांच्या देवळ्याचा एक चौथरा आज येथे शिल्लक आहे. त्यात विविध देवांच्या मूर्तीही मनमोहक आहेत. पूर्वी निवांत अन् एकांतात पहुडण्यासाठी ही जागा खास बनवली गेली असणार तीही नदीपात्राच्या मधोमध. या वास्तूच्या फक्त शिल्लक असलेल्या चौथऱ्याला न्याहाळताना समोरच्या टेकडीवरील गढीकडे लक्ष जातं. गढी आता जमीनदोस्त झाली आहे पण गढीचा बुलंद दरवाजा मात्र अजूनही इतिहास उभा करतो. नक्षीकाम, विविध शिल्पे अन्‌ हरवलेल्या इतिहासाला कवटाळून बसलेला हा दरवाजा अभोण्याची शान जपताना दिसतो. या वास्तूकडे जाण्यासाठी घाणीच्या साम्राज्यामुळे थोडी कसरत करावी लागते. पण हा दरवाजा पाहताना गढी (महाल) किती मोठी असेल याची प्रचिती येते. गढीच्या भिंतीचा आकार बरेच काही सांगतो.

हा अभोण्याचा ऐतिहासिक वारसा असल्याने ही वास्तू कायमस्वरूपी जपण्याची गरज मनाशी भिडते. पेशवेदप्तरातील ठोके घराण्याच्या कागपत्रांवरून या घराण्याचे पेठ संस्थानचे लक्षधीर राजे, बाजी आटोळे, सिन्नरचे देशमुख, कुंवर बहाद्दर, मुदोनकर भावसिंग ठोके यांच्याशी आप्त संबंध असल्याचे दिसते. अभोण्याचे देवराव व हरिसिंग ठोके हे दोन सरदार तळेगाव दाभाडेच्या खंडेराव दाभाडेंचे विश्वासू होते. यातून साधारण १७०४ मध्ये अभोण्याच्या देवराव ठोकेंची मुलगी उमाबाई छत्रपती शाहूंचे सरसेनापती खंडेराव दाभाडेंच्या घरात सून म्हणून गेली.

उमाबाईंच्या माहेरीही सरदारकीचे वातावरण असल्याने लढवय्या बाणा त्यांच्यात होताच. शस्त्र चालविण्यात आणि घोडस्वारीत त्या अव्वल होत्या. खंडेरावांच्या निधनानंतर उमाबाईंचा मुलगा त्रिंबकरावांकडे सरसेनापतिपद शाहूंनी सोपविले. मात्र गुजरातच्या सुभ्यावरून त्रिंबकराव व बाजीराव पेशवे यांच्यात संघर्ष निर्माण झाला. यावर मात करण्यासाठी बाजीराव पेशव्यांनी उमाबाईंच्या माहेरकडचे दलपतराव ठोके, भावसिंगराव ठोके, बजाजी आटोळे, कवडे व सिन्नरचे देशमुख, कुंवर बहादुर यांच्यासह ठोकेंच्या सर्व जवळच्या मंडळींना फोडून आपल्या पक्षात सामील केले. २५ नोव्हेंबर १७३० रोजी भावसिंग ठोके याला बाजीरावांनी सरंजाम व कुंवर बहादुर याला वस्त्रेही दिली. निझामाची चाकरी सोडून बाजीरावांच्या पदरी आलेल्या भावसिंग ठोकेने बागलाण परिसरात धुमाकूळ घालायला सुरूवात केली होती.वैतागलेल्या निझामाने पेशव्यांना पत्र लिहीत भावसिंग ठोके यांना मराठ्यांच्या चाकरीत ठेवू नये, अशी विनंती केली. त्यावर निझामाची मर्जी राखावी म्हणून शाहूंनी पेशव्यांना भावसिंग ठोके यास चाकरीत ठेवू नये, अशी आज्ञा केली होती. मात्र तसे घडले नाही. डभईच्या युद्धात १ एप्रिल १७३१ मध्ये पेशव्यांच्या पदरी गेलेल्या भावसिंगराव ठोकेने सेनापती त्रिंबकरावांवर बारगिरास सांगून गोळी झाडली. यामुळे त्रिंबकरावांचा मृत्यू झाला, असे संदर्भ सेनापती दाभाडे दफ्तर, डॉ. एस. ए. बाहेकर व पुष्पा दाभाडे यांच्या उमाबाईंवरील पुस्तकात मिळतात. त्रिंबकरांवांच्या मृत्यूमुळे उमाबाई दुखावल्या गेल्या. या प्रकरणात बाजीराव पेशव्यांना माफी द्यावी म्हणून शाहू स्वत: त्यांना घेऊन तळेगावास गेले. छत्रपती स्वत: आल्याने उमाबाईंना पेशव्यांना माफ करावे लागले. त्यानंतर शाहूंनी त्रिंबकरावांचा लहान भाऊ यशवंतरावांना सरसेनापतिपद तर धाकटा बाबुरावाकडे सेनाखासखेल ही पदे दिली. मात्र ते अल्पवयीन असल्याने सरसेनापती व सेनाखासखेल या दोन्ही पदांचा कारभार उमाबाईंच्या हाती आला. पती आणि मुलाच्या मृत्यूचे दु:ख उमाबाईंनी काळजात एकवटले आणि रणभूमीवर उतरल्या.

गुजरातचा बहुतेक भाग जरी मराठ्यांच्या ताब्यात असला तरी दिल्लीच्या बादशहाने आपली दहशत कायम ठेवली होती. दाभाडेंची पकड गुजरातवरून कमी झाल्याचे पाहून मारवाडचे राजा अभयसिंग याने दिल्ली बादशहाच्या मदतीने आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याने बडोदा हस्तगत करून डभईला वेढा घातला. पिलाजी गायकवाड उमाबाईंचा उजवा हात होता. हे ओळखून अभयसिंगने पिलाजींचा खून घडविला. उमाबाईंचा बाणेदारपणा त्यांच्या लष्करी नेतृत्वात होता. हेच दाखवित पिलाजींच्या हत्येनंतर उमाबाईंनी अभयसिंगवर स्वारी केली. उमाबाईंच्या भीतीने हार पत्करून अभयसिंग गुजरातमधून पळाला. मात्र अहमदाबादमधील मोगलाचे ठाणे अजूनही कायम होते. १७३२ मध्ये उमाबाईंनी गुजरातवर दुसरी स्वारी केली. यावेळी मोगलांचा जोरावरखान बाबी नावाच्या सरदाराने ‘एक विधवा माझ्याशी काय लढणार, तुझा निभाव लागणार नाही,’ अशा आशयाचे पत्र उमाबाईंना पाठवले. याचे उत्तर रणांगणात हत्तीवर बसलेल्या पांढऱ्याशुभ्र वेशातील सरसेनापती उमाबाईंनी युद्धांत अलौकिक शौर्य गाजवून दिले. उमाबाईंचे रौद्ररूप पाहून जोरावरखान अहमदाबादच्या तटात लपला. मराठा सैन्यांनी मुगल पठाणांचे मृतदेह एकावर एक खच करून तटावर जाण्याचा मार्ग तयार केला, अशी इतिहासात नोंद मिळते. एका महिला सरसेनापतीने केलेल्या या कामगिरीवर छत्रपती शाहू खूश झाले होते. त्यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबारात त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले.

सोन्याचे तोडे मिळविण्याचा मान उमाबाईनंतर त्यांचा मुलगा यशवंतरावांनी सुरतेच्या लढाईत मिळविला. पेशव्यांवरील उमाबाईंची नाराजी पुढेही नानासाहेब पेशव्यांमुळे कायम राहिली. शाहू महाराजांच्या निधनानंतर दाभाड्यांचा मुख्य आधार कोसळला. उमाबाई ताराबाईंबरोबर गेल्या. जात उमाबाई, ताराबाई, आणि दमाजी गायकवाड यांनी पेशव्यांच्या विरूद्ध उठाव केला. तेव्हा १६ मे १७५१ रोजी पेशव्यांनी दाभाड्यांची सर्व मंडळी पुण्यात होळकरांच्या वाड्यात नजरकैदैत ठेवली; परंतु उमाबाईंनी पेशव्यांशी समझोता घडवून आणला व ते प्रकरण संपले. मात्र दरम्यान, उमाबाईंनी पेशव्यांविरूद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसते. पेशवाईतील राजकारणाच्या रंगात उमाबाईंची पकडही यादरम्यान पहायला मिळते. उमाबाईंची तब्येत नंतरच्या काळात खालावली. २८ नोव्हेंबर १७५३ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले. ‘या ऐतिहासिक घटनांमध्ये सरसेनापती हा बहुमान मिळालेल्या उमाबाई खंडेराव दाभाडेंचे कार्य मोठे आहे.’ असे दाभाडे घराण्याचे वंशज सरदार सत्यशील दाभाडे सांगतात.

अभोण्याच्या ठोके घराण्यातील ३ मुली सरदार दाभाडे घराण्यात दिल्या होत्या. यात सेनापती दाभाडेंचा तीन नंबरचा मुलगा सेनाखासखेल सवाई बाबुराव दाभाडे यांची एक पत्नी ही हरिसिंग ठोके यांची बहीण अभोणकर ठोके घराण्यातील होती. तर सेनापती यशवंतराव (दुसरा दत्तक) याची पत्नी लक्ष्मीबाई ही हरिसिंग ठोकेंची मुलगी होती. हा इतिहास अभोण्याच्या गढीवरून अनुभवताना अन् बालपणी उमाबाई या गढीत तलवारीशी खेळतायेत असा प्रसंग डोळ्यासमोरून तरळताना अंग शहारून जातं. ठोके यांचे वंशज गावातील पेठ गल्लीत राहतात. त्यांच्याकडील सोन्याची मूठ असलेली तलवार हातात घेतल्यावर उमाबाईंनीही ही तलवार हातात घेऊन शौर्य घडविले असेल, असे वाटायला लागतं. ठोकेंच्या घरातील देव्हारा आणि देव्हाऱ्यातील व्यालावर बसलेली महिषासूरमर्दिनीची सप्तशृंगीची मूर्ती आवर्जून पाहण्यासारखी आहे. उमाबाईंची सप्तश्रृंगीवरील श्रद्धा त्यांच्या दानातून दिसते. त्यांनी सप्तश्रृंगी मंदिराच्या पायऱ्या बांधल्याची नोंद मिळते. ठोकेंचे ऐश्वर्य आता इतिहासापुरते शिल्लक राहिलेले दिसते. मात्र ठोके घराण्यातील व्यक्त‌िंच्या डोळ्यातील चमक अन् त्यांना मिळाला मान अजूनही कायम आहे. गावात होळीचा कार्यक्रम प्रथम वाड्यातून होलीका पूजनानंतरच सुरू होतो, अशी परंपरा आहे. ठोकेंच्या घरातील देवीच्या मूर्तीची दसऱ्याला दरवर्षी मिरवणूक निघते. हा सोहळा पाहण्यासारखा असतो, असे सरदार ठोके घराण्याचे वंशज जलालसिंग ठोके सांगतात.

अभोणा पाहताना जुन्या बांधणीची घरे जशी भुरळ घालतात तसेच गावातील मंदिरेही आपले वेगळेपण दाखविताना दिसतात. आनंदी देवी मंदिर, खंडेरायाची ठेकडी, मारूतीची दोन मंदिरे, महादेव मंदिर, शनीमंदिर, राममंदिर, गणपती या मंदिरांबरोबरच गोपालकृष्ण मंदिर गावाची शोभा वाढविताना दिसतो. याचबरोबर गढी जवळील समाध्याही पाहण्यासारख्या आहेत. गढीच्या मागील बाजूला नदी काठावरील महादेव मंदिर निसर्गसौंदर्याने सजलेलं आहे. हे मंदिर प्राचीन असल्याचे पुजारी गोविंद चवरे सांगतात. तेथून थोडं पुढं गेलं की, गढीलगत गोपालकृष्ण मंदिरही सुंदर आहे. येथील काष्टशिल्प नजरेत भरत तर मंदिरातील शांती तेथून पाय काढू देत नाही. मंदिरात गेल्यावर कृष्णांची काळापाषाणातील सुंदर मूर्ती पाहताना मोहाडीच्या श्रीकृष्णाची आठवण होते. या दोन्ही मूर्ती एकाच कलाकाराने साकारल्याचे प्रकाश देशमुख सांगतात. देव्हाऱ्यातील शिवाचा अर्धनारीनटेश्वराचा तांब्याचा मुखवटा नजरेत भरतो. गावात खंडेरायाची यात्रा भरते. तसेच श्रावणात गोपाळकृष्णाचा सात दिवस सप्ताह भरतो. पूर्वी यात्रेत बोहाडे सादर व्हायचे; मात्र आता ही परंपरा पंधरा वर्षांपासून बंद आहे. सरदार पेठ गल्लीतील जहागिरदार देशमुख मूळचे वायकुळे. ते काशी, राजस्थान, गुजरात करीत हतगडच्या लढाई दरम्यान कनाशीत व तेथून अभोण्यात स्थायिक झाले. त्यांना १८ गावांची वतनदारी मिळाली होती, असे प्रकाश देशमुख व प्रणव देशमुख सांगतात. गावात आदिवासी समाजही मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पेठ गल्लीत जैनांचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराला अनेकांनी सहकार्य केल्याचे कन्हूभाई पुजारी सांगतात. गावात दोन बारवाही आहेत. मात्र त्यांची अवस्था वाईट आहे. त्यांचा गावाला पाण्यासाठी वापर होऊ शकतो.

सोन्याची मूठ असलेली तलवार, सप्तश्रृंगीची अनोखी मूर्ती, ठोके, देशमुख घराण्याचा इतिहास अन् उमाबाईंनी दाभाडे घराण्यात उज्ज्वल केलेले अभोण्याचे नाव हा खरा अभोण्याचा वारसा आहे. गढीने देह ठेवला असला तरी इतिहास पुन्हा शौर्य गाजवायला सज्ज असल्याचं अभोणा भटकताना वाटतं. त्यामुळेच अभोण्याची सफर एकदा करायलाच हवी.

ताम्रपटातील चंद्राची मेट

नाशिकचा प्राचीन इतिहास त्याच्या कणाकणात दडलेला आहे. एखाद्या राजाने हजारो वर्षांपूर्वी मंदिरांना आणि महत्त्वाच्या व्यक्तींना दान म्हणून दिलेली गावे आता कोठे आहेत हे शोधताना नाशिकचा इतिहासही उलगडू लागतो. सामुंडी, चंद्राची मेट अशा गावांतून समोर येतो त्या वेळच्या ऋणानुबंधाचा धागा.

सातवाहनांचे बलाढ्य साम्राज्य नष्ट झाले अन् पाचव्या शतकाच्या मध्यात दक्षिणेत बदामी चालुक्य घराणे शक्तिशाली घराणे म्हणून उदयाला आले. या घराण्याची स्थापना पहिला पुलकेशीने केली. पुलकेशीला कीर्तीवर्मन व मंगलेश अशी दोन मुले होती. पुलकेशीच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पुत्र कीर्तिवर्मन राजा झाला. कीर्तीवर्मनच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा दुसरा पुलकेशी लहान असल्याने त्याचा राज्यपाल म्हणून कीर्तिवर्मनचा भाऊ मंगलेश याच्याकडे राज्यकारभार गेला. मात्र त्याने कीर्तीमानच्या मुलगा दुसरा पुलकेशीचा अधिकार नाकारला. त्यातून झालेल्या युद्धांत मंगलेश मारला गेला. घरातील या भांडणात शत्रूंनी चालुक्यांविरोधात बंडाचे निशाण उभारले. मात्र पुलकेशीने सर्वांवर विजय मिळवित उत्तरेस गोदावरी व दक्षिणेस कावेरी या मधील विशाल प्रदेशावर स्वामीत्व मिळविलं. हर्षवर्धनवरची पुलकेशीने विजय मिळविला. या स्वाऱ्यांनंतर दक्षिणापूतनाथ झालेला पुलकेशीने आपल्या राज्याला ९९ हजार गावे जोडली यात अंजनेरीचाही समावेश होता. पुलकेशीच्या मृत्यूनंतर पल्लवांनी बदामीचा ताबा घेतला. त्या चार मुलांपैकी पहिला विक्रमादित्य व चंद्रादित्य यांनी नाशिक-कोकण परिसरात आश्रय घेतला. तर आदित्यवर्मन व अभिनवादित्य यांनी बदामीवर आपले राज्य प्रस्थापित केले. विक्रमादित्याने आपला हक्क मारला गेल्याने आपल्या भावांवर चाल करून पुन्हा बादामी ताब्यात घेऊन स्वत: राजा झाला. विक्रमादित्यानेही नाशिकमध्ये बारावर्ष वनवास भोगला व त्यानंतर राजा झाला. त्यानंतर पल्लवांचा नाश करीत पुलकेशीच्या मृत्यूचा बदला घेतला. या दरम्यान नाशिकच्या अंजनेरीची प्रशासक म्हणून जबाबदारी विक्रमादित्यने गुर्जर उर्फ हरिश्चंद्रवंशीय वंशातील स्वामिचंद्र यांना दिली. वंशपरंपरेने अंजनेरीचा कारभार राजा सिंहराज व त्यानंतर राजा पृश्विचंद्र भोगशक्तीकडे आला अन् येथून सुरू होते नाशिकच्या अंजनेरी ताम्रपटातील भोगशक्तीने दान म्हणून दिलेल्या गावांची सफर. हा प्रवास एक अनोखा अनुभव देतो.

अंजनेरी हे अनेक राजांच्या राजधानीचे शहर राहिले आहे. हे आता अंजनेरीकडे पाहून वाटत नसले तरी तेथील मंदिर व लेणीहा वारसा आपल्याला आजही इतिहास सांगतो. अंजनेरीत चार प्राचीन ताम्रपट मिळाले आहेत. त्यांना अंजनेरी ताम्रपट असे म्हटले जाते. यातील दोन ताम्रपट भोगशक्ति या राजाचे आहेत. या ताम्रपटात देवालयाच्या व्यवस्थेसाठी दान दिलेल्या गावांचा तसेच लोकांना, व्यापाऱ्यांना दिलेल्या सवलतींचा उल्लेख केलेला आहे. तसेच ज्या लोकांनी गुन्हे केले आहेत. त्यांच्या दंडाचा व शिक्षेचा उल्लेख करण्यात आला आहे. यातील समगिरीपट्टन, चंद्रपुरी, सवाणेपल्लिका, कंसारिपल्लिका, मौरेयपल्लिका, अंबेयपल्लिका या गावांचा उल्लेख आलेला आहे. ही गावे आता नेमकी कुठे आहेत, कशी आहेत. त्या गावांना माहिती आहे का की, ही गावे आठव्या शतकाच्या आधीपासून आपला इतिहास घेऊन पुढे चालली आहेत. त्यांना माहिती असेल का हा इतिहास असे अनेक प्रश्न घेऊन अंजनेरीतून आमचा प्रवास त्र्यंबकेश्वरच्या दिशेने सुरू झाला. पहिनेरोडला लागल्यावर उजव्या हाताला काजोलीकडे जायचं. काजोली (काजुर्ली)च्या आधी डावीकडे असंख्य वीरगळी पावसापासून बचावासाठी एक झुडपाखाली आश्रयाला गेल्याने दिसते. काजोलीपाहून सामुंडीच्या दिशेने निघायचं. सामुंडी म्हणजे भोगशक्तिच्या ताम्रपटातील सवाणेयपल्लिका. हे गाव आता कसे असेल, असा विचार करता करताच सामुंडीत आपण पोहचतो. अकराशे लोकसंख्येच्या गावात कोळी समाज सर्वाधिक आहे. मारूती, मरिआई मंदिरे गावात आहेत. गावातील यात्रेतील बोहाड्यांची परंपरा पंचवीस वर्षांपूर्वी बंद झाली. सामुंडीला पूर्वी सोनेवाडीही म्हटले जायचे असे, संपत खोडे व लिलाबाई ठाकूर सांगतात. भोगशक्तिने आठव्या शतकात हे गाव देवालयाला दान म्हणून दिले होतं. सामुंडीपासून पुढे अस्वलीत हर्ष गाव लागतं. हर्ष म्हणजे हरिहर गड. हे गडाच्या पायथ्याचे गाव असल्याचे रामा बाळू सिद्ध सांगतात. तेथून पुढे हरिहरच्या पायथ्याचे कोटमवाडी, निरगुडे हर्ष ही गावे आहेत, असे समाधान निरगुडे सांगतात. तेथून थोडेपुढे गेल्यावर टाकेहर्षमध्ये भातशेतातील एक झाडाखाली मोठ्या संख्येने आदिवासींचे लाकडी चिरे उभारलेले दिसतात. तेथून पुढे टाके हर्ष हे गाव लागतं. हर्ष किल्ल्याच्या अवतीभवतीच्या सर्व गावांच्या मागे हर्ष असे बिरूद लागलेले आहे. पुढे बसगड म्हणजे भास्करगडाच्या पायथ्याला वसलं वैतरणा धरणामुळे विस्थापित डहाळेवाडी हर्ष हे गाव लागतं. गावाने आपल्या जुन्या परंपरा जपण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. गावात मे महिन्यात सात दिवस बोहाड्यांचा कार्यक्रम होतो, असे शिवराम घोरपडे व मधू खोंडे सांगतात.

आता भोगशक्तिच्या चंद्रपुरीत जाण्याचे वेध लागल्याने आपलाही वेग वाढतो. रस्त्यात उजव्या हाताला मोखाड्याकडे जाणारा घाट रस्त्याचा फाटा लागतो. या रस्त्यावर घाटनदेवीचे मंदिर आहे. चंद्राच्या मेट गावाची ही देवी गावाची रक्षणकर्ती मानली जाते. मंदिरापासून जवळच मुठभर घरांचे आदिवासी पाडे व त्यांचं विश्व अनुभवत आपण चंद्रपुरीत म्हणजेच चंद्राची मेट या गावात पोहचतो. गावाच्या नावातील चंद्र हा चालुक्य घराण्याचे मांडलीक असलेले हरिचंद्र वंशामुळे पडले असावे, असे वाटते. तर मेट म्हणजे गडाच्या उतारावरील सपाट परिसर जेथे गाव वसलेले असते अन् तेथे जकात व्यापार अशा गोष्टी चालतात. ही व्यवस्था ज्यांच्याकडे सोपविलेली असते ते मेटकरी, असे प्रा. रामनाथ रावळ सांगतात. चंद्राच्या मेटमध्ये दाखल झाल्यावर या आदिवासी पाड्यावर एकमेव वाड्यासारखे घर दिसते. हा वाडा ६ बाय १० खणी व दोन-तीन मजली असून, ते चंद्रे कुटुंबीयांचे आहे. अर्थात गावात सर्वाधिक आडनावाचे लोक चंद्रेच आहेत, असे कैलास चंद्रे, रमेश चंद्रे, चंद्रराम व जीवन चंद्रे सांगतात. हा वाडा दीडशे वर्ष जुना आहे. चंद्राची मेट हे जकातीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. त्याला नाशिकचं गेटही म्हटले जाते. जकातीचा कारभार बहुदा या कुटुंबीयांकडे असल्याने हे त्यावेळी श्रीमंत घर असावं. चंद्राची मेटमधील बाजारपेठही मोठी होती. येथील ग्रामस्थांना प्राचीन नाणीही सापडतात, असे जीवन चंद्रे सांगतात. इंग्रजांच्या काळात चळवळींचे केंद्रही हे गाव राहिलं आहे.

ग्रामस्थांशी गप्पागप्पांमध्ये गावचा इतिहास उलगडायला लागतो. तसे गावकरी गोळा व्हायला लागतात अन् बाराशे वर्षांपूर्वीही आमचे पूर्वज येथे होते. हे समजून घेताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपण्यासारखा झालेला असतो. अगदी पुलकेशी ते विक्रमादित्य अन् भोगशक्तिने जव्हार बुद्रूकच्या मंदिराला ही गावे दान म्हणून दिल्याचे एकताना गावकरी हरखून जातात अन् बाराशे वर्षांपूर्वीच्या या गावांमध्ये आल्याचा एक वेगळा आनंद मिळतो. सामुंडी, चंद्राची मेट याशिवायही कंसारपल्लिका म्हणजे कुरनोली असावे, मौरेयपल्लिका म्हणजे जव्हार रोडवरील मोरवाडी, अंबेयपल्लिका म्हणजे आताचे अंबाली, जयपूर म्हणजे जव्हार असावे असे संदर्भ शांताराम देव यांच्या महाराष्ट्र ताम्रपटांची वर्णनात्मक संदर्भमध्ये मिळतात. भोगशक्तिच्या ताम्रपटातील समगिरीपत्तन (पट्टन) हे गाव आता कोणते हा संदर्भ काही लागत नाही. मात्र हे गाव नदीच्या किनारी वसलेल गाव असणार. कारण पट्टन म्हणजे बंदराचे गाव. म्हणजेच वैतरणा नदीतून जलमार्गाने वाहतूक केली जायची. त्यावेळच्या लहान लहान नद्यांचा वापर जलवाहतुकीसाठी किती खुबीने करीत असावेत हेही समगिरीपत्तन दाखविते.

बदामी चालुक्यवंशीय पुलकेशी ते पृश्विचंद्र भोगशक्तिने अंजनेरीचा केलेला कायपालट आजही वारसास्थळ म्हणून आपल्याला पहायला मिळतो. अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेली सोळा मंदिरे, सरोवर अन् अंजनेरीत सापडलेली चार ताम्रपट (हे ताम्रपट नाणेसंशोधन केंद्रात उपलब्ध आहेत.) बाराशे वर्षांचा प्रवास आपल्याला घडवितो. माणसं मागे पडली असली तरी त्यांच्या खाणाखुणा वारसा म्हणून आपल्याबरोबर आहेत. फक्त गरज आहे ती हा वारसा अन् त्यांचा इतिहास जपण्याची.

 

यादवकालीन शिंदे, चिंचोली

यादवांचा पराक्रमी राजा सेऊणचंद्राच्या वसईच्या ताम्रपटातील दान दिलेल्या गावात नाशिकच्या चार गावांचा उल्लेख आहे. ही गावे आहेत कुठे अन् कशी आहेत हा शोध यादवकालीन तलाव अन् प्राचीन मंदिराचा खजिना समोर आणतात. सिन्नर तालुक्यातील चिंचोली, वडगाव पिंगळा, मोह व नाशिक तालुक्यातील शिंदे ही गावे मनाला मोहिनी घालतात कारण ताम्रपटामुळे त्या गावांचेही प्राचीनत्व लक्षात येते.

सातव्या शतकात हर्षवर्धनाच्या विशाल साम्राज्याचा अस्त झाला. त्यानंतर अनेक नवीन राजघराणी उदयास आली. त्यामुळे मध्ययुगीन भारताचा इतिहास हा या घराण्यांच्या आपसातील संघर्षांनी युद्धांनी भरलेला आहे. स्वपराक्रमाच्या जोरावर भाग्य काढू इच्छिणाऱ्या साहसी वीरांना हा काळ सर्वस्वी अनुकूल होता. त्यात यादववंशाचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. अगदी राजपुताना, माळवा, मध्यप्रदेश व महाराष्ट्र प्रदेशात आपली सत्ता स्थापन करून यादवांनी आपल्या संस्कृतीचा प्रसार करीत मध्ययुगीन भारताच्या इतिहासात आपले स्थान पक्के केले. मात्र हे यादव घराणे आले कोठून हे पाहणेही गरजेचे ठरते.

जिनप्रभसूरी यांच्या साधारण अकराव्या शतकातील तीर्थकल्प या ग्रंथात ‘नासिक्यकल्प’ या प्रकरणात अंजनेरीच्या श्रीचंद्रप्रभ तीर्थंकराच्या स्थान माहात्म्याबद्दल सांगताना जिनप्रभसुरी लिहितात, ‘दुर्वास ऋषीने द्वारावती (द्वारकानगरी) जाळल्यानंतर वज्रकुमार नावाच्या यादव क्षत्रियाची गर्भवती स्त्री जैन तीर्थंकर श्रीचंद्रप्रभ स्वामी यांना शरण आली. त्यांनी तिला आश्रय देऊन तिचे संरक्षण केले. तिला झालेला पुत्र दृढप्रहार म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने आपल्या पराक्रमाने तलारपय (तलवार पद म्हणजेत नगररक्षक) पदही मिळविले. अंजनेरीत यादव वंशाचे बीज रोवले गेले. दृढप्रहार पुढे राजा झाला व त्याने चंद्रप्रभस्वामींचे मंदिर बांधले.’ यादवांचा इतिहास हेमाद्रीने महादेवराय यादव यांच्या काळात (शके ११८२-११९३ म्हणजेच इ.स. १२६०-१२७१ ) या काळात लिहिलेल्या राजप्रशस्ती या ग्रंथातूनही समजतो. यात प्रथम राजा दृढप्रहारी (काळ अंदाजे इ.स.८५०) पासूनचा इतिहास दिला आहे. हेमाद्री दृढप्रहाराबद्दल ‌लिहितो की, ‘द्वारकेचा राजा सुबाहू याला चार पुत्र होते आणि त्याने आपल्या राज्याचे चार भाग करून त्यांना वाटून दिले. त्यात दृढप्रहाराला दक्षिणेचे राज्य मिळाले.’ या दृढप्रहाराचा पुत्र सेऊणचंद्र याचे नाव येते. याबद्दल हेमाद्री राजप्रशस्ती ग्रंथातील २२ व्या श्लोकात म्हणतो की,

तत: स राजा निजराधानीमधिष्ठिता श्रीनगरंगगरय:।
लेभे सुतं सेऊणचंद्र नाम यत्संज्ञया सेऊनदेशमाहु:।।

श्रीनगर राजधानीतील सेऊणचंद्र राजाच्या नावावरून प्रदेशाला सेऊणदेश असे नाव पडल्याचे हेमाद्री सांगतो. सेऊणचंद्र प्रथम हा यादववंशातील महत्त्वाचा राजा दिसतो. यादवांचा इतिहास अनुभवायचा असेल तर अपरांत प्रकाशनच्या देवगिरीचे यादव हे ब्रह्मानंद देशपांडे यांचे पुस्तक नक्की वाचायला हवे. राष्ट्रकूट आणि गुर्जरप्रतिहार यांच्या कलहात त्याने राष्ट्रकूटांच्या बाजूने मोठा वाटा उचलला असावा याचे मुख्य कारण म्हणजे सेऊणचंद्राचे बलाढ्य सैन. सेऊणचंद्राकडे मोठे पायदळ असल्याचा उल्लेख इतिहासात मिळतो. त्यामुळेच दृढप्रहार हा यादववंशाचा संस्थापक मानला जात असला तरी सेऊणचंद्र हा वंशाला पुढे घेऊन जाणारा ठरला. मात्र तो वडील असलेल्या दृढप्रहारांना विसरलेला नाही. वसईच्या ताम्रपटात सेऊणचंद्र दृढप्रहाराच्या पराक्रमांचेही वर्णन करताना दिसतो. मात्र हा ताम्रपट नाशिककरांसाठी जवळचा ठरतो. कारण यात नाशिकच्या चार गावांचा उल्लेख आला आहे. एक हजार वर्षांपूर्वीच्या ताम्रपटातील ती चार गावे नेमकी आहेत, कुठे आहेत याचा शोध पाऊलखुणांच्या माध्यमातून घेतला अन् चक्क एक हजार वर्षांची सफर अनुभवायला मिळाली.


वसई ताम्रपट सेऊणचंद्रने यादव राजघराण्याचा उपाध्याय सोमदेव आचार्यांचा शिष्य सर्वदेववाचार्य याला गुरूवार, श्रावण शुद्ध चतुर्दशी, सौम्य संवत्सर, शके ९९१, इ.स. १०६९ या तिथीस सिंही या १२ खेड्यांच्या छोट्या विभागातील चिंचुली हे खेडे दान दिले हे नमूद करण्याचा होता. हे दानपत्र नृपतीने चंद्रादित्यपूर या गावाहून दिलेले आहे. या ताम्रपटात सेऊणचंद्रांची वंशावळ दिलेली असून, त्याच्या पराक्रमाचा यात उल्लेख आहे. या दानपत्राचा लेखक प्रेकरय हा होता व सेकारेयनायक याने हे दानपत्र कोरले आहे. या ताम्रपटातील सेऊणपूर व सिंदीनेर म्हणजे सिन्नर, चंदादित्यपूर म्हणजे चांदोर म्हणजेच चांदवड, चिंचुली म्हणजे चिंचोली, वदगंभा म्हणजे वडगाव पिंगळा, महूय म्हणजे मोह व मोहदरी, सिंदी म्हणजे शिंदे गाव याचा उल्लेख आलेला आहे. या चारही गावांचा संबंध वृक्षांशी आहे. चिंचोली चिंचाची झाडे, मोह मोहाची झाडे, वडगाव वडाची झाडे, शिंदे सिंदीची झाडे या गावांमध्ये अधिक असल्याने गावांना तशी नावे पडली असावीत. ही गावे चांगल्या उत्पन्नाची गावे असतील म्हणूनच दान दिली असावीत हे स्पष्टच आहे. यामुळे नाशिक व सिन्नर तालुक्यातील या चार गावांना एक हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहास असल्याचेही पुढे येते.

शिंदे गावातील प्राचीन तलाव

नाशिकहून सिन्नरकडे जाताना दारणा ओलांडून पुढे गेल्यावर डाव्या हाताला शिंदे (ता. नाशिक) हे गाव लागते. गावात शिरताच हनुमान मंदिर आहे. मंदिराचा गाभारा उतरविण्यात आला असून, त्याचे नव्याने बांधकाम सुरू आहे. मंदिराच्या सभामंडपात ठाण मांडून बसलेले ज्येष्ठ मंडळी गावाबाबत भरभरून सांगू लागतात. ‘पूर्वी गावात सिंदीची झाडे खूप असतील म्हणून अथवा शिंदे नावाचा कोणीतरी गावात होऊन गेला असेल म्हणून गावाला शिंदे नाव पडले असावे.’ असे पांडूरंग सांगळे सांगतात. शिंदे गावात मारूती, महादेव, रेणुका देवी, खंडोबा, कान्होबा अशी अनेक मंदिरे आहेत. पेशवाईत गावात देशपांडेंचे अनेक वाडे होते; मात्र आता ते नाहीत. पूर्वी खंडोबाच्या यात्रेत बोहाडेही व्हायचे मात्र आता ते बंद होऊन पन्नास वर्ष झाली आहेत. गावात ७०-८० वर्षांपूर्वी मंदिरांची माहिती घेण्यासाठी इंग्रज आल्याची तोंडातोंडी आलेली आठवण ज्येष्ठ मंडळी सांगतात. गावाच्या परिसरात अनेक समाधीही होत्या. मात्र आता शहरीकरणाच्या गराड्यात त्या नामशेष झाल्या आहेत. मात्र शिंदे गाव चळवळींचे गाव म्हणूनही परिचित आहे. गावातून गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र लढा व इगतपुरीच्या भात लढ्यासह अनेक लढ्यांमध्ये मंडळींनी नाव कमावले आहे. यात रामचंद्रनाना भांगरे, पांडूरंग सांगळे, सहादू जाधव धोंडेराम जाधव, विठ्ठूबा जाधव व लक्ष्मण जाधव यांचे नाव आवर्जून घेतले जाते, असे निवृत्ती जाधव व दामू सगर सांगतात. आता गावात काहीच नाही, असे सांगताना ‘हा… एक लय भारी गोष्ट हाय.. दगडाचा हौद… नक्की पहा’ असेही पांडूरंग सांगळे सांगतात. दगडाचा हौद म्हणजे इंग्रजांनी पाण्याची व्यवस्थेसाठी केला असावा, असे सहज मनात आले.

शिंदे गाव नाशिक-पुणे महामार्गामुळे विभागले आहे. रस्ता ओलांडून शिंदे गावातील ज्युनिअर कॉलेजच्या रस्त्याने सरळ हौद पाहण्यासाठी निघायचे. पुढे एक मैदान अन् नदीपात्राच्या कडेला नव्याने बांधलेले रेणुका माता मंदिर व शनी मंदिर दिसते. मंदिराबाहेर एक पिंड व त्यासमोर नंदी उघड्यावर ठेवलेले आहे. हौदाकडे कसं जायचं असं विचारल्यावर एकजण म्हणाला, ‘गाडी तेथेच लावा अन् तेथून दोन किलोमीटरवर एका लहानश्या टेकडीवर जावा. तेथेच हौद हाय’ चिखलाने भरलेला कच्चा रस्ता तुडवीत दूरवर जावूनही रस्ता संपेना..! गुडघ्यापर्यंत आलेला चिखल अन् हिरव्यागार रस्त्यावरची एकांतातील भयानता अंगावर शहारा आणत होती. अखेर समोर एक टेकाड दिसले. मनात हायसं वाटलं असलं तरी परतीचा प्रवास असाच असणार आहे हा विचार मनात आल्यावर पुन्हा एकदा अंगावर काटा आला. दुमजली उंचीची टेकडी चढून गेल्यावर समोर दोन-तीन एकरातील दगडाच्या बांधणीतील बंदिस्त केलेला हौद.. हौद कसला प्राचीन तलाव पाहिल्यावर कसलचं भान उरत नाही. तलावाच्या दोन बाजूच्या भिंती कोसळू लागल्या आहेत. हा तलाव नक्कीच यादवकालीन असणार यात शंका नव्हती. नंतरच्या काळात इंग्रजांनी वरच्या थरातील भिंत बांधल्याचेही स्पष्ट दिसत होते. आजूबाजूचे शेतकरी शेतीसाठी येथून पाणीही वापरतात.

पूर्वी या प्राचीन तलावाभवती गाव असावं. या तलावाला एका जुन्या नोंदीनुसार चिंचोली तलाव म्हटले गेले आहे. मात्र ग्रामपंचायत हद्दीनुसार हा तलाव आता शिंदे गावच्या हद्दीत आहे. तलावातून गावात पाणी वितरणाची व्यवस्था असल्याचेही तलावाच्या एका कोपऱ्यात पहायला मिळते. या प्राचीन तलावाची रचना यादवकाळीन कुंडासारखी असून, मध्यभागी गाळ साचला आहे. पुरातत्त्व व पाटबंधारे विभागाने हा तलाव संरक्षित करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. वेगळं काहीतरी हाती लागल्याच्या आनंदात येताना चिखलातून झालेली फरपट जाताना किंचितही जाणवली नाही. तलावाचे चित्र डोळ्यापुढून जात नव्हते तोच वडगाव पिंगळा गावात केव्हा आलो हे लक्षातही आलं नाही. वडगाव पिंगळा हे गाव म्हणजे ताम्रपटातील वदगंभा म्हणजे वडगाव पिंगळा. वडगावला पिंगळा हे उपनाव शिवकाळात लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे खानदेशातील मोहिमांदरम्यान वडगावात गढी बांधून राहिले म्हणून वडगावला पिंगळ्यांचे वडगाव म्हणून ओळखले जाऊ लागले. वडगाव पिंगळ्यातही यादवकालीन मंदिर होते. याचे अवशेष आजही हनुमान मंदिराभवती पहायला मिळतात. तेथून ताम्रपटातील महूय म्हणजे मोह व मोहदरी या गावात पोहचलो. दारणेच्या कुशीत विसावलेले मोह गाव दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हनुमान मंदिर एखाद्या वाड्यासारखे आहे. मंदिरामागे भिसेंचा चाळीसारखा वाडा आहे. मात्र आता तेथे कोणी राहत नाही. गावातातील एका टेकडीवर खंडेरायाचे दगडी बांधणीचे लहानसे मंदिर आहे. तसेच कानिफनाथांचे मंदिरही गावात आहेत. गावात पूर्वी खूप मोहाची झाडे असल्याने गावाला मोह असे नाव पडल्याचे अरूण जाधव सांगतात.

चिंचोलीतील प्राचीन मंदिर

वसईच्या ताम्रपटात उल्लेखलेले चौथे गाव म्हणजे मोह गावाच्या समोरील चिंचुली म्हणजे चिंचोली हे गाव. मोह गावातून नाशिक-सिन्नर महामार्गावर यायचे महामार्ग ओलांडून समोरच्या रस्त्याने चिंचोली गावाकडे निघायचे. गावात चिंचाची झाडे पूर्वी खूप होती म्हणून चिंचोली नाव पडले असेल, असे ज्येष्ठ मंडळी सांगतात. गावात प्रवेश केल्यावर आपण चिंचोलीच्या शाळेच्या पटांगणात पोहचतो. पटांगणात एका चौथाऱ्यावर काही दगडांना शेंदूर लावलेला व त्यावर व्यायामाचे दोन मुदगल ठेवल्याचे दिसते. ग्रामस्थ त्याला वेताळबाबा म्हणतात. गावातील हनुमान मंदिर व इतर लहान लहान मंदिरांची भटकंती झाली. पण चिंचोलीचे वेगळेपण काय की ज्याचा यादवांशी संबंध येतो. याचे उत्तर उलगडत नसतानाच धनाजी सानप हे वयोवृद्ध चिंचोलीकर खांद्यांवर हात ठेऊन म्हणतात,‘तुला जे हवयं ते आहे माझ्याकडे चल माझ्यासोबत.’ त्यांचे हे शब्द मला कधी यादवकाळात घेऊन गेले हे समजलेही नाही. प्रवास चिंचोलीतील सर्वात मोठ्या वडाच्या झाडाच्या दिशेने निघाला. रस्त्यात उजव्या हाताला दोन उभ्या शिळांवर कोरलेले दोन नाग दर्शन देतात. डाव्या हाताला असलेल्या वडाखाली मोठेबाबा विसावलेले आहेत.

वडाच्या झाडानंतर डाव्याहाताला जाणारा रस्त्याने चार किलोमीटर कच्चा रस्ता (दुचाकी जावू शकते) आहे. या रस्त्याने थेट डोंगर भेटेपर्यंत चालत रहायचं. एका भेंडीच्या झाडाच्या मिठीत एक कातळ दडलेला दिसायला लागतो. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आहे. काळाने केलेले आघात सोसत हे भूमीज शैलीतील मंदिर फक्त गाभारा रूपाने उभं आहे. त्याचा देह आजूबाजूला विखुरलेला दिसतो. गाभाऱ्यात पिंड आणि नंदी आहेत. आजूबाजूला नक्षीकाम असलेले स्तंभ अन् अवशेष मनाला पीळ देतात. पण कौतुक कराव वाटतं ते त्या भेंडीच्या झाडाचं ज्यानं हजार वर्षांचा हा गाभारा अजूनही जपला आहे. ‘हे मंदिर पुन्हा आहे तसं उभं करता येईल का?’ हा प्रश्न समोर येतो तो शेजारच्या शेतातील बांधावर काम करणाऱ्या दिलीप सानप यांच्याकडून. ‘खूप जुनं मंदिर आहे हो.. याला जपता येईल का?’ ही त्यांची साद मनाला अस्वस्थ करते. कारण नाशिक जिल्ह्यात अशी तीनशेहून अधिक मंदिरे आहेत की जी जपण्याची गरज आहे. यासाठी कोण पुढाकार घेणार या प्रतीक्षेत अजूनही ही मंदिरे तग धरून उभी आहेत. त्या भग्न मंदिराशी संवाद साधताना तो पुन्हा यादवांचा पराक्रम सांगू लागतो आपलं दु:ख बाजूला ठेऊन. त्याला मानात साठवत परतीच्या मार्ग केव्हा संपतो हेच लक्षात येत नाही. पण मनाला एक प्रश्न सतावत राहतो.. ताम्रपटातील या प्राचीन गावांतील तलाव अन् मंदिर जपण्यासाठी आपण काही करणार आहोत का?

 

खडकवीरांचं धारणगाव

अख्यायिकांनी आपल्या अनोख्या शैलीतून इतिहासातील अस्मिता पाऊलखुणांच्या माध्यमातून जिवंत ठेवली आहे. एखाद्या गावातलं मंदिर फक्त त्या अख्यायिकांच्या बळावर आपला प्रवास करीत असल्याचं पहायला मिळतं. तो इतिहास किती अनोखा असेल याची फक्त कल्पनाच मन प्रफुल्लित करते. असाच अनुभव येवला तालुक्यातील धारणगाव खडक व धारणगाव वीर या गावांत येतो.

साधारणपणे महाराष्ट्रात आढळणारी मंदिरांची शैली म्हणजे भूमिज शैली होय. नाशिकमध्ये अशा शैलीतील दिसणाऱ्या मंदिरांना आपण सरसकट हेमाडपंती मंदिरे म्हणतो. मात्र याचा उल्लेख आवर्जून भूमिज मंदिरे असाच करायला हवा. महाराष्ट्रात अगदी चौथ्या-पाचव्या शतकातही मंदिरे असल्याचे पुरावे उत्खननातून मिळाले आहेत. मात्र राष्ट्रकुटानंतर दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात-अकराव्या शतकापासून मंदिर उभारणीला महाराष्ट्रात पुन्हा जोर धरल्याचे दिसते. मंदिराचा काळ ठरवण्यासाठी त्या मंदिराचे स्थापत्य, मूर्ती, नक्षीकाम, मंदिरावरील शिलालेख अंतर्गत व बाह्य रचना उपयोगी पडते. त्र्यंबकेश्वर, वणी, देवरगाव, धोडंबे, अंबेगण, अंजनेरी, सांगवी, पेठ, दारणासांगवी, सिन्नर आदी मंदिरे पाहिली की शैली अन् रचनेतील फरक लक्षात येतो. त्याशिवाय गोदाघाटावरील मंदिरे अन् साधारण हजार वर्षांपूर्वीची मंदिरं पाहिले की त्यांच्या शैलीत पडत गेलेला फरक लक्षात येतो. हा फरक फक्त रचनेत दिसत नाही. तर गाभारा, जोत, मुखमंडप, द्वार ललाटबिंब व त्यावरील उत्तररांग, सभापद्म म्हणजे फुलाच्या आकाराचे छत, गूढमंडप, अंतराळ, सभामंडप व गाभाऱ्यातील देवळी, उंबरठ्याच्या मंडारक व त्यावरील र्कीतीमुख, ते अर्धचंद्रासारखे असल्याने त्याला अर्धचंद्रशिला आपल्याला भूमिज शैलीचे दर्शन द्यायला लागते. सभामंडपाच्या देवळीत अथवा देवळीच्या बाजूला डोक्याखाली एक हात धरून आडव्या स्थितीतील विष्णू मन आकर्षित करतो. सभामंडपातील खांबांवरील उलटा नाग व त्यावरील चौकटीत देवी मूर्तीच्या अनेक प्रतिमा भूमिज शैलीत डोकवायला लावतात. शिखराच्या आधी पर्णवेल व यक्षवेलही मोहक वाटावी, मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सूरसुंदऱ्या व मैथून शिल्प अनेक प्रश्न मनात निर्माण करतात. नंतरच्या काळात शिलाहार, कल्याणीचे चालुक्य आणि यादवांचा प्रभाव असलेली अनेक मंदिरे नाशिक परिरात आहेत. यातील अजूनही अनेक मंदिरे अज्ञातवासात गूढ इतिहास घेऊन दडलेली आहेत. ही मंदिरे शोधणे अन् त्यांना उलगडणे

यापुढील काळात महत्त्वाचे ठरणार आहे. असे अनेक आयाम असलेले सूरसुंदरी व मैथून शिल्प असलेले एक मंदिर नाशिकपासून अवघ्या साठ किलोमीटरवर असलेल्या धारणगाव खडक येथे पहुडलेले पहायला मिळते. विशेष म्हणजे या मंदिराची दखल आजवर कोणी घेतलेली नाही. हे मंदिर आपल्याला मंदिर शैलीच्या विश्वात रमायला लावते. तर येथील ऐतिहासिक बारव पेशवाईतील इतिहास उलगडते.

नाशिक-येवला रस्त्यावर विंचूरच्या अलीकडे उजव्या हाताला नैताळे हे गाव लागते. नैताळेतून धारणगाव खडककडे रस्ता जातो. शाळेपासून गावात शिरताना डाव्या हाताला छोट्या मातीच्या ढिगाऱ्यावर एक समाधी दिसते. तेथून उजव्या हाताला गावात पोहचल्यावर सकाळी सकाळी ‘सीताराम आला रे सीताराम आला’ हे शब्द कानावर न पडले तर नवलचं. हा सूर ऐकायला आला म्हणजे आपण ग्रामसंस्कृतीच्या वैभवशाली जगात आल्याची खात्री होते. सीताराम बैरागी हे गावात जोगवा मागण्याची परंपरा आजही पुढे नेताना दिसतात. या परंपरेचे पुढे काय होणार ही खंत त्यांना अस्वस्थ करते. आपल्याला जमतंय तोपर्यंत करायचं असेही ते सांगतात. जोगव्याने आजही गावातील प्रत्येक घराला दारावर आलेल्याला आदराने कोणतीही काचकूच न करता पीठ वाढण्याचा संस्कार आजही टिकून असल्याचे दिसतो. धारणगाव हे नुसते धारणगाव नाही तर ते खडक आणि वीर या दोन गावांमध्ये विभागले गेले आहे. बोकडदरी गावातून पुढे धारणगावात येणारी बोकडदरी नदीने एका तिरावर धारणगाव खडक वसविले आहे, तर दुसऱ्या तिरावर धारणगाव वीर. धारणगावला खडक जोडले गेले ते बोकडदरीचा तो किनारा खडकाळ आहे म्हणून. पण यामागे एका राजांची अनोखी गोष्ट दडली आहे. याबाबत ग्रामस्थांकडून जाणून घेताना ते आपल्याला अनेक पिढ्यांपासून ऐकत आलेल्या अख्यायिकांतून ‘एक होता राजा’ या गोष्टीकडे आपल्याला घेऊन जातात. अशा अख्यायिका इतिहासाचे कण पुढे घेऊन जाणारे असतात. त्यामुळे त्यांना दुर्लक्षित करून चालत नाहीत. तसचं धारणगाव वीर या गावाचही आहे. पण गावाचे नाव धारणगाव का आहे. अशी कोणती गोष्ट येथे कोणी धारण केली होती का? इथल्या मातीला काही माहात्म्य आहे का? की गोदावरी काठावरील नांदूरमध्यमेश्वर येथे मारीच राक्षसाच्या वध करून पंचवटीकडे परतणाऱ्या श्रीरामाने काही धारण केले होते. मात्र, हा कल्पनाविलास असला तरी ‘धारण’ नावाचे कोडे काही उलगडत नाही. मात्र धारणगावाने अनेक तपस्वींना ज्ञानधारण करण्यास बळ दिलं आहे. तर धारणगावच्या उपनामांमागील अख्यायिका ही खडकसिंग व वीरसिंग यांच्या नावावरून पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. राजस्थानातील खडकसिंग आणि वीरसिंग हे दोघे भाऊ कुंभमेळ्यासाठी नाशिकला आपल्या कुटुंब व सैनिकांच्या लव्याजम्यासह आले होते. परतीच्या मार्गावर असताना खडकसिंगांच्या गर्भार पत्नीला प्रसवकळा सुरू झाल्या. बाळंत होण्यासाठी ते धारणगावात थांबले; मात्र राणीसाठी शयनगृह नव्हते. ते एका दिवसात बांधले गेले तर राणीने येथे थांबावे, असे राजाच्या एक विद्वानाने सांगितले. मात्र एका रात्रीत शयनगृह बांधले गेले नाही अन् ते अर्धवट राहिले. (पांडवांनी रात्रीत मंदिरे व लेणी बांधल्याच्या कथेसारखे) ते अर्धवट बांधकाम म्हणजे दगडी बांधणीतील कृष्णनाथ मंदिर होय, असे मधुकर जाधव व श्रावण डोमसे व इतर ग्रामस्थ सांगतात. हे मंदिर बोकडदरी नदीच्या काठावरच आहे. मात्र हे मंदिर कृष्णनाथाचे मंदिर नसून, भूमिज शैलीतील शिवमंदिर आहे. याच्या खाणाखुणा मंदिरभर पसरलेल्या आहेत. बाराव्या शतकातील हे मंदिर बरेचसे ढासळले आहे. तर मंदिराखाली बारा कढई भरून सोने असल्याच्या गैरसमजातून हे मंदिर अनेकदा खोदले गेले आहे. मंदिराचा समोरचा भाग, अंतराळ व गर्भगृह पूर्णपणे कोसळले आहे. शिल्लक आहे तो फक्त देह. सभामंडप, आतील देवळ्या, स्तभांवरील नक्षी व बाहेरील बाजूला असलेल्या सूरसुंदरी व मैथून शिल्पाची मोजक्या अन् पूर्णपणे झिजलेल्या मूर्ती हे शिवमंदिर असल्याची जाणीव करून देतात. मंदिराच्या अवतीभवती मंदिराचे अवशेष पडल्याचे दिसतात. हे सर्व अवशेष संकलित करून ठेवण्याची गरज आहे. मंदिराशेजारी एक बारव तसेच वीरगळी व आजूबाजूला गोसावी समाजाच्या समाधी पहायला मिळतात. हे भूमिज शैलीतील महादेव मंदिर जपण्यासाठी लासलगावच्या राजा शिवछत्रपती ग्रुपच्या तरुणांनी गेली वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहेत. हे मंदिर संरक्षित झाले तरच तेथील वैशिष्ट्य अन् इतिहास जपला जाईल. यासाठी मंदिराला पक्के कंपाऊड तसेच मंदिराची पुरातत्त्व विभागाकडून दुरूस्ती व्हावी, अशी मागणी हसमुखभाई पटेल, संजय बिरार, सुदर्शन हिरे, गौरव भोईटे, मयुर राऊत, अनिरूद्ध बोराडे, ऋषीकेश जोशी, इंद्रनिल खंडारे व्यक्त करतात. या तरुणांकडून मंदिर परिसरातील स्वच्छता व साफसफाईही वेळोवेळी केली जाते. या तरुणांना ग्रामस्थांचा पाठिंबा व प्रशासकीय बळ मिळाले तर एक मोठा इतिहास जपला जाईल. भग्नतेकडे निघालेल्या या भूमिज मंदिराला वाचविण्यासाठी धारणगावकरांनी तळमळीने प्रयत्न करण्याची गरज आहे.

भगरीबाबा हे एक अध्यात्मिक व्यक्तिमत्त्व गावाला लाभले आहे. भगरीबाबा मूळचे राजस्थानातून आले होते. त्यावेळी तेही याच भूमिज मंदिरालगतच्या बारवेपाशी तपश्चर्येला थांबले. त्यांना येथेच दृष्टांत झाला. त्यांच्या हातून ग्रामसेवा घडली अन् त्यांनी लासलगावात देह ठेवला. लासलगाव रस्त्याला त्यांची समाधी आहे. तर धारणगाव खडकमध्ये त्यांचे मंदिर आहे. गावात नव्याने बांधलेले विठ्ठल मंदिर, कृष्णमंदिर, महादेव मंदिर, हनुमान मंदिर आहेत. गावातील कीर्तनकार बाजीरावनाना जाधव यांच्या कीर्तनातूनही खडकसिंगांचा उल्लेख यायचा. त्यामुळे शेकडो वर्षानंतरही ही कथा जीवंत राहिली आहे. मात्र जाधवांचे निधन झाल्याने ते कीर्तन उपलब्ध नाही. हे कीर्तन नेमके काय होते याचा काही संदर्भ हाती लागत नाही. गावातील दादाराम डोह स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी इंग्रजांविरूद्ध मोठा लढा दिला होता. गावातील जाधव कुटुंबीय मूळचे राजस्थानचे. राजस्थानातून सासवड असा त्यांचा प्रवास झाला. त्यांच्यातील एक सरदारांना येवल्यातील १८ गावांची जहागिरी मिळाली. तेव्हापासून जाधव कुटूंब या गावांमध्ये स्थिरावले. विशेष म्हणजे जाधवांचे संबंध या अठरा गावांशिवाय इतरत्र केले जात नाहीत. ही प्रथा आजही पाळली जाते. खडकमध्ये जाधवांचे अनेक वाडे होते. ते आता कोसळले आहेत. वाड्यावरील कोरीव दगडी व लाकडी कलाकुसर आजही अनुभवता येते. गावातील उत्सवात दरवर्षी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो. याचेही मानपान ठरलेले आहेत. धरणगाव खडक अनुभवून बोकडदरी नदी ओलांडली की लागते धारणगाव वीर हे गाव. बोकडदरी हा एक नाल्यासारखा ओहळ आहे. या गावाचे नाव वीरसिंगांच्या नावावरून पडल्याचे ग्रामस्थ सांगात. गावातील छोट्याशा महादेव मंदिर व मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील शिल्प पाहण्यासारखी आहेत. मंदिरामागे अनेक वीरांच्या वीरगळी आहेत. तर समोर दगडी बांधणीची बारव आहे. तसेच गावात दगडी बांधणीच्या हिंदू व मुस्लिम समाधी आहेत. या समाधी नेमक्या कोणाच्या आहेत हे मात्र उलगडत नाहीत. धरणगाव वीरमध्ये आवर्जून नारा व कृष्णा नावाच्या दरोडेखोरांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. या दोघांनी इंग्रजांच्या नाकात दम आणला होता, असेही वयोवृद्ध एकनाथ सानप सांगतात. गावात खंडेराव, महादेव, मारूती, विठ्ठल आदी मंदिरे आहेत. खंडोबा यात्रेत बोहाडे सोंग नाचविण्याची परंपर २५ वर्षांपासून बंद झाली आहे. गावात फेरफटका मारताना जुन्या पद्धतीची घरे अन् गल्ल्या पाहून पुन्हा धारणगाव खडककडे वळायचं अन् परतीच्या प्रवासासाठी नैताळेकडे निघायचं. मात्र इतिहासाच्या शोधाचा प्रवास कधी संपत नसतो.

धारणगाव खडकमध्ये अजून एक अनोखी वास्तू असल्याचे कळालं अन् मोर्चा त्या वास्तूकडे वळाला. ती वास्तू म्हणजे एक अनोखी बारव आहे. या बारवेला अनोखे म्हणण्यामागे एक विशेष कारण म्हणजे बारवेवरील शिलालेख अन् बारवेत प्रवेश करताना उजव्या हाताला एक देवळीसारख्या मार्गाने बारवेच्या मधल्या भागात जाणारा रस्ता बारव शैलीचे आणखी एक कवाडे उघडताना दिसतो. आत गेल्यावर सातीआसरा सारखे दगड मांडून ठेवण्यात आले आहेत. बारवेला पाणी असून ती वापरात आहे. मात्र स्वच्छता अन् काळजी या अर्थाने दुर्लक्षित आहे. या शिलालेखावर धारणगावचा उल्लेख धारणग्राम खडक असा आला असून, देशमुखीपणाच्या वतनासाठी ही विहिर दिलेली असून, आसपासच्या ३०-३५ गावांना पाण्याची सोय व्हावी हा बारव उभारण्यामागील उद्देश आहे. ही बारव प्रतापी गंगाधर यांनी बांधली आहे. लेखात प्रभव संवत्सर उल्लेख आला आहे. मात्र आकडे नष्ट झाल्याने नेमके वय काढणे अवघड आहे. प्रभव संवत्सर दर साठ वर्षांनी येत असल्याने १८०७-८ अथवा १७५७ दरम्यानची ही वास्तू असावी. लेखाची भाषा मराठी व लिपी देवनागरी आहे. बांधकामातील धाटणी पेशवेकालीन असल्याने लेखाचा काळ हा पेशवाईतील असावा, असे मोडीतज्ज्ञ व इतिहास अभ्यास प्रा. रामनाथ रावळ सांगतात. खडकसिंग आणि वीरसिंगाचे पुढे काय झाले याचे उत्खनन पुढे होईलच पण त्यांच्या आठवणी या गावाच्या रूपाने आपल्यासमोर आहेत. सुख, समाधान धारण केलेल्या या गावातील प्राचीन मंदिर अन् बारवेच्या रूपाने शिल्लक असलेला वारसा जपण्याची गरज आहे.

 

इतिहास फुलविणारे अनकाई

एखाद्या गावाला इतकं काही ऐतिहासिक वैभव लाभलेलं असतं की, आपणही त्या गावचेचं होऊन जावं असं वाटायला लागतं. यादवांच्या काळात बांधला गेलेला अनकाई-टनकाई किल्ला व जैन लेणींच्या पायथ्याचे अनकाई गाव हे आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातं.

नाशिक जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यांना गडकिल्ल्यांचे कोंदण लाभलेले आहे. सेलबारी, डोलबारी, दुधेश्वर उपरांग, त्र्यंबकरांग, पेठ उपरांग, सातमाळ रांग, नाशिकची नैर्ऋत्य व वायव्य उपरांग, चणकापूर डोंगररांग, गाळणा टेकड्या गडकिल्ल्यांनी गजबजलेल्या आहेत. नुसत्याच गजबजलेल्याही नाहीत तर या प्रत्येक गडकोटांचे वेगळेपण त्यांच्या ठायी दडलेलं आहे. प्रत्येक किल्ल्याचा इतिहास मात्र विखुरलेल्या अवस्थेत आहे. तो किल्ला कोणी, कधी बांधला अन् कशासाठी बांधला. त्याभोवतीच्या ऐतिहासिक घडामोडी अन् शौर्य नोंदविण्याची गरज आहे. गाळणा रांगेतील येवल्याजवळील अनकाई-टनकाई किल्ल्याचीही ती अवस्था पहायला मिळते. अनकाई डोंगरावरील किल्ल्याचा उपयोग यादव काळापूर्वीपासून टेहळणी नाका म्हणून केला जात असे. हा किल्ला यादवकालीन असून, देवगिरीचे यादव सम्राट सिंघणाच्या (इ.स.१२००-१२४७) कारर्कीदीत तो परमारांच्या ताब्यात होता. यादवांनी परमारांचा किल्लेदार श्रीधर याला फितूर करून हा किल्ला जिंकला, असे पुरातत्त्वज्ञ डॉ. ओ. पी. वर्मा यांनी नोंदविले आहे. अनकाईचे लिखित पुरावे फारसे मिळत नाहीत. मात्र मुघल बादशहा शहाजहान याचा सुभेदार खानखनान याने अलका-पलका किल्ला जिंकून घेतला यावेळी अनकाई-टनकाई हा किल्लाही इ. स. १६३५ मध्ये जिंकल्याचा उल्लेख मिळतो. १६९३ मध्ये सुलेमानबेग हा अनकाई-टनकाईचा किल्लेदार असल्याचा उल्लेख मिळतो. पेशव्यांनीही अनकाई-टनकाई आपल्या ताब्यात असावा यासाठी धडपड केलेली दिसते. १७३४ च्या शेवगावच्या तहानुसार किल्ला मराठ्यांना देण्याचे निजामाने कबुल केले; मात्र निजामाचा अधिकारी व किल्लेदार अब्दुल अझिजखान याने हा किल्ला मराठ्यांना देण्यास नकार दिला. यामुळे पेशवा-निजामात संघर्ष वाढला. अखेर १७५२ च्या मराठे-निजाम यांच्यात भालकीचा तह झाला. या तहानुसार अनकाई मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर अनकाई १८१८ पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात होता. पेशवाईचा अस्त झाल्याने ४ एप्रिल १८१८ रोजी कॅ. मॅकडॉवेल यांनी अनकाईच्या किल्लेदाराशी वाटाघाटी सुरू केल्या; त्यात यश येत नसल्याचे पाहून मॅकडॉवेलने ५ एप्रिलला सहा पौंडी तोफांचा मारा किल्ल्यावर सुरू केला. या हल्ल्याने किल्लेदार शरण आल्याने अनकाई इंग्रजांच्या हाती आला. यावेळी मराठ्यांचे ३०० सैनिक व ४० तोफा किल्ल्यात होत्या. अनकाई-टनकाईची भक्कम तटबंदी हार खाण्यासाठी नव्हतीच हे आजही ती दाखविते. अनकाईचा इतिहास सतराव्या-अठराव्या शतकापुरताच मर्यादित नाही. तर अनकाई-टनकाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले जैन लेणीच्या कुशीत स्थिरावलेले अनकाई गाव व लेणी आपल्याला अगदी दहाव्या शतकाची सफर घडवून आणतात. गावातील अनेक वास्तू अनकाईवर पुरातत्त्वीय अन् इतिहासाच्या अंगाने खूप काम करण्याची गरज असल्याचे व्यक्त करतात.

नाशिकहून येवल्यात आलात की मनमाड मार्गावर दहा-बारा किलोमीटरवर अनकाई हे गाव आहे. अनकाई फाट्यावरून उजव्या हाताने वळालात की समोर अनकाई-टनकाई जोडगोळी डोंगर खांद्यावर किल्ला घेऊन मिरविताना दिसतो. जसजसे आपण जवळ जाल तसे हे दोघे हातीची कडी करून फुगडी खेळता-खेळता आपल्याला पाहून स्तब्ध झाल्यासारखे उभे असल्याचा भास होतो. दोघांचे हात किल्ल्यांचे बुरूज व तटबंदीने गुंफल्यासारखे वाटायला लागते. रेल्वेच्या पुलाखालून जाताना डोक्यावरून धावणारी रेल्वे मलाही किल्ला पहायचाय असं म्हणत पुढे धावत जाते, असे वाटते. अर्थात अनकाई-टनकाई पाहण्याची भुरळ फक्त आपल्यालाच पडली असे नाही तर परदेशी प्रवाशांनाही पडल्याचे दिसते. भारतात व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या डच, पोर्तुगीज, ब्रिटिशांनी सोळाव्या शतकापासून प्रवेश करण्यास सुरुवात केली. यात फ्रान्स शेवटचा (कालखंड इ.स. १६६४ ते १९५४) होता. याच दरम्यान, झां बातीस्त ताव्हेर्न्ये, फ्रान्स्वा बर्निअर व थेवेनॉट यांसारख्या प्रवाशांनी फ्रान्समध्ये भारताबद्दल बरीच उत्सुकता निर्माण केली होती. १६६५ मध्ये थेवेनॉट याने सुरत-औरंगाबाद मार्गावरील अनकाई हे एक मुख्य ठाणे असल्याचा उल्लेख केला आहे. थेवेनॉटच्या आठवणींसह आपण अनकाई गावात दाखल होतो. आपल्या आजूबाजूला अनेक मंदिरे व उघड्यावर पडलेल्या भग्नमूर्ती पहायला मिळतात. पर्यटकांसाठी राहण्याची सोय म्हणून येथे गावाने मोफत गेस्ट हाऊसची व्यवस्थाही केली आहे. खरं तर येथे उघड्यावर पडलेल्या भग्नमूर्ती, शिल्पांचे सुंदर संग्रहालय गेस्ट हाऊसच्या आवारात होऊ शकते. या गेस्ट हाऊससमोरील उघड्यावर ठेवलेली गणेश मूर्ती व वीरगळ पाहून मागील बाजूच्या अनकाईच्या भग्न वेशीकडे वळायचे. दगडी बांधणीची वेस दिसायला सुंदर आहे; मात्र तिचा वरचा भाग ढासळला आहे. वेशीच्या एका भिंतीला जैन तीर्थंकारांची मूर्ती व त्या मूर्तीच्या माथ्यावर गजलक्ष्मी शिल्प कोरलेले दिसते. वेशीतून गावात गेल्यावर समोर दगडी मठ पहायला मिळतो. अशीच एक वास्तू अनकाई-टनकाई किल्ल्याकडे जाताना लेणींच्या आधी डाव्या हाताला लागते.

अनकाई डोंगराच्या पायथ्यापासून शंभर एक पायऱ्या चढल्यावर जैन लेणी लागते. गावातून लेणीपर्यंत व तेथून किल्ल्यापर्यंत पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे फार दमछाक होत नाही. भौगोलिक दृष्ट्या ही लेणी टनकाईच्या पोटात आहे. बर्जेसने पश्चिम भारतातील लेण्यांवर केलेल्या लिखाणात फक्त सात लेण्यांचा समूह असल्याचा उल्लेख आहे. मात्र त्याठिकाणी वरच्या रांगेत एकूण आठ व त्याखालील रांगेत दोन अशा दहा लेण्या आढळतात. लेणी परिसरात पाण्याचे चार टाके आहेत. या लेणी दहाव्या अकराव्या शतकात कोरलेल्या असाव्यात. येथे लेणी क्रमांक ३ वर एक शिलालेखही आहे. मात्र तो पुसट झाल्याने त्याचे वाचन करता येत नाही. लेणी क्रमांक दोन मध्ये अनकाई देवी आहे. इतर लेण्यांमध्ये तीर्थंकरांच्या मूर्ती, द्वारशिल्पे अन् गूढ वाढविणाऱ्या मूर्ती पहायला मिळतात. तर काही मूर्तींच्या पायथ्याला शिलालेख कोरले आहेत. जैन लेणी केंद्रीय पुरातत्त्व विभागातर्फे सुरक्षित वास्तू घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे लेणीची व्यवस्था चांगली ठेवल्याचे दिसते. मात्र लेणी पाहताना वटवाघळांचा त्रास पर्यटकांना व लेणीलाही होत असल्याचे तेथील अवस्थेवरून लक्षात येते. लेणीचा सोहळा अनुभवून तसेच पायऱ्यांनी पुढे निघाल्यास अनकाई-टनकाई ज्या खिंडीत हातातहात घेऊन पहूडली आहे तेथील बुरूज अन् तटबंदी आपल्याला आकर्षित करते.

यादवकालीन एका ताम्रपटात (इसवी सन ९७४) अनकाई किल्ल्याचा उल्लेख ‘एनकाई दुर्ग’ असा केलेला आहे. किल्ला अनकाई-टनकाई असे म्हटले जात असले तरी गावाचे नाव फक्त अनकाई आहे. लेणीतील अनकाई देवीमुळे गावाला हे नाव पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. तर टनकाई हा अनकाईचाच एक भाग असलेला किल्ला आहे. मात्र टनकाई हे नावही टाकाई-टुकाई देवी मंदिरामुळे पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. हे मंदिर मनमाड मार्गावर किल्ल्यापासून जवळच आहे. रामायणकाळात अनकाई-टनकाईवर अगस्ती मुनींचे वास्तव्य होते. सीतेचे हरण झाल्यानंतर सीतेला शोधण्यासाठी निघालेल्या रामाची व अगस्तींची येथेच भेट झाली होती. यावेळी अगस्तींनी श्रीरामाला नांदगावच्या नस्तनपूर येथे जाऊन शनीदेवाची आराधना करण्यास सांगितले होते, अशी अख्यायिकाही ग्रामस्थ सांगतात. किल्ल्यावर अगस्तींची गुफाही आहे. तेथे अगस्ती ऋषींची मूर्ती व पाण्याचे तळे आहे. या तळ्याला काशी तळे असेही म्हटले जाते. या तळ्याच्या मधोमध अगस्तींची समाधी असल्याचेही ग्रामस्थ सांगतात. श्रावणात महिनाभर अगस्तींची यात्रा भरते. श्रावणातील दर सोमवारी मोठ्या संख्येने भाविक अनकाईला येतात. अनकाईवर मच्छिद्रनाथांची समाधी असल्याचेही ग्रामस्थ मानतात. त्यांना मोठा बाबा असेही म्हटले जाते. अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रावर स्वारी केली तेव्हा अनकाई किल्ला व लेणीची मोडतोड केली होती. त्यानंतर अनकाई-टनकाई मोगलांच्या ताब्यात गेला. विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांचे थोरले पूत्र शिवाजीपंत बापू यांनी निजामाशी युद्ध करून अनकाई मिळविला. अनवती (अनकाई) गावाजवळ हैजरच्या तोफ खाण्यावर विठ्ठल शिवदेव यांनी हल्ला केला. तेव्हा मिळालेल्या तोफातून थोरल्या माधवराव पेशव्यांनी दोन तोफा विठ्ठल शिवदेव यांना १६७४ मध्ये बक्षीस दिल्या. त्या त्यांनी अनकाई किल्ल्यावर आणून ठेवल्या. अनकाई टनकाई पेशवाईत इंग्रजांच्या हाती पडला. किल्ला भग्नावस्थेत असून किल्ल्याची तटबंदी व सात मजबूत दरवाजे, किल्ल्यावरील मंदिरे, गुफा, माथ्याचा परिसर, पाण्याचे टाके, हिंदू लेणी तळे, वाडा व इमारतींचे अनेक अवशेष पाहिले की किल्ल्याचा वापर अन् त्याच्यावर घडलेल्या ऐतिहासिक घटनांची उकल होते. अनकाईच्या उत्तरेकडे बाहेर पडण्यासाठी भुयारी रस्ताही आहे. किल्ल्यावरही दोन तीन ब्राह्मण लेणी आहेत. यात काही देवतांच्या मूर्ती आहेत. अनकाई किल्ला राज्य पुरातत्त्व विभागाने संरक्षित घोष‌ित केला आहे. टनकाईवर जाताना प्रवेशद्वार, वाड्याचे अवशेष, पाण्याचे तळे व दोन-तीन टाके, थोडीफार तटबंदी पहायला मिळते. टनकाईवर दगडीबांधणीचे शिवमंदिर आहे. किल्ल्यावरही अनेक ठिकाणी मूर्ती विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या पहायला मिळतात. ‘नाशिक जिल्ह्यात गाळणा किल्ला सोडला तर इतकी मजबूत तटबंदी अनकाई-टनकाईवरच आढळते,’ असा उल्लेख नाशिक गॅझेटियरमध्ये आला आहे. अगस्ती ऋषी, जैन तीर्थंकर व मच्छिंद्रनाथांचा सहवासामुळे अनकाई-टनकाई ऋषीमुनींचे आवडते ठिकाण असल्याचे कपिलगीतेवरून स्पष्ट होते. ‘कपिलगीता’ या धार्मिक ग्रंथावर १४६ वर्षांपूर्वी लिहिलेल्या टीकेच्या मूळ प्रती सोमठाणदेश येथील इतिहास अभ्यासक सुधाकर पगारे यांच्याकडे आहेत. शके १७९१ म्हणजे इ.स. १८६९ मध्ये दामोदर माधवराव यांनी ही टीका रचली. त्यांचे पूर्वज सदाशिव यांनी मूळच्या कपीलगीतेची रचना शके १७४१ म्हणजे इ. स.१८१९ मध्ये केल्याचा उल्लेख ‘येवला यथादर्शन’ या पुस्तकात आला आहे.

अनकाई-टनकाई किल्ला पाहून पुन्हा खिंडीत यायचे. पायऱ्यांनी खाली उतरताना जैन लेणी न्याहाळायची अन् पुन्हा वेशीपाशी हजर व्हायचे. गाव बदलत आहे त्याप्रमाणे गावची मोडकळीस आलेली वेसही दुरूस्त करण्याचा मानस ग्रामस्थ व्यक्त करतात. अनकाई माता मंदिराप्रमाणेच गावात खंडोबा, हनुमान, महादेव मंदिरे आहेत. गावात पूर्वी आखाडीचा कार्यक्रम आठ दिवस साजरा केला जाई व यात विविध सोंगे नाचविली जात, अशी माहिती, सुधीर जाधव, अशोक बोराडे व आनंद वैद्य यांनी दिली. अनकाई किल्ला व आसपासच्या परिसरात पुरातत्त्व खात्यामार्फत उत्खनन झाल्यास मोठा इतिहास समोर येऊ शकतो, अशी अपेक्षा इतिहास अभ्यासक नारायण क्षीरसागर व्यक्त करतात. अनकाईचा प्रवास येथेच संपला असे म्हणतानाच गावातील पूर्वेला सतीमंदिर व बारव आहे ती नक्की पहा, असे गावातील रविंद्र देवकर यांनी सांगितले अन् आमची पावलं झपाझपा तिकडं वळाली. सुरूवातीला लहानशी विहीर पहायला मिळाली. त्याला ग्रामस्थ सरोवर म्हणतात. त्याच्या आजूबाजूला मंदिराचे अनेक अवशेष विखुरलेले पहायला मिळाले. या परिसरात दगडी बांधणीची अनेक मंदिरे असणार यात शंका नाही. विहिरीजवळ जनावरांसाठी पाणी ठेवण्याचे मोठे दगडी पात्र पहायला मिळते. तेथून उत्तरकडे नजर टाकली की सहा-सात फूट उंच गवतामध्ये काळाशार कळस डोकावताना दिसला. एखाद्या मोठ्या मंदिराची लहानशी प्रतिकृती उभारल्यासारखा भास या वास्तूकडे पाहिल्यावर झाला. लहानसे प्रवेशद्वार, आतमध्ये मंदिराभवतीचा परिसर तोही लहान, मंदिराच्या बाहेरील सीमाभिंतीही लहान अन् मूळ मंदिरही लहानच प्रतिकृतीसारखे. ही वास्तू फासना शैलीची भासते. मंदिराचे शिखर अष्टकोनी असल्याने ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. कळसावर कोरलेले चार मुख व त्याच्या दोन्ही बाजूला चार सिंहाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. गाभाऱ्याचे प्रवेशद्वारही लहानच. समाधीसारखे भासणा-या वास्तूला अनकाईकर सतीमंदिर म्हणतात. गाभाऱ्यात विठ्ठल रूक्माईसारख्या दिसणाऱ्या भग्न मूर्ती आहेत. मात्र त्या नंतरच्या काळात बसविलेल्या असाव्यात. अनकाईवर येणाऱ्यांची पावले याकडे माहितीअभावी वळत नाहीत. ही वास्तू नेमकी काय असेल यावर संशोधनाला वाव आहे. मजबूत बांध्याचे जोडगोळी किल्ले, मठासारख्या दोन वास्तू, गावची वेस, विखुरलेल्या मूर्ती, लेणीचे कोंदण अन् अज्ञात वास्तूंचे वैभव यासह मनात अनेक प्रश्न, नव्याने काही तरी हाती लागल्याचं समाधान परतीचा प्रवास आनंदी करतो. चला, तर अनकाईची अनोखी रूपे अनुभवायला.

हिरेखानाचे सोनांबे

इतिहास नोंदविला गेला नाही अथवा त्याच्या नोंदी पुढे आल्या नाहीत तर काय होते. हे अनुभवायचे असेल तर नाशिकमधील अनेक गावे याची उत्तम उदाहरणं म्हणायला हवीत. पिढ्यांपिढ्या ऐकत आलेल्या गोष्टींवर अनेक गावांचा इतिहास तग धरून उभा आहे. अशीच काहीशी परिस्थिती सिन्नर तालुक्यातील सोनांबे या गावाचीही आहे.
नाशिकच्या नसानसात ऐतिहासिक ऐश्वर्य अन्‌ शौर्य दडलेलं आहे. त्याच्या पाऊलखुणा गावागावांमध्ये आजही अनुभवयाला मिळतात. मात्र या पराक्रमी आणि इतिहास घडविणाऱ्या रणधुरंधरांचा इतिहास अजूनही अज्ञातवासात खितपत पडलेला दिसतो. त्यांच्या शौर्याला त्यांनी उभारलेल्या ऐश्वर्यसंपन्न इतिहासाला पुनर्वैभव मिळवून देण्याची अज्ञातवासात असलेला इतिहासाला झळाळी देण्याची गरज आहे. सातवाहन ते यादव कालखंड, मुस्लिम राजसत्ता, त्यानंतर आलेला शिवकाळ अन् पेशवाईच्या काळात नाशिकमध्ये मोठे बदल झाले.

पेशव्यांच्या अनेक सरदारांना नाशिक परिसरातील गावांच्या जहागिऱ्या मिळाल्यामुळे त्यांचे वास्तव या परिसरात कोणत्या ना कोणत्या निमित्ताने झालेले दिसते. मोरोपंत पिंगळे असोत वा मस्तानी असो की पेशव्यांचा समशेर यांचे नाशिकशी ऋणानुबंध कोणत्या ना कोणत्या निमित्ताने जुळले आहेत. त्यांच्या पाऊलखुणा आजही त्यांचे अस्तित्व गावागावांमध्ये दाखवितात. त्याप्रमाणे महादजी शिंदे, मल्हारराव बर्वे, अहिल्याबाई होळकर, राजेबहाद्दर नारोशंकर यांनसह अनेक सरदार, घराणी व संस्थानांचा ठसा परिसरातील गावांवर उमटलेला दिसतो. सिन्नरमधील देवपूर अन् राणेखानाच्या इतिहासाला पानिपतच्या लढाईचा संदर्भ आहे. पानिपतच्या युद्धातून जखमी अवस्थेतेतील महादजी शिंदेंना राणेखानाने वाचविले व पुन्हा आपल्या मुलखात आणलं.

राणेखानाच्या निष्ठेवर खूश होत त्याला इमान म्हणून सिन्नर तालुक्यातल्या देवपूर, पिंपळवाडी, निमगांव, पास्ते ही गावे जहागिरी मिळाली. राणेखानाने देवनदीच्या किनारी प्रशस्त वाडा बांधला अन् येथेच विसावलाही. देवपूरमधील राणेखानाचा वाडा पाहताना त्यांच्या पराक्रमाची कल्पना येते. महादजी शिंदे राणेखानाला ‘भाई’ म्हणायचे अन् राणेखान गेल्यावर महादजी अनेक वेळा ‘भाई भाई’ म्हणून हाका मारायचे या संदर्भावरून राणेखानाचे व्यक्तित्त्व उलगडते. पण राणेखानाला हिरेखान नावाचा भाऊ असेल व देवपूरला राणेखान स्थिरस्थावर होत असताना त्याने आपल्या भावाला याच देवनदीच्या किनारी सिन्नरमधील सोनांबे या गावात वसवले असेल. हा इतिहास मात्र मौखिक रूपानेच सोनांबेकरांकडून ऐकायला मिळतो अन् त्या गावातील हिरेखानाच्या वाड्यासारख्या महालाच्या भिंती या इतिहासाचा साक्षीदार असल्याचे पहायला मिळतात. हिरेखान राणेखानासारखाच उमदा लढवय्या असणार, असा भास वाड्याच्या भिंतीला हात लावल्यावर होतो. दोघेही याच देवनदीच्या किनारी इतिहासाप्रमाणेच विसावले हेही दोघांमधील एक साम्य सोनांबे पुढे आणते.

सिन्नरहून सिन्नर-घोटी मार्गावर सात-आठ किलोमीटरवर डाव्या हाताला सोनांबे फाटा लागतो. फाट्यावरून दोन किलोमीटर रस्त्याने आत गेल्यावर झाडांच्या पुंजक्यामध्ये सोनांबे देवनदीच्या किनारी वसले आहे. गावात प्रवेश करताना लहान मोठी मंदिरे, समाधी दर्शन देतात. सकाळी सकाळी पारावर जमलेले ज्येष्ठ मंडळींचा पांढऱ्या शुभ्र पेहराव व कोन काढीत पुढे डोकावणाऱ्या त्यांच्या डोक्यावरील पांढऱ्या गांधी टोप्या इतिहासाबद्दल बोलू लागतात. सोनांबे म्हणजे काय? या माझ्या प्रश्नांनं सर्वच अस्वस्त होतात अन् एक आठवणींचा उसासा टाकत हरविलेल्या गोष्टींना उजाळा देताना जी निराशा, आपलेपणातून निर्माण झालेली उत्सुकता त्यांच्या डोळ्यात उभी राहते. ‘काय दिवस होते’ ही त्या वैशिष्ट्यांची आताची किंमत त्यांना आठवणींचे भावविश्व उलगडताना पाहून अंगावर काटा येतो अन् ते पिवळे धमक आंबे आजही चाखता आले असते तर काय मजा आली असती, असं उगाच वाटून जातं. आंब्याचा सिझनातही आता सोनांबेत आंबा मिळत नाही, ही ज्येष्ठांमधील रूखरूख सर्वकाही सांगते. सोनांबे म्हणजे सोन्यासारख्या पिवळा धमक आंबा पूर्वी गावात पिकायचा. चार माणसांच्या घेराइतकी मोठाली आंब्याची झाडे गावात होती अन् त्यांना येणारे आंबे सोन्यासारखे झाडावर दिसायचे म्हणून गावाला सोनांबे असे नाव पडले, असेही सोनांबेकर सांगतात.

सोनांबेच्या नावाप्रमाणेच सोनांबेचा इतिहासही आहे. मात्र तो आता हरविलेल्या अवस्थेत आहे. औरंगजेबाने नाशिक परिसरातील किल्ले घेण्यासाठी पाठविलेल्या एक सरदार सोनांबेतील भैरवनाथाचे मंदिर पाडण्यासाठी गावात आला होता. त्यावेळी त्या सुलतान नावाच्या सरदाराच्या भावाला सोनांबेत साप चावला. त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला तीन दिवस भैरवनाथ मंदिरात बसवून ठेवले व त्याला झालेली विषबाधा दूर झाली. त्या सुलतानाने मंदिराला हात तर लावलाच नाही उलट मंदिराच्या जीर्णोद्धाराला मदत केली. तेव्हापासून गावातील भैरवनाथाच्या यात्रेत मंदिरासमोर मंडप टाकण्याचा मान गावातील मुस्लिम कुटुंबियांना आहे, असे हरिषचंद्र सातपुते, एकनाथ पवार, राजू आंबेकर व ज्ञानेश्वर बोडके सांगतात. भैरवनाथ मंदिरात साप चावलेल्या व्यक्तीला तीन दिवस बसवून ठेवल्यास विषबाधा होत नाही, अशी एक समजूतही ग्रामस्थांमध्ये आहे. गावात देवपूरच्या राणेखानाच्या भावाची म्हणजेच हिरेखानाची मोठी तीन मजली हवेली देवनदीच्या किनारी आहे.

हवेलीला काही वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत ती पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र आजही हवेलीच्या तीन दिशांच्या बलाढ्या भिंती तग धरून उभ्या आहेत. या तीन मजली हवेलीचा दरवाजा अन् आतील लाकडी कोरीव काम अप्रतिम होते, असे तेथेच राहत असलेले हिरेखानाची वंशज पीरमहम्मद गुलाब पठाण व शाकिद पठाण सांगतात. मात्र आगीत सर्वकाही गेलं. हवेलीतील भुयार थेट देवपूरच्या राणेखानाच्या वाड्यात जाते, असेही ते सांगतात. मात्र आता तेथे कोणाला जावू दिले जात नाही. बिबी नावाची हिरेखानाची बहिण सोनांबेशेजारच्याच वडगाव सिन्नर या गावात दिली होती. बहिणीचे लग्न करताना हिरेखानाने भेट म्हणून सालखडी नदी दिली होती. त्यामुळे वडगाव सिन्नरची मंडळी हक्काने सालखडी नदीचे पाणी पाटाने गावात नेतात, असेही ग्रामस्थ सांगतात. हिरेखानाबद्दल इतिहास फार काही सांगत नसला तरी हवेली वजा वाडा त्याची शैली खूप काही सांगून जाते.

सोनांबेतील वतनदारीतील हेरफेरीचा एक संदर्भही इतिहासाच्या पानांमधून उलगडताना दिसतो. १७९६ मधील कारवाईचा एक मोडी कागद उपलब्ध झाला आहे. यानुसार, सिन्नर परगण्यातील मौजे सोनांबे या गावच्या दादो रघुनाथ कुळकर्णी याने मौजे बेलगाव तऱ्हाळे येथील कुळकण्यांचे वतन नसत्या भानगडी करून त्याच्यापासून निम्मे कुळकर्णीपण लिहून घेतले व जबरदत्तीने बेळगांव तऱ्हेळेच्या कुळकर्ण्यांचे घर मोडून टाकत तेथे वाडा बांधला होता. या संबंधिची फिर्याद दौलतराव शिंदे यांच्याकडे गेली होती. या फिर्यादीची दखल घेऊन मल्हारराव भिकाजी गोसावी यास पत्र लिहून याबाबात दादो रघुनाथ कुळकर्णीचा बदअमल मोडून काढण्याची आज्ञा दौलतराव शिंदे यांनी केली. त्यांनी त्या पत्रात म्हटले आहे की, सोनांबे या गावातील कुळकर्ण्यांचे घर मोडून सोनांब्याच्या कुळकर्णीने जो वाडा तऱ्हाळेत बांधलेला आहे तो तोडून त्या जागेवरील असेल ती संपत्ती, वतनाचे कागदपत्र ताब्यात घेऊन त्यांना लष्करात येण्यास सांगावे. यासाठी सर्व व्यवस्था भिकाजी गोसावी यांनी पहावी तसेच या विषयीचा फिरून बोभाटा येऊ न देण्याची ताकीदही या हुकूमनाम्यात दिली आहे. याचे मूळ पत्र व हा संदर्भ एक अज्ञात व्यक्तींने नोंदविला आहे. हिरेखानाच्या वाड्याकडून भैरवनाथाच्या मंदिराकडे जाताना गावातील ब्रिटीशकालीन शाळा पहायला मिळते. ही शाळा लवकरच नवे रूपडे घेणार आहे. उजव्या हाताला एक मंदिर व त्यासमोर एक पेशवेकालीन विहीर आहे. येथे पाण्यासाठी महिलांची गर्दी पहायला मिळते.

सोनांबे गावचे मुख्य दैवत म्हणजे भैरवनाथ महाराज. भैरवनाथांचे मूळ गाभारा मंदिर दगडी बांधणीचे आहे. या मंदिरात छोटे दगडी देवघर आहे ते मूळ भैरवनाथ मंदिर म्हटले जाते. मंदिरावर द्वारपाल, माथ्यावर उभा गणपतीची मूर्ती, कळसाला वेढा घातलेला नाग अन् गणपती मूर्तीच्या दोन्ही बाजूने वाघांच्या प्रतिमा छोट्याखानी मंदिराला साज चढवितात. या दगडी मंदिराभवती मोठे मंदिर बांधले आहे. त्यावर कौले बसविण्यात आली आहेत. मंदिराच्या कामासाठी भगूर व घोटीकरांनी मदत केल्याचा उल्लेख मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहे. मंदिरात लोखंडी दोन नगारे आहेत. मंदिराचा समोरचा मंडप सिमेंटचा बांधलेला आहे. मंदिरासमोरील दीपमाळ खूपच सुंदर असून, दीपमाळेवर पायांपाशी उठावदार नागाची प्रतिमा कोरलेली आहे. मंडपात अनेक समाधी आहेत. भैरवनाथाच्या यात्रेची सुरूवात पहिल्यादिवशी पालखी, रथ परंपरेने होते. संध्याकाळी काठ्या मिर‌विल्या जातात.

दुसऱ्या दिवशी कुस्त्या संध्याकाळी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो. बोहाडा ही परंपरा १५ वर्षांपासून बंद आहे. मात्र सोंगाचे मुखवटे दैवत म्हणून अनेकांनी जपले आहेत. गावात बाबुराव बाबा पवार यांची समाधीही आहे. त्यांचे वंशज बबन बाबुराव पवार यांच्याकडे बारागाड्या ओढण्याचा मान आहे. भैरवनाथ मंदिरामागे नागोबा काळेंची समाधी आहे. छत्रपती शिवाजी महाराज विश्रामगडावर असताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नागोबा काळे यांच्याकडे होती. त्यांच्याकडे घोडा असल्याने त्यांना घोडे आडनाव पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यांना ‌छत्रपतींनी सोनांबे गावात जमीन जहागिरी म्हणून जमीन दिली होती. घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. खापराळे गावातील डोंगरावरील भवानी देवीलाही ग्रामस्थ मानतात. गावातील काळे-घोडे मंडळी देवीची पूजा करतात. गावात काशीआई, हनुमान मंदिर, राम ‌मंदिर, महादेव मंदिरासह इतरही अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. नाशिकरोडच्या अनुराधा थिएटरचे रामनाथ कलंत्री व इतर कलंत्री मंडळी या गावची.

भैरवनाथ मंदिराच्या डाव्या हाताला देवनदी व त्यावर ब्रिटीशकालीन बंधारा पहायला मिळतो. गावातून बाहेर पडताना हनुमान मंदिरातील वीरगळ अन् मंदिरामागील अहिल्याबाईंची बारव पहायला विसरू नका. आता आतापर्यंत बारवेचे पाणी ग्रामस्थ वापरत होते. मात्र त्यात खूप कचरा साचल्याने ती मृत अवस्थेत आहे. ही बारव स्वच्छ करून जपण्याची गरज आहे. बारवे शेजारीच गोसावींच्या समाधी आहेत. सिन्नर तालुक्यात गोसावी समाज सर्वच गावांमध्ये पहायला मिळतो. गोसावी समाज हा भटक्या जातीत मोडतो; मात्र आता हा समाज गावांमध्ये स्थिरावला आहे. गिरी, पुरी, गोसावी, गोस्वामी, भारती अशी आडनावे त्यांच्याच आढळतात. या समाजाला शंकराचे वरदान असल्याचे म्हटले जाते. सिन्नरमध्ये महाशिवरात्रीला हा समाज एकत्र येत शंकराची पूजा करतो. अनेक गावांमध्ये आजही गोसावी समाजातील प्रथा, परंपरा आजही भक्तीभावाने पाळल्या जातात. यात अगदी घरोघरी जोगवा मागण्याची पद्धत असो वा अंतविधीची प्रक्रिया असो. गोसावी समाजातर्फे सिन्नर परिसरातील काही गावांमध्ये मठाची स्थापनाही केलेली दिसते. यात सोनांबेचा समावेश होतो. गावात गोसावी व भारती आडनावाची मंडळीही आहेत.

सोनांबेतून बाहेर पडताना नजर उगाचच सैरभैर होते. अजूनही कोठे आंब्याचे मोठे झाड दिसतील, त्याला लगडलले पिवळे धमक आंबे पहायला अन् चाखायला मिळेल, असे वाटते. मात्र सोन्यासारखा हा क्षण अनुभवलेल्या ज्येष्ठ मंडळींच्या डोळ्यातील आठवणींमध्ये जे सोनांबे पाहिले ते आज अनुभवायला मिळत नाही. सोनांबे अनेक बाबतीत प्रगतीपथावर आहे. मात्र गावात येणाऱ्या पाहुण्यांना सोन्यांचे आंबे अन् जपून ठेवलेला इतिहास अनुभवायला मिळाला तर अजून काय हवं.. नाही का?

मोरोपंत पिंगळेंचे वडगाव पिंगळा

अनेक गावं दुर्मिळ अशा अनोख्या इतिहासाने ओतप्रोत भरलेली आहेत. ऐतिहासिक पात्रांच्या स्पर्शाने मोहरलेली गावे आता त्यांच्या पुसट आठवणीशिवाय काहीच सांगत नसल्याचे दिसते. असाच अनुभव वडगाव पिंगळा, जामगाव, पास्ते, चंद्रपूर, खापराळे अन् पळसे या गावांत येतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचे एक प्रमुख सरदार अन् मराठा दौलतीचे पंतप्रधान म्हणून प्रसिद्ध असलेले मोरोपंत पिंगळे एक अनोखे ऐतिहासिक व्यक्त‌िमत्त्व. इ. स. १६६६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यास निघाले तेव्हा ज्या तीन गृहस्थांच्या हाती छत्रपतींनी आपल्या राज्य कारभाराची सर्व सूत्रे सोपविली त्यात मोरोपंत हे मुख्य होते. पुढे १६७० च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत व प्रतापराव गुजर यांना साल्हेरच्या कुमकेकरिता वीस हजार फौज देऊन रवाना केले. यावेळी त्यांनी साल्हेरजवळ मोगलांचा सरदार इखलासखान याच्या सैन्यावर मोठा विजय मिळवून शत्रूवर मात केली. सुरत लूट सुरक्षितरित्या राजगडावर नेण्यात मराठ्यांना यश आलेच. पण इतक्यावर ते थांबले नाहीत. शिवरायांनी पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांना त्रिंबक, औंढा, पट्टा, रावळ्या-जावळ्या हा नाशिक आसपासचा संपूर्ण भाग काबीज करण्याच्या कामगिरीवर पाठवले होते आणि खुद्द शिवरायही खानदेश भागात शिरले होते.

जाम गावातील हनुमान मंदिर

१६७९ ला जालना लुटून आल्यावर पट्टा किल्ल्याच्या आसपास मोंगलांचे जे २७ किल्ले होते त्यातील शक्य तेवढे काबीज करून घेण्याकरिता छत्रपतींनी पंतांची रवानगी केली. पंतांनी ते किल्ले घेऊन सर्व खानदेशवर पकड मिळविली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८०) प्रथम मोरोपंत सोयराबाईंच्या पक्षास मिळाले. म्हणून त्यांना संभाजी महाराजांनी बंदीत ठेवले. परंतु पुढे मोरोपंत छत्रपती संभाजींच्या पक्षास जाऊन मिळाल्याने त्यांना पेशवाईच्या जागी कायम करण्यात आले. मात्र सहा महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला. असे म्हटले जाते, की शिवाजी महाराजांचे हेतू व धोरणे मोरोपंतांना चांगले माहिती असल्याने त्यांच्या हातून विलक्षण पराक्रम घडला. युद्धशास्त्र व राज्य कारभारात मोरोपंत तरबेज होते, असे काही उल्लेख मराठा रियासतीत व इतिहासांच्या पानांमध्ये मिळतात. यातून मोरोपंत पिंगळ्यांची कारर्कीद समोर येते. त्यांचा नाशिकशी संबंधही या लढाय्यांदरम्यान समोर येतो. याच उलाढालीच्या दरम्यान मोरोपंत पिंगळेंचे वास्तव्य वडगाव पिंगळा असावे ही माहिती समोर आल्याने या गावाकडे पाहण्याचा नूरच पालटून जातो. इतिहासाला आपल्या नावातून पुढे घेऊन जात असलेल्या वडगाव पिंगळामध्ये आज मोरोपंतांच्या इतिहासाच्या खाणाखुणा शोधूनही सापडत नाहीत.

नाशिक-सिन्नर रस्त्यावर दारणा ओलांडून पुढे शिंदे गावातील उड्डाणपुलाच्या बोगद्यातून उजव्या हाताला नाशिक साखर कारखान्याकडे जाणा-या रस्त्याने आत गेल्यावर साखर कारखान्यापूर्वी डाव्या हाताने वडगाव पिंगळा या गावाकडे जाता येते. गावात प्रवेश केल्यावर डाव्या हाताला हनुमानाचे मंदिर लागते. मंदिराचा सभामंडप नव्याने बांधलेला आहे; मात्र मूळ मंदिराच्या प्रवेद्वारावरील लाकडावर कोरलेली सुंदर नक्षी व त्यावरील रंगकाम आपल्याला आकर्षित करते. मंदिरातील सभागृह व तेथील लाकडावरील कोरीव काम, मलखांब खेळणारा मल्ल, श्रीकृष्ण व सेवकांच्या लाकडी मूर्ती व दोन मजली मंदिरातील लाकडी छत्राचे नक्षीकाम मनमोहून टाकते. गावात हनुमानाची यात्रा भरते. यात्रेत पूर्वी बोहाडा व्हायचा. मात्र २५ वर्षांपासून ही परंपराही बंद झाली आहे. हनुमान मंदिरात बसलेले ज्येष्ठ मंडळी गावाच्या नावाबाबत एक वेगळीच माहिती उलगडतात. गावचे नाव वडगाव असे होते. त्याला पिंगळा हे नाव लागण्यामागे गावाला मोरोपंत पिंगळ्यांचा सहवास लाभल्याचे रघुनाथ सानप, रामदास मुठाळ सांगतात. याबाबत इतिहासात नोंदी नसली तरी वडगाव प‌िंगळातील ग्रामस्थ गावात मोरोपंतांची गढी असल्याने तसेच पिंगळ्यांची अनेक कुटुंब येथे राहत असल्याने गावाला पिंगळ्यांचे वडगाव म्हणता म्हणता वडगाव पिंगळा असे नाव पडल्याचे सांगतात.

पिंगळे आडनावाचे आता गावात कोणी नाही; मात्र मोरोपंतांच्या आठवणी गावाच्या नावातून आजही ताज्या आहेत. म्हणूनच की काय नाशिकच्या नवरत्नांमध्ये मोरोपंत पिंगळे यांचे नाव घेतले जाते. हे गाव मोरोपंत पिंगळ्यांना जहागिरीत मिळाले असावे का? याबाबत मात्र कोणतीही नोंद आता मिळत नाही. गावात पिंगळ्यांची मोठी गढी होती. मात्र आता ती नाममात्रही दिसत नाही. त्या जागेवर आता घरे वसल्याने खाणाखुणाही ‌मिळत नाहीत. फक्त गढीच्या तुटकतुटक आठवणी ज्येष्ठ मंडळी सांगतात. गावात शनी मंदिर, शिवमंदिर, विठ्ठल-रुख्मिणी आदी मंदिरे आहेत. अहिल्याबाईंच्या बारवेचा पायऱ्यांचा विस्तार बुजवून फक्त आता विहीर जाम रस्त्यावर दिसते. गावात पूर्वी पाण्याची काहीच अडचण नव्हती. वडगाव पिंगळाची मुंबईची परसबाग अशी ओळख होती. काही वर्षांपूर्वी मुंबईला ट्रकच्या ट्रक भरून भाजीपाला जायचा. मात्र आता पाण्याअभावी हेही बंद झाले आहे. विहिरी अन् बोअर प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने गावचा जलस्तर घसरला अन् शेती अवघड झाली. पाण्याचे इतर स्त्रोत म्हणजेच बंधारे व भूजलभरणाचे उपाययोजना नियोजनबद्ध न केल्याने नवीन पिढीला शेती व्यवसाय वारसा म्हणून देताना हात थरथरता, अशी विवंचनाही ज्येष्ठ मंडळी व्यक्त करतात. बोलता बोलता पंधरा वीस शेतकरी मंदिरासमोर गप्पांमध्ये सहभागी होतात अन् ज्येष्ठ शेतकरी आपल्या अडचणी तळमळीने सांगू लागतात.

इतिहास पोटासमोर खुजा झालेला वाटायला लागतो. ह‌रविलेल्या इतिहासाचे पैलू गोळा करीत अन् शेतकऱ्यांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन मन सुन्न होऊन जातं.प्रवास मात्र संपलेला नसतो. गाडीची चाक पुढील प्रवासाला निघतात.

दिंडींचा कळस म्हणजे पळस!

‘पळस पळस त्याने केला दिंडीचा कळस’ असे ज्या गावाच्या नावावरून म्हटलं जातं ते गाव म्हणजे नाशिक-पुणे महामार्गावरील दारणानदी कुशीत वसलेले पळसे हे गाव. पळसे अन् नाशिकला जोडणारा ब्रिटिशकालीन पूल १९०५ मध्ये बांधला गेला अन् पळसेचा विकास झपाट्याने होऊ लागला. त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्ती महाराजांची पालखी पंढरपूरला जाताना पळसे गावात मुक्काम करते. त्यामुळे दिंडीची मोठी परंपरा पळसे पुढे घेऊन जाताना दिसते. गावात पूर्वी पळसाची झाडे खूप असतील म्हणून गावाला पळसे हे नाव पडले असेल, असे धोंडीराम गायधनी, बबनराव थेटे, संजय डहाळे, विष्णू गायखे सांगतात. गावात प्रवेश केला की, डाव्या हाताला वेस अन् वेशीबाहेर नव्याने बांधलेली ग्रामपंचायत इमारत लागते. पूर्वी पळसे गावात साठे नावाचे लोकच सर्वाधिक होते. आताही साठे नावाचे काही कुटुंबं गावात राहतात. पेशवेकालीन वाडेही बरेच होते. यात पद्म‌िनिचा वाडा, पाटील वाडा पहायला मिळतो. पद्म‌‌मिनिचा वाडा सहा खणी आहे, असे भरत गायधनी सांगतात. वाडा पाहून जुन्या शाळेतील संत आईसाहेबांच्या समाधीकडे जायचे. दगडी छत्रीसारखी समाधी व त्या आजूबाजूला लहान मोठ्या समाधी पाहताना पळसे गावाचा संत परंपरेचा उलगडा होतो. पळसेकर महाराजांचे वास्तवही पळसे गावाला लाभल्याचे ग्रामस्थ सांगतात. तशीच गावात डाव्या विचारांची चळवळही रूजली होती.

गावात विठ्ठल मंदिर, मुंजाबा, हनुमान मंदिर, खंडोबा व शितळा माता मंदिर व इतरही लहान मोठी मंदिरे आहेत. हनुमान मंदिरासमोर सहा फूटाची स्तंभ दीपमाळ आहे. आषाढी एका‌दशीला गावात यात्रा भरते. पालखीचा सोहळा यावेळी पार पडतो, असे देवीदास गायधनी व सुधाकर जाधव सांगतात. तर आदिकमासात ग्रामस्थ महिनाभर नदीवर आंघोळीला जाण्याची प्रथा आहे. महामार्गापलीकडे भैरवनाथाचे मंदिर व गोसाव्याची समाधी आहे. येथेच मरीआई, खोकलाई, साती आसरा आहेत, असे सुदाम जाधव सांगतात. एक गंमत म्हणजे गावातील ‘बाराशे’ नावाचा एक कुत्रा खूप प्रसिद्धीस आला आहे. तो गावातील प्रत्येक अंत्ययात्रेत सहभागी होतो. या कुत्र्याचा अपघात झाला असताना त्याच्यावर बाराशे रूपये खर्च आल्याने त्याला बाराशे असे नाव पडल्याचे संजय डहाळे सांगतात. पळसेकरांनी लग्नातील एक विशेष परंपरा आजही जपली आहे. ती म्हणजे लग्नात जात्यावर दळण पुरूष मंडळी करतात व लोकगीते गातात. हू प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगतात. कधीकाळी कुस्ती अन् कबड्डीत हातखंडा आजमावणारे पळसे हे गाव प्रगतीशील शेतीच्या माध्यमातून विकासाकडे झेपावत असल्याचे पहायला मिळते. वेशीतून समोरच्या रस्त्याने गावाबाहेर पडताना रस्त्यात डाव्या हाताला आहिल्याबाईंची बारव वाईट अवस्थेत पहुडल्याचे पहायला मिळते. हा ऐतिहासिक वारसा जपला गेल्यास पळसेवर आणखी एक कळस नक्कीच चढेल, असे वाटायला लागते.

पोलिसांचं जामगाव अन् पास्ते

वडगाव पिंगळातून जामकडे जाणारा रस्ता हा एक आनंद देणारा घाट आहे. घाटातील पवनचक्क्या पाहत सात-आठ किलोमीटर गेल्यावर आपण जाम गावात पोहचतो. लांबूनच हनुमान मंदिराचा कमळाच्या पाकळ्यांसारखे दिसणारे शिखर ओढ वाढवतो. वडगाव पिंगळा सारखचं लाकडी बांधणीतील दुमजली हनुमान मंदिर जाम गावातही आहे. कौलारू छत, त्यावरील हनुमानाची चित्रे, लाकडीकाम व हनुमानाची सुंदर मूर्ती पहायला मिळते. गावात काशीआई, भवानी, खंडोबा मंदिरेही आहेत. सर्व मंदिरे नव्याने बांधलेली आहेत. गावात दरवर्षी काशीआईचा उत्सव होतो. साठ-सत्तर उंबऱ्यांचं जाम प्रसिद्ध आहे ते पोलिसांसाठी. प्रत्येक घरातील एकजण पोलिस दलात सेवेत आहे. तर गावातील ‍काशीनाथ बोडके यांची नात प्रियंका कीर्तनकार म्हणून जाम गावाला वेगळेपण मिळवून देत आहे, अशी माहिती प्रभाकर सांगळे व नितीन बोडके यांनी दिली. जाम गावातून पुढे तीन-चार किलोमीटरवर पास्ते हे गाव लागतं. पास्ते देवनदीच्या किनारी वसलं आहे. पास्ते नावाबाबत काहीच माहित नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. गेल्या अनेक पिढ्या गावाला हेच नाव असल्याचे बाळू आव्हाड व चंदू घुगे सांगतात. या गावात प्रवेश करताना शिवमंदिर, हनुमान मंदिर पहायला मिळतं. हनुमान मंदिरात विठ्ठल व गणपती मंदिर आहे. ही सर्व मंदिरे नव्याने बांधलेली आहेत. गावातील बहुतांश घरातील मुले पोलिस दलात आहेत.

पास्ते गावात दुमली जुनी घरे पहायला मिळतात. पास्ते हे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. जाम गावातून खापराळे गावाकडे जाताना चंद्रपूर हे गाव लागतं. गाव म्हणावं असं तीस-चाळीस घरांचा छोटासा पुंजका चंद्रकोरीतून डोकावताना दिसतो. आजूबाजूला मोकळ रानमाळ, सुसाट वारा अन् यात खेळताना दिसणाऱ्या पवनचक्या एवढं या गावाचं वर्णन डोळ्यापुढं उभं राहतं. गावाच्या आधी एक वीरगळ चंद्रपुरात स्वागत करते अन् गाव पाहता पाहता संपतेही. हा छोटासा आदिवासी पाडा ओलांडून आपण खापराळी या गावाकडे झेपावतो. खापराळी गावातील जवळपास सगळ्याच घरांची छपरं खापराची आहेत. हे गाव दूध व दह्यासाठी प्रसिद्ध आहे. खापराळीच्या डोंगरात भवानी मातेचं मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी डोंगरात वरपर्यंत गाडी जाते. नव्याने बांधलेले मंदिरातून समोर घोटी-सिन्नर रस्ता दिसतो. हा नजारा पाहून पुन्हा नाशिककडे निघायचं. खापराळी, चंद्रपूर, जाम, वडगाव पिंगळा अन् दारणा ओलांडण्यापूर्वी पुन्हा नाशिकमध्ये दाखल होण्यापूर्वी पळसे हे गाव लागतं.

गवळ्यांच गौळाणे अन् बहुल्याचे आंबे

प्रत्येक गाव आपला एक ठसा इतिहासावर उमटवूनवाटचाल करीत असतं. तर अनेकदा एखादा किल्ला अथवा लेणी आपल्या अवतीभवतीच्या गावांच्या निर्मित्तीला कारणीभूत ठरल्याने इतिहासाच्या पाऊलखुणा झालेल्या दिसतात. पांडवलेणीच्या पाठीवरील गौळाणे अन् बहुला किल्ल्यांच्या सावलीतील आंबे बहुला आजही तो इतिहास जागवतात.

दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे धडे देणारी त्रिरश्मी डोंगरावरील पांडवलेणी (बौद्धलेणी) अनेक गूढ आपल्या उदरात घेऊन आहे. पांडवलेणी घडताना पांडवलेणीच्या आजूबाजूच्या गावांचे स्वरूप काय असेल हा विषय संशोधनाचा ठरावा. पांडवलेणीतील शिलालेखांतून अनेक गावे, नद्या, राजे व व्यापाऱ्यांचा उल्लेख आलेला आहे. यातील अनेक गावांच्या नावांचा आता संदर्भ लावता येत नाही. तर अनेक गावांची नाव बदलल्याने ती सापडतही नाहीत. मात्र दोन हजार वर्षांपूर्वी नाशिक व गोवर्धन या गावांचा पांडवलेणीतील शिलालेखांमध्ये स्पष्टपणे झालेला उल्लेख आजही तसाच आहे. गोवर्धन आहारातील पूर्व मार्गावरील शाल्मलीपद्र गाव हे सातपूर असावे. (काही संशोधक हे निफाडजवळचे सावरगाव असावे असा अंदाज लावतात.) तर पांडवलेणीच्या उजव्या हाताला म्हणजे अगदी पायथ्यालाच असेलेले पाथर्डी हे गाव शिलालेखांमधील पिशाच्यपद्र हे गाव असावे, असा संशोधकांचा अंदाज आहे.

पांडवलेणीचे खोदकाम करण्यासाठीच्या कामगारांची अथवा पाथरटांची पाथर्डी ही वसाहत आजही आपल्या खाणाखुणा सांभाळून असल्याचे दिसते. तेथे सापडणारे अवशेष त्याची साक्ष देतात. पांडवलेणीतील बौद्ध भिक्षुकांना गरजेच्या गोष्टी पुरविण्यासाठी राजांनी व व्यापाऱ्यांनी चिवर (कपडे) व औषधांची सोय केल्याचा उल्लेखही शिलालेखांमध्ये आला आहे. याची सोय पूर्वी कापडासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गोवर्धनमधून होत असावी. तर भिक्षुकांच्या उदरनिर्वाहासाठी गायींचे दान दिल्याचा उल्लेखही लेणीमधील शिलालेखांमध्ये आढळतो. याचाच अर्थ लेणीच्या आजूबाजूच्या एखाद्या गोवर्धन सारख्या गावात या गाई सांभाळण्यासाठी दिल्या जात असाव्यात व तेथून भिक्षुकांना दुधाची सोय होत असावी. तसेच पांडवलेणी त्रिरश्मी डोंगरावरच का कोरली असावी, या प्रश्नाचे उत्तर दोन हजार वर्षांनंतरही तर्कविर्तकांवर आधारलेले आहे. लोकवस्तीपासून लांब पण भिक्षुकांना सहज वावरता येईल व त्यांच्या गरजाही पूर्ण होऊ शकतील, असे ठिकाण त्रिरश्मी पर्वत होते. पांडवलेणीसमोर गोदावरी व मागील बाजूस वालदेवी नदी यामुळे या दोन्ही नद्यांच्या मधोमध हा डोंगर असल्याने येथे पांडवलेणी साकारल्या असाव्यात. याचा संबंध पांडवलेणीच्या मागील पूर्वी दुधासाठी प्रसिद्ध असलेले गवळी लोकांचे गौळाणे हे गाव पांडवलेणीच्या प्रवासादरम्यान वसले असावे, असा ऋणानुबंध गौळाणे उलगडताना दिसतो.

पांडव लेणीच्या पायथ्याशी असलेल्या पाथर्डी गावातून गौळाणे गावात जाता येते. साधारण तीन किलोमीटरवर एक चौफुली लागते. चौफुलीवर वीर बाबाचे मंदिर आहे. तेथून डाव्या हाताच्या रस्त्याने गौळाणे गावाकडे रस्ता जातो. वालदेवी नदीच्या कुशीत गौळाणे हे गाव वसले आहे. अडीच हजार लोकसंख्येच्या गावात आदिवासी कुटुंबीयांचीही काही घरे आहेत. गावात एकमुखी दत्त मंदिर, सप्तशृंगी देवी, विठ्ठल मंदिर, महादेव मंदिर व चाणसनबाबांचा दर्गा आहे. मात्र गावाची एक विशेष ओळख आहे ती पूर्वी हे गाव गवळ्यांचे गाव होते. गावातील गवळी मंडळी दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत असल्याने दुधासाठी हे गाव प्रसिद्ध होते. त्रिरश्मी डोंगरामागे असलेल्या या गावात गवळी स्थिरावण्याचे कारण पांडव लेणी असावे, असेही ग्रामस्थ मानतात. मात्र पांडवलेणीत तसा थेट उल्लेख आलेला नाही. मात्र भिक्षुकांच्या उपजिवेकेसाठी दुधाची गरज हे गाव भागवित तर नसेल, याबाबत आता फक्त तर्कविर्तकच लावले जावू शकतात. मात्र आता गवळी मंडळी गावात नसल्याने दुधाचा व्यवसायही केव्हाच बंद झाला, असेही रामदास चुंभळे सांगतात.

गौळाणेचे सध्याचे वैशिष्ट्य आहे गावातील हनुमान. हनुमान मंदिरातील हनुमानाची मूर्ती नग्न आहे. सध्या हेच गौळाणेचे मुख्य आकर्षणही आहे. अंजनेरीवर हनुमानाने जन्म घेतल्यानंतर बाल हनुमानाने पहिली उडी गौळाणेत मारली होती. त्यावेळी बाल हनुमान नग्न अवस्थेत होते त्यामुळे गावातील हनुमान मूर्ती नग्न आहे, अशी अख्यायिका चुंभळे सांगतात. गावातील हनुमानाच्या मंदिरातील नग्न हनुमानाची मूर्ती व शेंदूर फासलेल्या एक वीरगळीसारख्या दगडी चिरेवर गणपती व गाईंची प्रतिमा कोरल्यासारखे दिसते. शेंदूरामुळे यावरील चित्रे अस्पष्ट झालेली आहेत. हे मंदिर नव्याने बांधण्यात आले आहे. हनुमान मंदिरापासून डाव्या हाताने वालदेवी नदीकडे रस्ता जातो. नदीच्या लगत महादेव मंदिर नव्याने बांधलेले आहे. त्याच्या पायऱ्या नदीपात्रातील स्वच्छ पाण्याकडे घेऊन जातात. हा परिसरच निसर्गरम्य आहे. निसर्ग अनुभवताना समोर नाकिंद्याचा किल्ला दिसतो. गौळाणेकर पगडीसारखा दिसणाऱ्या डोंगराला नाकिंद्याचा किल्ला म्हणतात, असे वाघू थापेकर, मुकुंद तपासे व विजय चुंभळे सांगतात. नाकिंदा लक्ष वेधून घेतो. गौळाणेकरांचा नाकिंदा म्हणजेच आंबे बहुल्याचा बहुला किल्ला.

बहुल्याचे आंबे बहुला

गौळाणेतूनच आंबे बहुला गावात रस्ता जातो. अगदी तीन किलोमीटरवर हे गाव लागतं. वालदेवीच्या किनारी एखाद्या घरांचा पुंजका वसावा असे हे गाव वसलेलं आहे. असं वाटण्यामागे एक विशेष कारणही आहे. लष्करांने देवळाली कॅम्प वसविले अन् १९४४ दरम्यान फायरिंग रेंजसाठी मोठ्या प्रमाणात जागा ताब्यात घेतल्या. यात आंबे बहुला हे गावही गेले. त्यामुळे नदीपलीकडे बहुला किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले आंबे बहुला हे गाव नदी ओलांडून आताच्या जागेत वसले आहे. याला आता ६०-७० वर्ष झाल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे गावात जुनं अस काहीच नाही. जी काही मंदिरे आहेत ती नंतर ग्रामस्थांनी नव्याने उभारलेली आहेत. यात मारूती, सप्तशृंगी, भैरवनाथ, राम, भवानी मंदिराचा समावेश होतो. आंबे बहुलेकरांची ग्रामदैवत म्हणजे भैरोबा.

 

भैरोबाचे जुन्या मंदिर आधीच्या गावातही आहे. ते तसेच असल्याचे सुरेश शिर्के व शशीकला गवारी सांगतात. नदीपलीकडे जुन्या गावात पूर्वी आंब्याची खुप झाडे होती म्हणून गावाला आंबे अन् बहुला किल्ल्याच्या पायथ्याचे हे गाव असल्याने गावाला आंबे बहुला असे नाव पडले. एस. पी. परमहंस यांच्या महाभारत शब्दकोशात बहुलाचा उल्लेख नदी म्हणून आला आहे. तर बहुला हे गणेशव्रत म्हणूनही ओळखले जाते. यामुळे बहुला या नावाभवतीचे गूढ उलगडत नाही. मात्र बहुला किल्ल्याच्या पायथ्याशी वालदेवी नदी वाहत असल्याने या नदीच्या सहवासात किल्ला असल्याने किल्ल्याला बहुला म्हटले गेले हेही उलगडत नाही. गावात आदिवासी लोकवस्ती जास्त आहे.

मूळच्या आंबे बहुल्यातून देशमुख मंडळी मोठ्या प्रमाणात भगूर, आडगाव, वडनेर, सुकेणे, नाशिकरोड भागात स्थलांतरीत झाली आहेत. ही मंडळीही किल्ल्यामुळे पायथ्याच्या या गावात वसली असावी. गावातील ग्रामस्थांच्या जमिनी लष्करासाठी घ्याव्या लागल्याने सर्वच अल्पभूधारक झाले आहेत. अजूनही त्या जमिनींचा मोबदला मिळाला नसल्याने गाव मोबदल्यासाठी लढताना दिसते, असे राजू देशमुख सांगतात. सध्याच्या गावाभवती वन विभागाची जमीन असल्याने गावचा पुरेसा विकासही होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परंतु आजही आंबे बहुल्याचे मुख्य आकर्षण आहे ते बहुला किल्ला. बहुला किल्ल्याच्या इतिहासात फारशा नोंदी मिळत नाहीत. मात्र बहुला किल्ल्याचे आकर्षण भल्याभल्यांना सोडवित नाही. अर्थात बहुला किल्ल्यावर जायला बंदी आहे. कारण हा किल्ला लष्कराच्या फायरिंग रेंजचा एक भाग आहे. रविवारी फायरिंग बंद असल्याने गिर्यारोहक किल्ल्यावर जातात; मात्र तोफांचे जिंवत गोळे इतरत्र पसरले असल्याने आंबे बहुल्यातील ग्रामस्थ तेथे जाणे धोक्याचे असल्याचे सांगतात. बहुला किल्ल्याची उंची ९६५ मीटर आहे. हा किल्ला सुरूवातीला मोगलांकडे असावा व मोगलांकडून मराठ्यांच्या ताब्यात आला असावा अशा काही नोंदी मिळतात. १८१८ नंतर पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रज कॅप्टन जॉन ब्रिग्जने बहुला किल्ल्याचा ताबा घेतला व त्याचे नुकसान केले, अशी नोंद नाशिक गॅझेटियरमध्ये मिळते. बहुला किल्ल्याची तटबंदी आता बऱ्यापैकी ढासळली आहे; मात्र तोफांपासून किल्ल्यांचे संरक्षण व्हावे, अशी किल्ल्याची तटबंदी असल्याचा उल्लेख कॅ. ब्रिग्ज करतो. त्यामुळे दररोज तोफांचे वार सोसूनही हा किल्ला आजही उभा आहे, अशी माहिती गिर्यारोहक सुदर्शन कुलथे देतात.

बहुला किल्लाचे उद्धवस्त झालेले प्रवेशद्वार व कातळात कोरलेल्या उभट पायऱ्या, पाण्याचे चार टाके, अश्मवर्तुळासारखी समाधी, काताळातील चौकोनी छिद्रांचे रिंगण हे बुरजाचा पाया असावे, उद्धवस्त झालेल्या दोन वास्तूंचे अवशेष व लहानसा बहुल्याचा माथा पाहिला की नवलं वाटतं. बहुल्याचा वापरही त्रिंगलवाडी सारखा वाटेवर नजर ठेवण्यासाठी झाला असावा. खरेतर हा किल्ला नाशिक शहरात प्रवेशद्वारावरच असल्याने बहुलाचे महत्त्व मोठे आहे. मात्र तो लष्कराच्या ताब्यात असल्याने तो नियमित पाहता येत नाही. अन्यथा तोही रामशेज सारखा ठरला असता, असे मतही कुलथे व्यक्त करतात. बहुल्याच्या माथ्यावरून महांकाळ डोंगर, औंढा, पट्टा, बितनगड, शेणीत सुळका, पश्चिमेला अलंग-मदन-कुलंग, कळसूबाई, वायव्येला गडगडा, रायगड डोंगर, डांग्या सुळका, इगतपुरीचा पसारा, उत्तरेला अंजनेरी व रांजणगिरी, ईशान्येला त्रिरश्मी डोंगर अन् विस्तारत चाललेलं नाशिक पहायला मिळतं. गौळाणेतील वीट भट्ट्या अन् महापालिकेचा खत प्रकल्प आकाशात ढग तयार करतानाही दिसतो.

शिंगवे बहुला, नांदूर बहुला, अस्वली बहुला, राजूर बहुला व आंबे बहुला या गावांवर बहुला किल्ल्याचा ठसा दिसतो तर पांडवलेणीच्या अवतीभवतीची गावे व त्या गावातील व्यवसाय पांडवलेणीच्या उद्देशांशी जोडली गेली असल्याचे पहायला मिळते. ही गावे भटकतांना त्या काळच्या जीवनशैलीचा स्पर्श आपल्याला होताना अनुभवायला मिळतो. म्हणूनच शहराच्या अगदी जवळची अन् इतिहासाच्या पैलूतून निर्माण झालेली ही गावे नक्कीच पहायला हवीत. कारण अजून काही वर्षांनी या गावांतील खाणाखुणांची जागा शहरातील उंच उंच इ‌मारती घेताना दिसली तर नवलं वाटायला नको.

कर्दमऋषींचं आंबेवणी

रखरखत्या उन्हातही गारवा देणाऱ्या गावांची संख्या आता कमी कमी होत चालली आहे. मात्र दिंडोरीतील आंबेवणी कर्दमऋषींच्या आश्रम अन् धरणाच्या सिंचनामुळे हिरवेगार भासते. दत्तात्रेयांचे आजोळ असणारे आंबेवणी आपल्याला आध्यात्मिक प्रवासही घडविते.

एक धार्मिक शहर म्हणून नाशिक प्रसिद्ध आहेच. पण, पौराणिक, धार्मिक अन् ऐतिहासिक माहात्म्य या सुवर्णत्रिकोणामुळे ते अधिक झळाळताना दिसतं. ऋषीमुनी, मानवाची प्राचीन वसतीस्थाने ते अगदी दोन हजार वर्षांपूर्वीच्या सातवाहनांचा काळ नाशिकला वेगळेपण मिळवून देताना दिसतो. नाशिकच्या जडणघडणीत प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासाने जेवढा हातभार लावलेला दिसतो तेवढाच पौराणिक अख्यायिकांनी लावलेला आहे. रामायण, ऋषीमुनींच्या पौराणिक अख्यायिकांशिवाय नाशिकचा इतिहास परिपूर्ण होत नाही. ऋषीमुनींसाठी तर नाशिक हे आगारच होते. म्हणूनच राक्षसांमुळे त्रस्त झालेल्या ऋषीमुनींना दिलासा देण्यासाठी वनवासात असताना श्रीराम दंडकारण्यात आले असावेत. अगदी अगस्ती, मार्कंडेय ते कृषीतज्ज्ञ पराशर ऋषींपर्यंत सर्वांची कर्मभूमी पुराणांमधील उल्लेखानुसार नाशिकच राहिली आहे. यात दत्तांचे आजोबा व ब्रह्मपुत्र कर्दम ऋषींचाही उल्लेख महत्त्वाचा ठरतो. ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना व त्याच्या विस्तार करण्यासाठी कर्दम ऋषींची निर्मिती केल्याचे अनेक धार्मिक ग्रंथात म्हटले गेले आहे. कर्दम ऋषींनी आपल्या योग्य विद्येच्या मदतीने जल, वायू, भूमी यावर उडणाऱ्या विमानाची रचना केली होती, असेही म्हटले जाते. कर्दम ऋषींच्या जन्माचा उद्देश आणि ब्रह्माकडून त्यांची निर्मिती केली गेल्याचे नारदाच्या तोंडून कौतुक ऐकल्याने मनु ऋषींना कर्दम ऋषींबद्दल खूप आकर्षण निर्माण झाले. त्यांनी स्वत: कर्दम ऋषींच्या आश्रमात जावून आपली कन्या देवहूतीशी लग्न करावे, असा प्रस्ताव ठेवला. कर्दम ऋषींनी मनुचा प्रस्ताव स्वीकारला व देवगणांच्या उपस्थितीत कर्दम ऋषींचं लग्न मनुची कन्या देवहूतीशी झाले. त्यांना नऊ मुली व एक मुलगा झाला. ब्रह्मदेवाने आपण स्वत: तुझ्या मुलाच्या रूपाने देवहूतीच्या गर्भातून जन्म घेऊ असा शब्द कर्दम ऋषींना दिला होता. म्हणून कर्दम ऋषींचा मुलगा कपिल ऋषींना विष्णुचा अवतार मानले जातात. कर्दम ऋषींनी आपल्या सर्व कला, अनसूया, श्रद्धा, हविर्भू, गति, क्रिया, ख्याति, अरुंधती तथा शान्ति या मुलींचे लग्न क्रमश: मरीचि, अत्रि, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, ऋतु, भृगु, वसिष्ठ तथा अथर्वा या देवांशी लावले. कपिल ऋषींनी आपली आई देवहूतीबरोबर कर्दम आश्रमात राहून आईकडून भक्ति-वैराग्याचे धडे गिरविले. देवहूतीनेही आश्रमात राहून गृहस्थाश्रम धर्माचा त्याग करून योगाच्या माध्यमातून अध्यात्म मार्गाची निवड केली. तर कपिल ऋषी कर्दमाश्रमातून ईशानकोण आश्रमात निघून गेले. तर दुसरीकडे अनसूया व अत्री यांना झालेला मुलगा पुढे दत्तात्रेय म्हणून परिचित झाला अन् त्यांचे पालनपोषण त्यांचे आजोबा कर्दम ऋषींच्या आश्रमातच झाले असावे. त्यामुळेच येथे दत्तात्रेयांचा प्रभाव दिसतो, असे करंजी देवस्थानचे ट्रस्टी दत्तात्रेय नेवडे सांगतात. त्यामुळेच नाशिकवर महानुभवपंथाचा प्रभाव घट्ट दिसतो. कर्दम ऋषींचा आश्रम म्हणून प्रसिद्ध असलेले दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र करंजी कर्दमऋषी आणि दत्तात्रेय प्रभूंच्या माहात्म्यातून अध्यात्मिक प्रवास घडविताना दिसते. हा प्रवास फक्त अध्यात्मिक नाही तर निसर्गसौंदर्य मनात फुलविणाराही ठरतो.

नाशिक-वणी रस्त्यावर दिंडोरीपासून सात-आठ किलोमीटरवर डाव्या हाताला ओझरखेड हे गाव लागते. रस्त्यावरील पुल ओलांडताना उजवीकडे श्री क्षेत्र करंजीकडे जाणारा दिशादर्शक फलक आपले स्वागत करतो अन् एक कच्चा रस्ता आपल्याला कर्दम ऋषींच्या आश्रमाकडे घेऊन जातो. चटके देणाऱ्या उन्हातील हा प्रवास रुक्ष वाटत असला तरी करंजीकडे जाणारा रस्ता आपल्याला घनदाट झाडीतून आश्रमाकडे घेऊन जातो. जसं काही हा उन्हाळा नाहीच, असा एक वेगळा अनुभव येथील निसर्गसौंदर्य देऊ लागते. त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी करवंदांचा बहर मनाला गारवा देतो. आंबेवणी हे गाव दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाच्या कुशीत वसल्याने सिंचनामुळे येथे हिरवाई भर उन्हातही दिलासा देते. महामार्गापासून साधारण एक किलोमीटर आत गेल्यावर घनदाट झाडीत श्री क्षेत्र करंजी वसले आहे. आंबेवणी गावातील श्री क्षेत्र करंजी हे नाव दण्डकारण्यातील या ज्या परिसरात कर्दम ऋषी तपश्चर्या करीत होते, त्या भागात करंजीची झाडे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे परिसराला करंजी हे नाव पडले व आश्रमाला कर्दमाश्रम असे नाव पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. दत्तात्रेय प्रभूंचे आजोळ म्हणून हा परिसर परिचित आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात व इतर वेळीही श्री क्षेत्र करंजी येथील कर्दमाश्रमात भाविकांबरोबरच साधू-महंतांनी रेलचेल असते. पुरातन काळापासून दशनाम जुना आखाड्यातील साधू-महंत कुंभमेळ्याला येथे येऊन वास्तव्य करतात. या आश्रमातच काशीची गंगा अवतरल्याचे म्हटले जाते. पर्वणी काळात हजारो भाविक गंगामाईत स्नानासाठी कर्दमाश्रमात येतात म्हणून या क्षेत्राला प्रतिगाणगापूरही म्हटले जाते.

दत्तात्रेयांचे रूप एकमुखी की त्रिमुखी? हा भक्तांसाठी नेहमी कुतुहलाचा विषय करंजीत मात्र भक्तांचे आणखीनच कुतुहल वाढविताना दिसतो. ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन देवतांमधून साकारल्याने दत्तात्रेयांना तीन मुखे असल्याचे पुराणांत व्यक्त झालेले मत आहे. त्रिमूर्तीचे उल्लेख मल्लिनाथ, बाण, कालिदास इत्यादींनी तसेच शुद्रकाने केलेला दिसतो. मात्र निरंजन रघुनाथांचे नातू विश्वनाथबोवा यांनी काशी येथे स्थापन केलेली दत्तमूर्ती एकमुखी आहे. सत्पुरुष श्रीवासुदेवानंद सरस्वती यांनीही एकमुखी दत्तमूर्तीचाच प्रचार केला तसेच गुळवणी महाराजांच्या संप्रदायातही एकमुखी दत्ताचीच चित्रे लोकप्रिय आहेत. नाशिक येथील भटजी महाराजांच्या मठामागील मंदिरातील दत्तमूर्ती एकमुखीच आहे. असं असलं तरीही दत्ताची मूर्ती ही त्रिमूर्ती म्हणूनही भक्तांमध्ये अधिक प्रचलित आहे. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम दत्तांच्या त्रिमुखीचाच उल्लेख आपल्या अभंगातून करताना दिसतात. तर सुप्रसिद्ध संतसत्पुरुष श्रीरंग अवधूतांनी श्रीदत्ताला एका आदर्श शेतकऱ्याच्या रूपात उभे केले आहे. शेतकऱ्यास कधीही विश्रांती नसते त्याचप्रमाणे दत्तही नेहमीच उभा आणि संचारी असतो, अशी त्यांच्या रूपाची व्याख्या केली त्यांनी केली आहे. मात्र करंजीत दत्तात्रेय प्रभूंची पद्मासनातील त्रिमुखी मूर्ती पहायला मिळते. श्रीदत्तात्रेयांनी आपल्या आजोळी ज्ञानसाधना केल्याने ही मूर्ती पद्मासनातील असल्याचे येथे सांगितले जाते. कर्दमाश्रम पाहण्यासारखा असून, येथे स्वामी शिवदयाळ गिरी व रामचंद्र महाराज यांची समाधी आहे. करंजीतील या क्षेत्रात श्री जुना दत्त आखाड्याचीही परंपरा आहे. आखाड्याचे मठाधीपती शिवदयाळ गिरी (इ.स. १७०१ ते १८२७), सदगुरू रामचंद्र ब्रह्मचारी (इ.स. १८२७ ते १९४७), मुकूंद महाराज ब्रह्मचारी (इ.स. १९४७ ते १९५५), हरि गिरी ब्रह्मचारी (इ.स.१९५५ ते १९६९), भास्करानंद ब्रह्मचारी जोशीबाबा (इ.स. १९६८ ते १९९५) आणि आता महंत सुभाषगिरी महाराज आश्रमाची जबाबदारी सांभाळतात. कर्दमाश्रमात अनेक मंदिरे असून, गंगास्थानावर सुंदर घाट बांधण्यात आला आहे. घाटाजवळच गंगा मंदिरही आहे. श्रीगणेश मंदिर, महादेव मंदिर तसेच आश्रमातून बाहेर पडताना उजव्या हाताला सप्तशृंगी माता व विठ्ठल रुक्मिणी मंदिरही आहे. देवस्थानतर्फे विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, भक्तनिवास व गोशाळा चालविली जाते, असेही दत्तात्रेय नेवडे व नरेंद्र जगताप यांनी सांगितले. कर्दमाश्रमातील हा सोहळा पाहून आपली पावले उनंदा नदीच्या काठावर वसलेल्या आंबेवणीत वळतात.

आश्रमापासून अर्ध्या किलोमीटरवर आंबेवणी हे गाव आहे. गावात प्रवेश करण्यापूर्वी उजव्या हाताला स्मशानभूमी व एक मंदिर लागते. मंदिरापासून उनंदेच्या कुशीत शंभरहून अधिक वर्षांपासून उभा असलेला दगडी बांधणीचा सुंदर घाट उनंदेचे रूप दाखवितो. घाटावरून गावातील उंच उंच दिसणारी घरे अन् वाड्यांच्या मोडकळीस आलेल्या मोठाल्या भिंती आपल्याला गावात घेऊन जातात. गावाला आंबेवणी असे नाव कसे पडले असेल याबाबत सांगताना सुरेश वडजे म्हणतात,‘पूर्वी गाव आंब्यांच्या झाडांनी मढलेलं होतं. अगदी वडाच्या झाडासारखा विस्तार व उंची असलेली हजारो आंब्याची झाडे गावात व अवतीभवती होती. मात्र आता बोटांवर मोजण्याइतकी आंब्याची झाडेही गावात नाहीत. त्यामुळे पूर्वी आंब्याचे उत्पादन प्रचंड होतं की गावाचे नावच आंबे पडलं.’ आंबे गावाला आंबेवणी ही म्हटले जाते. हे गाव शिंदे घराण्याच्या वणी संस्थानात येत असल्याने गावाला आंबेवणी म्हटले गेले आहे.

घाटाकडून गावाकडे जाताना उजवीकडे चढावर रेणुका मातेचे सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या गर्भगृहात रेणुकीचा तांदळा आहे. हा मुखवटा पूर्वी लगद्याचा होता. काही वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला यावेळी दगडी मुखवटा बसविण्यात आला. मंदिराच्या पूजारी रेणुका बैरागी रेणुका मातेच्या मंदिराबाबत एक अख्यायिका सांगतात की, ‘आंबेवणीपासून पुढे वरखेडा हे गाव लागते. या गावातील एक व्यक्ती वणी गावातील रेणूकेच्या दर्शनासाठी नेहमी जात असे. भक्ताच्या या भक्तीवर खूष होऊन एकदा देवी भक्तामागे वडखेडा गावाकडे निघाली. रस्त्यात भक्ताला जावणले की, आपल्यामागे कोणीतरी येत आहे. देवीनं भक्ताला सांगितलं की मी तुझ्यागावी येऊन राहणार आहे. मात्र भक्ताला काही विश्वास बसेना. आंबेवणी येथे भक्ताने अखेर मागेवळून पाहिले अन् देवी तेथेच थांबली.’ रेणुका देवी तेव्हापासून आंबेवणीच्या ग्रामदैवता असून, गुढीपाडव्याला गावात मोठी यात्रा भरते. पूर्वी यात्रेत बोहाड्याची सोंगे व्हायच‌ी; मात्र आता सोंगाचा कार्यक्रम होत नाही. गावात रेणुकामंदिरासमोर लाकडी बांधणीचे मारूती मंदिर आहे. याशिवाय गणपती मंदिर, शिवालय व पांडूरंग मंदिर आहे.

गावात वडजेंचे तीन वाडे व गायकवाडांचा एक वाडा आहे. गायकवाडांचा वाडा आता पूर्णपणे पडला असून, त्याची भिंत गावात ये-जा करणाऱ्यांना गावचा इतिहास सांगत असते. गायकवाडांचे कुटुंब गावात राहाते. तसेच वडजेंचे वाडे गावात आहेत. वडजेंचा वाडा नऊ खणी असून, वाडा संस्कृतीच्या सर्व खाणाखुणा या वाड्यात अनुभवायला मिळतात. धान्य साठवणीच्या वाड्याच्या भिंती रांजणांपासून वाड्यातील आड, चौक अन् दोन मजली वाड्यासाठीचे तीन जीने पाहण्यासारखे आहेत. वडजे मूळचे राजस्थानमधील चितोडचे. महाराणा प्रतापांनंतर ते धोडपजवळील वणी संगमनेर येथे आले. तेथून त्यांना आंबेवणीतील पाटीलकी मिळाली. वडजेंचे काही कुटुंब मडकेजांब येथे तर काही म्हसरूळ येथे स्थिरावली आहेत. वडजेंच्या अनेक नोंदी राजस्थानहून येणाऱ्या भाटांकडे मिळतात, असे सुरेश व गणेश वडजे सांगतात. गावात आजही लहान लहान वाडे अन् बाराबलुतेदारी या ग्रामसंस्कृतीच्या पाऊलखुणा पहायला मिळतात.

आंबेवणी पूर्वी प्रसिद्ध होते ते आंबे अन् डांगरांसाठी. आंबेवणीतील डांगर पखवाजाऐवढे मोठे असायचे. तसेच फ्लॉवर व कोबीसाठीही आंबेवणी प्रसिद्ध होते. आंबेवणीची भाजी मुंबईला जायची. मात्र आता ना आंबे मिळत ना डांगर. भाजीपाला शेतीही नावालाच होते. आता आंबेवणीकर द्राक्ष उत्पादक झाले आहेत. आंबेवणीने काळानुसार कात टाकली असली तरी वाड्यांच्या रूपाने व कर्दमाश्रमाच्या रूपाने आजही आंबेवणीचा साज कायम आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले आंबेवणी रखरखत्या उन्हात पाहण्याची मजाच काही औरच आहे.

सयाजीरावांचं कौळाणे

मनाशी अभिमान बाळगावा असे नाशिकच्या भूमीने इतिहासाला खूप दिले आहे. यात मालेगाव तालुक्यातील कौळाणे गावात जन्मलेले व बडोदा संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड हे एक. कौळाणेतून बडोद्याच्या प्रवास थक्क करतोच; पण येथील वाडेही हा इतिहास जागा करतात.
गुजरातमधील बडोदा संस्थान उभं राहण्यामागे अनोखा इतिहास आहे. मागील देवरगावावरील लेखामध्ये आपण गायकवाड घराण्याचे मूळ पुरूष सरदार दमाजीराव गायकवाड ते १८७१ मध्ये बडोदा संस्थांनच्या गादीवर आलेले मल्हारराव गायकवाड यांच्यापर्यंतचा प्रवास अनुभवला होता. मल्हाररावांचे इंग्रजांशी संबंध बिनसलेलेच राहिल्याने १८७५ मध्ये अखेर त्यांना गादीवरून पायउतार व्हावे लागले. त्यांना मद्रास येथे अज्ञातवासात ठेवण्यात आले. तेथेच त्यांचा १९८२ मध्ये मृत्यू झाला. दरम्यान, १८७५ मध्ये अज्ञातवासात असलेल्या महाराणी जनकाबाईंचा उदय झाला. इंग्रजांनी त्यांना पुण्यातून पुन्हा बडोद्याला आणले व सर टी. माधवराव सारखा मुत्सद्दी दिवाण इंग्रजांनी त्यांच्या हाताशी दिला. जनकाबाईंना मुलगी असल्याने त्यांना दत्तक मुलाची गरज होती. दरम्यान, बडोद्यातील वाडीवाले गायकवाड कुटुंबियात संस्थानला वारस मिळतील अशी मुले होती; मात्र जनकाबाईंनी त्यांची निवड नाकारली.

गादीवर वयाने मोठी मुले आल्यास पुन्हा वाद अन् कटकारस्थाने सुरू होतील या भीतीने इंग्रजांनीही महाराजांची निवड करताना वयाने लहान असलेल्या मुलाची निवड करण्याचा सल्ला दिला. असे केल्यास त्यांना योग्य शिक्षण देऊन राज्य कारभारासाठी तयार करता येईल, असेही सुचविले व तोपर्यंत राज्यकारभार महाराणी जनकाबाईंकडे सोपविण्यात आला. गायकवाड घराण्यातील मूळ पुरूष दमाजीराव गायकवाडांचा मुलगा पुलाजी यांना दुसरे दमाजी व प्रतापराव ही दोन मुले होती. पानिपत युद्धानंतर दुसरे दमाजी आपल्या गावी परतले तर प्रतापराव नाशिकजवळच्या मालेगावात स्थिरस्थावर झाले. तेथून त्यांनी कौळाणेत (कवळाणे) शेती करायला सुरूवात केली व ते कौळाणेला स्थिरावले. एकीकडे भाऊ बडोद्याच्या संस्थानवर राजा म्हणून होता, तर दुसरीकडे एक भाऊ शेती करीत होता.

खरंतर बडोदा संस्थानसाठी योग्य राजा तयार करण्यासाठी जमीन कसण्याचे काम करीत होते, याची कल्पना कोणीही केली नव्हती. बडोद्यासाठी राजाचा शोध व वाद टोकाला गेला होता. अनेक मुत्सद्दी इंग्रज अधिकारी यावर लक्ष ठेऊन होते. गायकवाड घराण्यातील एक शाखा कौळाणेत असल्याचे समजल्यावर तेथून दत्तक पुत्रांच्या खातरजमेसाठी इंग्रजांनी विशेष चौकशी समिती नेमली. त्यावेळी कौळाणेत गायकवाडांची सात घरे होती. प्रतापरावांचे पुत्र काळोजीराव व त्यांचे मयाजीराव व भिकाजीराव ही दोन मुले. भिकाजीरावांना गबाजीराव, बाबुराव, काशीराव, उखाजीराव व सखारामराव असे पाच पुत्र होते. यापैकी तिसरे काशीराव व त्यांच्या पत्नी उमाबाई हे सयाजीराव महाराजांचे पालक होत. त्यांना सात आपत्य होती.

काशीरावांना भिमाबाई, आनंदराव, चिमाबाई, गोपाळराव, ठमाबाई, संपतराव व तुळाबाई असे तीन मुलगे व चार मुली होत्या. यातील गोपाळराव म्हणजेच सयाजीराव महाराज. यांचा जन्म ११ मार्च १८६३ रोजी कौळाणेत झाला.
गोपाळरावांनी एकदा अंजठा लेणी पाहिली अन् त्यांना तेथील मूर्तीसौंदर्य इतके भावले की, त्यांनी असे सौंदर्य अनुभवण्यासाठी खूप हिंडावे, अशी इच्छा व्यक्त केली होती, अशीही नोंद मिळते. त्यांचे वडील काशीराव लढवय्ये होते. त्यांना एकदा मालेगावच्या पैलवानाने आव्हान दिले होते. ‘मला हरव अथवा बांगड्या भर’ या लढतीत काशीरावांनी पैलवानावर असा डाव टाकला की तो पैलवान बेशुद्ध पडला. काशीरावांचे ज्येष्ठ बंधू गबाजीराव हे कौळाणे गावचे पाटील होते. गावातील गायकवाड कुटुंबियांची घरे तेव्हा धाब्याची होती, असा उल्लेख दाजी नागेश आपटे यांनी १९३६ मध्ये लिहिलेल्या ‘श्री महाराज सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे चरित्र खंड पहिला (इ.स. १८६३-१८८७)’ या दुर्मिळ ग्रंथातून मिळतो.

१८७५ मध्ये अचानक एक दिवस इंग्रज अधिकारी कौळाणेत गायकवाड कुटुंबियांची चौकशी करीत आला अन् नाशिकच्या कमिशनरकडे उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या. कौळाणेतील गायकवाड खरंच बडोदा संस्थानशी संबंधित आहेत का, याची पक्की चौकशी करण्याचे कडक आदेश असल्याने नाशिकचे कमिशन मि. ईलियट यांच्यावर इतका ताण आला होता की, ते नाशिकच्या रस्त्यावर व क्षेत्रोपाध्यायांकडे गायकवाडांबाबत वेड्यासारखा माहिती गोळा फिरत असत. त्याला नाशिककरांनी वेडा ईलियट म्हणण्यास सुरूवात केली होती. पण ईलियटच्या या वेडेपणाला यश आले अन् एका क्षेत्रोपाध्यायाकडे गायकवाड घराण्याच्या नोंदी सापडल्या अन् कौळाणेचे बडोदा संस्थानशी नाते असल्याचे अखेर उलगडले. हे ईलियट पुढे महाराजांचे शिक्षक व जवळचे मित्र झाले.

कौळाणेच्या गायकवाड कुटुंबाला तेथून तातडीने हलविण्यात आले. नाशिकच्या डोंगरेंच्या वाड्यात त्यांना आणण्यात आले. तेथे मुक्काम करून पोलिस बंदोबस्तात बडोद्याला नेण्यात आले. जनकाबाईंनी राजा निवडण्यासाठी एकच प्रश्न विचारायचे ठरविले होते. तो प्रश्न होता ‘तुम्हाला येथे कशासाठी आणले आहे,’ यावर गोपाळरावांनी ‘मी येथे राजा व्हायला आलो आहे’ असे उत्तर देत महाराणी जनकाबाईंचे मन जिंकले. त्यानंतर अनेक उलाढालीनंतर गोपाळला बडोद्याचा दत्तकपुत्र म्हणून शिक्कामोर्तब झाले अन् कौळाणेच्या गुराख्याचा मुलगा राजा झाला. १२२ तोफांची सलामी देत २७ मे १८७५ या दिवशी गोपाळरावांचा राज्याभिषेक झाला व त्यांचे नाव सयाजीराव ठेवण्यात आले. सयाजीरावांना बडोदा संस्थानकडून राजशिष्टाचार, राजसंस्कारांचे शिक्षणाबरोबरच मराठी, गुजराती, इंग्रजी व मोडीचे शिक्षण देण्यात आले. २८ डिसेंबर १८८१ रोजी सयाजीरावांचे वय अठरा झाल्यानंतर त्यांच्याकडे राजाची सर्व सूत्रे सोपविण्यात आली. तेव्हापासून ते बडोदा नरेश श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड म्हणून ओळखले जाऊ लागले.

सयाजीरावांची कारर्कीद बडोद्यासाठी सुवर्णकाळ ठरली. शाळा, कॉलेज, जलयोजना, शहराचा विकास व बँकसारख्या ठोस निर्णयाने बडोदा संस्थान जगभर ओळखले जाऊ लागले. १९०८ मध्ये बँक ऑफ बडोदाची स्थापना केली, १९०६ मध्ये महाराजांनी बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. बालविवाह बंदी, महिलांना वारसा हक्क, विधवा विवाह पद्धती सुरू केल्या. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीला सक्रिय मदत केली. या लोककल्याणकारी राजाने कर्मवीर भाऊराव पाटील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्यासह अनेकांना पाठबळ दिले. करारी स्वभावाचे सयाजीराजांनी भारतातील त्यावेळचे सम्राट पंचम जॉर्जला १९११ रोजी भर दरबारात मुजरा करायला नकार देऊन आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिले होते. सयाजीराव महाराज कौळाणेतून बडोदा संस्थानचे राजे होण्यासाठी दत्तक म्हणून १८७५ मध्ये गावाबाहेर पडले ते ५१ वर्षांनंतर म्हणजे १९२६ मध्ये प्रथमच आपल्या जन्मभूमीत आले होते. गुराख्याचा एक मुलगा राजा होतो हा प्रवास थक्क करणारा आहे. म्हणूनच कौळाणे पाहताना मनोमनी बाल गोपाळराव गावात बागडताना दिसतात.

नाशिक ते मालेगाव हा शंभर किलोमीटरचा प्रवास आहे. मालेगावच्या अलीकडे उजव्या हाताला सौंदाणे गाव लागते. गावाच्या कमानीतून कौळाणेकडे जाता येते. येथून साधारण दहा किलोमीटरवर कौळाणे आहे. सुरूवातीला सौंदाणे, टाकळी व सोनजमधून उजव्या हाताने कौळाणेचा पोहचायचे. कौळाणे गावाजवळ आल्यावर एका ओसाड प्रदेशात घरांचा पुंजका पहायला मिळतो. डाव्या हाताला एसटीचा थांब्यापासून गावात प्रवेश केला की आपण थेट गायकवाडांच्या भल्यामोठ्या वाड्यासमोर पोहचतो. वाड्याशेजारच्या मोठ्या कडूनिंबाच्या झाडाखालाचा गारवा अनुभवताना मालेगावच्य़ा तापमानाचा अंदाज येतो अन् कधीकाळी या निंबाखाली बडोदा संस्थानचे महाराजा सयाजीराव खेळले असतील ही कल्पना भर उन्हातही सुखद अनुभव देते.

कौळाणे हे नाव गावाला कसे पडले हे वाड्यासमोरच्या महादेव मंदिरात बसलेले ज्येष्ठ ग्रामस्थ पूर्वीपासून हेच नाव असल्याचे हसतहसत सांगतात. फक्त ते गावाचे मूळ नाव कौळाणे निंबायती असून, गावात कडूनिंबाची खूप झाडे होती. त्यामुळे गावाला कौळाणे निंबायती म्हटले जाते हे आवर्जून सांगतात. मालेगावमध्ये कौळाणे नावाची दोन गावे आहेत. त्यामुळे त्यांना ही उपनामे लावण्यात आली आहेत. एक आहे मालेगावच्या आधी लागणारे कौळाणे निंबायती. हे राजाचे कौळाणे या नावानेही ओळखले जाते. तर दुसरे आहे कौळाणे गाळणा. हे गाव मालेगावच्या पुढे गाळणा किल्ल्याजवळ असल्याने त्याला कौळाणे गाळणा म्हटले जाते.

सयाजीराव गायकवाडांचं म्हणजेच राजाचं कौळाणे म्हटलं म्हणजे रस्ता चुकत नाही, असे जगन्नाथ पवार सांगतात. गायकवाड कुटुंब गावात येण्यापूर्वी येथे जाट आणि शिंदे लोक सर्वाधिक होते. प्रतापरावांचे गायकवाडांचे कुटुंब कौळाणेत आल्यावर त्यांचा मुख्य व्यवसाय होता शेती. तेव्हा गावात त्यांची धाब्याची घरे होती. आता गावात एक नव्हे तर सात भलेमोठे गायकवाडांचे वाडे आहेत. यातील दोन पूर्णपणे कोसळले आहेत. राममंदिर, महादेव मंदिर व हनुमान मंदिरासमोरील पटांगणातील आनंदरावांचा वाडा सयाजीरावांचा वाडा म्हणूनच ओळखला जातो. आनंदरावांचे वंशज सत्यजितराजे गायकवाड यांनी हा राजवाडा ह्दयापासून जपला आहे. सयाजीराजे १८८१ मध्ये गादी सांभाळू लागल्यावर त्यांनी आपल्या भावंडांना व नातलगांना वाडे बांधून दिले.

हे वाडे १८८५ मध्ये बांधून झाले. या वाड्यांचे काम डोसाजी लुकमानजी व मिस्त्री चिरीधर लिलाधर यांनी केले आहे. तर वाड्याचे योजक म्हणून मेस्तनजी दोराबजी खंडाळेवाले यांनी काम पाहिले आहे. आनंदरावांच्या वाड्यासमोर मंदिरे अन् पटांगण, संस्थांनांच्या वाड्याला असलेले दगडी कंपाऊंड व समोरचा राजेशाही वाड्याचा चेहरा पाहताना नाशिकमधील वाडा संस्कृतीचा पुढील टप्पा येथे अनुभवायला मिळतो. वाड्याचे दरवाजाचे नक्षीकाम सज्जा अन् दुमली वाड्यातील दोन चौक, दगडी व लाकडी खांब, चौकांमधील तुळस, तळघर, वीसपंचवीस खोल्या अन् आजूबाजूची नक्षी डोळ्यात भरते. पूर्वी या वाड्याच्या भिंती नैसर्गिक रंगांनी काढलेल्या चित्रांनी सजलेल्या होत्या. मात्र कालांतराने ते ऐश्वर्य मागे पडले. पण वाड्याचे सौंदर्य काही कमी झालेले नाही. वाड्याचे वैभव पाहत मागील दरवाजाने बाहेर पडल्यावर समोर भुपेंद्रसिंग गायकवाड यांचा व त्याच्या शेजारी उज्जलसिंगाचा वाडा अनुभवायला मिळतो. आनंदरावांच्या वाड्याशेजारी आणखी एक छोटा वाडा आहे. या सर्वांवरील नक्षीकाम अन् लाकडी काम अजबगजब आहे. हा सोहळा अनुभवून पश्चिम दिशेला असलेल्या चंद्रकांत गायकवाड कुटुंबियांच्या वाड्याकडे जायचे.

रस्त्यात दोन पूर्णपणे कोसळलेले वाडे पहायला मिळतात अन् डावीकडे चंद्रकांत गायकवाड यांच्या वाड्याच्या मागील बाजूला आपण पोहचतो. हा वाडा देखील १८८५ ला बांधल्याचे चंद्रकांत गायकवाड सांगतात. प्रत्येक वाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी विहीर, प्रशस्त खोल्या, तळघर असल्याचे ते सांगतात. म्हणूनच कौळाणेला वाड्यांचे कौळाणे असेही म्हटले जाते. गावात राममंदिर, महादेव मंदिर, लाकडी बांधणीचे हनुमान मंदिर, खंडेराव मंदिर, जुने-नवे जैन मंदिर आहे. दांडी पोर्णिमेला खंडेरायाची यात्रा व सप्ताहाचे कार्यक्रम गावात होतात. पूर्वी यात्रेत बोहाडे नाचविण्याची रित होती. ४१ ग्रामस्थ त्यावेळी रामायण सोंगाच्या माध्यमातून सादर करायचे. मात्र, गेल्या वीस वर्षांपासून सोंगांचा कार्यक्रम होत नाही, असे रावणाचे सोंग नाचविणारे शंकर बच्छाव सांगतात. त्यांनी काही मुखवटे सांभाळून ठेवले आहेत.
गायकवाड घराण्याचे हे वैभव अनुभवून पुन्हा निघताना मुख्य वाड्याच्या डावीकडे गोसावी समाजाच्या समाधी दिसतात. तर वाड्यासमोर एक वीरगळही पहायला मिळते.

गावात काहीही नव्हतं. सयाजीराजांमुळे वाड्यांच्या रूपाने गावात जीव आला, असे अभिमानाने ग्रामस्थ सांगतात. पण, महाराजांचे कौळाणे असले तरी महिलांची पाण्यासाठी सुरू असलेली वणवण काही संपलेली नाही. त्यांची पाण्यासाठी भर उन्हात धावाधाव सुरू होती. यावर ग्रामस्थ म्हणतात, ‘काय करणार, गावात आज एक महिन्यानंतर पाणी आलं आहे. राजाचं गाव असलं तरी गाव पाण्यासाठी तहानलेलेच आहे. राजकीय पुढाऱ्याला कौळाणेच्या राजाचा अभिमान अन् प्रशासनाला कदर असती तर गावची ही परिस्थिती गावात नसती.’ हे सांगण्यापूर्वी एका महिलेनं अगदी आदरातिथ्य करीत ग्लासभर दिलेलं पाणी खरचं राजाच्या गावची महिलाच अभिमानाने अन् मोठ्या मनानं देऊ शकते याची जाणीवही झाली. वारसा फक्त वस्तूतून जपला जात नाही तर ‘अभिमान’ या संस्कारातूनही जपला जाऊ शकतो हे राजाच्या कौळाणेतील त्या महिलेनं ग्लासभर पाण्यातून दाखवून दिलं. आपण आपल्या समृद्ध इतिहासाकडे अन् त्यांच्या खाणाखुणा असलेल्या गावाकडे इतकं दुर्लक्ष का करतो आहोत, या प्रश्नाने मनात कालवाकालव होते.

पंचरथी मंदिराचं देवळी कराड

नाशिकमधील प्रत्येक मंदिर आपली वेगळी परिभाषा सांगताना दिसतं. कोणी आपल्या वयानं, शैलीनं ओळखलं जातं. तर कोणी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्यानं नटलेलं असतं, तर कोणी इतिहास सांगत असतं. कळवण तालुक्यातील देवळी कराड हे गाव अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण अशा पंचरथी मंदिराने नटलेलं आहे.

मानवाची मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृतीचे आध्यात्मिक अंग आणि भौतिक सृष्टी वा वास्तूरूप सृष्टी म्हणजे आधिभौतिक अंग. पहिल्यात धर्म, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, राजनीती, साहित्य आणि कला यांचा समावेश होतो, तर दुसऱ्यात ऐहिक स्वास्थासाठी निर्माण केलेल्या वस्तूंचा समावेश होतो. तसेच नाशिकच्या मनोमय सृष्टीतील प्राचीन कलावैभवाच्या पाऊलखुणा प्रत्येक गावांमध्ये विखुरलेल्या दिसतात. प्राचीन लेणी, किल्ले, वाडे, मंदिरे, शिल्पे, नाणी, शिलालेख, बारव, वीरगळी अशा अनेक लहानमोठ्या कलाकृतींचा अनुभव पावलोपावली घेता येतो. या सर्वांतून माणसाचं जगणही उलगडतं. समाजपुरूषाचा देह आणि त्याचा आत्मा याचे यथार्थ ज्ञान व्हायचे तर त्याची आधिभौतिक आणि आध्यात्मिक संरचना कशी आहे हे उलगडून पाहणे गरजेच ठरते. आत्माशिवाय देह जसा सचेतन असूच शकत नाही तसेच आधिभौतिक अंगाशिवाय केवळ आध्यात्मिक समृद्धीमुळे संस्कृती संपन्न ठरत नाही. संस्कृतीचा सर्वार्थाने विचार करावयाचा असेल तर या दोन्ही घटकांचा विचार आवश्यक असतो.

प्राचीन भारतीय स्थापत्याचा, शिल्पांचा आणि चित्रांचा उपयोग आधिभौतिक संस्कृती समजण्यासाठी होतो. एवढेच नव्हे तर मंदिर-स्थापत्य आणि मूर्तिशिल्पांतून त्या समाजाची आध्यात्म‌कि बाजूही समोर येते. ही मंदिरे इतिहासाचं अंतरंग उलगडत असतात. म्हणून हा वारसा जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हा वारसा हरवला तर आपलं आधिभौतिक आणि आध्यात्मिक संरचनाच उलगडली जाणार नाही अन् माणसानं ही मंदिरे का बांधली याचं कोडही कधी उलगडलं जाणार नाही. म्हणूनच कळवण तालुक्यातील देवळी कराड (कऱ्हाड) हे गाव मनाला भुरळ घालतं. या गावातील महादेव मंदिर एका अनोख्या शिल्पसौंदर्याचा साक्षीदार असल्याचा पुरावा देतं. नागर शैलीतील हे मंदिर फक्त मंदिर नाही तर ग्रामस्थांच्या दृष्टीने हा एक रथ आहे. या रथाला पंचरथ अथवा पंचरथी असेही ते म्हणतात. देव एखाद्या रथावरून स्वार होण्यासाठी सज्ज झाल्याचा भास या मंदिराकडे पाहिला की होतो. मूळात रथ ही संकल्पना शिखराच्या निमुळत्या होत जात असलेल्या शैलीच्या थरावरून जरी ठरत असली तरी ग्रामस्थांच्या पंचरथ या अनोख्या संकल्पनेला दादच द्यावी लागते, म्हणूनच देवळी कराडची सफर शिल्पसौंदर्याने नटलेली ठरते.

नाशिकहून दिंडोरी मार्गे वणीत जायचे. वणीतून एक रस्ता सप्तशृंगीकडे जातो, तर दुसरा सापूताऱ्याच्या दिशेने हतगडकडे. वीस किलोमीटर गेल्यावर हतगडपूर्वी बोरगाव लागतं. बोरगावातून उजव्या हाताला खिराड गावाकडे जाणारा रस्त्याने देवळी कराड (कऱ्हाड) कडे जाता येतं. जागोजागी रस्त्याला फाटे असल्याने विचारत विचारत जाणे कधीही योग्य. देवळी कराडमध्ये शिरताना लांबून काळ्याभोर शिखरावर भगवा फडकताना पाहिला की जीव भांड्यात पडतो. योग्य ठिकाणी अखेर पोहचल्याची ही खूण मनाला दिलासा देते. गावातून उजव्या हाताच्या रस्त्याने थेट मंदिरासमोरील पिंपळाच्या बलाढ्य झाडाच्या छायेत आपण पोहचतो. धाकट्या भावाप्रमाणे हे झाड या मंदिराचा सांभाळ करीत असेल, असे त्या वृक्षाच्या विस्ताराकडे पाहिले की वाटायला लागते. नाशिक परिसरात भूमिज शैलीतील मंदिरे सर्वाधिक आहेत. मात्र नागर शैलीतील मंदिरे तशी कमीच आढळतात. त्यामुळे देवळी कराडचे नागर शैलीतील चांगल्या स्थितीतील महादेव मंदिर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. हे मंदिर राज्य पुरातत्त्व विभागाने संरक्षित घोषित केले आहे. मात्र या मंदिराच्या शैलीबद्दल कोणताही फलक नसल्याने येथील ग्रामस्थ या मंदिराला हेमाडपंती मंदिर असेच म्हणतात.

नागर शैलीतील या मंदिराचे वैशिष्ट्य ‘प्रासादमंडन’ या प्राचीन संस्कृत ग्रंथातील तृतीय अध्यायात दिलेली आहेत. यातील पंचरथी मंदिराच्या संकल्पनेत हे मंदिर तंतोतंत बसते. पीठ, मध्यमपीठ, कनिष्ठ पीठ, जाड्यकुंभ, कर्णिका, ग्रासपट्टी, गजथर, नरथर, अश्वथर आदी संकल्पना स्पष्ट होतात. या मंदिरावर माजी पुरातत्त्व अधिकारी शंकर साठे यांनी प्रसिद्ध केलेल्या संशोधन निबंधातही याचे हे अनोखे वर्णन प्रत्यक्ष अनुभवताना प्राचीन वास्तूशास्त्रज्ज्ञांचे नवल वाटते. कोणत्याही आधुनिक उपकरणांशिवाय साकारलेले मंदिर हातांनी साकारलेले असेल यावर विश्वास बसत नाही. प्रथम दर्शनीच हे मंदिर रथासारखे भासते. नागरशैलीच्या वैशिष्ट्यांमध्ये शृंग, उरशृंग किंवा अंग, प्रत्यंग, रथिका (कोनाडे), शुकनात आणि शेवटी कलशासह आमलक हे सर्वकाही देवळी कराडच्या मंदिरात पहायला मिळते. मंदिराचे छत हे संवरणा पद्धतीचे असून, ते आकाशाकडे निमुळते होत जाणारे आहे. तर गर्भगृहाचे शिखर आमलक व कलशाने आच्छादिले असल्याने हे मंदिर नागर शैलीचे असल्याचे शंकर साठे सांगतात. मात्र या मंदिरावर गुजराती शैलीचा प्रभावही दिसतो. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने हे मंदिर जपण्यासाठी प्रयत्न करायला हवेत; तसेच ग्रामस्थांना देखील मंदिराचे महत्त्व समजावून सांगायला हवे, असेही ते सांगतात. गुजरात सीमेपासून जवळ हे गाव असल्याने त्यावेळी ज्या कोणी राजाने हे मंदिर बांधून घेतले असेल त्यावेळी गुजरातच्या कामगारांचा या सहभाग असेल, असे म्हणायला जागा आहे. म्हणूनच हे मंदिर पाहताना त्याच्या सर्व बारकाव्यांवर नजर टाकणे गरजेचे ठरते.

महादेव मंदिरात प्रवेश करताना चार-पाच पायऱ्या चढून गेल्यावर आपण अर्धमंडपात येतो. अर्धमंडपात डावी-उजवीकडे कठडा आहे. वर निमुळते छत असून, चौकोनी स्तंभ त्याला आधार देत उभे आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर डावी उजवीकडे शैवद्वारपाल आपले स्वागत करतात. मंदिराला एकूण तीन द्वारशाखा आहेत. पैकी एक स्तंभनक्षीची आहे. तिच्या माथ्यावर गणेशपट्टी असून, त्यावर अस्पष्ट झालेली गणेश प्रतिमा आहे. मंदिराचे सभामंडप गूढमंडप म्हणजे बंदिस्त आहे. अगदी साध्या स्वरूपाचे सभामंडप असून, शिल्पांनी नटलेले खांबांवर ते आधारलेले आहे. स्तभांवर कीर्तिमुख, घटपल्लव कोरलेली आहेत तर किचकाने स्तंभाला आधार देत छत पेलले आहे. सभामंडपातून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळ म्हणजे सभामंडप व गर्भगृह (गाभारा) यांच्यामधली जागा. प्रामुख्याने अंतराळ हे छत विरहित असते. मात्र येथे छत असून, त्यावर शुकनास आहे. अंतराळाच्या वर गर्भगृहाला जोडून पोपटाच्या शुकाच्या चोचीसारखे जे बांधकाम असते त्याला शुकनास असे म्हणतात. नागर शैलीचे हे आणखी एक वैशिष्ट्य असल्याचे शंकर साठे सांगतात.

अंतराळाच्या दोन्ही बाजूंना मूर्तीविरहीत कोनाडे आहेत. अंतराळाचा गुंग करणारा सोहळा अनुभवून गर्भगृहात प्रवेश करायला. गर्भगृहात जाण्यासाठी तीन-चार पायऱ्या उतरून जावे लागते. गर्भगृहाच्या मध्यभागी शिवपींड तर समोरच्या देवळीवजा कोनाड्यात गणपती व उमामहेश्वराच्या मूर्ती आहेत. उमामहेश्वरांची मूर्ती सुंदर आहे. गर्भगृहात पूर्वी विह‌रिीसारखा खोल खड्डा होता, असे दशरथ गांगुर्डे व महेंद्र चौथरी सांगतात. हा खड्डा नंतर बुजविण्यात आला. येथून जाण्यासाठी बोगदाही होता, असेही ग्रामस्थ सांगतात. मात्र आता ना बोगदा आहे नाही पाणी. महादेव मंदिर आतून जेवढे सुंदर तेवढेच बाहेरूनही आहे. पीठ, उपपीठ, पद्मपट्ट, अधोजाड्यकुंभ, कणी, कीर्तिमुख व मिथुन शिल्प अनुभवायला मिळतात. मंदिराच्या बाहेरील बाजूस प्रामुख्याने मूर्ती असतात; मात्र या मंदिराला भौमेतिक नक्षी आहे. मंदिर पाहून पिंपळाच्या झाडाकडे आपला मोर्चा वळवायचा. या पिंपळाची मुळे गावभर पसरलेली आहेत, असे ग्रामस्थ सांगतात. झाडाखाली काही मूर्ती व एक वीरगळ पहायला मिळेल. या वीरगळीकडे जरा निरखून पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराज शिवपिंडीसमोर हात जोडून एक गुडघा जमिनीला टेकवून बसल्याचे पहायला मिळते.

तर शिवपिंडीवर चंद्र व सूर्य कोरण्यात आले आहेत. वीरगळीच्या दुसऱ्या बाजूला शिवधनुष्य पेललेला सैनिक व समोर शत्रू असे कोरण्यात आले आहे. तर तिसऱ्या बाजूला आडवा पडलेला मनुष्य दाखविण्यात आला आहे. छत्रपतींसारखी दिसणारी प्रतिमा आणि कळवणचा काय संबंध असाही प्रश्न पडतो अन् हतगड किल्ल्यामुळे हा प्रश्न सुटतोही. छत्रपतींनी सुरत लुटी दरम्यान या मार्गाने ये-जा केल्याने त्यांच्या सैनिकाची ही वीरगळ असावी, असे त्यावरील चित्रांवरून वाटते. देवळी कराड असे गावचे नाव का पडले असेल याचे उत्तर महादेव कोळी व कोकणा आदिवासींकडे नाही. हा समाज नंतरच्या काळात येथे स्थलांतरीत होऊन आला असणार; मात्र कराडला देवळी हे नाव मंदिरावरून पडले असेल, हे स्पष्टच आहे. देवळी कराडकरांचा महाशिवरात्री हा मुख्य उत्सव. या उत्सवात बोहाडा साजरा केला जातो. यासाठी जवळच्याच अस्तमाळ या गावातून सोंगं आणली जातात. ही परंपरा अजूनही कराडकरांनी जपली आहे. आगारीचा पाडवा म्हणजेच अक्षय्यतृतीयेला आदिवासी मंडळी आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पूजापाठ करतात. यावेळी शिजविलेल्या भाताचे शिंतोडे घरावर व चुलीत टाकण्याची परंपरा आहे. तसेच डोंगरी देवाचा उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात मिरवणूक काढली जाते. गावातील चावडी ते धानीपर्यंत पालखी खांद्यावर काढली जाते. गावात मारूती मंदिरही आहे. पूर्वमुखी महादेव मंदिरासमोर व उजव्या हाताला देवळी कराड वसलं आहे. मातीची लहान लहान घरे, घरासमोर बैलगाडी अन् शेतीचे अवजारे लक्ष वेधून घेतात. देवळी कराडचं मुख्य आकर्षण महादेव मंदिर असल्याने ‘आमच्या कडं देवाशिवाय काय बी नाय’ असे ग्रामस्थ सांगतात.

मंदिरं कशी निर्माण झाली असतील. याचा एक नमुना देवळी कराडपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले देवळी नावाच्या गावात पहायला मिळतो. या गावाला देवळी वणी असेही म्हणतात. हे गाव तेव्हा वणी संस्थानच्या अंतर्गत असल्याने गावाला देवळी वणी म्हटले गेले असावे. या गावात मंदिराच्या गर्भगृहाचीच बांधणी झालेला दगडांचा ढाचा आहे. हा ढाचा पाहिला की, येथेही देवळीकराडसारखं मंदिर उभे राहण्याच्या तयारीत होते; मात्र ते अचानक बंद पडलं असावे असे वाटते. या ढाच्यामुळे मंदिराची निर्मिती होत असताना पहिल्यांदा गर्भगृह कसा आकार घेत असेल हे पहायला मिळतं. देवळी गावातील हनुमान मंदिराच्या शेजारी पाच फूट उंचीच्या वीरगळींचा समूह सोहळा अनुभवणे हा देखील अनोखा अनुभव ठरतो. त्यावरील सैनिकांची शिल्पे आपल्याला युद्धभूमीची आठवण करून देतात. वीरगळींच्या शेजारीदेखील दगडी बांधणीचे मोठे मंदिर असेल, असे आजूबाजूला पडलेल्या मंदिराच्या अवशेषांवरून लक्षात येते.

देवळी कराड असो वा देवळी हे गाव. ही गावे खरेतर लहान-लहान आदिवासी पाडी आहेत. ती नंतरच्या काळात वसली; मात्र त्यापूर्वी हा परिसर मोठा इतिहास घेऊन जगत असणार यात शंका नाही. याच इतिहासाच्या या पाऊलखुणा जपण्याची गरज आहे. तरच नाशिकच्या इतिहासाची कवाडे कायम खुली राहतील, अन्यथा आपण एकएक करून सर्वकाही हरवून बसू. याचं भान नावातच देव अन् त्याचं घर असलेली देवळी ही दोन्ही गावे देतात.

बडोद्याच्या प्रधानाचे देवरगाव

बडोदा संस्थान म्हटलं की, नाशिकशी असलेल्या बडोद्याच्या ऋणानुबंधाची आठवण होते. त्यापूर्वीही नाशिकभूमीतील अनेक व्यक्तींनी आपले बौद्धिक प्राबल्य अनेक संस्थांनांवर गाजवले. म्हणूनच चांदवडच्या देवरगावचे नारायणभाऊ शिंदे यांची या संस्थानातील प्रधानपदाची कारकीर्द अन् त्यांचं गाव अनुभवणे अनोखे ठरते.

गुजरातमधील बडोदा संस्थान उभं राहण्यामागे अनोखा इतिहास दडला आहे. तो जाणून घेतल्याशिवाय देवरगावात (ता. चांदवड) प्रवेश करण्यात काहीच मजा नाही. गोष्ट आहे १७०५ सालातील. शाहू महाराजांचे तत्कालीन सेनापती खंडेराव दाभाडे यांनी नर्मदा ओलांडून मोगलांच्या दोन छावण्या उद्धवस्त केल्या. यात त्यांना सरदार दमाजीराव गायकवाड यांची मोठी मदत झाली. गायकवाड घराण्याचा मूळ पुरुष नंदाजीराव यांनी वाघाच्या तावडीतील एक गाय सोडवून आपल्या घराच्या कवाडाच्या आड सुरक्षित आणून ठेवली. म्हणून त्यांना गाय+कवाड = गायकवाड म्हटले जाऊ लागले. त्यांचे मूळ नाव मत्रे पुढे ते मंत्री झाले अन् त्यांना मंत्रीगायकवाड असेही म्हटले जाऊ लागले. दमाजीरावांनी १७३४मध्ये बडोदा हे स्वतंत्र संस्थान म्हणून स्थापन केले. बडोद्याच्या गादीवर अनेक राजे आले. अनेक कटकारस्थाने घडली यात महत्त्वाची भूमिका निभावली ती त्या-त्या वेळी संस्थानवर आलेल्या दिवाण म्हणजे प्रधानांनी. बडोदा संस्थानचे दिवाणपद रक्तरंजित, कटकारस्थानांनी अन् कुरघोड्यांनी बरबटलले होते.गायकवाड घराण्याचे पहिले दिवाण प्रभू रावजी आप्पाजी होते. रावजीच्या मृत्यूनंतर त्यांचा पुतण्या सीताराम रावजी दिवाण झाला. मात्र त्याचे इंग्रजांशी न पटल्याने इंग्रजांनी त्याला हकलून लावले अन् त्याच्या जागी त्याचा भाऊ बाबाजी रावजी दिवाण झाला. १८१० ला बाबाजीच्या मृत्यूनंतर बाबाजींचा मुलगा विठ्ठलराव भाऊ हा दिवाण झाला. दोन वर्षांनंतर त्यांची काठेवाड येथे बदली करून त्याच्या जागी गायकवाडांचे पुण्यातील वकील गंगाधरशास्त्री पटवर्धन दिवाण झाले. मात्र त्यांचाही पुढे खून झाला. हा खून त्र्यंबक डेंगळेंनी केल्याची आवई इंग्रजांनी उठवली अन् पुढे पेशवाईचा अस्त झाला.

गंगाधरशास्त्रीनंतर बडोद्याची दिवाणगिरी त्यांच्या अल्पवयीन मुलाकडे सोपविण्यात आली. पण तो दुर्बळ ठरला. दिवाणगिरीसाठी सीताराम रावजी पुन्हा धडपडू लागला. इंग्रजांनी सीतारामला नजरकैदेत ठेवले. रावजी दिवाण नसले तरी त्यांच्या सल्ल्यानुसारच राज्य कारभार सुरू होता. हे इंग्रजांना खटकत होते. इंग्रजांनी राजे दुसरे सयाजीरावांना (१८१८-१८४७) सीतारामास दूर करून इतर कोणालाही दिवाण नेमण्यास हरकत नसल्याचे सांगितल्यावर सयाजीरावांनी विठ्ठलराव देवाजी खासगीवाले यास आपले दिवाण नेमले. मात्र हा दिवाण राजद्रोह करीत असल्याचे सांगत राजांनी त्याला काढून टाकले. त्यानंतर दिवाण कोण असावा यावर बरीच खलबते रंगली. १८५६ मध्ये खंडेराव महाराज (१८५६-१८७०) बडोद्याच्या गादीवर आले. दरम्यानच्या काळात खंडेरावांचे दोन दिवाण सदाशिव ओझे व गोविंद रोडे यांचीही हकालपट्टी झाली होती. त्यामुळे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील देवरगावचे नारायणभाऊ शिंदे बडोदा संस्थानचे प्रधान दिवाण झाले. नारायणभाऊ शिंदे हे चतुर दिवाण म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्यानंतर संस्थानचे दिवाण म्हणून आलेल्या दादाभाई नौरोजींना देखील राजीनामा द्यावा लागला होता. बडोदा संस्थानचे नाशिकच्या कौळाणेचे तृतीय राजे सयाजीराव गायकवाड (१८७५-१९३९) गादीवर येईपर्यंत सर्वच दिवाणांची कारकीर्द वादग्रस्त अन् गूढ राहिली. यावरूनच राजे खंडेरावांच्या काळात दिवाण राहिलेले नाशिकच्या नारायणभाऊ शिंदेंची कारकीर्द जाणून घेणे व अन् त्यांच्या देवरगावची सफर अनोखी ठरते.

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडकडे जाताना शिरवाडे वणीपुढे धोतरखेडे व त्यानंतर महामार्गावर उजव्या हाताला खडकजांब गाव लागते. या गावातून देवरगावला जाण्यासाठी दहा किलोमीटरचा कच्चा रस्ता आहे. पुढे खडक ओझर व गुऱ्हाळे गावातून देवरगावात जाता येते. हा रस्ता थोडा थकवणारा असला तरी देवरगावची ओढ कमी करीत नाही. शिवनदीच्या काठावर वसलेले हे गाव देवाने वरदान दिलेले गाव असल्याने त्याला देवरगाव असे म्हटले जाते, असे कचू शिंदे व साहेबराव शिंदे सांगतात. बाराबलुतेदारी पद्धतीच्या या गावाला एक वेस होती. देवरगावात प्रवेश करताना डाव्या हाताला झाडींचा पुंजका पहायला मिळतो. या पुंजक्यात देवरगावचे महादेव मंदिर वसले आहे. हे मंदिर गुजरात मंदिरशैलीतील खास बडोद्याची छाप असलेले आहे. मंदिरासमोर सभामंडपही होता तो कालांतराने पडल्याने ग्रामस्थांनी मंदिराच्या मूळ रचनेला स्पर्श न करता मंदिरापासून दहा फूटांवर नव्याने मंडप बांधला आहे. मंदिरात सहा पायऱ्या चढून वर जाताना अगदी समोर गर्भगृहाचे शिल्पांनी सजलेले प्रवेशद्वार मनमोहून घेते. पगडीफेटा घातलेले दोन पाहारेकरी अन् दगडावरील नाजूक नक्षीकाम, प्रवेशद्वारावरील शेषनागावरील विष्णू, वराह शिल्प व इतर लहान लहान मूर्तींचा सोहळा अनुभवण्यासारखा आहे. मंदिराच्या गर्भगृहात शिवपिंड आहे. मंदिराच्या चारही बाजूंना असलेले नक्षीकाम बडोद्याच्या मंदिरांची आठवण करून देतात. नाशिकमधील अशा शैलीतील एकमेव असे हे मंदिर नारायणभाऊ शिंदे यांनी उभारल्याचे ग्रामस्थ सांगतात. शिवनदीत एक डोहही आहे. या डोहाबाबत एक अख्यायिका सांगितली जाते. मात्र नदीला पाणी नसल्याने ही अख्यायिकाही आता विस्मरणात गेली आहे. नदीलगतच्या बटाई तिकोजी मळ्यात सातीआसरा आहेत. हा सोहळा अनुभवून समोरच्या पाराच्या मागील बाजूने गावात प्रवेश करताना एका उंच कौलारू इमारतीचे छत दर्शन द्यायला लागते. ते टोक नजरेत ठेऊन चालत गेल्यावर आपल्याला दगड व लोखंडी सळ्यांनी एखाद्या हवेलीभवती असलेले कंपाऊड लागते. नाशिकमधील वाड्यांभवती दगडी बांधणीचे तट असतात; मात्र नक्षीदार लोखंडी कंपाऊंड ही शैली देखील बडोद्याचीच. कंपाऊंडमधून आपले शरीर इतरांच्या नजरेत भरावे यासाठी एखादा साधू मांडी घालून तपश्चर्येला बसला आहे, असा विस्तार भाऊ शिंदेच्या हवेलीचा असल्याचे दिसते. या हवेलीला शिंदेवाडा म्हटले जाते.

मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताना दिसणारा दोन मजली शिंदेवाडा नऊ खणाचा आहे हे पाहिल्यापाहिल्या लक्षात येते. एखाद्या राजवाड्यासारखी दिसणारी हवेली बडोदा संस्थानचे दिवाण नारायणभाऊ शिंदे यांचे वंशज भाऊसाहेब शिंदे वाडा फिरवून दाखवितात. दोन चौकी वाडा, त्यातील खोल्या, प्रकाशयोजना, आड, सुसज्ज असे दरबार हॉल, ओसरी, गॅलरी तसेच दुर्मिळ वस्तू अन् वरच्या मजल्याच्या दरबार हॉलमधील २०० वर्षे जुन्या पेटिंग मंत्रमुग्ध करतात. चित्रांचा हा सोहळा म्हणजे त्यावेळच्या बडोदा संस्थानच्या लोकजीवनाचे प्रतिबिंबच असल्याचे अनुभवायला मिळते. हा वाडा नारायणभाऊंनी बांधल्याचे भाऊसाहेब शिंदे सांगतात. गावात शिंदेंनी आणखी एक वाडा बांधला होता. तो पसंत न पडल्याने नव्याने वाडा बांधण्यात आला. जुना वाडा आता अस्त‌त्विात नाही, असेही ते सांगतात. बडोद्यातील शिंदे कॉलनीतही शिंदे यांचा वाडा आहे. नारायणभाऊ शिंदे यांचा जन्म कुठला याचा उल्लेख इतिहासाच्या पानात सापडत नसला तरी ते ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याशी संबंधित असावेत, असे वंशज भाऊसाहेब शिंदे सांगतात. नारायणभाऊ शिंदेंना देवरगाव, नारायण टेंभी (निफाड) व संगमनेर येथील सायखेडी ही गावे जहागिरी मिळाली होती. तेव्हापासून ते येथे आले. १९१५ मध्ये बडोद्याचे सत्यजीत राजे देवरगावाला भेट देण्यासाठी आल्याचेही ते सांगतात.

बडोद्याच्या इतर प्रधानांप्रमाणेच नारायणभाऊ शिंदेंची दिवाणची कारकीर्दही वादग्रस्त राहिली आहे. १८५७ मध्ये महाराज खंडेराव गायकवाड बडोद्याच्या गादीवर आले. त्यापूर्वीपासून असलेले सदाशिव ओझे व गोविंद रोडे यांची हकालपट्टी करीत खंडेरावांनी १८६८ मध्ये नारायणभाऊ शिंदेंची नेमणूक बडोद्याचे दिवाण म्हणून केली. नारायणभाऊ शिंदेच्या कारकीर्दचे उल्लेख दाजी नागेश आपटे यांनी १९३६ मध्ये लिहिलेला ‘श्री महाराज सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे चरित्र खंड १ ला (इ.स. १८६३-१८८७)’ या दुर्मिळ ग्रंथातून अनुभवायला मिळतो. खंडेराव महाराजांना पुत्र नसल्यामुळे ते पुत्रप्राप्तीसाठी मुस्लिम फकीराच्या नादी लागले होते. या घडामोडींमध्ये नारायणभाऊ शिंदेंच्या चतुराईचा उल्लेख येतो. येथे शिंदेबद्दलच्या अनेक अख्यायिकांचे लेखकाने केलेले वर्णन शिंदेच्या चतुराईची उदाहरणे देताे. लेखक म्हणतो,‘चांगल्या वाईटगुणांचे त्यांच्यात विलक्षण मिश्रण होते म्हणून हा पुरूष गाजला. त्यांचा स्वभाव आनंदी व उदार होता. त्यांची दरबारात वागण्याची बोलण्याची पद्धत सर्वांवर प्रभाव टाकत असे. सर्वांचे स्वागत कसे करावे व मानपान कसा राखावा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते.

भाऊंना उत्तमोत्तम वस्तूंचा संग्रह करण्याची आवड होती. त्यांचा डामडोल निराळाच होता. मात्र ते दिवाण झाल्यापासून त्यांची वागण्याची पद्धत बदलली. त्यांचे अनेक मित्र त्यांच्या दिवाणगिरी वागणुकीमुळे दुरावली होती. त्यांनी महाराजा खंडेरावांवर अशी काही मो‌हिनी टाकली होती की, सकाळी उठल्यावर खंडेराव भाऊंचे तोंड पाहत असत. शिंदे यांचे महाराजांच्यापदरी असलेले हे महत्त्वच त्यांच्या नाशालाही कारण ठरले.’ असे वर्णन या ग्रंथात केले आहे. १८६९मध्ये नारायणभाऊ शिंदे यांच्यावर अनेक आरोप ठेवत इंग्रजांच्या कुरघोडीने त्यांना बडतर्फ केले. त्यानंतरही ते खंडेरावांचे विश्वासू व्यक्ती होते. मात्र नारायणभाऊंना दिवाणगिरी मिळाल्यामुळे दुखावलेले बापूसाहेब निंबाळकरांनी बंडाळी केली होती. नारायणभाऊंना हटविल्याशिवाय गादी मिळणार नाही, अशी अवस्था निर्माण झाली होती. दरम्यान, खंडेरावांचा लहान भाऊ मल्हाररावाने खंडेरावाचा हत्येचा कट केला. पण तो उधळला गेला. १८७० मध्ये इंग्लडचे युवराज मुंबईत आले होते. त्यांच्या भेटीसाठी महाराज खंडेराव गायकवाड यांनी दिवाण नसलेल्या माजी प्रधान नारायणभाऊंनाही सोबत घेऊन गेले होते. यावरून शिंदेच्या बडतर्फीनंतरही ते महाराजांच्या किती जवळ होते हे लक्षात येते. यावेळी मुंबईत गायकवाड राजांना पहायला जमलेल्या लोकांनी शिंदेना ‘भाजलेला इमाम’ असे म्हणून हिणवले. यावेळी झालेल्या अनेक वादांतून राजे इंग्लडच्या राजपुत्राला न भेटताच बडोद्याला परतले. या घटनेनंतर पाच सहा महिन्यांनी खंडेराव राजे यांचे निधन झाले. शिंदेंचा राजाश्रय संपुष्टात आला. त्यानंतर निंबाजीदादा ढवळे दिवाण झाले, तर मल्हारराव गायकवाड राजे झाले. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या गाडीत नारायणभाऊ शिंदे यांना सोबत घेतले अन् आपल्या संस्थानात फिरविले. शिंदेंशी वैर असलेल्या राजांना पाहून संस्थानातील जनता आश्चर्यचकित झाली होती. त्यानंतर शिंदेंवर खटला चालविण्यात आला अन् त्यांना भरचौकात शिक्षा देण्यात आली. त्यानंतर कैदेत असताना त्यांचा २ मे १८७२ रोजी मृत्यू झाला. बडोद्याच्या प्रधानाच्या कारकीर्दचा एक अध्याय नारायणभाऊ शिंदे यांच्या रूपाने संपला. त्यांच्या पत्नी गंगूबाई नारायण शिंदे व इतर कुटुंबीय तेव्हापासून देवरगावातच राहू लागले. देवरगावच्या या वाड्यात शिंदेंचे वंशज राहतात. नारायणभाऊंची ही कारकीर्द अंगावर काटा आणते. त्यांचा वाडा मात्र मनाला शांतता देतो. त्यांच्या आठवणी या वाड्याच्या रूपाने आजही येथे अनुभवायला मिळतात. नारायणभाऊंची आवडनिवडही या वाड्यातील वस्तू व वाड्याच्या कामावरून अनुभवायला मिळते.

नारायणभाऊंच्या आठवणी मनात साठवत गावाची सफर पुन्हा सुरू होते. गावातील शनी मंदिराजवळ अहिल्याबाईकालीन बारव आहे. मात्र ती दुर्लक्षित आहे. तिचे पुनरुज्जीवन केले तर तिच्या पाण्याचा वापर गावाला होऊ शकतो. हनुमान मंदिर, विठ्ठलमंदिर तसेच इतरही लहान मोठी मंदिरे आहेत. यात श्रीक्षेत्र देवरगाव हे हरेकृष्ण महाराजांचे समाधिस्थळ व मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी कार्तिकी एकादशीला प्रतिपंढरपूर म्हणून तालुक्यातून भक्तांची गर्दी होत असते. यानिमित्त देवरगाव ते चांदवड महारथ यात्रेचे आयोजन केले जाते. रथातून योगीराज हरेकृष्ण बाबांचा मुखवटा व पादुका श्रीक्षेत्र चांदवड येथे अर्धपीठ आदिमाया श्री रेणुकादेवीच्या भेटीस आणल्या जातात. विंचूबाबा, हरिकृष्णबाबानंतर योगीराज पिठाधीश सुजित महाराज गावातील आध्यात्मिक परंपरा पुढे घेऊन जात आहेत. देवरगावचे वेगळेपण नारायणभाऊ शिंदे यांचा वाडा व महादेव मंदिराच्या रूपाने आजही अनुभवता येतो. नाशिकच्या भूमित अनेक माणसं घडली अन् इतिहासाच्या पडद्याआड गेली असली तरी त्यांच्या आठवणी मात्र इतिहास बनून आजही अनुभवता येतात. हे देवरगावचे मुख्य वैशिष्ट्य.

देवठाण : मंदिरांचा आत्मा

प्रत्येक मंदिराच्या निर्मिती मागील उद्देश देव, भक्त आणि भक्तिबरोबरच त्या गावाला एकत्रित ठेवणे हाही असतो. मंदिर ही संकल्पना आकाराला येत असताना देवाचं ठाणं म्हणजेच देवघर! फक्त मंदिर म्हणून नव्हे तर सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असल्याची साक्ष येवल्याचे देवठाण गाव देतं. म्हणूनच शिल्पसौंदर्यानं नटलेलं देवठाणचं हेमाडपंती मंदिर हे मंदिरांचा आत्मा वाटू लागतो.

माणूस निसर्गपूजकाकडून मूर्तीपूजक कधी झाला हा प्रवासही रम्य तितकाच गूढ आहे. त्रिरश्मी डोंगरावरील पांडव (बौद्ध) लेणीचे उदाहरण पाहिले तर पूर्वीचे राजे बौद्ध भिक्षुकांना दान द्यायचे. या दानातून बौद्ध भिक्षुक पूजापाठासाठी तसेच पावसापासून रक्षण होण्यासाठी लेणी खोदून (कोरून) घ्यायचे. दोन हजार वर्षांपूर्वी दिसणारी बौद्ध लेणी खोदण्याची परंपरा सातव्या आठव्या शतकानंतर बंद झाली. त्यानंतर जैन व हिंदू धर्मियांना राजाश्रय मिळाल्याने त्या लेणींची निर्मिती झालेली दिसते. कलचुरींच्या नंतर राष्ट्रकूट राजघराण्याचा अंमल महाराष्ट्राच्या विस्तृत प्रदेशावर सुरू झाला. राजघराण्यात हिंदू धर्माला अधिक उत्तेजन दिले जाऊ लागले. या काळात लेणींबरोबरच पहिल्यांदा बांधीव मंदिरांनाही प्रोत्साहन मिळू लागले अन् लेणी युग मागे पडून मंदिर युगाला सुरूवात झाली. मात्र उद्देश बदलला नाही. लेणी ही जशी आश्रय अन् पूजापाठाची जागा होती तशीच मंदिरंदेखील होती. बहुतेक, माणूस याच काळात मूर्तीपूजक झाला असावा. मात्र ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळात मूर्तीचे उल्लेख येतात. देवालय म्हणजे मानवी शरीर, शिखर म्हणजे शिर, त्याखाली बेकी म्हणजे मान, मग स्कंध, गाभारा म्हणजे ह्दय, मग मंडोवर म्हणजे छाती, पोट हा भाग, कटिभाग म्हणजे जंघा इत्यादीचा उल्लेख अग्निपुराणातही येतो. या आधारेच मंदिर या वास्तूची संकल्पना उभी राहिली. एखादे मंदिर कसे पहावे अन् अनुभवावे हे देखील ही मंदिराची रचना आपल्याला शिकवते. मूर्ती नसलेली मंदिरे ही लेणीनंतर साकारलेल्या गेलेल्या मंदिरांची स्थितीही सुरूवातीला मठ या परिभाषेला पुढे घेऊन जाणारी असावी. भाविकांसाठी आश्रयाचे ठिकाण, त्या-त्या गावातील बाजारपेठेचे ठिकाण, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक चळवळींचे ठिकाण म्हणूनही मंदिर संकल्पना अधिक उपयोगी ठरली असावी. लग्न, मुंज, कौंटुंबिक कार्यक्रम तसेच कीर्तने, चर्चा, ग्रामसभा भरविण्याचे ठिकाण म्हणूनही भव्यदिव्य मंदिरासारख्या दिसणाऱ्या मात्र मूर्ती नसलेल्या वास्तूंची निर्मिती झाली असावी. नाशिकचे सौभाग्य असे की, नांदूरमध्यमेश्वर येथील खानगाव थडी, चांदोरी रस्त्यावरील ओढा गावातील तातोबा मंदिर व येवल्यातील देवठाण येथील मंदिर नाशिकच्या मठ संस्कृतीची प्रतीके अजूनही पहायला मिळतात. देवठाणचे हेमाडपंती मंदिर पाहतांना धर्मभावना बाजूला ठेऊन मंदिर रचना, स्थापत्य अन् त्याचा हेतू या अंगाने या वास्तूकडे पाहिले तर त्यावेळचे ग्रामजीवन आपल्या डोळ्यासमोर नांदताना दिसते. कारण देवठाणचे मंदिरही मंदिराच्या उत्क्रांतीच्या क्षणाला म्हणजे साधारण इ.स. ८५० ते १०६० या काळात साकारले गेल्याचा दावा केंद्रीय पुरातत्त्व विभाग करतो.

गाव ही संकल्पना अस्तित्वात आली तसे तिचे अनेक पैंलूही निर्माण झाले. मौजे आणि कसबा, बुद्रूक आणि खूर्द. व्यापार, हुन्नर व कसबी मजुरी करणारे लोक मौजेपेक्षा कसब्यात अधिक असतात आणि कसब्याखाली वाड्याही जास्त असतात. कसब्याचे गाव मौजेपेक्षा जास्त विस्तृत, चव्हाट्याचे, रोजगारी व संपन्न असते. तसेच खेडणे म्हणजे जमीन कसणे आणि खेडू म्हणजे जमीन कसणारा. तेव्हा खेडूंची जी वस्ती ते खेडे. तर ठाण म्हणजे व्यापारी, बाजारपेठेचे ठिकाण, श्रीमतांची वस्ती म्हणजे ठाणं. बुद्रक म्हणजे थोरला, वयस्कर, मोठा तर खूर्द म्हणजे खूर्दा, चिल्लर, किरकोळ अथवा लहान. जमीनदार, मालदार, मोठे लोक कसबे, बुद्रुक व ठाणं मध्ये निवासाला असत. त्यांचे कामगार मजूर अन्य मौजे, खुर्द वा खेड्यात राहत. पूर्वी ही वर्गव्यवस्था होती. दोन्ही वस्त्यांमध्ये थोडे अंतर असे एखादा रस्ता, नाला वा नदी अशी सीमा असे. जसे देवठाण व भायखेडे यांच्यामध्ये नदी आहे. तशीच ठाणं ही संकल्पना आजही वापरात आहे; मात्र आज तिला गाव म्हटले जात नाही. एखाद्या देवतेचं ठाण, पीराचं ठाण म्हणून आपण त्या ठिकाणांचा उल्लेख करतो. तसेच देवनदीच्या कुशीत वसलेलं देवाचं ठिकाण म्हणूनही देवठाण असे या गावाला नाव पडले असावे, असे कैलासराव डुमरे सांगतात. म्हणूनच देवठाणचा प्रवास अनेक अंगांनी पडलेल्या प्रश्नांची कोडी उलगडतो. नाशिकहून येवला अन् येवल्यातून औरंगाबाद महामार्गावर साधारण २० किलोमीटर गेल्यावर औरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीवर देवठाण गाव देव नदीच्या किनारी वसले आहे. महामार्गावरून जाताना देवठाणचा फलक लागेल व गाव दिसेल अशी अपेक्षा न केलेलीच बरी. कारण फलक शोधता शोधता आपण वैजापूर हद्दीत कधी दाखल होतो हे लक्षातही येत नाही. त्यामुळे विचारत विचारतच जाणे योग्य. एका मोडकळीस आलेल्या बसस्टॉप व लहानशा चौफुलीवरून डाव्या हाताने दोन किलोमीटर आत जाताना भासणारा ओसाड परिसर खिन्न करतो. दहा मिनिटांच्या सुनसान प्रवासानंतर पन्नासएक घरांचे लहानशे गाव लागते. गावात प्रवेश करताना डाव्या हाताला एक लहानशे मंदिर आपले स्वागत करते. गावात गेल्यावर दगडी बांधणीच्या दोन घरांच्या मधून एक रस्ता देवठाणच्या महादेव मंदिराकडे आपल्याला घेऊन जातो. येथेच पूर्वी वेस होती. मात्र आता ती कोसळल्याने तिचे अस्तित्व दिसत नाही. वेशीतून आत गेल्यावर एका लहानशा टेकडावर चौकोनी आकाराचे मंदिर इतर मंदिरापेक्षा वेगळ्यापद्धतीने साकारलेले पहायला मिळते. ही वास्तू केंद्रीय पुरातत्त्व विभागाने २५ सप्टेंबर १९१५ रोजी संरक्षित केली. त्यांच्याकडून होत असलेल्या देखभालीमुळे मंदिराभोवती कंपाऊंड अन् परिसर स्वच्छ दिसतो.

वीसएक पायऱ्या चढून गेल्यावर मंदिरात प्रवेश करताना मन जसे शांत होते तसे या मंदिराच्या आवारात आल्यावर होते. मंदिराचा समोरचा सभामंडपाचा शिल्लक भाग सध्या अठरा खांबांवर उभा आहे. येथे जाण्यासाठी पाच पायऱ्या चढाव्या लागतात म्हणजे आपल्यातील अहंकार, मत्सर, लोभ, मोह अन् आपल्यातील आपण या पायऱ्यांवर ठेऊन समामंडपात प्रवेश करायचा. पायऱ्यांना लागून असलेल्या पहिल्याच स्तंभावर आपल्याकडे पाहत असलेली नाजूक कोरीव कामाने नटलेली नर्तिकेची मूर्ती आपल्या एका हाताचे बोट ओठांवर ठेऊन फक्त शांत राहून मंदिराचा अनुभव घ्या, असे सांगताना दिसते. तर तिच्या शेजारी चांगल्या गोष्टींची सुरूवात आपण ज्याने करतो, असा श्रीगणेश खांबावरील मनोहारी रूपाने आपल्या मनात उरलासुरला मळभ गळून पडतो. मंडपातील खांबांवरील शिल्पवैभव समोरासमोर सजलेल्या दोन देवळ्या व त्यावरील नक्षीकाम तसेच नर्तिकी अन् हत्तींचा नक्षीकामातील वापर आपल्याला मोहात पाडतो. अदभूत सुंदर नक्षीकाम व स्त्रीसौंदर्याने सजलेल्या मूर्तींचा सोहळा द्वारशाखेवर बहरलेला दिसतो. ही द्वारशाखा आपल्याला गर्भगृहात खेचून नेते. या हेमाडपंती मंदिरातील हा गर्भगृह म्हणजे खरे तर सभामंडप आहे. हा सभामंडप पंचवीसहून अधिक खांबांनी पेलला आहे. आयताकृती छत सपाट आहे. येथे फक्त दरवाज्याच्या अगदी समोर एक लहानशी देवळी आहे याशिवाय आत काहीच नाही. मात्र शांत उभे राहिल्यावर देवळीसमोर एखादा प्रगाढ बुद्धिवंत खांबांचा आधार बसलेल्या दहा-वीस शिष्यांना धर्म अन् मानवजातीच्या उधारासाठी मार्गदर्शन करतोय, असे वाटायला लागते. आतील खांब गोल, चौकोनी आकाराचे मिश्र आहेत व त्याच्या वरच्या बाजूला उलट्या नागाचा फणा आहे. आतील न‌ीरव शांतता अनुभवून शेजारच्या छोट्या मंदिरात यावे. ही खोली मंदिराचा गाभारा असल्यासारखे वाटते. येथे पूर्वी महादेवाची पिंड होती, असे जगन खिल्लारे सांगतात. सध्या येथे पिंड नाही. मंदिराच्या गर्भग्रहाच्या छतावर कमळाच्या फुलांची नक्षी आहे. मंदिराला ग्रामस्थ शिवमंदिर मानतात. मात्र हा भुयाराचा मार्ग होता. तो आता बंद करण्यात आला आहे. येथून अंकाई किल्ल्यावर तर देवनदीकडे निघता येत होते, असे ग्रामस्थ सांगतात. हे बदल कालांतराने झाले असावेत. त्यामुळे पुरातत्त्व विभागही मंदिर शिवमंदिर असल्याचे न म्हणता हिंदू मंदिर अशी नोंद केलेली दिसते. मंदिराला शिखर नाही. शिखरावर गेल्यावर मंदिरातील आतील रचनाही वरून पाहता येते. तसेच पावसाचे पाणी छतावर साठून राहू नये म्हणूनही हेमाद्रीने याचा विचार केल्याचे दिसते. मंदिराच्या तीन बाजू सपाट दगडाच्या आहेत त्यावर हलके नक्षीकाम केलेले दिसते. कालांतराच्या पाऊसपाण्याने ही नक्षीपुसट झाली आहे. या मंदिराभोवती कोट असल्याचे पहायला मिळते. मंदिराच्या कोटाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन खांबांचे अवशेष पडलेले दिसतात. यावरून कोटाचा दरवाजाही सुंदर असेल याची कल्पना येते. त्यामुळे अपसूकच त्या अज्ञात कलाकारांचे कौतुक करावेसे वाटते. येथून अजिंठा, वेरूळ जवळच असल्याने मंदिर ही संकल्पना जेव्हा अस्तित्वात यायला सुरूवात झाली होती. त्या पहिल्या टप्प्यातील ही वास्तू घडविली गेली असेल, असे वाटते. डोळ्यांचे पारणे फेडणारे शिल्पसौंदर्य अन् वास्तूरचना अनुभवली म्हणजे देवठाणचा प्रवास संपला असे नाही. तर जगन खिल्लारे हे गावातील एक ज्येष्ठ आपल्याला मंदिराबरोबरच गावचीही सफर घडवून आणतात. कधी देवठाण पहायला गेलात, तर एखाद्या गाईडप्रमाणे ते आपलं गाव आपुलकीनं सर्वांना दाखविताना दिसतात.

देवठाणच्या हेमाडपंती मंदिराच्या टेकडावरून गावाकडे पाहिले, की समोर देवनदी व त्याअवतीभवती वसलेले देवठाण आता अगदी लहान वाटतं. पण तेव्हा देवठाण हे बाजारपेठेचे ठिकाण होतं. कारण पूर्वी देवठाणच्या बाजारपेठेत घोड्यांची खरेदीविक्री मोठ्या प्रमाणात चालत असल्याने देवठाणला ‘घोड्यांचं देवठाण’ म्हटले जायचे, अशी नोंदही पुरातत्त्व खात्याकडे असल्याचे कैलासराव डुमरे सांगतात. बाराबलुतेदारांचं हे गाव आजूबाजूच्या गावांसाठी त्यावेळी आर्थिक राजधानी असणार; मात्र कालांतराने सर्वकाही बदललं. या छोट्या गावात हनुमान, खंडोबा, देवीचे मंदिर, बिरोबा व विठ्ठल-रुक्‍माईचे मंदिर आहे. विठ्ठल मंदिर व्यापारी कुटूंब आट्टल यांनी बांधून दिले आहे, असे गंगूबाई जानराव सांगतात. येथे एका महाराजांची मूर्ती व समाधीही आहे. ही वास्तू वाड्याची आठवण करून देते. गावात जैन समाजही पूर्वी होता. आता त्यांची जुनी घरे पहायला मिळतात. खंडोबा मंदिर हेदेखील गावचे एक वेगळेपण आहे. खंडोबा मंदिराला कोट आहे. कोटाला सुंदर दगडी प्रवेशद्वार, मंदिरात मुख्य खंडोबा मंदिर असून, मंदिरात एका दगडावर खंडोबा व त्याच्या आजूबाजूला दोन मूर्ती आहेत, असे पुजारी नाना बोठे सांगतात. मंदिराच्या आवारात समाधी व समोर वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळ व पिंड, लहान मोठ्या मूर्ती व वीरगळी आहेत. गोल आकाराच्या दीपमाळेच्या वास्तूत टोकापर्यंत जाता येते. दीपमाळेमागे सहा खांबावर आधारलेली

सहा कमानींची देखणी दगडी लहानशी वास्तू आहे. जवळच गोल आकारातील अवाढव्य चुन्याच्या घाण्याचा मोठा दगड पाहिला की, दगडाच्या वास्तू कशा साकारल्या असतील याची लगबग डोळ्यापुढे दृष्य बनून दिसू लागतात. गावात दगडी बांधणीची बारवही होती; मात्र ती बुजली आहे. ही बारव पुन्हा मोकळी करून गावाला तिच्या पाण्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गावात लक्ष्मीची यात्रा होते. पूर्वी यात्रेत सोंगांचा कार्यक्रम व्हायचा. मात्र सोंग नाचविणे आता बंद झाले असून, यात्रेत आता तमाशा होतो. गावात मल्लांची देखील परंपरा होती. मात्र आता तीही नाही. हेमाडपंती मंदिरामुळे सुंदर भासणारं गाव हीच गावची मुख्य ओळख सध्या आहे.

लेणीकडून मंदिराच्या दिशेने आकाराला आलेला काळ, मठ परंपरा, मंदिराचा उद्देश अन् नंतरच्या काळात बदलत गेलेली मंदिरे अन् त्यांचा उद्देश यासर्वांचा अनुभव घ्यायचा असेल तर देवठाण पहायलाच हवं. शिल्पसौंदर्याचा खजिना असलेले देवठाण आपल्याला एका दिवसाच्या या सहलीत हजार वर्षांचा प्रवास घडवितो, हे काही कमी नाही.

कसे जावे?

नाशिकहून औरंगाबाद एसटीने गेल्यास देवठाण चौफुलीवर उतरून दोन किलोमीटर चालत जावे लागते.

काय पहावे?

देवठाण येथील हेमाडपंती मंदिर मुख्य आकर्षण आहे.

खंडोबा मंदिर व तेथील दीपमाठ आकर्षक आहे.

खासगी गाडी असल्यास देवठाण बरोबरच येवला व चिचोंडीची सफरही करता येईल.

सातवाहनांचं सातपूर

अनेकदा प्राचीन संस्कृतीचं अधिष्ठान लाभलेल्या गावात प्रगतीच्या वेगामुळे ‘त्या’ संस्कृतीच्या खाणाखुणा मिळत नाहीत. मात्र गाव ते उपनगर हा प्रवास केलेल्या सातपूरने आपल्या नावातून तो प्राचीन इतिहास अजूनही जपला आहे. सातवाहनांचे अधिष्ठान असलेले सातपूर अजूनही गुढीपाडव्यातून दोन हजार वर्षांपूर्वीच्या पराक्रमाच्या इतिहासाची साक्ष देताना दिसते.

सम्राट चंद्रगुप्त मौर्याची कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो. चंद्रगुप्ताच्या आधिपत्याखाली असलेल्या एकूण प्रदेशापैकी दख्खनही (आताचा महाराष्ट्र) एक होता. त्यानंतर सुरू झालेला सातवाहन कालखंड महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा आरंभ ठरला. सातवाहनांचा साम्राज्य विस्तार गोदाखोऱ्यात व्यापलेला होता. म्हणून त्यांच्या राजवटीस गोदासंस्कृती म्हटले गेले. सातवाहनकालीन महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमा अतिशय व्यापक होत्या. गौतमीपुत्र सातकर्णीचे वडील शिवस्वातींकडे तेव्हाच्या महाराष्ट्राचा कारभार होता अन्‌ त्यांची वसाहत गोवर्धन येथे होती. म्हणजे आताचे गंगापूर-गोवर्धन गाव. उत्तरेकडून आलेले परकीय क्षहरात घराण्यातील भूपक आणि नहपान या क्षत्रपांनी शिवस्वातीवर आक्रमणे करून महाराष्ट्र ताब्यात घेतला अन् महाराष्ट्रावर राज्य करणारे प‌हिले परकीय घराणे ठरले. नाशिक-जुन्नर परिसरावर क्षहरात घराण्याचे राज्य होते. भूपक क्षत्रपानंतर नहपानाच्या हातात सत्ता एकवटली. दरम्यान, क्षत्रपांनी सातवाहनांना नाशिक परिसरातून हुसकावून लावले व सातवाहन पैठणला वसले. सातवाहन घराण्यातील गौतमीमीपुत्र सातकर्णीने अथक प्रयत्नांनंतर नहपान या क्षत्रपावर नाशिक येथे पूर्ण तयारीनिशी युद्ध केले अन् या युद्धात विजय मिळवित महाराष्ट्र प्रदेश स्वतंत्र केला. हे युद्ध अतिसंहारक असल्याच्या नोंदी पांडवलेणीतील (त्रिरश्मी लेणी) शिलालेखात मिळतात. सातकर्णीने नाशिकमध्ये नहपानाच्या सैन्यावर मात केली. नहपान युद्ध भूमीतून सह्याद्री पर्वतात आश्रयाला गेला. सातकर्णीने त्याचा पाठलाग करून नहपानाचा समूळ उच्छेद केला. पांडवलेणीतील शिलालेखात याचा उल्लेख ‘क्षहरात वंश निर्वंश करस’ म्हणजेच ‘नहपान क्षत्रपाचे क्षहरात घराणे नष्ट करणारा’ असा केला आहे. सातवाहनाने महाराष्ट्र राज्यलक्ष्मी त्यांच्याकडे खेचून आणली. या काळात गौतमीपुत्र सातकर्णी इतका बलाढ्य राजा भारतात अन्य नव्हता म्हणून त्याच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्याले होते, असे गौरोवोद्गार पांडवलेणीतील शिलालेखात आहेत. तर या युद्धाचे वर्णन भद्रबाहू या जैन साधूच्या ग्रंथातही आढळते. इ. स. ७८ मध्ये झालेले हे युद्ध म्हणजे पहिले स्वातंत्र्यसमरच ठरले. नहपानावरील हा अद्वितीय असा विजय दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा विजयोत्सव सातवाहनांनी गुढ्या उभारून साजरा केला. तेव्हापासून गुढीपाडवा साजरा केला जातो, असे इतिहास अभ्यासक मानतात. हा पराक्रम नाशिकमध्ये घडल्याने हा सण नाशिकनेच जगाला दिला, असे म्हणायलाही हरकत नाही. सातवाहनांनी चार शतकांहून अधिककाळ महाराष्ट्रावर राज्य करीत समृद्धीचा सुवर्णकाळ दाखविला. याच काळात सातवाहन व क्षत्रपांनी पांडवलेणी (त्रिरश्मीलेणी) खोदण्यासाठी दाने दिली. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीच्या कारकीर्दीत नाशिकजवळील गोवर्धन (गोवर्धन गंगापूर) येथे व्यापाऱ्यांचे संघ स्थापन झाले होते. सातवाहनांच्या या इतिहासाची छाप जशी लेणीतील शिलालेखांतून उमटली आहे तशीच गुढीपाडवा सणामुळे गेल्या दोन हजार वर्षापासून हा अज्ञात इतिहास घराघरात बहरताना दिसतो. त्यातच सातवाहनांची वसाहत असलेल्या सातपूरलाही गुढीपाडव्यांलाच यात्रा भरते. ही परंपरा दोन हजार वर्षांपासून चालत आली असावी, असे सातवाहनांचा पराक्रम सांगून जातो.

औद्योगिक वसाहतीमुळे सातपूर आता नाशिक शहराचे एक महत्त्वाचे उपनगर बनले आहे. पूर्वी ते सातवाहन या भारतातील एका बलाढ्य राजाची वसाहत होते, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही अन् ते साहजिकही आहे. पण दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास अन् त्या इतिहासाचा घटनाक्रम आपल्याला सातपूर या नावामागील कथा उलगडून सांगतो. सातपूरमध्ये उत्खननात (खोदकामात) सातवाहनकालीन हत्यारांचे अवशेष मिळाले आहेत. तांबड्या रंगांची हत्यारांची पाती पाहताना त्यावेळी घडलेले युद्ध डोळ्यासमोर उभी राहतात. या हत्यारांचे अवशेष त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील नाणे संशोधन केंद्रात ठेवण्यात आली आहेत. म्हणूनच या परिसरात सातवाहन राहत असावेत म्हणून गावाला सातपूर नाव पडले असावे, याला बळ मिळते. सातपूरचे पूर्वीचे नाव सतीपूर होते, असे सांगताना ग्रामस्थ एक अख्यायिका सांगतात. श्रीराम या परिसरात अग्न‌ियज्ञ करत होते. यावेळी पार्वती सीतेचे रूप घेत यज्ञस्थळी श्रीरामाची परीक्षा घेण्यासाठी आली. मात्र श्रीरामाने महादेवाच्या पार्वतीला ओळखले व माता तू येथेच थांब, अशी विनंती केली. तेव्हा पार्वतीने नंदिनी नदीच्या (आताची नासर्डी) रूपात येथेच राहील, असे सांगितले. तेव्हापासून सातपूरला सतीपूर असे नाव पडले व नंदिनी या सतीपूरातून वाहते, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात. सतीपूर या गावाचे नाव मुगलांच्या काळात सय्यदपूरही झाले अन् पेशवाईत सातपूर असेही ग्रामस्थ सांगतात. सय्यदपूरचे सातपूर होण्यामागेही राजेबहाद्दर नारोशंकरांच्या पराक्रमाची अख्यायिका ग्रामस्थ सांगतात.

त्र्यंबकरस्त्यालगत अन् नंदिनीच्या कुशीत वसलेल्या सातपूरच्या मुख्य बाजार रस्त्याने या उपनगरात प्रवेश करताना डाव्या हाताला समोर हनुमानाचे मंदिर लागते. तीन मजली दिसणारे हे हनुमानाचे मंदिर पूर्वी सातपूर गावच्या वेशीबाहेर होते अन् त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांना विश्रांतीसाठी पडावाचे ठिकाण असे. मंदिरासमोर सातपूर गावची वेस होती. आज ती नाही. मात्र तिच्या आठवणी ज्येष्ठांच्या मनात दिसतात. वेशीतून आत गेल्यावर सातपूर गावात अजूनही दोनशे-तीनशे वर्षांपूर्वीचे वाडे असतील याची कल्पनाही कोणी केली नसेल, पण सोनवणे वाडा, जैन वाडा, भंदूरेंचा वाडा, निगळांचा वाडा, बंदावणे वाडा अशी काही उदाहरणे पहायला मिळतात. हे वैभव अनुभवून पुन्हा हनुमान मंदिराकडे यायचे अन् हनुमान मंदिरासमोरून उजव्या हाताने माळी गल्ली, बंदावणे गल्ली, निगळ गल्लीतील जुनी घरे व काही शिल्लक राहिलेले लहान लहान वाडे पाहत स्वारबाबा नगरमधील अग्निमंदिरापर्यंत जायचे. अग्निमंदिरात अरविंद पतंगे अग्निपूजेबद्दल माहिती देताना दंग होऊन जातात. ‘पूर्वी सातपूर गावात कोण आलं तरी कळायचं, आता हे गाव शहर झालं आहे. कोण येत जातं यावर आता नियंत्रण नाही,’ असे सातपूरच्या बदलेल्या स्वरूपाबद्दल दत्तू पंढरीनाथ मौले तळमळीने सांगतात. ‘आम्ही काशीमाळी मध्य प्रदेशातून सातपूरमध्ये आलो. याला आता दोनशे-तीनशे वर्षे झाली असतील. सातपूर पूर्वी नजरेत भरावं एवढं गावासारखं होतं.’ असेही मौले आवर्जून सांगतात.

सातपूरला निगळांचं सरदार घराणंही लाभलं आहे. निगळांचा बाराशे सालापासूनचा वंशवृक्ष राजस्थानच्या भाटांकडे नोंदविलेला दिसतो. ‘राजस्थानातील प्रतापगडचे निगळ औरंगाबादच्या देवगिरीची लढाई लढले. ही लढाई जिंकल्याने त्यांना नारायणगावची जहागिरीत पाटीलकी मिळाली. तेथून १३३५ मध्ये पुण्यातील ओडेगावी आले. तेथे निगळांनी मोठा गढीवजा वाडाही बांधला. मुगलांच्या त्रासापासून धर्म वाचविण्यासाठी निगळ परिवार १५०५ मध्ये कोकणात स्थिरावले. तेथून पेशवाईत महादुपा या एका भावाला ओझाची तर तुकाराम या दुसऱ्या भावाला सातपूरची पाटीलकी मिळाली. तुकाराम निगळ १७०७ मध्ये सातपूरला आले.’ असे शांताराम निगळ भाटांकडील नोंदीच्या आधारे सांगतात. तर ‘भंदुरे कुटुंब राजस्थानातून काशीला आले व तेथून ते जलालपूर येथे शेती व्यवसायात स्थिरावले. भंदुरेनंतरच्या काळात जलालपूरहून सातपूरला स्थिरावले. भंदूरेंचे दोनशे-तीनशे वर्षापूर्वीचे दोन जुने वाडे या इतिहासाची साक्ष आजही देतात,’ असे डॉ. झुंबर भंदुरे सांगतात. गावातील अनेक कुटुंबांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सातपूरची ग्रामदेवता सप्तशृंगी माता आहे. तिला भवानी माताही म्हटले जाते. मातेचे मंदिर औद्योगिक वसाहतीतील एका टेकडावर वसले आहे. हे मंदिर व वणीचे सप्तशृंगी मंदिर समोरासमोर असल्याचे दिसते. अग्नि मंदिर, गणेश मंदिरातील गणपतीची शिळा व बारागाड्या ओढणाऱ्या गणेशाची सुंदर मूर्ती पाहून मरीमाता मंदिराकडे जायचे तेथून पुन्हा निगळगल्ली, बंदावणे गल्ली व माळी गल्लीतून हनुमान मंदिर व शेजारचे खंडोबा मंदिर पहायचे. हनुमान मंदिराशेजारी पूर्वी तालीम होती. ती आता नाही. मंदिरातून तालमीत जाणारा दरवाजा मात्र अजूनही तालमीची आठवण करून देतो. मंदिरातील पुजेचा मान असलेल्या यमुनाबाई पोटींदे या आजीबाई येणाऱ्या जाणाऱ्याला शुभआशीर्वाद देताना दिसतात. त्यानंतर दुर्गामाता मंदिर, सातपूरचा बाजार, बाजारामागील सप्तशृंगीचे छोटेखानी मंदिर, राममंदिर व पूर्वी घाटावर असलेले महादेव मंदिर दगडी बांधणीचे आहे. नंदिनीला पूर्वी सुंदर घाट होता. याच घाटावर महादेव मंदिर होते. येथे पूर्वी दशक्रियाविधी देखील व्हायचे. मात्र आता नंदिनीचा नासर्डी नाला झाल्याने घाट हरविला आहे. महादेव मंदिर पाहून नंदिनी अनुभवली की पूर्वी नंदिनी किती सुंदर असेल याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहाते. १९५० पर्यंत सातपूरचे ग्रामस्थ नंदिनीचे पाणी पिण्यासाठी वापरायचे, असे शांताराम निगळ सांगतात. जवळच बंद पडलेली शिवटॉकीज आहे. तेथून भवानी मातेच्या मंदिरात जाता येते. हे मंदिर राजर्षी शाहू महाराज विद्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच आहे. येथे देवीची चिरा आहे तर मंदिराबाहेर एका कोपऱ्यात अनेक वीरगळी पहायला मिळतात. तेथून आई गडदवणी माता मंदिर व पीरबाबांचे ठाणेपाहून सातपूर रस्त्यातील वेताळ मंदिरातील लाकडी मुखवटे सातपूर गावात पूर्वी बोहाड्यांच्या सोंगांचा उत्सव होत असल्याचा इतिहास सांगतात. बोहाडे आता होत नाहीत. मात्र सातवाहनांनी याच गावातून सुरू केलेला गुढीपाडवा उत्सव ग्रामस्थ आजही जल्लोषात साजरा करतात. सातपूरकर दरवर्षी गुढीपाडव्याला भवानी मातेचा उत्सव व बारागाड्या ओढण्याचा अनोखा सोहळा साजरा करतात. बारागाड्या ओढणाऱ्याला गणेशा म्हटले जाते. मानपान ठरलेल्या कुटुंबातील पुरूषाला म्हणजेच गणेशाला साडी, चोळी, पीतांबर फेटा हातात तलवार अशी पारंपरीक वेशभूषा केली जाते. त्यानंतर गणेशाला गावातून मिरवले जाते व दारोदारी सुवासिनी गणेशाचे औक्षण करतात. सर्व मंदिरांमध्ये गणेशा दर्शन देवतांचे पूजन करीत सप्तशृंगी माता मंदिरातून गणेशा बारागाड्या ओढण्याच्या ठिकाणी येतो. गणेशा बारागाड्यांना प्रदक्षिणा घालतो व बारागाड्या ओढतो. गणेशाची मिरवणूक गावातील पीराला नेवैद्य दाखवून संपते. बारागाड्यांचा सोहळा, पोळा, होळी व निवृत्ती महाराजांची पालखी असे सातपूरचे मुख्य सोहळ्यांचा मानपान ग्रामस्थ एकत्रित येऊन ठरवितात. निगळ, घाटोळ, बंदावणे, भंदुरे, मौले आदी कुटुंबांचा व ग्रामस्थांचा गावातील उत्सवांमधील सहभाग सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवितो, असे डॉ. झुंबर भंदुरे व शांताराम निगळ सांगतात.

सातपूरमध्ये १९४६ पर्यंत इंग्रजांची निग्रोंच्या पलटनीचा कॅम्प होता. याच्या खाणाखुणा अजूनही सातपूरमधील पपया नर्सरी चौकात इंग्रजांनी बांधलेल्या बराकीच्या माध्यमातून पहायला मिळतात. या बराकींचा आता कार्यालयासाठी खुबीने वापर केलेला दिसतो. हा कॅम्प त्यानंतर देवळालीत वसला. त्यानंतर १९६१ मध्ये सातपूर औद्योगिक वसाहत आली अन् सातपूरचे गावपण शहराकडे वळले. मात्र सातपूरने वेगवेगळ्या उत्सव आणि सुप्तगुणांतून दोन हजार वर्षांपासूनचा जपलेला इतिहास थक्क करतो. म्हणूनच सातवाहनांचे सातपूर पाहताना दोन हजार वर्ष मागे गेल्यासारखे वाटायला लागते. असं काही सातपूरमध्ये अनुभवयाला मिळेल, ही कल्पना मात्र नक्कीच कोणी केली नसणार!

सरदारांचं कोटमगाव

नाशिकला एक फार मोठे अवलिया होऊन गेले. आपल्याकडे कुणीआल्यास त्याने पहिल्या पायरीवर पाय ठेवला की कोण आले ते त्यांना ज्ञात होत असे. नारायणदास श्रीपादश्रीवल्लभ पिठले हे त्यांचे नाव. मूळ नाव वेगळे. परंतु, नंतर याच नावाने त्यांनी कार्य केले. अवलियांमध्ये एखादाच असा असतो की समाजाचे भान, व्यवहाराचे ज्ञान आणि आध्यात्मिकता याची सांगड घालून तो पुढे जातो, पिठले महाराज त्यापैकीच एक होते.

अगदी दोन हजार वर्षांपासून भारतावर होत आलेल्या अनेक आक्रमणांनी भूमिपुत्रांच्या पायाखालची पायभूमी हिसकावली. हा भूमिपुत्र स्थलांतरीत झाला अन् मग मिळेल तिथे आपला स्वत:चा इतिहास निर्माण करण्यासाठी धडपडू लागला. ही धडपड साधीसुधी नव्हती, तर अनेक पिढ्यांच्या कष्टानंतर दाखवलेल्या शौर्यातून त्याला एखाद्या परगण्यात जहागिरी अथवा वतनदारी मिळाली अन् तो योद्धा स्थिरावला. नाशिकची अनेक घराणी हीच कथा मांडताना आपल्या शौर्यगाथा व्यक्त करताना दिसतात. काळ मात्र बदलत असतो, तो ना कोणासाठी थांबतो ना, पुन्हा तोच काळ परत देतो. बदलत्या परिस्थितीशी प्रत्येकाचं युद्ध सुरूच असल्यानं स्थिरावलेल्या मनालाही बदलाची ओढ काय असल्याचे दिसते. तो बदल मात्र इतिहासाच्या पाऊलखुणा पुसट करायला लागतो. ऐतिहासिक वास्तू मागे ठेवून माणसाला पुढे घेऊन जातो. मग उरतात त्या फक्त आठवणी अन् कागदावर मांडलेली वंशावळ. मात्र शौर्यगाथा त्याच असतात. या शौर्यगाथाच त्या गावची ओळख असते. अगदी तीन एक हजार लोकवस्तीचे निफाड तालुक्यातील लासलगावजवळच्या कोटमगावची अशीच कथा आहे. कोटमगाव अज्ञात वाटतं पण त्याच्या अज्ञातपैलूंमध्ये अनेक गुपितं दडली आहेत याचा अनुभव गावाची भटकंती करताना येतो अन् गावाने पाहिलेल्या शौर्याचे वैभवही डोळ्यासमोर उभे राहते.

नाशिक-निफाड हे अंतर साधारण ३५ किलोमीटर आहे. निफाडपासून लासलगाव पंधरा किलोमीटर व तेथून कोटमगाव अगदी दोन किलोमीटरवर. लासलगावातून डाव्या हाताला लासलगाव कृषी उत्त्पन्न बाजार समितीकडे जाणाऱ्या रस्त्याने आत गेल्यावर रेल्वेपूल लागतो. रेल्वेपूल ओलांडला की, कोटमगाव आपले स्वागत करताना दिसते. समोरच देवराम मंदिरासमोरील पारावर बसलेली ज्येष्ठ मंडळी गावगप्पा मारताना दिसतात. कोटमगाव म्हणजे काय हे कोड त्यांनाही उलगडलेलं नाही, असे ते सांगतात. जेव्हापासून आठवतं तेव्हापासून अन् आजोबा, पंजोबाही कोटमगावच म्हणायचे असं ते ठासून सांगतात. मात्र हे सांगताना गावात बरेच लहान मोठे वाडे होते, हे सांगायला ते विसरत नाहीत. गाव वेशीने सजलेले. या गावाला कोट अन् दोन बुरूजही असल्याचे ज्येष्ठ मंडळी सांगतात. वेशीला लाकडी दरवाजाचा आधार हा गावालाही आधार होता, मात्र काळ बदलला अन् वेशींनी देह ठेवला. मात्र स्मृतीपल्याड गेलेल्या या वेशी गावातील श्रीमंतीचा अन् सरदारांच्या शौर्याचा इतिहास सांगतात.

देवराम मंदिरासमोरून डाव्या हाताला गेलं की, एका लहानशा टेकडीवर गढीसारखे वैभव असलेला वाडा नजरेत भरतो. वाडा म्हणून असलेले त्याचे वैभव आता उरलले नाही; मात्र या गढीवर अकरा-अकरा खणाचे दोन वाडे समोरासमोर उभे होते. या वाड्याला सोमवंशींचा वाडा म्हटले जाते. सोमवंशी वाडा ३५० वर्षे जुना आहे. त्याची कलाकुसर ही चांदवडच्या रंगमहालाशी साम्य दाखविते. रंगमहालाचे काष्टशिल्पाचे काम ज्या कारागिरांनी केले त्याच कारागिरांनी सोमवंशी वाड्याचेही काम केल्याचे विलासराव यादवराव सोमवंशी आनंदाने सांगतात. या वाड्याभवती कोट होता. आता त्या कोटाचे फक्त अवशेष राहिले आहेत. कालांतराने होणारे सर्व बदल या वाड्यात झालेले पहायला मिळतात. शिवकाळात सरनौबत सरदार सोमवंशी नाशिक परिसरात आले. त्यांना कोटमगाव व मोहाडी येथील जहागिरी मिळाली होती. सरदार सोमवंशी लढवय्ये होते. ते मूळचे हस्त‌िनापूरचे. त्यांचा प्रवास दिल्लीतून सुरू झाला. त्यांना पुण्यातील घोडनदीजवळची जहागिरी मिळाली.

त्यानंतर कोटमगाव, मोहाडी जहागिरी मिळाल्याच्या नोंदी भाटांकडील दप्तरातून मिळतात. या टेकडीवरील वाड्याला दगडी प्रवेशद्वार होते. अकरा-अकरा खणी असे दोन वाडे समोरासमोर व मध्ये चौक अशी या वाड्याची रचना होती. मात्र आता यातील एक वाडाच शिल्लक आहे. त्याचेही दोन मजले आता नाहीत. मात्र वाड्यावरील सुंदर काष्टशिल्प व अकरा खण अजूनही वाड्याचे वैभव दाखवितात. कोटमगावातील विलासराव यादवराव सोमवंशी यांचे आजोबा आनंदराव व्यंकटराव सोमवंशी हे मोहाडीतून दत्तक आले होते. त्यावेळी त्यांचे नाव शहाजीराव भगवंतराव सोमवंशी असे होते. याबाबतचे १९२१ चे मोडीतील दस्त त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. सोमवंशींचा नाशिकच्या सरकारवाड्याजवळही सोमवंशी वाडा होता, असे विलासराव सोमवंशी सांगतात. वाड्यातील आड अन् तटबंदीच्या आठवणी घेऊन ही गढी उतरायची अन् उजव्या हाताच्या मार्गाने पुढे गेल्यावर मारूती व रोकडेश्वराच्या मंदिरात आपण पोहचतो. लाकडी बांधणीतील दीडशे वर्षे जुन्या या मंदिराचे वरचे दोन मजले आता शिल्लक नाहीत; मात्र मंदिराचा जुना बाज कायम रहावा म्हणून कोटमगावच्या ग्रामस्थांनी या मंदिरावर पत्र्याचा मोठा डोम उभारून मंदिर जपले आहे. या मंदिराबाबत अनेक अख्यायिका सांगितल्या जातात.

रोकडेश्वर-हनुमान मंदिर थोडे मागे करावे म्हणून हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र ते न हलल्याने मूळ मंदिर संरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला. रोकडेश्वर मंदिरातील हनुमानाच्या मूर्ती खाली देवीची मूर्ती असल्याची अख्यायिका सांगितली जाते, असे भागीरथ शिरसाठ सांगतात. मंदिरातील रोकडेश्वर व हनुमानाची मूर्ती पाहण्यासारखी आहे. येथेच विठ्ठल-रूक्मिणी मंदिरही आहे. गावात जुन्या बांधणीची अनेक घरे आहेत. मात्र शेतीमुळे मळ्यात राहायला जाण्याच्या पद्धतीमुळे ही घरे ओस पडली आहेत. ग्रामदैवत असलेल्या रोकडेश्वराचे मंदिर पाहून उजव्या हाताने पुढे गेल्यावर स्वस्त धान्याचे दुकान म्हणून वापरात असलेली सुंदर माडी पहायला मिळते. तेथून पुढे वीराची शिळा अन् त्यावरील वीर पाहून गावचे श्रद्धास्थान असलेल्या काशी विश्वेश्वर महादेव मंदिर पहाता येते. हे मंदिर पूर्णपणे दगडी बांधणीचे होते. मंदिराचा कळस कालांतराने कोसळल्याने नव्याने फक्त कळसाची बांधणी करण्यात आली; मात्र मंदिर तसेच आहे. पांढऱ्या रंगाने न्हावून निघालेले विश्वेश्वर महादेव मंदिरावरील नक्षीकाम व परिसर वेगळा वाटतो. मंदिरासमोरील नंदीच्या खाली तळघर होते ते आता बंद करण्यात आले आहे. ग्रामदैवताची यात्रा अन् सप्ताहाचे कार्यक्रम नित्यनियमाने होतात, असे ग्रामस्थ सांगतात.

‌महादेव मंदिराचे वैभव अनुभवून मंदिरासमोरच आपले दोन्ही बाहू पसरवून उभा असलेला ब्राह्मणवाडा आपल्याला साद घालतो. ब्राह्मणवाडाही तीनशे-साडेतीनशे वर्षांचा इतिहास बाळगून आहे. या वाड्याची बांधणी व वाड्यावरील काष्टशिल्प काम चांदवडच्या रंगमहालाशी साम्य दाखविते. यामागील कोडे ब्राह्मणवाड्यातील जितेंद्र अशोक कुलकर्णी उलगडतात. ‘कोटमगाव चांदवड संस्थानचाच एक भाग होते. येथील सरदार होळकरांशी संबंधित होते. होळकरांचा निफाड परगण्याचा कारभार कोटमगावातून चाले. यासाठीची जबाबदारी त्यांनी कुलकर्णींकडे सोपविली होती. यासाठी हा वाडाही त्यांनीच बांधला. येथे न्यायनिवाड्याचे काम चालत असे त्यासाठी मोठ्या वाड्याची गरज असेल म्हणून हा बांधला गेला असावा. ब्राह्मणवाड्यात कोर्टाची इमारत व मोठा दिवाणखानाही होता. तीन मजली वाड्यात तळघर अन् भुयारही होते. कालांतराने वाड्याची पडझड झाली, मात्र आठवणी ताज्या आहेत,’ असे कुलकर्णी सांगतात.

कोटमगाव आणखी एका सरदाराचे शौर्य सांगते ते म्हणजे पवार घराणे. पवारांचाही वाडा गावात होता. येवल्यातील सावरगावातील पवारांचे पूर्वज धार येथून आले. मध्य प्रदेशातील देवास येथील थोरल्या पातीचे तुकोजी पवार (१७८९ ते १८२७) यांच्या घराण्याची जहागिरी लासलगावजवळील कोटमगाव ही होती. त्या जहागिरीची व्यवस्था धारचे गोविंदराव पवार पाहत होते. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी सावरगावचे ग्रामस्थ येथील मुस्लिम प्रशासकाच्या छळाने हैराण झाले होते. सावरगावकरांनी आपले गाऱ्हाणे कोटमगाव येथील गोविंदराव पवारांपुढे मांडले. गोविंदरावांनी सावरगावातील जुलमी शासकाची हकालपट्टी करीत सावरगावचा कारभार स्वत:च्या हातात घेतला. तेव्हापासून पवार घराणे सावरगाव येथे स्थायिक झाले. त्याच घराण्यातील मारोतराव पवार यांनी १९८५ ते १९९५ पर्यंत दहा वर्षे विधानसभेत येवला मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले, असे इतिहास अभ्यासक नारायण क्षीरसागर सांगतात.

नाशिकच्या अनेक वाड्यांवरील चित्रांचा इतिहासही कोटमगाव उलगडते. नाशिकच्या अनेक वाड्यांवर अनोखी चित्रे पहायला मिळतात. रंगमहालावरील चित्रे नाशिकच्या चित्रकारांनीही काढल्याचे कोटमगाव सांगते. तर नाशिकच्या चित्रकारांनी राज्याबाहेरही आपली ओळख निर्माण केली होती. कोटमगावचे चित्रकार बापू दिंडोरीकर-दंडगव्हाण हे मल्हारराव होळकरांबरोबर इंदूरला गेले होते. त्यांच्या कलेमुळे होळकरांनी त्यांना मानपान दिला होता. त्यामुळे इंदूरमध्येही दिंडोरकराचा सोनारवाडा होता. दिंडोरकरांनी मल्हाररावांचे काढलेले चित्र अजूनही पुण्यातील चित्रकार वाईकरांच्या संग्रहात असल्याचे कोटमगावातील सुनील दिंडोरकर सांगतात. ब्राह्मणवाडा पाहून मांगीरबाबाच्या व अनोख्या मुखवट्यांच्या दर्शनासाठी राजवाड्याचा रस्ता पकडायचा. रस्त्यालगत उभ्या असलेल्या दगडी बांधणीच्या दोन-तीन समाधी आपल्याला दिशा दाखवितायेत असे वाटायला लागते.

कोटमगावात चैत्र पोर्णिमेला एक अनोखा जल्लोष गावाला एकत्र करायचा. हा उत्सव म्हणजे बोहाडे. मात्र गेल्या १० वर्षांपासून सोंगाचा हा खेळ बंद झाल्याने कोटमगावची शानच गेल्यासारखी वाटते आहे. अजूनी अनेक सोंग राजवाड्यातील मांगीरबाबाच्या मंदिरात ठेवलेली पहायला मिळतात. अनेक सोंग अजूनही त्या-त्या सोंगाच्या पात्रांनी आपल्या घरात जपली आहेत. कोटमगावचे आणखी एक वेगळेपण म्हणजे बोहाड्यासाठी लागणारी सोंगांचे मुखवटे बनविणारा कलाकार त्र्यंबक खैरनार याच गावचे. त्यांच्या मृत्यूनंतर गावात मुखवटे बनविणे बंद झाल्याचे विष्णू कदम सांगतात. मात्र त्र्यंबक खैरनार यांच्या आठवणींचा वारसा मुखवट्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी जपला आहे, एवढाच काय तो ओलावा मनाला सुखावून जातो.

मांगीराबाबांचे मंदिरही अनोखे आहे. मंदिरात मांगीरबाबांची शिळा आहे. साधारण प्रत्येक गावात मांगीरबाबा पहायला मिळतो. मांगीरबाबांना मांग वीर असेही म्हटले जाते. पूर्वी समाजाच्या उत्कर्षासाठी लढलेल्या योद्धांच्या स्मृतीनिमित्त गावात मांग वीराची चीरा उभारली जात असे. त्यालाच मांगीरबाबा असे म्हटले गेले, असे खैरनार व कदम सांगतात.

कोटमगाव हे नाव गावाला कशावरून पडले हे सापडत नसले तरी या मातीत होळकर, सोमवंशी व पवारांचे घराणे रूजले अन् त्यावेळच्या समाजव्यवस्थेला आवश्यक ते योगदान या पिढ्यांनी दिले. त्यांचा वारसा त्यांचा इतिहास म्हणून पुढे नेण्याचे काम कोटमगाव करीत आहे. बोहाडे बनविणारा कलाकार व राजामहाराजांचे चित्र रेखाटणारा चित्रकार आता
नसले तरी कोटमगाव त्यांच्या आठवणींनी संपन्न झाल्याचा अनुभव गावात घेता येतो. म्हणूनच कोटमगावची सफर करायला हवी!

 

पाताळेश्वराचे अनोखे पाळे

गाव ही संकल्पना कशी आली? बुद्रुक अन्‌ खुर्द म्हणजे काय?, पाटीलकी देशमुखी बदलत्या व्यवस्थेत निर्माण झाल्या अन् व्यवस्थेसह त्याही गेल्या. गावाच्या अन् गावात एकत्रित राहणाऱ्या माणसांच्या संरक्षणासाठी उभे राहिलेली वेसकोट ही संकल्पनाही काळाच्या ओघात जमीनदोस्त झाली. पण या आठवणी अजूनही मनाच्या कोपऱ्यात ताज्या आहेत त्या ग्रामदैवत अन्‌ त्यांच्या अख्यायिकांमुळे. कळवण तालुक्यातील पाताळेश्वराचे पाळे हा अनुभव घडवितं.
रमेश पडवळ

तथाशूद्रजनप्राया सुसमृद्धकृषीवला /
क्षेत्रोपभोगभूमध्ये वसतिर्ग्रामसंज्ञिता //

पुराणांमध्ये गाव म्हणजे नेमके काय ही संकल्पना या श्लोकात मांडली आहे. म्हणजेच माणसाला पूर्वीपासूनच एकत्र रहायला आवडतं. एकमेकांच्या आयुष्यात रमायला आवडतं. गाव म्हणजे ज्याच्याभोवती कीर्दसार-वहितीला (शेती) योग्य जमीन आहे आणि जिथे मातब्बर शेतकरी व पुष्कळसे मजूर आहेत, अशा वस्तीला गाव म्हणतात. गावच्या हद्दीला किंवा सीमेला शीव ही संज्ञा आहे. गावाचे स्वभावत: आणि एकमेकांपासून अलग असे दोन भाग उघड उघड पडतात. एक पांढरी किंवा गावठाण आणि दुसरा काळी किंवा रान, काळी आणि पांढरी या संज्ञा जमिनीच्या रंग व गुणधर्मावरून प्रचारात आल्या असाव्या. काळी जमीन काळी किंवा काळसर असून, भुसभुशीत असते, ती पाणी धरते व खचते. पांढरी जमीन पांढरसर, आवळ व निबर असून पाणी ढाळते.

यामुळे काळी जमीन जितकी वहितीला उपयोगी, तितकी इमल्याला (घरांसाठी) नसते आणि पांढरीवर जसा इमल्याला धर सापडतो, तसा कंदमुळांना सापडत नाही, अशी गावाची व्याख्याच गावगाड्यात मांडली आहे. अर्थात आता मातीची घरे बांधण्याची संकल्पनाही मागे पडली आहे. मात्र मातीच्या घरात राहण्याचा आनंद काही वेगळाच असतो हे नाशिकच्या कोणत्याही गावात गेलात तर अनुभवायला मिळू शकते. गावठाणात पांढरीवर गाव वसलेले असते अन्‌ काळीवर शेती. गावाच्या ज्या जागेवर माणस घरेदारे करून नांदतो तिला पांढरी, आई-पांढर किंवा गावठाण म्हणतात. ज्या जागेत शेती करतात तिला काळी, आई-काळी, रान किंवा शिवार म्हणतात. शहरातील फ्लॅट संस्कृतीप्रमाणे गावातही शेतातील बंगल्यांमध्ये वेगळं राहण्याची संकल्पना अधिक बळावल्याचे पहायला मिळू लागले आहे. यामुळे ग्रामसंस्कृतीची वाटचाल शहरसंस्कृतीकडे सुरू झाल्याचा भास व्हायला लागतो.

गावातील सिंमेटच्या घराभवती धीर सोडत असलेली घरे पाहताना स्थापत्यशास्त्रातील घरांच्या बांधणीची ही पिढी परत कधीच पाहता येणार नाही याची हुरहुर मात्र कायम मनात राहते. बदलत्या ग्रामीण जीवनावर आजही ग्रामदैवत व गावातील विविध दैवतांचा पगडा घट्ट असल्याने का होईना अनेक गावांचे गावपण अजूनही टिकून आहे. सण, उत्सव, जत्रेनिमित्त का होईना आजही गाव एकत्र येताना दिसतं अन्‌ हरविलेल्या, हरवत चालेल्या गावावर चर्चा होताना दिसते. कळवण तालुक्यातील पाळे बुद्रुक व खुर्द ही जोडगोळी अशाच बदलाची स्थित्यंतरे उलगडताना दिसते. ग्रामदैवतांनी गावपण टिकविल्याचा अनुभव अन्‌ जुन्या घरांचा ओलावा येथे अनुभवायला मिळतो. तर पौराणिक व ऐतिहासिक आठवणीही गावाने जोपासल्या आहेत.

नाशिक ते सप्तश्रृंगी गड साधारण ६५ किलोमीटर अंतर आहे. उजव्या हाताने गडाकडे न जाता कळवणकडे जाणाऱ्या रस्त्याने पाच-सहा किलोमीटर गेले की, कोल्हापूर फाटा लागतो. या फाट्याला कोल्हापूर फाटा म्हणण्यामागे गंमतीशीर किस्सा दडलेला आहे. अनेकांना कोल्हापूर फाटा म्हटलं की बुचकळ्यात पडल्यासारखे होते. मात्र, पूर्वी या परिसरात कोल्हे फार होते आणि हा रस्ता कच्चा होता. त्यामुळे या ठिकाणाला कोल्हापूर म्हणण्याची पद्धत रूढ झाली. या फाट्यावरून डाव्या हाताने आत शिरले की पाळे गाव लागते. पाळे गिरणा नदीच्या अल्याडपल्याड वसले आहे. अल्याडपल्याड म्हणजे दोन्ही किनाऱ्यावर पाळे हेच गाव आहे. अलीकडच्या गावाचे नाव आहे पाळे बुद्रूक तर नदी पलीकडे आहे पाळे खुर्द. नाशिकमध्ये अनेक गावांना ब्रुद्रुक आणि खुर्द हे शब्द चिकटलेले पहायला मिळतात. बुद्रुक व खुर्द हे शब्द फारसी असल्याने ते मोगल काळात प्रचलित झाले असावेत. ‘

खुर्द’ म्हणजे लहान. मोठ्या गावाच्या शेजारी वसलेली लहान वा किरकोळ वस्ती म्हणजे ‘खुर्द’. ‘बुद्रुक’ हा शब्द ‘बुजुर्ग’ या फारसी शब्दाचा अपभ्रंश असून, ‘बुजुर्ग’ म्हणजे मोठा किंवा थोर. म्हणजेच मुख्य किंवा मोठं गाव म्हणजे ‘बुद्रुक’. येथे बुजुर्ग शब्दाचा अपभ्रंश होऊन तो बुद्रुक असा स्वीकारला तर खुर्द हा शब्द जशाच्यातसा घेतला. फारशीतील अनेक शब्द आपण अपभ्रंश किंवा जसेच्या तसे घेतल्याचे पहायला मिळतात. साधारणत: बुद्रुक आणि खुर्द ही जोडगोळी पहायला मिळते. कोल्हापूर फाट्यावरून गावात प्रवेश करताना पहिल्यांदा आपण पाळे बुद्रुकमध्ये प्रवेश करतो. गावाला पाळे नाव कशावरून पडले याबाबत अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. सुरत लुटीनंतर परतताना छत्रपती शिवाजी महाराज पाळेगावात थांबले होते तेव्हा त्यांनी गावाचे नाव पाळे ठेवले, असे पाळे खुर्दमधील मनोज पाटील सांगतात तर पाळे बुद्रुकमधील पाताळेश्वर मंदिरामुळे गावाला पाळे नाव पडल्याचे पाळे बुद्रुकचे प्रभाकर खैरनार, काशीनाथ देशमुख सांगतात. महादेवाने पालन पोषण केलेले गाव म्हणून ‘पाळे’ असेही म्हटले जाते.

पाळे गावाला पौराणिक अख्यायिकेचाही संदर्भ आहे. श्रीराम नाशिकमध्ये वनवासाला असताना ते पाळे गावातूनच संतश्रृगी गडावर देवीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी श्रीरामाने गावात महादेव मंदिराची स्थापना केली होती म्हणून या मंदिराला ते मंदिर महादेवाचे असूनही रामेश्वर मंदिर असे म्हटले जाते, असे अॅड. बाळासाहेब देशमुख, शिवाजी देशमुख, दिलीप डेरले, संतोष देशमुख सांगतात. रामेश्वर मंदिर पूर्वी दगडी बांधणीतील होते. मंदिरातील महादेवाची पिंड दक्षिणमुखी आहे. पिंडीवर महादेवाचा शेषधारी तांब्याचा मुखवटा आकर्षक आहे. दगडी मंदिर पाडून ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. जुन्या मंदिराचे अवशेष या मंदिराच्या आजूबाजूला पहायला मिळतात. मंदिराच्या व्यवस्थेसाठी देशपांडे घराण्याने २६ एकर जमीन मंदिराला दान दिली आहे. या जम‌िनीचा दर पाच वर्षांनी लिलाव होतो. रामेश्वर मंदिराजवळच पाळे बुद्रुकच्या हनुमानाचे मंदिर आहे. हा हनुमान सप्तश्रृंगी गडाकडे पाहतो आहे. श्रीराम जेव्हा पाळे गावातून गडाकडे निघाले तेव्हा त्यांना हनुमान पाहत आहे, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात.

हनुमान मंदिरासमोर देशपांडेंची गढी होती. आता ती जमीनदोस्त झाल्याने तिचे विखुरलेले अवशेष पहायला मिळतात. पाळे बुद्रुक देशमुख व देशपांडे तर खुर्द पाटलांचे म्हणून प्रसिद्ध आहे. देशमुखांना अठरा गावांची देशमुखी होती. देशपांडेंकडे महसुलाची जबाबदारी होती. त्यांची गढी आता नाही; मात्र त्यांचे वंशज गावात आजही आहेत. तर मोरे-शिंदेंना गावची वतनदारी होती. त्यांचे वंशजही गावात आहेत, असे मनोहरराव मोरे व विकास देशपांडे सांगतात. बाराबलुतेदारी पद्धत गावातील वेगवेगळ्या गल्ल्यातून आजही पहायला मिळते. आजूबाजूच्या गावांसाठी पाळे बाजारपेठेचेठिकाण होते. देशपांडेंच्या गढीतून एक भुयार गिरणा नदीतील चुहेली डोहात निघायचे. गढी पडल्याने हा बोगदाही बुजला. मात्र चुलीसारखा दिसणारा हा डोह अजूनही गढीच्या आठवणी सांगतो. या डोहात शस्त्र ठेवले जायची तसेच लपण्याची जागाही येथे होती, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात.

बुद्रुकमध्ये राम मंदिर, हनुमान मंदिर, दत्त मंदिर, खंडेराय मंदिरे आहेत. रामाचे मंदिर पूर्वी लाकडी बांधणीचे होते ते आता सिमेंटचे झाले आहे. राम मंदिराला खाकी आखाड्याच्या साधूंची मोठी परंपरा आहे. नाशिकमधील नागचौकातील खाकी आखाड्याचे महंत खाकीदास, बालकदास, जानकीदास गरीबदास व सध्या खाकी आखाडा सांभाळणारे नरसिंह दास यांनी पाळे गावात तपश्चर्या करून पुढे मठाची जबाबदारी सांभाळली आहे. हे सर्व साधूमहंत याच गावचे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. राम मंदिरासमोरच एक कुंड आहे. कुंडात महादेवाची पिंड तर शेजारी हनुमानाचे आणखी एक मंदिर व चावडीची जुनी इमारत आहे. पाळे बुद्रूकमध्ये महाशिवरात्रीला महादेवाचा उत्सव तर पाडव्याला बोहाडे होतात. २६ सोंगांच्या बोहाड्याची जबाबदारी २६ घरात दिलेली आहेत.

विशेष म्हणजे देशमुख व देशपांडेंकडेही बोहाड्याच्या सोंगांची जबाबदारी आहे. दर तीन किंवा पाच वर्षांनी सोंगांचा कार्यक्रम केला जातो. बोहाड्यातील संक्रांतीचा म्हणजेच देवीचा अवतार घेणारे सूत्रधार यशवंत देशमुखांनी आता सत्तरी ओलांडली आहे. मात्र बोहाड्यात संक्रांत साकारण्याची त्यांची जिद्द मात्र कमी झालेली नाही. उत्साहाला वय नसतं असं सांगताना ते म्हणतात,‘बोहाडे कोठून आले, का आले माहिती नाही पण गावाला गावपण देण्याचं काम हा उत्सव करतो. प्रत्येकाला एकत्र ठेवण्याचे अन्‌ तीन वर्षातून एकदा का होईना ग्रामदैवतेच्या साक्षीने जगण्याचे भान देतो. वय झालं असलं तरी अजून एकदा तरी बोहाड्यात देवीचा अवतार होऊन नाचायचं आहे.’ यशवंत देशमुखांप्रमाणे, विकास देशपांडे व इतरही अनेकांनी बोहाड्यातील सोंग उत्सवापर्यंत देवघरात जपून ठेवली आहेत. देशमुख स्वत: बोहाड्यांची देखभाल दुरूस्तीचे कामही पाहतात. गावाला कळवण येथील संत बाबांमुळे गावाला भजन परंपरा जपली आहे.

चावडीसमोरच कीर्तनकार प्रभाकर खैरनार महाराजांचे घर आहे. बाहेरून पाहिल्यास हे घर वाटते; मात्र घरात गेल्यावर आठ खणाचा मोठा वाडाच असल्याचा भास होतो. सुरूवातीला चार खोल्या पार करून आत गेल्यावर वाड्यासारखा चौक लागतो. त्यापुढील पुन्हा चार खोल्यापार केल्यावर गावच्या दुसऱ्या रस्त्याला त्यांचे घर संपते. इतक्या मोठ्या घराची रचना अनोखी अन् दुर्मिळ वाटते. खैरनार यांच्याकडे जुन्या हस्तलिखितांचा संग्रह आहे. हतगडचे वंशज मनोहरराव मोरे यांच गावचे. त्यांच्याकडील ताम्रपटाचा अन्‌ मोडीतील कागदपत्रे पाहून गिरणानदीवरील पूल ओलांडून पाळे खुर्दमध्ये जाता येते. केमच्या डोंगरातून गिरणा पुढे वाहत जाते. गिरणामुळे हा परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. पुलावरूनच पाळे खुर्दमधील अष्टभुजा नारायणी देवीचे मंदिर आपल्याला खुणावत राहते. या मंदिरातील देवीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचे पाळे खुर्दमधील पोपटसोनू पाटील, संदिप पाटील, जितेंद्र पाटील, वैभव पाटील सांगतात. गावात हनुमान, दत्त, संतोषी माता आदी मंदिरे आहेत.

दरवर्षी शाकांबरी पोर्णिमेला अष्टभुजा देवीची यात्रा होते. यावेळी तमाशा, कुस्ती हे मुख्य आकर्षण असते. मात्र खुर्दमध्ये बोहाडे होत नाहीत. गिरणा नदीवर ब्रिटीश काळात लिफ्टची योजना उभारण्यात आली होती. त्याची इमारतही या गावात पहायला मिळते. खुर्दमधील हनुमानाला शेंडीचा हनुमान म्हटले जाते. शेंडी असलेला हनुमान इतरत्र नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. या हनुमानाला तांब्याच्या कवचाने मढलेले आहे. त्यामुळे शेंडीचा हनुमान आवर्जून पहावा असा आहे.

महादेवाने पालन पोषण केलेले, रामाचा पदस्पर्श, छत्रपतींच्या आशीवार्दाने भारावलेले पाळे पाहताना ग्रामीण जीवनाचा स्पर्श अनुभवायला मिळतो. हा ठेवा कायम राहावा ती मातीचं घर, मंदिरांचा साज जपण्यासाठी त्यांचे पालनपोषण करण्यासाठी पाळे धडपडताना दिसते.

सोंगांचं चाचडगाव

टीव्ही व संगणक युगाने माणसाच्या मनोरंजनाची संकल्पनाच बदलली. हा बदल होत असताना याचा मोठा फटका ग्रामीण भागातील प्रथा, परंपरांना बसला. बदलाच्या लाटेत अनेक उत्सवांचे स्वरुप बदलले अन् होरपळला सोंगांचा मुखवटा अन् ते बनविणारे कलाकार. नाशिक जिल्ह्यात सोंगांचे मुखवटे बनविणारी पिढी अखेरचा श्वास घेत आहे. हा श्वास जपण्यासाठी चाचडगाव धडपडतांना दिसतं.

mask

व्यक्तीवर त्या-त्या सामाजिक परिस्थितीचा प्रभाव पडतो अन् त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्वात रुपांतर होतं. मात्र प्रत्येक व्यक्तिमत्त्वाला एक मुखवटा असतो. हा मुखवटा त्यांच्या स्वार्थ, व्यथा, वेदना अन् सुखाशी इतरांना अज्ञात ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळेच मुखवटा अन् चेहरा हे समीकरण सर्वांना कायम स्तिमीत करत आलं आहे. म्हणूनच माणूस आणि मुखवटा यांचा एकमेकांशी वेगळा ऋणानुबंध जडला आहे. पण कोठून आले हे मुखवटे, कधी आले, कसे आले, कोणी आणले आणि आता ते कुठे आहेत? असे अनेक प्रश्न प्रत्येकालाच सतावतो. मुखवट्यांना प्रत्येक धर्मात अन् समाजात परंपरेच्या अर्थाने एक वेगळं महत्त्वही आहे. देवघरातील टाकांपासून घर सजविताना भिंतीवर टांगलेल्या विदुषकाच्या मुखवट्यापर्यंत आपला कुठे ना कुठे या कलेशी संबंध येतो. महाराष्ट्रातील मुखवट्यांची परंपरा केरळमधून कोकणमार्गे अड‌‌‌ीचशे-तीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्र फलश्रुत झाली. १७२८ साली श्यामजी नाईक काळे व शिवराम नाईक गोडबोले या दोन कीर्तनकारांनी कर्नाटकातून यक्षगान हा लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला. त्याला पुढे दशावतार व नमन-खेळे या वेगवेगळ्या नावाने ओळखले जाऊ लागले. नमन-खेळेतील गीतांमध्ये राघोबादादांचा उल्लेख येतो, यावरून हा प्रकार पेशवाई काळापासून होत असावा. हळूहळू ही बोहाड्याची (आखाडी, भवाडा, सोंग) परंपरा कोकणातून ठाणे, नाशिक भागातील आदिवासींमधून रुजली. बोहाडा अथवा आखाडी हा ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कारण नाशिकमधील जवळपास प्रत्येक गावात बोहाड्यांचा कार्यक्रम अगदी अलीकडेपर्यंत जल्लोषात साजरा व्हायची. अजूनही काही गावात ते कसेबसे टिकूनही आहेत. बोहाडा हे मुख्यत: मुखवटानाट्य आहे. आदिवासींमध्ये जंगली प्राण्यांचे मुखवटे धारण करून त्यांची सोंगे सादर केली जायची. परंतु, त्यांचा शहरांशी संपर्क वाढत केल्याने शहरी संस्कृतीचा व देव-देवतांचा प्रभाव त्यांच्या बोहाड्यांवरही पडला अन् प्राण्यांची जागा देव-देवतांच्या मुखवट्यांनी घेतली. त्यांची सादर करण्याची पद्धत नाट्यसादरीकरणाकडून मिरवणुकीत नाचण्यापर्यंत बदलेली. गाव उत्सव, होळी व धार्मिक सणांनिमित्त बोहाडे नाचविले जातात. पण बोहाड्यांमध्ये नाचविले जाणारे मुखवटे येतात कोठून अन् ते कोण बनवितो हे उलगडण्यासाठी चाचडगावात जावं लागतं. हा प्रवास आपल्याला एका वेगळ्या कलेशी जोडतो.

नाशिक-पेठ रस्त्यावर नाशिकपासून २५ किलोमीटरवर चाचडगाव (ता. दिंडोरी) लागते. चाचडगाव चौफुलीवर डाव्या हाताला गावच्या ग्रामदेवतेचे म्हणजेच बेंडकाई माता देवीचे स्थान असलेला डोंगर गावाच्या संरक्षणासाठी दोन्ही बाहू पसरवून निवांत पहूडला आहे. या डोंगराच्या पायथ्याला चाचडगाव वसल्याचे दिसतं. पेठ रस्त्यावरील गावच्या चौफुलीवर ज्येष्ठांचा सकाळी सकाळी जमलेला मेळा चाचडगाव उलगडून सांगायला लागतो. चाचडगाव असे गावाचे नाव कसे पडले अथवा चाचड म्हणजे काय हे कोणालाही माहिती नाही. मात्र चाचपडत चाचपडत हे गाव वसले असावे म्हणून चाचडगाव म्हटले गेले असावे, अशी शक्यता ज्येष्ठ मंडळी व्यक्त करतात. मात्र गाव वेगळं आहे. शोधलं तर खूप काही सापडेल अशा आशावाद बाळू पेगमहाले व एकनाथ रहेरे व्यक्त करतात. गावात बेंडकाई मातेचा उत्सव अक्षयतृतीयेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. डोंगरावर मातेचे छोटेखानी मंदिर बांधलेलं आहे. याशिवाय गावात खंडोबा अन् म्हसोबाचं मंदिर आहे. म्हसोबाच्या मंदिरात दगडी चिरे आहेत. मंदिराशेजारी वीरगळींचा खच पडलेला दिसतो. चाचडगावात प्रामुख्याने कोळी व कोकणा आदिवासी राहतात. त्यामुळे त्यांच्यातील वीरांच्या चीरा म्हणजेच वीरगळ उभारण्याची पद्धत चाचडगावातही अनुभवता येते. मात्र या दगडी वीरगळींचे महत्त्व उमजले नसल्याने हा वारसा दुर्लक्षित होऊन गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला निपचीत पहूडलेला आहे. वीरगळीवर समोरच्या बाजूला घोड्यावर हातात तलवार घेऊन बसलेला वीर तसेच वीरगळीच्या डाव्या उजव्या बाजूलाही सैनिकांच्या प्र्रतिमा कोरलेल्या आहेत. वीरगळींवरील नक्षीकाम अनोखे तर आहेच; मात्र अजूनही सुस्थितीत आहे. त्यामुळे या वीरगळी एखाद्या ठिकाणी व्यवस्थित मांडायला हव्यात. आता आदिवासींमध्ये च‌रिे उभे करण्याची पद्धत बंद झाल्याने त्यांच्या पुढच्या पिढ्यांना गावातील वीरांच्या कथा या वीरगळींमधून जिवंत ठेवता येऊ शकतील.

उत्सवांमधून गावातील वीरांच्या कथा सांगण्यासाठीच गावात बोहाड्याच्या सोंगांची निर्मिती होऊ लागली असावी, असे या वीरगळींकडे पाहिल्यावर वाटायला लागतं. चाचडगावात आंबेकर व पेगमहाले ही दोन कुटुंब सोंगे बनविण्यासाठी ओळखली जात होती अन् ही ओळख गावापुरतीच नव्हती, तर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून या दोन कुटुंबीयांकडे सोंगांची मागणी असे. गेल्या तीन-चार पिढ्या ही दोन कुटुंब बोहाड्यांसाठी सोंग बनवित आले आहेत. मात्र गावागावांतील घरांवर डीश टीव्हीच्या छत्र्यांची गर्दी वाढू लागली अन् मनोरंजनाची संकल्पना बदलत गेली. पूर्वी गावातील उत्सव, धार्मिक व सामाजिक सोहळेच मनोरंजनाचे मुख्य स्त्रोत होते अन् ते अधिक बहारदार करण्यासाठी सोंग नाचविणे हा एक विशेष मनोरंजनाचा कार्यक्रम समजला जायचा. पण काळ जसा बदलत गेला तसा सोंगांऐवजी गावाच्या चौकात चित्रपट दाखविले जाऊ लागले. घराघरात टीव्ही आले अन् सोंगांचे मनोरंजनाचे मुख्य काम हिरावले गेले. सोंगं आता धार्मिक कार्यक्रमांपुरतेच मर्यादित झाले आहेत. त्यातच अनेक गावांत बोहाड्यांमध्ये दारू अन् गोंधळाचा प्रादुर्भाव झाल्याने बोहाड्यांच्या परंपरेला खीळ बसली. बोहाड्यांचे खेळ करणारी अन् सोंग ठरलेली मानापानाची कुटुंबे नव्या पिढीपर्यंत ही कला पोहचवू शकली नाहीत. त्यामुळे शिक्षणासाठी गावाबाहेर पडलेली नवी पिढीही यापासून दुरावली. याचा परिणाम सोंगांसाठी मुखवटे बनविणाऱ्या कलाकारांवर झाला अन् पेगमहाले या कलाकाराने व त्यांच्या पुढील पिढीने मुखवटे बनविण्याऐवजी पोटाची खळगी भरू शकेल असा नवा व्यवसाय निवडला. गावातील आंबेकर या कुटुंबातील मुखवटे बनवू शकेल, अशी शेवटची व्यक्तीही या कलेपासून लवकरच दुरावेल अशी स्थिती आहे. ‘मागील तीन-चार पिढ्यांपासून आम्ही मुखवटे बनविण्याच्या व्यवसायात आहोत. हा व्यवसाय करताना जोड धंदा हवाच. पूर्वी जवळपास प्रत्येक गावातून मुखवट्यांची मागणी असायची त्यामुळे तीस-चाळीस मुखवट्यांचा एक संच असे अनेक संच तयार ठेवावे लागत. त्यामुळे वर्षभर काही ना काही काम सुरू असे. माझे आजोबा तुकाराम आंबेकर व वडील रघुनाथ आंबेकर यांची सोंगांसाठी मोठे योगादान दिले आहे. मात्र यावर वाढलेला संसार आता चालू शकणार नाही हे लक्षात आल्याने घरातील इतर मंडळी मुखवट्यापासून दुरावली. मी मुखवटा कलाकार आहे. मात्र आता सोंगांना पूर्वीसारखी मागणी नाही. एक संच भाड्याने दिल्यावर चार-पाच हजार रूपये भाडं मिळतं; मात्र यावर वर्षभराचा संसार चालू शकत नाही. त्यामुळे आता मुखवट्याचे काम कमी करून शहरात भंगार व्यवसाय सुरू केला आहे. माझी मुले शिकत असल्याने तेही या कलेपासून दुरावली आहेत. बहुतेक मुखवटे बनविणारी आंबेकरांमधील माझी शेवटची पिढी ठरेल,’ असे सांगताना मुखवटा कलाकार विजय रघुनाथ आंबेकर व त्यांची आई राधाबाई रघुनाथ आंबेकर यांचे डोळे भरून येतात. मात्र सोंगांचे कलावैभव किती समृद्ध आहे हे सांगताना ते थकत नाहीत.

गणपती, सरस्वती, शेंद-आसूर, वाली-सुग्रीव, वराह, दुःशासन, भीमा, अर्जुन, मच्छ, खापऱ्या चोर, नारद वाल्मिक, राम, लक्ष्मन, श्रृपनखा, खंडेराव, महादेव, काळभैरव, चंद्रसूर्य, नरसिंह, महिषासूर, देवी, वेताळ, म्हशा आदी मुखवटे तर डोक्यात घालायचा टोप तसेच अनेक पात्र असलेल्या मुखवट्यांच्या ताठी म्हणजेच पाच पांडव ताठी, कृष्ण ताठी, बळीराम ताठी, रावण ताठी, रक्तादेवी ताठी, मारूती ताठी हे मुखवटे विजय आंबेकरांच्या मातीच्या घरातील माडीवर पहूडलेले पाहताना मन थक्क होतं. मुखवटे हातात घेऊन त्यावरील धूळ बाजूला करतांना विस्मरणात जाणाऱ्या कलेला आपण शेवटचे भेटतो आहोत हा भास अंगावर काटा उभा करतो. प्रत्येक मुखवटा चेहऱ्यावर लावताना अन् त्या मुखवट्याच्या डोळ्यातून जग पाहताना नक्की कोण आपला चेहरा हरवत आहे? हा प्रश्नही मनाला अस्वस्थ करतो. मुखवटा काढताना तो निघत नसल्याचा भास ‘मला सोडून जाऊ नका’ अडगळीत टाकू नका’, असे सांगतो आहे की काय असं वाटायला लागतं. मुखवट्यांवर साचलेली धूळ मुखवट्यांवर आहे की आपल्याच चेहऱ्यावर मढवलेली आधुनिकतेची ती धूळ आहे असाही विचार मनात काहूर माजवतो.

आंबेकरांच्या घराच्या माडीवर मुखवट्यांचे छोटेखानी संग्रहालय पाहताना एका कोपऱ्यात जमिनीवर मातीत एक चेहरा साकारलेला आहे. हे काय असावं असा प्रश्न पडतो तोच त्याचं कोडही उलगडतं. हा चेहरा मुखवट्यांचा मातीचा साचा आहे. कागदी लगदा, मेथी चार-पाच दिवस भिजत घालून नंतर तो ठेचून घेतला जातो व चपातीसाठी पीठ मळतो तसं तो लगदा मळला जातो अन् तो मातीच्या त्या साच्यावर थापला जातो. साच्यामुळे चेहऱ्याचा एक आकार तयार होतो अन् त्यातून वेगवेगळे मुखवटे आकार घेतात. तो साच्या मला थोडं आश्वस्त करतो की मी अजून आहे! जगतानाच्या वेदना विसरून काही आनंदाचे क्षण बोहाड्याच्या निमित्ताने का होईना पूर्वी ग्रामस्थांना मिळायचे, त्यांना एकत्रित बांधून ठेवायचे; मात्र झपाट्याने बदलत गेलेल्या मनोरंजनाच्या साधनांनी बोहाड्यांना दारिद्रय दाखवलं. बोहाड्यांची परंपरा नाशिकमधून हद्दपार होतेय असेच नाही तर या बोहाड्यांमध्ये रंग भरण्याचे काम करणारे मुखवटे बनविणारे कलाकारही अज्ञात होऊ लागले आहेत. बोहाड्यांच्या निमित्ताने दर्शन देणाऱ्या मुखवट्यांनाही मागणी कमी झाली अन् त्यांनाही घरघर लागली. त्यांचा चेहराही हरवू लागला. एका पिढीची बोहाड्यांची परंपरा पुढच्या पिढीकडे जात नसल्याने हा बोहाड्यांसह मुखवट्यांचा वारसा लुप्त होईल, अशीच अवस्था नाशिक जिल्ह्यातील गावांमधून दिसते. जे काही अस्तित्व शिल्लक आहे ते बोहाडे करणाऱ्या गावांमुळे. त्यामुळे या कलाकारांना कसलं कलेचं आरक्षण अथवा अनुदान नको आहे तर बोहाडे, सोंग बंद केलेल्या गावांनी ते पुन्हा सुरू केले तर एक कला अन् मनोरंजनाचा एक अनोखा आनंद नवीन पिढीतही रूजविला जाईल, एवढीच अपेक्षा ते कलाकार व्यक्त करतात.

बोहाड्यांच्या मुखवट्यामागे मोठा इतिहास, संस्कृती अन् परंपरा आहे. हा इतिहास लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. तो वाचविण्यासाठी चाचडगावातील कलाकारांना पुन्हा नव्याने उभारी देण्याची गरज निर्माण होताना दिसते. नाहीतर मुखवट्यांचा अज्ञातातून अज्ञाताकडील हा प्रवास अज्ञात राहू नये म्हणून या वेशीवरच्या पाऊलखुणांची नोंद आपण सर्वांनीच घ्यायला हवी.

त्र्यंबकजी डेंगळेंची सासूरवाडी आहेरगाव

इतिहासातील अनेक पात्र आपल्या आजूबाजूला वावरत असतात; मात्र त्यांच्या अभूतपूर्व कर्तृत्वाची नोंद इतिहासाच्या पानातून पुसटशी आल्याने ते बेदखल ठरू लागतात. नाशिकसाठी अज्ञात असलेल्या अशाच एका ऐतिहासिक पात्राचे नाशिकच्या आहेर गावाशी गहिरे नाते आहे. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांची सासूरवाडी म्हणजे निफाड तालुक्यातील आहेरगाव. हे गाव अनेक घटनांचे साक्षीदार आहे. तेव्हांच्या घडामोडींचा थरार आजही अनुभवता येतो.
दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती सरदार त्र्यंबकजी डेंगळे कोण होते अन्‌ त्यांचा आहेर गावशी नेमका संबंध काय हे गूढ समजून घेण्यासाठी पेशवाईच्या कारर्किदीवर नजर टाकावी लागते. सतराव्या शतकाचा शेवट अन्‌ आठराव्या शतकाची सुरूवात मराठी साम्राजाला अनेक धक्के देणारी ठरली. यात पेशवाईचा शेवट अंगावर काटे उभे करतो. श्रीमंत माधवराव पेशव्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे लहान भाऊ नारायणराव पेशवे झाले, पण त्यांचा खून झाला अन् त्यांचा मुलगा सवाई माधवराव गादीवर आले. मात्र सर्व सूत्रे नाना फडणीसांच्या हाती होती. त्यानंतर पहिल्या बाजीरावांचा पुत्र अन्‌ आनंदीबाईंचे पती रघुनाथरावांकडे पेशवाईची सूत्रे आली अन् अवघ्या एका वर्षात बारभाईप्रकरणामुळे ते पायउतार झाले. पुन्हा सत्ताकेंद्र नाना फडणीसांच्या हाती आली. त्यांनी इंग्रजांना मराठा साम्राज्यापासून दूर ठेवण्यात यश मिळविले असले तरी पेशवाईचा कारभार पेशव्यांच्या वंशजांकडे सोपविण्याचे राजकारण अनेक घडामोडींना अन्‌ अनेक लढवय्यांना तयार करत होते. रघुनाथराव पेशवे व आनंदीबाईंचा मुलगा दुसरा बाजीराव याला नाना फडणीसांच्या कैदेत होता. बाजीराव कैदेतून पेशवे होण्यासाठी खटपट करीत होते.

 पेशव्यांचे वंशजच पेशवाई चालवू शकतात हे मराठी सरदारांना पटवून देत मराठी सरदारांना आपल्याकडे वळवीत होते. पेशवाईवरून पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली. अनेक मराठी सरदार बाजीरावांच्या बाजूने असल्याचे पाहून नाना फडणीसांचा नाईलाज झाला अन्‌ छत्रपतींनी पेशवाईची सूत्रे १७९६ च्या दरम्यान दुसरे बाजीराव पेशव्यांकडे म्हणजेच रघुनाथराव पेशव्यांच्या मुलाकडे सोपवली. अनेक वर्षे कैदत असलेल्या दुसऱ्या बाजीरावांना अखेर पेशवाई मिळाली. पतीला पेशवाई मिळावी म्हणून प्रचंड खटपट करणाऱ्या आनंदीबाईच्या मुलाने अखेर त्यांची ही इच्छा पूर्ण केली. दुसऱ्या बाजीरावाला पेशवाईसाठी नाना फडणीसासारखा मुत्सद्दी अधिकारी हवा होता. मात्र दुसऱ्या बाजीरावांना नाना नको असल्याने त्याने नानांना कैदेत टाकले अन्‌ येथे जन्म झाला एका नव्या मुत्सद्दी अधिकाऱ्याचा. हा मुत्सद्दी अधिकारी होते त्र्यंबकजी डेंगळे. पेशव्यांचे सेनापती झालेले त्र्यंबकजींच्या कर्तृत्वावर अनेक मोहिमा फत्ते झाल्या. अनेक किल्ले ताब्यात आले. मराठी साम्राज्याचा पुन्हा वचक निर्माण झाल्याची स्थिती इंग्रजांच्या डोळ्यात खुपू लागली. त्र्यंबकजी इतके विश्वासातील होते की त्यांच्यासाठी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी तीन किल्ले इंग्रजांना जामीन म्हणून दिले होते. एखाद्या व्यक्तीसाठी किल्ले जामीन दिल्याची ही इतिहासातील पहिलीच घटना असावी. त्र्यंबकजींना हटवले नाही तर आपल्यालाही हे त्रासदायक होईल हे इंग्रजांनी ओळखले अन्‌ सुरूवात झाली एका सूड कथेची. ही सूडकथा आपल्या घेऊन जाते आहेर गावापर्यंत अन्‌ आहेर गावही ती कथा उलगडून सांगायला.

sas
मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकपासून ३० किलोमीटरवर पिंपळगाव बसवंत हे गाव आहे. येथून पुढे चार किलोमीटरवर वडनेरभैरव-शिरवाडे चौफुलीपूर्वी उजव्या हाताला आहेर गावाकडे घेऊन जाणारा फलक नजरेस पडतो. या रस्त्यावर पुढे गेल्यावर नेत्रावती नदीवर बांधलेला पूल ओलांडला की उजव्या हाताला हात जोडून उभ्या असलेल्या सैनिकाची अन्‌ त्याच्या दोन कुत्र्यांची प्रतिमा असलेली वीरगळ आपले स्वागत करते. नेत्रावती नदी किनारी वसलेल्या आहेरगावात प्रवेश करताना लहान मोठ्या मंदिरांचा समूह आपल्याला ख‌िळवून ठेवतो.

 वेशीसमोर महादेव मंदिराच्या डाव्या हाताला मशीद आहे. मशीदीशेजारीच दातावली ऊर्फ दत्तापीर साहेबांची समाधी आहे. दातावली बाबांच्या अनेक चमत्कारांची माहिती गावकरी देतात. गावातील हिंदू-मुस्लिम समुदायाचे हे ग्रामदैवत असून, पीर साहेबांचा व खंडेरायाचा उत्सव गावात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पीर साहेबांच्या उरसाला १८१८ ला ७०० लोक उपस्थित होते, अशी इंग्रजांच्या दप्तरी नोंद मिळते. गावात महादेव मंदिर, राम, हनुमान, खंडोबा व रोकडोमल महाराज आदी मंदिरे आहेत. गावातील रोकडोमल महाराजांची लाकडी रथातून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. रोकडोमल महाराजांचे मंदिर पिंपळगाव रस्त्याला नेत्रावती नदीपलीकडे आहे. येथे सातीआसरा देखील आहेत, असे भास्कर मोरे, फकीरा संत व मधुकर निकम सांगतात.

Untitled-1
दातावली बाबांची समाधी पाहून बाहेर पडले की, आहेरगावची वेस आपल्याला गावात यायला सांगते. पूर्वीची वेस पाडून ही वेस नव्याने बनविण्यात आली आहे. वेशीवर ग्रामपंचायत कार्यालय आहे. वेशीतून आत गेल्यावर डाव्या हाताला पारावर ज्येष्ठ मंडळींचा गप्पांचा फड रंगलेला असतो. आजूबाजूला जुन्या बांधणीची घरे गावाचा इतिहास उलगडायला लागतात. पूर्वीसारखे वैभव आता राहिले नसले तरी जुन्या-नव्या संस्कृतीचे दर्शन येथील मातीत पहायला मिळते. मात्र पारावर आजही गप्पा रंगतात त्या त्र्यंबकजी डेंगळे यांच्या. त्र्यंबकजींना आहेर गावात पकडण्यात आले होते यापलीकडे ग्रामस्थांना फारशी माहिती नाही. गावातील अवचीत अन्‌ कवचीत या गवळी असलेल्या बंधूंनी त्र्यंबक डेंगळेंना पकडून देण्याचा विडा उचलला होता व त्यांनीच त्र्यंबकजींना पकडून दिल्याचे आहेरगावकर सांगतात. मात्र काही पुसटशा नोंदी एक मोठा इतिहास समोर आणतो. यासाठी त्र्यंबकजींना समजून घेणे गरजेचे ठरते.

सरदार त्र्यंबकजी डेंगळे संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी या गावचे. ना. स. इनामदारांच्या ‘झेप’ या कादंबरीत या भन्नाट व्यक्त‌िमत्त्वाची ओळख होते. तसेच कॅप्टन ब्रीज रिपोर्ट, ग्रँट डफ यांच्या ‘मराठास्‌’ या पुस्तकातून त्र्यंबकजींबद्दल माहिती मिळते. दुसऱ्या बाजीरावांचे निकटर्तीय अशी ओळख निर्माण झाल्यानंतर त्र्यंबकजींचा दबदबा वाढला. नाना फडणीसांनंतर इंग्रज मराठा साम्राज्य ताब्यात घ्यायला आसूसले होते. मात्र आधी नाना फडणीस अन्‌ आता त्र्यंबकजी डेंगळे त्यांच्या हेतूच्या आड येत होते. त्र्यंबकजीला एखाद्या प्रकरणात गोवल्याशिवाय हा काटा दूर करणे शक्य नसल्याचे इंग्रज अधिकारी एल्फिस्टनने ओळखले. दरम्यान, पेशव्यांच्या मेव्हूणीचं लग्न बडोद्यातील गायकवाडांच्या पदरी असलेले इंग्रजांचे वकील गंगाधरशास्त्री पटवर्धन यांच्या मुलांशी जमवून आणण्यात त्र्यंबकजींच्या खेळीला यश आले होते. यानिमित्ताने गंगाधरशास्त्री गायकवाडांना पेशव्यांच्या जवळ घेऊन येतील अन्‌ गंगाधरशास्त्री इंग्रजांचे वकील असल्याने एका दगडात दोन पक्षी मारले जाणार होते हा या मागील त्र्यंबकजींचा दूरदृष्टीकोन होता. लग्न नाशिकला करायचे ठरले. लग्नासाठी सरकारवाडा सजला. मात्र इंग्रज अधिकारी अस्वस्थ झाले. त्यांनी बडोद्याच्या गायकवाडांवर दबाव वाढविला व गायकवाडांनीही हा विषय प्रतिष्ठेचा करीत लग्नाबाबत गंगाधरशास्त्रींवर नाराजी व्यक्त केली.

 इंग्रज व गायकवाडांची नाराजी फायद्याची नसल्याचे लक्षात आल्याने नाशिकमध्ये लग्नासाठी दाखल झालेल्या गंगाधरशास्त्रींनी लग्न मोडले. त्यानंतर काही महिन्यांनी पेशवे व गंगाधरशास्त्री पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले असतांना एका पहाटे गंगाधरशास्त्रींचा खून झाला. हा खून लग्न मोडल्याच्या संतापातून त्र्यंबकजीने करविल्याचा आरोप इंग्रज अधिकारी एल्फिस्टन यांनी केला व त्र्यंबकजींना अटक करण्याची मागणी केली. गंगाधरशास्त्री इंग्रजांचे वकील असल्याने त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आपली असल्याचे सांगत इंग्रजांनी त्र्यंबकजींच्या अटकेसाठी पेशव्यांकडे ससेमिरा सुरू केला. अखेर त्र्यंबकजींना अटक झाली.

इ.स.१८१६ साली ठाण्याचा किल्ल्यात (म्हणजे आजचे ठाणे कारागृह) त्र्यंबकजी पहिले राजबंदी होते. मात्र या वादळाला थोपविणे शक्य नव्हते. त्र्यंबकजी मोठ्या शिताफीने इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन तेथून निसटले. पुढे त्यांनी फौज गोळा करून इंग्रजी मुलखात मोठा धुमाकूळ घातला. इंग्रजांच्या अनेक तहांना आणि अटींना कंटाळून १८१७ ला बाजीराव पेशव्यांनी सरदार बापू गोखले, कारभारी मोरदीक्षित यांना हाताशी घेऊन, त्र्यंबकजी डेंगळे तसेच शिंदे-होळकर-भोसले यांच्या बळावर इंग्रजांविरुद्ध युद्धाची घोषणा केली. स्मिथ आणि एल्फिस्टन या इंग्रज अधिकांऱ्यांनी त्र्यंबकजींसाठी पेशव्यांवर दबाव वाढविला. डेंगळेंची अटक टाळण्यासाठी पेशव्यांनी अनेक प्रयत्न केले. अखेर त्र्यंबकजी हाती येत नसल्याने पेशवाई ताब्यात घेण्याची धमकी देणे सुरू केल्यावर तडजोड म्हणून त्र्यंबकजींच्या जामिनापोटी सिंहगड, पुरंदर, रायगड हे किल्ले इंग्रजांच्या स्वाधीन करण्याची वेळ पेशव्यांवर आली. हा तह १३ जून १८१७ रोजी पार पडला. मात्र इंग्रजांच्या सततच्या पिच्छामुळे अन्‌ पेशव्यांनीही हतबलता दाखविल्याने त्र्यंबकजी गहिवरले. त्यांनी या सर्वांतून निवृत्त होत सांसरीक जीवन जगण्यासाठी निवडले ते म्हणजे नाशिकजवळचे आहेरगाव. आहेरगाव ही त्र्यंबकजींची सासूरवाडी. त्यांची पत्नी येथील देशमुखांच्या घरातील. हाती असलेल्या पैशातून गुरे घेऊन आहेर गावात कुटुंबासह राहू लागले. यादरम्यान गावातील अवचीत अन्‌ कवचीत यांच्याशी वाद झाले असावेत यातून त्र्यंबकजीने त्यांना जखमी केले. या घटनेमुळे गवळी कुटुंबातील महिला दुखावली. या घटनेचा सूड उगविण्यासाठी त‌िने चांदोर (आताचे चांदवड) येथे जाऊन त्र्यंबकजी आहेरगावात लपल्याची खबर दिली. कॅप्टन ब्रीजच्या रिपोर्टनुसार, त्र्यंबकजीने गावातील एका व्यक्तीला जखमी केले होते. याचा सूड घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या पत्नीने चांदोरला जाऊन त्र्यंबकजींबद्दल माहिती दिली.

कॅ. ब्रीजने कॅ. स्वान्स्टन याला सैन्यांसह पाठवून गावाला वेढा दिला. त्र्यंबकजी एका घराच्या तळघरातील गवऱ्या ठेवण्याच्या ढिगाऱ्याखाली लपलेल्या स्थितीत सापडला, असे गावकरी सांगतात. या घटनेनंतर त्र्यंबकजींना अटक करून चांदवडला व नंतर बंगालमधील चुनारगढच्या कारागृहात हलविण्यात आले. यानंतर त्र्यंबकजी डेंगळेंचे काय झाले. त्यांच्या कुटुंबाचे काय झाले हे याची कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे ज्ञानेश्वर देशमुख सांगतात. त्र्यंबकजींची पत्नी देशमुखांची मुलगी होती अन्‌ त्यांना आहेरगावात इंग्रजांनी पकडले होते. एवढीच माहिती आतापर्यंत वाडवडिलांकडून ऐकली असल्याचेही ते सांगतात.
गाववेशीतून बाहेर पडल्यावर डाव्या हाताला दोन दीपस्तंभ व त्यासमोरील अनोखी वीरगळ नजरेत भरते.

 यातील एका दीपस्तंभावरील शिलालेख पुसट झाल्याने वाचता येत नाही. तर दुसरा स्तंभ ही वीरगळ आहे. तिची उंची अधिक असल्याने ही त्र्यंबकजींची वीरगळ असावी का? असाही कयास बांधता येतो. जवळच नेत्रावती किनारी त्र्यंबक डेंगळेंच्या पत्नीची समाधी आहे. ही सती गेल्याचे म्हटले जाते. सतीमातेच्या या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. त्र्यंबकजींची पत्नी सती गेली असेल तर त्र्यंबकजींना मृत्यूनंतर त्यांना गावात आणले असावे का? की कारागृहातून सुटल्यानंतर ते पुन्हा आहेरगावात आले असावेत अन्‌ तेथेच त्यांचा मृत्यू झाला असावा. हा अज्ञात इतिहास अस्वस्थ तर करतोच; पण एक मुत्सद्दी अन्‌ लढवय्या सेनापतीची अखेर नेमकी कशी झाली असेल अशा अनेक प्रश्नांनी मन भांबावून जाते. म्हणूनच आहेरगाव वेगळे ठरते!

व‌िरांचे एकदरे

इतिहासाच्या खाणाखुणांनी गजबजलेलं दमणगंगेच्या तिरावर वसलेले पेठ तालुक्यातील एकदरे फक्त एक सर्वसामान्य गाव नाही, तर हे गाव भावतं ते तेथील वीरगळींच्या समुहामुळे, वारली समाजाच्या वास्तवामुळे अन् कॉफीच्या अनोख्या गंधांमुळे. वारली चित्रकलेचा आनंद अन् वीरगळींवरील वीरांच्या कथा हरपल्याने एकदरेचा अज्ञात प्रवास मात्र अस्वस्थ करतो…

virgal

वीरगळ व सतीशीळा नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी दिसून येतात. सततच्या लढाया, परकीय आक्रमणे यामुळे धारातीर्थी पडणाऱ्या विरांचे स्मृतीमंदिर म्हणून गावागावांमध्ये वीरगळ उभारल्या गेल्या. वीरगळींबरोबरच उभारल्या गेलेल्या सतीशिळा आपल्याला जुन्या प्रथांची आठवण करून देतात. त्या वीरांची पत्नी आपल्या पतीबरोबर सती जात असल्याचे या वीरगळ सांगतात. त्यामुळे त्यावेळच्या समाजमनावरही प्रकाश पडतो. रणभूमीत अथवा एखाद्या धाडसी कामात वीरगती पावलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ उभारलेला वैशिष्ट्यपूर्ण दगड म्हणजे (हिरो स्टोन) वीरगळ. विराचा दगड या अर्थाच्या वीर-कल या कन्नड शब्दावरून वीरगळ हा शब्द आला. वीरगळाला विराचा दगड किंवा केवळ वीर म्हणूनही संबोधले जाते. वीरगळांची उगम कर्नाटकात झाला अन् तेथून त्यांचा महाराष्ट्रात प्रसार झाल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात. कल्याणी चालुक्य, राष्ट्रकूट या कन्नड राजघराण्यांची सत्ता असलेल्या प्रदेशात वीरगळी आढळण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या वीरगळींना ऐतिहासिक व शिल्पशास्त्रीय महत्त्व आहे. अनेकदा वीरगळींवर वीर धारातीर्थी पडला तेथील युध्दप्रसंग कोरलेला असतो. गावाचे संरक्षण करताना अथवा वाघापासून गावाचे संरक्षण करताना वीरपुरूष मरण पावल्यास त्याच्या स्मृती म्हणूनही वीरगळ उभारली जाते.

virgal1

प्रत्येक वीरगळ वेगवेगळ्या घटना सांगतात. त्या वीराच्या कथा शेकडो वर्षांपासून आपल्या ह्दयाशी जपून ठेवताना दिसतात. वीरगळीच्या सर्वांत वरच्या बाजूला देवळाच्या कळसासारखा अथवा गोलाकार त्रिकोणी आकार असतो. वीरगळीवर घोड्यावर बसलेला वीर हातात तलवार घेऊन कोरलेला असतो. वरच्या बाजूला अथवा खाली एक किंवा दोन महिलांच्या प्रतिमा कोरलेल्या असतात. या महिला म्हणजे त्या विराच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या बायका दाखविलेल्या असतात. तसेच वीरगळीवर वरच्या बाजूला दोन्ही बाजूस चंद्र-सूर्य कोरलेले असतात. जोपर्यंत चंद्र-सूर्य उगवत आहेत, तोवर या विराची कीर्ती कायम राहील, हे यातून वीरगळ उभारणाऱ्यांना सांगायचे असेल. आदिवासी भागात सपाट शिळेवरील वीरगळी अधिक दिसतात. त्यांची उंची एक ते अगदी दहा फुटापर्यंतही असते. तर शिव म‌ंदिरांभवती असणाऱ्या वीरगळींचा आकार चौकोनी गोलकडा अन् प्रमाणबद्ध असलेली असते. वीरगळाची रचना, नक्षीकामही त्या-त्या वेळच्या काळाच्या कडा उलगडतात. घोड्यावरील विराच्या वेशभूषेवरून व डोक्यावरील टोपावरून तसेच वीरगळीवरील नक्षीवरून तो वीर किती प्रबळ होता हे दाखविले जाते. तर आदिवासी भागात दगडी वीरगळींबरोबरच गावातील प्रसिद्ध, हुकमी व्यक्तीच्या च‌िराही उभारण्याची पद्धत पूर्वी होती. त्याचे शिल्लक अवशेष अन् अस्पष्ट व अज्ञात होत असलेल्या वीरगळी एकदरेत पहायला मिळतात. एकदरेतील हा इतिहास अज्ञात असला तरी हे गाव वीरांचे गाव असल्याचे वीरगळींचा हा समूह दाखवितो.

virgal2

नाशिक-पेठ रस्त्यावर साधारण ४० किलोमीटरवर डाव्या हाताला कोटंबे हे गाव लागतं. गावाच्या कमानीतून आत जाणाऱ्या फलकावर उस्थळे, देवगाव, गोंदे व घनशेतकडे घेऊन जाणारा फलक दाखवितो. फलकावर एकदरे नसले तरी याच रस्त्याने चार किलोमीटर गेल्यावर एक चौफुली लागते. चौफुलीवर कोठेही न वळता दमणगंगेला डाव्याहाताला ठेऊन पाच-सहा किलोमीटर गेल्यावर गंगेच्या काठावर वसलेले एकदरे पहायला मिळते. चौफुलीपासून एकदरेपर्यंतचा प्रवास खडतर रस्ता अन् अवघड घाट हैराण करीत असला तरी दमणगंगेची सोबत मिळाल्याने हा प्रवास अल्हाददायक होतो. सागाची झाडे अन् डोंगरउतारावर आदिवासींची घरे, शेत पाहताना दमछाक करणाऱ्या प्रवासाचा विसर पडतो. एकदरेत प्रवेश करताना डाव्या हाताचे लाकडी बांधणीचे हनुमान मंदिर व उजव्या हाताकडेचा वीरगळींचा समूह आपले स्वागत करतो. हेदपाडा, उसनळा व एकदरा अशा तीन पाड्यांचे सातशे लोकसंख्येचं एकदरे हे वारली आदिवासी समाजाचे गाव आहे. या वीरगळी केव्हापासून येथे आहेत याचे उत्तर गावात कोणाकडेही नाही. मुळात यांना वीरगळ म्हटले जाते हेच त्यांना माहीत नाही. आदिवासींच्या दृष्टीने या चिरा आहेत. त्यांच्या घरातील कोणाच्या तरी असाव्यात, असे ते सांगतात. पंधरा-वीस वीरगळींचा हा समूह एका रांगेत उभा केलेला आहे. आदिवासींसाठी या च‌िरा त्यांच्या पूर्वजांच्या असल्याने त्या वीरगळींना शेंदूर फासलेला आहे. सण-उत्सवाच्या काळात त्यांना नेवैद्यही दाखविला जातो. या वीरगळी नेमक्या कोणाच्या हे कोणालाही सांगता येणार नाही, असे शंकर सापटे सांगतात.

एका वीरगळीवर काळाराम सापटे असे नाव असून, काळाराम सापटे यांची वीरगळ दोन चौकटींची आहे. वरच्या चौकटीत वीर घोड्यावर बसलेला असून, त्याच्या हातात काठी आहे. तर त्या चौकटीवर चंद्र, सूर्य कोरण्यात आला आहे. खालील चौकटीत कंबरेवर हात ठेवलेली त्या वीराच्या बायकोची प्रतिमा असून, तिच्या दोन्ही बाजूला झाडवेलीची प्रतिमा आहे. शंकर सापटे आमच्या पूर्वजांपैकी एक असल्याचे ते सांगतात. मात्र ते कोण होते अन् ही वीरगळ केव्हा उभारली हे अज्ञात आहे. एकदरेतील या वीरगळींच्या समूहाचे कौतुक तेथील आदिवासींनाही आहे. मात्र मागील पन्नास वर्षांपासून एकही वीरगळ उभारली नसल्याचे पुंडलिक बात्रे सांगतात. गावात लाकडी चिराही उभारल्या जातात. मात्र ही प्रथाही आता बंद झाली आहे. दगडी वीरगळींनंतर लाकडी चिरा उभारण्याची परंपरा आदिवासींमध्ये होती. या चिरा गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या स्मरणार्थ उभारल्या जात असत; मात्र आता त्याही उभारणे बंद झाले आहे. लाकडी च‌िराही येथे पहायला मिळतात. त्यांच्यावरही ती व्यक्ती कोणत्या कारणाणे मरण पावली ते कोरलेले असते व त्यावरही सूर्यचंद्र कोरलेला असतो. मात्र आता त्या दुर्मिळ होत चालल्या आहेत, असेही ते सांगतात. मात्र या चिरा व वीरगळ वैशिष्टपूर्ण असून, त्यावरील नक्षी, वीराचे हावभाव, त्यांच्या बायकांची लगबग, पेहराव, दागदागिने व वीरगळीचे नक्षीकामावरून त्यावेळच्या जीवनशैलीची कल्पना येते. मात्र आताची आदिवासी बांधवांची परिस्थिती पाहिली तर कोठे गेले ते वैभव असा प्रश्न पडतो.

एकदरेत वारली आदिवासी राहतात. वारली ही जंगल व डोंगराळ प्रदेशात वास्तव्य करून राहत आलेली एक प्राचीन आदिवासी जमात आहे. वारलं म्हणजे नांगरलेल्या जमिनीचा भाग, तुकडा; ‘ वारली ‘ शब्द याच अर्थाचे समूहनाम/ विशेषनाम आहे. वारली म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर चटकन वारली चित्रकला येते. या आदिवासी संस्कृतीची वारली चित्रकला ही अविभाज्य अंग असली तरी एकदरेत ही कला नामशेष झालेली दिसते. या कलेला आपल्याकडे व्यासपीठ न मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात टिकून असलेली ही कला हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. लग्नसोहळ्यांमध्ये मातीच्या घरांच्या भिंतींवर लग्नाचा चौकाच्या चित्रातून दिसणारी ही कला अखेरचा श्वास घेताना दिसते. एकदरेत आता कोणीही वारली चित्र काढत नाही. काही लोकगीतेच फक्त होळी, दिवाळी आदी सणांना गायली जात असल्याने ती टिकून आहेत, असे जानू भोंडवे व पुनाबाई भोंडवे सांगतात.

वरूण देवाला प्रसन्न करण्यासाठी कांबडी नाच मात्र एकदरेत पहायला मिळतो. कांब म्हणजे काठी. ज्याच्या हाती घुंगरे लावलेली कांब असते तो कांबडी. मांदल नाच होळीत तर घोर नाच किंवा टिपरी नाच दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत केला जातो. भक्तीभावाने अन् बेभान होऊन काठी नाचविली जाते. अशीच एक सागाची उंच काठी मारूती मंदिरासमोर उभी करण्यात आली आहे. तिला सणांमध्ये सजवलं जातं. मात्र बोहाडे अथवा सोंगे करण्याची परंपरा गेल्या पंधरावर्षांपासून बंद पडली आहे. पाड्यावर वीज आली तसा टीव्हीही आला अन् बोहाड्याची जागा या मनोरंजन करणाऱ्या चौकटीने घेतली. मात्र वारली आदिवासींची प्रथा परंपरेवरील श्रद्धा कमी झालेली नाही. मारूती मंदिरात नियमित सप्ताह होतो. मारूती मंदिरापासून काही अंतरावर दमणगंगा वाहते. दमणगंगेचा करंजी डोह एकदरेच्या ग्रामस्थांसाठी खास आहे. तेथे देवीचे व शंकराचे छोटेखानी मंदिर आहे. या डोहाबद्दल अख्यायिका आहे मात्र ती सांगणारी पिढी आता गावात नसल्याने आता ती कोणाला सांगता येत नाही. नाचणी, उडीद, भात या पारंपरिक पिकांबरोबर अनेक रानभाज्याही हे आदिवासी दररोजच्या गरजा म्हणून पिकवितात. त्यांची एक सवय मात्र अजब आहे. ती म्हणजे चहा ऐवजी कॉफी पिण्याची. कॉफी! हो धक्का बसेल पण, एकदरेतील बहुतांश आदिवासी चहा पित नाहीत तर कॉफी पितात. याला कारणही तसं आहे. टाकळा ही कोवळ्या पानाची पालेभाजी आदिवासी पिकवितात. टाकळा या रानभाजीला शास्त्रीय नाव आहे कॅशिआ टोरा. हे गाव डॉ. देवदत्त देशमुख यांनी लक्षात आणून दिले. आदिवासी गावांमध्ये त्वचा रोगाचे प्रमाण अधिक असते. मात्र इतर आदिवासी गावांप्रमाणे एकदरेत त्वचारोग नाही. याला ही कॉफी म्हणजे ही टाकळा (कॅशिआ टोरा) अनुकल ठरत असल्याचेही डॉ. देशमुख सांगतात. या रानभाजीला शेंगाही येतात. त्या शेंगांची भाजीही केली जाते. टाकळाच्या बियांना तरोटाही म्हणतात. त्या तव्यावर कडक गरम करून नाचणी दळावी तसे ते टाकळाच्या बिया म्हणजेच तरोटा जात्यावर दळतात अन् तयार होते कॉफी! तरोट्याचे पिठाची ही कॉफी ओठांवर खिळून राहते. एकदरेत गेलात अन् कॉफी पिली नाही तर ही सफर पूर्ण होत नाही. कॉफी केव्हापासून केली जाते हेही त्यांना माहिती नाही मात्र गेली अनेक पिढ्या हेच चालत असेल, असे ते सांगतात.

नदीचा काठ असो वा लेणीच्या परिसरातील गावे आपल्या संस्कृतीच्या खाणाखुणा असलेल्या वीरगळ, सतीशिळा अनेक गावांमध्ये विखुरलेल्या रूपात पहायला मिळतात. यावर पुरेसे संशोधन न झाल्याने हे शिल्प कोणी उभारले अन् केव्हा उभारली तसेच ही शिल्पे नक्की काय आहेत असा अनेकांना प्रश्न पडतो. हा अज्ञात वारसा नोंदविला गेला पाहिजे, त्यादृष्टीने प्रयत्न झाल्यास मोठा वारसा पुढील पिढ्यांना किमान पाहण्यासाठी तरी साठविता येईल, असे एकदरे सांगताना दिसतो.

भैरवमय वडनेर

शेकडो वर्षांचा इतिहास अंगाखांद्यावर घेऊन मिरविणारे वडनेर भैरव हे गाव आपल्या वेगळेपणाबद्दल अजूनही अज्ञात आहे. मुख्य बाजारपेठ व त्याकाळी जिल्ह्याचे स्थान असलेले ऐतिहासिक वडनेर प्राचीन ताम्रपटातून उलगडते. भैरवनाथाचे मंदिर अन् रथयात्रेच्या परंपरेमुळे प्राचीन वडनेर भैरवमय झाल्याचे अनुभवायला मिळते.

नाशिक-चांदवड रस्त्यावर ४१ किलोमीटरवर शिरवाडे फाटा लागतो. तेथून वडनेर भैरव ४ किलोमीटर आहे. फाट्यावरून डाव्या हाताने वडनेर भैरवकडे निघाल्यावर लगेचच पालखेडचा कालवा लागतो. तो ओलांडताना डाव्या हाताच्या वडाच्या झाडाखालील एक अनोखी वीरगळ आपल्या स्वागताला सज्ज असलेली दिसते. वीरगळीला न्याहाळताना आपली पावलं एका ऐतिहासिक गावाकडे झेपावताहेत असं वाटायला लागतं अन् मनात कुतुहल निर्माण होतं ते नेत्रावती नदीच्या कुशीत वसलेल्या गावाचं वडनेर भैरव असं नाव कसं पडलं असेल याचं. पूर्वी वडनेर अन् भैरव ही दोन वेगळी गावं होती. वडनेर म्हणजे वड नेहार म्हणजेच वडांच्या झाडांचा समूह अथवा थापी अन् नेहर म्हणजे नदी. नदीच्या लगत असलेल्या वडांच्या झाडांचा समूह ते वडनेर. तसेच वटक ऋषी नावांच्या ऋषींनी हे नगर वसवल्याचा पुराणामध्ये उल्लेख मिळतो. म्हणूनही गावाला वडनेर म्हटले गेले असावे, असे ग्रामस्थ सांगतात. भैरव गावाला भैरवनाथाच्या मंदिरामुळे भैरव नाव पडले असावे. वडनेर व भैरव ही दोन्ही गावे केव्हापासून एक झाली हे सांगणारी पिढी अथवा नोंद उपलब्ध नाही. मात्र वडनेर व भैरव ही दोन गावे वेगळी होती हे निश्चित करण्यासाठी दोन्ही गावांच्या दोन वेशी, दोन मारूती मंदिरे, दोन तालमी पुरेशा ठरतात. वडनेर भैरव ही गावे एक होण्याबाबत शिंदे व होळकर घराण्यांमधील एक व्यवहाराची नोंदही महत्त्वाची ठरते. अहिल्याबाई होळकरांनी भैरव गावातील भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हापासून वडनेर भैरवशी जोडले जावे म्हणून त्यांनी ग्वाल्हेरच्या शिंद्यांना त्यांच्या वणीच्या महसुलात असलेल्या वडनेर गावच्या बदल्यात चांदवडच्या महसुलातील पाचोरे, शिरवाडे, आहेरगाव ही गावे दिली. त्यामुळे ही गावे आता वणी पाचोरे, वणी शिरवाडे व वणी आहेरगाव अशी ओळखली जातात. तर वडनेरला भैरवचे वैभव लाभल्याने वडनेर हे वडनेर भैरव म्हणून ओळखले जाऊ लागले. भैरवनाथाच्या संस्थानाला १२५० पासून ४४१ बिगा जमीन मिळाल्याचा उल्लेख गुरवांकडील एक दस्तात मिळतो, अशी माहिती चंद्रकांत भंडारे यांनी दिली. गावात प्रवेश करताना मल्लासारखा दिसणारी आग्या वेताळाची मूर्ती आपले स्वागत करते. हे गाव मल्लांसाठीही प्रसिद्ध असल्याचे जणू वेताळ देव सांगायला लागतो. मंदिरासमोर रस्त्यापलीकडे वर्तुळाकार दगड आहे. हे भैरव मंदिराच्या दीपमाळेचे दगड आपल्याला गावाच्या इतिहासात डोकवायला लावतात.

vadner-bhairav-temple
वडनेर भैरवचा प्रवास येथेच संपत नाही तर हा प्रवास आपल्याला येथून १४०० वर्ष मागे मूळच्या प्राचीन वडनेरपर्यंत घेऊन जातो. वडनेरचा उल्लेख आतापर्यंत तृतीय गोविंद राजाचा शके ७३० मधील वणी ताम्रपटात मिळतो. हा ताम्रपट दिंडोरी येथे सापडला असून, सध्या हा ताम्रपट बॉम्बे ब्रँच ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटीत आहे. हा ताम्रपट संस्कृत नागरी लिपीत असून, राष्ट्रकूट नृपती गोविंद तृतीय यांच्या आमदानीतील आहे. या ताम्रपटाचा मुख्य उद्देश राजाने मयूरखंडी (म्हणजे वणीचा मार्केंडेय किल्ला) या राजधानीतून वेंगीनिवासी भारद्वाज गोत्री द्विवेदी दामोदर याचा पुत्र चतुर्वेदी दामोदरभट्ट याला नाशिक देशातील वटनगर (आताचे वडनेर भैरव) विषयातील (म्हणजे जिल्ह्याचे ठिकाण अथवा प्रमुख केंद्र) अंबकग्राम (अंबकग्राम म्हणजे वणीच्या दक्षिणेस ८ मैलांवरील अंबे हे गाव) दान दिले हे नमूद करण्याचा हेतू आहे. हा ताम्रपट वत्सराजपुत्र अरूणादित्य याने लिहिला व यावेळी याचा दूतक भुविराम होता. असे या ताम्रपटात नमूद करण्यात आले आहे. वडनेर येथील नाना ऊर्फ अहिराजी तिडके यांच्याजवळ १९१२ रोजी ताम्रपट मिळाला. हा ताम्रपट कलचुरी नृपती बुद्धराज यांचा असून तो संस्कृत भाषेत असून लिपी दाक्षिणात्य वळणाची आहे. हा ताम्रपट कलचुरी नृपती शंकरगणाचा पुत्र बुद्धराज यांच्या काळातील असून, बुद्धराजाने वटनगरचा काश्यप गोत्री ब्राह्मण बोधस्वामी याला वटनगर भागातील भट्टऊरिका जवळचे कोणिकांचे गाव दान दिले हे नमूद करण्यासाठी हा ताम्रपट कोरला. हा आदेश विदिशा (मध्य प्रदेशातील हल्लीचे बेसनगर) येथील लष्करी तळावरून अनंतमाहायी नावाच्या राणीच्या आदेशावरून महासांधिविग्रहिक अनाफित याने लिहिला. महाबलाधिकृत प्रसह्यविग्रह हा या वेळी दूतक होता. या ताम्रपटांमधील वडनेरच्या उल्लेखावरून वडनेर मुख्य बाजारपेठ असल्याचे निर्देश करते. यातील आणखी एक ताम्रपट गावातील एका व्यक्तीकडे आहे. मात्र तो दाखविला जात नसल्याने वडनेर भैरवच्या इतिहासाचे अनेक पैलू अजूनही अज्ञात आहेत. मारूती मंदिरातील दगडावरील शिलालेख ग्रामस्थांनी न जपल्याने त्यावर नोंदविलेला इतिहास गमावला आहे. हा शिलालेख कुठे आहे हे कोणालाही माहिती नाही. गावाबद्दलच्या अशा पाऊलखुणा समजल्या जाण्याची गरज आहे.

बाराबलुतेदारांचे वडनेर भैरव गाव आजही गावगाड्याची ही रचना पेठांच्या माध्यमातून स्पष्टपणे दाखविते. मुख्य बाजारपेठ रस्त्याला बाराही बलुतेदारांची दुकाने असल्याचे आजही पहायला मिळतात. ही पेठ पाहताना व्यापाऱ्यांच्या लाकडी नक्षीकामातील माड्या पाहताना नवल वाटते. त्यामुळे वडनेर भैरवच्या या पेठेला गुलजार पेठ असेही म्हणतात. `गुलजार पेठ वडनेरेची, चल सजने तुला दाखवितो’ असे शिरवाडच्या रघुनाथ माळी या शाहीराने नोंदवून ठेवले आहे. यावरून वडनेरच्या व्यापारी पेठेचे गुलजार (आबादीआबाद) महत्त्व समोर येते. दोन्ही गावच्या वेशी आज नाहीत. मात्र बाजारपेठ गल्लीने गावचे वैभव आजही टिकवून ठेवल्याचे दिसते. प्राचीन वडनेर भैरवची औरंगजेबाच्या काळात हानी झाली. औरंगजेबाने गावातील मंदिरे पाडण्याचे आदेश दिले. तेव्हा चार मुस्लिम सरदारांनी भैरवनाथाचे मंदिराचा कळस पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र कळसावर चढलेले ते सरदार वरून खाली पडून मरण पावले. त्यांच्या चार दगडी शिळा आजही मंदिराभवती आहेत. तेव्हा गावातील भैरव गावातील तिडके पाटील यांनी औरंगजेबाला असे न करण्याची विनंती केली. तेव्हा औरंगजेबाने तिडकेंना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगितले. मंदिर पाडले जाऊ नये म्हणून तिडकेंनी मुस्लिम धर्म स्वीकारला व ते तिडकेंचे पटेल झाले. त्यामुळे भैरवनाथाच्या पालखी सोहळ्यात पटेलांनाही पूजेचा मान आहे. पोळ्याच्या दिवशी वडनेरच्या वेशीतून भालेरावांचे व भैरवच्या वेशीतून तिडके (आताचे पटेल) यांचे मानाचे बैल वाजत गाजत प्रवेश करतात. गावातील बाराही बलुतेदारांना म्हणजेच प्रत्येक समाजाला मानपान दिला जातो, अशी माहिती अरूण तारकुंडे व सोपान वक्ते यांनी दिली.

औरंगजेबाच्या त्रासानंतर गाव पुन्हा स्थिरस्थावर झाले ते आहिल्याबाई होळकरांच्या काळात. अहिल्याबाईंनी भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. गावात तीन मजली चावडी बांधली, भैरवनाथ मंदिराजवळ बारव बांधली. अहिल्याबाईंनी बांधलेल्या गावात एकूण चार बारवा आहेत. त्यातील पाचोरा रस्त्यावरील बारवच आज पहायला मिळते. गावात न्यायनिवाड्यासाठी फकिरांची चावडी होती. गाव इंग्रजांच्या काळातही प्रसिद्ध होते ते दरोडेखोरांसाठी. गावावर सतत दरोडे पडत असल्याने १८०० पासून येथे पोलिस स्टेशन होते. त्यामुळे येथे स्वातंत्र्यचळवळही बळावल्याने स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणूनही वडनेरला ओळखले जाते. स्वातंत्र्य सैनिक फकिरदास भालेराव हे गावचे पहिले सरपंच होते. विशेष म्हणजे १९४५ दरम्यान गावात किसान चित्रमंदिर टॉकिज उभे राहिले होते. मशालींच्या प्रकाशात येथे नाटके सादर होत असतं. टुरिंग टॉकिज हा फिरता नाटकाचा मंच गावात येत असे. नाट्य परंपराही गावात जपली जात होती. १९६० च्या दरम्यान गावात वीज दाखल झाली. याच दरम्यान, गावात सार्वजनिक वाचनालय उभारण्यासाठी ग्रामस्थांनी नाट्य चळवळ सुरू केली. गावकऱ्यांनी नाटक बसवून पैसा उभा केला व वाचनालय उभारले, अशी आठवणही ज्येष्ठ मंडळी सांगतात. आजही अरूण तारकुंडे नाटकांतील त्या पात्रांचे डायलॉग म्हणून दाखविताना किसान चित्रमंदिर टॉकिज मंदिरात बसून त्यांना अभिनय पाहत असल्याचा भास होतो. चित्रमंदिरनंतर जळाले अन् टिव्ही दाखल झाल्यानंतर फिरत्या टुरिंग टॉकिजलाही घरघर लागली. गावातील बोहाडे साजरा करण्याची परंपराही ९० च्या दशकात बंद पडली. सध्या वाचनालय एक छोट्याशा जागेत चालविले जाते. याची स्वतंत्र इमारत होण्याची गरज आहे. भैरवनाथाचे मंदिर सुंदर सभामंडप आवर्जून पाहण्यासारखा आहे. मंदिराचा मूळ मंदिर गाभारा दगडी आहे. त्यात भैरवनाथ, जोगेश्वरीची राळ्याच्या लुकनने बनवलेला मुखवटा आहे. जोगेश्वरी शेजारी तिची पाठराखण पुतळाबाईची मूर्ती आहे. मंदिराच्या उजव्या हाताच्या दरवाजातून आत गेल्यावर भैरवनाथाच्या रथाचे अवशेष ठेवलेले आहेत. चैत्रेला उत्सवासाठी हे अवशेष जोडून रथ बनविला जातो. तेथून पुढे माहुरची रेणुका मातेची तांदळा आहे. त्याशेजारी भैरवाची व शंभर पार्वतीची दगडी मूर्ती आहे. भैरवनाथाचा उत्सव हे वडनेर भैरवचे मुख्य आकर्षण असते. या उत्सवात रथयात्रा चौवीस तास अविश्रांत चालते. रथात भैरवनाथाची मूर्ती ठेवण्यापासून प्रत्येक चौकात पूजेच्या मानपानाचे त्या त्या समाजाचे मानपान आधीपासून ठरलेले आहेत. त्यानुसार भैरवनाथाची म‌िरवणूक गावातून डोंगरकडेच्या कोकणटेंभी वस्तीजवळच्या जानुसघरात (जानोसा) येथे भैरवाच्या लग्नासाठी जाते. तेथे भैरवाचा जोगेश्वरीशी विवाह लावला जातो व पुन्हा मिरवणूक मंदिराच्या दिशेने गावातून काढली जाते. यावेळी महिला मिरवणुकीसमोर दंडवत घालतात तर पुरूष मंडळी मिरवणुकीसमोर लोटांगण घालतात. हा सोहळा अनुभवण्यासारखा असतो. गावात गणपती, मारूती मंदिरे आहेत. ईदगाह व जामा मशीदही आहे. भैरवनाथ मंदिरामागे गोसावी समाजाच्या समाधी असून, त्या पाहण्यासारख्या आहेत. बाबुराव गोसावी यांनी त्याला चांगल्याबद्दतीने सांभाळल्या आहेत. गावात दहा-बारा मठ होते. यात नागासाधूंचे मठ सर्वाधिक होते. मात्र आज फक्त एकच पुरी मठ गावात आहे. संत जिवनेश्वर काळू बाबा हे वडनेरचेच. त्यांची समाधी आणि मंदीर वडनेर-शिरवाडे रस्त्यावर आहे.

सोनार अन् ब्राह्मणांसाठी ओळखले जाणारे वडनेर भैरव हे गाव पूर्वी नागवेलींच्या पाणमळ्यासाठी प्रसिद्ध होते. आता हे गाव द्राक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. काळानुसार गावची ओळख बदलली असली तरी गावचा प्राचीन इतिहास आपली ओळख ठळक व्हावा, यासाठी आसुसलेला पहायला मिळतो. प्राचीन वास्तु, ताम्रपट, वीरगळ व शिलालेखांच्या माध्यमातून गावाभर विखुरलेल्या पाऊलखुणा जपण्याची गरज हे गाव मनापासून व्यक्त करते.

शिवमंदिर – ओढा (नाशिक)

 https://bhatakbhavani4216.wordpress.com/2021/01/13/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0-%e0%a4%93%e0%a4%a2%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95/

काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वर फिरणारा एक फोटो आणि सोबत, “नाशिकरोड जवळील ओढा गावातील शिवमंदिर” इतकीच माहिती मिळाली.. पण याच्या पुढे काहीच माहिती सापडत न्हवती. मग काय अचानक बेत करून आपली भटक भवानी काढून नाशिकचा रस्ता धरला..
मुंबई – आग्रा हायवे ने नाशिक गाठून नंतर निफाड, ओरंगाबाद रस्त्यावरच ओढा गाव आहे. गावातील गोदावरीच्या काठावरील गणेश घाट आणि श्री सिद्धिविनायक मंदिरासाठी गाव प्रसिद्ध आहे. गावातील छत्रपती शिवाजी महाराज ग्रामपंचायत कार्यालयाजवळून एक रस्ता गणेश घाटाकडे जातो, याच रस्त्यावर डाव्या बाजूला हे जीर्ण शिव मंदिर आहे. मंदिराचा कळसाचा भाग कोसळला असून उर्वरित मंदिर सुद्धा खंडर बनलेले आहे. मंदिरासमोर कोण्या गोसाविबुवांची समाधी आहे. समाधीसमोर दिवाबत्तीची सोय केलेली आहे. मात्र समाधी नेमकी कोणाची याविषयी माहिती मिळत नाही. काही पायऱ्या चढून समाधीवर आले असता समाधीवर एक शिवलिंग ठेवलेले आढळते. हे बघून मंदिराकडे यायचे. तीन-चार फूट उंचीच्या पिठावर हे मंदिर उभारलेलं आहे. मंदिरात प्रवेश केला की आधी आतून निघणारा चिमण्यांच्या थवा आपले स्वागत करतो. मंदिराच्या बाहेरील भागातील खांबांच्या वर आपल्याला मंदिराच्या छताचा बाबर तोलणारे यक्ष आहेत.
मंदिर मुखमंडप आणि गाभारा असे दोन भागांचे असावे. बाहेरील भागात दोन्ही बाजूंना दोन देवकोष्टके आहेत मात्र ती रिकामीच आहेत. मूळ स्तंभांच्या सोबतच टेकू म्हणून एक लाकडी स्तंभ इथे लावलेला आहे. गाभाऱ्याच्या चौकटीवर ललाट पट्टीवर श्रीगणेशाचे शिल्प आहे. त्याच्या वर अजून एक श्री गणेश कोरलेले असून ही मूर्ती #उजव्या_सोंडेची आहे.
हे बघून आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो. मध्यभागी साधारण १२ खांबाचा चौकोनी असा गाभारा इथं तयार झालेला आहे, भग्नावस्थेत गेलेल्या मंदिरात पूज्य देवता किंवा शिवलिंग नाही. सध्या ही जागा रिकामीच आहे, गाभाऱ्यातील शिवलिंगच जागेवर माती आणि दगड आहेत. गाभाऱ्याच्या मागील बाजूला एक खिडकी/ वातायन आहे. याच्या चौकटीवर खालील बाजूला देवी चे शिल्प आहे. गाभाऱ्यात आजूबाजूला मात्र कोळी, उंदीर या प्राण्यांचेच साम्राज्य आहे.
मंदिर भग्नावस्थेत असल्याने इथं कोणीच फिरकत नाही, म्हणूनच की काय वाढलेल्या झुडपात सध्या साप आणि इतर प्राण्यांनी आपला ठाण मांडलेला आहे.
गणेश घाटावर नवीन शिवमंदिर, हनुमान मंदिर, गणेश मंदिर आणि प्रशस्त बांधलेला घाट इतकं सगळं बघितलं की मग हा प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा असा दुरावस्थेत का? अस प्रश्न आपल्याला नक्किच पडेल. ओढा गावात श्री गणेशांच्या दर्शनाला जाणारी भाविकांनी एखादा क्षण इथं थांबून या शिवमंदिराचे देव दर्शन नाही तरी देऊळ दर्शन करायला हरकत नाही.

शिवमंदिर
गोसाविबुवांची समाधी आणि शिवमंदिर
मुखमंडपाचे स्तंभ
मुखनमंडपातील स्तंभावरील यक्ष मूर्ती
मुखमांडपातील मूळ स्तंभ,त्या शेजारी लाकडी खांब, आणि मागे रिकामी देवकोष्टक
रिकामी देवकोष्टक
गाभाऱ्याची द्वारशाखा
ललाटबिंब/गणेश पट्टीवरील उजव्या सोंडेचे श्री गणराज
१२ खांबी गाभारा,
मूर्तीविरहित रिकामी गाभारा
वितान – छत
वातायन – खिडकी
खिडकीच्या चौकटीवरील शिल्प
मंदिरासमोर समाधी
गणेश घाट आणि मंदिरे
श्री शिवमंदिरे
ओढा गाव याच श्री सिद्धिविनायक मंदिरा साठी प्रसिद्ध आहे.

टिम : भ्रमणगाथा Fearless Explorer’s. Cont 9137132689

 

तपोवनातील अज्ञात लेणीसमूह प्रकाशात

तपोवनातील गोदा-कपिला संगमावर १० अज्ञात लेणीचा समूह प्रकाशात आला आहे. या लेणी नेमक्या कोणत्या कालखंडातील, कोणी खोदल्या तसेच या लेणी बौद्ध, जैन की हिंदू आहेत, याबाबत इतिहास अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
caves
नाशिक : तपोवनातील गोदा-कपिला संगमावर १० अज्ञात लेणीचा समूह प्रकाशात आला आहे. या लेणी नेमक्या कोणत्या कालखंडातील, कोणी खोदल्या तसेच या लेणी बौद्ध, जैन की हिंदू आहेत, याबाबत इतिहास अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या लेण्यांचा अभ्यास करून त्या संरक्षित होण्याची गरज इतिहास व पुरातत्त्व अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

तपोवनातील गोदावरीच्या पलीकडील काठावर महापालिकने राम, सिता व लक्ष्मणाची प्रतिमा उभी केली आहे. ती पाहण्यासाठी भाविक हमखास तेथे जातात. मात्र, या प्रतिमेच्या समोरच गोदापात्रातील खडकात खोदलेल्या नऊ व एक अपूर्ण अशा दहा लेणीच्या रांगेकडे आतापर्यंत कोणाचे फारसे लक्ष गेलेले नाही. त्यामुळे या गुहा 'लेणी' असाव्यात का, कोणी बांधल्या असाव्यात, त्यांचा कालखंड कोणता हे अजूनही अज्ञात आहे. शहराच्या मध्यभागी असूनही राज्य व केंद्र पुरातत्त्व विभागाने या लेणींची आजपर्यंत दखल घेतलेली नाही. नाशिकसह राज्यभरातील अभ्यासकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले असून, या लेणींच्या अभ्यासाची गरज व्यक्त केली आहे.

नाशिकला दोन हजार वर्षांपूर्वीचा सातवाहन राजांचा लिखित इतिहास पांडवलेणी या बौद्ध लेणीच्या माध्यमातून लाभला आहे. सातवाहन, अभीर, राष्ट्रकूट, कलचुरी, चालुक्य, यादव या घराण्यांच्या इतिहासाने नाशिकला समृद्ध केलं आहे. बौद्ध लेणी प्रमाणेच नाशिक परिसरात जैन व हिंदू लेणी व असंख्य प्राचीन मंदिरे आहेत. तसेच सिंहस्थामुळे अनेक पंथ व उपपंथांच्या उपासकांचा वारसाही या शहराला लाभला आहे. याच्या खाणाखुणा शहर परिसरात पावलोपावली अनुभवायला मिळतात.

तपोवनात गोदा-कपिला संगम आहे. या संगमाला अनेक धार्मिक आख्यायिका आहेत. त्यामुळे भाविक श्रद्धेने या परिसराला भेट देतात. लेणी दुर्लक्षित आणि अज्ञात असल्याने त्या पाहण्यासाठी पर्यटकांना माहिती देणारी फलकेही येथे नसल्याचे दिसते. या परिसरात जुगारी मंडळी व जोडप्यांची गर्दी असते. लेणीच्या संरक्षणासाठी प्रयत्न होण्याची गरज असून, पुरातत्त्व विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी अभ्यासकांनी केली आहे. पुरातत्त्व विभागाकडून आतापर्यंत झालेल्या दुर्लक्षामुळेच नाशिकच्या इतिहासाचे अनेक पैलू अजूनही अज्ञात राहिल्याचा आरोप केला जातो.

लेणी नेमक्या कशा आहेत?

गोदा-कपिला संगमावरील लाकडी पुलाखालून नदीपात्रात उतरल्यावर उजव्या हाताच्या २० फूट उंच खडकात या दहा लेणी खोदलेल्या पहायला मिळतात. पहिल्यांचा खडकावर लेणी कोरण्यासाठी आणखी केलेली दिसते. मात्र, हे काम अर्धवट आहे. त्यानंतरच्या नऊ लेणीच्या समोरचा भाग आयताकृती कोरला असून, या लेणींमध्ये कोणतेही नक्षीकाम अथवा मूर्ती नाही. दोन लेणींमध्ये सभामंडप व गर्भगृह अशी रचना दिसते. तर एका लेणी बाहेर ब्राह्मी अक्षरे कोरल्याचे दिसते; मात्र, ही अक्षरे खराब झाली आहेत. क्रमांक ९ मध्ये हनुमानाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. तर शेवटच्या दहाव्या क्रमांकाच्या लेणीचे एका साधूने दोन भाग केले असून, एकात ते राहतात तर दुसऱ्या भागात शिवलिंग आहे.

सर्वसाधारणपणे बौद्ध अथवा जैन लेणी या उंच टेकडीवर पहायला मिळतात. तर हिंदू पंथांच्या उपासकांचे स्थळे ही नदी काठावर असतात. तपोवनातील या गुहा सिंहस्थात येणाऱ्या साधूंसाठी त्यांच्या उपासणेसाठी खोदल्या गेल्या असाव्यात. त्या कोणत्या कालखंडात बांधल्या गेल्या हा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे या गुहांचा अभ्यास व्हायला हवा.

- गिरीष टकले, अध्यक्ष, नाशिक इतिहास संशोधन मंडळ

नाशिकमध्ये गोदापात्रात आतापर्यंत गोवर्धन व तपोवनातील संगमावर सातवाहन नाणी मिळाली आहेत. जेथे ही नाणी मिळाली आहेत त्या भागाचा सातवाहनांशी संबंध आलेला दिसतो. त्यामुळे या लेणी सातवाहनकालिन असाव्यात असे वाटते. या लेणी खोदण्याची पद्धत पांडवलेणीशी मिळती जुळती आहे.

- चेतन राजापूरकर, नाणे अभ्यासक

तपोवनातील लेणींची रचना चामर लेणीशी मिळती जुळती आहे. काही लेणींमध्ये गर्भगृह आहे. त्यामुळे या जैन लेणी असाव्यात, असे वाटते. नाशिक परिसरात जैन लेणी संख्येने अधिक आहेत.

- डॉ. जी. बी. शहा, जैन धर्माचे अभ्यासक

बौद्ध लेणींच्या प्राथमिक अवस्थेसारखी ही लेणी दिसत असून, यात सापडलेल्या धम्मालिपीतील अर्धवट शिलालेख तसेच छंनी हतोड्याचे घाव हे त्रिरश्मीवरील बुद्ध लेणींसारखेच दिसत असल्याने ही लेणी सातवाहन काळातील असल्याचे सूचित करते. या लेणीवर संशोधन करून माहिती लोकांसमोर आणावी.

- अतुल भोसेकर, बौद्ध धर्माचे अभ्यासक

तपोवनातील ही लेणी आहे की, गुहा हे या स्थळाचा अभ्यास केल्यानंतरच सांगता येईल. नाशिकला बौद्ध, जैन, हिंदू तसेच अनेक पंथांचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे अभ्यासानंतर त्याचा कालखंड ठरविला जाऊ शकेल. काही अनुमान लावण्यापूर्वी या गुहांचा अभ्यास होणे गरजेचे आहे.

- डॉ. अभिजीत दांडेकर, सहायक प्राध्यापक, डेक्कन कॉलेज

तपोवनातील ही लेणी आहे हे निश्चित मात्र त्या कोणत्या कालखंडातील आहे हे, या स्थळाचा अभ्यास केल्यानंतरच सांगता येईल. नाशिकला बौद्ध, जैन, हिंदू लेण्या आहते. त्यामुळे अभ्यासानंतर त्याचा कालखंड ठरविला जाऊ शकेल. नाशिकच्या इतिहासासाठी या लेणी महत्त्वाच्या आहेत.

- डॉ. श्रीकांत प्रधान, पुरातत्त्वज्ञ
 
 

नाशिक -आडवाटेवरील किल्ले पिंपळा भिलाई प्रेमगिरी आणि चौल्हेर

https://rockpachh.wordpress.com/2019/04/08/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87-2/


 गुलशनाबाद म्हणजे  अर्थात आपले नाशिक!!! नाशिक हा सुद्धा डोंगर आणि पर्वत रांगांनी समृद्ध असा प्रदेश.ह्याच पट्ट्यात बरेचसे महत्वाचे किल्ले येतात परंतु ह्यातील पण सटाणा पासून आत आडवाटेवर अनेक किल्ले आहेत जिथे शक्यतो कोणी जात नाही.ह्याच आडवाटेवरील  पट्ट्यातील ४ किल्ले करण्याची मला संधी लाभली तीही मस्त थंडीत. तापमान जास्त असे काही नव्हते फक्त ३ अंश सेल्सिअस!!!

असो ते मी सांगेलच पुढे थंडीने काय झाले ते. रात्री १०.३० वाजता डोंबिवली हुन प्रस्थान केले ते पहिल्या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाकडे म्हणजे पिंपळा किल्ल्याच्या पायथ्याच्या गावी.पिंपळा किल्ल्याचे पायथ्याचे गाव म्हणजे मळगाव बुद्रुक, पिंपळा गावापासून किल्ला लांब आहे.पहाटे ४.३० ला आम्ही पोहोचल्यावर सकाळी ६.३० पर्यंत बसमधून बाहेर पडायची कोणाची पण हिम्मत नाही झाली  इतकी थंडी  होती. शेवटी ६.३० ला उजाडल्यावर आजूबाजूच्या छोट्या काड्या , लाकडं आणि चाऱ्याच्या साहाय्याने ड्राइवर ने शेकोटी पेटवली तेव्हा कुठे बरे वाटले. नाश्ता व इतर सोपास्कार आटपून साधारण ८ च्या सुमारास पिंपळा किल्ल्याकडे आम्ही सर्व निघालो.गावातून चालत जाताना सूर्यफूल व कांद्याची शेते दिसली.सूर्यफूल इतके सुंदर आणि टवटवीत दिसत होते कि ते पाहून मन प्रसन्न झाले.गावात किल्ल्याला जाण्याच्या मार्गावर एक धारण लागते  तिथूनच डावीकडे जाणारी वाट किल्ल्यावर घेऊन जाते.डावीकडे  वळल्यावर सरळ थोडासा चढ  लागतो ज्यावर खूप मोठे दगड आहेत .साधारण अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण एक डोंगर पार करून पठारावर येतो.जो डोंगर आपल्याला समोर दिसत असतो त्याच डोंगराच्या मागे पिंपळा किल्ला आहे.पठारावर पोहोचल्यावर आपल्याला पिंपळा दृष्टीक्षेपात येतो.

                                                                    कांद्याची शेती

                                                     पठारावरून दिसणारा पिंपळा

पठार  चढून छोटेसे टेकाड पार केल्यावर पिंपळा हा त्याच्या कातळटोपीसकट एकदम जवळ दिसू लागतो. इथूनपुढे थोडी कसोटी असते  कारण वाट सोपी असली तरी घसरडी आणि वळणावळणाची असल्याने थोडा वेळ लागतो.मी चढताना सांभाळूनच चढलो कारण नुसते चढायचे नव्हते तर वाऱ्याचा झोत सुद्धा अंगावर घेत चढायचे होते.ह्या ठिकाणी आणि किल्ल्यावर मी  त्याचा वेग अनुभवला त्याला काही तोड नाही.खूप थंडगार पण तितकाच बोचरा असा हा अनुभव होता.घसरडे चढ  चढल्यावर उजव्या बाजूला वळल्यावर  समोर साल्हेर हा त्याच्या टोकामुळे सहज ओळखता आला.इथून सरळ गेल्यावर आपण किल्ल्याच्या मोठ्या नेढ्यापाशी पोहोचतो जे महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेढे आहे.नेढ्याच्या खाली दोन पाण्याची टाकी लागतात. टाकी बघून नेढ्याच्या मधोमध उभा राहिलो पण खरं सांगतो २० सेकंदापेक्षा जास्त उभे राहवेना इतका वारा होता कशीतरी फोटोसाठी पोझ देऊन फोटो काढला आणि नेढ्यातून खाली उतरून कट्टयावर बसलो.

                                                           पिंपळा वरून दिसणारा साल्हेर

                                                                     पाण्याची टाकी

                                                                        नेढे

इथून पुढे किल्ल्याला नेढ्या पर्यंत वळसा घालता येतो पण त्या साठी  सांभाळून जावे लागते.नेढ्याच्या मागील बाजूस प्लास्टर करून देवीचे चित्र  रंगवले आहे व त्या मागे एक शिलालेख आहे. हे सर्व पाहून आल्या मार्गाने पुन्हा नेढ्याजवळ यावे.परंतु पुन्हा सांगतो मागच्या बाजूस जाताना काळजी घ्यावी वाट ढासळलेली आणि छोटी आहे उगाच उत्साह जास्त न केलेला बरा.नेढ्यात आल्यावर डाव्याबाजूला किल्ल्याच्या गडमाथ्यावर जाण्यासाठी वाट आहे जिचे सुरुवातिचे दगड थोडे ढासळले आहेत पण व्यवस्थित  चढता येते. चढल्यावर आपण माथ्यावर पोहोचतो जिथे आणखी ३ पाण्याची मोठी टाकी आहेत.हे पाहून पुन्हा खाली येऊन आपली गडफेरी संपते.
पिंपळा किल्ल्यासंदर्भातल्या नेढ्याचा व  त्यात वाहणाऱ्या वाऱ्याचा छोटा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा (इअरफोन्स अथवा हेडफोन्स चा वापर करा).

https://youtu.be/Q1Rxzlzlq_w

                                                                       शिलालेख

                                                         गडमाथ्यावरील ३ रेखीव टाकी
पिंपळा किल्ल्याची गारेगार सफर करून दिवसातल्या दुसऱ्या किल्ल्याकडे  म्हणजे भिलाईकडे आम्ही निघालो.भिलाई हा दगडी साकोडे ह्या गावाजवळ आहे.परंतु ह्या गावाच्या आधी साखरपाडा खिंड आपल्याला लागते त्या खिंडीच्या बरोबर उजव्या बाजूच्या डोंगरावर भिलाई किल्ला आहे.किल्ला पिंपळा सारख्याच कातळटोपीमुळे ओळखू येतो.खिंडीत पोहोचल्यावर उजव्याबाजूच्या उतरत्या डोंगरसोंडेवरुन किल्ला चढायला सुरुवात करावी.  प्रथम छोटी चढाई केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची कि कायम डाव्या बाजूने चढावे उजव्या बाजूला किल्ल्याला वाट नाही आहे. माझ्या मते पहिल्यांदा जाणाऱ्यांनी वाटाड्या घ्यावा कारण ह्या किल्ल्यावरील सप्तशृंगी देवीच्या गुहेतील मंदिरामुळे उत्सवामध्ये   गावकऱ्यांची ये जा असते. डावीकडून चढत चढत किल्ल्याच्या खाली असणाऱ्या पठारावरील मोठ्या झाडाच्या आश्रयाखाली जेवून घेतले.जेवल्यावर सरळ चढायला सुरुवात केल्यावर किल्ल्याच्या कातळटोपीवर जाण्यासाठी दगड रचून ठेवलेले दिसतात ते सावकाश चढून आपल्याला दोन वाटा दिसतात एक पुन्हा दगडांचीच वाट अथवा छोटी निमुळती पायवाट.दोन्ही वाटांवर खूप घसारा आहे त्यामुळे दोराची गरज नसली तरी मी मुद्दाम सांगेल जपवून जावे ,हवे तर सरळ खाली बसून जावे जर पायवाटेने जाणार असाल तर अथवा दुसऱ्या वाटेसाठी एकमेकांच्या मदतीने जावे.पायवाटेने गेल्यावर आपण कातळटोपीच्या खाली असणाऱ्या गुहेच्या खाली पोहोचतो जिथे पाण्याची मोठी २ टाकी लागतात.

                                                                      पाण्याची टाकी

                                                                            भिलाई    

हे पाहून पुन्हा घसरड्या वाटेने आपण गुहांपाशी पोहोचतो परंतु मी तेथे गेलो नाही कारण मला वाट खूपच घसरडी वाटली.ह्याच गुहेतून पुन्हा घसरड्या वाटेनेच गडमाथा गाठता येतो परंतु येथेही जपून जावे कारण मी ट्रेक मधल्या सराईत ट्रेकर्स ना पण येथून  उतरायला ३० ते ३५ मिनिटे घेतलेली पाहिली आहेत.गडमाथा छोटा आहे व माथ्यावर भगवा झेंडा लावला आहे.

                                                          सप्तश्रुंगी मातेची मूर्ती भिलाई

क्रमशः

गडांच्या इतिहासाबद्दल – हे दोन्ही किल्ले ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये सध्यातरी मूक अवस्थेत आहेत.परंतु ह्या दोन्ही किल्ल्यांचे ठिकाण आणि अवाका पाहता हे किल्ले टेहळणीचे असावेत ह्यात दुमत नाही.त्यामुळे तूर्तास आपल्याला एवढ्याच माहितीवर समाधान मानावे लागेल.   

लाईच्या वेगळ्या घसरड्या अनुभवानंतर आम्ही थकलेले सर्व जीव पुन्हा अंगात त्राण आणून निघालो दिवसातल्या शेवटच्या किल्ल्याकडे म्हणजे प्रेमगिरी किल्ल्याकडे.प्रेमगिरी साठी कळवण गावापासून ५ किलोमीटर वर असणारे एकलहरे गाव गाठायचे. पेमगिरी आणि प्रेमगिरी हे दोन्हीही वेगळे किल्ले आहेत ह्याची नोंद घ्यावी.संध्याकाळच्या ५.१५ वाजता आम्ही आशेने हा किल्ला चढून अंधारातच खाली उतरावे लागेल ह्या तयारीनेच निघालो.परंतु आमचे दुर्दैव असे कि ह्या किल्ल्यावर जायला दोन वाटा आहे पैकी एक वाट गावाच्या मुख्य रस्त्यावरून आत जाऊन डावीकडे वळून सरळ खडा चढ  चढून जावी लागते (ज्या वाटेने  आम्ही गेलो) आणि दुसरी वाट सोपी अशी थोडी फिरून रस्त्याच्या बाजूंची शेतं पार करून  तिथून सरळ जायचे व डावीकडे वळायचे .कृपया करून सरळ खडा चढ असलेल्या वाटेने जाऊ नये हि वाट घसरडी आणि खडतर आहे.दुसऱ्या वाटेने जावे जी शेतं पार करून जाता येते.जाताना वाटाड्या जरूर घ्यावा.मी ७५% वाट पार केलेली मात्र नंतर आमच्या लीडर नेच निर्णय घेतला कि सर्वांनी परत मागे फिरायचे  कारण चढ हा खडा होता आणि तिथून पुन्हा अंधारातून मागे येणे त्रासदायक झाले असते.नाईलाजाने आम्हाला परत फिरावे लागले , आमच्यापैकी फक्त ४ जण पुढे गेली आणि त्यांना अंधारातून काट्या कुड्यातून वाट काढून येईपर्यंत ८ वाजले.

                                                                          प्रेमगिरी    
परंतु उपलब्ध जी माहिती मला आमच्या चौघा  मित्रांकडून मिळाली त्यावरून व त्यांनी काढलेल्या फोटोज वरून  किल्ल्यावर सुरेख पाण्याची टाकी आणि हनुमान मंदिर आहे.ह्या मंदिरात गावकऱ्यांची ये जा असल्याने मी आधी म्हणालो तसे दुसरी वाट सोपी आणि मळलेली आहे.गडावर पाण्याच्या टाक्या व मंदिराशिवाय इतर अवशेष नाहीत.दुसऱ्या वाटेने किल्ल्यावर जाताना कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात.
                                                                हनुमान मंदिर
                                                                  हनुमान मंदिर
     
प्रेमगिरी बघू न शकल्याने वाईट तर वाटले पण तो निर्णय पण योग्य होता.रात्री ९ च्या सुमारास मुक्कामाच्या चौल्हेर  किल्ल्याच्या पायथ्याच्या गावी वाडी चौल्हेर ला पोहोचलो.जेवून साधारण १०.३० ला झोपून सकाळी ६ वाजता कडकडत्या थंडीत उठून तयारी करून सकाळी ८ च्या सुमारास शेवटचा किल्ला चौल्हेर कडे निघालो. आदल्या रात्री ३ अंश सेल्सिअस तापमानामुळे sleeping बॅग, त्यावर गोधडी , कानावर कॅप घालून पण काही उपयोग नाही झाला एवढी थंडी होती.
असो,चौल्हेरकडे पाहिल्यावर शेवटपर्यंत आपल्याला दरवाजा कुठे आहे ते दिसत नाही. ह्या किल्ल्याच्या सर्वोच्च टोकापर्यंत जाता  येते . मळ्याच्या मागून किल्ल्यासाठी वाट आहे .वाट तशी सोपी आहे, पण तरीही प्रथम जात असताना  वाटाड्या घेऊन जावे.वाटेत प्रथम आपण छोट्या  डोंगराला वळसा घालून मुख्य किल्ल्या खालच्या टेकाडापाशी पोहोचतो.इथून पुढे सरळ चढत जायचे , वाटेत चिंचेचे झाड लागते .इथून पुढे थोडे सरळ चालून मग डोंगर डावीकडे ठेवून उजवीकडे चालत राहायचे , वाटेत पुन्हा घसारा लागला हो हा चौथा किल्ला  ट्रेकचा आणि त्यावर पण मला घसारा लागला.खर भीती पडण्यापेक्षा पण जर पाय सरकून लचकला किंवा दुखावला जाण्याची जास्त भीती होती.असो साधारण २० मिनिटात आपण रेलिंग लावलेल्या ठिकाणी पोहोचतो.इथून सरळ चालत गेल्यावर शेवटी कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि देखणा दरवाजा दिसल्यावर जो काय आनंद झाला तो मी नमूद नाही करू शकत.

                                                     पायथ्यापासून दिसणारा चौल्हेर
                                                                कातळातील पायऱ्या
                                                                 पहिला दरवाजा
पहिला दरवाजा पार केल्यावर परत पायऱ्या लागतात आणि दुसरा दरवाजा लागतो.दुसऱ्या दरवाज्या नंतर डावीकडे काटकोनात  वळावे मग तिसरा दरवाजा लागतो तिथून पुन्हा काटकोनातच उजवीकडे वळाल्यावर चौथा दरवाजा लागतो. ह्या किल्ल्याचे चारही दरवाजे अत्यंत चांगल्या स्थितीत आहे.मी मुद्दाम चौघांचेहि फोटो देत आहेत.
                                                                   दुसरा दरवाजा
                                                                 तिसरा दरवाजा
                                                                    चौथा दरवाजा
चौथ्या  दरवाजातून आत आल्यावर डाव्या बाजूला प्रथम जावे.डाव्या  बाजूने पायऱ्यांच्या साहाय्याने वर गेल्यावर समोर किल्ल्याचे छोटे पठार लागते आणि डाव्या बाजूला नंदी आणि पिंड ठेवली आहे .नंदीच्या जवळून खाली बघितल्यास पाण्याचे मोठे टाके दिसते.हे पाहून पठारावर यावे . पठारावरून सरळ टोकाच्या दिशेने चालत गेल्यावर वाटेत दोन मोठी पाण्याची टाकी लागतात .हि पाहून सरळ टोकाला बुरुजावर जायचे.बुरुजावरून सभोवतालचा विलोभनीय परिसर दिसतो. 
हे सर्व पाहून पून्हा मागे येऊन चौथ्या दरवाजाजवळ यायचे व समोर असलेल्या कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या  साहाय्याने गडमाथा गाठायचा अर्थात पायऱ्या चढून आपण कातळटोपीच्या खालीच असतो.येथून प्रथम डावीकडे जावे तिथे पत्र्याची शेड लागते येथे एका साधूचे वास्तव्य आहे असे कळले.तिथून पुढे सिमेंट चे चौरंगीनाथाचें मंदिर बांधले आहे , मंदिरात पाषाणाची चौरंगीनाथांची मूर्ती आहे.इथून पुढे वळसा घातल्यावर लांबलचक पाण्याचे कोरडे टाके लागते ज्यात सध्या मोठी दगडं पडली आहेत.इथूनपण  किल्ल्याचा सर्वोच्च माथा गाठता येतो परंतु वाट घसाऱ्याची आणि कठीण आहे. त्यामुळे पुन्हा पत्र्याच्या शेड जवळ येऊन सरळ चालत जायचे आणि उजव्या बाजूला म्हणजे विरुद्ध बाजूला वळायचे जिथे  प्रथम खांब टाके लागते ज्याला मोती टाके म्हणतात.इथून पुढे सरळ चालल्यावर  आणखी दोन टाकी लागतात.टाक्यांच्या पुढे पुन्हा कातळात खोदलेल्या अप्रतिम पायऱ्या लागतात ज्या चढून  माथा गाठायचा .
                                                                       मोती टाके (चौल्हेर)
                                          कातळात खोदलेल्या पायऱ्या सर्वोच्च माथा गाठण्यासाठी
पायऱ्या चढल्यावर उध्वस्त प्रवेशद्वारातून आत गेलो.येथे बहुदा नक्षीकाम असलेल्या प्रवेशद्वाराच्या खांबांचे अवशेष विखुरलेले दिसले. इथूनपुढे डाव्या बाजूला उध्वस्त वास्तूचे अवशेष आहेत. ते बघून समोरच आपल्याला चोर दरवाजा बघायला मिळतो.अजूनही काही उध्वस्त वस्तू माथ्यावर आहेत परंतु झाडींमुळे तिथे जात येत नाही.उद्धवस्त वास्तूमधून पुढे गेल्यावर पाण्याची आणखी दोन मोठी रेखीव टाकी पाहायला मिळतात. टाक्यांच्या पुढे ध्वजस्तंभ लावला आहे.येथे आपली गडफेरी पूर्ण होते .इथून खाली किल्ल्यावरील पठाराचे विहंगम दृश्य दिसते (छायाचित्र खाली पहावे). हा किल्ला फिरायला कमीत कमी दीड तास लागतो.माझी सर्वाना विनंती आहे वेळ काढून हा किल्ला बघा घाईने फिरण्याचा हा किल्ला नाही .
                                           '          गडमाथ्यावरील उध्वस्त वास्तूचे अवशेष
                                                                         चोर वाटा
                                                                        पाण्याची टाकी
                                   सर्वोच्च माथ्यवरून दिसणारा किल्ल्यावरील पठार आणि त्यावरील पाण्याची टाकी

गडांच्या इतिहासाबद्दल -

प्रेमगिरी  आणि चौल्हेर ह्या दोन्ही किल्ल्याबद्दल विशेष माहिती सापडत नाही.भिलाई हा तर नक्कीच टेहळणीचा किल्ला असावा परंतु चौल्हेर हा बहुदा ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असावा असे वाटते.
मी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतोय , माहिती मिळाल्यावर नक्की समोर आणेन.परंतु तूर्तास तरी हे दोन्ही किल्ले इतिहासाबाबतीत मौन बाळगून आहेत. 
 
 
 

प्राचीन वसाहतींच्या बाबतीत बरेचदा असे लक्षात येते की, अतिप्राचीन स्थळे ही बरेचदा पुढे जाऊन तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला येतात. आपल्या पूर्वजांनी त्या ठिकाणी जो काळ व्यतीत केलेला असतो त्याची स्मृती वंशज जपतात आणि त्या स्थळाची प्राचीनता पुढे त्याला पावित्र्य बहाल करते. या सर्व गोष्टी काळाच्या ओघात लोकांच्या नकळत घडतात, फक्त काळच त्याला साक्षीदार असतो. म्हणूनच म्हणतात ना ‘कालाय तस्मैः नमः’!

प्राचीन नासिक्यनगरीचा उत्कर्ष ज्यांच्या काळात झाला ते सातवाहन राजे किती बलाढय़ होते हे त्यांच्याबद्दलच्या बृहत्कल्पसूत्रभाष्य (6246-47) या ग्रंथातील प्राकृत गाथांमधून स्पष्ट होते. जरी या गाथा थोडय़ा प्रौढी मिरवल्यासारख्या जरी भासल्या तरी त्यातून सातवाहनांचे महत्त्वाचे स्थान लक्षात येते. नाशिकच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचा अध्याय सातवाहनांच्या काळापासून सुरू झालेला दिसतो. कृष्ण या राजाच्या काळात नाशिकमधील श्रमणांच्या अमात्याने आज पांडवलेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्रिरश्मी पर्वतात सर्वप्रथम लेणे कोरलेले दिसते. यापाठोपाठ अनेक लेणी इथे कोरल्या गेल्या. हिंदुस्थानी पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या नोंदीनुसार इथे 24 लेणी आणि त्यात एकूण 27 शिलालेख आहेत. परंतु नुकतेच हिंदुस्थानी पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे डोंगरात उंचावर पावसाळ्यापूर्वीचे लेणी संवर्धनाचे काम चालू असताना श्री. सलीम पटेल, श्री. राकेश शेंडे इ. अधिकाऱयांना तीन नवीन लेणी सापडली. त्यांनी आणि नाशिक येथील ट्रिबिल्स संस्थेचे अतुल भोसेकर, सुनील खरे आणि पुरातत्त्वविद मैत्रेयी भोसेकर यांनी या लेण्यांची सविस्तर नोंदणी केली आणि त्यांची माहिती प्रथम उजेडात आणली. या नवीन लेण्यांच्या शोधामुळे आता येथील लेण्यांच्या संख्येत भर पडली आहे. काळाच्या ओघात त्यांचा सखोल अभ्यास होईलच.

त्रिरश्मी पर्वतावरील लेणी कोरण्यासाठी इ.स. पूर्व 1ल्या शतकापासून ते इ.स.च्या 5व्या-6व्या शतकापर्यंत अनेक भक्तांनी देणग्या दिल्या हे तिथे असलेल्या निरनिराळ्या शिलालेखातून स्पष्ट होते. यात काही वैयक्तिक देणग्या आहेत तर काही समूहांनी दिलेल्या दिसतात. महाराष्ट्राच्या तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक इतिहासाची पुनर्रचना करण्यासाठी येथील शिलालेखांचा मोठा उपयोग झाला आहे. बौद्ध धर्माच्या विकासातले विविध टप्पे समजण्यासाठीसुद्धा या लेखांचा उपयोग झाला आहे. इ.स.च्या 1ल्या शतकात गुजरातमधल्या नहपान नावाच्या क्षहारात क्षत्रप घराण्यातल्या शक राजाने सातवाहनांच्या राज्यावर आक्रमण करून त्यांना पश्चिम हिंदुस्थानातून पूर्व हिंदुस्थानात स्थलांतर करण्यास भाग पडले. या काळात त्या शक राजाचा जावई उषवदात याने या पर्वतावर एक सुरेख विहार (भिक्षूंचा निवास) कोरला. या काळात अनेक परकीय व्यापारी या स्थळाला भेट देऊन नवीन लेणी तयार करण्यासाठी दान देत होते, असे या लेखांच्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे. त्यात उत्तरेतून आलेला यवन इंद्राग्निदत्त, शक दामचिक यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या लोकांनी दानांबरोबर त्यांच्या काही संकल्पना, काही चिन्हे (त्यांच्यासाठी शुभ असलेली) यांची ओळख स्थानिक लोकांना आणि कारागीरांना करून दिली. त्याचा परिणाम असा झाला की मूळची हिंदुस्थानी नसलेली अनेक चिन्हे, प्रतीके या लेण्यांमध्ये आज पाहायला मिळतात.

प्राचीन हिंदुस्थानी धर्मात लोकदेवतांचे स्थान खूप महत्त्वाचे होते. बौद्ध, हिंदू आणि जैन या सर्व धर्मियांचे आपापले स्थानिक देव किंवा यक्ष-यक्षी या स्वरूपातल्या रक्षक देवता होत्या. महाराष्ट्रातील अनेक बौद्ध लेण्यांमध्ये चैत्यगृहांच्या प्रवेशद्वारापाशी त्यांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. पण त्या यक्ष-यक्षी किंवा देवांच्या मूर्ती आहेत असे आपण समजतो. त्यासंबंधीचा कोणताही अभिलेखीय पुरावा तिथे नसतो. पण याला अपवाद म्हणजे नाशिक येथील चैत्यगृह. इथे चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारापाशी एका व्यक्तीचे शिल्प कोरले आहे. पण त्याच्या मागच्या भिंतीवरील शिलालेखात त्याचा यक्ष असा उल्लेख केला आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा अभिलेखीय पुरावा आहे. इ.स.च्या 7व्या शतकात लिहिल्या गेलेल्या ‘महामायुरी’ नावाच्या बौद्ध ग्रंथात सतत प्रवास करणाऱया बौद्ध भिक्षूंना सर्पदंशापासून वाचण्यासाठी काही रक्षामंत्र किंवा कवचमंत्र दिले आहेत. तसेच ते ज्या प्रदेशात असतील तिथल्या स्थानिक देवता किंवा यक्षांनाही आवाहन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे हिंदुस्थानातील तत्कालीन सर्व महत्त्वाच्या व्यापारी आणि धार्मिक केंद्रांची यादी तसेच तिथल्या स्थानिक रक्षक देवता आणि यक्ष यांच्या नावांची यादी या ग्रंथात दिली आहे. त्यात नाशिक येथे ‘सुंदर’ नावाचा यक्ष होता असा उल्लेख आढळतो. वर उल्लेखिलेला चैत्यागृहाच्या बाहेरचा यक्ष हा तो ‘सुंदर’ नावाचा यक्ष होता का हे सांगता येणे अवघड आहे. पण हा नाशिकचा प्राचीन रक्षक यक्ष आता पूर्णपणे विस्मृतीत गेला आहे हे नक्की.

वर उल्लेखिलेल्या पश्चिमी क्षत्रप राजा नहपान याच्याशी सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने नाशिकजवळच्या गोवर्धन नावाच्या गावाजवळ घनघोर युद्ध केले. त्या युद्धात नहपान याचा दारुण पराभव झाला आणि त्यांचा वंश ‘निरवशेष’ झाला. सातवाहनांचे गेलेले राज्य परत मिळाले. या सर्व घटनांचा उल्लेख त्रिरश्मी बौद्ध लेण्यांमध्ये असलेल्या शिलालेखांमध्ये आढळतो. एवढेच नव्हे तर या विजयाचे प्रतीक म्हणून नहपानाच्या चलनात असलेल्या चांदीच्या नाण्यांवर गौतमीपुत्राने स्वतःचे चिन्ह पुनर्मुद्रांकित केले. नशिकजवळच्या जोगळटेम्बी नावाच्या गावाला 1904मध्ये नहपानाच्या 13230 नाण्यांचा संग्रह अचानक सापडला. त्यामधील 9270 नाण्यांवर गौतमीपुत्राने स्वतःचे चिन्ह पुनर्मुद्रांकित केले होते. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, या ‘त्रिसमुद्रतोयपीतवाहन’ (म्हणजे ज्याचे घोडे तीनही समुद्रांचे पाणी पितात म्हणजे तिथे पोचलेले आहेत) असे विशेषण मिळालेल्या गौतमीपुत्र सातकर्णीने शकांवर जो मोठा विजय मिळवला त्याप्रीत्यर्थ त्याने ‘शालिवाहन शक’ हा संवत्सर सुरू केला. परंतु हा शक सातवाहनांनी कधीही वापरला नाही, याचे खरे कारण त्यांनी तो सुरूच केला नाही. नहपानाचे गुजरातमधले राज्य कार्दमक क्षत्रप या दुसऱया शक घराण्यातला राजा चष्टन याने ताब्यात घेऊन एक संवत्सर इ.स. 78मध्ये सुरू केला. तोच पुढे शक संवत्सर नावाने प्रसिद्ध झाला. शालिवाहन म्हणजे सातवाहन यांनी एका शक राजाला हरवल्यानंतर जो दुसरा शक राजा गादीवर आला त्याने हा सुरू केला, ही वस्तुस्थिती आपण काही प्रमाणात स्मरणात ठेवली आणि काही प्रमाणात विसरलो.

काळाच्या ओघात सातवाहनांच्या साम्राज्याचा ऱहास झाला आणि या परिसरात आभीर राजांचे राज्य आले. त्रिरश्मी बौद्ध लेणी समूहात त्यांचा शिलालेख आढळतो. याच आभीर राजांचे वंशज म्हणजे आजचे आहेर आणि त्यांची भाषा ती अहिराणी. काही अभ्यासकांच्या मते त्यांच्या कान्हाचा देश खानदेश. पुढे बौद्ध भिक्षूंनी या लेणी सोडल्यावर तिथे इ.स.च्या 11व्या–12व्या शतकात जैन धर्मियांचा प्रभाव वाढलेला दिसतो. म्हसरूळजवळ चामरलेणी तयार झाल्या तर त्रिरश्मी बौद्ध लेणी समूहात काही लेण्यांमध्ये जैन तीर्थंकरांच्या मूर्ती कोरण्यात आल्या असे दिसते. तसेच अंजनेरी येथे जैन मंदिरांचेही बांधकाम झाले. अंजनेरी पर्वत, अंकाई-टंकाई, मांगी तुंगी या ठिकाणी जैन लेणी कोरली गेली. अशा प्रकारे मुळातच अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या या परिसरात सर्व धर्मियांनी आपापल्या धार्मिक स्थापत्याची उभारणी केली. मांगी तुंगी येथे उभ्या केलेल्या 108 फूट उंचीच्या तीर्थंकरांच्या मूर्तीची 2016 साली गिनीस बुकात नोंद झाली आहे. एका महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर वसलेले एक प्राचीन काळापासून समृद्ध व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले नगर सर्व प्रकारच्या लोकांना आपला आर्थिक उत्कर्ष साधण्यासाठी इथे आकर्षित न करेल तरच नवल होते. त्यातून गोदावरी नदीचे माहात्म्य सर्वश्रुत होतेच. सिंहस्थाच्या वेळेस भरणाऱया कुंभमेळ्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात या परिसराची ख्याती पसरली होती. नाशिक आणि त्र्यंबक या अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या नगरांमध्ये विविध प्रकारचे धार्मिक, पितरांसाठीचे विधी करण्यासाठी हिंदुस्थानभरातून लोक येऊ लागले. काळाच्या ओघात अनेक राजवटींनी या प्रदेशात राज्य केले, व्यापार उदीम वाढायला मदत केली, अनेक मंदिरे बांधली, किल्ले बांधले आणि येथील भरभराटीस हातभार लावला. जरी मध्ययुगात नाशिकचे नाव गुलशनाबाद झाले तरी या गावाच्या धार्मिक महत्त्वात, नावलौकिकात काहीही फरक पडला नाही. काही काळाने ते परत नाशिक या नावाने ओळखले जाऊ लागले.

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत)

 
 

महाराष्ट्रातील प्रमुख राममंदिरे-श्री काळाराम मंदिर (नाशिक)

shree kalaram mandir nashik

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर निर्माणाच्या ऐतिहासिक सुवर्णयोग घटनेनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’ने ‘नित्यविजयी रघुनंदन’ ही, मराठी संतसाहित्यातील रामदर्शनाची लेखमाला, जानेवारीमध्ये सुरू केली आणि आपण गेल्या 11 महिन्यांत 46 लेखांद्वारे, संत निवृत्तीनाथ-ज्ञानदेवांपासून ते थेट आधुनिक संत गोंदवलेकर, साईबाबा यांच्या साहित्यातील परब्रह्म रामाचे व रघुवीररामाचे विविधांगी दर्शन केलेले आहे. श्रीराम भारतीय जीवनाचा सर्वोच्च आदर्श आणि सर्वाधिक भक्तजनप्रिय उपास्य देवता आहे. या श्रीरामाची महाराष्ट्रात अनेक मंदिरे आहेत. त्यातील प्रमुख ऐतिहासिक अशा मंदिरांची आपण पुढील तीन-चार लेखांत माहिती घेऊया. त्यातील पहिले ऐतिहासिक मंदिर म्हणजे नाशिकचे सुप्रसिद्ध श्री काळाराम मंदिर...

श्री क्षेत्र पंढरपूरला ‘भूवैकुंठ’ म्हणतात, तसे श्रीक्षेत्र नाशिकला ‘दक्षिण काशी’ म्हणून भाविक भक्तांमध्ये, श्रद्धावंतांमध्ये सर्वोच्च स्थान आहे. दक्षिणवाहिनी माता गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या या नगरीला ‘कुंभनगरी’ म्हणून हिंदू परंपरेत विशेष स्थान आहे. दर बारा वर्षांनी होणारा ‘सिंहस्थ कुंभमेळा’ ही तर नाशिकची खास ओळख. त्रेतायुगात प्रभू रामचंद्राचे वनवास काळात या ‘जनस्थान’ नगरीच्या पंचवटी भागात वास्तव्य होते. राम-सीता आणि लक्ष्मणाच्या पुनीत वास्तव्याची अनेक पदचिन्हे आजही नाशिकमध्ये विद्यमान आहेत. श्री काळाराम मंदिर त्या परममंगल पदचिन्हांपैकी एक आहे. आज जेथे भव्य, दिव्य, आकर्षक असे श्री काळाराम मंदिर विद्यमान आहे, तेथेच त्रेतायुगात वनवासकाळात लक्ष्मणाने राम-सीतेने बांधलेली पर्णकुटी होती, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या काळाराम मंदिरास एक विशेष स्थान आहे. महाराष्ट्रात प्रभू रामचंद्राची अनेक मंदिरे आहेत. त्यात रामटेकचे राम-लक्ष्मण मंदिर आहे, चाफळचे समर्थ रामदास स्थापित राम मंदिर आहे, नामयोगी संत गोंदवलेकर महाराज स्थापित ‘थोरले राम मंदिर’ आणि ‘धाकटे राम मंदिर’ अशी दोन मंदिरे आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेले पंढरपूरच्या महाद्वार घाटावर स्थापित राम मंदिर आहे. फलटणच्या राजे निंबाळकर स्थापित राम मंदिर आहे. पण, या सर्वांमध्ये नाशिकच्या काळाराम मंदिराचे स्थान एकमेवाद्वितीय आहे.
‘काळाराम’ नव्हे ‘काल’ राम
नाशिकच्या काळाराम मंदिराला फार मोठा इतिहास आहे. ‘श्री काळाराम मंदिर’ हे नाव अलीकडच्या काळात लोकरूढ झालेले नाव आहे. पूर्वी या मंदिराला ‘रघुराम मंदिर’, ‘श्री रामचंद्र संस्थान मंदिर’ म्हणून ओळखले जात होते. पण, नंतरच्या काळात पंचवटीच्या पावन परिसरात अनेक रामभक्तांनी श्रीरामाची अनेक छोटी-मोठी मंदिरे बांधून पुण्यकार्याची धन्यता प्राप्त केली. या अनेक मंदिरातील रामाच्या मूर्ती पांढर्‍या संगमरवरी असल्याने आणि मूळ रघुराम मंदिरातील, गोदावरीमध्ये मिळालेल्या राम-लक्ष्मण-सीतेच्या मूर्ती काळ्या वालुकामय पाषाणाच्या असल्याने भाविक या मंदिरास ‘श्री काळाराम मंदिर’ म्हणून ओळखू लागले व तेच नाव कालप्रवाहात रूढ झाले, असे म्हणतात. खरे तर हा ‘काळाराम’ शब्द रंगवाचक नसून, गुणवाचक आहे. तो शब्द ‘काळा’ नसून ‘काल’ (कर्दनकाळ) असा कार्यवाचक आहे. ईश्वराचे वर्णन ‘काळाग्नी’, ‘काळरूद्राग्नी’ अशा शब्दांमध्ये अनेक स्तुतीस्तोत्रामध्ये केलेले आहे. त्याअर्थाने हा ‘कालाराम’ आहे. शूर्पणखा भगिनीच्या अपमानाचा बदला घेण्यास आलेल्या राक्षस, खर, दूषण आणि 18 हजार राक्षससेनेचा प्रभू रामचंद्रांनी उग्र रूप धारण करून नायनाट केला. या उग्र रूपाला वीररूपालाच ‘काल रूप’ म्हणतात. राक्षसांसाठी राम कर्दनकाळ ठरला.
काळ्या पाषाणाचे मंदिर शिल्प : महाराष्ट्र वैभव
श्री काळाराम मंदिराच्या इतिहासाचा आढावा घेताना, आपणास इसवी सनाच्या आठव्या शतकात, या जागेवर एक लाकडी मंदिर होते असे दिसते. त्या लाकडी मंदिराचा तत्कालीन शंकराचार्यांनी जीर्णोद्धार केला आणि नव्याने विधिवत नित्योपचाराची नवी परंपरा सुरू केली. या काळात या मंदिराला ‘श्री रघुराम मंदिर’ म्हणून ओळखले जात होते. आपण आज जे काळ्या पाषाणाचे कोरीव सुंदर असे श्री काळाराम मंदिर पाहतो, ते इ. स. 1778 ते 1790 अशा बारा वर्षांच्या काळात बांधलेले आहे. पेशव्यांचे सरदार रंगनाथ ओढेकर यांनी श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाईसाहेब यांच्या इच्छेनुसार या मंदिराचे बांधकाम करून घेतले. त्याकाळी त्यासाठी 32 लक्ष रुपये खर्च आला, असे इतिहासातील कागदपत्रातील नोंदीवरून कळते. नाशिकच्या ओढा या भागामध्ये सरदार रंगनाथपंत जहागीरदार होते. या मंदिर निर्माण कार्यासाठी सरदार ओढेकरांच्या पत्नीने आपली हिरेजडित नथ दान दिली होती व रामसेवेमध्ये खारुटीच्या सहभागाचे पुण्य मिळवले होते. हे मंदिर पूर्ण घडीव दगडाचे असून, हा सारा काळा पाषाण नाशिक जवळच्या डोंगरातून खोदून आणलेला आहे. अशाप्रकारे काळाराम मंदिराचे देखणे मंदिरशिल्प हे महाराष्ट्रातील पाषाण वैभव आहे.
इंद्राच्या ऐरावतालाही लाजवेल असे हे काळ्या पाषाणातील मंदिर, शिल्पकलेचा अद्वितीय, अनुपम असा देखणा आविष्कार आहे. त्र्यंबकेश्वरचे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी बांधलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि नाशिकचे काळाराम मंदिर या दोन्ही पाषाण शिल्पांच्या वैभवामध्ये विलक्षण साम्य आहे.
श्री काळाराम मंदिर हे पूर्वाभिमुख असून, 266 फूट लांब आणि 138 फूट रूंद आहे. मंदिराच्या भोवती भरभक्कम दगडी तटबंदी असून, चार दिशेला चार द्वारे आहेत. हे चार दरवाजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चार पुरुषार्थाचे प्रतीक आहेत. प्रांगणातील तटबंदीला लागून कडेने अनेक ओवर्‍या आहेत. त्याला 84 सुंदर कमानी आहेत. त्या 84 लक्ष योनीच्या प्रतीक मानल्या जातात. सुमारे आठ-दहा पायर्‍या चढून मुख्य राममंदिरात जावे लागते. मुख्य मंदिरात 40 खांबांचा भव्य मंडप आहे. या मंडपास पूर्व, दक्षिण, उत्तर अशी तीन प्रवेशद्वारे असून, ती सत्व, रज आणि तम या त्रिगुणांची प्रतिकरूप आहेत. मंदिराचा गाभारा अत्यंत प्रशस्त असून, गाभार्‍यात चौथर्‍यावर श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या सुंदर मूर्ती विराजमान आहेत. या मूर्ती गोदावरी नदीच्या प्रवाहात सापडलेल्या स्वयंभू मूर्ती आहेत. विशेष गोष्ट म्हणजे, श्रीरामाचा डावा हात सरळ पायाकडे असून, उजवा हात छातीवर आहे. पायी नतमस्तक होणार्‍या श्रद्धावंताला श्रीराम छातीवर हात ठेवून रक्षणाचे अभय देत आहे. म्हणून हा काळराम ‘अभयराम’ सुद्धा आहे. मंदिरावर उंच शिखर असून, सोन्याचा कळस चढवलेला आहे.
(पुढील अंकात ः रामटेकचे राममंदिर)
 
 
https://www.evivek.com/Encyc/2024/9/2/from-Nashik-Ganesha-Darshan.html

नाशिक येथील वैशिष्ट्यपूर्ण गणेश दर्शन

विवेक मराठी    02-Sep-2024
Total Views | 190
@ अश्विनी भालेराव
ganesh festival
तीर्थस्थळांचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातदेखील अनेक गणपती मंदिरे स्थित आहे. यातील अनेक मंदिरांना प्राचीन इतिहास आहे. अनेक वैशिष्ट्यांसह धार्मिक महत्त्व तर आहेच, शिवाय यातील काही गणपती आपली आभूषणे, आपल्या मूर्तिवैशिष्ट्यानेही प्रसिद्ध आहेत.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आपलासा, हवाहवासा वाटणारा देव अर्थात आपला लाडका ‘गणपती बाप्पा’. भाविक आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे उपासना करतात. आपल्या मनातील गुपिते हक्काने बाप्पाला सांगतात. याच बाप्पाची संपूर्ण जगात अनेक मंदिरे आहेत.
 
 
तीर्थस्थळांचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातदेखील अनेक गणपती मंदिरे स्थित आहे. यातील अनेक मंदिरांना प्राचीन इतिहास आहे. अनेक वैशिष्ट्यांसह धार्मिक महत्त्व तर आहेच, शिवाय यातील काही गणपती आपली आभूषणे, आपल्या मूर्तिवैशिष्ट्याने प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजे नाशिकमधील ‘चांदीचा गणपती’.
 
 
नाशिकचा मानाचा गणपती म्हणून शहराच्या ‘रविवार कारंजा’ या भागात स्थित असलेला ‘चांदीचा गणपती’. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरातील व रविवार कारंजा परिसरातील काही जागृत देशभक्त नागरिकांनी 1917 सालापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.
 
 
बुंदेलखंडातून रविवार पेठेत आलेल्या गंगाप्रसाद हलवाई या व्यापार्‍याची लोकमान्य टिळकांवर असीम श्रद्धा होती. त्यामुळे आपल्याकडे असलेली सर्व संपत्ती त्यांनी या मंडळाला दान केली. या देणगीतून पूर्वी शाडूची मूर्ती येथे बसवली जात असे. साल 1978-79 मध्ये शाडूची मूर्ती विसर्जित करताना अडचण होते, म्हणून मंडळ सदस्यांनी 11 किलोची चांदीची मूर्ती तयार करण्याची सूचना केली. अखेर 2008-09 साली 201 किलो भरीव चांदीच्या मूर्तीसाठी मंदिर बांधून त्यात सिद्धिविनायक गणपती मूर्तीची विधिवत स्थापना केली गेली, तर 2011-12 मध्ये भाविकांनी नवस प्राप्त झाला म्हणून दान केलेल्या सोन्यापासून विविध अलंकार बनविले. 45 तोळे सोन्याचा हिरेजडित हार, 40 तोळे कान आणि कपाळमार्गे सोंडेवरील सुवर्णाने तयार केलेले गंध, 17 तोळे सोन्याची हिरेजडित झालर श्रींसाठी तयार करण्यात आली आहे.
 

ganesh festival 
 
हा गणपती नवसाला पावतो, अशी भाविकांची भावना आहे. त्यामुळे अनेक भाविक वेगवेगळे नवस या गणपतीला करतात. ज्या भाविकांचे नवस पूर्ण होतात, ते भाविक नवसपूर्तीसाठी चांदी गणपतीला अर्पण करतात आणि त्या चांदीची भर मूर्तीमध्ये केली जाते.
 
 
नवसाला पावणारा गणपती म्हणून ‘चांदीचा गणपती’ मंदिराची सर्वश्रुत ख्याती तर आहेच; पण त्याही पलीकडे रत्नजडित चांदीच्या मूर्तीचे विशेष रूप भाविकांना भावणारे आणि भुरळ पाडणारे आहे.
 
 
आपल्या आकर्षक आणि मनोवेधक पगड्यांनी नाशिकमधल्या ‘पगडी गणेश’ गणपतीचे मंदिर सर्वश्रुत आहे. पेशवेकाळात नाशिकचा खर्‍या अर्थाने उत्कर्ष झाला. त्या काळी विशेषत: सरकारी दरबारी मानकरी, वेदशास्त्रनिपुण पंडित, वकील, तत्सम मंडळी प्रामुख्याने पगडी घालीत असत. पगडीनिर्मितीचे उद्योजक व विक्रेते यांचा परिसर म्हणून या गल्लीची ओळख ’पगडबंद लेन’ या नावाने होती. या परिसरात अतिशय कुशल, कसबी कारागीर राहत होते.
 

ganesh festival 
 
साधारणत: 1970-75 सालच्या आसपास सराफ बाजार आणि पगडबंद लेन येथील काही तरुणांच्या मनात आले की, आपल्याही भागात एक आपला हक्काचा गणपती असावा आणि त्यातही आपल्या सराफी व्यवसायाची, सोन्या-चांदीच्या बाजारपेठेची ओळख असणार्‍या आपल्या भागात ’चांदीचीच मूर्ती’ असावी. मग त्या तरुणांनी ’नगरकर लेन’च्या कोपर्‍यावर असलेल्या खेडकर वाड्याच्या ओट्यावर एक गणपती बसवला.
 
 
दरवर्षी थोडी-थोडी चांदी जमा करत काही वर्षांतच एक आकर्षक आणि विलोभनीय चांदीची गणेश मूर्ती तयार झाली. दरवर्षी मंडळाचे कार्यकर्ते मूर्तीसाठी पैसे जमवत आणि शिवाय स्वतःची भर घालत होते. काही वर्षांनी ही बाप्पाची चांदीची मूर्ती तब्बल 51 किलोची झाली होती. 2006 साली नगरकर लेन परिसरात मंदिर बांधून या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
 
 
या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीच्या मस्तकावर असंख्य प्रकारच्या वेगवेगळ्या पगड्या आपल्याला पाहायला मिळतात. आजमितीला या मंडळाकडे 100 हून अधिक रंगीबेरंगी, अलंकारजडित आणि विविध कापड प्रकार असलेल्या, विविध जरीकाठांचा वापर केलेल्या पगड्या आहेत. या गणपतीला इतर कोणत्याही प्रकारचे मुकुट किंवा फेटे वगैरे न घालता फक्त पगडीचाच वापर केला जातो. मस्तकी पगडी धारण करणार्‍या गणपतीला मग पुढे राजेशाही थाट देत जानवं, कपाळावर असलेलं गंध यावर शुद्धीकरण सोनं चढवण्यात आलं आहे.
 

ganesh festival 
 
सहसा आपण ज्या गणपतीच्या मूर्ती पाहतो, त्या मूर्तींमध्ये बाप्पाच्या हातात शंख, मोदक किंवा दूर्वा हाती घेतलेले हात आणि आशीर्वाद देतानाचा हात आपण पाहतो; पण नाशिकमध्ये असे एक गणपती मंदिर आहे ज्या मंदिरातील बाप्पाच्या हातात जपमाळ आहे. जणू काही हा बाप्पा जगतकल्याणासाठी तप करत आहे असा भास व्हावा. हे ‘तपस्वी गणेश मंदिर’ नाशिकच्या सोमवार पेठ भागात स्थित आहे.
 
 
महाराष्ट्रात असे मोजके गणपती आहेत ज्या गणपतीच्या हातामध्ये जपमाळ आहे, त्याच्या अंगावर वस्त्र नाही, जो धूम्रवर्ण रूपातील आणि संन्यस्त स्वरूपातील गणेश आहे.
 

ganesh festival 
 
ही तपस्वी गणेशाची अखंड संगमरवरी पाषाणातून बनवलेली सुबक मूर्ती आहे. बाप्पाला बसण्यासाठीदेखील संगमरवरीच अष्टकोनी चौरंग आहे. हातात मोदकांची रास आणि न रहावून त्यातला एक मोदक उचलून सोंडेत धरलेला हा गणपती आहे. हा गणपती म्हणजे जगतकल्याणासाठी तप करत असलेला बाप्पा. जणू दिवस-रात्र अखंडपणे तो जप करतोय. यामुळेच तपस्वी गणेशाचे रूप पाहताना भाविक नकळत समाधी अवस्थेत जातात.
 
 
आपल्या आगळ्यावेगळ्या आकाराने प्रसिद्ध असलेले नाशिकमधील एक मंदिर म्हणजे श्री ‘मोदकेश्वर गणपती मंदिर’. नाशिकचे ग्रामदैवत म्हणून मोदकेश्वर गणपतीस प्रथम मान आहे.
 
 
श्री मोदकेश्वर गणपती स्थानाविषयी पुराणात आख्यायिका आहे की, श्री गणेश अवकाशमार्गातून भ्रमण करीत असताना त्यांच्या हातातील एक मोदक खाली पडला व त्यापासून गणपती निर्माण झाला. त्यानंतर श्री गणेशभक्त ‘विलास सीताराम क्षेमकल्याणी’ यांच्या पूर्वजांना झालेल्या दृष्टांतानुसार त्यांनी मंदिराची उभारणी केली. नयनमनोहर हुबेहूब मोदकासारखा आकार असल्याने बाप्पास ‘श्री मोदकेश्वर गणपती’ असे नाव प्रचलित झाले.
 
 
गणेशोत्सवाच्या कालावधीत श्री मोदकेश्वराला विविध वस्त्रे, अलंकार पूजाधिकारी चढवितात व मंदिराची सजावट केली जाते. त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळे असे श्री मोदकेश्वराचे स्वरूप दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक येत असतात.
 
 
तीर्थस्थळाची ख्याती असलेल्या नाशिकमध्ये अशी अनेक प्रसिद्ध आणि धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असलेली मंदिरे आहेत. आपण जर कधी नाशिकमध्ये तीर्थाटन करण्यास गेला, तर आपले आगळेवेगळे वैशिष्ट्य असलेल्या या बाप्पांना आवर्जून भेट द्यावी.
 
 
 https://www-sahapedia-org.translate.goog/my-city-my-heritage-my-nashik?_x_tr_sch=http&_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=tc

बागेचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेले नाशिक हे मंदिरांचे शहर आणि दक्षिण भारतातील काशी म्हणून प्रसिद्ध आहे. " नाशिक नव टेकद्वार वसविले " (नाशिक हे नऊ शिखरांवर वसलेले आहे) ही मराठी म्हण नाशिकच्या भौगोलिक स्थानाचे योग्य वर्णन करते, जे दख्खन पठाराच्या नऊ शिखरांवर पसरलेले आहे. दक्षिणेकडील गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिकपासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या मंदिर नगरी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावते आणि नाशिक शहराच्या मध्यभागीून वाहते. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १५ लाखांपेक्षा जास्त होती, ज्यामध्ये सुमारे ८५% लोकसंख्या हिंदू होती.

नाशिक शहर गोदावरीच्या दोन्ही बाजूंना वसलेले आहे. ज्या नदीवर नाशिक वसले आहे त्याचा आकार उलटा 'एस' सारखा आहे आणि प्रथम उजवीकडे आणि नंतर डावीकडे वळलेला आहे. या शहरात तीन मुख्य विभाग आहेत: जुने नाशिक, पंचवतीची पवित्र वस्ती, नदीच्या डाव्या किंवा पूर्व तीरावर एक मोठे ठिकाण नाही; मध्य किंवा मुसलमान नाशिक, ज्याला पूर्वी गुलशनाबाद किंवा गुलाबांचे शहर म्हटले जात असे, पंचवतीच्या उजव्या तीरावर आणि दक्षिणेस; आणि आधुनिक किंवा मराठा नाशिक, जे उजव्या तीरावर आहे, मुसलमान नाशिकच्या उत्तरेस आणि पश्चिमेस आणि पंचवतीच्या पश्चिमेस आहे.

हिंदू पौराणिक कथेनुसार, रामायण महाकाव्याचे नायक भगवान राम यांनी त्यांच्या वनवासाचा बराचसा काळ सध्याच्या नाशिकच्या पंचवटी प्रदेशात घालवला. १३-१६ व्या शतकात इस्लामिक राजवटीत मुस्लिम लोकसंख्या नदीच्या उजव्या तीरावर स्थायिक झाली. इस्लामिक काळात नाशिकच्या भूभागात कोकणीपुरा, पाठपुरा, काजीपुरा, नायकवाडीपुरा, मुलतानपुरा आणि कलापुरा असे विविध ' पुरे' जोडले गेले . या काळात शहर काजीपुरा दरवाजा, त्र्यंबक दरवाजा, दरबार दरवाजा, बाघूर दरवाजा आणि दिल्ली दरवाजा (कुलकर्णी १९८१:१३) यासारख्या ' दारांनी' किंवा दरवाज्यांनी वेढलेले होते. या काळातील काही अवशेष अजूनही शहरात दिसतात. हिंदू आणि इस्लाम व्यतिरिक्त, २००-६०० इसवी सनाच्या दरम्यान नाशिक प्रदेशात बौद्ध धर्माचे वर्चस्व निर्माण झाले, जे 'पांडू लेणी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या बौद्ध लेण्यांच्या गटावरून दिसून येते. नंतर, ११व्या-१२व्या शतकाच्या सुमारास, जैन धर्म प्रमुख झाला, जे 'चांभार लेण्यां'च्या उपस्थितीवरून स्पष्ट होते.

१७ व्या शतकात, पुण्यातील पेशव्यांनी नाशिकवर ताबा मिळवला. मुख्य बाजार रस्त्याच्या शेवटी असलेल्या पेशव्यांचा राजवाडा अलिकडच्या काळात पोलिस स्टेशन आणि सार्वजनिक ग्रंथालयात रूपांतरित करण्यात आला आहे. त्यांच्या कारकिर्दीत, नदीच्या दोन्ही काठावर अनेक मंदिरे बांधण्यात आली आणि त्यांचे नूतनीकरण करण्यात आले. या काळातील विविध वाडे किंवा ' वाडे' , ' पेठे' किंवा परिसर आणि मंदिरे अजूनही शहराच्या भूदृश्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून उंचावर आहेत. नंतर, १९ व्या शतकात, नाशिक परिसर पूर्णपणे ब्रिटिश राजवटीत आला. ब्रिटिश राजवटीत शहराच्या सीमा विस्तारल्या, त्यात कलेक्टर ऑफिस, फौजदारी आणि दिवाणी न्यायालये, जमीन अभिलेख आणि महसूल कार्यालये, पोलिस मुख्यालय आणि परेड ग्राउंड यांचा समावेश झाला. हे जोड शहराच्या केंद्रापासून दूर होते, परंतु बहुतेक भागांच्या आवाक्यात होते. ब्रिटिश नियोजन संकल्पनेचे अनुसरण करून, अधिकाऱ्यांचे बंगले, बागा, रुग्णालये, शाळा आणि ग्रंथालये देखील सुरू करण्यात आली. यामुळे या भागात ब्रिटिश प्रशासन मॉडेलची अंमलबजावणी झाली. १८८२ मध्ये, नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था नियुक्त करण्यात आली. [३]

वसाहतवादी काळात, शहराच्या भूदृश्याने औद्योगिक युनिट्स, नियोजित आणि अनियोजित दुकाने, निवासी इमारती, सहकारी गृहनिर्माण संस्था आणि स्वतंत्र बंगले अशा अनेक नवीन वैशिष्ट्यांचा समावेश केला. पारंपारिकपणे, शहराची अर्थव्यवस्था प्रामुख्याने धार्मिक उपक्रम आणि संबंधित व्यापारावर अवलंबून आहे. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरूंनी आखलेल्या धोरणात्मक चौकटीनुसार शहर औद्योगिकीकरण करू लागले. १९६० च्या दशकात नाशिक औद्योगिक सहकारी इस्टेट, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य गुंतवणूक महामंडळ यासारखे अनेक सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग स्थापन झाले, ज्यामुळे हे शहर देशाच्या औद्योगिक नकाशावर एक प्रमुख स्थान बनले. गुंतवणूक, सिंचन योजना आणि वीज यामुळे कृषी अर्थव्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली, ज्यामुळे हा प्रदेश विविध प्रकारच्या द्राक्षांचा अग्रगण्य उत्पादक बनला आणि यॉर्क आणि सुला सारख्या अनेक प्रसिद्ध वाइनरीजचे घर बनले. [4]

महाराष्ट्रातील मुंबई (१८५ किमी), पुणे (२१० किमी) आणि औरंगाबाद (१९० किमी) आणि गुजरातमधील सापुतारा (७२ किमी) आणि सुरत (२५० किमी) यासारख्या शहरांच्या जवळ असल्याने, नाशिकला पर्यटन उद्योगाचाही फायदा होतो. शहराच्या आत आणि आजूबाजूला धोडप आणि रामशेज सारखे अनेक डोंगरमाथ्यावरील किल्ले आहेत, जे ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करतात. या टेकड्यांवरील हिरवळीची जंगले या प्रदेशातील स्थानिक वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक प्रजातींचे घर आहेत. नाशिकमध्ये दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो . डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील काळाराम मंदिर सत्याग्रहासारख्या पद्धतशीर दडपशाहीविरुद्ध शहरात महत्त्वाच्या सामाजिक चळवळी झाल्या आहेत. आधुनिक मराठी साहित्याच्या विकासात नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाने महत्त्वाची भूमिका बजावली. पैठणी आणि धातू हस्तकला यासारख्या हातमाग आणि हस्तकला शहराच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.

नाशिक हे पारंपारिक तीर्थक्षेत्र असले तरी, अलिकडच्या काळात बहुसांस्कृतिक इतिहास असलेले हे शहर जागतिक संबंधांसह आधुनिक शहरी केंद्रात विकसित झाले आहे.

 https://www.mahamtb.com/Encyc/2022/4/8/Article-On-Ram-Kshetra-Nashik.html
mahamtb.com

॥श्रीराम क्षेत्र नाशिक॥

08-Apr-2022

मोक्षपुरी नाशिक चारही युगात प्रसिद्ध आहे. वाल्मिकी रामायणातील उल्लेखाप्रमाणे महर्षी अगस्तीच्या आश्रमातून, महर्षींच्या निर्देशाप्रमाणे भगवान श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण हे दंडकारण्यातील गोदा तटावरील जनस्थान-पंचवटीत आले. राजा दंड व त्यांच्या दंडकारण्याची कथा पुराणांमध्ये वर्णविली आहे. तेव्हा, अशा या श्रीराम क्षेत्र नाशिकचा महिमा वर्णित करणारा हा लेख... 

भगवान श्रीराम पंचवटीला आल्यानंतर येथील गोदावरीचा प्रवाह, निसर्गसौंदर्याने नटलेला रमणीय प्रदेश पाहून मोहित झाले. वाल्मिकी रामायणात असलेले हे सुंदर वर्णन मुळाहून वाचण्यासारखे आहे. गोदातटापासून काही अंतरावर लक्ष्मण यांनी थोडी माती गोळा करून भिंत बनविली व नंतर त्यात सुंदर व बळकट असे खांब रोवून त्यावर बांबू व झाडांच्या पानांनी छप्पर तयार करून पर्णकुटी बांधली.

 पर्णकुटी बांधून झाल्यावर लक्ष्मणांनी गोदावरीच्या तिरी जाऊन स्नान केले व येताना काही फळे व कमलपुष्पे घेऊन ते पर्णशाळेत आले. शास्त्रीय विधीपूर्वक फुले - फळे देवतांना समर्पित करून त्यांनी ती वास्तू शांत केली. नंतर भगवान श्रीराम सीतेसह या आश्रमात, पर्णकुटीत प्रवेश करते झाले. पर्णकुटी पाहून भगवान लक्ष्मणांस दृढ आलिंगन देऊन म्हणाले की, “लक्ष्मणा, तू माझे मन जाणारा, कृतज्ञ आणि धर्माचे ज्ञान असणारा आहेस.” मग श्रीरामांनी सीतेसह या आश्रमात निवास केला. श्रीरामाच्या वनवास काळातील, शूर्पणखेचे नासिका छेदन, १४ हजार राक्षसांसह खर, दूषण आणि त्रिशीर या राक्षसांचा संहार, मारीच यांच्या सहकार्‍याने रावणाने सीतामाईचे अपहरण, या घटना या क्षेत्राशी संबंधित आहे.

खर, दूषण आणि त्रिशीर या तीन राक्षसांचा वध ज्या ठिकाणी झाला, ते ठिकाण आजही ‘तीवंधा’ म्हणून ओळखले जाते. यासोबत नाशिक ही क्रांतिभूमीसुद्धा आहे. स्वधर्म स्थापनेसाठी अयोध्येचे राजे प्रभू रामचंद्र वनवासकाळात या भूमीत आले. येथेच सीतामाईचे हरण झाले आणि स्वधर्म स्थापनेच्या क्रांतीला निमित्त मिळाले. चोहीकडे म्लेंच्छांचे राज्य. स्वधर्म लोप पावला होता. अशा भीषण परिस्थितीत नारायण सूर्याजीपंत ठोसर नावाचा मुलगा लग्नाच्या बोहल्यावरून ‘सावधान’ एकताच पसार होतो.

तो थेट प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या भूमीत येऊन १२ वर्षे गायत्रीचे पुरश्चरण व ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या तारक मंत्राचा १३ कोटी जप करून स्वधर्म स्थापनेचा शंखनाद करतो तोही याच भूमीवरून! १८९८ मधील पारतंत्र्याचा काळ. १५ वर्षांचा कोवळा विनायक, घरातील अष्टभुजा देवीच्या मूर्तीपुढे ‘शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजीन’ अशी शपथ घेतो आणि पुढे ‘अभिनव भारत’ ही क्रांती संघटना स्थापून, सशस्त्र क्रांतीचा उद्घोष करीत बलाढ्य परकीय शक्तीला प्रचंड हादरे देणारे कार्य करतो तेही याच भूमीवरून! श्री काळाराम मंदिर अशी धारणा आहे की, जेथे प्रभू श्रीरामांची पर्णशाळा होती, त्या जागी आजचे श्री काळाराम मंदिर उभे आहे. यादव काळातसुद्धा नाशिकक्षेत्र सुप्रसिद्ध होते.

१२७८च्या सुमारास श्री चक्रधर स्वामी नाशिकला आले असता, त्यांनी श्रीरामनाथांचे दर्शन घेतले होते. त्यावेळी तेथे एक पूर्व मुख गुहा व एक उत्तर मुख गुहा होती. त्यांनी गुहेचे दर्शन केल्याचा उल्लेखही सापडतो. पूर्वीचे जुने राम मंदिर बहुदा लाकडी सभामंडप असलेले होते व त्यातील मूर्तीसुद्धा लाकडी असल्याची माहिती मिळते. या लाकडी मंदिर बांधण्याचा कुठलाही उल्लेख-संदर्भ मिळत नाही. परंतु, समर्थांच्या काळातही हेच मंदिर असावे. येथे नित्य कीर्तन होत असे आणि गोपिकाबाई पेशवे कीर्तनात येत असत.

असेच एकदा सरदार रंगराव ओढेकर आले असता, त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विषय निघाला, तेव्हा आपल्या जवळ असलेल्या अलोट संपत्तीचा उपयोग करून भव्य मंदिर बांधण्याचा निर्धार ओढेकरांनी व्यक्त केला आणि त्यांनी हे जीर्ण मंदिर आपल्याजवळ असलेल्या अलोट संपत्तीचा उपयोग करून बांधले. त्यावेळी असलेल्या मंदिराची जागा फारच लहान असल्यामुळे सभोवतालच्या लोकांची असलेली घरे, मठ व श्रीमार्तंडाचे लहानसे देवालय घेऊन त्याऐवजी त्यांच्या मालकास मंदिराच्या आसपास घर, मठ आदी बांधून दिली, अशा रीतीने पूर्व-पश्चिम २६६ फूट लांब आणि दक्षिणोत्तर १३८ फूट रुंदीची जागा मोकळी करून तिच्याभोवती चार फूट रुंदीचा मुस्तकीम चिरेबंदी कोट बांधला आणि त्या कोटात आतील बाजूने ११ फूट रुंदीच्या यात्रेकरुंना उतरण्यासाठी धर्मशाळा म्हणजे ओवर्‍या बांधल्या.

मंदिराला कोटाचे भिंतीत पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर असे समोरासमोर चार दरवाजे असून, पूर्वेकडील दरवाजा सर्वात मोठा आहे. त्यास ‘महाद्वार’ असे म्हणतात. मंदिराच्या आवारात नैऋत्य कोपर्‍यावर जेथे पूर्वीचे जीर्ण राम मंदिर व त्यापुढे लहानसा लाकडी सभामंडप होता, तेथे भव्य देवालय बांधण्याचा विधी निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून पाषाणाची श्री गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आली. मंदिराच्या वायव्य कोपर्‍यात विहीर खणून बांधली आहे. मुख्य मंदिरासमोर पूर्व-पश्चिम चिरेबंदी दगडी पाटाईचा तीन दालनी साडे ७३ फूट लांब, ३२ फूट रुंद, दहा फूट उंच, ४० खांबी असा प्रशस्त सभामंडप बांधला आहे. या सभामंडपाच्या कडेवर पश्चिमाभिमुख श्री दासमारुतीची मूर्ती उभी आहे. या सभामंडपाचा उपयोग कथा, कीर्तन, पुराण यासाठी होतो. देवळातच दोन नाथपंथीय साधूंच्या संजीवन समाध्या आहेत.

सिंहस्थ काळात नाथपंथी साधूंची झुंडी या काळाराम मंदिरात १५ दिवस निवासासाठी असते. दरवाजाने आत गाभार्‍यात प्रवेश केल्यावर समोर सिंहासन व त्यावर रौप्यमय शेष चिन्हांकित एकास एक लागून तीन प्रभावळ असून त्याखाली भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्ती विराजमान आहेत. गाभार्‍यावरील घुमट सर्वात उंच असून शंखाकृती आहे. यावरील कळस चार फूट उंचीचा, सहा फूट घेराचा असून तशाच घाटाचा तांब्याचा कळस कोणी गोसाव्याने बसविला होता. त्यावर नाशिक येथील प्रभाकर दिवाकर पंगेवैद्य यांनी कोणी एक मुंबईचा श्रीमंत व्यापारी जलोदर ग्रस्त होता.

त्याचा रोग बरा करून त्यांच्याकरवी सोन्याचा मुलामा देवविला, असे म्हटले जाते. असेही म्हटले जाते की, मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर कळसाचे काम बाकी असताना रंगराव ओढेकर यांचे जवळील संपत्ती संपत आली असता, अशावेळी त्यांच्या सुविद्य पत्नीने आपली उंची नथ मोडून कळस मढविण्याचे काम पूर्ण केले. शिखरावर हनुमान चिन्हांकित ध्वजा फडकत आहे. या देवालयासाठी लागलेले दगड नाशिकपासून तीन कोसावर असलेल्या रामसेज व बोरगड येथून आणून काम करण्यात आले आहे. या मंदिराची प्राची दिशा वेदशास्त्रसंपन्न यादव शास्त्री कायस्थ या ज्योतिष विद्वानाने इतक्या नेमकेपणाने साधून दिली आहे की, मेष व तुळ या दोन संक्रांतीस म्हणजे भूमध्य रेघेवर सूर्य येणारे दिवशी सूर्योदयाबरोबर सूर्यकिरण श्री मुखावर पडतात.

या देवालयाचे बांधकाम १७७८ मध्ये सुरू होऊन १७९० मध्ये पूर्ण झाले. या मंदिराचे काम एकंदर १२ वर्षे चालून त्या कामी २२ लाख रुपये खर्च लागला. या मंदिरास अनेक गावे इनाम असल्याची माहिती मिळते. मंदिरातील मूर्ती वालुकामय असून प्रभू श्रीरामांचा उजवा हात हृदयाशी आहे व डावा हात खाली सरळ आहे. प्रभू स्वतः निर्देश करीत आहेत की, “जो कोणी मला शरण येईल, त्याला मी हृदयाशी लावीन.” हा राम ‘आत्माराम’ आहे. या रामाची उपासना करुनच समर्थ रामदासांनी स्वधर्माचा शंखनाद केला. १७९० मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर रंगराव ओढेकर यांनी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला. पानिपतच्या रणसंग्रामात सरदार ओढेकर यांनी आपला देह ठेवला.

परंतु, या मंदिराच्या निमित्ताने त्यांनी आपला कीर्तीध्वज आसूर्य फडकत ठेवला आहे. मंदिरात चैत्र मासात पाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व त्याची सांगता रथोत्सवाने केली जाते. याशिवाय या हरिहर क्षेत्रात खालील वैशिष्ट्यपूर्ण राम मंदिरे प्रसिद्ध आहे. काळाराम मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समरसतामार्च १९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेशाचे आंदोलन सुरू केले. हे आंदोलन पुढे तीन वर्षं चालले. भाऊराव गायकवाड, अमृतराव रणखांबे, साहित्यिक शांताबाई दाणी, कुसुमाग्रज अशा स्थानिक मंडळींनी हे आंदोलन चेतवत ठेवले.

अस्पृश्यता ही धर्मामुळे आली आहे, अशी समाजधारणा असल्यामुळे, धर्माचे अधिष्ठान असलेल्या, काळाराम मंदिरात प्रवेश मिळाला, तर आपोआपच अस्पृश्यतेचा भाव समाप्त होईल. म्हणजे ज्या हिंदू धर्माच्या हृदयात श्रीरामांना स्थान आहे, ते स्थान अस्पृश्य बांधवांनाही मिळेल आणि हिंदू समाज जातपात विरहित होऊन संघटित व कुठल्याही उच्च-नीचतेची बाधा नसणारा, समतेच्या अधिष्ठानावर उभा असणारा समाज निर्माण होईल, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धारणा होती. श्री काळाराम मंदिर (नाशिक), अंबामाता मंदिर (अमरावती), पर्वती मंदिर (पुणे) या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने मंदिर प्रवेशाची आंदोलने झाली.

स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यातील भेद रेषा संपविण्याचा मूळ उद्देश या आंदोलनामागे होता. मात्र, तत्कालीन समाजधुरिणांना व धर्ममार्तंडांना डॉ. बाबासाहेबांचे मन आणि विचार कळले नाहीत. स्वा. सावरकर, कुर्तकोटी शंकराचार्य यांचा या मंदिर प्रवेश आंदोलनाला पाठिंबा होता. मात्र, धर्माचा अर्थ न कळलेल्या सवर्णांकडून आंदोलकांवर म्हणजेच अस्पृश्य बांधवांवर दगड-गोट्यांचा वर्षाव झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन हे आंदोलन स्थगित केले. या घटनेला वर्ष ७५ झाल्यानंतर काळाराम मंदिरातून २००५ साली समरसता यात्रेचा प्रारंभ झाला. महाराष्ट्राच्या संघदृष्ट्या चारही प्रांतात समरसता यात्रा गेल्या.

नाशिक येथील समरसता यात्रा उद्घाटन कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव हे उपस्थित होते. यावेळी काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर महाराज यांनी या यात्रेप्रसंगी उपस्थित भटके-विमुक्त, अनुसूचित जाती- जमाती, ओबीसी अशा सर्व समाज घटकातील समरसता यात्रेचे कार्यकर्ते यांना मंदिराच्या गाभार्‍यात नेले व त्यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांचे पूजन केले. यावेळी महंत सुधीर महाराज म्हणाले की, “माझ्या पूर्वजांनी केलेले पाप तुम्हा सार्‍यांच्या उपस्थितीमुळे आज धुवून निघाले आहे.” हा क्षण प्रत्यक्ष अनुभवणार्‍या सर्व बांधवांच्या चेहर्‍यावर डॉ. बाबासाहेबांचे समतेचे स्वप्न संघ प्रेरणेतून साकार होत असल्याचा आनंद दिसत होता. अहिल्या राम मंदिरआसेतू हिमाचल सहस्रावधी जीर्ण व ध्वस्त मंदिरांचा जीर्णोद्धार व निर्माण करणार्‍या धर्म मूर्ती अहिल्याबाई होळकर यांनी नाशिक क्षेत्रीसुद्धा गोदातीरावर घाट व कुंडे निर्माण करून, अहिल्या कुंडासमोरच श्री काशिविश्वेश्वर यांचे भव्य मंदिर उभारले आहे.

मंदिराला लागूनच भव्य अहिल्याराम मंदिराची उभारणी केली आहे. मंदिरात भगवान श्रीरामांच्या विग्रहासह प्रातःस्मरणीय अहिल्याबाईंची मूर्तीसुद्धा दर्शनीय आहे. गर्भगृहापुढे पाण्याचे कारंजे आहे. मंदिराच्या प्रारंभी भिंतीवर शिलालेख असून, त्यावर श्रीमंत महाराज होळकर सरकार इंदोर स्टेट श्री अहिल्या राम मंदिर पंचवटी नाशिक हे मंदिर पुण्यश्लोक देवी श्री अहिल्याबाई होळकर यांनी बांधून घेतले व श्रींची स्थापना शके १७०८ ज्येष्ठ शुक्ल १२ गुरुवार रोजी केली, असा उल्लेख राजमुद्रेसह आहे. सरदार हिंगणे यांचे गोरेराम मंदिरदिल्ली दरबारात स्वराज्याचे यशस्वी वकील, सरदार महादेवराव हिंगणे हे नाशिकला पेशव्यांचे उपाध्याय होते.

बहुश्रुतता व अवलोकन चातुर्य तसेच, फारसी भाषेवर प्रभुत्व असणार्‍या हिंगणे यांनी उत्तरेतील पेशव्यांनी मिळवलेल्या अनेक सरदेशमुख्या, चौथाया यांच्या अनेक भानगडींचा यशस्वी निकाल लावून दिला, असे महादेवराव भट हिंगणे यांनी १७८२ साली नाशिकला गोदावरीच्या तीरावर श्री राम मंदिराची निर्मिती केली. मंदिरात श्रीराम पंचायतन असून गणपती, देवी, शंकर, पार्वती, मारुती आदी मूर्ती आहेत. गोदेच्या काठावर दगडी पायर्‍या चढून गेल्यावर या मंदिराचे दर्शन होते. सरदार श्रीमंत मुठे गोरेराम मंदिरश्रीक्षेत्र कपालेश्वर मंदिराजवळच सरदार श्रीमंत मुठे यांचे जवळ जवळ २०० वर्षांपूर्वीचे हे गोरेराम मंदिर आहे. हे मंदिर संपूर्णपणे सागवानी लाकडात बांधलेले असून, पेशवेकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरात भगवान श्रीराम लक्ष्मण सीतेसह भगवान श्रीविष्णूचे (सत्यनारायणाचे) श्री विग्रह आहे.

या मूर्ती पांढर्‍या संगमरवरी असल्याने त्यांना ‘गोरेराम’ असे म्हणतात. मंदिरात चतुर्थाश्रम घेतलेल्या पू. दिनकर गणेश मुठे, पू. गणेश रघुनाथ, मु. पू. भिकाजी मुठे या सत्पुरुषांच्या जागृत समाध्या असून, मंदिराबाहेर श्री मारुती मंदिर व काही सत्पुरुषांच्या समाध्या आहेत. मंदिरात वेगवेगळे उत्सव होत असून, लाकडी बांधकामाची देखभाल विषयी अत्यंत काळजी घेतली जाते. बायकांचे रामनाशिक क्षेत्री नाव दरवाजा येथे ‘बायकांचे राम’ असे वैशिष्ट्यपूर्ण राम मंदिर आहे. या मंदिराची स्थापना पूर्वी कोणी महिलेने केल्यामुळे ‘बायकांचा राम’ म्हणून हे मंदिर ओळखले जाते. मंदिर साधारण सव्वाशे वर्षांपूर्वीचे असून या मंदिरातील मूर्ती सज्जनगडावरून पालखीतून आणून येथे स्थापन केल्याचे श्री विनोद वाघमारे यांनी सांगितले. पूर्वीच्या काळी स्त्रियांकडून या मंदिराची पूजाअर्चना होत असे. मंदिरात चैत्र पाडव्यापासून नवमीपर्यंत उत्सव व नित्य काकड आरती होत असते.

त्याचप्रमाणे महिलांचे भजन आदी कार्यक्रम होत असतो. कोदंडधारी श्रीरामनाशिकच्या सैनिकी शिक्षण देणार्‍या सुप्रसिद्ध भोसला मिलिटरी शाळेच्या प्रांगणात भगवान श्री रामाची कोदंडधारी मूर्ती स्थापित आहे. या मंदिरातील मूर्ती ही रामदंडी (मिलिटरी स्कूलच्या स्थानिक विद्यार्थ्यांनी) वापरलेल्या बंदुकीच्या धातू व गोळ्यापासून बनवलेली आहे. शिल्पकार सदाशिव साठे यांनी बनविलेल्या या मूर्तीची स्थापना दि. १० एप्रिल १९८४ रोजी करण्यात आली आहे. याशिवाय अनेक छोटी-मोठी राम मंदिरे नाशिक क्षेत्री आहेत. स्वधर्म व स्वराज्य स्थापनेचा उत्कर्ष काळ उदित झाला असताना येणार्‍या प्रभू रामजन्मोत्सव - अवतरण दिनानिमित्त आत्मारामांच्या चरणी आत्मार्पण!जय श्रीराम!

- देवेंद्रनाथ नटवरलाल पंड्या 

९८२२३९९८५१

 
lokshahi.com

Shravan Somvar : Special Story : जाणून घ्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराची कथा

Siddhi Naringrekar

लोकशाही स्पेशल

 नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते. दर १२ वर्षांनी नाशिकबरोबर त्र्यंबकेश्वरलाही कुंभमेळा भरतो. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते. दर १२ वर्षांनी नाशिकबरोबर त्र्यंबकेश्वरलाही कुंभमेळा भरतो. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे. येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ आहे. निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते.भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त विधी, हे धार्मिक विधी केले जातात .

त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास

 प्राचीन काळी त्र्यंबक ही गौतम ऋषींची तपोभूमी होती. त्याच्यावर झालेल्या गोहत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी Gषी गौतमांनी तीव्र तपश्चर्या केली आणि येथे गंगेचा अवतार घेण्यासाठी शिवाकडून वरदान मागितले. परिणामी, दक्षिणेच्या गंगा म्हणजेच गोदावरी नदीचा उगम झाला.

गोदावरीच्या उत्पत्तीसह, गौतम ऋषींच्या अनुनयानंतर शिवाने या मंदिरात बसणे स्वीकारले. तीन डोळ्यांच्या शिव शंभूच्या उपस्थितीमुळे हे ठिकाण त्र्यंबक (तीन डोळे) म्हणून ओळखले जाऊ लागले. उज्जैन आणि ओंकारेश्वर प्रमाणेच त्र्यंबकेश्वर महाराज हे या गावाचे राजा मानले जातात, म्हणून दर सोमवारी त्र्यंबकेश्वरचा राजा आपल्या प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी शहराच्या दौऱ्यासाठी बाहेर जातो.

पौराणिक कथा

 एकदा महर्षी गौतमच्या तपोवनात राहणाऱ्या ब्राह्मणांच्या बायका काही मुद्यावर त्यांची पत्नी अहिल्यावर रागावली. त्यांनी आपल्या पतींना गौतम insultषींचा अपमान करण्यास प्रेरित केले. त्या ब्राह्मणांनी यासाठी श्रीगणेशजींची पूजा केली.

त्याच्या पूजेने प्रसन्न होऊन गणेशजी प्रकट झाले आणि त्यांना वरदान मागण्यास सांगितले, ते ब्राह्मण म्हणाले- ‘प्रभु! जर तुम्ही आमच्यावर प्रसन्न असाल, तर ऋषी गौतमला या आश्रमातून बाहेर काढा. ‘ हे ऐकून गणेशाने त्याला असे वरदान न मागण्यासाठी राजी केले. पण तो त्याच्या विनंतीवर ठाम राहिला.

सरतेशेवटी, गणेशजींना त्यांचे पालन करणे भाग पडले. आपल्या भक्तांचे मन राखण्यासाठी त्यांनी दुर्बल गायीचे रूप धारण केले आणि गौतम ofषींच्या शेतात राहू लागले. गाईला पीक चरताना पाहून softषीने हळुवारपणे हातात पेंढा घेतला आणि त्याला धावण्यासाठी धावले. त्या पेंढ्यांना स्पर्श केल्यावर ती गाय तिथेच मेली आणि खाली पडली. आता मोठा आक्रोश झाला आहे.

महर्षी गौतम यांनी ती सर्व कार्ये पूर्ण केल्यानंतर आपल्या पत्नीसह पूर्णपणे तल्लीन झाल्यानंतर भगवान शिव यांची पूजा करण्यास सुरुवात केली. यावर प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांना वरदान मागण्यास सांगितले. महर्षि गौतम त्याला म्हणाले- ‘प्रभु, मला तुम्ही गायींच्या हत्येच्या पापातून मुक्त करावेसे वाटते.’ भगवान शिव म्हणाले- ‘गौतम! तुम्ही पूर्णपणे निष्पाप आहात. गोहत्येचा गुन्हा तुमच्यावर धूर्तपणे लादला गेला. मला तुमच्या आश्रमाच्या ब्राह्मणांना शिक्षा करायची आहे ज्यांनी हे फसवणूक केली आहे. ‘

यावर महर्षी गौतम म्हणाले की प्रभु! त्यांच्यामुळेच मला तुमचे दर्शन मिळाले आहे. आता त्यांना माझे सर्वोच्च हित मानून रागवू नका. ‘ अनेक ,षी, मुनी आणि देव तेथे जमले, त्यांनी गौतमचे म्हणणे मान्य केले आणि भगवान शंकराला तेथे कायमचे वास्तव्य करण्यासाठी प्रार्थना केली. त्यांनी त्यांचा सल्ला स्वीकारला आणि त्र्यंबक ज्योतिर्लिंग नावाने तेथे स्थायिक झाले. गौतमजींनी आणलेले गंगाजी देखील जवळच गोदावरी नावाने वाहू लागले. हे ज्योतिर्लिंग सर्व गुणांचे दाता आहे.

 https://thatsinindia-com.translate.goog/blog/history-of-nashik/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=tc

नाशिकचा धार्मिक इतिहास - राम सीता, त्रिकंटक आणि बरेच काही

अपडेट केलेले:

या पृष्ठावरील काही दुवे संलग्न दुवे असू शकतात.

नाशिक

नाशिक सुमारे २,५८९ चौरस किमीमध्ये पसरलेले आहे आणि सुमारे  २२ लाख लोकसंख्या आहे  .

हा जिल्हा विनायक दामोदर सावरकर आणि दादासाहेब फाळके यांसारख्या महान नेत्यांचे जन्मस्थान आहे. याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरात दलितांच्या प्रवेशासाठी सत्याग्रह (१९३०-१९३४) सुरू केला होता. भारतातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र, कुंभमेळा देखील या जिल्ह्यात भरतो.

मी भारताच्या या वाईन कॅपिटलमध्ये बऱ्याच काळापासून राहतोय. नाशिकच्या इतिहासाच्या पलीकडे काहीतरी आहे हे मला खूप दिवसांपासून माहित आहे. तासन्तास केलेल्या संशोधनावर आधारित हा ब्लॉग तुम्हाला ते काय आहे याची ओळख करून देतो.

नाशिकचा प्राचीन इतिहास

नाशिकचा धार्मिक इतिहास ६ मुख्य घटकांनी ओळखला जातो. म्हणूनच नाशिक जगभरातून इतके हिंदू यात्रेकरूंना आकर्षित करते.

१. अयोध्येच्या राजाचे घर 

१४ वर्षांच्या वनवासात श्री राम, माता सीता आणि श्री लक्ष्मण नाशिक (पंचवटी) येथे सुमारे अडीच वर्षे राहिले. पंचवटीमध्ये ' सीता गुफा ' म्हणून ओळखली जाणारी एक गुहा आहे. भगवान राम आणि लक्ष्मण अन्नाच्या शोधात बाहेर पडत असत तेव्हा या गुहेत माता सीता राहत असत. 

याच ठिकाणी श्री लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक कापले होते. या घटनेमुळे नाशिक (नासिका) नाव पडले, ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ 'नाक' असा होतो. 

२. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर मंदिर

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे मी एक सुंदर मंदिर पाहिले आहे. भारतातील बारा 'ज्योतिर्लिंगांपैकी' हे एक मंदिर आहे . भगवान शिवाचेच अवतार मानले जाणारे हे ज्योतिर्लिंग हिंदू धर्मात खूप पवित्र आहेत.

असेही मानले जाते की बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याने 'मोक्ष' (मुक्ती) मिळू शकते. सनातनींसाठी, हे स्वतःच नाशिकला भेट देण्याचे महत्त्व दर्शवते.

३. भगवान हनुमानाचे जन्मस्थान

महावीर विक्रम बजरंगी भगवान हनुमानाच्या जन्मस्थानाबद्दल वेगवेगळी मते आहेत.  ब्रह्म पुराणात  नाशिकमधील अंजनेरी या टेकडीला भगवान हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे पुष्टी मिळते. म्हणूनच या टेकडीला भगवान हनुमानाची आई देवी अंजना यांच्या नावावरून हे नाव पडले आहे.

अंजनेरी तलाव
अंजनेरी येथील तलाव
अंजनेरी तलाव

टेकडीवर एक पोकळ रचना आहे, जी स्वतः भगवान हनुमानाच्या पावलांचे ठसे असल्याचे मानले जाते . मी त्या ठिकाणी भेट दिली होती, परंतु दाट धुक्याने पावलाचे ठसे पूर्णपणे झाकले होते. जेव्हा आकाश निरभ्र असते, तेव्हा पावलाचे ठसे स्पष्टपणे पाहण्यासाठी डोंगरावर आणखी चढावे लागते.

4. समुद्र-मंथन अमृत (अमृत) ड्रॉप

कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठा तीर्थयात्रा उत्सव आहे. तो दर चार वर्षांनी प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि  नाशिक या चार ठिकाणी होतो . हा मेळा फक्त याच ठिकाणी का होतो याचा इतिहास समुद्र-मंथनशी जोडलेला आहे. 

समुद्रातून अमृत बाहेर काढल्यानंतर, ते कोण सेवन करेल यावर वाद झाला. या लढाईदरम्यान, अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले. जर तुम्ही अंदाज लावला असेल तर ते प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिकवर पडले .

मला वैयक्तिकरित्या वाटते की या अमृताच्या थेंबाचा नाशिकमधील हिरवळ आणि मातीच्या सुपीकतेवर मोठा परिणाम होतो.

५. ५ पांडवांचे घर

कुरुक्षेत्राच्या मोठ्या युद्धापूर्वी, पांडवांना त्यांच्या राजवाड्यापासून दूर वनवासात राहावे लागले. नाशिकच्या बाहेर 'पांडव लेणी' नावाच्या टेकडीवर काही गुहा आहेत. या गुहा पांडवांच्या वास्तव्याचे ठिकाण असल्याचे म्हटले जाते, जरी या विधानाचे समर्थन करणारे पुरावे अद्याप सापडलेले नाहीत.

पांडव-लेणी
पांडव लेणी

६. गोदावरी नदी

गोदावरी नदी ही भारतातील सात पवित्र नद्यांपैकी एक आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथून तिचा उगम होतो. ऋषी गौतम यांच्या तपस्येमुळे ही नदी पृथ्वीवर आली असे म्हटले जाते. 

कुंभमेळ्यात गोदावरी देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तिच्या पवित्र पाण्यात डुबकी मारल्याने पापांचे शुद्धीकरण होते आणि मुक्ती मिळते असे म्हटले जाते. म्हणूनच या नदीला दक्षिण गंगा (दक्षिणेची गंगा) असेही म्हणतात. म्हणूनच, जे लोक त्यांच्या मृत प्रियजनांच्या अस्थी गंगेत विसर्जित करू शकत नाहीत ते गोदावरीमध्ये डुबकी मारणे पसंत करतात.

नाशिकची विविध नावे

नाशिकच्या विविध नावांमागे एक वेगळा इतिहास आहे.

  1. नाशिक : नासिका, ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ 'नाक' आहे. हे त्या आख्यायिकेशी संबंधित आहे जिथे श्री लक्ष्मणने रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक कापले होते. हे 'नासिक' नावाच्या उदयाशी संबंधित आहे.
  2. नाशिक : नाशिक शहराभोवती नऊ शिखरे आहेत. हिंदीमध्ये नऊ म्हणजे 'नौ' आणि शिखरांचा अर्थ 'शिखर' असा होतो. याचा अर्थ 'नौशिखर' असा होतो जो पुढे नाशिकमध्ये रूपांतरित होतो. जरी, दुसऱ्या एका सिद्धांतानुसार नाशिक हे नाशिकचे आणखी एक रूप आहे.
  3. गुलशनाबाद : नाशिक हे त्याच्या गुलाबांसाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे मुघल राजवटीत त्याचे नाव 'गुलशनाबाद' पडले. मराठा राज्यकर्त्यांनी नाशिकवर पुन्हा नियंत्रण मिळवल्यानंतर या नावाचे सार गेले.
  4. पद्मनगर : सत्ययुगात नाशिकला हेच नाव होते. पद्मनगर म्हणजे "कमळाचे शहर". ते सौंदर्य आणि अध्यात्माचे प्रतिनिधित्व करते. हे नाव नाशिकच्या प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे प्रतिबिंब आहे. हे कदाचित त्याच्या पवित्र नद्या आणि मंदिरांशी जोडलेले असावे.
  5. त्रिकंटक : त्रेतायुगात नाशिकला हेच नाव होते. संस्कृतमध्ये त्रिकंटक म्हणजे "तीन शिखरे". म्हणूनच ते प्राचीन ग्रंथांमध्ये नाशिकच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा किंवा बिंदूंचा संदर्भ घेऊ शकते. 
  6. जनस्थान : द्वापर युगात नाशिकला हेच नाव होते. "जनस्थान" चा रामायणाशी जवळचा संबंध आहे. याचा अर्थ "लोकांचे स्थान" किंवा "वस्ती असलेले ठिकाण" असा होतो. रामायणानुसार, नाशिक दंडकारण्य जंगलाचा भाग होता आणि त्याला जनस्थान म्हणून संबोधले जात असे. 


नाशिकच्या इतिहासाचा आढावा

नाशिकचा इतिहास समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. मौर्य राजवंशाच्या काळात हे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून सुरू झाले. या काळात व्यापार आणि संस्कृतीत भरभराट झाली. शतकानुशतके उलटत गेली, शक्तिशाली साम्राज्यांनी आपली छाप सोडली. सातवाहनांनी प्राचीन मंदिरे आणि गुहा बांधल्या. चालुक्यांनी त्यांच्या स्वतःच्या प्रभावी वास्तूंनी ही परंपरा चालू ठेवली.

त्यानंतर मराठे या क्षेत्रात आले. त्यांनी त्यांची अनोखी शासनशैली आणि संस्कृती आणली. त्यांच्या प्रभावामुळे नाशिकच्या इतिहासात एक नवीन पदर भरला. १९ व्या शतकात जेव्हा ब्रिटीश आले तेव्हा नाशिकमध्ये बदल होऊ लागले. ते एका आधुनिक शहरात विकसित झाले परंतु त्याचे ऐतिहासिक सार टिकून राहिले.

प्रत्येक युगाने स्वतःची छाप सोडली आहे, शहराचे वेगळेपण घडवले आहे. आज, नाशिक या विविध प्रभावांचे मिश्रण म्हणून उभे आहे. तुम्ही आमच्या समर्पित पृष्ठ, नाशिक वर शहराबद्दल आणि त्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता .


वारंवार विचारले जाणारे प्रश्न

नाशिक भारतातील बहुतेक वाइन बनवते आणि म्हणूनच त्याला भारताचे कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जाते. यामुळे त्याला 'नापा व्हॅली ऑफ इंडिया', 'वाईन कॅपिटल ऑफ इंडिया' आणि 'ग्रेप सिटी ऑफ इंडिया' अशी इतर टोपणनावे देखील मिळाली आहेत.

नाशिकचे हवामान आणि माती द्राक्षे लागवडीसाठी परिपूर्ण आहे. नाशिकच्या आसपासच्या अनेक द्राक्षमळे आणि वाइनरीज टूर आणि चाखण्याची सुविधा देतात, ज्यामुळे वाइन प्रेमी आकर्षित होतात.

 
 https://gajawaja.in/know-kalaram-mandir-of-nasik-is-historical-closely-associated-with-sri-rama-marathi-info/
 
gajawaja.in

Kalaram Mandir : काळाराम मंदिरचा इतिहास आणि माहिती

Jyotsna Kulkarni

नाशिक भारतातील एक महत्वाचे आणि मोठे शहर आहे. शिवाय देशातील हे एक महत्त्वाचे हिंदू तीर्थक्षेत्र देखील आहे. नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. मंदिरांचे शहर म्हणून देखील नाशिकची एक ओळख आहे. अतिशय पवित्र आणि मोठे तीर्थक्षेत्र असलेल्या या नाशिकला धार्मिक आणि ऐतिहासिक बाबतीत मोठे महत्व आहे

अतिशय प्रसन्न आणि अल्ह्हादायक वातावरण असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे ‘भारताची नापा व्हॅली’ म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. अशा या नाशिकमधील एक मंदिर असतीशय मोठे आणि जगप्रसिद्ध आहे. त्या मंदिराबद्दल अनेकांना मोठे कुतूहल आणि उत्सुकता जाणून घेण्यासाठी. देशविदेशातील असंख्य पर्यटक या मंदिरात भेट देण्यासाठी येतात आणि मनशांती अनुभवतात. असे हे अतिशय सुंदर मंदिर आहे काळाराम मंदिर.

प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पावनभूमीमधील हे काळाराम मंदिर जगविख्यात आहे. काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या मंदिराला भेट दिली. याचवर्षी 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. त्याआधी पीएम मोदींनी 11 दिवसांचे व्रत केले आणि त्याची सुरुवात नाशिकपासून आहे. प्रभू रामाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणजे काळाराम मंदिराविषयी अधिक माहिती सांगणार आहोत.

प्रभू रामचंद्रांचे त्यांच्या वनवासाच्या काळात नाशिकमध्ये अनेक वर्ष वास्तव्य होते. याच ठिकाणाहून देवी सीतेचे रावणाने अपहरण देखील केले. रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्यांच्या इथेही निवासाच्या अनेक खुणा आजही श्रीरामाच्या अस्तित्वाची साक्ष देतात. या अनेक खुणांची जपणूक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये होते. नाशिकचे काळाराम मंदिर हे त्यातीलच एक प्रसिद्ध मंदिर आहे, जे पंचवटी परिसरात वसले आहे.

Kalaram Mandir

नाशिकमध्ये रामाची अनेक मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिराचा आपला एक वेगळा इतिहास आणि विशेषता आहे. मात्र या सगळ्यात काळाराम मंदिराचे वैशिष्ट् आणि महती काही औरच. हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या जुने तर आहेच, सोबतच त्याची बांधणीही खास आहे. शिवाय या मंदिराला सामाजिक इतिहासही लाभला आहे.

पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७८२ मध्ये बांधले. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून नागर शैलीमध्ये या मंदिराचे बांधकाम झाले आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात.

संपूर्ण मंदिर ७४ मीटर लांब व ३२ मीटर रूंद आहे. मंदिराला चार दिशांना चार दरवाजे आहेत. पूर्व महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभामंडप लागतो. त्याची उंची बारा फूट आहे. त्यात चाळीस खांब असून तेथे असलेला मारूती समोर असलेल्या मुख्य मंदिरातील श्रीरामाच्या चरणाकडेच पाहत आहे असे वाटते. सभामंडपाच्या बाजूला तीस फूट उंचीवर नगारखाना आहे.

मंदिराचे गर्भगृह काटकोनी असून त्यावरची नक्षीही सुंदर आहे. मंदिराची कळसापर्यंतची उंची ६९ फूट आहे. कळस ३२ टनी शुद्ध सोन्याचा आहे. या मंदिराला मोठा कोटही आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराला तीन दालने आहेत. तिसर्‍या दालनात मंदिराचा गाभारा आहे. तिथे श्रीराम, लक्ष्मण व सीता यांची मूर्ती आहे. खास बाब म्हणजे आपण नेहमीच श्रीरामांच्या मंदिरात राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीसोबतच त्यांच्या पायाजवळ हनुमान असतो. मात्र या मंदिरामध्ये हनुमान रामाच्या जवळ नाहीये.

मंदिराला १७ फूट उंचीचा चिरेबंदी कोट आहे. त्याच्या चारही बाजूला ओवर्‍या आहेत. या मंदिराची बांधणी अशी काही आहे, की एकावर दुसरा पाषाण रचून त्याचे संतुलन साधण्यात आले आहे. पाषाण जोडण्यासाठी सिमेंट किंवा चुन्याचा वापर केलेला नाही. तर खोबणीद्वारे दगड एकमेकांत अडकवले आहेत. त्यामुळेच मंदिराचे स्थापत्य आगळे वेगळे ठरते.

हे राममंदिर प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर असल्याचे बोलले जाते. तिथे आधी नागपंथीय साधू रहात. मंदिरालगत भैरवनाथ आणि गोरक्षनाथांचे मंदिरही आहे. काही नागपंथी साधूंना अरूणा-वरूणा नद्यांच्या संगमावर या मूर्ती सापडल्या आणि त्यांनी लाकडी मंदिर बांधले. पुढे १७८० मध्ये माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी सरदार रंगराव ओढेकरांना हे मंदिर बांधण्याची सूचना केली. १७९० मध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले. त्याकाळी या बांधकामासाठी २३ लाखाचा खर्च आला.

=================

हे देखील वाचा : जाणून घ्या चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र यांमधील फरक

================


या मंदिरात पूर्वी दलितांना प्रवेश नव्हता. त्यामुळे त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा उभारण्यात आला. बरीच वर्षे लढा चालूनही त्याला यश आले नाही. अखेर याच घटनेने विदग्ध होऊन डॉ. आंबेडकरांनी येवला येथे हिंदू धर्मात जन्माला आलो तरी मरणार नाही, अशी घोषणा केली. पुढे या मंदिरात दलितानाही प्रवेश देण्यात आला. या लढ्याला काही वर्षांपूर्वीच ७५ वर्षे पूर्ण झाली.

याच मंदिराच्या परिसरात प्रसिद्ध सीतागुंफा आहेत. येथेच सीतेने साधना केल्याचे बोलले जाते. पंचवटी हे नाव ज्यामुळे पडले ते पाच प्रसिद्ध वटवृक्षही याच परिसरात आहेत. मंदिरापासूनच जवळच गोदावरी नदी वाहते. प्रसिद्ध रामकुंडही तेथेच आहे. शिवाय इतर अनेक प्रसिद्ध मंदिरेही याच परिसरात आहेत.

 
blogs.maharashtratimes.indiatimes.com

ताम्रपटातील चंद्राची मेट

रमेश पडवळ

नाशिकचा प्राचीन इतिहास त्याच्या कणाकणात दडलेला आहे. एखाद्या राजाने हजारो वर्षांपूर्वी मंदिरांना आणि महत्त्वाच्या व्यक्तींना दान म्हणून दिलेली गावे आता कोठे आहेत हे शोधताना नाशिकचा इतिहासही उलगडू लागतो. सामुंडी, चंद्राची मेट अशा गावांतून समोर येतो त्या वेळच्या ऋणानुबंधाचा धागा.

सातवाहनांचे बलाढ्य साम्राज्य नष्ट झाले अन् पाचव्या शतकाच्या मध्यात दक्षिणेत बदामी चालुक्य घराणे शक्तिशाली घराणे म्हणून उदयाला आले. या घराण्याची स्थापना पहिला पुलकेशीने केली. पुलकेशीला कीर्तीवर्मन व मंगलेश अशी दोन मुले होती. पुलकेशीच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पुत्र कीर्तिवर्मन राजा झाला. कीर्तीवर्मनच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा दुसरा पुलकेशी लहान असल्याने त्याचा राज्यपाल म्हणून कीर्तिवर्मनचा भाऊ मंगलेश याच्याकडे राज्यकारभार गेला. मात्र त्याने कीर्तीमानच्या मुलगा दुसरा पुलकेशीचा अधिकार नाकारला. त्यातून झालेल्या युद्धांत मंगलेश मारला गेला. घरातील या भांडणात शत्रूंनी चालुक्यांविरोधात बंडाचे निशाण उभारले. मात्र पुलकेशीने सर्वांवर विजय मिळवित उत्तरेस गोदावरी व दक्षिणेस कावेरी या मधील विशाल प्रदेशावर स्वामीत्व मिळविलं. हर्षवर्धनवरची पुलकेशीने विजय मिळविला. या स्वाऱ्यांनंतर दक्षिणापूतनाथ झालेला पुलकेशीने आपल्या राज्याला ९९ हजार गावे जोडली यात अंजनेरीचाही समावेश होता. पुलकेशीच्या मृत्यूनंतर पल्लवांनी बदामीचा ताबा घेतला. त्या चार मुलांपैकी पहिला विक्रमादित्य व चंद्रादित्य यांनी नाशिक-कोकण परिसरात आश्रय घेतला. तर आदित्यवर्मन व अभिनवादित्य यांनी बदामीवर आपले राज्य प्रस्थापित केले. विक्रमादित्याने आपला हक्क मारला गेल्याने आपल्या भावांवर चाल करून पुन्हा बादामी ताब्यात घेऊन स्वत: राजा झाला. विक्रमादित्यानेही नाशिकमध्ये बारावर्ष वनवास भोगला व त्यानंतर राजा झाला. त्यानंतर पल्लवांचा नाश करीत पुलकेशीच्या मृत्यूचा बदला घेतला. या दरम्यान नाशिकच्या अंजनेरीची प्रशासक म्हणून जबाबदारी विक्रमादित्यने गुर्जर उर्फ हरिश्चंद्रवंशीय वंशातील स्वामिचंद्र यांना दिली. वंशपरंपरेने अंजनेरीचा कारभार राजा सिंहराज व त्यानंतर राजा पृश्विचंद्र भोगशक्तीकडे आला अन् येथून सुरू होते नाशिकच्या अंजनेरी ताम्रपटातील भोगशक्तीने दान म्हणून दिलेल्या गावांची सफर. हा प्रवास एक अनोखा अनुभव देतो.

अंजनेरी हे अनेक राजांच्या राजधानीचे शहर राहिले आहे. हे आता अंजनेरीकडे पाहून वाटत नसले तरी तेथील मंदिर व लेणीहा वारसा आपल्याला आजही इतिहास सांगतो. अंजनेरीत चार प्राचीन ताम्रपट मिळाले आहेत. त्यांना अंजनेरी ताम्रपट असे म्हटले जाते. यातील दोन ताम्रपट भोगशक्ति या राजाचे आहेत. या ताम्रपटात देवालयाच्या व्यवस्थेसाठी दान दिलेल्या गावांचा तसेच लोकांना, व्यापाऱ्यांना दिलेल्या सवलतींचा उल्लेख केलेला आहे. तसेच ज्या लोकांनी गुन्हे केले आहेत. त्यांच्या दंडाचा व शिक्षेचा उल्लेख करण्यात आला आहे. यातील समगिरीपट्टन, चंद्रपुरी, सवाणेपल्लिका, कंसारिपल्लिका, मौरेयपल्लिका, अंबेयपल्लिका या गावांचा उल्लेख आलेला आहे. ही गावे आता नेमकी कुठे आहेत, कशी आहेत. त्या गावांना माहिती आहे का की, ही गावे आठव्या शतकाच्या आधीपासून आपला इतिहास घेऊन पुढे चालली आहेत. त्यांना माहिती असेल का हा इतिहास असे अनेक प्रश्न घेऊन अंजनेरीतून आमचा प्रवास त्र्यंबकेश्वरच्या दिशेने सुरू झाला. पहिनेरोडला लागल्यावर उजव्या हाताला काजोलीकडे जायचं. काजोली (काजुर्ली)च्या आधी डावीकडे असंख्य वीरगळी पावसापासून बचावासाठी एक झुडपाखाली आश्रयाला गेल्याने दिसते. काजोलीपाहून सामुंडीच्या दिशेने निघायचं. सामुंडी म्हणजे भोगशक्तिच्या ताम्रपटातील सवाणेयपल्लिका. हे गाव आता कसे असेल, असा विचार करता करताच सामुंडीत आपण पोहचतो. अकराशे लोकसंख्येच्या गावात कोळी समाज सर्वाधिक आहे. मारूती, मरिआई मंदिरे गावात आहेत. गावातील यात्रेतील बोहाड्यांची परंपरा पंचवीस वर्षांपूर्वी बंद झाली. सामुंडीला पूर्वी सोनेवाडीही म्हटले जायचे असे, संपत खोडे व लिलाबाई ठाकूर सांगतात. भोगशक्तिने आठव्या शतकात हे गाव देवालयाला दान म्हणून दिले होतं. सामुंडीपासून पुढे अस्वलीत हर्ष गाव लागतं. हर्ष म्हणजे हरिहर गड. हे गडाच्या पायथ्याचे गाव असल्याचे रामा बाळू सिद्ध सांगतात. तेथून पुढे हरिहरच्या पायथ्याचे कोटमवाडी, निरगुडे हर्ष ही गावे आहेत, असे समाधान निरगुडे सांगतात. तेथून थोडेपुढे गेल्यावर टाकेहर्षमध्ये भातशेतातील एक झाडाखाली मोठ्या संख्येने आदिवासींचे लाकडी चिरे उभारलेले दिसतात. तेथून पुढे टाके हर्ष हे गाव लागतं. हर्ष किल्ल्याच्या अवतीभवतीच्या सर्व गावांच्या मागे हर्ष असे बिरूद लागलेले आहे. पुढे बसगड म्हणजे भास्करगडाच्या पायथ्याला वसलं वैतरणा धरणामुळे विस्थापित डहाळेवाडी हर्ष हे गाव लागतं. गावाने आपल्या जुन्या परंपरा जपण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. गावात मे महिन्यात सात दिवस बोहाड्यांचा कार्यक्रम होतो, असे शिवराम घोरपडे व मधू खोंडे सांगतात.

आता भोगशक्तिच्या चंद्रपुरीत जाण्याचे वेध लागल्याने आपलाही वेग वाढतो. रस्त्यात उजव्या हाताला मोखाड्याकडे जाणारा घाट रस्त्याचा फाटा लागतो. या रस्त्यावर घाटनदेवीचे मंदिर आहे. चंद्राच्या मेट गावाची ही देवी गावाची रक्षणकर्ती मानली जाते. मंदिरापासून जवळच मुठभर घरांचे आदिवासी पाडे व त्यांचं विश्व अनुभवत आपण चंद्रपुरीत म्हणजेच चंद्राची मेट या गावात पोहचतो. गावाच्या नावातील चंद्र हा चालुक्य घराण्याचे मांडलीक असलेले हरिचंद्र वंशामुळे पडले असावे, असे वाटते. तर मेट म्हणजे गडाच्या उतारावरील सपाट परिसर जेथे गाव वसलेले असते अन् तेथे जकात व्यापार अशा गोष्टी चालतात. ही व्यवस्था ज्यांच्याकडे सोपविलेली असते ते मेटकरी, असे प्रा. रामनाथ रावळ सांगतात. चंद्राच्या मेटमध्ये दाखल झाल्यावर या आदिवासी पाड्यावर एकमेव वाड्यासारखे घर दिसते. हा वाडा ६ बाय १० खणी व दोन-तीन मजली असून, ते चंद्रे कुटुंबीयांचे आहे. अर्थात गावात सर्वाधिक आडनावाचे लोक चंद्रेच आहेत, असे कैलास चंद्रे, रमेश चंद्रे, चंद्रराम व जीवन चंद्रे सांगतात. हा वाडा दीडशे वर्ष जुना आहे. चंद्राची मेट हे जकातीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. त्याला नाशिकचं गेटही म्हटले जाते. जकातीचा कारभार बहुदा या कुटुंबीयांकडे असल्याने हे त्यावेळी श्रीमंत घर असावं. चंद्राची मेटमधील बाजारपेठही मोठी होती. येथील ग्रामस्थांना प्राचीन नाणीही सापडतात, असे जीवन चंद्रे सांगतात. इंग्रजांच्या काळात चळवळींचे केंद्रही हे गाव राहिलं आहे.

ग्रामस्थांशी गप्पागप्पांमध्ये गावचा इतिहास उलगडायला लागतो. तसे गावकरी गोळा व्हायला लागतात अन् बाराशे वर्षांपूर्वीही आमचे पूर्वज येथे होते. हे समजून घेताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपण्यासारखा झालेला असतो. अगदी पुलकेशी ते विक्रमादित्य अन् भोगशक्तिने जव्हार बुद्रूकच्या मंदिराला ही गावे दान म्हणून दिल्याचे एकताना गावकरी हरखून जातात अन् बाराशे वर्षांपूर्वीच्या या गावांमध्ये आल्याचा एक वेगळा आनंद मिळतो. सामुंडी, चंद्राची मेट याशिवायही कंसारपल्लिका म्हणजे कुरनोली असावे, मौरेयपल्लिका म्हणजे जव्हार रोडवरील मोरवाडी, अंबेयपल्लिका म्हणजे आताचे अंबाली, जयपूर म्हणजे जव्हार असावे असे संदर्भ शांताराम देव यांच्या महाराष्ट्र ताम्रपटांची वर्णनात्मक संदर्भमध्ये मिळतात. भोगशक्तिच्या ताम्रपटातील समगिरीपत्तन (पट्टन) हे गाव आता कोणते हा संदर्भ काही लागत नाही. मात्र हे गाव नदीच्या किनारी वसलेल गाव असणार. कारण पट्टन म्हणजे बंदराचे गाव. म्हणजेच वैतरणा नदीतून जलमार्गाने वाहतूक केली जायची. त्यावेळच्या लहान लहान नद्यांचा वापर जलवाहतुकीसाठी किती खुबीने करीत असावेत हेही समगिरीपत्तन दाखविते.

बदामी चालुक्यवंशीय पुलकेशी ते पृश्विचंद्र भोगशक्तिने अंजनेरीचा केलेला कायपालट आजही वारसास्थळ म्हणून आपल्याला पहायला मिळतो. अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेली सोळा मंदिरे, सरोवर अन् अंजनेरीत सापडलेली चार ताम्रपट (हे ताम्रपट नाणेसंशोधन केंद्रात उपलब्ध आहेत.) बाराशे वर्षांचा प्रवास आपल्याला घडवितो. माणसं मागे पडली असली तरी त्यांच्या खाणाखुणा वारसा म्हणून आपल्याबरोबर आहेत. फक्त गरज आहे ती हा वारसा अन् त्यांचा इतिहास जपण्याची.

डिस्क्लेमर : उपरोक्त लेखातील मते लेखकाची व्यक्तिगत मते आहेत.

 https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/veshiwarchya-paulkhuna/history-of-nashik/
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...