Tuesday, April 25, 2023

मार्कंडेश्वर मंदिर, मार्कंडादेव, गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडी या ठिकाणी वैनगंगेच्या तीरावर एक मंदीर समुह आहे. यमपाशातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकराच्या पिंडीला घट्ट मिठी मारणार्या मार्कंडेय मुनींची कथा सर्वांना माहिती आहे. असे म्हणतात कि प्रत्यक्ष भगवान शंकर प्रकटले आणि त्यांनी मर्केंडेयाला हृद्याशी घट्ट धरले व यमराजाला परत पाठवले. मार्केंडेय ऋषी दीर्घायुष्यी झाले. हि घट्ना घडली ते स्थान म्हणजे मार्किंडा अथवा मार्कंददेव अशी भाविकांची श्रध्दा आहे. मार्केंडेय मुनी आजही येथे येउन भगवान शंकराची पुजा करतात अशी त्यांची समजुत आहे. गडचिरोली जिल्हयात तसेच विदर्भात भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून मार्कंडा तिर्थस्थान ओळखला जातो. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते आणि पन्नास हजाराहून भाविक त्या काळात येथ येतात. असा हा मार्कंडदेव मंदीर समुह गुढरम्य, अप्रतिम मुर्तीकला यामुळे आवर्जून भेट द्यावा असा आहे. नागपुरपासून सुमारे १८० कि.मी.वर गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशीजवळ वैनगंगा नदीच्या तीरावर हा मंदीर समुह आहे. जिल्हा मुख्यालय यापासून 45 कि.मी. अंतरावर चामोर्शी तालुक्यात मार्कंडा हे देवस्थान असून ते चामोर्शीच्या वायव्यच्या दिशेला आहे.चंद्रपुरपासून हे अंतर सुमारे ६५ कि.मी. आहे. जिल्हा मुख्यालयाहून भाविकांना जाण्यासाठी गडचिरोली-चामोर्शी मार्गे मार्कंडा एस.टी. बसची सोय आहे. चंद्रपूरहून गोंडपिपरी, आष्टी, चामोर्शी मार्गे जाता येते. मुल-हरणघाट मार्गे मार्कंडा असाही प्रवास करता येतो. चंद्रपुर व नागपुरपासून येथे टॅक्सीनेही जाता येते. सकाळी ७ वाजता नागपुरवरून निघाल्यास एक दिवसीय सहल होउ शकते. संध्याकाळी ४.३० नंतर मात्र परिसर सोडावा. नंतर जंगल लागते. गडचिरोलीत नक्षलवादी आहेत, मात्र ते पर्यटकांना त्रास देत नाहीत. 





       मंदीर शास्त्रानुसार मंदीर निर्माणाची जागेची निवड करताना काही गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. त्यापैकी 'पाण्याच्या स्त्रोताजवळ', 'जेथे कमळे फुलतात', 'पक्षी कुजन करतात', 'प्राणी निर्भयतेने फिरतात' अशी जागा निवडावी असे शास्त्र सांगते. या नियमात मार्कंडा बसते. येथे तीन दिशांनी तटबंदीसारखी भिंत तर चौथ्या दिशेला खाली उतरल्यावर नदीचा घाट आहे. मंदीर कोणी व कधी बांधले याबध्दल बरेच तर्क आहेत.परंतु लिखीत पुरावा नाही. शिलालेखही नाही. संशोधनाअंती डॉ.मिराशी यांनी हि मंदीरे राष्ट्रकुट वंशातील तिसरा गोविंद या राजाने बांधून घेतली असावीत, असा निष्कर्ष काढला, ( ८ किंवा ९ वे शतक ) हे मंदीर पाहून डॉ,कनिंगहॅम यांनी याची तुलना खजुराहोशी केली. 
  म्हणूनच याला 'विर्भातील खजुराहो' म्हणतात. खजुराहोची मंदीरे इ.स. १० किंवा ११ व्या शतकातील असल्यामुळे हि मंदीरेही याच काळातील असावी असे काही अभ्यासक मानतात. मंदीराच्या विवीध अंगाप्रमाणे येथे ही आपल्याला अधिष्ठाण ( बेस फ्लॅटफॉर्म ) जगती ( फ्लॅटफॉर्म ), मंडॉवर, अर्धमंडप, गर्भगृह , शिखर वैगेरे भाग आढळतात. 






    ६० X ३६ मीटर आयताकृती परिसरात हि मंदीरे उभारलेली आहेत. वैनगंगा नदीच्या उत्तर वाहिनीच्या डाव्या तिरावर वैभवशाली इतिहासाची साक्ष देत व उत्कृष्ठ शिल्पकलेची आठवण करुन देणारे मार्कंडा देवालय आहे. प्रगट कला संस्कृतीचे, मार्कंडेय ऋषीच्या नावाने ओळखले जाणारे मार्कंडेश्वर मंदिर सर्वात मोठे असून मुर्तीमंत मंदिर आज दिमाखाने उभे आहे. मंदिराच्या सभोवताल दगडावर वेरुळ, अजिंठा व खजुराहो प्रमाणे कलाकृतीचे नमुने भिंतीवर कोरलेले आढळतात..इथे वैनगंगा नदी वळण घेउन उत्तर दिशेने वहायला सुरवात करते. त्यामुळे हे स्थान अतिशय महत्वाचे मानले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड आहे. पिंडीच्या खाली भुयारीवाट असल्याचे जुने लोक सांगतात. मंदिराच्या भोवती अनेक लहान मोठया देवळांचा समूह असून काही मंदिराचे भग्न अवशेष पाहायला मिळातात. मंदिराजवळ ज्योतिर्लिंग असून मंदिराला लागून भुवनेश्वर, गणपती, हनुमान, महिषासूर मर्दिनी यासारखे लहान-मोठे मंदिर आहेत. मुख्य मंदिरापासून वैनगंगा नदीच्या पात्रात उतरण्याकरीता पायऱ्या आहेत



गेल्या शतकात बेगलर या संशोधकाने या स्थळाची पहाणी करुन याठिकाणी २४ मंदीरे आहेत आणि मंदीर संकुल या दृष्तीने हि मंदिरे वैशिष्ट्यपुर्ण असल्याचे नमुद करुन ठेवले आहे. पुढे या मंदीराच्या शैलीचा अभ्यास केल्यावर आणि इतर काही वैशिष्ट्यामुळे या मंदीराचा उल्लेख 'विसर्भाचे खजुराहो' असा केला जाउ लागला. 

एक जंगा म्हणजे एकच शिल्पपट्टाची ओळ असलेल्या मंदीराचे उदाहरण म्हणजे खिद्रापुरचे मंदीर
द्वि जंगा म्हणजे शिल्पपट्टाच्या दोन ओळी असलेल्या मंदीराचे उदाहरण म्हणजे औंढ्या नागनाथ मंदीर
त्रिजंगा म्हणजे शिल्पपट्टाचे तीन ओळी असणारे महाराष्ट्रातील एकमेव मंदीर म्हणजे मार्कंडी मंदीर

मंदीराचे सगळ्यात मोठे आणि महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरराच्या बाह्य अंगावर एकावर एक असणारे तीन जंगा पट आणि मोठ्या प्रंमाणात आढळणारे व्याल , विलक्षण सदाशिव मुर्ती, हरिहरपितामहार्क या मुर्ती. गर्भगृहावर दोनदा आणि मंदीराच्या बाह्य अंगावर आपल्या शक्तीसह येणारे दिक्पाल हि वैशिष्ट्य जाणवतात. मुर्तीशिल्पाची शैली आणि शिलालेख यावरुन हि मंदीरे इ.स. ८५० ते ११०० या काळात बांधली गेली असावीत. अर्थात यावर मतमतांंतरे असली तरी हि मंदीरे किमान १० ते ११ शतक या काळात बांधली असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. अणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदीरावर असंणारे लतिननागर आणि फासना शैलीची शिखरे. अशाप्रकारची मंदीरे छत्तीसगड, विदर्भाच्या इशान्येला असणार्या मध्य प्रदेशात वास्तुशैलीशी साम्य दाखवतात. सध्या या मंदीरापैकी फक्त अठरा मंदीरे शिल्लक असून आपण फक्त दोनच मंदीराचा विचार करायचा आहे.




या मंदीरापैकी सर्वात प्राचीन आणि तात्कालीन स्थापत्याचे प्रतिनिधीत्व करणारे मंदीर म्हणजे मार्कंड ऋषींचे मंदीर. हे मंदीर पुर्वाभिमुख असून तिन्ही बाजुंना मुखमंडप असलेला मंडप, अंतराळ आणी  गर्भगृह अशी त्याची रचना आहे. हे शिवमंदीर असून मंदीरासमोर नंदीसाठी स्वतंत्र मंडप आहे. मंदीरावर लतिनप्रकारचे नागर शिखर असून त्याची बरीच पडझड झालेली आहे. या मंदीराची सुमारे शंभर वर्षापुर्वी गोंड राजाने दुरुस्ती केली अशी आख्यायिका आहे. सुमारे ३०० वर्षापुर्वी मंदिराच्या कळसावर वीज पडून शिखर व काही भाग भग्न झाला. जी डागडुजी झाली ती अत्यंत अपुरी असून थातुरमातुर व बेढब आहे. त्यामुळे त्या भागाकडे पाहून रसभंग होतो. शिखराची बरीच पडझड झाली असली तरी शिखराचा दक्षिण भाग शिल्लक आहे, त्यावरुन या मंदीराची स्थापत्यशिली कलचुरी आणि चंदेल्ल स्थापत्यशैलीशी मिळतीजुळती आहे हे समजते. अंतरा़ळाबर मोठे शुकनास आहे. मंडपावर एकुण पाच शिखरे होती, त्यापैकी चार कोपर्यात चार शिखरे शिल्लक असून ती फासना शैलीची आहेत. पाचवे म्हणजे मधोमध असलेले शिखर आज शिल्लक नाही, पण तेही फासना पध्दतीचे असावे. नंदी मंडपाचा तलविन्यास चौरसाकृती असून त्याच्या चारही बाजुला पुढे आलेले अंग किंवा भाग आहेत. मंडपाच्या उरलेल्या म्हणजे मुख्य भागचरही मुळात अंग असावे पण त्याची पुर्नरचना झाली आहे. नंदीमंडप कदाचित वामनभिंती असलेला खुला मंडप असावा. अंतराळावर असलेल्या शुकनासात खरोखरीचा वरचा मजला असून त्याच्या मध्यभागी दरवाजा आणी त्याच्या दोन बाजुस दोन लहान आकाराची मंदीरे आहेत. 








या लहान उपमंदीरांच्या पीठाची रचना मुख्य मंदीरासारखीच आहे.त्यावरही तसेच थर आहेत. इथे या मंदीराच्या जंघा पातळीवर नरथर दिसतो.शुक्रनासेच्या दरवाज्यावर एकमेकांना खेटून बसलेले उमा महेश दाखवले आहेत, त्याच्या दोन्ही बाजुना सुरसुंदरी दाखवल्या आहेत. त्याच्यावर हंसपट्ट दाखवला आहे. मंदीरांना त्रिकोणी शिखर असून त्यात गवाक्षे आहेत.त्यावर दोन्ही बाजुस वानरे आणि व्याल दाखवले आहेत. 
    

 


 




प्रवेशद्वारातून नंदीचे विहंगम दृष्य दिसते. येथून अर्धमंडपात प्रवेश होतो. मग गर्भगृह आहे. अर्धमंडपातही भरपुर कोरीवकाम आहे. चंद्र वैगरेची चित्रभास प्रकारची शिल्प आहेत. समुद्रमंथनाचा देखावा आहे. मार्केंडेय व यमाचे पिंडीसमवेत दृष्य आहे. परंतु अपुर्या प्रकाशामुळे त्याचा आस्वाद घेता येत नाही. 




गर्भगृहात शिवलिंग आहे.मंदीराच्या दोन्ही बाजुला दशावतार, रामायण व महाभारतातील दृष्ये कोरली आहेत. परंतु ती रेखीव नाहीत. त्यामुळे समकालीन नसावीत. 
















  मुख्य मंदीराच्या बाह्य अंगावर सर्वात खाली पीठ, आम्रभंजीकांनी अलंकृत केलेला वेदीबंध, भिंतीच्या भागावर तीन जंघा पट्ट आणि कपोतालीच्या वर लतिन शिखर आहे. कोपर्यावर असणार्या शिखरावर भुमी आमलक असून मुख्य मंदीराच्या शिखरावर असे सहा भुमीआमलक दिसतात. पीठावर जाड्यकुंभ, अंतरपत्र, कणी आणि त्यावर वेदीबंध असे थर आहेत. गर्भगृहाच्या मागील हरिहरपितामहार्क तर उरलेल्या दोन भद्रावर नृत्य करणारा भैरव आणि बसलेला दशभुज सदाशिव, कोपर्यावरील पट्टावर दिकपाल आणि वसु दाखवले आहेत. तसेच कोण आणि भद्र यांच्यामधील भागात अप्सरा दाखवल्या आहेत. 

 याशिवाय इथे आणखी एक आवर्जून बघण्यासारखी गोष्ट म्हणजे व्याल. व्याल म्हणजे संयुक्त प्राणी ( hybrid) एका प्राण्याचे धड आणि दुसर्या प्राण्याचे शीर.अधीक गुण अथवा ताकद दर्शविण्यासाठी असा प्रयोग केला आहे. हे व्याल विवीध प्रकारचे आहेत.जसे नरव्याल, गजव्याल, शुकव्याल वगैरे. खजुराहोच्या मंदीरातही असे व्याल आहेत. बहुतेक संस्कृतीत कोणत्या ना कोणत्या प्रकारचे व्याल दिसतातच. जसे इजिप्तमध्ये जगप्रसिध्द स्किंफ व्यालच आहे. या मंदिरावर इतके वेगवेगळ्या प्रकारचे व्याल दाखविले आहेत कि प्रत्येक व्याल वेगळ्या प्रकारचा आणि अद्वितीय आहे. कदाचित शिल्पकाराची कल्पनाशक्ती आटली तेव्हा मधूनमधून साधू दाखवले आहेत. 

ईशान सपत्निक


ब्रह्मेशानजनार्दनार्क मूर्ती
ब्रह्मा,शिव ,विष्णू आणि सूर्य या चारही देवतांची तयार झालेली संयुक्त मूर्ती.

ईशान सपत्निक .पत्नीच्या हातात कमलनाल आहे.

स्त्री आणि माकड.सुरसुंदरी ला माकडाने विवस्त्र केले आहे.
नृत्य गणेश,अष्टभुज मूर्ती,वाद्यसंगीताची साथ देणारे गण दोन्ही बाजूला आहेत.

आलसा किंवा लीलावती
पुर्व दिशेचा अधिपती इंद्र,उजव्या पाठीमागच्या हातात वज्र आहे.सपत्निक शचि सह.वाहन हत्ती पायाशी दाखवले आहे.
एकटा ईशान-त्रिशूल,अक्षमाला,त्रिमुखी नाग,कमंडलू.
जटामुकुट, पायाशी बैल.
स्त्री-मुंगुस- साप


पत्रलेखिका

     मंदीराच्या बाह्य अंगावरील खालच्या पट्टातील कोपर्यावर दिक्पाल आणि इतर देव दाखवले आहेत तर वरच्या दोन पट्टावर व्याल आणि अप्सरा दाखवल्या आहेत.सुरसुदंरी अत्यंत सुडौक प्रमाणबध्द आणि आकर्षक आहेत. परंतु या इथे कोणाला मोहवण्यासाठी गुंतलेल्या नाहीत, तर त्या भाविकांना विवीध प्रकारच्या मोहजाळातून बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन करतात, काम, क्रोध ,मद आदी षडरिपु त्यागून मंदीरात प्रवेश करा असे सांगणारी इथली सुरसुंदरी शिल्प अप्रतिम आहेत, त्यांची कल्पना करणार्यांना आणि साकारणार्यांना दाद द्यायला हवी. सुरसुंदरीच्या हावभावानुसार आणि वेशभुषेनुसार त्यांना विन्यासा, जया, नर्तिका, कर्पुरमंजिरी अशी वेगवेगळी नावे आहेत.


      देवदेवतांची शिल्प रौद्र आणि शांत मुद्रेत आहेत. येथे पार्वतीही दिसते आणि चंद्रीकाही दिसते. रुद्रही दिसतो आणि इश्वरही गरजेप्रमाणे रुप धारण करतो. हेच शिल्पकारांना सांगायचे असेल. प्रमुख देवतांची शिल्प देवकोष्टात दिसतात. प्रत्येक देवदेवतेच्या पायाशी वाहन कोरले आहे. त्यामुळे देवाची ओळख सहज पटते. मंदीराच्या प्रवेशद्वाराशी चित्र प्रकारची ( free standing ) दोन शिल्प आहेत. 
     



विदर्भाचे खजुराहो म्हणून ओळखले जाणारे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आणि पर्यटकांना आकर्षित करणारे हे ऐतिहासिक तिर्थक्षेत्र आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी 15 दिवस ते पाऊण महिन्यांपर्यंत भव्य यात्रा भरते. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर व विदर्भातील लाखो भाविक मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी येतात. या ठिकाणी पर्यटक व भाविकांसाठी निवासस्थान, भोजन व्यवस्था आदी पर्यटनाच्या दृष्टीने विविध सोयी उपलब्ध करण्यात आल्यास अधिक पर्यटक आकर्षित होतील. हया सोयी करण्यास येथे भरपूर वाव आहे.

यमधर्म मंदीर :- 

शिवमंदीराच्या बाहुलाच यमधर्म मंदिर आहे. यमाचे मंदीर क्वचितच बघायला मिळते. येथील बाकीच्या मंदीराप्रमाणे या मंदीराला देखील मंडप नाही. मध्य प्रदेशातील मध्यम आकाराच्या मंदीरात हे वैशिष्ट्य आढळते. येथील बाकीच्या मंदीराप्रमाणे या मंदीराला देखील मंडप नाही. मध्य प्रदेशातील मध्यम आकाराच्या मंदीरात हे वैशिष्ट्य आढळते. या मंदीराच्या उभारणीच्या काळात मंदीर वीटा किंवा दगड वापरुन बांधले जात असे. मात्र मंड्प अन्य साहित्य वापरुन उभारले जाते. आरंग येथील मंदीर, भटाळा येथील मंदीर हे या प्रकारची मंदीरे. यमधर्म मंदीराच्या तलविन्यासात केवळ मंड्प आणि गर्भगृहाचा समावेश होतो. गर्भगृह अंतराळाच्या खालच्या पातळीवर आहे आणि अंतराळातून गर्भगृहात जाताना चार पायर्या उतरुन जावे लागते. गर्भगृह चौरसाकृती असून पंचरथ प्रकारचे आहे. गर्भगृहाच्या बाह्यांगावर कोणतेही शिल्प नाही. मागील भद्रावर सुर्यमुर्ती असून दक्षिण व उत्तर बाजुच्या भद्रावर अनुक्रमे अंधकासुर वध व चमुंडा मुर्ती आहे. जंघेच्या उरलेल्या दोन पट्टावर कोणतीही मुर्ती नाही. शिखराला लागून असणारा शुकनास मार्कंड मंदीरासारखाच आहे, मात्र त्यावर कोणतेही शिल्प नाही. पण या शुकनासामुळे कोणतीही मुर्ती नसलेल्या शिखराला शोभा आणली आहे. शिखराच्या चार बाजुना असणार्या चार सपाट रेखांवर अमलक असून त्यावर कळस आहे.



  गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर मात्र तुलनेने बर्यापैकी शिल्पकला आहे. या प्रवेशद्वारावर अनेक द्वारशाखा असून त्यावर पुष्पपट्ट व व्यालपट्ट आहे. द्वारपट्टीच्या खालच्या भागात गंगा, यमुना, सेविका तसेच शैव, वैष्णव लांछनयुक्त द्वारपाल दाखवले आहेत. 
  









याशिवाय परिसरात महांकालेश्वर, भीमाशंकर, दंतेश्वरी, ध्यानमंदीर, हनुमान मंदीर, गणेश व दुर्गामंदीर व इतर मंदिरे आहेत. ती लहान व दुरावस्र्थेत आहेत. मागच्या भागात दशावतार मंदीर आहे. एका बाजुला बर्याच मुर्ती मांडल्या आहेत. परिसरातील मंदीरात अपुर्णता जाणवते.कोरीवकाम जवळजवळ नाहीच. थोडेफार आहे ते सुमार दर्जाचे व मुर्तॉ इत्स्ततः पडल्या आहेत. परिसरात १२ शिवलिंग विखुरली आहेत. कदाचित १२ ज्योतिर्लिंगाचे प्रतिक म्हणुन हा परिसर निर्माण केला असेल. आज याला अवकळा आलेली आहे. बर्याच मुर्तीचे हात व नाक तुटलेले आढळते. हे सर्व पाहून मन उद्विग्न होते. मंदीराच्या इतिहासाचे अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. त्याचे जतन संवर्धन केल्यास प्रसन्नता वाटेल. सध्यातरी येथील वातावरणात औदासिन्य जाणवते. येथे धर्मशाळा आहे, पण येणार्या पर्यटकांना आवश्यक सुखसोयी नाहीत. स्वच्छ प्रसाधनगृहही नाही. हा मंदीर समुह जर पुर्णावस्थेत आणि उत्तमरित्या राखला गेला असता तर विदर्भाच्या पर्यटनाच्या दृष्टीने एक मानबिंदु ठरला असता. 




 विदर्भाची काशी- मार्कंण्डेश्वर

 विदर्भाची काशी- मार्कंण्डेश्वर


नागपूर पासून सुमारे दोनशे पंधरा किलोमीटर अंतरावर असणारे मार्कंण्डेश्वराचे मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे या मंदिराला भेट देण्याची संधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्हाला मिळाली. विदर्भात उन्हाची तीव्रता एवढी की अक्षरशः अंग लाहीलाही करत घामाघूम होत होते. 45 अंश तापमानात चंद्रपूर, गडचिरोलीच्या घनदाट जंगलातून जाताना ही तीव्रता अधिकच जाणवते. नागपुर वरून चंद्रपूरचा प्रवास

















भद्रावती मार्गे तीन तासाचा, व पुढे चंद्रपूर  शहरातून बाहेर निघतात घनदाट जंगलाचा भाग लागतो .लोहारा -घंटा चौकी- चिचपल्ली मार्गे एक दीड तासाचा प्रवास करून मूल या गावाला आपण पोहोचतो .या दरम्यान बरेच अंतर घनदाट जंगलातूनच जावे लागते .आमची भ्रमंती संपूर्ण बस किंवा खासगी सार्वजनिक वाहतूकीतून सुरू होती.या अगोदरचे तीन मुककाम आमचे चंद्रपुरात असल्याने आम्ही सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत होतो . मूल हे तालुक्याचे ठिकाण त्या ठिकाणी आम्हाला तेथील नायब तहसीलदार श्री यश पवार साहेबांची खूप मोठी मदत झाली. ते मूळचे जळगावचे असल्याने अधिकच जवळीक! मुळात या नक्षलग्रस्त जिल्ह्याची आम्हाला काहीच माहिती नव्हती. आमच्यासोबत लोकमतचे उपसंपादक विवेक चांदुरकर व इतिहासाचे अभ्यासक प्रमोद टाले हे होते. दोघांचाही इतिहास व प्राचीन वास्तू चा गाढा अभ्यास असल्याने हा मार्कण्डेंश्वर  निश्चित पावणारच होता. तहसीलदार साहेबांनी त्यांच्या गाडीतून आम्हाला मार्कंडे श्वराकडे चामोर्शी मागे घेऊन निघाले. मूल पासून 30 किलोमीटर अंतरावर गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगेच्या तीरावर हे मंदिर आहे. चामोर्शी हा गडचिरोलीतील तालुका या तालुक्यात हे मंदिर येते. चामोर्शी पर्यंत रस्ता चांगला आहे परंतु तेथून मार्कंण्डेश्वराच्या मंदिरापर्यंत रस्ता थोडा कच्चा आहे.गावात पोहचताच 'मराठा ' धर्मशाळा दिसते . असे सांगितले जाते की, गाडगेबाबा यांच्या प्रेरणेने ही मराठा धर्मशाळा येथे उभी राहिली. राम प्रसाद महाराज जयस्वाल यांनी ती पुढे नेण्याचं काम केलं .थोडेसे समोर गेले की मंदिरांचा समूह दिसतो व समोर असलेले वैगंगेचे विस्तीर्ण पात्र आपल्या नजरेस पडते. दक्षिण वाहिनी वैनगंगा इथे वळसा घालून उत्तरवाहिनी होते. येथील वालुकामय भाग हा जणू समुद्रच भासतो. साधारणपणे भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये मोठमोठी शहरे, सांस्कृतिक व धार्मिक केंद्रे ही नदीच्या काठावरच वसलेली आहेत. त्यापैकीच एक मार्कंण्डादेव म्हणजेच मार्कंण्डेश्वराचे मंदिर ,विदर्भाची काशी !

         विदर्भातील मंदिराचा विचार केल्यास जवळपास सर्वच जिल्ह्यात प्राचीन मंदिरे आहेत. ही सर्व मंदिरे यादवकालीन किंवा त्यापुढील कालखंडातील आहेत. हे मंदिर मात्र यादव काळा पूर्वीचे आहे. साधारणतः दहाव्या किंवा अकराव्या शतकातील हे मंदिर असावे असे अभ्यासकांचे मत आहे.  विदर्भातील यादवकालीन सर्वच मंदिरे ही काळ्या दगडातील आपणास घडविलेली दिसतात, पण महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर याला अपवाद आहे. याची घडण ही लाल पाषाणातील आहे. खजुराहो शिल्प घडणीशी  या मंदिरातील शिल्पाचे साम्य आढळते. नागर शैली मधील ही मंदिरे आहेत खजुराहो मध्ये सुद्धा याच शैलीचे मंदिर आढळतात. म्हणूनच विदर्भाची काशी म्हणून या मंदिराला संबोधले जाते. केवळ ही दुर्गम भागात असल्याने या पवित्र अतिप्राचिन वास्तूकडे पर्यटक जरा कमीच दिसतात. प्राचीन पुराणकथा नुसार मुंडक ऋषिस  शिव कृपेने मार्कंण्डेय यांचा जन्म झाला मार्कंण्डेयास १६ वर्षांचेच आयुष्य लाभले होते, पण शिव कृपेने व भक्तीने ते यमा पासून  मुक्त झाले असे सांगितले जाते. पूर्वी या ठिकाणी तेवीस-चोवीस मंदिरांचा समूह होता. आता पुरातत्व विभागाने या वास्तूस संरक्षित केले असून मंदिराची झालेली पडझड ही शास्त्रीय पद्धतीने जिर्णोध्दारीत करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंदिरासह इतर काही मंदिराचे शिखर कोसळलेले आहे. बऱ्याच छोट्या मंदिरांचा केवळ सांगाडाच येथे उभा आहे. शेकडो वर्षापासून ही मंदिरे येथे उभी आहेत. या मधील काळात त्यांनी अनेक राजकीय ,सामाजिक, धार्मिक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. नैसर्गिक संकटाचा ही सामना केलेला आहे. भव्य दिव्य वैनगंगेच्या काठावर असल्याने प्रचंड महापुरे देखील सोसली असतीलच यामध्ये अनेक ठिकाणी पडझड झालेली दिसते पण आता या मंदिराचे चांगले काम सुरू आहे.

         नदीच्या बाजूने मंदिरसुहात येण्यास एक द्वार व समोरील बाजूस एक मुख्य प्रवेशद्वार आहे द्वारावर सुंदर दगडी शिळांचे गोपूर निर्मिले आहे. आजही ते मजबूत स्थितीत उभी आहे. द्वाराच्या दगडी चौकटीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. दोन्ही बाजूनी छोटे-छोटे यक्ष या गोपूरास तोलून धरणारे शिल्प कोरलेले आहे. दरवाज्यातून आत गेल्यावर उजव्या बाजूला संपूर्ण मजबूत तटबंदी असलेल्या या मंदिराच्या तटबंदीवर जाण्यासाठी अर्धवट दगडी जिना आपल्याला दिसतो.पूर्वी या तटबंदीवरून टेहाळणी करता येत असावी.  समोरच शिवलिंग ठेवलेले एक महाकालेश्वराचे छोटे मंदिर आहे. त्याच्या दरवाजावर देव-देवतांचे शिल्पे आहेत त्याच्याच समोरासमोर वरदविनायकाचे व तेवढेच सुस्थितीत असलेले लहान मंदिर आहे. सुरसुंदरी व गज शार्दुल शिल्पे या मंदिराच्या खालील भागात कोरलेली आहे. पुढच्या भीमाशंकर मंदिराच्या बाहेर डमरुधारी शिवपार्वती व मंदिराची ही शिल्प या मंदिरासमोर आहेत. बाजूलाच अनेक देवदेवतांची सुंदर शिल्पे तुटलेल्या अवस्थेत आहेत .चौरंगावर बसलेल्या पार्वतीसह महादेवाचे अत्यंत सुंदर शिल्प हे सांगाडा उभा असलेल्या एका छोट्या मंदीराच्या समूहांमध्ये आपल्याला दिसून येते.

    समोरच आपल्याला मुख्य मंदिराचे दर्शन होते. तीन प्रवेशद्वार असलेले सभामंडपा सह गाभारा अशी रचना आहे. सभागृहाच्या भिंती नव्याने बांधलेल्या दिसतात.गाभार्‍याच्या द्वारावर अत्यंत सुबक नक्षीकाम केलेले आहे. खांबावर साखळीत लटकवलेल्या घंटांचे शिल्प कोरलेले आहे. त्याखाली अत्यंत सुंदर अशी श्री गणेशाची मुर्ती शिल्पे सुद्धा आहेत. गाभार्‍यातही देवांगणा गजशार्दूल ही शिल्पे आहेत .मुख्य खांबावर यक्ष मंदिराचा भार सांभाळतानाच शिल्प आहे .आतील बाजूस सुंदर नक्षीकाम पट्टी आहेत. ब्रम्हा ,विष्णू महादेवाची ही सुंदर शिल्पे या सभामंडपात कोरलेली आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्यात समोरच नदीच्या बाजूला एक नंदीमंडप होता. आता तो तुटलेला असून त्यावरील छत सुद्धा कोसळलेले आहे नंदी साठी नदीच्या बाजूने केलेले भव्य  नंदीमंडप याठिकाणी असावा असे यावरून दिसते. मुख्य मंदिराच्या समोर एक नंदीची रचना होती मुख्य मंदिरा बाहेरील भागात चारही बाजूने कीर्तिमुखे कोरलेली आहेत. त्या किर्तीमुखा च्या खाली सुंदर असे आम्रपालीचे शिल्प एका ठिकाणी आपल्याला दिसते.  मंदिराच्या बाहेरील बाजूस अत्यंत सुबक अशी शिल्पे कोरलेली आहेत यामध्ये देवी-देवता, शिव ,भैरव सुरसुंदरी, नृत्य अप्सरा, अजस्त्र व्याल ,त्रिमुख ब्रम्ह ,कालभैरव, जगदंबा ,लक्ष्मी, पार्वती अष्टदिग्पाल, ब्रम्हा सरस्वती ,विष्णू ,पदम निधी ,कार्तिकेय ,नृत्य गणेश ,सूर्य आदींची शिल्पे आपल्याला या ठिकाणी दिसतात आजही ती जिवंत असल्याचाच भास आपल्याला या ठिकाणी झाल्याशिवाय नाही. या व्यतिरिक्त मंदिराच्या समूहामध्ये यमधर्म मंदिर, मुर कुंड ऋषी मंदीर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ध्यान मंदिर, मृत्युंजय मंदिर ,उमा शंकर मंदिर ,दशावतार मंदिर ,गणेश मंदिर, आदिशक्ती महिषासूर्मर्दिनी मंदिर, महाकालेश्वर मंदिर, भीमाशंकर मंदिर आधी देवदेवतांची स्वतंत्र मंदिरे आहेत बहुतेक मंदिरावर आमलक व कळस आजही दिमाखात उद्या असलेले आपल्याला दिसतात मुख्य मंदिर मात्र याला अपवाद आहे मुख्य मंदिराच्या द्वारा समोरच आता भैरवाच्या उभ्या स्थितीतले भव्य दोन शिल्प लावण्यात आलेली आहेत त्यामधील नक्षीकाम हे जिवंत असलेले जाणवते उभ्या भैरवाच्या मुकुटा मधील कीर्तिमुख स्पष्ट दिसतो मुंडन माला धारण केलेल्या या दोन शिल्पांमध्ये कमालीचे साम्य जाणवते ती एकाच शिल्पकाराने घडविली असावे असे वाटते .

     महिषासुर मर्दिनी मंदिराच्या सरळ रांगेत आठ छोट्या मंदिरांचा समूह आहे .यांच्या कळसाची रचना पिरॅमिड स्वरूपाची आहे. यामध्ये या परिसरातील अनेक देव देवतांची शिल्पे  सुरक्षित ठेवलेली दिसतात. काम सुरू असल्याने प्रत्येक शिल्प पाहणे शक्य नव्हते, या शिल्पांमध्ये सुरसुंदरी, देवांगना, मातृका, नृसिंह, वर्धमान ,वराह देवता आदी शिल्पे आहेत बाहेरील काम सुरू असल्यामुळे मंदिराच्या प्रत्येक शिळेला व शिल्पाला नंबर कोडिंग करून योग्य त्या ठिकाणी बसविण्याचे काम सुरू आहे .पडलेल्या अवशेषांमध्ये मंदिरांचे आमलक ,उदयता, विर जा ,जागृता ,गजा कांता शिल्पे अजूनही जिवंत वाटतात मकरीका सिंहाचे म्हणजे व्यालाचे भाग मकरासारखे असलेली सिंह असे सिंह पुढच्या भागात स्थापित केलेले असतात अशी शिल्पे सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. शिवलिंग सुद्धा मंदिराच्या परिसरामध्ये आहेत वीरगळ असलेले शिल्प सुद्धा येथे आढळते. यापैकीच एक दंतेश्वरी स्तंभ आहे सर्वात वरच्या भागात कीर्तिमुख त्याखाली श्रीकृष्णाचे शिल्प शिल्प एका बाजूस आपल्याला बघावयास मिळतात अनेक मोठमोठ्या दगडी शिळा देखील या ठिकाणी दिसतात.रामायणातील जटायु प्रसंग,राम रावण युद्धाचे सुंदर शिल्पे एका पट्टीत कोरलेले आहेत .गजशार्दूलाचे अनेक शिल्पे आहेत .

      एवढे वैभव शेकडो वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात होते .ज्या काळात राज्यात राजकीय स्थैर्य व आर्थिक सुबद्धत्ता असते त्याच काळात अशी उच्च कोटीची कला असलेली महान कार्य होत असतात. विद्या व कलेचा हा अभूतपूर्व संगम म्हणजे ही वास्तू होय .पुराणकाळात एकूण 32 विद्या आणि चौसष्ठ कला सांगितले आहेत याच कलेच्या माध्यमातून हे निर्माण झाले या निर्माण यामागील भाव शोधणे ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येक शिल्प हे आपल्याला एक स्वतंत्र संदेश देते. प्रत्येकाच्या निर्माण यामागे एक भाव एक विचार एक तत्वज्ञान एक संदेश आहे. हे आज आपण शोधून आपल्या जीवनात त्याचा अंगीकार करणे गरजेचे आहे. एवढी आशा आपण आपल्या प्राचीन वारसा कडून निश्चितच घेऊया व आपल्या पूर्वजांनी या अशा महान वास्तू निर्माण केल्या त्या केवळ आणि केवळ आपल्याला काहीतरी चांगला संदेश देण्यासाठी आहेत .याचा शोध आपण निश्चितच घेतला पाहिजे अन्यथा काळाच्या ओघात या अशाच झिजत राहतील आणि आपण मात्र यापासून वंचित राहू !

आपल्या प्राचीन वारशाला न्याहाळत असताना प्रचंड उन्हातही त्याचा त्रास जाणवला नाही याचं कारण एकच जे बघत होतो ते अलौकिक होते .

https://shivjagars.blogspot.com/2022/06/blog-post_18.html


➖➖➖➖➖➖➖

संजय खांडवे

बुलढाणा 

9011971122













No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...