दाभोळ -
भाग 1 – प्राचीन कालखंड ते बहामनी राजवट
भारतीय पश्चिम किनाऱ्याचा व्यापार ग्रीस, रोम, मिसर (इजिप्त) यांजबरोबर फार प्राचीन काळापासून चालत आला आहे. (भारत आणि बाबिलोन (इराक) चा व्यापार जुन्या करारांत नमूद आहे. ख्रिस्त पूर्व ६ व्या शतकापासून बाबिलोन व इतर पश्चिमेकडील राष्ट्र यांजबरोबर भारताचे दळणवळण होते, याचे उल्लेख बौद्ध जातकात (जातक – गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या कथांचा ग्रंथसमूह ) आढळतात. भारतात रोमन नाणी सापडली, त्यावरून ‘ऑगस्टस’ { रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट, जन्म २३ सप्टेंबर इ.स.पू. ६३ – मृत्यू १९ ऑगस्ट इ.स. १४ } ते ‘नेरो’ {रोमन साम्राज्याचा शेवटचा सम्राट, जन्म १५ डिसेंबर इ.स. ३७ – मृत्यू ९ जून इ.स. ६८ } पर्यंत ‘रोम व भारत’ यांजमध्ये मोठा व्यापार चालत असल्याचे सिद्ध होते.) यामुळेच भारतीय किनारपट्टीबरोबर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर अनेक व्यापारी बंदरे व नगरे उदयास आली.
या बंदराचा व नगरांचा उल्लेख इजिप्त, ग्रीस व रोमन प्रवाशांच्या वर्णनात मिळतो. स्ट्रॅबी, प्लीनी, टॉलेमी यांच्या लिखाणातून कोकणातील बऱ्याच बंदरांचा उल्लेख आलेला आहे. ‘पेरीप्लस ऑफ युरेथ्रियन सी’ या साधनात सातवाहन काळात कोकणात किनारपट्टीवर परदेशी व्यापार चालत असे, अशी माहिती मिळते. प्राचीन कालखंडात चेऊल, सोपारा, ठाणे ही कोकण किनारपट्टीवरची महत्त्वाचे ची बंदरे होती. याबरोबरचं कलिअन (कल्याण), बर्यागाझा (भडोच), सेमुल्ल, चेमुली (चौलरेवदंडा), मंदागोरा (बाणकोट), मेलिझिगारा (सुवर्णदुर्ग – राजापूर), सेसेक्रियनाय (वेंगुर्ले), मुसोपोले (म्हसळ), आगिडी (गोवा) इत्यादि बंदरांचा उल्लेख प्राचीन साधनांमध्ये आढळतो. इ. स. ४० मध्ये ‘हिपॅलस’ या ग्रीक संशोधकाने मान्सूनचे वारे ठराविक वेळेत, ठराविक दिशेने वाहतात त्यावेळेस भारतात गलबते हाकारली तर जलदगतीने जातील असे शोधून काढले. त्यामुळे रोमन, ग्रीक, इराणी व्यापार भारतात मोठ्या प्रमाणावर वाढला. भारतात आलेल्या व्यापाऱ्यांनी पश्चिम घाटातील बौद्धगुफांना भरघोस दाने दिली. सातवाहन काळात कोकण किनारपट्टीचा परदेशी व्यापार भरभराटीचा होता. सहाव्या- सातव्या शतकात उत्तर कोकणात मौर्यांनी राज्य केले. पुढे बदामीच्या चालुक्यांनी दक्षिण कोकणात राज्यविस्तार केला. चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याच्या काळात भारताचे परकियांशी मैत्रीचे संबंध होते. त्यावेळी घोड्यांची आयात मोठ्या प्रमाणात केली जात असे. राष्ट्रकूटांनीही व्यापारात अग्रेसर असलेल्या अरबांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. एकंदरीत कोकण किनारपट्टीवरचा व्यापार समृद्ध होता.

प्राचीन कालखंडात दाभोळ बंदराचा फारसा उल्लेख आढळत नाही. काही इतिहासकारांनी ‘पलियपटामय’ म्हणजे दाभोळ असे म्हटले आहे. परंतु डेक्कन कॉलेजचे डॉ.गोगटे यांच्या मते ‘पलियपटामय’ म्हणजे कोकणातील गुहागर जवळील पालशेत असावे. पण पन्हाळेकाझी येथील बौद्ध व नाथपंथीय लेणी पाहता दाभोळ हे प्राचीन बंदर असावे, असा अन्वयार्थ काढता येतो. कारण डॉ.म.ना.देशपांडे व इतर पुरातत्ववेत्यांच्या दृष्टिकोनातून येथील शैलगृहांची (लेण्यांची) सुरुवात साधरणतः दुसऱ्या-तिसऱ्या शतकात सातवहनांच्या काळात झाली. लेण्यांचे ठिकाण व नदीमार्गे किंवा खुश्कीच्या रस्त्याने दाभोळपर्यंतचे अंतर सुमारे २०/२२ किलोमीटर आहे. यावरून तत्कालीन वाहतुकीची सोय विचारात घेता अंतर्गत व बाह्य जगात प्रवासासाठी ‘दाभोळ’ हे महत्त्वाचे पूर्ण असल्याचे दिसून येते.

मध्ययुगीन कालखंडात मात्र चौल व दाभोळ ही कोकण किनारपट्टीवरील प्रमुख बंदरे असल्याचे बरेच उल्लेख आढळतात. यावरून दाभोळ बंदराचे व्यापारी महत्त्व मध्ययुगात वाढलेले दिसते व त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दाभोळ बंदरात अरबस्थानातून होणारी घोड्यांची आयात हे म्हणता येईल.

दाभोळ हे १७॰ ३५ उत्तर अक्षांश व ७०॰ १० पूर्व रेखांशावर कोकणातील दापोली तालुक्यात ( जिल्हा रत्नागिरी ) वसले आहे. अंजनवेल किंवा वशिष्ठी नदीच्या उत्तर काठावर टेकड्यांच्या पायथ्याशी दाभोळ शहर समुद्रापासून दोन मैल आत आहे. मुंबईच्या आग्नेय दिशेस सुमारे ८५ मैलावर ‘दाभोळ बंदर’ आहे. दाभोळचे नाव दाभिलेश्वराच्या म्हणजेच शिवाच्या (दाभोळात दाभिलेश्वराचे जुने मंदिर आहे ) किंवा वनदेवता दाभ्यावरून पडले असावे, असे मानले जाते. प्राचीन काळी दाभोळ हे दालभ्यवती नावाने ओळखले जात होते. दालभ्य ऋषींच्या वास्तव्यावरून पडलेल्या या नावाचा कालांतराने दाभोळ असा अपभ्रंश झाला, असेही म्हटले जाते.
दाभोळच्या इतिहासाचा मागोवा घेताना दाभोळमधील प्रसिद्ध भूमिगत चंडिकादेवीचे मंदिर मि. क्रॉफर्ड यांच्या म्हणण्यानुसार बदामी शैलगृहे मंदिराच्या काळातील (चालुक्य कालीन) इ. स. ५५० ते ५७८ मधील आहे. क्रॅकोर्डच्या मते आणि एका स्थानिक बखरी नुसार दाभोळ हे अकराव्या शतकात एका शक्तिशाली जैन राजाचे राज्य होते आणि त्यास पुरावा म्हणून इ. स. ११५६ (वैशाखाचा ३ रा दिवस, १०७८ शालीवाहन) चा शिलालेखही सापडला आहे. पुढे यादवांच्या काळात दाभोळ हे एक महत्त्वाचे बंदर होते. यादव काळात उद्योग-व्यापार उदित(भरभराटीचा) होता. गोवा, दाभोळ व चौल बंदरातून परदेशात पैठणी, देवगिरी व दख्खनी कापड निर्यात केले जात असे. परदेशातून सुवर्णाचा मोठा ओघ भारताकडे असल्याचे त्या काळात नमूद आहे. व्यापारामध्ये अरबांचे वर्चस्व होते. अल मसुदी, अल इताकरी, इब्न हौकल या अरब प्रवाशांच्या लिखाणातून, तसेच आलेखांमधील माहितीनुसार तुर्की आक्रमणापुर्वीच कोकण किनारपट्टीवर मलबार पासून ते उत्तरेस संजान पर्यंत अरबांनी आपले बस्तान बसविले होते. आलेखांमध्ये त्याचा ‘नवायत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. सिराफ, ओमान, बसरा व बगदाद इ. ठिकाणांहून अरब व्यापारासाठी येथे येत असत.


संदर्भ :
- गेट वे ऑफ दाभोळ – अण्णा शिरगावकर.
- किल्ले महाराष्ट्र (कोकण विभाग )
- मुसलमानपूर्व महाराष्ट्र, खंड १ – वासुदेव कृष्ण भावे
- लेख डॉ. दाऊद दळवी.
- लेख प्रा. विद्या प्रभू (इतिहास विभाग प्रमुख, ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे.)
- लेख डॉ. एम. ए. लोहार (इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
भाग 2 – आदिलशाही व पोर्तुगीज संघर्ष (सोळावे शतक)
इ.स. १४७८ मध्ये गोव्याच्या बहामनी सुभेदारचा मुलगा बहादूरखान गिलानी याने दाभोळ ताब्यात घेतले व तेथे स्वतंत्र शासक म्हणून राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला. त्याने गुजरात सुलतान महमूद बेगाडा (१४५९ ते १५११) याच्या व्यापाऱ्यांची जहाजे दाभोळ बंदरात लुटल्यामुळे बेगाडाने बहामनी सुलतान महमूद दुसरा याकडे तक्रार केल्यामुळे महमूदशा बहामनीने १४९४ मध्ये दाभोळ वर हल्ला करून बहादूरखान गिलानीचा पाडाव केला. काही ऐतिहासिक संदर्भानुसार बहादूर खान गिलानीचा दाभोळ मधील पाडाव महमूदशा बहामनीने न करता युसुफ आदिलशहाने केला. बहामनी राजवटीत कोतवाल बहादूर खान गिलानी हा अतिशय मुजोर झाला होता. परदेशातून येणारी व गुजरात किंवा मलबारहून मालवाहतूक करणारी जहाजे तो लुटत असे. मात्तबर व्यापाऱ्यांना तो डोईजड झाला होता. त्याचे पारिपत्य करणे आवश्यक होते. शेवटी युसुफ आदिलशहाने गिलानिविरुद्ध मोहीम उघडली व सर्व बाजूंनी त्याची कोंडी करून दाभोळच्या सागरीयुद्धात त्यास जेरीस आणले.

बहामनी राजवट अस्तास येत असताना विजापूरच्या आदिलशाहिचा अंमल वाढू लागला. दाभोळ बंदरात उतरलेल्या युसुफ आदिलखानने गुलबर्ग्याला जाऊन बहामनी राज्याच्या पदरी राहून बिजापूरला ( विजापूर ) स्वतंत्र राज्याची उभारणी केली. दाभोळ हे सागर किनाऱ्यावरील बिजापुरचे महाद्वार होते. दाभोळला तो ‘बाब उल हिंद’ (भारताचे महाद्वार) असे म्हणित असे. आदिलशाही काळात दाभोळ आर्थिकदृष्ट्या अतिशय समृद्ध होते. अंजनवेलची वहिवाट या हस्तलिखितानुसार १५ व्या शतकापूर्वी मौजे गुढे तर्फ वलंबे येथे पवार नावाचा मराठा सरदार गढी बांधून या भागावर अंमल करीत होता. इ.स. १५०२ च्या सुमारास मुस्तफाखान या आदिलशाही सरदाराने पवाराच्या गढ्या उध्वस्त करून दाभोळ येथे सुभा स्थापन केला. १५०२ मध्ये रत्नागिरी, राजापूर, कुडाळ व दाभोळचा समावेश करून दाभोळ तर्फची (इलाखा, जिल्हा) निर्मिती झाली. १५०२ मध्ये या प्रदेशात नवीन महसूलधारा पद्धती सुरु करण्यात आली. आदिलशाहीत दाभोळ शहर भरभरटीस आले. अनेक देशाचे व संस्कृतीचे लोक येथे स्थायिक झाले. मुस्लिम सत्ता असल्यामुळे जागोजागी सुंदर मशिदींचे बांधकाम करण्यात आले. १५०३ मध्ये दाभोळच्या धक्क्यावरील माँसाहेबांची मशीद विजापुरी स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. १५०३ मध्ये भारतात आलेला इटालिअन प्रवासी वारथेमा दाभोळचे वर्णन एक सुंदर व समृध्द शहर असे करतो.

दाभोळ संपन्नता आणि ऐन समृद्धीच्या काळात असताना व दक्षिणेत विजयानगर, बिजापूर, अहमदनगर व गोवळकोंडा येथे सत्तांतर होत असतानाच कालिकत–केरळमध्ये पोर्तुगिजांनी बाजी मारली. पश्चिम आशिया व युरोप मधील अतिशय सुसंपन्न व्यापार अरबांच्या हातात होता. त्यांना शह देण्याची संधी पोर्तुगिजांना मिळाली. केरळ नंतर त्यांची वक्रदृष्टी गुजरात व कोकण किनाऱ्याकडे वळली. सन १५०७ मध्ये पोर्तुगिजांनी गव्हर्नर फ्रान्सिस्को आल्मेडाचा मुलगा लोरेंझो याच्या अधिपत्त्याखाली पश्चिम किनारपट्टी व्यापारासाठी खुली करण्यास आरमार पाठवले. या आरमारविरुद्ध विजापूर, अहमदनगर, गुजरात वगैरेंच्या सुलतानांनी आघाड्या उघडल्या. इजिप्तचा सुलातनही त्यात सामील झाला. लोरेंझोची आरमारी तारवे दिवजवळ असताना तिथला सुभेदार मलिक अय्याझ याने अचानक हल्ला केला व पोर्तुगिजांना नामोहरम केले.


इ. स. १५२० मध्ये इस्माईल आदिलशहा ( १५१०-१५३४ ) याने पोर्तुगिजांना त्यांनी जर दाभोळला आयात होणाऱ्या घोड्यांना संरक्षण दिले तर मैत्रीचा तह करण्यात येईल असा प्रस्ताव धाडला. हा प्रस्ताव पोर्तुगिजांनी झिडकारला व त्यानंतर दोन वर्षांनी (१५२२ मध्ये) दाभोळ पुन्हा एकदा लुटले. परंतु या लुटीनंतरही दाभोळ लवकरच सावरले आणि १५४० मध्ये जगातील एक मोठी नगरी म्हणून उदयास आले. जिच्यात संपूर्ण हिंदी महासागरास लागून असलेल्या राष्ट्रांमधील व्यापाऱ्यांनी व जगाच्या सर्व खरीदारांनी फार मोठ्या प्रमाणावर गर्द्दी, वस्तिस्थाने केली होती. त्यानंतर सातच वर्षात या नगरीचे वैभव ओसरून फक्त ४००० रहिवासी, दोन किल्ले आणि काही खंदक तेवढे उरले. त्यावर्षी (१५४७ च्या सुमारास) पोर्तुगिजांनी दाभोळ पुन्हा उध्वस्त केले. इ.स. १५४८ मध्ये बिजापूर आणि पोर्तुगिजांमध्ये तह होऊन पोर्तुगिजांनी दाभोळला गुमास्ता (Factor) पाठवून समुद्राद्वारा प्रवास करणाऱ्या व्यापारी व इतरांना परवाना (Passport) देण्याची व्यवस्था करून दाभोळची भरभराट करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पोर्तुगिजांनी आदिलशहास सालीना सोन्याचे २००० परदाव (सोन्याची नाणी = १५४ ब्रिटिश पौंड) देण्याचे कबुल केले. १५५४ मध्ये पोर्तुगिजांनी हा करार मोडला आणि १५५४ व १५५७ मध्ये पुन्हा दाभोळ लुटले. या लुटीनंतर दाभोळला सावरण्यास थोडा वेळ लागला. गुजराती इतिहासकार असे नमूद करतात की, इ. स. १५७० मध्ये दाभोळ हे युरोपियन बंदाराप्रमाणे होते. १५७० मध्ये अली आदिलशाह व अहमदनगरचा सुलतान मुर्तझा निजामशहा यांनी पोर्तुगिजांविरुद्ध आघाडी उघडली. कालिकतचा राजा झामोरिन हा सुद्धा त्यांना सामील झाला. पण पोर्तुगिजांच्या लष्करी डावपेचांसमोर व तोफा दारूगोळ्यासमोर आघाडी टिकू शकली नाही. शेवटी नाईलाजाने पोर्तुगिजांबरोबर आदिलशहाला डिसेंबर १९७३ मध्ये तह करावा लागला. त्यानुसार पोर्तुगिजांची एक नाविक तुकडी दाभोळला तैनात करण्यात आली. काही दिवसानंतर या तुकडीतील सोजिरांना भोजनाचे आमिष दाखवून बिजापूरच्या सैन्याने आमंत्रण दिले व त्यांची भयानक कत्तल केली. गोव्याला हे वृत्त कळताच व्हाईसरॉय डॉम दियागो द मेनेझेसने (१५७६-१५७८ ) पुन्हा सूड म्हणून दाभोळचा पुरता विध्वंस केला.
संदर्भ :
- गेट वे ऑफ दाभोळ – अण्णा शिरगावकर.
- किल्ले महाराष्ट्र (कोकण विभाग )
- मुसलमानपूर्व महाराष्ट्र, खंड १ – वासुदेव कृष्ण भावे
- लेख डॉ. दाऊद दळवी.
- लेख प्रा. विद्या प्रभू (इतिहास विभाग प्रमुख, ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे.)
- लेख डॉ. एम. ए. लोहार (इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
भाग 3 – सोळावे शतक ते सतराव्या शतकाच्या मध्ययुगापर्यंतचा व्यापार
बीजापुर आणि पोर्तुगिजांमधील या लढाया सतरावे शतक उजाडले तरी चालूच होत्या. दाभोळ बंदर व शहर या लढायांना वारंवार बळी पडत होते. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला दाभोळ मुसलमानी आमदनीत होते. इ.स. १६११ मध्ये इंग्रज अधिकारी मिडलटोनला येथे सीदी सुभेदार आढळला. त्याने त्याच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी दाभोळचा व्यापार मंदावलेला, निराशाजनक होता. विक्रेते उत्तम कापड, नीळ आणि काळी मिरी विक्रीसाठी गोंगाट करीत असत. परंतु ते खरेदी करायला कुणी पुढे येत नसे. येथील लोक फक्त जाडेभरडे कापड, चटया ( Kerseys) आणि शिसेच खरेदी करत. त्यानंतर पुढच्याच वर्षी इ.स. १६१२ मध्ये जॉन जॉर्डन या इंग्रजाने दाभोळला भेट दिली. तो लिहितो, “सोळाव्या शतकापासून महत्वाच्या बंदरात पोर्तुगिजांनी बाहेर जाणाऱ्या जहाजांना परवाने ( कार्टाझ ) देण्याची पद्धत सुरु केली होती. दाभोळ बंदरात देखील दुसरीकडे जाणाऱ्या जहाजांना दस्तके देण्यासाठी पोर्तुगिजांनी आपला एक प्रतिनिधी ठेवलेला होता. तांबडा समुद्र, पर्शियातील होर्मुझ आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या गलबताना परवाने देण्यासाठी गोव्याच्या व्हाईसरायकडून त्याची नेमणूक करण्यात आली होती. तोफेची दारू आणि इतर प्रकारचे युद्धसाहित्य गलबतातून नेण्यास मनाई होती. पण पोर्तुगीज प्रतिनिधीला लाच देऊन बंदी असणारे साहित्य नेण्यात येत असे. अरबस्थानातून घोडे आणून विकण्याचा मक्तादेखील त्याच्याकडेच होता. घोडेविक्रीप्रमाणेच दाभोळ शहरात मद्य विकण्याची मक्तेदारीदेखील पोर्तुगीज अधिकाऱ्याकडे होती. यासाठी तो दाभोळच्या आदिलशाही सुभेदाराला दरवर्षी २००० लाऱ्या देत असे. दाभोळात पोर्तुगिजांचा स्वतःचा व्यापार जास्त नव्हता. मात्र सागरी प्रवासाला जाणाऱ्या परदेशीय गलबताना परवाने देण्यासाठी तेथे पोर्तुगीज प्रतिनिधी होता.” (प्रतिनिधी बाबतचा असाच उल्लेख सुरतेहून लिहिलेल्या १० एप्रिल १६२१ च्या इंग्रजी पत्रात आहे.) याशिवाय जॉन जॉर्डन दाभोळच्या वर्णनात लिहितो, “हे बंदर प्रवेश मुखाजवळ अरुंद आहे. या ठिकाणी खडक दिसत असला तरी पाण्याची खोलीमात्र अधिक आहे. शहर दोन मैलावर असताना जहाज जेव्हा प्रवेश करते तेथे हे एक चांगले बंदर असल्याचे जाणवते.” त्याशिवाय दाभोळच्या व्यापाराविषयी तो म्हणतो, “दरवर्षी दोन किंवा तीन जहाजे दाभोळहून लाल समुद्राकडे जातात व त्यामध्येच सुरतेच्या जहाजपेक्षा अधिक व्यापारी माल भरलेला असतो. त्याचप्रमाणे पर्शियन आखातातील होर्मुझ या बंदराकडे देखील दोन जहाजे जातात.”




संदर्भ :
- गेट वे ऑफ दाभोळ – अण्णा शिरगावकर.
- किल्ले महाराष्ट्र (कोकण विभाग )
- मुसलमानपूर्व महाराष्ट्र, खंड १ – वासुदेव कृष्ण भावे
- लेख डॉ. दाऊद दळवी.
- लेख प्रा. विद्या प्रभू (इतिहास विभाग प्रमुख, ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे.)
- लेख डॉ. एम. ए. लोहार (इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
भाग 4 – शिवाजी महाराजांचा काळ ते इ.स.१८१८

इ.स. १६६० मध्ये थेवेनॉट हा युरोपिअन प्रवासी दाभोळचे वर्णन जुने ठेंगण्या घरांचे व काही तटबंदी असलेले शहर असे करतो.इ.स. १६७० मध्ये फादर नवराईट म्हणतो की, शिवाजी महाराजांचा येथे भक्कम व सुंदर किल्ला आहे. तर इ.स. १६७० मध्येच ओगिल्बी असे म्हणतो की, “पूर्वी दाभोळ हे खूप प्रसिद्ध गांव होते, लढायांमुळे आता ते बरेच उध्वस्त झाले आहे आणि त्याचा व्यापारही कमी झाला आहे. त्याला प्रवेशासाठी फक्त दक्षिणेकडून नदीकडून मार्ग असून समोरचं दोन युद्ध–बुरुजांवर संरक्षणासाठी चार लोखंडी तोफा तैनात केलेल्या आहेत.” परंतु इ.स. १६६२ च्या दरम्यान दाभोळ बंदर शिवाजी महाराजांच्या ताब्यात असताना महाराजांनी दाभोळच्या व्यापारावर लक्ष दिल्याचे दिसते. त्यांची काही जहाजे दाभोळ व मुंबई येथे व्यापार करीत असत, असे उल्लेख तात्कालीन कागदपत्रात सापडतात. मुंबई बेटावरून लंडनला पाठविण्यात आलेल्या एका पत्रात शिवाजी महाराजांच्या ताब्यातील राजापूर व दाभोळ ही बंदरे मुंबईच्या व्यापारासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात दाभोळचा व्यापार बऱ्याच प्रमाणात कमी झाला. शिवाजी महाराजांनंतर संभाजी राजे व राजाराम राजे यांनी या सुभ्यावर निरनिराळे सुभेदार पाठविले. १६९७ मध्ये दाभोळची जहागिरी शिर्के कुटुंबाकडे बहाल करण्यात आली. इ.स. १७०० ते १७४४ पर्यंतच्या हबशी आणि मराठ्यांच्या संघर्ष काळात इंग्रजांची वखार होती,असे वर्णन केले जात असे. याच काळात तुळाजी आंग्रे यांनी दाभोळ जिंकून घेतले व हबशांना हाकलून लावले. त्यानंतर १७५६ ला पेशवा व इंग्रज संयुक्त फौजेने विजयदुर्ग किल्ल्यावर तुळाजी आंगरेंचा पराभव केल्यानंतर दाभोळ शहर व बंदरावर पेशव्यांचे नियंत्रण आले. इ.स. १८१८ पर्यंत दाभोळ पुढे पेशव्यांच्याच ताब्यात होते. १८१८ मध्ये कसलाही प्रतिकार न करता ते पेशव्यांकडून ते ब्रिटीशांच्या स्वाधीन करण्यात आले.
संदर्भ :
- गेट वे ऑफ दाभोळ – अण्णा शिरगावकर.
- किल्ले महाराष्ट्र (कोकण विभाग )
- मुसलमानपूर्व महाराष्ट्र, खंड १ – वासुदेव कृष्ण भावे
- लेख डॉ. दाऊद दळवी.
- लेख प्रा. विद्या प्रभू (इतिहास विभाग प्रमुख, ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे.)
- लेख डॉ. एम. ए. लोहार (इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
कॅम्प दापोलीची गोष्ट
१८१८ ते १८१९ च्या दरम्यान म्हणजे आजपासून जवळजवळ २०० वर्षांपूर्वी इंग्रजानी ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत कॅम्प दापोली वसवली. संपूर्ण कोकण पट्टयात दापोली कॅम्प हे तेव्हाच्या काळातले इंग्रजांचे एकमेव सुरक्षित व सोयीस्कर ठिकाण. हीच कॅम्प दापोली पुढे कोकणच्या व महाराष्ट्राच्या २०० वर्षाच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडींची साक्षिदार राहिली.
१६११ …
पण कॅम्प दापोलीची ही गोष्ट १६११ मध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने दाभोळ बंदरात कोकणातला पहिला कारखाना टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरु होते. फेब्रुवारी १६११ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सर हेन्री मिडलटन ने ३ बोटींसह दाभोळ बंदरात तेव्हाच्या सिद्धी गव्हर्नरची भेट घेतली व थोडासा व्यापारही मिळवला. असा प्रयत्न ईस्ट इंडिया कंपनीने पुन्हा १६१२ आणि १६१८ मध्ये पुन्हा केला पण दाभोळ आणि एकंदरीत कोकण किनाऱ्यांवर असलेल्या पोर्तुगीज आणि डच प्रभुत्वामुळे तोही अयशस्वी ठरला. शेवटी १६२४ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला, सिद्धी बरोबर झालेल्या करारानुसार दाभोळ बंदरात कारखाना उघडण्यासाठी परवानगी मिळाली. दाभोळ बंदर व आसपासचा प्रांत, कंपनीच्या व्यापाराकरिता अधिक सुरक्षित आणि सोईस्कर ठरेल, म्हणून कंपनीने त्यांचे सुरतेचे सर्व कारखाने व धंधे दाभोळला हलवावे, अशी अट १६२४ च्या ह्या करारात होती. कारखाना चालू केल्यानंतर मात्र इंग्रज ह्या कराराला प्रामाणिक राहिले नाहीत आणि पुढील दहा वर्षातच त्यांना दाभोळचा कारभार आटोपता घ्यावा लागला. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा कोकणात तळ जमविण्याचा हा पहिला प्रयत्न होता.
१६३९…
कोकणात त्यानंतर १६३९ मध्ये सर विल्यम कॉर्टेन च्या फ्रीट्रेडर अससोसिएशन ने कारखाना टाकण्यात यश मिळवले. लंडनच्या ह्या फ्रीट्रेडर अससोसिएशन ने दाभोळ आणि राजापूर प्रांतातून जवळजवळ दहा वर्षे व्यापार चालवला. राजापूर आणि दाभोळ ह्या दोन व्यापारी बंदरातून इंग्रज वर्षाला जवळजवळ ३००० खंडी मिरीची निर्यात करीत. मिरपुडीचा वापर हा मांस जास्त काळ टिकवण्यासाठी होत असे. युरोपातल्या “मीट प्रोसससिंग” इंडस्ट्रीचा हा सुरवातीचा काळ होता. विल्यम कॉर्टेन च्या फ्रीट्रेडर अससोसिएशन बरोबर ईस्ट इंडिया कंपनीसाठीहि राजापूर हे सुरत व बॉम्बे नंतरचे महत्वाचे लक्ष्य बनले होते.
१६५०…
१६५० च्या दरम्यान विल्यम कॉर्टेन च्या फ्रीट्रेडर अससोसिएशनच्या हेळसांड कारभाराला आणि वाढत्या कर्जाला कंटाळून तिथल्या मुसलमान गव्हर्नर ने सुरतला ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रेसिडेंटची भेट घेतली. त्या भेटीत झालेल्या करारात राजापूर ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी मोकळा झाला, आणि इंग्रजाची ईस्ट इंडिया कंपनी अधिकृत रित्या कोकणात व्यापार करू लागली. गमतीची गोष्ट म्हणजे करारानंतर लगेचच, ईस्ट इंडिया कंपनीने, विल्यम कॉर्टेन च्या फ्रीट्रेडर अससोसिएशनचा ताबा मिळवून त्यांच्याकरवीच काम चालू ठेवली. ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरवातीच्या साम्राज्यातील मोक्याची असलेली राजापूरची हि फॅक्टरी शिवाजी महाराजांच्या काळात १६६४ मध्ये पुन्हा बंद पाडली गेली.
१७०८….
१६११ व १६३९ च्या दोन प्रयत्नानंतर, १७०८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला दाभोळ, राजापूर आणि वेंगुर्ल्यात व्यापाराला मार्ग मोकळे झाले होते, परंतु ह्याच काळात कंपनीचा बॉम्बे पोर्टचा कारभार बराच वाढल्याने पुढे १७५६ पर्यंत कंपनी कोकणात कुठेच असल्याचं नमूद नाही.
शिवाजी महाराज…
शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत, सिद्दीच्या जंजिरासारखी एकदोन अपवाद वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा भाग बनली होती. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सरखेल कान्होजी आंग्रे हा एकछत्री अंमल होता, कानोजी आंग्र्यांची जरब इंग्रजापासून, डच आणि पोर्तुगीजामध्ये संपूर्ण युरोपात होती. परंतु १७३९ नंतरच्या काळात आंग्रे कुटुंबातील अंतर्गत वाद व पेशवाईचा प्रभाव दोन्ही वाढतच गेले
१७५६…
शेवटी मार्च १७५६ मध्ये, नानासाहेब पेशव्यानी इंग्रजांची मदत घेऊन हर्णेच्या सुवर्णदुर्गावर हल्ला चढविला. बॉम्बेच्या ईस्ट इंडिया कंपनीचा कोमोडोरे जेम्स ने ४ युध्दनौका घेऊन सुवर्णदुर्ग व समोरच्या भुईकोट किल्यांच्या ताबा मिळवला. आंग्र्यांबरोबरच्या लढाईत केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून बाणकोटचा किल्ला, हिम्मतगड व त्याच्या आसपासची ५ गाव पेशव्यानीं इंग्रजांना देऊन टाकली. पेशव्यानं कडून मिळालेला बाणकोट हि ईस्ट इंडिया कंपनीची कोकणातील पहिली भौगोलिक मिळकत होती. इंग्रजांनी बाणकोटचा किल्ल्याचे नंतर फोर्ट व्हिक्टोरिया असे नामकरण केले.
१७५६-१८१८…
१७५६ नंतर १८१८ पर्यंत संपूर्ण कोकण ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरतेपासून खाली बेळगाव पर्यंत पसरलेल्या साम्राज्याचे भाग बनला होता ज्याला आपण “The Bombay Presidency” म्हणून ओळखतो. १८१८ पर्यंत पेशवाई पूर्णपणे नामशेष होऊन ईस्ट इंडिया कंपनीच्या झेंड्याखाली इंग्रज़ी राजवटीची पायमुळं अगदी खोलवर पसरली होती. ह्या दरम्यान कोकणात इंग्रजांनी, मालवण, वेंगुर्ला, बाणकोट व हर्णे अश्या ४ ठिकाणी छोट्या सैनिकी तुकड्या ठेवल्या होत्या. त्यानंतर मात्र इंग्रजांना कोकणात एक नियमित सैनिकी ताफा ठेवण्याची गरज वाटू लागली व त्यासाठी दापोलीची निवड करण्यात आली. आणि कॅम्प दापोली अस्तित्वात आली.
१८१८ आणि पुढे ….
१८१८ च्या नंतर च्या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या अमलाखाली इंग्रजांनी कायदा, चलन, दळणवळण, शिक्षण क्षेत्रातल्या पारंपरिक व्यवस्था मोडीत काढून नव्या इंग्रजी संकल्पना राबविल्या, ह्या कालावधीत संपूर्ण उत्तर कोकण आणि त्याची शेतीसंस्कृती जवळजवळ नष्ट झाली. ह्याच कालावधीत दापोलीत कचेरी, दिवाणकोर्ट, चर्च, ईस्ट इंडिया कंपनीची चलनातील नाणी, आर्मी बर्राक, गोळीबार क्षेत्र, फॅमिली माळ व जालगावची बाजार पेठ वरून खाली कॅम्पात आली.
१८१८ ते १८५७ ह्या कालावधीत ईस्ट इंडिया कंपनीने इंग्रजी साम्राज्याची भारतावरची पकड मजबूत केली, पण ह्यात उत्तर कोकण, कुलाबा, पनवेल, भिवंडी व वसई सारखे प्रांत पेशवाई पासून चालत आलेल्या करांमध्ये व नंतर त्यात इंग्रजी विकास ह्यात संपूर्णपणे नष्ट होत चालले होते. अगदी भिवंडी पर्यंत रेल्वे ट्रॅकस, महाड पर्यंत गाडी रास्ता देखील पूर्ण होत आला होता. पण त्यापुढे दापोली पासून खाली तळ कोकणात बैलगाडीच चालू होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या अश्या परिस्थितीत सुद्धा संपूर्ण कोकणातुन, हर्णेचं सुवर्णदुर्ग आणि गुहाघरच अंजनवेल अशी दोन प्रांत अगदी वेळेवर न चुकता कर भरीत असत त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचं दक्षिण कोकणात सगळं व्यवस्थित चाललं होतं. अगदी १८४० पर्यंत इंग्रजांनी दापोलीतील नियमित ताफा हलवून फक्त अनुभवी, आणि वरीष्ठ इंग्रज़ी अधिकाऱ्यांची तुकडी नियुक्त केली होती. ह्याला दापोलीतील थंड हवा व नैसर्गिक सौंदर्य ह्यापलीकडे दापोलीची भौगोलिक सरंचना कारणीभूत असावी. १८५७ नंतर मात्र इंग्रजांनी अधिकृत रित्या दापोलीत सैनिकी ताफा ठेवला नाही.
१८५७ च्या बंडानंतर इंग्रजानी ईस्ट इंडिया कंपनी कडून राज्यकारभाराची सूत्र स्वतःच्या हातात घेतली. १८५७ पासून पुढे इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी जाऊन ब्रिटिश राज चालू झाला आणि पुढे २१ वर्षांनी १८७८ मध्ये SPG मिशन चे आल्फ्रेड गॅडने दापोलीत आले. खुद्द राणीच्या शिफारसीतून आलेला हा एक तरुण स्कॉटिश मिशनरी होता. गॅडननेंनी दापोलीत आर्मी बर्राक च्या जागेवर AG high school ची स्थापना करून संपूर्ण अभ्यासक्रम रचला, आजु बाजूच्या गावातल्या मुलांना हे शिक्षण घेता यावं ह्याकरिता बोर्डिंग स्कूल्स बनवून घेतली. हर्णेत मुलींसाठी शाळा चालू केली. कोकणात रुढ असलेल्या पारंपरिक गुरुकुल शिक्षण पद्धती नंतर इंग्रज़ी शिक्षण प्रणालीत कोकणात एवढं यश मिळवणारे ग्याडने हे पहिलेच.
ब्रिटिश राजवटीत SPG मिशनची मुख्य कार्यपद्धती हि ख्रिस्ती धर्माचा प्रसार व धर्मांतर करण्यावर जोर देत असे. आल्फ्रेड गॅडने देखील ह्याच उद्देशाने दापोलीत आले पण त्यापुढे ते असखलीत मराठी व संस्कृत बोलणारे दापोलीकर कसे बनले हि गोष्ट स्वतंत्रपणे सांगायला हवी.
खरंतर गॅडननेंना दापोलीत एकही धर्मांतर करण्यात यश मिळाले नाही. त्यांनी SPG मिशनला केलेल्या पत्रव्यवहारात ते नमूद करतात कि “इथे वेगवेगळ्या धर्मांची व जातीची बरीच लोक आहेत. बरीच लोक गरीबही आहेत, त्यांच्यावर कर्जही आहेत, परंतु इथल्या लोकांना इतर गरजा किंवा इच्छा नाहीत व ते समाधानी आहेत आणि म्हणूनच माझे इथले काम कठीण झाले आहे.”
१९२८ पर्यंत व त्यानंतरच्या कालावधीत ग्याडने च्या AG high school ने पुढे दापोली आणि पूर्ण देशाला थोर विचारवंत व क्रांतिकारी दिले. इतकेच नव्हे तर, सैन्यदल, नौदल, रेल्वे व इतर सरकारी सेवेत हुशार व कर्तव्यदक्ष अधिकारी सुद्धा दिले. १९२२ ची असहकार चळवळ, १९३० चा मिठाचा सत्याग्रह, ४२ ची चले जावं ह्यासारख्या १९४७ पर्यंतच्या सर्व देशव्यापी चळवळीतून दापोलीने मोलाच योगदान केल. पुढे १९४७ नंतर, स्वातंत्र्याची घडी बसविण्यात सुध्दा दापोली अग्रेसर राहिली. ह्या प्रांताने देशाला धुरीचे राजकारणी दिले हि गोष्ट आजतायागत खरी होईल.
साने गुरुजी, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्यासारखी युगप्रवर्तक नेतृत्व. डॉ. पा. वा. काणे, रँग्लर परांजपे, असे थोर विचारवंत. बाबा पाठक, सुडकोजीं खेडेकर, शिवराम मुरकर ,चंदुभाई मेहता, पुरुषोत्तम मराठे,मालू शेट, विठ्ठलराव बेलोसे, ह्यांच्यासारखी सामान्य पण नीतिमूल्यं जपणारी आदर्श स्वातंत्र्यसेनानी असुदेत किंवा त्यांना आडोसा देणारी नुसतीच बुटलांच्या दुकानाची ओसरी असुदे,त्यांच्या बोथट पण निरपराध विचारांना धार चढवणारी गोखले लायब्ररी असुदे, कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धनानी मिठाचा सत्याग्रह घडवला तो हर्णेचा समुद्र किनारा असुदे, वा स्वातंत्रउत्तोर काळात पूर्ण कोकणची राजकीय भाषणे ज्याने गिळून टाकली ते आझाद मैदान असुदे कोकणच्या व त्यानंतर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जडणघडणीत दापोली कधी गोंगाट करीत तर कधी नकळत आपल स्थान टिकवून राहिली आहे.
कॅम्प दापोलीची गोष्ट कधी संपते किंवा संपली यासाठी अजून थोडं किंवा बरच खोदावं लागेल. मात्र १६११ पासून परकीय आक्रमणापासून इथल्या श्रीमंत संस्कृतीला व निसर्गाला जपून ठेवणारा हा प्रांत ज्याला आपण सर्व दापोली म्हणतो, तिची गोष्ट नक्कीच संपणार नाही.
आता सध्याच्या दाभोळ परिसराची माहिती घेउया.
दाभोळ खाडीतील फेरी सर्व्हीस
स्वयंभू श्री चंडिका देवी (दाभोळ):-
दापोली शहरापासुन साधारण एक तासाच्या (२८ किमी) अंतरावर एका टेकडीवर वसले आहे श्री स्वयंभू चंडिका देवीचे स्थान.
टेकडीच्या डावीकडील भागातून खाली उतरल्यावर एकसंघ दगडामध्ये कोरलेल्या भुयारवजा गुहेमध्ये असलेल्या श्री स्वयंभू चंडिका देवीच्या मंदिराकडे आपण येतो.
चंडिका देवीची गुहा
गुहेमध्ये प्रवेश करताना एका छोट्या दरवाजातून वाकून जावे लागते. आत आल्यावर आपल्याला दिसते ती काळ्या कभिन्न पाषाणाच्या गुहेत कोरलेली नंदादिपाच्या प्रकाशात उजळलेली मंगलमय आणि सोज्वळ शेंदुरचर्चित श्री चंडिका देवीची मूर्ती. अशी ही प्रसन्न मूर्ती पाहताक्षणी आपले भान हरपते.
(मंदिरात देवीचा फोटो काढण्यास परवानगी नसल्याने हा फोटो नेटवरून साभार)मूळ मूर्तीची प्रतिकृती
श्री स्वयंभू चंडिका देवीचे रुप जेव्हढे सुंदर तेव्हढेच रौद्रही भासते. देवीच्या भुवया मोठ्या असून ती आपल्या नयनांनी संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून असल्याचे सांगतात. देवीला चार हात असून तीच्या उजव्या हातात तलवार आहे.
श्री चंडीकेचे मुख नैऋत्य दिशेला असून ती पूर्णपणे शाकाहारी आहे. दाभोळ गावात असलेल्या ईंगळाइ-भैरीदेवी या श्री चंडीकेच्या बहिणी असून दालभ्येश्वर, नवनाथ दत्त मंदिर आदी देवांना तीने आपल्या छत्रछायेखाली घेतले आहे असे स्थानिकांचे मत आहे. अशा या जागृत देवीचे दर्शन घेऊन त्या अंधाऱ्या गुहेतून पणत्यांच्या मंद प्रकाशात प्रदक्षिणा पूर्ण करून आपण बाहेर पडतो.
बाहेरील रचनेवरून आत असलेल्या गुहेची अजिबातच कल्पना येत नाहि. फार पूर्वी दालभ्य ऋषींनी या गुहेत तपसाधना केल्याचे सांगितले जाते.
मंदिर परीसर :-
नवरात्रीत देवीचा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. मंदिराच्या मुख्य द्वाराजवळच घटस्थापना केली जाते. पहाटे साडेचार-पाचच्या सुमारास काकड आरतीला सुरुवात होते. दसर्याच्या दिवशी सोने लुटून मंदिरावर निशाण चढविले जाते. देवीचे स्वरूप हे स्वयंभू असून ती नवसाला पावणारी जागृत देवी आहे. उत्सवाच्या काळात विविध भागातून भक्त देवीच्या दर्शनाला हजारोंच्या संख्येने येत असतात. चंडिकेवर जेंव्हा मुघलांचे राज्य आले तेंव्हा शिवरायांनी येथे स्वारी केल्याची नोंद आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव सध्या एनरॉन प्रकल्पामुळे गाजत आहे. तरीसुद्धा आपली एक परंपरा व खास कोकणी ठसा अजुनही या गावात जाणवतो
.दाभोळ बंदर हे सतत नौकांनी गजबजलेले असते. या बंदराच्या पलिकडे असलेल्या अंजनवेल, वेलदुर परिसरापर्यंत लाँचसेवा उपलब्ध आहे. येथील समुद्रकिनाराही सुरुंच्या झाडामुळे अधिकच आकर्षक वाटतो. खास कोकणी निसर्ग सौंदर्याबरोबर स्वयंभू दालभ्येश्वर मंदिर, नवसाला पावणारा सय्यद अमिरूद्दिन बालापीर,
कोकणामध्ये दाभोळ बंदरात आदिलशाहीच्या काळापासूनची प्रचंड शाही मशीद आहे. तिचा अंडा मशीद किंवा मासाहेबा मशीद असा उल्लेख केला जातो. ही मशीद विजापूर येथील शाही जामा मशिदीची प्रतिकृती मानली जाते.अंडा मशिद हा प्राचीन वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना मानला जातो. या वास्तूत प्रवेश करण्यासाठी प्रशस्त, सुंदर काळ्या दगडाच्या पायऱ्या आहेत.
तेथेच हौद व कारंज्याची मांडणी केलेली आहे. मशिदीच्या दर्शनी भागात तीन भव्य कमानी आहेत. चारही कोपऱ्यांवर अतिशय प्रमाणबद्ध मनोरे आहेत. मनोऱ्यावर दगडात कोरलेले साधे पण मनोवेधक नक्षीकाम आहे. छज्जाच्या मध्यभागावर छोटे छत्रीवजा घुमट व त्याच्या पाठीमागे मशिदीचा भव्य घुमट आहे. घुमटावर पूर्वी सोनेरी पत्रा होता असे सांगितले जाते. या मशिदीच्या निर्मितीच्या कथा वेगवेगळ्या सांगितल्या जातात. त्यातील एक कथा अशी की, इ. स. १६५९ मध्ये विजापूरची राजकन्या आयेषाबीबी मक्केला जाण्यासाठी दाभोळला आली. पण हवामान ठीक नसल्याने ती जाऊ शकली नाही. मौलवीने सोबत आणलेले धन धार्मिक कार्यासाठी वापरावे, असा तिला सल्ला दिला. त्यानुसार तिने कामीलखान या शिल्पकाराकडून ही मशीद बांधून घेतली. त्यासाठी त्या वेळेस त्यासाठी १५ लाख रुपये खर्च आल्याची नोंद आहे. दाभोळ बंदरात अरबी घोडय़ांची आवक केली जात होती. मसाल्याच्या पदार्थाचा व्यापार होता. सध्या बंदरात मोठय़ा होडय़ांमधून चारचाकी, तीनचाकी वाहने पलीकडच्या किनाऱ्यावर सोडली जातात. येथे माशांची विक्री मोठय़ा प्रमाणात केली जाते.
दाभोळ आणि परकीय प्रवासी
‘दाभोळ’ हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील महत्त्वाचे बंदर. त्याचा उत्कर्ष चौदाव्या ते सतराव्या शतकांत झालेला होता. दाभोळ बंदराचा सर्वात प्राचीन उल्लेख सातवाहन काळात एका अनभिज्ञ परकीय प्रवाशाने लिहिलेल्या ‘पेरीप्लस ऑफ इथिरियन सी’ या ग्रंथात सापडतो. दाभोळचा तो उल्लेख ‘पालीपाटमे’ असा आहे. त्याच प्रमाणे जुन्या लिखाणात कोकणातील बंदरांचे संदर्भ सापडतात. त्यात सोपारा, कल्याण, चौल, मंदागौर (बाणकोट), मेलीझीगारा (सुवर्णदुर्ग-राजापूर), सेसेक्रियनाय (वेंगुर्ले) या बंदरांचे नामोल्लेख येतात.
सातवाहन राजवट मौर्य साम्राज्यानंतर महाराष्ट्रात अस्तित्वात आली. त्या काळात ही बंदरे भरभराटीस आली होती. त्या बद्दलचे उल्लेख स्ट्रॅबो, टॉलेमी, प्लिनी, व पेरिप्लस या भूगोलवेत्त्यांप्रमाणे तर हुएनस्तंग, इब्नबतुता, अल्बेरुनी या प्रवाशांनी त्यांच्या लिखाणात करून ठेवलेले आहेत. दाभोळ बंदरातून रोम, इजिप्त, अरेबिया, इराण, आफ्रिका या पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे. दाभोळचा संदर्भ पेरिप्लसमधील एक उल्लेख वगळता प्राचीन लिखाणात सापडत नाहीत. दाभोळ मध्ययुगीन इतिहासात भरभराटीला आले असणार. अफसानी निकीतीन हा प्रवासी रशियातून 1740 मध्ये भारतात आला होता. त्याच्या लिखाणात इजिप्त, अरबस्तान, खोरासन, तुर्कस्तान येथून मोठ्या प्रमाणात घोड्यांची आयात दाभोळ बंदरात होत असून, दाभोळ हे एक मोठे बंदर असल्याचे वर्णन आहे. अरबी घोड्यांचा दर्जा फार चांगला असल्याने त्या घोड्यांना विजयनगर, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही या राजवटींत मागणी असे. परदेशांतून आलेले घोडे दाभोळ बंदरात उतरून विविध राज्यकर्त्यांकडे पाठवले जात.
दुआर्तेबार्बोसा या पोर्तुगीज प्रवाशाने 1518 मध्ये कोकण किनारपट्टीला भेट दिली. तो लिहितो, “मक्का, एडन, होर्मुझ येथून व्यापारी मोठ्या संख्येने घोडे घेऊन येथे येतात. तसेच खंबायत, दीव, मलबार किनाऱ्यांवरून जहाजे अनेक वस्तू घेऊन येथे येतात. येथील मुस्लिम व हिंदू धर्मीय व्यापारी खूप श्रीमंत आहेत. दाभोळच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात तांबे, पारा, हिंगुल (पारा आणि गंधकाचे मिश्रण अथवा पाऱ्याचा अशोधीत धातू) सापडते. अंतर्गत भागातून आणलेले कापड दाभोळ बंदरात जहाजांवर मोठ्या प्रमाणात चढवले जाते. येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंत विविध प्रकारचे कापड, मसाल्याचे पदार्थ, गहू, तेलबिया, कडधान्ये यांसारख्या वस्तू असतात.”
जॉन जॉर्डन आणि हेन्री मिडल्टन या प्रवाशांनी सतराव्या शतकात दाभोळला भेट दिली. त्यांच्या लेखनात दाभोळ बंदराचे वर्णन आहे. जॉन जॉर्डन लिहितो, “दाभोळ हे बंदर मुखापाशी अरुंद असून, त्या ठिकाणी खडक दिसत असला तरी बंदरात खोली मात्र अधिक आहे. त्या बंदरावरून दरवर्षी पाच-सहा जहाजे होर्मुझ बंदर व लाल समुद्र यांच्याकडे जातात. हेन्री मिडल्टनने लिहिले आहे, “आग्नेय आशियातील सुमात्रा बेटावरील ‘अचिन’ या बंदराकडे दोन-तीन जहाजे जातात. त्या जहाजांमध्ये सुरतेच्या जहाजांपेक्षा जास्त माल भरलेला असतो.” डच इस्ट इंडिया कंपनीतील ब्रोक त्याच्या लिखाणात म्हणतो, की “दाभोळची जहाजे सप्टेंबर महिन्यात सुमात्रामधील ‘अचिन’ बंदराकडे जातात आणि परतताना जावा, सुमात्रा यांमधून मिरी, डिंक, कापूर, लवंग आणि रेशमी कापड घेऊन येतात. तसेच, तेथील जहाजे विविध वस्तू घेऊन खांबात आणि पर्शियन आखातातील मोखा बंदराकडेही जातात.”

दाभोळ हे सोळा-सतराव्या शतकात महत्त्वाचे असे आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर झाले. स्वाभाविकच, दाभोळ मध्यकाळात व्यापारयोग्य माल साठवणुकीचे महत्त्वाचे केंद्र बनले. पोर्तुगीजांनी पश्चिम किनाऱ्यावरील व्यापार त्यांच्या ताब्यात घेऊन बाहेर जाणाऱ्या जहाजांना परवाने (कार्टाझ) देण्यास सुरुवात केली. जॉन जॉर्डनने दाभोळमध्ये दस्तक देण्यासाठी गोव्याच्या गव्हर्नरने त्यांचा प्रतिनिधी ठेवल्याचा उल्लेख केला आहे. तोफेची दारू यासारखे युद्ध साहित्य जहाजांवरून नेण्यास बंदी असे. मध्य आशियातून आलेल्या घोड्यांच्या व्यापाराचा मक्ता; तसेच, विदेशी मद्य विकण्याचा मक्ता पोर्तुगीजांकडे होता. त्यासाठी गोव्यातील पोर्तुगीज सत्ताधीश आदिलशहाला वार्षिक पद्धतीने मोठी रक्कम देत असत. तसे उल्लेख सुरतेहून इंग्लंडला पाठवलेल्या पत्रांतून सापडतात. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने दाभोळमधून व्यापार करण्याचा प्रयत्न सतराव्या शतकाच्या आरंभी केला. परंतु पोर्तुगीजांचे पश्चिम किनाऱ्यावरील वर्चस्व आणि निजामशाही व आदिलशाही राज्यकर्त्यांशी सख्य असल्यामुळे ते प्रयत्न सफल होऊ शकले नाहीत. इंग्रजांनी पोर्तुगीजांचे एक गलबत आफ्रिकेच्या कोमोरी बेटाजवळ 1617 मध्ये पकडले. त्यात सुरत, दीव आणि दाभोळ येथील व्यापारी होते. यावरून दाभोळचा आफ्रिकेशी व्यापार चालत असल्याचे निदर्शनास येते. पूर्वेकडील व्यापारासंदर्भात, दाभोळची गलबते बंगालच्या किनाऱ्यावरून मालाक्काकडे (मलेशियाच्या दक्षिण भागात वसलेले राज्य) जात असत. गलबते दाभोळ येथून सुरत, खंबात व केरळ यांच्या किनाऱ्यावरील बंदरे, पूर्व किनारपट्टीवरील महत्त्वाची बंदरे येथे जात असत. दाभोळ, चौल बंदरांचे महत्त्व नंतरच्या मोगल आणि ब्रिटिश कालखंडात कमी झाले. सुरत व मुंबई नावारूपाला आले आणि पश्चिम किनाऱ्यावरील दाभोळसह इतर बंदरे बिनमहत्त्वाची झाली.
परकीय प्रवाशांच्या वृत्तांतात दाभोळमधील वजने-मापे याबद्दल माहिती मिळते. येथून परदेशात जाणाऱ्या मालात प्रामुख्याने मिरी, कापड, सुंठ, लाख, तांदूळ, दोरखंड असे; तर शिसे, बॉडक्लॉथ नावाचे कापड, तंबाखू, लोकर, खजूर, मनुका, तलवारीची पाती येथे आणली जात. मिरीचे वजन करण्यासाठी खंडी हे माप वापरले जाई. जॉन अल्बर्ट मँडेलस्लो हा प्रवासी 1638 मध्ये जर्मनीमधून आला होता. त्याच्या लिखाणात दाभोळमधील एक मण हा चाळीस शेरांचा असल्याचे म्हटले आहे. दाभोळचा एक मण म्हणजे पंचवीस इंग्रजी पौंड असल्याचे; तसेच, व्यापारी मालाचे वजन करण्यासाठी प्रामुख्याने शेर, मण, खंडी ही वजने वापरली जात. सतराव्या शतकात दाभोळ येथून गोंबून येथे जाणाऱ्या मालासाठी दरखंडीस पन्नास लारी मोजाव्या लागत. तर माणशी अकराशे लाऱ्या भाडे आकारले जात असे. लारी हे आदिलशाहीतील चांदीचे नाणे होय. ते पश्चिम किनाऱ्यावर चलन म्हणून वापरले जात असे.
तत्कालीन प्रवास वर्णनातून प्रवासास लागणाऱ्या वेळेसंबधी माहिती मिळते. लंडन येथून दाभोळला पोचण्यास सात-आठ महिन्यांचा कालावधी लागत असे. तसेच, दाभोळ येथून सुमात्रातील अचीन बंदरात पोचण्यास साधारण एक महिना लागत असे. गोंबून (पर्शिया) येथून निघालेले गलबत दाभोळला सतरा-अठरा दिवसांत पोचत असे. दाभोळच्या बंदरावर बाराशे टन माल वाहून नेणारी गलबते लागत.
ओगिलबी हा प्रवासी (1670) म्हणतो, की “सध्या युद्धामुळे दाभोळच्या प्राचीन बंदराचे मोठे नुकसान झाले असून, तेथील व्यापार घटला आहे.” तर सतराव्या शतकाच्या अखेरीस आलेल्या अलेक्झांडर हॅमिल्टन याने दाभोळचे व्यापारी महत्त्व नष्ट झाल्याचे मत नोंदवले आहे. यामागे मोगल साम्राज्याचे महत्त्वाचे बंदर असलेल्या सुरतेला आलेले व्यापारी महत्त्व, पोर्तुगीजांचे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील वर्चस्व, इंग्रजांनी राजापूरला, तर डचांनी वेंगुर्ल्याला उघडलेल्या वखारी, सिद्दीचे दाभोळवर वरचेवर होणारे हल्ले, मोगल, मराठा आणि विजापूरकर यांच्यातील संघर्ष ही कारणीभूत ठरतात.
– संदीप परांजपे 9011020485 sparanjape0665@gmail.com
https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B3-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80/
कोकणातील टाळसुरेत ऐतिहासिक पाऊलखुणा - पुढारी

दापोली; प्रवीण शिंदे : कोकण (historical konkan) हा अनेक गोष्टींनी समृद्ध असलेला प्रांत आहे. याच कोकणात भारतीय संस्कृतीच्या इतिहासाची अनेक पाऊलखुणा दडलेली आहेत. याच कोकणात दापोली तालुक्यात प्राचीन संस्कृतीचा अनमोल ठेवा दडलेला आहे. येथील प्रत्येक गावात असे काही प्राचीन संदर्भ आहेत, जे सामाजिक किंवा सांस्कृतिक अनास्थेमुळे अजुनही सर्वांसमोर आलेले नाहीत.
दापोली तालुक्यातील टाळसुरे (historical konkan) नावाचे असेच एक गाव आहे. या गावात देखील इतिहासाच्या पाऊल खुणा आहेत. श्रीमंत बाजीराव पेशवे यांची पत्नी काशिबाई यांचे हे टाळसुरे माहेर आहे. मात्र हा इतिहास दापोली तालुक्यातील अनेकांना माहीत नसावा. दापोली शहरापासून अगदी जवळच, दापोली खेड या मुख्य मार्गावर हे गाव आहे. या गावात इतिहासाच्या पाऊल खुणा असूनही हे गाव पर्यटनाच्या पटलावर आले नाही. या गावात व आजुबाजूच्या परिसरात अनेक ठिकाणी काही ऐतिहासिक खुणा दडलेल्या आहेत. या बाबत गावातील वयोवृद्ध नागरिक या ऐतिहासिक ठेव्याची माहिती देतात. हा पुरातन ठेवा अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्याने त्याचे म्हणावे तसे जतन झाले नाही. यासाठी टाळसुरे गावचे सरपंच प्रभाकर लाले आणि ग्रामस्थ यांनी मिळून या पुरातन ठेव्याचे जतन व्हावे म्हणून पुढाकार घेतला आहे. यासाठी टाळसुरे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदेश राऊत व त्यांचे काही विद्यार्थी याचे या कामी सहकार्य करत आहेत.

स्थानिक इतिहासप्रेमी (historical konkan) ग्रामस्थ यांच्या एकत्रित श्रमदानातून व सरपंच श्री प्रभाकर लाले आणि यांच्या सहकार्यातून हे पुरातन भग्नावशेष अगदी बऱ्यापैकी दिसू लागले आहेत. खेर्डी जवळील जोगटेंबा येथे एक विशाल गुहासदृश लेणी येथे सापडली आहेत. या गुहेच्या वरील बाजूस कातळावर छत्तीस कोरीव खड्डे (मंडप घालण्यासाठी लागतात तशी नेमं) आहेत. या गुहेत आता वीस फुटांपर्यंत आत सहज जाता येते. ही गुहा खूप पुढेपर्यंत गेली असावी. मात्र कालौघात ही गुहा माती, दगडधोंडे व गाळाने पूर्णपणे भरून गेली आहे. पुरातत्त्व खात्याकडून अशा ऐतिहासिक व पुरातन अवशेषांची योग्य दखल घेतली गेली आणि या ठिकाणी आवश्यक खोदकाम व साफसफाई झाली तर या गुहेमध्ये गडप झालेल्या अनेक पुरातन संदर्भांचा अभ्यास व संशोधन करणे शक्य होणार आहे.
टाळसुरे या गावातून इतिहासप्रसिद्ध (historical konkan) कोडजाई नदी आजही वाहते. ही नदी अतिप्राचीन व पुरातन आहे. आजही दापोली शहरास याच नदीच्या पाण्याचा मुख्य आधार आहे. याच कोडजाई नदीच्या प्रदेशात पुरातन नागरी संस्कृती अतिशय समृद्ध स्वरुपात अस्तित्वात होती असा अंदाज आहे. या कोडजाई नदीच्या प्रदेशात सापडलेली लेणी, गुहा, पाण्याचे दगडी पाट, वाघबीळे पाहिली की या अंदाजास वास्तविक पुष्टी मिळते.
पांडव त्यांच्या वनवासाच्या काळात याच कोडजाई नदीच्या प्रदेशात सर्वाधिक काळपर्यंत वस्ती करून होते असे उल्लेख सापडले आहेत. याच उल्लेखांवरुन असे दिसते की, त्याच काळात या प्रदेशात अशी नागरी संस्कृती विकसित झाली असावी. येथील बोरघर परिसरात अशाच प्रकारचे छोटे पांडव मंदिर आढळून येतात तर वयस्कर ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार येथे पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या कातळ शिल्पा बद्दल अधिक अभ्यास व संशोधन करणे शक्य होईल.
टाळसुरे येथील कातळात अशी अर्धवट खोदकाम केलेली अपूर्ण अवस्थेत दिसणारी लेणी सापडली आहेत. यांपैकी अनेक लेणी मातीने भरून गेल्याने लेण्यांपर्यंत पोचता येत नाही. येथीलच एका लेण्यामध्ये साफसफाई करताना एक किंचित भग्नावस्थेतील पण खूप रेखीव दगडी मुर्ती आढळून येते. चार भूजा असलेल्या या मूर्तीच्या भुजांमध्ये तलवार व ढाल यांसारखी शस्त्रे आहेत. येथून काही अंतरावर अशाच प्रकारची भग्नावस्थेतील लेणी आढळली आहेत. या लेण्यांपर्यंत पोहचता यावे यासाठी अधिक व आवश्यक खोदकामाची गरज आहे.

या लेण्यांचा आतील भाग मोकळा झाल्यास या लेण्यांध्ये तत्कालीन नागरी संस्कृती अधोरेखित करणारे अनेक संदर्भ आढळतील. आपटी परिसरातील वाघबीळ परिसरात अशीच लेणी आढळली आहेत. येथे वाघबीळ या नावाने परिचित असलेली एक लांबलचक गुहा आहे. पुर्वीच्या काळात वाघासारख्या हिंस्र प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी कातळात व जंगलात अशी वाघबीळे खोदलेली असत. संकटकाळात गुप्त व सुरक्षित मार्ग म्हणूनही अशा बाघबीळांचा वापर होत असे. आपटी येथील अशा प्रकारच्या वाघबीळवजा गुहेत साधारण १५-२० फुटापर्यंत सहज वावर करता येतो. मात्र, हे वाघबीळ मातीने भरलेले असल्याने या गुहेत जास्त दूरपर्यंत जाणे शक्य होत नाही.
येथून जवळच असलेल्या भोमेश्वर मंदिर परिसरातही अशाच प्रकारचे पुरातन संदर्भ व भग्नावशेष आढळले आहेत. या परिसरात भग्नावस्थेतील अनेक दगडी मूर्त्या, ऐतिहासिक ठेवीं बाबतच्या अनास्थेमुळे अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. या सर्व मुर्त्या आज भग्नावस्थेत असल्या तरी त्यांची घडणावळ पाहता पुरातन काळात या प्रदेशात अतिशय समृद्ध नागरी वस्ती व मंदिरे असावीत याची खात्री पटते. सिंधुसंस्कृतीसारखी नागरी संस्कृती टाळसुरे परिसरात आढळलेली ही सर्व लेणी कोडजाई नदीच्या प्रदेशात आहेत. टाळसुरे येथील लेणी व भग्नावशेष, दगडी कालवे, पुढे पन्हाळेकाझी येथील लेणी यांमध्ये खूप साधर्म्य आहे. लेण्यांची रचना, प्रवेशद्वार, प्रवेशद्वारावरील दगडी कोरीवकाम, लेण्यांमधील खोल्यांची रचना, दिवाणखाने, दगडी मूर्त्या, शयनगृहे दाभोळ येथील चंडीका मंदिरातील अंतर्गत गृहरचना, भुयारे यांमध्ये खुपच साधर्म्य आहे.
शासनाच्या पुरातत्त्व खात्याने टाळसुरे, आपटी, बोरघर परिसरात आढळलेल्या अशा ऐतिहासिक पुरातन भग्नावस्थेतील गुहा, लेणी, कालवे व वाघबीळांचे अधिक संशोधन करुन या भग्नावस्थेतील लेण्यांना पुन्हा एकदा अजेडात आणणे गरजेचे आहेत.
सुवर्णदुर्ग
कोकणच्या ७२० कि.मी.लांबीच्या किनारपट्टीवर महाराष्ट्राचे वैभव म्हणून अनेक जलदुर्ग उभे आहेत. त्या जलदुर्गांपैकी एक प्रमुख जलदुर्ग म्हणजे हर्णैचा ”सुवर्णदुर्ग”. या किल्ल्याचा इतिहास थेट शिलाहारांपासून सुरु होतो, असे म्हटले जाते. परंतु या म्हणण्याला पुष्टी देणारे निश्चित असे पुरावे उपलब्ध नाहीत. ज्ञात माहितीनुसार हा किल्ला सोळाव्या शतकात आदिलशाही राजवटीत बांधला गेला असावा, असा अंदाज वर्तविला जातो. १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्या अली आदिलशहाचा पराभव करून हा किल्ला स्वराज्यास जोडला, तेव्हा या किल्ल्याची फेरबांधणी केली व किल्ला अतिशय बळकट बनवला.
हा किल्ला साधारणतः आठ एकर जागेत पसरलेला आहे. समुद्रसपाटीच्या पातळीवर अगदी सपाट अशा खडकावर मधल्या उंचवट्याचा खडक तासून, त्याच्या माथ्यावर दगडी चिरे बसवून हा किल्ला बांधलेला आहे. अखंड तटबंदी बांधलेल्या या किल्ल्यास खूप बुरुज व फक्त दोन दरवाजे आहेत. मुख्य दरवाजा पूर्व दिशेस आहे; परंतु पूर्व दिशेस असला तरी तो उत्तराभिमुख आहे. या दरवाजाचे दर्शन किल्ल्याच्या अगदी जवळ गेल्याशिवाय होत नाही. दरवाज्याकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्या जिथे सुरू होतात तिथे वाळूची पुळण आहे. या पुळणमध्ये मोडून पडलेल्या जुन्या तोफा आहेत. द्वाराच्या उजव्या तटावर डोक्यावर शेपटी घेतलेल्या युद्ध मारुतीची प्रतिमा कोरलेली आहे. उंबऱ्याच्या अलीकडच्या पायरीवर कासव कोरलेले आणि दारावर गोमुख आहे. दरवाजाच्या आतील बाजूस दोन्ही बाजूला रक्षक खोल्या आहेत. डाव्या बाजूच्या तटाजवळ विहीर आहे. तेथून पुढे आल्यावर वाड्याचे अवशेष व दोन कोठारे आहेत.
किल्ल्यावर झाडेझुडपे व गवत फार वाढलेले असल्यामुळे किल्ल्याचे बरेचसे अवशेष झाकून गेले आहेत. किल्ल्याच्या नैऋत्य बाजूस अरुंद होत गेलेला एक भाग आहे. तेथून कनकदुर्ग अतिशय उत्तम दिसतो. कनकदुर्ग,फत्तेगड व गोवा किल्ला हे तीन किल्ले सुवर्णदुर्गाच्या रक्षणार्थ बांधले गेलेले. पश्चिमेस गडाचा दुसरा दरवाजा आहे. खरंतर तो वायव्य दिशेस आहे. हा गडाचा चोर दरवाजा आहे. तेथे उतरण्यासाठी तटामध्ये उत्तम अशा पायर्या बांधलेल्या आहेत. गडाच्या काही बुरुजांमध्ये व बुरुजालगत खोल्यांचे बांधकाम दिसते. बहुदा ती शस्त्रागृहे किंवा धान्य कोठारे असावीत. याशिवाय पडके चौधरे, पाण्याचे हौद व इतर काही अवशेष आढळतात. मात्र मंदिर किंवा मंदिराचे अवशेष किल्ल्यावर आढळत नाहीत. या मागचा संदर्भ इतिहासात शोधल्यावर असे समोर येते की, सरखेल कान्होजी आंग्रे यांची कुलदेवता कालंबिका देवी सुवर्णदुर्गवरून हलवून अलिबागच्या हिराकोट मध्ये प्रस्थापित केली होती.
सुवर्णदुर्गाचा इतिहास पाहिल्यास त्यातील मोठा काळ आंग्रे घराण्याशी जोडलेला आहे, असे दिसून येते. सरखेल कान्होजी आंग्रेंचे आजोबा सेखोजी आंग्रे यांनी सुवर्णदुर्गाची तटबंदी बांधण्याचे काम केले, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांत आढळतो. कान्होजी आंग्रेंचे वडील तुकोजी आंग्रे शिवरायांच्या काळात सुवर्णदुर्ग किल्ल्यात सरनोबत म्हणजे उपसेनापती होते. कान्होजींचा जन्म सुवर्णदुर्ग किल्ल्यावर झाला. सागरी युद्धकलेचे व युद्धनीतीचे धडे त्यांनी सुवर्णदुर्गाच्या परिसरातच गिरवले. १६८८ साली मोगल सरदार सिद्दी कासीमने सुवर्णदुर्गास वेढा घातला होता. सुवर्णदुर्गाचा किल्लेदार अचलोजी मोहिते किल्ल्यावरची रसद व दारूगोळा संपत आल्यामुळे मोगलांना फितूर झाला. किल्लेदार पैसे घेऊन सुवर्णदुर्ग सिद्धयाच्या ताब्यात देणार अशी हमखास खबर बाळाजी विश्वनाथांना लागली. त्यांनी ती कोळ्यांच्या मार्फत कान्होजींना कळवली. त्यावेळेस कान्होजी अवघे वीस-बावीस वर्षांचे होते. त्यांनी त्याच रात्री गडावरील सहकाऱ्यांना एकत्र केले व अचलोजी मोहितेला कैदेत टाकले, इतर फितुरांनाही वेचून मारले आणि किल्ल्याबाहेर पडून सरळ मोगलांवर हल्ला चढवला. परंतु हल्ला फसला व ते आणि त्यांचे सहकारी मोगलांच्या कैदेत पडले. मोगलांच्या कैदेतून शिताफिने निसटून ते पुन्हा सुवर्णदुर्गावर आले. गड पुन्हा बऱ्याच कालावधीपर्यंत त्यांनी झुंजत ठेवला.
अखेर मराठ्यांचा हा चिवटपणा पाहून सिद्याने वेढा उचलला. या घटनेमुळे त्यावेळचे मराठे राजे राजाराम महाराज यांनी कान्होजींना “ सरखेल” पदवी देऊन आरमाराअधिपती केले. पुढे त्यांच्या मृत्युपर्यंत म्हणजे १७२९ पर्यंत किल्ला कान्होजींच्याच ताब्यात होता.(अर्थात मराठा राजांच्यावतीने कान्होजी ही जबाबदारी सांभाळीत होते. शिवाजी महाराजांनानंतर राजाराम महारांजाकडे इ.स.१७०० पर्यंत व नंतर ताराराणीकडे 1714 पर्यंत सुवर्णदुर्ग होता. कान्होजींनी ताराराणीचा पक्ष सोडल्यामुळे १७१४ पासून तो शाहू महाराजांकडे गेला.) कान्होजींच्या मृत्यूपश्चात त्यांचा मुलगा “ संभाजी आंग्रे” यांनी गड सांभाळला. संभाजींच्या पश्चात त्यांचा सावत्र भाऊ “ तुळाजी आंग्रे” यांनी सुवर्णदुर्गाचा ताबा घेतला. तुळाजी आंग्रे हे पराक्रमी व स्वतंत्र वृत्तीचे होते. छत्रपतींच्या वतीने राज्य कारभार पाहणाऱ्या पेशव्यांनाही ते जुमेनासे झाले. त्यांचा वाढता प्रभाव दडपून टाकण्यासाठी पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने सुवर्णदुर्गावर हल्ला करायचे ठरवले. २२ मार्च १७५५ रोजी पेशवे – इंग्रज तहानुसार तुळाजींवर स्वारी करण्यासाठी प्रोटेक्टर जहाजावरच्या ४४ तोफा,१६ तोफांचे दुसरे जहाज, दोन युद्धनौका, चौलच्या खाडीशी ७ गुराब, ६० गलबत आणि दहा हजारांच नौदल घेऊन बाहेर पडले. पहिला मुक्काम कुंभाऱ्याला आणि दुसरा मुक्काम सुवर्णदुर्गाच्या उत्तरेला २०-२२ की.मी. वर पडला. तिथून रामाजीपंत हे मराठा सरदार जमिनीवरून सुवर्णदुर्गाच्या दिशेने सरकू लागले.
सुवर्णदुर्गाच्या आश्रयानं हर्णैच्या बंदरात नांगरून ठेवलेल्या तुळाजींच्या आरमारावर कमोडर जेम्सने हल्ला चढवला’( कमोडर जेम्स म्हणजेच ब्रिटिश कमांडर विल्यम जेम्स. हा इंग्रजी सैन्याचा प्रमुख होता.) पण ही बातमी आंग्रेंना आधीच कळल्याने त्यांचे आरमार दक्षिणेस पळाले. आंगऱ्यांच्या आरमारामागे “प्रोटेक्टर” नेच काय तो पाठलाग केला; पण शेवटी तोही परत आला. पण लगेचच सुवर्णदुर्गावर हल्ला करायचे इंग्रजांनी ठरवले आणि तोफांद्वारे किल्ल्यावर अग्निगोलकांचा मारा सुरू केला. पश्चिमेकडून मारा अचूक ठरेना, तेव्हा ईशान्येकडून हल्ला चढविला. तिथला बुरुज ढासळला. पडलेल्या खिंडारातून आज घुसलेल्या अग्निगोलकांमुळे किल्ल्यावरच्या झोपड्या, कोठारांनी पेट घेतला. त्याच वेळेस प्रोटेक्टर जहाजावरून गोवा किल्ल्यावर चढवलेला तोफगोळ्यांचाही हल्ला यशस्वी ठरला. गोवा किल्ला ताब्यात आल्यामुळे तोफांच्या छत्राखाली काही सैनिक सुवर्णदुर्गाच्या खालच्या सपाट कातळावर उतरवणेही जमून गेले.
तिथे उतरलेल्या सैनिकांनी अक्षरशः कुऱ्हाडी घालून सुवर्णदुर्गाचा दरवाजा फोडला. ६ एप्रिल १७५५ रोजी फत्तेगड, कनकदुर्ग किल्लाही पेशव्यांच्या फौजेने जिंकला. यशस्वी झालेला कमोडर जेम्स ८ एप्रिल रोजी बाणकोटकडे मार्गस्थ झाला. ११ एप्रिल रोजी ब्रिटिशांनी तहानुसार इंग्रजांनी किल्ला पेशव्यांकडे सोपविला. ब्रिटिश संमतीने रामजी महादेव यांस सुवर्णदुर्गाचे अधिकारी म्हणून नेमण्यात आले. पण लढाई जिंकण्याचे श्रेय ब्रिटिश कमांडर जेम्सला जाते. ब्रिटिश राजवटीच्या दृष्टीने या विजयाचे भविष्यात फार चांगले परिणाम झाले. रामजी महादेव यांच्या मृत्यूनंतर हरिपंत फडके सुवर्णदुर्गाचा किल्लेदार होते.
कनकदुर्गाची माहिती – https://talukadapoli.com/places/kanakdurg-harnai/
गोवा किल्ल्याबद्दल माहिती – https://talukadapoli.com/places/goa-fort-harnai/
पुढे १८०२ साली यशवंतराव होळकरांच्या भयाने दुसरा बाजीराव कुटुंबकबिल्यासहीत पुण्याहून सुवर्णदुर्गाच्या आश्रयाला आला आणि काही दिवसांनी कुटुंब सोडून एकटाच वसईला इंग्रजांच्या आश्रयाला निघून गेला. १८०४ साली एक मराठा सरदाराने कब्जात आणलेला सुवर्णदुर्ग इंग्रजांनी परत जिंकून पेशव्यांच्या स्वाधीन केला. त्यावेळी ८०० अरब व मुसलमानांची शिबंदी मराठा सरदाराच्या हाताखाली होती.
नोव्हेंबर १८१८ मध्ये कर्नल केनेडी सुवर्णदुर्ग घेण्यासाठी आला होता. त्यावेळेस कॅप्टन कॅम्बेल व लेफ्टनंट डॉमिनिसेटी यांनी अवघ्या ५० शिपाई व ३० खलाशांसह या किल्ल्यावर हल्ला चढवला. तोफांच्या भडीमाराला तोंड देऊन ही मंडळी शिड्या लावून तटावर चढली व त्यांनी शिबंदीकडून किल्ल्याचा ताबा घेतला. सन १८१८ पासून स्वातंत्र्यापर्यंत किल्ला ब्रिटिशांच्याच ताब्यात होता.
सुवर्णदुर्ग जिंकल्यानंतर कमोडर जेम्सने त्याच्याबरोबरचे सर्व सैन्य कलकत्त्याला कर्नल रॉबर्ट क्लाइव्ह यांच्याकडे पाठविले. त्यावेळेस क्लाइव्ह प्लासीच्या लढाईची तयारी करत होता. प्लासीची लढाई कलकत्त्यापासून सुमारे १५० कि.मी दूर भागीरथी नदीच्या तीरावरील “ पलाशी” या ठिकाणी झाली. पलाशी त्यावेळी बंगालचा नवाब सिराजउद्दौला याची राजधानी होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजउद्दौला यांच्यात पलाशी येथे घमासान लढाई झाली. सिराजउद्दौलाला फ्रेंचांनी मदत केली. परंतु रॉबर्ट क्लाइव्हच्या धूर्त चालीने ही लढाई इंग्रजांनी जिंकली. लढाई जिंकण्याची तारीख होती २३ जून १७५७. इंग्रजांनी भारतात जिंकलेली ही पहिली मोठी लढाई होती. त्यामुळे पूर्ण बंगाल प्रांत ब्रिटिशांच्या ताब्यात आला. या क्षणापासून ब्रिटिशांनी भारतात अधिकृतरित्या राज्य सुरू केले.
१७२० साली अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या जेम्स या युवकाने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी घर सोडले आणि समुद्राच्या आश्रयाला गेला. तेथेच तो नाविक दलात सामील झाला. वयाच्या १८ व्या वर्षी जेम्स एक जहाज घेऊन इंग्लंडला जात असताना सागरी मोहिमेत स्पॅनिश लोकांनी त्याला पकडले आणि शिक्षा म्हणून पुन्हा समुद्रात सोडले. त्यानंतर जेम्सने १७४७ साली ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी धरली. त्याला व्यापारी जहाजांच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली होती. त्याकाळी समुद्रात असणारे चाचे या मालवाहू बोटींची लूट करीत असत. या चाच्यांना रोखण्याचे प्रयत्न अनेकांनी करून पाहिले; पण त्यात कोणीच यशस्वी झाले नव्हते. हीच महत्त्वाची जबाबदारी जेम्सने स्वीकारली आणि त्याने बॉम्बे प्लीट नावाची तुकडी भारताच्या किनारपट्टीवर उभी केली.
त्यामध्ये तब्बल ४४ तोफा असलेले ‘प्रोटेक्टर’ नावाचे जहाज सोबत घेतले व समुद्री चाच्यांचा पाडाव करायला जेम्स सज्ज झाला. या चाच्यांमध्ये कोकण किनारपट्टीवर तुळाजी आंग्रे यांच्या एका तुकडीचा समावेश होता. हर्णैजवळ असणाऱ्या सुवर्णदुर्गाच्या आश्रयाने मराठ्यांची ही तुकडी ईस्ट इंडिया कंपनीच्या मालवाहू जहाजांना लक्ष करून लूट करत असे. या गोष्टीचा बीमोड करण्यासाठी जेम्सने थेट सुवर्णदुर्ग किल्ल्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला व आपले नाविक दल, तोफखाना यांचा पुरेपूर वापर करत १७५५ साली जेम्सने सुवर्णदुर्ग ताब्यात घेतला.
सुवर्णदुर्गाच्या विजयामुळे त्याला भरपूर मानसन्मान आणि संपत्ती मिळाली. सन १७५९ मध्ये जेम्स इंग्लंडला परतला. तेव्हा तो आपली पत्नी अँन गोगार्ड आणि दोन मुलांसह सोहा परागण्यातल्या गेराड स्ट्रीटवर राहत असे. तो ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळात सामील झाला. कॉर्नवॉलमधून ब्रिटिश संसदेवरही निवडून आला. १७७८ साली ब्रिटीश सरकारची सर ही बहुमानाची पदवी त्याला प्राप्त झाली. पण लंडनमधील वास्तव्यात जेम्स सुवर्णदुर्गाला मात्र विसरला नाही. त्याला या किल्ल्यात राहायचे होते. त्याचे हे स्वप्न अधूरे राहिले कारण १७८३ मध्ये जेम्सचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
पण आपल्या पतीची स्मृती जतन करण्यासाठी व सुवर्णदुर्गाची आठवण कायमस्वरुपी रहावी यासाठी जेम्सच्या पत्नीने लंडन शहराच्या अग्नेय दिशेला असलेल्या शुटर्स हिलवर सुवर्णदुर्गाची प्रतिकृती असलेल्या एका इमारतीचे बांधकाम करून घेतले. २ एप्रिल १७८४ सदर बांधकामाला सुरुवात झाली. सुवर्णदुर्ग किल्ल्याचा ज्याप्रकारे त्रिकोणी आकार, तब्बल ६३ फुट उंचीची तटबंदी व बांधकाम आहे तसेच बांधकाम करण्यात आले; पण गॉर्थिक शैलीमध्ये. आणि या इमारतीला सुवर्णदुर्गाच्या आठवणींसाठी सेव्हर्नद्रुग कॅसल असे नावही देण्यात आले. २०१६ मध्ये सेव्हर्नद्रुग कॅसलने इंग्लंडमधील वारसाहक्क श्रेणीत मिळवल्या जाणाऱ्या अतिमहत्त्वाच्या २१ इमारतींमध्ये स्थान मिळवले आहे.
संदर्भ :
परिचित अपरिचित दापोली – प्रा.डॉ.विजय अनंत तोरो
दै,रत्नागिरी टाइम्स (बुधवार दि.१७ फेब्रुवारी २०१६)
जलदुर्गांच्या सहवासात – प्र.के.घाणेकर
दुर्गकथा – निनाद बेडेकर
milindjamdar.blogspot.com/p/blog-page_18.html?m=1
पालगड किल्ला – दापोली
दापोली तालुक्यातील ‘पालगड’ हे ‘परमपूज्य साने गुरुजी’ यांचे गाव. या गावाच्या पूर्वेला, दापोली-खेड तालुक्याच्या सीमारेषेवर, सह्याद्रीच्या कुशीत, समुद्रसपाटीपासून साधारण १२००-१५०० मीटर उंचावर असलेला एक छोटेखानी किल्ला आहे. तो म्हणजे ‘पालगड किल्ला.’

ह्या किल्ल्याची प्रथम पायाभरणी कोणाच्या काळात झाली, याबद्दल निश्चित असा ऐतिहासिक पुरावा नाही. पण शिवकाळात हा किल्ला स्वराज्याशी जोडलेला होता, अशी शाश्वत माहिती मिळते. शिवाजी महाराजांनी समुद्री आरमार उभारताना हर्णे येथील सुवर्णदुर्गाची पुनर्बांधणी केली, तेव्हा किल्ल्याच्या बांधणीसाठी व रसद पुरवण्यासाठी पालगड आणि मंडणगड किल्ल्याचा उपयोग केला असावा, असा अंदाज वर्तविला जातो. (हर्णे ते पालगड अंतर सरळ रस्त्याने जाता सुमारे ४०- ४५ कि.मी. तर आडमार्गे जाता ३०- ३५ कि.मी. आहे.) मंडणगड किल्ल्याचे गडकरी ‘दळवी’ (पालवणीचे) हे किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार होते. त्यांनी आपल्या मुलींची लग्ने ‘बेलोसे व पवार’ कुटुंबात करून त्यांच्याशी सोयरीक जोडली आणि किल्ल्याची व्यवस्था ‘बेलोसे व पवार’ यांजवळ दिली. किल्ल्याचा वापर रसद, शस्त्रसाठा आणि दारूगोळा साठविण्यासाठी होत असावा. कारण किल्ला अतिशय लहान म्हणजे एक ते दीड एकरमध्ये आहे. किल्ल्यावर लढाईच्या फारश्या खाणाखुणा नाहीत. किल्ल्यावर पाच तोफा आढळल्या, त्यातील २ किल्ल्यावर आणि २ किल्ले माचीत आहेत. (माची म्हणजे किल्ल्याभोवतालची जमीन, शत्रूला थोपविण्याची जागा. माची सर झाल्यास शत्रूला किल्ला आरामात ताब्यात घेता येतो.) पालगड किल्ल्याला चार माची आहेत: जांभूळ माची, पवार माची, राणे माची आणि किल्ले माची. या किल्ल्याच्या चारही बाजूला मोक्याच्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत. यातील किल्ले माची फक्त खेडच्या बाजूस आहे. इतर तीन दापोलीच्या दिशेने. किल्ल्याकडे जाणारा सोयीचा मार्ग किल्ले माची व राणे माचीतून आहे. किल्ल्यावरील एक तोफ श्री. क्षेत्र परशुराम, चिपळूण येथे आहे, असे सांगण्यात येते. किल्ल्याच्या पायथ्याला जुनी बाजारपेठ आहे. त्यात बारा बलुतेदारांची वस्ती आहे. किल्ल्याखाली हिरवी गर्द देवराई आहे. या देवराईत पालगडची देवी ‘श्री. झोलाई’ हिचे मंदिर आहे.


मंदिराकडून जी किल्ल्याकडे पायवाट जाते, ती अतिशय उंच, निमुळती आणि दोहो बाजूस जंगल व खोल दरी अशाप्रकारची आहे. वर किल्ल्यावर जाण्यासाठी दोनशेच्या आसपास पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर समोर दोन बुरुज दिसतात. बुरुजाच्या मधून केवळ दोन माणसे प्रवेश करू शकतील एवढा निमुळता दरवाजा आहे. साधारण ८ फूट उंच व ३ फूट रुंद असा दरवाजा दगडी बांधकामात आहे. किल्ल्याला हे एकच प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार उत्तर दिशेस आहे. किल्ल्याची तटबंदी नैसर्गिक डोंगरकडा कापून तयार झाली आहे. नैसर्गिक कड्याच्या वर सुमारे १०-१५ मीटर उंचीची भिंत उभारून तटबंदी तयार केली आहे. ही तटबंदी आज बऱ्याच ठिकाणी तुटलेली आहे. त्यात किल्ल्याची भिंत काही ठिकाणी निसर्गत: डोंगरकडा सरळसोट कापून तयार केलेली असल्यामुळे त्यावर तटबंदी भिंत उभारण्याची गरज भासली नसावी. किल्ल्याच्या आतील सर्वच इमारती आज कोसळलेल्या आहेत. त्यांच्या पायाचा भागच जुन्या खुणा म्हणून शिल्लक आहे. किल्ल्याच्या मागील बाजूस दगड खोदून बांधलेल्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. किल्ल्यावर एकही विहीर नाही. एक भूयारी वाट आहे. ती सध्या भुजलेली असून मंडणगड किल्ल्याकडे जाते, असे म्हटले जाते. नैसर्गिक तटबंदीमुळे किल्ला अतिशय मजबूत आणि सुरक्षित असल्याचे आढळून येते. सरळसोट कापलेला डोंगरकडा शत्रूला चढून वर येण्यास अगदीच अशक्य असल्याचे दिसते. किल्ल्याच्या सुरक्षिततेचा विचार किल्ला बांधतानाच केलेला दिसतो. दोन डोंगरांच्या मधल्या छोट्या डोंगरावर किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. मुख्य किल्ला दुरून दिसत नाही. (खेड व दापोली दोन्ही बाजूने) किल्ल्याच्या एका बाजूला टकमक टोकासारखा डोंगर आहे तर दुसऱ्या बाजूला आयताकार डोंगर आहे. किल्ल्याचा डोंगराचा आकार पालीसारखा म्हणून किल्ल्याला ‘पालगड’ हे नाव देण्यात आले. (पूर्वी पालील किंवा पालगडात जाताना ‘पालनात जातो’ असे म्हटले जायचे.) एक आख्यायिका अशी की, किल्ल्याचे बांधकाम प्रथम मधल्या डोंगरावर न होता आयताकार डोंगरावर होणार होते, ज्याला रामगड म्हणतात. पण डोंगरावर खोदकाम करताना काचा आढळल्या आणि त्यावेळच्या समजुतीनुसार आपण शत्रूपासून भविष्यात कच खाऊ या भावनेला अनुसरून किल्ला बांधण्याची जागा बदलण्यात आली. हा किल्ला खेडचा रसाळगड व मंडणगड किल्ला या दोहोंमधील थांबा किंवा मुख्य किल्ल्यांना रसद, दारूगोळा, तोफखाना व टेहळणीसाठी बांधण्यात आला असावा, असे वाटते. किल्ल्याचा मध्ययुगीन ते ब्रिटीश कालखंडापर्यंतचा पूर्ण इतिहास आढळत नाही. अतिशय त्रोटक असे काही उल्लेख आढळतात. त्यात पहिला बाजीराव आणि जंजिऱ्याचा सिद्धी यांच्यात या किल्ल्यावर लढाई झाली होती, असा एक उल्लेख सापडतो.
संदर्भ
- रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले – श्री. रघुनाथ रामकृष्णाजी बोरकर
- गणेश मुंगशे – शिक्षक जि.प.शाळा, पालगड
Read more at: https://talukadapoli.com/places/panhale-kazi-caves-research/
कनकदुर्ग, हर्णे
दापोलीतील हर्णे येथील ‘सुवर्णदुर्ग’ या जलदुर्गाचे सहाय्यक दुर्ग म्हणून कनकदुर्ग, फत्तेगड व गोवा किल्ला, असे तीन उपदुर्ग आहेत. त्यातील हर्णे बंदराला लागूनच असलेला किल्ला म्हणजे कनकदुर्ग. हा किल्ला तीनही बाजूने समुद्राने वेढलेला आहे. याचे क्षेत्रफळ साधारणत: पाव हेक्टर आहे. किल्लाचा आकार लाबंट आणि किल्लावर जाण्यास पायऱ्या आहेत. त्या जेथे संपतात तेथे उजव्या हातास खालच्या सपाटीवर पाण्याची टाकी दिसते. किल्लाच्या आत उंच जागी दक्षिण दिशेस दिपग्रह आहे. तेथेच हवामान खात्याचे कार्यालय आहे. किल्लाच्या आत एक बाजूस सलग नऊ छोटे छोटे पाण्याचे हौद दिसतात. किल्लाच्या पश्चिम व दक्षिण बाजूस समुद्रसपाटीच्या पातळीवर खडक दिसतो. या खडकावर समुद्राच्या लाटा जोरजोराने आदळत असतात. सायंकाळच्या वेळेस अनेक पर्यटक व ग्रामस्थ या किल्ल्यावर येतात. किल्ल्यावरून सुवर्णदुर्गाचे आणि समुद्राचे अगदी नयनरम्य सुंदर असे दर्शन होते. हर्णे बंदरातील कोळ्यांच्या होड्या, बंदरावरचा मासळी बाजार अगदी उत्तम प्रकारे येथून पाहता येतो. त्यामुळे हर्णे बंदरावर आलेला पर्यटक कनकदुर्गावर गेल्याशिवाय राहत नाही.
गोवा किल्ला, हर्णे
दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ 3 किल्ल्यांचा समूह आहे. कनकदुर्ग, फत्तेगड व गोवा किल्ला. हे किल्ले नेमके कोणी बांधले व केव्हा बांधले याची माहिती उपलब्ध नाही; पण हे किल्ले हर्णे समुद्रातील ‘सुवर्णदुर्ग’ किल्ल्याच्या रक्षणार्थ बांधले गेलेले, हे खात्रीशीर रित्या सांगितले जाते. त्यातील गोवा किल्ला हा सुमारे सव्वातीन हेक्टर जागेत पसरलेला आहे. हर्णे बंदराकडे जाताना रस्त्याला लागूनच किल्ल्याचे एक प्रवेशद्वार आहे; परंतु ते मुख्य प्रवेशद्वार नाही. मुख्य प्रवेश द्वार मागल्या बाजूने समुद्राकडे आहे. त्या समुद्राभिमुख दरवाजाच्या दोन्ही बाजूस आणि चौथऱ्याच्या तळाशी काही वैशिष्ट्यपूर्ण शिल्प कोरलेली आहेत. महाद्वाराच्या आतील बाजूस देवड्या आणि तटबंदी आहे. या तटबंदीवर जाण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या बांधलेल्या आहेत. किल्ल्याचा पश्चिम आणि उत्तर भाग समुद्राने वेढलेला आहे.
दक्षिणेकडच्या भागात किल्ल्याला नैसर्गिक उंचवटा आहे. या उंचवटाच्या भागावर काही मोडकळीस आलेल्या इमारतीचे अवशेष आढळतात. खालच्या भागात मोठा पाण्याचा हौद व युरोपियन मांडणीची इमारत आहे. सध्या किल्ल्याच्या तटबंदीची थोडीशी पडझड झालेली आढळते; परंतु १८६२ च्या पाहणीत हा किल्ला व्यवस्थित होता व किल्ल्यावर जुन्या ६९ तोफा होत्या आणि त्या तोफांची संरक्षणव्यवस्था पाण्यासाठी 19 शिपाई होते, अशी नोंद मिळते. या किल्ल्यावरून सुवर्णदुर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. या किल्ल्यावरून सूर्योदय व सूर्यास्त पाहणे हा तर एक नयनरम्य विलक्षण अनुभव असतो.















No comments:
Post a Comment