मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण हे महत्त्वाचे ठिकाण आहे. चिपळूण शहराचा इतिहास किमान दोन हजार वर्षे जुना आहे. त्याचा पुरावा सांगणारी बौद्धलेणी (दगोबा), शहरानजीक कोल्हेखाजण परिसरात बायपास गुहागर हायवेवर पाहाता येतात. इ.स. ७४१-४२ दरम्यानच्या पश्चिमी चालुक्य नृपती विक्रमादित्य याच्या ताम्रपटावर चिपळूणचा उल्लेख 'चिप्ररुलन' असा आहे. शिलाहार नृपति मल्लिकार्जुन याच्या इ.स. ११५१ च्या ताम्रपटात'चित्पुलुण' असा या शहराचा उल्लेख आहे. शहराची स्थापना श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला सायंकाळी झाली आहे. चिपळूण येथे सुरुवातीला सातवाहन, कदंब, क्षत्रप, कलचुरिस व राष्ट्रकूट यांनी राज्य केले. त्यानंतर दिल्ली सल्तनत, आदिलशहा, मराठा यांचे येथे वर्चस्व होते.शहराच्या चारही बाजूंना डोंगर, पूर्वेस सह्याद्री, शहरामधून वाहणारी शिवनदी आणि वाशिष्ठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतिहास समजून घेण्याची आवड असलेल्या पर्यटकांनी इथला 'दळवटणे'परिसर पाहायला हवा. शहरात हायवेला लागून पाग नावाचा भाग आहे. तेथे पागा असाव्यात. आदिलशाहीमध्ये मक्केकडून विजापूरला येण्यासाठी जी बंदरे विकसित केली गेली, त्यापैकी गोवळकोट हे चिपळूणला लागून असलेले महत्त्वाचे बंदर होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची छावणी येथे होती. राज्याभिषेकापूर्वी महिनाभर राजांचा मुक्काम येथे होता. ८ एप्रिल १६७४ ला महाराजांनी या भागाची सर्वप्रथम पाहणी केली, ९ मे १६७४ ला महाराजांनी या लष्करी छावणीला उद्देशून 'काटकसर आणि दक्षता' याबाबतचे आज्ञापत्र दिले होते,इतिहासात ते पत्र प्रसिद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तीनदा भेट दिलेली, त्यांच्या स्मृती जोपासणारी 'राजगृह' इमारत शहरात वडनाका-गुरवआळी भागात आहे. तालुक्यात परशुराम आणि वैजी-शिरळला जोडणाऱ्या अशा दोन प्राचीन पाखाड्या आहेत,येथील नेचरट्रेल वेगळा अनुभव ठरावा. गुहागर तालुका व चिपळूण तालुक्यातील ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. निसर्गसंपन्न चिपळूण हे अनेक घाटांनी वेढलेले आहे.
चिपळूणात गौतमेश्वर, वीरेश्वर, गांधारेश्वर, कृष्णेश्वर, रामेश्वर ही पंचलिंगे असून पैकी गौतमेश्वर गाभाऱ्यात शिवपिंडीवर जलाभिषेक केल्यास प्रसिद्ध 'सिंहनाद' याची दुर्मीळ अनुभूती घेता येते. तालुक्यातील मोरवणे या निसर्गरम्य गावातील खालच्या वाडीत असलेल्या पूर्वाभिमुख श्रीहनुमान मंदिरातील प्रताप मारुतीची तळ हातावर सहज मावेल एवढी अंदाजे ३ इंच रुंद, ४ इंच लांब आणि १ इंच जाडीची छोटीशी काळ्या नरम दगडातील लहान मूर्ती ही किमान चारशे वर्षपूर्व समर्थ काळातील असावी. समर्थ काळात एका श्रीरामदास सांप्रदायिक ‘स्वामी’ अवलियाने आपल्या झोळीतून आणून ही प्रताप मारुतीची मूर्ती मोरवणेतील सध्याच्या जागेत आणून ठेवल्याचे सांगितले जाते. एवढ्याश्या छोट्याश्या मूर्तीबाबत स्थानिक आपल्या भावना चार शतके जपतात, हे एक आश्चर्य आहे. वाशिष्ठीची उपनदी असलेल्या तांबी (ताम्रपर्णी) नदीच्या तीरावर गोंधळे गावी पेशवेकालीन श्रीहरिहरेश्वर मंदिर असून मंदिराशेजारी असलेली चाळीस पायऱ्यांची, विशाल आकारमानाची चिरेबंद बांधकामाची विहीर आवर्जून पाहावी अशी आहे. गुढेतील श्रीदेव वामनेश्वर या हेमाडपंथी बांधणीच्या, सातशे वर्ष जुन्या मंदिरातील एक शिंग दुसऱ्यापेक्षा थोडे खाली वाकलेला ‘नंदी’ वैशिष्ट्यपूर्ण आहे. कुंभार्लीतील श्रीदेवी सुकाई-वरदायिनी-महाकाली हे बाराव्या शतकातील देवस्थान आहे. मंदिरातील लाकडी कोरीव पाहाण्यासारखे आहे. किमान ५०० वर्ष जुनी, कल्पकतेने कोरलेली वीरच्या निसर्गरम्य परिसरात ‘श्रीलक्ष्मी मल्लमर्दन’ची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती जमिनीपासून तीन फूट खोल गाभाऱ्यात आहे. मूर्तीच्या तळाला १०८ विष्णू लिंगे कोरलेली आहेत. वीर पासून जवळच संगमेश्वर तालुक्यात शिरंबे गावी चौदाशे वर्षांपूर्वीचे, पाण्याने चारही बाजूंनी वेढलेल्या तळ्यात श्री मल्लिकार्जुन देवस्थान आहे. कोकणात अगदी मोजक्याच ठिकाणी अशी मंदिरे आहेत. विद्येची देवता असलेल्या श्रीशारदादेवीचे संपूर्ण कोकणपट्टीतील एकमेव देवस्थान तुरंबव गावी आहे. बिवली गावी भगवान विष्णूची शाळीग्राम पाषाणात कोरलेली,एकसंघ, सव्वा दोन फूट उंच, ‘श्रीलक्ष्मीकेशव’ स्वरूप प्राचीन मूर्ती आहे. दादरचे संगमरवरी बांधकाम असलेले श्रीरामवरदायिनी मंदिर आणि दाक्षिणात्य,राजस्थानी कलेचा संगम असेलेले टेरवचे श्रीभवानीमाता मंदिर हे आधुनिक वास्तूशिल्पशास्त्राचा अप्रतिम अविष्कार आहे. नंदिवसेतील देवराईत, वैतरणा नदीच्या काठावर असलेले श्रीभैरवाचे प्राचीन देवस्थान नेचरट्रेल साठी अत्यंत उपयुक्त आहे.
चिपळूण बौध्द लेणी इसवी सन पहिल्या शतकात कोरलेली लेणी असून हि व्यापारी मार्गावर असणारी लेणी आहेत.चिपळूणजवळ असलेले खेड हे व्यापारी मार्गावर असलेले ठिकाण होते.या ठिकाणी लेण्या असून त्या हि हीनयान काळातील असून त्या चिपळूण लेण्यांशी साम्य साधणाऱ्या लेण्या आहेत. त्याच काळात चिपळूण लेण्यांची हि निर्मिती झाली असावी. चिपळूण हा प्रांत सातवाहन साम्राज्याचा एक भाग होता.नंतर क्षत्रप, राष्ट्राकृट यांचे साम्राज्य, मग मुघल,मराठे,पेशव्यांचे राज्य आले. सातवाहन काळात या ठिकाणी लेण्या कोरण्यात आल्या असाव्यत. या लेण्यांच्या बरोबरच चिपळूण-कराडमार्गावर कुंभार्ली घाटाच्या अलिकडे कोळकेवाडी इथे डोंगरावर लेण्या आहेत. तसेच अजून काही भागात लेण्या आहेत परंतु त्यांचे अद्याप संशोधन व्हायचे आहे. अपरांत म्हणजे आजचा कोकण आणि अपरांत मध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर झाला होता त्याची हि ऐतिहासिक स्थळे आपणास पाहायला मिळतात.
लेणीकडे जाण्याचा मार्ग :
चिपळूण तालुक्यात असणारी हि लेणी गुहागर बायपासवर बावशेवाडी गावाच्या हद्दीत आहेत. तीन लेण्यांचा हा समूह असून या ठिकाणी बौद्ध भिक्षुंना राहण्याची सोय या ठिकाणी केलेली होती. चिपळूण स्टॅन्ड वरून थेट नवीन गुहागर कडे जाणारा बायपास रोडने जावे पहिल्याच वळणावर डाव्या बाजूला महालक्ष्मी डोंगर आहे किंवा बाजूला बावशेवाडी नामक गाव आहे त्याच्या बाजूला असणाऱ्या या महालक्ष्मी डोंगरात हि लेणी कोरलेली आहेत.
साधारण तीन लेण्यांचा हा समूह आहे.

लेणी क्रमांक १ :-
यामध्ये हि अत्यंत छोटी खोली आहे इथे भिक्षु ना राहण्यासाठी कोरलेली असावी साधारण लहान आहेत इथे एक दगडी बाक आहे झोपण्यासाठी सध्या भग्न अवस्थेत आहे

लेणी क्रमांक २ :-
हे पहिल्या लेण्यापेक्षा मोठे लेणे आहे परंतु इथे असे काही नाही इथे काही तरी खोदकाम करण्याचा प्रयत्न झाला असावा असे वाटते
लेणी क्रमांक ३ :-
हे मुख्य लेणी आहेत यामध्ये एल स्तूप आहे परंतु सध्या हा स्तूप अर्धा नष्ट केलेल्या अवस्थेत असून या वर लोकांनी गणपती व महादेवाची पिंड ठेवली आहे व ते एक पांडव कालीन महादेवाचे मंदिर आहे असे समजून इथे लोक दर्शनास येत असतात.लेण्याच्या वरच्या बाजूस स्तूपाची हार्मिक पाहायला मिळते. इथे असणारा हि स्तूप अर्धवट आहे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष असून इथली लेणी दुर्लक्षित आहेत. बौद्ध धम्माची लेणी असणारी लेणी प्रामुख्याने पांडव लेणी म्हणून ओळखली जातात. बाजूला एक पाण्याचे टाके देखील आहे व तिथे जाण्यासाठी कोरीव पायऱ्या हि आहेत.
या लेण्यांचा कालावधी निश्चित करता येत नाही तरी काही जणांची मते हि इसवी सण २ ते ३ रे असू शकते पण आम्ही मात्र हे लेण्यांचे बांधकाम हे इसवी सणाच्या पूर्वी पहिल्या शतकात असावे असे वाटते कारण महत्वाचे कारण स्तूप दगडाचा स्तूप बांधण्याची कला हि इसवी सनापूर्वी ची आहे आणि अशोकाच्या काळात बौद्ध धम्म कोकणात मोठ्या प्रमाणात होता जवळपास सर्वच कोकणवासीय लोकांचा बौद्ध धम्म हा धर्म बनला होता लोकधर्म झाला होता आणि त्याच काळात लेणी बांधणे यासाठी दान दिले जात असे कोकणात सातवाहन राजांचे हि वर्चस्व होते सातवाहनांच्या काळात स्तूप निर्मिती ला हि वेग होता त्यामुळे कोकणातील हे स्तूप शक्य तो सातवाहन काळातील असण्याची शक्यता आहे कारण कोकणात बहुतांश अवशेष हे इसवी सणाच्या आधीचे पाहायला मिळतात लेणी बांधण्याची काम हि सम्राट अशोकचन्या काळातच कोकणात झालेली आहेत कारण व्यापारी मार्गामुळे व अशोकाच्या धर्म प्रसार या ध्येयामुळे कोकणात लेणी कोरण्याची काम अशोकाच्याच काळात घडलेली आहेत दुसरी गोष्ट काही लेण्यांचा कालावधी निश्चित जरी सांगता आला नाही तरी ती लेणी इसवी सणाच्या पाचव्या शतकाच्या नंतर ची येत नाहीत कारण हा काळापर्यंत कोकणातील व्यापारी मार्ग भरभराटीचा होता सर्व सुविधांनी उपयुक्त होता त्यामुळे इथे असणारी लेणी यांचा कालावधी इसवी सणाच्या पाचव्या शतकानंतर येत नाही इतके नक्की.
संदर्भग्रंथ :-
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) :ABCPR Team ब्लॉग
३) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स


No comments:
Post a Comment