Sunday, December 26, 2021

गंधारपाले लेणी

   रायगड जिल्ह्यातील महाड शहराला सातव्या शतकापासूनचा वैभवसंपन्न इतिहास आहे. सावित्री, गांधारी आणि काळ नदीच्या तीरावर असलेल्या महाड तालुक्यात गांधारी नदीकाठी सातव्या शतकातील गांधारपाले या बौद्धकालीन लेणी आहेत. महाहट्ट म्हणजेच मोठी पेठ या पाली शब्दाचा अपभ्रंश होत पुढे महाड हे नाव झाले अशी महाडची ओळख आहे. मुंबई गोवा मार्गावरील प्राचीन काळापासून एक महत्वाचे व्यापारी ठिकाण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सत्याग्रह केलेल्या चवदार तळ्यामुळे प्रसिद्ध असलेले महाड. महाड परिसरात येताच बाजूच्या सह्याद्रीच्या डोंगररांगात लांबून दिसणारी लेणी आपल्याला खुणावत असते तीच गांधारपाले बौद्ध लेणी.गांधारपाले बौद्ध लेणी इतिहास :महाड मध्ये पाले हे गाव महाड पासून अगदी ३ ते ४ किलोमीटर अंतरावर हि लेणी असून मुंबई गोवा महामार्गावरच आहेत  या लेण्यांना पाले लेणी किंवा गांधारपाले लेणी म्हणतात किंवा महाड बौद्ध लेणी म्हणुन हि म्हटली जातात.लेण्यांचे मुळ नाव पाले लेण्या असे आहे पण डोंगरापलीकडून वाहणार्‍या गांधारी नदीकाठच्या गांधार गावावरुन याला गांधारपाले लेण्या असे नाव पडले.


      ही बौद्ध लेणी असून महाडनजीक रायगड किल्ल्याजवळच दिसतात. मुंबई-गोवा महामार्गाने महाड शहरात जाताना ३ कि.मी. आधी डावीकडील डोंगरात कोरलेली गांधारपाले लेणी आपले लक्ष वेधून घेतात. दक्षिणोत्तर पसरलेल्या टेकडीवर पायथ्यापासून साधारण २०० फुट उंचीवर ही पूर्वाभिमुख लेणी आहे. पायथ्याजवळ पुरातत्व विभागाने फलक लावलेला असुन येथुन अर्ध्या तासात पायऱ्या चढून आपण लेण्यांपर्यत पोहोचतो. पायऱ्या चढून गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला २८ क्रमांकाचे लेणे दिसते. पुरातत्व खात्याने या लेण्यांना १-२८ असे क्रमांक दिले असुन १ क्रमांकाच्या लेण्यापासून सुरवात केल्यास सर्व लेणी व्यवस्थितपणे पहाता येतात. तीन स्तरात कोरलेल्या या लेणी समूहात २८ लेणी असुन त्यात ३ चैत्यगृह,१९ विहार व अनेक पाण्याची टाकी कोरलेली आहेत. अभ्यासकांच्या मते ही लेणी कंभोग वंशातील विष्णू पुलित या राजाने खोदलेली असुन पाले हा पुलित नावाचा अपभ्रंश आहे. लेण्यांसमोरून महाड शहर, चांभारगड, सावित्री नदी, मुंबई-गोवा महामार्ग असा सुंदर देखावा बघावयास मिळतो.
      पहिल्या वरच्या स्तरात वीस आणि दुसर्‍या स्तरात उर्वरित अशी लेणी आहेत. लेणी एकमध्ये भव्य सभागृह आहे. एका शीळेवर प्रलंबपदासन मुद्रेतील बुद्धमूर्ती आहे. सिंहासनावर भगवान बुद्धाच्या पाया जवळ धम्मचक्र व हरिणाची प्रतिमा आहे. ध्यानधारणेसाठी खोल्या व प्रार्थना घरे. पाली भाषेतील शिलालेख, खोल्या, सभागृह, दालन, वाळूच्या घडयाळासारखी नक्षी, चैत्यगृह, ओटे, नक्षीकाम. लहान मोठी प्रवेशद्वारे, भोजनगृह, स्तूप, दगडी पाण्याची टाके, प्रतीमा, दिर्घिका, स्तंभ. अर्धस्तंभ ,खांबावरती असे सुंदर कोरीवकाम या लेण्यांमध्ये पहावयास मिळते. 
   वास्तविक लेणी एखाद्या बळकट राजाश्रयाच्या आधारे कोरली जात कारण लेणी खोदण्यासाठी धनाची अवश्यकता असे.ते धन पुरवण्याचे काम राजसत्ता किंवा व्यापारी करत असत. पाले लेण्यापुरते बोलायचे तर या लेण्यांना नेमक्या कोणत्या बंदराचा आश्रय लाभला हे समजत नाही. हे एक नैसर्गिक बदंर असून जलवाहतुकीस सोयीस्कर अशी जागा होती टॉलमेंनी नुसार इसवी सन १५० च्या काळात पालेला बाली पाटण म्हटले जायचे आणि पेरिप्लस च्या काळात इसवी सन २४७ च्या काळात पालैपट मई म्हटले जायचे वा तसे नाव असावे त्या नंतर पाले चा उल्लेख चौदावा नृपती अनंतदेव इसवी सन १०९४ याच्या   ताम्रपट मध्ये बलीवपन किंवा पालीपट्टण असा उल्लेख आहे  त्यांनतर पाले चा उल्लेख इसवी सन १७७४ ला फोर्बस च्या  नोंदीत सापडतो त्याने आपल्या नोंद वहीत लिहून ठेवले आहे कि चढण्यास कठीण असलेले ठिकाण या ठिकाणी एलिफंटा व साष्टी सारखी विहार चैत्यगृह कोरलेली आहेत हि लेणी चौल व राजपुरी खाडीतील बंदरे व महाड वरध घाट तेर या प्राचीन मार्गावर  आहेत इथे बहुमुल्य अशी ऐतिहासिक २८ ते ३० लेण्यांचा समूह आहे हि लेणी तीन स्थरावर आपल्याला पाहायला मिळतात दुरून पाहिल्यावर हि लेणी तीन मजली इमारती सारखी भासतात  गांधारपाले लेणी गांधारपाले गावाला लागून असलेल्या टेकडीवर आहेत. पायथ्यापासून साधारणपणे ५०-६० मीटर उंचीवर ही लेणी आहेत. लेणी समूहात एकूण २८ लेणी आहेत व त्यात ३ चैत्य आणि १९ विहार आहेत. पुरातत्व विभागाने लावलेल्या फलकाजवळ उतरल्यानंतर लगेच लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण लेण्यांपर्यत पोहोचतो. पायऱ्या चढण्यासाठी २०-२५ मिनीटे लागतात.



कसे जायचे : मुंबईहून मुंबई गोवा मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ ने महाड बस स्थानकाच्या तीन कि. मी. आधी गांधारपाले गाव लागते हे अंतर साधारण १७३ कि. मी. आहे. येथे उतरल्यावर गांधारपाले लेणीचा फलक दिसेल तेथूनच लेण्यापर्यंत जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग दिसेल.

      पुणे येथून यायचे झाल्यास नसरापूर, भोर, बिरवाडी, महाड मार्गे साधारण १३४ कि. मी. अंतरावर आहे. दुसरा मार्ग हा पिरंगुट, मुळशी, माणगाव साधारण १३९ कि. मी. अंतरावर आहे.बहूतांश येथे असलेल्या लेण्या लहान मोठ्‍या आकाराच्या आहेत. त्यातील पाहण्यासारख्या लेणी क्रमांक १, ८, १५, २१ या महत्वाच्या आहेत. लेण्याच्या परिसरातून आजूबाजूचा परिसर अगदी मनमोहक दिसतो. संपूर्ण लेण्या पाहण्यासाठी साधारण एक तास पुरेसा आहे.

18

          सद्ध्या या लेण्यांपर्यंत जाण्यासाठी पायथ्यापासून पायर्‍यांची सोय प्रशासनाने केली असल्यामुळे लेण्यांपर्यंत जाण्याचा मार्ग सुखकर होतो. पायरी मार्गाने वर निघालो कि  पायथ्याशी एक स्तूप घरंगळत खाली आलेला दिसतो किंवा हेतूपुरस्पर काही वर्षांपूर्वी आणला गेला आहे. 
Image
 जाणकारांच्या मते हा स्तूप अनेक दिवस - वर्ष येथेच पडून आहे

या लेणीच्या पायथ्याशी लेणीचे तुटलेले भग्नावशेष सुद्धा तसेच इस्ततत विखुरलेले आपणाला दिसतात. लेणीच्या आत ठिकठिकाणी आपणाला ऑइल पेंटने  पर्यटकांकडून स्वतःची नावे रंगवलेली दिसतात.2000 वर्षापूर्वी ज्या कलाकारांनी, कारागिरांनी ह्या लेणी कोरल्या ज्यांनी दान दिले अश्या उपासकांना जिथे आपली नावे कोरावीशी वाटली नाही तिथे आजची पिढी आपली नावे रंगवून या ऐतिहासिक वारसा स्थळांना हानी पोहचवत आहेत हे पाहून खंत वाटते. ही लेणी तसेच इतरही एतिहासिक वारसा असलेल्या वास्तू तिथे कोणी आपल्या नावचा ठसा उमटवून आपला प्राचीन अमुल्य ठेवा विदृप करु नका अशी कळकळीची एक नम्र विनंती.

जवळील ठिकाणे : रायगड किल्ला, महाडचे चवदार तळे

 

कधी जायचे : कधीही वर्षाचे बारा महिने. शक्यतो पावसाळ्यानंतर उत्तम, कारण पावसाळ्यात पायर्‍या निसरड्‍या होतात त्यामुळे पाय घसरून पडण्याची शक्यता जास्त असते म्हणून.

1

2

3

 लेणे क्र. १:-
    पाले लेणीसमुहातील हे सर्वात मोठे लेणे अजिंठा परंपरेतील महायान पंथीय आहे असे बर्जेस, फर्ग्युसन्,नागराजु,विद्या दहेजीया या सर्व तज्ज्ञांचे मत होते.मात्र श्री. म.के.ढवळीकरांनी हे लेणे हीनयान पंथीयांनी कोरले असे सप्रमाण सिध्द केले.लेण्यात असलेल्या बुध्द आणि बोधीसत्वाची उपस्थिती तसेच व्हरांड्यातील स्तंभाची रचना यावरुन हे लेणे हीनयानपंथींयाचे असल्याचे सिध्द झाले.व्हरांड्यात समोर सहा स्तभ तर बाजुला दोन अर्धस्तंभ आहेत.  लेणीच्या प्रथम दर्शनी सहा खांब आहेत त्यातील एकच खांब पूर्ण कोरलेला आहे.या स्तंभाचे काम सहाव्या शतकातील असावे,स्तंभाचे कोरीवकाम देखील लक्षवेधी आहे.तळाशी चौकोनी, थोड्यावर अष्टकोनी,मध्ये सोळा कोन, पुन्हा वर अष्टकोनी आणि सर्वात वर पुन्हा चौकोनी. व्हरांड्यात मागे भिंतीत अर्धवट कोरलेली देवळी दिसते. मग ओसरी लागते त्यानंतर ३ दरवाजे आहेत त्यातुन आपण प्रार्थनागृह/ध्यानगृह प्रवेश करतो, येथे शक्यतो त्याकाळी वर्षावासाच्या काळात म्हणजे पावसाळाच्या काळात ध्यान धारना व ध्यान साधना तसेच धम्म प्रवचन यांसाठी या कक्षाचा उपयोग होत असे. 
 
 
 
सभागृहात चारही भिंतीना लागून ओटा आहे.दोन्हीकडच्या मागच्या भिंतीत अर्धवट कोरलेल्या प्रत्येकी दोन अश्या चार खोल्या आहेत. त्या समोर गर्भगृह तसेच खोल्या ही आहेत. गाभार्‍यात जाण्यासाठी प्रवेशद्वार असून त्याच्या दोन्ही बाजुला दोन खिडक्या आहेत. गर्भगृहाची रचना कुडे लेण्यासारखी किंवा वाईच्या लेण्यासारखी आहे. गाभार्‍यात जमीनीपासून छतापर्यंत चौकोनी शिळा स्तुप कोरण्यासाठी सोडली असावी.मात्र नंतरच्या काळात समोर बुध्द मुर्ती कोरली असावी. हि मुर्ती प्रलंबपदासन मुद्रेत आहे. सिंहासनारुढ भगवान बुद्धांच्या खालील भागात धम्मचक्र, हरणे, आकाशात उडणारे यक्ष कोरलेले दिसतात.दोन बाजुस चामरधारी तर वर दोन विद्याधर दिसतात.तसेच मकरतोरणही दिसते.दोन मानव आकृतींनी मुकुट तोलून धरल्याचे दिसत आहे.दुर्दैवाने बुध्दाचे मुख ,छाती,उदर तसेच भोवतालच्या बोधीसत्वाच्या प्रतिमा झीजल्या आहेत. शिळेच्या मागच्या बाजुला आसनस्थ बुध्दाची रेखांकित प्रतिमा आहे.तर शिळेच्या डाव्या बाजुला असलेली बुध्दाची प्रतिमा त्याच्या मुकुटातील स्तुपामुळे वज्रपाणीची असावी तर उजव्या बाजुला असलेली मुर्ती पद्मपाणीची असावी. या दोन्ही प्रतिमा ओबडधोबड आहेत.या दोन्ही प्रतिमा सहाव्या शतकात कोरल्या असाव्यात. या काळात कार्ले,नाशिक, कुडे येथील अनेक हीनयान लेणी महायान लेण्यात रुपांतरीत करण्यात आली.
 
   लेण्याची मुळ रचना पाहीली तर या लेण्यांचे काम हीनयान काळात सुरु होउन, हीनयानांचा प्रभाव ओसरुन महायानांचा प्रसार वाढण्याचा जो संक्रमणाचा काळात पुर्ण झाले असावे, याचा अर्थ या लेण्याच्या कामाची सुरवात इ.स. तिसर्‍या शतकाच्या अखेर किंवा चौथ्या शतकाच्या प्रारंंभी झाले असावे. या लेण्याच्या पुढच्या बाजुस खाली पाण्याची तीन टाकी आहेत.त्यातील एक टाके ६ मी X ५ मी व ३ मीटर खोल आहे.
लेणे क्र. २:-
   हे लेणेदेखील अपुरे सोडले असून समोर दोन स्तंभ,उजव्या भिंतीला लागून असलेला ओटा आणि अर्धवट सोडलेली खोली इतकेच इथे आहे.
5
लेणे क्र. ३:-
लेणे क्रमांक २ च्या उत्तरेला हे लेणे आहे.खोली व व्हरांडा अशी याची रचना आहे.व्हरांड्याच्या पुढे आलेल्या छतामुळे बर्‍यापैकी सावली पडते.या लेण्यातील सभागृह मोठे आहे ( ५.२ मीटर रुंद ,२.६ मीटर लांब व २.१ मीटर उंच ) उजव्या भिंतीला लागून ओटा आहे तर समोरच्या बाजुस दोन स्तंभ तर दोन अर्धस्तंभ आहेत.  या लेण्यात उजवीकडे पायरी असलेला कट्टा कोरलेला असुन दर्शनी भागात २ स्तंभ व त्यामागे दगडी ओटे आहेत. स्तंभ खालील बाजुस चौकोनी तर वर अष्टकोनी आहेत. व्हरांड्याच्या भिंतीना गिलावा केलेला आहे. या लेण्यातील ओट्यांना सुंदर नक्षीदार स्तंभ कोरले आहेत.या लेण्याची रचना स्तंभ आणि व्हरांडा अशी असली तरी प्रशस्त खोली व नक्षीकाम यावरुन हे लेणे उच्च दर्जाच्या भिक्षुंच्या निवासासाठी तयार केले असावे. 
  येथील चौरसाकृती पायाचे अष्टकोनी स्तंभ कान्हेरी,जुन्नर लेण्यांप्रमाणे आहेत.मात्र जुन्नर लेण्यामध्ये असलेल्या डमरुच्या प्रतिमा येथे नाहीत.येथुन खाली उतरत वळत जाणाऱ्या पायऱ्या लेणी क्र. ४ कडे जातात.
लेणी क्र. ४ –
   या लेण्याच्या दर्शनी भागात दोन स्तंभ आणि अर्धस्तंभ असून व्हरांडा, दालन व विहार अशी याची रचना आहे. दालन हे विहारापेक्षा मोठे असून व्हरांड्याच्या उजव्या भिंतीवर ब्राम्ही शिलालेख कोरलेला आहे.त्यातील काही अक्षरं वाचता येतात.गेल्या शतकापर्यंत पहिल्या ओळीतील "(मा)यानसा" हि अक्षरे दिसत होती, ती आता दिसत नाहीत. पुरालिपीवरुन हा शिलालेख इ.स. २३० नंतरच्या काळातील असावा. या काळातील इतर शिलालेख या लेण्यात आढळतात. चौथ्या आणि पाचव्या लेण्यांच्या मध्ये जोडणारी खिडकी आहे. आत भिंतीला लागून ओटे आहेत.
7
लेणी क्र. ५ –
 या लेण्याची रचना मंडपासारखी असुन आत दालन आहे. याच्या दर्शनी भागात चार स्तंभ असुन हे स्तंभ तळात चौकोनी तर वरील बाजुस अष्टकोनी असुन त्यावर भौमितीय आकाराची नक्षी आहे.  ओसरीच्या आत दालन असून ओसरीत दोन स्तंभ आणि दोन अर्धस्तंभ आहेत. अर्धस्तंभावर डमरुसारख्या प्रतिमा आहेत. दालनाच्या आत तिन्ही बाजुस कट्टे आहेत. पाचव्या क्रमांकाच्या लेणीची रचना मंडपासारखी आहे.हे लेणे मतपा म्हणजे मटप मंडप भोजनगृह असावे.लेण्यातील डाव्या बाजुची भिंत ओबडधोबड दिसत असली तरी ती कोरताना बाजुला असलेल्या लेणे क्रमांक ४ मध्ये कोसळु नये अशी काळजी घेतलेली दिसते.यावरुन चार क्रमांकाचे लेणे आधी अस्तित्वात होते असे दिसते. म्हणजे एकतर सुरवातीला हि खोली नसावी आणि भिक्षुकांच्या निवासासाठी किंवा धान्य साठविण्यासाठी हि खोली बांधली असावी. सभागृहाचा वापर भोजनगृह म्हणून झालेला दिसतो.
 
लेणी क्र. ६ –
 हे खालच्या स्तरात अर्धवट कोरलेले लेणे असुन या लेण्याजवळ दोन पाण्याची टाकी आहेत. सहाव्या क्रमांकाची लेणी ही खालच्या थरावर आहे. या लेणीचं खोदकाम अर्धवट सोडून दिलं आहे.
4
 लेणी क्र.७ –
सातव्या क्रमांकाची लेणी सहाव्या लेण्याच्या खालच्या पातळीवर कोरण्यात आली आहे. या लेण्याचा दर्शनी भाग कोसळला असुन व्हरांडा व विहार अशी याची रचना आहे. ओसरीचा दर्शनी भाग कोसळला आहे. व्हरांडा व खोली यातील भिंतही नष्ट झाली आहे.या लेण्याच्या पुढे पाण्याची दोन टाकी आहेत.
 
लेणी क्र. ८ –
 आठव्या क्रमांकाचे हे खोली व व्हरांडा अश्या रचनेचे आहे.लेण्याचे काम ओबडधोबड आहे.डॉ. बर्जेसने या लेण्याची दखल घेतली असली तरी श्री. ढवळीकर व नागराजु यांनी घेतली नाही.त्यांनी नवव्या लेण्यास आठ क्रमांक दिला आहे.८ व ९ या लेण्यांच्या मध्ये पाण्याचे टाके आहे.
 
लेणी क्र. ९ –
   ९ क्रमांकाचे लेणे पाले येथील सर्वात आकर्षक लेणे म्हणता येईल.पाले येथील लेण्यात तीन चैत्यगृह आहेत.लेणे क्र.१ च्या चैत्यगृहाचा निर्माण काळ इ.स.२५० ते ३०० तर लेणे क्रमांक २१ या चैत्यगृहाचा काळ तिसर्‍या शतकाच्या पुर्वार्धातील आहे.या नवव्या क्रमांकाच्या लेण्याचा म्हणजे चैत्यगृहाचा निर्माणकाळ चौथ्या शतकाच्या प्रारंभीचा असावा असे नागराजु यांचे मत तर ढवळीकरांच्या मते याचा निर्मितीकाळ तिसर्‍या शतकाच्या मध्यातील असावा.
   बर्जेसच्या मते या लेण्याच्या पुढे व्हरांडा असावा व त्याच्यापुढे दोन स्तंभ असावेत.मात्र आता हे स्तंभ दिसत नाहीत. या लेण्याचे सभागृह विस्तृत असून असून त्याचा आकार ८.१ मीटर रुंद, ७.१ मीटर लांब, २.७५ मीटर उंच असून त्याच्या तिन्ही भिंतीना ओटा आहे. या लेण्यातील दालनाला दरवाजा व दोन खिडक्या असुन ओसरीत उजव्या बाजुस कट्टा कोरलेला आहे. या ओसरीला इतर लेण्यांप्रमाणेच खांब आणि अर्धस्तंभ आहेत.  ​नवव्या क्रमांकाचं लेणं वरच्या पातळीवर असून दालनाला दरवाजा आणि दोन खिडक्या आहेत.
  सभागृहाच्या मागच्या बाजुला विस्तृत गाभारा (४.५ मीटर X ४.५ मीटर ) आहे.सभागृहाच्या दोन्ही भिंतीत तीन तर मागच्या भिंतीत गाभार्‍यात दोन्ही बाजुला दोन अश्या एकुण आठ खोल्या आहेत.खोल्यांमध्ये शयनओटे आहेत.गाभार्‍याच्या पुढील जमीनीत व बाजुच्या भिंतीत छिद्र दिसतात.यावरुन इथे लाकडी दरवाजा असावा.गाभार्‍याच्या मध्यभागी स्तुप होता,मात्र आता तो अस्तित्वात नाही. छताला लागून स्तुपाच्या छत्राचे अवशेष दिसतात.छत्र छताला भिडले आहे यावरुन हे लेणे कान्हेरी,कुडे व जुन्नर यानंतरचे असावे.
      सभागृहाच्या समोर दोन खांब होते,मात्र ते आता नष्ट झाले आहेत.फक्त त्या खांवांचा वरचा भाग शिल्लक आहे.त्यात वरच्या बाजुला पिरॅमिडचा आकार्,मधोमध आवळ्यासारखा गोलाकृती भाग ( अमलक ) आणि हंड्यासारखा ( कुंभशीर्ष ) यावरुन हे स्तंभ नाशिक आणि जुन्नरच्या लेण्याप्रमाणे असावेत. दोन्ही बाजुला असलेले अर्धस्तंभ चौरसाकृती असून त्यावर डमरुसारखे आकार कोरलेले आहेत. 
 6
ह्या लेण्यात उजव्या बाजूच्या भिंतीवर अर्धस्तंभाच्या बाजूला प्राकृत भाषा आणि ब्राह्मी लिपीतील शिलालेख कोरलेला आहे. यात राजवंश व तिथीचा उल्लेख नाही.
याचे वाचन असे १ ओळ- सिधं कुमारस काणभोअस (काणभोज ) व्हेणुपालितस ( विष्णूपालित ) २ ओळ- (ए)स लेण चेतिएघर ओवरका च अठ ८ विकमं नियु ३ ओळ- तं ले(ण)स च उभतो पसेसु पोढियो बे २ लेणस ४ ओळ- अलिगणके पथो च दतो एतस कुमारस देय याचा अर्थ- सिद्धी असो. कुमार कानभोज विष्णुपालित याने लेणे, चैत्यगृह, आठ ओवऱ्या, लेण्याच्या दोन्ही बाजूस एक एक टाके व लेण्याचा मार्ग यांची दिलेली देणगी दिली. लिखाणाच्या शैलीवरुन हा लेख इ.स.२३० नंतरचा आहे.  या लेण्याच्या पुढे पाण्याची दोन टाकी अर्थातच पोढी आहेत.

लेणी क्र. १० –
​या लेण्याला ४.५७ X २ मीटर असे आयताकृती असून त्याला खिडक्या नाहीत.या लेण्याची पडझड झालेली असुन लेण्याचे खांब तळाशी चौकोनी आणि वरती अष्टकोनी असुन त्यावर भौमितीय नक्षी आहे. या लेण्याच्या कट्ट्यावर कोरीव काम आहे.​दहाव्या लेण्याची रचनादेखील नवव्या लेणीप्रमाणेच आहे. दर्शनी भागाची पडझड झालेली दिसते. लेणीच्या पाय-या नष्ट झालेल्या दिसतात. तळाशी चौकोनी आणि वरच्या बाजूला अष्टकोनी खांब असून खांबावरती वाळूच्या घडयाळासारखी नक्षी आहे. या लेणीला खिडकी नाही.कान्हेरीची लेंणे ७९ व हे लेणे यात साम्य आहे.या लेण्याच्याही पुढे पोढी आहे.
लेणी क्र.११ आणि १२–
  क्रमांक अकरा आणि बारा क्रमांकाच्या लेणी एकाच पातळीवर आहेत. ओसरी आणि दालन अशी या दोन्ही लेण्यांची रचना आहे. या लेण्यांच्या दर्शनी भागात दोन स्तंभ आणि दोन अर्धस्तंभ असुन व्हरांडा आणि दालन अशी यांची रचना आहे. अर्धस्तंभाच्या मध्यावर डमरुसारख्या प्रतिमा कोरल्या आहेत.१२ व्या लेण्याच्या दरवाजाबाहेर ओटा व पायऱ्या खोदलेल्या आहेत.
लेणी क्र. १३ –
  अकराव्या लेण्याच्या अगदी खालच्या बाजुस हे लेणे आहे. याची रचना ९ व्या लेण्यासारखी म्हणजे खोली आणि ओसरी अशी आहे.मात्र ओटा नाही.या लेण्याला दरवाजा व दोन खिडक्या असुन दर्शनी भागात नक्षी कोरलेले चार स्तंभ आहेत. लेण्याच्या दरवाजात पायऱ्या कोरल्या असुन समोरच चौकोनी आकाराचे टाके आहे.तेरा क्रमांकाची लेणी खालच्या पातळीवर असून या लेणीला आयताकृती दरवाजा आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला खिडक्या खोदलेल्या आहेत. दोन स्तंभ आणि दोन अर्धस्तंभ आहेत. या लेणीतल्या अर्धस्तंभावरही वाळूच्या घडयाळासारखी नक्षी आहे. या लेण्याच्या समोर बंदीस्त पाण्याचे टाके असून त्याला पाणी काढण्यासाठी चौकोनी छिद्र आहे.
  लेणी क्र. १४ – 
 चौदावी लेणी तेराव्या लेणीला लागून असून याची रचना खोली आणि ओसरी अशी आहे.हे अर्धवट कोरलेले लेणे असुन व्हरांडा व विहार अशी याची रचना आहे.

महाड जवळील गांधारपाले लेणी क्रमांक १५ मधील स्तूप.

लेणी क्र. १५ –
हि लेणी म्हणजे कोनाड्यात कोरलेला लहान स्तूप असुन स्तुपावर गोलावर वेदिकापट्टी व वरील बाजुस छताला टेकलेली हर्मिका आहे.  पंधराव्या क्रमांकाची लेणी एका कोनाडयात खोदली आहे. यात असलेला स्तूप तीन थरांत असून स्तुपाच्या दंडाकृती गोलावर नक्षी, वरच्या अर्धगोलाकृती भागावर चौकोनी हर्मिका आणि छतापर्यंत जाणारा उलटया पाय-यांचा पाच थरांचा पिरॅमिड आहे.स्तुपाची हार्मिका छताला भिडली असल्यामुळे हा स्तुप प्रगत प्रकारातील आहे.हार्मिकेवर यष्टी किंवा छत्र नाही.अशी रचना कुडे लेणी ९ व १५ मध्ये आहे.
लेणी क्र. १६ –
         व्हरांडा, दालन आणि विहार अशी या लेण्याची रचना आहे.हे लेणे मतपा म्हणजे भोजनगृह आहे. स्तंभाची रचना इतर लेण्यांप्रमाणेच आहे. दालनाच्या दर्शनी असलेले स्तंभ पुर्णपणे झिजलेले आहेत. व्हरांड्याच्या डाव्या बाजुस एक विहार असुन त्यात बाहेरून प्रवेश करता येतो. दालनाला दरवाजा व दोन खिडक्या असुन तिन्ही भिंतीना ओटा खोदलेला आहे. सभागृहाच्या मध्यभागी प्रवेशद्वार असून दोन्ही बाजुला खिडक्या आहेत. स्तंभ पायाशी चौरसाकृती तर मधोमध अष्टकोनी आहेत.व्हरांड्याच्या डाव्या बाजुला ओटा नसलेली खोली असून तीचे प्रवेशद्वार ठेंगणे आहे.
9
लेणी क्र.१७ – 
अर्धवट कोरलेल्या या लेण्याची व्हरांडा व दालन अशी रचना आहे. सतराव्या लेणीचं खोदकाम अर्धवट सोडून दिलं असलं तरी त्याची रचना दालन आणि ओसरी अशी असल्याचं दिसतं.

लेणी क्र. १८ आणि १९ –
 व्हरांडा व दालन अशी रचना असलेल्या या लेण्याचे आतील खोदकाम अर्धवट आहे. १८ व्या लेण्याला दरवाजा व खिडक्या अशी रचना असुन दोन्ही लेण्यांच्या व्हरांड्यात कट्टे कोरलेले आहेत.सभागृहाच्या मागची खोली अर्धवट कोरुन सोडलेली दिसते. सभागृहाच्या एकाही बाजुस खिडकी नाही. लेण्यांच्या खांबांवर नक्षी कोरली आहे.स्तंभ पायाच्या बाजुला चौकोनी तर मधोमध अष्टकोनी आहेत.

लेणी क्र. २० – 
हे अर्धवट कोरलेले लेणे आहे. विसावी लेणी ही अर्धवट स्थितीत आहे. सुरुवात करून लगेच सोडून दिलेलं दिसतं.

लेणे क्रमांक २१ ते २८ खालच्या रांगेत आहेत.
लेणी क्र. २१ – 
  एकविसावी लेणी हे एक चैत्यगृह असून ते समोरच्या बाजूने खुलं आहे.  या लेण्याचे आकारमान २.८ मीटर रुंद २.६ मीटर लांब व २.१ मीटर उंच आसे आहे. मधोमध स्तुप विराजमान आहे. हे एक चैत्यगृह असून या लेण्यातील स्तूपावर वेदिकापट्टी आणि हर्मिका आहे.याची शैली १५ व्या लेण्यातील स्तुपासारखीच आहे.फरक इतकाच कि १५ व्या लेण्यात स्तुप पुर्ण आहे तर इथे तो बैठा आहे
 चैत्यगृहाच्या उजव्या भिंतीवर महायान काळातील आसनस्थ बुद्धाची प्रतिमा असुन शेजारी चवरीधारी आहेत तर बुद्धांच्या डोक्यावर विद्याधरांनी मुकुट धरला आहे. शिल्पाच्या वरील भागात मकरतोरण असुन हे शिल्प ५-६ व्या शतकात महायान पंथीयांनी कोरले असावे.या चैत्यगृहाच्या डाव्या भिंतीत देवळीचा ओटा आहे.यावरुन हे लेणे कान्हेरीच्या ३६ क्रमांकाच्या लेण्यासारखे आहे.
लेणी क्र. २२ –
 या लेण्याचा दर्शनी भाग कोसळलेला असुन व्हरांडा व विहार अशी या लेण्याची रचना आहे.मागच्या भिंतीत देवळी असलेला ओटा आहे.व्हरांड्याच्या डाव्या भिंतीतही तसाच ओटा आहे,या लेण्याच्या पुढे पाण्याचे टाके आहे.
 11
लेणी क्र. २३ –
 व्हरांडा आणि दालन अशी या लेण्याची रचना असुन दालनाला दरवाजा व दोन्ही बाजुस खिडक्या आहेत. त्याच्या व्हरांड्याच्या मागे मोठी आयताकृती खोली आहे.त्याला प्रवेशद्वार असून दोन्ही बाजुला खिडक्या आहेत.व्हरांड्यात कोठेही ओटा नाही. लेण्याजवळ पाण्याचे टाके असुन व्हरांड्यात अष्टकोनी व चौकोनी आकाराचे स्तंभ आहेत. येथील नक्षीकाम दहाव्या लेण्यातील नक्षीकामासारखे भासते,14

15

 लेणी क्र.२४– 
  या लेण्याची रचना पुढे व्हरांडा, सभागृह व मागे दोन खोल्या अशी आहे. सभागृहाची भिंत भग्न झाली आहे.या लेण्याला दोन विहार असुन दर्शनी भागातील स्तंभ नष्ट झाले आहेत. व्हरांड्याच्या डाव्या भिंतीत देवळीचे ओटे आहेत.
लेणी क्र.२५ – 
या लेण्याची पडझड झाली असुन यातील विहाराला एक दरवाजा व खिडकी आहे.  पंचविसावी लेणी ही काहीशी वेगळी आहे, म्हणजे ओसरीच्या मागे एकच खोली असून खोलीचा दरवाजा थेट छतापर्यंत पोहोचला आहे. दरवाज्याला वर व खाली द्वारशाखा आहेत.व्हरांड्याच्या समोरचा भाग जिथे स्तंभ व अर्धस्तंभ असावेत तो भाग कोसळला आहे.
लेणी क्र.२६ –
 सव्वीस क्रमांकाच्या लेणी रचना ही सर्वसाधारण म्हणजे खोली, दालन आणि ओसरी अशीच आहे.या लेण्याच्या स्तंभाची पडझड झाली आहे.व्हरांड्यातून सभागृहात जाताना दरवाजा व बाजुला दोन खिडक्या आहेत.सभागृहाच्या डाव्या भिंतीत खोली तर उजव्या भिंतीत देवळीचा ओटा आहे. समोर पोढी आहे. 
 
लेणी क्र. २७ – 
हे लेणे व्यवस्थित कोरले असून त्याची रचना व्हरांडा, दालन व विहार अशी आहे. दर्शनी भागात अष्टकोनी व चौकोनी चार खांब आहेत. या खांबावर भौमितीय नक्षी कोरली आहे. आयताकृती अर्धस्तंभावर डमरुसारख्या प्रतिमा आहेत.व्हरांड्याच्या मधोमध सभागृहाचे प्रवेशद्वार असून दोन्ही बाजुस खिडक्या आहेत.उजव्या भिंतीत देवळी असलेला ओटा आहे.मागच्या भिंतीत खोलीचे प्रवेशद्वार असून आत ओटा आहे. 
  व्हरांड्याच्या उजव्या भिंतीत कोनाडा असून त्यात उठावाचा स्तुप कोरला आहे.अश्या प्रकारचे उठावाचे स्तुप शिवनेरी लेण्यात आढळते.यात नक्षिकामाने सजवलेली वेदीका,हार्मिका वर पिरॅमिडच्या आकाराचे शीर्ष व त्यावर यष्टी व छत्र आहे. 
सत्तावीस क्रमांकाच्या लेणीत डाव्या भिंतीवर एक शिलालेख कोरलेला आहे. लेखाची लिपी ब्राह्मी आणि भाषा प्राकृत आहे. या लेखात राजवंश व तिथीचा उल्लेख नाही.
या लेखाचे वाचन असे १ ओळ -सिधं गहपतिस सेठिस संघरखितस पुतस वि २ ओळ - वादसिरिय देयधमं लेनं चेतियकोठि पा ३ ओळ — छेतानि यानि लेणस पेठा गोराव —- नं — ४ ओळ - ति छेतेहि करे ततो चेतिआस गध ५ ओळ- अठ ८ भतकंमानिका अठ ८ कोढिपुर ९ ओळ- कारणकारणे च लेणस सवेणा क—- या लेखात वादसिरिने (वादीश्री) लेणे, चैत्यकोठी (चैत्यगृह) व लेण्याच्या खालच्या बाजूस असलेली शेती दान दिल्याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर गहपति (गृहपती) श्रेष्ठी (उच्चपदी विराजित) संघरखितच्या (संघरक्षित) मुलाचा उल्लेख लेखात असला तरी त्याचे लेखात नाव दिलेले नाही. दान देणारी व्यक्ति वादसिरी ( वादश्री ) आहे.
      पुरालिपीच्या शैलीनुसार हा शिलालेख व लेणी क्रमांक ९ मधील शिलालेख समकालीन वाटत असल्यामुळे दोन्ही लेणी समकालीन म्हणजे इ.स. तिसर्‍या शतकाचा मध्य किंवा अखेरची असावी. या लेण्याच्या उजव्या बाजुस पाण्याचे टाके आहे.
13
लेणी क्र. २८ – 
पडझड झालेल्या या लेण्याची ओसरी, दालन व विहार अशी रचना असुन दालनाला मोडलेला दरवाजा व चौकोनी आहे. आता फक्त मागची खोली शिल्लक आहे.व्हरांड्यातून सभागृहात जाताना मध्यभागी प्रवेशद्वार व डाव्या बाजुला खिडकी आहे.
    या टेकडीखाली दोन स्तुप पायापासून निखळून पडले आहेत.त्यातील एक ९ व्या लेण्यातील असावा.दुसरा कोणत्या लेण्यातील असावा याचे अनुमान करता येत नाही.कुडे लेण्याप्रमाणे हि लेणीही रायगड जिल्ह्याच्या दक्षिण बाजुला कोकणात मध्यवर्ती परिसरात आहेत.येथे घुमटाकार छताचे चैत्य नाही किंवा सभागृहाभोवती विहार असलेले नामांकित लेणे नाही.अपवाद फक्त चैत्यगृह असलेल्या लेणे क्रमांक ९ चा.
   इतिहास संशोधक, पर्यटक व अभ्यासकांना पर्वणी असणारी महाड जवळील बौद्धकालीन गांधारपाले लेणी अनेक गैरसोयीने वेढलेली आहे. मुंबई गोवा महामार्गावर असणा-या या प्राचीन स्थळाचे संवर्धन झाल्यास हा परिसर विकसित होऊ शकतो. रायगड संवर्धनांतर्गत रायगड व परिसरातील गावांचा विकास होत आहे त्याप्रमाणेच या लेण्यांचाही विकास व्हावा अशी मागणी आहे.  
     मुंबई - गोवा महामार्गावर महाड जवळ असूनही पर्यटकांना या लेण्यांची पुरेशी माहिती मिळत नाही. महामार्गाचे चौपदरीकरण होत असल्याने या स्थळाला महत्व येणार आहे. पुरातत्व विभागाने काही वर्षापूर्वी येथे पाय-या बांधल्या असल्या तरी ठिकठिकाणी पाय-या तुटल्या आहेत. लेण्यांवर कोणत्या ही प्रकारची वीजसुविधा, पिण्यायोग्य पाण्याची सुविधा तसेच सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने पर्यटकांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात जमलेले शेवाळ व उन्हाळ्याल लागणा-या वणव्यामुळे या लेण्या धोक्यात येत आहेत. 
        लेण्यात असलेले स्तूप झिजून जात आहेत तर लेण्यांची पायथ्याशी दोन स्तूप बेवारस पडलेले आहेत. या लेण्यांमध्ये पाली भाषेत लिहिलेले शिलालेख असुन शिलालेखांची व स्तूपांची दुरवस्था झाल्याने त्यावरील लिखाण समजत नाही..त्या काळात लेण्यात पाण्यासाठी जलकुंड बांधणण्यात आलेली आहे. कडक उन्हाळ्यातही या जलकुंडात असते. ते आता लालसर झालेले आहे. प्लॅस्टीक बाटल्या व कचरा या कुंडात साठला आहे. परंतु, कुंडांची स्वच्छता करणे, गाळ काढणे अशी कामे न केल्याने कुंडात अस्वच्छता आहे. रायगड संवर्धनाचे काम स्तुत्य आहे. पंरतु, कोकणातील दुर्लक्षीत बौध्दकालिन लेण्यांचे संवर्धन करण्याकडेही सरकराने लक्ष द्यावे नाहीतर हा पुरातन वारसा लोप पावेल. 
    पर्यटक ,अभ्यासक, इतिहास संशोधक यांना ही लेणी अतीव आनंद देणारी अशी आहेत.महामार्गावर असल्याने येथे यायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत.पावसाळ्यात लेण्यांच्या वरून पडणारे धबधबे ,समोर सावित्री-गांधारी नद्यांचा विस्तिर्ण जलाशय…हे दृश्य ही मनमोहक असते.कोकणात ,रायगड ,महाबळेश्वर नाहीतर गोव्याकडे जातांना थोडावेळ इथे थांबा आणि ऐतिहासिक शिल्पकलेचा सुंदर नमुना पाहून जा. 

संदर्भः-
१)  रायगड जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३)  केव्ह टेंपल्स ऑफ इंडीया- जेम्स बर्जेस्,जेम्स फर्ग्युसन
४)  www.durgbharari.com   हि वेबसाईट
५)  https://prahaar.in   https://bhramantikatta.blogspot.com/2021/05/gandharpale-caves-mahad.html,  https://www.facebook.com/groups/ABCPR/posts/2210534525712544/ http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com  या  वेबसाईट
६) आडवाटेवरचा महाराष्ट्र- प्र.के.घाणेकर






8


10


12


16

17




















      


























 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...