Monday, December 6, 2021

ब्रिटनचे सर्वाधिक धडाडीचे हेर

 

मूळ लेखक: पीटर जेकब्स
 
मुक्त अनुवाद : मुकुंद कर्णिक 
 

द ट्विन्स – लेखक पीटर जेकब्स पुस्तकाचे मुखपृष्ठ

ही अल्फ्रेड आणि हेन्री न्यूटन या दोन ब्रिटिश भावांची कथा आहे ज्यांनी दुसऱ्या महायुध्दात पादाक्रांत फ्रान्समध्ये गुप्तहेर आणि घातपाती कारवाया करणारे म्हणून आपले योगदान दिले.

१५ महिने नरकात काढल्यानंतर अल्फ्रेड आणि हेन्री न्यूटन हे दोघे स्वत:ला भाग्यवान समजत होते. का? – जेमतेम का होईना पण जिवंत राहिल्याबद्दल!

११ एप्रिल १९४५. मध्य जर्मनीतल्या बुखेनवाल्ड या ‘कैदी कोंबण्याच्या खुराड्याच्या’ (नाझी छळणूक छावणी ( Concentration Camp )) दाराबाहेर अमेरिकेचे रणगाडे येऊन उभे राहिले. त्यातले ‘मुक्तिदाते’ अमेरिकन सैनिक जेव्हा छावणीत शिरले तेव्हा इतर असंख्य कैद्यांबरोबरच हे दोघे जुळे भाऊही त्यांना आढळले. तेही कसे? ‘ब्रिटनचे सर्वात जास्त धडाडीचे हेर’ हे बिरुद सन १९५० मधल्या एखाद्या वर्तमानपत्रानं सहज आणि नि:शंकपणे त्यांना दिलं असतं असे हे धाडसी  ब्रिटिश अधिकारी म्हणजे केवळ कातडी आणि हाडांचे सांगाडे उरलेले होते. मोठ्या मुष्किलीनं चालू शकत होते. आपण आता मुक्त होणार या आजवर करू न शकलेल्या कल्पनेने भावनाविवशही झाले होते.

“सूड घेण्याची उर्मी”

२५ सप्टेंबर १९४१ च्या रात्री ‘एस एस अव्होसेटा’ ही उतारू आणि माल या दोन्हींची वाहतूक करणारी स्टीमशिप जर्मनीच्या यू बोटीने बुडवल्याच्या घटनेपासून या अध्यायाची सुरुवात झाली. या स्टीमशिपचा मलबा आयर्लंडच्या नैऋत्य (साऊथ-वेस्ट) टोकापासून ७०० मैल आत, उत्तर अटलांटिक समुद्राच्या तळाशी पडलेला आहे. ती जागा म्हणजे स्टीमशिपमधील प्रवासी न्यूटन कुटुंबातल्या सात व्यक्तींची स्मशानभूमी आहे!

ही स्टीमशिप बुडवली गेली तेव्हा ३७ वर्षांचा हेन्री आणि त्याचा २७ वर्षांचा धाकटा भाऊ अल्फ्रेड हे दोघेही नैऋत्य फ्रान्समध्ये होते. त्यांचे वडील हे पूर्वाश्रमीचे रॉकडेल –  लँकेशायर इथले रेसमधले घोडेस्वार (जॉकी). त्यांनी एका करमणूक कलाकाराशी (कॅबरे आर्टिस्ट) लग्न केल्यानंतर कामासाठी युरोपभर फिरत अखेरीला फ्रान्समध्ये आपले बूड स्थिर केले होते. या दोघा भावांनी आईच्या पावलावर पाऊल ठेवत कॅबरे आर्टिस्ट म्हणूनच काम करायला सुरुवात केली. ‘बूर्न बंधु’ या नावाने त्यांनी जवळ जवळ दहा वर्षे आपल्या टॅप डान्समधील कौशल्याने आणि विनोदी भूमिकांनी युरोप, दक्षिण अमेरिका इथल्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ( बूर्न हे त्यांच्या आईचं नाव् )

(१९३८ मधल्या या फोटोत डावीकडचा हेन्री आणि उजवीकडचा अल्फ्रेड न्यूटन)

दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर हे कुटुंब विखुरलं गेलं. दोघा भावांना सक्तमजुरी गृहात ( लेबर कॅम्प ) मध्ये पाठवण्यात आलं आणि दोघांच्या बायका, तीन मुलं, आणि आईवडील यांना ब्रिटनमध्ये जायला सांगण्यात आलं. आपल्या कुटुंबियांबरोबर राहायचं अशा निर्धाराने दोघा  भावांनी कॅम्पमधून पळून जाऊन पिरानीज पर्वतराजीतून लपून छपून पायपीट करत स्पेन गाठलं. पण तिथं गेल्यावर त्यांच्या कानावर दुर्दैवी बातमी आली की त्यांचे कुटुंबीय ज्या बोटीतून प्रवास करत होते ती ‘एस एस अव्होसेटा’ बोट बुडवली गेली आहे.

अशा परिस्थितीत कोणाच्याही मनात सुडाग्नी धगधगत राहणं साहजिक आहे. पण या दोघांनी धीरानं घ्यायचं ठरवलं. फेब्रुवारी १९४२ मध्ये लंडनला पोचल्यानंतर अतुलनीय धैर्य एकवटून ते एस ओ ई ( SOE – स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्यूटीव्ह ) या युध्दकालीन हेरगिरी आणि घातपात करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गुप्त संस्थेत सामील झाले. इथंच त्यांना दोघांच्या वयात १० वर्षांचा फरक असूनही ‘जुळे बंधू’ ( द ट्विन्स ) हे नाव मिळालं आणि स्फोटकं बनवणं व  दंगेधोपे घडवून आणणं या कामांचं शिक्षणही मिळालं.

 

( एस्. एस्. अव्होसेटा )

“द ग्रीनहार्ट”


३० जून १९४२ च्या रात्री ह्या दोन भावांचं अभियान ( मिशन ) सुरू झालं. हवाई छत्रीच्या सहाय्यानं दोघे दक्षिण फ्रान्समधल्या ‘विचि फ्रान्स’ या जर्मनांनी ताब्यात न घेतलेल्या भागात घातपात करण्याच्या कामासाठी उतरले. जर्मन आणि इटालियन फौजांनी ‘सहाय्यकारी राहू’ असे आश्वासन घेऊन ‘विचि फ्रान्स’ हा भाग आपल्या कबजात न घेता स्वतंत्र सोडला होता. फ्रेंच भूमिगत सैनिकांबरोबर सहकार्य करण्याच्याही सूचना दिल्या होत्या. न्यूटन बंधूंनी तिथं स्थानिक मित्रांना बरोबर घेऊन “द ग्रीनहार्ट” समूह स्थापन केला. अगदी अल्पकाळातच या समूहाची सभासद संख्या २०० च्या वर गेली. लिऑन ( Lyon ), सेंट एटीन्न ( Saint Etienne ) आणि ल् पाय ( Le  Puy) या आणि आसपासच्या भागात त्यांचं कार्य सुरू झालं.

‘अ‍ॅक्सिस’मधील सरकारांच्या सैन्यानं ११ नोव्हेंबर १९४२ या दिवशी विची फ्रान्स हा भाग  पादाक्रांत केला. तेव्हा अल्फ्रेड आणि हेनरी या दोघांची नाझी सैन्याशी दोन हात करायची इच्छा फळाला आली. त्याच दिवशी त्यांना पहिली संधी मिळाली. रस्त्याच्या कडेला उभ्या करून ठेवलेल्या जर्मन रेडियोच्या दोन व्हॅन्स त्यांना आढळल्या. मग काय, दोन्हींच्या बुडाशी स्फोटकं चिकटवायला त्यांना काही सेकंदच पुरे होते. नंतर काही मिनिटांतच दोन स्फोट झाले आणि त्या व्हॅन्सच्या चिंधड्या उडाल्या.

थोड्या दिवसांनंतर हवाई छत्र्यांच्या सहाय्याने सामग्री आणि अवजारे उतरवून घेण्यासाठी गावाबाहेर एखादी सोयीस्कर जागा मिळते का, याचा लपत छपत शोध घेत असताना कुठून तरी एक काळी सिट्रॉन कार येऊन थांबली. कारमधून साध्या कपड्यातली – पण गेस्टॅपो या जर्मन गुप्तहेर संघटनेत असलेली – चार माणसं खाली उतरली आणि जवळच्या झुडपात शिरली. न्यूटन बंधूंनी लगेच संधी साधली आणि ताबडतोब, पण काळजीपूर्वक, त्या गाडीच्या बुडाशी स्फोटकं चिकटवून दोघेही जवळच्या टेकाडापलिकडे जाऊन लपले, वाट बघत.

ते चौघे गेस्टॅपो अधिकारी थोड्याच वेळात परतले आणि कारमध्ये बसले. पुढं काय घडलं ते न्यूटन बंधूंच्याच शब्दात सांगायचं झालं तर – “अचानक कानठळ्या बसवणारा आवाज झाला आणि ती सिट्रॉन हवेत उचलली गेली. धुरानं आसमंत भरून गेला आणि ती हवेतच गिरकी घेऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. कारमध्ये काहीही हालचाल दिसली नाही.  कण्हणं, किंचाळ्या काहीच ऐकू आलं नाही.”

जुळे बंधू नाझींशीच लढत होते असं नाही. काही वाट चुकलेल्या फ्रेंच व्यक्तींनी केलेल्या दगाबाजीशी आणि ( एस ओ ई मध्ये ) घुसलेल्या हेरांशीही त्यांना सामना करावा लागत होता. ४ एप्रिल १९४३ रोजी नशिबानं त्यांची साथ सोडली. लीऑनमधल्या ( Lyon ) एका घरात दगाबाजीनं तीन विश्वासू मित्रांसमवेत दोघेही पकडले गेले.

त्यांच्या अभियान अहवालात त्यानी त्या घटनेचं वर्णन दिलं आहे: “जवळजवळ पंधरा एक गेस्टॅपो आरडाओरडा करत घरात घुसले. सरळ आमच्या खोलीत. आमच्याकडं पिस्तुलं होती पण लहानश्या खोलीतल्या भाऊगर्दीत आम्ही ती वापरू शकलो नाही. खोलीतल्या अंधारात आम्ही दोघे १५ गेस्टॅपोंशी भिडलो. गर्दन पकडत, मोडक्या खुर्च्यांचे ‘अवयव’ दंडुक्यांसारखे फिरवत ही झटापट जेमतेम पाच एक मिनिटं चालली असेल. आम्हाला गिरफ्तार केलं त्यांनी.”

युध्द संपलं होतं त्यांच्यापुरतं आणि त्याचबरोबर त्यांचं जिवंत असणं देखील बहुतेक संपलं होतं.

“टिकून राहण्यासाठी धडपड”


अल्फ्रेड आणि हेन्री या दोघांना लीऑन मधल्या गेस्टॅपोच्या मुख्य कचेरीत नेण्यात आलं. पुढचे सहा आठवडे त्यांना SS ( Schutzstaffel – Protective Echelon ) या नाझी रक्षक दलाचा प्रमुख गेस्टॅपो ऑफिसर क्लाऊस बार्बीच्या – जो पुढं ज्यू आणि फ्रान्सच्या प्रतिकारी दलाचे मेंबर्स यांच्या  त्यानं केलेल्या हत्याकांडासाठी ‘लीऑन्सचा खाटिक’ म्हणून कुप्रसिध्द झाला –  प्रश्नोत्तराला आणि अमानुष मारहाणीला तोंड द्यावं लागलं.

पण न्यूटन बंधूनी हार मानली नाही की ते झुकले नाही. त्यांना नंतर पॅरिस इथल्या फ्रेस्नेस या  तुरुंगात पाठवण्यात आलं. तिथलं जिणं तर जास्तच खडतर होतं. मिळणारा शिधा जगण्यासाठी पुरेसा नव्हता. फक्त न मरता अस्तित्वात राहण्यासाठी इतपतच होता.

(SS ऑफिसर क्लाऊस बार्बी – युध्द संपल्यानंतर बोलिव्हियामधून हद्दपार केलेले असतानाचा फोटो)

नोव्हेंबरच्या महिन्यात त्यांना पॅरिसच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या नं ८४ अव्हेन्यू फॉख या या इमारतीत नेण्यात आलं. या इमारतीबद्दल लोकांच्या मनात धास्ती भरलेली होती कारण तिथे SS नाझी ऑफिसर्स एस ओ ई च्या पकडलेल्या लोकांची क्रूरपणे उलटतपासणी करत असत. पण एव्हाना न्यूटन बंधूंना पकडल्याला सात महिने होऊन गेले होते त्यामुळे दोघांपैकी कुणाकडेही नाझींच्या उपयोगाला येईल अशी नवी माहिती नव्हती.

“छळणूक छावणीतलं जीवन”


अखेर १९४४ च्या जानेवारी महिन्यात जनावरांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रकमध्ये कोंबून दोघांची बुखेनवाल्डच्या छळणूक छावणीत पाठवणी करण्यात आली. हिमवर्षाव, बोचरी थंडी, गोठून टाकणारं  तापमान यात तीन दिवसांचा भयानक प्रवास होता तो.

त्यांच्या अहवालात त्या छावणीत सुरुवातीला कसं काम करावं लागे त्याचं वर्णन केलेलं आहे.
“आम्ही बर्फ आणि चिखल यांच्या रबरबाटात खाणीतून दगड वाहून आणत होतो. अंगावर पुरेसे कपडे नसायचे आणि पायात लाकडी फळकुटे कॅनव्हासच्या पट्टयानी बांधून केलेली पादत्राणं असायची. फ्रेस्नेसच्या तुरुंगात किती तरी महिने एका कोठडीत बंद होतो, बाहेरची  ताजी हवा घ्यायला जाता येत नव्हतं. त्यामुळं आत्ताचं हे (कंबरतोड) काम आणि कमालीची थंडी असह्य वाटायची.”

उन्हाळा आला, तसं बरोबरच्या काही कैद्यांच्या वशिल्यामुळं त्यांना जरा साधी, खोलीतच करायची कामं दिली गेली. त्यात सरावले गेले तरी त्रास होताच. तो काही चुकला नाही.

अशात एस ओ ई चे व फ्रान्सच्या प्रतिकारी दलाचे आणखी ३७ जण छावणीत आले. त्यामुळं जरासा उत्साह आला. पण एके दिवशी त्यांच्यापैकी १६ जणांना छावणीच्या मुख्य दाराशी जायला सांगितलं आणि नंतर ते परत आले नाहीत अन् कधी दिसलेही नाहीत. महिन्याभरात न्यूटन बंधू धरून फक्त पाच ब्रिटिश ऑफिसर शिल्लक राहिले.

मार्च महिन्याच्या अखेरीस पाचांपैकी एकाला मुख्य दाराशी जाण्याचा हुकूम देण्यात आला. आधीच्या सोळा जणांचं जे झालं तेच व्हायचं होतं त्याचं – तळघरातल्या छताला अडकवलेल्या आकड्याला लटकवून घेऊन फासावर जाणं. युध्द समाप्तीची वेळ येत चालली तेव्हा अल्फ्रेड आणि हेन्री यांची खात्री पटली की आता लवकरच आपल्यालाही मुख्य दाराकडे जायचं फर्मान निघणार. तेव्हा छावणीच्या भोंग्यातून त्यांची नावं पुकारली जायची तेव्हा ते लपून बसायला लागले.

आणि अचानक एके दिवशी अमेरिकन सैनिक छावणीत घुसले.

“युध्दसमाप्तीनंतरचं आयुष्य”


थोड्याच दिवसात जुळे बंधू ब्रिटनमध्ये परतले. कसोटीचा काळ संपला. फ्रान्समध्ये त्यांनी केलेली कामगिरी आणि दोन वर्षांच्या कैदेत दाखवलेली सहनशक्ती याबद्दलच्या  पारितोषिकादाखल दोघांनाही एम् बी ई ( मेंबर ऑफ एक्सलंट ऑर्डर ऑफ ब्रिटिश एंपायर ) हा सन्मान देण्यात आला. दोघांनाही त्याचा आनंद झाला. पण बाकीच्या कैद्यांचं हौतात्म्य / त्याग ते विसरू शकत नव्हते. आणि अर्थातच या सगळ्यापेक्षा त्यांना त्यांच्या कुटुंबियांची आठवण प्रकर्षानं येत राहिली. परिणामस्वरूप त्या दोघांच्याही स्वभावाचा एकाकीपणा आणि खिन्नता हा स्थायीभाव बनून राहिला.

ब्रिटनमधल्या जीवनात सामावून जायचा प्रयत्न करताना सुरुवातीला अल्फ्रेड आणि हेन्री दोघांनीही ट्रेंट नदीवरील स्टोक (Stoke-on-Trent) या गावात रेड टेप ( नाइट ) क्लब चालवला. अल्फ्रेडनं नंतर बी. ओ. ए. सी. ( British Overseas Airways Corporation )च्या लंडन ऑफिसात व्यावसायिक आणि प्रतिष्ठित लोकांसाठी विमान प्रवासाची आखणी करण्याचं काम स्वीकारलं. चेल्सी इथं एक घर घेऊन तिथं राहायला लागला. डोरिसबरोबर सन १९५२ मध्ये त्यानं लग्न केलं आणि दोघेही लंडन सोडून स्टेन्स इथं स्थायिक झाले. तिथं त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला. हेन्रीला तोपर्यंत पूर्णपणे अधू झालेला असल्याबद्दल निवृत्तीवेतन मिळायला सुरुवात झाली होती. ईशान्य (नॉर्थ ईस्ट) लंडनमधल्या वाल्थॅम्स्टॉ इथं राहून तो टेरियर कुत्र्यांची पैदास आणि जाजम बनवण्याच्या व्यवसायात रमला. सन १९५४ मध्ये त्यानं मार्गारेटबरोबर लग्न केलं.

तिकडे अल्फ्रेडच्या प्रकृतीच्या कुरबुरी वाढत चालल्या होत्या. तो आणि डोरिस न्यूझीलंडला गेले, नंतर काही दिवस स्पेनमध्ये राहिले आणि अखेर सन १९७०च्या मध्याला  परत ब्रिटनमध्ये मिडलसेक्स परगण्यात येऊन स्थायिक झाले. तिथं अल्फ्रेड सर्वसंगपरित्याग केल्यासारखा सदैव एकांतवासातच राहायला लागला. अखेर ६ जुलै १९७८ या दिवशी तो केंट, अ‍ॅशफोर्ड  इथल्या शुश्रूषागृहात वयाच्या ६४ व्या वर्षी मरण पावला.

युध्दकाळातल्या त्रासामुळं हेन्रीच्या मनावर झालेल्या जखमा खोल होत्या; त्यामुळं तो कायम चिंताग्रस्त असायचा. त्याच्याही ढासळत्या प्रकृतीमुळं ( उपचारांसाठी ) इथून तिथं अशा प्रवासात पहिल्यांदा केंटमधल्या हर्नी बे इथं, मग स्पेनमध्ये अलिकांटे, असं त्याचं स्थलांतर होत गेलं. आणि अखेर अलिकांटे इथंच वयाच्या ७६ व्या वर्षी, १६ जानेवारी १९८० मध्ये त्यानं अखेरचा श्वास घेतला.

युद्धसमाप्तीनंतर ‘अलाइड’ सेनेचे युरोपमधील सर्वेसर्वा जनरल ड्वाइट डी आयसेनहॉवरनी उद्गार काढले होते : “एस ओ ई आणि फ्रेंच प्रतिकारी गट यांनी युध्दकालात जे कार्य पार पाडलं त्याच्याचमुळं हे महायुद्ध नऊ महिने आधी संपलंय.” नऊ महिने! युध्दात हा फार मोठा काळ असतो. विशेषत: किती माणसांचे जीव वाचले त्याचा विचार केला तर! आणि या कार्यात एस ओ ई कडून अल्फ्रेड न्यूटन आणि हेन्री न्यूटन या ‘जुळ्या बंधूंनी’ नक्कीच मोलाचं योगदान दिलं आहे.

***
मूळ लेखक : पीटर जेकब्स
 
मुक्त अनुवाद : मुकुंद कर्णिक 
karnik.mukund@gmail.com

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...