रत्नगड म्हणले तर बहुतेक दुर्गप्रेमींना रत्नागिरीचा रत्नदुर्ग आठवेल किंवा भंडारदरा या सुप्रसिध्द पर्यटनस्थळाजवळचा रतनगड आठवेल.मात्र या नावाचा गड रायगड जिल्ह्यात पेणजवळ आहे, हे बहुतेकांच्या गावीही नसते. गुगलवर रत्नगड असं शोधायला जरी गेलं तरी भंडारदऱ्याचा मुकुटमणी असणाऱ्या रतनगडाचीच भरभरून माहिती मिळते आणि रत्नगडाबद्दल मात्र निराशाच हाती पडते. चला तर मग जाणून घेऊन अशा या अल्पपरिचित रत्नगडाबद्दल.
रायगड जिल्ह्यातील पेण शहर येथे बनविल्या जाणाऱ्या गणपतीच्या मुर्तींमुळे संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. या पेण शहराच्या पुर्वेला महालमिऱ्या डोंगररांग पसरली आहे. पेण-खोपोली हा प्राचीन व्यापारी मार्ग या डोंगररांगेतुन जात असल्याने त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या डोंगररांगेच्या दक्षिणेला सोनगिरी उर्फ मिरगड हा किल्ला तर पुर्व टोकाला रत्नदुर्ग किल्ला बांधला गेला. किल्ल्याचा आकार व वरील अवशेष पहाता या किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी केला जात असावा. मिरगड आणि रतनगड उर्ग रत्नदुर्ग किल्ल्याच्या मध्ये एक खिंड आहे. पेण - खोपोली हा प्राचीन व्यापारी मार्ग या खिंडीतून जात होता.किल्ल्या वरील पाण्याची टाकी पाहाता हा किल्ला सातवहान कालिन असावा.
पेण तालुक्यात रत्ना नदीच्या काठी रत्नगड हा छोटासा किल्ला लपला आहे. स्थानिक लोक मात्र याला रतनगड या नावानेच ओळखतात. नगर जिल्ह्यातील प्रवरे काठचा रतनगड पाहण्यासाठी पूर्ण एक दिवस हाताशी हवा मात्र पेण जवळील या छोट्या रतनगडाला भेट देण्यासाठी अर्धा दिवस देखील पुरेसा आहे. कारण समुद्रसपाटी पासून रत्नगडाची उंची १३८० फुट असून पायथ्यापासून हा किल्ला फक्त ६५० फुट उठवला आहे. तसेच या डोंगरावर याला किल्ला म्हणावे असे बुरुज, तटबंदी किंवा दरवाजे असे कोणतेही महत्वाचे अवशेष नाहीत.हा छोटेखानी अपरिचित किल्ला मुंबई पुण्याहून एका दिवसात पाहात येतो. वेळेचे काटेकोर नियोजन केल्यास हा किल्ला व जवळच असलेला सोनगिरी उर्फ मिरगड हा किल्लादेखील पहाता येतो.
किल्ल्याच्या इतिहासात डोकावल्यास याचा उल्लेख खुप कमी येतो.परंतु किल्ल्यावरील खडकाच्या आतील बाजुस खोदलेली पाण्याची टाकी पहाता हा किल्ला सातवहानकालीन असावा असे वाटते पण गावकरी हा किल्ला बाबुराव पाशिलकर (बाजीराव पासलकर?) यांनी बांधल्याचे सांगतात. शिवकालात मराठ्यांनी हे गड सन १६५७ च्या सुमाराला अखत्यारीत आणले. इ.स.१६६२ मध्ये मुघल सरदार नामदारखान याने शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळी पेण परिसरावर हल्ला केला असता मिरगडच्या परिसरात झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी भाग घेतल्याचे उल्लेख येतात. मुघलांकडून हा किल्ला घेण्याचा प्रयत्न झाला असता गडाचा किल्लेदार कावजी कोंढाळकर याने तो हाणून पडला. यानंतर किल्ल्याचे उल्लेख येतात ते पेशवे-आंग्रे यांच्या पत्रव्यवहारातुन. मार्च १७४० दरम्यान बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे व चिमाजीअप्पा मानाजी आंग्रे यांच्या मदतीसाठी आले असता त्यांनी तुळाजी आंग्रे यांस कैद करून पाली, मिरगड हा भाग ताब्यात घेतला. त्यात १० एप्रिल १७४० उरुणचें ठाणें सर केल्याचें वर्तमान आलें. २९ एप्रिल १७४० फावडी किल्ला ता॥ रत्नगड जावजी मराठे यांनी सर केल्याचे वर्तमान आलें असे वाचनात येते.रत्नगडाचा हा किल्ला मिऱ्या-महल डोंगररांगेत येतो त्यामुळे ब्रिटीशांनी या डोंगराचा थंड हवेचे ठिकाण म्हणून वापर करावा असा विचार केला मात्र तो प्रत्यक्षात आला नाही.
पुण्यावरुन रत्नगडला जायचे असेल तर प्रथम खोपोली गाठावे. खोपोली-पेण रस्त्यावर पेणच्या साधारण ८ किलोमीटर आधी वाक्रूळ नावाचे गाव लागते. वाक्रूळ गावातून डावीकडील एक गाडी रस्ता आधी कामार्ली आणि मग पुढे गड पायथ्याच्या सायमाळ गावाकडे जातो. सायमाळ गावात गाडी रस्ता संपतो. येथून पुढे रत्नगडाच्या पायथ्याच्या काळभैरवाच्या मंदिरापाशी पोहोचण्यासाठी कच्च्या रस्त्यावरून २० मिनिटाची तंगडतोड करावी लागते.

तर मुंबईहून दोन मार्गाने किल्ल्या पायथ्याच्या सायमाळ गावात पोहोचता येते.
१) मुंबई - पनवेल - पेण - कामार्ली - वाक्रुळ फ़ाटा -सायमाळ (अंतर ८० किमी) . पेण एसटी स्थानकातून पेण - तिलोरे जाणार्या एसटी बसेस आहेत. पेण सायमाळ अंतर १७ किमी आहे. या बसने सायमाळ फ़ाट्यावर उतरुन १ किमी चालत आपण १० मिनिटात गावात पोहोचतो.
२) मुंबई - खोपोली - वाक्रुळ फ़ाटा - सायमाळ (अंतर ७७ किमी). खोपोली पेण रस्त्यावर बर्याच एसटी बसेस धावतात. त्याने वाक्रुळ फ़ाट्याला उतरुन पेण - तिलोरे बस पकडून सायमाळ फ़ाट्यावर उतरावे. (एसटीचे वेळापत्रक साईटवर दिलेले आहे.) वाक्रुळ ते सायमाळ अंतर ७ किमी आहे.सायमाळ हे किल्ल्याजवळील गाव मुंबईहुन ९० कि.मी. अंतरावर तर पुण्याहुन १०७ कि.मी.अंतरावर आहे. सायमाळ गावात जाण्यासाठी मुंबईहुन पनवेल-पेण- वाक्रुळ फ़ाटा– सायमाळ तर पुण्याहुन पेणकडे जाताना खोपोली-वाक्रुळ फ़ाटा-सायमाळ असा गाडीमार्ग आहे. वाक्रुळ ते सायमाळ अंतर ७ कि.मी. असुन खाजगी वहानाने थेट सायमाळ गावात पोहोचता येते.
सायमाळला जाण्यासाठी एसटीचे वेळापत्रक असे.
पेण ते सायमाळ- सकाळी 7.30,9.30,11.30,1.30,3.30,5.30,7.45(रात्र मुक्कामी)
सायमाळ ते पेण- 6.30,8.30,10.30,12.30,2.30,4.30,6.30
सायमाळ हे पेण तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले एक टुमदार गाव. या गावाच्या आजूबाजूस अनेक छोटे मोठे डोंगर उठवलेले आहेत. हे सर्वच डोंगर एक सारखे भासत असल्यामुळे गावातील एखादया माहितगार माणसास नेमका रतनगडाचा डोंगर कुठला किंवा रत्नाई देवीची मूर्ती कोणत्या डोंगरावर आहे हे विचारून घ्यावे.
सायमाळ म्हणजे ३५ घरांची वस्ती, एक प्राथमिक शाळा असलेले हे गाव किल्ल्याच्या समोर वसलेले आहे. गावाला खेटून रांजण नावाचा डोंगर आहे. सायमाळ रत्नदुर्ग किल्ल्यासमोर असलेल्या टेकडीच्या काठावर वसलेले असुन पुर्वी हे गाव रत्नदुर्ग किल्ल्याची पेठ होती.
गावात नव्याने बांधलेले गणपती मंदिर असुन येथे प्रसंगी १०-१२ जण मुक्काम करू शकतात. या मंदिराच्या मागील बाजुस असलेल्या दरीत पहिले असता या दरीतुन एक लहानसा डोंगर उठावलेला दिसतो. हा डोंगर म्हणजेच रत्नदुर्ग किल्ला होय. गड छोटा असला तरी गडावर कुणी जात नसल्याने पायवाटा नष्ट झाल्या आहेत त्यामुळे गावातुन शक्यतो वाटाड्या घेऊनच किल्ल्यावर जावे.
गणपतीचे दर्शन घेऊन गावातील प्राथमिक शाळेपाशी पोहोचावे. या ठिकाणी ओतीव तोफ़ेचा मागचा तुकडा पडलेला आहे. तोफ़ पाहून कच्च्या रस्त्याने रतनगडाच्या दिशेला चालत निघावे. सायमाळ गाव आणि रतनगड यांच्या मध्ये दरी आहे. कच्चा रस्ता दरी पर्यंत जातो. पुढे पायवाटेने आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. गावापासून किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जाण्यास १० मिनिटे लागतात.
पायथ्या पासून १० मिनिटे चढून गेल्यावर गावदेवीचे १९८० मध्ये बांधलेले मंदिर आहे. मंदिरात दोन बाजूस दोन शीळा आणि मधे भैरवाची दगडी मूर्ती आहे. मंदिरा बाहेर झिजलेली मुर्ती ठेवलेली आहे. मंदिरात ३ मुर्ती आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूने मागे जाऊन किल्ला चढायला सुरुवात करावी. किल्ल्यावर गावकर्यांचा वावर नसल्याने पायवाटा ठळक नाही.
किल्ल्यावर झाडी भरपूर असल्याने पायवाटा पाचोळ्या खाली झाकलेल्या आहेत. काही ठिकाणी मुरुमामुळे तीव्र घसारा आहे.
हे सर्व पार करत तीव्र चढ चढून अर्ध्या तासात आपण सपाटीवर पोहोचतो. पायथ्यापासून किल्ल्याची उंची जरी कमी असली तरी कोकणातील दमट वातावरणात ही खडी चढाई चांगलाच घाम काढते.
पठारावरुन थोडेसे वर चढून गेल्यावर पायवाटेने माथ्यावर जाताना आधी किल्ल्याच्या मुख्य उंचवट्यामधे कातळात खोदलेले एक पाण्याचे टाके लागते. या टाक्यातील पाणी मात्र गवत व झाडी वाढल्याने पिण्यास योग्य नाही.
टाक पाहून किल्ल्याच्या सर्वोच्च टोकाकडे न जाता डाव्या बाजूने जाणार्या पायवाटेने वळासा घालून पुढे गेल्यावर कातळात खोदलेले दुसरे टाक दिसते, हे टाक कोरडे आहे. पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या खाचा आहेत.
त्यातून जपून खाली उतरल्यावर पाण्याच मोठे टाक आहे. हे टाक पाण्याने भरलेले आहे पण पाण्याचा उपसा नसल्याने पाणी पिण्यायोग्य नाही. हे टाक भरल्यावर पाणी बाहेर जाण्यासाठी पन्हाळी दगडात कोरलेली आहे.

या पन्हाळीच्या खालच्या बाजूला चौथे टाक आहे, ते पाहाण्यासाठी तिसर्या टाक्याच्या पुढे असलेला १० फ़ूटी कातळ टप्पा (रॉक पॅच) उतरुन जावे लागते. त्यासाठी गिर्यारोहणाचे तंत्र अवगत असणे आणि सोबत रोप असणे आवश्यक आहे. चौथे टाक कोरडे आहे. ते पाहून आलेल्या मार्गाने जपून वर चढून पहिल्या टाक्यापर्यंत यावे. येथून गड माथ्यावर जाण्यासाठी वाट आहे.
टाक पाहून पुढे गेल्यावर आपण रत्नगड आणि किल्ल्याचा डोंगर यामधील खिंडीच्या बाजूला येतो. या ठिकाणी कातळात कोरलेले गोल खळगे (पॉटहोल्स) दिसतात. या ठिकाणी बसून टेहळणी करणार्या टेहळ्यांचे उन पाऊसा पासून संरक्षण करण्यासाठी या पॉटहोल्स मध्ये लाकडी खांब रोवून त्यावर गवताचे छप्पर घातले जात असे. या ठिकाणाहून सायमाळ गावच्या बाजूचा रांजण डोंगर, दुरवरची तिलोरे, डोलवली इत्यादी गावे दिसतात.
टाक्याकडून एक वाट सरळ उतरत जाते तर दुसरी वाट किल्ल्याच्या माथ्याकडे जाते. या दुसऱ्या वाटेने किल्ल्याची उध्वस्त तटबंदी पार करत आपला ५ मिनिटात किल्ल्याच्या ढासळलेल्या तटबंदीतून आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो.
माथ्यावर पोहोचतो. या तटबंदीवर एक दगडी पन्हाळी पडलेली आहे. सायमाळ गावातुन माथ्यावर येण्यासाठी १ तास पुरेसा होतो. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ११६० फुट असुन किल्ल्याचा गोलाकार माथा साधारण अर्धा एकर आहे.
माथ्यावर पोहोचताच समोर नजरेस पडते ती रत्नाई देवीची उघड्यावर असलेली मूर्ती. जवळच एक शिवपिंड देखील आहे. या दोन्हीही देवतांच्या मुर्त्या ऊन व वारा यांचा आघात सहन करत भग्न अवस्थेत पडलेल्या आहेत.हे पाहुन आपण तटबंदी चढुन आलो त्या वाटेच्या पुढील बाजुस दुसरी वाट खाली उतरतांना दिसते. हि वाट आपण खाली पाहिलेल्या टाक्याकडून पुढे जाणाऱ्या वाटेस मिळते.
| किल्ल्याच्या पश्चिमेकडील कातळात असणारे एक भुयार. गावकऱ्यांच्या मते हे भुयार आत एका गुहेत उघडते व तिथे बरेच लोकांना बसण्याची जागा आहे. |
| किल्ल्याच्या पश्चिमेकडील कातळात एक थंड पाण्याचे टाके आहे. तिकडे जाणारी हि वाट थोडी अरुंद व निसरडी आहे. |
पश्चिमेकडे थोडं खाली उतरलं कि एक भुयार दिसते. गावातील वाटाडयाच्या मते या भुयारात पुढे मोठी गुहा असून आत बसण्यासाठी कट्टे देखील आहेत.
या भुयाराजवळून डाव्या हातास थोडे अजून खाली उतरले की कातळात खोदलेले एक पिण्यायोग्य पाण्याचे टाके लागते. हे टाके अगदीच डोंगरकडयात खोदलेले आहे त्यामुळे टाक्यापर्यंत जाणारी वाट थोडी अरुंद व धोकादायक आहे. पाण्याची गरज असेल तरच योग्य काळजी घेऊन खाली उतरावे.
पण थोडासा धोका पत्करून या टाक्यापर्यंत येण्याचे श्रम मात्र नक्कीच सार्थकी लागतात. कारण या टाक्यात आहे नितळ आणि फ्रीजसारखे थंडगार पाणी.इथेच आपली गडफेरी पूर्ण होते. त्यामुळे टाक्यातील थंडगार पाणी पिऊन थोडी विश्रांती घ्यायची आणि सभोवताल नजर फिरवायची. किल्ल्याच्या पश्चिमेला दरीपलीकडे मिऱ्याचा डोंगर उठवलेला आहे तर समोर कामार्ली गावाजवळचे हेटवणे धरण दिसते. वातावरण स्वच्छ असल्यास उत्तरेला दूरवर माणिकगड दिसतो. जवळच असणारे अनेक कौलारू घरांचे कोकणातील टुमदार सायमाळ गाव माथ्यावरून खूप सुंदर दिसते.



संदर्भग्रंथ :-
१) रायगड जिल्हा गॅझेटीयर
२) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
३) रायगड जिल्ह्याची दुर्गजिज्ञासा” – श्री. सचिन जोशी
४) शोध शिवछत्रपतीच्या दुर्गांचा -सतिश अक्कलकोट
५) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
६) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे
७) www.durgbharari.in हि वेबसाईट
८) www.trekshitiz.com हि वेबसाईट
९) श्री. विनीत दाते, श्री विराग रोकडे यांचे लिखाण
२) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
३) रायगड जिल्ह्याची दुर्गजिज्ञासा” – श्री. सचिन जोशी
४) शोध शिवछत्रपतीच्या दुर्गांचा -सतिश अक्कलकोट
५) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
६) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे
७) www.durgbharari.in हि वेबसाईट
८) www.trekshitiz.com हि वेबसाईट
९) श्री. विनीत दाते, श्री विराग रोकडे यांचे लिखाण
No comments:
Post a Comment