Monday, March 1, 2021

रामगड (Ramgad)

 निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मनमोहक पर्यटन स्थळे आहेत.याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्लेही तितकेच देखणे आहेत.वास्तविक किल्ला हे लष्करी संरक्षक ठाणे असते.त्यामुळे त्याची उभारणी लढाउ व युध्दाला सोयीची अशी केली जाते.मात्र सभोवतालच्या रम्य निसर्गामुळे एखाद्या चित्राचे देखणेपण लाभलेले काही किल्ले महाराष्ट्रात आहेत.रामगड त्यापैकी एक.
     सह्याद्रीच्या डोंगररांगेत उगम पावणारी गड नदी अखेरीस सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ समुद्राला मिळते. नदीच्या या प्रवाहावर उगमापासून ते संगमापर्यंत वेगवेगळ्या काळात लहानमोठे किल्ले बांधले गेले. यात उगमाजवळ भैरवगड-सोनगड, पुढे रामगड, त्यानंतर दोन्ही काठावर भरतगड-भगवंतगड तर संगमावर सर्जेकोट बांधलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ला वगळल्यास या भागातील इतर किल्ल्यास सहसा कोणीही भेट देत नसल्याने हे किल्ले ओस पडले आहेत. 

     रामगडाच्या पायथ्याचे गाव गडाच्याच नावचे म्हणजे रामगड हे आहे. रामगड गाव सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात आहे. कणकवली व मालवण दोन्ही कडून रामगडला जाण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध आहेत.रामगड हे पायथ्याचे गाव असुन कणकवली हे जवळचे शहर आहे. मुंबईहुन कणकवली अंतर ४४० कि.मी.असुन येथुन कणकवली –आचरा मार्गाने आपण १२ कि.मी. असलेल्या रामगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. 
१) रामगड कणकवलीहून १२ किमी वर आहे. कणकवलीहून मसूरे, आचरा मार्गे मालवण, देवगडला जाणार्‍या बसेसनी रामगडला जाता येते.
२) रामगड मालवणहून २९ किमी वर आहे. मालवणहून आचरामार्गे कणकवलीला जाणार्‍या बसेसनी रामगडला जाता येते. खाजगी गाडीने मालवण -चौके - बागायत - मसदे - बेळणा - रामगड यामार्गेही जाता येते.
    आचरा-कणकवली रस्त्याला लागुनच हा छोटासा पण नितांत सुंदर दुर्ग उभा आहे.आचरा कणकवली रत्स्यावर त्रिंबक्,श्रावण अश्या वेग़ळ्याच नावाची गावे लागतात.हि ओलांडत आपण रामगड या गावी पोहचतो.गडाच्या पायथ्याशीच गाव वसला आहे.
गावातूनच किल्ल्याचे पहिले दर्शन घडते, रामगडच्या बाजारपेठेतूनच किल्ल्याकडे जाणारी पायवाट जाते. ५ मिनिट चालल्यानंतर उजव्या हाताला जाणाऱ्या पायवाटेने चढत वर गेल्यावर एक पाण्याची टाकी लागते तेथून सरळ वर वर चढत गेल्यावर आपण १५ मिनिटात पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारात पोहचतो. गडाच्या पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश करतो. गडाचे प्रवेशद्वार ८ फुट उंच आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला १८ फूट उंच बुरुज आहेत. 
दोन्ही बुरुज दरवाज्यापासून १० ते १५ फुटापर्यंत आल्यामुळे हा मार्ग दोन बुरुजांच्या मधून जातो. हा मार्ग पुर्णपणे बुरुजांच्या मार्‍यात असल्यामुळे प्रवेशद्वाराला चांगले संरक्षण लाभले आहे.शिवनिर्मित दुर्गाचे वैशिष्ट्य असणारा हा गोमुखी बांधणीचा दरवाजा. प्रवेशद्वार अद्याप चांगल्या अवस्थेत आहे.रामगडाच्या तटबंदीची उभारणी जांभा दगडात केली आहे.बांधकाम शैली बघीतली तर चुना अगर इतर दर्जा न वापरता चिरे रचलेले दिसतात.
दरवाजासमोर ५-६ पायऱ्या बांधल्या असुन उभे रहाण्यासाठी फारशी जागा नाही. हा दरवाजा दोन बुरुजांमध्ये वळण देऊन बांधलेला असुन आत शिरण्यासाठी अतिशय चिंचोळा मार्ग ठेवला आहे.
 या दरवाजाच्या कमानीतील एक दगड कोसळण्याच्या स्थितीत असुन वेळीच आधार न दिल्यास हा पुर्ण दरवाजा ढासळून जाईल. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला पहारेकर्‍यांसाठी देवड्यांची योजना केलेली आहे. प्रवेशद्वारातून गडमाथ्यावर प्रवेश करताना दरवाज्याच्या माथ्यावर जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या दिसतात.दरवाज्याच्या कमानीवर उभा राहील्यास झाडीभरला रामगडाचा माथा आणि अनेक घरे व वाड्यांचे अवशेष दिसतात. बुरुजावर तसेच तटावर बंदुका व तोफांचा मारा करण्यासाठी जंग्या व झरोके बांधलेले आहेत. 
गडाची तटबंदी साधारण १२ ते १५ फुट उंच असुन फांजीची रुंदी ४-५ फुट आहे. फांजीवर चढउतार करण्यासाठी काही ठिकाणी पायऱ्या बांधल्या आहेत. फांजीवरून संपुर्ण गडाला फेरी मारता येईल पण सध्या त्यावर वाढलेल्या झाडीमुळे हे शक्य होत नाही. गडाचा एकुण परिसर साधारण ७ एकर असुन गडमाथा तीन एकरवर तर माचीकडील भाग ४ एकरवर पसरलेला आहे.बालेकिल्ल्याचा दरवाजा पाहून  डाव्या बाजुला निघाल्यावर केवळ पन्नास फुटावर दुसरा दरवाजा आहे ,हा दरवाजा माचीवर उघडतो.हि माची टेकडीच्या उतारावर बांधली असून ती थेट नदीच्या किनार्‍यापर्यंत उतरत गेली आहे.या दरवाजाला गोलाकार कमान असुन आतील एका बाजुस पहाऱ्याची देवडी आहे. दरवाजाबाहेर २ फुटावर आडवी भिंत बांधलेली आहे. हा गडाचा मुख्य मार्ग नसुन माचीवरून गडात येण्याजाण्यासाठी बांधलेला दरवाजा आहे. 
या दरवाजाबाहेर तटबंदीला लागुन दुसरी तटबंदी थेट नदीकाठी उतरली आहे. या दरवाजाने खाली उतरत गेल्यास या तटबंदीत असलेले असलेले गडाचे दोन बुरुज पहायला मिळतात. या शिवाय गडाची दुसरी बाजुदेखील तटबंदी व दोन बुरुजांनी बंदीस्त करण्यात आली आहे. गडाची नदीकाठी असलेली तटबंदी व या तटबंदीत असलेला गडाचा पहिला दरवाजा आज पुर्णपणे नामशेष झाला आहे. बालेकिल्ल्यातील दरवाजाने माचीवर उतरणे कठीण वाटल्यास गड उतरून नदीच्या दिशेने जाणाऱ्या वाटेने गडाच्या माचीवर जाता येते. माचीवर देखील मोठया प्रमाणात झाडी वाढली असुन तटबंदी वगळता इतर कोणतेही अवशेष दिसत नाहीत. उतरत आलेल्या दोन्ही बाजुच्या तटबंदीत कोठेही दरवाजा नाही.




    कोकणातील खाडीकाठी असलेल्या बहुतांशी किल्ल्यांची रचना एकसमान दिसुन येते ती म्हणजे टेकडीवर असलेला मुख्य किल्ला व तेथुन थेट खाडीच्या काठापर्यंत आलेली तटबंदी. गोपाळगड, जयगड, विजयगड, यशवंतगड, रामगड, देवगड या किल्ल्यात हि रचना दिसुन येते. रामगड हा किल्ला असाच दोन भागात विभागलेला असुन टेकडीवर बालेकिल्ला व खाडीकाठी परकोट अशी याची रचना आहे. रामगडावर एतिहासिक काळात राबता असेल तेव्हा या गड नदीचा जलवहातुकीसाठी उपयोग केला जात असणार .मुळात नदीला गड हे नाव पाण्यासाठी रामगडच कारण आहे.या नदीतून उतरले कि थेट माचीवर गड चढणे अशी हि योजना आहे,शिवाय सर्व बाजुने तटबंदी व माची यामुळे गडाला वेढा घालणे अशक्य आहे.हि सर्व शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या दुर्गबांधणीची वैशिष्ट्ये आहेत.
      गडाच्या नदीकाठी असलेल्या भागाचा कोठेही उल्लेख नसल्याने येथे आलेले दुर्गप्रेमी केवळ गडमाथा पाहुन आपली दुर्गफेरी पुर्ण करतात पण नदीकाठी असलेला हा भाग पाहील्याशिवाय आपली दुर्गफेरी पूर्ण होत नाही. 
 माची पाहून पुन्हा बालेकिल्यावर आलो कि दरवाजाकडून पुढे जाताना डावीकडील उंचवट्यावर एक समाधीवजा चौथरा दिसतो. 
या चौथऱ्यावर वारूळ वाढलेले असुन चौथऱ्याखाली असलेल्या पायऱ्या मातीत गाडलेल्या आहेत. हा चौथरा वेताळाचे ठिकाण म्हणुन ओळखला जातो. येथुन पुढे जाताना डावीकडील तटावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असुन संपुर्ण तटबंदी त्यात झाकुन गेली आहे तर उजवीकडील झाडी इतकी दाट आहे कि आत शिरता येत नाही. पुढे जाऊन वाट वाट डावीकडे वळते. या वळणावर एक मोठा बुरुज असुन त्यावरील झाडी विरळ असल्याने बुरुजावर जाता येते. या बुरूजावरून गड नदीचे पात्र नजरेस पडते. 

येथुन पुढे आल्यावर आपण होळींच्या माळावर पोहोचतो. वाटेच्या डावीकडे एका रेषेत उलट पुरलेल्या सात लहानमोठया तोफा पहायला मिळतात. या सर्व तोफांचे कान म्हणजे बत्ती देण्याची जागा लोखंडी मेखा मारून बंद करण्यात आली आहे.त्यातील सर्वात मोठी तोफ ७ फूट लांबीची आहे.  
वाटेच्या उजवीकडे झाडीत लपलेले एक मोठे जोते असुन तोफांसमोर ७ फुट उंचीचे एक मोठे तुळशी वृंदावन आहे. हे तुळशी वृंदावन म्हणजे समाधी असावी. भगवंतगडावरील तुळशी वृंदावनाची आठवण करून देणाऱ्या या वृंदावनात सध्या तुळशी ऐवजी मोठे झाड उगवले आहे. वेळीच हे झाड न काढल्यास पडझड झालेले हे वृंदावन नष्ट होईल.

    तोफांसमोरच किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे.दोन बुरुजांच्या आधारे बांधलेला गडाचा उत्तराभिमुख दरवाजा गोमुखी बांधणीचा आहे. या दरवाजाचा आकार व गोमुखी बांधणी पहाता कधी काळी गडावर प्रवेश करण्याचा हा राजमार्ग असावा पण आता याच्या बाहेरील बाजुस वाटेवर इतकी काटेरी झाडे वाढली आहेत कि आपण ८-१० फुट देखील खाली उतरू शकत नाही. प्रवेशद्वारा बाजूच्या बुरुजांचे चिरे ढासळल्यामुळे प्रवेशद्वारातून रामगड गावातील होळीवाडीत जाणारा मार्ग बंद झाला आहे.
दरवाजाच्या दोन्ही बाजुस पहारेकऱ्यासाठी देवड्या असुन एका देवडीत तटावरून येण्यासाठी लहान दरवाजा आहे. दरवाजाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असुन वेळीच काळजी न घेतल्यास हा दरवाजा केव्हाही कोसळुन पडेल. या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताच्या तटबंदीवरुन गड नदीचा प्रवाह दिसतो.दरवाजा पाहुन झाल्यावर पुन्हा तोफांकडे यावे.
रामगडावरील वाड्याच्या पायऱ्या 

 येथे तुळशी वृंदावनाच्या मागे उजव्या बाजुस भिंत शिल्लक असलेली एक वास्तु आहे तर डावीकडे गडावरील चौसोपी वाडा आहे.  या वाडयाच्या चारही बाजुस असलेल्या सोपा व भिंती आजही शिल्लक असुन पुर्वाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजाने वाडयात प्रवेश करताना दरवाजात दोन्ही बाजुस जोत्यावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. 
या शिवाय मागील भिंतीत देखील वर जाण्यासाठी पायऱ्या असुन या पायऱ्यांसमोर भंगलेल्या कोनाडयात कोरीव गणेश मुर्ती ठेवली आहे. 
तांत्रिक गणपती

या मुर्तीच्या आसनाखाली सात मानवी कवट्या कोरलेल्या असुन गळ्यात नरमुंडमाळ आहे. गणेशची हि आगळीवेगळी मुर्ती इतर कोठे पहायला मिळत नाही.तांत्रिक गणपती स्वरूपातील महाराष्ट्रातील एकमेव मूर्ती आहे
 वाडयाच्या आवारात जांभ्या दगडात बांधलेले तुळशी वृंदावन आहे. तीन बाजुने वर जाणाऱ्या या पायऱ्या व वाडयाच्या भिंतीची जाडी पहाता हा वाडा दुमजली असावा. या शिवाय वाडयाच्या दरवाजासमोर उजव्या बाजुस तटाला लागुन एक वास्तु बांधलेली आहे. येथे तटावर जाण्यासाठी दोन ठिकाणी पायऱ्या आहेत. वाडा पाहुन झाल्यावर आपण गडावर प्रवेश केलेल्या ठिकाणी यायचे. या दरवाजापासुन उजवीकडे साधारण ५०-६० फुट अंतरावर गडाचा तिसरा दरवाजा आहे.  गडाच्या तटबंदीत एकुण १९ बुरुज असुन १५ बुरुज गडमाथ्यावर तर ४ बुरुज माचीवरील तटबंदीत आहेत. प्रत्येक बुरुजाला ३ दिशांना खिडक्या आहेत. बुरुजांच्यामध्ये १८ फूटी तटबंदी असून तीने पूर्ण किल्ल्याला वेढलेले आहे. तटबंदीची लांबी अंदाजे ६४० मीटर आहे. गडावर किल्लेदाराच्या वाड्याचा चौथरा आहे, पण पाण्याची विहीर अथवा तलाव आढळत नाही. गडाला बहुदा नदीतुन पाणीपुरवठा केला जात असावा. येथे आपली दुर्गफेरी पूर्ण होते. गडमाथा व माची फिरण्यासाठी दीड तास पुरेसा होतो.गावातील प्रभुदेसाई यांची खाजगी मालमत्ता असलेला हा किल्ला आता पुर्णपणे निसर्गाच्या ताब्यात आहे. 




सध्या या दुर्लक्षित गडाचा कायापालट करायचे दुर्गवीर या संस्थेने मनावर घेतले आहे.त्यांचे दुर्गसंवर्धनाचे कार्य ईथे सुरु आहे.त्यांना यश येउन रामगड आपल्या जुन्या वैभवाने मिरवायला लागेल अशी आशा करुया.


रामगडाच्या भेटीत आवर्जून पहावे असे आणखी एक ठिकाण म्हणजे गडाकडे जाताना डाव्या बाजुस लागणारे रवळनाथ मंदिर व त्यापुढे टेकाडावर असलेले मल्लिकार्जुन मंदिर . या मंदिरात कोरीव मुर्त्या असुन आवारात एक गजलक्ष्मी शिल्प,काही प्राचीन मुर्ती व अनेक विरगळ पहायला मिळतात. येथे समोरच शेत पार करून किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट आहे. 

       निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या गडाचा इतिहास मात्र फारसा माहिती नाही. रामगडची उभारणी शिवाजी महाराजांनी केल्याचे सांगीतले जाते पण याला कागदोपत्री कोणताही आधार नाही, शिवाय महाराजांच्या काळात असलेल्या गडकोटांच्या यादीत रामगडचे नाव दिसत नाही. तसेच भरतगडच्या डोंगरावर पाणी नसल्याने गड न बांधणारे महाराज पाण्याच्या सोयीशिवाय रामगड बांधतील हे शक्य वाटत नाही. गडाचे एकुण बांधकाम पहाता हा गड शिवपुर्वकाळात बांधला गेला असावा. गड नदीतून होणार्‍या व्यापारावर नियंत्रण ठेवण्याकरीता या गडाची उभारणी झाली असावी. विजयनगर साम्राज्याखाली हा प्रदेश असताना दुसरा देवरायाच्या कारकिर्दीत सन १४२६ मध्ये मराठीत कोरलेला शिलालेख रामगड येथे सापडला आहे.त्रिंबक गोसावी हा त्यावेळी अधिकारी होता.या शिलालेखाच्या आरंभी गणपती,शंकर यांना नमन केले आहे. 
रामगडाचे गोमुखी बांधणीचे प्रवेश्द्वार व माची लक्षात घेता या गडाची दुरुस्ती निश्चितच शिवछत्रपतींनी केली असली पाहिजे. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतही रामगडचा उल्लेख येत नाही. रामगडचा उल्लेख येतो तो थेट शाहु महाराज व रामचंद्रपंत आमात्य यांच्यात झालेल्या सन १७१०-१२ मध्ये झालेल्या करारात. कान्होजी आंग्रे किंवा त्यांचे पुत्र सेखोजी किंवा सेखोजी आंग्रे यांनी करवीरकरांकडून रामगड अक्धी आणि कसा घेतला यासबंधी काही माहिती मिळत नाही. सन १७५५ मध्ये नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांच्या सहाय्याने तुळाजी आंग्राविरुध्द मोहीम उघडली.पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यातील लढाईवेळी तुळाजीने रामगड जिंकून घेतला. तेव्हा पेशव्यांचे सरदार कृष्णाजी महादेव व सावंतवाडीकर यांचा जमाव खंडाजी मानकर यांनी एकत्र होउन फेब्रुवारी १७९६ मध्ये रामगड जिंकला. तर ६ एप्रिल १८१८ मध्ये कॅप्टन पिअरसनच्या नेतृत्वाखाली गड ब्रिटीशांनी जिंकून घेतला. १८६२च्या पाहणीनुसार रामगडावर २६ तोफा व १०६ तोफगोळे असल्याचा महत्त्वपूर्ण उल्लेख आहे. आज मात्र फक्त सातच तोफा पहायवयास मिळतात. याशिवाय गॅझेटीयरच्या उल्लेखाप्रमाणे गडाच्या बालेकिल्ल्यात किल्लेदाराच्या रहाण्याचा वाडा असून एक देवालय आहे.( यातच बहुधा गणपतीची मुर्ती असावी ) या देवालयाचे बांधकाम फार सुरेख असून ते औरस चौरस ३६ यार्ड आहे.  
    केवळ रामगड पहायला येण्यापेक्षा व्यवस्थित योजना आखून या परिसरातील सर्व किल्ले एकदम पहाता येतील. मालवणहून सकाळी निघून (१२ किमी) मसूरे जवळील भरतगड व भगवंतगड पाहून (१७ किमी) रामगडला जाता येते. तसेच रामगडहून ओवळीये गावातील (१० किमी) सिध्दगड पाहून कसाल मार्गे (३६ किमी) मालवणला येता येते. या मार्गाने हे ४ किल्ले एका दिवसात पाहून होतात.यातील मालवण ते मसूरे व मसूरे - रामगड बसेस आहेत. परंतू रामगड ते ओवळीये व ओवळीये ते कसाल जाण्यासाठी रामगडहून रिक्षा करावी लागते. कसाल - मालवण बसेस आहेत.

संदर्भः-

१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) गड्,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- सतिश अक्कलकोट
३) महाराष्ट्र देशातील किल्ले- श्री. चिंतामण गंगाधर गोगटे
४) www.trekshitiz.com   हि वेबसाईट
५ ) www.durgbharari.com  हि वेबसाईट
 




      
















No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...