Monday, March 1, 2021

यशवंतगड ( रेडी )

  महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांब किनारपट्टी लाभली आहे. या किनार्‍यावर असंख्य जलदुर्ग आहोरात्र रक्षण करीत उभे आहेत.यात थेट समुद्रातून डोके वर काढणार्‍या बेटावर उभारलेले जंजिरे जसे खांदेरी,उंदेरी,पद्मदुर्ग,सुवर्णदुर्ग,सिंधुदुर्ग,जंजिरे मेहरुब्,तसेच किनार्‍यावर ठाण मांडलेले विजयदुर्ग,जयगड्,रत्नदुर्ग,बाणकोट्,वसई असे पाणकोट आहेत.याच शृंखलेतील महाराष्ट्रातील शेवटचा किल्ला म्हणून यशवंतगड ओळखला जातो. मॅगेनिजच्या खाणीमुळे व येथील स्वयंभू गणपतीसाठी प्रसिद्‌ध असणाऱ्या रेडी गावात हा दुर्ग वसलेला आहे.
 प्राचीनकाळापासून कोकणातील बंदरे व्यापारासाठी प्रसिद्ध होती. या बंदरांचा अनेक देशांशी व्यापार होत असे. त्यापैकीच एक महत्त्वाचे बंदर होते रेडी. प्राचीनकाळी रेडी गाव ‘रेवतीद्वीप’ या नावाने ओळखले जाई. इ.स. ६१० ते ६११ मध्ये चालुक्य राजा स्वामीराजाचे रेडी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्याकाळी हा किल्ला बांधण्यात आला असावा. सागरी व्यापारावर तसेच खाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यशवंतगड उभारला गेला. यशवंतगडाच्या उंच बुरुज आणि तटबंदीमुळे गाव व सिंधुसागरावर लक्ष ठेवता येई.
   किल्ल्याचा ज्ञात इतिहास विजापूरकर आदिलशहापासून चालू होतो. आदिलशहाकडून या किल्ल्याचा ताबा वाडीच्या सावंतांकडे गेला. त्यांच्याकडून शिवाजी महाराजांनी हा गड सन १६६४ साली जिंकला व त्याची दुरुस्ती करुन किल्ला मजबूत बनविला.हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला अशी माहिती गॅझेटीयर देते,तरी गडाची एकंदरीत बांधणी बघता या गडाची दुरुस्ती शिवाजी महाराजांनी केली असावी.अर्थात यानंतर सावंत शिवाजी महाराजांना शरण आले आणि त्यांनी स्वराज्याची चाकरी पत्करली असली तरी संधी मिळताच स्वराज्याशी बेईमानी करण्याच्या कारवाया सोडल्या नाहीत.
    काही ठिकाणी रेडीचा यशवंतगड १७०९ ते १७३८ या दरम्यान इतर किल्ल्यासोबत यशवंतगड बांधला अशी माहिती दिली जाते ,ती चुकीची आहे.कारण सन १७१७-१८ च्या मोगल मराठ्यांमधील करारात शिवछत्रपतींच्या स्वराज्यात असणार्‍या किल्ल्यांच्या यादीत यशवंतगडाचा उल्लेख आहे.शिवाय सन १७०९ मध्ये फोंड सावंत सावंतवाडीचे प्रमुख बनल्यानंतर त्यांनी जे किल्ले बांधले त्यात यशवंतगडाचा उल्लेख येत नाही.शिवाय इतक्या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी किल्ल्याची उभारणी नक्कीच केली असणार.मुख्य म्हणजे सावंतांनी भरतगडासारखे काही किल्ले उभारले असले तरी इतके बळकट लष्करी ठाणे उभारण्या इतपत सावंतांचे राज्य समृध्द,संपन्न नव्हते.शिवाय सावंतांनी हे स्वतंत्र संस्थानिक म्हणून कमी काळ राज्य केले,या काळात ते कोल्हापुरचे संस्थानिक होते.
        संभाजी महाराजांच्या अखेरच्या काळात सावंतवाडीकर सावंत मोघलांना सामिल झाले आणि त्यानी मराठ्यांच्या ताब्यातील किल्ल्यावर हल्ला करण्यास सुरवात केली.मात्र यात यशवंतगडाचा उल्लेख दिसत नाही.पुढे मोघलांचा पडता काळ आल्यावर जहागिरीसाठी सावंत पुन्हा मराठ्यांना सामिल झाले आणि करवीर संस्थानाचे चाकर बनले.अर्थात सावंत हे संधीसाधूपणा करीत करवीरकरांविरुध्द्द कारवाया करीत्,या कामी गोव्याचे पोर्तुगीज त्यांना मदत करत असत.मात्र विशेष म्ह्णजे सावंत पोर्तुगीजांविरुध्दही कारवाया करत असत.
      सावंताविरुध्द पोर्तुगीजांनी १७४५-४६ मध्ये मोहीम काढली, तेव्हा त्यांनी यशवंतगडावर हल्ला केला.या लढाईसंदर्भात नारायणजी अंजुरकर नानासाहेब पेशव्यांना पत्रात लिहीतात "गोव्यासमीप मुरुमगाव आहे, तेथे पुरुतकालहून (पोर्तुगॉलहून ) पातशाही रक्ताचा मातबर फिरंगी येउन राहीला आहे.त्याच्याबरोबर फौज सहा हजार आहे.रेढीकरासई (यशवंतगडावरील फौज) व गोवेकरासी युध्दे लागले परंतु तो पोरतुकालहून फिरंगा आला आहे.त्याणी काही गोवेकराची मदत केली नाही.सव्वासे माणुस मात्र दिल्हे होते.तितक्यांनीच रेढीकरांवर इतका उपध्दाप केला".
    पुरेसे साहीत्य नसल्याने पोर्तुगीज फौजेला तोंड देणे यशवंतगडाला शक्य नव्हते.पोर्तुगीजांनी हल्ला करुन रेडी गाव जाळून टाकले पण यशवंतगड त्यांनाही घेता आला नाही, कारण त्यासाठी पुरेसे बळ त्यांच्याकडेही नव्हते.लढाई रडतखडतच चालली.अंजुरकरांनी यासंदर्भात वृत्तांत नानासाहेब पेशव्यांना ८ नोव्हेंबर १७४६ रोजी लिहीला "गोव्यास फिरंग्यांचा जमाव येकुणीस हजार माणुस जमा झाले आहे.त्यापैकी रेढीवर काही गेले,काही गोव्यात आहेत.फ्रेंच,फिरंगी व आंग्रे एक झाले असून गनिमाची नेमणूक येणेप्रमाणे झाली आहे.दोन हजार माणुस व तीन फरगादे (युध्दनौका) येसवंतगडास जावे व दोन हजार माणुस उरणावर व दोन हजार माणुस बेलापुरवर "
        यशवंतगडावर हे मोठे संकट होते आणि गडाला बाहेरुन मदत मिळत नव्हती.अखेर ३ डिसेंबर १७४६ रोजी गड पोर्तुगीजांनी घेतला.सावंतांना हा मोठा धक्का होता.कारण तो त्यांचा महत्वाचा गड होता."सावंत भोसले हे आपली बहुतांश गलबते रेडी बंदरात ठेवत" असा पोर्तुगीज कागदपत्रात उल्लेख मिळतो.यशवंतगड फिरंग्यांनी आपणास फसवून घेतला असा आरोप सावंतांनी केला.
      जयराम व रामचंद्र सावंत यांनी २ जुलै १७४८ रोजी व्हॉइसरॉयला लिहीले."स्नेहभावाचे बोलणे चालु असताना पोर्तुगीजांनी तेरेखोल घेउन रेडीवर चाल केली.तेव्हा केरीच्या मुक्कामी बोलणी झाली कि तहनामेस निशाणा होईपर्यंत रेडी किल्ला ओलिस द्यावा म्हणून कागद दिला.तो पावेतो रेडीच्या लोकांस व रयतेस काडीमात्र तोसीस बाधा देणार नाही म्हणोन करार केले होते.त्या भरवसेवर रेडी किला सामान सहवर्तमान व्हॉइसरॉयच्या स्वाधीन चार रोजांच्या बोलास ओलिस दिला होता".
       पोर्तुगीजांनी रेडी स्वतःकडे ठेवले होते.तेव्हा रामचंद्र सावंतने व्हॉइसरॉयकडे रेडी मागितले.त्यास उत्तर मागितले "पोर्तुगालास कागद पाठविण्यात येईल आणि उत्तर आल्यावर रेडी ताब्यात देण्यात येईल". सावंताच्या लक्षात आले की आता पोर्तुगीजांकडून रेडी परत मिळणे कठीण.फिरंगी राजकारणी चांगला ज्या युक्तीने गनिमापासून कार्य साधावे तैसे साधले.असा उल्लेख मिळतो. 
     पोर्तुगीजांनी तेरेखोलच्या लढाईत सावंतांचे आरमार बहुतेक नष्ट केले होते.तेव्हा लढाई करुन रेडी जिंकणे सावंतांच्या आवाक्यातील गोष्ट नव्हती.युध्द नाही तर भेद, हि निती वापरुन सावंतांनी यशवंतगडावरचा पोर्तुगीजांचा किल्लेदार रघुजी नाईक यास गुप्त बोलणी करुन फितवले. रघुजी हा किल्ला सावंतांना देण्यास तयार झाला. किल्ला ताब्यात घेण्याची तारीख्,वे़ळ निश्चित झाली.या गोष्टीची कुणकुण रेडी येथील व्यापारी रामा कामत यास लागल्यावर त्याने हि गोष्ट गोव्यास जाउन पोर्तुगीजांच्या कानावर घातली.
        यशवंतगडावरील सैनिक पोक्या नाईकने देखील गडावरच्या फितुरीची बातमी व्हॉइसरॉयला कळविली. तेव्हा व्हॉईसरॉयने ताबडतोब हालचाल करीत रघुजीला कैद करीत चौकशी केली.चौकशीअंती आरोप सिध्द झाल्यावर रघुजीला फाशी देण्यात आली.बक्षीस म्हणून पोक्या नाईकास दिडशे रुपये व रामा कामतास रोख पैसे दिले.
       सावंतांचा प्रयत्न फसला असला तरी सावंतांनी हार मानली नाही.ऑगस्ट १७४७ मध्ये सांवतांनी यशवंतगड घेण्याची तयारी केली.आपल्या हस्तकांबरोबर किल्ल्यातील सैनिकांना मिठामध्ये विष मिसळलेली सुकी मासळी विकली.मासळी खाल्ल्यामुळे सैनिक आजारी पडले.हि संधी साधून सावंतांनी गडावर हल्ला केला.गड सावध आणि लढाईस सज्ज होता. गडावरुन होणार्‍या पोर्तुगीजांच्या तिखट मार्‍यामुळे सावंतांनी माघार घेतली.
  पोर्तुगीजांनी यशवंतगड घेतल्यामुळे ओढावलेल्या परिस्थितीबध्दल मिळणारी माहिती अशी "रेडीचा किल्ला घेतला आणि फिरंगीयाकडेस हे महाल पडलेने वतनदार व रयत फिरंगियाखाली पडले.नंतर हिंदुधर्म रहात नाही".
      तसेच सावंताच्यात एकी नव्हती. याबध्दल सन १७५० मधील पत्रातील माहिती अशी "वाडीकर सावंतास व त्याचे मुत्सदीयात व सरदारात अंतर्यामी बहुत फांट आला आहे.सारे एकसरोन सर्व दौलत एखादाचे घरी घालावी या यत्नास लागले आहेत.रेडी दिलीया बदलामीनी बदलाम होउन दहशत खादली आहे आणि धणी शोधतात.ईकडील अवस्था पत्री काय ल्याहावी".
    अखेर २८ ऑक्टोबर १७५४ रोजीच्या तहानुसार सावंताकडून मोठा प्रदेश घेत व खंडणी देण्याच्या अटीवर पोर्तुगीजांनी रेडी व निवती हे किल्ले सावंताना परत केले.पुढे इंग्रजांनी या परिसराचा ताबा घेण्यासाठी आघाडी उघडून करवीरकरांच्या ताब्यातील सिंधुदुर्ग आणि राजकोट ताब्यात घेतले.तसेच सावंतांच्या चाचेगिरीने वैतागलेल्या इंग्रजांनी मेजर गॉर्डन व वॅटसन यांनी सैन्यासह ६ मार्च १७६५ रोजी रेडी येथे उतरुन यशवंतगडास वेढा घातला. इंग्रजांच्या सैन्यबळाला तोंड देण्याची तयारी यशवंतगडाची नव्हती.त्यामुळे गनीमी काव्याने लढत देण्याची योजना झाली.त्यानुसार सावंतांचे अधिकारी जिवाजी विश्राम हे रात्रीच्या वेळी इंग्रजांवर छापा घालण्याची योजना आखुन सैन्याची जमवाजमव करु लागले. भानशेट भोगटे हे आपला जमाव घेउन गडाच्या मदतीस निघाले.मात्र हि रसद पोहचण्यापुर्वीच इंग्रजांनी तोफांचा मारा करुन यशवंतगड ताब्यात घेतला.
     जिवाजी विश्राम यांनी यासुमारास पोर्तुगीजांकडून मदत मागितली होती.पोर्तुगीजांनी गड वाचविण्याची युक्ती सावंताना सांगितली.त्याबध्दल जिवाजींनी लिहीले कि "इंग्रज रेडीस जुंजावयास गेला आहे.याकरिता तेरेखोलास लिहीले कि पोर्तुगीजांचे निशाण व पाच जण फिरंगी रातोरात किलेवर किलेवर चढवून इंग्रजासही सांगून पाठवावे कि किला इस्तादाचा ( व्हॉइसरॉयचा ) आहे.तुम्ही न जुंजावे यैसे सांगून पाठवावे" जिवाजीने दारुगोळा व गोलंदाज किल्लेस जलदीने पाठवावे अशी विनंती केली. 
     जिवाजी विश्रामने सन १७६५ मध्ये सावंतांना पत्र लिहीले "इंग्रजांने चोहोकडून सिलांदाज करुन रात्रीपासून किला जेर केला.किलेकरांमधे अवसान राहिले नाही.बाहेरुन येलणार करावा तर इलाज नाही.तशामध्ये उपाय होईल ते करितो दारु अगदी नाही.पाठविली तीही सरली.त्यामुळे घाट जाहला.फिरंगी यास कागद लिहून यशवंतगडाची कुमक करावी असे लिहावे व दारुगोळेविषयी लिहून सत्वर कागद रवाना करुन द्यावे" गड राखता आला नाही.
  यशवंतगड घेउन इंग्रज १३ मार्च १७६५ रोजी भरतगडाच्या स्वारीला निघाल्याचे पाहून सावंत तहाला तयार झाले.७ एप्रिल १७६५ रोजी झालेल्या तहानुसार सावंतांकडून इंग्रजांनी बराच मोठा मुलुख ताब्यात घेतला.आरमार ठेवू नये, एक लाख युद्ध खर्च द्यावा,रेडी येथे व अन्यत्र वखारी घालण्यास जागा द्यावी इत्यादी अटी लादल्या गेल्या.आणि हा तह अंमलात आणला तरच यशवंतगड परत देण्याचे ठरले. इंग्रजांना पन्नास हजार लवकरच देणे गरजेचे होते असे पत्रातील "हल्ली रेडी इंग्रजाने घेतली आहे.त्यास पन्नास हजार रुपये द्यावे लागतात" या मजकुरावरुन समजते.
  तसेच इंग्रजांनी सावंतास तंबी दिली कि, किले रेडी येथील रयत व लोक  कितीएक किल्ला घेतल्यापासून इंग्रजांचे निशाणाखाली राहिले व कितीएक चाकरीस व व्यापारा करिता आले.त्यास भोसले ( सावंत ) याही आम्हास कळता न कळता हर गोष्टीने उपसर्ग न देता त्यांची जमीन घरे व वतनबाब पुर्वीपासून ज्याप्रमाणे भोसलेंकडून घडून न आले तर सरकार कुंपनी हे सरदेसाई ( सावंत ) याजवर चढाई करील".
    सावंतांनी तह पाळला नाही.तेव्हा पुढच्या वर्षी इंग्रजांनी दबाव आणुन सावंतांना पुन्हा तह करण्यास भाग पाडले.रेडी येथे २४ ऑक्टोबर १७६६ रोजी तह झाला.त्यानुसार पुर्वीचा थोडा मुलुख परत करण्यात आला आणि युध्द खर्च दोन लाख रुपये लादण्यात आला. तो फेडण्यात मुदत दिली व रकमेची फेड होईपर्यंत वेंगुर्ले तेरा वर्षापर्यंत इंग्रजांच्या अंमलाखाली ठेवण्याचे ठरले.तीन महिन्याच्या आत पहिला हप्ता सावंतांनी दिल्यावर त्यास गड परत देण्याचे ठरले.अशा तर्‍हेने सावंतांनी पहिला हप्ता दिल्यावर यशवंतगड पुन्हा सावंतांच्या अंमलाखाली आला. 
    सन १७७२ मध्ये करवीरकरांनी सावंतांचा भरतगड व निवती घेउन सिंधुदुर्गावरील आरमाराच्या सहाय्याने यशवंतगडाला वेढा घातला.मात्र सावंतांच्या मदतीला पोर्तुगीजांचे आरमार आल्याने करवीरकरांच्या आरमाराने माघार घेतली.
 पुढे सन १७८७ मध्ये मोरचेल प्रकरणावरुन करवीरकर आणि सावंत यांच्यात वितुष्ट आले.पुन्हा एकदा करवीरकरांच्या सिंधुदुर्गाच्या आरमाराने यशवंतगडाला वेढा दिला.पुन्हा एकदा सावंताच्या मदतीला पोर्तुगी़ज आल्यामुळे करवीरकरांना माघार घ्यावी लागली.
  सन १८०५-०६ मध्ये सावंतवाडी अंतर्गत कलहात गुंतलेले पाहून करवीरकरांनी फोंड सावंतांची बाजु उचलून सावंतवाडीच्या मुलुखात चाल करीत यशवंतगड व निवती आपल्या ताब्यात घेतले.इकडे सावंतवाडीला सोम सावंत याने फोंड सावंताच्या लोकांना पकडून कैद करुन त्यांच्या भोवती दारु ठेवून वीस लोक जाळले.मात्र यात फोंड सावंत वाचला.करवीरकरांचे अधिकारी रत्नाकरपंत राजाज्ञा हे रेडीला गेल्,त्यांनी यशवंतगडावर ९०० लोक तैनात केले व वाचलेल्या फोंड सावंताला घेउन करवीरला आले.
     करवीरकरांनी किल्ला घेतलेला पाहून सावंतवाडीच्या लक्ष्मीबाईंनी पोर्तुगीजांची मदत मागितली.त्या लिहीतात "करवीरकरांनी किल्ल्यावर फौज नेली असेल तर तीला पिटाळून लावावे आणि कोणत्याही स्थितीत करवीरकरांचा प्रवेश आपल्या प्रदेशात होता कामा नये".मात्र यशवंतगडावर करवीरकरांचाच अंमल बसला.त्यांनी तेथील गलबते सिंधुदुर्गावर नेली.
    यासंदर्भात बच्चाजी अनंत यांनी सिंधुदुर्गावरुन बाळाजी पंताना सन १८०६ ची हकीकत कळवली आहे "रेडीचा किला आम्हाकडे देउन येथे येउन हुजूर गेले त्या तागायत किल्ला हुजुरांचे ताब्यात आहे.तेथे वाडीकर यांचे आरमारी गुराबा तीन व गलबते खुसकीस धडेवर ( किनार्‍यावर ) होती.ती जंजिरा आणवून धडेवर काढून ठेवणे विषयी आज्ञा.त्यावरुन जंजिराहून ( म्हणजे सिंधुदुर्गावरुन ) लोक दर्यावर्दी पाठवून गुराब पाण्यात लोटून गुराबास हाकारणीचा सरंजाम न करिता गुराबा गलबताच्या पागेस लावून जंजिरास येत असता बोट व फत्तेमार्‍या इंग्रज यांच्या वाटेवर आल्या.तेव्हा गुराबाची व फत्तेमार्‍यांची गाठ पडली.फत्तेमार्‍या बोटीने मारगिरी ( गलबतांवर ) बहुत केली.आमचे लोक सुध्दा बांधोन घेउन गेले".
    लक्ष्मीबाई शांत बसली नाही.सन १८०७ मध्ये यशवंतगडावर अचानक हल्ला करुन तो घ्यावा असे ठरवून पाचशे सैन्य पाठविले.गडावरील लोक हुशार होते.शिवाय त्यांना समुद्रमार्गे सिंधुदुर्गाच्या आरमाराची मदत असल्यामुळे सावंतांनी माघार घेतली.पण लवकरच लक्ष्मीबाईचा भाउ रामचंद्रराव खानविलकरने फौजेची जमवाजमव केली आणि नांदोस येथे करवीरच्या सैन्याचा पराभव केला.नंतर यशवंतगड व निवती पुन्हा वाडीकरांच्या अधिपत्याखाली आणले.
    सावंताच्या विनंतीवरुन त्यांच्या मदतीला आलेले निपाणीकर निंबाळकर सरदार आप्पाजी सुबराव यांना भाउसाहेब सावंतांना कैद करुन लक्ष्मीबाईसही कैद केले व यशवंतगड,वेंगुर्ले व निवती आपल्या ताब्यात घेतले.सन १८०८ मध्ये निपाणीकर डोईजड झाल्याचे पाहून सावंतांनी सन १८१० मध्ये सुबरावाचा पराभव करुन रेडी व यशवंतगड ताब्यात घेतला.
      यानंतर संभाजी सावंत यांना यशवंतगडाचे किल्लेदार नेमले गेले.मात्र संभाजी सावंत गडाच्या आश्रयाने चाचेगिरी करु लागला.इंग्रजांनीही याचा त्रास होउ लागला.तेव्हा त्यांनी ऑक्टोबर १८१२ मध्ये सावंतांना तह करण्यास लाविले.त्यात असे ठरले की, चाचेगिरी बंद करण्यासाठी वेंगुर्ला कोट सावंतांनी इंग्रजांना द्यावा असे ठरले.सर्व लढाउ जहाजे इंग्रजांना द्यावी आणि तरीही चाचेगिरी चालु राहिल्यास यशवंतगड व निवती सावंतवाडी सरकारने इंगर्जांना द्यावा,या तहाचा परिणाम म्हणून संभाजी सावंताची चाचेगिरी काही काळ थांबली.
    किल्लेदार संभाजी सावंत यास अर्धांगवायुचा झटका येउ लागला.बांद्याचा किल्लेदार चंद्रोबाने जादु केल्याने आपणास हा त्रास होत आहे असा आरोप करित त्याने त्याच्यावर हल्ला केला.त्यात तो पराभुत झाला.
       सन १८१७ मध्ये पोर्तुगीजांनी सावंतावर हल्ला केला तेव्हा यशवंतगडावरील गडकर्‍यांनी तेरेखोलवर हल्ला करायला सावंतांनी सांगितले.यस्गवंतगडाच्या कुमकेने तेरेखोलवर चाल करीत तो घेतला.हे पाहून व्हॉइसरॉय तेरेखोलवर स्वारी करुन तो ताब्यात घेत यशवंतगडास वेढा घातला.पोर्तुगीज व सावंतामध्ये नित्य चकमकी होउ लागल्या.बरेच सरदार्,सैनिक मारले गेले.२७ दिवसापर्यंत ( मेजर कीरने २९ दिवस लिहीले आहेत) हा वेढा चालला.पोर्तुगीजांनी किल्ल्याजवळच्या हस्त नावाच्या डोंगरावर तोफा चढवून गडावर मारा केला.परंतु या मार्‍याने गडाचे काही नुकसान झाले नाही.अखेर किल्ला शरण येत नसल्याचे पाहून पोर्तुगीजांनी किल्ल्याच्या परिसरातील हजारो माडाची झाडे तोडून टाकली व जाळपोळीवर समाधान मानून पोर्तुगीज गोव्याला निघून गेले.
    सन १८१९ मध्ये यशवंतगडावरील लोकांची चाचेगिरी थांबत नसल्याने इंग्रजांनी सन १८१२ च्या तहानुसार यशवंतगड व निवती किल्ले तीन वर्षापर्यंत आपल्याकडे देण्यास सांगितले.पण सावंतानी नकार दिला.इंग्रजांनी लढून रेडी घेण्याचे ठरवले आणि मेजर विल्यम ग्रिथ कीर याच्यावर रेडीची मोहीम सोपवली.निवतीचा किल्ला ४ फेब्रुवारी १८१९ रोजी घेतल्यावर तोफखाना आणि रसद जहाजात चढवून रेडीच्या दिशेने रवाना केले.पुढे ब्रिटीश काळात लष्करी लोकांना चांगल्या हवेसाठी म्हणुन वारंवार या किल्ल्यात आणुन ठेवत.पुढे ब्रिटिश राजवटीत ईथे बराच काळ पोलिस स्टेशन होते.

गडाचा प्रदीर्घ इतिहास समजून घेतल्यावर आता गडाची भ्रमंती करुया.
 यशवंतगडास जाण्यासाठी सावंतवाडी किंवा वेंगुर्लेहून रेडी गाव गाठावे. वेंगुर्ला ते रेडी हे अंतर २० कि.मी. आहे.रेडी गावात जाण्यासाठी सावंतवाडी तसेच वेंगुर्ले येथून STची सोय आहे. रेडी गावातील विठ्ठल मंदिराच्या बाजूने जाणारा गाडी रस्ता थेट गडाजवळ नेऊन सोडतो. एका लहानशा १५० फुट उंचीच्या टेकडावर यशवंतगड बांधलेला असुन सध्या दाट झाडीझुडपांमध्ये वेढलेला आहे.
रस्त्यावरुन जाताना उजव्या हाताला गडाची तटबंदी लागते.यशवंतगडाला चौपदरी तटबंदी आजे.त्यातील एक पदर थेट जमीनीवर बांधला आहे.आपल्याला दिसते ती हिच तटबंदी.

गडाकडे जाताना डाव्या हाताला खाडी दिसते.
 
 
मुख्य प्रवेशद्वार

यशवंतगडाची वैशिष्ट्ये म्हणजे त्याची बांधणी व गडावरील मोठ्या प्रमाणात आस्तित्वात असलेले अवशेष होत. रेडी गावातून गडावर प्रवेश करण्यासाठी छोटेखाणी प्रवेशद्वार व त्याचे रक्षण करणारे बुरुज व तटबंदी नजरेस पडते.पहिला दरवाजा गोमुखी पध्दतीचा आहे.पुर्ण वळाल्यावर आपल्याला दरवाजा समोर येतो. या दरवाजाला लागुनच भक्कम असा बुरुज आहे. थोडे कष्ट घेतले तर आपण या बुरुजावरही जाऊ शकतो. 
   प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपण गडाच्या माचीवर प्रवेश करतो. पायवाटेने चालत गेल्यावर थोड्या उंचीवर गडाचा पहिला दरवाजा लागतो.बालेकिल्ल्याच्या पहिल्या दरवाजातला काही पायऱ्याही आहेत. या दरवाजातून आत शिरल्यावर प्रथम आपल्या नजरेत भरतो तो संरक्षणासाठी दोन्ही बाजूने खोदलेला २० फुटाचा खोल खंदक. हा खंदक पूर्ण बालेकिल्ल्याच्या भोवती खणला आहे. तर समोरच एक दरवाजा आणि बुरुज दिसतो.

 
या दरवाज्याच्या पुढे २० फूट खोल खंदक लागतो. हा खंदक पूर्ण किल्ल्याभोवती फिरवलेला असून तो दगडांनी बांधून काढलेला आहे. दुसरा दरवाजा पहिल्या दरवाजाच्या काटकोनात आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला बुरुज आहेत. 


यानंतर लगेच समोर एक भक्कम बांधणीचा दरवाजा दिसतो. हा दरवाजा वैशिष्ट्यपूर्ण असुन मुख्य दरवाजा बंद असल्यास आत प्रवेश करण्यासाठी या दरवाजा शेजारी लहान दिंडी दरवाजा बांधलेला आहे. इथून आत येताच दोन्ही बाजूस असलेल्या पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात तर समोर तीन ओवऱ्या असून पुढील मार्ग कातळ कोरुन तयार केलेला आहे. बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दरवाजामधील जागेत बंदिस्त चौक आहे. ही कमानयुक्त बांधणीची जागा बांधून सरंक्षणाच्या दृष्टीने तिची रचना केलेली आहे. या बालेकिल्ल्याच्या दरवाजाच्या आत देवडय़ा या चौकापर्यंत परवानगी शिवाय कोणी पोहोचू शकणार नाही अशी सर्व व्यवस्था जाणीवपूर्वक केलेली आहे. प्रशस्त देखण्या कमानदार देवड्या पाहून आपण हरखून जातो. ही जागा त्यावेळी खासच असणार ह्यात शंका नाही.




येथे समोरच बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसतो. या दरवाजाचे गोलाकार बुरुज आवर्जून पाहण्यासारखे आहेत. या गोलाकार बुरुजांमुळे दरवाजाच्या सौंदर्यात अजूनच भर पडते. चौथा दरवाजा तिसर्‍या दरवाजाच्या काटकोनात असून त्यापूढे (अंदाजे ७ फूट लांब) बोगद्याप्रमाणे रचना केलेली आहे. या दरवाजाच्या बाजूने असलेली २० फूट उंच तटबंदी सर्व किल्ल्याला वेढते.



 











बालेकिल्ल्यात आत शिरल्यावर डावीकडे आपल्याला राजवाडा आणि कचेरीची दुमजली इमारत दिसते. थोडं पुढे गेल्यावर एका कमानयुक्त प्रवेशद्वारातून आपण भव्य राजवाड्यात प्रवेश करतो.या इमारतीची रचना भुलभुलैयासारखी आहे. बालेकिल्ल्याचा १/३ भाग व्यापणार्‍या या इमारतीत फिरतांना आपण कुठल्या दालनातून कोठे आलो हे कळत नाही. इमारतीचा पहिला व दुसरा मजला शाबून नाही. पण तूळ्यांसाठी भिंतीत असलेल्या खाचा, पहिल्या व दुसर्‍या मजल्याच्या उंचीवर असलेले दरवाजे, खिडक्या, कोनाडे, झरोके पाहाता येतात. या इमारतीच्या भिंतीवर वाढलेल्या वृक्षांच्या मुळांमुळे अनेक प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण आकार तयार झालेले आहेत. 



 इमारतीच्या एका चौकात हौद किंवा तरण तलाव असून तो २०×२० फूट मापाचा आहे. त्यात उतरण्यासाठी चारही बाजूंनी पायर्‍या आहेत. हौदाच्या काठावर दगडी स्तंभ असून त्यावर चुन्यात रेखलेली पानफूल आहेत.
एका खोलीत अलीकडच्याच काळात गांधीजींचे चित्र रेखाटलेले आहे.

इमारतीच्या भूलभूलैयातून बाहेर पडल्यावर उत्तरेकडील व पूर्वेकडील तटात आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण पहार्‍याच्या जागा पाहायला मिळतात. तटाच्या आत जाण्यासाठी चोर दरवाजांप्रमाणे छोटे दरवाजे ठेवलेले आहेत. त्याच्या आत ३ फूट उंच भिंतीचा आडोसा केला असून त्या भिंतीच्या आड बसून दूर पर्यंतच्या प्रदेशावर नजर ठेवता येते.
बुरुजावरील जंग्यांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे.
 
राजवाड्याजवळील विहिर

   सुंदर आणि प्रशस्त राजवाड्यातून आपण तटबंदीकडे चालत जातो. तटबंदीकडे जात असताना वाटेत एक आयताकृती मोठी विहीर लागते. या विहिरीत उतरण्यासाठी काही पायऱ्या आहेत. पण पुढे फक्त माती असल्यामुळे सांभाळतच पुढे जावे लागते.
    या व्यतिरीक्त गडावर एक कोठारासारखी इमारत प्रवेशद्वारासमोर आहे. गडावर पाण्याच टाक, तलाव अथवा विहिरीचे अवशेष दिसत नाहीत. 
     विहीर पाहून तटावरून गड-फेरी चालू ठेवत, बुरुज-जंग्या पाहत, सिंधुसागाराचे-पुळणीचे तसेच केरवाडा येथील नौकांचे दर्शन घेत आपण एका बुरुजापाशी येतो. 

पहारेकर्यांसाठी बांधलेल्या खोल्या

या तटाजवळ तटबंदीत पहारेकर्यांसाठी बांधलेल्या दोन खोल्या आहेत. या खोल्या पाहून परत तटफेरी चालू ठेवत. आपण एका भव्य अशा मोठ्या भक्कम बुरुजावर येतो.

उत्तर बुरुजावरुन अरबी समुद्र व रेडीची खाडी यांच्या संगमाचे अप्रतिम दृश्य दिसते. इथून रेडी बंदरापासून खाडीपलीकडील केरवाडा पर्यंतचा परिसर दिसतो. यावरूनच या किल्ल्याचे महत्त्व कळून येते.

इथून पुढे चालत आपण बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या माथ्यावर येतो. 

इथल्या खिडकीतून बंदिस्त चौकाचे आणि तिसऱ्या  दरवाजाचे दर्शन होते. पुढे तटावर झाडी माजल्यामुळे जास्त फेरी मारता येत नाही. 
पुढे फक्त एक बुरुज पाहून व प्रस्तराने खाली उतरून दरवाज्यापाशी येतो. इथे आपली बालेकिल्ल्याची फेरी संपते व परत आपण सुंदर राजवाडा भक्कम दरवाजाची दृश्ये कॅमेऱ्यात आणि डोळ्यात साठवत गडपायथ्याशी येतो.
गडपायथ्यापासून सागरकिनाऱ्याकडे रस्त्याने चालत जावे. इथे एक अर्धा फुटका बुरुज आहे. हा बुरुज चढून वरून गेल्यावर समोरच एक जांभ्या दगडात कोरलेली द्विभुज श्रीगणेशाचे वाईट अवस्थेत असलेले शिल्प दिसते. या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिल्प व रेडी गावातील प्रसिद्ध द्विभुज गणेश मूर्ती हुबेहूब आहेत.

बाप्पाचे दर्शन घेऊन पुढे चालत गेल्यावर एक छोटेखानी विहीर लागते. या विहीरीत उतरण्यासाठी चार पायऱ्या आहेत. स्थानिक लोक या विहिरीला घोड्याची विहीर संबोधतात.
                      घोड्याची विहीर

तिथेच वाटेत एक अजून कोरडी विहीर आहे. हे सर्व बघून एक छोट्या दरवाजाने बाहेर पडतो


आणि समोर असलेल्या सुंदर पुळणीवाटे  सिंधुसागरात स्नान करण्यासाठी निघून जातो.


 
यशवंतगड उर्फ रेडीचा किल्ला: किल्ला फारच देखणा आहे तरी दुर्लक्षित आहे महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनार्‍यावर शेवटचा किल्ला आहे. त्यामुळे पुढे गोव्याच्या किनाऱ्यावरील विदेशी पर्यटक इकडे ही खोऱ्याने दिसतात . 

        

image

यशवंतगडाच्या भेटीत न चुकता बघण्यासारखे ठिकाण म्हणजे रेडीचे द्विभुज गणेश मंदिर, माऊली मंदिर व रेडीचा समुद्रकिनारा.  सुमारे तेराव्या शतकात रेडी ही रेवतीनगर या नावाने सलेश्वर राजाची राजधानी म्हणून ओळखली जात होती. यादरम्यान नाथपंथी सांप्रदायाचा प्रसार सुरू होता. त्यावेळचे नाथपंथीय श्री सिद्धेश्वर व आज तळवणे येथे समाधिस्थ झालेले परशुराम भारती महाराज यांनी नाथपंथांच्या प्रसारासाठी कोकण भागात वास्तव्य केले होते.
सिद्धपुरुषाच्या सिद्धविद्येने सत्येश्वर राजा भयभीत झाला होता. त्याने कट करून सिद्धपुरुषाला मारण्याचा प्रयत्न केला असता समुद्राने उग्ररूप धारण करून सत्येश्वर राजा व त्याची राजधानी रेवतीनगरला बुडवून टाकले अशी आख्यायिका सांगितली जाते. रेवतीनगरच्या अस्तानंतर या भूमीचे अस्तित्व व जागृती कायम टिकवून राहावी यासाठी ग्रामदेवता धावून आली. माऊली देवीच्या स्थापनेचा इतिहास देवी कोषामध्ये मिळतो.
   श्रीदेवी माऊली (आदिमाया) ही स्वयंभू व नवसास पावणारी देवता रेडी येथे अनादिकाळापासून आहे, असे दिसून येते. तिला पार्वती म्हणूनही मानण्यात येते. कारण तिच्या शोधार्थ श्रीदेव महादेवाचा या भूमीला पदस्पर्श झाल्याने माऊली मंदिराजवळ स्वयंभू श्री महादेव मंदिर तसेच ३३ वर्षापूर्वी साक्षात्कारातून पकट झालेले द्विभुज श्रीगजानन ही तिन्ही ठिकाणे एका त्रिवेणी संगमात असल्याचे बारकाईने पाहिल्यास लक्षात येते.
      गेल्या ५०-६० वर्षापासून अंधारी देवता या देवीच्या चतु:सीमेत काळे सोने आहे, असे सांगत होती. पण याचा अर्थ त्यावेळी कोणालाही समजला नाही. त्यानंतर रेडीत खाण व्यवसाय सुरू झाल्यानंतर रेडीतील रयतेला त्याची प्रचिती आली जी भक्तमंडळी या देवास मनोभावे भजतात, त्यांना प्रचिती येते व जे जे दुष्ट व अहंकार वृत्तीने वागतात त्यांना शासनही मिळते या अनुभवाची साक्षात अनेक उदाहरणे असल्याचे जाणकार सांगतात.
    सध्या असलेल्या माऊली मंदिराचा मुख्य भाग सुमारे अडीचशे वर्षापूर्वी बांधल्याचे संकेत निघतात. तर मंदिराच्या घुमटाचे प्लास्टर १८२८ मध्ये पूर्ण केल्याची नोंद मंदिराच्या भिंतीवर होती. जिल्ह्याच्या तुलनेत छोटेसे दिसणारे हे गाव असले तरी गावाची महती अवर्णनीय अशीच आहे.
    रेडी गणेश रेडी बंदर किनार्याजवळच लोह खनिजाच्या खाणीच्या परिसरात १८ एप्रिल १९७६ रोजी स्वयंभू श्री गणेशाची द्विभुजा मुर्ती दृष्टांत प्रकट झाली. या ठिकाणी श्रीगणेशाचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. दर संकष्ठीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी जमते. रेडी येथील नागोळा वाडीतील एक तरुण सदानंद नागेश कांबळी हा ट्रक ड्रायव्हर म्हणून एक लोहखनिजाच्या कंपनीत नोकरीला होता. रेडीतील मायनिंगच्या खाणीवरुन बंदराकडे व बंदराकडून खाणीकडे त्याच्या लोहखनिज भरलेल्या ट्रकची सतत ये-जा होत असे दि. १८ एप्रिल १९७६ रोजी एका विशिष्ट ठिकाणी त्याने आपला ट्रक उभा केला व तो तेथेच झोपला. पहाटेच्या सुमारास त्याला स्वप्न पडले व स्वप्नामध्ये श्रीगणपतीने येऊन त्याच ठिकाणी खोदा आपले या ठिकाणी वास्तव्य आहे असा दृष्टांत दिला. त्यानुसार श्री.कांबळी व श्री.वासुदेव जुवेलकर यांनी मायनिंग कंपनीतील काही मजुरांच्या मदतीने खोदकामास सुरुवात केली. काही भागाचे खोदकाम करताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांना गणपतीच्या मूर्तीच्या तोंडाचा व कानाचा भाग स्पष्ट दिसू लागला. लगेच ग्रामदेवता श्री माऊली देवीच्या मंदिरात ही सर्व मंडळी गेली व त्यांनी देवीचा कौल घेतला. श्रीदेवी माऊलीने श्रीगणपतीच्या मूर्तीची त्याच ठिकाणी स्थापन करण्याचा कौल दिला. खोदकाम करता करता दि. १ मे १९७६ रोजी गणपतीची पूर्ण मूर्ती दिसली. श्री गणराया प्रगटले! ही मूर्ती जांभ्या दगडाच्या गुंफेमध्ये कोरलेली होती व मूर्ती जांभ्या दगडाचीच होती.

   सुमारे सव्वा महिन्यांनी बंदराजवळ गणपतीचे वाहन असलेला दगडात कोरलेला मोठा उंदीर सापडला. श्रीगणपतीच्या त्या मुर्तीला प्लास्टरिंग व रंगरंगोटी करुन सजविण्यात आले. श्रीगणेशाची ती द्विभुजा भव्य मूर्ती अतिशय देखणी व सुबक दिसते. नवसाला पावणारा हा रेडीचा श्रीगणेश भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या ठिकाणी गणेशाचे सुबक मंदिर बांधण्यात आले. प्रत्येक संकष्टीस व श्रीगणेशाच्या प्रगटदिनी अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याने या परिसरास जत्रेचेच स्वरुप असते. अनेक भाविक पर्यटक रेडीच्या या गणपतीच्या दर्शनासाठी अगत्याने श्रध्देने येतात.अखंड जांभ्या दगडात कोरलेली ही मूर्ती सहा फूट उंच व तीन फूट रुंद आहे.
मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे. द्विभुज मूर्तीचा एक हात आशीर्वाद देत असून दुस-या हातात मोदक आहे.


    कालांतराने १९७८ साली या गणपतीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले. कोकणामध्ये गणपतीला आराध्य दैवत मानले जाते. त्यामुळे सिंधुदुर्गामध्ये आलेला भाविक किंवा पर्यटक रेवतीनगरच्या द्विभुज गणपतीच्या दर्शनासाठी गेला नाही असे होत नाही.
      हा सगळा परिसर पहायचा तर स्वताचे वाहन असणे सोयीचे. खाजगी वहानाने मालवणहून निघाल्यास २५ किमी वरील निवतीचा किल्ला, तेथून ४० किमी वरील यशवंतगड व ७ किमी वरील तेरेखोल किल्ला पाहून परत मालवणला मुक्कामी किंवा ४० किमी वरील पणजीला जाता येते.
  संदर्भग्रंथ :-
१) सिंधुदुर्ग जिल्हा गॅझेटीयर
२) गड्,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- सतिश अक्कलकोट
३) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
४)  www.trekshitiz.com  हि वेबसाईट
५) www.durgbharari.com हि वेबसाईट
          


महाद्वारातून डावीकडच्या वाटेने पुढे चालत गेल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या पहिल्या दरवाजात येतो. या दरवाजातून आत शिरल्यावर प्रथम आपल्या नजरेत भरतो तो संरक्षणासाठी दोन्ही बाजूने खोदलेला खोल खंदक. हा खंदक पूर्ण बालेकिल्ल्याच्या भोवती खणला आहे.

तर समोरच एक दरवाजा आणि दयनीय अवस्थेत असलेला बुरुज दिसतो व एकदा वाचलेल्या ओळी आठवतात:-
फत्तरातला एक-एक चिरा निखळून पडतोय,
राजे तुमच्या आठवणीने उर भरून येतोय!
       यानंतर लगेच समोर एक भक्कम बांधणीचा दरवाजा दिसतो. हा दरवाजा वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुख्य दरवाजा बंद असल्यास आत प्रवेश करण्यासाठी दिंडी दरवाजाची सोय आहे. इथून आत येताच दोन्ही बाजूस असलेल्या पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. तर समोर तीन ओवऱ्या दिसतात. हे सर्व पाहून बंदिस्त चौकात येतो.
                      भक्कम दरवाजा

                       दिंडी दरवाजा

येथे समोरच बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसतो. या दरवाजाचे गोलाकार बुरुज आवर्जून पाहण्यासारखे आहेत. या गोलाकार बुरुजांमुळे दरवाजाच्या सौंदर्यात अजूनच भर पडते. या दरवाजाच्या आत देखील देवड्या आहेत व पुढील मार्ग कातळात कोरलेला आहे.
                  बालेकिल्ल्याचा दरवाजा

याच मार्गाने पुढे गेल्यावर डावीकडे एक भव्य इमारत दिसते. हीच गडावरची राजवाड्याची इमारत. थोडं पुढे गेल्यावर एका कमानयुक्त प्रवेशद्वारातून आपण भव्य राजवाड्यात प्रवेश करतो. हा राजवाडा म्हणजे एक भुलभुलैय्याच आहे. त्यामुळे आपण कुठून आलो आणि कुठून बाहेर पडलो. हे कळतच नाही. या राजवाड्यात सभागृहासारखी दोन प्रशस्त दालने आहेत. तळमजल्यावर अनेक खोल्या आहेत. तसेच दुमजली खोल्या देखील आहेत. पण आता त्या ढासळल्यामुळे फक्त कल्पनेतच पाहाव्या लागतात.







      


































































































No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...