मराठी माणसाचा समुद्रावरील मानबिंदू असलेला किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला सिंधुदुर्ग हि ओळख या किल्ल्यामुळेच मिळाली आहे. असे म्हणतात कि मालवणला जाऊन सिंधुदुर्ग न पहाता येणे म्हणजे देवळात जाऊन देवदर्शन न करता येणे. त्यामुळे येथे येणारे पर्यटक आवर्जुन सिंधुदुर्ग किल्ला पहायला जातात. पण देवळात जाताना नंदीचे अथवा कासवाचे दर्शन करावे लागते हा संकेत मात्र विसरतात. असेच काहीसे सिंधुदुर्ग किल्ला व त्याच्या आसपास असलेल्या किल्ल्याबाबत घडते. शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ला बांधताना त्याच्या रक्षणासाठी आसपासच्या परिसरात पद्मदुर्ग , राजकोट, सर्जेकोट या उपदुर्गांची साखळी निर्माण केली. सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटक जात असले तरी या दुय्यम किल्ल्याकडे कोणी फिरकत नसल्याने दुर्लक्षित झालेले हे किल्ले आज ओस पडले आहेत. सिंधुदुर्ग सागराचा रक्षक असेल तर हे त्रिकुट म्हणजे जणु त्याचे अंगरक्षक म्हणावे लागतील.सिंधुदुर्गाला भेट देण्यापुर्वी या रक्षकांची आधी माहिती करुन घेउया.सर्वप्रथम सिंधुदुर्गाचा सख्खा शेजारी पद्मदुर्गची ओळख करुन घेउया.
पद्मदुर्ग
रायगड जिल्ह्यातला जंजिर्याजवळचा “पद्मदुर्ग” सर्वांना परिचित आहे,हल्ली अनेक शिवप्रेमी तिथे भेटही देउ लागलेत. पण ह्या किल्ल्याशी नाम-साधर्म्य असलेला सिंधुदुर्गानजीकचा “पद्मदुर्ग” तसा दुर्लक्षित आहे.आवर्जून कोणी पर्यटक तिथे जात नाही.वास्तविक मालवणच्या किनारपट्टीवरुन मजेत चालत या पद्मदुर्गवर जाता येत.मात्र तरीही हा दुर्ग उपेक्षित राहीला हे खरे.अलिबागच्या कुलाबा किल्ल्याला जसा संरक्षणासाठी सर्जेकोट किल्ला बांधलेला आहे तसाच सिंधुदुर्गाचा राखणदार असलेला हा पद्मदुर्ग. कुलाबा किल्ल्याप्रमाणे हा किल्लाही ओहोटी असताना चालत जाऊन पाहता येतो. किनाऱ्यावरून आणि सिंधुदुर्गला बोटीतून जाताना पद्मदुर्ग खुणावत असला तरी त्यावर जाण्यासाठी दांडगेश्वर किनाऱ्यावर जावे लागते. पद्मदुर्गची भौगोलिक रचना खासच आहे. मालवणच्या समुद्रकिना-यावरून सिंधुदुर्गाकडे पाहिल्यास डावीकडे ‘पद्मदुर्ग’ तर उजव्या किना-याच्या भूशिरावर ‘राजकोट’ आहे. सर्जेकोट मालवण किना-यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. समुद्राला ओहोटी आल्यावर सर्जेकोटापासून पद्मदुर्गला चालत जाता येतं.

पद्मदुर्गकडे जाताना किना-यावर दांडगेश्वराचं मंदिर लागतं. या मंदिराच्या समोर सिंधुदुर्गाकडे समुद्रात शिरलेली वाळूची पुळण दिसते. मागे २००६ आलेल्या त्सुनामीचा धक्का या मालवण समुद्रकिना-याला बसला होता. त्या वेळी सिंधुदुर्गाकडच्या मधल्या भागातील सर्व पूळणच वाहून गेली होती. त्यामुळे या भागात मोठया प्रमाणात खोलगट भाग तयार झाला होता. तेव्हा ओहोटीच्या वेळीसुद्धा पुरुषभरापेक्षा जादा उंचीचं पाणी भरायचं. त्या वेळी एखाद्या होडीनेच पद्मदुर्गकडे जावं लागायचं. गेल्या काही वर्षात पाणी पुन्हा साठल्यामुळे ओहोटीच्या वेळी कमरेएवढया पाण्यातून जावं लागत.ओहोटी सुरु होत असताना जर पटकन चालत गेलं आणि १०-१२ मिनिटात हा छोटासा किल्ला पाहून परतलं तर ओहोटी संपायच्या आत अगदी सुरक्षितपणे मालवण किनाऱ्यावर परत पोहोचता येत.
ओहोटी सोडून इतरवेळी पद्मगडावर जाण्यासाठी मालवण किनार्यावरील दांडगेश्वर
मंदिरापासून होडी बरीच खटपट केल्यावर व बिदागी दिल्यास मिळू शकते. नाहीतर
सिंधुदूर्ग किल्ल्यात बोटीने जाताना दुर्बीणीने पद्मदुर्गचे निरीक्षण करता
येते. सिंधुदूर्ग किल्ल्यातील शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा असलेल्या
बुरुजावरुन पद्मदुर्गचे निरीक्षण करता येते.
मालवणच्या धक्क्यापासून पद्मदुर्गपर्यंत येण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो. लांबूनच या किल्ल्यावरचे भगवे ध्वज आणि लाईटचे पोल दिसत असतात.प्रवेशद्वारापर्यंत मार्ग एकदम साफ केलेला असून दुतर्फा सुरुची झाडे लावलेली आहेत. बाकी इतरत्र जागेत गवत आणि इतर झाडे आहेत.
प्रवेशद्वाराच्या कमानीला चुना मारलेला आहे. किल्ल्याच्या दरवाजाचे अवशेष आजही पाहता येतात. मात्र त्यावर कोणतीही द्वारशिल्पे नाहीत.याचा दरवाजा बरोबर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दरवाजासमोरच आहे.
दरवाजा बाहेरच डावीकडे अनगड देव आहे. शेजारी निरंजन आणि ते विझू नये म्हणून काचेचा चौकोनी बॉक्स दिसतो.किल्ल्याचा परिसर एक एकरापेक्षाही कमी क्षेत्रफळाचा असावा. त्यामुळे पद्मदुर्गाच्या महाद्वारातून प्रवेश करताच एकाच नजरेत किल्ल्याचा पुर्ण परिसर समावतो. प्रवेशद्वारातून आत मंदिरापर्यंत फरशी वगैरे घालून रस्ता केलेला आहे.
इथे असलेले मंदिर “पद्मदुर्ग महापुरुष देवस्थान” आहे. कोकणात ठिकठिकाणी महापुरुषांची ( वेताळ मंदिर ) मंदिरं आहेत. महापुरुष म्हणजे त्या जागेचा रक्षणकर्ता.पद्मदुर्ग हा तसाही सिंधुदुर्गाच्या रक्षणासाठीची तजवीज म्हणूनच जागा हेरून बांधला गेला होता, त्यामुळे तसं म्हटलं तर हा किल्लाही महापुरुषच! इथं बहुतेक
वेळेला पुजारी असतो. त्याची परवानगी घेऊन तटावर चढून परिसर न्याहाळता येतो.
रचिव दगडांनी पद्मदुर्गची तटबंदी उभारलेली आहे.पूर्वी तर किमान १०-१२ फूट तरी उंच असावा. आता तो ढासळून ४-६ फूट उरला
आहे.तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली आहे पण त्यावरून परिसर उत्तम दिसतो. गडाला एकच दरवाजा असून चार बुरुज आहेत.मात्र याची बांधणी सिंधुदुर्गाइतकी चिरेबंदी नाही.तटाला वर चढण्यास पायर्या आहेत.त्यावर चढून फांजीवरुन फिरता येते.
प्रवेशद्वारातून बाहेर येऊन परतताना डावीकडे वाटेत तटबंदीजवळ असलेल्या
कातळाला चौकोनी आकाराचे एक भोक दिसते. बसून माणूस जाऊ शकेल एवढे आणि
मानवनिर्मित आहे. शिवरायांनी इथे जहाजे बांधणी आणि दुरुस्तीसाठी गोदी
बांधल्याचे वाचले होते. हे दगड कदाचित त्याचेच अवशेष असावेत.
मालवणच्या कोळी बांधवांचं श्रद्धास्थान असल्याने त्यांची येथे नित्यनेमाने ये-जा चालू असते. त्यामुळे वेताळाची नियमित पूजाअर्चाही होते. पद्मदुर्गचा उपयोग शिवकाळामध्ये गलबतांच्या दुरुस्तीसाठी केला जायचा. त्यासाठी भरती ओहोटीच्या वेळा साधून या खडकाळ बेटावरील धक्क्यावर गलबतं आणली जायची. या गोदीत दुरुस्त झालेली अथवा नव्याने बांधलेली मध्यम आकारची गलबतं भरतीच्या वेळी बाहेर काढून सागरात दाखल व्हायची.
किल्ल्याच्या
आतला भाग वेगवेगळी झाडे लावून सुशोभित केलेला आहे आणि स्वच्छही ठेवलेला आहे.
किल्ल्याचा आकार एकूणच लहान असून सर्व बाजूची तटबंदी बऱ्यापैकी सुरक्षित आहे.
मंदिराला लागून एक पाण्याचा हौद बांधलेला आहे किंवा ही कोरडी विहीरही असावी.किल्ल्यात बांधकामाची जोती आहेत.
वास्तविक इथून सिंधुदुर्ग लांब नाही. ओहोटी असेल तर इथून सिंधुदुर्गाचे दिशेन जाउन बर्याच जवळ पोहचू शकतो.मात्र या वाटेवरचे दगड बरेच अणकुचीदार आहेत्,त्यामुळे अत्यंत सावधगिरीने चालले पाहिजे.कदाचित जमीनीवरुन शत्रु या मार्गाने सिंधुदुर्गाच्या जवळ येउ शकेल याच शंकेने महाराजांनी या बाजुला पद्मदुर्गची उभारणी केली असावी.
या पद्मदुर्गचेही इतिहासात काही उल्लेख सापडतात. १२ जानेवारी १७६६ रोजी इंग्रज-करवीरकर छत्रपती यांच्यात झालेल्या तहानुसार जो १४ कलमी करार झाला त्यातील तिसरे कलम असे आहे "जंजिरे सिंधुदुर्ग,राजकोट व सर्जाकोट देखील व पद्मदुर्ग किल्ले स्वाधीन झाल्यास". इथे पद्मदुर्गचा उल्लेख स्वतंत्र किल्ला म्हणून येतो. तसेच इंग्रजांच्या पत्रव्यवहारात पद्मदुर्गाचा उल्लेख स्वतंत्र किल्ला म्हणूनच येतात.पद्मदुर्गचा उल्लेख बरेच जण 'पद्मगड' असा करतात्,जो चुकीचा आहे.कारण कागदपत्रात त्याचा उल्लेख पद्मदुर्ग म्हणूनच येतो.अर्थात पद्मदुर्ग हा सिंधुदुर्गाचा रक्षक दुर्ग किंवा उपकिल्ला असल्याने सिंधुदुर्गाच्या इतिहासाशी तो निगडीत आहे.मात्र सिंधुदुर्गाच्या महाद्वाराच्या बाजुला असल्याने आणि आरमारी गोदी असल्याने या किल्ल्याला महत्व होते.जरी आकाराने छोटा असला तरी या गडाला स्वतंत्र किल्लेदार आणि शिबंदी होती.या गडाचा रामदुर्ग असाही उल्लेख आढळतो. शिवकाळात या गडाची जबाबदारी विश्वासु अश्या महार जमातीकडे होती.
या पद्मदुर्गचेही इतिहासात काही उल्लेख सापडतात. १२ जानेवारी १७६६ रोजी इंग्रज-करवीरकर छत्रपती यांच्यात झालेल्या तहानुसार जो १४ कलमी करार झाला त्यातील तिसरे कलम असे आहे "जंजिरे सिंधुदुर्ग,राजकोट व सर्जाकोट देखील व पद्मदुर्ग किल्ले स्वाधीन झाल्यास". इथे पद्मदुर्गचा उल्लेख स्वतंत्र किल्ला म्हणून येतो. तसेच इंग्रजांच्या पत्रव्यवहारात पद्मदुर्गाचा उल्लेख स्वतंत्र किल्ला म्हणूनच येतात.पद्मदुर्गचा उल्लेख बरेच जण 'पद्मगड' असा करतात्,जो चुकीचा आहे.कारण कागदपत्रात त्याचा उल्लेख पद्मदुर्ग म्हणूनच येतो.अर्थात पद्मदुर्ग हा सिंधुदुर्गाचा रक्षक दुर्ग किंवा उपकिल्ला असल्याने सिंधुदुर्गाच्या इतिहासाशी तो निगडीत आहे.मात्र सिंधुदुर्गाच्या महाद्वाराच्या बाजुला असल्याने आणि आरमारी गोदी असल्याने या किल्ल्याला महत्व होते.जरी आकाराने छोटा असला तरी या गडाला स्वतंत्र किल्लेदार आणि शिबंदी होती.या गडाचा रामदुर्ग असाही उल्लेख आढळतो. शिवकाळात या गडाची जबाबदारी विश्वासु अश्या महार जमातीकडे होती.
सन १८०४-०५ च्या देवी नाईक याने भाउसाहेब महाराज यांना लिहीलेल्या पत्राप्रमाणे "गलबते व गुराबा पद्मगडावरील काढणे याविषयी आज्ञा व्हावी". या पत्रावर महाराजांनी दिलेले उत्तर असे "आकाराम यादव हवालदार यास आज्ञा झाली आहे.जे आरमार सावकारी असेल ते सावकारीच तयार करणे.त्यास हल्ली तुम्ही गुराबा आरमारे काढणे म्हणोन विनंती पत्र लिहीली त्या सेवेसी यास व दिनकरराव गायकवाड या उभयतास इलिफिस्तन यासी हा मजकुर विचारावा म्हणोन कलमी जाहले आहे.आरमार कोणे ठिकाणी ठेवून सावकारीस पाठविणेची वहिवाट करावी याचे उत्तर येइल. त्याप्रमाणे तुम्हास आज्ञा होइल"
करवीरकर व इंग्रज यांच्यातील १ ऑक्टोबर १८१२ च्या तहानुसार सिंधुदुर्गसोबत पद्मदुर्गसुध्द्दा इंग्रजांना देण्यात आला.मात्र इंग्रजांना त्याचा प्रत्यक्ष ताबा १८१४ ला मिळाला. तहानुसार किल्ल्यातील सामान व सरंजाम करवीरकर पुढील आठ वर्षात बाहेर काढू शकले नाहीत.बरेच सामान मालवण व पद्मदुर्ग येथे पडून होते.त्यावर सन १८२० च्या सुमारास करवीरकर महाराजांनी बच्चाजी अनंत यांना लिहीले कि "मागील शिलकी मालवणातील तोफा व गलबतातील सामान आहे. त्यापैकी किल्लेस उपयोगी असेल ते किल्लेस पाठविणे बाकी काय राहील ते गलबते आहेत ती चौकशीने सावकाराचे विद्यमाने किंमत ठरवून यादी हुजुर पाठवून देणे. अवलोकन होउन रास्त करणेविषयी आज्ञा होइल"
यावर बच्चाजी अनंत यांनी मालवण मुक्कामावरुन ८ जानेवारी १८२२ रोजी उत्तर दिले "पद्मदुर्गावर गुराबा आहेत तेथे रखवाली नाही.गुराबाची शाडूनीही नाही.तेणे करुन खराब होउन गेली.त्यास काही गिर्हाईक उभे रहावयाचे नाही. लोखंडी सामान गुराबाचे निखळून काढून कोणी नेले.एक गुराब व गलबत त्यांची यंदा पर्जन्यकाळी शाकारणी केली नाही.परंतु काही उपयोगी निगा खपलेस गुराबाचे जर सुकाणाचे पेट पाटणाचे काढून नेले.वरकड काही सामान कोठीत ठेवले.त्याचे कुलुप चौथाई हुजुरे याजकडे आहे.लाकडी सामान गुराब व गलबत येक तडीस ठेवले त्याचीही यादी हुजुर याजपाशी आहे".
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) गड्,किल्ले सिंधुदुर्गाचे- सतिश अक्कलकोट
३) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! - प्र.के.घाणेकर
४) श्री. सदानंद कबरे यांचे लिखाण
५) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६) www.durgbharari.com हि वेबसाईट
७) http://omkarkelkar.blogspot.com/2020/02/blog-post.html हा ब्लॉग
८) http://
९) https://daryafirasti.com/ हा ब्लॉग
१०) http://prahaar.in/feature/ bhannat/131795 हि लिंक

तसं एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर “मोरयाचा धोंडा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भूमिपूजनाचा दगड”
पण एवढे रुक्ष वर्णन करण्यापलीकडे याचे महत्त्व नक्कीच आहे. मराठा आरमारातला सिंधुदुर्ग हा महत्त्वाचा किल्ला. या किल्ल्याच्या बांधकामासाठी “कुरटे बेट” ही मालवण किनाऱ्यावरची जागा निवडण्यात आली. “चौर्यांशी बंदरी ऐसी जागा नाही” असे जिचे वर्णन करण्यात येते ती जागा निवडण्यास मदत करणाऱ्या कोळी लोकांना गावेही इनाम देण्यात आली.
भूमीपूजनाचा मुहूर्त काढण्यासाठी मालवणचे वेदशास्त्रसंपन्न जानभट अभ्यंकर यांना निमंत्रण केले गेले. अशा वास्तूचे भूमिपूजन करण्यासाठी महाराजांनी वायरी-दांडी किनारपट्टीवरची जागा निवडली. असे म्हणतात की हिरोजीला इथलाच एक दगड दाखवून त्यावर गणपतीचे चित्र कोरायला खुद्द महाराजांनी सांगितले. गणपती बरोबरच शिवलिंग व नंदीचीही स्थापना झाली. तसेच चंद्रसूर्यही कोरण्यात आले.
मार्गशीर्ष शके १५८६ द्वितीया म्हणजे २५ नोव्हेंबर १६६४ ला हे भूमिपूजन होऊन नंतर सिंधुदुर्ग उभारणीस सुरुवात झाली. साक्षात महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या पण पर्यटकांपासून तसा उपेक्षितच असलेल्या या मोरयाच्या धोंड्याची पूजाअर्चा स्थानिक लोक मनोभावे करतात.

सदर छायाचित्र श्री संतोष पेडणेकर यांच्या ब्लॉग येथून घेण्यात आले आहे. तसेच या छायाचित्राचे सर्व हक्क त्यांच्याकडे राखीव आहेत.
आपण त्यांच्या ब्लॉगला खालील लिंकद्वारे भेट देऊ शकता.

तसं एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर “मोरयाचा धोंडा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भूमिपूजनाचा दगड”
पण एवढे रुक्ष वर्णन करण्यापलीकडे याचे महत्त्व नक्कीच आहे. मराठा आरमारातला सिंधुदुर्ग हा महत्त्वाचा किल्ला. या किल्ल्याच्या बांधकामासाठी “कुरटे बेट” ही मालवण किनाऱ्यावरची जागा निवडण्यात आली. “चौर्यांशी बंदरी ऐसी जागा नाही” असे जिचे वर्णन करण्यात येते ती जागा निवडण्यास मदत करणाऱ्या कोळी लोकांना गावेही इनाम देण्यात आली.
भूमीपूजनाचा मुहूर्त काढण्यासाठी मालवणचे वेदशास्त्रसंपन्न जानभट अभ्यंकर यांना निमंत्रण केले गेले. अशा वास्तूचे भूमिपूजन करण्यासाठी महाराजांनी वायरी-दांडी किनारपट्टीवरची जागा निवडली. असे म्हणतात की हिरोजीला इथलाच एक दगड दाखवून त्यावर गणपतीचे चित्र कोरायला खुद्द महाराजांनी सांगितले. गणपती बरोबरच शिवलिंग व नंदीचीही स्थापना झाली. तसेच चंद्रसूर्यही कोरण्यात आले.
मार्गशीर्ष शके १५८६ द्वितीया म्हणजे २५ नोव्हेंबर १६६४ ला हे भूमिपूजन होऊन नंतर सिंधुदुर्ग उभारणीस सुरुवात झाली. साक्षात महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या पण पर्यटकांपासून तसा उपेक्षितच असलेल्या या मोरयाच्या धोंड्याची पूजाअर्चा स्थानिक लोक मनोभावे करतात.

सदर छायाचित्र श्री संतोष पेडणेकर यांच्या ब्लॉग येथून घेण्यात आले आहे. तसेच या छायाचित्राचे सर्व हक्क त्यांच्याकडे राखीव आहेत.
आपण त्यांच्या ब्लॉगला खालील लिंकद्वारे भेट देऊ शकता.
राजकोट
सिंधुदुर्गसारखा बळकट पाणकोट राखायचा असेल त्याला सभोवती संरक्षक कवच पाहीजे.कोकणच्या किनार्याबर जंजिर्याचा सिद्दी,गोव्याचे पोर्तुगीज्,वेंगुर्ल्याचे डच्,राजापुर्,मुंबईचे इंग्रज हे प्रबळ आरमार असणारे प्रतिस्पर्धी आधीच पाय रोवून बसले होते.त्यांना तोंड द्यायचे तर सिंधुदुर्गाबर होणार्या संभाव्य हल्ल्यापासून वाचण्यासाठी उपदुर्ग आवश्यक होते.यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उत्तरेस समुद्रात शिरलेल्या एका उंच भुशीरावर राजकोटचा किल्ला बांधलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ला ते राजकोट हे अंतर सरळ रेषेत मोजल्यास ३ हजार फुटापेक्षा कमी आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जमिनीकडून होणाऱ्या हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. मालवणच्या किनार्यावर उत्तरेकडे खडकाळ व काहीसा उंच भाग आहे.तसेच नैसर्गिक उंचवट्यामुळे सिंधुदूर्गाच्या उत्तरेकडील समुद्रावर लक्ष ठेवणे सहज शक्य झाले. त्यामुळे राजकोटाची उभारणी करुन तसेच त्याच्या जोडीला उत्तरेला सर्जेकोटाची उभारणी करुन शिवाजी महाराजांनी मालवण बंदराला आणि सिंधुदुर्गाला जणु अभेद्य कवच प्रदान केले.
सिंधुदुर्गाचे दर्शन घेउन राजकोट बघायला जायचे तर मालवण शहरात मेढा भागात असलेल्या जयगणेश मंदिराकडून किल्ल्यावर चालत जाता येते.यासाठी मालवण जेट्टीवरुन किनार्याने उत्तरेकडे चालत गेल्यास राजकोटला पोहचु शकतो किंवा मालवण एस टी स्टँडवरुन सुटणार्या सर्व बसेस बाजारातून फिरुन जातात या बसेसनी वडाच्या पारावर उतरुन राजकोटला १० मिनीटात चालत जाता येते. आज हा किल्ला इतका दुर्दैवाचे दशावतार भोगतोय कि राजकोट बघण्यासाठी या परिसरात गेल्यास ह्या किल्ल्याशेजारी उभ्या असणाऱ्या लोकांना सुद्धा किल्ला कुठे आहे ते सांगता आले नाही, ही आहे किल्ल्याची उरलेली शोकांतिका.
सुवर्ण(सोन्याच्या) गणपती मंदिरापासून फुटणार्या डाव्या हाताचा रस्ता राजकोटला व उजव्या हाताचा रस्ता रॉक गार्डनला जातो. साधारण आयताकृती आकाराचा हा किल्ला ३ एकर परिसरावर पसरलेला असुन किल्ल्याचा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला आहे.
तीन बाजुस समुद्र व एका बाजुस जमीन अशी या किल्ल्याची रचना असुन किनाऱ्याकडे उभे राहिले असता समोरच उंचवट्यावर एक वास्तु दिसते. हि वास्तु किल्ल्याच्या समुद्राकडील दिशेने असलेल्या बुरुजावर उभी आहे. या बुरुजाकडे जाताना एका मोठया झाडाखाली महापुरुषाची घुमटी दिसते.
किल्ल्याच्या या सपाट भागात मोठया प्रमाणात मासळी सुकत घातलेली असल्याने कुबट वास सहन करावा लागतो.
बुरुजावरून समोरच सिंधुदुर्ग किल्ला व दूरवर पसरलेला अथांग सिंधुसागर दिसतो. या बुरुजावरून समुद्र्काठाने पुढे आल्यावर उध्वस्त झालेला दुसरा बुरुज दिसतो.
या बुरुजाच्या पुढे जमिनीच्या बाजूने असलेली किल्ल्याची तटबंदी आजही शिल्लक असुन या तटबंदीची उंची ५-६ फुट आहे. या तटबंदीच्या बांधकाम सांधण्यासाठी कोणतेही मिश्रण वापरलेले नाही. या तटबंदीच्या काठाने पुढे जाताना तटबंदी बाहेर बंदीस्त आवारात इंग्रज अधिकाऱ्यांच्या चार समाधी पहायला मिळतात. या समाध्या एकोणीसाव्या शतकाच्या अखेरच्या आहेत.
तटबंदीच्या टोकाला ढासळलेला तिसरा बुरुज असुन तटबंदीला लागुनच एक बांधीव विहीर आहे.
किल्ल्यात पाण्याची एकमेव सोय असलेल्या या विहिरीचे पाणी आजही वापरात आहे. तटबंदीच्या काठाने पुढे आल्यावर एक घर असुन या घराच्या पुढील भागात किल्ल्याचा सुस्थितीतील चौथा बुरुज आहे. या बुरुजावर तोफांचा मारा करण्यासाठी मोठमोठया जंग्या आहेत.
बुरुजाला लागुन किल्ल्याच्या आवारात तीन चार घरे आहेत.बाजुलाच खडकांमध्ये एक छोटे चर्च अगदी उठुन दिसते. या बुरुजावर सध्या धोक्याची सुचना दाखवणारा बावट्याचा स्तंभ आहे.या ठिकाणी आपली अर्ध्या तासाची गडफेरी पुर्ण होते.
राजकोट हा सिंधुदुर्गाचा उपदुर्ग असल्याने याला फारसा स्वतंत्र इतिहास नाही. राजकोट किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांनी इ.स १६६४ ते १६६७ च्या दरम्यान केली. ज्याच्या हाती सिंधुदुर्ग त्याच्याच ताब्यात राजकोट अशी स्थिती होती. शिवकाळ असो किंवा संभाजी महाराजांच्या कालखंडातील आलमगिरी आक्रमणाचा धामधुमीचा काळ, राजकोटावरचा भगवा अखंडपणे फडफडत राहीला.इ.स.१७६३ साली पोर्तुगीजांनी सिंधुदुर्गवर हल्ला केला असता जवळच्या एका लहान दुर्गावर मराठ्यांचे २०० लोक व सहा तोफा असल्याचा उल्लेख येतो. हा दुर्ग बहुदा राजकोट अथवा सर्जेकोट असावा.पद्मदुर्ग निश्चितच नाही,कारण पद्मदुर्गाचा जेमतेम विस्तार लक्षात घेता,त्यावर दोनशे लोक असणार नाहीत. मुळ पत्रातील वाक्य "सिंधुदुर्गा जवळ एका लहानशा दुर्गावर मराठ्यांचे दोनशे लोक व सहा तोफा होत्या." राजकोट आकाराने मोठा असल्याने पत्रात उल्लेख केलेला हा किल्ला नक्कीच राजकोट असणार. सन १७६६ मध्ये इंग्रज व करवीरकर यांच्यात झालेल्या तहानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखारीसाठी व मोठ्या जहाजांना उभे रहाण्यासाठी परवानगी मागितली होती. इंग्रज या राजकोटाचे महत्व जाणून होते.थेट सिंधुदुर्ग ताब्यात नसला तरी त्यावर वचक ठेवण्यासाठी व आपली जहाज नांगरण्यासाठी त्यांना राजकोट सोयीचा वाटला.इंग्रज व करवीरकर छत्रपती यांच्यात १ ऑक्टोबर १८१२ रोजी झालेल्या तहानुसार १८१४ मध्ये राजकोटाचा ताबा इंग्रजांकडे आला. १८६२ मध्ये किल्ल्यात काही इमारतींचे अवशेष, तुटलेली तटबंदी व एक तोफ असल्याचा उल्लेख आहे. शिवाय कोटाजवळच काही इमारती होत्या ज्यात सन १७९२ मध्ये बांधलेली इंग्रजांची वखार होती. या भागाला 'ओल्ड रेसिडेन्सी' म्हणत. इंग्रजांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार कोटाच्या भिंती विशेष मजबूत नसून त्याच्या तीन कोपर्यात तीन बुरुज आहेत.तसेच १८१२ मध्ये बांधलेल्या काही बराकी आहेत.
राजकोटाचे आज पुर्वीचे काही वैभव उरले नसले तरी या राजकोट परिसरात आल्यावर आवर्जून बघावी अशी काही ठिकाणे आहेत.
रॉक गार्डन:- राजकोटच्या आसपास असलेल्या खडकाळ भागात रॉक गार्डन बनवण्यात आले आहे. येथील खडकावर आपटून फूटणार्या लाटा पहातांना वेळेचे भान राहत नाही. येथून समुद्रात होणारा सूर्यास्त अप्रतिम दिसतो.
गणेश मंदिर: राजकोटहून मालवणला जाताना वाटेत सुवर्ण(सोन्याच्या) गणेशाचे मंदिर आहे.
मौनी महाराज मंदिर: शिवाजी महाराजांनी उभारलेले जांभ्या दगडातील मौनी महाराजांचे मंदिर मेढा राजकोट या भागात आहे.
सर्जेकोट
मालवण हे जरी बंदर असले तरी ते खुल्या समुद्रात असल्याने पावसाळ्यात तितके सोयीचे नव्हते. सहयाद्रीत उगम पावणारी गड नदी कोकणात कालावल खाडी म्हणुन ओळखली जाते. या कालावल खाडीच्या मुखाशी असलेल्या भुशिरामुळे पाणी वळुन खाडीत शिरते त्यामुळे या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी असतो व लाटाही कमी प्रमाणात उसळतात. यासाठी पावसाळ्यात मराठ्यांचे आरमार कालावल खाडीत नांगरून ठेवले जात असे. या आरमाराच्या मदतीसाठी व सुरक्षेसाठी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उत्तरेस २.५ मैल अंतरावर असलेल्या कोळंब खाडीच्या मुखाशी सर्जेकोटाची निर्मिती करण्यात आली. वेडीवाकडी वळणे असलेल्या कोळंबच्या खाडीत पावसाळ्यात महाराजांच्या आरमारातील जहाजे नांगरुन ठेवली जात असत.
सर्जेकोटला भेट देण्यासाठी मालवणपासुन ४ कि.मी.अंतरावर मालवण आचरा रोडवर असलेले कोळंब गाठावे.त्यासाठी मालवणहून एसटीने सर्जेकोटला जाता येते.
सर्जेकोटला जाण्यासाठी मालवणवरुन थेट बस सेवा आहेत.
मालवण ते सर्जेकोट- सकाळी ९.००,१२.१५ आणि संध्याकाळी ५.१५
सर्जेकोट ते मालवण- ९.३०,१२.४५ आणि संध्याकाळी ५.४५
अर्थात बससेवा फारच मर्यादीत असल्यामुळे मालवणहून रिक्षा ठरवूनही किल्ल्यावर जाता येते. मालवण - सर्जेकोट अंतर ४ किमी आहे.अर्थात स्वताचे वाहन असणे सर्वात सोयीचे.दोन-तीन दिवसात या परिसरातील सर्व किल्ले पाहून होता.सर्जेकोट गावात रहाणे,जेवणे अशी कोणतीही सोय नाही.त्यामुळे मालवणला राहून इथे येणे सोयीचे आहे.
सर्जेकोट स्टॉपपासून १० मिनिटात चालत किल्ल्यावर पोहोचता येते. सर्जेकोट पंचक्रोशी मच्छीमार सहकारी सोसायटी पासून डाव्या हाताने जाणार्या रस्त्याने थेट किल्ल्यात जाता येते. गावातुन समुद्रावरील धक्क्यावर जाताना धक्क्याच्या थोडे अलीकडे एक रस्ता डावीकडे जातो. या रस्त्याच्या टोकाला सर्जेकोट किल्ल्याचा लहानसा कमानीदार दरवाजा आहे.
सर्जेकोट गडाच प्रवेशद्वार छोटस पण कमानदार आहे.
प्रवेशद्वाराच्या बाजूला बुरुज आहे. किल्ल्याच्या आत मधल्या परिसरात घरं आहेत आणि त्यात अजूनही लोक राहतात त्यामुळे घराच्या आसपासचा परिसर त्यांनी साफ ठेवलेला आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर घरांकडे जाणारा रस्ता तेवढाच साफ दिसतो. घरांमध्ये विचारपूस केल्यावर त्यांच्या-त्यांच्या हद्दीत येणारी तटबंदी, अवशेष ते पाहू देतात. पण तटबंदी आणि घरांचे सगळेच बांधकाम त्यांच्या कम्पाउंडच्या भिंतीसहित चिऱ्यांचे असल्याने काही ठिकाणी तो किल्ल्याचा भाग आहे कि घरांच्या बांधकामाचा, असा संभ्रम निर्माण होतो.डाव्या बाजुला तीन घरे असुन सर्जेकोट त्यांच्या खाजगी मालकीचा असल्याने त्यांनी बनवलेल्या नारळाच्या बागेने आतील वास्तु भुईसपाट झाल्या आहेत. यातील एका घराच्या आवारात विहीर असुन या विहिरीचे पाणी आजही वापरात आहे.
दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्याचा चौथरा असुन वाटेच्या उजवीकडे काही अंतरावर बुजत आलेले पाण्याचे लहान टाके आहे. वाटेने सरळ पुढे आल्यावर तटबंदीत डाव्या बाजुला खाली उतरत जाणारा मार्ग दिसतो. हा मार्ग तळात बंद झाल्याने या वास्तुचा नक्की बोध होत नाही.
आपण प्रवेश केलेल्या दरवाजाच्या साधारण चौकोनी आकाराचा हा किल्ला २ एकर परिसरावर पसरलेला असुन किल्ल्याचे बालेकिल्ला व बाहेरील किल्ला असे दोन भाग पडले आहेत. एका बाजुस समुद्र व तीन बाजुस जमीन अशी या किल्ल्याची रचना असुन किल्ल्याच्या एका टोकाला बालेकिल्ला आहे.
एका घराच्या मागच्या बाजूस बालेकिल्ला आहे. याच्या चारही बाजूचे बुरुज सुरक्षित आहेत. आत मध्ये साफसफाई नसल्याने फारसे निरीक्षण येत नाही. बाजूला खंदक असल्याचा उल्लेख आला तरी हे खंदक आता बुजून गेलेत. तसं बघितलं तर झाडी साफ केल्यास राहती घरं असूनही खूप असे अवशेष पाहता येऊ शकतात. तटबंदीही बरीचशी शिल्लक आहे.
नीटसे बघितल्यास झाडीत आणि घरांच्या जवळ लपलेले अजूनही काही बुरुज दिसतात. किल्ल्याची एक बाजू अर्थातच समुद्रकिनारी आहे, त्याही बाजूने निरीक्षण केल्यास बुरुजांचे भाग दिसतात.
किल्ल्याच्या तटबंदीत एकुण दहा बुरुज असुन यातील चार बुरुज बालेकिल्ल्याच्या तटबंदीत व तीन बुरुज समुद्राच्या दिशेने आहेत. दहा बुरुजातील एक बुरुज चौकोनी असुन मुळ बुरुज ढासळल्याने हा कदाचित नंतर बांधला गेला असावा.
तीन बाजुस समुद्र व एका बाजुस जमीन अशी या किल्ल्याची रचना असुन किल्ल्याला तीन बाजुंनी १० फुट रुंद व १० फूट खोल खंदक असल्याचे वाचनात येते पण आज केवळ बालेकिल्ल्याच्या तटाबाहेरील बाजूस या आकाराचा खंदक पहायला मिळतो. किल्ल्याचे बांधकाम घडीव चिऱ्यात केले असुन हे बांधकाम सांधण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मिश्रण वापरलेले नाही.
किल्ल्याचे दोन बुरुज व काही तटबंदी वगळता बाहेरील सर्व बांधकाम आजही सुस्थितीत आहे. किल्ल्यातील घराच्या आवारातुन बालेकिल्ल्यात जाण्याची वाट असुन तटबंदीतील हा मार्ग अतिशय चिंचोळा असल्याने या ठिकाणी दरवाजा असावा असे वाटत नाही. बालेकिल्ल्याच्या आतील परीसर अतिशय लहान असुन त्यात विहीर, तुळशी वृंदावन व घराचे जोते पहायला मिळते. तटबंदीच्या आत एक शौचकूप असुन तटावर जाण्यासाठी जिना आहे. जिन्याने वर चढुन तटावर फेरी मारता येते. बालेकिल्ल्यात मोठया प्रमाणात काटेरी झाडी वाढलेली असली तरी बुरुज तटबंदी सुस्थितीत आहेत. किल्ल्याच्या संपुर्ण तटबंदीत बंदुकीच्या माऱ्यासाठी जंग्या असुन बुरुजावर तोफांचा मारा करण्यासाठी मोठमोठे झरोके आहेत. संपुर्ण किल्ला आतबाहेर पहाण्यासाठी एक तास पुरेसा होतो. एकूणच किल्ल्याचे किल्लेपण हरवत चालले आहे. वेळीच काळजी न घेतली गेल्यास सर्जेकोटचा राजकोट होण्यास फार वर्षे लागणार नाहीत.
मालवणहून परिसरातील किल्ल्यांच्या भटकंतीचे नियोजन करायचे असल्यास सकाळी निघून भरतगड, भगवंतगड, सर्जेकोट हे किल्ले पाहून संध्याकाळी सिंधुदूर्ग व राजकोट हे किल्ले स्वत:च्या / खाजगी वहानाने (एस टी ने नव्हे) एका दिवसात पाहाता येतात.सिंधुदुर्ग - राजकोट - सर्जेकोट - रामगड - निवती किल्ला, भोगवे समुद्र किनारा असा क्रम ठेवल्यास कमी वेळ लागेल.
सर्जेकोटावरुन उत्तरेला कालावल खाडी दिसते.हि खाडी सह्याद्रीत सोनगडाच्या पायथ्याशी उगम पावते,पुढे रामगडाला चरणस्पर्श करुन भरतगड आणि भगवंतगड यांच्या नजरेमधुन वहात समुद्राला येउन मिळते.इथेही गड नदीच्या स्वागताला सर्जेकोट उभा आहेच.
राजकोट आणि पद्मगडाप्रमाणे सर्जेकोटालाही वेगळा असा इतिहास नाही.सर्जेकोट किल्ल्याची बांधणी सिंधुदुर्गबरोबर इ.स.१६६४ ते १६६७ च्या दरम्यान केली गेली. तुळाजी आंग्र्याना हरवून विजयदुर्गाचा ताबा पेशव्यांकडे आला.पण यावेळी सिंधुदुर्ग आणि त्याचे तिन्ही रक्षक दुर्ग करवीरकर संस्थानाच्या अधिपत्याखाली होते.सर्जेकोटावर वचक निर्माण करण्याच्या हेतूने कोळंब खाडीच्या उत्तर तीरावर तोंडोली गावाच्या हद्दीत नानासाहेब पेशव्यांनी माती व लाकडाच्या ओंडक्याने मेढेकोट उभारण्याचा प्रयत्न केला.करवीरकर छत्रपतींनी यावर अर्थातच आक्षेप घेतला. तहामध्ये यासाठी कलम घातले गेले "किले मालवण येथील जंजिरा सर्जेकोट नजीक तोंडोलीस विजयदुर्गकरी मेढा घालतात.त्यास कैलासवासी सिवाजी महाराज यांचे कारकीर्दीपासून व आंग्रे यांचे वेळेस आजपर्यंत तेथे कोणी मेढा घातला नाही,हल्ली विजयदुर्गकरी मेढा घालतात त्यास किल्ल्यानजीक घातल्याने किल्ल्यास उपद्रव होतो.वास्तव मेढा घालावयाचे मना करावे,घातला असेल तो काढावा. सालमजकुरी नवाच मेढा घालतात तो घालु नये"
जानेवारी-फेब्रुवारी १७६५ मध्ये सिंधुदुर्गासोबत इंग्रजांनी सर्जेकोटही घेतला.पुढे १२ जानेवारी १७६६ च्या तहानुसार सर्जेकोट पुन्हा करवीरकरांना मिळाला.इंग्रज व करवीरकर यांच्यात झालेल्या १ ऑक्टोबर १८१२ च्या तहानुसार सर्जेकोट व सिंधुदुर्ग किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.मात्र इंग्रजांना सर्जेकोटाचा प्रत्यक्ष ताबा सन १८१४ मध्ये मिळाला. इ.स.१८६२ साली इंग्रजांनी केलेल्या किल्ल्याच्या पाहणीत हडी गावाच्या हद्दीतील सर्जेकोट किल्ल्याला तिन्ही बाजुस खंदक असुन किल्ल्याची तटबंदी मोडकळीस आल्याचे नमूद केले आहे.
संदर्भग्रंथः-
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) गड्,किल्ले सिंधुदुर्गाचे- सतिश अक्कलकोट
३) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! - प्र.के.घाणेकर
४) https://deepakparulekar.blogspot.com/ हा ब्लॉग
५) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६) www.durgbharari.com हि वेबसाईट
२) गड्,किल्ले सिंधुदुर्गाचे- सतिश अक्कलकोट
३) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! - प्र.के.घाणेकर
४) https://deepakparulekar.blogspot.com/ हा ब्लॉग
५) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६) www.durgbharari.com हि वेबसाईट













































No comments:
Post a Comment