शके १५८६ मार्गशीर्ष मध्ये म्हणजेच नोव्हेंबर १६६४ मध्ये शांत्,निवांत मालवण परिसर अचानक घोड्यांच्या टापांनी गजबजून उठला.अर्थात हि वर्दळ मालवणकरांना नवीन नव्हती.एखादा आदिलशाही सरदार आला असावा या कल्पनेने मालवणकर धास्तावून गेले,मात्र थोड्याच वेळात भगवे निशाण आघाडीवर फडफडत असलेला सेनासमुद्र मालवणच्या सिंधुसागराजवळ आला.एक तेजस्वी,धारदार नाकाची,पाणीदार डोळ्याची, डौलदार चालीची व्यक्ती घोड्यावरून खाली उतरली आणि सिंधुसागर निरखु लागली.गडबडलेले,धास्तावलेले मालवणनिवासी आता थोडे सावरले, हि आदिलशाही फौज नक्कीच नव्हती.तेवढ्यात कोणाच्या तरी ध्यानी आले "हे शिवाजी राजे असां".अचानक सगळीकडे आनंदाची लहर उमटली.स्वंयपाकघरातून मागच्या परसात लपलेल्या लेकी,सुना बाहेर आल्या, पातशाही फौजा आता काय धुडघुस घालणार या कल्पनेने चिंताक्रांत झालेल्या बापड्यांचे चेहरे उजळले.सगळेजण समुद्रकिनार्याकडे धावले.
नुकतेच लालमहालात शाहिस्तेखानाला धडा शिकवून आणि कोकणातील इंग्रज आणि इतर फितुरांना योग्य तो धडा शिकवून गोमांतकातून शिवाजी महाराज मालवणास आले होते. त्यांची गरुड नजर लांब समुद्रात असलेल्या बेटावर स्थिरावली.महाराजांनी स्थानिक कोळ्यांकडे चौकशी केली तेव्हा कृष्णसावंत देसाई, भानजी प्रभू देसाई, यांनी माहिती दिली 'महाराज्,ते तर कुरटे बेट'. किनार्यापासून या बेटावर जायचे तर अडचणी खुप.एकतर पाण्यातून सरळ वाट नाही.समुद्राने पोटात दडवलेले दगड कधी नावेचा तळ फाडून काढतील्,नेम नाही. पण महाराजांचा शब्द गेला होता.तो झेलायला तानाजी,मानाजी,गंगाजी व सावजी कोळी यांनी बेटावर सुरक्षित जायची नागमोडी पाणवाट शोधलीच.स्थानिक कोळी उत्साहाने मदतीला होतेच. कृष्णसावंत देसाई, भानजी प्रभू देसाई, गोविंद विश्वनाथ, प्रभाकरभट्ट,मोरोपंत,हिरोजी असे सखे सोबती घेऊन महाराजांनी बेट पाहीले. बेटाचा घेर कोस - सव्वा कोस, बेटाकडे येण्याच्या मार्गाची दुर्गंमता,

बेटाच्या सभोवती सर्वत्र दगड आहेत.त्यातील खडक सागर भरतीच्यावेळी लपवतो.त्यामुळे बेटाच्या तीन कोसापर्यंत मोठी नाव येउ शकत नाही. बरेच तरांडी, जहाज, बोटी, नाव हे तेथील माहितगार माणासनीच चालवावी असाच तो मार्ग आहे. हेच या बेटाला असलेले नैसर्गिक कवच आहे. तांडेलांनी महाराजांना अचूक बेटावर पोहचते केले. ऐन समुद्रात मालवणच्या किनार्यापासून भर समुद्रात असलेल्या कुरटे बेटाचे आज भाग्य उजळले. बेट उत्तम व आटोपशीर होते.‘कुरटे’ बेटावर खडक, चारही दृष्ट्या मोक्याची जागा व त्यावर असलेली गोड्या पाण्याची सोय या गोष्टी पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञा केली की, या जागी बुलंद किल्ला वसवावा चौºयांशी बंदरी ऐशी जागा दुसरी नाही! आणि ‘सिंधुदुर्ग’ नावाचा सागरी अभेदय किल्ला साकार झाला.
अफजलखानाला मारल्यावर छत्रपतींनी आदिलशहाची ठाणी काबीज केली. महाराज त्यानंतर मालवण किनार्यावर आले. त्यावेळी कोकणाची स्थिती अत्यंत भयानक होती. आदिलशहा, सिद्दी व पोर्तुगीजांचे जबरदस्तीने होणारी धर्मांतरे, अमानुष अत्याचार, फुटणारी देवळे, स्त्री-पुरुषांना पकडून परदेशात गुलाम म्हणून होणारी रवानगी हे प्रकार रोजचेच होत होते. या सर्वांना कुठेतरी खीळ बसावी यासाठी महाराजांनी किल्ला बांधणीची आवश्यकता होती.छत्रपतींनी बांधलेल्या या किल्यामुळे मराठ्यांच्या नौदलाला एक मोठे बळ मिळाले. कारण तोपर्यंत समुद्रावर केवळ इंग्रज, पोतुर्गीज, डच, आदिलशहा, सिद्दी व पोतुर्गीज, चाचे यांचाच वचक होता. समुद्रकिनार्यावरून होणार्या शत्रूचा त्रास कमी करण्यासाठी, कोकण परिसरात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी, सागरी मार्गाने येणार्या शत्रूवर करडी नजर ठेवून त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी, पोर्तुगीज, डच, फे्रंच, इंग्रज आणि सिद्दी या दर्यावर्दीना आळा घालण्यासाठी, स्वराज्यांचे संरक्षण करण्यासाठी शिवरायांनी मालवण बंदरी कुरटे बेटावर सिंधुदुर्ग हा अभेद्य, मजबूत, अजिंक्य, कणखर, असा जलदुर्ग बांधला नव्हे शिवलंकाच उभारली.
'ज्याचे आरमार त्यांचा समुद्र' याच न्यायाने 'भारतीय आरमाराचे जनक' छत्रपती शिवाजी महाराजचे नाव संपूर्ण विश्वामध्ये घेण्यात येते. मध्ययुगीन काळात भारतामध्ये सागराचे व आरमाराचे महत्व ओळखणारा पहिला राजा. दुर्ग हे महाराष्ट्राचे वैभव आहे. याच दुर्गाच्या अंगाखांद्यावर येथील मराठी माणूस खेळला, बागडला आहे. जसे ''ज्याचे अश्वबल त्याची पृथ्वी'' तसेच 'ज्याचे जवळ आरमार त्याचाच समुद्र'. एरवी महाराज उंच उंच डोंगरी किल्ल्यावर सदैव वावरत, सह्याद्रीच्या अंगणात हुतूतू घालीत. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळवण्यास व शत्रूस खेळवण्यास त्यांचे मन अतिशय रमत असे. त्यांच मन सह्याद्री इतकच सागरावर पण होते. सागराकडे त्यांना लक्ष दयायला वेळ नव्हता. एका पाठोपाठ एक जमिनीवरच्या मोहिमा त्यांच्या छाताडावर येऊन आदळत होत्या. त्यांना तोंड देण्यास त्यांचे बळ खर्ची पडत असे. आरमार उभे करायचे तर जलदुर्गाचे पाठबळ हवे.छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स.१६५९ मध्ये मराठ्याच्या आरमारी दलाची मुहूर्तमेढ रोवली. आरमाराचे प्रमुख ठाणे मजबूत असावे या हेतूने समुद्राकाठी दुर्ग उभारण्याची योजना शिवरायांनी हाती घेतली. मराठ्यांच्या महापराक्रमाला जलदुर्ग बांधून आणि आरमार उभे करून शिवरायांनी सागराचे दरवाजे उघडून दिले. आरमाराचे संपूर्ण महत्व ओळखणार्या या जाणता राजाला 'भारतीय आरमाराचे जनक' मानले जाते. अशा या शिवरायांची, शिवगडपतींची सागरी राजधानी म्हणजे 'सिंधुदूर्ग' किल्ला होय.
शिवाजी महाराजांनी मालवण येथे सिंधुदुर्ग का उभारला याची एक दुर्गकथा सांगितली जाते.शिवाजी राजांनी जंजिरा जिंकून घेण्याचा खुप प्रयत्न केला,पण त्यांना काही केल्या यश येईना.त्यांना तर जंजिरे मेहरुब जिंकायचाच होता.त्यासाठी ते एकदा समुद्रकिनार्यावर उपोषणाला बसले.सात दिवस झाले.त्यांनी अन्नपाण्याला स्पर्श केला नाही,मग समुद्र त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाला.एके रात्री त्याने शिवाजी महाराजांना दृष्टांत दिला आणि सांगितले कि "जंजिरा तुमच्या हाती येणार नाही.त्याचा नाद तुम्ही सोडून द्या.त्याच्या मोबदल्यात तुम्हाला पाण्यात ( म्हणजे समुद्रात ) तश्याच योग्यतेची दुसरी जागा देतो.तिथे किल्ला बांधा.तो तुम्ही आपण होउन कोणाला दिला तर हातचा जाईल्,अन्यथा नाही.युध्दाचा कितीही बाका प्रसंग आला तरी मी शत्रुला शासन करीन.तीन वर्षांनी तुमच्याकडे लाखो रुपयाची मालमत्ता चालून येईल.ती जमा करा".
मग शिवाजी महाराज झोपेतून खडबडून जागे झाले आणि डोळे उघडून बघतात तर समोर समुद्राची ओहोटी चालु होउन पाणी कमी झाले होते आणी अकस्मात पाण्यात बेट उत्पन्न झाले होते.हे बेट दहा-वीस हात उंच व सहा कोस रुंद असे होते.त्यांच्याबरोबर इतर अधिकार्यांनीही हे दृष्य पाहिले.त्यांनाही आश्चर्य वाटले.यामुळे महाराजांची किर्ती दुरवर पसरली.त्यांनी समुद्राने दिलेल्या बेटावर किल्ला बांधला आणि त्याला नाव दिले 'सिंधुदुर्ग'
अर्थात अशी कथा शिवदिग्विजय बखरीत आहे.पण या कथेत काहीही तथ्य नाही.मालवण येथे जंजिर्याला तोंड देण्यासाठी योग्य जागा शोधण्याचे श्रेय मात्र निसंशय शिवछत्रपतींचेच.



जलदुर्ग बांधण्याचे निश्चित झाल्यावर उत्तम मुहुर्त पाहीला गेला.२३ नोव्हेंबर १६६४ या शुभदिनी मालवणच्या किनार्यावर गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेला खडक, मोरयाचा धोंडा येथे पुजेची तयारी करण्यात आली.पण यासाठी गावतील उपाध्याय हवा म्हणून जानभट्ट अंभ्यकर व त्यांचे भाचे वेदमुर्ती दादंभट यांना बोलवण्यात आले.मात्र दोघांच्याही मनात शंका होती.उद्या महाराज येथून गेले आणि हा प्रदेश पुन्हा आदिलशहाने घेतला तर घराची राखरांगोळी व्हायची.वास्तविक स्वरा़ज्याची शपथ घेउन जवळपास एकोणीस वर्ष झाली तरी वर्षानुवर्षे पातशाही जुलमी काळ अनुभवलेल्या लोकांचा विश्वास बसत नव्ह्ता.ज्या रयतेच्या राज्यासाठी बाजी पासलकर्,बाजीप्रभु देशपांडे अश्या असंख्य वीरांनी प्रसंगी स्वत:च्या प्राणाचे बलिदान देण्यासाठी मागेपुढे बघीतले नाही,तरीही रयत अजून विश्वास धरत नाही हे चांगले लक्षण नव्हते.महाराजांनी त्या दोघांना पकडून आणायला सांगितले.नंतर मात्र त्यांचा आदरसत्कार केला आणि त्यांना म्हणाले "तुम्ही ब्राम्हण, या जागी सुखरुप रहाणे.मनी शंका न धरणे"आता पुजार्यांना अनमान करायला जागाच नव्हती.मोरयाच्या धोंड्यासमोर शिवछत्रपती पुजेस बसले. पुजार्यांनी त्यांना संकल्प सांगितला "प्रजारक्षणार्थम्,राज्यरक्षणार्थम्,धनरक्षणार्थम"
कुरटे बेटाचे भाग्य उदेले. प्रभाकरभट्टांनी पंचांग मांडले. शके १५८६ मार्गशीर्ष वद्य द्वितीया (२५नोव्हेंबर १६६४) या शुभ दिनी महाराजांनी कुरटे बेटाचा कायापालट करण्याचा संकल्प सोडला. जानभट अभ्यंकर आणि दादंभट बिन पिलंभट या वेदोनारायणांच्या पौरोहित्याखाली मोरयाच्या धोंड्यापाशी भूमीपुजन झाले. या मंगल समयी रामेश्वर देवळातले वतनकरी सनई चौघडा वाजवत होते. महाराजांनी श्रीगणेशपुजा आणि समुद्रपुजन केले. समुद्रास दक्षिणा १०० होन अर्पिले सुवर्ण, श्रीफळ, वस्त्रे, मंदिल, चादर वाहिली. साखरा वाटल्या ब्राम्हणभोजने घातली. कोटी होनाचे उदक सोडले उत्तम मुहूर्त पाहून पाथरवाट ५००,लोहार २००, कोळी, कामासाठी व बाजे लोक मिळून ३००० माणूस आणले. वरकड सामानही आणले दोनशे खंडी लोखंड आणिले, बळकट पायाभरणीसाठी पाचशे खंडी शिसे ओतविले आणि पहिला चिरा बसला खुद्द राजश्रींचे हातून. गोवेकर फिरंग्यास ताकिद करून १०० हुन्नरवंत फिरंगी जंजिऱ्याचे कामास ठेविले या नव्या दुर्गाचे नाव ठेवले सिंधुदुर्ग
"श्रीगणेश पुजन व समुद्र पुजन करुन तरांडियातून धोंडे व सामान नेउन काम चालीस लाविले.शर्करा वाटिल्या,ब्राम्हण भोजने घातली.समुद्रात दक्षिणा सुवर्ण नाणे होन १०० अर्पिले व पंचखाद्ये व फळावळ सुर्वर्णाचे श्रीफळ पाणियात अर्पण केले.वाद्ये लाविली.वस्त्रे मंदिल चादर वाहीली.तदनंतर महाराजांनी हुन्नरवंत पाथरवट चुना मुस्तेद करावया कोळी व कामाठी व बाजे लोक मिळोन तीन हजार माणूस गोवेकर फिरंगी यास ताकीद केली व तेथील फिरंगी हुन्नरवंत काबील जंजिरियाचे कामकाजात म्हणोन शंभर आणविले..
उत्तम मुहुर्त पाहून पाथरवट असामी पाचशे व लोहार दोनशे आणून लोखंड दोनशे खरीदी करुन टांक्या हातोडे व पहारा व अडून वगैरे तयार करविले.नंतर धोंडे काढवून पायाचे व इमारतीचे टांकी लावून तयार करविले.पाच खंडी शिसे आणून जंजिरेचा पाया शोधून घातला"
महाराजांनी सिंधुदुर्गाची उभरणी सुरु केली त्यासंदर्भात देखील एक दुर्गकथा सांगितली जाते.शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्गाचा पहिला चिरा बसविण्यासाठी स्थानिक ज्योतिष्याकडून मुहुर्त काढून घेतला.मग ते आपल्या अधिकार्यासह कुरटे बेटावर आले.तिथे अनेक बेलदार पहारी घेउन सज्ज होते.महाराजांनी काढलेल्या मुहुर्तावर पहिली पहार मारण्याची आज्ञा दिली.एका बेलदाराने आपली पहार खडकात मारली तेव्हा दगडातून रक्ताची चिळकांडी उडाली.सगळेजण हा प्रकार बघून थक्क झाले,शिवाजी महाराजांनी ज्या ज्योतिष्याने हा मुहुर्त काढून दिला होता,त्याला विचारले.त्यावर ज्योतिष्याने त्या जागेची पहाणी केली आणि महाराजांना म्हणाले "बेलदारांनी मारलेली पहार शेषनागाच्या मस्तकापर्यंत गेली म्हणून रक्त आले.पण तुम्ही काळजी करु नका.सातशे वर्ष शत्रुचा या किल्ल्यात प्रवेश होणार नाही.मग सगळ्यांचे समाधान झाले,आणि किल्ल्याचे बांधकाम नियमित सुरु झाले.
अशीच एक कथा सासवडजवळच्या सोनोरी उर्फ मल्हारगडाबाबत सांगितली जाते.मात्र या कथेत काहीही तथ्य नाही.शिवाय सातशे वर्षाचा दावाही असत्य आहे.कारण सन सन १७६५ म्हणजे अवघ्या शंभर वर्षातच हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
पोर्तुगीज आणि सिद्दीचा बांधकामास उपद्रव होऊ नये म्हणून पाच हजार मावळ्यांची नेमणुक केली. कामावर देखरेखीसाठी गोविंद विश्वनाथ प्रभू सुभेदार यांची नेमणुक झाली. कामगारांच्या रोजमुऱ्याचा हिशोब ठेवण्यासाठी भानजी प्रभूंची नेमणुक झाली. सिंधुदुर्गाचे काम मार्गी लावून महाराज राजगडावर गेले.हिरोजींच्या कुशल मार्गदर्शनाखाली दुर्ग आकार घेऊ लागला.
खुद्द शिवछत्रपतींची गडाच्या बांधकामावर बारीक नजर होती.गड बांधताना घ्यावयाची काळजी संदर्भात त्यांनी हिरोजी इंदुलकरांना पत्र लिहीले
"आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले असे हे बरे जाणने. अवघे काम चखोट
करणे. माणसे नवीन आहेती. त्यास सांभाळोन इत्येकाचा उपेग करून घेणे. पाया
बहुत भला रूंद घेणे, खाली अवघा कातळ तरी वरी थोर इमारत तस्माद दो बाजूस दोन
हात जागा सोडोन तट उभारता येई इतकी रुंदी घेणे, तट कोठे रुंद, तर कोठे
जागजागा अरुंद येणेप्रमाणे धरावा लागतो अनुकूल दिसेल त्या प्रमाणे करणे.
पायात ओतण्यापायी शिसे धाडायचे व्यवस्था केली असे नीट पाहोन, मोजोन, माल
ताब्यात घेणे. टोपीकर साहूकार लबाड जात. डोळ्यातील काजळ चोरुन नेतील. पत्ता
लागो देणार नाहीत. पुनःत्परतोन त्या कामाचा रोजमुरा मागतील सावध असणे.
गोडे पाणी हाताशी बहुत पाण्याच्या ठावापाशी टाक्या बांधोन त्यात वाळू
साठवणे. गोड्या पाण्यामध्ये चार दोनदा भिजू देणे.खारटाण धुतले जाईल .ती
धुतलेली वापरणे. चुनखडी घाटावरून पाठवित असो . बरी तपासोन घेत जाणे. मिसळ
असणार नाही तरी सावध असणे उत्तम. रोजमुरा हररोज देणे जाणे, त्यास किमपी
प्रश्नच न देणे."
यावरुन महाराजांचे सिंधुदुर्गाकडे किती बारीक लक्ष होते हे दिसून येते.
नेर्न नावाच्या इंग्रज व्यापाऱ्याने लिहून ठेवले आहे की शिवाजीची माणसे
दक्ष आहेत. ती कसलाच थांगपत्ता लागून देत नाहीत. मात्र वरघाटातले किल्ले
औरंगजेबला द्यावे लागल्याने शिवाजी हा किल्ला बांधायची निकड करत आहे. सर्व
बाजूने माघार घ्यावी लागली तर दरीयातले आश्रय स्थान म्हणून त्याने या
ठिकाणाची निवड केली आहे. माझ्या मते ही निवड अचूक आहे.
गडाचे बांधकाम चालु असताना शत्रुने अडथळा आणु नये म्हणून "वरकड जंजिरियाचे आरमार आणून पाणियात गाव दोन गावचे तफावतीने सामान सुध्दा व तोफा व दारुगोळा सहित ठेविले. अडीच पाच हजार मावळे लोकांची चौकी नेमली". गड बांधण्याचा खर्चही मोठा असे. सुरत लुटून मिळविलेली अदमासे एक कोटीची होनांची संपत्ती खर्चुन हि शिवलंका उभारली गेली.
इकडे सिंधुदुर्गाचे बांधकाम सुरु असतानाच मिर्झाराजे जयसिंगाचे स्वराज्यावर आक्रमण झाले आणि त्यांना तोंड देणे अवघड आहे हे लक्षात आल्यावर शिवछत्रपतींनी पुरंदरच्या पायथ्याशी तह केला.तहानुसार त्यांना औरंगजेबाच्या वाढदिवसासाठी व भेटीसाठी आग्र्याला जावे लागले.तिथे औरंगजेबाच्या कपटनितीमुळे अडकून पडावे लागले.यथावकाश सुटकाही झाली.मात्र यादरम्यान स्वराज्यातील कोणत्याही गडावर ना फंदफितुरी झाली ना सिंधुदुर्गाचे बांधकाम थांबले.यावरुन शिवाजी महाराजांनी रयतेते किती विश्वास निर्माण केला होता आणि स्वराज्याची शिस्त किती चोख होती हेच निदर्शनास येते. एकदा बांधकामासाठी पैसे कमी पडल्यावर हिरोजी इंदुलकरांनी कड्या गहाण ठेवून पैसे उभे केले.अर्थात शिवाजी महाराजांनी ते पुढे परत केले.
तीन वर्षे सिंधुदुर्गाचे बांधकाम चालले.जसे काम पुर्ण झाले तसे त्याची बातमी शिवाजी महाराजांना देण्यात आली. शिवाजी राजे २९ मार्च १६६७ रोजी मालवणला आले. अठरा टोपीकरांचे उरावर अजिंक्य शिवलंका उभी राहिली. मुहूर्त पाहून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश केला महाराजांच्या उपस्थितीत किल्ल्याची वास्तुशांत पार पडली यावेळी साखरा वाटण्यात आल्या,तोफा झाल्या गोवेकर वगैरे हुन्नरवंतास बक्षिसे देण्यात आली. हिरोजी इंदुलकर व गोविंद प्रभु यांना भरजरी वस्त्रे, सोन्याची कडी व इतर बक्षीसे देउन नावाजण्यात आले.
सिंधु दर्याला पालण घालणार्या या दुर्गाचे नाव शिवछ्त्रपतींनी ठेवले 'सिंधुदुर्ग'. शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत याबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे :
'चौर्याऐंशी बंदरात हा जंजीरा,अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका,अजिंक्य जागा निर्माण केला ।
सिंधुदुर्ग जंजीरा,जगी अस्मान तारा ।
जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार ।
चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।
शिवछत्रपतींनी परकीय सागरी सत्तांना रोखण्यासाठी मालवणला सिंधुदुर्ग उभारण्याचा मनसुबा केला त्याचवेळी तिकडे स्वराज्याचा जुना वैरी औरंगजेबाने नवीन चाल केली.शाहिस्तेमामांनी बोटे महाराष्ट्रात सोडून बंगाल परगणा गाठला तरी आलमगीराची स्वराज्य बुडवायची खुमखुमी गेली नव्हती.महाराजांनी महाराष्ट्रात मांडलेला स्वराज्य स्थापनेचा यज्ञ रोखायला औरंगझेबाने मिर्झा राजा जयसिंगांस नामजाद केले. इथे महाराजांनीही एक मोहीम मुक्रर केली. मुघलांविरूद्ध? छे हो मुघल फौजा कुठे झेपा टाकत येतात त्या आरामात येणार तोवर जमेल तेवढ साधून घ्यायच महाराज मालवणला आले. सिंधुदुर्गाचे काम चालूच होते. समुद्रात आरमार भगवे ध्वज नाचवत महाराजांचे हुकुम ऐकण्यास अधीर होत होते. सिंधुदुर्गाची आणि महाराजांची ही पहिलीच सागरी मोहिम, सहा हजार फौज, तीन मोठी जहाजे, पंच्याऐंशी गलबते असा आरमारी काफिला निघाला. (८ फेब्रुवारी १६६५) कारवारच्या दक्षिणेला बेदनूर नाईकाच्या बसरूकडे.
९ फेब्रुवारी १६६५ ला पहाटे महाराज बसनूरास पोहोचले गाफिल बसनूरातुन यथासांग लुट जमा झाली. महाराज ४ फेब्रुवारीला गोकर्ण आणि तिथून अंकोलाला गेले. इथे त्यानी सागरी मोहिम संपवली. कारवार मधून खंडणी मिळवून महाराज राजगडला गेले.
सिंधुदुर्गाच्या इतिहासातील पुढचा उल्लेख येतो तो १३ एप्रिल १६६८ रोजी सिंधुदुर्गाचे हवालदार रायाजी भोसले यांना शिवाजी महाराजांनी लिहीलेल्या पत्रात "रामचंद्रपंत निळकंठ ( आमात्य ) यांना जंजिरे सिंधुदुर्गची सबनिसी वतन दिल्ही आहे.यास शंभर पातशाही होन सिरस्ता केला आहे.तेणेप्रमाणे अदा करणे".
पुढे करवीर गादीचे शिवाजी राजे दुसरे यांच्या काळात सबनिशी वंश परंपरेने दिली गेली.
शिवकाळात तरी सिंधुदुर्गकडे वाकडया नजरेने बघायची हिंमत कोणा शत्रुने केली नाही. पुढे संभाजी महाराजांच्या राजवटीत सन १६८१ ला औरंगजेब चालून आला.मोघलांचा कोकणातील अधिकारी कुतुबुद्दीन याने औरंगजेबाला सल्ला दिला कि "समुद्राच्या वाटेने खांदेरी,कुलाबा,सुवर्णदुर्ग,मलवंडी हे ( मराठ्यांच्या ताब्यातील ) किल्ले घेता येतील".कुतुबुद्दीनखानाने उल्लेख केलेला मलवंडी किल्ला म्हणजेच सिंधुदुर्ग होय. सिंधुदुर्गाचा बर्याच कागदपत्रात मालवणचा किल्ला असा उल्लेख आहे,पोर्तुगीज त्याचाच अपभ्रंश मेलुंडी करतात.मोघलांनी हेच नाव मलवंडी केले आहे.अर्थात मोघलांनी काही सिंधुदुर्गावर हल्ला केला नाही.
मात्र पुढे १६८७ मध्ये मुघलांनी शहाजादा शाह आलम याच्या नेतृत्वाखाली प्रचंड सैन्य घेउन कोकणात आक्रमण केले.या स्वारीत त्यांनी वेंगुर्ला शहर लुटले.तसेच मालवण शहरही उध्वस्त केले.नंतर सिंधुदुर्गावर हल्ला केला होता पण यात साध्य काहीच झाले नाही. मात्र याचवेळेस कुडाळ मुघलांनी लुटले. यामुळे सावंतवाडीचे सावंत व देसाइ देखील मोघलांचे चाकर बनले..याचा उल्लेख असा सापडतो "कितीइक मनुष्ये तांब्रांनी ( मोघल ) धरुन नेली.सिंधुदुर्गातील लोकांना गडाबाहेर जाणे अवघड जाहले.कोठून दाणा गला येणे तो राहीला.मनुष्यास अन्न नाही.लोकाखेरीज सिंधुदुर्गी जे कोणी होते ते बिद्नूर प्रांती जाउ लागले".
ते समयी कृष्णाजी मोहीते यांनी दादभट्टास ( यांनाच शिवाजी महाराजांनी मालवणचे उपाध्यय म्हणून नेमले होते ) पुसिले कि "तु ब्राम्हण म्हणजे एका पायाने क्षीण आहेस.तुझ्यावस्तु कोठे जावते असे नाही. जंजिरामध्ये अन्नाचे दुर्भिक्ष्य जाहले.आम्ही मराठे लोक भाजीपाला खाउन धान्याची जागा जतन करीत आहो.आमच्या निष्ठेस फलदाता ईश्वर आहे.आम्हा चाकर लोकांस सुटका नाही.तु ब्राम्हण कर्नाटकात जाणार तर सुखरुप जाणे".
त्यावर दादभट्टने म्हणले कि "मागे तुम्हामध्ये राहून उपाध्येपण करुन सुख भोगीले आणि तुम्हास काही काल विलग पडल्यावर टाकून जावे. हि गोष्ट इश्वरास बरी मानवणार नाही." अशी निष्ठावंत माणसे शिवछत्रपतींनी निर्माण केली म्हणून स्वराज्य असंख्य वादळातून आणि वावटळीतून सुखरुप बाहेर पडले.
मार्च १६८९ मध्ये संभाजी महाराजांची क्रुर हत्या झाली.यानंतर मोघलांनी अनेक किल्ले जिंकले पण सिंधुदुर्ग अभेद्यच राहीला.स्वराज्याचे वैरी असणार्या पोर्तुगीजांना अर्थातच सिंधुदुर्गाचा वचक होता. पोर्तुगीजांची पकडलेली जहाजे सिंधुदुर्गाला आणली जात.त्यामुळे वैतागलेल्या पोर्तुगीजांनी इशारा दिला कि जो पर्यंत आमची जहाजे परत केली जात नाहीत तोपर्यंत मराठ्यांशी आमचे सबंध सुरळीत होणार नाहीत.
सन १७०० मध्ये सिंधुदुर्गावर मानसिंगराव हे हवालदार होते. सन १७०३ मध्ये सिंधुदुर्गावरील आरमाराने पोर्तुगीजांचे एक जहाज पकडून दोन पाद्री आणि चार लोकांना किल्ल्यात कैद करुन ठेवले होते.किल्लेदार बुर्हाणजी मोहीते यांनी पोर्तुगीज व्हॉइसरॉयला लिहीले "पोर्तुगीजांची जहाजे त्यांच्या उत्तरेकडील ठण्यातून गोव्याला जातील त्याला आपला परवाना घ्यावा लागेल."इतरांकडून कार्ताझ घेणार्या पोर्तुगीजांना हे मान्य होणे शक्य नव्हते.
पोर्तुगीजांनी करवीरकर छत्रपती शिवाजी महाराज ( दुसरे) ( राजाराम महाराज व ताराराणीचे पुत्र ) यांच्याकडे तक्रार करणारे एक पत्र ३ ऑक्टोबर १७०५ रोजी लिहीले "मोसुंडीच्या ( सिंधुदुर्ग ) किल्ल्यातील लोकांचा आम्हाला पुष्कळच उपद्रव होतो. आमच्या राज्याच्या प्रजाजनांची त्यांनी फार हानी केली आहे.त्यांनी लुटमार तर केलीच पण काहींना ठार मारुन तर काहींना तुरुंगातही टाकले आहे.आपण त्यांना योग्य ते शासन कराल अशी आशा आहे.हे प्रकार बंद झाल्याखेरीज आपल्या दोन्ही राज्यातील मैत्री प्रस्थापित होणार नाही व आमची बंदरे सुरक्षित होणार नाही".
मराठ्यांना पोर्तुगीजांची लबाडी माहिती असल्यामुळे त्यांनी वर वर मैत्रीचा देखावा केला.मात्र सिंधुदुर्गाची पोर्तुगींना असलेली दहशत कायम राहीली. पुढे सन १७१४ मध्ये हीच तक्रार पोर्तुगीज पुन्हा एकदा करवीरकर संभाजी महाराजांकडे करतात.सन १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यु झाल्यावर मोगलांनी संभाजी महाराजांचे पुत्र शाहु राजेंची कैदेतून मुक्तता केली.
सिंधुदुर्गातील आरमाराने पोर्तुगीजांची अनेक जहाजे पकडून मालवण बंदरात आणली होती.एका जहाजावर मराठ्यांना दहा तोफा मिळाल्या होत्या.जहाजे परत मिळविण्यासाठी पोर्तुगीजांनी हल्ला करण्याची योजना आखली.गोव्याच्या व्हॉइसरॉयने आरमार प्रमुखाला १३ जानेवारी १७१२ रोजी सुचना देणारे पत्र लिहीले "सिंधुंदुर्ग किल्ल्यावर तोफखान्याचे लोक नाहीत अगर महत्वाचे लोक नाहीत असा तुमचा गैरसमज होउ देउन बेसावध राहू नका.सिंधुदुर्गाच्या आसपासची अथवा त्याच्या सत्तेखालची गावे जाळून भस्मसात करावी.याकामी स्त्रीया,मुले वगळता कोणाचीही गय करु नये.स्त्रिया व मुले निरपराधी असल्यामुळे त्यांच्याबाबतीत सहानुभुती दाखवावी".
अर्थात या लढाईत पुढे काय झाले ते मात्र समजत नाही.मात्र पुढे १७१६ मध्ये करवीरकरांशी झालेल्या तहात पोर्तुगीजांनी 'सिंधुदुर्गच्या आरमाराने जप्त केलेली आपले जहाजे परत करावीत तसेच पोर्तुगीज राज्यातील रयतेला सिंधुदुर्गाच्या सागरी हद्दीतून तसेच मालवणच्या जनतेला पोर्तुगीज राज्यातून व्यापारी संबंध ठेवण्याची परवानगी असावे असे कलम घातले".
सन १७१० मध्ये इंगर्ज अधिकारी हॅमिल्ट्न याबे सिंधुदुर्गावरील लोकांचे असे वर्णन केले आहे "मालवण येथे चाचे लोकांचा स्वतंत्र सरदार असून त्याच्या जवळ तीन चार गलबते आहेत.जो त्याच्या सपाट्यात येतो त्याला बुडविल्यशिवाय तो सोडत नाही". सन १७१५ सिंधुदुर्गावरील मराठ्यांनी इंग्रजांच्या दोन गलबतावर हल्ला केला.त्यावेळी एका गलबतावर मुंबईचा डेप्युटी गव्हर्नर स्ट्रट होता.इंग्रजांनी तोफांचा मारा सुरु केल्याने मराठ्यांना माघार घ्यावी लागली.
इ.स. १७३० मध्ये मराठ्यांनी इंग्रजांचे एक जहाज समुद्रात फुटले होते,त्याचा फायदा घेउन पकडुन नेले.यामुळे करवीर गादीचे सरदार शंकरपंत व इंग्रज यांच्या मध्ये बराच वादविवाद होउन तह ठरला.
करवीरकर संस्थानाच्या हद्दीत सिंधुदुर्ग हाच बळकट जलदुर्ग असल्यामुळे सहाजिकच करवीरकरांचे आरमार सिंधुदुर्गावर अवलंबून होते.सन १७२१ मध्ये सिंधुदुर्गावर चांदजी घाटगे हे हवालदार होते. संभाजी राजे सन १७३९ मध्ये सिंधुदुर्ग येथे आले होते.सन १७३६ मध्ये डच कंपनीला मालवणला वखार उघडण्याची परवानगी देण्यात आली होती.डच आपली वेंगुर्ल्याची वखार मालवणला हलविणार होते. करवीरकर गादी आणि तुळाजी आंग्रे यांचे सख्य नसल्याने तुळाजींचा उपद्रव सिंधुदुर्गाला देखील होत असे.सन १७४७ च्या अखेरीस तुळाजीने सिंधुदुर्गाची काही गलबते पकडून नेली होती. सन १७५३ मध्ये नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांच्या मदतीने विजयदुर्गावर हल्ला करुन तुळाजीशी युध्द सुरु केले.त्यात पुर्व वैमनस्यामुळे सावंत पेशव्यांच्या आजुने युद्दात उतरले होते.या सगळ्या घडामोडीचा त्रास सिंधुदुर्गाला होत होता.गडावर साधनसामग्री अपुरी असून तातडीने रसद पुरवावी असे सिंधुदुर्गावरील अधिकारी करवीरकरांना पत्र लिहीत होते.मात्र मदत आली नाही.मात्र संभाजी राजे सिंधुदुर्गाला येत आहेत अशी खबर धाडण्यात आली.मग मात्र सिंधुदुर्गावरुन स्प्ष्ट शब्दात खलीता करवीरकरांना पाठविण्यात आला "तुम्ही साहित्य करुन आंग्रेचा शह निवारण होय असे सामर्थ्य असिले तरी तुम्ही मालवणास येणे. साहित्य न होता आला तरी गडावर घेणार नाही. या आपल्या साहित्याची वाट दोन महिने पावेतो पाहतो.उपरांत किल्ला ( सिंधुदुर्ग ) पेशव्यांकडे देतो" हे निर्वाणीचे पत्र पाहून बहुधा करवीरकरांनी मदत पाठविली असेल.
सन १७६०-६२ च्या सुमारास सिंधुदुर्गाच्या आरमाराने वीस तरांडी पडाव धरुन सिंधुदुर्गास आणली.त्यात दहा-बारा लक्ष मालमत्ता सापडली.
शाहु महाराजांच्या मृत्युनंतर पेशव्यांनी करवीरच्या छत्रपतींशी तह केला.या तहात एक कलम सिंधुदुर्गाबाबत होते "सावकारी तरांडी दर्यातून बाहेर व सावकारीन जात असतात.त्यांचा कौल मालवणकरांकडून शिवाजी महाराजांचे कारकीर्दीपासून घेउन जात असतात.त्यास तुमचा अंमल जाल्यापासून अलिकडे तुम्हाकडील तालुकदार कौल मालवणचा न घेणे म्हणोन सावकारास न सांगतात.मालवणचा कौल घेउन जात येत असावे येविशी तुम्हा कडून तालुकदारास ताकीद जाली पाहिजे"
दुसरे कलम असे "जंजिरे सिंधुदुर्ग येथील तनखा आरमार निसबत कोकण समुद्रात उंदरप्रांते व दक्षणप्रांते हेट पूर्वीपासून चालत आहे"
पुढे सन १७६३ साली आफ्रिकेहून
गोव्याकडे जाणारे एक जहाज सिंधुदुर्ग वरील आरमाराने पकडले. त्यात हत्तीचे ५८८ दात होते व हे सामान आणि गलबत विकल्यावर ४०७१९ रुपये आले.पोर्तुगीज
अधिकाऱ्याने सिंधुदुर्गच्या येसाजी शिंदे या किल्लेदाराकडे याबाबत तक्रार
केली. पण कुणी दाद न दिल्याने या घटनेचा वचपा म्हणून पोर्तुगीजांनी
सिंधुदुर्गवर आरमार धाडले. १० नोव्हेंबर १७६३ रोजी पोर्तुगीज सैन्य मालवण
बंदरात उतरले. त्यांनी मालवणात जाळपोळ, लुटालूट केली किल्ल्यावर तोफा
डागल्या. पण सिंधुदुर्गाच्या किल्लेदाराने हा हल्ला परतवून लावला. या
प्रसंगात आपले १९ लोक मारले गेले आणि पुष्कळ घायाळ झाले. असे पोर्तुगीज
म्हणतात तर मराठी कागदपत्रात ४०० पोर्तुगीज सैन्य मारले गेले असे म्हंटले
आहे.
या हल्ल्यासंबंधी व्हॉइसरॉय येग याने पोर्तुगॉलच्या राजास माहिती दिली "८ रोजी सदर तारु ( मराठ्यांनी पकडलेले ) बळजबरीने घेउन येण्यासाठी पोर्तुगीजांनी कर्नल लांद्रेसच्या नेतृत्वाखाली आपले आरमार सिंधुदुर्गावर रवाना केले.या आरमारामध्ये २ फरगात,२ तारवे,१ पाल,१ इबात,१२ मचवे व वीसावर होड्या होत्या.१० रोजी रात्री हे आरमार सिंधुदुर्गाजवळ पोहचले.व लगेच मालवणच्या भुमीवर फिरंग्यांचे सैन्य उतरले.तेथील नदीतील पन्नासावर होड्यास त्यांनी आग लावून दिली.व गावामध्ये शिरुन बाजारपेठ जाळली.पोर्तुगीजांचे मालवणच्या नदीत असलेले तारुही जळुन गेले.
सिंधुदुर्गाजवळ एका लहानश्या किल्ल्यावर ( हा राजकोट असावा ) मराठ्यांचे दोनशे लोक व सहा तोफा होत्या.तो किल्ला फिरंग्यांनी ताब्यात घेतला. मालवण्च्या परिसरात दिड कोसपर्यंत पोर्तुगीज सैन्याने जाळपोळ केली.तेथील एखादेही देउळ किंवा मशीद त्यांनी उभी ठेवली नाही.फिरंगी आरमाराने तोफांच्या मार्याने सिंधुदुर्गाच्या तटबंदी(वर आग ओकली.या हल्ल्यात पोर्तुगीजांचे १९ लोक मृत्युमुखी पडले व पुष्कळ घायाळ झाले.एक आठवड्यापर्यंत हे युध्द चालु होते.१६ नोव्हेंबर रोजी पोर्तुगीज आरमार गोव्यास निघाले."
अर्थात करवीरच्या राणी जिजाबाईंनी येसाजी शिंदे यांना लिहीलेल्या २१ नोव्हेंबर १७६३ च्या पत्रात या घटनेचा उल्लेख असा आहे "फिरंगी (पोर्तुगीज ) गोमांतकाकडून आरमार सुधा येउन जंजिरासी ( सिंधुदुर्ग ) मातबर युध्द केले.साहेबाच्या सेवक लोकीही त्याचा मार सोसून आपणाकडील जंजिराकडील तोफांनी मारगिरी करुन पाच चारशे फिरंगी मारुन नेस्तनाबूत केले.जंजिराच्या लोकांस यश आले.मर्दुमीची शर्त जाहली.असा अकस्मात दंगा कधीही न जाहला.आणि याप्रमाणे गनिमाचे पारिपत्येही कोणी केले नाही".
यापुर्वी सिंधुदुर्गावर हल्ला करण्याचे धाडस कोणी केले नव्हते.माधवराव पेशवे आपल्या आरमार प्रमुख धुळूपांना १९ डिसेंबर १७६३ रोजी लिहीतात "फिरंगी यांनी बदराह वर्तणुक करुन, सिंधुदुर्ग हा जागा महाराज छत्रपतींचा खाजगी.आजपर्यंत टोपीकर व इतर याणी स्थलाची अमर्यादा कोणी केली नाही.असे असत ज्ंजिरेवर अतिशय केला.पेठ जाळली.किल्ल्यावर तोफा मारल्या.येणेकरुन स्वरुपात योग्य कि काय ? तुम्ही येकनिष्ट काय ?तुम्ही येकनिष्ट राज्यातील लोक समीप असता त्याचे पारपत्यास अंतर जाहाले.या उपरी त्याच्या पारपत्यास कोताई केलीत तर कार्यावर पडणार नाही" आंग्रेंचे आरमार नष्ट केल्यामुळे इंग्रजांना सागरावर कुणाचे भय राहीले नव्हते,तीन वर्षापुर्वी पानिपतावर मराठ्यांचा दारुण पराभव झाल्यामुळे इंग्रज शेर जाहले होते.
शिवकालातील बुलंद अश्या या जलदुर्गाची स्थिती पुढे मात्र बिकट झाली. १६६४ मध्ये सिंधुदुर्गावरील शिबंदीचे पगार थकले, तेव्हा लोकांनी तक्रार सुरु केली म्हणून हैबतराव भोसलेनी ८ जानेवारी १६६४ रोजी जिजाबाईना पत्र लिहीले "लोकांना रोजमुरा देवलियावरी लोक चाकरीवरी सादर असतील.उदासपणे चाकरी होणे नाही.रात्रंदिवस चौकी पहारा गस्ती चौकशीने करावयासी पाहिजे.याकरिता लोकास तीन माहे रोजमरा पोहचती करणार साहेब समर्थ आहेत"

पुढे इंग्रजांची वक्रदृष्टी सिंधुदुर्गाकडे वळली. अर्थात पुरेश्या लष्करी बळाच्या अभावी सिंधुदुर्ग इंग्रजांना तोंड देउ शकणार नव्हता.नरसिंहराव जाधवांनी जिजाबाईना लिहीले "धनी नजरेने पहातील जागेची हालाखी दृष्टीस पडेल.इंग्रज याची तारवे भारे साजसामान भरुन तयार जाहली.स्वारी जंजिर्यावर होणार" या पत्राची दखल करवीरकरांनी घेतली नही.
सिंधुदुर्गाचा आश्रय घेउन समुद्रातून येजा करणारी इंग्रजांची जहाजे लुटण्यात येत होती.मुंबईवरुन इंग्रज आरमार निघाले. आपला अंमल बसवण्यासाठी २८ जानेवारी १७६५ रोजी मेजर गाॅर्डन आणि कॅप्टन वाॅटसन यांनी सिंधुदुर्गास वेढा घातला.अर्थात गडातून तिखट प्रतिकार सुरु झाला.इंग्रजांच्या तुलनेने कमी बळाच्या मराठ्यांच्या आरमाराने चिवट प्रतिकार केला. इंग्रजांनाही हा किल्ला ताब्यात मिळेल असे वाटले नाही. करवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी जिजाबाई यांनी किल्ला झुंजवण्याची जय्यत तयारी केली होती. करवीरकरांचे आरमार आणि किल्ल्याच्या शिबंदीने कडवी झुंज दिली. जिजाबाईंनी माधवराव पेशव्यांकडे मदत मागितली होती पण ते कर्नाटकात मोहीमेत व्यस्त असल्यामुळे मदत करू शकले नाहीत. किल्ल्यावरील दारुकोठारास आग लागली.ज्याच्या बळावर हा जलदुर्ग लढवायचा तेच नष्ट झाले.इंग्रजांचा तोफखाना इकडे आग ओकत होता.किल्ल्यातील शिबंदीला आता शरणागती शिवाय पर्याय उरला नाही.अखेरीस किल्ला इंग्रजांनी जिंकला.
मात्र पत्रात सिंधुदुर्गाने फारसा प्रतिकार केला नाही असा उल्लेख मिळतो "इंग्रज झुंजत असला तरी सितीने महिगिर्या (गलबत ) गडाच्या दरवाज्याजवळ न्यावा हा सिधांत.मरतील ते मरतील.वाचतील ते वाचतील.परंतु किल्ल्यात जावे नाईकवाड्याने घ्यावे यैसे होते.परंतु संधीत गाठ न पडली यामुळे इंग्रजास किल्ला दिल्हे.काही जुंजले नाहीत.कोण्ही लोक मेला नाही.साहेबाचे स्थल त्याणी घालविले"
शिवछत्रपतींनी बांधलेल्या हा बलाढ्य जलदुर्ग आपल्याच राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे शंभर वर्षांनी इंग्रजांनी जिंकून घ्यावा हि मराठी साम्राज्य लयाला जाण्याचे लक्षण होते. इंग्रजांनी किल्ल्याचे नाव ठेवले "फोर्ट ऑगस्टस".मराठ्यांचा फक्त एक किल्ला नव्हे तर स्वाभिमानाचे एक स्थळ जिंकून घेतल्यामुळे सहाजिकच इंग्रजांना आनंद झाला. मुंबईचा एक जासुद करवीरास कळवितो "इंग्रजाने सिंधुदुर्ग घेतले त्यामुळे गर्व बहुत झाला आहे".
राणी जिजाबाईंनी पेशव्यांना मदत पाठविण्याची विनंती केली होती.मात्र मदत वेळेवर पोहचु शकली नाही.इंग्रजांनी सिंधुदुर्ग पाडण्याचा विचार सुरु केला. जिजांबाईंना या घटनेचे अतिशय वाईट वाटले.त्यांनी पत्र लिहीले "मालवणचा सिंधुदुर्ग घेतल्यानंतर इंग्रज दुर्बुध्दीस प्रर्वतला आहे.त्याचा गर्वहत होउन पुर्ववतप्रमाणे हाल खुद्द राहिला पाहिजे याचा विचार कसा करावा."
त्या दुसर्या पत्रात लिहीतात "कोवळा मोड ( म्हणजे इंग्रज) आहे तो मोडील्याने उत्तम.भारी जाहल्याने सर्वांचे वाईत.हे पुरते चित्तात आणून समर्पक ते करावे".
इंग्रजांच्या सामर्थ्यापुढे करवीर राज्याला झुकणे भाग पडले. १२ जानेवारी १७६६ साली जिजाबाईंनी इंग्रजांसोबत तह करून किल्ला परत मिळवला पण यासाठी नुकसानभरपाई म्हणून इंग्रजांना साडे सात लाख रुपये द्यावे लागले. या घटनेने इंग्रजांना राजकोटात वखार घालायची परवानगी मिळाली आणि मालवणात पाय रोवायची संधीही. सिंधुदुर्गासाठी राणी जिजाबाईंनी पोर्तुगीजांकडून तोफा,दारुगोळा व गलबते वगैरेचा भरपुर पुरवठा करण्यास सांगितले. सन १७७२ मध्ये मालवणच्या बंदरामध्ये एक आरमार होते त्यात तीन पालं व दहा गलबते असतात अशी माहिती मिळते.
सन १७७८ च्या पत्रावरुन सिंधुदुर्गचे अधिकार कुठवर चालायचे याची माहिती मिळते.ती अशी "सिंधुदुर्ग जंजिरा येथील कौल समुद्रामध्ये होनावर, मंगरुल्,कालिकोट व तालेचेरी येथील साहुकार व कर्नाटकातील वगैरे बंदरचे साहुकार जंजिरे सिंधुदुर्गचा कौल घेउन आमदरफ्ती करित आले"
सन १७७७-७८ मधील पत्रात जंजिरे सिंधुदुर्ग देव सावंत व रामजी अनंत यांनी राजकारण करुन सरकारचे लोक व निशाण वरते चढोन हस्तगत झाल्यावर त्यांना खालीलप्रमाणे इनाम देण्यात येणार असल्याची माहिती मिळते "१०००० रोख तेथे पावतील.२०००० समस्त सरदार वगैरे तसेच ३५०० रुपये याचे गाव चालविले जातील.हवालदार्,सरनोबत व समस्त सरदार,मेटकरी व दर्यावर्दी व किल्ल्यावर नेहमी ( रहाणारे ) लोक त्यास शेती वगैरे देण्यात येईल. सरकारात म्हणजे करवीरकरांचा हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात देण्याची हि मसलत आहे.मात्र ती शेवटास गेली नाही.
सावंतवाडीच्या सावंतांनी बादशहाकडून स्वतंत्र राज्याचे प्रतिक असणारे मोरचेल स्विकारल्याने करवीरकरांनी सन १७८७ मध्ये सावंताच्या यशवंतगडास सिंधुदुर्गाच्या आरमाराने वेढा दिला.मात्र गडाच्या मदतीस पोर्तुगीज आरमार आल्याने सिंधुदुर्गच्या आरमाराने विजयदुर्गची मदत मागितली.
पेशव्यांचे विजयदुर्गचे सरदार धुळप २० एप्रिल १७८३ रोजी नाना फडणवीसांना लिहीतात "आरमार घेउन फिरंगी याणे जंजिरे सिंधुदुर्ग येथे वेढा दिला.टोपीकर तेथे सेर जाहल्याने उत्तम नाही हे समजोन खुष्कीने जमाव रवाना केला.जलमार्गा गुराबे घेउन आम्ही गेलो.बेजख गुराबासुध्दा चालोन घेतले.युध्द चार दिवस मातबर जाहले.युध्द होत होत छावणी मुंबईकरांच्या बार्यावर गेली.युध्दाची रात्र जाहली,जुंझ होत फिरंगीयांची तरांडी साहुकार्या दोन मंज्या दस्त करुन आणिल्या".
इंग्रजांनी करवीर संस्थानाशी २५ नोव्हेंबर १७९२ रोजी तह केला "सिंधुदुर्गकरांनी सन १६८५ पासून लुटलेल्या इंग्रज जहाजांची नुकसान भरपाई देणे व यापुढे महाराजांच्या आरमारापासून उपद्रव होणार नाही याची खात्री देण्यासाठी मालवणास वखार घालावी.या वखारीवर इंग्रजांचे निशाण फडकेल.वखारीत कंपंनीला आवश्यक वाटतील तेवढे शिपाई ठेवता येतील आणि त्यांचा खर्च महाराजांकडून होईल"
या जाचक अटी मान्य करण्याशिवाय करवीरकरांकडे दुसरा पर्याय नव्हता.मालवणची वखार व तेथील शिबंदीमुळे इंग्रजांना सिंधुदुर्गावर लक्ष ठेवणे सोपे झाले.
सन १८०५ रोजी करवीरकर छत्रपतींनी सावंताच्या ताब्यातील निवती किल्ला जिंकून घेतला.चिडलेल्या सांवंतांनी मालवण व सिंधुदुर्गावर प्रतिहल्ला केला.अर्थात त्यांना सिंधुदुर्ग काही जिंकता आला नाही.
सन १८०६ मध्ये सिंधुदुर्गाच्या आरमाराने सावंतांचे जहाज यशवंतगडावरुन पकडून सिंधुदुर्गाला येत असताना इंग्रजांच्या आरमाराने हल्ला करीत काही गलबते व लोक धरुन नेले.इंग्रजांनी आगळीक केली असली तरी त्याचा जाब विचारण्याचे धैर्य मराठ्यांच्यात राहिले नव्हते.
पेशव्यांचे सरदार सिधोजीराव निपाणकर करवीरकर छत्रपतींना डोईजड झाले होते.इंग्रज अधिकारी एलफिस्ट्नच्या डोक्यात कल्पना आली कि आपण निपाणकरांचा बंदोबस्त केल्यास करवीरकरांकडून सिंधुदुर्गाचा ताबा घेता येईल.एलफिस्टनने करवीरकरांच्या पुण्यातील वकीलासमोर हि गोष्ट काढली.निपाणकरांना नमविण्यासाठी करवीरकरांना कोणाची तरी मदत हवी होती. करवीरकर तहास राजी झाले.
मात्र निपाणकर हे पेशव्यांचे सरदार असल्यामुळे त्यांनी करवीरकर महाराजांना कळविले कि "इंग्रजांचे म्हणणे बिलकुल एकु नये व सिंधुदुर्ग किल्ला देउ नये" तर इंग्रजांना कळविले "करवीर राज्य हे पेशव्यांच्या मुलुखातील असल्यामुळे कंपनी सरकारला त्यांच्याशी स्वतंत्र तह करता येणार नाही".
मात्र चांगलच बस्तान बसलेले इंग्रज आता पेशव्यांचे म्हणणे एकण्याची शक्यता नव्हती.इंग्रज व करवीरकर यांच्यात बोलणीस सुरवार झाली.सिंधुदुर्ग इंग्रजांना द्यायचे निश्चित झाले.किल्ला दिल्यावर आतील लोक, सामान व सरंजाम याविषयी बोलणे होउ लागले.तसेच मोकळा करुन घेण्यासाठी एलफिस्ट्नकडून वेळ मागून घेणे आवश्यक होते.
यासंदर्भात करवीरच्या राजांनी स्वरुपजी क्षीरसागर यांना २५ ऑगस्ट १८१२ रोजी लिहीले की "मालवण येथील चार किल्ल्यांची ( म्हणजे सिंधुदुर्ग्,राजकोट्,पद्मदुर्ग,सर्जेकोट ) गडकरी यांच्या जमीनी खर्चाच्या त्याजकडे ठेउन याप्रमाणे एलफिस्टन बहद्दर यासी बोलून कौल तसेच किल्ला येथील सामान काढावयासी वाईदा करुन घेणे.सामान निघावयासी पाहिजे यास्तव दोन महिने फुरसतीने वाइदा करुन घेणे".
इंग्रज व करवीर यांच्यात १ ऑक्टोबर १८१२ रोजी तह झाला त्यानुसार कलम अशी होती
"१) मालवण बंदर व त्या परिसरातील सिंधुदुर्ग,राजकोट्,पद्मदुर्ग व सर्जेकोट हि सर्व ठिकाणे इंग्रजांना देण्यात यावीत.
२) छ्त्रपतींनी कोठेही आरमार अथवा लढावु जहाज ठेवू नये
३) हुजुरचे ( म्हणजे करवीरकर छत्रपती ) आरमार ठेवणेस व वखार घालण्यास जागा कुंपनी बहाद्दरानी नेमून द्यावे.
४) करवीर राज्यावर जो शत्रु येईल त्याचे पारिपत्य तुमचे तुम्ही करावे.खर्च मागु नये"
तहानुसार सिंधुदुर्ग व इतर तीन किल्ले इंग्रजांना मिळाले आणि शिवछत्रपतींचा शिवलंका सिंधुदुर्ग युनियन जॅकच्या पट्टेरी विळख्यात अडकला.
इंग्रजांनी या गडाचे नामकरण केले "सेंट ऑगस्टस".

मात्र गड व किनार्याचा प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला तरी सिंधुदुर्गाच्या हस्तांतरणाची प्रक्रीया पुर्ण झाली नाही. यासंदर्भात कर्नल इस्वीट याने ६ नोव्हेंबर १८१२ रोजी लिहीलेले पत्र बोलके आहे "सिंधुदुर्ग,पद्मदुर्ग,राजकोट व सर्जेकोट हे चार किल्ले आम्हास दिले.त्यातील सरंजाम तोफा व दारुगोळा व मुले व माणसे व सरकार कोठीचा दाणा गुराब व गलबते व भांडी ( तोफा ) वगैरे त्याकडे जशी सरंजाम वगैरे गडकरी जोकर लोक त्याचा सरंजाम व सरकारचा सरंजाम महाराजांचा आहे. तो जे वेळी नेणार ते वेली न्यावा. आम्हाकडून काडिमात्र अटकाव होणार नाही.चाकरमाने लोकांची घरे आहेत.त्यांची खुशी असलेस रहावे.जाणार तर जावे.आम्हाकडून त्यास अटकाव नाही म्हणोन कौल आहे"
इंग्रजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यातील लोकांना त्यांच्या ईच्छेप्रमाणे कोठेही रहाण्याची मुभा दिलेली होती.सिंधुदुर्गातील शिबंदीची व्यवस्था रांगणा किल्ल्यावर करण्यात आली.पुजारी वगैरे सेवक लोक किल्ल्यातच राहिले.इंग्रजांनी गड घेतल्यावर करवीरकरांना आपले सामान सरंजाम घेउन जाण्यास मुदत दिल्यामुळे करवीरकरांना किल्ल्यातील बरेचसे सामान,गलबत हलविण्यास तह झाल्यानंतर सहा वर्ष लागली.
सिंधुदुर्गावरुन तोफा काढण्यास सुरवात झाली.दोन तोफा खाडीत पडल्या.तीन तोफा सावंतवाडीच्या सावंतांनी पळवून नेल्या.किल्ल्यातील बरेचसे सामान पद्मदुर्ग येथे पडून राहीले आणि खराब झाले.काहींची चोरी झाली.तोफा वाटेत पडून राहील्या.सिंधुदुर्ग इंग्रजांना देण्यापुर्वी किल्ल्यातील तोफा बाहेर काढण्याचे फेब्रुवारी १८१२ मध्ये ठरले होते. करारानुसार करवीरकरांनी गङावरील दोनशे तोफा भुदरगड व रांगणागडावर हलविण्याचे ठरले.काही तोफा मालवणला आणण्यात आल्या.१४ मे १८१४ रोजीचा उल्लेख असा आहे "देवजी तोफा आणी ते समयी जहाजातून पाच सहा तोफा घालून खाडीतून आणिताना खराड वाजवळ महागिरी तोफ सुध्द्दा बुडाली".
सिंधुदुर्गातून सर्व तोफा सन १८२० पर्यंत तरी बाहेर काढण्यात आल्या नव्हत्या.सन १८२० मध्ये करवीरकरांनी बच्चाजीस लिहीले "मागील शिलकी मालवणातील तोफा व गलबताचे सामान आहे,त्यापैकी किल्ले उपयोगी असेल ते किल्लेस पाठविणे.बाकी काय राहिल ते गलबते आहेत.ती चौकशीने सावकाराचे विद्यमाने किंमत ठरवून यादी हुकुर पाठवून देणे,अवलोकन होउन रास्त करणेविषयी आज्ञा होइल".
इतर तोफा फोंडा घाटापर्यंत खाली आणण्यात आल्या.तोफा वरघाटी न नेता घाटाखालीच ठेवण्यात आल्या. सर्व तोफा कित्येक वर्ष जंगलात विखरुन पडल्या होत्या,सन १८२२ मध्ये करवीर गादीवर बुवासाहेब बसले.बुवासाहेबांनी त्या सर्व तोफा जमा करुन कोल्हापुरला आणण्याचे ठरविले.महाराजांची स्वारी पुर्या तयारीनिशी कोल्हापुरवरुन निघाली.वरघाटी ओळवणनजीक मुक्काम केला.तिथून सडी स्वारी घाटाखाली फोंडे मुक्कामी गेली.तिथे राहून रानात पडलेल्या एकंदर दोनशे तोफा जमविल्या. नंतर मोठी झाडे पोखरुन त्यात तोफा घातल्या आणि झाडानिशी तोफा घाटावर आणुन माणसांकडून चढविल्या.नंतर सर्व तोफा घेउन स्वारी परत करवीरास आली.
सिंधुदुर्गमधून तोफा बाहेर काढण्याचे काम सन १८२४ मध्ये देखील चालु राहीले.इंग्रजांनी करवीर राज्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या शिरी घेतल्यामुळे करवीरकरांना आपल्या तोफांचे महत्व वाटत नव्हते.नाहीतर तोफा किल्ल्यातून हलविण्यासाठी त्यांना बारा वर्ष लागली नसती.इंगर्ज -करवीरकर करार जरी १८१२ ला झाला असला तरी पुर्ण किल्ला रिकामा व्हायला सन १८१४ साल लागले.तोपर्यंत मराठे किल्ल्यात रहात होते.अखेर सन १८१४ मध्ये करवीरकरांनी राजाज्ञा यांना सिंधुदुर्ग इंग्रजांना हवाली करण्यास पाठवून दिले.
याविषयी पत्रातील मजकुर असा "रत्नाकरपंत राजाज्ञा याची रवानगी मालवणास केली कि मालवणास इंग्रजांची पलटण दोन तिकडे गेली.यामुळे किल्ला खाली करुन देणेस रवानगी केली आहे.सरकारी काम जलदीने आटपून घेउन यावे.आता काही अवधि नाही" अशा रितीने तहानंतर दोन वर्षांनी सन १८१४ मध्ये सिंधुदुर्ग इंग्रजांच्या कायमचा हवाली झाला.
इंग्रजांच्या काळात सन १८२८ च्या उल्लेखाप्रमाणे उत्तर व पुर्व बाजुची तटबंदी दुरुस्त होती.मात्र दक्षिण व पश्चिम बाजुची तटबंदी पडीक अवस्थेत होती.किल्ल्यातील ईमारतीची दुरुस्ती होत असली तरी दारुकोठार व मुख्य दरवाजा सोडून बाकी ईमारती पडलेल्या अवस्थेत होत्या.सन १८६२ च्या उल्लेखाप्रमाणे आतील भाग चांगल्या अवस्थेत होता.मात्र त्यावेळी किल्ल्यावर पहारा नव्हता,फक्त निरुपयोगी १९ तोफा विखरुन पडल्या होत्या.
दुर्गदर्शन :-
महाराष्ट्राचा कोकण किनारा म्हंटल कि डोळ्यासमोर काय येत? अथांग निळशार दर्या, नारळी पोफळीच्या बागा, टुमदार कौलारू घर, रस्त्याच्या दुतर्फा झाडांची सोबत !अगदी एखाद चित्र रेखाटाव अस निसर्गाच सुंदर मोहक रुप. समुद्राची गाज ऐकत सुर्यनारायणाला समुद्रात मावळताना पाहण्याचा मोह तर भल्या भल्यांना आवरत नाही. ह्या सौंदर्याला जोड आहे ती इथल्या कष्टाळू प्रेमळ लोकांच्या आदरातिथ्याची आणि दर्यादिलेरी पराक्रमाची. इथे सागरही सांगत असतो गाथा स्वराजाच्या दर्यावर्दी वीरांची आणि आरमाराचे सुकाणू सांभाळणाऱ्या जलदुर्गांची.
कोकणकिनार्यावरील एका सागरमार्तंडाच्या दर्शनाला, शिवकाळाचा अभिमान उराशी कवटाळून तुफान दर्याला झुंज देत उभ्या असणाऱ्या दुर्गेश्वराला भेटण्यास आपण जाणार आहोत. छत्रपती शिवरायांची सागरी राजधनी म्हणता येईल असा हा सिंधुदुर्ग बघायचा तर सर्वप्रथम मालवण शहर गाठायचे.मालवण रस्त्याने सर्व प्रमुख शहरांशी जोडले गेले आहे. सिंधुदुर्गावर जाण्यासाठी मालवण बाजारपेठेतून बंदराकडे यावे.ईथे धक्का बांधला असून इथूनच सिंधुदुर्गावर जाण्यासाठी बोटी सुटतात. मालवणपासून सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या या कुरटे बेटावरील सिंधुदुर्ग किल्लयावर जाण्यासाठी होडीतून प्रवास करावा लागतो. ९० रुपये प्रति व्यक्ती असे या होडीचे जाऊन-येऊन भाडे आहे. १२ वर्षांखालील मुलांना ५० रुपये असा दर आहे.तसेच कार पार्किंगसाठी ५० रुपये आकारले जातात.

















येथे सुमद्र शांत, सुंदर व स्वच्छ पाणी असल्याने आजुबाजूचा परिसरही देखणा आहे. बोटीतून जाताना समुद्राच्या पाण्याची मौज अनुभवत असताना वरून उडत जाणारे समुद्री पक्षी आपली सोबत करतात. पण गंमत म्हणजे किल्ला सरळ समोर दिसत असूनही आपली बोट सरळ न जाता अशी वळणे घेत का जातेय, याला बखरीतले उत्तर साजेसे राहील.
"मार्ग कठीण , सर्पाकार,तरांडी होडी मात्र चालते सभोवते सारे खडक.दुसरी तरांडी तीन कोसापर्यंत यावयास गती नाही"
इथे मार्गात पाण्याबाहेर डोकवणारे बरेच खडक आहेत आता हे खडक चुकवत जायला हवे ना! इथल्या कुशल नावाड्यांनाच ही किमया जमते. लहान-लहान होड्या, नारळाची झाडे, निळे पाणी असे पाहत आपण सुमारे दहा ते पंधरा मिनिटातच किल्याच्या प्रवेशाद्वारासमोर येऊन पोहचतो.वाटेत आपली होडी पद्मदुर्गाजवळून जाते.तितकेच सिंधुदुर्गाच्या या रक्षक दुर्गाचे दर्शन घडते.
किल्ल्याच्या दिशेने प्रवास करताना निसर्गाचे भव्य रूप पाहत पाहत आपले पाय धक्क्याला लागतात.किल्ल्यावर असणारी पर्यटकांची वर्दळ लक्षात घेता हा धक्का बर्याच होड्या एकदम किनार्यावर उभ्या करता याव्यात यासाठी बांधला आहे.
समोर दिसणारे भव्य बुरुज आणि प्रचंड तटबंदी पाहत इथे क्षणभर थांबावेसे वाटते. पण दरवाजा मात्र चटकन नजरेस पडत नाही. गोमुखी बांधणीचे हे किल्ल्याचे प्रवेशद्वार दोन बुरुजांच्या खिंडीमधून जावे तेव्हा समोर उभे राहते. अगदी जवळ पोहोचेपर्यंत आपल्याला दार दिसत नाही. महादरवाजावर आता द्वारशिल्पे नाहीत. पण चौकट आणि महिरपी कमानीचे सौंदर्य खुलून दिसते.या दोन बुरुजांपैकी दरवाज्याच्या उजवीकडील बुरुज हा तिथला एकमेव चिलखती बांधणीचा आहे. बुरुजाच्या ढालीमागे प्रवेशद्वार सुरक्षीत ठेवण्याचे हे बांधकाम कौशल्य महाराजांच्या दुर्गपती उपाधीस साजेसे असेच आहे.गोमुख बांधणीचे दरवाजे हे शिवकालीन दुर्गबांधणीचे वैशिष्ट्य. महाराज सांगतात –'दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून पुढे बुरुज देऊन येतिजाती मार्ग बुरुजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे.'
प्रवेशद्वारातून आत जाताना ‘छत्रपती शिवाजीमहाराज की जय...’, ‘जय भवानी जय शिवाजी...’’ अशा घोषणा देत पर्यटक किल्यात प्रवेश करतात. समुद्राच्या आत ऐवढा मोठा किल्ला व त्यावर एवढे पर्यटक पाहून आपणही आश्चर्यचकित होऊन जातो. आत गेल्यावर किल्याची माहिती सांगण्यासाठी खासगी गाईड आपले स्वागत करतात. खरेतर स्वत:हून किल्ला पाहण्यात आनंद आहे. पण ज्यांना किल्याची व इतर माहिती माहित नसते त्यांनी या गाईडचा आधार घेतला तर काहीच हरकत नाही. ५ जणांसाठी २०० रुपये घेऊन आपल्याला ते किल्यातील महत्त्वाच्या गोष्टी, किल्याचा इतिहासाबद्दल माहिती सांगतात. किल्यात घरे आणि टपरीवजा हॉटेल आहेत. त्यामुळे पाण्याची विकत व्यवस्था होते. तसा किल्ला पाहायला किमान दोन तास हवेत, पण सध्या बोटवाल्यांच्या अजब धोरणामुळे आपल्याला एक तासच मिळतो.हि गोष्ट लक्षात ठेवूनच गड फिरायचा.
बारकाईने पाहिल्यास या महाद्वाराच्या वर कमानीत तीन पाट काढल्यासारखी जमीनीकडे तोंड करून पन्हाळी आहेत. त्यांची रचना पाहता शत्रु जर सर्व विरोध मोडून महाद्वारावर चाल करून आला तर त्याच्यावर उकळते तेल सोडून त्याला भाजून काढण्यासाठी तर ही व्यवस्था केली नसावी ना? संपूर्ण किल्याला हेच एकमेव प्रवेशद्वार आहे. महाद्वारासमोरच एक तुटकी तोफ आहे तसेच गडाचे रक्षणकर्ते शक्तीचे द्योतक दक्षिणमुखी मारुतीराया दाराजवळच ठाण मांडून आहेत.त्यांच्या उजव्या बाजुस गणपती आहे. यांना नमस्कार करून महाद्वारातून आत प्रवेश करू. प्रवेशद्वाराचे बांधकाम आजही भक्कम आहे. उंबराच्या जाड लाकडी फळ्याचे मजबूत दरवाजे आहेत.

 |
| Sindhudurg Fort Malvan |
दरवाज्याच्या वरील बाजूस जांभ्या दगडात बांधलेला नागरखाना असून, शत्रू आल्यास नगारा वाजवून संपूर्ण किल्यावर संदेश देण्यासाठी याचा वापर होई. सध्या जरी येथे बोटी येण्यासाठी धक्का बांधला असला तरी पूर्वीच्याकाळी समुद्राच्या लाटांमध्ये किल्यात प्रवेश करणे अवघड जात असावे हे नक्की. नगारखान्यावर गेल्यानंतर १५ मैलांचा प्रदेश सहज दिसतो.
संपूर्ण किल्ला सुमारे ४८ एकरात बांधलेला असून, ४ ते ५ किलोमीटरची तटबंदी आहे. २० ते ३५ फूट उंचीची तंटबंदी आहे. तटबंदी ८ ते १० फुट रुंद आहे. दक्षिणमुखी मारुती दरवाज्यातच आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. शिसे, चुना, वाळू, गुळ, उडीद, भेंडी अशा पदार्थांच्या वापरातून तटबंदीच्या वापरासाठी केला आहे. शिसेच्या वापर पाया भरणीसाठी केलेला आहे. गडावर धान्य कोठार देखील आहे. नागमोडीच्या आकाराची तटबंदी पाहण्यासारखी आहे. सुमारे ५२ बुरूज येथे उभारलेले आहे. तटबंदीतच ४० शौचकुपे देखील बांधलेली आहेत. इतक्या मोठ्या संख्येने असलेली शौचकुपे इतरत्र आढळत नाहीत. तटबंदीवरून आपल्याला गडाची प्रदक्षिणा पूर्ण करता येते. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले.
दरवाज्यातून आत येताच समोर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत.






जरीमरी मंदिर
या देवड्या पार करुन पुढे आलो की समोरच जरीमरी देवीच छोट मंदिर आहे. पण ते शिवकालीन नाही या मंदिरावर असलेल्या लेखात याचे साल १८८२ आहे.मंदिरात मुर्ती मात्र नाही पावले आणि लहान शिवलिंग आहे.जर म्हणजे आजार आजारांवर मात करणारी ही माता आहे. जरीमरी हि लेकुरवाळ्या सवाष्ण बायकांची आवडती देवी आहे,हिला नवस बोलून मंगळवारी नाऱळ फोडण्याची परंपरा आहे.देवळावर असणार्या शिलालेखाचे वाचन असे
"तुकाराम येसबा आयरेकर सके श्री म यांनी बांधीले सन १८८२"
२५ नोव्हेंबर १६६४ ला किल्ला बांधणीस सुरूवात झाली तर २९ मार्च १६६७ मध्ये किल्ला पूर्ण झाला. आजच्या काळात किल्ला बांधण्यास ३२ हजार कोटी खर्च आला असता. देवीच दर्शन घेऊन आपण जवळच असलेल्या बुरुजाच्या जिन्यावरून नगारखान्याकडे जाऊ.
सिंधुदुर्गाचा नकाशा
.
महाराजांच्या हात आणि पायाचे ठसे असलेल्या घुमट्या
नगारखान्याच्या उजवीकडे पुढे गेल्यास बुरुजा जवळच्या पायऱ्यापाशी आणि तटावर अशा दोन घुमट्या आहेत. कसल्या हो या घुमट्या? काय आहे यात? आहो सिंधुदुर्गाच्या देहावर असलेली अमोल लेणी आहेत ही. सिंधुदुर्गाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथं असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पावलाचे ठसे इथं पाहता येतात.
महाराजांचा सहवास लाभलेल्या प्रमुख किल्ल्यांच्या इतिहासात काही अनमोल क्षण आहेत.शिवनेरी शिवजन्माचा शतकांच्या प्रतिक्षेने लाभलेल्या क्षणाच्या धुंदीत हरविला आहे,महाराजांच्या पहिल्या लढाईचा साक्षीदार असणार पण त्याच वेळी मिर्झाराजे जयसिंगाबरोबर झालेल्या कडू क्षणांचा घोट गिळणारा एका डोळ्यात आसु तर एका डोळ्यात हासू अशी परिस्थिती पुरंदरची आहे, महाराजांच्या उण्यापुर्या पन्नास वर्षाच्या आयुष्यातील निम्म्या कालखंडांचा आणि त्यांच्या सर्व पराक्रमी गाथांची महती एकावी ती राजगडाकडूनच, महाराजांच्या,मराठी मुलुखाच्या,भारतभुच्या आणि विश्वाच्या सोनेरी क्षणाचा म्हणजे राजाभिषेकाचा किरीट धारण केलेला आणि त्याच थोर पुरुषाचे पार्थिव शरीराचे दुख वागवणारा रायगड या सर्वांच्या तुलनेत शतकानुशतके जपून ठेवावा असा नजराणा सिंधुदुर्गाच्या भाग्यत आहे.ते म्हणजे प्रत्यक्ष छत्रपतींच्या हाताचा आणि पावलाचा ठसा.
हे ठसे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत याचा स्पष्ट पुरावा देखील आहे.करवीरच्या
जिजाबाईसाहेबांनी २९ नोव्हेंबर १७६३ मध्ये किल्लेदार येसाजी शिंदे यास पत्र
पठवून या पवित्र शिवस्मृतीला नैवेद्याची व्यवस्था केली होती आणि ठशांवर
घुमटी बांधण्याची आज्ञा केली होती. ते पत्र असे होते.
श्री शंभू प्रा ||
श्री मन्माहाराज मातुश्री ——- आईसाहेब याणी चिरंजीव राजश्री येसाजी
सिंदे सुभेदार यासी आज्ञा केली केली यैसीजे. सु|| आर्बा सितैन मया व अलफ.
तुम्ही विनंतीपत्र पाठविले प्रविष्ट होऊन लेखनार्थ श्रवण जाहला. साहेबाची
आज्ञा घेऊन निघालो ते गुरुवारी तडीस राहोन जंजिरातील कारभारी व नाइकवडी
भृगुवारी येऊन जंजिरा घेऊन गेले म्हणोन लिहिले. त्यावरून संतोष जाहला.
फिरंगी गोमंतकाहून आरमारसुद्धा येऊन जंजिरासी मातवर युध केले. साहेबाच्या
सेवक लोकींही त्याचा मार सोसून आपणाकडील जंजिराकडील तोफानी मारगिरी करून
पाचच्यारसेहे फिरंगी मारून नेस्तनाबूद केला. तन्मुले फिरंगी कांही लबडी (?)
मार न सोसे यास्तव हतधैर्य होत्साता पलायेन संपादिले जंजिऱ्याच्या लोकास
येश आले. मदुर्मिची सर्त जाहली. असा आकस्मात दंगा कधीही न जाहला. आणि या
प्रमाणेंं गलिमाचे पारिपत्येही केले नाही. साहेबी दोनी हजार स्वर व पाच
हजार हशम तयार करून खासा स्वारी सित्ध जाहाली. तो भवानजी कदम यासमागमे
किलाची खुशालीची विनंती पत्रे आली. त्यावरून स्वारी तहकुब जाहली. पुढे फौजे
रवाना केली आहे ती ही येऊन पावली असल. *तीर्थरूप कैलासवासी माहाराज
राजश्री-छेत्रपती याचा हात (?) जंजिरा आहे त्याजवरी गची व कोनाडा बांधोन
नैव्यद्य व पूजा चाले सारिखी करणे.* याविसी अंतर न करणे जाणिजे र|| छ १५
माहे जमादिलावल लेखन सीमा.
लेखन सीमा
करवीर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी यातील हाताच्या ठशाची
चांदीची प्रतीकृती देव्हाऱ्यात पुजेस ठेवली होती. आजही ही प्रतीकृती
करवीरमध्ये जुन्या राजवाड्याच्या देवघरात आहे.
या संदर्भात एक दुर्गकथा सांगितली जाते. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला असलेल्या तटबंदीवर एका छोट्याश्या जागेत छत्रपती शिवाजीमहाराजांच्या हाताचा व पायाचा ठसा जतन करून ठेवला आहे. किल्ला संपूर्ण बांधल्यावर तो पाहण्यासाठी आलेल्या महाराजांनी हिरोजींना किल्ला बेलाग उभारल्याबद्दल बक्षीस देऊ केले. हिरोजींनी देखील बक्षीस म्हणून काय मागितले ? सोने, पैैसे नाही तर चक्क महाराजांच्या हाताचा व पायाचा ठसा मागितला. केवढे मोठे बक्षीस? हिरोजी इंदुलकरांनी महाराजांकडे काय मागितलेले अवघड आहे ना. नाहीतर एवढा किल्ला बांधल्यावर स्वत:साठी काही तरी मागून दुसºया एखाद्याने स्वत:चे पोट भरून घेतले असते. ना पैैश्यांची अफरातफर, ना बांधकामामध्ये भेसळ, ना टक्केवारी, ना टेंडरची फिरवाफिरवी. असली माणसे महाराजांना कशी काय भेटली असतील ना.
काही जणांच्या मते किल्ल्याचे बांधकाम सुरु असताना छत्रपती शिवराय इथं आले आणि ओल्या ठिकाणी त्यांच्या पायाचा व हाताचा ठसा उमटला आणि तिथल्या गवंड्याने तो तसाच ठेवला असं सांगितलं जातं. तर काही जणांच्या मते महाराजांचा ठसा मुद्दाम उमटवून घेतला आहे.हे ठसे नीट बघीतले तर व्यवस्थित जागेच्या मधोमध उमटलेले आहेत.याचा अर्थ ते चुकून उमटले नसावेत.मुद्दाम उमटवून घेतलेत.वास्तुस्थिती काहीही असली तरी आपण एका अनमोल मुद्रेचे साक्षी आहोत.यापुर्वी या घुमट्या उघड्या होत्या.तेव्हा किल्ल्याला भेट देणारे बहुतेक जण या ठश्यावर हात्,पाय ठेवायचे,अनेकांनी प्लॅस्टरमध्ये या ठशांची प्रतिकृती बनविण्याचा प्रयत्न केला.आपले सुदैव म्हणून या प्रकारात मुळ शिल्पकृतीचे काही नुकसान झाले नाही.
दोन फाटे असलेला माड पुर्वी अाणि अाता
शिवरायांचे हाता,पायाचे ठसे बघीतल्यावर तसेच तटबंदीवरुन फिरत आपण गडाच्या परिघाचा फेरा करु शकतो.पण आपण आधी गडाच्या मध्यभागी असणारी ठिकाणे पाहुया.त्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराकडे परत फिरुन आता आपण जरीमरी मंदिर उजवीकडे ठेऊन पुढे जाऊ.
सिंधुदुर्गाची बांधणी हा जसा मानवनिर्मित चमत्कार आहे,तसा निसर्गाने देखील एक आविष्कार ईथे केलेला होता.प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पुढे डाव्या हाताला एक आगळेवेगळे नारळाचे झाड होते. विशेष म्हणजे या झाडाला दोन फांद्या होत्या आणि दोन्ही फांद्यांना नारळ लागलेले असायचे. परंतु २००७ च्या पावसाळ्यात त्यावर वीज पडून ते झाड मेले. आणी आता मात्र, तेथे काहीही नाही. दुर्देव. वास्तविक हे आश्चर्य जतन करणे आवश्यज होते.मात्र आपल्याकडे असा दृष्टिकोण नसल्याने हे झाड आता फक्त आठवणीत राहिले आहे.
 |
| शिवाजी महाराजांचे मंदिर |
 |
| Shivrajeshwar Mandir, Sindhudurg Fort, Malvan |







किल्ल्यात दगडी पायवाटेवरून थोडं पुढे गेलं की एक अनोखं मंदिर दिसतं. हे आहे श्री शिवराजेश्वर मंदिर. शिवाजी महाराजांचे भक्कम बंदर उभारण्याचे स्वप्न या सिंधुदुर्गाच्या रुपाने पुर्ण झाले,मग त्याच सिंधुदुर्गाने अनमोल शिवखुणा अंगावर बाळगल्या आहेत. जसे छत्रपतींच्या हाताचे आणि पावलाचे ठसे तटावर आहेत, तसेच शिवरायांचे देवतास्वरुप वास्तव्य इथे आहे. साक्षात शिवाजी महाराजांचे मंदिर सिंधुदुर्गाच्या मधोमध आहे.शिवछत्रपतींची मंदिर इतरही काही ठिकाणी आहेत.जसे श्रीशैल्य, तळगड तसेच इथे सिंधुदुर्गावर असलेले मंदिर १६९५ साली छत्रपती राजाराम महाराजांनी बांधले आहे. त्यांनी फक्त मंदिराचा गाभारा बांधला आणि त्यापुढील सभामंडप छत्रपती शाहू महाराजांनी १९०५ च्या सुमारास बांधून घेतला. दगडी बांधकामावर चुन्याचा गिलावा देऊन हे मराठा शैलीचं देऊळ बांधलं गेलं आहे. प्रवेशद्वारानंतर काही अंतरावरच हे छत्रपती शिवाजीमहाराजांचे मंदिर आहे. छत्रपती राजाराम महाराजांनी शिवाजीमहाराजांची मूर्ती स्थापन केली आहे. मंदिरासमोर समोर सुबक तुळशी वृंदावन आहे.मंदिरासमोरच एक तोफही पाहता येते.गडावर सध्या तीन तोफा दिसतात.एक महाद्वाराच्या बाहेर फुटक्या अवस्थेत पडली आहे.दुसरी शिवराजेश्वर मंदिराच्या आत आणि तिसरी बाहेर.
शिवरायांच्या मुर्तीचे मुळ रूप आणि पुजा बांधणी
मुर्तीच्या मस्तकी मुकुट, गळ्यात अलंकार, दंडावर आणि मनगटात कडे आहेत. तसेच पायात तोडा आहे. मुर्तीच्या दोन्ही बाजूस चंद्र सुर्य आणि मोर्चेल आहे. गाभाऱ्यात प्रवेश करताना उजविकडे दगडात कोरलेल्या रामदास स्वामींच्या पादुका आहेत. डाविकडे पाटगावच्या मौनीबाबांची मुर्ती आहे.गाभाऱ्यात स्थापन केलेली शिवाजी महाराजांची मुर्ती नावाड्याच्या वेशातील विरासन घालून बसलेली आहे. ह्या मुर्तीच वैशिष्ठ्य म्हणजे महाराजांच मिशा आणि दाढी नसलेल रूप.
हे मंदिर करवीर छत्रपतींच्या अखत्यारीत आहे. अजूनही करवीर गादीकडून दर दोन वर्षांनी महाराजांना मंदिल आणि वस्त्रे अर्पण केली जातात. मंदिराचे पुजारी श्रीराम सकपाळ नावाचे गृहस्थ आहेत. यांच्या घराण्याकडे पुजेची व्यवस्था वंशपरंपरागत आहे. महाराजांच्या मुर्तीला सकाळी अभिषेकानंतर वस्त्रे चढवतात आणि चांदीचा मुखवटा लावतात. विशेष प्रसंगी आणि सणाच्या दिवशी सोन्याचा मुखवटा लावतात. मुल्हेरी मूठ असलेली शिवरायांच्या वापरातील तलवारही इथं ठेवण्यात आली आहे असं दिसतं. प्रत्यक्ष शिवरायांची तलवार राजाराम महाराजांनी इथे ठेवली आहे. तसेच इतर शस्त्रे पण होती पण इंग्रजांनी १८१२ मध्ये किल्ला घेतला तेव्हा ही शस्त्रे नेली अशी माहिती पुजारी सांगतात. महाराजांच्या मुर्तीला सकाळी आणि रात्री नैवेद्य दाखवला जातो तसेच मुर्तीवर चवरीही ढाळतात. इथे सकाळ संध्याकाळ नौबत झडते. रविवार हा शिवरायांच्या पूजनाचा वार आहे. शाहू महाराजांनी आपल्या दिवाण रत्नाकर आप्पा यांना शिवराजेश्वराची देखरेख करण्यासाठी दरवर्षी १५२२ रुपयांची नेमणूक करून दिलेली दिसते.
मंदिरात रामनवमीचा उत्सव साजरा होतो. कांदळगावचे ग्रामदैवत रामेश्वराची पालखी पंचायतनासह दर तीन वर्षांनी सिंधुदुर्गास भेट देते सर्व लवाजम्यानिशी देव जोशींच्या होडीतून किल्ल्यावर येतो. किल्ल्यात प्रवेश करताना २१नारळ फोडले जातात. हा भेटीचा सोहळा पाहण्यासारखा असतो. त्यावेळेस पालखी किल्ल्यावरील इतर मंदिरांसह शिवराजेश्वरास भेट देते
किल्यावर महाराजांच्या वेळी किल्याची देखरेख करण्यासाठी असलेली काही कुटुंबे आजही राहतात. सतराव्या शतकापासून इथं ग्रामस्थ किल्ला न सोडता काळजी घेण्यासाठी थांबले आहेत. गडावर १८ कुटुंबांची वस्ती आहे. सपकाळ, सावंत, भोसले, जैन, यादव, पडवळकर, फाटक, वैंगणकर, मजुवर अशी वस्ती आज देखील येथे राहते. गडावर त्यांची सध्या ९ वी पिढी राहत आहे. ग्राम पंचायत इथली देखभाल करण्यासाठी देणग्या स्वीकारते, तिथं यथाशक्ती मदत करावी.तसे किल्यावर सूर्यास्तानंतर इतरांना राहण्याची परवानगी नाही.






शिवराजेश्वरांचे दर्शन घेऊन डावीकडील वाटेने पुढे जायचे किल्ल्याच्या पश्चिम भागाकडे वळू, सिमेंटच्या बनवलेल्या मार्गाने पुढे गेलो की एक महादेवाच मंदिर दिसते मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे मंदिरात एक अतिशय लहान म्हणजे ३ बाय २ फुट आकाराची आयताकृती विहीर म्हणजे बारव आहे. बारवेच्यापुढे नंदी आणि शिवलिंग आहे. स्थानिकांच्या मते ते एक भुयार आहे. जे थेट मलवण शहराच्या उत्तरेकडे असलेल्या ओझर या गावी एक मठ आहे तिथे उघडते.
महादेवाच दर्शन घेऊन पुढे आल्यावर आपल्याला किल्ल्याला गोड्या पाण्याचा पुरवठा करणार्या विहीरी दिसतात. या विहीरींची नावेही गमतीदार आहेत. दुधबाव, साखरबाव, दहीबाव ( बांव = विहीर ).हा किल्ला समुद्रात उभा असुनही आतमध्ये असलेल्या या गोड पाण्याच्या विहीरी महणजे आश्चर्यच मानले जाते. किल्ल्याच्या स्थानी मुबलक पिण्याचे पाणी असल्याशिवाय बांधकाम करू नये अशी छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञाच होती.किल्ल्यावर असलेल्या रहिवाशी हेच पाणी वापरतात.
पंचामृतामध्ये असलेल्या या तीन गोष्टींमुळे अजूनच गोडवा तयार होतो. तिन्ही विहिरींना शंकराच्या पिंडीचा आकार दिलेला आहे. साखरबाव आणि दहीबाव शेजारीच आहेत. पण दुधबाव थोडी एका बाजूला आहे. संपूर्ण जांभा दगडामध्ये या विहीरींचे बांधकाम केलेल आहे.
या विहीरीच्या शेजारीच राजवाड्याचे अवशेष आहेत. इथे ताराराणी व राजाराम याचा वास्तव्य होते. मात्र, त्याची दुरवस्था झाली आहे. ब्रिटीशांनी येथील राजवाडा तोडून भुईसपाट केलेला आहे. महाराजांची स्फूर्ती घेऊन पुढे कोणीही महाराजांसारखे कर्तृत्व करू नये यासाठी इंग्रजांनी केलेली ही सोय होती.
भगवती मंदिर
हे पाहून पुढे निघालो की आपल्याला भवानी (भगवती) देवीचे मंदिर दिसते.मंदिरापुढे दिपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे.
मंदिरात देवीची उभी चतुर्भुज मुर्ती आहे. काळ्या पाषाणाची ही मूर्ती आहे.देवीच्या हातात त्रिशूळ, तलवार, ढाल आणि परळ आहे. पायाजवळ वाहन सिंह आहे.
आतापर्यंत आपण पाहिलेली सर्व ठिकाणे गडावर येणारे बहुतेक पर्यटक पहातात.पण याशिवाय माहिती नसलेली काही एतिहासिक ठिकाणे सिंधुदुर्गावर आहेत्,आता त्यांचा आढावा घेउया.
भवानी देवीचे दर्शन घेऊन तटबंदीकडे जाणार्या मार्गाकडे येऊन डाविकडे वळूया
चोर दरवाजा :-
 |
| चोर दरवाजा , सिधुदुर्ग किल्ला |
इथून चौथ्या बुरूजाजवळ एक चोर दरवाजा आहे. पण तो दगडात चिणून काढला आहे. किल्ल्याला संकटकाळी बाहेर पडण्यासाठी एकाहुन अधिक मार्ग असावेत त्यापैकी जरूरीचे राबता ठेऊन बाकीचे चिणून टाकावेत अशी रीत होती. हेच कारण तर या चिणलेल्या दरवाज्यामागे नसावे ना?
हा दरवाजा आतून दिसत नाही कारण किल्ल्यात पाणी येऊ नये म्हणुन तो आतून बंद करण्यात आला आहे. तरीही आजही तिथुन समुद्राच पाणी किल्ल्यात येत. (समुद्राच पाणी चोर दरवाजातून किल्ल्यात येऊ नये म्हणुन ३०० वर्षापूर्वी काय योजना केली होती हा अभ्यासाचा विषय आहे). मात्र याच चोर दरवाज्याच्या बाहेरच्या बाजुला स्कुबा डायव्हींगसाठी बोटी नेल्या जातात.त्यावेळी सिंधुदुर्गाच्या तटबंदीत हा चोर दरवाजा दिसतो. समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या थोडासा वर असलेला चोर दरवाजा, यातून निसटायच म्हणजे एकतर होडी पाहिजे किंवा समुद्राच्या पाण्यात झोकून द्यायच आणि पोहत मालवणचा किनारा गाठायचा.

बुरूजातला गणपती
गणरायाचे शिल्प दर्शन देते, पण यासाठी आपल्याला तटबंदीवर जावे लागेल. हे शिल्प पाहून पुन्हा भवानी मंदिराकडे वळून थोडे पुढे येऊ. विहिरींच्या पलीकडे त्याच रस्त्याने चालत गेल्यावर तटबंदीच्या आत बांधलेला एक बुरुज दिसतो. त्याला निशाणकाठीचा बुरुज असे म्हणतात. या बुरुजावरून किल्ल्याच्या परिसराचे सुंदर दृश्य दिसते.संपुर्ण बेट खडक फोडून सपाट केल्यामुळे टेहाळणीसाठी हा उंच बुरूज बांधण्यात आला. नुसत्या डोळ्यांनी देखील वेंगुर्ला परिसर, मालवण परिसर, निवतीचा किल्यापर्यंत नजर ठेवता येई.
या भागात आपल्याला विशिष्ट प्रकारचा खडक नजरेस पडतो, जो कोकणात अढळणार्या जांभ्या खडकपेक्षा वेगळा आहे. इतका प्रचंड किल्ला उभा करण्यासाठी दगड कुठून मिळाले असतील? काही इतिहासकार सांगतात की फोंडाघाट सारख्या ठिकाणांहून इथं बांधकामासाठी दगड आणला गेला असावा. काही प्रमाणात असा दगड जरी आणला गेला असेल तरीही मुख्य वापर हा कुरटे बेटावरील कुरुंदाच्या दगडाचा केला गेला आहे. भूशास्त्रीय दृष्टीने हे क्वार्टझाइटचे रूप असावे असं मला वाटतं.
सागराच्या अथांग गहिऱ्या निळाईबरोबर या कुरुंदाच्या खडकाच्या पिवळ्या, नारिंगी, हिरव्या छटा एक वेगळाच दृश्य परिणाम निर्माण करतात. अजूनही किल्ल्यात अनेक ओबडधोबड कुरुंदाच्या खाणी दिसतात. भगवतीचे मंदिर आणि महाराजांच्या वाड्याचे अवशेषही आहेत. निशाणी बुरूजा शेजारी एक तलाव आहे पण काळाच्या ओघात तो कोरडा पडला आहे.

निशाणी बुरुजाच्या जवळ एक भिंतीसारखे बांधकाम आहे. त्यावर बंदुकिच्या गोळ्या झाडल्यामुळे छिद्रे पडावित तशी छिद्रे आहेत इंग्रजांच्या काळात इथे शूटिंग रेंज होती अस म्हणतात.
राणीची वेळा
हे सार पाहून आता आपण पश्चिम तटाकडे वळू, या बाजूस तटबंदी चांगली रूंद आहे. इथे बांधकामात वापरलेले चिरेही मोठे आहेत. इथे तटबंदीवर जाण्याच्या जीन्याजवळ एक छोटा दरवाजा आहे. या दरवाज्यातून खाली वाकत बाहेर आलो की समोर दिसते एक पुळण हिच प्रसिद्ध "राणीची वेळा" वेळा म्हणजे लहान समुद्रकिनारा ही आहे.तिन्ही बाजूने किल्ल्याच्या तटाच्या संरक्षणात आहे. शुभ्र वाळूत उभे राहुन तटाकडे धावणार्या लाटांची मौज अनुभवत असताना समुद्राच पाणी अंगावर घ्यावसे वाटते,मराठा राज्याची दोन शकले झाल्यानंतर करवीर छत्रपतींकडे या किल्ल्याचे स्वामित्व आले. महाराणी ताराबाई या किल्ल्यावर सहा महिने राहिल्या होत्या, त्यावेळेस त्या येथे समुद्रस्नानासाठी येत असत.
राणीची वेळा पाहून परत फिरून थोडे पुढे आल्यावर एक चुन्याची घाणी दिसते. जवळच वाळलेल्या चुन्याचे ढिग आहेत. घाणीच्या पश्चिमेला तटावर मोटेसारखी रचना आहे.बांधकाम साहित्य वर ओढून घेण्यास ही सोय केली असावी. |
| बुरूजातली खोली |
चुन्याच्या घाणीच्या जवळ असलेल्या जिन्याने तटबंदीवर येऊन पुढे आल्यावर आपल्याला बुरूजात असलेली खोली पाहता येते. थोडे पुढे गेल्यावर तटात मारूतीचे शिल्प पहायला मिळते.
किल्ल्याच्या उत्तर भागाकडे जाताना एक तलाव दिसतो ह्याला महापुरूषाचा तलाव म्हणतात. तलावाशेजारी महापुरूषाचे लहान मंदिर आहे. किल्ल्यावर शिबंदीची घरे, कचेरी, सदर अशी अनेक बांधकामे असतील पण आज मात्र त्यांचे अवशेष झुडूपांमुळे शोधणे अवघड होऊन गेले आहे. तटबंदीवरून आपल्याला गडाची प्रदक्षिणा पूर्ण करता येते. पण वेळे अभावी आपल्याला ती शक्य होत नाही.या किल्ल्यावर २८२ फूट उंचीचा भगवा ध्वज इ.स. १८१२ पर्यंत फडकत होता. इ.स. १९६१ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटदुरुस्ती केली.
महाराजांनी या किल्ल्याच्या आणि किनाऱ्याच्या रक्षणार्थ पद्मगड, राजकोट, सर्जेकोट अशी उपदुर्गांची साखळीच उभी केली. हे उपदुर्ग स्वतंत्र वेळ देऊन पहावेत
 |
| चुन्याचा घाणा |
राहण्यासाठी खोल्या :
निवास गणपतीपुळे आणि तारकर्ली MTDC आश्रयस्थान येथे उपलब्ध आहे.
कसे जावे :
नाव / फेरी: किल्ला धोन्तारा आणि पद्मगड दोन लहान बेटे दरम्यान, फक्त एक अरुंद जलमार्ग वाहिनीद्वारे जवळ जाऊ शकते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मालवण पोर्ट पासून नियमित मध्यंतर येथे एस् फेरी.
रेल्वे :
राजापूर आणि कुडाळ कोकण रेल्वे जवळच्या रेल्वे स्थानके आहेत.
बस:
रोड द्वारे सिंधुदुर्ग गोवा हायवे मार्गे मुंबई पासून 510-किमी आहे.
कोल्हापूर ते मालवण :
कोल्हापूर – कुणकेश्वर -तालेवाडी रोड, अंतर १५९ किलोमीटर ,प्रवासासाठी लागणारा वेळ साधारण चार तास.
कोल्हापूर – कासल – मालवण मार्ग,अंतर १५५ किलोमीटर ,प्रवासासाठी लागणारा वेळ साधारण साडेचार तास.
कोल्हापूर – वेंगुर्ला – बेळगाव रोड ,अंतर १९६ किलोमीटर, प्रवासासाठी लागणारा वेळ साधारण साडेचार ते पाच तास
मालवण मध्ये राहण्याची सोय
मालवणमध्ये स्थानिक घरगुती राहण्याची सोया उपलब्ध आहेत. तसेच अनेक खाजगी हॉटेल ,लॉजिंग मोठया प्रमाणावर उपलब्ध आहेत. स्थानिकांना विचारून चांगल्या राहण्याची सोय विषयी माहिती घेतलेली केव्हाही चांगले. हॉटेल विषयी माहिती विचारतांना हॉटेल एजेंट यांना टाळावे. राहण्याची सोय शोधतांना वेळ लागला तरी चालतो परंतु थोडे विचारपूस केल्यास स्वस्त आणि चांगली राहण्याची सोय होऊ शकते.
कसे जावे :
पुण्याहून : कोल्हापूर मार्गे सुमारे गगनबावडा मार्गे सावंतवाडी व तेथून मालवण : ४१० किलोमीटर
मुंबईहून पेण, पनवेल, चिपळूण, लांजा, सावंतवाडी, मालवण. : ४८१ किलोमीटर
मुंबई - पुणे - कोल्हापूर - मालवण : ५३३ किलोमीटर
राहण्याचे ठिकाण :
तारकार्ली बिचवर एमटीडीसीची निवास्थाने आॅनलाईन बुकिंग करता येऊ शकतात. एसी / नॉन एसी सुमारे २ ते ३ हजार रुपये एक दिवसासाठी असा दर आहे. या शिवाय मालवण परिसरात स्थानिक लोकांच्या घराच्या परिसरात त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या खोल्यांमध्ये राहण्याची व जेवण्याची सोय होते. अंदाजे १ ते २ हजार रुपये असा एका दिवसाचा खर्च आहे.
जवळचे पर्यटन स्थळ
येथून जवळच असलेला तारकर्ली समुद्र किनारा, डॉल्फिन सफारी, तारकर्लीला समुद्राचे तळ दाखविणारे नितळ पाणी आहे, हाऊस बोट, स्कुबा डार्विन, तारकर्ली समुद्र तट हे सिंधुदुर्ग जिल्हातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. तारकर्लीत MTDC चे कोकणी पद्धतीच्या झोपड्या असलेले सुंदर रिसॉर्ट आहे. याशिवाय देऊळवाडा येथील संसारी नारायण मंदिर. मौनी महाराजांचे स्मारक मंदिर, जयगणेश मंदिर : सुवर्ण गणेशाची मूर्ती पाहण्यासारखी, मौनी महाराजांचे स्मारक मंदिर, ह्याव्यतिरिक्त तारकर्लीला जलपर्यटन अनुभवू शकतो. धामापूरचा सुमारे तीनशे वर्ष जुना तलाव, कुणकावळे येथील श्रीदुर्गादेवी आणि श्री ब्रम्हदेव, हिवाळे सड्यावरील पुरातन शिल्पाकृती.
मालवणी प्रकारचे नॉनव्हेज जेवण खूप प्रसिद्ध आहे. मालवणी मसाले व या मसाल्यात बनविलेले समुद्री पदार्थ चाखण्यासाठी पर्यटक नेहमी गर्दी करतात.
मालवण पासून जवळच असलेले मालवण बंदर व पदमदुर्ग या किल्याला भेट देऊ शकतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किल्ल्यांची बांधणी करतांना वेगवेगळे तंत्रज्ञान वापरले, अनेक प्रयोग केले ते किल्ल्यावर गेल्यावर पाहायला मिळतात. जलदुर्ग किंवा किल्ला उभारतांना महाराजांनी केलेले सखोल निरीक्षण व अभ्यास आणि गळ्यावेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर यामुळे किल्ल्याची दुर्गमता व बेलागपणा यात भर पडलेली आहे. प्रत्येक किल्ला उभारतांना महाराजांनी किल्ल्याची नैसर्गिक अभेद्यपणा, दिशा, किल्ल्यांचे ठिकाण इत्यादी तांत्रिक बाबी पडताळूनच तेथे किल्ले उभारलेले आहेत. म्हणून आजही शेकडो वर्षे उलटून देखील किल्ले इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. म्हणून किल्ल्यांना भेटी देऊन तिथला इतिहास जाणून घेतल्यास प्रेरणादायी ठरते
 |
| Scuba Diving behind Sindhudurg Fort, Malavan |
भटकंती : दिवस दुसरा : सिंधुदुर्ग - राजकोट - सर्जेकोट - रामगड - निवती किल्ला ...भोगवे समुद्र किनारा
सिंधुदुर्ग
: किल्ला पाहण्यास २ तास (ह्यातला प्रत्यक्ष एकच तास मिळतो, बाकी वेळ
बोटीचा प्रवास) बोट फी : रु. 80/- किल्यात घरे आणि टपरीवजा हॉटेल आहेत.
त्यामुळे पाण्याची विकत व्यवस्था होते.
राजकोट : किल्ला पाहण्यास ५ मिनिटे (असून नसल्यासारखा किल्ला) पाणी नाही, सुक्या मासळीचा भयंकर वास आहे.
सर्जेकोट : किल्ला पाहण्यास १५ मिनिटे, तटबंदी आणि बुरुज आहेत तरी वाढलेल्या प्रचंड झाडोऱ्यात सारे अवशेष गायब झाले आहेत.
कसे जाल : सिंधुदुर्ग - राजकोट - सर्जेकोट - रामगड - निवती किल्ला, भोगवे समुद्र किनारा असा क्रम ठेवल्यास कमी वेळ लागेल.
हे चुकवू नका : सिंधुदुर्ग
किल्ल्यावरील महाराजांचे पायाचे व हातांचे ठसे. रामगडावरील दुर्गवीर
ह्यांचे काम. किल्ले निवती वरून सूर्यास्त आणि भोगावेचा समुद्रकिनारा.
अडचणी : सिंधुदुर्ग पाहण्यासाठी मिळणार फक्त एक तास. ह्या वेळेत किल्ला १० टक्के पण पाहून होत नाही.
थोडक्यात महत्त्वाचं :
कोकणातली भटकंती नितांत सुंदर असते ह्यात वादचं नाही. तुम्ही कोणत्या
उद्देशाने आलात हे ठरवून भटकंती केल्यास तुमच्या पदरात कोकण आगळं वेगळं
टाकील ह्यात शंकाच नाही.
वाटाड्या : सिंधुदुर्ग व्यवस्थित समजून घ्यायचा असल्यास एखादा माहितीगार सोबत असावा.
संदर्भग्रंथ :-
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) गड-किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- सतिश अक्कलकोट
३) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्रा.प्र.के.घाणेकर
४) जलदुर्गांच्या सहवासात- प्रा.प्र.के.घाणेकर
५) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे
६) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स'
७) श्री.अमित सामंत यांचे लिखाण







१६६८ मध्ये रायाजी भोसले येथे किल्लेदार होते असं इतिहासकार सांगतात.
१६७१ च्या सुमारासचे इंग्लिश दस्तऐवज असे सांगतात की शिवरायांनी
किल्ल्यांच्या देखरेखीसाठी पावणेदोन लाख होनांच्या रकमेची तरतूद केली होती.
त्यापैकी दहा हजार होन सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी होते




निशाण काठी म्हणून येथे एक जागा आहे. ही किल्याची सर्वात उंच असलेली
जागा याला टेहळणी बुरूज म्हणून देखील म्हणतात. सभोवताली नजर ठेवण्यासाठी
याचा वापर केला जाईल. नुसत्या डोळ्यांनी देखील वेंगुर्ला परिसर, मालवण
परिसर, निवतीचा किल्यापर्यंत नजर ठेवता येई.



कोल्हापूर ते मालवण :
- कोल्हापूर – कुणकेश्वर -तालेवाडी रोड, अंतर १५९ किलोमीटर ,प्रवासासाठी लागणारा वेळ साधारण चार तास.
- कोल्हापूर – कासल – मालवण मार्ग,अंतर १५५ किलोमीटर ,प्रवासासाठी लागणारा वेळ साधारण साडेचार तास.
- कोल्हापूर – वेंगुर्ला – बेळगाव रोड ,अंतर १९६ किलोमीटर, प्रवासासाठी लागणारा वेळ साधारण साडेचार ते पाच तास





खंत :
सध्या मुंबईत समुद्रात छत्रपती शिवाजीमहाराजांचा आश्वारुढ भव्य, उंच असा
पुतळा उभारण्याचे सरकारचे स्वप्न आहे. मी हा पुतळा बांधण्याच्या विरोधात
आहे. पुतळा उभारण्यासाठी कितीतरी कोटी रुपये खर्च होईल आणि एवढे पैसे खर्च
करून काय मिळणार आहे? एकीकडे छत्रपतींचे भव्य दिव्य पुतळे उभारायचे व
दुसरीकडे छत्रपतींचे प्रेम असलेल्या गड किल्यांची दुरवस्था होत असताना
पाहायची यासारखे दुर्देव्य नाही. शिवस्मारकावर ही उधळपट्टी करण्याऐवजी
छत्रपतींनी बांधलेल्या महाराष्ट्रातील किल्यांची ढागडुजी, ढासळलेली तटबंदी
पुन्हा बांधली, योग्य ते मार्गदर्शक (गाईड) ठेवले तर शिवरायांनी घडवलेला
इतिहास पुन्हा एकदा आजच्या व पुढच्या पिढीला नक्की कळेल. यातूनही चांगले
पर्यटन घडेल. या किल्यांची दुरुस्ती केल्यानंतर मग खरच बांधा
शिवाजीमहाराजांचा आश्वारुढ पुतळा. हेच महाराजांना अपेक्षित असेल ना...

कसे जावे :
- पुण्याहून : कोल्हापूर मार्गे सुमारे गगनबावडा मार्गे सावंतवाडी व तेथून मालवण : ४१० किलोमीटर
- मुंबईहून पेण, पनवेल, चिपळूण, लांजा, सावंतवाडी, मालवण. : ४८१ किलोमीटर
- मुंबई - पुणे - कोल्हापूर - मालवण : ५३३ किलोमीटर
राहण्याचे ठिकाण :
- तारकार्ली बिचवर एमटीडीसीची निवास्थाने आॅनलाईन बुकिंग करता येऊ शकतात.
एसी / नॉन एसी सुमारे २ ते ३ हजार रुपये एक दिवसासाठी असा दर आहे. या
शिवाय मालवण परिसरात स्थानिक लोकांच्या घराच्या परिसरात त्यांनी उपलब्ध
करून दिलेल्या खोल्यांमध्ये राहण्याची व जेवण्याची सोय होते. अंदाजे १ ते २
हजार रुपये असा एका दिवसाचा खर्च आहे.
- मालवण ते सिंधुदुर्ग किल्ला बोटीने : ९० रुपये प्रौढांसाठी तर ५० रुपये १२ वर्षांखालील.
- पार्किंगसाठी : ५० रुपये कार
या शिवाय :
- स्कुबा ड्राव्हिंगचा अनुभवही आपण या ठिकाणी घेऊ शकतो. माणसी ६०० रुपये असा खर्च आहे.
 |
| Bastion at Sindhudurg Fort before repairing |
 |
| Bastion at Sindhudurg Fort after repairing |
No comments:
Post a Comment