Monday, March 1, 2021

डच वखार (वेंगुर्ला कोट)

   प्राचीन काळी भारतातून सोने,मसाल्याचे पदार्थ्,नीळ्,मध ,कापड असे अनेक पदार्थ युरोपमधील देशांना निर्यात होत असत.उत्कृष्ट प्रतीच्या या वस्तुंचा मोह युरोपमधील नागरीकांना पड्ला नसता तरच नवल. अर्थात या वस्तुंचा व्यापार थेट हिंदुस्थान ते युरोपचे देश असा न होता, मध्ये अरब व्यापारी,अफ्रीकेतील मोझांबिक असे मध्यस्थ होते.मात्र हिंदुस्थानशी थेट व्यापार करायची निकड भासलेल्या युरोपियन देशांना हिंदुस्थानात येण्यासाठी समुद्रीमार्ग थेट दळणवळण संपर्क आवश्यक होता.यात कोलंबसने केलेला सर्वात आधीचा प्रयत्न फसला आणि तो पोहचला थेट अमेरीकेत.मात्र पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा याने दक्षिण अफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून अखेर हिंदुस्थानच्या किनार्‍यावर म्हणजे कालिकत बंदरात पोहचण्यात यश मिळवले.एकदा हा सागरी मार्ग खुला झाल्यावर पोर्तुगीजांच्या मागोमाग फ्रेंच्,डच आणि इंग्रज भारतात पोहचले.
 पोर्तुगिज, इंग्रज, फ्रेंच, डच इत्यादी युरोपातील विविध देशातील व्यापारी भारतात बनणारा माल (मसाले, सुती कपडे,सोन्या चांदीच्या वस्तू इ.) युरोपात विकून भरपूर नफा कमवत असत. तर युरोपात तयार होणारा माल (बंदुका, तोफा, दारू, काच सामान, लोकरीचे कपडे, दुरदर्शिका,चष्मे इ.) भारतात आणून विकत असत. भारताच्या दोन्ही किनार्‍यावर सोयीस्कर जागा पाहून या युरोपियन व्यापार्‍यांनी आपली व्यापारकेंद्रे स्थापन केली.मात्र व्यापार वाढीसाठी आणि मालाच्या व पैशाच्या सुरक्षिततेसाठी लष्करी संरक्षणाची आवश्यकता होती.या सागरी मार्गाने होणार्‍या व्यापारातील माल साठवण्यासाठी या परदेशी व्यापार्‍यांनी ठिकठिकाणी बंदरांजवळ आपल्या वखारी (वेअर हाऊस/ गोडाऊन) स्थापन केल्या. यासाठी अर्थातच स्थानिक सत्ताधार्‍यांचे सहकार्य आवश्यक असे.व्यापारा बरोबरच राज्य विस्तार हा सुप्त हेतू मनात असल्यामुळे अनेक ठिकाणी या वखारींची उभारणी किल्ल्यांप्रमाणे करण्यात आली होती. महारष्ट्राच्या सागर किनार्‍यावर पोर्तुगिज, इंग्रज, डच यांच्या वखारी होत्या. त्यापैकी डचांची एकमेव वखार वेंगुर्ले बंदरात आहे. वेंगुर्ले शहरात आजही या वखारीचे अवशेष पहायला मिळतात.
     वेंगुर्ले प्राचीन काळी एक प्रसिध्द व्यापारी बंदर असल्याने, सोळाव्या शतकात हिंदुस्थानात आलेल्या डच व्यापाऱ्याचे वेंगुर्ले येथे आगमन झाले. हॉलंडहून आलेल्या डच व्यापार्यांचा मराठी ऎतिहासिक कागदपत्रात "वलंदेज" या नावाने उल्लेख आढळतो. डच लोकांनी वेंगुर्ला हेच ठिकाण वखार बांधण्यासाठी का निवडले ? याचे कारण म्हणजे "वेंगुर्ले गाव व बंदर व येथील लोक सोयीचे वाटले.इथे पाणी व धान्यगोटा मुबलक मिळण्यासारखा आहे.ताजे मटण व फळेही मिळतात.शत्रुला इकडे त्रास देता येणार नाही.कारण हा सर्व भाग आदिलशहाचा आहे.लोक मैत्रीने वागतात व त्यांच्यातर्फे आम्हास गोव्यातील सर्व बातम्या मिळतात.गोव्यापासून हे फक्त सहा मैलावर आहे.आम्हाला आमच्या शत्रुंशीही लढण्यात त्यांचा फार उपयोग होउ शकेल.संबंध इंडीया घालवू पण डचांना इकडून हाकलू.ही जी पोर्तुगीजांची बडबड आहे, ती आम्ही सहज शांत करु".
Dutch Factory at Vingorla [Vengurla] 20122
      डचांनी सन १६३७ मध्ये आपला प्रतिनिधी जॉन्स व्हान यास विजापुरला आदिलशहाकडे वखार बांधण्याची परवानगी मिळविण्यास पाठवले.जॉन्स व्हॉन विजापुर दरबारी रुजु झाल्यावर पुढच्याच वर्षी रगियापुर या गावी वखार बांधण्याची परवानगी मिळाली.मात्र प्रत्यक्षात वखार काही उघडली गेली नाही.याच सुमारास पीटर पीट आणि त्याचे दोन मदतनीस वेंगुर्ल्याला आले.सुरत्,पार्शिया व इतरत्र जाणार्‍या डच जहाजांना लागणारा सर्व माल पुरवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.आदिलशहाने परवानगी तर दिलीच,पण वखार बांधण्यास आपले लोक पाठविले.विशेष म्हणजे ७ डिसेंबर १७३७ रोजी आदिलशहाने परवानगी दिली.पण लवकरच ती नाकारली.व नंतर पुन्हा देण्यात आली.
    सन १६४० मध्ये भाड्याच्या जागेत वखार बांधायचे ठरले. सुरवातीला डचांनी उभारलेली वखार दगड्,मातीने बांधलेली होती व आकारानेही लहान होती."२ मार्च १६३९ च्या पोर्तुगीज पत्रातील माहितीनुसार पुर्वीच डचांनी येथील घरे सुधारुन आपली फॅक्टरी (वखार ) तिथे उभी केली आहे".मात्र सुरवातील कच्च्या स्वरुपात उभारलेल्या या वखारीला वेंगुर्ल्याच्या धुवांधार पावसाने चांगलाच हात दाखविला. सन १६५४ च्या पावसात या वखारीचे चांगलेच नुकसान झाले.
    हि आधीची वखार बांधणारा डच व्यापारी प्रमुख लिंडार्ट जान्सझून्स ( Leendart Janszoons )याने नवीन मजबूत किल्ला पध्दतीची तटबंदीयुक्त वखार बांधली. त्यासाठी त्याकाळी तीन हजार गिल्डर (तीन हजार तोळे) एवढा खर्च आला.नेमके यासाठी ३४.५ किलो सोने लागले.यासाठी लिंडार्टने बटालिया इंडोनेशिया येथील संकल्पित डच वखारीच्या इमारतीच्या बांधकामाची शिफारस केली.तिकडून परवानगी येते कि नाही याची वाट न बघता वेंगुर्ला येथील वखार बांधायला सुरवात केली.
   यासंदर्भात ३० सप्टेंबर १६६३ च्या डाग रजिस्टरमध्ये असा उल्लेख आहे "वेंगुर्ल्याच्या वखारी सभोवतालची मातीची भिंत दगडी करण्याचे काम तूर्त पुढे टाकावे.लीरडाम गलबतावर ३० पोर्तुगीज कैदी आहेत.ते वेंगुर्ल्याला उतरवून मुक्त करावे".
 माल साठविण्याचे गोदाम तसेच गढी म्हणूनही याचा उपयोग व्हावा अशी तिची मजबूत बांधणी करण्यात आली होती. त्याठिकाणी दहा तोफा व दोनशे बंदुकीचा पहारा ठेवण्यात आला होता. वखारीवरील तोफांवर आफ्रिकेतील गुलामांची नेमणूक करण्यात आली होती. तर संरक्षणासाठी भारतीय सरंक्षक गार्ड होते. डच वखारीची इमारत पोर्तुगीज पध्दतीची आहे. वखारीची इमारत मजबुत तर बांधली गेलीच पण नक्षीदार खांब व कलाकुसरीने व रंगाने सुंदररीत्या सजविली होती.त्यासाठी कुंदापुरच्या जंगलातील सागवानी लाकुड वापरण्यात आले.वखारीच्या परिसरात फुलांची बाग फुलवण्यात आली.सन १६६० ते १६७० पर्यंत दरवर्षी ९ किलो सोने खर्चून लिंडार्ट्ने वखारीची बळकटी वाढवत नेली.वखारीच्या संरक्षणासाठी मजबुत बुरुज व ८ मीटर उंच व दिड मीटर रुंद तटबंदी उभारुन त्याच्याभोवती खंदक खणले.त्यावर पुलाची सोय करण्यात आली. अडचणीच्या वेळी हा पूल उचलून घेण्याची सोय होती. इ.स.१६७१ मध्ये बडीबेगमने हज यात्रेस जाण्यापूर्वी या वखारीत मुक्काम केला होता. वेंगुर्ल्याला उभारलेल्या वखारीमुळे या परिसरातील व्यापार्‍याला चालना मिळाली,इथून जपान्,पार्शिया या ठिकाणी व्यापार होत असे.
          पोर्तुगीज व डच यांच्यात हाडवैर असल्यामुळे डच वेंगुर्ल्याला वखार बांधण्याची हालचाल करीत आहेत असे दिसताच अशी परवानगी आदिलशहाने देउ नये यासाठी पोर्तुगीज प्रयत्न करत होते,त्याचवेळी डचांनी गोव्यावर आपली स्वारी केली.
   पोर्तुगीज व्हॉइसरॉय आपल्या राजास ५ मार्च १६३७ च्या पत्रात कळवितो "डचांनी गोवा बंदरास वेढले असताना डचांनी आपला वकील ( वेंगुर्ल्याच्या सुभेदाराकडे ) पाठवून विनंती केली कि त्यांना वेंगुर्ल्याला कोट बांधण्याची परवानगी द्यावी व आदिलशहाने आपल्या सैन्यासह जमीनीवरुन व डचांनी समुद्रातून गोव्यावर हल्ला चढवावा,हा वकील सुभेदाराकडे गेला असता त्याने त्यास आदिलशहाकडे पाठविले.तेव्हा पोर्तुगीज वकीलाने आपल्या वकीलास कळविले की,शक्य तेवढे करुन शत्रुच्या वकीलाची आदिलशहाशी भेट होणार नाही असे करा".
    आदिलशहाने डचांना सहाय्य करु नये म्हणून पोर्तुगीजांनी नमते घेउन आपला वकील विजापुरला पाठविला.आदिलशहाने सर्व खर्च पोर्तुगीजांकडून मागितला.त्यावर पोर्तुगीजांनी विनंती केली कि "डचांना वेंगुर्ल्यात थारा देउ नये." मात्र हि विनंती आदिलशहाने फेटाळून लावली.
         आदिलशहाने पोर्तुगीजांविरुध्द लढण्यासाठी डचांना साथ दिली नाही म्हणून डच नाराज होते.डचांनी सन १६३९ मध्ये गोव्यातून पोर्तुगीजांना हाकलून लावण्यासाठी पुन्हा एकदा योजना आखली.यात आदिलशहाने त्यांना सहाय्य करावे व मोबदल्यात गोव्याचा जिंकलेला प्रदेश आदिलशहाने घ्यावा.मात्र काही कारणाने या मोहीमेसाठी आदिलशहाने सैन्य पाठविले नाही,सन १६४१ मध्ये आदिलशहाने फर्मान काढून डचांना वेंगुर्ल्याच्या वखारीत तोफा,दारुगोळा वगैरे युध्दसाहीत्य ठेवण्याची व आणण्याची परवानगी दिली.या घटनेमुळे गोव्याला वेंगुर्ल्याची चांगलीच दहशत बसली.पोर्तुगीजांना सैदव वेंगुर्ल्याकडून धोका असल्याने या बाजुला शह बसला.
       सन १६४४ मध्ये डच व पोर्तुगीज यांच्यात तह झाला.डचांनी आदिलशहाच्या सुभेदारास कळविले "आपल्या यापुर्वीच्या संबधात काहीच फरक पडणार नाही,जेव्हा,जेव्हा व जिथे जिथे जरुर पडेल तेव्हा तेव्हा व तिथे तिथे साह्य व संरक्षण देउ.पोर्तुगीज आपल्या व्यापारात ढवळाढवळ करतील तेथील राजाला आपल्या विरुध्द चिथावतील.वेंगुर्ल्याच्या सुलतानाला ( आदिलशहाला) मात्र आपण मदत देण्याचे कार्य आपण चालुच ठेवले पाहीजे" असे डचांचे धोरण होते.
   डचांच्या वखारीमुळे वेंगुर्ला परीसरातील व्यापार भरभराटीस येउ लागला.म्हणून डचांना या परिसरातून काढून लावण्याचे पोर्तुगीजांचे प्रयत्न सुरु होते.गोव्याचा व्हॉइसरॉय २ मार्च १६३९ रोजी लिहीतो."मुस्तफाखानाने ( आदिलशहाचा वजीर ) या डचांना आदिलशाही बंदरातून आणि विशेषतः वेंगुर्ल्यातून हाकलून द्या म्हणून सांगितले.परंतु मैत्रीचा तह डावलून केवळ पैशाच्या इच्छेने त्यांनी तसे केले नाही.व करण्याची इच्छाही नाही.उलट या डचांनी तिथली घरे सुधारुन आपली फॅक्टरी (वखार ) उघडली आहे.मुर लोकांनी आपला व्यापार तेथेच वाढविला आहे.बालाघाटपासूनचे कापड व इतर वस्तुंचे व्यापारी आपले सर्व काफीले घेउन तिकडेच जातात".
  डचांना वेंगुर्ल्यातून काढणे पोर्तुगीजांना शक्य झाले नाही.डचांचे आरमार पोर्तुगीजांच्या तुलनेत बळकट होते.या सर्व घडामोडी तळकोकणात होत असताना इकडे मावळात शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेला सुरवात केली होती.या काळात सध्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदिलशहाचे राज्य होते. १० नोव्हेंबर १६५९ रोजी अफझलखानाला मारल्यावर मराठ्यांनी या प्रदेशावर स्वारी केली. डिसेंबर १६५९ ते जानेवारी १६६० या दरम्यान आदिलशहाचा चाकर लखम सावंत याचा पराभव करीत मराठ्यांनी फेब्रुवारी-मार्च १६६० मध्ये वेंगुर्ल्यापर्यंत धडक मारली.  
     मराठ्यांचे सैन्य कुडाळपर्यंत आल्याची बातमी वेंगुर्ल्यात पोहचताच तिथले रहिवासी घाबरले आणि मुख्य अधिकार्‍याबरोबर पळून जायच्या तयारीला लागले.या आणीबाणीचा परिस्थितीचा देखील लखम सावंतानी गैरफायदा घेतला.याबाबत डच लिहीतात "कटकट्या लखम सावंताने १५०० होन घेउन वेंगुर्ल्याच्या आदिलशाही अधिकार्‍यांना गाव सोडण्यास सांगितले.हे अधिकारी त्याची तक्रार करण्यास विजापुरला निघाले"
    मराठे वेंगुर्ला परिसरात पोहचले आणि वेंगुर्ला बंदर मराठ्यांच्या ताब्यात येण्याची शक्यता निर्माण झाली.मात्र त्याच वेळी स्वतः शिवछत्रपती सिद्दी जोहरच्या वेढ्यात पन्हाळ्यावर अडकले तर एक लाखाच्या फौजेनिशी शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला.या दुहेरी आक्रमणामुळे स्वराज्याचे लष्करी बळ पुण्याच्या आसपास असलेला मुख्य प्रदेश वाचविण्यासाठी एकवटणे आवश्यक ठरले. साहजिकच मराठी फौजा कुडाळ-वेंगुर्ला परिसरातून माघार घेउ लागल्या.या परिस्थितीत आदिलशाही अधिकार्‍यांनी वेंगुर्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. या घटनेचा उल्लेख डचांच्या डाग रजिस्टरमध्ये उल्लेख केला आहे "आदिलशहाने लखम सावंताकडे वेंगुर्ल्याच्या संरक्षणाचे काम सोपविले.पण त्याने शिवाजी पेक्षा लोकावर अधिक जबरदस्ती व दांडगाई केली.यामुळे सुरक्षितपणासाठी डच रेसिडेंटनी माल घेउन गोव्याला जावे असा सल्ला मिळाला".
     सन १६६० मध्ये आदिलशहाची आई बडी बेगम मक्केला जाण्यासाठी वेंगुर्ल्याला आली होती.मक्केची यात्रा करुन ती ९ सप्टेंबर १६६२ रोजी वेंगुर्ल्यास पोहचली.डचांनी फुलवलेल्या बागेतच बड्या साहेबीणीने मुक्काम केला.याच वेळी या बड्या बेगमेने एक आदेश जारी केला कि "वेंगुर्ल्याचा व्यापार उत्तरोत्तर वाढवा म्हणून वेंगुर्ले किंवा बंदर हे नाव बदलून त्याला यापुढे शहाबंदर म्हणावे". अर्थात हे नाव काही रुजले नाही.वेंगुर्ला हे नावच रुढ झाले. दोन दिवस विश्रांती घेउन ११ सप्टेंबर रोजी बडी साहेबीण विजापुरला परत निघाली. डचांनी तीला आंबोलीपर्यंत सोबत करुन निरोप दिला.
    स्वराज्यावर आलेली सिद्दी जोहर आणि शाहिस्तेखान या दोन्ही संकटांवर मात करुन शिवाजी महाराज १३ एप्रिल १६६३ रोजी दक्षिण कोकणात उतरत कुडाळ वगैरे काबीज करत मे महिन्याच्या अखेरीस   वेंगुर्ल्यास आले.शिवाजी महाराजांनी हेरामार्फत निरोप पाठविला कि,"आपल्या मनात वेंगुर्ला स्वतःच्या अंमलाखाली घेण्याचे आहे.त्या बध्दल रेसिंडेटचे म्हणणे काय पडते ?आमच्याबध्दल भिती वाटून रेसिडेंटने मालाच्या सुरक्षितपणाबध्दल खटपट चालविली आहे.पण तशी भिती बाळगू नये. कारण आमच्या मनात कोणत्याही तर्‍हेने वैरभाव नाही."
   यावर डच रेसिडेंटने उत्तर पाठविले "आम्ही व्यापारी असल्यामुळे युध्दाच्या बाबत सल्ला देता येत नाही".
शिवाजी महाराज वेंगुर्ल्याजवळ येताच वेंगुर्ल्याच्या आदिलशाही हवालदार घाबरुन न लढताच गोव्याला पोर्तुगीजांचा आश्रयाला पळून गेला. या आधीच आदिलशहाचे बाकीचे हवालदार व देसाई पळून गेले होते.यासंदर्भात पोर्तुगीज व्हॉइसरॉयने आदिलशाही खवासखानाला १३ डिसेंबर १६६४ रोजी पत्र लिहीले "इतर देसाई आणि आमच्या राज्यात शिवाजीच्या भयाने पळून आलेले आहेत.आणि वेंगुर्ल्याचे हवालदारही येथे सुखरुप आहेत".मात्र हे पत्र खानास मिळण्यापुर्वी स्वतः खवासखानच शिवाजी राजांकडून पराभुत होउन निघून गेला.
 शिवाजी महाराजांनी वेंगुर्ला ताब्यात घेतले आणि लखम सावंतापासून उपसर्ग पोहचू नये म्हणून सुभेदार नेमून त्याच्या हाताखाली बंदोबस्तासाठी काही शिपाई ठेवले.हि माहिती १७ नोव्हेंबर १६६३ च्या पत्रात मिळते.
  आदिलशहाने कुडाळ वगैरे प्रदेश घेण्यासाठी खवासखानाला रवाना केले.तेव्हा शिवाजी महाराजांनी खवासखानाचा पराभव करुन कोकणातील आदिलशहाच्या ताब्यातील मुलुखाची लुट केली.शिवाजी महाराज वेंगुर्ला परिसरात असतानाच त्यांचे आरमारी अधिकारी दर्या सारंग व मायनाक भंडारी ९० गलबतांसह वेंगुर्ले बंदरात दाखल झाले.
     मराठ्यांच्या आरमारासंदर्भात वेंगुर्ल्याच्या डच वखारीचा प्रमुख आपल्या गव्हर्नर जनरलला लिहीलेल्या २२ जानेवारी १६६५ च्या पत्रात माहिती देतो "३ नोव्हेंबर १६६४ रोजी शिवाजी सुमारे ६५ लोकांच्या आरमाराने वेंगुर्ला वंदरात शिरुन तिथे असलेली दोन लहान जहाजे काबीज केली.त्यापैकी एक कानड्याचे होते.दुसरे बडे साहीबीणीचे ( आदिलशहाची आई ) होते.मराठ्यांचे आरमार बंदरात शिरले तेव्हा ते जहाज नांगरलेले नव्हते.त्याने प्रखर प्रतिकार केला.चार तासाच्या लढाईनंतर ते काबीज केले.या लढाईत मराठ्यांनी साठ माणसे गमाविली.मराठ्यांनी ते जहाज काबीज केले तेव्हा त्याच्या कप्तानाने निराश होउन स्वत:ला भोसकून घेतले.त्यानंतर ते जहाज खारेपाटण ( विजयदुर्ग ) येथे नेण्यात आले आणि त्यातील माल घेरीयाच्या किल्ल्यात साठवून ठेवण्यात आला.१४ नोव्हेंबर १६६४ रोजी शिवाजीचे तीस नौकांचे एक आरमार दौलतखानाच्या अधिपत्याखाली पुन्हा वेंगुर्ल्यात आले.त्यांनी येमेनचे जहाज काबीज करण्याचा प्रयत्न केला.पण त्यात यश आले नाही.२० नोव्हेंबर रोजी सकाळी मराठ्यांचे सुमारे दोनशे टन वाहन क्षमतेच्या एका जहाजाचा पाठलाग करीत पुन्हा वेंगुर्ला बंदरात शिरले.त्या जहाजावर चौदा तोफा आणि शंभराहून अधिक माणसे होती.त्यात दोन इंग्रज गोलंदाज होते.ते सुरतेहून आलेले होते.त्याचे रक्षण करावे असे गियासुद्दीन खानाच्या वतीने डच डायरेक्टरने वेंगुर्ल्याच्या डचांना कळविले होते.ते मराठ्यांच्या हाती सापडू नये म्हणून त्यातील खलाशांनी ते किनार्‍यावर धडकवले, पण मराठ्यांनी त्या जहाजावर चढून ते काबीज केले आणि त्यातील खलाशी ताब्यात घेउन आपल्या विवीध गलबतावर विखरुन ठेवले.त्यानंतर मराठ्यांच्या गलबतांनी ते जहाज ओढत नेले.याचे सर्व रहीवाशांना आश्चर्य वाटले.कारण मराठे ते जहाज काबीज करु शकणार नाहीत अशी त्यांची खात्री होती.६ डिसेंबर १६६४ रोजी मराठ्यांनी डच कंपंनीचे दलाल काशिबा व शेणवी यांचे वेंगुर्ले बंदरात नांगरुन उभे असलेले एक छोटे जहाज काबीज केले.नांगराचे दोर तोडून निघून जा असा सल्ला दर्यासारंगाने त्या जहाजाच्या नाखव्याला दिलेला होता.तरीही त्याने जहाज काबीज होउ दिले.जहाज खारेपाटणला नेण्यात आले.२६ डिसेंबर रोजी मराठ्यांनी एका जहाजाचा पाठलाग केला,पण र्ते जहाज डचांचे आहे असे समजल्यावर त्यांनी पाठलाग सोडून दिला. ५ जानेवारी १६६५ रात्री शिवाजी सकृतदर्शनी काही कारण नसताना त्याच्या गलबतासह वेंगुर्ले मार्गे घाईघाईने निघून गेला आणि त्याचे घोडदळही खुष्कीच्या मार्गे ( म्हणजे जमीनीवरुन ) निघून गेले".या स्वारीच्या वेळी शिवाजी महाराज वेंगुर्ल्यास दोन हजारची शिबंदी थेवून घोडदळाबरोबर माघारी फिरले आणि महाबळेश्वरास गेले.
     खवासखानाचा पराभव केल्यावर शिवाजी महाराजांनी आदिलशाही प्रदेशात केलेली लुट आणि त्यांच्या आरमाराने १ नोव्हेंबर पासून ७ डिसेंबर १६६४ पर्यंत वेंगुर्ले व इतर बंदरामध्ये उभे असलेली व पार्शिया व मस्कतवरुन वेंगुर्ले बंदराकडे येत असलेली जहाजे तसेच पोर्तुगीज मुलुखातून धरलेली जहाजे यातून बरीच संपत्ती मिळविली.यासंदर्भात डच वखारीचा प्रमुख लेनार्त्सने डच गव्हर्नर जनरलला २२ जानेवारी १६६५ च्या पत्रात लिहीले आहे "शिवाजी राजाने बा़जी घोरपडेला मारुन खवासखानास पराभुत करीत वेंगुर्ले व इतर बंदरात जहाज धरुन व जमीनीवरुन केलेली लुटीतून वीस लाख सुवर्णमुद्रा ( २८ लाख होन ) एवढ्या किंमतीची लुट शिवाजीस मिळाली".  तसेच २३ मार्च १६६५ रोजीच्या पत्रात हाच लेनार्त्स लिहीतो "शिवाजीला जमीनीवर व समुद्रातून मिळालेली लुट गतवर्षी त्याच्या सुरतेतून मिळालेल्या लुटीपेक्षा जास्ती आहे असे मानले जाते".
   डाग रजिस्टर मधील १२ जुन १६६५ रोजीच्या माहितीनुसार डचांचा माल लुटून तो ( शिवाजी महाराज ) खारेपाटणला जाउन बसला आहे.आदिलशहाने वेंगुर्ल्याच्या रक्षणासाठी नेमलेल्या लखम सावंताने जास्त लोकांवर जबरदस्ती व दांडगाई केल्याने डच रेसिडेंटने गोव्याला जावे असा सल्ला मिळाला.परंतु शिवाजी महाराजांनी डच व्यापार्‍यांना अभयदान दिल्याने डचांनी वेंगुर्ला सोडले नाही.
मिर्झाराजे जयसिंग व दिलेरखान यांनी स्वराज्यावर केलेल्या आक्रमणामुळे स्वराज्याच्या सर्व लष्कराचे लक्ष तिकडे केंद्रीत झाल्याचा फायदा घेउन आदिलशहाने कुडाळच्या आसपासचा मुलुख पुन्हा जिंकून घेतल्यावर हकीम शमसा हा वेंगुर्ल्याचा अधिकारी झाला.त्याने एक दारुडा सुभेदार नेमला होता.त्याने प्रजेवर अनन्वित जुलुम केले.सन १६६६ च्या नोंदीप्रमाणे वेंगुर्ला आदिलशहाच्या ताब्यात होते.शिवाजी महाराज आग्र्याला कैदेत असताना मराठयांनी सन १६६७ मध्ये वेंगुर्ला घेतले आणि याच महिन्यात शिवाजी महाराज आणि आदिलशहा यांच्यात तह झाला.पोर्तुगीज हे लखम सावंत आणि इतर बंडखोर देसायांना आश्रय देतात म्हणुन सन १६६७ मध्ये शिवाजी महाराजांनी बारदेशवर स्वारी केली.यावेळी वेंगुर्ल्याच्या डचांनी त्यांना दारुगोळ्याची मदत केली.यापुर्वी डचांनी शिवाजी महाराजांकडे लखम सावंतांची तक्रार केली कि पोर्तुगीजांच्या सांगण्यावरुन त्यांच्या आश्रयाने लखम सावंतांनी डचांना त्रास दिला.
 सन १६७२ मध्ये वेंगुर्ला परिसरात अशांतता असल्यामुळे डचांनी तिथली वखार बंद करण्याचा निर्णय घेतला.यासबंधी ३१ जानेवारी १६७५ रोजीच्या डच रिपोर्टमधील माहिती अशी "शिवाजीचे वेंगुर्ल्यातील अधिकारी आमच्याशी मित्रत्वाने वागतात.आम्ही तिथे पुन्हा वखार घालावी अशी त्यांची इच्छा आहे,तथापि आम्हाला अनुकुल निर्णय घेता येत नाही.गोव्यापासून ८ मैलावर शिवाजीच्या हद्दीबाहेर कोंडेवार हे ठिकाण आज आमच्या मंडळींना बरे वाटले"
      नोव्हे १६७६ मध्ये शिवाजी महाराजांच्या अधिकार्‍यांची डच कंपनीशी बोलणी चालु होती.अखेर डचांनी आपली वखार बंद करण्याचा निर्णय मागे घेतला.सन १६७७ मध्ये मराठ्यांनी डचांकडून तांबे खरेदी केले.
   मार्च १६७५ मध्ये शिवाजी महाराज राजापुरास आलेले असताना इंग्रजांनी त्यांना नजराणा दिला.तेथून जाण्यापुर्वी ४० गलबते त्यांनी वेंगुर्ल्याकडे रवाना केली.पण हे कशासाठी याची माहिती मिळत नाही.जंजिर्‍याच्या सिद्दीचे आरमार २० नोव्हेंबर १६७५ रोजी वेंगुर्ले येथे जाळपोळ करुन पसार झाले होते. 
वेंगुर्ला येथील काही लोक शिवाजी महाराज बांधत असलेल्या किल्ल्यांवर काम करीत होते.सप्टेंबर १६७७ मध्ये शिवाजी महाराज विल्यम लाँगहॉर्न याला लिहीतात "तोफा नेण्याकरीता लागणारे मोठे गाडे करण्याचे काम करु शकणारे,त्याचप्रमाणे सुरुंग लावून मोठ्या दगडी भिंती पाडण्याचे ज्ञान असलेले गोवे,वेंगुर्ल्याकडील लोक आमच्यापाशी होते.परंतु त्यांना आम्ही आमच्या निरनिराळ्या गडांवरील कामात नियुक्त केले आहे"
   वेंगुर्ल्यातील मचवे व तांदळांने भरलेली जहाजे पोर्तुगीजांनी धरणे व पोर्तुगीजांची जहाजे मराठ्यांनी पकडणे या घटनांमुळे वेंगुर्ल्याचे हवालदार तानाजी राम व व्हॉईसरॉय यांच्यात अनेक पत्रव्यवहार झाले.
   जंजिर्‍याचा सिद्दी १६८० च्या अखेरीस वेंगुर्ल्यास आला होता.संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांविरुध्द स्वारी केली तेव्हा मोघल आरमार घेउन सिद्दि वेंगुर्ल्यास ऑक्टोबर मध्ये आला होता.संभाजी महाराज व औरंगजेब यांच्यातील संघर्षात औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याला संभाजी महाराजांनी आश्रय दिला होता.तो सन १६८३ मध्ये वेंगुर्ल्यास आला असताना मोघलांचे आरमार त्याला पकडण्यासाठी वेंगुर्ला इथे आले.मोघलांनी अकबराने तयार केलेली जहाजे जाळुन टाकली.
     शहाजादा शहाआलम सन १६८४ मध्ये प्रचंड सैन्यासह कोकणात उतरुन डिचोलीहून वेंगुर्ल्यास आला. मोघलांचे प्रचंड सैन्य येत असल्याचे पाहून वेंगुर्ल्याचे लोक पळून गेले.त्यामुळे मोघलांना विरोध झाला नाही.किनार्‍यावर मोघल आरमार होतेच.वेंगुर्ल्याची जमीन व समुद्र मोघलांनी व्यापले.मोघलांनी वेंगुर्ला लुटले.वेंगुर्ल्याच्या वखारीत शाही मेजवान्या झडत होत्या.यात अमीर ऊमरावांबरोबर पोर्तुगीज वकील सुध्दा असत.राजपुत्राचा मुक्काम त्याच्या शाही शामियान्यात असे.अखेर शहाआलमला मराठ्यांनी घाटावर जाण्यास भाग पाडले.प्रचंड हानी सहन करत मोघल घाट चढले. मोघल घाटावर गेल्याचे पाहून मराठ्यांनी पुन्हा सन १६८४ मध्ये वेंगुर्ले ताब्यात घेतले.
     संभाजी महाराजांच्या विरुध्द देसाई व सावंत यांना पोर्तुगीज सहाय्य करित होते.व्हॉइसरॉय आपल्या राजास २४ जानेवारी १६८६ रोजी लिहीतो "डिसेंबर १६८५ मध्ये बंडाळ्या करणार्‍या देसायांना मदत व्हावी म्हणून मी आमच्या आरमाराला वेंगुर्ले नदीच्या मुखाशी आणून ठेवले आहे.आमच्या आरमारामुळे शत्रुला बाहेरुन मदत मिळणे बंद झाले आहे.तेव्हा त्याने घाटावरुन घोडदळ आणले".
    संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर लवकरच वेंगुर्ला मोघलांनी घेतले.खेम सावंत मोघलांना सोडून मराठ्यांकडे आला आणि पुन्हा मोघलांना सामिल झाला.खेम सावंताने ऑक्टोबर १६९६ मध्ये वेंगुर्ल्याच्या किल्ल्यास वेढा घातला तेव्हा वेंगुर्ला मोघलांकडे होते.खेम सावंत स्वताला मोघलांचा किल्लेदार म्हणवत असला तरी मराठ्यांपासून बचावासाठी त्याने किल्ला घेतल्याचे म्हणले.मोघलांना त्याचे म्हणणे पटले असले तरीही वेंगुर्ला पुढे काही वर्ष मोघलाईत राहीले.आणि सावंताच्या आज मराठ्यांच्या पक्षात तर उद्या मोघलांकडे असा प्रवास सुरुच राहीला.
         सन १७०७ ला औरंगजेबाच्या मृत्युनंतर मराठ्यांच्यात शाहुराजे व ताराराणी असे दोन पक्ष व दोन गाद्या झाल्यावर सावंतानी ताराराणीचा पक्ष स्विकारत वेंगुर्ले आपल्या ताब्यात ठेवले आणि सन १७०८ मध्ये ताराराणीकडून तशी सनद आणली आणि विशेष म्हणजे शाहु महाराजांचा विरोध होणार असे दिसल्यावर तशी सनद शाहु महाराजांकडून सुध्दा आणली.
       सन १७१७ मध्ये सावंतांची चाचेगिरी थांबवण्यासाठी इंग्रज गव्हर्नर बुन याने विक्स यास रवाना केले.परंतु वेंगुर्ला बंदर खडकाळ असल्यामुळे व त्याच्याजवळ लाटा उसळत् असल्यामुळे इंग्रजांना किनार्‍यावर उतरता येईना.अखेर इंग्रज किल्ल्याजवळील जमीनीवर उतरले व किल्ल्यावर तोफांचा भडीमार सुरु केला.लढाई सुरु असतानाच वीक्स व स्टँटेगन यांच्यात भांडण झाल्याने इंग्रजांनी माघार घेतली.याचा अर्थ डचांनी वेंगुर्ल्याची वखार यापुर्वीच सोडून दिली होती असे दिसते.
    सावंत्,आंग्रे आणि करवीरकर यांच्यातील आपसातील वैमनस्याने वारंवार वेंगुर्ला इथे हल्ले होत.याला वैतागून डचांनी वेंगुर्ल्याची वखार सोडून दिली होती. डचांनी आपली नवीन वखार मालवणास घातली.त्या दृष्टीने मार्च १७३६ मध्ये करवीरकर छत्रपतीं संभाजी राजेंशी करार झाला.त्यात असे ठरले कि "महाराजांनी आपणास मालवणंच्या बंदरी वखार बांधण्यास जागा दिल्ही आहे.तो वेंगुर्लेस वखार होती त्याप्रमाणे आपला खर्च लावून बांधोन घ्यावी.वेंगुर्लेस पहीले आपले चालवित होतो तैसे चालवावे.म्हणोन पुर्वी वेंगुर्लेस फोतोरी म्हणून वखार होती ते लुटुन नेली.त्या गोष्टीचे आपले मनामध्ये काहीही नाही.आणखी टोपीकर वखारीस जागा मागतील त्यास तेथे जागा न द्यावा".  
    सावंतांच्या कुरापतीमुळे डिसेंबर १७४८ मध्ये पोर्तुगीज व्हॉईसरॉयने आपले आरमार घेउन सावंतांच्या प्रदेशावर हल्ला करुन निवतीचा किल्ला हस्तगत करुन तो वेंगुर्ल्याच्या दिशेने निघाला.पोर्तुगीजांना तोंड देण्याइतके बळ नसल्यामुळे सावंतांनी वेंगुर्ले कोटाचा काही भाग पाडून वेंगुर्ले सोडले.बेवारस झालेल्या वेंगुर्ल्यात पोर्तुगीज शिरले आणि कोटाची मोडतोड करुन लुटमार करुन गोव्यास परतले.पोर्तुगीजांची पाठ फिरताच सावंत पुन्हा वेंगुर्ल्यात आले आणि त्यांनी कोटाची दुरुस्ती केली.
    सन १७५३ च्या सावंतांच्या गृहकलहात जयराम सावंत याने आंग्रेंच्या मदतीने वेंगुर्ल्यावर हल्ला चढविला होता.यासंदर्भात सावंतांचे कारभारी जिवाजी विश्राम याने व्हॉईसरॉय यास लिहीले "जयराम सावंत राजकारण करुन आंगरेसी आरमार आणून वेंगुर्ल्यास भांडत आहेत.वचन दिले ते स्मरण करुन गनिमास ( आंग्रे ) मारुन कोट राखतील यैसा पुर्ण भरवसा सावंत हे पोर्तुगीजांचे मांडलिक म्हणवित तेव्हा त्यांनी सहाय्य करावे अशी त्यांची अपेक्षा होती,आंग्रेना वेंगुर्ले घेता आले नाही".
         इंग्रजांनी सन १७६६ मध्ये करवीरकरांवर हल्ला चढवित वाडीकरांचे यशवंतगड व भरतगड हे किल्ले काबिज केले. तसेच रेडीचा किल्ला ताब्यात घेतला.सावंतानी इंग्रजांशी रेडी येथे २४ ऑक्टोबर १७६६ रोजी तह केला.त्यावेळी झालेल्या तहात इंग्रजांनी भरतगड किल्ला परत केला व युध्द खर्चापोटी २ लाख रुपये मिळेपर्यंत वेंगुर्ला तेरा वर्ष इंग्रजांच्या ताब्यात राहील अशी अट घातली.तसेच सावंताचे विठोजी सबनीस व दळवी हे इसम मुंबईला रहातील असे ठरले.सन १७७१ मध्ये इंग्रजांकडे ओलिस असलेले लोक पळून आले आणि इंग्रजांचे लोक वसुलीला वेंगुर्ल्याला गेल्यावर सावंतांच्या लोकांनी त्यांना विरोध केला. सावंत हे पुर्ण रकमेची फेड करु शकले नाहीत. इ.स.१७८० पर्यंत वेंगुर्ला इंग्रजांच्या ताब्यात होते.तेरा वर्ष पुर्ण होताच त्यांनी इंग्रजांच्या लोकांकडे ( ज्यांच्याकडे कोट गहाण होता ) त्यांच्याकडे वेंगुर्ला परत मागितले.मात्र सावंतांनी पुर्ण रकमेची परतफेड केली नसल्यामुळे इंग्रजांनी त्यांना नकार दिला.त्यावर वाडीकरांनी हल्ला करून वेंगुर्ला शहर व कोट ताब्यात घेतले.
  बादशहाकडून मोरचेल आणल्यामुळे नाराज झालेल्या करवीरकरांनी सावंताच्या प्रदेशावर सन १७८७ मध्ये हल्ला केला आणि बा़कीच्या प्रदेशाबरोबरच  वेंगुर्ला कोट ताब्यात घेतला.त्यांना प्रतिकार करण्यासाठी सावंताने डचांकडे दोन हजार होन आणि २४०० पौंड दारुगोळयाची मागणी केली. मात्र डचांनी केवळ ६०० पौंड दारुगोळा दिला. सावंतांना लढून वेंगुर्ले घेता आले नाही.पुढे सन १७९३ मध्ये करवीरकरांनी वेंगुर्ले व इतर किल्ले सावंताना परत दिले.
     सावंतांच्या समुद्रावरील चाचेगिरीचा इंग्रजांना त्रास होउ लागला.तेव्हा त्यांनी ऑक्टोबर १८१२ मध्ये सावंताना तह करण्यास भाग पाडले.तहास असे ठरले कि सावंतांची चाचेगिरी बंद करण्यासाठी वेंगुर्ले कोट्,बातेरी ( तोफखाना ) चौकी,गणोराम टेंब व बंदर इंग्रजांना द्यावे.वेंगुर्ले किल्ल्यात असणारे सरदार व शिबंदी वगैरे लोक पाहतील त्यास जंगी सरंजाम  व खावयाचे जिन्नस देखील बिलावती येईल.त्यास तुमची चौकशी असु नये"
     करवीरकरांचा भरतगड घेतल्यावर तो परत घेण्यास इंग्रजांना सैन्याचा वापर करावा लागला.याच्या मोबदल्यात इंग्रजांनी सन १८१३ मध्ये वेंगुर्ल्याचा जो भाग सावंतांच्या ताब्यात होता तो देखील घेतला आणि वर काही महिन्यांनी सावंतांनी कळविले की "वेंगुर्ले हि तुम्ही खर्चा पोटी दिलेली देणगी नसून तो आम्ही जिंकलेला मुलुख आहे". अशा तर्‍हेने इंग्रजांनी संपुर्ण वेंगुर्ले स्वतःच्या अंमलाखाली आणला.
   सन १८६२ मध्ये वेंगुर्ल्याचा कोट चांगला स्थितीत होता,किल्ल्यात शिबंदी होती.व पाच लहान तोफा होत्या.पाणी विपुल होते.इंग्रज लोक कोटाचा वापर शस्त्रागार व कोठार म्हणून करीत होते.
Dutch Factory - Picture of Dutch Factory, Vengurla - Tripadvisor
    अशी हि इतिहासप्रसिध्द वखार उर्फ डचांनी बांधलेला भुईकोट किल्ला मोठ्या आशेने पहायला वेंगुर्ल्याला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहर सावंतवाडी पासून ३२ किमी अंतरावर आहे. मुंबई पासून कोकण रेल्वेने सावंतवाडीला जाता येते. तेथून एसटीने वेंगुर्ल्याला जाता येते.किंवा मुंबई - पुण्याहून वेंगुर्ल्यासाठी थेट एसटी सेवा आहे. वेंगुर्ल्याच्या बाजारातून बंदरावर जाणार्‍या रस्त्यावर डाव्या बाजूच्या एका गल्लीच्या टोकाला वखार आहे. ह्या वास्तूकडे बघून क्षणभर आत घुसण्याचं धाडस होत नाही. आत गेलो आणि कोसळली तर? आज पडेल, की उद्या अशी तीची सध्याची अवस्था आहे. बाहेर तसा बोर्डच लावलाय.
      वेंगुर्ल्याची वखार म्हणजेच डच फातोरी हि खाडीच्या तोंडाशी जहाज लागु शकेल अश्या धक्क्याशेजारी उभी केलेली आहे.या वेंगुर्ला वखारीविषयी इंग्रजी,डच्,पोर्तुगीज्,स्पॅनिश आणि मराठी भाषेत थोडी माहिती उपलब्ध आहे.पण ती फारशी एकत्रित स्वरुपात उपलब्ध नाही. या वखारी संबंधी सर्व कागदपत्रे पुढे मलबार फॅक्टरी रेकॉर्डस या नावाखाली हॉलंडमध्ये जपून ठेवली आहेत.पण अद्याप त्याचा कोणी अभ्यास केलेला नाही.यावर वेंगुर्ल्याचे वकील श्री.राम आजगावकर यांनी किरातच्या दिवाळी अंकात एक माहिती देणारा लेख लिहीला.   
      वेंगुर्ले वखारीची  तटबंदी १० फूट उंच व १ मीटर रूंद आहे. वखारीच्या चारही टोकाला पोर्तुगिज धाटणीचे चौकोनी बुरुज आहेत. बुरुजांमध्ये तोफा ठेवण्यासाठी जंग्यांची रचना केलेली आहे.
 वखारीच्या प्रवेशव्दाराची कमान अर्धवर्तूळकार आहे. प्रवेशव्दाराच्या आतल्या बाजूस पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. 
प्रवेशव्दातून आत शिरल्यावर समोरच ३० मीटर लांब व १५ मीटर रूंद दुमजली इमारत आहे. या इमारतीची बरीच पडझड झालेली आहे, तरी आपल्याला दुसर्‍या मजल्यावर जाता येते. इमारतीच्या मागच्या बाजूस चौकोनी विहिर आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी सुंदर जीना आहे. 
दोनही मजल्यावर भरपूर दालन आहेत. पहिल्या मजल्यावरील एका दालनाच्या भिंतीत समोरासमोर अनेक खोबण्या आहेत व त्यातील बर्‍याच खोबण्यांत लाकडाचे तुकडे आहेत. 
या ठिकाणी पूर्वी लाकडाची मांडणी (रॅक्स) असावी, त्याचा उपयोग काच सामानाच्या वस्तू ठेवण्यासाठी होत असावा असा तर्क करता येतो. कधीकाळी हि इमारत किती सुंदर असावी याचा फक्त आज तर्क करता येतो.

     इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर जाण्यासाठी अरूंद जीना आहे, वरून संपूर्ण वखार दृष्टीच्या टप्प्यात येते.किल्ल्यात विहीर देखील आहे.मात्र पडझड सुरु असल्याने किल्ला संपुर्ण पहाणे अशक्य होउन बसले आहे.

१९६३ सालापर्यंत या वखारीच्या जागी सरकारी कार्यालये होती. त्यानंतर ही इमारत खाली झाल्यावर त्यातील तुळ्या, वासे, दरवाज्या चौकटी हे सामान चोरीस गेले व इमारतची पडझड होऊन ती केवळ अवशेष रुपाने उभी आहे. 
बारकाईने पाहिले तर तशी देखणी वास्तू आहे, परंतु ती आता दुरुस्त करणे अवघड होऊन बसले आहे. सन १९०९ साली 'Album of architectural and topographical views, mostly in South Asia' या पुस्तकासाठी एका अज्ञात फोटोग्राफरने काढलेले फोटो हि आठवण फक्त उरली आहे.वखारीवरील तोफा आज तेथे नाहीत पण वेंगुर्ला बंदरावर २ तोफा उलट्या पुरलेल्या पहायला मिळतात, त्यांचा उपयोग बोटी बांधण्यासाठी केला जातो.
डच वकिलातीने १९८३ मध्ये या डच वखारीच्या संरक्षणाची मागणी केली व तिकडे होणा-या दुर्लक्षाकडे पंतप्रधान इंदिरा गांधीचं लक्ष वेधलं, तेव्हा खास बाब म्हणून दहा हजार रुपये खर्चून डागडुजी केल्याचं फक्त नाटक केलं गेलं.. महाराष्ट्र देशी सातवाहन, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, कदंब आदी सत्तांनी महाराष्ट्रात फार प्राचीन काळापासून दुर्गबांधणी केली. मोगल , बहामनी , अबिसिनियन सिद्दी , इंग्रज , पोर्तुगीज , मराठे यांनीही काही दुर्गरचना केली. पण डचांनी बांधलेला हा एकमेव किल्ला आपण जपला पाहिजे, नाहीतर हा वास्तुविशेष नष्ट झाला की हळहळत बसावं लागेल. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. त्यात डचांची एकमेव वखार वेंगुर्ले बंदरात आहे. त्याची डागडूजी करून त्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिल्यास ते एक चांगले पर्यटन केंद्र होऊ शकेल. या वखारीतून आयात -निर्यात होणार्‍या वस्तू, त्याकाळचे डचांचे पोषाख, पुतळे, तोफा यांच्या प्रतिकृती यात ठेऊन पर्यटकांना आकर्षित करता येईल.अर्थात हे होईल तेव्हा होईल.सद्यस्थिती अतिशय खराब. पडून जायच्या आधी बघून घ्यावी.
    वेंगुर्ल्याच्या वखारीबरोबरच आवर्जून पाहावी अशी परिसरातील ठिकाणे : वेंगुर्ला तालुका :- वेंगुर्ला रॉक्स, श्री सातेरी देवी, श्री रामेश्वर मंदिर, कनया रेडीची नवदुर्गा, हत्तीचा डोंगर, सिद्धेश्वर मंदिर-रेडी, मठगाव मांगल्याचा मठ व शिलालेख.
सावंतवाडी तालुका :  रामतीर्थ, वझरा-सखलाचा फेसाळ धबधबा, हुतात्मा स्मारक-पत्रादेवी, श्री रवळनाथ - ओटवणे येथील मोठी घंटा.मालवणहून खाजगी वहानाने सकाळी निघून निवतीचा किल्ला(२५ किमी) + वेंगुर्ल्याची डच वखार (३० किमी) + यशवंतगड रेडी(२० किमी) + तेरेखोलचा किल्ला(७ किमी) पाहून मालवणला परत येता येते किंवा तेरेखोलहून(४० किमी) पणजीला मुक्कामी जाता येते.

संदर्भग्रंथ :-
१) सिंधुदुर्ग जिल्हा गॅझेटीयर-
२) गड्,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे -सतिश अक्कलकोट
३) जलदुर्गांच्या सहवासात -प्र.के.घाणेकर 
४)  www.trekshitiz.com  हि वेबसाईट
५) www.durgbharari.co.in  हि वेबसाईट
६)  www.konkankatta.in/2014/09/dutch-wakhar.html हि वेबसाईट
७)  माझा वेंगुर्ला - Maza Vengurla हे फेसबुक पेज



Dutch Wakhar



 
 
 


















 


















































No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...